मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला व तीन शेजारी देशांची तीन ठळक पैलूंविषयी माहिती:
१. प्राकृतिक सौंदर्य :
या देशांचे प्राकृतिक सौंदर्य फार विशेष आहे. अनेक रौद्र सक्रीय ज्वालामुखी
पर्वत या प्रदेशात मोठ्या शहरांच्या अगदी अंगणात आहेत. यातील पकाया हा
ज्वालामुखी काही वर्षांपासून सक्रीय आहे, तर अलिकडेच फुएगो ही जागृत झाला
आहे. अँटिग्वा शहरातून हे दोन्ही तासाभराच्या अंतरावर आहेत. उंची फार नाही
परंतु चढण थोडी कठिण आहे, पण तरिही बहुतेकांना तयारीशिवायही करता
येण्यासारखी आहे. मी रहात असलेल्या हॉस्टेलवर दोन इटालियन मुलींना तेथे
जायचे होते, पुढे असेच एक दोन करत अजून सहा जण मिळाले व ही चढाई आम्ही
मिळून केली. हवामानाने फारशी साथ दिली नाही, तरिही अनुभव अद्वितीय होता.
अनेक स्थानिक संस्था मोठ्या गटांत सहलीही नेतात. 'ज्वालामुखीय गिर्यारोहण'
हे आवर्जून करावे असे काही...
एल साल्वाडोर या देशात अजून मोठे सुप्त ज्वालामुखी आहेत. काहींची विशाल
विवरे मोठ्या तळ्यांमध्ये रुपांतरीत झाली आहेत. अस्थिर परंतु अतिशय सुंदर
सृष्टी येथे पहावयास मिळते.


२. जैवविविधता :
हा संपूर्ण प्रदेश हिरवा गार, नैसर्गिक संपदेने श्रीमंत आहे. पशु, पक्षी,
वनस्पती यांच्या असंख्य प्रजाती, सुंदर प्रजाती. पक्षीनिरीक्षकांनी जरूर
भेट द्यावी असा प्रदेश! या बाबतीत मी शेजारी होंडुरासला कैक गुण अधिक देईन,
त्यांनी जपलेली जैवविवीधता कौतुकास्पद! बेलीझ सुद्धा या बाबतीत अतिशय
संपन्न आहे. अर्थात, देशांच्या सीमा मानवांसाठी, सातही मध्यअमेरिकन देशांना
निसर्गाचे श्रेष्ठ वरदान प्राप्त आहे! पक्षांचे रंग इतके आकर्षक, पुरातन
स्थानिक, रंगीत पिसे पैशांच्या जागी वापरत. ग्वाटेमालाचे चलन केत्झाल हे
पक्षाचेच नाव. (जरूर गूगलवर पहा, quetzal). होंडुरास मध्ये कोपान या
प्रसिद्ध 'माया' शहरात असंख्य मकाव व टुकान अन्य रंगीत पक्षाबरोबर पहावयास
मिळतात.
काही पक्षांची चित्रे:







३. स्थापत्य विशेष :
या देशांतील स्थापत्यविशेष दोन प्रमुख प्रकारचे, प्राचीन माया, व
वसाहतकालीन स्पॅनिश. पहिल्या प्रकारात निर्विवाद उत्कृष्ट उदाहरण म्हणजे
टिकाल! उत्तुंग भव्य मंदिरे, राजप्रासाद, क्रीडासंकुल या सर्वांनी सुसज्ज
महानगर. चिचेन इत्झा, पलेंके, टिकाल व कोपान ही चार ज्ञात माया महानगरे
इतिहास प्रेमींना नेहमीच आकर्षित करतात. यातील पहिली दोन मेक्सिको मध्ये
आहेत. ग्वाटेमालातील टिकाल भव्यतेसाठी तर होन्डुरासमधील कोपान
कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत.
