Friday, October 23, 2020

न्यूझीलंड

 प्रीति छत्रे

 माओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा? नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बारीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते.
न्यूझीलंडला जायचं ठरवलं, ते स्वतःच सगळं प्लॅनिंग करायचं, असं योजूनच. त्याप्रमाणे व्हीजासकट सगळी पूर्वतयारी केली. बुकिंग्ज झाली. न्यूझीलंडचा नकाशा धुंडाळताना बर्‍याच ठिकाणांची अ-इंग्रजी वाटणारी नावं दिसत होती- व्हांगारेई, वायटोमो, लेक वाकाटिपु, वगैरे. ती बहुदा माओरी भाषेतली असावीत अशी मनोमन नोंद झाली; पण त्यावर अधिक विचार केला गेला नाही. तयारीच्या तीन-चार महिन्यांदरम्यान इंटरनेटवरचे विविध फोरम्स, हाती लागतील ते ब्लॉग्ज, व्लॉग्ज, इतर माहिती धुंडाळणे, त्या देशाबद्दलची स्वतःच्या परिने एक पूर्वपीठिका तयार करणे, हे सुरू होतंच. स्वबळावर निवडणूक लढवतात तसं प्रथमच स्वबळावर परदेशी भटकायला निघालो होतो. न्यूझीलंड हा देश फिरायला अत्यंत सुरक्षित आहे असंच सगळीकडे वाचायला मिळत होतं; त्यामुळे मनोमन एक दिलासाही मिळत होता. एकीकडे स्वतःला समजावत होतो- परदेशात फिरतानाची किमान सावधगिरी इथेही बाळगावी लागेलच; पण निदान भाषेचा तरी प्रश्न येणार नाही...
जायची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपली. आणि एक दिवस अचानक एक ब्लॉग दिसला, जो न्यूझीलंडमध्ये पोचल्या पोचल्या आवश्यक असणार्‍या ‘आईसब्रेकिंग’बद्दल बोलत होता. ‘न्यूझीलंडमध्ये जाण्यापूर्वी पर्यटकांनी माओरी भाषेतले काही शब्द आत्मसात करावेत’ असं त्यात सुचवलेलं होतं; आणि पुढे त्या भाषेतले दैनंदिन वापरातले काही शब्द, वाक्यं, त्यांचे अर्थ, असं सगळं दिलेलं होतं. मी एकदा नुसती त्यावरून झरझर नजर फिरवली. विरंगुळा म्हणून ते वाचायला इतर वेळी मजा आली असती; पण त्या ब्लॉगचा एकंदर सूर पाहता असं वाटायला लागलं, की न्यूझीलंडमध्ये माओरी भाषाच अधिक वापरतात की काय! म्हणजे तिथे माओरी लोकसंख्याच अधिक आहे की काय! म्हणजे इंग्रजीचा वापर फारसा नाहीच की काय!... आणि प्रथमच जरा पाल चुकचुकली.
आमच्या न्यूझीलंड प्रवासाच्या आधीच्या पंधरवड्यात त्यांची क्रिकेट टीम भारत दौर्‍यावर आली होती. मी हा ब्लॉग पाहिला त्याच दिवशी एक वन-डे मॅच होती. मॅच संपल्यावर रॉस टेलरचाच एक छोटा इंटरव्ह्यू दाखवला. आता तोच एक आधार उरला होता अशा थाटात मी टीव्हीचा आवाज वाढवून अगदी जिवाचे कान करून त्याचं बोलणं ऐकलं. तो काय बोलतोय यापेक्षा ते कसं बोलतोय यात मला रस होता. भाषेचे, विविध उच्चारांचे सूर, ढब, प्रमाण भाषेहून वेगळ्या दिसणार्‍या त्यातल्या छटा, हे सगळं मी तेवढ्या वेळात शोधायचा प्रयत्न केला. त्यात फारसा अर्थ नव्हता हे मलाही कळत होतं, पण याला ‘प्रवासाचा ज्वर चढणे’ असं म्हणू शकतो.
दरम्यान, थोडंफार फॉरेन एक्सचेंज वगैरे खरेदी झाली होती. सहज न्यूझीलंड डॉलरच्या त्या अपरिचित नोटा न्याहाळत होते. तर त्यावर ‘द रिझर्व बँक ऑफ न्यूझीलंड’ या इंग्रजी शब्दांखाली ‘TE PUTEA MATUA’ असे शब्द दिसले. (‘गूगल ट्रान्सलेट’कडून कळलं, की ती माओरी भाषा होती; त्याचा शब्दशः अर्थ ‘मुख्य पिशवी’ असा होता!) ते पाहून माझी खात्रीच पटली, की त्यांच्या चलनी नोटांवरही माओरी भाषा नांदते आहे त्याअर्थी तो ब्लॉग म्हणत होता ते बरोबरच होतं; न्यूझीलंडला जायचं तर माओरींशी आणि माओरीशी तोंडओळख हवीच. पण आता तेवढा वेळ हाताशी नव्हता. शेवटी अज्ञानातल्या सुखावर भिस्त ठेवून प्रवासाची सुरूवात करायची ठरवली.

मुंबई-हाँगकाँग-ऑकलंड असा लांऽबचा प्रवास... ऑकलंडच्या विमानात माझ्या शेजारच्या सीटवर एक भारतीय बाईच होती. ती गेली १५ वर्षं ऑकलंडमध्ये राहते आहे. मूळची पंजाबी, मराठी माणसाशी लग्न केलेली; आयतीच माझ्या हातात सापडली. प्रवासभर जेव्हा जमेल तेव्हा मी तिला नाना प्रश्न विचारून भंडावून सोडलं...
आमचं विमान ऑकलंडला उतरायला आलं होतं. खिडकीतून बाहेर पाहिलं तर नुकतंच उजाडत होतं; मात्र बाहेर पांढर्‍याधोप, दाऽट ढगांविना बाकी काहीही दिसत नव्हतं. विमानाची उंची कमी-कमी झाली तरी ढग मात्र हटायला तयार नव्हते. शेजारची बाई माझ्याकडे वळून म्हणाली - “न्यूझीलंडचं दुसरं नाव ‘एओटिआरोआ’, इट्स अ माओरी नेम; त्याचा अर्थ, द लँड ऑफ लाँग व्हाइट क्लाऊड”... परत एकदा माओरी आणि त्यांची भाषा पुढ्यात ठाकले होते. पण आता सलामी झडायला आलेली होती; माओरीचा अभ्यास करण्याची वेळ निघून गेली होती.
ऑकलंड एअरपोर्टवरचे वेळखाऊ सोपस्कार पार पाडले; एअरपोर्टवरच्याच खादाडीच्या एका छोट्याशा दुकानातून सँडविच आणि फळं घेतली आणि आम्ही निघालो. आता आपण आणि आपला ट्रॅव्हल-प्लॅन, बस्स, असा विचार करत एअरपोर्टच्या बाहेर पडलो. आता पुढचे १५-२० दिवस भारतीय इंग्रजीच्या साथीने किल्ला लढवला की झालं! दरम्यान माओरीशी सामना करायची वेळ आलीच, तर करायचे दोन हात...
----------
Cut to ‘Paihia, Bay of Islands’, न्यूझीलंडच्या पार उत्तरेकडचं, दक्षिण पॅसिफिक समुद्राकाठचं एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. (स्थानिक उच्चार : पाह्हीऽऽया)

maori-1.jpg

आम्ही घर सोडून छत्तीस-एक तास उलटले होते; त्यातले १८ तास तर विमानातच गेले होते; त्या दरम्यान, विमानातली शेजारची बाई म्हणाली तसं ‘टाईम की पूरी खिचडी’ झालेली होती; ३-४ तासांच्या झोपेत ती ‘खिचडी’ थोडीफार पचवून आम्ही ‘पाहिया जरा पाहूया’ म्हणून बाहेर पडलो होतो.
शांत ठिकाण; मुंबईत ऐन हिवाळ्यात असतो तितपत गारठा; नोव्हेंबर महिना म्हणजे तिथला हिवाळा संपून वसंत ऋतूची आणि पर्यटन मोसमाची नुकती चाहूल लागलेली असते. छोटंसं गाव, एकच मुख्य रस्ता, रस्त्यावर तुरळक माणसं; पर्यटकांना खुणावणारी मोजकी दुकानं; एकंदर सगळा निवांत मामला होता. रस्त्याच्या एका बाजूला समांतर समुद्रकिनारा, विरुद्ध बाजूला सुंदर घरं, बागा; मध्येच एखादी शाळा नाहीतर चर्च; मग दुकानं... या सगळ्यात आम्हाला जे हवं होतं ते दिसलं - तिथलं व्हिजिटर सेंटर.

maori-2.jpg

न्यूझीलंडमध्ये देशभरात सर्व प्रमुख पर्यटनस्थळांवर I-Site Visitor Centres दिसतात. पर्यटकांसाठीची ही त्यांची अधिकृत सुविधा आहे. प्रत्येक ठिकाणच्या सेंटरमध्ये स्थानिक मंडळी काम करतात. तिथे जाऊन ‘इथे पब्लिक टॉयलेट्स कुठे आहेत?’ किंवा ‘चांगली फळं कुठे मिळतील, हो?’ अशी कुठलीतरी चौकशी करा, नाहीतर ‘दोन दिवस भटकायचं आहे, बुकिंग्ज हवी आहेत.’ किंवा ‘रात्री दहाचं विमान आहे; एअरपोर्ट ड्रॉप हवा आहे’ असं सांगा; तिथे तुम्हाला हमखास मदत मिळते. ऑकलंड एअरपोर्टवरच आम्हाला त्याची प्रचिती आलेली होती. एअरपोर्टवर आम्ही जिथे सँडविच आणि फळं घेतली त्याच्या शेजारीच आय-साईटचं एक छोटंसं सेंटर होतं. ऑकलंड सिटीत जायला बस बरी पडेल की टॅक्सी, बसचं तिकीट कुठे मिळेल, ऑनलाईन तिकीट इथेच मिळेल का, सिटीतून पाहियाला जायची बस कुठे पकडू, अशा प्रश्नांच्या आधारे घरंगळत घरंगळत, २ तिकिटं आणि २-४ छापिल नकाशे हातात घेऊन, आधी एका बसनं ऑकलंड सिटी आणि तिथून दुसर्‍या बसनं पाहिया, असा आमच्या ‘आईसब्रेकिंग’चा पहिला टप्पा पार पडलेला होता. चौकशीसाठी पहिल्या काऊंटरला जावं आणि तिथेच आख्खं काम उरकून बाहेर पडावं याची आपल्याला मुळी वट्टात सवयच नसते. त्या पार्श्वभूमीवर हे म्हणजे अतीच झालं. त्यामुळे आता पाहियातही आमचे पाय आय-साईटकडे वळणे साहजिक होतं.
तिथे गेल्या गेल्या “हिलोऽ गाईऽज...”नं आमचं स्वागत झालं. (हिलो - hello चा किवी उच्चार) पुढचे ३ आठवडे न्यूझीलंडमध्ये आम्ही ‘गाईज’च होतो. चाळीशी-पन्नाशीतल्या जोडप्याला असं ‘गाईज’ म्हणवून घेताना काय गोऽड वाटतं म्हणून सांगू! खोटं कशाला बोलू! (पुढे क्वीन्सटाऊनमध्ये तर एकानं ‘आर यू गाईज मॅरीड?’ असाही प्रश्न टाकला. त्यावर काय प्रतिक्रिया द्यायला हवी होती हे अजूनही आमचं ठरत नाहीये!) तर, काऊंटरपलिकडच्या त्या माणसाला उत्तरादाखल आम्ही आमच्या स्वकष्टार्जित ट्रॅव्हल प्लॅनमध्ये पाहियाच्या रकान्यात जे जे टाकलं होतं, त्याचा पाढा वाचून दाखवला. त्यातली प्रत्येक गोष्ट त्याच्या दृष्टीने एकेका फोनकॉलच्या अंतरावर होती. त्यानं आमची नावं विचारून घेतली, आम्ही कुठून आलोय हे विचारून घेतलं; आणि मग झाला सुरू... होल इन द रॉक क्रूझला जायचंय, हा नंबर डायल कर; पॅरासेलिंग करायचंय, त्याला फोन कर... “हिलो, धिस इज ख्रिस फ्रम आय-साइट... I have two persons फ्रम India, they wish to... No, they are a couple... येह, शुअ, थँक्स” करत ५-७ मिनिटांत त्यानं पुढल्या दोन दिवसांतला आमचा कार्यक्रम आम्हाला हवा होता तसा मार्गी लावून दिला.
आमच्या हॉटेलपासून दोन-अडीच किमी अंतरावर तिथलं सुप्रसिद्ध ‘Waitangi Treaty Grounds’ हे ठिकाण होतं. तिथे फिरत फिरत जायचं असं आम्ही आधीच ठरवलेलं होतं. त्यामुळे ख्रिसनं त्याबद्दल विचारल्यावर आम्ही त्याला ‘चालतच जाणार, गाडी नको’ वगैरे सांगून टाकलं. त्यावर त्यानं ‘एक सुचवू का...’ म्हणत त्या ठिकाणी होणार्‍या माओरी शोबद्दल, नंतरच्या पारंपरिक माओरी डिनरबद्दल सांगितलं. ‘हा शो सध्या फक्त सोमवारी आणि गुरूवारी असतो, उद्या सोमवार आहे, तुम्हाला हवं तर मी बुकिंग करून देऊ शकतो,’ म्हणाला. आमच्या प्लॅनमध्ये पुढे ‘रोटोरुआ’च्या (Rotorua) रकान्यात या दोन्ही गोष्टी होत्या; पाहियातून आम्ही रोटोरुआलाच जाणार होतो. तरी, आम्ही क्षणभर विचार केला आणि त्याला ‘हो’ म्हणून टाकलं. प्लॅनिंग करताना, असे रकाने भरतानाच आमच्या डोक्यात होतं, की हे केवळ एक जनरल माहिती म्हणून सोबत ठेवायचं; ऐनवेळी यात बदल करावेसे वाटले तर करायचे. आखीव सहलकार्यक्रमाचं जोखड मानेवर नको, थोडी स्पॉन्टेनिटी हवी, म्हणून तर सगळी स्वतःची स्वतः आखणी केलेली; ती इच्छा अशी पहिल्याच दिवशी पुरी होणार असेल तर कोण ती संधी सोडेल! (रोटोरुआच्या रकान्यातला तो टाइम-स्लॉट रिकामा झाल्यामुळे पुढे तिथे गेल्यावर आम्हाला ध्यानीमनी नसताना एक निवांत आणि भारी जंगल-वॉक करता आला.)

अशा तर्‍हेनं पंधरा-एक मिनिटांनी ‘I-site Visitor Centre’ला मनोमन ‘Like’ करत, ख्रिसच्या ‘Enjoy your stay in Paihia, Guys...’चं मोरपीस अंगावर फिरवत आम्ही तिथून बाहेर पडलो. ख्रिसनं अशी निरोपाची भाषा केली असली तरी पुढच्या दोन दिवसांत मी काही ना काही कारणं काढून तिथे जाणार होते; तिथल्या लोकांना हे ना ते प्रश्न, माहिती विचारून त्यांच्या मदत करण्याच्या क्षमतेची एका परिनं परिक्षाच घेणार होते; आणि पाहियाचा प्रत्यक्ष निरोप घेतेवेळी ‘Like I-site’वरून ‘बदाम I-site’वर शिफ्ट होणार होते.
दुसरा आख्खा दिवस मोकळाच होता. त्यामुळे सकाळी आरामात आवरून आम्ही समुद्राच्या कडेकडेनं रमतगमत चालत, फोटो काढत, दक्षिण गोलार्धातलं सुखद ऊन खात, पॅसिफिक वार्‍याचे घोट घेत आणि एक डोळा फोनमधल्या गूगल-मॅप्सवर ठेवत वायटँगी ट्रीटी ग्राऊंड्सचा रस्ता पकडला. (संध्याकाळ होईतो या ‘सुखद’ उन्हाचा असा काही तडाखा बसला, की दुसर्‍या दिवशी सकाळी आधी ‘सनस्क्रीन लोशन घ्यायचं आहे, Is there any super-market around?’ - असा प्रश्न घेऊन मला आय-साइटमध्ये शिरायचं निमित्त मिळालं.)

maori-3.jpg

वाटेत काही अंतरापर्यंत छोट्या-छोट्या ईटरीज, आईसक्रीम शॉप्स, सूवनीर शॉप्स दिसत राहिली. एका ईटरीच्या काऊंटरपलिकडच्या दोघांकडे माझं सहज लक्ष गेलं. तर त्यांची चेहरेपट्टी साधारण भारतीय, पंजाबी वाटली. मग उगीचच त्यांच्या मागच्या मोठ्या मेनू-डिस्प्लेकडे बघितलं गेलं; जणू तिथे मला चना-भटुरा, पुलाव वगैरे शब्दच दिसणार होते. पुढच्या एका ईटरीतही काऊंटरपलिकडच्या दोघांच्या चेहर्‍यांकडे अपेक्षेनं पाहिलं गेलं; रंग भारतीय होता, मात्र चेहरेपट्टी भारतीय नव्हती; पण किवी-युरोपीय गोरी अशीही नव्हती. आणि अचानक माझी ट्यूब पेटली - ते दोघं, एक पुरूष-एक स्त्री, माओरी होते! मग जाणवलं, ऑकलंड-पाहिया बसमध्ये आमच्या पुढच्या सीटवर एक कॉलेजवयीन मुलगा होता, तो माओरीच होता! त्यानं कानांना लावलेले मोठाले हेडफोन्सच लक्षात राहिलेले होते; पण त्याच्या चेहरेपट्टीची नोंद मनोमन घेतली गेली होती. त्याआधी, ऑकलंड स्काय-सिटी टर्मिनलला पाहियाच्या बसचं तिकीट काढलं तिथली क्लार्क मुलगीही अशीच, म्हणजे माओरी, होती! आणखी मागे जाऊन, ऑकलंड एअरपोर्टवर आम्ही सँडविच-फळं घेतली ती विक्रेतीही माओरी होती! न्यूझीलंडचे आदिवासी न्यूझीलंडमध्ये पाय ठेवल्यापासूनच असे अधूनमधून समोर आलेले होते; आणि ते अजिबात आदिवासी वाटलेले नव्हते.

ज्ञानवृद्धीच्या आनंदात पुढचं काही अंतर काटलं. आता जरा चढाचा रस्ता सुरू झाला. दुकानं संपली; वस्ती जरा विरळ झाली; डाव्या हाताला एक लहानसा डोंगरकडा सुरू झाला. उजव्या हाताला समुद्र होताच. चढाचा रस्ता असल्यामुळे रस्ता आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये रेलिंग लावलेलं होतं. आणि रेलिंगवर थोड्या थोड्या अंतरावर त्या प्रदेशात आढळणार्‍या विविध पक्ष्यांची माहिती देणारे छोटे छोटे फलक लावलेले होते. प्रत्येक फलकावर त्या पक्ष्याचा फोटो, एकीकडे इंग्रजी नाव, दुसरीकडे माओरी नाव, इंग्रजी नावाखाली इंग्रजीतून माहिती, माओरी नावाखाली माओरी भाषेतली माहिती लिहिलेली होती. माओरी भाषेची लिपी रोमनच असल्यामुळे आपसूक त्यातल्या शब्दांचा उच्चार करण्याचा प्रयत्न होत होता आणि ते उच्चार भलतेच असल्याचं जाणवत होतं.
रेलिंगच्या कडेकडेने आणखी ५-१० मिनिटं चालल्यावर आम्ही त्या ट्रीटी ग्राऊंड्सच्या परिसरात शिरलो. १९व्या शतकात ब्रिटिश वसाहतवादी आणि स्थानिक माओरी नेते यांच्यातल्या करारावर (Treaty of Waitangi) इथे सह्या झाल्या, असं इतिहास सांगतो.
आम्ही त्या परिसरातले दिशादर्शक फॉलो करत रिसेप्शनपाशी पोहोचलो. तर तिथल्या दाराच्या बाहेर दोन्ही बाजूंना एक तरूण स्त्री आणि एक तरूण पुरूष एकदम रंगीबेरंगी, चित्रविचित्र पोषाख घालून उभे होते; त्यांच्या अंगावरचे कपडे लौकिकार्थाने ‘कमी’ या कॅटेगरीतलेच होते. त्यांच्या हातांत प्रॉप्स होते; फूट-दीड फूट लांबीची दोरी आणि त्याला पुढे बांधलेला गोळा; ते स्वतःच्या चेहर्‍यांसमोर ते प्रॉप्स इंग्रजी आठाच्या आकड्यात फिरवत होते आणि आपांपसांत हळू आवाजात अनाकलनीय भाषेत बोलत होते. त्यांच्या दंडांवर, मांड्यांवर, मानेवर, गालावर नाहीतर कानामागे जागा मिळेल तिथे मोठाले पण कलात्मक टॅटूज होते. त्या मुलीने काळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली; मुलाच्या डोळ्यांभोवती रंगरंगोटी केलेली; त्यांच्या कमरेला, गळ्यांत, हातांत माळा, झिरमिळ्या, वगैरे... ‘हां! याला म्हणतात आदिवासी!’ ही पहिली तत्पर प्रतिक्रिया झाली. त्यांचं तिथे तसं उभं राहण्यामागेही तोच उद्देश असावा; कदाचित पर्यटन व्यवसायाची काही गणितंही असावीत. मला त्यांचं बारकाईने निरिक्षण करत तिथेच थांबण्याचा एक क्षण मोह झाला; पण का कोण जाणे, परग्रहावरचा प्राणी पाहिल्याच्या नजरेनं त्यांना न्याहाळायचं, फोटो काढायचे, हे काही मला बरं वाटेना. त्यामुळे दोघांकडे एकदा नजर टाकून आम्ही पुढे झालो.

