खूप दिवसांचा रेंगाळलेला बेत आता सिद्धीस जात होता. ब्रुसेल्सहून ओस्लो ला जाणारे विमान समोर होते. सोबतीला सूर जुळणारे एक जोडपे होते. उद्यापासून ४ दिवस नॉर्वेतल्या दरीखोर्यात राहायचे आहे या कल्पनेनेही शांत शांत वाटत होते. विमानाने हाक मारली. आत जाऊन बघतोय तर मोजून १२ डोकी ! "होल वावर इज आवर" म्हणत आम्ही ऐसपैस जागा घेतल्या. ( तरी त्या खत्रुड हवाईबयेने बिजनेस क्लास मध्ये नाहीच बसू दिले ! ) सोबतची तीन डोकी हापिसातून परस्पर आल्यामुळे झोपून गेली. अडीच वर्षाची सगुणा विमान या वस्तुतले सगळे कुतुहल संपल्यामुळे कंटाळून झोपून गेली. मी मात्र टक्क जागी होते. कोणत्याही प्रवासाला जाताना नवीन काहीतरी बघण्याची दिवास्वप्न पडत असल्याने मी झोपूच शकत नाही. चाळा म्हणून स्वतःशी गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या. 'दरीखोर्यातून वाहे... एक प्रकाश प्रकाश...' हे गाणं आलं नि मनात उद्या दिसणारे डोंगर बहरू लागले. आत्तापर्यंत जमा केलेल्या माहितीची मनात उजळणी सुरू झाली.
नॉर्वे म्हणजे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश एवढीच माहिती होती. पण जेव्हा नकाशा बघितला, फोटो बघितले तेव्हा आश्चर्याने थक्क झाले. लांबट निमुळत्या आकाराचा हा देश. त्याला २५ हजार किमि. चा समुद्र किनारा. एका बाजूला समुद्र तर एक बाजू सगळी पर्वतमय. पठराचा भाग देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ १० % ! म्हणजे बहुसंख्य लोक डोंगरदरीत राहातात. आम्ही उन्हाळ्याच्या अगदी शेवटी जाणार असल्याने मध्यरात्रीचा सूर्य दिसणार नव्हता. म्हणून फार उत्तरेकडे न जाता मध्यभागी असणार्या फियॉर्ड्स बघायला जाणार होतो. समुद्र आत घुसल्यामुळे पर्वत भंगून दर्या निर्माण झालेल्या असतात त्या भागाला फियॉर्ड्स म्हणतात. "नॉर्वे इन नटशेल " असे आमच्या सहलीचे नाव. कल्पना एका प्रवासी कंपनीकडून घेऊन आरक्षणं आणि बाकी नियोजन आम्हीच केले होते.
तरीही मनात शंका होत्याच. कारण पर्यटन म्हणजे प्रेक्षणीय स्थळांची यादी हवी, त्यात दोन चार संग्रहालये वगैरे पाहिजेत. तसे या प्रवासात काहीच नव्हते. सगळे दिवस आम्ही रेल्वे, बस आणि जहाजातून प्रवास करणार होतो आणि त्याचवेळी जे दिसेल ते प्रेक्षणीय असणार होते. एका अर्थाने खूप आरामदायी प्रवास होता हा. आम्हाला फक्त एका वाहनातून उतरून दुसर्या वाहनात बसायचे होते. आणि पंचेंद्रिये उघडी ठेवायची होती. पण हे सगळे आम्ही नेटवरचे फोटो बघून ठरवले होते. किती धाडस ! एक तर नॉर्वे खूप खर्चिक देश आहे. ( राहाणीमान अमेरिकेपेक्षा ३०% नि ब्रिटन पेक्षा २५% ने जास्त आहे म्हणे ! ) नेटवरच्या सारखे काही दिसले नाही तर एकूण प्रकरण फारच कंटाळवाणे होणार...
विचारांच्या तंद्रीत विमान ओस्लो विमानतळाकडे झेपावले. रात्रीचे साडेदहा वाजले होते. बाहेर १० डिग्री तापमान होते. विमानतळावरून शहरात जाणारी फास्ट मेट्रो चुकली होती. मग दुसरी एक घेतली. त्या रेल्वेने आम्हाला मुख्य स्थानकावर सोडले. आता हॉटेल शोधायचे होते. अजून एक मेट्रो. बहुतेक आमची दिशा चुकली नि आम्ही पुन्हा तिसर्याच ठिकाणी उतरलो. रात्रीचे सव्वाबारा झाले होते. मग मात्र सरळ टॅक्सी करून हॉटेल गाठले. हे हॉटेल मीच शोधले होते. ४ तास झोपण्यासाठी एवढ्या दूरचे हॉटेल बुक केले म्हणून मनात स्वतःला शिव्या घातल्या.
एवढ्या रात्री सुद्धा शहर जागे होते. पब्स, रेस्टॉरंट्स फुललेले होते. युरोपियन धाटणीच्या इमारती दिमाखात चमकत होत्या. चक्क आपल्याकडे असतात तशा सायकल रिक्षा सुद्धा दिसत होत्या. तरुणाईचा भर रस्त्यात जल्लोष चालू होता. एका टीन एजर्स च्या झिंगलेल्या घोळक्याने तर पूर्ण रेल्वेस्टेशन डोक्यावर घेतले होते. एकूण शहर खूप नियोजनपूर्वक बांधलेले दिसत होते. यावेळेलाही पोलिसांची गर्दी मात्र ठिकठिकाणी का होती ते समजले नाही.
हॉटेलवर पोहोचलो तोवर एक वाजून गेला होता. उद्या सकाळी ओस्लो वरून निघून
आलेसुंद नावाच्या गावी वाहाने बदलत बदलत संध्याकाळपर्यंत पोहोचायचे होते.
मस्त झोप लागली. सकाळी साडेपाचला उठलो. खिडकी बाहेर पाहिले तर अगदी
खिडकीच्या खाली एक झरा खळखळ वाहात होता ! त्यावर एक चिमुकला पूल ! खूप
प्रसन्न वाटले. भराभर आवरून नाश्ता करून मुख्य रेल्वेस्थानकावर गेलो. तिथे
अजून एक गोड धक्का होता. रेल्वेत कुटुंबांसाठी वेगळा डबा असतो. त्यात
बाबागाडी ठेवायला प्रशस्त जागा. डब्याच्या शेवटी मुलांना खेळता यावे म्हणून
छोटे खेळघर. त्यात मुलांच्या उंचीची आसने आणि फळा, खडू, गोष्टीची पुस्तके
नि टी.व्ही. !!! हे सगळे सुस्थितीत !
रेल्वेने ऑस्लो मागे टाकले. आता सहा तास रेल्वेतून नॉर्वे बघायचा होता. चित्रातल्या सारखेच दिसत होते सगळे. नॉर्वे ही सुजलाम् भूमी आहे. इतके पाणी मी कुठेच नाही पाहिले. सहजतेने निर्माण झालेली विशाल सरोवरं सर्वत्र दिसत होती. आणि त्या सरोवराच्या काठाशी बिलगलेली नॉर्वेजियन खेडी. लांबच लांब कुरणे हिरव्यागार गवतावर पावसाने मोती शिंपडल्यासारखी चमचमत होती. मध्येच एखादा अवखळ झरा खळाळत यायचा. थोडी जागा सापडली की विसाव्यासाठी पाणी थांबून तळे तयार झालेले असायचे. त्या भोवती आनंदात हसणारे एखादे शेत. शेताच्या एखाद्या कोपर्यात कौलारू घरे. त्या दोनचार घरांची वाडी बघताना राहून राहून "पाडस" मधले ज्योडीचे घर आठवत होते. अगदी तस्सेच दृश्य दिसत होते.
लोकवस्ती खूप विरळ दिसत होती. इथे सरासरी ४ किमी स्क्वेअरमध्ये १२० लोक
राहातात म्हणे ! सरोवरांच्या काठावर कितीतरी सुबक घरे दिसत होती. इतक्या
काठावर की घरामागच्या पायर्या पाण्यात दिसायच्या. त्या प्रत्येक घराचे
वैशिष्ट्य म्हणजे घराजवळ बांधलेली छोटीशी होडी. अगदी हौसेने रंगरंगोटी करून
सजवलेली. उन्हाळ्याच्या ४ महिन्यात मासेमारी करून ताज्या माशांनी पोटं नि
मनं तुडुंब भरत असावीत. हा भाग सामन माश्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे म्हणे.
