Monday, October 26, 2020

सौदी

 

नुकतेच सौदी अरेबिया मधली नोकरी संपवून परतलो. या काळात अनुभवलेला तो देश माझ्या सवयीप्रमाणे प्रकाशचित्रांत बंदिस्त करून बरोबर आणला आहे. त्या चित्रांव्दारे मी साठवलेल्या आठवणींची तुमच्याबरोबर परत उजळणी करू म्हणतो. त्या देशात एकंदरीत कशी हालहवाल आहे आणि तो कसा दिसतो याबाबत बर्‍याच जणांना कुतूहल आहे असे जाणवल्याने ही लेखमाला लिहीत आहे. माझ्याबरोबर हा आठवणींचा प्रवास तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे.

ही लेखमालेचा रोख सौदी अरेबियाच्या भौगोलिक, राजकीय अथवा सामाजीक परिस्थितीवरची प्रतिनिधिक टिप्पणी असा नसून मी अनुभवलेला रोजच्या जीवनातला देश बरीचशी चित्रे आणि थोडेसे लिखाण वापरून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. चला तर करूया सुरू सौदी अरेबियाची सफर...

सौदी अरेबिया हा देश दोन कारणांमुळे जगात प्रसिद्ध आहे. पहिले कारण म्हणजे तो इस्लामचे उगमस्थान आहे आणि त्या धर्माची सर्वोच्च दोन स्थाने मक्का आणि मदिना तेथे आहेत. दुसरे म्हणजे तेथे असलेल्या जगातील सर्वात जास्त विक्रीयोग्य खनिज तेल साठ्यामुळे या देशाला जागतिक अर्थकारणात आणि त्यामुळे अर्थातच राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. खनिज तेलामुळे आलेल्या समृद्धीचा वापर करून अरबी आखातातल्या देशांचा विकास ७०च्या दशकापासून वेगात दौडू लागल्याने अर्थातच तेथिल सौदी अरेबियासह सर्व देशांत अनेक प्रकारच्या मनुष्यबळाची चणचण भासू लागली. या समस्येवर परकीय मनुष्यबळ आयात करणे हा उपाय अनेक समृद्ध देशांनी इतिहासात अनेकदा वापरलेला आहे. त्याची पुनरावृत्ती आखाती देशांनी केली नसती तरच नवल.

सौदी अरेबिया अरबी जगतातला आकारमानाने दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे (पहिला क्रमांक अल्जेरियाचा आहे). इतर अरब आखाती भागातील देशांच्या मानाने अवाढव्य असणार्‍या सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे. या देशाची लोकसंख्या २ कोटी ७० लाख आहे. यापैकी ६० लाखावर लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने तेथे कायम वास्तव्य असणारे परदेशी नागरिक आहेत.

 भारत आणि सौदी अरेबिया (जालावरून साभार)

अब्दुलअझिझ बिन अब्दुलरहमान अल् सौद (टोपणनाव इब्न सौद) या नावाच्या राजपुत्राने १९०२ साली अरबी व्दिपकल्पातिल राज्ये व टोळ्यांचे एकत्रीकरण सुरू केले आणि २३ सप्टेंबर १९३२ ला आधुनिक सौदी अरेबियाची ("ममलकत सौदीय आरबिय" उर्फ "किंगडम ऑफ सौदी अरेबिया") स्थापना केली आणि स्वतःला राजा असे घोषित केले. तेव्हापासून आजतागायत हा देश एक राजेशाही आहे.

 सौदी अरेबिया (जालावरून साभार)

वरच्या नकाश्यात देवनागरीमध्ये तांबड्या रंगात नावे लिहिलेली रियाध (राजधानी), जेद्दा आणि दम्माम-खोबार-दाहरान (हे पुणे-पिंपरी-चिंचवड सारखे एक तिळे शहर आहे) ही तीन लोकवस्तीची मोठी केंद्रे असून देशाच्या इतर भागांत बरीच विरळ लोकवस्ती आहे. या देशाचा फार मोठा भूभाग "रब अल् खाली" उर्फ रिकामा चौकोन किंवा Empty Quarter नावाच्या (वाळवंटांच्या चित्रात दाखवल्या जाणार्‍या वळ्यावळ्यांच्या सरकत्या वाळूच्या) वाळवंटाने व्यापलेला आहे. सौदी खनिज तेलाच्या साठ्यांपैकी ९०-९५ टक्के साठे एकट्या पूर्व विभागात (अश् शर्किया, इस्टर्न रिजन / प्रॉव्हिन्स) आहेत. दम्माम-खोबार-दाहरान हे या विभागातले मुख्य केंद्र आहे.

सौदी अरेबियाचे इ स २०१३ चे राष्ट्रीय उत्पन्न (GDP-PPP) अंदाजे $९२७ बिलियन आणि दरडोई उत्पन्न $३१,००० होते. तेथील ९५% अर्थव्यवस्था तेल उद्योगाशी संबंधीत असून त्याचा सरकारच्या वार्षिक उत्पन्नात ७०% हिस्सा आहे.

असो. देशाच्या इतक्या तोंडओळखीनंतर आपण क्षणचित्रांकडे वळूया...

किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम (KFSHD)

हे आमचे गेले काही वर्ष कर्मक्षेत्र होते. स्पेशियालिस्ट हॉस्पीटल म्हणजे केवळ पाच-सहा सुपरस्पेशियालिटीज निवडून त्यांच्या उपचार व संशोधनावर लक्ष केंद्रित करणारे रेफरल हॉस्पिटल. येथे देशाच्या नागरिकांनाही बाहेरील मोठ्या हॉस्पीटलच्या कन्सलटंटचे संदर्भपत्र (रेफरल लेटर) असल्याशिवाय उपचार घेता येत नाहीत.

 किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : दर्शनी भाग ०१

 किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : दर्शनी भाग ०२

 किंग फाहाद स्पेशियालिस्ट हॉस्पिटल - दम्माम : तातडीक सेवेच्या प्रवेशव्दाराचा भाग

 घराच्या व्हरांड्यातून दिसणारे हॉस्पिटलचे दृश्य

 प्रशासकीय संकुल ०१

 प्रशासकीय संकुल ०२

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०१

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०२

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०३

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०४

परदेशातल्या घरासमोरही आपली खाजगी बाग करण्याचा उत्साह काही मंडळी दाखवतात. याबाबतीत अर्थातच पाश्चिमात्य मंडळी पुढे असते. शहरात इतर ठिकाणीही शासकीय खर्चाने राहण्याची उत्तम सोय असली तरी चालत जाण्याच्या अंतरावरच्या असलेल्या हॉस्पिटलच्या आवरातील वसतिस्थानांना जास्त पसंती देणारेही असतातच.

 हॉस्पिटलच्या आवरातील निवासी संकुलाचा एक भाग ०५

डिसेंबरच्या थंडीतील एका प्रसन्न सकाळी कोवळ्या उन्हात संकुलाच्या हिरवळीवर या भावंडांनी चक्क पिकनिक साजरा केला !

 रोज संध्याकाळी आवारात धुडगूस घालणार्‍या अनेक गुंड टोळ्यांपैकी एक. कामावरून परतताना त्यांना रंगेहाथ कॅमेरात कैद केले :)

 मोसमाप्रमाणे रंग बदलणार्‍या फुलांनी भरलेला हा कामाला जाण्याच्या वाटेवरचा गोल रोज सकाळी माझे मन प्रसन्न करत असे

 हिवाळ्यातली एक सकाळ ०१

 हिवाळ्यातली एक सकाळ ०२

 एक संध्याकाळ

फुलेच फुले

नामांकित सरकारी इमारतींचे आवार नीटनेटके आणि सुंदर राखणे हे अभिमानाचे समजले जाते. त्यामुळे हॉस्पिटलच्या आवारातून फिरताना कॅमेरा वापरण्याचा मोह टाळणे अशक्य होते...

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०१ : बहरात आलेला कामाच्या वाटेवरचा माझा आवडता गोल

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०२

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०३

हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०४

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०५

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०६

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०७

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०८

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ०९

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले १०

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले ११

 हॉस्पिटलच्या आवारातली फुले १२

हॉस्पिटलच्या आवारातली फुले १३

आवारात इतकी फुले बघितल्यावर हॉस्पिटलच्या कॅन्टिनमधले खानसामेपण उत्साहाने त्यांचे खाद्यपुष्परचना कौशल्य दाखवल्याशिवाय कसे मागे राहतील?

 हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०१

 हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०२

हॉस्पिटलच्या कँटीनमधली खाद्यपदार्थांपासून बनवलेली फुले ०३

असो. पुढच्या भागापासून आपण बाहेर पडून भटकायला सुरुवात करूया.

क्रमशः 

दम्माम (ad-Dammām; الدمام‎) ही सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या पूर्व प्रांताची (अश् शर्किया उर्फ इस्टर्न प्रॉव्हिन्स)राजधानी आहे. ६७२,५२२ चौ किमी क्षेत्रफळाचा हा प्रांत खनिज तेलाच्या बाबतीत केवळ सौदी अरेबियातला अथवा अरबी आखातातलाच नव्हे तर जगातला सर्वात जास्त समृद्ध प्रदेश आहे. सौदी अरेबियाचे बहुतेक सर्व खनिज तेल या प्रांतातच आहे.

दम्मामचे नाव कसे पडले याबाबत दुमत आहे. काहींच्या मते मच्छीमारी करून परतणार्‍या होड्यांची सूचना देण्यासाठी वाजविल्या जाणार्‍या ढोलाच्या आवाजावरून (अरबीमध्ये त्या आवाजाला "दमदमा" असे म्हणतात) हे नाव पडले आहे. तर इतरांच्या मते या जागेशेजारी आखातात असणार्‍या पाण्याच्या भोवर्‍यामुळे (अरबीमध्ये "दव्वामा")हे नाव पडले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एक छोटीशी मासेमारी वस्ती असलेली ही जागा खनिज तेलाच्या शोधामुळे प्रचंड वेगाने एक मोठे विकसित नागरी केंद्र बनले आहे. या शहरात १५ मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळा, २४ विद्यापीठे / विद्यालये आहेत, ३० च्या वर रुग्णालये आहेत.

बृहद् दम्माम (ग्रेटर दम्माम / दम्माम मेट्रोपोलिटन एरिया) मध्ये दम्माम, अल खोबार आणि दाहरान या मुख्य तीन शहरांबरोबर आजूबाजूची काही लहान शहरे आणि गावेही समाविष्ट आहेत. बृहद् दम्मामची लोकसंख्या ४० ते ५० लाख आहे. तेलाच्या अर्थकारणामुळे हे शहर दरवर्षी १२% च्या वेगाने वाढत आहे. हा वाढीचा वेग सर्व अरबी जगतातील सर्वात मोठा वेग आहे.

किंग फाहाद कॉजवे हा जगप्रसिद्ध आखाती पूल सौदी अरेबियातील ग्रेटर दम्मामला बहरेन या देशाशी जोडतो. चार लेनचा हा पूल २५ किमी लांब आणि २३ मीटर रुंद आहे. उत्तम जलदगती रस्ता आणि विमान वाहतुकीबरोबरच दम्माम देशाच्या राजधानी रियाधशी रेल्वेनेही जोडलेले आहे. दम्मामचे किंग अब्दुल अझिझ बंदर अरबी आखातातले सर्वात मोठे आणि अरब जगतातले दोन क्रमांकाचे बंदर आहे (सौदी अरेबियाच्या पूर्व किनार्‍यावरच्या जेद्दा बंदराचा मध्यपूर्वेत आणि उत्तर आफ्रिकेत पहिला क्रमांक आहे).

खोबर हे शहर तुलनेने नवीन वस्ती आहे. तेथे अनेक उंच इमारती आहेत आणि नीटनेटके एकमेकाला काटकोनात छेदणारे रस्ते आहेत. दाहरान हे मुख्यतः "सौदी अराम्को" या सौदी तेल व्यवसाय सांभाळणार्‍या एकमेव सरकारी तेल कंपनीचे मुख्यालय आहे आणि ते जवळ जवळ सर्व शहर त्या कंपनीच्या आवाराने व्यापलेले आहे. सौदी अराम्को ही उलाढालीच्या प्रमाणात जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या विभागातला एकमेव विमानतळ दाहरानला तेल कंपनीच्या सोयीसाठी बांधला गेला होता. आता तो सर्वसामान्य वाहतुकीसाठी वापरात नाही.

दम्माम शहर आडवे पसरलेले आहे आणि तेथे मुख्यतः कमी उंचीच्या इमारती आहेत. मुख्य बाजारपेठ सोडली तर दम्मामचे बरेच विभाग खाजगी घरांच्या वस्त्या आहेत. त्यातली काही तर राजवाडे म्हणता येतील इतकी मोठी आहेत.

तर चला पडूया आवाराबाहेर आणि मारूया फेरफटका दम्माम परिसरात...

दम्माम शहर


बोटीच्या आकाराची इमारत असलेला एक मॉल


दम्मामचे रात्रीचे एक विहंगम दृश्य 

किंग फाहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

.दम्मामचा किंग फाहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रफळाच्या मानाने (७८० चौ किमी) जगातला सर्वात मोठा विमानतळ आहे. हे क्षेत्रफळ शेजारच्या बहरेन या देशाच्या एकूण क्षेत्रफळाइतके आहे ! इथल्या तीन मजली कार पार्कमधे जवळ जवळ ५,००० चारचाकी उभ्या राहू शकतात ! विमानतळ शहराबाहेर २५ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे सहा लेनच्या रस्त्याने जाताना सौदी वाळवंटाचे दर्शन होते...

विमानतळापासून साधारण आठ-दहा किलोमीटर वरूनच सर्व विमानतळावर लक्ष ठेवणारा ८५.५ मीटर (तीस मजली इमारतीएवढा) उंच नियंत्रण मनोरा दिसू लागतो. या मनोर्‍यावरच्या कार्यालयांचे एकूण क्षेत्रफळ ७,९६० चौ मीटर (८५,६८१ चौ फूट) आहे. विमानतळापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर पोचलो की त्याची वैशिष्ट्यपूर्ण इमारत नजरेच्या टप्प्यात येते. लांबून नीट अंदाज येत नाही पण जवळ आल्यावर तिची भव्यता जाणवू लागते...


