Friday, October 23, 2020

अंगोला

 जाह्नवी

जून मध्ये अंगोला या नव्या आणि कधीही स्वप्नात सुद्धा न आलेल्या देशात माझं आगमन झालं. इतरांप्रमाणे "आफ्रिका" बघायला मिळणार म्हणून खरं तर खुशीत होते पण विमान तळावर पाउल टाकल्या टाकल्या काय झालंय आणि आपण कुठे आलोय ते समजलं....अजिबात आवडला नव्हता तो देश....मी अजूनही नवर्याला म्हणतेही की तुझ्यावर माझं इतकं प्रेम नसतं ना तर मी परत गेले असते.....
दोन दिवसांचा वीक एंड झाल्यावर नवरा गेला कामाला आणि मी??? घरात??? बाप रे ....नवरा येईपर्यंत चे ते सात तास म्हणजे मला सात वर्षान सारखा वाटत होते ....पण आलिया भोगासी च्या तालावर मी वेळ मोजायला सुरुवात केली...मनात म्हटलं, काय अगदी आपण पण अतीच करतोय जरा.....बायका काय रहात नाहीत की काय असं देशाबाहेर येउन घरात एकट्या??? आता एकदा आलोय न.....मग काहीतरी उद्योग करायलाच हवा.....

मग विचारांना सुरुवात....पहिली गोष्ट म्हणजे आमच्या लग्नाची सी डी बघितली...कार्यालयातून निघतानाचा सीन आल्यावर लग्नात रडले नव्हते; पण तेव्हा रडले....तेवढाच वेळ गेला हो......घड्याळ बघितलं, पण छे.... फक्त ११ च वाजले होते...म्हणजे अजून सकाळच होती....??? बरं.... मग आता पुढे काय? म्हणून मग स्वयंपाक घरात मोर्चा हलवला......म्हटलं बघावं तरी......त्या आधी कधी बघितलंच नव्हतं......लग्न होऊन सासरी आले तरीही आधीचा अनुभव नसल्यामुळे सगळं सासुबाईन्च्या हाताखालीच चाललं होतं ना......मग रात्रीच्या स्वयपाकाची तयारी, बेत वगैरे झाल्यावर म्हणलं बाहेरची गम्मत बघूया जरा.......म्हणून हॉल च्या खिडकीत येउन उभी राहिले......आणि आजूबाजूचा परिसर वगैरे निरखायला सुरुवात केली.....आणि मला आपले पुढचे सहा महिने कसे जाणार याची पूर्ण कल्पना आली.

असाच काहीबाही करतंच तो आठवडा गेला...आणि वीक एंड आला....पूर्ण आठवडा मी वीकेंड ला काहीतरी करूच की....या आशेवर काढला होता शेवटी....शनिवारी सकाळी जरा आरामातच उठलो....मग चहा नाश्ता वगैरे करेपर्यंत जेवायचीच वेळ झाली होती....आज काही मी स्वयंपाक करणार नाही असा सांगून टाकलंच होतं मी नवर्याला.....त्यामुळे भुकेनी हाका द्यायला सुरुवात केल्यावर नवरा म्हणाला, "चल आपण इथेच जवळ एक कॅफे आहे तिथे जाउया...." मनात आलं, वाहः......आहे वाटतं असं काही इथे......कारण खिडकीच्या कक्षेत तर असलं काहीच नव्हतं.....म्हणलं चला...बरं झालं.....असं म्हणून गेलो तिथे....आणि तिथलं स्पेशल म्हणून राइस आणि फेजाव म्हणजे आपला उसळ भात असतो न तसलं काहीतरी खाउन आलो......मी यापेक्षा छान केलं असतं असंही म्हणण्याची सोय नव्हती.....जेवण झाल्यावर आम्ही एक-एक कफे मारली......तेवढाच काय तो बरं भाग ........आणि चालत चालत परत घरी.........मनात अजूनही म्हणलं रविवार आहे अजून........पण घरी पोचता पोचताच नवरा म्हणाला.....इथे असंच आहे......मी तर तू यायच्या आधी सरळ झोपून टाकायचो.......माझा हात कपाळावर......पण एखाद्या गोष्टीत पडलोय ना.... मग जे आहे ते स्वीकारायचं असा स्वभाव असल्यामुळे जेव्हा जेव्हा बाहेर पडेन तेव्हा तेव्हा फोटो काढायला सुरुवात केली....फोटोग्राफी म्हणून चांगले नसतील पण आजूबाजूच्या परिसराची अन वातावरणाची एक झलक........

हे काही फोटोज......
अशी रस्त्यावरची दुकानं असतात इथे.....आणि तिथे ब्रेड पासून आय फोन (?) पर्यंत सगळं विकतात!
DSC03431.JPGDSC03533.JPGDSC03953.JPGDSC03960.JPGDSC03968.JPG
ही जनरल स्टोर्स
DSC03501.JPG
या बायका त्यांच्या केसांच्या वेण्या वेण्या कशा घालतात हे कोडं सुटलं....ते गंगावनासारखे लावलेले केस असतात आणि ते भारत, चीन, जपान या देशातून आयात करतात.
DSC03435.JPG
कान्डूनगेरो ...तिथला लोकल कन्व्हेयन्स....पुण्यात ६ सीटर असतात तसं....पण त्यापेक्षा जास्त कोम्बाकोम्बी
DSC03949.JPG
पूर्वीची पोर्तुगीज कॉलनी असल्यामुळे तेव्हाच्या काही इमारती अजूनही आहेत..आता बहुतांशी या इमारती शासकीय कार्यालयांसाठी वापरल्या जातात...
DSC03619.JPGDSC03620.JPGDSC03621.JPG

DSC03617.JPG

प्रत्येक देशाची आपली अशी एक संस्कृती असते. रितीरिवाज असतात, खाद्यप्रकार असतात. अंगोलात येउन आता ५ महिने झालेत त्यामुळे इथल्याही अशा काही गोष्टी तुमच्या बरोबर शेयर कराव्याशा वाटल्या. मी काही सगळंच बघितलेलं नाही अजून पण मला सगळ्यात जास्त विशेष वाटलं ते म्हणजे इथलं जेवण, इथली लग्न पद्धती, घरात मृत्यू झाल्यावर करण्यात येणार्या गोष्टी आणि इथल्या बायकांचे पारंपारिक ड्रेस!

इथलं कॉमन जेवण म्हणजे फुंज. हे आपल्या कडच्या गव्हाच्या चीका सारखं दिसतं, आणि वर्याच्या तांदुळा सारखी चव असते. इथे रताळ्यासारखं एक मुळ मिळतं, त्यापासून फुंज बनवतात. विविध प्रकारच्या मांसाबरोबर हे खातात. आणि बरोबर बियर प्यायली जाते. बेकरी प्रोडक्टस मध्ये जो अतिशय साधा ब्रेड असतो त्याला डोंकेय'स ब्रेड म्हणतात. आणि जो तिथला उत्तम ब्रेड मानला जातो त्याला देवाचा ब्रेड "पाऊ दे देऊश" असं म्हणतात.

लग्न म्हणजे भारतीय संस्कृतीत असतात तशी समारंभा सारखी वाटली नाहीत. तो एक कौटुंबिक सोहळा म्हणून केला जातो. मुहूर्त वगैरे चा प्रश्नच नसल्यामुळे एक तारीख ठरवून त्या दिवशी मुला कडची मंडळी मुलीकडे येतात. इथे हुंडा मुलाकडून मुलीला दिला जातो. त्यात रोख पैसे, विविध प्रकारचे मद्य आणि कपडे अशा गोष्टी असतात. त्याची यादी मुलीकडचा एक माणूस आधी वाचून दाखवतो. मग त्यात घासाघीस वगैरे करून तो मुद्दा सेटल करण्यात येतो. तो पर्यंत मुलगी आतच असते. हुंडा नक्की झाल्यावर मग तिला बाहेर आणतात आणि नंतर रिंग सेरेमनी होते.हे आपल्या साखरपुड्या सारखंच असतं. (अर्थात हा अंगठी घालण्याचा भाग आपणच पाश्चिमात्य लोकांकडून घेतलाय असा मला वाटतं. नाहीतर टिळा किंवा तिलक हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. असो.) या पुढचा भाग खरा गमतीचा आहे. समजा अजूनही मुलीचे आई-वडील हुंड्या बद्दल असमाधानी असतील तर ते रुसून बसतात आणि मुलीला सासरी घेऊन जायला नकार देतात. मग परत त्यात निगोशिएट करून त्यांचा रुसवा काढला जातो. (थोडक्यात काय, मनासारखं झालं नाही तर रुसणे हे त्याही संस्कृतीत आहेच...) कधी कधी रिंग सेरेमनी च्या वेळी मुलगी लहान असते त्यामुळे नंतरची एखादी तारीख ठरवून मुलीला सासरी घेउन जातात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नंतर मद्यपान जेवण वगैरे करून हे लग्न साजरे केले जाते. आणि सोहळा संपतो.

