Thursday, February 29, 2024

https://omkarkelkar.blogspot.com

 

किल्ले नगरदेवळा आणि पारोळा


किल्ले नगरदेवळा

दुसऱ्या दिवशीचं पहिलं ठिकाण होतं नगरदेवळा. पहिल्या दिवशी कन्हेरगड पाहून झाल्यावर आमचा मुक्काम चाळीसगाव गावातच होता. इथून साधारण तीस किलोमीटर अंतरावर हे नगरदेवळा गाव आहे. “देवळांचे नगर” म्हणून नगरदेवळा. अशी ओळख असलेले गाव “अग्नावंती” नदीकाठी आहे. गावाजवळच अग्नावंती धरणही आहे. या गढीचे मालक असलेले पवार घराणे हे “धार” घराण्याचे आहेत.

मूळ धार प्रांतातील “परमार” घराण्याचे वंशज “साबूसिंग पवार” हे या घराण्याचे मूळ पुरुष म्हणून ओळखले जातात. हे शिवाजी महाराजांच्या कल्याण स्वारी वेळी स्वतः त्यांच्याबरोबर होते. त्यांचेच वंशज पुढे राजाराम महाराज यांच्या बरोबर होते तर पुढील वंशज पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या बरोबरही होते. स्वराज्य स्थापनेपासूनच मराठा साम्राज्याच्या इमानीत असलेले हे घराणे स्वतंत्र भारतात संस्थाने खालसा होईपर्यंत आपला अंमल इथे राखून होते. अजूनही या घराण्याचे वंशज इथे राहतात.

“देवळांचे नगर” - नगरदेवळा

सकाळी साडेसातच्या सुमारास इथे आम्ही दाखल होतानाच “नगरदेवळा” नावाचा प्रत्यय आला. अगदी खरंच इथे लहान-मोठी अशी मंदिरच मंदिर आहेत. नगरदेवळा ही गढी असली तरी ह्याचे स्वरूप साधारण नगरकोटा सारखेच होते. हा नगरकोट साधारण बारा एकर मध्ये पसरलेला होता तर आत मध्ये तीन एकरात गढी आणि त्यात खासे पवार यांचा वाडा असे ह्याचे स्वरूप होते.

देवळं बघत-बघत गढीकडे निघालो तर एक बुरुज दिसला. नगरकोटाच्या पाच बुरूजांपैकी शिल्लक हा एकमेव बुरुज – “फत्ते बुरूज”.

फत्ते बुरूज

नगरकोट म्हटलं म्हणजे त्यात राहती घरे आलीच. ह्या बुरुजाला लागून पण घरं आहेत. लागूनच गोठ्यासारखी गुरांसाठी जागा केलेली दिसली आणि तिथे दावणीला बांधलेल्या म्हशींशेजारून वाट काढत बुरुजावर पोचलो. बुरुजाच्या आतमधून छान पिंपळाचं झाड डोकं वर काढून उभं होतं आणि बुरुजाच्या भिंतीवर या झाडाच्या सावलीत एक कबरही दिसली. इथून समोरच पाण्यासाठी बांधलेली भिंत दिसते त्याला “नगरदुर्ग बंधारा” असे म्हणतात. बुरुजावरुन पलीकडे खालच्या बाजूला नजर गेलीआणि जरासं वाईट वाटलं. इथे ती स्कीम नाहीये ना की, “करणाऱ्याला” शंभर रुपये दंड आणि सांगणाऱ्याला पन्नास रुपये बक्षीस! वाईट यासाठी की इथे आमचं दोन चारशे रूपयाचं नुकसान झालं. सहज कमाई झाली असती. असो...

गणेश दरवाजा

तर नंतर पहिला दरवाजा आम्हाला दिसला. हा “गणेश दरवाजा”. दरवाजाची मोठी बांधीव कमान आता सिमेंटने प्लॅस्टर वगैरे केलेली आहे. रंगकामही झालेले आहे. पण त्या पुढची, आतली दरवाजाची लाकडी कमान मात्र शाबूत आहे. कमानीवर नक्षीही कोरलेली आहे.

भडगाव दरवाजा

त्यानंतर जो दरवाजा दिसला तो “भडगाव दरवाजा”. हाही आता रंगवलेला असून एका बाजूला श्रीराम, तर दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज यांचे पोस्टर चिकटवलेले दिसले. याच्यातली लाकडी कमान मात्र बऱ्यापैकी तुटलेली आहे.

झेंडा बुरुज

दरवाजे बघून गढीकडे जात असताना, घरांच्या रांगेत मध्येच उभा अतिशय सुंदर बुरुज दिसला, जो “झेंडा बुरुज”. बुरूजावरचा झेंडा याचं नाव जणू अधोरेखित करत होता. याला अतिशय सुंदर झरोके असून त्याच्यावरच्या कमानी रेखीव आहेत. साधारण शेजारची घरं ज्या उंचीची आहेत, म्हणजे साधारण १५ फुटापर्यंत, तिथला भाग दगडात बांधलेला आहे तर वरचा भाग हा भाजीव विटांत आहे. दगडी बांधकाम मजबूत असलं तरी वरच्या विटांच्या भागात आलेले वडाचे झाड आता या बुरुजाला धोकादायक आहे. बुरुजाला लागून असलेली गढीची तटबंदी मात्र शाबूत आहे.

मारुती बुरुज

पुढे उंचीने थोड्या लहान बुरुजात मारुतीराय संरक्षणासाठी सज्ज दिसले. ह्याही बुरुजाची रचना झेंडा बुरुजा सारखीच आहे, फक्त उंची थोडी कमी आणि कमानी नक्षीदार नाहीत. बुरूजावरचा हनुमान ह्या बुरूजाचं नांव स्पष्ट करत होता - “मारुती बुरुज”!


गढीचा पुर्वाभिमुख दरवाजा
दरवाजावर नगारखाना, वर जायला पायऱ्या, सुरक्षिततेसाठी कठडा

बुरुज ओलांडून पुढे गढीतल्या पवार वाड्यात शिरताना वाड्याचा शाबूत असलेला दरवाजा लागतो. हा दरवाजा पुर्वाभिमुख असून भक्कम आहे. कमान नक्षीदार आहे. दरवाजावरील नगारखाना आजही सुस्थितीत असून त्याला तीन कमानीदार खिडक्या आहेत. हा दरवाजा पाहण्यासारखा आहे. उंचीला फार मोठा वगैरे नसला तरी भिंत चांगलीच रुंद असून आत मध्ये घोड्याच्या पागा आहेत. आतल्या बाजूने वरच्या नगारखान्यात जायला पायऱ्या आहेत. या नगारखान्याच्या बाहेरून बुरुजावरच दरवाजाच्या बाजूला सुरक्षिततेसाठी कठडा केलेला आहे, जो नक्षीदार आहे.

घरांचा सामाईक चौथरा, नक्षीदार खांब

हे बघत बघत घरांच्या रांगेजवळून जाताना दिसले की, सगळ्या घरांचा चौथरा सामाईक आहे. जो दगडात आहे. त्यावर नक्षीदार दगड देखील आहेत. त्यावर चढायला पायर्‍या दगडी आहेत, तर घरासमोरचे खांब लाकडी असून तरी त्यालाही खाली मजबूत दगडी बैठक आहे. सर्व लाकडी खांबांवर नक्षी आणि अतिशय बारीक, सुंदर अशी कलाकुसर आहे. इतरत्र नक्षीदार दगडही पडलेले दिसतात. पुढे एक विहीरही आहे, जी अजूनही वापरात आहे.

मुख्य वाडा
खांबावरच्या नक्षी

मुख्य वाड्यासमोर पोचलो. या वाड्यात त्यांनी विद्यार्थी वसतीगृह केलेलं असून खांब आणि भिंतींना रंगरंगोटी केलेली आहे. खांबावरच्या नक्षी तर आपण टाळूच शकत नाही. थांबून निरीक्षण केल्याशिवाय इथून पुढे जाणं शक्य होत नाही.

नक्षीदार दरवाजे

सध्या इथे दीपक पवार साहेब राहतात, ज्यांनी आम्हाला उत्साहाने सगळा वाडा दाखवला. आतील दरवाजे बारीक कलाकुसरीने भरलेले आहेत. आत मध्ये सुंदर तुळशीवृंदावन आहे. हे बघून झाल्यावर ते आम्हाला बाहेरील परिसर दाखवायला आले. वाड्यासमोरील भागातच एक कबर आहे.

झेंडा बुरुज

आम्ही इथून झेंडा बुरुजाकडे गेलो. गढीच्या बाहेरून येताना हा बुरुज बघितला होताच. पण आतील बाजूने बघताना बुरुजावर जाण्यासाठी असलेला रस्ता लक्षात आला. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. लहानश्या उंचीच्या दरवाजातून या गोलाकार पायर्‍या आपल्याला बुरुजावर घेऊन जातात.

बुरुजावर जाण्यासाठी गोलाकार पायर्‍या

या बुरुजावर बळी द्यायची प्रथा पूर्वापार होती. सन २०१२ पासून बंद केली गेली आहे. बळी देण्यासाठी खास जागाच आहे ह्या बुरुजावर. हा बुरुज सर्वात उंच असून गढीचा सगळा परिसर डोळ्याखालून घालता येतो.

महिलांचे शृंगार साहित्य
कट्यार
तलवारी

पूर्वजांच्या पराक्रमाच्या खुणा, अशी काही हत्यारं या घराण्याकडे आहेत. कट्यार, नाणी, तलवारी, गंजिफा, भांडी या वस्तूंबरोबर दुर्मिळ अशी विष्णूचे दशावतार कोरलेली एक तलवारही आहे. जे सगळं सध्या त्यांनी “जळगांव विद्यापीठाला” संग्रहालयात ठेवण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे पूर्वजांच्या पराक्रमाची खुणा असलेला हत्यारांचा ठेवा आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही. पण तरीही धैर्यशील पवार साहेब यांनी आम्हाला फोटोतून हे समाधान दिले आणि फोटो ब्लॉग वर वापरायची परवानगी दिली.

ग्रासलं जात असलेलं चंद्रासमान भासणारे सूर्यबिंब

नऊ वाजले होते. पूर्ण गढी बघून पवार साहेबांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. दिनांक २६ डिसेंबर २०१९. त्या दिवशी होते सूर्यग्रहण. नेहमी तेज:पुंज असलेले सूर्यबिंब, ज्याच्याकडे या वेळी डोळ्यांनी बघताही येऊ शकले नसते ते ग्रासले जात असल्याने चंद्रासारखे भासत होते. अर्थात नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पहायचे नसते, परंतु कॅमेरात बघणे मात्र शक्य होते आणि एक सुंदर फोटोही निघाला. नगरदेवळाला निरोप देऊन निघालो ते “किल्ले पारोळा”कडे!

किल्ले पारोळा

पारोळा हे गाव धुळे आणि जळगाव यांच्यामध्ये येतं. हे गाव धुळे शहरापासून साधारण ४० किलोमीटर तर जळगाव पासून ३५ किलोमीटरच्या आसपास मध्ये आहे. नगरदेवळा पासूनही साधारण ४० किलोमीटर. आम्ही इथे साधारण साडेदहाच्या सुमारास दाखल झालो. हा भुईकोट किल्ला अगदी भर बाजारपेठेत आहे.

इतिहासात डोकावलं तर “जहागीरदार हरी सदाशिव दामोदर” यांनी हा किल्ला १७२७ मध्ये बांधल्यानंतर किल्लेदारांनी व्यापार्‍यांना मुक्त आश्रय दिल्याने इथे व्यापारवृद्धी झाली. पेशव्यांचे सरदार नेवाळकर यांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर भारतातली सर्वात मोठी बाजारपेठ झाली.

आता हा काळ सरला असला, बाजारपेठ तेवढी मोठी राहिली नसली, तरीही या भागात चांगली भरगच्च बाजारपेठ अजूनही आहे. विविध दुकानं आहेतच, पण मोह आवरावा लागतो तो हातगाड्यांवरच्या ताज्या भाज्या बघून. भाज्या, फळं अशी ताजी रसरशीत दिसत होती, की इथेच बाजार उरकावा. पण एक तर घरी परत जायला अजून दोन ते तीन दिवस होते आणि मुख्य म्हणजे इथे आलो होतो आम्ही किल्ला बघायला.

तर भर बाजारपेठेतला हा किल्ला अगदी जवळपास चौरस आकारात आहे. ४८० X ५८० फूट अशी साधारण परिमिती. या भागाला फार पूर्वीपासून बहुतेक सरळ रेषेत राहायची सवय असावी. म्हणजे हे गावंच अशा स्वरुपात वसलेले आहे कि रस्ते पण सरळ रेषेत लांब. या रस्त्यांवर मध्ये-मध्ये पिंपळाचे व देवतांचे लहान-लहान पार एका रांगेत बांधलेले दिसतात. सरळ रस्त्यांमुळे हे पार एका ओळीत दिसतात. म्हणजे “पारांच्या या ओळी” म्हणजे “पारोळी”. त्याचा अपभ्रंश “पारोळा”. (माहिती आंतरजालावरून साभार)

जुना लाकडी दरवाजा चोरदरवाजासह

आम्हाला गाडी लावायला लांबच जागा शोधावी लागली आणि मगच बाजारात शिरलो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा बरोबर उत्तराभिमुख आहे. गडाच्या या प्रवेशद्वारावरची बांधीव कमान आता पुनर्बांधणीत सिमेंटची झालेली दिसली. पण शेजारचा भाग मात्र जुनाच, दगडी बांधणीत आहे. तटाची भिंत धरूनच (नशिबाने दरवाजा सोडून) सगळी दुकानंच दुकानं बांधलेली आहेत. आश्चर्य म्हणजे कमानीतला जुना लाकडी दरवाजा मात्र सुस्थितीत आहे. अगदी त्यावरच्या लोखंडी पट्ट्या आणि त्यातल्या चोरदरवाजासह. मोठा दरवाजा बंदच असतो ये-जा करायला, छोटासा दरवाजा उघडा असतो. आम्ही त्यातूनच गेलो.

गदुहेरी तटबंदी आणि ह्यातले खणखणीत बुरुज

किल्ल्याच्या ह्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे त्यातली आमच्या समोर आता दुसरी तटबंदी दिसली. या तटबंदीत खणखणीत बुरुज अजूनही उभे आहेत. जमिनीपासून जेमतेम पाच-सात फूट दगडी बांधकाम असावे. वरती सगळेच भाजीव विटांचे बांधकाम. बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या आणि वरती कमानीदार चर्या. त्यातही बंदुकीच्या माऱ्यासाठी जागा ठेवलेल्या. बाहेरील या तटबंदीत जवळपास १० तरी बुरूज आहेत. चौरसाच्या चार कोपऱ्यांवरचे चार मोठे बुरुज, तर मध्ये-मध्ये सहा-सात लहान बुरुज.

बालेकिल्ल्याचा दरवाजा

दुहेरी तटबंदी सोडून आत शिरल्यावर समोर दिसतो तो बालेकिल्ला. बालेकिल्ल्याच्या चार कोपऱ्यांवर एक-एक असे चार बुरुज आहेत, ज्यांची आता बरीच पडझड झालेली आहे.

काही अवशेष - चौकोनी विहीर, कमानी

किल्ल्यात बघायला असंख्य अवशेष आहेत, पण दुर्दैवाने कशाचीही निगा राखली न गेल्याने, इथे वाढलेल्या झाडीत लपलेले आहेत. वाढलेल्या झुडुपांनी त्यांना गिळंकृत करायलाही सुरुवात केलेली आहे. तिकडे फिरताना बरेच छोटे-छोटे वाडे, भिंती दिसतात. बऱ्यापैकी कमानी दिसतात. एका कमानीजवळ चौकोनी विहीरही आहे. पण अर्थातच खूप कचरा ह्या पाण्यात आहे. तटबंदीवर जायला पायऱ्याही दिसतात.

काही छोटेखानी मंदिरं

आतल्या परिसरात काही छोटेखानी मंदिरंही दिसून येतात. पहलं दिसलं ते “श्री सद्गुरू दादा महाराज मंदिर” पुढे सुंदर हनुमान मूर्ती असलेलं “हनुमान मंदिर” दिसलं. एका झाडाखाली नंदी आणि शिवपिंडी उघड्यावरच दिसली, तर पुढच्या झाडाखाली मंदिरावर दत्तगुरु फरशीवर आणि आत मध्ये साईबाबा फोटोत दिसले. या झाडामागे एक चोर दरवाजा असावा. तटबंदीच्या पलीकडे असलेले पाणी इथून आठ डोकावत होते, पण तरंगणारे प्लास्टिक, बाटल्या आणि पिशव्या असा कचरा घेऊनच.

श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर
जमिनीच्या पातळी खालचे महादेव मंदिर

इथे जे मंदिर आहे ते “श्री हरीहरेश्वर महादेव मंदिर” हे मंदिर खरतर जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. तरी वरच्या बाजूला पण एक नंदी आणि शिवपिंडी आहे आणि तसाच नंदी पायऱ्या उतरून गेल्यावर खाली आहे. त्याच्या बरोबर समोर हे मंदिर आहे. ज्याचा कळस जमिनीच्या पातळीच्या वरती आहे.

तटबंदी बाहेरचा तलाव

संपूर्ण किल्ला फिरताना अजूनही खूप अवशेष दिसतात. तटबंदीवर चढून फिरताना पारोळा गावही दिसते. किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या तटबंदी बाहेर मोठा तलाव आहे. तलावाच्या बाहेरील बाजूने पूर्ण दुकानांचा वेढा आहे.

बालेकिल्ल्यातील काही अवशेष

बालेकिल्ला फिरताना खूपसे उध्वस्त अवशेष दिसतात. साफसफाई केली तर खूप अवशेष उत्तम स्वरूपात समोर येतील. काही अवशेषांचे संवर्धन करण्याचा प्रयत्नही झालेला दिसतो.

दगडी दरवाजा आणि बालेकिल्ल्याचा उध्वस्त बुरुज

एक मजबूत दगडी दरवाजा पूर्णपणे शाबूत आहे. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा. त्यावर दगडी नक्षीही आहे.

बुरुज आणि लागून असलेलं पिराचं स्थान

दरवाजातून पलीकडे गेल्यावर काही कौलारू घरं दिसली. या पूर्वी कचेऱ्या होत्या. एका बुरुजाला लागून एक पिराचं स्थानही आहे.

गणपती मंदिर आणि विहिर

या शेवटच्या टप्प्यात एक विहीर दिसली. विहिरीचा कठडा गोलाकार बांधून काढलेला आहे. विहिरीवर रहाट वगैरेही बसवलेला आहे. संवर्धन करताना या विहिरीची विशेष काळजी घेतलेली दिसते.

एका चौकोनी बुरुजाच्या खाली एक गणपती मंदिर आहे आणि त्यावर पत्र्याची शेडही बांधलेली आहे.

अवशेष खूप होते. काही उध्वस्त, तर काही उध्वस्त होण्याची वाट बघत, थोडेसे ढासळलेले. तटबंदीतून तलावात उतरण्यासाठी काही मार्गही आहेत. त्यातला एक हरिहरेश्‍वर मंदिरासमोर आहे. उरलेले काहीसे लुप्त झालेले आहेत. नामशेष होण्याची वाट बघत असतील कदाचित... महादेव मंदिराजवळ एक भुयारही आहे. पूर्वी हे भुयार इतकं मोठं होतं, की त्यातून घोडेस्वार जात असे. असे स्थानिकांनी सांगितल्याचे मी वाचलं होतं. याच भुयाराचा वापर करून राणी लक्ष्मीबाई पारोळ्यातुन बाहेर पडल्या होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांचे वंशज आजही पारोळ्यात राहतात. (माहिती आंतरजालावरून साभार)

किल्ले पाहताना, आठवताना असा इतिहासात आपण रमत जातो. जणू त्या काळात जातो. पण काही वेळातच भानावर येऊन सध्याच्या जगात परतावं लागतं.

आपल्या असंख्य शिल्लक, उध्वस्त, नामशेष होण्याची वाट बघत असलेल्या अवशेषांची सहल घडवून आणलेल्या या किल्ल्याला, आम्ही त्या लाकडी महादरवाज्याच्या छोट्याशा दरवाजातून बाहेर पडत निरोप दिला. त्या गजबजलेल्या बाजारात परत आलो.

पुढचं लक्ष होतं “विचखेडे गढी”.

किल्ले चौगाव उर्फ त्रिवेणीगड


आजच्या दिवसात तशा गढ्या, भुईकोट किल्ले आणि नगरकोट होते. डोंगर चढायचे नव्हते. नाही म्हणायला तसा थाळनेर हा गिरीदुर्ग आहे. पण उंच वगैरे नाही आणि त्यातून पायर्‍यांपर्यंत गाडी जाते. म्हणजे आता फक्त नावालाच गिरीदुर्ग.

किल्ले विचखेडे

एकलकोंडा बुरुज

दुपारी पावणे बाराला पोचलो “बोरी” नदीच्या काठी असलेल्या या गढीवजा किल्ल्यात - “किल्ले विचखेडे”. पारोळा किल्ल्यापासून अवघ्या दहा मिनिटांवर हा किल्ला आहे. पारोळाकडून धुळ्याकडे जाताना “बोरी” नदी वरचा पूल लागतो. हा मुंबई-नागपूर महामार्ग. पुलाच्या जरा अलीकडेच उजवीकडे एकलकोंडा बुरुज दिसतो. हा या किल्ल्याचा सुस्थितीत असलेला अवशेष. कारण शेजारी वस्ती नाही. उरलेले अवशेष पुलाच्या डाव्या बाजूला आहेत. राष्ट्रीय महामार्ग या किल्ल्यातूनच गेलेला आहे, या किल्ल्याला दुभागत. किल्ल्याची चांगलीच दुरावस्था झालेली असली तरी अजूनही एका बाजूची तटबंदी तग धरून उभी आहे.

बुरुज, तटबंदी असे अवशेष

या बाजूला काही बुरुज, पुरातन महादेव मंदिर, समोर दीपमाळ, कबर, भुयारी मार्ग, बुरुजावर पीराचे स्थान, नाग मंदिर, सात पैकी दोन शिल्लक चौकोनी विहिरी... असा तब्बल २५ एकराचा भाग हा किल्ला व्यापून आहे. पण एकतर किल्ल्यात वस्ती असल्याने खूप असे अवशेष नष्ट झाले आहेत, झाडीत गेलेले आहेत. तर काही सापडत नाहीत. आम्ही थोडक्यात अवशेष बघून निघालो अमळनेरकडे.

किल्ले बहादरपूर

किल्ले बहादरपूर - एकमेव शिल्लक अभेद्य बुरुज

जानेवारी २०१८ मध्ये आम्ही सहकुटुंब शेगावला जात असताना अचानक बहादरपूर किल्ला पदरात पडला होता. त्यावेळी आडवाटेवरचा किल्ला बघून ब्लॉग लिहिताना म्हटलं होतं, की “परत कधीही इथे याची सुतराम शक्यता नसताना पंधरा मिनिटात धावत-पळत किल्ला बघायला मिळाला”. पण दोन वर्ष पुर्णही झाली नाहीत आणि आज परत या किल्ल्यात होतो. फक्त मी यावेळी उगाच छाती पुढे काढून वाटाड्या असल्यासारखा सगळ्यांना किल्ल्यात घेऊन गेलो.

कबर, वाडे असे इतर अवशेष

गेल्यावेळी बघायचे राहिलेले अजून शिल्लक असे अवशेष बघितले. इथे एका शेतात काही कबरी आहेत. या राजघराण्यातील व्यक्तींच्या असल्याचे सांगतात. त्या बघितल्या, जुन्या काळातले वाडे, त्यावर ते सुंदर नक्षीकाम यावेळी बघता आलं.

किल्ले अंमळनेर

भव्य दरवाजा आणि बुरुज

अंमळनेर मध्ये पोचलो तेव्हा दोन वाजत आले होते. अंमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमि. अंमळनेर हा खरा नगरकोट, पण शहराच्या वाढत्या विस्ताराने हा नष्ट होत गेला. सध्या इथे भव्य असा वीस फुटी दरवाजा दोन्ही बाजूंना बुरुजांसह शहरात उभा आहे.

शिल्लक तटबंदी आणि अवशेष

नदी पात्राच्या बाजूने संरक्षणासाठी तटबंदी उभारलेली होती, ती आजही “संत सखाराम महाराज” मंदिराकडे जाताना नदीपात्रात बघायला मिळते. चाळीस फूट लांब असलेल्या या तटबंदीवर आता घरं आहेत. त्यातही मशीदी सारखे छोटे मिनार असलेला दरवाजा कसाबसा तग धरुन आहे. काही बुरुजही नष्ट होण्याची वाट बघत तिथे लपलेले आहेत. खूप जुनी मंदिरं या तटबंदीवर बांधलेल्या घरांच्या मध्ये आहेत. बांधकाम जुने असल्याने घरांवर नक्षीदार कमानी आहेत. हे जुनं लाकडी सुतारकाम मजबूत आहे. तटबंदीतल्या दरवाजाच्या बाहेर लागूनच तीन सार्वजनिक संडास आहेत. अर्थातच त्यांना कुलपं होती. इथे एकूणच असल्या गोष्टींचा वापर करण्याची गरज कोणाला वाटत असेल असं दिसत नव्हतं.

किल्ले गांधली

अंमळनेर पासून दहा किलोमीटरवर गांधली गांव आहे. या गावालाही कोट आहे. गावात पोचून कोट कुठे आहे अशी विचारणा करण्याआधीच रस्त्याच्या डाव्या बाजूला बुरुज, तटबंदी असे अवशेष दिसायला लागले. पूर्ण गावच कोटात वसलेलं असल्यानं याचे अवशेष असे ठरवून बघता येत नाहीत. स्थानिकांच्या मदतीने ते शोधावे लागतात. चालताना मध्येच दोन घरांच्या मध्ये एखादा बुरुज दिसतो, कुठेतरी तटबंदीचा जरासा शिल्लक भाग दिसतो.

पूर्वाभिमुख देवड्यांसह आणि पश्चिमेकडील दरवाजा

दोन दरवाजे मात्र आपल्या दोन्ही बाजूला बुरुज घेऊन उभे आहेत. मध्ये-मध्ये सहा असे एकूण दहा बुरूज बघता येतात. बुरुजांना प्रचंड मोठ्या भेगा पडलेल्या असून, कधीपर्यंत हे उभे राहतील हा प्रश्नच आहे. त्यातून तटबंदी व बुरुजांचे दगड स्थानिक घर बांधायला घेऊन जातात.

पूर्वाभिमुख ह्या दरवाजात देवड्या वगैरे अजून तरी शिल्लक आहेत. कमान मात्र गायब आहे. इथे याला लागूनच घरं आहेत, गुरं बांधलेली आहेत. दुसरा दरवाजा मात्र जरा श्वास घेत उभा आहे, हा पश्चिम दरवाजा. त्याला लागून फक्त एक हनुमान मंदिर आहे.

जैन मंदिर परिसरातील अवशेष

आत मध्ये इथे एक जैन मंदिर आहे. त्यालाही तटबंदी व बुरुज आहेत. इथे असलेल्या कोटात खूप काही दडलेलं आहे. आम्हाला कोट दाखवायला आलेल्या मामांनी गवत बाजूला करून एक सरळ तळघर दाखवलं. म्हणजे आम्ही जमिनीच्या पातळीला फिरत असलो, तरी पायाखाली चार खोल्या होत्या. त्या संपूर्ण तटबंदीच्या आत प्रदक्षिणा मार्गावर दोन विहिरी आहेत, त्यावर चढण्यासाठी पायर्‍याही आहेत. एकंदरीत हा कोट शेवटचे श्वास घेत अस्तित्व कसे तरी राखून आहे. इथेच बसस्थानकासमोर ३ कमान असलेली बारंवही आहे.

किल्ले थाळनेर

केळी वेफर्स On The Road...

लहानपणापासून जळगाव म्हटलं की इथली केळी प्रसिद्ध असं वाचलं होतं. आम्हाला थाळनेरकडे जाताना रस्तोरस्ती केळ्यांचे लोंगरच्या लोंगर घेऊन, तिथेच जमिनीतली चूल मांडून वेफर्स तळत असलेले अनेक जण दिसले. ते गरम-गरम वेफर्स बघून खायचा मोह आवरला नाही. तसंही अशा भ्रमंतीत दुपारचं जेवण फारसं विचारात घेत नव्हतो आम्ही, त्यामुळे त्या वेफर्सवर ताव मारला.

संध्याकाळी पाचच्या सुमारास या किल्ल्यावर घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांजवळ आम्ही दाखल झालो. हा किल्ला तापी नदीकाठावर आहे. इथून जेमतेम ४५ किलोमीटरवर मध्य प्रदेश सीमा आहे. किल्ल्याचे स्थानच अतिशय सुंदर आहे. किल्ला उंचावर असल्याने खाली तापी नदीचं खोरं लांबवर दिसतं. इथे ती इंग्रजी “U” आकारात वळण घेत असल्याने हे दृश्य अजूनच सुंदर भासतं. त्याहून सुंदर म्हणजे समोरच पश्चिम दिशा. म्हणजे नदी पलीकडे सूर्य मावळतो आणि आम्ही त्याच सुमारास इथे किल्ल्यावर होतो. काय सुरेख दृश्य होतं हे. आमचे कॅमेरे मात्र हे दृश्य साठवण्यास सक्षम नव्हते.

थाळनेर किल्ला नवे-जुने अवशेष आणि वरून दिसणारे विहंगम दृश्य

किल्ल्यावर अवशेष फारसे नाहीत. तीन-चार फूट उंचीची तटबंदी नव्याने बांधून काढलेली आहे आणि संध्याकाळी निवांत येऊन बसायच्या दृष्टीने हे ठिकाण विकसित केलेलं आहे. वरती सप्तश्रुंगी मातेचं छोटसं मंदिर आहे. अजून एक जुनं मंदिर आहे. काही पडके वाडे, त्यातल्या खोल्या, काही तळघर असं शोधल्यास सापडतात. नव्याने बांधलेल्या तटबंदी बाहेर जुनी तटबंदी आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने बुरुजही आहेत.

अवशेष फारसे नसल्याने समोर तापी नदी, त्यामागचा मावळतीचा सूर्य, अशा दृश्याचा आनंद घेतला. खाली उतरून रस्ता “पाताळेश्वर महादेव” मंदिरावरून गावात “जमादार हवेली”कडे जातो. ही हवेली राहती, जागती आहे.

जमादार हवेली

हवेलीला लागून आता सिमेंटचे बांधकाम असलं तरी हवेलीचं सौंदर्य काही कमी होत नाही. भव्य असा दरवाजा, त्यावर खूप कलाकुसर केलेलं लाकूडकाम. जमिनीपासून सहा फुटापर्यंत दगडी तर वरती अजून दहा-पंधरा फूट विटेचं बांधकाम, अशी ही हवेली आहे. एका बाजूला सुंदर आणि अजूनही सुस्थितीत असलेला बुरुज आहे. त्यात खिडकीही आहे.

ही हवेली बघताना अंधार पडण्याच्या आत काही थडगी बघायची असल्याने आवरतं घेतलं. “थडगं” म्हटल्यावर डोळ्यासमोर येत असेल त्यापेक्षा वेगळंच काहीतरी हे बघायला मिळालं. ताजमहाल हेही एक थडगंच आहे हे लक्षात घ्यायचं. राजदरबारातील लोकांची थडगी अशीच सौंदर्यपूर्ण असतात. “थडगी काय बघायची” असा विचार असल्यास आल्यास इथली अशी थडगी बघितल्यावर हे विचार झटकले जातात.

कबरी - अप्रतिम नक्षीकाम आणि शिलालेख

प्रचंड कलाकुसर, जागोजागी नक्षी, दरवाजांवर ओळीच्या ओळी फारसी भाषेतील शिलालेख, असा खरोखर सौंदर्याचा उत्तम असा हा नमुना आहे. लवकरच अंधार पडणार होता, मग काही बघता येत नाही, फोटो तर लांबच, म्हणून थडगं हा शब्द डोक्यातून काढून त्यातूनच नाचत-नाचत इथलं सगळी कलाकारी डोळ्यात भरून घेतली. अर्थात फोटो आलेच की.

हाती असलेल्या वेळेचं योग्य नियोजन केलं, की अशा गोष्टी आपल्याकडच्या मर्यादित वेळातही नीट बघून होतात, याचं आजचा दिवस हे एक उदाहरण होतं. नगरदेवळा, पारोळा, विचखेडे, बहादरपूर, अंमळनेर, गांधली आणि थाळनेर हे किल्ले बघून, वर जमादार हवेली आणि ही थडगी एवढ्या गोष्टी बघितल्या. नुसत्या बघितल्या नव्हे, तर फोटोही काढले आणि अवशेष शोधून शोधून बघीतले. मग रात्री मुक्कामाला पोहोचलो चौगाव गावात.

किल्ले चौगाव उर्फ त्रिवेणीगड

ब्लॉगचं नांव हे इथल्या किल्ल्याचं असलं, तरी पारोळा नंतरचा इथे येईपर्यंत त्याचा प्रवास हा थोडक्यात मांडताना नमनाला घडाभर, नाही, अगदी दोन घडे तेल, असाच झाला.

रात्री “चौगाव” गावात पोचल्यावर पहिल्यांदी राहायची सोय बघायची होती. सुदैवाने आपल्याकडे मंदिरांना तोटा नाही. इथे ही एक शंकराचे मस्त मंदिर आहे. २६ डिसेंबर, म्हणजे चांगलेच थंडीचे दिवस. उघड्यावर झोपायची सोय नाही. पण नशिबाने या मंदिराच भाग असलेल्या खोलीत आमची झोपायची व्यवस्था झाली. सकाळी वाटाड्याची तजवीज करून सगळे गुडुप झालो.

शेकोटी

पहाटे लवकर उठून छानशी जागा बघून मोकळा झाल्यावर आटपून तयार झालो. सहा वाजता बरोबर येतो म्हणालेला आमचा वाटाड्या भाऊ उगवायला तयार नव्हता. त्याची वाट बघता बघता शेजार जागा व्हायला लागला. इथे एके ठिकाणी मस्त शेकोटी तयार करून लोक बसले होते. मीही त्याचा लगेच फायदा घेतला. जरा अंग गरम झाल्यावर त्यांना आमचा वाटाड्या मित्राचा पत्ता विचारला. सरळ घरी गेलो तर साहेबांना त्यांच्या आईने उठवावं लागलं. त्याला घेऊनच परत आलो. तोपर्यंत बाकीचेही वाट बघत थांबले होतेच.

त्रिवेणी संगम, महादेव मंदिर आणि मागे चौगाव किल्ला

आता वेळ न काढता गडाच्या वाटेला लागलो. सुरुवातीचं काही अंतर गाडी नेता येते. तसा रस्ता नाहीच आहे, पण त्या कच्च्या रस्त्यावरून गाडी काही अंतरापर्यंत जाते. पुढे पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर त्रिवेणी संगम लागतो. इथे तीन ओढे एकत्र येतात, म्हणून त्रिवेणी संगम. त्यामुळे या किल्ल्याला “त्रिवेणीगड” असेही नांव आहे. अजून एक नांव “विजयगड”. पण एक तर या नावाचे फारसे संदर्भ उपलब्ध नाहीत आणि त्यातून रत्नागिरीमध्ये विजयदुर्ग आणि विजयगड दोन्ही किल्ले असल्याने गोंधळ नको म्हणून हा उल्लेख टाळू.

तर या संगमावर जवळ यायला सात वाजून गेले होते. इथे महादेवाचे मंदिर आहे. परत येताना हे बघणार होतोच. सध्या बाहेरूनच नमस्कार करून, संगमाचे पाणी ओलांडून, गडाच्या वाटेला लागलो. हा भाग “बडा बाजार” म्हणून इतिहासात ओळखला जात असे. तसा गड आपल्याला आधीपासूनच दिसत असतो. या “त्रिवेणी संगमाजवळच्या” महादेव मंदिरापासून गडाचा पायथा अजून पंधरा मिनिटावर आहे.

खांबटाकी

पायथ्याशी पोचल्यावर प्रत्यक्ष चढाईला सुरुवात होते. चढाई फारशी नाहीये. अवघ्या अर्ध्या तासात जरा वरती गडाचा दरवाजा दिसला. पण आधी वर न जाता डावीकडे जायचं. तिथे पाण्याची टाकी आहेत. एक कोरडं आहे. एकाच पाणी आहे पण त्यात जाण्यासारखी जागा नाही आणि पाणीही पिण्यासारखे नाही. एका जमिनीच्या खालच्या पातळीत असलेल्या दुसर्‍या खांबटाक्यात पाणी आहे. पाणी पिण्यायोग्य नाही, पण हे टाकं प्रशस्त आहे. काही प्रमाणात गाळाने भरलेलं असलं तरी चार-पाच खांब पाण्यावरती व्यवस्थित आहेत.

पूर्वाभिमुख दरवाजा

पुढे फक्त पाच-सात मिनिटात आपण दरवाजा जवळ पोचतो. दरवाजा पुर्वाभिमुख असल्याने उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात न्हाऊन निघाला होता. दरवाजा पलीकडे गेल्यावर एक पायवाट दिसते, पण इथे झाडी असल्याने वाटा कळायला वाटाड्या हवा. इकडे एका बाजूला एक कोरडा तलाव आहे.

दुर्गामाता मंदिर

पुढे काही चौथरे आपल्याला दिसतात, इथे एक मंदिर आहे. हे दुर्गा मातेचे मंदिर. इथल्या उध्वस्त वास्तूचे दगड गोळा करून हे दुर्गा मातेचे मंदिर गावकऱ्यांनी बांधलेलं आहे. त्याला लाकडाने सुंदर मंडप उभारलेला आहे आणि साड्यांनी छान पैकी आच्छादून घेतलेलं आहे. देवीची मूर्ती हा तांदळा असून त्याला साडी नेसवून मुकुट वगैरे घातलेला आहे. या मंदिरात आवर्जून बघावा असा एक दुमजली दगडी दिवा आहे.

उत्तरेकडील लपलेले प्रवेशद्वार

बाजुला तटबंदीचे अवशेष आजही दिसतात. झाडाझुडपात लपलेले तटबंदीचे अवशेष बघता बघता आम्ही एका दरवाज्याजवळ पोचलो. या दरवाजाची कमान अगदी सुबक आणि रेखीव आहे. गडाच्या उत्तरेकडेचं हे प्रवेशद्वार अतिशय सुंदर जागी असून दोन्ही बाजूला उंच भाग तर द्वार मधल्या, जराशा खालच्या बाजूला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याचं स्थान उत्तम योजलेलं आहे.

हा दरवाजा पाहून आम्ही ह्या गडाच्या मुख्य अवशेषाजवळ जवळ आलो. हा इथला राजवाडा. याला “गवळी राजाचा राजप्रासाद” म्हणून ओळखतात. या वाड्याचे चुना आणि दगडात असलेले बांधकाम खूप मजबूत आहे, कारण या भिंती अजूनही उत्तम स्थितीत उभ्या असलेल्या दिसतात.

गवळी राजा राजप्रासाद - प्रवेशद्वार आणि अप्रतिम नक्षी

बाहेरून या भिंती निरखून मग आत मध्ये प्रवेश केला. पूर्वेकडच्या भागात हे प्रवेशद्वार आहे. पाच फुटांवरचा भाग हा मात्र फोडल्या सारखा वाटतो. म्हणजे मूळ प्रवेशद्वार नक्की किती उंचीचं असावं व त्याची कमान कशी असावी हे प्रश्न आपल्याला पडतात. पण हे प्रश्न नंतर पडतात. त्या आधी आपल्याला थक्क करते ती वाड्याच्या या भिंतीवर असलेली विटांची दुमजली नक्षी. पत्त्यांचा बंगला आपण बांधत जातो तशी विटांची नक्षी केलेली आढळते. इतकी अप्रतिम नक्षी दुसरीकडे बघायला मिळत नाही.

प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच साधारण तीन फूट उंच व सात-आठ फूट लांब अशी एक भिंत मधोमध आहे. भिंतीची पडझड झाल्यासारखं वाटत नाही. आजूबाजूलाही काही नाही, त्यामुळे हिचं नक्की प्रयोजन कळत नाही. कदाचित संरक्षण व्यवस्थेचा हा भाग असावा.

प्रासादाचे प्रवेशद्वार आतील बाजूने, समोर भिंत. मागच्या बाजूला टाक्यांचे उंचावरून दर्शन

चुन्याने लिंपलेल्या भिंतीच्या आतल्या बाजूस खूपसे कोनाडे आहेत. हे एका ठराविक अंतरावर असल्याने, कदाचित प्रत्येक खोलीत एक, अशा प्रमाणे इथे खोल्या असाव्यात असं वाटतं. वाडा आतमध्ये चांगलाच लांब आहे. साधारण २५० फुट X ८० फुट असा प्रशस्त असा हा राजवाडा आहे. पण आतल्या सगळ्या भागात सायाच्या झाडांनी गर्दी केलेली आहे.

हे बघून वाड्याच्या बाहेर आलो आणि एका बाजूला मगाशी आम्ही बघितलेलं दुर्गामातेचे मंदिर दिसलं. शेजारी एक उंच ध्वजही दिसला. तिथून इथे यायला सरळ वाट आहे, पण आम्हाला उत्तरेकडचा दरवाजा दाखवण्यासाठी वाटाड्या मित्राने दुसऱ्या वाटेने इथे आणलंन होतं. वाड्याच्या समोर मोकळ्या जागेत १९७७ साली सहा फूट लांबीच्या चार तोफा सापडल्या. त्या आता चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.

मंदिराकडे न जाता त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भागाकडे आम्ही निघालो. जरा खालच्या बाजूला चार टाक्यांचा एक सुंदर समूह आम्हाला दिसला. त्यामुळे उत्साह अजून वाढला आणि उड्या मारतच अवघ्या दोन मिनिटात या समूहासमोर दाखल झालो.

पाण्याने तुडुंब भरलेली टाकी

एक मोठा आयताकार भाग. त्याला मधोमध अधिकच्या चिन्हात विभागून त्याचं चार टाक्यांत रूपांतर केलेलं आहे. त्याला लागूनच चार-पाच कमानयुक्त गुहा आहेत. पाणी तुडुंब भरलेला असल्याने इतर टाक्यातही काही खांब-गुहा वगैरे आहेत का हे समजू शकलं नाही. त्या अधिकच्या चिन्हाच्या बरोबर मध्ये जाऊन फोटो काढायचा मोह आमच्यापैकी कोणालाही आवरला नाही.

झेंडा बुरुज अवशेष

इथून अवघ्या तीन-चार मिनिटांत दुर्गामाता मंदिराजवळ परत येता येतं. परत येऊन मंदिराजवळ असलेल्या, मगाशी वरून दिसलेल्या त्या उंच झेंड्याजवळ गेलो. हा झेंडा बुरुज. इथली तटबंदी उत्तम स्थितीत असून त्यात शिबंदीची घरटी आपल्याला दिसतात.

इथून आजूबाजूच्या परिसरातील डोंगरही दिसतात. काली टेकडी, लेभागा डोंगर, बांदरा डोंगर, धाकला चिपाट्या डोंगर अशा नावाचे काही डोंगर येथे आहेत. हा चौगाव उर्फ त्रिवेणीगड किल्ला प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात (नेमाड) आत जाणाऱ्या “भिराम घाट” या डोंगरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला होता. हा किल्ला सातपुडा डोंगर रांगेत येतो.

सोनेरी किरणांत चमकणारा डिंक

पावणेदहा वाजले होते आमची गडफेरी पुर्ण झाली होती. उतरताना काही झाडांना डिंक आलेला दिसला. त्या सूर्यकिरणात हा सुंदर दिसत असल्याने, फोटोचा मोह आवरला नाही.

त्रिवेणी संगम मंदिर - महादेव, पंचमुखी हनुमान

जेमतेम वीस ते पंचवीस मिनिटात त्रिवेणी संगमाजवळ परत आलो. वर जाताना बघितलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मुख्य मंदिर महादेवाचं असून गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला गणपती आहेत. मंदिराचा मंडप मोठा असून त्यात पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. संगम मंदिर आणि आजूबाजूचा परिसर वनखात्याच्या अखत्यारित येत असून येथे वनविभागाचे कर्मचारी तैनात असतात. इथे मुक्कामाला परवानगी नाही. मोहीमेतल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात या गिरीदुर्गापासून झाली. यानंतर बघायचा होता एक अत्यल्प परिचित गिरिदुर्ग.

कन्हेरगड उर्फ बिज्जलगड उर्फ भिल्लांचा किल्ला


महाराष्ट्रात दोन कन्हेरगड आहेत. एक आहे नाशिकमध्ये तर दुसरा इथे चाळीसगाव मध्ये गौताळा अभयारण्य परिसरात.

देहेरगड आणि नंतर नस्तनापूरची गढी बघितल्यानंतर पुढे आम्हाला हा चाळीसगाव मधला कन्हेरगड बघायचा होता. हा गड गौताळा अभयारण्य परिसरात येणाऱ्या पाटणा गावात आहे. नस्तनापूर वरून इथे पोचायला आम्हाला साडे बारा वाजून गेले. मंदिर आणि गड दोन्ही अभयारण्य परिसरात असल्याने इथं परवानगीशिवाय जाता येत नाही. वाटेवरच तपासणी नाका आहे.

तपासणी नाका सूचना व माहिती

“गौताळा औट्रम घाट वन्यजीव अभयारण्य तपासणी नाका” या “वन्यजीव विभाग, औरंगाबाद” यांनी लिहिल्या बोर्डाने आमचे स्वागत केले. त्यावर पर्यटकांसाठी असलेल्या भेटीची ठिकाणं, वाहन प्रवेश, छायाचित्रण शुल्क इत्यादी माहिती दिलेली आहे. बाजूलाच एका बोर्डावर वन्य परिसरात काय काय करू नये, जे गुन्हे धरले जातील वगैरे यांचीही माहिती दिली आहे.

महादेव मंदिर दिशादर्शक फलक

या तपासणी नाक्यावर भटकंतीसाठीची वेळ, रहाणे वगैरेची चौकशी करून निघाल्यावर पुढे “हेमाडपंती महादेव मंदिर” असं लिहिलेला आणि खाली उजवीकडे जाणारा बाण असलेला बोर्ड दिसला. इथे कुठेही अजिबात न थांबता, महादेव मंदिराकडे जाणारी वाट सोडून डावीकडे पहिला मोर्चा किल्ल्याच्या वाटेकडे वळवला. मंदिर खाली आल्यावर बघणे योग्य होते, कारण किल्ला चढायला-बघायला लागणारा वेळ बघता या जंगलात उशीर होऊन चालण्यासारखे नव्हते.

गवतात लपलेला पायऱ्या मार्ग

अवघ्या काही मिनिटांत आम्ही किल्ल्याच्या वाटेला लागलो, जेमतेम एक वाजत होता.

हा किल्ला संध्याकाळच्या आधी बघावा लागतो याचे कारण म्हणजे अगदी जंगलाच्या मधोमध हा उभा आहे. चहूबाजूने लहान मोठी झाडे, वृक्ष यामुळे संध्याकाळ जवळ आली की हा भाग भयाण वाटतो. या भागातली लेणी, मंदिरं पाहता हा किल्ला फार पुरातन आहे हे लक्षात येते.

किल्ल्याची बांधणी आठव्या शतकात झालेली असल्याचे अनुमान काढले तरी १३ व्या शतकाच्या सुरुवातीला इथे “कान्हेर स्वामी” वास्तव्यास होते. त्यांच्याच नावावरून गडाचे नांव “कान्हेरगड” व पुढे “कन्हेरगड” झाले असावे. इसवी सन ११२८ ला इथे यादवांचे मांडलिक, “हेमाडी देव निकुंभ” यांचे राज्य होते. पाटणादेवी ही त्यांची राजधानी. पुढे त्यावर सत्ता फारुकी घराण्याची आली. १६०० मध्ये मोगलांनी सत्ता स्थापन केली, तर १७५२ ला नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला मराठा राजवटीत आणला. जो पुढे भिल्लांच्या ताब्यात जाऊन १८१८ ला इंग्रजांकडे गेला. काही काळ भिल्लांच्या ताब्यात किल्ला असल्याने ह्याला "भिल्लांचा डोंगर" असेही ओळखतात. "बिज्जलगड" असेही एक ह्या किल्ल्याला नांव आहे. तरी सुद्धा गावात मात्र “पाण्याची टाकी असलेला डोंगर” या नावाने ओळखला जातो.

मंदीराच्या बाजुनेच रस्ता गडाकडे जात असला, तरी वाटा जंगलातल्या असल्याने जाताना खुणा लक्षात ठेवाव्यात. सुरुवातीला सह्याद्री प्रतिष्ठानने बोर्ड लावलेले आहेतच.

दाट जंगल

दहा मिनिटात जंगलाच्या दाट झाडीतून बाहेर पडू थोडी उंची गाठली. मागे वळून बघितले तर खाली लांबवर झाडांच्या शेंड्याचे झुपके दिसायला लागले.

वाळलेल्या गवतातच कातळात पायर्‍या दिसतात. अगदी सुबक, कोरीव नसल्या तरी वाट समजण्यापुरत्या नक्कीच आहेत. या वाटेनेच अवघ्या ५ मिनिटात गुहेजवळ पोचलो. ह्या “नागार्जुन गुहा”.

नागार्जुन गुहा

समोर २ खांबी असलेल्या गुहेच्या मागे, मध्यभागी असलेल्या दरवाजावर रंगाने “श्री १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर” असं लिहिलेलं आहे. शेजारी पुरातत्व खात्याने “संरक्षित स्मारक” आणि काही सूचना लिहिलेला फलकही पडलेला होता.

नागार्जुन लेण्यांमधील मूर्ती, कोरीवकाम

नागार्जुन लेण्यांमधील मूर्ती, कोरीवकाम

दरवाजाच्या डाव्या बाजूस महादेव कोरलेले दिसतात. आतमधल्या ३ दालनांमध्ये जैन मुर्ती कोरलेल्या आहेत. अगदी फूटभर ते सहा फूट उंचीच्या अशा आकारात ह्या मूर्ती आहेत. गुहेत मध्यभागी भगवान नेमिनाथ यांची मूर्ती, बाजूला चवरीधारी सेवक, नक्षीदार खांब, डाव्या बाजूला दिगंबर तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत तर खांबाजवळ इंद्राची प्रतिमा सुद्धा आहे. खांबातच कोरलेल्या मूर्तीला चक्क जानवे सदृष्य काहितरी कोरलेले दिसते, हीच इंद्राची प्रतिमा किंवा यक्ष असावे.

या लेण्यासमोरच एक खांब आहे, त्याला सतीचा खांब म्हणतात. इथे मुल होण्यासाठी नवस बोलण्याचा प्रघात आहे.

सीतेची न्हाणी लेण्याच्या वाटेवरील पाण्याचं टाकं

सीतेची न्हाणी

पुढे सीतेची न्हाणी नावाची लेणी आहेत. वाटेत एक पाण्याचे टाके पण आहे. पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. ही लेणी जरी बाहेरून नागार्जून लेण्यासारखी दिसत असली तरी बाहेरील बाजूच्या दोन खांबांवर तसेच भिंतीवर काहीही कोरीव काम नाही. आत मध्ये काही मूर्तीही नाहीत. ह्या लेण्यांच्या व्हरांड्यातच मोठे पाण्याचे टाके आहे किंवा इथे कायम पाणी भरत असावे. कदाचित म्हणूनच ह्याला सीतेची न्हाणी नांव पडले असेल.

माथ्याकडे जाण्यासाठी हा कातळटप्पा चढावा लागतो

मळलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर पुन्हा कातळकोरीव पायऱ्या लागतात. हीच वाट सरळ एका कातळकड्यापाशी आपल्याला घेऊन येते. इथे कड्याच्या बाजूने एक वाट उजवीकडे गेलेली दिसते, ह्या बाजूला उतरताना जायचं ठरवलं. आधी किल्ल्याच्या माथ्यावरती जायचं होतं. त्यासाठी समोरच असलेला कातळकडा आपल्याला चढावा लागतो.

ह्या कड्याला मात्र कातळकोरीव पायऱ्या वगैरे कोरलेल्या दिसल्या नाहीत. कदाचित पूर्वी इथे पायऱ्या असाव्यात पण सध्या इथे कातळ बऱ्यापैकी सपाट आहे. पावसाळ्यात पाणी वाहत असताना यावर चढणं अशक्यच आहे. इथे चुन्याने काही खुणा केलेल्या दिसल्या. गावकरी किंवा सह्याद्री प्रतिष्ठान सारख्या संस्थांचा इथे पायऱ्या करण्याचा मनसुबा असू शकतो.

कडा फार मोठा नसल्याने १-२ मिनिटातच तो चढून वर आलो. वरती काही तटबंदी शिल्लक आहे. त्यावर रंगाने “कन्हेरगड” असे लिहून बाणही काढलेला आहे.

माचीवरील खांबटाकं

दहा मिनिटात गडाच्या माचीवर येऊन पोचलो. इथे एक खांब टाके आहे. हे बऱ्यापैकी गाळाने आणि पाण्याने भरलेलं दिसत असलं तरी थोडेफार उतरून वाकून पाहिल्यास आत खांबांचा वरचा भाग दिसतो. म्हणजे गाळ काढल्यास त्याची खरी खोली कळू शकेल.

वाटेवर पुढे चौथरा आणि त्यावर थडगं दिसलं. इथे तिथे उजवीकडे एक टेकडी दिसते.

कोरडा पडलेला तलाव

ह्याच पायवाटेने वाटेने पुढे जाताना टेकडीच्या पायथ्याशीच एक मोठा तलाव दिसला. जो गाळाने पूर्ण भरून बुजून गेलेला आहे. साधारण २० मिनिटांनी झाडीत लपलेलं पाण्याचं टाकं आणि पुढे थडगं दिसलं, ह्यालाही चौथरा दिसत होता जो झाडीत आणि मातीत गेलेला आहे. ह्या वाटेने पुढे गेल्यावर गडाचा अतिशय सुंदर दरवाजा आणि बुरुज दिसला.

गडाचा एकमेव असलेला शिल्लक बुरुजांसह दरवाजा

येथे उजव्या बाजूला वरती गडाचा सर्वोच्च माथा आहे. वरती जायच्या आधी एकदा दरवाजा डोळे आणि कॅमेरा भरून पाहून घेतला. हे इतके सुंदर आणि सुस्थितीत आहेत कि हे नाही पाहिले तर गड काय पाहिला? असं वाटावं.

सुंदर बुरुज आणि दरवाजा

बुरुजावर आलेल्या झाडांनी याला उध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही बाजूला बुरुज, दरवाजाच्या कमानीत देवड्या, बुरुजावर सुंदर अशा जंग्या हे सुंदर असे अवशेष आहेत.

हा दरवाजा आणि बुरुज बघितल्यावर सर्वोच्च माथ्याकडे मोर्चा वळवला. इथून वाट मळलेली नाहीये. माथा तर दिसत होता, पण नक्की कुठून वर जायचं ते समजत नव्हतं. त्यात वाळलेलं गवत आडवं पडलेलं, त्यावर पाऊल टिकत नव्हतं. थोडं तिरकं तिरकं वरच्या बाजूला दरवाजापासून मागे जात एकदाची पायवाट सापडली.

खरं तर या माथ्यावर लोक येत असतात. त्यामुळे आपण आधी खाली बघितलेल्या तलाव आणि थडग्याजवळून इथे यायला वाट आहे. पण आम्ही आधी बुरुज आणि दरवाज्याकडे गेल्याने तिकडून इकडे माथ्यावर यायला सहज वाट मळलेली नाहीये.

माथ्यावर थडगे

तर या घसाऱ्याच्या वाटेवरून सावकाश, सांभाळून पुढे गेल्यावर पंधरा मिनिटांत पायर्‍या दिसल्या. पुढच्या दोनच मिनिटांत एक थडगंही दिसलं.

बुद्धीमताम् वरिष्ठं, शक्तीची देवता हनुमान

पुढे जवळजवळ सगळ्या गडांप्रमाणेच ह्याही गडावर संरक्षक, आधार म्हणून असलेली बुद्धीमताम् वरिष्ठं अशी शक्तीची देवता हनुमान आहेच. इथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गदाधारी, शेंदूर फासून घेतलेले हे हनुमान मस्त विश्रांती घेत होते.

खाली गडाचा दरवाजा बुरुजांसह

मारुतीला नमस्कार करून पायवाटेने हा माथा न्याहाळताना एका बाजूने मगाशी आम्ही पाहून आलेला गडाचा दरवाजा बुरुजांसह दिसला. पुढे खाली लांबवर पसरलेले जंगल, असा मस्त नजारा इथून दिसतो.

अजून एक पाण्याचं टाकं

माथा बघून खाली येताना जरा चांगली वाट निवडली. म्हणजे असा आम्हाला वाटलं 😁 पण तिकडेही काही कमी घसारा नव्हता, उलट चढताना जरा बरं होतं असं वाटायला लागलं. पण या वाटेचा फायदा म्हणजे वाटेत खांबटाकं दिसलं.

क्षणभर परत खाली बुरुज-दरवाजाजवळ टेकून खालच्या वाटेला लागलो. आल्या वाटेने परत थडगे, तलाव करत-करत कातळ टप्पा ओलांडून खाली आलो. किल्ल्यावर येतांना ह्या समोरच्या कातळटप्प्याच्या वाटेने वर आलो होतो तिथे उजवीकडे एक वाट दिसली होती. आता त्या वाटेने जाऊन काय बघायला मिळतं त्याची उत्सुकता होती.

पावणे चार झाले होते. आम्ही योग्यरीतीने वेळ पाळल्याने हाताशी अजून वेळ होता, पण तरीही निवांतपणा करण्यात अर्थ नव्हता. त्या जंगलातच पूर्णपणे उजेडातच खाली उतरून बाहेर पडायचे होते.

वाट कातळकड्याखाली जंगलात जाते

गडाला डावीकडे ठेवत निमुळत्या पायवाटेने समोर दिसणाऱ्या खड्या कातळकड्याच्या कुशीत जायचं होतं. सुंदर अश्या दाट झाडीतून असं काही ठिकाणापर्यंत, तर काही ठिकाणी मळलेल्या पायवाटेने आणि पुढे गवतातूनच वाट शोधत पुढे जात होतो.

वाटेवरचं पाण्याचं टाकं

शृंगारचौरी लेणी

अखेर यश मिळालं. एक आयताकार टाकं दिसलं. त्यात पाणी होतं आणि बरोबर झाडांचा भरपूर पाला-पाचोळा देखील. पण पुढे मात्र त्या काळाच्या कुशीत असलेली अतिशय सुंदर अशी लेणी समोर आली. हीच अकराव्या शतकात कोरलेली “शृंगारचौरी लेणी”. ही पूर्णपणे हिंदू लेणी आहेत. ५-६ सुंदर नक्षीदार खांबांवर ही लेणी तोललेली आहेत.

लेण्यांवरील कोरीवकाम, देव आणि शृंगारिक चित्र

खांबांवर सुंदर गणपती आणि इतर देव कोरलेले आहेत. खालच्या बाजूला सिंह वगैरे काही प्राणी आणि शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत म्हणूनच यांना “शृंगारचौरी” लेणी म्हणत असावेत.

लेण्यांचाअप्रतिम दरवाजा

लेण्यांचा दरवाजा तर इतका अप्रतिम कोरलेला आहे की दहा मिनिटं नुसती त्यावरची मूर्ती आणि नक्षी न्याहाळाव्यात. आत मध्ये मात्र भरपूर पाणी भरलेले आहे.

पंधरा मिनिटात नागार्जुन लेण्यांजवळ आलो. परत २-४ क्लिक करून महादेव मंदिराकडे खाली निघालो. वर येताना १५ मिनिटांत इथपर्यंत चढून आलो होतो म्हणजे १० मिनिटांत परत मंदिर दिसणं अपेक्षित होतं. पण पंधरा मिनिटे झाली तरी मंदिर दिसेना, म्हणजे भलतीच पायवाट पकडून रस्ता चुकल्याचं लक्षात आलं.

कुठल्याच जंगलात रस्ता चुकणं चांगलं नसतं. पण सुदैवाने फार उशीर झालेला नव्हता, अंधार पडलेला नव्हता, पावणे पाचही वाजले नव्हते. गप्पा मारता मारता पायवाट चुकली होती एवढंच, दिशेचा अंदाज घेत, जवळपास गाडीचा आवाज आला तर त्या आवाजाने, असं करून डांबरी रस्त्याला लागलो. पण मंदिराकडे जायला कोणत्या बाजूला जायचं हेच समजेना.

एक बाजू धरून चालायला लागलो. नशिबाने काही वेळात एक गाडी दिसली, त्यांना हात करून ते विचारलं आणि आम्ही महादेव मंदिराच्या बरोबर विरुद्ध बाजूला निघालेलो असल्याचं कळलं. वन्यजीवन विभागाचा “हेमाडपंती महादेव मंदिर” बोर्ड दिसला आणि हायसं वाटलं.

हेमाडपंथी महादेव मंदिर

मंदिराचा अप्रतिम झरोका आणि इतर मूर्ती

पटापट पावलं उचलून मंदिरात पोचलो. महादेव मंदिर अतिशय सुंदर आणि प्रचंड कोरीव काम असलेलं आहे. पुरातत्त्व खात्याकडे असल्याने उत्तम स्वच्छता आहे. मंदिराचेच काही इतरत्र पडलेले नक्षीदार दगड जमा करून एकत्र ठेवलेले आहेत.

मंदिरावरील कोरीवकाम

किल्ला वेळेत बघुन झाल्याने हाती असलेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून मंदिर डोळ्यात भरून घेतलं आणि दगडी पाखडी वरुन तिथून बाहेर आलो.

पाटणादेवी मंदिर

देवीची भव्य अठरा हातांच्या मूर्तीसह इतर मूर्ती

इथून जवळच पाटणादेवीचे मंदिर आहे. हे हि मंदिर प्राचीन असून परिसर स्वच्छ आहे. मंदिराचे काही अवशेष नीट जमा करून ठेवलेले आहेत. गाभाऱ्यात देवीची भव्य अठरा हातांची मूर्ती असून वाघावर आरूढ अशी देवी पायाखाली रेडा आणि एका हाताने राक्षसाला धरून आहे. राक्षस वधाचा हा देखावा आहे. देवीच्या उजव्या हाताजवळ गणपतीची मूर्ती आहे तर इतर गाभार्‍यात अजूनही काही मूर्ती आहेत. त्यात एके ठिकाणी विष्णू तर एके ठिकाणी उजव्या सोंडेचा गणपतीही आहे.

भव्य दगडी दीपमाळा

मंदिरावरती येणाऱ्या पायर्‍यांच्या बाजूला दोन दगडी भव्य दिपमाळा आहेत. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबाबतचा शिलालेख याच परिसरात पुरातत्त्व खात्याला सापडला असून तो त्यांनी जतन करून ठेवलेला आहे.

जळगांव-बुलढाणा भटकंतीच्या पहिल्या दिवसाची सांगता सर्व बाजूने घनदाट जंगलाच्या कुशीत नांदत असलेल्या, भटक्यांकडून थोडा दुर्लक्षित अश्या कन्हेरगड आणि प्रसिद्ध पाटणादेवी मंदिराला भेट देऊन झाली.

किल्ले राजदेहेर आणि नस्तनापूरची गढी


किल्ले राजदेहेर

२०१९ ह्या वर्षाच्या शेवटी डिसेंबर मध्ये, सालाबाद प्रमाणे महिन्याच्या शेवटी म्हणजेच वर्षाच्याही शेवटी किमान ४ दिवसांची किल्ले भ्रमंती करायची असं ठरलेलं होतं आणि ह्यावेळी ठरवलेला होता खान्देश-विदर्भ भाग - जळगांव आणि बुलढाणा जिल्हा.

“राजदेहेर” नामसाधर्म्य असणारे काही किल्ले महाराष्ट्रात आहेत. चांदवड जवळचा “राजधेर” आणि नाशिक मधला “देहेरगड”.

ह्या भ्रमंतीत सुरुवात करायची ठरली, ती चाळीसगांव मधल्या राजदेहेर किल्ल्यापासून. ह्या किल्ल्यालाच “ढेरीचा किल्ला” असेही नांव आहे.

“कोरोना” नामक असुराने जग पादाक्रांत करायची सुरुवात अजून करायची होती. चीनमध्ये असले काहीतरी चालू असल्याची कुणकुण लागली होती, पण इथे काळजी करावे असे लोण काही पसरलेले नव्हते. त्यासंबंधी कसलेही निर्बंध इथे नव्हते, त्यामुळे नेहमीप्रमाणे रात्री प्रवासाला सुरुवात केली.

श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर गंगा आश्रम

२५ डिसेंबरच्या पहाटे विनीत आणि त्याच्या निलपरीतून मी, नाना आणि भूषण असे ४ जण राजदेहरेवाडीतल्या “श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर गंगा आश्रम” जवळ पोचलो. पहाटेचे बहुतेक ३-४ वाजले असावेत. अजिबात वेळ न घालवता मुख्य दरवाजातून आतमध्ये गेल्यावर समोर दिसणाऱ्या मंदिरात आडवे झालो.

ह्या दिवसांत साडे ६ वाजत आले तरी उजेडाचा पत्ता नसतो, पण मंदिरातली पूजाअर्चा चालू झालेली होती. असे अवेळी, पूर्णपणे अनोळखी ठिकाणी, कोणालाही न विचारता निर्धोकपणे आपण राहू शकतो हीच भारतीय खासियत 😊. आम्हाला आम्ही स्वतःहून उठेपर्यंत कोणीही उठवून, कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. साधे तुम्ही कोण, कधी, कुठून आलात वगैरे! अर्थात आम्हीही आक्षेपार्ह काही बरोबर ठेवले नव्हते आणि उगाच लोळत पडलो नव्हतो हीही गोष्ट तितकीच महत्वाची 😊.

तर पटापट आवरून देवाचे दर्शन घेऊन गडाकडे कूच केली.

बंधारावजा धरणाच्या मागून जंगलातून डोकं वर काढणारा  राजदेहेर किल्ला

अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर “छोटा महादेव” मंदिर आहे. इथपर्यंत गाडीरस्ता आहे. इथे जवळच एक तलाव आहे. त्याचे नांव “श्रावणबाळ” तलाव. त्यावर बांधलेल्या एका लहानश्या बंधारावजा धरणाच्या मागून राजदेहेर किल्ला जंगलातून डोकं वर काढताना दिसतो.

पायवाट: डावीकडे एका डोंगराचा कातळकडा आणि उजवीकडे किल्ला

इथूनच एक पायवाट झाडी-झाडीतून गडाकडे जाते. गडाचा हा दिसणारा डोंगर उजवीकडे ठेवत, त्याला लगतच्या पायवाटेने प्रदक्षिणामार्गाने सुरुवात करायची. डाव्या हाताला एक मोठा डोंगर, त्याची सरळ उभी कातळबाजू आपल्याकडे करत आपल्याला सोबत करतो, ते अगदी आपण उजवीकडे वळून गडाची वाट धरेपर्यंत.

साधारण १५-२० मिनिटांत हि वाट उजवीकडे पठारावर चढते. इथे उजवीकडे फिरल्यावर गडाचा उंच भाग समोर दिसतो. आपल्या डावीकडे असलेला डोंगरही ह्या किल्ल्याला आपण उभे असलेल्या पठाराने जोडलेला आहे.

गडाची शिल्लक तटबंदी

आता आम्ही उजवीकडे गडाच्या दिशेने चालायला लागलो आणि गडाचे अवशेष दिसायला लागले. थोडीशी फुटकी तटबंदी जसजसे जवळ जाऊ तसतशी जास्ती प्रमाणात दिसायला लागली. जराश्या अंतरावर एक कातळटप्पा सुद्धा आहे. फार कठीण नसला तरी सावधगिरी हवीच.

थोड्याच वेळात आम्ही प्रवेशद्वारापाशी पोचलो. तसं द्वार, कमान वगैरे काही शिल्लक नाहीये, तुटलेल्या तटबंदीतूनच आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये चहुबाजूला नजर फिरवली.

काही खांबटाकी

पाहिलंच एक खांबटाकं दिसलं जे पाण्याने पूर्ण भरलेलं होतं आणि बहुतांशी गाळाने पण. अगदी वाकून बघितल्यावर आतमधले खांब जरासे दर्शन देतात. पण गाळ काढला गेल्यास ते पूर्ण दिसू शकेल. मोठे आणि उत्तम स्थितीत असणार हे टाकं, असं तरी वाटलं ते बघून.

बुरुजाची भिंत, जंग्या

झाडाझुडुपांच्या आक्रमणात तटबंदी कशीबशी तग धरून आहे. ह्या तटबंदीत, बुरुजाच्या भिंतीत काही ठिकाणी बंदुकांचा मारा करण्यासाठी ठेवलेल्या जंग्या दिसतात.

किल्ल्याच्या मागच्या बाजूचे डोंगर

मागे वळून पाहिल्यास मोठमोठाले आणि पसरलेले डोंगर दिसतात. तसा हा सगळा भाग दाट जंगलाचाच आहे. गौताळा अभयारण्याला लागुनच असल्याने घनदाट झाडी, जंगली श्वापदं इथे असतातच. त्यामुळेच ह्या अश्या झाडीत लपलेले गडाचे अवशेष शोधूनच बघावे लागतात.

अजून एक खांब टाकं दिसलं. पाणी मात्र पिण्यायोग्य वाटलं नाही. पुढे अजून एक खांबटाकं दिसलं जे लपून बसलं होतं. हे जमिनीखाली कातळकोरीव आहे. त्यानंतर अजून एक खांबटाकं लागलं जे जवळ जवळ पूर्णपणे बुजलेलं आहे.

नाथपंथीय साधूची समाधी आणि गडावरची तटबंदी

मोठी गुहा, जमिनीखालचे कातळकोरीव टाके

टाक्यांची हि मालिका संपल्यावर छोटासा ब्रेक घेतला. ह्या किल्ल्याला लागून डाव्या बाजूला एक लहान डोंगर आहे. इथे एक थडगे आहे, जी नाथपंथीय साधूची समाधी आहे. इथे मधल्या जागेत बसायला जागा आहे, घटकाभर थांबून, पुढे अजून अवशेष शोधत निघालो. प्रदक्षिणा मार्गाने किल्ल्याच्या डावीकडच्या बाजूला आलो होतो. ह्या बाजूला काही पायऱ्या दिसल्या. पुढे एक मोठी गुहा सुद्धा दिसली. गुहा चांगली ५-६ फुट आहे उंचीला आणि १५-२० फुट तरी नक्कीच आतमध्ये आहे.

