Wednesday, October 14, 2020

बंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची

  प्रास्ताविक आणि मनोगत :

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दलच्या आणि काही दिवसांपूर्वी 'बंगभोज' ह्या कोलकात्याच्या खाद्ययात्रेविषयी लिहिलेल्या लेखाला भरभरून कौतुक मिळाले. त्यामुळे 'आमार कोलकाता' ही लेखमाला आजपासून क्रमश: प्रकाशित करीत आहे. उपलब्ध प्रवासवर्णनं आणि पर्यटकांच्या दृष्टीपलीकडल्या कोलकाता शहराची जडणघडण, तेथील लोक, समाज, त्यांचा वेगवेगळा आणि सामायिक इतिहास, स्थापत्य-कला-नाटक-सिनेमा-संगीत-भाषा-भूषा-भोजन अशी बहुअंगी ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

तुम्हां गुणिजनांचे अभिप्राय, सूचना, सल्ले आणि प्रतिसाद प्रार्थनीय आहेत.

* * *

आमार कोलकाता - भाग १

IMG_3434.jpg

कोलकाता शहर म्हटले की तुम्हाला पटकन काय सुचतं?

माणसांची प्रचंड गर्दी, हुगळी नदीचे विस्तीर्ण पात्र अन त्यावरचा अनोखा हावडा ब्रिज, क्रिकेटचे ईडन गार्डन, फुटबॉलचे मोहन बागान आणि इस्ट बंगाल क्लब्स, ट्राम, भुयारी मेट्रो, रेल्वे, काळ्या-पिवळ्या जुनाट अँबेसेडर टॅक्सी आणि हातरिक्षा एकसाथ नांदणारे गर्दीचे रस्ते, सत्यजित रॉय - ऋत्विक घटक यांचे बंगाली चित्रपट, देशातील सर्वाधिक जुन्या शिक्षण संस्था, ब्रिटिशकालीन राजेशाही इमारती, मोठाली उद्याने, कळकट्ट झोपडपट्ट्या यापैकी काही गोष्टी डोळ्यांपुढे तरळतात ना? ह्या एका शहराच्या पोटात अनेक शहरं नांदतात. काहीजण शहराला 'सिटी ऑफ जॉय' म्हणतात तर काहींच्या मते कोलकाता हे गचाळ-गलिच्छ आणि गतवैभवावर जगणारे शहर. हे शहर काहींना विद्वानांची-विचारकांची भूमी वाटते तर काहींना निरर्थक वादविवादांमध्ये गुंग असलेल्या ‘स्युडो इंटलेच्युअल’ लोकांचे माहेरघर.

आपल्याच देशातील शहरं, आपलेच लोक ह्यामध्ये आपसात संपर्क, संवाद आणि देवाणघेवाण थोडी कमी आहे. पूर्व भारताशी तर आणखीच कमी. कोलकाता शहराबद्दल आधीच अनेक प्रवाद-पूर्वग्रह, त्यातून उर्वरित भारतीयांप्रमाणे मराठी जनतेचाही इकडे वावर-संपर्क कमी असल्यामुळे हे पूर्वग्रह अधिकच गडद आहेत.

माझं मत विचाराल तर महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन्ही राज्ये काही बाबतीत अगदी भावंडं म्हणावी इतपत सारखी आहेत. समाजसुधारकांची सुदीर्घ परंपरा, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल-मवाळ दोन्ही गटांचे बलिदान, विद्वानांची चिकित्सक वृत्ती, काव्य शास्त्र विनोदात रमणारे सुशिक्षित शहरी लोक, बऱ्यापैकी निष्पक्ष पत्रकारिता, स्थानिक संगीताची एक ठळक वेगळी परंपरा आणि नाटकांचे वेड. अनेक बाबीत सारखेपणा आहे, साम्यस्थळे आहेत. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये होणार ऱ्हास सुद्धा दोन्हीकडे सारखाच आहे. कोलकाता आणि मुंबई शहरांच्या जडणघडणीत देखील अनेक बाबतीत समानता आहे.

इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही. असे जिवंत शहर एका दिवसात आकाराला येत नाही. गंगेसारखी नदी अनेक शतकांचा मैलोनमैल प्रवास करून सागराला जाऊन मिळते तेंव्हा नदीमुखाशी सुपीक गाळ साचतो. गंगेच्या खडतर प्रवासाचं संचितच जणू. ह्याची अनेक आवर्तनं होतात, गाळाच्या थरांची बेटं तयार होतात. यथावकाश निसर्गाची कृपा होऊन दलदल, जंगल, तळी, मानवी वस्ती, शेती, कोळी-दर्यावर्दी, व्यापारी अशी कालक्रमणा होऊन हळूहळू शहर आकाराला येतं. हेच ते कोलकाता, भारतातील जुन्या महानगरांपैकी एक.

आज सुमारे सव्वातीनशे वर्षे वयोमान असलेल्या कोलकाताने काळाचे अनेक चढउतार बघितले आहेत. ब्रिटिश अंमलाखालील भारताची राजधानी असण्याचा प्रदीर्घ सन्मान असो की भारतीय उद्योगजगताची पंढरी असण्याचा अल्पजीवी रुबाब - कोलकाता एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे सर्व बदलांचा निर्लेप मनाने स्वीकार करत असल्यासारखे वाटते. ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून सुमारे चौदा दशकं मानाचे स्थान मिळवलेल्या ह्या शहरातून राजधानी दिल्लीला हलवली ती १९११ साली. त्यानंतर कोलकात्याच्या वैभवाची सोनेरी उन्हं उतरणीला लागली. ‘कलकत्ता’ शहर २००१ पासून 'कोलकाता' झालं, त्यालाही आता बराच काळ लोटला. 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत. बहुतेक वयस्कर बंगाली भद्रलोकांना (‘जंटलमन’ला हा खास बंगाली शब्द - भद्रलोक.) स्वतःच्या इतिहासात रमायला आवडते, त्याबद्दल बोलायला, गप्पा मारायला तर खूप आवडते. स्वतःच्या जुन्या घराबद्दल, संयुक्त परिवाराच्या गोतावळ्याबद्दल, गल्लीतल्या दुर्गापूजेबद्दल, हुगळीच्या घाटाबद्दल, भोजनसंस्कृतीबद्दल, पिढीजात असलेल्या नातेसंबंधांबद्दल ठळक जाणवणारा जिव्हाळा असतो. ज्याला आपण इंग्रजीत ‘हॅविंग सेन्स ऑफ हिस्ट्री’ म्हणतो तो भाव कोलकात्याच्या भद्रलोकांत आढळतो. त्यामुळे काळ पुढे सरकला, बदलला तरी त्यांचं कोलकाता शहर त्यांना परकं होत नाही आणि माझ्यासारख्या उपऱ्यांनाही ते एका हव्याहव्याश्या आकर्षणात बांधून ठेवतं.

बंगाली भाषा-संस्कृतीचा पगडा असला तरी शहर पूर्वापार बहुआयामी आहे. कोण नाही इथं ? स्थानिकांसोबत पूर्व बंगालातून (म्हणजे आताच्या बांगलादेशातून) आलेले बंगाली आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारे चिनी आहेत. पारशी, ज्यू, अर्मेनियन, अफगाणी, अँग्लो-इंडियन, नेपाळी आहेत. देशाच्या अन्य प्रांतातून आलेले मारवाडी, गुजराती, बिहारी, आसामी आहेतच. आता सर्वांनी हे शहर आपले मानले आहे आणि शहराने त्यांना सामावून घेतले आहे. कोलकात्याच्या इतिहासाने जेव्हढे समुदाय बघितले आणि रिचवले आहेत तेव्हढे अभिसरण आशियातील फार कमी शहरात झाले असेल. प्रदीर्घ ब्रिटिश अंमलाचा दृश्य परिणाम शहरावर आहे. पुलॉक स्ट्रीट, ब्रेबॉर्न रोड, कॅनिंग स्ट्रीट, सॉल्ट लेक, ईडन गार्डन स्टेडियम, बाजार स्ट्रीट, एक्सप्लेनेड, रायटर्स बिल्डिंग अश्या इंग्रजाळलेल्या नावांच्या इमारती-रस्ते म्हणजे इथल्या ब्रिटिश राजवटीच्या पाऊलखुणा.

पुण्यसलीला गंगा इथे ‘हुगळी’ आहे. तिचे विस्तीर्ण पात्र, दोन्ही काठांवर दाटीवाटीने वसलेले महानगर आणि तो प्रसिद्ध 'हावडा ब्रिज' हे कोलकात्याचे चित्र जुनेच पण नित्यनूतन आहे.

IMG_2944.jpg

कोलकाता एक नैसर्गिक बंदर आहे. समुद्री मार्गाने व्यापारासाठी एक भरवशाचे ठिकाण असा लौकिक पूर्वापार आहे. भौगोलिक रचनेमुळे गंगा समुद्राला मिळते त्या खाडीमुखातून समुद्री जहाजे आतल्या प्रदेशात हाकारणे सोपे. गंगेच्या विस्तीर्ण पात्रातून देशांतर्गत जलवाहतूक परंपरागतरित्या होत असल्यामुळे बंदर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांना फायद्याचे होते. आजचे कोलकाता शहर आहे त्या भूमीवर इंग्रज व्यापारी पार १६९० सालापासून ये-जा करीत होते. आर्मेनियन, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीझ व्यापारी त्याही आधीपासून. गंगेकाठच्या विस्तीर्ण प्रदेशात बराच व्यापार जलमार्गाने बिनबोभाट चालत होता. ह्यात तो कुप्रसिद्ध अफूचा व्यापारही आला. भारतात पिकलेली अफू विकत घेऊन ती समुद्रमार्गे चीनमध्ये आणि अन्यत्र नेण्याचा उद्योग हुगळीकाठी जोरात होता.

वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सुमारे पाच लाख भारतीय मजुरांना भारताबाहेर सूरीनाम, फिजी, गुयाना, मॉरिशस अश्या अनेक देशात नेण्यासाठी कोलकात्याचे बंदर प्रामुख्याने वापरण्यात आले. विदेशी लोक भारतात येणे आणि भारतवंशीय लोक जगभर विखुरणे - दोन्ही अभिसरणात कोलकात्याच्या वाटा आहे तो असा. भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर खुष्कीच्या मार्गाने किंवा जुन्या रेशीम मार्गाने होणाऱ्या प्राचीन व्यापाराचे आणि अनुषंगिक राजकारण, युद्धे, सामाजिक क्रियाकलापांचे जेवढे दस्तावेजीकरण झाले आहे तेवढे भारताच्या पूर्व भागातल्या व्यापार-राजकारण-समाज विषयांचे झाले नाही किंवा फारसे अभ्यासले गेले नाही. आजही परिस्थिती फार वेगळी नाही, भारतीय पूर्वभाग थोडा उपेक्षित आहे हे उघड आहे. तर ते एक असो.

* * *

आजचे कोलकाता शहर वसण्याची खरी सुरुवात झाली १६९० साली ! ब्रिटिश गोऱ्या साहेबानी सबर्ण रॉयचौधुरी ह्या स्थानिक जमीनदाराला त्याच्या ताब्यातली तीन छोटी गावे भाड्यानी मागितली. भाषेची अडचण आल्यामुळे दुभाषा म्हणून मुर्शिदाबादहून एक माणूस बोलावण्यात आला, चर्चा होऊन भाडे ठरले १३०० रुपये महिना. स्थानिक वस्तीला हात लावायचा नाही ही जमीनदाराची अट ब्रिटिशांनी मान्य केली आणि रिकाम्या जमिनीवर ब्रिटिशांना हव्या त्या इमारती बांधण्याची सूट रॉयचौधुरीनी दिली. भाडेकरार झाला.

दलदलीचा भाग जास्त, त्यामुळे चिखल, साप, डास आणि कीटकांची संख्या प्रचंड. प्यायला शुद्ध पाणी, चांगले रस्ते आणि घरे बांधण्यासाठी लागणारे सामान - सर्व बाबतीत आनंदच होता. त्यात दरवर्षी येणाऱ्या साथीच्या रोगांमध्ये अनेक माणसे दगावत. तरीही एकदा निर्णय घेतला की तो सहसा बदलायचा नाही ह्या ब्रिटिश शिरस्त्याप्रमाणे कोलकाता शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली, हळू हळू वस्ती वाढू लागली. धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच. तस्मात, व्यापाराची मुळे धरू लागली तशा अडचणी कमी वाटू लागल्या. दोन पाच वर्षात एक छोटा किल्ला आणि वखार आकाराला आली.

शतक पालटले. ह्याचसुमारास अर्मेनिया ह्या देशातून आलेले काही श्रीमंत व्यापारी भारताच्या पूर्व भागात व्यापारासाठी चांगल्या बंदराच्या शोधात होते. ते हुगळीच्या दुसऱ्या काठावर जमीन विकत घेते झाले. सधन आर्मेनियन व्यापाऱ्यांना त्यांचा धर्म प्राणप्यारा होता, त्यामुळे लवकरच १७०७ साली त्यांनी हुबळीकाठी स्वतःचे 'होली चर्च ऑफ नाझरेथ' प्रार्थनास्थळ बांधले आणि त्याजवळ वस्ती केली. (हे चर्च सध्याच्या पार्क सर्कस भागात सर्वबाजूनी प्रचंड बांधकामे आणि घनदाट वस्ती असलेल्या भागात एका छोट्या गल्लीत आहे. त्याला आर्मेनियन ‘चर्च’ म्हणतात पण दुरून ही इमारत एखाद्या हिंदू मंदिरासारखी दिसते.)

१७२६ साली ब्रिटिश सम्राट जॉर्ज पहिला (हा ब्रिटिश सम्राट जर्मन होता आणि आजही जर्मनीतच चिरविश्रांती घेतोय) यानी फर्मान काढून कोलकात्याला 'मेयर्स कोर्ट' नियुक्त केले आणि अधिकृतरित्या 'कोलकाता शहर' आकारास आले. आता चिखल वाळवून रस्ते बांधण्यात आले, शौचासाठी थोड्या दूरवर वेगळ्या जागा ठरल्या, कुडाच्या झोपड्या जाऊन पक्क्या चुना-विटांच्या इमारती बांध्याची सुरवात झाली. राजनियुक्त मेयरकडे न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही देण्यात आले.

अफूच्या प्रचंड नफा देणाऱ्या व्यापाराबरोबरच चहा, नीळ, रेशमी वस्त्रे, मसाले, कापूस, मीठ अश्या अनेक भारतीय पदार्थांचा व्यापार कोलकात्यातून चालत असे. ब्रिटिश व्यापारी कोलकात्यातून स्थानिक माल युरोपात विकून गब्बर होऊ लागले तशी त्यांना वखारींसाठी जास्त जागेची गरज भासू लागली. म्हणून अधिकची गावे - जमिनी विकत घेण्यात आल्या. पुढे १७६५ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताचे दिवाणी हक्क मिळाले आणि खऱ्या अर्थाने कोलकात्याचे भाग्य फळफळले. व्यापाराबरोबरच आता करवसुली आणि सत्ता संचालनाचे काम ब्रिटिश साहेबाच्या हाती आले. कर घेतो म्हटल्यावर नागरिकांसाठी सोईसुविधा निर्माण करण्याची आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी आली. यथावकाश १७७३ साली कोलकात्याला ब्रिटिश-इंडियाची राजधानी करायचे ठरले आणि कोलकात्याचे सुवर्णयुग क्षितिजावर दिसू लागले.

ब्रिटिश सत्तेनी कोलकात्याला आपले ठाणे केले आणि इथे व्यापारी उलाढाल वाढली. देशोदेशीचे भारतात ये-जा असलेले व्यापारी कलकत्त्याला खास थांबा घेऊ लागले. शहर भरभराटीला आले तसे अनेक देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वखारी स्थापन केल्या, काहींनी कोलकात्याला वास्तव्य करायला सुरवात केली. ब्रिटिश, डच, फ्रेंच, आर्मेनियन, चिनी असे देशोदेशीचे व्यापारी येऊन वसल्यामुळे बंगाली वळणाचे कोलकाता बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले, ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले. १७०० सालापासून कोलकाता हे पाश्चात्य धाटणीचे शहर म्हणून आकारास येऊ लागले होते, तत्कालीन भारतीय शहरांपेक्षा थोडे वेगळे. (पुढे मुंबई-बॉम्बे आणि चेन्नई-मद्रास ही शहरे पण अशीच विकसित झालीत).

बंगालची फाळणी, बांगलादेशची निर्मिती, व्यापार-रोजगाराच्या संधी आणि शहरीकरणामुळे कोलकात्यात नव्याने येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते. फार काही बोलले-वाचले जात नसले तरी अनेक बाबतीत प्रथमपदाचा मान कोलकाता शहराकडे आहे. भूतकाळात रमलेले, भविष्याकडे आशेने बघत आजचा दिवस आनंदाने साजरा करणारे कोलकाता शहर पुढील भागांमध्ये आपण जवळून बघणार आहोत.

 भद्रलोक म्हणजे gentleman नाही. भद्रलोक या शब्दाला विशिष्ट वर्ण, वर्ग यांचं कोंदण आहे. इंग्रजांमुळे आलेली श्रामंती आणि पाश्चात्य शिक्षण यांमुळे भद्रलोकाचा उदय झाला. बंगालातला प्रबोधनकाळ, विविध समाजांचा, संस्थांचा उदय यांत भद्रलोकाचा सहभाग होता. भद्रलोक ही व्यक्ती नसून एक सामाजिक वर्ग होता.

Gentleman या अर्थी वापरला जाणारा शब्द म्हणजे बाबू. बंगाली समाजातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जाई. समाजात वजन राखणार्‍या पुरुषांसाठीचा हा शब्द नंतर कारकुनांसाठी वापरला जाऊ लागला.

 

झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई. ‘व्यापारी’ म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतात 'शासक' म्हणून पाय रोवायला कारणीभूत ठरलेली ही लढाई. ह्या लढाईचा कोलकात्याशी महत्वाचा संबंध असल्यामुळे त्याबद्दल थोडे :-

जुनी शहरं म्हणजे एखादा किल्ला, लष्करी छावण्या आणि त्यालगत व्यापारी-निवासी पेठा. जगातील सर्व जुन्या शहरांचे स्वरूप साधारणतः असेच आहे. वर्ष १६९६ ते १७०० ह्या कालावधीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकात्यात फोर्ट विल्यम हा किल्ला आणि व्यापारी वखार बांधली. कंपनीकडे स्वसुरक्षेसाठी असलेले सैन्यदल ह्या भागात राहायला आले. त्याच सुमारास हुगळीच्या दुसऱ्या काठावर 'अर्मेनिया' ह्या देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वस्ती केली. अर्मेनियन व्यापाऱ्यांना भारत नवा नव्हता, ते मोगल बादशाह अकबराच्या काळापासून भारतात व्यापार करत होते. कोलकात्याला येण्याआधी आग्रा, दिल्ली, सुरत अशा शहरात अर्मेनियन व्यापाऱ्यांचा बऱ्यापैकी जम बसलेला होता.

img.jpegफोर्ट विल्यम आणि त्यालगतच्या वखारींचे एक चित्र

त्यावेळी बंगाल प्रांताची राजधानी होते मुर्शिदाबाद (आणि त्याहीआधी जहांगीरनगर /ढाका). मोगल काळापासून बंगाल प्रांत श्रीमंत गणला जाई. तत्कालीन बंगालचा आकारही अवाढव्य होता - आजचा बंगाल, बांगलादेश, बिहार, आसाम आणि ओरिसाचा काही भाग मिळून 'बंगाल सुभा' आणि सुमारे ७ लाख लोकवस्तीचे मुर्शिदाबाद शहर सुभ्याची राजधानी अशी रचना. मोगलांचा प्रतिनिधी बंगालचा नवाब मुर्शिदाबाद शहरातून राज्यकारभार हाकत असे. मोठे शहर असल्यामुळे डच, अर्मेनियन, फ्रेंच आणि मारवाडी व्यापारी तिथे आधीच होते. त्यात इंग्रजांची भर पडली.

