इतिहासाचार्य पू.राजवाडे, पू.सरदेसाई आदि मंडळींचे ऐतिहासिक क्षेत्रांत अतुलनीय योगदान आहे. विदर्भाच्या इतिहासाचा विचार केल्यास वऱ्हाडचे आद्य इतिहासाचार्य यादव माधव काळे उपाख्य अण्णासाहेब काळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. दुर्दैव असे की अण्णासाहेबांचे नाव त्यांची जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यांत फारसे ठाऊक नाही. यास जबाबदार केवळ जातीयतेचे गलिच्छ राजकारण आहे. अण्णासाहेबांवर एक लेखमाला लिहावी असे मला खूप वाटे परंतु
आवश्यक संदर्भांची जुळवाजुळव करीत होतो. या लेखापासून प्रारंभ करीत आहे.
अण्णासाहेबांचा जन्म 18 फेब्रुवारी सन 1881 साली बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिध्द लोणार या गावी एका देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण कुळात झाला. परिस्थिती अतिशय हलाखीची होती कारण विद्वान असूनही निजामी अंमलामुळे काळ कंठणे सुरु होते. त्यांचे वडिल पं. माधवराव काळे हे विद्वान वे.शा.सं. होते. अण्णासाहेब हे बालपणापासूनच प्रखर बुध्दीमान, धर्मकृत्य परायण, व व्यायामाची प्रचंड आवड असणारे होते. लोणार-धारा ही हिन्दुंसाठी अतिशय पवित्र. तसेच दैत्यसुदन भगवान, कमळजा माता, आणि लोणार सरोवर हे तर हिन्दुंचे श्रध्दास्थळ. परंतु हमखास हिन्दु लोक येथे स्नानास आले की मुसलमान खोड्या काढीत. तेणेकरुन हिन्दुबांधव त्रस्त होते. अण्णांच्या मातु:श्री राधाबाईंचा नित्यनेम असे, पौर्णिमेस धारास्नान करण्याचा. अशाच त्या एकदा गेल्या असता, स्नानादरम्यान कुणा यवनाने वस्त्रे पळविली. हे धाकटे अण्णा पाहत होते. त्यांच्यामागे जाऊ लागले. मात्र आपल्या पुत्रास बाटवितील या भयाने आईने परत बोलाविले. पण हा प्रसंग अण्णासाहेबांच्या मनास लागला. विचारांच्या गर्तेत असता बालकाने आई कमळजेसमोर शपथ घेतली, 'मी जोवर लोणार-धारा म्लेंच्छमुक्त करित नाही तोवर लोणारात पाउल टाकणार नाही'. आणि मातु:श्री बाईंचे व देवतांचे दर्शन घेउन अण्णासाहेब लोणारांतुन निघुन गेले. येथुन पुढे पदवी बी.ए. होईपर्यंत त्यांनी काय केले ते सापडत नाही. कळते ते एवढेच की अण्णासाहेब पदवी घेउन यवतमाळ येथल्या एका राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करता करता त्यांनी वकिलीचे शिक्षण पूरे केले. यात त्यांना श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांची खूप मदत मिळाली. प्रारंभी ते दादासाहेबांचे Asst. म्हणूनच अमरावतीत कार्यरत होते. येथेच त्यांचापू. लोकमान्य टिळकांच्या विचारांशी जवळून परिचय झाला. ते प्रखर राष्ट्रभक्त बनले, टिळकभक्त बनले. हिन्दुत्व तर हाडीमांसी भिनलेलेच होते. कायद्याचे शस्त्र उपसून आपल्या प्रतिद्न्ये नुसार ते कोर्टात गेले. त्यांनी हरतर्हेने पुरावे मांडून लढा यशस्वी केला. लोणार धारेवर हिन्दुंचा हक्क मान्य करवून घेतला. विजयश्रीमंडित अण्णा लोणारात प्रविष्ट झाले. लोणार धारा हिन्दुंची झाली.
