Sunday, October 25, 2020

पेरू

 

माझ्या पेरु देशातील एकल प्रवासाची ही कहाणी. निसर्गवैविध्यसंपन्न अशा मोजक्या देशांपैकि हा एक!
हे देश एका अर्थाने 'पैसा वसूल' असतात कारण एकाच भेटीत अनेक अनुभव घेता येतात. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानासाठी तयारीही करावी लागते, ओझं ही बाळगावं लागतं. साधारण एक दीड महिना आधी, पीतज्वर लसिकरण् व तिकिटांपासून तयारीला सुरुवात झाली. (विषुववॄत्तीय देशांमध्ये जाण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे)

आधी थोडा इतिहास भूगोलः हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम-मध्य किनारपट्टीवर आहे. उत्तर आणि पूर्व भाग अमेझॉनचे जंगल, दक्षिण-मध्य भाग हा उंच पठार व हिमाच्छादित पर्वतरांगा, दक्षिण किनारपट्टीवर रूक्ष वाळवंट व धुक्याने कायम आच्छादलेला पश्चिम किनारा असा थोडक्यात भूगोल. इथले मूळचे लोक हे अनेकविध भटक्या व नागरी संस्कृतींचे वंशज आहेत. केचुआ हे त्यातील सर्वात प्रगत. त्यांच्या राजाला 'इंका' असे म्हणत आणि त्याच अभिधानावरून बहुतांश जग या संस्कृतीला 'इंका' या (चुकीच्या) नावाने ओळखते. पुढे स्पेनच्या गुलामीचे दुर्दैवी पर्व आणि सध्याचा 98% ख्रिस्ती देश असा थोडक्यात इतिहास.

.

माझ्या प्रवासाची सुरुवात मी इथपासून केली. राजधानी लिमा. जुन्या शहरातील प्रवास हा मुख्यत्वे पाईच केला. संग्रहालयांपैकी फ़क्त महत्वाची दोन पहायची ठरवली कारण कुठल्याही ऐतिहासिक संपन्नता असलेल्या देशांची संग्रहालये हाच मुळी अतिशय वेळखाऊ विषय असतो, आणि वेळ असेल तर मात्र नक्की द्यावा. असो, संग्रहालयांवर एक भाग नंतर...

राजधानी लिमा हे बंदर असून अतिशय नपिक व ओसाड भागात वसलेले आहे. परंतु कोलोनिअल् स्थापत्यकलेचे अतिशय समृद्ध नमुने इथे पहावयास मिळतात. अतिशय विस्तृत असे चौक, रेखिव बाल्कन्या (सौध/गवाक्ष) आणि भडक पण शोभणारे रंग अशी येथील वास्तुकलेची काही वैशिष्ट्ये.

प्लाझा सान मार्टीन्

.

काही रेखीव बाल्कनी


.

.

.

.

.



चर्च ही दुसरी बघण्यासारखी वास्तुशिल्पे.

इग्लेझिआ डे ला मेर्सेद् चे अल्तार
.


लिमा मुख्य चर्च्
.

.

.


सान् पेद्रो बसिलिका
.


सान् फ़्रान्सिस्को चर्च् च्या तळघरात मिळालेले असंख्य सांगाडे. धर्मांतराचे बळी...
.


नव्या जुन्याचा संगमः भर वस्तीतले दक्षिण अमेरिकी पिरॅमिड् : व्हाका-पुक्याना (huaca pucllana)
.


कोस्ता वेर्दे हिरवा किनाराः भर दुपारी सुद्धा असे मळभ/धुके असते...
.
.



पेरू राष्ट्रपती भवनः राष्ट्रीय चिन्ह
.

नविन लिमाः एका उद्यानातील कारंजे

.

पराकास समुद्री अभयारण्य

या भागात सुरुवातीला एकल प्रवासाविषयी थोडे... सर्वात मोठा आणि महत्वाचा फ़ायदा म्हणजे कोणावरही अवलंबित्व नाही, स्वतः सगळा आराखडा बनवा आणि तंतोतंत पालन करा. शिवाय स्वतःला ज्याची आवड आहे त्यासाठी जास्त वेळ देता येतो. एक तोटा (किंवा फ़ायदा) म्हणजे तुमच्या 'पराक्रमांचे' फ़क्त तुम्हीच साक्षीदार असता. ब-याच वेळा पुरातत्वीय महत्व असलेल्या ठिकाणी येण्यात फ़ार लोकांना रस नसतो, मग काय्, उचला बोचकं आणि चालू लागा. अजून कोणी एकल प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी एक टिप, शक्य असल्यास एखाद्या मध्यमवर्गीय स्थानिकाच्या घरी निवास करावा. म्हणजे तेथील विचारसरणी, आदरातिथ्य, परंपरा, खाद्यसंस्कृती, त्यांच्या समस्या या सगळ्याची खूप जवळून आणि खरी ओळख होते. लिमा मधील माझे वास्तव्य अशाच एका कुटुंबाच्या घरी होते. पेरुविषयी माहिती मिळवत असताना लिओ, माझ्या संपर्कात आल्या. लिमामधील उच्चभ्रू वस्तीमध्ये लिओ यांचे शंभर वर्षांहून जुने घर आहे. विमानतळावरून थेट त्यांच्याच घरी मी उतरलो होतो. अशा स्थानिक लोकांकडून काही सुरक्षेच्या आणि प्रवासाच्या दृष्टिने महत्वाच्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे कळतात.