अन्य व्यापाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाकांक्षी असलेल्या इंग्रजांनी बंगाल आणि एकूणच भारतीय पूर्वकिनाऱ्यावर व्यापारविस्तारासाठी एका नावाजलेल्या अर्मेनियन व्यक्तीची मदत घेतली. त्याचे नाव खोजा इझ्राएल सरहद. एक श्रीमंत व्यापारी आणि दानशूर व्यक्ती म्हणून तो प्रसिद्ध होता. मोगलांच्या विलासी राहणीला अनुकूल असे जिन्नस खास आयात करून ते मोगल दरबारी विकणे हा त्याच्या कामाचा भाग होता. ह्यामुळे मोगल दरबारातील अमीर-उमराव आणि मोगल शहजाद्यांशी त्याची जवळीक निर्माण झाली. त्याचे मोगलांशी संबंध इतके प्रगाढ होते की बंगाल प्रांतात व्यापारवृद्धीची इच्छा धरून असलेल्या ब्रिटिशांनी खोजा सरहदला आपला दूत म्हणून मोगल दरबारात रदबदली करण्याची गळ घातली. १६९८ च्या सुरवातीला ब्रिटिशांचा विशेष दूत म्हणून सरहद तत्कालीन मोगल बादशहा अझीम-ऊस-शानला (औरंगझेबाचा नातू) भेटला आणि ब्रिटिशांना हुगळी येथे वखार स्थापन करून भारतात व्यापार करण्याची मुभा देणारे शाही फर्मान त्याने मिळवले. मदतीची परतफेड म्हणून ब्रिटिशांनी नवीन वसवलेल्या कोलकाता शहरात सरहदला व्यापार वाढवण्यासाठी पूर्ण मोकळीक आणि सहकार्य देऊ केले. ब्रिटिश व्यापाऱ्यांना मिळालेल्या 'फर्माना'नुसार त्यांना बंगाल सुभ्यात जकातमुक्त व्यापार करता येणार होता. पुढची पन्नास वर्षे जकातमुक्त व्यापारामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी भरपूर पैसा कमावला. बंगालच्या वैभवाला अक्षरश: ओरबाडले.

१७१७ पासून बंगालच्या नवाबांनी दिल्लीश्वर शासकांना महत्व देणे बंद करून स्वतंत्रपणे शासन करणे सुरु केले होते. ब्रिटिशांचे वाढते वैभव, त्यांच्या पगारी फौजांची सतत वाढती संख्या आणि अरेरावीचा व्यवहार बंगालच्या नवाबाला रुचत नव्हते. जकातमुक्त व्यवहाराचे फर्मान अहस्तांतरणीय होते पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अधिक लाभासाठी स्थानीय व्यापाऱ्यांनासुद्धा 'दस्तक' (परवाना) भाड्याने द्यायला सुरुवात केली. त्याने नवाबच्या महसुलाचे मोठे नुकसान होऊ लागले. नवाबाने ईस्ट इंडिया कंपनीला बंगालात सैन्य आणायला बंदी केली, ती पाळण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सपशेल नकार दिला. लवकरच ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यात वरचेवर खटके उडू लागले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कोलकात्यात किल्ला आणि फौज असणे नवाब सिराजउद्दौला याला धोक्याचे वाटत होते. त्याने जून १७५७ मध्ये कोलकात्याच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि फोर्ट विल्यम ताब्यात घेतला. ह्या कृतीमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी निर्णायक लढाई लढली - प्लासीची लढाई. रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वात ब्रिटिश सैन्याने नवाब सिराजउद्दौलाचा सपशेल पराभव केला. नवाबाचा फितूर सहकारी ‘मीर जाफर’ याला कळसूत्री नवाब म्हणून मुर्शिदाबादच्या गादीवर बसवून बंगाल सुभ्याच्या सत्तेची पूर्ण सूत्रे ब्रिटिशांनी स्वतःच्या हाती घेतली.

प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांना कोलकात्याजवळ एका मजबूत सैनिक ठाण्याची गरज जाणवली. नवीन फोर्ट विल्यमचा विस्तार आणि आजच्या 'बराक' भागाचे बांधकाम ह्याचवेळी अस्तित्वात आले. लॉर्ड क्लाइव्हने लढाई संपल्याबरोबर ह्या बांधकामासाठी कॅप्टन जॉन ब्रॉहीअर ह्या वास्तुविशारदाला कामाला लावले. ब्रॉहीअरने नवीन अष्टकोनी फोर्ट विल्यमच्या आरेखनाचे आणि बजेट तयार करण्याचे काम केले. पण प्रत्यक्ष काम सुरु होण्यापूर्वी त्याच्यावर पैशाच्या अफ़रातफरीचे आरोप झाले आणि तो भारत सोडून निघून गेला. बांधकाम करून विस्तारित ठाणे स्थापन करायला १३ वर्षे लागलीत आणि सुमारे २० लाख ब्रिटिश पौंड एवढा खर्च आला.

48785875103_58efb01e98_c.jpgविस्तारित 'नवीन' फोर्ट विल्यमचे एक चित्र

ह्या नवीन फोर्ट विल्यमने ब्रिटिश कोलकात्याचा चेहेरामोहरा बदलला. पंधरा हजार ब्रिटिश सैन्य आणि सुमारे १०० ब्रिटिश अधिकारी ह्या भागात राहायला आले, त्यामुळे सभोवतालच्या भागाला ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले. कोलकात्याच्या हृदयस्थळी असलेल्या ह्या भागाचे अनोखे वैशिट्य म्हणजे हिरवेकंच 'मैदान' ! एकूण क्षेत्रफळ १२०० एकर ! नगरनियोजन हे शास्त्र आहे त्यापेक्षा जास्त एक कला आहे. ब्रिटिश कोलकात्याच्या शहर नियोजनात हा कला आणि शास्त्राचा संगम सुरेख जुळून आलेला दिसतो. 'मैदान' भागाच्या भव्यतेचे मूळ फोर्ट विल्यमच्या विचारपूर्वक केलेल्या आरेखनामध्ये आहे. किल्ला प्रमुख ब्रिटिश सैनिक ठाणे म्हणून स्थापन झाला की मग त्याचे संरक्षण करण्यासाठी तोफा-बंदुका आल्या. तोफा झाडताना चुकून जीवितहानी होऊ नये म्हणून किल्ल्यासमोरचा मोठा भाग मोकळा करून तेथे मैदान योजण्यात आले आणि मैदानाच्या परिघाबाहेर अन्य वस्ती अस्तित्वात आली. ते पुढच्या सर्व राज्यकर्त्यांनी तसेच कायम ठेवले. आता त्यातील बऱ्याच भागाचे वेगवेगळ्या कामांसाठी लचके तोडल्यानंतर आजही हे मैदान भव्यच दिसते त्यात आश्चर्य ते काय ?

48785876133_3893ea6d79_z.jpgकोलकात्याचे सुप्रसिद्ध 'मैदान'

आजचे कोलकाता बकाल शहर नाही असे कोणी म्हणणार नाही. पण जे मूळचे कोलकाता ब्रिटिशांनी वसवले त्याचा बराच भाग अनेक दशकांच्या पडझडी आणि आबाळ-अनास्थेला तोंड देऊनही नगरनियोजनाच्या तत्त्वांनुसार आजही नियोजनबद्ध आहे, सुंदर, सौष्ठवपूर्ण आहे.

* * *

प्लासी युद्धानंतर मुर्शिदाबादचे महत्व संपुष्टात येऊन सत्तेचे केंद्र कोलकात्याला सरकू लागले. तोवर ब्रिटिश ताब्यातल्या 'बंगाल प्रेसिडेंसी'चा आकार बराच वाढला होता. काही दशकाचा काळ संरक्षण आणि व्यापारावर भर दिल्यानंतर सत्तेत स्थिरावतांना स्थानिक कारभारात आणि महसुली अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी ब्रिटिशांना स्थानिक भाषा आणि कायदे समजून घेण्याची गरज भासू लागली. तत्कालीन बंगाल सुभ्यात बहुतांश प्रदेशात शासकीय कायदे, महसूल आणि मालकीहक्क दर्शवणारी कागदपत्रे उर्दू, अरेबिक, पर्शिअन भाषेत असत. बरेचसे कायदे मौखिक असत, धर्मानुसार वेगवेगळे असत. स्थानिक पंडीत आणि मौलवी परंपरागत कायदे, धार्मिक नियम आणि सामाजिक व्यवस्था समजून घेण्यात ब्रिटिशांना मदत करत.

48786393277_56749a2045_z.jpgब्रिटिश ताब्यातला 'बंगाल प्रेसिडेंसी'चा नकाशा

मौलवी आणि काझी यांच्याकडून स्थानिक मुस्लिम तरुणांना आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना भाषा आणि परंपरागत कायद्याचे शिक्षण देण्यासाठी लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स याच्या पुढाकाराने कोलकात्यात ब्रिटिशांनी पहिले शिक्षण केंद्र सुरु केले १७८०-८१ साली - त्याचे मूळचे जुने नाव 'मदरसा-ए- आलिया' पण ब्रिटिश सरकारी कागदपत्रात इस्लामिक कॉलेज किंवा 'कलकत्ता मदरसा' असाच उल्लेख सापडतो. (१७९२ साली काशीला बनारस संस्कृत विद्यालय सुरु करण्यात आले.) विद्यार्थ्यांना 'काझी' / न्यायाधीश म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देणे हा कलकत्ता मदरसाचा मुख्य उद्देश आणि उर्दू,, अरेबिक, पर्शियन या भाषांचा आणि शरिया कायद्यांचा अभ्यास असा अभ्यासक्रम. उत्तम इमारत बांधण्यात, योग्य प्रशिक्षक आणि शिक्षक नेमण्यात लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्सने पुढाकार घेतला. त्याचा परिपाक म्हणून अनेक विद्वान आणि तज्ञ प्रशासक ह्या संस्थेतून तयार झाले. पुढे दोनदा स्थलांतर झाले आणि आज ते आलिया युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते.

48786241751_6bb91ba885_z.jpgआलिया विद्यापीठ - जुनी इमारत

कलकत्ता मदरसा नंतर कोलकात्यात इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या उभारणीची मालिकाच सुरु झाली. १८०० साली ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंगाली भाषा शिकवण्यासाठी फोर्ट विल्यम ‘कॉलेज ऑफ कलकत्ता’ सुरु झाले. बंगाली भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालयं आलीत. यथावकाश वैद्यकीय महविद्यालय, मुलकी प्रशिक्षण संस्था, कायदा शिक्षण आणि भाषांतरकरांच्या प्रशिक्षणासाठी संस्था अशी मोठी मजल कोलकात्यानं गाठली. व्यापारी आणि स्थानिक कारभार चालवण्यासाठी बंगाली भाषेची गरज ओळखून जे इंग्रजी-बंगाली शब्दकोश छापण्यात आले. १८०० ते १८५० ह्या कालावधीत अनेक प्रसिद्ध शिक्षण संस्था शहरात स्थापन झाल्या. सेरामपूर कॉलेज नुकतेच २०० वर्षाचे झाले आहे. शहरातील प्रसिद्ध स्कॉटिश चर्च कॉलेजिएट स्कूल, सेंट जोसेफ, सेंट ऍंथोनी, कलकत्ता बॉईज स्कूल, कलकत्ता गर्ल्स स्कूल, राधाकांत देब यांचे हिंदू स्कूल, लॉरेटो स्कूल, सेंट जेम्स, सेंट थॉमस अशा कितीतरी शिक्षणसंस्था शंभर ते दीडशे वर्ष जुन्या आहेत. त्यांच्या भव्य मजबूत देखण्या इमारती, तेथे शिकवणारे शिक्षक आणि शिक्षण घेतलेले कर्तृत्ववान विद्यार्थी कोलकात्याचे भूषण आहेत.

इंग्रजांनी पुढाकार घेऊन त्यांच्या पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले त्यामुळे त्यांचा अपेक्षित फायदा झालाच पण हे इंग्रजी शिक्षण कोलकात्याच्या स्थानिकांना फार मानवले. कोलकात्यात शिकून उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. बंगालीबरोबरच इंग्रजी भाषा आणि ब्रिटिश संस्कृती स्थानिकांनी आपलीशी केली. त्याचा फार मोठा प्रभाव कोलकाता शहरावर पडला, त्याबद्दल पुढील भागात.

(क्रमश:)


48835698082_06aee965ef_b.jpg
हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.

१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले. एतद्देशीय शासकांचे वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी खच्चीकरण करून त्यांना मांडलिक बनवण्यात आले, काहींचे पूर्ण राज्यच खालसा करून तेथे कंपनीचा थेट अंमल सुरु झाला. १८१८ साली मराठी सत्तेचे शेवटचे आव्हान संपुष्टात आले आणि पूर्ण भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची एकहाती सत्ता स्थापन झाली. भारतात लुडबुड करणाऱ्या अन्य युरोपीय वसाहतवाद्यांना त्यांनी तोवर आवर घातला होता. आता भारतातील सर्वशक्तिमान सत्ताकेंद्र म्हणून फारसे आव्हान कंपनीपुढे राहिले नाही.

कंपनीची ताकद प्रचंड पटीत वाढली, कोलकाता त्यांच्या राजधानीचे शहर असल्यामुळे त्याच पटीत शहराचे महत्वही वाढले. गव्हर्नर जनरल, मोठे मुलकी आणि सैन्याधिकारी, श्रीमंत व्यापारी, स्थानिक मांडलिक राजे-जहागीरदार यांची भव्य निवासस्थाने कोलकात्यात स्थलांतरित झाली. तालेवार सावकारी आणि व्यापारी पेढ्या, नाणी पाडण्याची टाकसाळ, सरकारी कोषागार आणि लेखागार, न्यायालय, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालये यांनी शहर सजले. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आणि सुरक्षा पुरवणाऱ्या लोकांची वस्तीही आपसूकच वाढली.

ही वर्षंशंभरी बंगाल प्रांतासाठी आणि विशेषतः कोलकाता शहरासाठी प्रचंड धामधुमीची आणि सामाजिक बदलांची ठरली. ह्या काळात कलकत्ता मदरसा (१७८१), एशियाटिक सोसायटी (१७८४) आणि फोर्ट विल्यम कॉलेज (१८००) अशा नामवंत संस्था कोलकात्यात स्थापन झाल्या आणि भरभराटीला आल्या. स्थानिकांबद्दल फार ममत्व निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांना आपल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी ब्रिटिश सत्ता पुढे सरसावली असा मामला नव्हता. ब्रिटिशांना आपले शासन व्यवस्थित चालवण्यासाठी स्थानिक लोकांची गरज होती. सुरवातीला काही दशकं शिक्षण व्यवस्था दुपेडी होती - ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षकांनी स्थानिक भाषा आणि कायदेकानू शिकवणे आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्थानिकांना शासनतंत्रासाठी योग्य असे प्रशिक्षण देणे अशी एकमेकांना पूरक व्यवस्था. त्यासाठी एतद्देशीय भाषांचा अभ्यास गरजेचा होता. संस्कृत, अरेबिक, पर्शियन, बंगाली, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषांचे विद्वान शिक्षक कोलकात्याच्या शाळा-विद्यालयांमध्ये काम करू लागले. बंगाली स्थानिकजन इंग्रजी भाषा शिकले. याकाळात अक्षरशः शेकडो पुस्तके, ग्रंथ आणि शासकीय कागदपत्रे अन्य भाषांमधून इंग्रजी आणि बंगालीत भाषांतरित करण्यात आलीत, त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांची मोठी जमात कोलकात्यात तयार झाली. १७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती ! यावरून विषयव्याप्तीचा एक अंदाज यावा.

कंपनी सरकारसाठी सरकारी आणि महसुली कागदपत्रांची हाताळणी करणाऱ्या लेखनिकांची आणि कारकुनांची संख्या तर प्रचंडच वाढली. ह्या मंडळींना काम करण्यासाठी शहरात २५ एकर क्षेत्रफळाच्या ‘लाल दिघी’ तळ्याकाठी भव्य 'रायटर्स बिल्डिंग' बांधण्यात आली. ही कोलकात्यातील पहिली ३ मजली इमारत. त्यावेळच्या काही ब्रिटिश प्रवासी अधिकाऱ्यांनी इमारतीचे डिझाईन गचाळ आणि ओबडधोबड असल्याची टीका केली आहे, गुरांच्या गोठ्याशी तुलना करायलाही कमी केले नाही. पण राज्यकर्त्यांची पसंती रायटर्सला सदैव लाभली आहे. ब्रिटिश सत्तेच्या वाढत्या वैभवाला अनुकूल असे बदल वेळोवेळी घडून रायटर्स बिल्डिंग एक इमारत राहिली नसून १३ वेगवेळ्या इमारतींचा समूह झाला आहे. बदलली नाही ती रायटर्सची 'सरकारी मुख्यालय' म्हणून असलेली वट आणि इमारतीचा लाल रंग !

आज २४० वर्षांनंतर रायटर्स बिल्डिंग मध्ये पश्चिम बंगाल सरकारचे मुख्यालय आहे. सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून रायटर्सचे स्थान आजही अबाधित आहे.

48835154783_a92bd966a5_z.jpgसुप्रसिद्ध 'रायटर्स बिल्डिंग' कोलकाता.

कंपनीची सत्ता जसजशी मजबूत होत होती तसे तसे ब्रिटन आणि युरोपच्या अन्य भागातून अधिक लोक नशीब काढण्यासाठी कोलकात्यात दाखल होऊ लागले. त्यात व्यापारी होते, शिक्षक होते, धर्मप्रचारक, कलाकार, सैनिक, हौशी प्रवासी - पर्यटक सगळेच होते. त्यातलाच एक विल्यम करे (William Carey). १७९३ मध्ये तो ख्रिती धर्मप्रसारक म्हणून कोलकात्याला आला आणि इथलाच झाला. त्याने बायबलचा पहिला बंगाली अनुवाद केला आहे. (त्याला बायबलच्या प्रथम मराठी अनुवादासाठीसुद्धा ओळखले जाते.) विल्यमने उडिया, असामी आणि संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवले आणि इंग्रजी आणि बंगालीसोबत ह्या अन्य भाषा शिकवणासाठी सेरामपूर कॉलेज स्थापून तेथे अनेक वर्षे अध्यापन केले. बहुभाषाकोविद विल्यमने बंगाली लिपीचे प्रमाणीकरण, बंगाली व्याकरणाची आधिकारिक नियमावली आणि बंगाली-इंग्रजी शब्दकोश सिद्ध करण्यात पुढाकार तर घेतलाच पण स्थानिक दर्जेदार साहित्याचा सखोल अभ्यास करून इंग्रजीत अनुवादही केला. रामायणासारख्या महाकाव्याचा इंग्रजीत आणि बायबलचा अनेक भारतीय भाषा आणि बोलीभाषांमधे अचूक अनुवाद करण्याच्या कामांमध्ये मोठे योगदान दिले. विल्यमने कोलकात्यात स्थापन केलेले सेरामपूर कॉलेज 'लेखी पदवी' देणारी आशियातील पहिलीवहिली शिक्षणसंस्था म्हणून प्रसिद्ध झाले. शिक्षक आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक म्हणून त्याने मोठा लौकिक मिळवला. कोलकात्यात पहिला छापखाना सुरु करून रोमन, देवनागरी आणि बंगाली लिपीत साहित्य प्रकाशित करण्याची मुहूर्तमेढ रोवली. विल्यमची कर्मभूमी असलेला कोलकात्याच्या भाग आज सेरामपूर युनिव्हर्सिटी नावाने ओळखला जातो.

48835699947_1b0aa75668_n.jpgसेरामपूर युनिव्हर्सिटीची दोनशे वर्षे जुनी इमारत, कोलकाता.

पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण आणि देशविदेशातील विद्वान शिक्षकांचा संपर्क ह्यामुळे कोलकात्यातील समाजजीवन आमूलाग्र बदलले. पारंपरिक विद्याभ्यास करणारे शेकडो भारतीय लोक ब्रिटिश शासनप्रणीत संस्थांशी जोडले गेले. इंग्रजी भाषा आत्मसात करून अधिक ज्ञान मिळवण्यासाठी अनेकजण विलायतेत शिकायला गेले. तत्कालीन ब्रिटिश / युरोपीय विचारसरणीचा आणि जीवनपद्धतीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तेथून कोलकात्यात परत आल्यावर अनेकांनी अध्ययन-अध्यापन-संशोधनाचे काम हाती घेतले. ह्या संवादामुळे कोलकात्याच्या अभिजनांना नवीन संकल्पनांची तोंडओळख जलद गतीने झाली. राज्यकर्त्यांची भाषा असल्यामुळे इंग्रजीला अधिकच मान मिळाला तरी बंगाली भाषेचे महत्व काही कमी झाले नाही. संवादाची भाषा म्हणून समाजात इंग्रजीसोबत बंगाली भाषेलाही प्रतिष्ठा मिळत राहिली. बंगाली-इंग्रजी शब्दकोश आणि बंगालीत भाषांतर झालेल्या उत्तमोत्तम पुस्तकांनी बंगाली भाषकांना मातृभाषेतून नवीन विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. १८१३ पासून कोलकाता आणि जवळपासच्या भागात अर्मेनियन, डच आणि ब्रिटिश ख्रिस्ती धर्मगुरूंचा ओघ वाढला. त्यांनीही स्थानिकांशी संबंध वाढवण्यावर जोर दिला. बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर झाले आणि चर्चमधल्या प्रार्थना बंगालीत करायला सुरुवात झाली.