कोपान येथील राजाची एक मूर्ती, होंडुरास

वसाहतकालीन स्थापत्य कोपान व अँटिग्वा या शहरात पाहण्यासारखे आहे. येथे सतत भूकंप होत असतात त्यामुळे बरीच जुनी बांधकामे आज शिल्लक नाहीत, परंतु नंतर बांधलेल्या इमारतीही जुन्याप्रमाणेच रंगवलेल्या व सजवलेल्या आहेत. जुन्या भग्न इमारतींचाही शहराच्या सजावटीसाठी उत्तम उपयोग करण्यात आला आहे.
पुढील सर्व चित्रे अँटिग्वा येथील



तर ही झाली मध्य अमेरिकेची भटकंती…
…आणि हो, खाण्या पिण्याशिवाय भटकंती कशी पुर्ण होइल? :-) ह्या फोटोत स्थानिक खाद्य पदार्थ, पुपुसा ब्रेड - राजम्याचे सारण भरलेली मक्याची पोळी, राजम्याचे पिठले (फ़्राईड बीन्स) केळ्याचे भाजलेले काप (Plantain) भात व अव्होकाडो.

अवांतर:
१ युद्धभूमीबाहेर जगातील सर्वात असुरक्षित देश म्हणून होंडुरास व एल
साल्वाडोर ही नावे युनोच्या यादीत सर्वात वर आहेत. गुन्हेगारी, विशेषकरून
खूनाचे प्रमाण येथे सर्वाधिक... दोन्ही देशांतील माझे अनुभव बऱ्यापैकी
चांगले होते, पण सद्यस्थितीविषयी नमुद करावेसे वाटले. ग्वाटेमाला ही तसा
याच यादीतला
२ अजून एक म्हणजे, भारतीयांना होंडुरास व एल साल्वाडोर दोन्ही देशांसाठी
व्हिसा लागत नाही. युरोप किंवा युएस चा मल्टिपल एन्ट्री व्हिसा असेल तर
ग्वाटेमाला व बेलीझ यांचाही व्हीझा आवश्यक नाही
३ सन्दर्भासाठी माझा प्रवासाचा मार्ग : मी एल साल्वाडोर ची राजधानी सॅन
साल्वाडोर येथे सुरुवात केली, पुढे सर्व प्रवास रस्त्यानेच, होंडुरास मध्ये
कोपान, तिथून मध्य ग्वाटेमाला, पुढे उत्तर ग्वाटेमालात टिकाल, तिथून
पूर्वेकडे बेलीझ व बेलीझ सिटी मध्ये समाप्ती.

दोन वर्षांपूर्वी डिसेंबर मध्ये मोठ्या सुट्टीत 'ग्वाटेमालाला जाऊया का?' असं नवऱ्याने विचारलं तेव्हा मी या देशाचं नाव पहिल्यांदाच ऐकत होते. त्याने दाखवलेले सेमक चांपे (semuck champey) या जागेचे फोटो बघितले आणि बघता क्षणी ती जागा फार आवडली. ग्वाटेमालाबद्दल अजून थोडी माहिती वाचून मग आम्ही तिथे भटकायला जायचा आमचा बेत पक्का केला. सोबत १० महिन्यांची मुलगी असणार आणि तिच्यासाठी जरा नेहमीपेक्षा वेगळी तयारी या प्रवासासाठी करावी लागणार याचं थोडं टेन्शन आलं. पण मग तिला प्रवासाचा ताण नाही येणार अश्या बेताने आपण प्रवासाची आखणी करू असं ठरवून आम्ही ह्या अनुभवासाठी सिद्ध झालो.