विमानतळाचा दर्शनी भाग (जालावरून साभार)


विमानतळाच्या मुख्य इमारतीतले विशाल कारंजे (जालावरून साभार)

चेक-इनची गर्दी ओलांडून आत शिरलो की मग विमानतळाचा प्रत्येक विभाग प्रशस्त आहे. सुरुवातीच्या भागांत थोड्या कालापूर्वीच सुरू झालेल्या ड्यूटी-फ्री दुकानांची आणि छोट्या रेस्तराँची गर्दी लागते...

तेथून पुढे निघाल्यावर मात्र इमारतीच्या भव्यपणामुळे विमानतळ ओकाबोका वाटू लागतो ! विमानांत नेणार्‍या व्दारांकडे नेणारे मार्ग...

फुटबॉल खेळता येईल इतके मोठे पण मोजकीच गिर्‍हाईके असलेले पहिल्या मजल्यावरचे रेस्तराँ...

पारंपरिक अरबी रेस्तराँ

पाश्चात्त्य पद्धतींची हॉटेल्स आणि रेस्तराँ तर जगभर पहायला मिळतात. पण सौदी सांस्कृतिक मंत्रालयाने गौरवलेल्या एका खास पारंपरिक रेस्तराँची भेट विशेष होती. चला त्याची ओळख करून घेऊया. (अंधुक प्रकाशामुळे रेस्तराँच्या प्रकाशचित्रांची पातळी निकृष्ट आहे. क्षमस्व.)


रेस्तराँचा दर्शनी भाग

सर्वप्रथम दर्शनी भागातल्या एका खास विभागात जमिनीवरच्या पारंपरिक बैठकीवर बसून पारंपरिक पद्धतीने बनवलेली सौदी काहवा (अरबी कॉफी) देण्यात आली...

रेस्तराँच्या मुख्य बैठकीच्या भागांपैकी काही...


रेस्तराँमधली एक पारंपारिक पद्धतिने सजवलेल्या खिडकीची प्रतिकृती

सौदी परंपरेप्रमाणे जमिनीवरच्या बैठकीवर बसवून खास सौदी जेवण घेताना उत्तर अमेरिकेतून आलेल्या नामवंत पाहुण्यांची बर्‍यापैकी गडबड उडाली होती !

पुढच्या भागापासून आपण दम्माम शहरातून बाहेर पडून आजूबाजूला हिंडणार आहोत.

क्रमशः

 

महाकंपनी सौदी आराम्को (Saudi Aramco)

सौदी आराम्को या महाकंपनीचे सौदी अरेबियात आणि जगात इतके मोठे महत्त्व आहे की तिची ओळख करून घेतल्याशिवाय त्या देशाची ओळख अपुरी राहील. सौदी आराम्को (Saudi Arabian Oil Company) ही सौदी सरकारच्या आधिपत्याखालील खनिज तेल आणि वायूचे व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. सद्द्या या कंपनीच्या ताब्यात सबळ पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालेला २६० बिलियन बॅरल्स येवढा तेलसाठा आहे. फिनान्शियल टाईम्सच्या मूल्यमापनाप्रमाणे या कंपनीची किंमत US $ १०,०००,०००,०००,००० (दहा ट्रिलियन) म्हणजेच साधारणपणे भारतीय रुपयांत ६,००,००,००,००,००,००० (साठ लाख कोटी) आहे. अर्थातच तेलाच्या वाढणार्‍या भावाप्रमाणे ती वर अथवा खाली (बहुदा वरच) जाते. नवीन तेलसाठ्यांचा शोध लागल्यास अर्थातच तिची किंमत वर जाते. जगतील दुसर्‍या क्रमांकाची कंपनीची किंमत सौदी आराम्कोच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.

जगातले सर्वात मोठे असणार्‍या घवार आणि शायबा या दोन तेलसाठ्यांच्या जवळ असलेल्या दाहरान या शहराला या कंपनीच्या मुख्यालयाच्या जागेचा मान मिळाला आहे. आणि हा मान असा की जवळ जवळ सर्व दाहरान शहर या कंपनीच्या कार्यालयांनी आणि कर्मचार्‍यांच्या वसाहतींनी व्यापून गेले आहे.

या कंपनीचा इतिहास आणि त्याचा जगातील अर्थकारणावर आणि राजकारणावर पडलेला प्रभाव मोठा मनोरंजक आणि बोधकारक आहे. त्याची एक धावती उजळणी अशी आहे...

पहिल्या महायुद्धात झालेल्या मोठ्या प्रमाणावरच्या खनिज तेलाच्या (आणि त्यामुळे उर्जेच्या) तुटवड्याने युद्धात, उद्योगधंद्यांत आणि एकूणच अर्थकारणात खनिज तेलाचे अनन्यसाधारण महत्त्व जगापुढे आले. इ स १९२० च्या सान रेमो कराराप्रमाणे ब्रिटन आणि फ्रान्सला ऑटोमान साम्राज्यापासून स्वतंत्र झालेल्या (त्या वेळेस माहीत असलेल्या) तेलाने समृद्ध सिरीया व मेसोपोटेमिया (आताच्या इराकचा भाग) या देशांत शासकीय अधिकार (अड्मिनिस्ट्रेटिव्ह राइट्स) मिळाले. अर्थातच तेथे अमेरिकेचा प्रभाव नगण्य झाला. त्यामुळे अमेरिकेचा त्या वेळेचा वाणिज्य मंत्री हर्बर्ट हूवरने परदेशात तेलसंशोधन करून तेथून तेल आयात करण्यासाठी "खुला दरवाजा धोरण (Open Door policy)" जाहीर केले.

Standard Oil of California (SoCal) या कंपनीने या धोरणाचा उपयोग करून मध्यपूर्वेत तेल उद्योगधंद्यात शिरकाव करायला सुरुवात केली. SoCal ने १९२९ मध्ये Bahrain Petroleum Co. (BAPCO)च्या रूपाने पहिली उपकंपनी स्थापन केली. या कंपनीला बहारेनमध्ये १९३२ मध्ये तेलाचा शोध लागला. यामुळे मध्यपूर्वेतील तेलसाठ्यांकडे जगाचे लक्ष वेधले जाऊन तेथे तेलसंशोधनाला चालना मिळाली. २९ मे १९३२ रोजी सौदी सरकारने तेलसंशोधनाचे हक्क ब्रिटिश प्रभावाखालील Iraq Petroleum Co. ला डावलून SoCal ला दिले.

SoCal ला १९३६ पर्यंत सौदी अरेबियात तेल शोधण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे तिचे ५०% समभाग Texas Oil Co. (Texaco) विकावे लागले. चार वर्षांच्या असफल प्रयत्नांनंतर दाहरान जवळ सातव्या प्रयत्नात "दम्माम क्रमांक ७" या तेलविहिरिला यश मिळाले. मात्र ही विहीर इतकी लाभदायक ठरली की तिने त्वरित दर दिवशी १,५०० पिंपे तेल देण्यास सुरुवात केली ! अश्या तर्‍हेने अर्थकारणीय राजकारणाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली, जे अजून चालू आहे.

३१ जानेवारी १९४४ ला SoCal चे नाव बदलून Arabian American Oil Co. (Aramco, आराम्को) असे ठेवले गेले. या नवीन कंपनीत SoCal आणि Texaco बरोबर Esso आणि Mobil या दोन कंपन्याच्या पूर्वाश्रमीच्या अवतारांचाही सहभाग होता.

इ स १९५० मध्ये राजा अब्दुल अझिझ ने देशातील तेलसाठ्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याची धमकी देऊन आराम्कोच्या ५०% फायद्यावर हक्क मिळवला. या वेळेपर्यंत ही तेलकंपनी इतकी प्रबळ झाली होती की तिने या "फायद्यातल्या घाट्या"ला उपाय म्हणून सौदी सरकारला द्यायचा ५०% फायदा उत्पन्नकरातून वजा करण्याची तरतूद अमेरिकन सरकारकडून मंजूर करवून घेतली ! या प्रकाराला "सोनेरी युक्ती (golden gimmick)" असे नाव पडले आहे ! नंतर हा प्रकार कायदेशीर बनवण्यासाठी कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क येथून सौदी अरेबियातील दाहरान येथे हलवले गेले.

१९७३ मध्ये झालेल्या योम किप्पूर नावाने ओळखल्या जाण्यार्‍या अरब-इझ्रेली युद्धात अमेरिकेने इझ्रेलला मदत केल्याच्या कारणावरून दबाव आणून सौदी सरकारने आराम्कोचा २५% हिस्सा मिळवला. १९७४ मध्ये सौदी सरकारने त्याचा हिस्सा ६०% पर्यंत वाढवून आणि पुढे १९८० मध्ये १००% केला. त्यानंतर १९८८ मध्ये सौदी सरकारने या कंपनीवर पूर्ण व्यावसायिक ताबा मिळवून तिचे सौदी आराम्को (Saudi Aramco) असे नामकरण केले. पूर्ण सौदी मालकी असली तरी या कंपनीने पूर्वीच्या भागधारक कंपन्यांशी असलेले तेलसंशोधन आणि तेलव्यवस्थापनाचे करार मात्र अबाधित ठेवलेले आहेत.

या कंपनीच्या ताब्यात असलेल्या प्रचंड तेलसाठ्यांमुळे आणि विकाऊ तेलाच्या मोठ्या आकारमानामुळे तिचा जागतिक तेलव्यवसाय व तेलाच्या किमतीवर प्रबळ प्रभाव असणे आश्चर्यकारक नाही. आता ही कंपनी देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडली आहे. Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस २०१३ मध्ये जाहीर झाला आहे.

अश्या या जगातील सर्वात बलाढ्य कंपनीच्या प्रचंड आवारात शिरकाव करायला जवळ जवळ एखाद्या देशात प्रवेश करण्यासारखेच सोपस्कार करावे लागले तर आश्चर्य नाही. कंपनीचे व्यावसायीक निमंत्रण अथवा आतल्या एखाद्या महत्त्वाच्या रहिवाशाचे आमंत्रण असल्याशिवाय तेथे प्रवेश अशक्य आहे. शिवाय मुख्य व्दारावर पूर्ण चौकशी होऊन आणि रहिवाशाबरोबर दूरव्धनीवर संभाषण करून मगच आत प्रवेश मिळतो. आवार इतके मोठे आहे की विभाग, रस्ता आणि घर क्रमांक माहीत असले तरी रस्ता चुकण्याचे प्रमाण कमी नाही ! हे आवार एका प्रकारे "देशामध्ये देश (State within State)" आहे कारण इथे सौदी पोलिसांना मुक्त प्रवेश नाही आणि ही एकच जागा आहे की जिथे स्त्रिया (फक्त आवाराच्या आतच) चारचाकी चालवू शकतात.

दाहरानमधे असलेली अजून एक महत्त्वाची संस्था म्हणजे किंग फाहाद पेट्रोलियम आणि खनिजे विद्यापीठ (King Fahd University of Petroleum and Minerals, KFUPM). येथे मॅसेचुसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) च्या सहकार्याने नवअविष्कर्त्यांना आणि नवसंकल्पनाकारांना (inventors and designers) प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एक खास विभाग (incubator cell) आहे.

असो. इतकी माहिती घेतल्यावर आता सौदी आराम्कोच्या आवारातल्या तेल उद्योगावर आधारीत खास प्रदर्शनाची एक प्रकाशचित्रसफर करूया...

सौदी आराम्को प्रदर्शन

ज्या एकमेवाव्दितीय कंपनीने सौदी अरेबियाला जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात मानाचे स्थान मिळवून दिले तिच्या संबंद्धीच्या तिच्या स्वतःच्या कायमस्वरूपी प्रदर्शनाला भेट देण्याबद्दल खूपच उत्सुकता होती. हे प्रदर्शन कंपनीच्या आवारातच असल्याने तेथे मुक्त प्रवेश नाही. ते बघण्याची संधी आमच्या हॉस्पिटलाच्या क्रीडा व मनोरंजन विभागाने (रिक्रिएशन डिपार्टमेंट) एक सहल आयोजित करून दिली.

प्रदर्शनाच्या आवारात मुख्य प्रवेशव्दाराच्या समोर असलेला पृथ्वीचा गोल आपले स्वागत करतो. त्याच्या पलीकडे एका उंचवट्यावर खर्‍याखुर्‍या तेलवाहकांच्या व्हाल्वज् चे मानशिल्प आहे...


प्रवेशव्दारासमोरचे प्रांगण


प्रवेश्व्दार


स्वागतकक्षातून दिसलेली पहिली झलक

आत गेल्यावर आपल्याला एक मार्गदर्शक पत्रिका मिळते. तिच्यात प्रदर्शनाचा नकाशा आणि सर्व विभागांची तोंडओळख असते. या पत्रिकेमुळे कोणाच्याही मदतीशिवाय हे प्रदर्शन आपल्या मनाप्रमाणे फिरून बघता येते. इथेच आपल्याला आतापर्यंत ऐकलेल्या सौदी आराम्कोच्या व्यवस्थापकीय वेगळेपणाची खात्री पटू लागते.

.


भूस्तरांची मांडणी आणि त्यांत खनिज तेलाच्या खाणाखुणा


तेलाच्या विहिरीची किचकट मांडणी


समुद्रातल्या तेलविहीरीतले तेल तेलवाहू जहाजावर चढवण्यासाठीची यंत्रणा


तेलवाहू जहाजाची रचना


खनिज तेलापासून रॉकेल, पेट्रोल, डिझेल, इ भाग उर्ध्वपतनाने वेगळे करणारे मनोरे


खनिज तेलापासून तयार होणारी अनेक उत्पादने


समुद्रातल्या तेलविहिरीचा खूप काळाच्या वापरानंतर काढून टाकलेला, त्याच्यावर वाढलेल्या पाणजीवांसह, एका भाग

प्रदर्शनातील बहुतेक सर्व वस्तूंजवळ त्यांची अरबी व इंग्लिशमध्ये माहिती देणारे फलक आणि दृकश्राव्य व्यवस्था आहे. त्यामुळे मनातल्या बहुतेक सर्व शंका मार्गदर्शकाविना दूर होण्यास मदत होते आणि प्रत्येक भाग आपल्या आवडीप्रमाणे वेळ देउन बघता येतो. हे माहितीपूर्ण प्रदर्शन बघायला खूपच मजा येते. मला सर्वच विभाग आवडले पण सर्वात जास्त रोचक वाटलेला होता "खनिज तेल तयार होण्याची दशकरोडो वर्षांची प्रक्रिया, तिला हिमयुगांमुळे समुद्राच्या पाण्याच्या वरखाली होणार्‍या पातळीची मदत आणि आधुनिक तेलसंशोधन प्रणाली" दाखवणारा विभाग.