पायऱ्या

पायऱ्या

जागोजागी टाकी

ह्या बाजूला अवशेष शोधताना मध्येच खाली-वर करून ते बघावे लागतात. पुढे २ * २.५ फुटांचा एक चौकोन कातळात कोरलेला दिसला. त्यात वाकून बघितलं तर आतमध्ये पूर्ण पाणी भरलेलं दिसलं. म्हणजे हेही एक टाकंच! 😊 ह्या किल्ल्यावर एकूण किती टाकी आहेत कोण जाणे. आम्हाला सहज दिसलेली काही,काही लपलेली तर काही गाळाने भरल्याने लक्षात येत नाहीत अशी अजून...

शिवलिंगाकृती कोरीवकाम आणि शेजारचे खड्डे

एके ठिकाणी चौकोनी खड्डे, एका बाजूला एक असे खोदलेले दिसले. सलग १०-१२ पेक्षा जास्ती असावेत. आजूबाजूलाही असे अजून काही खड्डे दिसले. इथे टाके खोदता येईल का ते बघण्यासाठी असे खड्डे खोदतात. जागा साजेशी नसेल तर तो प्रयत्न सोडून दिला जातो. दुसरा उद्देश हा मांडव घालण्यासाठी खांब रोवायला केलेली सोय. ह्यातले काहीही असू शकते.

ह्याच्या शेजारीच शिवलिंगाकृती कोरीवकाम आहे. पण त्यात शिवलिंग नसून पादुका कोरलेल्या आहेत.

अजून एक टाकं

गडाचा डोंगर फिरताना अजून खूप ठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. घडीव दगड,  पाण्याची टाकी असे जुने अवशेष दिसत राहतात. जोडीला सीताफळांच्या झाडांचे रान आहे.

डोंगराच्या पोटात लेणी
इतस्ततः पसरलेले नक्षीदार दगड

उतरताना दुसऱ्या मार्गाने उतरायचे ठरले. म्हणजे दुसरी वाट कळते आणि ह्या बाजूचे अवशेषही दिसतात. गडाचा मुख्य डोंगर आणि शेजारचा डोंगर इथून आम्हाला खाली जाता येईल अशी जागा दिसली होतीच मगाशी इथून फिरताना. ह्या बाजूने उतरताना डावीकडच्या डोंगराच्या पोटात लेणी कोरलेली दिसली. त्याच्या खाली पाण्याची टाकी आहेत. हे जोडटाके आहे. समोरच कातळकोरीव बांधकाम बघता इकडे गडाचा दरवाजा असावा असं वाटतं.

इकडे दगडी लांब शिळा पडलेल्या आहेत. तसंच लहान लहान कोरीव नक्षीदार दगडही दिसतात, म्हणजे इथे नक्कीच जुनं मंदिर असलं पाहिजे.

छोटा महादेव मंदिराशेजारी पारावर ठेवलेले दगड

ह्या वाटेने खाली येऊन परत छोटा महादेव मंदिरात पोचलो. इथे झाडाच्या पाराखाली मंदिराचे घडीव दगड, घोडेस्वार, प्राणी असे कोरलेले दगडही ठेवलेले आहेत.

१०:३० च्या आत ह्या मोहिमेतला पहिला किल्ला पाहून खाली आलो आणि लगेच पुढच्या ठिकाणाकडे निघालो – नस्तनापूरची गढी.

नस्तनापूरची गढी

“राजदेहरे” मधून मागे फिरून मुख्य चाळीसगांव-नांदगांव रस्त्याला लागलं कि नांदगांवकडे जाताना “नायडोंगरी” गांव सोडल्यावर “पिंपरखेड”च्या आधी अगदी रस्त्यालगत डावीकडे ही गढी आहे. राजदेहरे पासून सुमारे १५ किलोमीटरच्या आसपास हे अंतर आहे.

बुरुजांच्या मधून गढीत जाणारी वाट

ह्या गढीला “राजे खोजा” गढी असंही म्हणतात. इथे येतानाच रस्तावरून डावीकडे बुरुज दिसतात. त्यामुळे ही गढी शोधायची वगैरे गरज पडत नाही. गढीकडे वळल्यावर गढीची तटबंदी आणि बुरुज लागतात, ह्यातले चार-एक बुरुज ओलांडल्यावर गढीचे प्रवेशद्वार आहे.

प्रवेशद्वाराजवळचे गणपती मंदिर

बुरुजाच्या बाजूने वळसा घालून आत गेल्यावर तटबंदीच्या आडोशाला एक नव्याने बांधलेलं मंदिर आहे, हे गणपतीचं मंदिर आहे. इथून जवळून तटबंदीवर चढून आतमध्ये जाता येते. तसं म्हंटलं तर प्रवेशद्वार, कारण इथून जाता येतं म्हणून. वास्तविक दरवाजा, कमान वगैरे नाहीये.

मुख्य रस्त्यावरून इथे येईपर्यंत आपल्या लक्षात आलेलंच असतं कि मुळातच हि गढी बऱ्यापैकी मोठी आहे. साधारण ३०० चौरस फुट एवढा तिचा आकार आहे. त्यामुळे आत शिरताच असंख्य अवशेष दिसायला लागतात. फक्त अजिबात निगा न राखली गेल्याने वाढलेल्या झाडीतून वाट काढत ते बघावे लागतात.

बुरुजाचा आतील भाग आणि त्यावर इतिहास रचत असलेली गावकरी मंडळी

साधारणपणे सगळ्या गढ्या आणि भुईकोटांची परिस्तिथी असते तशीच इथेही आहे. गावातली पोरं इथे निवांत ठिकाण म्हणून टाईमपास करायला येतात. आत तटबंदी वरून चढून शिरल्यावर डावीकडे एक भली थोरली भिंत दिसते. ही पलीकडे असलेल्या बुरुजाच्या आतल्या बाजूची भिंत आहे. त्यावर चढायला पायऱ्या वगैरे होत्या. एक जण त्या पायऱ्यांवर बसून जुनं भूगोल,विज्ञान वाचत बसला होता तर दुसरीकडे त्या भिंतीवर दुसरा एक जण नवीन इतिहास लिहित होता. पुढच्या पिढ्यांसाठी तो नवीन इतिहास रचत असेल कदाचित, पण अश्या प्रकाराने जर गढी शिल्लक राहिली बघायला तर.

बुरुजाच्या आतील बाजूला असलेली दुसऱ्या बुरुजाला जोडणारी भिंत आणि त्यातील झरोके

ह्या भिंतीला वळसा मारून नक्की बुरुज केवढा आहे वगैरे अंदाज घेतला, खूप मोठा बुरुज आहे हा. ह्या भिंतीला लागून दुसरा बुरुज आहे आणि त्याला जोडणाऱ्या भिंतीत खूप झरोके आहेत. हे सगळं पाहत भिंत ओलांडून पलीकडे गेलो.

वाड्याचे अवशेष
बाव
बावेच्या काठावर कोरलेले देव

पलीकडे एका वाड्याचे किंवा बुरुजाच्या भागाचे खालचे अवशेष वगैरे शिल्लक आहेत, त्याला कमानी आहेत. त्याला लागुनच एक सुंदर बाव आहे. बावेच्या वरच्या बाजूलाच एक मूर्ती वगैरे काहीतरी कोरलेले आहे.

मिनारवाली वास्तू आणि शेजारी बाव

थोडं पुढे एक मिनारवाली लहानशी वास्तू आहे आणि त्याच्या शेजारी एक बाव आहे.

गढीच्या आतील भागातले मोठे बुरुज

आतमध्ये सगळी मोकळी जागा आहे. प्रशस्त जागा असली तरी ह्यात नीट अशी वाट नाही आणि नीटसे अवशेष, रांगेने बघत जावेत असे नाहीत. एक तर झाडी प्रचंड आहे. ह्या झाडीतून वाट काढत जुने वाडे, आतले बुरुज, त्याच्या भिंती वगैरे जे काही आहे ते अवशेष बघता येतात. बुरुज खूप आहेत आणि काही फार मोठे आहेत, फक्त उध्वस्त असल्याने त्यांचा नीट आकार आणि गढीचा पूर्ण नकाशा काही उलगडत नाही.

झरोकेवाली लांब भिंत

एका बुरुजावर चढून बऱ्यापैकी भाग न्याहाळता येतो ह्या गढीचा. तिथून बघितले तर एक लांब अशी भिंत दिसते, अर्थात ही वाड्याचा आतील भाग असणार हे नक्की, कारण ह्या भिंतीला चक्क १५ झरोके तर मी मोजले. अजूनही असतील जे एक तर झाडीत लपले आहेत आणि भिंतही पूर्ण शिल्लक राहिलेली नाही, तरीही हि शिल्लक भिंतच तब्बल १५० फुट आहे. भिंतीच्या पडलेल्या भागात अजूनही झरोके असणारच, म्हणजेच हा आतला वाडा खासे राजांचा असावा असा कयास बांधता येतो.

एका बुरुजात काही समान आणि अडगळीत गेलेला फ्लेक्स बोर्ड

एका बुरुजाच्या आतमध्ये गादी, पुस्तकं, पाण्याची रिकामी बाटली वगैरे समान दिसलं म्हणजे इथेही सध्या कोणीतरी तात्पुरता आसरा घेत असणार 😊

शेजारीच मोठा फ्लेक्स बोर्ड होता, त्यावर “राजे खोजा नाईक” लिहिलेलं आणि त्यांचा मोठा फोटो. वरती “राजपुत्र एकलव्य वीर सेना” असंही लिहिलेलं. त्यात “पुतळ्याची नियोजित जागा” असाही मजकूर आहे. म्हणजे इथे कधी काळी पुतळा बांधायचा विचार होऊन मग बारगळलेला असावा असं दिसलं.

असे सगळे जमतील, दिसतील तेवढे अवशेष बघितले आणि गढीच्या बाहेर पडलो. एके ठिकाणी झाडाखाली दगडात कोरलेला देव आणि तोफगोळे ठेवलेले बघितले.

पावणे १२ च्या सुमारास ते गांव सोडले. पुढे जायचे होते गौताळा अभयारण्य भागात 😊

पाटणादेवीचं मंदिर आणि देवीच्या सहवासात असलेला कण्हेरगड किल्ला बघायला.

कर्नाटकातील किल्ले - किल्ले जलदुर्ग आणि किल्ले रायनपाल्या


किल्ले जलदुर्ग

कर्नाटकातल्या ह्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मुद्गल किल्ला पाहून झाला होता. तेलंगण सीमेवर जाऊन परत महाराष्ट्राकडे वळलो होतोच. ह्या रायचूर जिल्ह्यातला शेवटचा किल्ला आम्ही बघणार होतो – जलदुर्ग!

“जलदुर्ग” हा वास्तविक किल्ले प्रकारातला एक प्रकार. पाण्यात असलेले, म्हणजे चहुबाजूंनी किंवा बहुतांशी पाण्याने वेढलेले किल्ले म्हणजे जलदुर्ग. हे बऱ्यापैकी समुद्राच्या आसपास असतात असेच डोळ्यासमोर येते. परंतु प्रचंड विस्तार असलेल्या नद्यांच्या काठावर सुद्धा जलदुर्ग असतात. समुद्र असो वा इतर जलाशय, अश्या जलमार्गांवर नियंत्रण ठेवणे आणि अधिपत्य गाजवणे यासाठी मुख्यत्वे जलदुर्गांची उभारणी होते. आम्ही होतो रायचूर जिल्ह्यात, म्हणजे कोणत्याही दिशेला शेकडो किलोमीटरवर समुद्र नाही, पण नद्या मात्र आहेत आणि त्यात आहे “कृष्णा” नावाची जणू “महानदी”च!

रायचूर जिल्ह्यात लिंगसूर नांवाचे गांव आहे. “बसवसागर” धरणातून पुढे खळाळत निघालेली कृष्णा नदी ह्या लिंगसूरजवळ एका साधारणपणे त्रिकोणी आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला येऊन धडकते आणि दुभंगून पुढे साधारण १०-१२ किमीवरच्या टोकापुढे येऊन परत मिळते. असे हे एक बेटच तयार झालेले आहे. आणि ह्या बेटावरचा, नदीच्या पाण्याने वेढलेला किल्ला म्हणून प्रकार “जलदुर्ग” आणि नांवही तेच.

परंतु जलदुर्ग ह्या नांवाची अजून एक व्युत्पत्ती सांगितली जाते. इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेल्यावर त्याचा उपयोग ते गुन्हेगार, कैदी ठेवण्यासाठी करत असत, म्हणजे हा “जेल-दुर्ग” आणि पुढे जलदुर्ग.

हा किल्ला बेटावर म्हणजे द्वीपावर आहे म्हणून याला द्वीप-दुर्ग असेही नांव असल्याचे वाचनात आले.

नांवात काय आहे म्हणता म्हणता २-३ नांवे आणि व्युत्पत्ती बघत लिंगसूर जवळ ज्या बेटावर हा किल्ला आहे त्याला जोडणाऱ्या पुलाजवळ येऊन पोचलोय. J

“जलदुर्ग कोटे रस्ता” ह्या रस्त्यावर हा पूल आहे. त्याचे नांवही जलदुर्ग पूल. (कोटे म्हणजे कन्नड मध्ये किल्ला) कृष्णेच्या दुभंगलेल्या प्रवाहाच्या तुलनेने अरुंद प्रवाहावर हा पूल आहे. पूल ओलांडून आम्ही बेटावर प्रवेश केला.

गडाचे पहिले प्रवेशद्वार

पुढे एका वस्तीतून शेतांच्या कडेकडेने रस्ता आपल्याला थेट किल्ल्यात घेऊन जातो.

किल्ल्याच्या एका दरवाजातून आत गेल्यावर गाडीरस्ता संपला. तिथे गाडी लावून आम्ही गडाच्या आत मधल्या भागाकडे निघालो.

आतील भागात नेणाऱ्या पायऱ्या

आता गडाच्या आतमधेच गाडी घेऊन गेलेले असल्याने, आजूबाजूला गडाचे अवशेष दिसायला लागलेलेच असतात. काही उध्वस्त, ढासळलेले अवशेष, तटबंदी बघत ते ओलांडून गडाच्या आत मध्ये आलो. या गडातही वस्ती आहे.

तटबंदी वरून बुरुजावर जाणारी वाट

पायर्‍या चढून वर आलो, तर वाट तटबंदीच्या कडेकडेने सरळ तो टोकावरच्या बुरुजावर जाते.

हा बुरुज ह्या बेटाच्या ज्या बाजूने कृष्णा नदी वाहत येते, त्या बाजूच्या टोकाला आहे. बुरुजाच्या वरचा भाग ढासळलेला असला, तरी जमिनीच्या पातळीच्या खालचा, म्हणजे पायाचा भाग मात्र शाबूत आहे.

या बुरुजाचे स्थान लक्षात घेतले, तर ह्या संपूर्ण भागावर लक्ष ठेवण्यासाठी हा किती महत्त्वाचा आहे ते लक्षात येते. बुरुजच काय, एकूणच किल्ल्याचे स्थान बघता, जिल्पी आमनेर किल्ल्याची आठवण येते.

बुरुजावरून पलिकडे, कृष्णा नदीचे पात्र

इथे थोडावेळ निवांत बसून परिसर न्याहाळावा, हा मोह नक्कीच होतो. जर सूर्यास्ताच्या वेळी आपण इथे असू, तर निसर्गाचे रूप न्याहाळत बसावे, निवांत क्षण अनुभवावेत असे न वाटल्यास नवल.

आम्ही टळटळीत दुपारी तिथे होतो, तरीसुद्धा कृष्णा नदी, तिचे ह्या बेटामुळे दुभंगणारे पात्र, पलीकडे जंगल, तिकडच्या भौगोलिक परिस्थितीला साजेसे असे मोठमोठाले रचलेले असल्यासारखे दगड, हे सर्व न्याहाळले.

बुरुज सोडून तटबंदीवरुन पलीकडच्या टोकाला गेलो. वाटेत गडाच्या आतल्या भागात नजर टाकली, तर किल्ल्यातील वस्ती व त्यांनी थाटलेला संसार दिसतो. बाजूला दिसते ती त्यांनी लावलेली विविध फुलझाडे, नारळाची झाडं, त्यातच लाईटचे खांब, त्यातून वर डोकावणारी टीव्हीची छत्री आणि अंगणात मुक्तपणा अनुभव असलेली गायी-गुरं. परिसर स्वच्छ ठेवलेला होता या लोकांनी.

इस्लामिक शैलीत बांधलेले मंदिर

तटबंदीला लागूनच आतल्या बाजूला एक मिनार वाली वास्तू आहे. मूळच्या दगडी बांधकामावर प्रत्येक मिनारावर धातूचे कळस बसवलेले आहेत. तिथे देवाची नियमित पूजा होत असेलच, कारण गाभाऱ्यासमोर देव पूजेसाठी लागणारे भांडी-साहित्य दिसत होते. याजवळ आणखीही काही वस्तूंचे अवशेष आहेत. ही वास्तु इस्लामिक पद्धतीची बांधीव असली, तरीही हे मंदिर आहे.

बुरुज

दुमजली वास्तू

ह्या बाजूला आणखी एक बुरूज आहे. आतील बाजूस एका उंच चौथऱ्यावर एक वास्तू दिसली. वरच्या बाजूचा भाग ढासळलेला असला तरी इतर वास्तू बऱ्यापैकी शाबूत आहे. लगेच मोर्चा तिकडे वळवला.

दरवाजे

जमिनीच्या खालच्या पातळीत दरवाजे

आत मध्ये जाऊन भाग न्याहाळला. दोन बाजूंना दरवाजे आहेत. यातील आतल्या बाजूच्या दरवाजातून, किल्ल्याचा आतील भाग पूर्ण दृष्टीक्षेपात येतो. वास्तू पूर्वी दुमजली तरी असावी, कारण एक चोरदरवाजा जमिनीच्या खालच्या बाजूला आहे. अजूनही अवशेष असावेत पण ते ढासळलेले आहेत.

इकडच्या टोकावरून कृष्णा नदीपात्र

अजून एक बुरुज आणि तटबंदीमधून जाणारी वाट

प्रदक्षिणा मार्गाने फेरी मारत, परत गडाच्या प्रवेशापाशी येता येत होते. इथे डावीकडे अजुन एक बुरुज दिसला. बुरूज आणि तटबंदीमधल्या वाटेने प्रदक्षिणा पूर्ण करत गडाच्या प्रवेशद्वारापाशी आलो.

घरी आल्यावर फोटो बघताना हा चुकून क्लिक झाला होता काय असं वाटलं,
पण त्यात एक जण माझ्याकडे बघताना दिसला.
गाड्या ह्या दरवाजाजवळ लावल्या होत्या

वरचा सगळा भाग बघून झाल्यावर गाडीजवळ आलो. आम्ही जिथे गाडी लावली होती, त्याच्या जवळच एक दरवाजा आहे. दरवाजा आणि दोन्ही बाजूचा थोडा भाग फक्त शिल्लक आहे, तर आजूबाजूचे सगळे नष्ट झालेले आहे. पण दरवाजामागे देवड्या आहेत.

चौथऱ्यावर नंदी

झाडीत लपलेली समाधी
दडलेले अवशेष

आजूबाजूला झाडीत अजूनही काही अवशेष दडलेले आहेत. त्यातच एका बाजूला एका चौथऱ्यावर एक नंदी आहे, त्याला नव्याने रंग दिलेला आहे. एक समाधीही आहे.

गडावर गाड्या लावल्या तिथे येतांना आम्ही एका दरवाजामधून आलो होतो. परत जाताना तिथे गाडी थांबवून दरवाजा न्याहाळला. या गडाच्या शिल्लक अवशेषांमध्ये हा दरवाजा एकदम उत्कृष्ट भाग आहे.

दरवाजा आणि आतील बाजूस सुंदर पाकळ्या

गडाकडे येणारा रस्ता याच दरवाजातून येत असल्याने हा व्यवस्थित राहिलेला असावा. आजूबाजूचे सगळे मात्र पडून गेलेले आहे. आतल्या बाजूस सुंदर कमळाच्या पाकळ्यांच्या सारख्या कमानी आहेत.

डिसेंबर महिन्यात तुडुंब भरलेली शेते आणि भात लावणी

या दरवाजा बरोबर जलदुर्ग पूर्णपणे बघून झाला. परतीच्या वाटेवर जलदुर्ग पुलावर थांबून नदीपात्राचे फोटो काढले. पुढे रस्त्याच्या कडेला भात लावणी होताना दिसली. डिसेंबर महिन्यात चक्क भात लावणी? म्हणजे मुबलक पाणी, वा!

पुढचा किल्ला गुगल मॅप वर मार्क नसलेला किल्ला - म्हणजे किल्ले रायनपाल्या!

किल्ले रायनपाल्या

तलावाच्या पलिकडे किल्ले रायनपाल्या 

कर्नाटक दौऱ्यातला शेवटचा बघायचा हा किल्ला. गुगल मॅप ह्याचे स्थान Mark केले गेले नाहीये अजून तरी आम्हाला बघायचा तर होताच.

रायचूर जिल्ह्यातून परत यादगिर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यात आलो. इकडे रायनपाल्या नावाचे गाव आहे. जलदुर्ग वरून निघाल्यावर "बसवसागर" धरणाच्या अगदी जवळून कृष्णा नदी ओलांडून नारायणपूर गावात रस्ता जातो. हाच रस्ता पुढे कोडेकल गावातून जातो. ह्या रस्त्याला “बसवेश्वर मंदिर रस्ता” असे नाव आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर एक कालवा लागतो. बसवसागर धरणातून हा कालवा वाटेतल्या सगळ्या गावांना पाणीपुरवठा करत, खूप लांब वरून वळसा मारून ह्या कोडेकल गावाच्या शेजारून पुढे जातो.

बसवेश्वर मंदिर रस्ता ह्या कालव्याजवळ सोडून उजवीकडे वळून, कालव्याच्या कडेकडेने रस्ता परत उजवीकडे वळून रायनपाल्या गावाकडे जातो. त्यापुढे वळल्यास राजन-कोलूर गाव लागते. पण या उजव्या बाजूला न वळता थोडे पुढे गेल्यावर कालव्याजवळ एक वस्ती लागते. त्या वस्तीतून जावे. गुगल मॅप वर यातील कोणतेही ठिकाण मार्क नसल्याने नीट लक्ष द्यावे लागते.

शेतांजवळून जो कच्चा रस्ता जातो, तो म्हणजे अगदी सांभाळतच जावा असा आहे. आम्ही सरळ सगळे गाडीतून उतरून गाडीचे वजन कमी केले आणि फक्त गाडी सांभाळत निघालो. आमची दुसरी गाडी तर होंडासिटी होती. ती इथे घालणे, म्हणजे खड्डा सरळ दिसत असताना त्यात उडी मारल्यासारखे होते. त्यांना अशा सूचना फोनवर दिल्या आणि वस्तीत शिरलो.

वस्तीत जुजबी चौकशी केली आणि त्यांना चेहर्‍यावर गोंधळलेल्या भावातच ठेवून वस्ती ओलांडून पुढे झाडीत, जंगलात शिरलो. रस्ता अशा गाड्यांसाठी बनवला नसावा. चूक त्यांची नव्हती. इथे कोण येणार होतं? आमच्या अंगात मस्ती म्हणूनच आम्ही इथे आलो होतो आणि त्यातून गाडी सकट.

अशा रस्त्यावरून गाडी साठी जागा करत करतच शेवटी एके ठिकाणी गाडी लावली. किल्ला दिसायला लागलाच होता. फक्त चालायचं बाकी होतं. थोडं चालल्यावर उजवीकडे मस्त तलाव लागला. तलावाच्या पलीकडे कडेलाच किल्ला आहे.

बुरुजच बुरुज आणि ३ पातळीत तटबंदी

जलाशयाच्या शेजारून, तसेच पायवाटेने पुढे गेलो. किल्ल्याचे लांबून दर्शन तर खूप मस्त होते आणि इथून समोरून त्याचे रूप तर त्याहूनही छान होते. किल्ला फार उंचावर वगैरे नव्हता. क्षेत्रफळही काही एकरात वगैरे नव्हते, पण सुरक्षितता कसली होती... तटबंदी समोरच तीन पातळीत दिसत होती.

एके ठिकाणी नागमूर्ती दिसल्या. यांच्या पूजेच्या निमित्ताने तरी गावकरी लोक इथे येत असावेत.

तटबंदी, बुरूज, सारं काही स्पष्ट डोळ्यासमोर होतं. हा किल्ला काही पुणे-मुंबई जवळचा नव्हे प्रसिद्ध असायला. प्रसिद्ध तर बाजूलाच, ट्रेकर्स आणि भटक्या मध्येही परिचित असा हा किल्ला नव्हे. उलट कर्नाटकातल्या कुठल्याश्या, कशाचाही दृष्टीने, कोणाच्या डोळ्यात न येणाऱ्या खेडेगावातला हा किल्ला. पण नुसत्या बाह्य दर्शनाने आम्ही चकीत झालो होतो. सर्वांनी एकमेकांची साथ देऊन अशा दुर्गम ठिकाणी जिद्दीने आल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होते. अर्थातच खूप फोटो काढले.

नागमूर्ती, अनगड देव आणि हनुमान!

तिथल्याच एका दगडशिळेजवळ काही देवांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसल्या. त्यात काही नागदेव, काही आकार न कळणारे अनगड, तर एक चक्क हनुमान दिसला. किल्ला कोणत्याही राजवटीखाली असो हनुमान सर्वत्र असतोच!

बुरुजाच्या मागे संरक्षित दरवाजा

दरवाजा

किल्ल्याच्या जसजसं जवळ जायला लागलो, तसा किल्ला अंतरंग उलगडून दाखवायला लागला. सुरुवातच गोमुखी दरवाजाने झाली. लांबून आणि समोरून साधासा वाटणारा बुरुज चक्क एका दरवाजाचा संरक्षक चिलखत निघाला. आत मध्ये डावीकडच्या दरवाजा समोर आलो. बांधणी कसली भक्कम आहे ह्याची... दगड, मस्त घडीव, टाकी लावलेले आहेत. पलीकडे आणखी एक दरवाजा आणि देवड्या वगैरे. देवड्या तर एवढ्या प्रशस्त, कि वाड्याचाच एक भाग वाटावा.

भरभक्कम बुरुज

त्यापुढे चक्क हत्तीने पाय रोवून उभं रहावं, असा भरभक्कम बुरुज त्या तटबंदीच्या रक्षणासाठी सज्ज होता. त्यावर जायला पायऱ्या आणि वर एक लहानसा दरवाजा.

किल्ल्याचे अंतरंग

बुरुज बघितल्यावर आजूबाजूला कुठेच लक्ष न जाता सरळ तिकडेच वळलो. पायर्‍यांवर गेलो आणि पाठीमागे नजर टाकली तर काय, किल्ल्याचे आणखी बुरुज तटबंदी, बहुतेक तो बालेकिल्ला असावा. झाडाझुडपांनी त्यावर थोडे अतिक्रमण केले असले, तरी हा अंतरंग खास दिसला. सूर्यप्रकाशात झाडे वेगवेगळ्या रंगाच्या पालवीने खुललेली, तर त्यातून मधून किल्ल्याचे बुरुज डोके वर काढून.

खूप वेळ मालिका बघतोय आणि चार अतिशय संथ भागानंतर एका भागात काहीतरी घडावं आणि नंतरचे परत चार भाग संथ असं काही नव्हतं इकडे.

इकडे बुरुज तर तिकडे तटबंदी

जरा चार पावले टाकली, की एक तर एका बाजूला बुरुज, नाहीतर तटबंदी. नाहीतर सरळ समोरच एखादा दरवाजा. कुठल्याशा भक्कम बुरुजामागून आपल्याकडेच वाकून पाहत असलेला. बरं, बुरुजही काही ढासळलेले वगैरे नाहीत. आपल्या चर्या-जंग्यांसह जणू शत्रू आला, तर कधीही लढायला सज्ज. फक्त वर मावळे दिसत नव्हते. दरवाजे पण साधे-सुधे नाहीत, देखणे!

देखणा दरवाजा

उजवीकडचा बुरुज ओलांडून, डावीकडच्या दरवाज्यात गेलो. तर समोरचा दरवाजा आपल्या दगडांच्या बाहू मधून आपली दगडी छाती काढत, डोक्यावर मुकुट घेऊन उभा! या दगडांमध्ये ना चूना, ना सिमेंट. जणू अखंड दगडाला सुरीने कमानीदार कापून, त्यात चिरा पाडून नक्षी केलेली.

नाही, गाविलगड, नरनाळा वगैरे बलाढ्य दुर्गांच्या दरवाजांशी नका तुलना करू. नाही, आपल्या सह्याद्रीतल्या दरवाज्यांशी पण. पण ह्या दुर्गम भागातल्या या किल्ल्यावर असे दरवाजेही काही कमी नाहीतबलाढ्य नाहीत, पण रेखीव.

दरवाजामधून आत मध्ये प्रवेश केला. हा किल्ल्याच्या सर्वात आतला भाग. इथे एका चौथर्‍यावर चक्क सिमेंटच्या भिंतींनी एक खोली बांधलेली आहे. म्हणजे अलीकडच्या काही वर्षांतले ते कसले तरी ऑफिस किंवा तसेच काही असावे.

सर्वोच्च स्थानावरचा बुरुज

दीड वाजून गेला होता. जेवणाचा काही विचार वगैरे नव्हताच. आधी किल्ला फिरून घ्यावा म्हणून इतर अवशेषांकडे वळलो. उजवीकडच्या टोकावर एक बुरूज आतल्या बाजूने ढासळलेला होता. मात्र बाहेरून अजूनही शत्रूसमोर लढायला पाय रोवून उभाच वाटला होता. कडेकडेने गेल्यावर बुरुजातला दरवाजा दिसला आणि त्याकडे नेणाऱ्या पायऱ्या.

गडाच्या सर्वोच्च स्थानावरून वर येणारा मार्ग

डावीकडे जलाशय
आतील बाजूस सिमेंटचे बांधकाम आणि पलिकडे मंदिर

दरवाजातून सरळ वर गेलो. किल्ल्याच्या या भागातून इथवर आलो तो भाग डोळ्याखाली घातला. खाली डाव्या हाताला ज्याच्या जवळून आलो तो तलाव. मागे आतल्या भागात सिमेंटच्या खोलीच्या मागे तीन कमानीदार एक वास्तू दिसली. पलीकडे किल्ल्याचे शेवटचे टोक, त्यावर बुरुजाच्या आतील अर्धगोल भाग.

मंदिर

खाली उतरून आधी त्या मंदिरात गेलो. कसले मंदिर आहे हे सांगता येत नव्हते. लाल पिवळ्या रंगाचे ठिपके ठिपके असे रंगवलेले होते.

सर्वात मागचा, शेवटच्या टोकावरचा बुरुज

दर्शन घेऊन, त्याच्या शेजारून मागील भागात जाणार्‍या पायऱ्यांवरून वर गेलो. पाठीमागचे बुरुजही सुस्थितीत आहेत. किल्ला पाहून त्या समाधानाने बॅग ठेवून बसलो. निवांत (?) दहा मिनिट (😂) बसून खाऊचे बकाणे भरले.

परत फिरून आल्यावाटेने किल्ल्याबाहेर पडून तलावाजवळ आलो. मागे फिरून किल्ल्याचे काही फोटो घेऊन त्याला निरोप दिला. जवळच्या झाडीतही काही बांधकामाचे अवशेष दिसले. ते सर्व पाहून, हळू हळू गाडी बाहेर काढत, भरल्या मनाने त्या गावाचाही निरोप घेतला.

कर्नाटक पाणीव्यवस्था, डिसेंबर मध्ये भातशेतीचे रहस्य

कर्नाटकच्या या दौऱ्याची अशी सांगता झाली. अडीच वाजता त्या कालव्या जवळून ते गाव सोडलं ते ह्या दौर्‍यावर ब्लॉग लिहायचा निश्चय करूनच.

प्रश्नच नाही! अतिशय प्रसिद्ध अशा गुलबर्गा/कलबुर्गी किल्ल्याने दौर्‍याची सुरुवात होऊन सांगता या अत्यल्प-परिचित रायनपाल्या किल्ल्याने झाली होती. कर्नाटकातल्या त्या कन्नड भाषेतला आपलेपणाचा ओलावा, भूक चाळवणाऱ्या इडल्यांचा सुवास आणि मन तृप्त करणारे लिंगायत मेसमधले जेवण, या सगळ्यांनी हे चार दिवस कर्नाटकमय झाले होते.

महाराष्ट्रात खेडोपाड्यात मिळणारा आपुलकीचा पाहुणचार कर्नाटकातही उपभोगायचे भाग्य आम्हाला लाभले होते. फिरलेला प्रत्येक किल्ला त्याचे स्वतःचे एक तरी वैशिष्ट्य मनात भरूनच आम्हाला निरोप देत होता, खाल्लेला प्रत्येक घास त्याची चव जिभेवर ठेवत होता, तर भेटलेला प्रत्येक माणूस त्याची आठवण आमच्याकडे ठेवूनच आम्हाला पुढे जाऊ देत होता. २०२० च डिसेंबरचे हे शेवटचे चार दिवस, तेही कोरोनाने सगळ्यांना हैराण करून सोडलेल्या काळातले आमच्या चांगलेच लक्षात राहतील.

कलबुर्गी/गुलबर्गा, मालखेड, शहाबाद, यादगिर, शहापूर, वनदुर्ग, सुरपूर उर्फ कुंभारपेठ, वागनगेरा, रायचूर, मलिआबाद हे किल्ले पाहतानाच ब्लॉगचा विचार मनात येत होता. जो पुढे मान्वि, मुक्कुंदा, रौडकोंडा, मुद्गल, जलदुर्ग आणि या सर्वांवर झालासे कळस, असा रायनपाल्या किल्ला बघितल्यावर अगदी पक्काच झाला, जो आज या ब्लॉगने आंतरजालावर उतरला!

कर्नाटकातील किल्ले - किल्ले रौडकोंडा आणि मुद्गल


किल्ले रौडकोंडा

मुक्कुंदा किल्ल्यापासून साधारण पंधरा किलोमीटरवर रौडकोंडा गांव आहे. गुगल मॅपवर जरी रस्ता सापडला आणि दिसतही असला तरीही वस्ती, पायथ्याचे गांव जवळ आल्यावर लोकांना विचारल्याशिवाय खरा रस्ता सापडत नाही, हे आता आमच्या लक्षात आलं होतं. गांवाजवळ पोचताना लांबूनच, रस्त्यावर समोर, एका उंच टेकडीवर एक मंदिर असल्यासारखे दिसायला लागले. त्याच्या डावीकडे एका टेकडीवर किल्ल्याचा बुरुज लांबूनही दिसला. चला, म्हणजे आमचे लक्ष्य तरी आम्हाला दिसलं.

दिसलेलं मंदिर हे मल्लीकर्जून मंदिर. या वेळी आमची दुसरी गाडी पुढे होती, तर आम्ही मागे होतो. त्यामुळे पुढे जाऊन ते किल्ल्याची वाट शोधून ठेवतील आणि मग आम्हाला काही त्रास होणार नाही ही आशा होती. पण झालं भलतंच. त्यांचा गांवकऱ्यांमुळे काहीतरी गोंधळ झाला आणि ते किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्याकडे न वळता, पुढे टेकडीवर असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराच्या वाटेला लागले. अर्थात इथल्या किल्ल्यावर कोण कशाला येईल असा गावकऱ्यांचा समज असावा, त्यामुळे ते आम्हालाही किल्ल्या शेजारच्या टेकडीवरच्या मंदिराचा रस्ता दाखवत होते. त्यांनाही तसेच केलं असावं. परंतु आम्ही खूप वेळा किल्ल्यावरच जायचंय, असं सांगितल्यावर कसाबसा रस्ता कळला.

आमच्याकडे सगळेजण आम्ही जणू परग्रहावरून आलोय असंच बघत होते. आम्हाला हेही आता नवीन राहिले नव्हते. त्यांना मुळात किल्ल्याचा रस्ता दाखवायची इच्छाच दिसत नव्हती. अर्थात तसं का ते आम्हाला पुढं कळणारच होतं. तूर्त तरी तो विचार करायला आमच्याकडे वेळ नव्हता. पाच वाजून गेले होते. सूर्यास्त होऊन अंधार पडायच्या आत खाली परतायचे होते, त्यामुळे इतरांची थोडाच वेळ वाट बघून सरळ किल्ल्याचा मार्ग धरला. त्यांनीही मल्लीकर्जून मंदिर रस्त्याला लागलोच आहोत तर ते बघायचं ठरवलं, त्यामुळे आम्ही सरळ किल्ल्याच्या वाटेला लागलो.

पूर्णपणे घसरड्या दगडांचा चढ

नुसते चढ-उतार असलेले दगड, माती नाहीच

जशी वस्ती संपली, तसा लोकांच्या वागण्याचा अर्थ समजला. इथेही पाय टाकताना चुकला की संपलं, अशी अवस्था होती. यावेळी चूक न करता नीट उड्या मारत निघालो. वर जाणारी वाट म्हणजे पूर्णपणे घसरड्या दगडांचा चढ आहे. मातीची जमीन नाहीच. पाय सरकायला पूर्ण वाव. त्यातून गावकऱ्यांनी टाकलेला सडा. पण थोडा चढ चढलो आणि त्या हिरवळीतून आमची सुटका झाली.

मोठमोठाले दगड आणि त्याला फासून ठेवलेला रंग

मोठमोठ्या दगडी शिळांमधून डोकं वर काढणारा बुरुज

दगडांची ही रचना पाण्याने झालेली असावी. पंधरा मिनिटात आम्ही तो दगडी टप्पा पार करून वर पोचलो. मोठ-मोठ्या पडलेल्या दगडांमधून वर जायची वाट शोधली. वर दिसला तो मोठमोठ्या दगडी शिळांमधून डोकं वर काढणारा बुरुज.

किल्ल्याचा हा एकमेव अवशेष शिल्लक आहे, बाकी काहीही या किल्ल्यावर शिल्लक नाही. ना तटबंदी, ना टाके. काही प्रचंड शिळांच्या मागून तिथे जायला वाट शोधली आणि दाखल झालो त्या बुरुजाच्या प्रवेशद्वारापाशी. प्रवेशद्वार जमिनीपासून चार-एक फूट तरी वरती आहे आणि पायर्‍याही नाहीत. दरवाजाची उंचीही जेमतेम चार फूट आहे. कमानीवरती गणपती कोरलेला आहे. इथे सगळ्यांनी फोटो काढून घेतले, कारण सुर्यास्ताच्या आधी आणि त्यातून वाट शोधत शोधत वर पोचल्याचा आनंद नक्कीच झाला होता.

आतला चिंचोळा रस्ता आणि वर जायला पायऱ्या
बुरुज- आतील बाजू, झरोका आणि खांब

नंतर त्या दरवाजातून आतमध्ये वरती जायला पायऱ्या आहेत हे कळलं. जरा भीतभीतच शिरलो. वरती छत खांबांवर तोललेलं आहे. पडझडही बरीच झालेली दिसत होती. बहुतेक वटवाघुळं असावित. त्यामुळे आम्ही फार आवाज न करता वावरत होतो.

एका चिंचोळ्या जागेतून बुरुजावर येताना नाना
खाली गांव

पलिकडे टेकडीवर जाणारा पांढऱ्या रंगाने रंगवलेला मार्ग

इथे एक झरोका आहे. जवळच प्रकाशाचा झोत दिसला. बुरुजाच्या वर जायला दगड रचून इथे सोय केलेली आहे, त्यावरून चिंचोळ्या जागेतून बुरुजावर चढलो. वरतून खाली एका बाजूला रौडकोंडा गांव, तर दुसऱ्या बाजूला शेजारची उंच टेकडी दिसली. त्यावर जाणारा मार्ग पांढऱ्या रंगाने रंगवलेलाही दिसला.

रंगीबेरंगी काटे कोरांटी (कोरंटक्की)

आमची “टीम बी” मल्लीकर्जून मंदिरातच रमली असावी. पावणेसहा होऊन गेले होते. अंधार पडायच्या आत खाली जायचे असल्याने लगेच निघालो. इथे रानटी कोरंटक्कीची झाडेही खूप आहेत, त्यांवर वेगवेगळ्या रंगाची फुलं फुललेली होती.

उतार

दगडी शिळा पार करून आता उतारावर आलो. पाण्याने तयार झालेल्या ह्या लेअर्स वरून सावकाश उतरावं लागत होतं. त्यात दगड गुळगुळीत झालेले. सरळ उतरताच येत नव्हतं. पाऊल आडवं टाकत-टाकतच उतरत होतो. तेवढ्यात खालून “लवकर या” अर्थाचे आवाज ऐकू यायला लागले. खाली काही गावकरी पुरुष आम्हाला खाली पटापट यायला सांगत होते. त्यांना आमची कदाचित काळजी वाटत असावी, कारण अंधार होत होता.

सावकाश खाली उतरताना प्रमोद आणि विनीत

काळजी लक्षात घेतली, तरी चार फोटो काढल्याशिवाय खाली कसे उतरणार? त्यातून सावकाश पावले टाकली नसती तर काही सेकंदातच खाली पोचलो असतो, फक्त गडगडत, म्हणून वेग वाढवता येत नव्हता. खालून फारच घाई होत असल्याचे कळल्यावर मात्र वेगळाच संशय आला. खालपर्यंत आलो, तर खरा प्रकार लक्षात आला. घाई आमच्या काळजीपोटी नव्हती, तर त्यांची वेगळीच घाई झाली होती. त्या पुरुषांच्या मागे हातात टमरेल घेऊन बायका तयारच होत्या. हि त्यांची ठराविक वेळ असावी.

असो... आम्ही वेळेत खाली आलो होतो म्हणजे आणि तेसुद्धा वरचा एकमेव शिल्लक अवशेष असलेला बुरुज बघूनच. दिवस सार्थकी लागला होता. मुक्कुंदा नंतर हा असे दोन लहानगे, पण रस्ता शोधण्यात वेळ गेलेले आणि अतिशय कमी परिचित असे किल्ले पदरात पडले होते.

आता आजच्या दिवसातले शिल्लक होते फक्त रात्रीचे जेवण आणि कर्नाटकातल्या ह्या दौर्‍यातला शेवटचा मुक्काम मुद्गल या गावी.

किल्ले मुद्गल

किल्ले मुद्गल या किल्ल्याबद्दल लिहायचे तर घामच फुटला. अर्धा तास तर कुठून सुरुवात करू यावरच गेला. सगळे फोटो चार वेळा बघून झाले. हो ना, तब्बल १५५ ते १६० एकरच्या आसपास आहे हा किल्ला. सगळा किल्ला धड फिरूनही होत नाही, तरी जेवढा बघितला तेवढा लिहायचा प्रयत्न करू.

तर रौडकोंडा बघून मुद्गल गावात पोचायला रात्र झाली होती. राहायची सोय बघितल्यावर पोटपूजेची व्यवस्था पाहिली. रात्री धड कळतही नव्हतं कि नक्की आपण गावाच्या कोणत्या भागात आहोत, किल्ला नक्की किती लांब आहे.

सकाळी लवकर उठून, आटपून, न्याहारीसाठी शोधाशोध झाली आणि चहा पिताना अचानक कळले की ती टपरी एका मराठी माणसाची आहे. म्हणजे तो मूळ इथलाच, मुद्गल गावचा. पण जन्मापासून खूप वर्ष महाराष्ट्रात राहिलेला, आणि तोही चक्क रत्नागिरीत. मग सकाळी साडेसहाला मुद्गल ग्रामी एक भरत भेटीचा प्रसंग घडला.

परकोटाची तटबंदी

परकोटाची तटबंदी

गुगल मॅपवर गडाच्या लोकेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गाड्या हाणल्या आणि २-४ मिनिटांतच रस्त्याला लागूनच किल्ल्याची तटबंदी दिसायला लागली.

हा किल्ला सुद्धा जमिनीवर आणि डोंगरावर अशा दोन्ही भागात आहे. यातले गावातले अवशेष दिसायला सुरुवात झाली होती. दुहेरी तटबंदी, आत मध्ये मुद्गल गावाचा काही भाग आणि बाहेरून खंदक अशी ही रचना आहे. खंदकाच्याही बाहेरून असलेल्या रस्त्यावरून आम्ही चाललो होतो.

रस्त्याच्या कडेचा हा खंदक पाण्याने भरलेला होता. त्यात पलिकडे मस्त तटबंदी आणि त्यात बुरुज सुंदर दृश्य होते. त्यातून सूर्योदयाची वेळ. त्या पाण्याला पण तटबंदी मागून आलेल्या किरणांची सोनेरी किनार आलेली होती. कॅमेरा हे दृश्य टिपायला असमर्थ होता. मी प्रयत्नही केले नाहीत. पण अस्वस्थ करत होती ती बुरूज आणि तटबंदी वर वाढलेली प्रचंड झाडी. ही झाडी जर साफ केली तर काय अप्रतिम दिसेल हे स्थान आणि वास्तू! अगदी राजस्थान सारखं... राणीमहाल, पुढे मस्त तलाव.

पराकोटाची तटबंदी आणि त्यात बुरुज, झरोके आणि चर्या

असो, तर ही बाहेरची तटबंदी बघितली. मोठमोठाले बुरूज आणि त्यावर चर्या, बाहेर अगदी उत्तम झरोके. प्रत्येक बुरुज देखणा, दहा-बारा झरोके तर फक्त बाहेरच्या बाजूने दिसत होते, तेवढेच आतमधून असतील कि. म्हणजे जवळ-जवळ २० एक झरोके असतील कि एकेका बुरुजाला.

झाडीने व्यापलेले आणि कचऱ्याच्या साम्राज्यात तटबंदी आणि बुरुज

काही ठिकाणी खंदकात पाणी आटलेलं होतं आणि त्यामुळे त्यात असलेले कचऱ्याचे साम्राज्य समोर आले. त्यामुळे तटबंदीजवळ जायचा मोह आवरला.

प्रवेशद्वार आणि २ बलाढ्य बुरुज

आतून बाहेर डोकावताना
प्रवेशद्वार बाहेरच्या दुसऱ्या बाजूने

गाडीने किल्ल्याच्या पश्चिम दरवाजात पोहोचलो. इथे २ बलाढ्य बुरुज, त्यांच्या मधूनच गाडीरस्ता आतमधल्या वस्तीत गेला आहे. बुरुज एकदम देखणे आहेत. रस्त्याच्या कडेची एक जुनी वास्तू नव्याने बांधून काढलेली आहे. 

दुसरा दरवाजा आणि पलिकडे बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा

या मधल्या दरवाजातून आत गेल्यावर अजून एक दरवाजा आहे. आतमध्ये देवड्या आहेत. पलीकडे एक लहान दरवाजा आहे त्यातून तटबंदीबाहेर जाता येऊ शकते.

वाड्यात आल्याचा भास निर्माण करणारा झरोका आणि दिवा

वळणदार रस्त्याने उजवीकडे अजून एका दरवाजात जाता येते. इथे एका झरोक्याखाली एक दिवा लावलेला आहे. त्याने एका मोठ्या वाड्यात आल्याचा भास होतो. असे चार पाच दरवाजे ओलांडत परकोटाच्या आत मध्ये प्रवेश होतो. यातीलच सुरुवातीच्या एका दरवाजाच्यावर तोफ आहे.

एका दरवाजावरची तोफ

तोफेजवळून दिसणारे किल्ल्याचे अंतर्गत भागातील अवशेष

तोफेजवळून दिसणारा मुद्गल डोंगरी किल्ला

मागे फिरून ती तोफ बघण्यासाठी आलो. सगळ्या बुरुजांना वर चर्या आहेत आणि त्या स्थानिकांनी घाण करून ठेवलेल्या आहेत. स्पष्टच सांगायचं झालं तर जणू काही तटबंदीवर ह्यांच्यासाठी बांधलेले संडासच, असा वापर. फक्त दरवाजे लाऊन नाही घेतलेले ह्या लोकांनी त्याला, नशीब.

किल्ल्यातून जाणारा रस्ता

किल्ल्याच्या अंतर्गत रस्त्यावरील दरवाजे, देवड्या वगैरे

तर हे सगळं बघून मुद्गलच्या डोंगरी किल्ल्याकडे निघालो. रस्ता वस्तीतूनच जातो आणि एका मशिदीजवळ हा रस्ता संपतो. तिथे गाडी लावली. डावीकडे उंच टेकडीवजा डोंगरावर किल्ल्याचे अवशेष इथूनच दिसले. आता गाडी रस्ता संपला.

रस्ता संपला आणि दर्शन झाले ते किल्ल्यामागून डोकावणाऱ्या सूर्यनारायणाचे

झाडी संपल्यावर दिसणारा पायथ्यापासूनचा डोंगरी किल्ला

रस्ता सोडून पायवाटेने झाडीत शिरलो. आडव्या पसरलेल्या त्या डोंगरावर डावीकडच्या टोकावर एक मिनार सदृश इमारत इथूनच दिसत होती आणि त्याच्या पाठीमागून सूर्य वर येत होता.

डावीकडे तटबंदी

झाडी संपून दगडी शिळांना भिडलो आणि त्या टेकडीवर चढायला सुरुवात केली. ठराविक अशी वाट नव्हती, पण तटबंदी दिसत होती आणि खालूनच टेकडीच्या डावीकडच्या टोकावर दिसत असलेली मिनारवाली वास्तू हे लक्ष्य, असं ठरवूनच चाललो होतो.

वर येताना आमचे सहकारी

दगडांची रचना

डावीकडे तटबंदी होती, तर वाटेत काही काही अवशेष दिसत होते. कशाचीही निगा न राखल्याने, प्रचंड झाडी वाढल्याने ते नेमके काय आहे हे कळत नव्हते. दगडांची रचनाही वेगळी होती. इकडच्या बाजूंचे दगड समजत नाहीत, कि ते नैसर्गिक तसे आहेत, की रचले गेले आहेत. वाटेत तलावही असावेत. मोठमोठ्या दगडी शिळा पडलेल्या होत्या. त्यांची रचना पाहून सगळीकडेच फोटो काढावेसे वाटत होते.

वास्तूच्या वाटेवर प्रमोद

वास्तूचे उरलेसुरले अवशेष

अखेरीस त्या इमारतीजवळ पोचलो. इमारतीचा बहुतांशी भाग ढासळून गेला असला तरी उरल्यासुरल्या अवशेषांवरून ही पूर्णावस्थेत असताना खूप छान दिसत असेल, हे सहज लक्षात येत होतं. या इमारतीजवळ जाऊन प्रत्येकाने फोटो काढून घेतले, तसेच इमारतीवर जायला पायऱ्या आहेत त्यावरही जाऊन फोटो काढले. ह्या बाजूला नीट बघितल्यास एका लांब अशा दगडी शिळेवर कन्नड भाषेत शिलालेख कोरलेला आहे, तर मारुतीची एक मूर्तीही कोरलेली आहे, जी वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे साधारण पाच-सहा मारुती मिळून एक मारुती असा तयार केलेला आहे. आजूबाजूला पडलेले काही दगड बघितल्यास ही जुने मंदिर पाडून नवीन बांधलेली वास्तू आहे हे लक्षात येतं.

गोलाकार बुरुज

बुरुजावरून वास्तू

ह्या इमारतीच्या पलिकडे एक मोठा गोलाकार बुरुज आहे. एका बाजूच्या ढासळलेल्या भागातून या बुरुजावर जायला वाट शोधून काढली. वर जाऊन किल्ल्याचा खूपच मोठा भाग दृष्टीक्षेपात आला.

गोल बुरुजावरून पलिकडे "नवरस बुरुज"

बुरुजावर प्रभाकर आणि ज्यू. प्रभाकर

खाली उतरून वाट शोधताना मागे फिरून कटाक्ष

या बुरुजाच्या पलीकडे लांबवर मोठ्या दगडी शिळा यांच्या आधारावर बांधलेला एक बुरुज दिसला. हा “नवरस बुरुज”. पुढचे लक्ष्य Fix झाले, पण त्यावर जायला सरळ वाट नाहीये. मध्ये तटबंदी आणि तलाव आहे. हा बहुतांशी कोरडा आहे, म्हणून खाली उतरलो आणि त्या तलावातून पलीकडे जायला वाट शोधून झाली. मध्ये तलावात पाणी आणि त्यात प्रचंड वाढलेली असल्याने तिथून काही मार्ग सापडला नाही.

बुरुज आणि भग्न दगड शिळा

तटबंदीच्या कडेकडेने चालत मागे आलो आणि तिथून मात्र ह्या पलिकडच्या भागात जायला वाट सापडली. मागे वळून बघितलं तर ज्या मोठ्या बुरुजावरून आलो तो बुरुज आणि चक्क शेजारी चक्क जणू काही सुपारी फोडून ठेवावी अशी फुटलेली एक दगडी शिळा दिसली.

लांबूनच बुरुज सुंदर वाटला

वाट काढत काढत नवरस बुरुजाजवळ पोचलो. हा बुरूज नैसर्गिक शिळांचा आधार घेऊन बनलेला आहे, की बुरुज बांधण्यासाठी त्या शिळा जमा करून रचल्या आहेत, हे सांगणे कठीण आहे. पण साधारण तीन मजली हा बुरुज आहे. सर्वात खालचा थर पूर्णपणे नैसर्गिक दगडी शिळा आहेत, त्यात बांधीव अवशेष काही नाहीत. त्याच्या वरचा, म्हणजे मधला मजला हा नैसर्गिक दगडी शिळा आणि बांधीव असा मिळून आहे, तर सर्वात वरचा पूर्णपणे बांधीव आहे.

जवळ आल्यावर वर जायला पायऱ्या, आणि तिमजली रचना स्पष्ट झाली
बुरुजावर येणारी पायऱ्यांची चिंचोळी वाट

लांबूनच हा बुरुज खास वाटला होता. ह्यावर जायला पायऱ्या ही दगडी शिळांच्या मधूनच बांधलेल्या आहेत. पायर्‍यांच्या आधी डाव्या बाजूला, साधारण आठ फूट व्यासाचा परफेक्ट गोलाकार आकाराचा एक खड्डा आहे. हा खोल नाही, जेमतेम सहा इंच खोल असावा. त्याचे प्रयोजन काही कळत नाही.

बुरुजावरचे अवशेष
बुरुजावरची तोफ ठेवायची रचना

दगडी शिळांमधून असलेल्या चिंचोळ्या जागेतल्या त्या पायऱ्यांवरून वर गेलो. गडाचा खूप मोठा परिसर इथून दिसतो आणि पलीकडे खाली मुद्गल शहर दिसते. या बुरुजांची वरची रचना पाहता पूर्वी यावर नक्कीच तोफ असावी आणि ती फिरती ठेवण्यासाठीची व्यवस्थाही असावी हे लक्षात येतं.

परतताना वाटेतले अवशेष

नाना

आमच्या दृष्टीने शक्य तेवढं बघून झालं होतं. परत खाली येताना पुन्हा दगडी शिळा, पाणवठे इत्यादी ओलांडत खाली आलो.

या किल्ल्याचा विस्तार इतका प्रचंड आहे की सगळे असेच बघायचे म्हटले तर एक दिवस पुरणार नाही. दगडी शिळांची तर काही ठिकाणी अशी रचना आहे, कि ती धड नैसर्गिक म्हणता येत नाही आणि मानवनिर्मित असावी यावर विश्वास बसत नाही. काही शिळांमधून तर विशिष्ट पद्धतीने ठोके दिल्यास एक नाद ऐकू येतो. पण हे अनुभवायला आणि मुळात असे दगड सापडायला स्थानिक माहितगार बरोबर पाहिजे. किल्ल्याच्या डोंगरी भागात आणि शहरी भागातही कानडी शिलालेख आणि देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

सारांश, किल्ला खूप मोठा आणि अत्यंत सुंदर आहे. बघायला पुरेसा वेळ, माहितगार असणे आवश्यक आहे. अवशेष खूप आहेत आणि किती तरी अजूनही लपून असतील. योग्य ती निगा न राखली गेल्याने कालांतराने ते नष्ट होण्याची शक्यता आहे.

असो... तर साधारण साडे नऊ वाजले असतील, खूप भूक लागली होती. पुन्हा एकदा इडली-डोसे हादडले.

मोठमोठ्या दगडी शिळा आणि खडकांच्या ह्या साम्राज्यात पुढचे लक्ष्य तर नावातच उत्सुकता निर्माण करणारे होते – “जलदुर्ग”!

कर्नाटकातील किल्ले - किल्ले मान्वि आणि मुक्कुंदा


किल्ले मान्वि

मान्वि गांव रायचूर शहरापासून साधारण ४५ ते ५० किमीवर आहे. हा तालुका आहे. जुनं मान्वि गांव अर्धवर्तुळाकार आकारात टेकड्या-डोंगरांनी वेढलेलं आहे, आणि ह्यातील बऱ्याच टेकड्यांवर मंदिरं आहेत.

दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या हत्तींच्या मिरवणुकीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. मुळात मान्वि हे गांव बर्‍याच धार्मिक लोकांसाठी ओळखलं जातं अशी माहिती उपलब्ध आहे. मध्वचार्य, श्री जगन्नाथ दास यांची ही भूमी आहे. ही झाली आंतरजालावरून मिळालेली माहिती.

ह्या किल्ल्यावर जायला वस्तीतल्या बारीक-बारीक रस्त्यांवरून लोकांना विचारतच पायथ्याशी पोचावे लागते. वाटेत दगडी शिळांपासून रचलेल्या भिंती दिसतात. पायथ्याशी पोचल्यावर त्या अरुंद बोळातच कशीबशी कडेला गाडी उभी केली आणि किल्ल्याकडे वळलो.

सिमेंटच्या पायर्‍या

किल्ल्याची उंची फारशी नाही. खालूनच तटबंदीचे अवशेष दिसतात. मोठ मोठाले दगड-शिळा आणि शेजारी दगडी जमीन. जमीन/दगड निसरडे होत असावेत म्हणून त्यावर सिमेंटच्या पायर्‍या बांधलेल्या दिसल्या. त्या जेमतेम ४०-५० पायऱ्या संपून आपली नेहमीची वाट चालू होते.

सगळे एकाच प्रकारचे दगड आजूबाजूला पडलेले. पायऱ्याही त्याच्याच आणि तटबंदीही त्यांचीच.

रेहमतुल्लाह अल्लाई दर्गा

काही मिनिटांतच आपण दर्ग्याजवळ येऊन पोचतो. येथील थडग्यावर कन्नड मध्ये “रेहमतुल्लाह अल्लाई” असं लिहिलेलं आहे. इथे मुसलमानांचा काही कार्यक्रम चालू होता. पायात बूट असल्याने दर्ग्यात गेलो नाही.

दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेली तटबंदी

दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेले बुरुज

मोठमोठ्या दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेल्या तटबंदीचे अवशेष दिसत होते. पण त्यात सलगता नव्हती. आणि याच दगडांचा वापर करून नुसती तटबंदीच नाही तर चक्क बुरुजही बांधलेले आहेत. असाच एक बुरुज खालून दिसला. त्याच्याखाली तर एक प्रचंड दगड पडलेला होता. बुरुज आणि त्यानुसार शेजारील दगडाचा आकार लक्षात घेतल्यास त्याची भव्यता कळेल.

पाण्याचा मोठा तलाव

तिथून किल्ल्यावर जायला फार वेळ गेला नाही. प्रवेश केल्यावर डावीकडे एक पाण्याचा मोठा तलाव आहे. चांगलाच खोल असलेल्या ह्या तलावाची एक बाजू अर्धगोलाकार आकारात बांधून काढलेली आहे. ह्या भागात त्याची उंची दहा-अकरा फूट तरी असणार.

सध्या या भागात थोडे पाणी शिल्लक होते. अर्थात सध्या तलावाच्या जमतेम १ टक्का एवढेच पाणी असले तरी पण पोहण्याएवढे नक्कीच होते. पोरं मस्त उद्या मारून पोहत होती. माझ्या गळ्यात अडकवलेळा कॅमेरा बघून त्या मुलांना जास्तीच चेव आला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या पाण्यात उड्या मारून त्यांचे फोटो काढायला ते मला सांगू लागले. त्यांचे काही फोटो घेऊन मी दुसरे अवशेष बघायला वळलो.

ना आगा ना पिछा - एकला बुरुज

‘ना आगा ना पिछा’ असे मध्येच काही बुरुज बांधलेले असे इकडच्या किल्ल्यांवर दिसतात तसाच एक बुरूज आमच्यासमोर होता. आजूबाजूला ना तटबंदी, ना वाडा, ना आणखी काही. एकटाच बिचारा हा बुरुज.

टोकावर अजुन एक बुरुज, पलीकडे दर्गा आणि मल्लीकार्जून मंदिर

समोर हा एकटा बुरुज तर उजवीकडे टोकावर अजुन एक बुरुज दिसला आणि पलीकडचा डोंगरही. ह्या पलीकडच्या डोंगरांवर "हजरत सयद शाह सबजाली सत्तर कादरी साहेब दर्गा" आणि मल्लीकार्जून मंदिर आहे.

या बुरुजाचे स्थानच इतके मस्त आहे की त्याचे फोटो किती आणि कुठून काढू असं होतं. ह्याच्या वर जायला वाट सरळ नाही. मध्ये एक मोठा कोरडा तलाव आहे, जोडीला मोठे खंदक आणि बाभळीची झाडी. यांना वळसा मारून या बुरुजावर पोचलो.

मागे तटबंदीचे अवशेष

काही पायऱ्या चढून गेल्यावर बुरुजावर जायला दरवाजा आहे. मागे वळून पाहिल्यास तटबंदीचे बऱ्यापैकी अवशेष दिसतात. जी नैसर्गिक दगडांचा आधार घेऊनच बांधलेली आहे.

दरवाजातून आत गेल्यावर पायऱ्या चढून त्या बुरुजावर जाता येते. इथून मान्वि शहराचा परिसर दिसतो. पलीकडच्या डोंगरावरचे मल्लिकार्जुन मंदिरही स्पष्ट दिसते. इकडचे एकूणच डोंगर म्हणजे कशात तरी दगड भरून आणून तिथे ओतून ठेवल्यासारखे वाटतात.

टोकावरील बुरुजावरून किल्ल्याचा परिसर

बुरुज जमिनीवरचा आणि सर्वोच्च स्थानावरचा

बुरुजावरून किल्ल्याचा परिसरही न्याहाळता येतो. परिसरात मोठमोठाल्या दगडी शिळा अशाच इतस्ततः पसरलेल्या आहेत. मध्येच एक एकटाच छोटा बुरुज तर प्रवेशद्वाराजवळ पडलेल्या मोठा शिळांवर एक मोठा बुरुज.

किल्ल्याच्या साधारण मधोमध लहानसा तलावही आहे.

बुरुजाचा दरवाजा

बुरुजावरून खाली येताना दरवाजा नीट न्याहाळला. दरवाजावरची कमान कसल्याही मटेरियल शिवाय नुसतेच दगड तशा आकारात कापून नीट बसवलेले आहेत. दगडांवर कमळं कोरलेली आहेत.

कोरीव गणपती

परिसर न्याहाळताना एका दगडावर एक गणपती कोरलेला दिसला. हा दगड कोणत्याही अवशेषांचा भाग दिसत नव्हता म्हणजे काहीतरी घडवत असताना कारागिरांनी ते काम अर्धवट सोडलं असं वाटत होतं.

सर्वोच्च स्थानावरचा बुरुज (उजवीकडे). डावीकडे दगडाला टेकून प्रभाकर

फक्त सर्वात उंचावर दिसत असलेला बुरुज पहायचा राहिला होता. सगळ्या बाजूने फिरून त्या शिळांवर चढायचा प्रयत्न करून झाला. एका बाजूने नानांनी अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला गाठला होता, पण त्यांना मागे फिरावे लागले. दुसऱ्या बाजूने प्रभाकरने मात्र सगळ्या प्रकारचे कौशल्य लावत तो बुरुज गाठलाच. एकूणच दुपारचा दीड वाजत आलेला असल्याने आळशीपणा आला होता. त्यात भूक लागली होती आणि मुळात वेळेचं बंधन होतं. वर जायचा रस्ता मिळूनही एकेकाने वरपर्यंत जाणे वेळेच्या दृष्टीने परवडणारे नव्हते.

त्या शिळांखालीच सावलीत बसकण मारून बकाणे भरले. फार वेळ न लावता धडाधड खाली उतरलो.

एकूणच आजचा दिवस थोडा वेगळा होता. सकाळी रायचूरचा राहिलेला नवरंग दरवाजा, मलिआबाद किल्ल्यातले शिव-मंदिर तर मान्वि किल्ल्यावरचा सर्वोच्च स्थानावरचा बुरुज नाही म्हटलं थोडी तरी मनात थोडी रुखरुख ठेवून गेला.

किल्ले मुक्कुंदा

तीन वाजून गेले होते. मान्वि किल्ल्यापासून साधारण ७० किलोमीटरवर असलेल्या मुक्कुंदा गावात पोचलो. गावात पोचल्यावर किल्ला तर दिसला, पण तिथे जायचा रस्ता सापडेना.

गावातली स्वच्छता तर काय वर्णावी... एक तर धड रस्ता कळेना, त्यात गावातले लोक नक्की कोणत्या रस्त्याने जायचं ते सांगताना गोंधळत होते. खरंतर त्यांनाच नक्की असं काही माहिती नसावं. मुळात सगळीकडे पडतो तसा त्यांनाही प्रश्न पडला असावा, कि हे लोक कशाला त्या डोंगरावर जातायत! महत्प्रयासाने एका रस्त्यावर शिक्कामोर्तब झाले.

अरारारा... तिथली अवस्था बघताच त्यात गाडी घालायची सरळ रद्दच केले. चालत जायचे झाले तरी मध्ये मध्ये दिसणाऱ्या दगडांवरून उड्या मारत जायला लागणार होते, तेही अलगद. न जाणो जोरात उडी पडली आणि पाय वरच नाही आला तर? पण त्यातून नाचतच वस्तीमध्ये पोचलो.

किल्ल्याचे दर्शन

समोर किल्ला तर दिसत होता, पण जायला चांगला रस्ताच दिसत नव्हता. किल्ला तर अगदी छोटासा दिसत होता. साधारणपणे पुण्यातल्या एखाद्या मोठ्या सोसायटी एवढा असेल. म्हणजे वर जायला दहा मिनिटं पुरी होतील, किल्ला बघायला पंधरा-वीस मिनिटं पुरेत आणि खाली यायला फारतर पाच मिनिटं बास झाली. म्हणजे एकूण अर्ध्या तासात किल्ला बघायचा कार्यक्रम आटपायला पाहिजे, अगदी फोटो धरून पावून तास. पण प्रत्यक्षात १५ मिनिटं तर नुसतीच इकडून जाऊन बघ, तिकडून बघ करण्यात गेली. गावातली दोन पोरं पण आमच्याबरोबर यायचा, आम्हाला रस्ता मिळवून द्यायचा प्रयत्न करत होती. पण शेवटी आम्ही बघत होतो त्या बाजूने रस्ताच नाहीये असं एकदा ठरवून टाकलं. ४ घरं फिरल्यावर नशिबाने एक मुलगा सापडला ज्याला वर कुठून जाता येईल याची कल्पना होती. म्हणजे तो कधीतरी जाऊन आलेला होता. तिथून जाता येईल कि नाही ह्याबद्दल तोही साशंकच होता, म्हणजे अर्थातच या किल्ल्यावर कधीच कोणीच येत नसणार. त्यामुळे सहज आणि साफ रस्ता सापडायचा प्रश्नच येत नव्हता.

Actually आमच्याकडे असलेल्या माहितीत/ब्लॉगमध्ये एक वाट दिलेली होती, म्हणजे त्या लोकांना वर जायला सापडलेला मार्ग. पण तो आम्हाला सापडत नव्हता. त्यातले फोटो आणि समोर दिसत असलेल्या किल्ला यांचा मेळ राखत शोधून झालं, पण नाही... तो ब्लॉग साडेसहा वर्षापूर्वीचा होता, नंतर पडझडीमुळे आम्हाला समोर दिसणारा मार्ग बंद झालेला असावा. त्यातून तिथे झाडी प्रचंड वाढलेली होती.

पण... शेवटी आम्हाला “हनमेश” भेटला आणि वर जाता येईल अशी शक्यता दिसली. पण तोही यायला तयार होईना. वर धड रस्ता नाही आणि खूप झाडी वाढलेली आहे, खूप घाण आहे, असली अनेक कारणे त्यामागे होती आणि ती खरीही होती.

पण आमचा हट्ट आम्ही सोडणार नव्हतो. एक तर किल्ला छोटुसा, पण सुंदर दिसत होता. आणि आम्ही १५-२० मिनिटं चक्क पायथ्याशी फिरत होतो. डोळ्यासमोर आणि अगदी शेजारीच असलेला किल्ला सोडायचा, हे शक्यच नव्हतं. प्रमोदला कन्नड येत होतं म्हणून ठीक, नाहीतर चर्चाही शक्य नव्हती. सरळ पाणी सोडणे भाग होते, नाहीतर अगदी कठीण तरी नक्कीच होते. खूप विनवण्या झाल्यावर हनमेश प्रसन्न झाला आणि कोयता घेऊन आमच्या मदतीसाठी सिद्ध झाला.

ह्या बाजूच्या किल्ल्यांची एकूणच अवस्था बघता आमच्या दोन गाड्यांपैकी जे आधी पायथ्याशी/गावात पोचतील त्यांनी वाट न बघता रस्ता शोधायला सुरुवात करायची हे ठरलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आधी पोचल्याने हनमेशला प्रसन्न करून ठेवलं होतं आणि तोपर्यंत दुसरी गाडी पोचलीही गावात. पण एकंदरीत आम्ही पायथ्याशी असताना इथवर पोहोचलेल्या रस्त्याचे वर्णन ऐकून त्यांनी सरळ इकडे येणे रद्दच केले. त्यातून दुपारचं जेवण ही प्रथा बंद झाल्याने पोटात काही नव्हते. त्यांना भूकही लागली होती. आम्हालाही कदाचित लागली असावी पण आमच्या गाडीतल्या लोकांना किल्ल्यापुढे भूक दिसतच नव्हती.

