अतिथि देवो भव
(आशिष महाबळ, LAMAL, 10 Dec 2011)
अनाहुताला देवासमान वागवायची पौर्वात्य प्रथा प्रचीन आहे. घरोघरी शक्य असेल त्याप्रमाणे रोज रात्री थोडे अन्न देखील कोणी उगवल्यास उपयोगी पडावे म्हणुन वगळुन ठेवल्या जाई. ही रीत नक्कीच हीतकारी व मानवताभिमुख होती. आजकाल मात्र, निदान शहरांमधे, निरोप न पाठवता जाण्याचा प्रघात नाही. अचानक टपकणे शिष्टाईला धरुन नाही असा समज आहे. जुन्या पद्धतीचा दुरुपयोगही केल्या जायचा. गम्मत म्हणजे जिथे देवांना किम्मत नसायची अशा ठिकाणी देव अतिथ्याच्या रूपात पोचून आपला कार्यभाग साधायचे. विष्णुचेच घ्या. सर्वशक्तीमान होण्याकडची आपली वाटचाल बलीने सुरु ठेवली होती. त्यात विघ्न आणायला वामनावतारात शेषशाई पोचले व शुक्राचार्याला न जुमानता आपले मिशन साध्य केले. पण ते सर्वश्रुत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे किस्सा काशीचा. स्कंदपुराणातील काशीखंडातील या गोष्टीत भगवान अ-तिथी न येता तिथी सांगुन येतात आणि तरीही बसलेली घडी मोडुन नव्या घडीचा पाया बनवण्यात यशस्वी होतात.
खूप पुर्वी जगभर दुष्काळ पसरला होता. ६४ वर्षे चाललेल्या या आपत्तीमुळे पृथ्वीचे भवितव्य धोक्यात आले होते सामाजिक व्यवस्था कोलमडू लागली होती व खुद्द ब्रह्मा काळजीग्रस्त होता. दिव्यदृष्टीने त्याला दिसले की आपले राज्य सोडुन सध्या वाराणसीत तप करत असलेला रिपुंजय राजाच केवळ स्थिती पुर्ववत करण्यात मदत करु शकेल. ब्रह्माने रिपुंजयाची मनधरणी केल्यावर नाईलाजाने तो एका अटीवर पृथ्वीवर राज्य करण्यास तयार झाला: सर्व देवांनी पृथ्वी सोडुन द्यायची व स्वर्गात आपापल्या जागी जायचे. ते मानण्याशिवाय ब्रह्माला गत्यंतर नव्हते. एकच अडथळा होता आणि तो म्हणजे शिवाला वाराणसी सोडायला कसे तयार करायचे. योगायोगाने मंदर पर्वताने शिवाची आराधना करुन शिवपार्वतीने आपले बिऱ्हाड तिथे हलवावे असा वर मागीतला होता. त्याची मनोकामना पुर्ण व्हावी आणि ब्रह्माला त्याचा शब्द राखता यावा म्हणुन शिवाने काशी सोडायची तयारी दर्शविली. जाताजाता आपली खूण म्हणुत तेथे त्याने एका लिंगाची स्थापना केली. काशीतील हे पहिले लिंग. ते पाहुन ब्रह्मा, विष्णु आणि इतर देवांनीही एकेका लिंगाची तिथे स्थापना केली.
रिपुंजयाने, 'दिवोदास' हे नाम धारण करुन काशीतुन पृथ्वीवर राज्य करणे सुरु केले. बघता-बघता सगळीकडे सुबत्ता पसरली व धर्मपरायण आणि न्यायी म्हणुन दिवोदासाने नाव कमावले. सर्व लोक आपापल्या धर्माप्रमाणे वागत आणि एकुणच राहण्याकरता स्वर्गापेक्षा उत्कृष्ठ अशी काशीची ख्याति झाली. दिवोदास सर्व धर्म सांभाळत असुनही देवांनी त्याच्याविरुद्ध कारस्थाने रचणे सुरु केले. पृथ्वीवरुन येणारे हवन बंद झाले होते आणि त्यांचे वर्चस्व धोक्यात होते. त्याला जेरीस आणण्याकरता म्हणुन अग्नी, वायु व इंद्राने उष्णता, वारा व पाऊस नाहीस केला. पण दिवोदासाच्या तपाचे फळ इतके जबरदस्त की त्याच्या बळावर हे सर्व त्याने स्वत:च बनविले.
यादरम्यान शिवालाही काशी पुन्हा हवीहवीशी वाटु लागली होती. त्या दुराव्यामुळे तो अक्षरश: पेटला होता. शितकारी चंदन, चंद्र, गंगा या सर्वांचाही उपयोग त्या ओढीचा ताप शमविण्यात होत नव्हता. काशीला परतुनच सर्व ठीक होणार होते. पार्वतीचीही भुणभुण सुरु होती की प्रलयकाळी देखील कमळाप्रामाणे सुंदर असलेल्या, आणि शिवाच्या त्रिशुळाग्रावर वसलेल्या काशीत त्यांचे वास्तव्य असते. असे असतांना या सुंदर पण मन न रिझवणाऱ्या ठिकाणी आपण का आहोत? काशी जी की पृथ्वीवर आहे, पण पृथ्वीची नाही, जिथे मृत्युनंतर जन्म नसतो, पापाचे भय नसते, अशा त्या काशीत आपण कसे परतु शकणार? हजारो सुंदर, चमत्कृतीपुर्ण शहरे असली तरी, शिवा, तुझ्या काशीसमोर ती 'किस झाड की पत्ती'. दुराव्याचा हा ताप तुझ्याइतकाच मलाही होतो आहे. तिथे जाऊनच आपल्याला बरे वाटणार. वगैरे.
राजाच्या धर्मशासनात ढवळाढवळ कशी करावी याबद्दल शिवपार्वतीची विचारचक्रे फिरु लागली. रोगराई, वार्धक्य, मृत्यु सारख्या गोष्टी दिवोदासाला नामोहरम करु शकणार नव्हत्या, म्हणुन शिवाने एक कपट करायचे ठरविले. त्याने ६४ योगिनींना राजाला भुलविण्याकरता पाठविले. योग, मायादी शक्तींनी परीपुर्ण त्या दिवोदासावर आपले कौशल्य दाखवता येणार म्हणुन उल्हासीत झाल्या. त्याचबरोबर शिवाचेही कार्य त्यांच्याकडुन सिद्ध होणार होते व त्या रम्य काशीनगरीचेही दर्शन होणार होते. काशीत मायेनी त्यांच्यातील कुणी जादुगार बनल्या, कुणी डोंबारी, कुणी ज्योतिष्यी तर अजुन कुणी अजुन काही. पूर्ण एक वर्षभर त्यांनी प्रजेला व त्याद्वारे राजाला आपल्या कारस्थानांना बळी पाडायचा प्रयत्न केला पण त्यांना यश प्राप्त झाले नाही. आपली अयशस्वी तोंडे मंदर पर्वतावर परतून शिवाला दाखवण्याची त्यांच्यात हिम्मत नव्हती. आणि काशीवर तर त्यांचे प्रेम जडले होते. त्या म्हणाल्या की केवळ एखादी मुर्ख व्यक्तीच मुक्ती देणाऱ्या या काशीला एकदा पोचल्यावर बाहेर पडेल. असे म्हणुन त्यांनी तेथेच आपले बस्तान बांधले.
योगीनी न परतल्याचे पाहुन शिवाने सुर्याला पाचारण केले आणी काशीला जाऊन राजात दोष शोधायला सांगीतले. शेवटी एकदाचे काशीत जाता येणार या आनंदाने सूर्य थरथरु लागला. वर्षभर सूर्य वेगवेगळ्या वेषांमधे फिरत होता. कधी भिकारी, तर कधी व्यापारी तर कधी ब्राह्मण. पण दिवोदासात दोष काही तो शोधु शकला नाही. योगिनींप्रमाणेच काशीचा आश्रय घ्यायचे त्याने ठरविले. क्षेत्रसन्यासाचे हे व्रत काशीची हद्द कधीही न सोडण्याचे होते. 'इथे खुद्द धर्माचे वास्तव्य आहे. तो मला खचितच रुद्रापासुन वाचवेल. आधीच काशीला पोचणे इतके कठीण. का सोडुन जायची काशी? शिवाने रागावुन माझे तेज कमी केलेच तर काशीतील आत्मज्ञानाचे तेज मला प्राप्त होईल'. असा विचार करुन सुर्याने स्वत:ला १२ भागांमधे विभाजीत केले व १२ आदित्य म्हणुन तिथेच राहिला.
