Wednesday, October 21, 2020

मडिकेरी-कुर्ग

 एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला भारताचं स्कॉट्लंड समजलं जातं तर कुणी कुणी दक्षिणेतला कश्मिर म्हणतात. अरे वा!, भर मार्च मध्ये गारवा कुणाला आवडणार नाही. कसं जायचं काय पहायचं अशी जुजबी माहिती गोळा करून आम्ही निघालो.

मडिकेरी म्हणजे कूर्ग चे जिल्हा हेडक्वार्टर्स. समुद्रसपाटीपासून ५००० फूट ( साधारण १५२५ मिटर्स) उंचीवर असलेला हा प्रदेश. उतरणीच्या टेकड्यांवर वसलेलं एक छोट्टसं गाव. बुटक्या बैठ्या लाल कौलारु बंगल्यांची शोभा काही निराळीच. इथे रहाणारे कोडवू लोक हिंदू क्षत्रिय व खूप शूर. हे मडिकेरी किंवा मर्केरी १६८१ मध्ये हलेरी चा राजा मुद्दु ह्याने वसवलं. म्हणूनच त्याला मुद्दुराजकेरी आणि नंतर अपभ्रंशित मर्केरी किंवा आत्ताचं प्रचलित नाव मडिकेरी मिळालं असावं.

इथल्या संस्कृती बद्दल समजावून घेताना कळलं की, कोडवू हा शब्द मुळच्या कुडू ह्या शब्दापासून आला आहे. कोडाईमालेनाडू म्हणजे टेकड्यांचा प्रदेश -"dense forest on steep hills". दक्षिण भारतातल्या नयनरम्य निसर्ग सौन्दर्य लाभलेल्या हिलस्टेशन्स पैकी एक असलेले कोडवू म्हणजे कावेरी नदीचे उगमस्थान आहे. कोडवू लोक कावेरीची पूजा करून स्वतः ला तिची लेकरे मानतात. आदरातिथ्य करण्यात कोडवू लोक सर्वश्रुत आहेत. कोडवू रेसिपिज सुद्धा तेवढ्याच छान आहेत.

पूर्वापार चालत आलेल्या इतीहासापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या शीलालेखांवरून असे समजते की कूर्ग वर कुण्या एकाच राजघराण्याची सत्ता नव्हती. तर अनेक राजांनी वेगवेगळ्या काळात इथे राज्य केले होते. इथे असणार्‍या शीलालेख आणि ताम्रपटांवर इथे गंगा, कदंब, छोला, कोंगवा, होयसाला आणि नायक ई. वेगवेगळ्या लोकांनी राज्य केल्याच्या नोंदी आहेत. हा झाला मडिकेरीचा इतीहास.

कूर्ग कर्नाटकाच्या पश्चीमी घाटावर सुमारे ४१०२ स्के. मी ईतकं वसलेलं दर्‍या खोर्‍यांचं गाव आहे. बंगळूर ते मडिकेरी अंतर २५२ किलोमिटर आहे. चहा कॉफीच्या बागा मळे पहायच्या तर कूर्गला जावे. मऊ धुक्याने भरलेली दरी पहायला, नगमोड्या वळणावळणाच्या रस्त्यांचा आनंद घ्यायला कूर्गला जावे. खरं तर ऑक्ट्बर ते मे हा इथला मेन सिझन. पण पावसा आधी पावसा नंतर केव्हाही जाण्यात आनंदाची पर्वणीच आहे.

आम्ही सकाळी सहा ला मडिकेरिला जाण्यासाठी बंगळूर हून निघालो. SH-17 वरून श्रीरंगपट्टना, व्हाया मड्डूर बायपास, रंगनथिट्टु, हुंसूर असे करत मग SH-88 मार्गे कुशलनगर वरून मडिकेरीला जावे लागते. साधारण अकरा बारा वाजेपर्यंत कुशलनगर पार करून सुन्तिकोप्पल सोडलं पुढे मडिकेरीकडे जवळच आहे असं समजलं. रस्ता फारच छान होता. जसजशी वळणे वाढत गेली त्याचबरोबर हिरवाईही. रस्त्यात भरपूर बांबूची वनं आहेत. सर्वत्र पसरलेल्या हिरव्यागार बागांमध्ये कसलीशी टप्पोरी फुलं फांदीभर लगडलेली दिसू लागली. त्या फुलांचा वास आसमंतात भरून राहिला होता. गाडी पुढे जाउ लागली तशी ह्या झाडांची शेतीच आहे.. मळे फुललेले दिसले आणि आम्ही खात्री केली हेच ते कॉफीचे मळे. उतरणीच्या रत्यांवर लाल कौलारू घरं दिसू लागली. अमुक तमुक कॉफी इस्टेट.. होम स्टे असे बोर्ड दिसू लागले. इथले लोकल लोक खास घरं ट्युरिस्ट लोकांना होम स्टे देतात. तिथल्या रहाण्याबद्द्ल आणि जेवणाबद्द्ल एक दोन स्नेह्यांकडून बरेच ऐकले होते. आम्ही क्लब महिन्द्रा रिसॉर्ट ला जाणार असल्याने ते शोधत खुद्द मडिकेरीमध्ये पोहोचलो. एका चौका सारख्या ठिकाणी ट्युरिस्ट इन्फॉर्मेशन साठी मोठठा बोर्ड दिसला. काही लोकल साईट सिईंग पॉईंट्स आहेत. सगळे जवळ जवळ होते. रिसॉर्ट् वर जाउन फ्रेश होउन, जेउन निघालो साईट सिईंग ला.

मडिकेरी किल्ला : (Madikeri Fort)

आधी मातिच्या असलेल्या ह्या किल्यांची टिपू सुलतानाने सध्या असलेल्या दगडी किल्ल्यात पुनःबांधणी केली. अठराव्या शतकात टिपू सुलतानाने इथे राज्य केले होते. किल्ल्याच्या आत साधे बांधकाम असलेला लिंगायत राज्यकर्त्यांचा राजवाडा आहे. ह्या किल्ल्यावरून पूर्ण मडिकेरी भागाचे उत्तम दर्शन होते.

गदिग्गे : (Raja's Tomb)

ह्या ठिकाणी राजा लिंगराजेन्द्र ह्यांची सन १८२० मध्ये बांधलेली समाधी आहे. तसेच त्या बरोबर राजाचे धर्मगुरु आणि मोट्ठा विरराजेंद्र आणि राज्याच्या दोन सैनिकांच्याही समाधी आहेत इथे. मडिकेरी शहरातल्या महादेव पेठेच्या उत्तरेकडे ही गद्दिगे आहे.

ओंकारेश्वर मंदीर : (Omkareshwara Temple)

omkareshwar.jpg

कोडवू राजा लिंगराज याने सन. १८२० मध्ये बांधलेले थोडेसे मुघलाई धाटणीचे हे शंकराचे मंदीर आहे. मध्यभागी मोठा मशिदीसारखा घुमट आणि त्या बाजुला चार छोटे मिनार आहेत.
मुख्य मंदिराच्या गाभार्‍याभोवती प्रदक्षिणा करायला मोठ्ठा परिसर आहे. काही खोल्यांची तटबंदी आहे. त्याच्या भंतींवर देवदेवतांची सुंदर चित्रे पहायला मिळतात. मंदिर परिसरात एक अतिप्राचिन विहीर आहे.

om2.jpg

मंदिरासमोरच एक छोटासा तलाव आहे.

ह्या मंदिराविषयी एक गोष्ट सांगण्यात येते. लिंगराजेन्द्राने स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी एका प्रामाणिक सद्भक्त ब्राह्मणाला मारले. तो ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाला आणि राजाला छळू लागला. मग राजाने काशीहून एक शिवलिंग आणले व मंदिरात स्थापन केले आणि त्याची ह्या तथाकथीत ब्रह्मराक्षसाच्या त्रासापासून मुक्तता झाली. असेही सांगितले जाते की ह्या मंदिराच्या खिडक्यांचे गज पंचधातूचे आहेत आणि त्यावर लिम असे लिहिलेले आहे.

अ‍ॅबी फॉल्स : (Abbey Falls)

बोली भाषेत अ‍ॅबी म्हणजे धबधबा. मडिकेरीपासून साधारण १-२ किमी आत एका खाजगी कॉफी ईस्टेटीत हा नयनरम्य धबधबा आहे. ह्या भागात पर्यटकांची बरीच गर्दी असते. इथे आल्यावर बाहेर बर्‍याच खाउच्या कणसं नारळपाणी उसाचा रस विकणार्‍या गाड्या दिसल्या. गाडी पार्क करून आत खाली बरंच चालत गेल्यावर हा धबधबा आहे. कावेरीचे पाणी उंच खडकांवरून पडताना फारच सुंदर दिसते. धबधब्याचा चांगला व्ह्यु मिळावा म्हणून एक झुलता पूल बांधलेला आहे.

abbey.jpg

अ‍ॅबे फॉल्सहुन परत येइ तोपर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती. राजाज सिट ला जाउन सनसेट बघायचा होता.

राजाज सिट :

rajas.jpg

फोर्ट पासून एक किलोमिटर अंतरावर हा पॉईंट आहे. कोडवु राजे इथे बसून सुर्यास्त बघत. एक छोटीशी बाग आहे. आणि बच्चेकंपनीला खेळवायला फिरून आणायला छोटीशी ट्रेन आहे इथे. बागेच्याच पश्चीमेकडे एका उतरत्या टेकडीच्या पाहिर्‍यांवरून मडिकेरी भोवतालच्या निसर्गाचे एकाच ठिकाणाहून दर्शन होते. न मावळणारा सूर्य, हिरवे हिरवे गालिचे पसरलेले चहा कॉफीचे मळे, आणि हिरवाईवर पांघरलेले चंदेरी ढगांच्या दुलईसारखे भासणारे आकाश. मावळतिच्या त्या लालभडक मोठ्या सुर्यबिंबाचे दर्शन घेउन मन अगदी तृप्त झाले.

खुद्द मडिकेरीमध्ये पहाण्यासारखे इतकेच होते. मग दुसर्‍यादिवशी जवळपास फिरून यायचे ठरले.
सकाळी नाष्ता करून भगमंडला नावाचा नदिचा संगम आणि तलकावेरी म्हणजे कावेरीचे उगमस्थान पहाण्यासाठी निघालो.

भगमंडला : (Bhagamandala)

मडिकेरी पासून ३३ किलोमिटर वर हे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी कावेरी आणि कनिका ह्या दोन नद्यांचा संगम आहे. तिसरी सुज्योती नावाची नदीही ह्या संगमाला जमिनीअंतर्गत मिळते. १७ किंवा १८ ऑक्टोबर ला जेव्हा तुला संक्रमण असते तेव्हा अनेक यात्रेकरू ह्या संगमात स्नान करून पुण्य मिळवतात. ह्या संगमाजवळच भगंडेश्वराचं मंदिर आहे. केरळी पद्धतीने बांधलेल्या ह्या मंदिरात शंकर, सुब्रमण्या, महाविष्णू आणि गणपतीची छोटी छोटी मंदिरं आहेत.

