बव्हंशी अपरिचित असा नितांतसुंदर ब्रह्मदेश हा या लेखमालेचा मुख्य
प्रेरणास्त्रोत जो आपण आधीच्या भागांमध्ये पाहिला. या भागापासून थाईलँड
विषयी. हा देश आता अगदी 'परसातले पर्यटन स्थळ' होऊन गेला आहे. परंतु तरीही
'पॅकेज टुरीझम' चा पगडा असल्याने बराचसा भाग आजही तसा अपरिचितच आहे.
त्याविषयी थोडे या भागापासून पुढे…
प्रथम थाईलँड ची थोडी ओळख; इथून पुढे मी 'सयाम' हे जुने नावच केवळ 'लिहायला
सोपे' या कारणाने वापरणार आहे. देशाचे राजकीय नाव स्थानिक भाषेत 'रात्च
अनाचक थाई' व व्यवहारातील स्थानिक नाव 'प्रथेत थाई' असे आहे. दोन्ही
संस्कृतोद्भव शब्द, 'राज्य आज्ञा चक्र थाई' व 'प्रदेश थाई' असे. यातील थाई
शब्द समुदाय संबोधक. या प्रदेशातील भाषा 'ताई' कुटुंबातील असून त्यातली एक
'ताई' म्हणजे आजची 'थाई', ती बोलणारे लोक, व त्या लोकांचा प्रदेश असा
साधारण व्युत्पत्ती विस्तार. आपल्याकडेही या 'ताई'च्या २-४ लेकी
अतिपूर्वेकडील राज्यात नांदत आहेत.
सद्य भौगोलिक सयाम हा पाच भागांचा मिळुन बनला आहे. सुदूर दक्षिण किनारी भाग
: हा ऐतिहासिक 'श्रीविजय' साम्राज्याचा भाग होय. फुकेत, क्राबी, सुरत थानी
(सुरत वरून ठेवलेले नाव) ही मोठी/प्रसिद्ध शहरे. सध्या ब्रह्मदेशाने
हाकलून दिलेल्या व मलेशियाने न स्वीकारलेल्या त्रासदायक मुसलमानांमुळे हा
भाग सयामचे अवघड जागचे दुखणे आहे. मुख्य भूमीचा दक्षिण भाग हा सर्वात
समृद्ध व प्रगत, बँकॉक, पाथ्थया ही सर्वश्रुत ठिकाणे या भागातील. मध्य भाग
हा सयाम चे सांस्कृतिक केंद्रस्थान. अयुथ्थया (अयोध्या) ही थोड्या
पलीकडल्या काळातील राजधानी, त्याही पलीकडल्या काळातील नाव 'द्वारावती'.
जवळच समृद्ध असा प्राचीन सुखोथाई राज्याचा भाग, सुखोथाई (सुखोदय) व सी
सत्चनालाई (श्री सज्जनालय) ही प्राचीन शहरे या भागातील. उत्तर सीमावर्ती
भाग हा डोंगराळ प्रदेश, मेकाँगच्या खोऱ्यातील ऐतिहासिक 'लान-ना' उर्फ
'हरीपुंजया' राज्याचा भाग. उर्वरित पूर्वेकडील भाग इसान (ईशान्य) म्हणून
ओळखला जातो, हा खरा ख्मेर (कंबोडिया) राज्याचा भाग परंतु सध्या सयाम मध्ये
समाविष्ट आहे. इथे हिंदू प्रथांचा बराच प्रभाव आढळतो.
संदर्भासाठी नकाशा
आधी लिहिल्याप्रमाणे सयाम तसा फारसा अनोळखी राहिलेला
नाही त्यामुळे झगमगाटातील जागांविषयी लिखाणाची पुनरावृत्ती टाळून या
प्रस्तावनेच्या भागात बँकॉक व लगतच्या प्रदेशाची थोडक्यात चित्रयात्रा.
पुढील भागात काही अल्प परिचित भागाविषयी सविस्तर.
एरावन (ऐरावत) ब्रह्मदेव मंदिर, प्रमुख देवतांपैकी एक
मरकत बुद्ध : सयामची सर्वात महत्वाची बुद्धमूर्ती, जेड पासून बनलेली असली तरी 'एमरल्ड बुद्धा' म्हणायची पद्धत आहे.
अजून एक महत्वाची सुवर्ण बुद्धमूर्ती
बँकॉक पासून पूर्वेकडे साडेतीन तासांवर फिमाई (मूळ नाव
'विमयपुरी') व फानोम रुंग ही ख्मेर/अंकोर शैलीतील पुरातन शैव मंदिरे आहेत.