वस्तीतला दरवाजा

दरवाजा आतील बाजूने

तर शेवटी हनमेशला घेऊन एका दरवाजात दाखल झालो. हा दरवाजा नक्की कसला आहे सांगणे कठीणच वाटावे, कारण हा दरवाजा पायथ्यालाच, अगदी वस्तीत आणि किल्ल्याशी सरळ काही संबंध नसलेला होता. प्रचंड मोठ्या दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेला आहे हा दरवाजा. कमानीतल्या सपाट आडव्या दगडावर लांब नाग कोरलेला आहे. आत दगडांची बैठक, तर वरती दगडी शिळांचे छत. म्हणजेच किल्ला पूर्वी या वस्तीच्या भागातही असणार, जो आता लुप्त झाला आहे.

किल्ला

पलीकडे गेल्यावर दिसला तो अखंड किल्ला. नाहीतर इतका वेळ एका कोनातून थोडासाच भाग दिसत होता. आता ब्लॉगमध्ये वाचलेला आणि पाहिलेला भाग समोर आला, जो ढासळलेला होता आणि प्रचंड झाडीही त्यात वाढलेली होती. पण आम्हाला याला वळसा मारून मागच्या बाजूला जायचं होतं. समोरच दिसणार्‍या किल्ल्याच्या भागात तटबंदीचा ढासळलेला भाग, आणि त्यातून आतमधून डोकावणाऱ्या तीन खोल्या ही नक्की काय रचना असावी हे सांगता येत नव्हतं. त्याच्या उजव्या बाजूला प्रचंड शिळेवर तटबंदीचा टोकाकडेचा भाग आहे, टोक असल्याने तो अर्धवर्तुळाकार आकारातल्या तटबंदीचा भाग बुरुजासारखा दिसत होता. अर्थात याला बुरुज म्हणणे शक्यच नाही. याला जर बुरुज म्हणायचं असेल तर पूर्ण किल्ल्यालाच बुरुज म्हणावे लागेल.

किल्ला - उजवीकडून

बाकी तटबंदी आणि एकूणच किल्ला शेजारच्या शिळांचा आधार घेऊनच बांधलेला आहे.

वळसा मारून झाडीत घुसलो. हरे राम... गावकऱ्यांनी या किल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. उलट जुने अवशेष सांभाळत, वर नवनवीन अवशेष तयार करण्याकडे भर दिलेला आहे, हे जागोजागी.. नव्हे, तर पायाखालीच दिसत असलेल्या नवनवीन बुरुजांवरुन सहज लक्षात आले. रोज सकाळी असे सोनखत आणि पाणी मिळत असल्याने इथली झाडी फोफावली नसती तरच नवल! अरारा... पाउल चुकलं की संपलंच.

किल्ल्याची मागची बाजू

किल्ल्याचा खोबणी प्रवेशभाग आणि त्यासमोर दगडी शिळा

खोबणीतून वर जाताना

असला रस्ता पार करत आम्ही गडाच्या पलीकडच्या बाजूला भिंतीजवळ गेलो. रमेश हातातल्या कोयत्याने वाट करतच आम्हाला नेत होता तिथे. ह्या बाजूला एक जवळजवळ किल्ल्याच्या उंचीचीच एक प्रचंड शिळा उभी आहे. त्याच्या शेजारी एका खोबणीतून वर जायला वाट आहे. ही वाट काही खरी वाट नसणार. दगड पडून झालेली खोबणी ही सध्याची तात्पुरती झालेली वाट. त्यामुळे इथे पायर्‍या वगैरे असण्याचा संबंधच नाही. त्या खोबणीतून डोकं वर काढून सरतेशेवटी किल्ल्यावर पोचलो.

किल्ल्याचा आकार केवढा आहे वर? लंबूळक्या आकाराचा हा किल्ला लांबीला ४०-४२ मीटर आहे आणि रुंदी तर फक्त १५ मीटर म्हणजे अवघी ४५ फूट.

आजूबाजूचा परिसर बघता हा नुसता टेहळणी बुरुज वाटत नाही. म्हणजे टेहळणी करण्यासाठी जे स्थान आवश्यक असते असे स्थानच नाहीये ह्याचे आणि तटबंदीही पूर्ण आकारात आहे. म्हणजे हा नुसता त्यांनी टेहळणी बुरुज नसून प्रॉपर किल्ला आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांत हा सर्वात लहान आकाराचा किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही.

माथ्यावरचा एकमेव अवशेष

वर पोचलो तर मध्ये मध्ये लांब लांब दगडी शिळा पडलेल्या आहेत. त्यावर दगड घडवत असल्याच्या खुणाही आहेत. लंबूळक्या माथ्यावर उजवीकडच्या टोकावर खांबी वास्तू आहे. या वास्तूवर चढून बघितले तर खालच्या बाजूला लहानशी मुक्कुंदा गावातली वस्ती दिसली. किल्ल्याची उंची मुळातच फार नसल्याने लांब वरचे दिसणे काही शक्यच नव्हते.

वास्तुवरून दिसणारा किल्ल्याचा लंबूळका आकार

येथून किल्ल्याचा संपूर्ण लांबुळका भाग एका दृष्टीक्षेपात बघता येतो. दुसऱ्या टोकाला आलो. तिथे एका बाजूला तटबंदी ढासळलेली आहे. हा भाग घालून आम्ही पाहिला होता. आम्ही जिथे उभे होतो तिथे पायाखाली खरंतर एक वास्तू आहे. आतले बहुतेक ढासळलेले असल्‍याने ह्या वास्तूचे कसलेच प्रयोजन कळत नाही.

मागच्या बाजूने किल्ला

२० मिनिटांत किल्ला बघून आल्यावाटेने खोबणीतून खाली आलो. सगळे परत निघालो पण माझ्या डोक्यात ब्लॉगमध्ये वाचलेली एक शंकराची पिंडी डोक्यात होती आणि त्याच्या शेजारीच पडलेला असायला हवा होता एक दगडी खांब, ज्याच्यावर एक शिलालेख आहे. हनमेशलाही ते पाहिल्याचे आठवत होते पण नेमकी जागा आठवत नव्हती. वेळ कमी होता त्यात भयानक असं हे वावर. शोधता शोधता घाईत जे व्हायचं तेच झालं. जरा पाऊल वाकडं पडलं आणि एक नवनिर्मित बुरुज मी तोडला. परिणाम माझी चप्पल पवित्र झाली आणि शंकराची पिंडी वगैरे सगळं विसरावं लागलं.

वस्तीत परतल्यावर रमेशने पाण्याची व्यवस्था करून दिलीन आणि मग ते साफ करण्याचा कार्यक्रम उरकला. पटापट गाडीत बसून रवाना झालो ते रौडकोंडाला.

कर्नाटकातील किल्ले: किल्ले रायचूर आणि किल्ले मालिआबाद


किल्ले रायचूर

रायचूर किल्ला बघून झाल्यावर मुक्कामाला जायचं होतं रायचूर जिल्ह्यात. गाडीत बसल्यावर काम चालू झालं ते राहण्यासाठी ठिकाण शोधायचं. मंदिर वगैरेंचा विचार करता करता डॉर्मेटरी विषय झाला आणि नवरंग दरवाजा रस्ता परिसरात सोय झाली.

हि डॉर्मेटरी म्हणजे चक्क एकावर एक बेड असणारी बस सारखी झोपायची व्यवस्था असलेली निघाली. म्हणजे चक्क एसी-स्लीपर बस एका ठिकाणी रात्रभर उभी आहे असं वाटावं. पण व्यवस्था उत्तम. प्रत्येकाला चार्जिंग पॉईंट, लाईट, बॅग ठेवायला जागा वगैरे. अशी चक्क ३५० तरी बेड असतील तिथे. बऱ्यापैकी पुरतील सगळ्यांना एवढी सकाळी आवरण्याची व्यवस्था, बाथरूम वगैरे. म्हणजे म्हटलं तर व्यवस्था उत्तम झाली. गरम नसले तरी अंगावर घेण्याइतपत पाणी मिळाले. ट्रेकचा तिसरा दिवस आणि सलग आंघोळ 😄

तिथून सामान घेऊन बाहेर आलो. ते गाडीत टाकलं आणि इडलीचा कुकर शोधला अर्थात त्यातून गरम गरम इडल्या काढत असलेल्या मालकासकट. इडल्या चापून चहा ढोसला आणि रस्ता विचारून लागलो तडक किल्ले रायचूरकडे.

रायचूर किल्ला तुंगभद्रा नदीकाठी आहे. सापडलेल्या शिलालेखानुसार हा किल्ला काकतिय राणी रुद्रम्मादेवी हिच्या आदेशाने राजा विठ्ठल याने तेराव्या शतकाच्या अखेरीस बांधला. नंतर बहामनी व आदिलशाही राजवटीत आला. त्यांनी त्याचा विस्तार केला. हा किल्ला दोन भागात आहे. “अंदरून” आणि “बाहरून”. बाहरून म्हणजे रायचूर शहराला असलेला जणू परकोट. ह्याला पाच दरवाजे आहेत. त्यातला “नवरंगी” दरवाजा सर्वात जास्त प्रसिद्ध. इतर दरवाजे म्हणजे मक्का, काठी, खंदक आणि दोड्डी दरवाजा.

दर्ग्याच्या जवळ कातळात कोरलेल्या पायऱ्या

आधी अंदरून किल्ला बघायचे ठरले होते. अंदरून किल्ला म्हणजे या शहरातल्या एका उंच टेकडीवर असलेला किल्ला. शहराच्या ह्या भागाचे नांव पण “अंदरून किल्ला” असेच आहे. रायचूर बस स्टँड समोरच “काली मशीद”, कबरस्थान आणि “दर्गा हज शेख मिया”/”टाकी वाले बाबा दर्गा” आहे. टेकडीवर असलेल्या अंदरून किल्ल्याकडे वाट तिथूनच जाते.

डाव्या बाजूला असलेली तटबंदी
खाली दर्गा, त्याच्या पुढचं छोटंसं तळं, त्यात कारंजं

प्रवेशद्वार आणि त्यावरील तटबंदी
प्रवेशद्वार

ह्या वाटेने वर निघाल्यावर उजवीकडच्या कडेच्या बाजूला तटबंदी दिसायला लागली. मागे वळून बघितलं तर खाली दर्गा, त्याच्या पुढचं छोटंसं तळं, त्यात कारंजं आणि नुकतीच दर्ग्यावर प्रार्थनेसाठी यायला लागलेली लोकं दिसायला लागली. थोडासा ओबड-धोबड रस्ता पार केल्यावर पायऱ्या लागल्या. त्यावरून जाताना काही मिनिटांतच तीन प्रचंड दगडी शिळांचं  नैसर्गिकरित्या तयार झालेलं प्रवेशद्वार लागलं. गंमत म्हणजे हेच गडाचे प्रवेशद्वार आहे. ह्या दगडांची रचना न बदलता उलट त्यांच्याच आधाराने बाजूला तटबंदी तर वरती बुरुज बांधलेला आहे.

ह्या नैसर्गिक दरवाजातून आत गेल्यावर आणखी एका कमानीतून पलीकडे गेलो. आजूबाजूला मोठे दगड व शिळा. उजव्या बाजूला तटबंदीचे अवशेष. पायऱ्यांवरून चालत गेलो तर डाव्या बाजूला एक तलाव असावा जो कोरडा पडलेला होता. किल्ल्याच्या समोरच्या टोकावरून सूर्य वर डोकावताना दिसला. किल्ल्याच्या ह्या पूर्वेकडील टोकाला पोचलो. खाली उजव्या बाजूला प्रचंड पसरलेला तलाव आहे, हा “आम तलाव”. किल्ल्याच्या टेकडीवर आम्ही उभे होतो तर टेकडीवरून खालच्या बाजूला अजून तटबंदी दिसली.

या किल्ल्याला तीन लेअर मध्ये तटबंदी आहे तळापासून. बहुतांशी तटबंदी ढासळलेली आहे.

सर्वोच्च माथा प्रवेशद्वार

ह्या पुर्वेकडील टोकावर उभे असताना डावीकडे पाहिले तर एक प्रवेशद्वार दिसले. ह्याच्या बाजूची तटबंदी सुद्धा बऱ्यापैकी ढासळलेली आहे. तिथून आत मध्ये गेलो तर डावीकडे एक थडगं दिसलं. तिथे नित्यनियमाने पूजा-अर्चा होत असावी. समोरच लक्ष वेधून घेते ती एक तीन कमानी असलेली एक इमारत.

चौथरा आणि इमारती

हा एक राहता वाडा असावा. तीन कमानी पैकी उजवीकडची कमान आता अर्धी ढासळलेली आहे. आम्ही एका ब्लॉगवर ह्या किल्ल्याबद्दलची माहिती वाचली होती, त्यावर असलेल्या फोटोत ह्याच इमारतीच्या तीनही कमानी सुस्थितीत होत्या. म्हणजे सध्या शिल्लक असलेल्या अडीच कमानी कालांतराने दोन होऊ शकतात. इमारतीच्या डाव्या बाजूला एक छोटेखानी वास्तू आहे. ह्यालाही मिनार आहेत.

एकमेव तोफ

आम तलाव (मोठा) आणि खास तलाव (लहान)

एकूणच किल्ल्याचा हा सर्वोच्च माथा म्हणता येईल. याच्या मधोमध एक मोठा चौथरा आहे, जिथे पुर्वी वाडा असावा. उजव्या हाताला एका बाजूला चौथऱ्यावर एक तोफ पडलेली आहे. ती चांगली २१ एक फूट लांब आहे. तोफेच्या एका टोकावर पर्शियन भाषेत लेख आहे. इथून भोवातालचे लांबपर्यंतचे दृश्य दिसते. लांबवर काही डोंगर दिसतात, ह्याबाजुलाच मालिआबाद किल्लाही असावा. तर जवळच खालच्या बाजूला प्रचंड पसरलेला “आम तलाव”, त्याच्या अलीकडे लहानसा “खास तलाव”. हे दृश्य बघून तीन कमानीवाल्या इमारतीजवळ आलो.

मंडप

कमानीयुक्त इमारत

इमारत आतील बाजू - झरोके

झरोक्यातून बाहेरचे दृश्य

झरोक्यातून बाहेर दिसणारा अर्धवट कोरलेला नंदी

इमारतीच्या बाहेर उजव्या बाजूला एक मंडप आहे. पूर्वी एखादे मंदिर इथे नक्कीच असणार हे दर्शवणारी ही वास्तू. या मंडपाच्या छतावरील दगडांवर वेलबुट्टीची सुरेख नक्षी कोरलेली आहे. कमानीदार इमारतीत आतमध्ये पलीकडील बाजूला चांगले झरोके आहेत. इथल्या एका झरोक्यातून बाहेर एका दगडावर अर्धवट कोरलेला नंदीही दिसला.

मिनारयुक्त लहानशी वास्तू

वास्तूजवळून खाली रायचूर शहर

ही इमारत बघून शेजारच्या मिनारवाल्या वास्तुकडे आलो. वास्तू लहान असली तरी रेखीव आहे. दोन मिनार मात्र ढासळलेले आहेत. ह्या बाजूने खाली रायचूर शहराचा भाग छान दिसतो. रायचूर बसस्थानक आणि पलीकडे एक मोठे मैदान येथून दिसते.

मोठ्या दगडी शिळांवर फोटो काढायचा मोह कसा आवरणार...

“अंदरून” किल्ल्याचे सगळे अवशेष पाहून झाले. परतताना अवशेष निरखत, फोटो काढत त्या नैसर्गिक दरवाजातून खाली आलो.

जेमतेम ८:३०-७:४५ वाजत असावेत, सकाळी खादंती करूनही पोट परत खायला मागत होतं. अर्थातच चांगले हॉटेल बघून गाडी थांबवली. इडली, डोसा, उपीट, पोहे, मेदुवडा जे काही मिळालं ते रिचवून पुढच्या अवशेषांकडे वळलो.

शहरात पसरलेला “बाहरून” किल्ला बघायला सुरुवात केली. इथे रस्त्यांवरून फिरताना अवशेष दिसायला लागले.

नवरंग दरवाजाकडे जाताना अनेक लहान मोठे बुरुज लागले. जिथे शक्य झाले तिथे उतरून ते नीट पाहता आले तर काही ठिकाणी फक्त लांबूनच ते बघता किंवा फोटो घेता येत होते.

अवशेषांवरील नक्षीकाम असलेले दगड

बहुतांशी बुरुजांची अवस्था खूपच वाईट आहे. झाडे झुडपे वाढलेली आहेत. अतिक्रमण प्रचंड आहे. निरखून पाहिल्यास बुरुजातील काही दगडांवर कोरीव काम केलेले दिसते. हे सगळं जतन केल्यास खूप मोठा ठेवा हाती लागू शकेल, पण अतिक्रमणामुळे ते कितपत शक्य आहेत ते सरकारी खातंच जाणो.


नवरंगी दरवाजा

एवढं करून नवरंग दरवाज्यापाशी पोचलो तर हा सगळा भाग कर्नाटक सरकारच्या पुरातत्व विभागाने Museum केलेला दिसला. सरकारी म्हटल्यावर ९-९:३० ला काय उघडणार? त्याची उघडायची वेळ साडे दहा होती आणि कोरोना काळामुळे ते उघडेल की नाही याचीही शाश्वती नव्हती.

आतील बाजूस ठेवलेल्या पुरातन वस्तू

दरवाजातून डोकावून जमेल, दिसेल तेवढे नजरेखाली घातले. खूप जुन्या मूर्ती, शिलालेख इथे जतन करून ठेवलेले दिसले. आमच्या दुर्दैवाने ते जवळ जाऊन काही पाहता आले नाहीत. आत मध्ये खूप काही बघायला असणार हे मात्र नक्की.

वेळ-काळ ओळखून, मनावर दगड ठेवून तो भाग पुन्हा कधीतरी बघू म्हणून तसाच सोडून पुढच्या किल्ल्याकडे वळलो.

पुढे जायचं होतं मालिआबादला.

किल्ले मालिआबाद

मालिआबादला पोचल्यावर किल्ल्याची चौकशी करायच्या ऐवजी सरळ “रमणी गोशाळा” विचारायचं. ही गोशाळा किल्ल्यातच आहे. एक कच्चा रस्ता या गोशाळेकडे घेऊन जातो. वाटेत दोन्ही बाजूला कापसाची शेती आहे तर पुढे बऱ्यापैकी जंगलाचा भाग आहे. इथे मोर तर आरामात फिरताना दिसले.

कच्चा रस्ता आणि आजूबाजूला दिसणारे अवशेष

साधारण दहा वाजले होते. या कच्च्या रस्त्यावर आल्यावर गोशाळेकडे जाताना वाटेतच किल्ल्याचे अवशेष दिसायला लागले. हा किल्ला म्हणे १०० एकर मध्ये पसरलेला आहे.

कापसाची शेती

अर्थातच थोडे मोठे आवार आम्हाला बघण्यासाठी कोणीही योग्य ठेवलेलं नसणार हे गृहीत धरलेले होते. कारण एवढे मोठे वावर, त्यात शेतं असणारच. वस्ती नसेल फारशी असं जरी धरलं तरी एवढा मोठा भाग मोकळा कोण ठेवणार?

गोशाळेचे गेट

गोशाळेच्या गेटच्या आतील बाजूने गडाचे अवशेष

तर... गेट मधून आत गेलो तर जवळच एक हनुमान मंदिर दिसलं. या मंदिराच्या परिसरात असंख्य कोरीवकाम केलेले दगड आहेत. परिसरात तिथली मंडळी बसलेली होती, त्यात कदाचित काही इथली मॅनेजमेंट बघणाऱ्या मंडळींपैकी ही असावीत. गोशाळेत तर अनपेक्षित असा अनुभव आला. मंडळी तर कन्नड सोडून कशातच बोलायला तयार नव्हतीच. वर काही दाखवायलाही अनुत्सुक होती. इथले काही आम्हाला ते फिरू देणार नाहीत हे समजल्यावर या किल्ल्याबरोबर अजिबात न टाळता बघावी अशी गोष्ट म्हणजे अखंड दगडात कोरलेले हत्ती, ते तरी बघायला मिळावे म्हणून चौकशी केली. आमच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे ते जवळपासच्या कापसाच्या शेतात ठेवलेले असणार होते. पण चौकशी केल्यावर त्या मंडळींनी काहीच सांगायला नकार दिला. उलट तिथल्या कामगार बायकांनी काही सांगायला सुरुवात केल्यावर त्यांनाच गप्प राहायला सांगितल्यासारखे वाटले.

ह्या किल्ल्यात तटबंदीजवळ कुठेतरी शिवमंदिर आहे हेही वाचून होतो. पण यातलं काहीच आमच्या नशिबात दिसत नव्हतं. या मंदिरात म्हणे ३ फुट उंचीची शंकराची पिंडी आहे आणि वीरगळही आहे. ह्यातले काही नाही तरी जेवढा बघायला मिळेल तेवढा किल्ला आणि किमान ते हत्ती तरी बघायचेच असं ठरवून त्या गोशाळेतून बाहेर निघालो.

बहुतेक सरकारी/पुरातत्व खात्याच्या माणसांनी यांच्या श्रद्धास्थानांना काही धोका पोचावलेला असावा. कदाचित तिथल्या वस्तू उचलूनही नेत असावेत नाहीतर असे अनुभव येत नाहीत. अर्थात हा आमचा तर्क होता वस्तुस्थितीची कल्पना नाही.

गोशाळेतून बाहेर पडून कच्च्या रस्त्यावर वाटेत भेटलेल्या लोकांशी चौकशी करत एका कापसाच्या शेतात घुसलो. तिथल्या बायका बहुतेक तुळू मध्ये बोलत होत्या. त्यांनी खाणा-खुणा करून हत्ती कुठे आहेत ते सांगितल्यावर त्या कापसाच्या शेतातून वाट काढत ते “दगडांचे हत्ती सांगा कुणी पाहिले” करत निघालो. आम्ही सरळ किल्ल्याच्या तटबंदीवरुन चालत होतो हे लक्षात आलं. तटबंदीला लागून किल्ल्याचा आतमध्ये सगळी शेती आहे.

कापसाच्या शेतात असलेले हत्ती

सगळेजण त्या शेतात कुठेतरी लपलेले (कि लपवलेले?) हत्ती दिसतात का ते बघत होतो. अचानक एके ठिकाणी दुरवर ते हत्ती दिसले. आता तटबंदी सोडून सरळ त्या शेतात घुसलो. कसली वाट अन कसलं काय! त्या कापसाच्या शेतातूनच तिथपर्यंत पोचलो.

अहाहा! हत्तींचे सौदर्य काय वर्णावे? संपूर्ण एका दगडात एक असे दोन हत्ती कोरून ठेवलेले आहेत. अगदी Lifesize मध्ये. डोळे, सोंड, सुळे, सुळ्यावरचे दागिने, कान... काय काय लिहायचे? अवयव आणि दागिने... सगळंच सुरेख! पाठीवर झुल, गळ्यातले वळ्यावळ्यांचे दागिने, साखळ्या, त्या साखळ्यांना घंटा. गंडस्थळावर खास लटकन असलेला दागिना आणि गंमत म्हणजे पाठीवरची झुल नुसतीच नाही तर त्याला व्यवस्थित Figure of 8 ची गाठ मारलेली आहे. पायात घुंगुर... असो. वर्णन अशक्य.

हत्तीच्या पाठीवरील Figure of 8 ची गाठ

मनसोक्त फोटो झाल्यावर सरळ निरखत बसलो प्रत्येक दागिना. अगदी जणू हातात घेऊन पाहिला.

नक्षदार दगड

पूर्वी इथे मंदिर असावे किंवा जिथे मंदिर असेल तिथे हे हत्ती असावेत कारण आजूबाजूला काही नक्षीदार दगडी गोळा करून ठेवलेले आहेत, जे मंदिराच्या बांधकामाचे दिसतात. पुरातत्ववाले हे उचलून नेत असावेत म्हणून स्थानिक आम्हाला हे सगळं दाखवत नसावेत.

आम्ही हे पाहून त्या कापसाच्या शेतातून परत तटबंदीवर आलो. पूर्ण मागे न जाता वाटेतच एका बाजूला कच्चा रस्त्याकडे परत जायला जागा आहे. हे किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे. सगळी तटबंदी आणि बांधकाम प्रचंड आकाराच्या घडवलेल्या दगडांनी बांधलेले आहे. लांबीला एक-एक दगड किमान दहा फूट तरी असावा. तरी ह्या प्रवेशद्वाराचे सुद्धा अवशेषच शिल्लक आहेत. यामधूनच कच्च्या रस्त्याने आम्ही गोशाळेकडे गेलो होतो.

थोडक्यात जेवढा बघायला मिळाला तेवढा मालिआबाद किल्ला बघून झाला. अकरा वाजत आलेच होते.

पुढे बघायचा होता किल्ला मान्वि.

कर्नाटकातील किल्ले: किल्ले वनदुर्ग, सुरपूर उर्फ कुंबारपेठ आणि वागनगेरा


किल्ले वनदुर्ग

शहापूर सोडून वनदुर्गला पोचायला तीन वाजत आले होते. तरी दिवसातला हा शेवटचा किल्ला नव्हता, त्यामुळे निवांत किंवा वाया घालवायला वेळच नव्हता. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर झाडाचा पार आहे, अगदी तिथपर्यंत गाडी जाते.

अगदी बरोब्बर आयताकार किल्ला

हा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचा आकार बघितला तर अगदी परफेक्ट चौकोन आहे. अगदी पट्टीने आखून बांधल्यासारखा. आकार २२५ मी * २१४ मी. गडाला एकच प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक-एक शिलालेख कोरलेला असून पांढऱ्या रंगाने रंगवलेला तो विद्रूप वाटतो. हे शिलालेख संस्कृत भाषेत आहेत. प्रवेशद्वाराच्या बाबतीत या किल्ल्याच्या आर्किटेक्टचं खास कौतुक केलं पाहिजे.

गडाचा फसवा दरवाजा
दरवाजाच्या आतली रचना, देवड्या वगैरे

आयताकृती किल्ल्याच्या परकोटाच्या एका बाजूच्या तटबंदीतून बाहेर, हे प्रवेशद्वार आहे. तेसुद्धा गोलाकार रचनेत. ह्या रचनेच्या एका बाजूला हे प्रवेशद्वार आहे, आणि त्यातून लगेच किल्ल्यात प्रवेश होतच नाही. आतमध्ये पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. ह्याला छान पैकी खांब आहेत. इथे डावीकडे वळावे लागते, म्हणजे शत्रूने तडक प्रवेश मिळवू नये. मग अजून एका भागात आपण येतो, तरीही किल्ल्यात प्रवेश नाही. इथे डावीकडे वळून पाहिल्यास अप्रतिम असे शब्द बाहेर न पडले तरच नवल!

अप्रतिम असे परकोटाचे प्रवेशद्वार

इथेही किल्ल्याचे वाडे वगैरे नाहीत तर आहे परकोटाचे प्रवेशद्वार, आणि तेही दोन बाजूला भरभक्कम बुरुज घेऊन. दरवाजाच्या कमानीवर आकृत्या आहेत, ज्या नीटश्या समजल्या नाहीत. पण सर्वात डावीकडे बहुतेक कमळ असावे, तर सर्वात उजवीकडे चंद्रकोर ओळखता आली. हे प्रवेशद्वार बुरुजांसह भक्कम आहे. जुने दरवाजाचे लाकडी दार तुटक्या अवस्थेत का होईना पण शिल्लक आहे, त्याला संरक्षणासाठी असलेल्या लोखंडाच्या खिळ्यांसह.

इथून आत येतो ते परकोटाच्या आत मध्ये. इथे स्वच्छता असल्याने किल्ल्यात राहणाऱ्या मुलांनी हेच क्रिकेटचे मैदान मानले आहे. समोरच मुख्य किल्ल्याची भिंत दिसते. सर्वात उजवीकडे एक बुरुज आहे आणि त्याला लागूनच खाली कसलेतरी मंदिर. आधी मुख्य किल्ल्यात जाऊन मग इकडे यावे म्हणून डावीकडे दिसणाऱ्या प्रवेशदाराजवळ गेलो.

मुख्य प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी भोवताली गोलाकार रचना

तिथेही मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत. संरक्षणासाठी भोवताली गोलाकार रचना आहे. दरवाजाच्या कमानीवर मधोमध कमळ असून इतर आकृत्या पुसल्या गेल्या आहेत. दरवाजाच्या मागील बाजूस आत मध्ये एक शिलालेख किंवा काही चिन्ह असलेला दगड आहे. पण ह्याच्यावरच्या गोष्टी धड समजत नाहीत. हा प्रकार नेहमीपेक्षा वेगळा आहे. साधारण ११-१२ आडव्या रेषा (Rows) तर त्याला छेदणाऱ्या आठ उभ्या रेषा (Columns). आडव्या-उभ्या रेषा छेदून झालेल्या चौकोनात (Cell) मध्ये कसलीतरी चिन्हं किंवा अक्षरं कोरलेली. मुख्य किल्ल्यात आधी जायचं रद्द करून किल्ल्याला बाहेरून प्रदक्षिणा मारावी म्हणून मागे फिरलो.

बुरुज आणि त्यात हनुमानाची मूर्ती

सर्वात उजवीकडे असलेल्या बुरुजाला लागून खाली असलेल्या मंदिराकडे गेलो. तिथे बुरूजाच्या एका दगडात हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. मूर्ती दिसायला अत्यंत सुंदर आहे. किल्ल्याला उलटी प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. आमच्या उजव्या बाजूला परकोटाची भिंत तर डाव्या बाजूला कायमच किल्ल्याची भिंत असणार होती, प्रदक्षिणा संपेपर्यंत.

परकोटाच्या आतील बाजूस भिंतीला धरून खंदक

परकोटाच्या आतील बाजूस भिंतीला धरून खंदक आहे. त्यात तुडुंब पाणी भरलेलं होतं. हे पाणी ह्याच पातळीत वर्षाचे बाराही महिने असतं असं म्हणतात. आतमध्ये जिवंत झरे आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये जी कुटुंब राहतात, त्यांच्यासाठी हा पाण्याचा स्त्रोत आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडची बाजू सोडल्यास उरलेल्या तीनही बाजू खंदकाने संरक्षित केलेल्या आहेत.


बुरुज आणि त्यावर वाढलेली झाडी

किल्ल्याच्या आयताकृती बांधकामाच्या चार कोपऱ्यांवर एक-एक मोठे बुरुज, तर मध्ये दोन-दोन बुरुज असे एकूण बारा एकूण बुरुज या किल्ल्याला आहेत. बहुतेक सर्व बुरुज अत्यंत उत्तम अवस्थेत आहेत. बुरुजांवर झाडी वाढल्याने भविष्यात मात्र धोका नक्कीच आहे.

इथे आजूबाजूला झाडी असण्यात वेगळं असं काहीच नाही. ह्या किल्ल्याचे बांधकाम शोरपूर/सुरपूर साम्राज्याचे कृष्णप्पा नायक यांनी जेव्हा केले, तेव्हा सर्व बाजू जंगलाने वेढलेल्या होत्या. म्हणून तर किल्ल्याचे नांव वनदुर्ग पडले. परंतु त्या वेळी आजूबाजूला जंगल असेल, तर बांधकामावर अर्थातच झाडे-झुडपे ठेवलेली नसणार. सध्या मात्र एकदम उलटी स्थिती आहे, वनदुर्ग म्हणावे असे सोडाच, पण साधे जंगलही आजूबाजूला नाही. उलट बांधकामावर झाडी वाढलेली आहे. किल्ल्याच्या आतमधल्या भागात राहणारी कुटुंबं तर आतमध्ये चक्क शेती करतात.

प्रदक्षिणा मारताना एका बाजूला पाण्याने भरलेला खंदक, बाहेरची तटबंदी, तर आतल्या बाजूला किल्ल्याची भिंत, बुरूज, हे बघतच किल्ल्याच्या तिसर्‍या बाजूला आलो.

प्रदक्षिणा मार्ग इथे बंद झालेला आहे तो वाढलेल्या प्रचंड झाडी मुळे. त्यामुळे जिथून प्रदक्षिणा सुरू केली, तिथपर्यंत परत येता येत नाही. पण इथे किल्ल्यात प्रवेश करायला एक चोर दरवाजा आहे. किंबहुना इथे चोरदरवाजा असल्यामुळे पुढची झाडी स्वच्छ करायच्या भानगडीत कोणी पडलेले नसावे.

चोरदरवाजा

दरवाज्याच्या आतल्या बाजूला खांबांवर असलेले नक्षीकाम बघण्यासारखे आहे. आखीव-रेखीव आणि अतिशय पॉलिश, फाईन असे काम आहे हे. गडाच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर काही जुनी बांधकामं दिसतात. इथे वस्ती आहे. त्यांचा सगळा संसार, शेळ्या-बकऱ्यांसह इथे आहे.

मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आतील भागातच मोठे हनुमानाचे मंदिर आहे. आमची गडफेरी इथे संपली होती. सगळे फोटो काढ निवांत फिरूनही अवघ्या ३५ मिनिटांत किल्ला पूर्ण भरून झाला होता.

अजून एक किल्ला बघायचा शिल्लक होता आमचा या दिवसाच्या वेळापत्रकातला, त्यामुळे भुकेची जाणीव फारशी होतच नव्हती. लक्ष सूर्याकडे लागले होते. तो जिथवर साथ देईल, तोपर्यंत जे काही बघायचे ते बघता येणार होतं. कोणाला तरी भुकेची जाणीव झाली आणि प्रवेशद्वारासमोरच्या झाडाच्या पारावर आम्ही पंगत मांडली. दही-पराठे वगैरे जे काही होतं त्याचा फडशा पाडला.

इथून निघाल्यानंतर आम्ही शिरपूर गावातूनच जाणार होतो, त्यामुळे सुरपूर उर्फ कुंबारपेठ किल्लाही बघायचं नियोजन सुरुवातीला होतं. पण शिल्लक वेळ, एकूणच वाहत असलेले निवडणुकांचे वारे आणि त्यामुळे होत असलेली गर्दी लक्षात घेता जर अंत:करणाने तो वगळावा लागला होता. नाहीतर त्याच्या पुढचा किल्ला आजच्या दिवसात करणे शक्य नव्हते आणि मग सगळं वेळापत्रकच बिघडलं असतं.

शिरपूर/कुंबारपेठ/सुरपूर किल्ल्याचा दक्षिणेकडील दरवाजा

ह्या किल्ल्याचे अवशेष गावात आहेत आणि जवळील टेकडीवरच पण आहे असं वाचलं होतं. गावात तर “राज-दरबार” म्हणून वास्तू आहे. ह्या सगळ्यावर पाणी सोडून आम्ही आमच्या रस्त्याला लागलो होतो. सुरपूर गांव ओलांडून गावाच्या दक्षिणेकडच्या बाजूला आलो तर रस्त्याच्या एका वळणावर, उजव्या बाजूला किल्ल्याचा एक दरवाजा दिसला. आम्ही गाडी तशीच पुढे कशी नेणार? थांबलो अर्थातच.

दरवाजा आणि त्यातल्या दगडांवरील नक्षी

एवढा भरभक्कम दरवाजा बघितल्यावर आमच्या उड्या पडल्या. दरवाजा प्रचंड मजबूत असून आतमध्ये तर चांगलाच लांब आहे. दोन्ही बाजूला ३-३ अश्या ६ देवड्या आहेत. वरती एकूण चार कमानी आहेत. दरवाजावरील काही दगडांवर हत्ती, साप, वेगवेगळ्या प्रकारची माणसे, कमळ अशा आकृत्या कोरलेल्या आहेत. ज्यावर कुणीतरी सध्या पिवळाधमक रंग पासून ठेवलेला आहे, जणू Highlighter.

दरवाजाची मागची बाजू

दरवाजातून पलीकडच्या बाजूला बाहेर पडलो, तर ह्या बाजूला असलेले २ भक्कम बुरुज दिसले. हा दरवाजा अप्रतिमच आहे. कमानीवर ७ आकृत्या असून दोन्ही बाजूला लोखंडी कड्या शिल्लक आहेत.

मोजून दहा मिनिटांपेक्षा कमी वेळात शिरपूर/कुंबारपेठ किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग पदरात पाडून घेतला आणि दुःख थोडं हलकं झालं.

जराही न थांबता पुढे कूच केली “वागनगेरा” किल्ल्याकडे.

किल्ले वागनगेरा

शिरपूर/कुंबारपेठ किल्ल्याचा एकच दरवाजा आम्ही बघितला, हा किल्ला पूर्वी मोठा असावा. कारण हा किल्ला नायकांचं मुख्यालय होता आणि नंतर राजधानी पण. पण हा किल्ला राजधानीचे  केंद्र व्हायच्या आधी नायकांच्या राजधानीचे केंद्र होता तो किल्ले “वागनगेरा”.

वागनगेरा युद्ध होऊन उद्धवस्त झाला तो १७०४ साली. हि लढाई झाली ती मुघल आणि रामोशी पेड्डा नायक यांच्यात. रामोशींचे सैन्य होते ९०००, तर मोगल झुल्फिकार खान यांचे ४०,०००. तरीही तीन महिने प्रतिकार करून मग शेवटी पैसे व सोनं घेऊन रामोशींनी पळ काढला व मराठ्यांना येऊन मिळाले.

मोगलांनी नंतर वागनगेराचं नामकरण करून ते रहमान बक्ष किल्ला असं केलं.

गडावर नेणाऱ्या पायऱ्या

समोरच्या टेकडीवरील अवशेष

गाडी अगदी पायऱ्यांपर्यंत पोचते. येथे उजव्या बाजूला एक तलाव आहे, “वागनगेरा तलाव”. आमच्यापुढे मुख्य किल्ल्यावर जाणारा पायरी रस्ता होता, तर मागच्या बाजूला एक टेकडी होती, त्यावर काही अवशेष आणि बांधकाम ही दिसत होते. हा किल्ला तीन टेकड्यांवर आहे. आम्हाला इथे गडपायथ्याशी पोचायला सव्वा पाच झाले होते. वेळ संपलेली नसली, तरी भरपूर असा वेळ हातात नव्हता. त्यामुळे आम्ही सरळ मुख्य किल्ल्याचा मार्ग धरला.

पायऱ्यांची सुरुवात होताच डावीकडे एक बुरुज सदृष बांधकाम दिसते. “L” आकारात हा पायरी मार्ग आहे, जो आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातो.

वाटेत चार खांबांवर तोललेली, एक मंडप सदृष वास्तू आहे. मूळ बांधकाम पडल्याने, नव्याने ते पूर्वीसारखेच बांधल्यासारखे दिसत होते. समोर असलेल्या झाडीतून दोन बुरुज डोकं वर काढून असलेले दिसले.

बुरुजांजवळ पोचल्यावर मधले प्रवेशद्वार दिसले. इथले बांधकाम ढासळत चालले असून कमानीचा बऱ्यापैकी भाग ढासळलेला आहे. दरवाजा आणि बुरुजावरच्या चर्यांचे काम बघण्यासारखे आहे.

तलाव आणि शेजारील तटबंदी

दरवाजातून आत गेलो तर समोरच एक बर्‍यापैकी मोठा चौकोनी तलाव आहे. हा बांधीव आहे. त्यात उतरायला दोन बाजूंनी पायर्‍या आहेत. त्यात असलेले पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. प्रचंड पाला-पाचोळा आणि शेवाळं याने ते झाकलं गेलेलं आहे.

वेणुगोपाल स्वामी मंदिर

इथे डाव्या बाजूला जी वाट जाते, ती आपल्याला या किल्ल्यावरच्या सध्याच्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत सुंदर मंदिरात घेऊन जाते. या मंदिरात जे देवाचे चित्र आहे ते बालाजीच्या चित्रासारखे दिसते. परंतु एके ठिकाणी वाचल्यानुसार ते वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे. हे तिथे उभ्या असलेल्या दगडांच्या प्रचंड शिळांच्या आधाराने बांधलेले आहे.

उद्ध्वस्त भूतनाथ मंदिर

मंदिरातील नक्षीकाम केलेले दगड

या मंदिराच्या बाजूला दुसऱ्या एका उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष पडलेले आहेत. हे मंदिर म्हणजे भूतनाथ मंदिर” असं एके ठिकाणी वाचलं. ह्या अवशेषांत खूपसे नक्षीदार दगड आहेत. या कितीतरी वेगवेगळ्या आकृत्या असून, कमळ, घोड्यावर बसलेले, उभे, सिंहासनाधीश, असे अनेक रूपातले देव आहेत. मधोमध एक मोठा चौकोनी दगड आणि त्यावर गोलाकार आकार कोरलेला आहे. हे सर्व दगड इतके सुंदर कलाकुसर केलेले आहेत, की त्यांची अशी अवस्था नकोशी वाटते.

मोठ्या वेणुगोपाल स्वामी मंदिराच्या समोर एक लहानसे मंदिर आहे, तर बाजूला आणखी एक मंदिर असावे. पण त्यात सध्या देवमुर्ती दिसत नाही. याच परिसरात काही थडगी असून, त्यातले एक औरंगजेबाच्या मुलाचे मानले जाते.

आता किल्ल्याच्या आल्या भागातले अवशेष बघायला सुरुवात केली. आतमध्ये एक पाण्याचे टाके आहे, ज्यात उतरायला पायऱ्या आहेत. टाकं पाण्याने नाही तर बाभळीच्या झाडीने पूर्णपणे भरून गेलेलं आहे.

तटबंदी जी शाबूत आहे, त्यावर जायला पायऱ्या आहेत. त्यातल्या चर्या आणि त्यामधली रचना सुंदर आहे, बाभळींनी किल्ल्याचा खूप भाग व्यापलेला आहे.

चंदेरी झाडं

किल्ल्याच्या मागच्या भागात जाताना वाटेत चक्क चंदेरी रंगाने रंगवलेली झाडं दिसली. त्यावर बरीच चर्चा झाल्यावर ती रंगवलेली नसून झाडांची एक नैसर्गिक अवस्था आहे हे लक्षात आले.

झाडी, अवशेष आणि सूर्य

प्रदक्षिणा मारत मारत परत येताना वाटेत अनेक अवशेष दिसत होते. एकदम मागच्या भागाच्या कोपऱ्यात एक बुरुजही आहे. ह्या बाजूच्या तटबंदीची बरीच पडझड झालेली आहे आणि आतमध्ये खूप झाडी वाढलेली आहे.

बाभळीच्या झाडांच्या रंगछटा

वाटेतल्या बाभळीच्या झाडांच्या रंगछटा बाभळीतही सौंदर्य दाखवत होत्या. हे सगळे न्याहाळत एका टोकाला आलो. इथे बोटीच्या टोकासारखा एक दगड पुढे आलेला असून त्याच्याच वर एक बुरुज उभारलेला आहे. आणि याच दगडाचा आधार घेऊन एक तटबंदीही बांधलेली आहे.

आधी या अतिशय सुंदर रचनेवर फोटोशूट झाले. एकूण संरचना पाहता हे अपरिहार्य होते.

लांबच लांब तटबंदी

या बुरुजावर गेलो तर गडाची या बाजूची पूर्ण तटबंदी दिसायला लागली. अशी लांबच लांब तटबंदी बघून डोळे खरंच सुखावले. तटबंदीमध्ये असलेले बुरुज, मध्ये मध्ये तटबंदीवर चढण्यासाठी असलेला पायरी मार्ग तर या तटबंदीचे सौंदर्य आणखीनच खुलवतो.

बाहेरच्या बाजूला नजर टाकली, तर पाण्याने भरलेली शेतं

गावाकडच्या आणि एकूणच किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला नजर टाकली, तर पाण्याने भरलेली शेतं दिसली. अरे हो... ते सांगायचं राहूनच गेलं. यावेळी इकडच्या खुपश्या भागांत भाताची शेती चालू होती. डिसेंबर महिन्यात भातशेती म्हणजे पाणी किती मुबलक प्रमाणात असेल तिकडे? पाण्याचे हे नियोजन महाराष्ट्राने कर्नाटककडून शिकण्यासारखे आहे. असो...

तिकडून दोन टेकड्यांवरचे किल्ल्याचे उरलेले अवशेष दिसत होते, पण ते अगदीच थोडके आहेत. होतो तिथूनच त्यांचे फोटो काढले. परत फिरून प्रवेशद्वारापाशी यायला निघालो. वाटेत परत चंदेरी चमचमणाऱ्या फांद्या घेऊन मिरवणारी झाडं, जुन्या वाड्यांचे अस्तित्व दाखवत, अजूनही तग धरून असलेले शिल्लक अवशेष हे दिसत होतेच. प्रवेशद्वाराजवळच्या मोठ्या तलावाजवळ आलो आणि उलट्या प्रदक्षिणा मार्गाने आमची गडफेरी पूर्ण झाली. खाली उतरलो तेव्हा सहा वाजत आले होते. म्हणजे वेळेमध्ये ठरल्याप्रमाणे किल्ला बघून झाला होता.

रात्री मुक्काम करायचा होता रायचूर मध्ये आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी सकाळी बघणार होतो “रायचूर” किल्ला.

कर्नाटकातील किल्ले: किल्ले शहापूर जोड किल्ले


यादगिर किल्ला बघून झाल्यावर इडली-वडे सगळ्यावर ज्यापद्धतीने तुटून पडलो होतो, ते बघता दुपारच्या जेवणाची लवकर आठवण होणारच नव्हती. एकूणच कर्नाटकामध्ये कुठल्याशा निवडणुकांचे वारे वाहत होते, त्यामुळे यादगिर मधून पण लांबच्या रस्त्याने बाहेर पडायला लागले. शहापूर किल्ल्याच्या पायथ्याशी यायला सव्वा अकरा झाले होते. या किल्ल्याचा पायथा म्हणजे श्री सिद्धलिंगेश्वर मंदिर. शहापूर गावाच्या बाजूने या डोंगरावर सरळ डांबरी रस्ता केलेला आहे. गुगल सरळ हाच रस्ता दाखवतो.

तसा डोंगराच्या गावाकडच्या बाजूने एखादा रस्ता नक्कीच वर येत असेल, पण आम्हाला धोपटमार्ग पाहिजे होता आणि गावात त्या गर्दीत गाडी घालण्यात काहीच अर्थ नव्हता.

सिद्धलिंगेश्वर मंदिर शिवपिंडीच्या आकारात बांधलेले आहे. आवारात प्रचंड वटवृक्ष आहे, ज्याचा विस्तार डोळ्यांना नक्कीच सुखावतो. मंदिराच्या जागेत गाड्या पार्क केल्या. किल्ला समोरच दिसत होता. कुठूनही गेलं तरी वाटेत झाडी दिसत नसल्यामुळे वाट सापडण्याचा प्रश्न येणार नव्हता. पण उगाचच धोपटमार्ग का सोडा, म्हणून प्रशस्त असा जो मार्ग दिसला, त्यावरूनच निघालो

रस्ता थोडासा वळसा मारून आहे. सपाटीवरून चालत होतो. उजवीकडे काही अंतरावर एक मंदिर दिसलं. त्या खालच्या सिद्धलिंगेश्वर मंदिरातून, या मंदिरात सरळ पायवाट नक्कीच येत असेल, पण आम्ही उगाचच प्रशस्त रस्ता पकडू म्हणून वळसा मारून आलो होतो. समोर दिसत असलेल्या किल्ल्याच्या डोंगराला डावीकडे ठेवत, एकदम उजव्या टोकाला आलो, जिथे दुसऱ्या मंदिराकडून सरळच रस्ता येत होता.

समोरच्या डोंगरावर सुद्धा गडाचे अवशेष दिसले, हा या किल्ल्याचाच भाग. शहापूर हा जोड किल्ला आहे, शेजार-शेजारच्या दोन डोंगरांवर मिळून.

आम्हाला आधी मुख्य भागात जायचं होतं, म्हणजे जो डोंगर डावीकडे ठेवला होता त्यावर.

तसं बघायला गेलं तर डाव्या बाजूला वर बघितल्यावर दरवाजा किंवा किल्ल्यात शिरता येईल असा आकार दिसत होता. पण एक तर हा प्रदेश नवीन, मोठमोठाले प्रचंड खडक अस्ताव्यस्त पडलेले, उगाच कुठल्यातरी मार्गाने जाऊन समोर एकदम खड्डा यायचा, त्यापेक्षा कशाला धोपटमार्ग सोडा? त्यातून आम्ही धरलेल्या प्रशस्त रस्त्याच्या बाजूला सरळ बाण काढलेले रंगाने.

अवघ्या दोन मिनिटांत एक पाण्याचा बांधीव टाकं लागलं. ते अगदीच कोरडं नव्हतं, पण पाणी पिण्यायोग्य नव्हतं. वरच्या बाजूला तटबंदी सुद्धा दिसली. जर असंच पुढे गेलो तर दगडी पायऱ्या, आणि उजवीकडे वळलो तर एक दरवाजा आहे. दरवाजाची पूर्ण कमान नक्षीदार आहे. वरती मधोमध एक दगड आहे, ज्याच्यावर मध्ये गणपतीआणि त्याच्यावर दोन्ही बाजूला सोंडेने अभिषेक घालत असलेले हत्ती आणि मोर असे कोरलेले आहेदरवाजाला प्रशस्त देवड्या असून त्याला सुंदर कमानी आहेत.

दरवाजा ओलांडल्यावर मुख्य किल्ल्याचा भाग असलेल्या डोंगरावरची तटबंदी डावीकडे वरती दिसायला लागली. याचा अर्थ आम्ही डोंगराच्या पलीकडच्या बाजूने कडेकडेने चाललो होतो. म्हणजे वर जाणारा रस्ता वळसा मारून असावा. कारण चालत असलेला मुख्य रस्ता आम्ही सोडलाच नव्हता. म्हणजे इथूनच कुठूनतरी वर जाणारा रस्ता असणार होता.

आम्ही हीच कन्नड अक्षरं आणि बाण दिशादर्शक म्हणून मानत होतो

डोंगराच्या कडेला लागून दाट बाभळीची झाडी, तर आम्ही जात असलेला रस्ता स्वच्छ आणि साफ केलेला. पुढे मात्र वाट थोडी दाट झाडीत शिरली. पण सावलीत चालायला छान वाटत होतं. त्यातून कन्नड मध्ये बोर्ड आणि बाण. मी आणि प्रमोद पुढे होतो. डावीकडे डोंगराच्या कड्याची उंची वाढत चाललेली समजत होती. वर जायची वाट काही येत नव्हती, पण आम्ही चाललेली पायवाट अतिशय चांगली मळलेली, साथीला कन्नड बोर्ड आणि तोही बाणा सकट. अर्थात किल्ल्यावरच्याच कुठल्याश्या मंदिरात जाण्यासाठी बाण काढलेले असणार ना...

पुढे चालत राहिल्यावर एक पडका दरवाजा. त्यात प्रशस्त देवड्या वगैरे. दरवाजा ओलांडला, तर जंगल साफ एकदम. तरी पण एक कळलं होतं, किल्ल्यावर जायची वाट सोडून या कन्नड बोर्डाने भलतीकडेच कुठे तरी आणलं होतंन. आम्ही मध्ये मध्ये मागचे लोक लोक हाकेच्या अंतरावरच आहेत ना हे पाहत होतोच.

आता सरळ मागे फिरून त्यांची वाट बघितली. सगळ्यांना आपण रस्ता चुकल्याचं सांगितलं. आधी सगळे एकत्र जमा झालो. थोडी चर्चा झाल्यावर शेडबाळे सर एकीकडे, तर प्रभाकर आणि मापारी सर दुसरीकडे जायचं ठरवून निघाले. उरलेले आम्ही, यांची वाट बघत मध्ये थांबलो.

शेजारच्या डोंगरामुळे आम्ही कुठे आलो आहे हे माझ्या लक्षात येत होतं. तसंही आम्ही किल्ल्याच्या मुख्य डोंगराला लागूनच होतो. फक्त एकदम मागच्या, म्हणजे गावाकडच्या बाजूला आलेलो. इथून वरती जायला नक्की जागा असणार होती. गुगलप्रमाणे तिकडे एक दर्गा असायला हवा होता एकदम डाव्या बाजूला. गडाचा मॅप बघणे आणि गाडीमध्ये तरी नेव्हीगेटर मीच, त्यातून सर्वात पुढे चालत येऊन मागच्या सर्वांना ह्या चुकलेल्या रस्त्यावर मीच घेऊन आलो, ही चुटपुट लागलेली. मुद्दामच आणखी रस्ता शोधा च्या भानगडीत पडलो नाही.

आणि एक तर शेडबाळ सर एकीकडे, तिकडे प्रभाकर आणि मापारी सर दुसरीकडे गेलेले, त्यात मला तिसरीकडे जाऊन अजून गोंधळ वाढवायचं नव्हता.

"श्री जिव्हेश्वर" मंदिर

प्रभाकर आणि मापारी सरांना एक मंदिर सापडलं जे गुहेत होतं. वाटेत ते बोर्डावर वाचत (म्हणजे आम्ही नुसती कन्नड अक्षर बघत आलेलो) ते हेच "श्री जिव्हेश्वर" मंदिर. हा शोध पूर्ण कर्नाटक भ्रमंती नंतर आज हा ब्लॉग लिहिताना, माझ्या मामीला तो बोर्ड वाचायला दिला त्यावरून बोध झाला.

आता एवढं सगळं वाचल्यावर सांगतो की "इथे यायचं नाSSSSही". उलट फिरून "इथे डाव्या बाजूला दरवाजा किंवा किल्ल्यात शिरायला योग्य अशा प्रकारचे बांधकाम दिसलं. तिकडे जाता धोपट मार्गाने पुढे आलो" असं जिथे लिहिलं होतं ना? तिथपर्यंत मागे जायचं (म्हणजे वाचताना, प्रत्यक्षात नव्हे) आणि तिथेच डावीकडे वर दिसणाऱ्या बांधकामात घुसल्यावर सरळ किल्ल्यात जातो आपण. 😝😝😝

पण सध्यातरी आम्ही इकडे श्री जिव्हेश्वर मंदिराजवळ आलो होतो. त्यात शेडबाळे सर सोडून आम्ही एकत्र होतो. आता त्यांची शोधमोहीम सुरू झाली. बराच वेळ ते रस्ता बघून तिथेच परत येतील अशी वाट बघितली. तशी लक्षणं दिसल्याने मागे फिरून सरांच्या नावाने हाका मारत सुटलो.

आता किल्ल्याचा मुख्य डोंगर उजवीकडे होता तर दुसरा डोंगर समोरच होता. किंबहुना आम्ही त्याच्या आतमध्ये इथुनच कुठून तरी शिरू शकू म्हणतानाच तटबंदी दिसली. आधी वाट चुकताना मीच आघाडीवर असलो, तरी इथे तटबंदी दिसल्यावर परत आधी धाव घेतली गेली. दरवाजा सापडला, तो सुद्धा अगदी कमानीवर तीन कमळ वगैरे सह.

मी कसाही, कुठेही आणि सगळ्यात आधी शिरत असलो तरी एक नियम कधीच मोडला नव्हता, आपल्या मागचा माणूस हाकेच्या अंतरावर आहे ना याची खात्री करत राहायचा. त्यामुळे किमान मला शोधत राहायची वेळ कोणावर येणार नव्हती.

तर, माझ्या मागचे कायम हाकेच्या अंतरावर आहेत ना याची खात्री करत, म्हणजे मध्ये मध्ये हाका मारत, किल्ल्याच्या या भागात शिरलो.

इकडे तर चहूबाजूला तटबंदी. किल्ल्याच्या मुख्य डोंगराच्या बाजूला पाहिले, तर त्यावरचे बुरुज वगैरे बांधकाम इकडूनच दिसायला लागले.

खुद्द मी ज्या किल्ल्यात उभा होतो, तिथे डोंगराचा सर्वात उंच भाग आणि खाली जमिनीच्या पातळीवर एक मंदिर. सर्व बाजूंची तटबंदी निरखताना शेडबाळे सरांच्या नावांचा जप चालूच होता, तर दुसरीकडे मागे विनीत प्रमोद वगैरे यांच्या नावाने हाका.

तेवढ्यात उजवीकडच्या एका तटबंदीतून सर डोकावताना दिसले. ते निवांत तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने फिरत फिरत इथे येऊन आत मध्ये घुसले होते.

सगळे एकत्र आल्यावर मग, तुमचा फोन लागला नाही, आमचा फोन बिझी होता, किती हाका मारल्या... वगैरे सुखसंवाद झाला, हा सुखसंवाद जिथे झाला, तिथे एक मोठा तलाव होता. डावीकडच्या बुरुजातून शेडबाळे सर अवतरले होते, तर उजवीकडे आम्ही पूर्ण टोकापर्यंत जाऊनही काहीच पाहिलेला शहापूर किल्ल्याचा मुख्य डोंगर होता.

रस्ते आणि सगळे भिडू सापडल्यावर लक्ष पुन्हा घड्याळाकडे गेलं. गेली ३०-४० मिनिटे फिरूनही किल्ला मात्र बघितलाच नव्हता. शेजारच्या बुरुजावरून पलीकडे बघितले तर किल्ल्याच्या तटबंदीची बाहेरची रेखीव बाजू बुरुज दिसले.

समोर एक प्रचंड तलाव, शेजारी मस्त हिरवीगार हिरवळ आणि एका बाजूला किल्ल्याच्या तटबंदीची बाहेरची गोलाई. त्यात दिसणार्या कमानीदार पाकळ्या, आणि त्यात बंदुकीच्या माऱ्यासाठी ठेवलेल्या जंग्या.

"मंदाकिनी अंजनेय स्वामी" मंदिर

किल्ल्याच्या आतल्या बाजूला तलावाजवळच्या मंदिराजवळ आलो. हे "मंदाकिनी अंजनेय स्वामी" मंदिर आहे. आत मध्ये हनुमानाची मुर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला मी गेलो. तिथे शंकराच्या पिंडीसारखा आकार असला तरी त्यात साळुंका नाही तर तीन खड्डे आहेत.

आम्हाला इथल्या लहानग्या उंचवट्यावर चढायचे होते. बाकी सगळे मंदिराच्या पुढच्या बाजूने वर निघाले, तर मी जिथे होतो तिकडून, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूने सुरुवात केली. तिकडून किल्ल्याच्या मुख्य डोंगरावरचे जवळजवळ सगळेच अवशेष दिसत होते. अर्थातच अजून तिकडे आमचे जायचे शिल्लक होते. मी चढत होतो ती वाट पावसाळ्यात अगदीच अशक्य आहे. एवढंच काय तर पाणी येत असेल तर पावसाळा वगळता इतर कधीही जावं अशी सुद्धा. वर पोचलो तर एक पडकं बांधकाम आहे आणि जागोजागी पाणी साठून नंतर कोरडे पडलेले खड्डे. मी आणि नाना पुढे पुढे आलो होतो, तर इतर सगळे कदाचित खालीच असावेत अजून.

नेहमीप्रमाणे मी आणि नानांनी इकडच्या दगडांबरोबर, पाण्याबरोबर फोटो काढून घेतले.

खाली बघितलं तर प्रचंड जलाशय किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला.

एका बुरुजाच्या चोर दरवाजातून सगळे आज शिरताना दिसले. त्यांना वरून हात केला आणि आम्ही वर तिथेच वाट बघत थांबतो असं सांगितलं.

इथे कातळकोरीव वाटावेत असे काही खळगे होते. त्यात पाणी साचलेलं होतं, पण ती टाकी नसावीत. ते नैसर्गिकरित्या झालेलं वाटत होतं.

इथे माथ्यावर बघायला तसं काहीच नव्हतं. वरून किल्ल्याच्या दोन्ही डोंगरांचा view मात्र उत्तम दिसतो. एकदा चुकामूक होऊन गेली होती म्हणून सगळे येईपर्यंत मी आणि नाना तिथे थांबलो.

वरून किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बघून ठेवला होताच. सगळ्यांना त्या बाजूने उतरून दोन डोंगरांच्या मधल्या दरवाजात जाता येईल हे सांगितलं.

सर्वात आधी रस्ता चुकला तेव्हा सगळ्यात पुढे मीच होतो, तरी सगळ्यांना मी सांगत असलेला रस्ता तिथे घेऊन जाऊ शकेल की नाही यावर शंका आली नाही हे नशीब. 😄

तिथून खाली उतरताना, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला येणारा रस्ता एकदम निसरडा आहे. त्यावर पाणी असेल तर अजिबात येण्यासारखा नाही. एका चोर दरवाजातून खाली उतरून दोन डोंगरांच्या मधल्या भागात आलो. म्हणजे सगळ्यात आधी पाहिलेला हा दरवाजा, जिथे आम्ही सुरुवातीला येऊन तसेच पुढे मंदिराकडे गेलो होतो. नक्षीदार कमानीयुक्त, मध्ये दोन हत्ती गणपतीवर अभिषेक करत असलेला दरवाजा तो हाच.

एक चोर दरवाजा, जो आधीच्या डोंगरावरूनच हेरून ठेवला होता या महत्त्वाच्या किल्ल्यात जाण्यासाठी, तिथे आलो, चोरदरवाजे साधारणपणे ज्या उंचीचे असतात, तसाच हाही बेताच्या उंचीचाच. पण ह्याला एका बाजूला गोलाकार खांब आहे. दरवाजा ओलांडून गेल्यानंतर आत मध्ये मात्र चांगलीच झाडी आहे. झाडीच्या पलिकडे अजून एक चोरदरवाजा ओलांडावा लागतो.

इकडे खरंतर दरवाजांची अतिशय चांगली शृंखला असणार, जी आता पडझड झाल्याने नेमकी कशी असावी हे लक्षात येत नाही.

पुढे अजून काही बुरुज आणि त्यात दगड मातींनी बुजलेल्या दरवाजे दिसले. त्यात अर्थातच जागा आणि वाट शिल्लक राहिलेली नव्हती.

त्यात पूर्ण तटबंदीत फक्त उजवीकडे, तो सुद्धा पडझड झाल्याने जायला रस्ता असल्याचं दिसलं. इथले सगळे दगड पावसाळ्यात अतिशय धोकादायक आहेत. सध्या कडकडीत ऊन आणि पाण्याचा थेंबही वर नसलेल्या दगडावरून सुद्धा आम्हाला पावलं तिरकी टाकत टाकत सांभाळून जावं लागलं.

मागे वळून बघितल्यावर आधी ज्या डोंगरावर गेलो होतो तिथली तटबंदी चांगली दिसत होती.

प्रत्यंचा अकारण ताणून धरलेल्या धनुष्याकृती आकाराचा तलाव

तटबंदीतून आत आलो, तर समोरच त्रिकोणी आकाराचा तलाव दिसला. त्यात बऱ्यापैकी पाणी होते, अर्थात एकदम शेवाळ युक्त हिरवे हिरवे, अजिबात पिण्यायोग्य नसलेले. तलाव बांधताना दोन बाजूच्या नैसर्गिक दगडांच्या दोन बाजू धरून, म्हणजे त्या आकर्ण ताणून धरलेल्या धनुष्याची प्रत्यंचा मानल्या, तर वरच्या आणि खालच्या दोन बाजूची टोके ओढल्या गेलेल्या धनुष्याचा भाग, म्हणजे ही बाजू, पूर्ण बांधून काढलेली आहे. (परत एकदा वाचा वाक्य हवं तर आणि चित्राची मदत घ्या 😀)

इथे डावीकडे असलेल्या दोन बुरुजांच्या मध्ये असलेल्या दरवाजातून पलीकडे जाता येते.

आत मधे शिरल्यावर डावीकडच्या टोकापासून अगदी सरळ जिथपर्यंत दिसत होतं, तिथपर्यंत तटबंदी बांधून काढलेली दिसत होती. नैसर्गिक दगडांचा वापर करून जमेल तिथे टाकी बांधून काढलेली आहेत या तटबंदीला लागून. त्यात पाणीही बर्यापैकी दिसत होते. वाटेत तयार झालेल्या नैसर्गिक खड्ड्यात पाणी जमा झालेलं होतं ते वेगळंच. हे खड्डे म्हणजे जणू काही रांजणखळगेच आहेत.

डावीकडच्या तटबंदीला धरून पुढे शेवटी दिसत असलेल्या बांधकामांकडे निघालो. वाटेत खूप ठिकाणी दगड फोडण्याचे प्रयत्न केलेले दिसत होते. कदाचित मनासारख्या जागा मिळाल्याने ते प्रयत्न अर्धवट सोडून दिल्यासारखेही वाटत होते.

समोर दिसणाऱ्या बांधकामांमध्ये चोर दरवाजा, मोठा दरवाजा आणि खूप गोष्टी दिसत होत्या. पण तिथे सरळ जायला जागा नव्हती. मधली बांधकाम ढासळलेली होती, मोठ मोठाले खड्डे किंवा तलाव म्हणता येईल अशा जागा इथे तयार झालेल्या आहेत.

मधोमध चौकोनी बांधकाम दिसलं, ती ह्या बाजूने तरी मशीद वाटत होती. तिथे जाऊन सावलीत बसायचं आणि थोडी पोटपूजा करायची असा मी विचार केला.

एक वाजून गेला होता. सूर्य चांगलाच तळपत होता. सुरुवातीला वाट चुकून नंतर सापडलेल्या किल्ल्याचा एक डोंगर बघून या महत्त्वाच्या डोंगरावर आलेलो. पाणी शरीरातील जणू तो सूर्य ओढून घेत होता. सुदैवाने आमच्याकडे पाण्याचा मुबलक साठा होता. वाट बघत होतो ती निवांत सावलीची.

बांधकामाच्या इथे पोचण्यासाठी वाट उजवीकडून असेल असं वाटत राहतं, पण तसं नाहीये. मध्ये तळं आहे. डावीकडच्या तटबंदीला धरूनच तिकडे पोचावं लागतं. त्यात वाटेत बाभळीचे काटे, ते सांभाळत बांधकामाजवळ पोचलो.

मशिदीचे बांधकाम सर्वसाधारणपणे असतं तसंच आहे. वर कमानी, नक्षी. चार बाजूला नसले तरी दोन बाजूंना पूर्वी मिनार असावेत, जे आता पडून गेलेले आहेत. आत मध्ये मध्यभागी मोठा कमानयुक्त कोनाडा, तर शेजारी दोन थोडे लहान लहान पण असेच कमानयुक्त कोनाडे.

आत मध्ये सावली तर होती, पण जागा बसण्यायोग्य नव्हती. थोडी खोदाखोद केलेलीही दिसत होती. मग परत बाहेर येऊन त्याच मशिदीच्या सावलीत दगडांवर ठिय्या मांडला.

शरीरातलं पाणी आटत चाललं होतं. त्यात नानांनी संत्री काढली. सगळे जणू ह्यासाठी थांबले होते अशाप्रकारे सगळ्यांनी ती संत्री उडवलंनी. उन्हातून फिरल्यावर संत्री-मोसंबी सारखा उत्तम उतारा नाही. शरीर जणू सी जीवनसत्व पाहिजे म्हणून मागणी करत असतं.

शरीर आणि मन प्रसन्न झाल्यावर तिथून उठलो आणि किल्ल्याचा शेवटचा राहिलेला भाग बघायला सुरुवात केली.

दुमजली बुरुज आणि तोफ क्र. १

इथे येताना जी डाव्या बाजूची तटबंदी धरून आलो होतो, त्यात असलेले बुरुज इथून स्पष्ट दिसत होते. ते बुरुज दुमजली होते, जणू एकावर एक ठेवल्यासारखे. त्यावर चक्क एक तोफही दिसली. ह्या किल्ल्यावरची आम्हाला दिसलेली पहिली तोफ. त्यानंतर बांधकामात डोकावून बघताना अजून एक तोफ दिसली, मात्र ती अशीच बेवारशी झाडीत पडलेली आहे.

या बाजूने किल्ल्याचे खरे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे, कारण संरक्षणाच्या दृष्टीने बुरुज आणि दरवाजांची रचना ह्याच बाजूला दिसते.

इथे गोलाकार बुरुज आणि मधून दरवाजा. पुढे जराशा अंतरावर मोठा दरवाजा, त्यात देवड्या अशी रचना या बाजूला आहे.

किल्ल्याच्या इकडच्या भागात खाली एक दृष्टी टाकल्यास, तटबंदीचे जरा जराशा अंतरावरचे दोन तीन लेअर दिसतात. ह्या बाजूने मोठ्या भागात किल्ल्याला असलेला एक्सेस या सर्व बांधकामांनी संरक्षित केलेला आहे.

दोन मोठे गोल बुरुज, त्यावर जायला अधांतरी केलेल्या गोलाकार रचनेच्या पायर्या इकडे आहेत. या बुरुजांच्या मध्ये अतिशय चिंचोळ्या भागातून किल्ल्यात यायला मार्ग आहे. तिथे पायऱ्या आहेत.

इथे मी एकटाच आलो आलो होतो म्हणून धावत मागे गेलो. सगळ्यांना शोधून काढलं. त्यांनी एकदम उजवीकडच्या भागात असलेले अवशेष बघायला सुरुवात केलंनी होती.

इथे एक आयताकृती बांधकाम आहे, ज्याला लहानसा दरवाजाही आहे आणि उजवीकडे बुरुज. बांधकामावर जायला बुरुजाला अधांतरी पायऱ्यांची गोलाकार रचना, तर समोरच्या भिंतीवर सुद्धा पायऱ्या आहेत. हे धान्याचे कोठार वाटते, कारण आत मध्ये खोल मोठ्या दोन तीन खोल्या आहेत.

विचित्र रचना - शेजारी शेजारी २ पूर्ण गोलाकार बुरुज

या बुरुजावर जाऊन खाली पाहिले तर मगाशी मी जाऊन आलेला आणि तिथून दिसलेला सगळा भाग अधिक उंचीवरून दिसला. जे चिंचोळी वाट बसलेले बुरुज दिसले ते वरून पाहिल्यावर अजूनच विचित्र रचना वाटली ती. असे बांधकाम करण्यामागचा उद्देश कळण्यासाठी आजूबाजूचे बांधकाम शाबूत पाहिजे होते. ह्या बाजूला प्रचंड झाडी वाढली आहे.

बुरुजांवर येणाऱ्या पायऱ्यांची रचना इतकी सुंदर आहे कि तिथे फोटो काढायचा मोह आवरला नाही. या बुरुजातच एक कोनाडा आहे.

