जुलै
महीन्यात आम्ही डिपार्टमेंटची वर्षा सहल आंबोली इथे नेली होती. अगोदर
माळशेज ठरवीले होते, पण गाडि भाडे आणि १ दिवस मुक्कामासाठी प्रती व्यक्ती
१२५० खर्च येणार होता. मुंबईच्या जवळ इतके पैसे भरुन जायला सगळ्यांच्या
जीवावर आले. कारण वर्षभरात किमान ३-४ सहली असतात. त्यात १-२ कुटुंबासकट
असतात. त्यामूळे या वर्षासहली साठी दुसरे ठिकाण शोधणे सुरु केले. माझ्या
कोकण प्रेमाने उचल खाल्ली आणि आंबोलीसाठी मी गळ घातली. जुलै महीन्याच्या
सुरुवातीला १-२ दिवस पाऊस पडुन झाल्यावर त्याने पुढिल ८-१० दिवस दडि मारली
होती. आंबोली इथे भारतात चेरापुंजी नंतर दुसर्या क्रमांका इतका पाऊस पडतो.
त्यामूळे हमखास पावसाची हमी दिल्याने सर्व जण तयार झाले. १२ व १३ जुलै
रोजी शनिवार रवीवार मजा करुन सोमवारी office ला हजर राहण्याची हमी दिल्यावर
बॉसने देखील परवानगी दिली. प्रती व्यक्ति १२५० काढुन आम्ही १५ जण लगेच
तयारीला लागलो. जाण्या येण्याची कोकणकन्याची बुकींग केलि. तसेच हॉटेल
बुकींग केले.
११ जुलै शुक्रवार रोजी रात्री ११:४५ ला कोकणकन्या पकडली. दुसर्या दिवशी
सकाळी ठिक १०:०० वाजता आम्ही सावंतवाडी स्टेशनवर पोहोचलो. तिथुन ४०० रुपये
देऊन थेट आंबोली साठी ६ सिटर रिक्शा केल्या. वाटेत सावंतवाडी शहरात थांबुन
लाकडी खेळण्यांची खरेदी केली. (रवीवारी सावंतवाडी बाजार बंद असतो)
सावंतवाडीत कडकडीत उन होते. चौकशी केल्यावर कळले की गेले २ आठवडे तिथे पाऊस
पडलाच नाही. रेल्वे प्रवासात आम्हाला २-३ ठीकाणी पाऊस पडताना दिसला होता.
पण तो कोकणचा फेमस कोसळणारा पाऊस नव्हता. पिकनिक चे planning चुकले की काय
अशी शंका मनात आली. खरेदी करुन आंबोलीला कुच केले. रिक्शा दाणोलीला
पोहोचल्या. (येथे साटम महाराजांचे निवासस्थान आहे) आणि वातावरणात वेगाने
बदल होउ लागला. घाट सुरु झाला, गर्द झाडीतुन रस्ता जात होता. उन केव्हाच
गायब होऊन सावलीतुन प्रवास सुरु झाला. जस जसे आम्ही घाट चढु लागलो. हवामान
थंड होऊ लागले. मध्ये मध्ये पावसाची सर येत होती. थोड्याच वेळात
वार्याच्या ठंड झुळुकी जागी गारठवणारा वारा उघड्या रिक्शातुन आत येऊ
लागला. दुरवर असंख्य धबधबे आम्हाला खूणावत होते.
आम्ही पुर्वेचा वस येथे पोहोचलो. येथे आंबोलीचा मुख्य धबधबा आहे. मुंबईकर
जसे लोणावळा, खंडाळा येथे weekend ला गर्दी करतात, तसे गोवेकर व बेळगावकर
(बेळगावीकर लिहिले तर आपला त्यांचावरचा हक्क जाईल) आंबोलीला येतात. खुप
गर्दी असल्याने रस्त्यावर वाहतुक मुरांबा झाला होता. आम्ही थेट हॉटेल
गाठले. (हॉटेल ग्रीन पॅलेस) आमच्या रुम ताब्यात घेउन फ्रेश झालो. तोवर
मालवण हुन ताजे मासे घेउन टेंपो आला. हॉटेल मालकाने काय खाणार म्हणुन
विचारणा केली. सर्वांनी सुरमयी म्हणुन सांगीतले. हॉटेल मधील इतर अनेक
ग्रुपच्या मागणी प्रमाणे मासे खरेदी होऊन त्यांची kitchen मध्ये रवानगी
झाली. तास - दिड तासात मालवणी पद्धतीचे जेवण तयार झाले. सोबत सोलकढीचे पेले
रिचवले गेले. तत्पुर्वी रुम मध्ये काही सहकार्यांचे अपेय पान झाले. सोबत
मालवणी पद्धतीचे chicken होते.
रिक्शातून उतरताच हॉटेल बाहेर आम्हाला मालका अगोदर सामोरा आलेला स्थानिक जीव ....
आता थोडे आंबोली विषयी. समुद्र सपाटी पासुन तब्बल २५०० फुट उंचावर
वसलेले हे ठिकाण इंग्रजांची त्या काळी उन्हाळी राजधानी होती. हिंदुस्थानात
चेरापुंजी नंतर पाऊसाचे सर्वाधीक प्रमाण असणारे हे ठीकाण आहे. येथे तब्बल
५०० ईंच पाऊस पडतो sorry कोसळतो. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी
येथुन बेळगाव किंवा कोल्हापुरला जाणार्या हमरस्त्यावर हे ठीकाण आहे.
सावंतवाडी ते आंबोली हे अंतर ३० किमी तर बेळगाव ते आंबोली हे अंतर ६० किमी
आहे. गोवा ४०-५० किमी दुर आहे. कोकणात सर्वत्र आढळणारे माड इथे दृष्टीस पडत
नाहीत तर कोकणात कुठेही नजरेस न पडणारी ऊसाची शेते इथे आहेत. म्हणजेच हे
ठिकाण भौगोलिक दृष्ट्या घाट माथ्यावर येते. कोकणातुन घाटावर नेणारा हा घाट
रस्ता इंग्रजांनी बांधला. इथे सावंतवाडी संस्थानचे राज्य होते. आजही इथले
स्थानिक लोक सावंतवाडी संस्थानशी संबंधीत आहेत. स्वातंत्र्य पुर्व काळात
येथे गांधीनी ही वास्तव्य केल्याची नोंद आहे. येथे अस्णार्या चौकुळ
यागावातील घरटी एक जण तरि सैन्यात आहे. आंबोली येथे माजी सैनिकांनी स्थापन
केलेले. सैनिक school आहे. आंबोली विषयी एक आख्यायीका सांगीतली जाते. ती
म्हणजे हा घाट रस्ता एका गुराख्याने इंग्रजांना दाखवीला होता. नंतर त्याला
ईंग्रजांनी ठार केले. सावंतवाडी आंबोली रस्त्यावर त्याचा पुतळा पाहावयास
मिळतो. आंबोलि धबधबा ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच. धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ।। हा संपुर्ण महाराष्ट्रातील आकर्षित धबधबा आहे. इथे mtdc
ने छान पैकी पायर्या केल्या आहेत. रस्त्या पासुन धबधब्या पर्यंत
जाणार्या या पायर्यांवर पर्यटक बसतात. पाणी थेट खांद्यापर्यंत अडवतात.
आणी मग अचानक उठुन पाण्याचा लोंढा खाली सोडतात. त्यामुळे पायर्यांवरुन वर
येणार्या पर्यटकांची चांगलीच भंबेरी उडते. धबधब्याखाली उभे राहणे मात्र एक
वेगळाच अनुभव देते. पाणि अक्षरशः ice cold असते. प्रवाहात बसल्यास पाठिला
चांगलाच मसाज होतो. पण झोंबणार्या गार वार्याने कान अगदी दडे बसल्या
सारखे होतात. आम्बोली धबधब्यातील गमती विषयी पुढे लिहीनच आता थोडे आंबोली
गावा विषयी.
