Saturday, October 24, 2020

जर्मनी

 

जर्मनी : लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव
(म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग १)

Germany : Linderhof Palace And Oberammergau
(Munich-Neuschwanstein Castle Day Tour – Part 01)
मुखपृष्ठ – ००१
Will Update Picture Soon

जर्मनीला जायचं ठरल्यावर कुठल्या कुठल्या ठिकाणी भेटी द्यायच्या त्याचं Planning सुरु झालं. बरेच पर्याय पुढे आले. त्यातले काही मागे गेले,काही वगळले गेले. पण त्या सगळ्यात कायम आघाडीवर, अगदी पहिल्या नंबरवर राहिला तो म्हणजे जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आणि जर्मनीमधली सर्वात जास्त भेट दिली जाणारी इमारत आणि ती म्हणजे परिकथेतला नॉईश्वानस्टाईन कॅसल.

हा किल्ला जर्मनीमधल्या बव्हेरिया या परगण्यात आहे आणि शेजारी देश ऑस्ट्रियाच्या अगदी बॉर्डर (हद्दी) जवळ आहे.

आमच्या या जर्मनी टूर मध्ये म्युनिक या जर्मन शहरात आम्ही ५ दिवस होतो. एक अपार्टमेंटच बुक केलं होतं . त्यापैकी एक दिवस या प्रख्यात किल्ल्याच्या भेटीसाठी राखून ठेवला होता.

म्युनिक रेल्वे स्टेशनच्या बाहेरून बऱ्याच खाजगी कंपन्यांच्या आरामदायक बसेस या किल्ल्याची डे टूर घडवून आणतात.

या डे टूर मध्ये म्युनिक रेल्वे स्टेशनबाहेरून पिक अप, लुडविग-II या जर्मन राजाचा लिंडरहॉफ राजवाडा, ओबरआमेरगॉव हे गांव , नॉईश्वानस्टाईन किल्ला ज्या गांवात वसलेला आहे ते होहेनश्वांगॉव गांव , तिथे दुपारचे जेवण,नॉईश्वानस्टाईन किल्ला अथवा होहेनश्वांगॉव राजवाडा/ किल्ला या दोघां पैकी एका किल्ल्याला आपल्या मर्जीनुसार भेट (चॉईस दिला होता) आणि बसमधून परतीचा प्रवास. पण ड्रॉप मात्र म्युनिक रेल्वे स्टेशनऐवजी तिथल्याच एक प्रख्यात बीअर गार्डन जवळ, असा डे टूरचा भरगच्च प्रोग्राम होता.

या भागात आपण लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव हे चित्र रंगवलेल्या भिंतीच प्रसिद्ध गाव पहाणार आहोत. (खरं तरं या दोन ठिकाणांबाबत आधी आम्हाला नीटशी माहिती नव्हती. मूळ किल्ल्याबरोबर डे टूर मध्ये Part of the Package आहेच म्हणून घेतलं. पण प्रत्यक्ष पाहिल्यावर ही दोन्ही ठिकाणं म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्काच ठरला).

आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीच या टूरचं पुढच्या दिवसासाठी बुकींग केले होतं . त्यांच्या सूचनेनुसार सकाळी ८. १५ वाजता आम्ही म्युनिक स्टेशनच्या बाहेरच्या त्यांच्या बस स्टॉपपाशी पोहोचलो. तिथे आमच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन २ x २ बसेस उभ्या होत्या. त्यापैकी पहिल्या बसमधे आमचा नंबर लागला. बसमध्ये बसल्यावर जरा वेळातच बस निघाली आणि आमच्या डे टूरची सुरुवात झाली .

बराचसा प्रवास हायवेने (ए-९५) होता. काही छोटीशी जर्मन शहरं ,गावं आणि बराचसा अतिशय विरळ वस्तीचा, हिरव्या कुरणांचा प्रदेश यामधून आमचा प्रवास चालू होता.

जसे माझे "स्विस स्केप्स: आगगाडीच्या रुळांवरून" यामधले फोटो ट्रेन मधून काढलेले होते तसे ह्या प्रवासातले फोटो चालत्या बसमधून, काचेमधून काढलेले आहेत आणि म्हणूनच थोडे ब्लर, थोडे अनक्लिअर आहेत.
मात्र बसच्या काचेच्या आतून ही छायाचित्रे टिपली असल्यामुळे तो एक काचेचा अडसर आणि त्या काचेमधील प्रतिबिंब (Reflection) तुम्हाला ह्यातल्या काही क्षण चित्रात आढळेल. पण लेखाला पूरक ठरतील म्हणून इथे दिले आहेत.

प्रचि ०१: म्युनिक मधून बाहेर पडल्यावर मध्यम किंवा विरळ लोकवस्तीची अशी दृश्य दिसायला लागतात. पण प्रत्येक ठिकाणी एखादं चर्च किंवा चॅपेल हे दिसतंच दिसतं . दृश्य साधारणपणे स्विझर्लंडमधल्या ग्रामीण भागासारखंच. . . . .कारण देशाच्या सीमा बदलल्या तरी प्रदेश सारखाच. . . वातावरणही सारखंच आणि आल्प्सचं सान्निध्य ही सारखंच.

प्रचि ०२: आल्प्सची पार्श्वभूमी...

प्रचि ०३: विरळ लोकवस्ती आणि गवता-कुरणांचा प्रदेश -०१

प्रचि ०४: गवता-कुरणांचा प्रदेश -०२

प्रचि ०५: लिंडरहॉफ पॅलेसकडे नेणारा प्रवेश रस्ता

प्रचि ०६: राजवाड्याकडे जाताना उजव्या हाताला लागलेलं हे तळं आणि पाठीमागे आल्प्सची पार्श्वभूमी. . . . सगळ गवत हिरव्या कंच रंगाचं आणि दाट झाडांच्या सावलीने वेढलेलं. इथल्या कुठल्या तरी झाडाखालच्या सावलीत ह्या गवतावर पहुडावं, मनमुराद लोळावं अशी इच्छा प्रत्येकालाच होत असणार. मला तर नक्कीच झालेली. (नशीब माझं कि मी हरिण किंवा ससा नव्हतो. . . . कि दुर्देव माझं कि मी हरिण किंवा ससा नव्हतो...?)

प्रचि ०७: राजवाड्याकडे . . . . सगळ्या हिरवाईत हे एक लाल पानांचं झाड

प्रचि ०८: राजवाड्याच्या रस्त्यावर. . . .अजून एक, खर तर दोन लाल पानांची झाडं

आमचं टूर मधलं पहिलं ठिकाण होतं राजा लुडविगने बांधलेला लिंडरहॉफ पॅलेस .

राजा लुडविग -II याने ३ राजवाडे बांधले, त्यातला हा सर्वात लहान राजवाडा. आणि हा एकमेव राजवाडा जो लुडविग पूर्ण झालेला पाहू शकला. खरं तर सन १८८६ मध्ये हा राजवाडा त्याच्या सर्व वैभवासह पूर्ण झाला आणि त्याच वर्षी नंतर राजा लुडविग-II दुर्दैवी, अकाली, अनपेक्षित आणि रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावला.

पण हा राजवाडा म्हणजे आधीच्या वास्तूचे भव्य राजवाड्यामध्ये रूपांतर असल्यामुळे राजाला ह्या राजवाड्यात रहाता तरी आले.

मोठा झाल्यावर लुडविग राजाचं जास्तीत जास्त वास्तव्य ह्याच राजवाड्यात असे.

हा राजा ज्याला वेडा राजा (Mad King Ludwig) म्हणून ओळखलं जातं, तो स्वतः कलासक्त मनाचा होता. सुंदर इमारती बांधण्यात त्याला रुची आणि गती होती. बांधकामाच्या आराखड्यात आणि बाह्यरूपात बाह्यसौंदर्यात त्याला रस होता. या सर्वांमध्ये त्याचा सहभाग असे तसंच तो त्यात हस्तक्षेपही करी आणि हा हस्तक्षेप कलात्मक दृष्टीने चांगलाच असे हे त्याने उभारलेल्या इमारतींवरून सिद्ध झालेले आहे.
या राजाला त्याच्या इमारती एखाद्या आधी झालेल्या , त्याला आवडलेल्या इमारतीच्या संकल्पनेवर डिझाईन करायची, ती संकल्पना फुलवायची सवय होती.

फ्रान्सचा राजा १४वा लुई हा राजा लुडविग II चा आदर्श होता. आणि १४व्या लुईचा पॅरिसचा व्हर्सायचा राजवाडा हा लुडविगचे लिंडरहॉफ राजवाडा बांधण्यामागचे प्रेरणास्थान होते.

त्यामुळे दोघांच्या आकारमानात खूप फरक असला तरी व्हर्सायच्या राजवाड्यातील आणि त्याच्या परिसरातील सूर्य-प्रतिमा, किंग्ज कॉटेज, आईने महल, ह्या गोष्टींचा वापर लिंडरहॉफ राजवाड्यातही झालेला दिसतो.

प्रचि ०९ : राजवाड्याचे पहिले दर्शन...

प्रचि १०: राजवाड्याचे प्रवेश द्वार. तीन कमानीच्या मधून प्रवेश आणि कमानींच्या बाजूंवर चार सशक्त पुरुषांच्या शिल्पाकारातील दगडी ब्रॅकेट वर तोललेला सज्जा.
सज्जाचे रेलिंग आणि कठडा काळ्या आणि सोनेरी रंगाच्या अतिशय डेकोरेटिव्ह बिडाच्या जाळीमध्ये....

प्रचि ११: दगडी पुरुष शिल्प (अॅटलस) : जवळून

प्रचि १२: मात्र राजवाड्यात प्रवेश करण्यापूर्वी टूर गाईड आपल्याला राजवाड्या समोरचे कारंज पाहायला आणि तिथून वर जाणाऱ्या पायऱ्या चढून वर जायला सांगतो. कॅमेराही कॅरी करायला सांगतो. कारण हि एक अशी जागा आहे जिथून अख्खा राजवाडा त्याच्या सभोवतालासह, कारंजासह, विविध दगडी शिल्पांसह, वर खाली जाणाऱ्या सुरेख रेखीव पायऱ्यांसह आणि मागे चढत जाणाऱ्या हिरवळीच्या पार्श्वभूमीसह आपल्या नजरेच्या कवेत येतो.
आणि ते समोरचं दृश्य पाहिलं की मग लुडविग -II ने निर्मिलेली लिंडरहॉफ राजवाडा हि एक उत्कृष्ट, रमणीय आणि अविस्मरणीय वास्तू आहे, असं का म्हटलं आणि मानलं जातं त्याचा आपल्याला प्रत्यय येतो.

Will Update Picture Soon

लहान लुडविग खरं तर त्याच्या बाबांबरोबर शिकारीसाठी ह्या किंग्ज कॉटेज नावाच्या गवताळ कुरणं असलेल्या आणि जंगल- डोंगराच्या सानिध्यातील प्रॉपर्टीमध्ये यायचा.

हि जागा, हा परिसर आवडल्यामुळे त्याने हेच कॉटेज लहानपणी लुडविग इथे ज्या फाॅरेस्टर्स हाऊस (Royal Hunting Lodge) मधे रहायचा ते मोठा झाल्यावर त्याने वाढवलं.
नंतर हळूहळू त्यात त्याने टप्प्याटप्प्याने (Phase Wise) खोल्यांची भर घातली... आणि मग मूळ Lodge संपूर्ण पणे काढून टाकलं..
त्यामुळे म्हटलं तर त्याने मूळ इमारतीत भर घातली आणि म्हटलं तर जुनी इमारत संपूर्ण पणे पाडून टाकली..
आणि याचमुळे तो ह्या राजवाड्यात बराच काळ राहू शकला.

हा राजवाडा आर्किटेक्चरच्या रोकोको स्टाईलमधे बांधला आहे.

१८ व्या शतकात पॅरिसमध्ये उदय पावलेल्या , नंतर फ्रान्सभर पसरलेल्या आणि नंतर अन्य युरोपियन देशात, विशेषतः ऑस्ट्रिया आणि जर्मनीमध्ये विशेष वाढ झालेल्या Rococo Architectural style मध्ये ह्या राजवाड्याचे बांधकाम आहे. त्यामुळे सहाजिकच ह्या शैलीचे वैशिष्ट्य असलेल्या अतिशय डेकोरेटिव्ह घटकांची यात रेलचेल आहे.

प्रचि १३: राजवाड्याची उजवी बाजू.

हेच डेकोरेटिव्ह घटक राजवाड्याच्या अंतरंग सजावटीतही (Interior) दिसून येतात.
मात्र दुर्दैवाने ह्या राजवाड्याच्या अंतर्भागाचे छायाचित्रण करण्यास मनाई आहे, म्हणून ह्या सर्व प्रतिमा केवळ राजवाड्याला प्रत्यक्ष भेट देऊन अथवा आंतरजालावरतीच पाहता येतात. त्यामुळे प्रत्यक्ष राजवाडा पाहिला तरी फोटो काही काढता आले नाहीत म्हणूनच केवळ वाचकांना थोडीशी कल्पना यावी यासाठी आंतरजालावरून काही प्रचि इथे साभार देत आहे.

प्रचि १४ : आईने महल (Hall of Mirrors) हि ह्या राजवाड्यातील एक अतिशय खास जागा. ही खोली लुडविग ची अतिशय आवडती होती. कारण हा निशाचर राजा दिवसा झोपायचा आणि रात्रभर जागा राहून ह्या खोलीतल्या एखाद्या कोनाड्यात बसून पुस्तकं वाचायचा किंवा बऱ्याच मेणबत्त्या पेटवून आरसे महालातल्या असंख्य आरशांमध्ये त्या ज्योतींच्या अनंत प्रतिमा पहात त्या उजेडात आनंदाने हरवून जायचा. (आंतरजालावरून साभार)

प्रचि १५: सोनेरी रंगाची खुर्ची, सोनेरी मोल्डींग्ज्, मयूर नील रंगाचा (Peacock Blue) रेशमी पडदा आणि गालिचा (आंतरजालावरून साभार)

हे त्याचे खाजगी निवास स्थान असल्याने या राजवाड्यात त्याचे सिंहासन नाही. राजवाड्यामधील एकंदर गोल्ड प्लेटिंगसाठी सुमारे ५ किलो सोन्याचा वापर केलेला आहे.

प्रचि १६: लुडविग राजाची बेडरूम (आंतरजालावरून साभार)

प्रचि १७: ऑडियन्स रूम (आंतरजालावरून साभार)

राजवाड्याच्या परिसरातील बगिचांमध्ये लँडस्केपिंगची आखीव रेखीव आणि भौमितिक स्वरूपाची “बरोक” शैली, इंग्लिश शैली आणि इटालियन रेनेसान्स शैली यांचा सुयोग्य मिलाफ आहे. आणि म्हणूनच या बागा जगातील सर्वात सुंदर बगिच्यांपैकी एक म्हणून गणल्या जातात. ह्या लँडस्केप्ड बागा जवळजवळ सव्वाशे एकरात पसरलेल्या असून सभोवतालच्या नैसर्गिक अल्पाईन लँडस्केप मध्ये त्या छान मिसळून जातील असे त्यांचे डिझाईन आहे.

प्रचि १८: अश्व शिल्प कारंज (Neptune Fountain) आणि पाठीमागे चढावरती दिसणारे Music Pavilion
हे कारंजामधलं पाणी आल्प्स पर्वताच्या उतारावरून वहाणार्या नैसर्गिक झऱ्याचं पाणी आहे.

प्रचि १९: बागेतील पुतळा – ०१

प्रचि २०: निळे स्वछ आकाश...

प्रचि २१: आखीव रेखीव भौमितिक बाग -०१ (मला स्वतःला लँडस्केपिंगची ही भौमितिक शैली अजिबात आवडत नाही, सगळं फार कृत्रिम वाटतं)

प्रचि २२: आखीव रेखीव भौमितिक बाग -०२


प्रचि २३: आखीव रेखीव भौमितिक बाग -०३

(पॅव्हेलियन आणि त्याच्या वाटेवरील बाण मारणाऱ्या मदनाचे कारंजे) (Cupid Fountain)

प्रचि २४: बागेतील पुतळा – ०२

प्रचि २५: परतीच्या वाटेवरील ताटवा

प्रचि २६: राजा लुडविग II चा ब्राँझ मधला अर्धपुतळा

प्रचि २७: बसकडे जाताना सभोवतालचे Alpine Landscape

लिंडरहॉफ राजवाड्यानंतर आमचे पुढचे ठिकाण होते ओबरआमेरगॉव (Oberammergau).
लिंडरहॉफ पॅलेसमधून जवळच असलेले हे गांव नॉईश्वानस्टाईन किल्ल्याच्या वाटेवरच आहे. हे गाव प्रसिद्ध आहे ते गावातील कोरीव लाकूडकाम करणारे कारागीर, त्यांनी बनवलेल्या कोरीव लाकूड कामाच्या वस्तू , दर १० वर्षांनी होणारे पारंपारिक Passion Plays , Nato School आणि मुख्यत्वे परिकथेतील अथवा धार्मिक चित्रं आणि त्रिमितीय भास होणारी चित्रं रंगवलेली रंगीबेरंगी घरे (Frescoed इमारती) यांसाठी.
म्हणूनच याला " Town of Painted Buildings " असे म्हणतात.

यामधली Architectural चित्रं म्हणजे एखाद्या साध्याशा खिडकीला किंवा दरवाजाला बाजूने एवढं छान रंगीत चित्र काढून Detailing करतात कि ती खिडकी , तो दरवाजा एकदम शाही अथवा विशेष (Special) होऊन जातो. आणि इमारतीचं रुपचं पालटतं.

प्रचि २८: या इमारतीच्या १ ल्या मजल्यावर धार्मिक प्रसंग चितारलेला आहे. उजवी कडचा कोपरा म्हणजे सपाट भिंत असली तरी त्यात चित्र रंगवण्याच्या पध्दतीमुळे कमानदार त्रिमितीय दरवाज्याचा (3 Dimensional Arched Door) भास होतो.

तर डाव्या कोपऱ्यात एखाद्या घराच्या व्हरांडयाचा भाग, पायऱ्या, व्हरांडयाचं छप्पर असा आभास रंगवण्यामधून, त्याच्या लाईट्स आणि शेडमधून होतोय. आणि याच चित्रांसाठी ओबरआमेरगॉव प्रसिद्ध आहे.

प्रचि २९: हे पण एक तिथले टिपिकल उदाहरण. हे चित्र बहुतेक त्यांच्या एखाद्या परिकथेतील असावं. त्याच्या खालच्या खऱ्या खिडक्या साध्या सुध्याच आहेत पण त्यांच्या मध्ये रंगवलेले गोल खांब, त्या खांबाचं सोनेरी, डेकोरेटिव्ह कॅपिटल, खिडक्यांच्या कमानीवरची सोनेरी, वळणदार पानाफुलांच्या डिझाईनची वेलबुट्टी यामुळे खिडक्यांना एक भारदस्तपणा आणि उच्चभ्रू राजेशाही रुप आलं आहे.

ही सुद्धा ओबरआमेरगॉवची खासियत.
या शिवाय याच इमारतीचं (Hotel चं) आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे लाकडापासून बनवलेले गॅलरीचें कठडे.

प्रचि ३०: पार्श्वभूमीवर ओबरआमेरगॉवचा Signature Mountain समजले जाणारे Kofel शिखर.
या शिखराच्या डोक्याचा भाग लक्षात येईल असा पांढरा आहे. शिखराच्या माथ्यापर्यंत साधारणपणे १.० किलोमीटरचा सौम्य चढ असल्यामुळे आणि तिथे टोकाला एक छान सूळ (Cross) असल्यामुळे बरेच ट्रेकर्स याच्या माथ्यापर्यंत जात येत असतात.

प्रचि ३१: Kofel पहाडावरचा सूळ (Cross). शेजारी काही माणसंही दिसतायत.

प्रचि ३२: सुळाचा (Cross) Close Up..

प्रचि ३३: लाकडी कठड्यांची आणि बाल्कनीत लाकडी सूळ असलेली एक इमारत.

प्रचि ३४: ओबरआमेरगॉव मधला एक निवांत रस्ता. रस्त्याला काँक्रीट आणि दगडी पेबल्सचे फूटपाथ.
(हि जागा रुंद रस्त्यावर वसली आहे आणि इथे माणसांची, गाड्यांची अजिबात गर्दी नाही एवढा फरक वगळता जुन्या मुंबईची विशेषतः गिरगाव, कांदेवाडी, फणसवाडी वगैरेंची आठवण करून देणारा परिसर)

प्रचि ३५:अजून एक रंगवलेली इमारत...

प्रचि ३६: हा एक कॅफे. दोन्ही बाजूला परिकथेतील चित्रं रंगवलेला आणि मधल्या खिडक्यांना वर आणि खाली डिझाईनची रंगवलेली पट्टी आणि वर तिरक्या होत जाणाऱ्या कौलारू छपराचा आभास निर्माण करणारं रंगकाम. चित्रात उन्ह जाणवत असलं तरी तापमान १६ ते १८ डिग्री. . . . So Chill . . . .

प्रचि ३७: दुकानासमोरच्या शोभिवंत फुलांच्या कुंड्या...

प्रचि ३८: हे Passion Play होणारं Passion Play Theater. सन १६३४ पासून या प्लेज ना सुरुवात झाली. ज्या वर्षाच्या शेवटी शून्य असते अशा वर्षी म्हणजे दर दहा वर्षांनी हे प्लेज केले जातात. या पुढचा प्ले आता सन २०२० ला आहे. त्या वर्षी ५ महिने हे प्ले केले जातील. ह्या Plays चं बुकिंग आत्तापासूनच सुरु झालयं. . . .

प्रचि ३९: या Play Theater समोर एक छान बाग आहे. जिच्या भोवती खूप छान म्युरल्स , स्कल्प्चर्स ची मांडणी केलेली आहे.

प्रचि ४०: म्यूरल

प्रचि ४१: बसायला छान बाकं असलेल्या या बागेतलं एक महत्त्वाचं स्कल्प्चर : गाढवावरचा ख्रिस्त (Jesus On Donkey)

प्रचि ४२: Close Up of "Jesus On Donkey"

प्रचि ४३: अजून एक म्यूरल : Rottwagen

इथे दुकानात लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंची आणि त्या टिपिकल ककू क्लॉक्सची रेलचेल असते. पण टूरच्या वेळेच्या मर्यादेमुळे ते फार काही बघता आलं नाही.

प्रचि ४४: हि ती टिपिकल ककू क्लॉक्स...

प्रचि ४५: लाकडी कारागिरीच छान उदाहरण: लाकडी घुबड...

यानंतर आम्ही शेवटचं ठिकाण पाहिलं ते म्हणजे "सेंट पीटर व पॉल "चे चर्च.

प्रचि ४६: सेंट पीटर आणि पॉल चर्चचा Bell Tower...

प्रचि ४७: Bell Tower- Close Up

प्रचि ४८: चर्चचा अंतर्भाग....


आता मात्र आमची ह्या गावातली वेळ संपत आलेली म्हणून मग धावत पळत बसपाशी गेलो.
यानंतर आम्ही बसमध्ये चढलो ते या टूरचं सर्वात मोठं आकर्षण असलेला नॉईश्वानस्टाईन कॅसल - एका वेड्या राजाचे स्वप्न पाहण्यासाठी.

(क्रमश:)

 

जर्मनी : एका वेड्या राजाचे स्वप्न : नॉईश्वानस्टाईन कॅसल
(म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग २)

Neuschwanstein Castle-Dream Of A Mad King, Munich-Neuschwanstein Castle Day Tour : Part -2

मुखपृष्ठ – ००१

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगर होतं. त्यावर एक राजा राज्य करीत होता. पण तो होता "वेडा". . .

अशा गोष्टी आपण बालपणी वाचल्या.
पण आज मात्र आपण खरंच एका वेड्या राजाची कहाणी पाहणार आहोत.
ह्या राजाला आलम दुनियेत वेडा राजा लुडविग (Mad King Ludwig) म्हणून ओळखले जातं.
त्यालाच Swan King असेही म्हणत.
परिकथेतील राजा (Fairy Tale King) म्हणूनही तो ओळखला जाई.
लहरी राजा हेही त्याचे नामाभिधान.
आणि Shy King Ludwig म्हणूनही तो प्रसिद्ध होता.

ह्या वेड्या राजाने एक स्वप्न पाहिलं, "एक किल्ला बांधण्याचं", आणि त्याच्या स्वप्नातला हा किल्ला म्हणजे नॉईश्वानस्टाईन कॅसल जो जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आहे.
या राजाचं आयुष्य पाहिलं आणि त्याची स्वप्न पाहिली तर मी मात्र याला वेडा राजा न म्हणता
"मनस्वी राजा" म्हणीन आणि त्याने बांधलेल्या नॉईश्वानस्टाईन कॅसलला म्हणीन,
”एका मनस्वी, कलंदर, कलावंत राजाची निर्मिती”.
(इथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे किल्ला म्हटल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील किल्ले, Forts आठवतात. इथे Castle याचा एक अर्थ किल्ला असा होतो. पण युरोपमधील "Castle" म्हणजे एखाद्या सरदाराचं, उमरावाचं किंवा मोठ्या माणसाची, संरक्षणाची व्यवस्था असलेली त्यांची रहायची जागा. त्यामुळे Castle म्हणजे गढी असाही एक अर्थ आहे.)

कधीकधी माणूस पहाताना वास्तू कळते तर कधी वास्तू पहाताना माणूस कळतो याच उत्तम उदाहरण म्हणून राजा लुडविग- II आणि नॉईश्वानस्टाईन कॅसल या जोडगोळीकडे पहायला हवं.

या सुंदर किल्ल्याला "परिकथेतील किल्ला" (Fairy Tale Castle), ”Disney Story Book Castle”, “Cindrella's Castle” असंही म्हटलं जातं.

आल्प्सच्या अंगाखांद्यावरच्या अल्पाईन जंगलाच्या आणि पायथ्याच्या अतिशय विहंगम अशा गवता - कुरणाच्या (Meadows) निसर्गसौंदर्यामध्ये वसलेल्या एका टेकडीवर या किल्ल्याचं बांधकाम केलंय.

मुळात हा किल्ला आल्प्स पर्वतातल्या एका टेकडीवर बांधल्यामुळे त्याची उंची वाढलेली आहे आणि त्या उंचीवरून होहेनश्वांगॉव गावाच्या अतिशय सुंदर निसर्गाचं आणि दरीचं मंत्रमुग्ध करणार दर्शन होतं.
प्रथमदर्शनी हा किल्ला आपल्याला मध्ययुगीन काळातील किल्ल्याची प्रचिती आणून देतो.

म्युनिकवरून याच राजाचा लिंडरहॉफ पॅलेस आणि भित्ती चित्रांसाठी प्रसिद्ध असलेले वाटेतील ओबरआमेरगॉव हे गांव पाहिल्यावर आमच्या डे टूरची बस होहेनश्वांगॉव गावात पोहोचली ज्या गावात हा नॉईश्वानस्टाईन किल्ला वसलेला आहे.
मात्र गावात पोहोचण्याआधीच नॉईश्वानस्टाईन किल्ल्याने त्याचे दर्शन लांबवरूनच द्यायला सुरुवात केली.

प्रचि - ०१:

प्रचि - ०२:

इथे आम्हाला उतरवल्यावर आधी जवळपासच्या रेस्टॉरंट्समध्ये जेवण आटपून घ्यायचे होते आणि नंतर एका मिनी बसने किल्ल्याजवळ जायचे होते.

किल्ल्यामध्ये जाण्यासाठी घोडागाडीचा पर्यायही होता. अर्थात चालत जाणारे पर्यटकही होतेच.

प्रचि - ०३: ह्या तिकीट हॉलपाशी आम्ही बसमधून उतरलो.

प्रचि -०४: ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच घेतले, त्याच्या दर्शनी भागातही ओबरआमेरगॉव सारखी रंगीत भित्तिचित्रे काढलेली होती.

प्रचि -०५: जेवून झाल्यावर थोडं पुढे गेलो आणि मागे पाहिलं तर पुन्हा नॉईश्वानस्टाईन किल्ल्याचं दर्शन झालं.

प्रचि -०६: गांवातून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल

प्रचि -०७ : नॉईश्वानस्टाईन कॅसलच्या वाटेवर लागतो होहेनश्वांगॉव कॅसल, ज्यामध्ये लुडविग- II राजाचं बालपण गेलं.

प्रचि -०८ : होहेनश्वांगॉव कॅसल

प्रचि – ०९: किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली घोडागाडी (काय मस्त दणकट, धष्टपुष्ट घोडे आहेत नां…..?)

प्रचि – १०: होहेनश्वांगॉव कॅसल जवळून

प्रचि – ११: होहेनश्वांगॉव कॅसल वरचे लुडविग राजाचे हंस चिन्ह

प्रचि – १२: किल्ल्याचा रस्ता चढाचा आहे ज्याच्यावरून मिनी बस पण शेवटपर्यंत जाऊ शकत नाही.
बस मधून उतरल्यानंतर थोड्या चढाच्या रस्त्यावरून वर जायला लागतं.

एखादं वळण चढून आपण वर आलो की सरळ रस्ता जातो किल्ल्याकडे आणि उजव्या हाताला एक वाट जाते ती मेरीच्या पुलाकडे.

प्रचि – १३: मेरीच्या पुलाकडे - ०१

प्रचि – १४: मेरीच्या पुलाकडे - ०२

लुडविग राजाने हा सुंदर किल्ला बांधायला तर घेतला. पण एवढं भव्य बांधकाम, देखणी इमारत जवळून पहाण्यापेक्षा थोडी दुरून पहिली आणि तीही नजरेच्या पातळीत (Eye Level ला) आणि त्यातूनही घरं, कुरणं, नदी, डोंगर आणि हे सर्व पहाडाच्या पार्श्वभूमीवर. . . .
तर त्यात एक आगळीच मजा येईल. आणि हे बांधकाम जसजस प्रगतीपथावर जाईल तसतसं आपलं स्वप्न साकार होताना दिसेल.
यासाठी ह्या वेड्या राजाने एक अफाट जागा शोधली . . . .
ती म्हणजे मेरीचा पूल (Mary's Bridge)

दोन पहाडांमधून वहाणाऱ्या आणि Pollat George Waterfall मधून उगम पावलेल्या Pollat Stream वर लुडविगच्या बाबांनी एक छोटासा कामचलाऊ लाकडी पूल बांधला होता आणि त्यांच्या पत्नीचे, राजा लुडविगच्या आईचे, मेरीचे (Queen Mary of Prussia) नाव दिलं होतं.
लुडविगने हा लाकडी पूल संपूर्ण पणे लोखंडी कामाने बांधला.

येणारे सर्व पर्यटक आधी ह्या मेरीच्या पुलावर येतात. तिथून डोळे भरून हा किल्ला पाहतात. फोटो काढतात आणि मग मात्र फिरून किल्ल्याकडे जातात.