आपल्या व्यवसायात स्थिर झाल्यावर व प्रथम काही काळ मेहकर व तद्नंतर बुलडाण्यासच अण्णांनी व्यवसाय सुरु केला. स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या आवडत्या विषयाकडे लक्ष केंद्रीत केले-इतिहास संशोधन. वर्हाडप्रांत हा त्यांच्या जिव्हाळा व आपुलकीचा विषय होता. ती त्यांची जन्म-कर्म भूमि होती. तोवर विदर्भाच्या इतिहासावर फारसे संशोधनही झाले नव्हते. अतयेव अण्णासाहेबांनी या कार्यास वाहून घेतले. यात त्यांना सरदेसाई, दत्तोपंत आपटे, यशवंत खुशाल आदि मंडळींचे सहकार्य लाभले. साधारणत: अण्णांच्या ऐतिहासिक कार्याचे वर्गीकरण तीन प्रकारांत करता येते.
1. ऐतिहासिक लेखन
2. संपादन
3. निबंध व व्याख्याने.
● ऐतिहासिक लेखन: अण्णांनी सुरुवात मातृभुपासुनच केली. त्यांचा पहिला ग्रंथ लोणार महात्म्य. हा ग्रंथ संस्कृतात आहे परंतु ऐतिहासिक दस्तावेज, तत्कालीन जवळपास उपलब्ध असलेली 25 पुस्तकांचा आधार घेउन हे लिहीले आहे. हा धर्मग्रंथ नव्हे. याशिवाय अण्णा प्रमुख्याने प्रसिध्द आहेत ते त्यांच्या 'वर्हाडचा इतिहास' या ग्रंथासाठी.
वर्हाडचा इतिहास: सन 1904-05 सालीच अण्णासाहेबांनी या ग्रंथाचा पहिला भाग लिहिला. यासाठी बडोद्यापासून नागपूर, अकोला, बाळापूर, चंद्रपूर, गडचिरोली आदि स्थांनांचे दौरे केले. तत्कालीन कागदपत्रे, संदर्भ, वाकाटकांपासून ते भोसले महाराजांपर्यंत सगळ्या नोंदी तपासल्या व प्रस्तुत ग्रंथ लिहीला. या ग्रंथाचा द्वितिय भाग सन 1924 साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे महत्व असे,की इतिहासाचार्य सरदेसायांनी दिलेल्या प्रस्तावनेत 'ही तर विदर्भाची बखरच आहे' असे गौरवोद्गार काढले आहेत.
गोंड लोकांचा इतिहास: गडचिरोली, गोंदिया, भंडारा आदि भागात गोंड लोकांचे पूर्वापार वास्तव्य होते. ही लढवय्यी जमात कायम उपेक्षित राहीली. यांचे गुणगान गाणारे अण्णासाहेब हे पहिले इतिहासकार होत. म्हणूनच गोंडवना विद्यापीठीस अण्णासाहेबांचे नाव द्यावे असा प्रस्ताव आला होता मात्र हे होऊ शकले नाही. हा ग्रंथ सन 1926-27 साली लिहिला गेला.
नागपूर प्रांताचा इतिहास: नागपूर चा अगदी नाग लोकांपासूनचा इतिहास यात आहे. विविध राजे, सत्तापालट यांचे रोमहर्षक वर्णन या ग्रंथात पहावयास मिळते ग्रंथलेखन सन 1934 सालचे आहे. याशिवाय, सरदार रघुजी भोसल्यांवर लहान मुलांसाठी एक लेखमालाही अण्णांनी लिहीली.
● ऐतिहासीक ग्रंथांचे संपादन:
नागपूरकर भोसल्यांची बखर: प्रस्तुत ग्रंथ हा नागपूरकर भोसले महाराजांच्या दरबारी असलेला इंग्रज रेसिडेंट रिचर्ड जेन्किन्स याने इंग्रजीत लिहीला होता (सन 1822). त्यानंतर तिचे मराठीत भाषांतर झाले, मात्र ते मोडी लिपीत होते. राब।। वामन दाजी ओक यांनी ही बखर सर्वप्रथम 1885 साली 'काव्येतिहास संग्रहा'त मालीकारूपाने प्रसिध्द केली होती. परंतु ती अपूर्णच राहीली. सन 1937 साली अण्णासाहेबांनी तिचे देवनागरी लिप्यंतर करून शुध्द स्वरूपात संपादन केले व त्यास अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावनाही लिहीली. अण्णांना जरी भोसल्यांची प्रजा असल्याचा अभिमान होता, तरी या बखरीत त्यांनी जानोजीराजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणतात, "सातारीयाच्या तख्ताचा मोह धरून, ज्यांचेमुळे मर्हाटा राज्य पुनश्च दिल्लीपर्यंत विस्तारले, त्या माधवराय पंतप्रधानावर तरवार धरोन चालून गेले, त्याचा अंजाम पावले. तेथेच जानोजीने नागपूर संस्थान इंग्रजी घशात घालावयाचा श्रीगणेश केला.." या बखरीचे वैशिष्ट्य म्हणजे अण्णांकडून संपादीत ही बखर आग्रा विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली होती.
