Wednesday, October 14, 2020

डलहौसी ट्रेक

 नमस्कार 



लेहमधील झंस्कार नदीवरील चद्दरट्रेक विषयी ऐकल्यापासून तो करायचे मनात होते आणि आहेही. अनुभवी मंडळींकडून मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रेक खूपच आव्हानात्मक आहे असे कळले. साहजिकच आहे म्हणा, लडाखमधील कडाक्याच्या थंडीत गोठलेल्या नदीवरून सलग काही दिवस चालणे म्हणजे एक दिव्यच असणार.  पूर्वतयारी म्हणून एखादा थंडीतला ट्रेक करणे गरजेचे आहे हेहि लक्षात आले. त्यातूनच समोर आला youth hostel चा डलहौसी हिवाळी ट्रेक. थोडी माहिती गोळा करून, स्वतः अभ्यास करून आम्ही दोघांनी या एन्ट्री लेवल हिवाळी ट्रेक चे बुकिंग केले. आता एवढे लांब चाललोच आहोत तर बाजूलाच असलेले धर्मशाळा आणि डलहौसी मधील local स्थलदर्शन करायचा बेत सुद्धा केला आणि त्याप्रमाणे ट्रेन बुकिंग पण करून झाली. 

आता सुरु झाली ट्रेकची तयारी. YHAI + winter  trek  म्हटल्यावर कडाक्याची थंडी + पावसाची जय्यत तयारी आणि स्वतःची ताट वाटी चमचा टिफिन इत्यादी जमवा जमव चालू केली. शक्यतो लोकल ट्रान्सपोर्टनेच फिरायचे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणे पठाणकोटला ट्रेनमधून उतरल्यापासून share auto + HRTC bus +लोकल बस असा प्रवास करत आम्ही धर्मशाळा मधील मॅकलॉइडगंजला पोचलो. २ दिवस लोकल sight seeing मध्ये दलाई लामा मंदिर आणि त्यांचे निवास स्थान आम्ही चालतच फिरलो. संध्याकाळी auto ने नड्डी या गावी जाऊन सूर्यास्त पाहून आलो. लोकल रेस्टो मध्ये मोमोज + थुपका चा आस्वाद घेतला. खास नमूद करायचे म्हणजे 'भागसु' भागातील "जर्मन बेकरी" रेस्टो. संध्याकाळच्या मस्त थंडीत येथे आम्ही उत्तम प्रतीच्या कॉंटिनेंटल डीशेस खाल्ल्या.

(धर्मशाला-नड्डी येथील सूर्यास्त)


(दलाई लामा यांचे निवासस्थान)


धर्मशाळेत दीड दिवस व्यतीत केल्यावर  तिसऱ्या दिवशी पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत HRTC bus पकडून आम्ही डलहौसीला १२ वाजता पोचलो. दुपारी आराम करून संध्याकाळी थोडे चालून आलो. रात्री पावसाची किंचितशी रिपरिप (किव्वा पिरपिर म्हणा) चालू झाली. पुढील तीन दिवसातील पावसाच्या धुमाकुळीची नांदी  होती ती. पण हॉटेल मालक खुश दिसला कारण "गये तीन महिनोमे बिलकुल पानी गीरा नही है' ही त्याची खंत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण ढगाळ वातावरणात चेक आऊट करून HRTC bus ने आम्ही डलहौसीच्या मुख्य भागात पोचलो आणि स्टॅन्ड वरून १० मिनिटे चालत युथ हॉस्टेल च्या बेस कॅम्पमध्ये दाखल झालो. रेजिस्ट्रेशन औपचारिकता पूर्ण करून आम्ही आपापल्या विभागात जाऊन त्यातला त्यात सोयीस्कर असा बेड पटकावला.

(बेस कैंप शयन व्यवस्था)