मागील भागात सांगितल्याप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या मिशनरी शाळांची मोठी मालिका कोलकाता शहरात स्थापन झाली. ह्या मिशनरी शाळांमध्ये होणारे ख्रिस्ती धर्माचे गुणगान पसंत नसलेल्या काही स्थानिक धनपतींनी हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या इंग्रजी आणि बंगाली शिक्षण संस्थांची स्थापना केली. पारंपरिक भारतीय ज्ञानवारसा न सोडता आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे असा त्यांचा प्रयत्न. ओरिएंटल सेमिनरी ही अशीच एक विख्यात संस्था. सरकारी किंवा चर्चचा हस्तक्षेप अजिबात न होऊ देता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

48835527376_5210785651_b.jpgओरियंटल सेमिनरीची इमारत, कोलकाता.

ह्याचवेळी ब्रिटन-युरोपमध्ये पहिल्या उद्योगक्रांतीला (१७६०-१८४०) लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रचंड पुरवठा करणाऱ्या भारतीय भूभागातील प्रमुख बंदर म्हणून कोलकात्याने एक आगळीवेगळी औद्योगिक-व्यापारी क्रांती अनुभवली. सहभाग फक्त कच्च्या मालाच्या पुरवठ्यापर्यंतच सीमित असला तरी विदेशी व्यापाऱ्यांबरोबरच देशी जमीनदार आणि व्यापारीसुद्धा त्यात उतरले. एकमेकांशी स्पर्धा करत, भांडत, जुळवून घेत एकमेकांचा वापर करून श्रीमंत झाले. राज्यकर्ते आणि धनको-सावकार-व्यापारी यांच्या परस्पर गरजेतून १८०६ साली 'बँक ऑफ कलकत्ता' शहरात स्थापन झाली. शहरात १७५७ सालीच नाणी पाडण्यासाठी ब्रिटिश टाकसाळ 'मिंट ऑफ कलकत्ता' उभारण्यात आली होती, पुढे ३३ वर्षांनी इंग्लंडमधून मागवण्यात आलेल्या नवीन यंत्रांनी मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्याचे काम सुरु झाले. १८२९ सालापासून नवीन भव्य इमारतीतून दररोज ६ लाख नाणी पडणारी व्यवस्था क्रियान्वित झाली. (ही देखणी इमारत मात्र बेल्जियममधल्या जुन्या कापड बझाराची हुबेहूब नक्कल आहे.) कोलकात्यात ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यांच्या मालकांना विम्याची हमी देण्यासाठी भारतातील पहिलीवहिली विमा कंपनी 'ओरियंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी' स्थापन झाली (१८१८). मालाची साठवणूक आणि खरेदी-विक्री यासाठी 'कमोडिटी एक्सचेंज' आणि लिलावाच्या खास सोई-सुविधा शहरात निर्माण करण्यात आल्या. या सर्व व्यापात स्थानिकांच्या हातातही पैसा आला.

कोलकाता शहराची ब्रिटिश 'व्हाईट टाऊन' आणि उरलेले 'नेटिव्ह ब्लॅक टाऊन' अशी सुरवातीला झालेली विभागणी जाऊन हळूहळू स्थानिक जमीनदार आणि धनिकांचे महाल आणि व्हाईट टाऊनच्या राजेशाही इमारती यांची सरमिसळ झाली. ह्या भव्य महालांनी कोलकात्याला 'सिटी ऑफ पॅलेसेस' अशी ओळख मिळवून दिली. अनेकविध देशातून, वेगवेगळ्या समाजातून आलेल्या लोकांच्या आणि त्यांच्या संस्कृतींच्या अभिसरणातून कोलकात्याच्या स्वतःचे असे व्यक्तिमत्व तयार झाले. आपसात चर्चा-संवाद आणि प्रसंगी वादविवाद करणे कोलकात्याच्या संस्कृतीत रुजले. चर्चा - संवाद -वादविवाद करणे हा शहराचा गुण जुनाच.

यथावकाश ब्रिटिश विचारांचा पगडा असणारा, त्यांच्याच पद्धतीचे जीवन जगू इच्छिणारा, स्थानिक भाषा आणि संस्कृती समजणारा, नोकरी-व्यापारउदीम करून श्रीमंत झालेला असा इंग्रजी भाषक अभिजनांचा एक वेगळा वर्ग कोलकात्यात निर्माण झाला. काहींच्या मते असा 'ब्राऊन साहेब' वर्ग आजही शहरात आहे.

एक मात्र खरे. कोलकात्याच्या ह्या इंग्रजाळलेल्या बंगाली भद्राजनांनी खऱ्या अर्थाने 'बंगालेर नबोजागरण' म्हणजे सर्व क्षेत्रात बंगालच्या नवजागरणाचा सूत्रपात केला - त्याबद्दल पुढच्या भागात.

(क्रमशः) 

८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता

48869151587_f96d025668_z.jpgचित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.

जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले. कोलकाता शहर त्या व्यक्तीला नवे नव्हते, पण शहरात नेहमीसाठी वास्तव्याला येण्याचे महत्व वेगळे होते. ह्या साध्या घटनेचा परिणाम मात्र मोठा झाला. पुढे उणीपुरी वीस वर्षे ती व्यक्ती जगली पण तत्कालीन कोलकाता शहर आणि बंगालच नव्हे तर भारत आणि जगावर आपला प्रभाव पाडू शकली.

48869092736_5e534f063a.jpgचित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.

* * *

इंग्रजी भाषा, पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण आणि दीर्घ सघन जागतिक संपर्क ह्या तीनही मुद्द्यांना अन्य भारतापेक्षा बंगाल प्रांत आधी सामोरा गेला. गोपाळ कृष्ण गोखल्यांचे एक विधान प्रसिद्धच आहे - What Bengal thinks today, India thinks tomorrow.’

राष्ट्रवादी विचारांची आणि सामाजिक सुधारणांची आंदोलने, साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात नवनवीन कल्पनांचा उदय, नव्या विचारांची, साहित्याची सतत पडणारी भर आणि देशोदेशीच्या विचारकांचा-कलाकारांचा दीर्घमुक्कामी मेळा असा समाजाला नवचेतनेची ऊर्जा देणारा सुमारे शंभर वर्षांचा बहारदार काळ (१८१४- १९१९) 'बांगला नवजागरणाचा' काळ म्हणून ओळखला जातो. ह्या काळात बंगालच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक जीवनात मोठे बदल झाले. ह्या काळात झालेल्या वेगवान बदलांचा बंगालवर आणि एकूणच बंगाली समाजमनावर दीर्घकालीन प्रभाव पडला. अस्पृश्यता, जातीप्रथा, बालविवाह, सतीप्रथा अश्या अनेक चुकीच्या धार्मिक प्रथापरंपरांविरुद्ध प्रश्न उपस्थित करणारी, त्याला चहुअंगी आव्हान देणारी उच्चविद्याविभूषित भद्रलोकांची रुढीभंजक पीढी उदयाला आली. सामाजिक बुरसटलेपणाला वैचारिक तडा देणारे, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले अनेक विद्वान, विचारक आणि सुधारक नवजागरणाच्या काळाने बघितले. सुरुवातीला बंगालचे नवजागरण म्हणजे फार मोठे जनआंदोलन असे नव्हते. त्याचे स्वरूप उच्चशिक्षित, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय समाजाने आपल्या सभोवताली असणाऱ्या अन्यायकारक प्रथापरंपरांकडे डोळसपणे पाहणे आणि त्यांचा सनदशीर मार्गांनी विरोध करणे इथवरच सीमित होते, थोडेसे इटालियन रिनेसाँ सारखे. पण पुढे ह्या नवजागरणाने अनेक खऱ्याखुऱ्या आंदोलनांना जन्म दिला. ह्या नवजागरणातच भारतीय राष्ट्रवादाची सुप्त बीजे होती असे अभ्यासकांचे मत आहे.

नवजागरणाचा पाया रचणाऱ्यांमध्ये 'ओरिएंटॅलिस्ट' म्हणून ओळखल्या जाणारी विल्यम जोन्स, विल्यम करे, कोलब्रूक, एच एच विल्सन, रामकोमल सेन, जेम्स प्रिंसेप यासारखी विचारक - अभ्यासक - तत्वज्ञ मंडळी आघाडीवर होती. पण नवजागरणाची खरी धुरा वाहिली कोलकात्याच्या बंगाली भद्रजनांनी. ब्राम्हो समाजाचे धुरीण राजा राममोहन रॉय (१७७५-१८३३) आणि गुरु रविंद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) ह्या दोन बंगाली महारथींच्या हाती ह्या नवजागरण काळाची दोन टोके आहेत असे म्हणता येते. अर्थात त्यामुळे केशबचंद्र सेन, मानवेंद्रनाथ रॉय, बंकिमचंद्र चॅटर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, बिपीनचंद्र पाल, मायकल मधुसूदन दत्त आणि अश्याच अन्य महनीय व्यक्तींचे योगदान तसूभरही कमी होत नाही.

बंगाल नवजागरणाच्या एकूण काळाचे साधारण पाच ठळक भाग करता येतात :-

१८१४ ते १८३३ - ह्या काळाचे निर्विवाद नायकत्व राजा राममोहन रॉय ह्या असामान्य व्यतिमत्वाचे!
१८३३ ते १८५७ - राममोहन रॉय निवर्तल्यानंतर १८५७ च्या 'गदर' पर्यंत
१८५७ ते १८८५ - 'गदर' ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत
१८८५ ते १९०५ - काँग्रेस स्थापनेपासून बंगालच्या फाळणीपर्यंत
१९०५ ते १९१९ - बंगालच्या फाळणीपासून ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनापर्यंत.

कोलकाता शहर ही नवजागराची पंढरी, अनेक दीर्घप्रभावी घटनांचा रंगमंच ! ‘८५ अँमहर्स्ट स्ट्रीट कोलकाता’ ह्या पत्त्यावर राजा राममोहन रॉय राहायला आले आणि ह्या जागेला एक वलय प्राप्त झाले. राममोहनांचे मूळ गाव हुगळी जिल्ह्यातले राधानगर. कुटुंब सनातनी विचारांचे. तत्कालीन परंपरेप्रमाणे त्यांनी लहानपणी बंगाली आणि संस्कृत भाषेचे जुजबी शिक्षण घेतले. संस्कृतमध्ये चांगली गती असल्याकारणाने त्यांना पाटणा आणि वाराणसीला वेदाध्ययनादी शिक्षणासाठी पाठवण्यात आले. ह्याच कालावधीत इंग्रज आणि फारसी विद्वानांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी अन्य भाषांमध्ये असलेले ज्ञानही मिळवले. दिल्लीचा बादशाह अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली. तरुण राममोहन रॉय संस्कृत, हिंदी, इंग्रजी, अरबी, फारसी तर शिकलेच, पुढे हिब्रू आणि ग्रीक भाषा सुद्धा त्यांनी आत्मसात केली. पौर्वात्य ज्ञानपरंपरा आणि पाश्चात्य चिकित्सावृत्ती यांचा मिलाफ म्हणजे राममोहन रॉय असे म्हटले जाते. विचारांची प्रखरता आणि ठाम तर्कसंगत विवाद करू शकण्याची कला यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यांचे (त्याकाळी क्रांतिकारी वाटणारे) विचार न पटणाऱ्या समाजाकडून त्यांना तीव्र विरोध सुद्धा होऊ लागला. सगळ्यात पहिला मुद्दा होता तो मूर्तिपूजा नाकारण्याचा. रॉय मूर्तिपूजेच्या विरोधात होते आणि मूर्तिपूजा वेदसंमत नाही ह्यावर ठाम होते. ह्या विषयावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तिका तयार करून त्याचे वितरण चालवले त्यावेळी त्यांचे वय होते १५-१६ वर्षे. तत्कालीन विद्वानांना हे अजिबात पटले नाही. मूर्तिपूजेच्या विरोधातील त्यांच्या प्रचारामुळे अनेक लोक दुखावले, त्यात त्यांचे नातेवाईकही होते. त्यांना खुद्द त्यांच्या घरातून निष्कासित करण्यात आले. निष्कासनाचा सदुपयोग करत त्यांनी प्रदीर्घ देशाटन केले. इराण, नेपाळ, तिबेट पर्यंत प्रवास करून देशोदेशीच्या विद्वानांशी चर्चा केली, अधिकाधिक अनुभवसंपृक्त होऊन एकेश्वरवादाचा पुरस्कार करू लागले.

हिंदू-सनातन धर्मातील 'सतीदाहो' (सतीप्रथा), अस्पृश्यता, जातिप्रथा आणि बालविवाहासारख्या रुढींबद्दल त्यांची मते तीव्र होती. ह्या विषयांवर त्यांच्या लेखनाला आणि आंदोलनांना कंपनी सरकारातील अनेकांचा पाठिंबा होता. अनेक ख्रिस्ती धर्मगुरू त्यांच्या मताशी सहमत होते. सतीप्रथेवर प्रहार करणारी त्यांची तीन पुस्तके लागोपाठ प्रसिद्ध झाली. सतीप्रथेविरुद्ध आधी वैचारिक-समाजजागृतीपर आणि पुढे कायदेशीर आंदोलन उभारून ही प्रथा हद्दपार करण्याचे श्रेय राममोहन रॉय यांना आहे.

रॉय यांचे विचार फक्त एका धर्मापुरते सीमित नव्हते. बहुभाषाकोविद रॉय सर्व महत्वपूर्ण धर्मग्रंथांचा मूलभूत अभ्यास करू शकत, प्रसंगी भाषांतरही करत. सनातन धर्माव्यतिरिक्त इस्लाम, जैन, सूफी मत, ख्रिश्चन धर्माच्या अनेक प्रसिद्ध ग्रंथांचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या तर्काला मौलिक अनुभवाचे, प्रत्यक्ष ग्रंथाभ्यासाचे-ज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त झाले होते. त्या-त्या धर्मातील खुळ्याभाबड्या आणि चुकीच्या कल्पनांवरही त्याची लेखणी परजत असे. १८२० साली कोलकात्यात रॉय यांचे 'पर्सेप्टस ऑफ जिझस' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. चमत्कार आणि धर्मप्रसारासाठी घुसवलेल्या वाढीव कथाकहाण्यांना तिलांजली देऊन ख्रिस्ताचा नैतिक संदेश त्यांनी या पुस्तकात रोखठोकपणे मांडला होता. तो कोणालाच रुचला नाही आणि त्यांचा समर्थक असलेला कोलकात्यातील प्रतिष्ठित ख्रिस्ती समुदाय त्यांचाविरुद्ध गेला. स्वधर्मातील भवानीचरण बॅनर्जी, राधाकांत देब, गौरीकांत भट्टाचार्य यांच्यासारखे परंपराप्रिय विद्वान त्यांच्याविरुद्ध होतेच त्यात अन्यधर्मीय सुधारविरोधी लोकांची भर पडली.

राममोहन रॉय कोलकात्यात राहायला आल्यावर त्यांनी ग्रंथ, विचारपत्रे, सभा आणि प्रत्यक्ष चर्चा अशी सर्व संपर्कमाध्यमे वापरून आपल्या विचारांचा प्रचार केला. वेद आणि उपनिषदांना संस्कृत भाषेच्या कोषातून बाहेर काढून बंगाली-इंग्रजी भाषांतर आणि त्यांच्या मर्माबद्दल सुलभ लेखनामुळे राममोहनांचे नाव प्रसिद्ध झाले. प्रत्येक मुद्द्याचा सर्वांगांनी गहन विचार करणे आणि त्याचे सत्व नेमक्या शब्दात सगळ्यांना समजू शकेल असे मांडणे हे रॉय यांचे वैशिष्ट्य. त्यांचे घर म्हणजे 'चर्चेचा अड्डा' असे समीकरण झाले. वैचारिक देवाणघेवाणीसाठी राममोहनांच्या घरी दर आठवड्याला कोलकात्यातील विद्वत्जनांची 'आत्मीय सभा' भरू लागली. एकेश्वरवादाचा पुरस्कार, सतीप्रथेवर आणि बालविवाहावर कायद्याने बंदी, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण अश्या अनेक विषयांवर रुढीप्रिय लोकांचे मतपरिवर्तन हे प्रमुख कार्य आत्मीय सभेने अनेक वर्षे केले. पुढे अधिक वैचारिक सुस्पष्टतेसह रॉय यांच्या पुढाकाराने कोलकात्यात 'ब्राम्हो समाजाची' स्थापना झाली. फार जनाश्रय लाभला नाही तरी ब्राम्हो समाजाने धार्मिक - सामाजिक चळवळींचे चक्र पुढे फिरवले याबद्दल संशय नाही.

शहरात असलेल्या छापखान्यांनी विचारप्रसाराचे काम सोपे केले. अनेकानेक पुस्तके, वृत्तपत्रे आणि मासिके जन्माला आली. भारतातील पहिल्यावहिल्या वर्तमानपत्राचा मान कोलकात्याकडे आहे. इंग्रजी, बंगाली आणि 'मिरात-उल-अखबार' सारखे फारसी भाषेतले वृत्तपत्र सुद्धा प्रथम कोलकात्यातून प्रकाशित झाले. शहरात पहिले सार्वजनिक ग्रंथालय सजले. घरात पुस्तकांची कपाटं असणे ही कुलीनपणाची सर्वमान्य कसोटी ठरू लागली. ह्या काळात कोलकात्याच्या विद्वानांनी प्रचंड मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. जगातील ज्ञान टिपतांनाच बंगाली साहित्याने नवकलेवर धारण करून स्थानिक इतिहासाचा, संस्कृतीचा, त्यातल्या उदात्त तत्वज्ञानाचा नव्याने उदघोष केला. ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या सर्वव्यापी प्रभावाने दडपलेल्या तत्कालीन भारतासाठी ही मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल.

48869152462_4365c56f6c_c.jpgचित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.

ऋणनिर्देश - फलकावरील मजकुराचा 'नूतन' यांनी केलेला हा अनुवाद :-

मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत.

मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

आजचे कोलकाता शहर आपल्या वैश्विक प्रसिद्धी मिळवणाऱ्या सुपुत्राला विसरले नाहीये. अँमहर्स्ट स्ट्रीटला 'राजा राममोहन रॉय सारिणी' असे नाव देऊन आणि त्यांच्या घराला स्मृतिस्थानात बदलून रॉय यांच्या आठवणी आणि शहराशी असलेला ऋणानुबंध जपण्यात आला आहे. तेथे फारसे कोणी जात नाही. जागेची निगा चांगली राखली आहे आणि काही स्थानिक वयस्कर मंडळी जयंती-पुण्यतिथीला येथे कार्यक्रम करून त्यांच्या कार्याचा वारसा जागवतात हेही नसे थोडके.

* * *

नवजागरणाची व्याप्ती फक्त धार्मिक आणि सामाजिक विषयांपुरतीच मर्यादित राहिली नाही. कोलकात्याच्या कलाविश्वातही अनेक दीर्घप्रभावी आणि बहारदार बदल झाले, त्याबद्दल पुढे.

(क्रमश:)

आमार कोलकाता - भाग ५ - नवजागरणाचा नवोन्मेष

कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते बरेच जुनेही आहे. नेमका कालावधी सांगायचा तर सव्वादोनशे वर्षे जुने !! आज प्रचलित असलेल्या स्वरूपातल्या (फॉरमॅट) ‘बंगाली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची कहाणी अद्भुत म्हणावी अशी. जन्माने रशियन असलेल्या पण कोलकात्यात स्थायिक होऊ पाहणाऱ्या गार्सीम लेबेदेफ या नाट्यवेड्या अवलियाने रिचर्ड जॉर्डेलच्या ‘The Disguise’ या नाटकाचे बंगाली भाषांतर केले आणि स्थानिक हौशी मंडळींचे टोळके जमवून पहिल्यावहिल्या बंगाली नाटकाचा प्रयोग कोलकात्यात घडवून आणला. दिवस होता २७ नोव्हेंबर १७९५!