आंबोली हा बाजार पेठ एव्हढाच सिमीत असलेला गाव आहे. गावात राहाण्या
खाण्याची चांगली सोय आहे. mtdc तसेच अनेक प्रायव्हेट हॉटेल्स आहेत. घरगुती
सोय देखील होवु शकते. mtdc चे हॉटेल आता कामत ग्रुप चालवतो. या व्यतिरिक्त
इंडीयन हॉटेल हिल रिसोर्ट, ग्रीन व्हॅली रिसोर्ट, व्हिस्लिंग वुडस, hotel
JRD international , शिव मल्हार , ग्रीन पॅलेस अशी अनेक हॉटेल्स आहेत. लाड
हाऊस प्रमाणे अनेक MTDC Bread & Breakfast Scheme वाली हॉटेल्स तसेच
घरगुती खाणावळी आहेत. ज्यांना ढाबा चालतो अश्यांसाठी 'सैनिक धाबा' नावाचा
धाबा देखिल आहे. येथील पोईंट दाखवीन्यासाठी गाईड सुविधा तसेच फिरण्यासाठी
वाहन मिळु शकते. गावात पेट्रोल पंप आहे. माऊली देवी ही गावचे ग्राम दैवत
आहे. गावात एक रेशीम केंद्र देखील आहे.
संपुर्ण महाराष्ट्रातील आकर्षक धबधबा (गर्दीमुळे थोडा कुरुप दिसतोय .. )
दुपारी जेवण आटोपुन आम्ही घाटातील धबधब्याकडे निघालो. हा धबधबा आंबोली
गावापासुन ३ कि.मी. अंतरावर आहे. वाटेत तसे अनेक धबधबे आहेत. हा हमरस्ता
अस्ल्याने इथे वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालते. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच
गोवा राज्य परिवहन मंडळाच्या असंख्य बसेस सारख्या ये - जा करत असतात. आम्ही
अश्याच एका बसने धबधब्यावर पोहोचलो. भिजणे कंपलसरी असल्याने सोबत कोणतेही
इलेक्ट्रॉनिक गॅझेट नेले नव्हते. (मोबाइल, कॅमेरा, घड्याळ वै.) शनिवार
असल्याने खुप गर्दी होती. वाहतुक मुरंबा होवु नये म्हणुन शनीवार व रवीवार
येथे अवजड वाहनांना प्रवेश बंदी असते. केवळ खाजगी गाड्या आणि राज्य परिवहन
मंडळाच्या बसेस चालु असतात. खाजगी वाहने ही घाट रस्त्यावरच पार्क केली
जातात (माळशेज प्रमाणे). रस्त्या लगत गरमागरम चहा, बटाते वडे, मक्याचे
कणीस, ऑम्लेट वै. बनवुन देणारी असंख्य दुकाने उभी राहिलेली असतात. गैर
प्रकार घडु नये म्हणुन पोलीस बंदोबस्त देखील अस्तो. मात्र कपडे बदलण्यासाठि
येथे सोय नाही. गाडीतच पडदे वै. लावुन change करावे लागते. संपुर्ण दिवसभर
दाट धुके असते. धबधब्यात मजा करुन आम्ही आंबोलि पर्यंत छान rain walk
केला. दाट धुके आणी रहदारी मुळे थोडे जपावे लागते.
धुक्यात हरवलेला रस्ता (ए भाय जरा देखके चलो .... )
वाटेत असंख्य पॉईंटस असुन तेथे mtdc ने छान viewing gallery बनवील्या
आहेत. पावसाळ्यात दाट धुक्या मुळे संध्याकाळी काहीच दिसत नव्हते. मजल दरमजल
करित हॉटेल वर पोहोचलो. हॉटेलवर पोहोचताच गरम पाण्याचा शॉवर घेतल्यावर
सगळ्यांच्या जीवात जीव आला. तरी सुद्धा बर्याच जणांचे कुडकुडणे चालुच
होते. त्यातच एकाने अचानक खीडकी उघडली. त्या बरोबर आख्खा ढग रुममध्ये
घुसल्याचा भास झाला. रात्री देखील खीडकी बाहेर ढग किंवा धुके यावर आमच्या
सावल्या दिसत होत्या. (आमचा रुम दुसर्या मजल्यावर होता, त्यामुळे रुम मधील
लाईटने आमची सावली बाहेर दिसावी अशी कोणतीच वास्तु किंवा वस्तु तेथे
नव्हती) दुसर्या दिवशी अनेक पॉईंटस फिरायचे असल्याने एक टेंपो ट्रॅव्हलर
ठरवीला. (पुर्ण दिवसाचे २ हजार रुपये भाडे) रात्री जेवणानंतर उशीरा पर्यंत
मुकाभिनय करुन चित्रपट ओळखणे, पत्ते कुटने चालुच होते.
दुसर्या दिवशी भल्या पहाटे बरेच जण उठले. (पिकनिकला सकाळी ६ वाजता म्हणजे
भल्या पहाटेच) सगळे जण morning walk ला निघाले. दाट धुक्यामुळे रस्त्यावरिल
वाहनांचे हेडलाईट्स तेव्हढ्या दिसत होत्या. त्यामुळे रस्ता सोडुन गावातील
आडरस्त्यांवर भटकंती सुरु केली. यारस्त्यांवर mtdc चे green valley resort,
हेमंत ओगले यांचे whistling woods आहे. सैनिक शाळेकडे गेलो. पण तेथे
प्रवेश दिला नाही. हॉटेल वर परतल्यावर Breakfast like king केला. रुमवर
परतुन सर्वजण morning law उरकु लागले. नऊच्या ठोक्याला टेंपो ट्रॅव्हलर हजर
झाला. हॉटेल मधुन ताबडतोब check out केले. गाडीत सामान भरले. आणि गणपती
बाप्पा मोरयाच्या गजरात हिरण्यकेशी उगमाकडे निघालो.
हिरण्यकेशी उगम - आंबोली पासुन ४ किमी अंतरावर हे पवित्र तिर्थ क्षेत्र
आहे. इथुन हिरण्यकेशी नदी उगम पावते. अतिशय रम्य अश्या वनराइने वेढलेल्या
या परिसरात छोटेसे पार्वतीचे मंदीर आहे. तिच्यासाठी शंकराने ही जलगंगा
(हिरण्यकेशी नदी) निर्माण केली. येथे मंदीरा समोर एक छान अशी बांधुन
काढलेली तळी आहे. त्यात गोमुखातुन पाणि पडते. आम्ही पावसाळ्यात गेल्याने
गोमुख अडिच फुट पाण्यात होते. येथे एक गुहा आहे. त्याबाबत अनेक कथा
सांगतात. जसे की भुयार २ किमी आहे .... आत सात तळी आहेत .... एका पुणे base
group ने त्याचा शोध घायचा प्रयत्न काही वर्षांपुर्वी केला होता.
हिरण्यकेशी उगमाकडुन आम्ही गेलो नांगरतास धबधब्याकडे (आंबोली पासुन चे अंतर ८ किमी).
खोल घळीत कोसळणारा हा धबधबा बघुन छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही. इथे
mtdc ने cantilever viewing gallery at two levels केली आहे. त्या गॅलरीत
उभे राहुन पाण्याच्या तुषाराचा आनंद आपण घेउ शकतो. पाण्यात जाण्याचा विचार
मात्र वेडेपणाचा नसुन जिवघेणा आहे (आम्ही गेलो होतो त्याच्या मागील
आठवड्यात बेळगाव येथील एक डॉक्टर पाय घसरुन पाण्यात पडला आणि प्रवाहा बरोबर
वाहुन गेला.)