लेडीज आणि जेन्ट्स साठी वेगवेगळी व्यवस्था होती. बाहेर पहिले तर आता पाऊस चालू झाला होता. म्हणजे आम्ही बाल बाल बचावलो होतो. DW -२ (म्हणजे Batch -२) चे नोंदणी करणारे आम्हीच पहिले होतो. DW -१ गट सरावाच्या फेरफटक्याला (Acclimitise  walk) गेले असल्याने कॅम्पवर तसा शुकशुकाटच होता. जो तो स्टाफ मेंबर आम्हाला सांगत होता कि- "you will enjoy more bcoz yours is a small group of 15 only". त्याची चांगलीच प्रचिती आम्हाला पुढील ४ दिवसात आली. बाहेर पहिले तर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता जो पुढील ४८ तास आमची पाठ सोडणार नव्हता. DW -१ चा ४५ जणांचा ग्रुप सराव फेरी मारून परतू  लागला. पॉन्चो घातलेला असूनही पावसात चिंब झालेली, थंडीने हुडहुडणारी लोकं आपापल्या हौल मध्ये धावू लागली आणि आम्ही स्वतःला त्यात पाहू लागलो. गप्पांमध्ये लक्षात आले कि प्रॉब्लेम क्लिष्ट होता. ५-६ डिग्रीची थंडी, त्यात पाऊस, पावसात भिजतील म्हणून वूलनचे कपडे घालायला मर्यादा यामुळे अवस्था बिकट होती. DW -१ चे चिंताक्रांत चेहेरे, त्यांची चाललेली सामानाची बांधाबांध, बरोबर काय घ्यावे, काय टाळावे याची चर्चा आम्ही live  पाहत होतो. संध्याकाळ होत गेली तशी थंडी वाढू लागली. रात्रीचे तापमान -१ डिग्रीला जाण्याचा अंदाज होता. Heater  वगैरे चा तर सवालच नव्हता. बाहेर पावसाची जोरात batting चालू होती. DW -२ च्या आम्ही १५ जणांनी पावसात भिजतच आपापली sleeping bag + blanket  कलेक्ट केली. कॅम्प मधील जेवण-चहा-नाश्ता छान शाकाहारी रुचकर असल्याने त्या आघाडीवर काही चिंता नव्हती. वॉश रूम/बंक बेड व्यवस्था सुद्धा चांगली होती. रात्री ९.३० ला सर्व लाईट बंद होतात आणि सर्वजण झोपलेच आहेत ना याची खातरजमा कॅम्प लीडर करतो. मद्य आणि तंबाखू ला अजिबात परवानगी नाही आणि तसे काही आढळल्यास चंबू गबाळे आवरून तात्काळ कॅम्प सोडावा लागतो. 


दुसऱ्या दिवशी सकाळी ५. ला उठवून, चहा प्यायला घालून ६ ते ६.३० आमचा वॉर्मअप व्यायाम करून घेतला. नंतर नाश्ता करून DW-१ गटाला YH  शिरस्त्यानुसार निरोप दिला. त्यांचा पहिल्या दिवसाचा ट्रेक चिंब पावसात, बोचऱ्या थंडीत चालू झाला आणि आम्हाला Acclimitise walk ची धडकी भरली. YH च्या कडक वक्तशीरपणामुळे बरोब्बर ९ वाजता आमची DW -२ ची वरात कोसळणाऱ्या पावसात, पॉन्चो घातलेल्या अवतारात, पाठीवर ३-४ किलोच्या ओझ्यासह सुरु झाली. त्यातल्या त्यात एकच exciting गोष्ट घडली होती म्हणजे, DW -१ ला फ्लॅग ऑफ करतानाच गारांचा पाऊस झाला होता. बॉल बेअरिंग आकाराच्या पांढऱ्या शुभ्र गारांचा आकाशातून होणारा वर्षाव आयुष्यात प्रथमच पाहिला होता. गेल्या २ दिवसात कॅम्प लीडर्स आणि फील्ड डायरेक्टर बरोबरच्या गप्पांमध्ये ज्ञान मिळाले होते कि सततचा प्रचंड पाऊस + गारा म्हणजे स्नोफॉलची अतिदाट शक्यता. या भागात साधारणपणे २०-२२ डिसेंबर नंतरच पहिला स्नोफॉल होतो. पण पावसामुळे आम्ही सर्व जबरदस्त आशावादी होतो. walk चालू झाल्यावर अर्ध्या तासातच आमचा आशावाद सत्यात उतरला. प्रथम जोराचा पाऊस होता, नंतर गारांचा पाऊस सुरु झाला आणि क्षणांत हिमवर्षाव चालू झाला. अजिबात आवाज न करता पिसांप्रमाणे खाली येणारे शुभ्र पूंजके आम्ही सर्व हरखून पाहत राहिलो. पाण्याची पर्वा न करता जो तो आपापला मोबाइल काढून हे क्षण कॅमेरा मध्ये बंद करत होता. आयुष्यातला पहिला हिमवर्षाव डलहौसीच्या मुख्य रस्त्यावर आम्ही अनुभवत होतो. हा सोहळा आम्ही १५-२० मिनिटेच अनुभवला पण आयुष्यातला एक अनोखा, अविस्मरणीय आनंद देऊन गेला. 