हा भगमंडला नावाचा भाग सन १७८५ ते सन १७९० या काळात टिपू सुलतानाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा ह्या भागाला अफिसालाबाद असे म्हणले जायचे. मग १७९० ला राजा विरराजेन्द्राने तो पुन्हा कोडागू म्हणून स्वतंत्र मिळवला.

तलाकावेरी : (Talakaveri) कावेरी नदीचे उगमस्थान

talakaveri.jpg

ब्रह्मगिरी पर्वताच्या पुर्वेकडील उतारावर, भगमंडलापासून सुमारे ८ किलोमिटर अंतरावर कावेरी नदिचे उगमस्थान आहे.

ज्या ठिकाणी नदिचा प्रवाह उगम पावतो त्याला गुंदिगे असं म्हणतात. त्याला लागूनच एक छोटसं पाण्याचं कुंड (तलाव) आहे. ह्या कुंडाचे पाणी पुढे जमिनीत अंतर्धान पावतं ते दूरवर साधारण एक दिड किलोमिटर खोल टेकडीवर पुन्हा आढळतं. दर वर्षी तुलासंक्रांतिला ह्या गुंदिगे ठिकाणच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढ्तो त्याला तिर्थोद्धवा असं म्हणतात. हे तिर्थ म्हणजे साक्षात पार्वती इथे अवतरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक हे पवित्र तिर्थ भरुन आपल्या घरी घेउन जातात.

ह्या गुंदिके जवळच दोन छोटीशी मंडिरं आहेत. एक गणेशाचं आणि दुसरं शिवाचं. असं सांगण्यात येतं की इथे असलेल्या अश्वत्थ वृक्षाजवळ अगस्त्य ऋषींना त्रिमुर्ती-ब्रह्मा विष्णू महेषाचा साक्षात्कार झाला होता. तसेच ह्या ठिकाणी सप्तमहाऋषींनी मोठे यज्ञ केल्याचंही सांगितलं जातं.

brahmagiri.jpg

ह्या तलाकावेरीपासूनच वर ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी पाहिर्‍या आहेत.

आम्हीही थोड्या पाहिर्‍या चढून उतरून आलो. दमून संध्याकाळी उशिरा रिसॉर्टवर पोहोचलो. क्लब महिन्द्राच्या कॉटेजेस मस्त आहेत. सगळी व्यवस्थाही चोख आहे. जेवणासाठीही बरेच ऑप्शन्स उपलब्ध होते. तरिही आम्ही मडिकेरी मधे अजुन दोन तिन हॉटेल्स खादाडीसाठी शोधून ठेवली होती.

पुन्हा बंगळूर ला परताना परतीच्या वाटेवर कुशलनगर जवळ बरीच ठिकाणे आहेत. पिकनिक स्पॉट्स आहेत. ट्रेकिंग करणार्‍या हौशी लोकांसाठी छोटे छोटे अ‍ॅडव्हेंचर कॅंप्स आहेत.

वीरभूमी :

कर्नाटकातलं एकमेव थीम रेसॉर्ट आणि अ‍ॅडव्हेंचर कॅंप.

निसर्गधाम :

मडिकेरीपासून ३० किमी. आणि कुशलनगरपासून फक्त २ किमी अंतरावर हे रेसॉर्ट आहे. नावाप्रमाणेच निसर्गधाम आहे. इथे हरीणं, हत्ती, मोर आणि इतर बरेच प्राणि बघायला मिळतात. इथे इलेफंट सफारी असते. एक मस्त अविस्मरणीय सफर.

गोल्डन टेंपल : (GoldenTemple- Buddhist Monastery)

कुशलनगर पासून ४ किमी वर बायलाकुप्पे नावाच्या ठिकाणी तिबेटीयन लोकांचा रिफ्युजी कँप आहे. चिन ने तिबेटचा ताबा मिळवल्यावर, बरेचसे रेफ्युजी ह्या कुशलनगरजवळच्या बायलाकुप्पे ला स्थाईक झाले.
१९७२ ला ही बुद्धीस्ट मोनस्ट्री पुनःप्रस्थापीत केली.

goldentemple2.jpg

बायलाकुप्पेला आल्यावर सर्वत्र पिवळे झेंडे फडकताना दिसतात. स्तूप दिसतात. मग आपण गोल्डन टेंपल जवळ येउन पोहोचतो. गोल्डन टेंपल फारच प्रेक्षणिय आहे. मुख्य गेट पासूनच रांगोळ्यांसारखी रस्त्यावर सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत.

goldentemple.jpg

मुख्य मंदिराच्या दालनात आतमध्ये ४० फुटी मोठ्या पद्मसंभव, बुद्ध आणि अमितयुस यांच्या मूर्ती आहेत.

buddha.jpg 

दुबेर : (Dubare)

elephant.jpg

कुशलनगर जवळच मडिकेरी सिद्धपूर रोडवर कावेरी नदीतीरावर कूर्ग वनविभागाचा दुबेर एलिफंट ट्रेनिंग कँप आहे. इथे जंगली हत्तींना पकडून त्याना इतर प्रशिक्षीत हत्ती आणि स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांकडून प्रशिक्षण दिलं जातं. ह्या प्रशिक्षण शिबिरात जाण्यासाठी कावेरीचा प्रवाह छोट्या बोटीतून पार करावा लागतो.

आणखी पुढे परतीच्या वाटेवर हुंसूर वरून नागरहोल अभयारण्याकडे एक फाटा आहे. पण वेळे अभावी आम्ही तिथे जाउ शकलो नाही. मग नागरहोल आणि बंदिपूर ही अभयारण्ये पुन्हा एखाद्या मोठ्ठ्या विकेंड ला येउन बघायचे ठरवून आम्ही घरी परतलो.

 

कूर्ग डायरीज

बरेच दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनात होते कि कुठे तरी बाहेर फिरायला जावे पण ठिकाण नक्की होत नव्हते. तसा माझा प्रवासाचा अनुभव मर्यादितच आहे. माझा बहुतेक प्रवास हा माझ्या गावाच्या आजूबाजूलाच जास्त झाला आहे म्हणजे सातारा , पुणे ,सोलापूर आणि कोल्हापूर व कोकण इतकाच. मुळात मला स्वतःला फिरायला खूप आवडते. कॉलेजला असताना पिकनिक आणि ट्रेकिंगमुळे काही पर्यटनस्थळे फिरण्याचा योग्य आला होता , अर्थात तो अनुभव सुद्धा भन्नाटच होता. परंतु गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबासमवेत प्रवास हा मर्यादित स्वरूपाचाच राहिला. त्यामुळे हि सहल प्लॅन करणे थोडे कठीणच वाटत होते. हो ना करता डिसेंबर २०१९ मध्ये काहीही करून जायचेच असे ठरले... नव्हे नव्हे बायकोने ठरवायलाच लावले आणि शोध सुरु झाला भारतातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांचा.

आंतरजालावर खूप शोधाशोध केल्यानंतर काही स्थळे शॉर्टलिस्ट केली,उदा. कुलू मनाली, केरळ, कूर्ग, आणि राजस्थान. शेवटी कूर्ग ला जाण्याचे आम्ही सर्वांनी नक्की केले आणि विमानाची तिकिटे आणि हॉटेल्स बघायला सुरुवात केली. खूप माथेफोडी करून मदिक्केरी या कूर्ग मधील जागेत वसलेल्या प्रशांती रिसॉर्टला राहण्याचे ठरवले आणि बुकिंग सुध्दा करून टाकले. दि. २७ डिसेम्बर ते ३१ डिसेम्बर ची तारीख नक्की करून विमानाची तिकिटे आरक्षित केली. प्रशांती रिसॉर्टच्या हरीश जी यांनी फिरण्यासाठी गाडीही अरेंज करून दिली.

 

पूर्वतयारी

हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटांचे आरक्षण अगोदरच झाल्यामुळे जीव तसा निर्धास्तच होता. तत्पूर्वी कूर्ग बद्दल खूप जणांकडून माहिती घेतली होती. आंतरजालावरून सुद्धा खूप माहिती मिळाली. कूर्ग हे मुळात एक थंड हवेचे ठिकाण , अगदी आपल्या महाबळेश्वर प्रमाणे . पण कूर्ग मध्ये महाबळेश्वर सारखी स्ट्रॉबेरी नाही पिकत बरं का. तिथले मुख्य आकर्षण म्हणजे कॉफिचे मळे . कूर्गचा बहुसंख्य भाग हा कॉफी आणि मिरी किंवा वेलची अश्या मसाल्याच्या पिकांनी व्यापलेला आहे.

कूर्गची कॉफि जशी प्रसिद्ध तसेच तिथले संत्र सुद्धा प्रसिद्ध आहे. आपल्या नागपूरच्या संत्र्यापेक्षा आकाराने लहान असलेले हे कूर्गचे संत्र चवीला सुद्धा थोडे आंबटच असते. मीठासोबत या संत्र्याची चव भलतीच खुलते. कूर्गची वेलची आणि मिरीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे.

मुळात कूर्ग हा कर्नाटकातील एक महत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कोडुगु आणि मदिक्केरी हि दोन ठिकाणे थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. पर्यटनाबरोबरच कॉफी आणि मसाले यांचा व्यापार हा इथला उत्पन्नाचा मुख्य स्रोत. कॉफीचे विस्तीर्ण मळे हे बड्या धेंडांच्या मालकीचेच आहेत. यात बरेचसे उद्योजकहि आहेत. कॉफी आणि मिरीचा मुख्य मोसम हा डिसेम्बर आणि जानेवारीचाच. या मोसमात कॉफीचे फळ धरते आणि पिकते सुद्धा. मी खरेच खूप नशीबवान कारण मला ह्या कॉफी बेरीज पाहायला मिळाल्या. कॉफीचे पीक हे माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून एकदाच घेतले जाते. त्यामुळे आम्ही सर्व खूप नशीबवान ठरलो. मिरीच्या वेलींना सुद्धा फळ धरले होते. त्यामुळे हा अनुभव आमच्यासाठी खूपच खास ठरला. कॉफीच्या विस्तीर्ण मळ्यांमध्ये सुपारीची आणि सिल्व्हर ओक ची उंचच्या उंच झाडे आणि त्यांना लपेटलेल्या मिरीच्या वेली हे दृष्य खूपच विहंगम होते हे निश्चित.

 

बेंगळुरू ते मदीक्केरी हे अंतर सुमारे २७५ ते ३०० किमी आहे. त्यामुळे प्रवासाचे ६ तास लागणार हे नक्की होते. आमचे मुंबईहून फ्लाईट २७ डिसेम्बर ला सकाळी ७ चे होते आणि बेंगळुरूहुन आमचे फ्लाईट ३१ डिसेम्बर ला संध्याकाळी सव्वासहाचे होते त्यामुळे ३१तारखेला आम्हाला मदीक्केरीहून लवकर निघणे गरजेचे होते. आणि ते खूप थकवणारे झाले असते म्हणून आम्ही प्लॅन मध्ये थोडा बदल केला. ३१ तारखेला मदिक्केरीहून निघण्याऐवजी ३० तारखेला निघण्याचे ठरले पण बेंगळुरूला न जात मदीक्केरीहून फक्त पावणे तीन ते तीन तासांवर असलेल्या श्रीरंगपट्टणाला जायचे ठरले.