POONA RESIDENCY RECORDS vol. 5 (1781-1821): या ग्रंथाचे संपादन इतिहासाचार्य सरदेसायांसह अण्णासाहेबांनी सन 1939 साली केले.
ऎतिहासीक पत्रवेव्हार सूची: या ग्रंथाचे संपादन सरदेसाई, वाकसकर, कुळकर्णी या मंडळींसह अण्णासाहेबांनी केले. या सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. याखेरीज Histroy of wakatakas हा ग्रंथहि त्यांनी करावयास घेतला होता, परंतु तो पूरा होउ शकला नाही.
यादवरावांचे वक्तृत्व उत्तुंग होते. अभ्यास सखोल होता, व मनात इतिहासाविषयी अलोट श्रध्दा होती. यातुनच त्यांनी काही स्फुट लेखन केले. त्यापैकी काही येथे देतो.
'वाशीमचा राजा उदाराम' हा त्यांचा निबंध अभ्यासकांसाठी उत्तम आहे. (प्रकाशक- भारत इतिहास संशोधन मंडळ). सन 1923.
'375 वर्षांपूर्वीचा कळंब (जि. यवतमाळ) चा शिलालेख'.
श्रीमंत थोरले बाजीराव साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त रावेरखेडी येथील व्याख्याने (सन 1926).
सरदार मल्हारराव होळकर पुण्यतिथीनिमित्त इंदुर येथील व्याख्याने (सन 1926)
परांजपे स्मारक व्याख्यानमाला, नागपूर.
वसंत व्याख्यानमाला, दत्तोपंत आपटे यांचे अध्यक्षतेखाली, (सन1917). विषय- सीताबर्डी(नागपूर) ची लढाई. याखेरीज त्यांच्या साहित्यसेवेसाठी पूण्यात आनंदाश्रम येथे साहित्यसम्राट न.चि.केळकर यांनी अण्णांचा सत्कार केला होता.
☆ इतिहासाचार्यांचे राजकारण:
मुख्य हरिकथा निरोपण। दुसरे ते राजकारण।।' या समर्थ रामदास स्वामींच्या वचनावर अण्णासाहेबांचा पूर्ण विश्वास होता. अमरावती मुक्कामी श्रीमंत दादासाहेब खापर्ड्यांशी संपर्क आला असताना ते पू. लोकमान्य टिळकांच्या राजकीय विचारांशी समरस झाले. श्रीरामदास स्वामी व लोकमान्यांना ते गुरु मानीत. लोकमान्यांच्या खामगाव, अकोला येथे झालेल्या सभांना उपस्थिती लावून त्यांनी लोकमान्यांचे आशीर्वादहि घेतले होतेे. लोकमान्यांच्या देहान्तानंतर ते विधायक राजकारणाकडे वळले. देशबंधु चित्तरंजन दास यांनी स्थापन केलेल्या 'स्वराज्य पक्षा' ची निवडणूक त्यांनी लढविली व त्यांत ते विजयीही झाले. त्याचप्रमाणे सन 1925 साली Central Provinces & Berar Legislative Council चे अध्यक्ष म्हणूनही ते निवडुन आले व सन 1937 पर्यंत ते प्रस्तुत समितिचे सभासदही होते. सन 1926 साली मुंबई येथे झालेल्या हैदराबाद स्टेट पिपल्स कान्फरन्स चे अध्यक्ष म्हणूनहि ते निवडुन आले. विदर्भासाठी त्यांनी तनमनधन ओतुन कार्य केले. आजहि बुलडाणा, लोणार, मेहकर व इतर भागातील वृध्द व जाणकार लोक त्यांचे आदराने नाव घेतात. बुलडाण्यात वृक्षारोपणाचा सपाटा लावून, त्याला प्रसिध्दी मिळवून देणारे कानडे शास्त्री हे अण्णांचे शिष्यच होत! अण्णासाहेब हिन्दु महासभेचे ही काही काळ कार्यकर्ते राहीले होेते. आपले राजकीय वजन व वकिली बुध्दीमत्ता वापरून त्यांनी वाशीम