घरातल्या मृत्यूचा हे लोक घेत असलेला अर्थ काही प्रमाणात सकारात्मक वाटला पण पहिल्यांदाच बघत असल्याकारणाने थोडा चमत्कारिक वाटला. एकदा अशीच घरात बसले होते...अचानक कसली कसली गाणी आणि लोकांचा गलबला ऐकू आला. प्रथम दुर्लक्ष केलं कारण नेहमीच अशी मोठ्ठ्या-मोठ्ठ्यांदा गाणी लावून वीक एंड ला हे लोकं अक्षरशः डोकं उठवतात. समोरच एक शाळाही होती. त्यामुळे शाळा सुटायच्या वेळेला मुलांचाही गोंगाट असायचा. पण नंतर खिडकीत जाउन बघितलं तर समोरच्या इमारती खाली टेबलावर एका माणसाचा फोटो ठेवला होता. त्याच्या दोन्ही बाजूला बुके होते आणि आजूबाजूला खुर्च्या ठेवून लोकं बसलेली होती...नीट निरखून बघितलं तेव्हा समजलं की काही जण रडत होते आणि काही जण सांत्वन करत होते. तेव्हा समजलं की कुणीतरी गेलंय आणि तो प्रकार असाच सलग तीन दिवस चालला. दिवस रात्र त्या फोटो पाशी कुणी ना कुणी बसलेलं असे. आणि झोपायच्या वेळा सोडल्या तर शांत आणि बहुधा दुःखी गाणी लावलेली असत. चौथ्या दिवशी मात्र कहर झाला. त्या दिवशी शनिवार असल्याने मी आणि माझा नवरा घरातच होतो. नेहमीप्रमाणे एक-एक कफे मारावी म्हणून खाली गेलो, तर किमान दोनशे-अडीचशे लोक तिथे जमा झाले होते. त्याच त्या इमारती च्या खाली बुफे मांडलेला होता. शेजारीच बियर च्या बॉटल चे बॉक्सेस होते आणि ती सर्व मंडळी आपण लग्नात बुफे मध्ये जसं आपापल्या ग्रुप बरोबर जेवतो ना, तसं जेवत होती. नटून थटून आलेली नसली तरी तयार होऊन आलेली दिसत होती. मी आणि माझा नवरा चाटच पडलो. आम्हाला वाटलं दुसर्या कुणाच्या घरातच कार्यक्रम असेल. पण शेजारच्या घरात माणूस जाउन तीन दिवस झालेत आणि हे काय? असा आपला अगदी टिपिकल मराठी विचार आमच्या मनात डोकावला. नंतर त्याबद्दल जेव्हा नवर्याच्या ऑफिस मध्ये विचारलं तेव्हा समजलं की हा तिथला रिवाज आहे. तीन दिवस दुःखाचे पाळायचे आणि चौथ्या दिवशी लोकांना बोलावून जेवण द्यायचे. त्या मागे कारण असं की जो माणूस गेलाय त्याबद्दल दुःख वाटणं सहाजिकच आहे पण तो स्वर्गात पोचलाय हे आपण साजरं केलं पाहिजे. ही गोष्ट मला सकारात्मक वाटली.

आपण टी व्ही वर बघतो त्याचाशी मेळ असलेला फक्त इथल्या बायकांचा पोशाखाच आहे. म्हणजे एक सहा वारी साडी एवढं कापड असतं. बहुतेक वेळा त्यावर मोठ्ठी मोठ्ठी फुलांची नक्षी किंवा गडद रंगसंगती असते. त्यातलंच कापड त्या डोक्याला गुंडाळतात, आणि त्याच कापडाचे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट आणि स्कर्ट शिवतात. केसांच्या तर्हा तर अनंत असतात. मुळात तुमच्या केसांची लांबी छोटी असली तरी फरक पडत नाही. कारण दुसरे खोटे केस त्यासाठी वापरतात. खोटे म्हणजे आयात केलेले हे केस असतात. केसांची आयात हा तिथला एक व्यवसाय आहे असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. तर ह्या केसांच्या जुड्या करून खर्या केसांबरोबर त्याच्या वेण्या किंवा पिळे घातले जातात आणि मग त्याच्या हेयरस्टाईल घरच्या घरी करता येतात. प्रत्येक आठवड्याला निराळी हेयरस्टाईल!

तर असं आहे अंगोला पुराण! देश खूपच आकर्षक आहे. शोधणार्याच्या नजरेला बघायला खूप गोष्टी आहेत. पण त्या सगळ्या हिंडून बघण्याइतकी सामाजिक सुरक्षितता नाही. कारण २००७ च्या सिव्हील वॉर नंतर अंगोला अजूनही सावरतोय. पैसा हीच सध्या एकमेव गरज असून त्यासाठी शिक्षण हा मार्ग आहे हे अजून उमजायचंय......त्यामुळे जे मिळेल ते विकून पैसे मिळवणे आणि भूक भागवणे हेच ध्येय!

सुंदर निसर्ग, समुद्रकिनारा पार करत करत पुढे यावं तसतसं त्या समुद्राची पोच लक्षात येऊ लागते.....इथेच बर्याच वर्षांपूर्वी पोर्तुगीज लोकांनी आपल्या वसाहती वसवल्या होत्या..एका बाजूला आताच्या नवीन इमारती...ऑफिसेस आणि घरं यांची लांबलचक भिंत असावी अशा थाटात पसरलेल्या......तर किनार्याच्या दुसर्या बाजूला पोर्तुगीज वसाहतींचे ठसे म्हणून राहिलेल्या पंधराव्या शतकातल्या सुरेख इमारती.....यातल्या काही इमारती बँका, इतर ऑफिसेस यासाठी वापरात असलेल्या दिसतात किंवा डागडुजी करून सरकारी वापरात आहेत....पण काही इमारतींची त्या काळातली शान मोडून पडलेली दिसते....१९७५ मध्ये या संपत्तीचा मालक तिला सोडून गेला तेव्हापासून नंतर या देशातल्या लोकांना ती संपत्ती जपता आली नाही हेच खरे.....इथला पोर्तुगीज मनातून नक्कीच हे बघून हळहळत असणार.....

(१)
IMG_0675.jpg

(२)
IMG_0739.jpg

(३)
IMG_0672.jpg

(४)
IMG_0712.jpg

हे सगळं बघत बघत जेव्हा अजून पुढे यावं..तसं लक्षात येतं की रस्ता हळूहळू अरुंद होतो ....रस्त्यावरचं डांबर जाऊन वाळू दिसायला लागते .....रस्त्यावरच्या लोकांची संख्या वाढायला लागते आणि आधीच असलेली गाड्यांची गर्दी अधिकच जाणवू लागते.....एका मोठ्या इमारतीच्या भोवताली तात्पुरत्या बांधलेल्या छोट्या घरांची गर्दी दिसायला लागते तसं पोर्तुगीज काळातल्या इमारतीचं सौंदर्य डोक्यात असतानाच पायरी चुकून पडावं तशी नजर अडखळते....सगळीकडे लोकच लोक......कोणी नुसतंच उभं आहे....कुणी काही बाही विकतंय...अगदी १२-१३ वर्षांच्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत गाड्यांच्या मागे धावतायत......हातातली जी असेल ती वस्तू विकण्यासाठी नाहीतर त्या वस्तूचे पैसे घेण्यासाठी.....कारण इथल्या गाड्यांच्या गर्दीत गाड्या आपल्या वेगाने आणि विक्रेते त्यांच्या मागे आपल्या वेगाने धावत असतात.......त्यात भर म्हणून की काय, प्रवाशांची स्थानिक ने-आण करणार्या केन्डुन्गेरो बेलगाम पणे धावत असतात....आणि त्यात ३०-३० प्रवाशांची चढ-उतार करत असतात. एक मार्केट इथेच जन्माला येत असतं.....आकार घेत असतं .......या मार्केट मध्ये तुम्हाला जे हवं ते मिळेल......जवळ पास ६०-६५००० हजार विक्रेते इथे दररोज येतात आणि आपल्याकडच्या वस्तू ग्राहकांना विकतात. हेच इथल्या सामान्य कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच साधन आहे. कुटुंबातला प्रत्येक जण ज्या वस्तू इतर घाऊक बाजारात मिळतील त्या घेउन येतो आणि विकतो किंवा घरातच ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ तयार करून ते विकले जातात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतरही इथेच थांबण्याच धाडस मात्र अनुभवी आणि मुरलेले विक्रेतेच करू शकतात. बाकीचे सगळे आधीच घरी जातात किंवा न विकलेला माल घरच्या परतीच्या वाटेवर रस्त्यातल्या गाड्यांमध्ये विकतात.....

(५)
IMG_0532.jpg

(६)
IMG_0537.jpg

(७)
IMG_0542.jpg

(८)
IMG_0630.jpg

या सगळ्या गजबजलेल्या वातावरणातून पुढे येत येत दिसू लागतात छोटी छोटी झोपडी वजा घरं आणि काही घरांसमोर छोटी दुकानं जिथे बायकांचे अड्डे मासे, बिअर, भाज्या, फळं, सिगारेट्स वगैरे विकत असलेले दिसतात.....काही गोडाउन्स, जिथे बंदरातला माल उतरवला जातो. या गोडाऊन च्या बाहेर विक्रेत्या बायकांची रांग......रस्ता आता अजूनच अरुंद होऊ लागतो आणि छोटी छोटी वळणं घेत तो पोचतो एका अंगणापाशी....हे अंगण म्हणजे साधारण १०० फूट बाय ७५ फूट जागा...ज्यात सहा छोटी छोटी एक मजली घरं उभी आहेत......या अंगणाला भोवती माणूसभर उंचीची सिमेंट ची भिंत बांधलेली...हे घर आहे लुआंडा मधल्या टिपिकल कुटुंबाचं...इथे एकूण १४ प्रौढ व्यक्ती आणि २० मुलं राहतात....यामध्ये साधारणतः घरातलं मूळ जोडपं, त्यांची किमान ४-५ मुलं, १९ ते ३२ या वयोगटातली...त्यांनाही प्रत्येकी ३-४ मुलं....आणि त्यांचे नवरे असतील तर.......या एका कुटुंबाच्या राहणीमानावरून, कामाच्या स्वरूपावरून, इथल्या संस्कृतीचं आणि समाजव्यवस्थेच चित्रण करायचा माझा छोटासा प्रयत्न...आपली सुरुवात होईल ती या कुटुंबाच्या सगळ्यात मोठ्या मुलीपासून....पण पुढच्या लेखात.