आमचा मदिक्केरी मधील मुक्काम जिथे होता त्या प्रशांती रेसॉर्टचाच एक भाग असलेल्या श्रीरंगपट्टण येथील "योग धामा रिट्रीट " या ठिकाणास ३० तारखेच्या रात्री मुक्काम करण्याचे आम्ही ठरवले जेणेकरून आमचा वेळही वाचेल आणि दगदगही होणार नाही. हि सोय करून दिल्याबद्दल आम्ही प्रशांतीच्या हरीशजींचे आभार मानले.

हि माझी व्यक्तिशः कर्नाटकची दुसरी खेप. जवळपास १७ वर्षांपूर्वी कर्नाटकला जाणे झाले होते. त्यानंतर कर्नाटकचा कधी संबंध आला नाही. त्यामुळे मीही थोडा साशंकच होतो. बाकी माझे कुटुंब मात्र खुशीत गाजरं खात होते. मुलींचा आनंद तर काय वर्णनावा ! त्या भलत्याच खुष होत्या. त्यांचा हा पहिला विमान प्रवास असणार होता. त्यामुळे त्यांची खरेदीही जोरदार केली गेली होती.

मला मात्र आनंद या गोष्टीचा होता की माझी आई तिचा पहिलावहिला विमान प्रवास करणार होती. अर्थात हि गोष्ट जमवून आणण्याचे श्रेय माझ्या अर्धांगिनीलाच जाते. कारण ती नसती तर आम्ही ही सहल कदाचित प्लॅन नसती केली.

आमची फ्लाईट सकाळी ७ वाजता होती. घरातून सकाळी ५ वाजताच निघालो. वेळेवर टॅक्सीही मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. एअरपोर्टवरच नाश्ता केला आणि विमानात बसण्यासाठी पळालो. विस्ताराची फ्लाईट आणि कर्मचारी यांनी आमचे स्वागत केले आणि आम्ही आमच्या प्रवासासाठी आसनस्थ झालो.

विमान प्रवासाची पण एक गम्मतच असते. आकाशात उंच उडण्याची मज्जाच काही और. बंगळुरूला धुक्याचे सावट असल्याने विमानाचे उड्डाण थोडे उशिराच झाले आणि बंगळुरूला पोहोचायला थोडा म्हणजे एक तास उशीर झाला. आमचा ड्रायव्हर प्रकाश आमचीच वाट पाहत होता.

सुदैवाने थोडीशी गुलाबी थंडी पडली होती आणि धुके तर होतेच. विमानात पण थोडे खाणे झाले होते त्यामुळे भूक अशी नव्हती. साधारण ११ वाजले होते आणि आणि आम्ही मदिक्केरीला जायला तयार झालो. भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या राजधानीतील स्वागत तर छान झाले होते. पण आम्हाला आतुरता होती कूर्गच्या निसर्गरम्य वातावरणाची.

सहलीच्या पहिल्या दिवसाच्या छान सुरुवातीनंतर आम्ही सर्व ताजेतवानेच होतो. विमानात थोड्या डुलक्या सगळ्यांनीच काढल्या होत्या त्यामुळे थकवा असा नव्हताच. त्यात बेंगळुरूची आल्हाददायी सकाळ, त्यामुळे आम्ही सर्व फ्रेशच होतो.आमचा ड्राइवर प्रकाश हा सुद्धा खूप प्रोफेशनल वाटत होता. त्याच्याशी थोड्या गप्पा झाल्यानंतर कळले कि तो खरेतर मैसूर जवळच्या एका गावातून होता. हसतमुख वाटणारा प्रकाश खरेतर त्याच्या वयाच्या पंधरा वर्षांपासून या व्यवसायात होता. त्याची आम्हाला या सहलीमध्ये कशी खूप मदत झाली हे सविस्तर पुढे सांगेनच.

बेंगळुरू सोडल्यानंतर हायवे वरील एका छानश्या हॉटेलात दाक्षिणात्य पद्धतीचे छान जेवण केले. पुढे रामनगर, चन्नापट्टणम करीत मध्ये कुठेतरी चहा-कॉफीचा आस्वाद घेत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. प्रवास मोठा होता त्यामुळे थोडाफार त्रास होईल हे आम्ही गृहीत धरले होतेच. पण उतना तो चलताही है . मला खरे तर टेन्शन होते माझ्या आईचे कारण सत्तरी जवळ असताना ती हा प्रवास करीत होती. पण तिचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. मधून मधून मला ती टेन्शन न घेण्यास सांगत होती.

मजल दरमजल करीत एकदाचे मदिक्केरीला पोचलो. मदिक्केरी सिटीपासून आमचे रिसॉर्ट चार किमीवर होते.

प्रशांती रिसॉर्ट मदिक्केरीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. याचे मालक मूळ मराठीच. त्यांचा महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला मुलगा आदर्श याची आमची भेट झाली. त्यांची भाषा मराठीच पण काहीसा कानडी लहेजा असलेली. अर्थात आदर्शला कन्नड पण येत होती. रिसॉर्टमध्ये चेक इन केल्यानंतर फ्रेश होऊन जेवण मागवलं. जेवण थोडं घरगुती पद्धतीचे दिसत होते. ऑपशन्स पण मर्यादितच . पण चव छान होती.

 

दिवस पहिला

सूर्य उगवायच्या आतच मला जाग आली. आज कूर्ग मधील आमची ही पहिलीच सकाळ. रात्री छान झोप झाल्याने ताजे तवाने वाटत होते. बाहेर येऊन पहिले तर बाहेरचे दृष्य खूपच विहंगम होते. सगळीकडे अगदी घनदाट धुक्याची चादर ओढली गेली आहे असे वाटावे इतके सुंदर दृष्य होते ते. असे वाटत होते की जणू काही आपण आकाशातील ढगांमध्येच संचार करीत आहोत. हे दृष्य पाहून मुलींना उठवले हा अनुभव घेण्यासाठी. त्याही खूप खुश झाल्या ते धुके पाहून.

सर्व विधी आटपून नाश्त्यासाठी रिसॉर्टच्या किचनजवळ आलो. नाश्ता खूपच चविष्ट होता. गरम गरम इडल्या, मेदुवडा आणि डोसा असे टिपिकल दाक्षिणात्य नाश्त्याचे प्रकार जरी असले तरी सुद्धा खूपच चविष्ट होते. नाश्त्याचा फडशा पडून पुढील मार्गक्रमण करण्यासाठी आमच्या ड्राइव्हर प्रकाशशी संपर्क केला आणि कुर्गमधील आमच्या पहिल्यावहिल्या पर्यटनस्थळाला भेट देण्यास आम्ही सज्ज झालो.

राजा'ज सीट :Raja's Seat

Raja's Seat
कूर्ग मध्ये आम्ही पाहिलेले पहिले स्थळ म्हणजे राजा'ज सीट. हे एक सुंदर उद्यान असून सशुल्क असल्याने खूप छान मेंटेन केले गेले आहे. विस्तीर्ण असा परिसर, फुलांची सुंदर बाग , वाघ, हरीण,जिराफ ,हत्ती अश्या प्राण्यांचे पुतळे आणि आल्हाददायी हवा असे अद्भुत कॉम्बिनेशन म्हणजे राजा'ज सीट हे स्थळ. शनिवार असल्याने आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे अपेक्षित गर्दी होतीच. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे कूर्गचे शासक सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक दर्शन करण्यासाठी येत असत. त्यांच्या आसनाची व्यवस्था म्हणजेच ही राजा'ज सीट . इथला सूर्योदय आणि सूर्यास्त खूपच मोहक असणार यात शंका नव्हती. दुर्दैवाने आमच्याकढे तेव्हढा वेळ नव्हता. राजा'ज सीट हा छायाचित्रकारांची पर्वणीच ठरेल कारण छायाचित्रणासाठी योग्य अशा बरयाच जागा तिथे आहेत. पण काही जागांवर छायाचित्रण किंवा गेलाबाजार सेल्फी काढणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे आपल्या जीवाची काळजी घेऊनच असे प्रताप करावेत.
Raja's Seat

Raja's seat
Raja's Seat
Raja's Seat
एकूणच विहंगम अश्या राजा'ज सीटला भेट देऊन बाहेरआल्यानंतर कुल्फी आणि खमंग ,चटकदार भेळीचा आस्वाद घेतला. अगदी मुंबईतल्या चौपाटीच्या फील आला. पण इथली भेळ खरंच खूप चवदार होती. जोडीला आम्ही कैरी आणि अननसाचे तिखटमीठ लावलेले चाट घेतले जे आंबटगोड चवीचे अफलातून कॉम्बिनेशन होते.

राजा'ज सीट पाहून आम्ही ठरल्याप्रमाणे डुब्बारे फॉरेस्ट ला निघालो. डुब्बारे फॉरेस्ट हे कूर्ग सहलीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ. कारण इथे रिव्हर राफ्टिंग तसेच एलिफंट सफारीचा आनंद घेता येतो. डुब्बारे फॉरेस्ट ला पोचल्यानंतर पाहिले तर आज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गर्दी दिसत होती. बऱ्याचशा स्थानिक शाळाहि सहलीसाठी मुलांसह आल्या होत्या. आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारचे साधारण दोन ते अडीच वाजले होते. एलिफन्ट सफारी साडेचार वाजता सुरु होणार होती म्हणून प्रथमतः रिव्हर राफ्टिंगचे तिकीट काढले.
Dubbare
आयुष्यात पहिल्यांदा प्रॉपर रिव्हर राफ्टिंग करणार होतो तेही पूर्ण कुटुंबासमवेत. त्यामुळे नाही म्हणले तरी पोटात गोळा आला होता. सेफ्टी किट घालून आमची बोट कावेरी नदीच्या पात्रात उतरली आणि पोटातला गोळा थोडा मोठा झाला. आमच्याबरोबर अजून एक युगुल होते. म्हणजे आम्ही पाच जण , ते युगुल आणि आमचा मार्गदर्शक पवन असे आठ जण बोटीत होतो. मी, बायको आई ते युगल असे चौघे आणि मार्गदर्शक पवन असे नाव वल्हवणार होतो. माझी आई पहिल्यांदा असे काही धाडस करणार होती, त्यामुळे ती प्रचंड उत्साहित होती. आम्ही नाव वल्हवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू नदीच्या पात्राच्या मध्यभागी आलो. नदीचे विस्तीर्ण पात्र मध्यभागातून खूपच सुंदर दिसत होते. नाव वल्हवणे किती कठीण काम असते हे क्षणाक्षणाला प्रत्ययास येत होते. हात भरून येण्यास सुरुवात झालीच होती. पण एकंदर खूपच मज्जा येत होती नाव वल्हवण्यास. आमचा मार्गदर्शक पवन यास हिंदीसुद्धा येत असल्याने भाषेचा प्रॉब्लेम नव्हता. तो आम्हाला खूप मस्त समजावत होता. वेळोवेळी काही ठिकाणी जाऊन छायाचित्रण करण्यास सांगे. ते लाईव्ह क्षण टिपणे हे खरेतर अलौकिकच. आम्हाला त्याने काही ठिकाणी पोहोण्यास सुद्धा सांगितले पण पर्यायी कपडे आणले नसल्याने आम्ही तो विचार टाळला. साधारण अर्ध्या तासाच्या रपेटीनंतर आम्ही किनाऱ्यास लागलो. रिव्हर राफ्टिंग नंतर एलिफंट सफारीचा बेत होता पण गर्दी खूप होती. एलिफन्ट सफारीसाठी पात्र ओलांडून पलीकडच्या जंगलात जायचे होते. त्यासाठी सरकारी बोटींची व्यवस्था असते. या बोटीतून पलीकडे जात येते. पण रांग खूप असल्याने आम्ही तो बेत रद्द केला. आता आम्ही निसर्गधाम ला जाण्याचे ठरवले.

