Friday, October 23, 2020

बाल्कन युरोप - क्रोएशिया

 

युरोपातली टिपीकल/ऐतिहासिक शहरं बरीच बघून झाली म्हणून यावेळी स्प्रिंगमध्ये थोड्या वेगळ्या ठिकाणी जायचं ठरवलेलं. एका मित्राच्या फेसबूकवर त्याच्या क्रोएशियाच्या ट्रीपचे फोटो बघितले होते म्हणून क्रोएशियाबद्दल (विशेषतः डालमेशिया भागाबद्दल) माहिती गोळा करू लागलो. काही फोटो बघताच आणि थोडी माहिती घेउन लगेच तिकडं जायचं फ्लाइट टिकीट बूक करून टाकलं. क्रोएशियाबद्दल माहिती घेतानाच अचानक माँटेनेग्रो या देशातील काही ठिकाणंपण कळाली. खरंतर तोपर्यंत माँटेनेग्रो नावाचा देशपण अस्तित्वात आहे हेच माहिती नव्हतं. पण कोटोर, माँटेनेग्रोचे फोटो/वर्णन वाचलं आणि तिकडंपण जायचं ठरवलं. प्लॅन अशाप्रकारे केला की झदार, क्रोएशियाला जायचे आणि परत येताना पोडगोरिचा, माँटेनेग्रोहून परत यायचं.
हे दोन्ही देश अमर्याद निसर्गसौंदर्यानं नटलेले आहेत. क्रोएशियामधे (स्थानिक भाषेत हर्वात्स्का(Hrvatska)) तसं बघितलं तर पर्यटन हाच सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय आहे. माँटेनेग्रो हा युरोपतला सगळ्यात तरूण देश, २००६ साली स्वतंत्र झालेला. या दोन्ही देशांना अतिशय सुंदर अ‍ॅड्रियाटिक समुद्रकिनारा लाभला आहे.

आम्ही ब्रसेल्सहून झदारच्या छोट्याश्या विमानतळावर उतरलो. विमानतळाहून हॉटेलकडं जाताना जणूकाही गोव्यात असल्याचा फील येत होता. झदारच्या आजूबाजूला पाहण्यासारखं बरंच आहे पण आमच्या प्लॅनप्रमाणं आमच्याकडं तिथं फक्त एकच संध्याकाळ होती. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून प्लिटवित्से नॅशनल पार्कला जायचं होतं.

झदार - हे जवळजवळ ३००० वर्ष जुनं शहर. बराच काळ शहरावर रोमन्स आणि व्हेनेशियन्सनी राज्य केलं. एकेकाळी हे डालमेशियामधलं सगळ्यात श्रीमंत शहर होतं.

सेंट डोनॅटस चर्च आणि रोमन फोरमचे अवशेष-

समुद्रकिनारा -

इथं समुद्राकाठी 'सी ऑर्गन' नावाचा अद्भूत प्रकार आहे. समुद्राकाठी संगमरवरी फरशीच्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांचा आत पाइप्स/ट्यूब्ज बसवल्यात. या ट्यूब्ज पायर्‍यांच्या पृष्ठभागावर उघडतात. या ट्यूब्जमधून समुद्राच्या लाटांमुळे आवाज येतो (एखाद्या वाद्द्यातून आल्यासारखा). तिथंच 'सन सॅल्यूटेशन' नावाचे सौर ऊर्जेवर चालणारे लाइट्स आहेत. आम्ही गेलो त्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यानं खूपच थोडे लाइटस लागले होते.

डालमेशियातल्या इतर शहरांप्रमाणे जुनं झदारपण मोठ्या भिंतीनं वेढलेलं आहे. या सगळ्या शहरांनी शत्रूच्या (मुख्यतः टर्की ओट्टोमान) हल्ल्यापासून बचावासाठी सभोवती मोठाल्या भिंती उभ्या केल्या होत्या. या भिंती अजूनही शाबूत आहेत.