उजवीकडचे अवशेष बघताना ढासळलेली तटबंदी दिसली. नैसर्गिक दगडांचा वापर करून त्याचा आधार घेऊन बांधलेले पण सध्या ढासळलेल्या अवस्थेत असलेले बुरुज दिसले.

आम्ही वाट चुकून मंदिराच्या बाजूला आलेला भाग हा इथेच खाली असणार हे नक्की.

तोफ क्रमांक ३

इथल्या एका बुरुजावर एक तोफ दिसली. ही तोफ बर्यापैकी मोठी आहे.

इथे आमची गडफेरी पूर्ण झाली झाली. वाट चुकल्याने किल्ल्याचा बघितला जाणारा भागही आमचा बघून झाला होता. म्हणजे शोधून शोधून सगळेच अवशेष बघून झाले होते.

पावणे दोन झाले होते, आता पटापट खाली उतरायला हरकत नव्हती.

"श्री मंदाकिनी महालक्ष्मीमंदिर

आल्यामार्गे पटापट खाली उतरलो. खाली उतरून मंदिरात अवघ्या पंधरा मिनिटात आलो. हे मंदिर "श्री मंदाकिनी महालक्ष्मी" देवीचं आहे.

किल्ल्याचा मुख्य डोंगर

येथून किल्ल्याच्या डोंगरावरच्या भागाचा चांगला व्ह्यू मिळाला. इथून जवळ दिसणाऱ्या पायवाटेने सिद्धलिंगेश्वर मंदिराकडे येताना हनुमानाचे पण छोटेसे ठिकाण आहे.

सिद्धलिंगेश्वर शिवलिंगाकृती मंदिर

        सिद्धलिंगेश्वर शिवलिंगाकृती मंदिराचे फोटो काढून निघालो तेव्हा दोन वाजून गेले होते. आज अजून दोन किल्ले बघायचे होते. त्यातला पुढचा किल्ला होता वनदुर्ग. 

कर्नाटकातील किल्ले: किल्ले शहापूर जोड किल्ले


यादगिर किल्ला बघून झाल्यावर इडली-वडे सगळ्यावर ज्यापद्धतीने तुटून पडलो होतो, ते बघता दुपारच्या जेवणाची लवकर आठवण होणारच नव्हती. एकूणच कर्नाटकामध्ये कुठल्याशा निवडणुकांचे वारे वाहत होते, त्यामुळे यादगिर मधून पण लांबच्या रस्त्याने बाहेर पडायला लागले. शहापूर किल्ल्याच्या पायथ्याशी यायला सव्वा अकरा झाले होते. या किल्ल्याचा पायथा म्हणजे श्री सिद्धलिंगेश्वर मंदिर. शहापूर गावाच्या बाजूने या डोंगरावर सरळ डांबरी रस्ता केलेला आहे. गुगल सरळ हाच रस्ता दाखवतो.

तसा डोंगराच्या गावाकडच्या बाजूने एखादा रस्ता नक्कीच वर येत असेल, पण आम्हाला धोपटमार्ग पाहिजे होता आणि गावात त्या गर्दीत गाडी घालण्यात काहीच अर्थ नव्हता.

सिद्धलिंगेश्वर मंदिर शिवपिंडीच्या आकारात बांधलेले आहे. आवारात प्रचंड वटवृक्ष आहे, ज्याचा विस्तार डोळ्यांना नक्कीच सुखावतो. मंदिराच्या जागेत गाड्या पार्क केल्या. किल्ला समोरच दिसत होता. कुठूनही गेलं तरी वाटेत झाडी दिसत नसल्यामुळे वाट सापडण्याचा प्रश्न येणार नव्हता. पण उगाचच धोपटमार्ग का सोडा, म्हणून प्रशस्त असा जो मार्ग दिसला, त्यावरूनच निघालो

रस्ता थोडासा वळसा मारून आहे. सपाटीवरून चालत होतो. उजवीकडे काही अंतरावर एक मंदिर दिसलं. त्या खालच्या सिद्धलिंगेश्वर मंदिरातून, या मंदिरात सरळ पायवाट नक्कीच येत असेल, पण आम्ही उगाचच प्रशस्त रस्ता पकडू म्हणून वळसा मारून आलो होतो. समोर दिसत असलेल्या किल्ल्याच्या डोंगराला डावीकडे ठेवत, एकदम उजव्या टोकाला आलो, जिथे दुसऱ्या मंदिराकडून सरळच रस्ता येत होता.

समोरच्या डोंगरावर सुद्धा गडाचे अवशेष दिसले, हा या किल्ल्याचाच भाग. शहापूर हा जोड किल्ला आहे, शेजार-शेजारच्या दोन डोंगरांवर मिळून.

आम्हाला आधी मुख्य भागात जायचं होतं, म्हणजे जो डोंगर डावीकडे ठेवला होता त्यावर.

तसं बघायला गेलं तर डाव्या बाजूला वर बघितल्यावर दरवाजा किंवा किल्ल्यात शिरता येईल असा आकार दिसत होता. पण एक तर हा प्रदेश नवीन, मोठमोठाले प्रचंड खडक अस्ताव्यस्त पडलेले, उगाच कुठल्यातरी मार्गाने जाऊन समोर एकदम खड्डा यायचा, त्यापेक्षा कशाला धोपटमार्ग सोडा? त्यातून आम्ही धरलेल्या प्रशस्त रस्त्याच्या बाजूला सरळ बाण काढलेले रंगाने.

अवघ्या दोन मिनिटांत एक पाण्याचा बांधीव टाकं लागलं. ते अगदीच कोरडं नव्हतं, पण पाणी पिण्यायोग्य नव्हतं. वरच्या बाजूला तटबंदी सुद्धा दिसली. जर असंच पुढे गेलो तर दगडी पायऱ्या, आणि उजवीकडे वळलो तर एक दरवाजा आहे. दरवाजाची पूर्ण कमान नक्षीदार आहे. वरती मधोमध एक दगड आहे, ज्याच्यावर मध्ये गणपतीआणि त्याच्यावर दोन्ही बाजूला सोंडेने अभिषेक घालत असलेले हत्ती आणि मोर असे कोरलेले आहेदरवाजाला प्रशस्त देवड्या असून त्याला सुंदर कमानी आहेत.

दरवाजा ओलांडल्यावर मुख्य किल्ल्याचा भाग असलेल्या डोंगरावरची तटबंदी डावीकडे वरती दिसायला लागली. याचा अर्थ आम्ही डोंगराच्या पलीकडच्या बाजूने कडेकडेने चाललो होतो. म्हणजे वर जाणारा रस्ता वळसा मारून असावा. कारण चालत असलेला मुख्य रस्ता आम्ही सोडलाच नव्हता. म्हणजे इथूनच कुठूनतरी वर जाणारा रस्ता असणार होता.

आम्ही हीच कन्नड अक्षरं आणि बाण दिशादर्शक म्हणून मानत होतो

डोंगराच्या कडेला लागून दाट बाभळीची झाडी, तर आम्ही जात असलेला रस्ता स्वच्छ आणि साफ केलेला. पुढे मात्र वाट थोडी दाट झाडीत शिरली. पण सावलीत चालायला छान वाटत होतं. त्यातून कन्नड मध्ये बोर्ड आणि बाण. मी आणि प्रमोद पुढे होतो. डावीकडे डोंगराच्या कड्याची उंची वाढत चाललेली समजत होती. वर जायची वाट काही येत नव्हती, पण आम्ही चाललेली पायवाट अतिशय चांगली मळलेली, साथीला कन्नड बोर्ड आणि तोही बाणा सकट. अर्थात किल्ल्यावरच्याच कुठल्याश्या मंदिरात जाण्यासाठी बाण काढलेले असणार ना...

पुढे चालत राहिल्यावर एक पडका दरवाजा. त्यात प्रशस्त देवड्या वगैरे. दरवाजा ओलांडला, तर जंगल साफ एकदम. तरी पण एक कळलं होतं, किल्ल्यावर जायची वाट सोडून या कन्नड बोर्डाने भलतीकडेच कुठे तरी आणलं होतंन. आम्ही मध्ये मध्ये मागचे लोक लोक हाकेच्या अंतरावरच आहेत ना हे पाहत होतोच.

आता सरळ मागे फिरून त्यांची वाट बघितली. सगळ्यांना आपण रस्ता चुकल्याचं सांगितलं. आधी सगळे एकत्र जमा झालो. थोडी चर्चा झाल्यावर शेडबाळे सर एकीकडे, तर प्रभाकर आणि मापारी सर दुसरीकडे जायचं ठरवून निघाले. उरलेले आम्ही, यांची वाट बघत मध्ये थांबलो.

शेजारच्या डोंगरामुळे आम्ही कुठे आलो आहे हे माझ्या लक्षात येत होतं. तसंही आम्ही किल्ल्याच्या मुख्य डोंगराला लागूनच होतो. फक्त एकदम मागच्या, म्हणजे गावाकडच्या बाजूला आलेलो. इथून वरती जायला नक्की जागा असणार होती. गुगलप्रमाणे तिकडे एक दर्गा असायला हवा होता एकदम डाव्या बाजूला. गडाचा मॅप बघणे आणि गाडीमध्ये तरी नेव्हीगेटर मीच, त्यातून सर्वात पुढे चालत येऊन मागच्या सर्वांना ह्या चुकलेल्या रस्त्यावर मीच घेऊन आलो, ही चुटपुट लागलेली. मुद्दामच आणखी रस्ता शोधा च्या भानगडीत पडलो नाही.

आणि एक तर शेडबाळ सर एकीकडे, तिकडे प्रभाकर आणि मापारी सर दुसरीकडे गेलेले, त्यात मला तिसरीकडे जाऊन अजून गोंधळ वाढवायचं नव्हता.

"श्री जिव्हेश्वर" मंदिर

प्रभाकर आणि मापारी सरांना एक मंदिर सापडलं जे गुहेत होतं. वाटेत ते बोर्डावर वाचत (म्हणजे आम्ही नुसती कन्नड अक्षर बघत आलेलो) ते हेच "श्री जिव्हेश्वर" मंदिर. हा शोध पूर्ण कर्नाटक भ्रमंती नंतर आज हा ब्लॉग लिहिताना, माझ्या मामीला तो बोर्ड वाचायला दिला त्यावरून बोध झाला.

आता एवढं सगळं वाचल्यावर सांगतो की "इथे यायचं नाSSSSही". उलट फिरून "इथे डाव्या बाजूला दरवाजा किंवा किल्ल्यात शिरायला योग्य अशा प्रकारचे बांधकाम दिसलं. तिकडे जाता धोपट मार्गाने पुढे आलो" असं जिथे लिहिलं होतं ना? तिथपर्यंत मागे जायचं (म्हणजे वाचताना, प्रत्यक्षात नव्हे) आणि तिथेच डावीकडे वर दिसणाऱ्या बांधकामात घुसल्यावर सरळ किल्ल्यात जातो आपण. 😝😝😝

पण सध्यातरी आम्ही इकडे श्री जिव्हेश्वर मंदिराजवळ आलो होतो. त्यात शेडबाळे सर सोडून आम्ही एकत्र होतो. आता त्यांची शोधमोहीम सुरू झाली. बराच वेळ ते रस्ता बघून तिथेच परत येतील अशी वाट बघितली. तशी लक्षणं दिसल्याने मागे फिरून सरांच्या नावाने हाका मारत सुटलो.

आता किल्ल्याचा मुख्य डोंगर उजवीकडे होता तर दुसरा डोंगर समोरच होता. किंबहुना आम्ही त्याच्या आतमध्ये इथुनच कुठून तरी शिरू शकू म्हणतानाच तटबंदी दिसली. आधी वाट चुकताना मीच आघाडीवर असलो, तरी इथे तटबंदी दिसल्यावर परत आधी धाव घेतली गेली. दरवाजा सापडला, तो सुद्धा अगदी कमानीवर तीन कमळ वगैरे सह.

मी कसाही, कुठेही आणि सगळ्यात आधी शिरत असलो तरी एक नियम कधीच मोडला नव्हता, आपल्या मागचा माणूस हाकेच्या अंतरावर आहे ना याची खात्री करत राहायचा. त्यामुळे किमान मला शोधत राहायची वेळ कोणावर येणार नव्हती.

तर, माझ्या मागचे कायम हाकेच्या अंतरावर आहेत ना याची खात्री करत, म्हणजे मध्ये मध्ये हाका मारत, किल्ल्याच्या या भागात शिरलो.

इकडे तर चहूबाजूला तटबंदी. किल्ल्याच्या मुख्य डोंगराच्या बाजूला पाहिले, तर त्यावरचे बुरुज वगैरे बांधकाम इकडूनच दिसायला लागले.

खुद्द मी ज्या किल्ल्यात उभा होतो, तिथे डोंगराचा सर्वात उंच भाग आणि खाली जमिनीच्या पातळीवर एक मंदिर. सर्व बाजूंची तटबंदी निरखताना शेडबाळे सरांच्या नावांचा जप चालूच होता, तर दुसरीकडे मागे विनीत प्रमोद वगैरे यांच्या नावाने हाका.

तेवढ्यात उजवीकडच्या एका तटबंदीतून सर डोकावताना दिसले. ते निवांत तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने फिरत फिरत इथे येऊन आत मध्ये घुसले होते.

सगळे एकत्र आल्यावर मग, तुमचा फोन लागला नाही, आमचा फोन बिझी होता, किती हाका मारल्या... वगैरे सुखसंवाद झाला, हा सुखसंवाद जिथे झाला, तिथे एक मोठा तलाव होता. डावीकडच्या बुरुजातून शेडबाळे सर अवतरले होते, तर उजवीकडे आम्ही पूर्ण टोकापर्यंत जाऊनही काहीच पाहिलेला शहापूर किल्ल्याचा मुख्य डोंगर होता.

रस्ते आणि सगळे भिडू सापडल्यावर लक्ष पुन्हा घड्याळाकडे गेलं. गेली ३०-४० मिनिटे फिरूनही किल्ला मात्र बघितलाच नव्हता. शेजारच्या बुरुजावरून पलीकडे बघितले तर किल्ल्याच्या तटबंदीची बाहेरची रेखीव बाजू बुरुज दिसले.

समोर एक प्रचंड तलाव, शेजारी मस्त हिरवीगार हिरवळ आणि एका बाजूला किल्ल्याच्या तटबंदीची बाहेरची गोलाई. त्यात दिसणार्या कमानीदार पाकळ्या, आणि त्यात बंदुकीच्या माऱ्यासाठी ठेवलेल्या जंग्या.

"मंदाकिनी अंजनेय स्वामी" मंदिर

किल्ल्याच्या आतल्या बाजूला तलावाजवळच्या मंदिराजवळ आलो. हे "मंदाकिनी अंजनेय स्वामी" मंदिर आहे. आत मध्ये हनुमानाची मुर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला मी गेलो. तिथे शंकराच्या पिंडीसारखा आकार असला तरी त्यात साळुंका नाही तर तीन खड्डे आहेत.

आम्हाला इथल्या लहानग्या उंचवट्यावर चढायचे होते. बाकी सगळे मंदिराच्या पुढच्या बाजूने वर निघाले, तर मी जिथे होतो तिकडून, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूने सुरुवात केली. तिकडून किल्ल्याच्या मुख्य डोंगरावरचे जवळजवळ सगळेच अवशेष दिसत होते. अर्थातच अजून तिकडे आमचे जायचे शिल्लक होते. मी चढत होतो ती वाट पावसाळ्यात अगदीच अशक्य आहे. एवढंच काय तर पाणी येत असेल तर पावसाळा वगळता इतर कधीही जावं अशी सुद्धा. वर पोचलो तर एक पडकं बांधकाम आहे आणि जागोजागी पाणी साठून नंतर कोरडे पडलेले खड्डे. मी आणि नाना पुढे पुढे आलो होतो, तर इतर सगळे कदाचित खालीच असावेत अजून.

नेहमीप्रमाणे मी आणि नानांनी इकडच्या दगडांबरोबर, पाण्याबरोबर फोटो काढून घेतले.

खाली बघितलं तर प्रचंड जलाशय किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला.

एका बुरुजाच्या चोर दरवाजातून सगळे आज शिरताना दिसले. त्यांना वरून हात केला आणि आम्ही वर तिथेच वाट बघत थांबतो असं सांगितलं.

इथे कातळकोरीव वाटावेत असे काही खळगे होते. त्यात पाणी साचलेलं होतं, पण ती टाकी नसावीत. ते नैसर्गिकरित्या झालेलं वाटत होतं.

इथे माथ्यावर बघायला तसं काहीच नव्हतं. वरून किल्ल्याच्या दोन्ही डोंगरांचा view मात्र उत्तम दिसतो. एकदा चुकामूक होऊन गेली होती म्हणून सगळे येईपर्यंत मी आणि नाना तिथे थांबलो.

वरून किल्ल्याच्या मुख्य डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बघून ठेवला होताच. सगळ्यांना त्या बाजूने उतरून दोन डोंगरांच्या मधल्या दरवाजात जाता येईल हे सांगितलं.

सर्वात आधी रस्ता चुकला तेव्हा सगळ्यात पुढे मीच होतो, तरी सगळ्यांना मी सांगत असलेला रस्ता तिथे घेऊन जाऊ शकेल की नाही यावर शंका आली नाही हे नशीब. 😄

तिथून खाली उतरताना, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला येणारा रस्ता एकदम निसरडा आहे. त्यावर पाणी असेल तर अजिबात येण्यासारखा नाही. एका चोर दरवाजातून खाली उतरून दोन डोंगरांच्या मधल्या भागात आलो. म्हणजे सगळ्यात आधी पाहिलेला हा दरवाजा, जिथे आम्ही सुरुवातीला येऊन तसेच पुढे मंदिराकडे गेलो होतो. नक्षीदार कमानीयुक्त, मध्ये दोन हत्ती गणपतीवर अभिषेक करत असलेला दरवाजा तो हाच.

एक चोर दरवाजा, जो आधीच्या डोंगरावरूनच हेरून ठेवला होता या महत्त्वाच्या किल्ल्यात जाण्यासाठी, तिथे आलो, चोरदरवाजे साधारणपणे ज्या उंचीचे असतात, तसाच हाही बेताच्या उंचीचाच. पण ह्याला एका बाजूला गोलाकार खांब आहे. दरवाजा ओलांडून गेल्यानंतर आत मध्ये मात्र चांगलीच झाडी आहे. झाडीच्या पलिकडे अजून एक चोरदरवाजा ओलांडावा लागतो.

इकडे खरंतर दरवाजांची अतिशय चांगली शृंखला असणार, जी आता पडझड झाल्याने नेमकी कशी असावी हे लक्षात येत नाही.

पुढे अजून काही बुरुज आणि त्यात दगड मातींनी बुजलेल्या दरवाजे दिसले. त्यात अर्थातच जागा आणि वाट शिल्लक राहिलेली नव्हती.

त्यात पूर्ण तटबंदीत फक्त उजवीकडे, तो सुद्धा पडझड झाल्याने जायला रस्ता असल्याचं दिसलं. इथले सगळे दगड पावसाळ्यात अतिशय धोकादायक आहेत. सध्या कडकडीत ऊन आणि पाण्याचा थेंबही वर नसलेल्या दगडावरून सुद्धा आम्हाला पावलं तिरकी टाकत टाकत सांभाळून जावं लागलं.

मागे वळून बघितल्यावर आधी ज्या डोंगरावर गेलो होतो तिथली तटबंदी चांगली दिसत होती.

प्रत्यंचा अकारण ताणून धरलेल्या धनुष्याकृती आकाराचा तलाव

तटबंदीतून आत आलो, तर समोरच त्रिकोणी आकाराचा तलाव दिसला. त्यात बऱ्यापैकी पाणी होते, अर्थात एकदम शेवाळ युक्त हिरवे हिरवे, अजिबात पिण्यायोग्य नसलेले. तलाव बांधताना दोन बाजूच्या नैसर्गिक दगडांच्या दोन बाजू धरून, म्हणजे त्या आकर्ण ताणून धरलेल्या धनुष्याची प्रत्यंचा मानल्या, तर वरच्या आणि खालच्या दोन बाजूची टोके ओढल्या गेलेल्या धनुष्याचा भाग, म्हणजे ही बाजू, पूर्ण बांधून काढलेली आहे. (परत एकदा वाचा वाक्य हवं तर आणि चित्राची मदत घ्या 😀)

इथे डावीकडे असलेल्या दोन बुरुजांच्या मध्ये असलेल्या दरवाजातून पलीकडे जाता येते.

आत मधे शिरल्यावर डावीकडच्या टोकापासून अगदी सरळ जिथपर्यंत दिसत होतं, तिथपर्यंत तटबंदी बांधून काढलेली दिसत होती. नैसर्गिक दगडांचा वापर करून जमेल तिथे टाकी बांधून काढलेली आहेत या तटबंदीला लागून. त्यात पाणीही बर्यापैकी दिसत होते. वाटेत तयार झालेल्या नैसर्गिक खड्ड्यात पाणी जमा झालेलं होतं ते वेगळंच. हे खड्डे म्हणजे जणू काही रांजणखळगेच आहेत.

डावीकडच्या तटबंदीला धरून पुढे शेवटी दिसत असलेल्या बांधकामांकडे निघालो. वाटेत खूप ठिकाणी दगड फोडण्याचे प्रयत्न केलेले दिसत होते. कदाचित मनासारख्या जागा मिळाल्याने ते प्रयत्न अर्धवट सोडून दिल्यासारखेही वाटत होते.

समोर दिसणाऱ्या बांधकामांमध्ये चोर दरवाजा, मोठा दरवाजा आणि खूप गोष्टी दिसत होत्या. पण तिथे सरळ जायला जागा नव्हती. मधली बांधकाम ढासळलेली होती, मोठ मोठाले खड्डे किंवा तलाव म्हणता येईल अशा जागा इथे तयार झालेल्या आहेत.

मधोमध चौकोनी बांधकाम दिसलं, ती ह्या बाजूने तरी मशीद वाटत होती. तिथे जाऊन सावलीत बसायचं आणि थोडी पोटपूजा करायची असा मी विचार केला.

एक वाजून गेला होता. सूर्य चांगलाच तळपत होता. सुरुवातीला वाट चुकून नंतर सापडलेल्या किल्ल्याचा एक डोंगर बघून या महत्त्वाच्या डोंगरावर आलेलो. पाणी शरीरातील जणू तो सूर्य ओढून घेत होता. सुदैवाने आमच्याकडे पाण्याचा मुबलक साठा होता. वाट बघत होतो ती निवांत सावलीची.

बांधकामाच्या इथे पोचण्यासाठी वाट उजवीकडून असेल असं वाटत राहतं, पण तसं नाहीये. मध्ये तळं आहे. डावीकडच्या तटबंदीला धरूनच तिकडे पोचावं लागतं. त्यात वाटेत बाभळीचे काटे, ते सांभाळत बांधकामाजवळ पोचलो.

मशिदीचे बांधकाम सर्वसाधारणपणे असतं तसंच आहे. वर कमानी, नक्षी. चार बाजूला नसले तरी दोन बाजूंना पूर्वी मिनार असावेत, जे आता पडून गेलेले आहेत. आत मध्ये मध्यभागी मोठा कमानयुक्त कोनाडा, तर शेजारी दोन थोडे लहान लहान पण असेच कमानयुक्त कोनाडे.

आत मध्ये सावली तर होती, पण जागा बसण्यायोग्य नव्हती. थोडी खोदाखोद केलेलीही दिसत होती. मग परत बाहेर येऊन त्याच मशिदीच्या सावलीत दगडांवर ठिय्या मांडला.

शरीरातलं पाणी आटत चाललं होतं. त्यात नानांनी संत्री काढली. सगळे जणू ह्यासाठी थांबले होते अशाप्रकारे सगळ्यांनी ती संत्री उडवलंनी. उन्हातून फिरल्यावर संत्री-मोसंबी सारखा उत्तम उतारा नाही. शरीर जणू सी जीवनसत्व पाहिजे म्हणून मागणी करत असतं.

शरीर आणि मन प्रसन्न झाल्यावर तिथून उठलो आणि किल्ल्याचा शेवटचा राहिलेला भाग बघायला सुरुवात केली.

दुमजली बुरुज आणि तोफ क्र. १

इथे येताना जी डाव्या बाजूची तटबंदी धरून आलो होतो, त्यात असलेले बुरुज इथून स्पष्ट दिसत होते. ते बुरुज दुमजली होते, जणू एकावर एक ठेवल्यासारखे. त्यावर चक्क एक तोफही दिसली. ह्या किल्ल्यावरची आम्हाला दिसलेली पहिली तोफ. त्यानंतर बांधकामात डोकावून बघताना अजून एक तोफ दिसली, मात्र ती अशीच बेवारशी झाडीत पडलेली आहे.

या बाजूने किल्ल्याचे खरे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे, कारण संरक्षणाच्या दृष्टीने बुरुज आणि दरवाजांची रचना ह्याच बाजूला दिसते.

इथे गोलाकार बुरुज आणि मधून दरवाजा. पुढे जराशा अंतरावर मोठा दरवाजा, त्यात देवड्या अशी रचना या बाजूला आहे.

किल्ल्याच्या इकडच्या भागात खाली एक दृष्टी टाकल्यास, तटबंदीचे जरा जराशा अंतरावरचे दोन तीन लेअर दिसतात. ह्या बाजूने मोठ्या भागात किल्ल्याला असलेला एक्सेस या सर्व बांधकामांनी संरक्षित केलेला आहे.

दोन मोठे गोल बुरुज, त्यावर जायला अधांतरी केलेल्या गोलाकार रचनेच्या पायर्या इकडे आहेत. या बुरुजांच्या मध्ये अतिशय चिंचोळ्या भागातून किल्ल्यात यायला मार्ग आहे. तिथे पायऱ्या आहेत.

इथे मी एकटाच आलो आलो होतो म्हणून धावत मागे गेलो. सगळ्यांना शोधून काढलं. त्यांनी एकदम उजवीकडच्या भागात असलेले अवशेष बघायला सुरुवात केलंनी होती.

इथे एक आयताकृती बांधकाम आहे, ज्याला लहानसा दरवाजाही आहे आणि उजवीकडे बुरुज. बांधकामावर जायला बुरुजाला अधांतरी पायऱ्यांची गोलाकार रचना, तर समोरच्या भिंतीवर सुद्धा पायऱ्या आहेत. हे धान्याचे कोठार वाटते, कारण आत मध्ये खोल मोठ्या दोन तीन खोल्या आहेत.

विचित्र रचना - शेजारी शेजारी २ पूर्ण गोलाकार बुरुज

या बुरुजावर जाऊन खाली पाहिले तर मगाशी मी जाऊन आलेला आणि तिथून दिसलेला सगळा भाग अधिक उंचीवरून दिसला. जे चिंचोळी वाट बसलेले बुरुज दिसले ते वरून पाहिल्यावर अजूनच विचित्र रचना वाटली ती. असे बांधकाम करण्यामागचा उद्देश कळण्यासाठी आजूबाजूचे बांधकाम शाबूत पाहिजे होते. ह्या बाजूला प्रचंड झाडी वाढली आहे.

बुरुजांवर येणाऱ्या पायऱ्यांची रचना इतकी सुंदर आहे कि तिथे फोटो काढायचा मोह आवरला नाही. या बुरुजातच एक कोनाडा आहे.

उजवीकडचे अवशेष बघताना ढासळलेली तटबंदी दिसली. नैसर्गिक दगडांचा वापर करून त्याचा आधार घेऊन बांधलेले पण सध्या ढासळलेल्या अवस्थेत असलेले बुरुज दिसले.

आम्ही वाट चुकून मंदिराच्या बाजूला आलेला भाग हा इथेच खाली असणार हे नक्की.

तोफ क्रमांक ३

इथल्या एका बुरुजावर एक तोफ दिसली. ही तोफ बर्यापैकी मोठी आहे.

इथे आमची गडफेरी पूर्ण झाली झाली. वाट चुकल्याने किल्ल्याचा बघितला जाणारा भागही आमचा बघून झाला होता. म्हणजे शोधून शोधून सगळेच अवशेष बघून झाले होते.

पावणे दोन झाले होते, आता पटापट खाली उतरायला हरकत नव्हती.

"श्री मंदाकिनी महालक्ष्मीमंदिर

आल्यामार्गे पटापट खाली उतरलो. खाली उतरून मंदिरात अवघ्या पंधरा मिनिटात आलो. हे मंदिर "श्री मंदाकिनी महालक्ष्मी" देवीचं आहे.

किल्ल्याचा मुख्य डोंगर

येथून किल्ल्याच्या डोंगरावरच्या भागाचा चांगला व्ह्यू मिळाला. इथून जवळ दिसणाऱ्या पायवाटेने सिद्धलिंगेश्वर मंदिराकडे येताना हनुमानाचे पण छोटेसे ठिकाण आहे.

सिद्धलिंगेश्वर शिवलिंगाकृती मंदिर

        सिद्धलिंगेश्वर शिवलिंगाकृती मंदिराचे फोटो काढून निघालो तेव्हा दोन वाजून गेले होते. आज अजून दोन किल्ले बघायचे होते. त्यातला पुढचा किल्ला होता वनदुर्ग.

कर्नाटकातील किल्ले: किल्ले यादगिर


पहिल्या दिवशी ३ किल्ले पाहून झाल्यावर यादगिर शहरात मुक्कामी आलो. इथे सोय स्वामींच्या मठात झाल्याने राहण्याबरोबर अंघोळीचाही प्रश्न सुटला. फक्त पाणी मात्र थंsssड! थंड पाण्याला उपाय एकच, गाणं! स्तोत्र म्हणत पाणी अंगावर घ्यायचं, कि संस्कृत जड शब्दांचा संधी-विग्रह आपोआप होतो. चक्क थंडीच्या दिवसांत पहाटे पाच-साडेपाचला अंघोळ, तेही ट्रेक/किल्ले भटकंतीत... अश्यावेळी १२ अंघोळींचं पुण्य लाभतं म्हणतात.

तर, सकाळी साडे सहाला कडक चहा पिऊन गल्ली बोळातल्या रस्त्यांवरून किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झालो तेव्हा जेमतेम पावणे ७ वाजत होते. पायऱ्यांवरून वरती येताना एका ताईंनी किल्ला १० ला उघडतो म्हणून सांगितल्यावर दिवसभराचं वेळापत्रक डोळ्यासमोर आलं. ज्यावेळी किल्ला बघून दुसऱ्या किल्ल्याच्या पायथ्याला पोचायचं असा विचार होता, त्यावेळेला किल्ला उघडणार होता.

हा किल्ला “राहूदे, सोडून देऊ” प्रकारातला नव्हता. त्यामुळे वेळ बघता यक्षप्रश्न निर्माण झाला. किमान बंद दरवजापर्यंत जाऊ आणि बघू तिथे कोणी असेल तर असा विचार झाला.

महादरवाजा

मस्तपैकी जाळीचा दरवाजा आणि व्यवस्थित लावलेलं कुलूप. काहीच पर्याय दिसेना. शेजारी कन्नडमधली पाटी. त्यावर किल्ला उघडायची वेळ १० आणि खाली २ मोबाईल नंबर. नशीब...

पण त्या नंबरने काहीच होईना. तेवढ्यात एक दादा हातात किल्ली घेऊनच आले. वर येताना ज्या ताई भेटल्या होत्या त्यांची कृपा असावी. मोडक्या तोडक्या हिंदीत संभाषण झाले. त्यांना किल्लीसकट बघून आमच्या तोंडावरून ओसंडून वाहणारा आनंद त्यांनी बघितला, इतका कि आमच्या आभार प्रदर्शनाने ते लाजले. 😤

सकाळच्या वेळी सूर्यप्रकाश असा असतो कि फोटो काढायला अतिशय योग्य. डोक्याला कमी त्रास होतो आणि अवशेष बघणेही सोपे जाते.

हा बंद असलेला दरवाजा म्हणजे महादरवाजा. हा ओलांडून आत आल्यावर प्रशस्त जागा आहे. दोन्ही बाजूला कमानीयुक्त देवड्या आहेत.

अजून एक दरवाजा

पुढे अजून एक दरवाजा, पूर्ण तटबंदी असलेला आहे.

जीर्णोद्धारात आधार दिलेला दरवाजा

काही पायऱ्या चढून गेल्यावर नागमोडी वळणानंतर अजून एक दरवाजा आहे. जीर्णोद्धारात ह्याला चांगला आधार दिलेला आहे. हे दरवाजे परकोटाचे म्हणता येतील. कारण अशी ही दरवाजांची साखळी आहे. इथून पुढे मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो. इकडे डाव्या बाजूला एक मोठा कोरडा तलाव आहे. त्याची साफसफाई केलेली नाही. ह्या सगळ्या बाजूलाच बऱ्यापैकी झाडी आहे. त्यामुळेच इकडून सुरवंटाची झालेली फुलपाखरे म्हणा, नाहीतर गारुडी म्हणा, ते खाली जाताना दिसायला लागले. पण ह्याचाच अर्थ इकडूनही वर गावकऱ्यांना यायला जागा आहे हे कळलं. पण त्या वाटेसाठी मुळात गावात घुसावे लागेल.. हरे राम!

इथे डावीकडचा दरवाजा किल्ल्यात घेऊन जातो. दरवाजात वरती असणारं बहुतांशी ठिकाणी आढळणारं कमळ-कोरीव छत खाली पडलेलं आहे. ते तसंच देवड्यांत ठेवलेलं आहे. आता किल्ल्यातल्या बांधकामाचे अवशेष दिसायला सुरुवात झाली. ३ कमानीयुक्त एक बांधकाम वरच्या बाजूला दिसले.

एका बाजूला मोठे नैसर्गिक खडक, त्यावर थोडसंच करावं लागलेलं तटबंदीचं बांधकाम, तर डाव्या बाजूना जमिनीपासून वर बांधीव तटबंदी, अश्या मधून पायऱ्यांवरून अजून एका दरवाजात आलो. इथेही खूप झाडी माजलेली आहे. समोरच सूर्योदय होताना दिसत होता.

“U” आकाराचे वळण घेऊन उजवीकडे असलेल्या पायऱ्यांनी वर जाताना वळून बघितल्यावर खाली यादगिर शहर, जलाशय दिसले. प्रचंड वस्ती, मागे डोंगराआडून वर आलेला सूर्य हे विस्तार दाखवत होतं. यापुढचा कामानीदार दरवाजा ओलांडला तेव्हा मात्र डावीकडच्या भिंतीत चक्क फारसी शिलालेख.

तब्बल ५ दरवाजे ओलांडून वर आल्यावर किल्ल्याच्या मुख्य भागात आलो होतो. दरवाजांची ही साखळी पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्ती विचार केलेला दिसत होता. साहजिकच ह्या किल्ल्याचे महत्व खूप असणार हे नक्की.

मुळात हा किल्ला साधारण ८५० मीटर लांब आणि ५०० मीटर रुंद आहे. या किल्ल्यालाही कल्याण चालुक्य, यादव, चौल, बहामनी सुलतान, आदिलशाही, निजामशाही एवढ्यांंचे स्वामित्व लाभलेले आहे. दाराशी असलेल्या शिलालेखानुसार शहापूरमधल्या सागर नावाच्या गावातल्या “जगन्नाथ” नावाच्या व्यक्तीने हा किल्ला बांधल्याचे कळते. पुढे वेगवेगळ्या राजसत्तेने त्याचा, विस्तार, डागडुजी आणि नवीन बांधकाम केले.

तालावामागून सूर्योदय

तर किल्ल्याच्या मुख्य भागात आल्यावर डाव्या बाजूला जसा खाली दिसलेला तसा, किंबहुना जास्तीच सुंदर आणि खुपच मोठा तलाव आहे. ही पूर्वेकडची बाजू असल्याने मागून होत असलेला सूर्योदय कोरड्या तालावालाही सौंदर्य बहाल करत होता. तलाव भरलेला असताना काय सुंदर दिसत असेल हे सुर्योदयाचे दृश्य!

इथे उजव्या बाजूला काही बांधकाम दिसलं जे बऱ्यापैकी पडलं होतं. ह्यात जाणारा दरवाजा आतल्या बाजूने आलेल्या राडारोड्यामुळे भरून गेलेला असला तरी आतमध्ये जवळपास ४ तरी कमानी दिसत होत्या. बांधकामाच्या उजव्या बाजुलाजून एक पाडकाम बांधकाम आहे, तिकडे जाऊ म्हटलं तर काय, आतमध्ये “L” आकाराचं मोठं टाकं. टाकं कसलं, तलाव सुद्धा म्हणता येईल त्याला.

मध्ये असलेली मोठी वस्तू म्हणजे वाडे असावेत. कारण आतमध्ये बरंच नक्षीदार कमानीयुक्त बांधकाम आहे. ह्या बांधकामासाठी सरळ वर जाणारा मार्ग सोडून उजव्या बाजूला आलो होतो, जिथे पायऱ्यांचा धोपटमार्ग चढून सरळ जातो.

आता परत मागे फिरून त्या पायऱ्यांवरून पुढे गेलो. खाली जमीन अशी नाहीयेच इथे. मोठमोठाले खडक सगळे, त्यावर जे असेल ते बांधकाम.

प्रचंड मोठा तलाव

गोल बुरुज आणि कडेच्या बाजूला अर्धगोल बुरुज, त्यात एक तोफ

इथे आजूबाजूला असे पडके बांधकाम खूप आहे. त्यातल्याच एका बांधकामावर चढून डावीकडे खाली पाहिल्यास वर येताना दिसलेला तलाव पूर्ण दिसतो. खाली मध्ये मध्ये ३-४ गोल बुरुज दिसतात तर एकदम कडेच्या बाजूला अर्धगोल बुरुज दिसला, त्यात एक तोफही दिसली. म्हणजे तोफा दिसायला सुरुवात तर झाली. वरच्या बाजूला एका मोठ्या बुरुजावर एक ध्वज फडकताना दिसला, पण तो भगवा नव्हता. इकडे भगवे नाही फडकत, तर हे अर्धे पिवळे तर अर्धे लाल रंगातले असतात. हा कर्नाटक राज्याचा म्हणून त्यांनी ठरवलेला ध्वज असावा.

जमीन नाहीच, खडक आणि त्यावर बांधकाम
दुमजली पडकं बांधकाम

मी ज्या बांधकामावर उभा होतो त्याच्या आणि सर्वात उंच जागेवरच्या बुरुजाच्या मध्ये अजूनही काही वाडे दिसले, तर उजवीकडे मोठमोठाल्या खडकांच्या जमिनीनंतर दुमजली पडकं बांधकाम दिसलं. डोक्यात फोटोफ्रेम सेट झाल्या, विनीत, प्रमोद आणि मी जवळजवळ पळतच तिकडे गेलो.

एकाकी झालेली एक कमान - खास फोटोफ्रेम

इकडून खाली यादगीर गांव पसरलेले दिसले, शेजारचं बांधकाम पडल्याने एकाकी झालेली एक कमान, खास फोटोफ्रेम होती.

खडक फोडण्यासाठी वापरलं गेलेलं तंत्र

हे वेगळ्याच प्रकारचे असलेले खडक फोडण्यासाठी वापरलं गेलेलं तंत्र तिथे असलेले चौकोनी आकारातले दगडातले असलेले खड्डे उलगडून दाखवतात. मध्ये साधारण ५-५ सेमीचे अंतर राखून १०-१५ सेमी बाजूचे चौरस आकारातले ते घाव होते. अश्याप्रकारे दगडाला फोडून ठेवले जात असे आणि नंतर आपोआप त्याचे त्या रेषेत तुकडे होत असत.

एक टाकं, त्याच्या बरोब्बर मागे एक मंदिर

पुरेसे फोटो झाल्यावर पुढे जाताना मध्ये एक टाकं दिसलं. ज्यात पाणी शिल्लक होतं पण पिण्यासाठी अयोग्य वाटलं. त्याच्या बरोब्बर मागे एक मंदिर असावं असं जाणवलं.

मंदिर

समोर एक शहाबादी फारशी घालून केलेले अंगण. मध्यभागी जुन्या मंदिराचा खांब असावा, तो उभा केलेला. त्याच्या पुढे एक लहानगा नंदी. त्यावर चक्क ४ खांबांवर तोललेले लहानगे छत. बाजूच्या भिंतीत हनुमान, नागदेवता तर नंदीच्या बरोबर समोर शंकराचं मंदिर. डाव्या बाजूला छोटेखानी मंदिरात एक देवी असावी. त्याला मात्र पूर्णपणे लोखंडी जाळीचा पिंजरा होता. असं का ते गाव जाणे.

अधांतरी असलेल्या दगडाच्या पायऱ्यांचा जीना

इथल्या एका बांधकामावर आमची मंडळी गेली होती. वर जायला अधांतरी असलेल्या दगडाच्या पायऱ्यांचा जीना. वर जाऊन पुन्हा एकदा किल्ल्याचे अवशेष हेरून ठेवले जे अजून बघायचे होते. मगाशी खाली बुरुजावर दिसलेली तोफ अजूनही खुणावत होती. तिकडे जाऊन तीही बघून आलो. इथे मध्येच असलेला एक छोटासा पण पूर्ण गोलाकार बुरुज मस्त आहे.

पडके वाडे/बांधकामं, मागे सर्वोच्च ठिकाणाचा बुरुज
आणि आमची भटकी मंडळी

खूप पडके वाडे/बांधकामं होती. उगाचच जरासं आवडलं कि त्याच्या दरवाजात घुसून फोटो काढ, वर चढून फोटो काढ असं चाललेलं होतंच.

आता सरळ एकदम वर उंच ठिकाणी असलेल्या बुरुजाच्या वाटेला मी आणि नाना लागलो.

इथून मागे बघितल्यावर इतर बांधकामाबरोबर त्याच्या मागच्या बाजूला असलेलं, पण काहीतरी वेगळं जाणवावं असं बांधकाम दिसलं, जे नंतर बघू ठरवून बुरुजावर गेलो. बुरुजाच्या भिंतीत खालीच एक लहान दरवाजा आहे. आतमध्ये पूर्ण बुजलेला आहे हा भाग. इथेही नानांचे त्यांच्या "ईष्टाईल" मध्ये आणि माझे आपले नेहमीसारखेच फोटो झाले.

सर्वोच्च ठिकाणच्या बुरुजावरची तोफ

वर बुरुजावर मस्तपैकी मोठी तोफ लपलेली आहे, जी खालून दिसणे शक्यच नव्हते. ही आम्हाला दिसलेली दुसरी तोफ. आत पूर्ण दगड-मातीने तोफ बुजून गेलेली आहे. पण तोफेवाराच्या कड्या मस्तच एकदम.

सर्वोच्च ठिकाणच्या बुरुजावरची दुर्लक्षित तोफ

इथे बाजूला अजून एक तोफ बेवारशी पडलेली आहे. हिला कड्या नसल्याने आणि दुसऱ्या तोफेईतकी मोठी नसल्याने तिला महत्व मिळालेले नाहीये, म्हणून बिचारी एकाकी पडून आहे.

हा ह्या किल्ल्यावरचा सर्वात उंच बुरुज आहे. इकडून यादगीर शहराची पलीकडली बाजू दिसली. इकडे जलाशय, दूरवर पसरलेली वस्ती आणि किल्ल्याचा अजून बघायचा राहिलेला इकडचा भाग दिसला.

मुळात इथवर आलेलाच भाग अवघ्या तास-सव्वा तासांत पहिला होता, म्हणजे ८ वाजून गेले होते आणि ह्या किल्ल्यासाठी वेळ ठरवली होती ८:३० पर्यंतची. ह्या सर्वात उंच असलेल्या बुरुजावर आलो म्हणजे किल्ला संपला असेल, असा असलेला भ्रमाचा भोपळा इकडून दिसत असलेल्या विस्तीर्ण तटबंदीने फोडलान. अर्थातच वेळेकडे बघितले तरी किल्ल्याचे राहिलेले अवशेष बघायचे आम्ही सोडणार नव्हतो. उलट उजवीकडे एका बाजूला पलीकडे मोठमोठाले खडक सोडून एक बुरुज आणि त्यावरची यादगीर शहराकडे तोंड करून उभी असलेली तोफ हेरून आधी तिथेच जायचं ठरवलं होतं.

मंदिरासाठी विशेष दगड वापरला गेलाय

बुरुज उतरून, पाहिलं आधी डोक्यात असलेल्या बांधकामाकडे गेलो जे इतर बांधकामापेक्षा मोठ्या आकाराच्या दगडातलं होतं. इथे चक्क ३ मंदिरं निघाली. ह्या मंदिरात आतमध्ये काहीच नसलं तरी दरवाजावरच्या कमानीवरची नक्षी छान होती. आतमध्ये सफाई-संवर्धन गरजेचं आहे, जे आतमध्ये मूर्ती नसल्याने केलं गेलं नसावं.

आजुबाजुचं बांधकाम ढासळून गेलेलं असलं तरी मंदिरासाठी वापरलेले दगड विशेष आणि मोठे असल्याने हे बांधकाम मात्र तसंच उभं आहे.

आता निघालो किल्ल्याच्या वरच्या भागातल्या बघायच्या राहिलेल्या शेवटच्या अवशेषाकडे, म्हणजे त्या एकलकोंड्या बुरुजाकडे. एका मोठ्या खडकाचा उंचवटा चढून, थोडासा उतरून, परत दुसरा खडक चढल्यावर, समोरच बुरुज आहे. इथून खाली डाव्या बाजूला गडाचा आम्ही अजून भेट न दिलेला भाग दिसला, तर उजव्या बाजूला यादगीर शहर. डाव्या बाजूच्या काही बुरुज, पाण्याचे टाके/तलाव अश्या गोष्टी अजून न पाहिलेल्या गोष्टी आणि भागाचा विस्तार पाहता, आम्ही बघून झालेला भाग हा ७५% म्हणता येईल, अजून २५% शिल्लक होता म्हणजे.

किल्ल्याच्या उंचावरच्या भागातला शेवटचा बुरुज

तर आम्ही उभा असलेला हा बुरुज, किल्ल्याच्या उंचावरच्या भागातला शेवटचा बुरुज. ह्यावर यादगीर शहराच्या विरुद्ध दिशेने तोंड करून एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफही उत्तम स्थितीत आहे. फोटो वगैरे झाल्यावर परत फिरून, जिथून वरच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या बुरुजाकडे वाट जाते, तिथे आलो. वरती आधीच जाऊन आल्याने, आता गडाचा वरचा सगळा भाग बघून झाला होता. इथून चोर दरवाजातून खाली उतरून उरलेला भाग बघायला निघालो.

चोर दरवाजातून खाली उतरलो

ह्या दरवाजातून खाली उतरलो तर वरच्या बाजूची तटबंदी दिसायला लागली. जी नैसर्गिकरीत्या त्याच जागी वर्षानुवर्षे असलेल्या मोठाल्या खडकांवर बांधलेली आहे.

ते पिवळसर पांढरे खडक, मध्ये पडलेल्या भेगा हे Combination मस्त दिसत असल्याने कुठेही उभं राहून फोटो घ्यायचा मोह होत होता.

खडकावर एक बुरुज आणि त्यावर एक झाड

डावीकडे खाली अर्धगोल बुरुज, तटबंदी दिसते. अजून एक छोटासा सुंदर चोर-दरवाजा ओलांडून पलीकडे आलो, तर उजवीकडे एका खडकावर एक बुरुज आणि त्यावर एक झाड.

ह्या मोठ्या खडकांचा वापर उत्तम करून घेतलेला होता बुरुज आणि तटबंदी बांधायला त्याकाळच्या स्थापत्य विशारदांनी. त्यामुळे एकूणच ते सगळं सुंदर दिसतं. इथे दगडाला लागून आणखी एक चोरदरवाजा आहे, तिकडे जायचं नव्हतं, कारण एक तर त्यातून वर गडावर जायला वाट असावी, जो भाग आधीच फिरून आलो होतो आम्ही आणि ती वाटही झाडा-झुडुपांनी भरून गेलेली आहे.

जिकडून आलेलो तो सगळा भाग नेमका प्रकाशाच्या विरुद्ध बाजूला साल्याने फोटो धड घेता येत नव्हते.

इथून उजवीकडे जी वाट जाते ती मंदिराकडे जाते जे वरती खडकांत आहे. आम्ही सरळ खाली जाणाऱ्या वाटेने ह्याबाजुचे अवशेष पाहण्यासाठी गेलो.

बांधीव तलाव

इथे डावीकडे एक तलाव आहे. हा तलाव बांधीव असावा कारण आतील बाजूस धड्सळत चाललेले बांधकाम दिसले.

समोरच एक पडके बांधकाम आहे. ह्यावर जाण्यासाठी अधांतरी पायऱ्या असलेला जीना आहे, परंतु शेवटचा भाग ढासळल्याने वरती जाण्यासाठी कसरत करावी लागू शकते.

आयताकार तटबंदी - मजबूत जीना, छोटासा बुरुज आणि त्यावर तोफ

डावीकडच्या वाटेने ह्याबाजुच्या तटबंदीवर गेलो. ह्या आयताकार बांधकामावर बरीच दुरवस्था दिसत असली वर जाण्यासाठी बांधलेला दगडी जीना इतका भक्कम आहे कि त्याचा एकही दगड हललेला दिसला नाही. आयताकार आकाराच्या मध्येच एक पलीकडे जाण्यासाठी दरवाजा आहे. तर उजवीकडे वरती एक बुरुज आणखी एक तोफ.

आधी हे सर्व पाहून आलो आणि मग त्या दरवाजातून पलीकडे गेलो. हे आयताकार बंधाकन नुसतीच तटबंदी नाहीये तर बाहेरच्या बाजूने दोन्ही बाजूला एक-एक भक्कम बुरुज आहेत ह्याला. बुरुजांचा घेर खूप मोठा आहे. पलीकडे गेल्यावरच हे दिसले, आधी लक्षात येण्याजोगे हे नाही.

भले मोठे बुरुज

समोरच तटबंदी आणि त्यातून पलीकडे जाण्यासाठी लहानसा दरवाजा आहे. बुरुज आणि हि तटबंदी ह्यात अंतर खूप कमी असल्याने आधीच मोठे असलेले हे बुरुज अगदी अंगावर आल्यासारखे जाणवतात.

२ पूर्ण गोलाकार बुरुज

तटबंदीवर चढून पलिकडे खाली थोड्याच अंतरावर अजून २ बुरुज पूर्ण गोलाकार आहेत आणि त्यामधील त्यांना जोडणाऱ्या तटबंदीत एक लहानसा दरवाजा.

आता ह्या भागातले सगळे भाग बघून झाले होते. वर बुरुजावर असताना हे सर्व अवशेष दिसल्यावर, घड्याळाकडे बघितल्यावर विचार येऊन गेला होता, कि हे अवशेष राहून जातात कि काय भेट द्यायचे. But we had our priorities set. किल्ला प्रथम आणि सुरक्षितपणे पाहता येतील त्या सगळ्या अवशेषांसह!

त्यामुळे हे सगळे अवशेष पाहून झाल्यावर समाधान पदरात पडलं होतं.

२ तोफा आणि शेजारी हनुमान

इकडच्या बाजूला तालावाकडून डावीकडे येणाऱ्या वाटेने आलो होतो, तेव्हा समोर दिसणाऱ्या बांधकामाच्या मागे लपून बसलेला एक बुरुज कुकुक करून दाखवत होता. आधी त्याच्याकडे गेलो. इथे चक्क २ तोफा... एक बिचारी खाली पडलेली आणि एक बुरुजावर विराजमान. बुरुजाच्या बाजूला अगदी व्यवस्थित रंगवलेला हनुमान आणि एक नक्षीदार दगड ठेवलेला आहे.

मागे वळून पाहिल्यावर खडकांत भिंतीच्या मध्यभागी उंचीवर असलेले मंदिर दिसले. वर एक बुरुज, ज्यावर तोफ आहे, जे आम्हाला गडाचं शेवटचं टोक वाटलं होतं, त्याच्या बुरुजाच्या खाली असलेल्या खडकाच्या भिंतीत हे मंदिर आहे. वरून तशी पुसटशी सुद्धा कल्पना आली नव्हती. मागून येणारा सूर्याचा प्रकाश प्रखर झाल्याने फोटो काही घेऊन देत नव्हता तो.

खडकांत भिंतीच्या मध्यभागी उंचीवर असलेले मंदिर

मंदिराजवळ गेलो. मंदिर खडकांत उजवीकडे आहे तर त्यावर जाण्यासाठी पायऱ्या डावीकडून फिरून खडकाच्या भिंतीला चिकटून मंदिरात जातात. इथे पांढऱ्या रंगात हे सगळं रंगवलेलं, नाही, मढवलेलं आहे. पण त्यामुळे त्या पायऱ्या आणि जीना, जुनं बांधकाम आहे कि नवीन हेही कळत नाही. खालपासून अगदी मंदिरापर्यंत पूर्णपणे लोखंडी रेलिंग लावलेले असल्याने वाट एकदम सुरक्षित आहे.

गड मुळात १० ला उघडतो आणि आम्ही गड फिरून इथे ९ वाजता होतो. मंदिर उघडायला कोणीच आलं नव्हतं. हरकत नाही, गड बघायला मिळाला हेही नसे थोडके.

जेवढं फिरायला ४ तास तरी लागले असते तेवढं २ तासांत, तरीही सगळं नीट पहिल्याने, नाही म्हटलं तरी शीण आला होता. (मुख्य म्हणजे पोटात काही ढकलायला वेळ न मिळाल्याने आतले कावळेही भुकेने व्याकुळ झाले होते)

इथे खालच्या तलावातून प्यायला पाणी आणून टाकी बांधून सोय केलेली आहे. तोंड धुवून, पाणी पिऊन पूर्ण ताजेतवाने झालो.

उतरायला लागलो तर उजव्या बाजूच्या खडकांत एक अर्धगोलाकार गुहा आणि त्यावर लोखंडी जाळी.

भगवान नेमिनाथ, भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावीर

या जैन मुर्त्या आहेत. सर्वात उजवी आणि डावीकडे यक्ष-यक्षिणी आहेत तर मध्ये भगवान नेमिनाथ, भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावीर यांच्या आहेत.

खाली जाताना डावीकडे तटबंदी दिसत होती. ह्या खालच्या बाजूला असलेल्या तटबंदीत एका बुरुजावर एक तोफही दिसली.

खाली किल्ल्याच्या दरवाजाजवळ आलो तेव्हा डावीकडच्या बाजूला एका बुरुजावर लपून बसलेली एक तोफ दिसली, जी सकाळी आम्हाला वर जाताना दिसली नव्हती. तब्बल ९ तोफा आम्हाला दिसल्या.

८:३० ची वेळ ठरली होती. पण अपेक्षेपेक्षा जास्त मोठा आणि अवशेष निघाल्याने खाली उतरायला ९:३० झाले, तेही खूप जास्ती दगदग केल्याने तेवढ्या वेळेत पाहता आले. पण त्यामुळे खाली उतरलो तेव्हा रुखरुख नव्हती तर समाधान होते.

एके ठिकाणी मी त्याच्या आतमध्ये सहज बसू शकेन एवढ्या आकाराच्या इडली-कुकर मधून इडल्या जणू आमच्यासाठीच पटापट बाहेर येत होत्या. मग अर्थातच सगळेजण त्यावर तुटून पडलो.

इडल्या, मेदूवडे आणि बरोबर सुशीला, ह्यावर जोरदार हात मारला आणि वाटेत दिसलेल्या एका “गांव-दरवाजा"चा फोटो पटकन गाडीतूनच घेऊन “मिनी विधान सौधा” ओलांडून यादगीर सोडले.

कर्नाटकातील किल्ले: किल्ले मालखेड आणि किल्ले शहाबाद


 किल्ले मालखेड

    गुलबर्गा अर्थात कलबुर्गी किल्ल्यापासून सुमारे ४१ किलोमीटरवरसेदामरस्त्यावरकगिनानदीच्या काठी हा किल्ला आहे. कलबुर्गीसारखा किल्ला सोडल्यास इकडच्या भागातल्या कोणत्याही किल्ल्यावर जाताना गाव येईपर्यंत गुगल काकूंच्या सांगण्याप्रमाणे जावं. नंतर नम्रपणे त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून गावातच रस्ता विचारून त्याप्रमाणे जावं. नाहीतर आपली गाडी एखाद्या घराच्या दरवाज्यात जाऊन अडकण्याची शक्यता आहे.

            तर, मालखेड किल्ल्यावर जाण्यासाठी ह्या गुगल काकू, “कगिनानदीचा पूल ओलांडला की लगेच उजवीकडे वळायला सांगतात. पण तसं करता पुढे जाऊन मुख्य चौकातून उजवीकडे वळावं. पुढे गल्लीबोळातून विचारतच गाडी घालावी.

    आम्ही एकूण आठ जण, त्यामुळे ४-४ जणांच्यागाड्या. अश्यावेळी दोन्ही गाड्यांचा ताळमेळ ठेवावा लागतो. मुळ नियोजनानुसार कलबुर्गी नंतर मार्तूर किल्ला ठरला होता, पण तो वेळेअभावी रद्द करायला लागल्यामुळे मार्तूर-शाहबादकडून मालखेडकडे जाता, आधी मालखेडकडे जायचं ठरलं. पण या गोंधळात दुसरी गाडी मार्तूर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागली होती. त्यांना अर्ध्या वाटेतून परत बोलवावं लागलं. तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन मालखेड किल्ल्याचा रस्ता, आत जायची जागा बघून, त्यांनाही कळवलं.

    हाही भुईकोट असल्याने अतिक्रमणामुळे म्हणा किंवा वडिलोपार्जित जागा मिळाल्यामुळे म्हणा, प्रचंड वस्ती आहे आणि त्यामुळे खूप वास्तू नामशेष झालेल्या आहेत. ह्या किल्ल्याचे अवशेष गावात आजूबाजूला दिसतात पण ते बऱ्यापैकी नष्ट झाल्यामुळे फक्त मुख्य किल्ला शिल्लक राहिलेला आहे. ह्या किल्ल्यात जाईपर्यंत चिंचोळ्या वस्तीतून जाताना वाटेत जुन्या मिळालेल्या हिंदू देवता कशाही कुठेही कोपऱ्यात पडलेल्या दिसतात. त्या मूर्तींवर कचरा वगैरे पडता एका बाजूला स्वच्छ जागी उभ्या आहेत एवढंच समाधान.

पहिले प्रवेशद्वार

दुसरे प्रवेशद्वार

    गडाचे मुख्य प्रवेशद्वार असे जे आहे, तिथे जाऊन गाडी लावली. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. आत मध्येही दोन बुरुज असून दुसऱ्या प्रवेशद्वाराची कमान आहे. सुदैवाने सगळं शाबुत आहे आणि गंमत म्हणजे सगळं शहाबादी दगडात बनवलेलं आहे. पण इथेच बाजूला बैलगाडी-ट्रॅक्टर वगैरे उभं केलेलं आहे, कचरा तर सगळीकडेच आहे. बुरुजांवर असलेली झाडं ते बांधकाम पाडून टाकणारच आहेत हे मात्र नक्की.

दुसऱ्या प्रवेशद्वारा मागील कमानी

बुरुजावरून दिसणारी प्रवेशद्वारांची रचना

तटबंदीच्या भिंतीला लागून असणारे दर्गे

मस्त शहाबादी दगडातील पिवळसर पांढऱ्या रंगातले बुरुज

    येथून आत गेल्यावर समोरच एक दर्गा आहे. शेजारी थडगं आहे. अजून एक दोम्ही बाजूला बुरुज असलेलं प्रवेशद्वार ओलांडून गेलो आणि समोरच मुलं क्रिकेट खेळताना दिसली. इथे आतल्या बाजूला थडगी आहेत, जी नंतर आणून ठेवलेली असावीत. उजव्या बाजूला आठ एकामागून एक अशा कमानी आहेत हे बांधकाम कसले आहे ते नक्की सांगता येत नाही. कमानींच्या आधी उजवीकडे वर जायला दरवाजा आहे. त्या दरवाजातून वर गेलो. बुरूजावरून प्रवेशद्वारासमोरचा दर्गा, प्रवेशद्वाराची रचना वगैरे सगळं स्पष्ट दिसायला लागलं. तटबंदीला चिकटून असलेला अजून एक दर्गा दिसला. प्रशस्त फांजीवरून चालत, त्या बाभळीच्या काट्यातून वाट काढत, मी कोपर्यातल्या बुरुजापर्यंत जाऊन आलो. तिथे एक थडगं आहे. आजूबाजूला सगळी वस्ती दिसत होती किल्ल्याच्या आत मधल्या बाजूला. इथले लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. एक तर हे किल्ले कोण येतंय बघायला? मुळात ह्यात काही कोणी बघायला येण्यासारखं काय आहे हाच त्यांना प्रश्न पडत असावा. त्यामुळे कोपऱ्यातल्या बुरुजावर येणाऱ्या माझ्याकडे तसे बघणारच. तर, असेच एका विचित्र नजरेने बघणाऱ्या मुलालातुम्हाला घर यहा पे है क्या?” वगैरे सहज विचारल्यावरतो? ये सब हमाराही तो है!” असं उत्तर मिळालं. वास्तविक तिथली एकूण अवस्था बघता तो भाग कोणाचा असणारे हे वेगळे सांगायची गरज नव्हती. असो... इथे सगळीकडे बाभळीची झाडी वाढली आहे त्यातूनच सांभाळून परत दरवाजाजवळ आलो.

काली मशीद

काली मशीद

    इथे इंग्रजी “Y” सारखा भाग आहे, जिथे उजवीकडच्या रस्त्याने वस्तीकडे जाता येतं, तर डावीकडचा रस्ताकाली मस्जिदकडे जातो. हीकाली मस्जिदएक पडकं बांधकाम आहे. त्याच्या आधी एक भव्य बुरुज आहे. बुरूजावर सगळे गवत आणि बाभळी माजलेल्या आहेत. आधी ती मशीद बघायला गेलो. ही वास्तू बर्यापैकी उद्ध्वस्त झालेली आहे, ढासळलेली आहे. पण जे शिल्लक आहे त्यावरचे नक्षीकाम काम मात्र बघण्यासारखे आहे. समोरच तीन कमानी, त्या कमानींवर नक्षीकाम, वर घुमट असं नेहमीसारखं अगदी टिपिकल बांधकाम आहे.

बुरुजाचा दरवाजा: नक्षी, भगवान पार्श्वनाथ आणि शिलालेख

    हे सगळ बघुन उलट बुरुजाजवळ आलो. वर जायचा दरवाजा एकदम अप्रतिम आहे. त्याच्या कमानीवर तीनही बाजूंना नक्षीकाम आहे. पायाशी दोन्ही बाजूला कोरलेल्या मूर्ती आहेत. तर कमानीच्या बरोबर मध्ये वरतीभगवान पार्श्वनाथयांची मूर्ती आहे. त्याच्याहीवर फारसीतला एक शिलालेख कोरलेला आहे.


बुरुज

    वर जाणाऱ्या पायऱ्यांचे सौंदर्य काय आहे... जेमतेम १५-२० असतील पायऱ्या. पण असं गोलाकार बांधकाम आहे. मस्त. इथे वर जाऊन बऱ्यापैकी किल्ला दृष्टीक्षेपात येतो. एका बाजूला वस्ती, एका बाजूला नदी, एका बाजुला दाट झाडी. वस्तीच्या बाजूला आणखी एक दर्गा दिसला आणि बांधकामाचे अवशेष. तिकडे नंतर जायचं ठरवलं. आधी मशिदीच्या मागची वास्तू बघायला गेलो.

जीर्णोध्दारीत १२ खांबी वास्तू

    ही वास्तू जीर्णोद्धारात बांधली असावी. जुने खांब शाबूत असल्याने ते तसेच वापरलेले आहेत. ही वास्तू १२ खांबी आहे. इथे डाव्या बाजूला जुन्या मंदिराचे अवशेष पडलेले दिसतात. येथून सरळ जाणारी वाट हीअंजनेयहनुमान मंदिराकडे जाते. मंदिराचे ठिकाण आणि तिथून दिसणारंकगिनानदीचं दृश्य अप्रतिम असणार हे नक्की. पण बाभळी प्रचंड वाढल्यामुळे तो भाग आमच्या नशिबात नव्हता.

किल्ल्यातील आणि बाहेरील इतस्ततः पडलेल्या मूर्ती

    त्यामुळे उलट मागे फिरून परत Y शी आलो. येथे उजवीकडच्या रस्त्याने वस्तीकडे गेलो. तो समोर दर्ग्याबाहेरच वीरगळ, सतीचा हात, हिंदू देवतांच्या मूर्ती आणि विना मुंडक्याचा नंदी एका झाडाखाली बेवारशी पडलेला दिसला. समोर उध्वस्त वाडे दिसले. एक बुरुज आणि निळ्या रंगाने रंगवलेला दरवाजा होता. तिथून आत मात्र गेलो नाही कारण सगळीकडे वस्तीच वस्ती होती. तसंही बघायला काही मिळणार नव्हतं, उलट लोकांच्या विचित्र नजरा मात्र दिसल्या असत्या. किल्ल्यातून बाहेर आलो आणि गावातून बाहेर पडताना जुन्या सापडलेल्या मूर्ती ठेवलेल्या दिसल्या. जिथे मूर्ती ठेवलेल्या दिसल्या तिथे स्वच्छता होती. असणारच म्हणा! Its but obvious. पाच वाजलेच होते. मार्तूर किल्ल्यावर पाणी सोडायला लागलं असलं तरी शहाबाद किल्ला मात्र चुकवायचा नव्हता.

किल्ले शहाबाद

    शहाबाद हा किल्लाजुने शहाबादया भागात आहे. मालखेड वरून जसजसा जुना शहाबाद भाग जवळ यायला लागला, तसतशी सगळी घरं, दुकानं शहाबादी दगडात दिसायला लागली. त्या-त्या भागात मिळणाऱ्या दगडाने तशी बांधकामं केलेली असतात. सर्वसाधारणपणे सगळीकडे लाल विटांची बांधकामं असतात. मराठवाडा-खानदेश भागात काळ्या दगडांची तर  कोकणात लाल चीऱ्यांची असतात. तशी ह्या बाजूला सगळी शहाबादी फरशांची, म्हणजेच दगडांची. येताना वाटेत ह्याच दगडाची खाण आणि फरशांचा कारखानाही दिसला होता. इकडे फिरायला येताना लहान कार ऐवजी सरळ ट्रक घेऊन आलो असतो, तर हव्या तेवढ्या शहाबादी फारश्या भरून नेता आल्या असत्या. Joke Guys...

प्रवेशद्वार

    गावात आलो तेव्हा जवळजवळ पावणेवाजत आले होते. सुर्यास्त लवकरच होणार होता. त्यातून हिंदू-मुसलमान बाबतीत हा भाग जास्तीच नाजूक आहे असं ऐकिवात होतं. त्यामुळे किल्ल्याची वाट शोधण्यापासून आत मध्ये जायला मिळेल की नाही अशी मनात साशंकताच होती. पण तिथे पोचल्यावर हा प्रश्न सरकारने आधीच सोडवून ठेवलेला दिसला. गडाचे प्रवेशद्वार चक्क सिमेंटने बंद करून ठेवलेलं आहे. शेजारीअशोक चौक, जुने शहाबादअसा बोर्ड आहे.

    ऐकीव माहितीवर शिक्कामोर्तब लगेच झालं. फोटो काढताना मध्ये दरवाजात लावलेली मारुती ८०० गाडी मध्ये येत होती, ती काढायला तेवढ्यात त्यातली लोकं आली. गाडी बाहेर काढल्यानंतर फोटो चांगला मिळेल म्हणून त्यासाठी आम्ही सज्ज झालो, पण आम्हाला हातात मोबाईल फोटो काढायला धरलेला बघून सरळ बघून त्यांनी गाडी बाजूला काढायचं रद्द केलं. उलट आम्हाला दहा प्रश्न विचारले. तशी चूक म्हणता नाही येणार, कदाचित तिथली परिस्तिथी तशी असावी!

    दरवाजा जरी बंद केलेला असला तरी त्याची कमान, त्यावरचे नक्षीकाम सगळं बघता येत होतं. दरवाजाच्या कमानीवर ती एक झरोका आहे, त्यातून आता झाडं झुडपं डोकावत होती. त्यावर बुरुजांच्या नक्षीकामाला जोडून असं नक्षीकाम आणि त्याच्या वरती ही बुरुजांच्या वरच्या भागाला जोडणारी भिंत. भिंतीवरही नक्षीकाम आहेच. भिंतीच्या एकदम वरती कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे पाकळी बांधकाम आहे.

            संपूर्ण शहाबादी दगडात असलेले हे बांधकाम मजबूत आहे आणि टिकून आहे. पण या सगळ्यावर वाढलेली झाडी, पायाशी पडलेला कचरा, लोखंड, ट्रॅक्टरचे भाग.. हे सर्व बांधकामाला नक्की धोका पोहोचणार आहेत. त्यात जोडीला लोकांची आणि सरकारची अनास्था! असो..

किल्ल्यात आतमध्ये जात येईल असे एकमेव प्रवेशद्वार

    किल्ल्याच्या आतमध्ये जाता येणार नसल्याने आता समोर एकच मार्ग होता तो म्हणजे किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा मारायची. तशी सुरुवात केल्यावर पुढच्या उजवीकडच्या भिंतीत आकाशी रंगाने रंगवलेलं किल्ल्यात आतमध्ये जात येईल असे एकमेव प्रवेशद्वार दिसलं. या दरवाज्याच्या खांबांवरची नक्षी इथे मंदिरच आहे हे ओरडून सांगत होतं. कमानीच्या दोन्ही बाजूला वरती लाकडात घडवलेली घोड्यांची तोंडं आहेत. ही वास्तू काय आहे ह्या चर्चेला पूर्णविराम मिळत होता ते आतमध्ये सुरुवातीलाच असलेलं तुळशी वृंदावन बघून. तरीही आम्हाला आत जाऊ दिलं गेलं नाही.