मरजान बेट

दम्माम शहराशेजारी अरबी आखातात मरजान नावाचे एक छोटेसे बेट आहे. सौदी आराम्कोने त्याचा विकास करून त्यावर एक मळसूत्राकार अथवा कुंडलाकार मनोरा व बाग बनविली आहे. हे बेट सार्वजनिक वापरास खुले आहे. बेटावर जाण्यासाठी मुख्यभूमीपासून एक अर्धवर्तुळाकार बंधारा बांधून त्याच्यावर चारचाकीने जाण्यासाठी रुंद रस्ता केलेला आहे. आठवड्याच्या सुट्टीत (शुक्रवार-शनिवारी), शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांत आणि विशेषतः ईदच्या सुट्ट्यांत हे बेट तेथे फिरायला जाणार्‍या लोकांनी फुलून जाते. चला तर मरजान बेटावर सहलीला...


दम्मामचा समुद्रकिनारा आणि मरजान बेट (मूळ नकाशा जालावरून साभार)


मरजान बेटाचे पहिले दर्शन


दुरून दिसणारा मनोरा आणि बागेचा एक भाग


चारचाकीच्या पार्किंगमधून दिसणारा मळसुत्राकार मनोरा


मळसुत्राकार मनोरा, जवळून


मनोर्‍यावरून होणारे बागेचे दर्शन


मनोर्‍यावरून होणारे बागेचे आणि एका पर्यटन बोटीचे दर्शन

बेटाच्या जवळ एक धक्का आहे तेथून पर्यटन बोटींनी बेट आणि दम्मामच्या समुद्रकिनार्‍याचे समुद्राच्या बाजूने दर्शन घेता येते. दम्मामचा जवळ जवळ १५-२० किमी लांबीचा समुद्रकिनारा हिरवळ, फुलझाडे आणि मुलांच्या खेळाच्या व्यवस्थांनी सजविलेला आहे. असे समुद्रकिनारे कॉर्निश या नावाने ओळखले जातात. समुद्रकिनार्‍यांंवर वसलेल्या अनेक शहरा-गावांना असे कॉर्निश आहेत. तेथे संध्याकाळी, विशेषतः हिवाळ्यात, फिरायला जाण्याची मजा लोक भरभरून घेतात. ईदच्या मोठ्या सुट्ट्यांत तर कॉर्निश लोकांच्या गर्दीने भरलेले असतात. काही लोक संध्याकाळचे जेवण तेथे आणून त्याचा कुटुंबासह हिरवळीवर बसून आस्वाद घेतात तर काही उत्साही मंडळी तेथे चक्क बार-ब-क्यु पार्टी करतात.

तर चला बोटीतून मरजान बेटाचा आणि दम्माम कॉर्निशचा नजारा बघायला...


बोटीतून दिसणारे मरजान बेट : ०१


बोटीतून दिसणारे मरजान बेट : ०२


बोटीतून दिसणारे दम्माम कॉर्निश

जसजसा सूर्य खाली येऊ लागतो तसतसा हा सर्व परिसर प्रथम धूसर प्रकाशात आणि नंतर दिव्यांच्या झगमगाटात नवनवीन रूप धारण करू लागतो...


मरजान बेटावरची संध्याकाळ : ०१


मरजान बेटावरची संध्याकाळ : ०२

.


मरजान बेटावरची संध्याकाळ : ०३


मरजान बेटावरची संध्याकाळ : ०४

पुढच्या भागापासून आपण बृह्द् दम्मामच्या बाहेर पडून सौदी अरेबियातील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देणार आहोत.

क्रमशः

 दम्मामच्या आजूबाजूस एखाद्या दिवसाची सफर करण्याजोगी जी ठिकाणे आहेत त्यात जी तीन मुख्य आहेत ती अशी: अल् हफूफ, अल् कतीफ व अल् जुबेल. त्यांची स्थाने खालच्या नकाश्यात दाखवली आहेत...


पूर्व प्रांतातील दम्मामजवळची प्रेक्षणीय स्थळे (मूळ नकाशा जालावरून साभार)

अल् अहसा

पूर्व प्रांताचा मोठा हिस्सा अल् अहसा या विभागाने (गव्हर्नरेट) व्यापला आहे. स्थानिक बोलीभाषेत याच्या नावाचा उच्चार बहुदा "हास्सा" असाच करतात. हास्सा म्हणजे अरबीमध्ये वाहत्या पाण्याचा आवाज. या भागात मुबलक पाणी आहे आणि हे जगातले सर्वात मोठे मरुवन आहे. येथे असलेल्या खजुरांच्या झाडांची संख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे. काही लिखाणांत ती संख्या २० लाख इतकी मोठी असल्याचेही नोंदलेले आहे. पण सौदी अरेबियाचे इतर वाळवंटी प्रदेश पाहता दहा लाख झाडे हीसुद्धा फार आश्चर्यकारक वाटावी इतकी मोठी संख्या आहे. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि पाण्याच्या मुबलकतेमुळे हास्सा प्राचीन व्यापार आणि दळणवळणाच्या मार्गांवरील एक महत्त्वाचे ठाणे होते. आताही दोन विद्यापीठे, शेतकी संशोधन संस्था आणि उद्योगधंदे यामुळे ते सौदी अरेबियातला एक महत्त्वाचा प्रभाग आहे. अल् हफूफ हे या प्रभागातील मुख्य शहर आहे.

अल् अहसा विभागाला जुन्या काळी अल् बहरेन असे म्हणत आणि आधुनिक सौदी अरेबियाच्या पूर्व किनार्‍याचा भाग आणि अवल बेटे (आधुनिक बहरेन देश) त्यात सामील होते. इ स ८९९ मध्ये अबू ताहीर नावाच्या कॉर्मेशियन सरदाराने हा भाग बगदादच्या अब्बासिद खलिफतीपासून स्वतंत्र केला आणि हफूफ शेजारी आपली राजधानी स्थापली. सत्तर ऐंशी वर्षांच्या स्थैर्यानंतर येथे खूप राजकीय उलथापालथी झाल्या. प्रथम आयुनिद, नंतर उसफुरीद असे करत जाब्रीद घराण्याची सत्ता तेथे स्थिरावली होती.

इ स १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी अवल बेटे (आधुनिक बहरेन) जिंकून घेतली आणि जाब्रीद घराण्याला उतरती कळा आली. त्यातच त्या काळात ऑटोमन साम्राज्य आणि त्याला सहकार्य करणार्‍या स्थानिक जमातींनी हल्ले करायला सुरुवात केली. अखेर १५५० मध्ये अल् अहसा ऑटोमन साम्राज्याचे मांडलिक संस्थान झाले. साधारण शतकभराच्या स्थैर्यानंतर परत एकदा या विभागाचा ताबा बदलत राहिला. इ स १६७० मध्ये बानू खालिद जमातीच्या सरदारांनी अल् अहसा ऑटोमन साम्राज्यापासून स्वतंत्र केले. १७९५ मध्ये अल् अहसा आणि त्या भागातले अल् कतीफ हे भाग पहिल्या सौदी वहाबी राज्यात सामील केले गेले. १८१८ मध्ये ऑटोमन साम्राज्याने हा भाग परत जिंकून घेतला. पण १८३० मध्ये दुसर्‍या सौदी राज्याने ते परत आपल्या आधिपत्याखाली आणले. नंतर १८७१ मध्ये हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात गेला तो १९१३ मध्ये इब्न सौदने आधुनिक सौदी अरेबियाच्या स्थापनेच्या कारवाईत परत जिंकून घेईपर्यंत.

या त्रोटक इतिहासावरून या भागाचे किती महत्त्व होते हे ध्यानात येते. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील मुबलक पाणी आणि त्यामुळे असलेली शेती व उद्योगधंदे. हा भाग भातशेतीसाठी प्रसिद्ध होता. अल् हफूफ लोकर, रेशीम आणि कापसाच्या व्यापाराचे केंद्रही होते.

अल् हफूफ

हफूफ हे हास्सा प्रभागातील १२ लाख वस्तीचे मुख्य शहर आहे. हे सौदी अरेबियातील एक सांस्कृतिक केंद्र समजले जाते. येथील विद्यापीठात इतर विषयांबरोबर शेती, प्राणीवैद्यकशास्त्र (veterinary medicine) आणि प्राणी संपत्ती (animal resources) व्यवस्थापन शिकवले जाते. याशिवाय येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि गृहवित्त महाविद्यालये आहेत. या विभागाला पर्यटन आकर्षण बनविण्यासाठी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाचे प्रयत्न चालू आहेत.

दंतकथांतही या शहराला महत्त्वाचे स्थान आहे. लैला-मजनू या प्रेमी युगुलांचे दफन याच जागी झाले असे म्हणतात. तसेच येमेनच्या प्रसिद्ध शिबा राणीनेही या शहराला भेट दिली होती असे म्हणतात.

चला तर अश्या या अनेक ऐतिहासिक आणि आधुनिक पैलू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या मरुवनाच्या सफरीला...

दम्मामपासून साधारण १३० किमी दूर असलेल्या या ठिकाणी चारचाकीने (तुमच्या गाडीच्या वेगाप्रमाणे) सव्वा ते दोन तास लागतात. हाफूफ जसे जवळ येऊ लागते तसे रुक्ष वाळवंट संपून डोळ्याला थंडाई देणारी हिरवळ दिसायला सुरुवात होते...


हाफूफमधल्या मरुवनाचे प्रथम दर्शन

आणि सौदी अरेबियात दुर्मिळ असणारे पाण्याचे ओहोळ पण दिसायला लागतात...


वाळवंटातला पाण्याचा पाट


खजुराच्या झाडांमधिल शेती आणि भाजीपाल्याची लागवड

मधून पाण्याचा पाट, त्याच्या दोन्ही बाजूंनी मातीचे रस्ते आणि त्याच्या बाजूला शेती, बागा व फार्म हाउसेस अशी या सर्व मरुवनामध्ये रचना आहे...


पाण्याचा पाट, त्याच्या बाजूचे रस्ते व बागा

अशाच एका पाटाच्या बाजूच्या रस्त्यावरून आमची गाडी मरुवनात शिरली...

बागेत शिरल्यावर आपण सौदी अरेबियात आहोत हे विसरवून टाकणारी हिरवाई समोर आली. सर्वत्र असणारी खजुरांची झाडे ती काय सौदी अरेबियाची आठवण करून देत होती...


हफूफमधले फार्महाउस : ०१


हफूफमधले फार्महाउस : ०२


हफूफमधले फार्महाउस : ०३


हफूफमधले फार्महाउस : ०४

खुर्च्या सोडून सर्वप्रथम पारंपरिक बैठकीबर आरामात रेलून बसत काहवा (अरबी कॉफी) चा आस्वाद घेतला...


हफूफमधले फार्महाउस : ०५


हफूफमधले फार्महाउस : ०६

नंतर बागेत थोडा फेरफटका मारून आणि जेवण करून हाफूफमधील एक खास आकर्षण पाहायला बाहेर पडलो...

गारा (कारा) डोंगर

हाफूफच्या जवळ एक गारा / कारा नावाचा वालुकाश्मांचा डोंगर आहे. हजारो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेने त्याची झीज होऊन बाहेर वालुकाश्मांचे उंच खांब आणि डोंगराच्या पोटात मोठमोठ्या गुहा तयार झाल्या आहेत. त्यांच्या उंचीमुळे या गुहांमधली हवा उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम असते. हा निसर्गाचा चमत्कार पाहायला अनेक पर्यटक इथे येत असतात.


गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०१


गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०२


गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०३


गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०४


गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०५

चित्रविचित्र आकाराचे वालुकाश्माचे खांब पाहत पाहत आपण डोंगराच्या जवळ आल्यावर त्याच्या पोटातल्या गुहांची व्दारे दिसू लागतात. डोंगरांच्या माथ्यापासून पायापर्यंत झीज झाल्यामुळे या गुहांची उंची खूप मोठी आहे. काही ठिकाणी तर या गुहांचे छप्परही झिजून त्या उघड्या पडल्या आहेत आणि त्यांना उंच कड्यांमधल्या चिंचोळ्या दर्‍यांचे रूप आले आहे. काही गुहा डोंगराच्या पोटात १०० ते १५० मीटरपर्यंत खोल आहेत.


गारा डोंगरामधली गुहा : ०१


गारा डोंगरामधली गुहा : ०२


गारा डोंगरामधली गुहा : ०३


गारा डोंगरामधली गुहा : ०४

नंतर आमच्यापैकी काहींनी गिर्यारोहण करून गाराचा माथा गाठला. डोंगरमाथ्यावरून दिसणारे आसमंताचे विहंगम दर्शन भान विसरवणारे होते...


गारा डोंगरमाथ्यावरून दिसणारा परिसर आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०१


गारा डोंगरमाथ्यावरून दिसणारा परिसर आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०२


गारा डोंगरमाथा आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०३

तो नजारा पाहत राहावा असाच होता. पण मार्गदर्शकाने वेळेची जाणीव देत अजून दोन ठिकाणे पाहायची आहेत याची आठवण देत आम्हाला डोंगर उतरणे भाग पाडले.

स्थानिक कला

हाफूफमध्ये मातीच्या वस्तू आणि खजुराच्या पानांपासून वस्तू बनवण्याचा उद्योगधंदा प्राचीन काळापासून चालत आला आहे. मात्र आता जगभरच्या मालाने सौदी बाजारपेठ काबीज केल्यामुळे या कला एक सांस्कृतिक ठेवा आणि पर्यटन आकर्षण म्हणून जतन केल्या जात आहेत. आमचा पुढचा थांबा एका स्थानिक कारागिराच्या कार्यशाळेचा होता...