सामन मासे समुद्रातून नदीत प्रवाहाच्या विरुद्ध पोहत येतात आणि मग अंडी
घालतात. त्यामुळे या लहान मोठ्या तळ्यांच्या नि नद्यांच्या प्रदेशात
त्यांचा सुकाळ असतो. मत्स्याहारी लोक दुरून येतात ताजे सामन खायला. अर्थात
आम्हाला शाकाहारी असल्याने त्याचा काही लाभ घेता आला नाही.
लोकांचे रहाणीमान मात्र सधन असल्याचे जाणवत होते. या खेड्यांमधल्या प्रत्येक घरापुढे आधुनिक कार, स्पोर्ट्सकार आणि बाईक्स दिसत होत्या. तळ्याकाठच्या एका घरासमोर तर चक्क एक छोटेसे खाजगी विमानही होते ! घराच्या अंगणात वेगवेगळ्या आकाराचे पोहण्याचे तलाव निळ्याशार रंगाने उठून दिसत होते. घराजवळ गोठा. त्यात गायी, हरणं आणि घोडे. याशिवाय कोंबड्या सश्यांची खुराडी आणि कुत्री होतीच. कसे दिसत असतील या घरात रहाणारे लोक ? अंहं ! एकही माणूस दिसायला तयार नाही. हे समोरचं निसर्गदृश्य एखाद्या लँडस्केप सारखं माणसाच्या चित्राशिवाय दिसत होतं.
एका बाजूला उंचच उंच लांबवर पसरलेल्या डोंगर रांगा, त्यातून खेळत येणारे
झरे, नद्या, त्यावर बांधलेले चित्रमय पूल आणि लखलखणारी तळी ! एवढा वेळ भान
हरपून हे चित्र बघत होते. त्या सौंदर्याची गुंगी यायला लागली. त्यात काल
रात्री ४ च तास झोप मिळाली होती. पण पोटात काहीतरी गेल्याशिवाय झोप लागणार
नव्हती. सोबत शिदोरी भरपूर होती. तरीपण गरम काही मिळते का बघितले.
पॅन्ट्रीत गरम गरम स्पिनॅच पाय मिळाले. शाकाहारी हा एकच पदार्थ होता. (
त्याच्या नावात 'पाय' ! ) पालक आणि चीज भरलेले हे गरम गरम पॅटीस पोटात गेले
नि झोपेने जोरदार आक्रमण केले. मन झोपायला तयार नव्हते. आणि शरीर जागे
रहायला. बाहेर निसर्गाचा एवढा उत्सव मांडलेला दिसत असताना झोप येणे म्हणजे
करंटेपणाच ! बराच वेळ नुसत्या डुलक्या काढल्या. बाहेर पावसाच्या सरी सुरू
झाल्या होत्या. आता आमचे स्टेशन जवळ आले होते.
स्वभावानुसार रेल्वेच्या डब्यात पसरू दिलेला सहा तासांचा संसार गोळा
केला नि उतरलो. आजून मुक्कामाचे ठिकाण दोन तास बस च्या अंतरावर होते. जिथे
उतरलो ते स्टेशन अद्नाल्स्नेस. समोर एक मोठ्ठे सरोवर आणि तीन दिशांना डोंगर
रांगा. क्यामेरे सरसावले. १० मिनिटात किती बघू नि काय काय टिपून घेऊ असे
झाले. शेवटी बसमध्ये बसावेच लागले. आता आम्ही पठारी प्रदेश सोडून पर्वतीय
प्रदेशात जात होतो. नदीला नि सरोवरांना अगदी लगटून आमचा रोड वळणे घेत होता.
मध्येच बोगद्यातून बस जात होती. ड्रायवरमामा खुषीत दिसत होते. सोबतच्या
प्रवाश्यांशी नॉर्वेजियन भाषेत गप्पा मारत होते. बसमध्ये बरेच पर्यटक होते.
मध्येच एखादे सुंदर दृश्य बाहेर दिसायचे नि "वाव ! ऑसम् ! ग्रेट ! " असे
उद्गार ऐकू यायचे. लगेच बाकी सगळे क्यामेरे तिकडे जायचे ! आपल्याला मिळणारा
आनंद असा सहजतेने वाटला जात होता. दुणावत होता. माझ्या पुढच्या सीटवर एक
अमेरिकन काका नि एक जपानी काका यांच्या गप्पा चालू झाल्या होत्या. अमेरिकन
बडबडे असतातच पण जपानी काकांना स्वतःचा कंपू सोडून गप्पा मारताना बघायला
छान वाटत होते. निसर्गाची जादू असेल ही !
मुक्कामाचे गाव आले. आलेसुंद. या गावाच्या नगरपालिकेत पाच आयलंड्स येतात.
लोकसंख्या ४२०००. एकूण सात बंदरे असल्याने हे नॉर्वेतले एक महत्त्वाचे
मत्स्यव्यापार केंद्र मानले जाते. गिरिंजर फियॉर्डशी जोडले गेले असल्याने
पर्यटन व्यवसायातही या गावाचे स्थान महत्वाचे आहे.
आमच्या बसच्या ड्रायवरमामांना आमच्या हॉटेलचा पत्ता माहीत होता. त्यांनी
उतरल्यावर कुठून कसे जायचे ते सांगितले. गावात प्रवेश करताच एका सरकारी
इमारतीसमोरच्या पुतळ्याने लक्ष वेधले. मासे धरायला गेलेल्या आपल्या
प्रियकराची वाट बघणारी एक तरूण मुलगी होती ती. या पुतळ्याच्या चेहर्यावरचे
भाव आणि वाट बघणारी मुद्रा एवढी बोलकी होती ! कन्याकुमारीची गोष्ट आठवली
नि क्षणभर व्याकूळच झाले.
आज मात्र हातातल्या नकाशाने आणि ड्रायवर काकांनी मदत केल्याने हॉटेल लगेच
सापडले. हॉटेलकडे जाणारा रस्ता समुद्राच्या काठानेच जात होता. सध्या तिथे
खाद्यमहोत्सव चालू होता. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वाईन्स चा वास
वातावरणार भरलेला होता. लोक त्या वेगवेगळ्या पदार्थांवर रांगा लावून तुटून
पडत होते. ( हो, हो, आठवले मला पुण्यातले असे महोत्सव ! ) इथे काही
शाकाहारी आहे का विचारले असते तर लोक दगड घेऊन स्वतःचे डोके फोडत बसले असते
असे वाटले. एवढे तल्लीन होऊन सगळे मासे खात होते. ( इथे शाकाहारी मागणे
म्हणजे एखाद्या डिस्को बँडला 'देहाची तिजोरी" वाजवायला सांगणे झाले असते ! )
सामानाचे ओझे हॉटेलवर टाकून परत येऊ असे म्हणून हॉटेलवर पोहोचलो. सामान
लावताना डब्यातल्या मेथी पराठ्यांचा घमघमाट आला. मग काय सोबत शेंगादाण्याची
चटणी, पराठे आणि वर कणीक लाडू असा उभा आडवा यथेच्छ समाचार घेऊन सगळे
ताजेतवाने झालो.
जवळच एका टेकडीवरून संपूर्ण गाव आणि समुद्र असे सुंदर दृश्य दिसते असे
कळाले. तिथे गेलो तर काय ओबडधोबड रस्त्यावर टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ५००
पायर्या बांधलेल्या होत्या. आमच्या सोबत सगुणा. तिला उचलून चढणे किंवा
बाबागाडी चढवणे दोन्ही शक्य दिसत नव्हते, म्हणून आम्ही दोघे टेकडीच्या
पायथ्याशी असलेल्या एका छोट्या बागेत थांबलो नि सोबतचे गीता-माँटी टेकडी
चढायला गेले.
थोडावेळ खेळल्यावर तो कन्याकुमारीचा पुतळा जवळून बघून गावात एक चक्कर मारू
असा विचार करून निघालो. गाव डोंगरात असल्याने सगळे रस्ते चढउतारांचे होते.
काही ठिकाणी दगडी पूल आणि पायर्या बांधून दोन डोंगर जोडले होते. आम्ही
मुख्य रस्त्याला लागलो नि पावसाला सुरुवात झाली. हे अनपेक्षित नव्हतेच. हे
गाव पावसाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे म्हणतात. एक विनोदही सांगतात. एकदा
एका पर्यटकाने गाईडला विचारले, काय रे, पाऊस कोणत्या काळात नसतो ? यावर
गाईड उत्तरला , " मला काही कल्पना नाही बुवा. कारण मी फक्त २४ वर्षांचा आहे
! "
तर अशा या पावसाने चांगलीच झोडपायला सुरुवात केली. एका दुकानासमोर
निवार्याला उभे राहिलो. अर्धा तास झाला तरी पाऊस थांबेना. कमी पण होईना,
शेवटी टॅक्सी केली. १ कि मी च्या अंतरासाठी भरपूर पैसे मोजून हॉटेलवर
परतलो. खिडकीतून रिमझिम पाऊस, समुद्रावर पडणारा दिसत होता. मावळतीचा
सूर्यप्रकाश वातावरण अजून भारून टाकत होता. परतणार्या नौका, परतणारे पक्षी
आणि परतणारा सूर्य ! मन काही क्षण नि:शब्द झाले.