आमची १८ दिवसांची सहल सुरू झाली ग्वाटेमालासिटी मधुन. ही ग्वाटेमालाची राजधानी आहे. या शहरात फक्त आम्ही येता - जाता एक एक दिवस थांबलो. ग्वाटेमाला सिटीला पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही एका १६ सीटर बसने सेमक चांपेकडे जायला निघालो. बसमध्ये बसायला तशी अडचणच होती. मागच्या बाजूला दाटीवाटीने सर्वजण बसले होते. जवळजवळ सगळेचं परदेशी नागरीक होते. आमच्याकडे बाळ होते म्हणुन आम्हाला ड्रायव्हर शेजारची स्पेशल जागा मिळाली होती. ड्रायव्हरची सीट आणि त्याशेजारची सीट यामधल्या जागेत एक कामचलाऊ बसायची जागा केली होती, त्यावर माझा नवरा बसला. मी त्याच्याशेजारी जरा बऱ्यापैकी सीटवर मुलीला मांडीवर घेऊन बसले होते. ती खूश होती आणि कारसीट शिवाय प्रवास करत असल्यामुळे ह्या स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद लुटत होती.
साधारण ८ तास असा प्रवास करुन आम्ही संध्याकाळी लंकीन या सेमक चांपेजवळच्या गावात पोहोचलो. तिथे आम्हाला आमच्या 'युटोपिया' (Utopia) होस्टेलला घेऊन जाणारा पिक अप ट्रक येणार होता. तिथून पुढचा रस्ता म्हणजे गाडी जात होती म्हणुन रस्ता म्हणायचा असा भयानक होता. मांडीवरच्या बाळाला घट्ट धरून मी पुन्हा एकदा ड्रायव्हरच्या बाजूच्या जागेत बसले होते. यावेळी माझ्या शेजारी मात्र एक अनोळखी मुलगी बसली होती. बसली म्हणजे बिचारी कशीतरी एका छोट्या फ़ळकुटावर टेकली होती. नवरा आणी इतर युटोपियाला जाणारे आमच्या सोबतचे प्रवासी मागे पिक-अपच्या हौद्यात तोल सावरून आणि आपापल्या बॅग्ज संभाळत उभे होते. प्रत्येक वळणावर आणि खड्ड्यातून गाडी गेली की कोणीतरी खाली पडेल असे वाटत होते. कसाबसा अर्ध्या पाऊण तासाने तो प्रवास संपला आणि आम्ही आमच्या हॉस्टेलला पोहोचलो. तो पर्यंत सगळीकडे अंधार आणि सामसुम झाली होती. दिवसभर प्रवासाने थकलो होतो त्यामुळे मिळेल ते खाउन आमच्या रूम मध्ये जाऊन पडलो. पिल्लू दुध पिऊन मस्त झोपून गेलं. आपण कुठे आहोत आणि कुठे जाणार याची तिला काहीच काळजी नव्हती. सगळया प्रवासात ती मस्त एंजॉय करत होती आणि तिला मजेत बघून आम्हालाही छान वाटतं होतं. सकाळी उठलो आणि समोरचा नजारा बघून आदल्या दिवशीच्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळुन गेला.
महिंद्राचा पिक अप ट्रक
यूटोपिया हॉस्टेल
यूटोपिया हॉस्टेल इथली आमची रहाण्याची जागा
यूटोपियाला आम्ही ४ दिवस थांबणार होतो त्यामुळे आम्हाला कसली घाई नव्हती. इथून सेमक चांपेला जायची - यायची व्यवस्था हॉस्टेल मालकच करत होता. शिवाय तिकडे केव्ह टुर्स, नदीमध्ये ट्युबिंग अश्या गोष्टी होत्या त्यासाठीही होस्टेल मधून मुलं गाईड म्हणुन लोकांच्या सोबत जात होती. आम्ही केव्ह टुर करणार नसल्यामुळे जरा उशीराने निघायचे ठरवले. आम्ही यूटोपियाला पोहोचण्याआधी दोन दिवस भरपूर पाऊस पडल्यामुळे निळीशार असलेली नदी थोडी गढूळ झाली होती, पण पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे एक तजेला आला होता. वातावरण खूपच प्रसन्न झाले होते. आम्ही हॉस्टेल मालकाच्या पिक-अप ट्रक मधून सेमक चांपेला पोहोचलो. ही जागा ग्वाटेमालाच्या राष्ट्रीय राखीव जागांपैकी एक आहे. निळ्याश्यार पाण्याच्या टप्प्यांमध्ये विभागलेल्या 'काहाबान' नदीच्या प्रवाहात पोहण्यासाठी लोक खास करून इथे येतात. शिवाय नदीच्या पोटात गुहेसारखा नैसर्गिक बोगदाही आहे. पाणी कमी असताना तिथे आरामात जाता येते. या नदीच्याच बाजूने एक छोटा ट्रेक करून एका 'मिराडोर' म्हणजे व्हयु पॉईंटला जाता येते. आम्ही तो ट्रेक करून वर गेलो आणि तिथून दिसणारा नजारा असा होता.
