Friday, October 23, 2020

ईस्ट युरोप

 

एकदा जाण्याचे ठरवल्यावर मग मात्र ह्या विषयावर व देशांवर माहिती काढायला सुरुवात केली. सुरवात अर्थातच जर्मनी पासून केली. जर्मनी मध्ये सगळ्याच महत्वाच्या शहरांची दुसऱ्या महायुद्धात हानी झाली. पण त्यातही बर्लिन आणि ड्रेसडेन ची अपरिमित हानी झाली. बर्लिनचे तर नंतर लचके तोडले गेले. हिटलर स्वत: तिथे रहात असल्याने तसेच नाझीचे मुख्यालय इथेच असल्याने सहाजिकच इकडे सगळ्यात जास्त बॉंब वर्षाव झाला. त्यामुळे सुरुवात बर्लिन ने करायची ठरली. मग ड्रेस्डेन आणि मग इतर देश. साधारणत: माझा प्रवास असा झाला

बर्लिन- ड्रेस्डेन-प्राग-क्रेको-झाकोपाने-बुदापेष्ट-झाग्रेब-इस्त्रीया-लेक बोहींज –मुंबई

ह्यात बुदापेष्ट पर्यंतचा कार्येक्रम माझ्या मनातला होता पण झाग्रेब-इस्त्रीया (क्रोएशिया), लेक बोहींज (स्लोवानिया) हे मात्र अनुभव च्या मयुरेश ची पसंती होती. प्रवासाचे दिवस वाढतात म्हणून माझी जरा कुरकुर चालू होती. पण तिकडे गेलो नसतो तर एका अतिशय सुंदर अनुभवाला मुकलो असतो.

ह्यावर्षी जायचे कारण हे की नंतर पुढल्या वर्षी लेक १०वीत जात असल्याने आमची इच्छा असूनही तिच्या शाळेच्या मनात नसल्याने आम्हाला कुठे जाता येणार नाही. लेकीला (वय १३ पूर्ण) घेवून जाताना मनात जरा भीती होती. की तिकडे फक्त बघायचे आहे. म्हटलं तर भिंत म्हटलं तर कायमचा दुरावा- हा नजरिया असल्याने ती हे सगळ कसे अनुभवेल हा प्रश्न होता. बरं बर्फ नाही, डिस्ने पार्क नाही, तिला माहित असलेली कोणतीही गोष्ट नाही!!! त्या मुळे जरा धाकधुकीत मोबाईल वर अनेक गेम, पेन ड्राईव्ह वर अनेक सिनेमे, अशी जय्यत तयारी केली. तिची पूर्व तयारी म्हणून तिला डायरी ऑफ आन फ्रांक वाचायला दिले. तिची आवडीची दोन-चार पुस्तके बरोबर घेतली. पण सगळ्यात जास्त तिने मला सरप्राईज केले!!!! तिला ह्या सगळ्या गोष्टीची गरजच नाही लागली. एकदाही गेम वा सिनेमा पहिला गेला नाही. पुस्तकं वाचणे हे श्वासा सारखे असल्याने ती मात्र सगळी वाचून झाली. पण एकाही क्षणी तिने आई कंटाळा आला हे शब्द काढले नाहीत. हॉटेलातल्या टी.व्हि. ला तर हात लावला नाही. माझा व नवर्याचा मोबाईल मुद्दामूनच रोमिंग ठेवला नाही. वेगळच कार्ड घेतलं. नो disturbance !!!!!

तयारी तर जय्यत होती. आता वेळ आली व्हिसा ची. इस्ट युरोप मध्ये शांगेन व्हिसा चालतो. पण क्रोएशिया एक वर्षांपूर्वी च युरोपियन युनियन मध्ये आली आहे. त्या मुले तिकडे शागेन चालत नाही. पण शांगेन असेल आणि कोएशियाहुन शांगेन देशात प्रवेश असेल तर त्यांचा वेगळा व्हिसा काढावा लागत नाही. त्यामुळेच स्लोवेनिया शेवटी ठेवले.

नंतर चा प्रश्न होता तो चलनाचा!!!! ह्या ने मात्र फारच दमवलं. युरो फक्त जर्मनी आणि स्लोव्हेनियात चालतात. बरं आम्ही बरीचशी कंट्री साईड फिरणार असल्याने त्यात्या देशाचे चलन बाळगणे आले. परत बाकी तुम्ही वेळ आली तर क्रेडीट कार्डाने निभावून नेवू शकता पण जेवण व जागोजागी लागणार्या शौचालयासाठी मात्र जवळ त्या त्या चलनाची मोड अनिवार्य झाली. आपल्या कडे त्यांचे चलन नसेल तर युरो घ्यायचे पण अव्वाच्या सव्वा भाव लावून.
ह्यातल्या झेक, पोलंड, हंगेरी, स्लोव्हेनिया हे देश रशियन अधिपात्याखालुन निघाल्यावर युरोपियन युनियन मध्ये सामील झाल्या, पण त्यातही अनेक स्लेश राहिले. पोलंड व झेक युरोपियन युनियन व शांगेन दोन्हीत आहे. पण युरो झोन व बाय्लॅटरल मध्ये नाही. हंगेरी शांगेन मध्ये आहे पण युरो झोन मध्ये नाही. स्लोव्हेनिया सगळ्यात आहे. क्रोएशिया काशातच नव्हत. यायचा प्रयत्न करत आहे. आपापसात त्याच्यात खूप भांडणे आहेत. क्रोएशीया व स्लोव्हेनिया पूर्वी युगोस्लाव्हीयाचा भाग होते. पण ते जेंव्हा वेगळे झाले त्या वेळेस स्लोव्हेनियाने लागेचः युरोपियन युनियन मध्ये प्रवेश केला. युरोपियन युनियन च्या प्रवेशा साठी इतर सगळ्या सभासदांची संमती लागते. क्रोएशिया स्वत:ला स्लोव्हेनिया पेक्षा फारच ग्रेट समजतो. त्यामुळे त्यांच्यात विस्तव जात नाही. पण जेंव्हा क्रोएशियाने युरोपियन युनियन मध्ये भाग घ्यायचे ठरवले तेंव्हा मोठ्ठा विरोध स्लोव्हेनियाने ८ वर्ष केला. त्यांचा सीमाप्रश्नाचा वाद फार जुना आहे. ह्या सगळ्या कंट्री स्वत:च्या अस्तित्वा साठी लढताहेत. त्यांना लौकरात लौकर युरोपियन हा शिक्का हवा आहे. एकदाका युरोपियन युनियन मध्ये आले, की विकास कामांकरिता त्यांना निधी मिळतो. ज्याचा उत्तम उपयोग हंगेरीने केला आहे. इकडच्या भागात पर्यटन व बेसिक उद्योग सोडून फारशी प्रगती नाही. इकडे कोणी गुंतवणूक करू इच्छित नाही.

सणसणीत अपवाद खणखणीत जर्मनीचा. ती एकमेव इकोनोमी अशी आहे जी आजही युरोप मध्ये आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. त्यांच्या जिद्दीला दाद द्यावीशी वाटते. हिटलर कसाही असला तरी त्याचे शब्द आज खरे झाले आहेत की “ युद्धा नंतर अमेरिका व रशिया या दोन महासत्ता बनतील. इंग्लंड व फ्रांस ला कोणी विचारणार नाही. युरोप मध्ये कोणताही निर्णय घेताना अमेरिकेला जर्मनीचाच आधार घ्यावा लागेल.” ह्याचे प्रत्यंतर आपल्याला येतेच आहे. ज्या ड्रेस्डेन वर अपरिमित हल्ला करून एकुण एक ६५००० नागरीकांचा मृत्यू झाला, त्या ड्रेस्डेन च्या राजवाड्यात बराक ओबामा दोन दिवस राहून लोकांशी संवाद साधून गेला !!!!!

टर्किश एअर लाईन ची निवड करण्यामागे फक्त सोय हाच मुद्दा होता. कारण फक्त तेच आम्हाला परतीच्या ठिकाणा हून आमच्या वेळेत आणणारे फक्त तेच होते. येताना आम्ही स्लोव्हेनियाची राजधानी लुबानिया हून येणार होतो. ( ह्या शहराचं नावही मी ह्या ट्रीप मध्ये पहिल्यांदा ऐकलं. )

जर्मनी ने आम्ही सहलीची सुरुवात केली. साधारणत: मुख्य शहरातील हॉटेल निवडण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे आपल्याला शहरात फिरता येते आणि मला स्वत:ला शहराचा किंवा गावाचा फील त्याच्या गाभ्यात राहून घ्यायला फार आवडते. जरा पैसे जास्त पडतात पण इतरही फायदे होतात.