ट्रीटी ग्राऊंड्सच्या परिसरात फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय होते. २ तासांचा पास, फक्त म्युझियम, आख्ख्या दिवसाचा पास... आम्ही संध्याकाळच्या शोचं बुकिंग केलेलं असल्यामुळे आम्हाला डे पासचा पर्याय निवडण्याबद्दल सुचवलं गेलं. काऊंटरवरच्या तरूणाने त्याच्या पुढ्यातल्या कॉम्प्युटरवर काहीतरी खाडखुड-खाडखुड केलं आणि आमचे दोन पासेस आम्हाला काढून दिले. त्या पासेसवर आम्ही त्या परिसरात दोन वेळा प्रवेश करू शकणार होतो. तो कॉम्प्युटरवाला मुलगाही अर्थातच माओरी होता, पण शहरी वेषातला. बाहेरच्या दोघांपेक्षा आता तो उगीचच जरा परिचितासारखा वाटायला लागला. पासेस घेऊन आम्ही दर्शवलेल्या मार्गाने काही पावलं गेलो ते थेट ‘Te Kongahu Museum of Waitangi’च्या दारातच.
पाहियाचा रकाना भरताना हे म्युझियम आम्ही विचारात घेतलेलं नव्हतं. पण आता त्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली होती. त्यामुळे त्याला अव्हेरून पुढे जाणे शक्यच नव्हतं. आधुनिक म्युझियम्स इंटरअ‍ॅक्टिव मल्टिमिडिया वगैरेंनी युक्त असतात असं ऐकलं होतं. त्या प्रकारचं मी पाहिलेलं हे पहिलंच म्युझियम. माओरींचा समग्र इतिहास, टाईमलाईन, पुरातन नकाशे; आपल्या भूभागाकडे ठेवा म्हणून पाहण्याची माओरींची परंपरा, त्याविरुद्ध भूभागाचा उपयोग व्यापारासाठी करण्याचा ब्रिटिशांचा रिवाज, या मुद्द्यावरूनच माओरींना something is not right ची कुणकुण लागली; माओरींची विविध आयुधं, वाद्यं; त्या-त्या ठिकाणी दिलेली बटणं दाबली की त्या-त्या वाद्यांचा अगदी खरा वाटणारा आवाज येत होता, जणू आपल्या मागे एखादा बाहेरच्या त्या दोघांसारख्या अवतारातला माओरी उभा राहून ते वाद्य फुंकतोय, छेडतोय नाहीतर धोपटतोय; हे सारं बघत बघत एका अंधार्‍या दालनातून दुसर्‍या अंधार्‍या दालनात जायचं; ज्यांना इतिहासाचा तळ शोधायचाय त्यांनी ते करावं; माहिती वाचावी; पुरातन नेत्यांचे फोटो बघावेत; त्यांचे कोट्स वाचावेत… काही टचस्क्रीन्स होते, तिथे विविध मेनू होते; ते नॅव्हिगेट करत गेलं की दक्षिण पॅसिफिकचा गेल्या काही शतकांचा धांडोळा समोर उलगडत होता. एका दालनात एक आख्खी भिंत व्यापलेला मोठा स्क्रीन होता; स्क्रीनच्या पुढ्यात टेकायला काही ठोकळे, मोडे, बाक; स्क्रीनवर १२-१५ मिनिटांची फिल्म सतत दाखवत होते. मी लक्ष ठेवून फिल्मची सुरूवात पकडली आणि तिथे बसून ती संपूर्ण फिल्म पाहिली. ब्रिटिशांचं जगाच्या या कोपर्‍याकडे कसं लक्ष गेलं, त्यांनी त्याचं महत्व कसं हेरलं; माओरींशी आधी संवाद, मग व्यापार आणि मग करार; काही माओरी नेत्यांना अंधारात ठेवलं गेलं, काहींची मुस्कटदाबी केली गेली. ब्रिटिशांचा लौकिक पाहता त्यात काही वेगळं नव्हतं, तरी ते पाहताना अस्वस्थ वाटलंच. मग एका निसर्गविषयक विभागात शिरले. त्या भूभागात आढळणार्‍या वनस्पती, प्राणी, पक्षी, तशीच बटणं दाबून त्यांचे आवाज, त्यांच्या अधिवासाची मॉडेल्स, माओरींचं त्यांच्याशी असलेलं अतूट नातं... एक मजली म्युझियम, सबकुछ माओरीकेंद्री.

म्युझियममध्ये तास-दीड तास घालवून बाहेर पडलो; पुन्हा एक दिशादर्शक दिसला. त्याचं ऐकायचं ठरवलं, तर त्यानं आम्हाला थेट तिथल्या सूवनीर शॉपमध्ये आणून सोडलं. खरेदीची इच्छा आणि योजना दोन्ही नव्हतं, त्यामुळे तिथे नुसता एक फेरफटका मारला. तरी त्यातल्या त्यात लाकडी कोरीव कामाच्या वस्तूंच्या रॅकसमोर मी थोडी रेंगाळलेच. शॉपवाल्या माओरी मुलीनं लगेच ‘मागे एक वूड कार्विंग स्टुडिओ असल्याची’ माहिती पुरवली. आम्हीही लगेच तिकडे वळलो.
न्यूझीलंडच्या जंगलांत आढळणारे महाकाय वृक्ष लाकडी कोरीव कामासाठी आदर्श मानले जातात; तिथल्या समुद्रकिनार्‍यांवर नैसर्गिकरीत्या सापडणार्‍या ग्रीनस्टोनपासून पुरातन काळातली कोरीव कामासाठीची हत्यारं बनवली गेली. कोरीव काम केलेले खांब, तुळया, घराचे बाह्य भाग, मुखवटे; पुन्हा यातल्या प्रत्येक कोरीव कामाला काहीतरी अर्थ होता. स्थानिक माओरींपैकी काहीजण आजही या कलेची जोपासना करत आहेत. (पुढे रोटोरुआत एक मोठा वूड-कार्विंग-स्टुडिओ-कम-कॉलेज पहायला मिळालं.) वायटँगीच्या स्टुडिओत दोघं आडदांड माओरी काम करत होते. आम्ही तिथे गेल्यावर त्यांनी काम थांबवून आमच्याशी बोलायला सुरूवात केली. वूड-ग्रेन, ते कसे ओळखायचे, त्यानुसार लाकडाच्या रंगांमध्ये कसा फरक पडतो, लाकूड तासण्याची दिशा का आणि कशी महत्त्वाची… एकानं त्यांचं टूल-किट उलगडून दाखवलं, त्यात २०-२५ प्रकारच्या पटाशाच होत्या. ‘यातली नेमकी कोणती पटाशी कशासाठी लागणार हे तुम्हाला कसं कळतं?’ असा एक मठ्ठ प्रश्न मी माझ्या सुदैवाने ऐनवेळी फिरवून जरा चतुराईनं विचारला. त्यानंही मग त्यांचं थोडंफार क्लासिफिकेशन समजावून सांगितलं.

maori-4.jpgmaori-5.jpg

आमचं १०-२० टक्के लक्ष त्यांच्या उच्चारांना ग्रहण करण्याकडे होतं. किवी इंग्रजीला अजून कान रुळलेले नव्हते; त्यात माओरी ढब आणखी जराशी वेगळी पडते; त्यांतल्या एकाला ते जाणवलं की काय कोण जाणे; अचानक थांबून त्याने Am I talking fast? असं विचारलं. त्यावर आम्ही ‘तू बोल रे, फास्ट की स्लो त्याची चिंता करू नकोस, जे सांगतोयस ते भारी आहे; ठरवून स्लो बोलायला लागलास तरच व्यत्यय येईल, जे आम्हाला नकोय, त्यामुळे लगे रहो’ हे सगळं सांगणारे चेहरे करून त्याच्याकडे नुसतं नकारार्थी मान हलवत हसून पाहिलं. हा प्रश्न तो तिथे येणार्‍या सर्वच अ-इंग्लिश पर्यटकांना विचारत असणार आणि ते सगळेच त्या आपुलकीने खूष होत असणार.
दोघांशी १५-२० मिनिटं गप्पा मारून आम्ही निघालो. नाकासमोरच्या चढाच्या पायवाटेने जात जात प्रत्यक्ष ट्रीटी ग्राऊंड्सवर पोहोचलो.

maori-19.jpg

विस्तीर्ण हिरवंगार राखलेलं मैदान; परिसरात चिटपाखरूही नव्हतं. एका बाजूला खाली समुद्र दिसत होता. दुसऱ्या बाजूला जुन्या इंग्रजी पद्धतीचं एक मोठं घर होतं. पण त्यापेक्षा लांबवर दिसणाऱ्या आणखी एका घरानं आम्हाला खुणावलं. ते होतं पारंपरिक माओरी घर. तिथे गेलो; घराला दार नव्हतं, तिथे राखणीला कुणी नव्हतं, आत डोकावून पाहिलं तर काही बाक, बाकांसमोर सादरीकरणासाठी वाटणारी मोकळी जागा; संध्याकाळचा शो इथे होत असणार याचा अंदाज आला.

maori-6.jpg

समुद्र, हिरवंगार मैदान, घसघशीत मोठी स्थानिक झाडं, किलबिलणारे पक्षी; बराच वेळ तिथे फिरलो; पाय निघत नव्हता. पण जेवणाची वेळ होत आली होती आणि आसपास त्याची काही सोय दिसलेली नव्हती.
मैदानातून निघणारी आणखी एक पायवाट दिसत होती. कडेला To Ceremonial War Canoe असं लिहिलेलं होतं. खाली लगेच त्याचं माओरी भाषांतर. सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीच्या बरोबरीने माओरी भाषेचा वापर दिसत होता खरा; पण त्या ब्लॉगवर लिहिलं होतं तशीही काही परिस्थिती आतापर्यंत वाटली नव्हती.

maori-7.jpg

ती War Canoe म्हणजे अबब प्रकरण निघालं! एक ३०-४० फुटी लांब लाकडी बोट, संपूर्ण लाकडी, सुरेख कोरीव काम केलेली, तिथे एका खुल्या शेडखाली उभी केलेली होती. ट्रीटी ग्राऊंड्सच्या तुलनेत हे ठिकाण खाली होतं; जवळपास समुद्रकिनार्‍यावरच. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वायटँगी ट्रीटी दिन साजरा होतो. तेव्हा ती बोट पाण्यात ढकलली जाते. पारंपरिक माओरी वेषातले लोक तेव्हा ती बोट वल्हवतात.

maori-8.jpg

3०च्या दशकात कधीतरी या बोटीसाठी ३ महाकाय ‘काऊरी’ (Kauri) वृक्ष पाडण्यात आले असं तिथल्या छोट्याशा माहितीफलकावर लिहिलेलं होतं. तशाच आणखी एका अंदाजे ८०० वर्षं पुरातन वृक्षाच्या खोडाचा साधारण २ फूट उंचीचा स्लाईस त्या माहितीफलकामागे ठेवलेला होता. त्या महाकाय वृक्षांची काया किती महा असावी ते त्या स्लाईसवरून लक्षात येत होतं.

maori-9.jpg

आपले दोन्ही हात पसरले तरी त्याचा व्यास त्याला पुरून उरणारा होता. बोटीसाठी ३ वृक्ष पाडण्यात आले हे वाचल्यावर आधी जरा विषाद वाटला होता; पण त्यांच्या खोडाची ती ‘स्टँडर्ड साईझ’ पाहून वाटलं की तिथल्या जंगलातली तशी ३ झाडं म्हणजे दर्या में खसखस! तेवढीच जरा इतर १००-२०० वर्षांच्या झाडांना खेळायला जागा मिळाली असेल... त्या ८०० वर्षं जुन्या खोडाला स्पर्श करताना जे वाटलं ते मात्र शब्दांत नाही सांगता येणार!

----------

Cut to दुसर्‍या दिवशीचे संध्याकाळचे ७:००; माओरी शोसाठी आलेले सगळे म्युझियमनजीकच्या एका बागेत जमले होते. बागेलगत एक रेस्टॉरंट होतं. अजूनही स्वच्छ उजेड होता. मात्र हवेतला गारठा चांगलाच वाढला होता. आमच्यासारखे थंडीची विशेष सवय नसणारे लपेटून, गुरफटून बसले होते. तीच हवा इतर काही जणांसाठी beautiful, warm weather होती! एकीकडे शोच्या यजमानांची लगबग सुरू होती. पूर्ण काळ्या शहरी पोशाखांतले २० ते ३० वयोगटातले काही माओरी पुरुष, त्यांतल्या एकाने बोलायला सुरुवात केली. पुरातन काळी माओरी टोळ्या पाहुण्या टोळ्यांचं स्वागत ज्या पद्धतीने करत त्याच पद्धतीने पर्यटकांच्या टोळीचं स्वागत होणार होतं. आणि मग वर माओरी हाऊसमध्ये प्रत्यक्ष शो होणार होता. त्यानंतर Hangi, म्हणजे पारंपरिक माओरी जेवण आणि मग टाटा-बाय बाय, असा एकूण तीन तासांचा ऐसपैस कार्यक्रम होता. आम्ही बसलो होतो तिथेच एका कोपऱ्यात त्या ‘हांगी’ची तयारी सुरू होती.
हे हांगी म्हणजे आपल्याकडच्या पोपटीचं किवी भावंडं म्हणता येईल. जमिनीत मोठे खड्डे केलेले; भट्टीत सणकून तापवलेले दगड त्या खड्ड्याच्या तळाशी ठेवायचे; खड्ड्याच्या तोंडाशी स्टीलच्या जाळीची मोठी बास्केट, बास्केटमध्ये भाज्यांचे, मांसाचे तुकडे, ते आधी मोठ्या पानांनी झाकायचे, आणि त्यावरून कापडाचं आच्छादन; दगडांच्या उष्णतेने भाज्या, मांस शिजतात; मग त्यावर खास हांगी सीझनिंग घालून खायचं; असा तो साधारण प्रकार. आम्ही तिथे जमलो तेव्हा शिजण्यापर्यंतची प्रक्रिया पार पडलेली होती. आमच्यासमोर त्यांनी ती बास्केट बाहेर काढली.

maori-10.jpgmaori-11.jpg

मुरत मुरत शिजलेल्या अन्नाचा मस्त खमंग वास येत होता. त्यांनी त्याचे नमुने काहीजणांना चाखायला दिले. मी भाज्यांमधला एक तुकडा उचलून तोंडात टाकला, तर तो नेमका लाल भोपळा निघाला! अगदी ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ सिच्युएशन! पण त्याचा अर्थ इतर सर्व चवी त्याहून फर्मास असणार होत्या!! रात्री मस्त गारठ्यात ते जेवण जेवायला मजा येणार होती.

आता पारंपरिक स्वागत आणि शो. आदल्या दिवशी आम्ही कोरीव कामाच्या स्टुडिओपासून जो चढाचा रस्ता पकडला होता तिथूनच जायचं होतं. पर्यटकांच्या ‘टोळी’तून लीडर्स म्हणून तीन Volunteers निवडले गेले. प्रास्ताविक करणारा शहरी माओरी आमच्यासोबत चालत होता; आम्हाला माहिती सांगत होता. माओरी टोळ्या विरुद्ध टोळीच्या नेत्यांना आधी जोखून घेत. समोरची टोळी युद्ध करणार की मैत्री हे ओळखण्याची त्यांची एक पद्धत होती. ते तिथल्या स्थानिक नेच्याची (Fern) एक डहाळी खुल्या जागेत विरुद्ध टोळीच्या नेत्याच्या पुढ्यात ठेवत. ही टोळी मैत्रीभावनेनं आलेली असेल तर टोळीचा नेता माओरी नेत्याच्या नजरेला नजर भिडवत पुढे जाऊन ती डहाळी उचले आणि माओरी नेत्याच्या हातात देई. असं तीन टप्प्यावर तीन वेळा झालं की मैत्रीची खात्री पटे. हे तीन टप्पे पार पाडत आम्हाला त्या माओरी हाऊसपर्यंत जायचं होतं. हा साधारण त्या माहितीचा सारांश.

गर्द झाडीतून जाणारी वाट होती. वाटेत ठिकठिकाणी माओरी टोळ्यांमधली माणसं उभी होती; सर्वांचे पेहराव आदल्या दिवशी सकाळी दिसलेल्या त्या दोघांसारखे ‘खर्रेखुर्रे आदिवासी’. कुठूनतरी एका स्त्रीचं खड्या, खणखणीत आवाजातलं माओरी भाषेतलं गाणं ऐकू आलं. ती कुठून गातेय हे शोधायला मान आवाजाच्या दिशेला वळवली तर विरुद्ध दिशेच्या झाडीतून मोठा आवाज, चित्कार करत एक माओरी अचानक उडी मारून पुढ्यात आला. दचकायलाच झालं. त्याच्या हातात भाल्यासारखं शस्त्र होतं; वटारलेले डोळे, चेहऱ्यावर उग्र भाव, आ वासून जीभ पूर्ण बाहेर काढलेली, मधेच तो फुत्कार टाकत होता; गळ्याच्या शिरा ताणून माओरी भाषेत जोरजोरात काहीतरी बोलत होता; एकंदर अक्राळविक्राळ अवतार! (यांना फुफ्फुसाचे, हृदयाचे विकार कधी होत नसणार.)

maori-12.jpg

न्यूझीलंडच्या रग्बी टीमचा मॅच सुरू होण्यापूर्वीचा ‘हाका’ डान्स कुणी पाहिला असेल तर त्यावरून याची थोडीफार कल्पना येईल. समोरच्याला आव्हान देणे हा त्यामागचा उद्देश. रग्बी टीममधले अ-माओरी खेळाडूही त्याच त्वेषानं ‘हाका’ करताना दिसतात. समोरच्या टीमनं तेवढा वेळ त्यांच्या नजरेला नजर देत उभं राहायचं. क्रिकेट टीममध्ये रॉस टेलर बिचारा एकटाच माओरी; शिवाय तो एक नेमस्त खेळाडू म्हणूनच आपल्याला माहिती आहे. तो हे असं जिभा वगैरे बाहेर काढून डेल स्टेनसारख्यांना आव्हान देईल ही अशक्यकोटीतली बाब वाटते. असो. मुद्दा असा, की गुजराथी माणूस जसा जन्माला येतानाच गरबा शिकून येतो तसेच हे माओरी लोक आक्रमकपणा सोबत घेऊनच जन्माला येतात की काय असं वाटायला लावणारी दृश्यं होती ती.

maori-13.jpg

तर अशी तीन टप्प्यावर तीन गाणी ऐकत, तीन वेळा दचकत, नेच्याच्या तीन फांद्या उचलत, आमचे ‘लीडर्स’ पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे असे त्या माओरी हाऊसपाशी पोहोचलो. आम्हाला वाटेत दिसलेले माओरी वेगळ्या वाटेने आमच्या आधी तिथे पोहोचलेले होते. तिथे त्यांच्यातला मुख्य नेता उभा होता. हाऽ असा अगडबंब देहाचा, उग्र! आता हा आणखी कोणतं तांडवनृत्य करणार असा प्रश्न पडला; तर तो चक्क स्वच्छ इंग्रजीत बोलायला लागला. एकदम ‘हुश्श’ वाटून ‘कोई मिल गया’मधला बालबुद्धी हृतिक रोशन हसतो तसं हसावंसं वाटलं. भाषा हा जवळीक साधण्याचा किती हुकुमी मार्ग असतो!

पर्यटकांच्या टोळीने पात्रता फेरी पार पाडली होती, मैत्रीसाठी हात पुढे केला होता. आमच्या तीनही लीडर्सना त्या अगडबंबानं जवळ बोलावलं आणि खास माओरी पद्धतीनं एकेकाच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवून डोळे मिटून वंदन केलं. (न्यूझीलंड टुरिझमसंबंधीच्या अनेक वेबसाइट्सवर या कृतीचा फोटो दिसतो.) त्यांच्या आधीच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर ही कृती इतकी शांतावणारी होती की विचारायची सोय नाही! केवळ त्या कृतीसाठी तरी आपण volunteering करायला हवं होतं असं मला फार वाटून गेलं.

maori-14.jpg

आम्हाला सर्वांना त्यानं आत बोलावलं; बाकांवर बसायला सांगितलं. मग माओरी परंपरा, चालीरीती, लोकजीवन, परस्परव्यवहार यांच्याबद्दल माहिती देत देत त्यांचा नृत्याधारित शो सुरु झाला. ते सादरीकरण वेगवान आणि गुंगवून ठेवणारं होतं. त्यात तालबद्धता होती; लय होती; रौद्रता होती; प्रचंड आवाजी ऊर्जा होती. (आवाज त्या कलाकारांचेच.) शोचं व्हिडीओ शूटिंग करायला मनाई होती. मी सुरुवातीला काही फोटो काढले आणि मग निमूटपणे कॅमेरा ठेवून दिला. फोटो काढण्याच्या नादात त्या ऊर्जेला दुर्लक्षित करणं म्हणजे कर्मदरिद्रीपणा ठरला असता.

maori-15.jpgmaori-16.jpg

शो साधारण अर्ध्या तासाचा होता. तो संपल्यावर सगळे बाहेर आलो. आता त्या कलाकारांसोबत बातचीत करायला, फोटोसेशनला वगैरे थोडा वेळ बहाल केला गेला. त्यांच्या नृत्यादरम्यानची स्त्री-कलाकारांची एक विशिष्ट कृती मला लक्षवेधी वाटली होती. पुरुष कलाकार ती कृती करताना दिसले नव्हते. त्याबद्दल मी त्यांच्यातल्या एकीशी जाऊन बोलले; त्या कृतीचा अर्थ विचारला. तिनं अगदी खड्या, खणखणीत माओरी इंग्रजीत त्याचं उत्तर दिलं. आमच्या न्यूझीलंडमधल्या ‘आईसब्रेकिंग’ची ती सांगता होती.

Ceremonial Canoe च्या वाटेनंच परत खाली उतरलो आणि रेस्टॉरंटमध्ये जमलो. टेबलं डेकोरेट केली गेली होती – नेच्याच्या नाजूक फांद्यांची नागमोडी वेलबुट्टी, जोडीला तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरचे दगडगोटे आणि छोट्या छोट्या पणत्या/मेणबत्त्या. एकीकडे बुफे जेवण तयार होतं. परक्या देशातलं, परक्या संस्कृतीतलं जेवण; सर्वच पदार्थांची, सीझनिंगची चव अगदी सौम्य, तेल-तिखटाचा मागमूस नाही; पण स्मोकी स्वाद अप्रतिम होता.

maori-17.jpgmaori-18.jpg

जेवण उरकलं तोवर १० वाजत आलेले होते. दिवसभराच्या भटकंतीने दमायला झालं होतं. आदल्या दिवशी ख्रिसनं ‘माझं ऐका, रात्री मी एक टॅक्सी सांगून ठेवतो, ती १० वाजता तिथे येईल, १० मिनिटं तिथे थांबेल, तोवर शो संपला तर त्या टॅक्सीनं या, नाहीतर मग चालत या’ असं सुचवलं होतं. त्यानुसार ती टॅक्सी बाहेर उभी होती. प्रास्ताविक करणाऱ्या माओरी माणसानंच आम्हाला ते येऊन सांगितलं. या लोकांचं नेटवर्क भारीच होतं एकदम. त्याला थँक्स म्हटलं आणि टॅक्सीत बसलो, तर स्टीअरिंगवर एक काकू होत्या! त्यांना साडेदहा वाजता एका ‘फियामिली’ला एअरपोर्टवर सोडायला जायचं होतं. ‘शो वेळेवर संपला ते बरं झालं, नाहीतर मी निघालेच होते,’ म्हणाल्या. काकूंनी जी झूम टॅक्सी मारली, ते आम्ही ५ मिनिटांत आमच्या हॉटेलच्या दारात पोहोचलो. टॅक्सीचं भाडं चुकतं केलं, काकूंना थँक्स म्हटलं. काकू तशाच झूम निघून गेल्या.