(Devils On The Move)

DW -३ ने केलेल्या bye bye  आणि खास YH पद्धतीच्या टाळ्यांच्या गजरात आमचा पहिल्या दिवसाचा ट्रेक बरोबर ८ वाजता सुरु झाला. वरुणराजाचे तिसऱ्या दिवशीही थांबायचे नाव नव्हते. त्यात आज पावसाएवढ्याच गाराही होत्या. अर्ध्या पाऊण तासातच आम्ही मुख्य रस्ता सोडला आणि थोडी चढाची रानवाट पकडली. गारपिटीचे प्रमाण वाढले होते आणि आम्ही पाउलवाटेवर साठलेल्या बर्फात चालायची मजा घेत होतो. थोड्याच वेळात जंगलातील जास्त चढणीची वाट सुरु झाली आणि पोंचो ही एक मोठी पंचाईत वाटू लागली. पावसामुळे वूलन हातमोजे घालता येत नव्हते. कमालीच्या गारठ्याने हाताची बोटे कुडकुडून आखडत होती त्यामुळे हात खिशात घालून ठेवणे क्रमप्राप्त होते. चढताना सतत पायात येणार पॉन्चो आणि ओलेचिंब शूज सॉक्स मुळे गारठलेले-आखडलेले पाय-बोटे अशी पायपीट पुढील तासभर तरी चालू होती. खरंतर वैताग आला होता. सह्याद्रीत भटकताना मुद्दाम पावसात भिजण्यासाठी केलेला ट्रेक वेगळा आणि हिमालयातील कडाक्याच्या थंडीत सतत कोसळणाऱ्या पावसात पॉन्चो घालून बर्फातून चालणे वेगळे. मोठे ट्रेक करताना एकदातरी मनात येणार प्रश्न चमकलाच- "हे सर्व उपद्व्याप आपण नक्की कशाकरिता करतो? हजारो रुपये खर्चून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा थोडे पैसे जास्त घालून आरामदायी रीतीने फिरणे सहज शक्य असूनही का फिरत नाही". झटक्यात दुसरे मन सांगते- "अरे मित्रा, निसर्गाची जेव्हडी मजा, आनंद तुम्ही ट्रेक्कर लोक घेता, त्याची एकसे एक अद्भुत रूपे तुम्ही पाहता त्याचे काय?" मनाने परत उभारी घेतली आणि पायांनी चढ चढणे चालू ठेवले. 

दोन तासांच्या क्लिष्ट चढणीनंतर अचानक आम्ही एका मुख्य रस्त्याला लागलो. रस्त्यावर सर्वत्र फूटभर साठलेला शुभ्र रांगोळीसारखा बर्फ आणि त्यावरून येणार पांढऱ्या गुबगुबीत मेंढ्यांचा कळप जसा काही या 'बारापथ्थर' नावाच्या गावात आमच्या स्वागतासाठीच उभा होता. बाजूच्याच एका ठेल्यावर शेकोटी धगधगत होत होती, तिच्या बाजूला सर्वानी आपले बस्तान बसवले. अंगावरचा पॉन्चो काढून फेकून दिला, गच्चं झालेले शूज आणि सॉक्स काढून, पिळून परत घातले. फक्कड चहा-बिस्किटे खाल्ली आणि समोरच्या नजाऱ्याचे फोटो काढले. अर्ध्या तासाने आमचे गाईड बलबीरजींनी शिट्टी मारली आणि आमचा ग्रुप मेंबर्स चा कळप रवाना झाला. यापुढील आमचा प्रवास एका मोठ्या रस्त्यावरून होणार होता जो प्रचंड हिमवर्षावामुळे वाहतुकीसाठी बंद झाला होता. साधारण फूट दीडफूट बर्फातून चालत, फोटो काढत आम्ही एका चढणीला लागलो. वाहतूक बंद असल्याने वातावरणात गारठ्याएवडीचं शांतताही होती. पॉन्चो हा एक उपयोगी पण तेवढाच कटकटा प्रकार आता सॅकमध्ये जाऊन बसल्याने जास्त मोकळेपणाने चालत येत होते. वरुणराजानेही अखेर कृपा केल्याने पाऊस-गारा पूर्ण थांबले होते. ट्रेक संपेपर्यंत पॉन्चो परत वापरायची वेळ आली नाही. 



