भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जन्म झालेला असल्यामुळे समुद्रात होणारा सूर्यास्त बघायची सवय लहानपणापासून आहे. थोडं मोठं झाल्यावर कन्याकुमारीला सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही समुद्रात होतात ही गंमत कळली आणि समुद्रातून होणारा सूर्योदय बघण्याची इच्छा निर्माण झाली. पुढे एकदा पाँडिचेरीला गेल्यावर सूर्योदय नाही, पण पौर्णिमेचा चंद्र समुद्रातून उगवताना पाहिला आणि उगाचच भारी वाटलं. तरी अजूनही पूर्व किनार्याबद्दल एक आकर्षण मनात आहेच.
खूप दिवसांपासून ओडिशाला जायचं मनात होतं. ओळखीचे २-३ जण जाऊन आले होते आणि त्यांच्या वर्णनांमुळे उत्सुकता वाढली होती. कोणार्कचं सूर्यमंदिर पाहण्याची उत्सुकता शाळेत असल्यापासून होतीच, पण इरावतीबाईंच्या 'परिपूर्ती’ मधली गूढरम्य कथा वाचल्यापासून जगन्नाथपुरीलाही जावंसं वाटत होतं .
होता होता यावर्षी नाताळच्या सुट्टीत ओडिशाला जायचं ठरलं. विचार पक्का झाल्यावर असं वाटलं की आई-बाबा आणि सासूबाईंनाही विचारावं, येता का, असं. कारण ते एरवी प्रवासकंपन्यांतर्फे बर्यापैकी फिरलेले असले तरी पूर्व भारतात गेलेले नव्हते आणि ओडिशा हे नाव तसं रुळलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत येत नाही. त्या तिघांचंही हो-नाही करता करता यायचं ठरलं. आम्ही चौघे इथून बंगळूरहून विमानाने आणि ते तिघे मुंबईहून ट्रेनने भुवनेश्वरला पोचणार होतो. त्यांचा प्रवास चांगलाच लांबलचक, म्हणजे ३१ तासांचा होता, पण सुदैवाने फर्स्ट क्लासची तिकिटे मिळाल्यामुळे तशी काळजी नव्हती. ते २१ तारखेला सकाळी ७ ला पोचणार होते, तर आम्ही त्याच दिवशी सकाळी १० ला. प्रत्यक्षात त्यांच्या गाडीला उशीर झाल्यामुळे ते आमच्याही नंतर, ११-११.३० ला हॉटेलवर पोचले.
हॉटेल बुक करताना नवर्याला पुरीच्या एका
प्रसिद्ध हॉटेलचं नाव मित्राने सुचवलं होतं. पण ते हॉटेल फारच प्रसिद्ध
असणार, कारण आम्ही जवळजवळ दीड महिना आधी चौकशी करूनसुद्धा तिथे आधीच पूर्ण
बुकिंग झालेलं होतं.
त्रिवागोवर पुरीचं इतर कुठलं बरं हॉटेल न दिसल्यामुळे शेवटी
भुवनेश्वरच्या एका हॉटेलमधे ३ खोल्या ४ दिवसांसाठी बुक केल्या. नंतर मात्र
लक्षात आलं की थोडी जास्त शोधाशोध करून पुरीचंच दुसरं एखादं हॉटेल बुक
करायला हवं होतं कारण कोणार्क, चिल्का सरोवर ही ठिकाणं पुरीपासून जवळ आहेत.
भुवनेश्वरपासून थोडी लांबच पडतात.
२१ तारखेला हॉटेलला पोचल्यावर भारताच्या पश्चिम किनायापासून पूर्व किनार्यापर्यंतचा ( बाबांच्या शब्दात सिंधुसागरापासून गंगासागरापर्यंतचा) प्रवास करून थकलेले ज्ये. ना. आंघोळी करायला आतुर होते. ते फ्रेश झाल्यावर बाहेर जेवायला गेलो. बाहेरगावी गेल्यावर झोमॅटो, स्विगी, ओला, उबर अशा अॅप्सचा खूप आधार वाटतो हे या ट्रिपमध्ये लक्षात आलं. रेस्टॉरंटचं रेटिंग झोमॅटोवर बघून मगच तिथे जेवायला जायचं की नाही हे ठरवायचं आम्ही कटाक्षाने पाळलं.
पहिल्या दिवशी संध्याकाळी जवळच असलेलं धौली हे ठिकाण पहायचा बेत होता. इ.स.पू. तिसर्या शतकात सम्राट अशोकाने कलिंग राज्यावर आक्रमण केलं. कलिंगातल्या नागरिकांना आपलं सार्वभौमत्व प्रिय होतं. त्यांनी प्राणपणाने अशोकाला प्रतिकार केला. घनघोर युद्ध झालं. रक्ताचे पाट वाहिले. भयंकर नरसंहार झाला. हा सगळा विध्वंस बघून अशोकाला युद्धाची किळस आली. पश्चात्ताप झाला. बौद्ध धर्माशी त्याचा आधीपासून परिचय होताच. या युद्धानंतर झालेल्या नवीन जाणिवेमुळे तो बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. ही कथा आपल्याला माहिती असते. हे युद्ध ज्या परिसरात झालं आणि अशोकाला ही जाणीव ज्या परिसरात झाली, त्या ठिकाणी १९७२ मध्ये जपान आणि भारताने संयुक्तरीत्या एक शांतीस्तूप उभारला आहे. तेच हे धौली . तिथे बुद्धाची एक सुंदरशी मुख्य मूर्ती आहे आणि चारी बाजूंना अजून लहान लहान बुद्धमूर्ती आहेत. समोरच्या बाजूला दोन ऐटदार सिंह आहेत. ( एकूणच तिथे सगळीकडे सिंहाची शिल्पं खूप दिसली) एखाद्या ठिकाणी घडलेला इतिहास त्या ठिकाणाला वेगळंच महत्त्व प्राप्त करून देतो. हा स्तूप काही ऐतिहासिक नाही. अगदीच अलीकडचा, आधुनिक काळातला. पण त्याच्या पार्श्वभूमीमुळे आपली दृष्टी पूर्णपणे बदलते. त्या बुद्धमूर्तीचं दर्शन घेऊन खाली उतरताना मला अगदी ’ कोसला’ मधलं बुद्धदर्शन आठवत होतं.

ही मुख्य बुद्धमूर्ती
शांतीस्तूप
हा फोटोग्राफीचा एक प्रयत्न
त्याच स्तूपाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कृष्ट दृकश्राव्य शो तिथे असतो. तोही पाहिला. दुसर्याच दिवशी पौर्णिमा होती. त्यामुळे स्तूपामागून जवळजवळ पूर्णचंद्र उगवलेला होता. त्या तशा वातावरणात ओम पुरीच्या घनगंभीर आवाजातलं निवेदन असलेला तो शो पाहणं हा अतिशय संस्मरणीय अनुभव ठरला.
दुसर्या दिवशीसाठी ओटीडीसीची पुरी-कोणार्क टूर बुक केली होती. उडिया
लोकांच्या हिंदी उच्चारांचे दणके बसायला लागले होते, विशेषत: फोनवर बोलताना
फारच गोंधळ होत होता. बंगाली लोक जसे दोन्ही गालांमधे लाडू ठेवल्यासारखे
बोलतात, तसेच, किंबहुना थोडे जास्तच, उडिया लोकही बोलतात हे आधी माहिती
नव्हतं. वास्तविक बंगळुरात स्थलांतरित उडिया लोक खूप आहेत. ओडिशात फारसे
उद्योगधंदे नसल्यामुळे आर्थिक निम्न वर्गातली अनेक माणसे बंगळूरला रहायला
येतात आणि बारीकसारीक कामे करतात. आमच्या सोसायटीतला सिक्युरिटीचा पूर्ण
स्टाफ, इस्टेट मॅनेजर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन हे सगळे झाडून उडिया आहेत.
पण त्यांचे हिंदी उच्चार आम्हाला व्यवस्थित कळतात. कदाचित बाहेरच्या
राज्यात राहून त्यांची बोली बदलली असेल. भुवनेश्वर-पुरी-कोणार्कमध्ये मात्र
लगेजला लॉगेज आणि कॉल करो ला मात्र कल कॉरो ही कोडी सोडवता सोडवता दमछाक
झाली. पण माणसं मात्र अतिशय सहकार्य करणारी होती. त्यामुळे कुठे अडचण आली
नाही.
दुसर्या दिवशी सकाळी आठला निघून ओटीडीसीच्या थांब्यावर पोचायचं असल्यामुळे रात्री लवकरच झोपलो.
सकाळी नऊ-सव्वानऊला आमची ओटीडीसीची टूर सुरू झाली. कोणार्कच्या दिशेने जाताना वाटेत पिपिली नावाचं गाव आहे. तिथे हस्तकलेच्या विविध प्रकारच्या वस्तू बनवतात. नारळाच्या काथ्यापासून, करवंटीपासून सुंदर सुंदर वस्तू केलेल्या होत्या. पामच्या पानावर केलेली चित्रकला ही ओडिशाची खासियत आहे. रघुराजपूर नावाचं दुसरं एक गाव त्यासाठी सुप्रसिद्ध आहे. आम्ही मात्र पिपिलीवरच समाधान मानलं. थोडीफार खरेदी झाली आणि आमची टेंपो ट्रॅव्हलर कोणार्कच्या दिशेने निघाली. रस्ता छान होता. साधारणपणे अकरा-साडेअकरा वाजता कोणार्कला पोचलो. एक गाईड घेतला. कारण त्याशिवाय सूर्यमंदिराबद्दलचे बारकावे कळले नसते.
सूर्यमंदिर पाहून आपण अवाक होतो. त्याची भव्यता चकित करून टाकते. मुख्य
मंदिर जरी कोसळलेलं असलं तरी ’ ढासळलेले बुरुज सांगतात, मूळचा गड किती
बुलंद होता ते’ ! मंदिरासमोर दोन्ही बाजूला सिंह, त्याखाली हत्ती आणि
त्याहीखाली माणूस, अशी शिल्पं आहेत. सिंह हे संपत्तीचं आणि हत्ती हे
सत्तेचं प्रतीक आहे. सत्ता आणि संपत्ती माणसाला चिरडते असं दाखवणारी ही
शिल्पं आहेत.
सूर्यमंदिराची रचना रथाच्या आकारात केलेली आहे. दोन्ही बाजूंना
बारा-बारा चाकं आणि पुढे रथ ओढणारे ७ घोडे. कोणार्कच्या सूर्यमंदिराची ’
ओळख’ म्हणता येईल असं शिल्प म्हणजे हीच सुप्रसिद्ध चाकं. जुन्या वीसच्या
नोटेवर आणि नवीन दहाच्या नोटेवर याच चाकाचं चित्र आहे.

