एव्हरेस्ट बेस कॅम्पची बखर
२९ एप्रिल ते १० मे २०१८
-By Guest writer Mr. Pramod P Karajagi

प्रस्तावना

‘थ्री पॉईंट ऍडव्हेंचर’च्या टीम बरोबर मला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करायला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. मी बेस कॅम्पच्या ट्रेकला जाणार हे मला जाण्याच्या चार महिने आधी पण माहिती नव्हते. अशाच एका प्रसंगी सुरेंद्रची भेट झाली आणि ध्यानीमनी नसताना हे ठरलं. आयुष्यात बऱ्याच गोष्टी अशाच होतात. पण मी एकदा हो म्हंटल्यावर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करू लागलो. हळूहळू मला या संस्थेची अधिक माहिती मिळत गेली. आणि एकेक गोष्टी घडू लागल्या. माझे ट्रेकसाठी शूज घेण्यापासून, शर्ट व पॅन्ट घेण्यापर्यंत माझ्या सोबतीला त्यांच्या पैकी कोणी तरी होते. ट्रेकला जायची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसे मनातील भीती,एक प्रकारची अनिश्चितता वाढत गेली. अश्यावेळी अर्थात घरातील सर्वांचे साहाय्य लाभले. खर सांगायचं तर मी एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करेन याची माझ्यापेक्षा माझ्या सौभाग्यवतीला जास्त खात्री होती.अर्थात मी यात्रा पूर्ण करून आल्यावर तिने मला हे सांगितले. ट्रेकिंचे हे दहा दिवस मंतरलेले होते. दररोज नवा दिवस नवा अनुभव घेऊन येत होता. नवीन प्रकारचे लोक भेटत होते. त्यांच्या कडून प्रेरणा मिळत होती. माझे टीम मधील सारे मेंबर अनुभवी आणि सिरीयस ट्रेकर्स होते. त्यांचा मला खूपच फायदा झाला. त्यांचा अनुभव आणि प्रत्यक्ष प्रॉब्लेमला फेस करायची तयारी हे खूप काही शिकवून गेली. आणि आमच्या बरोबर आलेली सपोर्ट टीम अफलातून होती. टेकराज सारखा एव्हरेस्ट वीर आमच्या बरोबर होता. पेम्बा, आमचा गाईड होता याने बेस कॅम्प अनेक वाऱ्या केल्या होत्या. किती केल्या हे त्यालाही आठवत नव्हते. आमच्या बरोबर होता तो शेर्पा, पेम्बा आणि त्याची बहीण नेमा जी आमच्या बरोबर पहिल्यांदा ट्रेकला जात होती, यांचं एक मस्त त्रिकुट जमले होते. या सर्वांच्यात एक विलक्षण सामंजस्य होते. बाहेरून ते दिसत नव्हते, पण त्यांच्या वर्तणुकीतून ते प्रतिबिंबित होत होते. एखादी अडचण यायच्या आतच त्याच सोल्युशन तयार असायचे. विशेषतःमाझ्या पायाच्या त्रासाच्या वेळी त्याने केलेले मार्गदर्शन अविस्मरणीय होते. ट्रेकवरून आल्यावर माझे अनुभव मी लिहावेत अशी प्रेरणा झाली पण शब्द जुळवताना त्रास पडला, खूप वेळ लागला. तरी पण हा एक प्रयत्न केला. सर्व वाचकाला आवडेल अशी आशा आहे.
हे लिखाण करण्यात माझा एकच उद्देश आहे तो म्हणजे भविष्यात जे कोणी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जातील, त्यांना या ट्रेक बद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळावी. माझ्या अनुभवातून शिकून त्यांचे ट्रेकमधील दिवस जास्ती सुखकर व्हावेत. माझ्या अनुभवातून एकाला तरी बेस कॅम्पचा ट्रेक करायची स्फूर्ती मिळाली तर ते मी माझे भाग्य समजेन. आणि यापुढे कोणाला अजून माहिती हवी असेल, तर द्यायला मला नक्कीच आवडेल.

बेस कॅम्पच्या ट्रेक मध्ये जे जसे घडले तसे कागदावर उतरवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. “आँखो देखा हाल” म्हणतात ना तसे. या लिखाणात काही वैगुण्य असेल ते केवळ माझेच आहे. ते आपण समजून घाल अशी अशा आहे. राजाधिराज एव्हरेस्टला वंदन करून हे माझे मनोगत संपवतो.

पुणे

८ ऑगस्ट २०१८

एव्हरेस्ट बेस कॅम्प ची बखर

अनुक्रमणिका

१. तयारीचे दिवस

२. काठमांडूस प्रयाण

३. पुष्प पहिले: लुक्ला ते फाकडींग

४. पुष्प दुसरे: फाकडींग ते नामचे बाजार, मुक्काम नामचे बाजार

५. पुष्प तिसरे: नामचे बाजार ते तेंगबोचे

६. पुष्प चौथे: तेंगबोचे ते डिंगबोचे

७. पुष्प पाचवे: डिंगबोचे मुक्काम

८. पुष्प सहावे: डिंगबोचे ते लोबूचे

९. पुष्प सातवे: लोबूचे ते गोरक्षेप

१०. पुष्प आठवे: गोरक्षेप ते बेस कॅम्प

११. पुष्प नववे: बेस कॅम्प

१२. उत्तररंग

१३. उपोदघात

१. तयारीचे दिवस

तारीख १ फेब्रुवारी २०१८. पहाटे ५.३० ची वेळ.ठरल्या प्रमाणे सुरेंद्रचा मिस कॉल आला होता. आणि मी गडबडीत स्कूटरवरून निघालो. राजाराम पुलाजवळ भेटायचे ठरते होते. १०-१५ मिनिटात राजाराम पुलाजवळ पोचलो. सुरेंद्र वाटच बघत होता. शेजारीच मुंबईचे रजिस्ट्रेशन असलेली कार उभी होती. सुरेंद्रने आत बसायला सांगितले . मी मागच्या सीट वर बसलो. सुरेंद्र पुढे. आणि कार निघाली. गाडी चालवत होता कल्पेश. सुरेंद्रने जुजबी ओळख करून दिली. हाच कल्पेश अजून काही दिवसांनी बेस  कॅम्पच्या ट्रेकमध्ये माझा रूम पार्टनर होणार होता हे माहिती नव्हते. याची त्या वेळी कल्पना ही  नव्हती.

अर्ध्या तासात सिंहगडाच्या पायथ्याशी पोचलो. गड चढायच्या आधी एक कप चहा घेतला आणि चालायला सुरुवात  केली. कल्पेश आणि मी आपापल्या गतीने चढत होतो. शनिवार असल्याने गडावर चढणाऱ्यांची गर्दी तशी कमी होती. सुरेंद्र त्याच्या गतीने पण आमच्या मागून येत होता. कदाचित आमची चालण्याची style बघत असावा.तो निवांतपणे वाटेत थांबत थांबत, फोटो काढत येत होता. तरी पण आमच्या दोहोवर त्याचे लक्ष्य होते, असावे. मध्येच तो एखादा शॉर्ट कट मारायचा आणि पुढे निघून जायचा. आमच्या पुढे हजार असायचा. वाटेत आम्हाला पाणी प्यायला सांगायचा. पण फार आग्रह ही करायचा नाही. कल्पेश आणि मी गडावर साधारण एकाच वेळी पोचलो असू. मी कदाचित पाच दहा मिनिटे मागून पोचलो असेन. वर पोचल्यावर गडावर जायला उजवी कडे जावे लागते, आम्ही आपले डावी कडे निघालो,थोडी फार विश्रांती घेतले असेल नसेल, लिंबू सरबत प्यायलो आणि लगेच खाली उतरायला लागलो. उतरताना पण सुरेंद्र आमच्या मागेच असायचा. थोड्या फार किरकोळ सूचना द्यायचा एवढच.साधारण चढायला लागल्यापासून दोन एक तासात आम्ही कार पार्किंगपाशी येऊन पोचलो.गरम गरम पोहे आणि मिसळचा आस्वाद घेऊन परत निघालो. कल्पेश ने आम्हाला राजाराम पुलापाशी सोडले आणि तो पुढे गेला.

एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या तयारीच्या दृष्टीने केलेली ही सिंहगडाची पहिली सफर होती.या पूर्वी काही वेळा सिंहगडावर गेलो होतो, पण त्या वेळी असे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर नव्हते.बहुतेक वेळा तो एक फॅमिली गेट टुगेदर चा प्रकार असायचा.सिंहगड चढण्याचा बेस कॅम्पसाठी कितपत उपयोग होईल अशी मनात काहीशी शंका होती. पण कुठे तरी सुरुवात करायला हवी होती. आणि सुरेंद्रसारख्या एवरेस्ट वीराचे मार्गदर्शन लाभले होते, मग शंका कशाला घ्या? या पुढे अनेक वेळा सिंहगडावर जाऊ याची कल्पना  नव्हती. पुढच्याच शनिवारी परत आम्हा तिघांची टीम गडावर निघाली. परत तोच प्रकार. साधारण दोन एक तासात खाली परतणे, पोहे आणि चहा. आणि पुण्याला परतणे. जसे दिवस पुढे सरकू लागले तसे तिघांना एकत्र येणे जमेना, कुणाची तरी कसली तरी अडचण.’Two is company, three is crowd’ असा प्रकार होता. मग आम्ही दोघे किंवा कधी तरी एकटेच गडावर जाऊ लागलो. तशात मी पंधरा दिवसाची भूतानची ट्रिप केली. म्हंटल तर सहल, म्हंटल तर हाय अल्टीट्युड (high altitude) ची सवय व्हावी . थोडी फार थंडीशी तोंड ओळख पण होईल.तसेच काही हिमाच्छादित शिखरांचा सहवास दुरून का होईना घेता येईल. असा विचार केला.टायगर पॉईंटचा ट्रेक त्या दृष्टीने परिपूर्ण होता.चढ बऱ्यापैकी होता, थंडी जाम होती, थोडासा पावसाचा शिडकावा होता सोबतीला. या सर्वाना सोबत घेऊन टायगर पॉईंट सर केला. मजा आली. भूतान वरून माघारी  आल्यावर सिंहगडाच्या वाऱ्या परत सुरु केल्या.याच दरम्यान टेकराजची ओळख झाली. तो एका ट्रेक मध्ये सोबत आला होता. माझा नेहमीचा चढण्याचा कालावधी एक तास आणि दहा मिनिटे असायचा. टेकराजने एक तासात चढायची सूचना केली. मी म्हणालो, कसं जमेल? तो हसत म्हणाला, मनात आणलं कि सगळं जमत. शरीर मनाची आज्ञा पळत. प्रयत्न करून तरी बघा. आणि खरंच तसं झालं.पुढच्या आठवड्यात गड चालून गेलो. घड्याळ बघितलं. बरोब्बर एक तास लागला होता. मलाच खूप बरं वाटलं. नवा हुरूप आला. त्यावेळेपर्यंत आठवड्यातील एका फेरीचे दोन फेऱ्यामध्ये रूपांतर झाले होत. दर शनिवारी आणि आता दर बुधवारी पण गडावर जाऊ लागलो. कोणी बरोबर नसेल तेव्हा एकटाच. एकट्याने गड चढण्याचा आनंद वेगळाच आहे. प्रत्यकाने तो अनुभव जरूर घ्यावा.बेस कॅम्प ची तारीख नक्की झाली . त्या आधी एक आठवडा संपूर्ण विश्रांती जाहीर झाली होती.त्यामुळे विश्रांतीचा कालावधी सुरु होण्याच्या आधी अकरा वेळा तरी गड चढावा असा मनोमन पण केला. त्या अनुषंगाने आठवड्याच्या दोन फेऱ्या न चुकता केल्या.ठरवल्या प्रमाणे भक्ताने अकरा मारुती करावेत तश्या अकरा फेऱ्या पूर्ण केल्या.

शेवटच्या आठवड्यात थ्री पॉईंट मधला तिसरा जण (Third Point) म्हणजे चेतन भेटला.तो म्हणाला, काका, एकाच वेळा दोन वेळा गडावर जाऊन या.तरच तुम्हाला बेस कॅम्प जमेल.हे एकूणच अवघड प्रकरण होत.माझ्या चेहेऱ्या वरचे भाव ओळखून त्याने सूट दिली. निदान दीड वेळा तरी चढायला लागेल. माझ्या चेहरा तरी ढिम्मच . मग म्हणाला, असे करा या वेळी मात्र सगळे शॉर्ट कट घेऊन चढा. मी मान हलवली.आणि खरंच शेवटच्या वारीत मी चढताना सर्व शॉर्ट कट वापरले आणि चढून गेलो. अश्या compulsion चा फायदा नक्की पुढे झाला यात शंका नाही.माझी एक प्रकारे मानसिक तयारी होत होती.

मी मनोमन सिंहगडाचे आभार मानले. म्हंटल गड्या, तुझा खूपच उपयोग झाला. ऐकलं  होत की,काही दशकापूर्वी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला होता. आता माझ्या एवरेस्ट बेस कॅम्प ट्रेकच्या  मदतीला सिंहगड धावला म्हणायचा !!

२: काठमांडूस प्रयाण

सेवेसी विज्ञापना. मुक्काम पुण्य नगरी परगणे तालुका पुणे २९ एप्रिल शके २०१८. स्वारीवर जाण्याचे सर्व सामान पुन्हा एकदा तपासून घेतले.सामानाची यादी रा. सुरेंद्र यांनी दिलेली होती, त्या बरहुकूम सामान आहे की  नाही हे बघितलं.अन्नाचा साठा पुन्हा तपासून बघितला. ट्रेकच्या चढाईला लागणारी अवजारे , पाण्याचा साठा करायची साधने , अंगावर घालायची वस्त्रे,थंडीत शरीर  गरम ठेवायची साधने , वैद्य नरेंद्र यांनी दिलेली औषधे  व सर्वात शेवटी बँकेतुन  काढलेली रुपयांची चवड मोजून घेतली.इथून निघाल्यावर पंधरा एक दिवस  बाहेर राहणार होतो. त्यामुळे प्रस्थानाच्या दिवशी परमपूज्य श्री कसबा गणपती तसेच परमपूज्य श्री दगडू शेठ गणपती यांचे दर्शन घेऊन मनोमन प्रार्थना केली की स्वारीत यश येऊ दे. अखेर पुण्य हे श्रीमंतांचे, कष्ट हे चाकराचे !!

निघायच्या दिवशी रात्री भेटायला  सुरेंद्र औषधांचा साठा , कॅमेरा आणि इतर काही साहित्य  माझ्याकडे घेऊन आले. हे सर्व साहित्य आणि  औषध काठमांडुस न्यायच्या होत्या.  हे सर्व साहित्य काठमांडूस पोचल्यावर  टेकराज अधिकारी याजकडे सोपवायचे मला दिलेले होते. हे साहित्य वाहून नेण्याची मी तयारी दर्शवली. त्या बदल्यात आम्हास विमान तळावर पोचवण्याची विनंती सुरेंद्रला केली. त्यांनी लगेच होकार दिला. मध्य रात्रीचा प्रहरास अस्मादिकांसारख्या जेष्ठांची   मदत करून पुण्य मिळवावे असा सुज्ञ विचार त्यांनी केला असावा.

IMG_20180427_235528

विमानाची प्रस्थानाची वेळ पहाटे २ वाजून १० मिनिटांनी होती. विमानतळ प्रवाश्यांनी गजबजलेला होता. इतक्या रात्री अपरात्री एव्हढी गर्दी तर दिवसाढवळ्या किती लोक येत असतील याची कल्पना केलेली बरी. आज काळ PMT  पेक्ष्या जास्त गर्दी विमानाला असते असे वाटते. इथे स्वारगेटपेक्षा अधिक जनता पाहून व लोकांची  सुबत्ता बघून  उर भरून आला. पुण्य नगरीचा हा विमानतळ शांतता क्षेत्र असल्याने विमान उडण्याच्या वेळेची  कोणतीच सूचना दिली जात नाही. त्यामुळे विमानाच्या प्रस्थानाची वेळ झाली की  मुकाट्याने रांगेत जाऊन उभारायचे ठरवले. हळूहळू प्रवाश्याना विमानात सोडण्यात आले. गंमत म्हणजे विमानात पन्नास पाऊणशे गावाकडचे पाहुणे होते. हे सर्व आपल्या नेत्याला भेटायला राजधानीत चालले असावेत. किंवा अण्णांची दिल्लीत सभा, मोर्चा वगैरे असेल, तिथे निघाले असतील. विमानाने नेहमी प्रवास करणाऱ्या उच्चंवर्णीय प्रवाश्यांच्या पेक्षा ते उठून दिसत होते.बहुतेक सर्व पुरुषांनी पांढरी विजार वा धोतरे नेसली होती.बऱ्याच जणांनी पांढरी गांधी टोपी घातली होती.ज्या गांधींनी गरिबांची पांढरी टोपी जपली तीच पांढरी टोपी आता विमानात मिरवत होती. कालाय तस्मै नमः!  बहुतेक स्त्री  वर्गाने नेऊवारी साड्या परिधान केल्या होत्या.क्वचितच एका दोघीनी गोल पातळे नेसली होती. हातात ब्रिफ केस ऐवजी छान कापडी पिशवी होती. एका दोघीनी छत्री पण आणली होती. असा हा सारा गोतावळा विमानात एकदम शिरला तेव्हा साहजिकच हवाई सुंदरींची धावपळ उडाली. यापैकी अनेकांना आपले स्थान (seat)सापडत नव्हते. तेव्हा  हवाई सुंदरींना विचारून भंडावून सोडत होते. भारतातील विमान प्रवास हि कोण्या एका वर्गाची मक्तेदारी राहिली नाही, उलट ती तळागाळात रुजली आहे याचा प्रत्यय येतोय.सध्या रेल्वे वा बसपेक्षा विमानाने जास्त लोक प्रवास करतात  असे दिसते.

रात्री २ वाजून १०मिनिटांनी सुटणारे विमान अडीचच्या सुमारास उडाले आणि देशाच्या राजधानीत  पहाटे पाचच्या सुमारास पोचले. बॅग घेऊन बाहेर पडेपर्यंत सiडे पाच झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाहेर सुखद गारवा होता.आमचे विमान टर्मिनल एक वर उतरले आणि पुढचे काठमांडूला जाणारे विमान टर्मिनल तीनवरून सुटणार होते. त्यामुळे टर्मिनल तीनवर जाणे प्राप्त होते. टर्मिनल एकवरून टर्मिनल तीनसाठी बस ची व्यवस्था आहे. पुढच्या विमानाचा पास दाखवल्यावर या बस मधून मोफत प्रवास करता येतो. नाही तर तिकीटiसाठी वेगळे पैसे मोजावे लागले असते. बस दर वीस मिनिटांनी येते. त्यामुळे थोडा वेळ होता. टर्मिनलच्या बाहेर आसपास कुठे चहाची टपरी आहे का ते शोधले. पण नाही मिळाली. तेव्हा चहाचा नाद सोडला. टर्मिनल तीनला जाणारी बस आल्यावर पुढे निघालो. साधारण २० ते २५ मिनिटात टर्मिनल तीनला उतरलो. टर्मिनल तीनच्या बाहेर चहाचा स्टॉल  होता. नेहमीचा पुण्य नगरीत मिळतो तसi अमृततुल्यसारखा नव्हता. चहाला ५४ रुपये मोजले आणि तो पाण्या सारखा  चहा घेतला. परत कधी घ्यायचा नाही असे ठरवूनच.अर्थात बेस कॅम्प च्या ट्रेक मध्ये असाच चहा मिळणार होता. त्याची ही रंगीत तालीम होती. शेक्सपिअर साहेबानी म्हंटल आहे , कॉमिन्ग इव्हेंट्स कास्ट देयर शॅडो बिफोर ! (येणाऱ्या घटनांची नांदी आधीच सुरु होते!!). पुढचे विमान ११ वाजता होते. त्यामुळे भरपूर वेळ होता. विमानाचा बोर्डिंग पास मिळायला ९ वाजणार होते. त्यामुळे कुठे तरी कोपऱ्यात जागा पकडली आराम करता  झालो. काम काहीच नव्हते. तेव्हा व्हाट्सअप सारखा मित्र नाही. बसल्या बसल्या मोबाइलमधील नको असलेले विडिओ आणि  मेसेज  काढून टाकले(delete). ट्रेकमध्ये फोटो मोबाईलने काढणार होतो.  त्यामुळे ट्रेकचे फोटो साठी हवी असलेली स्पेस  तयार केली. मी फोटोसाठी वेगळा कॅमेरा घेतला नव्हता. सुरेंद्रने दिलेला SLR कॅमेरा माझ्या गळ्यात होता पण तो टेकराजला द्यायचा होता.नको असलेले व्हिडिओ डिलीट करे पर्यंत दोन तास कसे गेले कळलं पण नाही. मोबाइल ची बॅटरी चार्ज करून घेतली.

बरोबर नऊ वाजता चेक इन काउंटर वर हजर झालो.  तिथे दुसरे पण सहप्रवासी भेटले.”पाव्हणं, कुणी कडे” च्या चौकश्या झाल्या. पाठीवर सॅक घेतलेला कोणीही असला म्हणजे ती व्यक्ती हिमालयात ट्रेक ला जाणार  निश्चित होत.एकाला विचारलं, ती व्यक्ती पण एवरेस्ट बेस कॅम्प ला जाणारी होती. गोव्याहून आली होती. पण बंगलोर च्या दुसऱ्या कुठल्याशा ग्रुप बरोबर जाणार होती. पूर्वी अनेक  ट्रेक केल्यामुळे तयारी चांगली असावी.त्या मानाने मीच नवशिका असे मला वाटलं. काही वेळेला चढलेला सिंहगड आणि एकदा रायगड या पलीकडे माझी उडी नव्हती. पण माझ्यापाठी सिंहगडाचा आशीर्वाद  होता. (अभिताभच्या ‘दिवार’ सिनेमा तील शशी कपूरचा डायलॉग आठवा. ‘मेरे पास माँ है ‘ ). तसेच मराठी भाषेतील प्रसिद्ध ‘अंताजीच्या बखरी’ तील प्रसंग आठवला. अंताजी कोंकणात वाढलेला. वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी चाकरी शोधता शोधता सातारला येतो. त्यावेळचे सातारा म्हणजे मराठ्यांचीराजधानी. अंताजी एका सरदारiकडे नोकरी मागायला जातो. सरदार विचारतो, घोड्यावर बसता येते का? अंताजी ‘हो’ म्हणतो. तलवार चालवता येति का? अंताजी ‘हो’ म्हणतो. मग विचारतो, किती लढाया खेळल्या? अंताजी हा १२-१३ वर्षाचा कोवळा पोरगा,अजून मिसरुड पण न फुटलेला. याचाच अर्थ असा की त्या काळी आपल्याकडील १२ वर्षाची मुलें लढाईत भाग घ्यायची . इतक्या लहान वयापासून  मराठ्यांना लढायचं बाळकडू मिळत असे.  मग  मराठ्यांचे झेंडे अटके पार का लागू नयेत? रांगेत नंबर आल्याने विचारांची मालिका खंडित झाली. असो. माझा नंबर आल्यावर बोर्डिंग पास घेतला. विमान सुटायची वाट बघत बसलो. विमानवेळेवर सुटले. विमानात बहुतेक सगळे टुरिस्ट होते. काठमांडू ही टुरिस्ट लोंकाची राजधानी असल्यासारखी आहे. दुपारी दोन च्या सुमारास विमान काठमांडू च्या विमानतळावर उतरले. काठमांडूचं ‘राजा बिरेंद्रसिंग ‘ विमानतळ म्हणजे पुण्याच्या स्वारगेटचा अवतार होता. सर्वत्र गडबड आणि गोंधळ!! कस्टम चेकिंग साठी रांगा. त्या पैकी भारतीय पासपोर्ट आणि इतंरासाठी कोणती रांग हे कुणालाच ठाऊक नव्हते. कोणाला तरी विचारावे तर सांगणारे कोणी नव्हते. फॉर्म्स संपून गेले होते.बऱ्याच गोष्टी गोंधळले प्रवाशी एकमेकाला विचारून ठरवत होते.सगळे फॉर्म भरत होते. म्हणून मी पण भरला. मग रांगेत थांबलो. परत भारतीय आणि इतर देशातुन आलेल्या  लोकांची वेगळी रंiग होती. पण ती कुठे आहे ते कळत नव्हते. सर्वत्र आनंदी आनंद होताJ ज्या लाईन मध्ये गर्दी कमी होती, त्या रांगेत थांबलो. माझा नंबर आल्यावर त्या अधिकाऱ्याने तीस सेकंद पासपोर्ट पहिला न पहिला. आणि शिक्का मारून पासपोर्ट परत केला. बाहेर निघालो. आता बॅग घेण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. सामानाच्या बेल्टवर वाट बघत वीस मिनिटे थांबल्यावर बॅग आली.  एअरपोर्ट च्या बाहेर आलो. विमान वेळेवर पोहचल्याने व टेकराजला माझी काठमांडूला यायची वेळ आधीच कळवली असल्याने तो न्यायला एअरपोर्ट वर आला होता. त्याच्या बरोबर आमचा नेपाळमधील गाइड पण आला होता. गाईडची ओळख झाली. त्याचे नाव शंभू. नाव लक्ष्यात ठेवायला सोपे होते.त्याने सामानाचा ताबा घेतला.आणि गाडीत ठेवलं. गाडी मुक्कामाच्या हॉटेलकडे निघाली.