पुढे Hokitika मध्ये आम्हाला अशाच आणखी एक झूम गाडी चालवणाऱ्या भन्नाट काकू भेटणार होत्या… मस्त गप्पीष्ट होत्या त्या; रंगरूपाने गोर्‍या किवीच दिसत होत्या. पण गप्पांच्या ओघात कळलं, की त्यांच्या नजीकच्या पूर्वजांमध्ये काहीतरी माओरी लिंक होती. पण काकूंना जुजबी माओरीच तेवढं समजत होतं. त्यांची चिल्लीपिल्ली नातवंडं मात्र इंग्रजीबरोबरच अस्खलित माओरी बोलणारी होती. ते कसं काय? तर आता तिथल्या शाळांमध्ये रीतसर माओरी भाषाशिक्षणाचा अंतर्भाव केला गेला आहे. वायटँगी ट्रीटीपश्चात हळूहळू अडगळीत ढकलली गेलेली ही भाषा आधुनिक युगात आता परत दिमाखाने मिरवते आहे. पण हे सांगत असताना ‘आमच्यावेळी असं नव्हतं...’ हा काकूंच्या बोलण्यातला सूर लपला नाही. ‘जगभरातल्या जवळपास लोप पावलेल्या, मात्र यशस्वीरीत्या पुनरुज्जीवित केल्या गेलेल्या काही निवडक भाषांपैकी एक माओरी आहे’ असं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीच्या बरोबरीने माओरी का दिसत होती त्याचं कारण तेव्हा आमच्या लक्षात आलं. पण हे आमचं ज्ञानवर्धन आणखी १० दिवसांनी होणार होतं...
त्याआधी रोटोरुआतल्या ‘ते पुइया’च्या (Te Puia) माओरी व्हिलेजमध्ये त्यांचं धनधान्य साठवण्याचं, सुंदर कोरीव कामाचं ‘स्टोअरेज हाऊस’ दिसणार होतं; ‘बाहेरून जितकं अधिक कोरीव काम, तितकाच आतला धनधान्याचा साठा जास्त’ हे समीकरण आश्चर्यचकित करणार होतं. माओरी शोमधल्या कलाकारांच्या पेहरावातल्या झिरमिळ्या न्यूझीलंडच्या पाणथळ भागात आढळणार्‍या एका झुडुपाच्या चिवट पात्यांपासून तयार होतात, ही माहिती गाठीशी जमा होणार होती; ती वस्त्रं विणणार्‍या शहरी वेषातल्या माओरी मुलींच्या पुढ्यात उभं राहून त्यांचं काम बारकाईने निरखता येणार होतं.
दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांबद्द्ल आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी जमा होतील असं निघण्यापूर्वी स्वप्नातही वाटलं नव्हतं.

 

न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे.

न्यूझीलंडमधल्या I-site visitor centre च्या मी प्रेमात पडले ती खूप नंतरची गोष्ट म्हणायला हवी. त्याच्या खूप आधीपासून माझं TripAdvisor app सोबतचं प्रेमप्रकरण सुरू झालं. इतके दिवस TripAdvisor च्या लोगोतलं गॉगल लावलेलं घुबड आपल्याकडच्या काही हॉटेल्सच्या दारांवर वगैरे तेवढं पाहिलेलं होतं. त्यांपैकी काही हॉटेल्स खूप काही चांगली असतील असं बाहेरून तरी वाटायचं नाही. त्यामुळे ‘आजकाल काय... पट्टेवाल्यांची पोरंही कालेजात जातात, हो’च्या चालीवर त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. न्यूझीलंड टूरच्या प्लॅनिंगदरम्यान मात्र हे चित्र बघताबघता पालटलं.
नेटवर न्यूझीलंडमधल्या विविध things to do शोधायला गेलं की पहिल्या २-४ सर्च-रिझल्ट्समध्ये हमखास TripAdvisor ची लिंक असायचीच. सुरूवातीला आम्ही न्यूझीलंड टूरिझम खात्याच्या लिंक्स तेवढ्या उघडून पहायचो. इतर लिंक्सकडे तसं दुर्लक्षच करायचो. मग कधीतरी एकदा TripAdvisor वर क्लिक केलं गेलं; आणि मग हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं. TripAdvisor तुम्हाला विचारतं- कशा प्रकारचं टुरिझम हवंय? नेचर्स अँड पार्क्स बघायची आहेत का? लहान मुलांना आवडेल असं काही हवंय का? शॉपिंगमध्ये रस आहे का? अ‍ॅडव्हेंचर करायचंय का?... ते पाहिलं आणि ‘युरेका!’ झालं.

TripAdvisor वरची सर्वाधिक उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे त्या-त्या ठिकाणी जाऊन आलेल्यांनी लिहिलेले reviews. हळूहळू ते वाचायला लागलो. पुढेपुढे तर लहान मूल जसं घरातल्या इतरांनी काहीही सांगितलं तरी एकदा ‘हो, आई?’ करत आईला विचारून खात्री करून घेतं, तसंच व्हायला लागलं. एखाद्या ठिकाणाबद्दल नेटवर अन्यत्र काहीही दिलेलं असू दे, TripAdvisor वर त्याबद्द्ल काय दिलंय हे बघण्याची गरज वाटायला लागली; अमुकतमूक जागेचे फोटो पाहिल्यावर तिथे जावंसं वाटलं तरी त्या जागेचं TripAdvisorचं रेटिंग पाहिल्याशिवाय त्याबद्दल निर्णय घेणे बरं वाटेना. मग कामातून ५-१० मिनिटांचा ब्रेक घेऊन किंवा वेळी-अवेळी, रात्री-बेरात्री अशी शोधाशोध करायला बरं म्हणून त्यांचं app फोनवर डाऊनलोड केलं. देखते देखते ये दोस्ती प्यार में बदल गयी... आणि अंतिमतः TripAdvisor मुळे आम्ही Unique to NewZealand अशा तीन गोष्टी पाहू शकलो. त्यातली एक, म्हणजे वेलिंग्टनमधल्या एका अप्रतिम जंगलात पाहिलेले पक्षी; दुसरे, ख्राईस्टचर्चजवळच्या अकारोआ (Akaroa) इथले चिमुकले हेक्टर डॉल्फिन्स; आणि तिसरे... त्याचीच स्टोरी आधी सांगते.

न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधल्या रोटोरुआनजीक एक अत्यंत लोकप्रिय, चुकवू नये असं ठिकाण आहे - ‘Waitomo Glow Worm caves’. या प्रकारचे ग्लो-वर्म्स जगभरात फक्त न्यूझीलंडमध्येच पाहायला मिळतात, असं कळलेलं होतं. त्यामुळे काही झालं तरी ग्लो-वर्म्स पाहायचेच हे नक्की होतं; वायटॉमो short-list केलेलंही होतं. पण, TripAdvisor मुळे त्यात एक झकास ट्विस्ट आला.
प्लॅनिंगदरम्यानची गोष्ट. जाण्या-येण्याची विमानतिकिटं, हॉटेल-बुकिंग्ज, अंतर्गत प्रवासाची विमान-तिकिटं एवढं पूर्ण करून व्हिजासाठी अर्ज केलेला होता. व्हिजा आला की (आणि आला तर!) मग बाकीचं ठरवू असं म्हणून stand-by mode वर होतो. पण दरम्यान दुनिया की कोई ताकद मला TripAdvisor वर बागडण्यापासून रोखू शकत नव्हती.
तर अशीच एक दिवस तिथे हॉकिटिकाबद्द्ल काय काय दिलंय ते सहज बघत होते. आमचं तिथल्या हॉटेलचं location, तिथून सिटी-सेंटर किती लांब आहे, खादाडीची ठिकाणं, तिथला बीच कसा आहे, वगैरे, वगैरे. तर अचानक आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच एक जागा मार्क केलेली दिसली; त्या जागेचं नाव होतं ‘Glow Worm Dell’. मी लगेच त्या ठिकाणाचा सर्च मारला. तर कळलं, की तिथेही ग्लो-वर्म्स पाहता येणार होते. एकाने reviews मधे लिहिलेलंही होतं, की ‘वायटॉमोला जाण्यापेक्षा इथे जा; सेम तसेच ग्लो-वर्म्स पाहता येतात, ते देखील अगदी शांतपणे आणि मुख्य म्हणजे फुकटात!’ मी ताबडतोब हॉकिटिकातून बाहेर पडून वायटॉमोत शिरले. तिथल्या ग्लो-वर्म्स केव्‌जबद्दल लोकांनी भरभरून आणि चांगलेच रिव्ह्यूज लिहिले होते; पण ‘तिथे खूप गर्दी असते, त्या केव्‌जमधून इतक्या पटापटा लोकांना नेऊन आणतात की समाधान होत नाही, त्या मानाने पैसे खूपच घेतात,’ असा सर्वसाधारण सूर दिसत होता. मग मी वायटॉमोला कसं जायचं वगैरे शोधलं. रोटोरुआतून तिथे बसनं जावं लागणार होतं. साधारण दीड-दोन तासांचा प्रवास. आम्ही दोघंही motion-sickness चे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शक्यतो बसप्रवास टाळण्याकडे आमचा कल असतो. पण ग्लो-वर्म्ससाठी आम्ही ते देखील केलं असतं. मात्र आता TripAdvisor नं ते टाळण्याचा पर्याय दाखवला होता. त्यामुळे व्हीजा आल्यावर आम्ही पहिलं काय केलं तर वायटॉमोवर फुली मारून टाकली. त्यामुळे आमचा रोटोरुआतला किमान अर्धा दिवस वाचला; पैशांचीही बर्‍यापैकी बचत झाली. शिवाय, रोटोरुआला जाणारे आपल्याकडचे समस्त पॅकेज-टूरवाले जिथे ‘नेतातच’, तिथे ‘जायचंच नाही’ असा थोडासा माजही करता आला!

तर, हॉकिटिका...

hokitika-map-1.jpg
...

hokitika-map-2.jpg

“What made you stay here for 3 days??” - हॉकिटिकाच्या आय-साईटमधली मुलगी आश्चर्यानं आम्हाला विचारत होती.

न्यूझीलंडमधला तो आमचा ११वा दिवस होता. आता आम्ही त्या परक्या देशात on our own फिरायला ‘तय्यार’ झालेलो होतो. काळजीपूर्वक, इकडच्या-तिकडच्या खुणा लक्षात ठेवत फिरण्याचं सुरूवातीचं प्रमाण बरंच कमी झालं होतं. पर्यटकांसाठीच्या छोट्या-छोट्या सोयीही इतक्या व्यवस्थित दिसल्या होत्या की रस्ता चुकू म्हटलं तरी चुकणार नाही, याचा आत्मविश्वास आला होता. किवी इंग्रजी आपल्याला व्यवस्थित समजतंय, आपल्या भारतीय इंग्रजीला समोरून लगेच प्रतिसाद येतोय, हे ध्यानात आल्यानं बेधडक रस्त्यातल्या एखाद्याला ‘ओ दादाऽ, या रस्त्यान्‌ समुद्रावर जाता येतंय का?’ हे विचारायला लागलो होतो. (गूगल-मॅप्स दिशा दाखवतं, पण असे विचारत विचारत रस्ते शोधण्याची मजा त्यात नसते.) एका ठिकाणाचा निरोप घेऊन निघालं की पुढच्या ठिकाणचं आय-साईट कुठे आहे ते फोनवरच्या नकाशात शोधून ठेवायचं, त्या ठिकाणी पोचलं की हॉटेल चेक-इन करून आय-साईटपर्यंत शक्यतो चालतच जायचं, हे आमचं ठरून गेलेलं होतं. (आम्ही निवडलेल्या सर्व हॉटेल्सची चेक-इनची वेळ दुपारची असल्यामुळे हे शक्यही व्हायचं.) चालत जाण्याचा मोठा फायदा म्हणजे हॉटेलच्या आसपासचा परिसर आपोआप बघून व्हायचा; खादाडीची ठिकाणं कळायची; स्थानिक बसस्टॉप्स वगैरे दिसायचे; त्या-त्या ठिकाणच्या गारठ्याचा, वार्‍याचा अंदाज यायचा; (एकंदर न्यूझीलंडमध्ये सगळीकडेच बेक्कार वारा होता! एकवेळ थंडी परवडली, पण तो बोचरा वारा नको असं व्हायचं.) थोडक्यात, त्या जागेचा एकूण ‘फील’ यायचा. तर तसंच, हॉकिटिकाच्या आय-साईटमध्ये गेलो होतो. तीन दिवसांच्या मुक्कामात निवांतपणे काय काय करता येईल ते पाहत होतो; आणि तिथली क्लार्क मुलगी आम्हाला विचारत होती - “What made you stay here for 3 days??” त्यावर तिला ‘मेरीऽ मर्रऽऽजी’ असं उत्तर देण्याचा मोह होत होता. चूक तिचीही नव्हती. कारण बहुतेक पर्यटक हॉकिटिका नाहीतर ग्रेमाऊथमध्ये एखादा दिवस थांबून पुढे ‘Franz Josef’ या स्की-रिसॉर्टला, तिथली Fox Glacier बघायला जातात. (ग्रेमाऊथ रेल्वे स्टेशनवरून आम्ही फ्रान्झ जोसेफचीच बस पकडली होती; आणि हॉकिटिकाला बसमधून उतरणारे आम्ही दोघंच होतो.) फ्रान्झ जोसेफचा प्रवास ४ तासांचा, वळणावळणाचा; त्यामुळे आम्ही अगदी नाईलाजास्तव त्यावरही फुली मारली होती. हे सगळं तिला कुठे सांगत बसणार! त्यामुळे आम्ही ‘We just love beaches, you know...’ असं म्हणून तिला स्की-रिसॉर्टवरून बीचवर आणून सोडलं. मग तिनंही त्याचा नाद सोडून दिला आणि पाहियाच्या ख्रिससारखंच आम्हाला हवं होतं ते सगळं ५-१० मिनिटांत मार्गी लावून दिलं. मुख्य म्हणजे, हॉकिटिकातल्या त्या गप्पीष्ट काकूंशी दुसर्‍या दिवशी आमची गाठ घालून दिली. त्यांनीच आम्हाला तिथल्या आसपासच्या परिसराची सैर घडवून आणली. एकीकडे हॉटेललगतचा शांत समुद्रकिनारा होताच अधूनमधून डोकावायला.

या सगळ्यात मध्येच कधीतरी ती glow worm dell बघायची होती. मध्येच कधीतरी म्हणजे रात्रीच्या अंधारातच. पण ती जागा समोरच होती; मग काय, कधीही जाऊ शकतो, असं करता करता २ दिवस संपले. वायटॉमोची cave आणि ही dell, दोन्हींत काय फरक, असा प्रश्न पडला होता. Cave म्हणजे गुहा, हे माहिती होतं. Dell म्हणजे झाडा-वेलींनी बंदिस्त झालेली जागा, असं गूगलनं सांगितलं. हा अर्थ समजल्यावर पहिला मध्यमवर्गीय विचार काय आला, तर रात्रीच्या अंधारात थेट तिथे शिरण्यापूर्वी दिवसाउजेडी ती जागा एकदा बघून घेऊ. आणि हॉकिटिकातून निघायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिकडे वळलो.

हायवेच्या अलीकडे आमचं हॉटेल, आणि पलीकडे ती झाडांची गुहा. हायवेवरून गाड्या रोरावत धावत होत्या. न्यूझीलंडमध्ये आल्यापासून जिथे जिथे रस्ता ओलांडायची वेळ आली होती तिथे ईमानेइतबारे सिग्नल शोधून, तिथल्या खांबावरचं बटण दाबून, रस्ता ओलांडण्यासाठीचा कर्णकर्कश आवाज सुरू झाला की, आणि संपायच्या आत, रस्ता ओलांडला होता. तो आवाज नसताना रस्ता ओलांडायची ही पहिलीच वेळ होती. तेवढी २-४ मिनिटं उगाच बरं वाटलं; आपल्या देशात असल्यासारखं. बाकी, तिथेही आपल्यासारखा राईट हॅण्ड ड्राईव्हचाच नियम आहे, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये वेगळं काही वाटत नाही... शिस्त सोडल्यास! असं ट्रॅफिकमध्ये काही वेगळं न वाटण्याचा एक माफक (आणि मौखिक) प्रसाद आम्हाला पाहियात मिळाला होता. तिथे एक दिवस सकाळी हॉटेलमधून बाहेर पडून रस्त्याला लागलो होतो. तो हायवे नव्हता, तरी अशाच गाड्या रोरावत धावत होत्या. नेहमीच्या सवयीने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत होतो, म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्या दिसतात. तर, एका वळणावर समोरून एक सुसाट गाडी आली. आम्हाला उजव्या बाजूने चालताना पाहून तो गाडीवाला बुवा सपशेल हैराण झाला. मात्र गाडीचा वेग अजिबात कमी न करता तो खिडकीतून हात बाहेर काढून, डोळे मोठे करून ‘टीss दी आद साss’ असं काहीतरी ओरडत दिसेनासा झाला. ते किवी उच्चारांतलं ‘Take the other side…’ होतं हे आम्हाला त्यानंतर उमगलं. मग लक्षात आलं, की त्या रस्त्याला फक्त डाव्या बाजूलाच फूटपाथ होता आणि तो बुवा आम्हाला तिथून चालायला सांगत होता. त्याचा चेहरा पाहता त्यापुढे त्यानं आम्हाला २-४ शिव्या हाणल्या असल्याचीही दाट शक्यता होती; पण त्याच्या गाडीचा वेग इतका होता, की त्या शिव्या पुढे भलत्याच कुणावर तरी जाऊन धडकल्या असणार. त्यानंतर रस्त्यावर पाऊल टाकलं, की आधी फूटपाथच्या शोधार्थ नजर भिरभिरायची. तर, इतके ते शिस्तशीर आणि नियमबद्ध रस्ते...

हॉकिटिकातला तो हायवेही तसाच. पण हायवे असला आणि शिस्तशीर असला तरी तो सिंगल लेनचाच होता; पळत तो ओलांडला, आणि त्या Dell च्या तोंडाशी गेलो. एक बारीकशी पायवाट आत जात होती. आत गर्द झाडीने वेढलेली जराशी गोलाकार छोटीशी बंदिस्त जागा होती. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना छोटं रेलिंग लावलेलं होतं. मान पूर्ण वर केली तरच आकाश दिसत होतं. जरावेळ तिथे नुसतेच उभे राहिलो… चहूबाजूंनी गर्द झाडं, झुडुपं… ते ग्लो-वर्म्स इथे नेमके कुठे असतील, रात्रीच्या अंधारात इतक्या झाडीत आपल्याला दिसतील का, कालच यायला हवं होतं का, म्हणजे जरा सराव होऊन आज परत व्यवस्थित पाहता आले असते का, आज रात्री नाही दिसले तर काय, उद्या सकाळी इथून निघायचंय, रोटोरुआला न जाऊन चूक तर नाही ना केली… या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला आणखी ३-४ तासांनी मिळणार होती...
रात्री जेवण उरकून, सामानाची बांधाबांध करून ठेवून दहा-साडे दहाला परत बाहेर पडलो. हायवेवर काळोख, गाड्या तशाच रोरावत धावत होत्या. Dell च्या दिशेनं एक-दोघं रस्ता ओलांडून हॉटेलच्या आवारात शिरताना दिसले. न राहवून त्यांना विचारलं- Could you see the glow worms? त्वरित प्रतिसाद आला - Yep, they’re there, just fantastic! आणि संध्याकाळच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका दमात मिळाली.

उत्साहात रस्ता ओलांडून तिथे गेलो. तिथे २-३ गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. काहीजण आत जाताना दिसत होते, काही आतून बाहेर येत होते. एकूण तेव्हा तिथे १५-२० जण तरी होते. त्यात ४-५ तरुण मुलींचा एक ग्रुपही होता. आमच्या पाठोपाठ आत शिरताना त्यातल्या एकीनं आतल्या दिशेला बोट दाखवत मला विचारलं ‘glow worm?’ मी हसून मान डोलावली. मी त्या क्षणी ग्लो-वर्म्सपेक्षा त्या मुलींचाच विचार करत होते. त्या इतक्या रात्री निर्धोकपणे भटकू शकत होत्या त्याचा मला फार म्हणजे फार हेवा वाटत होता.

पायवाटेनं आत शिरलो. संध्याकाळी येऊन गेलो होतो, तरी अंधारात पुढे पाऊल टाकताना बिचकायला होत होतं. आसपास माणसं असल्याचं फक्त जाणवत होतं. पण इकडे तिकडे पाहिलं की नुसता काळा अंधार, बाकी काहीच नाही… साधारण निम्मं अंतर आत आल्याचा अंदाज घेऊन एका जागी थांबलो. ग्लो वर्म्स जवळ जाऊन पाहिले तर दिसतात, की लांबून पाहायला हवेत; त्यांच्या ‘ग्लो’चा आकार केवढा असतो, म्हणजे आपल्या काजव्यांएवढे असतात, की त्याहून लहान, की मोठे… बरेच प्रश्न पडले होते. अंधारात काय शोधायचं हे माहित होतं; पण काय दिसणार आहे हे माहित नव्हतं! अंधाराला नजर सरावायला हवी आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं… फार गंमतीशीर २-४ मिनिटं होती ती… अंधारात डोळे फाडफाडून नुसतं इकडे तिकडे बघत होतो… आणि एका क्षणी तो अंधार ठिकठिकाणी चमचमायला लागला! आपल्या काजव्यांहूनही अगदी चिंटूकले, मंद निळसर दिवे, तिथे जिकडे तिकडे सगळीकडे होते! ज्या क्षणी डोळ्यांना ते दिसायला लागले तो क्षण अजूनही मला आठवतोय. कमाल transition होतं ते! आपण संध्याकाळी आलो तेव्हाही हे दिवे इथेच होते; गेली २-४ मिनिटंही असेच होते, फक्त आपल्याला दिसत नव्हते; या विचाराने भारी वाटलं. एकाच जागी काय उभं राहायचं, म्हणून जरा पुढे गेलो, गोल फिरलो, पुढे, मागे, सगळीकडे निळसर चिमुकले डॉट्स; ते दृश्य असलं अफाट होतं की कार्टून्ससारखं माझ्या डोळ्यांतही निळसर ठिपके उमटायच्या बेतात होते. वास्तविक ते वर्म्स त्यांच्या भक्ष्याला आकर्षून घेण्यासाठी चमकत असतात. आपले काजवे त्यांच्याहून बरेच प्रखर म्हणायला हवेत. काजवे इकडेतिकडे उडतात; हे वर्म्स एका जागी स्थिर असतात; खडकांना नाहीतर झाडांच्या फांद्यांना लटकतात. आम्ही त्यांचे फोटो काढण्याचे १-२ निष्फळ प्रयत्न केले आणि सोडून दिले. १५-२० मिनिटं डोळे भरून ते दृश्य पाहिलं आणि तिथून निघालो. बाहेर Dell च्या तोंडाशी एका फलकावर त्या ग्लो-वर्म्सची वैज्ञानिक माहिती दिलेली होती. माहिती वाचण्यासाठी तिथे व्यवस्थित दिवा वगैरेही होता. पण आम्ही तिथे थांबलो नाही; ती माहिती काय नंतर नेटवरही वाचता आली असती; त्या क्षणी आतल्या अंधारात जे पाहून आलो होतो तेच डोळ्यांसमोर असू दे असं वाटत होतं...

टाईमलाईननुसार, Unique to New Zealand च्या आमच्या ‘इजा-बिजा-तिजा’तला हा तिजा होता; पण अनुभव म्हणून पहिल्या नंबरचा!

----------

Cut to ६ दिवस आधी, वेलिंग्टन...

हॉटेलपासून चालत १० मिनिटांच्या अंतरावरच्या आय-साईटमध्ये शिरलो होतो, ‘झीलँडिया’ची चौकशी करायला. TripAdvisor नं आम्हाला या ‘झीलँडिया’च्या दिशेला अक्षरशः ढकललं होतं. ती जागा इथून किती लांब आहे, तिथे जायला बस बरी पडेल की टॅक्सी, वगैरे आमच्या नेहमीच्या प्रश्नांना हसतमुख उत्तर मिळालं - ‘You’ll get a free ride there; the bus leaves from there, every morning at 9:00...’ यातलं पहिलं ‘there’ झीलँडियासाठी होतं, आणि दुसरं, आम्ही उभे होतो तिथून १०-२० पावलांवरच्या बस-स्टॉपसाठी. आमचा दुसर्‍या दिवसाचा to & fro प्रश्नच एका क्षणात मिटला होता.