बर्लिन ला आम्ही postdamer platz ह्या मुख्य चौकामधील हॉटेल घेतले होते. हॉटेल चा परिसर खूप महत्वाच्या ठिकाणी व रेल्वे स्टेशनच्या जवळच होता. पाहिल्यादिवाशीच आम्हाला एक सुवार्ता कळली की जर्मन संसद ज्याला राईशताग म्हणतात, ते पहाण्याची अपॉईंटमेंट मिळाली होती. हॉटेल मध्ये आल्यावर दीड तासातच आम्ही सुप्रसिध्ध इमारतीच्या दारात होतो. इकडेच नाझी सरकार मध्ये अनेक जीवघेणे निर्णय घेतले गेले. हिटलर ची प्रसिध्द भाषणे ही ह्या सभागृहाने ऐकली. प्रत्यक्षात ते अतिशय साधे सभागृह आहे. अगदीच साधे. पण इमारतीचा डोम मात्र सुरेख आहे. आणि हो तिकडे वरून सफर करायचीही सोय आहे. खूपच छान नजारा होता.

8 Reischtag Berlin3.JPG

बुलंद इमारत

IMG_0062_0.JPG

जर्मन फ्लॅग ज्याचा त्या लोकांना प्रचंड अभिमान आहे. हा फोटो डोम च्या गच्ची मधुन काढला आहे

23 Reischtag Berlin20.JPG

हे त्यांच्या प्रेसिडेंट चे निवासस्थान व ऑफिस

44 Berlin sight seeing5.JPG

आर्थात त्यांच्या प्रेसिडेंट्ला राजकारणात फारसे महत्व नाही. त्यांच्या चांन्सलर अ‍ॅन्जेला मॉरकल ह्या अतिषय डायनॅमिक आहेत. सगळे महत्व त्यांना आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोणत्याही सीक्युरिटी शिवाय दूसर्‍या दिवशी रस्त्याने राईश्टॅग समोरुन जाताना दिसल्या. त्यांनी सरकारी निवासस्थान घेतलेले नाही. त्या आपल्या स्वतःच्याच फ्लॅट मधे रहातात.

राईश्टॅग बघुन खुप आश्चर्य वाटलं. येवढी महत्वाची इमारत पण फारसे सीक्युरीटीचे अवदंबर नाही. पण शिस्त आणि टापटीप वाखाणण्या जोगी. आजुबाजुला प्रचंड हिरवाई. गाईड ने सांगितलं की दूसरे महायुद्ध जेंव्हा संपले तेंव्हा बर्लीन मधे एकही झाड चांगल्या अवस्थेत शिल्लक नव्हते. तेच बर्लीन आज मात्र आपल्या अंगावर भरपूर हिरवाई अभिमानने मिरवते आहे.

13 Reischtag Berlin8.JPG

बर्लिन शहर हे इतर युरोपियन शहरांसारख अति modern नाही. थोडी जुन्या वळणाची आजीबाई असावी तस त्याचं रूप आहे. अनेक बॉम्ब झेलल्याच्या खुणा जागोजागी आहेत. बर्लिन ला गेल्या पासून कधी एकदा बर्लिन wall चे अवशेष पहातोय असे होवून जाते. गम्मत म्हणजे आम्ही सहज म्हणून फिरून आलो तेंव्हा सारखी दुपदरी विटा सारखी ओळ पूर्ण रस्त्याच्या मध्ये नागिणी सारखी उठून दिसत होती. गाईड म्हणाली हीच बर्लिन भिंतीची खूण. भिंत जेंव्हा तोडली तेंव्हा त्याची आठवण म्हणून ही ओळ शहरातले रस्ते अजूनही छाती वर वागवत आहेत.

117 Wall marks germany_0.JPG

आमचा दुसरा दिवस सुरु झाला तोच मुळी भिंतीच्या अवशेष दर्शनाने. जेंव्हा जर्मनीचे लचके तोडायचे ठरले तेंव्हा रशियाने आपला भाग काढून घेतला. जास्त क्षेत्राफळाचा भाग त्यांच्या कडे राहिला. दोस्तांपैकी कोणालाही ह्याची पर्वा करायची गरज वाटली नाही. त्या रशियन अधिपत्या खालील जर्मनी मध्ये म्हणजे इस्ट जर्मनी मध्ये आत बर्लिन होतं. त्या बर्लिन चेही मग इस्ट आणि वेस्ट असे लचके तोडले गेले. खालच्या नकाशा वरून हे लक्षात येईल.

IMG_0121.JPG

बर्लिन ची फूट

IMG_0123_0.JPG

जर्मन लोकांना काहीही विचारण्याची सोय नव्हती. त्यांचे राष्ट्र हरले होते. त्यांचे नेते मेले, मारले गेले वा परागंदा होते. अनेक नागरिक इतर युरोपातील देशांमध्ये निर्वासित झाले होते. त्यांच्या माथ्यावर क्रूरकर्मा हिटलर ला साथ देणारे राक्षस असा शिक्का होता. निर्वासितांच्या ३५ ते ४० मैलांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांनी नंतर जर्मनी प्रस्थापित झाल्यावर परत जर्मनीत जाणे पसंत केले. एक भिंत बांधून रशियांस नी काय साध्य केले?.... म्हंटली तर भिंत, म्ह्म्ताल्म तर कायमचा दुरावा. त्या वेळेस इतकी भयानक परिस्थिती होती की अनेक कुटुंबे दुभ्म्गाली गेली. आई बाप एकीकडे, शिकायला गेलेली मुले दुसरी कडे. भाऊ भाऊ वेगवेगळे. एकाच शहरात पण कायमचे दूर. विचार करा आपलं माणूस त्याचं शहरात आहे पण एका भिंती मुळे ते वर्षानुवर्ष आपल्याला भेटू शकत नाही. आमच्या गाईडला तिचे वडील ह्या दुही मुळे भेटूच शकले नाहीत. जेंव्हा भिंत पाडली त्याच्या आधीच त्यांचा अंत झाला होता. तिची आई वेड्या सारखी जुन्या घराच्या दिशेने धावत होती. पण त्या खुणा कधीच पुसल्या होत्या. अश्या कहाण्या घरोघरी आहे. आजच्या बर्लिन वासियांना त्या आठवणी विसरायच्या नाहीयेत. म्हणूनच त्यांनी आज २४ वर्ष झाली तरी त्या भिंतीचे अवशेष जपून ठेवले आहेत.

111 German Wall 6_0.JPG

भिंतीला रशियन बाजूने खूपच संरक्षण होते. अमेरिका व रशियाच्या कोल्ड वोर काळात तर भिंतीचे संरक्षण भयानक क्रूरतेने केले गेले. वेस्ट हून इस्ट ला यायचा प्रयत्न कोणी करायचेच नाही. त्या मुळे तिकडे काहीच संरक्षण नव्हते. पण इस्ट हून वेस्ट ला जाण्या साठी मात्र अनेक तरुण आपल्या जीवाची बाजी लावायला तयार असायचे. इस्ट बाजूला भिंत सुरु व्हायच्या आधी एक खंदक होता (आता तिथे सुरेख फोटो म्युझियम आहे). तो खंदक पार करणेच अती भयानक होते. परत भिंत चढायलाही महा कठीण होती. त्या दिव्यातुनाही जरी कोणी पार पडलाच, तरी पलीकडे असलेल्या सैनिकांच्या हातात ते सापडायचे. तरीही हे दिव्य करायला लोक तयार असायचे. कारण रशियन राजवटी मध्ये कम्यूनिस्ट अतिरंजित कल्पनांमुळे अनेक गोष्टींची टंचाई असे. साध्या पावा साठी दोन तास रांगेत उभे राहावे लागे. मग फळे, भाज्या म्हणजे तर अप्राप्य गोष्टी. आणि एक भिंत ओलांडली की सगळी सुखं. ह्या विरोधाभासामुळे सगळ्यांनाच त्या भिंती पलीकडच्या जगाचे आकर्षण होते. रशियाच्या जोखडातून जर्मनी मोकळा झाला आणि पहिले त्यांनी ही भिंत तोडली. त्या वेळचे फोटो पहिले की दाटून येतं.

108 German Wall 3.JPG

आर्थात भिंत पाडल्यामुळे सगळ सुरळीत झाले असे मात्र झाले नाही. उलट नवे प्रश्न तयार झाले. इस्ट बर्लिन च्या लोकाना सामावून घेताना अनेक नवे प्रश्न तयार झाले. एकतर नोकर्या आणि घरांचे प्रश्न मुख्य होते. इस्ट मधल्यांना आता नुसत्या कार्डावर ब्रेड मिळणार नव्हता. त्या साठी काम करायला लागणार होते. ते पचनी पडायला खूप वेळ लागला. इस्ट मधल्या इमारती ठोकळेबाज, घर छोटी. त्यामुळे त्यांची मागणी कमी झाली. त्या उलट वेस्ट मधल्या चकचकीत इमारतींना भाव आला. एकाच शहरात इतकी तफावत झाली की शेवटी हे सगळ रेग्युलेट करे पर्यंत बराच काळ जावा लागला. मुळातच जर्मन लोक राष्ट्र प्रेरणेने भारलेले असल्याने त्यांनी पद्धतशीर पणे इस्ट जर्मनीला लौकरात लौकर नव्या जगात आणून सोडले. त्या करीता वेस्ट जर्मनीची राजधानी बॉन असतानाही, ती बर्लिन ला हलवली. त्या मुळे इतिहासाशी इमान राखणे सोप्पे गेले. लौकरात लौकर हिटलर आणि नाझींच्या खुणा पुसून टाकल्या. हिटलरच्या बंकर चा चक्क पार्किंग लॉट बनवून टाकला!!!!