एवढ्यात माँटी-गीता परत आले. मग कॉफी ( ही हॉटेलमध्ये रहाणार्यांसाठी चक्क
फुकट होती ! ) गप्पा, आणि गाण्याच्या भेण्ड्या. ४ वाजता पोटभर खाल्ल्याने
उगाच काहीतरी खायचे म्हणून पावसात बाहेर जाण्याची कोणाची तयारी नव्हती.
सामान आवरून ठेवले आणि झोपलो.
उद्या निसर्गदेवतेचा एक चमत्कार पहायला जायचे आहे. गिरिंजर फियॉर्ड !
गायरांगरला भेट देऊन परत आलेसुंड गावात उतरलो तेव्हा संध्याकाळचे सात
वाजले होते. जड सामान काल थांबलेल्या हॉटेलमध्ये ठेवले होते. पण चेक आउट
सकाळी केले होते. आज रात्री १२ च्या बोटीने निघून उद्या दुपारी ३ वाजता
बर्गन ला पोहोचायचे. आज रात्री बोटीवर झोपण्यासाठी केबिन्स मिळाल्या
होत्या. बोटीवर रहायचा नवाच अनुभव आज मिळणार होता त्यामुळे सगळे उत्साहात
होतो.
पण एक छोटी अडचण होती. आता ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत वेळ कसा
घालवायचा? सुदैवाने कालसारखा आज पाऊस नव्हता. पण लवकरच अंधार पडल्यावर
गावातले प्रेक्षणीय स्थळ दिसणार नव्हते. मग ठरवले की जेवण करून रात्री
दीपगृहाजवळ जाऊन रात्रीच्या बर्गन चे फोटो काढायचे. ( ट्रायपॉड चे ओझे
त्याचसाठी वागवित होतो ! )
भरपूर वेळ आहे म्हटल्यावर एखादे भारतीय रेस्टॉरंट शोधूया असे ठरवले. गाव
एवढे लहान की अर्ध्या तासात देशी रेस्टॉरंट सापडले सुद्धा !!! तिथे निवांत
वेळ घालवत काहीबाही जेवलो. साडेदहाला दीपगृह शोधायला बाहेर पडलो. थंडी
होती. सगुणाला पांघरुणात लपेटून बाबागाडीत झोपवून दिलं आणि जॅकेट घालून
आलेसुंडच्या निर्मनुष्य रस्त्यांवर चालू लागलो. नुकतीच पौर्णिमा होऊन गेली
होती. स्वच्छ आभाळात चंद्र आम्हाला सोबत करत होता. दीपगृहाजवळ पोहोचलो.
सगळे शहर तिथून नजरेच्या टप्प्यात येत होते. भरतीचा समुद्र, लख्ख
चंद्रप्रकाश आणि समोर निवांत झोपलेले शहर. काल पाहिलेली टेकडी दिव्यांनी
लखलखत होती. अगदी टेकडीच्या माथ्यावर चंद्र दिसत होता. शांत स्निग्ध. किती
दिवस झाले अशी शांतता अनुभवून ? वाहनांचे आवाज नाहीत, टी व्ही ची बडबड
नाही. माणसांच्या चाहुली नाहीत. फक्त समुद्राची गाज आणि वार्याची शीळ.. !
मोठा श्वास घेतल्याचाही आवाज कानांना स्पष्ट जाणवावा अशी शांतता. पुन्हा मन
देशात उडालं. कुठल्याश्या गडावर भर दुपारी मंदिराच्या गाभार्यात ऐकलेली
शांतता मनात दाटून आली. खरं तर समोरची अर्धचंद्राकृती दिव्यांची माळ बघून
मुंबई आठवायला हवी होती. मातीच्या मनात मातीच्याच आठवणी रुजल्यात त्याला
काय करणार !
ह्म्म. ट्रायपॉडवर फोटो टिपण्याच्या कसरती सुरू झाल्या. कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला. मग कॅमेर्याचं पोट रिकामं आणि मनाचं पोट फोटो काढून भरल्यावर सामान घ्यायला कालच्या हॉटेलकडे गेलो. सामान घेईपर्यंत आम्हाला नेणार्या बोटीचा भोंगा ऐकू आला.
आजची बोट कालच्या वरताण होती. अजून मोठी. उत्साहात चेक इन करायला गेलो. तर कळलं की आमच्या केबिन्स खिडकीच्या नाहीत ! आणि सकाळी ९ वाजता त्या सोडायच्या पण आहेत. भलंबुरं वाटून घेण्याच्या मूडमध्ये कोणी नव्हतंच. गुमान आमच्या केबिनमध्ये गेलो. तिथे दोन बेड, दोन कपाटं, लिहिण्याचा टेबल, आणि बाथरूम अशा सर्व सुविधा होत्या. फ्रेश होऊन झोपलो. रात्री कुणीतरी हलवल्यामुळे जाग आली. जरा दचकूनच जागी झाले. अशी झोपल्याझोपल्या रूमसह हलण्याचा अनुभव आधी कुठे बरं आला होता? ह्म्म्म.. लातूरला भूकंपाच्या वेळी ! एक क्षण लागला हे आठवायला आणि हा भूकंप नसून आपण नॉर्वेतल्या एका बोटीवर आहोत याचे भान यायला. होय. आमची बोट कसल्याश्या आनंदात अक्षरश: डुलत चालली होती ! एखाद्या प्रचंड मोठ्या झोक्यावर असल्यासारखं वाटत होतं. पोटातलं अन्न पण आनंदात नाचायला लागलं होतं. कधी बाहेर पडेल सांगता येत नव्हतं. आख्खी बोट डावीकडे उजवीकडे कलंडत होती. मध्येच खर्रर्र असा खडकांना घासल्याचा आवाज यायचा. मनात जहाजाच्या कप्तानाला शिव्या घातल्या. जोरदार दणका बसल्यावर बस ड्रायवरला नाही का देत आपण शिव्या ? तशा. एकदा तर वाटलं हा झोपला तर नसेल ? आणि म्हणून बोट भलतीकडेच जऊन खडकांवर आदळतेय वगैरे ! भरीत भर टायटॅनिक आणि इतर काही चित्रपट पण याच वेळेला का आठवावेत !!! तब्बल दोन तास बोटीचे हे निशानर्तन चालले होते. आणि मनाचे , कल्पनाशक्तीचे व्यायाम ! कधीतरी आपोआप झोप लागली.
सकाळ प्रसन्न होती. लख्ख ऊन पडलं होतं. आवरून नाश्ता करून डेकवर गेलो. तिथे हेलिपॅड होतं ! जॅकूझी आणि सोनाबाथ वगैरे चैनीच्या गोष्टी पण होत्या. आजही डेकवर गेलं की सूर्यफुलाच्या शेतात गेल्यासारखं वाटलं. सगळे लोक सूर्याकडे तोंड करून निवांत पडले होते. आम्ही पण जागा घेतल्या.
समोर समुद्र खेळत होता. अधुनमधुन समुद्रातूनच डोंगर कडे मान उंच करून आमच्याकडे बघत होते. समुद्र पण कसा बहुरूपी असतो नाही. काल रात्री चंद्रप्रकाशात तो ज्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन विश्वासाने स्वप्नात रममाण व्हावं अशा मित्रासारखा दिसत होता. रात्री बोट हलत असताना कुटिल जादूगारासारखा वाटत होता. कोणत्याही क्षणी गायब करू शकेल असा. आणि आज सकाळी रांगत रांगत खोड्या करत घरभर खेळणार्या बाळासारखा निरागस हसत होता. असं वाटलं या समुद्राला उचलून घेऊन त्याच्या जावळांवर हात फिरवावा ! आजही अधुन मधुन बेटांवर लहान मोठी खेडी वसलेली दिसत होती. कालच्यापेक्षा आजचा समुद्रमार्ग बराच मोठा होता. रुंद होता. तरीही एखाद्या डोंगराला बोट जेव्हा वळसा घालून जाई तेव्हा खडकाला घासल्याचा आवाज येत होता.