आय-साईटकडून ‘वेळेच्या आधी १५ मिनिटं हजर रहा’ अशी प्रेमळ सूचनाही मिळालेली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी पावणे नऊला दुसर्‍या ‘there’पाशी जाऊन उभे राहिलो. त्यादिवशी रविवार होता; वाटलं होतं, तिथे आणखी काहीजण नक्की असतील. पण कुणीच नव्हतं. रविवारमुळेच कदाचित रस्ते अगदी सामसूम होते; मुंबईतल्या फोर्टच्या एखाद्या गल्लीत उभं असल्यासारखा भास होत होता. तशाच दगडी इमारती, खिडक्यांना कमानी, वगैरे. क्वचित एखादी गाडी जाताना दिसत होती; क्वचित कुणीतरी पायी चालत जाताना दिसत होतं; हवेत चांगलाच गारठा होता; बोचरा वारा होता; आणि त्या free-ride चा पत्ता नव्हता. थंडीत अंमळ कुडकुडतच उभे होतो. नक्की इथेच यायचं होतं ना, बस दुसरीकडून कुठूनतरी निघून गेली नसेल ना, वगैरेही करून झालं. पण तिथल्या बस-स्टॉपसारख्या खांबावर ‘Zealandia Pickup’ असं स्वच्छ लिहिलेलं होतं. त्यामुळे ती जागा सोडायची नाही असं ठरवलं होतं. अजूनही स्टॉपवर, त्या फूटपाथवर, त्या रस्त्यावर आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. शेवटी सव्वा-नऊला एक मोठी पिक-अप व्हॅन अवतरली. व्हॅनवर बाहेर झीलँडियाचा लोगो दिसला. ‘फ्री’ पिक-अपच्या मानाने गाडी एकदमच टकाटक निघाली. ड्रायव्हर तसा ‘अंकल कॅटेगरी’तला वाटला; भरघोस दाढी, मिश्या; आडदांड शरीर; त्यानं आतून दार उघडलं आणि आम्ही गाडीत पाय ठेवायच्या आधीच उशीर झाल्याबद्दल खणखणीत आवाजात आमची माफी मागितली. आमचा पुढचा पाय पुढे, मागचा मागे राहिला. ‘काय काका, लगेच सॉरी वगैरे कशाला? रविवारचं चालायचंच जरा इकडे-तिकडे...’ यातलं काहीही बोलून उपयोग नव्हता; कारण काकांना १५ मिनिटांच्या उशीरानं अगदी मेल्याहून मेल्यासारखं झाल्याचं त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. गाडी निघाली; काकांनी उशीराचं स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली - गाडी सकाळी सुरू होईना, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता; वगैरे वगैरे. जरा वेळानं त्यांना जाग आली, की झीलँडियाची प्राथमिक माहिती यांना सांगायला हवी. गाडीत पर्यटक असे आम्ही दोघंच होतो. तरी त्यांनी गगनभेदी आवाजात बोलायला सुरूवात केली -
नव्वदच्या दशकात वेलिंग्टनमधल्या जिम लिंच नामक निसर्गसंवर्धकाच्या डोक्यात एक कल्पना आली, की शहराच्या मध्यात अशी एक जागा तयार करावी जी न्यूझीलंडच्या स्थानिक प्राण्या-पक्ष्यांसाठी असेल. मात्र त्याला तिथे प्राणीसंग्रहालय करायचं नव्हतं. नैसर्गिक अधिवास हवा होता. ४-५ वर्षं त्यानं चिकाटीनं याचा पाठपुरावा केला; एका विस्तृत जंगलसदृश विभागाला कुंपण घालण्यात यश मिळवलं; आणि न्यूझीलंडमधून अस्तंगत होऊ घातलेल्या पक्ष्यांच्या, पाली-सरड्यांच्या काही जातींना जाणीवपूर्वक तिथे आणून सोडलं. आज त्या बर्‍याच काहीशे एकरांवर एक अप्रतिम, नैसर्गिक जंगल तयार झालं आहे. सुरूवातीला त्याचं नाव काहीतरी वेगळं होतं; “आता त्याला ‘झीलँडिया - प्राईड ऑफ वेलिंग्टन’ म्हणतात.” काकांनी एका झोकदार वळणावर शेवटचं वाक्य इतक्या प्राईडनं उच्चारलं, की स्वतः जिम लिंचही तितक्या अभिमानानं कधी बोलला नसेल.

१५-२० मिनिटांत झीलँडियापाशी पोहोचलो. ड्रायव्हर काकांचं बोलणं ऐकण्याच्या नादात गाडीच्या खिडकीतून वेलिंग्टनमधली मजा बघायची मात्र राहिली.

zealandia-1.jpg
...

zealandia-2.jpg

तिकीट काढून आत शिरलो. तिथेही फिरण्याचे काही पर्याय होते - २ तास, ४ तास, गायडेड टूर, इ. आम्ही ४ तासांचा पर्याय निवडला. एकतर, त्यादिवशी आम्ही दुसरं काहीही करणार नव्हतो; आणि दुसरं, काकांनी आम्हाला परतीची वेळ दुपारची तीनची सांगितली होती. त्यामुळे हाताशी भरपूर वेळ होता.
तिकीट देणार्‍या मुलीनं तिकिटासोबत झीलँडियाची माहिती देणारं एक फोल्डर हातात कोंबलं. तसंच एक फोल्डर ड्रायव्हर काकांनीही दिलं होतं. (न्यूझीलंडमधून निघेपर्यंत अशी इतकी फोल्डर्स, बुकलेट्स आणि नकाशे जवळ साठले, की परतल्यावर त्या जोरावर Travel to NewZealand चं माहितीकेंद्रही उघडता आलं असतं.)

तिकीटं घेऊन पुढे झालो, तर झीलँडिया स्टाफपैकी एक मावशी येणार्‍या पर्यटकांना प्राथमिक माहिती देत होत्या. Rather, ती माहिती ऐकल्याशिवाय त्या कुणाला पुढेच जाऊ देत नव्हत्या असं दिसलं. मग काय, आमच्या पुढचा ग्रूप पुढे सरकेपर्यंत निमूटपणे थांबलो. त्या मावशी तसं का करत होत्या हे थोड्याच वेळात समजलं. झीलँडिया जंगलात शिकारी प्राणी किंवा पक्ष्यांची अंडी खाणारे साप-उंदीर इत्यादी प्राणी अजिबात नाहीत. म्हणजे ते जंगल जाणीवपूर्वक अशा प्राण्यांपासून मुक्त ठेवलं गेलं आहे. तर, त्या मावशी तिथे येणार्‍या प्रत्येकाकडची बॅग, पर्स, पिशवी जे काही असेल ते स्वतः जातीने तपासत होत्या. कुणाच्या बॅगेत घरचे पाळलेले उंदीर किंवा साप नाहीत ना, हे पाहत होत्या. ‘घरनं कुणी साप-उंदीर कशाला बरोबर आणेल?’ ही माझ्या मनातली शंका मावशींना स्पष्ट ऐकू गेली बहुतेक. कारण त्या चेहर्‍यावरचं स्मितहास्य तसंच ठेवत पण जरा यांत्रिकपणे ‘Believe me, people bring along such pets... What if a rat jumps out... we just can’t afford it here’ असं म्हणाल्या. बोलता बोलता आमच्या सॅकमध्ये पार आतपर्यंत हात कोंबून आतल्या वस्तू उलट्यापालट्या करून, मग सॅक बाहेरून चाचपून, दाबून बघून त्यांनी मनाचं समाधान करून घेतलं आणि आम्हाला पुढे जाऊ दिलं. पुढे बराच वेळ ‘बॅगेत उंदीर’ या नुसत्या कल्पनेनंच मला कसंसं होत होतं. पण ती कसंसं करणारी कल्पना बाजूला सारून झीलँडियानं कधी मनाचा ताबा घेतला ते कळलंच नाही.

पुढचे ४ तास आमच्या अवतिभोवती घनदाट जंगल आणि चहूबाजूंनी विविध पक्ष्यांचं अखंड मंजूळ कूजन, इतकंच होतं! वाहनांचे आवाज नाहीत, माणसांचा गोंगाट नाही; ढगाळ हवा, वेलिंग्टन-स्पेशल बोचरा गारठा, हिरवी शांतता, व्यवस्थित आणि भरपूर दिशादर्शक असणारे विविध मार्ग... पायांची साथ असेल तितकं आपण नुसतं भटकायचं; अधेमध्ये जरावेळ टेकायला बाक दिसत होते; पक्ष्यांची माहिती देणारे फलक होते; मात्र त्या माहितीचा मारा केलेला नव्हता.

zealandia-3.jpg
...
zealandia-4.jpg

पायवाटांवर बर्‍याच ठिकाणी जाड वाळू टाकलेली होती. त्यातून चालणार्‍या पावलांचे आवाज आणि विविध दिशांनी विविध पक्ष्यांचे आवाज... बहुतेक सगळे पक्ष्यांचे आवाज अनोळखीच; पण अगदी वेगळे आणि लक्षात राहणारे. बहुतेक सगळे पक्षी केवळ जगाच्या त्या भागात आढळणारे; काही तर केवळ न्यूझीलंडमध्येच असणारे - किया, टुई, पुकुपुकू; ही नावं लक्षात राहिली कारण त्यांचं कूजन फार वेगळंच आणि सुंदर होतं. पाहियापासून ते आवाज ऐकत आलो होतो; त्यांच्या विशिष्ट धाटणीमुळे ते कानांनी अगदी लक्षात ठेवले होते. ते केवळ याच देशात आढळणारे पक्षी आहेत हे झीलँडियात फिरताना समजलं आणि काहीतरी अडव्हेंचरस केल्यासारखी कॉलर ताठ करून घ्यावीशी वाटली. कानांचा वेध घेणारं एखादं कूजन ऐकू आलं की पावलं आपोआप थबकायची; वाळूतल्या पावलांचाही आवाज थांबावा आणि फक्त त्या पक्ष्याचा आवाज ऐकत उभं राहावं असं वाटायचं.

ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी खास घरटी, फीडर्स ठेवलेले होते. तिथे आसपासचे पक्षी माणसांना न बुजता अगदी समोर, शेजारी येऊन बसत होते. ‘पक्ष्यांना खायला घालू नये’च्या सूचना सगळीकडे होत्या; सगळीकडे त्या पाळल्या जात होत्या. एखादा पक्षी अगदी समोर येऊन बसला, की त्याला निरखावं, की डोळे मिटून फक्त त्याचा आवाज ऐकावा, की त्याचे फोटो काढावेत, असा प्रश्न पडत होता. पैकी फोटो काढण्याचा विचार सोडून देणे हे सर्वात सोपं होतं. ते आम्ही केलं. पक्ष्यांची एक से एक कूजनं कानांनी पीत, मनात साठवत जंगलात भटकत राहिलो.

वाटेवर अनेक लहान-मोठी तळी होती. प्रत्येक तळ्याची काहीतरी कथा होती. कथा म्हणजे पुराणकथा अशा अर्थानं नव्हे, तर संवर्धनाची गोष्ट अशा अर्थानं. अमूक तळ्याचं पाणी सजीवसृष्टीसाठी घातक बनलं होतं, मग शास्त्रज्ञांनी त्या पाण्यावर हे-हे प्रयोग केले, त्या पाण्यात अमूक प्रकारचं शैवाल चांगलं निपजलं, मग त्यावर गुजराण करणारे किडे तिथे आले, त्या किड्यांमागोमाग अमूक पक्षी आले... एवढं वाचलं की आपसूक नजर समोरच्या पाण्याकडे वळायची आणि तिथे ते पक्षी बसलेले दिसायचे. आधी आपलं त्यांच्याकडे लक्ष कसं गेलं नाही या विचारानं नवल करत आपण त्यांना निरखायचं आणि पुढे व्हायचं; हे सगळं आपोआप घडत होतं. तळ्यांच्या कथा तशा तिथे फलकांवर लिहिताना त्या लोकांना हे अपेक्षित होतं की नाही माहिती नाही; पण त्यामुळे मजा येत होती.

पुढची ५०० वर्षं ते जंगल तसंच ठेवायचं असं जिम लिंच अँड कंपनीनं ठरवलं आहे, म्हणे! त्या ५०० वर्षांपैकी एका कणभर टाईम-स्लाईसमध्ये त्या जंगलाला आपले पाय लागले; ‘संवर्धन’ म्हणजे काय त्याचा किलबिलता डेमो आपण पाहू शकलो; या विचारानं ‘पंख बिना उडूं..ऽऽ’ झालं. TripAdvisorचं ऐकलं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावीशी वाटली. हाँगकाँग-ऑकलंड विमानात शेजारच्या बाईनं अगदी आवर्जून सांगितलं होतं, की मोठ्या शहरांच्या बाहेरचा न्यूझीलंड बघा; शहरांमध्ये वेळ घालवू नका. हे खरंच; पण मी त्यात भर घालून म्हणेन, झीलँडियासारख्या अपवादांकडेही लक्ष ठेवा.

तर, टाईमलाईननुसार, Unique to New Zealand च्या आमच्या ‘इजा-बिजा-तिजा’तला हा इजा होता; पण अशी काही यादी आपल्या खाती जमा होणार आहे हे तेव्हा मनात रजिस्टर व्हायचं होतं...
ते झालं पुढे २ दिवसांनी, ख्राईस्टचर्चमध्ये.

Cut to Akaroa, ख्राईस्टचर्चपासून दोन-अडीच तासांचा निसर्गसुंदर बसप्रवास करून आम्ही आता क्रूझमधून निघालो होतो, ‘हेक्टर डॉल्फिन्स’ पाहायला.

akaroa-1.jpg

आमच्या दोन्ही बाजूंना लांबवर उंचच्या उंच खडक; समोर दूरवर दोन्ही बाजूंनी विंचवाच्या नांगीच्या टोकासारखे एकमेकांच्या दिशेला येऊन थांबलेले होते. दोन्हींच्या मधल्या साधारण २ किमीच्या ‘फटीतून’ दक्षिण पॅसिफिक समुद्राचं पाणी आत शिरलेलं. काय सुरेख पाणी दिसत होतं ते... निळ्या-हिरव्या रंगाचं! बोटवाला आसपासची भौगोलिक माहिती सांगत होता. मध्येच एकदा त्यानं डाव्या बाजूला अगदी खडकापाशी बोट नेऊन जरावेळ थांबवली. आम्ही लगेच बोटीच्या काठाशी उभे राहून खाली पाण्यात, किनार्‍यावर बघायला लागलो. वाटलं, आपला हेक्टर डॉल्फिन्सचा स्टॉप आला की काय. पण बोटवाला खाली नव्हे तर वर पाहायला सांगत होता. अक्षरशः अंगावर येणारा तो अजस्त्र खडक म्हणजे कैक वर्षांपूर्वी साचलेला लाव्हारस होता. ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांमुळे त्याचे एकावर एक असे ३-४ तरी जाड थर साचलेले होते. त्या थरांच्या मधल्या सीमारेषा अगदी स्पष्ट दिसत होत्या.

akaroa-2.jpg
...

akaroa-3.jpg

दोन थरांच्या वयातलं अंतर किती असेल कोण जाणे; एकूण ती रचना तयार होऊनच लाखो वर्षं झालेली; पण सर्वात वरचा थर सर्वात तरूण आणि अगदी खालचा सर्वात म्हातारा, म्हणून दोन्हींत पटकन काही फरक करता येतो का असं पाहायचा प्रयत्न केला; पण जमलं नाही. हलणारी बोट, असह्य बोचरा वारा, ही कारणंही होतीच.
आम्ही त्या २ किमी फटीच्या जसजसे जवळ जात होतो, तसतसा वार्‍याचा वेग अचाट होत होता. हा पॅसिफिक समुद्रातला ‘roaring forties’चा प्रदेश आहे हे बोटवाल्याकडून कळलं आणि वार्‍याने त्रासलेल्या आमच्या चेहर्‍यांचा अचानक ट्रान्सफर-सीन झाला.
बोटीत एक पामेरियन-टाईप दिसणारं कुत्र्याचं पिल्लू होतं. बोटीवरच्या कर्मचार्‍यांसारखाच एक गणवेश त्या पिल्लालाही घातलेला होता. म्हटलं, जरा अतीच लाड त्या पिल्लाचे. पण तसं नव्हतं. ते पिल्लू म्हणजेही ‘क्रू’चा एक भागच होतं. कसं? कारण डॉल्फिन्स जवळ आले की त्यांचं आपांपसांतलं कम्युनिकेशन या पिल्लालाही समजणार होतं. बोटवाल्याच्या म्हणण्यानुसार ते पिल्लूच आपल्याला डॉल्फिन्स कुठे असतील ते सांगणार होतं. आणि तसंच झालं. इतका वेळ उगीच इकडे तिकडे करणार्‍या त्या पिल्लाचे कान अचानक ताठ झाले. अचानक कुठल्यातरी कामगिरीवर निघाल्यासारखं ते हुशारीनं कशाचा तरी वेध घ्यायला लागलं; बोटवाल्यानं आधी सांगून ठेवलेलंच होतं, पाण्यात डॉल्फिन्स शोधू नका; त्यापेक्षा पिल्लाकडे लक्ष ठेवा. बघताबघता ते पिल्लू वाघ मागे लागल्यासारखं सुसाट वेगाने बोटीवर इकडे तिकडे धावाधाव करायला लागलं. आणि थोड्याच वेळात एकेक करत ते डॉल्फिन्स आमच्या बोटीच्या आसपास दिसायला लागले. आधी एकेकटे आणि मग जत्थ्याने. फिक्या करड्या रंगाचे, तुकतुकीत कांतीचे, बोटीहून अधिक वेगाने पाण्यात पोहत होते; डॉल्फिन-स्पेशल गोलाकार उडी मारत होते.

कैर्‍या आणि बाळकैर्‍या यांच्या आकारात जितका फरक तितकाच आपल्या माहितीचे मोठे डॉल्फिन्स आणि हेक्टर डॉल्फिन्स यांच्यातला फरक. हे चिमुकले आकाराचे डॉल्फिन्स जगभरात केवळ न्यूझीलंडमधल्या अकारोआच्या पाण्यातच दिसतात. इतके छोटेसे, गोंडस ते मासे; त्यांना असा uniqueness जपण्याची खरं म्हणजे काही गरज नव्हती. जगभरात ते जिथे जिथे गेले असते तिथे सगळीकडे त्यांच्यावर spotlight पडलाच असता; पण तरी त्यांचं आपलं अकारोआ एके अकारोआ! त्यांच्यासाठी आमच्यासारख्यांना जीव मुठीत धरून दोन-अडीच तासांचा बसप्रवास करायला TripAdvisor नं भाग पाडलं होतं...

यानंतर तीनच दिवसांनी आम्ही हॉकिटिकातले ग्लो-वर्म्स पाहणार होतो; बाकी कशाच्याही आधी TripAdvisor ला ‘5-star rating’ देणार होतो. गंमत म्हणजे आम्ही पाहिलेल्या या तीन Unique to NewZealand गोष्टींपैकी एकाचेही धड फोटो आम्हाला काढता आले नाहीत. पण त्या गोष्टी होत्याही तशाच; हौशी फोटोग्राफर्सना सहजी कॅमेरात पकडता न येणार्‍या...

----------

भूगर्भीय हालचाली म्हटलं की एकतर वज्रेश्वरी-गणेशपुरीची गरम पाण्याची कुंडं आठवतात; किंवा मग थेट कुठलातरी (प्रत्यक्ष न पाहिलेला) जागृत ज्वालामुखी. मध्यंतरी इंडोनेशियातल्या एका जागृत ज्वालामुखीच्या पर्यटनावरचा एक लेख वाचनात आला होता. तो वाचून ते ठिकाण तेव्हाच माझ्या विशलिस्टमध्ये आलेलं होतं. गरम पाण्याची कुंडं लहानपणी पाहिलेलीच होती. त्यामुळे एकदा इंडोनिशियाला एक फेरी केली, म्हणजे चारधामच्या चालीवर भूगर्भीय हालचालींचं द्विधाम पूर्ण झालं असं समजायला हरकत नाही असं मनोमन ठरवून टाकलेलं होतं. पण मग न्यूझीलंडच्या रोटोरुआनं खांद्यावर टॅप करून ‘शुक...शुक’ केलं, आणि सांगितलं, ‘हमारे जैसे भी खडे हैं राहों में...’

रोटोरुआच्या एअरपोर्टवर विमानातून बाहेर पाऊल टाकलं आणि एक वेगळाच वास नाकात शिरला. म्हटलं तर त्याची नोंद घेतली गेली; म्हटलं तर नाही. १०-१५ वर्षं गुजराथच्या अत्यंत प्रदूषित औद्योगिक पट्ट्यात राहिल्यानं अशा वेगळ्या वासाची नाकाला इतकी सवय झाली आहे, की तो वास आल्यावर आधी गुजराथचीच आठवण आली. गुजराथइतका तो वास तीव्र नसल्यानं त्याकडे लगेच दुर्लक्षही झालं.
हॉटेल चेक-इन, आय-साईट, गारठा, बोचरा वारा सगळं झालं. आय-साईटजवळच्या मोठ्या तळ्याच्या काठी (Rotorua Lake) निवांत अर्धा-पाऊण तास फिरलो. आमचं हॉटेल तसं ‘रिहाईशी इलाक्या’तच होतं. आसपास टुमदार बैठी घरं, छोट्या आखीवरेखीव गल्ल्या; बहुतेक घरांच्या परसदाराच्या नाहीतर पार्किंगच्या एका कोपर्‍यात एक-एक उंच, बारीक पाईप उभा केलेला दिसत होता. त्यातून मंदशी वाफ बाहेर पडताना दिसत होती. वाटलं, त्यांची एक्झॉस्टची नाहीतर सेंट्रल हीटिंगची काहीतरी पारंपरिक पद्धत असावी.

निघण्यापूर्वी आम्ही रोटोरुआच्या रकान्यात एकूण ३ गोष्टी टाकल्या होत्या. माओरी शो आणि डिनर, ते पुईया (Te Puia) आणि वाय-ओ-तापू (Wai-O-Tapu). पैकी माओरी शो तर पाहियातच पार पडला होता. (वायटॉमोचा पत्ता आधीच कट झालेला होता.) उरलेल्या दोन्ही गोष्टी geo-thermal activities च्या नावाखाली येत होत्या. म्हटलं, चला, गरम पाण्याची किवी-कुंडं बघून येऊ; काहीतरी वेगळं असलं तर मजा; नसलं तरी आपल्याकडे दिसते तशी बजबजपुरी तिथे नक्की नसणार. पण ते ठिकाण ‘गरम पाण्याची कुंडं’ यापलिकडेही एकदम भारी निघालं. गंमत म्हणजे, प्लॅनिंगदरम्यान geo-thermal activity ही कॅटेगरी एकदा कळल्यावर आणि तिथे जाण्याचं नक्की केल्यावर त्याबद्दल TripAdvisor वर आम्ही आणखी फारशी काही शोधाशोध केलेली नव्हती. थोडक्यात रोटोरुआला पोहोचल्याच्या दुसर्‍या दिवशी दुपारच्या टळटळीत ऊन्हात ते पुईयाच्या तिकीट खिडकीशी आम्ही जाऊन धडकलो तेव्हा आमच्या पाट्या बर्‍यापैकी कोर्‍याच होत्या.