रथाचे घोडे मात्र आता भंगून गेलेले आहेत. चाकंही काही सगळी सुस्थितीत
नाहीतच. ही चाकं पूर्वपश्चिम दिशेने आहेत आणि रोचक बाब म्हणजे ही चाकं
वापरून आपल्याला दिवसाची वेळ सांगता येते. एखादी सरळ काठी चाकाच्या
मध्यबिंदूकडे रोखून धरली, की तिची सावली कुठे पडते यावरून अचूकपणे वेळ
कळते. उत्तरायणात उत्तर बाजूच्या चाकांवर सूर्यप्रकाश पडतो, दक्षिणायनात
दक्षिण बाजूच्या चाकांवर. प्रत्येक चाकावर सुरेख नक्षीकाम आहे. मंदिराला
पूर्वेच्या बाजूला तीन दरवाजे आहेत. सूर्य जेव्हा मकरवृत्तावर जातो (उत्तर
गोलार्धात सर्वात लहान दिवस), तेव्हा सकाळी सूर्य उगवल्यावर त्याचे किरण
मुख्य दरवाज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या दरवाजातून आत शिरतात. याउलट जेव्हा
सूर्य कर्कवृत्तापर्यंत जातो, (उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस) तेव्हा
मुख्य दरवाज्याच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजातून सूर्यकिरण आत शिरतात.
जेव्हा दिवस-रात्र समसमान असते, म्हणजेच ज्या दिवशी सूर्य बरोबर
विषुववृत्तावर असतो, तेव्हा सकाळी पहिले सूर्यकिरण मधल्या मुख्य दरवाजातून
आत शिरतात. इ. स. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं आहे. पुरीचं जगन्नाथ
मंदिर आणि भुवनेश्वरचं लिंगराज मंदिरही याच सुमारास बांधलं गेलेलं आहे.
सूर्यमंदिरावरची शिल्पकला अतिशय सुंदर आहे. अनेक कथा, प्रसंग त्या दगडी शिल्पांमधून जिवंत केलेले आहेत.

यात समुद्रमंथनाचा देखावा आहे.

यात श्रावणबाळाची कथा आहे.

हे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. यात कलिंगाचा राजा हत्तीवर बसलेला दाखवला आहे आणि त्याला भेट म्हणून एक जिराफ नजर केलेला दाखवला आहे. जिराफ या आफ्रिकन प्राण्याचा जुन्या भारतीय शिल्पकलेतला हा एकमेव उल्लेख आहे. अरबी व्यापार्यांनी आफ्रिकेतून हा जिराफ आणून कलिंगाच्या राजाला नजर केला असावा.
हे मंदिर दगडी असलं तरी दगड एकत्र ठेवण्यासाठी आत लोखंडी कांबींचा वापर केलेला आहे.

असं म्हणतात की मुख्य देवळाच्या कळसात एक मोठा चुंबक होता. पोर्तुगिजांनी काही कारणाने तो काढला आणि त्यामुळे मंदिर कोसळलं. खरंखोटं माहिती नाही. मंदिराचं अजून काही नुकसान होऊ नये यासाठी १९०३ मध्ये आतला भाग चिणून बंद केला गेला. तिथे जायला मनाई आहे, पण तरीही नियम हे मोडण्यासाठीच असतात असा ठाम विश्वास असणारे काही महाभाग असतातच.

कोसळलेल्या मंदिरातली काही शिल्पं कोणार्कमधल्याच संग्रहालयात ठेवलेली आहेत. पण टूरच्या कार्यक्रमात त्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे ती पाहता आली नाहीत याची रुखरुख लागली. काही मोठे दगडी भाग मंदिराच्या आवारात ठेवलेले आहेत. प्रचंड अवजड अशा लोखंडी कांबीही आहेत.