सुदर बांधकाम आणि दुरावस्था

मागील बाजूचे प्रवेशद्वार

बजावलेली २ लहान प्रवेशद्वारं

    पुढच्या तटबंदीच्या भिंतीवर शेणाच्या गोवऱ्या थापून ठेवलेल्या दिसल्या. वर बुरुजाची नक्षीदार कमान, बांधकाम आणि खाली कचरा आणि त्यात बागडणारी डुकरं. पुढे गेल्यावर गडाच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार दिसलं. हे पण सिमेंटने बंद करून ठेवलेलं होतं. अर्धे नक्षीदार खांब, शहाबादीत केलेलं बांधकाम त्यावेळी मजबूत असलं तरी आता ढासळत चाललेलं आहे. पुढील भिंतीत दोन लहान प्रवेशद्वारं, अर्थातच बुजवलेली. पण त्यावरच भिंतीतच प्रचंड वाढलेले दोन पिंपळवृक्ष मात्र इथं मोठं प्रवेशद्वार लवकरच निर्माण करून ठेवणार आहेत हे नक्की. त्यानंतर अजून एक बुरुज बघून परत मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो.

              मारुती ८०० कार निघून गेलेली होती. जेवढा जमेल तेवढा किल्ला बघून झाला होता. आजच्या दिवसाची किल्ले भ्रमंती झालेली होती.

    प्रमोदकृपेने ओळखीने राहण्याची सोय झाली होतीएकदंडगीमठाच्या जागेत. चक्क त्या मंदिरात आमची राहायची सोय त्यांनी करून दिली. हा सध्याश्रीनिवासस्वामींचा मठ. हे मुळचे विजयनगर साम्राज्याच्या वेळपासून आध्यात्मिक कार्य करतात. ते साम्राज्य खालसा झाल्यानंतर हे सगळे स्वामी इतस्ततः विखुरले. या स्वामींचे वडील इथे यादगीर मध्ये येऊन राहिले. त्यांचे उत्तराधिकारी हे श्रीनिवास स्वामी. इथे आमची राहायची आणि अंघोळीची सोय झाली होती. इथे  राहायचे होते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी यादगीरचा किल्ला बघायला सोयीचा जाणार होता.

कर्नाटकातील किल्ले: किल्ले कलबुर्गी (गुलबर्गा)


वर्षभर सह्याद्रीत भटकंती तशी चालूच असते, त्यामुळे वर्षाच्या शेवटी मोठी सुट्टी काढून जरा लांबवरची भटकंती करायची असा प्रघात जणू गेलेवर्ष पडून गेलाय. ह्यावर्षीमरहट्टाप्रदेश सोडून जरासे दक्षिणेकडे म्हणजेकन्नडप्रांतात भटकायला जायचं ठरवलं होतं. बेळगांव जवळपासची भटकंती आधीच झालेली असल्याने ह्यावेळी भाग निवडला तो कलबुर्गी (गुलबर्गा), यादगीर आणि रायचूर जिल्हा.

भटकंती झाल्यानंतर जेव्हा याबद्दल लिहायचा विचार केला, तेव्हा ठरवून टाकलं की जे आधीच प्रसिद्ध आणि पूर्णपणे परिचित किल्ले आहेत त्याबाबत लिहिता, अपरिचित किल्ल्यांवर जास्त प्रकाश टाकायचा. परंतु वाचकांच्या भटकंतीला उपयोग होईल म्हणून भटकंतीत भेट दिलेले सगळे किल्ले थोडक्यात का होईना पण घेत आहे. थोडी माहिती आणि महत्वाचे फोटो एवढाच भाग ब्लॉग मध्ये.

तर मुळात यावर्षी कोरोनाने धुडगूस घातल्याने ही भटकंती जमेल की नाही? नंतर मग कधी जमेल? पासून २९ डिसेंबरला रात्री निघू पर्यंत नियोजन झालं. भटके लोक ठरले पण अचानक रात्रीची संचारबंदी आली आणि २९ला रात्री निघायचे रद्द करायला लागले. त्याऐवजी ३० तारखेला सकाळी निघायचं निश्चित झालं. नियोजनानुसार म्हणजेपलान के मुताबिकरात्री दहाला लिहून निदान सहा-सात तास तरी प्रवास करून, मग कुठेतरी जराशी विश्रांती घेऊन, सकाळी लवकरच कलबुर्गी पासून श्रीगणेशा करायचा असं होतं. पण ते आता ते सकाळवर आल्याने प्रवासाचा वेळ हा सकाळी खर्च होणार होता.

तोपर्यंत संचारबंदीचं गाडं जमावबंदी वर आलं आणि चार किंवा कमी लोकांना एकत्र फिरायची परवानगी मिळाली. त्यामुळे मी सकाळी साडेचारला घरातून निघून चिंचवडला जाणं एकटाच असल्यामुळे चालणार होतं. मग विनीतच्या घरी जाऊन गाडी लावली. विनीत तोपर्यंत नाना आणि प्रमोद यांना घेऊन आलाच. मापारी सर पण यायचे ठरल्यामुळे शेडबाळे सर त्यांच्या गाडीत गेले. त्यामुळे आमच्या गाडीत आम्हीजण आणि मापारी सरांच्या गाडीत तेजण.

विनीतकडे पोहोचून सामानाची बांधाबांध करून निघालो तेव्हा ५:२० झाले होते म्हणजे उठून दीड तास होऊन गेल्यामुळे माझ्या पोटातून आवाज यायला लागले होते. किल्ल्यांना खूप वेळ होता, त्यामुळे सध्या पोहे, इडली कुठे मिळेल त्यादृष्टीने डोळे सगळं scan करायला लागले. सोलापूर रस्त्याला लागल.ो पुण्याच्या बाहेर तरी पडू म्हणून करत करत बहुतेक यवत जवळ आलो. तिथे एकेठिकाणी गरम-गरम पोहे आणि वर सांबार चापलं. जीवात जीव आला. तर मापारी सरांची गाडी मात्र न्याहारीला थांबलीच नव्हती. दुपारच्या जेवणापर्यंतची निश्चिती झाली बगूनानाssss असं म्हणेपर्यंत दुसऱ्या गाडीला भूक लागल्यामुळे सोलापूरच्याआधी परत एकदा न्याहारीला गाड्या थांबल्या. आता इतरांपेक्षा वेगळे राहायचा प्रमाद नको या एकाच कारणामुळे मलाही ते खावे लागले. तिथे मिसळ, इडली, मेदूवडे, कडकण्या (ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीचा वाळवून केलेला प्रकार) असा सगळ्यावर ताव मारल्याने दुपारच्या जेवणाला आज मुहूर्त लागणार नाही हे निश्चित झालं. मुळातच रात्री ऐवजी सकाळी होत असलेल्या प्रवासाला गेलेला वेळ भरून काढायचा होता. एकूणच आजच्या दिवसातले ठरलेले सगळे किल्ले होणार नाहीत हे माहिती होतं, पण जेवढे जमतील तेवढे तरी बघू असा सुज्ञ विचार यामागे होता.

कलबुर्गी किल्ल्याचे प्रवेशद्वार

अशा तऱ्हेने कलबुर्गी शहरात किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर दाखल झालो ते बरोबर पाउण वाजता. हा किल्ला भुईकोट असून खूप प्रसिद्ध किल्ला आहे. जिल्ह्याचे नांव आणि किल्ल्याचे नांव एकच आहेकलबुर्गी. आधीचे नाव गुलबर्गा. कलबुर्गी हे मूळ नाव असल्यामुळे मधल्या राजवटीत त्याचे झालेले गुलबर्गा नाव बदलून आता परत ते कलबुर्गी करण्यात आले आहे. १३४७ मध्ये राजा गुलचंद द्वारे बांधला गेलेला हा किल्ला १४२४ पर्यंत बहामनी सत्तेची राजधानी होता, म्हणजे २३ वर्ष. नंतर तो मान बिदर किल्ल्याला मिळाला.

कलबुर्गी किल्ला Google Map Satellite View

या किल्ल्याला महत्त्वाचे दोन दरवाजे असून जवळपास पंधरा उंच बुरुज आहेत. तटबंदी दुहेरी असून बाहेरील बाजूस खंदक आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या या किल्ल्याला कोणतेही संरक्षण मिळालेले नसल्यामुळे खंदक आणि परकोट, तटबंदी असं बांधून हा किल्ला संरक्षित केला गेलेला आहे. जवळपास ७५ एकरांमध्ये पसरलेल्या या अवाढव्य किल्ल्यात एक प्रचंड मोठा आयताकृती बुरुज आहे, ज्यावर जवळपास पंधरा फूट लांबीच्या तीन तोफा आहेत. पश्चिमेकडील बुरुजावर एक तोफ आहे जी तब्बल २९ फूट लांब असून ती जगातील सर्वात लांब असल्याचे एके ठिकाणी नमूद केलेले आहे. ख्वाजा बंदेनवाज याचं थडगं पण याच किल्ल्यात आहे.

हा किल्ला राजा गुलचंद याने १३४७ ला बांधला (काही ठिकाणी उल-उद-दिन याने बांधल्याचे पण म्हटले आहे) नंतर या किल्ल्याला राष्ट्रकूट, चालुक्य, कल्याणचे कलाचुरी, देवगिरीचे यादव, हळेबीडुचे होयसाळस, काकतीय (वरंगलचे राजे), दिल्ली सल्तनत, विजयनगर साम्राज्य, बहामनी, आदिलशाही, मुघल आणि शेवटी इंग्रज, एवढ्या सत्तांचे स्वामित्व लाभलेले आहे.

किल्ल्याची प्रवेशद्वाराजवळची दुहेरी तटबंदी, खंदक आणि तिथे जाण्यासाठी असलेला भुयारी दरवाजा 

तर दरवाजा बघितल्यावर तिथून फोटोंचा धडाका लावला. आतून-बाहेरून दरवाजा, त्याच्या देवड्या, बाजूचा खंदक, मग परकोटात शिरून.. असे सगळे फोटो झाले. पण त्या ठिकाणी थांबल्यास मोकळ्या हवेतच गुदमरून मरू अशी अवस्था दिसली आणि गप-गुमाने गाडी सरळ आतमध्ये जामा मशिदीजवळ नेऊन लावली.

आशिया खंडातली २ऱ्या क्रमांकाची मोठी जामा मशीद

ही जामा मशिद १३६७ झाली बांधली आहे, म्हणजे किल्ला बांधल्यानंतर अवघ्या २० वर्षांत आणि ही आशिया खंडातली क्रमांक दोनची मोठी जामा मशीद आहे. जवळजवळ ३८,००० स्क्वे. फूट एवढ्या मोठ्या भूभागावर ही मशीद आहे. सध्या फक्त नमाज पडण्यासाठीच जाता येते त्यामुळे आमची ती संधी हुकली. बाहेरूनच फोटो घेऊन आम्ही पुढच्या बुरुजाच्या दिशेने निघालो

शिलालेख आणि नक्षीदार दगड

        या बुरुजाच्या समोर आल्यानंतर एक मोठा लोखंडी दरवाजा आणि त्याला लावलेले कुलूप दिसलं, कोरोनामुळेच म्हणून कदाचित. हा बुरुजावर जाणारा एकमेव लोखंडी दरवाजा बंद आहे पण कोणीतरी (आमच्यासाठी भल्या माणसाने) त्यातील दोन गज तोडून-वाकवून चोरदरवाजा तयार करून ठेवलेला आहे. आतमध्ये पायऱ्यांशेजारीच एका कोनाड्यात एक शिलालेख आहे. बुरुजावर गेलो तर मस्त पैकी २९ फूट बारागज तोफ आमचीच वाट बघत होती.

२९ फुटीतोफ 

येथून किल्ल्याचा चांगला View मिळत होता. जामा मशीद, मधला मोठा आयताकार बुरुज, तटबंदी, पराकोट बाहेरील वस्ती.. सगळा भाग डोळ्याखालून घातला. ही तोफ २९ फुट लांब असून पंचधातूची बनवलेली आहे. जाडीच तब्बल सात इंच असून व्यास दोन फूट आहे.

झुलती तोफ

किल्ल्यातले काही दर्गे, थडगी
सध्या वस्तीचा भाग असलेले जुने बांधकाम

इथून समोरच असणाऱ्या किल्ल्याच्या या भागात पूर्ण वस्ती आहे. अर्थातच हे सगळं अनधिकृत असणार किंवा पूर्वजांकडून मिळालेलंही असू शकेल. किल्ल्याचा भाग म्हणून मुळातच इकडे राहण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत आणि तिथेच सध्या वस्ती आहे, म्हणजे बांधायची पण गरज नाही असं मिळालेलं घर. तिकडे कोपऱ्यात बुरुज बघायला गेलो. तिथे एक दर्गा आणि थडगं आहे. या बुरुजावर एक झुलती तोफ आहे असं मला आधीच एका काकांनी सांगितलंनी होतं. झुलती म्हणजे काय तर त्याला खाली दिलेला आधार हा असल्यामुळे ती “See-Saw” सारखी झाली आहे, त्यामुळे ती हलते.

दरवाजांची रचना आणि खंदक-तटबंदीची अवस्था
काही दरवाजे
किल्ला खात असलेली वस्ती

इथून खाली सगळी वस्ती आणि किल्ला बांधतेवेळी अतिशय विचारपूर्वकरित्या बनवलेली दरवाजे आणि त्यांची रचना दिसते. खाली उतरून ह्या भागात फेरफटका मारला. ही रचना संरक्षणाच्या दृष्टीने एकदम उत्तम आहे. परंतु बांधकाम ढासळत चालले असून इथली वस्ती हे सर्व खाऊन टाकत आहे. जुन्या काळातले नक्षीदार खांब-कमानी आता कुठेतरी त्याच्या भवतालच्या बांधकामामुळे लपून गेले आहेत. ह्यातलं जे काही पाहता आलं ते पाहून तिथून निघालो.

आता बघायचा राहिला होता ह्या किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज. जो खरं तर मुख्य प्रवेशद्वारानंतर समोरच दिसतो पण आम्ही प्रदक्षिणामार्ग धरून फिरत आल्यामुळे हा बुरुज शेवटी बघून बाहेर पडणार होतो. कोरोनामुळे इकडचेही सिक्युरिटी गार्ड सगळीकडची कुलुपं लावून गायब झालेले होते. त्यामुळे या बुरुजाचाही वर जायचा एकमेव दरवाजा बंद होता. इथे कोणी भल्या (!) माणसाने त्यातले गज वाकवून अपमाच्यासाठी मार्ग करून ठेवलेला नव्हता. पण किल्ल्यात शिरलो होतो तेव्हा इथे वरतीजण पहिले होते, म्हणजे वर जायला कुठून तरी मार्ग आहे किवा तेच गार्ड असतील आणि आम्हला कुलूप उघडून देतील म्हणून तसा शोध चालू झाला. मग त्या बुरुजाच्या सगळ्या बाजूने फिरून मागच्या बाजूने जिथून वर जायला जागा आहे, तिथे जाऊन बघून आलो. पण ही वाट एकदम वर जात नाहीच. आणि इकडे काहीही नाही बघायला, त्यामुळे अर्थातच इथे आमच्याशिवाय कोणीही येत नसतील ह्याची खात्री होती. पण शेवटी इच्छापोटी मार्ग निघाला आणि सर्वात वरती जायला जागा मिळाली, म्हणजे काढली.

सर्वात मोठ्या आयताकृती बुरुजावरच्या ३ तोफा

इथे वर तीन १५ फुटी तोफा आहेत आणि प्रत्येकाला स्वतंत्र जागा आहे. ह्याचा Top-View किती सुंदर दिसेल, पण त्यासाठी ड्रोन पाहिजे. ते नसल्यामुळे सध्या गुगल Satellite View चा फायदा घेऊन तो बघू.

आयताकृती बुरुज

आयताकृती बुरुज - Google Map Satellite View

इथून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. पावणे दोन तास झाले होते, अजून बारीकसारीक अवशेष बघून गाडीत बसलो. वेळेअभावी मार्तूर किल्ला सोडून द्यावा लागणार होता आणि मालखेडचा किल्ला आधी बघायचा ठरला कारण तो मोठा असल्याचं वाचलं होतं.








किल्ले महिमंडणगड, पर्वत आणि चकदेव - I


महिमंडणगड

One the way...
सूर्योदय

गेल्यावेळी ना, रात्री तीन वाजता इथे पोचलो होतो. तिथे असलेल्या एकमेव हॉटेलच्या बाहेरच्या बाकड्यांवर मुक्काम केलेला. कशाला उगाच अपरात्री हॉटेलवाल्यांना उठवा, तेही तीन तासांसाठी?

यावेळी मात्र निवांत इथे पोचलो. सूर्योदय इथूनच बघितला. ज्या बाकड्यांवर गेल्या वेळी रात्री तीन वाजता झोपलो होतो, तिथे यावेळी चक्क साडेसात नंतर पोचलो.

गेल्यावेळी आधी खाणं-बीणं काही नाही, यावेळी चक्क आधी गावात जाऊन कांदेपोहे चहा झाला.

आता हे "यावेळी" आणि "गेल्यावेळी" हे पुराण म्हणजे, या आधी इथे आलो होतो. त्यावेळी आणि यावेळीही आमचं नियोजन अगदी जसाच्या तसं होतं. फक्त यावेळी पहिल्या ठिकाणी चढाईला सुरुवात केली ना, त्याच घड्याळाच्या वेळी, गेल्या वेळी आमचा ट्रेक रद्द झाला होता काही कारणाने.

त्यामुळे "गेल्यावेळी"च्या आठवणी काही जात नव्हत्या. निवांत नियोजन, पण "शुरु होने से पहले ही खतम" होतं ना, तेव्हा केवढी रुखरुख लागून राहते. एक तर असे योग असं चटकन जुळूनही येत नाहीत. तब्बल पाच वर्षांनी, हो पाच वर्षांनी हा योग आला होता. पाच वर्षांनी आम्ही त्याच ठिकाणी होतो, रद्द झालेलं नियोजन पुन्हा पूर्ण करण्यासाठी. फरक यावेळी साथीदारांचा होता. त्यावेळी असलेले प्रसाद आणि प्राजक्त हे येऊ शकले नव्हते, तर यावेळी मकरंद आणि प्रमोद होते. त्या आणि ह्या, दोन्हीवेळी मी आणि विनीत होतो.

रघुवीर घाटातून माहिमंडणगड

आता माहिती असणाऱ्यांना लक्षात आलं असेल, की आम्ही कुठे भटकंतीला चाललो होतो. बरोबर, रत्नागिरी-सातारा सीमेवर रघुवीर घाटावर लक्ष ठेवून असलेल्या महिमंडणगडावर.

सांगितलं तसं, आधी गावात जाऊन न्याहारी केली, ते गाव म्हणजे "मेट-शिंदी". नंतरच उलटं फिरून, वाटेत नुसतं "वाईच जरा येतो रे आधी गावात जाऊन", म्हणून हात करून आलेल्या महिमंडणगड किल्ल्याकडे गाडी हाकली. गांव आणि रघुवीर घाट जोडणारा रस्ता वन खात्याच्या अखत्यारित असल्याने कच्चा आहे, डांबरी करायला परवानगी नाही. लाल मातीच्या या रस्त्याने धूळ उडवत गावाकडे चाललेल्या लाल परीला टाटा करून एका विशिष्ट ठिकाणी आलो. "विशिष्ट ठिकाणी" म्हणजे तिथे असं काही लिहिलेलं नाही, की इथून चढायला सुरुवात करायची.

हा किल्ला तितकासा प्रसिद्ध नसल्याने पर्यटक तिकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे जे भटके असतात तेच इकडे वाट वळवतात. त्यातून घनदाट आणि राखीव जंगलांचा भाग असल्याने, तिथे येणं धोक्याचं आहे. माहितगार वाटाड्या, काळ-वेळ या सगळ्याचं नियोजन व्यवस्थित करणं इथे गरजेचे ठरतं.

समाधी
अपेक्षित घनदाट जंगलातून जाणाऱ्या वाटेकडे वाटचाल

चढायला सुरुवात केल्यावर अवघ्या तीन-चार मिनिटांत एका दगडी समाधी वजा वास्तूशी पोचलो. वाटाड्या बरोबर असल्याने चढायच्या मार्गाची चिंता नव्हती, पण डोळे काहीतरी वेगळं शोधत होते. हे घनदाट जंगल, यात गवे-अस्वलं हे आहेतच याची कल्पना होती. पण गंमत म्हणजे पाच वर्षात एवढा फरक पडेल असं वाटलं नव्हतं. तिथलं जंगल घनदाट वाटतच नव्हतं, वाटही प्रशस्त होती. गावकरी रोजच फिरायला येत असल्यासारखं काट्याकुट्या मारून वाट स्वच्छ. अगदी हाताने झाडाची फांदीही बाजूला करायला लागणार नाही एवढी...

अर्थात चांगलं वाटलं की वाट स्वच्छ आहे, साफ झाल्याने जंगली प्राण्यांचा धोकाही तसा कमी. पण एका कोपऱ्यातून वाईटही वाटत होतं, ती अवस्था बघून.

झाडांचा बोगदा

एके ठिकाणी वाट झाडांच्या तयार झालेल्या तीन बोगद्यानी अडवलंनी. का कोणास ठाऊक हे ओळखीचं वाटलं. बोगदा ओलांडून पुढे मात्र एकदम वाट साफ. डोक्यावरून झाडांचं छत बाजूला झालं, की एकदम सुरक्षित वाटतं. फरक फार नसतो तसा अंतरात, अगदी काही फूट. पण आधी मनात धाकधूक असते आणि अवघ्या दहा फुटांवर मोकळं आकाश. सूर्याचा प्रकाश, त्या छतामुळे आलेला अंधार दूर करताना भीतीच सावटही दूर करत जातो.

मोकळ्या वाटेवर आलो, वाट तशी अरुंद होती काही ठिकाणी. अशा ठिकाणी गवा धावत आला, तर महाकठीण काम होतं. त्यासाठीच तर स्थानिक गावकरी बरोबर पाहिजे. त्यांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त अशा प्रकारचे अंदाज असतात. अर्थात सगळे खेळ फक्त मनातच चालले होते आणि ते सुदैवाने मनातच विरले.

तटबंदी

निसर्ग उत्तम साथ देत होता. मागे दिसणारा डोंगर कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेला होता. वाट साफ आणि मळलेली असली, तरी खाली दाट जंगल वन समृद्धीची जाणीव करून देत होतं. पायाखाली त्या वाळक्या गवतातून अचानक पायऱ्यांनी डोकं वर काढलं आणि मग वेध लागले ते गडाच्या माथ्याचे. त्यात थोड्याच अंतरावर, उजव्या बाजूला चक्क तटबंदीचे अवशेष दिसले आणि गडप्रेमी सुखावला.

टाके, मागे टाके समूह आणि त्यामागे देवस्थान
देवस्थान

गडावर आलोच म्हणजे. मागच्या बाजूला रघुवीर घाटाकडे असणारे गडाचे टोक होते, तर समोर गडाचा या बाजूचा भाग. समोरच एक टाकं दिसलं आणि त्याच्या पलीकडे एक टाक्यांचा समूह. त्याच्याही पलीकडे या किल्ल्यावरचे देवस्थान. देवस्थानावर मंडपासाठी घातलेला लोखंडी सांगाडा शिल्लक होता. वाऱ्याने छप्पर उडून गेलं असेल. देव-दर्शन घेऊन पलीकडचं सातारा न्याहाळलं.

टाके समूह
टाक्यात मूर्ती

तिथला टाके-समूह अभ्यासण्यासारखा आहे. एका टाक्याच्या आतल्या भागात मूर्ती कोरलेल्या दिसल्या. टाक्यांचं उतारावरचं स्थान, जेणेकरून पावसाचं पाणी विनासायास कसं साचवता येईल, एक टाकं भरल्यावर त्यातूनच दुसरं टाकं भरण्यासाठी केलेली पन्हळ.. सगळं न्याहाळलं!

गडामाथ्यावरचं पाहिलं टाकं आणि मागे किल्ल्याचा घाटाच्या बाजूचा भाग

गेलो मग किल्ल्याच्या घाटाच्या बाजूच्या टोकावर. किल्ल्याचा हा डोंगर आणि त्याला लागून असलेला दुसरा डोंगर यातून हा घाट रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जोडतो.

घाट उतरल्यावर खाली रत्नागिरी जिल्ह्यात "खोपी" हे माझ्या आत्तेचं गांव, तर घाटाच्या वरच्या बाजूला "मेट शिंदी" हे गांव. पण हे सातारा जिल्ह्यात. आणि गंमत म्हणजे सातारा जिल्ह्याच्या इतर भागातून याचा जिल्ह्यात असणाऱ्या ह्या "शिंदी" गांवात यायचं झाल्यास, आधी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन मग रघुवीर घाट मार्गे वर उलटं चढून येण्याला पर्याय नाही. तसा सध्या एक रस्ता करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच ते पूर्णही होईल. मग मात्र साताऱ्यातून किंवा पुण्यातून या बाजूला यायला नवीन मार्ग तयार होईल आणि रत्नागिरीत जाऊन उलट याची गरज भासणार नाही. उलट इथून सरळ रत्नागिरीत जाण्यासाठीच या मार्गाचा वापर करता येईल.

टोकावरून खाली रघुवीर घाट

ह्या टोकावरून खाली दिसणारा वळणावळणाचा घाट न्याहाळत बसावा असाच आहे. सूर्योदयाला इथे पाहिजे होतो. समोर घाटाच्या उजव्या बाजूकडे असलेला डोंगर त्याचा विस्तार उलगडून दाखवत होता. दाट झाडीने भरलेला त्याचा पदर तर जंगलाचा दाटपणा स्पष्ट करत होता. पण त्यात एक नजर लागून गेली असावी कधीतरी. जोरदार भूस्खलन होऊन एक मोठा पट्टा उभा झाडं तुडवत खाली आलेला दिसला. उगाच भरल्या डोंगरावर जखमेसारखा भासला तो.

निवांतपणे निसर्ग अनुभवल्याने खाली यायला मात्र जवळपास साडेदहा वाजून गेले. इथपर्यंत सगळं छान होतं पण खरी गंमत यानंतर होती पुढे जायचं होतं पर्वतला...

पर्वत

शिंदी गावाच्या पुढे रस्ता "वळवण"कडे जातो. तिथे दोन वाड्या आहेत. आधी एक छोटीशी वाडी आहे. वाडीच्या डाव्या बाजूला लागून चकदेव, तर उजव्या बाजूला पर्वत आहे. या वाडीत आमचे चकदेवचे वाटाडे राहत असल्याने, इथेच गाडी लावली. जेवणाची व्यवस्था इथेच होती.

दुपारचे अकरा वाजून गेलेले. एक किल्ला करून आलेलो आणि समोर भुकेला जेवण हजर. मारला की सगळ्यांनी ताव त्यावर... भरल्या पोटाने डोक्यावर उन्हं असली, की पापणी जड व्हायला लागते. मग काय अंमळ पडलोच त्या मस्त सारवलेल्या अंगणात. ☺️

डोक्यावर मस्त माडाच्या झावळ्यांच्या झापांनी अच्छादलेल्या मांडवात, उताणे पडलेल्या या अवस्थेत आम्हाला पाहिल्यावर वाटाडे जंगम यांच्या घरी सगळे निवांत झाले असणार, की ही पोरं काय संध्याकाळपर्यंत उठत नाहीत. त्यांना काय, आमची अवस्था काही वेगळी होती का? इतर वेळ असती, तर कूस बदलायची सुद्धा तसदी न घेता गाढ झोपलो असतो. पण वेळ भटकंतीची होती. समोर "पर्वत" होता. इथेही दाट जंगल होतं. वेळा पाळणं गरजेचं असतं इथे.

एक वाजता उठलोच. आवरलं. रात्रीचा मुक्काम वरती. त्यामुळे अंथरूण वगैरे, स्वयंपाक या सगळ्या सामानासहित जड पाठपिशव्या पाठीवर घेतल्या. मुकाटपणे "रे पर्वत, एलो रे बाबा..." म्हणून वाटचाल चालू केली. आता पुढची वाडी "उगवती वाडी". इथपर्यंत खरा रस्ता आहे, गाडी नेता येऊ शकते. पण गाडी वाटाडे जंगम यांच्या अंगणातच लावून, दीड वाजता शेतातून आम्ही चालत सुटलो.

चोंढातली वाट

या उगवत्या वाडीकडेच यायला आम्हाला अर्धा तास लागला. खाली सुका पाचोळा आणि दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, याच्यामधून जाणाऱ्या चोंढातून चालत वरात चालली. पण तो सावलीचा आनंद जेमतेम दहा मिनिटे टिकला. पुढे पूर्ण उघडी बोडकी वाट आ वासून आमच्या समोर होती. खाणाखुणा बघत पर्वतच्या सोंडेवर चढलो.

गवत जाळून साफ केलेली वाट

पर्वतच्या पदरात दाट झाडी आहे, पण तिथे पोचेपर्यंत बिना छप्पर जाण्याला पर्याय नव्हता. वर दुपारच्या दोनचं रणरणतं ऊन डोक्यावर घेऊन चढणं भाग होतं. पर्वतवर मंदिर असल्याने गावकऱ्यांचा राबता आहे, यामुळेच वाट शोधायला फारशी अडचण येणार नव्हती इथून. त्यात वाटे जवळचं गवत जाळून वाट साफ केलेली होती. पण अर्थात त्याने उन्हाची दाहकता मात्र अजूनच जाणवायला लागली.

थोड्या थोड्या अंतरावर झाडी
मागे सुंदर डोंगर-झाडी

चला पुढच्या झुडपापर्यंत जाऊन जरा बसू, असं करत करत निघालो. पण अशी झुडपं सुद्धा तब्बल अर्ध्या-अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. पाणी-पाणी होत होतं. त्यात संत्री ऊर्जा देतात. जरा संत्री-ब्रेक घेतला. नंतर धबधब्याची जागा आली. इथे च्याऊ-म्याऊ खादंती ब्रेक घेतला. असे छोटे ब्रेक घेत, एका ठिकाणी दोन्ही बाजूंनी झाडांचं आच्छादन घेऊन आमची वाट बघत असलेल्या पायऱ्यांजवळ आम्ही पोचलो.

दोन्ही बाजूंनी झाडांचं आच्छादन असलेला पायऱ्यामार्ग
मंदिर कळस दर्शन

थोडे थोडके नाही, साडेचार वाजले होते. चढाई चालू करूनच अडीच तास झालेले. सकाळचा महिमंडण, दुपारचे जेवण आणि डोक्यावर ऊन. सगळ्याचा हा एकत्रित परिणाम होता. मग मात्र पुढच्या पंधरा मिनिटात मंदिराचं कळस दर्शन झालं. लगेचच "स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन" मंदिरात दाखल झालो.

आता निवांत वेळ होता. मंदिर पाहिलं, दर्शन घेतलं. विश्रांतीही घेतली, पण ह्यावेळी फार नाही. कारण सूर्य अस्ताला जाण्याआधी काही काम शिल्लक होतं. रात्री स्वयंपाक आणि एकूणच पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक होतं. अर्थात त्याची व्यवस्था करण्यासाठी लागणारं साहित्य आणि माहिती आमच्याकडे होती.

मंदिराच्या मागची विहीर

मंदिराच्या मागच्या बाजूला थोडंसं खाली उतरून, काही अंतरावर विहीर आहे. सगळं सामान इथेच मंदिरात ठेवून, आधी आमच्याकडच्या बाटल्या आणि मंदिरातली कळशी वगैरे घेऊन तिकडे निघालो. पाणी भरलं.

मागच्या बाजूचं टाकं

पण म्हटलं, परतण्याआधी ह्याच वाटेने पुढे जाऊन थोडा निवांत निसर्ग अनुभवावा. भरलेल्या बाटल्या तिथेच ठेवल्या. पर्वताच्या मागची, सातारा कडची बाजू कड्यावर बसून अनुभवली मग. इकडेही एक पाण्याचे टाकं आहे. पाणी घेऊन वर आलो. स्वयंपाकासाठी पाण्याबरोबरच सरपणाची ही गरज होती. झाडीच झाडी असल्याने, वाळक्या काटक्यांची कमतरता नव्हतीच. सगळी सोय झाली. सूर्य "उगवत्या वाडी"कडे मावळला.

निरभ्र आकाश आणि ओळखा बरं त्यात कोणतं हे नक्षत्र?

दुपारपासून निवांत थांबायला न मिळाल्याने ते सुख आता घेत होतो. सूर्य मावळला होता. आकाश निरभ्र होतं. शहरातल्या गजबजाटापासून, दिव्यांच्या प्रदूषणापासून खूप लांब पर्वतावर, होय शब्दशः "पर्वत"वर होतो. डोक्याखाली हात घेऊन निवांत पडायचं फक्त. ताऱ्यांकडे डोळे लावून नुसत्या डोळ्यांनी जे आकाश दिसतं, ते कॅमेरातून फोटोमध्ये उतरवायचं कसब माझ्याकडे नाही. त्यामुळे त्या ताऱ्यांची चमचम डोळ्यात भरून घेत होतो.

चूल मांडली...

मोबाईल नवीन असल्याने थोडे प्रयत्न केले, पण नंतर ते दिलं सोडून. नुसता काळोख अनुभवला. कितीही नको वाटत असलं, तरी एका क्षणाला उठावंच लागतं. चूल मांडली, साहित्य बाहेर आलं. सूप आणि जेवण. पापड, लोणचं जी काही व्यंजन होती, त्याने पान सजलं आणि जानेवारीच्या त्या थंडीत सुंदर पोट पूजा झाली. नियोजनातला एक टप्पा हा, म्हणजे एक रात्र पर्वत वर.. हे पूर्ण झालं! 

किल्ले महिमंडणगड, पर्वत आणि चकदेव - II


पर्वत - सूर्योदय रंगछटा

रात्रीचा काळोख जसा अनुभवावा, तशीच पहाटही अनुभवावी. रात्रीच्या काळोखात गंभीरता असते तर पहाटेमध्ये प्रसन्नता! सूर्यास्ताच्या वेळी शेवटचं अंतर सूर्य जसा झपकन कापतो, तसंच पहाटे परत येताना सुद्धा आगमनाचे संकेत देतो आणि मग एकदा डोकावल्यावर असा झरझर वर येतो की मिनिटांत डोळे दिपून जातात. फोटोसाठी ट्रायपॉड लावला, की आपण मोकळे होतो ते उगवते, केशरी सूर्यबिंब डोळ्यात भरून घेण्यासाठी... दोन्ही साध्य होतं!

सूर्योदय
सकाळच्या वेळी प्रसन्न मंदिर परिसर

बघता बघता सगळं उजळून गेलं. मंदिर प्रकाशात न्हालं. पाणी आणण्याचा कार्यक्रम परत झाला, परत चुल पेटली. क्या बताये, फक्कड पोहे-चहा अशी न्याहारी पण झाली.

काल चढलेला पर्वत आता उतरायचा होता. सकाळी उन्हं चढायच्या आधी आणि त्यातून उतरायचं म्हणजे अगदीच सोपं काम. पण म्हणून उगाचच वेळ काढला, तर चढणारं ऊन उतरल्यावर पुढच्या नियोजनाला मात्र त्रास देणार हे नक्की होतं.

पर्वत - निसर्ग समृद्धता

साडेआठला मंदिर सोडलं. धबधब्यापर्यंत यायला फक्त पाऊण तास लागला. काल चढताना जवळपास दुप्पट वेळ लागला होता. उतरत असल्याने तिथे जास्त थांबलो नाही. पण काल चढताना मात्र इथे खादंती ब्रेक घेतला होता. त्यावेळी दमलो तर होतोच, वरती ऊनही तापलेलं होतं.

निसर्ग आनंद

उन्हं असली तरी अंगातली मस्ती पण तशीच होती. त्यामुळे जरा पोटात पडल्यावर, बरोबरच्या बाटल्यांत पाणी शिल्लक असतानाही इथे मिळणारं ताजं पाणी, तेही दगडातून-झाडातून झिरपणारं, हातात घेऊन प्यायचा मोह आवरला नाही. धडपडत तिथे पोचून ते पाणी प्यायलं होतं. वर बाटलीतही भरून घेतलं होतं. त्यावर न थांबता, जरा आजूबाजूला झाडं-वेली उगाचच निरखत असताना मस्त एक वेलीचा झोपाळा मिळाला, तिथे झोपून झोकेही घेतले... पण हे काल.

आज मात्र फक्त बाटलीत पाणी घेतलं आणि झरझर खाली आलो. गाडी जवळ आलो, जरा पाण्यासाठी थांबलो असू फक्त. आज मात्र दुपारी दोनचं ऊन अंगावर घ्यायची इच्छा नसल्याने, पाण्याचा साठा घेऊन, लगोलग, अकरा - सव्वा अकराला पुनश्च ते घर सोडून चकदेव कडे निघालो.

चकदेव

जंगम यांचे घर वरती चकदेववरही आहे. खरंतर इथल्या लोकांचं मूळ घर वरती डोंगरावरच, पण येण्या-जाण्याच्या दुर्गमतेमुळे आता खाली जागा घेऊन इथेही हे लोक राहत आहेत.

त्यांचा मुलगा आमच्याबरोबरच वर येत होता. आम्ही त्याच्याच घरी मुक्काम करणार होतो आणि तोही वरती थांबणार होता. चकदेववरती अजूनही नांदती वस्ती असल्यामुळे गावकऱ्यांनी वरती जाण्यासाठी रस्ता करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात तो अपूर्णच आहे, पण काही अंतरापर्यंत धडपडत दुचाकी तरी नेता येऊ शकते.

मागे पसरलेला पर्वत

अर्धा तास चढून गेल्यानंतर मागे लक्ष केले आणि प्रचंड पसरलेला पर्वत दिसला. फोटोत तर मावतच नव्हता. अगदी वाईड-अल्ट्रावाइड कशातच.

हनुमंताचं ठाणं

बारा वाजून गेल्याने सूर्य त्याचे रंग दाखवत होता. वाटेत जिथे एक हनुमंताचं ठाणं आहे, तिथे पोचलो. आता इथे पोचलो म्हणजे बऱ्यापैकी पोचलो असा अर्थ होता.

दुपारी दोनचं ऊन डोक्यावर घ्यायचं नाही आणि जेवायला वरती पोचायचं, असं नियोजन होतं. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत पोचलो पण. नुसतं पोचलो नाही, तर दीड वाजताच गरमागरम भरलं ताट समोर घेऊन बसलो होतो.

आता काळजी नव्हती. चेपून जेवा, कुठेही पर्वत, काय साधा डोंगर सुद्धा चढायचा नव्हता. तुडुंब जेवलो आणि ढेकर देतानाच समोर चक्क पातेलं भरून ताक. अहाहा... काय ताक प्यायलोय!

जे झोपलो ताणून, ते सरळ चार वाजता बळंच उठलो. कारण चढायचं नसलं, तरी डोंगर फिरायचा होता. सूर्य आमच्यासाठी थोडीच थांबणार होता?

चकदेव महादेव मंदिर

चकदेवरच्या शंकराच्या मंदिराबाहेरुनच सध्या नमस्कार केला. "वाईच जरा येतोच फिरून" असं महादेवाला सांगून, सगळ्यात आधी चकदेवच्या एकदम मागच्या टोकाकडे निघालो. वाटाड्या बरोबर असल्याने वाटेची काळजी नव्हती. थोडी काळजी होती ती गव्यांची. ह्या डोंगरावर भरपूर गवे आहेत. इतके, की इथे राहणाऱ्या लोकांना शेती सुद्धा करून देत नाहीत. झुंडच्या झुंड शेतात घुसली की सत्यनाश.

गवे शक्यतो मुद्दामून अंगावर येत नाहीत म्हणा. पण त्यांचं काय हो, शेकडो किलोचं ते धूड. तो नुसता फिरायला जरी कुठे जात असेल आणि जाता जाता चुकून धक्का लागला, तरी आपल्याला तो सॉरी म्हणालेला ऐकायला आपण ढगात असणार की...

कानोसा घेत घेत पुढे जात होतो. काही पाणवठे आले. इकडे फार पाणवठे नसल्याने जे काही उरलं-सुरलं पाणी आहे, ते पिण्यासाठी येऊ शकतं की कोणी. पण सुदैवाने कोणाला तहान लागलेली नसावी.

राकट सह्याद्री

एका झाडी मधून चिंचोळ्या वाटेवरून पुढे पोचलो. जवळच आलं होतं डोंगराचं टोक. इथून पलीकडचा सह्याद्री त्याचे राकट दर्शन देत होता. जरा फोटो काढू, म्हणून कड्याजवळ गेलो. आमच्या उजवीकडे याच डोंगरावरचा एक भाग थोडं अंतर राखून पुढे आलेला होता. मध्ये दरी होती. त्यामुळे तो सरळ जोडलेला नव्हता आणि तिकडे लक्ष गेलं, तर तिकडून गवे महाराज आमच्याकडेच बघत होते की...

गवा महाराज

हायला... चारही पायात गुडघ्यापर्यंत पांढरे मोजे घातल्यासारखे पाय. शिंगं तर अगदी राजा-सर्जा वगैरे नाव शोभावं अशी मस्त गोल. आणि ते धूड आमच्याकडे पाहत होतं की! पण धोका दिसत नव्हता, उलट "कोण आलेत धडधडायला काय माहिती? सुखाने चारा पण खाऊ देत नाहीत हे कुडमुडे लोक" असेच भाव दिसले त्याच्या तोंडावर. तरी नशीब आमचं, की हे कोण क्षुद्र प्राणी तडमडायला आले एवढेच भाव होते आणि मुख्य म्हणजे त्याच्या आणि आमच्या डोंगराच्या भागात मध्ये असलेली दरी.

पंक्तीला आपण शांतपणे जेवताना मध्ये-मध्ये बडबड करत शेजारी कोणी येऊन बसला, की कसं, आपण आपलं ताट घेऊन मुकाटपणे दुसरीकडे जाऊन बसतो, तसाच चक्क तोंड फिरवून तोही आमच्या बाजूला पार्श्वभाग करून, त्यावरून शेपट फिरवत गेला निघून.

कड्यावरून पलीकडे दिसणारी डोंगर-रांग

हायसं वाटलं. पण काळजीही होती, की आम्हाला आल्या वाटेनेच परत जायचं होतं ना... पण सध्या तो विचार झटकला. आम्हाला जे फोटो घ्यायचे होते ते घेऊन निघालो.

घाट आणि कोंकण जोडणाऱ्या वाटेवर शिडी

इकडे खालच्या बाजूला कोकणातलं आंबिवली गांव. खालून गावातून इथे वरती यायला वाट आहे. ह्या वाटेच्या एका टप्प्यावर एक शिडी बसवलेली आहे. ट्रेक करताना आंबिवली गावातून वर शिडीच्या बाजूने चकदेववर येऊन शिंदी गावात उतरून किंवा बरोबर उलट, म्हणजे शिंदी गावातून वर येऊन खाली शिडीने आंबिवलीला उतरतात. पण आमचं नियोजन निवांत होतं, आम्हाला पर्वत आणि चकदेव, दोन्हींवर मुक्काम करून इथून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायचा होता. त्यामुळे आंबिवलीत न उतरता, शिडी पाहून परत वस्तीला वर जायचं होतं.

शिडीच्या वरच्या टोकाला गणपती

शिडीच्या वरच्या टोकाला काही पायऱ्या आहेत. इथे दगडावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. त्याचं दर्शन घेऊन शिडी जवळ आलो. शिडी उतरून खाली आलो, फोटो वगैरे काढले आणि जरा वेळ थांबून परत चढून वर गेलो.

इथल्या गणपतीचा निरोप घेतला. आल्या वाटेने परतताना, चहूबाजूला त्या गायब झालेल्या गव्याचा कानोसा घेत होतो. तो कुठेतरी जात असताना आम्ही त्याच्या मार्गातला स्पीड ब्रेकर होऊन, आम्हाला तो धडकून पडू नये एवढीच इच्छा होती आमची. पोचलो मंदिरापर्यंत. पण अजून सूर्यास्त बघायला खास ठिकाणी जायचं होतं.

सूर्यास्त पाहण्यासाठी खास जागा

मंदिराच्या मागच्या बाजूला, डोंगराकडच्या टोकाला एक दीपमाळ-वजा स्तंभ आहे. खास चकदेववरचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी इथे ठिय्या मांडला. परत ट्रायपॉड बाहेर काढला. मोबाईलला त्याचं काम करू दे, म्हणून आपण सूर्याकडे डोळे लावले.

चकदेव - सूर्यास्त

सुर्यानेही आम्हाला फार वेळ वाट बघायला लावलंन नाही. त्यालाही परतायची घाई असावी. अथांग डोंगरांच्या मागे क्षितिजाआड तो दडून गेला.

मुक्कामाचे ठिकाण हे शेजारीच असतं, तर इथेच बसलो असतो. इथून हलायची इच्छा कोणाला होणार म्हणा. पण अजून असलेला अंधार आणि गवे ह्या दोन्ही गोष्टी आणि त्याचं होऊ शकणारं डेडली कॉम्बिनेशन तर अजूनही परवडणार नव्हतं. तरीही सूर्याच्या मागून सगळी आवराआवर झाली ना, ह्याची खात्री करत जाणारा त्याचा सोनेरी प्रकाश अंधुक होईपर्यंत काही हललो नाही.

मग मात्र पटापट परत येत मंदिरात आलो. इथे पोचलो म्हणजे आपल्या गल्लीत आलो होतो. मंदिरात निवांतपणा होता. त्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर परतून स्वयंपाक आम्हाला करायचा नव्हता. थोडा वेळ देवाला द्यावा म्हणून, छे हो... देवाला काय द्यायचा? हे तर कारण फक्त. खरं तर त्या निमित्ताने देवाचाच वेळ आपल्यासाठी मागून घ्यावा आणि वरती त्याच्याकडेच काहीतरी मागायचं हो! माणूस शेवटी स्वार्थी.

असो... पण काही का कारणाने म्हणा, तिथे बसलो. काही म्हणा, शहरातली मंदिरं आणि इथे फरक पडणारच. नेहमीच्या शहर-गावांच्या गजबजाटापासून दूर डोंगराच्या माथ्यावरच्या मंदिरात काही मिनिटं ध्यान लागलं ना, की प्रचंड प्रसन्न वाटतं. ती प्रसन्नता भरभरून घेतली आणि ह्या महादेवानंतर वस्तीतल्या हनुमानाला आणि खंडोबालाही रामराम करत परतलो.

चकदेव वरून दृश्य

फार छान झोप लागली. परत पहाटे उठून, आवरून, पाठीवर सामान घेऊन सूर्योदय बघायला मंडळी सज्ज. आता मात्र वाटाड्या बरोबर नव्हता. वाटाड्या आणि कुटुंबियांना टाटा करून, दुसऱ्याच वाटेने निघालो. ही वाट सरळ शिंदी गावात पोचते. डोंगर दोन वाटांनी फिरल्याचं समाधान.

चकदेव - सूर्योदय

वेळेवर निघालो होतो. थोड्या वेळात सूर्य डोकवायला लागलाच. ही वाटही काही जवळची नव्हती. डोंगर सपाटीवरून चालत चालतच तास निघून गेला आणि मग सरळ उतार. पण ही वाट तर आम्ही वर आलो त्यापेक्षा मस्त निघाली. काय ते डोंगर, काय ते झाडी वगैरे...

चकदेव वरून शिंदी गावात उतरणाऱ्या ह्या वाटेवरचे दृश्य

आलो की झपाझप खाली. थोडसं कंटाळवाणं काम म्हणजे, ह्या शिंदी गावात जिथे उतरलो, तिथपासून ज्या वाडीत जंगमांच्या घरात आम्ही गाडी लावली होती, तिथपर्यंत रस्त्यावरून चालत जायचं. पण हरकत नव्हती. घाई नव्हती. निवांत गप्पा मारत पोचलो आम्ही.

पाच वर्षांपूर्वी ठरवलेलं नियोजन पूर्णत्वास आलं होतं. त्यावेळी असं नियोजन होऊन, तसा वेळ मिळून सुद्धा काही कारणाने ते रद्द करावं लागलं होतं. रद्द झालेल्या नियोजनाची रुखरुख किती काळ मनात असावी? पण पाच वर्षांनी का होईना, तो योग आला आणि उत्तम अनुभवलाही. दरवेळी एका दिवसात दोन-दोन तर कधीकधी तीन-तीन ठिकाणं बघायच्या झपाट्यात निवांतपणा मिळत नाही. नाही, आवडत नाही असं अजिबात नाही. पण वेळेच्या बंधनापोटी करावं लागतं. म्हणून हे निवांत नियोजन कधीतरी होतं.

ठरल्याप्रमाणे पर्वत आणि चकदेव, दोन्ही वरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता आला. डोळ्यात भरून घेता आला. निरभ्र आकाशातलं चांदणं, डोक्यावर त्याचंच छप्पर घेऊन, डोळे भरून घेता आलं. मस्त थंडीत डोंगराच्या माथ्यावर जेवता आलं. सूर्योदय, तोही हातात गरम चहाचा वापरता कफ घेऊन पाहिला. त्या उन्हातून डोंगर चढताना, सावलीत विसावा घेत, संथ ओढ्यातलं, कपारीतून झिरपणारं पाणी डोळ्याला लागलं. ओंजळ करून त्या पाण्याचा घोट घेता आला... दिवस सार्थकी लागले!!!








किल्ले नाकविंदा आणि बाडगीची माची


किल्ले नाकविंदा

हम्म्.... मथळ्यात असलेली दोन्ही नावं कदाचित ओळखीची वाटत नसतील. नाही, तुमचं चुकत नाहीये. वाटणं साहजिकच आहे, कारण ही दोन्ही नांवं तशी अल्पपरिचितच.

आपल्याकडे काय झालं, की १८१८ सालानंतर बहुतांशी किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी नंतर ते मराठ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या किल्ल्यांना सुद्धा घाबरत असल्याने हे सगळे किल्ले उध्वस्त करण्याचा सपाटाच लावला. ह्यात हरिहर सारखा एखादा किल्ला मात्र नशीबवान ठरला. हरिहर किल्ल्याच्या पायऱ्यांना कॅप्टन ब्रिक्स नावाचा इंग्रज भुलला आणि ते सौंदर्य त्याने उध्वस्त होऊ दिलंन नाही. पण तसा इंग्रज सगळ्याच किल्ल्यांना लाभला नाही. उलट त्यांच्या नशिबात आला तो तोफगोळ्यांचा माराच.

शत्रूंनी तोफगोळे डागून उध्वस्त केलेले असे अनेक किल्ले सह्याद्री बाळगून आहे ते मराठ्यांच्या सहज शरण न येण्याच्या आणि शस्त्रे खाली ठेऊन हार न पत्करण्याच्या ताठ बाण्यामुळेच. अन्यथा मराठ्यांच्या राज्याचा भाग नसलेले किल्ले आपले दिखाऊ सौंदर्य आजही दिमाखात मिरवत आहेत. पण अश्या दिखाऊ सौंदर्यावर मात करत उजवं ठरतं ते मराठ्यांच्या किल्ल्यांच्या उध्वस्त अवशेषांतुन उलगडून दिसणारं मराठ्यांचं शौर्य!

असे खूप किल्ले ह्या परकीयांच्या आक्रमणात उध्वस्त झाले. हे परकीयांचे आक्रमण संपले, देश स्वतंत्र झाला, पण त्यानंतर स्वकीयांनी शत्रूची उणीव भासू दिली नाही. ह्या स्वकीयांच्या अतिक्रमणात थोडे भाग्यवान ठरले ते गिरदुर्ग. त्यावर तेवढे अतिक्रमण झाले नाही, कारण गरज भासली नसावी किंवा करताही येत नसावे. कदाचित सोयीचही ठरलं नसावं.. जे काही असेल ते. पण भुईकोट किल्ले मात्र इथे हरले. विविध वास्तूंचे दगड घराच्या बांधकामाला वापरले गेले. उभी असलेली तटबंदी काही घरांच्या भिंतीचा भाग बनली, तर काही ठिकाणी हद्द म्हणजे चक्क बुरुजातच संसार थाटले गेले.

पण परकीय आक्रमण आणि स्वकीय अतिक्रमण कशानेही म्हणा पण आपला ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू, किल्ले उध्वस्त होत राहिले आणि ऱ्हास होत गेला.

किल्ले नाकविंदा (पिंपळगांव-नाकविंदा गावातून)

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील "पिंपळगाव नाकविंदा" गावात एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालाही अश्याच प्रकारे सामना करावा लागला असणार. अगदी किल्ल्याचे अस्तित्व ओळखू न येण्याइतकी स्थिती होण्यापर्यंत, अश्याच अनेक कारणांनी हा या अवस्थेत पोचला असणार हे नक्की. इथे कदाचित हा मान इंग्रजांना द्यावा लागेल कारण उध्वस्त झालेल्या कातळकोरीव पायऱ्या.

त्यात ह्या बिचाऱ्या किल्ल्याचा उल्लेख स्पष्टपणे असा इतिहासात महत्वाच्या घटनांशी संबंधित फार सापडत नाही. त्यामुळेच हा किल्ला जणू काही काळाच्या पडद्याआड गेला. परंतु सुदैवाने दुर्गप्रेमी आणि संशोधकांच्या अभ्यासामुळे तो पुन्हा प्रकाशात आला. शिवाजी महाराजांनी पट्टा किल्ला नंतर २३ किल्ले काबीज केले त्यात ह्या किल्ल्याचा समावेश असावा. ह्याचे स्थान आणि बांधणी पाहता, ह्या किल्ल्याचा उद्देश हा टेहळणीच्या दृष्टीने असावा असं वाटतं.

थोडक्यात हा किल्ला अत्यंत दुर्लक्षित आहे. ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी ठरल्यावर नेहमीप्रमाणे पुण्याहून रात्री आमचा प्रवास चालू झाला आणि पिंपळगाव नाकविंदा गावात रात्री २ च्या सुमारास दाखल झालो. वाटेत एक गंमत घडली, त्यामुळे जरा सावधपणेच झोपलो. पहाटे उठून आवरताना नेहमी गावकऱ्यांशी बोलून, माहिती विचारायची सवय आहे. त्याने एक तर आपल्याला आपण घेऊन आलेल्या महितीपालिकडे काही नवीन माहिती मिळते आणि गावातही कल्पना राहाते की काही लोक गडावर चालले आहेत, जेणेकरून काही गरज लागली तर मदतीसाठी ते धावूनही येऊ शकतात.

इथे सकाळी चौकशी करताना मात्र एक आज्जी म्हणाल्या, की गावातील लोकांनी मिळून निर्णय घेतलेला आहे, की कोणालाही गडावर जाऊ द्यायचे नाही. आता आली पंचाईत... गडावर तर जायचं होतं. मग काहीही न बोलता ठीक आहे म्हणून तिथून निघालो. तोपर्यंत दुसऱ्या एका गावकऱ्याशी आमच्या सहकाऱ्यांनी भेटून रस्ता विचारला होता आणि सुदैवाने थोडी माहिती मिळाली होती. पण आता कोणी अडवणूक करू नये म्हणून आम्ही चटकन सगळं आवरून गडाकडे कूच केली.

आता कारण सांगतो त्या आजीने आणि गावकऱ्यांनी असं ठरावण्यामागचं. ते म्हणजे या किल्ल्यावर असलेले आग्या मोहोळ. आग्या मोहोळ म्हणजे अत्यंत रागीट आणि विषारी अशा मधमाशांची पोळी. काही वर्षांपूर्वी या किल्ल्यावर भटकंतीला गेलेल्या ३-४ मंडळींचा मधमाशांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. हेच महत्त्वाचे कारण आहे इथे प्रतिबंध घालण्यासाठी. पण आम्हालाही हे माहिती होतंच. मग किल्ला तर पहायचा आहे आणि धोकाही पत्करायचा नाही, मग त्यासाठी आमच्या दृष्टीने आम्ही सगळी तयारी केलेली होती आणि त्यामुळेच ही माहिती असून सुद्धा आम्ही या किल्ल्यावर जाण्यासाठी इथे दाखल झालो होतो.

किल्ल्याच्या वाटेवर

आम्ही या गावातील शेवटी असलेल्या हनुमंताच्या मंदिरात मुक्कामाला थांबलो होतो. इथून गावाच्या मागे पुर्व-पश्चिम पसरलेला डोंगर व त्यावरील छोटी कातळटोपी आपल्याला दिसते. हाच नाकविंदा किल्ला. ह्या डोंगरचा आकार निमुळता असुन त्याला लागुन असलेल्या दोन्ही सोंडा गावाच्या दिशेने खाली उतरतात. या दोन्ही सोंडेवरून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. यातलीच एक वाट निवडून आम्ही गडाकडे चढायला सुरुवात केली. आता इथला अभ्यास तर आम्ही करून आल्यामुळे ही कल्पना होती, की एका खड्या चढाईनंतर पुढे एक पठार लागते. त्या पठारापर्यंत काहीच धोका नाही. त्या पठाराच्या पुढे जी शेवटची कातळ टोपी आहे. त्या कातळ कड्यातच काही गुहा आहेत आणि त्या गुहांच्या वरती ही मोहोळ आहेत. त्यामुळे पठारापर्यंत आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीनेच आणि पोशाखात गेलो.

पठारावरून किल्ला आणि विरुद्ध बाजू

पठारावर पोचल्यावर एक छोटा ब्रेक घेतला तिथे आम्ही उजळणी केली, की मधमाशांचा हल्ला कशाप्रकारे होऊ शकतो आणि हल्ला झाल्यास काय करायचं. मधमाशांचा हल्ला जणू होणारच आहे अशा पद्धतीनेच आम्ही तयारी केली होती. त्या पोशाखात आम्हाला बघून चटकन तोंडावर आलं ते "ट्रेकर्स ए मुस्तफा".

ट्रेकर्स ए मुस्तफा

अशाप्रकारे आम्ही मुस्तफा त्या गडाकडे निघालो. अत्यंत सांभाळून जात कोणत्याही प्रकारचा आवाज न करत, अगदी आमचे मोबाईलही सायलेंटवर ठेवलेले असल्याने त्याचाही आवाज न होणार अशा पद्धतीनेच आम्ही निघालो.

वाटेवरील पाण्याची टाकी आणि वरती मोहोळ

सुरवात केल्यानंतर कडा उजवीकडे ठेवत त्याला बिलगून जाणाऱ्या वाटेने पाच मिनिटांतच कड्यात कोरलेल्या पाण्याच्या पहिल्या टाक्याशी पोचलो. ह्या टाक्याच्या वरच्या बाजूलाच ५-७ माणसं बसू शकतील अशी एक अर्धवट कोरलेली गुहा आहे. खरंतर या गुहेत जाण्यासाठी इथेही खाचाही कोरलेल्या आहेत अशी माहिती होती. इतर गोष्ट असती तर गुहेत जायचा प्रयत्न आम्ही केला असता नक्की. पण तिथली स्थिती वेगळी होती. त्यामुळे आम्ही त्या मुद्दलातल्या खाच्या बघण्याच्या मनस्थितीत नव्हतो, तर त्या मुद्दलावर असलेलं व्याज, म्हणजे गुहा बघण्यासाठी, खाचातून वर गुहेत जाणं तर फार लांबची गोष्ट होती. या गुहांच्या वरतीच ही आग्या मोहोळ याची पोळी आहेत.

या गुहेच्या पुढे कड्यात कोरलेली पाण्याची अजून दोन टाकी आहेत. या अत्यंत निमुळत्या वाटेवर कातळात काही खाचा कोरलेल्या दिसतात. वाट निमुळती असल्यामुळे आधार म्हणून खांब रोवता यावेत यासाठी या खाचांचा वापर करण्यात येत असे. पुढे गेल्यावर अजून एक चौथं टाकंही दिसलं. खरं सांगायचं तर वर जाताना इतक्या बारकाईने हे सगळे अवशेष दिसलेच नव्हते, म्हणजे तसं लक्षही नव्हतं.

वाटेवर

ठरल्याप्रमाणे काळजी घेत, कोणताही आवाज न करता, मध्ये मध्ये वर बघून निरखत, आजूबाजूचा अंदाज घेत आम्ही तो टप्पा पार केला. कोणताही आवाज न करता, म्हणजे अक्षरशः एकमेकांना सुद्धा हाका तर सोडाच, काहीही न सांगता, रस्ता सुद्धा खाणाखुणांच्याद्वारे आम्ही सांगत होतो. कदाचित ही काळजी कोणाला अति वाटू शकेल, पण आम्हाला धोका पत्करण्यात कोणताही रस नव्हता. "दिसली छान जागा की काढ फोटो" या संघटनेचा अध्यक्ष, म्हणजे अस्मादिक, म्हणजे मी स्वतः, आम्ही मोबाईल तर खिशातून बाहेरच काढला नव्हता.

माथ्यावर जाणारा धोकादायक कातळटप्पा

हा धोकादायक टप्पा पार केल्यानंतर थोडी रुंद जागा मिळाली. इथे एक छोटीशी खिंड आहे. म्हणजे डावीकडे एक याच डोंगराचा छोटासा भाग, मध्ये एक छोटी खिंड आणि उजवीकडे जो भाग आहे तो किल्ला. पण या किल्ल्यावर जायचा मार्ग मात्र इथे खडतर आहे. कारण इथे एक छोटा कातळ टप्पा पार करायला लागतो, जो अतिशय धोकादायक आहे.

किल्ला माथा

कुठल्याही भटकंतीत अगदी अतिशय साध्या आणि सोप्या ठिकाणी जायचं असलं, तरी काही गोष्टी आम्ही कायम जवळ बाळगत असतो. जसं प्रथमोपचाराची साधनं आणि एक छोटी प्रस्तरारोहण करण्यासाठी कामात येणारी दोरी म्हणजे रोप. अनेक ठिकाणी भटकंती करून सुद्धा आम्हाला या रोपचा कधी वापर करायची गरज पडली नव्हती, परंतु यावेळी मात्र ती दोरी बाहेर काढली. अत्यंत काळजीपूर्वक चढाई करून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो.

माथ्यावरील पाण्याचं टाकं

गडाचा माथा अत्यंत निमुळता असून आम्ही पहिल्यांदा सर्वात शेवटच्या टोकाशी गेलो. इथे फार अवशेष शिल्लक नाहीत. काही कोरडी टाकी आहेत आणि त्याचबरोबर झाडीमध्ये काही तटबंदीचे घडीव दगडही पडलेले दिसतात. अवशेष फार नसले तरी नशीब जोरावर असेल, तर वातावरण स्वच्छ असल्यास नाकविंदाच्या माथ्यावरून कळसूबाई शिखर, अलंग-मदन डोंगररांग, रतनगड, पाबरगड असे किल्ले पाहता येतात. चेमदेव डोंगर देवस्थानही इथून समोरच दिसतं.

चिंचोळ्या वाटेवरची पाण्याची टाकी
पठारावर सुखरूप परत

अवशेष पाहून पुन्हा त्याच कातळटप्प्यावरून अतिशय सावधानतेने खाली उतरलो आणि परत एकदा मुस्तफाचा वेष परिधान करून त्या गुहा, मधमाशा आणि निमुळत्या वाटेवरून पठारावर परत आलो. येताना मात्र अवशेष नीट बघितले, फोटोही जरासे काढता आले. काळजी घेत घेतंच हे केले. इथे परत आल्यानंतर मग हायसं वाटलं. धोकादायक मानला गेलेल्या स्थितीतला हा किल्ला आमच्या पदरात पडला होता. निवांतपणे खाली आलो.

किल्ले नाकविंदा (गावाच्या पलीकडील बाजूने)

खाली आल्यावर, आम्ही मुक्कामाला थांबलेल्या हनुमानाच्या मंदिराच्या मागे जी शाळा आहे, तिथल्या शिक्षकांनी वगैरे आमची चौकशी केली. मोहोळाचा काही त्रास नाही झाला याची खात्री केली आणि आम्हाला पुढे तिथे जायचे होते तिथल्या वाटेचे मार्गदर्शनही केले.

आता सांगतो की आम्ही जी काळजी घेतली मधमाशांपासून ती म्हणजे काय घेतली.

१) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जंगलात किंवा जिथे कोणत्याही वन्य प्राण्यांचा धोका असू शकतो अशा ठिकाणी अजिबात भडक रंगाचे कपडे घालायचे नाहीत. निसर्गाच्या रंगात लपून जातील अशा प्रकारचे फिक्‍या रंगाचे कपडे वापरायचे.

२) कोणत्याही प्रकारच्या वासाचे अत्तर किंवा बॉडी स्प्रे, परफ्युम, डिओ असे वापरायचे नाहीत. आपल्याला कितीही घाम येऊन त्याचा उग्र वास येत असेल तरी तो धोकादायक ठरत नाही, पण कोणत्याही वासाचं अत्तर वगैरे वापरल्यास तो वास अशा अपघातांना कारणीभूत ठरू शकतो.

३) जे काही कपडे वापरायचे ते आपलं अंग जास्तीत जास्त झाकून ठेवतील अशा पद्धतीचे वापरायचे. तसेही कोणत्याही प्रकारच्या भटकंतीला जाताना आम्ही हाफ शर्ट, हाफ पॅन्ट अशा प्रकारचे कपडे कधीच वापरत नाही. पण इथे तर खास करून पूर्ण चेहरा झाकून जाईल, डोक्यावर टोपी आणि त्यानंतरचा मानेचा जो भाग उघडा राहतो, तिथेही स्कार्फ वगैरे किंवा रुमाल अशा पद्धतीने अंग झाकून घेतले.

४) पायात कधीही चप्पल न वापरता, कायम सॉक्स आणि बूट हे तर वापरतोच. त्यातून इथे जास्तीची सुरक्षा म्हणून कितीही उकडत असलं, तरीही नेहमीच्या कपड्यांवर जर्किन, डोळ्याला गॉगल असा आमचा "मुस्तफा" पोशाख होता.

५) एवढी काळजी घेऊनही, कोणत्याही प्रकारचा आवाज होणार नाही याची दक्षता घ्यायची असते. कारण उग्र वास, आवाज, रंग हे मधमाशांना/प्राण्यांना आकर्षित करतात किंवा त्यांना धोका वाटून स्वसंरक्षणासाठी त्या चवताळून उठतात.

अशाप्रकारे काळजी घेऊन हा ट्रेक आम्ही सुरक्षित पूर्ण केला.

बाडगीची माची

मूर्तस्थान म्हणून भूगोलात एक कोपरा अडकवून बसलेले सामान्य ठिकाण अचानक नशीबवान ठरते, त्या स्थानाच्या भाग्यात एखादी असामान्य व्यक्ती येते आणि आणि मग त्याची नोंद इतिहासात घेतली जाते आणि ते स्थान तीर्थस्थान होऊन जाते. पावनखिंड हे तर सर्वांना परिचित नांव, जे बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झाले आणि त्याला इतिहासात अढळ स्थान मिळाले. तसेच एक दुसरं स्थान म्हणजे कण्हेरगड, ज्याच्या भाग्यात रामजी पांगेरा आले आणि ते इतिहासात नोंदले गेले. हे जरा कमी परिचितच, पण त्याहूनही अल्पपरिचित आणि दुर्दैवाने भटक्यांपासून सुद्धा अलिप्त राहिलेले स्थान म्हणजे "बाडगीची माची".

यापूर्वी या भागातल्या चेमदेव डोंगराला भेट दिली होती. तसंच बितनगड उर्फ बीटका हा किल्लाही पाहून झाला होता. परंतु त्याच्या शेजारी असणाऱ्या, डोंगराच्या कुशीतल्या, बाडगीच्या माचीची माहिती मात्र तेव्हा नव्हती.

"ऑक्टोबर हिट"... त्यामुळे वास्तविक नाकविंदा किल्ल्याला भेट दिल्यानंतर त्या तळपत्या उन्हात केलेल्या भटकंतीमुळे जीव अर्धा झालेला होता. त्यातच मला घरून मुलीची तब्येत बरी नसल्याचं कळलं आणि चलबिचल चालू झाली. पण घरातली स्थिती बायको सांभाळून घेत असल्याने ती काळजी मिटली आणि एवढ्या लांब आलो आहोतच तर ठरलेल्या प्रमाणे बाडगीच्या माचीला भेट देऊनच परत जाऊ असा निर्णय झाला.

कुठेही भटकंती करताना त्या ठिकाणाचा अभ्यास आम्ही करून जात असतो. वाचनाबरोबरच जर तिथे आधी जे कोणी जाऊन आलेले असतील, त्यांनी मॅप रेकॉर्ड करून ठेवलेला असेल तर त्याचीही मदत आम्ही घेत असतो. जेणेकरून वाट शोधण्यात आमचा वेळ न जाता आमची भटकंती वेळेत पूर्ण होईल आणि चुकलो तरी त्याच्या मदतीने निदान परत तरी येऊ शकू.

गावातून माची परिसर

परंतु या ठिकाणाला आधीच म्हटल्याप्रमाणे दुर्लक्षित असल्याने, ह्याचं मॅप रेकॉर्डिंग काही मिळालेलं नव्हतं. त्यामुळे विचारत-विचारत, वाट काढत तिथे पोचायचं हे ठरवूनच निघालो. गावात चौकशी केली आणि माचीचं स्थान नक्की केलं. त्यानंतर तिथे जाणारी वाट विचारून घेतली. गावातल्या लोकांना तिथल्या वाटा तोंडपाठ असतात. त्यामुळे त्यांना समोर दिसणाऱ्या असंख्य वाटांमधून बरोबर वाट कोणती ते अचूक समजतं आणि नवीन येणारा माणूस मात्र सहज गोंधळून बसतो. गावकऱ्यांनी सांगताना ही वाट सरळ जाते असं जरी सांगितलं, तरी काही वेळा पुढे गेल्यावर त्यांच्या डोक्यातही न येणारी वाट नेमकी आपल्याला दिसते आणि गोंधळ उडतो.

इथेही असंच झालं. समोरच बाडगीची माची दिसत असून सुद्धा वाटेची माहिती चौकशी करताना काहीतरी गोंधळ झाला आणि आम्ही नेमकी एक डावीकडची वाट पकडली, जी त्यांनी सोपी पडेल म्हणून सांगितली होती. परंतु ती वाट एका ठराविक ठिकाणी सोडून दुसरी वाट पकडायची हे मात्र त्या गोंधळात आम्हाला सांगणं महत्त्वाचं त्यांना वाटलं नसावं किंवा राहून गेलं असेल. पण त्यामुळे आम्ही चुकलो हे मात्र नक्की.

माचीचं टोक

अर्थात हे काही लगेच लक्षात नव्हतं आलं. त्यांनी दिलेल्या वाटेने आम्ही निघालो. वाट मळलेलीच असल्यामुळे काही चुकतंय असं आम्हाला वाटतंच नव्हतं. उजव्या बाजूला त्या माचीची सोंड आम्हाला दिसत होती, पण वाट विचारून निघालेले असल्याने हीच वाट बरोबर असणार. सरळ नाकाडाने वर न चढता, हीच वाट पुढे हळूहळू लांबून वरच्या बाजूला आम्हाला घेऊन जाईल, असा आमचा समज झाला.