67 Hitler Bunker1.JPG

आर्थात हल्ली ते रशियन्स नी आम्हाला कसे छळले ते जगाला ओरडून दाखवायच्या मार्गावर आहेत. त्या मुळे DDR म्युझियम ची निर्मिती झाली. तिकडे त्या काळातील घरे, गाड्या, करमणूक साधने इ.इ. कसे backward होते आणि ते आम्हाला कसे दाबून टाकत असत... असे प्रदर्शन आहे. म्हणजे आता नाझी गाडून ते रशियन्स ना शिव्या घालत आहेत. ह्या सगळ्या देशात नाझी पेक्षाशी रशियन्स वर राग आहे. कारण ही आत्ताची पिढी रशियन्स च्या प्रभावात वाढली. आपल्या भाषा, इतिहास सोडून त्यांना रशियन आणि रशियाचा इतिहास शिकायला लागला. कम्युनिझम च्या काळात सण साजरे करायची ही चोरी होती.... त्या मुळे ती भडास आता बाहेर येते आहे.
बर्लिन चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इमारती तशाच काळ्या मुद्दाम ठेवल्या आहेत. बॉम्ब मुळे जळलेल्या खुणा ते अजूनही वागवत आहेत. त्यांचे brandenberg गेट पहाण्यासारखे आहे. अठराव्या शतकातल्या नीओक्लासिकल शैलीतले हे गेट सुरेख आहे. जेंव्हा जर्मनी एकत्र झाली, तेंव्हा ह्या गेट ला प्रचंड महत्व आल कारण हे गेट भिंतीच्या अगदी लागताच होत. त्यामुळे जेंव्हा भिंत पाडली तेंव्हा लोक प्रचंड संख्येने इकडे जमा झाले होते. त्याच्या माथ्यावर ग्रीक नाईके देवीचा भव्य पुतळा आहे. मुळात अठराव्या शतकात ह्याची बांधणी शांतीचे प्रतिक म्हणू झाली होती. जेंव्हा दोन्ही जर्मनी एक झाल्या तेंव्हा लोकांनी इथे येवून अप्रत्यक्ष रीत्या शांतीचा संदेश दिला.

61 Freedom sq. Germany.JPG56 Freedom Sq. Berlin1.JPG

इस्ट आणि वेस्ट जर्मनी मध्ये एक वेस होती त्याला चेक पोइंट चार्ली म्हणत. तिकडे कोल्ड war मध्ये भिंती पलीकडे जायला एक चेक पोइंत होता. मुळात १९६१ मध्ये भिंत बांधलीच होती मुली ह्या उद्देशाने की रशियन जर्मनी मधून लोक वेस्ट जर्मनी मध्ये जाऊ नयेत. त्या मुले हा चेक पोइंत अजूनही जपून ठेवण्यात आला आहे. जेंव्हा भिंत फुटली, सगळ्या शृंखला तुटल्या तेंव्हा त्याचं एक सिम्बॉल म्हणून त्यांच्या अलेक्झांडर स्क्वेअर मध्ये सुरेख शिल्प उभे केले आहे.

41 Berlin sight seeing2.JPG

हिटलर च्या बंकर चे त्यांनी पार्किंग लॉट मध्ये रुपांतर मध्ये रुपांतर केले त्याचं प्रमाणे त्याच्या समोरच ज्यू लोकांचे स्मारक उभारून आता ते नव्याने सुरुवात करत आहेत हे जगाला सांगायला सुरुवात केली आहे. हे स्मारकही खूप सुरेख आहे. अनेक आकारांच्या शाव पेट्या असाव्या असे त्यांचे स्वरूप आहे. त्याचं बरोबर एखादा भूलभूलैय्या ( मेझ) असावे असे ते दिसते.

DSC06324_0.JPG

एकंदर जर्मन माणूस मात्र खूप रिझर्व्ह वाटला. फारसे हसणे बोलणे वाटले नाही. मी आणि नवरा रात्री एका पब मध्ये पण मुद्दाम जाऊन आलो. पण वातावरण थोडे मवाळ वाटले. आर्थात बर्लिन थोडे मागासलेले शहर आहे (आर्थात त्यांच्या मानाने). तिकडे इतर युरोपियन शहरांसारखी चमक दमक नाही. एका प्रकारचे गंभीर वातावरण आहे. बर्लिन मध्ये स्प्रि नदी वाहाते. या युरोपच्या शहरांचे एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्येक शहरात सुरेख नदी आहे. स्प्रि चे वैशिष्ट्य म्हणजे ही नागमोडी वळणे घेत इस्ट आणि वेस्ट दोन्ही बर्लिन मधून वहाते.

नंतर चा आमचा मुक्काम होता ड्रेस्डेन शहरात. ह्या शहराने दुसऱ्या महायुद्धात अपरिमित हानी सोसली. १३ ते १६ फेब्रुवारी १९४५ ला जर्मनीची सपशेल हार दिसत असतानाही. इंग्लो-अमेरिकन विमानांनी ह्या शहरावर अपरिमित बॉम्ब फेक केली. बॉम्ब चा वर्षाव एवढा जास्त होता की इअमारती तर बेचिराख झाल्याच पण त्याचं बरोबर रस्त्याचे डांबर पण वितळले आणि लोक त्या रस्त्यात भाजून, पोळून मेली. सगळ्या युद्ध पत्रकारांनी ह्याचे भीषण वर्णन केले आहे. खुद्द चर्चिल सुध्धा ह्या हल्ल्या च्या विरुध्ध होता. परत ड्रेस्डेन च का? कारण इथले प्रसिध्द केथीड्रील आणि ही नागरी पूर्वी राजाघाराण्याच्या खुणा बाळगून आहे. ऑगस्ट-II द strong च्या काळात ही नागरी दिमाखाने उजळून निघाली होती. ह्या चर्च बद्दल जर्मन माणूस खूप हळवा आहे. इकडे लग्न करणे हे खूप अभिमानाचे समजतात. त्या मुळेच इंग्लो-अमेरिकन नी ह्या शहराची निवड केली. परत हे बर्लिन ला जवळ.

IMG_0188.JPG

हेच ते केथीड्रील. हे पूर्ण बेचिराख झाल.. अनेक लोक त्या वेळेस ह्या इमारतीच्या आश्रयाला गेले. कारण त्यांचा विश्वास होता की काहीही झाल तरी ही इमारत पडणार नाही. आपला देव आपल्याला वाचवेल. पण कलीयुगात देव सुध्धा ऐकत नाही ह्याचे प्रत्यंतर त्यांना आले. आत मधली सर्वच्या सर्व माणसे इमारातीसकट भुइसपाट झाली!!!. नंतर हे चर्च त्यांनी जस च्या तसं बांधून काढलं. त्या करीता लग्नाचे जुने फोटो मागवून त्या बर हुकुम हा चौक परत बांधला. शक्य तेवढे जुने जळलेले दगड वापरले.

193 Dresden Germany 24.JPG202 Dresden Germany4.JPG

हा इथला राजवाडा. राजघराणे पहिल्या महायुध्धा नंतर लयाला गेले. पण ही वास्तू आता राजकीय शिष्टाचारा साठी वापरतात. बराक ओबामा दोन वर्षांपूर्वी इथे राहून गेला.

ह्या शहराच्या पुनर्बांधणी साठी अनेक धनिकांनी आपली तिजोरी सैल सोडली. जर्मन रियुनियन नंतर ह्या शहराच्या पुनर्बांधणी चा विषय चर्चिला गेला. खूप चर्चा झाली आणि मगच होतं त्याचं स्वरूपात पुनर्बांधणी करायचे ठरले.