शिव मंदरवर काशीला परतायला अधीर होता. ज्याने तिसऱ्या डोळ्याने खुद्द कामदेवाला जाळले होते, तो स्वत: विरहाने जळत होता. शिवाने मग ब्रह्माला काशीला पाठवले. ब्रह्मा ब्राह्मणाच्या रूपात दिवोदासाच्या दरबारात पोचला व त्याची दशाश्वमेध यज्ञात मदत मागितली. यजमान म्हणुन दिवोदासाला अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी नियमांप्रमाणे तंतोतंत कराव्या लागल्या असत्या. कुठेनाकुठे त्याची चूक झाली असती आणि त्याचा धर्म भंग झाला असता. दिवोदासाने यज्ञास मान्यता दिली व बिचचूकपणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. तेंव्हापासुन ती जागा दशाश्वमेध या नावानेच ओळखल्या जाते व ते एक प्रमुख तिर्थ आहे. ब्रह्माने विचार केला की हे शिवाचेच स्थान आहे. या जागेच्या सेवेत राहिल्याने शिवाला राग येणे शक्यच नाही. येथे जर अनेक जन्मांच्या कर्मांची पापे धूतल्या जातात, तर कोण काशी सोडुन जाईल? त्याने तिथेच रहायचा निर्णय घेतला व ब्रह्मेश्वर नामक लिंगाची स्थापना केली.
ब्रह्मादेखील न परतल्याने शिव अस्वस्थ झाला होता. त्याचे कोणतेच दूत परतले नव्हते. त्याने आपल्या विश्वासु गणांपैकी शंकुकर्ण व महाकाळला काशीतील हालहवाल समजावून घ्यायला पाठविले. ते उत्साहाने निघाले, पण काशीला पोचताच शिवाच्या आज्ञांचा त्यांना विसर पडला. 'इथे एक लिंग स्थापन केले तर तिन्ही लोक बनविण्याइतके पुण्य प्राप्त होते. का सोडुन जाईल कोणी काशी'? असा विचार करुन ते तिथेच राहिले. मग शिवाने महोदर व घंटाकर्णाला पाठविले. ते ही काशीच्या जादुला भुलले व तेथे लिंगे स्थापन करुन राहिले. आता मात्र शिवाला हसु आले. त्याला कळले की तो ज्याला कुणाला पाठवेल काशी त्याला अडकवुन ठेवेल. त्याने इतर गणांनाही तिथे पाठवुन दिले पुर्णपणे समजुन की ते परत येणार नाहीत. त्याने विचार केला की त्याचे सर्वच गण तेथे असतील तर त्याला परतणे सोपे जाईल. सर्व गणांनी काशीत लिंगे स्थापन केली व मंदर पर्वतावर कुणीच परतले नाही.
शेवटी शिवाने त्याच्या मुख्य गणाला, गणेशाला, काशीला पाठविले. त्याने एका ब्राह्मण ज्योतिष्याचे रूप धारण करुन काशीच्या प्रजेला वश केले. लीलावती नामक राणीकरवी त्याची असाधारण ज्योतिषी म्हणुन झालेली ख्याती दिवोदासापर्यंत पोचली. दिवोदासाने त्याला राजवाड्यात बोलावुन घेतले. त्याच्या ज्ञानाने आणि वर्तणुकीने खुष होऊन राजाने दूसऱ्या दिवशी त्याला पुन्हा बोलावुन घेतले. तो आल्यावर दिवोदास त्याला म्हणाला, 'मी माझ्या प्रजेची ती माझी मुलेच असल्याप्रमाणे काळजी घेतली आहे. मी ब्राह्मणांचा आदर केला आहे आणि सर्वांचे क्षेम जपले आहे. पण आता सगळीकडे भरभराट असुनही मला अलिप्त वाटते. या सर्व चांगल्या कर्माचे फळ काय?'' यावर गणेश म्हणाला, ''तु खरेच खूप मोठी शक्ति बनला आहेस. चंद्र-सुर्य तूच आहेस, आठी दिशाही तूच आहेस. समुद्र, अग्नि, वायुही तूच बनला आहेस. पण तुझ्या प्रजेप्रती करत असलेल्या या तपश्चर्येचे फळ काय? त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी असमर्थ आहे, पण येवढे मात्र मी सांगु शकतो की आजपासुन अठराव्या दिवशी एक ज्ञानी ब्रह्मण येईल आणि तो तुला तुझे उत्तर देईल''. गणेशाच्या मनात विष्णु येऊन ते करेल असे होते. अशाप्रकारे विष्णुच्या आगमनाची पुर्वतयारी त्याने केली. पण इतरांप्रमाणेच मंदरला परतायची त्याची तयारी नव्हती, त्याला आलेल्या यशाबद्दल शिवाला सांगण्याकरता सुद्धा. त्याने स्वत:ला ५६ भागांमधे विभाजीत केले आणि शिवाच्या आगमनाची वाट पाहु लागला.
गणेशपण काशीहुन परतत नाही हे पाहिल्यावर शिवाने विष्णुला तिथे धाडले. तिथे पोचल्यावर विष्णुने आधी वरना व गंगेच्या संगमावर स्नान केले. ती जागा पादोदक तिर्थ या नावाने ओळखल्या जाते व विष्णुची तेथील प्रतीमा आदिकेशव या नावाने. विष्णुने मग एका बुद्ध भिख्खुचे रूप घेतले व पुण्यकिर्ती हे नाव धारण करुन किंचीत उत्तरेला असलेल्या सारनाथजवळ धर्मक्षेत्र या नावाचा आश्रम वसवला. विष्णुपत्नीने स्त्री-भिख्खुचे रूप घेतले व विज्ञानकौमुदी या नावाने वावरु लागली. गरुड पुण्यकिर्तीचा विद्यार्थी बनला व तिघेही आसपास सगळीकडे फिरुन बुद्धाचा संदेश पसरवु लागले. 'हे जग देवाने बनविले नसुन ते आपसुक बनते व नष्ट होते. देव नाहीतच व फक्त आत्मा खरा आहे आणि म्हणुन सर्व लोक समान आहेत. संहार वर्ज्य आहे व यज्ञयागांसाठी पण प्राण्यांची हत्या अयोग्य आहे. जातींमधे उच्च-निच असा भेदभाव करणे निशिद्ध आहे'. या जातीधर्माविरुद्ध असलेल्या शिकवणी ऐकुन हा-हा म्हणता लोकांचे आचरण बदलु लागले. स्त्रीया नवऱ्यांचा साथ सोडु लागल्या व पुरुषही भरकटु लागले. जातीव्यवस्था उध्वस्त होणे सुरु झाले होते. या गदारोळातच विज्ञानकौमुदीने लोकांना चेटुक व जादुटोण्याकडे आकर्षीत करणे सुरु केले.
राज्यातील धर्माचरण या तीन बौद्धांमुळे पुर्णपणे मोडकळीस आले होते. दिवोदासाची शक्ति क्षीण होऊ लागली व राज्याबद्दलची त्याची अनास्था वाढु लागली. गणेशाने सांगीतलेल्या अठराव्या दिवसाची तो आतुरतेने वाट पाहु लागला. अठराव्या दिवशी विष्णु एका ब्राह्मणाचे रूप घेऊन दिवोदासाच्या दरबारात आला. राजाने त्याचे चांगले आदरातिथ्य केले आणि राज्य व जगाबद्दल त्याला वाटु लागलेल्या अनासक्तीबद्दल त्याने त्याला सांगीतले व विचारले की या सर्व कर्मापासुन मोकळीक कशी मिळवायची.