काठमांडू शहर भारतातल्या कुठल्याही शहरात  चपखल बसेल असेच होते. त्यामुळे आपण भारतातच आहोत असा भास होत होता. रस्त्यावर पुष्कळ रहदारी, अनेक वाहने, चालणारी माणसे, गाड्यांचा धूर, ट्राफिक सिग्नल चा अभाव जी लक्षणे भारतात दिसतात तशीच इथे होती.त्यामुळे एखाद्या नवीन शहरात आलोय असा फील आला नाही.एअरपोर्टपासून जसे आपण शहरातील मध्यवर्ती भागात जातो तसे रस्ते अजून अरुंद होत होते. आमचं राहायचं हॉटेल ‘थामेल’ या शहरातील मार्केट मध्येच होते. येथील रस्ते पुण्यातील जुन्या गल्ली बोळांची आठवण करून देत होते. गल्लीतुन वाट काढत आमची कार अचानक डावी कडे वळली  आणि अजून एका अरुंद गल्लीत उजवी कडे वळली आणि अचानक हॉटेलसमोर थांबली.

IMG_20180428_155832

“होली हिमालय” हॉटेल मध्ये आम्ही राहणार होतो. काठमांडू आणि नंतर च्या ट्रेक मधील बहुतेक हॉटेल चे नामकरण हिमालयाच्या नiवावरून केले गेले आहे.होली हिमालय हॉटेल खूप च छान होते. मुख्य म्हणजे २४ तास चहा मिळण्याची सोय होती. रूम ताब्यात घ्यायच्या आधी छान पैकी मसाला घातलेला चहा घेतला. सकाळपासून नेहमी सारखा चहा मिळाला नव्हता. चहा पिऊन फ्रेश वाटले. नंतर रूम घेतली. सकाळ पासून अंघोळ नव्हती. तेव्हा आंघोळ केली. तोपर्यंत बाकीचे आमचे साथीदार हॉटेल वर पोचले होते. कल्पेश, सुधीर आणि तनिश. आम्ही सारे पुण्याचेच. कल्पेशला सिंहगडच्या ट्रेकच्या वेळी पुण्यात भेटलो होतो. सुधीर आणि तनिश ला पहिल्यांदाच भेटत होतो. दोघांची पिता पुत्राची जोडी छान वाटली. याच्या आधी त्यांनी बरेच ट्रेक केलेले होते. त्यामुळे ट्रेकचा अनुभव  जबरदस्त होता. त्यांच्या अनुभवाचा माझ्यासारख्या नवशिक्यांला फायदा होणार होता. थोड्या वेळात शंभू आणि टेकराजपण आले. सारी मंडळी जमली.

गंमत म्हणजे शंभूने हॉटेलमध्ये आमच्या स्वागताचे फ्लेक्स लावले होते. ते बघून मला कसेसेच वाटले. फ्लेक्सवर नाव यावे अशी आपण मोठी माणसे नाही. आपल्या नशिबात पुण्यात फ्लेक्सवर नाव नाही झळकलं. निदान काठमांडू च्या हॉटेलमध्ये तरी झळकतंय. गंमत आहे. फ्लेक्स समोर फोटो सेशन झाले. परत एक चहाचा राऊंड झाला.

IMG_20180429_101556

आता संध्याकाळ होत आली होती. दिवे लागले होते. मार्केट मध्ये चक्कर मारायला निघालो.सर्वत्र परदेशी ब्रँडची दुकाने होती. विकत घेणारे सुध्दा परदेशी. ट्रेकिंग लागणारे सर्व सामान इथे मिळते. विकत अथवा भाड्याने सुध्दा. दुकानात खास ट्रेकसाठीचे लोकरीचे कपडे होते तसेच पैश्याच्या विनिमयाची बरीच दुकाने होती. बाहेत विनिमयाचे दर लावलेले होते. सांयकाळी पर्यटकांनी मार्केट फुललेले होते. हॉटेल्स पण बऱ्यापैकी होती. पिझ्झा, बर्गर ,पास्ता इत्यादी  पदार्थांची रेलचेल होती. भारतीय जेवणाची पण सोय होते. आमच्यातील प्रत्येकाचं ट्रेकसाठी काही ना काही तरी सामान  घ्यायचे होते. पुण्यात बॅग भरतानाच काही गोष्टी काठमांडूच्या मार्केट मध्ये घेऊ म्हणून ठेवल्या होत्या. याचे कारण म्हणजे पुण्यापेक्षा किंमत कमी आणि दर्जा  चांगला. काठमांडूत दुसरा दिवस मोकळा असल्याने मी खरेदी दुसरे दिवशी करण्याचे ठरवले.

रात्री जेवायला समोरच्या हॉटेल मध्ये गेलो. ‘Fusion Kitchen ‘. जेवण चांगले होते. सर्वानाच झोपi आल्या होत्या रात्र भर जागरण झाले होते. दिवस भराचा प्रवास.  त्यामुळे सगळे थकले होते. कल्पेश, टेकराज आणि अस्मादिक एका खोलीत झोपलो. तनिश आणि त्याचे बाबा यांची सोय दुसऱ्या खोलीत होती.

बेस कॅम्प च्या तयारीच्यावेळी त्या संदर्भातील बरेच ब्लॉग आणि पुस्तके वाचली होती. त्यातच श्री सूर्यकांत कुलकर्णी यांनी लिहिलेलं त्यांच्या बेस कॅम्पच्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक होते. हे पुस्तक माझ्यासारख्या लोकांच्यासाठी ज्यांनी आयुष्यात फारसे ट्रेक केलेले नाहीत अशासाठी खूपच उपयुक्त आणि प्रेरणा देणारे  आहे. या पुस्तकात लेखकाने समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक दिला आहे.

‘मनी धरावे ते होते

विघ्न अवघेचि नासोन जाते

कृपा केलीया रघुनाथे

प्रचित येते !

रात्री झोपताना पुन्हा पुन्हा श्री स्वामी समर्थांचा श्लोक मनात घोळत  होता.(श्री सूर्यकांत कुलकर्णी यांच्या एवरेस्ट बेस कॅम्प च्या पुस्तकातून उचलेला हा श्लोक. श्री सूर्यकांत कुलकर्णी ना धन्यवाद). या श्लोकाने मनाला दिलासा दिला.  एक प्रकारची उभारी दिली. आपल्याला हा ट्रेक शक्य आहे अशी आशा जागृत केली.. एक आत्मविश्वास दिला. एक जबरदस्त कॉन्फिडन्स दिला. खरं तर बेस कॅम्प च्या ट्रेकसाठी मला मिळालेली ही  दोन कवच कुंडले होती. एक म्हणजे हा श्री समर्थांचा हा श्लोक आणि  दुसरा म्हणजे सिंहगडच्या केलेल्या अकरा वाऱ्या. विचार करताना डोळे कधी मिटले हे कळलेच नाही.सेवेसी श्रुत ही विज्ञापना !

पुष्प पहिले
लुक्ला ते फाकडींग

१. सुरुवातीची उंची:  ९१०० फूट/२८०० मीटर्स

२. पोचलेली उंची: ८५६३ फूट/२६१० मीटर्स

३. चढ: – ५३७  फूट/१९० मीटर्स

४. प्राणवायूची उपलब्धता : सुरुवातीला  ७२ % समुद्रसपाटीच्या

५. प्राणवायूची उपलब्धता : पोचल्यावरची ७४ %

६. चाललेले अंतर:  ४.६६ मैल/१२.६  किलोमीटर

७. लागणार वेळ: ३.५ ते ४ तास सुमारे

(चालायची पाऊले:२२२७४ )

काठमांडू ते लुक्ला हा प्रवास बेस कॅम्पच्या एकूण प्रवासातील एक चित्तथरारक प्रवास होता.आदल्या दिवशीची आमची विमानाची तिकिटे आरक्षित असून पण विमान प्रवास झाला नाही. कारण विमाने  काठमांडू हुन निघालीच  नाहीत. कारण लुकलाचे हवामान खराब होते. आणि दुसरे दिवशीची आमच्याकडे विमानाची रिझर्वेशन नव्हती. मग जाणार कसे?  विमान कंपनी पैसे परत करायला तयार होती. पण पैसे परत घेऊन दुसऱ्या विमानाचे तिकीट मिळणार नव्हते. म्हणतात ना इकडे आड आणि तिकडे विहीर ! अशा वेळी एकमेव जादूची कांडी कामी  आली  ती म्हणजे जुगाड संस्कृती !!

IMG_20180430_093719

टेकराज आणि शम्भूचे विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या बरोबर चांगले संबंध या वेळी उपयोगी पडले. दोघे जण विमान कंपनीच्या ऑफिसमध्ये सारख्या चकरा मारत होते. ह्याला  भेट, त्याला भेट, ह्याला  फोन कर, त्याला कॉन्टॅक्ट कर. सारखं चालू होतं.आमचे चेहेरे काळजीने त्रस्त आणि हे दोघे नेहमीच हसतमुख. ‘प्रथम ग्रासे मक्षिका पात: ‘ (जेवताना पहिल्याच घासाला अन्नात माशी पडावी ) अशी अवस्था झाली होती आमची. दर पाच दहा मिनिटांनी ते येऊन आम्हाला धीर देत होते. ‘अरे, उसको बोल दिया, अभी हो जायेगा.’ आमचा उत्साह वाढवण्याचा ते सतत प्रयत्न करीत होते. खर तर आज पहाटे सहा वाजताच विमानतळावर आलो होतो. पण सकाळचे आठ वाजले तरी आशेचा किरण दिसत नव्हता. एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे आज विमाने नेहेमीप्रमाणे उड्डाण करीत होती. विमानाच्या जाण्या येण्यावर बंधने नव्हती. हवामान चांगले होते. त्यामुळे आता नाही तर नंतर, काही वेळाने आपल्याला संधी मिळेल अशी आशा होती. अशा अनिश्चितेत आणखी एक भर पडली. ती म्हणजे, टेकराजचे पासपोर्ट वरील आणि विमानाच्या तिकीटावरील नावात किंचितसा फरक होता. नेमका हा फरक विमान कर्मचाऱ्याच्या ध्यानात आला. तो गृहस्थ काही केल्या बोर्डिंग पास देईना.परत आमच्या चेहेऱ्यावर काळजी परतली.मग टेकराज आणि शंभूने कुठे कुठे फोन केले.आणि त्या कर्मचाऱ्याला पटवून दिले की या दोन्ही व्यक्ती एकच आहेत.शेवटी त्याने ते मान्य केले आणि आमचे बोर्डिंग पास दिले गेले. सर्वाना एव्हढा आनंद झाला कि आनंदाने किंचाळी मारायची बाकी होती. बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटी चेक करून आत शिरलो. सिक्युरिटी चेक अगदी नावापुरतेच होते. आत मध्ये वेटिंग प्रांगणात बऱ्यापैकी गर्दी होती.आमच्या आधीचे तीन चार विमानाचे प्रवासी तरी वाट बघत असतील.कशी बशी बसायला जागा मिळाली. आमचं विमान आता अकरा वाजता सुटेल असे सांगण्यात आले. शंभू राजे आम्हाला शुभेच्छा देऊन परतले होते.

आता दहा वाजून गेले होते. आम्ही पहाटे पाच वाजता उठलेले होतो. पोटात अन्नाचा कण  गेला नव्हता सकाळ पासून. तेव्हा भूक भागवण्या साठी सर्वानी विमान तळावर महागडी कॉफी  घेतली. थोडी तरतरी आली. अजून विमान उडेल का नाही ही शंका होतीच. कारण जसा  वेळ वाढत जातो, तसे लुक्ला चे हवामान अस्थिर होतं जाते आणि मग विमान रद्द होण्याचा धोका वाढत जातो. पावणे अकरा झाले तरी आमच्या विमानाचा पत्ताच नव्हता. आमचे विमान सकाळच्या सॉर्टीने लुक्लाला पोचले होते, पण तिकडून परतायचे होते. सर्वाना परत शंका. हवामान बिघडले तर नाही ना, पाऊस सुरु झाला असेल का. अश्या वेळी ‘मन चिंती ते वैरी न चिंती ‘ अशी अवस्था होते. शेवटी एकदा आम्हाला घेऊन जाणारे विमान आले. बोर्डिंगची सूचना मिळाली. बोर्डिंग पास दाखवून आम्ही मिनी बस मध्ये बसलो. बसला मागच्या बाजूला हुक होता. सामानाची ट्रॉली त्याला जोडली गेली आणि आमची बस निघाली. सात आठ मिनिटात धावपट्टीच्या एका टोकाला येऊन थांबली. दहा पंधरा मिनिटे झाली तरी पुढे काही हालचाल होईना. बसमधून उतरता पण येईना. आमचे विमान ‘समिट ‘ कंपनीचं होतं. ‘समिट’ विमान कंपनीचे कर्मचारी आजू बाजूला फिरत होते. ते एकदमच ‘कूल’होते. त्यांना काहीच फरक पडत नव्हता.बाहेर प्रचंड उकाडा होता. शेवटी एका कर्मचाऱ्याला विमान कधी उडणार असे विचारले. तेव्हा तो म्हणाला की विमान उतरायला परवानगी मिळत नाहीय.कारण विमानाची उड्डाण सारखी चालू आहेत. आपल्या विमानाचा नंबर आला की विमान उतरेल. विमानाच्या कर्मचाऱ्याबरोबर टाइम पास म्हणून गप्पा चालू केल्या. समिट कंपनीची  विमाने युगोस्लाव्हिया देशाची होती.सात आठ वर्षे जुनी होती. युगोस्लाव्हिया एव्हढासा छोटासा देश आणि विमान बनवतो. आपण त्या देशाहुन कित्येक पटीने आकाराने आणि लोकसंख्येने मोठे, पण आपले देशाचे आपले छोटे का होईना विमान असू नये? राजकर्त्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना ना खंत ना खेद!! विमान तयार करून निर्यात करणे तर दूरची गोष्ट.असे विचारचक्र चालू असताना आमचे विमान विमानतळावर उतरले. त्यातून सामान उतरवण्यात फारसा वेळ गेला नाही. लगेच आम्ही विमानात बसलो. आणि विमान सुरु झाले . पण आमची वाट पाहायची प्रक्रिया अजून संपली नव्हती. काठमांडू विमानतळावर एकच धावपट्टी आहे. पाच ते सहा विमाने टेक ऑफ करायला रांगेत उभी होती. त्यात आमचा पाचवा नंबर होता. त्या रांगेत आमचं विमान येऊन उभे राहिले.या ट्राफिक जाम मध्ये पंधरा मिनिटे वाट पाहिल्यावर आमचे विमान एकदाचे उडाले.

काठमांडू ते लुक्ला प्रवास खरंच अविस्मरणीय आहे.विमाने अगदी छोटे,१८ प्रवासी बसतील इतके. हवाई सुंदरी मिळून १९ लोक.विमानाच्या इंजिनाचा आणि पंख्याचा आवाज अगदी आतपर्यंत येत होता. इंजिन टर्बो प्रोपेलर जातीचे. अश्या टाईपची इंजिने हल्ली कमीच दिसतात.बाहेरच्या वातावरणातील उष्णतेचे चढउतार याचा परिणाम विमानावर आणि त्या योगे आतल्या प्रवाश्यावर होतो. एखाद्या होडीत बसल्या सारखी परिस्थिती झाली होती.पाण्याच्या लाटे बरोबर होडी जशी खाली वर होते, तसे विमान खाली वर होतं होते.पण हे सर्व विसरायला लावणारा निसर्गाचा चमत्कार म्हणजे डाव्या बाजूच्या खिडकीतून दिसणाऱ्या हिमालयातील पांढऱ्या शुभ्र पर्वत रांगा.कमी जास्त उंचीची पांढरी शिखर ओळीने दिसत होती. भान हरपून लावणार हे दृश्य होते. हा नजारा उजव्या बाजूला बसलेल्या प्रवाश्यांच्या नशिबात नव्हता.हे निसर्ग दृश्य बघे पर्यंत विमानाने उजवी कडे डोंगराला वळसा घातला आणि उतरायला सुरवात केली देखील. दोन डोंगरांच्या व्हॅली तुन विमान खाली उतरू लागलं. हा हा म्हणता विमानाने धाव पट्टीला स्पर्श केला आणि एकदम वेग कमी करत उजवीकडे वळण घेतले . यु टर्न घेऊन विमान थांबले.सारा प्रवास २५ मिनिटांचा.या प्रवासIसाठी आम्ही ३६ तास घालवले होते. तशात झालेला मनःस्ताप  आणि वाट बघण्यात आलेला उद्वेग निराळाच. आता आम्ही हिमालयाच्या कुशीत आलो होतो. या पुढचे नियम,कायदे कानून हा राजाधीराज हिमालय ठरवणार होता. इथे सारे चाकर, फक्त श्रीमंतांची आज्ञा पाळायची.नाही तर शिक्षा मात्र अत्यंत कठोर. इथे दया माया नाही.याची ज्यांना कल्पना आहे, त्यांनीच इथे यावे. नाही तर खैर नाही कुणाची.

लुक्ला विमानतळावर स्वागत करायला आमचा गाईड पेम्बा आणि शेर्पा आले होते. एकमेकांच्या ओळखी आणि हस्तांदोलनIचा कार्यक्रम पार पडला. शेर्पाने आमच्या मोठ्या सॅक चा ताबा घेतला. पेम्बा बरोबर त्याची धाकटी बहीण नेमापण ट्रेकला येणार होती. आम्ही पांच जण आणि ते तिघे असे सारे एअरपोर्ट वरून बाहेर पडलो. जवळच्या पूर्वीच ठरवलेल्या हॉटेलमध्ये शिरलो. हॉटेलमध्ये बऱ्या पैकी गर्दी  होती. कोपऱ्यातील एक टेबल पकडले.नाना देशाचे लोक त्या हॉटेल मध्ये आलेले होते.काही बेस कॅम्प ला निघाले होते काही बेस कॅम्पला जाऊन परतले होते दोघांच्या.  चेहऱ्यातील फरक जाणवत होता. बेस कॅम्प करून आलेले साहजिकच उत्साही आणि आनंदी होते. जाणारे बहुतेक थोडे फार काळजीत होते. सकाळ पासून आमच्या पैकी कोणीच फारसं खाल्ले नव्हते. त्यामुळे सर्वाना भुका लागल्या होत्या. प्रत्येकाने आपापल्या ऑर्डर दिल्या. टेकराज थेट हॉटेलच्या किचन मध्येच गेला होता.सर्वानी जेवण आटपलं.सामानाची ऍडजेस्टमेन्ट केली. नको असलेले सामान मोठ्यासॅक मध्ये टाकलं. ट्रेकमध्ये चालताना लागणार अत्यावश्यक सामान तेव्हढे बरोबर घेतले.बाहेर हवा पावसाळी असल्याने सर्वानी आपले रेनकोट बाहेर काढले. माझा रेनकोट काही केल्या सापडेना. पुण्यातून निघताना घेतला की नाही हे ही आठवेना. पेम्बाने ही अडचण ओळखली. खाली दुकानात जाऊन त्याने प्लास्टिकचा एक कोट आणला. ब्लेडने तो उभा कापला. आणि मस्त पैकी शेतात वापरतात तसे ‘इरलं’ तयार झाले. आम्ही हॉटेल च्या खाली उतरलो. गणपती बाप्पाचा गजर करून निघालो. तोच अचानक जबरदस्त पाऊस सुरु झाला. वरुणराजाने आमचे सहर्ष स्वागत केले होते. येणाऱ्या कठीण दिवसांची जणू नांदीच होती ती. पाऊस वाढला आणि आता गारांचा वर्षाव सुरु झाला. हिमालय पर्वतराज अगदी पाहिल्याचं दिवशी आमची परीक्षा घेत होता. अंगावर कसे तरी इरलं चढवलं आणि निघालो. कपडे ओले होण्या बरोबर बुटात पाणी जाईल का आणि गेलेच तर ते वाळणार कसे याची चिंता भेडसावू  लागली. वाटेत सुरुवातीलाच एक सरकारी ऑफिस  लागते . तेथून ट्रेक साथी लागणारे पास गाईडने मिळवले. नेपाळच्या जनतेला पासची गरज नव्हती.ट्रेक सुरु होतानाच एका कमानीतुन आपल्याला जावे लागते. ती एका साहसी नेपाळी शेर्पा महिलेच्या  स्मृती प्रित्यर्थ बांधली होती. तिचे नाव ‘पासंग लहामा शेर्पा’. या वीरांगनेने सात वेळा एव्हरेस्ट सर केला होता आणि शेवटच्या आठव्या प्रयत्नात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिची आठवण म्हणून ही कमान उभारली होती. या शूर शेर्पाला सलाम करून आम्ही निघालो. बेस कॅम्पच्या ट्रेकचा श्री गणेशा इथून होतो. पंढरीच्या विठोबाला जाताना नामदेवाची पायरी लागते , भाविक नामदेवाच्या पायरीला नमस्कार करूनच पुढे जातात असा काहीसा प्रकार होता. लुक्ला चारी बाजूने डोंगरांनी वेढलेले आहे. आणि दूर वर दिसणारे हिमाच्छादित शिखर मन मोहून टाकतात. वाटेत पावसाचा जोर कायम होता. गारा नुकत्याच पडून गेल्याने चारी बाजूला पांढरी चादर पसरल्या सारखं दिसत होते.रस्त्यात हॉटेलच्या बाहेर टाकलेल्या टेबल आणि खुर्ची वर सुद्धा गारांचा थर झाला होता. घरांच्या आणि हॉटेलच्या छपरावर गारा साठल्या होत्या. काही ठिकाणी पाणी साठायला सुरुवात झाली होती. त्यातून वाट काढत बुटात पाणी जाऊ नये याची काळजी घेत निघालो. पावसामूळे चालण्याची गती मंदावली होती. साहजिकच होते ते.तथापि आज ट्रेकचा पहिलाच दिवस होता. आज मुख्य म्हणजे उंचावर चढायचे नव्हते. उलट पक्षी आज आम्ही आलेल्या उंची पेक्षा कमी उंची वर चाललो होतो. आणि अंतर पण फारसे नव्हते. क्रिकेटची टेस्ट मॅच सुरु होण्याआधी तीन दिवसांची प्रॅक्टिस मॅच असावी तसा प्रकार होता. आम्ही फाकडींगकडे चाललो होतो फाकडींगची उंची लुक्लापॆक्षा कमी आहे. त्यामुळे उंची कमी झाल्यावर जो त्रास होतो तो होणार नव्हता. साधारण एक तास चालल्यावर वाटेत एका लहान हॉटेल मध्ये गरम चहा घेतला.थोडा वेळ पावसापासून सुटका झाली. ज्या हॉटेल मध्ये चहा घेतला त्या गावाचं नाव होतं चेपलुंग. थोडेसे फ्रेश झालो आणि पुढील मार्गाला लागलो.वाटेत बऱ्याच ठिकाणी तिबेटी भाषेत लिहिलेली बुद्ध धर्माचे शिलालेख लागत होते. एका अशाच शिलालेखाचा मी पावसात थांबून फोटो घेणार होतो. तोच पेम्बाने मला थांबवले.तो म्हणाला, पुढं गेल्यावर असे बरेच शिलालेख लागतील. काळजी करू नका. तेव्हा पावसात थांबू नका. चालत राहा. मी फोटो घेण्याचा नाद सोडला आणि चालू लागलो. बुटात पाणी जाऊ नये म्हणून जपून, पाणीबघून चालत होतो. बूट आतून ओले झाले तर अशा थंडीत ते कोरडे होणे दुरापास्त च होते.

लुक्लाच्या मार्केटमध्ये  ट्रेकिंगला लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतात. ट्रेकिंगला जाताना एखादी वस्तू घ्यायची राहिली असेल, तेव्हा लुक्लाला जरूर विकत घ्या.आणि जसे आपण वर वर जातो, तश्या या वस्तू महाग होतं जातात. उदाहरणार्थ हात मोज्यांची किंमत लुक्लाला काठमांडू पेक्षा २० % जास्त असेल. तीच वस्तू नामचे बाजार ला ५०% महान असू शकते. लुक्लाला पाण्याची जी बाटली १०० रुपयाला पडते, तीच गोरक्षेपला ६०० रुपयाला मिळते.