प्रचि – १५: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०१

प्रचि – १६: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०२

दिवसा झोपणाऱ्या या राजाला दिवस झोपून काढल्यावर दिवसभरात किल्ल्याच्या पुऱ्या झालेल्या कामाची उत्सुकता असायची.
मग हा भूतकाळात, मध्ययुगात रमणारा निशाचर वेडा राजा, रात्री या मेरीच्या पुलावर यायचा. (आधी लाकडी आणि नंतर लोखंडी),
आणि त्या रात्रीच्या अंधारात जो उजेड चंद्र, ताऱ्यांचा असेल, बांधकामाच्या जागेवर पेटवलेल्या दिव्यांचा, मशालींचा उजेड असेल किंवा उबेसाठी पेटवलेल्या शेकोटीचा असेल त्या उजेडात किंवा अंधारात; तोपर्यंत जेवढा पूर्ण झाला असेल तो हा मध्ययुगीन किल्ला, त्याचे स्वप्न पुरे होत असल्याचे पहात बसायचा.

जशी विहिरीतील कासवीण आपल्या पिल्लांना नजरेने वाढवते. . . . . अगदी त्याचप्रमाणे स्निग्ध, स्वप्नाळू नजरेने.

या किल्ल्यावरून बलूनने फिरावं आणि हा किल्ला आणि त्याचा परिसर आकाशातून हंस पक्षाप्रमाणे पहावा अशीही या राजाची एक मनिषा होती.

प्रचि – १७: पुलाखालून खळाळत वहाणारा Pollat Mountain Stream. (हिवाळ्यात मात्र हा गोठतो)

प्रचि-१८: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०३

प्रचि - १९: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०४

मेरीच्या पुलावरून हा किल्ला पाहताना नॉईश्वानस्टाईन कॅसल एवढा सुंदर का मानला जातो,
का हा किल्ला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर गारुड करतो,
का प्रत्येक पाहणाऱ्याची नजरबंदी करतो,
याचं कारण समजतं.

आल्प्स पर्वताचं सानिध्ध्य, याच पर्वतामधली एक टेकडी, सभोवताली अल्पाईन जंगल, टेकडीचा विस्तार थांबतो तिथे गवताळ कुरणं, त्यात चरणाऱ्या धष्टपुष्ट जर्मन गायी, उतरत्या छपरांच्या घरांची लोकवस्ती, त्या पलीकडे कायम वहात असलेली नदी (हिवाळ्यात गोठत नाही तोपर्यंत), पर्वतावरूनच वहाणारा स्वछ पाण्याचा धबधबा आणि त्यातूनच वहाणारा, किल्ल्याला पाणी पुरवणारा आणि नंतर पुढे नदीला जाऊन मिळणारा झरा.

आणि त्या टेकडीच्या खडकाळ मजबूत उंचवट्यावर वसलेला ठाशीव कॅसल, गोलाकार उंच खांबांनी त्याला आलेली मृदुता आणि लाभलेलं सौंदर्य, त्याचे भरभक्कम बुरुज आणि एखाद्या अर्जुन वृक्षाप्रमाणे किंवा उंच महोगनी वृक्षाप्रमाणे आकाशाला चिरत जाणारे अरुंद slender तरीही उंच बळकट, शेवटाला निमुळते होत जाणारे, टोकेरी, अणुकुचीदार मनोरे.

आणि यामुळे एकाचवेळी तळाशी जमिनीच्या छाताडात पाय रोवून त्याच्या बुरुजांसह घट्टपणे उभा असल्याचा सामर्थ्यशाली भास आणि जसजशी वरती नजर जाईल तेव्हा त्या खांबा / मनोऱ्यांमुळे होणारा अधरतेचा, तरंगल्याचा आभास (Floating Effect) यामुळे ह्या किल्ल्याला तो खास परिकथेतल्या किल्ल्याचा तरल, Fantasy Feel आला आहे.

या किल्ल्याच्या डिझाईनमध्ये लुडविगचा एवढा हस्तक्षेप होता कि हे डिझाईन आता किल्ल्याच्या आर्किटेक्टपेक्षा लुडविगचे म्हणूनच ओळखले जाते.

या किल्ल्याच्या परिकथेच्या स्वरूपाने, आर्किटेक्चरने वॉल्ट डिस्नेलाही मोहित केलं आणि त्यावरून प्रेरणा घेत तो त्याची प्रसिद्ध जादूनगरी बनवायला प्रवृत्त झाला आणि डिस्नेवर्ल्ड फ्लोरिडा मधला Cinderella Castle आणि डिस्नेलँड पॅरिस मधला Sleeping Beauty Castle यांचे डिझाईन त्याने ह्या किल्ल्यावर बेतले.
एवढंच नव्हे तर या किल्ल्याला त्याने Disney कंपनीच्या लोगोमध्येही स्थान दिले.

प्रचि -२०: Disney Logo – 01 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)

प्रचि -२१: Disney Logo – 02 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)

प्रचि -२२: Disney Logo – 03 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)

लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्या माणसांच्या मनावरही (ज्यात मीही आलो) ज्या वॉल्ट डिस्नेच्या कार्टून फिल्म्स, अॅनिमेशन फिल्म्स ने प्रचंड गारुड केलेलं आहे त्या माणसाच्या मनावर ह्या किल्ल्याने गारुड करावं आणि त्याने ह्या किल्ल्याला स्वतःच्या कंपनीच्या लोगोमध्ये कायमस्वरूपी स्थान द्यावं यातच नॉईश्वानस्टाईन कॅसल ची महती सामावलेली आहे.

ह्या मेरीच्या पुलावरून किल्ल्याचं दर्शन घेतल्यावर आमच्याकडून एक चूक घडली.
ती म्हणजे आम्ही मेरीच्या पुलावरून किल्ल्यासाठी परत मागे येण्याऐवजी गैरसमजुतीमुळे पूल ओलांडून पलीकडच्या डोंगरावर गेलो. ह्या पायवाटेवरून एक ५-७ मिनिटं गेल्यावर एक ट्रेकर्सचा ग्रुप लागला. त्यांनी आमची वाट चुकलीय हे सांगून परत माघारी पाठवलं. त्यात आमची १५-२० मिनिटं वाया गेली.
पण ते भेटले नसते तर काही खरं नव्हतं.
म्हणजे परत आलो असतो, पण वाट चुकल्यामुळे एखाद दीड तास चुकीमुळे वाया गेला असता तर किल्ला बघायला वेळच मिळाला नसता. नुसताच भोज्ज्या.

प्रचि – २३: हि ती चुकलेली वाट...
(खरं तर ही वाट पुलापलीकडच्या डोंगरावर जाते. तिथून नॉईश्वानस्टाईन कॅसलचा अजून एक छान आणि उंचावरून दर्शन घडवणारा Point आहे. पण वेळेचे हे चोचले बॅग पॅकर्सना परवडतात, Day Tour वाल्यांना परवडत नाहीत.)

प्रचि – २४: परत मेरीच्या पुलावरून दिसणारी नदी, तिच्या काठावरचं गांव, घर. कुरणं आणि नॉईश्वानस्टाईन कॅसलचा एक कोपरा ...

प्रचि – २५: हे आता बरोबर रस्त्याला लागल्यावर, रस्त्यावरून दिसणारा कॅसल...

प्रचि- २६: आणि हि जंगलामधून दिसणारी बाजूची उतरती वाट जी चढून आम्ही आलो होतो...

प्रचि - २७: किल्ल्याचे बाहेरील (तटबंदीतील) प्रवेशद्वार

प्रचि – २८: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०१ (Long Shot)
आणि खाली धबधबा......

प्रचि- २९: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०२ (Mid Shot)

प्रचि- ३०: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०३ (Close Up)

प्रचि-३१ : किल्ल्याचे जवळून पहिले दर्शन...

कला आणि स्थापत्य याला आयुष्य वाहिलेला राजा लुडविग शास्त्रीय संगीताचा मोठा भोक्ता होता. जागतिक कीर्तीच्या रिचर्ड वॅगनर या संगीतकार आणि नाट्य दिग्दर्शकाचा राजा लुडविग खूप मोठा चाहता आणि पाठीराखा होता. हा किल्ला त्याने वॅगनरच्या सन्मानार्थ बांधला आणि या किल्ल्यातल्या बऱ्याच खोल्या वॅगनरच्या संगीतिकांमधल्या (Operas) पात्रांवर बेतलेल्या आहेत.

नॉईश्वानस्टाईन चा शब्दशः अर्थ म्हणजे "नवा हंस किल्ला". हे नाव वॅगनरच्या हंसाच्या आकाराच्या नौकेतून येणाऱ्या आणि राजकन्येची सोडवणूक/सुटका करणाऱ्या गूढ हंस सरदारावर (The Swan Knight) आणि त्या परिकथेवर बेतलेलं आहे.

प्रचि – ३२: हंस सरदार (Swan Knight) (प्र.चि. आंतरजालावरून साभार)

प्रचि - ३३: बुरुज

प्रचि- ३४: किल्ल्याचा कोपरा आणि रंगीत दगडी भिंत...

प्रचि-३५: प्रत्यक्ष किल्ल्याचे प्रवेशद्वार

या किल्ल्याला विरोधाभासाचा किल्ला (Castle of Paradox) असंही म्हणतात. कारण १९ व्या शतकामधे हा मध्ययुगीन काळातील म्हणजे १५ व्या शतकातला किल्ला बांधला गेला आहे. आणि १५ व्या शतकातल्या बांधकामातल्या संरक्षणात्मक युक्त्यांचा / तरतुदींचा १९ व्या प्रगत शतकात काहीच उपयोग नव्हता.
मात्र या किल्ल्याचा अंतर्भाग त्या काळातल्या, १९ व्या शतकातल्या अत्यंत आधुनिक सुख-सोयींनी युक्त आहे. कारण लुडविग राजा टेक्नॉलॉजि बाबत अद्ययावत होता. बहुश्रुत होता. आणि त्या सर्व अद्ययावत सुखसोयी वापरण्याकडे त्याचा कल होता.

या किल्ल्याचं बांधकाम सन १८५९ मध्ये सुरु झालं आणि ते तीन वर्षात पूर्ण करायचे असा लुडविगचा मानस होता. मात्र जरी बराचसा किल्ला पूर्ण झाला तरी परिपूर्ण किल्ला बनवण्याच्या ध्यासापायी लुडविगच्या आकस्मिक, अनपेक्षित, धक्कादायक, संशयास्पद आणि गूढ मृत्यूपर्यंत म्हणजे सन १८८६ पर्यंतही १७ वर्षांच्या कालावधीत हा किल्ला संपूर्ण होऊ शकला नाही.

मात्र त्याच्या हयातीत ज्या १४ खोल्या पूर्ण झाल्या, त्यांचे अंतरंग अतिशय परिपूर्ण, भव्य, राजेशाही आणि तत्कालीन उच्च अभिरुचीचे आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये उंच भिंतीने वेढलेल्या अतिशय सुंदर बागा आहेत. एवढंच नव्हे तर कृत्रिम गुहा सुद्धा आहेत. कारण लुडविगला गूढतेचे आणि एकांताचं (एकटं राहण्याचं) खूप आकर्षण होतं.

ह्या राजाच्या सापडलेल्या डायऱ्यांवरून, लिखाणांवरून या राजाचा कल Homo Sexuality कडे असावा असा अंदाज आहे. पण कट्टर कॅथोलिक धर्माच्या आत्यंतिक प्रभावाखाली, तत्कालीन चालीरीतीनुसार आणि राजघराण्यावर असलेली वावरण्याची बंधनं, त्यांचे आचार विचारांचे रीती रिवाज यामुळे लुडविगने त्याची हि उर्मी कधी व्यक्त केली नाही, करू शकला नाही. यामुळे याबाबत (त्याच्या Homo Sexuality बाबत) ठामपणे तसं होतंच, असं कुणाला म्हणता आलं नाही.

एक गोष्ट मात्र खरी की बव्हेरियाच्या सरदारकन्येबरोबर/ ऑस्ट्रियन राजकन्येबरोबर, सोफी बरोबर त्याचा वाड:निश्चय झाला होता. पण स्वतःचा कल लक्षात घेता आपण आपल्या वाग्दत्त वधूला न्याय देऊ शकणार नाही आणि तिचे आयुष्य वाया जाऊ नये या विचाराने बहुतेक, राजा लुडविगने ही सोयरीक मोडली. यावरूनही त्याची सहृदयता निदर्शनास येते. ह्या घटनेमुळेही तत्कालीन इतिहासकार त्याच्या ह्या कलाकडे बोट दाखवतात आणि त्याचा हा कल स्पष्ट होतो असे मानतात.

एक अतिशय खंत वाटणारी गोष्ट म्हणजे लिंडरहॉफ पॅलेसप्रमाणेच ह्या किल्ल्याच्या अंतर्भागाची छायाचित्रे काढण्यास ही मनाई आहे. मात्र मुख्य खोल्यांची टूर संपल्यावर आपण एका कॅफेटेरियामध्ये येतो. तिथपासून पुढच्या भागाची छायाचित्रे घेण्यास हरकत नाही.

पण तुम्हाला कल्पना येण्यासाठी एकच प्रचि आंतरजालावरून साभार घेऊन इथे देतो. कॅफेटेरिया लागतो
त्या आधी या राजाची सिंहासनासाठी राखलेली खोली लागते.

प्रचि- ३६ : सिंहासन कक्ष (आंतरजालावरून साभार)

भितिंवर देवदूतांची चित्रं रंगवलेली या किल्ल्यातील सिंहासनाची दुमजली खोली आर्किटेक्चरच्या Byzentime शैलीत बनवलेली आहे.
मात्र या खोलीत सिंहासन नाही. कारण राजा लुडविग दुर्दैवाने हि खोली पूर्ण व्हायच्या आधीच मरण पावला.

ही कामं करताना अफाट खर्च झाला. हि अशी भव्य आणि महाखर्चिक बांधकामे करताना, लुडविगने पैसे मात्र प्रजेचे वापरले नाहीत कि त्यांच्यावर कर लादले नाहीत.
त्याने हा सर्व खर्च त्याच्या खाजगी/ वैयक्तिक मालमत्तेमधून, संपत्तीमधून केला.

मात्र ही कामे केल्यामुळे बव्हेरियन जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. (आपली रोजगार हमी योजनाच म्हणा नां)
आणि हा रोजगारही एकसुरी, काही विशिष्ट लोकांना मिळण्याऐवजी या बांधकामाच्या अफाट आणि चतुरस्त्र, आणि विविधांगी गरजांमुळे समाजातल्या जवळजवळ सर्व घटकांकडे झिरपला.
प्रत्येक बलुतेदार, प्रत्येक क्षेत्रातला कारागीर, तंत्रज्ञ, मजूर यांना रोजगारासाठी या बांधकामांचा आसरा होता. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंतांची कलाही यामुळे बहरली आणि त्यांची आर्थिक सुस्थितीही.
या राजाने त्याची ही स्वप्नवत बांधकामे मजुरांच्या पाठीवर चाबकाचे फटके मारून निर्दयपणे पुरी केली नाहीत की अशा कलाकृती परत निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांचे हात तोडले नाहीत. राजरोस चांगली मजुरी, चांगले मानधन देऊन करून घेतली.

अर्थात या प्रचंड खर्चामुळे राजा लुडविगला वैयक्तिकरित्या मोठी मोठी कर्जे काढावी लागली.

तरीही पुढचं काम करण्यासाठी राजा लुडविगने जेव्हा आणखी कर्ज घेण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला, तेव्हा Bavarian Parliament नी तो फेटाळला.

त्याच्या कर्ज घेण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासाठी बव्हेरियन पार्लमेंटने चार मानसोपचारतज्ज्ञांची टीम बनवली ज्यांनी त्याला एकमताने वेडसर, विवेकशून्य (Insane) ठरवून राज्यकारभार करण्यास असमर्थ असे जाहीर केले आणि या मतावर विसंबून पार्लमेंटने १० जून १८८६ ला त्याला अटक करून त्याची राजपदावरून पाय उतारणी केली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या ४ पैकी ३ डॉक्टरांनी त्याची तपासणी साठी तर सोडाच पण उभ्या आयुष्यात कधीही भेट घेतलेली नव्हती.
तर मुख्य डॉ. गुडेन हे त्याला १२ वर्षांपूर्वी फक्त एकदा भेटले होते.
(शेवटी इतिहास हा जेत्यांकडून लिहिला जातो म्हणतात ते काही खोटे नाही.)

आणि यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे दिनांक १३ जून १८८६ ला, वयाच्या ४० व्या वर्षी हा सव्वा सहा फूट उंचीचा, अट्टल पोहोणारा राजा Lake Starnberg तलावाच्या केवळ तीन फूट खोल भागात बुडून मरण पावलेला आढळला.
त्याच्या बरोबर त्याला वेडा म्हणून जाहीर करणारा मानसोपचारतज्ञही (Dr. Gudden) शेजारी मृतावस्थेत आढळला.
लुडविगने आत्महत्या केली असं जाहीर करण्यात आलं असलं तरी घातपात, कपट, आणि खुनाची शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे.

हा राजा जरी सणकी, तऱ्हेवाईक, थोडासा विक्षिप्त (Eccentric) असला तरी त्याचं हे असं वागणं राजघराणं, मंत्री, राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्तींशी होतं. स्वभावाने अंतर्मुख असला तरी सामान्य जनतेबाबत तो अतिशय प्रेमाने आणि भावनाप्रधानतेने वागे.

बव्हेरियन कंट्रीसाईड भागात फिरण्याची आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी आणि मजुरांशी, कामकऱ्यांशी बोलायची त्याला आवड होती. या प्रवासादरम्यान जे त्याचे आदरातिथ्य करत त्यांना तो उदारपणे बक्षिसी देत असे.
या दयाळू, उदार स्वभावामुळेच सामान्य बव्हेरियन जनतेचा तो खूप लाडका राजा होता आणि अजूनही त्याची ही प्रतिमा बव्हेरियन जनतेमध्ये कायम राहिली आहे.
”Bavaria's Beloved King” हे बिरुद त्याला उगाचंच मिळालेलं नाही.

अवघं ४० वर्षांचं अल्पायुष्य, १८ व्या वर्षी डोक्यावर विराजमान झालेला राजमुकुट, जिथे रुबाबात मिरवायचं त्या राजेशाही लोकांमध्ये वावरताना लाजरेपणा, ज्यांच्यावर अधिकार गाजवायचा त्या सामान्य लोकांशी प्रेमाने वागण्याची वृत्ती, कदाचित Homo Sexuality कडे असणारा कल, एखादीच्या आयुष्याचं नुकसान होऊ नये म्हणून मोडलेला वाङनिश्चय, कल्पक स्वरूपाचे आणि अफाट खर्च करून बांधलेले उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचे नमुने, त्यासाठी प्रजेला यत्किंचितही तोशीस लागू न देता, उलट त्यांना कायमस्वरूपी रोजगार देणारी, उत्पन्न देणारी व्यवस्था व वृत्ती,
पूर्ण झालेल्या वास्तूत (लिंडरहॉफ पॅलेस) काही काळच राहायला मिळालेलं सौख्य आणि सर्वात अफाट, अचाट असलेल्या परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसलची निर्मिती पूर्ण होण्याआधीच, ती वस्तू पूर्णांशाने उपभोगण्याआधीच झालेला गुढ , अनपेक्षित मृत्यू यामुळे राजा लुडविग ५००० हुन जास्त पुस्तकं, अनेक नाटकं, फिल्म्स, कविता आणि नृत्यांचा विषय झाला आहे.

प्रचि-३७: जिथून फोटोग्राफीला हरकत नाही तो कॅफेटेरिया – ०१

प्रचि- ३८: कॅफेटेरिया - ०२ (ह्या प्रचि मधला छायाप्रकाश मला स्वतःला खूप आवडला)

प्रचि- ३९: कॅफेटेरिया - ०३ (भिंतीवर ओबेरामेरगॉव प्रमाणे भित्तिचित्रे)

या कॅफेटेरियाच्या बाहेर एक मोठ्या गोल दुहेरी खांबांनी वेढलेली छान गॅलरी आहे.

प्रचि -४०: त्या खांबांमधून दिसणारा हा मेरीचा पूल – ०१... आणि खाली धबधबा......

प्रचि- ४१: आणि त्या गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल -०१
(मध्यभागी टेकडीवरचा होहेनश्वांगॉव किल्ला)

प्रचि – ४२: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०२ (Overlooking Forggense Lake in the foot hills of Alps) आणि उजव्या खालच्या कोपऱ्यात होहेनश्वांगॉव किल्ला

प्रचि- ४३: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०३ (गॅलरीच्या कोपऱ्यातून)

प्रचि-४४: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०४ (गॅलरीच्या कोपऱ्यातून)

प्रचि-४५: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०५ (हिरवी कुरणं आणि लोकवस्ती)

प्रचि- ४६: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल - ०६ (Forggense Lake)

प्रचि - ४७: गॅलरी च्या दोन दुहेरी खांबांमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल - ०७

प्रचि- ४८: पावसाळी ढगांमुळे छान अंधारलेला परिसर

इथून आमचा किल्ल्यामधला परतीचा प्रवास सुरु झाला

प्रचि- ४९: हा शाही मुदपाकखाना - ०१

प्रचि - ५०: शाही मुदपाकखाना – ०२

प्रचि- ५१: किल्ल्याचे लाकडी मॉडेल

प्रचि- ५२: गूढ वाटणारा कॉरिडॉर - ०१

प्रचि- ५३: गूढ वाटणारा कॉरिडॉर - ०२

आता बाहेरून बसकडे परतीचा प्रवास आणि तो मात्र चालत.

प्रचि : ५४

प्रचि : ५५

प्रचि : ५६ (Worm’s Eye View of The Castle)

प्रचि : ५७

प्रचि - ५८: परतीची वाट

खरंतर अतिशय खाजगी निवासस्थान म्हणून बांधलेली हि इमारत आणि ते खाजगीच राहू द्यावं अशी अटकेच्या वेळी शेवटची (अंतिम) इच्छा व्यक्त केली असतानाही लुडविग राजाच्या मृत्यूनंतर ७ च आठवड्यात नव्या राजाने लोकांसाठी खुली केली.
आणि राजाचं निवासस्थान पाहायला आलेले लोक या किल्ल्याचं बाह्यरूप आणि अंतरंग बघून एवढे आश्चर्यचकित आणि थक्क झाले कि हा किल्ला पाहायला लोकांची, पर्यटकांची रीघ लागली.
त्यासाठी लावलेल्या तिकीट विक्रीतून एवढं उत्पन्न मिळायला लागलं कि खर्चाचा खड्डा असलेली हि इमारत, हा किल्ला बव्हेरियन तिजोरीसाठी आता उत्पन्नाची खाण ठरला आहे.
(प्रत्यक्ष वार्षिक उत्पन्न १.५ कोटी USD आणि हॉटेलमधला मुक्काम, खाणं-पिणं वगैरे अप्रत्यक्ष वार्षिक उत्पन्न ३.० कोटी USD) .
आणि जी गोष्ट एकेकाळी अफाट उधळपट्टी म्हणून गणली जात होती ती आता विस्मयकारक आणि अत्यंत हुशारीची गुंतवणूक (Brilliant Investment) ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

ह्या किल्ल्याची मोहिनी इतकी आहे कि दरवर्षी जवळजवळ १३ ते १५ लाख प्रवासी/ पर्यटक याला भेट देतात. वसंत ऋतूत तर जवळजवळ सहा हजारापर्यंत पर्यटक रोज या वास्तूत असतात.

प्रचि- ५९: परिसरातील घरे

प्रचि- ६०: बसजवळ येताना परतीच्या वाटेवरून दिसायला लागलेला होहेनश्वांगॉव कॅसल

प्रचि- ६१: Bye -Bye नॉईश्वानस्टाईन कॅसल

हे साकार झालेलं अप्रतिम स्वप्न बघताना आतून खूप आनंद होत होता.
पण डे टूरच्या गाईडच्या तोंडून राजा लुडविगचं आयुष्य जाणल्यापासून मनाला एक बोच होती, टोचणी लागली होती. काही केल्या मनातला सल संपत नव्हता, खरं तर कळत नव्हता.
एखाद्या छान, गुबगुबीत, मऊ मखमली गादीच्या खुर्चीत बसल्यावर सुख पण व्हावं, बरं पण वाटावं पण कुठेतरी त्या गादीत चुकून राहिलेली सुई सतत, हळूहळू आपल्याला टोचत राहावी, त्या सुखाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये, स्वस्थ वाटू नये, असं काहीतरी. . . .
कायम एक अस्वस्थपणा, एक विषण्णतेचा थर हलके हलके मनावर पसरत जावा.

थोडा वेळंच भळभळत राहणाऱ्या रक्ताच्या जखमेपेक्षा कायम मंदपणे स्त्रवत राहणारी, झिरपत राहणारी जणू एखादी जखम . . . .
ते झिरपणारं रक्त कधी थांबत नाही आणि म्हणून माणूस पूर्णपणे कधी बराच होत नाही.

आणि हे फक्त परततानाच झालं असं नाही, तर नंतर जेव्हा जेव्हा या किल्ल्याचे फोटो पाहिले, जेव्हा जेव्हा या किल्ल्याची, या राजाची, या गारुड करणाऱ्या वातावरणाची सय आली, किंवा अगदी आत्ताही हा लेख लिहिताना कायम असंच वाटत राहिलं आहे.

प्रचि- ६२ : बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया -०१

प्रचि- ६३ : बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया -०२

प्रचि- ६४: बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया- ०३

यानंतर आमच्या डे टुरवाल्या बसने आम्हाला सोडलं ते म्युनिकमधल्या एका बीअर हाॅल मध्ये.

प्रचि- ६५: बीअर हाॅल- ०१

प्रचि- ६६: बीअर हाॅल- ०२

प्रचि- ६७: बीअर हाॅल- ०३

हे सर्व आटपून म्युनिकमधल्या अपार्टमेंटमध्ये आलो. पण हा किल्ला काही पाठ सोडत नव्हता. आणि अजूनही त्याने माझी पाठ सोडलेली नाही. डिस्नेचा लोगो टी. व्ही. वर, थिएटर मध्ये आला कि हा किल्ला हटकून आठवतोच आठवतो.

या किल्ल्याबद्दल माझ्या काही अपुऱ्या इच्छा आहेत. काही स्वप्न आहेत. त्यापैकी काही म्हणजे:
o मावळतीच्या संध्या प्रकाशात हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o पौर्णिमेचा चंद्रप्रकाश सांडलेला हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o अमावास्येच्या ठार काळोखात जेव्हा आकाशात तारांगण नुसतं पेटलेलं असतं तेव्हा हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o सूर्योदयाच्या आधीपासूनच हळू हळू उजळत जाणाऱ्या प्राचीच्या वेळी/ त्या प्रकाशात सूर्योदयाच्या केशरी उजळत जाणाऱ्या प्रकाशात हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.

प्रचि -६८: पौर्णिमेच्या प्रकाशात उजळलेला किल्ला (प्रचि आंतरजालावरून साभार)

पण त्यापैकीही तमन्ना म्हणावी तर अशी कि :

मेरीच्या पुलाच्या अलीकडे किंवा पलीकडे कॅम्पिंगचा एक तंबू ठोकायचा. काही समानधर्मी किंवा प्रवासी वेडे मित्र सोबत घ्यायचे. रात्रीच्या Packed Food /Dinner ची काहीतरी सोय करायची.
रात्री जागं रहाण्यासाठी आणि रात्र जागवण्यासाठी गरमागरम चहा, कॉफीचे भलेमोठे थर्मासच्या थर्मास भरून ठेवायचे (पेय ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे Bw )
आणि जेव्हा भुरभुरता हिम वर्षाव होत असेल अशा ऋतूमध्ये सूर्यास्ताच्या आधीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर पर्यंतची एक रात्र हा परिकथेतला किल्ला बघत काढायची. . . .
जास्त मेरीच्या पुलावर, थोडीशी तंबूमध्ये. . . .

थंडी वाजू नये यासाठी सर्व जामानिमा चढवून चहा/कॉफीचे घुटके घेत संध्याकाळी स्पष्ट दिसणाऱ्या किल्ल्यापासून हळूहळू अस्पष्ट होत जाणाऱ्या आणि केवळ काळ्या बाह्यकृतीमध्ये (Silhouette)/ तिमिराकृतीमध्ये परावर्तित होणारा रात्रीचा किल्ला, त्याचे आकाशात शिरू पाहणारे टोकदार, उंच सुळक्यासारखे मनोरे पहात.
आता नांदता झाल्यामुळे काही ठराविक भागात उजेड असेल, एखाद्या गवाक्षातूनही पिवळसर मंद उजेड झिरपत असेल त्या मर्यादित प्रकाशात दिसणारं थोडंफार बाह्यरूप. . . .
आणि हे सारं त्या शिशिरातल्या हिमवृष्टीने न्हायलेल्या, माखलेल्या एक जिनसी आसमंतामध्ये…..
“हिम ल्यायलेला तो परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसल.”

डोळ्यावर फारच पेंग आली तर एखादी छोटीशी झोप काढायची त्या तंबूमध्ये. पण आपल्या डोळ्यांनीही तीच स्वप्न पाहायची जी त्या वेड्या, मनस्वी राजाने पाहिली होती. . . . .
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, प्रकाशाच्या/अंधाराच्या वेगवेगळ्या तीव्रतांमध्ये, वेगवेगळ्या छटांमध्ये तोच तो परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसल पाहायची. . . . . - पुन्हा पुन्हा. . . . . .
आणि जाग आल्यावर ब्रिजवर जाऊन तेच स्वप्न प्रत्यक्षात आणायचं. (डोळ्यांमध्येही तीच स्वप्नं भरून). अगदी उगवत्या प्रसन्न सूर्यप्रकाशात तो किल्ला दिसेपर्यंत…..

कदाचित तो वेडा, मनस्वी राजा त्या आसमंतामध्ये कुठेतरी असेलही, त्याच्या त्या स्वप्नाळू डोळ्यांसह, त्याचा नॉईश्वानस्टाईन कॅसल पहात.
आणि कदाचित खुशही होईल त्याच्याच सारखे काही वेडे पीर पाहून. . ..

आणि असाच आसुसून तो किल्ला, त्या वातावरणात, त्या पुलावरून पाहणं, विशेषतः रात्रभर; हीच त्या राजाला, त्याच्या स्वप्नदृष्टीला, त्याने साकारलेल्या स्वप्नाला, त्याने निर्मिलेल्या अजोड कलाकृतीला मानवंदना असेल.

शिशिरात, हिमवृष्टीत मी तिथे गेलो नसल्याने त्या ऋतूतली छायाचित्र माझ्याकडे नाहीत. पण तुमच्यासाठी हि काही आंतरजालावरून साभार. . .

प्रचि- ६९: शिशिरातील नॉईश्वानस्टाईन कॅसल ०१. मागे हिमाच्छादित आल्प्स शिखरे (आंतरजालावरून साभार)

So. . . . . . सध्या तरी तंबूमधली एकच जागा भरलीय . . . - माझी. . . .

आणि अजून जागा तर आहेतच.....

तेव्हा समानधर्मी, समव्यसनी माबोकरांनी हात वर करा, नंबर लावायला. . .

स मा प्त

 कृष्णबन

.

