मी
इतिहासतज्ज्ञ नाही. इतिहास हा माझ्या अभ्यासाचा विषय ही नाही. परंतु
इतिहासाची प्रचंड आवड आणि बरीचशी उत्सुकता यातून जे वाचन घडते त्यातील काही
माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या लेखात काही त्रूटी
आढळल्यास नजरेस आणून देणे. हा लेख कुठल्याही एका मेसोअमेरीकन समाजाची
विस्तृत माहिती नसून मेसोअमेरिकन जगाची छोटिशी तोंडओळख आहे.
स्पॅनिश सेनानायक आर्नान कोर्तेसने मेक्सिकोत आस्तेकांचा पराभव केल्यानंतर सोनं, दुर्मिळ खजिने, पिसांचे सुंदर भरतकाम केलेल्या वस्तू युरोपात पाठवायला सुरवात केली. स्वप्नातही न पाहिलेल्या अशा अमूल्य वस्तू, हिरे, खजिने पाहून युरोपात आश्चर्याची लाट पसरली. कोर्तेसच्या या भेटींनी युरोप खंडाला नव्या मेसोअमेरिकन जगाची ओळख करून दिली. तर मग नक्की कोण होते हे ‘मेसोअमेरिकन’?
‘मेसोअमेरिका’ – तज्ज्ञांनी “मेसोअमेरिका” हे नाव दोन गोष्टींना दिले आहे.
१) ऐतिहासिक दृष्टीकोनातून – मेसोअमेरिका अंतर्गत सुमारे २२००० हजार वर्षांचा कालखंड विचारात घेतला जातो. ख्रिस्तपूर्व २१००० वर्षांपूर्वी जेव्हा पहिला मनुष्य या भागात स्थलांतरित झाला ते आस्तेकांच्या पाडावापर्यंत म्हणजेच इसवी सन १५२१ पर्यंतचा कालखंड.
२) भौगोलिक दृष्टीकोनातून - अमेरिका खंडातील प्रदेश जेथे प्री-कोलंबियन समाज उदयास आला. भौगोलिकरित्या साधारणपणे यात मेक्सिको, बेलीसे, ग्वाटेमाला, साल्वादोर, होन्डुरास, निकारागुआ व कोलोम्बिया हे देश येतात. मेक्सिको हा मेसोअमेरिकेतील एक महत्त्वाचा प्रदेश मानला जातो.

या लेखात मेसोअमेरिका समाजातील रुढी, धार्मिक समजुती, संस्कृती, समाजजीवन याची आपण ओळख करून घेणार आहोत. परंतु त्या आधी जाणून घेऊया मेसोअमेरिकन जमाती नक्की होत्या तरी किती आणि इतक्या वर्षांनंतरही आजच्या जगाला त्यांची माहिती कशी ठाऊक झाली .
प्रमुख मेसोअमेरिकन जमाती खालील प्रमाणे :
१) ओल्मेक (१५००-१२०० ख्रिस्तपूर्व) – साधारणपणे आपल्याकडे ऋग्वेद, उपनिषदे लिहिल्याचा काळ.
२) त्सापोतेक (साधारपणे ख्रिस्तपूर्व ५००) – साधारपणे आपल्याकडे गौतम बुद्धाचा काळ
३) माया (४०० ख्रिस्तपूर्व – २०० इसवी सन ) – पाणिनीने संस्कृत व्याकरण लिहिल्याचा, चंद्रगुप्त मौर्य, राजा अशोकाचा, अजिंठा लेण्यांचा काळ
४) तोल्तेक (साधारणपणे इसवी सन ९००)
५) चीचीमेक (साधारपणे इसवीसन ११५०)
६) तोतोनाक
७) आस्तेक (इसवी सन १२००-१५२१) – साधारपणे आपल्याकडे ज्ञानेश्वर, गुरु नानकसिंग, पानिपतची पहिली लढाई , बाबरचा काळ
(वरील सनावळी/कालखंडात चूक आढल्यास कृपया चू.भू.दे.घे.)
या सर्व जमातीमध्ये माया आणि आस्तेक खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांच कामही तितकच अतुलनीय आहे.
आस्तेकांचा पाडाव केल्यानंतर स्पॅनिश धर्माप्रचारक मेसोअमेरिकन भागात आले.
सत्ता हातात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम धर्मप्रचार हाती घेतला. स्पॅनिश
सेनानी आर्नान कोर्तेसचा पूर्ण पाठींबा या धर्मप्रचारास होता. त्याची ठाम
समजूत होती की आस्तेकांच्या नृशंस रुढींचा बिमोड करून ख्रिश्चन धर्म
प्रस्थापित करण्यासाठी आपली देवाने योजना केली आहे. स्पॅनिश
धर्माप्रचाराकांनी मेसोअमेरिकन लोकांचा मूळ धर्म धाब्यावर बसवला. मंदिरे
मोडून त्याठिकाणी चर्च उभी केली. लोकांना ख्रिश्चनन धर्माची सामुदायिक
दीक्षा घ्यायला लावली. ज्यांनी विरोध केला त्यांची कत्तल केली. त्यांच्या
नरबळी सारख्या प्रथा हिंस्त्र मानून साम-दाम-दंड-भेद हरतऱ्हेचा वापर करून
त्यांच्या ग्रंथांची, हस्तलिखितांची धूळधाण उडवली.
या सर्व प्रकारात बिशप दिएगोची प्रतिक्रिया फारच महत्त्वाची वाटते. तो आपल्या “Report of things in Yukatan” या पुस्तकात लिहितो “These people used certain letters with which they wrote in their books about ancient subjects. We found any books written with these letters and since they held nothing that was falsehood and the work of the evil one, we burned them all.“ अशा रीतीने इतिहासातला मौलिक ठेवा लोप पावला.
या सर्व धामधुमीतून काही माया हस्तलिखिते बचावली. त्यापैकी ४ ती ज्या शहरात ठेवली आहेत त्या शहरांच्या नावावरून ओळखली जातात. ती अनुक्रमे ड्रेस्डेन(जर्मनी), माद्रिद(स्पेन), पॅरिस(फ्रांस) व ग्रोलीएर (दक्षिण अमेरिका) अशी आहेत. या हस्तालिखीतांमधून त्या वेळच्या माया संस्कृतीची बरीचशी माहिती उपलब्ध होते. या हस्तलिखितात माया देव-देवतांची चित्रे, सूर्य-चंद्र ग्रहण, शुक्राची गती, त्यावेळच्या रुढी, भविष्यात घडणार्या घटना इत्यादी माहिती सविस्तर दिली आहे.
अजून एक माया ग्रंथ या धुमश्चक्रीत वाचला तो म्हणजे “The Popol Vuh” (Book of Advice). दक्षिण अमेरिकेत ग्वाटेमाला जवळ वास्तव करणारे माया लोक म्हणजेच किंचे (Quinche ) या लोकांचा हा पवित्र ग्रंथ होता.या ग्रंथांचे थोर नशीब आणि किंचे लोकांचा दृढनिश्चय या दोन गोष्टी या ग्रंथाच्या बचावासाठी उपयुक्त ठरल्या. मूळ चित्रलिपीमध्ये असणारा हा माया ग्रंथ किंचे लोकांनी गुप्त रीतीने साधारण इसवी सन १५०० च्या सुमारास रोमन वर्णलिपिमध्ये भाषांतरित केला. इसवी सन १७०३ मध्ये हा भाषांतरीत ग्रंथ फ्रेच भिक्षु फ्रान्सिस्को सिमेनेस (Fransisco Ximenez) याच्या हाती लागला . फ्रान्सिस्कोला किंचे लिपी अवगत असल्याने त्याने तो स्पॅनिशमध्ये भाषांतरित केला.
वर नमूद केलेल्या सव मेसोअमेरिकन जमातींमध्ये बऱ्याच समानता आढळतात. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे कालमापन पद्धती. मेसोअमेरिकन २ दिनदर्शिका वापरत. पहिली सूर्याच्या भ्रमणावर आधारित(haab). त्यात ३६५ दिवस असत. आणि हे ३६५ दिवस वेगवेगळ्या ऋतूंशी जोडलेले असत. दुसरी धार्मिक दिनदर्शिका हि माणसाच्या गर्भधारणेच्या कालावधीवर आधारित असे(tzolkin). त्यात २६० दिवस असत. दोन्ही दिनदर्शिकेत समान दिवस येण्यासाठी साधारणपणे २६०-दिवसांच्या दिनदर्शिकेतील १८९८० दिवस किंवा ५२ वर्षे – ३६५ दिवसांच्या दिनदर्शिकेतील लागत. या परीमाणास असे संबोधले “Bundle of Years” जाते.प्रत्येक ५२ वर्षाचा शेवट हा जगाचा अंत:काल असून दिवशी जग संपणार आहे असा समज होता. खालील ३६५ दिवसांच्या दिनदर्शिकेत ५२ चिन्हे ५२ वर्षे दाखवत आहेत.
नरबळीची प्रथा :
सर्व मेसोअमेरिकन समाजात दिसणारा हा एक अजून समान धागा. मागे वळून पाहता
ओल्मेक साधारणपणे ख्रिस्तपूर्व १२०० काळात देवाला रक्त अर्पण करण्यात
प्रसिद्ध होते. माया, आस्तेक युद्ध कैद्यांबरोबर स्व:ताचेही रक्त देवाला
अर्पण करीत. स्त्रिया व पुरुष स्व:ताला कान, नाक, पायाला जखमा करून घेत.
पुरुष बरेचदा गुप्तांगसही जखमा करीत. नरबळी दिल्यानंतर मृतदेह पिरॅमिडवरून
खाली ढकलत. जेणे करून वाहते रक्त जमिनीला मिळून जमिन शक्तिमान होते असा
आस्तेकांचा समज होता.
बॉल गेम :
जवळ जवळ सर्व मेसोअमेरिकन समाजात बॉल गेम खेळला जाई. खेळाचे मैदान “आय”
आकाराचे असे. विस्तीर्ण अशा या खेळाच्या मैदानात दोन्ही बाजूंनी उतरत्या
भिंती असत. त्यापुढे पायर्यांवर प्रेक्षकांना बसायला जागा असे. काही
मैदानात बॉल रिंग असे. चेंडू जमिनीवर पडू न देता हाताने, पायाने,
मांड्यांनी , गुड्घ्यांनी न पडता या रिंगमध्ये टाकावा लागे. या खेळाचा
विचित्र नियम म्हणजे विजेत्याला देवापुढे बळी जावे लागे. आस्तेकांच्या मते
हा खेळ म्हणजे छाया आणि प्रकाशाचा म्हणजेच केत्झलकोएत्ल (Quetzalcoatl) व
तेझ्कात्लीपोका (Tezcatlipoca) या दोन भावांमधला संघर्ष. याच बरोबर
प्रसिद्ध दोन जुळ्या भावांची प्रसिद्ध कथाही याच बॉल गेमशी संबधित आहे. ती
पुन्हा कधीतरी.
शेती :
जवळ जवळ १४००० वर्षे मेसोअमेरिकन समाज भटक्या अवस्थेत वावरत होता. या
भागात हवामानही आजच्या तुलनेत थंड होते. मुबलक पाणी, फळफळावळ, हिरवीगार
राने असा हा समृद्ध प्रदेश होता.साधारणपणे ख्रिस्तपूर्व ७०००-५०० या काळात
मेसोअमेरिकन समाजाने शेतीचे तंत्र विकसित केले. रानात उगवणार्या वनस्पती,
रानटी पशु यांना मनुष्य उपयोगी बनवण्यास त्यांनी सुरवात केली. त्यातच मका
या महत्त्वाच्या पिकाचा शोध लागला आणि ते जवळ जवळ सर्व मेसोअमेरिकन
जमातींचे प्रमुख खाद्य बनले. त्याना मका, मिरची, कापूस, स्कॉश ही पिके
माहित होती. युरोपात झालेली शेतीची ओळख आणि मेसोमेरीकानांची तिच्याशी
पडलेली गाठ हा साधारण एकच कालावधी परंतु तिचा मेसोअमेरिकन जगातील प्रगतीचा
वेग फारच कमी होता आणि त्याची कारणेही फार मजेशीर आहेत. ती अशी :
युरोपात शेतीच्या कामासाठी सर्वसाधारणपणे बैल, घोडा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘चाक’ वापरले जाई. परंतु मेसोअमेरीकनांना कुठल्याही प्राण्याचा वापर शेतीसाठी माहित नव्हता. घोडा हे जनावर त्यांनी कधी पहिले सुद्धा नव्हते. स्पॅनिशसेनानी कोर्तेसने जेव्हा पहिले पाऊल मेक्सिको मध्ये ठेवले तेव्हा मेसोअमेरीकानांनी घोडा हा प्राणी सर्वप्रथम पहिला. धर्मभोळ्या आस्तेकांना तो अमानुष पशु वाटून त्यांनी पळ काढला.
चाकाची ओळख जरी मेसोअमेरीकनांना असली तरी त्यांनी कधी त्याचा वापर दैनंदिन जीवनात केला नाही. चाक हे चंद्र-सूर्यासारखे गोल. ते त्याला देवाचे वाहन मानीत आणि म्हणून माणसाला वापरायला निषिद्ध. त्यामुळे शेती असो व बांधकाम ते चाकू, दगडी कुऱ्हाड, धारदार पाती (ज्वालामुखीच्या दगडापासून बनलेली) अशी हत्यारे वापरत.

लिपी :
मेसोअमेरीकन संस्कृतीचा विशेष असा भाग म्हणजे त्यांनी विकसित केलेली लिपी.
बर्याचशा कठीण अशा या चित्रलिपीला "hieroglyphic" किंवा लघु रूपात
"glyph" असे म्हणतात या लिपीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खर्या
जगातल्या गोष्टी जसे मनुष्य, प्राणी , नैसार्गिक गोष्टी बर्या च प्रमाणात
सारख्या चितारण्याचा प्रयत्न. बर्याचदा मनुष्य आणि प्राणी संपूर्ण न
चितारता डोक्यापार्यांचा भाग काढला जाई. काही भौमितिक रचना जसे वर्तुळ,
चौरस ही वापरत.

माया लोकांनी स्व:ताची अंकतालिका होती. ती काहीशी अशी. बिंदू आणि रेषा यांच्या माध्यमातून अंक दर्शवले जात. काही हस्तलिखितांमध्ये आस्तेकांनी फक्त बिंदूंचा वापर अंक म्हणून केलेला आढळतो तर काही शिलालेखांमध्ये बिंदू आणि रेषा दोनही आढळतात.

तर अशी ही प्राचीन जगातील थोडी गूढ, काहीशी रहस्यमय आणि बरीचशी आश्चर्यचकीत करणारी, खिळवून ठेवणारी मानवी संस्कृती. तिचा लेखाजोखा मांडण्याचा माझा हा छोटा प्रयत्न.
संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व – मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Wikipedia : http://en.wikipedia.org/wiki/Mesoamerica
३) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
४) POPOL VUH :http://www.holybooks.com/wp-content/uploads/POPOL-VUH-THE-MAYAN-BOOK-OF-...
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.
ओल्मेक
तज्ज्ञांच्या मते, मेसोअमेरिकन भागातली पहिली वसाहत, ही बहुदा सैबेरीयातून स्थलांतरित झालेले भटके लोक. त्यांच्या स्थलांतराचा निश्चित कालावधी जरी माहीत नसला तरी Tlapacoya (North-East Mexico city) येथे सापडलेल्या काही हाडांच्या रेडीयोकार्बन डेटिंगने सिद्ध झालंआहे की, आस्तेकांची वसाहत ज्या भागात होती त्या भागाच्या आसपास सुमारे ख्रिस्तपूर्व २१००० वर्षे वस्ती असावी. याच मनुष्यवसाहतीमधील काही प्रगत पिढ्यांना ‘ओल्मेक’ असं नाव देण्यात आले. इतिहासाने ज्या संस्कृतीला ‘मेसोअमेरिकन संस्कृतीची जननी’ असं नाव बहाल केलं आणि जी पुढील बर्याच मेसोअमेरिकन पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरली त्या संस्कृतीचा आढावा या लेखात आपण घेऊ.
ओल्मेकांचा शोध लागेपर्यंत मायन संस्कृती प्राचीन मानली जायची. परंतु अलिकडे झालेल्या संशोधनात ओल्मेकांचं स्थान खूप आधीच असल्याच सिद्ध झालं आहे. ओल्मेकांचा निश्चित कालखंड इतिहासाला माहित नाही. त्यांच्या काही कलाकृती सोडल्या तर त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. इतकाच काय त्यांना दिलेलं “ओल्मेक” हे नावही आस्तेकांच्या ‘नौवात्ल’१ भाषेने त्यांना बहाल केलं. ओल्मेक म्हणजे ‘रबर पीपल’ त्यांना हे नाव मिळण्याचं कारणही एवढंच की त्यांचे अवशेष रबर पिकणार्या प्रांतात मिळाले.
ओल्मेकांचा कालखंड ख्रि.पू. १५०० – ४०० असा मानला जातो. गंमत म्हणून एक दृष्टिक्षेप टाकू नेमकं या काळात बाकी जगात काय चालू होतं. याचं सुमारास इजिप्शियनस पिरॅमिड बांधण्यात गर्क होते. भारतात आर्य संस्कृती फुलत होती, शून्याचा शोध लागला होता, ऋग्वेद जन्म घेत होता. तिकडे पूर्वेत चायनीज पतंग उडवत होते आणि रेशमाचा शोध तर त्यांनी फार पूर्वी लावला होता. युरोपात ग्रीसमध्ये होमारने ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ लिहायला सुरवात केली होती. इतर संस्कृतींच्या मानाने ओल्मेक जरी मागासलेले असले तरी त्यांनी एका संस्कृतीचा पाया रुजवला. एक प्रवाद असा ही आहे की ओल्मेक आफ्रिकेतून स्थलांतरीत झाले. कारण त्यांनी कोरलेल्या शिल्पकृतींमधिल चेहरे अफ्रिकनांशी मिळते जुळते आहेत. परंतु त्यात फारसं तथ्य नसावं. कारण ओल्मेकांमधे “शमन” (मांत्रिक) प्रथा होती. हे शमन आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत. साधारणे अशाच कहिश्या प्रथा अर्टिक्ट व सैबेरियात दिसुन आल्या आहेत.
मेक्सिकोच्या पूर्वेस असलेल्या Tuhtala डोंगरांच्या आसपास ओल्मेकांची वस्ती असल्याचं मानलं जातं. याच भागाला संशोधकांनी ‘ओल्मेक हार्टलँड’ संबोधले आहे. यात सान लोरेन्सो आणि ला वेंता अशी दोन मुख्य पुरातत्त्व ठिकाणे अंतर्भूत आहेत.
सान लोरेन्सो हे नाव, सान लोरेन्सो, तेनोच्तीत्लान२ आणि पोत्रेरो नुएवो या तीन पुरातत्त्व ठिकाणांना एकत्रितरित्या दिलं गेलं आहे. ही तिन्ही ठिकाण मेक्सिकोच्या आग्नेय दिशेस वेराक्रुझ३ येथे आहेत. साधारण ख्रि. पू. १२००-९०० या काळात सान लोरेन्सो मोठे शहर असावं. तसंच ते शेतीसाठी उपयुक्त अशा भागाच्या आसपास होतं. साधारणपणे सातशे हेक्टर परीसरात बांधलेल्या या शहरात दगडी पाईप बांधून केलेली सांडपाणी वाहून नेण्याची सोय होती. वातावरणातील बदल तसेच नद्यांनी आपल्या मार्गात केलेला बदल यामुळे ख्रि. पू. ९५० सुमारास सुरु झालेल्या सान लोरेन्सोचा र्हास सुरु झाला असं मानलं जातं.

सान लोरेन्सोच्या र्हासानंतर ला वेंता हे ओल्मेकांचे मुख्य केंद्र बनले. ओल्मेकांचे दिडशेहून अधिक अवशेष व्हीय्ये एरमोसा४ मधील वेंता पार्क मध्ये पाहायला मिळतात. नमुन्यादाखल ही काही चित्रे. हे पाहिलं चित्र आहे ग्रान आल्तारचं.
अभ्यासकांचा अंदाजानुसार बेसॉल्ट खडकातील ‘आल्तार’ म्हणजे मोठी शिळा. या शिळांचा वापर ओल्मेक राज्यकर्ते धार्मिक कार्यक्रम व महत्त्वाच्या रितिरिवाजांसमयी बसण्यासाठी वापरत. वरच्या चित्रात, शिळेत वरच्या बाजूला कोरलेली पट्टी आहे तर मधल्या भागात बसलेला रक्षक हातातील दोरखंडाने दोन्ही बाजूच्या कैद्यांना पकडून ठेवत आहे.
ला वेंता मधली अजून एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे जायंट हेड्स. खाली दिलेल्या चित्रामधे जवळ जवळ १२ फुट उंच असं हे आफ्रिकन माणसाचं मस्तक. चित्रात दिसत असल्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर शिरस्त्राण आहे. अतिशय प्राथमिक अवजारांचा वापर करून इतकी भव्य आणि तितकीच प्रमाणबद्ध कलाकृती पाहताना त्याच्या निर्मात्याला मनापासून दाद दिल्या खेरीज राहवत नाही. अशी सुमारे १२ मस्तके या ठिकाणी सापडली आहेत.