विष्णु उतरला, 'राजन, तु उत्तम प्रकारे राज्य केलेस हे योग्यच झाले. तुला आता मुक्त व्हावे असे वाटते आहे हे ही योग्यच आहे. तु देवांना जरी जुमानले नसलेस तरी धर्माचे पालन केले आहेस. तुझे एकमेव पाप म्हणजे शिवाला काशीबाहेर घालविणे. त्या पापापासुन मुक्ती कशी मिळवायची ते ऐक. तु एका लिंगाची स्थापना कर. तेवढ्या एका कृत्यानेच तुला सर्वोच्च स्वर्गात स्थान मिळेल. तसे तुझे हे पाप भाग्यकारीच कारण त्यामुळे शिवाच्या विचारात रात्रंदीवस तुच असतोस. तो तुला घालवावे कसे ह्याचा जरी विचार करत असला तरी शेवटी सतत विचार तुझाच करतो.'
विष्णु दरबारातुन निघुन गेल्यावर दिवोदासाने राज्यकारभार आपल्या मुलाच्या हाती सोपवला, दिवोदासेश्वर नामक लिंगाची स्थापना केली व त्याची षोडशोपचारे पुजा केली. त्याला न्यायला आलेल्या रथात बसुन तो शिवाच्या उच्चतम स्वर्गात पोचला. इकडे आपला कार्यभाग साधल्यानंतरही विष्णुला काशी सोडवेना. त्याने गरुडाकरवी शिवाला निरोप पाठवला आणि पंचनद नावाच्या ठिकाणी आवास प्रस्थापीत केला.
गरुडाकरवी विजयाचा निरोप मिळताच शिवाला अतोनात आनंद झाला. सर्व देवांचा लवाजमा घेऊन तो काशीला पोचला. उत्तरसिमेवर आधीच पोचलेले देव वाटच पहात होते. वृषभध्वज नामक या स्थानावरुनच पहिल्यांदा त्यांना शिवाचा ध्वज दिसला. सर्व देवांनी शिवाची १००० दिव्यांनी आरती करुन त्याचे स्वागत केले. काशी पुन्हा एकदा शिवाची झाली होती.
अशातऱ्हेने विष्णु तिथी सांगुन आला, किंवा गणेशाने सांगीतलेल्या तिथीला तो आला आणि तरी त्याने यजमानाला चकवलेच. अतिथ्याला देवासमान समजल्याने देवांची हकालपट्टी करणारा दिवोदास स्वर्गवासी झाला. हा दिवोदास धन्वंतरीचा वंशज मानल्या जातो, आणि सुश्रुताचा गुरु. दिवोदास म्हणजे जरी स्वर्गाचा दास तरी दूसऱ्या एका व्युत्पत्ती प्रमाणे त्याचा अर्थ त्याच्या कृतीला जास्त साजेसा असा स्वर्गाला महत्व न देणारा हा होतो.
हिंदु जातीव्यवस्थेत फुटिरता निर्माण करणारी बौद्ध शिकवण शिताफीने कथानकात गुंफली आहे. पुराणांच्या प्रथेप्रमाणे एका देवालाच महत्व दिले जाते व तो इथे अर्थातच शिव आहे. काशीबद्दल बोलायचे तर सर्व देवांचा वास तिथे आहे म्हणुन काशीची महती नसुन काशी दुर्लभ असल्यानेच सर्व देवांना तिथे रहावेसे वाटते. १२ आदित्यांनी, ५६ गणेशांनी ई. स्थापन केलेली पवीत्र वर्तुळे अजुनही शाबुत आहेत. वरील कथा स्कंदपुराणातील काशीखंडाच्या पुर्वार्धातील सर्ग ३९ ते ५३ मधे आहे. माझी या कथेशी पहिली ओळख झाली ते Diana Eck यांच्या Banaras City of Light या उत्कृष्ट पुस्तकातील चौथ्या प्रकराणातुन.
मागे काशीयात्रेबद्दल माहिती हवी आहे या नावाचा धागा टाकला होता. त्यावर
आलेले प्रतिसाद,सुचना मनात घोळवत ८एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत
काशीयात्रेला जाउन आलो. अलाहाबाद, विंध्याचल व शेवटी काशी असा प्रवास होता.
त्याचा थोडक्यात वृत्तांत असा.
यात्रेची तयारी नोव्हे.१२पासुनच सुरु होती. जाने.१३ मधे ट्रेन बुकींग केले.
ज्ञानगंगा एक्स्प्रेस २४तासात अलाहाबादला पोचवते असं ऐकुन तीचं रिझर्वेशन
केलं.
८ एप्रिल १३(सोमवार)
स्थळ: पुणे
दु. ४.२८ची ट्रेन होती.सांगवीतल्या आमच्या घरात लगबग. त्याआधी एलबीटीमुळे
आठवडाभर दुकानं बंद होती. म्हणुन आधीचा एक रविवार फक्त चपला, बुट, कपडे
खरेदीसाठी मिळाला. सोमवारचा २ वाजेपर्यत वेळही खरेदीत गेला. घरातील बाकी
लोक पॅकींग करत होते. २ वा. परत दुकानं बंद झाली. ३.३० ला ६ मोठ्ठाले डाग
घेउन स्टेशनवर निघालो. ४ वा. धावत पळत, बॅगा ओढत स्टेशनवर पोहोच्लो. तर
माबोकर शोभा आधीच येउन सामानासह हजर होती. गाडी लागलेलीच होती. पटापटा
सामान गाडीत टाकुन स्थानापन्न जहालो. गाडी बरोब्बर ४.२४ला हलली. मोठ्या
उत्साहाने प्रवासाला सुरुवात केली खरी, पण आमचे सीटस टॉयलेट्सच्या जवळच
असल्याने लवकरच त्या वासाने आम्ही हैराण झालो. त्यात माझ्या धाकट्या भावाची
बायको (तिचे वडील कल्याण येथे रेल्वेत आहे...त्यामुळे तिला रेल्वेची
माहिती जास्त. आणि आमचा सहकुटुंब पहिल्यांदाच इतका लांबच्या पल्ल्याचा
प्रवास) तिने सांगितले की गाडी निघण्याआधी धुतली जाते. तेवढ्यात थोपुवरुन
सहज घेतलेला ट्रेन सेफ्टी नंबर आठवला. तोपर्यंत दौंडला पोहोचलो होतो. 'एक
ट्राय तर करुन बघु' असा विचार करुन 'टॉयलेटस आर नॉट क्लिन" असा मेसेज
टाकला. ५च मिनिटात वास येणं बंद झालं. बघितलं तर टॉयलेट क्लिनिंग झालं
होतं. व्वा...सुरुवात तर मस्त झाली. हुरुप वाढला.
ज्ञानगंगा सुपरफास्ट एक्स्प्रेस. पण बारीक सारीक स्टेशनं ही घेत होती. अगदी
राहुरी, श्रीरामपुर, बेलापुर ही स्टेशनं पण घ्यायला लागली तेव्हा मात्र
वैताग यायला लागला. त्यात गाडीतलं पब्लीक एकदम बेक्कार. एकेका सीटवर ४-४
लोक आडवे तिडवे झोपलेले. श्रीरामपुर जवळ येउ लागलं तसं रेल्वेतल्या
पोलीसांनी डब्यात फिरुन खिडक्या दारं बंद करायला सांगितली. का तर म्हणे
तिथे लोक रात्री रेल्वेवर दगडं मारतात. रात्री १० वा. मनमाडहुन बहिणीची
फॅमिली आमच्यासोबत आली. मग बरोबर आणलेली शिदोरी सोडली गेली. दशम्या,
खोबर्याची चटणी, कडीपत्त्याची चटणी, तोंडलीची भाजी , शोभाकडची बटाटा भाजी
असा बेत होता.
रात्री १२ वा. भुसावळला धुळेकरांची टीम आम्हाला येउन मिळाली.