ब्लॅकफॉरेस्ट! नुसतं नावं घेतलं तरी डोळ्यासमोर येतो तो पांढर्‍याशुभ्र आयसिंगवर चॉकलेटचा चुरा आणि टप्पोरी चेरी लावलेला केक! ह्या केकचे बारसे जर्मनीतल्या प्रसिध्द श्वार्झवाल्ड अर्थात ब्लॅक फॉरेस्ट वरुन झाले.
उजव्या बाजूला र्‍हाइनचं खोरं आणि बोडनसे तर डाव्या बाजूला फ्रान्सची सीमा, पायथ्याशी स्वीस तर उशाला उरलेलं बाडेन व्युटेनबर्ग घेऊन १६० किमी लांब आणि ६० किमी रुंद असं साधारण आयताकृतीत अनेक टेकड्या आणि डोंगरांवर गर्द हिरवे पाइन्,थुजा,चिनारचे वृक्ष लेवून एन्झ, एल्झ, किन्झिग, डॅन्युब आणि अशा कितीतरी नद्यांना आपल्या अंगावर खेळवत ऐसपैस पसरलं आहे हे कृष्णवन! निसर्गाचा अगदी वरदहस्तच लाभलेल्या ह्या कृष्णवनात पाहण्याराहण्यासारखी अनेक ठिकाणं आणि गोष्टी आहेत. टिटिसे,श्लुकसे सारखी तिथली सुंदर सरोवरं, जर्मनीला सर्वात उंच धबधबा आणि जगातलं मोठ्ठं कुकु क्लॉक ही त्यातली अगदी न टाळता येण्यासारखीच!

शोनाख नावाचं अगदी लहानसं छोटुलं गाव ट्रिबेर्गला अगदी खेटून आहे तिथेच जगातलं पहिलं मोठ्ठं कुकुक्लॉक आहे आणि ट्रिबेर्गमध्येच जर्मनीतला सर्वात उंच धबधबा आहे. शोनाखबाखही तिथून लांब नाही.त्यामुळे ह्या वेळी आम्ही शोनाखच्या रिटाआजीच्या हॉटेलात रहायचे ठरवले. आम्ही तिकडे जायला निघणार त्याच्या आदल्या दिवशी रिटाआजीचा फोन,"तुम्ही किती वाजेपर्यंत याल साधारण? मला नेमके त्याच दिवशी दुपारी आजोबांना घेऊन दवाखान्यात जायचे आहे चेक अपसाठी.. तीन साडेतीनपर्यंत आम्ही येऊच परत पण आम्ही तिथे नसताना तुम्ही नेमके पोहोचलात तर गोंधळ होईल ना.. म्हणून विचारतेय."आम्ही संध्याकाळी पाच नंतरच पोहोचू म्हटल्यावर हुश्श झाले तिला.

.

फ्रांकफुर्ट हून ट्रिबेर्गला जायचं म्हणजे ए ५ वरून साधारण तीन साडेतीन तासात पोहोचतो आपण.एखादा कॉफीब्रेक घेतला तर अजून अर्धा तास जास्तीचा, आणि दुपारी ट्रॅफिकही नसतो फार, असा विचार करुन जेवणं झाल्यावर निघायचे ठरले. ऑटोबानवर आल्यावर गाडीने वेग घेतला आणि गाण्यांच्या ठेक्यानेही. बिडी जलायले पासून पांडेजींची सिटी वाजवून झाली, फेविकॉलने फोटो चिकटवून झाले आणि ओ वुमनिया पण वासेपूराहून आली. बाजूच्या लेनमधूनही भरधाव गाड्या जात होत्याच. हवा छान असल्याने मोटारबाइक्स वालेही ५/६ च्या गटाने स्वारीवर निघालेले दिसत होते.

.

कार्ल्सरुह सोडलं आणि दूरवर डोंगरमाळा दिसू लागल्या. ऑफेनबुर्गला पोहोचता पोहोचताच हिरवाई गडद झालेली जाणवू लागली. डोंगर जवळ आले. आपोआप हात सिडीप्लेअर कडे गेला आणि प्लेअरवरची गाणी बंद झाली. पण मनात मात्र वेगळं गाणं सुरू झालं होतं.किंझिग नदीच्या पुलावर असताना पुढे गाड्यांची रांगच लागलेली दिसली.गाडीचा वेग कमी केला तर पुढे मोटारसायकलच्या एका ग्रुपमधल्या कोणाला खूप लागलेलं होतं. अँब्युलन्स येऊन त्याला घेऊन जायच्या बेतात होती. त्याची बाकीची मित्रमंडळी आणि पोलिस यांची प्रश्नोत्तरं चालू होती. रस्ता अगदीच अरुंद होता त्यामुळे थांबण्याशिवाय पर्याय नव्हताच. खिडकीतून बाहेर पाहिलं की डोंगराच्या कुशीतली लाकडी घरं आणि माथ्यावरची दाट बनं.. दोन्ही साद घालू लागले. साधारण अर्ध्यापाऊण तासातच आपल्याला तिथेच पोहोचायचं आहे ह्या नादात तो ट्रॅफिकजामवरचा वैतागही किंझिग मध्ये बुडून गेला.

.

१०-१५ मिनिटात रस्ता परत सुरू झाला. गाडी ट्रिबेर्गकडे धावू लागली. 'शोनाखबाख'.. गावाच्या नावाची पाटी लागली आणि कुकु ओरडली इथेच आहे मी.. आणि ते भले मोठे घड्याळ जाताना अगदी रस्त्यातच उभ्या उभ्या भेटले. अगदी हात हलवून म्हणाले, सावकाश या उद्या गप्पा मारायला, आत्ता जा, त्या रिटाकडे जाऊन आराम करा.. अच्छा,बाय होईपर्यंत आमची गाडी बोगद्यात शिरली. पुढच्या १० मिनिटात आम्ही रिटाज् हॉटेलसमोर होतो. गाडी कुठे पार्क करुया ह्या विचारात असतानाच एक मध्यम उंचीची, जाडगेलीशी टुणटुणीत आज्जी बाहेर आली. हॉटेलच्या नावावरुन त्या आजीचं नाव आम्ही आपलं रिटाआजी ठरवून टाकलं होतं. तुमचीच वाट पाहत होते असं म्हणत, हसर्‍या चेहर्‍याने आमचं स्वागत करुन गाडी कुठे पार्क करायची हे दाखवून रुमच्या किल्ल्या घेऊन उत्साहात आमची खोली दाखवायला पुढे, जिना चढतानाही अखंड बडबडत होती ती. आजोबांचं चेक अप कसं वेळेत झालं. आम्ही कसे ४ वाजताच घरी परतलो. आता तुम्हाला किल्ल्या दिल्या की मी थोडावेळ व्यायाम करुन सोनाबाथ कसा आणि किती वेळ घेणार आहे. एक ना दोन..

आम्हाला थकवा असा नव्हताच. सहाच वाजले होते आणि उन्हाळ्यात नऊ वाजेपर्यंत लख्ख उजेड असतो त्यामुळे फ्रेश होऊन गावात एखादी चक्कर मारावी आणि जेऊन मग सावकाश हॉटेलला परत यायचं असं ठरवून आजीला इथल्या रेस्टॉरंटची माहिती विचारली तर त्यावरही एवढुश्या छोट्या गावात कशी ३/४ चांगली रेस्तराँ आहेत ह्या बद्दल प्रवचन देऊन मग तिने तिथे कसं जायचं हे ही सांगितले. खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि अहाहा.. एवढेच शब्द आले तोंडातून. जास्ती काही न बोलता थोड्याच वेळात आवरुन आम्ही गावचा फेरफटका मारायला बाहेर पडलो.

.

अगदी चिमुकलं गाव. टेकडीवर वसलेलं असल्यामुळे चढ उताराचेच रस्ते. चिमण्यातून निघणारा धूर आणि नवं तंत्रज्ञान अगदी सहज अंगावर खेळवणारी सोलार पॅनेल्स असलेली टुमदार घरं, घरासभोवतालची छोटीशी बाग, समोरच्या अंगणातलं शिस्तीत वाढवलेलं हिरवं लॉन, दाराशी सुबकपणे मांडून ठेवलेल्या कुंड्या, कुठे लाकडी ओंडक्याचाच लहानसा वाफा करुन त्यात लावलेली फुलं, तिथल्या झाडा, पानावर पसरलेली, कुंडीतल्या फुलांशी, अंगणातल्या गवताशी लडिवाळपणे खेळणारी संध्याकाळची उबदार सोनेरी उन्हं.. मन एव्हाना मोरपिस झालं होतं.

.

अशाच भारलेल्या अवस्थेत चालत असताना समोर एक लहानसे चर्च दिसले. आत शिरलो. बाहेरच्या वातावरणातली प्रसन्न शांतता आणि चर्चमधली स्पिरिच्युअल शांतता.. दोन्हीकडे तशीच समाधी लागली. दूरवर कोणाच्या तरी घड्याळातली कुकू ओरडली आणि आमच्या पोटातल्या कुकूंचेही कोरस साँग सुरू झाले. समोरच एक कॉफी शॉप होतं . तिथे लावलेली प्लमकेक आणि ब्लॅकफॉरेस्ट केकची लाळ गाळायला लावणारी चित्रे पाहून आधी कॉफी आणि केक खायचा बेत केला पण जर्मन वेळेने तो अगदीच हाणून पाडला. कॉफी शॉप सहालाच बंद झालं होतं. थोडं पुढे गेल्यावर एक पिझ्झेरिया दिसला. अजून काही शोधाशोध न करता तिथेच आम्ही आमच्या पोटातल्या कावळ्याकोकिळांना न्याय द्यायला आत शिरलो.
इतालिअन रोझ वाइनच्या संगतीने स्वादिष्ट पिझ्झा,पास्ता खाल्ल्यावर बेलीज् काफेची चव घोळवत, चांदणं अंगावर पांघरून घेत त्या निर्जन रस्त्यावरुन रमत गमत रिटाज् वर परतलो.

 

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच खोलीबाहेरच्या बाल्कनीत खुर्च्या टाकून कितीतरी वेळ समोरच्या त्या डोंगरमाळा निरखत राहिलो. उंच उंच घनदाट गर्द हिरवे सूचीपर्णी अरण्य लांबून अगदी काळेसावळे दिसत होते. आता अगदी पटलेच हे नाव कसे पडले ते! गर्द हिरव्या रंगात मिसळलेली सावली सारं रान सावळंकाळं करून टाकते आणि आकाशातून पाहताना तर ते अजूनच पटते.
.
आवरून मग नास्त्याच्या हॉलमध्ये आलो. रिटाआजी होतीच तिथे हवं नको पहायला आणि आजोबाही आले हातात कॉफीचा मोठ्ठा जग घेऊन.. म्युसली, दही,फळे, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेडचे, चीजचे प्रकार, अंडी,ज्यूस्, चहा, कॉफी असा साग्रसंगीत नास्ता चालू असताना तिला कुकु क्लॉककडे आणि धबधब्याकडे जायचा रस्ता विचारला. खाऊन होऊ दे तुमचं, मग निवांत बोलू, असं म्हणत ती दुसर्‍या टेबलावरच्या आजीआजोबांना कॉफी द्यायला गेली.

गाडी नका नेऊ, पार्किंगला तिकडे त्रासच असतो नेहमी, त्यात आणि आज शनिवार आहे.. ब्रेकफास्ट झाल्यावर आजीची टकळी सुरू झाली. आमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला आणि त्याची कॉपी आम्हाला दिली आणि म्हणाली हे दाखवून आता तुम्ही ह्या एरियात बस, रेल्वेने फिरू शकता. वेगळं तिकिट काढायची जरूर नाही. हॉटेलच्या समोरच बसस्टॉप आहे तो एव्हाना पाहिला असेलच तुम्ही, पण एवढी सुंदर हवा आहे आज आणि धबधबा काही फार लांब नाही, मोठ्ठं कुकु क्लॉकही त्याच वाटेवर आहे. फार तर दोन किमी तर असेल आणि अग, रस्ता इतका छान आहे. सोपा , उताराचा रस्ता आहे. अगदी नाकासमोर सरळ जायचं, कुठ्ठे वळायचं नाही,काही नाही. अजिबात दमायला होत नाही. तुम्ही चालतच जा. येताना मात्र बसने या, तेव्हा दिवसभराचे दमले,कंटाळले असाल ना.. असं आम्हाला जवळजवळ फर्मावलंच तिने.
.

.

आजीची आज्ञा शिरसावंद्य मानून समोर दिसणार्‍या बसस्टॉपकडे दुर्लक्ष करुन आम्ही चालायला सुरूवात केली. रस्त्याच्या कडेने असणार्‍या घरांच्या अंगणातल्या झोपाळ्यावर कुणी आजोबा मंद झुलत पेपर वाचत बसलेले दिसले तर दुसर्‍या एखाद्या अंगणात कॉफीपान चालू होते. एकंदरीत गावाचा दिवस नुकताच सुरू होत होता. हवा खरंच छान होती. उबदार किरणं बरी वाटत होती, अटकर बांध्याचा, नाजूक वळणांच्या रस्त्याच्या दोबाजूला उंच चिनार, पाईन चवर्‍या ढाळत होते. मध्येच येणारे काळेपांढरे चुकार ढग सावली देऊन जात होते. वेलीवेलींवर गुलाब फुलले होते. वाहनांचा कोलाहल नव्हता, हॉर्न्सचे आवाज नव्हते, फूटपाथवर फेरीवाले नव्हते कि भाजीवाले नव्हते. त्या शांततेला आमच्याच गप्पांचा त्रास होत असावा.

.

रिटाआजीने सांगितल्याप्रमाणे सरळ सरळ उतरत गेलो आणि एका ठिकाणी तिठा आला. आता कुठे जायचे? कुठे कसली पाटीही दिसेना. आता कुठे जायचे? एका अंगणात एक काकू कुंडीतली माती सारखी करत होत्या.त्यांना ट्रिबेर्गचा रस्ता विचारला. अगदी हातातले खुरपं बाजूला ठेवून कुंपणाच्या दाराशी येऊन त्यांनी कसं जायचं ते व्यवस्थित सांगितलं. आणि अगदी थोड्याच अंतरावर ते पहिलं मोठ्ठं कुकुक्स उअर आहे अशीही माहिती दिली. शोनाखबाख तर ट्रिबेर्गच्याही पुढे आहे, मग घड्याळ कसं इतक्यात लवकर येईल? आमचा उडालेला गोंधळ समजून ती हसली आणि म्हणाली, ते वेगळं घड्याळ.. ते सध्याचं सगळ्यात मोठं कुकु क्लॉक पण पहिलं मोठ्ठं कुकु क्लॉक शोनाख मध्येच आहे. आता दिसेलच की तुम्हाला थोडं पुढे गेलात की.. हे इथे तर आहे.. आम्ही पुढे कूच केलं. आपल्याकडच्या गावातल्या 'हे इथेच तर आहे...' सांगण्यात आणि ह्या काकूंच्या सांगण्यात भाषा सोडली तर काsही फरक नव्हता.बराच वेळ चालत होतो. दोन किमी इथेच झाले असावेत आणि ट्रिबेर्ग अजून कितीतरी लांब होतं. आता मध्येच कुठे बसही घेण्याजोगा रस्ता नव्हता. सगळी पायवाट होती.

.

थोडावेळ असेच पायवाटेवरुन चालल्यावर डाव्या बाजूला एकदम पाटी दिसली. "Die erste weltgrößte Kuckucksuhr " आणि शेजारीच पाचसहा पायर्‍या होत्या.,खाली छोटंसं कुकु क्लॉक्सचं दुकान होतं आणि मोठ्ठ्या कुकु क्लॉककडे जायला बाणही केलेला दिसला. आम्ही कुकु क्लॉकच्या मागच्या बाजूला उभे होतो. त्या बागेतल्या काकूंनी सांगितलेलं ते हेच घड्याळ असणार.. तरीच रिटाआजी म्हणाली होती, धबधब्याच्या वाटेवरच कुकुक्सउअर आहे ते.. आता लिंक लागली. आम्ही ते घड्याळ पहायला खाली उतरलो. १६८० मध्ये ट्रिबेर्गमध्ये कुकु क्लॉकचा जन्म झाला आणि अलिकडच्या शोनाखमध्ये जगातलं पहिलं मोठ्ठं कुकुक्लॉक तर पलिकडच्या शोनाखबाखमध्ये सध्याचं सर्वात मोठ्ठं कुकु क्लॉक! दोन्ही गावांमधल्या घड्याळांच्या मोठेपणातली चुरसही तेथे समजली. योसेफ डोल्ड नावाच्या घड्याळजीने दोन वर्षे खपून हे मोठ्ठं घड्याळ बनवलं. घड्याळ कसलं ? ३.६ मी लांब, १ मी रुंद आणि ३.१० मी ऊंच असं लहानसं घरच आहे ते. समोर छानसं हिरवळीचं अंगण,त्यात डोलणारी गवतफुलं, कलात्मकतेने मांडलेल्या कुंड्या, खिडक्यातून मांडलेली फुलांची आरास.. काय आणि किती बघू असं वाटत होतं. आतमध्ये चक्क कुकु घड्याळांचं दुकान आहे. छोटासा पोटमाळाही आहे त्याला पण तिथे कुकु राहते. त्यामुळे वर जाता येत नाही.

.

.
'घड्याळातले ऐका टोले.. ' म्हणत, बाहेर येणार्‍या कुकूला पाहून, कॅमेर्‍यात बंद करून नाइलाजाने तेथून पुढे निघालो. पुढे काही वेळ चालल्यानंतर एकदाची 'ट्रिबेर्ग' अशी पाटी दिसली. चला आलो आता गावात.. आता धबधबा कुठे विचारायचं आणि शोनाखबाखला कसं जायचं तेही.. पण पाय आणि पोट दोन्ही बोलायला लागले होते. त्यामुळे कार्टोफेल सुपं म्हणजे बटाट्याचे सूप आणि केझं स्पेटझलं ही चीज आणि न्यूडल्सची जर्मन खासियत खाण्यासाठी एका उपाहारगृहात शिरलो.

.

.
आता धबधबा, तो ही जर्मनीतला सर्वात उंच धबधबा बघायचा होता. आधीच धबधबा म्हटलं की कोसळत,धबाबा येणार्‍या पाण्याच्या धारा,तो पाण्याचा खळाळता आवाजच संमोहित करतो, इथे तर जर्मनीतला सगळ्यात उंच धबधबा पहायचा होता. १६३ मी. उंचीवरुन कोसळत तो गुटाख नदीकडे धाव घेतो. उत्साहाने आणि उत्सुकतेने आम्ही चालायला सुरूवात केली. थोडं पुढे गेल्यावर एका चौकात लाकडाची मोठ्ठी खारुताई ऐटीत शेंगा खाण्याच्या पोझमध्ये बसलेली दिसली आणि तिथेच थोडं पुढे धबधब्याकडे जाणारी मोठ्ठी पाटी दिसली. इथे मात्र बरीच चहलपहल जाणवली. आता लोकं दिसायला लागले होते. पाण्याचा खळाळता तो परिचित आवाज यायलाच लागला होता. एक चढण चढून वर गेलो आणि एका कोपर्‍यात अजून एक लाकडाची खारुताई तशाच ऐटीत बसलेली दिसली. समोरच तिकिटखिडकी. तिकिटांबरोबरच तिथे असलेल्या खारुताईंना खाऊ म्हणून भुइमुगाच्या शेंगाचे पुडे विक्रीला ठेवलेले होते, गंमत वाटली.

..
आत शिरता शिरताच खारुताईंची टोळीच दिसते. आता त्या लाकडी खारुतायांमागचं कारण समजलं. धबधब्यावर जवळजवळ रोजच खूप लोकं जातच असतात. त्यांना पाहून पाहून सगळ्या खारुताया माणसाळल्या असाव्यात. धीटपणे पुढे येऊन पायात शेंग पकडून खात होत्या बाईसाहेब. पण इथली खारुताई अंगापिंडाने जरा थोराडच असते ,शेपटी जरा जास्तच झुबकेदार.. आणि पाठीवर 'रामाची बोटंही' नसतात. चार शेंगा त्यांना घालून आम्ही चढायला सुरुवात केली. इथे चढणीचे दोन रस्ते आहेत. एक सोपा पण लांबचा , दुसरा कमी अंतराचा पण जास्त चढणीचा. आमच्या पुढेच असलेला आजीआजोबांच्या ग्रुपनेही कमी अंतराचा रस्ता निवडलेला पाहून आम्हीही त्यांच्या मागे चढायला सुरूवात केली.

..

.

पक्षांची किलबिल, खारींचा आवाज आणि खळाळत्या पाण्याचा आवाज, सगळे एकमेकात मिसळत होते. चढणीच्या बाजूने साधेनेचे, सिल्वरफर्न उगवलेले दिसत होते. पाइन ,चिनार आणि थुजा तर होतेच. सात टप्प्यात हा धबधबा कोसळतो आणि त्याच्या कोसळण्याच्या प्रत्येकच स्टेजला त्याला भेटायला लाकडी प्लॅटफॉर्म, व्हरांडे केलेले आहेत. तेथून त्याचे मनोरम दृश्य पाहताना खरंच हरखून जायला होते. त्याच्याशी अगदी गप्पा मारत आपण वरपर्यंत जातो. जोडीला सिल्व्हर फर्न, पाइनची हिरवाई असते आणि खारींचे,पक्षांचे आवाज सोबतीला असतातच. खाली उतरतानाही त्यांची सोबत असतेच आणि आपल्यासारखेच येणारे लोकंही हसून हॅलो करतात. एकमेकांचे फोटो काढायला उत्साहाने तयार असतात. आणि एकीकडे माहितीची देवाण घेवाणही होते. काही जणांच्या मते बेरेस्टेसगाडन ओबरसे येथला रोथबाखफाल हा जर्मनीतला सर्वात उंच धबधबा, तो तर ४७० मी वरुन कोसळतो आणि हा फक्त १६३ च मी वरून .. अधिक खोलात न शिरता इथला निसर्ग, त्याची सुंदरता निरखत बराच वेळ थांबलो. पण वेळेची मर्यादा होतीच. नाइलाजाने खाली उतरून आलो.

.

लगेचच पुढे गेले की समोरच्याच चौकात "Haus der 1000 Uhren" म्हणजेच "House of 1000 clocks" आहे. बाहेरच एक मोठेसे कुकु घड्याळ आहे आणि दुकानाच्या वर एक अस्वलबुवा पाठीवर दुरुस्तीचे घड्याळ घेऊन दोरावरुन चढतो आहे. एका टेबलावर एक घड्याळजी अस्वल चष्मा लावून दुरुस्तीचे काम करतो आहे, तर अस्वलीणबाई उभ्या राहून, हातवारे करत काहीतरी सांगत आहेत. शेजारच्या झोपाळ्यावर बेबी अस्वल दर १५ मिनिटांनी झोके घेते. ती झोके घ्यायला लागली की दोरावरचा मॅकेनिक घड्याळजी दोर चढू लागतो, शेजारच्या दोन मोठ्या खिडक्यातून कुकु डोकावतात आणि खालच्या मोठ्ठ्या घड्याळात सव्वा, साडे किवा पावणे.. वाजतात. जेव्हा तास पूर्ण होतो तेव्हा जितके वाजलेले असतील तितक्यांदा कुकु डोकावून ओरडतात. ते सगळं बघायला इतकी मजा येते. त्या घरासमोरच्या फूटपाथवर एक लहानशी कॉफीची टपरी आहे. छ्त्र्या वगैरे उभारुन, खुर्च्याही टाकल्या आहेत तिथे. मस्त कॉफी पित हा खेळ बघण्यात वेळेचे भान समोर घड्याळ असूनही राहत नाही. अजून १५ मिनिटे, अजून १५ मिनिटे असं करत आपण तेथेच खिळून राहतो.

.

दुकानाच्या आत शिरले की बाहेरच्या दुप्पट वेळ आत घालवतो. आतमध्ये तर सहस्त्र कुकुंचे आवर्तन चालू असते. आपल्या घराच्या भिंतीला आणि आपल्या खिशाला परवडेल असं कुकु क्लॉक घेतोच घेतो आणि मगच पुढे जातो. हे दुकान जिथे आहे तो ट्रिबेर्गचा मेन रोड! ह्याच्या आजूबाजूलाही कुकु क्लॉक्सची आणि लाकडी कारागिरीच्या शोभेच्या वस्तूंची, सुविनियरांची दुकाने आहेत. घनदाट जंगलांमुळे भरपूर लाकूड उपलब्ध आणि कडाक्याच्या, हाडे गोठवणार्‍या थंडीत घरात बसून दुसरं करता येण्यासारखं काय होतं? १७ व्या शतकातला हिवाळा इतका वाईट होता की कधी कधी त्या थंडीत गोठ्यातून घरापर्यंत आणताना दूधही गोठायचे. त्या काळात मनोरंजनाची साधनं तुटपुंजी, नुसते घरात बसून काय करणार? त्यामुळेच येथे लाकूडकामाचा व्यवसाय बहरला.

..

..
सन १६८० च्या आसपास एक काचव्यापार्‍याने झेकोस्लाव्हाकियातल्या बॉहमेन भागातून एक लाकडी घड्याळ आणले.त्याला लंबक नव्हता तर लाकडाचा तुकडा (त्याला 'वाग' म्हणत) घड्याळाच्या डायल वर पुढेमागे होत होता. घड्याळांचा व्यवसाय त्यावेळी ऐन बहरात होता.आपल्या व्यवसायात नाविन्य आणण्यासाठी ह्या नवीन प्रकारच्या घड्याळात कृष्णबनातल्या घड्याळजींनी अनेक सुधारणा केल्या. थंडीच्या दिवसात हे उअरश्लेपर्स घड्याळे बनवित आणि वसंतात ते विकायला देशोदेशी जात असत. सन १७३८ मध्ये म्हणजे जवळपास ५० वर्षांनंतर आंतोन केटरर ह्या घड्याळजीच्या कल्पक डोक्यात कुकुने कुहू केले आणि आजही तिचे कोकिळगान कृष्णबनातल्या घड्याळातून फक्त वसंतच नव्हे तर सर्व ऋतूंत चालू आहे.

पोटात ओरडणार्‍या कुकूंना शांत करण्यासाठी समोरच्याच उपाहारगृहात काफे उन्ड कुकन साठी आत शिरलो. एकीकडे पाण्याची खळखळ आणि कुकुगान ऐकत कृष्णबनात बसून ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री आणि कॉफी! आणखी काय हवं?

.

 

ह्याआधी:-
कृष्णबन- १
कृष्णबन- २
कृष्णबन- ३

.

हजारी घड्याळांच्या घरासमोरुन एक फुलराणीवजा गाडी जाताना दिसली. चौकशी केल्यावर समजले की ती ट्रिबेर्गदर्शनाची गाडी आहे. लगेचच तिच्या थांब्यावर पुढची फेरी कधी आहे ते पाहिले. दहाच मिनिटात पुढची गाडी असल्याचे वेळापत्रक दाखवत होते. त्या फुलराणीत बसल्यावर जर्मन आणि इंग्लिश दोन्ही भाषांतून काँमेटरी सुरू झाली. गावातून, डोंगरातल्या रस्त्यातून आमचा फेरफटका सुरू झाला. उतरत्या छपरांची लाकडी घरे, रंगीत फुलांच्या कुंड्यांनी सजवलेले व्हरांडे, हिरव्या पाचूच्या अंगणातले सुबक फुलवाफे तर एकीकडे उंच उंच डोंगरमाथ्यावर आकाशाला हात लावू पाहणार्‍या, सूर्याला पोहोचू न देणार्‍या पाईन,चिनारांची दाटी.. कय आणि किती पाहू असं झालं होतं. ट्रिबेर्ग रेल्वे स्टेशनाबाहेर आमची फुलराणी थांबली. गर्द बनातले अगदी चिमुकले स्टेशन, तेथे ठेवलेले जुने रेल इंजिन, आजूबाजूच्या हिरव्या डोंगरमाळा, त्यावरची लाल छपरांची घरे.. सगळेच विलोभनीय!

.

.

राट हाऊस म्हणजे टाऊन हॉलची टुमदार इमारत, त्यासमोरची फुलांची सजावट इतकी सुंदर आहे. इतक्या देखण्या सरकारी इमारती युरोपातच पहायला मिळतात. म्युनिकच्या राट हाऊसची इमारत फुलांनी सजलेली असते तर कलोनचे राटहाऊस मध्ययुगातल्या खुणा जपत असते तर फ्रांकफुर्टचे राटहाउस नेपोलियन एक रात्र राहिल्याचा इतिहास जपत असते तर ब्रुसेल्सच्या राट हाऊसच्या चौकात दर दोन वर्षांनी फुलांच्या गालिचाचा कुसुमोत्सव असतो

.

ट्रिबेर्ग दर्शन झाल्यानंतर मात्र शोनाखबाखला जायचे वेध लागले होते. रिटाज् मध्ये जो फॉर्म भरून दिला होता त्या पासावर ट्रिबेर्ग आणि आसपासच्या परिसरात बस, रेल्वेने आम्ही प्रवास करू शकत होतो. शोनाखबाखचे घड्याळ काल उभ्या उभ्या भेटले होते. आज शोनाखमधले पहिले मोठे कुकु घड्याळ पाहिले पण आता शोनाखबाखला जायचे होते. एका बाजूला शोनाखबाख तर दुसर्‍या बाजूला शोनाख आणि मध्ये ट्रिबेर्ग अशी ही गावे अगदी एकमेकांना लागूनच आहेत. येताना रस्ता माहित झाला होता. अगदी सरळ सरळ एकच रस्ता होता. फार तर ४- ५ किमी असेल. त्यातून शोनाखबाखचे हे घड्याळ तर अगदी हायवेवरच आहे. पुढे लगेचच मोठा बोगदा लागतो आणि ट्रिबेर्ग स्टेशनही येथून फार लांब नाही. जाता येताना गाडी थोडी आत घेऊन, थांबवून पाहता येईल असे. त्यामुळे येथे खूपदा गर्दी असतेच. आम्हाला तेथल्या कुकुलाही भेटायचे होतेच. तेथे पोहोचलो तेव्हा आजूबाजूला बरेच लोकंही होते. पण इथल्या निसर्गाचाच परिणाम की काय? कसलाच कलकलाट नव्हता. ह्या कुकुघड्याळाच्या शेजारीच मोठ्ठे कुकुक्लॉक्सचे दुकान आहे, तेथेही गर्दी दिसली. ह्या हायवेने थोडे पुढे गेले की येथेही देखणे हजारी घड्याळघर आहे. ते पाहण्यात आणि तेथल्या कुकुंचे सहस्त्रावर्तन ऐकण्यातही वेळ कसा जातो समजत नाही.

.

.

.

ब्लॅक फॉरेस्ट केक आणि कुकु घड्याळांबरोबरच कृष्णबनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली काचेवरची कारागिरी. इथले काचसामानही प्रसिध्द आहे. टेटेसे जवळच असलेल्या एका म्युझिअम वजा दुकानात ही काचेची शोभा पाहण्यासाठी गेलो. कटग्लास, ख्रिस्टलचे काचकामाचे अप्रतिम नमुने तेथे होते. वेगवेगळ्या पेयांसाठीचे पेले, निराळ्या आकाराचे बाऊल्स इतक्या सुंदरतेने मांडण्यांमध्ये रचून ठेवले होते. तेथे फिरताना चुकून आपला धक्का लागून एखादा पेला फुटला तर.. ह्या विचारानेच काचेशी फार सलगी न करता तेथून बाहेर पडलो.