आजचा वेळ फार लवकर गेला. बर्गन शहर दिसू लागले. बर्गन हे नॉर्वेतले आकाराने २ क्रमांकाचे मोठे शहर. ४०० वर्षांपासून अत्यंत महत्त्वाचे व्यापारी बंदर. अनेकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पुन्हा पुन्हा जोमाने उभे राहिलेले हे शहर एके काळी युरोपची व्यापारी राजधानी म्हणून ओळखले जायचे. जहाजातून उतरून बाहेर रस्त्यापर्यंत येताना अगदी मोठ्या विमानतळावर उतरल्यासारखे वाटत होते.
नकाशानुसार चालत जाऊन हॉटेल गाठले. थोडे खाऊन बाहेर पडलो. हॉटेल अगदी गजबजलेल्या परिसरात होते. जुन्या काळातल्या फिशमार्केटचा हा भाग आजही तितकाच प्रेक्षणीय आहे. जागोजागी थुईथुई नाचणारी कारंजी, त्याभोवती आकर्षक आकारात वाढवलेली हिरवळ आणि फुलांच्या वेली संध्याकाळच्या उन्हात वातावरण प्रसन्न करीत होत्या. गावातील प्रसिद्ध दर्यावर्दींचे आणि शिलेदारांचे, कलाकारांचे पुतळे या भागाला वेगळाच दिमाख प्राप्त करून देत होते.
आम्हाला जायचे होते फ्लोइएन डोंगरावर. तिथून संपूर्ण बर्गन शहराचा नजारा
अप्रतिम दिसतो. वर जाण्यासाठी तिथली प्रसिद्ध केबलकार, फ्लोइबानन
फ्युनिक्युलर घ्यायची होती. अतीशय तीव्र चढावरून समुद्रसपाटीपासून ३२० मीटर
वर घेऊन जाणारी ही सुविधा जुन्या तंत्रज्ञानाची कमाल मानली जाते. अवघ्या ५
मिनिटात आम्ही फ्लोइएन डोंगरमाथ्यावर गेलो.
वाटेत अजून एक अप्रूप पाहिले. एवढ्या तीव्र उतारावर घरांची गर्दी !
तिथपर्यंत जायला अगदी अरुंद रस्ते. खरोखरीच नॉर्वे मध्ये ओस्लो नंतर इथेच
एवढी दाट लोकवस्ती बघायला मिळाली.
वरून दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्याची चित्रेच बोलकी आहेत.
पावसाला सुरुवात झाल्याने लवकर खाली उतरावे लागले. जेवून हॉटेलवर परत
आलो. उद्याचा दिवस जास्त धावपळीचा आहे. लवकर झोपले पाहिजे. त्या आधी
बाजारातून आणलेले साहित्य वापरून चौघांनी पटापट सँडविचेस बनवून घेतली.
जवळची शिदोरी संपली होती नि उद्याच्या धावपळीत जेवण शोधायला वेळ मिळणार
नव्हता.
आता उद्या फ्लाम.
आजची
सकाळ निवांत होती. हॉटेलच्या अगदी शेजारी असलेल्या धक्क्यावरून आमची बोट
साडेनऊला निघणार होती. निवांत आवरले. काल सकाळी नॉर्वेजियन नाश्ता काय असतो
ते बघितले नव्हते. आज तासभर हातात होता. नाश्ताखोली गजबजून गेली होती.
टेबल खचाखच भरलेला होता. ५-६ प्रकारचे सीरियल्स, ताजी कापलेली ७ - ८
प्रकारची फळे, संत्री रस, दूध, फ्लेवर्ड दह्याचे प्रकार, ब्रेड चे ४
प्रकार. चीज आणि लोणी यांचेही प्रकार, बेक केलेले मश्रूम, बटाटे, टोमॅटो,
उकडलेल्या राजम्यासारखी कसलीतरी उसळ, चहा कॉफीचे प्रकार..... हे वेजिटेरियन
!!! नॉनवेज खाणार्यांसाठी यात अजून २५ प्रकारांची भर होती. सगळे प्रकार
खाऊन बघितले. काय जास्त चांगलं आहे कळेपर्यंत पोट भरले होते
"आता उद्या" असे ठरवून बोटीच्या धक्क्यावर पोहोचलो.
सव्वा नऊ झाले तरी तिथे अजून शुकशुकाट होता. पुन्हा एकदा आपण बरोबर जागेवर
आलोय नं असा प्रश्न पडला. तेवढ्यात एक अमेरिकन आणि दोन चिनी पोरी टपकल्या .
ह्म्म्म्म्म ! जागा बरोब्बर असल्याची खात्री पटली. कारण सर्वांचे फोटोसेशन
सुरू झाले होते. पाचेक मिनिटात बोटीचा भोंगा ऐकू आला. समोरच्या डोंगराला
वळसा घालून आमची बोट येत होती. त्या बोटीवर माणसांच्या आकृत्या फारच
चिमुकल्या दिसत होत्या. बोट जवळ आली. अबबबबबबब..... प्रचंड मोठे गावच जणू !
एकूण सात मजले. आणि एका गावात जे काही असू शकते ते सगळे बोटीवर होते. आत
गेल्यागेल्या एका बोटसुंदरीने आम्हाला हात धुवायला सांगितले. आधी कळालंच
नाही हा स्वागताचा कुठला प्रकार ते ! सगळे लोक दारात आले की, " हॅलो सर,
बोटीवर स्वागत. हात धुवून घ्या ! " थोडा वेळ गेल्यावर कळले. या भागात कोणती
तरी साथ चालू होती. त्याचा संसर्ग टळावा म्हणून ही खबरदारी. बोटीवर
प्रत्येक कोपर्यात पाण्याशिवाय हात स्वच्छ करण्याचा साबण ठेवलेला होता.
आम्ही ही जागा बरी, ती यापेक्षा बरी, नाहीतर इथे अजून छान असे करत करत
मांजरासारखे सामान आणि सगुणाची बाबागाडी फिरवत शेवटी एका ठिकाणी स्थिरावलो.
आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत या बोटीवर रहाणार होतो. सामानाजवळ कोणीतरी
थांबून आळीपाळीने सगळी बोट पालथी घातली. डेकवर थंडी वाजत होती. पण उन्हात
बरेही वाटत होते. सगळे फिरंगी सूर्यफुलासारखे सूर्याकडे तोंड करून
कसल्याश्या चिंतनात मग्न दिसत होते. बोट सुरू झाली. "बोट लागते " वगैरे काय
काय ऐकलं होतं. पण आता बोट पाण्यातून डुलत जात असतानाही पोटातलं पाणीही
हलात नव्हतं. इथून गायरांगर फियॉर्ड सुरू होते. गायरांगर गाव हे त्याचे
टोक. आम्ही तिथवर जाऊन परत याच गावात परत येणार होतो.
गायरांगर फियॉर्डचा हा भाग दोन भागात विभागला आहे. नोर्दाल आणि स्त्रांदा.
नोर्दाल मध्ये ५ खेडी आहेत. लोकसंख्या १७६० ! आणि स्त्रांदा च्या खेड्यांची
लोकसंख्या ४५०० ! अर्थात हे तिथले कायमस्वरूपी रहिवासी. उन्हाळ्यात या
भागात खूप गर्दी होत असते. त्यामुळे या चार महिन्यात पर्यटनाशी संबंधित
व्यवसाय तेजीत असतात.
गायरांगर फियॉर्डच्या या भागात झालेल्या उत्खननात १२००० वर्षांपासून मानवी
वस्तीच्या खुणा सापडल्या आहेत. निसर्गाच्या महान आश्चर्यांपैकी हे एक
आश्चर्य आहे. समुद्राने पर्वत रांगांवर आक्रमण करून १५ किमी लांब आणि ६००
मीटर खोल अशी भेग निर्माण केली आहे. त्या भागात मानवी वस्ती ! दोन्ही
बाजूंनी उंचच उंच डोंगर. पाण्यात मध्येच डोके वर काढणारे अजस्त्र सुळके.
डोंगरमाथ्यावर अजून न वितळलेले बर्फ, आणि वितळलेल्या बर्फाचे पाणी होऊन
धबाबा कोसळणारे जलप्रपात ! क्षणभरासाठीही पापणी मिटतानाही पुन्हा डोळे
उघडण्याची डोळ्याना घाई व्हायची.