सेमक चांपे परिसर
आम्हाला एक दिवसाच्या मोठ्या प्रवासानंतर थोडं निवांत रहायचं होतं त्यामुळे सेमक चांपे बघून आल्यानंतरचे दोन दिवस काहीच प्लॅन केला नव्हता. पुढचे दोन दिवस आम्ही युटोपियाच्या आजूबाजूला फिरलो. जवळचे सेमील गाव म्हणजे १५ -२० घरांची डोंगर उतारावर विखुरलेली वस्ती आणि एक छोटी शाळा एवढंच होतं. हॉस्टेल मालकाने जवळपास एक दोन जुने लाकडी झुलते पूल आहेत ते बघून येऊ शकता अशी माहिती दिली. त्यामुळे त्या पुलांचा शोध घेत एका अतिशय चिखलमय वाटेवर जाऊन अडकलो. हळु हळु त्यातून बाहेर पडुन शेवटी एकदाचे त्या पुलाजवळ पोहोचलो. पूल फारच जुना होता. दुसर्या बाजुला थोडीफार घरे होती. चांगले ट्रेकिंग शूज असल्यामुळे त्या चिखलातून कुठेही पडझड न होता सुखरूप बाहेर पडलो होतो. नशीबाने परत जायला दुसऱ्या बाजूने जरा चांगला रस्ता होता. त्यानंतर मग आडवाटेला कुठे गेलो नाही. हॉस्टेलच्या आजूबाजूलाच एवढं अप्रतीम निसर्ग सौदर्य विखुरलेलं होतं की आपण अजून कुठे जाऊन काही बघावं असं वाटलंही नाही.
युटोपियाहून सेमील गावाकडे जाणारा रस्ता



आमचा पुढचा प्रवासही मोठा होता. युटोपियाहुन निघून आम्हाला फ्लोरेसला (Flores) जायचे होते. जवळच्या लंकिन या गावपर्यंत आम्हाला सोडण्याची व्यवस्था आमच्या हॉस्टेल मालकाने केली होती. तिथून सकाळी ८ ला आम्ही मिनी बस घेतली आणि संध्याकाळी ५ ला फ्लोरेस ला पोहोचलो. अमेरीकेत सहजा सहजी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेले डायपर चेंजिंग स्टेशन्स या प्रवासात कुठेही उपलब्ध नव्हते. मी सोबत एक चेंजिंग मॅट घेतले होते त्यावरच मग जिथे जिथे बसचे विश्रांती थांबे होते तिथे बाळाचे डायपर चेंज केले. याबाबतीत टाळाटाळ न केल्यामुळे तिलाही पुर्ण प्रवासात कधीही डायपर रॅश किंवा इतर इन्फ़ेक्शनचा काही त्रास झाला नाही.
फ्लोरेसला आम्ही 'लॉस अमिगोज' नावाच्या हॉस्टेलमध्ये रहाणार होतो. हे हॉस्टेल गावाच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे इथे युटोपियाच्या मानाने बराच गजबजाट होता. आमची प्रायव्हेट रूम होती त्यामुळे बाहेरच्या कोलाहलापासून आम्हाला जरा निवांतपणा मिळाला. हॉस्टेलमधूनच तिकाल (Tikal) या उत्खननात सापडलेल्या प्राचीन मायन राजधानीला भेट देण्यासाठी सफरीचे बुकिंग करण्याची सोय होती. आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळची सूर्यास्त- सफर बुक केली.