.

कृष्णबनातलं अजून एक आकर्षण म्हणजे येथली सरोवरे. टेटेसे, श्लुकसे, श्ल्युष्टसे, फेल्डसे, मुमेलसे ही त्यातली काही मोजकी आणि महत्त्वाची. श्लुकसे हे ब्लॅकफॉरेस्ट मधलं सगळ्यात मोठ्ठं सरोवर तर श्ल्युष्टसे हे श्लुकसेच्या अगदीच जवळ असलेलं लहानसं तळं. ब्लॅकफॉरेस्ट मधला सगळ्यात मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं, पोटात अनेक दुर्मिळ पाणवनस्पतींना घेऊन नांदणारं फेल्डसे तर स्पा रिसॉर्ट मिरवणारं नखरेल टेटेसे.. सगळीच आपापलं निसर्गवैभव दिमाखात मिरवणारी. आम्ही टेटेसेचा नखरा आणि निसर्ग पहायचे ठरवले. टेटेसेच्या परिसरात केंपिंगप्लाट्झ म्हणजे कॅरावानसाठी किवा तंबू टाकण्यासाठी जागा आहेत. 'इथेच टाका तंबू..' म्हणत तिथे एक रात्र तरी थांबण्याचा मोह होतोच होतो.

.

.

.

समुद्रसपाटीपासून ८५० मी उंचीवर २ किमी लांब, १ किमी रुंद आणि ४० किमी खोल असलेला हिमयुगात जन्मलेला कृष्णबनातला हा निळा मोती! सरोवराच्या काठाने फिरताना त्या निळाईत, रानाची मिसळलेली हिरवाई पाहताना भान विसरायला होते हेच खरे. ह्या तळ्याकाकाठी तंबू टाकून चार दिवस राहण्याची मजा काही औरच! गाडीच्या टपावर आपलं होडगं बांधून आणायचं, नाहीतर येथे भाड्याने घ्यायचं आणि त्या निळाईवर एक ठिपका होऊन तरंगायचं. पण सगळ्यांनाच वेळेअभावी किवा साधनांअभावी ते शक्य होत नाही. म्हणून मग क्रूझ राइड तरी घ्यायचीच. वर निळंभोर आकाश, चहुबाजूला गर्द हिरवे, सावळेकाळे पाईन, मनात सुरू असलेलं गाणं... अजून काय हवं? आपली बोट तेथून बाहेर पडूच नये असं वाटत असताना बोट काठावर आल्याचा भोंगा वाजतो. परतीची वेळ जवळ आलेली असते पण ह्या कॄष्णबनात परत परत येणे होणारच असते.

.

(काही प्र. चित्रे जालावरून साभार)

 सुंदर वर्णन आणि फोटो. श्लुकसेचे (Schluchsee) अजुन काही फोटो.

.

.

तळ्याकाठाने धावणारी ट्रेन.
.

.

 

इये सुगंधाचिये नगरी!

.

र्‍हाइनच्या दोन्ही काठावर वसलेली युरोपातली एक महत्त्वाची नगरी म्हणजे क्योल्न! क्योल्न.. लॅटिनमधील कलोनिया म्हणजे कॉलोनी ह्या शब्दापासून आलेलं नांव क्योल्न! (कदाचित जिभेला जास्त व्यायाम नको म्हणून्)इंग्रज साहेबाने त्याचे कलोन असे बारसे केले. जर्मनीचे सांस्कृतिक,व्यापारी आणि दळणवळण केंद्र म्हणून अगदी सुरुवातीपासूनच सक्रिय असलेली ही महत्त्वाची नगरी!रोमन कालातही हिचं स्थान अग्रणी होतं. जर्मनीतली सर्वात जुनी युनिवर्सिटी क्योल्नचीच आणि जगप्रसिध्द एव्ह द कलोनचा जन्म इथेच झाला.इथली भाषा क्योल्श आणि इथली प्रसिध्द बिअरही क्योल्श!
.
फ्रांकफुर्ट ते क्योल्न हे अंतर १९१ किमी.गाडीने दोन तासात हे अंतर सहज पार होते पण आयसीइ ने म्हणजे जलद रेल्वेने मात्र तासाभरातच आपण कलोनला पोहोचतो. तासभर वाचण्यापेक्षाही रेल्वेने जाण्याचे आपुलकीचे कारण म्हणजे आमचे आकिम आजोबा!ह्या जलद रेलट्रॅकच्या बांधणीच्या टिममधले आमचे आकिम आजोबा हे एक इंजिनिअर आहेत. रेल्वेने किवा रस्त्याने क्योल्नच्या दिशेने प्रवास करत असतानाच आकाशाच्या पोटात घुसू पाहणारे दोन उंचच उंच कळस आपण जवळ आल्याची वर्दी देतातच. हेच ते सुप्रसिध्द क्योल्नर डोम अर्थात कलोन कॅथीड्रल!कलोनच्या आर्चबिशपची ही गादी! ह्या कॅथिड्रलच्या आवारात, अगदी अंगणातच रेल्वे स्टेशन आहे असं म्हणता येईल.

.

अतिशय भव्य असं हे कॅथिड्रल बांधणं कित्येक शतकं चाललं होतं.इस.१२७८ मध्ये सुरू झालेलं बांधकाम साधारण १४७३ च्या सुमाराला थांबलं. लोकांचा ह्या डोममधला रस आणि पेशन्स संपत चालला होता. ते तसंच अर्धवट कित्येक वर्षे राहिलं आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीला परत काम सुरू झालं आणि शेवटी १८८० मध्ये मूळ नकाशानुसारच पूर्णत्वाला नेलं आणि लवकरच युरोपातलं एक मोठ्ठं आणि महत्त्वाचं स्थान त्याला मिळालं. स्पेनमधील सिव्हेले आणि इटालीतील मिलान येथील कॅथिड्रल नंतर भव्यपणात ह्याचाच नंबर लागतो. ह्या डोमच्या चारही बाजूनी दगडी पायर्‍यांवरुन चढून मुख्य द्वारापर्यंत पोहोचता येते. आत प्रवेश करायच्या आधीच नजरेत भरते ते समोरचे भव्य प्रांगण आणि मुख्य भव्य द्वाराबाहेरची आणि द्वारावरची कलाकुसर आणि ठिकठिकाणी असलेले पुतळे!प्रवेशदारावर थोडे उंचावर असलेले अनेक ऑपोस्टल्सचे पुतळे जणू आपल्याला आशीर्वच देण्यासाठीच आहेत असे वाटते.आत शिरले की जाणवते ती भव्य शांतता! हो, तेथल्या भव्यतेसारखीच तिथली शांततही भव्य वाटते. इतकी चच्र्,कथीड्रलं पाहिली.. पण अशी भव्य शांतता क्वचित कुठे आढळली. अगदी व्हॅटिकन,रोम आणि अगदी पॅरिसमधल्या नॉट्रादॅममध्येही मला असा फिल आला नाही.
.
आत शिरताच दिसते ती एकेका कोपर्‍यातली मेणबत्त्यांची आरास. चहूबाजूच्या कोपर्‍यांतून एकेक संताचा किवा मेरीमातेचा पुतळा आणि त्याच्यासमोर भक्तांनी गार्‍हाणी घालण्यासाठी, अर्चने,प्रार्थनेसाठी केलेली मेणबत्त्यांची आरास त्या भव्य शांतपणात भर घालत असते. सगळीकडे काचेची तावदाने आणि त्यातील काचांवर बायबल आणि ग्रीक पुराणातले चित्रित केलेले प्रसंग दिसतात. सूर्यप्रकाश त्या रंगीत काचातून गाळून आत येतो आणि काचा प्रकाशमान होतानाच काचांवरची चित्रे सजीव झाल्यासारखी भासतात. ह्या डोममध्येच तीन राजांचे अवशेष जपणारे चांदी सोने आणि तांब्यावरती कलाकुसर केलेले निकोलस ऑफ वेर्दुन ह्या फ्रेंच सोनाराने बनवलेले श्राइन आहे.ह्या श्राइनवर अपोस्टल्स आणि ख्रिस्तपुराणातले अनेक प्रसंग कोरले आहेत. तेथे असलेला ओकच्या लाकडातला कोरलेला ख्रिस्ताचा पुतळा, गेरो द ग्रेट ह्या कलोनचा अर्चबिशपला मानाचा मुजरा म्हणून गेरो क्रॉस नावाने ओळखला जातो.

ह्याच डोमच्या कळसावर जाण्यासाठी ५०० च्या वर ,अगदी नेमकंच सांगायचं तर ५०९ दगडी पायर्‍या आहेत. त्या चढून वर गेले की कलोन शहराचे विहंगम विलोभनीय दृश्य पाहताना सारा थकवा दूर होतो.

कथीड्रल मधून बाहेरच्या प्रांगणात आलं की समोरच कलोन दर्शनाच्या वेगवेगळ्या गाड्यांचा बोर्ड दिसतो. हॉप ऑन हॉप ऑफ बस ,किवा आपल्या फुलराणीसारख्या शोकोलाडं एक्सप्रेस म्हणजे चॉकलेट एक्सप्रेस किवा झू एक्सप्रेस हवे ते तिकिट काढून घेऊन कलोनचा फेरफटका मारता येतो किवा सरळ हातात कलोनचा नकाशा घेऊन भटकता येतं. कलोनचे रस्ते अगदी आखीव रेखीव आहेत आणि डोमचे कळस तर कुठूनही दिसतातच, त्यामुळे चुकायची भीती नाहीच. पण हाताशी वेळ कमी असेल तर मात्र बस किवा फुलराणी घेणे सोयीचे होते. क्योल्नर डोम व्यतिरिक्त सेंट मार्टिन चर्च, होली ट्रिनिटी चर्च, संत सेव्हरिनची बॅसिलिका अशी महत्त्वाची धार्मिक स्थळं आहेत पण ह्या सर्वात वलयांकित आहे ते क्योल्नर डोमच!
.
.

.

पुरातन कलोनला मजबूत वेस होती आणि तिला १२ प्रवेशदरवाजे होते. आजही त्यातले तीन सुस्थितीत आहेत. १२व्या शतकातला टाऊन हॉल हा आजही वापरात असलेला कलोनचा टाऊन हॉल हा जर्मनीतलासगळ्यात जुना टाऊन हॉल आहे. कलोनमध्ये ३० च्या वर संग्रहालये आहेत त्यातील सिटी म्युझिअम हे एक महत्त्वाचं म्युझिअम!प्राचीन कलोनचे देखणे मॉडेल येथे ठेवले आहेच पण दुसर्‍या महायुध्दानंतर ९५% बेचिराग झालेल्या कलोनचं चित्रंही येथे दिसते आणि नकळत आपणही इतिहासाचे पान पालटत मागे जातो.
.
ह्या इतिहासातून आपल्याला वर्तमानात आणते ते चॉकलेट म्युझिअम! येथे जाताना चॉकलेट एक्सप्रेसने किवा कथीड्रलच्या मागच्या बाजूने नदीकाठावर उतरुन सरळ सरळ चालत जायचं. अगदी नदीतच काचेचा जास्त वापर करुन एखाद्या जहाजाच्या आकाराचे हे म्युझिअम बांधले आहे.देवाचे पेय असलेल्या चॉकलेटच्या उगमापासून ते पार आजच्या आधुनिक पध्दतींपर्यंतचा सारा इतिहास येथे आपल्याला पहायला मिळतो. चॉकलेटे बनावायचे पूर्वीचे साचे आणि आताची यंत्रेही तेथे आहेत. कोको दळण्यापासून ते चॉकलेट तयार होईपर्यंतची सारी यंत्रे कशी काम करतात हे चित्ररुपाने, मॉडेल्स रुपानदापहायला ठेवले आहे. कोको, कॉफी, व्हॅनिलाची झाडे तेथे हरितगृहात वाढवली आहेत.कोकोच्या बियांपासून ते पार चॉकलेटची वडी होईपर्यंतचा प्रवास पाहताना अगदी आरे मिल्क कॉलनीतली शाळेची ट्रीप आठवतेच. चॉकलेटच्या मोठ्ठ्या कारंज्यासमोर वॅफेलवर ओतून दिलेले चॉकलेट सॉस खाताना सगळे आपली वयं विसरतात. खिसे हलके आणि पिशव्या जड करुन तेथून निघायचे. अगदी नाकासमोर सरळ चालत गेले की कलोनचे कॅथिड्र्ल दिसते. नदीच्या पाण्यात पाय बुडवून ध्यान लावून बसलेल्या साधूसारखं..
.

.

.

कॅथेड्रल पासून १० एक मिनिटाच्या अंतरावर ग्लोकनगासं ४ ह्या रस्त्यावर एव्ह द कलोनचे मुख्यालय आहे. हेच ते सुप्रसिध्द ४७११ हाउस. इथेच कलोनवॉटरने पहिले ट्यां केले.. आणि त्याचा सगळा इतिहास त्या घरात अगदी निगुतीने जपला आहे. १८ व्या शतकात योहान मारिया फारिना ह्या कलोन मध्ये राहणार्‍या,मूळ इटालियन असणार्‍या गंधवेड्याने हा सुगंध तयार केला आणि त्याला नाव दिले एव्ह द कलोन म्हणजेच कलोनचे पाणी!
.

.

त्या काळात एलिट सोसायटीत फ्रेंच जास्त बोलले जात असे त्यामुळे फारिनाने आपल्या ह्या सुगंधी निर्मितीचे नाव फ्रेंच ठेवले असावे.क्योल्नवर थोडा फ्रेंच प्रभाव आहेच आणि नेपोलियनच्या सैन्याने कलोन काबीज केले होते आणि अनेक वर्षे ते फ्रेंचाच्या ताब्यात होते. ह्या क्योल्निश वासर म्हणजेच कलोनच्या पाण्याने कलोन शहराची कीर्ति जगभर नेली.फरिना २५ नोव्हेंबर १७६६ मध्ये सुगंधात विलिन होऊन गेला पण आजही त्याची आठवी पिढी हे गंधाचं देणं जगाला देत आहे. ह्या सुगंधाने मोहून गेली नाही अशी व्यक्ती विरळाच! ह्या आधीचे पोप बेनेडिक्ट १४ ह्यांनी स्वत:साठी स्पेशल कस्ट्म मेड कलोनची खास मागणी केली होती. त्या घराजवळ जात असतानाच तो परिचित सुगंध जाणवू लागतो. आत शिरताच तो दरवळ मन प्रसन्न करतो. आत शिरताच एका तोटीतून सतत वाहत राहणारे ,सुगंधाची उधळण करणारे एव्ह द कलोन आहे.तेथील मांडण्यांमध्ये एव्ह द कलोनचे वेगवेगळे प्रकार, स्प्रे,साबण, टिश्यू विक्रीसाठी सुबकपणे रचून ठेवले आहेत.कोपर्‍यातला जिना चढून वर गेले की तेथल्या गॅलरीत एव्ह द कलोनला वेळोवेळी मिळालेली पदके, बक्षिसे, मानपत्रे आहेतच पण वेगवेगळी जुन्यानव्या काळातली चित्रे आहेत, जुन्या काळातल्या एव्ह द कलोनच्या कुप्या ,बाटल्या कलात्मकरीत्या मांडून ठेवल्या आहेत.
.
.
.
सगळीकडे तो परिचित गंध दरवळलेला असतोच.तो गंध मनात मनसोक्त भरुन घेऊन मगच तिथून बाहेर पडायचे आणि सार्‍या कलोनचाच दरवळ मनात ठेवून गाडीकडे कूच करायचे.

(काही प्र.चित्रे जालावरून साभार)

भ्रमण जर्मनी.. ००

भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
भ्रमण जर्मनी.. ०४ - कलोन
--------------------------------------------------------------------------

जर्मनी..

BMW,फोक्सवॅगन, 'मर्सी' वाली जर्मनी..
FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..

ब्लॅक फॉरेस्ट,हॅमबर्ग, कूकू क्लॉक'वाली जर्मनी..
रोमँटीक रोडवरच्या वॉक वाली जर्मनी..

बर्लीन, फ्रँकफर्ट, म्युनीक 'ओक्टोबर्-फेस्ट' म्हणजे जर्मनी..
जगात भारी अशी, 'बियर अ‍ॅट इट्स बेस्ट' म्हणजे जर्मनी..

हिटलर, नाझी,अन महायुद्धातली 'आग' म्हणजे जर्मनी..
राख...., पुन्हा पेटलेला 'चिराग' म्हणजे जर्मनी..

Exhibitions , ख्रिसमस मार्केटच्या 'धूम' वाली जर्मनी..
टेक्नॉलॉजीकल, इकॉनॉमीकल 'बूम' म्हणजे जर्मनी..

(बास आता.. न्हाईतर तेल हितच संपायचं.. :D )

तर...
ऑन-साईट जाणं (आम्हा बिगर ऐटीवाल्यांच्या) नशीबात नाही, आणी स्वखर्चाने परदेशी जायची (अजुनतरी) ऐपत नाही..

४-५ वर्ष चांगली 'घासवून' घेतल्यावर आमच्या सायबाला थोSSडी दया आली आणी म्हणाला,
"जा पोरांनो.. करा मज्जा.."
महिनाभर जर्मनीचा पोग्राम ठरला. आणी पहिल्यावहिल्या परदेशगमनाची तयारी चालु झाली. पुन्ह्यांदा 'अपुर्वाई' वाचुन काढलं..
पोटातले कावळे जादा ओरडाय लागले तर त्यांच्यापुरती कामाला येईल एवढी पाककला शिकुन घेतली. तशी भुक लागल्यास दिसलं ते खायची तयारी होतीच म्हणा.. MTR चे रेडी-टू-कुक, मॅगीची २५-३० पाकीटे, १ कुकर, प्रती-डोकी ४-५ किलो तांदुळ, ३ जीन्स, ५-६ टी-शर्ट यांनी बॅगा भरल्या..
१००० युरो कॅश आणी १००० चे डेबिट कार्ड थॉमस कुक कडुन घेतले.

९ जुन २०१३. पहाटे ५.५५ ची फ्लाईट. टर्कीश एअरलाईन (सस्तातली)
न्युरेंबर्गला जायचं होतं. तिथं वैशाख वणवा चालु होता. मुंबई-इस्तांबुल-न्युरेंबर्ग असा प्रवास होता.

भारतातल्या ४ टोकाची ४ टाळकी मुंबईत जमली.
दिल्लीवाला म्हणाला, "याSSर.. ऑक्टोबरफेस्ट मै जाना चाहिए था याSSर.."
म्या म्हटलं.. "फुकटात मिळालय.. गोड मानुन घे बाबा.."
युरोप पहायला मिळणार याची उत्सुकता होतीच.. टिवल्या-बावल्या करत, सौंदर्य न्याहाळत ;) प्रवास चालु झाला..

मुंबई ते टर्की ७ तास लागले. जाताना 'गॉड मस्ट बी क्रेझी' पाह्यला. विमान इस्तांबुलला पोहोचलं..
आणी आहाहा.. युरोपचं पहिलं दर्शन घडलं..
१.
1 (2)

२.
1 (1)

टर्कीला trans-continental country (आशीया+युरोप) म्हणतात. समुद्रकाठचं इस्ताम्बुल पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं..
३ तास वेटींग टाईम होता. पेश्शल टर्कीश डिलाइट Lokum ची टेस्ट घेतली. कुणाकडेच 'चांगला' म्हणावा असा कॅमेरा नव्हता, पण तरी दिस्सल त्याचे फोटो काढायचं काम चालु होतं.
संध्याकाळी ७ ला न्युरेंबर्गला पोहोचलो. घड्याळं (अर्थातच मोबाईलमधली) साडे-तीन तास मागे सरकवली..
आणी विमानतळाबाहेर पाय ठेवताच.. श्वास घेताच.. 'तो' feeeeeel आला..
जर्मन कलीग रिसिव्ह करायला आला होता.. आज 'आवडी'त बसायची हौस पुर्ण झाली. सुरुवात चांगली झाली :) ..
-------------------------------
क्रमश:

म्युनिक

 

जर्मन कलीग रिसिव्ह करायला आला होता.. आज 'आवडी'त बसायची हौस पुर्ण झाली. सुरुवात चांगली झाली.

पुढे..

थोड्या वेळामागे पाउस झाला होता. 'क्षणात येते सरसर शिरवे…' टाईप वातावरण होते. तशी हिरवळ तर वर्षभर असतेच म्हणा..
थोड्याच वेळात कुकरच्या शिट्ट्यांनी हॉटेल Maximilian दणाणून गेले. मसालेभाताच्या आणी पंजाबी तडक्याच्या घमघमाटाने Nuremberg चा Gostenhof परिसर दरवळून गेला. जेवल्यावर मस्त झोप लागली.
पहाटे ४.३० ला सूर्योदय, अन रात्री ९.३० ला सुर्यास्त व्हायचा. त्यानंतरही प्रकाश असायचाच. म्हणजे १७-१८ तासांचा दिवस. सहीच ना?.
सोमवारपासुन ऑफिसची गडबड सुरु झाली. आठवड्याचा Travel पास २१ युरो मध्ये होता. महत्वाचं म्हणजे हाच पास कोणत्याही लोकल-बस, ट्राम, मेट्रोला चालतो.
लगेच दुसर्‍याच दिवशी जाम उकडायला लागले होते. आणी प्रॉब्लेम असा होता, की हॉटेलात किंवा ऑफिसमध्ये 'हिटर' तर होते, पण AC किंवा Fan यातले कुठेच, काहीच नव्हतं. जर्मन लोक्स 'समर' एन्जोय करत होते. पण आम्हाला ३०-३२ डिग्रीत कासावीस व्हायला लागलं होतं. Room service ला फोन करून AC ची व्यवस्था करायला सांगितलं, पण त्यांनी चक्क नकार दिला. आम्ही चौघेही अगदी तिसर्‍या महायुद्धाच्या तयारीत रिसेप्शनवर जाऊन धडकलो. पण तिथल्या सुबक ठेंगण्या बघताच आम्ही शरणागती पत्करली. दोघीतली १ सु.ठें. बाजूलाच कळफलक बडवत होती. दुसरीने आमची समस्या ऐकून घेतली आणी "२ मिनिट" म्हणुन ती फोनवर व्यस्त झाली.
आता आमचा बेंगॉली बाबू वैतगलाच. तीला उद्देशुन हिंदीतच म्हणाला, "साला एक तो तेरी ये जर्मनी इतनी गरम.. और उपरसे तू इतनी गरम.. चोलबे ना.."
आम्ही लगेच "ख्या..ख्या..ख्या.."
तेवढ्यात कळफलकवाली समोर येत म्हणाली "We have arranged table fan in your room"
अक्सेंट ओळखीचा वाटला, चौघांच्याही माना सिंक्रोनाईझ होउन तीच्याकडे वळल्या. अरे ही तर आपल्यातलीच..
नेमप्लेट-"दिव्याराणी".. गरमी अजुनच वाढली.
ऊ तेरी.. ये तो सब समझती है यार..
आम्ही फक्त Danke म्हणालो आणी कलटी मारली. (थॅन्क्यु)
च्यायला हे इंडियन्स ना.. कुठेही भेटतात. ;)

१ चित्र हजार शब्द बोलून जातं म्हणे.. तर तिथला Summer काहीसा असा होता..

DSC01901

पहिला विकेंड - म्युनिक.
'न्युरेम्बर्ग' दक्षिण जर्मनीत आहे. या भागाला 'बवेरीया' म्हणतात. बवेरीयान स्टेटची राजधानी 'म्युनिक'चा दौरा ठरला. म्युनिकला जर्मन्स 'München- म्युन्शेन' म्हणतात. ऑक्टोबर्-फेस्ट इथे म्युनिकमधेच असतो.
४२ युरोत ५ जणांचा विकेंड पास मिळतो. रात्री १२ पासुन २१ तास पुढे जर्मनीत कुठेही ट्रेनने फिरता येते. युरोपात एकंदरीतच कनेक्टीव्हिटी उत्तम.ट्रेनचा प्रवास अत्युत्तम..
1.जाताना मस्त हिरवेगार नजारे, चर्च, आणी अशी घरे दिसत होती. या घरांवर खापर्‍यांऐवजी सोलार पॅनल आहे. व्हॉट अ‍ॅन ऐडीया सरजी..

DSC01779

2. म्युनिकमधे फिरायला आम्ही हा ऑप्शन सेलेक्ट केला.२० युरोत एका दिवसाचा पास होता. याला Hop-on-hop-off बस म्हणतात. अशा दिसणार्‍या कुठल्याही बसमधे कुठेही hop-on- कुठेही hop-off व्हा.

DSC01825

बाल्कनीत बसुन म्युनीक बघायची मजाच काही और..

DSC05477

हे पहा..

DSC01806

3. दुसरा ऑप्शन हा होता.. यांना सेगवे टुर्स म्हणतात. गावभर या मुंग्यांची रांग असते. मोटर बसविलेल्या, बॅटरीवर चालणार्‍या या गाड्या. आजकाल दिल्लीत पण हे चालु आहे असं ऐकलंय..

DSC01807

4. पण एक समजत नव्हतं.. स्साला, एवढी गर्दी का आहे? माणसंच्-माणसं चोहीकडे होती. असं वाटत होतं की, ज्योतीबाची जत्राच भरलीय.. सगळीकडे गाणी, बॅन्ड, नाच, धिंगाणा अन बियरचा तर महापूर..

DSC01837

शेवटी एकाला पकडुन विचारलंच, "काय रे बाबा.. का एवढी गर्दी ?"
तेंव्हा समजलं.. म्युनीक वॉज सेलेब्रेटींग इट्स 855th बर्थडे.
१५-१६ जुन.
काय भाग्य.. काय भाग्य.. गेल्या जन्मीचं पुण्य मोठं, म्हणुन म्युनिकचा 'बर्डे' साजरा करायला मिळाला..

५. एका परफॉर्मन्समधे 'बॉन्ड थिम' ऐकण्यात गुंतलेली चिमुरडी-

DSC01841

6. चौकात बियरची व्यवस्था अशा झोपड्यांत करण्यात आली होती.. खायची प्यायची चंगळ होती.

IMG_3638

7. Angle of peace- इ.स. १८७० च्या फ्रॅन्को-जर्मन युद्धानंतर हे उभारण्यात आलं होतं.

DSC01867

8. एक चर्च-

DSC01826

DSC01847

IMG_3658

9. जवळच्याच एका होटेलबाहेर हे कुत्रं बांधलं होतं.

P1010404

German Shepherd तर फेमस आहेतच. जर्मनीत एखाद्या शिंगराएवढी (शिंगरु) कुत्री पहायला मिळाली.
तिथला प्रत्येक भिकारी १-२ कुत्री पाळतो. बेघर, की ज्याच्याकडे ते कुत्रं पाळण्याचा परवाना आहे त्यांना सरकार भत्ता देते असे समजले. ते काहिही असेल,पण त्या बिचार्‍या माणसाकडे आपलं असं, जीव लावणारं कुणीतरी आहे ना.. बास झालं..

10. मेरीयनप्लाट्झ. Marienplatz- इथे सर्वात जुना चौक आहे. सेंट मेरी'ज/ ओल्ड लेडी'ज चौक. सायकल रिक्षा सुद्धा मिळतात इथे..

DSC01907

11. बवेरीयन नॅशनल मुझीयम-

DSC01862

12. लुडविग-I

DSC01829

13. जर्मन पारंपारीक वेशभूषेतले आजी-आजोबा

DSC01925

14. आणी या पारंपारीक पोरीला 'फोटु काढु का?' म्हणताच लगेच मॅडमने ही पोज दिली..

DSC05464

15. कदाचीत फेस्टिवलमुळे जागोजागी असले जिवंत पुतळे दिसत होते.. आणी मागे 'जत्रा'..

DSC01926

16. आणी रस्त्यांवर सुद्धा कला बहरली होती. यातला पहिलं चित्र ज्या कॅसलचं आहे, तो Neuschwanstein castle आमचं पुढचं टारगेट ठरलं. जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल आहे हा..

DSC01931

17. Nymphenburg Palace- बवेरीयन राजांचं गतवैभव. मोठं पॅलेस आहे.. १६६४ ला बांधण्यात आलं होतं.
वेळ अपुरा पडल्याने जास्त पाहता नाही आलं.

DSC05489

18. त्यावेळेस एक राजेशाही लग्न चालु होतं. त्यांची गाडी-

DSC05482

19. ऑलिंपिक स्टेडियम- इथे १९७२ चे आयोजन झाले होते. इथेच एक अ‍ॅक्वेरीयम पण आहे. BMW village च्या अगदी जवळ आहे हे.

DSC05549

20. BMW Headquarters- अप्रतीम.
'बालाजी मोटर वर्क्स' नाही हां.. बवेरीयन मोटर वर्क्स. जगातल्या काही ३-४ लिडिंग कार्सपैकी एक..

DSC05541

21. या इमारती समोरच त्यांच्या 'कार' आणी 'बाईक्स' शो साठी ठेवल्या आहेत. मी BMW च्या 'बायका' पहिल्यांदाच पाह्यल्या.

शोरुम मधील Phantom car-

DSC05532

22. BMW, फोक्स्वॅगन, 'मर्सी'वाली जर्मनी.. फरारी, पोर्श, लॅबोर्गिनी.. सगळ्या डोळं भर्रुन बघितल्या..
DSC01832..P1010418
DSC01823

यातली एखादी घ्यायचा विचार केला होता.. पण यांचा ग्राउंड क्लियरंस एवढा कमी होता की पुण्यात चालणार नाहीत म्हणुन..
नाहीतर असल्या बाबतीत मी खर्च करायला मागे-पुढे बघतच नाही.. होऊ दे खर्च. ;)

23. FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..
Allianz Arena football stadium. (हे एकच चित्र जालावरुन साभार)

alnz

24.घरी/शेजारी फोटु दावताना म्हटलं, बघा किती स्वच्छ आहे पाणी.. तुमच्यासारखं निर्माल्य टाकत नाहीत ते लोक..
तर बायकांचं उत्तर- "असायचंच.... देवाला फुलं वाहुन माहित आहे काय त्यांना??"
बायका रॉक.. SYG shox..

DSC01864

25. लास्ट बट नॉट द लिस्ट..
आपल्याकडे ट्रॅक्टरचा उपयोग माल वाहुन न्यायला करतात. आणी जर्मनीत पण?? :D

P1010476

या मुलींनी नुसता उच्छाद मांडला होता.. एका म्हातार्‍याला 'बकरा' करुन छुपं व्हिडिओ शूटींग चाललं होतं.

 

म्युनिकचे अजुन काही फोटु..