अर्धा तास झाल्यावर पावसानी विश्रांती घेतली. थंडी वाढली होती. कानाला संरक्षण देणे भाग होते. कॅप घालायचा मला मोह झाला होता. पण पुढे येणाऱ्या गोष्टींची आतापासून सवय केलेली बरी. त्यामुळे थोडे दुर्लक्ष्य केले. तसाच निघालो. वातावरण अति प्रसन्न होते. कुठेही नजर जाईल तिथे सृष्टीचे रूप आगळे वेगळे होते. पाय वाटेने चालत राहावे. वाहनांची ये जा नाही. हॉर्नचा आवाज नाही. गाड्यांचा धूर नाही. गोंगाट नाही. कानाला सुखद वाटत होते. आवाज आला च तर जवळून जाणाऱ्या याकच्या गळ्यात बांधलेल्या घंटाचा किंवा खळखळ  वाहणाऱ्या पाण्याचा. पुणे मुंबई सारख्या शहरी वस्तीतून आलेल्या आपल्या सारख्याना हा एक स्वर्ग वाटावा. आपले शहरी जीवन किती बकाल आणि घाणेरडं आहे याची प्रचिती इथे आल्या वर होते. तशात नेपाळी लोक अतिशय विनयशील आणि आदरातिथ्य करणारे  होते. टेकराज काय किंवा पेम्बा काय, तुमची अडचण आधीच ओळखून मदतीला तयार असत.

मागच्या वेळी पेम्बाने पुण्याच्या  एका ट्रेकर्स ग्रुपचे गाईडचे काम केले होते. त्यांचा संगतीत राहून मराठीतील ‘थांबा’ शब्द त्याने उचलला होता. मी ग्रुप सोडून थोडासा पुढे गेलो की तो मागून ‘थांबा थांबा’ चा गजर करायचा.

पाऊस थांबल्यावर रेनकोट काढून हातात घेतला. पाठीवर सॅक होती. पायात ट्रेकिंग चे बूट.अंगावर कपड्याचे तीन थर. अशा अवतारात चालत होतो. आता घाम येऊ लागला. चहा प्यायला पुढच्या स्टॉप वर जेव्हा थांबलो तेव्हा वरचा स्वेटर काढून टाकला.  बाहेर खुर्चीवर उन्हात वाळायला  ठेवला . चहा झाल्यावर जाताना घेतला की झाले.

लुक्ला पासून निघाल्यावर रस्ता उताराचा होता. आमचा शेर्पा कधीच पुढे निघून गेला होता. त्याच्या पाठीवर आमच्या चार जणांच्या सॅक होत्या. वीस किलोची एक सॅक म्हंटल तर, ८० किलो त्याच्या पाठीवर होतं. पेम्बाच्या पाठीवर एक सॅक होती. पुण्याहून येताना मी ट्रेकमध्ये चालायची एक काठी आणली होती.  आणली आहे तेव्हा उपयोग करावा म्हणून हातात ठेवली. खर तर काठीची सवय नव्हती. पण इथे असावी असं वाटलं. कल्पश फोटो घेण्यात गुंतला होता.

तनिश कडे SLR कॅमेरा होता. त्याचीही फोटो काढण्याची घाई, लगबग सुरु होती. टेकराज मुद्दाम सर्वांच्या मागून येत होता. सगळ्याना बरोबर घेऊन येत होता.

वाटेत लागणाऱ्या घराच्या बाहेर लहान लहान मुलं खेळताना दिसत होती. तुमच्या ‘हॅलो’ ला ती गोड हसून उत्तर देत होती. माझ्याकडे मुलांना वाटायला आणलेले रंगीत खडू होते. पण ते मोठ्या सॅक मध्ये होते. त्यामुळे ते इथे देता आले नाहीत. असो. पुढच्या वेळी दुसऱ्या कोणाला तरी देता येतील.

साधारण लुक्ला पासून २-२.५ तास चालून गेल्यावर दूध कोशी नदीचे पात्र आले. ट्रेकच्या प्रवासात ही नदी आपल्या बरोबर असते. या नदीला आपण बऱ्याच वेळेला ओलांडतो. हिमालयातील टिपिकल झुलता पूल पहिल्यांदा इथे लागतो. ह्रिषीकेशला फार पूर्वी पहिल्यांदा झुलता पूल बघितला होता. त्या गोष्टीला कित्येक वर्ष झाली होती. त्यानंतर आत्ता झुलता पूल पाहत होतो. झुलत्या पुलावरून चालण्याचं एक टेक्निक असते. त्या टेक्निकनुसार चालावं लागत. पुलाच्या दोन्ही कठड्याला बुद्ध लोंकांच्यI पताका लावलेल्या होत्या. प्रचंड वाऱ्याने त्या फडफड आवाज करीत होत्या. नदीचा प्रवाह दगड धोंड्यातून वाट काढत खळखळाट करीत चालला होता. पाण्याचा प्रवाहाचा आवाज सभोतालच्या शांतते मुळे दूर वर येत होता. आता नदीला पाणी कमी होते. पूर आल्यावर ती कशी दिसत असेल याची कल्पना केलेली बरी. नदी  तिच्या काठावरच्या लोंकाची जीवन दात्री होती. नदीचे  दुधासारख पांढर शुभ्र पाणी आणि स्थानिक लोकांना कुशीत सामावून घेणारी म्हणून ही दूध कोशी !! फाकडींगच्या वाटेवर काही ठिकाणी गहू आणि मका लावलेला होता. सपाट जमिनीचे लहान लहान तुकडे होते. त्यावर केलेली हि शेती.

साऱ्या ट्रेकच्या रस्त्यावर बुद्धाची मंदिरे, पताका आणि निशाणे सर्वत्र दिसतात. जणू काही बुद्धiची माया आपल्या सोबत असते. संपूर्ण  ट्रेकचे सार थोडक्यात सांगायचे म्हणजे दूध कोशी नदी, त्यावरील झुलते पूल, त्याला लावलेल्या रंगीत फडफडणाऱ्या पताका,भोवतालची प्रेमळ नेपाळी लोंकाची वस्ती, खाली मान घालून चालणारे याक प्राणी आणि हॉटेल मध्ये खायला मिळणार रुचकर डाळ भात चा प्रसाद हे होय. आजूबाजूचा निसर्ग कसा शांत होता. ना कसली चिंता ना कसली घाई. योगी लोक हिमालयात का येतात हे आता कळलं . हिमालयात राहणाऱ्या योगी लोकांना अजून काय पाहिजे? योगी आणि ऋषीना अभिप्रेत असलेल्या समाधीसाठीचे  पोषक वातावरण म्हणजे अजून काय असेल? या वातावरणात एकदा चालू लागलो की माणसाची एक प्रकारची तंद्री लागते. मग आपल्या आजू बाजूला कोण आहे, कोण काय म्हणेल, आपल्या देशात, गावात काय सुरु आहे कशाची ही  आठवण होतं नाही. इंग्रजीत यालाच tranquility असे म्हणतात.ज्याला  ही चालायची तंद्री किंवा लय  जमेल तो बेस कॅम्प सर करेल असे सुरेंद्र नेहमी म्हणायचा. पुराणकाळापासून या tranquility साठीच लोक हिमालयात जात असतील. हिमालयाची या सर्वावर सावलीसारखी माया. सर्वावर सारखाच प्रेम करणारा. वेळ प्रसंगी शिक्षा करणारा. त्या दृष्टीने पहिले असता हिमालय हाच खरा समदर्शी वाटू लागतो. ज्याला अशी चालायची लय रोजच्या आयुष्यात जमली त्याला मोक्ष देखील अवघड नसावा.

फाकडींग आता तासाभरात पोचू असे पेम्बा म्हणाला. वाटेत  छोटी छोटी गावे, वस्त्या लागल्या. चुरीकारका, चेपलुंग, थाडाकसी , घाट वगैरे. ट्रेकिंगचा रस्ता या वस्त्यातून जात होता. बाजूला घरे व छोटीसी हॉटेले, रस्त्यात बागडणारी लहान मुलं होती. फाकडींग चा मुक्काम हा ट्रेक मधील पहिला मुक्काम होता. त्यामुळे हॉटेल कसे असेल, जेवण कसे असेल, स्वच्छता असेल का, झोपताना उबदार ब्लॅंकेट मिळेल का, मुख्य म्हणजे टॉयलेट ची सोय कशी असेल अशा नाना शंका मनात येत होत्या. साधारण चारच्या सुमारास आम्ही फाकडींगला पोचलो. पेम्बाने हॉटेल आधीच बुक केले होते. पाऊस नुकताच पडून गेल्याने सर्वत्र ओल होती. हॉटेलच्या बाहेर टाकलेली बाकडे अजून ओली होती. त्यामुळे हॉटेलच्या आतच बसणं भाग होते.हॉटेल लाकडाने तयार केलेले होते. झोपायच्या खोल्या पहिल्या मजल्यावर होत्या. ट्रेक मध्ये बहुतेक ठिकाणी अशीच व्यवस्था होती. प्रत्येक रूम मध्ये दोन किंवा तीन पलंग असतात. हॉटेलच्या मालकिणीने आधी ब्लॅंकेट द्यायला कुरकुर केली. पण नंतर ती ब्लॅंकेट द्यायला तयार झाली. नंतर मालकिणीच्या आणि टेकराजच्या गप्पा रंगल्या. गिरीप्रेमींच्या गिर्यारोहकांची हे हॉटेल म्हणजे नेहेमीची उतरायची जागा. त्यामुळे टेकराज ला एक प्रकारची VIP ट्रीटमेंट होती. चहा प्यायल्या वरच्या अंगाला चक्कर मारायला बाहेर पडलो. बाहेरच वातावरण अप्रतिम होते. पावसाने आलेला गारवा अजून ठाण मांडून होता. चारी बाजूला काळ्या भुरक्या रंगाचे डोंगर, पहाड, त्यांच्या शिखरावर हलकेसे शिंपडलेले बर्फ, उंच सुरुची झाडे,  कोशी नदीचा खळखळ करणारा प्रवाह,बोचरे वारे , हॉटेलच्या धुराड्यातून बाहेर पडणारा पांढरा धूर. साराच जगावेगळा अविष्कार होता.

IMG_20180501_171131.jpg

हॉटेलचे नाव होते,’ ताशी ता गे लॉज’. हॉटेलची मालकीण आणि तिच्या कुटुंबात काही कलह झाल्याने ती नवऱ्या पासून विभक्त झाली होती. आतल्या गोटातील ही माहिती टेकराजने पुरवली.रात्री जेवण झाल्या वर थोडा वेळ डायनिंग रूम मध्येच बसलो.दुसरे दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती पेम्बा ने दिली. किती वाजता उठायचे, नाश्ता किती वाजता, निघायची वेळ इत्यादीची माहिती व सूचना दिल्या. आपण जसे आज व्यवस्थित आणि वेळेत आलो तसेच उद्याही पोहोचू असा विश्वास दिला.बुटात थोडी ओल आली होती. म्हणून डायनींग रूमच्या कोपऱ्यात शेकोटीची जागा होती, तिथे बूट सुकायला ठेवले आणि खुर्चीवर तिथेच बसकण मांडली. एक फिरंग जोडपं शेजारच्या टेबलावर बसले होते. त्यांच्याशी गप्पा झाल्या. बहुतेक इटली वरून ते आले होते.

IMG_20180501_143359

थोडा वेळ बसून झोपायला रूम वर आलो. मी आणि कल्पेश एका रूम मध्ये होतो. शेजारच्या रूम वर खोत पिता पुत्राबरोबर टेकराज राहणार होता. झोपायला जाड ब्लॅंकेट असल्याने मस्त झोप लागली. दिवसभर बऱ्यापैकी धावपळ झाली होती. पहाटे पाच वाजता उठून विमान तळावर येण्यापासून लुक्ला ला पोचणे, नंतर फाकडींग पर्यंत चालणे, वाटेत लागलेला पाऊस, विसरलेला रेनकोट, त्यामुळे झालेली धांदल.सारे काही डोळ्यासमोर आले. तशात कधी झोप लागली कळले नाही. रात्री अचानक एक दीडच्या सुमारास जाग आली. सार शांत. उजेड अजिबात नाही. तेव्हा बॅटरी घेतली आणि खाली टॉयलेट ला जाऊन आलो. मग पहाटे पाच पर्यंत छान झोप लागली.

फाकडींगला जाताना वाटेत दगडावर खडकावर कोरलेली रंगवलेली गौतम बुद्धाची वचने दिसतात. पाली किंवा तत्सम लिपीत लिहिलेली असल्याने साधारपणे सर्वानाच अगम्य असतात. असे हे खडक,  बाजूचे डोंगर, नदीचा खळखळणारा आवाज वातावरणात एक गूढता निर्माण करतो. आपल्याला हजारो वर्षे भूतकाळात घेऊन जातो. या वातावरणाचा अनुभव घायचा असेल तर बेस कॅम्पच्या ट्रेकला जरूर यायला हवे. शब्दात हे वर्णन करणे केवळ अशक्य आहे.

4.पुष्प दुसरे

फाकडींग ते नामचे बाजार

१. सुरुवातीची उंची:  ८५६३ फूट/२६१० मीटर्स

२. पोचलेली उंची: ११२९० फूट/३४४० मीटर्स

३. चढ: + २७२७ फूट/ ८३० मीटर्स

४. प्राणवायूची उपलब्धता : सुरुवातीला  ७४ % समुद्रसपाटीच्या

५. प्राणवायूची उपलब्धता :  पोचल्यावरची ६७  %

६. चाललेले अंतर:  ४.७ मैल/१४ किलोमीटर

७. लागणार वेळ: ८ तास सुमारे

(चालायची पाऊले:२४८३५ )

रात्री फाकडींग ला कधी झोप लागली कळलं नाही. पहाटे बरोबर पाच वाजता जाग आली तेव्हा अगदी फ्रेश वाटत होते. कालचा थकवा, शिणवटा दूर झाला होता. आजचा नामचे बाजारचा चढ बऱ्यापैकी कठीण आहे हे पेम्बा ने कालच सांगितले होते. त्यामुळे नाही म्हंटल तरी एक अदृश्य दडपण मनावर होतं. आज बेस कॅम्प ट्रेकच्या परीक्षेतील पहिला पेपर होता. तो पण गणिताचा म्हणजे सर्वात कठीण पेपर. बेड टी घेतला.आणि वर येऊन रूम आवरली. नाश्ताची ऑर्डर कालच दिली होती. नाश्ता तयार असल्याची सूचना मिळाली. तेव्हा खाली डायनिंग रूम मध्ये आलो. ऑम्लेट आणि ब्रेड चा मेनू होता. आज भरपूर कॅलरी लागणार आहेत. तेव्हा पोट भर खावा. असे टेकराजने सांगितले.नेहमी कमी नाश्ता करणारा  मी, यावेळी जमेल तेव्हढं खात होतो. अगदी पोट भरून. आता स्ट्रॅटेजि बदलणे भाग होते. कमी वेळा खावा, पण खूप खावा.तसेच भरपूर पाणी प्या. कमीत कमी पाच लिटर तरी पाणी दररोज प्यायला पाहिजे असे गाईडने सांगितले. मी विनोदाने टेकराजला म्हणालो, आपला महाराष्ट्र हा दुष्काळी भाग. तिथे सारे नागरीक दररोज पाच लिटर पाणी पिऊ लागले तर कसे होणार? आपली तर अंघोळ पाच लिटरमध्ये होती राव.अशाने आपल्या महाराष्ट्रातील दुष्काळ अजून भीषण होईल. नाही का? ऐकल्यावर तो आणि बाकीचे पण हसू लागले. टेकराज ने ट्रेकच्या  दरम्यान मांसाहार करू नका म्हणून सांगितले. इथे जेवायला  पुरवितात ते मांस खालून म्हणजे लुक्ला वरून मागवले जाते. ते मांस वर येई पर्यंत  दोन दिवसाचे शिळे होते. आणखी जसे वर जाऊ तसे ते अजून च शिळे झालेले असते. तेव्हा मांसाहार वर्ज्य. पोटाचा त्रास होऊन औषध घेण्यापेक्षा वर्ज्य केलेला बरा. मी तर शाकाहारीच होतो. पण बाकीच्या सर्वानी हा सल्ला तंतोतंत मानला. काठमांडूला परत आल्यावरच मांसाहार करण्याचे सर्वानी  मान्य केले. निघताना चहा पिऊन आणि पाण्याच्या बाटल्या गार पाण्यानी भरून घेऊन निघालो. टेकराजेने मुद्दामच प्यायला थंड पाणी घेण्यास सांगितले. कारण हे पाणी संपल्यावर वाटेत गरम पाणी मिळणार नाही. एखाद्या झऱ्याचे पाणी भरून घ्यायला लागणार. तेव्हा आधी गरम पिणार नंतर गार पाणी यामुळे घश्याला त्रास होईल. म्हणून  काळजी घेतलेली बरी. दुसरी गोष्ट म्हणजे गरम पाणी घ्यायला  पैसे मोजायला लागले असते हे अलाहिदा. शेर्पा आमच्या सॅक घेऊन आधीच निघाला होता. तो आमच्यापे क्षा लवकर निघत असे आणि एक दोन तास आधीच पोचत असे. आपल्या कडे IPL च्या सामन्यात चार षटक टाकणारे खेळाडू शेवटच्या एक दोन ओव्हर किती धापा टाकतात आपण बघतो. आणि इथे हा माणूस जवळपास ८० किलो वजन पाठीवर घेऊन १०-१२ किलोमीटर चढाच्या वाटेने न थकता सहज चालतो. आणि दिवस काठी जेमतेम हजार रुपये मिळवतो. आणि आपले  IPL  खेळणारे २४ चेंडू पळत येऊन टाकतात आणि लाखो रुपये कमावतात. देवाच्या दारी न्याय नाही हेच खरं. ‘मुखी कोणाच्या पडते लोणी, कोणा मुखी अंगार’ असे मराठीतील वाल्मिकी ग दि मा यांनी म्हंटल आहे हाच प्रकार होता. मला तर सिंहासन सिनेमा मधल्या ‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ या गाण्याची आठवण आली. त्या गाण्यातील ‘कोण मेले कोणासाठी रक्त ओकून’ ह्या किती सार्थ होत्या. हा शेर्पा कोण कुठला, आम्ही कोण, कुठून आलेलो, पण दैव गतीने एकत्र आलेलो. आमचे ८० किलो चे ओझे तो खांद्यावर घेऊन  सुसाट चालत होता. त्याचे आम्ही पैसे देणार होतो हा भाग वेगळा. ट्रेक संपल्यावर आम्हाला तो परत कधीच भेटणार नव्हता. या दहा बारा दिवसाच्या  काळात आमचे ओझे त्याच्या डोक्यावर होते हे मात्र खरे. म्हंटल तर हा एक व्यवहार होता, म्हंटल हा एक ऋणानुबंध !! सारेच अनाकलनीय  होते.

पेम्बाने दिलेल्या माहिती वरून आणि इंटरनेट वरून मिळवलेल्या ज्ञानावरून  बेस कॅम्पच्या ट्रेक मधील हा एक खडतर प्रवास होता.खूप अवघड टप्पा होता. नामचे बाजार ला पोहचायला ९५० मीटर ची उंची चढायची होती, अंतर जवळपास ७.५ किलोमीटरचे कापायचे होते. स्वतःलाच म्हंटल, बघू  या कसे जमते ते.वाटेत बेस कॅम्प वरून परतणार पुण्याचा ग्रुप भेटला. ते सारे बेस कॅम्प ला जाऊन आल्याच्या आनंदात होते.

आम्ही कोशी नदी ओलांडली आणि उजवीकडे वळण घेतले व चढ सुरु झाला. चढ तसा खूप steep नव्हता. पण हा प्रदेश सर्व नवीन होता. शांतपणे पावले टाकीत निघालो. टेकराज म्हणाला की हा चढ काहीच नाही, खरा चढ हा ‘जोरसेला’ नंतर चालू होतो. त्यामुळे आता जमेल तेव्हढी energy साठवून ठेवा.घाई करून भर भर चालू नका. सकाळी साडे सातला हॉटेल सोडले होते. दीड तास झाला होता. म्हणून साधारण सव्वा नऊ च्या सुमारास चहासाठी थांबलो. ब्रेक घेणे आवश्यक  होते. नदीच्या किनाऱ्यावर एक हॉटेल होते. तिथे बाहेर टाकलेल्या बाकड्या वर बॅग ठेवली. पाणी भरून प्यायला  घेतले. पोट भरचहा ढोसला.पाच दहा मिनिटे विश्रांती झाली. आता निघालो. आता तर आम्ही नदीच्या पात्रातून चालत होतो. वाट अशी नव्हतीच. सर्वत्र नदीतील दगड आणि धोंडे. त्यावरून कसरत करत चाललो होतो. पुढे काही अंतरावर एक झुलता पूल दृष्टीस पडला.उभे होतो त्या अंतरावरून तो खूप च उंच दिसत होता. त्या पुलावरून कोशी नदी आम्ही परत ओलांडणार होतो. पण एवढा उंच पोचणार कसे याची काळजी वाटू लागली. माझ्या पोटात तर विचाराने गोळा आला. पण बाकीचे सारे जातात ना तसे आपल्याला हि हे शक्य होईल असा विचार केला. प्रत्येक पाऊल आता बऱ्या पैकी उंचावर ठेवायला लागत होते. हातात स्टिक असल्याचा फायदा होतं होता.खाली मान घालून मुकाट्याने चालत राहिलो. आणि काही वेळातच पुलाच्या एका टोकाला पोचलो. हा पूल ट्रेकच्या वाटेवरील  सर्वात उंचावर बांधलेलi पूल असावा, आहेच. सारे विश्रांती साठी थांबले.पाणी प्यायलो. वारा  खूपच होता. या पुलाच्या खाली दुसरा एक पूल होता. पण सध्या तो वापरात नव्हता. पुलाची उंची नदी पात्रापासून सुमारे चारशे फूट असावी. काही जण याला ‘आनंदाचा पूल’ (ब्रिज ऑफ जॉय) असे संबोधतात असे सुधीर कडून समजले. पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्यांची वाहतूक सुरूच होती. त्यात गिर्यारोहक होते, शेर्पा होते, याक प्राणी होते.नेहमी प्रमाणे पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याला रंगीबेरंगी पताका बांधलेल्या होत्या. वारा जोरात असल्याने त्यांचा जोरात आवाज येत होता. कोशी नदीचे पात्र खाली दिसत होते. डोळे फिरतात कि काय अशी या पुलाची उंची होती. नदीत पाणी कमी होते. त्यामुळे प्रवाह आकुंचित झाला होता.पण पाण्याला वेग मात्र तुफान होता. दूरवर मोठ्याला शिळेवर चार रानटी बोकड चरताना दिसत होते. त्या योगे हिमालयातील पशुसंपत्तीचे  दर्शन झाले. या पुलाचे  तसेच पुलावरून अनेक फोटो घेतले.

IMG_20180502_061442

पूल संपला आणि परत अजून चढ सुरु झाला.तत्पूर्वी ‘सागरमाथा’ वन विभागाचे चेक पोस्ट पार करावे लागते. या ठिकाणी प्रवेश पास घ्यावा लागतो .पास मिळेपर्यंत थांबलो. आमच्या आधी पोचलेली बरीच मंडळी इथे थांबली होती. पेम्बा आमच्या आधीच येऊन पोचला होता. त्याने आमच्या चौघांची तिकिटे काढली. नेपाळी जनतेला फुकट! त्यामुळे बाकीच्यांना तिकिटे नव्हते. ‘सागरमाथा नॅशनल पार्क’ हे जगातील सर्वात उंचावरील अभयारण्य आहे. ११४८ चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रफळात ते पसरले आहे. याची स्थापना १९७६ साली झाली. खुम्भू विभागातील या अभयारण्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जगातील अत्युच असे एवरेस्ट शिखर यात येते.उंची ८८४८ मीटर्स. याज बरोबर  ल्होत्से (८५०१ मीटर्स) आणि चो यु (८१५३ मीटर्स) ही दोन, आठ हजार पेक्षा जास्त उंचीची शिखरे येथे आहेत. त्याच प्रमाणे सहा हजार मीटर्स उंचीपेक्षा जास्तीची प्रमुख शिखरे थांगसेरकु , नुत्से  , आमा दाबलाम आणि पुमोरी शिखरें  यात आढळतात. पार्कच्या उत्तरेस दूध कोशी चा उगम आहे.तसेच प्रचंड खोल दर्या, ग्लेशिअर या पार्क मध्ये आहेत. १९७९ साली युनेस्कोने   या अभयारण्याला जागतिक हेरिटेज स्थळ म्हणून मान्यता दिली. या पार्क मध्ये मुख्यतः वस्ती बुद्ध धर्मीय शेर्पा लोकांची आहे. प्रसिद्ध तेंगबोचे मॉनेस्ट्री आणि इतर अनेक मॉनेस्ट्री इथे आहेत. दुमजे आणि मणी रिमदु या स्थानिक सणाच्या वेळी तिथे खूप गर्दी जमते. इतर मॉनेस्ट्रीमध्ये  खुमजुंग आणि पांगबोचे या महत्वाच्या आहेत. सागरमाथा अभयारण्य म्हणजे जगातील सर्व गिर्यारोहकांची काशी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

या पार्क मध्ये नानाविध झाडे, झुडपे, प्राणी , फुले, कीटक आढळतात. कमी उंचीच्या ठिकाणी पाईन वृक्ष आणि हेमलॉक झाडे आहेत. हिमालयातील सुप्रसिद्ध हॉडोडेंड्रॉन झाडे आहेत. ट्रेकिंगच्या  वाटेत पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले परिधान केलेले हे वृक्ष मन मोहून टाकतात.