पुढे इसवी सन पूर्व ५०० वर्षे ओल्मेकांनी मेक्सिको मधील मोंते आल्बान इथे डोंगर माथ्यावर शहर वसवलं. डोंगर माथ्यावर शहर वसवण्याचं कारण या परीसराचा भूगोल. तीन दर्यांमधे असलेला हा सुपीक प्रदेश सर्वत्र नजर ठेवायला अतिशय उपयुक्त होता. ओल्मेकांनी याच कारणास्तव आपली राजाधनी याठिकाणी बनवली असावी. त्या काळी देखील इथे दहा हजाराची वस्ती असल्याचा कयास आहे. ओल्मेकांचा हा निर्णय किती अचूक होता ते त्यांच्या नंतर आलेल्या झापोतेकानी मोंते आल्बानला आपली राजधानी बनवून सिद्ध केलं.
ओल्मेकांचा प्रभाव हा पुढच्या पिढ्यांवर दिसून येतो. ओल्मेकांच्या बर्याचं परंपरा, रिती, देवदेवता इतकचं काय तर अंक, लिपी पुढच्या सर्व मेसोअमेरिकन संस्कृतींनी आपलेसे केले. आस्तेकांच्या देवदेवता असोत किंवा मायन दुहेरी चक्र पद्धतीची कालगणना असो बर्याचं ठिकाणी ओल्मेकांचा प्रभाव आपल्याला वेळोवेळी जाणवतो. जग हे चार दिशांमध्ये विभागले गेले आहे ही कल्पना मेसोअमेरीकन जगात ओल्मेकांनीच प्रथम मांडली. ओल्मेकांनी छपाई तंत्र विकसित केल्याचे पुरावे सापडले आहेत. दगडी दंडगोल छाप्यावर शाईसारखा द्रव टा़कून अंगावर, कपड्यावर फिरवित असत. तज्ज्ञांच्या मते माया लोकांच्या लिपीचे मूळ हे ओल्मेकांच्या सांकेतिक चिन्हात आहे. ओल्मेकांच्या कलाकृतींमध्ये अभ्यासकांना १८० हून अधिक संकेतिक चिन्हे आढळली आहेत.
मेसोअमेरिकन काळात अनेक देवदेवता एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित झाल्याचे दिसून येते. आस्तेक आणि माया लोकांचे बरेच देव ओल्मेकांकडून आले. ओल्मेक प्राथमिक स्वरूपात या देवांची पूजा करत असत. जसं Tlaloc (पर्जन्यदेव) , Tezcatlipoca (रात्रीचा देव), Quetzalcoatl (पहाटेचा देव), Huehueteotl (अग्निदेव).


बॉल गेम शोधून काढण्याचं सर्व श्रेय मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये ओल्मेकांना जात. “पासो दे ला आमादा” (Paso de la Amada) येथील बॉल कोर्ट हे मेसोअमेरीकेतील सर्वात जुनं बॉल कोर्ट मानले जातं. ‘एल मानाती’ (El Manati) जवळ एक डझनाहून अधिक रबरी बॉल सापडले आहेत. परंतु ते नक्की ओल्मेकांनी वापरले असतील की नाही यावर अजून ही दुमत आहे. बॉल गेमसाठी लागणारे बॉल ओल्मेक रबराच्या झाडाचा चीक आणि मॉर्निंगग्लोरी फुलाची वाईन यांच्या मिश्रणापासून बनवत. रबरामुळे चेंडू उसळ्ण्यास मदत होई.
ओल्मेक घरं साधारणपणे विस्तृत मैदानात विखुरलेली असत. घराजवळच्या बागेत औषधी वनस्पती व घरगुती वापरासाठी छोटी पिकं, जसं की सुर्यफुल इत्यादी घेत असत. कोको, आवाकाडो सारखी फळं त्यांना माहित होती. फळं व भाज्या या बरोबरीने मासे, कासव, साप, ससा इ. भक्षण केले जाई. शेतं मुख्यत्वे गावाबाहेर असत आणि त्यात मका, स्कॉश, बटाटे, कापूस या सारखी पिकं घेतली जात.
ओल्मेकांच्या र्हासची दोन कारणे दिली जातात. वातावरणात अचानक झालेला मोठा बदल जो मोठ्या लोकसंख्येला मानवाला नाही. ओल्मेक सर्वतोपरी मुख्यत्वे शेतीवर गुजराण करीत. नद्यांच्या पत्रात झालेला बदल शेतीसाठी अयोग्य ठरला. दुसरा प्रवाद असा आहे की वारंवार या प्रदेशात होणारे ज्वामुखीमुळे ओल्मेकांनी दुसर्याजागी स्थलांतर केले असावे.
ओल्मेकांच्या र्हासाची कारणं काहीही असली तरी त्यांनी मेसोअमेरिकन जगाला दिलेली देणगी अमूल्य आहे. मेसाअमेरीकन संस्कृतीचा पायाभरणी त्यांनी केली असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आजच्या जगाला फारशी माहीत नसलेली ही संस्कृती जगाच्या पाठीवर नांदली, बहरली आणि पुढच्या अनेक पिढ्यांना मार्ग दाखून नाहीशी झाली. ओल्मेकांच्या अनेक शिल्पकृतींमध्ये कोरलेले चेहरे बसक्या नाकाचे (चीनी, मंगोलियनसशी मिळतेजुळते), जाड ओठांचे (आफ्रिकन) तर काही युरोपियनांसारखे टोकदार दाढीचे आढळून येतात. अमेरिका खंडाला कोलंबसचे पाय पहिल्यांदा लागले तर मग जगाशी संपर्कं नसलेल्या या ओल्मेकांनी कोरलेले हे चेहरे नक्की कोणाचे? या आणि अशा अनेक प्रश्नांना अनुत्तरीत ठेऊन एक संस्कृती जगाच्या पाठीवरून लुप्त झाली. सर्व मेसोअमेरिकन संस्कृती मध्ये “ओल्मेक” हे माझे सर्वात लाडके. त्यांच्याबद्दल कितीही वाचालं, ऐकलं तरी उत्सुकता न संपणारी. तुर्तास काही माझ्या आवडत्या ओल्मेक कलाकृतींचे फोटो इथे डकवून ओल्मेकांना निरोप देत आहे.




पुढील भागः मेसोअमेरिका [भाग ३] : झापोतेक
काही अवांतर नोंदी:
१. प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे.
२. नौवात्ल : ही आस्तेकांची भाषा. तिच्यात “त्ल” हे अक्षर फार येत. नौवात्लबद्दल समजून घेण्याआधी थोड आस्तेकांबद्दल जाणून घेऊया. स्पॅनिशांनी आस्तेकांचा पडाव केल्यावर त्यांच्या खुणा पुसायचा चंग बांधला. त्यात धर्म, शहर, कलाकृती सगळचं भरडल गेलं. आस्तेकांचा धर्म नृशंस, वाईट ठरवला गेला आणि लोकांच्या मनावर वाईट त्याच गोष्टी बिंबवल्या गेल्या. स्पॅनिशांच्या हकालपट्टीनंतर लोकांना हळूहळू आपल्या संस्कृतीची , भाषेची ओळख पटली. पण तोपर्यंत बर्याच कलाकृती, ऐतिहासिक ठेव्याची वाट लागली होती. नौवात्ल भाषेत आज माहित असलेले उच्चार तसे असल्याचं मानलं जातं परंतु ते नक्की कसे होते हे नीटस सांगता नाही येणार. उदा. त्यामुळे मराठीतले अनेक तत्सम शब्दांचे उच्चार आपल्याला नीट माहीत आहेत. कारण मराठीवर जो संस्कृतचा प्रभाव आहे त्या संस्कृतचं व्याकरण तसंच बरेचसे मूळ बारकावे फार पूर्वी लिहून ठेवले आहेत. नौवात्लचं तस नसावं. आस्तेक जी नौवात्ल बोलत तिला ‘क्लासिक नौवत्ल’ म्हणतात. आज माहीत असलेल्या नौवात्ल पेक्षा ती थोडी वेगळी असवी.
मूळ नौवात्लचे ४ उच्चार आहेत. Nahua, Nahuatl, Nahuat, or Nahual असे. त्यातला दुसरा उच्चार सर्वसाधारणपणे केला जातो. नौवात्लचं वैशिष्ट म्हणजे त्यात येणारे लांबलचक शब्द. भाषेच्या agglutinative गटात नौवात्ल येते. या गटाच वैशिट्य म्हणजे शब्दाच्या धातूला असे उपसर्ग लावतात की ज्यामुळे लांबलचक क्लिष्ट शब्द तयार होतो.
त्यामुळे होतं काय की या भाषेतला एक शब्द आपण जर इंग्रजी किंवा मराठी अशा भाषांमध्ये भाषांतरित करायला गेलो की ते लांबलचक वाक्य बनतं. आपण जशी मराठीत शब्दयोगी अव्यये (prepositions) वापरतो. तशी -tla, -pan, -ca, -cingo ही नौवात्ल मधली शब्दयोगी अव्ययं. याचा अर्थ ‘आत’ किंवा ‘च्या जागी’ असं होतो. उदा. ‘tlalpan’ याचा संधी असं होईल ‘tlal + pan’ आणि अर्थ जमिनीवर. बरेच शब्द नौवात्लने स्पॅनिश आणि इंग्रजीला बहाल केले आहेत. उदा. चॉकोलेट = नौवाल्त शब्द : xocolātl, (bitter water)अशी बरीच उदाहरणं आहेत.
३. तेनोच्तीत्लान : आस्तेकांची राजधानी तेनोच्तीत्लान आणि या लेखात
उल्लेख केलेली तेनोच्तीत्लान दोन्ही वेगवेगळया. आस्तेकांची राजधानी
मेक्सिको सिटीच्या जवळपास होती.
४. वेरा क्रुझ : आर्नान कोर्तेसने मेक्सिकोच्या
किनर्यावर उतरल्यावर येशूच्या नावाने क्रॉस उभा केला आणि तो प्रदेश
स्पॅनिश राजाच्या नावे घोषित केला. त्याच नाव त्याने वेरा क्रुझ (Vera Cruz – अर्थ : True Cross) असं ठेवलं.
५. व्हीय्येरमोसा (Villahermosa) : हा स्पॅनिश शब्द आहे. त्याचा अर्थ – सुंदर खेड. (व्हीय्या – खेड एरमोसा – सुंदर)
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- wikipedia : http://en.wikipedia.org/wiki/Mesoamerica
झापोतेक
सोळाव्या शतकात स्पॅनिशांनी जिंकलेल्या मेसोअमेरीकन वसाहतीतल्या लोकांची माहिती गोळा करून दस्ताऐवज बनवायला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी काही आस्तेक जमातींशी संपर्क साधला. या जमाती स्वत:ला ‘tzapotecatl’ असं म्हणत. ‘tzapotecatl’ चा अर्थ ‘People of the place of Sapote.’ (झापोतेकांचा असा समाज होता ही त्यांचे पूर्वज सापोतेच्या१ झाडावरून आले.) स्पॅनिशांना तो शब्द काहीसा “zapotea “ असा वाटला आणि त्यांनी या जमातींना ‘zapotec’ असं नाव दिलं.
स्पॅनिशांच्या आगमनापूर्वी झापोतेकांच्या उच्च वर्गातील लोकांचा (ज्यांच्या हातात सत्ता व अधिकार होते) असा समज होता की आपले पूर्वज आणि देव वरती ढगात रहातात आणि मृत्युनंतर आपणही आकाशात जाऊन त्याचाच एक भाग बनणार आहोत. त्यांच्या या श्रद्धेमुळे त्यांना काही भागात Be’ena’ Za’a. ‘Cloud People’ असं नाव मिळालं.
२१ व्या शतकातले झापोतेक स्व:ताला Be’ena’ म्हणजेच The People म्हणवून घेतात. या लेखात आपण जाणून घेऊया या झापोतेकांबाद्द्ल.
ओल्मेकांनी रचलेल्या भरभक्कम पायावर झापोतेकांनी आपली संस्कृती नेटाने बांधण्याचं काम उत्तमरीत्या केलं. झापोतेक ही मेसोअमेरीकेतली दुसरी महत्त्वाची संस्कृती. बोलीभाषेला सर्वप्रथम लिखित स्वरूप देण्याचं श्रेय मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये झापोतेकांकडे जातं. मेक्सिकोच्या आसपास मिळालेल्या पुराव्यावरून त्यांचे समकालीन ओल्मेक व तोल्तेकांशी व्यापारी संबंध असल्याचे स्पष्ट होते. ‘बार आणि डॉट’ मोजणी पद्धत, वीस या अंकावर आधारित अंकतालिका (Vigesimal/base 20), दुहेरी चक्राकार दिनदर्शिका ही झापोतेक संस्कृतीची वैशिष्टयं सांगता येतील.
मेक्सिकोच्या दक्षिणेला असलेल्या डोंगराळ भागात वाहाकामध्ये (Oaxaca) पिढ्यानपिढ्या झापोतेकांचं वास्तव्य होतं. ओल्मेकांच्या र्हासानंतर, मागच्या भागात आपण जे मोंते आल्बान पाहिलं, त्याचा ताबा झापोतेकांनी घेतला आणि पुढे जवळजवळ कित्येक वर्ष ते त्यांची राजधानी बनलं. मोंते आल्बानला त्यांनी एक सुंदर आणि मोठं शहर बनवलं.
मोंते आल्बानचं झापोतेक नाव आहे Danibaan म्हणजेच ‘पवित्र पर्वत’ (Sacred Hill) या डोंगराच्या माथ्यावर झपोतेकांनी पिरॅमिड्स बांधली, देवळं बनवली. मोंते आल्बानच्या भरभराटीच्या काळात तिथे साधारण ३५ हजारांची लोकवस्ती असल्याचा कयास आहे. तर चला एक छोटीशी सफर करुया झापोतेकांच्या मोंते आल्बानची.

मोंते आल्बानच्या मधल्या चौकाला ‘ग्रान प्लाझा’ म्हणतात. चौकच्या मधोमध
असलेली इमारत हे मुख्य देवस्थान. त्याच्या समोर ठेवलेला दगड बळी देण्यासाठी
वेदी म्हणून वापरीत.
या इमारतीसमोर एक बॉल कोर्ट आणि राजवाडा (Palacio –
क्रमांक १७) आहे. असं म्हणतात, या राजवाड्याला भुयारी मार्ग आहे आणि तो
देवळाला जोडतो. या स्थापत्याशात्राच्या नमुन्यामुळे राजाला अचानक देवळात
प्रकट होऊन लोकांना चकीत करता येई. मोंते आल्बनच्या बॉलकोर्टचं वैशिष्ट्य
म्हणजे माया व तोल्तेकांच्या बॉल कोर्टप्रमाणे इथे बॉलरिंग नाही.
देवळाशेजारी असलेली छोटी त्रिकोणाकृती इमारत म्हणजे वेधशाळा (Building J). या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर सर्व इमारती काटकोनात बांधलेल्या आहेत पण वेधशाळेची ही इमारत इतर इमारतींना ४५ अंशाचा कोन करत बांधली आहे. कदाचित या विशिष्ट कोनामुळे खगोलशास्त्राने झपाटलेल्या या लोकांना अवकाश निरिक्षण करणे सोपे जात असेल. याच ठिकाणी दुहेरी चक्राकार कॅलेंडरचं तंत्र (जे आपण मायन समजतो) विकसित झालं. झापोतेक ५२ वर्षांनी नवी कालगणना सुरू करीत. (आपण जसं १०० वर्षांनी करतो) दर ५२ वर्षाच्या शेवटच्या रात्री सर्व आगी विझवून नरबळी देत. डोक्यावरचा सप्तर्षी सरकला की सुर्याला पुढच्या ५२ वर्षांसाठी जीवनदान मिळाल्याचं मानलं जाई.
चित्रात अगदी वरती ” Building of the Danzantes” (dancers) किंवा ‘नर्तक कक्ष’ (Building L) आहे. इथे मिळालेल्या दगडी अवशेषात अनेक आकृत्या आहेत. त्या नक्की काय आहेत यावर बरीच मतं आहेत. काहींना ती लढाईत जिंकलेली शत्रूची चिन्हे वाटतात, काहींना बॉल गेम मधले मृत खेळाडू तर काहींना नर्तक, त्यातलाच हा एक नमुना :

अगदी खालच्या बाजूला झापोतेकांची स्मशानभूमी (Tomb 56) दिसेल. या ठिकाणी अनेक थडगी सापडली आहेत. त्यापैकी क्रमांक १०४ क्रमांकाच थडगं महत्त्वाचं मानलं जातं. या थडग्यात अनेक अमूल्य वस्तू सापडल्या आहेत. या थडग्यावर झापोतेक पर्जन्य देवाचं चित्र आहे. मोंते आल्बानच्या उत्तरेला बरीच पिरॅमिड्स व देवळे आहेत. उत्तरेला असलेलं पिरॅमिड सर्वात उंच आहे. ग्रान प्लाझाच्या प्रवेशद्वाराजवळ संग्रहालयात या ठिकाणी मिळालेल्या बराचश्या वस्तू ठेवल्या आहेत.
मित्ला हे प्रसिध्द झापोतेक गाव. मित्ला हे नाव अस्तेकांच्या नौवात्लमधूनआलं. mictlán म्हणजे “मृतांची जागा किंवा पाताळ”. मित्लाचं झापोतेक नाव lyobaa म्हणजे “विश्रांतीची जागा”. स्पॅनिशांनी mictlán चं मित्ला केलं. मोंते आल्बान नंतर उदयास आलेलं. झापोतेक हे कुंभारकाम आणि विणकामात प्रसिद्ध आहेत. आधीच्या लिखत नमूद केल्याप्रमाणे मेसोअमेरीकनांना जरी चाक माहित असलं तरी त्यांनी त्याचा वापर दैनंदिन जीवनात केला नाही. ही परंपरा या गावात आजही पाळली जाते. चाकऐवजी पालथ्या ताटलीवर, ताटली उपडी ठेवून वरची ताटली गोल फिरवून मातीच्या वस्तू बनवल्या जातात.

मित्ला हे mictlantecuhtle देवाच घर मानलं जातं. स्पॅनिशांनी मित्लाचा ताबा सोळाव्या शतकात घेतला. मोन्ते आल्बान नंतरचं दुसरं महत्वाचं शहर. शहराचा ताबा मिळताच स्पॅनिशानी मूळ देवळं, वास्तू पाडून त्यावर चर्चेस बांधली. आजचं मित्ला गाव हे भग्नावशेषांनी व्यापलेलं आहे. हा मित्लाचा नकाशा :

अगदी सुरवातीलाच palace of the columns दिसेल. या पॅलेसमध्ये Hall of the Columns, Patio of the Mosaics, Hall of the Columns, Patio of the Columns दिसतील. या राजवाड्यांपैकी एक झापोतेक धर्मगुरुंसाठी , एक राजासाठी, एक दुय्यम धर्मगुरुसाठी आणि एक सैनिकी अधिकर्यांसाठी होता. अडोबे ग्रुप धार्मिक कर्यासाठी वापरला जाई. आरोय्यो ग्रुप राजवडा होता. भौमितिक मोझॅक बांधकाम हे या भागाचं वैशिष्ट्य .
सर्व मेसोअमेरिकन संस्कृतीप्रमाणे झापोतेकही बहुदेवतावादी होते. त्यांचे दोन महत्वाचे देव म्हणजे Cocijo (पर्जन्यदेव) आणि Coquihani (प्रकाशाचा देव). प्रजनन आणि कृषीशी निगडीत देव हे झापोतेक देवांच वैशिष्ट्य. Copijcha हा युद्धाचा देव, Cozobi हा मक्याचा आणि Pecala हा प्रेमाचा देव, Pitao Xoo भूकंपाचा देव तर Cozaana सृष्टीचा निर्माता.