दुसर्‍या दिवशी जॉनी टॅक्सीतून आम्ही प्लिटवित्से नॅशनल पार्कला गेलो. जाताना जॉनी सर्बियन युद्धाबद्दल माहिती देत होता. त्याचे वडील युगोस्लाव सैन्यातून लढले होते. जाताना वाटेत काही घरं लागली जी सर्बियाबरोबरच्या युध्दात उध्वस्त झाली होती. नशिबानं सर्बियन फौजांनी प्लिटवित्स नॅशनल पार्कचे नुकसान केले नव्हते नाहितर जग एका अतिशय सुंदर निसर्गसौंदर्याला मुकलं असतं. प्लिटवित्से नॅशनल पार्क तिथल्या तळ्यांसाठी आणि धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. एकूण १६ तळी एकमेकांशी जोडली गेलीत. ही तळी टॅव्हर्टाइनपासून बनलेल्या बांधांनी वेगळी झालीत. या तळ्यांमधील पाण्याचा रंग हे इथलं खास वैशिष्ठय. शिवाय प्रदूषण जवळ्जवळ नसल्यानं पाणी एकदम पारदर्शक. बर्‍याच ठिकाणी तळ स्पष्ट दिसतो. पार्कमधे फिरण्यासाठी सगळीकडे लाकडी किंवा नैसर्गिक वॉकवेज आहेत. व्यवस्थित आखून दिलेल्या बर्‍याच ट्रेल्स आहेत, आपण त्यापैकी आपल्याला पाहिजे ते रूट्स आपण घेउ शकतो. आम्ही अप्पर लेक्स आणि लोअर लेक्स दोन्ही थोडक्यात कव्हर (४-६ तासात) होतिल असे २ रूटस केले. या नॅशनल पार्कचे काही फोटो -

हा तिथला सगळ्यात मोठा धबधबा.

हे सगळे पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळजवळ ८ तास लागले. एकूण ७-८ किलोमिटर्स चालणं झालं असेल. मुलींनीही पार्कमध्ये फिरणं चांगलंच एंजॉय केलं. इथून आम्ही मुक्कामासाठी स्प्लिटला (क्रोएशियातले दुसर्‍या क्रमांकाचे शहर) गेलो.

 

स्प्लिट हे क्रोएशियामधलं राजधानी झाग्रेबनंतरचं दुसर्‍या क्रमांकाचं मोठं शहर. हेही साधारण २००० वर्षं जुनं शहर. एक्कावन्नावा रोमन सम्राट डायोक्लेशियनच्या राजप्रासादाच्याभोवती वसलेले. डायोक्लेशियन मुळचा स्प्लिटजवळच्या सलोना गावातला. रोमन सैन्यात सैनिक म्हणून भरती झालेला डायोक्लेशियन आपल्या कर्तुत्वानं सम्राट पदापर्यंत पोहोचला. त्याला निवृत्तीनंतर आपल्या मूळगावाजवळ रहायचं होतं म्हणून त्यानं स्प्लिटमधे 'रेटायरमेंट-होम' जवळच्याच ब्राच बेटांवरच्या पांढर्‍या दगडांनी बांधून घेतलं, जे एखाद्या किल्यापेक्षा कमी नाही. डायोक्लेशियन हा स्वतःहून निवृत्त होणारा पहिला रोमन सम्राट. त्याच्या मृत्युनंतर मात्र बरीच वर्षं हा राजप्रासाद रिकामाच होता. नंतर आजूबाजूच्या परीसरातील लोकांनी शत्रूपासून बचाव सोपा जावा म्हणून नंतर राजप्रासादातच रहायला सुरुवात केली. अजूनही लोक इथे रहातात. आतमध्ये अनेक दुकानं/रेस्तराँ आहेत. आम्ही तिथली 'स्प्लिट १ पेनी टूर' घेतली. १ युरो (किंवा ७ कुना - क्रोएशियाची करन्सी) देउन तिकीट घ्यायचे आणि जर टूर आवडली तर गाइडला टीप द्यायची. आम्हाला बुडापेस्टमधे अशा गाइडचा चांगला अनुभव होता म्हणून इथं पण ही टूर घेतली. इथंही आमचा अपेक्षाभंग नाही झाला. हे टूर गाइड स्थानिक असतात शिवाय प्रशिक्षित असतात .