हा आधुनिक बंगाली नाट्यक्रांतीचा पहिला आविष्कार मानला जातो. गमतीशीर भाग असा की हे नाटक मूळ इंग्रज लेखकाचे, निर्माता-अनुवादक रशियन, नाटक बंगाली भाषेत, कलाकार आणि प्रेक्षक समस्त कोलकात्याची देशी-विदेशी मंडळी! या प्रयोगात युरोपीय पद्धतीप्रमाणे रंगमंचावरचे कलाकार आणि प्रेक्षक एकमेकांच्या अगदी समोरासमोर असण्याची पद्धत बंगालात पहिल्यांदाच वापरण्यात आली. त्याआधी बंगालमध्ये होणाऱ्या ‘जात्रा’ सारख्या कार्यक्रमात पौराणिक कथा-काव्यवाचन, कीर्तन-भजन इत्यादी सादरीकरण करणारे कलाकार प्रेक्षकांच्या वर्तुळाकार सभेच्या मधोमध रंगमंचावर उभे राहून प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करत. सोळाव्या शतकात अनेक भक्तिपंथातील संतांनी बंगालात वैष्णव भक्तीचा पाया घातला होता, त्यात आचार्य चैतन्य देव आणि त्यांचा गौडिय वैष्णव संप्रदाय आघाडीवर होता. राधा-कृष्णाच्या प्रेमावर आधारित अनेक छोटी मोठी बंगाली नाट्ये ‘लीला कीर्तन’ म्हणून सादर होत होती, त्यात नृत्य-संगीत आणि लयबद्ध सादरीकरण होते. तेही एकप्रकारे नाट्याविष्कार ठरते. म्हणूनच लेबेदेफच्या नाटकाचे वेगळेपण ठसत असले तरी त्याला एकट्याला बंगाली नाट्याचा जनक म्हणणे ही थोडी अतिशयोक्ती ठरेल. नाटकांची आवड आणि त्यातील नवीन प्रयोग हा मात्र शहरवासीयांचा खास गुण, तो अनेक दशकं कायम राहिला.

सुरवातीच्या काळात बंगाली नाटक म्हणजे लोककलेकडे झुकणारे आणि संस्कृतमधील प्रसिद्ध नाटकांचे बंगाली रूपांतरण असे स्वरूप होते. त्यात रामायण महाभारतातील कथा, वाईटावर चांगल्या शक्तींचा विजय, चांगुलपणाचा संदेश देणारी रूपकं असा साधारण मसाला असे. असल्या पौराणिक नाटकांना स्थानिक प्रेक्षकांनी प्रतिसादही भरपूर दिला. यथावकाश त्यांची क्रेझ कमी झाली आणि इंग्रजी आणि अन्य युरोपीय भाषांमधील साहित्यावर बेतलेली नाटके बंगाली भाषेत येऊ लागली. सुजाण भद्रजनांचा त्याला भरघोस पाठिंबा आणि जनाश्रय मिळू लागला. या भाषांतरित प्रयोगांमध्ये मायकल मधुसूदन दत्ता, रामनारायण तर्करत्न, दीनबंधू मित्रा असे बंगाली साहित्यकार-नाटककार आघाडीवर होते. त्याचा परिणाम म्हणजे बंगाली नाट्यसृष्टीला प्रख्यात इंग्रज आणि अन्य युरोपीय नाटककारांची नाटके बंगाली भाषेत भाषांतरित किंवा रूपांतरित करून मिळाली. पण काही फार्स आणि गंभीर वैचारिक नाटके वगळता या नाट्यचळवळीचे रूप मुख्यतः ब्रिटिश जीवनशैली आणि उच्चभ्रू समाजजीवनाचे चित्रण असे होते.

बंगाली नवजागरणाने साहित्याच्या सर्वांगाला झपाटले. गंभीर विषयांच्या ग्रंथांबरोबर कथा-कादंबऱ्या, लेख, कविता आणि नाटके अशा सर्व साहित्यविधांमधे बंगाली भाषेत उत्तमोत्तम रचना निर्माण झाल्या. मायकल मधुसूदन दत्तांचे (१८२४-१८७३) ‘मेघनादबधकाब्य’, रवींद्रनाथ टागोरांचे (१८६१-१९४१) ‘गीतांजली’ सारख्या बंगाली रचना जागतिक दर्जाचे साहित्य ‘मास्टरपीस’ म्हणून सहज मान्य होतील. गीतांजलीला सुयोग्य जागतिक कीर्ती मिळालीही, इंग्रजी भाषांतर झाल्यानंतर गीतांजलीबद्दल रवींद्रनाथांना साहित्यासाठीच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.

नवीन बंगाली साहित्यनिर्मितीत नाटकांचा क्रम वरचा. ययाती-देवयानीच्या महाभारतातील प्रसिद्ध कथेवर आधारित ‘शर्मिष्ठा’ हे नव्या धाटणीचे पहिले पूर्ण बंगाली नाटक लिहिणारे मायकल मधुसूदन दत्ता बंगाली भाषेतले पहिले नाटककार ठरतात. नाटकांप्रमाणे त्यांच्या ‘मायाकानन’ सारख्या कवितासंग्रहानी रसिकांना आनंद दिला. फक्त छंदात्मक पद्य वापरणाऱ्या बंगाली कवितेला त्यांनी मुक्तछंदाचे आकाश दाखवले. त्यांचा ‘चतुर्दशपदी कवितावली’चा प्रयोगही प्रचंड लोकप्रिय झाला. १६ ऑगस्ट १८६० रोजी दत्तांच्या ‘शर्मिष्ठा’चा पहिला प्रयोग बंगाल थिएटरच्या बेडन स्ट्रीटवरच्या (आताचे नाव दानी घोष सारिणी) नव्या इमारतीत झाला आणि बंगाली भाषेतल्या नाटकांचे एक नवे युग कोलकात्यात अवतरले. पद्मावती, तिलोत्तमासम्भव, व्रजगान, कृष्णकुमारी, वीरावगान अशी उत्तमोत्तम नाटके प्रसवणारे मधुसूदन बंगाली नाट्यचळवळीचे प्रमुख शिलेदार ठरले. त्यांच्या बेलगाछिया थिएटरने अनेक नाटकांचे प्रयोग कोलकात्यात केले. १८७० सालापासून बंगाली आणि इंग्रजी भाषेत व्यावसायिक नाटके सादर करण्याची परंपरा नॅशनल थिएटरने कायम केली. गिरीशचंद्र घोष आणि दीनबंधू मित्र यांच्यासारख्या प्रसिद्ध नाटककार मंडळींनी ही चळवळ पुढे नेली. नाटकाची आवड नसलेला बंगाली माणूस दुर्मिळ असण्याचा काळ होता तो.

कोलकात्याची मंडळी विलायतेतून शिकून जेव्हा कोलकात्यात परत आली तेव्हा ब्रिटिश शासनाकडून होणारे स्थानिकांचे शोषण आणि जनतेवर होणारे अत्याचार त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांच्या लेखणीने बंगाली नाट्यसृष्टीत नवनवीन प्रयोग घडवून आणले. समाजाच्या खऱ्याखुऱ्या समस्या आणि आक्रोशाचे प्रतिबिंब तत्कालीन बंगाली नाट्यसृष्टीत पडलेले स्पष्ट दिसते. उदा. बंगालातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शोषणाला वाचा फोडणारे दीनबंधू मित्र यांचे ‘नीलदर्पण’ हे नाटक ब्रिटिश मालकांविरुद्ध स्थानिकांच्या लढ्यावर आधारित होते. मायकल मधुसूदन दत्तांनी त्याचे इंग्रजीत नाट्यरूपांतर करून नाटकाच्या प्रसिद्धीस हातभार लावला. त्यामुळेच नीळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली.

48895127803_a5d821217b_b.jpgकोलकात्यातील सर्वाधिक जुनी नाट्यगृहे.

ग्रेट नॅशनल थिएटर (आताचे मिनर्व्हा), बीना थिएटर (पूर्वीचे व्हिक्टोरिया ऑपेरा हाऊस), स्टार थिएटर, कॉर्नवोलीस स्ट्रीटवरचे न्यू स्टार थिएटर, कर्झन थिएटर अशी अनेक नाट्यगृहे कोलकात्यात उभी राहिली. त्यापैकी काही कालौघात नामशेष झालीत, काही आजही आहेत.

48895851667_07add84b1f_k.jpgकोलकात्यातील सर्वाधिक जुनी नाट्यगृहे.

बंगाली नाट्यचळवळीचा दुसरा खंड म्हणता येईल असा काळ म्हणजे भारत भूमीतील स्वदेशी चळवळ रुजण्याचा काळ. शतक कूस बदलत असतांना हळू हळू बंगाली रंगभूमीतही परिवर्तनाचे वारे वाहू लागले. वर्ष १९०० ते १९५० हा ५० वर्षांचा कालखंड म्हणजे देशात हळूहळू पुन्हा तयार होत असलेले ब्रिटिशविरोधी वातावरण, बंगाली नवजागरणाचा काळ आणि स्वदेशी विचारसरणीचे सूप्त बीज रुजून त्याला फळे-फुले येण्याचा काळ. वर्ष १९०५ उजाडले आणि तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा तो दुर्दैवी निर्णय घेतला. त्याने बंगाली जनमानस ढवळून निघाले. निर्णयाला कसून विरोध झाला आणि अनेक ब्रिटिशधार्जिणे म्हणून ओळखले जाणारे विचारवंत-धनिक-प्रतिष्ठित लोक ब्रिटिशविरोधी गटात आले. या घडामोडींचे प्रतिबिंब कोलकात्याच्या बंगाली नाट्यपंढरीत उमटले नसते तरच नवल. अमरेंद्र दत्ता, राजकृष्ण रे, गिरीशचंद्र घोष, अमृतलाल बोस असे अनेक नाट्यवेडे या काळात कोलकात्याच्या रंगभूमीवर सक्रीय होते. गिरीशचंद्र घोष हे आधी ऐतिहासिक-पौराणिक नाटकांचे बादशहा म्हणवले जात. पुढे त्यांची सिराजउदौला, मीर कासीम, छत्रपती अशी नाटके आली. ही नाटके उघडउघड ब्रिटिश सत्तेविरुद्ध भाष्य करणारी होती. बहुतेक नाटककार स्वतः उत्तम अभिनेते असल्यामुळे हा काळ विशेष गाजला. बंगाली अस्मितेला मिळालेली झळाळी, उत्तमोत्तम बंगाली नाटकांची निर्मिती आणि त्यांना मिळणारे व्यावसायिक यश असा त्रिवेणी सुवर्णयोग कोलकात्याच्या बंगाली नाट्यपंढरीत जुळून आला.

आजच्या कोलकात्यात नंदीकर थिएटर फेस्ट, सभाघर, बंगाल नाट्यअकादमीचा वार्षिक महोत्सव असे काही नावाजलेले नाट्यमहोत्सव शहराची नाटक-भूक भागवतात. थोडीफार व्यावसायिक नाटके बंगाली आणि इंग्रजीत होत असतात. त्यांना बऱ्यापैकी प्रतिसाद असतो. सिनेमा-दूरचित्रवाणी मालिका-जालीय मालिकांच्या माऱ्यातही बंगाली नाटक टिकून आहे.

* * *
नाटक वगळता अन्य कलाप्रांतातही कोलकात्याने अनेक नवोन्मेष बघितले. ज्ञानान्वेषण, लिटररी ग्लीमर, कोमेट, लिटररी ब्लॉसम….. काव्य-साहित्याला वाहिलेली अशी अनेक मासिके कोलकात्यातून प्रकाशित होत (१८४०-१९१०). त्यात लिहिणाऱ्यांची संख्याही भरपूर होती.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळा केलेले भारतीय शिल्पकलेचे आणि चित्रकलेचे ऐतिहासिक महत्त्वाचे नमुने, स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचे शेकडो नमुने, स्थानिक कलाकारांच्या कलाकृती अशा ऐवजाचे कायमस्वरूपी प्रदर्शन शहरात असावे असा विचार पुढे आला. त्यासाठी काही धनिकांनी पुढाकार घेऊन कोलकात्याला एक अप्रतिम भेट दिली. एशियाटिक सोसायटीच्या पुढाकाराने चौरंगी-पार्क स्ट्रीटच्या भागात भव्य इमारतीत ‘इम्पिरियल म्युझिअम’ (आताचे इंडियन म्युझिअम) उभे राहिले.(१८७५). आधुनिक भारतातले पहिले. ऐतिहासिक-सांस्कृतिक ठेव्याबरोबरच वनस्पतीशास्त्र, मानववंशशात्र, भूगर्भशास्त्र अन्य अशा अनेक विषयांना वाहिलेली दालनं उभारली गेली. निओक्लासिकल वास्तुशैलीतील या पांढऱ्याशुभ्र इमारतीची संकल्पना वॉल्टर ग्रॅनविले या वास्तुरचनाकाराची. ही देखणी इमारत आणि त्यातील अमूल्य कलाकृती कोलकात्याचे वैभव आहे.

img_0.jpegकोलकात्यातील इंडियन म्युझियमची इमारत.

शहरातले गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट (स्थापना १८५४) कलेचे शास्त्रोक्त शिक्षण देणारी संस्था म्हणून अल्पावधीतच नावाजले गेले. लवकरच टागोर कुटुंबीय आणि इ. बी. हावेल, पर्सी ब्राऊन यांच्या पुढाकाराने चित्रांच्या ‘बंगाल शैली’ला प्रतिष्ठा मिळवून दिली. बंगाल शैलीची चित्रे अभिजात म्हणून मान्यता पावली. त्यापैकी काही इंडियन म्युझिअममध्ये प्रदर्शित केली आहेत.

48895854607_e63cc79148_k.jpgबंगाल शैलीतील रंगचित्रे, बंगाल मास्टर्स कलेक्शन, सौजन्य - इंडियन म्युझिअम, कोलकाता. - १

48895133148_be22a022b2_n.jpg
बंगाल शैलीतील रंगचित्रे, बंगाल मास्टर्स कलेक्शन, सौजन्य - इंडियन म्युझिअम, कोलकाता. - २

कलेच्या विविध प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या कोलकात्याच्या सुपुत्रांबद्दल आपण वाचले. पण एकाचवेळी अनेक कलाप्रांतांमध्ये असामान्य प्राविण्य मिळवणारी आणि शहराला वैश्विक कीर्ती मिळवून देणारी असामी म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ! शहरावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा न पुसता येणारा. त्यांच्याबद्दल पुढे.

(क्रमश:)


 

आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

प्रत्येक भारतीय ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गातो तेव्हा तो रवींद्रनाथ टागोरांचे गीत गात असतो. भारताचेच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनी लिहिले आहे. दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.) भारताचे ‘जन-गण-मन‘ आणि बांगलादेशचे ‘आमार सोनार बांगला‘ दोन्ही मात्र निर्विवादपणे टागोरांची अपत्ये. दोन्ही देशांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलंय, त्यांच्या स्मृती जपल्या आहेत, अमर केल्या आहेत.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणजे बंगाली संस्कृती-साहित्य-कला-समाज सर्व प्रांत व्यापून दशांगुळे उरलेलं व्यक्तिमत्व. बंगाली जनमानसाच्या ‘मर्मबंधातील ठेव’. कोलकाता शहर टागोरांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही. उत्तर कोलकात्यातील जोरासंखो ठाकुरबारी हे टागोर परिवाराचे कोलकात्यातील निवासस्थान. रवींद्रनाथांचा जन्म (१८६१) आणि मृत्यू (१९४१) ह्या वास्तूने बघितला. जोरासंखोच्या निष्प्राण भिंती रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे साहजिकच कोलकाता शहराला टागोरांबद्दल आत्मीयता आहे, शहराचे नाव उंचावणाऱ्या त्यांच्या कार्यलौकिकाबद्दल अभिमान आहे.

48917619017_0b7e91656d.jpg

टागोरांचा ‘गीतांजली’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊन त्यांना साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला तो १९१३ साली. हा पुरस्कार त्यांना कवितेच्या क्षेत्रातील योगदानामुळे मिळाला खरा पण रवींद्रनाथांचे योगदान फक्त कवितांपर्यंतच मर्यादित नव्हते. कादंबरी, नाटके, लेख, लघुकथा, प्रवासवर्णने, निबंध अशा सर्व साहित्यविधा रवींद्रनाथांना वश होत्या. इंग्रजी आणि बंगाली भाषांवर असामान्य प्रभुत्व होते. कंठसंगीत, वाद्यसंगीत, चित्रकला, सुलेखन, नाट्यमंचन, शिक्षण, समाजकार्य, धर्म-अध्यात्म, लोककला, स्थापत्यकला अशा अनेकानेक प्रांतात त्यांनी यथेच्छ मुशाफिरी केली. त्यांच्या व्यक्तित्वाचा फार मोठा प्रभाव कोलकात्याच्या समाजजीवनावर पडला.

रवींद्रनाथांची प्रसिद्ध कविता

Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षांपासून कविता लिहिणाऱ्या रविंद्रनाथांनी १६ व्या वर्षी पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. गुरुदेव टागोरांच्या सुमारे २३०० रचना ‘गीतबितान‘ ह्या नावाने ओळखल्या जातात. ‘गीतबितान’चा शब्दशः अर्थ गीतांची बाग. प्रेम, पूजा, निसर्ग अशा विषयांना वाहिलेली ही गीते म्हणजे त्यांचे काव्यमनोगतच आहे. काही मोजकी गीते ‘विचित्रा’ म्हणून ओळखली जातात, कारण त्यांचे विषय अगदी वेगळे आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षी रवींद्रनाथांनी नाटके लिहायला सुरूवात केली. टागोरांची नाटके आणि संगीतनाट्यात त्यांनी केलेल्या प्रयोगांनी बंगाली नाट्यसृष्टीला वेगळ्या धाटणीच्या नाट्याची ओळख करून दिली. ‘रवींद्रनाट्य‘ अशी एक वेगळीच नाट्यविधा त्यांनी निर्माण केली. संगीत आणि नृत्यांनी नटलेल्या नाटकांमध्ये कलाकारांच्या मोहक पण कमीतकमी हालचाली आणि नाजूक पदन्यास रवींद्रनाट्याचे वैशिष्ट्य असते. संथ सुरुवात आणि हळूहळू उत्कंठा वाढवत रोचक-रंजक शेवट असा फॉरमॅट टागोरांच्या नाटकात दिसून येतो. जोरासंखो बारीच्या रंगमंचावर रवींद्रनाट्यांचे प्रयोग होत, त्यासाठी गुणिजनांची गर्दी लोटत असे. टागोरांच्या नाटकांना खरी प्रसिद्धी मिळाली ती शंभू मित्र यांच्या ‘बहुरूपी थियेटर’मुळे. बहुरूपीने टागोरांची विसर्जन, वाल्मिकी प्रतिभा, चंडालिका सारखी प्रसिद्ध-अप्रसिद्ध नाटके मोठ्या प्रमाणावर सादर केली आणि त्यांना कोलकात्यातल्या रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

८४ लघुकथांचा एक संग्रह प्रसिद्ध करून रवींद्रनाथांनी बंगाली लघुकथांचा पायंडा पाडला. सर्व कथा बंगालच्या मातीतल्या, साध्या सोप्या विषयांवर आहेत पण त्यातील संदेश आणि प्रतीके चिरंतन आणि सर्व जगाला लागू होणारी आहेत. काबुलीवाला (१८९२), अतिथी (१८९५), क्षुधित पाषाण (१८९५) अशा प्रसिद्ध कथांचे विषय सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवन-संघर्षातून आलेले आहेत. टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.

टागोरांनी स्वधर्मातील विशेषतः जातिप्रथेच्या कुरूपतेवर भाष्य टाळले असा आरोप त्यांच्यावर होतो पण तो योग्य नाही. त्यांनी जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या विषयांवर लिहिले आहे. उदा.:- ‘चंडालिका’ ह्या नाटकात तथाकथित अस्पृश्य चांडाळ समाजातील वाळीत टाकलेली छोटी मुलगी प्रकृती आणि भिक्खु भन्ते आनंद यांच्यातील संवादाने कथा जितक्या सहजतेने फुलवली आहे त्याला तोड नाही.

48916887933_75036a5221_w.jpg

टागोरांच्या कथांवर आधारित सिनेमांची जंत्री बरीच मोठी होईल. टागोरांच्या ‘नष्टनीड’ ह्या रचनेवर सत्यजित रॉय यांचा ‘चारुलता’ हा प्रसिद्ध सिनेमा बेतलेला आहे. समाप्ती, मणिहार आणि पोस्टमास्टर अशा तीन टागोरकथांनी एकत्रितपणे ‘तीन कन्या’चे रूप घेतले आहे. तपन सिन्हानी टागोरांच्या ‘अतिथी’ला सिनेरूप दिले आहे. घरे बायरे, गोरा, काबुलीवाला, तप्तपदी, उपहार, थोड्या अलीकडच्या चतुरंग, चोखेर बाली अशा अनेक सिनेमांच्या कथा मूलतः टागोरांच्या आहेत.