(लकड़मंडी गांव)

दिड वाजता 'लकडमंडी' या गावांत जेवणासाठी थांबलो. छपरांवर ६ ते ८ ईंच बर्फ साठलेली १०-१२ गारठलेली घरे असे ते एक गाव होते. तिथल्या २ घरगुती ढाब्यांवर खाल्लेले पराठे, चहा-कॉफी, शेकोटी, ढाबा मालक-मालकीण-मुलांशी झालेल्या गप्पा हे सर्व त्या गारठ्यात ऊब देणारे होते. आपल्यासाठी असणारी बर्फाची मजा ही त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी कशी सजा आहे हेही लक्षात आले. बरोब्बर एक तासाने गाईडच्या शिट्टीसरशी आमचा जथ्था निघाला. आमचा पहिला कॅम्प 'काला टॉप' ३ km वर होता तर समोर जाणारा रस्ता ९ km वरील 'खज्जर' कडे जात होता. काला टॉप च्या रस्त्याला लागलो तसा एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला उतार आणि दुतर्फा सूचिपर्णी वृक्षांची जंगले असा मार्ग होता. सूर्यप्रकाश कमी होत चालला होता. चहूबाजूला बर्फाची शुभ्र चादर, वृक्षांवर साठलेले बर्फ, आसमंतात एक गूढ प्रकाश, कमालीची नीरव शांतता, मध्येच दिसणारी बर्फात लपलेली एखादी घुमटी किंवा शिवलिंग या परिकथेत शोभणाऱ्या पार्श्वभूमीवर समोरील वळणावळणाची बर्फाछादित वाट एकतर अनंतत्वाकडे घेऊन जातेय किंवा अनादीकालाकडे असेच वाटत होते. गूढ, रम्य, विलोभनीय, देहभान विसरायला लावणारा असा तो अनुभव होता. 

(भारत की सैबेरिया?)






वाटेत एका छोट्या ब्रेकसाठी थांबलो आणि क्षणात सर्वानी तिथल्या बर्फात हुंदडायला सुरुवात केली. कॅम्प फक्त १ km वर असल्याने गाईडनेही कुरकुर केली नाही. ५ वाजता कॅम्पला पोचलो. वाफाळता चहा आणि भाजके खारे शेंगदाणे खाल्ले व आम्हा पुरुषांना दिलेल्या एका हॉल मध्ये आपापली sleeping बॅग आणि ब्लॅंकेट पटकावून बस्तान टाकले. ६ वाजता सूप, ७ वाजता जेवण, ७.३० ला बोर्नव्हिटा आणि ८.३० ला lights off असे वेळापत्रक होते. आजूबाजूच्या एकसे बढकर एक 'घोरणेबहाद्दरांच्या' वेढ्यात, रात्रीच्या उणे ६ डिग्री तापमानात, हीटर्स नसताना, जमिनीवर एक तरट, त्यावर ब्लॅंकेट अश्या सुखसोयीत (??) स्लीपिंग ब्याग मध्ये शिरुन तशी बऱ्यापैकी झोप झाली.


(काला टॉप येथील निवास)

सकाळी ६ ला चहा, ७ ला नाश्ता, ७.३० ला पॅक लंच घेऊन ८ वाजता आमची दुसऱ्या दिवसाची सफर चालू झाली. जोरदार हिमवर्षावामुळे मूळच्या ट्रेकरूट वरून न जाता गाईडने आम्हाला लकडमंडी मार्गे खज्जरला नेले. रस्त्यावरील स्नो आता काही प्रमाणात वितळायला लागल्याने वाट जरा निसरडी झाली होती. पाऊस पूर्ण थांबला होता. आदल्या दिवशी बर्फातून १४ km चालल्याने आज सर्व सराईत झाले होते. फूटभर बर्फातून झपझप पावले टाकत, आजूबाजूच्या बर्फमय निसर्गाची मजा घेत सर्वजण मुंग्यांप्रमाणे एका रेषेत मार्गक्रमणा करत होतो. सर्वात पुढे वय वर्ष ६४ च्या दिल्लीच्या काकू, त्यापाठोपाठ वय-५३ चे वर्षभरात ४-५ मोठे ट्रेक करणारे दिल्लीचे एक 'दादा ट्रेक्कर' व त्यापाठोपाठ वयाने तीन नंबरचा ज्येष्ठ मेंबर म्हणजे अस्मादिक होतो. वाटेत आज काही ठिकाणी पांडा सारखे दिसणारे, झुपकेदार शेपटीचे लांबट प्राणी दिसत होते. आमची चाहूल लागताच झाडांमागे लपत होते. तसंच अनेक ठिकाणी बर्फामध्ये मोठ्या प्राण्याचे पावलांचे ठसे दिसले. हे ठसे snow leopard चे कि snow bear चे याचा अंदाज बांधत एका ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो.