DSC01830

DSC01860

DSC01815

DSC01891

DSC01904

DSC05548

 संपूर्ण बवेरीया मध्ये एक लिटर ची बियर ग्लासात मिळते.
त्याला मास असे म्हणतात
आइन मास
म्हणजे एक मास म्हटले की हा एकच प्याला दिला जातो.
आणि तुम्ही इथे म्हणून ज्या मधुशाळेची लिंक दिली आहे तेथेच तुम्ही पुढे लिहिले आहे त्या प्रमाणे हिटलर ने प्रयत्न केला होता , आमचे तेथे महिन्यातून दोनदा तरी जाणे होते.
खूप दिवसांनी जर्मनी बद्दल लेख वाचून बरे वाटले.
माझ्या आख्यानाची आठवण झाली ,
आधी माहिती असते तर एका दिवसात म्युनिक ह्या सदराखाली अजून पाहण्यासारखे बरेच सुचवता आले असते ,
म्युनिक व आजू बाजूचा परिसर पाहण्यासाठी किमान ३
दिवस हवेत
येथे मेरियान प्लाट चा उल्लेख झालेला वाचला.
येथे एक गंमत पाहायची एक सुवर्णसंधी दडवल्या गेली.
ह्याचे वाईट वाटले.
तेथे दुपारी व संध्याकाळी ५ वाचता ह्यात पाहत आहोत तशी तोबा गर्दी असते कारण मग घंटेचा नाद सुरु होतो ,Glockenspiel
क्लॉक टोवर च्या वरील बाहुल्या फिरायला लागतात.
वर्षाच्या बारा महिने हे दृश्य ह्या ठिकाणी ह्यावेळेला असते.
म्युनिक म्हणजे दुसरे पुणे , आपल्या शहराच्या परंपरा ,प्रथा ह्यांचा जाज्वल्य अभिमान त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतो , अश्या बर्याच गमती जमती ह्या शहराबद्दल आहेत , युरोपातील पहिल्या ३ नात येणार सौना बाथ येथे आहे ,त्यावर लिहिले तर एक लेखाची जिलबी नक्की पडेल. त्या बद्दल परत कधीतरी फुरसतीत
लिहीन.

 

साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)

 

आपल्याकडे ट्रॅक्टरचा उपयोग माल वाहुन न्यायला करतात. आणी जर्मनीत पण??
पुढे-
वेळ पाळण्याच्या बाबतीत सगळेच काटेकोर होते. एखाद्या वेळेस जर काही चुकलेच तर, 'आपणच चुकीचे असू' असे ठरवावे, इतकी परफेक्ट सिस्टीम. पण...
म्युनीक ते न्युरेम्बर्गची ट्रेन काही कारणाने आलीच नाही. मग स्टेशन मास्तराने सांगीतले की, ज्यांचे आरक्षण आहे त्यांनी एकतर तासभर वाट पाहावी किंवा दुसर्‍या एका ट्रेनमधुन म्युनीकला जावे. दुसरी ट्रेन १० मिनीटातच होती. त्यामुळे
२ ट्रेनचं पब्लीक एका ट्रेनमधे जायला फलाटावर गोळा झालं. इतकी गर्दी झाली की छ.शि.ट.वर असल्यासारखे वाटत होते. आमचे आरक्षण नसल्याने जागा 'पकडायची' होती. त्या दिवशी आमच्या सुप्त गुणांना जर्मनीत वाव मिळाला. दिवाळीत घरी जाताना KSRTC च्या बसमधे 'डायवर-शिट'कडुन जाणे किंवा अगदी खिडकीतुन प्रवेश मिळवण्याची कला अवगत असल्याने, जास्त त्रास झाला नाही.
जर्मन्स बाहेर फारसे कुणाशी बोलत नाहीत. ट्रेनमधे बाजुच्या सिटवर अगदी 'रासलीला' चालु दे किंवा एखादा 'कॅरेक्टर ढीला' बसुदे, काही सोयर सुतक नसते. आमच्या डब्ब्यात काही अपवाद वगळता सर्व शांतता होती. अपवाद एवढेच होते की, एका कोपर्‍यात एक तमीळ कुटुंब छिन्न्गुडगुडे नाडगुडगुडे ;) करत होतं, दुसरीकडे आमचा बेंगाली बाबु (गावाला ऐकु जाईल इतक्या आवाजात) हेडफोनवर 'चिकनी चमेली' ऐकत होता. मी भारतीय रेल-प्रवासाशी तुलना करत होतो इतक्यात , "बाबा, माझे पाय दुखताहेत" म्हणत एक मुलगी रडू लागली. गर्दीत काहीच दिसत नसताना मी ओरडलो, "ओ भाऊ,तीला इकडे पाठवून द्या". तीला माझ्याच सीटवर अ‍ॅडजस्ट करुन घेत त्या पुणेकर बाबाशी माझ्या गप्पा चालु झाल्या.

साल्झबर्ग- ऑस्ट्रीया
पॅरीस्,प्राग,व्हेनीस,का बर्लीन यावर भांडुन झाल्यावर अगदी जवळच्याच साल्झबर्गला जायचं ठरलं.
१. ट्रेनचा प्रवास:- आरामदायक पुश्-बॅक सीट, कमालीची स्वच्छता, मोठ्या काचांतुन दिसणारा हिरवागार निसर्ग, गाई, घोडे, पर्वत्, नद्या, आणी स्वप्नातली घरे.. और क्या चाहीए??

DSC06075

ऑस्ट्रियात असणारे साल्झबर्ग हे शहर जर्मनीच्या दक्षीण सीमेजवळ आहे. Salzach नदीच्या किनारी, आल्प्सच्या सानिद्ध्यात वसलेले हे गाव एक 'कल्चरल वर्ल्ड हेरीटेज साईट' आहे. Baroque architecture / स्थापत्यकलेसोबतच इथली महाविद्यालये प्रसिद्द आहेत.रोमन्/गॉथीक शैलीचे चर्च पाहावयास मिळतात. जगप्रसिद्द संगीतकार 'मोझार्ट' यांचे जन्मस्थान असलेल्या साल्झबर्गच्या नसानसात संगीत आहे. मीठ वाहुन नेणार्‍या जहाजांमुळे या शहराला Salzburg हे नाव पडले म्हणतात.
समर ओपेरा इवेंट, शंभर वर्षांपासुन जुलै-ऑगस्ट्मधे भरणारा Salzburg Festival सुद्धा प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रो-बवेरीयन हा जर्मन भाषेचाच एक डायलेक्ट इथे बोलला जातो.

२. म्युनीकप्रमाणे आम्ही इथेही हॉप्-ऑन्-हॉप्-ऑफ बस निवडली. असे सगळीकडे 'पेव्हड ब्लॉक' आहेत. च्यामारी फक्त तिथलेच उखडत कसे नाहीत कोणास ठाऊक?? आणी नाहीतर आपल्या इथे.. जाऊदे.

DSC05629

या बसवर जे चित्र दिसतेय, ते १९६५ सालच्या Sound of Music नामक सुप्रसिद्ध, ढीगभर पुरस्कार विजेत्या चित्रपटातील आहे. माझ्यासारखा बर्‍याच जणांनी अजुन हा पाह्यला नसेलच अशी खात्री आहे. :) यातील Julie Andrews नामक हिरवीणीचा जन्मही Salzburg येथेच झालाय. बसमधे गाईडच्या ऐवजी हेडफोन साथ देतात. शहराची माहिती घेत आणी या चित्रपटातील गाणी ऐकत जुन्या शहरातुन आपण फिरु शकतो. या शहरातील बर्‍याच जागांचे चित्रीकरण Sound of Music मध्ये झालंय.

३. जाता-जाता काढलेला तिथल्या जंगली महाराजांचा फटु-

DSC02032

४. युरोपातली आवडलेली अजुन एक गोष्ट म्हणजे इथल्या खिडक्या. सगळ्या खिडक्या फुलांनी सजवलेल्या पहावयास मिळतात.

DSC02028

५. आमचा पहिला थांबा होता 'मीराबेल गार्डन्स'. (Mirabell Palace and Gardens). या फोटोत मागे दिसणारे ते पॅलेस UNESCO हेरीटेज आहे.

P1010506

६. १६ व्या शतकात बांधलेलं हे मीराबेल पॅलेस १८ व्या शतकात आगीत जळालं होतं. सध्या इथली बाग भुमिती वापरुन बनवलेल्या फुलांच्या नक्षी, पुतळे, कारंजे यांनी पर्यटकांना आकर्षीत करते. या बागेत डो-रे-मी हे गाणं शूट झालंय असे समजले. या चित्रात जो डोंगरावर दिसतोय तो आहे Hohensalzburg फोर्ट.

P1010509

७. गेल्याच पावसाळ्यात येथे महापूर आला होता.. Salzach नदीत बोटीतुन फिरायची व्यवस्था आहे. या राईड मध्ये आल्प्सचेही दर्शन घडते. ट्रीप थोडी महाग असली तरी पैसे वसूल होतात.. असा बर्फ जिंदगानीत पयल्यांदाच बघितल्याने त्या जर्मन मुलीला (आणी ब्रिटीश कप्तानाला) 'जांदो..और आग्गे जांदो..' असे ओरडुन सांगावेसे वाटत होते..

DSC02006

जाताना सुंदर पुल दिसत होते.

DSC02000

कप्तानाचे विनोद चालले होते. बरेच अंतर गेल्यावर त्याने एकाजागी बोट थांबवली. कसलीतरी चक्रं बराच वेळ गोल्-गोल फिरवली.. इंजीनाचा जोरात आवाज येऊ लागला.. आणी बोटीने 'गर्रर्र'कन 'स्पॉट टर्न' मारला. मस्त 'हवाका झोका' आला, आणी त्या ३६० डिग्री टर्नने मजा़ आली.. अविस्मरणीय अनुभव.

DSC02003

८. नदीतुन जाताना किनार्‍यावरची हिरवळ पाहातच होतो.. ड जीवनसत्वाचा आभाव जरा जास्तच आहे तिकडे.. ;)
ते फोटो नाहीत, पण त्याऐवजी दिसलेली ही युन्वर्सीटी बघा.. साल्झबर्ग येथे पुण्याप्रमाणेच विद्यार्थी बरेच आहेत..

DSC01993

९. आम्हाला फक्त मद्रासचा मोझार्ट माहिती.. 'ए.आर' आणी 'आर.डी' इथेच आमचे संगीत घुटमळायचे.. लहानपणीच मोझार्टने किबोर्ड आणी व्हायोलीनवर प्राविण्य मिळविले होते. आम्हाला 'मोझार्ट मोन्युमेंट' पाहायला मिळाले. कुणीतरी मोझार्ट बद्द्ल म्हटले होते, "Posterity will not see such a talent again in 100 years". या गावात बरेच रस्ते, चौक, इमारती, पुल यांना मोझार्टचे नाव दिलंय. बहुतेक मार्केटींगचा भाग असावा. त्याच्या नावाने गोड्-धोड पदार्थसुद्धा आहेत जसे की, Mozartkugeln. हा एक चॉकलेट्चा बॉल असतो.
Wolfgang Amadeus Mozart. १७५६-१७९१.

DSC05648

असं म्हणतात की मोझार्टला साल्झबर्ग आवडत नव्हते. तो इथे फक्त एक बिशपचा सेवेकरी होत. पण त्याच्यामुळे इतकी प्रसिद्धी मिळाली या शहरास.

IMG_3955

१०. एका चौकात बुद्दीबळाचा डाव मांडलाय. मुफ्त..मुफ्त्..मुफ्त.. पण वाट पहावी लागते.
वातावरण एकदम मस्त होते. यालाच Mozartkugel monument म्हणतात. (चॉकलेटचा प्रकार)

DSC01974

११. वरच्या फोटोतल्या फोर्टला जायला ट्रेन सुद्धा आहे. या ट्रेनची सुरुवात १८९२ ला झालीय. पण आम्ही गिर्यारोहणाचा मार्ग स्विकारला.. गल्ली-बोळातुन साल्झबर्ग एक्स्प्लोर करायला मजा आली. पण उन्हाचं दमुन गेलो.

P1010527

हाच तो Hohensalzburg फोर्ट. १०७७ साली बांधण्यात आलेल्या या फोर्टवर झालेल्या गेल्या ९०० वर्षांच्या इतिहासात, आक्रमणात कोणालाही विजय मिळाला नाही. बर्‍याचदा याचे बांधकाम झाले, बदलले. आता इथे एक म्युझीयम आहे.

DSC01975

DSC05692

किल्ल्यावरुन दिसणारं साल्झबर्ग कॅथेड्रल.. एवढी मेहनत घेतली तरी, इथलं दृष्य थकवा घालवतं.

P1010590

१२. लिओपोल्ड्स्क्रोन. १७३६ ला बांधण्यात आलेला महाल. 'लिओपोल्ड'ने बांधला. पण पुढे बवेरीयाचा राजा 'लुयीस-I' याचे निवासस्थान होते. सध्या ही खाजगी मालमत्ता असल्याने फक्त बाहेरुन पाहता येते. पण येथील बागेत प्रवेश आहे.

DSC05668

DSC05669

१३. परतताना या दोघींचा फोटो काढायचा मोह आवरला नाही.. मागची एकदम कार्टुन कॅरेक्टर होती.

DSC05677

१४. लिव्ह लाईफ किंग साईझ..
अशा बाईक्स भाड्याने मिळतात. लक्षात असु द्या.. बायकोला खुश्श कराल.. काय तो थाट.. व्वा!!!

P1010519

मॉरल ऑफ द स्टोरी- 'प्रागला गेलो असतो तर बरे झाले असते का?' असे काहीदा वाटत होते.. पण एकदा भेट द्यायला काही हरकत नाही.. वेन्जॉय.

 

लाल कौलांचं गाव!

 अशाच एका मोठ्या विकांताला बॅगपॅक भरुन गाडीत टाकले आणि लाँग ड्राइव्हवर जायचा विचार केला. रस्ता नेईल तिथे जायचे अशा विचाराने ए ३ ह्या ऑटोबानला (फ्रीवे) ला लागलो आणि एकदम लक्षात आलं आपल्याला रोथेनबुर्गला जाता येईल की.. आता तुम्ही म्हणाल हे कोणत गाव? तर फ्रांकफुर्ट पासून साधारण १८० किमीवर ताउबर नदीवर वसलेलं हे गाव म्हणजेच रोमँटिक रोडवरचा एक थांबा रोथेनबुर्ग! जेव्हा फ्रांकफुर्ट आणि बर्लिन जर्मनीच्या नकाशावरचे ठिपके होते तेव्हा रोथेनबुर्ग मात्र नावारुपाला आलेलं एक स्वतंत्र संस्थान होतं आणि आजही मध्ययुगातला इतिहास जपून ठेवलेलं टूरिस्टांसाठी पर्वणीच असलेलं एक महत्त्वाचं गाव आहे. तेव्हा आम्ही तिथेच आपला तंबू टाकायचं ठरवलं.

.

एका थांब्यावर गाडी थांबवून जालावर पुढच्या रस्त्याचा शोध घेतला तर तिथे अनेक रोथेनबुर्गे दिसली की .. हे म्हणजे अगदी आपल्याकडे असलेल्या दोन दोन गोरेगाव,तळेगाव सारखेच झाले ना! त्यामुळे ताउबर नदीवरच्या रोथेनबुर्गचा आणि तिथल्या हॉटेलांचाही पत्ता जीपीसला विचारला आणि एका ठिकाणी फोन केला. एबरलाइन बाईंनी अगदी अगत्याने जणू काही आपले पाहुणेच आहेत अशा थाटात कसं या ते सांगितलं आणि साधारण तासाभरात तिथे पोहोचलो. रुमची चावी घेऊन बॅगा आत टाकायच्या आणि फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडायचे असं ठरवत असतानाच बाईंनी गावचा नकाशा पुढे केला आणि कसं जायचं तेही समजावून सांगितले.

.

गावाची खंदकयुक्त भिंतीची वेस अनेक शतकांचा इतिहास पोटात घेऊन अजूनही राखणीला उभी आहे. त्या वेशीतून आत शिरलं की बांधीव,दगडी रस्त्यावरून सरळ चालत जायचं की मार्क्ट्प्लाट्झ म्हणजेच बाजाराचा चौक लागतो. ही गावातली "हॅपनिंग प्लेस"!

.
इथे असलेला टाउनहॉलचा टॉवर म्हणजेच राटहाउसटुर्मवर जाऊन सगळ्या गावाचे विहंगम चित्र मनात आणि कॅमेर्‍यात साठवता येतं.

बाजारच्या रस्त्याने थोडं पुढे गेलं की ख्रिसमस म्युझिअम आहे. ख्रिसमसच्या दिवसात तर ते खूपच नटलेले सजलेले असतेच पण इतर दिवसातही ख्रिसमससाठीच्या सजावटीच्या वस्तू अगदी पुरातन काळातली सजावट कशी होती हे दाखवणारी चित्रं, मॉडेलं, त्यावेळची अ‍ॅड्व्हेंट कॅलेंडरं, ख्रिसमस कार्डे, ख्रिसमस ट्रींचे स्टँड एवढेच नव्हे तर पहिल्या महायुध्दात सीमेवरच्या शिपायांना पाठवण्यासाठी केलेले मिनी ख्रिसमस्ट्री स्टँड्स आणि ज्या पेट्यातून ती पाठवली त्या लहान संदूकाही फार कलात्मकतेने रचून ठेवल्या आहेत.

.

.

.

ख्रिसमस म्युझिअम उजवीकडे ठेवून मोठ्या रस्त्याने सरळ पुढे गेलं की सेंट याकोब किर्श म्हणजे याकोब चर्च लागते. हे प्राचीन चर्च म्हणजे जर्मन लाकडी कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे. बायबल मधील अनेक प्रसंग लाकडाच्या कोरीव करामतीने जिवंत केले आहेत.

.

थोडं पुढे गेलं की मध्ययुगीन क्राईम म्युझिअम लागते.ह्या चार मजली संग्रहालयात शिक्षेची आणि छळाची वेगवेगळी क्रूर साधने पाहताना उदासून जायला होतं. त्या काळात चर्चमध्ये प्रवचनात झोपला,पाव बनवताना त्याचा आकार लहान ठेवला अशा 'गुन्ह्यांना'ही ज्या भयंकर शिक्षा होत्या ते पाहताना अंगावर काटा येतो.

.

..

ह्यानंतर मात्र एका मोठ्या ब्रेकची मनाला आणि शरीराला गरज भासतेच. तेथेच समोर असलेल्या पुरातन कालीन 'रोटर हान' नावाच्या उपाहारगृहात खास बायरिश केझं स्पेट्झलं (एक प्रकारच्या न्यूडल्स्+चीज+ आणि बिर्याणीवर असतो ना तसा तळलेला कांदा),माउल्ट ताशं (पालक व चीजचे पुरण भरलेला एक प्रकारचा पास्ता) आणि बिअरमासचा आस्वाद घेणं अगदी आवश्यक वाटू लागते.आणि त्यानंतर डेझर्ट म्हणून श्ने बाल (एक प्रकारची पेस्ट्री)!

क्राइम म्युझिअमला उतारा म्हणून खेळणी आणि बाहुल्या कसं वाटतं? १५ व्या शतकातल्या टॉय आणि डॉल म्युझिअम मध्ये ७८०० ऐतिहासिक,पुरातन खेळणी आणि बाहुल्या आहेत. जर्मन आणि फ्रेंच कलाकारांची ही पुरातन कारागिरी पाहताना आपणही वय विसरुन लहानपणात रमतो.

..

..

चांदण्या रात्री आकाश अंगावर पांघरून घेत मार्क्ट्प्लाट्झ पासून नाइट वॉचमन ची टूर सुरू होते. कंदील आणि काठी हातात घेतलेला, त्या काळातले कपडे घातलेला हा रात्रीचा शिपाईगडी काठी आपटत आणि कंदिलाने रस्ता दाखवत आपल्याला बोट धरुन त्या काळात कधी नेतो समजतच नाही.
.
रोथेनबुर्ग ओब डेअर ताउबर म्हणजे जर्मन मध्ये ताउबर नदीवरचं लाल (कौलांच) किल्लेवजा गाव! कोंबुर्ग रोथेनबुर्गच्या सरदाराने इस. ९५० मध्ये ताउबर नदीवर लहानसे धरण बांधवले. सन १०७० मध्ये हा 'किल्लेवजा गाव' उंच डोंगराच्या कुशीत पायाशी ताउबर नदीला ठेवून वसला. स्टॉ़यफर कॅसल बांधताना हे गाव सापडले. कॅसलच्या मध्यवर्ती भागी बाजारची जागा आहे, थोडं पुढे गेलं की आहे सेंट याकोब चर्च! पुढे १३ व्या शतकात भिंत आणि मनोरे बांधले गेले आजही रॉडर कमानी आपल्या खांद्यांवर त्यातील श्वेतमिनार (वाइसरटुर्म) आणि मार्कुसटुर्म म्हणजे मार्कुसमिनार यांना घेऊन उभ्या आहेत.

.

.

त्या जुन्या काळात रइस ज्यू मंडळींचा प्रभाव येथे होता तर नंतर प्रोटेस्टंटांचा पगडा होता. पण १३५६ मध्ये झालेल्या भूकंपात हा स्टॉयफर कॅसल उध्वस्थ झाला. पुढे १७व्या शतकात झालेल्या तीस वर्षांच्या युध्दात प्रोटेस्टंट गावकर्‍यांनी निकराने लढा दिला पण ४०,००० च्या वर फौज घेऊन आलेल्या कॅथोलिक काउंट ऑफ टिलीने त्यांचा सहजी पाडाव केला आणि गाव धुवून नेले. कंगाल झालेले रोथेनबुर्ग पुढे म्हणजे इ.सन १८०० च्या सुमारास बाव्हेरियाला जोडले गेले आणि कार्ल स्पिट्झवेग सारख्या कलाकारांनी रोथेनबुर्गला नवसंजीवनी दिली. रात्रीचा फौजदार आपल्या रसाळ वाणीतून तो प्राचीन काळ उभा करत असताना परत बाजारापाशी येऊन टूर संपते, आपल्याला त्या काळातच सोडून ..

.

.

वेशीच्या भिंतीवर चढून चालताना कालाचा पापुद्रा अलगद उलगडतो. भिंतीतल्या टेहेळणीच्या झरोक्यांतून पाहताना वाटतं , आत्ता खाड खाड बूट वाजवत जर्मन ट्रूप येईल, समोरच्या दगडी रस्त्यावरुन बग्ग्या जातील, घोड्यांच्या टापा ऐकू येतील. त्या भिंतीवरुन फेरफटका मारताना जगभरातील अनेक देशातून केलेल्या भिंतीच्या डागडुजीसाठीच्या मदतीची नोंद कोरलेली आढळली आणि मोठं नवल वाटलं.

.

तेथून मग रोथेनबुर्गच्या टॉपलर कॅसल मध्ये गेलं की ह्यामागचं रहस्य समजतं. तेथे १९४५ सालातले रोथेनबुर्गवर बाँबहल्ला झाल्याचे चित्र आहे. ३१ मार्च १९४५ ला १६ विमानातून येथे बाँबहल्ला झाला.३०६ घरं उजाडली, ६ सार्वजनिक इमारती, ९ पाण्याच्या टाक्या आणि ६०० मी. भिंत एवढं सगळं उद्ध्वस्थ झालं. ३७ जण मरण पावले. अमेरिकेच्या असि. सेक्रेटरीला हे समजले. त्याला रोथेनबुर्गचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य माहित होते. त्याने बाँबहल्ला न करण्याचे आदेश दिले आणि चढाई करुन ते काबीज केले. महायुध्दानंतर लवकरात लवकर डागडुजी केली गेली आणि त्यासाठी जगभरातून देणग्या स्वीकारण्यात आल्या. त्या भिंतीवरची नावे हाच इतिहास मूकपणे बाळगून आहेत.
काळाचा एक मोठा पट आपल्या समोर उलगडलेला असतो पण लाल कौलांचं हे गाव मात्र आपल्याच नादात, आपल्या काळात रमलेलं असतं!

ह्या लाल कौलांमध्ये आम्ही अडकून पडलो आणि परत परत तिथे जात राहिलो. उन्हाळ्यातलं 'कूल',कडाक्याच्या थंडीत धुक्याच्या नाहीतर हिमाच्या दुलईत गुरफटलेलं किवा फॉलमधलं रंगीत.. रोथेनबुर्गची सगळीच रुपं भावतात. परत एखादा मोठा विकांत आला किवा अगदी दोन दिवसांसाठी कुठे जावसं वाटलं की गाडी आपेआप त्या लाल कौलांच्या गावाच्या रस्त्याला लागते.

(काही चित्रे जालावरून साभार)

केहलष्टाइनहाउस  इगल्सनेस्ट 

 मागच्या वेळी भ्रमणमंडळ जेव्हा बेरेष्टेसगार्टनला गेले होते तेव्हा खराब हवेमुळे इगल्सनेस्ट ला भेट द्यायची राहिली होती, नंतर जेव्हा जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा मुद्दाम केहलष्टाइनहाउस ला जाऊन आलो..)

ओबेरसाल्झबुर्ग आणि बेरेष्टेसगार्टन! पृथ्वीवरच्या स्वर्गातील एक बाग जणू.. ह्याच ओबेरसाल्झबुर्ग मध्ये केहलष्टाइन हाउसच्या पायथ्याशी लपले आहेत हिटलरचे बंकर्स.. तेथे परत जाउन नव्याने उमगल्या काही गोष्टी.. त्या बंकर्सचे आता ओबेरसाल्झबुर्ग डॉक्युमेंटेशन म्युझिअम केल्यामुळे दुसर्‍या महायुध्दाच्या काळातल्या अनेक खुणा तेथे जपल्या आहेत.आत गेल्यागेल्या समोर लावलेल्या 'त्याच्या'भव्य फोटोमुळे आपण त्या काळातच पोहोचतो जणू..

.

जुनी वर्तमानपत्रे, फोटो,चित्रफिती ह्या सार्‍यातून तो इतिहास सामोरा येतो. खुद्द बंकर्स पाहताना तर थक्क व्हायला होते. बंकर म्हणजे लपण्यासाठी,आसर्‍यासाठी केलेली सोय ,त्यामुळे मला उगाचच लहानसे जमिनीखाली केलेले बांधकाम असे काहीतरी चित्रं डोळ्यासमोर होते. पण येथे आपल्याला दिसते डोंगराच्या पोटात वसवलेले छोटेसे गावच जणू! जमिनीखाली जवळजवळ सहा मजले उतरुन गेले की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश!काय नव्हतं तिथे?
हे तर मोठ्ठे बंकर्सकाँप्लेक्सच दिसते.यात वेगवेगळी आठ युनिट्स असून त्यातील पाच युनिट्स आतून जोडली आहेत.आतमध्ये सुसज्ज दिवाणखाने, शयनगृहे,भटारखाने,भोजनकक्ष, हमामखाने,कचेरीदालने,वैद्यकियसेवाकक्ष तर आहेतच पण एक कारागृह सुध्दा आहे. टेलिफोनचे जाळे असून ८०० एक्स्टेनशन्स आहेत.वीज,पाणी एवढेच नव्हे तर एअरकंडिशनिंगचीही व्यवस्था केलेली दिसून येते. हवा खेळती रहावी म्हणून मोठमोठ्या पाइप्समधून हवा खेळवली होती त्यातील काही पाइपलाइन्सचे अवशेष त्या इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत.बंकर्सच्या तोंडाशी मशिनगन्स बसवून संरक्षक तटबंदी तयार केलेली आढळते. इटालिअन मार्बल वापरुन तयार केलेला शाही जिना आणि शाही रस्ता पाहताना थक्क व्हायला होते.अर्थात बाँबहल्ल्यात तेथील मार्बल उखडून टाकले गेले आहेत.

...

तेथेच आहे कलेक्टिव एअर रेड सेंटर! जर हवाई हल्ले झाले तर सैन्याला एकत्रित आसरा घेता येईल अशी मोठी दालने आहेत.तेथून बेर्गहोफ, गेस्ट हाउस,एस एस गॅलरी इ . ला जोडणारे चोररस्ते आहेत.ती भव्य कल्पकता पाहून थक्क व्हायला होते खरेच!

..

ह्या डॉक्युमेंटेशनच्या परिसरात गाड्या पार्क करुन त्यांच्या बसनेच वर जावे लागते.जवळ जवळ साडेसहा किमीचा हा डोंगरातल्या वळणावळणाचा हा घाटरस्ता आहे.बस वर जात असताना आपण मात्र इतिहासात रमायला लागतो.मार्टिन बोहरमानने फ्युररच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ह्या अशाअतिशय सुंदर ठिकाणी , उंच,अनवट जागी बांधलेला हा प्रासाद आणि तेथे जाण्याचा डोंगरातून खोदलेला वळणावळणाचा रस्ता अवघ्या १३ महिन्यात बांधून काढला गेला.ह्या सुंदर प्रासादात हिटलर स्वतः फक्त तीन वेळा राहिला. एक तर अतिशय उंचावर बांधलेला हा प्रासाद आकाशातून सहज लक्ष्य करता येईल अशी त्याला भीती वाटे.इव्हा मात्र त्या सुंदरतेची भुरळ पडून तेथे अनेकदा जात असे व राहत असे.एका बाजूला खाली खोल खोल जाणार्‍या दर्‍या तर दुसर्‍या बाजूला डोंगराची उंच उंच शिखरे अशी रौद्र सुंदरता पाहत,अनुभवत थक्क होत आपण भानावर येतो तेव्हा बस पार्क होत असते. अतिशय कठिण चढण आणि टोकावर पार्किंगसाठी केलेली खास जागा हा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना समजला जातो.बसमधून उतरत असतानाच आपल्याला परतीच्या बसचे बुकिंग टीहाउसला जायच्या आधीच करुन घ्या अशी सूचना मिळते. अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची खातिरदारी ज्या टीहाउस मध्ये केली जाई.तेथेच आता आपण जाणार आहोत ,एकदम भारी,रोमांचक वगैरे वाटायला लागते.

.

आता एक मोठ्या बोगद्यातून चालत लिफ्ट पर्यंत जायचे असते. खाड खाड बूट वाजवत फ्यूररची आर्मी एके काळी जेथून गेली त्याच ग्रानाइट लावलेल्या रस्त्याने,त्याच बोगद्यातून चालत आपण लिफ्टपाशी पोहोचतो.चकचकीत ब्रास,हिरवे लेदर आणि व्हेनेटियन आरशांनी सजलेली देखणी ,प्रशस्त लिफ्ट आहे ही..अशा ह्या देखण्या लिफ्टने १२ कामगारांचे बळी घेतले आहेत हे ऐकून उदास व्हायला होतं.. कोणत्याही देखण्या कामगिरीला ह्या अशा हाराकिरीचा शाप असतो की काय?
लिफ्टने वर आले की सुप्रसिध्द केहलष्टाइनहाउस आहे. ग्रेटीचा,इव्हा ब्राउनच्या बहिणीच्या लग्नाचा स्वागतसमारंभ मोठ्या थाटाने तेथे झाला. जेथे अतिमत्त्त्वाचे शाही पाहुणे आदरातिथ्याचा लाभ घेत तेथे आज उपाहारगृह आहे.
ह्याच उपाहारगृहात मुसोलिनीने भेट दिलेली ईतालियन रेड मार्बलमध्ये घडवलेली दिमाखदार फायरप्लेस आहे.
महायुध्दानंतर त्यातील तुकडे सोविनियर म्हणून नेण्यासाठी तिची मोडतोड केली.. पण अजूनही तिचा दिमाख कमी झालेला नाही. तेथे असलेली हिटलरची अभ्यासिका आता रेस्तराँची स्टोअररुम झाली आहे आणि इतर काही दालनांचे संग्रहालय!

आम्हीही त्या शाही रेस्तराँमध्ये आपली आपणच खातिरदारी करुन घेतली.

.