48917414701_85a583d3e9_m.jpg

संगीत क्षेत्रातले टागोरांचे योगदान तर असामान्य म्हणावे असे आहे. गायन आणि वादन यात नाव मिळवलेल्या मोठ्या भावाकडून, ज्योतिन्द्रनाथांकडून त्यांना संगीताचे प्राथमिक ज्ञान मिळवता आले. लहानपणापासून कानावर आणि मनावर संगीताचे संस्कार झाले. ‘रवींद्रसंगीत‘ ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची संगीत विधा निर्मिण्याचे श्रेय टागोरांना आहे. टागोरांनी स्वतः रचलेली जवळपास २३०० गीते हा रवींद्रसंगीताचा आत्मा आहे. रवींद्रसंगीत मूलतः हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या रागांवर बेतलेले आहे, अनेक गीतांवर भावप्रधान ठुमरी गायकीचा जाणवण्याइतपत प्रभाव आहे. बहुतेक गीते सुंदर निसर्ग, अमूर्त ईश्वर आणि मनुष्याच्या भाव-भावना ह्याच विषयांना वाहिलेली आहेत. हे विषय टागोरांचे हातखंडा विषय आहेत, त्यामुळे स्वर-रस-शब्द अशी सुंदर त्रिवेणी जुळून येते. विषय, भाव, राग, स्वर, काव्यसौष्ठव, गेयता-श्रवणीयता अशा सर्व निकषांवर रवींद्रसंगीत मौलिक ठरते. भारतीय शास्त्रीय संगीताचा ठसा आहे, पण गडद नाही. काव्यातील ‘भाव’ सर्वोच्च महत्त्वाचा आहे, त्यावर कुरघोडी करणाऱ्या सुरावटी अजिबात नाहीत. भावार्थाला पूरक होईल इतपतच भारतीय रागदारी संगीताचे मिश्रण आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील काही अनवट रागांचा कळेल-न-कळेल असा बेमालूम मिलाफही काही गीतांमध्ये दिसून येतो. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे संपूर्ण रवींद्रसंगीत हे लिखित सुरावटींचे असते, त्यामुळे जगात कोठेही गायिले तरी नव्यानेच संगत करणाऱ्या अपरिचित वादकांनाही समजते आणि साथसंगत करणारी वाद्ये सुरात वाजविता येतात. ह्याच कारणामुळे संगीतरचनेतील रेखीवपणा थोडा जाचक होतो आणि सुरावटींमध्ये लवचिकपणा राहत नाही असे काही संगीतप्रेमींचे मत आहे. ह्या गीतांचे दुसऱ्या भाषेत भाषान्तर किंवा भावरुपान्तर करतांना मात्र त्यातील गोडवा कमी होतो असे समस्त बंगालीजनांचे मत आहे. एक मात्र आहे, रवींद्रसंगीताच्या ह्या सुरावटी समजल्या नाहीत तरी मनाला भिडतात, अर्थात आवड आणि तयार कान असेल तर. त्याची आवड निर्माण व्हावी लागते. काहीसे बीथोवेन, बाख आणि मोझार्ट अशा प्रसिद्ध संगीतकारांच्या रचना ऐकण्यासारखे. अन्यथा अनेक लोकांना रवींद्रसंगीत प्रचंड कंटाळवाणे वाटू शकेल, वाटतेही. अनेकांना प्राणप्रिय वाटणाऱ्या आणि अनेकांना अर्थहीन-कंटाळवाणे वाटणाऱ्या रवींद्रसंगीतासाठी आजही जगभरातील दर्दी बंगालीजन जीव ओवाळून टाकतात. टागोरांचे हे असामान्य योगदान एक जागतिक ठेवा आहे.

बंदिस्त शाळा आणि अभ्यासक्रम टाळून निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्याना वेगळ्या धाटणीचे, जीवन समृद्ध करणारे शिक्षण देण्याचा ध्यास घेऊन टागोरांनी बोलपुरला ‘शांतिनिकेतन’ स्थापन केले. हा प्रयोग जगभर नावाजला गेला त्यात आश्चर्य नाही. आधुनिक भारताला अनेकानेक उत्तम कलाकार, साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार, नाटककार शांतिनिकेतनने दिले आहेत.

रवींद्रनाथ टागोरांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली असली तरी टागोर कुटुंबातील ते एकमेव कलाकार नाहीत. कुटुंबातील अनेक सदस्यांनी वेगवेगळ्या कलाविषयात मोठी मजल गाठली आहे. सामवेदात वर्णिलेल्या रागरागिणींना सतार आणि तबल्यावर, कंठसंगीताद्वारे प्रत्यक्ष रूप देऊ पाहणारे हरकुमार टागोर असोत की नाटककार जतींद्रमोहन टागोर. भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीताचा पाश्चात्य पद्धतीचा पहिला ‘ऑर्केस्ट्रा’ बसवणारे सतारवादक सुरेंद्रमोहन टागोर असोत की बंगाली चित्रकलेला नवीन आयाम देणारे ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरियंटल आर्ट’चे संस्थापक अबनिंद्रनाथ टागोर. गणितज्ज्ञ आणि गीतकार एकाचवेळी असलेले द्विजेंद्रनाथ टागोर असोत की चित्रकार-व्यंगचित्रकार गगनेंद्रनाथ टागोर….कलाप्रांतातल्या मूर्धन्य टागोरांची यादी न संपणारी.

48917621792_c4c502e62c_k.jpg

कोलकातावासीयांनी टागोरांचे घर सुंदर जतन केले आहे. दरवर्षी पांच बैशाख (रवींद्रनाथांचा जन्मदिवस) बाईशे श्रावण (पुण्यतिथी) अशा महत्वाच्या दिवशी इथे कलामेळावे, संगीतसभा आणि साहित्य-नाट्य जलसे असे कार्यक्रम होतात. त्यात शेकडो लोक भाग घेतात. कोलकात्याची कलाप्रियता जिवंत असल्याची पुरेपूर खात्री पटते. अन्य संग्रहालयासारखे निर्जीव वातावरण इथे नसते. आवारातच रबींन्द्रभारती विद्यापीठाचे मुख्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांचा चिवचिवाट कानी पडतो. आवारात रवींद्रनाथांचा काव्यवाचन करण्याच्या मुद्रेतला देखणा पुतळा आहे. घराच्या आत मंद आवाजात रवींद्रसंगीत सतत ऐकू येईल अशी व्यवस्था आहे. बाहेरच्या घनदाट वस्तीचा आणि धावत्या जगाच्या कोलाहलाचा विसर पडून संगीताच्या मंद सुरावटी ऐकवत जोरासंखो ठाकुरबारीतले कलादालन आणि संग्रहालय तुम्हाला टागोरांच्या महान व्यक्तित्वाचे रुपेरी कवडसे दाखवते.

* * *

प्रतिभाशाली माणसांमुळे शहराचे नाव होते, सन्मान वाढतो हे खरेच. पण सामान्य माणसांचे समूह सुद्धा आपापल्या परीने शहराला समृद्ध करतात. फार जुन्या काळापासून कोलकात्याला वास्तव्य करणाऱ्या, शहराला आपले म्हणणाऱ्या समाजसमूहांबद्दल पुढील भागांमध्ये.

(क्रमश:)


आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

48940346056_954e0737b5_b.jpg

भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांमध्ये सुमारे ३५०० किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. शेकडो वर्षांपासून दोन्ही देशात बहुस्तरीय सांस्कृतिक संपर्क असला तरी नागरिकांनी एकमेकांच्या देशात स्थायिक होण्याचे प्रमाण फारच कमी आहे, अगदीच ‘सागर में बूंद’ किंवा समुद्रात खसखस! भारतात शरणार्थी म्हणून आलेले लाखभर तिबेटी बांधव सोडले तर चीनच्या मुख्य भूमीतून येऊन भारतात वसलेल्या चिनी व्यक्तींची संख्या जेमतेम काही हजार असेल. चिनी लोक भारतात सर्वप्रथम स्थायिक झाले ते कोलकात्यात, आजपासून साधारण २३० वर्षांपूर्वी. आज सुमारे दोन हजार चिनी कोलकात्यात राहतात. बहुतेकांचे पूर्वज अनेक पिढ्या कोलकात्यातच आहेत. चिनी वस्ती असलेल्या भागांना ‘चायना टाऊन’ म्हणण्याचा प्रघात आहे. चायना टाऊन म्हणता येतील अशा दोन वस्त्या आजच्या कोलकात्यात आहेत. जुने चायना टाऊन आणि नवीन. पैकी जुने चायना टाऊन रवींद्र सारिणी जवळ तिरेता बझार (Tiretta Bazar) भागात आहे. पूर्व कोलकात्याच्या तांगरा भागात दुसरे ‘न्यू चायना टाऊन’ आहे.

कोलकाता म्हणजे बजबजपुरी असे स्थानिक लोकही म्हणतात. पण कोलकात्यात खरोखरीच एक ‘बजबज’ नामक वस्ती आहे – नावाला आणि अर्थाला जागणारी! याच बजबज भागात काही चिनी व्यापाऱ्यांनी स्वतःची पहिली पेठ वसवली होती. तोंग अच्यू (Tong Achew) नामक एका यशस्वी चिनी व्यापाऱ्याने येथे सर्वप्रथम जागा विकत घेऊन साखरेचा कारखाना टाकायचे ठरवले. त्यासाठी त्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी मिळवली. साखर कारखान्यासाठी ६५० बिघा जमीन दीर्घमुदतीच्या करारावर देणाऱ्या परवानगीपत्रावर खुद्द गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्सची सही आहे (वर्ष १७७८). पुढे कारखान्याच्या कामासाठी चीनमधून काही जाणकार आणि मजूर लोक आले. २-३ वर्षात साखरेचे उत्पादन सुरू झाले पण तितक्यातच तोंग मरण पावला, साखर कारखाना बंद पडला. त्याच्यासोबत आलेले चिनी परत गेले नाहीत, कोलकात्यातच राहिले. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृती, भाषा आणि धार्मिक परंपरांच्या रूपाने कोलकात्यात त्यांच्या देशाला जिवंत ठेवले. आज हा भाग तोंग अच्यूच्या नावाने अचीपूर म्हणून ओळखला जातो. अच्यूच्या नावे एक स्मृतिस्थळ तेथे आजवर आहे.

पुढच्या काही दशकांमध्ये कोलकात्याला येऊन वसणारे चिनी लोक सुतारकाम आणि चामडे कमावण्याच्या, पादत्राणे घडवण्याच्या कामात तरबेज होते. पहिल्या महायुद्धानंतर कोलकात्यात चिनी चर्मकारांचे अनेक कारखाने आणि दुकाने मोठ्या प्रमाणावर उघडली. बेंटिक स्ट्रीट – धरमतल्ला भागात ही दुकाने होती, पैकी काही आजही आहेत. ब्रिटिश सैन्याला आणि अधिकाऱ्यांना उत्तम कमावलेल्या कातड्यांपासून बनवलेल्या वस्तूंचा पुरवठा चिनी कामगार करत. ब्रिटिश रेसिडेन्सी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या चामडी पखालीतून पाणी वाहून नेणारे ‘भिश्ती’ शहरात नेमलेले असत. त्यांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या चामडी पखाली चिनी कामगार पुरवत, त्यामुळे त्यांच्या कौशल्याला विशेष मागणी होती. (अगदी अलीकडे साठच्या दशकापर्यंत पखालीतून पाणी वाहून नेणारे भिश्ती जुन्या शहरात कार्यरत होते.) एकेकाळी सुमारे ३० हजार संख्येने असलेल्या चिनी लोकांना त्यांच्या पद्धतीचे अन्न पुरवणाऱ्या बेकरी आणि छोटी उपाहारगृहे चालवणारे चिनी बरेच होते.

कोलकात्यातील चायना टाऊन सिंगापूर, ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेतल्या चायना टाऊन सारखी चकचकीत अजिबातच नाहीत. दोन्ही चायना टाऊनमध्ये मूळचे चिनी लोक दाटीवाटीने राहतात. पैकी जुने चायना टाऊन तेथील ‘चायनीज चर्च’ साठी ओळखल्या जाते. सहा-सात चायनीज चर्च अजूनही कोलकात्यात आहेत. प्रचंड गर्दीच्या दाटीवाटीने वसलेल्या गल्लीबोळात चिनी दैवतांची प्राचीन देवळे आहेत, स्थानिक चिनी लोक त्यांना देऊळ-टेम्पल न म्हणता चायनीज 'चर्च' का म्हणतात हे कोडेच आहे.

48940528592_ae6e8455f4_b.jpgकोलकात्याच्या ब्लॅकबर्न रोडवरचे चिनी चर्च (स्थापना १९०८)

हा भाग घनदाट लोकवस्तीचा आणि गलिच्छ असल्यामुळे सर्व चायनीज चर्चेसना भेट देणे शक्य नाही. काही जागी मात्र जाता येते. पैकी ट्रक टर्मिनस जवळचे क्वान यिन ह्या चिनी देवीला समर्पित रेड चर्च/सी ईप हे त्यातल्या त्यात शोधायला सोपे.

48940531957_96c3c2aa40.jpg

आतील मुख्य मूर्तीची दुर्गा झाली आहे, म्हणजे पूर्ण बंगालीकरण. अंगभर रेशमी शेला, भाळी कुंकुम, गळ्यात पुष्पहार. आजूबाजूची सजावट मात्र चिनी आणि प्रसाद म्हणून हक्का नूडल्स. सगळीकडे अंधार, फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाश. बाहेरच्या प्रचंड कोलाहलाचा आणि कुरुपतेचा आत गेल्यावर विसर पडतो ही त्या जागेची जादू असावी.

48940344331_127229b819_k.jpg

तांगरा भागात असलेल्या न्यू चायना टाऊन भागातही घनदाट लोकवस्ती आहे. इथे भल्या पहाटे रस्त्यावर दुकाने थाटून काही चिनी मंडळी चिनी खाद्यपदार्थ विकतात. अन्यत्र सहसा न मिळणारे, आत वेगवेगळे सारण असलेले चिनी पद्धतीचे पाव, मोमो, स्प्रिंग रोल, खास कॅण्टोनीज चवीचे पोर्क सूप अशी न्याहारी करायला काही स्थानीय लोक आणि थोडेफार विदेशी पर्यटक येतात. स्वच्छतेचा आग्रह मात्र ह्या भागात धरता येत नाही.

48940530067_3afdbb4f7c_b.jpg

न्यू चायना टाऊन मध्ये काही चिनी रेस्तराँ आहेत. नाव वगळता तिथे मिळणाऱ्या पदार्थांमध्ये फार काही चिनी नाही, देशभर इतरत्र मिळणारे ‘इंडो-चायनीज’ इथेही आहे, फक्त मालक मंडळी चीनवंशी आहेत. इथेच काही पडक्या घरांमध्ये ‘सॉस-मेकिंग मॉम्स’ राहतात – शहरातल्या हॉटेलांना आणि हातगाड्यांना लागणारे शेकडो लिटर चिली सॉस घरी तयार करून विकणाऱ्या कुटिरोद्योजक चिनी महिला!

48940342561_a07105c134.jpg‘मून केक फेस्टिवल’, चिनी नववर्ष, चिनी वर्षाच्या सातव्या महिन्यातला हिंदू पितृपक्षासारखा पूर्वजांना भोजन अर्पण करण्याचा ‘हंग्री घोस्ट फेस्टिवल’ असे काही महत्त्वाचे प्रसंग सोडल्यास फारसे काही इथे घडत नाही. या संपूर्ण भागाला अस्वच्छतेचा शाप आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे कोणाला तिथे जावेसे वाटत नाही. चीनवंशी जनताही आता फारशी तिथे राहात नाही, एकेकाळी संख्येने २० हजार असलेले चिनी आता हजार-दोन हजारच्या संख्येत असावेत.

* * *

समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात असे म्हटले जाते. कोलकात्याच्या चिनी रहिवासीयांनी स्वतःची भाषा जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे दाखले मिळतात. महत्त्वाचे म्हणजे ही चिनी मंडळी श्रीमंत नव्हती. पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात आलेल्या विपन्न लोकांना भाषा आणि संस्कृती टिकवणे अधिकच कठीण होते. चिनीपारा भागातली पहिली चिनी भाषा शिकवणारी शाळा सुरु झाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला. Chien Kuo Chinese school असे शाळेचे नाव. स्थानिक चिनी लोकांचा स्वभाषेशी संपर्क क्षीण झाला होता, त्यामुळे स्थानिक शिक्षक मिळवणे अवघड होते. समाजाच्या पुढाऱ्यांनी जुन्या ओळखीतून कॅण्टोनीज शिक्षक मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न फळला नाही. सरकारी मदत म्हणावी तर तत्कालीन चिनी सरकार ह्या उपद्व्यापाला अनुकूल नव्हते. त्यामुळे काही शिक्षक तैवानमधून आयात करण्यात आले. १४ शिक्षक आणि सुमारे ७०० विद्यार्थी अशी ही शाळा मुलांना कॅण्टोनीज भाषा, मँडरिन लिपीचे लेखन-वाचन, चिनी लोकसंगीत, गणित आणि समाजशास्त्रात पारंगत करत होती. पुढे १९५० सालाच्या दरम्यान शाळा बंद पडली ती परत कधीही सुरु न होण्यासाठी. शहरातील चिनी लोकांनी चालवलेल्या अन्य काही छोट्या शाळा प्राथमिक शिक्षण देत. अपुरा पैसा आणि पुरेशा पटसंख्येअभावी त्याही हळू हळू बंद पडल्या. १९६२च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चिनी कुटुंबांना कोलकात्याच्या बाहेर नेण्यात आले. हेरगिरीच्या संशयामुळे अनेकांना कायमचे तडीपार करण्यात आले. त्यावेळी ३० हजाराच्या आसपास असलेली चिनी लोकसंख्या कोलकाता-भारत सोडून झपाट्याने अन्य देशात विखुरली. याचा परिणाम म्हणून कोलकात्यात असलेल्या जवळपास सर्वच चिनी भाषक शाळा बंद पडल्या, पुन्हा सुरू होऊ शकल्या नाहीत. एक दोन शाळांची जबाबदारी कॅथलिक चर्चने स्वीकारली आणि सुमारे पाऊणशे मुले पटावर असलेली एक शाळा आणखी काही वर्षे चालवली. दरम्यान अनेक चिनी कुटुंबीयांनी धर्मपरिवर्तन करून ख्रिस्ताच्या धर्माला जवळ केले आणि इंग्रजी त्यांची प्रमुख भाषा झाली. कमी पटसंख्या, आर्थिक मदतीचा अभाव आणि चिनी भाषा शिकण्यासाठी अनुत्सुक नवीन पिढी अशा कचाट्यात सापडून चिनी भाषेतले शिक्षण हळूहळू कोलकात्यातून हद्दपार झाले. शांघाय शहरातून आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी स्थापन केलेले ग्रेस लिंग लियांग चायनीज चर्च स्कूल (स्थापना १९४९) आणि त्याची एक शाखा आज कोलकात्यात आहे. म्हणायला चिनी शाळा असली तरी तेथे फक्त इंग्रजी भाषेतले शिक्षण दिले जाते.

काही वृद्ध मंडळी सोडली तर खुद्द चिनी स्वतःची भाषा बोलू-लिहू शकत नाहीत. कुठलीही भाषा मरणे म्हणजे एक संस्कृती नष्ट होणे. तदनुसार ‘कोलकात्यातील चीन’ म्हणजे आता फक्त चिनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या, चार-दोन चिनी रेस्तराँ आणि काही पडकी चिनी देवळं वागवणारा गलिच्छ भाग एवढेच.

शक्ती सामंतांच्या ‘हावडा ब्रिज’ ह्या हिंदी चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं आहे – मेरा नाम चिन चिन चू. गीता दत्तच्या आवाजातले ‘बाबूजी मैं चीन से आई चीनी जैसा दिल लाई’ कोलकात्यातील चिनीजनांचे वर्णनच जणू ……. साखरेला बंगालीत ‘चीनी’ आणि चीनमधून आयात होणाऱ्या पोर्सेलीनला “चिनीमाटी’ म्हणतात. दोनही समूहात शेकडो वर्षांच्या संपर्काचा हा प्रभाव असावा.