मातीच्या वस्तू बनवणारा एक स्थानिक कलाकार


मातीच्या वस्तू : ०१


मातीच्या वस्तू : ०२


मातीच्या वस्तू : ०३


खजुराच्या झावळ्यांपासून बनवलेल्या रोजच्या वापरातल्या वस्तू

इब्राहिमाचा राजवाडा

हाफूफमध्ये इब्राहिमाचा राजवाडा नावाची एक गढी आहे. ही गढी ऑटोमनपूर्व काळातली आहे आणि ऑटोमन पर्वात ती या प्रांतामधल्या सैन्यदळाच्या मुख्य छावणीचे ठिकाण होते. जीर्णोद्धार करून तिला आता एक पर्यटक आकर्षणाचे स्वरूप दिले गेले आहे.


इब्राहिमाचा राजवाडा : पूर्वरूप (जालावरून साभार)


इब्राहिमाचा राजवाडा : जिर्णोद्धारानंतरचे बाह्यरूप

तेथे असलेल्या स्थानिक मार्गदर्शकाने आम्हाला मोठ्या आत्मीयतेने सर्व गढी फिरवून माहिती दिली. नंतर गढीसंबंद्धी एक माहिती चलत्चित्रपट दाखवून आम्हाला गढीच्या आवारात मोकळे फिरायला सोडले. ही तिची काढलेली काही प्रकाशचित्रे...


इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०१


इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०२


इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०३


इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०४ : सेनापतीचे निवासस्थान


इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०५

हे सगळे होईपर्यंत रात्र झाली होती. दिवसभराच्या धावपळीने सगळेजण थकलेही होते. गाडीच्या वातानुकूलित वातावरणात आरामदायक खुर्च्यांवर बसल्यावर जरा हायसे वाटले. हफूफच्या रात्रीच्या गर्दीतून वाट काढत आमची गाडी दम्मामच्या दिशेने धावू लागली...

पुढची सफरीत आपण अल् कतीफ नावाच्या दुसर्‍या एका वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधरंगी मरुवनात जाणार आहोत.

क्रमशः

 अल् कतीफ

अल् कतीफ हे पूर्व प्रांतातले अजून एक मोठे मरुवन आहे. कतीफ नावाच्या शहरासह आजूबाजूची छोटी शहरे आणि गावे मिळून कतीफ प्रभाग (गव्हर्नरेट) बनला आहे.

कतीफ पूर्व अरबस्तानातील एक फार जुनी वसाहत आहे. इथे सापडलेल्या प्राचीन अवशेषांवरून तिचा इतिहास अगदी इ स पूर्वी ३५०० वर्षांपर्यंत मागे जातो. पूर्वी या जागेचे नाव "खत्त" असे होते. येथील कारागीर उत्तम भाले बनवण्यात वाकबगार होते. या जागेच्या नावावरून त्यांच्या भाल्यांना "खत्ती" असे ब्रँडनेम होते. इथल्या पारंपरिक कथा-कवितांमध्ये या खत्ती भाल्यांचा उल्लेख आहे. इथल्या काही जमातींचे आडनाव (फॅमिली नेम) खत्ती असे आहे.

प्राचीन काळात कतीफ हे अरबी आखातातले महत्त्वाचे शहर आणि बंदर होते. ग्रीक त्याचा उल्लेख कॅटिअस (Cateus) असा करत. काही जुन्या युरोपियन नकाश्यात अरबी आखाताचे नाव कतीफचा समुद्र (Sea of El Catif or Katif) असे लिहिलेले आहे. यावरून त्या काळातले कतीफचे महत्व अधोरेखीत होते.

कतीफ प्राचीन अल् बहरेन या सौदी अरेबियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांताचा भाग होता. त्यामुळे त्याचा इतिहास आपण मागच्या भागात अल् अहसाच्या इतिहासाबरोबर पाहिला आहेच.

कतीफ हे एक मोठे मरुवन असल्याने, अर्थातच, येथे मोठ्या प्रमाणात खजुराची झाडे आणि हिरवळ आहे. पूर्वी येथे व्यापार, शेती आणि मासेमारी हे मुख्य उद्योगधंदे होते. मात्र जुबेल या तेल उद्योगासाठी खास वसवलेल्या आधुनीक शहराच्या जवळ असल्याने आता तेथील लोक मोठ्या प्रमाणात तेल उद्योग, सरकारी नोकरी, शिक्षणसंस्था आणि आरोग्यसेवा या व्यवसायांत काम करतात.

कतीफला या ना त्या निमित्ताने चार पाच फेर्‍या झाल्या आणि या मरूवनाची अनेक वैशिष्ट्ये बघायला मिळाली. चला त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी एक एक करत बघूया...

आठवड्याचा बाजार

कतीफला दर गुरुवारी आठवड्याचा बाजार भरतो. आजूबाजूच्या गावांतूनच नव्हे तर दम्माम-खोबार-दाहरान मधूनही लोक तेथे जातात. स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी जाणार्‍या लोकांबरोबरच त्या गर्दीत आमच्यासारखे बाजाराची मजा बघायला जाणारे पर्यटकही असतात. चला तर या बाजाराची वैशिष्ट्ये त्यात फेरफटका मारत बघूया...

आठवड्याचा बाजार म्हटले म्हणजे भाजीपाला, फळे हे नेहमीचेच आहे. यात कतीफ आणि आजूबाजूच्या भागांत तयार होणार्‍या भाजीपाल्याबरोबरच परदेशातून आयात केलेला भाजीपाला आणि फळेही असतात...


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०१


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०२


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०३

कतीफच्या आठवड्याच्या बाजाराचे खास वैशिष्ट्य मात्र तेथला पक्षी आणि प्राणी बाजार आहे. सगळ्या सौदी अरेबियात तरी असा बाजार इतर ठिकाणी नाही...


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०४


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०५


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०६


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०७


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०८


कतीफचा आठवड्याचा बाजार : ०९


कतीफचा आठवड्याचा बाजार : १०


कतीफचा आठवड्याचा बाजार : ११


कतीफचा आठवड्याचा बाजार : १२

अर्थात या सर्व गोष्टींबरोबर आठवड्याचा बाजार जुन्या बाजाराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही म्हणा...


कतीफचा आठवड्याचा बाजार : १३

मासळी बाजार

कतीफ त्याच्या मासळीबाजारासाठीही प्रसिद्ध आहे. येथील कोळी आजही पारंपरिक डोव्ह (मध्यम आकाराच्या मासेमारी बोटी) वापरून मासेमारी करतात व ते मासे घेऊन रोज पहाटे परततात. पहाटे ४ ते ६ या काळात कतीफ मधल्या एका राखीव जागेवर त्या माश्यांचा लिलाव होतो. हा लिलाव येथे गेल्या १५० वर्षांपासून भरतो आहे. मासेमारी व्यवसायात येथील ४,५०० लोक काम करतात आणि दररोज १००० ते १२०० टन मासे विकले जातात. या बाजाराची दरवर्षीची उलाढाल साधारण US$ १० कोटीची ( साधारणपणे रु ६०० कोटी) आहे. या लिलावातले मासे केवळ सौदी अरेबियातच नव्हे तर सर्व आखाती देशात जातात. सद्याची जागा कमी पडत असल्याने लवकरच या लिलावाची जागा किनार्‍याजवळ US$ २० लाख खर्चून बनविलेल्या एका कृत्रिम बेटावरच्या १,१०,६०० चौ मीटर आकाराच्या खास संकुलात हलविण्यात येणार आहे.

आठवड्याच्या सुट्टीच्या आणि इतर सुट्टीच्या दिवसांना स्वस्त दरात ताजे मासे खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतल्या नोकरदार लोकांची आणि पर्यट्कांची येथे झुंबड उडालेली असते...


कतीफचा मासळी बाजार : ०१ (जालावरून साभार)

कमी धाडसी किंवा सकाळी उशीरा उठणार्‍यांसाठी एका बाजूला भारतीय मासळीबाजाराप्रमाणे दिसणारी व्यवस्थाही आहे...


कतीफचा मासळी बाजार : ०२

कतीफ शहराचा फेरफटका

कतीफ प्राचीन काळापासून अरबी आखातातले महत्त्वाचे बंदर राहिले आहे. या बंदरात एका वेळेस ५०० पारंपरिक बोटी (डोव्ह) उभा राहू शकतात. यातल्या बहुतेक पारंपरिक बोटी कतीफ येथेच बांधल्या जातात. कतीफच्या समुद्रकिनार्‍यावर ३५,००० चौ मीटरवर हिरवळ आणि मुलांना खेळायची व्यवस्था केली आहे (कतीफ कॉर्निश)...


कतीफचा फेरफटका : ०१ : कतीफ कॉर्निश

शहरातल्या सर्व मोठ्या रास्त्यांना खजूराची झाडे, इतर प्रकारची झाडे झुडूपे आणि फुलझाडांनी शोभिवंत केले आहे...


कतीफचा फेरफटका : ०२


कतीफचा फेरफटका : ०३


कतीफचा फेरफटका : ०४


कतीफचा फेरफटका : ०५


कतीफचा फेरफटका : ०६


कतीफचा फेरफटका : ०७ : कतीफ सिटी मॉल

शहराच्या एका भागात एक जुनी गढी संरक्षीत करून ठेवली आहे. तिचे आताचे रूप काही दशके जुने असले तरी तेथे सापडलेल्या उत्खननात तेथे ३,५०० वर्षापूर्वीपासून वस्ती असण्याचे पुरावे सापडले असल्याचे समजते...


कतीफचा फेरफटका : ०७

आता सौदी अरेबियाबद्दलच्या सर्वसाधारण कल्पनेला छोटासा धक्का ! येथे एक खाजगी स्पोर्ट्स एरीना आहे. त्यात बोलिंग अ‍ॅली, टेबल टेनिस, इ बरेच खेळ खेळण्याची व्यवस्था आहे...


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०१


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०२


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०३


कतीफ मधली स्पोर्ट्स एरीना : ०४

कतीफ फेस्टिवल

कतीफ प्रभाग दरवर्षी "कतीफ फेस्टिवल" साजरी करतो. या समारंभात फक्त पेहराव वगळता भारतातील एखाद्या जत्रेचे वातावरण असते...


कतीफ फेस्टिवल : ०१ (जालावरून साभार)


कतीफ फेस्टिवल : ०२ (जालावरून साभार)


कतीफ फेस्टिवल : ०३


कतीफ फेस्टिवल : ०४


कतीफ फेस्टिवल : ०५

या समारंभाचे एक खास आकर्षण म्हणजे इथल्या दुचाकी-चारचाकीच्या संग्राहकांनी जमवलेल्या गाड्यांचे प्रदर्शन. इथले विशेष म्हणजे या भागात एकही संरक्षक दिसला नाही आणि प्रेक्षकांना हात लावून, बसून गाड्या पाहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते !...


कतीफ फेस्टिवल : ०६


कतीफ फेस्टिवल : ०७

जत्रा म्हटली म्हणजे खाण्यापिण्याच्या आणि आकर्षक वस्तूंच्या दुकानांची गर्दी आलीच. त्यापैकी काही...


कतीफ फेस्टिवल : ०८ : भेटवस्तूंचे दुकान


कतीफ फेस्टिवल : ०९ : कपड्यांचे दुकान


कतीफ फेस्टिवल : १० : मसाल्यांचे दुकान

कतीफच्या जत्रेत मला सापडलेली पाकिस्तानातून आलेली एक खास लाकडी कलाकुसरीची वस्तू...


ही पूर्ण बंद असताना केवळ कलाकुसर असलेली तबकडी वाटते. पण हँडल पकडून उघडली की होते...


टेबलावर फुले, फळे अथवा तत्सम वस्तू ठेवण्यासाठीची शैलीदार कोरीव परडी

या जत्रेत मजा करणारी पारंपरिक पोषाखातली काही मुले (जालावरून साभार)...

 ...

आपली पुढची सफर आहे सौदी अरेबियातील आधुनिक औद्योगिक शहर जुबेलची.

क्रमशः

द रॉयल कमिशन फॉर जुबेल अँड यानबू

२१ सप्टेंबर १९७५ साली सौदी राजाच्या वटहुकुमाने "द रॉयल कमिशन फॉर जुबेल अँड यानबू" ची स्थापना झाली. तडक केंद्रीय मंत्रीपरिषदेच्या आधिपत्याखाली असलेल्या या संस्थेचे मुख्य काम होते सौदी अरेबियाच्या अरबी आखाती पूर्व किनार्‍यावरील जुबेल आणि रक्तसमुद्रावरच्या पश्चिम किनार्‍यावरील यानबू या दोन ठिकाणांचा विकास करून तेथे अत्याधुनिक औद्योगिक शहरे वसवणे. ही दोन्ही शहरे तेल उद्योगावर आधारलेल्या सौदी कंपन्यांची माहेरघरे आहेत. उत्तम आराखडे तयार करून व्यापारी व्यवस्थापन तत्त्वावर स्थापन केलेली आणि चालवली जाणारी ही शहरे हा सौदी अरेबियात अस्तित्वात आलेला एक जगावेगळा उपक्रम आहे.

या दोन शहरांचा अनुभव जमेस धरून आता त्यांच्यामध्ये रास अल् खैर या तिसर्‍या जागेची भर टाकली गेली आहे. जुबेलच्या उत्तरेस ६० किलोमीटरवर असलेल्या या ठिकाणी अल्युमिनियम, अमोनिया, फॉस्फरस आणि सल्फर या सौदी खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग उभारले जाणार आहेत.

अल् जुबेल

दम्मामच्या बाहेर पडून सौदी अरेबियाच्या अरबी आखाताच्या किनारपट्टीला समांतर उत्तरेकडे कुवेतला जाणार्‍या महामार्गावर ९० किलोमीटरवर अल् जुबेल हे अरबी जगतातले सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे. १९७५ पूर्वी या जागी अल् जुबेल नावाचे एक छोटे खेडेगाव होते. या जागेवरच्या मानवी वस्तीचा इतिहास ७,००० वर्षांपूर्वीच्या दिलमून नावाच्या संस्कृतीपर्यंत मागे जातो. इ स १९३३ मध्ये सौदी अरेबियातील खनिज तेल शोधाचे सर्वप्रथम स्थान म्हणून जुबेलचे नाव नोंदले गेले आहे.