IMG_20180502_061505.jpg

नॅशनल पार्क मध्ये खुम्बू ग्लेशियर प्रमाणेच इमजा  आणि गोझुम्पा  (Ngozumpa) ही  पण प्रसिद्ध ग्लेशियर आहेत. सागरमाथा अभयारण्यातील प्रमुख आकर्षणे म्हणजे:

१. जगातील सर्वात उंच असे एव्हरेस्ट शिखर

२. ल्होत्से आणि चो यु ही  ८००० मीटर्स पेक्षा  जास्त उंचीची शिखरे

३. एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि काला पत्थर

४. गोक्यो लेक आणि गोक्यो ग्लेशिअर

५. चिंकूग आणि थाम व्हॅली

६. शेर्पा संस्कृती आणि मॉनेस्ट्री

नॅशनल पार्क मधून एवरेस्ट बेस कॅम्पचा जसा ट्रेक जातो तसेच इतर  काही ट्रेक आहेत.

१. नामचे बाजार ते खुमजुंग /खुंडे        २ तास

२. खुमजुंग /खुंडे ते डोले                       ७ तास

३. डोले ते मोचारमां                             ४ तास

४. मोचारमां ते गोक्यो                         ४ तास

५. गोक्यो ते गोक्यो शिखर                ३ तास

६. गोक्यो ते थाकनाक                       ३ तास

७. थाकनाक  ते फोर्टसे                       ६ तास

८. फोर्टसे ते पांगबोचे                          २ तास

९. पांगबोचे ते नामचे बाजार                ६ तास

या अभयारण्यात जाण्यासाठी सार्क देशातील नागरिकांना प्रवेश फी १५०० रुपये आहे तर इतर परदेशी नागरिकांना ३००० रुपये मोजावे लागतात. हा प्रवेशपास काठमांडू येथे नेपाळ टुरिझमच्या कचेरीत पण मिळू शकतो. किंवा ट्रेक मार्गावर monje येथे मिळतो.

वरील माहिती  सागरमाथा नॅशनल पार्कच्या पुस्तकातून घेण्यात आली आहे. नावांची थोडी फार गल्लत झाली असेल तर  इग्रंजी भाषांतरI मुळे असेल असे समजावे.

मोंजो ते नामाचे बाजार अंतर ५ मैल / ८ किलोमीटर आहे. फाकडींग ते नामचे बाजार या वाटेत झांम्पत्ये, टोक टोक इत्यादी छोटी गांवे लागतात.हा सारा रस्ता ट्रेकर्स चा असल्याने वाटेत अनेक हॉटेल आणि लॉज लागतात. ट्रेकर्सनी यावं, चहा कॉफी घ्यावी , थोडी विश्रांती घ्यावी आणि पुढे चालू लागावं.असा हा सारा प्रकार आहे. नामचे बाजार च्या ट्रेक मध्ये चालत गप्पा मारत असताना टेकराजने एक धमाल कहाणी सांगितली. कहाणी  कसली सत्यकथा आहे. ही गोष्ट माझ्या मते फक्त फिल्मस्टार रजनीकांतच करू शकतो. मात्र आपल्या या कथेच्या हिरोचे नांव आहे ‘सणो बाबू सुनूवर’. या गृहस्थाला आणि शेर्पा लाकपा शेरी (अल्टिमेट डिसेंट ग्रुप) या दोघांना २०१२ साली नॅशनल जिओग्राफीचे ‘ऍडव्हेंचर ऑफ द ईअर ‘ चा ‘किताब मिळाला. त्यांचे कारनामे असेच होते. हे दोघे वीर एव्हरेस्ट चढून गेले. तेथून त्यांनी पॅराग्लाईडींग केले, पॅराग्लाईडींग  करत ते दूध कोशी नदीच्या  खोऱ्यात उतरले. दूध कोशी नदी पुढे जात जेथे गंगा नदीला मिळते तिथंपर्यंत ते ‘कायाकिंग’ करत गेले. दूध कोशी आणि गंगा नदीच्या संगमापासून ते होडीने निघाले. तेथून बंगालच्या उपसागरIपर्यंत जेथे गंगा सागराला मिळते, तेथ पर्यंत ते होडीने गेले. आणि बंगालच्या उपसागराला लागले. एक प्रकारचा जागतिक विक्रमच म्हंटला  पाहिजे. असे धाडस पूर्वी कोणीच केले नव्हते. ह्या  धाडसी जोडीला नॅशनल जिओग्राफीने त्या वर्षाचा अत्यंत प्रतिष्ठीत अशा सन्मानाने  ,पुरस्काराने गौरविले. आपले जग अशा जगावेगळ्या वेड्या,चक्रम आणि मुन्ना भाईच्या भाषेत सांगायचे म्हणजे ‘सर्किट ‘ माणसांनी भरलेले आहे यात शंका नाही.

नामचे बाजार ट्रेक चा हायलाईट म्हणजे कोशी नदी वर लागणारे झुलते पूल. या अनेक पुलापैकी सर्वात कठीण पूल म्हणजे मागे पार केलेला होय.हा केवळ लांबीलाच मोठा नव्हता तर याची उंची पण जबरी होती. या पुलावर वारा अती  वेगाने वाहत होता. पडू नये म्हणून बाजूला कठड्याला हात लावला तर निघालेल्या लोखंडाच्या वायरीच्या टोकांनी हाताला इजा झाली असती. तशात समोरून येणारे मुसंडी मारत पुढे घुसणारे याक प्राणी. त्यांना वाट दिली नाही तर आपली ‘वाट’ लागली म्हणूनच समजा. पुलावर जेव्हढी ज्यास्त माणसे तेव्हढा पूल जास्त झुलायचा. त्यामुळे दोन मिनिटे शांत पुलावर उभे पण राहता येत नव्हते.

जोरसाल नंतर ट्रेक ची कठीणता वाढतच जाते. रस्त्यावर बऱ्या पैकी चढ आणि वळणाचा रस्ता.बरेच ट्रेकर्स प्रत्येक पन्नास पावलावर विश्रांती साठी थांबत होते. मी कधी थांबलो नाही ही गोष्ट वेगळी. कारण माझा चालण्यात एक रिदम आलेला असायचा. त्यामुळे मी माझ्याच गतीने चालत राहायचो. कासवाची का गती असेना. माझ्या वाटेत समोर कोणी आला की मला त्रास व्हायचा. कारण माझा रिदम डीस्टर्ब व्हायचा. एक गोष्ट मात्र नक्की. या टप्प्यात भरभर चालणाऱ्यांना उंचीचा त्रास होणार हे नक्की. म्हणून वाटेत क्षण भर थांबावे, निसर्गाचे विलोभनीय दर्शन घ्यावे. जमेल तेवढे फोटो आणि सेल्फी काढावेत. म्हणजे आपोआप विश्रांती मिळते. वाटेत ‘ तांगबोचे ‘ (६५४२ मीटर उंच) शिखराचे दर्शन होते. आकाराने अति भव्य आणि बर्फाच्छादित.त्याच रांगेत पुढे एव्हरेस्ट दिसतो. पण त्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ हवी. आम्हाला नशिबाने हात नाही दिला. त्यामुळे मन नाराज झाले. चालायचं. या ट्रेक मध्ये सारे काही नशिबाच्या साथीनेच चालते.

शेवटचा चढ हा खरंच जीव घेणारा होता. कधी संपतो असे झाले होते. या टप्प्यात पायाखालची माती कठीण होती. त्यामुळे पाऊले टाकणे जड जात होते. या टप्प्यावर नकळत माझ्या पायाची चालायची लय बिघडली. डावा पाय टाकताना थोडासा विचित्र पडू लागला. पाय ओढत न्यावा असे झाले होते. मला  हे चालताना ध्यानात आले होते. पण मी काहीच करू शकत नव्हतो. पायात एक प्रकारचा फटिग आला होता. तसेच चालत राहिल्यामुळे पाय दुखू लागला. तरी  दुर्लक्ष्य करत पुढे निघालो. काही वेळातच नामचे बाजारचा चेक पोस्ट आला. अभयारण्याची  प्रवेशिका इथे दाखवल्यावरच पुढे जाण्याची परवानगी मिळते. आमच्या कडे प्रवेशिका नव्हत्या. त्या पेम्बाकडे होत्या. त्यामुळे काही वेळ त्याची वाट पाहण्यात गेला. बाकावर बसून थोडी विश्रांती घेतली. पाणी प्यायलो. काही अंतरावर घरे आणि हॉटेले दिसत होती. चेक पॉईंट आला म्हणजे नामचे बाजार आला असे वाटणे साहजिकच होते.  पण दुर्दैवाने ते खरे नव्हते. नामचे  बाजार यायला  काही अंतर चालायचे होते. पास दाखवुन  झाल्यावर सगळे मिळून  निघालो. चेकपोस्टपासून वाटलं त्या पेक्षा अंतर बरंच  जास्त होते. किंवा त्या परिस्थितीत तसे वाटले. उजवी कडे वळल्यावर पर्वती सारख्या पायऱ्या लागल्या. त्या पार केल्यावर परत पाऊल वाट लागली. तेथील कट्ट्यावर विसावलो. चालत पुढे गेल्यावर उजवीकडे  एक सुंदर गार्डन लागली. उतारावर एका खाली एक अशी धर्म चक्रे लावली होती. त्या चक्रावर  कालव्यातून पाणी सोडले होते. उतारावरून येणारे पाणी वेगात येत होते. त्या पाण्याच्या वेगाने  चक्रे गोल फिरत होती. बघायला मस्त वाटत होते. अशी पाच तरी चक्रे एका खाली एक असावीत. त्यातून आवाज करीत जाणारे पाणी अगदी स्वच्छ होते. नामचे बाजार सुंदर करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न केला होता.  वाट काढत बाजारात आलो. तिथे  थोडासा चढ होता. बाजारात मार्गावर दोन्ही बाजूला दुकाने आणि हॉटेले होती. दोन एक मिनिटे चालल्यावर डावी कडे रस्ता गेला. त्या रस्त्यावर उजव्या हाताला आमचे हॉटेल होते. हॉटेलच्या दारावर याक प्राण्याचा  लहान पुतळा होता. हॉटेल पहिल्या मजल्या वर व खाली दुकाने होती. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर खोल्या होत्या. आता परत वर चढणे जीवावर आले होते.

तेव्हा हॉटेलच्या डायनिंग रूम मध्ये शिरलो. डायनिंग रूम मध्ये  बऱ्या पैकी गर्दी होतीबाकीच्या ट्रेकर्स चे सामान ढिगाने ठेवले होते. त्याच्या शेजारीच आमचे . सामान ठेवले.  कशीबशी बसायला जागा मिळाली. व टेकलो. पाय आता बोलू लागले होते.

नामचे बाजार ला पोचलो तेव्हा चार वाजले असतील. चहा ‘भेटल्यावर’ तरतरी आली. रूमवर जाऊन सामान ठेवले. पण रूम मधून लगेच खाली आलो. रूम वर थांबलो तर दमल्या मुळे झोप येईल. म्हणून बाजारात फिरायला जाण्याचे ठरले. कल्पेश, तनिश आणि टेकराज जवळच हेलिपॅड होते ते बघायला उजवीकडे गेले. त्या बाजूला जरासा चढ होता. आणि आता चढ चढणे मला जड झाले होते. त्यामुळे मी मागे राहिलो. माझ्या संगे  सुधीर पण थांबला. मग आम्ही गप्पा मारत मारत बाजारातून चक्कर मारायला निघालो. वाटेत एक कॉफी शॉप लागले. त्यात बरीच फिरंगी मंडळी गप्पा मारत बसली होती. कदाचित त्या भागातील बऱ्यापैकी फेमस हॉटेल असेल. मला आणि सुधीरला कॉफी प्यायची हुक्की आली. म्हणून आत शिरलो. जागा मिळाली.तेव्हा लक्षात आले की आम्ही दोघांनीही पैशाचे पाकीट आणले नव्हते. खिशातून चिल्लर काढली. दोघांकडची नाणी मिळवली तर एक कॉफी विकत घेणे शक्य होते. तेव्हा दोघात मिळून एक कॉफी घेतली. कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. कॉलेजच्या दिवसात खिशात पैसे नसायचे. तेव्हा अनेक वेळा आम्ही वर्गणी काढून  चहा प्यायला होता.

कॉफी पिऊन बाहेर पडेपर्यंत इतर सर्व हेलिपॅडला जाऊन आले होते. ज्यांना किरकोळ शॉपिंग करायचे होते ते आटोपले. आता या पुढे शॉपिंगचा स्कोप  नव्हता. कानटोपी आणि  काही इतर चिजा खरेदी केल्या. नामचे बाजार सर्व प्रकारच्या वस्तुंनी समृद्ध होता.विदेशी नागरिकांना ज्या काही गोष्टी लागतील त्याची रेलचेल होती. बिलियर्ड टेबल असलेली हॉटेले होती. एक दोन बेकरी होत्या. हॉटेलवर इंटरनेट फुकट असल्याचे बोर्ड होते. एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती  म्हणजे या भागात सर्वत्र इंटरनेट सेवा मिळेलच असे नाही. काही हॉटेल सुविधा पुरवितात पण त्या साठी वेगळे पैसे मोजावे लागतात. तसेच मोबाईल चार्जिंग साठी वेगळे पैसे द्यावे लागतात. या भागात विजेची (Electricity)कमतरता आहे. त्यामुळे मोबाईल आणि पॉवरबँक चार्जिंग ला पैसे लागतात.

माझा पाय आता दुखू लागला  होता त्यामुळे मी बाहेर हिंडण्यापेक्षा हॉटेल वर थांबणं पसंत केलं. माझी अडचण टेकराज ला सांगितली.त्याने मला सोबत रूम वर नेलं. त्याच्या बॅग मधील औषधाचा किट काढला. दुखणे (pain) दूर करणाऱ्या औषधाचा फवारा दुखऱ्या भागावर मारला. सोबत पायाचा हलकासा व्यायाम सांगितला.माझ्याकडून दोन चार वेळा व्यायाम करून घेतला. प्रत्येक दहा मिनिटांनी तो करायला सांगितलं. स्ट्रेचिंग चा व्यायाम होता तो. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी रूम वर बसल्या बसल्या व्यायाम करत राहिलो. आश्चर्य म्हणजे तासाभरात  पाय दुखायच प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले.

रात्री सर्वानी डाळ भात खाल्ला. आणि अंथरुणावर पडल्या पडल्या दिवस भराच्या ट्रेकचा प्रवास आणि विविध अनुभव,सृष्टी सौंदर्य याचा विचार करत झोपी गेलो. आजचा दिवस त्या मानाने परीक्षा घेणारा होता. चालायची परिसीमा होती. उद्याचा दिवस वातावरणाशी जुळवून घेण्याचा होता. उद्याला  परत एक छोटासा ट्रेक करायचा होता. मला तो करायला जमेल की  नाही अशी दुखऱ्या पायIमुळे शंका येत होती. विचार करता करता कधी डॊळे मिटले समजले नाही.

वातावरणाशी जुळवून घेण्या (acclimatization)चा दिवस

आज  नामचे बाजार ला मुक्काम होता. वातावरणाशी मिळवून जुळवून घेण्याचा हा दिवस. ४८ तासापूर्वी आम्ही काठमांडू हुन निघालो होतो, तेव्हाची उंची होती ४६०० फूट/१४०० मीटर्स होती. आता नामचे बाजारला आलो होतो. इथे उंची होती ११२९० फूट/३४२० मीटर्स.एव्हढ्या कमी वेळेत आम्ही बरीच उंची गाठली होती. हा फरक शरीराला नक्की जाणवत होता. म्हणूनच बहुतांशी ट्रेकर्स इथे एक दिवसाचा मुक्काम करतात.पुढच्या टप्प्यावर निघायच्या आधी इथे अजून एक रात्र काढायची होती. आज रात्री दोनदा जाग आली. वातावरणातील प्राणवायूच्या कमतरतेमुळे झोप नीट लागत नाही. जाग आली की  बाथरूम ला जाऊन यायचं आणि जाईल तेवढे पाणी प्यायचं, हा इथला शिरस्ता. आहे. मी पण असेच केले. रात्री बाथरूमला जायचे म्हणजे एक संकट असते. कारण रात्री नऊ वाजता लॉज वरील दिवे बंद करतात. विजेच्या कमतरतेमुळे असे करावे लागते. असा इथला प्रघातच आहे. त्यामुळे रात्री झोपताना बॅटरी उशाला घेऊन झोपायला लागते. तसेच जाताना चप्पल सुध्दा आपल्याला अंधारात सापडली पाहिजे अशी ठेवावी लागते. माझ्याकडे ट्रेकर्स वापरतात तशी डोक्याला अडकवायची प्रॉपर बॅटरी होती. पण त्यापेक्षा साधी हातात धरायची बॅटरी चालली असती. रात्री अंधारात ती हातातील बॅटरी सोयीची  पडते. रात्री लवकर झोपल्याने पहाटे पाचला जाग आली. रूम च्या खिडकीतून बाहेर पहिले. बाहेर उजाडायला सुरुवात झाली होती. आणि समोरच बर्फाच्छादित शिखर दिसत होतं. बर्फाच्छादित शिखर बघून अतिशय आनंद झाला. हे शिखर आमा दाबलामचे हे नंतर समजले. खूपच छान दिसत होतं. कल्पेशने खाली जाऊन पटकन फोटो काढले. आता पाय कालच्या पेक्षा कमी दुखत होता. पण पूर्णपणे थांबला नव्हता.रात्री आयोडेक्स मलम चोळले होते. पण पोटात गोळी घेतली नव्हती. कांच्याने (टेकराज) गोळी घेऊ नका म्हणून सांगितले होते. थोडासा स्ट्रेचिंग चा व्यायाम केला. बरं वाटलं. खाली डायनिंग रूम मध्ये आलो. गरम गरम चहा घेतला. थंडीमुळे प्रत्येकाने जवळपास दोन कप तरी चहा घेतला असेल. चहा काळा (ब्लॅक) होता. म्हणजे दूध नाही. आता या पुढे लुक्लाला परत येईपर्यंत काळा चहा प्यायचा होता.  दुधाने उंचावर जाऊ तसे पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दूध व्यर्ज. सकाळचा चहा घेताना पेम्बाने आजची रूपरेषा सांगितली. सकाळी सातला निघणे, अजून उंचीवर असलेल्या हॉटेल एव्हरेस्ट व्ह्यू वर जाणे, हॉटेलच्या बाल्कनीतून एव्हरेस्टचे दर्शन घेणे ,परत येताना वाटेत शेर्पा म्युझिअम पाहणे, मग रूमवर परतणे असा आजचा सकाळचा कार्यक्रम होता. दुपारी परत एक छोटासा ट्रेक करणे असा एकंदरीत आजचा दिवस होता.दुखणारा पाय घेऊन कसे जमणार हे माहित नव्हते.देवावर भरोसा. आणि एव्हरेस्टची इच्छा .अजून काय करणार?

सकाळी नाश्ता आटोपला आणि बाहेर पडलो. ट्रेकच्या दरम्यान सकाळी आवरण्याचा कार्यक्रम सोपा सुटसुटीत असायचा. अंघोळ करायला सुट्टी, दाढी करायला सुट्टी. दात घासले  की आवरून झाले. रात्री घातलेले ‘इनर’ चे कपडे उतरवले. परत एकदा पायाला मलम लावले आणि मनोमन पायाला सहकार्य करण्याची विनंती केली. हॉटेलच्या खाली आलो. सारे वाट पाहत उभे होते. काठमांडू ला एअरपोर्ट वर भेटलेले जोडपे इथे भेटले.मॅडम पुण्याच्या म्हणजे ‘मराठी बाणा’. त्या वर्षातून एकदा तरी हिमालयात ट्रेकिंग साठी येतात.  काठमांडू ला एअरपोर्ट वर ‘हाय हॅलो’ची मैत्री झाली होती. त्यांच्याशी पाच मिनिटे बोलायला थांबलो. आम्ही जसा आज नामचे बाजारला मुक्काम केला होता तसे ते  आज नामचे बाजारला थांबणार नव्हते. ते ‘गायकू’ च्या रस्त्याने पुढे जाणार होते. म्हणजे त्यांनी बेस कॅम्प च्या ट्रेक चा नेहमीचा रस्ता सोडला होता. आणि पुढे ते बेस कॅम्पच्या ट्रेक च्या रस्त्याला मिळणार होते. विशेष म्हणजे त्यांनी ना गाईड घेतला होता ना शेर्पा! हिमालयात अशा प्रकारे  फिरणे धोखादायक असून शकत. ‘पसंद अपनी अपनी’ आणखी काय बोलणार!!

नामचे बाजारच्या दुकानाच्या मधून वाट काढत चाललो. दोन मिनिटे चालून गेल्यावर डावे वळण घेतले आणि परत उजवे. तेव्हड्यात समोरून एक धट्टाकट्टा याक आला. त्याला जायला जागा करून दिली. थोडेसे अंतर चालून गेल्यावर नेहमी वाटेत बघायला मिळतात तसे बुद्ध धर्माचे चक्र आले. त्याला उजव्या हाताने गती दिली आणि पुढे कूच केले. अशा प्रकारे चक्र फिरविणे ‘लकी’ असते असे म्हणतात. वाटेत हॉटेल एव्हरेस्ट व्ह्यूचा बोर्ड लागला. त्या दिशेने कूच केले.  त्या दिशेने बरेच ट्रेकर्स निघाले होते. हवेत प्रचंड गारवा होता.तापमान शून्य अंशाच्या आसपास असावे. हवा ढगाळ होती आणि पुढचे दिसत नव्हते. वारे सुटले होते. पायवाटेने चालत निघालो. वाटेवर दगड, धोंडे आणि वाळू होती. पाय थोडा दुखत होता. जमेल का नाही अशी आशंका होती. दोन तासाची तरी चढण होती.मी अर्ध्या वाटेवर थांबलो तरी चालेल असे टेकराजने सुचवले.मी म्हंटल, हळू हळू चालत राहू. बघतो जमतेय का. आणि मी दुखण्या कडे लक्ष न देता चालत राहिलो. तेव्हढा एकाच मार्ग होता माझ्यापुढे.

वाटेत अर्धा एक तास चालून गेल्यावर ‘सागरमाथा नेक्स्ट’ नावाचा बोर्ड लागला. तेथून पन्नास फुटावर बांधकाम चालले होते. त्या बोर्डपाशी एक गोरा माणूस एका ग्रुप बरोबर बोलताना दिसला. उत्सुकतेने आम्ही पण तेथे गेलो. जे पहिले आणि ऐकले ते अद्भुतच होते. ‘टॉमी गुस्टाफसान’ नावाच्या व्यक्तीची गाठ पडली. हा गृहस्थ स्वीडन देशाचा.गेली १५ वर्षे नेपाळ मध्ये राहतो. टॉमी हिमालयात आला आणि हिमालयाच्या प्रेमात पडला. हिमालयातील पडलेला कचरा, प्लास्टिक, टाकून दिलेले सामान गोळा करून त्याची विल्हेवाट लावायचे व्रत त्याने घेतले आहे. आपला हिमालय हा स्वच्छ राहावा म्हणून याची धडपड चालू आहे. या व्रतातून उभी राहिली  संस्था ‘सागरमाथा नेक्स्ट’. या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे टाकाऊ कचऱ्यातून टिकाऊ गोष्टी तयार करणे, ट्रेकर्स आणि टुरिस्ट यांच्यात जनजागृती करणे, यातून तयार झालेल्या या वस्तू विकणे आणि ज्या वस्तूंचा काहीच उपयोग करू शकत नाही त्या एक एक किलोच्या बॅगामध्ये घालून गिर्यारोहकांच्या बरोबर खाली काठमांडूला पाठवणे. या प्रकाराने हिमालय आणि येथील पर्यावरण स्वच्छ राखता येईल हा उद्देश. या संस्थे साठी एक लहानशी इमारत बांधली जात होती. या इमारतीचा उपयोग टाकाऊ वस्तूपासून  तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवणे, स्थानिक लोकांना अशा वस्तू बनवायला शिकवून रोजगार मिळवून देणे, जगातील अशा वस्तू बनवणाऱ्या कलाकारांचे संमेलन भरवणे आणि हिमालयात जाणाऱ्या लोंकांच्यात कचरा करू नका अशी जागृती करणे या साठी होणार आहे. हे सारे घडत होते समुद्र सपाटी पासून ४००० मीटर्स उंचीवर. टॉमी आणि त्याच्या साथीदारांनी पर्यावरण रक्षणाचे अवजड शिवधनुष्य पेलले होते. यातून हिमालयातील पर्वतावर आणि दऱ्यात , नदी नाल्यात टाकला जाणारा कचरा कमी होणार होता, वाहणाऱ्या नद्या स्वच्छ राहणार होत्या आणि रोजगार निर्मिती होणार होती. टॉमी आपले घरदार, देश सोडून कित्येक वर्षे नामचे बाजार ला मुक्काम करून आहे. हिमालयातील पर्यावरणाचे रक्षण हे त्याचे जीवनाचे ध्येय झाले आहे. अशा समर्पित लोकांना मनाचा मुजरा !! सुधीर ने टॉमीची मुलाखत घेतली आणि फेसबुक वर टाकली. काही वेळातच त्याला कित्यकांनी प्रतिसाद दिला. धन्य हो सोशल मीडियाची!