आता आम्ही तब्बल १५ जण झालो.
९ एप्रिल,१३ (मंगळवार)
जाग
आली तेव्हा ट्रेन मध्यप्रदेशात गव्हाच्या पिवळ्या धम्मक शेतातुन (कटनी की
सतना जिल्ह्यातुन) धावत होती. नर्मदा नदी रात्री केव्हातरी पार झाली होती.
दुपार होऊ लागली तसा भयंकर उकाडा सुरु झाला. आम्ही ११.३०-१२लाच जेवणं
आटोपुन घेत्ली. संध्याकाळी ४.३० ला अलाहाबाद ला पोहोचलो.
अलाहाबादला पित्रे गुरुजींनी छान व्यवस्था लावुन दिली होती. स्टेशनवर
आम्हाला घ्यायला २ रिक्षावाले हजर होते. काहीही त्रास न होता आमचं वर्हाड
स्वामिनारायण मंदीरात येउन पोहोचलं.
गुलाबी चिर्याच्या दगडात बांधलेली सुंदर,निर्मळ बिल्डींग, गोशाळा,एका
बाजुला सुसज्ज स्वयंपाकघर होते. सग्ळी घरचीच मंडळी असल्याने एकच मोठा हॉल
घेतला. भाडे- ८००/-
रहाण्याची व्यवस्थाही सुंदर, मुबलक पाणी, आणि बाहेर ऊन असुनही आत गारवा. यामुळे तिथलं वास्तव्य सुसह्य झालं.
रात्री पित्रे गुरुजींनी येउन तिथल्या विधींविषयी चर्चा केली. अजुनही खुप
गप्पा मारल्या. तिकडे ऋतु दोनच. हिवाळा आणि उन्हाळा. दोन्ही एक्स्ट्रीम.
पावसाळा नाहीच. ..गुरुजी सांगत होते. "आम्ही बातम्या वाचतोय,
महाराष्ट्रातल्या. पाऊस कमी, दुष्काळ , पाणीटंचाई, भुजल पातळी इ. इ. पण इथे
बघा इकडे पाऊस कमी तरी पाणीटंचाई नाहीच. गंगा, यमुना या सारख्या मोठ्या
नद्यांना ऐन उन्हाळ्यातही पाणी भरपुर असते. "
मला आपल्याकडच्या प्रदुषणयुक्त पवना, मुळा, मुठा आठवल्या. श्रद्धेने का
असेना पण नद्या प्रदुषणमुक्त ठेवल्या तर आपणही त्यांना लोकमाता म्हणुन शकु.
असो. तिथे मुख्यतः ३ विधी होतात.
स्नानसंकल्प
वेणीदान
श्राद्ध/ पिंडदान
पापक्षालन/ स्नानसंकल्प : कुणीही करु शकतो. रेट १०१/- (१०१ रु.त जन्मोजन्मीची पापं फेडुन घ्या. 
वेणीदानः फक्त जोडप्यानेच करायचा विधी रेट २०१/-
श्राद्द/ पिंडदानः घरातला कर्ता पुरुष हा विधी करतो. ५०१/-
१० एप्रिल (बुधवार):
आमच्यातल्या
वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे विधी केले. त्या दिवशी अमावस्या असल्याने योग
जुळुन आला होता, भावाने श्राद्धविधी केला. मी व मुलाने १०१ रुपयात पापं
धुवुन घेतली.
वेणीदानाविषयी गुरुजींनी सांगितलेली माहिती अशी.
इथे तिघी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम आहे.यांना स्त्रीया असं
कल्पुन सौभाग्यवायन दिलं जातं.पुरुष जाउन त्यांचे केस दान करतात. पण
सुवासिनींचे केस हे सौभाग्यलक्षण असल्याने त्यांनी ते नवर्याला विचारुन दान
करायचे असते. पुर्वी स्त्रीया सगळे केस देत असतील पण आता कालमानानुसार हे
कमी झालय. या विधीमधे स्त्री नवर्याकडे केस दान करायची आज्ञा मागते. दोन
जोडपी आमच्याकडे तयार होती. लग्नाला १ वर्ष पुर्ण झालेले असे विवाहीत जोडपे
चालते. वेणीदान विधी करणार्या जोडप्यांचे दोनदा स्नान होते. म्हणजे एकदा
घरुन निघतांना. आणि पुजा झाल्यावर संगमावरचं स्नान.
इतर विधी करणार्यांनी घरुन निघतांना स्नान नाही केले तरी चालते.
आधी वेणीमाधव मंदिरात दर्शन घेउन येण्यास सांगितले जाते.
मग संकल्प, गणेशपुजा, पुण्याहवाचन. यातच गुरुजींची बायको गजरे आणुन जोडप्यातील पत्नीच्या डोक्यावर बांधते.
नंतर पतीला पत्नीच्या केसांची वेणी घालावी लागते. इथे मजा येते. कित्येक
म्हणजे बहुतेक सर्वच पुरुषांना केसांची वेणी घालता येत नाही. बायकोचे केस
लांब असतील तर अजुन गंमत. केसांचे ३ भाग करुन उगाचच इकडे तिकडे फटकारे
मारले जातात.
नंतर कात्रीची पुजा करुन, वेणीच्या शेवटचे केस ३ बोटांचं अंतर घेउन कापतात.
त्यांची पुन्हा पुजा आणि नंतर पुडीत बांधुन ती स्त्रीच्या पदराला बांधतात.
मग त्रिवेणी संगमावर स्त्नान. यमुनेचं पात्र खुप विशाल आहे. आणि त्यात भर
पांढरी रेतीचं वाळवंट ही अफाट पसरलं आहे. तिथे भुरट्यांचा सुळसुळाट आहे.
गुरुजींनी ताकीद दिलेली असते...संगमावर कुणी काहीही दिलं तर घ्यायचं नाही,
विकत घ्यायचं नाही, कुणी हातात नारळ देतं कुणी माळ, तर कुणी काय...आणि लगेच
पैसे मागतात.
गुरुजींनी सांगितलेल्या नाववाल्याकडेच जायचे. आणि नाववाला सांगेल त्याच
माणसाला पैसे द्यायचे असतात. आमच्या नावाड्याने सर्वांना होडी बॅलन्स होईल
असं 'वजना'नुसार बसवलं. माझा भाचा वंश (वय वर्षे ४) याला 'सौ ग्राम'
(१००ग्रॅ.) हे नाव त्यानेच पाडलं. "का करें!", "ये सौ ग्रॅम को
इहां नही बिठा सकते का"! अशी भाषा ऐकुन 'अमिताभ बच्चन'च्या गावाची भाषा
ऐकुन मजा वाटत होती. नाववाला ५०रु. प्रत्येकी घेतो. आणि संगमावर आणुन सोडलं
जातं. तिथे एक लाकडी प्लॅटफॉर्म केला आहे. नदीत ती पुडी आणि एकेक नाणं
टाकुन पाण्यात उतरायचे. यमुनेचे पाणी काळे दिसते तर गंगेचे पांढरट हिरवे.
सुरवातीला कंबरेपर्यंत असणारं पाणी पुढे पुढे जाल तसं कमी होत जाते. भर
नदीमधे म्हणजे मध्यभागी घोट्याएवढं पाणी आहे. मनसोक्त खेळुन घेतलं की
तिथेच फोटो काढुन देणारी मंडळी पण फिरत असतात. २०रु. कॉपी प्रमाणे लगेच
फोटो काढुन देतात. आमची गम्मत म्हणजे आम्ही मोठ्या इष्टाईलने काढलेले
संगमावर पाण्यातले फोटु तो फोटोवाला परत यमुनातिरी न भेटल्याने
यमुनार्पणमस्तु झाले.