तेथील संग्रहालयातून हिटलरकालीन इतिहासाचे अनेक तुकडे फोटो,लॅमिनेटेड कागद,चित्रफितींच्या रुपात आहेत. बंकर्स पाहताना आणि बसमधून वर येतानाच त्या काळात पोहोचलो होतोच, आता येथील फोटो आणि माहिती पाह्त त्यातच किती वेळ रमलो.बाहेरील अंगणातून परत परत डोंगराच्या कुशीतले बेरेष्टेसगार्टन पाहत होतो. नभ उतरु आलं होतं, मन झिम्माडं झालं होतंच..

..

बर्‍याच वेळाने भानावर आलो. बस चुकेल म्हणून नाइलाजाने परत लिफ्टकडे वळलो.

 

म्युनस्टर वारी

 मिसळपाव जर्मनी कट्ट्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र जमायचे ठरवले.आम्ही दोघं फ्रांकफुर्ट, केसु डार्मस्टाट, लिखाळ व त्यांची सौ. म्युनस्टर आणि विपिन डॉर्टमुंडला राहणारे.. ही मोट बांधायची कशी?आणि कुठे? शेवटी भूगोलतज्ज्ञांनी डॉर्टमुंड सोयीचे पडेल असा निर्णय दिला. त्याप्रमाणे शुक्रवारीच आम्ही दोघं आणि केसु विपिनकडे डॉर्टमुंडला डेरेदाखल झालो.डॉर्टमुंड ते म्युनस्टर अवघा तासाभराचा तर गाडीचा प्रवास, त्यामुळे शनिवारी सकाळी लिखाळकडे जायचा बेत आखला. त्यात आणखी आमच्या जर्मन आजीने म्युनस्टर पाहूनच या असा प्रेमाचा सल्ला दिला होता.

छोटेसे टुमदार गाव आणि तिथले विद्यापीठ म्हणून म्युनस्टर प्रसिध्द आहेच. सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या म्युनस्टरच्या मुख्य स्टेशनात ३०००च्या वर सायकली पार्क करायची व्यवस्था आहे. हॉलंडची सीमा इथून जवळ असल्याचा बहुदा हा परिणाम असावा. साडेनऊच्या सुमाराला आमची टोळी लिखाळच्या दारात हजर! आमच्या पैकी काही जण प्रत्यक्ष प्रथमच भेटत असले तरी औपचारिकपणाची झूल पहिल्या पाचेक मिनिटातच गळून पडली आणि वाफाळत्या चहाबरोबर खिदळणं सुरू झालं , जोडीला बुटरमिल्शकुकन होतंच आणि 'मिसळपावची ताजी तेज तर्रीही'! एवढ्या घाऊक प्रमाणात मराठी भाषक आणि तेही मिपाकर एकत्र आल्यावर मनसोक्त गप्पा रंगल्या आणि त्यातूनच भ्रमणमंडळाची सुपीक कल्पना निघाली. सौ.लिखाळांनी केलेल्या मटकीची उसळ,पोळ्या,भात,टोमॅटोचं अप्रतिम सार आणि गुलाबजामना (पाकासकट) न्याय देत पुढचे बेत सुरू झाले.
लिखाळच्या घराच्या मागे मोठ्ठाली शेतं आहेत,दोबाजूला हिरवीगार सावली असलेली पायवाट आणि मध्येच दिसणारे एखादे 'खेड्यामधले घर कौलारू'! त्या पायवाटेने बसच्या थांब्यावर जायला निघालो. तिथल्या शांततेला छेद देत आमचं खिदळणं चालूच होतं पण एका क्षणी मात्र सगळ्यांनाच ती शांत हिरवाई हवीशी वाटली. वार्‍याच्या एखाद्या मंद झुळूकेने होणारी पानांची सळसळ सोडली तर कसलाच आवाज नव्हता.ती शांतता वाचत असतानाच बस आली.

आ-से म्हणजे आ सरोवरापाशी पोहोचलो. समोर हंसे कलकलाट केला.. असे दॄश्य! अनेक काळ्याकरड्या पाणकोंबड्या,बदकांच्या घोळक्यात तो काळाभोर,लालबुंद चोचीचा,गुंजेच्या डोळ्यांचा राजहंस शोभून दिसत होता. (आधी राजहंस त्याच्या नावाप्रमाणेच रुबाबदार! त्यात काळा राजहंस पांढर्‍यापेक्षाही जास्त रुबाबदार दिसतो असं टोकिओत जेव्हा अगदी पहिल्यांदा काळा राजहंस पाहिला तेव्हाच मला वाटलं होतं त्याला आता इतरांकडूनही रुकार मिळाला.)त्या तळ्यात दूरवर एक प्लास्टीकचा भलामोठा हंस डोलताना दिसला. लिखाळने त्याची कहाणी सांगितली. ह्या खर्‍या राजहंसाची ती प्रेमिका आहे. जेव्हा तो प्लास्टिकचा हंस सरोवरातून काढून टाकला तेव्हा या प्रेमवीराने खाणेपिणे सोडले आणि तो झुरू लागला. ते पाहून परत तो प्लास्टीकचा हंस त्या तळ्यात सोडण्यात आला आणि एका शुभ्र हंसिनीलाही आणले.तीच आता त्याची प्रेमिका झाली आहे. त्या सार्‍या करड्या बदकांच्या कळपात ही राजबिंडी जोडी उठून दिसत होती. लगेचच 'कोचरेकरमास्तरांना' प्राणीमात्रांमध्ये वर्णभेद नसल्याची जाणीव झाली आणि त्यांनी तशी आपल्या डायरीत नोंद केली. सरोवराभोवतालच्या हिरवळीत बसून रहावं असा मोह फार होत होता पण ..त्या हिरवळीवरच्या भल्या थोरल्या गोलकांखाली आमची छबी काढली आणि पुढे निघालो.

( डावीकडून : स्वाती,सौ. लिखाळ, दिनेश, केशवसुमार, विपिन आणि लिखाळ )

जसं आपल्या गोव्यातल्या कोणत्याही देवळापुढे तळं आणि दीपमाळ असतेच असते तसं युरोपमधल्या कोणत्याही गावात चर्च,कथीड्रलच्या प्राचीन इमारती,त्यात कोरलेली प्रस्तरचित्रे आणि काचांवरचे नक्षीकाम असतेच असते.पण तरीही प्रत्येक ठिकाणचा वेगळेपणा,तिथल्या चर्चमधली शांतता अनुभवावीशी वाटते.दुसर्‍या महायुध्दात संपूर्ण उद्ध्वस्थ झाल्यावर कोणाला त्या पडझडीची शंकाही येऊ नये इतकं बेमालूम जोडकाम जवळजवळ सर्वच ठिकाणी केलं आहे, कलोनच्या कथीड्रलमध्ये,म्युनशनच्या चर्चमध्ये आणि इथल्या सेंट पॉल कथीड्रलमध्येही ! ह्या कथीड्रलचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे इस. १४०८ पासूनचे आजही चालू असणारे 'ऍस्ट्रॉनॉमिकल क्लॉक'( खगोलशास्त्रीय घड्याळ?).प्राचीन काळापासून जर्मन तंत्रज्ञान किती प्रगत होते ह्याची साक्ष म्हणजे हे घड्याळ आहे.

कथीड्रलमधल्या काचांवरची रंगीत चित्रनक्षी प्रकाशात आणखीच उजळून निघाली होती. ती मनसोक्त पाहून आणि फोटो काढून मुख्य चौकात गेलो. पूर्वीच्या काळी जेव्हा दळणवळणाची फारशी साधने नव्हती तेव्हा पाठीवर सामान लादून गावोगाव मालाची विक्री करत हिंडणारे वस्तूविक्ये असत.अशाच एका वस्तूविक्याचा प्रातिनिधिक पुतळा पाहून राटहाऊसकडे निघालो.
राट हाऊस (टाउन हॉल) अर्थात आपल्या मामलेदार कचेरीसारखा कारभार जिथून चालतो ती इमारत इथे प्रत्येक गावातच असते आणि जुन्या, प्राचीन,ऐतिहासिक संदर्भ असलेल्या इमारतीत राट हाऊस वसलेले असते. फ्रांकफुर्ट मधले 'बोलोंगारो पलास्ट' म्हणजेच 'बोलोंगारो पॅलेस' मध्ये असलेले राट हाउस तिथे नेपोलियन एक रात्र राहिला होता हे मिरवत असते. इथल्या राट हाऊसलाही ऐतिहासिक संदर्भ आहेच.१४ व्या शतकातला हा भक्कम 'पीस ऑफ वेस्टफालिया' लक्ष वेधून घेतो तिथे असलेल्या पोलादी हातामुळे आणि त्या हातातली तलवार सांगत असते , कायद्याविरुध्द वागलात तर गाठ माझ्याशी आहे..

सेंट लांबार्ट चर्च च्या कळसाजवळचे तीन भलेमोठे पिंजरे कुतुहल तर वाढवतातच पण त्या पिंजर्‍यांमागचे कारण समजले की थरकाप होतो.लायडनच्या जॉन ह्या डच व्यक्तीने आणि त्याच्या सहकार्‍यांनी १६व्या शतकात तत्कालीन धर्मसत्तेविरूध्द बंड केले त्याची शिक्षा म्हणून त्याला आणि सहकार्‍यांना मारून पिंजर्‍यात ठेवले आणि ते पिंजरे लांबार्ट चर्चच्या वर बांधले.त्यांच्या मृत शरीरांचीही विटंबना झाली. ती तिथेच तशीच सडली,कुजली. पन्नासेक वर्षांनी त्या पिंजर्‍यातल्या अस्थी बाहेर काढल्या परंतु ते पिंजरे मात्र आजही तिथेच लटकलेले आहेत. धर्म आणि सत्तेचा हा खेळ फार जुना आणि सगळ्या जगभरच आहे हे पाहून मन सुन्न झाले. अजूनही त्यांच्या पुण्यतिथीला तेथे मेणबत्त्या लावून अभिवादन केले जाते. कदाचित जर्मनीत प्रोटेस्टंट पंथी जास्त असल्याचा हा परिणाम असावा.
म्युनस्टरच्या त्या दगडी रस्त्यांवरून हिंडताना वारंवार म्युनशनची (इंग्रज साहेबाच्या भाषेत म्युनिक) आठवण येत होती.वास्तविक म्युनशन दक्षिणेला,आल्प्सच्या कुशीत तर म्युनस्टर उत्तरेला! दक्षिण आणि उत्तर जर्मनीतल्या गावांमधल्या घरांची,रस्त्यांची रचना, भौगिलिक परिस्थितीही खूपच वेगळी असताना हे 'साम्य' वेगळे वाटले.तिथल्या गल्लीबोळातून थोडा वेळ निरुद्देश भटकलो तरी कुतुहल काही नवे दाखवत होतेच. घड्याळाचा काटा पुढे सरकताना डॉर्टमुंडला जाणार्‍या गाडीची आठवण करून देत होता. त्यामुळे नाइलाजाने स्टेशनच्या दिशेने चालू लागलो.
गाडीत बसतानाच केसुंनी "रात्री पावभाजी मी करणार.." असे जाहीर केले आणि विपिनच्या घरी पोहोचल्यावर आम्हाला दोघींना किचन मध्ये फिरकूही न देता त्यांनी ए वन पावभाजी केली.

अशा मस्त पावभाजीनंतर चॉकलेट आईसक्रीम खात उद्या सकाळी सहाची बस आहे,लवकर उठायला हवं असं म्हणत म्हणत एक वाजेपर्यंत गप्पा चालूच होत्या..

(ब्रुसेल्स वृतांत- पुढील भागात.)

ब्रुसेल्सवर स्वारी

 रात्रीचा एक वाजून गेला तरी गप्पा संपल्या नव्हत्या शेवटी एकमेकांना दटावत सारे झोपायला गेले.सकाळी ६ वाजता बस निघणार होती त्यामुळे झोपलो न झोपलो तोच उठायची वेळ झाली.सगळेच जण पटापट आवरून विपिनने केलेली मस्त चहाकॉफी पिऊन ताजेतवाने झाले.बसस्थानकाशी पोहोचलो.आतमधले सारे जण शांत बसले होते.त्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर आम्ही पोहोचल्या पोहोचल्या चहेलपहेल सुरू झाली.बस हसूबोलू लागली. एसनला आम्हाला बस बदलायची होती आणि तिथेच इरफान,विपिनचा अजून एक मित्र वाट पाहत होता.तो ही उत्तम मराठी बोलणारा असल्याने भाषेची भेळ करायची गरज नव्हती. इथे मात्र आम्हाला सीट नं दिले. इरफानला एकट्याला वरच्या मजल्यावर जावे लागले तर आमच्या ४ सीट समोरासमोर आणि २ शेजारच्या बाकावर आल्या होत्या.त्यासमोर एक जर्मन आजी आजोबा होते.बस सुरू होण्याचा अवकाश, आमची तोंडं खाणे आणि बोलणे ह्या दोन्हीसाठी अव्याहत सुरू झाली.विषय अर्थातच 'मिसळपावचे व्यसन' होता. लिखाळची मिसळमयता सांगताना सायली म्हणाली, त्याला काही निरोप द्यायचा असेल तर खरड तरी टाकावी लागते किवा व्य नि तरी करावा लागतो ; तरच त्याला समजते नाहीतर तो लक्षच देत नाही.." हास्याचे मजलेच्या मजले त्या दुमजली बसवर चढू लागले.

आमच्या समोरच्या आजीआजोबांना आमच्या दंग्याचा त्रास होईल असे वाटल्याने हळूच त्यांच्याकडे पाहिले. तर त्यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे नसून आमच्याबद्दलचे कौतुकच दिसले.आणि ते नुसतं आम्हालाच दिसलं नाही तर थोड्या वेळाने आजीने बोलून दाखवले.तुम्ही सगळे ट्रीप अगदी एन्जॉय करता आहात. खूप मजा करता आहात तुम्ही, तुमची भाषा समजत असती तर आम्हाला आणखी मजा आली असती.आजीचे असे लायसन्स मिळाल्यावर तर आमच्या दंग्याला उत आला.तासदोन तासाने मात्र सारेच पेंगुळले आणि चहाब्रेकसाठी गाडी थांबेपर्यंत छानशी डुलकी झाली.
आता आजूबाजूला पाहिले तर फ्लेमिश,फ्रेंच आणि क्वचित डच पाट्या दिसू लागल्या. जर्मनीतून बेल्जिअममध्ये प्रवेशलो हेच त्या पाट्या आम्हाला सांगत होत्या.आता मात्र आम्हाला ड्रायव्हरबाबा गाडी फारच हळू चालवतो आहे असे वाटायला लागले.कधी एकदा ब्रुसेल्सला पोहोचतो असे वाटायला लागले आणि ते तर अजून बरेच लांब होते.मग मात्र सायलीने पत्ते बाहेर काढले.मूलाहूनही मूल होऊन सारे 'उनो ' खेळलो.दुसर्‍याची पाने पाहणे,चिटिंग, ठरवून एखाद्याला गाढव करणे .. पत्ते खेळताना आवश्यक अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या.मात्र उनोमुळे तो मधला कंटाळवाणा वेळ चांगला गेला.आमच्या समोरची आजी म्हणाली सुध्दा," तुम्ही लोकं हसता तरी नाहीतर खाता तरी.. "एकदाचे ब्रुसेल्सला पोहोचलो.

इयु आणि नाटोचे मुख्यालय असलेल्या ब्रुसेल्सला कामानिमित्त आणि फिरण्यानिमित्त जायचा योग जरी २,३ दा आला होता तरी तो प्रसिध्द फुलांचा गालिचा मात्र पाहता आला नव्हता.१९७१ मध्ये पहिल्यांदा ब्रुसेल्समध्ये हा अतिभव्य फुलगालिचा इ स्टॅच्युमान्स ह्या आर्किटेक्टच्या कल्पनेनुसार रेखला,त्यानंतर त्याला ब्रुगं,घेंट,अँटवेर्प,कलोन,लंडन,पॅरिस,लुक्झेंबुर्ग इ. ठिकाणांहून असे गालिचे तयार करण्यासाठी आमंत्रणं आली.दुसरा असा गालिचा चितारायला ७६ साल उजाडलं आणि ८६नंतर मात्र दर २ वर्षांनी १५ ऑगस्टच्या सुमाराला ब्रुसेल्सच्या ग्रँडप्लेस मध्ये फुलांचा भव्य गालिचा तयार करू लागले.साधारण चारेक दिवस हा गालिचा असतो. फुलांची ती भव्य रांगोळी पहायला अवघा युरोप लोटतो.ह्यावेळी मात्र आमचाही गालिचायोग आला.ग्रँडप्लेसमध्ये चारही बाजूनी प्राचीन राजवाड्याच्या इमारती आहेत आणि मध्ये आयताकृती फरसबंद भव्य अंगण! एरवी त्या अंगणात चित्रकार आपली कलाकारी दाखवत आणि चित्रे विकत बसलेले असतात पण ह्या फुलरांगोळीच्या आठवड्यात त्यांनाही त्यांची पाले कोपर्‍यात हलवावी लागतात.त्या अंगणभर फुलांची ती अतिभव्य रंगीत कशिदाकारी आणि ती पहायला जमलेली गर्दीही रंगीबेरंगी ! डोळे भरून तो गालिचा कितीवेळ पाहिला,कॅमेर्‍यात बंद करून घेतला तरी समाधान होत नव्हते.

बेल्जिअमची काच,लेस आणि चॉकलेटे अगदी प्रसिध्द! नाजूक लेसची कलाकारी ,काचेच्या अनेकविध वस्तू आणि चॉकलेटांच्या राशीचे तिथे जणू प्रदर्शन मांडलेले असते. छोट्यामोठ्या गल्लीबोळातल्या दुकानांपासून चकचकीत काचेच्या भव्य दुकानांपर्यंत सगळीकडे बेल्जिअन काचेच्या वस्तू, लेसच्या पर्सेस,झगे,अंगडीटोपडी आणि चॉकलेटे,प्रालिननचे (चॉकलेटचा एक अत्युत्कृष्ट प्रकार)असंख्य प्रकार यांची नुसती रेलचेल असते.इंदौरला सराफ्यावर जशी जिलब्यांची आणि मिठाईची दुकाने,ठेले आहेत ना तशी इथे चॉकलेटांची आणि प्रालिननची दुकाने आहेत.त्यात आमच्या रोमेनचे प्रामाणिक मत आहे की स्वीस चॉकलेट जगात कितीही प्रसिध्द असोत.. बेल्जिअन चॉकलेटला तोड नाही ! आता स्वतः स्वीस असूनही तो असं बोलतो यातंच सारं काही आलं.तेव्हा मुद्दा असा की तिथून चॉकलेटं न घेता बाहेर पडणं म्हणजे केवळ अशक्य! मग काय? घुसलो एका दुकानात. त्या गर्दीत आम्ही तिथे गेलेलो इतरांना समजलेच नाही.शेवटी लिखाळ आम्हाला शोधायला गेला आणि बाकीचे आमच्यावर वैतागले पण चॉकलेटचा बॉक्स पाहिल्यावर साहजिकच राग पळून गेला.ब्रुसेल्समधला प्रसिध्द 'मानेकन पिस' अर्थात 'मुत्तुकुमार'चा पुतळा पाहून आम्ही ऑटोमियमकडे जायचे ठरवले.

लोखंडाच्या रेणूची १६५बिलियन पट मोठी प्रतिकृती येथे तयार केली आहे.त्या नऊ गोलांमध्ये आत शिरता येते आणि सर्वात वरच्या गोलावर चढून दोरीने खाली येण्याचा डोंबारीखेळही तिथे चालू होता.त्या उंचीवरून दोराने खाली येण्याचे आम्हाला आकर्षण वाटू लागले पण प्रत्यक्षात मात्र फक्त विपिननेच ते धाडस केले.

तिथेच पलिकडे 'मिनी युरोप' वसवले आहे.युरोपातील सर्व प्रसिध्द इमारती,वैशिष्ट्ये यांच्या प्रतिकृती तेथे तयार केल्या आहेत. (असेच मदुरोडॅमला 'हॉलंड इन नटशेल' उभे केले आहे.)चिमुकला प्रतियुरोपच! बकिंगहॅम पॅलेस शेजारी आयफेल टॉवर दिमाखात उभा आहे. शेजारी हॉलंडमधल्या पवनचक्क्या आणि ऍमस्टरडॅममधले कालवे आहेत. ग्रँड प्लेसमधला फुलगालिचा तिथे वर्षभर पहायला मिळतो. लंडनचे पार्लमेंट हाउस,बर्लिनमधले ब्रांडेनबुर्ग गेट,पिसाचा झुकता मनोरा,रोमचे कलोझिअम,पाण्यावर तरंगणारी व्हेनिसनगरी.. सारे सारे काही तिथे आहे. युरोपची मयसभाच आहे ती !

एव्हाना साडेपाच वाजून गेले होते.केसुंना तिथूनच पुढे लंडनला जायचे असल्याने त्यांनी आमचा तिथेच निरोप घेतला आणि आम्ही परतीच्या गाडीकडे निघालो.आमची सकाळचीच बस ऑटोमियमपाशी आम्हाला घ्यायला येणार होती. त्याप्रमाणे थांब्यावर गेलो . बस आलीच लगेच आणि आम्ही आत चढलो. सकाळचेच सगळे चेहरे आलेत की नाही हे ड्रायव्हरबाबा पाहत होता. आम्ही केसुला न घेता आलोत असे वाटून आमच्या समोरच्या आजीने "तुमच्या मित्राला कुठे सोडून आलात? त्याला घेऊन या लवकर. बस सुटेल आता.." असा हल्ला केला.तिला केसु परत न येता लंडनला गेल्याचे सांगितले तेव्हा लगेचच ड्रायव्हरला कळवा असा तिने धोशा लावला.जेव्हा तिच्या समोर आम्ही परत एकदा ड्रायव्हरला केसु येणार नसल्याचे सांगितले तेव्हा ती शांत झाली.
बस सुरू झाल्या झाल्या आजी आजोबांनी आमच्याशी गप्पाच मारायला सुरूवात केली.तुमची आजची ट्रीप कशी झाली? अशी सुरूवात करून ती , कुठून आलात? इथे काय करता? सध्या कुठे राहता? आजीचे प्रश्न आणि कुतुहल संपेचना! अशा बोलण्याबोलण्यातूनच इरफानच्या घरावरूनच ते पुढे जाणार असल्याचे समजले आणि आजीबाईंनी त्याला आपल्या गाडीने घरी सोडू असे जाहीर केले.पण आमच्या उत्तरांनी तिचे समाधान होत नव्हते. "तुम्ही सगळे इतक्या वेगवेगळ्या गावात राहता आणि म्हणता की भारतातही वेगवेगळ्या ठिकाणी राहता तर तुमची ओळख आणि दोस्ती कशी झाली?"तेव्हा तिच्या तोंडून 'मिसळपाव' असे वदवून घेतले आणि मग तिचा समज असा झाला की मिसळपाव नावाचे एक गाव भारतात आहे आणि तिथे हे सारे भेटले.दोस्ती झाली आणि आता पोटापाण्यासाठी योगायोगाने एकाच वेळी जर्मनीत आलेत. तिचा समज दूर करण्याच्या फंदात मी पडले नाही ,कारण नाहीतरी त्यात खोटं काय आहे?

गावचा उत्सव

 परवाच्या शनिवारी विपिन फ्राफुला येणार असल्याने अर्थातच केसुना आवताण धाडले आणि मुख्य स्टेशनात भेटायचे ठरवले. आम्ही थोडे आधी पोहोचून तिथल्या एका तुर्की दुकानातून मिठाई वगैरे खरेदी करेपर्यंत केसुंचे फ्राफुत आगमन होऊन मुख्य स्टेशनाबाहेरच्या चौकात दादाकोंडकेंची गाणी ऐकत साहेब बसले होते.तिथून मग विमानतळ गाठला आणि कॉफी पित विपिनच्या गाडीची वाट पाहत बसलो होतो तेव्हाच रविवारी डार्मस्टाटमध्ये फिरायचे ठरवले.विपिनला घेऊन घरी जाताना आजची संध्याकाळ सत्कारणी कशी लावता येईल त्याचा विचार करू लागलो.सगळ्यांचं मत शिनूमाला गेलं.'मुंबई मेरी जान'चे परीक्षण वाचल्यापासून तो सिनेमा 'पहायचाच' ह्या यादीत गेला होता. त्याला 'बुधवार'ची जोड दिली. नसिर आणि अनुपम तोडीस तोड.. क्या बात है! दोन्ही सिनेमे लागोपाठ पाहिले.. जेवणाचा बेत होता पोळ्या, गाजराची कोशिंबिर,दहीभात,मिरचीचं लोणचं ',केसुंनी केलेली चटकदार मटकीची उसळ आणि 'थुलुंबा' ही तुर्की मिठाई(त्याला दिनेशने तुर्की गुलाबजाम असे नाव देऊन अपेक्षा वाढवल्या पण जऽरा अपेक्षाभंगच झाला..)आणि अर्थातच आईसक्रीम!

दोन दोन सिनेमे पहाताना दोन वाजून गेले.

फ्राफु ते डार्मस्टाट अवघ्या २५ -३० मिनिटांचा प्रवास.. रविवार सकाळ असल्याने सगळे फ्राफु आळसाच्या आणि सुट्टीच्या मूडात होते,अर्थातच गाडीला काडीची गर्दी नव्हती.जर्मनीमध्ये किवा एकंदरच युरोपातला ट्रामचा प्रवास मला नेहमीच आवडतो कारण जरी ट्राममधून फिरताना वेळ जास्त लागतो पण त्या गावात फेरफटका मारल्यासारखे वाटते.इथेही ट्रामममधून डार्मस्टाट दर्शन करत गावात एक चक्कर मारली.केसु 'राजुगाईड' झाले होते. ह्या गावातली चार चर्च प्रसिध्द आहेत त्यातील संत मार्टीन चर्च आणि रशियन चर्च ही दोन महत्त्वाची! रशियन चर्च केसुंच्या घराजवळच आहे, चालत जाण्यासारखे.मात्र डार्मस्टाट सगळा डोंगराळ भाग असल्याने रस्ते उंचसखल!एक चढण चढून वळण घेऊन चर्चच्या आवारात पोहोचलो. बाजूलाच मोठा बागिचा,लग्नाचा हॉल आणि डार्मस्टाटचे चिह्न म्हणून जो मनोरा कायम चित्रात दाखवतात तो मनोरा आहे. केगेल्न म्हणजे बॉलिंग खेळण्यासाठीची जागाही तिथेच पलिकडे आहे. मेपल्सच्या बागेत चारही बाजूला असलेले पुतळे लक्ष वेधून घेत असतानाच काहीतरी करुण कथा सांगत आहेत असे वाटते.(ती कथा काय ते कळले नाही.)चर्चच्या आवारात आयताकृती दगडी बांधीव फार खोल नसलेले तळे आहे. चर्चची इमारत बाहेरून फारच देखणी आणि टुमदार आहे. रशियन चर्चचा घुमट गोल असतो.इतर कॅथलिक आणि प्रोटेस्टंट चर्चांना घुमट नसतात तर उंच उंच कळस आकाशाच्या पोटात शिरायला पाहत असतात. अपवाद-फक्त म्युनशनमधल्या फ्राऊअनकिर्शला मात्र गोल घुमट आहे.

डार्मस्टाटच्या श्लॉस भागात गेलो.श्लॉस म्हणजे किल्ला. आता जरी हा भुईकोट किल्ला नसला तरी त्याच्या खुणा मात्र तिथले दगडी रस्ते आणि १५०० वर्षे जुनी मजबूत तटबंदीची भिंत दाखवते. तेथल्याच चौकात पहिल्या लुडविकचा भव्य पुतळा एका उंच मनोर्‍यावर आहे आणि तेथपर्यंत जिन्याने चढून जाऊन आपण डार्मस्टाटचे विहंगम दृश्य पाहू शकतो. सिटीसेंटर असल्याने येथे कायम चहेलपहेल असते.
सकाळी खाल्लेले केसुस्पेशल पोहे आता जिरले होते.त्यामुळे आता डार्मस्टाट मधील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत 'हाटेले' दिसू लागली होती. अशोककुमारच्या पिज्झेरियात भारतीय पदार्थ खाऊन बाहेर आलो तो मिरवणूक सुरू होणार असल्याची लक्षणे दिसली.चौकात लोकं जमायला सुरूवात झाली होती.म्हातारेकोतारे,लहान मुलं हातात पिशव्या घेऊन उभी होती.खिडक्या खिडक्यातून लोकं दिसू लागले.आपल्याकडे कसे गणपतीची मिरवणूक किवा गोविंदा पहायला लोकं उभे असतात त्याची आठवण झाली आणि योगायोगाने आज अनंतचतुर्दशी असल्याची आठवणही झाली.दूरवरुन ड्रमचा आवाज येऊ लागला.ही कसली मिरवणूक?अशी चौकशी केली असता हा मार्टिनक्रेब म्हणजे संत मार्टिनच्या उत्सवाची मिरवणूक असल्याचे समजले.
संत मार्टिनचे चर्च हे डार्मस्टाटमधील एक प्राचीन चर्च.सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी त्या चर्चची पारंपरिक जत्रा असते आणि पाठोपाठ येणार्‍या रविवारी 'आल्टस्टाटफेस्ट' म्हणजे गावचा उत्सव असतो.तीच उत्सवी मिरवणूक पहायला आता तिथल्या लोकांबरोबरच आम्हीही उत्सुक होतो.


सर्वात आधी बँडपथक बाअदबबामुलाहिजाहोशिय्यार करत आले.मागोमाग दोन उंच,पुष्ट,देखण्या आणि सजवलेल्या घोड्यांची बग्गी वाजतगाजत आली.घोडे चांगलेच दणकट होते.काळ्या रंगाचे आणि भुर्‍यापांढर्‍या आयाळीच्या घोड्यांना पायात फरचे जोडे घातले असावेत अशी मऊ झालर होती.बग्गीनंतर एकेक पथकं येऊ लागली.प्रत्येक पथकाचा गणवेष होता.त्यांचा बँड आणि त्यात वाजवणारे सगळे हौशी.. अगदी ८,१०,१२ वर्षांची मुलही फ्लूट,बिगुल,ड्रम वाजवत जात होती.कुठेही गडबड गोंधळ नाही की वाजवण्यात पुढेमागे नाही.सारे एका तालासुरात वाजवत चालले होते. प्रत्येक पथकामागोमाग त्यांचा सजवलेला रथ चालला होता आणि गोळ्या,चॉकलेटे,लहान खेळणी,किचेन्स इ. चा वर्षाव होत होता. सानथोर सारेच ते वेचत होते.मुलांच्या हातातल्या पिशव्यांचं कोडं आता उलगडललं.काही गाड्यातून गाजरे,सफरचंदे,वुर्ष्ट(सॉसेजेस्)इ. चे वाटप होत होते तर काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत होते आणि अंगूरबाला बँडच्या तालावर थिरकत साकीचे काम करत होत्या.भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते.दंगामस्ती होती पण बेधुंद कोणीही नव्हते.काही जण स्केटिंगची कौशल्यं दाखवत मिरवणूकीत चालले होते.तर काही नाचत गात चालले होते.गावचा उत्सव सारे गावकरी साजरा करत होते.