टॉमी बरोबर ग्रुप फोटो घेतला, त्याला शुभेच्छा देऊन आम्ही निघालो.आता वाट फारच अवघड आणि वेडी वाकडी होती. रस्ता असा नाहीच. वाटेत २-३ फूट वाढलेली झुडपे लागत होती. त्यांना वळसा घालून पुढे चालत राहिलो. ध्येय होते एव्हरेस्ट व्हू हॉटेल गाठायचे. पुढे गेल्यावर अर्धे फ़ुटबॉलचे मैदान असावे असे मोकळे आवार लागले. त्यावर बारीक दगड आणि मुरूम होता.चारी बाजूला एक प्रकारचे कुंपण होते. हा जगातील सर्वात उंचावरील विमानतळ होता. या ठिकाणी विमान उतरायची काहीच सोय दिसत नव्हती. साधी धावपट्टी सुद्धा नाही इथे.आता हा विमानतळ बंद आहे . तरी पण विमानतळ चालू स्थितीत असताना इथे विमान कशी उतरत असतील देव जाणे! हा ‘सांगबोचे विमानतळ’ उंची १२४०२ फूट/ ३७८० मीटर्स, सद्य परिस्थिती पाहता इथे एअरपोर्ट चा बोर्ड देखील नव्हता. आता सर्वत्र हेलिकॉप्टर चा उपयोग होतो. वापरायला सोपं आणि सुटसुटीत. धावपट्टीची गरज नाही. कुठं ही उतरवता येते. पुढे गेल्यावर एक इमारत दिसू लागली. वाटलं हेच एवरेस्ट व्हू हॉटेल असावे. पण एक बंदिस्त  असलेली इमारत होती. कुंपणाच्या गेटवर कुलूप होते.त्या इमारती मध्ये शुकशुकाट होता. इमारतीला उजव्या हाताने वळसा घालून चालत राहिलो. पुढे गेल्यावर टेकडी लागली आणि चढाची पायवाट सुरु झाली. हवेत गारवा होता. ढग खाली उतरले होते. ढगांमुळे पाच फुटापेक्षा पुढचं काही दिसत नव्हते.टेकडीच्या खालच्या अंगाने ढगांचे लोटच्या लोट येत होते.आणि अंगाला स्पर्श करून पुढे जात होते. सूर्यदेव सुट्टीवर गेले होते. त्या पाऊलवाटेवरून चालत राहिलो. उजव्या हाताला एक लहानसे मैदान लागले. त्याला वळसा घालून पुढे गेलो तर दोन मजली  इमारत समोर आली. हेच ते हॉटेल एव्हरेस्ट व्ह्यू . हॉटेल मध्ये जाताना वीस एक पायऱ्या चढायला लागतात. त्या चढून वर गेलो. हॉटेल मध्ये खूपच स्वच्छता होती. ठिकठिकाणी बोर्ड लावलेले होते.हॉटेलच्या आत शिरल्यावर गॅलरीत जायला वाट होती. त्या वाटेवर एव्हरेस्ट आणि खुंभू व्हॅलीचे मॉडेल करून लावले होते. ते पार करून गॅलरीत आलो. तिथे ओळीने टेबले आणि त्याला लागून खुर्च्या मांडल्या होत्या. इथे बसून चहा कॉफी घेत एव्हरेस्ट चे दर्शन घ्यायचं हा इथला प्रघात आहे. आज आमचं दुर्दैव होतं. ढगांनी आकाश व्यापून टाकलं होतं. सूर्याचे दर्शन अशक्य होते. आम्ही इथे बसल्यावर एवरेस्ट कसा दिसत असेल याची कल्पना केली. ढगांनी सारे वातावरण भरून आणि भारून टाकले होते. एव्हरेस्टचे दर्शन व्हावे केवळ यासाठी ट्रेकर्स इथे गर्दी करतात. पण आज ‘वेदरगॉड’ आमच्या वर प्रसन्न नव्हता. काही अंतरावर लावलेली पाईनची झाडे तेव्हढी दिसली. चहा ऑर्डर केला गेला. सर्वानी निवांत पणे चहाचा आस्वाद घेतला. आमच्या कडे भरपूर वेळ होता. बराच वेळ बसलो. हॉटेल मध्ये चक्कर मारली. खुम्भू व्हॅलीच्या मॉडेलशेजारी उभे राहून लोक चर्चा करत होते. आपल्या हिशेबाने तर्क करीत होते.त्याच वेळी टेकराज तिथे अवतरला. त्याच्यातील एव्हरेस्ट वीर जागा झाला. त्याने तेथील जमलेल्या लोकांना समजावून सांगितले. एव्हरेस्ट कुठे आहे, इतर शिखरे कुठे आहेत याचे वर्णन करून सांगितले. सारे बेहद्द खुश झाले.

नामचे बाजार मधील हे सर्वात महागडे हॉटेल. इतर ठिकाणी नामचेमध्ये चहा १५० रुपये तर इथे चहा ४०० रुपयाला.पण या हॉटेलची लोकेशन वैशिष्ट्य पूर्ण आहे. हवा स्वच्छ असेल तेव्हा रूमच्या खिडकीतून एव्हरेस्ट आणि इतर शिखरे स्पष्ट दिसत असतात. आमच्या नशिबात नव्हते हे गोष्ट अलाहिदा. आणखी एक चहा पिऊन आम्ही निघालो.बाहेर पडल्यावर हॉटेलच्या पायरीवर फोटो काढले. फोटो काढण्यात वेळ गेला. मनात आले कॅमेरा नसता तर मानवाने काय केले असते? सभोतालचे डोंगर, झाडे, पशु, पक्षी, फुले हे बघायचे सोडून आपण फोटो काढत बसतो. मोबाईल मध्ये कॅमेरा बसवणारा मनुष्य हा जिनिअस असला पाहिजे.

हॉटेलमधून पायऱ्या उतरून बाहेर पडलो.प्रत्यकाला अजून आशा होती,  ढग काही वेळा पुरते का होईना दूर होतील आणि महाराजांचे दर्शन होईल. पण निराशा पदरी पडली. तेंव्हा परतीचा रस्ता पकडला. आता उतार असल्याने भराभर उतरत होतो. पेम्बा आणि टेकराज  वेगवेगळे रस्ते शोधून उड्या मारत निघाले होते. वरच्या अंगावरून

नामचे बाजार गाव अति मोहक दिसत होते. रंगीबेरंगी घरे, हॉटेले, रस्ते,पताका, मध्येच उडणारी हेलिकॉप्टर,वर मंद गतीने चढणारे याक प्राणी हे सारे दिसत होते. खाली उतरल्यावर उजवीकडे नामचे चा रस्ता जातो आणि डावी कडे खुमजुंगचा रस्ता लागतो. म्हणजे खुमजुंग आणि खुंडे ला  वाट जाते. आमचा त्या दिशेने जाण्याचा कार्यक्रम नव्हता. खुंडेची उंची १२६०० फूट/३८४० मीटर्स आहे. खुम्भू व्हॅली मधील एकमेव हॉस्पिटल इथे आहे. आम्ही नामचेच्या रस्त्यानी उतरू लागलो. वाटेत बुद्ध चक्र लागले. तिथे थांबलो. त्यावेळी शाळेत जाणाऱ्या मुली दिसल्या.पाच सहा वर्षाच्या असतील.माझेकडे पुण्याहून आणलेले रंगीत खडू आणि पेन्सिली होत्या. नेमाने त्यांना जवळ बोलावून त्या वाटल्या. त्यांना खूपच आनंद झाला. नेमाने सांगितले की खडू आणि पेन्सिली इथेच वाटा कारण इथून पुढे शाळा नाहीत. त्यामुळे विद्यार्थी नाहीत. माझ्या कडे जेव्हढे होते ते मी वाटून दिले. वाटताना माझ्यापेक्षा नेमाला ज्यास्त आनंद झाला.

तेवढ्या वेळात समोरून  पाच परदेशी गोऱ्या लोकांचा ग्रुप आला. पुढे चालणार जो माणूस होता त्याने गॉगल घातला होता. हातातील काठीने चाचपडत तो चालत होता. त्याच्या मागचे सारे त्याला सूचना देत होते. कुठे चढ आहे, उतार आहे .मागच्याच त्याचा एका साथीदाराने आम्हाला सांगिंतले की तो पुढे चालणार माणूस अंध आहे. आणि त्याला तुम्ही डिस्टर्ब करू नका. सहानुभूती तर अजिबात दाखवू नका. त्याला ते आवडणार नाही. त्या लोकांना फुकटची चौकशी नको होती. पण एक अंध व्यक्ती बेस कॅम्प ट्रेक ला जाते याचे आश्चर्य आणि तेवढेच कौतुक वाटले. माणसाची अडथळ्यांवर मात करत, काही तरी जगावेगळं करून दाखवायची जी विजुगुशी वृत्ती असते त्याचे हे एक उत्तम उदाहरण होते. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेक मध्ये असे पॉझिटिव्ह चार्जने भरलेले अनेक जण भेटले. एव्हरेस्ट चा महिमा च असा आहे कि तो अशा सर्वाना आपल्याकडे खेचून घेतो. सलाम भाई, सबको सलाम!!

नामचे बाजार ते एव्हरेस्ट हॉटेल हा छोटा ट्रेक आहे. एव्हरेस्ट व्ह्यू हॉटेल वर जाताना आपण १४४४ फूट/ ४२० मीटर्स उंची चढतो आणि नंतर खाली येतो. आपल्या शरीराला पुढच्या टप्प्यातील उंचीची सवय व्हावी म्हणून हा खटाटोप. खर हे अंतर फार नाही, पण आदल्या दिवशीचा थकवा आणि प्राणवायूची कमतरता त्यामुळे हे अंतर ज्यास्त वाटते. खुंडे गावात एक मोठी मॉनेस्ट्री आहे. फारसे लोक तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे गर्दी नसते. इथेच श्री एडमंड हिलरी यांनी १९६६ साली सुरु केलेले हॉस्पिटल आहे. आज वर ६००० हुन जास्ती लोकांना या हॉस्पिटलचा फायदा झाला असेल. खुमजुंग ला एडमंड हिलरी ने स्थापन केलेली शाळा आहे. तिथे ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. आम्ही या ठिकाणी जायचा आळस केला यात शंका नाही. नियतीची इच्छा असेल तर कदाचित, पुढच्या बेस कॅम्प च्या प्रवासात इथे जाऊन येऊ.

येताना ठरल्या प्रमाणे आम्ही शेर्पा कल्चर म्युझिअम बघायला गेलो. या ठिकाणी  शेर्पा लोकांची जुन्या काळापासून वापरात आलेली भांडी, कपडे, हत्यारे इत्यादी गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. वास्तू  लहानच आहे. शेजारची इमारत जास्ती इंटरेस्टिंग आहे. या ठिकाणी आता पर्यंत एव्हरेस्ट चढून गेलेल्यांची नावे आणि नोंदी आणि फोटो आहेत. त्या वेळच्या केलेल्या चढायांचे  थोडक्यात वर्णन दिले आहे. शेजारी एव्हरेस्ट आणि इतर शिखरांचे पेंटींगचे दुकान होते. तेथील फ्रेम्स सुंदर होत्या, पण तेथील किमती बघून काढता पाय घेतला.

या प्रदर्शनाची प्रवेश फी २५० नेपाळी रुपये आहे. जरूर भेट द्या. तेव्हढीच या संस्थेला आपल्याकडून मदत होईल. याच इमारतीत १० मिनिटांची विडिओ फिल्म दाखवतात. ती मात्र छान आहे. ट्रेक मध्ये चालत असताना विडिओ मध्ये दाखवलेले पक्षी , प्राणी आणि झाडे दिसली. हा सर्व कार्यक्रम तास भर चालतो. आमच्या कडे वेळ भरपूर होता. त्यामुळे सारे काही आरामात चाललं होते. तेथून बाहेर पडणार तेव्हढ्यात पावसाची एक सर आली. त्या मुळे थांबलो. पाऊस थांबल्यावर लॉज वर निघालो.

खुमजुंग मॉनेस्ट्री मध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे ठेवलेले यति (yati) चे डोके. हिमालयात yati  आहेत असे म्हणतात. याति बघितलेला अजून कोणी भेटला नाही. पण त्याच्या डोक्याचा भाग इथे जपून ठेवला आहे. आपल्या कवटी पेक्षा याच डोकं मोठं आहे. हि कवटी बघायची इच्छा होती. पण जायला जमल नाही. बघू या पुढच्या वेळी. नशिबात असेल तर जरूर बघता येईल.

दुपारी हॉटेल वर पोचलो.नेहमीचे डाळ भातचे जेवण केले. दुपारचा वेळ मोकळा होता. तेव्हा सर्व जण पत्ते खेळत बसलो. काही जण फिरायला मार्केट मध्ये गेले. मी पायाला मलम लावून आराम केला. थोडासा स्ट्रेचिंगचा व्यायाम  केला. पायाचे दुखणे बऱ्या पैकी कमी आले होते. उद्यापासून परत चालणे सुरु.आजचा दिवस तास आरामाचा गेला म्हणायला हरकत नाही.आजचा नामचे बाजारला इथे थांबण्याचा उद्देश बऱ्या पैकी सफल झाला होता.

पुष्प

नामचे बाजार ते तेंगबोचे

शुक्रवार, ४ मे २०१८

१. सुरुवातीची उंची:  ११२९० फूट/३४४०  मीटर्स

२. पोचलेली उंची: १२७८७ फूट/३८६७ मीटर्स

३. चढ: + १३९७ फूट/ ४२७ मीटर्स

४. प्राणवायूची उपलब्धता : सुरुवातीला  ६७ % समुद्रसपाटीच्या

५.  प्राणवायूची उपलब्धता :  पोचल्यावरची ६० %

६. चाललेले अंतर:  ५.७२ ल/८.२ किलोमीटर

७. लागणार वेळ: ६ ते ७ तास सुमारे

(चालायची पाऊले:२४२४० )

नामचे बाजार ते तेंगबोचे हा ट्रेक मधील महत्वाचा आणि रोमांचक टप्पा होता. याचे कारण की  या प्रवासI दरम्यान आम्हाला साक्षात ‘प्रभू’चे दर्शन होणार होते. त्यामुळे सर्वांच्या मनात उत्सुकता होती. नामचे बाजार मधून निघताना परत एकदा ग्रुप फोटो झाला. एक दिवसाच्या विश्रांतीने मंडळी  ताजी टवटवीत झाली होती. या वेळी मुद्दाम थांबवून शेर्पाचा पण फोटो घेतला. तो नेहमी आमच्या आधीच निघून जायचा. त्यामुळे त्याचा फोटो घ्यायला मिळत नव्हता. आज तो आमच्या बरोबर बाहेर पडला होता. सकाळी नाश्ता करून निघेपर्यंत साडेसात झाले होते. सर्वत्र स्वच्छ सूर्य प्रकाश होता. समोर आमा दाबला चे हिमाच्छादित शिखर दिमाखात उभे होते. परतीच्या वाटेवर नामचे बाजारला उतरणार होतो. तेव्हा परतीच्या वाटेवर सात आठ दिवसांनी नामचे बाजार चे पुन्हा एकदा दर्शन होणार होते. त्या वेळेपर्यंत नामचे बाजारला ‘आडियोस’ करून निघालो. मार्केट पार करून कालचा रस्ता धरला. पुढे वीस  एक मिनिटे गेल्यावर दोन रस्ते फुटतात. डावीकडचा रस्ता एव्हरेस्ट व्ह्यू हॉटेलकडे जातो, उजवी कडचा तेंगबोचेकडे.  आजची स्वारी तेंगबोचेवर होती. उजव्या हाताच्या पाय वाटेने निघालो. गार वारे वाहत होते. वातावरणात चांगले होते. पाऊस नव्हता. थोड्याच वेळात उन्हाचा चटका सुरु होणार होता. रस्ता सपाट होता. त्यामुळं चालायची गती बरी होती. पायाचे दुखणे कमी आले होते. बरोबर बरेच ट्रेकर्स होते. खूपसे आधीच पुढे निघून गेले होते. आम्ही तशी  निघायची घाई केली नाही.

साधारण ४० ते ४५ मिनिटे चाललो. आणि काय आश्चर्य , हिमालयातील नव्हे तर जगातील सर्वात उंच शिखर दिसू लागले. उजवीकडे हे साजरे गोजिरे शिखर ज्याच्या दर्शनासाठी आम्ही निघालो होतो तो साक्षात पांडुरंग उभा होता. आम्हाला साक्षात एव्हरेस्टचे दर्शन झाले होते. अंगावर शहारे आणणारा हा क्षण होता. मी टेकराज चा हात हातात घेतला आणि त्याचे मनापासून आभार मानले. त्याच्या मुळेच हे शक्य झाले होते. हे त्याला मी बोलून दाखवले. समोरच्याला कृतज्ञता दाखवली म्हणून कोणी लहान होतं नाही. जेथून एव्हरेस्ट दिसत होता, या पॉईंटपाशी सर्वानी मनसोक्त फोटो काढले. कारण हा क्षणच असा होता. आतापर्यंत आम्हाला दोनदा एव्हरेस्टने खट्याळ मुलाने चकवा द्यावा असा  चकवा दिला होता. आता मात्र ‘याची देही याची डोळा’ साहेबानी दर्शन दिले होते.जगातील तमाम गिर्यारोहकांचा हा पांडुरंग. याचे दर्शन झाले म्हणजे मुक्तीचा मार्ग मोकळा अशीच सर्वांची भावना झाली होती. हे लिहिताना आता पण ,या घटकेला माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. विश्वास नाही बसणार, पण कित्यकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर अवर्णीय असा आनंद होता आणि एक निराळीच उर्मी आली होती. एव्हरेस्टच्या सोबतीला आमा दबलं शिखर होते. त्यांची इतर भावंडे लुत्से, तामशेरकु,कुसुम खंकारु, आणि कोंद शिखरांची बैठक बसली होती. ‘विठू माझा लेकुरवाळा , संगे गोपाळांचा मेळा’ असे हे दृश्य होते. प्रत्येक शिखराचा  आकार वेगळा, उकार वेगळा, रंग वेगळा, नजाकत वेगळी, साज न्यारा. पण सर्वात श्रेष्ठ म्हणजे सागरमाथा म्हणजेच एव्हरेस्ट. या बाजूच्या शिखरांना एव्हरेस्ट सोबतच मनोमन नमस्कार केला.

म्हणतात ना, ‘सर्व देव नमस्कार: , केशवम प्रति गच्छति’! या गोपाळांना केलेला नमस्कार ही शेवटी एव्हरेस्टला पोचतो. हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि मौल्यवान क्षण मनात साठवून  पुढे निघालो.

दीड दोन तास चालत होतो. आता विश्रांतीची आवश्यकता होती. ‘केंगजोमा’ नावाच्या गावांत थांबलो. तशी वाटेत अनेक हॉटेल होती.सगळी जवळ पास सारखीच.घामाने टी शर्ट ओला झाला होता. त्यावर वारे लागल्याने थंडी वाटत होती. त्यामुळे तो काढणे जरुरी होते. हॉटेल वर थांबलो, तेव्हा आधी टी शर्ट काढून टाकला. तेथेच कट्ट्यावर वाळायला ठेवला. जॅकेट मात्र अंगावर ठेवले. बाटलीत पाणी भरून घेतले. चहा घेतला. पाच मिनिटे आराम केला. आणि निघालो. वीस एक मिनिटे चालल्यावर पुढे एक चौफुला लागतो. (चार रस्ते) साधारण नामचे बाजार ते तेंगबोचेच्या मध्यावर आहे हा चौफुला.एक रस्ता जातो खुमजुंग कडे,एक जातो गोक्योकडे,तिसरा तेंगबोचे आणि चौथा नामचे बाजार.गोक्यो आणि खुंमजुंगचे ट्रेक सुद्धा लोकप्रिय आहेत. नामचे बाजारला भेटलेले जोडपे गोक्योला जाणार होते. एव्हरेस्टच्या मनात असेल तर कदाचित भविष्यात या ठिकाणांना पण जात येईल असा विचार केला .

मनी धरावे ते होते,

विघ्न अवघेचि नसून जाते,

कृपा केलीय रघुनाथे,

प्रचित येते…

श्री समर्थ रामदास स्वामी नि म्हंटलेले आहे याची आठवण आली.

तेंगबोचेच्या वाटेवर अजून एक अजब वल्ली गाठ पडली.त्यांच्या कामाचे वर्णन केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. तेंगबोचेची पायवाट चालताना उंचच्या उंच पहाड डावी कडे आहे आणि उजव्या हाताला खोल दरी आहे. अंतर चालून गेल्यावर डावीकडे लावलेला एक फ्लेक्स दिसला . ट्रेकच्या वाटेवर फ्लेक्स बुचकळ्यात टाकणारी एक विचित्र घटना होती.

IMG_20180504_094919

कुतूहल शमविण्यासाठी थांबणे भाग होते.फ्लेक्स वर इंग्रजी,स्पॅनिश आणि अजून एका कुठल्या भाषेत मजकूर लिहिला होता. त्या फ्लेक्सला लागूनच एक टेबल टाकून एक वृद्ध माणूस खुर्चीत बसला होता.त्या टेबलावर एक दान पेटी होती. खुर्चीत बसलेले गृहस्थ  म्हातारे दिसत होते.शेजारी त्यांची सहचरी दिसत होती. त्यामानाने वयाने कमी असाव्यात.साहजिकच हा काय प्रकार आहे ही उत्सुकता ताणली गेली. त्यांची मिळालेली माहिती अशी: या नेपाळी माणसाचे नांव होते ‘पासंग’. हे लोकांकडून देणग्या गोळा करतात. वही मध्ये आपले नाव आणि देशाचे नाव लिहा आणि पेटीत पैसे टाका. हे जमलेले पैसे गोळा करून पासंग ट्रेकच्या या रस्त्याची दुरुस्ती करतात. हा रस्ता गिर्यारोकासाठी नीट आणि सुरक्षित ठेवतात. सरकारकडून एक पै देखील न घेता! बेस कॅम्पला जाणारा मार्ग पहाडातून असल्याने बऱ्या पैकी धोकादायक आहे.रस्ता खचू शकतो, तसेच वरून दरडी कोसळतात. अशा वेळी जा ये बंद पडते. हिमालयातील पहाड तसा सह्याद्रीच्या मानाने ठिसूळ आहे असे म्हणतात. हे ८५ वर्षाचे गृहस्थ या रस्त्याची देखभाल करतात.गिर्यारोहकांवर किती उपकार आहेत त्यांचे.रस्ता साफ ठेवणे,दगड धोंडे बाजूला सारणे, रस्ता खचला असेल तेथे भर घालणे अशी कामे करतात.बोलून चालून एका माणसाचे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे.

या गृहस्थाबद्दल अधिक माहिती टेकराज ने सांगितली. पासंग आणि त्याच्या बायकोचे एकदा जोरदार भांडण झाले. एव्हढं कि त्यांच्यात हातापायी झाली.या मारामारीत या गृहस्थाने बायकोच्या डोक्यावर कठीण वस्तूने तडाखा दिला. मार वर्मी बसला आणि  गरीब बाई तिथेच स्वर्गवासी झाली. या घटनेने पासंगला अति दु:ख झाले. त्याचे बायकोवर जीवापाड प्रेम होते. आपण केलेल्या पापाची त्याला अचानक जाणीव झाली. या पापIच प्रायश्चित म्हणून हा माणूस समाजकार्य करू लागला. आणि ट्रेकर्स साठी रस्ता सुरक्षित ठेवण्याचे कार्य त्याने हाती घेतले. हे कार्य तो गेली कित्येक वर्षे करत आहे. अशा कामाला मदत करणे सर्वांचे काम आहे. आम्ही वहीत नाव आणि रक्कम लिहिली, आणि दानपेटीत टाकली. बहुतेक सर्व जाणारे येणारे मदत करत होते. सततच्या वाऱ्याने आणि पावसाने लावलेला फ्लेक्स इतका खराब झाला होता की त्यावर काय लिहिले आहे हे वाचणे अवघड होते. बिहार मधील एक माणसाने रस्ता करण्यासाठी उभा डोंगर कापून काढला या घटनेची याद आली. अशी जगावेगळी  माणसे आज ही जगात आहेत. असतात. त्यामुळेच हे जग चालू आहे. या लोकांना ना कुठल्या बक्षिसांचा मोह ना प्रसिद्धीची हाव. ते आपले काम शांत

गावातील पुढारी एव्हढस काम केले तर किती फ्लेक्स लावतात. त्यांना किती  प्रसिद्धीची हाव असते. आणि  इथे पासंग सारखी माणसे प्रसिद्धीपासून दूर समाजासाठी रात्रंदिवस झटत असतात. एव्हरेस्ट बेसच्या ट्रेक वर अशी अनेक कर्तृत्ववान माणसे भेटली.यांचे कार्य बघितले की मन भरून येते. नाही तर शहरात राहणारे आपण कित्येक क्षुल्लक गोष्टी वरून अपसेट होतो. अशा पासंग सारख्या लोकांच्या साठी एव्हढेच म्हणावेसे वाटते :

जनसेवेचे बांधून कंकण,

त्रिभुवन सारे घेई जिंकून ,

अर्पून आपुले हृदसिंहासन ,

नित भजतो मानवतेला, तोचि आवडे देवाला!!