तशी आमची शोभा फोटोग्राफर होती.:डोमा:
स्नान झाल्यावर पुन्हा प्लॅटफॉर्मवर यायचे. जसा प्रत्येक गावाला
क्षेत्रपाल असतो. तसा संगमावर पण क्षेत्रपाल असतो. त्याचा तिथे मान असतो
म्हणुन आपल्याला टीळा लावुन तो ११रु. दक्षिणा घेतो. स्नानानंतर परत काठावर
आल्यावर तिथे जवळ असलेल्या 'झोपलेल्या मारुती'च्या (बडे हनुमानजी)दर्शनाला
गेलो.
जवळच अलाहाबादच्या लाल चिरेबंदी किल्ला बघण्याचा मोह वेळेअभावी आवरला. आपण
गर्दीच्या ठिकाणी गाडी पार्क करतो तशीच इथे संगमाजवळच्या प्लॅटफॉर्मजवळ
आणि यमुनातिरी ‘नाव पार्कींग ‘ होती. फरक एवढाच की गाडी पार्क करतांना आपण
बिनधास्त करतो. तर एवढ्या नावांच्या गर्दीतुन नाव पार्क करतांना जरा कलती
झाली की आम्ही रामाचा धावा करायचो.
पण खरच ते ही एक कौशल्य आहे.
स्नान करुन आल्यानंतर गुरुजी त्यांच्या जवळच असलेल्या मराठी माणसाकडे
जेवणाची व्यवस्था करुन देउ शकतात. ७०/- रु. चा रेट आहे.पण त्यात एकच भाजी,
चपाती, वरण भात, हिरवी वाटलेली चटणी आणि शेवटी भरपुर ताक इतकच.
तर अशा रितीने अलाहाबाद दर्शन पुर्ण होते. नंतर गुरुजींनीच ठरवुन दिलेली गाडी घेउन आम्ही विंध्याचलकडे प्रस्थान ठेवले.
अलाहाबाद ते विंध्याचल- अंतर ८० किमी. रोड चांगला झाला आहे. विशेष म्हणजे कुठेही टोल नाका लागला नाही की ट्रॅफीक जाम नाही.
अलाहाबाद ते विंध्याचल प्रवास तसा कंटाळवाणा. विना प्लॅस्टरची, नुसती
विटांची घर, जवळजवळ प्रत्येकाच्या घरी दुध-दुभते, मधुनच दिसणारी पिवळी
गव्हाची शेतं. अलाहाबाद वाराणसी रोडवरुन विंध्याचल ला जायला एक बायपास
लागला. विंध्याचल रोडवर मग युपीमधली गरीबी दिसुन आली. पण गाई-म्हशी
प्रत्येकाच्या घरी. किंबहुना तीच त्यांची धनसंपत्ती. तेव्हा मला 'चारा
घोटाळा' आठवला. विंध्याचलला सुद्धा गंगा नदी आहे. काशीपेक्षा कितीतरी पटीने
स्वच्छ!
मजल दरमजल करत विंध्याचलला संध्याकाळी ६.३०ला पोहोचलो. इथे माझ्या
बहिणीच्या नवर्याने दोन पंडीतजींना रहाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगितले
होते.संस्थानच्या पंडीतजींनी पण मला व शोभाला जेव्हाही फोनवर बोलायचे
तेव्हा "आप आओ तो सही, अरेंजमेंट हो जाएगा, कोई प्रॉब्लेम नही आयेगा इ. इ.
सांगुन भलावण केली होती. विंध्याचलला दुसर्या दिवसापासुन चैत्र नवरात्र
सुरु होत असल्याने जोरात तयारी सुरु होती. देवळाकडे जायच्या वाटेवरच मोठ्या
यात्रेसारखे स्टॉल लागले होते. ऐन वेळेवर तिथे जाउन रहाण्याची व्यवस्था
होउ शकत नसल्याचे कळले. रुम होत्या तिसर्या मजल्यावर. आमच्यात ३ पेशंटस
असल्याने वरच्या मजल्यावर चालण्यासारखे नव्हते. त्यामुळे मधेच एकदा दर्शन
करुन तसच वाराणसी मुक्कामी जाउ हा ही पर्याय उपलब्ध होता. त्याप्रमाणे
वाराणसीच्या गुरुजींना विचारुनही झाले. बरं इकडेही दर्शन रात्री १०.३०नंतर
सुरु होणार होते. दर्शनच्या रांगेत थांबुन, दर्शन इ. सग्ळं आटोपुन निघता
निघता आम्हालाही १२ वाजले असते. त्यापुढे वाराणसी म्हणजे रात्री २ला आम्ही
पोहोचलो असतो. पण ऐन वेळेस माझ्या मोबाईलवर एका गुरुजींचा फोन आला व ते
आमची वाट बघत आहेत असे कळले तेव्हा जीव भांड्यात पडला. देवळाच्या चढावरच
रुम होत्या...मनासारख्या. ७००/- मधे लेडीजसाठी दोन रुम दिल्या.पुरुष
बाहेरच्या हॉलमधे. रुममधे स्वच्छता नव्हती. पण एका रात्रीपुरता प्रश्न
होता. म्हणुन हो म्हटलं आणि लगेच सामान टाकुन फ्रेश होउन आम्ही आधी जेवुन
घेतलं. मग दर्शनाची रांग.
रात्री १०.३०नंतर दर्शन सुरु झाले.
अगदी देवीच्या पायाला हात लावुन दर्शन झाले. रात्रीचे १२ वाजलेलेच होते.
तिथेच सर्वांना नमस्कार करुन हिंदु नविन वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या
शुभेच्छा दिल्या.
११ एप्रिल (गुरुवार)
सकाळी उठुन
आधी बांगड्या, चुनरी इ. खरेदी आटोपुन घेतली. सकाळी ७ वा. निघायचे होते ते
९.३० वाजुन गेले. मग कुल्हडमधल्या चहाची चव चाखली. कुल्हडची आयडीया फार
आवडली. प्लॅस्टीकचा कचरा होत नाही. आणी एकदम इकोफ्रेन्डली. 
पुन्हा एकदा सगळं सामान आवरुन गाडीत भरलं.
साधारण १०वा. वाराणसीकडे प्रस्थान!
इथुन खरा तर आमच्या काशीयात्रेचा मुख्य आणि सर्वात वाईट भाग सुरु झाला. आतापर्यंत आलेल्या सगळ्या चांगल्या अनुभवांच्या अगदी विरुद्द.
पुर्वीपासुन खुप ऐकले होते काशीबद्दल. काशीला पदोपदी लोक कसे ठकवतात.
सगळीकडे कसे पैसे द्यावे लागतात. ...इ.इ. आणि ते खरेच होते, याचा अनुभव
पावलापावलावर येत होता.
भर दुपारी १२.३०ला आम्ही तिथे पोहोचलो. सुर्य फुल्ल फॉर्मात होता. गाडी
तिथेच सोडुन आम्ही १५लोकांचे १६ डाग घेउन जाण्यासाठी गुरुजींनी एक हमाल आणि
त्याचे ४-५ सहकारी पाठवले होते. मध्यमवयीन, आणि दिसायला काडीमुडा
असलेल्या मुख्य हमालाने जेव्हा स्वतःच्या अंगावर ५-६ डाग चढवुन घेतले आम्ही
अचंबीत झालो. गुरुजींकडेच व्यवस्था केली होती. वाराणसीतल्या गल्ल्यांविषयी
खुप ऐकले होते. तिथे पोहोचताच त्याचा प्रत्यय आला. एवढ्यांशा गल्लीमधे पण
कानाकोपर्यात पचापचा थुंकलेल्या पानाच्या पिचकार्या आणि मधेच बसलेल्या
गाई- गोर्हे (फक्त गाईच), शेळ, उकीरडे, निर्माल्याचा कचरा. गल्लीत
स्वच्छता नाहीच पण वाड्यांमधे पण नाही. वाड्यांचे बाहेरचे ओटे तर
वर्षानुवर्ष न धुतल्यासारखे धुळीने भरलेले दिसत होते.