नांगरतास धबधब्याकडुन आम्ही कुच केले कावळेशेत पॉईंटकडे - कावळेशेत पॉईंट
(आंबोली पासुन चे अंतर १० किमी) - इथे जाताना रस्त्याच्या दुतर्फा ऊसाची
शेते दिसतात. तसेच इथे मोठ्या प्र्माणावर झुडपांसारखी छोटि झाडे दिसतात.
मात्र तिथे न गेलेलेच उत्तम कारण त्यात रक्त शोषुन घेणार्या जळवा असतात.
कावळेशेत पॉईंट हा आंबोलीतील उत्कृष्ट पॉईंट आहे.
अतिशय भयावह वाटणार्या दरीचे इथुन दर्शन होते. कावळेशेत पॉईंट हे नाव का
पडले याचा निटसा उलगडा झाला नाहि तरी येथे दरीतुन येणार्या वार्यामुळे
कावळे ऊडु शकत नाहीत असे स्थानीकांनी सांगितले. येथे दरीत भिरकावलेली
कोणतीही वस्तु खाली न जाता परत वर येते. त्यामुळे येथे पर्यटक रिकाम्या
मिनरल वॉटरच्या बाटल्या, टोपी दरीत फेकुन परत वर आल्यावर धावत जावुन
झेलायचा खेळ खेळत होते. येथे mtdc ने भक्कम असे pipe railing बसवीले आहे.
त्याच्या जवळ गेल्यावर मात्र ते घट्ट पकडुन ठेवावे लागते असा वारा इथे
असतो.
या पॉईंटवरुन दरीत पडणारे पाणी खालुन पाण्याचा फवारा मारावे तसे वर उसळत
अस्ते. धुके किंवा ढग आले असतिल तर मात्र दरी आणि त्यातील असंख्य धबधबे
बघण्यासाठी ते जाइ पर्यंत वाट बघणे भाग पडते.
कावळेशेत पॉईंट कडुन आम्ही महादेव गड पॉईंटला गेलो. महादेव गड पॉईंट -
आंबोली बाजारातुन अवघ्या ३ किमी वर हा पॉईंट आहे. येथुन सह्याद्रीच्या
दर्याखोर्यांचे विलोभनिय दृश्य दिसते. खाली असलेला पारपोली गाव हा मात्र
clear sunny day लाच आपण पाहु शकतो. महादेव गड पॉईंटला अस्वले आढळतात. इथे
असे सांगीतले जाते की जर अस्वल तुमच्या मागे लागले तर उतारावर पळायचे कारण
अस्वलांना उतारावर पळता येत नाही. (खरे खोटे ते अस्वलांनाच माहीत)
एव्हाना दुपार झाली होती. आम्ही परतीच्या प्रवासाला निघायचे ठरविले. वाटेत
आंबोलीच्या धबधब्याकडे थोडावेळ थांबलो. आदल्या दिवशी कुणी कॅमेरा नेला
नसल्याने आता सर्वांनी ती हौस भागवलि. रविवार असल्याने आंबोली धबधब्याचा
भुशी डॅम झाला होता. घाटात अनेक ठिकाणी माकडे होती त्यांना २ दिवसात उरलेला
सगळा खाउ दिला. वाटेत आंबोलीचा घाटरस्ता ईंग्रजांना दाखवीणार्या धनगराचा
पुतळा दिसतो. दुपारी ०२:३० च्या सुमारास सावंतवाडीस पोहोचलो. जिमखान्या
समोरील भालेकर मेस मध्ये जेवणासाठी थांबलो. येथे अवघ्या ६०-७० रुपयांत
स्वादिष्ट अशी चिकन, मटण, फिश थाळी मिळते. भालेकर खाणावळ भपकेबाज नाही.
साध्या शेड मधे टेबल, खुर्च्या आहेत. पंख्याचीही सोय नाही. मात्र नेहमी
दुपारि ०३:३० वाजता खाणावळ बंद होई पर्यंत बाहेर खाजगी गाड्यांचा ताफा
असतो. जर तुम्ही मांसाहारी असाल तर भालेकर मेस मध्ये अवश्य जेवाच. तुम्हाला
तुमचे स्टेटस इथे जपले जाणार नाहित असे वाटत असेल तर तुमच्यासाठी
सावंतवाडित अनेक हॉटेल्स आहेत. जसे की कामत, mango, celebration वै.
ज्यांना शाकाहाराची आवड आहे किंवा जे मांसाहार करत नाहीत अश्यांसाठी
सावंतवाडीमधे जेवणासाठी best place साधले मेस. केवळ ३० रुपयांत इथे थाळी
मिळते. इथली स्वच्छता आणी टापटीप पणा याला तुम्ही १०० पैकी १०० गुण द्याल.
आताच तुमच्यासाठी बाजारातुन विकत आणली आहेत. अशी ताट वाटी समोर येते.
जेवणही लज्जतदार. मे म्ध्ये सोबत आमरस वाटि हवी अस्ल्यास मिळू शकते.
तृप्तीचा ढेकर येइ पर्यंत सोलकढी पिउन सर्व जण सावंतवाडी पर्यटणाला बाहेर
पडले. रविवार असल्याने बाजार बंद होता. त्यामुळे चितार आळीत जाउन लाकडी
खेळण्यांची खरेदी केली. चितार आळीत प्रत्येक घरी ही खेळणी बनवीली जातात आणी
घरा बाहेर त्याची विक्री केली जाते. हल्ली खेळन्यां व्यतिरिक्त इतरही अनेक
गोष्टी लाकडापासुन बनवील्या जातात. जसे की wall mounting, चष्मा फ्रेम
स्टँड वै. बाजारात नार्वेकर मसाल्याचे दुकान तेव्हढे उघडे होते.
त्याच्याकडे खरेदी केली. तसेच Expresso बेकरीचे फेमस बटर घेतले. शहराच्या
मध्यभागी अस्लेल्या मोती तलावाभोवती फेरफटका मारला.
सुंदरवाडीतील (सावंतवाडीचे जुने नाव ..) मोती तलाव
इथे नगरपालीकेचे अतिशय सुंदर उद्यान आहे. (must see) काहीजण राजवाडा
परिसरात भटकुन आले. आम्ही मग शिल्पग्रामला गेलो. तेव्हा ते बंद होते. इथे
deccan odysy ने येणार्या पर्यटकांना कोकणातील संस्कृतीची ओळख करुन दिली
जाते. राजवाड्यात गंजीफा म्हणुन खेळाचे पत्ते बनविणारे हस्त कारागिरांचे
workshop आहे. दशावतारावर आधारित characters ची चित्रे या cards वर असतात.
एव्हाना संध्याकाळचे ०५:३० वाजले होते. तलावा बाजुच्या भारतमाता हॉटेल
मध्ये चहा घेतला. अक्षरशः अमृततुल्य चहा आणि किंमत केवळ ३ रुपये. वेळेअभावी
सावंतवाडी दर्शनाला फाटा देउन रेल्वे स्टेशन गाठले. कोकणकन्या वेळेवर आली
तिच्यात स्थानापन्न झालो. रात्री उशीरा पर्यंत दंगा केला . रात्री झोपेत
नजरे समोर येत होते ते आंबोली तील धबधबे. सकाळी ०५:१५ वाजता ठाणे आले.