(९)
IMG_0573.jpg

(१०)
IMG_0606.jpg

(११)
IMG_0608.jpg

(१२)
IMG_0619.jpg

क्रमशः

या छोट्याश्या घराचे मालक आणि त्यांची पत्नी ओरासिओ आणि इलियाना (वय वर्षे ५६ आणि ४७)...त्यांना सहा मुलं......सगळ्यात मोठी मुलगी इसाबेल (३२ वर्षे) तिच्या नवर्याबरोबर राहते. तिला तीन मुलं आहेत. मनुवेल, मारिया आणि सादी...वय वर्षे अनुक्रमे ७, ४ आणि १...इसाबेल घरात तयार केलेला ब्रेड रस्त्यावरच्या बाजारात विकते आणि तिचा नवरा अगुस्त हा घरातल्याच शेतात कॉफी आणि कसावा चे पीक घेतो. जेव्हा इसाबेल आणि अगुस्त पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी बरोबर राहायचा निर्णय घेतला तेव्हा अगुस्त फोटोग्राफर म्हणून काम करत असे. पण मधल्या अस्थैर्याच्या काळात त्याला पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले कारण त्यांच्या मते ज्याच्याकडे कॅमेरा आहे तो गुप्तहेर असला पाहिजे आणि अंगोला सरकारच्या विरोधात काही काम करत असला पाहिजे. तुरुंगात असताना अगुस्तने पोलिसांचा खूप मार खाल्ला....नंतर सुटून आल्यावर मात्र ओरासिओ यांनी आपला मुलगा आणि त्याची बायको (?) यांना सुरक्षिततेच्या कारणावरून घरातच राहायला परवानगी दिली. त्यांची मुलं मनुवेल आणि मारिया शाळेत जातात.
इसाबेल नंतरच्या दोन मुली आपापल्या मुलांना घेऊन वडिलांच्या घरीच राहतात. त्यांचे नवरे त्यांच्या बरोबर राहत नाहीत. त्या दोघी घरात तयार केलेले ब्रेड घराबाहेरच असलेल्या छोट्या दुकानात विकतात. यात त्यांना त्यांची सगळ्यात छोटी बहिण पॉला मदत करते. ही १९ वर्षांची आहे. ती सध्या एका लुईस नावाच्या पोलिसाच्या प्रेमात आहे आणि तिने नुकताच एका मुलाला जन्म दिलाय. हा युक्लीडस डिकास्टा कुटुंबातला सगळ्यात लहान सदस्य आहे. अ‍ॅना आणि एमिली नंतरची बहीण नताशा सुद्धा तिच्या मुलांबरोबरच राहते. तिला ४ मुलं आहेत. जॉन, पेद्रू, टोनी आणि एलीडीयो...वय वर्षे अनुक्रमे १२, १०, ७ आणि ४.....नताशा घाउक विक्रेत्यांकडून घेतलेल्या वस्तू रस्त्यावरच्या बाजारात विकते...आणि स्वतःचा आणि मुलांचा खर्च भागवते.
ओरासिओ यांचा सगळ्यात मोठा मुलगा झेका हा त्याच्या दोन बायकांसोबत राहतो. तो सुरक्षारक्षक आहे आणि त्याच्या बायका इथल्या इतर बायकांप्रमाणे बाजारात फळं किंवा तत्सम वस्तू विकून घरखर्चाला हातभार लावतात. त्यांची मुलंही शाळेत जाण्याएवढी मोठी आहेत. पहिल्या बायकोला-संद्राला ओलीम्पियो आणि जोझे ही ४ आणि २ वर्षांची मुलं तर दुसर्या बायकोला अ‍ॅन्जेलिनाला विल्यम हा एक मुलगा...झेका पेक्षा लहान मुलगा मारियो हा गाड्या धुवायचे काम करतो. हे काम इथे खूपच मोठ्या प्रमाणात केले जाते. तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळी जर खिडकीतून खाली डोकावून पाहिलेत तर किमान ४ जण गाड्या धुताना दिसतात. शनिवार आणि रविवार हे तर खूपच मोक्याचे दिवस असतात.
सर्वसाधारण पणे कोणत्याही अंगोलन कुटुंबाची चरितार्थाची हीच पद्धत....हे कुटुंब आपण मध्यमवर्गीय म्हणू शकतो कारण या कुटुंबातली सगळी मुलं शाळेत जातात. जुने असले तरी अंगभर घालायला यांच्याकडे कपडे आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की की घरातला प्रत्येक जण पैसे मिळवत असल्याने ही परिस्थिती शक्य आहे. या चांगल्या परिस्थितीत दोन वेळ जेवणापलीकडे मात्र काहीही येत नाही. कुठल्याही प्रकारची चैन याही कुटुंबाला परवडण्यासारखी नाही. कारण यांच्या जेवणात कधीही मांस नसते कारण ते विकत घेउन खाण्याची ऐपत नाही. जर एखाद्या दिवशी मांस असेल तर ते कुणीतरी स्वतः पाळलेले आणि मोठे केलेले एखादे बदक किंवा कोंबडी असते.....बियर किन्वा वाईन ही सुद्धा कोणी दिलेली असली तरच! अंगोलन कुटुंबातले पुरुष साधारण पणे त्यांच्या बायकांची काळजी घेत नाहीत. तर त्यांनी मिळवलेले पैसे ते घराबाहेर जास्त खर्च करताना दिसून येतात...
असं म्हणतात की इथली अर्थव्यवस्था ही जशी विक्री-खरेदी वर आधारीत आहे तशीच ती बर्याच प्रमाणात इथल्या स्त्रियांवर आधारित आहे. कारण इथे रस्त्यांवर वस्तू किंवा खाद्यपदार्थ विकणाऱ्या लोकांमध्ये स्त्रिया जवळ पास ७५ टक्क्यांहून जास्त आहेत. कारण इथे खाद्यपदार्थ पुरुष विकत नाहीत. याला कारण काही असावं असं वाटत नाही पण दिसत नाहीत हे नक्की...पुरुष माणसं जास्ती करून स्पेअर पार्टस, घरगुती वापराच्या हॅन्गर, क्लॉथ स्टॅन्ड यासारख्या वस्तू विकतात. ही "इन्फॉर्मल" अर्थव्यवस्था प्रगती करू शकत नाही कारण या प्रगती साठी काही ठोस उपाय योजलेले दिसत नाहीत. एका सर्व्हे नुसार महागाई मुळे किमतींमध्ये झालेली वाढ हीच काय ती इथल्या उत्पन्नातली वाढ आहे. पण आपला धंदा वाढवण्यासाठी काही उपाय ह्या विक्रेत्यांकडे नाहीत. काही वर्षांपूर्वी इथल्या विक्रेत्या बायकांनी बचत गटासारखी एक संकल्पना राबवली होती पण वाढत्या महागाईच्या दरामुळे हे बचत गट चालणेही अशक्य झाले...
पण तरीही इथे अनेक विकासाची काम होतानाही दिसतायत.....इथल्या काही हातावर मोजण्याएवढ्या सुशिक्षित लोकांमुळे आहे ती परिस्थिती झपाट्याने बदलत्ये...काही वर्षात इथली लोकं, त्यांचे विचार, बदललेले दिसतील हे नक्कीच..
असो....हे माझे आत्तापार्यान्ताचे अंगोला बद्दलचे ज्ञान...अनेक चौकशान्मधून, नवर्याच डोकं खाऊन, आणि इकडे तिकडे बघून मिळवलेले....तुम्ही दिलेल्या प्रतिसादांनी मला लिहिते केले....नाहीतर नुसतेच इथे राहून कंटाळून परत गेले असते.....आणि काहीतरी राहिले खरे....ची रुखरुख लागून राहिली असती....धन्यवाद!

https://www.maayboli.com/node/36375

बोम दिया अंगोला 

अंगोला ला यायचा निर्णय घ्यायला मी बराच वेळ घेतला. आफ़्रिकेला तसा मी नवा नाही.
चांगली ८ वर्षे काढलीत या खंडात. पण इथला प्रत्येक देश वेगवेगळा. भारताप्रमाणेच
युरोपीयन वसाहतवाद्यांनी विस्कटून ठेवलेला. आता आता कुठे जरा हे देश सावरायला
लागले आहेत.

यातले बहुतांशी देश, निसर्गसंपन्न आहेत, पण त्या साधनसंपत्तीचा योग्य तो उपयोग
करुन, देशांचा सर्वांगीण विकास करणारे नेतृत्व त्यांना लाभलेले नाही. जिथे नैसर्गिक
साधनसंपत्ती आहे तिथे आताआता कुठे प्रगतीचे वारे नव्हे तर झुळूक यायला लागली
आहे.