हे शहर बघून एक प्रकारची उदासीनतेची छाया येते. ह्याचा नवा चौक नितांत सुंदर आहे. आम्ही बराच वेळ इकडे शांत पणे बसलो होतो. अगदी माझ्या मुलीलाही ह्या जागेने अंतर्मुख केले. एकेका शहराची महती अशीच असते.
जर्मनी मधून निघता निघता मन झाकोळून गेले होते. पण पुढल्या मुक्कामी जाताजाता आम्ही जर्मन अभिमानाच्या अजून एका जागेला भेट दिली. माय्सेन पोर्सेलेन factory. चायनीज पोर्सेलेन वापरायची युरोप ला प्रचंड सवय झाली होती. पण चीन च्या किंमती फारच चढ्या होत्या. ते आपली मुजोरी कायम ठेवून होते. हे मोडून काढण्या साठी ऑगस्ट-II द strong ह्या राजाने जर्मन संशोधकांना आव्व्हान केले की तुम्ही हे पोर्सेलीन बनवून दाखवा. त्यांनी हे आव्हान स्वीकारले व अनेक वर्षांच्या मेहेनती मधून मायसेन पोर्सेलीन कारखान्याची सुरुवात झाली. आज युरोपात इतका जुना व जुन्या पद्धतीने कलाकुसर करणारा इतर कुठलाही कारखाना नाही. इथले पोर्सिलीन संपूर्ण युरोपात विकले जाते. आणि हो चायना पेक्षा ह्याची मागणी जास्त आहे. आपल्या दृष्टीने हे फक्त पहायचे..... घेणे अपने बस की बात नही.

214 Mysen Porceilin1.JPG225 Porceilen factory Mysen.JPG

एखादी भारदस्त मध्यमवयीन स्त्री जर तोकडे कपडे घालून आपल्या समोर उभी राहिली तर आपल्याला जसे विचित्र वाटेल तसे प्राग ला आल्यावर माझे झाले.

पूर्वी झेकोस्लोव्हाकियाचा भाग असणार्या प्राग ( मूळ उच्चार ‘प्राहा’) मध्ये आम्ही आलो तेंव्हा भूर भूर पाउस पडत होता. वातावरण सगळे झाकोळून गेले होते. थंडी पण होती. आता प्राग झेक मध्ये आहे. ह्याला गरीबांचे Paris म्हणतात. कारण Paris पेक्षा इकडे भयानक स्वस्ताई आहे. इमारती तशाच आहेत. आर्थात हे म्हणजे उगाचच लावलेली उपाधी वाटली.

एकेकाळी प्राग ही बोहेमियन साम्राज्याची राजधानी होती. खूप पूर्वी पासून झेक आणि स्लोव्हाकिया हे प्रांत एकमेकांशी पटवून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. झेक नेहेमी स्लोवाकीयांना कमी समाजात, आळशी समजत. त्याचं मुळे रशियन जोखडातून बाहेर आल्यावर पहिले ते वेगळे झाले. परत तोच प्रकार, अनेक मिश्र विवाहांची पंचाईत झाली. आमची गाईड जी एक शिक्षिका होती, तिची आई झेक व वडील स्लोवाकीयन. जेंव्हा वाटण्या झाल्या त्या बरोबर ह्यांच कुटुंब पण तुटल. वडील स्लोव्हाकीयात गेले. रशियन राजावातीबद्दल ती खूपच पोट तिडकीने बोलत होती. त्यावेळेस त्यांची लोकल भाषा बदलायचा राशीयंस नी खूप प्रयत्न केला. पूर्ण शिक्षण रशियन मध्ये घ्यायला लावले. सरकारी भाषा बदलण्याचे अनेक पातळीवर प्रयत्न झाले. लोक चोरून आपली भाषा शिकायचे. ती म्हणाली तिची आई तर नोकरी सोडून घरी बसली कारण तिला ह्या प्रकाराशी मानसिकरीत्या जुळवून घेणे कठीण पडले. झेक आणि पोलिश माणूस सगळ्यात कुठे वैतागत असेल तर ते लाईन लावायला. क्रिसमस च्या दिवशी एक तुकडा केक साठी त्यांना ४-५ तास लाईनीत उभे रहायला लागे. असे दिवस त्या लोकांनी काढले आहेत. प्रत्येक गोष्टीचे रेशनिंग होत असे. आपल्या गरीबीत आणि त्यांच्या गरीबीत फरक वाटला. त्यावेळेची त्यांची सक्तीची टंचाई होती. आपल्याकडे संख्येचा प्रश्न आहे. तिकडे मुद्दामून तयार झालेल्या कमतरतेचा प्रश्न होता.

प्राग एक सुरेख शहर आहे. मी तिकडे गेले ते documentry मध्ये पाहिलेले प्राग शोधायला. पण माझा भ्रमनिरास झाला. ते एक नंबर चे नखरेल शहर निघाले. सवंग शहर. गरीबांचे Paris व्हायच्या नादाने सगळा मी पणा हरवून बसलेले. सगळे विकायला काढलेले. कचर्याचा डबा शोधणारे भिकारी तर जागोजागी दिसले. रस्त्यातही भिक मागणारे भरपूर. इकडे स्वस्ताई म्हणजे किती असावी!!!! एका लोकल पेपर मध्ये पहिले तर नॉर्वे च्या ओस्लो ते प्राग वन नाईट स्टे जेवणा सहित फक्त २० युरो, ते ही विमान खर्चा सहित!!! गाईड ही म्हणाली की असली पेकजेस खूप असतात इकडे. आमचं हॉटेल अप्रतिम होत. एकदम सिटी सेंटर ला लागून, तेही तासांवर बुक करता येत होत. एका रात्रीचे डबल रूम चे चार्जेस फक्त ३० युरो होते. ब्रेकफास्ट घेतला तर ४० युरो. !!!!. अनेक लोक मुख्यत्वे नॉर्वे , (जे प्रचंड महाग आहे) फिनलंड हून इकडे वीक एंड साठी येतात. भयानक दारू पितात. खातात, इतरही सगळी ‘सुखं’ आहेतच हात जोडून. मजा करून जातात. देशाची इकोनोमी ७०% फक्त पर्यटनावर आहे. खरेदी तर इतकी भरमसाठ होती की किमती पाहून पाय तिकडे वळलेच पाहिजेत. खाणे सुध्धा बरेच स्वस्त. दारू तर विचारू नका.... दारु पिणार्‍यांसाठी स्वर्ग आहे हा. जिकडे तिकडे लोकच लोक. खात पीत फिरताहेत नुसते. एकंदर स्वरूप खूप सवंग वाटले.

दुसऱ्या महायुद्धा आधी इकडे ज्यू लोकांची व्यापारावर खूपच पकड होती. खुद्द प्राग मध्ये त्यांचे गेट्टो होते. जशी जर्मनीची पकड प्राग वर बसली तशी ह्या ज्यू लोकांची रवानगी जवळच्या ऑश्विझ कॅम्प मध्ये व्हायला लागली. आपण नेहेमी क्रेको च्या शिंडलर चे नाव ज्यू मित्र म्हणून ऐकतो पण असे अनेक ज्यू मित्र त्या वेळेस अस्तित्वात होते. त्या पैकी एक म्हणजे मायकेल (मी त्याचं आडनाव विसरले...पण आडनाव ब्रिटीश होत. ) हा एक ज्यू जो सुरुवातीच्या धामधुमीत ब्रिटन ला पळाला. आणि क्रिश्चन धर्म घेवून आडनाव बदलून राहू लागला. पुढे जेंव्हा ज्युची कत्तल सुरु झाली तेंव्हा याने प्राग व जवळच्या भागातून जवळ जवळ 600 अनाथ ज्यू बालके ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका ह्या देशात दत्तक दिली. त्यांची आयुष्य एका परीने मार्गाला लावली. पण त्याच्या ह्या कृत्याची दाखल इस्रायल घेत नाही कारण त्याने स्वत:चा व त्या मुलांचा धर्म बदलला ना !!!!

प्राग चा चार्ल्स ब्रिज मात्र पहाण्या सारखा आहे. चौदाव्या शतकातला हा ब्रिज एकदम सुरेख बांधणीचा आहे. हल्ली स्वित्झर्लंड चा कित्ता गिरवून हे देशही बॉलीवूड करांना इकडे शुटींग साठी बोलावणी धाडतात. कारण जस यश चोप्राने आपल्या सिनेमातून स्वित्झर्लंड लोकप्रिय केल आणि तिकडे जाणार्या पर्यटकां मध्ये भारतीयांची संख्या प्रचंड वाढली. त्याचं प्रमाणे हल्ली प्राग मधेही खूप शुटींग होतात. शेवटी पैसा महत्वाचा!!!! आणि ह्या शहराला तर त्याची चटक लागली आहे.

Prag17.JPG

इकडची वाल्त्वा नदीही नखरेल. ह्या नदीवर खूप छान छान पूल आहेत. ह्या नदीच्या सफरीत आम्हाला केवढे खायला दिले!! पहिले वाईन, मग स्प्राईट, मग केक, मग आईस्क्रीम. ४० मिनिटात हे एवढे पदार्थ दिले !!!! म्हणूनच ह्याचे स्वरूप “या या मजा करा, विकत घ्या...आणि आम्हाला पैसे द्या’ असे वाटले.