नामचे बाजार ते तेंगबोचे मधील निसर्गाचे वर्णन किती करावे? चारी बाजूला काळे कभिन्न पहाड, एकमेकाला चिकटून बसलेले हिम पर्वत, सर्वत्र पाईन वृक्ष, आणि अधून मधून शिंपडल्यासारखी ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे.या मोसमात हे वृक्ष बहरले होते. त्यावर लाल रंगाची फुले फुलली होती. दुरून पहिले तर जंगलात आग लागली असे वाटत होते. काही फुले तर पांढरी आणि पांढरट गुलाबी. एके ठिकाणी वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला या फुलांचा सडा पडला होता. हे वृक्ष फक्त हिमालयातच आढळतात. असे सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावे. मोबाईल मध्ये बंदिस्त करायच्या भानगडीत पडू नये. ट्रेक मधील चुकवू नयेत अशा अनेक गोष्टी पैकी ही एक.

बारा एक च्या सुमारास ‘फुंगीतांग’ लागले. इथे थांबलो आणि जेवण उरकले.नेहमीचाच डाळ भात.जेवल्या वर आता परत चढ सुरु झाला.तीन किलोमीटरचे अंतर आता चालायचे होते आणि चढ सुमारे ४०० मीटर्स चा होता. मी पेम्बाला म्हणालो, असे चढ आपण  लंच नंतर का बरं चढतो? सकाळी का बरं नाही? पेम्बा हसला. तो तरी काय करणार. वाटेत अजून एक चेक पॉईंट लागलं. पेम्बाने तिकिटे दाखवली आणि निघालो.दुपार झाल्याने डोक्यावर ऊन मी म्हणत होते. वारा पडला होता. त्यामुळे घाम येत होता. दमणूक होतं होती. वाटेत थांबत, पाण्याची तहान भागवत चालत राहिलो.सुमारे तीन च्या सुमारास तेंगबोचे ला पोचलो.

हॉटेल ‘हिमालय’ मध्ये शिरलो. इथे आमचं बुकिंग होते. शेर्पा आधीच आला होता. बॅगा रूम वर ठेवल्या होत्या.

नामचे बाजार च्या मानाने तेंगबोचे खूपच लहान आहे.पण आजूबाजूचे सृष्टी सौंदर्य अफाट होते.घर आणि हॉटेल लहान आणि संख्येने कमी होती.

चहा घेतला आणि जवळची मॉनेस्ट्री बघायला गेलो.आता थंडीचा जोर वाढला होता. मॉनेस्ट्रीत गेल्यावर बाहेर पादत्राणे काढणे जरुरी होते. मला एव्हढी थंडी वाटत होती की मला बूट काढावेत असे वाटेना. त्यामुळे मला मंदिरात जात आले नाही. मी बाहेरच थांबलो. मी नुकतीच भूतान  ट्रिप केली होती. तिथे बऱ्या पैकी मॉनेस्ट्री बघितल्या होत्या. त्या सबबीखाली मी स्वतःला माफ केलं. मॉनेस्ट्रीतुन बाहेर आलो. उजव्या हाताला ‘जर्मन बेकरी’ चा बोर्ड लागला. फिरत तिथे गेलो.फारशी गर्दी नव्हती. एक दोन टेबलावर फिरंगी माणसे बसली होती. ही बेकरी जगातील सर्वात उंचावरील आहे. असे त्या फलकावर लिहिले होते. थंडी वाढू लागली आणि वातावरण कुंद होऊ लागले. म्हणून हॉटेल मध्ये परतलो.हॉटेल च्या बाहेरच अंगणात १० फुटावर टॉयलेट होते. टॉयलेट म्हणजे एक बंद खोली आणि त्यात खणलेला खड्डा. त्या खड्यात झाडाचा वाळलेला पाला टाकला होता. त्यावर विसर्जन करायचे. त्यावर काही वेळाने नवीन पाला टाकला जात असेल. पाण्याने ओला झालेला पाला जड होतो आणि आपोआपच खाली जातो. या ठिकाणी आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी जसा वास येतो तसाच वास येत होता. पण प्रमाण जरा कमी होते. नंतर मी कधी अशा ठिकाणी जायचे टाळले. ज्या हॉटेल मध्ये उतरलो असेन, तेथील टॉयलेट वापराने कधीही श्रेयस्कर.

पुष्प पाचवे

तेंगबोचे ते दिंगबोचे

शनिवार , ५  मे २०१८

१. सुरुवातीची उंची:  १२७८७  फूट/३८६७  मीटर्स

२. पोचलेली उंची: १४४६९ फूट/४४१० मीटर्स

३. चढ: + १६८२ फूट/ ५४३  मीटर्स

४. प्राणवायूची उपलब्धता : सुरुवातीला  ६४  % समुद्रसपाटीच्या

५.                                   पोचल्यावरची ५९  %

६. चाललेले अंतर:    ८ मैल/१४.५  किलोमीटर

७. लागणार वेळ: ६ ते ७ तास सुमारे

(चाललेली पाऊले: २५३७८)

तेंगबोचे पासून दिंगबोचे कडे जाणारी वाट ऱ्होडोडेंड्रॉनच्या झाडीतून सुरु होते.सकाळी आठ वाजता निघालो. इंमजाला नदीवरील उंच  पूल ओलांडला.पानबोचे पर्यंतचा रस्ता सोप्या चढाचा आहे. तास भर चाललो. आता आपण खुम्भू व्हॅलीच्या मध्यावर उभे आहोत. अमा दाबलाम  शिखराचा नयनरम्य नजारा समोर दिसतो.नंतरचा रस्ता खुम्भू व्हॅलीच्या कडेकडेने जातो. पुढे त्याला दोन फाटे फुटतात.एक रस्ता फेरीचेला जातो व दुसरा दिंगबोचेच्या दिशेने जातो. इथून आपण इजमा  व्हॅलीच्या मुखापाशी येतो. तेंगबोचेच्या मॉनेस्ट्री पासून एव्हरेस्ट आणि जवळची शिखरे स्वच्छ आणि छान दिसतात. काल सांयकाळी पावसाळी वातावरण होते. त्यामुळे ५-६ फुटाच्या  पलीकडे दिसत नव्हते. त्यामुळे ही शिखरे संध्याकाळी दिसली नाहीत. यास्तव  ही शिखरें  बघायला  अनेक ट्रेकर्स पहाटे पाच वाजताच उठून हॉटेलच्या बाहेरच्या मैदानात जमा झाले होते.

इथून दिसणारी महत्वाची हिमशिखरे म्हणजे लुत्से, अमा दाबलाम, थां सेरकु ,कांगतेक वगैरे. पर्यटकांची फोटोग्राफी जोरात चालू होती. किती फोटो घ्याल तेव्हढे थोडेच. काही व्यायसायिक फोटोग्राफर वेगवेगळे सेटिंग घेऊन प्रकाश ऍडजेस्ट करत फोटो काढत होते.आम्ही पण त्या मोकळ्या जागेत पोचलो. पहाटेच्या पाच वाजण्याचा सुमार होता, त्यामुळे थंडी प्रचंड होती. चहा मिळाला तर बरे होईल असे म्हणे पर्यंत टेकराज चहा घेऊन आला. मोठ्या मनाने त्याने चहा ऑफर केला. नेकी और पूछ पूछ ! मी आनंदाने स्वीकारला. काही वेळ फोटो काढण्यात घालवला. मग नाश्ता तयार असल्याची वर्दी मिळाली. सकाळचा नाश्ता आटोपला. आमच्यापैकी ज्यांना अजून फोटो काढायची हौस भागवायची होती त्यांना पुरेसा वेळ देऊन निघालो. त्यामुळे आज निघायला थोडासा उशीर झाला. अमा दाबलाम शिखरचे रूप वर्णन करण्या पलीकडे होते. तो असा समोर दिसत होता, आकाराने प्रचंड. पांढरे शुभ्र बर्फ त्यावर पसरले होते. एक प्रकारची भव्यता होती त्याकडे. हिमालयातील प्रत्येक शिखर त्याच्या परीने आगळे वेगळे आहे यात शंका नाही.  दीड तासाची पायपीट केल्यावर आम्ही पांगबोचेला पोचलो. सुमारे ४.३ मैल/६.९६ किलोमीटरचा हा पल्ला आहे. काही ट्रेकर्स पांगबोचेला मुक्काम करतात. दुसरे दिवशी दिंगबोचे ला जातात. माझ्या मते इथे मुक्काम न करता दिंगबोचेला गेलेले कधी ही चांगले.इथे पर्यंत तुमची दमणूक कमी झालेली असते आणि पुढचे अंतर तुम्ही सहजपणे पार करू शकता. तेव्हढी ताकद, क्षमता तुमच्याकडे असते. आणि पुढील टप्प्याचा प्रवास सुद्धा कमी थकवणारा होतो.

वेब साईटवर मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक १००० फूट उंचीला हवेचे तापमान २ डिग्री सेल्सिअस ने कमी होते. ही  गोष्ट ध्यानात ठेवून त्यानुसार स्वतःचे रक्षण करण्यासाठी गरम कपडे बाळगणे आवश्यक आहे. तेंगबोचेच्या नंतर आता इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद होतात. पुढचे तीन दिवस आमचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटणार होता. Life without Internet & mobile! ही कल्पनाच करू शकत नाही.  अर्थात ही माहिती आम्ही सर्वानी घरच्यांना आधीच दिलेली होती. दुपारी तीन सुमारास आम्ही दिंगबोचेला पोचलो.

IMG_20180504_155218

दिंगबोचे हे तेंगबोचे च्या मIनाने मोठे गाव आहे, इथे घरे आणि  हॉटेल पण बऱ्यापैकी आहेत. तेंगबोचे माहात्म्य तेथील मॉनेस्ट्री मध्ये दडलेले आहे. तसेच वाटेत दिसणारी तेज:पुंज शिखरे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. दिंगबोचेला हॉटेल ‘एव्हरेस्ट’ मध्ये उतरलो होतो. हे हॉटेल थोडे आतल्या अंगाला आहे. नदी काठी आहे पण अगदी नदीला लागून नाही. हॉटेल मध्ये नदीचा खळखळाट स्पष्ट ऐकू येत होता. हॉटेल मध्ये बिन दुधाचा चहा ‘भेटला’.आता दिवस भर वेळ पूर्ण पणे रिकामा होता. आमचा इथे दोन दिवस (रात्र) मुक्काम होता. बेस कॅम्प च्या ट्रेक मधील  वातावरणाशी मिळवून घेण्याचे दुसरे ठिकाण. हॉटेल मध्ये बसून पत्ते खेळण्या पलीकडे काहीच करू शकत नव्हतो.तेंगबोचे सुटल्यावर हिरवी झाडी गायब झाली होती. आता केवळ फूट भर उंचीची झुडपे होती. चारी बाजूला उंच उंच डोंगर, दऱ्या आणि त्यातून वाहणारा बेफाम वारा. वाऱ्या बरोबर येणारे ढग आणि पडणारा पाऊस. असा इथला निसर्ग होता. दिंगबोचेला पोचल्यावर मला मुलांशी बोलणे  भाग होते. तेव्हा ‘एव्हरेस्ट’ कंपनीचे सिम कार्ड ६०० रुपये देऊन विकत घेतले. ६०० रुपयात फक्त १० मिनिटाचा ‘टाक टाइम’ मिळाला. तेव्हढा वेळ वापरून बोलून घेतले. आता तीन दिवस बोलता येणार नाही. बोलल्यावर हलके वाटले.काही महत्वाच्या निरोपाची अदलाबदल करायची होती, ते काम झाले.रात्री जेवल्यावर पत्ते खेळून कंटाळा आला होता. तेव्हा शेकोटी जवळ बसून सर्वाना दोन एक कथा ऐकवल्या. जशा जमतील तशा. द.मा.झिंदाबाद.पुण्याचा दुसरा एक ग्रुप आला होता. तो पण या कार्यक्रमात सहभागी झाला.कथा सर्वानाच आवडल्या (असाव्यात?).

IMG_20180505_054215

दिंगबोचेच्या हॉटेलच्या डायनिंग रूममध्ये आम्ही सर्वजण दुपारी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा ट्रेकमध्ये ज्या अनेक महान व्यक्ती भेटल्या अशा पैकी एका व्यक्तीचे आगमन झाले. दुपारच्या वेळी बाहेरून आत आलेली  ही व्यक्ती घामाने डबडबलेली होती. अंगावरील शर्ट घामाने भिजला होता. अति श्रमाने त्याला धाप लागली होती. डायनिंग रूम  मध्ये खुर्चीवर बसली. आणि दहा एक मिनिटांनी थोडी विश्रांती घेतल्यावर ही व्यक्ती बोलायला सुरुवात झाली. हा गिर्यारोहक ऑस्ट्रेलियातून आला होता. त्याने त्याच नाव जॉन सांगितले. ६ फूट  उंच आणि बांधा शिडशिडीत होता.आणि हा माणूस एव्हरेस्ट बेस कॅम्प ला चालला होता. आमच्या सारखाच. पण सांगायची बाब अशी की याला उजवा हात आणि उजवा पाय नव्हता. उजव्या पायाला कृत्रिम अवयव बसवला होता. अशा शारीरिक अवस्थेत हा बेस कॅम्प निघाला होता. माणसाची दुर्दम्य इच्छा शक्ती म्हणजे काय याच जाज्वल्य उदाहरण समोर होते. आणि एवढ्या अडचणी असून  चेहरा अत्यंत हसरा आणि टवटवीत होता. प्रत्येक  संकट म्हणजे एक संधी असते आणि या संधीचा उपयोग करत माणसाने पुढे केले पाहिजे या त्याचा संदेश हृदयावर कोरून ठेवावा असाच होता. त्याच्या बद्दलची आणखी माहिती वेब साईट वर मिळाली ती अशी:

त्याचे नाव जॉन कार्न्स.सव्वीस वर्षापूर्वी जॉनच्या आयुष्यात अशी दुःखद घटना झाली की  त्याने त्याचे आयुष्य बदलून गेले.  टोरोंटो येथे काम करत असताना ६८ टन वजनाच्या रेल्वे डब्याची त्याला धडक बसली आणि त्या अपघातात त्याचा उजवा हात कोपरापासून आणि उजवा पाय गुढघ्याखाली काढून टाकावा लागला. जीव वाचला होता. पण हात आणि पाय कायमचे अधू झाले होते. अपघातानंतरचे आधीचे काही दिवस वाईट गेले.पण काही वेळानंतर जॉनने स्वतःला सावरले. त्याने आपल्या शारीरिक अडचणींवर मात करण्याचा विडा उचलला. आणि वेगवेगळ्या साहसी प्रकारात त्याने स्वतःला झोकून दिले. ऑगस्ट २0१६ साली याने आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर ‘ किली मांजारो’ पादाक्रांत केले. २०१६ साली त्याला कॅनडातील ‘ अनसंग  हिरो (Unsung Hero) ‘ या पदवीने सन्मानित करण्यात आले.समाजातील अशा व्यक्ती ज्यांच्यामुळे इतरांना जगण्याची उर्मी मिळते अशाना हे पदक दिले जाते. तो आज एक मोटिव्हशनल (motivational speaker) वक्ता म्हणून काम करतो. समाजातील अशा शरीराने दुर्बल, अधू असणाऱ्यां लोकांना जीवन आनंदात जगण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. दीन दुबळ्यांना जगण्याची उर्मी देत असतो. ‘People are created more powerful than you realize. You have more potential in you than you realize.” हा त्याचा संदेश सर्वानाच प्रेरणा देत राहील यात शंका नाही.

दिंगबोचे: दुसरा दिवस : वातावरणाशी जुळवून घेण्याचा (acclimatization)

आजचा मुक्काम दिंगबोचेला होता. उद्देश वातावरणाशी जुळवून घेण्याचा होता.हा अश्या प्रकारचा दुसरा मुक्काम होता. पूर्वीचा पहिला मुक्काम नामचे बाजारला केला होता. मागच्या वेळी केले तसे या वेळी पण आम्ही एका उंचीवर जाऊन तेथे थोडा वेळ थांबून परत खाली हॉटेल मध्ये येणार होतो. तेथील हवामानाशी मिळते जुळते घेऊन परत खाली येणार होतो.हिमालय सारख्या उंच पर्वत मध्ये हा नियम पाळतात.उंच चढत राहा आणि मग खालच्या उंची वर येऊन थांबा. ‘Climb high and sleep low.’ एव्हरेस्वर चढणारे गिर्यारोहक तर वरच्या कॅम्पला (कॅम्प १,२ व ३) जातात आणि खाली बेस कॅम्पला परत उतरून मग आराम करतात.

आज सर्वांच्या तब्येती छान होत्या. आज तसा कमी टेन्शनचा दिवस होता. पुढंचे टार्गेट गाठायचे नव्हते. नाश्ता करून आरामात आठ वाजता निघालो. दिंगबोचे गावातून वाट काढत चाललो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आणि हॉटेल होती. रस्त्याकडून वाहणारा नाला होता. येताना जाताना याक प्राणी या नाल्यातील पाणी पिऊन तृप्त होतं होते. गावात बेकरी होती. त्यात काही गोरी माणसे टाइम पास करीत बसली होती. गाव तसे शांत, आळसावलेले वाटत होते. पाच मिनिटात गावाची वेस ओलांडली. डावीकडे वळलो. हाच रस्ता पुढे टेकडीवरून खुमजुंगला जातो. चढ चांगला होता. पाऊलवाट एकदम लहान होती. दोन्ही बाजूला झुडुपांचे साम्राज्य होते. ट्रेकर्सचे एक दोन ग्रुप पुढे गेले होते. त्यांच्या वाटेने चालत निघालो. टेकडी चढून वर आलो. साधारण ४० मिनिटे चाललो असेन. या ठिकाणी बुद्धाचे स्तूप असल्यासारखे होते. लोक इथे विसावले होते. आम्ही थांबून थोडे पाणी प्यायलो.

आता परत अजून उजवी कडे चालू लागलो. डाव्या हाताला खोल पण विस्तीर्ण दरी होती. त्यात लहान मुलांच्या खेळण्यात असावीत, अशी छोटी छोटी घरे दिसत होती. हेच ‘फेरीचे’ गाव होते. आम्ही परत येण्याच्या मार्गावर इथे थांबणार होतो. पाय वाटेवर ठिकठिकाणी दगड एकमेकांवर कलात्मक रित्या रचून मनोरे केले होते. हि एक कला आहे. प्रत्यकाला हे जमेल असेल नाही. माझ्या मते ट्रेकर्सना रस्ता लक्षात राहावा म्हणून केलेली ही सोय आहे. त्याला कदाचित धार्मिकतेचा रंग दिला असेल. बरेच गिर्यारोहक अजून उंचीवर असलेल्या ‘नांगकर्त्सन्ग ‘ पर्यंत जातात. पण आम्ही गेलो नाही. आम्हाला दुसरे दिवशीसाठी अंगातील कॅलरी साठवून ठेवायच्या होत्या. पोचलेल्या उंचीवर पंधरा मिनिटे थांबून खाली निघालो. आता वाऱ्याचा जोर वाढला होता. त्यामुळे पेम्बाने ज्या रस्त्याने वर चढलो होतो, तो रस्ता सोडून वेगळाच रस्ता पकडला. ज्या योगे वाऱ्याचा त्रास कमी होईल असा. या वाटेने उतरल्याने वाऱ्याचा त्रास खूप कमी होता. पण आता ही वाट खूपच उताराची होती. वाट अशी नव्हतीच. प्रत्यकाने आपापल्या हिशेबाने खाली उतरावे.पाय घसरायला चान्स होता. पेम्बा एखादी शेळी किंवा बकरी ज्या सहजपणे उतरते त्या सहजतेने खाली येत  होता. आम्ही सावकाश खाली उतरत होतो. जे चढण आम्ही दोन तासात चालून गेलो होतो, ते अंतर आम्ही अर्ध्या तासात उतरलो होतो. खाली आलो आणि परत गावात जायचा रस्ता धरून हॉटेलकडे निघालो. रस्त्यावर अजिबात लोकं नव्हती. सकाळीच गिर्यारोहक पुढच्या टप्प्यावर निघून गेले होते. आणि मागून येणारे दुपारी तीन नंतर पोचणार होते. आम्ही सुद्धा काल तीनच्या सुमारास आलो होतो. हॉटेल वर आलो तेव्हा १२ झाले होते. नेहमी प्रमाणे डाळ भात खाल्ला. आता पोटाची काळजी घेणे आवश्यक होते. पोट बिघडून चालणार नव्हतं.

दुपारचा वेळ काहीच काम नव्हतं. हॉटेलच्या शेजारून पन्नास एक फुटाच्या अंतरावरून नदी वहात होती. वेळ घालवण्यासाठी नदीवर जाण्याची टूम निघाली. कोणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली माहित नाही. ट्रेकच्या वेळापत्रकात हे आखलेले नव्हते. पण आयडिया मला आवडली. खळखळणारे वाहते पाणी बघून कित्येक वर्षे झाली होती. पुण्यातील मुळा मुठेला वाहणं माहीतच नाही! आम्ही चौघे जण निघालो. टेकराज अर्थातच बरोबर येणार होता. हॉटेलच्या कुंपणातून बाहेत पडलो. नदीवर जायला वाट अशी नव्हतीच. झुडुपातून वाट काढत निघालो. तुम्ही जसे चालाल  ती वाट. नदीच्या पात्रावर एक इसम काही तरी करताना दिसत होता. बहुतेक कपडे धूत  असावा. त्याच्या शेजारून पुढे गेलो. साधारण वीस फूट खाली उतरलो होतो. नदीला पाणी तसे कमीच होते. पण प्रचंड वेगाने वाहात होते. पाण्याचा आवाज दूर वर येत होता. खडकातून, दगड धोंड्यातून ,गोट्यावरून पाणी वाहात होते. थोडासा धीर करून दगड ओलांडून पात्रात पोचलो. हात पाण्यात घातले. पाणी बर्फासारखं थंड गार होते. वरून गार वारे वाहात होते. अंघोळ करायचा मोह अनावर झाला होता. पण मोह आवरला.  टेकराजने मनाई केली. अति थंड पाण्यात आंघोळ करून ताप येऊन पुढचा कार्यक्रम अपसेट झालेला त्याला चाललं नसत. हात मात्र धुतले. पाय धुण्या साठी बूट काढायला लागले असते.म्हणून नाही धुतले. तोंड धुतले. काही फोटो काढले.आणि नदीच्या पात्रातील मोठ्या खडकावर बसलो. पाणी इतक्या जोराने वाहात होते कि त्यात मासे किंवा तत्सम जीव तग धरणे केवळ अशक्यच.काठावर काही बारीक किडे फिरताना दिसत होते. तेव्हढीच येथील जीव सृष्टी. हे पाणी वरच्या अंगाच्या ग्लेशिअर मधून येत असल्याने खऱ्या अर्थाने ‘मिनरल वॉटर’ होते. नदीच्या पात्रात दूरवर एक याक प्राणी दिसत होता. तो नदी ओलांडून पलीकडे गेला.या नदीला पूर आल्यावर कशी दिसत असेल, किती रौद्र रूप धारण करत असेल याची कल्पनाच केलेली बरी.’ ‘जशी काळ नागिणी , सखे ग वैरीण झाली नदी ! असा भास होत असेल. माननीय पूज्य भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलजींनी एक कविता लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हंटल होते कि एव्हरेस्टसारखी सर्वोतुंग शिखरे ही एकाकी असतात.त्यांच्या एकाकीपणाचे दु:ख अश्रू बनुन प्रवाहाच्या रूपाने वाहात असते. त्या अश्रूंमुळे नद्या तयार होतात. ही कल्पना मला थोडीशी न पटणारी वाटते. मला तर एव्हरेस्ट आणि हिमालय हे दोघेही स्थितप्रज्ञ वाटतात.कोणत्या ही गोष्टीचा ना खंत,ना खेद,! एव्हरेस्ट तर अश्रू वाहणारा असूच शकत नाही. अश्रू हे कमजोर मनाचे लक्षण आहे. मला तर एव्हरेस्ट आणि भगवान श्री कृष्ण यात खूपच साम्य वाटते. ‘सुख दु:खे समे कृत्वा, लाभ लाभो जया जयौ:’ हे स्थितप्रज्ञाचे लक्षण दोघांना तितकेच चपलख लागू पडते.