सूर्यमंदिर पाहून आम्ही भारावून बाहेर पडलो. उन्हात फिरून मुलंही दमली होती. बाहेरच असलेल्या शहाळीवाल्याकडून शहाळी घेतली. ते मधुर पाणी पिऊन खूप छान वाटलं. ओटीडीसीच्या ठरलेल्या हॉटेलमधे जाऊन जेवलो आणि परत गाडीत बसून पुरीच्या दिशेने निघालो.
जगन्नाथपुरीला एक अस्पष्ट गूढतेचं वलय आहे. मंदिरात जगन्नाथ (
श्रीकृष्ण), बलभद्र ( बलराम) आणि सुभद्रा या तीन देवतांच्या मूर्ती आहेत.
या मूर्ती दगडी किंवा धातूच्या नसून लाकडी असतात. दरवर्षी आषाढात प्रचंड
मोठ्या लाकडी रथांतून त्यांची यात्रा निघते. (जगन्नाथाच्या रथावरून
इंग्लिशमधे जगरनॉट हा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ अवजड, प्रचंड असा आहे.)
मंदिरात बनवला जाणारा प्रसाद, म्हणजेच ’ भोग’ हा एक स्वतंत्रच विषय आहे.
मातीच्या भांड्यांमधून भात आणि कडधान्याचा हा प्रसाद प्रचंड प्रमाणात रोज
शिजवला जातो. पुरीला रोज सरासरी चार हजार भाविक भेट देतात. एकंदरीत
जगन्नाथपुरी हे भव्य, प्रचंड असं प्रकरण आहे. मंदिर संपूर्ण दगडी आहे.
मंदिरावरचा कापडी ध्वज रोज संध्याकाळी बदलतात. एका विशिष्ट कुटुंबातील
माणसेच पिढ्यानपिढ्या हे काम करत आलेली आहेत. आम्ही गेलो तेव्हा नेमका हा
ध्वज बदलण्याचा कार्यक्रम चालू असल्यामुळे आम्हाला पहायला मिळाला. इतक्या
उंचावर त्या माणसाला चढून जाताना आणि ध्वज बदलताना बघून जरा भीतीच वाटली,
पण त्यांच्यासाठी तो सवयीचा भाग असणार. मंदिरात खूप गर्दी होती. फोन,
कॅमेरा, चप्पल, कुठलीही चामडी वस्तू (पाकीट, पट्टा वगैरे) देवळात नेऊ देत
नाहीत. बाहेर पैसे घेऊन या वस्तू सांभाळणारे दुकानदार अर्थातच आहेत, पण
आम्ही हे सगळं गाडीतच ठेवून अनवाणीच गेलो. गाड्याही मंदिरापासून लांब पार्क
कराव्या लागतात. चालत जाता येतं, किंवा सायकलरिक्षाही असतात. वस्तू गाडीत
ठेवण्याचा निर्णय शहाणपणाचा ठरला, कारण त्या वस्तू ठेवायला आणि परत
घ्यायलाही प्रचंड गर्दी होती आणि नेमकी जागा सापडणेही कठीण होते. बर्याच
जणांनी आम्हाला तिथल्या पंड्यांबद्दल भरपूर सूचना दिल्या होत्या. पंड्ये
त्रास देतात, पाठीशी लागतात, पैसे उकळतात वगैरे. पण आम्हाला तरी असा काही
अनुभव आला नाही. गर्दी मात्र प्रचंड होती. जेमतेम दर्शन झालं. लांबूनच.
बाहेर आल्यावर ध्वज बदलताना पाहिलं, प्रसाद जिथे विकत मिळतो तो आनंद बझार
पाहिला. पण का कुणास ठाउक, प्रसाद विकत घ्यावासा मात्र आम्हाला वाटलं नाही.
अगदी आईबाबांनाही नाही. कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्न पाहून ते
खावंसं वाटलं नाही. बाहेर पडण्याच्या रस्त्यावर गर्दीत चक्क तीन-चार मोकाट
बैल सैरावैरा पळत सुटले होते. कसेबसे चालत तिथून मुख्य रस्त्यावर आलो.
जवळजवळ एक किलोमीटर चालत गाडीपर्यंत गेलो. ज्या प्रमाणात गर्दी तिथे
रोजच्या रोज असते, त्या मानाने स्वच्छता मात्र खरंच चांगली होती.
ज्यावर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्यावर्षी जुन्या मूर्तींच्या जागी
नवीन मूर्ती घडवल्या जातात. मूर्तींना ’ कलेवर’ असा शब्द वापरतात. नवीन
मूर्ती म्हणजे नवकलेवर ( नबकलेबर). अधिक आषाढ दर आठ, बारा किंवा अठरा
वर्षांनी येतो. नवीन मूर्ती बनवण्याचाही एक ठरलेला विधी आहे. विशिष्ट
लक्षणं असलेलं ( रंग, फांद्यांची संख्या, खोडावरची चिन्हं इत्यादी)
कडुनिंबाचं झाड त्या त्या मूर्तीसाठी निवडलं जातं. त्या लाकडाला ’ दारु
ब्रह्म’ म्हणतात. दारु म्हणजे लाकूड. ते झाड प्रथम सोन्याच्या, नंतर
चांदीच्या आणि शेवटी लोखंडी कुर्हाडीने तोडतात. वाजतगाजत ही लाकडं
मंदिराच्या परिसरात आणतात. त्यांच्या मूर्ती घडवतात. जुन्या मूर्तींसमोर या
नव्या मूर्ती ठेवतात आणि त्यांना रंगरंगोटी केली जाते. हा विधी ’ अनवसर’
म्हणून ओळखला जातो. नवीन मूर्तींमधे जुन्या मूर्तींमधला प्राण काढून
घालण्याचा विधी डोळे बांधून केला जातो असं म्हणतात. जुन्या मूर्तींना ’
कैवल्य वैकुंठात' नेतात, म्हणजेच स्मशानात. तिथे त्यांना एका कूपात ठेवून
वरून माती घातली जाते. ’ वासांसि जीर्णानि यथा विहाय...’
इरावती कर्व्यांनी परिपूर्तीमधल्या ’ नवकलेवर’ या कथेत/ लेखात हा सगळा विधी वर्णन केला आहे. कलेवर हा शब्द, प्राण काढून नवीन कलेवरात घालण्याची पद्धत, जुन्या मूर्तींना पाण्यात विसर्जित न करता मातीखाली पाठवणं हे सगळं गूढ वाटतं. शिवाय काही अंधश्रद्धाही या सर्वाशी निगडित आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांनी जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे होणार्या हस्तांतरणाशी याचा संबंध जोडला आहे. जगात रोज हा नवकलेवराचा उत्सव चालू असतो. कीटकांमधे जुन्या आणि नव्या कलेवरांची भेटच होत नाही. अंडी घालून पतंगाची मादी मरून जाते. उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांवरच्या प्राण्यांमध्ये मात्र हा ’ अनवसर’ काळ बराच मोठा असतो. कारण आचार-विचारांचा, संस्कृतीचा आत्मा नवीन कलेवरांमध्ये ओतायचा असतो. हे काम झालं की मात्र सन्मानाने निवृत्त होणंच श्रेयस्कर असतं. तसे जे निवृत्त होत नाहीत, घरात काय, बाहेर काय, सत्तेला चिकटून राहतात, त्यांना शेवटी अपमान, अवहेलना सहन करावी लागते. असा हा एवढा व्यापक विचार सांगणारी ही कथा कॊलेजच्या दिवसांत मनावर वेगळाच परिणाम करून गेली होती. तेव्हापासून मनात असलेली पुरीला जाण्याची इच्छा आज पूर्ण झाली.
ओडिसाला येऊन दोन दिवस झाले तरी उडिया जेवण चाखलं नव्हतं. कालच्या पुरी-कोणार्कच्या दिवसभराच्या प्रवासाचा थोडा थकवा होताच, त्यामुळे सकाळी फारसे कुठे गेलो नाही. ’ कनिका’ रेस्टॉरंटची झोमॅटोवर बरीच तारीफ वाचली आणि दुपारी जेवायला तिथे जायचं ठरवलं. हे एक ’ फाइन डाइन’ प्रकारातलं रेस्टॉरंट आहे. बाहेरची आणि आतलीही सजावट, एकूणच वातावरण छान, प्रसन्न होतं. उडिया थाळी मागवली.
थाळी यायच्या आधी भाजलेले उडदाचे पापड आणि मसाला ताक आलं. ताक अतिशय चवदार होतं आणि पापड आणि ताकाचं ’ काँबिनेशन’ अगदी मस्त जमलं होतं. थाळी यायला मात्र बराच जास्त वेळ लागला. एकूणच ओडिसामध्ये हिवाळ्यात दुपारच्या जेवणाची वेळ बरीच पुढे जाते म्हणे. आम्ही आपल्या सवयीने एक वाजता गेलो, तेव्हा तिथे शुकशुकाट होता, पण आम्ही अडीच-तीन वाजता निघालो, तेव्हा तिथे भरपूर गर्दी झाली होती.
थाळी आल्यावर मात्र वाट पाहिल्याचं सार्थक झालं.
एकूणएक सगळे पदार्थ अतिशय चविष्ट होते. कनिका हा उडिया गोड भाताचा प्रकार आहे. आपल्या साखरभातासारखा, पण जरा अगोड. भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची एक कोरडी भाजी होती, भरल्या परवराची रसदार भाजी होती. मला एरवी परवर फारसं आवडत नाही, पण ही भाजी अप्रतिम होती. दालमा हा उडिया स्पेशल प्रकार अर्थातच होता. (मला वाटतं मायबोलीकर सावलीने या तिन्ही पाककृती माबोवर लिहिल्या आहेत.) शिवाय एक आंबटगोड भाजी, बडी चुरमा ( या नावाची खात्री नाही, पण तिखट कुरकुरीत वड्यांचा चुरा होता), तांदळाची खीर आणि साधा भात- रोटी एवढे प्रकार होते. ताटंवाट्या, पेले, ताटल्या हे सगळं लखलखीत पितळेचं होतं. एरवी थाळी थोडी जास्तच होते पोटाला, पण हे जेवण अगदी योग्य प्रमाणात होतं.
जेवण करून निघालो. आज लिंगराज मंदिर आणि कोणार्कचा दृकश्राव्य शो, जमल्यास चंद्रभागा बीचवरून चंद्रोदय पाहणे असा बेत होता. पण जेवणात अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ गेल्यामुळे पुढचं प्लॅनिंग जरा बारगळलंच.
बंगळूर ’ गार्डन सिटी’, जयपूर ’ पिंक सिटी’ , तसं भुवनेश्वर मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. असंख्य जुनी मंदिरं इथे आहेत. त्यापैकी आम्ही लिंगराज मंदिर, परशुरामेश्वर मंदिर, मुक्तेश्वर मंदिर ही तीन मंदिरं पाहिली. तिन्ही शिवमंदिरं. लिंगराज मंदिर या सगळ्यांत भव्य आहे. पुरी आणि कोणार्कसारखंच इथेही सगळीकडे दगडावरचं सुंदर कोरीव काम आहे.
लिंगराज मंदिराच्या आवारात अनेक लहान लहान मंदिरं आहेत. नेहमीच्या देवतांची आहेतच, पण विशेष म्हणजे विश्वकर्म्याचं मंदिर आहे, यमराजाचं आहे आणि यमराजासमोरच सावित्रीचंही आहे. नेहमी शंकरासमोर नंदी असतोच, पण इथे नंदीचंही स्वतंत्र मंदिर आहे. इथेही पुरीसारखीच कॅमेरा, मोबाईलला बंदी असल्यामुळे फोटो काढता आले नाहीत. आवारात एक छानसं मांजर ऊन खायला बसलं होतं, त्यामुळे मुलांची जरा वेळ करमणूक झाली.
पहिल्या दिवशी आम्ही जिथे गेलो होतो, त्या धौलीच्या पायथ्याशी अशोकाचा एक शिलालेख आहे. शांतीस्तूप पहायला जाताना तो पहायचा राहिला होता म्हणून आत्ता जाऊन पाहिला. एका मोठ्या खडकावर ब्राह्मी लिपीत तो कोरलेला आहे. सम्राट अशोकाच्या महत्त्वाच्या शिलालेखांपैकी तो एक आहे.
तिथून निघून कोणार्कच्या दिशेने प्रवास सुरु केला. आदल्या दिवशी ओटीडीसीच्या वेळेला बांधील असल्यामुळे ज्या गोष्टी करायला जमल्या नव्हत्या, त्या आज करण्याचा बेत होता. त्याप्रमाणे कोणार्कला पोचलो, पण तिथलं वस्तुसंग्रहालय आम्ही पोचायच्या थोडा वेळ आधीच बंद झालं होतं. त्यामुळे थोडा विरस झाला. तिथला शो सुरु व्हायला वेळ होता, म्हणून जवळच असलेल्या चंद्रभागा बीचवर गेलो. सूर्यास्त नुकताच झाला होता, त्यामुळे चंद्रोदय समुद्रातून होताना पहायला मिळेलसं वाटत होतं, पण प्रत्यक्षात चंद्र बराच डावीकडून, रस्त्याच्या बाजूने उगवला. परत कोणार्कला पोचलो, तर तिथे पहिला शो नुकताच सुरु झाला होता. त्यामुळे दुसर्या शोसाठी थांबलो. इतर ठिकाणी जसं एक शो हिंदीत आणि दुसरा इंग्रजीत किंवा स्थानिक भाषेत असतो, तसं इथे नव्हतं. इथे प्रत्येकाला हेडफोन्स देत होते आणि त्यावर हिंदी, इंग्रजी आणि उडिया यांपैकी एक भाषा निवडायची चांगली सोय होती. सूर्यमंदिराच्या पार्श्वभूमीवर हा शो दाखवतात. हाही शो छानच होता. असं म्हणतात की कृष्णाचा मुलगा सांब याला आपल्या रूपाचा गर्व झाल्यामुळे त्याला कृष्णानेच त्वचारोग होण्याचा शाप दिला. त्यावर उ:शाप म्हणून नारदमुनींनी त्याला सूर्याची आराधना करायला सांगितली. ती त्याने कोणार्कला येऊन केली आणि त्याचा त्वचारोग बरा झाला. म्हणून त्याने येथे सूर्याचे मंदिर बांधले. पुढे नरसिंगदेव या कलिंगाच्या राजाने इ. स. तेराव्या शतकात सध्याचं सूर्यमंदिर बांधलं. ही सगळी माहिती जरी चांगली सांगितली असली, तरी मला स्वत:ला सूर्यमंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचनेबद्दल (अयनदिनांना सूर्यकिरण बरोबर आत शिरतील असे दरवाजे, लोखंडी अवजड कांबींचा बांधकामातला वापर इत्यादी) काही अधिक माहिती मिळेल असं वाटलं होतं, ती अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही. आज थंडी चांगलीच पडली होती. काकडतच परत गाडीत येऊन बसलो आणि साडेनऊ दहाला हॊटेलवर पोचून जेवून झोपलो.
चौथ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरमधे असलेली स्कंदगिरी आणि उदयगिरी लेणी पहायला गेलो. समोरासमोर असलेल्या दोन टेकड्यांमधे या गुहा किंवा बौद्धविहार आहेत. एखाददुसर्या गुहेत आपल्या अजिंठ्यासारखी भित्तिचित्रेही आहेत. वर चढायला मुलांनाही खूप मजा आली. केळी किंवा चणे विकत घेऊन काहीजण माकडांना खायला घालत होते. माकडंही मजेत होती.