गाण्याचा आस्वाद घ्या - मेरा नाम चिन चिन चू (जालावरून साभार)

https://youtu.be/cQjXKdyp_wM

चिनी समाजाप्रमाणेच कोलकात्याला आपले म्हणणाऱ्या आणि आता कोलकात्यातून अस्तंगत होत असलेल्या देशी-विदेशी भाषा-धर्म-वंशसमूहाबद्दल पुढे..

(क्रमशः)

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये कोलकात्याच्या क्रमांक तिसरा! दीड कोटी लोकसंख्या असलेलं शहर आता विकासाच्या मागे लागलं आहे. पूर्व भारतातील सर्वात मोठे शहर असल्याने शेकडो लोक रोजगार, शिक्षण आणि अन्य कारणांमुळे नव्याने येऊन इथे वसत आहेत, गर्दी वाढतेच आहे. नवीन वस्त्या आकाराला येत आहेत. त्यात झोपडपट्ट्या आहेत तशी बहुमजली गृहसंकुलेही आहेत. वाढत्या लोकसंख्येला प्रचंड गर्दीच्या जुन्या शहराऐवजी शहराबाहेरच्या, थोड्या दूरवरच्या नवीन चकचकीत वस्त्या खुणावत आहेत. त्यांना मुख्य शहराशी जोडण्यासाठी शहरात उड्डाणपुलांचं जाळं विणण्यात येत आहे. नवीन काही घडतांना जुने गळून पडणार हा निसर्गनियमच आहे. तद्नुसार कोलकाता शहराचं रूप बदलत आहे आणि स्वभावही.

thumbnail_Modern Kolkata .jpg

कोलकाता महानगरात अनेक शहरं वसली असल्याचा उल्लेख लेखमालिकेच्या पूर्वभागात आहे. हे वेगळेपण शहराला ऐतिहासिक वारसा म्हणून मिळाले आहे पण वैविध्य हे वैभव मानण्याचा विचार समाजातून हळूहळू हद्दपार होत आहे. अशाच समाजांविषयी या भागात :

शेक्सपिअरचे एक वचन आहे -“Let’s talk of graves, worms and epitaphs.” कोठल्याही समाजाची स्मृतिस्थळे म्हणजे त्या समाजाबद्दलचे त्रिमितीतले चिरंतन भाष्य. कदाचित त्यामुळेच मानववंश आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून कबरी, प्रार्थनास्थळे, छत्र्या, स्मारके बांधत असावा. कोलकात्यातील विविध समाजांच्या स्मशानामध्ये माणसे तर पुरली आहेतच, अनेक समाजांचा इतिहास, त्यांची ओळखही पुरलेली आहे. इथे चिरनिद्रा घेत असलेल्या लोकांमध्ये ब्रिटिश राज्यकर्ते आहेत, डच संशोधक आहेत, मैसूरच्या टिपू सुलतानची मुले आहेत, बगदादी ज्यू आहेत, अवधचा नवाब वाजिद अली शाह आणि त्याचं गणगोत आहे, अँग्लो-इंडियन मंडळी आहेत, झोराष्ट्रीयन पारशी आहेत, ग्रीक दर्यावर्दी आहेत, फ्रेंच कलाकार, अफगाणी आणि सीरियन सैनिक आहेत.

कोलकात्यात सर्वात जुनी ‘ख्रिश्चन’ कबर एका रझाबीबी नामक ‘अर्मेनियन’ स्त्रीची आहे. कबरीवर कोरलेल्या मजकुरात दफनविधी १६३० साली झाल्याची नोंद आहे !

खुष्कीच्या मार्गाने कोलकात्यापासून अर्मेनिया हा देश साधारण ४५०० किलोमीटर दूर असला तरी अर्मेनियन समाजाचे कोलकात्याशी संबंध फार जुने आहेत. एकेकाळी सुमारे २० हजार श्रीमंत अर्मेनियन कोलकात्याच्या ‘व्हाईट टाऊन’मध्ये राहात. त्यांना ‘द ट्रेडिंग प्रिन्स कम्युनिटी’ असे म्हणत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा कोलकात्याच्या उच्चभ्रू भागातल्या सुमारे ३५० इमारतींची मालकी एकट्या जोहान सी गॅल्स्टन या अर्मेनियन माणसाकडे होती. आद्य पंचतारांकित हॉटेल ‘द ग्रँड’चा (आजचे ओबेरॉय द ग्रँड) मालक अरातून स्टीफन, एकावेळी अनेक रोल्सरॉयस मोटारी बाळगणारा टिम टॉडस, कोट्यवधी रुपयांचा दानधर्म सहज करणारा पॉल चॅटर असे अनेक धनाढ्य लोक या समाजात होते. आज कोलकात्यात संख्येने जेमतेम १०० उरलेल्या अर्मेनियन समाजाची संपत्ती काही हजार कोटी रु.ची सहज असेल. हा समाज प्रख्यात HSBC बँकेचा सर्वात मोठा भागधारक आहे. रग्बीच्या खेळात विशेष प्राविण्य आणि ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रथेप्रमाणे डिसेंबरऐवजी जानेवारीत साजरा होणारा ख्रिसमस ही दोन्ही कोलकात्यातल्या अर्मेनियन समाजाची खास वैशिष्ट्ये!

ज्या मोजक्या अर्मेनियन खाणाखुणा आज राहिल्या आहेत त्या बऱ्या अवस्थेत आहेत. शहराच्या बडा बाजार भागात ‘अर्मेनियन स्ट्रीट’ आहे. व्यापारी जहाजांसाठी बांधलेला अर्मेनियन घाट आजही वापरात आहे. लोकसंख्या आटल्यामुळे अर्मेनियन शाळा आणि प्रार्थनास्थळे मात्र आता ओस पडली आहेत.

48994725131_f407ec702d_b.jpgप्रचंड गर्दीच्या अर्मेनिअन स्ट्रीट भागात ‘चर्च ऑफ होली नाझरेथ’

* * *

कोलकात्यात ब्रिटिशांच्याही आधी व्यापारात अग्रक्रम मिळवणारा समूह म्हणजे मारवाडी. या व्यापारी समुदायाने ब्रिटिशांशी एकाचवेळी व्यापारात तीव्र स्पर्धा आणि स्थानिक पातळीवर सहकार्य असे दुपेडी धोरण ठेवत स्वतःचा उत्कर्ष गाठला. स्थानिक भाषा, प्रथा-परंपरा आत्मसात करून मिळून मिसळून राहत असल्यामुळे त्यांना विरोधही झाला नाही. राजस्थानच्या दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेले अनेक होतकरू मारवाडी व्यापारी कोलकात्यात ज्यूट, चहा, परंपरागत ‘हुंडी’ आणि सावकारीच्या व्यवसायात जम बसवून प्रचंड श्रीमंत झाले. बडा बाजार भागात त्यांचे अनेक ‘बास’ आहेत. हे पारंपरिक ‘बास’ म्हणजे आजच्या भाषेत ‘बिझनेस इन्क्युबेशन सेंटर’. एक खानावळ आणि त्याला लागून मोठ्या ओसऱ्यांवर गाद्या-तक्क्यांची बैठक. रोजच्या जेवणाची सोय खानावळीत आणि व्यापारासाठी आणि रात्रीच्या झोपेसाठी ओसरी एवढ्या त्रोटक भांडवलावर शेकडो मारवाडी तरुणांनी कोलकात्यात पाय रोवले आणि पुढे डोळे दिपवणारे ऐश्वर्य प्राप्त केले. बिर्ला, गोयनका, मित्तल, बांगड, बाजोरिया, बिनानी, फतेहपुरीया, सिंघानिया, धानुका अशा अनेक मारवाडी व्यावसायिकांनी कोलकात्यात आपला व्यवसाय सुरू केला, वाढवला आणि त्याचा पुढे देशभर-जगभर विस्तार केला. आजही आपले व्यापारकौशल्य, संपत्ती आणि मनमिळावू स्वभावाच्या जोरावर हा समाज कोलकात्याच्या जीवनावर प्रभाव राखून आहे. त्यांच्या भव्य प्रासादतुल्य घरांबद्दल, त्यांच्या संपत्तीबद्दल ईर्षेचा सुप्त भाव अन्य शहरवासियांमध्ये दिसून येतो.

मिळवलेल्या वैभवाचा सदुपयोग अनेक मारवाडी दानशूरांनी केला आहे. ख्रिश्चन चर्च संचालित संस्थांचे अपवाद सोडले तर कोलकात्यातील अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, अनाथालये आणि रुग्णालये मारवाडी समाजानी केलेल्या आर्थिक मदतीतून उभारण्यात आली आहेत. जवळपास सर्वच संस्थांच्या संचालनात आणि व्यवस्थापनात समाजातील प्रतिष्ठित लोक सक्रिय सहभाग नोंदवताना दिसतात.

48994074808_1a12dc2bfa.jpgबिर्ला प्लॅनिटोरियम आणि बिर्ला सायन्स सेंटर

कोलकात्यातील जुन्या मारवाडी धनाढ्यांपैकी प्रसिद्ध नाव म्हणजे बिर्ला कुटुंबियांचे. कोलकात्यात बिर्ला तारांगण, बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर, बिर्ला इंडस्ट्रियल अँड टेकनॉलॉजी म्युझियम अशा अनेक सुंदर लोकोपयोगी इमारती या कुटुंबाने जनतेसाठी उभारल्या आहेत. बिर्लांच्या नावाने एखादा चौक किंवा रस्ता मात्र कोलकात्यात सापडणार नाही.

* * *

शहराच्या श्रीमंतीत भर टाकणारे ज्यू व्यापारी कोलकात्यात बरेच उशीरा दाखल झाले, साधारण १८३० ते १८४० च्या काळात. अल्पावधीतच त्यांनी इथे चांगला जम बसवला. या समाजाने अनेक कलाकार, गायक-वादक आणि दानशूर समाजसेवक शहराला दिले आहेत. त्यांची संख्या आता फार नसली तरी देखण्या ज्यू प्रार्थनास्थळांना (सिनेगॉग) शहरात तोटा नाही.

48994080838_bf7a1e3c72_c.jpgमेगन डेव्हिड सिनेगॉग, अंतर्गत रचना

* * *
‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जात’ …… हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आवडणाऱ्या बहुतांश लोकांना ही ठुमरी नक्कीच माहीत असेल. अवधचा दहावा आणि शेवटचा नवाब वाजिद अली खानची ही कालजयी रचना. लखनऊच्या ‘माहेरा’तून परागंदा झालेल्या रसिकाग्रणी वाजिद अलीचे ‘सासर’ आहे कोलकात्यातील मटीया बुर्ज भागात. त्याच्यासोबत त्याचा भलामोठा परिवार, दास-दासी, खानसामे, घोडे, पाळीव प्राण्या-पक्षांची फौज, त्याच्या प्राणप्रिय कत्थक नृत्यांगना, ठुमरी गायक-गायिका, संगीत आणि नृत्य-गुरु, नामांकित तवायफ आणि साजिंदे असे सगळेच गणगोत कोलकात्याच्या ‘मिनी लखनऊ’त चिरविश्रांती घेत आहे.

सध्या हुगळीच्या काठी ‘गार्डन रीच’ भागात आजही मटीया बुर्जचे काही अवशेष आहेत. वाजिद अलीचा आणि त्याच्या कलासक्त इतिहासाचा वारसा बहुदा कोणालाच नको आहे, त्यामुळे इथे फारसे कोणी जातांना दिसत नाही. बहुतेकांना इथे ऐतिहासिक महत्वाचे काही असेल याची कल्पना नसावी. सध्या हा भाग दोन वेगळ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे – तयार कपड्यांच्या ब्रॅंड्ससाठी डेनिम कपडे शिवणाऱ्यांच्या मोठ्या वस्तीमुळे आणि दुसरे म्हणजे दक्षिण-पूर्व रेल्वेच्या मुख्यालयामुळे.

परागंदा होऊन कोलकात्याला स्थायिक होणारा एकटा वाजिद अली शाहच नव्हता. मैसूरच्या टीपू सुलतानाचा मुलगा गुलाम मोहम्मद अनेक वर्षे कोलकात्यात वास्तव्याला होता. त्याने टीपू सुलतानाच्या स्मरणार्थ एक अतीव सुंदर वास्तू या शहराला दिली आहे – आजही सुस्थितीत असलेली धरमतल्ला भागातील टीपू सुलतान मस्जिद! आता तिचे ‘नूतनीकरण’ घडून मूळच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे तरी वास्तूचे सौष्ठव वादातीत आहे. मुघल शैलीतल्या या मशिदीचे वेगळेपण म्हणजे पाठीला जोडलेल्या सयामी जुळ्यांसारखी रचना. १८३०-१८३२ मध्ये बांधल्यामुळे त्यावेळी स्थानिक अभिजनांमध्ये प्रचलित वेगवेगळ्या युरोपियन शैलींचे हलकेसे शिंपण मशिदीच्या कमानी, खिडक्या, गवाक्षांवर दिसते.

48994081908_1f4098a273.jpgटीपू सुलतान मस्जिद, फ्रान्सिस फर्थ यांनी १८७० मध्ये टिपलेले छायाचित्र

गुलाम मोहम्मदला अभिवादन म्हणून टीपू मशिदीचे डिझाईन हुबेहूब वापरून स्थानिक वक्फ बोर्डाने टॉलीगंज भागात ‘प्रिन्स गुलाम मोहम्मद मशीद’ बांधून घेतली आहे. पण तिकडे जाण्यात काही अर्थ नाही, उगाच ‘हुबेहूब’ च्या व्याख्या बदलाव्या लागतील.

* * *

मुंबईप्रमाणेच येथेही पारशी-झोराष्ट्रीयन समाज अनेक शतकांपासून आहे. ब्रिटिश छत्राखाली चीनशी मुक्त व्यापार करण्याची मुभा असलेला शहरातील एकमेव समाज. त्याचसोबत नौकाबांधणी क्षेत्रात मक्तेदारी आणि बांधकामाच्या सरकारी कंत्राटांमुळे प्रचंड वैभव कमावणाऱ्या पारशी समाजाने कोलकात्याच्या शिक्षण, चित्रपट आणि वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान पुरेपूर दिले आहे. दानशूरपणात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. कोलकात्याच्या सिनेमा आणि नाट्यचळवळीत पारशी समाजाचे योगदान विशेष उल्लेखण्यासारखे. आता समाजाची संख्या उतरणीला लागली आहे. अतिवृद्ध मंडळी वगळता येथील बहुतेक पारशी अमेरिका, सिंगापूर आणि हाँगकाँगला स्थानांतरित झाले आहेत. पारशी-झोराष्ट्रीयन अग्यारी आणि आतषबागेत सर्वत्र सामसूम असते.

48994629831_d8fd6301bb_k.jpgपारसी अंजुमन आतिष अदरान

साधारण ३२ लाख मुस्लिम इथे आहेत. हिंदू – मुस्लिम संमिश्र वस्त्या जवळपास संपुष्टात आल्या आहेत. पार्क सर्कस आणि काशीया बागान सारख्या भागात १०० टक्के मुस्लिम वस्त्या आहेत. त्यांच्यातही मूळचे बंगाली, बांगलादेशी विस्थापित मुस्लिम, पठाणी, उर्दूभाषक मुस्लिम, बोहरी, शिया, बिहारी, तोपसिया भागात राहणारे सुमारे १० हजार इराकी बिरादरीचे मुस्लिम, खाटीककाम आणि लोहारकाम करणारे मुस्लिम अशी विभागणी आहे. १ लाख अँग्लो-इंडियन, २५ हजार तिबेटी, काही लाख नेपाळी असा लवाजमा शहरात आहे. बांगलादेश युद्धात अक्षरशः लाखोंच्या संख्येने शरणार्थी लोकांनी कोलकात्यात कायमचा आश्रय घेतला आहे. आज रोजगाराच्या आशेने ग्रामीण बंगालमधून, शेजारच्या बिहार आणि झारखंड राज्यातून कोलकात्यात आदळणाऱ्या लोंढ्यांबद्दल शहरवासियांमध्ये नाराजी आहे, तसेच नाईलाज असल्याची हतबलता आहे. शहर कुणालाच पुरे पडेनासे झाले आहे.

48994638846_70f80e74d7_b.jpg

* * *

शहराच्या व्यक्तिमत्वाचा खरा आरसा म्हणजे तेथील खाद्यजीवन. कोलकात्याच्या बहुरंगी-बहुढंगी खाद्यसंस्कृतीबद्दल शेवटच्या भागात आधीच लिहून झाले आहे. :-

बंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची
https://www.maayboli.com/node/72459

(समाप्त)

 

बंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची

मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही. जाणते-अजाणतेपणी अनेक सूक्ष्म भावभावना अन्नाशी जुळलेल्या असतात. प्रेम, वात्सल्य, अभिमान, स्वच्छता, सुरक्षा, संस्कृती, समाज, धार्मिक समजुती, परंपरा, भूगोल, इतिहास ... सगळ्यांचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. प्रत्येक घराच्या, समाजाच्या काही खास खाद्यपरंपरा असतात. ह्या खाद्यपरंपरा म्हणजे आपल्या समाजसंस्कृतीचा आरसा. ह्या लेखात वाचूया कोलकात्याच्या एकमेवाद्वितीय खाद्यपरंपरेविषयी.

आपण ज्या चंगळवादी वातावरणात वावरतो आहोत तेथे खाण्यापिण्याचे भरपूर पर्याय आपल्यासमोर हात जोडून उभे आहेत. नवनवीन चवी चाखणे सोपे होत आहे. उर्वरित भारताप्रमाणेच कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीतही प्रचंड वैविध्य आहे. 'ग्लोबल इज लोकल' ह्या नारा सगळीकडे आहे. याची दुसरी बाजू म्हणून 'लोकल इज ग्लोबल' असेही होत आहे. पिझा-पास्ता शहरात रुळला आहे पण स्थानिक ‘बंगाली फूड’चे चाहते कमी न होता वाढताहेत. कोलकात्याच्या बल्लवाचार्यांनी अ-बंगाली रहिवासीयांना परंपरागत बंगाली भोजनाची चटक लावली आहे, ‘बंगभोज’ आता ग्लोबल झाले आहे.

IMG_3400.jpg‘बंगभोज’

मत्स्याहारावर मनापासून प्रेम करणाऱ्या बंगालीजनांसाठी निसर्गानेही मुक्तहस्ते जलचरांची उधळण केली आहे. इतकी की बंगाली भाषेत माश्यांना 'जलपुष्प' म्हटले जाते. कोलकात्याला तर एकाचवेळी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातले, हुगळीच्या नदीपात्रातले, गंगासागरच्या नदीमुखातले, मुबलक असलेल्या पोखरा-तलाव आणि पाणथळ जागांमुळे गोड्या पाण्याच्या तळ्यातले असे समस्त जलचर ताजे आणि भरपूर मिळण्याचे वरदान मिळालेय. ‘माछेर झोल आणि भात’ हे बंगाली भोजन प्रसिद्धच आहे. मत्स्याहार पसंत नसलेला बंगाली माणूस दुर्मिळ. ज्या दिवशी जेवणात मासे नसतील तो दिवस आयुष्याचा मोजणीत धरू नये अशा अर्थाची मजेशीर म्हण स्थानिकांमध्ये आहे.

IMG_3447.jpg‘बांगलार सामिष भोज’

पारंपरिक बंगाली जेवणाला चार उपांगे आहेत - चर्ब्या (संस्कृत-चर्व्य, चावण्यासाठी), चोष्य (चोखुन खाण्यासाठी), लेह्य (चटणीसारखे चाटून खाण्यासाठी) आणि पेय म्हणजे पिण्यासाठी. घरोघरी केल्या जाणाऱ्या रोजच्या स्वयंपाकात ह्या चारही प्रकारच्या पदार्थांचा समावेश असतो. मराठी पाककृतींच्या लेखनात जे स्थान 'रुचिरा'कार कमलाबाई ओगल्यांचे तेच बंगालीत विप्रदास मुखोपाध्याय यांचे. उत्तम बंगाली भोजनाचा मेन्यू काय असावा याबद्दल विप्रदास सुचवतात:- लूची (पुरी), बेगुन भाजा (वांग्याचे तळलेले काप), गुलेल कबाब, प्रॉन कटलेट, तळलेले भेटकी मासे, मत्स्यमंजिरी (अगदी छोटे मासे), मासे टाकून केलेले मुगाचे वरण, चोखा (बटाटा रस्सा भाजी), फुलकोपीर भाजा (फ्लॉवरचे तळलेले तुरे), फिश मलाई करी (पांढरे मासे वापरून), बेदाणे टाकून केलेला जाफरानी पुलाव, फिश पुलाव, साखरपाकातले कैरीचे लोणचे, पपईची चटणी, मिष्टी दोई, पायेश, कलाकंद, पोस्तो (खसखस) बर्फी, साधा भात, तळलेले बटाटा काप, पापड आणि मोरांबा.