थोडक्यात खर्च मुंबई ते सावंतवाडी (return ticket II class sleeper with reservation) - ६०० /-
सावंतवाडी ते आंबोली (6 seater riksha) - ४०० /-
हॉटेल ग्रीन व्हॅली (3 beds room with 2 extra bed) - ६०० /-
टेंपो ट्रव्हलर (१ दिवसासाठी) - २००० /-
तळ टीप -- आम्ही आंबोलीला जाऊन आल्यावर आमच्या ग्रुप मधील एकाच्या
मित्रांनी २ आठवड्यांनी आंबोलीला भेट दिली. तेव्हा महाराष्ट्रात सर्वत्र
पाऊस चांगलाच स्थिरावला होता. संपुर्ण घाटरस्त्यावरील झर्यांना छोट्या
छोट्या धधब्यांचेच स्वरुप आले होते.
सह्याद्रीतील पावसाळा हा सह्याद्रीला जणू काही स्वर्गाचंच रुपडं बहाल करतो. हिरवे गालीचे आणि फेसाळणाऱ्या जलप्रपातांच्या आडून, धुक्याच्या गच्च आच्छादनाखाली लपून सह्याद्री भटक्यांना खुणावू लागला की मग त्याच्या भेटीला निघण्यावाचून दुसरा पर्याय नसतो.
समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर, घनदाट अरण्याने वेढलेला आणि जैववैविध्यतेचा शालू पांघरलेल्या हिरव्यागार टेकड्यांनी कवेत घेतलेला आंबोलीचा चैतन्यमयी परिसर म्हणजे विधात्याने वेळात-वेळ काढून घडवलेलं एक वेगळंच नंदनवन आहे.भौगोलिकदृष्ट्या घाटमाथ्यावर पण प्रशासकीयदृष्ट्या घाटाखालच्या सावंतवाडीत मोडणाऱ्या आंबोलीत, ढगांचा मार्ग रोखणाऱ्या अजस्त्र सह्यकड्यांच्या कृपेने भरभरुन पाऊस कोसळतो व मग पुर्ण पावसाळाभर व पुढे अगदी डिसेंबरपर्यंत येथील दर्याखोर्यातून सगळीकडे शुभ्र तुषार उडवत शेकडो छोटे-मोठे धबधबे, जलप्रवाह सक्रिय राहतात. जूनच्या मध्याला इथल्या सड्यांवर मुरणारा पाऊस झऱ्यांना जिवंत करू लागला की आंबोली कात टाकते व भटक्यांच्या स्वागताला सज्ज होते.
कोसळत्या पाऊसधारात, इथल्या दर्याखोर्यातून मुक्तपणे भटकत, धुक्याच्या चादरीआडून डोकावणाऱ्या विस्तीर्ण घाटरांगा न्याहाळत, विलोभनीय निसर्गरूपे डोळ्यांत साठवताना अवर्णनीय आनंद मिळतो. अंगावर शहारे आणणाऱ्या काळोखातून, चावरे कीटक, रक्त शोषणाऱ्या जळवा, सरपटणारे प्राणी यातून वाट काढत इथली जैवविविधता अनुभवत जंगलातून केलेली भटकंती एक वेगळाच जीवनानुभव देते.
याशिवाय डोंगर भटक्यांना साद घालणारी अनेक ठिकाणं आंबोली आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे ज्यांना पाय लागण्याची संधी मिळणे म्हणजे तशी थोरचं गोष्ट असते.
हिरण्यकेशी उगमस्थान -:
अगदी नावापासूनच वेगळेपण जपणारे, आंबोली बस स्थानकापासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर वसलेले हे पवित्र तिर्थक्षेत्र. गर्द वनराईने वेढलेल्या या परिसरात वाहनतळापासून समोर येणाऱ्या हिरण्यकेशीच्या प्रवाहावरील एक सुंदर सेतू ओलांडत व मग पुढे नदी डाव्या हाताला ठेवत ५ मिनिटांची बांधून काढलेली पायवाट आपल्याला हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाकडे घेऊन जाते. हिरण्यकेशी म्हणजे हरणाच्या त्वचेसम सोनेरी केस असणारी, माता पार्वतीचेचं हे एक नाव आहे, माता पार्वतीचे, हिरण्यकेशी स्वरूपात मंदिर याठिकाणी आहे, जोडीला, अर्थातचं शंकर भगवान ही हिरण्यकेश्वर रुपात विराजमान आहेत.
एका टेकडीखालून, गुहेसदृश्य जागेतून प्रसवणाऱ्या जलधारांच्या रुपात हिरण्यकेशी नदी येथे उगम पावते. भगवान शंकराने ही जलगंगा (हिरण्यकेशी नदी) माता पार्वतीसाठी याठिकाणी अवतीर्ण केली अशी मान्यता आहे.
पिवळ्या आणि लाल रंगसंगतीमध्ये रंगवलेल्या छोट्याशा मंदीरासमोर एक छान असं बांधुन काढलेल टाकं आहे. त्यात गोमुखातुन पाणी पडण्याची व्यवस्था करून इतर भागात फरशी टाकलेली आहे. पावसाळ्यात संपुर्ण मंदीर परिसर कमीत कमी एक-दीड फूट व पाऊस भरात असताना अगदी त्यापेक्ष्याही जास्त, सततच्या वाहत्या पाण्यात असतो, एक बांधीव यज्ञकुंडही इथे दिसते. दत्तगुरुंची संगमरवरी मुर्ती व गाईचं एक शिल्प ही लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या छतावर शिवलिंगाची प्रतिमा आहे. वाहत्या पाण्यात सतत निथळत असलेले हे मंदिर अतिशय सुंदर दिसते. एक वेगळीचं ऊर्जा या ठिकाणी जाणवते. भान हरपून आपण समोरील दृश्य मनात कायमचे साठवण्याचा प्रयत्न करीत राहतो व हिरण्यकेशीही अविरत झिरपत राहते...प्रवाहात ही आणि मनाच्या गाभाऱ्यातील एखाद्या खोल कप्प्यातही....
नांगरतास धबधबा-:
बेळगाव-आंबोली रस्त्यावर, आंबोलीच्या अलीकडे आठ किलोमीटर अंतरावर, धनगर समाजाच्या एका छोटेखानी मंदिराच्या मागच्या बाजूला, अगदी रस्त्याला लागून एक सुंदर धबधबा आहे जो नांगरतास या नावाने ओळखला जातो.
संततधार पाण्याचा प्रवाह महाकठीण काळ्या कातळालाही कापून मार्ग कसा काढतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे नांगरतास धबधबा. साधारण २०० फूट थेट खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने इथला कातळ नांगराने काढलेल्या तासासारखा कापला गेला आहे आणि त्या अडीच-तीन फुटाच्या भेगेतून पाणी वेगाने पुढे सरकते.
खोल घळीत कोसळणारा हा धबधबा बघुन छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही. रौद्रभीषण सौंदर्य म्हणजे काय ते दाखवणारा हा धबधबा. पर्यटन विभागाने इथे दोन गॅलरीज बांधल्या आहेत, त्याद्वारे अगदी समोर उभे राहून हा धबधबा अनुभवता येतो. खाली पाण्याजवळ जाण्याचा निव्वळ विचारही जीवघेणा आहे त्यामुळे त्या वाटेला न जाता निसर्गाचा हा ताकदवान आविष्कार सुरक्षित अंतरावरून पाहणे हेच उत्तम.....हिरण्यकेशीचं झरझर झरणारं पावित्र्य तर नांगरतासचा आडदांड, बेमुर्वत, बेफिकीर जोरदार प्रवाह... एकाच गर्भातुन प्रसवणाऱ्या प्रवाहाची परस्परविरोधी रूप पाहताना निसर्गाबद्दलचा आदर पुन्हा दृढ होतो.