इजिप्त ला पुर्वापार पर्यटकांचा राबता असतो. पण त्यापेक्षा सुंदर पिरॅमिडस असूनही,
सुदानकडे कुणी ढुंकून बघत नाही. केनया, युगांडा, टांझानिया, रवांडा आदी देशांनी
इस्ट आफ़्रिकन युनियन करुन, पर्यटन आणि शेती उद्योगात बरी प्रगती केली आहे.
मध्य आफ़्रिकेतील झिंबाब्वे आणि झांबिया खनिजाने समृद्ध आहेत. मॉरिशियस, अगदी
चिमुकले बेट असूनही, साखर आणि पर्यटन याने समृद्ध झालेत. मादागास्कार, मालावी,
मोझांबिक पण प्रगती साधताहेत. इजिप्त सोडला तर हे बहुतेक पुर्व आफ़्रिकेतले देश
आहेत. पण आफ़्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याला, खनिज तेलाचे वरदान लाभलेले आहे.

अल्जीरिया, नायजेरिया, घाना, लिबिया सारखे देश खनिज तेलाने समृद्ध आहेत.
नायजेरियात बरीच वर्षे तेलाचे उत्पादन घेतले जात असले तरी, दळणवळणाच्या
सोयी अजून तितक्याश्या नाहीत. तिथे बरीच वर्षे भारतीय लोक स्थायिक झालेले
आहेत.

अंगोला मधे खनिज तेलाबरोबरच हिरे पण आहेत. असे असूनही हा देश, जवळ जवळ
२० वर्षे, यादवी युद्धात होरपळला गेला. यादवी युद्ध हे अनेक प्रकारे नुकसान करते.
त्या काळात शिक्षणासकट सर्वच संस्था कोलमडून जात असल्याने, त्याकाळात
वाढत असलेली पिढी, कुठल्याही कौशल्यापासून वंचित राहते. आणि हे युद्ध संपल्यावर
देखील, नवीन उद्योग व्यवसायात या तरुणांना काम करणे अवघड जाते.

एक उदाहरण बघा, या युद्धापुर्वी, अंगोला कॊफ़ीसाठी प्रसिद्ध होता. पण आता ते सर्व
मळे वाया गेले आहेत. चहा आणि कॉफ़ी हि नगदी उत्पादने असली तरी त्या झाडांचे
तंत्र आणि उत्पादन प्रक्रिया फ़ार जिकिरीची असते. या काळात परदेशी तंत्रज्ञ
देश सोडून गेले आणि स्थानिक लोकांना ते तंत्र जमले नाही. आता परत ते मळे
जोपासणे अवघडच आहे.

आफ़्रिकेतल्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या देशात, व्यावसायिकांना नेहमीच मागणी असते.
माझ्या दक्षिण आफ़्रिकेतील मित्राने, मला ही ऑफ़र दिली होती. पण मी होकार
द्यायला बराच वेळ घेतला.

माझ्यातर्फ़े मी या देशाचा अभ्यास करायला सुरवात केली. त्यासाठी मी काही ब्लॊग्ज
चाळले. त्यांनी केलेले बहुतांशी लेखन हे निराशाजनकच आहे (जरी ते लोक इथेच
स्थायिक झाले असले तरी ) काहीजणांशी प्रत्यक्ष बोललोदेखील, पण त्यांनीदेखील
निराशेचाच सूर लावला.

अंगोलाची राजधानी लुआंडा हे जगातील सर्वात महागडे शहर अशी ख्याती आहे.
( हो तोक्यो आणि न्यू यॉर्क पेक्षाही ) यू ट्य़ुबवर तशा काही क्लीप्स पण आहेत.
इथे काहिही निर्माण होत नाही, सगळे आयात करावे लागते, त्यामूळे ते प्रचंड महाग
असते, असे लिहिलेले आहे. पण तरीही... मी निघालोच.

माझा व्हीसा, मी केनयात असतानाच, प्रिटोरिया ( दक्षिण आफ़्रिका ) येथून आला होता.
इथे यायला भारतातून थेट विमान नाहीच. माझे तिकिट इथिओपियन एअरलाईनचे होते.
या विमानकंपनीचा देखील मी फ़्रिक्वेंट फ़्लायर असल्याने, शाकाहारी जेवण आणि खिडकी
यांची सोय आपोआपच होते. आता दोनचार ओळी या देशाबद्दल.

सर्वात प्राचीन असा मानवी सांगाडा, या देशात सापडला आहे. त्या स्त्रीला अखिल मानव
जातीची माता, मानले जाते. सध्या तसा हा देश गरीबच आहे. ९० % लोकसंख्या शेती
करते. पण पर्यटक इथे येतात. एकतर हवामान खुप थंड आहे आणि निसर्गसौंदर्य अप्रतिम
आहे.

या विमानकंपनीने आफ़्रिकेत चांगलाच जम बसवला आहे. बुर्किना फ़ासो सारख्या अनेक
छोट्या छोट्या देशात हि विमाने जातात. ( बुर्किना फ़ासो हा देश घानाच्या उत्तरेला आहे.
तिथला कोको फ़ार प्रसिद्ध आहे आणि या उद्योगात त्याच देशातले लोक राबत असतात.)
त्यामूळे अदीस अबाबा हे आफ़्रिकेचे हब झालेले आहे. मुंबई, दिल्ली आणि हॉंगकॉंग वरुन
प्रवासी आले कि त्यांना बाकीच्या देशात पाठवायची लगबग इथे असते.
(या विमानतल्या हवाई सुंदऱ्या पण खुप स्मार्ट असतात. रंगाने सावळ्या असल्या तरी
नाकी डोळी भारतीय चेहरेपट्टीच्याच वाटतात.)

अदीस ते लुआंडा विमानात मात्र भारतीय असा मी एकटाच होतो. बहुतेक प्रवासी चिनी
दिसत होते. आफ़्रिकेच्या मध्य भागावरुन, म्हणजे लेक व्हीक्टोरिया, कॉंगोचे घनदाट
जंगल असे पार करत आम्ही लुआंडावर घिरट्या घालू लागलो.

आफ़्रिकेच्या दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर अनेक मोठी जहाजे वाळून रुतून बसलेली आहेत.
*नामिबीया च्या एका बीचला तर त्यामूळे स्केलेटन बीच असे नाव पडलेय. अंगोलाच्या
किनाऱ्यावर पण अशी जहाजे दिसली.

विमानतळ छोटासाच होता, तरी दोन तीन विमाने नुकतीच उतरलेली होती. त्यामूळे
इमिग्रेशनला खुप मोठी रांग होती. साधारण २ तास लागले मला या रांगेत. पण कुठलाही
फ़ॉर्म वगैरे भरावा लागला नाही. ( असे देश फ़ारच कमी आहेत. काही देशात तर निबंधच
लिहावा लागतो.) बाहेर आलो तर रिकाम्या ट्रॉलीज कुठे दिसेनात. पोलिसाला विचारले तर
म्हणाला, बाहेर आहेत. मी कस्टम्स पार करुन बाहेर जाऊन ट्रॉली आणली. हे पण नवलच !
(लेगॉसला ट्रॉलीसाठी १ डॉलर द्यावा लागतो, आणि क्वांटास च्या फ़्रिक्वेट फ़्लायर प्रोग्रॅमसाठी
पैसे भरावे लागतात.. किती ती नवलं !! )

ते ग्रीन चॅनेल, रेड चॅनेल प्रकरण होतेच. पण त्यातून कसे पसार व्हायचे, हे मला आता चांगलेच
माहीत आहे. विमानतळावर न्यायला गाडी आलीच होती.

शहरात शिरताना प्रचंड कोंडी असणार याची कल्पना होती, पण तेवढी नव्हती. माझे राहण्याचे
ठिकाण, व्हियाना हे लुआंडापासून १५ किमीवर आहे. पण तेवढे अंतर मोठ्या हायवेवरून
पटकन पार पडले. हायवे सोडल्यावर मात्र कच्चे रस्ते होते. कुशल चालकामूळे त्यावरूनही
लवकर आलोच.

माझे राहते घर हा प्रचंड मोठा फ़्लॅट आहे. घरात सर्व सुखसोयी आहेत, पण वीज मात्र जनरेटरचीच.
घरासमोरूनच वीजेचे खांब गेले आहेत, पण वीजेची परिस्थिती नायजेरियासारखीच.
(नायजेरिया एलेक्ट्रीकल पॉवर ऑथोरिटी म्हणजेच नेपाचे टोपण नाव आहे, नेव्हर एक्स्पेक्ट पॉवर
अगेन )

घराच्या आजूबाजूला मात्र खेडेगाव आहे (असे वाटले होते, आधी ) लुआंडाबद्दल भयानक
ब्लॉग्ज वाचून, कुणी तिथे रस्त्यावर येणार नाही. पण या गावात मात्र मी बिनधास्त फ़िरतो.
हा कोण नवा पाहुणा, म्हणून लोक अजिबात वळून बघत नाहीत. नायजेरियात आणि केनयात
मात्र छोट्या गावात, लहान मूले माझ्या मागे लागत असत.

सगळीकडे रेतीचेच रस्ते आहेत पण बरीच छोटीमोठी दुकाने दिसतात. प्रत्येक दुकानात जनरेटर
आहेच. आंतराराष्ट्रीय बाजारात मिळणारे बहुतेक पदार्थ (लेज, ट्वीक्स, कॉर्नफ़्लेक्स) उपलब्ध
असतातच. (ब्लॉग्ज लेखकांनी इथे काहिच मिळत नाही असे लिहिलेय )

मोठ्या सुपरमार्केट्समधे तर बहुतेक सगळे मिळते. अर्थात भारतीय पदार्थ मिळतील अशी अपेक्षा
नव्हतीच. पण अनेक कडधान्ये दिसली. डाळींपैकी फक्त मसूर डाळ दिसली.