हा Cocijo (पर्जन्यदेव) त्याच्या एका हातावर पाणी ओसंडून वाहतंय तर दुसर्या हातावर वीज.
झापोतेक
पापक्षालनासाठी देवाला रक्त देत. गंभीर गुन्ह्याची कबुली देताना हातवर,
गालावर जखमा करून त्यातून निघणारं रक्त ते मक्याच्या सालावर वाहत असत.
बारा हजार वर्षांपेक्षा जास्त काळ अस्तित्वात असलेल्या मोंते आल्बानचा इतिहास पाच भागात विभागला जातो.
१) मोंते आल्बान १ – ख्रि.पू. ४०० – १००
२) मोंते आल्बान २ – ख्रि.पू. १०० – इ.स. १००
३) मोंते आल्बान ३ – इ.स. २०० – इ.स. ९००
४) मोंते आल्बान ४ – इ.स. ९०० – इ.स. १३५०
५) मोंते आल्बान ५ – इ.स. १३५० – इ.स. १५२१
पहिल्या भागातले झापोतेक हे बरेचसे ओल्मेकांच्या प्रभावाखाली होते. दुसर्या आणि तिसर्या चरणात मोंते आल्बानची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आणि त्याचा विस्तार झाला.
झापोतेक समाजजीवन लिंगाधारित होते. स्त्री व पुरुष वेगवेगळे राहून कार्य करीत. स्त्रियांसाठी योनिशुचीता खुपच महत्त्वाची मानली जायची. स्त्री लहान असो वा वयोवृद्ध योनिशुचीता ही प्रतिष्ठेची होती. घर आणि मूलं सांभाळणं हे स्रियांचं मुख्य काम मानलं जाई. वयाच्या दहा बारा वर्षांनंतर मुलींबा एकटं बाहेर पडण्याची परवानगी नव्हती.
झापोतेकांच्या बर्याच बोलीभषा आहेत. त्या oto-manguean या भाषिक गटात मोडतात. या भाषांना tone Language संबोधतात याच कारण असं की या भाषा बोलतांना शब्दाचा उच्चार फार महत्त्वाचा ठरतो. उच्चाराच्या उतार चढावावर त्या शब्दाचा अर्थ ठरतो. उदाहरण द्यायचं झालचं तरं जसं आपण पाणी (जल) आणि पाणि (हात) जसा फरक करतो तसच काहीसं. आवाजातला चढ-उतार शब्दाचा अर्थ समजण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.
मोंते आल्बानने भरभराटीची अनेक वर्षे पहिल्यानंतर झापोतेकांची जागा मिह्तेकांनी घेतली आणि त्याचा र्हास चालू झाला. मिह्तेकांनी मोंते आल्बनचा वापर उच्च वर्गासाठी स्मशानभूमी म्हणून केला. मोंते आल्बानच्या र्हासाची कारण वाढत्या लोकसंख्येमुळे उद्भवलेली अन्नटंचाई किंवा उंच जागी राहतांना होणारी गैरसोय असं सांगितलं जातं
झापोतेक शूर , लढवय्ये समजले जातात. सहा दशकाहून अधिक काळ मेक्सिकोचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणारे बेनितो व्हारेस हे झापोतेक समाजाचे. वाहाकाच्या आसपास आजही झापोतेक संस्कृती नांदते आहे. स्पॅनिशांच्या प्रभावाखाली आल्याने बर्याच प्रथा आता बंद पडल्या आहेत. जागतिकीकरणाच्या शर्यतीत स्त्रिया ही विणकाम , भरतकाम, कापड उद्योगास हातभार लावत आहेत. वाढत्या स्पर्धेला तोंड देतांना झापोतेक स्व:ताला बदलत आहेत. परंतु वाहाकाशी असलेलं त्याचं हजारो वर्षांचं नातं तसंच अतूट आहे.
पुढील भाग: मेसोअमेरिका [भाग ४] : माया
काही अवांतर नोंदी:
१. सापोते : चिक्कूसारखं एक फळ.
२. Oaxaca या शब्दाचा उच्चार wah-HAH-kah असा होतो.
३. प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे. तसेच स्पॅनिश वळणची नावं शक्य तिथे स्पॅनिश उच्चाराप्रमाणे लिहिली आहेत. झापोतेक हे नाव सापोतेक, त्सापोतेक असेही उच्चारतात. वाचनाच्या सोयीसाठी इंग्रजी नाव ‘झापोतेक’ वापरलं आहे.
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- UNESCO Website : http://whc.unesco.org/pg.cfm?cid=31&id_site=415
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत
माया
जगाच्या पाठीवर एकाच वेळी ठिकठीकाणी अनेक संस्कृती नांदल्या, बहरल्या. काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही आपला वारसा पुढच्या पिढीला देऊन लुप्त झाल्या. मेसोअमेरीकेच्या इतिहासातील माया संस्कृती ही अशीच एक. ‘२०१२ – जगाचा अंत – माया कॅलेंडर“ या तीन गोष्टींच्या परस्पर संबंधामुळे आजच्या जगाला माहित असलेली. बरीचशी गूढ आणि रहस्यमय अनेक दंतकथांमधून अजरामर झालेली.
युरोपात रोमन साम्राज्य लयास जात असताना जगाच्या दुसर्या टोकाला अमेरीका खंडात प्रगत ‘माया” संस्कृती’ बहरास येत होती. ‘माया’ हे नावच आपल्याला किती जवळचं. अगदी आपल्या भाषेमधून उचलल्यासारखं. आपल्या पुराणात पाताळाचा देव माया किंवा मयासुराचा उल्लेख आहेच. ‘माया’ या नावाबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत. कुणी म्हणत अचाट शक्ती असलेले हे परग्रहवासी माया नावाच्या नक्षत्रावरून आले. त्या काळी ‘मायापान’ हे शहर फार महत्त्वाचं. त्यामुळे या लोकांना माया असं नाव मिळालं असंही म्हणतात. या लेखात प्रामुख्याने आपण माया समाजजीवन, कुटुंबव्यवस्था, धर्म , रितीरिवाज याबद्दल जाणून घेऊया.
माया संस्कृती ही साधारपणे मेक्सिकोच्या काही राज्यात (Chipas, Tabasco) तसेच युकातान१, मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला, बेलीसे, होन्डुरास या भागात अस्तित्वात होती.

ढोबळमानाने माया कालखंड तीन भागात विभागात येतो. त्यापैकी क्लासिक काळ (इ.स.२५० – इ.स. ९००) हा महत्त्वाचा मनाला जातो. अगदी सुरवातीच्या काळात मायन्सवर ओल्मेकांचा प्रभाव होता. ओल्मेकांप्रमाणेच प्राथमिक स्वरूपाची शेती या काळात मायन्स करीत. हळूहळू जशी लोकसंख्या वाढू लागली तसतसे नवीन शोध, ओल्मेकांकडून शिकलेल्या अनेक बांधकाम, शेतीतंत्राचा विस्तार व विकास करणं चालू झालं. नवीनवी शहरं उदयास आली. प्रगतीच्या अत्त्युच्च शिखरावर असताना तिकाल, चिचेन इत्सा, मायापान, कोपान, पालेंके सारखी ४० माया राज्ये अस्तित्वात होती.
माया स्वतंत्र राज्यात रहात. समाजाची रचना साधारणपणे पिरॅमिड सारखी असे. सगळ्यात वरती राजा आणि त्यानंतर उतरत्या भाजणीत इतरांना स्थान मिळे. हे काहीस असं वर्गीकरण होतं.

राज्याच्या सर्वोच्च अधिकार्याला Halach unic (True Man) संबोधले जाई. तो राज्याचा शासक तसेच पालनकर्ता, सल्लागार असे. राजाला देवदूत मानले जाई. राजा युद्धनीती ठरवत असे. राजाच्या मृत्युनंतर वारसाहक्काने त्याच्या मुलाला किंवा जवळच्या नातेवाईकास राजा बनविण्यात येई.
राजानंतर महत्त्व असे ते त्याच्या अधिकारी वर्गाला व धर्मगुरूंना. हे एकमेव लोक ज्यांना लिहिता वाचता येत असे. राज्यात लागणार्या धान्याची व्यवस्था बघणे, बांधकामास लागणारे सामान, कामगार गोळा करणे इत्यादी कामं अधिकारी करत. राज्याचा सैन्याच्या अधिकार्यास sahal असे संबोधले जाई. हे महत्त्वाचे पद बरेचदा राजाच्या खास जवळच्या नातेवाईकास मिळे. धर्मगुरू हेही फार महत्त्वाचे कारण त्यांचे देवाशी लागेबांधे. हे ही पद वारसाहक्काने मिळे. धर्मगुरू प्रामुख्याने भविष्यकथन, नरबळी देणे, युद्धप्रसंगी मुहूर्त सांगणे इत्यादी कामे करीत. धार्मिक कामांबरोबर ते गणित, अवकाश संशोधन या बाबीतही पारंगत असत.
माया लोक निरनिराळ्या शहरांबरोबर व्यापार करीत. हा व्यापार बरेचदा, जेडचे मौल्यवान दगड, शंख, copal२, quetzals३ अशा वस्तूंचा चाले. कलाकार मंडळी नानाविविध शिल्पे, मूर्त्या, आकर्षक भित्तीचित्रे बनवीत. मायन्स विणकाम व कुंभारकामातही तरबेज होते.
बळीराजा हा माया समाजाचा कणा. मका, स्कॉश, बिन्स याबरोबर इतर काही पिके शेतकरी घेत असत. शेतीच्या मोसमात पूर्ण वेळ शेतकरी शेतात असे तर बायका घरात राहून घरकाम, शिवणकाम करीत असत. बदलत्या ऋतुनुसार जेव्हा शेतीची काम कमी होत तेव्हा शेतकरी स्वत:ला बांधकामास जुंपत असत.युद्धासाठी सैनिक म्हणूनही त्यांचा वापर केला जाई.
माया समाजात सर्वात शेवटी स्थान गुलामांचं. गुलाम मुख्यत्वे आपल्या मालकासाठी शारिरिक मेहनतीची काम करीत. गुलाम बरेचदा युद्धकैदी, पालकांनी पैशासाठी विकलेली मुले असत. गुलामांना मुक्त जीवन जगता येत नसे. बरेचदा मालकाच्या मृत्युनंतर त्यांना मारून टाकण्यात येई.
माया शेतकरी छोट्या झोपडीत रहात. स्वयंपाकघर साधारणपणे मुख्य घराला लागून असे. माया शेतकर्याचं आयुष्य फार खडतर असे. बायका सहसा पहाटे लवकर उठून दिवसभरच्या कामासाठी आग तयार करीत. बरेचसे पदार्थ मक्यापासून बनत. दगडाच्या सहाय्याने मका दळून पीठ तयार करीत व त्यापासून तोर्तिया बनवीत. घरातल्या स्त्रिया दिवसभर घरकाम, मुलांना, पाळीव प्राणी सांभाळणे इत्यादी कामे करीत. पुरुष व मुले दिवसभर शेतात राबत असत, शेतीच्या कामांव्यतिरिक्त वन्य पशूंची शिकार, बांधकाम, लढाईच्या वेळी सैनिक म्हणून काम करीत.
अशा या खडतर जीवनातही काही समारंभाचे क्षण थोडा विसावा देऊन जात. बाळाचा जन्म हा आनंदाचा क्षण. बाळाच्या जन्मानंतर लागलीच धर्मगुरुंना पाचारण करण्यात येई. धर्मगुरू बाळाचे नामकरण करुन भविष्य कथन करीत. तसेच त्याच्या पालकंना त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सल्लाही देत. वयाच्या तिसर्या वर्षी मुलींसाठी एक समारंभ आयोजित केला जाई. वयाचं तिसरं वर्ष चुलीच्या तीन दगडचं प्रतिक त्यामुळे महत्त्वाचं. या समारंभात मुलीला स्वयंपाकासाठी लागणार्या वस्तू, विणकाम शिवणकामाचे साहित्य, मका दळण्यासाठी लागणारे दगड अशा तिला आयुष्यभर साथ देणार्या वस्तूंची ओळख करून दिली जाई. पुढे याचं वस्तू तिच्या सुखदु:खाच्या सोबती बनून जात असत.
अशाच प्रकारचा समारंभ मुलांसाठी वयाच्या चौथ्या महिन्यात करीत. चार हा
आकडा मुलांसाठी महत्त्वाचा. जिथे त्याला आयुष्यभर राबायचं अशा शेताच्या चार
दिशांचं प्रतिक. या सामरंभात मुलाला कुर्हाड, चाकू इत्यादी शेतकीच्या
औजारांची ओळख करून दिली जाई.
या पुढाचा समारंभ वयात येण्याचा. तो
मुलींसाठी वयाच्या बाराव्या वर्षी तर मुलांसाठी वयाच्या चौदाव्या वर्षी. या
समारंभात पाण्याने शुचिर्भूत होणे, आपल्या दोषांचा स्वीकार करणे, पुढील
आयुष्यात उपयोगी पडणारे आचरण याची ओळख मुलांना करून दिली जाई.
आयुष्यातला अजून एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे विवाह. मुलांचा विवाह विसाव्या वर्षी तर मुलींचा चौदाव्या वर्षी करीत. लग्न बरेचदा गावातील atanzahab (match maker) जमवीत. लग्न जमवताना मुलाला बायकोच्या कुटुंबासाठी अन्न, कपडे द्यावे लागत. तसेच मुलाला होणार्या बायकोच्या कुटुंबासाठी काम करावे लागे. तो किती वर्ष काम करणार आणि किती कपडालत्ता देणार ही बोलणी लग्न ठरायच्या आधी करीत. एकदा का ही बोलणी ठरली की धर्मगुरू लग्नाला मान्यता देत त्यानंतर सारा गाव मिळून नवदांपत्यासाठी घर बनवीत .
“This is the account: All was at rest. Not a breath, not a sound, The world was motionless and silent. And the expanse of the sky was empty. This is a first account, the first world. There was not yet any man or animal. There were no birds, fishes, crabs, trees, stones, caves or ravines. No grass, no forest. Only the sky was there. The face of the earth has not yet revealed itself. There was only the calm sea and the great expanse of the sky”
(Popol Vuh – The book of the community )
Popol Vuh या माया धर्मग्रंथातला हा उतारा सृष्टीनिर्मितीचं वर्णन करणारा. त्याची कथा कहिशी अशी. सृष्टीची निर्मिती होण्याआधी ना मनुष्य होता, ना पशु होते ना पक्षी. अस्तित्त्व होते ते फक्त आकाश आणि अथांग समुद्राचं. समुद्राचा देव Gucumatz (Sovereign Plum Serpent ) आणि Huracan( Heart of Sky) हा आकाशाचा देव. दोघेही महान तत्त्वज्ञानी. Huracan आकाशातून खाली समुद्रादेवातेला भेटायला आला. त्याने पृथ्वीच्या सृजनाची संकलना मांडली. दोघांनाही ही कल्पना आवडली असली तरी प्रत्य्क्षात ती कृतीत आणणं फार काठीण वाटत होतं. कारण त्यांना सुरवात कुठून करायची हेच कळत नव्हतं. मग दोन्ही देवांनी मिळून यावर बराच काळ सल्लामसलत केली. बराच काळ चाललेल्या या चर्चेनंतर दोघांनी मिळून एक योजना आखली. सगळ्यात आधी त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र पसरलेलं पाणी दूर करायच ठरलं. त्यामुळे सर्व सजीवांना राहायला जागा तयार होइल. यानंतर त्यांनी पशु, पक्षी, वनस्पती तयार करायचं ठरलं आणि मग आपण केलेल्या कार्याची प्रशंसा करायला कुणीतरी हवं. त्यातून माणसाची निर्मिती करायचं ठरलं. माणूस जो कालमापन करू शकतो, स्वत:ला भाषेच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो.
या दोघांच्या योजने प्रमाणे पृथ्वीवरील पाणी दूर झालं. पहिल्या टप्प्यात त्यांनी पर्वत, जंगल, पशु, पक्षी निर्माण केले. पाणी गोळा करून तळी बनवली, काही पाणी डोंगरावरून सोडलं. एक पायरी पूर्ण झाल्यावर दोन्ही देव खुश झाले. समुद्र देवाने आकाश देवाची स्तुती केली. आणि मग सरतेशेवटी त्यांनी माणूस बनवला.
माया जवळ जवळ १६० हुन अधिक देवांची पूजा करीत . यातले बरेचसे देव हे नैसर्गिक शक्तींशी निगडीत असत. जसे पर्जन्यदेव, मक्याचा देव, मृत्यूची देवता. Xibalba म्हणजे पाताळ आणि या पाताळात बारा दैवी शक्ती राहतात. त्यातल्या दोन मृत्युच्या देवता आणि बाकी सगळे राक्षस. हे बारा रक्षस जोड्याने फिरत आणि अधून मधून पृथ्वीवर येऊन माणसांना आजारी पाडणं , त्रास देणं हे त्यांचं काम.. Xiquiripat (Flying Scab) आणि Cuchumaquic (Gathered Blood) माणसांच रक्त दुषित करण्याचं काम करीत. Ahalmez (Sweepings Demon) आणि Ahaltocob (Stabbing Demon) हे दोघे कचर्याच्या ठिकाणी रहात आणि वेळ मिळताच माणसाचा खून करत. House Corner व Blood Gatherer हे दोघे रक्तपिपासू.
देवाने सृष्टी निर्माण केली तशी तो ती नष्ट पण करू शकतो. त्यामुळे देवाला खुश ठेवणं, त्याचा मान राखणं महत्वाचं. त्यासाठी देवाला अन्न, फुले, जेडचे मौल्यावान दगड, पिसे, शंख अशा अनेक भेटी दिल्या जात. मायन्सच्या मते रक्त देवाला शक्ती देत त्यामुळे पशुबळी व नरबळी देणं क्रमप्राप्त. नरबळी सहसा, गुलाम व युद्धकैद्यांचे दिले जात असत.
आता ओळख एका माया राजधानीची : पालेंके
मायन्सच्या अनेक राजधनींपैकी एक “पालेंके”. या शहराचं मूळ माया नाव माहित नसल तरी स्पॅनिशांनी या शहराला पालेंके म्हणजे तटबंदी (fortification) असं नाव दिलं.. तिकाल आणि कोपानपेक्षा थोडी छोटी अशी ही माया राजधानी. तिचा राजा “पाकाल” आणि ‘The Temple of the Inscriptions‘ या दोन गोष्टींमुळे जगप्रसिद्ध आहे. पाकाल राजाचा कार्यकाल हा मायांचा सुवर्णकाळ मानला जातो. पाकाल एका पायाने अधू असला तरी अतिशय पराक्रमी, धुरंधर. अगदी अल्प वयात त्याचा राज्याभिषेक झाला आणि जवळजवळ ७० वर्ष त्याने राज्य केलं. त्याला सूर्याचा अवतार मानीत आणि तो लोकांमधे अतिशय प्रिय होता.
पालेंकेवर जवळजवळ सत्तर वर्ष राज्य करणार्या पाकाल (K’inich Janaab’ Pakal) या राजाने स्वत:च्या चिरनिद्रेसाठी बांधून घेतलेला हाच तो जगप्रसिद्ध पिरामिड “The Temple of the Inscriptions”


पायर्यापायर्यांनी बनलेला हा पिरॅमिड आज मेक्सिको मधल्या चीआपास (chiapas) या राज्यात आहे. या पिरॅमिडचं मूळ माया नाव माहित नसलं तरी याला “The Temple of the Inscriptions” म्हणण्याचं कारण इथले अक्षर कोरलेले खांब. साधारणपणे आपल्या देवळाच्या आकारासाराखा असणार्या या त्रिकोणी पिरॅमिडला पायर्यांचे आठ स्तर आहेत.पाच प्रवेशद्वार असून ही प्रवेशद्वारे खांबांनी वेढली आहेत. त्यावर माया लिपीतील अक्षरे कोरली आहेत. या सहा खांबाना A ते F अशी नावं दिली आहेत . यापैकी खांब A हा पूर्णपणे चित्रलिपीत सजवलेला असून B खांबावर हातात बाळ पकडलेली मनुष्याकृती आहे. C खांबावर पाकालच्या आईचं म्हणजेच Lady Zac-Kuk. चा चित्र कोरलं असल्याचा अंदाज आहे.
या पिरामिड मधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खुद्द राजा पाकलचं थडगं. साधारणपणे १९४५ च्या सुमारास आल्बेर्तो रूस या मेक्सिकन संशोधकाच्या अचाट जिज्ञासेमुळे या थडग्याचा शोध लागला. या ठिकाणी त्याला एका फरशीवर चार भोक दिसली आणि त्याची जिज्ञासा चाळवली. त्याने ती फरशी बाजूला करून घेतली. त्या फारशीच्या खाली भुयारात काही पायर्या त्याला दिसल्या. भुयार साफ करायला तीन वर्ष लागली आणि ती वाट थेट पाकाल राजाच्या थडग्याकडे जात होती. हे पाकाल राजाच थडगं.

पाकाल हा सूर्याचा अवतार मनाला जाई. त्याच्या मृत्युनंतर पुर्नजन्म घेऊन तो परतणार अशी माया लोकांची अशा होती. त्यानुसार त्याला या अशा सुरक्षित ठिकाणी पुरलं होतं. या ठिकाणी पूर्वी राजवंशातील काही लोकांनाच प्रवेश होता.
पाकल राजाला ज्या शवपेटीत ठेवलं होत ती दगडी शवपेटी कोरीव काम केलेली आहे. या शावापेटीचं वैशिठ्य म्हणजे तिच्यावर असलेल दगडी झाकण. या झाकणावर अतिशय सुंदर असं कोरीव काम केलं आहे. या कोरीव कामावर अनेक संशोधकांनी संशोधन केलं, पुस्तकं लिहिली, प्रत्येकाने आपल्या परिने या कोरीव कामाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. हेचं ते सुप्रसिद्ध दगडी झाकाणावरील कोरीवकाम :

या चित्राला Pacal’s Tomb of the Astronaut असही म्हणतात. चित्रातला हा माणूस स्वत: राजा पाकाल असल्याचा अंदाज आहे. आणि तो अवकाश यान चालवीत असल्याचा दावा डॅनिकेन या स्वीस संशोधकाने आपल्या ‘चॅरिएट्स ऑफ द गॉड’ या पुस्तकात केला आहे आणि अर्थातच जगभरातील संशोधकांनी तो फेटाळून लावला. या पिरॅमिडशेजारी असलेला हा पाकालचा राजवाडा.