या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत
एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे
नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर
निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट
समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी
म्हणजे साक्षात जीवनच.....! आजूबाजूच्या निसर्गाचा माणसाच्या मनोवृत्तीवर
फार खोल ठसा उमटत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच की काय, अधुन
मधून लहानश्या बेटावर व्यावहारिक दृष्टीने अत्यंत कष्टाचे जीवन जगणारी
माणसं मला निर्मळ,निरामय आणि आनंदी दिसत होती. या दरीखोर्यातल्या
एकांतवासात एखाद्या बेटावर उभे असलेले एकुलते सुंदर घर बघितले की मन
म्हणायचे, इथे येऊन राहण्यामागची प्रेरणा कोणती असेल ? आणि त्याच घरापुढे
फुललेल्या वेली, सजवलेले गोठे नि गायवासरं, हरणं बदकं बघताना आपोआप उत्तर
मिळायचं. आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत
जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या
अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच
टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल.
हो. अवतीभवती पाचसातशे लोकांचा गोंगाट असतानाही मन या अशा विचारत गढून गेलं होतं यातच तिथला निसर्ग कसा असेल ते समजा.
एकेका डोंगराला मोहक वळसा घालून बोट पुढे चालली होती. मधून मधून समोर
दिसणार्या काही विशेष स्थळांची माहिती स्पीकर वरून प्रसारित होत होती. एक
ठिकाण सांगताना गाईडने सांगितले की "या निर्मनुष्य बेटावर एक तरूण ७ वर्षे
एकटा राहिला होता. त्याच्यावर नंतर डॉक्युमेंटरीही तयार झाली. " दुसरे एक
ठिकाण दाखवून म्हणाला, " इथे एका तरूण कुमारी मातेला दगडांनी ठेचून
मारण्यात आलं आणि या कड्यावरून तिच्या प्रियकराला जलसमाधी देण्यात आली". या
अशा कथा समोरचे उदात्त दृश्य गढूळ करत होत्या. प्रत्येक ठिकाणी असा मसाला
काम करत नाही हेच खरे. मग ऐकणे सोडून दिले.
दुपार कधीच उलटून गेली होती. सकाळची न्याहारी पण जिरली. पोट भूक भूक म्हणू
लागले. मग निघालो अन्नाच्या शोधात. बोटीवरच्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी
मेनू म्हणून फक्त अॅस्पेरेगसचे सूप आणि ब्रेड होता. शेफला भाज्या घालून
स्पॅघेटी बनवण्याची विनंती केली. चवदार सूप नि वातड स्पॅघेटी गिळून पुन्हा
डेकवर बैठक जमवली. इतक्यात बोट गायरांगर फियॉर्डच्या शेवटच्या भागात
आल्याची सूचना प्रसारित झाली.
आमचा प्रवास आता अजून निमुळत्या भागातून होता. इथे धबधबे अजूनच जवळ दिसत
होते. एका धबधब्याचे नाव होते सेवन सिस्टर्स ! या सप्तभगिनींपैकी ३ जणी
'सरस्वती' असलेल्या दिसत होत्या. पण त्यामुळे सौंदर्य कणभरही कमी दिसत
नव्हते. हळुहळू गायरांगर गाव दिसू लागले. तीन बाजूंनी डोंगर कडे आणि मध्ये
बेचक्यात अळंबीसारखे फुललेले हे खेडे ! गावाच्या थेट डोक्यावर अजून एक मोठा
धबधबा. यांची संख्या मोजणे कधीच सोडून दिले होते. असंख्य जलमाळा दिमाखाने
मिरवत हे छोटेसे खेडे आपल्या डोंगरांच्या बाहूने सर्वांचे स्वागत करत होते.
दरवर्षी सुमारे सात लाख पर्यटक या भागाला भेट देतात. हे ठिकाण युनेस्कोच्या
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे . प्राचीन काळापासून हे पर्वत आणि हा
समुद्र हातात हात घालून माणसाला अभय देत इथे जीवन फुलवत आहेत.
आमची बोट गावाजवळ जाणार नव्हतीच. एखाद्या देवळासमोर क्षणभर उभे राहून
आतल्या मूर्तीची प्रार्थना करावी आणि पुन्हा मार्गस्थ व्हावे तसे बोटही
थोडावेळ त्या गावासमोर रेंगाळली आणि तिने आपला मोहरा बदलला. परत एकदा
समुद्रातून त्याच डोंगर कड्यांना प्रदक्षिणा घालत; त्या रौद्रसुंदर
निसर्गाच्या कुशीत स्वस्थपणे राहाणार्या लोकांचा हेवा करत परतीच्या वाटेवर
निघालो.
सकाळ पावसात उजाडली. आजच्या प्रवासाला ' मजल दरमजल ' हे एकच नाव शोभले असते. भुरभुर पावसात बर्गन ला टाटा केले नि रेल्वेने जाऊन पोहोचलो वॉस ला. दोन बाकडे नि एक कॅफे असलेले नि एक कॅफे असलेले हे स्टेशन. एका बाजूला तळे नि तळ्याशी लगट करत रांगणारा रस्ता मग उगाच खोडकरपणे वर डोकं काढणारी एक टेकडी नि त्यावर उतारावर सरळ उभे रहाताना होणारी त्रेधातिरपिट दिसू न देण्याचा प्रयत्न करत असलेली घरे ! आणि आमचे सोबती.. रेल्वेचे रूळ ! एक मस्त झोका घेत वळणावर नाहीसे होत जाणारे... ! अवघ्या पाऊण तासात अजून काय काय बघायचं माणसानं !
आता पुढचा टप्पा बसचा. हे पण डायवर मामा आज खुषीत दिसत होते. बस चटकन भरली नि निघालीसुद्धा. आता जायचंय गुडवांगनला. एक प्रवासी गट वाटेत एका रिसॉर्टला उतरणार होता. ते रिसॉर्ट आले नि तिथे उतरणार्या, राहाणार्या लोकांबद्दल अगदी तीव्र असूया मनात दाटून आली. हे ठिकाण आपल्याला का नाही सुचले म्हणून स्वत:वर चिडचिडही झाली. ती जागाच तशी होती. एका डोंगराच्या अगदी कड्यावर ते हॉटेल बांधलेले होते. चहू बाजूंनी डोंगररांगा, समोर खोलच खोल दरी, आणि यावर कडी म्हणून त्या दरीत कोसळणारा प्रचंड धबधबा !
तेवढ्यात आमच्या चालकरावांनी सांगितलं की म्हणे क्यामेरे तयार ठेवा. पण सीटबेल्ट बांधून जागेवरच बसून रहा. फोटो काढण्यासाठी उभे वगैरे राहू नका. नियम पाळण्याच्या बाबतीत आपण एकदम भारी. तस्सेच केले. बस थोड्या कच्च्या वाटणार्या रस्त्यावरून पक्क्या पण अगदी अरुंद रस्त्यावर आली. सगुणाचं एक खेळणं आहे. नागमोडी घसरगुंडी. त्याच्या डो़क्यावरून आपण कार किंवा बस सोडायची..दोन सेकंदात सुळ्कन खाली घसरत येते. हा रस्ता तस्सा होता ! आता आमची बस पण तशीच सुळ्कन खाली गेली नाही म्हणजे बरे ! आपल्या कर्नाटकातले ऊटी, कोडाई वगैरे रस्ते आधी अनुभवले होते म्हणून बरं. नाहीतर रामरक्षा कधीच सुरु झाली असती !
हेअरपिन का काय म्हणतात तशा वळणावरून बस तुरुतुरू चालली होती. शेजारी धबधबा दिसत होता. फोटो काढण्यासाठी कुणी हौशी उठला की चक्रधारी ( हो, आता या क्षणाला ते सारथी, चक्रधारी सगळे होते!) समोरच्या आरशातून एक मिश्किल कटाक्ष टाकायचे. आणि बहुतेक आरशातून आपल्याकडे बघण्याच्या नादात सर्वांना एकत्र मोक्ष मिळू नये या भितीनेच हौशी खाली बसायचा. दुसरे वळण आले की पुन्हा फोटोंची घाई व्हायची. चालकराव कथा सांगू लागले. हा पक्का रस्ता बनायच्या आधी म्हणे हिवाळ्यात बर्फ पडलेले असतानाही जिवाची बाजी लावून बस चालवावी लागायची. समोर दरीत एक छोटीशी वस्ती दिसत होती. आणि काही शेतंही !
आम्हाला त्या तिथे पोहोचायचे होते. अगदी काळजीपूर्वक सावकाश चालत बस पोहोचली. समोरचे दृश्य जादूई होते. उंच डोंगराच्या माथ्यावर ते आम्ही पाहिलेले रिसॉर्ट मुठीएवढे दिसत होते. आम्ही जिथे उतरलो तिथे केवळ एक बोटीचा धक्का होता. आणि एक पूल. सरोवराचा सर्वात चिंचोळा भाग हा. इथे मोठी जहाजे येऊच शकत नव्हती. एका छोट्या फेरीने आम्ही पुढ्चे साडेतीन चार तास प्रवास करून फ्लाम गावी पोहोचणार होतो.
