Thursday, February 8, 2024

कोळिसरे मार्ग भ्रमण

 https://shriyogweb.wordpress.com/2022/01/27/kolisare-bhraman-1/

वेध लागणे म्हणजे काय असतं? सगळ्यांना जसा एखाद्या गोष्टीचा ध्यास लागतो तसाच प्रकार असतो वेध लागणे…कुणाला कशाचे कुणाला कशाचे वेध लागू शकतात…पण मला मात्र निसर्गाच्या कुशीत जाण्याचे वेध लागतात.खरंतर मी राहतेच “in the lap of the nature” पण तरीही अजून खोल ,आतवर ,जिथे फक्त हिरवा रंग भरून राहतो अशा कोळीसरे गावाचे वेध लागतात मला… इतका सुंदर निसर्ग आहे तिथे. माझं आणि त्या गावाचं नातं उणेपुरे १९वर्षांचं. पण हे इतकं घट्ट नातं आहे की तिथून पाय काही निघत नाही माझा. ते हिरवे डोंगर, तो खळाळणारा धबधबा, शांत शास्त्री नदी, पक्ष्यांचा मनसोक्त चिवचिवाट, दुपारची धीरगंभीर शांतता, रात्रीची वेढलेली गूढता हे सगळं मला बोलवत राहतं पुन्हा पुन्हा…आणि हो,तिथली माणसे. त्यांच्याशिवाय का आपलेपणा निर्माण होतो!

नुसते कोळीसरे गावच नाही तर तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच सुंदर आहे बरं! अलिबाग वरून निघावे ते ह्या आनंदाची शाल पांघरूनच! असा सुंदर कार्लेखिंडीचा घाट ओलांडून निघाले की खारेपाटात जावे,तिथली मोकळी हवा खावी आणि खेड्यातले मस्त जीवनदर्शन घेत, शेतात लावलेली भाजी, शेतात काम करणाऱ्या स्त्रिया, अजूनही पारावर बसून गप्पा मारणारे गावकरी हे सगळे पहात नागोठणे पार करावे नि NH 66 ला लागावे. महाडपर्यंतचा रस्ता छान बनून तयार आहे. अंबा नदी ओलांडली की मग सुरू होतो निसर्गाशी संवाद. तोपर्यंत घर ठीक बंद केले का,lights बंद आहे का असे अनेक प्रश्न डोक्यातून पुरते निघून जातात आणि मी एका वेगळ्या धुंदीने वेढली जाते.

सह्याद्री पोखरत हा रस्ता बनवला आहे, आजूबाजूला लाल मातीच्या डोंगरांनी ह्याला देखणेपण दिले आहे, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड असे निघायचे …सरळ सरळ रस्ता, गाडीने वेग घेतलेला आणि मनाने मी हिरवाई पांघरलेली की अहो गाडी थांबवतात…नदी किनारी काहीतरी पोटात टाकायला महाडला. मग मागे नदी ,समोर रस्ता, त्याबाजुला डोंगर आणि मी अधांतरी…असे वाटते की इथेच वेळ थांबून रहावा.थोडा आराम करून निघावे आणि मग महाड मधून आतल्या रस्त्याला लागावे. ज्यांना वेळ आणि धीर दोन्ही असेल त्यांनीच बरं का! ज्यांना वेगाची नशा आहे त्यांनी आपला हायवे पकडावा. पण आम्ही हा रस्ता घेतो कारण मला कोकण नुसते नको तर तेथील जीवनदर्शन करायचे असते.

सावित्री ओलांडायची आणि मग ज्या रस्त्याने निघायचे तिथून तुम्हाला सगळे वेगळे विश्व लागते. छानशी कौलारू घरे, शेणाने सारवलेली अंगणे, तुळशी वृंदावन , अंगणात बहरलेले झेंडू ,गुलाब,एखादी गाय असे मस्त शांत वातावरण दिसते. तर कधी एखाद्या अंगणात आजी,आजोबा , आणि नातवंडे बसलेली दिसतात…आयुष्य एकप्रकारे थांबून रहात असावे इथे. वेळ किती सावकाश जात असावा. त्या चेहाऱ्यांवरची निरागसता, समाधान कुठल्या पैशांनी विकत घेता येईल?डावीकडे डोंगर आणि उजवीकडे दरी अशा रस्त्यांवरून प्रत्येक वळणावर नवीन काही दिसून येते…आणि हे सगळं माझ्या आत झिरपत राहतं…इथे अहो पण गाडीतले संगीत बंद करतात…मी जणू त्या निसर्गाचाच भाग बनून रहाते…
मला माणसे वाचायला आवडतात…अशा वेगळ्या रस्त्यांवर अशी अनेक ठाणे असतात जिथे फक्त आपुलकी ,जिव्हाळा मिळतो एक कप चहाच्या बदल्यात. ह्यावेळेस अशाच एका ठिकाणी थांबलो. गाडी थांबली नी माझी नजर लालभडक गुंजांवर पडली…एका डोंगरातील काठावर ही वेल होती आणि शेंगा फुटून गुंजा धरून होती.