प्रांतातील पद्मतीर्थाचा खटला सोडविला. हिन्दुंच्या बाजूने न्याय मिळवून घेतला. हिन्दु मुस्लीम दंग्यातून निरपराध हिन्दुंना सोडविले. वाशीमकर हिन्दु जनतेने यासाठी त्यांना मानपत्रहि प्रदान केले. त्यातील मजकूर लेखासह पोस्ट केलेल्या चित्रात देत आहे. एकुणच राजकीय क्षेत्रांत अण्णांनी उत्तम ठसा उमटविला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या 'विदर्भ साहित्य संघा'च्या संस्थापकांपैकी अण्णासाहेब एक होत. दादासाहेब खापर्डे, अण्णासाहेब ओक, न्या.कोरटकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ओक आदि मंडळींसह सन 1923 साली 'विदर्भ साहित्य संघा' ची स्थापना झाली. अण्णासाहेब काळ्यांच्या इतिहाससेवेचा सम्मान म्हणून अमरावती येथील ब्रह्मविद्या मंदिरात झालेल्या सन 1924 सालच्या 'विदर्भ साहित्य संघा' च्या द्वितिय साहित्यसम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यास व धर्मकार्यास वाहून घेणार्या मंडळींना कौटुंबीक सौख्य क्वचितच लाभते. अण्णासाहेबांनाहि ते फारसे लाभले नाही, किंबहुना आपले सपूर्ण जीवन इतिहास संशोधन, राजकारण व समाजसेवेस वाहून घेतल्याने त्यांना घराकडे लक्ष द्यावयास सवड झाली नाही. प्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांनी द्वीतीय विवाह केला. सध्याही बुलडाण्यातील जुनी जाणती मंडळी अण्णासाहेबांचे नाव घेतात. मध्यप्रांतातून वर्हाड मुक्त व्हावा अशी मागणी करणारे अण्णासाहेब पहिलेच गृहस्थ होत. यासाठी त्यांनी हैदराबादेपर्यंत जाउन प्रयत्न केले. तेथील खटल्यासाठी वयाच्या 60 व्या वर्षी अण्णांना उर्दु शिकावे लागले. परंतु वर्हाडातील निजामी सत्तेखाली असणार्या हिन्दुंच्या मुक्ततेसाठी करता येईल तेवढे त्यांनी केले. बुलडाण्यास आज जेथे सरकारी दवाखाना आहे, तेथेच अण्णांचा विस्तृत वाडा होता. स्थानिक लोक त्या जागेस अजूनहि 'काळ्यांचा वाडा' म्हणूनच ओळखतात. अण्णासाहेब असेतो तेथे व्यायामशाळा होती. स्वत: परोपकारी वृत्तीचे असल्याने ते नेहमीच आपल्या वाड्यात शिकाऊ विद्यार्थी ठेवत. त्यांच्या शिक्षणाचा व खाण्यापिण्याचा खर्च स्वत: करत. त्यांच्या देहान्तापश्चात वाडा त्यांच्या मुलाने नि:स्पृहपणे सरकारी दवाखान्यास देउन टाकला. अण्णासाहेबांचे प्रखर हिन्दुत्व पाहून रा.स्व.संघाचे संस्थापक डा.हेडगेवार यांनी अण्णासाहेबांना बुलडाणा नगराचे प्रथम नगर संघचालक म्हणून नियुक्त केले होते. वर्धा येथे राष्ट्र सेविका समिती संस्थापन दिनास ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गेले होते. 1943 साली अण्णांना पक्षाघाताचा झटका आला व त्यातच, दि. 11मार्च 1943 रोजी बुलडाण्यास आपल्या वाड्यात रात्री 12:30 वाजता काळाने अण्णासाहेबांवर झडप घातली!! विदर्भाचे आद्य इतिहासाचार्य ब्यारीस्टर यादव माधव काळे अनंतात विलीन झाले.