वाटेने जाताना प्रचंड कारवी फुललेली आम्हाला लागली. त्यातूनच मळलेली वाट पुढे जात होती, पण काही अंतर गेल्यावर मात्र वाट अस्पष्ट होत गेली. आणि मग एका बाजूने पुढे जाऊन बघ, दुसऱ्या बाजूने पुढे जाऊन बघ... असं करत करत आमच्या लक्षात आलं, की माची फारच उजव्या बाजूला राहिली आहे आणि आम्हाला आता हळूहळू उजवीकडे जाणं भाग आहे. पण तशी वाट काही दिसत नव्हती. उजव्या बाजूला वरून येणारा एक ओढा, त्याच्या समांतर आम्ही चालत होतो. मग अशा एका जागी येऊन थांबलो की जिथून ओढा पार करणं शक्य होतं. जागा थोडी अरुंद होती.

अस्मादिक

पलीकडच्या बाजूला एक वाट दिसली आणि बऱ्यापैकी वाटायला लागलं की त्या वाटेने आपल्याला माचीवर जाता येईल. किमान योग्य वाटेवर तरी आपण पोहोचू. मग तो ओढा ओलांडला आणि थोड्याच वेळात आम्हाला योग्य वाट सापडली. मुळातच त्या उन्हामुळे नाकविंदा किल्ल्यावरून जो जीव अर्धा झाला होता त्यात नंतर वाट चुकल्यामुळे माझी तर बऱ्यापैकी तयारी झाली होती की इथूनच मागे फिरायचं. पण चिकाटी सोडली नव्हती, थोडं बघू, अजून जरा कळ काढून पाहू... अशातच योग्य वाटेला लागलो.

कारवी - पायघड्या
कारवीच कारवी चहूकडे, गं बाई, गेला ट्रेकर कुणीकडे

मग मात्र आमच्या प्रयत्नांना दाद म्हणून की काय, पण कारवीच्या चक्क पायघड्या घातलेल्या मिळाल्या... दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात फुललेली कारवी, मधून जाणारी चिंचोळी, निमुळती वाट आणि त्यावर अगदी निळ्याशाsssर कारवीच्या फुलांच्या पायघड्या! आता अशा फुलांवरून पाय देत जाणं कितीही नकोसं वाटलं, तरी वाट तीच असल्यामुळे त्याला पर्याय नव्हता. चहुबाजूने फुललेल्या कारवीचा आनंद घेत, उजवीकडची वाट पक्की धरत आम्ही माचीच्या पठारावर आलो. इथे पोचल्यावर मनावरचं आणि पाठीवरचं सगळं ओझं उतरवून ठेवलं आणि त्या ठिकाणाचा मनमुराद आनंद घेतला...

माचीच्या टोकावरून माची परिसर

भूगोलातून इतिहासात स्थान मिळवण्यासाठी या ठिकाणाच्या भाग्यात आले ते क्रांतिकारी राघोजी भांगरे. १८०५ साली राघोजी यांचा जन्म रमाबाईंच्या पोटी ह्याच अकोले तालुक्यातल्या देवगाव गावात झाला. काही आदिवासी ओव्या याबद्दल गायल्या जातात. रमाबाई जणू म्हणतात की,

रमाबाई म्हणे तो राघू, माझा तो लहान|

मावळे मुलखाचा ग राजा, होईल महान||

आणि ते खरं निघालं. वडील रामजी यांनी त्यांचे गुरु बनून आपल्या मुलाला सगळ्या विद्यात पारंगत केलं. १८२१ मध्ये त्यांना आणि गोविंद खडे/खरे यांना रतनगडच्या उठावात पकडण्यात आलं. नंतर पुढच्या ५ वर्षातच क्रांतीची नांदी झाली. राघूचा बंड.

रमाई बाई बोल, तू गं राघू माझ्या तान्ह्या|

राघू माझ्या तान्ह्या, जातो बाडगीच्या पाण्या||

या अशा ओव्या आदिवासी बांधवांमध्ये गायल्या जातात.

इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या बंडकऱ्यांचे निवासस्थान म्हणजे सोनोशी ता. इगतपुरी जि.नाशिक. हे बंडकरी क्रांतिकारी लोक इथल्या डोंगरांमधल्या गडदींमध्ये, म्हणजे गुहांमध्ये भूमिगत होण्यासाठी यायचे. या इथल्याच घनदाट जंगलात एका डोंगराच्या कुशीत आहे ही बाडगीची माची. बंडकरी क्रांतीवीर राघोजी भांगरे ह्यांच्या बंडाचं नियोजन ह्या बाडगीच्या माचीवरच्या गुहांमधून व्हायचं. इंग्रजांच्या सत्तेसाठी अतिशय पूरक असणारी सावकारी मोडून काढणं, या कार्याने या क्रांति कार्याची सुरुवात झाली. हे सावकार इथल्या आदिवासी जमातींकडून पैसे वसूल करून अत्याचार करत असत. या सावकारांचे कान आणि नाक छाटणे आणि सावकारी बंद पडण्यासाठी दहशत निर्माण करणे ही त्यांच्या क्रांतिकार्याची सुरुवात.

इथल्या या प्रदेशात एकाच ठिकाणी फक्त पूर्ण बाराही महिने पाणी साचलेलं असतं. हे पाणी ज्या कातळकोरीव आकारात साचतं, त्या आकाराचं पूर्वी स्वयंपाकाचे एक मातीचं भांडं होतं. भांड्याचं नाव बाडगी. म्हणून या माचीचं नाव बाडगीची माची. इथे भूमिगत राहून बंडाचे नियोजन करून क्रांतिकार्य करू पाहणाऱ्या क्रांतिकारकांचं पाणी पिण्याचे स्थानही कदाचित हेच असावं. ह्या क्रांतिकारकाचा शेवट १८४८ साली झाला. त्यांना ठाण्याच्या कारागृहात फाशी देण्यात आलं.

आदिवासी वीरांचा हा बालेकिल्ला, बाडगी माची नाव शोभे त्याला!

आशिर्वाद पाठी कळसुबाईचा, करू सन्मान बाडगी माचीचा!

महिमा वर्णू किती सहयाद्री खोऱ्याचा, करू सन्मान बाडगी माचीचा!

कळसुबाई जवळच असणाऱ्या ह्या अशा ऐतिहासिक ठिकाणाची भटकंती आम्ही पूर्ण केली. या भटकंतीत ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्याच्या समाधानाबरोबरच प्रचंड प्रमाणात कारवीच्या फुलांची उधळण बघायला मिळाली. अक्षरशः "कारवीच कारवी चहू गडे, ग बाई गेला ट्रेकर कुणीकडे" अशी आमची अवस्था झाली होती 😉

विनोद सोडा, पण ह्या एकदिवसीय ट्रेकने आम्हाला वेगळीच अनुभूती दिली. आग्या मोहोळाच्या धोकादायक वाटेवरून किल्ला पाहण्याचा समाधान मिळालं. कारवीचा फुलांची उधळण, पायघड्या मिळाल्या. त्यातच किल्ला बघून या माचीकडे येण्याच्या वाटेवर एके ठिकाणी तर चक्क आम्हाला नागांनी दर्शन दिलंन. हो अगदी दहाचा आकडा सुस्पष्ट दिसत असलेल्या, सुंदर फणा काढून थांबलेल्या नागाने आम्हाला दर्शन दिलंन. आणि जी सुरुवातीला उल्लेख केला ती गंमत म्हणजे... आता काय आहे, हा जो भाग आहे, परिसर आहे जुन्नरच्या आजूबाजूचा, येथे एका प्राण्याचा वावर फारच असतो. तशा बातम्या अधून मधून येत असतात. पण प्रत्यक्षात बघायला कधी मिळत नाही. परंतु त्या रात्री तो आमच्या नशिबात होता.

लहान बिबट्या

या नाकविंदा गावाकडे येण्याच्या वाटेवर एके ठिकाणी गाडीतून उतरून आम्ही पाय मोकळे करायला थांबलो होतो आणि त्यानंतर पुढे निघाल्यावर, अवघ्या पाच मिनिटांत समोरच अतिशय तुकतुकीत त्वचा, त्याच्यावर सुंदर काळे ठिपके, अशा रीतीने एका पूर्ण वाढ झालेल्या सुंदर बिबट्याने आमच्या गाडी समोरून रस्ता क्रॉस केलान.

अक्षरश: थबकलो. कारण जागा निर्मनुष्य नव्हती, त्या जागी दोन्ही बाजूला घरं होती. तिथल्या लोकांनाही त्याची कदाचित कल्पना असावी, त्यामुळे त्या परिसरात कुठेही पाळीव प्राणी घराच्या बाहेर बांधलेले नव्हते. तिथून थोडं पुढे येतोच आहे, तोवर एक बिबट्या चक्क दबा धरून बसलेला होता. पण तो थोडा लहान असल्यामुळे आमची गाडी बघितल्यावर घाबरून कडेला लपायला गेला. तोवर आमचीही थोडी भीड चेपलेली होती, कारण ह्या आधी काही मिनिटांपूर्वीच सुंदर बिबट्या दिसला होता आणि आम्ही कारच्या आत मध्ये काचा बंद करून सुरक्षित होतो. त्यामुळे थोडं पुढे जाऊन सरळ मागे फिरलो. अशा दोन फेऱ्या मारल्यावर अतिशय सुंदर दर्शन त्या बिबट्याचं आम्हाला मिळालं, अगदी फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढता आला. मग मात्र त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्याला त्रास न देता मार्गस्थ झालो...

विदर्भीय भटकंती - पितरांचा किल्ला - दृग


पितरांचा किल्ला - दृग

अजस्त्र किल्ला, अपरिचित किल्ला, कठीण/दुर्गम.. वगैरे वगैरे किल्ला अशी विशेषणं आपण किल्ल्यांची ऐकत असतो, पण अगागा... पितरांचा किल्ला! आता पितरांचा किल्ला म्हणजे काय, कुठे आहे वगैरे सगळं आपण नंतर पाहूच, पण आधी सांगतो की हा किल्ला, किल्ला सोडा, किल्ला असलेला हा जिल्हा पण आमच्या मूळ नियोजनात नव्हता.

नागपूर-भंडारा-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर अशी पंच-जिल्हा भटकंती करून परतताना, बुलढाण्यात देऊळगाव राजा व सिंदखेड राजा ह्या राजांना मुजरा करून परतायचं, असं मूळ नियोजन. मुळात हेच नियोजन कितपत यशस्वी होईल वगैरे धाकधूक होती. त्यापायी नियोजनात बऱ्यापैकी अधिकचा वेळ ठेवला होता. पण दिवसाच्या प्रकाशाचं नियोजन जमलं आणि तो वेळ वापरावाच लागला नाही, त्यातून तगडी साथ मिळालीच होती आणि त्यामुळे चक्क एक पूर्ण दिवस हातात पडला.

मग इतक्या लांब आलोच आहोत, तर अजून एक दिवस घालून दोन दिवसात चक्क वर्धा आणि यवतमाळ ही बघून घ्यावेत असा ठराव बहुमताने पास झाला. मागच्या लेखातले लहान लहान किल्ले जसे पाहिले, तसेच "पवनी" हा मोठा किल्ला आहे तोही पाहिला. जोडीला काही मंदिरं पण खात्यात जमा केली. "उमरेड" हा नागपूर मधला पाहिलेला शेवटचा किल्ला.

नाचणगांवची गढी व गढीचे मालक श्री देखमुख यांचे समवेत

त्यानंतर घुसलो वर्धा मध्ये. इथे बहुतांशी गढ्याच आहेत, त्यातही काहीच व्यवस्थित तर बाकी पडझड झालेल्या आणि कशाबशा तग धरून राहिलेल्या. नाचणगांवची गढी तर गढीचे मालक श्री देखमुख यांच्याकडे पाहुणचार घेऊन पहिली. "केळझर"चा गणपती, हा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपती. या गणपतीचे मंदिर हे चक्क एका किल्ल्यात आहे, तो केळझरचा किल्ला. हा गिरीदुर्ग असला तरी मंदिर असल्यामुळे इथे दारात गाडी जाते. हिंगणी, आंजी मोठी, धुळवा, पवनार, अल्लीपूर, सोनेगाव-आबाजी, नाचणगाव, विरूळ यात वर्धा संपवलं.

यवतमाळ मधीलही रावेरी, कळंब हे गढ्या-किल्ले पाहिले आणि मग ठरल्याप्रमाणे मोर्चा वळवला तो "पितरांचा किल्ला" उर्फ "दृग" उर्फ "दुरुग" उर्फ "दुर्ग" ह्या किल्ल्याकडे.

यवतमाळ जिल्ह्यातला हा एकमेव गिरीदुर्ग. पण ज्या किल्ल्याला भेट द्यायची होती, त्या किल्ल्याचे नाव मुळात दुरुग, दृग ती दुर्ग याबाबतच संभ्रम होता. महत्त्वाचं म्हणजे गुगलवर हे स्थळ मॅपही नव्हतं. त्यामुळे कळंबवरून "याला विचारू, की त्याला विचारू" करत गावात पोचलो. तिथे पोचल्यावर गावाचं आणि पर्यायाने किल्ल्याचे नांव हे दुर्ग नाही हे तरी नक्की झालं. मुळात हे "दृग" असावं आणि अपभ्रंश "दुरुग".

हनुमान मंदिर

हा किल्ला खरंच निबिड अरण्यात आहे. गांव सोडलं की लगेच इथे एक जलाशय आहे, त्यावर धरण आहे. हे दृग धरण किंवा दृग जलाशय. भारतात देव-धर्म, देवळं-मंदिरं ह्याबाबत कितीही नकारात्मक आरडाओरडा होऊ दे, या देवस्थानांमुळे त्या त्या ठिकाणांचा विकास झाला आहे, हे नाकारून चालणार नाही. अल्पपरिचित किंवा अशा दुर्गम ठिकाणी भटकंती करणारे तरी हे नक्की नाकारणार नाहीत. हा दृग किल्ला पण दुर्गम ठिकाणीच आहे. घनदाट आणि Untouched जंगल यामुळे तिथे वन्य प्राण्यांचा वावर सहज आहे. अर्थातच अशा ठिकाणी जाणं धोक्यातच असतं. पण गंमत म्हणजे त्रिभुवनात शब्दशः कुठेही पाठीशी असणाऱ्या देवतांपैकी एक, असे हनुमान इथे, ह्या अरण्यातही आपले तारणहार ठरतात. इथे असलेल्या हनुमान मंदिरामुळेच इथे रस्ता झालेला आहे. आणि सांभाळून नेल्यास इथपर्यंत चार चाकी जाऊ शकते. माझी स्विफ्ट आणि साथीदारांवर विश्वास ह्यामुळेच आम्हीही गांव ओलांडून धरणाच्या कडेने "सिनीक", पण कच्च्या रस्त्यावरून Offroading करत मंदिरापर्यंत पोहोचलो. अन्यथा गाडी धरणाजवळ ठेवून पुढे जंगलातून या मंदिरापर्यंत यायला तासभर तरी लागत असणार. आमचा हा वेळ वाचला.

श्रीपाद चितळे हे त्यांच्या विदर्भातल्या किल्ल्यांविषयी लिहिताना ह्या किल्ल्याबाबत असं नमूद करतात, की "जंगल इतके घनदाट की, सूर्यप्रकाश इथे झिरपत नाही". आता त्यांनी ज्या काळात भटकंती केली त्या काळात नक्कीच ही परिस्थिती असेल. फक्त सध्या आम्ही जात असलेल्या वेळी पानझडीमुळे म्हणा किंवा नंतर कदाचित वाढलेल्या मानवाच्या वावरामुळे म्हणा, किमान इतकी भयानक परिस्थिती नाही दिसली. हा, परंतु इथल्या जंगलाला अरण्य म्हणावं इतपत नक्कीच दाटपणा आहे, अगदी घनदाटपणा आहे. दुर्गम स्थान, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हिंस्त्र श्वापदांचा वावर, ह्यामुळे अर्थातच इकडे, चितळेंच्या भाषेत सांगायचं, तर मानवाचा चहाळ अत्यंत कमीच आहे. एकटा-दुकटा ह्या बाजूला फिरकत आला, तर श्वापदांच्या तावडीत सापडून परत जिवंत जात नसावा. त्यामुळे अर्थातच इथे भुताखेतांच्या, पितरांच्या गोष्टी जोडल्या जाणे यात नवल ते काय? म्हणूनच याला "पितरांचा किल्ला" म्हणत असावेत.

हा किल्ला १५-१६व्या शतकात बांधला असावा व माहूरच्या "उदाराम देशमुख" यांच्या अखत्यारीत येत असावा, अशी शक्यताही चितळे इथे नमूद करतात. तुरुंग सदृश अशी किल्ल्याची रचना असल्याचेही ते म्हणतात, जे स्वाभाविक वाटते ते याच्या रचनेवरून आणि स्थानावरून.

आम्ही निवडलेल्या वेळेमुळे सूर्यप्रकाश मात्र मुबलक होता. त्यामुळे अर्थातच जंगलाविषयीची भीड चेपली गेली होती. त्यात मंदिर-परिसर यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, आपल्याला सुरक्षिततेचे आश्वासक वातावरण जाणवते, हे का नाकारावे? मंदिराच्या शेजारून वाहणारा ओढा सगळं मन प्रसन्न करून गेला. वावरताना चहू बाजूला लक्ष ठेवणे क्रमप्राप्तच होते.

मंदिराजवळ सावलीत गाडी नीट लावून सरळ गडाची वाट धरली. उजवीकडची वाट गडावर घेऊन जाते तर डावीकडेही एक वाट जाते, मात्र ती जंगलातून पुढे जात असावी.

पायऱ्यामार्ग आणि दरवाजा

अवघ्या काही मिनिटातच दरवाज्यात पोचलो. म्हणजे दरवाजा असा शिल्लक नाहीये पण बहुतेक नव्याने किंवा जिर्णोद्धारित म्हणा, पण समोर असलेला पायऱ्यामार्ग पूर्वी इथेच दरवाजा असावा असं दर्शवतो.

अवशेष

किल्ल्यावर तसे फार अवशेष शिल्लक नाहीत. मुळातच दुर्गमता आणि त्यातून वापर तुरुंग म्हणून केला जात असल्याने फारसे बांधकामही केले गेले नसावे त्या काळीसुद्धा बहुदा. अर्थातच फार काही नसले तरी नैसर्गिक आणि बांधीव तटबंदी, पाण्याची व्यवस्था आणि जोडीला एखादं देवस्थान हे असतंच असतं. देवस्थानांचा फायदा हा असा, की किमान इथे येऊन पोचणारी वाट तरी रुळलेली असते. त्याप्रमाणेच आमचं लक्ष्य माहिती असल्याने ते समोर ठेवून इतरत्र अवशेष शोधत होतो. तटबंदीचे अवशेष दिसत होते आणि मंदिरामुळे वाटेत भगवे ध्वज आणि जवळपास एका वाड्याचे अवशेषही दिसले.

जगधामी मंदिर

सरळ मंदिर गाठलं. हे जगधामी मंदिर! मूळ जुन्या मंदिराचे अवशेष इथे होतेच. त्याने त्याचं स्थान आणि महत्त्व दर्शवलं जात होतं पण कालांतराने ते ढासळलं असावं. पण म्हणूनच त्यानंतर आता जिर्णोद्धारित मंदिर हे भक्तांचा आणि जुन्या देवळाचाही आसरा झालं आहे.

अवशेष

देवळाच्या मागे खालच्या बाजूला तटबंदीचे अवशेष आहेत, तर देवळाच्या समोर काही अंतरावर पाण्याची व्यवस्थाही आहे. परंतु त्याची निगा राखली न गेल्याने ते कोरडे झालेले आहे. आणि त्याचे स्थानही पक्के कळत नाही. जागोजागी वन्य प्राण्यांच्या विष्ठा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र करून देतात.

गाडीजवळ माकडंच माकडं

आल्या वाटेने किल्ला उतरून आलो. आजूबाजूला पाहिल्यावर देवळाच्या परिसरात विहीर दिसली. देवळात सामान ठेवून विहिरीतून पाणी काढलं. थंड पाणी पिऊन हातपाय धुऊन फ्रेश झालो. वळून बघितलं तर काय, गाडीजवळ माकडंच माकडं जमा झालेली होती. २०-२५ तरी असतील. आम्हाला बघून पळून जातील असं वाटलं, पण उलट आम्हाला चिडवायला सरळ गाडीवरच चढली. जाऊदे, जातील त्यांची त्यांची, असं म्हणून फार लक्ष न देता मंदिरात गेलो.

यक्षराज कपिमुखी हनुमान

हे हनुमान मंदिर, यक्षराज कपिमुखी हनुमानाचं आहे. निवांत दर्शन घेतलं. पण त्यानंतर आमच्या लक्षात आलं, की बाहेरची गाडीवर फिरणारी माकडं आता मंदिराकडे येत आहेत. आधी दरवाजा लावून घेतला, तर बाहेरून त्यांचा दरवाजा उघडायचा आटापिटा चालू झाला. मंदिराच्या छताजवळ मोकळी आणि अरुंद जागा असलेली जाळी आहे, त्यातून आत यायचा प्रयत्न चालू झाला. नंतर तर आमच्या हुसकवण्याच्या प्रयत्नांना दाद न देता ते आत घुसणार, हे लक्षात आल्यावर आम्ही सगळ्यांनी सामान घेऊन एकदम दरवाजा उघडला. आम्हीच जोरात आरडाओरडा करत बाहेर आलो आणि माकड दचकून बाजूला झाली. जरा वेळ बाजूला झाली खरी, पण आमच्या बॅगेतल्या केळ्यांचा वास त्यांना बरोबर गेला. क्षणभरही न थांबता, आम्ही सरळ सगळी केळी काढून, एका बाजूला फेकून गाडीकडे पळालो.

हुश्य... गाडीत बसलो आणि आधी गाडी बाहेर काढली. सावकाश सावकाश वळण घेत, त्या कच्च्या रस्त्यावरून परतीची वाढ धरली. थोडं अंतर जातो तर काय, समोर नीलगाईंचा कळप! थोडं मागेच थांबलो. पण ह्या नीलगाई आपल्यातल्या नांवातल्या गाईप्रमाणेच गरीबही असाव्यात, किमान आम्हाला तरी काही त्रास झाला नाही.

पुन्हा धरणाजवळच्या वाटेवरून गावात आलो. फोनला नेटवर्क आल्यावर पहिलं काम केलं, ते गुगल मॅपवर आत्तापर्यंत मॅप नसलेल्या या किल्ल्याचं स्थान चिकटवलं. जगधामी मंदिराजवळ आमचा आम्हीच Timer लावून काढलेला फोटो सुद्धा अपलोड झाला.

वर्धा-यवतमाळ मधील किल्ले पाहून झाल्यावर ही विदर्भ भटकंती सुफळ-संपूर्ण झाली. परतताना सिंदखेड राजा मध्ये किल्ला बघितला आणि जिजाऊंना मुजरा करून या भटकंतीची सांगता केली.

विदर्भीय भटकंती - किल्ले चंदनखेडा, शेगाव, चिमूर, भिवापूर


लेखाच्या शीर्षकात १-२ नाही तर ४ नांवं? म्हणजे किल्ले केवढे असणार?

"अरे येतो शुरू होने से पहले ही खतम हो गया..."

होय, या लेखातले किल्ले असेच आहेत.

पण आता किल्ले असे असतात का मुळात? तर, शक्य तरी आहे का? एखाद्या वास्तूला किल्ला म्हटले म्हणजे अर्थातच मोठं बांधकाम असणार ना? नाहीतर घर किंवा खोलीच नसतं का म्हटलं...

पण कालांतराने त्या वास्तूचा "किल्ला" ही गोष्ट म्हणून उपयोग संपतो आणि अनेक वर्षांनी मग त्याचा उपयोग कदाचित घर म्हणून होऊ लागतो. अश्या वेळी मग त्याचा "किल्लेपणा" ढासळतो, पण किमान "घर" रुपात तरी तो तग धरून राहतो. हळूहळू घर पण ओसाड पडत जातं, भिंतीही ढासळतात आणि एकंदर वास्तू ढासळून अवशेष स्वरूपात रहात, नामशेष होत जाते. त्याच्या डागडुजीकडे लक्ष देणे बंद होते. मुळात ज्या काळी किल्ले बांधले आणि उपयोगी पडले त्या काळातही त्यावर होणाऱ्या हल्ल्यामुळे त्यांचे नुकसान आणि पडझड होतच असते. त्यावेळी थोडी डागडुजीही केली जात असते, परंतु नंतर उपयोग संपणे, दुर्लक्ष, त्यावर होणारा आणि न परवडणारा खर्च, ऐतिहासिक वारशाबद्दलची स्थानिकांची आणि सरकारी अनास्था अशा अनेक कारणांमुळे त्याची डागडुजी केली जात नाही आणि मग ह्या प्रकारचे मीम त्यावर होतील, अशा अवस्थेत ते पोचतात.

अर्थात हे काही ह्या लेखातल्या फक्त चार किल्ल्यांबाबत नाही, तर एकूणच सर्व ऐतिहासिक तत्कालीन महत्त्वाच्या किल्ले, गढी या वास्तूंबाबतही लागू होऊ शकते. त्यातलाच एक किल्ला चंदनखेडा!

मुळात हा किल्ला आमच्या नियोजनात नव्हताच. कसा असेल? ह्या नावाचा किल्ला आहे हेच मुद्दलात माहिती नव्हतं. ना खुद्द मांडे सरांच्या पुस्तकात आणि ना अनेक इतर ठिकाणी. कुठे सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख नाही, तर आम्हाला कसा माहिती असणार?

पण मग ह्या किल्ल्यावर मी लेख तरी कसा लिहतोय? कारण आम्ही तो बघितला.

कसा कळला तीही गंमत आहे. भद्रावती किल्ल्यावरच्या लेखात म्हटलंच होतं, की आमचं नियोजन मुळात तिथे थांबायचं नव्हतं तर पुढच्या किल्ल्याच्या गावात किंवा जवळपास तरी जाऊन मुक्काम करायचा म्हणजे सकाळचा वेळ वाचतो हे होतं. पण गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ऐतिहासिक स्थळं पाहण्यात तिथे वेळ घालवला आणि मुक्काम भद्रावतीत झाला.

त्यानंतर नियोजनातला पुढचा किल्ला होता "शेगाव". जास्त माहिती नंतर पाहू. हे गजानन महाराजांचे शेगाव नव्हे तर चंद्रपूर मधलं छोटसं गाव शेगाव.

भद्रावती मधून इथे जायचं, तर वाटेत जंगलाचा दाट भाग लागतो, त्यामुळेच मुक्काम भद्रावतीत केला. इथून नांदुरी-वरोरा वरून सलोरी मार्गे शेगाव गावात पोचता येतं, तर दुसऱ्या मार्गाने मांगळी-रय्यतवारीवरून चंदनखेडा मार्गे पोचता येतं. रस्त्याचा अभ्यास करताना, माहिती गोळा करताना कळलं की ज्या वाटेत चंदनखेडा लागतं तिथे एक किल्ला आहे. लगेच अभ्यासाचा रोख बदलला, माहिती मिळवली आणि लक्षात आलं की ह्याही किल्ल्याला भेट देता येऊ शकते.

चंदनखेडा

अंधार पडल्यावर जो रस्ता भयाण असेल असा विचार केला होता, तोच रस्ता सकाळी अल्हाददायक वातावरणात रिफ्रेशिंग वाटला... अर्ध्या तासात चंदनखेडा मध्ये दाखल झालो. साधारणपणे कुठेही किल्ला विचारायचा स्थानिकांना गावात पोचल्यावर, की प्रश्न पडतो की कसा विचारायचा? कारण बऱ्याच ठिकाणी किल्ला स्थानिकांना माहितीच नसतो किंवा त्याला "किल्ला" अशी ओळख नसते. वेगळ्याच कोणत्यातरी गोष्टीने तिथे तो ओळखला जात असतो. म्हणजे एखाद्या प्रसिद्ध मंदिरावरून किंवा त्यातल्या एखाद्या वास्तू वरून. पण चंदनखेडामध्ये आश्चर्य म्हणजे सगळ्यांनाच किल्ला हा किल्ला म्हणूनच माहिती आहे हे कळलं.

किल्ल्याचे प्रवेशद्वार

किल्ल्यातच मंदिर आहे, "माधव महाराज देवस्थान". अगदी दरवाजात नेऊन गाडी उभी केली. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या कमानीतून आत मंदिराचा मुख्य दरवाजा दिसला. गंमत म्हणजे या दुमजली दरवाज्यात वरच्या मजल्यावर मस्त घोड्याची मूर्ती आहे अगदी लाइफ साईज. मंदिर आणि परिसर चांगला ठेवलेला आहे सुदैवाने. त्यात चांगलं म्हणजे किल्ल्याच्या दरवाजाची कमान आणि लागून असलेल्या भिंती रंगाने रंगवलेल्या नसून मूळ काळ्या दगडात तशाच ठेवून त्याचं सौंदर्य अबाधित ठेवलेलं आहे.

मंदिर प्रवेशद्वार - वरच्या मजल्यावर Life Size घोडा-मूर्ती

आत्तापर्यंत जी काही मंदिर पाहिली होती, त्यात घोड्याला इतकं महत्त्व दिलेलं पाहिलं नव्हतं. तसं म्हटलं तर टिपागडला गुहेबाहेर घोडामूर्ती होती, पण तेवढीच. इथे चक्क प्रवेशद्वारावरच अखंड घोडा-मूर्ती.

हे मंदिर सर्वधर्म श्रद्धास्थान आहे. म्हणजे नावाजवळच ॐ, चंद्र-तारा, क्रॉस, शीख, बौद्ध अशोकचक्र अशा सर्व धर्मांची चिन्ह छापलेली आहेत. आधी परिसर पाहून मग मंदिर बघावं असं ठरवलं कारण मंदिर बंद!

अर्थात आम्ही सकाळी ६:३० ला तिथे पोचणार हे आधी थोडंच माहिती असणार गावकऱ्यांना? खुद्द आम्हालाही आधीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती.

मग परिसर फिरायला बाहेर पडलो. शेजारच्या मैदानात एक उभा खांब आणि त्रिशूळ आहे. महाराष्ट्रात अशीही काही मंदिर आहेत ज्याचं आजूबाजूचं बांधकाम किल्ल्यासारखं आहे, परंतु तो किल्ला नाही. म्हणून इथला परिसर बघायचा ठरवून फिरायला लागलो. जेणेकरून कळेल की हे फक्त बांधकाम किल्ल्यासारखं आहे की हा किल्लाच आहे.

जोर्णोद्धारित कमान
उध्वस्त वास्तू

मंदिरापासून उजवीकडे बघितलं तर दरवाज्याची जिर्णोद्धारित कमान आहे. त्यातून पलीकडचा सगळा परिसर दिसतो. परिसर फिरताना लक्षात आलं की इथले सगळे अवशेष उध्वस्त आहेत. आणि हा परिसर फक्त बालेकिल्ला असणार, पूर्ण किल्ला खूप मोठा असणार खरंतर. परिसरातले अवशेष जे उध्वस्त आहेत त्याच्या बाहेरच्या बाजूच्या भिंती जवळपास सहा ते सात फूट रुंद आहेत. सगळ्या वास्तू बऱ्यापैकी उध्वस्त झालेल्या असल्याने काहीही पत्ता लागत नाही, की कोणते अवशेष कोणत्या वास्तूचे आहेत.

घोडेच घोडे
सुबत कोरीव घोडा-मूर्ती

पण इथे एक गंमत बघायला मिळाली. जिकडे बघावं तिकडे घोड्याच्या मूर्ती. छोट्या-छोट्या आकारापासून अगदी मोठ्या मूर्ती. अगदी खेळण्यातल्या लहान मूर्ती पासून, दगडी मोठ्या कोरीव मूर्तीपर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या आणि कलाकुसरीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्ती असण्यामागे बहुतेक नवस आणि त्याची परतफेड ही गोष्ट असावी.

दरवाजे, उद्ध्वस्त वास्तू, भक्कम भिंत, त्यावर चर्या वगैरे किल्ला असणाऱ्या गोष्टी दिसल्या तरी महत्त्वाची गोष्ट आम्ही शोधत होतो ते म्हणजे पाण्याचा स्त्रोत. तसे फिरताना एक दोन बांधिव हौद दिसले होते, पण ते ग्राह्य धरण्यासारखे नव्हते. कारण एक तर ते अलीकडच्या काळातले दिसत होते आणि जीर्णोद्धार केलेले मानले तरी आकाराने लहान, म्हणजे किल्ल्याच्या विस्ताराच्या दृष्टीने ते पुरेसे दिसत नव्हते.

तेवढ्यात बऱ्यापैकी उजाडल्याने मंदिराची देखभाल करणारे पुजारी आले. चौकशी करताना कळलं की इथे मागे विहीर होती आणि आता ती बुजली आहे. लगेच त्या शोधात बाहेर पडलो. ते काका बरोबर आले म्हणून ती सापडली आणि मनातला प्रश्न मिटला. पाण्याचा स्त्रोत मिळाला.

मंदिरात परत जाताना लक्षात आलं की फक्त मंदिराच्या मुख्य दरवाजावर मोठी घोड्याची मूर्ती नसून, इथे खरा घोडा सुद्धा आहे. ज्याची शोभायात्रा निघते. तो मंदिराच्या इथे बांधलेला दिसला.

पुजाऱ्यांनी तोपर्यंत मंदिर उघडून झाडलोट पूर्ण केली होती. मग मंदिरात दर्शनाला गेलो. मंदिरात घोड्यावर बसलेल्या माधवराज महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीचा आकार, स्थान, रंग अगदी मापात आणि सुंदर आहे.

घोड्यावर माधवराज महाराज आणि चौकोनात गुप्त मूर्ती

मूर्ती एकदम सुबक आहे. त्यात एक सुंदर वेगळेपण इथे पाहायला मिळालं. साधारणपणे शंकराच्या मंदिरात जशी एक पूजेची मोठी पिंडी असते पण कुठेतरी एखादी गुप्तपिंडी किंवा गुप्त स्थान असते तशी इथेही गंमत आहे. समोर जी माधवराज महाराजांची मूर्ती आहे त्याच्या खाली मागच्या बाजूला छोटीशी गुहा आहे. त्यात घोड्याची दगडी मूर्ती आहे.

हे सगळं पाहत असताना मंदिरातच चक्क डॉ. प्रदीप मेश्राम यांनी संकलन केलेल्या माहितीचा छापील फलक दिसला. त्यावरून कळलं की हे ठिकाण सातवाहनकालीन असून त्याकाळचे अनेक अवशेष आणि वस्तू येथे सापडलेले आहेत. हा किल्लाही मोठा नगरकोट असून चंद्रपुरातील हे एकमेव सातवाहनकालीन पुरातत्वीय स्थळ आहे. ह्याचे तत्कालीन नाव "कपिशकट" होते. गोंड राजांच्या काळात हे उपराजधानीचे ठिकाण होते, मोठे व्यापारकेंद्र होते. हेही श्री गजानन घुमे यांनी केलेल्या किल्ल्यासंबंधीच्या माहितीच्या संकलनावरून कळलं. आणि या माहितीमुळे इथे किल्लाच होता आणि जे काही अवशेष शिल्लक आहेत तेही किल्ल्याचेच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं.

आमच्या नियोजनात नसलेला, ह्याआधी नांवही न वाचलेला, कुठेही उल्लेख असल्याचे माहिती नसलेला एक किल्ला पाहण्याचं समाधान मिळालं.

शेगाव

यानंतर मूळ नियोजनात जो शेगावचा किल्ला बघायचा होता तिथे पोचलो. गल्ल्या-गल्ल्यातून गाडी घातली आणि जागा बघून गाडी लावून उतरलो. अर्थातच आमच्याकडे आश्चर्याने बघत असलेली लोकं दिसणं अनपेक्षित नव्हतंच. किल्ला? म्हटल्यावर तोंडावर उमटणाऱ्या प्रश्नचिन्हाचंही विशेष वाटत नव्हतं. पण असा काही वेळ गेल्यावर चक्क एक इसम भेटला ज्याने त्याच्या जागेतच हा किल्ला आहे असं सांगितलंन.

शिल्लक कमानीचा दगड
गोंड समाजाची पवित्र वास्तू

त्या माणसाच्या जागेत मागच्या अंगणात पोचलो, तर झाडीत बोट दाखवून तिकडे बघा असं म्हणाला. म्हणून तिकडे बघितलं, तरीही काही दिसेना आम्हाला. जेव्हा आम्ही सगळ्यांना मांडे सरांच्या पुस्तकातला फोटो दाखवून किल्ल्याची चौकशी करत होतो, तरीही तो कोणी सांगत का नव्हतं याचा इथे पोचल्यावर उलगडा झाला. मांडे सरांच्या पुस्तकातल्या फोटोत एक शिल्लक कमान आहे. आम्ही ती कमान दाखवत होतो आणि ह्यांनी झाडीत दाखवल्यावर आता ती कमानही शिल्लक नव्हती, तिथे फक्त एक दगड दिसला. फोटो समोरच्या जागेशी पडताळून पाहिल्यावर ह्याच जागेचा तो जुना फोटो असून सध्या त्या कमानीचा फक्त दगड शिल्लक राहिलेला आहे हे दिसलं.

हा फोटो म्हणजे पूर्ण किल्ल्याचा, शेवटच्या घटका मोजत असलेला एक कमानीचा दगड.

झाले अवशेष, संपला किल्ला.

अर्थात सध्या फक्त एक दगड असला म्हणून काही किल्ल्याचे महत्त्व कमी होत नाही. आता लोकांनीच आपापली घरं बांधायला किल्ल्याचे दगड यापूर्वीच नेलेले आहेत. ह्यापुढे कोणी किल्ला बघायला गेलं तर कदाचित हा शिल्लक दगड पण कोणाच्या घराच्या भिंतीत विराजमान झालेला असू शकतो.

शेगाव किल्ला हा असा चार ओळीत लिहून संपला.

चिमूर

शेगाव नंतर बघायचा होता चिमूर किल्ला. जेव्हा या भटकंतीचं नियोजन केलं होतं, तेव्हा सगळ्या स्थानांबरोबर या ठिकाणाचाही नक्षलवाद्यांच्या दृष्टीने विचार केलेला होता. अर्थातच तशी परिस्थिती ह्या बाजूला कुठेच दिसली नाही. त्यातून गुगल मॅपवरही चिमूर किल्ला मॅप केलेला आहे आणि त्यात स्थान पाहिलं तर तिथे जे काही फोटो दिसतात तेच प्रत्यक्षातही तिथे पोहोचल्यावर दिसलं.

किल्ल्याच्या जागेवर स्मारक, सभागृह

का. ही. ही. शिल्लक नाहीये तिथे किल्ल्याचे अवशेष म्हणून... शेगावला कमानीचा एक दगड तरी शिल्लक होता, इथे तर काहीही नाहीये. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे तेवढे आहेत. हे स्मारक आणि शेजारी संत तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे आणि २००८ साली अनावरण झालेला "शहीद बालाजी रायपूरकर" यांचाही पुतळा आहे. जवळच १९७१ साली बांधलेलं हुतात्मा स्मारक आहे. ही घटना घडली १९४२ सलात, त्या दिवशी नागपंचमी होती, त्यामुळे स्मारक म्हणून पंचमुखी नागाची छत्रधारी प्रतिमा आहे. आणि या जागेवर मोठे फुले सभागृह आहे. हा सर्व परिसर एकेकाळी ह्या चिमुर किल्ल्याचा भाग असणार जे आता भुईसपाट करून किंवा झाल्यावर ह्या वास्तू आणि पुतळे तिथे उभारलेले आहेत.

एकूणच या वास्तूमुळे ह्या किल्ल्याच्या लेखात चार ओळी तरी घेता आल्या. अन्यथा एक ओळही यावर लिहिता येणार नाही अशी चिमूर किल्ल्याची आता अवस्था आहे.

भिवापूर

यानंतर याच दिवशी चांदपूर किल्ल्याची भेट होती, परंतु मांडे सरांच्या पुस्तकांतच फार काही अवशेष दिसत नसल्याने आता तर नक्कीच काही उरलेलं नसणार ह्या खात्रीने तो नियोजनातून सरळ गाळला. पुढे भिवापूर किल्ल्यालाही भेट द्यायची होती. तो मात्र बघावा असं ठरलं. प्रवास परतीचा चालू झालेलाच होता त्यामुळे चंद्रपूरातून आता नागपुरात परत घुसलो होतो. गावात पोचल्यावर किल्ला शोधण्याचे नेहमीचे सोपस्कार पूर्ण झाले आणि किल्ला म्हणून जे काही शिल्लक राहिले आहे त्या ठिकाणी पोचलो.

अनगड देव आणि पूर्वी असू शकेल अशी दरवाजाची जागा

तिथेच इतस्ततः तुकड्यात पसरलेल्या चार भिंती शिल्लक आहेत. एक थडगं, इकडे-तिकडे थोड्याशा अर्धवट भिंती, एका चौथर्यावर पांढरा रंग देऊन त्यावर लाल रंगातल्या दोन-चार अनगड मूर्ती, त्याच्या शेजारी बहुतेक वाड्याच्या भिंती, जवळच "इथे कदाचित दरवाजा असू शकतो" अशा स्वरूपातील पडके अवशेष, झाडाझुडपात हरवलेल्या भिंतींचे अवशेष अशा एकूण स्थितीत हा किल्ला म्हणून शिल्लक आहे.

शिल्लक अवशेष

केवळ पंधरा मिनिटात ते बघून निघणार तेवढ्यात चौकशी करताना "एक तिकडे जुनी विहीर आहे, पण तिकडे जाऊ नका, कोणीही जात नाही" असं कळल्यावर त्या मागचं कारण लक्षात घेतलं. नाक दाबलं, पावलं सांभाळत विहीर शोधली. हगणदारीमुळे हाही भाग संपल्यात जमा आहे. विहिर तर जरी त्यात पडलो तरी सुद्धा येथे विहीर आहे हे न करण्याच्या अवस्थेत ती पोचलेली होती.

अशा तऱ्हेने हाही किल्ला संपला. मात्र चिमूर, शेगावच्या तुलनेत खूपच म्हणता येतील इतपत अवशेष इथे पाहिले आणि शेवटच्या घटका मोजत असलेला का होईना, पण हा किल्ला पाहिल्याचे समाधान पदरात पाडून घेतले.

अशा स्वरूपातले किल्ले काही आम्ही पहिल्यांदा पाहत नव्हतो आणि नंतरही असं बघायला मिळत राहणारच आहे ही खंत मनात होतीच. पण सध्या जे आहे त्यावर समाधान मानण्यापलीकडे हातात तरी काय होतं? जो दगड शिल्लक म्हणून बघितला तो सुद्धा पुढे कोणाला बघायला मिळणार नाही याचं दुःख करायचं, की शिल्लक दगड बघायला तरी किमान मिळाला ह्यात समाधान मानायचं? आणि मुळात यानंतर अश्या जवळपास काहीच शिल्लक नसलेल्या किल्ल्यांवर लेख तरी का लिहायचा?

पण किमान शेवटच्या घटका मोजत असलेल्या भिंती, दगड, कोरडी विहीर, स्थळांच्या डागडुजी पायी केलेली दारुण अवस्था, त्यात घालवलेलं किल्लेपण आणि तरीही त्यातून डोकावणारा एखादा त्याकाळची साक्ष देत असलेला काळा दगड हे जसं आम्हाला बघायला मिळालं तसं इतरांनाही बघायला मिळावं, त्याची माहिती असावी म्हणून!

हा छोटेखानी लेख अशा किल्ल्यांसाठी...

विदर्भीय भटकंती - किल्ले बल्लारशहा आणि किल्ले भद्रावती उर्फ भांदक


किल्ले बल्लारशहा

महाराष्ट्राच्या सिमांजवळ फिरून आता परत नागपूरकडे प्रवास सुरू झाला.

“खांडक्या बल्लारशाह” राजाने अंकलेश्वर मंदिर बांधले, चंद्रपूरला किल्ला बांधून आपली राजधानी तिकडे नेली, हे चंद्रपूरवरच्या लेखात आपण सविस्तर बघितलंच. त्यामागच्या कथाही बघितल्या. पण राजधानी चंद्रपूरला हलवण्याआधी “बल्लारपूर” हेच राजधानीचं ठिकाण जवळपास १८० वर्ष होतं. इथला हा भुईकोट किल्ला “बल्लारपूर” किंवा “बल्लारशाह” म्हणून ओळखला जातो तो या खांडक्या-बल्लारशाह राजाच्या नावामुळे.

बल्लारपूर ही सध्या उद्योग-नगरी आहे. इथे खाणकाम हा मोठा उद्योग आहे, तर इथली “बल्लारपूर पेपर मिल”ही प्रसिद्ध आहे. बल्लारपूर उर्फ बल्लारशाह हा भुईकोट किल्ला वर्धा नदीच्या काठी आहे. चौकोनी आकारातत्या ह्या किल्ल्याच्या दरवाजाची संरक्षण रचना मात्र, चौकोनालगत बुरुजांसह एक छोटा चौकोन अशी आहे.

माणिकगडकरून बल्लारपूरच्या दिशेने निघालो, तेव्हा आधी वाचलेल्या आणि ऐकलेल्या माहितीवरून हा किल्ला सरकार आणि स्थानिकांच्या अनास्थ्येमुळे अत्यंत बकाल अवस्थेकडे वाटचाल करत असून, सध्या नशेडी मंडळी आणि कपल अड्डा बनला असल्याचं माहिती होतं. आमच्या बालमनावर पुढे होऊ घातलेल्या आघातांची मानसिक तयारी ठेवूनच बल्लारपूर गाठलं.

भद्रावती हे शहर प्राचीन असल्याने आणि त्यातून हे एकेकाळची राजधानी असल्याने त्या काळच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.

किल्ल्याचे पहिले द्वार

गाडी तडक किल्ल्याच्या दरवाजात नेऊन उभी केली. दरवाजा बाहेरची छोट्याशा चौकोनी आकाराची संरक्षण रचना आता ढासळत चाललेली आहे. बुरुज पडलेले आहेत. दरवाजा मात्र लाल-पिवळ्या दगडातलं असं सुंदर बांधकाम आहे. दरवाजावरती दोन बाजूला आता थोडेसे भग्न झालेले पण ओळखू येत असलेले, पायात हत्ती धरून असलेले शरभ आपलं स्वागत करतात. इथे लोखंडी गेट बसवलेलं आहे. ज्याचं छोटं दार मात्र आमच्यासाठी उघड होतं.

किल्ल्याचे आतमधील द्वार

आतमध्ये डावीकडे मुख्य किल्ल्याच्या तटबंदीवरचा दरवाजा आहे. त्यावरही शरभ-शिल्प आणि कमळं आहेत. दोन्ही दरवाजाच्या आतील बाहेरील बाजूस अशीच शिल्पे आहेत. आतील बाजूस सुद्धा अशीच शिल्प कमी ठिकाणी बघायला मिळतात.

गंमत म्हणजे इतके सुंदर आणि मजबूत दरवाजे असणाऱ्या किल्ल्यात डोक्यावल्यावर समोर चक्क मोठं पटांगण दिसतं. एकतर कोणत्याही अवशेषाशिवाय असं पटांगण पटत नाही. इथले अवशेष गायब असणार हे नक्की. आणि त्यातून तेही स्वच्छ होतं, म्हणजे आमच्या ऐकीव माहितीत न जुळणारं.

विविध आकारातील बुरुज

पलीकडच्या तटबंदीला चिकटून मात्र अवशेष दिसत होते. तिकडे जायला निघायच्या आधी दरवाजाशेजारच्या पायऱ्यांनी वर चढलो. चहूबाजूला नजर टाकली. बहुतेक भूईकोटांप्रमाणे ह्याचीही कथा वेगळी नाही. किल्ला बाहेरच्या बाजूने घरांनी वेढला गेलेला आहे. वरून बुरुज बघताना लक्षात आलं की, सगळेच बुरुज एकसारखे नाहीयेत. काही गोल आहेत तर काही अष्टकोनी.

अरे हो, एक सांगायचं राहूनच गेलं की, दरवाजात आतमध्ये उजव्या बाजूला भारताचा ध्वज मस्त फडकत होता. किल्ल्यातलं मोकळं स्वच्छ पटांगण, हे नुकतीच होऊन गेलेली २६ जानेवारी आणि या ध्वजाची कमाल असावी.

तटबंदी

आता खाली उतरून पटांगणातून मागच्या बाजूला जाण्याऐवजी तटबंदीवरूनच जावं, म्हणून कडेकडेने निघालो. काही ठिकाणी जागा एकदम चिंचोळी आहे.

घोड्याची पागा

सुंदर तटबंदीवरून मागच्या महत्त्वाच्या अवशेषांकडे आलो. इथे घोड्याची पागा आहे. नदीकिनारी ही पागा मुद्दाम ठेवली गेली, जेणेकरून घोड्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे सोयीचे होईल, असं ऐकलं. परंतु या वास्तूची रचना पाहता, ही वास्तू म्हणजे घोड्यांची पागा नसून धान्य-कोठार असण्याची शक्यता जास्त वाटते.

या वास्तुत शिरताना परत धाकधूक होती, पण चक्क इथे कोणीच नव्हतं. कदाचित आम्ही योग्य वेळी इथे असल्याने, इतर नको ते लोक इथे सापडले नसावेत. नाहीतर आक्षेपार्ह गोष्टींसाठी इथे पूरक वातावरण आणि जागा असल्याने त्यासाठीच हे कुप्रसिद्ध आहे.

पश्चिमेकडील दरवाजा

ह्या वास्तूत एक चोर दरवाजा देखील आहे. नियमाप्रमाणे इथे वास्तूत एक क्लिक केला आणि बाहेर पडलो. लागूनच असलेल्या पायऱ्यांनी नदीकिनाऱ्याच्या बाजूच्या असलेल्या दरवाजाने मागच्या, म्हणजे पश्चिमेच्या बाजूला येता येते. अर्थातच लगेच तिकडे गेलो. चार-सव्वाचारची वेळ, म्हणजे सूर्य तिकडूनच प्रकाश फेकत, तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दरवाजा वगैरे सगळंच उजळवून टाकत होता. त्याचा अपमान कसा करायचा? लगेच पायऱ्यांवर फोटो काढला.

पश्चिमेकडील तटबंदी आणि बुरुज

गंमत वगळा, पण सुदैवाने झाडे तोडून सफाई केलेली होती आणि त्यात शेजारीच नदी. तटबंदी फुफ्फुसं भरून श्वास घेत असल्यासारखी बघून मात्र बरं वाटलं.

राणीमहाल

पुन्हा किल्ल्याच्या आतील भागात आलो. पुढची वास्तू आहे राणी महाल. महालाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूने छतावर जायला पायऱ्या आहेत.

राणीमहालातून परिसर-दर्शन

आतमध्ये असलेली रचना अतिशय सुंदर आहे. अतिशय सुंदर कमानी, देवळ्या, अशी छान रचना आहे. गेल्या काही वर्षातल्या, नाविन्याने कोरलेल्या प्रियकर-प्रेयसीच्या नावांच्या शिलालेखांकडे मात्र दुर्लक्ष करायचं. नदीच्या बाजूच्या भिंतीत सुंदर कमानी आहेत, त्या प्रत्येकातून वेगवेगळं दृश्य दिसतं. थोडेसे फोटो घेऊन बाहेर पडलो.

पायऱ्यांनी वर जाऊन चहू बाजूचं दर्शन घेतलं. वर जणू काही आपल्यासाठीच विसावा घेण्याच्या दृष्टीने म्हणून मोठ्या दगडांची बाकडी केलेली आहेत. संध्याकाळच्या वेळी मावळतीला चाललेला सूर्य, नदीकिनारी किल्ला, त्यावरच्या सर्वोच्च ठिकाणी निवांत बाकडी आणि अशा नयनरम्य ठिकाणातून निघायची इच्छा कशी होईल? पण निघालो.

इथल्या भिंतीत काही भुयारं आहेत, त्यातून पलीकडे मार्ग दिसत नसल्याने नीटसं काही समजत नाही. आणि म्हणूनच ह्याला काही कथा आहेत. त्यापैकीच एक तर चक्क ह्यातलं एक भुयार इथून चंद्रपूर जिल्ह्यात जातं अशी आहे. थोडक्यात या किल्ल्यात अभ्यासपूर्ण उत्खनन आणि संशोधन गरजेचे आहे.

बारव आणि पाणी उसपण्यासाठीची रचना

किल्ल्याच्या अंतर्भागात फिरताना अजून काही वास्तू दिसतात. जवळच एक सुंदर बारव आहे. शेजारी पाणी उपसण्यासाठीची योजनाही आहे. संवर्धन करताना मात्र लागलेलं काही सामान यातच टाकल्यासारखं वाटलं. असं नसतं तर ही बारव अजूनच छान दिसली असती. इथूनही एक दरवाजा नादीकिनारी जातो.

किल्ल्याचा आतला परिसर

किल्ला मोकळाच असल्याने अवशेष शोधावे लागत नाहीत, पण ह्या मोकळ्या भागात मात्र खूप काही दडलेलं नक्कीच असणार आहे.

किल्ले भद्रावती उर्फ भांदक

आमच्या नव्या सुधारित वेळापत्रकानुसार सगळं व्यवस्थित चाललं होतं. दिवस मोठा होत असल्याचा फायदा आम्ही व्यवस्थित करून घेत होतो. त्यामुळेच बल्लारपूर मध्येच साडेचार वाजून सुद्धा पुढचा किल्ला आजच्याच यादीत होता. लगेचच आमच्या सारथ्यानी, म्हणजे अस्मादिक हो, आमचा विदर्भ-भ्रमण रथ, म्हणजे स्विफ्ट, हातात घेतला. चंद्रपूर ओलांडून भद्रावतीत तासाभराच्या आताच दाखल झालो.

भद्रावती उर्फ भांदक किल्ला हाही भुईकोट आहे. बऱ्यापैकी चौरस आकारातला किल्ला मध्यवस्तीतच आहे. किल्ला पुरातत्व खात्याकडे असल्याने फाटक बंद असण्याची शक्यता होतीच आणि झालेही तसंच. त्यासाठीच आमच्याकडे backup plan तयार होता. पण त्याची गरजच पडली नाही. सुदैवाने ज्यांच्याकडे किल्ली असते तेच भेटले आणि आम्ही किल्ल्यात शिरलो.

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार

प्रवेशद्वार सुबकच आहे. बल्लारपूर प्रमाणेच येथे वापरलेले दगडही लाल-पिवळ्या रंगातले असल्याने त्याला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे.

सध्याचे द्वारपाल

द्वारपाल म्हणून भरगच्च आयाळ असलेलं सिंह-शिल्प येथे दरवाजात दोन्ही बाजूला आहे. अर्थात हे मूळ इथलं नसून दुसरीकडून आणून इथे शोभेसाठी ठेवलेलं असणार असं लक्षात येतं.

बारव आणि उतरायचे मार्ग

आतमध्ये शिरून आधी या किल्ल्याचा उत्तम अवशेष, म्हणजे तीन मजली बारव बघायला गेलो. वास्तविक दरवाजातून आत शिरल्या-शिरल्या उजवी आणि डावीकडे आपापली जागा घेऊन बसलेल्या सुबक मुर्ती आम्हाला खुणावत होत्या, पण सूर्याच्या किरणांची कृपादृष्टी त्यांच्यावर जास्त वेळ राहणार होती म्हणून “वाईच तेवढी बारव बघून येतो आधी” म्हणून आतमध्ये आलो.

३ मजली बारव

ह्या बारवेचा आकार मात्र वेगळाच आहे. चक्क तीन बाजूने यात उतरायची सोय आहे. प्रत्येक मजल्याच्या दरवाजांच्या कमानीवरून पाणी पडायला गोमुख आहे. ह्या दरवाज्यात पायऱ्यांनी जाण्याची सोय आहे. असं सगळं पाहण्याजोगं आर्किटेक्चर आहे या बारावेचं.

किल्ल्याची तटबंदी आतून न्याहाळत आतील भागातले उध्वस्त अवशेष नजरेखालून घातले.

मुख्यद्वार आणि देवड्यातील संग्रहालय

हे गाव ऐतिहासिक असून अनेक प्राचीन मंदिरे इथे आहेत. अनेक मूर्ती काही ठिकाणी, कधीकाळी, कोणत्यातरी मंदिरात स्थानापन्न असतील, पण कालांतराने काही कारणाने इतस्ततः पसरल्या गेलेल्या वगैरे मिळाल्याने त्या व्यवस्थित आणून या किल्ल्यात ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या व डाव्या बाजूला असलेल्या पहारेकरांच्या देवड्या म्हणजे मिनी म्युझियम झालेलं आहे. अतिशय वैविध्यपूर्ण असलेल्या मुर्त्या, अतिशय सुबक असून त्यावर बारकाईने कोरीव काम केलेलं आहे.

शिरच्छेद झालेली गणपती मूर्ती आणि जैन मूर्ती

तीस-पस्तीसच्या आसपास तरी असतील मुर्त्या, पण दुर्दैवाने धर्मावर हल्ला करण्याच्या काळात ह्या मुर्त्यांची विटंबना केली गेलेली दिसते. कोणाचा हात, कोणाचा पाय तर कोणाचे शीरच गायब आहे.

मातृका आणि मानव-घोडा युद्ध मूर्ती
नृसिंह आणि वराह अवतार
महिषासुर-मर्दिनी आणि हनुमान

गणपती, देवी, शंकर-पार्वती, विष्णू, स्वर्ग-अप्सरा, वराह, नृसिंह आदी अवतार, महिषासुरमर्दिनी, यक्ष आणि विशेष म्हणजे एक माणसावर हल्ला करत असलेला घोडा अशी विचित्र वाटणारी, जिचा काही अर्थ, प्रयोजन कळत नाही अश्या मूर्ती आहेत. ह्यात हिंदू मूर्तींबरोबर जैन तीर्थंकर यांच्याही मूर्ती आहेत. अर्थातच त्याही धर्मांधांच्या विटंबनेतून वाचलेल्या नाहीत.

निरोप सुर्यानारायणाला

हे संग्रहालय पाहून, शेजारच्या पायऱ्यांनी वर चढून, किल्ल्याचा भाग परत न्याहाळला. वरूनच बारवेच्या मागच्या तटबंदी मागे लपत असलेला सूर्याला निरोप दिला आणि किल्ल्याबाहेर पडलो.

लांबून लांबून लोक आपल्या गावात येतात काहीतरी बघायला, म्हणून स्थानिकांना कौतुक असतं आणि जिथे जिथे जातो तिथली लोक अतिशय आग्रहाने आणि आपुलकीने आपल्याला आपल्या गावाचं कौतुक सांगतात. जे जे चांगलं आणि अभिमान वाटण्याजोगं आहे, ते ते इतरांनी बघावं म्हणून झटत असतात.

वाकाटक कालीन दगडी पूल

त्यात या भद्रावती गावात तर खूप काही बघण्यासारखं आहे. किल्ला, देवस्थानं आहेतच. लेणी, गुहा-मंदिर आणि बरोबरच विशेष आकर्षण म्हणजे इथल्या “डोलारा” तलावातील दगडी पूल.

मंदिर अवशेष

किल्ल्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हा “डोलारा” नावाचा तलाव आहे. ह्या तलावाच्या मध्ये एक छोटसं बेट आहे. ह्या टेकडीवजा बेटाला इथे हुडकी म्हणतात. यावर दोन झाडं आहेत आणि प्राचीन मंदिराचे अवशेष त्याच्या छायेत विसावलेले आहेत. यात खूप मूर्ती आहेत. गणपती, नंदी, एक छोटीशी शंकराची पिंडी आहे. पूर्वी इथे उमा-महेश प्रतिमा होती असं सांगतात, जी सध्या गायब आहे.

इथे पोहोचण्यासाठी म्हणून या तलावाच्या आजूबाजूला असलेल्या वस्तीमधून एक पूल वाकाटक काळात बांधण्यात आला आहे. अखंड दगडी तुळया वापरून आणि सतरा x दोन अश्या ३४ खांबांचा हा पूल आहे.

वेळात वेळ काढून इथे गल्ल्या-गल्ल्यातून निमुळत्या रस्त्यावरून नक्की येऊन बघावं असं हे ठिकाण आहे.

किल्ला बघून निघायचं म्हटल्यानंतर चहाचा आग्रह झाला आणि “चला भवानी देवीचं गुहा-मंदिर बघूया” म्हणून झालेला आग्रह मोडता येत नसल्याने तिथे गेलो.

भरवस्तीत असलेलं हे मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. या मंदिराच्या शोधाची कहाणी आश्चर्यकारक आहे आणि ती प्राचीन वगैरे नाही तर अगदीच अलीकडच्या म्हणजे १९९० च्या काळातली आहे.

१९८८ मध्ये बोरकरांकडे मंदाताई लग्न होऊन आल्या. त्यांना देवीने दृष्टांत दिला आणि “माझे द्वार खुले कर” असा आदेश दिला. त्यानुसार ह्याजागी १९९२ रोजी खोदकामाला सुरुवात झाली. त्यात देवीची मूर्ती दिसली, जी गळ्यापर्यंत गाळाने भरलेली होती. देवीच्या आदेशावरून मंदाताई तिथे गेल्या आणि मूर्तीला हात लावताच ती गाळाची माती गळून पडली.

बौद्ध/जैन गुहा आणि मूर्ती

मंदिर पाहून पुढे आजच प्रवास करावा असा विचार होता. पण स्थानिकांचा आग्रह मोडवेना. बौद्धगुहा दाखवण्यासाठी आम्हाला ते आग्रहाने घेऊन गेले. पुरातत्व खात्याकडे असल्याने त्याची वेळ संपून त्या केव्हाच बंद झाल्या होत्या. तरीही त्यांनी रखवालदाराला बोलवून, त्या उघडायला लावून आम्हाला त्यांनी दाखवल्या. यांना बौद्धगुहा म्हणत जरी असले तरी त्यातल्या मूर्ती जैनही असू शकतात, कारण तिथल्या मूर्तीची नक्की ओळख पटत नाही. पण ह्या भांदक नगरीत काही जैन मंदिरं पण आहेत, त्यामुळे जैन-गुंफांची शक्यता जास्त वाटते.

हे सर्व बघून होईपर्यंत मात्र खूप उशीर झाला होता. त्यातून पुढे जायचा वाटेतला रस्ता हा राखीव जंगलातून जात असल्याने इथेच भांदक नगरीत मुक्काम करायचा ठरवला. वेळापत्रकात हा अचानक केलेला बदल होता. पण होतं हे भल्यासाठीच. पुढे होणारा अनपेक्षित फायदा तेव्हा माहिती नव्हता. मुक्कामाची सोय बघून निवांत पाठ टाकली.

विदर्भीय भटकंती – किल्ले माणिकगड


किल्ले हे राज्यासाठी इतके महत्वाचे असतात की राज्यासाठी जणू ते रत्नच. म्हणून आपल्याकडे रत्नांशी निगडित नांवं किल्ल्यांना आहेत. त्यातही माणिक हे एक मोलाचे रत्न, म्हणून रायगड मधला माणिकगड, नाशिकमध्ये माणिकपुंज आणि रत्नागिरीमध्ये माणिकदुर्ग. तसेच एक माणिक-रत्न आहे चंद्रपुरात गडचांदूरजवळ “माणिकगड”!

विदर्भ मुळातच जंगल समृद्ध, अर्थातच त्यात वनदुर्गांची संख्या जास्ती असणारच. त्यातलंच हे एक माणिक रत्न – किल्ले माणिकगड. या भटकंतीत सुरुवातीला मध्यप्रदेश सीमेजवळ जाऊन, नंतर छत्तीसगडमध्ये घुसून, परत महाराष्ट्रात आलो होतोच. आता माणिकगड म्हणजे चंद्रपूरपासून खाली जायचं होतं, तेलंगण सीमेजवळ.

जंगली भागातला हा किल्ला, जिथे अस्वलांसह वाघांचाही वावर आहे, अशा ठिकाणी जायचं म्हणजे पहाट आणि संध्याकाळ टाळायची. आमच्या नियोजनात हे उत्तम जुळत होतं. चंद्रपूर पाहून दुपारीच आम्ही इथे पोचणार होतो.

“माणिकगड किल्ला” म्हटलं की “माणिकगड सिमेंट” कारखान्याचा उल्लेख करणं हे शास्त्र असतं. आता किल्ल्याच्या नावावरून जर कारखान्याचे नांव असेल तर उल्लेख होणारच आणि त्यातून गडचांदूर सोडलं, की रस्त्यातूनच वरती सिमेंट आणायची मालाची वाहतूक करणारा रोप-वे दिसतो. ह्या पाळण्यांतून सारखी मालाची ने-आण चालू असते.

किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंगमध्ये गाडी त्यातल्या त्यात सावली बघून लावली आणि सगळी आयुधं बाहेर काढून एक एक परिधान करून सिद्ध झालो. हा किल्ला वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांची चौकी गाठली आणि शुल्क भरून तिकीट घेतलं.

कच्चा रस्त्याने किल्ल्याकडे जायला सुरुवात केली. विदर्भ हा कोकणापासून महाराष्ट्राच्या विरुद्ध टोकाला असला तरी काही समानता आश्चर्यकारक आहेत. कोकणात मुख्य पीक तांदूळ, तर विदर्भात भंडारा म्हणजे “राईस सिटी”च.. तशी इकडे मातीही. कोकण्याच्या डोळ्याला सुखावणारी लाल माती!

माणिकगड दरवाजा

दुपारी बाराच्या उन्हात तर पायाखायची आधीच लाल असलेली माती अगदी ज्वलंत भासत होती. उजव्या बाजूला वरती झाडीझुडपांच्या वरतून डोकावत असणारी तटबंदी बघत गडाच्या दरवाजात पोचलो सुद्धा. इथे एक तुटकी तोफ बेवारस पडलेली आहे. नाग, हत्ती, शरभ अशी द्वारशिल्प बघत बघत दरवाजा ओलांडला.

दुसऱ्या दरवाजाकडे घेऊन जाणारी खिंडीची वाट
दुसरा दरवाजा आणि त्यातून किल्ल्यात घेऊन जाणारी खिंडीची वाट

संवर्धन केलेली तटबंदी निरखत, पायऱ्याकडून खिंडीसारख्या वाटेवरून दुसऱ्या दरवाजात पोचलो. ह्या दरवाजाची जागा भन्नाट आहे. एक तर सध्या दरवाज्यात समोरच जाड खोडाचं मस्त झाड आहे आणि दुसरं म्हणजे हा दरवाजा नंतरही आपण आत आलेलो आहे तश्याच खिंडीच्या वाटेतून आपल्याला पुढे घेऊन जातो.

शहाणे काका पुढे जाऊन माझ्यासाठी खिंडीत थांबले होते, तर महेश आणि संतोष मागून रमत-गमत फोटो काढत येत होते. वनविभागाने लावलेला गडाचा नकाशा बघत त्यांची वाट बघत थांबलो, कारण पुढे जंगल होतं. सगळ्यांनी एकत्र फिरणं चांगलं, नव्हे गरजेचंच! वनविभागाने चक्क हमरस्तेच करून ठेवलेले असल्याने चुकण्याची काही शक्यता नव्हती, पण तरीही एकत्र फिरण्यात मजाही आहेच की.

बेलाचं झाड

या बोर्डाजवळच उभा असताना मागे एक छोटं फळ पडलेलं सापडलं. बेलाचं फळ बघितलं तेव्हा लगेच नजर फिरवली, तर त्याच झाडाच्या सावलीत उभा होतो. एवढी मोठी बेलाची झाडं बघायची सवय नसल्याने मला या झाडाचं अंमळ आकर्षण आहे. हळूच फळ खिशात टाकलं.

गणपती चौक

वनविभागाने आखून ठेवलेल्या मार्गावरूनच फिरताना इथलं जंगल किती दाट आहे हे लक्षात येत नाही, पण जर चुकून धोपट मार्ग सोडून झाडीत शिरलं तर कल्पना येईल की इथे वन्य प्राण्यांचं वास्तव्य का आहे. वन्य विभागाने तयार केलेल्या गणपती चौकात गेल्यावर श्री गणेशाचं दर्शन घेऊन राणी महाल-तलावाकडे गेलो. ह्या गणपती चौकात गणपतीच्या मूर्तीशेजारी एक दगडी गोटा आणि तो ठेवायला केलेला दगडी द्रोण आहे. आपल्या हाताने आपले कान पकडून कोपरांनी हा गोटा सावकाश उचलून परत जागेवर ठेवला कि आपली सगळी पापं धुवून जातात असं मानलं जातं. अश्या सोयी बऱ्या असतात ना मध्ये मध्ये 🤣

राणीमहाल - राणीतलावाकडे जाणारा मार्ग

राणी महालात फिरून वरतून पलीकडे खाली राणी तलावाचं दृश्य सुंदर दिसतं. गंमत म्हणजे हे अवशेष जमिनीच्या पातळीला नाही आहेत. सपाटीवरून चालताना अवशेष बघायला एकदम काही पायऱ्या उतरून खालच्या पातळीला यावं लागतं. मग राणी महाल आणि त्याच्याही खालच्या पातळीला पलीकडे राणी तलाव. राणी महालाचे टप्प्याटप्प्यात असलेलं बांधकाम मस्त फिरून बघता येतं. थँक्स टू वनविभाग! त्यांनी केलेल्या स्वच्छतेमुळेच इतक्या छान पद्धतीत हे बघता येतं. नाही तर झाडीत गडप झालेले अवशेष, झाडी बाजूला करून-करून रुक्षपणे बघायला लागले असते.

राणीतलाव
राणीतलाव

राणी-तलाव मात्र बेफाट आहे. हे राजे मुळात रसिकच. एवढा मोठा प्रचंड तलाव, त्याच्या काठावर राणी महाल आणि अशा तलावात पोहता येऊ शकतं. पण खास राण्यांसाठी सुरक्षित म्हणून राणी महालाला जोडूनच, त्याच तलावात भाग करून एक छोटा प्रायव्हेट स्विमिंग पूल. तो सुद्धा मस्त रुंद फांजी आणि चर्यायुक्त तटबंधित केलेला.