डायोक्लिशियननं इथं लावण्यासाठी इजिप्तमधून काही स्फिंक्स आणले होते त्यातले ३ अजूनही अस्तित्वात आहेत (३५०० वर्षं जुने). ३ पैकी एक आता 'धडविरहित' आहे.

पेरिस्टाइल -

राजप्रासादाच्या बाहेर क्रोएशियाचा हिरो ग्रेगरी (बिशप) ऑफ निनचा एक खूप मोठा पुतळा आहे. याने दहाव्या शतकात पोपला विरोध करून चर्चमधे रोमनऐवजी स्थानिक क्रोयेशियन भाषा वापरायला सुरूवात केली.

राजप्रासाद पाहून झाल्यावर तिथून आम्ही खादाडीच्या शोधात बाहेर पडलो. स्प्लिटमधे २-३ शाकाहारी रेस्तराँ आहेत. त्यातल्याच एकात आम्ही गेलो. भरपेट जेवण करून तिथून मार्यन (Marjan) टेकडीवर गेलो जिथून स्प्लिटचा खूप मस्त नजारा दिसतो. यासाठी टेकडीवर पूर्ण वरपर्यंत जायची गरज नाही पडत. थोडं चढून गेल्यावर एक कॅफे लागतं तिथंच पहिला स्टॉप आहे. तिथूनच स्प्लिटचे आणि समुद्राचे असे मस्त व्हूज दिसतात.

हा राजप्रासादाच्या मागचा समुद्राकडचा भाग. क्रोयेशियावर जेव्हा फ्रेंचांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी हा भाग (प्रोमनेड promenade) सुशोभित आणि विकसित करून घेतला.

तिथून आम्ही जवळच्याच बेनी बीचवर गेलो. इथल्या समुद्रात एकंदरच बाकिच्या समुद्रांप्रमाणे फारशा लाटा दिसल्या नाहित. या बीचवर पण लाटा अशा नव्हत्याच शिवाय हा वाळूचा बीच नाहिये. आणि वर्षातल्या यावेळी पाणी खूपच थंड असतं. तरीपण मुलींनी पाण्यात खेळायची थोडिफार हौस भागवून घेतलीच. बीच खूपच सुंदर आहे. पाणि एकदम नितळ ज्यातून तळसुध्दा दिसतो.

तिथला सुर्यास्त -

दुसर्‍या दिवशी ह्वार (Hvar) बेटांवर जायचं होतं. हे स्प्लिटमधलं सगळ्यात मोठं बेट आहे. जास्तकरून पार्टीप्लेस म्हणून प्रसिध्द आहे. शिवाय इथे लव्हेंडरची शेतं आहेत. स्प्लिटहून सकाळी ८:३० ची फेरी पकडली जेणेकरून तिकडून परत यायला ५:३० ची फेरी पकडता येइल. प्री-सीजनमुळं फेरींची फ्रिक्वेन्सी फार जास्त नव्हती.
या फेरीज म्हणजे मोठया बोटी आहेत ज्यातून कार्सपण नेता येतात. कॅटरमरान्सपण आहेत ज्या फक्त प्रवाशांना नेतात आणि तुलनेनं जलद जातात. ही फेरी बेटावरील स्टारी ग्राडला घेउन जाती. तिथून ह्वारला जायला बसेस असतात.