पुढील भाग: मेसोअमेरिका [भाग ५] : माया
काही अवांतर नोंदी:
१. युकातान : हे नाव त्या प्रदेशाला गैरसमजातून मिळालं. स्पॅनिश प्रथम मेक्सिकोच्या आसपास उतरले तेव्हा भटकत असताना त्यांनी तेथील लोकांना हा प्रदेश कुठचा असं विचारलं असता उत्तर आलं. ‘Ci-u-than’ (“We can not understand you”) आणि त्याचा अपभ्रंश पुढे ‘युकातान’ असा झाला.
२. Copal : झाडाचा रस जो माया धार्मिक कार्यक्रमांकरिता धुपासारखा वापरीत.
३. Quetzalls : हिरव्या रंगाचा एक पक्षी , ज्याच्या पिसांचा वापर शिरोवास्रासारख्या वस्तू बनविण्यासाठी करीत.
४. प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे. तसेच स्पॅनिश वळणची नावं शक्य तिथे स्पॅनिश उच्चाराप्रमाणे लिहिली आहेत.
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- Ancient Wisdoms – Gayle Redfern
- Lost Civilization (Parragon Books)
- wikipedia : http://en.wikipedia.org/wiki/Mesoamerica
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.
माया
“Nature to him (Newton) was an open book, whose letters he could read without effort.”
– Albert Einstein
आल्बर्ट आईन्स्टाईनचं हे वाक्य मायन्सना तंतोतंत जुळणारं. आपल्या आसपास असणारा निसर्ग आपला गुरू. तो आपल्याला दोन्ही हातांनी भरभरुन देतो. पण त्याच बरोबर त्याची विविध रुपं, नाना छटा, एक ना अनेक तर्हा. निसर्गातील सूक्ष्मातीसूक्ष्म फरक अचूक मोजून मापून नोंदवण्याची मायन्सची धडपड. एक झपाटलेपणच म्हणा ना! मग त्यातूनच जन्म झाला त्रिकालाबाधित कालमापन पद्धतीचा, अदभूत खगोलशास्त्राचा आणि अमेरिका खंडातल्या पहिल्यावहिल्या प्रगत अंकपद्धतीचा. बेबिलॉन, चायनिज, हिंदू संस्कृतीच्या बरोबरीने शून्याचा वापर करणार्या मायन अंकशास्त्राची ओळ्ख या लेखात.
मायन गणित हा मायन संस्कृतीचा कणा. त्यांनी बांधलेले पिरॅमिड बघताना याचा पदोपदी अनुभव येतो. वर्षानुवर्षे सखोल अभ्यास व निरिक्षण, शोध यातून तयार झालेलं मायन गणित साधारणपणे बांधकामशास्त्र (चिचेन इत्सा, कोपान, तिकाल), कालमापन, अनेक कलाकृतीमधे आढळ्णार्या भौमितिक रचना या ठीकाणी प्रकर्षाने आढळून येतं.
मायन गणित समजून घेण्याआधी या चिन्हांचा अर्थ शोधणार्याबद्द्ल. मायन चिन्हांचा अर्थ १८३२ मधे Constantine Rafinesque या जैवशास्त्रज्ञाने लावला. अमेरिका खंडात झालेल्या एकूण संशोधनात त्याचा फार मोठा वाटा आहे. त्याने जेव्हा Dresden Codex मधे वारंवार दिसणार्या रेषा पाहील्या तेव्हा त्याने ही चिन्हे कदाचित आकडे असावेत असा अंदा़ज बांधला. निरिक्षणाअंती त्याला असंही दिसून आलं डॉट म्हणजेच बिंदू हे जास्तीत जास्त चार आहेत. चारपेक्षा जास्त बिंदू आल्यास त्याची रेषा बनते.
आपण अंक लिहिताना वरुन सुरवात करुन हळूहळू खाली येत अंक लिहितो. याच्या बरोब्बर उलटं माया गणितात होतं. अंक लिहिताना ते खालून वर लिहित जायचे. आता असं का? याचं उत्तर देताना, इतिहासकार एस्पेरांझा हिदाल्गो (Esparanza Hidalgo) म्हणतो, समजा नुकतचं अंक शिकायला सुरवात केलेल्या एखाद्या लहानग्याने विचारलं, “बाबा, कुठून सुरवात करायची हो अंक लिहिताना? खालून की वरून?” यावर उत्तर येत असेल, “बेटा, आधी मला सांग हे समोरचं रोपटं कसं उगवतं? आकाशातून की जमिनीतून? जमिनीतून ना ! मग तसचं अंक लिहिताना सुद्धा खालून वर लिहित जायचं.” निसर्गाचं अचूक निरिक्षण आणि या निरिक्षणाचा दैनंदिन जीवनात केलेला वापर!
आपण अंकगणितात दशमान पद्धत वापरतो. माया गणित vigesimal म्हणजेच २० या आकडयावर आधारित आहे. त्यामुळे ४,५, २० हे आकडे महत्त्वाचे. आता २० हाच आकडा का? १० का नाही, ३० का नाही? तर उत्तर असं की हातापायाची मिळून एकूण बोटं किती? तर २०. म्हणून २० हा अंक महत्त्वाचा. माया गणितात ही तीन मुख्य चिन्हं वापरली जातात.

शून्य (०) दाखवण्यासाठी साधारणपणे शिंपला, बंद मूठ, डोकं याचा वापर करीत. डॉट किंवा बिंदू दाखवण्यासाठी बिया आणि बार किंवा रेषा दाखवण्यासाठी हाताचा वापर होई. बिंदू आणि रेषा यांच्या सहाय्याने बनलेले हे
प्राथमिक १ ते १९. अंक. एक बिंदू = १, २ बिंदू म्हणजे २.

आता एक महत्त्वाचा नियम, ५ बिंदू = १ रेषा. म्हणून ५ आकडा हा अंक १ रेष काढून दाखवला आहे. ६ ची फोड ५+१ म्हणून एक रेष + १ बिंदू.
अशा प्रकारे १ ते १९ अंक तयार होतात. हे झाले प्राथमिक अंक. आता समाजा तुम्हाला ८००० हा अंक लिहायचा असेल तर? आणि हो फक्त शिंपला, बिंदू आणि रेषा वापरायच्या.
त्यासाठी आधी बघु थोडे किचकट आकडे कसे लिहायचे. आतापर्यंत पाहिलेले प्राथमिक अंक, रेषा, चिन्ह हे आपण क्षितीजसमांतर म्हणजे आडवे लिहिले होते. आता त्यापुढचे अंक उभे लिहायचे. त्याआधी महत्त्वाचा आकडा २०. पुढच्या सर्व गणिताचा पाया. मग तो वेगळा दिसायला नको? २० हा असा काढायचा.

यामधे पाया म्हणजेच ० (शिंपला) आणि त्यावर एक बिंदू(डॉट). या रचनेचा अर्थ असा की दुसर्या क्रमवारीतील ही पहिली संख्या (one unit of the second order) जशी आपण १० नंतर ११ मोजतो. एकदा का हा २० समजला की पुढचे अंक सोप्पे. सगळे अंक खालून वर उभे वाचायचे. हे असे.

२० नंतर २१ लिहिण्यासाठी (२० + १ ) खालच्या शिंपल्याला हटवून त्याजागी नेहमीप्रमाणे १ म्हणजे बिंदू लिहायचा. अशाप्रकारे २९ पर्यंत आकडे आपण लिहू शकतो. आता दशमान पद्धतीमधे ३० कसा लिहितो आपण? १० X ३ = ३०. पण माया vigesimal पद्धतीत आकडे १,१०,१००,१०००.१००० असे दहाच्या पटीत न मोजता २० च्या पटीत म्हणजेच २०, ४००, ८०००, १६००० असे मोजत. त्यामुळे ३० लिहिताना २० + १० करायचे.
४० लिहिताना २० + २० हे असं.

हा १००. २० X ५. पण ५ बिंदू म्हणजे एक रेष म्हणून बिंदूच्या जागी रेषा आली.

आता मूळ प्रश्न. ८००० कसा लिहायचा. एकदम सोप्प. ८००० = २० X २० X २० हे असं.

दशमान पद्धत डोक्यात फिट्ट बसल्यामुळे हे आकडे नक्कीच किचकट वाटतात. पण ही पद्धत वापरून मायन्सनी हजारो वर्षांची भाकितं करुन ठेवली आहेत. या चिन्हांना नावंही दिली होती. ही अशी.

वर चित्रात दाखवल्याप्रमाणे १ = ‘Hun’ आणि २० = ‘Kal’ म्हणून २१ = ‘Hun Kal’.
१९ चं नाव ‘Bolonlahun’ म्हणून ३८० (१९ X २०) म्हणजे ‘Bolonlahun kal’.
वर तक्त्यात लिहिलेल्या ८००० या संख्येला pic असं संबोधलं जायचं. pic म्हणजे sack. कोकोच्या बियांचा वापर अन्नाबरोबर वस्तूच्या देवाणघेवाण करण्यासाठी केला जाई. कोकोच्या एका गोणीत ८००० बिया असत. त्यावरून हे नाव दिलं गेलं असावं.
ही झाली मायन गणिताची तोंडओळख. आता याचा वापर मोठया प्रमाणात झालेल्या कालमापन पद्धतीबद्द्ल.

हेच ते सुप्रसिद्ध माया कॅलेंडर. खरं ते ओल्मेकांपासून गेली चार हजार वर्ष अस्तित्वात आहे. पण ओळखलं मात्र जात “माया कॅलेंडर” म्हणूनच आणि का नसावं? त्यात अचूक बारकावे भरण्याचं काम केलं ते मायन्सनी. हजारो वर्ष सूर्य-चंद्र ग्रहणे, बुधाची भ्रमणे, तार्याची उलथापालथ अशा अनेक अवकाशातल्या घडामोडींचा नुसत्या डोळ्यांनी अभ्यास करून, बारकाईने निरीक्षणे नोंदवून बनवलेलं हे त्रिकालाबाधित कॅलेंडर. माया कालमापन पद्धतीचा अभ्यास केला तो बिशप दिएगो लांदा (Bishop Diego Landa) या स्पॅनिश धर्मगुरूने. (माया धर्मग्रंथांची नासधूस करण्यात याने मोठा हातभार लावला). माया कालगणना तीन प्रकारे करीत:
१) २६० दिवसाचं कॅलेंडर : हे आपल्या धार्मिक पंचांगासरखं. २० दिवसांचा १ महिना, असे वर्षात १३ महिने. या कॅलेंडरला ‘tzolkin’ असं संबोधत असत. २६० दिवसच का? याबाबत २ मतं आहेत. कदाचित बुधाचं भ्रमण लक्षात घेतलं गेलं असेल किंवा माणसाच्या गर्भधारणेचा कालावधी.
२) ३६५ दिवसांचं कॅलेंडर : हे सौरवर्षाचं कॅलेंडर. याला ‘haab’. यात २० दिवसांचे १८ महिने आणि शेवटचा पाच दिवसांचा “काळा महिना”.
३) माया लाँग काउंट : वर उल्लेख केलेल्या दिनदर्शिका ओल्मेकांपासून ते आस्तेकांपर्यंत सर्वच संस्कृतीमधे वापरल्या गेल्या. पण एकमेव कॅलेंडर जे फक्त माया वापरत ते म्हणजे “माया लाँग काउंट”. हे कॅलेंडर शुक्राच्या परिभ्रमणावर आधारलेलं. या कॅलेंडरचा मुख्य वापर धार्मिक कार्यासाठी, जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी वापरलं जाई.३६० दिवसांचं हे कॅलेंडर २० च्या पटीत मोजलं जात असे आणि मोजणी फक्त दिवसात होत असे. ही अशी :
- kin – १ दिवस
- uinal – २० दिवस (१ महिना)
- tun – ३६० दिवस (१ वर्ष)
- katun – ७२०० दिवस (२० वर्ष)
- baktun – १४४००० दिवस (४०० वर्ष)
उदा. ३.३.१.२.१.१ म्हणजे ३ baktun (४३२००० दिवस), ३ katuns (२१६०० दिवस), २ tuns (७२० दिवस), १ uinal (२० दिवस) = ४५४३४१ दिवस. हे कॅलेंडर इतकं अचूक होतं की सहा हजार वर्षांच्या काळात फक्त २४ तासांचा फरक पडत असे.


वर चित्रात दाखवल्याप्रमाणे या कॅलेंडरमधे २ चक्र असत आणि ती घडाळ्याच्या चाकांसारखी एकमेकांत अडकून फिरत असत. दोन्ही बाजूंच्या प्रत्येक दात्यावर दर दिवसाचं नाव असे. या दोन नावांची आजची युती दर ५२ वर्षांनी होत असे. त्यामुळे दर ५२ वर्षांनी नवी कालगणना सुरू होई. (आपण जशी दर १०० वर्षांनी करतो.)
या कॅलेंडरप्रमाणे सद्य युगाची सुरवात इ.स.पूर्व ११ ऑगस्ट ३११४
(ग्रेगोरियन कॅलेंडर) या दिवशी झाली आणि आपण आता त्याच्या अखेरच्या चरणात
आहोत. दर ५२ वर्षांनी जेव्हा नवी कालगणना सुरू होत असे तेव्हा माया
धर्मगुरू नरबळी देत. यामुळे जगाला पुढ्ची ५२ वर्ष जीवनदान मिळालं असं
मानण्यात येत असे. माया तत्त्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी आजपर्यंत चार वेळा नष्ट
झाली आहे, एकदा अग्निप्रलय, वायुप्रलय, जलप्रलय आणि एकदा अवर्षणामुळे, आता
या सर्व गणिती क्रिया, कालमापन पद्धती समजून घेतल्यावर तुम्हीच ठरवा २०१२
च्या अंताला जग संपणार आहे की नाही आहे की नाही?
जाता जाता अजून थोडं माया कॅलेंडरबद्दल


पुढील भाग: मेसोअमेरिका [भाग ६] : माया
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- UNESCO Website : http://whc.unesco.org/pg.cfm?cid=31&id_site=415
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.
माया
How much human life lost in wait
या वाक्यावर Indiana Jones (& the kingdom of Crystal Skull) येऊन
थांबतो. सिनेमागृहाबाहेर पडताना स्टिवन स्पिलबर्गसारख्या दिग्दर्शकाने एकाच
सिनेमात इतक्या घोडचुका कराव्या याचंच राहून राहून आश्चर्य वाटू लागतं?
त्याची बखोट पकडून विचारावंसं वाटलं, “बाबा रे, पेरुवियन जंगल दाखवलंस,
त्यात तुला केचुआ बोलणारी लोक कुठे भेटली?” पेरुच्या जंगलात हवाईयन धबधबे,
माणूस खाणार्या मुंग्या आणि सुप्रसिद्ध नाझ्का (Nazca) लाईन्ससुद्धा?
एकवेळ सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली या चुका माफ. पण मायांच्या “चिचेन
इत्सा” ला सरळ मेक्सिकोमधुन उचलून थेट पेरुत ठेवलंस ? मायांनी जर का हे
बघितलं असतं तर नक्कीच त्याच चिचेन इत्सावर स्टिवन स्पिलबर्गला साग्रसंगीत
बळी दयायला कमी केलं नसतं. 🙂 उद्या कुणी ताजमहाल उचलून श्रीलंका नाहीतर
बांग्लादेशात दाखवला तर?
‘चिचेन इत्सा’ माया संस्कृतीचा मुकुट्मणी. या
लेखात एक सफर माया बांधकामशास्त्र आणि गणित या दोघांचा अद्भभूत मिलाफ
असलेलं “चिचेन इत्सा”ची.
चिचेन इत्सा बघण्याआधी थोडं ‘इत्सा’ या माया जमातीबद्दल. इत्सा (Itza) हे युकातान प्रांतात बाहेरुन आलेले लो़क. माया इतिहासात त्यांचं वर्णन ‘आई बापाविना’, ‘धोकेबाज’ असं केलं आहे. ते नक्कीच स्थानिक भाषा जाणत नव्हते कारण काही ठिकाणी त्यांचं वर्णन ‘People who use our tounge brokenly‘ असंही केलं आहे. उत्तरेच्या ताबस्को (Tabasco) कडून आलेले हे लोक युकातानमधे साधारणपणे १२०० च्या सुमारास आले. १२२४-४४ मधे ते Uucil-abnal (Seven Bushes) इथे ते स्थायिक झाले आणि या ठिकाणाचं नामकरण त्यांनी Chichen Itza (Opening of the wells of Itza) असं केलं. Chichen Itza या शब्दाची फोड अशी होते. Chi (Mouth) + Chen (Well) + Itza.
मेक्सिकोच्या युकातान प्रांताच्या राजधानीजवळ म्हणजेच मेरिदाजवळ१ चिचेन इत्सा आहे. पालेंकेच्या र्हासानंतर या माया राजधानीचा उदय झाला. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या भागात त्याकाळी साधारपणे पंचवीस हजाराहूनही जास्त वस्ती असल्याचा अंदाज आहे. हे धर्मिक केंद्र असल्याने या ठिकाणी अनेक धर्मिक समारंभ होत असत. ही चिचेन इत्साची प्रतिकृती. सुरवात करुया “बॉल कोर्ट” पासुन.

चिचेन इत्साचं बॉल कोर्ट हे मेक्सिकोमधलं सर्वात मोठं व सुस्थितीत असलेलं बॉलकोर्ट आहे, ‘आय’ अक्ष्ररासारखी रचना असलेल्या या बॉलकोर्ट्च्या दोन्ही बाजूला भिंतीवर चित्रं कोरली आहेत. बॉलगेम हा फक्त मनोरंजनासाठी खेळला जात नसून या खेळाला धार्मिक महत्त्वही होत. खेळाच्या शेवटी हरणार्या गटातल्या लोकांचा बळी दिला जाई.२ बळींमुळे भरभराट होते असा समज असल्याने आपल्या मृत्यूनंतरही आपण आपल्या समाजचं भलं करत आहोत या भावनेतून खेळाडूही बळी जाण्यास उत्सुक असत. बॉलकोर्टच्या समोरच भिंतीवर खेळाडूंची डोकी कोरलेली आहेत.

बॉलकोर्ट्च्या शेजारी असलेल्या Temple of Jaguar मंदीरात काही लढाईची चित्रं कोरलेली आहेत. बहुदा तोल्तेकांबरोबर झालेल्या मायांच्या लढाईची ही चित्रं असावीत. ३
तिथूनच पुढे दिसणारं निळ्या रंगाचं पाणी म्हणजे पवित्र विहीर (Sacred Cenote). या नैसर्गिक विहिराचा वापर धार्मिक कार्यासाठी केला जात असे, धार्मिक कार्यात वापरलेल्या नरबळींचे देह या विहिरीत आणून टाकत असत. या विहिरीत केलेल्या पुरातत्वीय उत्खनात अनेक सांगाडे, सोनं, जेड्च्या वस्तू, मातीची भांडी, शंख, रबर, कपडे अशा अनेक वस्तू मिळाल्या आहेत.
शुक्र हा सर्वात जवळचा जवळचा त्यामुळे महत्त्वाचा तारा. त्याचा संबंध पुर्नजन्माशी जोडलेला. त्यामुळे Platform of Venus या ठिकाणी शुक्राच्या तोंडातून माणूस जन्माला येताना कोरला आहे. मेसोअमेरिका प्रांताच्या अक्षांश – रेखांशावर रोज सकाळी एक लुकलुकणारा तारा उगवतांना माया पहात. नक्कीच त्यांना तो शुक्र आहे असा ठाम माहित नसलं तरी नुसत्या डोळ्यांनी दिसणारा हा तारा त्यांना आकर्षित करीत असे. अवकाश निरिक्षणासाठी झपाटलेल्या मायांना शुक्राचं भ्रमण माहित होतं. मागच्या भागात जे कॅलेंडर आपण पाहिलं ते शुक्राच्या गतीवर आधारलेलं होतं. त्यांच्या अनेक संकल्पना शुक्राच्या भ्रमणावर आधारलेल्या होत्या. कुठल्याही साधनांशिवाय नुसत्या डोळ्यांनी केलेल्या निरिक्षणांवरुन अनेक गोष्टी त्यांनी अचूक लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या ड्रेस्डेन कोडेक्समध्ये सूर्य – चंद्र ग्रहणे, शुक्राचं भ्रमण, तसंच गुरु (३९९ दिवस) , शनी (३७८ दिवस) भ्रमणे त्यांनी अचूक लिहिलेली आहेत. त्यांना सुर्य, चंद्र, शुक्र, मंगळ, आकाशगंगा माहीती होत्या. पॅरिस कोडेक्समधे या तार्यांवर आधारलेल्या राशींचीही सविस्तर माहीती आहे.
आता मुख्य इमारत, ‘एल कास्तिलो’

धार्मिक कामासाठी बांधलेला हा पिरॅमिड. तोल्तेकांच्या प्रभावाखाली आल्यानंतर इथे मायांनी कुकुलकानचं४ मंदिर बांधलं. माया बांधकामशास्त्र आणि गणित यांचा अद्भूत मिलाफ म्ह्णून या पिरॅमिडकडे पाहीलं जात. मागच्या लेखात आपण माया कॅलेंडर पाहीलं. या कॅलेंडरचा वापर या पिरॅमिडमधे कसा केला गेला आहे ते पाहू.
या पिरॅमिडचे नऊ टप्पे आहेत. पिरॅमिडच्या चारही बाजूंना मधून
छेदणार्या पायर्या या नऊ टप्प्यांचे दोन भाग करतात. त्यामुळे एकूण भाग
झाले अठरा. हे वर्षाचे १८ महीने. या चार जिन्यांना प्रत्येकी ९१ पायर्या.
त्यामुळे एकूण पायर्या झाल्या ९१ X ४ = ३६४ आणि वरची १ धरुन ३६५ पायर्या.
हे झाले वर्षाचे ३६५ दिवस. पिरॅमिडच्या दर्शनी भागात ५२ फरश्या बसवल्या
आहेत. मायन्स दर ५२ वर्षांनी नवी कालगणना करीत असत. दर ५२ वर्षांनी आधीच्या
पिरॅमिडवर नविन पिरॅमिड बांधला जाई. या पिरॅमिड्च्या आतही अजुन एक पिरॅमिड
आहे. वरचा पिरॅमिड दुसरा आहे. पिरॅमिड्च्या आत चिंचोळी वाट जाते. अगदी
खाली जॅग्वारचं एक आसन आहे. तसंच कुकुलकानचं देऊळ आहे. जे तोल्त्कांच्या
प्रभावानंतर बांधलं गेलं.
या पिरॅमिडचे चार कोपरे पुर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर अशा चार दिशा अचुकपणे दाखवतात. या अशा रचनेमुळे दर २१ मार्च आणि २१ सप्टेंबर या दोन दिवशी (१२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र) इथे दिसणारा छाया-प्रकाशाचा अद्भभुत खेळ बघायला मिळतो. चित्रात दिसाणार्या जिन्याची कड नीट पाहीली तर ती सरळ नसून उतरत्या जिन्यासारखी असल्याचं आपल्याला दिसेल. तसंच पिरॅमिड्च्या पायथ्याशी सापाचं तोंड कोरलेलं दिसेल. वर उल्लेख केलेल्या दोन दिवशी प्रकाश जेव्हा इथे पडतो तेव्हा ही रचना नागिण असल्यासारखा भास होतो. ऊन जसंजसं खाली येत तसंतसं ही नागिण सळ्सळ्त खाली आल्याचा भास होतो. (खरंतर हा नजारा प्रत्यक्षात पाहिला तर जास्त स्पष्ट होईल) हे खालचं चित्र सळसळत खाली येणार्या नागिणीचं. या रचनेचा वापर धर्मगुरू करित. नागिण पहिल्यांदा खाली आली की पेरणी सुरु होत असे आणि दुसर्यांदा खाली आली की कापणी.