कावळेसाद धबधबा -
आंबोली एसटी स्टॅंडपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर, येळे गावच्या हद्दीत, कावळेसाद या वैशिष्ट्यपुर्ण नावाचा जलप्रपात आहे. कोकणात दुर्मिळ असलेलं दृश्य म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा असलेली ऊस शेती इथे जातानाच्या रस्त्यावर दिसते. तसेच तोरणा किल्ल्याच्या वाटेवर दिसणारी तोरण झुडपे ही धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दिसतात. परिसरातील छोट्याशा पठारावर एकत्रीत होणारे पावसाचे पाणी, वाहत जाताना पाहताना थोड्यावेळासाठी मढे घाटाचा धबधबा प्रवाही करणाऱ्या स्त्रोताची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
धुक्याने भरलेल्या दरीत अदृश्य होणारा जलप्रपात व वाऱ्याने धुक्याची चादर थोड्यावेळासाठी बाजूला केल्यावर अतिशय भयावह दिसणाऱ्या दरीचं विहंगम दृश्य इथं दिसतं. उजव्या हाताला धुक्यात हरवलेल्या खाली कोसळणाऱ्या अनेक जलप्रपातांच स्वर्गीय दर्शन होत. समोरून दरीत खालून वर धडकणाऱ्या वाऱ्याच्या जोराने धबधब्याचे पाणी उलटे फेकले जाऊन मोत्याच्या दाण्याप्रमाणे दिसणारे जलतुषार अंगावर झेलायला मजा येते.
निःसंशय, कावळेसाद ही आंबोलीतील एक उत्कृष्ट जागा आहे. वाऱ्याचा वेग जेव्हा जास्त असतो त्यावेळी, येथे दरीत भिरकावलेली कोणतीही वस्तु खाली न जाता परत वर येते. पर्यटन विभागाने येथे भक्कम रेलिंग्ज तथा एक दर्शनी गॅलरी बनवलेली आहे. वाऱ्याचा राक्षसी वेग पाहता रेलिंग्जचा आधार प्रत्येकाला घ्यावाच लागतो.
आंबोली धबधबा-:
आंबोली ते सावंतवाडी असा अंदाजे वीस किलोमीटर लांबीचा सुंदर वळणावळणाचा घाट, या घाटात अनेक लहान मोठे धबधबे उंच डोंगरावरून खाली कोसळतात. यातील अगदी रस्त्याला लागून असणारा आणि सर्वात मोठा धबधबा म्हणजे आंबोली धबधबा. आकारमानात बराच मोठा परिसर व्यापणारा हा धबधबा म्हणजे एक मोठं आकर्षण.
धुक्यात हरवलेलं वरचं टोक पाणी जणू आभाळातून खाली प्रचंड वेगाने दगडावर येऊन आदळतय अशी अनुभूती देतं. सुंदर, उत्कंठावर्धक तितकाच भीतीदायक असा हा प्रचंड धबधबा येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो. एकटक, वरून पडणारं पाणी भान हरपून पाहताना, सभोवतालीच्या गोंगाट-गर्दीचं अस्तित्व त्यात आपसुक विरघळून जातं व एका वेगळ्याचं समाधी अवस्थेची अनुभूती येते. निसर्गाचं असं विराट रूप पाहिलं की एकुणच जगरहाटीचं, जगण्याच्या व्यवहाराचं खुजं रूप प्रकर्षाने समोर येतं. आपल्या यकश्चित अस्तित्वाची जाणीव अशी निसर्गरूपे आपल्याला करून देतात.
तसं पाहता यासर्वां-व्यतिरिक्तची आंबोली ही अतिशय सुंदर आहे. कोकणी बाजाची शेवाळलेली छोटी-छोटी घरे, शेतं, गोठे, मांगर यांच्या आजूबाजूला खळाळत वाहणारे छोटेमोठे प्रवाह, भातशेतीच्या खाचरांची रांगोळी, नितळ डांबरी सडक आणि चिंब पाऊलवाटा, निथळणारी झाडे, हिरवी कुरणे, सभोवताली पसरलेले घनगर्द अरण्य आणि यासर्वांवर धुक्याच्या चादरीआडून चंदेरी पाखर घालणारा धुंद पाऊस......
जगण्याच्या बहुतांश रुक्ष वाटचालीत काही सुंदर क्षणांचे मोती वेचण्याची संधी सह्याद्रीतील पाऊस आपल्याला देत असतो. ती संधी मिळेल तेव्हा अगदी दोन्ही हाताने ती स्वीकारली पाहिजे व सह्याद्रीच्या अनवट वाटांवरची माती पावलांवर दागिन्यांप्रमाणे मिरवलीचं पाहिजे. ☺️☺️
#आंबोली
#Amboli
खूपच सुंदर ठिकाण. पूर्वी म्हणजे खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी दर पावसाळ्यात न चुकता जंगल भटकंती ठरलेली असे.
त्या हिरण्यकेशी उगमाच्या छोट्याशा तळ्यात एक मासा (माश्याची प्रजाती) जगात प्रथमच शोधून काढली गेलीय. ती या तळ्यातच सापडते. बहुधा श्री. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र या शोध मोहिमेत होते . चूक भूल द्यावी घ्यावी.
https://en.m.wikipedia.org/wiki/Schistura_hiranyakeshi

The fish has only been found in large numbers in the temple pond of Amboli, near the source of the Hiranyakeshi river.[4] The area has been declared a biodiversity heritage site by the state government.
जगात ही (उप)जात फक्त या तळ्यातच सापडते. याचा अर्थ ही शाखा त्या जागीच स्वतंत्रपणे निर्माण / उत्क्रांत झाली असणार.
https://www.misalpav.com/node/51461
थंडा थंडा कूल कूल............
सध्या सह्याद्री ओलाचिंब झाला आहे. अजून मान्सून यायचा आहे. पण उकाडया
पासून थोडासा दिलासा मिळाला आहे. आंबोलीत तर पावसाच्या धारा झिरमिरू
लागल्या आहेत. येथील आकाशाने कधीच रंग बदलला आहे. अजून हिरवाईची शाल
आंबोलीला पांघरायची आहे. कोरडया जंगलातून चालावे तरी अवघड.. भीतीदायक;
अशा स्थितीत ‘थंडा थंडा कूल-कूल’ चा अनुभव घ्यायचा असेल, ऊन-पावसाचा खेळ
बघायचा असेल आणि हो, निसर्गाचा अद्भुत आविष्कार ज्याची आपण स्वप्नात देखील
कल्पना करू शकत नाही ते आपल्याला सर्वागाने येथे अनुभवता येते. हीच तर
आंबोली.. चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण.. समुद्र सपाटीपासून
२३७८ मीटर उंचीवर असणा-या या आंबोलीतली पावसातली भ्रमंती जेवढी रम्य आणि
रमणीय तेवढीच या काळातलीही.. रिमझिमणारा पाऊस, धुक्यांचे ढग आणि गार-गार
वातावरण.. सारंच मन मोहून टाकणारे आणि आपल्या नेहमीच्या जगापासून खूप दूर
घेऊन जाणारे..
धुके उतरू लागल्यानंतर रिमझिम बरसणारा पाऊस विजांच्या
लखलखाटात उभा-आडवा झोडपून काढणारा पाऊस सह्याद्रीला नवा नाही. पावसाळया तील
आंबोली अनेक जणांना माहिती आहे. अंगा-खांद्यावर धबधब्यांची शाल पांघरून
एखादी सौंदर्यवती आपल्यासमोर उभी आहे असा भास व्हावा. असा सगळा तिचा थाट.