बरेच बांधकाम पुनर्रचित असले तरीही मूळ मंदिर आजही अतिशय देखणे आहे. अंकोर
शैलीप्रमाणे मोठे प्रांगण, उपमंदिरे व जलकुंड असा बराच भव्य विस्तार दोन्ही
ठिकाणी आहे. कोरीवकाम फारसे उरलेले नाही परंतु अंतरावरून हि मंदिरे फारच
सुंदर दिसतात. दोन्हीकडे जाण्यास बस सेवा नॉर्थ टर्मिनल वरून उपलब्ध आहे
(कोरात मार्गे)
फिमाई : मुख्य मंदिर
बँकॉक पासून उत्तरेकडे तासाभरावर अयुत्थया हि ऐतिहासिक
राजधानी. रेल्वे, नाव व बस तिन्ही प्रवासी सेवा इथे जाण्यासाठी उपलब्ध
आहेत. ब्रह्मदेशाने स्वारी करून हि नगरी लुटली व आता बऱ्याच मोठ्या
इमारतींचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. परंतु तरीही त्यावरून गतवैभवाची कल्पना
येते.
पुढील भागात उत्तरेकडची भटकंती…
सुखोथाई हे ऐतिहासिक शहर देशाच्या मध्य भागात आहे. जाण्या येण्याचे उत्तम
साधन म्हणजे रेल्वे. बँकॉक-फित्सानुलोक साधारण ५ तासात रात्रीच्या प्रवासात
सहज कापले जाते. शक्यतो असे थोडे लांबचे प्रवास रात्रीचे बरे असतात,
विशेषतः एकल प्रवासात, यामुळे राहायची वेगळी सोय करावी लागत नाही व अंतरही
कापले जाते आणि गोष्टी 'बघायच्या' वेळात मोठी बचत होते! फित्सानुलोक, मूळ
नाव 'विष्णूलोक' हे मध्य भागातले मोठे शहर, तिथून सुखोथाई तासाभारावर.
माझ्या प्रवासात हा साधारण मध्यावरचा पडाव होता. ब्रह्मदेश बघून झाल्यावर
शेवटी शेवटी रंगून मध्ये सर्दी ताप अशा किरकोळ आजारपणाने पकडले.
पावसाळ्याचे दिवस तसे संपत आले होते, तरी मध्य सयाम मध्ये अजूनही जोर ओसरला
नव्हता. त्यामुळे इथे तशी प्रतिकूल हवा होती, पण सुदैवाने राहायची सोय
अतिशय उत्तम झाली व शरीरास आवश्यक असलेला आराम मिळाला. जिथे राहिलो
त्यांनीच दुसऱ्या दिवशी भटकायला सायकल दिली, त्यामुळे मोठेच काम झाले. कारण
जुने महानगर बऱ्याच मोठ्या भूभागावर पसरलेले आहे, व नगरांतर्गत सार्वजनिक
वाहतुकीचा एकंदर बोऱ्याच आहे, त्यामुळे सायकल सर्वात उत्तम साधन. सार्वजनिक
बस म्हणजे आपल्याकडे महापालिकेच्या कचऱ्याच्या घंटागाड्या असतात तसे
ट्रॅक्टरवजा वाहन व त्यात लाकडी बाकडी टाकलेली.
सुखोथाई आता तीन वेगळ्या पुरातत्वखंडात विभागले आहे. पूर्वी हा सर्व एकच
पार्क होता व प्रवेशशुल्कही एकच होते आता त्याचेही तीन झाले. मध्य भाग
सर्वात महत्वाचा, उत्तरेकडेही काही चांगली संरक्षित मंदिरे आहेत,
दक्षिणेकडे जंगल अद्याप कायम असून अभ्यासू संशोधक मंडळींसाठी अधिक आकर्षक
बाकीच्यांनी वगळला तरी चालण्यासारखं. याव्यतिरिक्त संरक्षित समूहाच्या
बाहेर पश्चिमेकडे डोंगराळ भाग असून तेथेही काही भग्न वास्तू आहेत.
येथील सांस्कृतिक इतिहास व वर्तमान हिंदू-बौद्ध संमिश्र आहे. पुरातन
मंदिरात शैव व वैष्णव मंदिरे कलिंग-नागर व अङ्ग्कोर शैलीतील आहेत. बौद्ध
स्तुपांची रचना पारंपारिक लंका-ब्राह्मी शैली व काही ठिकाणी चौकोनी थाई-लाओ
शैलीत आहे. लाल जांभ्या दगडात जुने बांधकाम आहे हळूहळू पुढे विटांचा वापर
वाढलेला दिसतो. चुन्याचे लिंपण व रंगकाम काही ठिकाणी शिल्लक आहे. हा भाग
सुद्धा ब्राह्मी आक्रमणात बराच उद्ध्वस्त झाला.
पाउस तसा येउन जाऊन होता तरीही साधारण चार तास सर्व भाग बघण्यासाठी लागले.