ही स्कंदगिरी आणि उदयगिरीची लेणी.
नंतर परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर ही दोन
मंदिरं पाहिली. दोन्ही जवळजवळच आहेत. उंच, दगडी, कलिंग पद्धतीचे बांधकाम.
दोन्ही मंदिरांवर सुंदर कोरीव काम आहे. अतिशय शांत, स्वच्छ, रमणीय असा
परिसर आहे. एकूणच तिथे सगळ्याच मंदिरांच्या परिसरात चांगली स्वच्छता आढळली.

परशुरामेश्वर मंदिर
परशुरामेश्वर मंदिरावरचे कार्तिकेयाचे शिल्प

परशुरामेश्वर मंदिरावरचे कोरीव काम


मुक्तेश्वर मंदिर आणि परिसर
तिथून जेवायला गेलो आणि जेवून
हॉटेलवर जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत उभे होतो. मुलांची मस्ती सुरूच होती.
तेवढ्यात धावाधावी करताना धाकटा जोरात पडला. चेहर्याला चांगलंच लागलं.
सुदैवाने डॉक्टरांकडे जायची वेळ मात्र आली नाही. पण मग अजून कुठे खरेदीला
वगैरे जायचा मूड राहिला नाही.
दुसर्या दिवशी हॉटेल सोडायचं होतं. चिलिका
(चिल्का) सरोवराला जाण्यासाठीही ओटीडीसीची टूर असते. पण ती सकाळी सात ते
संध्याकाळी सात अशी असते. आमचं परतीचं विमान रात्रीचं असल्यामुळे आम्हाला
कदाचित जमलं असतं, पण आई-बाबा-सासूबाई दुपारच्या विमानाने मुंबईला परतणार
होते. आम्हालाही सकाळी सातलाच मुलांना घेऊन सामानासकट चेकआउट करणं अवघड
वाटत होतं, त्यात धाकटा जरा मलूलच होता, त्यामुळे आम्हीही चिल्का सरोवराला
जायचा बेत रद्द केला.
अकरा-साडेअकराला चेकआऊट केलं, ते तिघे विमानतळावर जाण्यासाठी रवाना झाले आणि आम्ही रीजनल म्युझियम ऑफ़
नॅचरल हिस्टरी पहायला गेलो. भुवनेश्वरला गेल्यावर नक्की भेट द्यावी, असं
हे म्युझियम आहे. खर्या ह्त्तीचा, देवमाशाचा सांगाडा इथे पहायला मिळाला.
विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींबद्दल भरपूर माहिती देणारं असं हे
संग्रहालय आहे. विशेषतः ज्या हत्तीचा सांगाडा आहे, त्या शंकरची कहाणी चटका
लावून जाते.

हा शंकर नावाचा हत्ती ओडिसामध्ये गावात शिरून त्रास देऊ लागला, दोन
माणसांचा मृत्यूही ओढवला, फॉरेस्ट खात्याने त्याला पकडून ठेवलं होतं. पुढे
त्याला काही इन्फेक्शन होऊन तो मेला. नंतर त्याचे शवविच्छेदन करताना खूप
पूर्वी त्याला लागलेली बंदुकीची गोळी हाडात अडकून बसलेली दिसली. शंकरच्या
हिंसक वृत्तीचे कारण म्हणजे हा बंदुकीचा हल्ला असू शकतो. आजही त्याच्या
हाडांच्या सापळ्यात ती गोळी दिसते.

देवमाशाचा सांगाडा
संग्रहालयातून बाहेर पडेपर्यंत दोन वाजून गेले होते. फिरून फिरून आम्हीही दमलो होतो. त्यामुळे निवांत एखाद्या सिनेमाला जाऊ, दोन-तीन तास आरामात बसू आणि मग एअरपोर्टला जाऊ असा विचार केला. एस्प्लनाड मॉलमध्ये गेलो. हा देशातला सहावा मोठा मॉल आहे म्हणे. मॉल चांगला आहे, पण स्पायडरमॅन की झीरो या पर्यायांमध्ये मी झीरो निवडला. (का ते विचारू नका). यापुढे मायबोलीवर परीक्षण वाचल्याशिवाय सिनेमाला जायचं नाही असा कानाला खडा! सिनेमा (एकदाचा) संपल्यावर बाहेर आलो, रिक्षा करून हॉटेलवर जाऊन सामान ताब्यात घेऊन लगेच विमानतळावर गेलो. रात्री बारा-साडेबाराला बंगळूरला घरी पोचलो आणि घरी पोचल्यावर नेहमीच जसं सुख वाटतं तसं वाटलं. दुसर्या दिवशी सुट्टीच होती त्यामुळे निवांत झोप काढली.
ओडिसा सहलीत सर्वात जास्त आवडलेल्या बाबी म्हणजे तिथल्या देवळांमध्ये असलेली स्वच्छता, सहकार्य करणारी, लुबाडणूक न करणारी माणसे, नुकताच हॉकी विश्वचषक होऊन गेलेला असल्यामुळे सजवलेलं भुवनेश्वर आणि अर्थातच उडिया जेवण! सर्वाधिक तापदायक बाब म्हणजे न समजणारे उच्चार!कोणार्क
"पुत्रा, गुन्हाच तसा घडला होता तुझ्याकडून. भलेही नारदमुनींनी मुद्दाम कळ लावून हे घडवून आणलय. पण चुकून का होइना तू श्रीकृष्णमहाराजांचा गुन्हा केलास आणि त्यांच्या तोंडून शापवाणी निघाली. आणि तूला कुष्ठरोग झाला."
"अगदी योग्य बोललीस माते, पण माझं निर्दोष असणं सिद्ध झाल्यावर तातांनीच त्यावर उ:शाप म्हणून सुर्यपुजेचा उपाय सांगितला. सुर्यदेव जे सर्व त्वचाविकारांचे नाशक मानले जातात त्यांची साधना."
"आणि गेल्या बारा वर्षाच्या अथक साधनेनंतर आज तू त्या महाभयंकर व्याधीतून मुक्त झालास. आता पुढे काय करायचे ठरवले आहेत. सुर्यपुजा अशीच चालू ठेवणार?"
"माते, गेली बारा वर्षे चंद्रभागेच्या तीरी मित्रवनातील या पवित्र जागी सुर्यदेवांची उपासना करत आलोय. त्यांच्या कृपेने या व्याधीतून मुक्त झालोय. त्या सुर्यदेवांचं भव्य मंदीर या ठिकाणी उभे करायची माझी इच्छा आहे."
"अगदी माझ्या मनातले बोललास पुत्रा, पण आधी या आनंदाच्या क्षणी श्रीकृष्ण महाराजांचे दर्शन घेवून त्यांचे आशीर्वाद घेवूया. या मंदीर उभारणीबद्दलही त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यकच आहे, नाही?"
"चल माते, आधी तातांचे आशीर्वाद घेवून त्यांच्यासमोर ही मनीषा व्यक्त करू."
आणि श्रीकृष्णपुत्र सांब आपली माता जांबुवंतीसह पित्याच्या महालाकडे, त्या सर्व शक्तिमान, पुर्ण पुरूषाच्या, देवोत्तमाच्या, श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी निघाला.......!
**********
नारदाच्या खोडकर, कळी लावण्याच्या स्वभावामुळे एकदा श्रीकृष्णपुत्र सांब याला आपल्या पित्याचे कोपभाजन व्हावे लागले. सांबाने आपल्या स्वभावानुसार एकदा नारदाची खोडी काढली. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून नारदमुनी त्याला एका ठिकाणी घेवून गेले. नेमके ती जागा श्रीकृष्णाच्या बायकांची स्नान करण्याची जागा होती. सांबाला तिथे सोडून नारद त्याच्या नकळत कृष्णाला तिथे घेवून आले. आपल्या बायकांच्या स्नानाच्या ठिकाणी सांबाला पाहून संतप्त झालेल्या कृष्णाने त्यास कुष्ठरोग होइल असा शाप दिला. नंतर सांबाने आपले निर्दोषत्व सिद्ध केले पण एकदा दिलेला शाप परत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णांनी त्यास सुर्यदेवांची आराधना करण्यास सुचवले. त्यानुसार बारा वर्षे सुर्याची आराधना केल्यावर सांबास आपले आरोग्य आणि सौंदर्य पुनश्च प्राप्त झाले.
(दंतकथा संदर्भ : श्री सांब पुराण)
*************************************************************************************
ही आणि अशा अनेक दंतकथा पुराणात वाचायला मिळतात. सांबपुराणानुसार श्रीकृष्णपुत्र सांबाने आपल्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून त्याकाळी चंद्रभागेच्या तीरी (सद्ध्याची चिनाब त्याकाळी चंद्रभागा या नामे ओळखली जात असे म्हणे) पुढे सांबाच्या नंतर मुळ-सांबपुर म्हणुन ओळखल्या गेलेल्या नगरी (सद्ध्याचे पाकिस्तानमधील मुलतान) एक विशाल सुर्यमंदीर बांधले. साधारण सातव्या शतकात भारताला भेट दिलेल्या चिनी प्रवासी ह्यु-एन त्संग याच्या लिखाणात मुलतानच्या या पुरातन सुर्यमंदीराचे उल्लेख येतात. नंतर हे मंदीर जिथे सांबाने प्रत्यक्ष सुर्याची आराधना केली होती तिथे हलवण्यात आले. यामागे देखील एक दंतकथा आपल्या पुराणात तसेच कपिल संहितेत आढळते. उडीया भाषेतील मदला पंजी या स्थानिक ग्रंथातदेखील अशाच प्रकारची दंतकथा सापडते.
आपली तपश्चर्या पुर्ण केल्यावर सांबाने चंद्रभागेत ( हे चंद्रभागा म्हणजे एक छोटेसे सरोवर आहे कोणार्कपासुन काही किमी अंतरावर) स्नान करण्यासाठी म्हणून एक डुबकी मारली, तेव्हा त्याला पाण्यात एक मुर्ती सापडली. जी विश्वकर्म्याने घडवलेली सुर्याची मुर्ती होती. त्या मुर्तीची सांबाने तिथुन जवळच असलेल्या मित्रवनात एक छोटेसे मंदीर बांधून तिथे प्रतिष्ठापना केली. बहुदा आताचे कोणार्क आणि त्यावेळचे मित्रवन या जागा एकच असाव्यात, म्हणूनच सांबाने सांबपूरात बांधलेले भव्य सुर्यमंदीर पुन्हा इथे स्थलांतरीत करण्यात आले.
कोनार्कचे जगदविख्यात सुर्यमंदीर.....!