ग्रुप ग्रुपने आम्ही त्या गल्ल्यांमधुन भर दुपारी तंगडेतोड करत
'ब्रम्हाघाटा'वरील गुरुजींच्या निवासस्थानी पोहोचलो. तेव्हा सर्वांचीच
चांगली दमछाक झाली होती. घरात गेल्यावर थंडगार पाणी मिळाले. एकेक ग्रुप
येउन पोहोचत होता आणि आम्ही एकमेकांकडे पाहुन स्वतःच्या फजितीवर हसत होतो.
हा गड उतरुन तर आलो. पण आता प्रत्येक वेळेस म्हण्जे कुठेही जायच्या वेळेस
या गल्ल्यांचा भुलभुलैय्या पार करावा लागणार होता. आणि तेवढी एनर्जी
त्यादिवशी तरी कुणामधेच नव्हती. म्हणुन आम्ही विश्रांती घेणेच पसंत केले.
दुपारी गुरुजींनी काशीच्या विधींची माहिती दिली. ती माहिती आणि आंतरजालावरुन घेतलेली काशीची माहिती थोडक्यात अशी:
काशी (वाराणसी): वरुणा
आणि असि या दोन उपनद्यांच्या संगमावर वसलेली नगरी. संस्कृत विद्येबरोबरच
अध्ययन्-अध्यापन, धर्म्-दर्शन, योग, आयुर्वेद, ज्योतिषकला यांचे केंद्र.
तसेच देवळांचे, घाटांचे व गल्ल्यांचे शहर.
महादेवाच्या त्रिशुलावर काशी स्थित आहे त्यामुळे प्रलय आला तरी काशीचा
विनाश होणार नाही अशी आख्यायिका आहे. वाराणशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिथले
गल्ली-बोळ. काही काही गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की एकावेळी दोन
माणसेसुद्धा बरोबर चालु शकणार नाहीत.
काशीत असलेली गंगा ही उत्तरवाहिनी असुन तिथले घाट मोठे व विशाल आहेत.
जवळजवळ ८० घाट तिथे आहेत. यातील पुष्कळसे घाट मराठ्यांच्या (शिंदे,
होळकर,भोसले, पेशवे)यांच्या अखत्यारीत होते.
उदा. राजघाटः हा अमृतराव पेशव्यांनी १८०७ मधे बांधला.
भोसले घाटः नागपुरकर
भोसल्यांनी हा घाट बांधला. १७९५मधे याचे रिनोव्हेशन करुन लक्ष्मीनारायण
मंदीर, यमेश्वर मंदिर, यमादित्य मंदिर बांधण्यात आले.
सिंदिया (शिंदे घाट) हा घाट १५० वर्षांपुर्वी बांधण्यात आला. असं म्हणतात
की 'अग्नी'चा जन्म इथे झाला आहे. ध्यान-योग यासाठी हा घाट प्रसिद्ध आहे.
आम्ही राहिलो तो ब्रम्हा घाट होता. बराचसा शांत, आणि स्वच्छ! ब्रम्हाघाटावर जवळजवळ ३०० महाराष्ट्रीयन ब्राम्हणकुटुंब रहातात.
पंचगंगा घाटावर किरणा, धुतपापा, सरस्वती, गंगा व यमुना या ५ नद्यांचा संगम आहे. तिथेच बिन्दुमाधवाचं मंदीर आहे.
मणिकर्णिका घाटः याला महाशमशान घाट म्हणतात.
तिथे २४ तास प्रेते जळत असतात.
मणिकर्णिका घाटाबद्द्ल मजेदार आख्यायिका आहे. असं म्हणतात की शंकराला
भ्रमंतीपासुन रोखण्यासाठी पार्वतीने तिच्या कानातलं इथे लपवुन ठेवलं आणि ते
शंकराला शोधायला सांगितलं. तेव्हापासुन शंकर ते शोधत तिथेच फिरत आहेत. इथे
अग्नि दिलेल्या प्रेताच्या आत्म्याला शंकरजी "तु पार्वतीच्या कानातलं
पाहिलं आहेस काय" असं विचारत असतात.
दशाश्वमेघ घाटः इथेच काशीविश्वेश्वर मंदीर आहे. ब्रम्हदेवाने इथे १० अश्वमेध यज्ञ केले होते असं म्हणतात. (फोटो- इंटरनेटवरुन साभार)
रोज सायंकाळी होणारी गंगेची विलोभनिय आरती याच घाटावर होते.
हरिश्चन्द्र घाटः
हाही श्मशान घाटच आहे. सत्यवादी राजा हरिश्चंद्र याची कथा इथे घडते.
महर्षी विश्वामित्रांना सर्वस्व दान केल्यावर राजा हरिश्चंद्र कल्लु
नावाच्या डोमाला स्वत:ला इथेच विकतो.
मनमंदिर घाट: १७७० मधे महाराजा जयसिंग याने हा घाट बांधला.
तुलसी घाटः तुलसीदासांनी 'श्रीरामचरितमानस' याच ठिकाणी बसुन रचलं.
अस्सी घाट: झाशीची राणी लक्ष्मीबाईचा जन्म अस्सीघाटावर भदैनी क्षेत्रात १९/११/१८२८ साली झाला.
मुख्य काशीविश्वेश्वर मंदिरः
श्री काशीविश्वेश्वराचे शिवलिंग स्वयंभु आहे. वाराणसीवर अनेक परकीय
आक्रमणं झाली. ११९४मधे तुर्की राजा कुतुबुद्दीन ऐबक याने, १३७६ मधे अफगाणी
फिरोज शाह, १४९६मधे सिकंदर लोधी, यांनी वाराणसीमधली मंदिरे तोडायचं फर्मान
दिलं. १६व्या शतकात शहेनशहा अकबराने थोडाफार या शहराचा विकास केला. आणि दोन
मोठी शंकर आणी विष्णुमंदिरं बांधली. १६५६ मधे पुन्हा एकदा औरंगजेबाने इथली
मंदिरं जमिनदोस्त करुन त्यावर मशिदी बांधल्या. मोगलांच्या हल्ल्याच्या
वेळेस इथल्या पुजार्यांनी आधीच विचारपुर्वक निर्णय घेउन काशीविश्वेश्वर
शिवलिंग जवळच असलेल्या 'ज्ञानवापी' विहिरीमधे टाकली. (आंतरजालावरुन साभार)
त्यानंतर १७८०मधे इंदुरच्या महाराणी अहिल्याबाईंना दृष्टांत झाला. त्यांनी
शंकराची पिंड विहिरीतुन काढुन सध्याच्या मंदिरात स्थापन केली. अशी दंतकथा
आहे. नंतर इ.स्.१८३९मधे पंजाबकेसरी महाराजा रणजीतसिंह यांनी मंदिराच्या
शिखरावर सुमारे साडे बावीस मण सोन्याचा मुलामा चढवला. (आंतरजालावरुन साभार)
अन्नपुर्णा मंदिरः
सध्याच्या अन्नपुर्णामंदिराची निर्मिती इ.स्.१७२५मधे थोरले बाजीराव पेशवे
यांनी केली. या मंदिरात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी केला जातो.
काळभैरव मंदिर: काळभैरवनाथ हा काशीनगरीचा कोतवाल आहे. (आंतरजालावरुन साभार)
इ.स.१७१५मधे बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचे निर्माण केले. मंगळवारी आणि रविवारी या मंदिरात गर्दी असते.
दुर्गा मंदिरः
बंगालची राणी भगवतीने या मंदिराची उभारणी १८व्या शतकात केली. उत्तर भारतीय
शिल्पकलेतील नागर शैलीचे हे मंदिर आहे. मंदिरात असंख्य वानर आहेत म्हणुन
याला मंकी टेम्पलही म्हणतात. मंदिराच्या जवळ दुर्गाकुण्ड नावाचे पाण्याचे
तळे आहे.
कवडीदेवी: ही काशीविश्वेश्वराची बहिण. हिचे दर्शन घेतल्याशिवाय काशीयात्रा पुर्ण होत नाही असं म्हणतात. देवीला कवडी वहातात.
संकटमोचन मारुती मंदिरः (इंटरनेटवरुन साभार)
संत तुलसीदासांनी मारुतीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. हनुमन्ताच्या
मुर्तीसमोर श्री रामसीता मंदिर आहे. मंदिरात सगळीकडे वानरसेना फिरत असते.