तिथे दोन पर्याय होते - ‘फुल डे पास’ आणि ‘छोटी गाईडेड टूर+फ्री टाईम’. तेव्हा दुपारचा १ वाजून गेलेला होता; त्यामुळे पूर्ण दिवसाच्या पासमध्ये पैसे घालवणे पटेना. म्हणून मग दुसरा पर्याय निवडला. गाईडेड टूर साधारण ३०-४० मिनिटांची होती. पैकी अर्धा अधिक वेळ माओरी संस्कृती, कोरीव कामाचा स्टुडिओ इत्यादी पाहण्यात गेला. पण ती गाईड अगदी बोलघेवडी होती; रंगवून रंगवून माहिती सांगत होती. ते सगळं पाहत, फिरत असताना मधूनच लांबवरची एक गोष्ट सारखं लक्ष वेधून घेत होती. लांब हिरवाईच्या पार्श्वभूमीवर ओसाड, रखरखीत पृष्ठभागातून एकगठ्ठा वाफा बाहेर पडताना दिसत होत्या. पण गाईडच्या मागेमागे फिरताना बघताबघता ते दृष्य नजरेआड होत होतं.

pohutu long shot_compressed.jpg

३-४ वेळा असं झाल्यावर मला राहवेना. मी गाईडचं बोलणं अडवून आणि त्या ठिकाणाकडे बोट दाखवून तिला विचारलं- ‘आपण तिथे जवळ जाणार आहोत का?’ हे म्हणजे असं, की हॉटेलात आपण ऑर्डर केलेले पदार्थ आपल्यासमोर येतात आणि तेवढ्यात शेजारच्या टेबलावर त्याहून वेगळं, काहीतरी इंटरेस्टिंग दिसतं आणि आपल्याला वाटतं, ते काय आहे, ते घेऊ या... ‘अफकर्स, वी आऽऽ गोइंग दीअऽ’ ती खणखणीत माओरी टोनमध्ये म्हणाली (Of course, we’re going there.) आणि शेजारच्या टेबलावरचं सिझलर मला एकदम माझ्या पुढ्यात येत असल्याचा भास झाला.
आणि अखेर गाईडेड टूरची शेवटची ५-१० मिनिटं त्या गाईडनं आपला मोहरा त्या वाफाळत्या ठिकाणाकडे वळवला. त्याचं नाव पोहुटू गीझर्स. (Pohutu Geysers) आखीवरेखीव वाटेवरून आम्ही त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो. तिनं त्याची प्राथमिक माहिती सांगितली आणि आमचा निरोप घेतला. आता त्या परिसरात आमचे आम्ही फिरायला मोकळे होतो.

रुक्ष, ओसाड, वाळवंटी भासणारा परिसर; ओबडधोबड अग्निजन्य खडकांचे गठ्ठे इकडेतिकडे विखुरलेले; ठिकठिकाणाहून वाफा बाहेर पडताना दिसत होत्या. त्या सर्व वाफाळ्यांचा दादा म्हणजे तो पोहुटू. दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा गीझर. त्याची शेजारी शेजारी दोन तोंडं असावीत. दोन्ही तोंडं फुरफुरत, फुसफुसत होती. कोण अधिक वाफ सोडतं, अशी दोघांच्यात स्पर्धा लागलेली. पण त्यांच्यात mutual understanding होतं. गाईडच्या सांगण्यानुसार, दोन्ही तोंडं आळीपाळीने साधारण दर अर्ध्या तासांच्या अंतराने erupt होणारी होती. ‘Erupt’ शब्द ऐकल्यावर परत तीच द्विधाम-सिच्युएशन आली. आपल्या दृष्टीने erupt होतो तो केवळ ज्वालामुखी; पृथ्वीच्या पोटातून उसळून वर येण्याचा हक्क केवळ लाव्हारसालाच! पण जगात अनेक ठिकाणं अशीही आहेत की जिथे तो स्वतः न येता आपल्या भालदार-चोपदारांना पाठवतो; ते पुईया हे ठिकाण असंच त्या भालदार-चोपदारांचं आहे.

pohutu-start_compressed.jpg

आणि कसले भारी होते ते भालदार-चोपदार. येण्याची वर्दी दिल्यासारखे अधिकाधिक वाफा सोडत होते. त्या तोंडांच्या भागात अग्नीजन्य खडकाचा एक मोठा गठ्ठा होता; त्याच्या भोवतीनं लाकडी कुंपण घातलेलं होतं. कुंपणालगत हळूहळू पर्यटक गोळा होत होते. आम्हीही त्या गर्दीत घुसलो. कुंपणापलिकडचा खडक अगदी समोर, हाताच्या अंतरावर होता. मला एक असं नेहमी वाटतं बरं का, की जे ठिकाण बघायला गेलो आहोत, तिथल्या दगडा-खडकांना आपण किमान स्पर्श तरी करायला हवा; तिथल्या नदी-समुद्राच्या पाण्यानं पावलं भिजायला हवीत; तिथल्या डोंगरवाटांवरची माती हातापायांना, कपड्यांना लागायला हवी; त्याशिवाय त्या जागेचा संपूर्ण फील आल्यासारखा वाटतच नाही... या यादीत आपण ताजा ताजा अग्नीजन्य खडक हा ‘आयटेम’ही टाकावा असा मात्र कधी विचारही केलेला नव्हता. इथे तो अवचितपणे अगदी समोर आला होता; पण हात लांब करून त्याला स्पर्श करण्याची हिंमत होईना. कुंपण होतं ते एक झालंच; शिवाय त्या गठ्ठ्याच्या मिळेल त्या फटीतून, दिसेल त्या बारीकशा वाटेनं वाफा येत होत्या. पोहुटू-वाफांच्या पुढे त्यांचं अस्तित्व तसं नगण्यच म्हणायचं; पण तरी ‘संत श्री ज्ञानेश्वरान्‌ परमिट दिलेलें आहें ऽऽ’च्या चालीवर त्या डँट के आपलं असणे दाखवून देत होत्या. नीट कान दिले, तर तिथे ‘पोहुटू असेल दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठाऽऽ, पण म्हणून आम्ही खडकातून बाहेर येऊच नये की काऽऽय!’ हे स्वच्छ ऐकू येत होतं. इतकी ऊष्णता पोटात घेऊन असलेला तो खडक चांगला सणसणीत गरम असणार हे ओघानं आलंच. वार्‍याची झुळूक आली की खडकाच्या दिशेनं जरा गरम हवेचा झोतही जाणवत होताच. त्यामुळे मी त्याला हात लावण्याचा प्लॅन रद्द केला.

इकडे मी गरम दगड वगैरे विचार करत होते आणि पलिकडे त्या गठ्ठ्यालगतच्या एका निळ्याशार छोट्या तळ्यात (The Blueys) दोन बदकं निवांत पोहत होती! इतकी कमाल वाटली ते पाहून. त्या बदकांकडे मी ज्या नवलाईनं पाहिलं, त्याच नवलाईनं पुढे Queenstown Lake च्या हाडं गोठवणार्‍या गार पाण्यात मजेमजेत डुंबणार्‍या चिल्ल्यापिल्ल्यांकडेही पाहिलं. ते पाणी हाडं गोठवणारं होतं, ते आमच्यासाठी; त्यांच्यासाठी ती lovely, gorgeous weather मध्ये केलेली धमाल होती. त्या बदकांसाठीही तो just another day होता. त्यांना ना त्या वाफांशी काहीही देणंघेणं होतं, ना तिथल्या H2S च्या वासाशी.
गीझर्समधून बाहेर येणारं पाणी त्या तळ्यात साठतं, खालच्या पत्थराच्या फटींमधून पुढे निघून जातं, त्या पाण्यातली मिनरल्स मात्र तळ्यात साचून राहतात, त्यांच्यामुळेच तळ्याला तसा रंग आला आहे, असं तिथल्या एका माहितीफलकावर लिहिलेलं होतं. पुरातन काळात माओरी लोकांचं हे स्नानाचं ठिकाण होतं. गीझर्समधून बाहेर पडणार्‍या ऊष्णतेवर, गरम पाण्यावर अन्न शिजवलं जायचं. आधुनिक काळातही (६०-७० च्या दशकात, बहुतेक) रोटोरुआच्या नागरिकांनी ठरवलं की आपणही त्या ऊष्णतेचा वापर करून घ्यायला हवा. मग ते पुईयापासून उष्णतावाहक पाईप्सचं जाळं शहरात नेण्यात आलं. काही काळ ते चाललं. त्याचा परिणाम असा झाला, की पोहुटूचा दमसास कमी पडायला लागला. एकीकडे त्याच मिनरल्समुळे वगैरे पाईप्स खराब व्हायला लागले. काही वर्षांतच ती सगळी सिस्टीम गुंडाळावी लागली. आणि मग पोहुटू परत एकदा पहिल्यासारखा जोमानं जोर-बैठका काढायला लागला.

... आता पोहुटू-वाफांचा वेग वाढला होता; वाफांबरोबर थोडंथोडं पाणीही उसळायला लागलं होतं. दिवाळीतली झाडं कशी फुलबाजीनं पेटवली की आधी काही सेकंद एकाच ज्योतीनं भसाभस जळतात आणि मग त्यातून कारंज्यासारख्या ठिणग्या उडायला लागतात, तसाच प्रकार होता तो. वाफांचा जोर जसजसा वाढायला लागला, तसतशी जमिनीखालून एक मंदशी पण अखंड घरघर ऐकू यायला लागली. आमच्या आसपासची गर्दीही वाढायला लागली होती. वाटलं, हे सगळं जराशा उंचीवरून पाहता यायला हवं. आसपास पाहिलं, तर आम्ही उभे होतो त्याच्या मागेच ४-६ पायर्‍या चढून जाऊन एक खुली कॅफेटेरियासारखी जागा दिसत होती. आम्ही लगेच गर्दीतून बाहेर पडून तिथे जाऊन उभे राहिलो. आणि तेच बरं झालं; तिथून आसपासचा बराच परिसर एका नजरेत दिसायला लागला. आता जमिनीखालची घरघर, खळबळ अधिक जोरानं ऐकू यायला लागली. पायांनाही ते जाणवायला लागलं. आणि बघता बघता पोहुटूच्या दोन तोंडांपैकी कुठलंतरी एक भसाभस पाणी बाहेर फेकायला लागलं. केवढी ताकद होती त्यात! बाहेर आलेलं पाणी सरळ उंच आकाशात भिरकावलं जात होतं; त्याच्याबरोबर वाफांचे लोळच्या लोळ उठत होते. त्यावेळी आकाश स्वच्छ होतं; पण अध्येमध्ये ढगांचे दाट पुंजकेही दिसत होते. पोहुटूच्या दाट, पांढर्‍या वाफा वरवर जायला लागल्या की नजरेनं त्यांना फॉलो करायचं; बघताबघता त्या ढगांच्या पुंजक्यातल्या एक होऊन विरून जायच्या; नजरेच्या टप्प्यात वाफा कुठे संपत होत्या आणि ढग कुठे सुरू होत होते, ते कळतंच नव्हतं... हा नजरखेळ करत मी बराच वेळ उभी होते. दरम्यान जमिनीखालचा आवाजही खूप वाढला होता. विमान रन-वेवर धावायला लागल्यावर येतो तसा तो आवाज वाटत होता. पोहुटू आता पूर्ण जोमानं उसळत होता. त्याचं पाणी ३० मीटर उंचीपर्यंत उसळतं म्हणे.

pohutu-full_compressed.jpg

या सगळ्या गोष्टी जशा एका मागोमाग सुरू झाल्या तशाच एकामागोमाग एक कमी कमी होत गेल्या. पुन्हा सगळं जरा थंडावलं. मग आम्ही तिथून हललो. तिथून पुढची पायवाट वर चढत होती. ती दिशा पकडली. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना कुंपण होतं; कुंपणाच्या पलिकडे वेगवेगळ्या आकाराचे, खोलीचे क्रेटर्स; कुठे करड्या मातकट मातीतून वाफा येत होत्या; मध्येच एखादा खडक हिरवट नाहीतर लालसर रंगाचा झालेला; कुठे दलदलीसारखं दिसणारं काळपट पाणी वाहत होतं; एका खड्ड्यात एकदम मऊशार चिखल खदखदत होता. हा Rotorua Mud ब्यूटी आणि स्किन-केअर इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे, म्हणतात. त्याच्यावर काही प्रक्रिया करून सुपरमार्केट्समध्ये तो विकायला ठेवलेला दिसला. आपल्याकडच्या मुलतानी मिट्टीचंच हे किवी भावंडं म्हणायला हवं. छोट्याशा गोलाकार खड्ड्यांमध्ये खळखळ उकळणारं पाणी तर जिथे तिथे होतं. क्रेटर्सच्या भोवताली खुरटी झाडं होती. त्यांची पानंही मिनरल-डिपॉझिट्समुळे गंज लागल्यासारखी लालसर दिसत होती. म्हटलं तर परिसरावर एक अवकळा आलेली; पण ते होतं सगळं नैसर्गिकच, त्यामुळे नवलाचं. दूर क्षितीजावर हिरव्यागार उंच डोंगररांगा, मग जरा कमी उंचीच्या टेकड्या, त्यांच्यावर जरा विरळ झाडी आणि त्या पार्श्वभूमीवर हा ओसाड परिसर, सगळं एकाच दृष्टीक्षेपात. ती हिरवीगार झाडंही पृथ्वीच्या पोटातूनच वर आलेली, हे पोहुटूही तिथलेच, The Blueys चा निळा रंग तिथलाच आणि H2S ही तिथलाच.

तो H2S हुंगत हुंगत पायवाट जिथपर्यंत जात होती तिथवर वर वर चालत गेलो आणि परत फिरलो. आता परत एकदा पोहुटूच्या उसळण्याची वेळ झाली होती. त्याच्यासमोरच्या कुंपणापाशी आता फारसं कुणी नव्हतं. मी तिथे जाऊन उभी राहिले. पोहुटू परत एकदा जोमानं उसळायला लागला. त्याचवेळी जोरात वाराही वाहत होता. आणि वार्‍याबरोबर त्या पाण्याचे मस्त तुषार एकदम अंगावर आले. गरम खडक को मारो गोली, दस्तुरखुद्द पोहुटूचं पाणीच अंगावर उडलं होतं. अजिबात अपेक्षित नसताना त्या जागेचा संपूर्ण फील येण्यासाठीची माझी अट पोहुटूनं सुफळ संपूर्ण केली होती. मेरा बस चलता, तो हातावरचे, चेहर्‍यावरचे ते ‘मिनरली’ तुषार मी जसेच्या तसे घरी घेऊन आले असते. पण ते काही शक्य नव्हतं.

हॉटेलवर परतलो, तर हॉटेलच्या पार्किंगच्या एका कोपर्‍यातही एक उंच पाईप उभा केलेला दिसला. त्यातूनही मंदशी वाफ बाहेर पडताना दिसत होती. आता पोहुटूमुळे ट्यूब पेटली, की ती एक्झॉस्टची नाहीतर सेंट्रल हीटिंगची पारंपरिक पद्धत वगैरे नव्हती; तर तिथल्या घरांच्या, आमच्या हॉटेलच्या लगेच खालीही पृथ्वी उकळत होती; त्या वाफेला बाहेर पडता यावं म्हणून केलेली ती सोय होती. क्षणभर त्या विचाराने थरारल्यासारखं झालं. त्या पाईपांमधून येणार्‍या वाफेकडे तिथली माणसं सतत लक्ष ठेवून असतील का? वाफांचं प्रमाण वाढलं तर ती त्यांच्यासाठी चिंतेची बाब असेल का? त्यांच्या स्थानिक ‘वेदर फोरकास्ट’मध्ये त्या वाफांचाही उल्लेख होत असेल का? होत असेल सुद्धा; कोण जाणे...

----------

रोटोरुआत येऊन ३६ तास उलटले होते. वातावरणातल्या H2S ची नाकाला कधी सवय झाली कळलंही नव्हतं. आता आम्ही निघालो होतो वाय-ओ-तापूला. हे त्या भागातलं आणखी एक नैसर्गिक नवलाईचं ठिकाण - Geothermal Wonderland. रोटोरुआपासून बसनं साधारण तासाभराचा निसर्गसुंदर रस्ता होता. प्रत्यक्ष ते ठिकाण पुन्हा उजाड, रुक्षच. अशा ठिकाणी एखादं पर्यटनस्थळ असेल असा आपण विचारही करणार नाही. ते पुईयाच्या तुलनेत हा परिसर बराच विस्तीर्ण होता. आत साधारण २५-३० व्ह्यू-पॉईंट्स असलेला मोठा ट्रेल होता. रिसेप्शनपाशी त्याचा नकाशा मिळत होता. नकाशाच्या मदतीनं आपल्याला वाटेल तितका वेळ तिथे रमतगमत फिरता येत होतं.

devil's bath_compressed.jpg

ते-पुईयाचा ‘B/W Show’ म्हटला, तर इथे एकदम ईस्टमनकलर मामला होता. भडक पोपटी-हिरव्या रंगाचं एक तळं (Devil’s Bath), एका तळ्यात हॉट चॉकोलेटसारखं दाट, गरम पाणी, त्याचं नाव Devil’s Inkpot! पोपटी पाण्यात आंघोळ करणार्‍या डेव्हिलनं पेनातली शाई मात्र अगदी नेमस्त रंगाची निवडली होती. कुठे Inferno crater, कुठे Bird’s Nest Crater, अशा ठिकाणी पक्षी घरटं बांधूच कसं शकतील असा विचार करेपर्यंत त्या क्रेटरच्या करड्या आणि कोरड्या पार्श्वभूमीवर आतून एक काळा पक्षी उडत बाहेर आला. आता काय बोलणार त्यावर! निसर्गापुढे हात टेकावे लागतात, ते असे! एक उकळता Oyster pool दिसला. एका तळ्यात मध्यभागी ‘हे १०० डिग्रीचं पाणी आहे बरं का, हात घातलात तर कातडी जळेल’ असा इशारा देणारी लाकडी पाटी दिसली. वाफा आणि ऊष्णता याशिवाय आसपास काहीच नसताना तिथे कोण मरायला हात घालणार! मध्येच उंच Alum Cliffs होते. मळकट हिरवट पिवळ्या रंगाच्या Sulphur Caves तर तोंडी लावायला जिकडेतिकडे होत्या. पण सर्वात भारी होते, Artist’s Palette आणि त्याच्या शेजारचा Champagne Pool!

शँपेन पूल :

champagne pool_compressed.jpg

आर्टिस्ट्स पॅलेट :

artist's pallete_compressed.jpg

या रंगांनाही कारणीभूत होती अशी कुठली कुठली खनिजं नाहीतर मिनरल्स! या दोन्ही तळ्यांच्या मधून चालत जाण्यासाठी छोटासा लाकडी पूल होता. पुलावर उभं राहून खाली वाकलं तर अगदी सहज पाण्यात हात घालता आला असता. माझे हात थोडा वेळ शिवशिवले सुद्धा... पण ते पाणी इतकं गरम दिसतच होतं, की हात घालणे शक्यच नव्हतं. (माझ्यासारख्या शिवशिव्यांसाठीच आधीची ती इशारा देणारी पाटी लावली गेली असणार, हे उघड होतं.)
अत्यंत रुक्ष, ओसाड, भकास वाटणार्‍या परिसरातली झाडं-झुडुपंही तशीच साजेशी होती. मनुका, कनुका आणि मिंगीमिंगी (Manuka, Kanuka, Mingimingi) या तीन जातीची shrubs तिथे सर्वाधिक आढळतात असं कळलं. पैकी मनुका झुडुपाला फुलंही येत असावीत. कारण ऑकलंडपासून सगळीकडच्या दुकानांमध्ये Manuka Honey विकायला ठेवलेला दिसला.
पाय दुखेपर्यंत त्या ट्रेलचा मार्ग फॉलो करत फिरलो. एक डोळा घड्याळावरही ठेवून होतो. कारण बस-ड्रायव्हरनं एक वेळ दिली होती; आणि जवळपास एक धमकीही दिली होती, की त्या वेळेच्या पुढे मी फारफार तर १० मिनिटं थांबणार, मग सरळ निघून जाणार. त्यामुळे निमूटपणे त्या वेळेच्या आधी पाच मिनिटं रिसेप्शनपाशी परतलो. रिसेप्शनपाशी सुंदर गुलाबी फुलांच्या दोन मोठ्या कुंड्या होत्या. आलो तेव्हा त्याकडे लक्षही दिलं नव्हतं. पण आत ३-४ तास नजरेला केवळ रखरखाट दिसला होता; त्या पार्श्वभूमीवर गुलाबी रंगांची फुलं प्रथमच पाहत असल्यासारखे त्या फुलांचे लगेच फोटो-बिटो काढले गेले.

वाय-ओ-तापूमध्ये एक ‘Lady Knox’ नावाचा गीझर आहे, तो दररोज सकाळी १०:१५ वाजता उसळतो असं कळलं होतं. अशी ठराविक वेळ कळल्यामुळे आम्ही ठरवून तिथे गेलो नाही. आदल्या दिवशी ते पुईयातली पोहुटूजवळची गर्दी पाहता तिथेही गर्दी होणार हे उघड होतं. आणि पोहुटू तर दिवसभर परत परत उसळणारे; ती ‘लेडी नॉक्स’ सकाळी एकदाच तोंड दाखवणार म्हटल्यावर तर तिथल्या गर्दीत न जाणे हेच शहाणपणाचं वाटलं.

रोटोरुआतली ही दोन ठिकाणं पर्यटनाच्या लौकिक व्याखेत न बसणारीच; ती पाहिली आणि ‘There’s no such thing as लौकिक व्याख्या; ज्यानं त्यानं आपापल्या व्याख्या बनवाव्यात, त्या विस्ताराव्यात’ हे ज्ञानही पदरात पाडून घेतलं.
तो geothermal प्रभाव असा, की पुढे बरेच दिवस रस्त्यात साचलेलं वगैरे पाणी दिसलं की ‘अरे, हे उकळत का नाहीये’ असं पटकन वाटून जायचं...

----------

Cut to हॉकिटिका...

‘आधी हॉकीटिका गॉर्ज बघायला जाऊ या... आज त्याचा रंग अगदी अप्रतिम दिसतो आहे...’ ड्रायव्हर काकूंचं हे वाक्य ऐकून जरा प्रश्नच पडला. ‘आज’ म्हणजे? रोज त्याचा रंग वेगवेगळा असतो का? त्या रोजच्या पर्यटकांना हेच सांगत असण्याची शक्यता अधिक होती. पण हरकत नव्हती; त्यांच्या कामाचा तो एक भाग म्हणून सोडून दिलं. काकू मस्त गप्पीष्ट होत्या. मुळात त्या स्वतः टोटल ‘संतूर काकू’ होत्या. त्यांच्या बोलण्यातून त्यांची चिल्लीपिल्ली नातवंडं असल्याचं कळलं होतं. पण त्यांच्याकडे पाहून तसं अजिबातच वाटत नव्हतं. मी अगदी मनापासून त्यांना तशी काँप्लिमेंट दिली. त्या गेली १० वर्षं हॉकिटिकात पर्यटकांना फिरवून आणायचं काम करत आहेत. ड्रायव्हिंग पण अगदी झोकात करत होत्या.