20150506_110332.jpg

प्राग मध्ये एक दिवस कमी पडतो आणि दोन दिवस जास्त होतात. कारण तेच ते आणि तेच तुम्ही सारखे नाही पाहू शकत. इकडचे खगोल घड्याळ मात्र पहाण्या सारखे आहे. बाराव्या शतकात उभारलेले हे घड्याळ प्रत्येक तासाला टोले देवून प्रत्येक राशी ची पोझिशन सांगते.

Prag czek2.JPG

प्राग मध्ये फसवा फसवी पण खूप वाटली. रस्त्यात अनेक दुकाने दागिन्यांची होती. आणि जबरदस्त बार्गेन चालू होते. एक अंगठी आवडली तर त्याची किंमत आधी ५० युरो सांगितली. मी घाबरून २० युरो म्हणाले तर लगेच ती विकणारी मुलगी तयार झाली. १० युरो ला मागुया का असा विचार करत असतानाच नवर्याने बाजूला खेचून नेले. कारण शेजारी तीच अंगठी १५ युरो मध्ये होती. आपल्याला ह्या बाबतीत अक्कल नाही हे परत एकदा सिद्ध झाले आणि परत “तिकडून” सुनावूनाही झाले. शेवटी कोल्ह्याला द्राक्षे आंबट ह्या बाण्याने ‘मला घ्यायचीच नव्हती नुसते बघत होते’ म्हणून काढता पाय घ्यायला लागला. एका गळ्यातल्या सेट ने मात्र माझं मन अजून चोरलं आहे... पण परत असे तसे ‘इकडून’ ऐकायचे नव्हते म्हणून काढता पाय घेतला. तिकडे मुलीचे मन एका पोर्सेलीन च्या बाहुलीने चोरले. तिची किमत पाहून ( ११५ युरो) अशा बाहुल्या भारतात ह्याच पैशात जन्म भर येतील सांगून “इकडून” तिची बोळवण झाली.... ( पुढल्या वेळेला “बाबा नकोत” असा ठराव बहुमताने मंजूर झाला)

प्राग मधून आम्ही क्रेको ह्या पोलंड मधल्या शहरात जायला निघालो. जवळ जवळ १० तासांचा प्रवास. पण बहुतेक कंट्री साईड ने झाला. एक वेगळ्याच प्रकारची पिवळी फुले पहायला मिळाली. ही फुलं फक्त १५ दिवसच असतात. त्या १५ दिवसात ती काढतात, वळवतात व त्यांचा उपयोग खत व जनावरांचे खाद्य म्हणून करतात ( दिनेशदा नाव सांगा फुलांचे !!!). हिरव्या रंगावर ही फुले खुप सुरेख दिसत होती. ह्या सगळ्या भागात ही गंमत सारखी पहायला मिळत होती.

254.JPG

मध्ये एक सुरेख घर लागले जे ३०० वर्ष जुने आहे व ज्याचे आता हॉटेल झाले आहे. जेवण सुद्धा छान होते. एक वेगळ्याच सॉस मधला राईस त्यांनी दिला. आणि उत्कृष्ट अशी पालकाची भाजी. ज्यात जायफळ घालून त्याचा उग्रपणा एकदम काढून टाकला होता. तिकडचं घरी बनवलेलं चीजही उत्तम होतं. एक वेगळीच डेझर्ट वाईन त्यांनी दिली. त्याची चव फारच सुरेख होती. ती मधा पासून करतात अस सांगितले. अजून एक वाईन तिकडे मिळाली जी दुधातून (याक...!! ऐकून कससच झालं) सर्व्ह करतात. एकंदरीत प्रकार मला पचणारा नव्हता हे नवर्याच्या चेहेर्या वरून कळले.

हेच ते घर व आजु बाजुचा परिसर

On the way to krakow 4.JPG

आतले जुने स्वरुप तसेच ठेवले होते

230 350 yr old house 2.JPG

क्रेको म्हणजे ह्या ट्रीप मधला हायलाईट होता. इकडे प्रचंड गोष्टी घडल्या. दुसऱ्या महायुद्धात नाझींचा सगळ्यात मोठ्ठा ज्यू ना मारायचा कारखाना म्हणजे ऑश्विझ आणि बर्कानाऊ इकडेच आहेत. नाझींनी क्रेको निवडायचे कारण हे की ते खूपच मध्यवर्ती ठिकाणी आहे. सगळ्या युरोपातून इकडे माणसे आणणे सोप्पे होते. परत हे खूपच निवांत जागी आहे. जरी ही जुनी पोलिश राजधानी असली तरी नाझी वर्चस्वाच्या काळात नाझी ना इकडे आपले चाळे लोकां पासून लपवायला ही जागा सुरक्षित वाटली.
आम्ही मात्र आमची सफर एका वेगळ्याच जागेने सुरु केली. वेलीक्झा salt माईन्स !!! एक अप्रतिम ठिकाण. पूर्वी जेंव्हा सोनं आणि मीठ ह्यांची किंमत एकाच होती, त्यावेळेस अशा अनेक खाणी अस्तित्वात आल्या. अस म्हणतात की काही कोटी वर्षं पूर्वी ह्या भागात समुद्र होता. त्यानंतर अनेक भूगर्भीय हलाचाली मुळे इकडे जमीन झाली. पण समुद्र काळात असलेल्या मिठा चे रुपांतर कठीण अशा दगडांमध्ये झालं. जे भूगर्भात दडून राहील. त्या वेळेस समुद्रातून मीठ काढायचे ज्ञान अवगत नव्हते. ह्या अशा खाणी वरच अवलंबून राहावे लागे. त्या मुळे ज्याच्या कडे मिठाच्या खाणी ची मालकी तो श्रीमंत ...अशी परिस्थिती होती. परत इतर खाणी पेक्षा इकडे काम करायला कामगार तयार असायचे कारण दगड किंवा कोळश्याच्या खाणी पेक्षा इकडचे जीवन खूपच सुकर होते. इकडे श्वसनाचे रोग वा लौकर मरण नव्हते. कारण क्षार व मीठा मुळे उलट हवा शुध्द असे. तरीही इतर समस्या होत्या. जशा खूप काळ काम केल्याने त्वचा सडत असे. कारण इकडे सतत ओल असे. बूट न घालता काम केले तर पायाच्या बोटांना भेगा पडत. अनेकदा ठिसूळ मीठ अंगावर पडून अपघात होत. असे अनेकदा अपघात झाल्यावर मग इकडच्या कामगारांनी खाली खाणीत एक चर्च बांधले. मीठ काढायची पद्धत ही अनोखी होती. हाताने मीठ वर चढवण्या ऐवजी ते लोक घोड्यां ना घाणा ओढायला लावत व त्या ची पुली बनवून मीठ एक एक मजला वर चढवत असत. ही खाण जवळ जवळ नऊ माजले खाली आहे..... आपल्याला आधी साधारण ३७० पायर्या उतरावया लागतात. सध्या गेली ३० वर्ष ही खाण बंद आहे. अजूनही इकडे मीठ आहे. पण ते आता महाग पडते. त्या मुळे त्याचा उपसा बंद आहे. त्याचं मुळे त्याचा आता पर्यटना साठी वापर होतो. आत मध्ये त्या कामगारांनी अप्रतिम शिल्प व झुंबर बनवली आहेत. हे सगळे मीठा चे आहे!!!!

Salt maine 48.JPGSalt maine 46.JPG

पोलंड व विशेषत: क्रेको चा अभिमान म्हणजे पोप जोन पॉल II.... हे पोलंडचे व त्यातूनही क्रेको चे . त्या मुळे त्यांचे शिल्प बर्याच ठिकाणी दिसते. आतातर व्हेटीकन ने त्यांना संत पद बहाल केले आहे. त्यामुळे जागो जागी त्यांची शिल्प दिसतात.

Salt maine 50.JPG

खाणीत जागोजागी बसायच्या जागा आहेत. कारण साधारण पणे ३ तासाची सफर आहे. इकडे सतत १४ डिग्री पर्यंत तापमान असते. त्यामुळे थकायला होत नाही. खूप सुरेख रीत्या ही जागा सजवली आहे. खाली एक मोठ्ठा हाल सुध्धा आहे. तिकडे कार्येक्रम होतात.

Salt maine 41.JPG

आम्ही तिकडे फिरत असताना एक स्थानिक पोलिश ग्रुप आला होता. ते अतिशय भक्तीभावाने पोप च्या पुतळ्या समोर नतमस्तक झाले. ही भाबडी श्रद्धा अनेक वेळा दिसली. अनेक स्थानिक शाळा आणि कोलेज आपल्या ट्रिपा घेवून इकडे येतात. एका बंद पडलेल्या जागेचे त्यांनी सुरेख रुपांतर केले आहे.