हा प्रवास मला सर्वात जास्त आवडला. छोट्याश्या बोटीवर शंभर माणसं असतील. दोन्ही बजूला उत्तुंग पहाड आणि त्यावरची खेडी. मन वारंवार त्या भागात चिकाटीनं नि जिद्दीनं राहाणार्या लोकांना प्रणाम करत होतं. नॉर्वे सरकारला सलाम करत होतं. या गावांच्या अगदी जवळून आम्ही जात होतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या पाकळ्या समोर दिसत होत्या. एक त्यातल्यात्यात मोठं गाव लागलं. तिथे म्हणे आजुबाजूच्या वस्त्यांवर राहाणार्या मुलांसाठी १०० वर्षांपूर्वी शाळा सुरू झाली. एक गाव फक्त मृत लोकांचे ! म्हणजे आजूबाजूच्या गावातून अंत्यविधीसाठी तिथे जायचे. मध्येच एक सोनेरी पाकळी दिसली. अवघी ५ घरं असणार्या एका गावच्या (?) धक्क्याला आमची फेरीबोट उभी राहिली. खाली सायकलरिक्षासारख्या एका गाडीत पोस्टमन काका उभे होते. फेरीवरून एक पार्सल खाली फेकलं गेलं नि त्यांनी ते झेललं. हे सगळं समोरच्या घरातली सत्तरीच्या घरातली आजीबाई बघत होती. पोस्टमन काकांनी तिला तिथनच हात उंचावून बहुतेक पत्र दाखवले. म्हातारी अक्षरशः दिव्यासारखी हसली! तिने आत जाऊन एक चिमुकला रुमाल आणला नि आमच्या फेरीकडे बघत फडफडवला ! वाट बघणं आणि ती फळाला येणं एवढं सुंदर 'दिसू' शकतं ? तिचा आनंद त्या रुमालाने आमच्यापर्यंत किती सहज पोहोचवला..
इकडे फेरीमध्ये वेगळीच गंमत घडत होती. कॅफेमध्ये एकाने (बहुदा मालकाने),
आम्हाला भारतातून आलात का असे विचारले. म्हट्लं हो. मग म्हणे कुठून.
म्हटलं मुंबईजवळून. म्हणे पुणं माहीतय का ? आँ.. हो असे म्हटल्यावर म्हणे
वाई माहितंय ?? थक्क झालो आम्ही. हा बाबा कधीकाळी वाईमध्ये गरवारे मध्ये
काम करत होता म्हणे ! त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने आम्हाला उकळलेला चहा
दिला !
त्याला विचारले की फ्लाम चे रेल्वे स्टेशन बोटीच्या धक्क्यापासून किती दूर
आहे ? त्यावर काय बावळट लोक आहेत असा चेहरा करून तो म्हणाला," अरे बाबांनो
तुम्ही फ्लाम ला जाताय न्युयार्कला चालल्यासारखं काय विचारताय ? फ्लाम हे
गाव मुळी काही मीटर्स मध्ये मोजतात! "
फ्लाम आलं. एक अजस्त्र बोट तिथे उभी होती. त्यापेक्षा प्रत्यक्ष गाव
कितीतरी लहान होतं. इथे तास दीड तास वेळ होता. सगळीकडे हिरवाई, स्वच्छ
प्रकाश आणि निर्मळ पाणी दिसत होते.
आता पुढचा टप्पा रेल्वेचा. जगातल्या सर्वात सुंदर रेल्वेपैकी एका रेल्वेची आम्ही वाट बघत होतो. ही रेल्वे म्हण्जे नॉर्वेच्या इतिहासातलं एक अत्यंत कौशल्याचं आणि धाडसाचं पान. समुद्रसपाटीपासून २ मीटर वरून ही रेल्वे तासाभरात ८६६ मीटर वर असणार्या मिरडाल या गावी नेते. २० कि.मी. चा हा रेल्वेमार्ग बांधायला २० वर्षे कष्ट घ्यावे लागले. १९२० साली सुरू झालेले हे काम १९४० ला पूर्णत्वास गेले. १९४४ साली तेथे पहिली विजेवर चालणारी रेल्वे सुरू झाली तर १९४७ साली वाफेवरील इंजिनाची शेवटची रेल्वे धावली. २० लांबलचक बोगद्यांपैकी १८ बोगदे हे मजुरांनी हातांनी खणले. हे बोगदे सहा सहा कि. मीटर्स लांबीचे आहेत ! पैकी एक बोगदा डोंगरातच १८० अंशाच्या कोनात वळतो ! किती साहस नि किती कौशल्य पणाला लागले असेल हे बांधताना. या मार्गावरून जाताना "रारंगढांग" मनात येत होतं.

या मार्गावर नॉर्वेमध्ये इतरत्र न दिसणारी दुर्मिळ निसर्गदृष्य बघायला
मिळतात. या जंगली, भीषण आणि तितक्याच तजेलदार निसर्गाभोवती इथे उगाच
गूढतेचे वलय असल्याचे भासते. कदाचित "मिस्टेरियस" हा शब्द वारंवार गाईडच्या
तोंडी येत होता म्हणून असेल असे वाटले. आणि या फ्लामबानारेल्वेने अजून एक
अविस्मरणीय अनुभव दिला.
एका प्रचंड धबधब्यासमोर रेल्वे थांबली. सगळे प्रवासी फोटो काढायला खाली
उतरले. ही लगबग चालू असताना संपूर्ण आसमंत कसल्याश्या गोड संगीताने भारून
गेला. समोर धबधब्याची गाज, गर्दी असूनही संगीत वातावरणात भिनले.
धबधब्याच्या मध्येच एका कातळावर कुठूनशी एक रक्तवर्णी वस्त्र ल्यायलेली एक
सुंदरी प्रकट झाली ! त्या संगीतातले शब्द कळत नव्हते पण सुरांची भाषा मात्र
खूपच जवळची.. ती निश्चितच एखादी विराणी गात होती. मध्येच गायब व्हायची नि
खूप अंतरावरच्या एका दुसर्या कातळावर दिसायची. शुभ्र पाण्याच्या
पार्श्वभूमीवर ही केवळ आकृती दिसत होती. तिचे नृत्य तिची विरहगाथा सांगत
होते. काही काळ काळाची पावलं तिला बघण्यासाठी, तिची व्यथा ऐकण्यासाठी जणू
स्तब्ध झाली होती. कधीकाळच्या आणाभाकांना साक्षीदार असेल ते पाणी. आज मात्र
त्या विरहिणीच्या व्यथेतले पाणी त्या उदंड पाण्यापेक्षा जास्त ठळकपणे दिसत
होते.
समाधी भंगली ती रेल्वेने बोलावल्यामुळे. पुढचा टप्पा लवकरच संपला. रेल्वेने आम्हाला मिरडाल ला सोडले. आता शेवटचा टप्पा होता मिरडाल ते ओस्लो. हा संपूर्ण प्रवास डोंगरावरच्या पठारावरून होता. वाटेत ठिकठिकाणी हायकिंग, ट्रेकिंग साठी येणारे गिर्यारोहक दिसत होते. एक तर सायकलपटुंचा गट दिसत होता. लांबवर ग्लेशियर्स आणि तिथे पोहोचण्यासाठी निघालेले; संध्याकाळ झाली म्हणून तंबू टाकून तळ ठोकलेले लोकही दिसत होते. ठिकठिकाणी हॉलिडे होम्स च्या पाट्या दिसत होत्या.
एक अचानक लक्षात आलं; इथे आजूबाजूला पर्वतरांगा नव्हत्या. कारण आम्ही खुद्द त्या पर्वतांच्या डो़यावरून रेल्वेने प्रवास करत होतो !
रेल्वे आता खाली उतरू लागली. मन आणि शरीर दिवसभराच्या नव्या नव्या
अनुभवांनी शिणले होते. किती प्रवास झाला आज ! सकाळी आठ ते रात्री साडेदहा
आम्ही वाहानं बदलत बदलत प्रवासातच होतो. रेल्वे, मग बस, मग फेरी, मग पुन्हा
रेल्वे नि शेवटी अजून एक रेल्वे ! दिवसभर जाणवले नाही पण आता हा विचार
करतानाही दम लागत होता. बाहेर संधीप्रकाशात अजूनही निसर्ग नटलेला दिसत
होता. पण आता या क्षणी जगातले काही सुंदर बघायचे राहिले आहे असे वाटत
नव्हते.
ओस्लो ला साडेदहाला उतरलो. खायला शाकाहारी मध्ये केवळ कोरडे सॅंडविच
मिळाले. खाऊन पुन्हा तासभर रेल्वेने जाऊन विमानतळावर पोहोचलो.
आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे वेटिंग एरिया असणार असे गृहित धरले होते. पण
तसे इथे काहीच नव्हते. नाही म्हणायला सहा बेंचेस सापडले. आमचे विमान सकाळी
सहाला होते. आमच्यासारख्या लोकांनी आपली सोय शोधली होती. त्या आवारात
असणार्या रात्री बंद झालेल्या कॅफे मधील कोचावर जाऊन बसलो. रात्र सरली.
पाच वाजता चेक इन केले. आता मात्र विमानात गर्दी होती. विमान उडाले.
उंचावरून दिसणारे नॉर्वे पुन्हा एकदा डोळ्यात भरून घेतले. स्मृतीत कोरून
घेतले. डोंगराच्या कपारीत चार दिवसांसाठी मुक्कामाला राहिलेले पक्षी
घरट्याकडे परत जाताना त्या पर्वतांना काय बरं वाटत असेल ?
http://misalpav.com/node/42081
नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास
डोंगरवाटांचं सौंदर्य पाहायचं तर पायीच भटकायला हवं असं नाही. प्रवास ट्रेनचा असो, बस किंवा चारचाकीचा असो, घाटवाटा, धुकं, पाऊस, कोसळणारे धबधबे हे मोहवून टाकतातच!
उत्तर युरोपातील नॉर्वे या देशाचं नाव घेतलं की फ्योर्डस् (Fjords) आणि northern lights (aurora borealis) आठवतात. यातलं दुसरं आकर्षण पाहणं सोपं नसलं तरी फ्योर्डसचं संथ पाणी मात्र पर्यटकांचं स्वागत करायला असतंच. फक्त ऋतूनुरूप त्याच्या आजूबाजूचे पर्वत कधी बर्फ लेवून समाधिस्त दिसतात, तर कधी धबधब्यांचे तुषार उडवत असतात. नॉर्वेच्या या भागात प्रवास करणे हासुद्धा पर्यटनाचाच एक भाग आहे, असं वाचलं होतं. त्याचा प्रत्यय २०१४ साली नॉर्वेतील एका बसप्रवासात आला. पर्यटकांची गर्दी टाळून नॉर्वेच्या अंतर्भागात वाट वाकडी करून केलेल्या त्या प्रवासाने निसर्गाची इतकी अप्रतिम रुपं दाखवली की आजही नॉर्वे म्हटलं की तो प्रवास आठवतो.
प्रवासाला सुरूवात झाली Ålesund या पश्चिम किनार्यावरील शहरातून. गंतव्य होतं सुप्रसिद्ध Sognefjord च्या Lustrafjorden या शाखेवरील Nes हे चिमुकलं गाव. २६० किलोमीटरचा हा प्रवास बसने करायला सुमारे सात तास लागणार होते. एवढा वेळ लागायची कारणं होती कमी वेगमर्यादा असलेले काही रस्ते आणि फ्योर्डसमध्ये अनिवार्य असलेला जलप्रवास.
ऑलेसुंड (Ålesund) ते शाइ (Skei) साडेचार तास, नंतर Sogndal पर्यंत एक तास आणि शेवटी Sogndal ते Nes एक तास असा एकूण प्रवास होता. ऑलेसुंडहून सकाळी अकराला निघायचं होतं. पण सकाळपासून रूमच्या खिडकीतून दिसणारे ढग तिथेच होते.
बस सुटल्यावरही हवामान बदलायचं चिन्ह दिसत नव्हतं. तसाही शहरी भाग बघण्यात रस नव्हताच. थोड्या वेळाने फ्योर्ड ओलांडण्यासाठी पहिल्या फेरीत चढलो (म्हणजे प्रवाश्यांसकट अख्खी बस चढली) आणि कॅमेर्याला एकदाचं काम मिळालं.
२० मिनिटांचा फेरीचा प्रवास संपला आणि बस पुन्हा मार्गी लागल्यावर पाऊस सुरू झाला. फ्योर्डच्या दुसर्या शाखेतून येणारी फेरी फोटोत दिसत आहे.
आता रस्ता पाण्याच्या कडेने जात होता. वातावरण ढगाळ असलं तरी पलीकडच्या तीरावरचे डोंगर, कुठे पाण्याच्या काठावर असलेली टुमदार घरं सुरेखच दिसत होती. मे महिना असल्याने हिवाळा संपून थोडीफार हिरवळही होती.
फ्योर्डच्या तीरावर दिसलेले हे या प्रवासातील एकमेव शहर. पाचेक मिनिटांनी बस पुन्हा एका बोटीच्या धक्क्यावर आली तेव्हा लक्षात आलं आता तिकडेच जायचंय.
इथे थोडं या फेरींबद्दल लिहायलाच हवं. नॉर्वेच्या फ्योर्डसच्या भागात अनेक ठिकाणी फेरी बोटी या रस्त्याच्या जाळ्यात मोडतात. आमची बस ज्या E३९ या युरोपियन महामार्गावरून जात होती त्याच रस्त्याचा ही फेरी एक भाग होती. स्वतः गाडी चालवून नॉर्वेत फिरायचं असेल तर वाटेतल्या सगळ्या फेरींची वेळापत्रके पाळणं महत्त्वाचं ठरतं. कुठेतरी मस्त धबधबा वगैरे दिसला म्हणून थांबलो आणि फेरी गेल्यामुळे अडकलो असं होऊ शकतं. शिवाय फेरीचं शुल्कही द्यावं लागतं.
बसच्या वाहतुकीत फेरी अंतर्भूत असल्याने वेगळा आकार नसतो. फेरी चालवणार्या वेगवेगळ्या कंपन्या असतात. बस आणि फेरीची वेळापत्रकं integrated असल्याने आणि बसेस (मे महिन्यात तरी) वेळेवर धावत असल्याने अजिबात व्यत्यय न येता प्रवास सुरू राहतो. शाइला पोहोचेपर्यंत तीनदा फेरीने वेगवेगळे फ्योर्डस् ओलांडले. प्रत्येक फेरीच्या वेळी एकच दृश्य दिसले. सगळ्या खासगी गाड्या धक्क्यावर रांग लावून असत. बस आली की सरळ फेरीवर चढून दुसर्या टोकाला जाऊन थांबत असे. मग बाकीच्या गाड्या चढत. पलीकडच्या धक्क्यावर सगळ्यांत आधी बस बाहेर पडे. पण त्यामुळे उगाच आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळत्येय असं वाटायचं!
फेरीत बस चढली की चालकासकट सगळ्यांनाच पाय मोकळे करायला मिळत. भणाणणारा वारा खायला मिळे. अर्थात फेरीगणिक इतर खानपानाचीही सोय असते. त्यात मला विशेष आवडले Brunost हे कॅरेमलच्या चवीचं चीझ भरलेले पॅनकेक्स. एका फेरी कंपनीच्या बोटींवर खाल्ले त्या चवीचे पॅनकेक्स इतर कुठे मिळाले नाहीत.
फेरीनंतर E३९ हा महामार्ग सोडून बस FV६५१ या लहान रस्त्याने निघाली. E३९ फेरी न घेता लांबून वळसा घेऊन Nordfjordeid ला जातो. अर्थात रस्ता कोणताही असला तरी बाहेर दिसणारी निसर्गाची रूपं अप्रतिमच होती. डोंगरमाथ्यावर वितळणारं बर्फ खाली आणणार्या असंख्य जलधारा आणि कुठे मोठे धबधबे डोळ्यांना सुखावत होते.
Nordfjordeid ला बस थोडा वेळ थांबणार होती. मग थोडी झोप काढली. जाग आली तेव्हा बस पुन्हा महामार्गावरून धावत होती. बाहेरचं दृश्य पाहून झोप लागल्याची हळहळ वाटली.
पुन्हा एक छोटा जलप्रवास पार पडला. शाइला पोहोचायला सुमारे एक तास होता. खिडकीतून बाहेर बघण्यात मस्त वेळ जात होता.
शाइला उतरल्यावर बस पुढे निघून गेली. डोंगरांनी वेढलेलं सुंदर गाव होतं शाइ. वीसेक मिनिटांनी Sogndal ला जाणारी बस आली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. Jostedalsbreen राष्ट्रीय उद्यानाच्या जवळून रस्ता जात होता. Jostedal हिमनदी ही युरोपातील मोठ्या हिमनद्यांपैकी एक आहे. तिच्या आजूबाजूचा मोठा पर्वतीय भाग संरक्षित केलेला आहे. उन्हाळ्यात तिथे भटकायला नक्कीच आवडेल.