भूक लागली होतीच. ड्रायव्हरच्या सल्ल्यानुसार जवळच असलेल्या आर्यन किंवा तत्सम नावाच्या हॉटेलला भेट दिली. मुळात ज्या ठिकाणी आपण भेट देतो तिकडच्या स्थानिक खाद्यप्रकारांचा नक्कीच आस्वाद घ्यावा अश्या मताचा मी आहे. प्रत्येक ठिकाणाची एक खासियत असते मग ती खाद्यप्रकाराच्या स्वरूपात असू शकते किंवा इतर काही. प्रत्येक पर्यटनस्थळांची आपली अशी एक खाद्यसंस्कृती सुद्धा असते आणि तिचा आस्वाद घेणे हे प्रत्येक पर्यटकांचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो. दक्षिणेत जाऊन उत्तरेतील खाद्यप्रकार खाणे शक्यतो टाळावे. अर्थात चांगले स्थानिक खाद्यप्रकार मिळणे हे ज्याच्या त्याच्या नशिबावर किंबहुना अनुभवावर अवलंबून आहे. पण एखाद्या पर्यटकाला जर स्थानिक रेसिपीज चाखायच्या असतील तर थोडे संशोधन करून घरगुती अन्न मिळण्याची ठिकाणे पालथी घालणे गरजेचे आहे . कारण बरेचसें स्थानिक अन्नपदार्थ हॉटेल मध्ये नाही मिळत किंवा त्यांची ऑथेंटिक चव हॉटेलमध्ये न मिळता एखाद्या घरी मिळू शकते.

तर आम्ही या हॉटेलमध्ये पारंपरिक दक्षिण भारतीय थाळी मागवली. दक्षिणेत भात हा मुख्य खाद्यपदार्थ. त्यामुळे ताटातील बहुतांश गोष्टी या भाताशी संलग्न होत्या. सांबार भात तर अप्रतिम होता. गरम गरम भात आणि चवदार सांबार.... भन्नाटच ! जेवण होईस्तोवर संध्याकाळचे साडेचार वाजले होते.

निसर्गधाम हे ठिकाण मदिक्केरी सिटीपासून साधारण ४० किमींवर आहे. आम्हाला तेथे पोहोचेपर्यंत सव्वापाच झाले होते. ड्रायव्हर ने सानित्याप्रमाणे निसर्गधाम हेसुद्धा एक लोकप्रिय स्थळ आहे. निसर्गधाम हे एक मानवनिर्मित जंगलच आहे. येथूनच कावेरी नदीचा एक प्रवाह सुद्धा जातो. आम्ही तिकीटं काढून आत जायला सज्ज झालो. आत प्रवेश करताच कावेरीची दर्शन होते. सुरुवातीलाच नदीवरचा झुलता पूल पार करावा लागतो आणि जंगलात आपण प्रवेश करतो. निसर्गधाम मध्ये बांबूचे विस्तीर्ण जंगल आहे. पाहावे तिकडे बांबूची बेटे . मदिक्केरीच्या पारंपरिक वेशातील जनजीवन निसर्गधाम मध्ये मूर्तिस्वरूपात निर्माण केले गेले आहे. काही ठिकाणी रोप क्लाइंबिंग किंवा तत्सम धाडशी खेळ सुद्धा मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. पण निसर्गधामचे मुख्य आकर्षण म्हणजे कावेरीच्या पात्रातील बोटिंग.
ND
nd
nd
nd
nd

आम्ही अगोदरच रिव्हर राफ्टिंग केले असल्याने आम्हाला बोटिंग मध्ये एव्हढा रस नव्हता. पण एका ठिकाणी नदीचे पात्र उथळ होते तेथे बरेच लोक पोहोण्याचा आणि पाण्याचा आनंद लुटत होते. मुलींचीही इच्छा होती पाण्यात खेळण्याची .... मग काय नेकी और पूछ पूछ! गेलो पाण्यात. तासभर पाण्यात खेळलो . पाणी खूप थंड होते तरीही मुली खुशाल खेळात होत्या. ते पाहूनच मज्जा येत होती. साधारण तासाभरानंतर अंधार पडण्यास सुरुवात झाली आणि पर्यटकांची पांगापांग झाली तसे आम्हीही बाहेर पडलो आणि रिसॉर्टवर परतण्यास तयार झालो. निसर्गधामचा सुंदर अनुभव घेऊन आणि ते विहंगम स्थळ डोळ्यात साठवून आम्ही निसर्गधामच्या शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश केला. स्वस्त आणि मस्त अश्या वस्तू हे या शॉपिंग सेन्टरचे वैशिष्ट्य. निसर्गधामच्या तिकीट खिडकीजवळच हे प्रशस्त शॉपिंग सेन्टर आहे.

 दिवस दुसरा :

पहिला दिवस तर छानच गेला होता त्यामुळे कूर्ग सहलीत आणखी काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता तर खूपच होती. कुर्गचे वातावरण खूपच आल्हाददायक आहे. इथला पावसाळा तर खूपच खतरनाक असतो. एकतर वळणावळणाचे डोंगरातून जाणारे अरुंद रस्ते आणि मुसळधार पाऊस यामुळे बाहेर निघणेही कठीण होऊन बसते असे मला काही स्थानिकांनी सांगितले. कूर्ग मधील पावसाचा थोडासा प्रत्यय मला बेंगळुरूहुन कुर्गमध्ये येत असतानाच आला होता. जणूकाही मुसळधार पाऊसधारांनी आमचे स्वागतच होत होते. सुदैवाने पावसाने पूर्ण सहलीत कोणताही व्यत्यय आणला नाही.

जेथे आम्ही राहत होतो त्या प्रशांती रिसॉर्ट मध्ये सुद्धा कॉफीची झाडे आणि मिरीचे वेल होते. कॉफीला लाल बेरी'ज लगडली होती. इथे रिसॉर्टमध्ये काही फुलांचे वेलही होते. त्याचे नाव माहित नाही पण दिसायला हि फुले पक्ष्यांसारखी दिसत, अगदी रंगीबेरंगी. त्याची प्रकाशचित्रे सोबत डकवत आहे. जाणकारांनी त्यावर प्रकाश टाकावा.

Prashanti Resort view

Prashanti Resort view

आता सुरुवात दुसऱ्या दिवसाची. सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर तयार होऊन स्थलदर्शन करायचे ठरवले होते. कारण एकतर हातात वेळ कमी होता आणि जमेल तेव्हढे स्थलदर्शन आम्हाला करायचे होते , अर्थात उगाचच भराभर स्थळे न पाहता फक्त मोजकी आणि महत्वाची स्थळेच पाहावीत असे आमचे सर्वांचे मत पडले आणि आम्ही निघालो आमच्या आजच्या पहिल्या स्थळाला भेट द्यायला , म्हणजेच मदिक्केरी किल्ला.

मदिक्केरी किल्ला हा मदिक्केरी सिटीमध्येच आहे. आता तिथे शासकीय कार्यालय आहे. हलेरी वंशाचा राजा मुद्दुराजा याने मदिक्केरी इ.स. १६८१ मध्ये वसवले . त्यावेळी हे शहर मुदराजनकेरी या नावाने ओळखले जात असे. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन याचे मदिक्केरी असे नामकरण झाले. मदिक्केरी किल्ला मात्र कोडुगु वंशाच्या राजांनी बांधला. मूळचा मातीचा असलेला हा किल्ला पुढे टिपू सुलतानाच्या हातात आला. टिपूने ह्या किल्ल्याची ग्रॅनाईटच्या साहाय्याने पुनर्बांधणी केली आणि याचे नवीन नामकरण जफराबाद असे केले.

fort

fort
(किल्ल्याचे छायाचित्र आंतरजालावरून साभार)

किल्ल्यात एक चर्चही आहे जे ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८५९ मध्ये बांधले असल्याचा उल्लेख सापडतो . आता या इमारतीत कर्नाटक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संग्रहालय (म्युझियम) चालवले आहे. या संग्रहालयामध्ये आपल्याला मुद्दुराजा ते टिपू सुलतान व ब्रिटिश सरकार पर्यंतच्या पुरातन वस्तू प्रामुख्याने शस्त्रास्त्रे पहावयास मिळतात. वेळेअभावी आम्हाला हे संग्रहालय पाहता नाही आले त्यामुळे एक ऐतिहासिक वारस पाहण्याची संधी हुकल्याची रुखरुख मनास लागून राहिली.

मदिक्केरी किल्ला पाहिल्यानंतर आमची मोहीम वळाली ते ओंकारेश्वर मंदिराकडे. कर्नाटकातील किंबहुना दक्षिण भारतातील मंदिरे पाहणे हि एक सांस्कृतिक मेजवानीच असते. अत्यंत सुंदर अशी ही मंदिरे बनवताना लागलेले कष्ट याची कल्पनाच न केलेली बरी. पण त्या मंदिरांवरची कलाकुसर पाहताना खरेच भान हरपून जाते.

श्री ओंकारेश्वराचे मंदिर मदिक्केरी सिटीमध्येच आहे. मार्केटपासून काहि किमी अंतरावर असलेले हे सुंदर मंदिर आणि त्यासमोरचा जलाशय हे दृश्य खूपच मनोहारी आहे. मंदिर बरेच जुने असावे. शिवाचे हे मंदिर म्हणजे दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. ओंकारेश्वराचा आशीर्वाद घेऊन आम्ही पोटपूजा करण्यासाठी उडुपी नावाच्या रेस्टॉरंट मध्ये आलो. उत्तम आणि रुचकर शाकाहारी जेवणासाठी हे ठिकाण एक छान पर्याय ठरू शकते.

temple

temple

जेवण करण्यासाठी सिटीमधीलच उडुपी नावाचे एक छान आणि प्रशस्त आवार असलेले असे रेस्तरॉं आहे. पुन्हा दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेतला. पण या हॉटेल मध्ये छान उत्तर भारतीय आणि चायनीज पदार्थ सुद्धा मिळतात. एकूणच छान अनुभव होता.
Food

पोटोबा झाल्यानंतर आम्ही आबे फॉल्स म्हणजे आबे धबधबा पाहायला निघालो. मदिक्केरी सिटीजवळच असलेला हा मनोहारी धबधबा आवर्जून पाहण्यासारखाच आहे. संपूर्ण कूर्ग प्रवासात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्रत्येक पर्यटनस्थळावर कचरा होऊ नये यासाठी चोख व्यवस्था होती. आमचा चालक प्रकाश सुद्धा प्लास्टिक इतस्ततः न फेकण्याबद्दल सजग होता. आमच्याजवळील प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक रॅपर्स सुद्धा तो आग्रहानं आमच्याकडून मागून कचरापेटीत टाकत असे.