Temple of Warriors या देवळाचं वैशिठ्य म्हणजे त्याच्यासमोर असलेले १००० खांब. हे Temple of Warriors आणि त्याच्यासमोर असलेले १००० खांब.

या खांबाच्या प्रवेशालाच चॅक या पर्जन्यदेवतेची मुर्ती आहे. युकातान हा पावसाचं दुर्भिक्ष असलेला प्रदेश त्यामुळे बरेच ठिकाणी चॅकचे पुतळे आढळतात. ही चॅकची मूर्ती.

थोडिशी मागे रेलून बसलेली, गुडघे पोटाशी घेतलेली. नरबळी दिल्यावर प्रथम सुर्याला त्याच ह्र्द्य अर्पण केलं जाई आणि त्यानंतर ते चॅकच्या पुतळ्यावर, गुडघ्यावर (तिथे एक सपाट जागा दिसेल) ठेवलं जाई.
El Caracol, ही गोल इमारत म्हणजे वेधशाळा. काराकोल म्हणजे गोगलगाय. या इमारतीच्या चारही दिशांना चॅकचे पुतळे आहेत. चित्रात दिसत असलेले झरोके अवकाश निरिक्षणासाठी वापरले जात. याच झरोक्यांतून धर्मगुरू, ज्योतिषी जनतेला संदेश देत असत.

अकाब स्तिब, या भागातली ही अजून एक रहस्यमय इमारत. साधारणपणे दुसर्या शतकात बांधलेली ही इमारत “अकाब स्तिब” म्ह्णजेच “अबोध लिखण” या नावाने ओळखली जाते. याचं कारण या इमारतीच्या एका दरवाजावर कोरलेलं चित्र. या चित्रात एक धर्मगुरु हातात भांड घेउन उभा आहे, या भांड्यावर कोरलेली अक्षरं हे अजुन पर्यंत न उकललेल एक कोडंच आहे.
चिचेन इस्ताजवळच ‘तुलुम’ या ठिकाणी मायांचे एकमेव सागरी अवशेष आहेत. तुलुम हे समुद्र्किनारी वसलेलं शहर. तुलुमचा अर्थ “भिंत”. हे शहर बंदोबस्तासाठी वसवलेलं. शहरातल्या किल्ल्यावरुन टेहाळणी करता येत असे. समुद्रावरुन हल्ला होण्याची भीती असल्या कारणाने या ठिकाणी काही महत्त्वाच्या कुटुंबांनाच रहाता येई. इथल्या किल्ल्यावर दिसणार्या ज्योतीचा उल्लेख स्पॅनिशांनी आपल्या दस्ताऐवजात केला आहे. हा तो किल्ला. स्पॅनिश हेच पहिले या प्रांतात पाय ठेवणारे. परंतु माया जमातींच्या आपापसातच लढाया होत. त्यामुळे कदाचित आपल्याच लोकांकडून आक्रमणाच्या भीतीने समुद्रावर हा किल्ला बांधला आसवा. जसं प्रत्येक सागरी किनारर्यावर संरक्षणासाठी किल्ला असतोच.

तुलूम हे माया शहर हे जरा अलीकडचं म्हणजे साधारण इ.स. १२०० च्या आसपासचं. इ.स. १३-१५ व्या शतकात ते प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर होतं. पोस्ट क्लासिक माया काळातलं ते एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र. तुलुमच्या किनार्यावर व्यापारी छोट्या नावेतून (canoes) येत असत. लेखात ज्या किल्ल्याचा उल्लेख केलाय तो किल्ला खरंतर दीपगृहाचं काम करी. पोस्ट क्लासिक काळात मायांनी व्यापारासाठी या Canoes वापरायला सुरवात केली. ४० ते ५० फुट लांब असलेल्या या Canoes मुख्यत्वे महोगानी किंवा तत्सम उष्ण्कटीबंध प्रदेशात मिळणार्या कठीण अशा लाकडापासून बनवीत असत. या पाण्यावर तरंगू शकणार्या Canoes माया व्यापारी जगतात खरंच क्रांतिकारक ठरल्या. कारण या Canoes च्या शोधाआधी व्यापारासठी मुख्यत्वे वस्तू माणसांच्या खांद्यावरून वाहून नेत असत. (हत्तीसारखा प्राणी त्या भागात उपलब्ध नव्हता. घोडा स्पॅनिशांनी प्रथम या भागात आणला) या छोट्या होड्यांमुळे माया व्यापार साधाराणपणे मेक्सिकोच्या अखातातापासून युकतानपर्यंत पसरला. तसंच तो आजच्या होन्डुरास, कोस्टारिका, पनामापर्यंतही असावा असा अंदाज आहे.(तसे पुरावे मिळाले आहेत.)
साधारणपणे इ.स. ९ शतकाच्या सुमारास दक्षिणेकडच्या माया प्रांतात लोकसंख्या वाढू लागली. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करण्यासाठी अमाप जंगलतोड सुरू झाली. तसंच त्यांच्या धार्मिक कल्पनांमुळे मोठ्मोठे पिअॅमिड, देवळं बांधण्यासाठीही बरीच जंगलतोड झाली. याची परिणीती अर्थातच निर्सगाचा तोल ढळला. हवामानात झालेल्या मोठ्या बदलांमुळे बरेच रोग पसरले. त्यातच भूकंप, वादळे या सारख्या इतर नैसर्गिक आपत्तींमुळेही लोकसंख्येत मोठी घट झाली आणि हळूहळू ही संस्कृती लोप पावायला सुरवात झाली. मायन्सच्या र्हासाचं अजून एक कारण दिलं जातं ते म्हणजे अंतर्गत युद्ध . वेगवेगळ्या माया जमातींमधे सतत युद्ध सुरु असत. युद्धात माणसं मारली जात तसंच हरणार्या टोळीचाही नरबळी जात असे, सतत होणारी युद्ध, उपसमार, अन्नाची कमतरता यामुळे काही मायन्स सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत झाले. बरेच माया ग्रंथांची स्पॅनिशांनी जाळपोळ केल्याने माया संस्कृतीतल्या अनेक गोष्टी न उलगडणारी कोडं बनून राहीली आहेत. इतर संस्कृतींबरोबर तुलना केल्यास कदाचित मायन्सच्या कल्पना, देव, समजुती थोड्या अघोरी, रानटी वाटतील पण प्राचीन जगातली ती एक अदभूत संस्कृती होती. खरंतरं मारुतीच्या शेपटीसारख्या न संपणार्या त्यांच्या अनेक कथा. अनेक माया राजधानी , शहरे, कलाकृती यांच अपरिमित भांडार आंतरजालावर उपलब्ध आहे. उत्सुकतेपोटी जे काही वाचन झालं ते तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न या तीन लेखात मी केला. तुर्तास मायांना इथेच विराम देऊ.


चिचेन इत्साजवळ असलेलं अजून एक माया शहर उष्माल मधले हे चॅकचे मुखवटे:

पुढील भाग: मेसोअमेरिका [भाग ७] : माया
काही अवांतर नोंदी:
१. मेरिदा: ही युकातानची राजधानी. प्राचीन काळापासून इथे माया वस्ती आहे. अर्नान कोर्तेसने मेक्सिकोत पाऊल ठेवलं तेव्हा त्याचं सगळं लक्ष आस्तेक साम्राज्याकडे लागलं होतं. त्यामुळे मेरिदामधे असलेल्या मायन्सवर त्याने चाल केली नव्हती. आस्तेकांचा पाडाव केल्यावर स्पॅनिशांचं लक्ष मेरिदाकडे गेलं. तिथल्या मायांमधे फूट पडलेली पाहून स्पॅनिश सेनानी फ्रान्सिस्को मोंतेहोने मेरिदावर चाल केली. हे शहर पाहून त्याला स्पेन मधल्या मेरिदा या शहराची आठवण झाली. त्याने या शहराचं ‘तिहो’ हे नाव बदलून मेरिदा असं केलं.
२. नरबळी : बॉलगेममधे बरेचदा जिंकणार्या टोळीचा बळी दिला जात असे परंतु काही ठिकाणी हरलेल्या टोळीचा बळी देण्याची प्रथा होती.
३. माया-तोल्तेक लढाई : चिचेन इत्सामधे असलेलं चित्र हे माया आणि तोल्तेक या दोन संस्कृतींचा मेळ दाखवणारं. तोल्तेकांचा पुढे बराच प्रभाव मायांवर पडलेला दिसतो.
४. कुकुलकान: तोल्तेकांचा र्हास व्हायला लागल्यानंतर त्यांचा राजा ‘केत्झलकोएत्ल’ पुर्वेला माया प्रांतात आला. मायांनी सर्पपूजेची कल्पना तोल्तेकांकडून उचलली. पुढे केत्झलकोएत्ल हा तोल्तेक पिसांचा साप मायांचा “कुकुलकान” हा देव झाला.
प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे. तसेच स्पॅनिश वळणची नावं शक्य तिथे स्पॅनिश उच्चाराप्रमाणे लिहिली आहेत.
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- UNESCO Website : http://whc.unesco.org/pg.cfm?cid=31&id_site=415
माया
मानवी विकासाच्या अनेक टप्प्यात काही महत्त्वाचे टप्पे ज्यामुळे मानवी जीवन आमुलाग्र बदललं तसचं सुसह्य झालं. त्यापैकी काही ठळक शोध म्हजे चाक आणि आगीचा शोध. याचबरोबर भाषेचा शोधही मला महत्त्वाचा वाटतो. माणसाला भाषेच्या माध्यमातून संवाद साधता येऊ लागल्यापासून माहितीचं संकलन, संग्रहण आणि पुढच्या पिढीला हस्तांतरण ही एक गरज बनली. त्यातूनच जन्म झाला माहिती साठवून ठेवता येईल अशा विविध साधनांचा. मग अगदी आदिम काळात वापरले गेलेल्या झाडाच्या साली, दगड असोत किंवा आजकालचे मोठ मोठे आधुनिक डेटा सेंटर्स. माहितीची साठवणं ही एक अव्याहत गरज बनली आहे. आज थोडी माहिती माया लिखाण पद्धतीची.
त्याआधी दररोजच्या वापरातल्या कागदाच्या शोधाची गोष्ट. कागदाचा शोध सर्वप्रथम लावण्याचं श्रेय जात चीनी लोकांना. तसंच सर्वप्रथम कागदाचा वापर टॉयलेट पेपर म्हणून करण्याचा मानही त्यांनाच जातो. साधारणपणे १२ व्या शतकात युरोपात पोचलेला कागद चिन्यांनी मात्र इसवीसनाआधी १ शतक शोधला तो अचूक निरिक्षणामुळे. त्याचं झालं असं. चीनी मंत्री “त्साय -लुन” धोबीघाटावर उभा होता. धोबी आपलं रोजचं कपडे धुवायचं काम करत होते. कपडे धुतलेलं पाणी एका बाजूला डबक्यात साचत होतं. थोडयावेळाने धोब्याने कपडे धोपटायला सुरवात केली. त्याबरोबर कपडयातले तंतू सुटून सांडपाण्याबरोबर वाहू लागले आणि डबक्यात एका ठिकाणी साचले. त्साय -लुन या सर्व गोष्टींचं बारीक निरिक्षण करीत होता. साचलेल्या तंतूंचा पापुद्रा त्याने अलगत उचलला आणि उन्हात सुकवला. सुकल्यावर त्याचा सलग असा मऊ तुकडा बनला. ते बघताच त्याच्या डोक्यात या तुकडयाचा वापर लिहिण्यासाठी करण्याची कल्पना आली. आणि त्यातून कागदाचा शोध लागला. चहा, रेशीम अशा महत्त्वाच्या शोधांप्रमाणे हाही शोध चिन्यांनी व्यवास्थितरित्या गुलदस्त्यात ठेवला. पुढे पाचव्या शतकात तो जपानमार्गे अरब देशात व इतर जगात पसरला. कागदाचा शोध लावणारा “त्साय-लुन”

आता वळूया माया लेखनप्रक्रीयेकडे. मेसोअमेरिकेत सर्वप्रथम चित्रलिपी विकसित करण्याच श्रेय जातं ते ओल्मेकांकडे. झापोतेकांनी पुढे त्यात भर घालण्याचं काम उत्तम केलं. मायांनी त्यावर कळस चढवला असं म्हणता येईल. बर्याचशा कठीण अशा माया चित्रलिपीला ‘hieroglyphic‘ किंवा लघु रूपात ‘glyph’असे म्हणतात. माया लिपीची काही वैशिष्ठये म्हणजे जगातल्या गोष्टी जसे मनुष्य, प्राणी , नैसार्गिक गोष्टी तंतोतंत चितारण्याचा केलेला प्रयत्न. कोलंबसपूर्व जगातील ही मेसोअमेरीकेमधली एकमेव लिपी ज्यातून बोलीभाषेला पूर्णपणे लिहून व्यक्त करता येत असे. जगातल्या अनेक संस्कृतींमधे ज्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या गेल्या त्यामागचे कलाकार मात्र बरेचदा अज्ञात आहेत. (उदा. अजिंठा) बरेचदा या कलाकृतींच्या निर्मात्यांपेक्षा त्या काळाच्या राजांनांच त्या कलाकृतींचं श्रेय आपण देतो. परंतु काही ठराविक संस्कृतींमधे कलाकारांनी आपली नाव आपल्या निर्मितीवर कोरून ठेवली आहेत. त्यापैकीच एक माया संस्कृती. पोस्ट क्लासिक काळाच्या शेवटी तयार केलेल्या एका भांड्यावर Ah Maxam१ त्याच्या कलाकाराचं नाव कोरलेलं आढळलं आहे. कॅलीग्राफी आणि चित्र यांचा अतिशय सुंदर मिलाफ हे अजून एक माया लिपीचं वैशिष्ठय सांगता येईल.
लेखनासाठी उच्चकुलिन लोकांच्या हाताखाली लेखनिक असत. हे लेखनिक बरेचदा शाहीकुलातली मुलं, मुली असत. माया चित्रात लेखनिक बरेचदा डोक्यात लेखनसाहित्य खोचलेले दिसतात. असे लेखनिक मोठ्ठ्या हुद्द्यावर असत. हा एक मुख्य माया लेखनिक.

लेखनिकांच्या प्रमुखाला ‘ak k’u hun’ (Gaurdian of Sacred books’) असं म्हणत. मुख्य लेखनिकाला अनेक कामे करावी लागत. राजघराण्यातल्या लग्नामधे मध्यस्त तसेच लग्नाचा दस्ताऐवज बनवण्याचं काम मुख्य. याच बरोबर आश्रित राज्यांची व त्यांच्याकडून आलेल्या भेटवस्तूंची माहीती गोळा करणे, राजघराण्याच्या वंशावळीची माहिती संकलित करणे अशाप्रकरची अनेक कामं हे लेखनिक करीत असत. माया लेखनिक बरेचदा चित्र व शब्दांच्या सहाय्याने लेखन करीत. माया कॅलिग्राफर आणि चित्रकारांना ah ts’ib (‘he of the writing’) असं संबोधत. चित्रलिपीचं ज्ञान असलेल्यांना yuxul (‘sculptor’) असा मान मिळे. स्त्री – पुरुष दोघेही लेखनिक असत परंतु पुरुष लेखनिकांची संख्या अधिक असे. स्त्री लेखनिकांना ah ts’ib आणि पुरुष लेखनिकांना ak k’u hun संबोधलं जाई.
लेखनिकांसाठी शाळा असत आणि त्यात शिकणार्या विद्यार्थ्यांना दीर्घकालीन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागे कारण अतिशय गुंतागुंतीची अशी माया चित्रलिपी समजून घेणं फार अवघड होतं. शाही खानदानतली मुलं, मुली लेखनिकांसाठी असलेल्या शाळेत विशेष शिक्षण घेत असत.
लेखनिकाला लिखाणासाठी अनेक पर्याय असत. लेखनिक एखादा शब्द, वाक्य वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकत असत. कधी ते logographs२ वापरत तर कधी उच्चार (त्या शब्दाचा उच्चार दाखवणारे चिन्ह – phonetics). एखादा शब्द किंवा नाव दाखवण्यासाठी लेखनिक बरेचदा logographs वापरत तर उच्चारसाठी असलेली चिन्ह spelling दाखवण्यासाठी. उदाहरणार्थ : balam (‘jaguar’) शब्द एक logograph म्ह्णजेच बिबळ्याचं डोकं वापरुन लिहिता येतो, तसंच त्या शब्दाच्या उच्चाराप्रमाणे ba, la आणि ma असाही लिहिता येतो. अशाप्रकारचे काही शब्द logograph आणि उच्चार दोन्हीचा वापर करुन लिहिता येत असत. अशावेळी लेखनिक तसा उल्लेख आपल्या लिखाणात करीत. आपण इंग्रजी लिहितांना २६ चिन्हांचा वापर करून वेगवेगळे शब्द बनवतो, त्याचप्रमाणे माया भाषेत जवळजवळ ८०० चिन्ह आहेत. चिन्हांचा वापर करुन अक्षरं बनतात. हा एक नमुना माया शब्दाचा.

क्लासिक काळात कोरलेली माया चित्रलिपी ही उभी व आडवी लिहिलेली आढळते. ती साधारणतः पहिल्या ओळीतला पहिला कॉलम, पहिल्या ओळीतला दुसरा कॉलम अशी वाचता येते. काही छोटया वस्तू, सिरॅमिकची भांडी, कोरिवकाम केलेली हाडं, शिंपले यावर थोड्या वेगळ्याप्रकारे लिहित. बरेचदा फक्त आडवं किंवा उभं लिहिलं जाई. काही आसनांवर व बॉलकोर्टमधे वर्तुळाकार लिहिल्याचं आढळून आलं आहे. कोपानमधे मिळालेल्या अवषेशांमधे काही ठिकाणी ती तिरपी लिहिलाची सुद्धा आढळलं आहे. काही थोडया ठिकाणी (पॅरिस कोडेक्समधली ४ पानं) उजवीकडून डावीकडे लिहिल्याचं दिसून येतं.
आतापर्यंत झालेल्या संशोधनमधे माया साधारणतः इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून लिखाणासाठी bark paper वापरायला सुरवात केली. या कागदाचं माया नाव Hu’un. अंजीर, Amate,३ , Ficus या झाडांच्या आतल्या भागात असलेल्या पातळ साली लेखनासाठी वापरत. खरंतर या झाडांच्या सालींचा वापर अंग झाकण्यासाठी कपडे म्हणून करीत परंतु त्याच सालींचा वापर लेखनासाठी केव्हापासून करु लागले हे अजून न सुटलेलं कोडं आहे. Amate च्या सालींवर काढलेलं हे चित्र.