ह्वार मधलं चर्च

इथे थोडी चौकशी केली तर क़ळालं की लव्हेंडरचा फुलोरा जून मधे असतो त्यामुळं ती शेतं बघायला जाण्यात काही पॉइंट नव्हता. एक टूरिस्ट कंपनी आम्हाला पुढच्या बेटांवर (व्हिस Vis) ब्ल्यू केव्हज आणि ग्रीन केव्हज बघायला स्पीडबोटीनं घेउन जायला तयार होति. या गुहा म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहेत. गुहांमधे एका अतिशय लहान जागेतून सूर्यप्रकाश आत येतो आणि आतमधे निळ्या आणि हिरव्या रंगाचा खेळ दाखवतो. ब्ल्यू केव्हज खूप जास्त सुंदर आहेत पण हवामान अनुकुल नसल्यानं तिथं आतमधे जाता येणार नव्हतं. पण आम्ही ग्रीन केव्हज मधे जाउन आलो.

बोटीतून ह्वार बेटाचा किनारा -

जाताना हे दीपगृह लागलं जे अ‍ॅड्रियाटिकमधलं सगळ्यात मोठं दीपगृह आहे

ग्रीन केव्हज -

तिथलाच एक सेक्लूडेड छोटासा बीच- कधीकाळी (२०० वर्षापूर्वी ही पण एखादी गुहा होति पण छत आणि एका बाजूची भिंत पडल्यानं तिथं मस्त बीच तयार झालाय.)

तिथून आम्ही एका दुसर्‍या बीचवर गेलो. आमच्याशिवाय तिथं कोणिही नव्हतं. इथं एक रेस्तराँशिवाय दुसरं काहिही नाही. पण हे रेस्तराँ इतकं प्रसिध्द आहे की ते जेव्हा सीझनमधे उघडं असतं तेव्हा तिथं अपॉइंटमेंट खूप आधी घ्यावी लागती.

परतताना दिसणारं ह्वार आणि तिथला किल्ला -

किल्ल्यावर जाण्यासाठी फारसा वेळ नव्हता कारण परतीची फेरी पकडायची होति. जेव्हडं शक्य तेव्हडं वर जाउन ह्वारचा नजारा टिपावा म्हणून आम्ही काहीवेळ चढून गेलो. तिथून दिसणारं ह्वार आणि आजूबाजूची बेटं -

तिथून परत स्टारी ग्राडला जाउन परतीची फेरी पकडली. परततानाचा सूर्यास्त आणि स्प्लिटचं दृष्य -

दुसर्‍या दिवशी सकाळी १० च्या बसनं दुब्रॉव्निककडं (Dubrovnik) ज्याला 'पर्ल ऑफ अ‍ॅड्रियाटिक' म्हणतात तिकडे रवाना झालो.

दुब्रॉव्निक हे सातव्या शतकात वसवलेलं आणि अ‍ॅड्रियाटिकमधले महत्त्वाचे आणि पर्यटकांचे, विशेषतः क्रूझ पर्यटकांचे आवडते ठिकाण. हे शहरसुध्दा युनेस्कोनं 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून जाहिर केलंय. क्रोएशियातील इतर शहरांप्रमाणेच हे पण भिंतींनी बंदिस्त केलेलं शहर आहे. सामुद्रिक व्यापारामुळं या शहराची १५व्या आणि १६व्या शतकात चांगलीच भरभराट झालेली. बर्‍याच आक्रमणांनंतरही या शहरानं स्वतःची स्वायत्तता बराच काळ टिकवून ठेवली होती. युगोस्लाव युध्दात या शहरावर बरेच बाँबिंग झालं पण आता त्या युध्दाच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत.

दालमेशियाचा हा भाग आणि क्रोएशियाचा भाग (स्प्लिटकडचा) सलग नाहिये. मधे साधारण १५ किमीचा 'बोस्निया आणि हर्झगोविना' या देशाचा भाग आहे. त्यामुळे क्रोएशियाच्या नागरिकांनाही दुब्रॉव्निकला जाताना पासपोर्ट किंवा क्रोएशियाचे ओळखपत्र घेउन जावे लागते.