आबे धबधबा हा अतिसुंदर जंगलाने वेढलेला आहे. तिथे सुद्धा पर्यटकांची बरीच गर्दी दिसत होती. कावेरी नदीवरच असलेला हा धबधबा खूपच सुंदर दिसतो. येथे पाण्यात उतरण्यास परवानगी नाही. कोणी पाण्यात उतरू नये म्हणून संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना धबधबा नीट पाहता यावा यासाठी मचाणाची व्यवस्थाही आहे. एकंदर धबधब्याची व्यवस्था खूपच छान रीतीने करण्यात आली आहे.

Falls

falls

falls

आबे धबधबा पाहण्यास थोडा जास्त वेळ लागला असल्याने त्वरित तळकावेरी साठी निघालो. तळकावेरी हे उंचावर स्थित असलेले कावेरी नदीचे उगमस्थान आहे. मदिक्केरी पासून साधारण ४० किमीवर असलेले तळकावेरी ब्रह्मगिरीच्या उंच डोंगरांमध्ये वसलेले आहे. तळकावेरीच्या रस्त्यावरच भागमंडला हे भागंडेश्वराचे म्हणजेच महादेवाचे सुंदर व प्राचीन मंदिरसुद्धा आहे.

temple
(भागमंडला मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार)

तळकावेरी मंदिर परिसर हा खर्च खूप सुंदर आणि मनोरम आहे. हवेत अजूनही गारवा आणि धुके दिसत होते. मंदिराच्या आवारातून मदिक्केरीचे दर्शन होते. मंदिराची व्यवस्था सुद्धा खूप सुंदर आहे. कावेरी नदीला म्हणजेच "कावेरम्माला"कर्नाटकात खूपच जिव्हाळ्याचे स्थान आहे. कर्नाटकाची जीवनदायिनीच असलेली कावेरी नदी आणि तिचे उगमस्थान पाहताना मनात एक पवित्र भावना उमटली. आपोआपच माझे हात कावेरी मंदिरासमोर जोडले गेले.

तळकावेरी स्थान पाहून अगदी आपल्या महाबळेश्वरचीच आठवण झाली. अगदी तसाच नयनरम्य परिसर, नागमोडी वळणे आणि थंड गुलाबी हवा असे अगदी रोमांचक वातावरण आपल्याला महाबळेश्वरचीच आठवण करून देते.

temple

temple

temple

temple
(कावेरी मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार)

तळकावेरीहून मदिक्केरीला येताना एक कॉफी प्लांटेशन फार्म आहे त्यास भेट द्यावी असा आमच्या चालकाचा आग्रह होता. आम्हालाही कॉफीच्या शेतीविषयी माहिती हवी होतीच. मग काय दिली भेट त्या फार्मला.

"Pappy's Coffee Island" असे नाव असलेल्या त्या फार्ममध्ये आम्ही शिरलो. येथे कॉफी प्लांटेशन आणि कूर्ग मधील इतर मुख्य शेतीबद्दल माहिती दिली जाते. यासाठी माणशी रु. २०० आकारले जातात. प्रथमतः हे थोडे महाग वाटेल पण अनुभव लाखमोलाचा मिळतो एवढे निश्चित. पैसे भरल्यानंतर आमची भेट आमच्या मार्गदर्शकासोबत घालून देण्यात आली . काही पर्यटक अगोदरच तिथे होते. मार्गदर्शक हा खरंच खूप ज्ञानी असावा कारण तो आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित आणि हजारजबाबीपणे देत होता.

या फार्म मध्ये कॉफीच्या "रोबस्टा" आणि "अरेबिया " या जातींबद्दल माहिती देण्यात आली. तसेच चिकोडी या नवीन पदार्थाबद्दल ऐकायला मिळाले जो एका रानवनस्पतीच्या मुळापासून बनतो आणि ओरिजिनल कॉफीमध्ये प्रमाण वाढवण्यासाठी मिक्स केला जातो. या चिकोडीचा अरोमा किंवा सुगंध अगदी कॉफी सारखाच असतो आणि आजकाल चिकोडीच्या कॉफीमधील प्रमाण बऱ्याचशा कॉफीच्या उत्पादनावर छापले जाते. या चिकोडीमध्ये कोणतेही उत्तेजक सापडत नाही हाच काय तो मूळ कॉफी आणि चिकोडीमधील फरक. या जागी बरीच नवीन झाडे उदा. कोको, कुर्गचे संत्र, तसेच रातांबा(कोकम)ची नर व मादी झाडे जी एकमेकांपासून ठराविक अंतरावर असतील तरच दोन्ही झाडांना फळ धरते असे आम्हाला सांगण्यात आले. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा हि विनंती. इलायची, मिरी, ऍव्होकॅडो , अश्या अनेक प्रकारच्या वनस्पती या प्लांटेशन फार्म मध्ये आहेत. अगदी सफरचंदाचे ४-५ वर्षांपूर्वी यालंगवाद केलेले आणि फळाची वाट पाहत असलेले झाडंही आम्हाला पाहावयास मिळाले. कूर्ग मध्ये सफरचंदाचे झाड पाहण्याचा अनुभव हा लाखमोलाचाच होता. याव्यतिरिक्त जगातील तिखटपणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली गांधारी मिरची, दालचिनी, कोकोचे बीज अश्या अनेक वनस्पती आम्हाला पाहावयास मिळाल्या. हे पाहून खरेच अनुभवसमृद्ध झाल्यासारखे वाटले. कुर्गमध्ये गेल्यास या ठिकाणास जरूर भेट द्यावी. मस्ट सी असे हे ठिकाण आहे याबद्दल माझ्या मनात दुमत नाही.

farm

farm

farm
ऍव्होकॅडो

farm

farm

farm

आता सूर्यास्त झाला होता म्हणून आमच्या रेसॉर्टकडे प्रस्थान केले. आजचा दिवस खरेच सार्थकी लागला होता. खूप छान छान अनुभव सोबत होते. त्यामुळे दिवसाची सांगताही खूप छान झाली होती. उद्याचा दिवस आमचा कुर्गमधील शेवटचा दिवस असणार होता. त्यामुळे जमेल तेवढे अनुभव शिदोरीत बांधून ठेवत होतो. उद्या मैसूर ला जायला निघणार होतो. त्यामुळे सामान पॅक करणे क्रमप्राप्त होते. सर्व सामान बांधून झाल्यावर छानपैकी सुग्रास भोजन झाले आणि बेडवर ताणून दिली.

 कूर्गला निरोप :

आज आमचा कूर्ग मधील शेवटचा दिवस. वेळ कसा पटकन निघून गेला हे कळलेच नाही. आमच्या या प्रवासात पर्यटनाबरोबरच आराम हे सुद्धा आमचे दुसरे ध्येय होते. वेळेअभावी बरीचशी स्थळे जरी या प्रवासात पाहता आली नसली तरीही त्याचे शल्य तितकेसे मनाला टोचत नव्हते कारण ज्या स्थळांना आम्ही भेट दिली होती ती एकतर खूपच छान होती आणि त्यांना भेट देण्याचा अनुभव एकदम पैसे वसूल होता. कूर्ग हे स्थळ पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहे यात शंकाच नाही. इथल्या निसर्ग सौंदर्याने अगोदरच मनावर गरुड केले होते. त्यात दाक्षिणात्य जेवणही अप्रतिम. त्यामुळे कुर्गचा निरोप घेणे कसेसेच वाटत होते. पण पर्यायही नव्हता.

सकाळी लवकरच दिवसाची सुरुवात केली. मुलींनाही लवकर उठवलं. सर्व सामान बांधून तयार झाल्यावर नाश्त्यासाठी खाली आलो. कुर्गमधील किंबहुना प्रशांती रेसॉर्टमधील शेवटचे डोसे आणि इडली-वडा मनसोक्त हादडून चेक आउटचे सर्व सोपस्कार पार पडले आणि गाडीमध्ये बसून पुढील प्रवासासाठी सज्ज झालो.

सकाळचे साधारण नऊ वाजले होते. कुर्गच्या आल्हाददायक हवेचा निरोप घेताना मनाला थोडे क्लेश झालेच. आज आम्ही म्हैसूर मार्गे श्रीरंगपट्टण ला जाणार होतो. खरेतर आम्ही डायरेक्ट बेंगलोरलाच निघणार होतो पण प्रवासाची दगदग एकाच दिवसात होऊ नये म्हणून कूर्ग मधील मुक्काम एका दिवस कमी करून श्रीरंगपट्टणला राहणार होतो. श्रीरंगपट्टण ला प्रशांती रेसॉर्टचे मालक यांच्या बंधूंचे योगा धाम रिट्रीट नावाचे एक रिसॉर्ट आहे. त्याबद्दल आम्हाला आमच्या चालकाने सांगितले होतेच. आता उत्सुकता होती म्हैसूर दर्शनाची.

म्हैसूरला पोचायला साधारण चार तास लागलेच. पोचल्यावर पहिला पोटोबा उरकून घेतला. भुकेल्या पोटी लष्कर चालत नाही त्यात आम्ही काय चालणार ? पोटोबा नंतर थोडी खरेदी केली. आमचा चालक प्रकाश आज आम्हाला म्हैसूर पॅलेस दाखवणार होता. त्यानंतर प्राणिसंग्रहालय पाहण्याचा बेत होता. पण प्राणिसंग्रहालय पाच वाजता बंद होते असे कळले त्यामुळे म्हैसूर पॅलेस लांबूनच पहिला आणि प्राणिसंग्रहालय पाहायला गेलो. अपेक्षेप्रमाणे गर्दी होतीच पण मुली खुश होत्या.

zoo

तिकीट काढून आत शिरलो आणि सुरु झाला एक अविस्मरणीय अनुभव. आजवर आम्ही फक्त मुंबईतील वीर जिजामाता उद्यान हे एकमेव प्राणी संग्रहालय पाहिले होते. त्यामुळे इथे कोणकोणते प्राणी, पक्षी व वनस्पती पाहायला मिळणार याचे कुतूहल होते.

सुरुवातीच्या पिंजऱ्यांमध्ये प्रामुख्याने पक्षीच होते. त्यामध्ये मोर, करकोचा, विविधरंगी पोपट, कोंबडीच्या निरनिराळ्या प्रजाती, बदके, सफेद मोर असे विविध पक्षी होते. पक्ष्यांचा राजा गरुड तसेच घुबडासारखा पक्षी पाहून खरेच कुतूहल चाळवले गेले. त्यातच लांबवर उभ्या असलेल्या खऱ्या अर्थाने राजबिंडा भासणाऱ्या आफ्रिकेतील मूलनिवासी जिराफाचे दर्शन झाले. पण ते खूपच लांब असावे कदाचित एक्झिट जवळ असावे.

जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसे नवनवीन प्राणी नजरेस पडत होते. आणि अश्यातच अतिचपल अश्या चित्त्याचे मनोहर रूप समोर आले. अवघ्या काही फुटांवर असलेला हा अप्रतिम सौष्ठव लाभलेला प्राणी अतिशय सुंदर दिसत होता.

zoo

या झूमध्ये माकडांच्याही अनेक प्रजाती आहेत. उदा. चिम्पान्झी. मानवाच्या मूळ रूपाचे दर्शन सुद्धा खरेच विलोभनीय होते. इथे हरीण, सांबर काळवीट यासारखे प्राणीही गुण्यागोविंदात राहतात. मग दिसतो वाघोबा. इथे तांबडा आणि पांढरा (रस्सा नाही बरं का !) असे दोन्हीही प्रकारचे वाघ पाहावयास मिळतात.

zoo
पांढरा वाघ

zoo
तांबडा वाघ

मांजरीच्या भाच्याचे दर्शन घेण्यात इतके गुंग झालो होतो की आजूबाजूचा पूर्ण विसर पडला होता. इतक्यात एक गगनभेदी डरकाळी कानावर पडली.... वनराजाची. वनराज सिंह आपल्याच तोऱ्यात फेऱ्या मारत होता. थकून जेव्हा एका ठिकाणी तो बसला तेव्हा कुठे फोटो काढायला फुरसत मिळाली आणि मग क्लीकक्लीकाट केला.

वनराज सिंह
zoo

देवाच्या या अप्रतिम निर्मितीला मनातच सलाम ठोकला. खरेतर सिंहापेक्षा वाघ नेहमी चपळ भासतो आणि असतो सुद्धा. सिंह कायम आळसावलेला दिसतो पण तरीही त्याच्या रूपात एक प्रकारचे खानदानी राजेपण दिसते जे पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. वाघ रागीट तर सिंह स्थितप्रज्ञ भासतो आणि चित्ता एकदम कपटी वाटतो मला.

पुढे ओव्हरकोट घातलेल्या एकशिंगी गेंड्याचे आणि पाणघोड्याचे सुद्धा दर्शन झाले. पण आम्हाला उत्सुकता होती. जिराफाच्या पुनर्दर्शनाची. पण ते एक्झिटजवळ पाहायला मिळतील असे कळले. आता नाही म्हटले तरी दोन तास होऊन गेले होते. तरीही खास थकावट वाटत नव्हती याला खरे कारण म्हणजे या उद्यानात ठिकठिकाणी विश्रांतीसाठी बसण्याच्या जागा तसेच प्रसाधनगृहे होती. इतके सुंदर नियोजन खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.

जिराफ़दर्शनाच्या आशेने जात असताना मध्येच झेब्रा दिसला. हा एक प्राणी खूप छान दिसतो. मुलींनी हा प्राणी प्रथमच प्रत्यक्ष पाहिला होता.
zoo
एकशिंगी गेंडा

zoo

येथे सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी एक खास दालन आहे. हत्तीचे सुद्धा दर्शन झाल्याने मुली खुश झाल्या.हत्तीला पाहून त्यांना गणपती बाप्पाची आठवण झाली. पाण्यात डुंबणारे आणि अजस्त्र लाकडी ओंडके उचलणारे हत्ती पाहून नजर तृप्त झाली.

आता एक्झिटपाशी येऊन पोचलो आणि जिराफाचे पुनर्दर्शन झाले. खरंच किती राजबिंडे रूप. अगदी डोळ्यातही न मावणारी उंची लाभलेला हा सुंदर प्राणी आपल्याच विश्वात असल्यासारखा वावरत होता.

zoo

zoo

अतिसुंदर असा अनुभव घेऊन बाहेर आलो . आता थकवा जाणवत होता म्हणून पहिला चहा घेतला आणि श्रीरंगपट्टण ला प्रयाण केले. एव्हाना अंधार पडला होता. म्हैसूर पासून अवघ्या १५ ते २० किमी वर असलेले श्रीरंगपट्टण शहर खरेतर टिपू सुलतानाचे. आमचे रिसॉर्ट खरेतर एका गावात होते. हमरस्त्यापासून आत असेलेले हे रिसॉर्ट आम्ही पोचलो तेव्हा अंधारात गुडूप झाले होते. आम्ही चेक इन केले तेव्हा खूपच सामसूम होती. आमच्या चालकाला परिचित असल्याने त्याने तिथल्या केयरटेकर नीरज ला बोलावून खोली उघडून दिली.

अंधार असला तरी पाण्याचा आवाज येत होता म्हणजे जवळच कुठे तरी नदीचा प्रवाह असावा. म्हणजे नक्कीच हे स्थान निसर्गरम्य असणार यात शंका नव्हती. चेक इन करून मस्त अंघोळ केली व जेवणासाठी हायवेवरील हॉटेल गाठून मस्तपैकी पोटपूजा केली.आजचा दिवससुद्धा सुंदर गेला होता म्हणून मनोमन त्या जगन्नियंत्याचे आभार मानले आणि पुढील प्रवासासाठी प्रार्थना केली. उद्याचा दिवस आमचा या सहलीतील शेवटचा असणार होता.उद्या यावेळी आम्ही नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत असणार होतो. त्यामुळे मनात मिश्रा भावना होती. रूम वर आलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. खूप प्रवासाने थकलो होतो म्हणून मस्त ताणून दिली.

 समारोप - कूर्ग डायरीज

इतके दिवस छान झालेला हा प्रवास आता संपणार म्हणून मन थोडे नाराज झाले असले तरी सकाळी उठून आमच्या रिसॉर्ट च्या बाजूलाच असलेले कावेरी नदीचे सुंदर पात्र पाहून खूप मस्त वाटले. सकाळी चहा घेऊन आम्ही सगळे नदीवर गेलो. थंडी होतीच तरीही मुली मात्र पोहोण्यास उत्सुक होत्या. मग काय त्यांना पाण्यात सोडले आणि मस्त डुंबू दिले. बाहेर आल्यावर खूप कुडकुडत होत्या. मग चहा घेऊन सर्व विधी आटोपून नाश्त्यासाठी असलेल्या दालनामध्ये गेलो. तिथेच रिसॉर्टच्या मालकांशीही भेट झाली.
yd

श्री. सुब्रमणि के. हे खरेतर एक नावाजलेले कृषी संशोधक. कर्नाटक सरकारने अनेकविध पुरस्कार देऊन त्यांना सम्मानित केले आहे. हे मूळचे मराठीच आणि मराठी भाषाहि छान बोलतात. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व. योग धाम हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. त्यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी श्रीरंगपट्टण येथे ५ एकर जमीन घेऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.

येथे गरीब मुलींना दहावी नंतरचे शिक्षण मोफत देण्यात येते. खरेतर सुब्रमणि सरांची हि संस्था म्हैसूर विश्वविद्यालयाशी संलग्न आहे. त्यामुळे दहावी नंतर येथे बारावी आणि पदवी परीक्षा वाणिज्य शाखेतून देता येते. तसेच याबरोबर सर्व मुलींना वेद, उपनिषद, योग यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्यात येते.

हे रिसॉर्ट पूर्णतः संस्थेतील मुलीच चालवतात. येथे मुलींना इंग्लिश आणि संस्कृतमध्येच बोलणे बंधनकारक आहे. या सर्व मुलीसुद्धा खूप छान पद्धतीने रेसॉर्टचे व्यवस्थापन सांभाळतात. खरेच श्री सुब्रमणि यांचे कार्य खूपच स्तुत्य आणि मोठे आहे. इतक्या उदात्त हेतूने संस्था चालवताना त्यांचे कृषी संशोधन सुद्धा चालू असते.

अश्या या मोठ्या पण विनम्र व्यक्तिमत्वाशी परिचय झाला, त्यांच्याशी बोलता आले हेही नसे थोडके.
इथे येणारे पर्यटक मुख्यतः योगाभ्यास करण्यासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे टुमदार रिसॉर्ट योगाभ्यासाइतकीच मन:शांती देते. कावेरीची खळाळते पात्र आणि योगविद्या यांची अभूतपूर्व सांगड घालणाऱ्या सुब्रमणि सरांना खरेच साष्टांग दंडवत.
yd

छानपैकी मस्त इडली आणि चटणीचा बेत नाश्त्यासाठी होता. नाश्ता अक्षरश: हादडून आम्ही तिथून निघालो नदीकिनारी फेरफटका मारण्यासाठी. आज आमचा कर्नाटकातील मुक्कामाचा शेवटचा दिवस असल्याने आम्हाला सर्व तयारी करून एयरपोर्ट ला निघणे क्रमप्राप्त होते. आमची फ्लाईट सव्वा सहाची होती. त्यामुळे किमान चार वाजता आम्ही बेंगळुरू विमानतळावर पोचण्याचे ठरविले आणि योगधाम मधील सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.

कूर्ग - हिरवाईच्या विविध छटा

कूर्ग ऊर्फ कोडागू - कर्नाटक राज्यातील एक थंड हवेचे ठिकाण. या जागेबद्दल खूप ऐकलेलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की फारसं बाजारीकरण झालेलं नसल्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य अजून प्रदुषित / शबलित झालेले नाही. कूर्ग हे खरंतर जिल्ह्याचं नाव आहे आणि मग त्यात अनेक छोटी गावं.

थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे एप्रिल मे हे येथे जाण्यासाठी सगळ्यात ऊत्तम महिने. पण आम्ही कूर्गचं पावसाळ्यातील सौंदर्य बघण्याचं ठरवलं. १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधी साठी Resort चं बुकींग केलं. कूर्ग ला जाण्यासाठी मंगळूरहून जाता येतं तसच म्हैसूरहूनही जाता येतं. मंगळूर साधारण १४० कि.मी. अंतरावर आहे तर म्हैसूर ११५ कि.मी. वर. आम्ही ठरवलं - जाताना मंगळूरवरून जाऊ आणि परतताना म्हैसूरवरून - कारण त्या वेळा आम्हाला सूट होत होत्या.

तर अहमदाबाद - मुंबई - मंगळूर असा विमानप्रवास करून साधारण दुपारी एक दीड च्या सुमारास आम्ही मंगळूर ला पोहोचलो. येथून कूर्ग साधरण १४० कि.मी. आहे. टॅक्सी बोलावलेलीच होती. अंतर कमी असलं तरी रस्ता घाटाचा असल्यामुळे आणि खराब असल्यामुळे पोचायला जवळपास साडेचार ते पाच तास लागले रिसॉर्टला पोचायला. हे रिसोर्ट आहे मडिकेरी गावामध्ये. सकाळी साडेचार ला ऊठून आम्ही अहमदाबाद सोडलं होते आणि बारा तास प्रवासात घालवून आता थकवा आला होता. पण रिसॉर्टचं पहिलं दर्शन झालं आणि सगळा थकवा क्षणार्धात कुठल्याकुठे पळून गेला.