या झाडांच्या साली लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवत जेणेकरुन त्या मऊ होत. त्यानंतर स्वच्छ पाण्यातून काढून त्यांना muinto या दगडी हत्याराने ठोकून काढीत.त्यामुळे या साली पातळ व रूंद होत असत. या साली नंतर एकावर एक उभ्याआडव्या अंथरल्या जात त्यामुळे सालींमधे असलेले फायबरचे धागे एकमेकांत अडकून तो जाड बनत असे. त्यामुळे अशा कागदावर पाठपोट लिहिता येत असे. हा कागद उन्हात सुकवून , त्याचे छोटे छोटे तुकडे जोडून मोठा कागद बनत असे. हा कागद पोत, टिकाऊपणा, लवचिकता या बाबतीत इजिप्तच्या पपायरसशी तुलना करता अधिक वरचढ होता. पुढे स्पॅनिशांच्या आक्रमणानंतर bark paper वर बंदी येऊन युरोपियन कागद वापरायला सुरवात झाली. हा कागद लेखनासाठी वापरायला घेण्यापुर्वी एक गोष्ट करावी लागत असे ती म्हणजे या कागदाला शाई शोषून घेण्यायोग्य बनविणे. त्यासाठी लेखनिक चुनखडी आणि पाणी याच्या मिश्रणाने gesso नावाचं द्रव्य बनवून त्याचा थर कागदाच्या दोन्ही बाजूला देत असत. gesso चा थर सुकल्यावर आता लिखाणासाठी योग्य असा कागद लेखनिकांकडे असलेल्या लाकडी उपकरणाचा वापर करुन पुस्तकासारखे शिवत असत. हे शिवलेलं पुस्तक लाकूड आणि बिबळ्याच्या कातडीचा वापर करून सुरक्षितरित्या बांधून ठेवत.

लेखणी म्हणून बरेचदा प्राण्यांचे केस, पंख याचा वापर होत असे. प्राण्यांच्या केसांपासून विविध तर्हेचे ब्रश बनवले जात. शाई ठेवण्यासाठी दौत म्हणून बरेचदा शंखाचा वापर केला जाई. हे शंखापासून बनवलेल्या दौतीचं चित्र. त्यावर लिहिलेल्या चित्राचा अर्थ असा. ku’ch sab’ak, म्हणजे “It is an ink-carrier “

माया कोडेक्स मधे बरेचदा लेखनिकांनी काळ्या शाईचा वापर केलेला दिसतो आणि गोष्टी चिन्हांकीत (highlight) करण्यासाठी लाल शाईचा वापर केलेला दिसून येतो. काळा रंग स्वयंपाकघरातील भांडयांच्या तळाशी जमणार्या काजळीपासून तर लाल रंग लोखंडापासून बनवला जाई. त्याव्यतिरिक्त निळा, हिरवा, पिवळा हे रंगही वापरलेले आढळून येतात. मायांनी त्यांच्या ग्रंथात केलेला काळ्या आणि लाल रंगाच्या वापरावरुन आस्तेकांनी माया प्रदेशाला “Land of Black and Red” असं नाव दिलं होतं.
स्पॅनिशांनी धर्मप्रचाराचा भाग म्ह्णून माया ग्रंथांची, हस्तलिखितांची धूळधाण उडवली. या सर्व धामधुमीतून काही माया हस्तलिखिते बचावली. त्यापैकी ४ ती ज्या शहरात ठेवली आहेत त्या शहरांच्या नावावरून ओळखली जातात. ती अनुक्रमे ड्रेस्डेन(जर्मनी), माद्रिद(स्पेन), पॅरिस(फ्रांस) व ग्रोलीएर (दक्षिण अमेरिका) अशी आहेत. या हस्तालिखीतांमधून त्या वेळच्या माया संस्कृतीची बरीचशी माहिती उपलब्ध होते. जगातल्या बर्याच संस्कृतीच्या अगदी उलट माया हस्तलिखितात राजेरजवाडे, त्यांचं आयुष्य, कर्तबगारी या वर्णनापेक्षा आपल्या परंपरा, धर्मिक विधी, अवकाश संशोधन, देव-देवता, सूर्य-चंद्र ग्रहण, त्यावेळच्या रुढी याची सविस्तर माहीती मिळते.
अजून एक माया ग्रंथ या धुमश्चक्रीत वाचला तो म्हणजे “The Popol Vuh” (Book of Advice). दक्षिण अमेरिकेत ग्वाटेमाला जवळ वास्तव करणारे माया लोक म्हणजेच किंचे (Quinche ) या लोकांचा हा पवित्र ग्रंथ होता.या ग्रंथांचे थोर नशीब आणि किंचे लोकांचा दृढनिश्चय या दोन गोष्टी या ग्रंथाच्या बचावासाठी उपयुक्त ठरल्या. मूळ चित्रलिपीमध्ये असणारा हा माया ग्रंथ किंचे लोकांनी गुप्त रीतीने साधारण इसवी सन १५०० च्या सुमारास रोमन वर्णलिपिमध्ये भाषांतरित केला. इसवी सन १७०३ मध्ये हा भाषांतरीत ग्रंथ फ्रेच भिक्षु फ्रान्सिस्को सिमेनेस (Fransisco Ximenez) याच्या हाती लागला . फ्रान्सिस्कोला किंचे लिपी अवगत असल्याने त्याने तो स्पॅनिशमध्ये भाषांतरित केला.
स्पॅनिशांनी नासधूस केली त्यामागच्या अनेक कारणांमधे एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना पुढच्या पिढीसाठी काहीही शिल्लक ठेवायचं नव्हतं. जगाच्या पाठीवर अशी कुठली प्रगत संस्कृती होती हे त्यांना जगासमोर येऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळेच बरेचदा या संस्कृतींचं चित्रण रानटी, असं करण्यात आलं. त्यांच्या नरबळीच्या प्रथा पाहून त्यांनी मुळ धर्म नष्ट करायचं ठरवलं. अर्नान कोर्तेसने त्यासाठी जंगजंग पछाडून अनेक कलाकृती , ग्रंथ यांची नासधूस केली. त्याला सर्व संस्कृती मुळापासून साफ करायची होती. जे उचलता येइल ते उचलायचं युरोपात पाठवायचं आणि उरलेलं साफ करुन टाकायचं हे त्याचं तत्त्व. धर्म बाटवण्यासाठी अनेक युक्त्या त्याने योजल्या. मायांना वाटणारं शुक्राचं महत्त्व लक्षात घेउन त्यांनी येशू शुक्राचं प्रतिक असल्याचा प्रचार केला. पिसांच्या सापांचा देव कुकुल्कानच्या रुपात अवतरल्याचंही पसरवण्यात आलं. जे या थापांना बधले नाही त्यांना जबरदस्तीने धर्मांतरीत करण्यात आलं.
पण या सगळ्याच संस्कृती दक्षिण अमेरिकेत विखुरलेल्या होत्या. स्पॅनिश आले तेव्हा एकाच वेळी आस्तेक, माया वैगेरे संस्कृती विखुरलेल्या स्वरुपात नांदत होत्या. हे लोक शूर, लढवय्ये होते. असे विखुरलेल्या स्वरुपातले अवशेष पुर्णपणे नामशेष करणं स्पॅनिशांना शक्य झालं नाही. त्यामुळे बरेच अवशेष वाचले. ते स्पॅनिशानी नष्ट केले नाहीत म्हणण्यापेक्षा त्या त्या भागातल्या लोकांनी केलेले प्रयत्नांमुळे वाचले असं म्हणता येईल. त्यातून पालेंके सारखी ठिकाणं निसर्गानेच आपल्या पोटात दडवून ठेवली होती त्यामुळे ती वाचली. काही ठिकाणी कोर्तेसने आस्तेकांच्या कलाकृती पाडून तिथे चर्च बांधली खरी पण त्यातली काही बरीच खोलवर खणून बांधलेली असल्याने वाचली आणि नंतर उत्त्खननात सापडली.
स्पॅनिशांनी जरी हरतर्हेने या संस्कृतीची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरीही लोककथा, दंतकथा, लिपी या माध्यमातून ती नक्कीच थोडीफार जिवंत राहिली. माया लेखनपद्धतीची किंबहुना त्या माध्यमातून माया संस्कृतीच्या एका पैलूची ओळख करून देण्याचा हा लेख माझा छोटासा प्रयत्न . हा लेख वाचून अपोकॅलिप्टोमधे चितारलेल्या रानटी जीवनसरणी पलिकडे जाउन माया ही एक सुसंस्कृत आणि प्रगत जीवनशैली होती हे थोडं जरी पटलं तर हा प्रयत्न सफल झाला असं मानायला हरकत नाही.


माया चित्राचा एक नमुना: मक्याने भरलेलं मडकं दासीच्या डोक्यावर चढवताना.

पुढील भाग: मेसोअमेरिका [भाग ८] : तोल्तेक
काही अवांतर नोंदी:
१. Ah Maxam – हा King of Naranjo आणि Princess of Yaxha यांचा मुलगा.
२. Logographs – एखादा शब्द चित्ररुपात दाखवणे. जसं ‘7’ या चिन्हाला
आपण इंग्रजीमधे Seven म्हणतो तर मराठीत ‘सात’. ते ७ हा अंक दाखवण्याचं
चित्र आहे.
३. Amate – हा स्पॅनिश शब्द आस्तेकांच्या नौवात्ल्मधून आला. मूळ शब्द āmatl. हे झाड मेक्सिकोच्या उत्तरेला Guerrero या भागात आढळतं.
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
तोल्तेक
मायन्सच्या र्हासानंतर मेसोअमेरीकेच्या वायव्येस उदयास आलेली अजून एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे ‘तोल्तेक’. नौवात्ल भाषेतील ‘tollan‘ या
शब्दावरून “तोल्तेक” हा शब्द बनला असावा. तोल्तेक या शब्दाचा अर्थ artist.
हे लोक मेक्सिकोच्या आसपास नक्की कुठून आले याची ठोस माहिती इतिहासात नसली
तरी बहुतेक दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात या लोकांची वस्ती असावी. तशी
एकूणच तोल्तेकांबद्द्ल फार कमी माहीती उपलब्ध आहे.
तोल्तेकांचं वास्तव्य मुख्यत्वे नकाशात असलेल्या भागात होतं :

साधारण इ.स. ९०० च्या सुमारास मायन्सच्या र्हासानंतर मेक्सिकोच्या वायव्येस पसरलेल्या काही संस्कृती प्रबळ होऊ लागल्या. यातूनच जन्म झालेली एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे “तोल्तेक”. इतिहासात तोल्तेकांचा काळ साधारणपणे इ.स. ८०० – १००० मानला जातो. तोल्तेकांचा पहिला राजा Mixcoal. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ‘तोपित्ल्झीन ‘ (Topiltizin) हा तोल्तेकांचा राजा आणि धर्मगुरू झाला. “तोपित्ल्झीन” हा शांतताप्रिय आणि केत्झ्ल्कोत्ल (Quetzalcoatl) या देवाचा एकनिष्ठ उपासक. Topiltizin राजाच्या कल्पनेतून निर्माण झालेलं तुला हे शहर तोल्तेक राजधानी. सध्या ती मेक्सिकोच्या State of Hidalgo या राज्यात आहे.

त्याकाळी केत्झ्ल्कोत्ल हा महत्त्वाचा देव असला तरी Tezcatlipoca
नावाच्या अजून एक लढाऊ देवाची उपासना चाले. या दोन देवांच्या उपसाकांमध्ये
आपापसात वैर होतं. त्यांच्या आपापसात बरेचदा लढाया होतं. अशाच एका लढाईत
अखेर तोपित्ल्झीन राजाचा पराभव झाला आणि त्याला आपल राज्य सोडावं लागलं.
त्याची आख्यायिका अशी की राजाने नाईलाजाने राज्य सोडलं. त्याने सापांचा
तराफा केला आणि समुद्रामार्गे पूर्वेस पळून गेला. पण जाताना “मी नाईलाजाने
जात असलो तरी भविष्यात परत येईन आणि माझं राज्य काबीज करेन” असं आश्वासन
प्रजेला दिलं. पुढील कित्येक पिढ्या या आख्यायीकेचा प्रभाव लोकांवर होता.
पुढच्या अनेक राजांनी तोपित्ल्झीनची वाट पाहिली. या घटनेनंतर बर्याच
वर्षांनी स्पॅनिश सेनानी अर्नान कोर्तेसने याच आख्यायिकेचा वापर आस्तेक
राजा माँतेझुमाविरुद्ध पुरेपूर वापर करून घेतला.

तुला शहरांचं वैशिट्य म्हणजे अटलांटिसचे भव्य पुतळे. हे सैनिकी वेशातले
पुतळे नक्की कुणाचे आहेत याची ठोस माहिती नाही पण या पुतळ्यांना
केत्झ्ल्कोत्ल या देवाचं प्रतिक मानलं जातं.

तोल्तेक लढाऊ होतेच परंतु त्यांचे समकालीन मायन्स बरोबर व्यापारी संबध असल्याचे बरेच पुरावे तुला आणि चिचेन इत्झा या दोन शहरामध्ये मिळाले आहेत. साधारणपणे बिन्स, कोको, मश्रुम, मिरच्या या वस्तुंचा व्यापार चाले.
तोल्तेकांचा कालखंड माया व आस्तेकांएवढा मोठा नसला तरी त्यांनी
आस्तेकांच्या बर्याच गोष्टींवर त्यांचा प्रभाव जाणवून येतो. तोल्तेकांनी
शेतीसाठी नवनवीन सिंचनाच्या पदधती शोधून काढल्या. डोंगराळ भागात पायर्या
पायर्यांनी चर खणून शेती करण्याची पद्धत मेसोअमेरिका प्रांतात तोल्तेकांनी
सर्वप्रथम विकसित केली. अनेक औषधी वनस्पतींचं ज्ञान तोल्तेकांना होतं.
तोल्तेकांना कोरफाडीसारख्या दिसणार्या maguey पासून बनवलं जाणारं मेक्सीकन पारंपारिक पेय pulque चे जनक मानलं जातं.

तोपित्ल्झीन राजाने तुला सोडल्यानंतर, तुला जिंकलेल्या क्रूर लोकांनी
सैनिकी अंमल आणला. जिंकलेल्या प्रदेशातल्या लोकांकडून खंडणीच्या रूपात
वस्तू लुटायला चालू केलं. युद्ध्कैद्यांना बळी द्यायची प्रथा चालू केली.
हीच प्रथा तोल्तेकांकडून आस्तेकांनी उचलली. साधारण ११ व्या शतकाच्या
सुमारास आलेल्या अवर्षणामुळे तुला ओस पडू लागलं. इतर टोळ्यांकडून होणार्या
हल्ल्यांमुळे ते अधिकच कमकुवत बनलं. साधारण इ.स. ११९० मध्ये ते पूर्णपणे
नेस्तनाबूत झालं. तोल्तेकांनंतर आलेल्या आस्तेकांनी तुलाचे काही भाग
वापरले.
फारशी माहिती उपलब्ध नसली आणि तोल्तेकांचा कालखंड जरी फार नसला
तरी आस्तेक परंपरांवर त्यांचा प्रभाव पहाता तोल्तेकांचं योगदान खचितच मोठं
आहे.
पुढील भाग:
संदर्भ : मेसोअमेरिका [भाग ९] : आस्तेक
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.
आस्तेक
सन १५१९. नवीन प्रदेशाच्या शोधार्थ निघालेल्या धाडसी स्पॅनिश सैनिकांनी आपल्या क्युबन वसाहतीतून मेक्सिकोच्या दिशेने कूच करण्यास प्रारंभ केला. या सैन्याने popocatepetl पर्वताच्या बर्फाच्छादीत रांगा ओलांडताच क्षणी त्यांना समोर अद्भूत नजारा दिसू लागला. छोट्या छोट्या तलावांच्या आसपास बांधलेल्या आखीवरेखीव वसाहती, त्यांना मधूनचं छेदणारे रस्ते, छोटी छोटी तळी आणि त्यावर बांधलेले पूल. या भूमीत पाउल ठेवण्याआधी स्पॅनिश सैन्याला इथल्या मूळ निवासी जमातीबद्दल थोडंफार ऐकीव ज्ञान होतं पण उंचावरून समोर दिसणारा नजारा अचंबित करणारा होता. स्पॅनिश सैन्याला अचंबित करणारी ही भूमी होती लढवय्या आस्तेकांची.

आस्तेकांनी जगाला अनेक वस्तुंची ओळख करून दिली. त्यांनी जगाला मका, तंबाकू, मिरची, रबर, कोको दिला. आस्तेकांच्या नौवात्ल भाषेत कोको म्हणजे ‘चोकोलात्ल’. आस्तेक राजा कोकोची पूड आणि डिंक पाण्यात मिसळून पीत असे. यातूनच पुढे चॉकोलेट तयार झालं.
मेक्सिकोच्या आसपास सापडणाऱ्या ‘सापोदिल्ला’ नावाच्या झाडाचा चिक तोंडात घोळवत रहायची आस्तेकंना सवय होती. अमेरिकेबरोबर झालेल्या एका लढाईत मेक्सिकन जनरल ‘आंतोनियो दे संता आना”ने या चिकाचा नमुना अमेरिकन फोटोग्राफर आणि व्यावसायिक थॉमस अॅडम्सला दिला आणि त्यातूनच पुढे च्युइंगमचा जन्म झाला.
या मालिकेतील काही लेख मेसोअमेरिकन भूमीवरील मायांइतकेच किंबहुना त्याहून काकणभर सरस अशा आस्तेकांबद्दल.
आस्तेकांचा इतिहास बर्याच प्रमाणात सविस्तर लिखित स्वरूपात उपलब्ध
आहे. बरीचशी माहिती स्पॅनिशांनी आस्तेकांचं राज्य काबीज केल्यावर लिहून
ठेवलेली आहे. काही आस्तेक ग्रंथ, हस्तलिखितं उपलब्ध आहेत ती चित्ररूपात
आहेत. या हस्तलिखितांमधील महत्त्वाचं हस्तलिखित म्हणजे Codex Mendoza.
इ.स १५२५ मध्ये पहिला स्पॅनिश व्हॉइसरॉय दोन आंतोनियो मेंदोझा याने
प्रमाणित केलं. त्यात चित्ररूपात आस्तेक राज्यांबद्दल सविस्तर माहिती आहे.
साधारण सोळाव्या शतकात लिहील गेलेलं Codex Aubin आणि Code xolotl, सतराव्या शतकात Fernanado de Alva Ixtlilxochitl या इतिहासकाराने संग्रहित केलेली माहिती, तसंच १५६९ साली बारा भागात पूर्ण झालेलं Friar Bernardino de sahagin या स्पॅनिश धर्मगुरू लिखित ‘General History of the thing of New Spain” अशा अनेक ग्रंथात आस्तेक समाजजीवनाची माहिती संकलित केली आहे. Bernardino चा शिष्य Churchman Diego Duran याने पुढे ‘Indies of New Spain, book of Gods and Rites and the ancient Calendar’
या ग्रंथांचं लेखन केलं. स्पॅनिश सेनानी अर्नान कोर्तेसने त्याकाळी केलेला
पत्रव्यवहार यातून अस्तेकांबद्दल अधिक माहिती उपलब्ध होते.
आस्तेकांना त्यांच्या नौवात्ल भाषेत तीन नावं आहेत. ‘आस्तेक’ हे नाव त्यांना बहुतेक त्यांच्या मूळ भूमी ‘Aztlan’
यावरून मिळालं असावं. त्यांना ‘मेहिका’ असंही संबोधतात. अभ्यासकांच्या मते
त्यांच्या अनेक देवांपैकी हे एक नावं असावं. ‘तेनोच’ या आस्तेक राजाच्या
नावावरून त्यांना Tenochca असंही म्हणतात. आस्तेक स्वत:ला मेहीका म्हणत आणि
त्यावरून ते रहात असलेल्या भागाला आपण आज मेक्सिको सिटी (Mexico स्पॅनिश
उच्चार मेहिको१ म्हणून ओळखतो. साधारणपणे अठराव्या शतकाच्या सुमारास अभ्यासकांनी ‘आस्तेक’ हे नाव इतिहासात वापरायला सुरवात केली.
इ.स. च्या तेराव्या शतकात उत्तरेकडून काही पोटार्थी टोळ्या
दक्षिणेकडे स्थलांतरीत झाल्या. त्यांच्या या स्थलांतरामागच एक मुख्य कारण
म्हणजे त्यांचा देव व्हीत्सोलोपोचीत्ली (Huitzilopochtli) म्हणजेच
सूर्य. आस्तेक हे सुर्यपूजक. आस्तेक समजुतीनुसार आजवर पाच सूर्य झाले.
त्यातले चार सूर्य इतर देवांशी लढताना नाश पावले. आताचा सूर्य हा पाचवा
सूर्य आणि त्याचं रक्षण करणं हे आद्यकर्तव्य. सूर्याच्या रक्षणासाठी अनेक
विधी करावे लागत त्यासाठी त्यांना स्वत:चं राज्य आवश्यक होतं.
आस्तेक राज्य स्थापन करण्यासाठी योग्य जागेच्या शोधात होते.
त्यासाठी धर्मगुरुंच्या आज्ञेनुसार ‘निवडुंगाच्या झाडावर जिथे गरुड साप खात
बसला असेल’ अशी जागा शोधण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांना हवी तशी योग्य
जागा दक्षिणेत एका पठारावर सापडली. पण त्या पठारावर आधीच वस्ती होती. शूर
आस्तेकांनी या मूळ लोकांशी युद्ध करून त्यांना हरवले आणि शेवटी या स्थानिक
लोकांनी आस्तेकांना जवळच असलेल्या ‘तेहकोको’ सरोवरात एक बेट देऊ केलं.