शहराजवळच्या डोंगरावर जाण्यासाठी केबल कारची सोय आहे. तिथून शहराचे आणि अ‍ॅड्रियाटिक समुद्राचे फारच सुंदर नजारे दिसतात.

दुब्रॉव्निक शहर आणि जवळचेच लोकरम (Lockrum) बेट -

जुनं बंदर -

जुन्या शहराभोवतालची भिंत

जुन्या शहरात अजूनही लोक राहतात. आत कुठलीही वाहनं येउ शकत नाहित. आतमधेच बरेच रेस्तराँ आणी दुकानं आहेत शिवाय इथल्या घरांमधून (अपार्टमेंट्स) रहायची सोय होते. आम्ही जुन्या शहरातल्याच एका घरात राहिले होतो.

जवळच्याच सेंट लॉरेन्स किल्ल्यावरून दिसणारं जुनं शहर आणि भिंत -

पिला गेटमधून आत गेलं की लगेचच हा ऑनोफ्रिओ (Onofrio) कारंज आहे. याच्या जवळच पर्यटक माहिती केंद्र आहे.

१०० कुना टिकीट काढून आपण शहराच्या भिंतीवरून फिरून येउ शकतो. तिथं ऑडिओ गाइडची सोय होती पण यावर्षीपासूनच ती सोय बंद झाली आहे. पाहिजे असेल तर खाजगी गाईड घेउन जाता येउ शकते.

भिंतीवरून दिसणारा सेंट लॉरेन्स किल्ला -

भिंतीवरून दिसणारी दृष्यं -

मिंचेता (Minceta) टॉवर(भिंतीचाच एक भाग) -

तिथून दिसणारं शहर -

भिंतीला असलेल्या एका खिडकीतून दिसणारं शहर -

इथलं समुद्राचं पाणी किती नितळ आहे हे इथं दिसून येतं -

शहरातलं भिंतींच्या आतमधे असलेलं एक चर्च -

इथंही आम्हाला एक शुध्द शाकाहारी रेस्तराँ (निष्ता Nishta) मिळाले, जिथे बाकिच्या पदार्थांबरोबरच पंजाबी थाळी मिळत होती जी चक्क बर्‍यापैकी चांगली होती. रेस्तराँचे मालक आणि मालकिण दोघं स्वतः शाकाहारी आहेत आणि भारतात बर्‍याचदा येउन गेलेत.

दोन दिवस दुब्रॉव्निकमधे काढून आम्ही तिसर्‍या दिवशी सकाळी कोटोर, माँटेनेग्रोला निघालो. आमच्या कोटोरच्या हॉटेलनं दुब्रॉव्निकहून पिक-अपची सोय केली होती. जाताना एका ठिकाणाहून दिसणारं दुब्रॉव्निकचं दॄष्य -

 

दुब्रॉवनिकहून कोटोर,माँटेनेग्रो साधारण ९० किमीवर आहे. या सगळ्या प्रवासात अ‍ॅड्रियाटिक समुद्र एका बाजूने साथ देतच होता. माँटेनेग्रो हा युरोपातला सगळ्यात तरूण देश, २००६ साली सर्बियामधून स्वतंत्र झालेला. सीमेवर कारमध्ये बसूनच इमिग्रेशन झाले. आमच्याकडे माँटेनेग्रोमधे तसा एकच दिवस होता त्यात नेमका त्याच दिवशी पूर्णवेळ पाउस होता. आम्हाला दुब्रॉव्निकहून पिक्-अप साठी जो आला होता त्यालाच माँटेनेग्रोची एक लहानशी टूर (कोटोरच्या आजूबाजूला) करून आणायला सांगितले. तोही लगेच तयार झाला.