यामुळेच सध्या पावसाच्या पूर्वसंध्येला आंबोलीचे नवे रूपडे सगळय़ांना
अनुभवता येण्यासारखे आहे. हिरवी वसुंधरा, निळे स्फटिकासमान आकाश आणि
हवाहवासा वाटणारा गारवा आपल्याला खिळवून ठेवतो.
आपण जरा लवकरच
पांघरूणातून बाहेर यावे आणि भल्या पहाटेच पायी चालत सुटावे. जसं जमेल
तसं..मग पावला-पावलावर निसर्गाचे सांगावे साद घालू लागतात. गाणारा कस्तुरा
(मलबार व्हिसलिंग थ्रश), स्पॉन्डेड बाबलर गुणगुणू लागतात. चुकार भेकर,
सांबर आपल्याला आडवे येतात. पण गर्द जंगलात जाताना एखादा वाटाडया सोबत
असायला हवा नाहीतर बिबटया ची डरकाळी ऐकली, अथवा अस्वल मागे लागले, जळू
पायाखाली रेंगाळले तर भीतीच्या डोहात आपण आणखीच गप्पगार होऊ.
झुंजूमुंजू होत असताना आपण माळरानावर पोहोचतो सुद्धा.. मग कारवीच्या
झुडपात चरणारे गवे आरामात पाहता येतात. निसर्गाची वैविध्यपूर्ण लेणी समजून
घेता येतात. सूर्योदयाबरोबर आपापल्या घरात पळणारे स्वत:च्या सावलीलाही
घाबरणारे अनेक जीव न्याहाळायला मिळतात. आंबोलीत जंगल भ्रमंतीला गेल्यावर
अनेक पॉइंट सर्वाना परिचित आहेतच; पण जंगलातल्या उंच भागात पोहोचल्यावर
दिशा सा-या एकवटतात. सूर्य साथीला येईलच याची शाश्वती देता येत नाही. येथील
एका उंचवटया वर पूर्वी एक टॉवर होतात. या भागातून कोकण भाग, कोल्हापूरचा
प्रांत, बेळगाव जिल्हा दृष्टीस पडतो. छोटया -छोटया टोपल्या उलटया घालून
ठेवल्यासारखी वाटणारी टोवली कारवीचे सौंदर्य येथेच पाहावे.
आंबोलीचा
माळ सोडला की, अंगावर ऊन पडू शकत नाही. एवढी घनगर्द झाडी आहे. तांबट,
वार्सब्लट, शिंजीर, शामा या पक्ष्यांच्या शिकारी टोळया आपल्याला याच
परिसरात भेटतात. फुलपाखरांचा हंगाम संपलेला असतो. परंतु एखाद् दुसरे
फुलपाखरू आपल्या वंशजांची जागा दाखवत असते. जंगल जागे झालेले असतानाच
रानकोंबडा आपल्या कॉककॉक आवाजात सहज झाडीतून दिसेनासा होतो. पावलं थबकतात
आणि सरसरणा-या पते-याचा (वाळलेली पाने) वेध घेऊ लागतात. दबकत रानात एक-एक
पाऊल टाकत असतानाच अचानक लाव्हांचा थवा भरारी घेतो. काळजात धस्स होते. आपण
लाव्ह्यांचा वेध घेऊ लागतो कोंबडीची पिल्ले जशी थव्याने चलत असतात तशी
रानाच्या करडया रंगात एकजीव झालेली ही पिल्ले काहीशा उड्डाणानंतर लगबगीने
चालत असतात.
समुद्र सपाटीपासून २३७८ इतक्या उंचीवर असलेले आंबोली हे
कोकणातील एकमेव हिलस्टेशन म्हणून ओळखले जाते. निसर्गरम्य जंगल, सुखद
हवामान, आकर्षक पॉईंट आदींसह पावसाळया त वाहणारे बारमाही धबधबे आदींमुळे
आंबोलीची ख्याती महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक राज्यात केव्हाच पोहोचली आहे.
महादेवगड पॉईंट, नारायण गड, कावळेसाद व्हॅली, शिरवलकर पॉईंट, परीक्षित
पॉईंट, सनसेट पॉईंट आदी स्थळे पर्यटकांना मोहविणारी अशीच आहेत. दीड ते २
हजार वनौषधींना आपल्या कुशीत बाळगताना हजारो वैविध्यपूर्ण जिवांचा सांभाळ
करणारी आंबोली सर्वागाने वेगळी आहे. आंबोली कोणत्याही हंगामात पाहावी.
प्रत्येक हंगामात तिचे सौंदर्य वेगळे असते. पावसाळया त ती नववधूप्रमाणे
सजलेली असते. तर उन्हाळया त तिचे रूप वेगळेच असते. पाऊस तोंडावर आला आहे.
याचा आंबोलीतील जीवांना कितीतरी आंनद आहे. जंगल फिरताना तो वारंवार जाणवतो.
मधमाश्यांची लगबग अनेक अवघड जागांवर लटकलेली पोळी मध काढणा-यांच्या
नजरेतून सुटत नाहीत. निसर्गाच्या या दुनियेत सफर करताना दुपारी कोकणी
जेवणाचा आस्वाद घ्यावा. खास मालवणी जेवण तर मिळेलच शिवाय पंजाबी, चायनीज
आणि बरंच काही पोटपूजा करण्यासाठी तयार असते. छोटी-मोठी हॉटेल येथे आहेत.
गावाच्या पश्चिमेला एक सूर्यास्त दर्शनाचा भाग आहे. येथून सावंतवाडीचा
हिरवागार परिसर पाहायला मजा येते. याहीपेक्षा मजा येते ती उत्तर-पश्चिमेला
या भागात तुम्ही
कधीही पोहोचा एक निसर्गाचा चमत्कार येथे तुमची वाट पाहत असतो. भणाणता वारा,
हिरवे जंगल हलके करून सोडतो आणि मग नकळत तोंडातून शब्द येतो व्वाऽऽव..
तोंडातला शब्द संपतो न् संपतो तोच बुलबुलची उंच तान ऐकू येते. येथे थेट
निसर्गाला साद घालावी त्याचा प्रतिसाद ऐकावा.
तुम्ही किती
अंतरीच्या उर्मीतून हाक मारता तेवढी त्याची हाक कानावर पडते. येथे जेवढया
डेसिबलमध्ये तुम्ही साद घालाल तेच शब्द चारही बाजूने तुमच्या कानापर्यंत
आदळू लागतील. शब्द पुन्हा-पुन्हा ऐकताना सुरू होणारा साद प्रतिसादाचा हा
इको साऊंडचा खेळ मंत्रमुग्ध करतो. येथेच राहावे, सारे काही विसरून जावे,
अगदी स्वत:लासुद्धा..
एक
दक्षता पावलोपावली घ्यायला हवी. निसर्गाबरोबर निश्चित खेळावे, परंतु त्याला
डिवचू नये. आपल्या आराडाओरडीचा परिसरात असणा-या जिवांना त्रास होऊ नये
याची काळजी घ्यायला हवी. नाहीतर अस्वल मागे लागायचे. या परिसरात अस्वलांची
संख्या भरपूर आहे. कधी कधी ही मंडळी वस्तीपर्यंत पोहोचतात सुद्धा. अस्वल
मागे लागले की, उतारावरून पळायचे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी गप्प गुमान
झोपून जायचे. श्वासालाही नियंत्रित ठेवायचे. शवासनात तुम्ही गेलात तर
सुटलात, नाहीतर तुमची थोडीशीही चूक तुम्हाला कायमचे शवागृहात पोहोचविणारी
ठरू शकते. अस्वल मानवाच्या कळीत सहसा पडत नाही. परंतु जर त्याने एखाद्याला
गाठलेच तर तो आपल्याला किती त्रास देऊ शकतो याचा अंदाज ते घेते आणि शवासनात
पडलेल्या त्या देहाकडे पाहून आपल्या मार्गाने चालू लागते. उतारावर पळत
असताना त्याला लगबग करता येत नाही. म्हणून आपण शिरजोर ठरतो. परंतु पळताना
एक भान ठेवायला हवे. उतार असल्याने गती समजून घ्यायला हवी नाहीतर दरीत पाऊल
भलतीकडेच पडायचे नाहीतर आगीतून फुफाटया त असे होऊन जायचे..