बेचेल (Bechtel) ही जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपनीला हे शहर बांधण्याचा आणि व्यवस्थापनाचा प्रकल्प मिळवला आहे. जगातला सर्वात मोठा अभियांत्रिकी प्रकल्प आणि एक उत्तम वसाहतीचा नमुना असलेल्या या शहराचे औद्योगिक आणि रहिवासी असे दोन भाग आहेत. त्यांची आखणी करताना औद्योगिक विभागातील प्रदूषणाचा जुबेलच्या आणि इतर कोणत्याही रहिवासी वस्तींना उपद्रव होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. २०११ च्या गणनेप्रमाणे जुबेलची लोकसंख्या ३,८०,००० होती आणि त्यांत एक तृतियांश सौदी, एक तृतियांश भारतीय आणि उरलेले एक तृतियांश जगातील इतर देशांचे नागरिक होते.

२००४ मध्ये "जुबेल दोन (Jubail II)" हा जुबेलच्या विस्तार करण्याचा US$ ३८० कोटीचा (रु २२,८०० कोटीचा) प्रकल्पही बेचेलला देण्यात आला आहे.

दम्मामची वस्ती सोडली की लगेच सौदी वाळवंटातून जाणार्‍या जलदगती मार्गावरून आपली गाडी वेगाने धावू लागते...

तास-सव्वातासाच्या प्रवासानंतर जुबेलमधल्या खनीज तेलावर पायाभूत उद्योगधंद्यांच्या खुणा दिसू लागतात...


पेट्रोकेमिकल व्यवसाय (जालावरून साभार)

मात्र शहराच्या रहिवासी भागाच्या वेशीपासूनच आखीव-रेखीव हिरवाईच्या रूपाने जुबेल जवळ आल्याच्या खाणाखुणा डोळ्यांना सुखावू लागतात...

या शहराचा जुना भाग इतर मध्यम आकाराच्या सौदी शहरांपेक्षा फार वेगळा दिसत नाही...

मात्र या शहराचा आधुनिक भाग जागतिक स्तरांवरच्या शहरांतही उठून दिसेल असा आहे. तर चला मारूया एक फेरफटका नागरी आयोजनासाठी (civic planning) प्रसिद्ध असलेल्या या शहराचा...

जालावरचीही खालील काही चित्रे या शहराच्या आखीव-रेखीवपणाची नीट कल्पना देऊ शकतील...


रॉयल कमिशनची इमारत


जुबेलमधिल एक रहिवासी वसाहत


जुबेलचे विहंगम दृश्य : ०१


जुबेलचे विहंगम दृश्य : ०२

जुबेल कॉर्निश

जुबेलचा समुद्रकिनारा हिरवळ व फुलझाडांनी सुशोभित केलेला आहे आणि तेथे मुलांच्या खेळांची व्यवस्थाही आहे. रोज संध्याकाळी आणि विशेषतः सुट्ट्यांच्या दिवसांना तेथे जुबेलच्या रहिवाशांची आणि पर्यटकांची गर्दी असते...


जुबेल कॉर्निश : ०१


जुबेल कॉर्निश : ०२ : रहिवासी भागातील समुद्रकिनार्‍यावरून दिसणारे औद्योगिक विभागातील तेल उद्योगातील कंपन्यांचे मनोरे


जुबेल कॉर्निश : ०३ : बोटीच्या आकाराचे रेस्तराँ


जुबेल कॉर्निश : ०४


जुबेल कॉर्निश : ०५


जुबेल कॉर्निश : ०६ : कॉर्निशच्या एका भागाचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)

जुबेल कॉर्निशच्या धक्क्यावरून समुद्रात सफर करण्यासाठी बोटी मिळतात. या बोटींवरून समुद्रात चक्कर मारण्याची आणि भर समुद्रात जेवण करण्याची मजा पर्यटकांना घेता येते...


बोटीतून दिसणारे जुबेल शहर : ०१


बोटीतून दिसणारे जुबेल शहर : ०२

जुबेल संग्रहालय

जुबेलमध्ये एक संग्रहालय आहे. त्याच्या इमारतीत वेगवेगळे interactive शात्रीय प्रयोग प्रदर्शित केले आहेत. त्यामुळे खेळाखेळात मुले आणि मोठी माणसेही शास्त्रीय प्रयोगांची मजा घेऊ शकतात. या संग्रहालयाच्या आवारात सौदी सैन्यदलातून निवृत्त केलेले अग्नीबाण, विमाने आणि सैनिकी गस्तीबोट, ठेवले आहेत...

 संग्रहालय : ०१


संग्रहालय : ०२

वातानुकूलित तंबूतील कट्टा

जुबेलच्या एका फेरीत आमच्या हॉस्पीटलच्या रिक्रिएशन विभागाने गावाबाहेरच्या एका वातानुकूलित तंबूत कट्टा भरवला होता, त्याची काही क्षणचित्रे...


तंबूतल्या कायम रहिवासी बिबट्या राजाबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरणे कठीण होते !

जुबेल बंदर

जुबेलमध्ये जुबेल वाणिज्य बंदर (Jubail Commercial Seaport), किंग फाहाद औद्योगिक बंदर(King Fahd Industrial Seaport) आणि किंग अब्दुल अझिझ नौदल तळ (King Abdul-Aziz Naval Base) आहेत.


किंग अब्दुल अझिझ नौदल तळ (जालावरून साभार)

जल आणि ऊर्जा प्रकल्प

जुबेलमध्ये जगातला सर्वात मोठा स्वतंत्र जल आणि ऊर्जा प्रकल्प (Independent Water and Power Project) आहे. तेथे दररोज समुद्राच्या पाण्यापासून ८ लाख घनमीटर शुद्ध पाणी आणि २,७४५ मेगॅवॅट वीज निर्माण केली जाते.


जुबेलमधिल समुद्रजल शुद्धीकरण प्रकल्प (डिसलायनेशन प्रोजेक्ट) : ०१ (जालावरून साभार)


जुबेलमधिल समुद्रजल शुद्धीकरण प्रकल्प (डिसलायनेशन प्रोजेक्ट) : ०२ (जालावरून साभार)

संध्याकाळी परतताना, दिवसा केवळ मनोरे आणि नळ्यांच्या शेवयांचा गुंता दिसणार्‍या तेल उद्योगातील प्रकल्पांवरची रोषणाई मन मोहून घेते...


तेल उद्योगातील (पेट्रोकेमिकल) प्रकल्प : ०१


तेल उद्योगातील (पेट्रोकेमिकल) प्रकल्प : ०२

पुढच्या भागात आपण राजधानी रियाधला भेट देणार आहोत.

क्रमशः

 लोक आखाती देशात पैसे मिळवायला जातात असेच आत्तापर्यन्त वाटत होते पण सुंदर आणि उच्च राहणीमान हा ही एक भाग असू शकतो असे आता म्हणता येईल असे वाटते.

आता:-
लोक पुन्हा परत का येतात ? घरच्या लोकांची ओढ ? पण इथे पुण्यात राहणारी मुले सुद्धा शिरुर मधल्या आपल्या आई-वडीलांना महिनोन महिने भेटत नाहीत ही भारतातील वस्तुस्थिती आहे ? तिथे अशी कोणती गोष्ट जाचक आहे की लोक अर्धवट वयात परत येतात ? ( मातृभूमीचे प्रेम ? ..जननि जन्मभूमीश्च..???) हे तितकेसे खरे वाटत नाही !

अन्य आखातातील /परदेशातील लोकांनी ही आपले अनुभव मांडावेत !

पाश्चिमात्य देशांसारखे आखाती देशांत नागरिकत्व मिळत नाही किंवा फार फार मोठ्या अभावानेच मिळते. त्यामुळे, तेथे नोकरी करणारा परत येणार हे नक्की असते. मात्र केव्हा परत येणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यातील काही...

१. नोकरीच्या कराराची मुदत संपणे / (सरकारी नोकरीतून) निवृत्त होणे.

२. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या अटी जाचक वाटणे... उदा. कुटूंबाचा व्हिसा नसणे, सुटी कमी असणे, इ.

३. हवा असलेला / समाधानकारक बँक बॅलन्स जमल्यावर नोकरीच्या जागेतले / देशातले वातावरण न आवडणे.

४. आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या चलाख एजंटनी मोठ्या पगाराची खोटी आश्वासने देवून केलेली फसवणूक हा प्रकार खाडी देशातल्या निम्न स्तरांच्या नोकर्‍यांत दिसतो. तसेच पाश्चिमात्य देशांत मानवी तस्करीच्या मार्गाने जाण्यासाठी मोठी रक्कम एजंटला देणारेही असतात. या दोन फार मोठ्या शोकांतिका आहेत. खरी वस्तुस्थिती समजल्यावर असे लोक काही करून स्वदेशात कसे परतता येईल याची स्वप्ने पाहत असणे स्वाभाविक आहे.

माझा स्वतःचा अनुभव व निरिक्षणे यावरून खालील विधाने करू शकतो...

उत्तम जीवन (स्वर्ग), नीच जीवन (नर्क) आणि त्या दोघांमधले मधले सर्व स्तर (स्पेक्ट्रम) हे जगात सर्वच ठिकाणी (तथाकथित उत्तम-नीच देशात आणि स्वदेश-परदेशात) असतात. प्रत्येक जागेवर, माणसाचे त्या जागेवरचे स्थान, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूची माणसे, इत्यादीवर तो माणूस स्वर्ग-नर्काच्या कोणत्या स्तरावर आहे हे ठरते. एकाच ठिकाणची परिस्थिती बदलल्यास स्वर्ग-नर्काचा स्तर बदलू शकतो. दर परिस्थितीत प्रत्येक माणसाची सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून स्वतःला परवडणारा निर्णय घेण्याची आणि तो अमलात आणण्याची पात्रता / धमक त्याच्या सुख-दु:खाचा स्तर ठरवते.

स्पष्टीकरण:

१. स्वदेशात अतिशय नीच अवस्थेत असणारी माणसे विरळ नाहीत हे आजूबाजूला पाहिले तर नक्की दिसेल. याउलट, जगात अत्युत्तम समजल्या जाणार्‍या देशातही फार आनंदात नसलेली स्थानिक / परकिय माणसे कमी नाहीत. "खाटल्यावर आणून देणारे हरी" जितके स्वदेशात विरळ असतात तेवढेच विरळ "छळणारे कंसमामा" परदेशात असतात. मात्र जसे आपण भारतात परदेशांचे गोडवे गातो तसेच आपल्याला परदेशात गेल्यावर देशप्रेमाचा आणि (देशात असताना महिनोमहिने न भेटणार्‍या) मित्र-नातेवाईकांबद्दलच्या प्रेमाचा उमाळा येतो. आपल्या हातात नसलेले खेळणे मुलांना जास्त चांगले वाटते... वय वाढल्यावर खेळण्याचे स्वरूप बदलते, इतकेच !

२. माझा स्वतःचा अनुभव मागे वळून पाहिल्यावर असे दिसते की, भारतात जितक्या समस्या मला आल्या किंवा जितके असुखकारक अनुभव आले त्यापेक्षा कमीच परदेशात आले.

३. स्वदेशातल्या आणि परदेशातल्या दर ठिकाणाला आपापले फायदे-तोटे असतात. आपण आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची तुलना करून आपल्याला परवडणारा निर्णय घ्यायचा असतो. या जगात १००% फायद्याची जागा कोठेही नाही... जन्मस्थानात, स्वदेशात किंवा परदेशातही.

 अर् रियाध

अर् रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेली आहे. ती जशी देशाची राजधानी आहे तशीच रियाध प्रांताचीही राजधानी आहे. समतल भूमीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या ५२-५३ लाख आहे. रियाध प्रांताची लोकसंख्या ७० लाख म्हणजे साधारण सर्व देशाच्या एक चथुर्थांश आहे. या देशातल्या तीन (रियाध, दम्माम आणि जेद्दाह्) महानगरांमध्ये रियाध हे सर्वात कर्मठ आणि मुख्यतः व्यावसायिक केंद्र समजेल जाते. कर्मठ पारंपरिक वहाबी संस्कृती आणि आधुनिक / पाश्चिमात्य प्रभाव यांचे एक सुरस रसायन येथे पहायला मिळते. अर्थातच रियाधमध्ये पर्यटनासाठी खास ठिकाणे नाहीत आणि तुमची वेशभूषा आणि सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या पद्धतीवर या शहरात वावरताना लक्ष देणे जरूरीचे आहे. मात्र याचा असा अर्थ नाही की तुम्हाला पाश्चिमात्य कपडे घालून अमेरिकन उच्चारात इंग्लिश बोलणारा सौदी तरुण दिसणारच नाही !

बानी हनिफा नावाच्या जमातीने स्थापन केलेल्या या शहराला इस्लामपूर्व काळात हज़र् या नावाने ओळखत असत. त्या काळी ते आधुनिक सौदी अरेबियाचा बहुतेक सर्व मध्य आणि पूर्व भाग व्यापणार्‍या अल् यमामा नावाच्या प्रांताची राजधानी होती. इ स ८६६ साली उखायधिराईट्सनी हा प्रांत अब्बासीद साम्राज्यापासून स्वतंत्र करून त्याची राजधानी जवळच्या अल् खार्ज नावाच्या शहरात हलवली आणि हज़र् ला उतरती कळा आली. या शहराचे हज़र् हे जुने नाव अजूनही स्थानिक कथा-कवितांत येत असते. मात्र चौदाव्या शतकापर्यंत या शहराने आपले महत्त्वाचे स्थान परत मिळवले होते. रियाध या अरबी शब्दाचा अर्थ बागबगिचे असा आहे. चौदाव्या शतकात इब्न बतूता या मोरोक्को (उत्तर आफ्रिका) मधील जगप्रवाश्याने या शहराचे वर्णन "पाण्याचे कालवे आणि झाडे असलेले शहर" असे केलेले आहे.