सगळ्यात महत्त्वाचे आणि पहिलेच आकर्षण होते कोटोर-बे मधले मानव-निर्मित बेट. मुद्दाम बुडवलेली जहाजं, बोटी आणि मोठी मोठी दगडं टाकून हे बेट बनवलंय. याच बेटावर 'अवर लेडी ऑफ रॉक्स' हे चर्च आहे. आख्यायिका आहे की या बेटाजवळच (सध्याच्या बेटाच्या जागी पूर्वी फक्त एक मोठा खडक होता) आश्चर्यकारकरीत्या मेरीचं एक चित्र सापडलं होतं. मेरीनं स्वतःच आपल्यासाठी जागा शोधली असा विश्वास ठेवून लोकांनी तिथंच तिचं चर्च उभारायचं ठरवलं आणि हे बेट निर्माण केलं. आतादेखील दर वर्षी जवळच्या पेरीस्त गावातले लोक ऑगस्टमधल्या एका ठरलेल्या दिवशी इथं येतात आणि बेटाच्या आजूबाजूनं अजून दगडं टाकतात जेणेकरून बेट तसंच रहावं. पेरीस्त गावातून या बेटावर जायला एकदम रीझनेबल दरात बोटी आहेत. १०-१५ मिनिटात बेटावर पोहोचता येतं. तिथले काही फोटो.

पेरीस्त गाव -

बेट -

चर्च - या चर्चमधे जगातल्या कुठल्याही चर्चपेक्षा जास्त मेरीच्या जीवनातील प्रसंग कोरलेल्या आणि भक्तांनी दान केलेल्या चांदीच्या पट्ट्या (सिल्व्हर प्लेट्स) आहेत.

या बेटाच्या जवळच अजून एक बेट आहे. एप्रिलमध्ये हे बेट पर्यटकांसाठी अजून बंद होते.

तिथून आम्ही बुड्वा आणि सेटिन्येकडे निघालो. तोवर बुड्वामधे पाउस चालू झाला होता त्यामुळं कुठं फारसं थांबता नाही आलं आणि फोटोही नाही काढता आले. तिथून आम्ही लगेचच चेटिन्येला गेलो. चेटिन्ये ही एकेकाळची (राजा निकोलाच्या (निकोलस) वेळी) माँटेनेग्रोची राजधानी. शरहातून वाहणार्‍या चेटिना नदीवरून चेटिन्ये हे नाव दिलंय. इथे एक छोटा राजवाडा अजूनही आहे. इथे एक सतराव्या शतकात बांधलेली ख्रिस्तीयन मोनास्ट्री आहे. ही मोनास्ट्री त्यावेळी सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र होती.

मोनास्ट्रीच्या आत फोटोग्राफीला परवानगी नाही.

तिथल्याच एका चर्चचे अवशेष -

तिथून परत येताना दिसणारं कोटोर -

परत येउपर्यंत अंधार झाला होता त्यात पाउस पडत होता आणि मुली कंटाळल्या होत्या त्यामुळं कोटोरमधलं काही विशेष बघता नाही आलं. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर निघून पोडगोरिचाहून परतीचं विमान पकडायचं होतं. जाता जाता परत एकदा स्वेती स्टेफान वरूनच जावं लागत होतं.

स्वेती स्टेफान - हे एक अति-श्रीमंतांचं (टॉम क्रूझ, पमेला अँडरसन, इतर हॉलिवूड स्टार्स, बर्‍याच देशांचे राजे, इ.) हॉलिडे डेस्टिनेशन आहे. दिवसाचं हॉटेलचं भाडं ३०० युरो ते २००० युरोपर्यंत जातं असं कळालं. आयुष्यात कधीतरी एक रात्र तरी इथं काढू अशी स्वप्नं बघत आम्ही तिथून ब्रसेल्सला परत आलो.

समाप्त.

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...