गेळेच्या दक्षिणेला नारायणगड आहे. पूर्वी हा गड स्वराज्य संरक्षणात व्यस्त
असायचा आता येथे हिरडय़ांच्या झाडांची दाटी झाली आहे. आंबोलीपासून पुढे
बेळगाव रस्त्यावर नांगरतास हा पॉईंट दिसतो. प्रत्येक पॉईंटला येथे लोककथा
आहे. नांगरतासमध्ये तर एका शेतक-याचा नांगर वाहून आला आणि सह्याद्रीला उभा
चर पडला, त्याचा धबधब झाला असे सांगितले जाते. पावसाळया त याचे रौद्र
स्वरूप पाहायला मिळते. अनेक जण या रानभुलीत आपलं पाऊलच विसरतात. वाकडे
पाऊल पडले तर थेट दरीच आपल्यासोबत असते. असा अनेकांना जीव गमावावा लागला
आहे. येथे ऑर्किड ही दुर्मीळ वनस्पती पाहायला मिळते. आता कोरडे झालेले मॉस
पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत आहेत. भेडस, करवंद, धावशी, बेळे खायला
येथे मिळतात. सीतेचे केस या कोरडया जंगलातही आपली कोमलता जपून आहेत. उबदार
थंडी, आल्हाददायक वातावरण पशू-पक्षी, फुलपाखरे यांची रेलचेल, जंगलाचा
हिरवेपणा आपणास वारंवार साद घालत असतो. धबधबे आता घासून-पुसून साफ आहेत.
मान्सूनच्या पहिल्या सरीबरोबर ते जागृत होतील आणि पुढे दिवाळीपर्यंत दणाणू
लागतील. आंबोलीतला निसर्ग पाहणे म्हणजे एक खजिनाच असतो. येथे पावला-पावलावर
जैवसंपत्तीचे भांडार समजून घेता येते. सरपटणारे जीव, उभयचर, जलचर प्राणी
यांचे हे राज्य किती छान आहे याची जाणीव होते. या भागात आंबोलीत
पोहोचल्यावर तुम्ही सर्वत्र भ्रमंती करताना जवळच्या हिरण्यकेशीला जायलाच
हवे. नदीचा उगम आणि येथील गुहांची रचना समजून घ्यायला हवी. सूर्योदयापेक्षा
आता माघारी फिरायला हवे. अन्यथा त्यांचे राज्य सुरू
झालेले असते या शक्तीत आपला चाणक्षपणा फायद्याचा पडत नाही, कारण एकदा काळोख
पडला की, आपल्या दृष्टीपेक्षा त्यांची दृष्टी तीव्र झालेली असते.
आपल्यासोबत असतो चंद्र, जो आपल्याबरोबर चालत असतो. हजारो मैलांचे अंतर
असूनही तो आपल्याला साद देत असतो. वारा चंद्र आणि ढगांची पाठशिवन सुरू
होते. निसर्गदृष्टी पाहून सावंतवाडीला जायला उतार चालू झाला की,
प्रथमपूर्वीचा वस हे ठिकाण येते. घाटाचा मार्ग दाखविणारा अशी त्याची ओळख
आहे. येथूनच पुढे प्रसिद्ध आंबोली धबधब्याच्या माळा सुरू होतात. अलीकडे
आंबोली परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सुरू झाले आहे. उन्हाळया त हवेचा
गारवा अनुभवायाला येणा-या प्रत्येकाला आंबोली कुशीत घेते. याच मुळे पहिल्या
पावसापासून १५ जुलैपर्यंत हॉटेलची बुकिंग एवढया तच फुल्ल झाली आहे.
आंबोलीत रस्त्याने येताना बेळगाव ७० कि.मी., कोल्हापूर १२० कि.मी.,
सावंतवाडी ३० कि.मी., पणजी ९० कि.मी. अंतर आहे. अंबोलीला सावंतवाडी रोड हे
जवळचे रेल्वेस्टेशन आहे. पावसाळया पूर्वी याच पायावाटांवरून अनेक जीवांची
अनेक पावले फिरलेली दिसतात. पाऊलवाटा जाग्याच असतात. अनेकदा त्या वाटाच नवे
आश्चर्य दाखवतात.
आंबोली कशी हे अनेक वेळा अनेकांनी अनेक प्रकारे
अनुभवलेले असेल. एखाद्या डिस्कव्हरी चॅनेलचा आपण भाग झालो आहोत असे एका
क्षणी मनाची पक्की खात्री पटते. तेही याच जंगलात. उन्हाळया तही येथे असणारी
प्रचंड गर्दी पाहिल्यावर आणि पावसात जागृत होणारी नुकतीच आंघोळ करून
‘गरिबांचे महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि आता ‘वर्षा
पर्यटना’मुळे लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘आंबोली’ या
पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची ‘पॅकेज’ खर्ची पडली आहेत.
परंतु बराचसा खर्च नियोजनाच्या त्रुटीमुळे वाया गेलेला दिसतो. आंबोली हे
हिलस्टेशन म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेले गेल्या दशकात ‘वर्षा पर्यटना’ने
त्याची जागा घेतली आहे. पावसाळी हंगामात आंबोली घाटातील डोंगरकपा-यातून
वाहणा-या धबधब्याखाली स्नानाचा सचैल आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी
करतात. या पार्श्वभूमीवर आंबोलीचा पर्यटनस्थळाचा मूलभूत विकास अद्यापि दूरच
आहे.
मुख्य धबधब्याचा विकास, कावळेसाद व्हॅलीवर झुलता पूल,
शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण, पॉईंटवर रेलिंग, पर्यटन निवासी संकुल,
हर्बेरियम सेंटर, जंगल सफारी, वन्यप्राण्यांना
एकंदरीत आंबोलीत पर्यटन विकासासाठी आजवर
जो निधी आला तो योग्य नियोजनाअभावी आणि खाबूगिरीने अक्षरश: वाया गेला आहे.
पाऊस कोसळल्यानंतर आंबोलीतील धबधबे एक दोन दिवसात सुरू होतील. या
धबधब्याखाली स्नानाचा सचैल आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक धाव घेतील. तसं
पाहायला गेलं तर आंबोलीची सैर एका दिवसात पूर्ण होईल, सूर्योदयापासून
सूर्यास्तापर्यं
आंबोलीचे हे रूप आपल्याला आपलेपण विसरून निसर्गाबरोबर एकरूप करणारे आहे.
या एकरूपतेत अनेक गावे आंबोली परिसरात वसली आहेत. या गावांतील ग्रामस्थांची
दैनंदिनी वेगळी आहे. येथील प्राण्यांचे जीवन वेगळे आहे. आपण जगतो
त्यापेक्षा वेगळं काहीतरी निश्चितच आंबोलीत आहे. घरटे बांधणारे बेंडूक,
दरीमध्ये उतरणारे चांदणे आणि आंबोलीच्या कुशीत सह्याद्रीच्या घनगर्द
वसलेल्या गावांमध्ये पावसाच्या पहिल्या सरीबरोबर धडधडू लागणारी होमकुंड हे
सारेच विलक्षण आणि अप्रूप असे.... !!