मेक्सिकोने पुढे याच चिन्हाला आपल्या राष्ट्रध्वजावर स्थान दिलं. आस्तेकांना मिळालेलं हे बेट खडकाळ, निवडूंगाने भरलेलं होतं. आस्तेकांनी तिथे आपली वसाहत उभारली आणि या भागाचं नाव त्यांनी ‘तेनिच्तीत्लान’ (तेनोच = आस्तेक गुरु व तीत्लान = निवडुंग) असं ठेवलं. हळूहळू आस्तेकांनी आपलं राज्य स्थापन केलं आणि खडकाळ जमिनीला आपली राजधानी बनवली. खडकाळ अशा या प्रदेशात मोठ्या कष्टाने त्यांनी सुंदर रस्ते बांधले. मंदिर, राजवाडे, पूल, बंधारे, पिरॅमिडस बांधून काढले. स्पॅनिश सैन्याने पर्वतराजीतून पाहिलेलं हेच ते नयनरम्य तेनोचीत्त्लान शहर. पोटार्थी आस्तेकांनी खडकाळ अशा बेटाचा खुबीने कसा कायापालट केला ते पाहू.
आस्तेकांनी तेनिच्तीत्लान या खडकाळ बेटावर वसाहत तर उभी केली पण
मेसोमेरिकन भूमीवरील अनेक जमातींप्रमाणे आस्तेकांजवळ ना ओझं वाहणारे प्राणी
(घोडे,हत्ती) होते ना शेतीसाठी लागणारी हत्यारं. चाकाची माहिती असूनही,
चाक सूर्य चंद्रासरखं गोल असल्या कारणाने त्याचा वापर करण त्यांनी टाळलं.
आस्तेकांकडची हत्यारं अतिशय प्राथमिक स्वरुपाची. आता अशा या प्राथमिक
स्वरूपाच्या हत्याराच्या सहाय्याने अत्यंत खडकाळ व कठीण अशी जमीन खोदणं हे
जिकिरीचं काम. यामुळे आस्तेकांनी शेतीची नवीन पद्धत अंमलात आणली. तिला
Chinampa असं संबोधलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं तर Chinampa हे
मानवनिर्मित कृत्रिम बेटं होती. शहराबाहेर असलेल्या तलावात साधारण २०० मीटर
लांब बांबूच्या टोपल्या ते बनवत. या टोपल्या मातीने भरून टाकत. त्या तळाला
जाऊन हळूहळू ती जागा मातीने भरून जाई व जमीन तयार होत असे. प्रत्येक
Chinampa म्हणजे छोटा आयताकृती पट्टी असे. साधारणतः खाली दाखवलेल्या
चित्राप्रमाणे.

छोटे Chinampa साधारणपणे ५ X ५० फूट आकाराचे बनवले जात परंतु बरेचसे Chinampa हे ३०० फुट लांब व १५ ते ३० फुट रुंद असत. या Chinampa वर बांबूच्या गवती घरात शेतकरी रहात असे. काही Chinampa एका ठिकाणावरून दुसरीकडे नेता यावे यासाठी लाकडी होडीवर बांधले जात.

Chinampa बनवण्यासाठी सर्वप्रथम बांबूच्या तराफावर चिखलाचा थर दिला जाई. हा थर कडक झाल्यावर आयताकृती कापून त्यात बिया पेरण्यासाठी छोटी छोटी छिद्रे करीत. पाळीव जनावरे नसल्यामुळे प्राण्यांची विष्ठा खत म्हणून वापरता येत नसली तरी शहरातल्या शौचालयातून मानवी विष्ठा गोळा करून शेतकऱ्यांना विकण्यात येत असे. प्रत्येक पिकासाठी पेरणीचा कालावधी अशा रीतीने ठरवलेला असे की Chinampa वर्षभर कार्यरत असत.

१६ व्या शतकातला हा नकाशा तेनिच्तीत्लान या शहराचा एक भाग आहे. या नकाशात अतिशय प्रमाणबद्ध असे Chinampa, त्यांच्या मालकांची चित्रलिपीत लिहिलेली नावं दिसतील. या नकाशात जवळजवळ ४०० Chinampa आहेत. मधोमध कालव्याने विभागला गेला असून महत्त्वाचे कालवे नागमोडी रेषांनी तर कालव्यांच्या कडेचे रस्ते पाउलखुणांनी दर्शविलेले आहेत. प्रत्येक घराच्या आसपास साधारणपणे ६-८ Chinampa असत. एक chinampa बांधायला साधारपणे १०-१५ लोकांची गरज लागे.
आस्तेकांनी अशी छोटी छोटी अनेक बेटं शहराभोवती बांधली. ही बेटं
कालव्यांमार्फत मुख्य शहरांना जोडलेली असत. यात वर्षातून वेगवेगळी पिके घेत
असत. एका अर्थाने त्यांची ही तरंगती शेतीच होती. शहराभोवती खोदलेले असंख्य
कालवे आणि त्यात तरंगणाऱ्या होड्या पाहून कोर्तेसने या शहराची तुलना
व्हेनिसची केली होती.
या Chinampa मध्ये मुख्यत्वे घेतलं पिकं म्हणजे ‘मका’. साधारणपणे
मार्च ते मे या काळात मक्याची पेरणी करण्यात येई. आदल्या वर्षीच्या
पिकामधून चांगल्या प्रतीचे बियाणे बाजूला पेरणीसाठी काढून ठेवण्यात येई.
पेरणीच्या वेळी या बिया देवळात नेउन Chicomecoalt या मक्याच्या देवीला
दाखवण्यात येत. त्यानंतर या बिया २ ते ३ दिवस पाण्यात भिजवून पेरत असत. याच
काळात पेरणीआधी शेतकरी काठीने जमीन उकरून काढित आणि छोटी छोटी छिद्रे
बनवीत. या छिद्रात बिया पेरून छिद्र बंद केली जात.
शेतकरी Chinampa वर एका छोट्या आयताकृती झोपडीत रहात. ही घर मातीची
असत. आणि त्यांचा वापर मुख्यत्वे जेवण्यासाठी व झोपण्यासाठी करीत. घरात
रोजच्या वापराच्या वस्तू जसे झाडू, जमीन खोदण्याची काठी, बिया ठेवण्याच्या
टोपल्या, स्वयंपाक घरात वापरण्यात येणारी भांडी, मका दळण्यासाठी दगड असे.
प्रत्येक घरात देवाच्या मूर्ती असत.

एका कोपऱ्यात तीन दगडाच्या चुलीवर मक्याच्या भाकऱ्या (tortilla) भाजल्या जात. त्या भाजण्यासाठी मातीच्या तव्याचा उपयोग केला जाई. जळणासाठी सुकलेली पानं, निवडुंग, मक्याची सालं वापरत. पोटापाण्यासाठी आस्तेक शेतीबरोबर मासेमारी करीत.


पुढील भाग: मेसोअमेरिका [भाग १०] : आस्तेक
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- UNESCO Website : http://whc.unesco.org/pg.cfm?cid=31&id_site=415
आस्तेक
२५ फेब्रुवारी १९७८ ची मध्यरात्र. मेक्सिको सिटी नगरपालिकेच्या वीज कामगारांचं नेहमीप्रमणे खोदकाम चालू होतं. ‘झोकालो’१ च्या आसपास खोदकाम करता करता अचानक २ मीटर खोल अंतरावर सुमारे ८ टन वजनाचा अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला दगड कामगारांना सापडला. त्यानंतर लगोलग मेक्सिको सिटी आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालं आणि यातूनच आस्तेकांबद्द्लची बरीच माहिती उजेडात आली. हा शोध फक्त मेसोअमेरिकाचं नव्हे तर जागतिक पुरातत्त्वक्षेत्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. युनेस्कोने या स्थळाला १९८७ मध्ये आपल्या यादीत स्थान दिलं. मेक्सिको सिटीच्या भूभागात लपलेली ही जागा होती आस्तेकांनी वसवलेलं शहर ‘तेनिच्तीत्लान’.
खोदकाम करतांना सापडलेला दगडी अवशेष होते एका मंदिराचे, ‘तेंप्लो मायोर’चे२.
त्याचं झालं असं, स्पॅनिशानी सत्ता काबीज केल्यावर धर्मप्रचाराचा भाग
म्हणून आस्तेकांच्या सर्व खुणा पुसून टाकायला प्रारंभ केला. यातच बळी पडलं
आस्तेकांचं सुंदर शहर तेनिच्तीत्लान. कोर्तेसने त्याच्या बाजूने हरतऱ्हेने
प्रयत्न करून या शहरची धूळधाण उडवली. पण या शहराचं बांधकाम इतकं प्रचंड
होतं की ते संपूर्ण नामशेष करणं त्याला शक्य झालं नाही. शहराचा बराचसा भाग
जमिनीत गडप झालेला होता किंबहुना आजही बराचसा भाग अज्ञात आहे.
हे तेंप्लो मायोरचं कल्पनाचित्र आहे. प्रत्यक्षात त्याचे फारच कामी अवशेष शिल्लक आहेत. आस्तेकांच्या धार्मिक कार्याच्या दृष्टीने तेंप्लो मायोरचं महत्त्व फार. तेंप्लो मायोर हे खरं तरं स्पॅनिशांनी दिलेलं नाव. आस्तेक या देवळाला ‘कोतेपेक’ म्हणजेच ‘सर्पांची टेकडी असं संबोधत. देवळाचा मधोमध गोल आकारात ‘केत्झ्ल्कोत्’ या सर्पदेवाचं देऊळ होतं आणि त्यापुढे Huitzlipochtli म्हणजेच सुर्यदेवाचा भलामोठा पिरॅमिड. आतून मातीने बनलेल्या या पिरॅमिडवर वरून विविध रंगाच्या फारश्या बसवलेल्या होत्या. साधारण १०० फुट उंच असा हा पिरॅमिड एकावर एक असा सात टप्प्यात बांधला गेला. प्रत्येक आस्तेक राजा सत्तेवर आल्यावर जुन्या पिरॅमिड्वर नवीन पिरॅमिड बांधून विस्तार करत असे. पिरॅमिड्च्या आसपास बोल कोर्ट तसंच धर्मगुरुंच्या निवासची सोय होती. या पिरॅमिडच्या डाव्याबाजूस कवट्यांची भिंत होती तिला ‘त्सोम्पान्त्मी” अस म्हणतं. नरबळीचे मस्तक या भिंतिंवर खोचले जाई. ही तेंप्लो मायोर मधली खर्या कवटयांची भिंत.

प्रत्यक्षदर्शी स्पॅनिश सैनिकांनी अशा भिंतींची वर्णनं लिहून ठेवली आहेत. अशाच एका भिंतीवर स्पॅनिशांनी जवळजवळ ६०००० कवट्या मोजल्या होत्या. कवटीच्या कानातून सळी आरपार घालून भिंतीमधे खोचत असत. या कवटया साधारणपणे युद्धकैदी किंवा बॉलगेममधे जिंकलेल्या खेळाडूंच्या असत. भिंतीत कवट्या खोचण्याची प्रथा आस्तेकांच्या आधी तोल्तेक आणि मिहतेकांपासून सुरू झाली. अशा प्रकारे बळी जाऊन स्वतःची कवटी भिंतीत खोचूण घेणं फार प्रतिष्ठेचं मानलं जाई. असं मरण म्हणजे देवाची सेवा करायची संधी मिळणं असा आस्तेकांचा समज होता. आस्तेक कोडेक्स मधलं हे एक Skull Rack चं चित्र :

तेंप्लो मायोरचं आस्तेक समाजजीवनातलं महत्त्व अधिक जवळून समजून घेण्यासाठी आस्तेकांच्या धार्मिक परंपरा समजून घेऊ. आस्तेक लढवय्ये, शूर होतेच पण त्यांच्यावर धर्माचा पगडा खूपच जास्त होता. धर्मगुरू हे सर्वेसर्वा. अगदी राजावर ही त्यांची सत्ता चाले. मूल जन्माला आल्यापासून धार्मिक रीतीरिवाज चालू होत असत. जन्मलेलं मूल जर मुलगा असेल तर त्याला लहानपणापासून सैनिकी शिक्षण देण्यात येई. कारण समाजात सैनिकाचा मान मोठा. धार्मिक रीतीरिवाजांचं शिक्षण देवळात धर्मगुरुंच्या देखरेखीखाली होई. त्यामुळे एकूणच धार्मिक गोष्टी लहानपणापासुन मनावर बिंबवल्या जात. सैनिकी शिक्षण घेताना शारीरिक यातना सहन करण्याचं शिक्षणही त्यांना देण्यात येई.
आस्तेक मुख्यत्वे युद्ध राज्यविस्तारासाठी न करता युद्धकैदी मिळवण्यासाठी करीत. युद्धात हारजीत महत्त्वाची नसून जास्तीत जास्त युद्धकैदी पकडून आणणाऱ्या सैनिकास मान मिळत असे. युद्ध करताना शत्रुपक्षातील सैन्याला ठार न मारता शक्य तितक्या इजा करून जेरबंद करायचं अशी योजना असे. मग असे जायबंदी झालेले युद्धकैदी देवापुढे बळी देत असत. मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे आस्तेक समजुतीनुसार आजवर पाच सूर्य झाले. त्यातले चार सूर्य इतर देवांशी लढताना नाश पावले. आताचा सूर्य हा पाचवा सूर्य आणि त्याचं रक्षण करणं हे आदयकर्तव्य. सूर्याला जास्तीत जास्त बळी देऊन सामर्थ्यवान बनवणं हे प्रत्येक आस्तेकाचं जीवितकार्य मानलं जाई.
तेंप्लो मायोरच्या मधोमध असणार्या पिरॅमिडवर सूर्यदेवाचं देऊळ होतं. युद्धकैद्यांचे बळी तिथे दिले जात. बळी देण्याचा विधी धर्मगुरुंच्या आज्ञेप्रमाणे व रितिरिवाजांनुसार होत असे. पकडून आणलेलं युद्धकैदी खास सणांसाठी राखून ठेवत ज्या सैनिकाने युद्धकैदी आणला असेल त्याच्या घरी साध्या सैनिकी वेशात कैदयाला पिंजर्यात डांबून ठेवलं जाई. त्याचा मालक त्याची देखभाल करे. त्याच्या जखमा भरल्या जात, त्याला भरपूर खायला देत. असा कैदी घरात असणं ही प्रतिष्ठेचं बाब. कैद्याची योग्य ती देखभाल केल्यानंतर सणाच्या दिवशी त्याला सजवून वाजतगाजत यात्रा काढून त्याला मुख्य पिरॅमिडवर नेत. तिथल्या एका मोठ्या चौथऱ्यावर त्याला आडवं झोपवलं जाई. धर्मगुरू मंत्रपठण करीत. चार धर्मगुरू बळीचे हातपाय पकडीत तर पाचवा धर्मगुरू डोकं. सहावा धर्मगुरू युद्धकैद्याची छाती फाडून त्याचं हृद्य बाहेर काढी. हे थडथडतं ताज हृद्य सुर्याला अर्पण केलं जाई.

ह्र्दय काढल्यानंतर उरलेला देह पिरॅमिड्वरून खाली ढकलून देण्यात येत असे, ज्यामुळे शरीरातील रक्त जमिनीवर सांडून धरणी सुजलांसुफलां होईल असा आस्तेकांचा समज होता.

हे मृत शरीर पिरॅमिड्च्या पायर्यांवरुन गडगडत खाली आलं की ते पुन्हा वाजत गाजत मालकाच्या घरी नेलं जातं असे. त्याचे रीतसर तुकडे केले जात. धड वेगळं करून नरभक्षक पशुपक्ष्यांना दिलं जात असे. शीर वेगळं करून भिंतीत लावण्यासाठी देवळात देत असत आणि हातपाय मालकाच्या घरी मेजवानीसाठी वापरात असत. पंजाचा मांसल भाग चवदार म्हणून खास पाहुण्यांसाठी राखून ठेवला जाई. आता उरलं ते प्रेताचं कातडं. मालक ते स्वत:भोवाती गुंडाळत असे. या सर्व प्रकाराला Cannibalism असंही म्हणतात.

निरनिराळ्या प्रसंगासाठी बळी राखून ठेवले जात. सुर्यग्रहणच्या दिवशी ग्रहण लवकर सुटण्यासाठी अपंग, कुबड आलेल्या माणसाचा बळी देण्यात येत असे तर Tezcatlipoca या देवासाठी तरुणाचा. या देवाला बळी देण्यासाठी वर्षभरआधी सुंदर, तडफदार तरुणाचा शोध घेण्यात येत असे. त्याला अकरा महिने राजासारखं वागवत. उत्तमोत्तम खाणंपिणं, तैनातीला सेवक अशी उत्तम बडदास्त ठेवण्यात येत असे. बाराव्या महिन्यात त्याच्या दिमतीला चार सुंदर स्त्रिया दिल्या जात आणि बाराव्या महिन्याच्या शेवटी वाजतगाजत त्याला बळी देण्यासाठी देवळात नेण्यात येत असे.
त्लालोक देवासाठी दोन भोवरे असलेली मुलं बळी देत असत तर काही क्वचित प्रसंगी बायकांचा बळी दिला जाई. मात्र तो गळा दाबून आणि त्यासाठी महिला धर्मगुरू असत. लहान मुलांचा बळी मुख्यत्वे पर्जन्यदेव tlaloques याच्यासाठी दिला जात असे. बळी देत असताना लहान मुलं घाबरून रडू लागत. मुलं जितक्या जोरात रडेल तितका जोरात पाऊस पडेल असा आस्तेकांचा समज होता.
आता या सर्व वर्णनावरून नकीच असा प्रश्न पडेल की हे सर्व कशासाठी? या प्रकाराला कोणी प्रतिकर का नाही केला. तर याला उतर एकच ‘धर्म’. एकदा का धर्मात एखादी गोष्ट सांगितली की ती करणं क्रमप्राप्त. कुठल्याही प्रकाराला विरोध करणं म्हणजे समाजाच्याचं नाही तर देवाच्या विरुद्ध जाणं. स्वत:हून हसत हसत मरण कवटाळणं म्हणजे पुरुषार्थ. मृत्युनंतरचं जीवन म्हणजे स्वर्गात पोचणं आणि एकदा का स्वर्गप्राप्ती झाली की कोणतचं दुख: उरत नाही. आस्तेक आईवडीलांवर धर्माचा पगडा इतका जबरदस्त होता की बळीसाठी आपलं मूल देणं हे त्यांना कर्तव्य वाटत असे. एकदा का मूल त्लालोक देवाकडे पोचलं की सर्व चिंता मिटली. स्वर्गात स्तनाची फळं असणारा वृक्ष आहे त्यामुळे आपल्या मुलांची दुधाची सोय आपसूकच होईल असा सार्वत्रिक समज होता. तसचं नरबळींना देवदूत मानलं जात असे. एकूणचं समाजावर कैक वर्षे कट्टर धार्मिक विचारांचा पगडा असल्याने या प्रथा स्पॅनिश आक्रमणापर्यंत चालू राहिल्या.
नरबळी देण्याचं मुख्य कारण धार्मिक प्रथाच. आस्तेकांच्या वैभवशाली काळात तेनिच्तीत्लानची लोकसंख्या जवळजवळ १० लाखांच्यावर होती. आस्तेक राजे बरेचदा आसपासच्या राज्यांवर आक्रमण करून भूभाग जिंकून घेत असत. मग जिंकलेल्या राजांकडून नरबळी देण्यासाठी युद्धकैदी मागून घेत असत. अनेकदा बरेच युद्दकैदी गोळा करून जिंकलेल्या राजाचं राज्य परत केलं जाई. तसचं या प्रथा आस्तेकांनी सुरू केल्या नसून त्या फार पुर्वीपासून अस्तित्वात होत्या फक्त आस्तेकांच्या राज्यात त्या जास्त फोफावल्या. सुरवातीला असे बळी क्वचित दिले जात. परंतु १५ व्या शतकात भयंकर असा दुष्काळ पडला. हा सूर्यदेवाचा प्रकोप असं मानून आस्तेकांनी शेजारच्या राज्याशी लढाई करून अनेक बळी दिले. कालांतराने ऋतुमान बदललं. परिस्थिती सुधारली आणि त्याचं श्रेय सुर्यदेवाला देऊन बळीची प्रथा तशीच चालू राहीली. पुढे स्पॅनिश सेनानी अर्नान कोर्तेसने त्याच प्रथांचा वापर मोठ्या खुबीने आस्तेकांविरुद्ध कसा केला ते पुढ्च्या काही लेखांमधे येईलच.