दुसर्या एका दंतकथेनुसार पुढे कधीतरी केसरी राजवंशाच्या पुरंदरकेसरी नामक राजाने कोनार्क देवाचे एक मंदीर उभे केले. कोनार्क हा शब्द बहुदा कोना ( Corner : भारताच्या एका कोपर्यातच ओरिसातील हे जगदविख्यात सुर्यमंदीर वसलेले आहे) आणि अर्क (सुर्य) यांच्या संधीतून निर्माण झाला असावा. त्याला त्याकाळी कोनादित्य या नावाने संबोधले जात असे. त्यानंतर तिथे गंगा राजवंशाच्या राजवटीत राजा नरसिंहदेव (१२३८-६४) याने या मंदीरासमोरच दुसरे एक भव्य मंदीर उभे केले. राजा नरसिंहदेवाचा पिता राजा अनंगभिम याने पुरीच्या जगन्नाथासमोर या मंदीराचे एका भव्य मंदीरात रुपांतर करण्याचे कबुल केले होते. हे मंदीर एका रथाच्या आकाराचे होते. मध्यभागी अतिषय देखणे असे भव्य मंदीर (रथ) ज्याला सात अश्व आणि चक्रांच्या (चाकांच्या) १२ जोड्या म्हणजे रथाला अतिशय सुक्ष्म आणि सुंदर कोरीवकाम केलेली एकुण २४ चाके आहेत.
इथे आणखी एक दंतकथा सांगण्याचा मोह आवरत नाही. राजा नरसिंहदेवाने जेव्हा हे भव्य मंदीर बांधायला घेतले, तेव्हा सुरूवातीला या मंदीराच्या बांधकामासाठे एकुण १२०० कामगार तत्कालीन विख्यात वास्तुविद 'बिसू महाराणा' याच्या हाताखाली राबत होते. मंदीर पुर्ण करायला त्यांना अतिशय कष्टाची अशी १२ वर्षे लागली. पण मंदीर काही पुर्ण होत नव्हते. सगळे बांधकाम कळसापाशी येवून अडकले होते. एवढा विस्तीर्ण कळस पेलायची खालच्या सांगाड्याची ताकत नव्हती. त्यामुळे कळस काही पुर्ण होत नव्हता. नेमका त्यावेळी बिसू महाराणाचा १२ वर्षाचा मुलगा 'धर्मपद' मंदीराचे बांधकाम पाहण्यास आला. आणि पित्याची अडचण पाहून कळस पुरा करण्याचे काम त्याने स्वतःच्या डोक्यावर घेतले. कळसाचा शेवटचा दगड त्याने स्वतःच्या हाताने बसवला, आणि कळस पुर्ण झाला. पण हा शेवटचा दगड काही वेगळ्याच प्रकारचा होता. तो नक्की दगडच होता की......?
पण त्यानंतर काही दिवसातच समुद्रकिनारी धर्मपदाचे शव सापडले. दंतकथा असे सांगते की धर्मपदाने आपल्या योगशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरातील सर्व उर्जा त्या दगडात ओतून त्याचे एका महा - शक्तिशाली चुंबकात रुपांतर केले होते. त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. पण त्याची पुर्ण ज्ञाती त्याच्या या त्यागामुळे राजाच्या कोपाला बळी जाण्यापासून वाचली.....
ऐकावे ते नवलच.....
पुराणातील अनेक दंतकथा, किवंदंतीने सजलेले तत्कालीन शिल्पकलेचा विलक्षण नमुना असलेले हे सुर्यमंदीर केवळ अद्वितीयच आहे. काही दिवसांपुर्वी ऑफीसच्या काही कामानिमीत्त ओरिसाभेटीचा योग आला. त्या संदर्भातले काही फोटो इथे टाकले होते. काम आटोपल्यावर सुदैवाने लागुनच आलेला एक सुटीचा दिवस पकडून मी भटकंतीला निघालो. हॉटेलहून बाहेर पडलो तेव्हा प्रवासाची काहीच रुपरेषा ठरवली नव्हती. मिळेल ती बस पकडून आधी जगन्नाथ पुरीला जायचे आणि जगन्नाथाचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळालाच तर आजुबाजुला जवळपास असलेली काही ठिकाणे पाहायची असे ठरवले होते. त्याप्रमाणे एक खाजगी बस पकडून पूरीला पोहोचलो. सुदैवाने जगन्नाथाचे अगदी व्यवस्थीत दर्शन झाले. भोग वगैरे चढवून बाहेर आलो. मंदीरात, आत कॅमेरा नेण्याची परवानगी नसल्याने बाहेर आल्यावर बाहेरूनच मंदीराचे काही फोटो काढले. मंदीराच्या समोरच एक कातीव, भव्य असा स्तंभ उभा आहे. त्याला अरूण स्तंभ असे म्हणतात. तिथल्या एका पुजार्याने सांगितलेल्या माहितीवरून हा स्तंभ आधी कोनार्कच्या सुर्यमंदीरापाशी होता. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या एका ओरीसास्वारी दरम्यान हा क्लोराईटने बनलेला अरुणस्तंभ कोनार्कहून आणून पुरीला जगन्नाथाच्या दारात उभा केला म्हणे. असे म्हणतात की या स्तंभावरील अरुणाची मुर्ती अगदी श्री जगन्नाथाच्या मंदीरातील मुळ मुर्तीच्या पातळीत येते. ...
(जगन्नाथपुरी : श्रींचे मंदीर)

तिथून बाहेर पडल्यावर थेट पुरीच्या समुद्रकिनार्यावर गेलो. सुटीचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी होती. भर दुपारचे १२.३० वाजलेले. तिथे चौकशी केली असता कळले की कोनार्क इथुन अवघ्या ४० किमीवर आहे. बस्स, आता दुसरा काही विचार करण्याचा प्रश्नच येत नव्हता.
(पुरीचा समुद्र किनारा)


बस स्टँडकडे येताना भर रस्त्यावर प्रेमाने गप्पा गोष्टी करणारे हे दोन
मित्र भेटले आणि त्यांचे ते प्रेम पाहून मग मला कॅमेरा हातात घेण्यावाचुन
गत्यंतरच राहीले नाही. 

बसस्टँडहून कोनार्कला जाणारी बस लागली आणि मीही लटकलो...... ! बसला... 

पुरी ते कोणार्क हा प्रवास बर्यापैकी हिरव्यागार भागातून होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला येणारी छोटी छोटी गावे, माडाच्या झाडांच्या दाटीत वसलेली घरे वेड लावतात. हा पुर्ण पट्टाच हिरव्यागार निसर्गाने भारलेला आहे. मध्येच एका ठिकाणी कुठलीतरी एक छोटीशी नदी लागली आणि मी कॅमेरा सरसावला.


साधारण ४० मिनीटांनी बसायला जागा मिळाली. मी खुशीत येवून सीटवर टेकलो आणि हुश्श.....तेवढ्यात बस थांबली आणि बसवाहक ओरडला (त्याला बोंबलणे हा शब्द जास्त समर्पक ठरावा)......
"उतरो भाय्...कोSSSSSSSSणार...... !
शेवटचा 'क' त्याने खाल्ला की बसमधल्या कोलाहलाने कुणास ठाऊक? पण पुन्हा धक्के खात एकदाचा कोनार्कच्या त्या बसथांब्यावर उतरलो. तसे लगेच तिथले गाईडस माझ्याकडे धावले.......
"यार पहिली बार नही आ रहा हू मै...गाईडकी जरुरत नही है!" या परिस्थितीतला माझा पेटंट डायलॉग.
मेल्यावर उकळत्या तेलाच्या कढईकडे नेणार्या यमदुतालादेखील बहुदा हेच ऐकवीन मी.....!
(चमकलात? थेट स्वतःलाच नरकात नेवून उभे केले हे पाहील्यावर. वो क्या है ना
भाय, अपन अपने दोस्तलोगको भोत चाहता है भिडू..जिधर तुमे लोगा रहेंगे उधरीच
अपुनभी आयेगा, बोले तो ...... Innocent ) तसे त्यांनी स्थानिक भाषेत बहुदा
दोन चार शिव्या हासडून माझा नाद सोडला. तरी एकजण मंदीरापर्यंत माझ्या
पाठीमागे होताच. शेवटी वैतागून मीच त्याला विचारले सौ रुपये देगा क्या, तो
मै तेरेको साथमें लेताय गाईड करके.... तो बिचारा खालमानेने निघून गेला.
(सज्जन होता बिचारा, खरेतर मी भांडायची आणि तशीच वेळ पडली तर बचावासाठी पलायनाची तयारीही ठेवली होती.
)
मंदीरापाशी आल्यावर कळाले की सुर्यमंदीर आणि तेथील पुराण वस्तु खात्याचे वस्तु संग्रहालय यांचे कॉमन तिकीट एकाच ठिकाणी मिळते. मी २० रुपये मोजून तिकीट घेतले. मंदीरदर्शनाची फी १० रुपये आणि संग्रहालयाची १० रुपये...आणि मंदीराकडे निघालो. समोरून मंदीराचे प्रथमदर्शन झाले ते या स्वरुपात. यावरुनच मंदीराच्या भव्य स्वरुपाची कल्पना येते.