रियाध या नावाचा पहिला लेखी उल्लेख सतराव्या शतकात लिहिलेल्या १५९० मध्ये झालेल्या एका घटनेच्या संदर्भात केला गेला आहे. मान्फुहा या शेजारच्या प्रांतातील देहाम इब्न दवास या नावाच्या निर्वासिताने रियाधवर कब्जा केला आणि रियाधच्या विखुरलेल्या सर्व वस्त्यांभोवती एक संरक्षक भिंत उभारून त्याला एकसंध शहराचे स्वरूप दिले. नंतर यमामाचा पडता काळ आला आणि शहराचे परत अनेक वस्त्यांच्या रूपात तुकडे झाले. साधारण शंभर वर्षांपूर्वी रियाध साधारण २०,००० वस्तीचे, धुळीने भरलेल्या खजुराच्या लागवडींचे आणि छोट्या ओहोळांवर तगून असलेल्या शेतांचे ठिकाण होते. इ स १९०२ मध्ये राजा अब्दुलअझिझ इब्न सौदने या शहरावर कब्जा केला आणि १९३२ मध्ये आधुनिक सौदी अरेबियाची स्थापना केल्यावर त्याला राजधानी बनवले. खनिजतेलसंपत्ती आल्यानंतर अर्थातच या राजधानीच्या शहराचा एक अत्याधुनिक आणि गगनचुंबी इमारतींनी भरलेल्या शहरात विकास करण्यात येत आहे. वाढत्या समृद्धीबरोबर या शहराची वाढ होत आहे आणि दरवर्षी त्यांत उंच, विशाल अथवा इतर काही वैशिष्ट्यपूर्ण इमारतींची भर पडत आहे.

रियामधिल "राजकन्या नोरा बिंत अबदुलरहमान विद्यापीठ" हे जगातील सर्वात मोठे खास स्त्रियांकरिता राखीव असलेले विद्यापीठ आहे.

तर चला एक फेरी मारू रियाधमध्ये...


रियाधमधला फेरफटका : ०१


रियाधमधला फेरफटका : ०२


रियाधमधला फेरफटका : ०३


रियाधमधला फेरफटका : ०४


रियाधमधला फेरफटका : ०५


रियाधमधला फेरफटका : ०६


रियाधमधला फेरफटका : ०७


रियाधमधला फेरफटका : ०८ : किंग फाहाद मेडिकल सिटीचा स्वागतकक्ष

किंगडम सेंटर

जवळ जवळ सर्व रियाधमधून दिसणारी आणि रियाधमधल्या प्रवासात एक महत्त्वाची खूण म्हणून एका इमारतीचे नाव घेतले जाते, ती म्हणजे बुर्ज अल् ममलकाह् उर्फ किंगडम सेंटर. रियाधमध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश केला तरी किंगडम सेंटरची इमारत तिच्या उंचीमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे नजरेत भरते...


किंगडम सेंटर : ०१


किंगडम सेंटर : ०२ (जालावरून साभार)

जगातल्या अतिश्रीमंत लोकांमध्ये गणना केल्या गेलेल्या राजपुत्र अल् वलिद बिन तलाल याच्या किंगडम होल्डिंग कंपनीच्या मालकीची ही इमारत रियाध भेटीत बघणे नक्कीच आवश्यक गोष्ट आहे. ही ९९ मजली आणि ३०२ मीटर उंच इमारत ९४,२३० चौ मीटर क्षेत्रफळावर २० कोटी सौदी रियाल (३२०० कोटी रुपये) खर्चून बांधली आहे. २००२ मध्ये या इमारतीला "एंपोरिस स्कायस्क्रेपर पारितोषिक" आणि "त्या वर्षाचा जगातला सर्वोत्तम आराखडा व कार्यप्रणाली बहुमान" मिळाला आहे. ही सौदी अरेबियातील सर्वात उंच इमारत आहे.

या इमारतीत खालच्या तीन मजल्यांवर एक मोठा शॉपिंग मॉल आहे. त्यातला एक मजला स्त्रियांसाठी राखीव आहे...


किंगडम सेंटर : ०३ : शॉपिंग मॉल

मॉलच्या वर फोर सीझन्स हॉटेल रियाध आहे आणि त्यावर ऐषआरामी फ्लॅट्स आहेत. इमारतीचे टोक बॉटल् ओपनरच्या आकाराचे आहे. त्याचे भोक इतके मोठे आहे की त्यातून छोटे विमान आरपार नेण्याचा विक्रम केल्याचे सांगितले जाते. सगळ्यात वरचा भाग म्हणजे ५६ मीटर लांबीचा निरीक्षण पूल (स्कायब्रिज वॉकवे) आहे. किंगडम सेंटरचा गतिमान लिफ्ट आपल्याला ९९ व्या मजल्यावरच्या निरीक्षण पुलावर घेऊन जातो. तर चला या ३०० मीटर उंच पुलावरून रियाधचे विहंगम दृश्य बघायला...


किंगडम सेंटरचा निरीक्षण पूल


किंगडम सेंटरच्या निरीक्षण पुलावरून दिसणारे रियाध : ०१


किंगडम सेंटरच्या निरीक्षण पुलावरून दिसणारे रियाध : ०२


किंगडम सेंटरच्या निरीक्षण पुलावरून दिसणारे रियाध : ०३

अल् फैझलिया सेंटर

रियाधमधली दुसरी वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे अल् फैझलिया सेंटर. ही सौदी अरेबियातील दोन क्रमांकाची २६७ मीटर उंचीची इमारत आहे. या इमारतीच्या उंचीमुळे आणि तिच्या टोकावर असलेल्या सोनेरी गोलामुळे ती उठून दिसते. या गोलामध्ये रेस्तराँ आहे आणि त्याच्या खाली निरीक्षण सज्जा आहे...


अल् फैझलिया सेंटर : ०१


अल् फैझलिया सेंटर : ०२ : स्वागतकक्ष

रियाध दूरचित्रवाणी मनोरा

हा १७० मीटर उंच आकर्षक दूरचित्रवाणी मनोरा सौदी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आवारात आहे.


रियाध दूरचित्रवाणी मनोरा

रियाधची काही विहंगम दृश्ये


रियाधचे विहंगम दृश्य : ०१ (जालावरून साभार)


रियाधचे विहंगम दृश्य : ०२ (जालावरून साभार)

अल् जनाद्रिया महोत्सव

इ स १९८५ पासून राष्ट्रीय संरक्षक सेना (नॅशनल गार्ड) रियाध शेजारच्या एका मोठ्या मैदानात दर वर्षी फेब्रुवारी/मार्चमध्ये दोन आठवडे "संस्कृती आणि वारसा (culture and heritage)" या विषयाला मध्यवर्ती ठेवून एक उत्सव साजरा करते. रौधात सुवेस (Rowdhat Souwais) या फार जुन्या सौदी परंपरेचा हा आधुनिक अवतार आहे. या उत्सवात सौदी सरकारच्या बहुतेक सर्व खात्यांचे विभाग आणि अनेक लहान-मोठ्या खाजगी कंपन्या पंडाल उभारतात. त्याचबरोबर शोभेच्या वस्तू, खेळांचे शामियाने, मौजमजेची आणि खाण्यापिण्याची भरपूर दुकाने असतात. याशिवाय घोड्यांची शर्यत, उंटांची शर्यत, अर्धा व मिझमार हे पारंपरिक सौदी नाच, इ कार्यक्रमही असतात. एकंदरीत आपल्या इथल्या जत्रेचेसारखेच स्वरूप असते. सर्व देशातून दहा लाखांपेक्षा जास्त लोक तेथे या दोन आठवड्यामध्ये मजा करायला येतात.

चला मारूया या सौदी जत्रेत एक चक्कर...


जनाद्रिया महोत्सव : ०१


जनाद्रिया महोत्सव : ०२


जनाद्रिया महोत्सव : ०३


जनाद्रिया महोत्सव : ०४


जनाद्रिया महोत्सव : ०५


जनाद्रिया महोत्सव : ०६


जनाद्रिया महोत्सव : ०७ : सौदी काव्यगायन / शेरोशायरीचा कार्यक्रम


जनाद्रिया महोत्सव : ०८


जनाद्रिया महोत्सव : ०९


जनाद्रिया महोत्सव : १०

पुढच्या भागात, जेद्दाह् ची सहल.

क्रमशः

 

जेद्दाह्

जेद्दाह् हे सौदी अरेबियाच्या पश्चिमकिनार्‍यावरील रक्तसमुद्रावरचे सर्वात मोठे बंदर आणि सौदी अरेबियातील (राजधानी रियाध खालोखाल) दोन क्रमांकाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या ५१ लाख आहे. हे मक्का प्रांतातील सर्वात मोठे शहर आहे आणि मक्केत हज या इस्लामी तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना या शहराच्या मार्गे जावे लागते. या कारणामुळे या शहराला धार्मिक आणि व्यापारी महत्त्व असणे साहजिकच आहे. याशिवाय त्याला आधुनिक वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी जगतात महत्त्वाचे स्थान देण्यासाठी अनेक प्रकल्प चालू आहेत. जेद्दाह् मध्ये अनेक पर्यटक स्थाने (resorts) असून ते सौदी अरेबियाचे प्रथम क्रमांकाचे पर्यटन शहर आहे. Globalization and World Cities Study Group and Network (GaWC) ने या शहराला Gamma world city हा किताब बहाल केला आहे.

या शहराच्या नावाबद्दल अनेक प्रवाद आहेत. त्यातील सर्वात रोचक असा. अरबीत जद्दा म्हणजे आजी. आधुनिक मानवांतली मूळ स्त्री म्हणजेच 'मानवजातीची आजी इव्ह'चे थडगे या शहराजवळ आहे असा पूर्वपार समज येथे आहे. यावरून या जागेला जेद्दाह् असे नाव पडले आहे. कोणाच्याही थडग्याजवळ प्रार्थना करणे इस्लाममध्ये निषिद्ध आहे. त्यामुळे इव्हच्या तथाकथित थडग्याजवळ प्रार्थना करण्याची प्रथा बंद करण्यासाठी १९७५ साली ती जागा कॉन्क्रीटने आच्छादून टाकली आहे. या शहराच्या नावाचे जुद्दा आणि जाद्दा असे उच्चार काही प्रमाणात प्रचलित असले तरी जेद्दाह् हाच उच्चार बहुतांश केला जातो.

उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून येथे अश्मयुगात वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. इ स पूर्व ५०० मध्ये येथे येमेनेमधल्या कुदा नावाच्या जमातीच्या कोळी लोकांचे खेडे होते. अलेक्झांडर (इ स पूर्व ३५६ - ३२३) त्याच्या एका मोहिमेत इथपर्यंत येऊन गेला असे म्हणतात.

इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मक्केला जाण्यासाठी मुख्यत: अल् शोइबा नावाच्या एका बंदराचा वापर होत असे. इ स ६४७ मध्ये उथमान बिन अफान या तिसऱ्या मुस्लिम खलिफाने जेद्दाह् बंदराचा विकास करून त्याला मक्का तीर्थयात्रेच्या मार्गावरचे मुख्य बंदर बनविले आणि जेद्दाह् ची ऊर्जितावस्था सुरू झाली ती आजतागायत चालू आहे. मात्र त्याच्या याच ऐतिहासिक महत्त्वामुळे या शहरावर सतत आक्रमणे झाली. त्यामुळे जेद्दाह् आणि आजूबाजूचा प्रदेश मिळूम असलेल्या हिजाझ प्रांताच्या मालकीचे अनेकदा हस्तांतरण झाले.

इ स ९६९ मध्ये अल्जेरियाच्या फातीमिद खिलाफतीने इजिप्तचा पाडाव करून रक्तसमुद्राच्या व्यापारावर स्वामित्व स्थापन केले आणि जेद्दाह् मुख्य शहर असलेल्या हिजाझ प्रांतावर वर कब्जा केला. या साम्राज्याने रक्तसमुद्रमार्गे चीनच्या साँग राजघराण्याशी व्यापारी आणि राजकीय संबद्ध स्थापन केले होते. या काळात जेद्दाह् मध्ये पूर्व आफ्रिका, सिंध, दक्षिणपूर्व आशिया, इत्यादी अनेक दूरदेशीच्या दर्यावर्द्यांचा आणि व्यापाऱ्यांचा राबता असे.

इ स ११७१ मध्ये जेरुसालेमचा पाडाव करून सालादीनने स्वत:ला इजिप्तचा राजा घोषित केले आणि फातीमिद साम्राज्य खालसा करून त्यांचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. त्याच्या आय्युबीद खिलाफतीचा छोटा कालखंड व्यापारी आणि सांस्कृतिक भरभराटीचा होता. याच काळात आय्युबीद घराण्याने अनेक गावा-शहरांत मदरसे स्थापन करून या भागामध्ये इस्लामच्या सुन्नी तत्त्वांचा वरचष्मा स्थापन केला. इ स १२५४ मध्ये आय्युबीद साम्राज्य मोडकळीला येऊन जेद्दाह् सह हिजाझ प्रांत मामलुक सल्तनतीचा भाग बनले.

नंतर १५१७ मध्ये ऑटोमन तुर्कांनी मामलुक सल्तनतीचा पराभव करून इजिप्त, सिरीया आणि मक्का-जेद्दाह् सह हेजाज प्रांत आपल्या साम्राज्याला जोडला. १५२५ मध्ये पोर्तुगीज सरखेल लोपो सोरेस द अल्बुकर्क ने केलेल्या हल्ल्याला परतवून लावल्यानंतर तुर्कांनी संपूर्ण जेद्दाह् शहराभोवती सहा व्दारे असलेली संरक्षक भिंत बांधली आणि आपली पकड अधिक मजबूत केली.


ऑटोमन साम्राज्याचा नकाशा (जालावरून साभार)

.


संरक्षक भिंतीसह जेद्दाह् शहराचे प्रकाशचित्र (इ स १९३८) (जालावरून साभार)

१८०२ मध्ये स्थानिक नेज्दी लोकांनी उठाव करून मक्का आणि जेद्दाह् ताब्यात घेतले. पण ऑटोमन सुलतानाने हल्ला करून १८१३ च्या जेद्दाह् च्या पहिल्या युद्धात त्यांना परत मिळविले आणि पुढची शंभर वर्षे त्यावर कब्जा कायम ठेवला. पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या (१९१४ - १८) गडबडीचा फायदा घेऊन स्थानिक सरदार हुसेन अलीने बंडाळी करून सिरीयातील अलेप्पो पासून ते येमेनमधल्या एडनपर्यंतच्या भूभागावर स्वतंत्र अरब राज्य स्थापन केले आणि स्वत:ला त्याचा राजा घोषित केले. १९२४ साली इब्न सौदने त्याच्यापासून मक्का जिंकून घेऊन आधुनिक सौदी अरेबियाची स्थापना करण्यास सुरुवात केली. या युद्धानंतर हुसेन राजगादीवरून पायउतार झाला आणि त्याचा मुलगा अली हुसेन राजा झाला. इब्न सौद बरोबरच्या जेद्दाह् च्या दुसऱ्या युद्धात अली पराभूत झाला आणि तो बगदादला पळून गेला. नंतर पुढे तो अम्मानला जावून स्थायिक झाला. अम्मानला अलीच्या वारसांनी हाशेमाईट घराण्याची राजसत्ता स्थापन केली, ती आधुनिक जॉर्डन देशाच्या रुपाने आजतागायत चालू आहे.