ही वाट

Salt maine 52.JPG

हे मीठात कोरलेलं लास्ट सपर

Salt maine 42_0.JPG

हे चर्च

Salt maine 48_0.JPG

पुर्वी ह्या अश्या पायर्‍या होत्या

Salt maine 34.JPG

घोड्यान्ची पुली

Salt maine 26.JPG

क्रेकोचा राजवाडाही खास आहे. उंची वरची ही जागा शहराचे सुरेख दर्शन घडवते. पोप चे रहाण्याचे ठिकाण, त्यांनी कार्डिनल म्हणून खूप काल घालवला ती जागा. हे सगळं आता देवत्वाच्या उच्च्तेला पोचले आहे. पोप बद्दल ह्या लोकाना विशेष अभिमान दिसला. दुसरी अभिमानाची व्यक्ती म्हणजे कोपर्निकस !!!! त्यांचे कोलेजाही आता हेरीटेज वास्तू म्हणून सांभाळले आहे.

पोप चे निवासस्थान

Old Chapel Krakow.JPG

क्रेको मधला आमचा दुसरा दिवस एका भयानक इतिहासाने उजाडणार होता. त्या आधीची संध्याकाळ एका वेगळ्याच जेवणाने झाली. एका स्थानिक ठिकाणी फार सुरेख जेवण मिळाले. ओलिव्ह ओईल मध्ये केलेली ब्रोकोली ची भाजी आणि अप्रतिम अशा चवीची लोणी आणि क्रीम घालून केलेली अप्रतिम अशी पालक ची भाजी. त्याच्या बरोबर भात. त्याचं बरोबर अर्गुला सलाड. अर्गुला ची पाने मी प्रथमच खाल्ली. मला आधी चव उग्र वाटली. पण नंतर मात्र चव फारच आवडली. त्या सलाड चे ड्रेसिंग वेगळेच होते.

त्या हॉटेल चा मालक पण गप्पिष्ट निघाला. एकंदरच पोलंड आणि त्याच्या सद्य स्थितीवर पोट तिडकीने बोलत होता. बोलता बोलता अचानक गप्प होवून उठून गेला. आधी आम्हाला आश्चर्याच वाटले. मग गाईड म्हणाली की इकडे पूर्वी रशियन राजवटी मध्ये प्रत्येक जण गुप्तहेर असल्या सारखा वागायचा. लोकांना एकमेकांची भीती वाटायची. लोक चुगल्या करायची. सरकार विरुद्ध बोलणारी लोक अचानक गायब व्हायची. त्याच मानसिकते मधून आजूनही हे लोक बाहेर पडलेले नाहीत. मधेच मिटून जातात. त्या मुळे इच्छा असूनही जास्त बोलत नाहीत. बाहेरच्याबरोबर ते मोकळे असतात पण स्थानिकांना च घाबरतात.

ही भावना मला नविन होती. आपण साधारण्तः बाहेरच्यान्ना बुजतो पण आपल्यां बद्दल खात्री बाळगुन असतो. अशी पण लोकं असतात ह्यावर विश्वास बसत नव्हता. परिस्थीतीने त्यानां असं संशयी बनवलं आहे.

पुढचा मुक्काम आयुष्यभर पुरेल असा अनुभव देणारा मिळाला. 

 

ह्या ट्रीप ला जायचे ठरवले तेंव्हाच ऑश्विझ हा नाझींचा ज्यू कत्तल खाना पहायचा आहे, हे माहिती होतं. त्या बद्दल अनेक ठिकाणी वाचलं होत. शिंडलर्स लिस्ट, लाईफ इज ब्युटीफुल सारख्या सिनेमां मधून पाहिलं होत. तरीही एक अनामिक रुख रुख मनाला लागली होती. आपण तिकडे का जातोय? हा प्रष्ण पण मनात येत होता. खरच का गेले मी तिकडे?

उत्तर एकच, ते मला पहायचे होते. का? कारण तो एक काळा इतिहास आहे. घडून गेलेला. आपल्या सुदैवाने आपल्याला त्याची जराशीही झळ लागली नाही. आपल्यावर आपल्या दुर्दैवाने इंग्रजांनी राज्य केले. ते स्वत: दुसऱ्या महायुद्धात सक्रीय होते. आपले अनेक सैनिक अनेक आघाड्यांवर दोस्तांच्या बाजूने लढायला होते, आपल्या कडे ही अनेक लोकांचे शिरकाण इंग्रजांच्या राज्यात झाली. पण मास किलिंगच्या एखाद दुसऱ्या (जालियान वाला बाग) घटना सोडता, आपल्या नशिबी तसे सभ्य शासाकच आले. मला वाटते मानव जातीच्या इतिहासात एवढ्या प्रमाणावर माणसे मारण्याचा कुविक्रम फक्त आणि फक्त नाझीम्च्या नावावर असेल. शिंडलर्स लिस्ट सिनेमात एक दृश्य आहे, की कॅम्प चा मुख्य सकाळी उठतो आणि बाहेर गेलारी मध्ये येवून आळस झटकतो. सहज म्हणून तो बंदूक डोळ्याला लावतो व खालून चाललेल्या एका ज्यू प्रिझनर वर गोळी चालवतो. उगाच, मजा म्हणून, मरगळ झटकायला !!!! हा प्रसंग अतिशय केज्युअली चित्रित करण्यात आला आहे. तरी तो अंगावर येतो. अशीच त्यावेळेस माणसे मारली गेली. का?.....का?.... उत्तर कोणाही कडे नाही.

हिटलर अतिशय सद्वर्तनी होता. शाकाहारी होता, स्त्री दाक्षिण्य असणारा होता, काटकसरी, मद्यपान न करणारा, शेवटच्या १५ वर्षात इव्हा ब्राऊन सोडून एकाही स्त्री कडे न पहाणारा, उत्तम प्रशासक, जर्मनीला पहिल्या महायुद्धाच्या अपमानित परिस्थितीतून वर काढत तंत्रज्ञानाच्या वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवणारा. पण त्याचं बरोबर कमालीचा हेकट, तापट, टोकाची भूमिका असणारा, स्वत: बद्दल फाजील कल्पना असणारा, एककल्ली, क्रूर सुध्धा होता. त्याने जर ज्यू व इतरांच्या शिराकाणाची आज्ञा दिली नसती तर आज तो एक यशस्वी राज्य करता म्हणून ओळखला गेला असता. नाण्याला नेहेमी दोन बाजू असतात हे खरे, पण इकडे त्या काळ्या बाजूने करोडो लोकांचे प्राण घेतले. हकनाक बळी घेतले.

ज्यु लोकान्चा बरेच धर्म राग करतात. क्रिश्चन्स त्यांचा राग करतात, की त्यांनी येशू क्रीस्ताला कृसिफाय केले. मुसलमान त्यांचा राग करतात कारण दोन्ही धर्म एकाच जागे वर हक्क सांगतात. हिटलर चा हा ज्यू द्वेष एवढा टोकाचा का? ह्याचे मुळ युरोप च्या अर्थ कारणात आहे !!!! त्यावेळेस ज्यू समाजाच्या हातात अनेक उद्योग धंद्याची नाडी होती. मुळातच हे सावकार लोक. त्याच बरोबर व्यापारात डोके चालणारे. रिटेल उद्योगाच्या नाड्या आपल्या हातात असणारे. त्याचं मुळे पैसा बाळगून असणारे. आर्थिक दृष्ट्या मजबूत व एकमेकान्ना धरून असणारे. पहिल्या महायुद्धा नंतर आलेल्या मंदी मध्ये हा समाज त्यांच्या ह्या वैशिष्ट्या मुळे तरुन गेला. तोच इतर समाज मात्र पोळला गेला. त्यामुळे हा ज्यू द्वेष मुळातच ह्या लोकांत होताच. हिटलर ने त्यांचे भांडवल केले. लोकप्रियता मिळवण्या साठी केलेल्या घोषणांचे नंतर ओझे झाले. मग जगाला त्यांच्यावर केलेलं अत्याचार कळू नयेत म्हणून मग गुपचूप पण अतिशय planning ने त्यांना मारायला सुरुवात केली. युद्ध हरतोय अशी जाणीव झाल्यावर तर अजून जोमाने मारायला सुरुवात केली.

माझ्या परीने मी ह्या मानसिकतेचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला. ह्या विषयावर अजून चर्चा अपेक्षित आहे. माझा दृष्टीकोन चुकतही असेल. माबो वरील जाणत्या लोकांनी प्रकाश टाकावा.