लिमा शहरातील भटकंती तशी एकदम सुरक्षित. पण पुढचा प्रवास आता शहरापासून लांब होता. पहाटे चार वाजताच निघायचं ठरवलं. मस्त चकाचक टोयोटा भाड्याने घेतली. अशा प्रवासात एकट्याने जाणे फ़ारसे सुरक्षित नाही, चोरी-लूट वगैरे नाही, तरी समजा गाडीच बंद पडली किंवा तत्सम् कुठली समस्या, तर अनोळखी प्रदेशात मदत मिळणे कठिण. आणि पुन्हा भाषेचा प्रश्न आहेच. मोठी शहरे वगळता इंग्रजी फ़ारच कमी समजते. त्यामुळे शक्यतो एखादा वाटाड्या बरोबर घ्यावा. चार पैसे जास्त जातात, पण अडचणीच्या वेळी मदत सहज उपलब्ध होते. असो. आता या भागाच्या प्रवासवर्णनाकडे.

या भागात पेरूच्या समृद्ध समुद्री अभयारण्यास भेट देऊया. लिमा पासून दक्षिणेस 250 किलोमिटरवर् पराकास् अभयारण्य आहे. हा भाग जैवविवीधतेसाठी प्रसिद्ध आहे. समुद्री पक्षी, प्राणी व जलचरांच्या अनेक प्रजाती इथे पहावयास मिळतात. पहाटे चारलाच निघाल्याने लवकरच, साधारण साडे-तीन तासात इथे पोहोचलो. पॅनअमेरिकन हायवे चा हा पट्टा अतिशय उत्कृष्ठ दर्जाचा आहे त्यामुळे गाडी चालवणे अतिशय सुकर होते. शिवाय हा भाग वर्षभर धुक्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे वातावरण मस्त ताजेतवाने करणारे होते. 40 सोलेस् (पेरूचे चलन, सधारण 12$ / 750₹) देऊन तिथे दोन्-अडीच तासांची समुद्री सफ़र उपलब्ध आहे. जवळच बाय्येस्टास् आयलंड्स् ला एक फ़ेरी मारून परत किना-यावर. हा संपूर्ण प्रदेष वाळवंटी असून लाल रंगाच्या रेतीमुळे मंगळावर आल्यासारखं वाटतं. प्राचीन काळी इथे पराकास् आणि लिमा संस्कृतीचे लोक रहात असत. त्यांच्या जीवनाविषयक एक छोटेसे संग्रहालय आहे. इथपासून पुढे आटाकामा वाळवंट सुरू होते. जगातील् सर्वात रूक्ष (सर्वात कमि पर्जन्यमान) व सर्वात उंच वाळुच्या टेकड्या (ड्यून्स्) असलेल्या ह्या वाळवंटाच्या सफ़रीविषयी पुढील भागात. दर भागात एकदम वेगळीच भौगोलिक संपन्नता आपल्याला पहावयास मिळणार आहे, आणि हीच पेरूची खासियत् आहे.

नकाशात अभयारण्याचे स्थानः

वाळवंटी किनारा

भूरूपेः पाणी आणि वा-याच्या कलाकृती










पेंग्विन्

बूबीज

सील

पक्ष्यांची वसाहत

बाय्येस्टास् बेटांवरील समृद्ध समुद्री जीवन

'कॅथेड्रल'

प्रसिद्ध त्रिशूळ (क्डेलाब्रो) एरिक् व्हॉन् डेनिकेन् किंवा सुरेशचंद्र नाडकर्णी सारख्यांनी ज्याचा संबंध रामायणातील पाताळाच्या सीमेशी जोडला आहे असे हे भव्य भूरेखन (जिओग्लिफ)