तिकीट खिडकीपाशीच मंदीराबद्दल माहिती देणारे दोन फलक आढळले.

तिथे असलेल्या गार्डकडुन तिकीट पंच करुन घेतले आणि आत शिरलो.
या भव्य वास्तुच्या प्रांगणात आपले स्वागत होते.... ते भोग मंडपाच्या दर्शनाने. आता भोग मंडपाचे फक्त अतिषय सुंदर कोरीव काम असलेले उभे खांब आणि पाया शिल्लक आहेत, पण जे काही आहे, तेही वेड लावायला पुरेसे आहे. परमेश्वराच्या भोजनासाठी म्हणुन हा भोग मंडप (भोग : नैवेद्य) उभारण्यात आला होता. अतिशय सुंदर, आणि बारीक कलाकुसर असलेला भोग मंडप त्यावेळी आपल्या परमोच्च अवस्थेत असलेल्या ओरीसाच्या अत्युच्च शिल्पकलेची साक्ष देत आजही उभा आहे. पुर्णपणे अतिषय बारीक नक्षीकाम केलेल्या एका विस्तीर्ण चौथर्यावर सोळा संपुर्णपणे अतिषय सुरेख नक्षीकाम केलेल्या खांबाच्या आधाराने भोग मंडपाचे हे शिल्प उभे होते. आता फक्त चौथरा आणि खांबच शिल्लक आहेत. पण जे काही आहे ते निर्विवादपणे भव्य आणि सुंदर आहे.
(भोग मंडप)





भोग मंडपातून बाहेर पडले की समोर येतो तो सुर्यमंदीराचा दर्शनी भाग. त्याकडे आपण शेवटी येवू....
सुर्यमंदीराच्या उजव्या बाजुला एक पुरातन वटवृक्ष आपल्या स्वागताला हजर असतो..

मी मंदीराच्या प्रदक्षिणेला सुरूवात केली.
डाव्या बाजुला दर्शनी बाजूला सात अश्वांपैकी आता फक्त दोन शिल्लक आहेत, तेही भग्नावस्थेत. मी भारावल्यासारखा मंदीराच्या चारीबाजुनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. नृत्यकला, यक्ष किन्नर यांच्याबरोबरच कामशास्त्रातील विविध श्रुंगारीक आसने अशा विभीन्न प्रकारांनी नटलेली ती नितांत सुंदर शिल्पे बघताना डोळे एका जागेवर ठरत नव्हते. हे एवढं भव्य, विशाल आणि तरीही इतकं सुक्ष्म नक्षीकाम केलेलं महाशिल्प उभे करायला किती वेळ लागला असेल्..किती जण त्यासाठी राबले असतील? त्या पुरंदरकेसरी ने किंवा नरसिंहदेवाने त्यांच्या प्रजेसाठी काय केले माहीत नाही, पण हे अद्वितीय मंदीर उभारून अखंड भारताला मात्र एक खुप मोठा सन्मान प्राप्त करून दिला आहे एवढे नक्की.
(प्रदक्षिणा मार्ग )







दोन तीन प्रदक्षिणा घालून झाल्यावर जाणवले की ...
अरेच्चा, अजुन आपल्याला खुप काही पाहायचे आहे. इथेच गुंतून राहीलो तर कसे व्हायचे? म्हणून मी प्रदक्षिणेचा नाद सोडला आणि मंदीराच्या प्रांगणात असलेल्या इतर शिल्पांकडे वळलो.
मंदीराच्या डाव्या बाजुला एक छोटेसे सद्ध्या भग्नावस्थेत असलेले शिल्प आहे. याला नटमंदीर या नावाने ओळखले जाते. उपलब्ध माहितीनुसार या मंदीरात नर्तकी (देवदासी ? ) देवासमोर नृत्य करायच्या. भग्नावस्थेत असलेले हे छोटेसेच नटमंदीरदेखील अंगा खांद्यावर आपल्या तत्कालीन वैभवाच्या अनेक समृद्ध खुणा बाळगून होते.
(नटमंदीर)

पुर्वी केसरी वंशातील श्री पुरंदरकेसरी याने बांधलेल्या शिल्पात एक श्रीकृष्णाचे (जगमोहन) मंदीरही होते. बहुदा सुर्यमंदीराची अजस्त्र वास्तू ढासळायला (कळस) सुरूवात झाल्यावर ते बंद करण्यात आले असावे. पण त्या मंदीरातील 'जगमोहना'चे देखणे शिल्प मात्र आजही नटमंदीरात प्रतिष्ठापीत करून जतन करून ठेवले आहे.
(जगमोहन)

जगमोहनाचे (श्रीकृष्णाचे) दर्शन घेवून बाहेर पडलो आणि अहो आश्चर्यम इथे मला अचानक आपली माणसं भेटली.
"वो ताई, हिकडं या. येक फोटू काडू या समदे मिळून....!"
एक पांढरा शुभ्र सदरा आणि पायजामा घातलेले, गांधीबाबांचे समर्थक (?) (त्यांना गांधीबाबांना समर्थन करण्यासाठी गांधी टोपीची गरज नव्हती, डोइवर मस्त पुर्णचंद्र चमकत होता, भर माध्यान्हसमयी कुणातरी ताईंना हाका मारत होते.
त्या परक्या राज्यात मराठी कानावर पडलं आणि माझी अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी झाली. त्यांच्या हातवार्यांच्या रोखाने पाहीलं आणि अजुनच चाट पडलो. ते एका विदेशी तरुणीला बोलावत होते. नंतर तिचाशी बोलताना कळले की ती जपानी असुन, तिचे नाव 'एमिको' आहे, ज्याचा जॅपनीजमध्ये अर्थ होतो 'हसरं मुल' किंवा ' सुंदर मुल' ! दोन्ही नावं तिला अगदी सुट होत होती.
तर या काकांचा, माफ करा काकांची ओळख राहीलीच. 
चार काकालोक (अगदी सदरा, पायजामा आणि मुंडासं किंवा गांधी टोपी अशा पारंपारीक महाराष्ट्रीय वेशातले) आणि चक्क नऊवारीतल्या सहा मावश्या (बहुतेक सगळेच ४५-५० च्या पुढचे) असा हा सुरेख गृप खास नाशकाजवळच्या मालेगाववरून थेट ओरीसात जगन्नाथाच्या दर्शनासाठी आणि आजुबाजुचा हा भाग पाहण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे एवढ्या लांब आलोय, तर काही जामानिमा करून नटून थटून वगैरे न येता अगदी घरगूती पेहरावात ही सगळी मंडळी आली होती. सर्वच जण सामान्य घरातले आहेत हे त्यांच्या पेहरावावरूनच लक्षात येत होते. पण प्रवासाची त्यांची या वयातली ओढ पाहून खुप छान वाटले. विशेष म्हणजे ती जपानी तरूणी 'एमिको' भाषेचा अडसर बाजुला ठेवून त्यांच्यात अगदी सहज मिसळून गेली होती.
कसं असतं ना, तुमची मनं शुद्ध असली, मनापासुन नाती जोडण्याची तयारी असली की वय, शिक्षण, भाषा, रंग, रूप, देश हे सगळे अडसर क्षुद्र ठरतात. केवळ हातवारे आणि खाणा खुणा यांच्या साह्याने त्यांच्या संभाषण चालू होते.
मी लगेचच काकांना गाठले....
"नमस्कार काका, कुण्या गावचे?"
मी संभाषणाला सुरूवात केली, मराठी ऐकली आणि काका हरखले.
"आरं ही तर आपली भाषा हाये. आमी मालेगावहून आलो देवा, तुमी कुंकडून आले?"
"मी मुंबईला असतो, कंपनीच्या कामासाठी आलो होतो. आज सुटी होती मग फिरायला बाहेर पडलो झालं. तुमच्या तोंडुन आईची भाषा ऐकली आणि राहवलं नाही" इति मी.
"लै बेस झालं देवा, आता तुमीच आमची आमच्या नव्या तायशी नीट वळक करून द्या बिगी बिगी."
म्हणाजे आत्तापर्यंत त्यांना त्या जपानी मुलीचं किंवा तिला त्यांचं नाव ही माहीत नव्हतं. मग मी त्यांच्याशी आईच्या भाषेत आणि एमिकोशी इंग्लिशमध्ये बोलत (माझ्या धन्य इंग्लीश अॅक्सेंटमध्ये) त्यांची ओळख करुन दिली. एमिको (याचा उच्चार अमिको असाही करतात का? पण स्पेलिंग EMIKO असेच होते.असो) तिच्या बॉयफ्रेंडबरोबर जगभरातील विविध जाती-धर्माच्या मंदीरांचा अभ्यास करत, जग बघायला निघाली होती. मी तिला मुंबईला येण्याचे आमंत्रण द्यायला विसरलो नाही.
(गाववाले काका आणी जॅपनीज ताई)

नंतर मालेगावची काका-मावशी कंपनी आणि जॅपनीज ताईचा निरोप घेवून मी पुढे निघालो.
मुळ मंदीराकडे वळण्याआधी मी पुन्हा एकदा आजुबाजुचा परिसर पाहून घेतला. आपल्या पुराण वस्तु संशोधन खात्याने (त्यांच्याकडून अपेक्षा नसतानाही) सुर्यमंदीराच्या आजुबाजुच्या निसर्गाची व्यवस्थीत निगा राखलेली आहे. चारी बाजुला बागा मेनटेन केलेल्या आहेत. सगळीकडे हिरवेगार असल्याने परिसर कसा प्रसन्न वाटत होता.
(सुर्यमंदीराभोवतालचा निसर्ग)

आधीच ठरवल्याप्रमाणे सगळ्यात शेवटी मी मुख्य मंदीराकडे वळलो....