हे सगळे अवशेष जमिनीच्या पातळीच्या खालच्या बाजूला आहेत. तसंच जंगल भागामुळे इथे तलावात वन्य-प्राण्यांचा वावर. म्हणूनच कदाचित, इथल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक बुरुज बांधलेला आहे. हा जमिनीच्या पातळीला आहे. ज्यावरून राणी महाल आणि पूर्ण तलावावर एका दृष्टीक्षेपात लक्ष ठेवता येतं. ह्याला “बोकड डोह नाला” म्हणतात.

इतर अवशेष

इथं पुढचं दुसरं लपलेलं प्रवेशद्वार शोधत निघालो. ह्या बाजूला तटबंदी आहे. प्रवेशद्वार लपलेलं ह्यासाठी, कि इथला दरवाजा नेमका दिसतंच नाही. बऱ्यापैकी शोधाशोध केल्यावर तो नाद सोडला. उगाच जंगलाची परीक्षा कशाला घ्या... तिथल्या प्राण्यांना आमचा त्रास नको ना उगाच! पण दरवाजाचे स्थान नक्की लक्षात येतं कुठे असू शकेल तो.

त्यानंतर वाटेत फिरताना इतर अवशेष दिसतात, ते बघितले. पण या भानगडीत बऱ्याच दाट जंगल भागात आलो होतो. किल्ल्याच्या कडेकडेच्या बाजूने जाताना तोंडावर येणाऱ्या वेली, झाडांच्या फांद्या बाजूला करतच जायला लागत होतं. डाव्या बाजूला डोंगर-कडाच होता आणि ज्याला पूर्ण तटबंदीही शाबूत असलेली दिसली.

पाताळ-विहीर

त्या नंतर मग मोर्चा ह्या किल्ल्याचं आकर्षण असणाऱ्या वास्तु-अवशेषाकडे वळवला. “पाताळ-विहीर” 😊 आता नांवावरून लक्षात येतच असेल की, एक तर ही विहीर पाताळात तरी असेल किंवा पाताळात घेऊन जाणारी तरी... कदाचित दोन्हीही म्हणता येईल, कारण राणीचा महाल जसा जमिनीच्या पातळीच्या खाली आहे, त्या सारखीच, उलट त्यापेक्षा अजूनच खाली, जणू पातळतच की-काय, अश्या ठिकाणी ही विहीर आहे. कसलं स्थळ शोधून ही विहीर खणली आहे! चारही बाजूने उंच दगडी भिंती, आणि मध्ये चौकोनी विहीर. मस्तपैकी चिऱ्यांनी बांधून काढलेली आहे. लाल माती बरोबर कोकण्याच्या डोळ्यांना सुखावणारी ही अजून एक वस्तू - जांभा दगड.

वनविभागाने इथे लोखंडी रेलिंग लावल्याने येथे वावरणं धोकादायक राहिलेलं नाही. निवांत विहीर बघून, परिसरात दाट सावलीत बसून ते ठिकाण अनुभवले आणि तेवढ्यात काही पर्यटक इथे येणाऱ्या पायऱ्या उतरताना दिसले. “आता हवं तर घाला काय तो गोंधळ घालायचा असला तर” म्हणून सुटकेचा निश्वास टाकला.

पातळ विहिरीकडून पॅगोडाकडे आलो. ही जागा सुंदर आहेच आणि पॅगोडाही सुंदर बांधलेला आहे. फक्त डागडुगीची गरज मात्र आता आहे. पुढे एक रस्ता घोड्याच्या पागेकडे जातो तर दुसरा रस्ता "टहाळकी बुरुज" नावाच्या वास्तूकडे. ह्या वास्तूसमोरच एक सुंदर सूचना लिहिली आहे, “आपण पहावे आणि दुसऱ्यांना पाहण्यास संधी द्यावी”. खरंच, लोक एखादी गोष्ट पाहून तिथेच रेंगाळत बसतात. निवांत फिरताना लक्षातही घेत नाहीत, की आपला कदाचित दुसऱ्याला त्रास होत असेल. मग अपमान करून घेतात आणि चिडतात.

सदर

असो, पण वास्तु मात्र खणखणीत आहे आणि "टहाळकी" म्हणजे टेहळणी असा अर्थ अभिप्रेत असावा. पण एकूण बांधकाम बघताना येथे सदर असणार. पण सदर जागेचा उपयोग मात्र जोडपी छानसा आडोसा म्हणून करतात. त्यांना आमचा त्रास होऊ न देता जिन्यांना चढून वर गेलो. इथून गड परिसर अप्रतिम दिसतो.

या वास्तूच्या समोर तुटकी तोफ पडलेली पाहून पुढच्या बुरूजाकडे निघालो. हा "संत्री बुरुज". हा बुरुज छोटासा, पण सुस्थितीत असल्याने बघायला छान वाटलं. वनविभागाचं कौतुक म्हणजे परिसर एकदम स्वच्छ ठेवलेला आहे. एकतर झाडी वगैरे साफ केलेली आहे. त्यात लोकांनी कचरा वगैरे टाकलेला नसावा किंवा टाकलेला असल्यास, स्वच्छ केलेला आहे. त्यामुळे अवशेष बघायलाही छान वाटतात. इथे एक सूचना मात्र गमतीशीर आहे “पर्यटकांना कुठलाही त्रास होणार नाही असे अमानुष कृत्य करू नये” आता व्याकरण-चुका सोडून दिल्या, तरी ही सूचना नक्की कोणासाठी ही गंमतच आहे. आता पर्यटकांना त्रास होण्यासारखं कृत्य कोण करणार? आणि तेही अमानुष 🤣 कदाचित इथल्या वाचता येणाऱ्या, सुशिक्षित वन्यपणासाठी असावी.

संत्री बुरुज आणि वनखात्याचा टेहळणी टॉवर

पुढे वनखात्याचा टेहळणी टॉवर लागतो. इथे शेजारी वनरक्षकांसाठी एक खोलीसुद्धा बांधलेली आहे. या जागेवर कदाचित पूर्वी बुरुज असण्याची शक्यता आहे पण सध्या तसे काही बांधकाम दिसत नाही.

आमची गडफेरी पूर्ण झाली होती. एक वनरक्षक प्राण्यांच्या माहितीसाठी लावलेले Motion-trap कॅमेरे रिकामे करण्यासाठी घेऊन जात होता, त्याला पकडलं. त्याच्या कॅमेराने त्यात अस्वलं वगैरे पकडलेली होती. मग ऐकीव माहितीची खात्री पटली.

अवशेष बघून झाले. ह्या गडाचं नांव तिच्यावरून पडलं त्या “माणिक्या” देवीचं दर्शन मात्र इथे होत नाही. तसं काही स्थानही नाहीये इथे. “राजा गहिलु” ह्याने नवव्या शतकात हा किल्ला बांधण्याची नोंद आहे आणि त्याचे चिन्हही प्रवेशद्वारा जवळ आहे. ह्यांची अग्रदेवता माणिक्या देवी. हा गड पदरात पडल्यावर आमचा परतीचा प्रवास म्हणावा असा प्रवास चालू झाला, कारण आता परत फिरून वर-वर जात जिथून सुरुवात केली त्या नागपूरकडे वाटचाल होणार होती.

विदर्भीय भटकंती – किल्ले वैरागड आणि चंद्रपूर


किल्ले वैरागड

आता टिपागडावर फरसाण वगैरे सगळं हाणल्याने गाडी सुसाट निघाली. तसही दुपारचं जेवण साग्रह-संगीत वगैरे चोचले नसल्याने तोही ब्रेक घ्यायचा नव्हताच. पण सावरगावला चहा मात्र घेतला आणि “कुलभट्टी, मुरमगाव” करत वैरागडकडे निघालो. रस्ते बऱ्यापैकी चांगलेच आहेत. त्यातून वैरागड हा अगदी गावातच आहे, भुईकोट आहे, त्यामुळे किल्ला सापडायला काही फार वेळ लागला नाही.

तरी सव्वा पाच वाजले होते. अर्थात आम्ही वेळेत होतो, कारण साधारण तासाभरापेक्षा थोडासा जास्त वेळ नक्कीच होता उजेडात किल्ला बघायला.

वैरागड दरवाजा

वैरागड हा भुईकोट आहे आणि त्यातून तो गावात आहे, त्यामुळे अर्थातच त्याची अवस्था काय असेल याचा विचार करायची गरजच नव्हती. पण आश्चर्यकारकरीत्या आम्हाला जे अपेक्षित होतं तश्या प्रकारे काही अस्वच्छ निघाला नाही किल्ला. अर्थात किल्ल्याची पडझड झालेली असणार हे साहजिक आहे. बाहेरची तटबंदी ही बऱ्यापैकी उध्वस्त आहे. तटबंदीच्या भग्न दरवाजाच्या आत डावीकडे गोल बुरूज दिसतो, हाही ढासळत चाललेला आहे. त्याला लागून तटबंदी मात्र सलग आहे. ही आतील बाजूची तटबंदी आहे. तटबंदीला डावीकडे ठेवत रस्ता मुख्य दरवाज्याकडे जातो. उजव्या बाजूला पूर्णपणे तलाव आहे. तीन चौकोनी बुरुज ओलांडल्यावर गडाचा दरवाजा येतो. इथे लोखंडी गेट लावलेलं आहे आणि ASI चा बोर्ड आहे. किल्ला पुरातत्व खात्याकडे असल्याने गेट संध्याकाळी बंद होत असेल व सकाळी ठराविक वेळीच उघडणार असणार. पण स्थानिकांची कृपा... किल्ला हे गुरांसाठीचं चरायचं ठिकाण असल्याने त्यातून मनसोक्त चरून भरल्या पोटाने गुरं बाहेर येत होती, त्यामुळे गेट उघडंच होतं.

गुरं आणि गुराखी बाहेर आल्यावर Whole वावर was our... निवांत किल्ला बघता येणार होता. सुस्थितीत असलेला मुख्य दरवाजा बघून आत गेलो. या दरवाजावर बाजूला एक गणपती कोरलेला आहे.

हत्तीचा हौद

किल्ल्यात तीन बारव आहेत. (श्रीपाद चितळे त्यांच्या पुस्तकात चार बारव असल्याचं नमूद करतात, त्यातली चौथी बारव अशी सापडली नाही. कदाचित बुजून गेलेली असू शकते किंवा शेजारील अतिक्रमणामध्ये गेलेलीही असू शकते) दरवाज्याच्या आत मध्ये गेल्यावर समोरच उजवीकडे मोठी बारव आहे, जी अष्टकोनी आहे आणि त्यात उतरायला पायऱ्याही आहेत. ह्या बारवेला “हत्तीचा हौद” म्हणतात.

बारव

दरवाजाच्या समोरच्या रस्त्याने किल्ल्याच्या आतमध्ये जाताना वाटेतच डाव्या बाजूला दुसरी बारव आहे. एक भग्न नंदी इथे ठेवलेला आहे. पुढे उजव्या बाजूला एक चौकोनी बांधीव खड्डा आहे. कदाचित चितळे सर म्हणतात ती ही बारव असू शकते, पण बुजल्यामुळे असेल कदाचित, पण तो खड्डा बारव वाटत नव्हता. इथूनच सरळ रस्त्याने शेवटपर्यंत गेल्यावर मागच्या बाजूच्या दरवाज्यात पोचलो. आता हा दरवाजा बऱ्यापैकी बुजलेला आहे.

मागच्या बाजूचा दरवाजा

आता माहिती असलेले बघायचे असे सगळे अवशेष बघून झाले, पण अजूनही असेल कि काहीतरी बघायला, म्हणून परत मुख्य दरवाजात येऊन उलट्या प्रदक्षिणा मार्गाने जायचं ठरवलं. जाताना एक बारव दिसली. आता उरलेले अवशेष बघण्यासाठी झाडीत शिरणं गरजेचं होतं. झाडीत घुसलो आणि खूप फिरल्यानंतर एका तटावर हनुमान सदृश मूर्ती दिसली. पण खूपसे अवशेष असेच दडले गेलेले आहेत.

बारव

जे शक्य होईल ते अवशेष पाहत गेलो आणि नंतर शेवटी बाहेरच्या बाजूने असलेला खंदक पाहून आमची गडफेरी संपवली तेव्हा सव्वा सहा वाजून गेले होते. अंधार पडायच्या आत सगळे अवशेष आमचे बघून झाले.

दिवसभरातली ठिकाणं ठरल्याप्रमाणे फिरून झाल्यावर आता फक्त झोपण्याची जागा शोधणे आणि झोपणे हीच कामं शिल्लक राहिली होती. हा अर्थात जेवणही राहिलं होतं, ते जाता जाताच करायचं ठरलं. रात्रीचा सदुपयोग म्हणून वैरागड मध्ये राहण्यापेक्षा सरळ चंद्रपुरातच जायचं ठरवलेलंच होतं, कारण इथे राहण्यात काहीच अर्थ नव्हता, सकाळचा वेळ प्रवासात कशाला घालवायचा? त्याप्रमाणे चंद्रपूरकडे जाताना वाटेत गडचिरोलीत जेवलो आणि चंद्रपूरकडे गाडी हाकली.

किल्ले चंद्रपूर

चंद्रपूरला निसर्गाचं एक सुंदर असं वरदान नक्की लाभलेलं आहे, ते म्हणजे जंगल! गडचिरोलीतील महामार्गाने चंद्रपूरकडे निघाल्यावर “मूळ, अय्याजपूर-रय्यतवारी सोडलं की चित्तपल्ली पासून राखीव वनविभाग चालू होतो, तो थेट “लोहारा” गावापर्यंत. हे जंगल ओलांडलं की अवघ्या पाच किलोमीटरवर आहे चंद्रपूर शहर. चंद्रपूर शहराच्या इतक्या जवळ राखीव जंगल... काय मस्त ना इथल्या लोकांना? वन्य प्राण्याचे दर्शन ही काही विशेष बाब नसेल त्यांच्यासाठी.

रात्रीचे नऊ वाजून गेले होते. २० किलोमीटरच्या आसपास रस्ता ह्यावेळी आणि तोही दोन्ही बाजूला राखीव जंगलातून... फक्त विचार काय मस्त वाटत असेल गाडी चालवायला! चंद्रपूर शहरात पोहोचायला कितीही वाजले असते तरी आम्हाला चालले असते. त्यामुळे ह्या रस्त्याचा आनंद घेत निवांत चंद्रपूर शहर गाठलं. यावेळेस शहरात पोहोचल्यावर “I ❤ चंद्रपूर” दिसलं आणि लगेच त्याच्याबरोबर फोटोही काढून घेतला. काय करणार? या विदर्भातल्या निसर्ग सौंदर्याने चंद्रपूरच काय, पूर्ण विदर्भाच्या प्रेमात पाडलंच होतं की आम्हाला 😊

चंद्रपूरचा किल्ला बघणे हे तसं दिव्यच काम आहे. कारण नगरकोट म्हटलं की आला अवाढव्य पसारा, चहू बाजूने वस्ती, वस्तीचे अतिक्रमण, त्यातच रस्ते आणि रहदारी. आता सवयीने माहिती झालेलं होतं, की जी काही बुरुज-तटबंदी शिल्लक असेल ते वस्तीने घेरलेलं असणार. अगदी कुठे बुरुजाच्या आतमध्ये तटबंदीची भिंत धरून घर उभारलेली असणार, दरवाजे हे शहराच्या मधोमध कुठेतरी, त्यात आत मधून रस्ता आणि बुरुजांवर किंवा त्यांच्या डोक्यावर जाहिरातीचे बोर्ड घेऊन ते नाईलाजाने उभे असणार. चंद्रपूर ही याला अपवाद का असेल? म्हणून पहाटे उठून रहदारी सुरू व्हायच्या आधीच जमेल तेवढे अवशेष बघून घ्यावेत असा विचार होता.

जटपुरा दरवाजा

बरोबर सव्वा सहाला आम्ही पहिला फोटो घेतला, तो जटपुरा दरवाजाचा, आणि लक्षात आलं की आमचा विचार जरी बरोबर असला, तरी सव्वा सहा ही वेळ म्हणजे उशिरच झाला होता. रहदारी आधीच सुरू झालेली होती.

या किल्ल्याला एकूण ३९ बुरुज आहेत. दरवाजे आणि खिडक्या वेगळ्याच. तब्बल १२ किलोमीटर लांब तटबंदीच आहे. आता पूर्ण शहर ज्यात सामावले आहे, तो किल्ला असणारच म्हणा असा. मग असं किती पहाटे सुरुवात करून कमी रहदारीत पाहणार होतो म्हणा किल्ला? बरं ह्यात फक्त तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि खिडक्या नाहीत तर अनेक मंदिरे, तलाव, राजवाडा वगैरे सगळं किल्ल्याचेच भाग आहे. आम्ही कसं सोडणार ह्यातलं काही?

चोर खिडकी

“चार तासांची निश्चिंती झाली बगूनाना...” म्हणून घातला सरळ मोबाईल खिशात. मस्त गरम गरम वाफाळणारे पोहे लगेचच चाणाक्ष नजरेने हेरले आणि तर्रीच्या वासाने तिकडे ओढलो गेलो. तुडुंब पोहे रिचवल्यावर चहा ढोसला आणि कामाला लागलो.

अंचलेश्वर, बिनबा, जटपुरा आणि पठाणपुरा ही चार महत्त्वाची प्रवेशद्वारं आहेत. तर अजून पाच छोटे दरवाजे आहेत, त्यामुळे त्यांना इथे खिडकी म्हणतात. “हनुमान खिडकी, बगड खिडकी, विठोबा खिडकी, चोर खिडकी आणि मसान खिडकी” हे खिडकीवजा दरवाजे सुद्धा रहदारीच्या रस्त्यांवरच आहेत.

हनुमान खिडकी
हनुमान खिडकी

इथे फिरायची तयारी करताना सरळ गुगल मॅप काढला होता. त्यावर सगळे दरवाजे, खिडकी-दरवाजे मांडून ठेवलेले होते. बरं फक्त एवढंच नाही, तर ह्या किल्ल्याचाच भाग म्हणता येईल असं महाकाली मंदिर, गणपती मंदिर, अंचलेश्वर महादेव, एकविरा देवी मंदिर ह्या वास्तूही चुकवून चालणार नव्हत्या, त्यामुळे त्याही वास्तू आधीच नकाशावर मांडून ठेवलेल्या होत्या. राजा बीरशहा, त्याची राणी गंगाई यांची स्मारक-मंदिरही बघितलीच पाहिजेत. त्यामुळे हे सगळं नकाशावर मांडून त्या ठिपक्यांची रांगोळी काढावी तसा नकाशा मांडून ठेवला होता, जेणेकरून कुठून कसं जावं हा प्रश्न आयत्यावेळी पडून वेळ वाया जाऊ नये.

त्या चंद्रपूरच्या रांगोळीचा जो चक्रव्यूह तयार करून ठेवला होता, तो एकदा डोळ्याखालून घातला आणि भरल्या पोटाने आमचा वारू सुटला.

बिनबा दरवाजा
बिनबा दरवाजा

एका मागून एक दरवाजे, खिडक्या सगळं पाहिलं. गुगलबाबाने रस्ता बिनबा दरवाजाकडून पठाणपुराकडे जायला दाखवला. आता शहरातले रस्ते कसा चुकू शकेल हा बाबा, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून गाडी घातली आणि अगदी जेमतेम शंभर मीटरवर चक्क सगळ्यांनाच खाली उतरवावं लागलं. गाडीखाली पाच ते सात इंच खडीचा थरच होता. हळूहळू गाडी मागे घेतली आणि खडीच्या थरातून बाहेर पडलो. दुसरा रस्ता धरून पठाणपुरा दरवाजा गाठला. पठाणपुरा दरवाजा काय सुंदर आहे? दोन्ही बाजूला सिंह आहेत, त्यांच्या पायाखाली हत्ती. इथे मनासारखे फोटो मिळेपर्यंत थांबलो.

पठाणपुरा दरवाजा
पठाणपुरा दरवाजा

अंचलेश्वर मंदिरही फार जुने आहे. त्याच्या शेजारीच “हडवाडा” येथे गोंड राजांच्या समाधी असलेलं मैदान आहे. गुगलवर अंचलेश्वर मंदिर शोधल्यावर बहुतेक ठिकाणी जो फोटो दिसतो ती खरी ह्या मैदानातली देखणी अशी समाधी आहे, जी चंद्रपूरचा दहावा राजा बिरशहाची आहे.

अंचलेश्वर मंदिर

ह्या मंदिराच्या उभारणीमागे कथा आहे. आज हे चंद्रपूर शहर असलेल्या जागेवर सुमारे ५०० वर्षापूर्वी सर्वत्र जंगल होते. या टापूवर गोंड राजाची सत्ता होती. त्यावेळी या राज्याचे राजधानीस्थळ “वर्धा” नदीकाठावरील बल्लाळशहा, म्हणजे आजचे बल्लारपूर, हे होते. इथे राजा “खांडक्या बल्लाळशाह” हे गादीवर बसले होते. हे नांव त्याला त्याच्या अंगावरील फोड म्हणजे “खांडकां”मुळे पडलेले होते. हा राजा आपल्या ह्या खांडकांमुळे त्रस्त होता. विविध उपचार करून ही ते जात नव्हते. त्याची राणी, “राणी हिरातानी” हिने राजाची तब्येत बरी व्हावी म्हणून त्याला शिकारीला जात जायला सांगितलं. त्याच्यासाठी जुनेजा इथे एक तलाव आणि काठाला महालही बांधला. एकदा राजा शिकारीसाठी जंगलव्याप्त या भागात झरपटनदी परिसरात आला. त्याने जंगलातील कुंडातील पाणी प्यायले आणि त्या पाण्याने आपले अंग पुसले. सकाळी त्याच्या खांडकांना आराम पडल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि या पाण्याच्या चमत्कारीत गुणामुळे राजाची श्रद्धा या ठिकाणावर बसली. त्याने त्या ठिकाणी एक मंदिर बांधलं, हेच पुढे अंचलेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

अंचलेश्वर दरवाजा
अंचलेश्वर दरवाजा

याच मंदिरात दर्शन घेऊन एकदा राजा परत जात असताना त्याला शिकारी कुत्र्याच्या मागे ससा लागलेला दिसला. नंतर कुत्र्याने सश्याची शिकार केली खरी, पण हा प्रकार आश्चर्यकारक होता. त्यामुळे त्याने राणीच्या सल्ल्यानुसार पुढे जंगल साफ करून किल्ला बांधून गाव वसवले. चंद्रपूर असे नाव गावाला देवून बल्लारपूरची राजधानी चंद्रपूर येथे हलविण्यात आली.

समाधी स्मारक परिसर दरवाजा

मंदिराशेजारच्या मैदानाला चहूबाजूने तटबंदी आहे आणि त्याला बुरुजही आहेत. हे सकाळी नऊ-दहाला उघडतं. पण महादेवाची कृपा. त्यादिवशी डागडुगीच्या कामासाठी साडेआठच्या आधीच उघडलं होतं, त्यामुळे आम्हाला वाट बघायला लागली नाही. लगेच बघायला आत घुसलो आणि ते सुद्धा निर्मनुष्य बघता आलं. निवांत फोटो काढले, बाहेर दरवाजावर मात्र फोटो आणि व्हिडिओसाठी बंदी लिहिलेली आहे. कदाचित कॅमेरातून एखादा देव किंवा तिथलं सौंदर्य कोणीतरी पळवून तर नाही ना नेणार अशी त्यांची भीती असावी. याच मैदानात एक सुंदर बारवही आहे.

समाधी स्मारक परिसर दरवाजा
बारव

इथे असलेल्या समाधीपैकी जी सगळ्यात सुंदर दिसते ती राजा बिरशहाची समाधी, जी त्याची राणी गंगाई हिने बांधली. ह्या राजाला अवघ्या विसाव्या वर्षी गादीवर बसावं लागलं आणि फक्त ८ वर्षाच्या कालखंडानंतर त्याचा खून झाला. त्यानंतर राणी गंगाई हिने पुढील १५ वर्ष राज्यकारभार सांभाळला. तिने बांधलेल्या ह्या समाधीपुढे नंतर भोसले यांनी सभामंडप उभारले. ह्या समाधीपुढेच ह्या राणीचेही स्मारक आहे.

ह्याप्पी बड्डे सल्लुभाई, शेजारी "डिटर्जंट पावडर - नवीन पॅक तीच चव 😉"
बगाड खिडकी

पुढचा दरवाजा, नव्हे खिडकी-दरवाजा बघताना सल्लू भाईला त्याच्या पंख्याने जाहीर शुभेच्छा दिलेल्या बघायला मिळाल्या. बगाड-खिडकी. इथे बुरुजावर गेल्यावर समोर सुंदर तलाव दिसतो. हा “रामाळा” तलाव. राजा रामशाह याच्या नावावरून ह्या तलावाला हे नांव पडले.

शहरात राजा हिरशहाने बांधलेला बालेकिल्ला बघायला गेलो पण मात्र त्यात सध्या तुरुंग असल्याने बाहेरूनच तो बघायला मिळतो. एकूणच ज्या ज्या दरवाजे-खिडकीमधून कार जाऊ शकते तिकडून फिरवून झाली. जिथून जात नाही, तिथे चालत भटकून झालं.

त्यानंतर बाबूपेठ नावाच्या भागात गेलो. इथे आम्हाला बघायचं होतं, “अपूर्ण देवालय”. इथे आम्ही गमतीशीर रस्त्याने पोचलो. गल्ल्या-गल्ल्यातून कशीतरी गाडी घातली. पलीकडून रस्ता आहे की नाही ह्या विचारात, कडेने बघत-बघतच चिंचोळ्या गल्लीतून कसेबसे पोचलो. आता गुगलबाबांनी अश्या रस्त्याने आम्हाला मुद्दाम नेले, कि हाच रस्ता आहे हे गुगललाच माहिती. पण पोचलो. आता गमतीशीर रस्त्याने पोचलेल्या ह्या ठिकाणामागची कथा सुद्धा रंजकच असणार कि...

बाबूपेठ परिसरातील बाभळीचे जंगल कापून गोंडराजांनी वसाहत उभारली. त्यामुळे यास बाबूपेठ असे नाव पडले. लागूनच भिवापूर पेठ वसवली. गोंडराजे धुंड्या रामशहा यांच्या कार्यकाळात सोळाव्या शतकात बाबूपेठेत राहणाऱ्या रायप्पा कोमटी-वैश्य यांनी भव्य शिवमंदिराची उभारणी करण्यासाठी अनेक मूर्तींची निर्मिती केली. ह्यासाठी त्यांनी डोंगरातून मोठमोठ्या शिळा आणल्या.

एकाच दगडात व रेतीच्या दगडात कोरलेल्या अनेक मूर्ती कोरल्या. प्रत्येक मूर्तीचा आकार भव्य ठेवला. सर्व मूर्तीचे काम पूर्ण झाल्यावर एक शिवमंदिर बांधून त्यात शंकराच्या पिंडीची स्थापना करावी व आजूबाजूला इतर मूर्ती ठेवायच्या असा त्यांचा विचार असावा. दशमुखी दुर्गेसह महिषासुरमर्दिनी, विष्णूचे मत्स्यावतार, कूर्मावतार, शिवलिंग, नंदी, हत्ती, गणेश, हनुमान, कालभैरव, दोन नागिणींसह शेषशायी चतुर्भुज शंकर, दिगंबर शिव, गरुड, द्वारपाल असा एकूण पंधरा मूर्तींचा समूह तेथे बांधला. मात्र, शिवालयाचे कार्य प्रगतीपथावर असतानाच रायप्पा वैश्यचा मृत्यू झाला आणि काम कायमचे थांबले. ते अपूर्णच राहिले, त्यामुळे या परिसराला 'अपूर्ण देवालय' असे म्हणतात.

दशानन दुर्गादेवी (फोटो आंतरजालावरून साभार )

दुर्गादेवीची मूर्ती चारशे वर्षे पुरातन आहे, जी २३ फूट लांब आणि १८ फूट रुंद अशी एकपाषाणी विशाल दहा तोंडे असलेली आहे. ह्या दशभुजाधारी मूर्तीच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे. दहा तोंडे असल्यामुळे अनेक लोक या मूर्तीला रावण समजून विजयादशमीच्या दिवशी दगड मारायचे. त्याने मूर्तीचं थोडं नुकसानही झालेलं आहे. परंतु, नंतर संशोधकांनी मूर्तीला खरी ओळख मिळवून दिली. ती मूर्ती देवीची असल्याची माहिती पुढे आल्यानंतर लोकांमधील गैरसमज दूर झाला आणि दगड मारण्याची परंपरा बंद झाली.

मत्स्यअवतार आणि हत्तीसह शिवलिंग

येथील एक वैशिष्ठ्यपूर्ण मूर्ती म्हणजे शिवलिंग आणि समोर हत्ती. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगावरील पाणी हत्तीच्या पाठीवर पडते. हत्तीच्या पाठीवरून हे पाणी वाहून जाण्यासाठी सुरेख वाहिका तयारी केलेली आहे. बहुतेक मंदिरांत गोमुखातून पाणी जाण्याची व्यवस्था असते तसा इथे हत्तीचा वापर केलेला प्रथमच दिसून येतो.

चंद्रपुरात आलेल्या पर्यटकांनी हे ठिकाण अजिबात चुकवू नये असे आहे. सगळ्या मूर्ती अत्यंत सुबक आहेत. पण हे देवालय बिचारे पर्यटकांच्या प्रतीक्षेत एकटे पडून आहे किंवा कदाचित आमची वेळ चांगली जुळली असल्याने इथे लोक नसतील. पण त्यामुळे गाडी लावायला जागा पण मस्त मिळाली आणि जणू काही प्रत्येक मूर्तीची जवळ घेऊन चौकशी करावी अशा प्रकारे निवांत फेरफटकाही मारायला मिळाला.

आमचे चंद्रपूर शहर भटकून झालं. आता शहरा-बाहेर जायचं होतं म्हणजे चंद्रपुरातून थोडं दक्षिणेला ते पुढच्या किल्ल्याकडे.. बघूया पुढे माणिकगड!

विदर्भीय भटकंती – किल्ले टिपागड


टिपागड

विदर्भातल्या ह्या भागात जायचं ठरल्यावर गडचिरोलीतील किल्ल्यांच्या यादीत एक नाव आलं “टीपागड”. भटकंतीला जायचं म्हटल्यानंतर त्या त्या ठिकाणची पूर्ण माहिती घ्यायची आणि मगच नियोजन करायचं ही सवय. कारण एखादी जागा ठराविक दिवशी बंद असते किंवा जायला परवानगी नसते किंवा सगळी माहिती नसेल, नीट अभ्यास केला नसेल, तर काही अवशेष बघायचे राहून जातात.

दुर्दैवाने या किल्ल्याची माहिती ना इंटरनेटवर सापडली ना विस्तृत स्वरूपात पुस्तकात. मांडे सरांच्या पुस्तकात किल्ल्याच्या फक्त स्थानाचा उल्लेख आहे. श्रीपाद चितळे यांच्या पुस्तकात माहिती असली तरी त्यांची भटकंती फार पूर्वीची आहे, त्यामुळे सध्याची स्थिती कळायला या पुस्तकावर जास्ती अवलंबून राहता येणं शक्य नव्हतं. आणि मुळात हे पुस्तक आम्ही भटकंतीला निघायच्या आदल्या दिवशीपर्यंत माझ्याकडे नव्हतंच मुळी. इंटरनेटवरचे व्हिडिओ आहेत त्यात किल्ला म्हणून जवळपास काहीच माहिती नाही. आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ म्हणूनच याचे चित्रण जास्ती आहे. त्यातही तिथे गेलेले लोक जवळपास स्थानिकच आहेत. थोडक्यात शहरी भागातले किंवा इतर ठिकाणचे ट्रेकिंग किंवा किल्ले भटकंतीच्या उद्देशाने तिथे गेलेले असं कोणीच सापडलं नाही. मांडे सरांच्या पुस्तकात ठळक शब्दात “अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग” असा उल्लेख आहे. “टिपागड दलम” नावाची नक्षलवाद्यांची तुकडी सुद्धा आहे. थोडक्यात इथे जावं की नाही हे ठरत नव्हतं.

भटकंतीतले बघायची ठिकाणं नकाशावर पाहता, गोंदियातील प्रतापगड पाहून मग इथे जायचं असं नियोजनात बसत होतं. प्रतापगडावरून टिपागडला जायला दोन मार्ग आहेत. एक रस्ता कुरखेडा वरून मळेवाडा-कुलभट्टी-सावरगाव वरून “मोठाझोलीयाला” येतो, तर दुसरा रस्ता कुरखेडावरून कुराडा-बेडगाव-कोरोची असा कोडगूळ मार्गे “मोठाझोलीयाला” येतो. दुसरा रस्ता काही किलोमीटर अंतर छत्तीसगड राज्यातूनही जातो. आमच्या नियोजनात प्रतापगड दुपारी होणार होता. त्यामुळे टिपागडला जाताना मुक्काम कुठे करायचा हा मोठा प्रश्न होता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरत होता “नक्षलग्रस्त भाग” हाच. आम्हाला जरा सुद्धा जोखीम पत्करायची नव्हती आणि किल्ला बघायची तर फार इच्छा होती. मग त्या दृष्टीने हातावर हातात ठेवून न राहता हालचाल करायला सुरुवात केली. म्हणजे काय, तर फोन फिरवले. सुदैवाने काही संपर्क मिळाल्यानंतर त्यांच्याकडून काही माहिती मिळाली. त्यात कोरोची मार्ग निवडायचा ही महत्वाची माहिती मिळाली. मग ठरलं कि टिपागड बघायचा म्हणजे बघायचा!

लेखात किल्ल्याकडे वळण्यापूर्वी नमनाला घडाभर तेल झालं. पण ते का वाहिलं हे मात्र लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण मांडे सरांनी म्हटल्याप्रमाणे हा अतिसंवेदनशील भाग आहेच. “टिपागड दलम” आहे हे विसरून चालणार नव्हतं. आणि त्यात किल्ल्याची माहिती गुगलवर बघताना दीपागड म्हणून शोधल्यास नक्षलवादी कारवायांच्या बातम्याच जास्ती दिसतात.

फोनाफोनीत मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवला. साध्या नागरिकांना नक्षलंचा त्रास नाही असंही सगळीकडून ऐकत होतोच. मग नक्षलवाद्यांवरही वरही विश्वास ठेवला. पण आपण खरंच “साधे नागरिक” आहोत हे मात्र “सगळ्यांना” सहज समजावं अशी काळजी मात्र घेतली पाहिजे ह्याची नोंद घेतली आणि सज्ज झालो ते टिपागडला भेट द्यायला.

स्वागताची पाटी

आमचं नशीब जोरावर होतं. आधीचे किल्ले नियोजनाच्या आधीच झाल्यामुळे प्रतापगड दुपार ऐवजी सकाळला आला होता आणि त्यामुळे साहजिकच एक प्रहर वर सरकल्याने टिपागडला सकाळचा वेळ मिळाला आणि त्यामुळे रस्त्यात मुक्कामाची गरज पडणार नव्हती. बेडगाव-कोरोची जवळ थोडा रस्ता चुकत-चुकत आलो तरी दुपारी साडेबारा-पाउणच्या दरम्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला बाणाची खुण असणारी “टिपागड ९०० मीटर अशी पाटी दिसली” (खरंतर पाटी ०.९०० मीटर होती पण याचा अर्थ तीन फूटही होत नाही ही पाटीवरची गंमत आज ब्लॉग लिहिताना लक्षात आली.) “टिपागड गुरुबाबा देवस्थान” असं लिहिलेल्या बोर्डाने, मोठाझोलिया ग्रामपंचायतीने आमचं स्वागत केलं. इथून उजवीकडे वळून गेल्यावर “न्याहाकल” गाव लागतं. वाटेत जिल्हा परिषदेची शाळाही लागते.

रस्ता जिथपर्यंत जातो तिथे पर्यंत गाडी नेऊन टळटळीत उन्हात, बरोबर एकच्या सुमारास गडाकडे वाटचाल चालू केली. वाट ठळक आहे. त्यातून इथे नुकतीच जत्रा होऊन गेली होती त्यामुळे वाटाड्याची गरज सुद्धा वाटली नाही. सुरुवातीलाच एक प-ह्या लागतो, तो ओलांडून पलीकडे वाट सरळ दिसते.

समृद्ध जंगल
समृद्ध जंगल
समृद्ध जंगल
शिळा

इकडचं जंगल विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी समृद्ध आहे हे आम्हाला प-ह्या ओलांडून जंगलात शिरता शिरताच समजलं. किती प्रकारचे वृक्ष इथे असतील आणि वेली इथे असतील हे सांगणं कठीणच आहे. “टिपा” म्हणजे गोंड भाषेत “द्वीप”. अतिप्राचीन काळी हे क्षेत्र ज्वालामुखीच्या भागात येत असल्याने येथे तशा प्रकारच्या अग्निजन्य शिळा प्रचंड प्रमाणात आहेत.

तटबंदीचे पहिले दर्शन

“अखेर टिपागड” ही भावना मनात असल्याने फोटो-व्हिडिओ चालूच होते. तासाभरानंतर तटबंदी दिसली आणि पहिला विचार मनात आला तो म्हणजे हा किल्लाच आहे. तटबंदीतून रस्ता आतमध्ये जातो.

सर्पशिल्प आणि अनामिक देवता

तटबंदीतून आत जाता जाता एक ठिकाणी दगडावर सर्पशिल्प कोरलेलं दिसलं. तीन सर्प एकमेकांना विळखा घालून, फणा काढलेले दाखवलेले आहेत. त्याच्या शेजारीच शिळेवर मनुष्यरूपातील देवतेचं शिल्प आहे. पण ते नक्की कसले किंवा कोणत्या देवाचे ते समजत नाही. जवळच खाली दोन दगडात तीन-चार ध्वज खोचून ठेवलेले दिसले. यातल्या दगडात घोड्याची मूर्ती कोरलेली आहे.

२००० फुट उंचीवरील डोंगरावर विस्तीर्ण तलाव

तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर विस्तीर्ण जलाशय दिसतो. हा तलाव स्वच्छ अशा गोड्या पाण्याचा असून समुद्रीपासून जवळपास दोन हजार फूटपेक्षा जास्त उंचीवर आहे. एवढ्या उंचीवर असलेला, एवढा मोठा तलाव एकमेव म्हणावा लागेल. त्यातून आश्चर्य म्हणजे ह्या तलावाला बारमाही पाणी असतं. गंमत म्हणजे हा संपूर्ण तलाव किल्ल्याच्या आतील भागात आहे. तलावाच्या बाहेरच्या बाजूने पूर्ण तटबंदी आहे. आपल्याला संपूर्ण तटबंदी दाट जंगलामुळे फिरून बघता येत नसली तरी बऱ्यापैकी तटबंदीचा भाग आपल्याला लांबून का होईना पण दिसतो. याच तलावामधून पाणी झिरपत एका नदीचा उगम झाला आहे, तिला “टिपागडी नदी” म्हणून ओळखतात.

बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या

तलावाच्या पलीकडे बरोबर समोरच्या बाजूला एक मंदिराचे बांधकाम लांबूनच दिसलं, तर उजवीकडे सुद्धा अजून एक मंदिर दिसलं. इथून डावीकडून प्रदक्षिणा मार्गाने तलावाच्या कडेकडेने विरुद्ध बाजूस दिसलेल्या मंदिराकडे जायचं. तलावाजवळच्या ह्या मंदिराजवळ पोचलो. इथे झाडांना पार बांधलेला आहे. डावीकडची वाट गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाते. आधी बालेकिल्ला बघून घ्यायचा आणि येताना मंदिरात दर्शन घ्यायचं ठरवलं.

भवानी माता स्थान

पायथ्यापासून सुरुवात करून रमत-गमत सुद्धा येथे दीड तासात पोचलो होतो. डावीकडच्या पायऱ्यांनी बालेकिल्ल्याकडे जायला सुरुवात केली. इथे एक छोटीशी खिंड तयार झालेली आहे, त्यातून ह्या पायऱ्यावर चढतात डावीकडच्या डोंगरावर. विदर्भात बालेकिल्ला हा प्रकार सगळ्या किल्ल्यांवर आढळत नाही. इथे मात्र याचे व्यवस्थित असे अस्तित्व आहे. छोटीखानी असला, तरी अस्तित्वाच्या खुणा मात्र बाळगून आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर वाट सरळ समोर बालेकिल्ल्यावर जाते. परंतु इथे उजव्या बाजूला एक छोटेसे देवस्थान आहे. उजवीकडे जरासं उतरून इथल्या अनगड देवाचे दर्शन घेतले. बहुतेक हे भवानीमाता देवस्थान.

शिळा

पायऱ्या चढून आल्यावर लगेचच उजवीकडे हे ठिकाण आहे आणि दगडांची रचना बघता हा बुरुजाचा भाग असावा असं दिसतं. म्हणजे तिथे पाहिल्यानंतर एक मुख्य दरवाजा, एका बाजूला बुरुज घेऊन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डावीकडच्या बाजूला प्रचंड शिळा असल्याने येथे बुरुज बांधण्याची गरजच वाटत नाही. नीट बघितल्यास झाडीत दडलेली तटबंदीही दिसते.

मुख्य गुहा – गुरुदेव देवस्थान

पाच मिनिटांतच वर चढून आल्यावर समोर एक गुहा आणि त्यातून धूर येताना दिसला. ही गुहा बालेकिल्ल्याचाच एक भाग आहे. गुहेसमोरच तटबंदी स्पष्ट दिसते. तलावाच्या डावीकडच्या खिंडीतून बालेकिल्ल्याकडे येणाऱ्या पायऱ्यांच्या खालीच इथे येणारे भाविक चप्पल काढून ठेवतात.

घोड्याची मूर्ती, जटाधारी बाबा

गुहेबाहेर डावीकडे एक घोड्याची मूर्ती आहे. काळ्या-पांढऱ्या रंगाने रंगवलेली मूर्ती सुंदर सजवलेली होती. नुकतीच जत्रा होऊन गेल्याने त्याच्या खुणा सगळीकडे होत्या. गुहेसमोर एक जटाधारी बाबा बसलेले होते.

गुहेत देवस्थान

गुहेत गेलो. कोंकणात असतो तसा “गुरव” इथेही होता. भाविकांच्या मनोकामना देवापर्यंत पोहोचवायचं काम तो इमाने-इतबारे करत होता. गंमत म्हणजे आतमध्ये कोणत्याही देवाच्या मूर्ती दिसत नाहीत. एका उंचवट्याला शेंदूर लावलेला आहे आणि त्यासमोर खूपश्या उदबत्त्या. इथे काही पादुकाही दिसल्या आणि मूर्ती म्हणावी अशी एकच गोष्ट दिसली ती म्हणजे घोडा! या भागात घोड्याचे महत्त्व फार आहे. चक्क घोडा मंदिरं आहेत आणि त्यातून घोड्याची मिरवणूकही निघते. अर्थात हे नंतर एका किल्ल्याच्या दरम्याने समजलं.

बालेकिल्ल्याची तटबंदी

गुहेच्या उजव्या बाजूने वाट अजून पुढे गडाच्या सर्वोच्च भागाकडे जाते. तिकडे जायला लागल्यावर अजून तटबंदी दिसली. काही वाड्याचे चौथरेही दिसतात. आणि पुढे दिसल्या त्या प्रचंड शिळा. या शिळा किल्ल्याचे बांधलेले अवशेष अर्थातच नाहीत, पण याचाही उपयोग करून घेतला जात असावा.

गुहा
गुहा
गुहा

कोणाचाही थांग लागणार नाही अशा अनेक छोट्या गुहा ह्यामुळे इथे तयार झालेल्या आहेत. आतमध्ये कोणी लपून बसलं असेल तर सापडणं कठीणच. या गुहांना “सात-खंडा गुहा” म्हणतात असं स्थानिकांकडून कळलं. इथून गुहे-गुहेतून फिरून परत शिळांच्या सुरुवातीला येता येतं. गडाचा सर्वोच्च स्थान हेच आहे.

तळघराकडे जाण्याचा बुजलेला मार्ग

किल्ल्याचे अवशेष म्हणावं असं तळघर इथे आहे. एक छोटा मार्ग त्यासाठी दिसला. पण तो बऱ्यापैकी बुजलेला आहे. झाडीत अनेक अवशेष दडलेले आहेत. नजर फिरवली, तर बांधकामाचे अवशेष, वृंदावन, समाध्या अशा गोष्टी दिसतात.

हा किल्ला कोणी बांधला वगैरे काही ज्ञात नाही. कदाचित गोंड-पूर्व काळातीलही असावा. “पुरमशहा” हे नाव या किल्ल्याशी सर्वात जास्ती निगडित आहे. पण श्रीपाद चितळे यांच्या पुस्तकात ते नमूद करतात की त्यापूर्वी हे क्षेत्र गढामंडळाच्या संग्रामशहाच्या अखत्यारीत होते. त्याच्या अधिपत्यात ५२ गड होते. “कर्णशहा” या गौंड राजाने (ई.स. १५४७-१५५२) मध्ये टिपागड जिंकून गढमंडल्या संग्रामशहाजी सद्दी संपवली आणि त्यापुढे पुरमशहाचा काळ येतो.

पूरमशहा अत्यंत शक्तिशाली राजा होता आणि पूर्ण वैरागड परगण्यावर त्याचा ताबा होता. त्याच्याकडे तब्बल २००० पायदळ, ५ हत्ती आणि २५० अश्वदळ होतं. त्याच्या ऐश्वर्याचं छत्तीसगडातील राजांना वैषम्य वाटत असे. त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न ते सारखा करत असत. त्याची कीर्ती सर्वदूर पसरत असताना, त्याची सत्ता उलथवून लावण्यासाठी आजूबाजूच्या राजांनी “गटबंधन” केलं. (मी काहीशे वर्षापूर्वीचं वर्णन करतोय हे विसरू नका वाचता वाचता 😉)

टिपागडच्या परिसरात ही लढाई झाली. कोटगलच्या मैदानात गटबंधनाचा धुव्वा उडाला. काही ठिकाणी स्वतः पुरमशहाने तलवार हातात घेऊन लढाईत भाग घेतला. लढाईत विजय होतच होता, पण त्यात ह्या राजकुमाराच्या पायातील जोडा रणांगणात पडला. शत्रूपक्षाने त्याचा फायदा घेत ते जोडे टिपागडवर आणून राणीला “पेश केले”. राणीच्या वजीरानेच मुद्दाम असं केलं असंही काही जण मानतात तर काही ठिकाणी राजा युद्धात पुढे जात असताना मागे राहिलेल्या सैनिकांपैकी एका शिपायाला ते जोडे सापडून गैरसमजातून ते गडावर आणून दिले असेही मानतात. पण असे कुठल्यातरी मार्गाने जोडे राणीकडे आले आणि अनर्थ घडला. चुकीची बातमी आली. दुःखातिरेकाने ती राणी ती वेडी झाली. तिने सुवासिनीचा वेश धारण केला. जोडे बरोबर घेऊन बैलगाडीत (बैलजोडीच्या रथात) बसून ती तलावाजवळ आली. तिळाच्या दाण्यांनी भरलेला उजवा हात वर आकाशाकडे उंचावून तिने प्रार्थना केली की, “हे भवानी देवी, येणाऱ्या भविष्यात इथे कोणी राज्य करू नये. जोपर्यंत माझ्या हातातील मुठीत तिळाचे दाणे शिल्लक असतील, तोपर्यंत ह्या तटबंदीजवळ आमच्या शत्रूंच्या मस्तकांचा ढीग लागू दे”. तिने बैलांना सरळ तलावात जायला लावले आणि अश्या रीतीने राणी दिसेनाशी झाली. नंतर पूरमशहा मात्र विजयश्री होऊन परतला आणि तलावाजवळच ह्या बातमीने थबकला. तिच्या विरहाने कासावीस होऊन तिच्या मागोमाग, त्याच जागी त्यानेही जलसमाधी घेतली. टिपागड प्रेमाचे प्रतीक म्हणूनही त्यामुळे ओळखला जातो.

राणीची मागणी जणू मान्य झाली आणि त्यानंतर त्या ह्या टिपगडावर कोणीही राजसत्ता गाजवू शकलं नाही. हा गड ओसाड झाला आणि निबीड अरण्यात जणू दिसेनासा झाला. आजही कडे गडप्रेमींचा चहाळ कमीच आहे. भाविक आदिवासी लोक तेवढे येतात.

टिपागडचा राजा पुरमशहाच्या दुदैवी अंतानंतर या किल्ल्यातील खजिना आपल्याला मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गुरुबाबा यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला. त्याला कंटाळून गुरुबाबांनी टिपागडच्या ऐतिहासिक तलावात जलसमाधी घेतली अशी आख्यायिका टिपागड बाबत सांगितली जाते.

तलावाशेजाराची तटबंदी

बालेकिल्ला बघितल्यावर आमची गडफेरी पूर्ण झाली. आल्यावाटेने बालेकिल्ला उतरून तलावाजवळ आलो. ह्या बाजूने समोर तलाव ठेवून डावीकडे लगेचच एक बांधकाम आहे. हे भाविकांसाठी विश्रांती/जेवण/प्रसादासाठी व्यवस्था वगैरेसाठी बांधलेले आहे. पुढे डावीकडे लांबच लांब तटबंदी आहे. तलावाच्या कडेच्या बाजूला एक बांबू वगैरेनी लाकडी मंडप केलेला असून यात देवांच्या मूर्ती दिसत नसल्या तरी दिवे लाऊन पूजा मात्र केलेली दिसली.

लाकडी मंडप
गडकरी मातेचे मंदिर

ह्यालाच लागून नवीनच बांधलेले “गडकरी मातेचे” मंदिर आहे. देवीच्या उजव्या हाताला हत्ती, तर डाव्या हाताला घोड्याची मूर्ती आहे. हे मंदिर, तलाव सगळेच किल्ल्याच्या आत आहे. तटबंदीच जवळपास दोन मैल लांबीची आहे.

तलावाकाठी तहान-लाडू भूक-लाडूवर ताव

किल्ल्याचे पाहता येण्यासारखे सगळे अवशेष पाहून झाल्यावर प्रचंड आनंद झाला होता आणि मग जाणीव झाली ती भुकेची. तलावाच्या कडेला निवांत बसून आपले तहान-लाडू भूक-लाडू काढले. गडकरीमातेच्या कृपेने, जत्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांकडून इथला प्रसादही मिळाला. विदर्भाचे भटकंती नियोजन इथेच सार्थकी लागले होते. नियोजन करताना एकूणच धाकधूक जी होती, त्यानंतर आता मात्र नियोजनातला राहिलेला भाग सहज सोपा वाटायला लागला.

भटकंतीतले सहसोबती संतोष आलम, महेश दारवटकर आणि शहाणे काका यांच्यामुळेच या अनवट वाटेला येऊन अवघड असा टप्पा सहज पार करता आला. आजच्या दिवसातला आता खेळ शिल्लक राहिला होता तो माझा, गाडी हाकण्याचा! अंधार पडायच्या आधी वैरागडला नुसतं पोचायचं नव्हतं तर व्यवस्थित उजेडात पोचून कोणतेही अवशेष न चुकवता तोही किल्ला पदरात पाडून घ्यायचा होता.

विदर्भीय भटकंती – किल्ले प्रतापगड


किल्ले प्रतापगड

“प्रतापगड” म्हटलं की लगेच चित्रंच उभं राहतं डोळ्यासमोर. एकीकडे एक अवाढव्य राक्षस अफजलखान, दुसरीकडे त्याच्या बगलेत त्याच्यापुढे अगदीच खुजे दिसणारे शिवाजी महाराज. एकीकडे डोळ्यात कृरता, राग, भीती आणि अहंकारावर घाला घातला गेल्याचे भाव, तर दुसरीकडे करारीपणा, आत्मविश्वास असणारे तेजस्वी डोळे! “शिवप्रताप” हे नांव त्या दिवसाने दिमाखात मिरवावं अशी त्या दिवशी घडलेली, शतकांत एकमेव अशी ती घटना. आणि हा “प्रताप” ज्या गडाशी संबंधित आहे, तो “प्रतापगड”! सहाजिकच पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर आणि मनात हीच घटना येते. पण हा प्रतापगड तर साताऱ्यात आहे. मग विदर्भाच्या या लेखमालेत या “जंगलातल्या” गडाची “वाईल्ड कार्ड” इंट्री झाली की काय”?

कचारगड गुहा

नाही, नाही. आम्ही “अंबागड” या भंडाऱ्यातल्या भटकंतीनंतर शिरलो ते गोंदिया जिल्ह्यात. गोंड राजांचा, आदिवासी बहुल गोड स्वभावाच्या लोकांचा हा जिल्हा. नागपूर-भंडारा एकवेळ ठीक आहे, पण गोंदीया आणि गडचिरोली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या लोकांसाठी एकदमच वेगळा. गोंदियात शिरलो आणि कामठा हा भुईकोट किल्ला बघून नक्षलवादी भागातली “कचारगड” गुहा पाहिली. नावात “गड” असला तरी हा किल्ला नाही. कचारगड गुहा हे आदिवासी लोकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान. इथे महाराष्ट्रातले आदिवासी तर येतातच, पण आजूबाजूच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा वगैरे मधले आदिवासी भाविक पण मोठ्या संख्येने येतात. या वार्षिक उत्सवाच्या वेळी तिथे नक्षलवादी सक्रिय नसतात कारण यापैकी लोकांचेही श्रद्धास्थान असेलच की ते. इथे येण्याआधी काही ठिकाणी “आशिया खंडातली सर्वात मोठी” असा उल्लेख ऐकला होता. खरं-खोटं देव जाणे, पण ही गुहा आहे मात्र प्रचंड.

आदिवासी भाविकांबरोबर

या भेटी नंतर काही थोड्या अंतरासाठी गाडी आयुष्यात प्रथमच छत्तीसगड राज्यात घातली. परत फिरून महाराष्ट्रात आलो आणि आधी सानगडी उर्फ सहानगड किल्ला बघून दुसऱ्या दिवशी पोचलो ते प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगड गावातच. होय, गोंदिया जिल्ह्यात प्रतापगड हे गांव आहे आणि तिथेच हा किल्ला आहे. म्हणजे हा लेख आहे तो गोंदियातल्या याच प्रतापगडातल्या किल्ल्यावर. पण हाही प्रतापगड जंगलातच आहे, म्हणजे थोडक्यात “वाईल्ड कार्ड एन्ट्री” म्हणायला हरकत नाही.

असो.. तर मूळ नियोजनात इथे दुपारी येणं होणार होतं, पण आधीचे किल्ले वेळेआधी झाल्याने हाही दुपार वरून सकाळ वर आला होता. फायदा असा कि वेळेआधी असल्याने पुढील भटकंतीत हाताशी जास्तीचा वेळ असणार होता. पण याचा एक छोटासा तोटा असा झाला, की किल्ल्यावर न्यायला वाटाड्याच मिळेना. कारण एक तर सगळे कामाला चालले होते आणि या जंगलात अस्वलं आहेत, त्यामुळे जे होते ते ८ च्या आधी यायला तयार नव्हते. जंगलाची माहिती असणाऱ्या कोणालाही सहज कळेल की अशा ठिकाणी जाणं किती धोक्याचं असतं. त्यामुळे अर्थातच वाटाड्या मिळत नसला, तरीही वेळ वाचावा म्हणून स्वतःचं स्वतः जाणं आम्हाला संयुक्तिक वाटत नव्हतं. अर्थातच वाटाड्याची तजवीज होईपर्यंत प्रयत्न करत खालीच थांबणं भाग होतं.

मुळात “या” प्रतापगड विषयी माहिती आंतरजालावर तशी कुठेही सापडत नाही. एखाद-दोन पुस्तकात थोडीशी माहिती आहे. त्यांच्या वेळेला त्यां लेखकांनी बघितलेल्याप्रमाणे त्यांनी ती माहिती लिहिलेली आहे. त्यानुसार गावातून अर्धा तास चढून गेल्यावर एक “मजार” लागते असा उल्लेख आहे. सध्या या दर्ग्यापर्यंत गाडी जाते त्यामुळे आपला अर्धा तास वाचतो. हा दर्गा “ख्वाजा उस्मान गनी हरून” याचा आहे. किल्ल्याचाच हा भाग आहे. गोंड राजांच्या काळात या किल्ल्याची उभारणी झाली असून याची बांधणी सोळाव्या शतकातील असावी. नंतर तो देवगडचा राजा बख्तबुलंदचा सिवनीचा दिवाण राजखान पठाण याच्या ताब्यात आला. चंद्रपूरच्या गोंड राजांच्या उत्तरेच्या आक्रमणास रोखणारा हा किल्ला देवगडकर गोंडांनी बांधला असं नमूद केलेलं आढळतं.

दर्ग्याजवळची तटबंदी
दर्गा

वाटाड्या शोधण्यात आमचा तब्बल दीड तास गेला. दर्ग्याजवळच पोहोचायलाच साडेसात होऊन गेले. पण जंगली प्राण्यांच्या वावराची वेळ आता टाळून गेली असं धरायला हरकत नव्हती. त्यात वाटाड्या मिळाल्यावर आमची काळजी मिटली. दर्ग्याजवळचा भाग हाही किल्ल्याचाच भाग आहे हे सिद्ध करणारे जुन्या तटबंदीचे अवशेष इथे शिल्लक दिसतात.

किल्ल्याचा वाटेवरील कातळकडा
ह्या कड्यालाच मधाची पोळी आहेत

त्या घनदाट जंगलात शिरून किल्ल्याच्या अजस्त्र दिसणाऱ्या कातळ कड्याशी अवघ्या पंधरा मिनिटात येऊन पोहोलो. दाट जंगल, त्यात पहाटेची वेळ टाळून गेली असली तरी थोडीशी धाकधूक. त्यात समोरच्या अंगावर आलेल्या कातळकड्याला लगडलेली मधमाशांची पोळी. सगळे एकदम शांत झालो.

कड्यात वाघाची गुहा - किल्ल्यावर शेजारी वाटेने जाता येते

गडावर जाण्यासाठी याच कड्याला डावीकडे ठेवत याच्या जवळूनच वर जावं लागतं. इथेच एक गुहा आहे, स्थानिक त्याला वाघाची गुहा म्हणतात. इथं वाघाचं वास्तव्य असतं असं ते सांगतात.

दाट जंगलातल्या वेली

हे घनदाट जंगल अतिशय समृद्ध आहे. प्रचंड मोठे मोठे आणि औषधी वृक्ष इथे आहेत. इथल्या वेली या सकाळी सुद्धा घाबरवतात. पण हीच तर खरी वृक्ष संपदा आहे.

चौकोनी बुरुज

अवघ्या दोन मिनिटांतच गडाच्या पहिल्या बुरुजाचं दर्शन झालं. या भागातल्या बहुतेक डोंगरी किल्ल्यांचे बुरुज असेच चौकोनी आहेत. आपण या लेखमालेतील “भीमसेन कुवारा” या किल्ल्याच्या लेखात तसे पाहिले होते.

बुरुज आणि पुरातत्व खात्याच्या पाटीचे अवशेष
बुरुजावर इथे कबर आहे
बुरुजावरून खाली परकोटाचे अवशेष दिसतात

इथून पाच मिनिटांत, वर आल्यावर समोर पुरातत्व खात्याची पाटी दिसते किंवा म्हणूया की तिचेही अवशेष दिसतात. इथे असाच एक चौकोनी बुरुज असून त्यावर जाणाऱ्या पायऱ्या डावीकडून आहेत. वर एक कबर आहे. इथून खाली पाहिल्यास जंगलात दडलेले थोडके परकोटाचे अवशेष दिसतात. आपण उभा असलेला बुरुज मुख्य गडाचा भाग आहे. वर चढून गेल्यावर बालेकिल्ला आहे, तर कातळकड्यानंतर दिसलेला पहिला चौकोनी बुरुज, हा माचीचा भाग आहे.

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आणि बुरुज

ह्या बुरुजाजवळून पुढे न जाता डावीकडे वरती बालेकिल्ल्याकडे जायचं, कारण बुरुजाच्या पुढे दाट जंगलाचा भाग आहे. त्यामुळे तिथे जरी शिल्लक असतील तरी अवशेष शोधणं कठीण आहे आणि जंगलाच्या भागात पाणवठे असल्याने तिथे जाणही धोक्याचं आहे.

आतील भागात वाड्यांचे अवशेष
तटबंदीतील चर्या

बालेकिल्ल्याच्या भग्न दरवाज्यातून आपण बालेकिल्ल्यात आल्यावर झाडी विरळ झालेली दिसते. इथेही तटबंदीचे भरपूर अवशेष आहेत, त्याला चर्या आहेत. पुढे जाता-जाता वाटेत वाड्यांचे चौथरे दिसतात. पुढे पोचलो ते एका गुहांपाशी.

नैसर्गिक गुहा

या गुहा नैसर्गिक आहेत. खडकाचा बाहेरील चपटा भाग मूळ खडकापासून वेगळा झाल्याने या गुहा तयार झालेल्या आहेत. इथे आत प्रचंड प्रमाणात वटवाघळं आहेत. त्यांचे आवाज वरपर्यंत येत होते. आत उतरायला अतिशय कठीण आहे. प्रस्तरारोहणाचे साहित्य आणि कौशल्य बरोबर असल्याशिवाय हा प्रयत्न करू नये. त्यातून आतमध्ये उजेड पोचतच नाही. पूर्वी ह्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे असे नमूद केलेलं आढळतं.

माथ्यावरील पश्चिमेकडील भागावर वाड्याचे अवशेष
लांबवर पसरलेलं दाट जंगल

ह्या गुहा वरूनच वाकून बघून गडाच्या मागच्या बाजूला निघालो. इकडे तटबंदी-वाड्याचे खूपसे अवशेष आहेत. ही गडाची पश्चिम बाजू. पलीकडे अतिशय दाट जंगल लांबवर पसरलेलं डोळ्यांना सुखावतं. त्यातच खाली थोड्या अंतरावर एक छोटा तलाव दिसतो. त्याला स्थानिक लोक “पांढरीचा तलाव” म्हणतात. थोडे लांबवर डावीकडे डोंगर दिसतो, जिथे शंकराचे मंदिर आहे आणि मोठी मूर्ती आहे. इथे खूप मोठ्या संख्येने भाविक लोक वार्षिक उत्सवाला येतात. तिथे जत्रा भरते. पण त्यामुळेच इथला मार्ग न विचारता किल्ल्याची वाट विचारलं की स्थानिकांना आश्चर्य वाटतं.

पश्चिमेकडची तटबंदी

पश्चिमेकडे तटबंदीचे खूप अवशेष असले तरी पूर्ण किल्ल्याला तटबंदी नाही. खरंतर तशी गरजच नसल्याने बांधलेलीच नसावी. नैसर्गिक कातळकड्याचे संरक्षण लाभलेलं आहे या किल्ल्याला.

वाड्यांचे अवशेष
दगडांची सुंदर रचना

ह्या बाजूने पुढे दक्षिणेकडे जाताना डावीकडे बऱ्यापैकी शिल्लक असे वाड्याचे अवशेष दिसले. पुढे असलेली कातळाची नैसर्गिक रचना अतिशय सुंदर दिसते. यापुढे दक्षिण टोकाजवळ पोचल्यावर एक निसर्गाचा अविष्कार बघायला मिळतो, तो म्हणजे एक छोटा दगडी पूल. दगडांखालून सतत पाणी वाहिल्याने मध्येच असा हा एक पूल तयार झालेला आहे, ज्याला स्थानिक लोक “श्रावण बाळाची कावड” म्हणतात.

श्रावणबाळाची कावड

संतोष: छ्या! ह्या पोरांना चुकूनसुद्धा गडसंवर्धनासाठी घेऊन जायला नको.

शहाणे काका: कुठे न्यायच्या लायकीची नाहीत पोरं. काय खालून वर काय, वरून खाली काय डोकावतात...

फोटोसेशन केल्यावर निवांत क्षणी

इथे फोटो तो बनते है... निवांत वेळ काढून तिथे फोटो काढून घेतले.

दक्षिणेकडील बाजू
"पाणीमाय " तलाव/टाकं
पाणीमायेत उतरणाऱ्या पायऱ्या

गडाला उलटी प्रदक्षिणा मारत बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी यायच्या आधी एक सुंदर पाण्याचं तलाव सदृश टाकं लागतं. याचं नांव "पाणीमाय". नांव नक्कीच सार्थ आहे, कारण किल्ल्यावरच्या शिबंदी आणि जनावरांच्या पाण्याची सोय बघणारी माय नाही का हि? टाक्याच्या समोर दिसणाऱ्या रचनेचं प्रयोजन मात्र नक्की लक्षात येत नाही. कारण यात मध्येच एक गडगा बांधून हे टाकं दोन भागात विभागलेलं आहे, पण अर्धवट. म्हणजे हा बांध पूर्णपणे टाक्याला दुभागत नाही. कडेकडेने या टाक्यांना लांब लांब अशा पायऱ्या आहेत. जनावरांच्या पाण्याची व्यवस्था यासाठी ही रचना असणार. या तलावाचं/टाक्याचं संवर्धन केल्यास अतिशय सुंदर टाकं नक्कीच समोर येईल.

गडफेरी इथे पूर्ण झाली. दर्ग्यापर्यंत परत यायला फक्त वीस मिनिटं लागली. खूप अवशेष असलेला, समृद्ध जंगल आजूबाजूला बाळगून असलेला हा किल्ला पदरात पडला. किल्ला बघितल्यावर आल्या मार्गाने परतीचा प्रवास नव्हता, तर “चिंचोळे” मार्गे आम्हाला कुरखेडाला बाहेर पडायचं होतं.

तिबेटी मुलं

कुरखेडाला जाणारा हा मार्ग “इतियाडोह” नावाच्या कालव्याजवळून निघतो. गंमत म्हणजे इथे तिबेटी वस्ती आहे. हे मूळ तिबेटी लोक आता आता गोंदियाकर आहेत. सकाळी वाटाड्याची वाट बघताना जिथे चहा-पोहे उडवले, तिथे काही मुलांची भेट झाली. ही मुलं इथे सुट्टीला आपल्या गावी आली होती. १९७० नंतर चीनने तिबेटी भागावर अतिक्रमण करून तो ताब्यात घेतल्यावर तिथले लोक पळून भारतात आले. त्यांना गोंदियामध्ये आश्रय दिला गेला. तिबेट सारख्या थंड प्रदेशातून महाराष्ट्रातल्या गरम गोंदिया मध्ये हे कसे जगले, ते त्यांचे त्यांनाच माहिती. पण इथे ह्या लोकांची २ गावं वसली. मुलांना पाचवी पर्यंत शाळा आहेत, त्यानंतर मात्र त्यांना कर्नाटकात जावं लागतं, तिथल्या तिबेटी कँप मध्ये. २०१४ मध्ये मात्र सरकारने पुनर्वसन धोरण सुधारित केलं त्यानंतर परिस्थितीत थोडी सुधारणा झाली. जेमतेम हजारभर शिल्लक राहिलेल्या या वस्तीत स्वच्छता मात्र वाखाणण्याजोगी आहे. त्यांनीच त्यांच्या सोयी तयार केल्या आहेत, जसं मंदिर, दवाखाने वगैरे.

तिब्बत कँप २

छोट्याशा या वस्तीतून बाहेर पडलो. भाग्यवान म्हणून प्रतापगड आणि ह्या वस्तीचंही दर्शन घडलं. पुढचा किल्ला होता नियोजनातला, तो पूर्णपणे नक्षलवादी भागाने ग्रस्त असलेल्या भागातला... महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडील किल्ला... कोणता ते, बघूया लवकरच!

विदर्भीय भटकंती – किल्ले अंबागड


किल्ले अंबागड

भंडारा जिल्ह्यातला अंबागड किल्ला हाही राखीव वनक्षेत्रात येतो. देवळापार किल्ल्यावरून गुगल मॅप चालू केला तर अंबागडला जाणारा रस्ता “हिवरा बाजार” वरून “मांगर्ली” मार्गे अंबागड किल्ल्यापाशी असा तडक दिसतो. पण एकतर हा रस्ता राखीव वनक्षेत्रात, त्यातून सुनसान आणि संध्याकाळ नंतर तर धोकादायकच. आणि गंमत म्हणजे, त्यातून ह्या रस्त्याने जे पायथ्याचे ठिकाण दिसते तिथून खरच या गडावर वाट जाते की नाही हा प्रश्नच आहे. मग अर्थातच मोर्चा वळवला, तुमसरकडे.

अंबागड जवळचे मोठे ठिकाण म्हणजे तुमसर. “Welcome To Rice City – Tumsar” असं आपलं स्वागत होतं. इथे मुक्काम करायचा आम्ही ठरवलं आणि सकाळी “अंबागड” या पायथ्याच्या गावात जाऊन किल्ल्यावर जायचं असं ठरवलं. तुमसर वरूनही “अंबागड किल्ला” असा गुगल मॅप लावला तरी रस्ता मेहगाव-मिटेवाणी-बघेडा मार्गे त्याच पायथ्याशी जाताना दिसतो जिथे गुगल मॅप देवळापार वरून घेऊन येतो. आपण मात्र मेहगाव नंतर मिटेवाणीच्या पुढे डावीकडे वळून अंबागड गावात जायचं. तिथून चौकशी करायची ती किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिराची. सहज चुकू शकू असे कच्चे रस्ते पकडत मंदिरापाशी जायचं.

हनुमान मंदिर, मुर्त्या आणि परिसर
गडावर जाणाऱ्या पायऱ्या

मंदिराचा परिसर स्वच्छ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर आहे. फक्त माकडांचा वावर खूप असल्याने योग्य ती काळजी घ्यायची. तसेही कायम एखादी काठी जवळ बाळगणे हे केव्हाही उत्तमच फिरस्तीच्या वेळी. किल्ल्यावर चढायचा मार्ग म्हणजे अगदी मंदिरापासून किल्ल्याच्या दरवाजापर्यंत बांधलेल्या पायऱ्या. बहुतेक पाचशे-एक पायऱ्या असतील किल्ल्याच्या दरवाजापर्यंत.