पहिले चहा घ्यायचा म्हणून थांबलो. एक वारकरी आजोबा ते दुकान चालवत होते. लहानसे दुकान, समोर अंगण,त्यावर रांगोळी, समोर कट्टा आणि त्यावर एक काकी बसलेल्या. एक खुर्ची मस्त निसर्ग भोवती. काका म्हणाले की चहा तर नाही आहे…washrooms कुठे आहे…त्यांच्याकडे ती ही सोय नव्हती. पण त्यांनी त्यांचे घरचे washroom वापरायला दिले. हे दुकान दोन मजली बांधून रस्त्याच्या पातळीवर आणले होते…घर इतके खोल होते…मी उतरून गेले…घराच्या बाजूला चवळीचे शेत लावलेले, केळी, पपई,तुर असा सगळा पसारा…त्यात कौलारू घर.आता इथून पाय निघणे मुश्किल माझा. काकांना बोलले की तुम्ही रूम्स काढा इथे. मी राहायला येईन …ते मनसोक्त हसले. माझा आणि अनिकेत चा भयानक संवाद सुरूच होता की तिथे बसलेल्या काकी विचारता झाल्यात, “एकटाच आहे का?” मी होकारार्थी मान हलवली आणि त्यांनी मला त्यांचे तत्त्वज्ञान सांगणे सुरू केले. आता इतक्या प्रांजळ पणे त्या बोलत होत्या की माझ्या सारख्या व्यक्तीला खूप खूप आवडलं. खरं तर अशा लोकांशी बोलायला खूप आवडतं मला. त्यांना ना स्वार्थ असतो ना मतलब…रस्त्यांवरून जाणाऱ्या कोणा कुटुंबाशी त्या इतक्या सहज गप्पा मारत होत्या की जणू मी त्यांची लेकच. त्यांच्या मुलीच्या,नातवाच्या सगळ्या गप्पा झाल्यात. ऑनलाईन शिक्षणाने मुलांचे किती नुकसान झाले आहे हे ही सांगितले. नवीन शिक्षण पद्धती मध्ये पाढे पण येत नाहीत मुलांना हेही सांगितले. मग म्हणाल्या की त्यांना ३०पर्यंत पाढे येतात आणि त्यांनी बोलून ही दाखवले. “माझ्याकडे बघून लोकं मला अंगठा लावायला सांगतात पण मी सही करते” , असं म्हणाल्या आणि माझाच ऊर भरून आला. त्या माऊलीचा पण शिक्षणा प्रती असलेला दृष्टिकोन नक्की बलशाली भारत घडवण्यास हातभार लावतो हे तितकेच खरे! मग गुंजा गोळा केल्यात आणि निघालो.

नातूनगरला हा रस्ता बाहेर पडतो तेव्हा आपण परत हायवेला लागतो ते पोलादपूर आणि कशेडी घाट ओलांडूनच…पुन्हा खेड ,चिपळूण, सावर्डे असे करत संगमेश्वर ला लागलोच की एक रस्ता आपल्याला आतून थेट गणपतीपुळे कडे घेऊन जातो…वेळ आणि अंतर दोन्ही वाचत…आणि निसर्ग हा असा आपल्या पुढ्यात येऊन ठाकतो. छोटी छोटी घरे , खाली नदी ,वर डोंगर, काजूच्या बागा असं सगळं भारावलेले वातावरण. अख्खा रस्ता आपल्याला आंदण…मध्येच डोक्यावरून रेल्वे पुलावरून कोकण रेल्वे जाते आहे त्याचा तेव्हढा तो आवाज ,कधी हे दृश्य पुढ्यात येतं…दोन डोंगराच्या मध्ये पुल आणि त्यावरून चाललेली रेल्वे….काय रोमँटिक वे आहे हा रस्ता बनविण्याचा. प्रवासात आलेला शिण तसाच निघून जातो… फुनगुस गाव उजवीकडे टाकून आपण पुल ओलांडतो नी काजूच्या मोहोराच्या घमघमाटाने जीव हरखून जातो. खोल खोल श्वास घ्यावेत तरी मन भरत नाही इतकं मदहोश होत राहतं मन…हा एक अप्रतिम अनुभव आहे.

रस्ता आपल्याला सरळ जाकादेवीला नेतो आणि एक वेगळाच भूप्रदेश आपल्या स्वागताला हजर असतो. तो म्हणजे कातळाचे सडे. जैविविधतेने नटलेले हे सडे आता आता पर्यंत मोकळेच होते. पण आता त्यावर घर बांधकाम चालू आहेत. कुठे बागा केल्या आहेत …काजू आणि आंबा मोहोरावर आलेले असल्याने आसमंत सुंगंधाने व्यापलेला आहे…आपली एकाच गाडी त्या सुंदरशा भूप्रदेशात फिरते आहे. कोकणी माणसे आता घराकडे परतू लागली आहेत. आम्ही ही दमलो आणि चाफे फाट्याला थांबलो. विसावा हॉटेलमध्ये चहा घेतला…बाबा थोडे पाय मोकळे करून आलेत.मेडिकल मध्ये जुजबी गोळ्या घेतल्या आणि जयगड रस्त्याला वळलो. चाफे फाट्यावर दोन फाटे आहेत. एक रस्ता गणपती पुळ्याला जातो तर दुसरा जयगडला. जयगड रोड ने गेले की कमान लागते आणि एक रस्ता लागतो . तोच कोळीसरे रस्ता. कमानीवर लिहिले आहे

“लक्ष्मीकेशव कृपा ज्यावरी शतधारांनी झरे
असे देखणे गाव नांदते येथे कोळीसरे”

असेच त्या डोंगरावरून खाली उतरायचे की गाडी एक sharp वळण घेते आणि आपण मंदिरापाशी जाऊन थांबतो…गाडीतून खाली उतरताच त्या निसर्गाने मला आलिंगन दिलेले असते. मी स्तब्ध उभी राहून ते सगळं दृश्य मनात साठवून घेते…मगच माणसे दिसतात मला.

©अनुराधा

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...