कोनार्कचे हे सुर्यमंदीर तत्कालीन ओरीसा वास्तु शैलीचे एक अतिषय सुंदर उदाहरण आहे. उडीया शैलीप्रमाणे मुळ मंदीराच्या रचनेत देऊळ (गर्भगृह), जगमोहन (सभामंडप किंवा महामंडप) , अंतराळ आणि भोग मंडप अशा वास्तु अंतर्भूत आहेत. भोग मंडपाची वास्तू मुळ मंदीराच्या वास्तुपासून थोडी बाजुला असली तरी तो संपुर्ण योजनेचाच एक मुलभुत घटक आहे हे नक्की. अन्य उडीया मंदीरे आणि कोनार्कचे सुर्यमंदीर यात एकच मुलभुत फ़रक दिसून येतो तो म्हणजे हे मंदीर एका योग्य आणि सुस्थीत चौथर्यावर बांधण्यात आलेले आहे. एक भक्कम बेस (पाया, कट्टा .. काय बरे म्हणता येइल त्याला?) बांधून त्यावर मंदीर बांधण्यात आलेले आहे.
टिपीकल वक्रीय शिखरासहीत असलेले गर्भगृह हे उडीया शैलीच्या 'रेखा देउळ' या पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. तर जगमोहन किंवा सभामंडपाचे बांधकाम हा "उडीया शैलीच्या "पिढा देउळ" या प्रकाराचा उत्कृष्ट अविष्कार आहे. दोन्ही वास्तू म्हणजे रेखा देऊळ आणि पिढा देऊळ मे मुळ प्लानप्रमाणे आतुन आयताकृती असून बाहेरून मात्र उडीया वास्तू शैलीच्या पंचरथ शैलीचे अतिषय योग्य आणि लक्षणीय उदाहरण आहे. या आणि अशाच प्रकारची बरीच माहिती तो गाईड सांगत होता. खरेतर ते सगळे माझ्या डोक्यावरून जात होते. कारण तो ज्या अगम्य हिंदी-इंग्लीश किंवा तत्सम भाषेत बोलत होता ती भाषा जाम डोक्यावरून (की डोक्यात जात होती). मलाच ते फारसं कळालं नाही पण जे कळालं ते इथे लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे.
(सर्वसाधारण आराखडा : मुख्य मंदीर + जगमोहन मंदीर)

मुख्यमंदीरालाच लागून असलेल्या या भव्य मंदीरालाच (सभामंडप) जगमोहन म्हणूनच संबोधले जात असावे. कारण तिथले गाईडलोक त्याचा उल्लेख जगमोहन असाच करीत होते. साधारण ३० चौरस मिटर आकारमान आणि तेवढीच उंची लाभलेल्या जगमोहन नामक या वास्तुला लागुनच मुख्य सुर्यमंदीर कळासासहीत उभे आहे (साधारण ६८ मिटर उंच). पुढच्या काळात कधीतरी शिखराचा भाग ढासळला गेला... (त्याची कारणे आजही अज्ञात आहेत)
यासंदर्भात इथे गाईडकडून एक विलक्षण दंतकथा ऐकायला मिळाली. (मी त्याचा फुकट्या ग्राहक होतो). त्यानुसार त्यावेळी जगमोहनाचे शिखर बांधताना त्यात एक विलक्षण शक्तीशाली असा चुंबक बसवण्यात आला होता. तो चुंबक सर्व वास्तुचा (कळस) भार सावरून धरत असे. परंतू मध्ये काही शतकांपुर्वी मंदीरावर वीज कोसळली आणि त्यावेळी तो चुंबक निखळून पडला आणि त्या नंतर मंदीराचे शिखर ढासळायला सुरूवात झाली. ही कथा जर खरी असेल तर त्यावेळचे आपले वास्तुशास्त्र किती प्रगत असेल याची कल्पनाच केलेली बरी. खरे खोटे तो जगमोहनच जाणो. नंतर शिखर कोसळायला सुरूवात झाल्यावर मंदीरात आत, गाभार्यात भर घालून लोकांना जाण्यास मनाई करण्यात आली. तिन्ही बाजुला असलेली दारे आता सुरक्षेच्या कारणास्तव काँक्रीटने बंद करण्यात आलेली आहेत. त्यापुर्वी वर सांगितल्याप्रमाणे आतली जगमोहनाची मुर्ती काढून बाहेरील नटमंदीरात स्थापीत करण्यात आली. जगमोहनाचे छत तीन विभीन्न स्तरात विभाजीत करण्यात आले आहे. या तिन्ही स्तरांवर अतिशय सुंदर आणि सुक्ष्म नक्षीकाम केलेली विविध शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.
(जगमोहन : सभामंडप)

जगमोहन हे मला वाटते त्यावेळी एकप्रकारचे सभास्थान किंवा देवाचा दरबार भरण्याची जागा असावी. तत्कालीन उडीया मंदीरांप्रमाणे हे देखील पंचरथ पद्धतीचे बांधकाम आहे. एका विस्तृत प्लॅटफॉर्म किंवा पिठावर उभारलेल्या जगमोहनाचा आराखडा पाच आडव्या विभागांमध्ये (स्तर) विभागला गेलेला आहे. सगळ्यात खालचा भाग 'पभगा', त्यानंतर त्यावरील स्तर 'जंघा', 'बंधना' 'उर्ध्वजंघा' आणि त्यानंतरचा भाग म्हणजे 'वरंडा'. हा प्रत्येक स्तर पुन्हा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये विभागला गेलेला आहे. त्यावर मुर्ती कोरण्यासाठी किंवा नक्षीकाम करण्यासाठी छोटी छोटी खिडकीवजा आकार कोरण्यात आले आहेत. त्याला पिढा मुंडी, खाखर मुंडी आणि वज्र मुंडी अशी नावे आहेत. यापैकी पिढा मुंडीच्या रचनांमध्ये मुख्यतः यक्ष, किन्नर, फुले, नागदेवता कोरलेल्या आहेत. बाडा उर्फ जगमोहनाच्या सगळ्यात वरच्या स्तरात आठ मुक्तपणे उभ्या असलेल्या दिपकला अर्थात अष्टदिशांच्या देवतांच्या मुर्ती उभ्या केलेल्या होत्या. उदा. इंद्र (पुर्व), अग्नि (south east), यम (दक्षीण), नैरुत्य (नैरुत्य), वरुण (पश्चिम), वायू (north west), कुबेर (उत्तर) आणि इशान (इशान्य) इ. यापैकी बर्याचशा मुर्ती चोरून परदेशी स्मगल करण्यात आल्या. यापैकी एक मुर्ती परत मिळवण्यात ओरिसा सरकारला यश आले. ती मुर्ती सध्या कोणार्क येथील वस्तु संग्रहालयाची शोभा वाढवते आहे.
असो तर पिढा मुंडीच्या नंतर जरा वर सरकले की क्रमांक लागतो तो खाखरमुंडी रचनांचा. हे आकार बहुतांशी रिकामे आहेत किंवा बहुतेकांमध्ये काही विचित्र आकाराचे प्राणी आणि बहुतांशी अगदी लाईफ साईझ म्हणता येतील अशी कामशास्त्राशी संबंधीत शिल्पे कोरण्यात आलेली आहेत्.पुर्ण वास्तू बहुदा लोखंडी बिम्सच्या आधारावर उभी आहे. आणि मधला भिंतीचा भाग , तसेच दरवाजे बहुदा क्लोराईट किंवा तत्सम पाषाणापासुन कोरण्यात, बनवण्यात आलेले आहेत. या दरवाज्यांवर किंवा चौकटींवर म्हणु हवेतर देखील अतिषय सुक्ष्म आणि सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. (आराखड्याच्या फोटोत डावीकडील उभे तीन आकार हे पिढा मुंडी, खाखर मुंडी आणि वज्र मुंडीचे आहेत)
जगमोहनाला लागूनच मुख्य सुर्यमंदीर आहे. इथे बाहेरच्या बाजुने, चौकटीमधून तीन सुर्यप्रतिमा स्थापीत करण्यात आलेल्या आहेत. जे काही समोर होते ते विलक्षण भारावून टाकणारे होते. या तिन्ही सुर्यप्रतिमा शैशव, तारुण्य आणि वार्धक्य या मानवी जीवनाच्या तीन कालावधीनुसार बसवलेल्या आहेत. काळ्या पत्थरात (क्लोराईट) कोरलेल्या या सुर्यप्रतिमा अतिषय देखण्या आणि भव्य आहेत. मला इथे आणखी एक रंजक माहिती मिळाली जी आधी कधीच ऐकलेली नव्हती. आपल्याकडे वैदिक काळापासून सुर्यपुजेची पद्धत आहे. पण सुर्य हा आपला देव नाही. सुर्य हा आर्यांचा देव. शेकडो युगांपूर्वी आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर आपले देवही आणले. त्यात सुर्य हा प्रमुख देव होता. त्यामुळेच आपल्या इतर देवांपेक्षा वेगळी एक गोष्ट सुर्याच्या प्रतिमेत आढळते ती म्हणजे सुर्यदेवाच्या पायात घोट्याच्याही वर येणारे बुट आहेत.
(सुर्यदेव)


निघण्यापुर्वी मंदीराच्या परिसरातील अन्य काही भग्न शिल्पांचे घेतलेले फोटो.