त्यांच्याशी गप्पाटप्पा करत, तिथली अगदी करकरीत कंट्री-साईड न्याहाळत साधारण अर्ध्या तासात गॉर्जपाशी पोहोचलो. गाडीतून उतरता उतरता लक्षात आलं की रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती. ‘छत्री नाही का? नसायचीच...’ असा चेहरा न करता काकूंनी आम्हाला गाडीच्या सीटखालची एक छत्री काढून दिली. जोडीला सँडफ्लाईजपासून बचाव करण्यासाठी म्हणून एक लोशन लावायला दिलं. न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडमध्ये, त्यातही पश्चिम किनारपट्टीवरच्या मिलफर्ड साऊंड परिसरात फिरताना या सँड फ्लाईजचा त्रास जाणवतो असं निघण्यापूर्वी नेटवर वाचलं होतं. तिथे जाण्यापूर्वी ते रिपेलण्ट विकत घेण्याचं ठरवलंही होतंच. त्यामुळे काकूंच्या हातातून ती बाटली घेऊन मी त्याच्या लेबलचा फोटो काढून ठेवला. म्हटलं, पुढे उपयोग होईल. बाटली उघडून ते लोशन चेहर्‍याला आणि हातांना फासलं. तर ते चक्क निलगिरी तेलासारखं काहीतरी निघालं! आपल्या नेहमीच्या पाहण्यातला मेडिकल स्टोअरवाला एखाद्या दिवशी अचानक मल्टिप्लेक्समध्ये दिसला तर आधी आपल्याला प्रश्न पडतो, ‘कोण बरं हा... चेहरा खूपच ओळखीचा आहे’ तसंच झालं. तिथे परदेशातल्या त्या पूर्ण अनोळखी जंगलात चक्क आपल्या निलगिरीचा वास नाकात शिरेल याची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे तो वास कशाचा हे पटकन लक्षातच येईना. असो. तर ते ‘युकॅलिप्टस’च असल्याची काकूंना विचारून खात्री करून घेतली आणि निघालो.
काही पावलं काकू आमच्या बरोबर आल्या, आणि पुढचा रस्ता दाखवून मागे फिरल्या. त्यांनीही परतायची एक ठराविक वेळ दिली आणि ‘उशीर करू नका’ अशी प्रेमळ धमकीही दिली. त्यांचा तात्पुरता निरोप घेऊन वळलो, आणि दूरवर ती अप्रतिम निळ्या रंगाची दुलई अंथरल्यागत गॉर्ज दिसली. काय कमाल रंग होता! नजर ठरत नव्हती.

hokitika gorge long shot_compressed.jpg

आपल्याला पुढे जायचं आहे, ७-८ टप्प्यांचा ट्रेल पार करायचा आहे, हे लक्षात आल्यावर समोरची पायवाट पकडून चालत निघालो. अधूनमधून एखाद्या वळणावर ती निळी दुलई परत दिसायची; दरवेळी आणखी आणखी जवळ येत जाणारी. आणि तो नजरेला शांत करणारा नितळ, निळा रंग! त्याचं काय वर्णन करणार!
ट्रेलचे टप्पे फॉलो करत करत अगदी नदीच्या काठाशी गेलो. शेवटी जरासा रॉकी पॅच होता; पण तिथवर जाऊन त्या निळ्या पाण्याशी न जाता परत फिरायचं हे शक्यच नव्हतं. पाण्यात पाय बुडवायची खूप सुरसुरी आली होती. पण ढगाळ हवा आणि भुरभूर पावसामुळे हवेत खूपच गारठा होता. त्यात बूट काढून पाय भिजवायला नको वाटलं. पण तरी मी पाण्यात हात बुडवून आलेच. पाण्याचा निळा रंग बोटांनाही लागेल की काय असं वाटावं इतका तो सुंदर, पक्का आणि एकसारखा रंग होता.

hokitika gorge_compressed.jpg

तिथल्या एका माहितीफलकावर त्या निळ्या रंगाची ‘रेसिपी’ लिहिलेली होती - ‘दगडांचा भुगा, त्यात चिमूटभर हिम, आणि पुरातन ग्लेशियर्समधली मिनरल्स असं मिश्रण करून ठेवावं. नदीच्या पाण्यात ते सतत मिसळत राहावं. म्हणजे पाण्याला हा रंग येईल.’ घ्या! म्हणजे, ते पुइयाच्या निळ्या तलावाची आणि इथली, दोन्ही रेसिप्या वेगवेगळ्या निघाल्या; पण अंतिम पदार्थ एकसारखा होता. इथला जरा अधिक ‘अहाहा!’ निळा होता. आसपास छान झाडी होती, स्थानिक पक्षी होते, शांऽत वातावरण होतं. नदीही अगदी संथ होती, पण या सर्व गोष्टींवर तो पाण्याचा ‘मिल्की, टरकॉईज’ रंग कडी करत होता. अशा वेळी डोळे भरून पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीही नसतं...

हा मिनरल्सची किमया न्यूझीलंडहून परतल्यावरही पुढे कैक दिवस नजरेसमोरून हटणार नव्हती!

‘नेचर अँड पार्क्स’ थीम ठरवून टूरचं प्लॅनिंग करत असताना ‘काय करायचं नाही’ ते डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे, एखादा बीच-वॉक, एखादा जंगल-ट्रेल करायला मिळाला तरी भरून पावलो, अशी भावना होती. कारण, करायचं नाही असं ठरवलेलं खरंच न केल्याचा आनंद अधिक होणार होता. प्रत्यक्षात या टूरमध्ये आम्ही ११ वॉक्स/ट्रेल्स करू शकलो; आणि त्यांपैकी तब्बल ७ मूळ प्लॅनमध्ये नसलेले, उत्स्फूर्तपणे/ऐनवेळी ठरवून केलेले होते. त्यांतल्या सर्वात आवडलेल्या अनुभवापासून सुरूवात करते...

ते-पुईयाची चार-एक तासांची ‘जिओथर्मल’ रपेट करून जस्ट बाहेर पडलो होतो. तिथून आमचं हॉटेल तसं फार लांब नव्हतं; पण येताना टॅक्सीनं आलो होतो हे कारण काढून टॅक्सीनंच परत जायचं ठरवलं. रस्त्यापर्यंत जाऊन पाहिलं तर टॅक्सी-स्टँड वगैरे कुठे दृष्टीक्षेपात आलं नाही. येताना वाटेतही तसं काही दिसलं नव्हतं. मग सरळ तिथल्या रिसेप्शन डेस्ककडे गेले. तिथे आम्हाला दुपारी माओरी-सैर करवणारी बाई बसलेली होती. तिला म्हटलं, हॉटेलपर्यंत टॅक्सी हवी आहे; बस असेल तरी चालेल, कुठून पकडायची ते सांगा. बस होती, पण तिथून बस-स्टॉप जरा उलट्या दिशेला लांब होता. तिनं तिच्या फोनवरून आमच्यासाठी टॅक्सी मागवण्याचा प्रस्ताव दिला; आम्ही कशाला नाही म्हणतोय. झालं; एक फोन कॉल, आणि ती म्हणाली ५ मिनिटं थांबा, टॅक्सी येतेच आहे. मला प्रश्न पडला, की तिला आम्ही हॉटेलचा नाव-पत्ता वगैरे काहीच सांगितलेलं नव्हतं... तिथे जायला टॅक्सीवाला नाही म्हणाला तर... अशी कशी अर्धवट माहितीवर लगेच टॅक्सी बोलावली... पण मी जरा १-२ सेकंद धीर धरला असता तरी चाललं असतं; कारण ती म्हणाली, तुम्हाला जिथे जायचंय तिथे टॅक्सी नेऊन सोडेल. हे एकदम अनपेक्षित!
तिला थँक्यू म्हणून वळताना तिच्या समोरच्या डेस्कवर काही नकाशे, माहितीपत्रकं ठेवलेली दिसली. तिला विचारून त्यातला एक नकाशा मी उचलला. तो अर्थातच रोटोरुआचा टुरिस्टी नकाशा होता. आपण आत्ता कुठे आहोत, आपल्या आसपास काय आहे ते मी त्यात बघायला लागले. जीपीएसच्या मदतीविना असं छापिल नकाशावर ‘You are here’ ठरवायला मजा येते.

त्या भागातलं आणखी एक प्रमुख आकर्षण होतं, माओरी व्हिलेज, शो आणि माओरी डिनर. पण आम्ही ते सगळं पाहियात करून आलेलो होतो. त्यामुळे मी बाकीचं बघायला लागले. माओरी व्हिलेजच्या आसपास बराच मोठा जंगलाचा, हिरवागार भाग दिसत होता. एव्हाना मला तिथल्या अशा माहितीपत्रकांमध्ये माओरी नावं किती आहेत आणि इंग्रजी नावं किती आहेत हे बघायचा नाद लागला होता; त्यातल्या माओरी नावांचे उच्चार करून बघताना आधी बोबडी वळायची, मग हळूहळू ते मोठाले शब्द मध्येमध्ये कुठे तोडायचे हे लक्षात यायला लागलं होतं. असं सगळं पाहत असताना नकाशात ‘Redwoods Forest Walk’ हे शब्द दिसले. शेजारीच त्याची त्रोटक माहिती देणारे काही icons होते; चालणे, पळणे, सायकलिंग, व्हील-चेअर, इत्यादीसाठी सोयिस्कर; कुटुंबासहित जाऊ शकता; वगैरे. मी घड्याळ पाहिलं तर पाच वाजत आलेले होते. हॉटेलवर परतून आणखी काही करायचं ठरलं नव्हतं. ८:००/८:३० शिवाय अंधार पडत नाही हे देखील आता समजलेलं होतं; त्यामुळे टॅक्सी आल्यावर हॉटेलवर परतायचा बेत पुढे ढकलून टॅक्सीवाल्याला म्हटलं, ‘चलो, रेडवूड्स फॉरेस्ट...’
टॅक्सी ड्रायव्हर (इंडियन नावाचा) फिजीयन होता. (न्यूझीलंडमध्ये आम्हाला बहुतेक सगळे असेच टॅक्सीवाले भेटले.) त्यानं काही चुकीचं ऐकलं, की आमचे उच्चार त्याला समजले नाहीत, कोण जाणे, पण त्यानं तिथून बाहेर पडून २-४ मिनिटांत टॅक्सी एका मोठ्या गेटपाशी आणून उभी केली. तिथे माओरी-शो, माओरी-डिनरच्या जाहिरातींचे मोठाले बॅनर्स दिसत होते. आधी वाटलं, माओरी शो आणि रेडवूड्स दोन्हींसाठी तिथूनच प्रवेश असेल. तरी नकाशावरून केलेला अंतराचा अंदाज आणि आम्हाला लागलेला वेळ याचं गणित काही जुळत नव्हतं. टॅक्सीतून उतरून पैसे देताना ड्रायव्हरला ‘रेडवूड्स फॉरेस्टला इथूनच जायचं ना?’ हे विचारलं. आणि ते बरंच झालं, कारण आता त्यानं ते बरोबर ऐकलं आणि आम्हाला चुकीच्या ठिकाणी आणल्याचं त्याच्या (आणि आमच्याही) लक्षात आलं. मग मी त्याच्यासमोर हातातला नकाशा नाचवला; ‘इथे इथे बैस रे मोरा’ करत त्याला ती जागा दाखवली. त्यानं परत आम्हाला टॅक्सीत घातलं आणि आमच्या अंतराच्या अंदाजाशी साधारण मेळ खाईल इतकं अंतर खरोखर काटून आम्हाला रेडवूड्स फॉरेस्टच्या दारात नेऊन सोडलं.

तिथे नमनाला आधी i-SITE ची एक शाखा दिसली. आणि मला कसं अगदी परिचित ठिकाणी आल्यासारखंच वाटलं. ‘फॉरेस्ट-वॉक’ची माहिती विचारावी म्हणून तिकडे मोहरा वळवला. तर दरवाज्याच्या बाहेरच भिंतीवर संबंधित सविस्तर माहिती असलेला मोठा नकाशा लावलेला होता. मग परत You are here वगैरे करून, नकाशा ट्रेस केला. फॉरेस्ट ट्रेलचे एकूण ६ मार्ग होते. आम्ही त्यातला ३.४ किमी.चा ‘वायटावा वॉक’ (Waitawa Walk) निवडला. त्यासाठीचा कलर-कोड पाहिला. ‘तो रंग फॉलो करा’ असं तिथे म्हटलं होतं. म्हणजे नेमकं काय करायचं ते तिथे उभं राहून कळलं नसतं. मग आम्ही इमानेइतबारे ‘Start here’ची पाटी शोधली आणि चालायला लागलो.
आता हमरस्ता आमच्या मागे होता. त्यावरून धावणार्‍या गाड्यांचे आवाज येत होते. आसपास काही चिल्लीपिल्ली बागडत होती. एका बाजूला तिथे आलेल्यांच्या गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या... इकडेतिकडे बघत जेमतेम शंभर-एक मीटर गेलो असू, आणि आसपासची माफक वर्दळ मागे पडलेली जाणवली; हमरस्त्यावरची वाहनं ऐकू येईनाशी झाली; आजूबाजूची झाडं अधिक सरळसोट आणि मोठाली व्हायला लागली... आम्ही शिस्तीत त्या झाडांच्या, म्हणजे रेडवूड्सच्या जंगलात शिरलेलो होतो. मागे पाहिलं, तर पार्क केलेल्या गाड्या, आय-साईटचं ऑफिस काहीही दिसत नव्हतं. चौफेर नजर फिरवू तिकडे केवळ ती सरळसोट, गगनाला भिडणारी रेडवूड झाडं. तांबूस झाक असलेली, खडबडीत खोडं; आणि वरती उंचावर त्यांच्या फांद्या आणि पानं. जमिनीलगत खोडाचा घेर हा एवढा... आपले दोन्ही हात पसरले तर त्याचा व्यास जेमतेम कव्हर होईल, असा. पायांखाली जरा ओलसर, दमट माती आणि काट्याकुट्या.

IMG_20171109_095245_compressed-COLLAGE.jpg

आणखी एक भारी जाणीव झाली- कानांत आता अवर्णनीय शांतता भरून राहिली होती. दिवसाउजेडी, डोळे मिटून एका जागी उभं राहिलं आणि कानांना कुठला आवाजच आला नाही तर कसं वाटेल? मी शब्दशः तशी उभी राहिले काही सेकंद. इतक्या शांततेचं काय करायचं हे शहरी भारतीयांना सहसा माहितीच नसतं! त्या शांततेला सरावायला मला जरा वेळच लागला. हवा सुखावह गार होती. जंगलाचा ‘calm and quiet’पणा अगदी ‘caaaalmly’ आणि ‘quieeeetly’ आत आत उतरत होता. त्यानंच मला उचंबळून आल्यासारखं झालं. ओळखीतले, नात्यातले जे-जे चेहरे आठवले त्या सर्वांना त्याक्षणी त्या शांततेचं वर्णन करून सांगावं असं अगदी आतून वाटलं. आणि ती शांतता अल्पजीवी नव्हती. जसजसं आत आत जात होतो तसतशी तिची पातळी वरवर जाताना जाणवत होती. मला अशा शांततेचं खूप अप्रूप आहे.
चालताना अधेमध्ये व्यायामासाठी येणारे तुरळक स्थानिक दिसत होते. आपापल्या पाळीव कुत्र्यांना फिरायला घेऊन आलेली काही मंडळी दिसत होती. त्या सर्वांचा मला फार हेवा वाटला.
आमच्या पायवाटेला मधूनच आणखी एखादी पायवाट छेद देत होती. अशा ठिकाणी कलर-कोड्सच्या पाट्या लावलेल्या होत्या. तुमच्या रंगाचा बाण ज्या दिशेला असेल त्या दिशेला जात राहायचं. रोज येणार्‍यांना नंतर नंतर त्या बाणांचीही आवश्यकता भासत नसणार. तशी बाणांची पहिली पाटी दिसली तिथे आपला रंग निळा की जांभळा यावरून आमचा ‘गांधी, की नेहरू, की काहीतरी रोड’टाईप एक संवाद झडलाच. पण दोघांमधल्या अधिक काटेकोर आणि शिस्तशीर भिडूनं चालायला सुरूवात करण्यापूर्वी नकाशाच्या विवक्षित भागाचा फोटो काढून ठेवला होता. त्यानं तो लगेच ‘एक्झिबिट नं. १’ म्हणून सादर केला. त्यावरून आमचा रंग निळा असल्याचं सिद्ध झालं. मग दुसर्‍या भिडूला युक्तिवादासाठी बोलण्यासारखं काही उरलं नाही. Rather, बाण, रंग, दिशा वगैरेंची चिंता तो भिडू करेल या आनंदात दुसरा भिडू अधिकच मुक्तपणे शांतता प्यायला मोकळा झाला.
गंमत म्हणजे, तिथे पक्ष्यांचे आवाजही नव्हते. मुळातच त्या भागात सतत गंधकाचा वास भरून राहिलेला असल्यामुळे इतरत्र किलबिलणार्‍या पक्ष्यांची संख्या तिथे कमी असण्याचीही शक्यता होतीच. वाटेत कुठेकुठे कडेला छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहिलेलं दिसत होतं. तिकडे लक्ष गेलं, की काहीतरी चुकतंय असं वाटत होतं; ‘अरे, हे उकळत कसं नाहीये’ असा प्रश्न पडत होता. दुपारच्या ते-पुईयातल्या फेरफटक्याचा तो परिणाम होता.
मुद्दामहून लागवड करून वाढवलेलं जंगल आहे हे कळत होतं; मात्र कुठेही मानवी हस्तक्षेप नावालाही नव्हता. वाटेत एका झाडापाशी एक पाटी दिसली- The Mary Sutherland Memorial Redwood. २०व्या शतकाच्या सुरूवातीला इंग्लंडमध्ये मेरी सुदरलंड नावाची एक जंगल-अभ्यासक होऊन गेली. जगातली ती पहिली स्त्री जंगल-अभ्यासक होती. तिनं १० वर्षं न्यूझीलंड फॉरेस्ट सर्विसमध्ये काम केलं. त्यापैकी काही काळ ती इथल्या जंगलपरिसरात येऊन राहिली होती. तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ लावलेलं ते झाड होतं. खरं म्हणजे ते सगळे वृक्षच होते; त्यांना झाडं म्हणणे म्हणजे ‘सशाच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्या’च्या उलट जे असेल, ते होतं. त्यांच्या खडबडीत खोडांना अधूनमधून हात लावत, माना वर करकरून त्यांचे शेंडे पाहण्याचा प्रयत्न करत, जमेल तसे फोटो-व्हिडिओ काढत चालत होतो.
अवघ्या पाऊण-एक तासात तो वॉक संपला; पण काय बहार आणली त्यानं!

परतल्यावर आय-साईटला विनंती करून टॅक्सी मागवली. टॅक्सीची वाट पाहत थांबलो होतो, तर समोर अनेक उंच रेडवूड्सना जोडणारा अरुंद आणि जरासा झुलता पूल दिसत होता. जमिनीपासून उंची असेल १०-१५ फूट. काही तुरळक पर्यटक त्यावरून बिचकत बिचकत चालत होते. एका झाडाच्या खाली एक लहानशी लाकडी केबिन दिसत होती. केबिनमध्ये त्या जंगलातल्या स्टाफपैकी एक जण बसलेला होता. मला कुठे राहावतंय; मी तडक गेले त्याच्याकडे आणि त्या ‘ट्री-टॉप वॉक’ची चौकशी केली. Day-walkची वेळ संपत आली होती. पण ‘तुम्ही नाईट-वॉक ट्राय करू शकता’ असं त्यानं सुचवलं. रात्री ८:३० नंतर तो करता येणार होता. It’s very much safe अशी पुस्तीही त्यानं जोडली. क्षणभर त्या कल्पनेनं माझे डोळे चमकले. पण त्यासाठी आम्हाला एकतर आणखी दोन-अडीच तास तिथे वेळ काढावा लागला असता; जवळचं अबरचबर खाऊन जेवणाची वेळ मारून न्यावी लागली असती; (कारण तिथे जुजबी स्नॅक्स मिळत होते आणि त्यातलेही बरेचसे संपत आलेले होते) किंवा मग हॉटेलवर जाऊन, जेवून परत यावं लागलं असतं. यायच्या-जायच्या टॅक्सीचं भाडं अधिक ट्री-टॉप वॉकसाठी भरावे लागणारे प्रत्येकी २०-२५ NZ डॉलर्स अशी सगळी बेरीज केल्यावर मी तो ट्री-टॉप नाईटवॉकचा विचार गपगुमान सोडून दिला. जो फॉरेस्ट वॉक करून आलो होतो तो देखील बरेच दिवस पुरून उरणारा होताच.
असं अचानक नकाशात दिसलं जंगल, ठरवलं आणि गेलो तिथल्या वॉकला, हे मी करू शकेन असं त्याच्या ४ दिवस आधी कुणी मला सांगितलं असतं तर मला ते खरं वाटलं नसतं. पण त्यामागे खरंच ४ दिवसांपूर्वी केलेल्या अशाच आणखी एका वॉकचा कॉन्फिडन्स होता.

----------

Cut to ४ दिवस आधी, पाहिया....
पाहियातल्या (आणि न्यूझीलंडमधल्याही) भटकंतीचा पहिला दिवस. सकाळचा अर्धा दिवस ‘वायटँगी ट्रीटी ग्राऊंड्स’ परिसरात घालवून, जेवण उरकून आता आम्ही ‘ओपुआ फॉरेस्ट लूक-आऊट’ला (Opua Forest Lookout) निघालो होतो.
घरून निघण्यापूर्वी त्या रॉस टेलरच्या इंटरव्ह्यूच्या आगेमागेच कधीतरी नकाशावर मला या ओपुआ जंगलाबद्दल समजलं होतं. ते आमच्या हॉटेलपासून जवळ दिसत होतं. तेव्हाच मनाशी नोंदवून ठेवलं होतं, की जमल्यास/वेळ मिळाल्यास या जंगलात जायचं... आणि आता बहुतेक ते जमणार असं दिसत होतं.
सकाळी हॉटेलवरून चालत येताना ओपुआच्या पत्त्यातल्या ‘स्कूल रोड’ची पाटी कुठेतरी पाहिल्याचं आठवत होतं. तरी आधी i-SITE मध्ये जाऊन चौकशी केली. त्यांनी रस्ता सांगितला; लगेच एक नकाशाही हातात कोंबला; त्यात ओपुआ ट्रेलचे दोन पर्याय मार्क केले- एक १.४ किमीचा आणि दुसरा ५.२ किमीचा. सकाळी आमची बर्‍यापैकी पायपीट झालेली होती. शिवाय टूरच्या पहिल्याच दिवशी वयाला न शोभणारं साहस नको असा मध्यमवयीन विचार करून आम्ही पहिला छोटा पर्याय ठरवून टाकला.
मुख्य रस्त्यावरून त्या स्कूल-रोडवर वळलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी छोटी, टुमदार बंगलेवजा घरं होती. मध्येच ‘स्कूल-रोड’मधल्या स्कूलचं मैदान दिसलं. शाळा सुटलेली होती; मैदानात, शाळेत सामसूम होती. माझा जरा विरसच झाला. नाहीतर मी शाळेतली मुलं, त्यांचे गणवेष, एकंदर तिथली चहलपहल पाहत ५-१० मिनिटं नक्की थांबले असते.
सर्व घरांच्या बाहेर garbage-bags ची बोचकी ठेवलेली दिसत होती. केर-कचरा गोळा करणार्‍या गाडीची वेळ झालेली असावी. बहुतेक घरांच्या बाहेर जुन्या पद्धतीच्या लाकडी पत्रपेट्या दिसत होत्या. प्रत्येक घराबाहेर लहानशी का होईना बाग होती. बागेत पाणी घालण्यासाठी काय सोय आहे, नळांची पद्धत, पाईप कोणते वापरले जातात, अंगणांमध्ये कोणकोणती झाडं-फुलं लावलेली आहेत, कुंड्या साधारणपणे कशा दिसतात, घरांच्या दारांचे-फाटकांचे प्रकार कसे आहेत, अशा बारीकसारीक गोष्टी पाहण्यात मला फारच रस होता; निव्वळ कुतूहल म्हणून, परका प्रदेश जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणून; पण तसं निरखत घरांसमोर उभं राहणे हे अर्थातच बरं दिसलं नसतं. त्यामुळे चालता-चालता जेवढं दिसत होतं तेवढ्यावर समाधान मानत निघाले होते.