प्रशांत महासागर

पराकास् बंदर

वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर आमचे वाहन्

संग्रहालयाजवळील 'मंगळावरचा' रस्ता

हॉटेलमधील तरणतलाव

वाळवंटाची सफर

या भागात अजुन थोडे पूर्वतयारीविषयी. भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा देश स्पेन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे व्यवहाराची भाषा 'एस्पान्योल्' आहे. इंग्रजीशिवाय कोणतीही भाषा बोलली जात असलेल्या प्रदेशात जर तिथल्या रंगात रंगायचे असेल तर भाषेचा रंग आधीपासूनच चढवायला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या भूमीवर उतरताक्षणीच मिसळून जाणे कठिण जात नाही... आपण भाग्यवान भारतीय, देशांतर्गतच हे अनुभवू शकतो, पण ती रंगण्याची इच्छा आणि तयारी हवी. याआधीही अशा एका देशाला भेट दिल्यामुळे या भाषेचा अभ्यास आधी एकदा झालेला होता, आता परत त्याची उजळणी आणि काही नवीन भर असा पहिले दोन महिने उद्योग होता. साधारण मूलभूत प्रश्न विचारता आले पहिजेत (उदा. रहायची सोय, बघण्यासारखी ठिकाणे, स्वच्छतागृहे, प्रवासी थांबे, ठिकाणापासून अंतर-वेळ, समय, पोलिस-डॉक्टर-पोस्ट,भारतीय दूतावास इ.) तसेच 'ही सुंदर भाषा मला थोडीशीच येते' 'मला समजलं नाही, परत/हळू सांगता का?' आदी उपयोगी वाक्ये आणि समोरच्याने सोप्या भाषेत बोललेले कळणे आवश्यक आहे.

आणि एकल प्रवासामध्ये तर भाषा येणे अजून महत्वाचे. तुम्ही एकटे असता तेव्हा निश्चितच दुर्बल असता, त्यामुळे फ़सवले जाण्याची शक्यता अधिक, तेव्हा भाषा समजणे, व आपल्याला भाषा समजते हे इतरांना समजणे याने मोठा फ़रक पडतो. अजुन एक फ़ायदा मला असा झालाः शक्यतो एकल प्रवासी संस्कृती मधे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र रहातात, फ़िरतात आणि त्या त्या ठिकाणी त्यांचा एक तात्पुरता कंपू बनत जातो. (क्वीन चित्रपटात याची एक झलक पहावयास मिळते). मुख्यतः जपान, ऑस्ट्रेलिया, पूर्व युरोप त्यांच्या कंपूत भाषा येणा-यांचे अजून महत्व वाढते.

आता या भागातील भटकंती, पराकासवरून आता जरा समुद्रापासून दूर ईका शहराकडे प्रस्थान. जवळच पिस्को नावाचे शहर आहे. त्या नावाची ब्रॅन्डी इथे फ़ार् प्रसिद्ध आहे. त्याच्या वाईनरीज्/डिस्टिलरीज् जवळपास आहेत. त्यातील एकाला भेट दिली. 'टकामा' दारूभट्टी शतकाहून जुनी व अजून कार्यरत आहे. 'पिस्को सोअर्' या नावाने प्रसिद्ध इथली मदिरा जणु पेरूचे 'राष्ट्रीय मद्य' आहे. ईथून इका जवळच आहे. आता आपण भर वाळवंटात आहोत. जगातील सर्वात उंच वाळूच्या टेकड्यांचा हा प्रदेश आहे. शहराच्या पश्चिमेला अगदी जवळच एक निसर्गाचा चमत्कार, व्हाकाचिना मरूद्यान आहे. उंचच् उंच वालुकापर्वतांच्या मध्ये एक सुंदर तलाव आणि त्या पाण्याच्या आधाराने वाढलेली रम्य हिरवळ. इथेच बर्फ़ाप्रमाणे वाळूचे खेळ खेळता येतात. 'स्नो बोर्डिंग' ब्लॅक डायमंड लेवल् पर्यंत येत असल्याने सॅन्ड्बोर्डिंग अजून मजेदार वाटले. एक बग्गी दिलेली होती, ती आपल्याला टेकडीवर घेऊन जाते आणि मग आपण घसरत खाली यायचं, परत बग्गी दुस-या टेकडीवर घेउन जाते, असा हा सूर्यास्ताजवळच्या एक दोन तासांचा खेळ. वाळवंट असलं तरी तापमान इथे खूपच कमी असते. इथूनच पुढे जगप्रसिद्ध नाझ्का रेषा आहेत. तिथे विमान सफ़र उपलब्ध आहे. तेथील गूढ अद्यापही तसेच असल्याने फ़क्त बघून परत यायचे एवढेच. त्याविषयी जालावर भरपूर माहिती आहेच्, त्यामुळे त्याविषयी अधिक नंतर कधी.

अटाकामा वाळवंट

आमची बग्गी

सॅन्ड्बोर्डिंग अधिक माहिती

वरील सर्व चित्रे वाळूविरोधी (सॅन्डप्रूफ) कॅमेरातील असल्याने दर्जा थोडा कमी आहे. खालील चित्रे आता नेहमीच्या कॅमेरातून

व्हाकाचिना मरूद्यान

अरेकिपा शहर
















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...