तिकाल बघण्याची खूप उत्सुकता होती. तिकाल नॅशनल पार्क हि जागा रेन फॉरेस्ट मध्ये गुडूप झालेल्या अतिप्राचीन मायान बांधकामांनी भरलेली आहे. यातल्या अगदी मोजक्याच जागांचे आत्तापर्यंत उत्खनन झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाने इथे सर्व प्रथम उत्खनन सुरु केले आणि त्या उत्खननातून अमेरिकेतले (उत्तर, दक्षिण आणि मध्य) आतापर्यंतचे सगळ्यात उंच टेंपल पुन्हा दिसू लागले. ते तिकाल नॅशनल पार्कमध्ये टेम्पल ४ म्हणून प्रसिद्ध आहे. टेंपलच्या वरच्या भागापर्यंत जाण्यासाठी लाकडी पायऱ्यांचा जीना करण्यात आला आहे. इथून नजर जाईल तिकडे फक्त जंगलच दिसते आणि मध्ये मध्ये दिसतात तिकाल टेंपल्स. इथल्या जंगलाची वाढ इतक्या झपाट्याने होते की जर व्यवस्थित निगा राखली गेली नाही तर पुन्हा काही वर्षात हि टेंपल्स झाडावेलींनी पूर्णपणे झाकून जातील.


दुसरा दिवस फ्लोरेस जवळच छोट्या पार्क मध्ये घालवला. तिसऱ्या दिवशी तिकाल सारख्याच असलेल्या पण जरा लांबच्या याक्षा (Yaxha) या ठिकाणी उत्खनानात सापडलेली पुरातन टेंपल बघायला गेलो. इथली टेंपल्स तिकालच्या मानाने कमी उंचीची आहेत. शिवाय इथे जायचा रस्ताही खडतर आहे त्यामुळेच की काय, इथे गर्दी कमी होती आणि आम्हाला निवांत फिरता आलं. इथूनही अप्रतिम सूर्यास्त पहायला मिळला.
याक्षा टेंपल्स
सूर्यास्त
पुढचा दिवस आमचा या ट्रिप मधला दहावा दिवस होता आणि आम्ही अजून एक मोठा प्रवास या दिवशी केला. फ्लोरेस मधून निघून आम्ही ग्वाटेमाला सिटी जवळच्या अॅण्टिग्वा (Antigua) या गावी आलो. हा प्रवास जवळ जवळ १० तासांचा होता. सकाळी १०:३० ला फ्लोरेस मधून निघून रात्री ९ ला आम्ही अॅण्टिग्वाला पोहोचलो. या प्रवासात पहिल्यांदाच आम्ही हॉटेल मध्ये रहाणार होतो. हे हॉटेल म्हणजे एक जुना वाडाच वाटतं होते. आपल्याकडे जुन्या वाड्यांना असतो तसा दिंडी दरवाजाही त्याला होता. हे हॉटेल गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात होते त्यामुळे इथून आम्हाला जिथे जिथे जायचे त्या सगळ्या ठिकाणी चालत जाणे सोयीस्कर होते. इथे काही मोठं आकर्षण बघण्याचा आमचा बेत नव्हता शहरात चालत जाण्यासारख्या ठिकाणी भटकणे आणि दोन दिवस निवांत एका ठिकाणी राहणे एवढाच आमचा उद्देश होता. वास्तुशिल्पासाठी प्रसिध्द असलेली काही चर्चेस या शहरात आहेत. आजूबाजूला भटकून आम्हीही जवळपासचे एक - दोन प्रसिद्ध चर्च पहिले.