या देशात काही आयात करायचे म्हणजे प्रॉब्लेम आहे. लुआंडा बंदर जरा लहान असल्याने
जास्त प्रमाणात कार्गो हाताळू शकत नाही. शेजारी देश नामिबीयाची परिस्थिती, उघड्यापाशी
गेलं वाघडं अशी आहे. त्यामूळे रस्त्याने काही आणायचे तर ते दक्षिण आफ़्रिकेतून आणि अर्थातच
वेळखाऊ. त्यामूळे नाशिवंत पदार्थ आणणे कठीणच. नाही म्हणायला झिंबाब्वे मधून ताजी फ़ळे
आलेली दिसताहेत. त्यामूळे भडक रंगाची संत्री, पेअर्स आणि सफ़रचंदानी बाजार भरलेले आहेत.
मी मुंबईत या भेटीत चांगली सफ़रचंदे १४० रुपये किलो या भावानी घेतली होती. त्यामानाने
इथे जर ती १६० रुपये, असली तर महाग नाही म्हणता यायची.

आयात पदार्थांपेक्षा स्थानिक उत्पादनांत मला नेहमीच रस असतो. फ़ळांपैकी सध्या संत्री, मोसंबी,
अननस, पपया, केळी यांनी बाजार भरलेले दिसतात. अर्थातच ती जास्त चवदार असतात.
इतकेच नव्हे तर बोरे, पेरू, अवाकाडो, काटेफ़णस आणि करमळे पण दिसतात.
नैरोबीचा भाजी बाजार म्हणजे स्वर्ग होता इथे तेवढ्या भाज्या मिळतील अशी अपेक्षा नव्हतीच.
तरीपण कांदे, बटाटे, टोमॅटो याशिवाय कोबी, वांगी, भेंडी, सिमला मिरची, गाजरे आणि स्थानिक
पालेभाज्या दिसल्याच. रताळी, भोपळा, कसावा आणि काही स्थानिक कंद पण दिसतात.

इथले शेंगदाणे फ़ार चवदार वाटले, रंगाने लाल आणि गोडसर चवीचे. स्थानिक तांदूळ पण
छान लागला (सध्या तोच खातोय.) वेगवेगळ्या बीन्स पण चाखून बघतोय.

आणखी बरेच लिहायचे आहे, लिहितो पुढच्या भागात.

सध्या माझे पाककलेचे प्रयोग मात्र ऑन होल्ड आहेत. कारण सध्या ऑफ़िसमधेच स्थानिक जेवण जेवतोय.
टेबलावर चार सहा प्रकार असतात पण त्यातला एकच मांसाहारी असतो. भात किंवा पुलाव, टोमॅटो कांदा ग्रेव्ही, उकडलेले बीन्स, उकडलेले किंवा भाजलेले किंवा तळलेले रताळे / कसावा / केळे, मक्याची उकड असे पदार्थ असतात. क्वचित कोबी / बटाटा अशी भाजी पण असते. बिनमसाल्याचे जेवण मला सध्या आवडतेय.

घरी खायला मात्र पावाचा छान पर्याय उपलब्ध आहे. ब्लॉगवर एक पाव ४ डॉलरला असे लिहिले आहे,
पण तो परदेशी पाव असावा. इथे जागोजाग बेकऱ्या दिसतात आणि सांजसकाळ ताजे पाव विकायला
येतात. फ़्रेंच बगेत च्या आकाराचा पण त्यापेक्षा खुपच मऊ असा पाव, चांगला चवदार लागतो.
पिठे मिळतात का त्याचा शोध घ्यायचाय शिवाय माझ्याकडे लाटणे तवा वगैरे नाही, सध्यातरी.

इमिरेट्स काय किंवा इथिओपियन काय, बॅगेजच्या बाबतीत फारच उदार आहेत. ४० किलो तर
तिकिटावरच लिहिलेले असते शिवाय वर ५/६ किलो असले तरी काही बोलत नाहीत. ( स्विस एअर चालू
होती त्यावेळी मी ११०/१२० किलो वगैरे सामान नेले आहे.) त्यामूळे पुढच्या फ़ेरीत हे सगळे आणायचे आहे.

पाव मुबलक म्हणजे मैदा मिळत असावा, मक्याचे पिठही असणार. पण सध्या थोडीफ़ार अडचण आहे ती भाषेची. इथली व्यवहाराची भाषा पोर्तुगीज. ऑफ़िसमधे माझे अडत नाही, कारण बहुतेकांना इंग्लिश येते.
सुपरमार्केटमधे मुक्याने व्यवहार करता येतो. प्रत्यक्ष बाजारात मात्र पोर्तुगीज बोलावी लागते.
मी तशी तयारी करून आलो होतो, पण इथली पोर्तुगीज हि ब्राझिलियन पोर्तुगीज असल्याने, उच्चार थोडे वेगळे आहेत. नेटवर ती उपलब्ध नाही. त्यामूळे माझ्या सेक्रेटरीशी लेखी व्यवहार करुन शिकतोय.

तसे बरेचसे शब्द ओळखीचे वाटतात. अननस, बटाटा, पाव, काजू हे सगळे मूळचेच पोर्तुगीज शब्द आहेत. लोकांची नावे पण मावरो, परेरा, डिकास्टा अशी गोवन वाटतात.

सध्याच्या जगात इंटरनेट शिवाय आमच्या क्षेत्रात व्यवहार करणे अशक्य आहे. आम्ही सध्या मोडेम वापरतो. या क्षेत्रात इथे दोनच कंपन्या आहेत, त्यामूळे स्पर्धा नाही. (केनयात एअरटेल आल्यापासून या क्षेत्रात क्रांती झाली होती. भारतापेक्षा तिथले कनेक्शन फ़ास्ट होते.) इथेही तसे लवकरच घडेल अशी आशा वाटते. पण तरीही, घरी अगदी ब्रॉडबॅंड कनेक्शन येईल, याची मात्र खात्री नाही.

बँकांचे व्यवहार देखील मला नेटवरच बघावे लागतात. त्यांच्या साईटस मात्र दर्जेदार आहेत. पासवर्डस साठी पण जरा वेगळीच सोय आहे. (विनयचे काम का हे ?)

माझे राहते घर ऑफ़िसपासून १० किमी वर आहे. सकाळी गावातले वातावरण अगदी आपल्याकडे असावे असे असते. बायका केरसुणीने अंगण झाडताहेत (मुले पाठीला बांधली आहेत ) शाळेत मुले टिवल्याबावल्या करत जाताहेत. काही बायका पाण्याच्या मागे लागल्यात तरी काहिंनी दुकानांची मांडामांड सुरु केलीय.

घर ते ऑफ़िस हा प्रवास दुबईतील डेझर्ट सफ़ारीची आठवण करुन देणारा. रस्ते म्हणजे वाळूच, तीसुद्धा
मऊशार. वाटेत कोंबडी, कुत्री येणार. डायवरसाहेबांचे रोज नवे शॉर्टकट. पण एकंदर मजाच.
येताना मात्र आम्ही हायवेवरून येतो. तो नव्याने बांधलेला आणि नीट निगा राखलेला आहे.
रस्ता दुभाजक जरा रुंद आणि तो गाडीला ओलांडणे अशक्य (म्हणुन तर जायचे यायचे रस्ते वेगळे.)
नायजेरियात तर छोटी गाडी, चार जण उचलून दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला ठेवतात.

या रस्त्याला लागून एक रेल्वेलाईन जाते. दोनदा फ़ाटक ओलांडावे लागते. मला चक्क आठवड्यातून
चारपाच वेळा आगगाडी दिसते. हे मुद्दाम लिहितोय कारण, नायजेरियात रेल्वे लाईनवर तर चक्क
बाजार भरतो. कधीमधी जर चुकत माकत रुळावर गाडी आलीच तर फ़ेरीवाले आपला माल उचलतात.
माझ्या ४ वर्षांच्या वास्त्यव्यात मी फ़क्त एकदा रुळावर गाडी बघितली.

इथली आगगाडी ३ डब्याचीच असते. बाहेरचा अवतार अगदीच कुर्डुवाडी पंढरपूर असा नसतो आणि पब्लिक लटकत वगैरे नसते. दोनदा तर चकाचक एसी गाडी दिसली. छोटी छोटी स्टेशन्स अगदी स्वच्छ आणि नवीन दिसताहेत. फ़ाटकाच्या बाजूला बाजार असायलाच हवा.

मला खास आवडले ते रेल्वेलाईन ओलांडणारे पादचारी पूल. खुप सुबक डिझाईनचे आहेत ते,
शिवाय त्यावर व्हीलचेअर्स साठी वेगळी सोय आहे (असे आधी वाटले.)

पण त्याचा उपयोग दुसरेच एक वहान करत असताना दिसते. कवासाकी बाईकच्या मागे, साधारण ५ फ़ूट बाय ५ फ़ूट असा टेंपोसारखा हौद लावलेला दिसतो आणि त्यात ६/८ प्रवासी किंवा फ़ुटकळ सामान घेऊन जात असतात. कवासाकीच्या ताकदीला मानावेच लागते.

सामान्य लोकांसाठी बाईक्स पण दिसतात. पण वाळूतून चालताना त्या बऱ्याचदा घसरतात. मऊ वाळूत पडल्यावर फारसे लागत नसावे, कारण अशावेळी चालक आणि ग्राहक दोघेही, पटकन कपडे झटकून पुढचा प्रवास सुरु करतात.