इतके सगळे प्रकार रोजच्या जेवणात अर्थातच कुणी करत नाही, पण विविध प्रकारचे मासे, बटाटे, मोहरी आणि खसखस बंगाली स्वयंपाकघरात प्रचंड प्रमाणात वापरल्या जातात. आलूर चॉप, आलूर दम, पोस्तो दियेर आलू, आलू पुरी, आलूर तोरकारी, आलू दियेर खिचुरी, मांगशोर आलू, झुरी आलू भाजा, आलू परोठा, आलू दियेर बिर्यानी...... कोलकात्याच्या बंगाली भोजनात बटाटा प्रेम डोकावते. वैष्णवपंथाच्या प्रभावामुळे काहींनी शुद्ध शाकाहार अंगिकारला तेव्हापासून 'खिचुरी' उर्फ खिचडीला बंगाली जेवणात ध्रुवपद मिळालेय. शहरवासीयांचे 'कम्फर्ट फूड' असलेल्या खिचुरीचे भरपूर प्रकार घरोघरी रांधले जातात.

विशिष्ट प्रसंगांच्या सामिष बंगाली मेजवानीत कोळंबी अनिवार्य! मलाई चिंगरी, डाभ चिंगरी (नारळपाणी पिण्यासाठी वापरतो तसल्या कोवळ्या ओल्या नारळात शिजवलेली कोळंबी) आणि चिंगरी दिये मोचार घोंटो (केळीची फुले वापरून) सारख्या पाककृती बंगाली खाद्यजीवनातले सुखनिधान आहे.

IMG_3404.jpg‘चिंगरी दिये मोचार घोंटो’

मूळचे पश्चिम बंगालमधील आणि ढाका-खुलना-जसोर-सिल्हेट म्हणजे आताच्या बांग्लादेशात मूळ असलेल्या लोकांच्या (घोटी आणि बांगला) पारंपारिक खानपानात आणि एकच पदार्थ रांधण्याच्या पद्धतीत सूक्ष्म फरक असल्याचा दावा खवैये करतात. इलीश (हिल्सा) मासे खावे तर ‘बांगला’ घरात आणि ‘चिंगरी’ (कोळंबी) खावी ती घोटी गृहिणीच्या हातची असे तत्व अनेक बंगालीजन पाळतात. आज्या-पणज्यांच्यावेळी हा मुद्दा बरोबर असला तरी आता सगळेच पश्चिम बंगालमध्ये राहत असल्याने ह्या मुद्द्याला फारसा अर्थ राहिला नसल्याचे अनेकांचे मत आहे. असे असले तरी खास बांगलादेशी पद्धतीचे 'शुक्तिमाश' (सुकट) आणि रोहू-इलीश माछेर झोल खाण्यासाठी शहरातल्या 'पद्मापारेर रोंगघर' सारख्या 'बांग्लादेशी' रेस्तराँत कोलकातावासी गर्दी करतात.

* * *

कोलकात्यातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव म्हणजे दुर्गापूजा आणि पोटपूजा हा उत्सवातला महत्वाचा भाग. सार्वजनिक दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये खाण्यापिण्यासाठी जंगी व्यवस्था असते. खिचुरी, पुरी, बेगुन भाजा, छेनार पायेश असा 'भोग' (प्रसाद) बहुतेक ठिकाणी असतो. जुन्या श्रीमंत जमीनदार कुटुंबांच्या दुर्गापूजेत हाच 'भोग' अनेकदा ६० पेक्षा जास्त पदार्थांचा असतो! घी भात, वासंती भात, राधावल्लभी (सारणयुक्त पुऱ्या), गोडाच्या पुऱ्या, कोचू साग, खिचुरी, अनेक प्रकारचे वडे, शोर भाजा, निमकी असे 'हटके' पदार्थ आणि सीताभोग, जोयनगरेर मोआ, पंतुआ, लवंग लतिका, जिलबी, छेनार जिलपी, खीर कदम, मालपुवा, केशर पायेश, संदेश, इंद्राणी, हिरामणी, रसमणी, दुर्गाभोग, रसमोहन, खीरकदम, चमचम, लांगचा, खीरमोहन, कांचागोला, चंदन खीर, तालशांश, चंद्रपुली, पंतुआ, पान गाजा, जोलभरा संदेश, लेडी किनी, मिहीदाना अश्या मनोरम नावांच्या डझनावारी प्रकारच्या बंगाली मिठायांचा भरगच्च मेन्यू दुर्गाभक्तांच्या दिमतीला असतो.

IMG_3437.jpgनोलेन गुरेर रोशोगुल्ला

मांसाहाराचा नैवद्य ही देशात सगळीकडेच प्रचलित असलेली परंपरा. अनेक बंगाली कुटुंबात 'ब्रिथा' म्हणजे 'नैवैद्याचे नसलेले' मांस खाणे निषिद्ध मानले जाते. ह्याचे निवारण करण्यासाठी कोलकात्यातल्या मांसविक्रेत्यांनी एक नामी शक्कल लढवली आहे - प्रत्येक प्राणी कापण्याआधी दुकानातच ठेवलेल्या काली प्रतिमेला त्याचा नैवेद्य दाखवण्याची! म्हणून आता कोलकात्यात कोठेच ‘ब्रिथा’ मांस मिळत नाही, अगदी दुकानमालक हिंदू नसला तरीही.

* * *

काही अपवाद वगळता कोलकाता शहरात सर्वभक्षी लोक बहुसंख्य असल्यामुळे खाण्यापिण्याच्या प्रांतात परकीय-परप्रांतीय-परधर्मीय लोकांशी संघर्ष न होता उलट देवाण-घेवाणच जास्त घडली आहे. कोलकात्यात अरबांनी नान आणि मोगलांनी बिर्यानी आणली तर पोर्तुगीझांनी दुधापासून पनीर आणि चीझ बनवण्याची कला. ब्रिटिशांनी ब्लॅक टी उर्फ बिनदुधाचा चहा पिण्याची सवय स्थानिकांना लावली. चिनी-नेपाळी-तिबेटी बांधवांनी स्थानिकांना मोमो, नूडल्स, थुकपा, शेजवान राईस, पोर्क सूप अशा पदार्थांची चटक लावली तर मारवाड आणि वाराणसीच्या हलवायांनी इथे उत्तर भारतीय मिठाया, समोसे आणि चाट सारखे पदार्थ रुजवले. स्थानिकांचे 'छेना'वंशीय मिठायांवरचे प्रेम, जलचरांची प्रचंड विविधता आणि नवनवीन पदार्थ चाखून बघण्याची हौस ह्यामुळे कोलकात्याचे खाद्यजीवन समृद्ध आहे. खाण्यापिण्यातला चोखंदळपणा कोलकातावासीयांचा खास गुण.

दुपारच्या जेवणात फक्त 'कॉंटिनेंटल' पद्धतीचे खाणाऱ्यांची सुदीर्घ परंपरा शहरातल्या भद्रलोकात आहे. ग्रेट ईस्टर्न, पॉलिनेशिया, फ्रिपोज अशी खास 'कॉंटिनेंटल ओन्ली' रेस्तराँ आता बंद पडली असली तरी त्यांच्यासारखी अनेक नवीन रेस्तराँ शहरात आकाराला आली आहेत. अनेक पक्क्या यूरोपीय पदार्थांचं कोलकात्यानं संपूर्ण बंगालीकरण करून टाकलं आहे. याचवर्षी शंभरी पूर्ण केलेल्या प्रसिद्ध 'ब्रिटानिया' बिस्कीट ब्रँडचा जन्म कोलकात्याचा. ब्रिटानियाने कोलकात्याला बिस्कीट आणि बेकरी पदार्थाची गोडी लावली असली तरी त्याहीआधी ब्राम्होसमाजी सुधारकांनी बिस्किटे आणि शेरीचे सेवन इथे रुजवले. जुन्याकाळी शहरात हे पदार्थ बनवणारे लोक हमखास मुस्लिम किंवा तथाकथित शूद्र समाजातले असल्यामुळे भद्राजनांनी हे पदार्थ खाण्यामागे एक प्रकारे सामाजिक बंधने तोडण्याचा अविर्भाव असे. खाण्यातून समाज बदलतो तो असा!

बीफचा खप शहरात प्रचंड आहे, बहुधा भारतातल्या कोणत्याही शहरापेक्षा अधिकच. सध्या या विषयावरून वातावरण गढूळ झाले असले तरी अनेक शहरवासी फार आधीपासून बीफ आवडीने खातात. पार्क सर्कस भागातल्या 'हॉटेल जमजम'ची बीफ बिर्यानी स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहे. तुलनेनी स्वस्त असल्यामुळे बीफला शहरातल्या कष्टकरी जनतेची विशेष पसंती आहे. दररोज संध्याकाळी फ्री स्कूल स्ट्रीटचे 'मोकाम्बो' आणि पार्क स्ट्रीटवरचे 'ऑलीपब' सारखी रेस्तराँ बीफप्रेमी खवैयांनी खच्चून भरलेली असतात. तिबेटी-नेपाळी प्रकारच्या चिली बीफ, फाले, बीफ मोमो इत्यादींचे चाहते सौ. डोमा वांग यांचे 'शिम-शिम' रेस्तराँ गाठतात. आयरिश स्टीक, बीफ स्टीक सिझलर, बीफ सॉसेज, ऑक्स टंग सूप, स्मोकड हंगेरियन सॉसेज अशा पदार्थांवर ताव मारणाऱ्या लोकांमध्ये अँग्लो इंडियन आणि मुस्लिम तरुणांसोबत चॅटर्जी-बॅनर्जी मंडळीही भरपूर असतात. ह्याबाबतीत कोलकाता शहर जातीधर्मावरून भेदभाव करत नाही.

* * *

शहरातला मारवाडी समाज शाकाहाराचा आग्रह धरणारा असल्यामुळे पार्क स्ट्रीट सारख्या उच्चभ्रू भागात 'शुद्ध शाकाहारी' रेस्तराँची रेलचेल आहे. इतकेच काय भारतातल्या मोजक्याच 'मिशलिन स्टार' दर्जा असलेल्या दुर्मिळ आणि अति-महागड्या रेस्तराँपैकी कोलकात्याच्या 'Yauatcha' मध्ये शाकाहारी ग्राहकांच्या मागणीनुसार वेगळा शुद्ध शाकाहारी विभाग आहे !

'ग्लोबल फूड' शहराला नवे नाही, त्यामुळे त्याचे फार कौतुकही नाही. पिझा-पास्ता-सँडविचपेक्षा चायनीज नूडल्स-सूप-मोमो-थुकपा स्थानिकांना जवळचे वाटतात, अपवाद शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा. सिंघाडा (छोटे समोसे) आणि चीज कटलेट, एग रोल यांना भरपूर मागणी आहे.

IMG_3433.jpg

रस्तोरस्ती हातगाड्यांवर मिळणारे काठी रोल, फिश/पनीर चॉप आणि फुचका (पाणीपुरी), झालमुरी (भेळ) खाल्ल्याशिवाय कोलकात्याच्या खाद्ययात्रा अपूर्णच.

IMG_3432.jpg

* * *

'बडा साहिब' लोकांसाठी असलेले कोलकात्यातले उच्चभ्रू 'क्लब्स' एका वेगळ्या खाद्यपरंपरेचे पाईक आहेत. विदेशी उंची मद्यात सोडा मिसळून पिण्याची परंपरा कोलकात्याच्या क्लब्समध्येच सुरु झाली असे एक मत आहे. पाणी आणि बर्फाच्या शुद्धतेविषयी खात्री नसलेल्या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांकडे तिचे जनकत्व असावे. आजही क्लबच्या सदस्यांना आणि त्यांच्या पाहुण्यांना 'भेटकी सिसिले', 'डाकबंगलो मटन रोस्ट' आणि 'बॅनबेरी अँपल पाय' सारख्या पदार्थांचा अनोखा अँग्लो-इंडियन खाना' पेश करणाऱ्या ह्या राजेशाही क्लब्सची समृद्ध खाद्यपरंपरा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

* * *

साखरेचे खाणार त्याला कोलकाता देणार.

'मिष्टी' उर्फ बंगाली मिठाया हा कोलकात्याचा 'वीक पॉईंट'! रसगुल्ला -रोशोगुलाचे जन्मगाव बंगालचे कोलकाता की ओडिशाचे जगन्नाथपुरी ह्याबद्दल भरपूर वाद असले तरी कोलकात्याचे रसगुल्ला सम्राट 'नबीन चंद्र दास' हेच असल्याबद्दल स्थानिक मंडळी ठाम आहेत. दासबाबूंचे 'के सी दास अँड कंपनी' हे बागबझार भागातले प्रख्यात दुकान गेली १५१ वर्षे रसगुल्ले आणि उत्तमोत्तम बंगाली मिठाया विकत आहे. आता त्यांच्या अनेक शाखा शहरभर आहेत, सगळीकडे भरपूर गर्दी असते. पण दास एकटेच नाहीत, कोलकात्याच्या मिठाईप्रेमाला दाद देण्यासाठी आणि जगावेगळ्या मिठायांचा भरपूर पुरवठा सतत करण्यासाठी इथे शेकडो दुकाने सज्ज आहेत. ४८ प्रकारचे रसगुल्ले आणि ६४ प्रकारचे ‘संदेश’ विकणारी दुकाने ग्राहकांनी खच्चून भरली असली तरी खरे दर्दी असल्या प्रकारांना ‘प्रयोगशील मिठाईविक्रेत्यांनी प्रसिद्धीसाठी केलेला आचरटपणा’ म्हणून नाक मुरडतात.

49022079233_7dceb980ec_b.jpg‘राजकीय ‘संदेश’ देणारे 'संदेश'

कोपऱ्यावरच्या दुकानातून मिठाया विकत घेणे अनेकांना आवडत नाही. बंगाली मिठायांचे खरे दर्दी चित्तरंजनच्या ताज्या गरम रसगुल्ल्यांसाठी, भीम नागच्या 'लेडीकिनी' मिठाईसाठी, गंगुराम हलवाईंच्या 'जोलभरा संदेश'साठी, बलराम मलिक-राधारमण मलिकच्या 'छेनार जिलपी'साठी, बांछारामच्या 'गोविंदभोग'साठी कोलकात्याच्या भयंकर गर्दीतून २०-२० किमी प्रवास करायलाही एका पायावर तयार असतात असा त्यांचा लौकिक आणि असा त्यांचा महिमा.

IMG_3452.jpg‘कोलकात्याची प्रसिद्ध 'मिष्टी’

पहाटे पाचला सुरु होणाऱ्या आणि रात्री उशिरापर्यंतही न संपणाऱ्या शहराच्या खाद्ययात्रेत 'काउन्ट द मेमोरीज, नॉट द कॅलरीज' हे खवैयांचे ब्रीदवाक्य शब्दशः जगणाऱ्या कोलकातावासीयांचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

 

बोनेदी बारीर पूजो

Submitted by अनिंद्य on 16 October, 2018 - 08:41

“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो.

'दुर्गापूजा' (बंगालीत फक्त 'पूजो') असा नुसता शब्द जरी ऐकला तरी समस्त बंगालीजनांचे डोळे लकाकतात आणि चेहऱ्यावर हमखास स्मिताक्षरे उमटतात. महाराष्ट्र आणि बंगाल दोहोंमध्ये असलेल्या अनेकानेक साम्यस्थळांमधले एक उठून दिसणारे साम्य म्हणजे उत्सवप्रियता. त्यात मराठी मनात जे महत्व गणेशोत्सवाचे तेच महत्व बंगालीजनांमध्ये दुर्गोत्सवाचे. हे दोन्ही उत्सव साजरे करण्याची पद्धत, त्यातील उत्साह, जनसामान्यांचा सहभाग, भव्य कलात्मक मंडप, देखावे, पारंपरिक खाद्यपदार्थांची लयलूट, नातेवाईक-मित्रमंडळींचे एकत्र जमणे….. बरेचसे सारखे आहे. माझ्या कन्येच्या शब्दात सांगायचे तर 'बाप्पाज मॉम टेक्स हिज प्लेस अँड शी स्टील्स द शो. आफ्टरऑल शी इज द मॉम, सो शी नोज हाऊ टु'

लहान-थोर-जवळचे-दूरचे-नवीन-जुने नातेवाईक आणि मित्र सगळ्यांनी ठरवून एकमेकांना भेटायचा वार्षिक सोहळा म्हणजे बंगालातील दुर्गापूजा. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध गणपती मंडळांसारखीच कोलकात्यात सार्वजनिक दुर्गा मंडळे आहेत. त्याचे भव्य पंडाल, रंगांची उधळण करणारे कलात्मक देखावे, रात्री रंगीबेरंगी रोषणाईने झगमगलेले वातावरण, खाण्यापिण्याची शेकडो दुकाने, सकाळ-संध्याकाळ होणारी पूजा आणि आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळीकडे कोलकातावासियांची अपार गर्दी असे दृश्य सर्वत्र असते.

पण हा झाला सर्वसामान्य लोकांचा वार्षिक दुर्गोत्सव. मी सांगतोय ती कहाणी थोडी वेगळी आहे - कलकत्त्याच्या गर्भश्रीमंत जमीनदारांच्या भव्य महालांमध्ये होणाऱ्या दुर्गोत्सवाची, म्हणजेच 'बोनेदी बारीर पूजो' ची.

पूर्व भारतात अनेक शतकांपासून शाक्तपंथाचा प्रभाव आहे. ईश्वराला शक्तीरूपात पुजण्याची परंपरा अगदी चौथ्या शतकापासून आहे. सहाव्या शतकानंतर अनेक आदिवासी दैवते हळूहळू वैदिक देवतांमध्ये समाविष्ट होऊ लागली आणि काली / चामुंडा अश्या रौद्ररूपिणी देवींचे उग्र स्वरूप उदयाला आले, लोकप्रिय झाले. देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक पशुपक्ष्यांचे बळी-नरबळी पूजाविधीत समाविष्ट होते. मातृरुपी, शांत, लेकुरवाळी वत्सलमूर्ती 'दुर्गा' हे रूप बरेच उशिराने विकसित झाले आहे, साधारण सोळाव्या शतकाच्या शेवटी.

काही मोजक्या धनाढ्यांचे महाल वगळता शारदीय नवरात्रात दुर्गेची 'सारबोजनीन' (सार्वजनिक) पूजा हा प्रकार तर आणखीच उशिरा आला, साधारण अठराव्या शतकाच्या सुरवातीला. तोवर बंगालच्या नवाबाच्या सत्तेला उतरती कळा लागून बंगालातील जमीनदार स्वतंत्र झाले होते. १७५७ चे प्लासी युद्ध जिंकून ब्रिटिशांनी बंगाल ताब्यात घेतला तेंव्हा ह्या श्रीमंत जमीनदार मंडळींनी आपल्या निष्ठा इंग्रजांना वाहिल्या. इंग्रजांशी होणाऱ्या व्यापारामुळे त्यांच्या समृद्धीत आणखी भर पडली आणि त्यांच्या राजेशाही महालांमध्ये भव्य प्रमाणात वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा विस्तार पावली, प्रचंड लोकप्रिय झाली. हीच ती बोनेदी बारीर पूजो..... आजच्या 'सारबोजनीन' दुर्गापूजेचे आद्य रूप.

‘सुमारे दोन आठवडे चालणारा, बंगाली संगीत, नाट्य, लोककला, मनोरंजन, खास लखनौ-अलाहाबाद आणि मुर्शिदाबादहून आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगनांच्या मैफिली, खानपान यांची रेलचेल असलेला वैभवशाली महोत्सव’ असे वर्णन ब्रिटिश दस्तावेजांमध्ये मुबलक आढळते. आज तशी श्रीमंती आणि थाटमाट उरलेला नसला तरी ह्या दुर्गापूजा आपले ऐतिहासिक महत्व आणि पारंपरिक आब राखून आहेत.

जमीनदारांच्या भव्य महालांना बंगालीत 'राजबारी' असे नाव आहे. ह्या पूजा राजबारीतील 'ठाकुर दलान' नामक भव्य देवघरात साजऱ्या होतात, त्यासाठी पंडाल वगैरे बांधल्या जात नाहीत. महिना आधीपासून ठाकुर दलानाच्या साफसफाई आणि नवीन रंगकामाला सुरुवात होते.