नदीच्या पात्रातून काळ्या मेघांची रांग येत होती.आता वाऱ्याचा जोर  वाढला होता. पावसाची चिन्हे दिसू लागली होती. तेव्हा आता काढता पाय घेणे गरजेचे होते. नदीचा काठ चढून वर आलो. हॉटेलच् कुंपण ओलांडून आत शिरलो. हॉटेलच्या मागच्या बाजूस मोकळे पटांगण होते. त्यात मालकाने एक घोडा सोडला होता. मोकळाच होता तो. मैदानाच्या कोपऱ्यात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या  कामगाराची राहायची खोली असावी. खोलीच्या बाहेर पाण्याचा नळ होता.त्याला रबराचा पाईप बांधला होता. त्यातून पाणी बादलीत पडत होते. बादलीत धुण्याचे कपडे टाकलेले होते. घोड्याला बहुतेक तहान लागली असेल. त्याने पाणी पिण्यासाठी बादलीत तोंड घातले. जेव्हढे पाणी बादलीत होते ,पिऊ शकत होता तेव्हढं प्याला. पण त्याची तहान भागत  नव्हती. मग त्याने तोंडाने तो रबरी पाईप ओढून काढला.नळाला तोंड लावले आणि पोट भर पाणी प्यायला.शांतपणे निघून गेला. कोण म्हणत मुक्या प्राण्याला अक्कल नसते?

संध्याकाळी परत पत्ते कुटणे आणि जेवण असा कार्यक्रम होता. उद्याला आम्ही लोबूचेकडे प्रयाण करणार होतो. आमच्या लक्ष्याच्या आम्ही जवळ जवळ जात होतो.
श्रीमंतांची कृपा अगाध आहे.यश मिळेल. सेवेसी श्रुत हे विज्ञापना.

पुष्प 6.

दिंगबोचे ते लोबूचे

१. सुरुवातीची उंची:  फूट/४४१०  मीटर्स

२. पोचलेली उंची: १६१४२ फूट/४९२०  मीटर्स

३. चढ: + फूट/४१० मीटर्स

४. प्राणवायूची उपलब्धता : सुरुवातीला ५९% समुद्रसपाटीच्या

५.                                   पोचल्यावरची 54%

६. चाललेले अंतर:  ७.५ मैल/१२.६  किलोमीटर

७. लागणार वेळ: ४ ते ५  सुमारे

(चालायची पाऊले:२२३२७)

दिंगबोचेहून सकाळी लवकरच प्रस्थान ठेवले. दिंगबोचेमधील घरे, हॉटेल यांतून वाट काढत डावीकडचे वळण पाच एक मिनिटात आले असेल. आणि चढाची सुरुवात झाली. तसा चढ कमी होता. खुमजुंग टेकडी चढून गेलो ते डावी कडे दरीत फेरीचे दिसू लागले.  काल आम्ही याच रस्त्याने वर चढून खाली उतरलो होतो. फेरीचे मधील घरे व हॉटेल खेळण्यातील वस्तूसारख्या लहान वाटत होत्या. परतीच्या प्रवासात आम्ही फेरीचेला थांबणार आहोत अशी माहिती गाईडने सांगितली. दोन अडीच तास सतत चालत होतो. वाटेत एक दोन ठिकाणी पाणी प्यायला थांबलो असेन इतकेच. समोर पांढर शुभ्र खळाळत जाणाऱ्या पाण्याचा ओढा आला. त्यावर पूल नव्हता. प्रवाहात पडलेल्या दगड धोंड्यावर पाय ठेवीत स्वतःला सांभाळत पलीकडे गेलो. ओढ्याला लागूनच थुकल्या ची वस्ती होती. वस्ती कसली, एक दोन हॉटेल आणि घरे.

IMG_20180507_104328

इथे दुपारच्या जेवणाचा स्टॉप होता. खर तर फारशी भूक नव्हती. पण पुढे खायला लवकर मिळणार नव्हते. त्यामुळे थांबलो. बहुतेक सर्व ट्रेकर्स इथे थांबतात. इथे प्रथमच ‘रा रा’ सूप चा आस्वाद घेतला. नूडल्स आणि त्यात भरपूर पाणी असे स्वरूप होते. तशी ओरिजिनल चव नव्हती. मग त्यात मनाला येतील ते मसाले आणि सॉस घालून आपल्याला हवी तशी चव तयार केली आणि पोटोबा भरला. त्यातील पाण्याचा  अंश बऱ्यापैकी होता ही जमेची बाजू होती.

IMG_20180506_132806

हॉटेल मधून बाहेर अंगणात आलो. बाहेर घामाने भिजलेला  टी शर्ट वळत घातला होता दगडावर. तो घेतला. येथपासून अत्यंत खडतर प्रवास सुरु झाला. चढ बराच होता आणि वाट अशी नव्हतीच. दगड धोंडे तर विचारू नका. प्रत्येक पंधरा मिनिटांनी थांबावे असे वाटायचे. पण मनाचा हिय्या करून चालत राहिलो. वरून व कधी मागून येणारी याक मंडळी यांचा अडथळा असायचा. तासाभराचा हा चढ बऱ्यापैकी कस काढणारा होता. हाच तो जीव घेणारा ‘दुधला पास’. ट्रेकर्सची परीक्षा घेणारा. आम्ही आपापल्या गतीने आणि परीने चढत होतो. थोड्या थोड्या अंतराने पाणी प्यायला थांबत होतो. उंचीचा त्रास कमी व्हावा म्हणून पाणी पिणे भागच होते.नंतर त्रास झाल्यावर औषधे घेण्यापेक्षा हे बरं.

दुधला पासची उंची साधारण ४८३० मीटर्स असेल. एकदाचा हा दुधला पास संपला आणि थांबलो. पाणी प्यायलो.  थोडी विश्रांती घेतली. इथे वर आल्यावर पाहतो तो काय, ठिकठिकाणी एव्हरेस्ट वीरांची थडगी उभी केली होती. हा अमुक एका देशाचा, अमुक साली ट्रेक मध्ये मृत्यू पावला. काही ठिकाणी दोन किंवा जास्ती वीरांचे स्मरण केले होते. ही वीरांची आठवण थोडीशी का होईना मनाला खिन्नता देऊन जाते. या एव्हरेस्टवीरांच्या दफन भूमीवर ‘नाही चिरा, नाही पणती’ अशी अवस्था होती. सर्वाना मनोमन नमन करून चालू लागलो.आणखी दोन एक तास चालत राहिलो. पायवाट च होती. ट्रेक मध्ये असावी तशीच. दुरून लोबूचे दिसू लागले. आता आम्ही  उंचीवर असल्याने गाव व वस्त्या छोट्या दिसत होत्या.

दुधला पास संपला आणि हिरवी झाडे विरळ होता गेली. खर म्हणजे झाडे दिसेनाशी झाली. निसर्गाचे रूप अजून रुक्ष होता गेलं. वृक्ष संपदा संपल्याने आता सर्वत्र रखरखीतपणा,दगड आणि धोंडे, खडक यांचे साम्राज्य. वाळवंट , दऱ्या आणि पर्वत. सर्व उजाड आणि ओसाड. पण यात सुद्धा निसर्गाचे वेगेळे रूप दिसत होतं. जे आपण नेहमी पाहू शकत नाही, असे एक वेगळेपण यात निश्चित होतं. आपण घरात धूप जाळतो ना, त्याची झुडपे होती. इथे प्राणवायूची कमी. झाडे नाहीत म्हणून प्राणवायू नाही आणि प्राणवायू नाही म्हणून झाडे नाहीत. न सुटणारे कोडे होते. इथून ‘काला  पत्थर’ चे लांबून दर्शन होतं होते. शेवटच्या दिवशी हा पर्वत आम्ही चालून जाणार होतो.

लोबूचे मध्ये आमचा मुक्काम ‘ न्यू EBC गेस्ट हाऊस ‘ मध्ये होता.हॉटेल नेहमी प्रमाणे लाकडी होते. रूम बऱ्या होत्या. चहा पाणी झाले. संध्याकाळी हॉटेल मध्ये पत्ते खेळात बसलो. हळूहळू इतर ट्रेकर्स येत होते. बहुतेक जण पत्ते खेळत होते. काही जण नकाशे पाहत बसले होते. दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकिंग ची रूपरेषा आखात होते. जसा थंडीचा कडाका वाढला, तसे  फेदर जॅकेट अंगावर चढवले.कानटोपी घातली. नंतर अजून थंडी वाजायला लागली तसे थर्मल चढवून बसलो. थंडीपासून रक्षण अत्यावश्यकच होते. तुम्ही शरीराचा एखादा भाग उघडा ठेवता तेव्हा बाहेरचे तापमान कमी असल्याने हिट लॉस (heat loss) होतो. law ऑफ हीट ट्रान्सफर शाळेत शिकलेला आठवा. आणि या वातावरणात डोके दुखणे, सर्दी होणे व डोळ्यातून पाणी येणे या तक्रारी सुरु होतात. पेम्बा आम्हाला वेळोवेळी सूचना देत होता (आणि आम्ही त्या पाळत होतो).

पुष्प सातवे

लोबूचे ते गोरेक्षेप

१. सुरुवातीची उंची: १६१४२ फूट/४९२० मीटर्स

२. पोचलेली उंची: १६८६३ फूट/५१४० मीटर्स

३. चढ: +७२१ फूट/२२० मीटर्स

४. प्राणवायूची उपलब्धता : सुरुवातीला ५६% समुद्रसपाटीच्या

५.                                   पोचल्यावरची : ५४%

६. चाललेले अंतर: २.६७ मैल/४.३ किलोमीटर

७. लागणार वेळ: २ तास ४० मिनिटे सुमारे

आज आमच्या ट्रेकचा आठवा दिवस.दिवंसे दिवस आम्ही आमच्या लक्ष्याच्या जवळ पोचत होतो.तो एक आनंद , समाधान आणि उत्सुकता मनात बाळगून आज बाहेर पडलो. खुम्भू ग्लेशिअरची चढाची वाट सुरु झाली.काही अंतर गेल्यावर डावी कडे एका वेधशाळेचI बोर्ड लागला. इथे जगभरातील वैज्ञानिक हिमालयातील हवामान,त्याचा मनुष्य मात्रावरील परिणाम,भूगर्भशास्त्र आणि यांचा परस्परांवरील संबंध इत्यादींचा अभ्यास करतात असे बोर्ड वरून समजले. तिकडे जायचे म्हणजे अजून दोन तीन किलोमीटरचा पल्ला पडला असता. आम्हाला गोरक्षेप ला पोचायची घाई होती. म्हणून त्या वेधशाळेकडे न जाता थेट निघालो. प्रयोगशाळेकडे जायचा मोह टाळला. आता चढ फारसा नव्हता. तरी प्राणवायूची कमतरता दमवणारी होती.सुदैवाने माझ्या शरीराने या कमतरतेची ओळख लवकर करून घेतली होती. वाढणाऱ्या वया बरोबर अन्नाची भूक कमी होते असे म्हणतात, तशी प्राणवायूची पण गरज कमी होतं असावी Jकाही अंतर चालल्यावर दोन डोंगरांच्या घळीतून वाट गेली होती. त्यावरून खाली उतरलो आणि परत चढ सुरु झाला. लवकरच गोरक्षेप दिसू लागले.वाटेत आम्ही कुठंच थांबलो नव्हतो. हा पल्ला आम्ही न थांबता पार केला होता. वाटेत तहान भागवण्यासाठी थांबलो असेल तेव्हढा वेळ गेला होता.

आज ट्रेक मधील D day ! म्हणजे अत्यंत महत्वाचा दिवस. आज आपण एवरेस्ट बेस कॅम्प ला पोचणार.आज स्वप्न पुर्तीचा दिन.लोबूचे (४९४० मीटर ) ते गोरक्षेप (५१६४ मीटर) ते पुढे बेस कॅम्प (५३६५ मीटर) व परत मुक्काम गोरक्षेप असा कार्यक्रम होता. ‘याच साठी केला होता अट्टाहास’ चा हा दिवस होता. प्रत्येकाच्या मनात अपेक्षांचे प्रचंड ओझे साथीला  आकांक्षाचे वारू होते!  लोबूचे ते गोरक्षेप ते बेस कॅम्प ते गोरक्षेप असा आजचा दिवस तसा दमवणारा होता यात शंका नव्हती. पण प्रत्येक जण उत्साहाने ओसंडून वाहत होता. त्यामुळे सकाळी लवकरच निघालो.सकाळी साडे सहा वाजता नाश्ता उरकला आणि सात वाजता गोरक्षेप दिशेने कूच केले. रस्ता त्या मानाने कमी चढाचा होता. पण रस्त्यात सर्वत्र मोठाले दगड, पाषाण आणि रेती चे राज्य होते. वाटेत काही ठिकाणी उतार देखील होता. एकंदरीत रस्त्यावर पूर्ण पणे लक्ष्य देऊन चालत होतो. नेहेमी प्रमाणे उजव्या हाताला खुम्भू व्हॅली  सोबतीला होती. कधी समोरून तर कधी मागून याक भेटत होता. याक आल्यावर डोंगराचा सहारा घेऊन जीव वाचवणे भाग असे. ही एक कसरतच होती. मधूनच स्वतःच्या वजनाहून अधिक सामान वाहून नेणारे शेर्पा भेटत होते. त्यांना वाट देताना मनातूनच त्यांच्या बद्दलच्या सहानुभूतीची  भावना जागी होत असे. एकेक शेर्पा ज्या प्रमाणात सामान वाहून नेतो  ते पाहिल्यावर तोंडात बोट गेल्याशिवाय राहत नाही. काही शेर्पा तर भरलेले तीन गॅसचे सिलिंडर आपल्या पाठीवर घेऊन चालले होते. एके ठिकाणी शेर्पा प्लायवुड चे चार शीट्स घेऊन जात होता. बिसलेरी बाटल्यांचे कित्येक डझन पॅक्स, भाज्या, फळे,दूध,धान्य,तांदूळ इत्यादी सामान पाठीवर घेऊन शेर्पा जाताना दिसतात. एव्हढे सामान घेऊन जात असताना त्यांच्या चेहेऱ्या वरचे स्मित कधीच कमी झालेलं नसायचे. वाटेत  दोन शेर्पा थांबून गप्पा मारायचे. थोडी फार बिडी काडीची देवघेव व्हायची. आमचे सामान वाहून नेणारा शेर्पा सकाळी बॅग गोळा करायच्या वेळी दिसायचा , तो पुढे निघून जायचा. आमच्या आधी एक दीडतास तो पुढच्या मुक्कामावर पोचलेला असायचा. मंगेश पाडगावकरांच्या ‘सलाम’ कवितेत म्हंटल्याप्रमाणे तशाच शब्दात ,भाषेत सांगायचं म्हणजे, ‘सलाम भाई सबको सलाम, अनोळखी प्रवाश्यांचे सामान वाहून नेणाऱ्या शेर्पांना मनापासून सलाम ‘!

IMG_20180508_094833.jpg

वाटेत येणारी जाणारी हेलिकॉप्टर दिसायची. दिवस भर त्यांचा राबता सुरु असायचा. वेगवेगळ्या रंगाची, कंपन्यांची, आकाराने लहान मोठी हेलिकॉप्टर होती. बेस कॅम्प च्या ट्रेकर लोकांना अडचणीतुन सोडवणारी. ही हेलिकॉप्टर उडविणारे वैमानिक खरेच अफलातून असॆ पाहिजेत. एक इथे हवा विरळ, उतरायला सपाट जमीन नाही. तरी ते आपला जीव धोक्यात घालून ट्रेक करताना अडकलेल्या लोकांना सोडविण्यात तत्पर होते. आकाशातून उतरणारे देवदूतच जणू. आमच्या या टप्प्या वर चालत असताना खुम्बू व्हॅली मध्ये चार अति उत्साही ट्रेकर्स अडकलेले दिसत होते. त्यांची अडचणीतून सुटका (rescue)  करायचे काम हेलिकॉप्टर करताना दिसत होते. अतिउत्साहाच्या भरात किंवा फाजील आत्मविश्वासाने ते भरकटले होते.आणि व्हॅलीत अडकले होते. खुम्भू व्हॅली क्रॉस करायला चालले असावेत. ही व्हॅली वरून दिसताना लहान दिसते पण जवळ गेल्यावर तिची भव्यता आणि उग्रता दिसते. काही ट्रेकर्स कुठल्याही गाईड शिवाय दु;साहस करून बसतात. खूप वेळा या गोष्टी जीवावर बेतू शकतात. खुम्भू व्हॅली मध्ये वैमानिकाला हेलिकॉप्टर उतरायला सपाट जमीन मिळेना, तेंव्हा त्याने हेलिकॉप्टर कमी उंचीवर आणून स्थिर केले, त्यातून दोरखंड खाली सोडला  आणि लोकांना वर उचलून घेतलं.अर्धा पाऊण तास हा सुटकेचा कार्यक्रम चालू होता.

IMG_20180508_085507

गोरक्षेपच्या आधी १-२ किलोमीटरचा टप्पा अत्यंत सुंदर,नयनरम्य आणि उत्कंठा वाढवणारा होता. गोरेक्षेपला आम्ही ठरलेल्या वेळेच्या अर्धा एक तास आधीच येऊन पोचलो. कदाचित बेस कॅम्प च्या पोचण्याच्या उत्कंठेमुळे सर्वांची पाऊले जलद पडत असतील.पांडुरंगाच्या दर्शनाच्या अधिरतेपायी वारकऱ्यांची पाऊले लवकर पाडावीत तसे काहीसे झाले असावे.

हॉटेलमध्ये शिरता शिरता एक आश्चर्याचा धक्का बसला. हॉटेलच्या प्रांगणात अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा नजरेस पडला.दोन हजार बारा साली पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेने या पुतळ्याची स्थापना केली. महाराजांना ऊन लागू नये म्हणून छानशी शेड केली आहे. सोलर पॅनल बसवून दिवा बत्तीची पण सोय केली आहे.

जगाच्या पाठीवरील सर्वात उंच ठिकाणी बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बघून कोणाचे मन भरून येणार नाही? एका बाजूला पर्वतराजी मधील सर्वोत्तम उंचीचा एव्हरेस्ट माथा आणि त्याच्या जवळच या पृथ्वीतलावरील राजांच्या पैकी सर्वात श्रेष्ठ राजांचे वास्तव्य.! केव्हढा मोठा योगायोग होता हा. मला खात्री आहे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करायला जाणाऱ्या प्रत्येक वीराला महाराज प्रोत्साहन आणि सदिच्छा देत असतील. एक प्रकारची वीरश्री देत असतील. महारांजांना मुजरा करून पुढे एवरेस्टची गळाभेट घेणाऱ्या प्रत्येक वीराला सलाम !! टेकराज जो आमच्या बरोबर सावली सारखा होता त्याने या स्थापनेच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेतला होते. त्याने स्थापनेच्या प्रसंगाची त्या वेळची रंजक माहिती पुरवली.

IMG_20180508_094522

हा पुतळा उभा करायचे गिरीप्रेमी संस्थेने ठरविले.पण त्यांना नेपाळ सरकार पुतळा उभा करायला जागा देईना.बराच पत्रव्यवहार झाला. गाठी भेटी झाल्या. पण नेपाळ सरकार काही तयार होईना. शेवटी गिरीप्रेमी संस्थेनी या हॉटेलमालकाशी संपर्क साधला.गिरीप्रेमीने आजतागायत शेकडो जणांना बेस कॅम्प आणि एवरेस्ट वर पाठवले आहे. त्यायोगे या हॉटेलचा बिसिनेस वाढायला मदतच केली आहे. त्यामुळे गिरीप्रेमींची ही विनंती मालक त्यांना नकार देऊ शकत नव्हता. अशा प्रकारे हॉटेलच्या मालकाने जागा देऊ केली. पुतळा आणण्यापूर्वी पूजनीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुण्यात पुतळ्याची पूजा करण्यात आली. खरं तर, बाबासाहेबाना स्वतःलाच स्थापने साठी येण्याचं मनात होते. पण या गोरक्षेपच्या उंचीमुळे हवेतील प्राणवायूच्या कमतरतेमुळे डॉक्टरांनी त्यांना मनाई केली. मग पुतळा पुण्याहून काठमांडूला आणण्यात आला. काठमांडूहुन हेलिकॉप्टरने हा पुतळा गोरक्षेपला आणला गेला. हे सर्व काम खूपच जोखमीचे आणि कष्टाचे होते.साग्रसंगीत ढोल ताशाच्या गजरात आणि थाटामाटात महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. पुतळा देखील असा बसवला आहे की महाराजांची दृष्टी त्या एव्हरेस्ट शिखराकडे आहे.महाराज कदाचित म्हणत असतील, माझ्या शूर मावळ्यांनो, हा एवरेस्ट आपण स्वराज्यात केंव्हा सामील ही श्रींची इच्छा आहे. आम्ही सर्वानी छत्रपतींचा त्रिवार जयजयकार केला आणि तेथून हॉटेलमध्ये गेलो . या उपक्रमाबद्दल गिरीप्रेमीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महाराजांचा हा पुतळा प्रत्येक भारतीयाला विशेषतःमराठी माणसाला प्रोत्साहन देत राहील यात शंका नाही.

गोरक्षेप ते बेस कॅम्प आणि परत गोरक्षेप

गोरक्षेप ते बेस कॅम्प मधील काही महत्वाची माहिती दिली आहे तो खालील प्रमाणे:

  1. गोरक्षेप उंची: १६८६३ फूट/५१४० मीटर
  2. बेस कॅम्प उंची: १७५९८ फूट/५३६४ मीटर
  3. उंचीतील फरक: +७३५ फूट/२२४ मीटर
  4. सुरुवातीच्या प्राणवायूची उपलब्धता:५४% समुद्र सपाटीपेक्षा
  5. बेस कॅम्प प्राणवायूची उपलब्धता: ५3% समुद्र सपाटीपेक्षा
  6. अंतर : २.१७ मैल/३.५ किलोमीटर
  7. लागलेला वेळ: १ तास ४० मिनिटे (साधारण ४ तास जाऊन येऊन)

(courtesy : Halfway Anywhere )

IMG_20180509_163004.jpg

गोरक्षेप मधील ‘हिमालय लॉज आणि रेस्टारंट’ मध्ये लंच आटपून आम्ही लगेच बाहेर पडलो. स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला होता. ३-४ वाजायच्या आत परत यायच्या सूचना टेकराजने दिल्या. कारण तीन वाजल्या नंतर हिमालयात गार भोचक वारे सुरु होतात आणि पावसाची शक्यता वाढते. तेव्हा त्याच्या आत परत यायची त्याने सूचना केली. एव्हरेस्ट बेस कॅम्प चे व्रत अंगिकारल्यानंतरचा हा सर्वात महत्वाचा दिवस होता. नऊ दिवस आम्ही आयुष्यातील एका खडतर आणि  जीवघेण्या प्रवासातून गेलो होतो. वाटेत अनेक संकटे आली. त्यांचा सामना करत इथपर्यंत पोचलो होतो. सुदैवाने आम्ही सर्व  सुखरूप होतो. कोणालाही कसली इजा वगैरे झाली नव्हती. अर्थात  सारे श्रेय गाईड पेम्बा आणि टेकराजाला दिले पाहिजे. पेम्बा ची धाकटी बहीण जी पहिल्यांदाच बेस कॅम्प च्या ट्रेकवर आली होती, तिने सुद्धा सावलीसारखी पाठराखण केली होती. वाटेत अनेक अफलातून आणि धाडसी  मंडळींची भेट झाली होती. त्यांच्या कहाण्या ऐकून अंगावर शहरे येत असत.एका अनोळख्या आणि अनोख्या पण तितक्याच धोकादायक प्रदेशातून आम्ही मार्गक्रमण केले होते. गाईडच्या सूचना तंतोतंत पाळल्याच्या आम्हाला फायदा झाला असावा. सततचे चालणे, प्राणवायूची कमतरता , चढ उतार , तापमानातील सतत होणारे बदल याना तोंड देणे ही खरंच सोपे काम नक्की नव्हते.

गोरक्षेप तो बेस कॅम्पचा ट्रेक एका विस्तीर्ण मैदानातून सुरु होतो. पूर्वी या जागी एक मोठाले सरोवर होते असे म्हणतात. आता ते एक मैदान झाले आहे. जातानाच डाव्या हाताला ‘कालपत्थर’ चा पहाड दिसतो. हा आम्ही दुसरे दिवशी सकाळी चढणार होतो. मैदानात दूरवर पाण्याचे नळ होते. लोक तेथून पाणी भरून आणत होते. गोरक्षेपला हॉटेलमध्ये पाण्याची कमतरता होती. त्यामुळे मिनरल पाण्याची एक लिटरची बाटली सहाशे रुपयाला होती. समोर साक्षात बर्फाचा डोंगर आणि हॉटेलमध्ये पाणी इतके महाग. गंमतच आहे मुळी. त्यामुळे गोरक्षेप ला पाणी जपून वापरावे लागले. हॉटेलमध्ये साधे पाणी मिळतच नाही.