IMG_20171106_114233_compressed.jpg

जरावेळाने किंचित चढाचा रस्ता सुरू झाला. आपण गेली दहा-एक मिनिटं हातातला नकाशा रिफर केलेला नाही हे जाणवलं. परक्या देशातल्या भटकंतीच्या पहिल्याच दिवशी इतका निष्काळजीपणा या वयात बरा नव्हे, असं एकमेकांना सुनावत आम्ही तो नकाशा उघडला. नव्याने You are here करून, आता पुढचा लँडमार्क कोणता दिसायला हवा हे नक्की करून पुढे निघालो.
समोरून एक मध्यमवयीन बाई येत होती. रस्ता सरळसोट असल्यामुळे बर्‍याच आधीपासून ती दिसलेली होती. व्यायामाचा पेहराव, कानाला हेडफोन्स; आम्ही नकाशा पाहतोय हे तिनं पाहिलं होतं. आमच्याजवळ आल्यावर तिनं आपणहून हेडफोन्स काढले आणि चौकशी केली : ‘You guys looking for Opua Forest?’ आम्ही ‘हो’ म्हणताच तिनं आपणहून सविस्तर रस्ता सांगायला सुरूवात केली- ‘असंच सरळ जा. एका ठिकाणी कार-पार्किंगची जागा दिसेल. (हे सांगताना तिनं दोन्ही हात पसरले. त्यावरून ती जागा बर्‍यापैकी मोठी असावी असा आम्ही अंदाज केला.) जंगलात शिरायचा रस्ता त्या पार्किंगच्या एका कोपर्‍यात आहे. There’s a small green and yellow signboard. हा रस्ता उजवीकडे वळेल. तिकडे जाऊ नका. माझं घर त्याच रस्त्यावर शेवटी आहे. बरेच जण तिकडे वळतात आणि मग येऊन आम्हाला रस्ता विचारत बसतात.’ शेवटचं वाक्य बोलताना तिनं कपाळाला हात टेकवून वैताग दर्शवला. (तिचा सूर पाहता तिनं घराबाहेर एखादी ‘पाहिया-पाटी’ही लावली असावी.) माणसांची काही-काही gestures जगभरात एकसारखीच असतात, हे किती बरं असतं. तिच्या वैतागाशी मी लगेच कनेक्ट झाले.
तोंडभरून हसत तिला थँक्यू म्हटलं. तिनंही ‘थम्ब्स-अप’ करत Enjoy म्हटलं आणि हेडफोन्स परत कानांवर सरकवत ती निघून गेली. टूरिस्ट-सीझनमध्ये त्या बाईच्या दाराशी घडणारे सीन्स-संवाद इमॅजिन करत पुढची पाच मिनिटं आम्ही जरा टाईमपास केला. आणि ती रस्ता उजवीकडे वळणारी जागा आली. पण ती मोठी कार-पार्किंगची जागा काही दिसेना. शिवाय पार्किंगची जागा म्हणजे तिथे एखाद-दुसरी गाडी तरी उभी असणारच असं आम्ही धरून चाललो होतो. तसंही नव्हतं. तो ग्रीन-अँड-यलो बोर्डही दृष्टीपथात नव्हता.

20171106_185907_compressed.jpg

दोघांमधल्या काटेकोर आणि शिस्तशीर भिडूनं त्या बाईचा ‘उजवीकडे वळू नका’ हा इशारा चक्क नीट digest केलेला नव्हता. त्यामुळे त्या तिठ्याशी जंगलाचा रस्ता पटकन दिसेना म्हणताना त्या भिडूनं ‘गांधी, की नेहरू, की काहीतरी रोड’ हा संवाद सुरू होण्याआधीच उजवीकडचा रस्ता पकडून चालायला सुरूवात केली. दुसर्‍या भिडूची absent-minded म्हणून अधिक ख्याती असल्यामुळे त्याला युक्तीवादाला बोलण्यासारखं काही उरलं नाही; आणि दुसरा भिडूही गपगुमान पहिल्या भिडूच्या मागे चालायला लागला.
तो रस्ता आता आणखीनच चढाचा होता; तशीच दोन्ही बाजूंना घरं, बागा. थोडं चालून गेल्यावर पहिल्या भिडूच्या लक्षात यायला लागलं, की हे काही खरं नाही. तशी कुणकूण लागताच दुसर्‍या भिडूला चेव चढला. मात्र टूरचा पहिलाच दिवस असल्यामुळे भांडणाचा बेत रहित करून दोघं उलटे वळले.
एखादी वस्तू घरभर शोधून मिळाली नाही की परत पहिल्या जागीच व्यवस्थित शोधावी तसं पुन्हा मी तिठ्यापाशी येऊन तो हिरवा-पिवळा बोर्ड शोधायला सुरूवात केली. आणि यावेळी तो सापडला. बुटकासा, अगदी जमिनीलगत तो अगदी एका कोपर्‍यात लावलेला होता. त्या बाईनं बरोबर सांगितलं होतं. मात्र तो कोपरा धरून त्याच्या अलिकडची मोकळी जागा म्हणजे हात पसरून दाखवण्याजोगी मोठी पार्किंगची जागा अजिबातच नव्हती. तिथे जेमतेम २-३ छोट्या cars, त्या देखील कशाबशा पार्क करता आल्या असत्या. ‘पार्किंगची मोठी जागा’ याच्या जगभरातल्या व्याख्या वेगवेगळ्या असतात हे यानिमित्तानं सिद्ध झालं.
हिरव्या-पिवळ्या बोर्डालगत एक बारीकशी पायवाट आत शिरत होती. गोरज मुहूर्तावर त्या पायवाटेने आम्ही अखेर ओपुआ जंगलात शिरलो. गंमत म्हणजे, आधीच्या शोधाशोधीत मी जवळपास तिथपर्यंत जाऊन परत आले होते. तेव्हा बोर्ड शोधायचा होता, त्यामुळे वाटेकडे लक्षच दिलं नव्हतं. ते सगळं आठवून हसायला यायला लागलं. १० मिनिटं उगीच वाया घालवली होती.
गर्द झाडीतून चालायला सुरूवात केली. थोड्यात वेळात पायवाट वर चढायला लागली. एक बारीकसा ओहोळ लागला. झुळझूळ पाणी वाहत होतं. तो पार करण्यासाठी लहानसा लाकडी पूल होता. तो ओलांडला आणि झाडी आणखी गर्द झाली. बाहेर तिठ्याशी लख्ख ऊन असलं तरी जंगलात तुलनेनं चांगलंच अंधारून आलेलं. इथे मला जरा बाकबूक वाटायला सुरूवात झाली. जायचंय का शेवटपर्यंत, पुढे आणखीनच अंधारून येणार, परतताना तर काळोखच होईल, काही साप-सरडे असले म्हणजे, वगैरे नाना शंका-कुशंका यायला लागल्या. TripAdvisor वर तर जंगल एकदम सुरक्षित वगैरे मतं वाचलेली होती. तरी ‘अंदर की आवाज’ स्वस्थ बसू देईना. आम्ही सावकाश चालत, वर वर जात होतो. सुरूवातीलाच पायवाटेच्या कडेला कुठल्यातरी झाडाच्या दोन फांद्या पडलेल्या दिसल्या होत्या. बर्‍यापैकी सरळसोट, बारीक, हातात ठेवण्याजोग्या वजनाच्या. त्या आम्ही उचलून घेतल्या होत्या. चढताना त्या काठ्यांचा सपोर्ट कामी येत होता. एका क्षणी जाणवलं, की हे जरासं ट्रेकिंगसारखं होत चाललं आहे. ही जाणीव भारी होती. त्यामुळे मनातली बाकबूक किंचित मागे पडली.
जंगलात पूर्ण शांतता होती; आणखी कुणी तिथे असेल असं वाटत तरी नव्हतं. चढताना मला बर्‍यापैकी दम लागत होता. त्यामुळे तर शेवटपर्यंत जायचंच हा निश्चय आणखी पक्का व्हायला लागला. जरा वेळाने समोरून एक बाई आणि तिचा कुत्रा येताना दिसले आणि काय हायसं वाटलं. ती आमच्याकडे पाहून हसली, ‘हॅलो’ म्हणाली. १.४ किमी.चं अंतर आहे हे ठाऊक असूनही तिला मी ‘आणखी किती रस्ता आहे?’ असं विचारलं. ती ‘Ohh, just 10 or 15 minutes more...’ असं किरकोळीत म्हणाली आणि निघून गेली. मनात म्हटलं, तुझं काय जातंय किरकोळीत काढायला, तू रोज येत असशील, आम्हाला नाही सवय अशी रोज जंगलात भटकायची...
हपापत, धापा टाकत चढत होते. वाटेत आपापल्या कुत्र्यांना घेऊन आलेली आणि आता परत निघालेली आणखी २-३ मंडळी दिसली. मध्ये एक पॅच पायर्‍यांचा आला. चढाच्या रस्त्यावर पायर्‍यांसारखा महावैतागवाणा प्रकार नाही. १५-२० पायर्‍याच होत्या म्हणून नशीब. त्या चढून गेलो आणि मग जरा सरळ वाट सुरू झाली. गर्द झाडी होतीच; पण आता जरा उंचावर आल्यामुळे की काय, अंधारून आलेलं कमी झालं होतं. झाडांमधून कुठे कुठे ऊन दिसायला लागलं होतं. सपाट वाटेच्या कृपेनं काटेकोर भिडूला दिशा वगैरे ठरवायला थोडासा अवसर मिळाला... म्हणेपर्यंत परत चढ सुरू झाला. एका ठिकाणी वाट झपकन उजवीकडे वळली. तिथे काटकोनात दोन बाक दिसले. बाकांपाशीच आमची वाट संपत होती.
एका बाकावर एक चिनी रंगरुपाची तरुण मुलगी एकटीच बसलेली होती; हातातल्या फोनवर काहीतरी करत होती. बाकाच्या पुढ्यात झाडीतून खाली Paihia-bay दृष्टीस पडत होता.

IMG_20171106_104933_compressed.jpg
.
DSC05371_compressed.jpg

निळं, नितळ पाणी; वरती निळं, नितळ आकाश; फारच झकास दृश्य होतं ते. हीच ती lookout ची जागा असावी हे लक्षात आलं. तिथे एक लाकडी रेलिंग होतं. सर्वात वरच्या लाकडी पट्टीवर कॅलिग्राफी, चित्रकला, खोदकाम, कोरीवकाम वगैरे केलेलं दिसत होतं. काही शब्द, नावं लिहिलेली दिसत होती. सार्वजनिक ठिकाणी असली ग्राफिटी चितारण्याची वृत्ती जगभरात सारखीच असते, असा त्याचा अर्थ होता. (त्यातला एकही शब्द/नाव भारतीय नव्हतं; ते पाहून मला उगीच हायसं वाटलं.) एका बाकाच्या मागे एक खडबडीत उंचवटा होता. त्यावर चढून खालच्या दृश्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण फारसं काही हाती आलं नाही.
तिथे आम्ही आपांपसांत बोलत होतो, समोरचं दृश्य आवाजी दाद देऊन admire करत होतो; फोटो-व्हिडिओ काढत होतो; आमचं हे सगळं सुरू असताना ती चिनी मुलगी फोनवर अखंड काहीतरी ब्राऊज करत होती. फोनच्या स्क्रीनवर हलणारा तिचा अंगठा वगळता ती जराही हललेली नव्हती. इथवर येऊन फोनच बघत बसायचं, तर ते ती खाली समुद्रकिनार्‍यावर किंवा तिच्या हॉटेलमध्ये बसूनही करू शकली असती, असं मनोमन वाटलं. (मनोमन कशाला, हे मी मोठ्यांदा बोलले असते तरी तिला थोडीच कळणार होतं.) बरं, तिच्याबरोबरही कुणी नव्हतं. तिथे एकटीनं येऊन फोन बघत बसावंसं तिला का वाटलं असेल कोण जाणे. आम्ही तिथून निघालो तरी ती जागची हललेली नव्हती. वाट पुन्हा झपकन डावीकडे वळली आणि मी त्या मुलीचा विचार सोडून दिला.
आता उताराचा रस्ता होता. चालायला लागलो. वेग आपोआपच जास्त होता. ‘जमलं तर करू’ म्हटलेली गोष्ट पहिल्याच दिवशी जमवली होती. त्या जाणीवेनंच खूप आनंद झाला होता. शिवाय, ट्रेकिंगचा feel, रस्ता शोधताना आलेली मजा, हा added bonus होता. डोंगरवाटा तुडवायला तर काय मला कायमच आवडतं. मग ते अंतर १ किमी असो, नाहीतर १० किमी! १०-१५ मिनिटांत खाली पोहोचलो. वाटेत परत काही ठिकाणी अंधार अगदी दाटून यायला लागला होता. तासाभरापूर्वी इथून जाताना आपल्याला बाकबूक वाटली होती याचाही आता मला विसर पडला होता.
जंगलातून बाहेर पडून परत ‘स्कूल-रोड’ला लागलो. दुपारी परिसरात सामसूम होती. आता जरा वर्दळ दिसत होती. मुख्य रस्त्याला लागताना समोरून ३-४ बायका येताना दिसल्या; छान कपडे, मेकअप, शूज, पर्सेस; त्यांतून अचानक आमच्या दिशेनं प्रश्न आला, ‘Could you find the road? How was the lookout?’ आधी काही कळेचना, की या बायांना कसं काय समजलं आपण कुठे गेलो होतो. तेवढ्यात ट्यूब पेटली, की दुपारी आम्हाला रस्ता सांगणारी बाईच आताही चौकशी करत होती. मी तिला अजिबात ओळखलं नाही. तिचा दुपारचा अवतार आणि आताचं रूप यात खूपच फरक होता. पण तिनं आम्हाला बरोबर ओळखलं होतं. तिला परत तोंडभरून हसून उत्तर दिलं, थँक्यू म्हटलं आणि हॉटेलचा रस्ता धरला.
७:००/७:३० वाजत आले होते. अजूनही लख्ख उजेड होता. दक्षिण पॅसिफिक समुद्र निवांत पहुडलेला होता. माझ्या मनात मात्र काहीतरी achieve केल्याच्या विचारानं उकळ्या फुटत होत्या...

त्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी Hole in the Rock Cruise करून परत येताना (त्याबद्दलही लिहायचं आहेच.) आमच्या बोटीत काहीतरी किरकोळ तांत्रिक बिघाड झाला. म्हणून बोटवाल्यानं वाटेत एका लहानशा बेटापाशी बोट थांबवली. Paihia bayमध्ये अशी लहान-मोठी मिळून जवळजवळ १०० बेटं आहेत, म्हणे. आम्ही सगळे खाली उतरलो. दुसरी बोट बोलावली होती. ती यायला किमान २०-२५ मिनिटं लागणार होती. ते चिमुकलं बेट झकासच होतं. अर्धा तास तिथेच समुद्रकिनार्‍यावर वेळ काढायला काहीच हरकत नव्हती.

IMG_20171107_040055_compressed.jpg

पण आमच्या बोटीतले काहीजण उतरल्यावर एका दिशेला चालायला लागले आणि जवळच्या टेकडीवर दिसेनासे झाले. मी जरा त्यांचा माग काढला, तर त्या मार्गावर परत एक हिरवा-पिवळा बोर्ड दिसला. Motuarohia Track आणि Way to viewing platform..

20171107_120830_compressed.jpg

आदल्या दिवशीच्या माफक adventure चा हँगओव्हर अजून उतरलेला नव्हताच. मी बोटीवरच्या स्टाफपैकी एका मुलीला माहिती विचारली. तर तो रस्ताही आवाक्यातला आहे, असं दिसलं. त्या जागेला Captain Cook’s Lookout असंही म्हणतात, असं तिच्याकडून कळलं. कॅप्टन कूक तिथून समुद्रावरच्या हालचालींवर लक्ष ठेवायचा म्हणे. आम्ही मग जराही वेळ न दवडता तिला सांगून तडक ती दिशा पकडली. अंतर जास्त नव्हतं; मात्र चढ आदल्या दिवशीच्या तुलनेत खूप होता. शिवाय अर्धा रस्ताभर लाकडी जिने होते. (न्यूझीलंड सेनादलाने १२-१५ वर्षांपूर्वी या पायर्‍या तिथे बसवल्या, म्हणे.)
अधिक हपापत, अधिक धपापत १५ मिनिटांत वर पोहोचलो. आणि वरून जे काही amazing दृश्य दिसलं! प्रचंड वारा होता; गारठा होता; फोटो काढताना हात स्थिर ठेवणे कठीण जात होतं. पण त्या दृश्यानं डोळे जसे निवले त्याला तोड नव्हती. जवळपास २७० अंशातला देखावा पाहता येत होता. १० मिनिटं तिथे थांबलो आणि निघालो.

20171107_114953_compressed.jpg

माफक का होईना, पण Unplanned adventure आणि ते कमालीचं निसर्गसौंदर्य यामुळे मला परत एकदा उचंबळून आल्यासारखं झालं. (खरं म्हणजे, हे पहिलं; रेडवूड्समध्ये उचंबळून आलं ते नंतर होतं.)
तसंच परत ५ मिनिटांत खाली आलो. तोवर दुसरी बोटही आलेली होती. या बेटाचं नाव Roberton Island असं नंतर नेटवर समजलं. मी मात्र ते ‘कॅ. कूक आयलंड’ या नावानंच लक्षात ठेवलंय. आजही ते नाव आठवलं, की मी डोळे मिटते आणि मनानं त्या viewing platform वर पोहोचते. तिथला वारा आजही माझ्या कानांत घुमतो; गारठ्यानं आखडलेली बोटं आठवतात. त्यापेक्षाही ज्या ऊर्मीनं मी ती वाट पकडली ती ऊर्मी परत एकदा शरीरात, मनात जागी झाल्यासारखी वाटते.
त्या ऊर्मीचं अप्रूप मनात कायम जागं राहो अशी माझी इच्छा आहे. 

---------------------

पाहिया, रोटोरुआची भटकंती संपवून वेलिंग्टनला पोहोचलो तोवर अशा आयत्यावेळी ठरवून केलेल्या वॉक्सची जवळपास चटक लागल्यासारखं झालं होतं. वेलिंग्टनच्या वाटेवर असताना नकाशात हॉटेलचा पत्ता वगैरे पाहत होते; तेव्हा हॉटेलपासून जवळच ‘माऊंट व्हिक्टोरिया लूक-आऊट’ नावाचा ट्रेल दिसला. तिथे जायचं हे ओघानं आलंच.
वेलिंग्टनला हॉटेल चेक-इन केलं, i-SITE ची वारी केली, तिथे दुसर्‍या दिवशीच्या ‘झीलँडिया टूर’ची व्यवस्था लावली, तिथून जवळच्याच ‘बेसिन-रिझर्व क्रिकेट ग्राऊंड’मध्ये एक फेरफटका मारला आणि मग माऊंट व्हिक्टोरियाची वाट पकडली.
आमचं हॉटेल आणि आसपासचा रहिवासी भाग एका अर्थानं मा.व्हिक्टोरियावरच वसलेला होता. कारण आम्ही लूक-आऊटच्या दिशेला चालायला लागलो तो चांगलाच चढाचा रस्ता निघाला. जवळपास दहा-एक मिनिटं हाशहुश करत चालत होतो. दोन्ही बाजूंना टुमदार घरं नाहीतर २-३ मजली इमारती दिसत होत्या. पण चढ असा होता की धड फोटो काढायचंही सुचलं नाही.

आमच्या जरा पुढे एक बाई हातात भाजीपाला-वाणसामानाच्या पिशव्या घेऊन चालत होती. रस्त्याच्या शेवटी वस्ती संपून जिथे लूक-आऊटची डोंगरवाट सुरू होत होती, तिथे तिचं घर होतं. घराच्या फाटकातून ती आत शिरून दिसेनाशी झाली, म्हणून ते कळलं. मनात आलं, घरगुती बाजारहाट करून, वजन उचलून असं चढावर चालत यायचं म्हणजे केवढा व्याप आणि ताप! तो देखील आठवड्यातून किमान एक-दोन वेळा तरी करावाच लागत असेल. मग तिथे घरं घेऊन राहणार्‍यांनी काय विचार करून ती ठिकाणं नक्की केली असतील? बरं, ती काही झोपडपट्टी किंवा एखादी अनधिकृत वस्ती वगैरे नव्हती. सगळी व्यवस्थित बांधकामाची मध्यमवर्गीय/उच्च मध्यमवर्गीय घरं होती. पण अशा चढावरची घरं म्हणून ती स्वस्तात पडली असतील का? आम्ही वेलिंग्टनमध्ये होतो ते २ दिवस विकांताचे होते. त्यामुळेच बहुदा सर्व घरांसमोर गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. अशा रस्त्याला पॅरलल पार्किंग करायचं म्हणजे देखील कठीण आणि काटेकोरपणे करायचं काम. अर्थात पुढे त्याचीही सवय होत असणार, म्हणा. त्या पायी चालणार्‍या बाईचं मात्र मला खरंच कौतुक वाटलं.
जंगलवाट सुरू होत होती तिथे एक माहितीफलक होता. त्याच्या चौथर्‍यावर जरा वेळ टेकलो, कारण चढाच्या रस्त्यानं बघताबघता चांगलाच घाम काढला होता.
collage-1.jpg
चांगलं कडक ऊन होतं; तिथल्या बोचर्‍या गारठ्यात त्यामुळे खरं म्हणजे बरं वाटत होतं. अंगावरचं जॅकेटही निघालं, त्यानं अधिकच मोकळं मोकळं वाटायला लागलं. आणि आम्ही उत्साहात पायवाटेनं वर चढायला सुरूवात केली.

छान, शांत पायवाट; दोन्ही बाजूंना झाडी. आधीच्या अनुभवांवरून लक्षात आलं होतं, की अशा ट्रेल्सच्या वाटेवर व्यवस्थित पाट्या असतात, दिशादर्शक बाण असतात, एकूणच हे ट्रेल प्रकरण निःशंक मनानं जावं असं असतं. त्यामुळे आता मनोमन बाकबूक वगैरे नावालाही नव्हती. साधारण अर्धा तास कच्ची पायवाट होती. वाटेवर दमट माती, बारीक दगड-गोटे, मध्येच कडेला मातीच्या घट्ट ढिगार्‍याच्या आडून अर्धवट बाहेर आलेली एखादी मोठी शिळा; अशा शिळेवर जरावेळ उगीचच टेकल्याशिवाय मला राहवत नाही. म्हणजे तेव्हा मला दम लागलेला असतो, किंवा मी बसायला जागा शोधतच असते असं काही नसतं; पण आधीच्या लेखांमध्ये कुठेतरी म्हटलं तसं, असं केल्याशिवाय त्या ठिकाणाचा ‘फील’ आल्यासारखा वाटतच नाही. एका ठिकाणी तशीच टेकले. डोंगर माझ्यामागे होता, समोर होतं बघताबघता विहंगम फ्रेममध्ये गेलेलं वेलिंग्टन शहर. मात्र एक आहे, शहर अनोळखी असेल तर असा ‘bird’s eye view’ जवळपास वायाच जातो. कुठे कोणती ठिकाणं आहेत, त्यांचं आपांपसातलं रस्त्यावरचं अंतर किती आहे हे माहिती असेल, तर विहंगम दृश्यातल्या बदललेल्या perspective ची मजा असते, ती अशा ठिकाणी येत नाही. तरी त्यातल्या त्यात वरून ‘बेसिन-रिझर्व’ सापडलं; त्यावरून आमच्या हॉटेलची आणि i-SITE ची जागा नक्की केली; याहून अधिक काही करणं शक्य नव्हतं.