ढगांनी आणखी गर्दी केल्याने काळोख दाटला. त्यामुळे एकदाची कॅमेर्याला विश्रांती मिळाली. थोड्याच वेळात सोग्नला पोहोचलो. पण प्रवास अजून संपला नव्हता! तिथून तिसर्या बसने Lustra फ्योर्डच्या तीरावरील चिमुकल्या Nes ला एकदाच आणून सोडलं. फ्योर्डच्या बाजूने रस्ता आणि रस्त्यापलीकडे छान सजवलेलं गेस्ट हाऊस बघून सगळा शीण गेला. इथे पुढचे दोन दिवस आराम आणि जवळपास पायी निरुद्देश भटकायचं एवढाच बेत होता. पुस्तक वाचणं नाहीतर पाण्याच्या पलीकडे डोंगरातल्या प्रचंड धबधब्याचा आवाज ऐकणं, कुराणात बागडणारी कोकरं पाहणं यात मस्त वेळ गेला..
भटकताना या सुंदर रंगवलेल्या पोस्टाच्या पेट्या दिसल्या एकदा रस्त्याच्या कडेला.
तासनतास पाहत राहावं, एवढा प्रवास करून आल्याचं सार्थक वाटावं असं दृश्य खोलीच्या बाल्कनीतून दिसत होतं...
१. नॉर्वेच्या संपूर्ण पश्चिम किनार्याच्या बाजूने गल्फस्ट्रीम नावाचा विषुववृत्तापासून सुरू होणारा बारमाही गरम पाण्याचा प्रवाह वाहतो. त्यामुळे त्या देशाचा संपूर्ण किनारा व असंख्य बेटांच्यामध्ये असलेला समुद्राचा भाग हिवाळ्यातही द्रवरूप राहतो... बर्फाने झाकून जात नाही. त्यामुळे, नॉर्वेच्या किनारपट्टीवर बाराही महिने जलवाहतूक चालू असते...
(चित्र जालावरून साभार)
मात्र नॉर्वेचा किनारा संपताच गल्फस्ट्रीमचा प्रवाह कमजोर होतो आणि त्यापुढे सुरू होणारा बॅरेंट समुद्र व रशियाचा किनारा तिथल्या दीर्घ हिवाळ्यात इतक्या जाड बर्फाने गोठलेला असतो की त्याच्यावरून स्नोमोबिलने निर्धोक प्रवास करता येतो. फक्त जमिनीच्या बर्याच आत शिरलेल्या सामुद्रधुन्या व फ्योर्ड्स बर्फाच्छादित होतात. गंमत म्हणजे, यामुळे हिवाळ्यात नॉर्वेच्या अतीउत्तर किनार्याचे तापमान १२-१५०० किमी दक्षिणेला असलेल्या जमिनीने वेढलेल्या भागापेक्षा कधी कधी १०-१२ अंश सेल्सियने जास्त असते !
खालील भर थंडीच्या मोसमात काढलेल्या फोटोत, बर्फाच्छदित 'नोर्डकाप्' उर्फ 'युरोपचे सर्वात उत्तरेकडील भूशीर' आणि त्याच्या उत्तरेकडील द्रवरूप असलेला बॅरेंट समुद्र दिसत आहे...
२. नॉर्वेमध्ये मुख्य भूमी आणि त्याच्या हजारो बेटांच्या समुहाला जोडणारे ७५० किमी पेक्षा जास्त लांबीचे ९०० पेक्षा जास्त भुयारी मार्ग आहेत.
त्यातल्या एकमेकाला छेदून जाणार्या दोन भुयारीमार्गांनी तयार झालेला हा एक भुयारी चौक !...
३. याशिवाय, (अ) भर हिवाळ्यातल्या -१८ किंवा कमी तापमानात व मीटर-दोन मीटर उंच हिमवर्षावाने भरलेल्या विमानतळांवरून सुव्यस्थित चालणारी विमानव्यवस्था आणि (आ) त्याच अवस्थेतल्या रस्त्यांवरून वाहनवाहतूक चालू ठेवण्याची व्यवस्था, केवळ नॉर्वेजियन तंत्रज्ञ व प्रशासनच करू जाणे !
गल्फस्ट्रीमच्या नॉर्वेच्या हवामानावर होणार्या प्रभावाची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! नॉर्ड्कापचा फोटो मस्त आहे.
इथे फ्योर्ड्सविषयी थोडं लिहिल्यास अप्रस्तुत नसेल. फ्योर्डस हे तांत्रिकदृष्ट्या समुद्राचा भाग आहेत. (फ्योर्डसना धरल्यास नॉर्वेची किनारपट्टी साधारण ३० हजार किलोमीटर लांब आहे!) फ्योर्डसना नद्या, झरे, धबधबे असे गोड्या पाण्याचे स्त्रोत येऊन मिळतात. हे गोडं पाणी आणि समुद्राचं खारं पाणी एकमेकांत मिसळत असतं. पाण्याच्या तापमानातील फरक, गल्फ स्ट्रीम, मुखापासून अंतर, उन्हाळ्यात वाढलेलं गोडं पाणी अश्या घटकांमुळे फ्योर्ड्सच्या गोड्या आणि खार्या पाण्याचं प्रमाण बदलत असतं. उदाहरणार्थ साधारणतः हिवाळ्यात खारं पाणी फ्योर्ड्सच्या जास्त आत येतं, जे गल्फस्ट्रीममुळे कमी थंड असतं. त्यामुळे नॉर्वेतले फ्योर्ड्स सहसा गोठत नाहीत. बारमाही धबधबे, फ्योर्ड्ससदृष तळी मात्र गोठतात किंवा काही अंतर्भागातील फ्योर्ड (बहुतेक ओस्लो फ्योर्ड) गोठू शकतात.
पाण्याच्या प्रवाहाने जमीन झिजून डोंगरांच्यामध्ये बनलेल्या खोल भागाला दरी म्हणतात; तर हिमनद्यांच्या प्रवाहाने जमीन झिजून डोंगरांच्यामध्ये खोल बनलेल्या आणि सलग असलेल्या समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या भागाला फ्योर्ड म्हणतात. समुद्रापासून खूप अंतरापर्यंत भूभागात पसरलेल्या फ्योर्डमधले पाणी, त्यांच्याकडे सतत वाहणार्या हिमनदी/नदीच्या पाण्यामुळे, गोडे असू शकते.
खर्च कीती आला?
खर्च या बसप्रवासाचा सांगणे शक्य होईल. परंतु हा प्रवास पूर्ण सहलीतील एक छोटा टप्पा होता. अश्या सहलीचा खर्च किती दिवस कुठे जाणार, कुठे राहणार, काय पाहणार सारख्या अनेक गोष्टींप्रमाणे बदलत असल्याने खर्चाचा अंदाज देणे कठिण आहे.
कोणती साइट आहे का ही ट्रीप बूक करण्यासाठी तेही सांगा...
एकूण सहलीत Geiranger Fjord, Norway in a Nutshell सारखी आकर्षणंही समाविष्ट होती. बुकिंगसाठी कुठलीही साइट किंवा टूर वापरली नव्हती. सगळी माहिती जालावर शोधून (त्यासाठी TripAdvisor उत्तम), त्याप्रमाणे आराखडा ठरल्यावर हॉटेल्स, काही आवश्यक तिकिटं हे सगळं स्वतःच जालावर बुक केलं होतं. त्यासाठी अर्थातच खूप वेळ, आवड आणि चिकाटीही हवी.
तुम्हाला काही specific माहिती हवी असल्यास किंवा प्रश्न असल्यास अवश्य सांगा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
खरे तर बहुतान्श युरोप खण्ड हे जलाशयांसाठी व जलवाहतुक करण्यास योग्य अशा नद्यांसाठी नावाजलेले आहेच. त्यात हा देश म्हणजे तर कहरच ! आपण जर पुन्हा नॉर्वे ला जाणार असाल तर पिन्केर्टन ( असाच काहीसा उच्चार असलेले ) या ठिकाणास अवश्य भेट द्या. इथे ४०० फुटावरून खाली नदीत उड्या मारतात म्हणे.
Preikestolen (इंग्रजीत Pulpit Rock) म्हणायचं असावं तुम्हाला. सुंदर जागा आहे ती. वर जाण्यासाठी एक लहान पण खडा ट्रेक आहे.
हे ठिकाण आवडलं असेल तर Stavanger जवळच्या Trolltunga (ट्रोलची जीभ) चे फोटो नक्की पाहा. हवेत झेपावणारा हा कडा भारी आहे. इथे वर जायचा ट्रेक बराच मोठा आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.