ज्याप्रमाणे लोबूचे ते गोरक्षेप रस्ता कमी चढाचा होता तसाच गोरक्षेप ते बेस कॅम्प चा सुद्धा. फक्त आपण समुद्र सपाटी पासून वर जात असतो. वाटेत प्रचंड दगड आणि धोंडे होते. त्यातून वाट काढत चालणे म्हणजे दिव्य होते. वातावरण स्वच्छ असल्याने खुम्बू व्हॅलीतील बर्फ स्पष्ट दिसत होता. icefall आणि त्यामुळे जमिनीला पडलेल्या वळ्या छान दिसत होत्या. बेस  कॅम्प पासून एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करायला  जाणाऱ्या लोकांना हा पल्ला सर करावा लागतो. हे  एक अतिशय कठीण काम होते यात शंका नाही. बेस कॅम्पवर उभारलेले पिवळ्या रंगाचे तंबू दुरून दिसत होते. एखाद्या पांढऱ्या चुरगालेल्या चादरीवर पिवळ्या रंगाचे नक्षी काम केल्यासारखे दिसत होते. शेवटी चढ संपला आणि बेस कॅम्प जाणारा सपाट रस्ता (पाऊलवाट) सुरु झाली. थोडा उताराचा भाग पण होता. पण परतताना हाच चढ म्हणून लागणार होता.आम्ही चढाच्या सर्वात उंच कड्यावर असल्याने खुम्भू व्हॅलीचा नजारा  सुंदर दिसत होता. तेंगबोचे पासून जी गोष्ट मिस केली होती ते म्हणजे एवरेस्ट शिखर आता दिसू लागले होते.गडद काळसर रंगाचे एक शिखर जे खुम्बुत्से आणि ल्होत्से शिखराच्या मागे मध्येच डोके काढत होते, ते म्हणजे राजाधिराज एवरेस्ट होय. हाच तो जग भरातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा सागरमाथा वा एवरेस्ट! एव्हरेस्ट आपण इतक्या दुरून पाहतो की  तो खुम्बुत्से (२१८६७ फूट/६६६५ मीटर) आणि नुपतसे (२५७९० फूट/६७८६१ मीटर) च्या पेक्षा बुटका दिसतो. एवरेस्ट ची उंची आहे २९०२१ फूट/८८४८ मीटर. ( समाजात नेहमी पुढे पुढे करणाऱ्या व्यक्ती सर्वात बुद्धिमान असतातच असे नाही हे जे आपल्या समाजात पाहतो, त्याचा प्रत्यय इथे ही का बरं यावा?)

एव्हरेस्ट बघून मनुष्य वेडा  होणार नाही असे होणे नाही. मनात महान कवियित्री शांताबाई शेळके यांचे सूर आपसूकच उमटू लागले.(गानतपस्वी किशोरी आमोणकर यांचे हे अजरामर गीत आहे.) यात किंचितसा फेरफार करून असे म्हणेन.

हे  शाम सुंदरा, राजसा, मनमोहना

विनवुनी सांगते तुझं ‘पाहू दे’

मला जवळुनी.

रे श्यामसुंदरा

कवियित्री पुढे म्हणतात,

पावरीचा सूर भिडला

मजसी माझा विसर पडला

न कळता पाऊले मम् राहिली

इथे थबकूनी!!

ही शाम सुंदरा….

मन भानावर आले. पाऊले थबकुनि राहतात हे  तिळभर ही असत्य नाही.  एव्हरेस्ट ही खुम्बुत्से आणि नुपतसे पेक्षा उंच आहे पण पृथ्वीच्या गोलाकार आकारामुळे ते ज्यास्त उंच असून देखील अंतरावरून खुजे दिसत होते. एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. माझ्या आयुष्यातील एका सर्वोच्च ठिकाणी मी उभा होतो. पण त्याही पेक्षा अजून उंच शिखर समोर उभी होती. अशी उंच शिखरे याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य मला लाभले होते. ही उंच शिखर मला पदस्पर्श करू देतील का? माझ्या भाग्यात असेल का? ठाऊक नाही. हिमालयातील ट्रेक मधून एक गोष्ट मनाला भिडते ती म्हणजे तुम्ही कुठल्या ही क्षेत्रात असा, तुम्ही ज्या उंची वर पोचता , त्या पेक्षा आधी उंचीच पुढचे ठिकाण अस्तित्वात आहे. ते अजून तुम्हाला सर झालेले नाही. वाटत, शेवटी माणूस हा निसर्ग पुढे खुजाच. मग अरे मानवा, तू कुठल्या गोष्टीचा एव्हढा गर्व बाळगतोस? लहानपणी शाळेत शिकलेली एक कविता आठवते. कवितेचे शीर्षक आठवत नाही. पण कवितेचा सारांश असा होता की एका पर्वताच्या पायथ्याशी एक झाड उगवते. दररोज त्याची वाढ सुरु होते. काही दिवसांनी झाडाला आपल्या उंचीचा गर्व वाटू लागतो. झाड पर्वताला म्हणते की बघ, आता मी मोठा होतोय. एक दिवस मी तुझ्यापेक्षा उंच होईन. आता झाडावर पक्षी येऊन मधुर गाणी म्हणू लागतात. दुपारच्या उन्हात वाटसरू थांबू लागतात. झाड पर्वताला म्हणते, बघ माझ्याकडे सर्व येतात. मी सर्वाना आवडतो. तुझ्याकडे कोणीच येत नाही. पर्वत शांत असतो. झाडाच्या या बोलण्याकडे हसून दुर्लक्ष करत राहतो. एक दिवशी प्रचंड वादळ होते. आणि पाऊस सुरु होतो. त्यातच कडकडाट होऊन वीज पडते. तो नेमकी झाडावर. एका क्षणात झाड जाळून खाक होते. पर्वत मात्र स्थितप्रज्ञासारखा मंद स्मित करत उभा असतो.

निसर्गI पुढे मानव हा अतिशय लहान आहे, किंबहुना क्षुद्रच आहे. टेकराज म्हणाला होता, there is always a next summit yet to be explored !

शेवटी आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प ला पोचलो होतो. इथून सुरु होतो एव्हरेस्टला जाऊ इच्छिणाऱ्यांचा मेळावा.त्यांनी टाकलेल्या तंबूची दाटीवाटी गर्दी , एव्हरेस्टला  जाणारे  गिर्यारोहक, त्यांचे शेर्पा, इतर मदतनीस यांचे तंबू, सर्वांचा एक मोठा किचनचा तंबू . याच जणू एक गावच वसले होते. तेथून पुढे  जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. ही वारकरी मंडळी रात्रंदिवस या विठूचा म्हणजे एवरेस्टचा ध्यास करत असतील, त्याकडे डोळे लावून बसले असतील, त्याच ध्यान करत असतील. रात्री त्यांना आकाशातील ताऱ्यांच्या ठिकाणी एवरेस्ट दिसत असेल का? त्यांच्या हृदयाची धडधड एवरेस्टला ऐकू जात असेल का? टेकराज सांगत होता. एव्हरेस्ट चढण्याची प्रक्रिया  ही जीवघेणी आणि प्रदीर्घ आहे. एव्हरेस्ट चढताना टप्प्याटप्प्याने कॅम्प १,२ आणि ३ नंतर साऊथ कोल गाठावा  लागतो.वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कॅम्प १,२ आणि ३ च्या वाऱ्या करायला लागतात. थंडी आणि बोचऱ्या वाऱ्याचा सामना करावा लागतो. त्यातून कधी पाऊस तर कधी हिम वर्षाव चालू असतो. एव्हरेस्ट वर तर सुमारे २५० ते ३०० किलोमीटर प्रति तासाला या वेगाने वारे वाहत असतात. त्यामुळे एवरेस्ट शिखरावर बर्फच साठत नाही. त्या मुळे तो काळसर दिसतो. जसा वारकऱ्यांचा विठू काळा तसा या गिर्यारोहकांचा विठू पण काळाच.लहानपणी वाचलेली गोष्ट आठवली. लहानपणीचा कृष्ण यशोदा मातेला विचारतो, माझे सर्व सवंगडी गोरे आणि मी का बरं काळा? या प्रश्नाचं उत्तर इथे आल्यावर मिळाले.असो.

IMG_20180508_130414IMG_20180508_130922

आम्ही बेस कॅम्प ला आलो तेव्हा सुदैवाने गर्दी थोडी कमी झाली होती. पोचल्यावर आम्ही एकमेकांचे अभिनंदन केले. कल्पेशने घरून मिठाई आणली होती. ती आम्ही खाल्ली. एव्हरेस्टला नैवेद्य दाखवून जणू आम्ही प्रसाद खात होतो. नंतर ‘थ्री पॉईंट adventure’ चे बँनर घेऊन ग्रुप फोटो काढला. नंतर तिरंगा हातात घेऊन प्रत्यकाने वैयक्तिक फोटो काढले . सर्व जण एव्हढे उत्साहित होते की काय करू आणि काय नको असे झाले होते. बेस कॅम्प वर एका खडकावर नेपाळ मधील वीरांगणाचे एकत्र फोटो असलेला फ्लेक्स लावला होता . या स्रियांनी एव्हरेस्ट एक वा अनेक वेळा सर केला होता. त्यापैकी काही जणींनी प्राण गमावले  होते. त्या सर्वांची आठवण जागवण्यासाठीचा हा प्रयत्न होता. थोड्याच वेळात पुण्याचा दुसरा ग्रुप जो आनंदच्या नेतृत्वाखाली आला होता , बेस कॅम्पला पोचलI. त्यांच्या बरोबर पण फोटो काढले. एकंदरीत माहोल सगळा इलेक्टरीफायिंग होता.पुणेकरांचे एक छोटास संमेलन भरलं होते. त्या ग्रुपची वाटचाल आमच्या बरोबर असल्याने आणि वाटेत बऱ्याच वेळा भेट झाल्याने बहुतेकांची तोंड ओळख झाली होती. आनंदच्या ग्रुपने ‘बेटी बचाव’ चा बॅनर सोबत आणला होता. त्या बॅनर खाली पण फोटो काढले गेले. भ्रूण हत्या थांबवा आणि बेटी वाचवा असा संदेश देण्याचे समाज प्रबोधनाचे कार्य या ग्रुप केले होते. हा एक प्रकारे जगाला दिलेला संदेशच होता. बेस कॅम्पपाशी मोकळी जागा फारशी नव्हती. तरी आजूबाजू असलेल्या मोकळ्या जागेत जमेल तेव्हढे सर्वानी फोटो काढून हौस भागवून घेतली. आणि का करू नये? गेले कित्येक महिने आणि दिवस या क्षणासाठी प्रत्येकजण जण राबला होता. कष्ट करत होता. त्याचे फळ आज मिळत होते. तिथे एक नेपाळी स्त्री चहा वाटत होती, फक्त नेपाळी जनतेला. टेकराज ने चहा घेतला. आमचा आनंद एवढा होता की चहा न मिळाल्याचं कोणाला काहीच वाटले नाही. कुठल्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला, विशेषतः आपल्याकडे पर्यटकांनी आपली आठवण म्हणून कोरलेल्या पाट्या असतात तशा इथे पण होत्या. त्यात परदेशी पर्यटक पण सामील होते. उदाहरणार्थ, २८ मार्च रोजी न्यझीलँड ची टीम येऊन गेली होती. त्यांनी आपले नाव रंगाने लिहून ठेवलं होते. अशी नावे लिहिणाऱ्या प्रत्येकाला वाटते की आता आपले नाव आता मानवी इतिहासात अजरामर होणार. अशा प्रकारे अजरामर होणाऱ्यांची थडगी जगभर पसरली आहेत याची त्यांना काय कल्पना!

IMG_20180508_113015.jpg

परतीच्या वाटेवर असताना कर्मधर्म संयोगाने बेस कॅम्पच्या वाटेत पुण्यातील डॉक्टर कुलकर्णी यांच्या नावाचा फलक दिसला. पहिल्या नागरी (CIVIL) एक्सपेडिएशन ते सभासद होते. मे १९९२ ची घटना . त्यामध्ये डॉक्टर कुलकर्णी याना मरण आले होते. गिरीप्रेमीच्या सभासदांनी त्यांची आठवण म्हणून हा फलक लावला होता. कुलकर्णीच्या नागरी टीम चे वैशिष्ठय म्हणजे त्यांनी south कोल ची वाट प्रथम नागरी लोकांना खुली करून दिली. असा मजकूर त्या शिळे वर लावला होता.  डॉक्टर कुलकर्णीचे योगदान आपल्याला अभिमानास्पद आहे यात शंका नाही.

बेस कॅम्पवर इतर ट्रेकर्सचे ग्रुप येतच होते. तोच आनंद, आनंदाच्या आरोळ्या म्हणा हव्या तर, आरडा ओरडा , एकमेकाला hugging चालू होते. प्रत्येक देशातील लोक आपले ध्वज घेऊन फोटो काढण्यात मश्गुल होते. उशीर होऊ लागला तसा तेथून चालायची सूचना गाईडने केली. फार संध्याकाळ व्हायच्या आत रूम वर परतायचे होते. पाऊस सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.परत एकदा गाईड आणि टेकराज आणि इतर सर्व टीम चे आभार मानले आणि परत फिरलो.पुन्हा एकदा एवरेस्टचे आभार मानले आणि हा ‘शाम सुंदर, राजस सुकुमार’ परत कधी भेटतो याची आस बाळगत आणि अजून जवळून दर्शन कधी देतो अशी मनोमन  करुणा भाकून  निघालो.

IMG_20180510_060639

परत येताना या वेळी मी ग्रुपच्या मागे पडलो होतो. कदाचित एव्हरेस्टच्या वियोगाच्या व्यथेने पाऊले जाड झाली असतील. परमप्रिय सावळया विठू माउलीचे आषाढी एकादशीला दर्शन घेऊन परत येणाऱ्या वारकऱ्या सारखी माझी गत झाली होती. आता थंड वारा सुटला होता. त्याचा बोचरेपणा जाणवत होता. परत येतानाच्या वाटेवर बेस कॅम्प कडे निघालेले ग्रुप लगबगीने जाताना दिसत होते. मंडळी तिथे पोचणार कधी आणि परत कधी येणार याची क्षणभर चिंता वाटली.एवरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या सर केल्याच्या आनंदावर स्वार होऊन हॉटेल वर परतलो.

IMG_20180510_071447

खर तर बेस कॅम्प ला जाताना आपण बेस कॅम्प पेक्षा जास्त उंचीवर जातो आणि मग बेस कॅम्पच्या उंची पेक्षा खाली उतरतो.तसेच बेस कॅम्प वर एव्हरेस्ट ला जाणाऱ्या गिर्यारोहकांचे तंबू टाकलेले होते. त्यामुळे आपण बेस कॅम्प च्या सीमा रेषेवर जाऊन परत येतो.विना परवाना बेस कॅम्प ची सीमा ओलांडली तर दंड भरावा लागतो.बेस कॅम्प पासून एव्हरेस्टचे दर्शनापेक्षा आधीच्या प्रवासात तो अजून चांगला दिसतो. काहीही असो, “एव्हरेस्ट म्हणजे  एव्हरेस्ट म्हणजे  एव्हरेस्ट असतो, तुमचा आणि आमचा  सेम असतो”.जाणकारांच्या मते एव्हरेस्टचे सर्वात चांगले दर्शन ‘कालपत्थर’ या शिखरावरून होतं. आणि आनंदाची बाब म्हणजे दुसरे दिवशी पहाटे आम्ही तिथे जाणार होतो. पहाटे तीन साडेतीन वाजता निघायचा बेत ठरला.म्हणजे पाच वाजेपर्यंत कालपत्थर शिखरावर पोचु आणि उगवत्या सूर्यIच्या किरणांनी न्हाऊन निघालेला एव्हरेस्ट पाहता येईल. असा बेत होता. सर्व साधारण पणे हाच ट्रेकर्स चा कार्यक्रम असतो. रात्र होतं आली आणि पहाटे लवकर उठायचे या जाणिवेने लवकरच झोपलो.

उपोदघात
एव्हरेस्ट बेस कॅम्पची ही  बखर संपत आली. मनात नेहमीच प्रश्न येतो की एव्हरेस्ट बेस कॅम्प चा ट्रेक कोणी करावा? ट्रेक करून आल्यावर माझ्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी हा प्रश्न विचारला , मला हे जमेल का, मला शक्य आहे का? माझे उत्तर आहे की हा ट्रेक कोणी हि करावा. लहानांनी करावा, मोठ्यांनी हि करावा. प्रौढांनी करावा तसेच ज्येष्ठांनी ही करावा. पुरुषांनी करावा तसेच स्त्रियांनी ही करावा. आमच्या बरोबरचा तनिश हा जेमतेम पंधरा वर्षाचा होता. आणि वाटेत भेटलेले लोक जेमतेम ८० वर्षाचे होते.पाय धड असणाऱ्यांनी तर करावाच, पण पाय नसणार्यांनी पण करावा. काठमांडू एअरपोर्ट वर भेटला मलेशिया देशाचा तरुण , ऍडम दोन्ही पायानी पांगळा होता. चेहरा हसतमुख आणि आत्मविश्वासाने भरलेला.  बेस कॅम्पच्या ट्रेकला निघाला होता. आणि कॅनडा  देशाचा टॉमी एका पायाने आणि एका हाताने अधू होता. बेस कॅम्पचा ट्रेक पूर्ण करायची त्याची जिद्द अचंबित करणारी होती. वाटेत अशा कहाण्या एकलायला मिळाल्या , काही जोडप्यांनी त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस बेस कॅम्प वर साजरा केला. अगदी केक कटींग सह. ऐकूनच गंमत वाटली. वाटेत एक आज्जी भेटल्या. त्या ७० वर्षाच्या तरुण होत्या. डोक्यावरील सारे केस पांढरे शुभ्र आणि चेहेऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे दिसत होते. आपली मुलगी  आणि जावयासोबत बेस कॅम्पला निघाल्या होत्या. मागे सांगितल्या प्रमाणे एक अंध व्यक्ती आपल्या मित्राबरोबर बेस कॅम्प ला चालली होती. एव्हरेस्ट ही एक जगातील अशी जादू आहे की सर्वाना आपल्याकडे आकर्षित करते. या वाटेवरचे वारकरी आपले वय,देश,धर्म,जातपात ,आपली तहान भूक विसरतात. पंढरीच्या वारकर्यांना जशी विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, तसे एव्हरेस्ट च्या दर्शनाची आस लागते. म्हणूनच ज्यांना रक्त दाब आहे त्यांनी पण ट्रेक करावा, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी पण करावा. (अर्थात वैद्याच्या सल्ल्याने आणि टेकराज सारख्या अनुभवी गाईड च्या मार्गदर्शनाखाली ). शेवटी एव्हरेस्ट ही कल्पना माझ्या मते माणसाच्या मनातील एक वृत्ती आहे.  एक ध्यान धारणा आहे. ती माणसाला स्वस्थ बसू न देणारी एक विजीगुशी वृत्ती आहे.बेस कॅम्प हि एक साधना आहे. या साधनेत वेळ कसा जातो ते कळतच नाही. बेस कॅम्प ला जायची काही महिने केलेली तयारी. त्या ओघाने सिंहगड आणि तत्सम अनेक किल्ल्यांवर केलेल्या स्वाऱ्या. कात्रज ते सिंहगडचा रात्रीचा ट्रेक. अशी अनेक अंगे याला आहेत. ही साधना मात्र अनुभवी गुरु च्या मार्गदर्शनाखाली करावी लागते. मी माझी साधना सुरेंद्र आणि टेकराज च्या अनुभवी नजरेखाली केली. तुम्ही आपले वेगळे गुरु निवडू शकता. मात्र शेवटचे ध्येय मनात स्पष्ट हवे. बेस कॅम्प चा ट्रेक ही एक मनाला आणि शरीराला शिस्त लावणारी कवायत आहे. आपण मनाला जसे तयार करतो, तसे शरीराला तयार करत असतो. या ट्रेक च्या दरम्यान भेटणाऱ्या महान व्यक्तींचं दर्शन हा एक आगळा वेगळा सोहळा आणि आनंद असतो. ही एक प्रेरणा असते. ही सारी मंडळी आपल्याला देवासारखी वाटू लागतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनतुन मिळणारी सुटका हा माझ्या मते एकंदरीत मिळणाऱ्या नफ्याचा एक अगदी छोटासा नगण्य भाग म्हंटला पाहिजे. ट्रेकच्या काळात जगातील सर्वात शद्ध वातावरणात आपण फिरत असतो. लुक्ला सोडल्यानंतर परत येई पर्यंत कुठल्याही ऑटोमोबाईलपासून आपण दूर असतो. सारे कस स्वच्छ आणि शांत. एकाद्या देवळात पहाटेच्या वेळी जावे, अजून बाकीचे भक्त आलेले नाहीत अशा वेळी. आपण आणि आपल्या समोर असलेली देवाची मूर्ती. गाभाऱ्यात तेवणारा एक मंद दीप. अशा वेळी आपण आणि देव एकच होऊन जातो . एक अद्वैताचे स्वरूप जाणवते, ‘’पायI पडू गेले तंव, पाऊलचे ना दिसे’असे काहीसे होते. तसे आहे हे एव्हरेस्टचे दर्शन.माझ्या मते जगातील सर्वोत्तम कलाकृती कोणती ती म्हणजे जी माणसाला अंतर्मुख करते. मला वाटत ताजमहाल पIहिल्यावर त्याचा रेखीवपणा, त्याचे सौंदर्य, त्याची भव्यता जाणवते पण आपण अंतर्मुख होतोच असे नाही. एव्हरेस्ट आणि या हिमालयातील इतर  शिखर आपल्याला अंतर्मुख करणारी आहेत यात शंका नाही. एक गोष्ट नक्की. येथील शांतता, हवेतील ताजेपणा तुमच्या शरीरातील अणूरेणू प्रफुल्लित केल्याशिवाय राहणार नाही. चालताना थकवा वाटत नाही. आला तरी तो क्षणिक असतो. एक प्रकारचा सुखकारक असतो. आपण निसर्गाशी किती तादात्म्य पावतो हे या ट्रेक मध्ये अनुभवावे. प्रश्न पडतो मग हिमालयात परत परत यावे का? मला वाटते जो पर्यंत शरीर साथ देते तो वर जरूर यावे. चेहेऱ्यावर सुरकुत्यांचं जाळ पसरलेल्या आज्जी येऊ शकतात तर आपण सुद्धा जरूर यावे. एव्हरेस्ट हा एक अवघ्या मानव जातीला आपल्या कडे खेचून आणणारा एक जीताजागता चुंबक आहे. मला वाटत, पहिला केलेला ट्रेक  एक तोंड ओळख आहे. दुसरा ट्रेक जवळीक निर्माण करतो आणि त्यानंतर आपण हिमालयशी तादात्म्य पावतो. आपण या हिमालयाचा, त्यातील शिखरांचा, डोंगराचा, नद्यांचा एक अविभाज्य घटक होऊन जातो. दरवर्षी पंढरपूर ला जाणारे वारकरी जसे साक्षात विठोबाचे अवतार होतात तसे. यात्रेला निघालेल्या  वारकऱ्याला त्यामुळेच विठू माउली म्हणतात. तसाच काहीसा हा प्रकार आहे. ट्रेकवरून परत आल्यावर काही दिवस, महिने आनंदात जातात आणि मग परत पाय हिमालयाच्या दिशेने वळू लागतात.

“मन शांत होता पुन्हा लागे ओढ, तस्सा मांडी गोड संसाराचा थाट

पाऊले चालती पंढरीची वाट”

अशी अवस्था होते. तुम्ही आपले वेगळे गुरु निवडू शकता. ‘गुरुविण कोण दाखविलं वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम , अवघड डोंगर-घाट’ असे सर्वश्रेष्ठ कविवर्य ग दि मा नी म्हंटल आहे. बेस कॅम्प च्या ट्रेकला समोर ठेवून हे गीत लिहिल्यासारखं वाटत!! मात्र शेवटचे ध्येय मनात स्पष्ट हवे.
हे लिखाण संपवताना एक विचार मनात येतो. आता इथून पुढे काय? व्हॉट नेक्स्ट?? यावेळी दोन कल्पना मनात येतात. पहिली म्हणजे बेस कॅम्पचा ट्रेक परत करायचा, पण या वेळी गोक्यो लेक आणि गोक्यो शिखर च्या रूटने करायचा. आणि  पुढे ‘कालपत्थर ‘ सर करायचा.या वेळेच्या ट्रेक मध्ये कालपत्थर राहून गेला होता.  त्यासाठी गोरक्षेपला एखादा दिवस जास्तीचा थांबायला लागले तरी चालेल. माझ्या मते, असा ट्रेक जमायला हरकत नसावी. आणि दुसरा विचार एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक एकट्याने करायचा. हे थोडेसे अतार्किक आहे. पण असंभव असू नये. आणि शेवटी समर्थानी म्हटलेले आहेच;

मनी धरावे ते होते, विघ्न अवघेचि नसून जाते! कृपा केलिया रघुनाथे, प्रचित येते!!

आपल्या सर्वाना  या हिमालयाचे वारकरी होता यावं आणि राजाधिराज एव्हरेस्टचे दर्शन याची देही, याची डोळा होवो अशी इच्छा राजाधिराज एव्हरेस्टच्या चरणी अर्पण करून निरोप घेतो.