पाय निघत नव्हता पण निरोप घेणे आवश्यक होते. संध्याकाळ व्हायला लागली होती. मग शेवटी न राहवून पुन्हा एकदा मंदीराभोवती एक प्रदक्षीणा घातली आणि मावळत्या सुर्यनारायणाला नमस्कार करत कोणार्कच्या त्या अद्वितीय चमत्काराचा निरोप घेतला. निघता निघता तिथून जवळच असलेल्या पुराण वस्तु खात्याच्या संग्रहालयाला भेट दिली. मंदीरातून तुटून पडलेली काही शिल्पे इथे जतन करून ठेवली आहेत.

शेवटी पुन्हा एकदा इथून थेट भुवनेश्वरला जाणारी बस पकडली..... अहं लटकलो... बसला ! 
बॅक टू पॅव्हेलियन.... भुवनेश्वर ! उद्या मुंबईला परत..........
कोणार्कला जायचे कसे?
ट्रेन अथवा विमानाने भुवनेश्वर आणि तिथून मग बस (खाजगी बसेस सुटतात
भुवनेश्वरहून). पुरी, कोनार्क एका दिवसात सहज होण्यासारखे आहे. कोनार्कच्या
आसपास अजुनही काही बघण्यासारखी क्षेत्रं आहेत. उदा. चंद्रभागा ई. पुरीबरून
कोनार्कला जाताना मध्येच हे लागते. मला नाही जमले पण होण्यासारखे आहे.
राहण्याची सोय भुवनेश्वर आणि पुरी इथे चांगली होवू शकेल. कोनार्कमध्ये मला
काही विशेष हॉटेल्स दिसली नाहीत. भुवनेश्वरला राहणे उत्तम.
कोणार्क मंदिरातील सिंहासनाविषयीही अनेक मिथ्यके आहेत. कळसात असलेल्या चुंबकांमुळे ते सिंहासन हवेत तरंगायचे म्हणे! कोरलेल्या प्राण्यांमध्ये जिराफही आढळतो! [ आफ्रिकेशी व्यापार?]
कोणार्क मंदिर जर का गोर्या साहेबाने बंद करून ठेवले नसते तर ते एव्हाना पडून पण गेले असते. मुख्य मंदिर आतमधून पूर्णपणे रेबिटने भरलेले आहे. आणि त्यामुळेच वरचा ढाचा अजून उभा आहे.
इथे बाहेरच्या बाजुने, चार दिशांना, चार सुर्यप्रतिमा स्थापीत करण्यात आलेल्या आहेत. (मला फक्त तीनच पाहता आल्या, कारण सुर्यमंदीराच्या बर्याचशा भागात सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य दर्शकांना प्रवेश नाही.)>> आम्हाला गाईडने दिलेल्या माहितीनुसार बाहेरच्या बाजूस तीन सूर्यप्रतिमा आहेत आणि त्या बालक(सकाळ) , तरूण (दुपार) आणि वृद्ध (संध्याकाळ) अशा ठेवल्या होत्या व त्या त्या वेळेप्रमाणे त्यावरती सूर्याची किरणे पडत असत. सध्या या मूर्ती पुराणतत्त्व खात्याने या तीन कमानीमधे बसवल्या आहेत.
त्यामुळेच आपल्या इतर देवांपेक्षा वेगळी एक गोष्ट सुर्याच्या प्रतिमेत आढळते ती म्हणजे सुर्यदेवाच्या पायात घोट्याच्याही वर येणारे बुट आहेत.>> कारण सूर्य हा इराणी (झरतुष्ट्राच्या अगोदरचे) देव आहे त्यामुळे "खरी सूर्यप्रतिमा" ओळखायची खूण ही असते.
कोणार्कचे गाईड बर्याचदा भारत का इकलौता सूर्यमंदिर अशी ओळख करून
देतात, मात्र कोकण किनारपट्टीवर बरीच सूर्यमंदिरे आहेत व ती अजून पूजनीय
अवस्थेमधे आहेत हे त्यानाच काय कित्येक मराठी लोकाना ठाऊक नाही
कशेळीची सूर्यमंदिर, अर्थात ही मंदिरे कोणार्कैतकी भव्य नाहीत हेही खरे
कोणार्कमधे सर्वात जास्त बघन्यालायक काय असेल तर ते रथाची चोवीस चक्रे. प्रत्येक चक्रावर वेगळ्या मूर्ती. वेगळी थीम. आणि त्या चक्रावर पडणार्या सावलीवरून अचूक वेळदेखील सांगता येते.
मंदिराच्या पाठीमागे उषा आणि छाया (सूर्यदेवाची मंदिरे) आहेत. तसेच, कोणार्कच्या मंदिराचे सर्वात जास्त वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधल्यापासून तेथे कधीही पूजा झालेली नाही. दंतकथा सांगते की, मंदिराचे बांधकाम करणारा मुख्य पुजार्याचा मुलगा या मंदिराच्या कळसावरून खाली पडला त्यामुळे मंदिर अपवित्र झाले व येथे पूजा झाली नाही... इतके सुंदर मंदिर उभारून देखील तिथे पूजा न होणे म्हणजे काय उपयोग त्या मंदिराचा.
कोणार्कच्या मंदिरातील मूळ पूजेची मूर्ती नक्की कुठे हे माहित नाही. मात्र, जगन्नाथ पुरीच्या मंदिराच्या आवारामधे एक सूर्याची मूर्ती आहे तीच कोणार्कमधली असे पुजारी व गाईड सांगतात, इतिहासतज्ञ त्याला दुजोरा देत नाहीत.
कोणार्क मंदिराच्या आवारातच अजून एक नवग्रह मंदिर आहे. इथे अजून पूजा
चालते. आणि इथे जर गेलं तर खास ओरिसाच्या पंड्याचा अनुभव येतो. आठवड्यातून
कधीही जा... आज अमुक वार है, अमुक ग्रहका वार. पूजा कराईये बस्स पाचसो
रूपयेमे
बहनजी, आप दान धरम करेंगे तो गरीब ब्राह्मण भोजन करेगा.. " 
ओरिसामधे फिरताना या पंड्यापासून फार जपून फिरावे लागते. हातोहात लुटत जातात ते.
कोणार्कवरून पुरीला जाणारा रस्ता मात्र खूप सुंदर आहे. पूर्ण
समुद्रकिनार्याच्या बाजूने हा रस्ता जातो. इथे वाटेमधे आमचा डायवर आम्हाला
एका देवीच्या देवळात घेऊन गेला. देवळाच्या आवारामधे एक डोल्फिनचा सांगाडा
ठेवलाय. उग्र अशी कालीची मूर्ती होती. आम्हाला देवळात गेल्यावर मासे
तळण्याचा वास यायला लागला. अगदी उभे राहवेना. देवळात असा वास कसा काय??
पुजार्याला शेवटी विचारलं.
"मा को सिर्फ मछली का भोग चलता है!!!!!"
अर्थात ती कोळ्याची देवी आहे.
विशाल, जगन्नाथाच्या मंदिरामधे तुम्हाला जगन्नाथजी का प्रशाद मिळाला का??
नंदीनी, चांगलाच प्रशाद (?) मिळाला. तिथल्या कार्यालयातून मी जगन्नाथजींना चढवण्यासाठी म्हणून नैवेद्य (स्थानिक शब्दात भोग) घेतला.. रुप्ये ३५१ फ़क्त...(सुरूवात २५१ पासून होते ती चार-पाच हजारापर्यंत पर्याय उपलब्ध करून देते) . पुन्हा आत जगन्नाथाच्या पायापर्यंत प्रशाद पोहोचवण्यापुर्वी त्या पंड्याने ’भोग’च्या बॊक्समध्ये काहीतरी खुशी थेवायची विनंती केली, ते ५१ रुपये आणि मग शेवटी आतपर्यंत प्रवेश मिळवून दिल्याबद्दल त्याला एकशे एक रुपये.
पण म्हणले आपलं कुठे नेहमी नेहमी येणे होणार आहे... असेही बाहेर जेवायला
गेलो की एका वेळी सात-आठशे रुपये तरी किमान जातातच. आज तो खर्च
देवबाप्पांच्या जेवणासाठी करू...
मग भले ते पैसे कुणाच्याही पोटात का जाईनात.
अर्र... हा प्रशाद नव्हे!!! जगन्नाथच्या मंदिरामधे जे पंडे उभे असतात
त्याच्या हातात एक वेताची छडी असते. त्याने ते सपासप लोकावर मारत असतात आणि
लोक भक्तिभावाने "जगन्नाथजी का प्रशाद" म्हणून तो मार खात असतात.
जास्त जोरात लागत नाही.

हा तो जिराफचा फोटो.
विशाल, भुवनेश्वर मधील अनेक मंदिरांव्यतिरीक्त जमल्यास पुढच्यावेळी हिरापुर आणि शिशुपालगढला जाता आले तर पहा. हिरापुर मधी ६४ योगिनींचे मंदिर भव्य जरी नसले तरी स्तापत्यशास्त्राच्या व पुराणवस्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे आहे (८वे शतक), तर शिशुपालगढला अजुनही उत्खनन सुरु आहे (निदान ३ वर्षांपुर्वी मी गेलो होतो तेंव्हा तरी होते). ते शहर कलिंगाची राजधानी असावी असा कयास होता/आहे (ईसपुर्व तिसरे शतक).
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.