सर्वात शेवटचे पथक होते सफाईपथक! मिरवणूकीदरम्यान रस्त्यात पडलेल्या गोळ्याचाकलेटांच्या चांद्या,बिअर,वाइनचे प्लास्टीकचे गल्लास,गाजराचा पाला इ. कचरा यंत्राने साफ करत येणारी गाङी आणि ते सफाईकामगार ह्यांना मनोमन सलाम करत आम्हीही दोन चार चौक त्या मिरवणूकीत शामिल झालो.

कार्निवालच्या मिरवणूकीची आठवण करून देणारा हा गावचा उत्सव मनात जपत आम्ही फ्रांकफुर्टला परतलो.

प्रागकडे प्रयाण ...

ब्रुसेल्सच्या सहलीतच परतीच्या वाटेवर पुढच्या सहलीचे सुतोवाच करून झाले. झेक रिपब्लिक आता युरोपिय युनियनमध्ये आल्यामुळे तिथे शेंगन व्हिसा चालतो.. जायचं का प्रागला? सगळ्यांनी मिळून जर ह्या प्राचीन,सुंदर सुवर्णनगरीला भेट द्यायची असेल तर सोन्याला सुगंधच की.. मग त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. इंडियन ट्रॅवल कॉर्नरच्या रवि देशपांडेंबरोबर आम्ही ट्यूलिप्सच्या गावाला गेलो होतो , त्यांना गाठले. प्रागबरोबरच थोडे दक्षिणेला ऑस्ट्रीयात येऊन साल्झबुर्गही करायला त्यांनी सुचवले. परत फोनाफोनी ,खरडाखरडी , विरोपाविरोपी सुरू झाली. केसु आणि आम्ही दोघं जरी अगदी जवळच्या गावात राहत असलो तरी नेमके केसु दौर्‍यावर! दोन दिवस माद्रिद तर दोन दिवस लंडन,मध्येच स्टॉकहोम तर डार्मस्टाटला एखाद दिवस येऊन एकदम इटालीला प्रयाण असे त्यांचे जवळजवळ महिनाभर चालू होते आणि दिनेशच्या पॅरिस आणि आयबेरियात चकरा चालू होत्या. विपिन फ्लोरेन्समध्ये अडकलेले तर इरफान आणि लिखाळद्वय फ्राफुहुन बरेच लांब अंतरावर असल्याने सहलीची तारीख ठरली की आधी फ्राफुला येण्याची बुकिंग करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यात व्यग्र, तर डॉन अजून भारतातच होता. त्याचे जर्मनीचे तिकिट पक्के झाल्यावर तोही फ्राफुमध्येच राहणार असल्याने भ्रमणमंडळ कुठे, कधी सहलीला जाणार आहे याची चौकशी सुध्दा न करता त्याने सहलीत आपली जागा पक्की करून टाकली होती.

आता आम्हीही चार्ज्डअप झालो.देशपांडेंनी साल्झबुर्गला फेरियनवोहनुंग म्हणजे हॉलिडेहोममध्ये रहायचे असल्याने तिथे स्वयंपाकाची सोय आहे असे सांगितले होते. मग काय जवळ जवळ रोजच मी आणि शाल्मली जेवणाचे बेत ठरवत होतो आणि शक्यता लक्षात घेऊन बाद करत होतो.डॉन्याला भेळीसाठी चुरमुरे आणायला सांगितले होतेच त्यामुळे तो एक पदार्थ मात्र नक्की होता.

३ ऑक्टोबर हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या पुन:एकत्रीकरणाचा ऐतिहासिक दिवस असल्याने सुटी असते. ह्यावर्षी तो शुक्रवारी असल्याने मोठा विकांत मिळाला होता. तेव्हा गुरुवारीच दुपारी पाचच्या सुमाराला प्रागकडे कूच करायचे ठरले. लिखाळ आणि शाल्मली १/१०ला रात्रीच फ्राफुत दाखल झाले. महिन्यादोनमहिन्यांनी प्रत्यक्ष भेटत होतो आणि प्रागच्या सहलीची नशा होती त्यामुळे वाईनच्या साक्षीने रात्री गप्पा रंगल्या. जेवायला चिनी पध्दतीचा भात,सूप,चिनी बटाटे आणि डेझर्ट म्हणून वाईनक्रिम!

आमच्या जर्मन आजीआजोबांना भेटायची त्या दोघांना खूप उत्सुकता होती त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी ११च्या सुमाराला त्यांच्याकडे गेलो. तिथेही इतक्या गप्पा रंगल्या की शेवटी दिनेशला आम्हाला आठवण करुन द्यावी लागली प्रागला आजच जायचे आहे.

इरफान गेल्सनकिर्शहून ४च्या सुमाराला फ्राफुत पोहोचणार होता तर विपिनचे विमान फ्लोरेन्सहुन ४.१०ला येणार होते. केसु आणि डॉन्याही ४ च्या सुमाराला मुख्य स्टेशनातच भेटणार होते. तिथे असलेल्या 'मदन कॅश अँड करी' वाल्याला रात्रीचे जेवण आणि सामोशांची आर्डर दिली होती. ते बांधून घेऊन 'गणपतीबाप्पा मोरया'च्या गजरात गाडी विमानतळाकडे वळवली. ठरल्याप्रमाणे ८ नं च्या फाटकापाशी विपिन सज्जच होता. आता गणसंख्या पूर्ण झाली आणि सीमोल्लंघनासाठी प्रागच्या दिशेने काकांनी गाडी हाकायला सुरुवात केली. इकडे आमची तोंडे खाणे आणि बोलणे यासाठी अव्याहत चालू होती. सामोशांचा फन्ना केव्हाच उडला. गप्पा आणि हसण्याला तर उत आला होता. सहा महिन्यांपूर्वी आम्ही सारे एकमेकांना प्रत्यक्ष भेटलोही नव्हतो यावर देशपांडेकाका तर सोडाच पण आमचाच आमच्यावर विश्वास बसत नव्हता. शाळाकॉलेजच्या सहलीत जसा दंगा चालतो ना तस्सा दंगा करत आम्ही प्रागकडे चाललो होतो.
जर्मनीच्या ऑटोबानवर ( फ्रीवे)स्पीडलिमिट नाही. त्यामुळे जरी मोठा विकांत असला तरी जास्त रहदारी गृहित धरूनही १०च्या सुमाराला प्रागला पोहोचू असा अंदाज अनेकवेळा फ्राफु ते प्राग अंतर पार केलेल्या देशपांडेकाकांचा होता. पण वाटेतल्या अपघातामुळे सगळी गणितं चुकली. एरवी इथे ट्राफिकजॅम होतो म्हणजे गाड्या ४० ते ६०किमी /तास च्या वेगाने चालत असतात. पण आज मात्र वाहतुकीची कोंडी इतकी झाली होती की साकीनाक्याच्या ट्राफिकमध्ये अडकलोत असे वाटावे. ३७ वर्षात ही अशी स्टँडस्टिल राहण्याची दुसरी वेळ ! अशी माहिती काकांनी पुरवली. अशीच स्थिती पुढेही दोनतीनदा आली. सारेच कंटाळले होते.

अशातच केसुंचे पित्त खवळले होते. ते अनिश्चित रुटिन आणि फिरतीमुळे नसून काल रात्रीच्या हुकलेल्या चिनी जेवणामुळे असल्याचा निष्कर्ष म्युनस्टरवाल्यांनी काढला. आता एक छोटा कॉफी ब्रेक घेतला. त्यानंतर केसुंनी दादाकोंडकेची गाणी आयपॉडवर ऐकत आणि ज्ञानेश्वरांच्या(?) रेड्याच्या सुरात सर्वांना ती ऐकवत प्रवासात जान आणली त्यामुळे थोडा वेळ जरा बरा गेला. १० च्या सुमाराला जेवणासाठी एकेठिकाणी थांबलो आणि मदनच्या जेवणाला न्याय दिला. असं करता करता जेव्हा एकदाचे प्रागला पोहोचलो तेव्हा रात्रीचा १.३० वाजून गेला होता.

सुवर्णनगरी...

 झेक रिपब्लिकची राजधानी, गोल्डनसिटी अर्थात सुवर्णनगरी जिला म्हणतात त्या प्रागमध्ये आम्ही आलो होतो. हे प्राचीन शहर तितक्याच प्राचीन इमारतींसाठी आणि स्थापत्त्यासाठी प्रसिध्द आहे. गोथिक आणि बरॅक स्थापत्त्यशास्त्रांचा प्रभाव या शहरावर दिसतो. दोन्ही महायुध्दांमध्ये बरीच हानी होऊनही ,बर्‍याच इमारतींची पडझड होऊनही परत त्या इमारती जशाच्या तशा बांधून काढून प्राग आपल्या पुरातन दिमाखात परत उभे राहिले आणि सार्‍या युरोपाने सुवर्णनगरीचा मान दिला! युरोपातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी हे एक! रात्री जरी बराच उशीर झाला होता तरी सकाळी लवकरच चहापाणी उरकून, प्रागच्या मुख्य स्टेशनात गाडी पार्क करून, हातात नकाशा घेऊन ह्या नगरीत फिरायला बाहेर पडलो.

मुख्य स्टेशनाची इमारत पहाण्यासारखी आहे. तसं पाहिलं तर इथल्या प्रत्येकच इमारतीवर कोरीव काम केलेले दिसते. कमनीय युवती,सिंह आदिंचे पुतळे भव्य प्रवेशद्वारांवर दिसतात. प्रवेशदारेही अगदी पाहण्यासारखी आणि भव्य! जुन्या वाड्यांच्या मोठमोठ्या शिसवी,सागवानी कोरीव दरवाजांची आठवण यावी असे!

नाचणारे घर अर्थात डान्सिंग हाऊस पहायची उत्सुकता सर्वांनाच होती.दुसर्‍या महायुध्दात बेचिराख झाल्यानंतर बर्‍याच उशिरा म्हणजे १९९२ मध्ये क्रोएशियन आणि कॅनेडियन आर्किटेक्टने मिळून ह्या इमारतीचा आराखडा केला. १९९६ साली हे बांधकाम पूर्ण झाले.ह्या इमारतीच्या अगदी विचित्र अशा डिझाइनमुळे बरेच वादंग झाले पण तत्कालीन झेक अध्यक्ष हावेल तेथून अगदी जवळच राहत होता. त्याने ही आगळीवेगळी इमारत सांस्कृतिक केंद्र व्हावी म्हणून प्रस्ताव उचलून धरला आणि ही 'चिवित्र' इमारत आकाराला आली. फ्रेड आणि जिंजर ह्या दोन प्रसिध्द नर्तकांचे जोडनाव ह्या इमारतीला दिले आहे. सर्वात वरच्या मजल्यावर फ्रेंच उपाहारगृह आहे तर इतर मजल्यांवर बहुराष्ट्रीय कंपन्यांची हापिसे! लोकं गमतीने ह्या नाचणार्‍या घराला पिणारे घर (ड्रंक हाऊस) असेही म्हणतात. हावेलचे येथे सांस्कृतिक केंद्र करण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.

स्टेशनाच्या अगदी लगतच आहे ते 'नारोदनी' म्हणजे 'नॅशनल म्युझिअम'. युरोप आणि जगाला जोडणारे सांस्कृतिक संग्रहालय असे वर्णन असणारे झेक रिपब्लिकमधील हे सर्वात मोठे संग्रहालय. भव्य ग्रंथालय,इतिहास,विज्ञान, कला, संगीत त्यातही झेक संगीताचे एक वेगळे दालन आदि विविध दालने तर येथे आहेतच; पण आशियाई,आफ्रिकन आणि अमेरिकन संस्कृतीची माहिती देणारीही अनेक दालने येथे आहेत. अर्थात हे एकच संग्रहालय पहायला दिवस काय आठवडा पुरला नसता. वेळेअभावी अर्थातच आम्ही ते पाहू शकलो नाही.

तसेच पुढे चालत चर्च पर्यंत गेलो. तिथल्या टॉवरवर लिफ्टने गेलो.शेवटचा मजला लाकडी,पुरातन पायर्‍यांवरून चढलो.पूर्ण लाकूडकामाने युक्त असा तो पोटमाळाच वाटला. फक्त त्याला चारही बाजूंनी खिडक्या आहेत. त्यांचे कोयंडेही अगदी जुन्या पध्दतीचे आहेत. तेथून सार्‍या प्रागचा नजारा डोळे भरून पाहिला आणि कॅमेर्‍यात बंद करून घेतला.

चालत चालत प्रागच्या मुख्य चौकात आलो. ओल्ड टाउन स्क्वेअर येथे असलेले चर्च आणि त्या चर्चावर असलेले ऍस्ट्रोनॉमिकल घड्याळ हा अत्यंत कुतुहलाचा भाग आहे. यापूर्वी म्युनस्टरला असे घड्याळ आम्ही पाहिले होतेच पण आद्य आणि वेगळे ऍस्ट्रॉनॉमिकल घड्याळ म्हणजे प्रागचेच! इस. १४१० मध्ये कदान नावाच्या घड्याळजीच्या मदतीने चार्ल्स विद्यापीठातील गणित आणि खगोलशास्त्राचा प्राध्यापक सिंडॅलने हे घड्याळ तयार केले.अर्थात ह्या घड्याळाचा कर्ता कोण ह्यावरही प्रवाद आहेतच. १५५२ पर्यंत ते व्यवस्थित चालत होते. मग मात्र बंद पडले. ते मग दोन तीन वेळा दुरुस्त केले व ते करतानाच त्यात ख्रिस्तपुराणातील व्यक्तिरेखा आणि घड्याळाच्या बाजूचे चार पुतळे यांची भर घातली. ऍस्ट्रॉनॉमिकल डायल, सूर्य आणि चंद्राच्या जागा, १२ महिन्यांसाठीची कॅलेंडर डायल आणि प्रत्येक तासाला खिडकीबाहेर येणार्‍या ख्रिस्तपुराणातील अपोस्टल्स आणि इतर व्यक्तिरेखा हे ह्या घड्याळाचे मुख्य आकर्षण!

घड्याळाच्या डाव्या बाजूला दोन पुतळे आहेत. एक म्हणजे वॅनिटी - हातात आरसा घेतलेला ,स्वतःच्याच सौंदर्यात मग्न असलेला पुतळा आत्ममग्नता दर्शवतो. तर त्याच्या शेजारी असलेला सोने घेऊन जाणारा ज्यू लोभीपणाचे प्रतिक आहे. 'ज्यू'च का? चे उत्तर असे की ज्यू आधीच लोभी आणि कंजूष म्हणून ओळखले जातात ( आपल्याकडील मारवाड्यांसारखेच जणू ..) त्यात सोने वाहून नेणारा ज्यू म्हणजे तर लोभीपणाचा कळसच ! उजव्या बाजूला आहे एक सापळा, त्याच्याच हातात घड्याळाचा तास.. मृत्यूचे प्रतिक असलेल्या सापळ्याच्या हातात काळाची दोरी आहे आणि एकेक तासाचे टोल वाजवताना तो जाणीव करून देतो आहे.. वेळ पुढे पळतो आहे,मी जवळ येतो आहे. त्याच्या शेजारी असलेला योगी मात्र वाद्य वाजवण्यात तल्लीन आहे,सार्‍या जगापासून,सार्‍या मोहजालातून अलिप्त आहे. आयुष्यातली महत्त्वाची सत्येच हे पुतळे सांगतात.

आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा १२.५५ झाले होते आणि एक वाजता टोल वाजला की अपोस्टल्स बाहेर येणार त्याची वाट पाहत अलोट गर्दी थांबली होती.आम्हीही त्या गर्दीतला ठिपका होऊन एक वाजायची वाट पाहू लागलो. बरोब्बर एक वाजता मृत्यू सापळ्याने दोर ओढायला सुरुवात केली. तास वाजे झणाणा.. सुरु झाले. घड्याळावरचा कोंबडा आरवला आणि ख्रिस्तपुराणातल्या त्या बारा व्यक्तिरेखांच्या पुतळ्यांनी एकेक करून दर्शन दिले. कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट झाला. एक वेगळाच अनुभव गाठीशी बांधून आम्ही पुढे निघालो.

सिल्व्हर लाईन असे अधोरेखित केलेल्या रस्त्यांवरून फिरताना खरोखरीच सुवर्णकाळात फिरतो आहोत असे वाटत होते. बांधीब दगडी रस्ते, लहान गल्ल्यांतून चालत लहान मुलाचे कुतुहल डोळ्यात घेऊन त्या नगरीला डोळे भरून पाहत होतो. ख्रिस्टलसाठी प्रसिध्द असलेल्या प्रागमध्ये ख्रिस्टलचे मनमोहक आकार असलेले प्राणी,पक्षी,फुलदाण्या, घंटा,लोलक ,अलंकार आणि कितीतरी वस्तू पाहत पुढे चाललो होतो. आठवण म्हणून एखादी लहानशी वस्तू घ्यायचा विचार मात्र मनातच ठेवावा लागला कारण पुढच्या प्रवासात ती नाजूक वस्तू घरापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची खात्री वाटत नव्हती. रंगीबेरंगी खेळणी,बाहुल्या यांचे जणू प्रदर्शनच दुकानादुकानांत मांडलेले होते. अगदी अंगठ्याएवढी चिमुकली ठकू बाहुली पासून ते फूटभर उंची पर्यंतच्या वेगवेगळ्या आकारातल्या तश्शाच बाहुल्या एका रांगेत उंचीप्रमाणे मांडून ठेवल्या होत्या. त्या एकात एक बसवता येतात ही नवीच माहिती कळली.(आतापर्यंत फक्त एकात एक डबेच ठेवता येतात असा माझा समज होता.) तिथेच एका टपरीवजा दुकानात सळयांना मैद्याचे गोळे विशिष्ट आकारात लावून भाजत होते. आणि बदाम, पिस्ते ,कॅरामल मध्ये घोळवून ते खायला देत होते. आम्हीही त्याचा आस्वाद घेतला. एकदम 'झाटनामाटिक' लागते ते!

असेच हिंडत असताना एक बुध्दिबळाचे पट मांडून ठेवलेले दुकान दिसले. इतक्या विविध पध्दतीने सजवलेले चतुरंग दळ त्या पटांवर मांडलेले होते. ती बारीक कलाकुसर पाहतानाच एका षटकोनी पटाने लक्ष वेधले त्यात चक्क तीन प्रकारच्या सोंगट्या होत्या. काळ्या,पांढर्‍या आणि लाल! तिघांनी एका वेळी खेळायचा हा षटकोनी बुध्दीबळपट आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो.

हे आश्चर्य मनात घेऊनच आम्ही चार्ल्स पूलाकडे आलो. व्लटावा नदीवर राजा चार्ल्सच्या कारकिर्दीत इस.१३५७ मध्ये ह्या पूलाचे बांधकाम सुरू झाले.पूर्णपणे दगडी बांधकाम असलेला हा भक्कम पूल बांधायला ५० च्या वर वर्षे लागली आणि जवळजवळ १८७० पर्यंत पलिकडच्या भागाला जोडणारा हा एकच दुवा होता. नंतर मग इतर अनेक पूल बांधले गेले तरी ह्या चार्ल्सपूलाची शान काही वेगळीच! आता ह्या पुलावरून वाहने नेता येत नाहीत. फक्त चालत पलिकडे जायचे.त्या पूलावरून चालताना मुळामुठेवरचे पूर्वीचे जुने पूल उगाचच आठवत राहिले. जाताना दोन्ही बाजूंचे सौंदर्य पाहत,रमत गमत,आस्वाद घेत जायचे. घाईगडबडीत जाण्याची ही जागा नव्हे. त्याच पुलापासून पाऊण एक तासाच्या बोटींच्या फेर्‍याही निघतात. होडीत बसून सैर करत, बिअर नाहीतर कॉफी पित प्रागची शोभा पाहण्याची नशा काही वेगळीच.. पण वेळेअभावी आमची ती संधी हुकली.

चार्ल्स पूल पार करून आम्ही पुरातन किल्ल्याकडे आलो. अतिपुरातन १० व्या शतकात बांधलेला हा कॅसल म्हणजे फक्त राजमहालच नव्हता तर प्रागचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र होता. १४ व्या शतकात राजा चार्ल्सच्या सर्व महत्त्वाच्या राजकीय हालचाली येथूनच होत असत. राजसत्ता आणि धर्मसत्ता दोन्हीचे हे महत्त्वाचे केंद्र! मेरीमातेचे चर्च ही तेथली पहिली इमारत, नंतर मग संत जॉर्जची बॅसिलिका, संत व्हिटुसचे कथीड्रल बांधले गेले. आजही सर्वोच्च पदासाठीचा महाल येथेच आहे.देशाचे महत्त्वाचे सण येथेच साजरे केले जातात. मौल्यवान राजमुकुटही येथेच ठेवलेला आहे. विशेष म्हणजे येथे असलेली संग्रहालये आणि जुने महाल अध्यक्षांची कार्यालये सोडता जनतेला पहायला खुले आहेत.जुन्या आणि नव्याला जोडणारा हा प्राग कॅसल आज मोठ्या रुबाबात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खुणा जपतो आहे.

एकदम दोस्ती करावी असं वाटलं प्राग मला.. वेळ खूपच कमी पडला. परत कधीतरी प्रागला यायच अशी खूणगाठ मनाशी बांधलीच. साल्झबुर्गला जायचे होते. कालच्या स्टाऊच्या (ट्राफिक जाम)अनुभवाने पाय निघत नसतानाही गाडीच्या दिशेकडे जावे लागले. पावसाची रिपरिप चालू झाली होती. अपेक्षेप्रमाणेच सारे अंदाज कोसळले. नऊ सव्वानऊ पर्यंत पोहोचू असे वाटत असताना साल्झबुर्गमध्ये पोहोचलो तेव्हा ११ वाजून गेले होते. पोटात भूक आणि डोळ्यात झोप घेऊन आम्ही योहानाच्या दारात उतरलो. खिचडी खाऊन उद्याची स्वप्ने मनात घेऊन झोपलो .

हिमगुंफा !

 आज सकाळीच हिमगुंफा पहायला जायचे होते त्यामुळे लवकरच उठलो.पडदे बाजूला सारल्यावर आपसूकच अऽहा आले!योहानाचे घर डोंगराच्या कुशीत, वळणावळणांची वाट, दारात असलेलं सफरचंदाचं झाडं,उजव्या हाताला हिरवेगार मखमालीचे आवार, त्यात चरणार्‍या पुष्ट गाई, त्यांच्या गळ्यातल्या किणकिणत्या (त्या कोणत्याशा सिनेमामुळे सुप्रसिध्द झालेल्या)घंटा.. पलिकडेच दाणे टिपणार्‍या कोंबड्या,वार्‍यावर डोलणारी रंगीत गवतफुले, मागच्या बाजूला उंचचउंच आल्प्स, शिशिररंगात न्हालेली ती केशरीपिवळी झाडं,थोडी वर नजर गेल्यावर दिसणारे हिरव्या शेंड्यांचे पाइन्स आणि अजून वर पाहिलं की त्या हिरव्यागार पाइन्सवर जणू खोबरं पेरावं तसं शुभ्र बर्फ!नंदनवनातल्याच एका कोपर्‍यात आम्ही आलो नव्हतो ना? रात्रीच्या अंधारात आणि आंबलेल्या शरीर आणि मनाला हे सौंदर्य दिसल नव्हत.एका अर्थी ते बरंच झालं म्हणा.. सकाळ इतकी प्रसन्नता घेऊन उगवली की पूछो मत!

जिना उतरुन खाली आलो तर योहानाने नाश्त्याची जय्यत तयारी केली होती. घरचे दूध, बटर, दारच्या सफरचंदांचा उत्कृष्ठ केक,शेतातल्या स्ट्रॉबेरीचे मार्मालाडं,अंडीही घरचीच, म्युसली,वेगवेगळ्या प्रकारचे पाव..पूर्वी ती पावही घरीच करायची पण हल्ली तिच्याच्याने होत नाही अशी माहितीही कळली. काल प्रागच्या नादात जेवणाचे तसे हालच झाले होते. मिळेल ते खाल्लं होतं. रात्रीही खूप उशीर झाल्याने खिचडीवर भागवलं होतं. आता मात्र सगळी कसर भरून काढली. सगळ्यांनी ताव मारला.योहानाही आग्रहाने काय हवे ,नको ते विचारत होती आणि आम्ही पण येऊ दे केक, आणा अजून अंडी असे सांगत यथेच्छ खाल्ले.
आता वेर्फनला जायचे होते. जगातल्या सगळ्यात मोठ्ठ्या हिमगुंफा येथे आहेत. पायथ्यापर्यंत गाडी जाते, तिथून मग साधारण अर्धा तास चढून केबलकारच्या थांब्यापाशी जायला लागते. केबल कारचा थांबा साधारण १००० मीटरवर आहे आणि रोपवेने आपण १५७५ मीटरवर जातो.नंतर परत अर्धा तास चढायचे की १६४१ मीटर उंचीवर हिमगुंफेचे द्वार!
आम्हाला पायथ्याशी सोडून देशपांडेकाका परत गेले. ते तरी किती वेळा पाहतील गुंफा? असा विचार करून आम्ही चढायला सुरुवात केली.कच्चा वळणावळणांचा रस्ता,हिरवेगार पाइन आणि दुसर्‍या बाजूला दरीतून खोलवर दिसणारी घरांची सुबक रांगोळी!आम्ही जरा तरंगतच चढायला सुरुवात केली आणि टप्पोरे थेंब आले की अंगावर.पाण्याचे ते गार ,बोचरे थेंब नक्को वाटतात त्यापेक्षा बर्फ परवडले. छत्रीचा तर उपयोग नसतोच."अरे देवा,हा बोचरा पाऊस नको रे बाबा, त्यापेक्षा स्नो चालेल.." अशी विनवणी देवाने ऐकली चक्क आणि थोडं अजून वर गेल्यावर हिमवर्षा चालू झाली.शाल्मली आणि डॉन्याचा हा पहिलाच बर्फ! (लहान मुलांना कसं आपण पहिलाच उन्हाळा,पहिलाच पावसाळा आहे म्हणतो ना अगदी तस्सं..)पण कितीही वेळा ही वर्षा पहा,अनुभवा त्यातली गंमत ताजीच राहते.आम्ही सगळ्यांनीच भरपूर आनंद घेत चढणे चालू ठेवले.झाइलबान म्हणजे रोपवेची तिकिटे आता काढायची होती.
रांगेत उभे राहिलो आणि सभोवार पाहिले तर नजर ठरेल तिथे आता फक्त हिरवा आणि पांढरा रंग होता आणि धुक्याची हलकीशी लपेटलेली शाल.. परत अऽहाहा.. आले उस्फुर्तपणे!

रोपवेने आणखी वर गेलो. आता खाली दरीत फक्त धुकेच दिसत होते. अजून वर चढायचे होते.रस्ता अजूनच कच्चा,चढणीचा आणि वळणांचा झाला होता आणि खाली दरीत फक्त धुकेच दिसत होते त्यामुळे डोंगराला चिकटूनच चालायचे होते. झाडाझाडांवर लगडलेली हिमफुले पाहून सगळेच लहान झाले. बर्फाचे गोळे एकमेकांना मारत खेळायला सुरुवात झाली. शेवटी गुंफेत लवकर पोहोचायला हवे,येताना हवे तितके खेळू असे एकमेकांना बजावत परत चढू लागलो.
गुंफेच्या दारापाशी फक्त आम्हीच ७ जण!

पाचच मिनिटात दार उघडले. आम्ही तर तिळा,दार उघड! सुध्दा म्हणालो नव्हतो. अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे केल्विनच्या पाठोपाठ आम्ही आत शिरलो. दार परत बंद झाले. आत मिट्ट काळोख. आपल्याला बॅटरी न्यायला,फ्लॅश मारुन फोटो काढायला परवानगी नाही. उष्णतेने आतील बर्फ वितळू नये म्हणून ही काळजी. आम्हाला दोघात एक कंदिल दिला. आता एकूण १४०० पायर्‍या चढणे उतरणे होते.ते अद्भुत पहायला आम्ही अधीर झालो होतो.बर्फाचा राजवाडा आणि त्यातले ते महाल केल्विन आम्हाला मॅग्नेशियमच्या ज्योतीच्या प्रकाशात दाखवत होता.तो बर्फाचा नैसर्गिक चमत्कार पाहताना किती वेळा डोळे विस्फारले गेले. बर्फामुळे तयार झालेले एका बाजूने पोलार बिअर आणि दुसर्‍या बाजूने दिसणारा गजराज असे काय काय पाहिले.बाहेर कितीही तपमान असले तरी आतमध्ये मात्र शून्य अंश से. तपमान कायम असते. बर्फाच्या लेयरवरून त्याचे वय कसे ओळखतात तेही केल्विनने सांगितले.

ह्या गुंफांचा शोध अचानकच लागला. १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी ह्या गुंफा जगाला माहिती झाल्या. इस. १८७९ मध्ये अँटोन पोझेल्ट ह्या साल्झबुर्गच्या निसर्ग शास्त्रज्ञाला आप्ल्समध्ये फिरताना ह्या गुंफा सापडल्या.त्याने त्यावर माहितीपूर्ण लेखही लिहिले पण मग विशेष काही घडले नाही.मॉर्कच्या अलेक्झांडरने पोझेल्टचे लेख वाचले आणि तो त्या गुंफापर्यंत गेला आणि मग तिथे जायचा लोकांचा ओघ वाढला.साधारण १९२० नंतरअगदी प्रिमिटिव्ह का होईना चढणीसाठी रस्ते खोदले आणि मग पुढे वर्षभरात कच्चा का होईना रस्ता तयार केला गेला आणि इस. १९५५ मध्ये रोपवे बांधला गेला.
अलेक्झांडरची ह्या गुंफांमध्येच चिरनिद्रा घ्यायची इच्छा होती म्हणून मग त्याचा अस्थीकलश ह्या गुंफांत ठेवला आहे.एका बाजूला त्याचा अस्थीकलश आणि शेजारीच तयार झालेले हिमरुपी शिवलिंग हिंदू तत्वज्ञानाची जाणीव करून देतात.

केल्विन माहिती सांगत होता आणि एकीकडे ते बर्फीय चमत्कार दाखवत होता.एरवी अशी टूअर असते तेव्हा साधारण २५ एक लोकं तरी एका गटात असतात पण आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा फक्त आम्हीच ७ जण होतो आणि त्यांची वेळ झाल्यामुळे त्याने फक्त आम्हालाच घेऊन टूअर सुरु केली. सगळ्या गुंफेत तेव्हा फक्त आम्हीच होतो साहजिकच नियम थोडे शिथिल झाले आणि आम्ही भरपूर फोटो काढू शकलो.
तृप्त मनाने जेव्हा उदंड बर्फ पाहून आम्ही बाहेर आलो तेव्हा बाहेरची गर्दी पाहून आम्ही लवकर तिथे गेल्याचा विचार किती शहाणपणचा होता हे एकमेकांना सांगत आम्ही आता उतरु लागलो. आता मात्र मुक्तपणे बर्फात खेळत, एकमेकांना बफाचे गोळे मारत, बर्फाचे लाडू भरवत मूलाहून मूल झालो. आणि जेव्हा मन भरले तेव्हा रोपवेत बसलो.