बुरुज आणि गोमुखी दरवाजा

ह्या पायऱ्या चढून आलो आणि समोर अनपेक्षित असा बलाढ्य बुरुज असलेला दरवाजा आला. दरवाज्याची रचना गोमुखी असल्याने सरळ दरवाजा न दिसता खरंतर दोन बलाढ्य बुरुज आणि मध्ये भिंत हेच दिसलं. आणि त्यात तिरकस अशा जाणाऱ्या पायऱ्या गेलेल्या दिसल्या.

पुरातत्व विभागाने इथे संवर्धन केलेलं असून किल्ल्याची माहिती असलेला फलकही लावलेला आहे. इसवी सन १६९० ते १७०० च्या सुमारास हा किल्ला गोंड राजा “बख्त बुलंद” यांच्या कारकिर्दीत त्यांच्या आदेशाने शिवनी येथील “राज खान” नावाच्या पठाण सुभेदाराने उभारलान. इकडच्या इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला नंतर नागपूरकर भोसल्यांकडे आला. तुरुंगासारखा उपयोग होत असलेल्या या किल्ल्यातल्या विहिरीचे खराब पाणी पिऊन कैदी मरत असत असेही हि माहिती सांगते. इंग्रजांनी ठेवलेल्या कैदेत नागपूरचे पराक्रमी योद्धा मनभट उपाध्ये यांचा पण तिथेच कैदेत मृत्यू झाला अशीही नोंद आहे.

महादरवाजा

दिलेल्या माहितीत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचे नाव महादरवाजा आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याच दरवाजासमोर आम्ही उभे होतो. खालून वर आम्ही अवघ्या दहा मिनिटात आलो. पण हा दरवाजा निरखून बघण्यातच वीस मिनिटे निघून गेली. दरवाजा कसा देखणा असेल याची यावरूनच कल्पना येईल. गोंडवनाचे गोंड राजे बख्त बुलंदशहा उईके यांचा हा किल्ला. त्यांची निशाणी असलेल्या चवऱ्या या दरवाजावर कोरलेल्या आहेत. त्या पण साध्या सुद्धा नसून थ्रीडी आहेत. कमळ आहेत, दोन्ही बाजूला एका खाली एक असे चार-चार कोनाडे आहेत. कोनाड्यात मात्र कोणतीही नक्षी, मूर्ती नाही.

दरवाजाच्या आत – देवड्या

दरवाजातून आत शिरताच डावीकडे पहारेकऱ्यांसाठी उत्तम देवड्या आहेत. आम्ही उजवीकडे वळून आधी किल्ला बघायला आत शिरलो. इथे एक फार मोठा खड्डा आहे. हा खड्डा नक्की कसला असेल ते कळलं नाही, पण खूप मोठा घेर आणि खोलही असल्याने बाजूला संरक्षण कठडा मात्र बांधलेला आहे. डावीकडे एक पाण्याचं टाकं आहे त्यातलं पाणी खूप खराब होतं. इथूनच प्रदक्षिणा मार्गाने गडफेरीला सुरुवात केली. किल्ल्याच्या मधल्या भागात खूप झाडी असल्याने तटबंदीवरून सुरुवात केली. संवर्धन केलं गेलेलं असल्याने तटबंदी वरून निवांत फिरता येतं. प्रशस्त फांजी आहे, जंग्या, चर्या आहेत, गोलाकार बुरुज आहेत. तटबंदी मधल्या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी जागा आहे, जिथे तोफ ठेवून अगदी ३६०° अंशात फिरवता येईल.

तलाव आणि बालेकिल्ला

पूर्ण तटबंदीत मिळून असे एकूण नऊ बुरुज आहेत. तटबंदीवरूनच पुढे एका सपाट जागेवर आलो. या चौथऱ्यावर उजवीकडे चौकोनी आकाराचा मोठा बांधीव तलाव आहे. तलावाच्या मागे वरती आपल्याला बालेकिल्ला दिसतो. तलावाजवळूनच इथं वर जाता येतं. वरून तलावाचा व्ह्यू चांगला मिळेल म्हणून इथल्या दरवाज्याच्यावर चढून तलावाचे फोटो काढले.

तलाव

कैद्यांशी संबंधित वर्णन केलेली ती ही विहीर हीच असावी का? कारण ह्यातलंही पाणी अजिबात पिण्यायोग्य नाही. आत उतरायला मात्र पायऱ्या आहेत. दरवाजा वरून मी परत खाली आलो, कारण मला तटबंदीवरूनच प्रदक्षिणा मारायची होती. बाकी सगळे मात्र इथून बालेकिल्ल्याकडे वर गेले. मी तटबंदीवर येऊन प्रदक्षिणा मार्गाला लागलो.

दारूगोळा कोठार

उजवीकडे बालेकिल्ला आणि त्यातला बुरुज दिसला. बालेकिल्ल्याच्या तटबंदीलाही दोन बुरुज आहेत. किल्ल्याच्या तटबंदी वरून कोपऱ्यावरच्या बुरुजावर आलो. तटबंदीतच भग्न असं दारूगोळा कोठार आहे. इथून पुढे मात्र तटबंदीचा मार्ग बंद झालेला आहे.

उजवीकडे असणाऱ्या बालेकिल्ल्यावर जायला एक घसाऱ्याची वाट आहे. धोपटमार्ग तलावाच्या मागून आहे पण अतिशय सावधपणे इथूनही वर जाता येतं. इथूनच वर बालेकिल्ल्यावर आलो. इथे अवशेष खूप आहेत, पण पायाखाली सांभाळून फिरायचं कारण जवळच एक खड्डा दिसला ज्याच्यात आत मध्ये पाणी होतं. संरक्षणासाठी इथे काही नाही, पण एका झाडाची फांदी एक आडवी कोणीतरी टाकून ठेवलेली असल्याने त्याकडे लक्ष गेलं आणि वाचलो.

बालेकिल्ल्यावरील अवशेष

ही खरंतर राजवाड्याची इमारत आहे. ही दोन मजली असून मागच्या बाजूने आल्याने आपण सरळ दुसऱ्या मजल्यावरच येतो. इथे खालच्या मजल्यावर जायला पायऱ्याही दिसल्या. पण खालचा मजला आणि खोल्या पूर्णपणे पाण्याने भरलेला असल्याने उतरता आलं नाही. खोल्या, कोनाडे, झरोके असं बघून मी इतर भिडूंच्या दिशेने बालेकिल्ल्याच्या पलीकडे गेलो, जिथून ते वर येत होते.

विहीर आणि मेघडंबरी

इथे मात्र एक विहीर आहे, ती ठार कोरडी होती. कदाचित ही सुद्धा ती कैद्यांशी संबंधित विहीर असू शकेल. काठावर एक सुंदर मेघडंबरी आहे.

घुमटी, चुन्याचा घाणा आणि सुंदर फुललेलं झाड

बालेकिल्ला उतरून तलावाजवळून परत दरवाज्याशी आलो. इथे एक डावीकडे घुमटी आहे ज्याच्यात शेंदूर धारण केलेला अनगड देव आहे. याच्या शेजारी चुन्याचा घाणा आहे. त्याचं तुटलेलं चाकही आहे. इथे एक झाड मात्र पांढरी शुभ्र कांती आणि पानगळती झाल्याने टोकाटोकांवर असलेली केशरी फुलं घेऊन ती मिरवत असलेलं छान दिसलं. असंच झाड आधी तलावाजवळही होतं.

महादरवाजा शेजारच्या देवड्यांमधून वर जायला वाट आहे त्यातून वरती बुरुजावर फिरून आलो. इथून लांबवरचा प्रदेश सुंदर दिसतो. समोरच बघेडा धरणाचं बॅक वॉटरही त्याच्यात उठून दिसतं. किल्ला उतरताना जसं भीमसेन कुंवारा किल्ल्याच्या वाटेवर होतं, तसंच दोन्ही बाजूला मुरुड शेंगेचं रान दिसलं. किल्ला उतरून आल्यावर आधी गाडीकडे धावत जात गाडीवर चढून असलेल्या माकडांना हाकलून लावलं. बूट काढले आणि हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. मंदिरात एक बाबा राहतात. त्यांच्याशी गप्पा मारून भंडारा जिल्ह्यातील एकमेव अशा गिरीदुर्ग अंबागड किल्ल्याच्या भेटीनंतर मार्गस्थ झालो. पुढचा जिल्हा – गोंदिया!

विदर्भीय भटकंती – किल्ले भीमसेन कुँवारा उर्फ भिवगड


किल्ले भीमसेन कुँवारा उर्फ भिवगड

विदर्भाच्या या भटकंतीचे नियोजन केल्यापासूनच या नांवाचं फार आकर्षण होतं. “भिवगड” हे नाव विशेष वाटत नाही पण “कुँवारा भीमसेन” हे नांव मात्र उत्सुकता वाढवून जातं. ह्यामागे नक्कीच काहीतरी रंजक कथा असणार आणि जी त्या स्थानी जाऊन जाणून घ्यायला उत्सुक होतो.

देव कुँवारा भिमसेन मंदिर आणि मूर्ती

हा किल्ला नागपूर जिल्ह्यात “पारशिवनी” या तालुक्यात येणाऱ्या पेंच धरणाच्या बॅकवॉटरला लागून आहे. नागपूरवासीयांसाठी एक दिवसीय भटकंतीचे हे पर्यटन स्थळ आहे, जिथे “कुँवारा भीमसेन” यांचे मंदिर आहे आणि शेजारी या मंदिराजवळच हा किल्ला आहे. बहुसंख्य ठिकाणी डोंगरावर मूळ देवस्थान तर खाली नवीन देवस्थान, असा प्रकार इथेही आहे.

सकाळीच सकाळी सगळ्यात पहिला हाच किल्ला पाहून दिवसाच्या भटकंतीची सुरुवात करायची होती. कारण, आधी इथे जो राणी महाल पाण्यात आहे तो सूर्योदयाच्या वेळी मस्त बोटीत बसून बघायचा आणि मग किल्ला असा मस्त प्लॅन होता. पण हे कुठे माहिती होतं की तो बघण्यासाठीच्या बोटी चालू होतात त्या इतक्या लवकर होत नाहीत? पण तरीही नशीब जोरावर असल्याने एका नावाड्याचा संपर्क मिळालेला होता.

सकाळी सात वाजताच या मंदिराजवळ दाखल झालो. कोवळ्या उन्हातच मस्त बोटिंग करून आधी राणी महाल पाहून घ्यायचा असल्याने आधी आमच्या नावाड्याला झोपेतून उठून आणलं आणि बोट पाण्यात ढकलली.

राणीमहाल

ही राणी महाल नावाची वास्तू बघण्यासाठी पाण्यात बोटीतून जावं लागतं. पण तिथे उतरता येत नाही, कारण बोट लावायला धक्का नाही. पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात इथे पाणी आटल्यावर तरी चालत जाता येत असे असं म्हणतात. आता बाराही महिने पाणी असल्याने फक्त बोटीतून त्याला प्रदक्षिणा मारत ही वास्तू पाहता येते. आमच्या सुदैवाने पाण्याची उंची फार नसल्यामुळे वरचा दीड मजला आम्हाला बघता आला, तोही सूर्य पाण्यात कोवळी किरणे टाकून स्वतःचं रूप पाहून घेत असतानाच्या प्रसन्न वेळी!

किल्ले भिवगड आणि राणी महाल

या राणीमहाला जवळच दाट झाडीने भरलेला डोंगर आहे, हाच भिवगड/भीमगड उर्फ कुँवारा भीमसेन/भिवसेन किल्ला.

“मोहभट्टा” राज्याचे राजा “सयमल मडावी” याचे पुत्र “भुराभगत” व सून “मा कोतमा राणी”. या दोघांना बारा मुलं. त्यात ७ भाऊ आणि ५ बहिणी. ही सगळी बहिण-भाऊ एक-एक कौशल्य राखून होती. एक जण कृषीतज्ञ होता, तर दुसरा रस्ते बांधण्यात कुशल. एक बहिण धान्य-जेवण व्यवस्था याच्यात हुशार तर दुसरी बहीण वैद्य. एक भाऊ ग्रामविकासात निपुण तर दुसरा जलव्यवस्था तज्ञ. असे अनेक विविध गुण हे सगळे राखून होते. त्या बाराही मुलांमध्ये भीमसेन हे सर्वात मोठे, जे धर्मकारण, राजकारण, समाजकारण तसेच मल्लविद्या, धनुर्विद्या अशा अनेक विद्यांमध्ये निपुण होते. या सर्व मुलांनी अविवाहित म्हणजेच कुँवारा राहून समाजकार्य करायचे ठरवले. यांचा मामा “राजा सेवता उईका” याच्या मुलीही यांच्या समाजकार्याला जोडल्या गेल्या. त्यातल्या “बमलाई” यांचं “बंबलेश्वरी देवी” या नावाने मंदिर आहे तर “समलाई (तिलकाई)” यांना “कोराडी की देवी” या नावाने ओळखले जाते.

“भीमसेन कुँवारा मंदिर” हे मंदिर असलेल्या या स्थळाला गोंड समाजाच्या धार्मिक स्थळात फार मोठे महत्त्व आहे. “नांदपूर” राज्याचे राजा “उईका” यांच्या सुपुत्रि “कजला राणी करंगु मसराम” यांचा हा राणी महाल आहे. कथेनुसार भीमसेन यांना चोर समजून या राजाने कैदेत टाकले होते आणि नंतर त्यांना ओळखून सोडून दिले आणि त्यांचे भक्त झाले. तेव्हा भीमसेन इथे येऊन राहिले, डोंगरावर. त्यांची भक्ती करताना येण्या-जाण्यास त्रास होऊ नये त्यामुळे राणीच्या गरोदरपणाच्या वेळी इथे हा महाल बांधला गेला. हा महाल तीन मजले उंच आहे.

पायऱ्या
पहिला बुरुज

त्याच्यानंतर आम्ही वळलो ते किल्ल्याकडे. किल्ल्याच्या वर जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. दाट जंगलातूनच ही वाट वर जाते. वाटेत आधी एक वाजता प-ह्या लागतो. स्वच्छ पाण्याचा हा प-ह्या ओलांडून वर जाताना पायऱ्या लागतात. दहा मिनिटातच आपण एका बुरूजाजवळ पोचतो. हा बुरुज एकावर एक दगड असे नुसते रचून बांधलेला आहे.

गुहा

इथे एक लहान गुहा सुद्धा आहे. कुँवारा भीमसेन इथेच ध्यानाला बसत असत असं कथेनुसार समजतं. ह्या गुहा लहान असूनच आत मध्ये भाविकांनी वाहिलेले हळद-कुंकू वगैरे दिसते.

दुसरा बुरुज

या बुरुजाच्या वर गेल्यानंतर अजून एक बुरुज दिसतो तोही चपट्या दगडी शिळा एकावर एक रचून अशाच पद्धतीने बांधलेला आहे. इथेच जुनं प्रवेशद्वार असावं असं लक्षात येतं. याच्यावर पोचल्यानंतर समोरच एक पत्र्याची शेड दिसते.

गडावरचे देवस्थान

हे कुँवारा भीमसेन यांचे डोंगरावरचे स्थान. राणीला गरोदरपणातील नवव्या महिन्यात दर्शनासाठी त्रास होऊ नये यासाठी दर्शन देण्यासाठी ते तीन पावलात खाली गेले त्यातले पहिले पाउल इथेच ठेवले असं म्हणतात. इथे शेंदूर वगैरेने पूजा केलेली दिसते. इथे एक शिवपिंडी सुद्धा आहे. शेजारी भारताच्या झेंड्या सहित गोंड समाजाचा “जय सेवा” झेंडा तसेच भगवा ध्वजही आहे.

मागच्या बाजूच्या बुरुजावरून खाली पाण्यामध्ये राणीमहाल

हे स्थान अतिशय सुंदर असून चहू बाजूला लांबवर दिसणाऱ्या निसर्ग समृद्धीचा आनंद घेता येतो. धरणाचे बॅकवॉटर, पेंच अभयारण्यातली दाट झाडी असे सुंदर, मन प्रसन्न करणारे दृश्य इथून दिसते. त्यानंतर मागे पलीकडच्या बाजूला आम्ही गेलो. जिथे गेल्यावर पाण्याच्या बाजूला खाली राणी महाल दिसतो, जवळच एक बेटही दिसतं जे झाडीने भरलेलं आहे. मग लक्षात आलं की जिथून हे आम्ही सर्व बघत होतो, तो एक बुरुज आहे. हा बुरुज बराचसा ढासळला असला, तरी कडेच्या बाजूने नीट दिसतो. जवळच एका दगडात अजून एक शिवलिंगही आहे.

चौकोनी बुरुज आणि तटबंदी

यानंतर प्रदक्षिणा मार्गाने गडाच्या या उंचवट्याला फेरी मारताना मागे अजून एक बुरुज दिसला. चुना, सिमेंट वगैरे असलं काहीही न वापरता हे बुरुज बांधलेले आहेत. फक्त एकावर एक चपटे दगड ठेवून. या बुरुजाचा आकार चौकोनी आहे. इथे खाली उतरलो फक्त फोटो काढायला म्हणून आणि लक्षात आलं की तिथे दरवाजा असणार कारण त्याच्याबरोबर शेजारच्या बाजूला अजून एक बुरुज दिसतो जो बऱ्यापैकी उध्वस्त झालेला आहे पण पहिला बुरुज मात्र उत्तम स्थितीत आहे. तसंच या बुरुजाला लागून चक्क लांब वर तटबंदी दिसली, ज्यात अजूनही काही बुरुज आहेत. आतील बाजूने हे सगळे मातीने भरून गेल्यामुळे ते आतल्या बाजूने लक्षात येत नाहीत.

वर आलो आणि लक्षात आलं की असे तटबंदीचे एकापुढे एक असे किमान दोन ते तीन लेअर आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने असं आर्किटेक्चर इथे उभारलेलं आहे. गडफेरी पूर्ण करून पहिल्या बुरूजाजवळ परत आलो. खाली परत येताना लक्षात आलं की वाटेवर वर चढताना साग, उंबर, ऐन, अर्जुनाच्या वृक्षांकडे लक्ष गेलं होतं पण वाटेच्या दोन्ही बाजूला लागून असलेली मुरुड-शेंगेची झाडं लक्षातच आली नव्हती.

प-ह्या पार करून परत मंदिराजवळ आलो. दिवसाची सुरुवात तर अशा नयनरम्य ठिकाणी असलेल्या या किल्ल्याच्या भटकंतीमुळे अतिशय जबरदस्त झाली होती. नवीन मिळालेल्या माहितीनुसार आमच्या मूळ नियोजनात थोडासा बदल करून या किल्ल्यानंतर आम्हाला बघायचा होता तो आधी नगरधन किल्ला, मग रामटेक आणि नंतर मनसरचा किल्ला.

विदर्भीय भटकंती – किल्ले महादागड


किल्ले म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सह्याद्री. डोळ्यासमोर येतात ते मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज! आपल्या सुदैवाने इतकं सुंदर चित्र सतराव्या शतकात चितारलं गेलं आणि आपलं नशीब म्हणून आपण त्या चित्राचा एक भाग असलेल्या मातीत जन्माला आलो. किल्ला म्हटलं की “महाराजांचा गड” म्हणून आपण जवळ करायला बघतो तळपलेल्या उन्हात, चिंब पावसात, लाल-काळ्या मातीतून किंवा काळ्याकभिन्न कातळावरून...

पण ह्या मराठा साम्राज्याबरोबर अजूनही काही साम्राज्य इतरत्र नांदत होती, जी मराठा साम्राज्याचा भाग होऊन भाग्यवान ठरली नाहीत. विदर्भ हा त्यातलाच भाग. या “गोंड”वनातील किल्ले हे “गोंड” राजाकडे होते, जे मुघलांचे मांडलिक बनून राहिलेले होते. गोंड राजांचा काळ हा तेराव्या शतकापासून सुरू होऊन १७व्या शतकानंतर नागपूरकर भोसल्यांनी घेईपर्यंतचा. या गोंडवनातील किल्ले ही अत्यंत सुंदर आहेत व ह्यातले गिरीदुर्ग प्रकारात मोडणारे किल्ले हे बहुतेककरून चहूबाजूंनी घनदाट अरण्याने वेढले गेल्याने ते वनदुर्ग आहेत. सुदैवाने ते खरंच वनदुर्ग राहिलेले आहेत.

ह्या भटकंतीत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ असे सात जिल्हे पालथे घालून जवळपास ३७ किल्ल्यांना भेट दिली. त्यातले मोजकेच किल्ले या लेखमालेत मांडणार आहे. त्यातला पहिला लेख हा “महादागड” ह्या वनदुर्गावर.

हा सोप्या श्रेणीतला किल्ला आहे. सहज भटकत जावे आणि किल्ला फिरून यावे. पण यासाठी दोन महत्त्वाचे अडथळे आहेत. ते म्हणजे प्रचंड संख्येने भटकंती प्रेमी असलेल्या पुण्या-मुंबईपासून खूप लांब आहे, नागपूर जिल्ह्यात. आणि दुसरे म्हणजे घनदाट जंगलात हा किल्ला आहे. गंमत म्हणजे हा जंगलाचा भाग पुणे-मुंबईकडून नागपूरकडे जाताना फक्त ३० किलोमीटर आधी अंतरावर आहे. समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जाताना “सातनवरी” नावाचे ठिकाण “बाजारगाव” च्या पुढे आहे. तिथून डावीकडे हा किल्ला चार किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर आहे. “सातनवरी” वरून डावीकडे वळून पुढे जाताना “खैरी” गांव लागते. इथे कागद कारखाने आहेत. इथल्या “उत्कर्ष पेपर मिल” च्या पुढे हा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. ह्या पेपर मिलजवळ पोचलो की गुगल मॅप बंद करायचा. नाही तर आपला वेळ वाया जातो आणि स्थानिकांची मदत घेतल्याशिवाय पुढे नक्की समजत नाही.

कच्चा प्रशस्त रस्ता

गावात पोचल्यावर वस्तीजवळ डांबरी रस्ता संपतो तिथे वडाच्या पारावर नागमूर्तीची स्थापना केलेली आहे. इथे उजवीकडे वस्ती आहे तर समोरचा कच्चा, पण प्रशस्त रस्ता जंगलाकडे जातो. रस्ता तसा चांगला मळलेला आहे पण आपल्याकडचं जंगल आणि इकडचं जंगल ह्याच्यात खूप फरक असल्याने आम्ही मोठ्या कष्टाने गावातल्या दादांना आमच्याबरोबर यायला तयार केले आम्हाला किल्ला दाखवायला.

प-ह्या

एक तर पावणेतीन झालेले होते. भटकंतीचा हा पहिलाच दिवस, पहिलाच गिरीदुर्ग. हा राखीव जंगलाचा भाग. रस्ता चुकून वेळ वाया घालवणे आम्हाला परवडणारे नव्हतेच. ह्या प्रशस्त रस्त्यावरून चालू लागल्यावर अवघ्या दोन मिनिटात एका प-ह्याजवळ पोचलो. स्वच्छ पाण्यात अंग घुसळावे हा झालेला मोह बाजूला ठेवत बूट सुद्धा न भिजवता तो दगडांवरून उड्या मारत पार केला आणि वन खात्याच्या लोखंडी गेट जवळ पोचलो.

बांबूच्या वनात.. अहा अहा...

उजवीकडेची मळलेली पायवाट थेट गडावर जाते. वाटेत बांबूचं अक्षरशः वन आहे. पराकोटाची तटबंदी असेल असं वाटणारा एक गडगा ओलांडून जंगल भागातून किल्ल्याच्या पायवाटेवर चालताना पुढे इथे पूर्वी पायऱ्या असाव्यात अशा मार्गाजवळ येतो. तिथूनच डावीकडे गड स्पष्ट दिसायला लागतो.

तटबंदी
गडाच्या दरवाजात

मोठमोठ्याला खडकांवर तटबंदी दिसायला लागली आणि दोन मिनिटात गडाचा उध्वस्त दरवाजा लागला. दरवाजाचे अवशेष काही शिल्लक नसले तरी उजवीकडच्या शिल्लक तटबंदीमुळे आणि डावीकडच्या बुरुज सदृश्य पण आता शिल्लक नसलेल्या बांधकामामुळे इथेच दरवाजाचे अस्तित्व असणार हे कळून येते. वरती दर्गा असल्याने हिरवी फडकी काही ठिकाणी लावलेली दिसतात.

गडाची शाबूत तटबंदी
दर्गा

गडाची तटबंदी शाबूत आहे, फक्त झाडीत लपून गेलेली आहे. दर्ग्याच्यासमोर एका झाडाखाली हिंदू देवस्थान आहे. तिथे लावलेला ॐ आणि त्रिशूळ यामुळे त्याचे अस्तित्व टिकून आहे. इथे मूळ शंकराचे स्थान होते असं वाचनात आलं होतं, पण सध्या पिंडी काही दिसत नाही.

जुने शंकराचे स्थान जे आता नष्ट होत चालले आहे
अनगड देव

गडमाथा तसा लहानच आहे आणि तटबंदी शाबूत आहे. या माथ्याच्या बऱ्यापैकी मधोमध असलेल्या या दर्ग्याच्या डावीकडून मागच्या बाजूला गेल्यावर काही अनगड देव दिसतात. शेंदूर फासलेल्या देवाजवळ दिवाबत्तीची सोय आहे.

पलीकडे डोळ्यांना सुखावणारं हिरवंगार जंगल

तटबंदी पलीकडे लांबवर पसरलेलं घनदाट हिरवंगार जंगल डोळ्यांना सुखावतं. एकूणच गडाचे स्वरूप बघता, त्यावेळीही इथे राबता नसावा. पण याचं स्थान पाहता टेहळणीच्या दृष्टीने आणि एक लष्करी ठाणं म्हणून याचं महत्त्व नक्कीच जास्त असेल.

गड-देवता
गड-देवता

आल्यामार्गानेच खालपर्यंत आल्यावर जंगलातच एके ठिकाणी एक गणपती जंगल राखतो आहे, हे स्थान जातानाच हेरून ठेवलेलं होतं पण दुसरं स्थान मात्र स्थानिक बरोबर नसेल तर कळूसुद्धा शकणार नाही. इथे गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती ही नेहमीपेक्षा वेगळी आहे, जी उभी आहे आणि त्याचा साईड-व्ह्यू आहे. एका हनुमानासमोर एक नंदीही आहे. म्हणजे शंकराची पिंडी कुठेतरी गायब झालेली असणार हे नक्की.

महाकाली देवस्थान - मांसाच्या नैवेद्याची व्यवस्था

स्थानिकांचा आग्रह मोडवेना, म्हणून “मौजे भुयारी (शिरपूर) धामणा” इथल्या महाकाली देवस्थानालाही भेट दिली. मूळ मंदिर आता अस्तित्व गमावून बसलेले असले, तरी त्यावेळच्या मूर्ती तिथे जतन करून ठेवलेल्या आहेत. या महाकाली देवीला बकरा किंवा कोंबड्याचा नैवेद्य लागत असल्याने त्याची स्वतंत्र सोयही केलेली आहे.

पहिल्या दिवसाच्या भटकंतीची सांगता करून पुढे मुक्कामाला “पार-शिवनी” गाठले. सकाळी बघायचा होता “कुंवारा भीमसेन” हा पेंच अभयारण्य किल्ला.

रसलपुर सराई, वरखेड गढी, मलकापूर नगरकोट


रसलपुर सराई

याआधीच्या भटकंतीत काही गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि स्थळदुर्ग बघायला मिळाले होते, पण त्यात “सराई” हा प्रकार माहिती नव्हता. “सराई” म्हणजे एक प्रकारचा स्थळदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला. फरक असा कि, या प्रकारच्या किल्ल्याचा मुख्य उद्देश नेहमीच्या किल्ल्यांसारखा लढाईच्या दृष्टीने सुरक्षित जागा किंवा शेजारच्या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी, टेहळणीसाठी असलेले ठिकाण/चौकी वगैरे नसून दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि लष्कराच्या विसाव्यासाठीची सुरक्षिततेची जागा असं म्हणता येईल. नगरकोट आणि सराई ह्या मधला हा महत्त्वाचा फरक म्हणता येईल.

यावल किंवा भुसावळवरून रस्ता साव्हडा, रावेर, खानापूरवरून पुढे बुऱ्हाणपूर कडे जातो. पालवरून रावेरकडे जाताना अलीकडेच हे रसलपूर आहे.

ही सराई बघणे, म्हणजे खरं तर दिव्य काम आहे. ही सराई पूर्णपणे कॅप्चर्ड आहे. सामान्यतः नगरकोटांच्या आत-बाहेर वस्ती वाढतेच, पण ही सराई पद्धतशीरपणे ताबा मिळवलेली आहे. स्थानिकांच्या वागण्या-बोलण्यातून आणि नजरेतून ते सहज कळून येते.

अतिक्रमण: खंदकांवर आणि तटबंदीशेजारी

माझ्या गळ्यात अडकवलेल्या कॅमेरावरून पत्रकार किंवा सरकारी माणसं असल्यासारखे वाटून अगदीच हाकलून लावता येत नसल्याने, “हमारा इलाका” दाखवायला आलेल्या मुलाने “अब ये हमारा है” असं स्पष्ट म्हणून शंकेला जागा सुद्धा ठेवलीन नाही.

तसे म्हटले तर खूप अवशेष शिल्लक आहेत. परंतु तटबंदी-बुरुज जे काही आहे त्याला नुसते लागून नव्हे, तर त्यावर आणि आतमध्ये सुद्धा घरं बनवून ताबा मिळवलेला आहे. म्हणजे पूर्वापार नगरकोटाच्या आत-बाहेर लागून जागा दिलेल्या असत, पण बुरुजाच्या आत कोणाला कोणत्याच राज्यकर्त्याने जागा दिलेली असणे शक्य तरी आहे का? तटबंदीच्या बाजूने असलेल्या खंदकांवर काही ठिकाणी सरळ सरळ तो बुजवून त्यावर घरे बांधण्याचे काम चालू आहे. म्हणजे चुकून सुद्धा ज्याला वडिलोपार्जित आहे म्हणून तरी अधिकृत वगैरे म्हणावे असं सुद्धा नाही. आणि त्यातून साधारण पंधरा फुटाच्या आसपास असलेल्या ह्या खंदकावर घाण आणि कचऱ्याला तर सुमार नाहीच. तसं एकूणच इकडच्या सगळ्या भागात हीच परिस्थिती आहे.

असो, तर हे अवशेष शोधून-शोधून बघताना कधी एखादा बुरुज लपलेला दिसायचा, तर कधी दरवाजा. तटबंदीत घरं तर दोरीवर कपडे वाळत घातलेले दिसतात तशी सजलेली दिसली.

अतिक्रमण: दरवाजा कमानीत, तटबंदीत

शिल्लक असलेल्या दरवाजांपैकी एक उत्तरेला तर एक पूर्वेला आहे. फोटोत दिसत असलेल्या दरवाजाला लागून, वरती आणि चक्क आतमध्येसुद्धा घर सहज दिसतात. हे अवशेष शिल्लक राहण्यामागचे कारण सुद्धा १०-१२ फूट उंचीची दगडी बांधीव मजबूत भिंत फुकट, कष्ट न करता बांधून मिळते तर कशाला सोडा? हेच असेल.

काही ठिकाणी ह्या दगडी भिंतींच्यावर विटांचे बांधकाम दिसते. त्यात जंग्या दिसतात. तटबंदीतल्या खोल्यांत लोकांनी घरं, तर काही ठिकाणी गुरांसाठी चक्क गोठे बांधलेले आहेत.

शिल्लक बुरूज पाहतानाही त्याचे तटबंदीच्या वरच्या उंचीचे बांधकाम विटांत केलेले दिसते. आत मध्ये फिरताना नशीब चांगले असेल आणि स्थानिकांनी दाखवले तर दोन विहिरी बघायला मिळतात. खंदकात उतरण्यासाठी बांधलेल्या पायऱ्याही काही ठिकाणी बघायला मिळतात.

सुदैवाने जे काही शिल्लक आहे ते बघायला मिळाले आणि पहिली-वहिली “सराई भेट” पदरात पडली.

वरखेड गढी

वरखेड/वरखेडे/वरखेडी अशा काहीशा नावाने ओळखली जाणारी गढी शोधणे हे जरासे कठीण काम आहे.

रसलपुर वरून मलकापूर कडे जाताना चिखली-दसरखेड मार्गे न जाता बोदवड मार्गे जावे. बोदवड-मलकापूर रस्त्याजवळ वरखेड बुद्रुक मध्ये ही गढी आहे.

गावात अतिशय जुने वाडे आहेत. त्याचे नक्षीदार दरवाजे, सुंदर कोरीव काम असलेले वासे पाहत या गढीजवळ पोचायचे. गढी बरोबर चौरस आकारात आहे. आतमध्ये उध्वस्त असलेल्या या गढीची तटबंदी मात्र पूर्ण शाबूत आहे.

गढी दरवाजे

मुख्य प्रवेशद्वारावरती विटात सुंदर नक्षीकाम आहे. बांधकामात दगडाचे असून वरचे बांधकाम विटात आहे. आतमध्ये खूप उध्वस्त अवशेष आहेत. तटबंदीवर चढायला तशी जागा नाही. पण शिल्लक अवशेषांवरून वर चढून तटबंदीवर फिरता येते.

पूर्ण तटबंदीला जागोजागी जंग्या आहेत.

अष्टकोनी शिल्लक बुरुज

तटबंदीच्या एका कोपऱ्यात अष्टकोनी, तटबंदीपेक्षा जास्त उंचीचा एक बुरुज आहे.

वेगळी गणेश मूर्ती

तटबंदीच्या आतमध्ये विहिर आहे. तिच्या काठावरच्या भिंतीतल्या कमानीत गणपतीची सुंदर उभी आणि नेहमीपेक्षा वेगळी मूर्ती आहे. गढीच्या आत मध्ये एक चौकोनी विहीर आहे.

भक्कम तटबंदी

गढीच्या बाहेरून फिरताना मात्र ही तटबंदी भव्य वाटते.

मलकापूर नगरकोट

मलकापूर हा नगरकोट असल्याने अवशेष पूर्ण पसरलेले आहेत. सात वेशींचे शहर अशी याची ओळख आहे. म्हणजे हा किल्ला पाहणे हा वेळ देऊन अवशेष शोधणे असे काम आहे. नगरकोट म्हटला की लांबच्या लांब तटबंदी, त्याला धरून वस्ती हे आलेच. त्यामुळे सुरुवातीला मुख्य दरवाजापासून श्री गणेशा करायचा.

आम्ही सरळ गाडी एका ठिकाणी लावून एक रिक्षा केली. स्थानिकांबरोबर फिरण्याचा फायदा म्हणजे आपण वाचून, माहिती काढून आलेले अवशेष तर त्यांच्या मदतीने बघता येतातच आणि अजूनही काही माहिती पदरात पडण्याची शक्यता असते. तसेच नगरकोट म्हणजे खूप अवशेष दडलेले असतात जे त्यांच्या शब्दांवर बघता येतात.

दरवाजा

अवशेषांची सुरुवात अशीच तटबंदीत बांधलेल्या बुरुजावरच्या घरापासून झाली. नगरकोटाचे सात वेशींचे शहर म्हणजे सात दरवाजे असणार. परंतु सध्या तीनच दरवाजे पाहता येतात. चौथा दरवाजा काही काळापूर्वीच रस्ता रुंदीकरणात पाडला गेल्याचे वाचले होते. पहिला मुघल दरवाजा बघितला, त्याला “बडा मुघल दरवाजा” म्हणतात. तिथे जवळच “सूर्यमुखी बडा हनुमान मंदिर” सुद्धा आहे. ह्या मुघल दरवाजाचे संवर्धन झालेले दिसते. वरचा अर्धा बुरुज आता सिमेंटने बांधलेला असून त्यावर ध्वज उभारण्यासाठी जागा ठेवलेली आहे. आतील बाजूने घराचे वेढलेली तटबंदी असली, तरी एके ठिकाणी बुरुजांवर जायला जागा ठेवून आपल्यावर कृपा केलेली दिसते.

दरवाजा
दरवाजा
जीभीची भिंत

सरळ पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो त्याच्या समोर जिभीची भिंत आहे. दोन्ही बाजूला छोटे बुरुज आहेत. तिथे एक जुने मारुतीचे मंदिर आहे. तिसऱ्या दरवाजाच्या वर मात्र जाता येत नाही.

दुरावास्थेतले शिल्लक अवशेष
बुरुज

एका मागून एक असे दरवाजे बघता येतात. नदीच्या बाजूला सुटे बुरुज आहेत. एका दरवाजाच्या बाहेर घोड्यांच्या पागेसारखी जागा पण आहे.

नेमीवंतांची हवेली आणि राजे नेमिवंत यांचे श्रीराम मंदिर

शोधून शोधून दरवाजे, बुरुज वगैरे बघितल्यावर स्थानिकांच्या मदतीने “नेमीवंतांची हवेली”, “श्री मल्लिकार्जुन मंदिर”, राजे नेमिवंत यांचे श्रीराम मंदिर बघता येते. इथे एक मोठा देवनागरीतला शिलालेखही आहे.

राणी बाव - शिलालेख

गावाबाहेर एका शेतात एक जुनी बाव आहे, याला राणीची बाव म्हणतात किंवा लालबाव. समोरच शेतात एक जुनी वास्तू आहे. वास्तू जवळ हनुमान मंदिरही आहे. या विहिरीत दोन शिलालेख असून एक देवनागरीत दर दुसरा फारसी मध्ये लिहिलेला आहे.

या भटकंतीत गिरीदुर्गांपेक्षा बहुतेककरून जास्ती गढ्या आणि भुईकोट किल्ले किंवा वाडेच पाहण्यात आले. या भागात "सराई" हा एक वेगळा प्रकार बघितला.

भटकंतीत पुढे पिंपळगाव राजा इथली देशमुखांची गढी, रोहिणखेडचा भुईकोट किल्ला, देऊळगाव घाट इथला नगरकोट आणि शिरानी गढी तसेच “करवंड” इथली शेवटच्या घटका मोजत असलेली गढी, जाफ्राराबाद इथला भुईकोट किल्ला, मेहुणा राजा इथली गढी, देऊळगाव राजा इथला नगरकोट किल्ला तसेच उतरांडा इथली गढी पाहिली. “करवंड” इथली गढी इंगळे घराण्याची, म्हणजे शिवरायांची ८ वी पत्नी, “गुणवंताबाई” यांची आहे. ही तर “५२ बुरुजी” होती असं गावकरी सांगतात.

एकूणच यानंतर आमची भटकंती इथे सुफळ संपूर्ण झाली.

देशमुख गढी (पिंपळगांव राजा)
रोहीणखेड - गढी, मशीद
रोहीणखेड - एकलकोंडा बुरूज
देऊळगांव घाट - शिरानी यांचा वाडा
देऊळगांव घाट - नगरकोट दरवाजा

देऊळगांव राजा

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!










Vadu Tulapur and Wagheshwar Temple: A Photo Feature


वडू तुळापूर ही पुणे अहमदनगर महामार्गावरील भीमा कोरेगावच्या सीमेला लागून असलेली दोन लहान गावे आहेत. थोर शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांचा छळ आणि फाशीची साक्षीदार असलेली ठिकाणे म्हणून तुळापूरला इतिहासात महत्त्व प्राप्त झाले आहे.

 तर वडू हे ठिकाण आहे जिथे संभाजीराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दोन्ही ठिकाणी मराठा राजाच्या हौतात्म्याचा गौरव करण्यासाठी समाधी (स्मारक) उभारण्यात आल्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी दख्खनमधील मुघलांच्या हल्ल्याचा प्रतिकार केला. दहा वर्षे संभाजींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मुघल युद्धे चालू राहिली.

संभाजीला एक कवी कलश, उत्तर भारतातील कन्नौजी ब्राह्मणाच्या रूपात एक सहाय्यक आणि मित्र होता. कलशांच्या आग्रहास्तव संभाजींनी १६८८ चा उष्ण उन्हाळा विशाळगडापासून उत्तरेला वीस मैलांवर आणि रत्नागिरीपासून बावीस मैल ईशान्येस असलेल्या कोकण-संगमेश्वर येथे कवी कलशांनी बांधलेल्या महालात घालवण्याचा निर्णय घेतला होता. संभाजीच्या हातून चूक सिद्ध झाली, कारण तो एकदा रायगडच्या अभेद्य किल्ल्याच्या सुरक्षित संरक्षणापासून दूर होता). संभाजींचा ठावठिकाणा ही बातमी लवकरच मुघलांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मुघल सेनापती मुकर्रब खान याने संभाजीला वैयक्तिकरित्या पकडण्यासाठी एक धाडसी योजना आखली. त्यांना त्यांच्या प्रयत्नात संभाजीच्या परक्या मेहुण्याने, गणोजी शिर्के या नावाने मदत केली, ज्याने मुघल सैन्याला लगतच्या घनदाट जंगलातून मार्ग दाखवला, एकाच वेळी मुघलांना, रसद आणि संभाजींच्या हालचालींची माहिती पुरवली.



 फेब्रुवारी 1688 मध्ये संभाजी आणि कवी कलश यांना घेरले गेले आणि पकडले गेले. त्यांना औरंगजेबासमोर आणण्यात आले, ज्याने स्वतः अकलूज (पंढरपूरजवळ) येथे तळ ठोकला होता. दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्यात आले आणि बफूनच्या पोशाखात जमावासमोर परेड करण्यात आली. संभाजीला बहादूरगड (पेडगाव, श्रीगोंदा) येथे बंदिवासात ठेवण्यात आले होते जेथे औरंगजेबाने संभाजीला अपमानास्पद प्रस्ताव दिला होता. संभाजीने आपले सर्व किल्ले आणि जमा केलेला मराठा खजिना मुघलांच्या स्वाधीन करावा. दुसरे म्हणजे, त्याने मराठ्यांशी गुप्तपणे संगनमत करणाऱ्या सर्व मुघल अधिकाऱ्यांची नावे उघड करावी आणि तिसरे म्हणजे संभाजीने स्वतःला इस्लाम स्वीकारावे आणि नजीकच्या काळात बादशहाची सेवा करावी. त्या बदल्यात औरंगजेब संभाजींचा जीव वाचवणार होता.


परंतु निडर मराठा राजाने तिरस्काराने प्रतिवाद केला की, औरंगजेब आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी देण्यास तयार असेल तरच तो सम्राटांच्या अटी मान्य करेल. त्यानंतर संभाजीने अपमानाची देवाणघेवाण केली. या उद्धटपणामुळे बादशहाला अजिबात राग आला आणि त्याने संभाजींना फाशीची आज्ञा दिली .मराठे संभाजीला सोडविण्याचा प्रयत्न करतील या भीतीने त्याला गुपचूप पुण्याजवळील तुळापूर येथे हलवण्यात आले.तीन दिवस संभाजींना भीमा नदीच्या काठावर तुळापूर येथे छळण्यात आले. औरंगजेबाने निंदनीय जीभ बाहेर काढण्याचा आदेश दिला, त्याचे डोळे कापले गेले, हातपाय तोडले गेले. संभाजींना अतिशय भयानक अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले. पण तिसऱ्या दिवशी त्याचे डोके कापले जाईपर्यंत त्याने ते धैर्याने सहन केले.



त्याचा सहाय्यक आणि विश्वासू कवी कलश देखील शेवटपर्यंत त्याच्या स्वामीशी एकनिष्ठ राहिला. त्यालाही संभाजीसारखेच भाग्य लाभले.
संभाजींच्या शेवटच्या दिवसांशी निगडीत मियांखान या मुघल अधिकाऱ्याची आणखी एक कहाणी आहे. या मियांखानाला आधी संभाजीने काही मोलाची मदत केली होती आणि नंतरचे हे मियांखानाचे ऋणी होते. हाच अधिकारी संभाजी अत्याचाराच्या वेळी तुळापूर येथे तैनात होता. पण छत्रपतींचे डोळे काढायला सांगितल्यावर त्यांनी आत्महत्येला प्राधान्य दिले.
 संभाजींचे छिन्नविछिन्न अवशेष नंतर वडूच्या काही शूर लोकांनी (नंतर शिवले पाटील किंवा राजाचे मृत अवशेष शिवणारे पाटील म्हणून संबोधले गेले) एकत्र शिवले आणि शेवटी विधीपूर्वक आणि सन्मानाने तेथे अंत्यसंस्कार केले.
अशा प्रकारे एका बेपर्वा पण शूर राजाचे जीवन संपले (११ मार्च १६८९). मृत्यूनंतर तो हुतात्मा झाला, मराठा लढ्याला प्रेरणा देत.
संभाजींच्या मृत्यूनंतर, सर्व मराठा सरदार आपले मतभेद विसरून, छत्रपती राजाराम (संभाजींचे सावत्र भाऊ) यांच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि मुघलांविरुद्ध त्यांचा संघर्ष चालू ठेवला.

तुळापूरमधील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे संगमेश्वरचे मध्ययुगीन मंदिर जे विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या सैन्यातील सेनापती मुरार जगदेव आणि त्याचा सेनापती शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे यांचे वडील आणि संभाजीराजे यांचे आजोबा आणि जहागीरदार यांनी बांधले होते. पुणे (तुळापूर पुण्यात आहे). आजोबांनी बांधलेल्या याच मंदिराच्या परिसरात संभाजीराजे कैदेत होते असे म्हणतात.

मध्ययुगीन काळात हा प्रदेश नागरगाव म्हणून ओळखला जात असे. हे पूर्वी राष्ट्रकूटांच्या अधिपत्याखाली आणि नंतर सेउना यादव राजांच्या अधिपत्याखाली होते. नागरगाव हे पाच नद्यांचे संगम होते. भीमा, भामा, इंद्रायणी, अंदुरी आणि सुधा. या महान नद्यांच्या काठावरच यादवांनी भगवान शिवाला समर्पित असलेली घृष्णेश्वर, औंडा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि परळी वैजनाथ अशी पाच ज्योतिर्लिंग मंदिरे उभारली. नागरगावला संगमेश्वर नावाचे अत्यंत पवित्र शिवमंदिर होते. सुरुवातीला हे एक अतिशय नम्र निवासस्थान होते आणि तपस्वी योगी फत्तेश्वर महाराजांचे घर देखील होते.



पुढे मुरार जगदेवने हत्तीच्या वजनाच्या वीस पट सोन्याचे वजन (तुला) दान केल्याने हे नाव बदलून तुळापूर झाले. हे मुरार जगदेव यांनी फत्तेश्वर महाराजांचे शिष्य आणि उत्तराधिकारी रुद्रनाथ महाराज यांच्या गूढ आजारातून बरे झाल्यानंतर केले होते. तसेच मुरार जगदेव यांच्या सूचनेनुसार शहाजीराजे यांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केले आणि तेथील निवडुंगाची झाडे काढून या जागेचा जीर्णोद्धार केला. मंदिराभोवती दगडी पायऱ्यांसह नदीकडे जाणाऱ्या घाटासारखा घाटही त्यांनी बांधला. 



फत्तेश्वर महाराज आणि रुद्रनाथ महाराज या दोघांच्या समाधीही नंतर बांधल्या गेल्या आणि त्या आजतागायत अस्तित्वात आहेत. रावजीबुवा देसाई यांचीही समाधी आहे ज्यांनी या परिसराची दीर्घकाळ काळजी घेतली.



तसेच 24 ब्राह्मण कुटुंबांना जमिनी दिल्या आणि ते येथे स्थायिक झाले.

तथापि संभाजीराजांच्या हौतात्म्यानंतर हे ठिकाण नरकापूर किंवा नरकनगर म्हणून ओळखले जाऊ लागले.

18 व्या शतकाच्या उत्तरार्धात (1790), इंदूरच्या (प्रसिद्ध मराठा सरदार मल्हारराव होळकर यांची सून) राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची आणि घाटाची पुनर्बांधणी केली आणि या प्रदेशाचे तुळापूर असे नामकरण केले.

तेव्हापासून या मंदिराचे अनेक नूतनीकरण झाले आहे. १९८९ पर्यंत त्याची देखभाल रावजीबुवा महाराज नावाच्या एका साधूने केली होती.

 त्यांच्या मृत्यूनंतर, मंदिराची देखभाल आणि सुशोभीकरण डॉ. सुधीर निरगुडकर आणि निरगुडकर ट्रस्ट (1993) यांनी केले आणि ते आजतागायत सुरू आहे.

संगमेश्वर मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून सभामंडप व गाभारामध्ये विभागलेले आहे. 

गाभारामध्ये हे तेजस्वी शिवलिंग आहे.

बाहेर प्रांगणात नंदीमंडप आहे जेथे नंदीमहाराज विराजमान आहेत, तसेच उंच दगडी दीपमाळ आहे.

गणेश, भगवान हनुमान आणि इतर देवतांना समर्पित लहान मंदिरे देखील आहेत.

मंदिरातून बाहेर पडल्यावर घाटातून वाहणाऱ्या नदीकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात.



हा घाट अहिल्याबाई होळकर घाटाला लागून आहे ज्यात शिव आणि गणेश मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत.

लोक नदीत जलद पोहण्याचा किंवा फिरण्याचा आनंद लुटताना दिसतात. नदीच्या पलीकडे खारफुटीच्या वनस्पती असलेले बेट दिसते.



तसेच मंदिराच्या परिसरात मध्यकालीन शिव बल्लाळेश्वर आणि गणेश मंदिरे आहेत.

ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्या ठिकाणी समाधी देखील तयार करण्यात आली आहे.

कवी कलश यांना समर्पित समाधी देखील आहे.

थोडे पुढे संभाजी महाराजांचा पुतळा आहे.

तुळापूर नंतर काही किलोमीटर अंतरावर वडू गाव आहे . 



असे म्हटले जाते की वडू येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी (मुघलांच्या क्रोधाकडे दुर्लक्ष करून) पाटील नावाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या मृतदेहाचे छिन्नविछिन्न भाग शिवून गावात त्यांचे अंत्यसंस्कार व अंत्यविधी केले. 



ते शिवले पाटील (किंवा संभाजीचे शरीर शिवणारे पाटील) म्हणून ओळखले जाऊ लागले. 



त्याच ठिकाणी छ.संभाजी, कवी कलश आणि शिवले पाटलांच्या समाधी आहेत.

भीमा कोरेगावच्या परिसरात कॅप्टन स्टॉन्टनच्या नेतृत्वाखालील बॉम्बे नेटिव्ह लाइट इन्फंट्रीच्या पाचशे महार सैनिकांना समर्पित स्मारक आहे, ज्यांनी पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि जिंकले (१८१८), ज्यांची संख्या साठ पटीने जास्त होती. हे अंतिम अँग्लो मराठा युद्ध असेल आणि ज्याने भारतात ब्रिटिश साम्राज्याचा मार्ग मोकळा केला.



वाघेश्वर मंदिर पुणे अहमदनगर रस्त्यावर वाघोली येथे पुण्याबाहेर (वडू तुळापूरपासून काही किलोमीटर अंतरावर) आहे. हे मध्ययुगीन शिवमंदिर उत्कृष्ठपणे कोरलेले आहे.

वाघेश्वर मंदिराची छायाचित्रे:

वरील चित्रे: भिंत कोरीव काम

वरील छायाचित्र: नंदी मंडप

मंदिराच्या पलीकडे एक चांगला पसरलेला तलाव आहे. शेजारी एक बाग देखील आहे.

तसेच मंदिराशेजारी पेशवाईचे प्रमुख सरदार पिलाजीराव जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समाधी आहेत.                           

फेरफटका


थेरगाव बोट क्‍लब

थेरगाव बोट क्‍लब  

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे  उभारण्यात आलेल्या काही पर्यटक प्रकल्पांमधील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून थेरगाव येथील बोट क्लब नावारुपाला येऊ लागला आहे. सुमारे 5 एकरावर पसरलेल्या या बागे शेजारी  वाहणा:या पवना नदीत पर्यटकांना बोटिंगचाही मनसोक्त अनुभव घेता येऊ लागला आहे. त्या विषयी...

थेरगाव :
      थेरगाव हे पवना नदीकाठी असलेले एक छोटेसे गाव. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेशानंतरचे हळूहळू विकसित होऊ लागले. बापुजीबुवा हे थेरगावचे ग्रामदैवत. पूर्वी थेरगावचे गावठाण पवनानदीकाठी केजुबाई मंदिर परिसरात होते. कालांतराने बापुजीबुवा मंदिर विभागात गावचे स्थलांतर झाले. येथील पदमजी पेपर मिल या कारखान्यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळाला.
      गावाच्या इतिहासाविषयी एक कथाही सांगितली जाते. फार पूर्वी शेतीला पाणी सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी थेरगावचे गावठाण नदीकाठी होते. येथील केजुबाई मंदिराजवळ सुसरींचे प्रमाण वाढले. पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांवरही सुसरींचे हल्ले वाढले. यामुळे सोळाव्या शतकानंतर गावठाणाचे स्थलांतर बापूजीबुवा मंदिर परिसरात झाले.  प्रत्येक वर्षी चैत्रपौर्णिमेस गावामध्ये बापुजीबुवा देवाचा उत्सव भरतो.  थेरगाव परिसर पिंपरी व चिंचवडला जवळ असल्याने अनेकांनी येथे गृहउद्योग उभारले आहे. वाहतूकदृष्टीने पुण्याकडे जाण्यास थेरगाव जवळ आहे.
        बच्चे कंपनीला शाळांच्या सुट्टय़ा लागल्या आणि परिसरासतील बागा फुलू लागल्या. संध्याकाळी कुठल्याही बागेत जाण्यापेक्षा घरापासून तीन ते चार किलोमीटरवर असणा:या थेरगाव येथील बागेत जाण्यास निघालो. उन्हाळय़ात अंगाची लाहीलाही करून सोडणारे उन. उन्हामुळे बाहेर तर जाता येत नाही. मग अंगावर पाण्याचे थंडगार तुषारे घेण्यसाठी मस्त ठिकाण म्हणजे थेरगाव येथील हा बोटक्लब.
       श्री मोरया गोसावी मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणा:या या क्लबची उभारणी १६ फेब्रुवारी 2007 साली महापालिकेतर्फे  करण्यात आली. थेरगावला शेती प्रमुख व्यवसाय. औद्योगिकीकरणानंतर येथील राहणीमानात फरक जाणवू लागला. मोठमोठे प्रकल्प, औद्योगिक वसाहतीमुळे थेरगाव रुप पालटू लागले. पवना नदी शेजारील सुमारे 5 एकर जागेवर महापालिकेने सुंदर बाग निर्माण केली आहे. या बागेचे वैशिष्ट म्हणजे येथून वाहणारा कृत्रिम धबधबा. सुमारे 400 ते 500 मीटर लांब असा येथे कृत्रिम धबधबा करण्यात आला आहे. पाणी स्वच्छ असल्याने बच्चे कंपनीला येथे मनसोक्त पाण्यात खेळायला मिळते.

लहान मुलांसाठी खेळणी
       येथे झोकाळे, घसरगुंडी, खांबावरील विविध खेळ लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. मात्र, काही हौशी पर्यटक लहान मुलांच्या झोकळय़ांवरती झोकळा घेऊन आपली इच्छा पूर्ण करताना दिसतात. मात्र, यामुळे नाहक खेळण्याची मोडतोड नक्कीच होणार आहे. या ठिकाणी पर्यटकांबरोबरच प्रेमी युगलांचाही वावर वाढल्याचे दिसते. झाडामागे, ओडाश्याला जाऊन प्रेमाचे चाळे करणारे प्रेमवीर ही आपणास पाहावयास मिळतात. असो.

टॉयट्रेन :
       लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन ठरू लागली आहे. ट्रेन खाली बहुधा रिक्षाचे एंजिन जोडून रेल्वेसारखा गाडीला आकार दिला आहे. तरीही लहान मुलांना अर्थातच त्यांच्या पालकांनाही या ट्रेनमध्ये बसण्याचा मोह आवारता येत नाही. फक्त 5 रुपये तिकीट दर असल्याने येणारा प्रत्येकजण याचा अनुभव घेतोच. उद्यानातील प्रवेशद्वारापासून बागेच्या शेवटर्पयत एक फेरफटका मारता येतो.

लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन

कृत्रिम धबधबा

बोटक्लब :
       उद्यानाचे मुख्य आकर्षण ठरलेले हा बोट क्लब पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागला आहे. केजुदेवी बंधारा बांधल्याने पवना नदीत पाणी अडवून ठेवता येते. याच अडविलेल्या पाण्यावर येथे बोट क्लब सुरू केला आहे. हौशी पर्यटक येथे बोटिंगचा अनुभव घेतात. माणसी 30 रुपये पॅडल बोट 15 मिनिटांसाठी तर मोटार बोट 40 रुपये 15 मिनिटांसाठी आहेत. इतर बोटिंग क्लब पेक्षा या ठिकाणी दर कमी आकारणी आहे. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक बोटिंग करतात.

बोट क्लब

बोट क्लब

बोट क्लब

केजुदेवी मंदिर :
       बोटक्लबच्या अलीकडेच वाहनतळाच्या ठिकाणी नदीकाठी आपल्याला एक मंदिर दिसते. हे केजुदेवीचे मंदिर. नवरात्रत या ठिकाणी मोठा उत्सव भरलेला दिसतो. पावसाळय़ात अनेकवेळा हे मंदिर पाण्याखाली जाते. या बंधा:यावर आजुबाजूच्या परिसरातील पोहणारे तरुण नदीत डुंबायला व पोहायला येतात. अनोळखी ठिकाण असल्याने या बंधा:यावर नवख्या माणसाने पोहण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा या बंधा:यावर दुर्घटना घडल्याच्या बातम्या वाचण्यात आलेल्या आहेत.

केजुदेवी

केजुदेवीचे मंदिर व पवना नदी.

वेळ व दर आकारणी :

  • उद्यानात प्रवेश घेण्यासाठी लहान मुलांना 5 रुपये तर 12 वर्षापुढील व्यक्तीसाठी 10 रुपये प्रवेश फी आकारली जाते. 
  • उद्यानाची वेळ : सकाळी 11 ते सायं. 7

  • कसे जाल :
  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवडगावात जाणा:या रस्त्याने थेट चापेकरचौकात जाऊन तेथून मोरया गोसावी मंदिरात गजानानचे दर्शन घेऊन धनेश्वरच्या महादेवाचे दर्शन घ्यावे तेथील जवळच्या पुलावरून सरळच आपल्याला थेरगाव बोटक्लबकडे जाता येते.
  • दुसरा मार्ग : पुण्यातून डांगे चौकातून येऊन उजवीकडे वळून चिंचवडगावाकडे जाणा:या रस्त्यावर डावीकडे बोटक्लबला जाता येते.
  • तिसरा मार्ग : चापेकर चौकातील नव्याने उभारलेल्या पुलावरून डांगे चौकाच्या अलिकडे डावीकडे बिर्ला हॉस्पिटलशेजारील रस्त्यावरून बोटक्लबकडे जाणारा रस्ता आहे.
  • पुणे ते चिंचवडगाव अंदाजे 18 किमी.
  • चिंचवड ते बोटक्लब : अंदाजे 3 किमी.

अजून काय पहाल

एकंदरीत एक दिवस वेगळय़ा ठिकाणी व निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आल्याने मन तरतरीत हे नक्की.
सकाळी लवकर घरून निघाल्यास पिंपरी-चिंचवड परिसरातील अन्य पर्यटन स्थळे ही पाहता येणे शक्य आहे.

वाघोलीचा वाघेश्वर

वाघोलीचा वाघेश्वर 

         तुळापूर येथून निघून 20 मिनटात वाघोलीला असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो. पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून 20 कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे  पुरातन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे. तसेच  पेशवाईतील शूर कर्तबगार सरदार पिलाजीराव जाधवरावांची समाधी आहे.
          वाघेश्वर मंदिराची रचना ही चौकोनी गाभारा, सभा मंडप, भिंतीवरील अनेक कोनाडे, शिखराची रचना टप्प्याटप्प्याची खालच्या टप्प्यापेक्षा वरचा टप्पा लहान होत जाणारा. त्यामुळे मंदिराकडे पाहिल्यास आपली नजर सरळ  वर न जाता ती आडव्या रेषामध्ये जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरील नंदी मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. नंदी पांढ:या रंगात रंगवलेला आहे. मंदिराच्या बाहेरील प्रत्येक स्तंभाची रचना कलशावर कलश मांडून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या बाहेरील खांबावर दगडी शिल्पामध्ये राम अवतार, बळीवामन, शेषशाही विष्णू, नृसिंह अवतार, वराहअवतार, गरुड देवता, हनुमान, मत्स्य अवतार, कच्छ अवतार,यक्ष, व्याल, महिशाशूरमदिर्नी, मल्ल, व्याल,कल्की अवतार, गणोशमूर्ती, नागदेवता, सहस्त्न भाऊ आणि परशुराम युद्ध ,अश्वमेध यज्ञ, घोडा अशा शिल्पकृती दगडावर कोरलेल्या आहेत.  मंदिराजवळ असणारा  तलाव  पर्यटकांचे आकर्षण ठरू लागला आहे ते येथील बोटिंगमुळे. संध्याकाळचे 7.30 वाजल्यामुळे मला फोटो काढता आले नाही.

 

पिलाजी जाधवराव :
पिलाजीरावांनी तलावाच्या शेजारील  वाघेश्वर  मंदिराजवळ बागेसाठी पेशव्यांकडे जागेची मागणी केली होती. गावातील लोकांना पाण्याची अडचण दूर होण्यासाठी तलाव बांधला. ही मागणी बाजीराव पेशव्यांनी 1722  मध्ये मान्य करून पिलाजी आणि संभाजी जाधव रावास जमिन दिली.   पिलाजीरावांनी  दिवेघाटात तलाव बांधला. तो मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिवेघाटात वर पोहचल्यावर खाली नजर टाकल्यास मोठा पाण्याचा कोरडा तलाव दिसतो हाच तो मस्तानी तलाव. मध्यंतरी पेपरात तलाव साफ करण्याच्या बातम्या झळकल्या होत्या. 1729 च्या पूर्वी या तलावाची बांधणी  पिलाजीरावांनी केली. पुढे बाजीरावांकडे हा तलाव आला.

सरदार पिलाजीराव जाधवांची समाधी
मंदिराशेजारी पाषाणातील सुबक बांधकाम असलेली पिलाजीरावांची समाधी आहेत. या समाधीजवळच जाधवराव घराण्यातील अनेक पुरु षांच्या समाध्या दिसतात.


तुळापुर

तुळापूर   

रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे असे ठरवून जवळ असल्या तुळापूरला जायचे ठरले. अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजीमहाराज व त्यांचे सुपूत्र धर्मवीर संभाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तुळापूर येथील भूमी पुण्यापासून काहीच अंतरावर आहे. त्या विषयी...

तुळापूर : 

आदिलशाही दरबारातील वजिर मुरारपंत जगदेव यांनी ठिकाणी हत्तीला तराफ्यात उतरवून त्याचे वजनाइतके सोने दान केले अशी एक गोष्ट सांगण्यात येते. यावरूनच गावाला तुळापूर नाव पडले. तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. पूर्वीचे नाव 'नांगरवास' असे होते. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेले छोटेसे गाव. तुळापुर आळंदी पासून अंदाजे १४ किलोमीटरवर  तर पुण्यापासून ३० किलोमीटरवर आहे.  येथे महाराष्ट्रातील नद्यांचा दुर्मिळ त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. श्रीक्षेत्र आळंदीकडून वाहत येणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलात उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा  या तीन मोठ्या नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

संगमेश्वर मंदिर

तुळापूरला श्री शंकराचे जुने  मंदिर होते. काही कालावधीनंतर हे मंदिर श्री संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. इसवी सन १६३३ च्या सुमारास आदिलशाही दरबारातील वजिर श्री मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रुद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेचे पालन करून श्री संगमेश्वर मंदिराची डागडुजी केली. येथे वास्तव्यास असताना छत्रपती शहाजी महाराज तसेच बालशिवाजी दोघेही संगमेश्वराची पूजा करीत असत. येथील संगमावर मोठा नदीघाट उभारला असून, बोटिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. माणसी ३० रुपये प्रमाणे आपल्याला नदीतून एक चक्कर मारता येते.  निरगुडकर फाउंडेशनद्वारा येथे संभाजीमहाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. 

तमाम शिवप्रेमींची ही श्रद्धास्थाने. तुळापूरपासून जवळच असलेले वढू बुद्रुक आणि तुळापूर ही भीमा नदीतीरावरची ही पवित्र स्थाने. या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने अमानुष व क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले. त्या सर्व इतिहासाची साक्षीदार ही भूमी आहे.  शंभूराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने साखळदंडात कैद करून तुळापूर येथे आणले होते.  फाल्गुन अमावस्येला ११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती.  वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. वढूपासून तुळापूर ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. वेळेअभावी मला वढूला जाता आले नाही.  औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. आपला राजाचा क्रुरतेने केलेला अंत येथील जनतेला कळल्यावर अंतिम संस्कार योग्य रीतीने व्हायला पाहिजे असे वाटले. वढूच्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमानदी रात्रीत ओलांडून व मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिमसंस्कार केले. 

संभाजी राजे : 

संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ (14 मे 1657चा.) रोजी पुरंदर गडावर झाला. राजे केवळ २ वर्षांचे असतानाच सईबाई वारल्या. सईबार्इंच्या मागे राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीत त्यांना राजकारणाचे धडे शिकू लागले.  या काळात महाराजांच्या बरोबर त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडला. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या गोष्टीत संभाजी राजे पारंगत होते. राजांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथात  केवळ ९ वर्षांच्या कालखंडात राजांनी १२८ लढाया जिंकून शिवाजीमहाराजांचे नाव राखले. 

                   संभाजीराजांचा वाढता पराक्रम औरंगजेबाला घाबरून सोडणारा होता. पूर्ण ताकदीनिशी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. 1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वर येथे मुक्कामी थांबले होते.  1 फेब्रुवारी 1689 ला आपला सख्खा मेहुणा गणोजी शिर्केयाच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले.  तेथून धिंड काढत अतिशय क्रूरपणो  15 फेब्रुवारी 1689 या दिवशी पेडगावच्या किल्यात औरंगजेबासमोर राजांना आणण्यात आले. धर्म बदलण्याची अट लाथाडून धर्मनिष्ठ राजांनी मरण पत्करले. 12 मार्च 1689 या दिवशी गुढीपाडवा होता.  गुढीपाडवा हा हिंदुचा मोठा सण. या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली.   राजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. मृत्युसमयी राजांचे वय अवघे 32 होते.

महाराजांच्या पराक्रमाने, शौर्याने ही भूमि पावन झालेली आहे.  संभाजीराजांबद्दल वाचून व ऐकून अंगावर आजही काटा उभा राहतो. अशा ह्या परमप्रतापी धर्मविर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळास एकदा तरी प्रत्येकाने भेट अवश्य द्यायला हवी. 

तुळापूरहूनजवळच असलेल्या वाघोलीकडे जाण्याकडे निघालो. वाघोली हे पुणे-नगर रस्त्यावरील प्राचीन गाव. येथे वाघेश्वराचे जुने मंदिर आहे. तुळापूरहून निघाताना संध्याकाळचे ६.३० वाजले होते. 

वाघाच्या जबड्यात घालुनि हात मोजुनि दात...

बलिदान स्थळाकडे जाणाºया मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर हे शिल्प बसविले आहे. छत्रपती संभाजीमहाराज यांचे मनाला स्फूर्ती देईल असे शिल्प आहे. रायगडच्या पायथ्याला सांदोशीच्या जंगलात संभाजीमहाराजांनी सिंहाशी झुंज दिली होती. त्याचा जबडा हाताने फाडून ठार केले होते. या घटनेवर आधारित हे शिल्प असून, सुमारे आठ फूट उंच, दहा फूट लांब असे शिल्प आहे.

 तुळापूर येथे स्वागत कमानीवर साकारलेले आकर्षक शिल्प.
श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांचे प्रेरणादायी शिल्प.

कवि कलश यांची समाधी.

श्री कवी कलश यांची समाधी : 

श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तसेच संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व  काव्यसम्राट श्री कवी कलश यांना देखील संभाजी महाराजांबरोबरच तुळापूर येथे ठार करण्यात आले. त्यांची समाधी आपणांस संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजुस दिसते.

श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज समाधी.

संगमेश्वर येथील मंदिर व कळस.

मंदिरासमोर असलेला छोटा नंदी.


श्री संगमेश्वर
श्री संगमेश्वराचा कळस.



भीमा, भामा व इंद्रायणनदीचा त्रिवेणी संगमावरील मनोहारी दृश्य.
नदीपात्रत करण्यात येणारे नौकाविहार.


नदीतिरावरील श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर

नदीचा घाट

कसे पोचाल :

  • पुण्यापासून ईशान्येला अंदाजे ४० किलोमीटरवर असलेल्या तुळापूर या ठिकाणी पोहचण्यासाठी नगररोड मार्गे सुमारे ३२ किलोमीटर अंतर तर आळंदी रोड मार्गे अंदाजे ३४ किलोमीटर अंतर पार करावे लागते. 
  • तुळापूर येथे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध आहे.

पुण्याकडून यायचे झाल्यास :

  • पुणे नगर रोड - चंदन नगर  - वाघोली -  लोणीकंद - (डावीकडे) तुळापूर फाटा -फुलगाव - तुळापूर.

दुसरा मार्ग

  • पुणे -आळंदी रोड मार्गे:  पुणे - येरवडा - विश्रांतवाडी - कळस - दिघी - च-होली -आळंदी - मरकळ - तुळापूर (रस्ता थोड्या ठिकाणी खराब आहे.)
  • स्वत:ची गाडी असेल तर तुळापूरमध्ये पोहोचण्यासाठी जवळपास १ तास  पुरेसा होतो.

भीमा नदी  :
आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे उगम पावते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यामधुन व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या भागातून जातो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमांवरुन जाताना काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे व सोलापूर या जिल्हयांमधील हद्दीवरून ती पुढे जाते. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमांवरुन वाहत जाऊन ती पुढे नीरा नदीला घेऊन सोलापूर जिल्ह्यात जाते. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या आहेत. 

इंद्रायणी नदी : 

इंद्रायणी ही भीमेची उपनदी पुणे जिल्ह्याच्या मध्ये भागातून वाहते. ही नदी लोणावळयाच्या नैऋत्येला कुरवंडेजवळ उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर येथे ही भीमेस मिळते.

तुळापूर येथून निघून 20 मिनिटावर असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो. 
















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...