Club Mahindra - Coorg

सुरेख वातावरण होतं. पाऊस रिमझिम होता पण भिजवून टाकत नव्हता तर drizzle showers ची मजा घेऊ देत होता. रिसॉर्ट मध्ये असलेली हिरवीकंच शोभा कूर्गची झलक दाखवत होती. त्या गर्द हिरवाईतूनच वळणावळणाचे दगडी रस्ते फिरवलेले होते. सामान वगैरे ने आण करण्यासाठी विजेरीवर चालणार्या गाड्या होत्या - प्रदुषण होऊ नये म्हणून.

जवळपास अर्धा कि.मी. गेल्यावर आम्ही आमच्या अपार्टमेंटपाशी पोचलो.

त्या दिवशी आम्ही आराम केला. दुसरे दिवशी आम्ही आमचे रिसॉर्ट एक्स्प्लोर करणार होतो. जवळपास ३५ एकराच्या जागेत हे रिसॉर्ट पसरलेले आहे ज्यापैकी बांधकाम फक्त ७ एकरामध्ये आहे. बाकी आहे हिरवी गर्द वनश्री. हे आहेत फोटोज रिसॉर्ट प्रिमाइसेसमधील.

पुढचे तीन चार दिवस फिरायचं होतं. सगळ्या sight seeing trips आम्ही रिसोर्ट तर्फेच करणार होतो. त्यासाठी अर्थात additional charges होते. ग्रुप मध्ये जायचे वेगळे आणि personal trips चे वेगळे.

दिवस तिसरा १७ ऑगस्ट - दुबारे एलिफंट कॅम्प - कूर्गहून साधरण ३५ कि.मी. येथे पाळीव हत्ती आहेत ज्यांना आंघोळ घालण्याची संधी तुम्हाला मिळते - रु. १०० देऊन. आमच्या मुलीमुळे आम्ही ईथे जायचं ठरवलं. सकाळी साडेआठ ला निघालो आणि साधारण तासाभरात पोचलो. मध्ये एक नदी होती. ती पार करून पलीकडे गेल्यावर गजराज दिसणार होते. नदी पार करताना सुद्धा झकास फ्रेम्स मिळत होत्या फोटो काढायला.

आणि मग दिसले गजराज - स्नानाचा आनंद लुटताना.

माझ्या मुलीने पण मग त्यांना आंघोळ घातली - अर्थात माहूत होताच. त्यानंतर हतीवरून एक फेरी मारली - पुन्हा एकदा रु. १००/-.

तेथून परत फिरलो. रिसॉर्टवर परत आलो. जेऊन परत निघायचं होतं मडिकेरी मधील sight seeing साठी.

पहिल्यांदा गेलो अ‍ॅबी फॉल्स ला. आमच्या गाईड ने सांगितल्याप्रमाणे स्थानिक भाषेत अ‍ॅबी म्हणजे धबधबा. पार्कींग पासून पायवाट होती . साधारण शंभर एक फूट ऊतरून आलो आणि अ‍ॅबी फॉल्सचं रमणीय दर्शन झालं. आजूबाजूला गर्द हिरवी झाडी आणि मध्ये सफेद पाण्याचे तुषार ऊडवणारा पाण्याचा प्रपात. फॉल्सच्या बरोबर समोर एक पुल आहे ज्यावर ऊभे राहून धबधब्याचे समोरून दर्शन घेता येते. पण तिथे कॅमेरा बाहेर काढणे अशक्य होते एवढे तुषार येतात.

तिथून निघालो ओंकारेश्वर मंदीराकडे. वाटेवर परत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

Omkareshwara Temple, Madikeree

मंदिरात दर्शन घेऊन निघालो "Raja's Seat" या मडिकेरी गावामधील सर्वात ऊंच ठिकाणी. ईथून दिसणारे दृष्य फारच विहंगम होते.

खाली हिरव्यागार झाडीत एक लाल कौलारू घर दिसलं - एकदम चित्रातल्यासारखं. माझ्या कॅमेर्याच्या 35 x optical zoom चा वापर करून मी लगेच ते घर कॅमेराबद्ध केले.

आता संध्याकाळ होत आली होती. रिसॉर्टवर परत आलो. ऊद्याचा चौथा दिवस - १८ ऑगस्ट. ऊद्याचा कार्यक्रम होता निसर्गधाम आणि Nyingmapa Monastery चा.

 

आम्ही राहीलो होतो Club Mahindra ला. कूर्ग चे त्याम्चे रिसॉर्ट ही गोल्ड कॉईन प्रकारात मोडणारी प्रॉपर्टी आहे.

स्थानिक खाद्यप्रकारांबद्दल म्हणाल तर संपूर्ण आठवडा न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यात इतक्या विविध प्रांतातील खाद्यप्रकार बुफे मध्ये मिळतात की काही विचारू नका. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही. त्यात विशेषकरून आठवते स्थानिक पद्धतीने केलेले चिकन आणि मटण. मत्स्याहार देखील ऊत्क्रुष्ट होता. अर्थात आम्ही आमची सगळी जेवणं रिसॉर्टलाच घेतली होती.

जनरल करिअप्पा व थिमय्या ही दोन नावे तिथे गेल्यावर निश्चितच ऐकायला मिळतात. कूर्ग ही लढवय्यांची भूमी मानली जाते. आमच्या गाईड ने सांगितल्याप्रमाणे भारतीय लष्करामध्ये सुरुवातीला कूर्ग रेजिमेंट होती.

देखण्या रेखीव मुलींबद्दल मी देखील पुष्कळ ऐकलं होतं पण त्या ऐकीव माहीतीला दुजोरा मिळेल असा भरघोस पुरावा काही बघायला मिळाला नाही.

आज भेट द्यायची होती निसर्गधाम आणि Nyingmapa Monastery ला.

निसर्गधाम. मडिकेरी गावापासून साधारण ४०-४२ कि.मी. अंतरावर एका नदीच्या प्रवाहात बनवलेले हे एक मानवनिर्मित बेट आहे. वेगवेगळ्या वनस्पती, फुले बघता येतात. आमच्या रिसॉर्टच्या बसने आम्ही साधारण एक दीड तासात आमच्या ईच्छित स्थळी पोचलो. निसर्गधाम मध्ये प्रवेश करायला एक सुरेख पूल होता.

त्या पुलावरून भवताली सगळीकडे दिसत होती हिरवाई.

समोर दिसत होता जीर्ण झालेला जुना पूल. हा वापरासाठी बंद आहे. पण त्याकडे बघून वाटले याच्या वरून जायला अधिक मजा आली असती.

पुढे गेल्यावर दिसली वेगवेगळी फुले आणि एक नेहमी दिसणारे फुलपाखरू.

निसर्गधाम बघून झाल्यावर आम्ही निघालो Nyingmapa Monastery कडे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी Monastery आहे. जवळ्पास ५००० ते ६००० तिबेटी भिक्षू राहतात. तिबेटी धर्मस्थळांची स्वच्छता, शांतता, बुद्धाच्या सुरेख मूर्ती, सोनेरी लाल रंगसंगती ही सगळी वैशिष्ट्ये येथे देखील बघायला मिळतात.

Nyingmapa Monastery चे प्रवेशद्वार आणि कळस -

आवारात असलेले Golden Temple आणि त्यातील बुद्धमूर्ती. ही मूर्ती संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेली आहे आणि तिची ऊंची आहे ६० फुट. बाजूलाच आहेत त्याच्या दोन शिष्यांच्या मूर्ती ज्या ५० फुट ऊंचीच्या आहेत.

एक विलक्षण शांती अनुभवून आम्ही त्या तिबेटी धर्मस्थळातून बाहेर पडलो आणि परत रिसॉर्टच्या दिशेने निघालो. पुन्हा एकदा हिरव्या रंगाच्या छटांची रंगपंचमी सुरू झाली.

अगदी मनःपूत हिरवाई बघायला मिळाली होती आम्हाला. नंतरच्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टला आम्ही म्हैसूरला जाऊन तेथील राजवाडा आणि प्राणिसंग्रहालय बघून आलो. वीस तारखेचा दिवस रिसॉर्टवर आराम केला आणि बघता बघता परत जायचा दिवस ऊजाडला. आणि सामान घेऊन निघताना आमच्या रूमच्या बाहेरच दिसले "Atlas Moth".

ही Moth ची जगातील सगळ्यात मोठी प्रजाती आहे. आम्हाला दिसलेल्या Atlas Moth चा wing span होता जवळपास १५ सें.मी. त्याचा आकार, पंखांवरची नक्षी, वरच्या पंखांवरची अगदी सारखी असलेली सापाची तोंडे. निसर्ग अगाध आणि अफाट आहे हेच खरं. अधिक माहीती या दुव्यावरती.
/url?sa=t&rct=j&q=atlas+moth&source=web&cd=1&ved=0CDgQFjAA&url=http%3A%2F%2Fen.wikipedia.org%2Fwiki%2FAttacus_atlas&ei=2xJNT7raKMSmrAfV85S4Dw&usg=AFQjCNGzwzhe-B3IOwDMV6W8AQXL8YUvJg&sig2=Q5m_UupjyJMgPTxuvfCFyw

कूर्गची ही parting gift कायमची अंतःकरणावर कोरून आम्ही हिरवाईला निरोप देत परतीच्या प्रवासाला लागलो .

 

 

मडिकेरी - एक धावती सहल

मागच्या महिन्यात कर्नाटकातील चिक्कमगळुरु येथे जाण्याचा योग आला. आता मार्चमध्ये उडुपीला एका समारंभात जायचे होते. त्याला धरून थोडे मडिकेरी फिरून आलो. दोन्ही ठिकाणं कॉफीच्या मळ्यांसाठी नावाजलेली आहेत. ८०० ते १००० मिटर्स उंचीवर डोंगर उतारावर आणि उंच झाडांच्या सावलीत कॉफीची झाडे चांगली वाढतात. पाऊस जास्ती लागतो. त्यासाठी पोषक वातावरण इथे आहे. विशेष म्हणजे कॉफीच्या झाडसाठी डोंगरावरची झाडे कापून टाकावी लागत नाहीत. तसे चहा लागवडीचे नाही. एकूण हा भाग रम्य आहे. आम्ही मंगळुरूला रेल्वेने उतरून बसने मडिकेरीला गेलो. तिथे दोन दिवस राहून परत बसने मंगळुरूमार्गे उडुपीला पोहोचलो. कोस्टल रोड छान मोठा आहे. वाहने वेगात जाऊ शकतात. मंगळुरू ते उडपी ६६ किमतीचे अंतर बसने सवा तासांत कापले. (मागच्या महिन्यात उडुपीला राहून मल्पे बीच पाहिले होते. इकडे मट्टु बीच सहा किमीटरवर, काउप बीच अठरा किलोमीटर अंतरावर आहे. शहरात बरीच हॉटेल्स आहेत. या वेळेस श्रीकृष्ण मठाच्या आवारात राहिलो. )