(स्नो लेपर्डचे ठसे)

(लंच- दूसरा दिवस)


साधारण ६ तासांनी खज्जर जवळ येऊ लागले तसे बर्फाचे प्रमाण कमी झाले. ४.३० वाजता खज्जर कॅम्पला पोचलो. सॅक टाकून, चहा, बटाटेवडे खाऊन सर्वजण तेथील प्रसिध्ध खज्जर तलावाकडे पळालो. उल्कापातामुळे निर्माण झालेले तळे, त्याच्या आजूबाजूच्या विस्तीर्ण हिरवळीमुळे सुंदर दिसत होते. डोंगराआड अस्ताला जाणारा सूर्य लाल-पिवळ्या रंगातील विविध छटांची उधळण करत होता. तलाव प्रदक्षिणा करून आम्ही कॅम्पवर पोचलो. खज्जरला तुलनेने थंडी जरा कमी होती आणि राहायची व्यवस्थाही बऱ्यापैकी चांगली होती.

(खज्जर तलाव)

तिसऱ्या दिवसाचा ट्रेक ठीक ८.३० ला सुरु झाला. आज थोडी चढण आणि भरपूर उतरंड होती. एका ऊंच, सुंदर, स्मितवदनी शिवमूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही खज्जर सोडले. वाटेत छोट्या वस्त्या लागल्या. मुले अक्रोड, पॉपकॉर्न  विकत होती. YH चा हा ट्रेक दरवर्षी सलग एक महिना असल्याने (दररोज एक गट असे ३० गट) येथील अर्थव्यवस्थेला थोडाफार का होईना पण हातभार लागतो. लंच ब्रेक ११.३० लाच झाला.




नंतर मात्र एक कंटाळवाणा उताराचा रस्ता होता जो संपता संपत नव्हता. सर्वांनी कटाक्षाने एकामागोमाग एक असेच चालायचे असल्याने सावकाश जावे लागत होते. पण वाटेतील छोटी गावे, त्यातील हसतमुख लोक, फुले विकणाऱ्या मुली, open air school, रानातील तुरट-गोड़ फळे यांचा आस्वाद घेत आम्ही हिमालयन घाटी उतरत होतो. सह्याद्रि मधील एखादा किल्ला मस्त थंडीत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात उतरतोय असेच वाटत होते. वाटेत कुठेच चहाचा ठेला न मिळाल्याने, आमच्या विनंतीला मान देऊन एका घरीच आम्हा १५ जणांसाठी झकास चहा बनला. पण नंतर मात्र त्यांनी खूप आग्रह करूनही चहाचे पैसे न घेतल्याने आम्हाला धक्काच बसला. त्यांना झालेल्या त्रासाचे दुःख तर झालेच पण या 'बारी' नावाच्या हिमालयन  दुर्गम खेड्यातील गावकऱ्यांच्या मनाचा उमदेपणा पाहून त्यांना मानाचा मुजरा केला.


(ओपन एयर शाळा)


ठीक ५ वाजता 'मंगला' गावातील आमच्या तिसऱ्या व शेवटच्या कॅम्पला पोचलो. यशस्वीरीत्या ट्रेक पूर्ण केल्याबद्दल सर्वानी Hip Hip Hurray करून एकमेकांचे अभिनंदन केले. चहा बिस्किटे खाऊन, खाजगी टॅक्सी करून आम्ही काही जण १० km अंतरावरील 'चंबा' या तालुक्याच्या ठिकाणी फिरून आलो. 


(टीम- DW २)
दुसऱ्या दिवशी YH च्या खाजगी बसने २ तास प्रवास करून डलहौसी बेस कॅम्पला पोचलो. फोटोसेशन, प्रमाणपत्र वितरण झाले. डिपॉझिट केलेल्या ब्यागा कलेक्ट करून, लंच करून दुपारी २ च्या HRTC बसने पठाणकोटला निघालो व आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. 

YHAI बरोबरचा पहिलाच, तो पण हिवाळी, आणि तो सुद्धा पाऊस-गारा -हिमवर्षाव या सर्वांची अनुभुती देणारा हा ट्रेक आमच्यासाठी अविस्मरणीय आणि खूप काही शिकवणारा ठरला. 

(टीप: DW-२ च्या सदस्यांनी शेयर केलेल्या फोटोज बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार)

धन्यवाद  

राहुल लेले

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...