असा वैविध्यपूर्ण इतिहास असलेले आणि अनेक संस्कृतींनी प्रभावीत झालेले शहर बघायची उत्कंठा होतीच. पण दम्मामपासून सरळ रेषेत १५०० किमी दूर असलेल्या या जागी जाण्याचा योग येत नव्हता. अखेरीस तेथे एका परिषदेत भाषणबाजी करायला आमंत्रण मिळाले आणि तो योग आला. योगायोगाने त्या दोन दिवसांना जोडून आठवड्याची दोन दिवसांची सुट्टी आली आणि दुधात साखर पडली. त्यामुळे हे शहर जरा मोकळेपणाने बघायला मिळाले. मक्का प्रांतात असल्याने हे शहर खूप कर्मठ असेल आणि त्यांत पर्यटकांसाठी फारसे काही नसेल या कल्पनेला बऱ्यापैकी धक्का बसण्याइतके हे शहर आधुनिक, मोकळे आणि वैविध्यपूर्ण आहे.

चला तर विविधरंगी जेद्दाह् च्या सहलीला…

विमानतळावरून हॉटेलवर पोहोचलो तेव्हा दुपार उलटून गेली होती. थोडा आराम करून संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी आणि जेवणासाठी बाहेर पडलो.

व्यापारी महत्त्व असलेल्या या शहरात मोठमोठी आकर्षक दुकाने व मॉल नसते तरच आश्चर्य. शहराच्या नवीन भागांत रुंद रस्ते आणि रस्त्यांवर दोन्ही बाजूंना आणि दुभाजकांवर हिरवळ व झाडे आहेत...


ताहलिया रस्ता : ०१

.


ताहलिया रस्ता : ०२

.


ताहलिया रस्ता : ०३

.


ताहलिया रस्ता : ०४

.

दुसर्‍या दिवशी जरा लवकर आटपून मोकळ्या दोन दिवसांचा पुरेपूर उपयोग करायला एक टॅक्सीवाला दिवसाच्या बोलीवर गाठला आणि शहराची भटकंती सुरू केली. कर्मधर्म संयोगाने टॅक्सीवाला मल्याळी निघाला. मग काय ! शहराच्या भटकंतीबरोबर खास मल्याळी ढबीतल्या हिंदीमध्ये जेद्दाची वैशिष्ट्ये आणि गुपिते उघडी होऊ लागली ! :)


किंग फाहाद रस्ता

.


जेद्दाह् मधिल एक रस्ता

.


रस्त्याशेजारचा एक बंगला

.


कापडाचे दुकान

.


मॉल : ०१

.


मॉल : ०२

.


शॉपिंग कॉम्प्लेक्स

.


कॉर्निश रस्ता : ०१

.


कॉर्निश रस्ता : ०२

.


कॉर्निश रस्त्यावरची एक मस्जिद

.


जेद्दाह् कॉर्निशचे रात्रीचे दृश्य

.


जेद्दाह् कॉर्निशच्या एका भागाचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)

.


जेद्दाह् कॉर्निशचे रात्रीचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)


जुने जेद्दाह्

जेद्दाह् हे खूप जुन्या काळापासून व्यापार आणि धार्मिक प्रवासाच्या मार्गावरचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने तेथे जुनी पारंपरिक धाटणीची घरे असणारच. मात्र ती घरे खनिज तेलामुळे आलेल्या समृद्धीच्या सुनामीत वाहून जाऊ लागली होती. त्यांना पाडून नव्या इमारती बांधण्याचा सपाटा सुरू झाला होता...


नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०१ (जालावरून साभार)

.


नूतनीकरणापूर्वीचे जुने जेद्दाह् : ०२ (जालावरून साभार)

.

बरीच जुनी घरे वेगाने वाढणार्‍या शहरामुळे नष्ट झाल्यावर सरकारने हा सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. शहराचा एक जुना भाग राखीव ठेवून तेथील जुन्या घरांचे नूतनीकरण केले जात आहे...


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०१

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०२

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०३

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०४

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०५

.


नूतनीकरणानंतरचे जुने जेद्दाह् : ०६


पारंपरिक जेद्दाह् सूक (बाजार)

पारंपरिक स्थानिक बाजाराला अरबीत सूक असे म्हणतात. स्थानिक विशेषांच्या आणि रोजच्या जीवनातल्या वस्तूंची रेलचेल असणार्‍या सूकमधील एक फेरी...


जेद्दाह् सूक : ०१

.


जेद्दाह् सूक : ०२

.


जेद्दाह् सूक : ०३

.


जेद्दाह् सूक : ०४


रिसॉर्ट सिटी जेद्दाह्

व्यापाराच्या आणि धार्मिक प्रवासाच्या निमित्ताने जेद्दाह् मध्ये दर वर्षी २५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी येतात. या वर्दळीचा फायदा घेण्यासाठी जेद्दाह् मध्ये अनेक पर्यटक रिसॉर्ट्स बनविली आहेत. त्यातली नामवंत आहेत दुर्रात अल् आरूस; अल् नवरस मोवेनपिक रिसॉर्ट; क्रिस्टल रिसॉर्ट; रॅडिसन ब्लॉ; द सिग्नेचर अल् मुरजान रिसॉर्ट; अल् नखील व्हिलेज; सँड्स; शेरेटन अभूर; पार्क हयात जेद्दाह् मारीना, क्लब अँड स्पा; इ. यातल्या बर्‍याच रिसॉर्ट्सना त्यांचा स्वतंत्र समुद्रकिनारा आहे. त्यातल्या काही रिसॉर्ट्सची स्वतःच्या मालकीची रक्तसमुद्रातील प्रवाळ बेटे (कोरल रीफ) आहेत.


जेद्दाह् मधील एक रिसॉर्ट : ०१ (जालावरून साभार)

.


जेद्दाह् मधील एक रिसॉर्ट : ०२ (जालावरून साभार)

.


जेद्दाह् मधील एक रिसॉर्ट : ०३ : पार्क हयात जेद्दाह् मरीना, क्लब अँड स्पा

जेद्दामध्ये बघण्यासारखे अजून खूप आहे. यापुढची सफर आपण पुढच्या भागात चालू ठेवूया.

क्रमशः

 रस्त्याशेजारच्या हिरव्या पिवळ्या बंगल्यात एका मनुष्याच्या अनेक बेगमा असणार असे वाटले. नाही ! :) इस्लामच्या तत्वाप्रमाणे प्रत्येक बायकोला समान गोष्टी (संपत्ती, दागिने, घर, गाडी*, इ) द्यावे लागते... म्हणजे जितक्या बायका तितके बंगले बांधावे लागतात / फ्लॅट घ्यावे लागतात. शिवाय इस्लाममध्ये लग्नात नवर्‍याने बायकोला हुंडा (मेहेर) द्यायचा असतो. सौदी लग्नात मेहेर हा एक फार मोठा खर्च असतो. सौदी मुली आणि मुलींचे पालक या नियमाबाबत आग्रही असतात, त्यामुळे तेथे खूप श्रीमंत असल्याशिवाय अनेक लग्ने करणे शक्य होत नाही.

पण याचा दुसरा परिणाम असा की सर्वसामान्य परिस्थितितल्या अनेक तरूणांना मेहेरचे पैसे जमेपर्यंत बराच काळ अविवाहित रहावे लागते. यावर काही प्रमाणात तोडगा म्हणून सरकारचे बिनव्याजी कर्ज मिळते. पण ती व्यवस्था सर्वानाच मिळते असे नाही.

 वरील दाखवलेल्या मॉलमध्ये आणि रिसॉर्टमध्ये स्त्रीयांना प्रवेश आहे का? प्रत्येक मॉलला स्त्रीयांचा मजला वेगळा असतो का?

प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था असेलच असे नाही. सर्व मॉल्स / दुकानांमध्ये स्त्रीयांना सर्व ठिकाणी प्रवेश असतो. काही मोठ्या मॉल्समध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या भागात आणि इतर ठिकाणी केवळ स्त्रियांच्या उपयोगाच्या वस्तू विकणार्‍या दुकानांत पुरुषांना मज्जाव असतो.

प्रचंड मॉलचा संपूर्ण मजला स्त्रियांसाठी राखीव असणारे माझ्या माहितीतले एकमेव ठिकाण म्हणजे रियाधचे किंगडम सेंटर.

 

जेद्दाह् शहरातला खुल्या आकाशाखालील सौंदर्याविष्कार (ओपन एअर आर्ट)

सत्तरच्या आणि ऐशीच्या दशकात खनिज तेलाच्या किमतीच्या चढत्या कमानीमुळे आलेल्या समृद्धीमध्ये जेद्दाह् च्या सार्वजनिक ठिकाणांवर कलेला वाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याअंतर्गत केलेल्या एका प्रकल्पामुळे, शहरभर रस्त्यांच्या चौकांत आणि इतर मोकळ्या जागांवर, १२५ पेक्षा जास्त शिल्पकृती स्थापन केलेल्या आहेत. त्या कलाकृतींचे विषय आम जीवनातल्या वस्तूंपासून ते नवकलेच्या (अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट) आविष्कारांपर्यंत आहेत. यामुळे हे सर्व शहरच जगातले सर्वात मोठे खुले कलाप्रदर्शन (ओपन एअर आर्ट एक्झिबिशन) झाले आहे. मक्का प्रांतातल्या व हजच्या वाटेवरील शहरामध्ये असा अनोखा कलाविष्कार आणि तोही खुल्या आकाशाखाली बघणे हा एक आश्चर्यकारक अनुभव होता.

तर चला आपण जेद्दाह् ची चारचाकीने सफर करत हे जगावेगळे प्रदर्शन पाहूया...


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : धार्मिक प्रतीके

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मनोरा / इमारत (नवकला)

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : पृथ्वीगोल

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नकाशा

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : पक्षी (नवकला)

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : धूपदाने (सांस्कृतिक प्रतीक)

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.

 ......
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : विमान (हे शिल्पात वापरलेले विमान खरेखुरे आहे !)

.

 ...
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : सायकल

.

 ...
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मेणबत्ती आणि नवकला

.

 ...
जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : नवकला (उंट) आणि भूमिती संच

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : घड्याळ

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : मूठ

.


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : फळे

.

आणि हा अरबस्थानातला (कार घेऊन चाललेला आधुनिक) उडता गालिचा ! :)


जेद्दाह् मधले सौंदर्याविष्कार : कार घेऊन चाललेला आधुनिक उडता गालिचा !


खेळाची मैदाने

आपल्या इथल्या क्रिकेटइतका फुटबॉल हा खेळ सर्व अरबी जगतात लोकप्रिय आहे. टेलिव्हिजनवर कोणत्याच चॅनलवर फुटबॉल (चालू अथवा जुन्या) सामन्याचे प्रक्षेपण चालू नाही असे दिवसाच्या चोवीस तासांत एकही मिनिट तेथे असणे शक्य नाही ! अश्या या खेळातील सौदी अरेबियाचे सर्वात जुने आणि नावाजलेले अल् इत्तेहाद आणि अल् अहली हे दोन क्लब जेद्दाह् मध्ये आहेत. अर्थातच या शहरात अनेक मोठी आणि आधुनिक खेळाची मैदाने आहेत. त्यातली ही दोन...


किंग अब्दुल्ला मैदान, जेद्दाह्

.


किंग अब्दुलअझिझ विद्यापीठ मैदान, जेद्दाह्


किंग फाहाद कारंजे

जेद्दाह् च्या किनार्‍यावर समुद्रात असलेले हे कारंजे इथले एक मोठे आकर्षण आहे. १९८० मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये त्याची "जगातील सर्वात उंच (३१२ मीटर / १०२४ फूट) पाण्याचे कारंजे" अशी नोंद केली गेली आहे. जेद्दाह् कॉर्निशवरून फिरताना त्याचा नजारा बघता येतो. समुद्रकिनार्‍यावरच्या अनेक हॉटेल्स आणि र्रिसॉर्ट्समध्ये हे कारंजे पाहत पाहत संध्याकाळचे जेवण घेण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. शंभर मजली इमारतीपेक्षा जास्त उंच उडणारे हे कारंजे रात्रीच्या अंधारात त्याच्यावर टाकलेल्या प्रकाशझोतांत पाहणे हा एक मनोरंजक अनुभव असतो...


किंग फाहाद कारंजे : दिवसा दिसणारे सोनेरी धुपदान म्हणजे कारंज्याचा बुंधा आहे. तेथून पाणी उडते.

.


किंग फाहाद कारंजे : रात्री, पाण्याचा फवारा सुरू झाल्यावर

.

किंग फाहाद कारंजे (कॅमेरा हातात धरून व्हिडिओ काढल्यामुळे कारंजे हालताना दिसत आहे. प्रत्यक्षात कारंजे स्थिर आहे, माझा कॅमेरा हालत होता ! :) )


राष्ट्रीय व्यापारिक बँक

जगभरच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे साहजिकच हे शहर तेथील आंतरराष्ट्रीय चलनाची अदलाबदल करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी (money changers) प्रसिद्ध आहे. या प्रकारच्या सगळ्यात मोठ्या व्याप्याऱ्याने इथली एक मोठी राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) स्थापन केली आहे. तिची वैशिष्ट्यपूर्ण इमारत बघण्यासारखी आहे...


राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) : ०१ (जालावरून साभार)

.