जाण्याअगोदर यूट्यूबवर काही वाडिओ पाहून घेतले. या साईटवर चांगली माहिती मिळाली.
Thrillophilia ....25 Best Tourist Places in Madikeri
यातल्या बऱ्याच ठिकाणांमध्ये आवड नव्हती.
इरप्पू आणि अबी या धबधब्यांना भेट देणे उपयोगाचे नव्हते कारण मार्च महिन्यात पाणी कमी असते.
भागमंडला+तलकावेरी ४३ किमी दूर मडिकेरीच्या पश्चिमेस आहे. याच रस्त्यावर ग्लास ब्रिज आहे.
कुशालनगरा(तिबेटी वस्ती आणि मंदिर), निसर्गधामा (मुलांसाठी बाग), दुबारे ( हत्ती पाहणे) या तीन जागा मडिकेरीच्या पूर्वेला मैसुरू रोडवर साधारण तीस किमी अंतरावर आहेत.
राजाज टूम (थडगे समाधी)२ किमी, अबी (कोदवू भाषेत धबधबा)फॉल्स ८ किमी उत्तरेस आहे.
राजाज सीट एक किमी दक्षिणेकडे आहे.
ओंकारेश्वर टेंपल आणि मडिकेरी फोर्ट ( पॅलेस आतमध्येच आहे) हे बस स्टँड पासून तीनशे मिटर्स इतके जवळच आहे. यास लागूनच पोस्ट ऑफिसची इमारत आहे.
का जावे: सुटी घालविण्यासाठी थंड हवेचे धार्मिक नसलेले उंचावरचे ठिकाण म्हणता येईल.
कसे जावे : मंगळूरू येथे रेल्वे किंवा विमानाने गेल्यावर पुढील १४० किमी मडिकेरीला रस्त्यानेच जावे लागते. मंगळूरू - बंटवाल - पुत्तुर - सूल्या - मडिकेरी मार्गे मैसुरू बसेस सतत असतात. सूल्यापासून पंचवीस किमी गेल्यावर नंतरचे पंचवीस किमी घाट चढून ११०० मिटर्स उंचीवर मडिकेरी आहे. रात्रीचे तापमान २३° सेंग्रेडहोते. दिवसा २७°. बेंगळूरू -मैसुरू-मडिकेरी असा २५० किमीटरसचा रस्ता पडतो. म्हणजे तिकडूनही सहल पुरी करता येईल.

राहाणे कुठे : मडिकेरी बस स्टँड, फोर्ट यांच्या आजुबाजूला बरीच हॉटेल्स आहेत. सभोवार बघितलं तर डोंगर उतारावर अनेक हॉटेल्स दाटीवाटीने उभी दिसतात. शिवाय विविध रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कॉफीमळे (इस्टेटस) आहेत त्यात होम स्टे आहेत. आमचे फिरणे स्थानिक बसेसनेच होत असल्याने शहरातील हॉटेल्स शोधतो.

खाणे : दूरच्या किंवा इस्टेटमधील होम स्टेमध्ये त्यांचीच खानावळ असते. शहरात पर्याय बरेच असतात. फोर्टासमोरचे शांती सागर वेज हॉटेल चांगले आहे. येथे इडली, वडे, डोसे, भजी चांगली मिळतात परंतू एकूणच उडपी,मंगळूरू , मडिकेरी, चिक्कमगळुरू भागांत मुख्य शाकाहारी जेवणाची वाट लागते. अत्यंत बेचव आमटी भाजी असते. एक डाळीचं पातळ तिखट पाणी, आणखी एक जरा तिखट पाणी आणि भोपळ्याच्या फोडी घातलेलं आणखी एक तिखट पाणी अधिक भात हा प्रकार. भाजी म्हणजे भोपळ्याची मोहरी खोबरं घातलेली बेचव भाजी. कोशिंबीर म्हणजे बीट, कांदा खोबरं मिक्स. एक खिरीची वाटी. पोळी नाही. कुठे असलीच तर जाड रोडगे असतात. पुऱ्या कडक असतात. बाहेर दुकानातून पाव लोणी घ्यावे तर सॅन्डविच ब्रेड आणि अमुल बटर कुठेही मिळत नाही. मडिकेरीत 'कोदवू' लोक राहात होते. त्यांच्या पद्धतीचे खाणे आणि जेवण देणारी हॉटेल्सही बरीच दिसतील. यांचा मुख्य भर पोर्क डिशेस असतो.

फिरणे, मडिकेरीतील भटकंती : दूर दूरच्या होम स्टेमध्ये राहाणारे (बेंगळुरूहून येणारे) आपल्या कारनेच येतात त्यामुळे फिरण्याचा प्रश्न नसतो. कार, बाईक रेंटल मिळतातच. मुंबई पुण्याकडून येणारे मराठी लोक बरेच दिसले. ते टॅक्सी भाड्याने घेऊन फिरतात. आम्ही एसटीनेच फिरतो. आणि ती वाहन व्यवस्था तिकडे फारच चांगली आहे. बसेस,बस डेपो, आणि त्यातील कॅन्टिनस स्वच्छ आहेत. भरपूर बसेस असतात. मडिकेरी भाग संपूर्ण डोंगराळ आहे. सलग शंभर दोनशे मिटर्सचा सरळ सपाट रस्ता सापडणार नाही. ( चिक्कमंगळुरूत तसे नाही.खूप छान शहर आणि बाजाराचे रस्ते दिसतात.) सतत वळणावळणाचे चढउताराचे घाट आहेत.
सकाळी तलकावेरी , भागमंडला बसने जाऊन पाहून आलो. पावसाळ्यात इथे जाणे योग्य. आता पाणी नव्हते. ( कन्नडा भाषेत 'तले' म्हणजे माथा) भागमंडला येथे भगंडेश्वराचे देऊळ आहे आणि दोन नद्यांचा संगम आहे.
आम्ही शहरातीलच फोर्ट, ओंकारेश्वर आणि राजाज सीट पायी फिरत पाहिले.
राजाज सीट ही छोटीशी बाग सर्वात चांगली जागा आहे. फुले भरपूर. शिवाय रोपवे आणि रॉकेट झोपाळा तरुणांना नक्की आवडेल. छोटी टॉय ट्रेन बंद होती. सकाळ संध्याकाळी वेळ घालवायला उत्तम.

इतर माहिती : वर दिलेल्या साईटवर चांगली माहिती दिलेली आहे. गाईडची गरज नाही. 'कॉफी इस्टेट टुअर' हवी का म्हणून कुणी विचारतात. त्यात बाग आणि मसाल्याची झाडे दाखवतात. आपण प्रवास करतानाच वाटेत दोन्ही बाजूस रबर, कॉफी,वेलदोडे, नारळ, ताड, सुपारी, फणस, यांची गच्च झाडी दिसतच राहाते. मडिकेरी हे कोदावू लोकांचे वसतीस्थान. ब्रिटिशांनी कूर्ग नाव ठेवले होते त्याला आता कोडगू म्हणतात. मरकेरा या नावाचे मडिकेरी झाले आहे. हॉकी खेळाचे बरेच खेळाडू इथले असत. सैन्यात जाणारे लोकही फार असत. ती माहिती इतरत्र मिळेलच. चार दिवस रेंगाळण्यासाठी मडिकेरी छान आहे.
मनोरंजन करण्यास भरपूर वाव आहे, फक्त वेळ आणि पैसे हवेत.

फोटो १
राजाज सीट जाण्याचा मार्ग रूट

फोटो २
तलकावेरीकडे ,४३ किमी

फोटो ३
मसाल्याची दुकाने

फोटो ४
ओंकारेश्वर वरून

फोटो ५
ओंकारेश्वर तलाव.

फोटो ६
राजाज सीट. इथे राजा बसून सूर्यास्त पाहात असे.

फोटो ७
राजाज सीट बागेतून दिसणारे दृष्य.

फोटो ८
वेलीची कमान, राजाज सीट बाग.

फोटो ९
कोटे महागणपती मंदिर, मडिकेरी किल्ला.

फोटो १०
मडिकेरी किल्ल्यातील राजाचा महाल. रंगकमामुळे आतून पाहता आला नाही. खूप मोठा आहे.

फोटो ११
मडिकेरी फोर्ट मधील दोन हत्ती पुतळे.

फोटो १२
किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारा मडिकेरी शहराचा भाग.

फोटो १३
तलकावेरी प्रवेशद्वार. मोठी वाहने, बसेस इथे थांबतात. येथून फक्त पाच मिनिटांवर कावेरी उगम मंदिर आहे. लहान वाहने अगदी पुढे जाऊ शकतात.

फोटो १४
प्रवेशद्वार, मडिकेरी फोर्ट.

फोटो १५
माहिती पाटी.

फोटो १६
या वेलीची फुले मडिकेरीमध्ये जागोजागी दिसतात.

फोटो १७
बेगम बहार नावाची झुडपे राजाज सीट बागेची शोभा वाढवतात.

फोटो १८
हत्ती पुतळा, राजाज सीट पार्क.

फोटो १९
फक्त दोन फुटी उंचीचे कॉफीचे झाड, फुलांचा बहर. पोस्ट ऑफिसच्या आवारात दिसले

फोटो २०
उडुपी कृष्ण मंदिर आवारातील विद्यावरिधिनी तीर्थ गेस्ट हाऊस इमारतीच्या रुममधून दिसणारे दृष्य. समोरच्या रस्त्याला कार स्ट्रीट म्हणतात. येथे कृष्णाची एक मूर्ती रोज वाजत गाजत फिरवतात.कौलारू मंदिर चंद्रमौलिश्वराचे. मागचा घुमट रथाचा आहे. गोपूर कृष्ण मंदिराचे आहे.

उडुपी श्रीकृष्ण मंदिराच्या आवारात रथमार्गावर संध्याकाळी श्री कृष्णाची मिरवणूक निघते.
Video link
https://youtu.be/xDY-hEua0DI

 मीं २०१९ डिसेंबरात बंगलोर-मैसुर-बांदीपुर-कूर्ग-बंगलोर अशी सहल केली होती. ईथे मडीकेरी नाव बघुन जरा बुचकळ्यात पडलो, पण मग वाचताना खुलासा झाला. ओंकारेश्वर मंदिर ग्रहणामुळे बंद होते, पण राजाज सीट आणि ईतर ठिकाणे बघितली. किल्ला बघितला नाही, कदाचित ट्रुरिस्ट कारवाले त्यात फारसे ईंटरेस्टेड नसावेत किवा पर्यट्कांचे अनुभव बघुन त्यानी टाळला असेल. बस/ट्रेन करत जायचे तर नीट माहीती पाहीजे आणि हाताशी जरा वेळ हवा, म्हणजे एखाद दिवस ईकडे तिकडे झाला तरी चालतो. एकदा स्वतःच्या गाडीने कोस्टल कर्नाट्क करायची ईच्छा परत बळावली. फक्त २-३ ड्रायव्हर पाहीजेत, म्हणजे एकावरच ताण येणार नाही.

मयुरा व्हॅली व्ह्यू आणि कर्नाटक सरकारची इतरही ठिकाणची पर्यटक निवासी संकुल चांगली असतात. त्यांना अतिशय मोक्याची जागा मिळते जी सहसा खाजगी व्यावसायिकांना मिळण्याची शक्यता नसते. हीच स्थिती इतरही राज्यात असते ज्यामुळे बऱ्याच वेळा जुने प्रशस्त बंगले निवासासाठी मिळू शकतात.

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...