सिंधुदुर्ग : चौकुळ येथे आढळले हजारो वर्षापुर्वीचे ‘अशनी विवर’

आंबोली (सिंधुदुर्ग); निर्णय राऊत : जगातील एकमेव खडकातील (कातळ) विशिष्ट अशा अशनी विवरचा भूवैज्ञानिक डॉ.अतुल जेठे व सहकारी प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी चौकुळ येथील खमदादेव पठार (खमद्याचा पठार) येथे शोध लावला आहे. त्याचे नामकारण “रजतकृष्ण” असे करण्यात आले असून येत्या काही दिवसात सदर अशनी विवराचा सखोल अभ्यासाने व संशोधनाने माहिती पुढे येईल. त्यामुळे हे जगातील एकमेव असे अद्भुत ‘अशनी विवर’ म्हणून ओळखले जाईल अशी शक्यता आहे. (Ashni Crater)
उल्का, अशनी म्हणजेच मोठे उल्काभ अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणातून येताना पूर्ण जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतात. अशा अपार्थिव पदार्थांना ‘अशनी’ म्हणतात. उल्काभांच्या मानाने अशनींची संख्या अल्प असते, कारण बहुसंख्य उल्काभ वातावरणातच जळून जातात. पृथ्वीवर ते क्वचितच आढळतात. सामान्यत: उल्कावृष्टी होते तेव्हा अशनी पडत नाही. अशनी एकटा पडतो किंवा वातावरणात फुटून अनेक तुकडेही पडतात. कधी कधी अशनीच्या आघाताने भूपृष्ठावर विवर निर्माण होते. ॲरिझोनातील अशनिविवर व लोणार सरोवर ही याची ठळक उदाहरणे आहेत. (Ashni Crater)
असा लागला शोध… (Ashni Crater)
चौकुळ परिसरात विविध महत्वप्राप्त पठारे, गुहा तसेच धार्मिक स्थळे आहेत. त्यातील खमद्याचे पठार नावाने ओळखल्या जाणाऱ्या याच पठारावर शिरूर(पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अतुल जेठे यांनी त्यांच्या सोर्स नुसार माहिती घेत येथील सॅटेलाईट छायाचित्रे मार्फत विशिष्ट विवराचा आकार पाहिला होता. तर डॉ.अतुल जेठे हे आपल्या संशोधनासाठी प्रख्यात असल्याने त्यांनी त्यावर प्राथमिक दृष्ट्या सॅटेलाईट छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना सदर विशिष्ट आकार हा अशनी विवर संबंधित असल्याचे खात्री झाली. त्यानंतर त्यांचे सोबती प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्यासह नुकतीच या खामद्याच्या पठार परिसरातला भेट दिली असता पश्चिम घाटातील या पठारावर सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर असल्याचे प्राथमिक दृष्ट्या त्यांनी पुष्टी केले. अन् हे अशनी विवर असलेला परिसर पाहता या विवरा बद्दल होणाऱ्या संशोधनात विविध आणि आश्चर्यकारक महत्वपूर्ण गोष्टी समोर येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

अशनी विवरावर प्रा. डॉ. अतुल जेठे यांनी दिलेल्या माहिती नुसार चौकुळ येथील आज असलेल्या खमदादेव मंदिरापासुन पूर्वेकडे सुमारे ५०० मीटर अंतरावर सुमारे पन्नास हजारहून अधिक वर्षापूर्वी आकाशातून एक पेटता अशनी येऊन येथील जांभ्या खडकाच्या कठीण पठारावर कोसळला व त्यामुळे वर्तुळाकार आकाराचे विवर तयार झाले. आज या विवरात काळसर -पिवळट रंगाची माती व त्यावर पावसाळ्यात उगवणारे गवत यांचे अस्तित्व आहे. पावसाळ्यात येथील परिसरात सर्वात जास्त पाऊस पडतो. तर या विवराच्या ईशान्य दिशेकडून विवरातील पाणी वाहून जाते. या विवराचा पूर्व -पश्चिम व्यास सुमारे १८० मीटर तर उत्तर-दक्षिण सुमारे २२० मीटर असुन विवराचा परिघ सुमारे ५२५ मीटर आहे. या विवराचा अधिक अभ्यास व संशोधन करण्यासाठी आपण या मे महिण्याच्या शेवटी पुन्हा भेट देणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या स्थळाला शासनाने ‘अति संवेदनाशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून संक्षित करावे अशी मागणी देखील डॉ. जेठे यांनी केली आहे.
भौगोलिक स्थान!
या विवराचे पृथ्वीवरील भौगोलिक स्थान १५ अंश ५२ मिनिटे व ३९.५ सेकंद उत्तर अक्षवृत्त ते ७४अंश १ मिनिट ५४.५ सेकंद पूर्व रेखावृत्त असे आहे. समुद्र सपाटीपासुन हा भाग सुमारे ६३० मीटर उंचीवर आहे. घटप्रभा व कृष्णा या नद्यांच्या जोडणारी’ देवाची न्हय’ही नदी पूर्वेकडून पावसाळ्यात वहाते. तसेच भारतातीलच नव्हे; तर जगातील जांभ्या खडकावरील (Laterite Rock) कातळसड्यावरील हे एकमेव विवर ठरण्याची शक्यता डॉ.अतुल जेठे यांनी वर्तवली. याला शास्त्रीय परिभाषेत ‘सिम्पल बाऊल क्रेटर’ म्हणजेच ‘साधे वर्तृळाकृती विवर’असे म्हणतात. आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस या भागात पडत असल्याने वातावरणातून अतिगतिमान अशनीचा आघात झाल्यावर वर उसळून आलेली कड (Ejecta- Blanket) मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी. अशी शक्यता देखील डॉ.अतुल जेठे यांनी वर्तवली.

असे आहे खमद्याचे पठार!
प्रसिद्ध अशा खमदादेव पठार हे पूर्वी पासूनच वैशिष्टपूर्ण आहे. नजर जाईल एवढे विस्तृत हे पठार असून तेथे पवित्र खमदादेवाचे मंदिर आहे. याच खमदादेव नावानेच हे पठार ओळखले जाते. मुख्य रस्ता पासून अवघे काही मीटरवर हे पठार असून पावसाळ्यात येथे जैवविविधतेचे विविध घटक सहज (जीव व वनस्पती) आढळतात. तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात विविध प्रजातीची रानफुलेही येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटक सुद्धा येथे व्हिजीट करत असतात. येथे पुरातन देवाची तलाव सुद्धा आहेत. मंदिराच्या समोरच दोन वर्तुळकार एक मोठ्या तर एक लहान आकाराची तळी (तलाव) आहे. यातील एका तळीत पाणी पाहायला मिळते तर दूसरी तळी ही नेहमी बीना पाण्याची असते. तीच बीना पाण्याची मोठी तळी, जीचा आता अशनी विवर म्हणून शोध लागला आहे. त्याचेच रजतकृष्ण नुकतेच असे नामकरण करण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसात अशनी विवर हे पूर्णतः सिद्ध झाल्यास आंबोली – चौकुळ – गेळे परिसरात अन्य काही खगोलीय घटना किंवा पुरातन मानवी संस्कृति याचा शोध घेणे आवश्यक आहे.
https://pudhari.news/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3/539091/discovery-of-thousands-of-years-old-ashni-crater-at-chokul-in-sindhudurg-district/ar
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.