राष्ट्रीय व्यापारिक बँक (National Commercial Bank; NCB) : ०२ : स्वागतकक्ष


किंगडम टॉवर

ही इमारत अजून बांधून झालेली नाही. पण जेद्दाह् ची गोष्ट तिची चर्चा केल्याशिवाय पुरी होऊ शकत नाही. ज्याने रियाधमधली किंगडम सेंटर ही सौदी अरेबियातली सर्वात उंच इमारत बांधली त्याच राजपुत्र अल् वलिद बिन तलाल याने ही जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचा घाट घातला आहे.

अगोदर या इमारतीची उंची एक मैल म्हणजे १.६ किलोमीटर इतकी ठरवली होती. पण ज्या जमिनीवर ती बांधली जात आहे ती इतक्या उंच इमारतीसाठी योग्य नसल्याने ध्यानात आले. त्यामुळे पूर्णावस्थेत तिची उंची नक्की किती असेल हे गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र या इमारतीची उंची कमीतकमी एक किलोमीटर (१००० मीटर / ३२८०.८४ फूट) असेल असे जाहीर केलेले आहे. अगदी एक किलोमीटर उंचीही दुबईतील बुर्ज खलिफा या सद्याच्या जगातील सर्वात उंच इमारतीच्यापेक्षा १७८ मीटरने जास्त असेल !

ही इमारत पूर्ण झाल्यावर कशी दिसेल याची झलक या खालच्या दोन चित्रांवरून दिसेल...


किंगडम टॉवरची मानचित्रे (जालावरून साभार)

या इमारतीच्या उंचीची खरी ओळख तिच्या बाजूला इतर आकाशाला शिवणार्‍या उंचीच्या इमारती उभ्या करून तुलना दाखवणार्‍या चित्रामुळे होते...


किंगडम टॉवरची जगातल्या इतर आकाशाला शिवणार्‍या उंचीच्या इमारतींशी तुलना करणारे चित्र


जेद्दाह् बंदर

जेद्दाह् रक्तसमुद्रावरील सर्वात मोठे बंदर आहे. मक्का-मदिनेच्या तीर्थयात्रेसाठी समुद्रमार्गे येणार्‍या यात्रेकरूंची येथे मोठी वर्दळ असते. याशिवाय सौदी अरेबियाच्या समुद्रमार्गे होणार्‍या आयातीचा ६०% हिस्सा या बंदरातून होतो. वाढत्या वाहतुकीच्या सोयीसाठी १९७६ साली याचा विस्तार व आधुनिकीकरण केले गेले. १०.५ चौ किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या या बंदराच्या ११ किमी पेक्षा जास्त लांबीच्या धक्क्यांवर एका वेळेस ५० पेक्षा जास्त बोटी उभ्या राहू शकतात.


जेद्दाह् बंदर

.


जेद्दाह् बंदराचा जलवाहतूक नियंत्रण मनोरा (जालावरून साभार)


फळांच्या रसाचे खास दुकान

आमच्या टॅक्सीचालक आणि स्वनियुक्त मार्गदर्शकाच्या खास शिफारशीने एका फळांच्या रसांच्या दुकानात गेलो आणि जेद्दातली एक खासियत बघता आणि चाखता आली. या १८ - २०,००० चौ फूट आकाराच्या दोन मजली रेस्तराँत जवळ जवळ शंभर प्रकारचे फळांचे रस आणि मॉकटेल्स मिळतात. आम्ही गेलो तेव्हा बसायला जागा मिळायलाच १०-१५ मिनिटे गेली. पण दुकानाच्या प्रदर्शनी भागांत आणि बुकिंग काउंटरच्या बाजूला असलेल्या फळांच्या रचनांची सजावट पाहताना तो वेळ केव्हा गेला हे समजलेच नाही...


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०१

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०२

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०३

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०४

.


जेद्दाह् मधले एक फळांच्या रसाचे खास दुकान : ०५

.

त्या दुकानाची सर्वोत्तम खासियत असलेले एक मस्त मॉकटेल पिऊन तृप्त मनाने हॉटेलवर पोहोचलो.

समाप्त

===================================================================


मनोगत

सौदी अरेबिया या देशाचे नाव सर्वसाधारपणे लोकांना माहीत असते. पण त्या देशाची ओळख अत्यंत जुजुबी किंवा माध्यमांतून ऐकलेल्या सनसनाटी बातम्यांपलीकडे नसते. माझीही सौदीची ओळख अशीच "ऐकीव-वाचीव" होती. त्यामुळे तेथे जाताना मनात बर्‍यापैकी धाकधूक होती. मुलाखतीच्या वेळेस मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍यांपर्यंत ती पोचली असावी. म्हणून जेव्हा त्यांच्याकडूनच प्रथम "लोकम" म्हणून एक-दोन महिने जागेचा अनुभव घ्या आणि नंतर आवडल्यास स्थायी करार करा असा पर्याय आल्यावर ताबडतोप हो म्हणून टाकले. या मालिकेतील माझ्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सुदैवाने "जागा, माणसे, वातावरण, इ माझ्या सोयीचे निघाले" आणि तेथे जास्त काळ रहावे की नाही याचा निर्णय सोपा झाला. म्हणता म्हणता साडेसात वर्षे कशी गेली हे कळले नाही.

या कालावधीत अर्थातच माझ्या पायावरचे चक्र मला स्वस्थ बसून देणे शक्य नव्हते. मी केलेल्या त्या भटकंतीचे काही क्षण कॅमेर्‍याच्या डोळ्यातून तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांत नेहमी चर्चेत असलेले मुद्दे टाळून सौदी अरेबियाच्या चर्चेत नसलेल्या काही पैलूंची ओळख तुम्हाला करून देणे यावर या लेखमालेत माझा भर होता. त्या भटकंतीच्या क्षणांची मजा मी पुरेपूर अनुभवली. त्या मजेतील काही वाटा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो असेन अशी आशा आहे.

या सर्व वाटचालीत वाचकांचा सहभाग हा नेहमीच उत्साहवर्धक असतो. त्याबद्दल सर्व वाचकांना अनेक धन्यवाद. काही वाचकांनी कळफलक पुढे ओढून कौतुकाचे शब्द टंकले. त्यांचे आभार मानायला शब्द कमी पडतील.

आपल्या सर्वांचा हा लोभ पुढे असाच असू द्यावा.

होय बुर्ज खलिफाच नाही तर अनेक उंच इमारती आपले डोके ढगांच्या खालच्या थरांच्या वर डोके काढू शकतात. कसे ते खालच्या क्लिपमध्ये (जालावरून साभार) दिसेल...

येथे त्यासंबद्धात अजून काही नेत्रदिपक चित्रे आहेत.

 

सौदीतल्या बर्‍याच गोष्टींना किंग फाहादचे नाव दिसते आहे. ह्या राजाचा अल्पसा इतिहास, सौदीच्या उभारणीतील त्याचे योगदान जाणून घेण्यास आवडेल.

इब्न सौद या आधुनिक सौदी अरेबियाच्या संस्थापक राजाचा आठवा पुत्र फाहाद बिन अब्दुलाझिझ अल् सौद (१९२१-२००५) सौदी अरेबियाच्या राजपदावर १९८२ पासून २००५ पर्यंत विराजमान होता.

रियाधमधिल राजपुत्रांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेत शिक्षण पूर्ण झाल्यावर निम्न स्तरापासून सुरुवात करून अनेक पाहिर्‍या पार करत तो १९५३ मध्ये शिक्षणमंत्री झाला. त्यानंतर १९५९ मध्ये लीग ऑफ अरब स्टेट्स मध्ये सौदी प्रतिनिधी म्हणून नेमणूक, १९६२ मध्ये गृहमंत्री आणि १९६७ मध्ये दुसरा उप-पंतप्रधान (ही जागा खास फाहादसाठी निर्माण केली गेली होती) अश्या चढत्या भाजणीने प्रगती चालू राहिली.

सौदी राजघराण्याच्या नियमांप्रमाणे राजगादीवर सर्वप्रथम इब्न सौदच्या मुलांचा हक्क आहे. ते हयात नसल्यास / राजा होण्यास योग्य नसल्यासच इतरांचा वारसांचा विचार केला जात असे. १९७५ साली राजा फैझलच्या मृत्यनंतर त्यांचा भाऊ खालिद राजा बनला आणि खालिदच्या तडक खाली असलेल्या दोन भावांना वगळून तिसर्‍या क्रमांकावरील फहादला पहिला उप-पंतप्रधान आणि युवराज अशी दोन पदे मिळाली. राजा खालिद याच्या मृत्युनंतर १९८२ साली फाहदने राज्यारोहण केले.

राजा फहाद पॅलेस्टाईनचा खंदा समर्थक आणि इझ्रेलचा विरोधक होता. त्याच्या कारकिर्दीत सौदी अरेबियाचे अमेरिकेबरोबर घनिष्ट संबद्ध प्रस्थापित झाले. अरब जगतातले अंतर्गत हेवेदावे संपावे म्हणून त्याने बरेच प्रयत्न केले. लेबॅनॉनमधले यादवीयुद्ध थांबवण्यासाठी त्याने १९८९ मध्ये "ताईफ करार" घडवून आणला. (ताईफ सौदी अरेबियात्ले एक थंड हवेचे पर्यटक ठिकाण आहे.) कुवेत युद्धात त्याने अरब जगताचे नेतृत्व केले.

राजघराण्यातल्या वारसांचे वय आणि राजपरिवाराची संमत्ती असे आस्तित्वात असलेले राजाच्या निवडीचे केवळ दोनच निकष अस्विकार करून फाहादने १९९२ मध्ये राजा निवडण्याचे नविन नियम बनवले. त्याप्रमाणे राजाला युवराजाला बरखास्त करण्याचा हक्क मिळाला आणि इब्न सौदचे नातू राजगादीवर बसण्याचा लायक ठरले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे फाहादने १९९५ मध्ये युवराज अबदुल्लाच्या हाती रोजमर्राचा राज्यकारभार चालविण्याचे हक्क दिले. फाहादच्या नेतृत्वाखाली अबदुल्लाने सौदी अरेबियातल्या अंतर्गत बंडाळीला कठोर कारवाया करून चिरडले. कारकिर्दीच्या शेवटच्या काळात फाहादने सौदी अरेबियातिल धार्मिक कर्मठपणाची धार कमी करण्यास सुरूवात केली होती. सौदी सेनादल, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक उद्योगधंद्यांच्या विकासाला फाहादच्या कारकिर्दीत चालना मिळाली. १ ऑगस्ट २००५ ला फाहादच्या मृत्युनंतर युवराज अबदुल्लाला राजा म्हणून घोषित केले गेले, जो सद्याचा सौदी अरेबियाचा राजा आहे. राजा अबदुल्ला तुलनेने उदारमतवादी समजला जातो आणि त्याच्या कारकिर्दीत धार्मिक उदारमतवादाचा सावधगिरीने आणि विकासकामांचा जोमाने पाठपुरावा चालू आहे.

 
अजून एक शंका, सौदीत धर्माबाबत कायदे करण्याचा अखेरचा शब्द राजाचा का मुल्ला-मौलवींचा? कारण इस्लामच्या नियमांनुसार धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकाच व्यक्तीकडे एकवटलेली असते. उदा. खलिफा.
 

सौदी अरेबियात धर्म आणि राजसत्तेचे संबद्ध बर्‍यापैकी क्लिष्ट आणि ऐतिहासिक आहेत. १७४४ मध्ये मुहम्मद इब्न सौदने सर्वप्रथम सौदी टोळ्यांचे एकत्रिकरण सुरू केले. त्याच सुमारास मुहम्मद इब्न अबदुलवहाब नावाचा एक धार्मिक अभ्यासक (religious scholar) त्याकाळच्या सौदी टोळ्यांमध्ये असलेल्या थडग्यांजवळ प्रार्थना करणे, दैवी झाडांची पूजा करणे, इ कर्मठ इस्लामला मान्य नसलेल्या प्रथांमुळे नाराज होता. अब्दुलवहाबच्या कर्मठ इस्लामी आचारविचारांना पुढे वहाबी हे विशेषण मिळाले. या दोघांच्या आपापल्या संघर्षांत; "धार्मिक पाठिंबा राजसत्तेला बळकट करेल" हे इब्न सौदला आणि "राजसत्तेच्या मदतीशिवाय धर्माचे कर्मठ आचरण लोकांत आणणे शक्य नाही" हे अब्दुलवहाबला कळून चुकले होते. त्यामुळे दोघांचा एक करार झाला यात धार्मिक अधिकार वहाबींकडे आणि राजकिय अधिकार सौद घराण्याकडे दिले गेले.

पुढे १९०२ ला अब्दुलझिझ बिन अब्दुलरहमान अल् सौदने (इब्न सौदने) सौदी टोळ्यांचा एकत्रिकरणाला सुरुवात करून १९३२ ला आधुनिक सौदी अरेबियाची स्थापना केली. वहाबी टोळ्यांच्या (यांना इखवान उर्फ ब्रदर्स उर्फ भाऊ असे नाव पडले आहे) सहभागाने इब्न सौदच्या युद्धांना आणि राज्याच्या विस्ताराला धार्मिक अनुष्ठान मिळाले.

मात्र आधुनिक सौदी अरेबियाच्या सीमेबाहेरच्या (ब्रिटिशांशी संरक्षण करार असलेल्या) इराक, कुवेत, ट्रान्स-जॉर्डन इ वर धर्मप्रसाराच्या नावाखाली हल्ला करण्याचे इखवानचे मनसुबे राजकिय दृष्ट्या महाग पडतील हे ओळखून ते इब्न सौदने बळाचा वापर करून मोडून काढले. त्याकरता १९२९ मध्ये सौदच्या फौजेचे आणि इखवानचे (सबिलाचे) युद्धही झाले.

१९३२ पासून देशांतर्गत धार्मिक अधिकार वहाबींकडे आणि आंतरराष्ट्रिय राजकारणावर सौद घराण्याचा अधिकार असा सर्वसाधारण शक्तीसमतोल आहे. आधुनिक सुधारणांच्या वार्‍यांवर वाहत येणार्‍या जागतिक वातावरणाचा प्रभाव सौदी अरेबियावर पडला नसता तरच आश्चर्य. त्यामुळे सत्तसमतोलावर होणार्‍या प्रभावाने निर्माण होणार्‍या समस्या निभावताना दोन्ही गटांना बरीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याबाबत अधिक माहिती या या निबंधात मिळेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...