टॅक्सी म्हणून छोट्या, आकाशी पांढऱ्या रंगाच्या मिनीबसेस दिसतात. आफ़िकेतल्या मिनी बसेस हे एक वेगळेच प्रकरण असते. ( केनयात त्या असतात मटाटू, म्हणजे ३ सेंटसना एक मैल. अर्थात हा पुर्वीचा दर. ) तर या गाड्या म्हणजे आमच्या डायवरसाहेबांची डोकेदुखी. कारण भररस्त्यात कुठेही थांबणे, प्रवासी घेण्यासाठी आडवे चालणे. भर रस्त्यात बिघडणे, हे अगदी नेहमीचेच.
त्याशिवाय चांगल्या बसेस पण रस्त्यावरुन दिसतातच. आणि बाकि सगळ्या पॉश अद्यावत गाड्या.

यादवी संपल्यानंतर इथे भरपूर उलाढाल दिसतेय. पण भारतीय कंपन्या मात्र यात उतरलेल्या दिसत नाहीत. याबाबतीत मुसंडी मारलीय ती चायनाने. इथे बांधकामाचे प्रचंड मोठे प्रकल्प चीन राबवताना दिसतो. लोकांना स्वस्त घरे उपलब्ध करुन द्यायचे या सरकारचे धोरण आहे, त्यानुसार चायना इंटरनॅशनल फ़ंड ने, एक खुप मोठा प्रकल्प इथे जवळजवळ पूर्ण करत आणलाय.

अर्थातच तिथे चिनी कामगार दिसतात. केनयात पण एक मोठा फ़्लायओव्हर, चिनी कंपनीने बांधून पुर्ण केला. (नैरोबीत या लोकांबद्दल एक विचित्र समज आहे. ते म्हणतात, तिथे जन्मठेपेची वगैरे शिक्षा झालेल्या लोकांना, आफ़्रिकेत पाठवून देतात. आणि ती माणसे जीवावर उदार होऊनच काम करतात.) मी वर लिहिल्याप्रमाणे माझ्या विमानात पण बरेच जण होते. आमच्या कंपनीची पण एक भलीमोठी फ़ॅक्टरी शेड, चिनी लोकांनी बांधून पुर्ण केलीय.

इतक्या मोठ्या संख्येने चिनी लोक इथे आहेत, कि अनेक फलक पण चिनी लिपीत लिहिलेले आहेत. कदाचित त्यांचे चायना टाऊन पण असेल. हि संधी भारताने गमावली असेच म्हणावे लागेल आता.

बांधकाम साहित्य, जसे कि लाद्या, दिव्याच्या शेड्स, बाथरुम फ़िटिंग्ज पण चीनमधून आयात झालेली दिसतात. या देशात उद्योगधंदे आता आता सुरु होताहेत.

इथे भारताचा दूतावास आहे, पण भारतीय किती आहेत याची कल्पना नाही. आमच्या गावात मात्र, मी आल्यापासून एकही भारतीय व्यक्ती दिसलेली नाही. लुआंडामधे भारतीय वाणसामान मिळणारे दुकान आहे, असे वाचले. भारतीय रेस्टॉरंटस पण असल्याचे वाचले. पण ती अतिमहागडी आहेत, असे वाचले.

संपुर्ण आफ़्रिकेभर एम नेट हे टिव्ही नेटवर्क आहे. ते इथेही दिसते. त्यावर काही भारतीय चॅनेल्स दिसतात. दुपारच्या जेवणाच्या वेळी मी कधी कधी बघतो, धोरण म्हणून मी घरात, टिव्ही ठेवत नाही.

यादवी युद्धाच्या जखमा त्या त्या देशात दिसत राहतातच. आम्हालाही रस्त्यात वापरात नसलेल्या सैनिकी चौक्या, चौथरे, वापरात नसलेले रणगाडे, काही जाळलेल्या गाड्यांचे सांगाडे दिसतात. पण घरांवर काही गोळीबाराच्या खुणा दिसत नाहीत. बहुतेक घरे नव्याने बांधलेली दिसतात.

त्या काळात पेरलेले काही सुरुंग अजून तसेच आहेत, त्यामूळे रस्ता सोडून बाजूला जाऊ नये असे नेटवर लिहिलेले आहे. पण तेसुद्धा लुआंडामधे असावे असे वाटते, कारण आमच्या गावात रस्ताच नसल्याने, रस्त्याच्या आजूबाजूला असे काही प्रकरणच नाही. मुख्य रस्त्यावरुन आत शिरल्यावर एक भले मोठे मैदानच लागते, त्यातून रॅलीत चालल्यासारख्या आमच्या गाड्या चाललेल्या असतात. शिवाय आजूबाजूला मुलांचे फ़ुटबॉलचे खेळ रंगात आलेले असतातच.

अगदी गल्लीबोळात मुले हा खेळ खेळत असतात. पहिल्याच विकेंडला माझे रवांडन मित्र, मला एका हॉटेलमधे स्पेन विरुद्ध इतालिया असा सामना बघायला घेऊन गेले होते. असे सामने बघावेत तर आफ़्रिकन किंवा दक्षिण अमेरिकेतील लोकांसोबत, त्यांचा त्या सामन्यातला मानसिक सहभाग, क्षणाक्षणाला होणारी घालमेल बघण्यासारखी असते.

हे हॉटेल आमच्या गल्लीतच आहे. मला आवडले ते तिथले आवार, स्वच्छता, पांढरा प्रकाश आणि नो स्मोकिंगचा बोर्ड ! नाहीतर अंधारे आवार, सिगारेटचा धूर, दारू चढलेल्या माणसाचे चढलेले आवाज, यांनी मी वैतागतो.

या देशाचे चलन आहे क्वांझा. पण त्याचबरोबर डॉलर्स देखील सहज स्वीकारले आणि दिले जातात.
बॅंकेचा विनिमय दर ९३/९८ असला तरी व्यवहारात १ डॉलर म्हणजे १०० क्वांझा असे सोपे गणित
वापरले जाते. केनयात करन्सीवर काही बंधने नसली तरी असा रोखीने व्यवहार होत नाही,
नायजेरियात तर चारचौघात डॉलर हा शब्दही उच्चारता येत नाही. त्याला तिथे, राजा म्हणतात आणि
बोलताना तोच शब्द वापरतात.

प्रत्येक देशातील तरुणांच्या एकंदर दिसण्याबद्दल काही ठोकताळे बांधता येतात. धावण्याच्या स्पर्धेत
नेहमी केनयाचे खेळाडू पहिले येतात, ते बघितले असेल. ते जसे दिसतात म्हणजे अगदी कृश अंगकाठीचे आणि शरीरावर कातडी ताणून बसवल्यासारखे, तसेच तिथले युवक दिसतात. मुली मात्र खुपच स्थूल दिसतात. त्या तुलनेत अंगोलाची तरूण पिढी मात्र चांगलीच बांधेसूद दिसते. मुले आणि मुलीसुद्धा. ( गेल्या वर्षी मिस अंगोला, जगतसुंदरी ठरली होती ना ? )

वर लिहिल्याप्रमाणे पोर्तुगीजचे धडे मला सेक्रेटरी देत आहेच. सर्वात आधी सर्वाना म्हणायचे ते बोम दिया. म्हणजे गुड डे. इंग्रजांप्रमाणे हे लोक केवळ सकाळसाठी नव्हे तर पूर्ण दिवसासाठी शुभेच्छा देतात.

तिला बाकी काही सांगितले कि ती म्हणते, शीं ~~
कारण शीं म्हणजे हो !

(इथले हवामान आणि निसर्ग याबाबत पुढच्या भागात लिहितो.)

निसर्गाबद्दल लिहायचे म्हणून जरा निवांतपणे लिहायला घेतलेय आणि तसा निसर्गाला पण
भिडायला मुरायला वेळ द्यायला हवा ना !

मी इथे आलो तो दिवस दक्षिण गोलार्धातला सर्वात लहान दिवस होता, त्यामूळे सूर्य लवकरच
मावळला आणि एक देखणा सूर्यास्त बघायला मिळाला. वाळवंटातील सूर्यास्त हि एक खास
पर्वणी असते. इथली वाळू, अगदी मुलायम असल्याने दिवसभर आसमंतात उडत असते, आणि
संध्याकाळच्या वेळी ती आभाळात अनोखे रंग भरते. अबोली रंगाच्या वाळूमूळे, आभाळही
निळसर किरमीजी रंगाचे दिसले, सूर्याचे बिंब जरा जास्तच केशरी दिसू लागले, दुसऱ्या दिवशीचा
सूर्योदय पण तसाच देखणा होता.

आणि मग हे रोजचेच होऊन गेलेय. वर लिहिल्याप्रमाणे सूर्याचे दक्षिणायन पूर्ण झाल्याने, सूर्य
भरदुपारी देखील डोक्यावर नसतो. तो इतका खाली गेलेला असतो, कि सुर्योदय आणि सूर्यास्त
मला घराच्या एकाच खिडकीतून दिसतात. ( भारतातून असे दिसत नाही.)

इथे सर्वत्र वाळूच आहे, अगदी घोटाभर पाय रुतेल इतकी. त्यातही अबोली रंगाची जास्त. क्क्वचित
पांढरी वा पिवळसर पण दिसते. हि वाळू चरचरीत नसते, हाताला तर मुलायम लागतेच पण
डोळ्यात गेली तरी फ़ारशी खुपत नाही.