अॅण्टिग्वा चर्च
आम्ही नाताळलाही अॅण्टिग्वामध्येच होतो. इथे त्या दिवशी आमच्या हॉटेल जवळच्या चर्चच्या आजूबाजूला जत्रे सारखी गर्दी होती. मदरमेरीच्या पुतळ्याची रस्त्यावरुन मिरवणुक चालली होती. आम्हीही रस्त्याच्या बाजूला उभे राहून या सगळ्याची मजा अनुभवली. एकंदरीत आपल्याकडे उत्सवांत असते तसेच उत्साही वातावरण तिथे त्यावेळी होते. या मिरवणुकीमुळे आमचा वेळ चांगला गेला आणि करमणूकही झाली.
आमचा पुढचा मुक्काम होता 'लेक-अतितलान' (Lake Atitlan) ह्या ग्वाटेमालातील अतिशय सुंदर लेकाच्या काठावर. इथे ह्या सरोवराच्या सभोवती वसलेल्या सातपैकी एका गावात सॅन पेद्रो (San Pedro) मध्ये. ही जागा म्हणजे प्रमुख ग्वाटेमालामधाल्या आकर्षणांपैकी एक आहे. या जलाशयाचे क्षेत्रफळ १३० स्क्वे. किमी असून सभोवतालच्या गावांमध्ये पर्यटकांसाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. यात स्पॅनिश शिकण्यापासुन ते योगा आणि मेडिटेशन शिकण्यापर्यंत बरेच काही आहे. शिवाय ह्या विस्तीर्ण तलावाकाठी राहुन तुम्ही त्याभोवतीच्या 'सिएरा माद्रे' पर्वतराजी मध्ये ट्रेकिंगही करू शकता किंवा आम्ही राहिलो तसे किनाऱ्यावरच्या एखाद्या गावात राहून निवांतपणाही अनुभवू शकता.
आम्ही राहिलो होतो ते 'हॉटेल सक्कारी' लेक अतितलानच्या अगदी काठावर होते. हॉटेलमधून दिसणारा लेक आणि आजूबाजूचा परिसर फारच सुंदर होता. या ठिकाणी दिवसभर काहीही न करता बसून राहिलो तरी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणाऱ्या वेगवेगळ्या बोटी, कयाकिंग करणारे पर्यटक, अधून-मधून पाण्यात सूर मारणारे पक्षी हे सगळे बघत वेळ कसा जातो ते कळतही नाही.
हॉटेल सक्कारी बाग
हॉटेलच्या आसपास खाण्याचेही बरेच पर्याय उपलब्ध होते. त्यापैकी एका ब्रिटिश तरुण चालवत असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये खूपच चविष्ट व्हेज बिर्याणी खायला मिळाली. अश्या अनपेक्षित ठिकाणी आपल्या ओळखीचा पदार्थ खायला मिळालं की त्याची चव अगदी अप्रतिम लागते. खूप दिवस भारतीय पद्धतीच जेवण न खाल्यामुळेही असेल पण ती बिर्याणी आम्हाला फारच छान लागली.
आम्ही सकाळ संध्याकाळ पोटपुजेच्या निमित्ताने बाहेर पडून गावात आजूबाजूला हिंडून येत होतो. एकदा असेच भटकत असताना एक स्थानिक आमच्याजवळ आला आणि त्याने माझ्या नवऱ्याला विचारले "तू ग्वाटेमालन आहेस का?" त्याने नाही म्हंटल्यावर तो म्हणे "मग तुझी बायको ग्वाटेमालन आहे का?" त्याने मीही ग्वाटेमालन नाही हे सांगितल्यावर तो आश्चर्यचकित झाला आणि मग आम्ही भारतीय आहोत हे सांगितल्यावर तो म्हणाला, की तुमच्याकडे बघुन तर तुम्ही ग्वाटेमालानच असाल असे वाटाले. पण आमच्या ह्या ग्वाटेमालन दिसण्याचा कोणत्याही दुकानात आम्हाला वस्तुंची किंमत कमी करून घेण्यात काहीही फायदा झाला नाही. आमच्या अगदीच कामचलाऊ स्पॅनिश बोलण्यामुळे लगेचच समोरच्याला आमचा खरा रंग कळून यायचा आणि मग वस्तूंच्या किमती पण वर जायच्या. रस्त्यात फिरताना बरेचदा लोक आम्हाला मुलीचं वय विचारायचे आणि मी गडबडीत 'दोसे मेसेस'(दहा महिने) च्या ऐवजी 'दोस मेसेस' (दोन महिने) असं सांगायचे आणि विचारणारा हे उत्तर ऐकून चक्रावून जायचा.