पिढ्यांपिढ्यांचे ठरलेले मूर्तिकार ठरलेल्या साच्यात मूर्ती घडवायला घेतात आणि कलकत्त्याच्या कुमारटोलीचा भाग गजबजतो. शहराला दूर्गापूजेची चाहूल लागते. प्रतिमा घडवणारे कलाकार दुर्गप्रतिमेच्या मुखासाठी लागणारी माती सोनागाछी भागातील वेश्यांच्या घरून समारंभपूर्वक आणतात - वारांगना ह्याच खऱ्या 'चिरसोहागिनी' - अखंड सौभाग्यवती असतात ही भावना त्यामागे आहे.

भारतभर शारदीय नवरात्र हा 'नऊ' रात्रींचा सण असला तरी बंगालात दुर्गापूजा पाच दिवसांची असते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी (षष्ठी) राजबारीतील सजवलेल्या ठाकूर दलान मध्ये दुर्गेचे आगमन होते. बरे ही कुटुंबवत्सल दुर्गा एकटी येत नाही, तिच्यासोबत तिचा मोठा लवाजमा असतो - महिषासुराला पायाखाली चिरडणारी दुर्गा, तिचे दोन्ही पुत्र - गणपती आणि कार्तिकेय, सोबतीला लक्ष्मी आणि सरस्वती, क्वचित काही ठिकाणी शंकर सुद्धा सौंना सोबत करायला येतात Happy

दुसरे दिवशी सप्तमीला प्राणप्रतिष्ठेसाठी एक मजेशीर विधी असतो - कोला बहू ! सूर्योदयाच्या आधी केळीच्या कोवळ्या फांदीला गंगास्नान करवून वधूप्रमाणे भरजरी लाल वस्त्रांनी आणि दागिन्यानी सजवले जाते. हेच ते दुर्गेचे 'आत्मरूप' - कोला बहू किंवा केळीच्या पानातील सवाष्ण दुर्गा. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी आवाहन केल्यानंतर ह्या फांदीतून दुर्गेचे प्राण मृत्तिकेच्या मूर्तीत अवतरित होतात अशी श्रद्धा आहे. एकदा हे झाले की पुढील चार दिवस उत्सवाला उधाण येते. रोज सकाळ संध्याकाळ पूजा, भोग, 'अंजली' (आरती), नाचगाणे, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल होते.

(अवांतर :- सर्वच दुर्गा कुटुंबीय सुंदर दिसत असले तरी मला ह्यांचा महिषासुर फारच बापुडवाणा वाटतो. तो दैत्य तर दिसत नाहीच, उलट दोन्ही गालात रसगुल्ले भरून आळसावलेला व्रात्य मुलगाच जास्त दिसतो, ते एक असो Happy

बोनेदी बारींपैकी सुबर्ण रायचौधरी परिवाराची दुर्गापूजा कलकत्त्यातच नव्हे तर अक्ख्या बंगाल प्रांतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित दुर्गापूजा आहे. कुटुंब जुन्या काळापासून गर्भश्रीमंत. सुवर्णबाबूंनी कलकत्ता शहर वसवण्यासाठी ब्रिटिशांना स्वतःची जमीन भाड्याने दिली होती, त्यावरून काय ते समजा. त्यांना आद्यपूजक परिवार म्हणून मान आहे. बारीषाच्या त्यांच्या मुख्य राजबारीत थेट १६१० साला पासून दुर्गापूजा होते आहे. प्रमुख राजबारीचे सद्य वारस आता आठ वेगवेगळ्या कुटुंबात विभागले आहेत. त्यांच्यापैकी एक सांगतात - ‘आमच्या दुर्गेला 'संगीतप्रिया' म्हणतात कलकत्त्यात. रात्र रात्रभर चालणारे शास्त्रीय गायनाचे जलसे आणि ते ऐकण्यासाठी लोटलेली दर्दीजनांची गर्दी हे दृश्य आता फार दिसत नाही, पण म्हणून आम्ही आमच्या दुर्गेला संगीत ऐकवत नाही असे नाही. या तुम्ही सप्तमीच्या रात्री, आता राजबारीचे 'नाचघर' नाहीये पूर्वीसारखे, ते कोसळले काही वर्षांपूर्वी. पण त्यानी फरक पडत नाही. बहारदार रबिन्द्र संगीताचा कार्यक्रम आहे इथेच, ह्या ठाकुर दलानमध्ये…..’ गर्वाने ओथंबलेली अशी अनेक विधाने अन्य सदस्यांकडून येतात. खऱ्या माणिकमोत्यांच्या दागिन्यांनी सजलेल्या त्यांच्या दुर्गेचे रूप मात्र फार सोज्वळ.

रायचौधरींच्या राजबारीला जाण्याचा रस्ता अगदीच सोप्पा आहे - डायमंड हार्बर रोड गाठा, गर्दीला न जुमानता बेहाला चौरस्त्याकडे निघा, साखेरबझारच्या अरुंद, गर्दीभरल्या चौकातून के के रॉयचौधुरी रस्त्यावर या. उजवीकडे सबर्ण पारा रोड दिसतो न दिसतो तसे आतमध्ये घुसा. काही पावलांवर अतिप्राचीन द्वादशशिवमंदिर दिसेल. तिथल्या गर्दीतुन वाट काढत काही पावलातच तुम्ही रॉयचौधुरींच्या भव्य ठाकुर दलान मध्ये पोहचाल (दमलात?) त्यांचे स्वतःचे कुटुंब प्रचंड मोठे असल्यामुळे इथे आगंतुकांना प्रवेश नाही, त्यामुळे हा खटाटोप वाया जाण्याची शक्यता आहे.

आगमन आणि विसर्जनाला ब्रिटिश काळापासून खऱ्याखुऱ्या तोफांची सलामी घेणारी राजा नवीनकृष्ण देव ह्यांची शोभाबाझार राजबारी दुर्गा ही पण अशीच एक पुरातन पूजा. स्थापनेचे वर्ष १७५७. कुटुंबीयांमध्ये काही वाद झाल्याने विभक्त झालेल्या दुसऱ्या पातीने समोरच असलेल्या ‘छोटो राजार बारी’ ठिकाणी दुसरी पूजा सुरु केली १७९१ साली.

"आमच्याकडे दुर्गापूजेला आलेल्या पाहुण्यांची यादी भारदस्त आहे. लॉर्ड कलाइव्ह, वॉरेन हेस्टिंग्स, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, नेपाळ नरेश महेंद्र, प्रिन्स ऑफ वेल्स, खुद्द रवींद्रनाथ टागोर आमच्या दुर्गेला नमन करायला येऊन गेले आहेत." राजा नबीनकृष्णांच्या सद्य वारसांचा अभिमान आजही शब्दा-शब्दातून ओसंडतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आता यथातथाच असली तरी दोन्ही राजबारी बऱ्यापैकी राखल्या आहेत आणि आधी आमंत्रण सुनिश्चित केल्यास दर्शनापुरता प्रवेश मिळण्याची शक्यता आहे इथे.

दुर्गा भोग :

उत्सव आणि खाणेपिणे ह्यांचा अन्योन संबंध आपल्या सर्वांना माहिती आहेच. पोटपूजेशिवाय उत्सवात कसली मजा? सार्वजनिक दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये एक मोठा भाग ह्या 'भोग' (प्रसाद) साठी राखीव असतो. खिचुरी, पुरी, बेगुन भाजा, छेनार पायेश हा प्रसाद बहुतेक ठिकाणी असतो.

पण राजबारींची तऱ्हाच न्यारी. त्यांचा भोग अनेकदा ६० पेक्षा जास्त पदार्थांचा असतो ! घी भात, वासंती भात, मोठ्या परातीच्या आकाराच्या राधावल्लभी (ह्या बंगाल्यांचा रसबोध फारच उच्च दर्जाचा आहे राव - नाहीतर मैद्याच्या पुरीला कोणी ‘राधावल्लभी’ म्हणतं का?) केशरी पुऱ्या, गोडाच्या पुऱ्या, कोचू साग, खिचुरी, जिलबी, मालपुवा, अनेक प्रकारचे वडे, केशर पायेश, संदेश, इंद्राणी, हिरामणी, रसमणी, दुर्गाभोग, रसमोहन, खीरकदम, चमचम, खीरमोहन, कांचागोला, लेडी किनी (हो, मिठाईचंच नाव आहे ते Happy अश्या मनोरम नावांच्या डझनावारी प्रकारच्या बंगाली मिठाया असा भरगच्च मेनू दुर्गेच्या दिमतीला असतो.

शोभाबाझार राजबारीसारख्या काही क्षत्रिय यजमानांच्या दुर्गा ताजा शिजवलेला भात / अन्न खात नाहीत, त्यामुळे खिचुरी बाद होते पण 'भोग'च्या भव्यतेत काही कमतरता नसतेच. ह्या दुर्गे साठी मग आदल्या दिवशी वेगवेगळ्या चविष्ट मिठाया तयार केल्या जातात. ह्यांच्याकडच्या 'मोंडा' मिठाया फार कल्पक आणि त्यांचा आकार भव्य. साधारण पाच पाच किलो वजनाचे पांढरे शुभ्र मोतीचूर लाडू ही इथली खासियत आहे. निमकी, चंदन खीर, तालशांश, चंद्रपुली, पंतुआ, पान गाजा, जोलभरा संदेश …… देब कुटुंबीयांनी सांगितलेली नावे लक्षात ठेवणे अशक्य इतके प्रकार ! काही बोनेदी बारींच्या राजगृहात आलेल्या दुर्गा मीठ खात नाहीत तर काही रुचिपालट म्हणून एक वेळ सामिष भोजन करतात - ‘कोई’ माश्यांचे कालवण ही विशेष सामिष 'भोग' डिश.

बंगाली लोक फक्त 'माछेर झोल आणि भात खातात' हा माझा गैरसमज नेहमीसाठी दूर झाला इतके प्रकार राजबारीच्या कुटुंबीयांनी दाखवले आहेत. दुर्दैवाने हा सगळा सरंजाम बघायला आणि भोग चाखायला मिळणे दुर्लभ आहे, त्यासाठी राजबारीच्या मालकांनी तुम्हाला व्यक्तिगत आमंत्रण द्यायला हवे. Happy

संगीत, रस, गंध, अन्न असा सर्व पाहुणचार भोगून आणि भक्तांना आशीर्वाद देऊन तृप्त मनाने दुर्गा 'बिजोया' म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सासरी जायला निघते. राजबारीचे प्रमुख यजमान 'नीलकंठ' पक्ष्यांची एक जोडी पिंजऱ्यातून मुक्त करतात, त्यांनी स्वर्गात शंकराला दुर्गेच्या आगमनाची पूर्वसूचना द्यावी अशी अपेक्षा असते. आता वन्यजीव कायद्यामुळे खरे नीलकंठ पकडण्यास मनाई आहे, तस्मात रेशमी रुमाल किंवा मातीच्या प्रतिकृती वापरतात.

मग आपल्याकडच्या गणपती विसर्जनासारख्या मिरवणुकांनी कलकत्ता शहर गजबजून जाते. एव्हाना संजय लीला भन्साली आणि तत्सम अन्य चित्रपटकारांमुळे आपल्या परिचयाचा झालेला 'सिंदूर खेला' ह्याच मिरवणुकीत होतो. दुर्गेची पाठवणी करतांना सवाष्ण स्त्रिया तिला रक्तवर्णी टिळा लावतात आणि मग एकमेकांना लाल रंगात माखवतात, एक मिनी रंगपंचमी घडते - पण रंग फक्त लाल आणि सहभाग फक्त स्त्रियांचा. 'पाड' म्हणजेच लाल काठाची पांढरी साडी हा युनिफॉर्म. रुपये पाचशे ते साठ हजार पर्यंत किमतीच्या ह्या साड्या म्हणजे बंगसुंदरींचा जीव की प्राण.

दुर्गा प्रतिमांच्या गंगेत विसर्जनाने उत्सव संपतो. पुढल्या दुर्गापूजेपर्यंत मग ह्या बोनेदी राजबारींमध्ये शुकशुकाट पसरतो. गुरुदेव रबिन्द्रनाथांच्या शब्दात सांगायचे तर - क्लांत दिवस आणि प्राणहीन रात्रींचे सत्र सुरु राहते.

 

बंगालची दुर्गापूजा



आश्विन महिन्यात देशभरात सर्वत्र आदिशक्तीची पूजा केली जात असली, तरी बंगालची दुर्गापूजा मात्र वैशिष्टय़पूर्ण मानली जाते. किंबहुना दुर्गापूजा आता देश, प्रांताची सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. जगात सार्वजनिकरीत्या साजरा होणारा सर्वात मोठा सण असे दुर्गापूजेचे वर्णन केले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी जसे लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले, अगदी तसेच बंगालमध्येही घडले. स्वातंत्र्यदेवीचे प्रतीक म्हणून दुर्गादेवीची आराधना केली जाऊ लागली. बंगालमध्ये १४व्या शतकाच्या अखेरीस तत्कालीन जमीनदार आणि जहागीरदारांनी आपापल्या महालात दुर्गापूजा करण्यास सुरुवात केली. अर्थात त्याला खरे सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त होण्यास आणखी दोनशे र्वष जावी लागली. १७६१ मध्ये हुगळी शहरात १२ तरुण मित्रांनी एकत्र येऊन सार्वजनिकरीत्या वर्गणी गोळा करून दुर्गापूजा करण्यास सुरुवात केली. बारा मित्रांनी सुरू केली म्हणून या उत्सवास ‘बारोयारी' पूजा असेही म्हटले जाते. त्यानंतर हे लोण सर्व बंगालमध्ये पसरले. भारतावर अधिसत्ता गाजविणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीचे मुख्यालय कोलकात्यात होते. कोलकाता हीच इंग्रजांची राजधानी होती. कंपनीचे अधिकारीही दुर्गापूजा महोत्सवात सहभागी होऊन स्थानिक जनतेची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न करीत असत. अतिंद्रनाथ बोस यांनी १९२६ मध्ये सार्वजनिक दुर्गापूजा महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात करून सर्व धर्म आणि पंथीयांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
भाद्रपद अमावस्येपासून वेध
बंगालमध्ये जरी पंचमीपासून दुर्गापूजा केली जात असली, तरी त्याचे वेध मात्र सर्वपित्री अथवा भाद्रपद आमावस्येपासून लागतात. आपल्याकडे जसे दिवाळीत नरक चतुर्दशीच्या पहाटे आकाशवाणीवरून नरकासुर वधाचे कीर्तन दरवर्षी प्रसारित होत असते, तसेच घटस्थापनेच्या आदल्या दिवशी भल्या पहाटे महिषासुरमर्दिनीचे आख्यान बंगालच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असते. १९५० पासून सातत्याने हे आख्यान प्रसारित होत असून लाखो बंगाली ते भक्तिभावाने ऐकतात. दिवंगत बीरेंद्रकृष्ण भद्र आणि पंकजकुमार मुल्लिक यांच्या आवाजातील हे देवीआख्यान ऐकण्यासाठी सारा बंगाल पहाटे चार वाजता उठून रेडिओला कान लावतो.
महाराष्ट्रात घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव साजरा होत असला, तरी बंगालमध्ये तो पंचमी म्हणजे पाचव्या दिवसापासून साजरा केला जातो, अशी माहिती गेली ३५ वर्षे महाराष्ट्रात असणाऱ्या दीपांणिता रॉय यांनी दिली. दीपांणिता ठाण्यातील बंगाली समाज संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्यरत असून दरवर्षी शहरात दुर्गापूजा करतात. यंदा त्यांच्या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या म्हणतात, बंगालमध्ये पंचमीच्या दुर्गापूजेस प्रारंभ होतो. नऊ सुहासिनी नदीवर जाऊन घटातून पाणी आणतात. त्या नऊ घटातील पाणी दुर्गापूजेसाठी वापरले जाते. अर्थात पंचमीच्या दिवशी फार मोठी पूजा होत नाही. खरा सोहळा दुसऱ्या दिवशी षष्ठीच्या दिवशी असतो. या दिवशी विवाहित महिला त्यांच्या मुला-मुलींच्या भल्यासाठी उपवास करतात. अर्थात उपवासाचे हे बंधन पूजाविधी संपेपर्यंतच असते. एरवी दुर्गापूजा महोत्सवात मात्र विविध खाद्य-पक्वान्नांची रेलचेल असते. त्यात सामिष आहारही असतो. दुर्गा, कालीमाता, महालक्ष्मी अशा आदिमायेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पूजेचा मुहूर्त पंचांगानुसार ठरतो. कालीमाता दोन प्रकारच्या असतात. एक- नीला काली, जी आकाशनिळ्या रंगाची असते आणि दुसरी- समाकाली ही पूर्ण काळ्या रंगाची असते. नीला कालीचा उजवा पाय, तर समाकाली देवीचा डावा पाय पुढे असतो. कालीमातेस बळी देण्याची प्रथा आढळून येते. सर्वसाधारणपणे बोकडाचा बळी दिला जातो. बळी देण्यासाठी सफेद भोपळ्याचाही वापर केला जातो. सकाळ-संध्याकाळी आरती केली जाते. तेव्हा पारंपरिक ढाक हे वाद्य वाजविले जाते. पूजाकाळात प्रत्येक दिवशी मंडपात महाप्रसाद असतो. अष्टमीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. रात्री साधारण ११ ते १२च्या दरम्यान १०८ दिवे लावून महालक्ष्मीचे पूजन केले जाते.
चित्तवेधक मूर्तिकला
अप्रतिम मूर्तिकला हा या उत्सवाचा प्राण असतो. आपल्याकडे जसे दसऱ्यापासूनच काही मूर्तिकार पुढील वर्षीसाठी गणेशमूर्ती घडविण्याच्या कामास सुरुवात करतात, तसे बंगालमध्ये अक्षय्य तृतीयेस मूर्तिकार काम सुरू करतात. मूर्तीसाठी गंगा नदीच्या काठाची माती आणली जाते. विशेष म्हणजे मूर्तिकामासाठी चिमूटभर का होईना एखाद्या वारांगनेच्या घरातून माती आणण्याची परंपरा कसोशीने पाळली जाते. कोलकातामधील कुमारतुली (कुंभारवाडा) भागात मोठय़ा प्रमाणात मूर्तिकाम होते. आता देशभरात विखुरलेला बंगाली समाज आपापल्या ठिकाणी सार्वजनिक दुर्गापूजा आयोजित करतो. तिथे पारंपरिक मूर्ती घडविण्यासाठी खास बंगालमधून कलावंतांना आमंत्रित केले जाते.
नवमीच्या दिवशी कुमारीपूजन केले जाते. या दिवशी पूजास्थळी नऊ वर्षांखालील मुलींना देवी मानून त्यांची पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. विजया दशमीच्या दिवशी या महोत्सवाची सांगता होते. आपल्याकडे एकमेकांना आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटून हा दिवस साजरा केला जातो. बंगालमध्ये सुहासिनी महिला या दिवशी सिंदुरखेळा करतात. सिंदुरखेळा म्हणजे आपल्याकडचा हळदीकुंकू समारंभ. संध्याकाळी हा उत्सव झाला की देवीची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. त्या वेळी आपण गणपती विसर्जन मिरवणुकीत जसे गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..! म्हणतो, अगदी तसेच बंगाली भाविक ‘अच्छे बोछोर अबार होबे’ म्हणजे ‘हे असे पुढील वर्षीही घडेल’ अशी घोषणा देतात.
दुर्गापूजेची परंपरा जमीनदारांनी त्यांच्या घरात सुरू केली असली तरी सध्या मात्र बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक स्वरूपातच हा सण साजरा केला जात असल्याची माहिती अरुणिमा रॉय यांनी दिली. या दिवशी सहसा घरात कुणी स्वयंपाक करीत नाहीत. शहरातील हॉटेल्सही या काळात खास खाद्य महोत्सव भरवून पारंपरिक पदार्थ उपलब्ध करून देत असतात. दुर्गापूजेसाठी बांधण्यात आलेले ‘पेंडॉल' अप्रतिम आणि भव्य असतात. एखाद्या भव्य देवालयासारखे पेंडॉलचे स्वरूप असते. त्याभोवती डोळ्याचे पारणे फेडणारी विजेची आरास केली जाते. संध्याकाळी शहरभर फिरून अशा आरासी पाहणे हा एक मोठा आनंदसोहळा असतो. आपल्याकडे गणेशोत्सवात जसे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम सादर होतात, तसेच दुर्गापूजा महोत्सवात बंगालमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. बंगाली समाज उत्सवप्रिय मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी दुर्गापूजा महोत्सव संपत असला तरी याच दिवसापासून दिवाळीपर्यंत एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याचे पर्व बंगालमध्ये सुरू होते. या काळात प्रत्येक घरात काही ना काही गोड पदार्थ खायला मिळतात
 
----- लोकप्रभा 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...