काही अवांतर नोंदी:
१. झोकलो : मुख्य चौक. मेक्सिको सिटीमधलं हे एक मुख्य ठिकाण.
२. तेंप्लो मयोर : Templo- देऊळ Mayor- महान
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- Everyday Life of Aztecs – Warwick Bray
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.
आस्तेक
इसवी सनातलं १५ वं शतक जागतिक इतिहासात मैलाचा दगड मानलं जातं. एकीकडे अतिपूर्वेला याच शतकात बांधलेल्या ‘फॉरबिडन सिटी” ने कित्येक अश्राप मुलींचं आयुष्य देशोधडीला लावलं तर भारतभूमीत विजनगरचं राज्य बहरलं, इकडे युरोपात विज्ञानाची कास धरून अनेक संशोधक प्रयोगात गुंतले असतांना स्पेन व पोर्तुगाल या दोन देशांमध्ये झालेल्या कराराने या दोन्ही देशांना युरोपाबाहेरच्या भूमीचे दरवाजे उघडे झाले. कॉन्स्टिंटीनोपलच्या पाडावामुळे युरोपियन देशांना नवीन व्यापारी मार्गाची गरज भासू लागलीच होती. तिकडे दक्षिणेकडे इंका माचूपिचु बांधण्यात गर्क होते.
इसवी सन पंधराव्या शतकात संपूर्ण जगात अनेकानेक घडामोडी घडत
असतांनाच १४९२ साली कोलंबसने स्पॅनिश राजाश्रयाखाली अमेरिका खंडाचा शोध
लावला आणि स्पेनसाठी या नव्या जगाचे दरवाजे उघडे झाले. त्यानंतर
स्पॅनिशांनी अनेकानेक योजना आखून या भागाकडे आपला मोर्चा वळवला. स्पेनमधून
नवीन जगाच्या शोधार्थ निघालेल्या सैन्यात एक सैनिक होता. “अर्नान कोर्तेस”.
अर्नान कोर्तेस म्हणजे संधिसाधू, कावेबाजपणा, अत्यंत टोकाची
महत्त्वकांक्षा, कॅथलिक धर्मावर अतोनात श्रद्धा पण त्याचबरोबर हुशारी,
धाडस, चिकाटी या गुणांचं एक अनोख मिश्रण असणारं व्यक्तिमत्त्व. सन १५११
साली क्युबाबरोबर झालेल्या लढतीत अतुलनीय कामगिरी करून तो सेनाधिकारी झाला.
पुढे सात वर्ष क्युबाचा अधिकारी म्हणून काम केल्यावर सन १५१९ मध्ये त्याने
आपला मोर्चा नुकताच शोध लागलेल्या मेक्सिकोच्या दिशेने वळवला.

याच सुमारास आस्तेकांचं राज्य प्रगतीच्या अत्त्युच्य शिखरावर होतं. लढावय्या, पराक्रमी आस्तेक राजांनी जीवाची बाजी लावून आपलं राज्य मोठं केलं. खडकाळ जमिनीत शेती फुलवली. अंगभूत कलागुणांचा वापर करून विविध शिल्प, इमारती घडवल्या. आस्तेक राजांना ‘मोंतेझूमा’ म्हणत. पंधराव्या शतकाच्या सुमारास मोंतेझुमा दुसरा हा अतिपराक्रमी पण देवभोळा आस्तेक राजा राज्य चालवित होता. स्पॅनिशांनी अनेक ठिकाणी त्याची वर्णन लिहून ठेवली आहेत. आस्तेक यशाच्या अत्युच्च शिखरावर असतांना त्याच्याकडे अगणित सोनं, रत्ने, हिरे, माणकं होती. त्याला आठ मुली व अकरा मुलं होती. त्याची ‘केत्झलकोइत्ल’ या नागदेवावर अपार श्रद्धा. आपल्याला पडणारर्या प्रश्नांची उत्तरं धर्मात शोधायची सवय धर्मभोळ्या आस्तेकांना होती. त्यातूनच अनेक आख्यायिका तयार झाल्या.

केत्झलकोइत्ल देवाची ही अशीच एक आख्यायिका. केत्झलकोइत्ल हा महत्त्वाचा देव असला तरी Tezcatlipoca नावाच्या
अजून एक लढाऊ देवाची उपासना चाले. या दोन देवांच्या उपसाकांमध्ये आपापसात
वैर होतं. त्यांच्या आपापसात बरेचदा लढाया होतं. अशाच एका लढाईत अखेर
‘तोपित्ल्झीन’ या केत्झलकोइत्ल भक्त राजाचा पराभव झाला आणि त्याला आपलं
राज्य सोडावं लागलं. राजाने नाईलाजाने राज्य सोडलं. त्याने सापांचा तराफा
केला आणि समुद्रामार्गे पूर्वेस पळून गेला. पण जाताना “मी नाईलाजाने जात
असलो तरी भविष्यात परत येईन आणि माझं राज्य काबीज करेन” असं आश्वासन
प्रजेला दिलं. पुढील कित्येक पिढ्या या आख्यायीकेचा प्रभाव लोकांवर होता.
पुढच्या अनेक राजांनी तोपित्ल्झीनची वाट पाहिली. आस्तेकांचा तत्कालीन राजा
मोंतेझुमा दुसरा हा ही आपल्या राजाची आतुरतेने वाट बघत होता.
इकडे
अर्नान कोर्तेसने ६०० सैनिक व काही घोडे असं तुटपुंजं सैन्य व प्रचंड
महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून मेक्सिकोच्या दिशेने प्रवास चालू केला. तो
सर्वप्रथम मेक्सिकोच्या पूर्व किनाऱ्यावर उतरला. त्याने तिथे येशूच्या
नावाने क्रॉस उभा केला आणि तो प्रदेश स्पॅनिश राजाच्या नावे घोषित केला.
त्याच नाव त्याने वेरा क्रुझ (Vera Cruz – अर्थ : True Cross) असं ठेवलं.
त्यानंतर त्याने आस्तेक राजधानी तेनोचीत्लानच्या दिशेने कूच करण्यास
प्रारंभ केला. वाटेत मोठ्या हुशारीने आस्तेक शत्रू राज्यांशी त्याने
मैत्री केली. आस्तेक नेहमीच बळींसाठी आसपासच्या राज्यांबरोबर लढाई करीत.
सततच्या लढाईने ही राज्यं बेजार झाली होती. त्यांनी ही लागलीच मदतीचा हात
पुढे केला. त्यातलं एक महत्त्वाचं नाव Tlaxcala या राज्याच्या राजाने कोर्तेसला सैन्य व इतर बऱ्याच गोष्टीची मदत देऊ केली.
हळूहळू आस्तेक राजाच्या कानावर या बातम्या तसंच कोर्तेसचं वर्णन
कानी पडू लागलं. अर्नान कोर्तेस हा स्पॅनिश रक्ताचा गौरवर्णी, शरीरयष्टी
कमावलेला, रुबाबदार सैनिक. तसंच तो घोड्यावर मांड टाकून फिरत असे. एकतर
आस्तेकांसाठी घोडा हा कधीही न पाहिलेला प्राणी त्यात भर म्हणून कोर्तेस व
स्पॅनिश सैन्याची रुबाबदार देहयष्टी. त्यातून द्रष्ट्या कोर्तेसने
मेक्सिकोच्या भूमीत प्रवेश केला तो पूर्वेच्या दिशेने – ज्या दिशेला
आस्तेकंचा राजा पळून गेला होता. या सगळ्याचा यथोचित परिणाम मोंतेझुमावर
झाला आणि त्याला कोर्तेस म्हणजे वर उल्लेख केलेल्या आख्यायिकेतला राजा वाटू
लागला. घोडयावर बसलेलं स्पॅनिश सैन्य आस्तेकांना माणसाचं डोक असलेलं जनावर
वाटे. हा अजब प्रकार शूर आस्तेकांच्या मनात धडकी भरु लागलं.
आस्तेक राजा घाबरला तर होताच पण त्याला आपला राजा आता परतून आपलं
राज्य परत घेणार असंही वाटू लागलं. त्याला लढाई टाळायची होती. त्याने
लागलीच कोर्तेस व त्याच्या सैन्याच्या स्वागतार्थ संदेश व अमूल्य अशा भेटी
आपल्या सेवकांच्या हाती पाठवल्या. त्याची उत्तम बडदास्त ठेवली. हुशार
कोर्तेसनंही त्याच्या अंधश्रद्देला स्वत:ला राजाचा अवतार भासवून चांगलंच
खतपाणी घातलं. मोंतेझुमाने कोर्तेसला आपला राजा समजून पाठवलेल्या संदेशातला
हा देवाचं गुणगान गाणारा हा आस्तेक भाषेतला काही भाग.
“Our lord, thou hast suffered fatigue, thou hast endured weariness. Thou hast come to arrive on earth. Thou hast come to govern thy city of Mexico; thou hast come to descend upon thy mat, upon thy seat, which for a moment I have guarded for thee. For thy governors are departed – the rulers Itzcoatl, Montezuma the Elder, Axayactl, Tizoc, Auitzotl, who yet a very short time ago had come to govern the city of Mexico. O that one of them might witness, might marvel at what to me now hath befallen, at what I see now that they have quite gone. I by no means merely dream, I do not merely dream that I see thee, that I look into thy face. I have been afflicted [troubled] for some time. I have gazed at the unknown place whence thou hast come – from among the clouds, from among the mists. And so this. The rulers departed maintaining that thou wouldst come to visit thy city, that thou wouldst come to descend upon thy mat, upon thy seat. And now it has been fulfilled; thou hast come. Thou hast endured fatigue, thou hast endured weariness. peace be with thee. Rest thyself. Visit thy palace. Rest thy body. My peace be with our lords….”
आस्तेकांच्या मानाने स्वत:जवळ असलेल्या तुटपुंज्या लष्करी ताकदीची
कोर्तेसला पूर्ण कल्पना असूनही अफाट महत्त्वाकांक्षेच्या जोरावर कोर्तेस
मिळालेल्या भेटी स्वीकारून पुढे मार्गक्रमण करीतच राहिला. आस्तेकांच्या
नृशंस रुढींचा बिमोड करून ख्रिश्चन धर्म प्रस्थापित करण्यासाठी आपली देवाने
योजना केली आहे असा त्याचा समज होता. त्याने कधी वाटेतले आस्तेकांचे शत्रू
जिंकून घेतले तर कधी त्यांच्याशी तह केला. जिंकून घेतलेलं सैन्य आपल्या
सैन्याला जोडलं. आपण दिलेल्या भेटी स्वीकारून सुद्धा कोर्तेस चाल करून
येताना दिसल्यावर मोंतेझुमाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याने आपलं
सैन्य शहराच्या वेशीवर तैनात केलं. चतुर कोर्तेसने चाल करून येण्याआधी या
भागाचा चांगलच अभ्यास केला होता. सीमेवर राजा सैन्य तैनात करणार याची
थोडीफार कल्पना होती. यावर उपाय म्हणून त्याने Popocatepetl पर्वताच्या खिंडीतून मोठ्या धाडसाने आपलं सैन्य शहरात उतरवलं.

राजधानीत उतरल्यावर कोर्तेसने मोंतेझुमाची भेट घेतली. यावेळी ही राजा गाफील राहिला आणि पुन्हा कोर्तेस आणि त्याच्या सैन्यासाठी अमूल्य भेटी आणल्या.

या चित्रात अर्नान कोर्तेस आणि मोंतेझुमा भेट आपल्याला दिसेल .कोर्तेसच्या मागे उभी असलेली स्त्री म्हणजे “मालिंचे” अर्नान कोर्तेसची दुभाषी, सल्लागार, विश्वासू सेवक. तिचं खरं नाव Malinalli. कोर्तेसला चढाई करण्यापूर्वी या भूभागाची माहिती मिळवण्यासाठी आस्तेक भाषा नौवात्ल जाणणारा विश्वासू सेवक हवा होता. त्यातूनच कुणीतरी मालिंचेचं नाव पुढे केलं. कोर्तेसने तिची हुशारी बघुन स्वत:ची दुभाषी म्हणुन नियुक्त केलं. या आस्तेक मुलीला कोर्तेसने मोठ्या हुशारीने जवळ केलं. तिचं नाव त्याने बदलून ‘मरिना’ असं केलं. मरिनानेही आपल्या मालकावर जीव ओवाळून सर्वतोपरी मदत केली. तिच्याच मदतीमुळे कोर्तेसला आस्तेक रुढी, अंधश्रद्धा, शहरातल्या खाचाखोचा समजल्या.
मोंतेझुमाने आपल्या भेटीत कोर्तेसला आक्रमण थांबवून परत जायची
विनंती केली. कोर्तेसनंही ती मान्य केली. परंतु लागलीच काही दिवसात
राजवाड्यावर स्वारी करून त्याने राजाला बंदी केलं. त्याबदल्यात जनतेकडून
त्याने पुन्हा अनेक मौल्यवान भेटी लुटल्या. वर्षभर राजाला कैदेत ठेवल्यावर
आस्तेक जनतेचा प्रतिकार तुटपुंज्या सैन्यासमोर भारी पडू लागल्यावर त्याने
राजाला सोडलं. पण अतिमहत्त्वाकांक्षा आणि आस्तेकांची संपत्ती त्याला स्वस्थ
बसू देईना. त्याने आसपासच्या स्पॅनिश वसाहतींमधून मदत घेऊन पुन्हा एकदा
आस्तेकांवर चढाई केली. या वेळेस त्याने राजाला बंदी केलं. Bernal Diaz del Castillo या
कोर्तेसच्या सैन्यातील सैनिकाने लिहिल्याप्रमाणे कोर्तेसने राजाला १ जुलै
१५२० ला आपल्या राजवाड्याच्या सज्जात नेऊन प्रजेला मागे हटण्याचं आवाहन
करायला सांगितलं. आस्तेकांसाठी राजा म्हणजे देवाचा अवतार. त्यांचा
रक्षणकर्ता. राजाने अशी हार मानणं त्यांना रुचलं नाही आणि त्यांनी
त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. या मारामुळे राजा जबर जखमी झाला व तीनच
दिवसात त्याचा मृत्यू झाला. आस्तेक जनतेने Cuauhtémoc हा नवीन राजा नेमला. त्यालाही कोर्तेसने मारून आस्तेकांची सत्ता काबीज केली
अत्यल्प लष्करी ताकद असतांना ही कोर्तेसने चतुराईने आस्तेकांचा
पाडाव केला. मुळात आस्तेक युद्ध राज्यविस्तारासाठी न करता युद्धकैदी
मिळवण्यासाठी करीत. युद्धात हारजीत महत्त्वाची नसून जास्तीत जास्त
युद्धकैदी पकडून आणणाचा मान मोठा. त्यामुळे त्यांच्या सैन्यात शिस्त,
विजीगिषु वृत्ती कमीच. त्याउलट स्पॅनीश सैन्य शिस्तबद्ध. आस्तेक धनुष्यबाण
वैगेरे प्राथमिक स्वरूपातील हत्यारं वापरीत तर युरोपात बंदुकीचा शोध तोवर
लागला होता. अर्नान कोर्तेस सारखा चतुर आणि धाडसी नेता स्पॅनिश सैन्याला
लाभला होता. कोर्तेसच्या धाडसाची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे. आस्तेकांशी
लढतांना जेव्हा दारुगोळा संपत आला तेव्हा तो पूर्वेकडून ज्या Popocatepetl पर्वताच्या
ज्वालामुखीच्या रस्त्याने आला त्या ज्वालामुखीत त्याने पाच धाडसी सैनिक
पायाला दोर बांधुन तेरा वेळा उतरवले आणि गंधक गोळा करुन दारुगोळा बनवला.
सत्ता हातात आल्यावर कोर्तेसने सर्वप्रथम धर्मप्रचार हाती घेतला.
स्पॅनिश धर्माप्रचाराकांनी मेसोअमेरिकन लोकांचा मूळ धर्म धाब्यावर बसवला.
मंदिरे मोडून त्याठिकाणी चर्च उभी केली. लोकांना ख्रिश्चनन धर्माची
सामुदायिक दीक्षा घ्यायला लावली. ज्यांनी विरोध केला त्यांची कत्तल केली.
त्यांच्या नरबळी सारख्या प्रथा हिंस्त्र मानून साम-दाम-दंड-भेद हरतऱ्हेचा
वापर करून त्यांच्या ग्रंथांची, हस्तलिखितांची धूळधाण उडवली. जगाच्या
पाठीवरील एक जुनी संस्कृती हळूहळू लोप पावू लागली.
संपूर्ण अमेरिका खंडावर या घटनेमुळे निश्चीतच परिणाम झाला. पुढे
स्पॅनिश अजून खाली दक्षिणेत उतरले. अशाच युक्त्याप्रयुक्त्या वापरून
त्यांनी ‘इंकां’ चं राज्य घशात घातलं. उत्तरेला त्याने कॅलिफोर्निया आणि
मेक्सिको किनाऱ्यालगतचा प्रशांत महासागराचा भाग शोधून तो भाग स्पॅनिश
अधिपत्याखाली आणला. सन १५३६ साली स्पॅनिश संशोधक Francisco Vásquez de Coronado ने
मेक्सिकोतला काही भाग शोधकार्यासाठी स्वत:च्या हातात अधिकर घेतले आणि
वैतागलेला कोर्तेस स्पेनला परतला. त्याने कोर्टात आपल्या हक्कसाठी केस
ठोकली. स्पेनच्या राजाने त्याच्या कामगिरीबद्दल त्याचा यथोचित गौरव केला
परंतु त्याने जिंकलेल्या भागावर त्याचा मालकी हक्क नाकारला. नाराज
कोर्तेसने निवृत्ती घेऊन आपलं उर्वरित आयुष्य स्पेनमध्ये व्यतीत केलं.
१९ व्या शतकात फादर मिगेल हिदाल्गोच्या नेतृत्वाखाली मेक्सिकन
जनतेने उठाव करून ३०० वर्षांची स्पॅनिष सत्ता उलथवून लावली. ३०० वर्ष
स्पॅनिशांनी ज्या संस्कृतीचा नायनाट करण्यात आपली शक्ती खर्च केली त्या
संस्कृतीचे जमिनीत गडप झालेले अवशेष आपल्या पाउलखुणा कधीच विसरू देणार
नाहीत. जगातल्या इतर महान संस्कृतींप्रमाणेच मेसोअमेरिकेची संस्कृती थोडी
कमी लोकप्रिय का होईना पण खचितच महान होती.
थोडं अवांतर…..
१ तेओतिव्हकान : मेसोअमेरिकेच्या
इतिहासाची ओळख करुन घेतांना ‘तेव्होतिव्हाकान”ला टाळता येणं अशक्य.
मेक्सिकोला भेट देणार्या पर्यटकांची ही पहिली पसंती. तेओतिव्हकान या
शब्दाचा अर्थ ‘जिथे देवाची भेट घडते अशी जागा’ (where man met the gods)
किंवा ‘माणूस देव बनतो अशी जागा’. आस्तेक राजधानी तेनोचीत्लान (आजची
मेक्सिको सिटी) पासून अगदी जवळच असलेलं हे ठिकाण सुमारे इ.स. पूर्व २००
वर्ष अस्तित्त्वात होतं. या शहराचा निर्माता जरी अज्ञात असला तरी
आस्तेकांना ते साधारणपणे इ.स १३०० व्या शतकाचा आसपास सापडलं. या शहरातील
भव्यदिव्य बांधकाम डोळे दिवपवून टाकणार होतं. आस्तेकांना तर ते कुण्या दैवी
शक्तीनेच बांधलं असावं असं वाटलं. तेओतिव्हकानची रचाना इतर मेसोअमेरिकन
शहरांसारखीच. केत्झालाकोएत्ल आणि त्लातोक देवाची देवळं, राजा व धर्मगुरुंचे
राजवाडे. पण नजरेत भरण्यासारखे आहेत ते इथले अतिभव्य चंद्र व सूर्य
पिरॅमिड. तेओतिव्हकान आस्तेकंचं सर्वात मोठं धार्मिक ठाणं होतं. या शहरात
साधारण २००० निवासी घरं, ६०० छोटेमोठे पिरॅमिड्स, अनेक देवळं, अनेक चौक,
सरकारी कचेर्या होत्या. ५०० छोटी मोठी घरं व्यापारी आणि कलावंतांसाठी
राखून ठेवलेली होती.
हा सूर्य पिरॅमिड.

२. कोर्तेसला भेटी देणारे आस्तेक :

(३) नुकताच वाचनात आलेला मेसोअमेरिकेबाबच्या माहीतीचा आंतरजालावरील दुवा
संदर्भ :
- मेक्सिकोपर्व – मीना प्रभू : Meena Prabhu, (1 January 2008). Mexicoparva, MOUJ PRAKASHAN.
- Phillips, C., & Jones, D. M. (2005). The lost history of aztec & maya: The history, legend, myth and culture of the ancient native peoples of Mexico and Central America. London: Hermes House.
- The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
- Everyday Life of Aztecs – Warwick Bray
लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.