इथून एक दिवस 'लांचा' म्हणजे छोट्या बोट मधून जवळ असलेल्या 'सॅण्टिआगो' गावात जाऊन आलो. आम्ही राहत होतो त्या गावापेक्षा हे गाव खूपच बकाल होते. इथे 'सेंट मक्षिमॉन' चर्च बघण्यासारखे आहे असे वाचलेले होते म्हणुन ते बघायला गेलो तर तिथेही फारच उदासीन वातावरण होते चर्चची बाहेरून काही ठिकाणी पडझड झाली होती आणि एकंदरीतच सगळीकडे मरगळ पसरलेली होती. पण लांचा मधून येता जाता आजूबाजूच्या पर्वत्राजीचे आणि सुप्त ज्वालामुखी असलेल्या 'सॅन पेद्रो', 'व्होल्केन अतितलान' यांचे दर्शन फारच मनमोहक होते हीच काय ती जमेची बाजू.
बघता बघता आमचा निघण्याचा दिवस आला. परतीसाठी आम्ही पानाहाचेल (Panajachel) या गावातून ग्वाटेमालासिटीमध्ये जाण्यासाठी शटल बस घेतली. बससाठी वाट बघत असताना पानाहाचेलच्या बाजारात भटकलो. इथे स्थानिक लोकांच्या बरोबरीने बाहेरून येऊन इथे बस्तान बसवलेल्या 'हिप्पी' लोकांनी आपली दुकाने थाटली होती. हा भाग पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध असल्यामुळे छोट्या गोष्टींच्याही किमती बऱ्याच होत्या. आम्हाला आकर्षक असे फारसे काही न वाटल्याने खरेदीचा मोह सहजपणे टाळता आला.
दुपारी १२ च्या बसने इथे तिथे थांबे घेत - घेत संध्याकाळी ५ ला आम्हाला ग्वाटेमाला सिटीमध्ये पोहचवले. आम्ही पहिल्यादिवशी जिथे राहिलो त्याच 'दोस लुनास' या ब्रेड अॅन्ड ब्रेकफ़ास्ट ठिकाणी निघायच्या आधी एक दिवस येऊन राहिलो. आमच्या पुर्ण प्रवासाची हकीकत ऐकण्याची तिथल्या ओनर जोडप्याला खूपच उत्सुकता होती. इतक्या लहान बाळासोबत प्रवास करताना काही अडचण आली नाहीच, उलट बाळामुळे सगळीकडे लोक येऊन आमच्याशी बोलत होते आणि त्यामुळे आम्हाला लोकांमध्ये सहज मिसळण्याची संधी मिळाली. हे ऐकून त्यांना चांगले वाटले. एकंदरीत आम्हाला सगळीकडेच चांगला अनुभव आला. कुठेही लुबाडणूक किंवा गैरसोय झाली नाही आणि जिथे जिथे गेलो ती सगळी ठिकाणे आम्हाला मनापासून आवडली हे त्यांना सांगितल्यावर आपल्या देशाबद्दल अभिमान आणि एक प्रकाराचे समाधान यांचे मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर आणि कोणतीही अप्रिय घटना न घडता सहल पूर्ण झाल्याचे समाधान आमच्या चेहर्यावर पसरले.
पुढे मुलगी मोठी झाल्यावर जर म्हणाली की 'चला पुन्हा जाऊ ग्वाटेमालाला' तर आम्ही नक्की जाऊ अजून एकदा या वैविध्यतेने नटलेल्या देशाला भेट द्यायला.