पुढे सी सत् चनालाई (श्री सज्जनालय) हे छोटेसे नदीकाठचे रम्य ठिकाण साधारण
तासाभारावर बसने जाण्यासारखे आहे. दिवसभरात दोन्ही ठिकाणे बघून संध्याकाळी
फित्सानुलोक येथे परत व रात्री रेल्वेने दक्षिणेकडे बँकॉक किंवा उत्तरेकडे
च्यंग माई / च्यंग राई कडे जाता येते. फित्सानुलोक ला परत आल्यावर एका
बौद्ध मंदिरात एका बौद्ध भिक्षूंनी उपचारांसाठी मार्गदर्शन केले. प्रथमतः
भाषेपलीकडे त्यांनी माझ्या प्रकृतीची गरज ओळखली व नंतर अल्प संभाषणातून
आवश्यक ती मदत केली. संभाषणाची भाषा संस्कृत! बरेच बौद्ध धर्मग्रंथ संस्कृत
भाषेत आहेत त्यामुळे वरिष्ठ भिक्षुंना भाषा अवगत आहे. पुनश्च
लेखमालाशीर्षक अधोरेखित…! असो, पुढे चित्रांतून अधिक माहिती…
संदर्भासाठी नकाशा
सुवर्णांकित बुद्ध
वट सी-चुम बुद्ध
पुढील भागात उत्तर सीमेवरची भटकंती
थाईलँड म्हंटले की शक्यतो बँकॉक व समुद्र असेच समीकरण असते. या भागात उत्तरेकडील बव्हंशी अपरिचित असलेल्या भागाची सफर.
उत्तर सयाम तुलनेत दुर्गम आहे. डोंगराळ भागात अनेक आदिवासी जमाती अजूनही
पारंपरिक पद्धतीने जीवन व्यतीत करतात. तशी मोठी शहरे या भागातही आहेत,
मेकाँग नदीच्या सुपीक खोऱ्यातील प्रदेश असल्याने सुबत्ताही आहे. इतिहासात
वेगवेगळ्या जमातींचे येथे वर्चस्व असल्याने मुख्य सयाम पेक्षा येथील
लोकजीवन वेगळे जाणवते. प्राचीन काळी हिंदू राज्ये असलेला हा प्रदेश
कालांतराने कधी ब्राह्मी तर कधी लाओ, व अलीकडे थाई सत्तेच्या अंमलाखाली
आला. आजही येथे गणेश, ब्रह्मा, लक्ष्मी व इंद्र या प्रमुख देवता आहेत.
मूर्तिपूजा व उपचारांची लोकांना आवड आहे.
फित्सानुलोक (विष्णुलोक): सयामचा सद्य राजवंश या स्थानाशी निगडित
असल्यानेही याला वेगळे महत्व आहे. या शहरात देशातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध
मंदिरांपैकी एक, श्री रत्तन महाथाट हे मंदिर आहे. प्रसन्न अशी बुद्धाची
सोन्याची मूर्ती व भिंतीवरील सुवर्णरेखन उल्लेखनीय! ख्मेर शैलीतील शिखर,
थाई पद्धतीचा मंडप हे स्थापत्य विशेष. सुखोथाई व सी सत्चनालई ही प्राचीन
नगरे येथून जवळ आहेत.
च्यांग राई : उत्तर सीमेवरील एक महत्वाचे शहर. लाओ, ब्राह्मी व थाई
संस्कृतीचा मिलाफ या प्रदेशात पाहावयास मिळतो. दूरवर पसरलेली भात शेती व
क्षितिजावरच्या डोंगररांगा यामुळे हा प्रदेश अतिशय नयनरम्य आहे. आजूबाजूस
असणारी खेडीदेखील स्वयंपूर्ण व समृद्ध आहेत.
ब्लॅक हाऊस
च्यांग सान - मेकाँग च्या किनाऱ्यावर वसलेले लाओस सीमेवरील हे छोटेसे प्राचीन नगर. काही भग्न स्तूप व तटबंदीचे अवशेष आजही पाहावयास मिळतात.
में साई - हे सयाम चे उत्तरेकडील टोक. ब्रह्मदेशाच्या सीमेवरील हे महत्वाचे
व्यापारी केंद्र. आयात-निर्यात उद्योगामुळे बरीच भरभराट झालेली येथे दिसून
येते. तसेच सीमावर्ती नगरांचे तस्करी, गुन्हेगारी, घुसखोरी इत्यादी रोगही
इथे आहेतच. परंतु निसर्गाचे वरदान असल्याने अतिशय नितांत सुंदर असा हा
प्रदेश आहे.
पुढील भागात 'सुवर्ण त्रिकोण' व लाओस भेट
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.