अशी वाळू असल्याने, झाडे वगैरे नसतील असा समज झाला असेल तूमचा, पण तसे नाही,
अगदी नैरोबी इतकी नसली तरी भरपूर झाडे आहेत इथे, आणि त्यातली बरीचशी ओळखीची,
पण वेगळ्या रुपड्यातली पण.
मस्कतमधले वाळवंट शुभ्र वाळूचे आहे आणि तिथे ठायी ठायी खजूराची फळावणारी झाडे
आहेत. रस्त्याच्या कडेने तर आहेतच पण खास मस्कती खजूराच्या बागायती पण आहेत.
इथे मात्र ती झाडे अजिबातच दिसली नाहीत.
पण काल खजूराबाबत एक हृद्य किस्सा घडला. घराजवळच्या मिनी सुपरमार्केटमधे मी गेलो
होतो. तिथे मला फ़्रिजमधे एक खजूराचे पाकिट दिसले. ते अर्थातच मी घेतले. कॅश काऊंटरवर
गेल्यावर तिथला मुलगा म्हणाला, ते खजूराचे पाकिट मी माझ्यासाठी ठेवले होते. मी म्हणालो,
मला माहित नव्हतं, ठेव तू. तर तो म्हणाला असं कसं, तू पण घे ना. त्याने दुसऱ्या पिशवीत
त्यातले अर्धे खजूर ठेवून मला दिले, आणि माझ्याकडून पैसेही घेतले नाहीत, मला एकाचवेळी
भरूनही आले आणि ओशाळल्यागतही झाले. ( सध्या रमदान चालू आहे.)

लाल माती आणि कच्चे रस्ते, असे बघून कोकणातच आलो आहोत कि काय असे वाटत राहते,
आणि या भावनेत भर घालतात ती इथे असणारी आंब्याची झाडे. चक्क आमराया आहेत इथे,
आणि त्यांच्या पानावर लाल मातीचे थर. सध्या सगळी झाडे मोहोरावर आहेत. पिकल्यावर
आंबा खायचा झाला तर रत्नागिरी, देवगड विसरूनच खावा लागेल, पण निदान कैऱ्या तरी
मिळतील. सर्व झाडे एकाच आंब्याच्या जातीची दिसली.

पोर्तुगीज वसाहत असल्याने तितक्याच संख्येने काजूची झाडे आहेत. पण या झाडांनी जरा
चकवले. गोव्यात पोर्तुगीजांनी काजूची झाडे लावली, ती तिथली मातीची धूप रोखण्यासाठी
( फ़ेणी हि स्थानिक लोकांनी शोधलेली चीज आहे.) आणि हा हेतू फ़ारच मनावर घेतल्या
सारखी गोव्यातील झाडे (इतकेच नव्हे तर कोकणातली बहुतेक झाडे ) ही जमिनीलगतच
वाढतात. उभ्या विस्तारापेक्षा आडवा विस्तार अगदी डोळ्यात भरण्यासारखा असतो. पण
इथली झाडे मात्र सरळ खोड आणि वर गोलाकार विस्तार अशी वाढलेली दिसताहेत.
आमच्या कंपनीच्याच आवारात झाडे असल्याने, अगदी जवळ जाऊन, पानांचा वास घेऊन
बघता आले.
आपल्याकडे आंब्याचा आणि काजूचा मोहोर साधारण एकाचवेळी येतो, इथे मात्र काजूच्या
झाडावर सध्या ना मोहोर ना काजू. पण हि झाडे फळावता्त एवढे नक्की, कारण तशा खुणा
झाडावर आहेतच.

काजू सारखेच कोडे घातले ते इथल्या देशी बदामानी. आपल्याकडे हि झाडे वाढतात ती मधे उभे खोड
आणि सभोवताली समांतर प्रतलात पाने. तसे आपल्याकडे या झाडाला फ़ारसे महत्व नाही. (मालदीवमधे
मात्र मी याच्या बिया, सोलून वगैरे विकायला असलेल्या बघितल्या होत्या ) इथे हे झाड असा काही
खास आकार न घेता वाढलेले दिसते. आमच्या कंपनीच्या आवारातच आहे आणि झाडाखालच्या बिया
फ़ळे, इथले कामगार टाईमपास म्हणून खात असतात. या फ़ळात खाण्याजोगा भाग फारच थोडा असतो.

पण कोकणात फ़ारशी नसलेली कडुनिंबाची झाडे पण इथे भरपूर आहेत. अगदी घराच्या अंगणात
वगैरे लावलेली आहेत. आपल्या कोकणात कडुनिंब फ़ारच तुरळक दिसतो. तिथले अनेक लोक,
बकाण्यालाच कडुनिंब समजतात. पण इथे मात्र भरपूर आहे तो. तुरळक निंबोण्या दिसताहेत.
कधी फ़ुलतो ते बघायचेय आणि फ़ुलला कि नगर भागात जसा भरभरून फ़ुलतो का, ते ही बघायचेय.

पूर्व आफ़्रिकेत, बाभूळ तर ठेचेठेचेला आहे. तिथल्या गवताळ प्रदेशात, बाभूळ आणि गवत यांच्यात
कायम चढाओढ असते आणि हती कधी या पार्टीत तर कधी त्या पार्टीत असे करतो. त्याच्या
मनात आले तर गवताळ प्रदेशात बाभळीचे वन तयार करू शकतो आणि त्याच्याच मनात आले तर
बाभळीच्या वनाचा नायनाट करुन तिथे गवताळ प्रदेश निर्माण करू शकतो. ( याबाबत मी सविस्तर
दोन लेख लिहिले होते ) तिथल्या वनातील झाडे, सरळ खोड आणि वर सपाट असा पर्णसंभार अशी
वाढतात. पण ही झाडे नैरोबीतही भरपूर आहेत. तिथे मात्र ती गोलाकार वाढलीत. अंगोलात आल्या
पासून, मात्र मी एकही बाभळीचे झाड बघितलेले नाही.
या गावी बाभळी नसल्या तरी बोराची झाडे आहेत. मुद्दाम लावलेली दिसतात आणि बाजारात ती
बोरे विकायलाही असतात. अगदी थेट आपल्याकडच्या चवीचीच. बोराबरोबर पेरू हवेतच, त्याचीही
झाडे आहेत. पेरूपासून केलेले एक पेय, इथे चांगलेच लोकप्रिय आहे. चवीला छान लागते ते.

आमच्या ऑफ़िससमोर एक सिताफळाचे झाड आहे. फ़ळे धरलीत पण कच्ची आहेत अजून, त्याचीही
चव बघायची आहे. नवल म्हणजे इथे शिरिषाची झाडेही खुप आहेत. सध्या शेंगांवर आहेत, शेंगा सुकल्या
की तसाच पैंजणांसारखा नाद करतात आणि फ़ुलावर आली कि आसमंत सुंगधी करतात, तेही बघायचेय.
पण अशी मोठी झाडे सोडली तर खास शोभेसाठी किंवा फ़ुलांसाठी लावलेली झाडे अजिबातच नाहीत.
गुलमोहोराचीपण २/३ च दिसली. ती पण दुर्लक्षितच. (आपण जेवढे गुलमोहोराला डोक्यावर घेतलेय,
तेवढे त्याच्या मूळ स्थानी, मादागास्कारला पण घेतले नसेल.)

नायजेरियातील आणि न्यू झीलंडमधील काही झाडे, खुपच अनोळखी आहेत. त्यांचा आकार, पाने,
फळे, फ़ुले या कशाचीच आपल्याकडच्या झाडांशी तुलना होऊ शकत नाही, पण इथली काही झाडे
मात्र मला कोड्यात टाकतात. काही कोडी मी सोडवली तर काही कदाचित सोडवू शकणार नाही.
इथे हादग्यासारखी फ़ुले येणारी काही झाडे आहेत. पाने किंचीत लहान, पण फ़ुलांचा आकार तोच.
आपल्याला सहसा हादग्याची पांढरी फ़ुले दिसतात, कवचित गुलाबी फुलेही असतात, पण इथली
फ़ुले मात्र, लालभडक आहेत. आता हे कोडे सोडवायचे तर त्या फ़ुलांची भाजी करावी लागेल,
ते जरा कठीण वाटतेय.

पण एक कोडे सोडवले ते शेवग्याचे. जश्या मोई सालई बहीणी बहीणी ( असे बहिणाबाईंनी लिहिलेय)
तसे शेवगा हादगा भाईबंद असावेत. तशीही हि नावे जोडीनेच घेतली जातात. शेवग्याची झाडेही इथे
भरपूर आहेत. मुद्दाम लावलेली आणि मैदानात आपसूक उगवलेलीही आहेत. पण घराच्या अंगणात
आहेत, म्हणून मुद्दाम लावलीत म्हणावीत, तर झाडावर गेल्या हंगामातल्या सगळ्या शेंगा, या
हंगामातल्या कोवळ्या शेंगा आणि फ़ुले सगळेच आहेत, पानेही आहेत. माझ्या घरासमोरच एक झाड
आहे. रोज मी निरिक्षण करत असतो. या फ़ुलांवर भुंगे, सूर्यपक्षी नुसते तुटून पडलेले असतात.
पोपटासारखे दिसणारे पण रंगाने तपकिरी पक्षी पण भरपूर असतात. हे पक्षी नैरोबीतही खुप दिसतात.
पण जरा विनोदीच असतात. एकतर त्यांची शेपटी त्यांना पेलत नसल्यासारखे बसलेले असतात. तारांवर
पण कशी आडवे किंवा तिरपे बसत नाहीत, तर उभे बसतात ( आपण रेल्वेत लटकतो तसे )
तर एवढे सगळे पक्षी येताहेत, म्हणजे झाड विषारी वगैरे नसणार असा अंदाज केला ( तो चुकीचा
असू शकतो. विष खाउन ते पचवण्याची कुवत अनेक पक्ष्यांकडे असते.) तरीही एका रविवारी सकाळीच
जाऊन शेंगा तोडल्या, आणि केली की भाजी. छान होत्या चवीला. मग हे लोक का खात नसतील !
एक कोडे सुटले तर दुसरे पडले, म्हणायचे.