अधिक चित्रांसाठी आप्ल्सच्या कुशीत हे कलादालन पहावे.

गरुडघरटं

 गुंफा उतरुन खाली येईपर्यंत एक वाजून गेला होता. आल्प्सच्या त्या डोंगरात मिळणारे पाणी परडवणारे नाही हे माहित होते त्यामुळे डबाबाटली सोबत होती. गाडीत बसल्याबसल्याच सँडविचांचा फन्ना उडाला. खाली उतरताना वाटेत लागतो अतिसुंदर 'होहन वेर्फन श्लॉस '!

होय तीच ही गढी जी "व्हेअर इगल्स डेअर" चित्रपटात दाखवली आहे. जिला 'श्लॉस ऍडलर ' नावाने चित्रसॄष्टीत ओळखतात. तेथे रेंगाळणे अपरिहार्यच होते पण थोडक्या वेळात सारे काही बसवायचे असल्याने नाइलाजाने तेथे जास्त वेळ न घालवता निघालो.

आता जायचे होते ओबेरसाल्झबुर्गला,इगल्सनेस्ट म्हणजेच ते सुप्रसिध्द टीहाउस,Kehlsteinhaus पहायला. हा सारा परिसर डोंगराळ भागात आहे.ओबेरसाल्झबुर्ग म्हणजे साल्झबुर्गचा वरचा भाग! आल्प्सचा तो सारा परिसरच इतका सुंदर आहे की शब्द आणि प्रतिभाही अपुरे पडतात.

हुकुमशहा हिटलरकडे कलाकाराचे मन होते त्यामुळेच बहुदा येथे सुंदर प्रासाद बांधवून घेतला असावा. तसेच हा सगळा डोंगराळ भाग,रस्ते वळणांचे, कठिण चढणीचे असल्याने शत्रू तेथे सहजपणे पोहोचू शकणार नाही , असाही विचार होता.ते पाहून थोरल्या महाराजांच्या राजकारणात गडकिल्ल्यांचे असलेले वेगळे महत्त्व ह्याने वाचले होते की काय? असा विचार उगाचच मनात आला.
गरुड नेहमी उंचावर ,सहज कोणाला दिसणार नाही आणि कोणाच्या हाती लागणार नाही अशा ठि़काणी आपले घरटे बांधतो. जर्मनीचा राष्ट्रीय पक्षी गरुड! साहजिकच ह्या गरुडाधिराजाचे हे घरटे म्हणजेच हिटलरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मार्टिन बोहरमानने बांधवून घेतलेले हे केहलस्टाइन हाउस ! शाही पाहुण्यांच्या खास खातिरदारीसाठी ह्याचा उपयोग केला जाई.अतिशय सुंदर ठिकाणी ,उंच जागी बांधलेला हा प्रासाद आणि तेथे जाण्याचा डोंगरातून खोदलेला वळणावळणाचा रस्ता अवघ्या १३ महिन्यात बांधून काढला गेला.अतिशय कठिण चढण आणि टोकावर पार्किंगसाठी केलेली खास जागा हा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना समजला जातो. ह्या सुंदर प्रासादात हिटलर स्वतः फक्त तीन वेळा राहिला. एक तर अतिशय उंचावर बांधलेला हा प्रासाद आकाशातून सहज लक्ष्य करता येईल अशी त्याला भीती वाटे. त्या काळातही तेथे वर जाण्यासाठी एक पितळी लिफ्ट बांधली होती जी ३० सेकंदात ३० मीटर अंतर जाते. ही लिफ्ट बंद पडली तर.. अशीही भीती त्याच्या मनात असे.त्यामुळे तो तेथे राहणे टाळत असे. इव्हा मात्र त्या सुंदरतेची भुरळ पडून तेथे अनेकदा जात असे व राहत असे.

दुसर्‍या महायुध्दाच्या हालचालींचे केंद्रस्थान ह्याच भागात बेरेष्टेसगार्टन रिजन येथे होते.फ्यूररचे वास्तव्य ह्या भागात जास्त असल्याने या भागाला 'ब्रांचऑफिस ऑफ बर्लिन' असे गमतीने संबोधले जात असे. येथेच माइनकान्फ च्या पैशातून १९३३ साली विकत घेतलेले वाखनफेल्ड हाउस ज्याचेच पुढे बर्गहोफ असे नामांतर झाले तो हिटलरचा प्रासाद आणि हेरमान गॉरिंग,मार्टिन बोरमान,अल्बर्ट स्पिअर आदि बर्‍याच अधिकार्‍यांचे बंगले होते परंतु महायुध्दातल्या बाँबवर्षेत तेथील घरे उध्द्वस्थ झालीच आणि बर्गहोफलाही त्याची झळ पोहोचली .तरी बर्गहोफ बर्‍याच प्रमाणात चांगल्या अवस्थेत होते. मात्र १९५२ मध्ये बव्हेरियन गवर्मेंटने ते निओनाझी मंडळींची पंढरी होऊ नये म्हणून उध्द्वस्थ करुन टाकले आणि तेथे झाडे लावली. त्या खुणा सांगणारी एकही गोष्ट आता तेथे नाही,त्यांची जागा फक्त वृक्षांनी घेतली आहे. युध्दसमाप्तीनंतर हा सगळाच भाग अमेरिकनांच्या ताब्यात अनेक वर्षं होता.
वर टीहाउस कडे जाणारा रस्ताही फार सुंदर आहे ,त्या रस्त्याने प्रवास करणे हाच एक अनुभव आहे असे म्हणतात.तेथे जाण्यासाठी त्यांच्या ठराविक बसनेच जावे लागते. खाजगी वाहनांना मज्जाव आहे.आम्ही हे गरुडघरटे पहायला अतिउत्सुक होतो पण.. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर वाढला होताच पण वाईट बातमी म्हणजे वर जाणार्‍या बसेस पावसामुळे आणि खराब हवेमुळे बंद केल्या होत्या.आता इगल्सनेस्ट पाहणे शक्य नव्हते. थोडेसे निराश होऊन आणि परत इथे यायचेच असे मनाशी ठरवून आम्ही पायथ्याशी असलेल्या बंकर्सकडे वळलो. हे बंकर्सही असे बांधले गेले की सहजासहजी ते दृष्टीस पडणार नाहीत. आज तेथे दुसर्‍या महायुध्दाचे माहितीकेंद्र तथा म्युझिअम केले आहे .

आत पोहोचलो ते विस्फारल्या डोळ्यांनीच! एकूण जर्मनीतच हिटलर, दुसरे महायुध्द यावर बोलणे सारेच जर्मन टाळतात.त्या काळच्या खुणाही शक्य तिथे पुसून टाकल्या आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती मिळणं तसं कठिणच,पण येथे मात्र दुसर्‍या महायुध्दाच्या काळातल्या अनेक खुणा जपल्या आहेत. जुनी वर्तमानपत्रे, फोटो,चित्रफिती ह्या सार्‍यातून इतिहास सामोरा येतो.
खुद्द बंकर्स पाहताना तर थक्क व्हायला होते. बंकर म्हणजे लपण्यासाठी,आसर्‍यासाठी केलेली सोय ,त्यामुळे मला उगाचच लहानसे जमिनीखाली केलेले बांधकाम असे काहीतरी चित्रं डोळ्यासमोर होते. पण येथे आपल्याला दिसते डोंगराच्या पोटात वसवलेले छोटेसे गावच जणू! जमिनीखाली जवळजवळ सहा मजले उतरुन गेले की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश!काय नव्हतं तिथे?
हे तर मोठ्ठे बंकर्सकाँप्लेक्सच दिसते. यात वेगवेगळी आठ युनिट्स असून त्यातील पाच युनिट्स आतून जोडली आहेत.आतमध्ये सुसज्ज दिवाणखाने, शयनगृहे,भटारखाने,भोजनकक्ष, हमामखाने,कचेरीदालने,वैद्यकियसेवाकक्ष तर आहेतच पण एक कारागृह सुध्दा आहे. टेलिफोनचे जाळे असून ८०० एक्स्टेनशन्स आहेत.वीज,पाणी एवढेच नव्हे तर एअरकंडिशनिंगचीही व्यवस्था केलेली दिसून येते. हवा खेळती रहावी म्हणून मोठमोठ्या पाइप्समधून हवा खेळवली होती त्यातील काही पाइपलाइन्सचे अवशेष त्या इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत.बंकर्सच्या तोंडाशी मशिनगन्स बसवून संरक्षक तटबंदी तयार केलेली आढळते.

तेथल्याच एका दालनात ( पूर्वीच्या बंकरमध्ये ) हिटलरच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा माहितीपट जर्मन आणि इंग्रजीत तेथे दाखवतात. तो पाहून संमिश्र भावना मनात घेऊन आम्ही साल्झबुर्गकडे निघालो.

साल्झबुर्ग आणि सांऊड ऑफ म्युझिक! हे दोन शब्द अगदी हातात हात घालून जातात ना? पण आज आम्हाला साउंड ऑफ म्युझिक मधले साल्झबुर्ग पाहण्याइतका वेळ नव्हता. त्यामुळे या सुंदर शहरात एक फेरफटका मारावा असं ठरवून मुख्य चौकात उतरलो.
दर शनिवारी येथे असतो आजूबाजूच्या डोंगरातल्या खेड्यातून आलेल्या शेतकर्‍यांचा आठवडी बाजार! आम्ही तेथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होत आली होती ,सारे शेतकरीही आपापली पालं आवरायच्या तयारीत होते.चौकात जिकडेतिकडे मोझार्टचे पुतळे आणि कटआउट्स आहेत. त्याचे हे जन्मगाव.

त्याचे जन्मस्थान पाहून मग गेलो ते तेथल्या प्राचीन चर्चमध्ये. चर्चसभोवतालचा परिसरही तितकाच सुंदर आहे. चर्चच्या प्रांगणात एक मोठ्ठा बुध्दिबळपट आहे.(असाच मोठ्ठा पट आमच्या फ्राफुच्या बोलांगरोपलास्ट मध्येही आहे.)तेथे दोन म्हातार्‍यांचा डाव अगदी रंगात आला होता आणि आजूबाजूला बघ्यांचीही भरपूर गर्दी होऊ लागली होती पण ते दोघे मात्र खेळात अगदी रंगून गेले होते,त्यांचे इतरांकडे लक्षच नव्हते.

तो खेळ थोडावेळ पाहून आम्ही आत गेलो. चर्चमधील कोरीव काम,काचकाम पाहण्यात वेळ तसा बराच गेला. साल्झबुर्गच्या फॅशनस्ट्रीटवर विंडो शॉपिंग करत असताना अचानक लक्षात आलं केसु कुठे दिसत नाहीत.. मग पुढे गेला असेल, तू जाऊन पहा रे.. असे करत करत तेथला सारा परिसर शोधले. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. ते थंडगार,बोचरे पाण्याचे थेंब चुकवत केसुंना शोधणे चालूच होते. शेवटी म्याकदादाकडे आसरा घेतला आणि केसुना फोन लावला तर हे महाशय आम्हीच सगळे रस्ता चुकल्याबद्दल आम्हालाच बोल लावत गाडी जिथे पार्क केली होती तेथे उभे होते.साल्झाक नदीच्या किनार्‍यावरुन दिसणारे दृश्य पाहण्यात जास्त वेळ न घालवता मग आम्ही गाडीकडे निघालो. गाडीपाशी पोहोचल्यावर 'प्रेमळ ' शब्दांची देवाणघेवाण झाली आणि योहानाच्या घरी जायला निघालो.

आज रात्रीचा बेत होता चटकदार भेळ! डॉन्या (आदेशाप्रमाणे) भारतातून चुरमुरे घेऊन आला होता. गोड,तिखट चटण्या, फरसाण ,कांदे ,टोमॅटो इ.कच्ची तयारी सगळी बरोबर घेतली होतीच.तरी कोथिंबिर आयत्यावेळी पिशवीत टाकायची म्हणून फ्रिजमध्ये ठेवली होती ती आठवणीने विसरले होते त्यामुळे प्रेमळ शब्दांची बरसात फारच वाढली. घरी पोहोचल्यावर किचनचा ताबा केसुंनी घेतला आणि फर्मास भेळ बनवली. भेळ व मोझार्ट बीअरचा आस्वाद घेत उद्याच्या सॉल्टमाईन्सचे बेत आखू लागलो.

 

लाइष्टष्टाइनचा धबधबा!

 आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना.. येथील ड्युर्नबेर्ग ह्या डोंगराच्या पोटात मीठाच्या खाणी आहेत त्या पहायला अर्थातच आम्ही सारे उत्सुक होतो. वेळाचं गणित कसं जमवायचं हाच मोठ्ठा प्रश्न होता. लिखाळमंडळींची गाडी फ्राफुहून संध्याकाळी ६.३० वाजता सुटणार होती तर इरफानची ७.१५ वाजता,म्हणून मग सक्काळी लवकर निघून लाइष्टनष्टाइनइन्क्लाम हा आल्प्समधला सर्वात लांब,खोल आणि सुंदर धबधबा पहायचा आणि मग खाणी पाहून एकच्या सुमाराला परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची असं ठरलं. त्याप्रमाणे सक्काळी लवकर उठून, आवरुन योहानाचा आणि त्या सुंदर परिसराचा निरोप घेताना परत इथे यायचेच असे प्रत्येकाच्याच मनात आले.

आम्ही धबधब्याच्या एंट्री पॉइंटपाशी पोहोचलो तेव्हा तिकिटखिडकी उघडायला थोडा वेळ होता. बाजूलाच असलेल्या छोट्याशा पार्कातले झोपाळे, डुलणारे घोडे पाहून सगळे जण मूलाहून मूल होऊन तिथे धावले. तिथे एवढावेळ फक्त पक्षीरवच काय तो होता आणि अचानक आमच्या कलकलाटाची भर पडली.

बहुदा आमच्या आवाजानेच खिडकीवरच्या माणसाने लवकर दार उघडून आम्हाला तिकिटे देऊन आत पिटाळले आणि आमच्या गोंगाटातून सुटला एकदाचा..

एका बाजूला उंचच उंच आल्प्स आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी.. हिरवी पिवळी केशरी झाडं डोंगरमाथ्यावरही होती आणि खाली दरीतही..कच्च्या रस्त्यावरुन आम्ही चढायला सुरुवात केली.थोडे वर गेल्यावर एक लाकडी साकव लागला. कुठेही कृत्रिम बांधकाम वाटणार नाही, त्या निसर्गाचा तोल बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन रस्टिक फिल देऊन तेथील दोन्ही तिन्ही पूल बांधले आहेत,तीच गोष्ट दोन्ही बोगद्यांची आणि दगडी आणि लाकडी पायर्‍यांची..थोडे अजून वर चढल्यावर पाण्याचा खळाळता आवाज ऐकू येऊ लागला.

ग्रोसारल नदीत उडी घेणारा,शेकडो वर्षांच्या स्थित्यंतरांनी तयार झालेला हा जलप्रपात पहायला आतुर झालेल्या पावलांचा वेग आपसूकच वाढला.लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले.अनुपम सॄष्टिसौंदर्य लाभलेला हा प्रपात म्हणजे लवणपूराची शान आहे!

तो नजारा डोळ्यात साठवून घेत आम्ही वर चढत होतो. शेवाळंभरले दगड,पाण्याच्या आघाताने गुळगुळीत झालेले खडक त्या प्रवाहात दिसत होते.काही ठिकाणी इतके उंच आणि निमुळते डोंगरसुळके की आकाशाचा चतकोर निळा तुकडाच चुकारपणे दिसावा आणि त्या निळाईशी स्पर्धा करणारे खाली खोल वाहणारे खळाळते पाणी..

दुपारच्या वेळी सूर्यदेवांची कृपा असेल तर तेथे मनोहारी इंद्रधनुची रांगोळीही उमटते.सृष्टीचे ते सारे नवल पाहत आम्ही बोगदा ओलांडून पुढे गेलो आणि एका वळणावर त्याचे ओझरते दर्शन झाले.कितीतरी वेळ तिथेच त्या निसरड्या पायर्‍यांवर उभे राहून भारल्या अवस्थेत पाहतच राहिलो.

काही वेळाने त्या गारुडातून जागे होऊन पुढे चढू लागलो.खळाळत्या पाण्याखेरीज आता कसलाच आवाज नव्हता. दुसरा बोगदाही ओलांडून आम्ही पुढच्या वळणावर पोहोचलो आणि 'तो' सामोरा आला.कितीवेळ त्याच्याकडे पाहत राहिलो, मग भानावर येऊन त्याला सामोरा,पाठीशी ठेवून भरपूर फोटो काढून घेतले.

नायाग्रा किवा इग्वासुसारखा हा अतिभव्य धबधबा नाही. त्याच्या तुषारात भिजायला नेणारी धुक्याची पोर नाही. आल्प्स खोदून निमुळत्या डोंगरसुळक्यांतून निसटून खाली ग्रोसारल नदीकडे झेपावणारा हा धबधबा उंचीला उत्तुंग आणि खोलीला अथांग आहे. कधी रंगीत तरी कधी हिरव्या झाडांचा पोषाख ल्यालेला आल्प्स दुधाच्या धारा घेऊन येतो आणि आपल्याला आमोरासामोरा भेटतो,एखाद्या मित्रासारखा! हिवाळ्यात आल्प्सने बर्फाची दुलई गुरफटून घेतली की इथला मार्गही बंद. धबधबा तर गोठतोच पण ह्या चढणवाटेने त्याला भेटायला येणं अशक्य होऊन जातं. वसंतात पुन्हा पाणी खळाळू लागतं आणि ते थेट शिशिराची चाहूल लागेपर्यंत.. तेथून हलूच नये असं वाटत होतं पण लवणखाणींकडेही जायचे होते. नाईलाजाने त्याला ऑफ विडर सेझेन (पुन्हा भेटूया) म्हणून आम्ही ड्यूर्नबर्गकडे निघालो. 

लवणखाणी

 ड्यूर्नबर्ग,आल्प्सच्या डोंगरमाळेतला एक प्राचीन डोंगर, मीठाच्या सगळ्यात जुन्या खाणींपैकी एक असून त्या खाणी पाहणं हा एक अनुभव आहे.प्राचीन काळात मीठामुळेच साल्झबुर्गला संपन्नता आली ,ह्या मीठाच्या खाणी सापडल्या हलाइनच्या ड्यूर्नबर्ग डोंगरात आणि म्हणून 'हलाइनचे श्वेतसोने ' असे नाव मीठाला पडले.ह्या खाणींचा मालक प्रिन्स आर्च बिशप,वोल्फ डिटरिश! दरवर्षी ३६,००००टन मीठ ह्या खाणीतून काढले जात असे.ह्या खाणी पहायला हलाइन या टुमदार गावातून आपल्याला ड्यूर्नबर्गकडे जावे लागते. तेथे पोहोचल्यावर आम्हा सर्वांना विशिष्ट एप्रन चढवायला सांगितले आणि एका सरकत्या जिन्याने खाली नेले. तेथे रेलट्रॅक दिसला.

एक साधारण पन्नाशीची मावशी तिथल्या पारंपरिक वेशात तेथे उभी होती. आत्ता मायनर ट्रेन (पिट रेल्वे)येईल,त्यात बसून आपल्याला खाणींकडे जायचे आहे.तिने माहिती पुरवली. थोड्याच वेळात ती झुकझुकगाडी आली की.. एक इंजिन आणि ३५,४० जण बसतील असे लांबच लांब बाकडे.. एवढीच गाडी. टप नाही की काही नाही.ज्ञानेश्वरांची चालणारी भिंत उगाचच काहीही संदर्भ नसताना आठवली. तर त्या बाकड्यांवर एकामागोमाग एक सगळे सलहान मुले गाडीगाडी करत खेळताना जसे बसतील तसे बसले आणि गाडी सुरु झाली. साधारण ५/७ मिनिटे गाडी बोगद्याबोगद्यातून चालली होती आणि एके ठिकाणी मावशींनी आम्हा सर्वांना उतरायला सांगितले. पलिकडच्या बाजूला आधीच्या ट्रीपमध्ये खाणी पाहिलेले लोकं परत जाण्यासाठी नंबर लावून उभे होतेच.

आम्ही मग पुढे जाऊ लागलो. एका ठिकाणी थांबून मावशींनी जुने लहान बुटके मार्ग आणि नविन मार्ग दाखवले. हे बोगदे बांधताना लाकूड,स्टील आणि काँक्रिटचा वापर केलेला असून आपण आत्ता जमिनीखाली ८० मीटर आहोत अशी माहिती पुरवत मावशींनी सगळ्यांना एका ओळीत चालायला सांगितले. शाळेच्या सहलीला आल्यासारखे बाईंच्या सूचनेने वाटले खरे पण त्या बोगद्यात इतकी कमी जागा आहे की एकावेळी एकच जण जाऊ शकेल. येथल्या दगडांनाही खारट चव आहे हे ती सांगत असतानाच सगळ्यांनाच लग्गेच चव पहायचा मोह आवरला नाही. पुढेपुढे चालत आम्ही सगळे एका दालनात आलो. इथे चित्रफित सुरु झाली.खाणीतून मीठ कसे काढले जात असे पासून बाजारपेठेत कसे पोहोचत असे इथपर्यतचा सारा प्रवास ह्या चित्रफितीतून गोष्टीरुपाने दाखवला आहे.ड्यूर्नबर्गचा प्रिन्स आर्चबिशप, वोल्फ डिटरिश आपल्याला ह्या चित्रफितीतून भेटतो आणि त्याचे बोट धरुन आपणही त्याच्याबरोबर त्या काळात पोहोचतो.विशेष म्हणजे ही फित सलग न दाखवता खाणीच्या चार टप्प्यात ती दाखवतात.

येथून आता लाकडी स्लाइडने खाली जायचे होते. २८ मीटर लांबीची ती घसरगुंडी,एकावेळी दोघातिघांनी बसायचे,एकमेकाला धरुन ठेवायचे , पाय जमिनीला न घासतील असे तरंगते ठेवायचे आणि घसरायचे, मावशी सूचना देत होत्या.घसरगुंडीवर किती वर्षांनी बसलोत असे म्हणत सगळे खाली आले. इथे एका पाइपातून पाणी ठिबकत होते आणि खाली मीठाचे स्फटिकही दिसत होते.सगळ्यांनीच ते खारट पाणी चाखले. जागोजागी लावलेले फलक,पुतळे आणि चित्रांतून खाणीची माहिती सांगितलेली दिसत होती. चालता चालता एक पाटी दिसते. आपण ऑस्ट्रीयातून जर्मनीत येतो. जमिनीच्या पोटात ऑस्ट्रीया-जर्मनी सीमा आहे, जमिनीच्या पोटातल्या सीमेवर सुरक्षा नाही की चेकपोस्ट नाही हे अनुभवताना वेगळेच वाटले.

पुढे एका दालनात आलो. प्रिन्स मीठाची गोष्ट सांगत होता.हजारो वर्षांपूर्वी समुद्रातल्या खार्‍या पाण्यातले सॉल्ट डिपॉझिटस खडकांवर झाले,त्यापुढे हजारो वर्षांनी आल्पची निर्मिती झाली,आणि आल्प्सच्या काही डोंगरांच्या पोटात हे खडक लपून बसले.मग त्याने ड्यूर्नबर्गच्या पोटात लपलेले हे खडक आणि मीठ लोकांसमोर आणण्यासाठी खाणी खोदवून घेतल्या. आता आम्ही पुढे खरं म्हणजे अजून खाली जाण्यासाठी अजून एका ४२ मीटरच्या घसरगुंडीवरुन मघासारखेच खाली घसरुन आलो. प्रिन्स बिशप आमच्याआधीच इथे स्वागताला येऊन पोहोचलेला होता."पारंपरिक पध्दतीनेकाढले जाणारे मीठ पुरेसे नव्हते. मग मी तज्ज्ञांच्या एका गटाला पाचारण केले. मीठाचा पाण्यात विरघळण्याचा गुणधर्म लक्षात घेऊन त्यांनी एक योजना मांडली.'सोल्युशन माइनिंग' !" प्रिन्स गोष्ट सांगू लागला.

एक साधारण ३० मीटरच्या शाफ्टच्या सहाय्याने डोंगराच्या पोटात मोठ्ठा खड्डा खोदला. हा खड्डा पाण्याने काठोकाठ भरला.तेथल्या आजूबाजूच्या खडकातले मीठ ह्या पाण्यात विरघळत गेले आणि बाकीचा भाग पाण्याच्या तळाशी बसला. हा खड्डा हळूहळू मोठा होत गेला. पाच सहा आठवड्यांनी हे खारट झालेले पाणी,ज्यात साधारण २७% मीठ होते,पुढच्या प्रक्रियेसाठी बाहेर काढले गेले. ह्या पाण्याचे बाष्पीभवन करून खाली उरलेले मीठ दाबाखाली वाळवले जात असे. पुढची १०-१५ वर्षे हे अव्याहत चालू होते,आता खड्ड्याचे चांगल्या मोठ्ठ्या सॉल्ट लेक मध्ये रुपांतर झालेले होते.

गोष्ट ऐकून जरा भारावूनच एका तराफ्यातून त्या तळ्याच्या पलिकडे गेलो. "आपण आता जमिनीच्या खाली १८० मीटर आहोत." मावशींनी बोलायला सुरुवात केली. एवढा वेळ आम्ही जमिनीच्या पोटात होतो. अरुंद बोगद्यातून चालत होतो. कुठेही एकदासुध्दा आम्हाला गुदमरायला झाले नाही की उकाडा जाणवला नाही. "खाणी बांधल्या तेव्हापासूनच येथे १० अंश से तपमान वर्षभर कायम ठेवले जाते आणि शुध्द हवा खेळवलेली असल्याने तुम्हाला खाणीत,जमिनीच्या पोटात असलात तरी फ्रेश एअर मिळते." जुनी , ऐतिहासिक लाकडी पाइपलाइन दाखवत मावशींनी तत्परतेने प्रश्नाचे उत्तर दिले.आता मात्र ही पाइपलाइन न वापरता नवीन तंत्रज्ञान वापरले जाते हे सुध्दा आवर्जून सांगितले. थोडे पुढे आल्यावर आमचे लक्ष दोन मानवी सांगाड्यांनी वेधले. खाणीचे बांधकाम जेव्हा चालू होते तेव्हा १५७७ मध्ये एक आणि १६१६ मध्ये दुसरा असे दोन मानवी सांगाडे मिळाले. शेकडो वर्षांपूर्वी दरडी कोसळून त्यात गाडले गेलेले हे लोकं आहेत. २००० वर्षे वयाचे हे सांगाडे तेथल्या मीठामुळे सुरक्षित राहिले.ते पाहताना अंगावर काटा आला.

जमिनीच्या पोटात दडलेले ते आश्चर्य पाहून सरकत्या जिन्याने वर आलो आणि मघाचच्या झुकझुकगाडीची वाट पाहू लागलो. आता सगळ्यांचे लक्ष घड्याळाकडे गेले. १ वाजून गेला होता. दिडपर्यंत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर साडेपाच पावणेसहापर्यंत फ्रांकफुर्टात पोहोचू असा विचार मनात आला. खाणीतून बाहेर आल्यावर अक्षरशः पळत आमच्या गाडीकडे गेलो. तहानभूक बाजूला ठेवून,कोठेही न थांबता शक्य तितके लवकर फ्राफुला पोहोचून लिखाळ मंडळी आणि इरफानची ट्रेन गाठायची हे लक्ष्य होते. १३०,१४०/तास च्या वेगाने जात होतो पण तणावाने कोणालाच काही सुचत नव्हते. एखाद्या ठिकाणी कॉफी ब्रेकमध्ये पाच,दहा मिनिटे घालवून वेळेचा अपव्यय नको असेच सगळ्यांचे मत पडले आणि .. चालत्या गाडीला खीळ लागली. पुढे दिसणारा गाड्यांची मोठ्ठाच्या मोठ्ठी रांग पाहिल्यावर अवसान गळाले. त्यात १०,१५ मिनिटे अडकून पुन्हा वेग पकडला आणि परत एकदा स्टाऊ! असे तीन चारदा झाले. घड्याळात आता चार वाजून गेले होते, अजून आम्ही न्यूर्नबर्गच्याच आसपास होतो. दीडपावणेदोन तासात फ्रांकफुर्ट गाठणे अशक्य आहे ,लिखाळची गाडी चुकली हे तर स्पष्ट झाले.इरफानला तरी गाडी मिळेल ह्या आशेने नेटाने,वेगाने पुढे जात राहिलो पण परत एकदा जवळजवळ २० मिनिटे स्टाऊत अडकलो. आता इरफानचीही गाडी मिळणे अशक्य होते.

एकदा गाड्या चुकल्याच आहेत म्हटल्यावर आता त्रास करुन घेण्यात काय अर्थ आहे? असे वाटले आणि सकाळी नाश्त्यानंतर काहीही न खाल्ल्ल्याची जाणीवही झाली. मग मात्र एका ठिकाणी थांबून पेटपूजा केली,कॉफी पिऊन जरा ताजेतवाने झालो आणि पुढचा प्रवास तणावरहित गप्पा करत केला. मानहाइमच्या अलिकडे पुन्हा स्टाऊ ! हे म्हणजे आता अगदी पोचतोच आहोत ठाण्यात असे वाटावे आणि पनवेलात ट्रॅफिकने हैराण करावे असे झाले. शेवटी १०च्या सुमाराला फ्रांकफुर्टात पोहोचलो. विपिनचे ओपन तिकिट असल्याने कोणतीही गाडी चालणार होती. आता ह्या तिघांच्या तिकिटांचे आणि गाड्या कधी आहेत ते पहायचे होते.तिकिटखिडकीवर जाऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेला प्रकार कथन केला आणि काही पैसे भरुन ती तिकिटे पुढच्या गाडीसाठी व्हॅलिड करुन घेतली. एवढे होईपर्यंत डॉन्याची ट्राम आणि केसुंची डार्मस्टाटची गाडी लागलेली दिसल्यावर त्यांना जायला सांगितले. डॉर्टमुंडला जाणारी गाडीही तेवढ्यात १६ नं ला लागलीच. मग विपिनचा निरोप घेतला. अगदी इमर्जन्सीला हवीच म्हणून ठेवलेली थोडी सफरचंदे आणि पाणी विपिन, इरफान, लिखाळ, शाल्मली ह्या सर्वांना आता ह्या पुढच्या प्रवासाला उपयोगी पडत होते. लिखाळ द्वय आणि इरफानच्या गाडीला अजून पाऊण तास होता.इरफानला पहाटे ४ च्या सुमाराला एसन येथे गाडी बदलून गेल्सनकिर्शला जावे लागणार होते पण तरी थेट गाडी उपलब्धच नसल्याने इलाज नव्हता.
एव्हाना ११ वाजायला आले होते. सकाळपासून धावपळ चालू होती. आता गाडीची सोय झाल्यावर सगळ्यांची पोटं बोलू लागली होती. जवळपास २२ तास चालू असणार्‍या बर्गरकिंगमुळे ती सोय झाली. सर्वांनी आता मात्र खाऊन घेतले आणि नंतर ह्या तिघांना म्युनस्टरच्या गाडीत बसवले . आता सुटकेचा खरा नि:श्वास टाकून आम्हीही घरी जायला निघालो.

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...