इतर माहिती -
भौगोलिक स्थान: मध्य अमेरीका
चलन: केत्साल
मुख्य विमानतळ: ग्वाटेमालासिटी
व्हिजा:
उत्तर अमेरिकेतून जाणाऱ्या भारतीयांकडे जर अमेरिकेचा व्हॅलिड वर्क व्हिजा /
डिपेंडंट व्हिजा असेल तर ग्वाटेमालाचा व्हिजा घ्यावा लागत नाही. त्यामुळे
आम्हाला वेगळा व्हिजा लागला नाही.
प्रवास नियोजनासाठी माहिती स्त्रोत: लोन्ली प्लॅनेट - थॉर्न ट्री फोरम, ट्रिप अॅडवायजर
हॉटेल बुकिंग: स्वतंत्रपणे हॉटेल/हॉस्टेलच्या वेबसाईट वरून
खाद्यसंस्कृती:
येथील खाद्यसंस्कृतीवर माया संस्कृतीचा प्रभाव आहे. बीन्स, कॉर्न हे प्रमुख खाद्यपदार्थ आणि सोबतीने कुठलेतरी मांस.
मी थोडाफार मांसाहार करत असले तरी माझा नवरा शाकाहारी आहे आणि श्यक्यातो
परगावी किंवा परदेशात गेल्यावर मीही शाकाहारीच जेवण खाणे पसंत करते.
ग्वाटेमालामध्ये फिरताना शाकाहारी खाण्याचे पर्याय जरी कमी असले तरी
प्रत्येक ठिकाणी काही ना काही खायला मिळत होतेच. तिथे राईस आणि बिन्स
सगळीकडे मिळतात. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे फ्रँकी सारखे रॅप होते. मोठ्या
गावातल्या रेस्टॉरंटमध्ये क्रेप, पास्ता असल्या गोष्टी होत्या. शिवाय
रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आम्हाला व्हेजीटेरिअन ऑप्शन सुचवा असे वेटरला
विचारले तर तेही तिथले आपल्याला माहित नसलेले पदार्थ सुचवतात. एका ठिकाणी
भाताबरोबर आपल्या मेथीच्या भाजीसारखी भाजीसुद्धा होती. सगळीकडे ताजी फळे
मिळत असल्यामुळे बऱ्याचदा सकाळी नाष्ट्याला आम्ही फळेच खाल्ली. नविन
गोष्टींचा अनुभव घेण्याची मनाची तयारी असेल तर खाण्यापिण्यातल्या
थोड्याश्या गैरसोयीचे काहीच वाटतं नाही.
यूटोपिया हॉस्टेल्मधाला नाष्टा
फ्लोरेसमधले लंच
सॅन पेद्रो मधे डिनर
भाषा: स्पॅनिश
आमचा अनुभव - इथे छोट्या गावांमध्ये फिरताना तुम्हाला किमान थोडेफार
प्राथमिक स्वरूपाचे स्पॅनिश येणे गरजेचे आहे असे मला तरी वाटले, त्यामुळे
तुम्ही लोकांशी थोडंफार बोलू शकता. मला अगदी थोडेच शब्द माहित होते पण
माझ्या नवऱ्याने ग्वाटेमालाला जाण्याआधी काही दिवसच बेसिक स्पॅनिशचा कोर्स
केला होता त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. दुकानांमध्ये घासाघीस करण्यासाठी
,जेवणात काय हवे नको सांगायला आणि मुख्य म्हणजे तिथल्या स्थानिक
लोकांमध्ये थोडंफार मिसळुन संवाद सुरु करायला आम्हाला या गोष्टीचा चांगला
उपयोग झाला. आम्ही तोडके-मोडके बोललो तरी लोकांनी आम्हाला समजून घेतले आणि
त्यामुळे भाषेचा अडसर फारसा जाणवला नाही.
समाप्त...!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.