तरीही तो जे एक प्रश्न होता “का? कशासाठी” हा प्रश्न तिकडे जाऊन आल्यावर मनात अजूनच नाचायला लागला आहे. बर> हे खूप सहज झालं आहे का... की बाबा भावनेच्या भरात केला एखादा अपराध..... आणि झाला पश्चाताप.... पण नाही... खूप विचारपूर्वक, प्रचंड डोके लावून, नीर निराळ्या पद्धतीने, अभ्यास पूर्ण रीत्या ही गोष्ट घडवून आणण्यात आली. आणले ज्यू...घातल्या त्यांना गोळ्या..... दिसला ज्यू उडवलं त्याचं मुंडकं..... असे असते तर ते युद्ध ह्या नावाखाली खपले असते. पण इकडे पद्धतशीर रीत्या, त्या जीवांना कसे मारायचे, कसा आरडाओरडा होवू द्यायचा नाही, जगाला कळू द्यायचे नाही, आड जागा शोधून, त्यातही त्यांच्या शरीराच्या प्रत्येक गोष्टीचा कसा उपयोग होईल, ह्याचा विचार करून हे काम केलेले आहे. म्हणजे सहज नाही, तर खूप बुद्धीचे हे काम आहे. माणसे कशी मारायची ह्यावर अनेक संशोधक, डॉक्टर्स, इन्जिनीअर्स विचार करायचे. नव्या नव्या क्लुप्त्या काढायचे.

साधारण इकडे असा “प्रोसेस” ( एकदम प्रोडक्शन हाउस सारखे वाटते ना.... पण हा खरो खरीच माणसांना मारायचा कारखाना होता) होता, की ट्रेन, रोड, ने लोकं इकडे आणली जायची. एका wagan मध्ये जिकडे जेम तेम ५० जण मावू शकायचे त्यात 400-४५० लोक भरून आणले जायचे. कधी हा प्रवास काही तासांचा असे, तर कधी कधी आठवड्यांचा. न खाता न पिता एकामेकांच्या अंगावर कोंबून बसल्याने व शारीरिक विधी ही एकमेकांच्या अंगावर झाल्याने, दुर्गंधी, घाण व कोंडून बरेच लोक प्रवासातच मरायचे. जे उरायचे त्यांना ऑश्विझ व बर्कानाऊ सारख्या रम्य ठिकाणी आणल्यावर बरे वाटायचे. ह्या लोकाना आणताना तुम्हाला कामाला नेत आहोत हेच सांगितले जायचे. स्टेशन वर उतरल्यावर त्यांच्या रांगा लावायचे. त्यात १५ वर्षां खालील मुले व स्त्रिया ह्यांची एक रांग, व पुरुषांची दुसरी रांग. पैकी मुले व त्यांच्या आया ह्यांना सरळ सरळ gas चेम्बर मध्ये नेले जायचे. तिकडे जागा नसेल, वा खूप रांग असेल तर एक दोन दिवसात नेले जायचे. मुले व त्यांच्या आया एकत्र का, तर आई पासून तोडले तर पोर व आया गोंधळ घालीत म्हणून. gas चेम्बर मध्ये नेताना त्यांना सांगत की तुम्हाला प्रवासात जे इन्फेक्शन झाले आहे ते काढण्या साठी आंघोळ घालायची आहे. म्हणजे मग तुम्हाला काम देता येईल. मग कपडे काढून, बायकांच्या डोक्या वरचे लांब केस काढून , आत त्यांच्यावर शोवार्स सोडत असत. ह्या शोवार्स मध्ये झायाक्लोन बी हे पोयझन मिसळलेलं असे. हा शोवर अंगावर पडून साधारण पणे गुदमरून २० मिनिटात मृत्यू यायचा. आधी ते अशा ज्यू ना गोळ्या घालत. पण नंतर गोळ्या कशाला फुकट घालवायच्या? असा “ सुज्ञ” विचार करून त्यांनी हा मास किलिंगचा प्रकार शोधून काढला. ही माणसे मेल्यावर त्यांची प्रेत ओव्हन ( म्हणजे विद्युत दाहिनी) मध्ये घालून त्याची राख करत असत.

जे पुरुष व स्त्रिया शरीराने मजबूत असत त्यांना कामांसाठी वेगळं काढत असत. त्यांच्या कडून खूप कामे करून घेत, जशी युद्ध सामुग्री, शेती, वस्तू बनवणे इ. त्यांना गरजे एवढेच अन्न देत असत. झोपायला गोणपाटात गवत भरून केलेल्या गाद्या देत असत. साधारण एका बराकीत 500 ते 600 माणसे असत. त्यांना मिळून साधारण १० शौचालये असत. देख रेख करायला, त्या प्रिझनर्स मधीलच युद्ध कैद्यांची निवड होई. ते लोक खूप लाच खाऊन व देवून स्वत: चे मरण पुढे ढकलत असत. रोज साधारण पणे १००-१५० लोकांवर काहीतरी खोटे आरोप करून त्यांना मारत असत. त्या मुळे इतरांवर वाचक रहात असे. रोज संध्या काळी ओर्केस्त्रा वर गाणी वाजवली जात. त्या वेळेस सगळे कैदी तिकडे जमत. हे करमणुकी साठी नसून डोकी मोजण्या साठी अवल्म्बालेले तंत्र होते. रोज संध्याकाळी कैद्यांची परेड घेत असत.
जे आजारी पडत त्यांची रवानगी दवाखान्यात होई. इकडे त्यांच्या वर वेगवेगळ्या औषधांचे टेस्टिंग होत असे. कधी कधी विशिष्ट लक्षणे आढळली तर मुद्दाम त्या रुग्णाला तिकडे डाम्बत असत. (अश्या तर्हेने जवळ जवळ ३०० औषधांच्या पेटंट चे काम इकडे झाले!!!).

कैदी इकडे आणताना त्याच्या चीज वस्तू काढून घेण्यात येत.(मेल्या वर सोन्याचे दात सुद्धा कढुन घेत !!!!) परत जाताना आपल्याला परत मिळाव्यात म्हणून बिचारे ह्यावर नावे घालीत. ह्यातल्या कीमती वस्तू बाहेर विकत असत. अनेक एजंट ह्या वस्तू एका दूरच्या ठिकाणी विकत घेत. त्या ठिकाणाला कॅनडा म्हणत. कारण त्या वेळेस युरोप मध्ये कॅनडा हा देश श्रीमंती साठी प्रसिध्द होता.कैदी मारल्या नंतर त्यांचे चांगले बूट, कपडे, bag ठीकठाक करून बाहेर विकत असत. सगळ्या जर्मनीत त्याची विक्री होत असे. त्या मेलेल्यांच्या केसां पासून ते एक वेगळेच कापड तयार करत असत. जे युद्ध भूमीवर सैनेकांच्या वापरा साठी नेले जायचे. तिकडे मिळणार्या मिंक कोट साठी तर अनेक जर्मन धनिक बायका डोळे लावून असायच्या.

हे सगळे पाहिल्यावर मन सुन्न होवून जाते. का? आणि कशा साठी? हे प्रश्न पाठ सोडत नाहीत. कैद्यांनी बाहेर पळून जावू नये म्हणून जाड जाड तारांचे, ज्या वर वीज खेळवली आहे, असे कुंपण असायचे. तरीही 600 कैदी इकडून पळून जाण्यात यशस्वी झाले. पण १३ लाख मेले!!!!

हे ऑश्विझ चे प्रवेशद्वार

Aushtwich.JPG

ह्या बराकी. त्या मैदानात परेड चाले.

IMG_0402.JPG

हे कुंपण

DSC06441.JPG

हे gas चेम्बर्स

DSC06455.JPG

हे ओव्हन्स

DSC06457.JPG

अशा तर्हेने माणसे वेगळी करत

DSC06451.JPG

हा तो गॅस

Aushtwich Gas.JPG

ह्या बॅगा

IMG_0380.JPG

बुट

IMG_0386.JPG

बराक आतिल बाजु

IMG_0389.JPG

हे सगळे पाहिल्यावर भडभडून आले. अनेक ठिकाणी तर मी रडत होते. अनेक ठिकाणी फोटो काढायला मनाई आहे. कारण अनेकांचे केस, वस्तू अश्या चीजा इकडे ठेवलेल्या आहेत. इकडे गाईड बहुतेक पोलिश असतात. अनेक लोक रोज भेट देतात. गाईड ला विचारले तर ती म्हणाली की येनार्यात इस्रायल कडून खूप लोक येतात. देणग्याही देतात. कारण त्यांचे कोणी ना कोणी इकडे होतेच ना !!! जर्मन पण खूप येतात. पण आपल्या पूर्वजांनी केलेली एक चूक म्हणूनच ते ह्या कडे पहातात. १९४५ साली जर्मन जेंव्हा पोलंड सोडून गेले त्या नंतर १९४६ साला पासून ऑश्विझ व बर्कानाऊ कॅम्प tourist अ‍ॅट्रॅक्शन झाले. मानवतेच्या क्रूर तेचे प्रतिक झाले.