श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिरः सेठ
रतनलाल सुरेकानी आपल्या आई भागीरथी देवी सुरेकाच्या स्मरणार्थ इ.स.१९६३मधे
हे मंदिर बांधले. मंदिराच्या भिंतींवर गोस्वामी तुलसीदास यांचे
'श्रीरामचरितमानस' कोरलेले आहे.
असो. बॅक टु गुरुजींचा वाडा!
दुपारी जेवणं करुन थोडं लवंडलो. आणि लगेच संध्याकाळी ७ वाजेची गंगेची आरती
सापडवायची होती.त्याआधी बाकीच्यांना काशीविश्वनाथाचं दर्शन घ्याय्चं होतं.
म्हणुन घाटाच्या ३०-४० पायर्यांवरुन वयस्कर लोकांना गंगातिरी आणविले.
'बाबु' नावाचा पोरगेलासा नावाडी तयारच होता. जीव मुठीत धरुन आणि सर्व भार
'बाबु'वर सोडुन नावेत सगळे बसलो.
कारण जरा नाव हलली की आमच्यातलं कुणीतरी ओरडायचं. बाबुला विचारलं तर
काठावरच ४ फुट खोली आहे असं म्हणालेला म्हणुन सगळेच मनातुन चरकलेले होते.
बाबुने होडी बॅलन्स व्हावी म्हणुन आधीच वजनानुसार लोक बसवले होते. भोसले
घाट, पंचगंगा घाट, असे पार होता होता मणिकर्णिका घाट आला. दोन प्रेतं आधीच
जळत होती. वातावरणात धुर पसरलेला. थोडा थोडा अंधार दाटु लागला होता.
मणिकर्णिका घाटावर जळाउ लाकडांची चळत रचलेली होती. थोडसं घाबरतच हे अंतर
पार केलं. सिंदिया घाट, ललिता घाट. ललिता घाटावर काशिविश्वनाथ मंदिराच्या
लायनीत उभं रहायचं म्हणुन नावड्यासहित इतर लोक गेले. मी दोघी आज्जी, आणि
आमचे जिजाजींना घेउन तिथेच थांबले. अंधार दाटलेला. पण तरीही एक बरं होतं की
ललिता घाटावरची गंगाआरती ६.३०ला सुरु होते त्याची तयारी सुरु होती.
दशाश्वमेघ घाटावरची मोठी आरती असते. त्यामानाने ललिताघाटावर लहान आरती
होती. पण अगदी पुर्वतयारीपासुन आरती पहाता आली.
दर्शनाला गेलेले लोक आल्यानंतर फटाफट(?) नावेत बसलो. आणि दशाश्वमेघ घाटाकडे
कुच केली. पण हाय रे दैवा! नावाड्याने आमची नाव बरीच अलिकडे 'पार्क' केली.
का तर म्हणे आरती संपताच मोठ्या नावा इथुन जातील मग आपली नाव काढणं
मुश्किल होईल.
त्यामुळे लांबुनच आरती बघुन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. इतर नावा नंतर
भराभर पुढे निघुन गेल्या. आम्हाला परत ललिता घाटावर जाउन जेवायचे पार्सल
आणायचे होते. म्हणुन पुन्हा ललिता घाटावर नाव पार्क करुन नावाडी पण गायब
झाला. आमच्यातल्या ३ पैकी २ पुरुष जेवणाचे पार्सल आणायला घाट चढुन वर गेले.
जवळ जवळ दीड तास आम्ही नावेत ठीगळसारखे बसुन राह्यलो. कारण जर्रा कुठे
हलायची चोरी. अगदी कुणी खोकललं तरी नाव हलायची. आणि बाकीचे घाबरुन ओरडायचे.
बरं बाजुला मणिकर्णिका घाट. तिथली प्रेतं अजुन जळत होती. रात्री गंगेवरचे
वातावरण कुंद, त्यात 'तो' धुर. आमच्यातल्या पेशंट लोकांना त्रास व्हाय्ला
लागला. घाटावर उतरुनही बसणार कसं? आमची ही १५ लोकांची पलटण पुन्हा नावेत
बसवायलाही त्रास होणार होता.
पुन्हा आपलं ते 'जीव मुठीत' वगैरे. ९.१५ वाजता जेवणाचे पार्सल आणणारे लोक
आले आणि आम्ही परत निघालो. रात्रीचं गंगेचं रुप भयावह नसलं तरी घाटावर लोक
आणि नदीत नावा दिसत नसल्याने आमची सटारली होती खरं! ब्रम्हा घाटावर आल्यावर
जीवाला भांड्यात पाडुन सगळे परत आपल्या रुमवर आलो.
दुसरे दिवशी सकाळी उठुन आम्हाला गंगास्नानासाठी जायचं होतं. गंगाभेट, संकल्प, अशी एक पुजा असते ती आम्ही करायचं ठरवलं.
फी: ५१/-
लागणारा वेळः १५ मिनिटे
१२ एप्रिल (शुक्रवार)
हा विधी गंगेच्या काठावरच करायचा असतो. विधी झाल्यावर पाण्यात उतरलो. भरपुर
'हर हर गंगे' करुन झाल्यावर घाटावर आलो. तिथे ही क्षेत्रपालांना ११ रु.
दक्षिणा देउन टीळा लावुन घेतला. परत आल्यावर ज्यांना शिवलिंगावर अभिषेक
कराय्चा होता ते गुरुजींच्या वाड्यावरच थांबले.
वाराणसीमधे घाटावरच्या प्रत्येक घरात एक तळघर असते म्हणे. आणि तिथे दगडी शिवलिंग स्थापन केलेले असते.
तिथेच अभिषेक होतो.
आमच्या गुरुजींचे घर म्हणजे घरी गुलाबी दगडाचा ५ मजली चिरेबंदी वाडा.
त्याचे तळघरच दोन मजली होते.. वाड्याच्या पायर्याही दमछाक होईल अशा. सर्वात
खालच्या तळघरातुन थेट गंगेवरच जायला रस्ता होता. रचना जनरली उत्तरेकडे
असतात तशी. मधे मोकळा पॅसेज्...वरपर्यंत. इतक्या निमुळत्या गल्ल्यांमुळे
हवा, आणि उजेड यावा म्हणुन प्रत्येक घरात प्रोव्हिजन केली आहे. प्रत्येक
मजल्यावर या मधल्या पॅसेजवर जाळी टाकलेली. कारण एकुणच वाराणसीमधे माकडांचा
त्रास आहे. पॅसेजच्या अवती भोवती रुम्स, टॉयलेट, भिंतीतच असलेल्या
पाण्याच्या टाक्या, विहिर इ.
मी आणि दोघी आज्जी, जिजाजी आमचं काशीविश्वनाथाचं दर्शन राहिलं होतं म्हणुन
आम्ही सकाळी एका गाईडला बरोबर घेउन मजल दरमजल करीत बसत उठत त्या गल्ल्या
पार केल्या. गाईडचा रेटः १००/-.
हुश्श...दमलो बुवा! गल्लीत एका ठिकाणी लस्सीवाला दिसला. कुल्हडमधली लस्सी
बघितल्यावर तोंडाला पाणी सुटली. विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस तो दह्याच्या
भांड्यातुन दही घ्यायचा. त्यात बाजुला असलेल्या थर्माकोल पेटीतुन बर्फ
टाकायचा, साखर इ. मिक्स करुन रविने घुसळायचा. असं ६ जणांच्या लस्सीला अर्धा
तास लागला.
ब्रम्हा घाट ते दशाश्वमेघ घाट अंतर साधारणतः शिवाजीनगर एस. टी. स्टँड ते
लक्ष्मी रोड इतकं. पण तरी रिक्षावाल्यांनी ६ जणांचे १०० रु. घेतले. त्यात
गंमत अशी की अजुन १०रु. मागुन घेतले. का तर म्हणे 'नो एंट्री'तुन घुसायचं
आहे. पोलिसाला द्यावे लागतात.