बाजारात अवाकाडो भरपूर म्हणजे अवाकाडोची झाडेही असणार, हे झाड मोठ्या पानांचे असून
कायम हिरवेगार असते. पानगळ होत नाही. आणि फळेही भरपूर लागतात. आफ़्रिकेत अनेक
लोक त्याचा लोण्याप्रमाणे वापर करतात. चक्क पावाला लावून खातात. या फ़ळाची एक खोड
म्हणजे हे झाडावर कधीच पिकत नाही. आणि घरी आणल्यावरही कधी पिकेल ते सांगता येत
नाही. मला खुप आवडते हे. आणि किंचीत मेद असणारे हे फ़ळ, लागतेही लोण्यासारखेच. (
फक्त कुत्रांसाठी हे फ़ळ धोकादायक ठरते. )

अंगोलाच्या एंबसीच्या वेबसाईटवर इथली एक खास रेसिपी आहे, त्यात पाम ऑइल वापरलेय.
या पाम ऑईलचा इथे फारच प्रसार झालाय. आणि अर्थातच त्याची भरपूर झाडे पण असणार.
खास करुन बायो डिझेलसाठी त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यावर तर धोकादायक ठरेल अशा
पद्धतीने या झाडाची लागवड झाली आहे. आणि अर्थातच स्थानिक वनस्पतींचा नाश झालाय.
नायजेरीयाला आमच्या ऑफ़िससमोरच मोठी बागाईत होती. या बागेत किंवा या झाडाखाली
बाकीची झाडे जगू शकत नाहीत. हीच जागा गुगल अर्थवर बघितल्यावर मात्र, खरेच डोळे
फ़िरतात, एवढा तिचा विस्तार आहे.

सकाळी आमच्या गल्लीतल्या सगळ्या आयाबाया अंगण झाडताना हिराची केरसुणी वापरतात.
त्याअर्थी इथे नारळाची झाडे पण असणार. पण नवल म्हणजे, मी राहतो ती जागा, समुद्रापासून
फ़ारतर २० किमी असेल, तरीही माझ्या परीसरात एकही नारळाचे झाड दिसत नाही. (बाजारात
नारळ देखील विकायला असतात.)

चिंचेला, तमार ए हिंद असे खास भारतीय नाव दिलेले असले तरी ते झाड मूळचे आफ़्रिकेतलेच.
आणि इथे बरीच झाडे दिसतात. इतकेच नव्हे तर एक स्थानिक पेय, पण चिंचेपासूनच केलेले
असते. टिनवर चिंचेचे चित्र बघून मला आधी खरेच वाटले नाही. पण चव मात्र खासच होती.
आपल्याकडे मिळते ते पेय थायलंडहून आलेले. आपल्या बाजारात मिळते गोडी चिंच पण तिथलीच.
असे छान चवीचे पेय, आपल्याकडे का बरं मिळत नाही ? अमृत कोकम पण आत्ता आत्ता मिळायला
लागले बाजारात. (तेसुद्धा कोकमापासून नसतेच बनवलेले.)

इथे यायच्या आधी इथल्या हवामानाबद्दल जे वाचले होते ते म्हणजे उष्ण. पाऊसही बेताचा.
नामिबीयाच्या किनाऱ्यावरुन एक समुद्रीय शीत प्रवाह वहात असतो, त्यामूळे तिथे ढग
निर्माण होत नाहीत आणि पर्यायाने पाउसही पडत नाही. आणि त्याच प्रवाहामूळे अगदी
समुद्रानजीकही तिथले हवामान कोरडे असते. अंगोलामधे त्याचा थोडाफ़ार फ़रक पडत असावा.
पण मी आल्यापासूनतरी इथे हवामान थंडच आहे. घरी एसी लावावा लागत नाही. आकाशातही
बरेच वेळा ढग असतात. पाऊसही एकदाच शिंतडला. चौकशी केल्यावर कळले कि साधारण,
डिसेंबर जानेवारी मधे हवामान गरम असते. किती तपमान विचारले तर म्हणतात ३४ अंश सेंटीग्रेड
पर्यंत जाते. आता या तपमानाला, निदान मुंबईकर तरी घाबरणार नाही. पुढच्या महिन्यापासून
पावसाला सुरवात होईल, असेही म्ह्णतात.

मी राहतो तो भाग, निवासी आहे आणि ऑफ़िसचा भाग औद्योगिक भागात. पण वाटेत काही
शेती दिसते. शेतात कसावाचेच पिक आहे. पण शेती फ़ार निगुतीने केली जाते, असे दिसत नाही.
आणि तसेही या पिकाला फ़ार काही करावे लागत नाही. इतकेच नव्हे तर तयार झाल्यावर वर्ष
दोन वर्ष काढले नाही, तरी जमिनीखाली कसावा सुरक्षित राहतात. दुष्काळी परिस्थितीत हे
पिक चांगलेच तग धरते. रताळ्या / बटाट्याप्रमाणे याच्या सालीजवळ विषारी द्रव्ये असतात.
पण सोलून, धुवून घेतले कि ते रहात नाही. आपल्याकडे पण हे पिक चांगले येईल.

वरती मी काही पक्ष्यांचा उल्लेख केलाय त्यांच्याबरोबर मला इथे चिमण्या आणि कबुतरेही
भरपूर दिसतात. ऑफ़िसच्या खिडकीच्या काचेवर टोचा मारत बसायचा उद्योग चिमण्या
इथेही करत असतात. कबुतरेही तसाच पण तेवढ्या संख्येने नाही, रस्त्यावर डेरा टाकून असतात.
पण नवल म्हणजे मी इथे आल्यापासून एकही कावळा बघितलेला नाही. नैरोबीतले कावळे
आपल्या कावळ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांची मान आणि पोट पांढरेशुभ्र असते. पण तेही
कावळे इथे दिसले नाहीत. स्विस मधल्या बर्फ़ाच्छादीत मांऊट टिटालीसवर पण कावळे
असतात, इथे का नसावेत.

आणि आता एका अति खास झाडासंबंधी.
आफ़्रिकन बाओबाब किंवा आपली गोरखचिंच हे अगदी खास झाड असते. एक भलेमोठे
गाजर उलटे ठेवलेले, आणि त्याला फ़ांद्या व पाने असे याचे रुप. मुंबईत नवलाची झाडे
बघायला राणीच्या बागेत किंवा वसईच्या किल्ल्यात जावे लागेल. पुर्वी दादरला पोर्तूगीज
चर्चच्या आवारात पण बघितल्यासारखे आठवतेय, पण आता नाही.
या झाडाची फुले पण देखणी असतात आणि भल्यामोठ्या गोरखचिंचा तर खासच. नैरोबीला
असताना, या चिंचेच्या गरापासून केलेला खाऊ खुप खाल्ला. खरे तर नैरोबीच्या
परिसरात हि झाडे अजिबात नाहीत. बहुतेक हि झाडे, मोंबासाच्या जवळपास असावीत.

अंगोला ला आल्यापासून मात्र हि झाडे खुप बघितली. गावाच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक
अवाढव्य झाड नव्हे तर वृक्षराज आहे. मुंबईतील झाडांच्या खोडाचा घेर फ़ारतर एक ते
दिड मीटर्स असेल, इथल्या काही झाडांच्या बुंध्याचा घेर चक्क चार ते पाच मीटर्स आहे.
माझ्या घराजवळचा बाजार, याच झाडाच्या आजूबाजूला भरतो.
मुंबईतील झाडांना फ़ार कमी चिंचा लागतात, इथल्या काही झाडांना तर शेकड्याने
चिंचा लागल्या आहेत. काही झाडांच्या बुंध्यांवर, गोलाकार खाचा आहेत. कदाचित
त्या गोळीबाराच्या खुणा असतील. इथल्या झाडांच्या आकारमानातही विविधता आहे.
हि झाडे अर्थातच शेकडो किंवा हजारो वर्षे पुराणी असतील. नव्याने रुजलेली, तरीही
पाच पन्नास वर्षे आयूष्यमान असतील अशीही झाडे दिसतात. त्यांच्या बुंध्यांचा घेरही
अर्धा मीटर सहज आहे.
या झाडांना इथे पवित्र मानतात ( पुरणात वर्णन केलेला कल्पवृक्ष हाच असावा, असाही
कयास आहे.) त्यामूळे इथे सहसा ही झाडे तोडली जात नाहीत. कुठेही असलो, तरी
नजरेच्या टप्प्यात एक भला मोठा वृक्ष दिसतोच. आता त्यांना बहर कधी येतोय, त्याची
वाट बघतोय.
तर सध्या या निसर्गाच्या ग्रंथाचे केवळ पहिले पान उघडलेय मी.




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...