जेंव्हा जर्मन्स इकडून पळाले तेंव्हा ह्या कॅम्प चा जास्तीत जास्त वेळ जो मुख्य अधिकारी होता तो रुडोल्फ होस, जो आर्जेन्टीना मध्ये पळून गेला होता, त्याला मोसाद ने पकडले व बर्कानाऊ मध्ये एका वध स्तंभ बांधून त्या वर त्याला फाशी देण्यात आले. त्याला मृत्य समयी सुध्धा वाईट वाटत नव्हते. “मी आज्ञा पालन केले” हेच त्यांचे शब्द शेवट पर्यंत होते. ह्या सगळ्या मागे जरी हिटलर ची इच्छा हे कारण होते तरी एवढ्या क्रूरतेने मारण्या मागचे डोके मात्र हिमलर चे होते. जे एस.एस. गार्डस ह्या कॅम्प मधून कामे करत असत ते ही जवळ जवळ ११००० संख्येत होते. पैकी नंतर फक्त 800 मिळाले. बाकीचे इतर देशात पळाले वा आपली ओळख बदलून राहिले.

सुरुवातीला ह्या कैद्यांचे रेकॉर्ड ठेवत असत. त्यांची नावे, फोटो ठेवत असत. पण नंतर नंतर ही नोंद ठेवणेही कठीण झाले. त्यातले काही फोटो तिकडे लावलेले आहेत. त्यावर कॅम्प मध्ये आणल्याची आणि मृत्यू ची तारीख अशा नोंद आहे. काही काही लोकांना तर ५-६ दिवसात मारले आहे. अनेक प्रकारे छळ करून त्यातले खुपसे लोक रोगांना बळी पडत. हे जे फोटो आपल्याला इकडे दिसतात, ते त्या वेळच्या गार्डस ने लपवून काढलेले आहेत. नंतर जेंव्हा त्यांच्या वर खटले भरले त्या वेळेस हेच फोटो पुरावे म्हणून वापरले गेले.

जेंव्हा मी ऑश्विझ मध्ये गेले तिकडे कॅम्प छोटा असल्याने व खूप लोकं तिकडे येत असल्याने भकासपणा जरा कमी जाणवला. पण बर्कानाऊ मध्ये शिरल्या शिरल्या भयंकर nigativity जाणवायला लागली. खूप ओझं वाटायला लागलं. बर्कानाऊ ऑश्विझ च्या ८ पाट मोठा आहे. प्रचंड कॅम्प आहे. इकडेच सर्वाधिक माणसे मारली गेली. मी स्वत: रेकी आणि एंजल थेरपी व मेडीटेशन करते. alternative हिलिंग मध्ये असल्या कारणाने, मला nigativity पटकन जाणवते. तिकडे गेल्या गेल्या माझे हात जड झाले. प्रचंड ओझे वाटायला लागले. गंमत म्हणून माझ्या नवर्याने गाईड ला विचारले की इकडे भुतेही असतात का हो? कारण एवढ्या प्रमाणावर लोकं हकनाक मेल्या मुळे सहाजिकच खूप वाईट व्हायाब्रेशांस इकडे असणे सहाजिक आहे. आम्हाला वाटले होते की ती गाईड हा प्रश्न उडवून लावेल. पण तिने उत्तर दिले की, तिने स्वत: हा अनुभव घेतलेला नाही, पण इकडे काम करणार्या रात्र पाळी च्या सुरक्षा रक्षकांनी मात्र असे अनुभव व तक्रारी केलेल्या आहेत. त्यांना रात्री च्या वेळेस परेड करताना जसे खूप बुटांचे आवाज येतात तसे आवाज ऐकू आले आहेत. बर्कानाऊ ला कुठलेच कुंपण नाही. तारांचे कुंपण आहे. पण तो 400 एकर असल्याने खूप मोकळा आहे. आजूबाजूला व्यवस्थित वस्ती आहे. पण एकंदर वातावरणात एक प्रकारची खिन्नता आहे. आजूबाजूच्या घरांच्या किमतीही कमी आहेत, अशी माहिती कळली. सहाजिकच आहे, अगदी अडल्या शिवाय इकडे घरे कोण घेणार. मृत्यूचा एवढा मोठ्ठा खेळ जिकडे झाला तिकडे असे वातावरण अपेक्षितच होते.

येणारे लोक (आम्ही सुध्धा) एक ऐतिहासिक घटना व वास्तू म्हणूनच ह्याच्याकडे पाहतात. पण तरीही खूप ओरखडे मनावर रहातातच. ती गाईड बोलताना “जर्मन्स” असाच उल्लेख करत होती. आमच्यातील एकाने तिला ‘नाझी’ असा उल्लेख करायची विनंती केली. ती तिने मान्य केली. खरच आहे पण. हे कृत्य बर्याच जणांना माहित नव्हते. अगदी आतले लोक सोडले तर नक्की काय होते आहे, ह्याची कल्पना बाहेर लोकांना नव्हती. होस ची बायको, जी त्याच कॅम्प मध्ये एका टोकाला रहात होती, व जिच्या घरा भोवती भिंत होती, तिला आपला नवरा जेलर आहे ह्या पलीकडे नक्की काय करतोय ह्याची अजिबात कल्पना नव्हती. जेंव्हा तो आर्जेन्टीना मध्ये पळाला तेंव्हाही ही जर्मनीतच रहात होती. जेंव्हा पोलीस तिच्या कडे येवून विचारणा करू लागले, तेंव्हा तिला त्यांचे चाळे समजले. तरीही ती नवर्या बद्दल ते सगळे खरे आहे हे मानायला तयार नव्हतीच!!!! त्यामुळे ह्या बातम्या खूप गुप्त ठेवत असत.

त्या काळात मिडीया आजच्या इतका सक्रीय नव्हता. युद्ध पत्रकारांना तर इकडे येण्यास बंदीच होती. ज्यू लोक फक्त युद्ध सामुग्री बनवण्या साठी व शेती साठी मजूर म्हणून वापरली जातात एवढेच त्यांना माहित होते. पण इतका नर संहार असेल अशी कल्पना रशियन ने येवून हे कॅम्प ताब्यात घेई पर्यंत कोणालाही नव्हती.

आज पोलंड देशाचं हे एक मोठ्ठ tourist अ‍ॅट्रॅक्शन झालेले आहे. लाखो लोक इकडे येतात. अनेकांची पोट ह्यावर अवलंबून आहेत. ते जगाला ओरडून सांगत आहेत, बघा बघा नाराधमतेचा नजारा. हे सांगणे गरजेचे आहे का? पाहणे गरजेचे आहे का?

हो... मला वाटते हो..... आपल्या एका इच्छे मुले त्या माणसाने हजारोंचे प्राण घेतले. म्हणजे एक इच्छा किती संहार करू शकते. हे पाहून भविष्यात कोणी हिटलर पैदा होवू नये आणि कडव्या मानसिकतेने फक्त आणि फक्त निराशाच हाती लागते, ह्याचे हे कॅम्पस म्हणजे द्योतक आहे. इतका संहार करूनही आज ते ज्यू आपल्या पायावर खंबीर पणे उभे आहेत. भले प्रगत देशांची त्याला फूस असेल, मोठ्ठ राजकारण तिकडे असेल, काहीही असो. पण त्यांची जीवन इच्छा मेली नाही. उमेद संपली नाही. उलट ह्या आघातांनी वाढली. आज रेताड मातीताही अनेक प्रयोग करून इस्राईल ने शेती मध्ये क्रांती केली आहे, तंत्रज्ञान, गुप्तहेर खाते सगळ्यातच प्रगती केली आहे. युद्ध संपल्यावर त्यांनी ह्या अपराध्यांना वेचून वेचून शोधून काढले. त्यांच्यावर खटले भरले. शासन केले. जगाची सहानुभूती त्याना होतीच.

नाझी जर्मनीला तरी उद्वास्थ्ते शिवाय काय मिळाले? फक्त लोकांच्या डोळ्यातला संताप, उपेक्षा आणि राग. आघातांनी राष्ट्र मोठी होतात की काय? काय माहित. पण इतिहास तरी तेच सांगतो. जर्मनी, जपान, इस्रायेल. ह्यांचा तरी इतिहास हाच आहे.

हे सगळे पहात असताना माझी १४ वर्षांची मुलगी माझ्या सोबत होती. फारसे काही माहित नसलेली. म्हणजे पूर्वाभ्यास नसलेली. ती खूप उत्सुकतेने पहात होती, गाईड ला प्रश्न विचारात होती, रडत होती, खिन्न होत होती. तिकडून निघताना उगाच हिला आणली असे मला वाटले, मी बोलूनही दाखवले. त्यावर ती पटकन म्हणाली,” आई, हा इतिहास आहे, तो आम्हाला कळलाच पाहिजे, नाहीतर असे हिटलर अजून बनतील. लोकाना मारून काही मिळत नाही. फक्त स्वत:चा शेवट हाती लागतो.” वरच्या परिच्छेदा मधल्या भावना तिच्या आहेत.

हे ऐकून ज्या उद्धेशाने हे कॅम्प जतन केले आहेत तो सफल झाला असे वाटते.

भाग ४ = झाकोपाने , बुदापेष्ट = रम्य दुनिया

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...