आमची रिक्षा थोडी अलिकडे थांबवुन तो पळत पळत जाउन पोलिसाला देउन आला. मग
रिक्षात परत येउन आम्हाला सुचना," ताकते मत रहो". आम्ही कशाला 'ताकतोय'!!
तरी हळुच मी डोळ्याच्या कोपर्यातुन पाहिले. पोलिसही जणु काही त्याचं लक्षच
नाहीये अशा अविर्भावात पाठ फिरवुन उभा होता. वा रे तेरी महिमा..काशी!!
काशीविश्वनाथ मंदिराचा एरिया म्हणजे आपल्या तुळशीबागेसारखा.
किंबहुना त्याच्यापेक्षाही अरुंद बोळ. अगदी ऊनही खाली येणार नाही. असा
परिसर. सगळीकडे ओल, चिकचिकाट. भाविक लोक बाहेरच्या दुकानातुन दुध घेउन
मंदिरात जातात. दुधाच्या अभिषेकामुळे सगळीकडे निसरडे झालेले आहे. ते
धुण्यासाठी मंदिराचे कर्मचारी सारखे पायर्यांवर पाणी ओतत असतात.
विश्वनाथाच्या मंदिराशेजारीच अन्नपुर्णा माता मंदिर आहे.
अन्नपुर्णेची अजुन एक सोन्याची सुंदर मुर्ती पहिल्या मजल्यावर आहे. तिचं
इतर वेळेस भाविकांना दर्शन नसतं. दिवाळीनंतर ३ दिवस अन्नकूट असतो. त्या तीन
दिवसातच त्या मुर्तीचे दर्शन मिळते.
एवढ्या २-३ दिवसात १-२ भ्रमिष्टावस्थेतल्या विधवा स्त्रिया वगळता आम्हाला
तिथे अशा स्त्रीया दिसल्या नव्हत्या. मात्र इथे मंदिराजवळ माझ्या बहिणीला
मागुन आलेल्या एका तरुण विधवेने(पांढरी साडी, आणि डोक्यावर चिकन गोटा)
जोरदार धडक देउन पुढे सरकली. पण नंतर बघितले तर तिथल्या पोलिसांशी 'ती' हसत
खेळत बोलत होती.
दर्शन झाल्यावर गंगेचे कमंडलु, स्फटीकाच्या माळा वै. फुटकळ खरेदी केली. आणि
परत वाड्यावर. तिथे बाकीच्यांचे अभिषेक ई. कार्यक्रम आटोपले होते.
सायंकाळी ४ वा. काशीनगरी पहायला निघालो.
आमच्या यादीत :
संकटमोचन मंदिर
त्रिदेव मंदिर
तुलसी मानसमंदिर
कवडादेवी मंदिर
कालभैरव मंदिर
दुर्गाकुंड
ही नावं होती. दोन रिक्षा लागणारच होत्या. रिक्षावाले एवढं फिरवायचे ४००/- म्हणत होते. हो नाही करता करता ३५०/- वर गाडी निघाली.
प्राचीन संकटमोचन हनुमान मंदिरात खुप माकडं होती. काशीमधे आम्ही पाहिलेलं
सर्वात सुंदर आणि आताच्या काळातलं मंदिर म्हणजे 'त्रिदेव मंदिर'.
हनुमन्ताचा फक्त मुखवटा आहे. एका बाजुला राम, लक्ष्मण, सीता तर एकीकडे
अंजनीदेवीचं मंदिर. तिच्या कुशीतला बाल हनुमान खुपच गोंडस होता.
त्यानंतर सत्यनारायण तुलसीमानस मंदिर, दुर्गादेवी मंदिर केले. अंधार पडु
लागला होता. कवडीदेवी मंदिर शहराच्या एका बाजुला आहे. तिकडे जाऊ की नको
संभ्रमात होतो. पण रिक्षावाल्याला ठरवल्याप्रमाणे गेलो. आणि एवढ्या लांब
गेल्याचं समाधान वाटलं. कवडीदेवीची मंदिर लहानसं असलं तरी मुर्ती खुपच
सुंदर आहे. देवीला कवड्या देउन काशीयात्रेची सांगता झाली.
इतरांचं कालभैरवाचं दर्शन राहिलं होतं म्हणुन पुन्हा सगळी पलटण कालभैरव
मंदिराकडे गेली. त्यांचं दर्शन होईस्तोवर आम्ही पेटपुजा आटोपुन घेतली. आणि
वाड्यावर जायला निघालो. रस्त्यात लखनवी कुर्ते, बनारसी साड्या इ. खरेदी
केली. बाहेरच हादडुन रात्री १०नंतर रुमवर परत.
मग सामानाची बांधाबांध. सकाळी ११.१५ची गाडी होती. आम्हाला बरोबरच्या वयस्क
लोकांना घेउन चालत त्या गल्ल्यांमधुन जायचे असल्याने ९.००च निघायचे होते.
१३ एप्रिल (शनिवार)
सकाळी
उठुन चहा घेउन निघालो. रस्त्यात भाजीमंडई दिसल्यावर बरोबरच्या बायकांना
'नविन काही भाजी दिसली तर घेउ' असं मनात आल्याने थांबलो.:फिदी:
'रसभरी' फल या नावाची ऑरेंज कलरची बोराएवढी फळं असतात ती घेतली. स्वाद काही
विशेष नाही. चेरीसारखा आंबट गोड आहे. विशेष काही वेगळ्या भाज्या, किंवा
रेटमधे फरक दिसला नाही. नाही म्हणायला, आपल्याकडे मिळणारी सापासारखी पडवळ
तिकडे तोंडली किंवा तत्सम थोड्या मोठ्या आकारात मिळते. दोन्ही गुरुजींकडे
जेवणात आम्हाला त्याचीच भाजी होती.
काशीच्या स्टेशनवर आल्यावर बघितलं तर गाडी तासभर लेट होती. तिथुनच लंच
पॅकेट्स घेतले. 'महानगरी' एक्स्प्रेस मात्र त्यातल्या त्यात बरी होती.
बहुतेक सर्व महाराष्ट्रीयन पब्लीक बरं होतं. गाडी २ तास लेट झाली, तरीही
येतांनाचा प्रवास इतका मात्र जाणवला नाही. रात्री जेवण येइस्तोवर अंताक्षरी
खेळुन आम्ही डबा दणाणुन सोडला होता(आणि त्यातल्या त्यात उडत्या चालीच्या/
मराठी लावणी गीतांनी).
१४ एप्रिल (रविवार)
सकाळी
९वा. गाडी भुसावळला आली. ‘पुढच्या वर्षी पुन्हा आता असच ग्रुपने तिरुपती
किंवा वैष्णौदेवी जायचं’ असं ठरवुन तिथे काही जणांना अलविदा केलं. आमच्या ६
जणांचं तिकीट कल्याणपर्यंत होतं. पण कल्याणहुन इतकं सामान घेउन येण्यास
सोयिस्कर गाडी नसल्याने आणि गाडी लेट झाल्यावर पुढच्या कनेक्टेड (कल्याण ते
पुणे) ट्रेनचं रिझर्वेशन करु शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही सकाळी
११वा.मनमाडलाच उतरलो. तिथे वहिनीचे काका स्कॉर्पिओ घेउन हजर होते. कोपरगाव
च्या अलिकडे निघणारा पोहेगाव फाटा, संगमनेरजवळ नाशिक-पुणे रोडला येउन
मिळतो. रस्त्याचा एक पॅच अतिशय खड्ड्यांचा आहे. इतर वेळेस रस्ता निर्मनुष्य
असतो. तरीही पुणे मुक्कामी पोहोचण्यास संध्या. ६ वाजले. रेल्वेभाडे सोडुन
आणि वैयक्तिक पुजाविधीचा सोडुन प्रत्येकी १५००/- खर्च रहाण्या/
खाण्यापिण्याचा आला.
अशा तर्हेने काशीयात्रेची सांगता झाली.
आमेन!!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.