IMG_20171111_105344_compressed.jpg

एका ठिकाणी आमची पायवाट पक्क्या रस्त्याला जाऊन मिळाली. हा मा.व्हिक्टोरियावर वाहन घेऊन येण्याचा रस्ता. आम्ही हॉटेलपासून पायी आलो त्या तुलनेत हा पक्का रस्ता बराच लांबून येत असावा असं दिसलं. पक्का रस्ता लागल्यावर थोडीफार वर्दळही लागली. स्ट्रोलर्समधून कच्च्याबच्च्यांना घेऊन निघालेले आई-बाप, विकांत असल्यामुळे हुंदडायला आलेली तरूण पोरंपोरी, खाजगी वाहनं, पर्यटकांच्या दोन-चार बसेस...

आणखी १०-१५ मिनिटांत आम्ही समीटला पोहोचलो. इतका वेळ स्वच्छ ऊन्ह अधिक गार वारा असं दुर्मिळ combination सुखावह वाटत होतं; ते चित्र वर पोहोचताच पूर्णतः बदललं. वर ऊन्ह होतंच, पण प्रचंड सोसाट्याचा आणि अचाट बोचरा वाराही होता. ‘Windy Wellington’चा खरा हिसका तिथे बसला. वरून ३६० अंशात शहराचं अप्रतिम दृश्य दिसत होतं; लांबवर विमानतळाची धावपट्टी दिसत होती; तिथे ये-जा करणारी विमानं दिसत होती; एकीकडे वेलिंग्टन बंदर, त्याच्या जरा डावीकडे आम्ही जिथून आलो तो रहिवासी भाग; आणखी डावीकडे अथांग साऊथ पॅसिफिक सी!

IMG_20171111_102340_compressed.jpg

दूरवर तंद्री लावून एकटक बघत बसावं असं इतकं काय काय समोर होतं, पण तो वारा...!! समीटच्या ठिकाणी मोठा गोलाकार observation deck आहे, कडेला रेलिंग आहे. रेलिंगवर ओळीनं अनेक माहितीफलक होते. १८व्या-१९व्या शतकातला वेलिंग्टनचा इतिहास, त्या बंदराचं महत्व वगैरे बरीच काय काय इंटरेस्टिंग माहिती होती; पण तो वारा...!! धड काही सुचूच देत नव्हता!! फोटो काढायचे तर हात स्थिर ठेवणे कठीण होतं; फोन हातातून उडून जाईल की काय असं वाटत होतं.

समीट डेकवरून काही पायर्‍या खाली उतरून मग पुन्हा थोडी फिरण्यासारखी मोकळी जागा होती. त्या जागेत Richard Byrd या अंटार्क्टिक संशोधकाचं एक छोटंसं स्मारक आहे. स्मारकाचा आकार बर्फाळ प्रदेशात संशोधक ज्या प्रकारच्या तंबूत राहतात तसा आहे. आत Richard Byrd चा अर्धाकृती पुतळा आहे. पुतळ्याच्या मागच्या भिंतीसाठीचे दगड अंटार्क्टिकाच्या एका ग्लेशियरमधून आणलेले आहेत, अशा अर्थाची एक पाटी तिथे जमिनीत लावलेली होती. त्या ग्लेशियरचं नावही दिलेलं होतं. हे एक मला जरासं झेपलं नाही. पर्यावरणवाद्यांनी याला आक्षेप वगैरे कसा घेतला नाही, असा प्रश्न पडला. पण मी त्यावर फारसा विचार केला नाही; कारण स्मारकाची मागची बाजू अधिक इंटरेस्टिंग होती. तंबूच्या आकारातली ती मागची बाजू बरोबर उत्तर-दक्षिण येईल अशी रचना केलेली आहे. तिथे एका मोठ्या माहितीफलकावरच्या नकाशात वेलिंग्टन आणि अंटार्क्टिका खंडाची पॅसिफिक समुद्रातली जागा दर्शवलेली होती. शेजारी लिहिलं होतं, की तंबूच्या त्या रेषेत सरळ उड्डाण केलं तर पुढचा थांबा असेल थेट अंटार्क्टिका खंड.
collage-2.jpg
ते वाचून क्षणभर थबकायला झालं. वेलिंग्टन असं पॅसिफिक समुद्रात ‘शेवटी’ आहे, याची कल्पनाच नव्हती. आपण दक्षिण गोलार्धातल्या एका टोकावर उभे आहोत, हा scenario अंतराळाच्या perspective मधून नजरेसमोर तरळून गेला. तरी कुठेतरी वाटलं, की हवेतून उडत थेट अंटार्क्टिकाला जाता येत असेल, पण न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडचा एखादा बारीकसा भाग तरी त्या axis च्या वाटेत मध्ये येत असणारच. मग वार्‍याची तमा न बाळगता डोळ्यांवरचा गॉगल काढला, फोनवरचा मॅप उघडला, झूम-आऊट करून अंटार्क्टिकाला मॅपवर आणलं, दुसर्‍या फोनची edge त्या रेषेत ठेवून बघितली, तर खरंच तसंच होतं. (वास्तविक, असा पडताळा करण्याचं मला काही नडलेलं नव्हतं. पण मुळात नकाशे हे माझं आवडतं प्रकरण; त्यात टूर-प्लॅनिंगपासूनच न्यूझीलंडचा नकाशा इतक्या वेळा पाहिला गेला होता, तरी आपल्याला कधीच कसं हे लक्षात आलं नाही, ही टोचणी त्यामागे जास्त होती. असो.)

mt-victoria-lookout-map_compressed.jpg

त्या उत्तर-दक्षिण रेषेनं मा.व्हिक्टोरिया ट्रेलचं सार्थक झालं. पाहिया-रोटोरुआच्या तुलनेत वेलिंग्टनमध्ये अंधार लवकर पडणार याची कुणकूण लागली तसं आम्ही तिथून निघालो. पायवाटेवरून जरासं खाली आल्यावर कानांशी सुसाटणारा वारा आधी बंद झाला; त्यानं कोण हायसं वाटलं!
डोंगरावरून आम्ही खाली उतरत असतानाच आकाशात हळूहळू ढग जमायला लागले होते. रात्री जेवणाच्या शोधार्थ परत बाहेर पडलो, तर किंचित भुरभूर पाऊस पडत होता आणि अचाट बोचरा वारा मा.व्हिक्टोरियावरून खाली रस्त्यांवरही उतरला होता. जेवणानंतर वेलिंग्टन बंदराच्या परिसरात एक फेरफटका मारण्याचं ठरवलं होतं; पण ‘Windy Wellington’नं तो बेत रहित करायला लावला.

----------

Cut to .... १२ दिवसांनंतर, ऑकलंड.

न्यूझीलंड टूरचा शेवटचा दिवस. दिवसभराचा काहीही कार्यक्रम ठरवलेला नव्हता. तरी हाताशी एक अख्खा दिवस होता. त्यामुळे सकाळी नाश्ता वगैरे करून नकाशा धुंडाळत होतो. नेचर ट्रेल, पायपीट, या प्रकारातली दोन ठिकाणं खुणावत होती. एक, One Tree Hill आणि दुसरं, Mt. Eden. पैकी One Tree Hill जरा लांबच पडत होतं. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे निघायचं होतं. त्यामुळे तो पर्याय बाद केला.
तुलनेनं माऊंट ईडन जवळ होतं. जरा शोधाशोध केल्यावर कळलं, की तिथून जवळ ‘माऊंट ईडन’ हे ऑकलंडचं उपनगरीय रेल्वे स्टेशन होतं. मग काय! तडक ऑकलंड उपनगरीय रेल्वे सेवा आजमावून बघायचं ठरवून टाकलं. माऊंट ईडनची ट्रेन ‘Britomart’ स्टेशनवरून सुटते असं नेटवर वाचलं. आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही ऑकलंड बंदर परिसरात बरंच पायी फिरलो होतो. तेव्हा एक मोठं उपनगरीय रेल्वे स्टेशनही बाहेरून पाहिलं होतं. नकाशात पाहिलं तर आम्ही पाहिलेलं ते स्टेशन ब्रिटोमार्टच निघालं. (आदल्या दिवशी यातलं काहीच डोक्यातही नव्हतं; त्यामुळे स्टेशनचं नाव वगैरे बघून ठेवावं असं काही वाटलं नव्हतं.)

मा.ईडनचा हा आमचा ट्रेल सुरू झाला तो आमच्या हॉटेलपासूनच. आदल्या दिवशी निरुद्देश भटकताना फारसं काही जाणवलं नव्हतं; पण आता लक्षात आलं, की ब्रिटोमार्टपर्यंत परत चालत जायचं तर बराच वेळ गेला असता. मग तिथपर्यंत जाण्यासाठी बसची शोधाशोध सुरू केली. हॉटेलपासून जवळच Auckland SkyBusचं (ऑकलंडची सिटी बस) एक ‘airport drop special’ थांबा-cum-कार्यालय-cum-तिकीट घर होतं. तिथे केवळ विमानतळाला जाणार्‍या आणि विमानतळाहून येणार्‍या बसेस थांबत होत्या. तरी आम्ही सरळ तिथेच जाऊन धडकलो आणि ब्रिटोमार्टच्या बसची चौकशी केली. जराशा भलत्या ठिकाणी चौकशी केली गेली तरी कोणतेही ‘लूक्स’ न मिळता व्यवस्थित माहिती मिळते याची गेल्या २-३ आठवड्यांत इतक्या वेळा प्रचिती आलेली होती, की आम्ही निवांत होतो. आणि तसंच झालं. बसस्टॉपवर उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसानंच आम्हाला माहिती दिली. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला त्या बससाठीचा स्टॉप होता, तो दाखवला. ती बस थेट ब्रिटोमार्टला जाणारी नव्हती; त्यामुळे दुसर्‍या बससाठी कुठे उतरावं लागेल ते देखील सांगितलं. आम्हाला लगेचच बस मिळाली. बस बदलायची वेळ आली तिथे उतरल्यावर मेंदूतल्या आदल्या दिवशीच्या जीपीएसमुळे ब्रिटोमार्ट स्टेशन जवळ आल्याचं समजलं. मग आम्ही दुसरी बस पकडायचा विचार सोडून दिला आणि पायी निघालो.
जेमतेम ५-१० मिनिटांत स्टेशनला पोहोचलो; स्टेशनात शिरल्यावर लक्षात आलं, की कालच्या रस्त्यापेक्षा आज आम्ही वेगळ्याच वाटेनं आलो होतो! पण तरी exploration केल्यासारखं वाटत होतं ते भारी होतं.
तिकीट काढलं. रेल्वे स्टेशन म्हणावं तर ट्रेन्सचा, रुळांचा कुठे मागमूसही नव्हता. एका ठिकाणी खाली जाणारे जिने दिसत होते. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तोच रस्ता होता; पण रेल्वे भुयारी नव्हती; फक्त स्टेशन भुयारी होतं. ४ जिने उतरून गेलो तर खाली ३-४ प्लॅटफॉर्म्स दिसले. स्टेशनावर सगळा शुकशुकाट! एका प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभी होती.

IMG_20171123_115027_compressed.jpg

आमच्या तिकिटावर जी वेळ लिहिली होती तीच ही ट्रेन किंवा कसं वगैरे विचार करत जरा उभे होतो, तर एक रेल्वे स्टाफपैकी वाटणारा मनुष्य जवळ आला. ‘You guys from India?’ त्यानं चौकशी केली. आम्ही ‘बुगुबुगू’ केल्यावर तो एकदम सैलावला आणि उत्साहानं गप्पा मारायला लागला. तो चेन्नईचा होता, गेली २०-२२ वर्षं ऑकलंडमध्ये तिकीट तपासनीसाची नोकरी करत होता. त्यानं आमचं तिकीट बघितलं. आमची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर आणि किती वाजता येईल ते सांगितलं.
मग त्यानं आपणहून आम्हाला त्या उभ्या असलेल्या ट्रेनच्या इंजिनरूममध्ये नेलं; तिथले consoles, controls वगैरे दाखवले; फक्त फोटो काढू दिले नाहीत, नाहीतर त्याच्या नोकरीवर गदा आली असती, म्हणे. स्टेशनात कुठे सीसीटीव्ही नव्हते का, असा प्रश्न पडला. इंजिनरूममध्ये मला चिंता, की तेवढ्यात ती ट्रेन सुटली तर काय? पण मग म्हटलं, आपण तिकीट तर काढलेलं आहे; ट्रेन सुटली तर या महाभागाला पकडून ठेवायचं; उतरू द्यायचं नाही. पण तसं काही झालं नाही.
आम्ही खाली उतरून परत जरा वेळ गप्पा मारल्या. ऑकलंडमधले train rush hours, नोकरदार माणसांसाठीच्या प्रवासाच्या सोयी; सकाळी साडेनऊ-दहा पर्यंत ट्रेन्सना गर्दी असते, त्यानंतर निवांत असतं, मग संध्याकाळी ६-७ वाजता गर्दी, वगैरे. आम्ही मुंबईहून आलोय, हे कळल्याबरोब्बर त्यानं न्यूझीलंड-भारत आंतरराष्ट्रीय स्नेहसामना सोडून दिला आणि चेन्नई-मुंबई स्थानिक कबड्डी सुरू केली... बाप रे, मुंबईच्या लोकल ट्रेन्स, भयानक गर्दी, मी तो प्रवास करण्याचा विचारही करू शकत नाही, चेन्नईतच छान वाटतं, इत्यादी... मग आम्ही गप्पा आवरत्या घेतल्या आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहिलो.

ट्रेन आली, रिकामीच होती. आत चढलो. समोरच एका छोट्या फलकावर ‘कृपया, रेल्वे क्रॉसिंगपाशी मोबाईल हेडफोन्स काढून ठेवा’ अशी पाटी दिसली. (इतका वेळ मुंबई लोकल ट्रेन्सशी काही कनेक्शनच होत नव्हतं, ते इथे झालं.) पुढच्या ‘पार्नेल’ स्टेशनला काही कॉलेजवयीन मुलं डब्यात चढली. त्यांच्या आपांपसांत जोरजोरात गप्पा सुरू होत्या. तिथल्या तरुणाईचे गप्पांचे विषय जाणून घेऊ म्हणून मी जरा कान टवकारले तर ती मुलं बिचारी अभ्यासाबद्दलच बोलत होती. मग मी तो नाद सोडून दिला. पुढचं स्टेशन ‘न्यू मार्केट’. हे एक जंक्शन आहे. आमची ट्रेन स्टेशनात थांबली, पुन्हा जराशी उलट्या दिशेला गेली आणि मग मार्गस्थ झाली. तिसरं स्टेशन ‘माऊंट ईडन’.

IMG_20171123_123546_compressed.jpg

आम्ही उतरलो. निर्मनुष्य स्टेशनाचा एक फोटो काढला आणि जिना चढून वर रस्त्यावर आलो. तिथून माऊंट ईडनची वाट शोधायला फारसं जड गेलं नाही.

Travel sites वर याचा उल्लेख ‘Mt Eden Volcano Walk’ असा केला जातो. साधारण दीड-दोन किमीचं अंतर; स्वच्छ, डांबरी पायवाट, भरपूर झाडी; मात्र संपूर्ण चढाचा रस्ता आहे; सवय नसेल तर धाप लागतेच. आम्ही पायपिटीच्या दृष्टीनंच निघालो होतो, त्यामुळे तो प्रश्न नव्हता.
वास्तविक माऊंट ईडन हा एक मृत ज्वालामुखी आहे. काही हजार वर्षांपूर्वी त्याचा शेवटचा उद्रेक झाला होता. समीटच्या जरासा अलिकडे एक मोठा crater दिसतो. तिथे आता सगळं हिरवंगार गवत आहे. मात्र क्रेटरच्या आत उतरू नये अशा पाट्याही तिथे दिसल्या. त्यामुळे तो मृत नसून सुप्त ज्वालामुखी असावा का, अशी शंका आली.

IMG_20171123_133834_compressed.jpg

क्रेटरच्या कडेकडेने वरती जाण्याची वाट आहे. चालताना खाली ऑकलंड शहर दिसत होतं; इथे परत तेच, एक ऑकलंड स्काय टॉवर वगळला तर इतर काहीच ओळखीचं नव्हतं; असं म्हणेम्हणेपर्यंत खाली ‘ईडन पार्क क्रिकेट ग्राऊंड’ दिसलं.

IMG_20171123_132514_compressed.jpg

इथे ते रग्बी ग्राऊंड म्हणून ओळखलं जातं. रग्बीच्या सामन्यांव्यतिरिक्त वेळ उरला तर तिथे क्रिकेटच्या मॅचेस होतात. (आम्ही आदल्या दिवशी क्रिकेट ग्राऊंडला कसं जायचं त्याची चौकशी केली होती, तेव्हा ही माहिती मिळाली होती.)
रमतगमत, फोटो काढत समीटला पोहोचलो. मध्येच ऊन्ह, मध्येच ढग येत होते; हवा छान होती; मुख्य म्हणजे वेलिंग्टनसारखा हैराण करणारा वारा नव्हता.

समीटपाशी एक अतर्क्य गोष्ट पाहिली.
अशा ठिकाणी अनेकदा असते तशी तिथे एका चौथर्‍यावर जगभरातल्या विविध प्रमुख शहरांची दिशा आणि अंतरं दर्शवणारी एक मोठी गोलाकार पितळी पाटी लावलेली होती. जो-तो तिथे जाऊन आपापल्या ओळखीची नावं शोधत होता, त्याचे फोटो काढत होता; त्यात काही फार नवल नव्हतं. आम्हीही दिल्ली शोधलं; त्याऐवजी मुंबई दिसल्यावर खूष झालो. पाऊस-वार्‍यामुळे ती पाटी जराशी काळी पडली होती, मात्र पाटीवरचं ‘बीजिंग’चं नाव तेवढं लख्ख चमकत होतं.

IMG_20171123_140120_compressed_0.jpg

ते कसं काय, हा प्रश्न पडेपडेपर्यंत त्याच्या उत्तराचा ‘live demo’ मिळाला! दहा-एक मिनिटंच आधी तिथे एक मोठी बस भरून चिनी पर्यटक आले होते. त्यातले काही त्या पाटीपाशी जमले; त्यांनीही त्यांच्या ओळखीचं नाव शोधलं असणार; ते दिसल्या दिसल्या अनेक दिवस हरवलेलं मांजरीचं चिमुकलं पिल्लू अचानक सापडलं तर त्याला कसं कुरवाळू तसं त्यांनी त्या बिजींग शब्दाला अक्षरशः कुरवाळायला सुरूवात केली. सर्वांच्या चेहर्‍यांवर जुन्या हिंदी सिनेमातल्या अंध, म्हातार्‍या ‘माँऽऽ’सारखे भाव. आसपास उभ्या असलेल्या आमच्यासारख्यांना ते चिनी ‘बिजींग ऽऽ बिजींगऽऽ’ करत तिथे बोट दाखवून सांगत होते; मोठमोठ्या आवाजात मागच्यांना बोलावत होते; मग मागून आलेले बिजींगला कुरवाळण्याचं काम पुढे सुरू ठेवत होते. असं त्यांचं पुढची ५-१० मिनिटं सुरू होतं. मी अक्षरशः अवाक्‌ होऊन ते पाहत होते. हे नुसतं कुणी मला सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता. पण चकाकत्या बिजींगचा धडधडीत पुरावा समोर होता. (बिजींगलगतच मॉस्कोचंही नाव होतं; collateral damage मुळे ते पण चकाकत होतं.) ही देशप्रेम व्यक्त करायची अनोखी पद्धत म्हणायची? की जागतिक पातळीवरचं exposure नसल्याचा परिणाम म्हणायचा? की चायना-मेड social conditioning म्हणायचं? काही कळेना. त्यांतल्या कुणालातरी कारण विचारण्याची माझी फार इच्छा होती. पण परदेशात ग्रूपनं फिरणार्‍या चिनी पर्यटकांना एकतर इंग्रजी बोलता येत नाही, किंवा त्यांच्याशी बोलायला गेलं तर ते उत्तर द्यायला अजिबात उत्सुक नसतात, असा माझा एकंदर अनुभव; त्यामुळे तसाही विचारून फारसा उपयोग झाला नसताच. त्या अचाट आणि अतर्क्य गोष्टीचा अर्थ लावायचा मी बराच वेळ प्रयत्न करत राहिले...
दीड-दोनपर्यंत तिथे निवांत वेळ काढला आणि मग परत फिरलो.
माऊंट ईडनला काही अंतरापर्यंत वाहनं आणण्याची सोय आहे. मोठ्या टूरिस्ट बसेससाठी पार्किंगचीही जागा आहे. पार्किंगच्या ठिकाणी एका बाजूच्या लॉनवर २-३ मोठे कापडी फलक अंथरून ठेवले होते; फलकांवर काही चित्रं, फोटो आणि चिनी लिपीतला मजकूर दिसत होता.

IMG_20171123_142909_compressed.jpg

माझी उत्सुकता चाळवली. मी जवळ जाऊन पाहिलं, तर त्यातले काही फोटो ओळखीचे वाटले. ते तियानानमेन चौकातल्या त्या काळ्या घटनेबद्द्लचे होते. रणगाड्यासमोर हात पसरून उभा असलेला एक मनुष्य - हा फेमस फोटोही होता. चिनी मजकुरात एकच इंग्रजी वाक्य दिसलं. ते कसल्याशा संघटनेचं होतं; आणि एकूण फलकांमधून चिनी कम्युनिस्ट नेत्यांचा निषेध केला असावा असं दिसत होतं. त्या वरच्या कुरवाळू चिन्यांची बस तिथेच शेजारी उभी होती. तिथे येणार्‍या चिन्यांना ते फलक दिसावेत असेच अंथरलेले होते. आता मला उत्सुकता वाटली, की कुरवाळू चिनी हे फलक पाहून कशी प्रतिक्रिया देत असतील? की या फलकांचा परिणाम म्हणून तो वरचा चकाकता पुरावा होता? काही कळायला मार्ग नव्हता. ते चिनी खाली परतेपर्यंत थांबून ते काय करतात बघावं असाही एकदा विचार आला. पण पोटात कावळे कोकलत असल्यामुळे मी तो सोडून दिला.

खाली उतरून रस्त्यावर आलो. एका दुकानात चौकशी करून बस-स्टॉप शोधला आणि बसनं दुपारनंतर हॉटेलवर परतलो.
पाहियात पहिल्या दिवशी जसं काहीतरी achieve केल्यासारखं वाटलं होतं, तसंच परत वाटलं. न्यूझीलंडमधला शेवटचा दिवस ध्यानीमनी नसलेल्या प्रकारे सार्थकी लागला होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...