विदर्भाच्या सर्वांगीण इतिहासावर त्यानंतर बरीच ग्रंथसंपदा निघाली, डा.कोलते, मिराशी, देशपांडे इत्यादिंनी विदर्भाच्या इतिहासावर खूप संशोधन केले मात्र याही मंडळींनी आद्य वैदर्भ-इतिहासाचार्य म्हणून अण्णासाहेब काळ्यांना गौरवान्वीत केले आहे. अण्णासाहेबांचे फारसे वंशज नाहीत. शिवाय त्यांच्यामागे समर्थपणे ही धुरा संभाळणारा कुणी नव्हता, व आमच्या लोकांची इतिहासाबद्दलची वाढती उदासीनता, यांमुळे हा नरशार्दुल कायमच उपेक्षीत राहीला.
आभार - रवी ठोकरे पाटिल, सचिन दिक्षीत
संदर्भ ग्रंथ:
1. जगप्रसिध्द विवर : लोणार सरोवर--प्रा. प्रकाशचन्द्र व्यास
2. संघगंगोत्री-(संपा.) रमेश पतंगे
3. बडोदा संस्थाातील कागदपत्रे (Article 11)
4. नागपूरकर भोसल्यांच्या ग्रंथाशी संबंधीत विद्यापीठातील कागदपत्रे
5. विदर्भ साहित्य संघाचा इतिहास
6. इतिहासाचार्यांचे सर्व ग्रंथ.
7. राष्ट्र सेविका समिती पुस्तिका..
सर्व हक्क लेखकाधीन... © सुधांशू कविमंडन
त्या आधी नव्हते असे नाही पण, ब्रिटीश आणि नंतरच्या काळात वाघांच्या अतोनात शिकारी झाल्या, त्याला आळा बसला. पट्टेदार वाघ महाराष्ट्रात फक्त विदर्भातच आहेत ही FACT आहे.
वाघ असणे म्हणजे इतर सर्व निसर्ग pyramid मजबूत आहे.
मेळघाट महाभारत काळापासून संदर्भात आहे. पांडव इथे अज्ञातवासात येऊन राहिले, कदाचित रुक्मिणी हरण वेळी अमरावतीला येऊन गेल्यावर कृष्णाने पाहिले ऐकले असेल आणि सूचवले असेल की घनदाट आहे आणि secluded आहे जेणेकरून
बातमी कळू नये.
150 किमी East West आणि 70किमी north south असलेला हा डोंगराळ भाग दोन मजबूत किल्ले आणि एक hill station ठेवून तर आहेच, ब्रिटिशांनी निबिड अरण्यात ठिकठिकाणी हौशीखातर बांधलेले Rest Houses आजही आहेत. नरनाळा हा महाराष्ट्रातल्या आकाराने मोठ्या पहिल्या पाचात येईल एवढा.
सातपुडा म्हणजे सात East West रांगा काही ठिकाणाहून मोजता येतात. "तुझे निळे पण आभाळाचे" सुचावे इतके विविध निळ्या छटा इथे दिसतात. डोंगरांना फार अक्राळविक्राळ सुळके नसल्याने असावे की वन्यजीव खूप आणि म्हणून वाघोबा.
आम्ही उभयता इथे दिवाळी आणि Monsoon ला येतो ते वाघ बघण्यासाठी नाही तर निसर्ग रिचवण्यासाठी. दिसला कधी तर Bonus मानू. चिखलदऱ्याच्या cozy stay पासून ते अंबाबरवा च्या real nature stay पर्यंत मधले सगळे अनुभवत अनुभवत.
एका दिवाळीत तर नागपूर AM band वरील मराठी गाणी ऐकत High point ला केलेला किंवा चिखलदऱ्याहून आमझरी आणि खाली केलेला, वैराटचा प्रवास, तसेच सूर्या धबधब्याचे पहिले दर्शन .. printed आहे memoryत.
मेळघाटात रात्री जेवढ्या चांदण्या दिसतात, मला तरी कुठेच तेवढया दिसल्या नाहीत, कोटी कोटींचा खच !!!!
Melghat is for Nature Trail, nature soaking, ... भसा भसा जा points ला आणि काढा फोटो असे नको.
एकदा दाट जंगलातून येताना वाडी वस्तीवरील आजी आजोबा bus ची वाट पहात होते, त्यांना आणून चिखलदऱ्याला सोडले, उतरताना त्यांनी थरथरत्या हाताने दहाची जुनी नोट देऊ केली... डोळ्यात टचकन पाणी आले .
- सतिश अनसिंगकर
श्री चक्रधर स्वामी मंदिर, बार्शीटाकळी, अकोला
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.