Friday, October 23, 2020

थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा


वाघ

महाराष्ट्रात वाघ म्हटलं की ताडोबा आठवतं. कारण जवळपास महाराष्ट्रातले निम्मे-अर्धे म्हणजे ११५ वाघ ताडोबातच आहेत. जवळच्या पेंचमध्येही ६० वाघ आहेत. अर्थात पेंच तसंही ताडोबाच्या अर्धंच आहे म्हणा. पण म्हणून महाराष्ट्रात हमखास वाघ पहायचा तर लोक दोनच ठिकाणं निवडतात; पेंच नाहीतर ताडोबा.

9E3A8273.jpg

पेंच नागपूरहूनच जवळ. एक-दीड तासाचा प्रवास. पेंच तसं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मिळून पसरलं आहे. मध्य प्रदेश पेंच जितकं गाजलं आणि लोकांनी डोक्यावर घेतलं, तितकं भाग्य महाराष्ट्र पेंचला नाही लाभलं. महाराष्ट्रात फक्त सिल्लारी गेट पूर्वापार प्रसिद्ध. या गेटला कॅन्टरपण चालतात. स्वस्तात मस्त. आता आता मध्य प्रदेश सीमेवरचं खुर्सापार गेट लोकांनी ‘हिट्ट’ केलं. किती दिवस हे महाराष्ट्र पेंचचं गेट आहे, हेही पर्यटकांना माहीत नव्हतं. ही दोन गेट सोडली तर चोरबाहुली, पवनी, सुरेवानी, खुबाळा, कोलितमारा ही इतर गेट नाही फार चालत. त्यातही चोरबाहुली, सिल्लारी, पवनी आणि खुर्सापार हे एका रस्त्यावर तरी आहेत पण बाकी तीन दिशांना तीन.

पेंचसुद्धा अतिशय सुंदर आहे. पेंच नदीकाठी फुललेली ही क्लिओमची फुलं. ही इथं कोट्यावधी आहेत.

_MG_9748.jpg

आणि या क्लिओमच्या फुलांत रमलेली ही नदी-टिटवी.

_MG_0059.jpg

कोलीतमा-यात पेंच नदीच्या पात्रात मगरीपासून सुरक्षित उंच खडकावर हे बगळे बसले होते. मी थोडा उद्योग करून फोटोचं पेंटिंग केलं.

_MG_8268---Painting.jpg

एका पावसाळी सकाळी पेंचच्या तोतलाडोहचं हे मनोवेधक दृश्य.

_MG_0636a.jpg

२०१७ पर्यंत शेकडो होड्या घेऊन हजारो लोक यात दिवसरात्र मासेमारी करीत. अखेरीस वनविभागानं मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी ते थांबवलं. आता इथं मासेमारांचा गोंधळ नाही, या एका बेटावरून उतरून दुस-या बेटावर पोहत जाणारा वाघ दिसू शकतो. मी पाहिलाय. पण कॅमेराच नव्हता त्या दिवशी.

माकडं पाणी पित होती. वाघ वरुन धावला. अर्धी माकडं काठा-काठानं धावत सुटली. अर्ध्या माकडांनी पाण्यात उड्या मारल्या आणि पोहत निघाली. मागोमाग वाघानं उडी ठोकली आणि पोहत पाठलाग सुरू केला. माकडं जीवाच्या आकांतानं हातपाय मारत होती. पण वाघच तो. त्यानं थोड्याच वेळात पंजाने एक माकड पाण्यातच उलटं-पालटं केलं. पाण्याचा मोठा डोंब उसळला. वाघाच्या तोंडात माकडाची मान होती. काठाशी येऊन वाघ माकडाची हाडं कडाकडा फोडून घास गिळू लागला.
असो.

पेंचपेक्षा प्रसिद्ध ताडोबा. ताडोबाचं नाव भारतातल्या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांमध्ये घेतलं जातं. जवळ जवळ १३०० चौरस किलोमीटरवर पसरलेलं हे ताडोबाचं दांडगट रान. जाणं येणं जरासं गैरसोयीचं आहे म्हणा. रेल्वे फार सोयीस्कर नाही इथं यायला जायला. रेल्वे, विमान नागपूरपर्यंत. मग बरेच लोक नागपूर किंवा वर्धेला उतरुन येतात. दोन्हीकडनं सारखंच.

आता ताडोबाच्या गेटचं म्हणाल तर कोअर आणि बफर मिळून १९ गेट आहेत. मोहर्ली, खुटवंडा, नवेगाव, कोलारा, पांगडी, झरी, आगरझरी, देवाडा-आडेगाव, जुनोना, रामदेगी-नवेगाव, निमढेला, अलीझंजा, कोलारा झोन, मदनापूर, सिरकाडा, पांगडी झोन, झरी-पेठ, मामला, केसलाघाट. हुश्श!

_MG_2749.jpg

१९ गेट म्हटलं की कधी नाही ते ‘ब्यागा बांधून फिरायला चाल्लेला’ माझ्यासारखा मध्यमवर्गीय (त्यातही कनिष्ठ पद) आडवा होतो. १९??? ही काय गेटची संख्या आहे? रोज एक म्हटलं तर अर्धा महिना इथंच. आणि खर्रर्रच असं राहतो म्हटलं, तर पैसेपण बॅगभर लागतील. पण आहे बुवा असं खरं. चार महीने आधी आरक्षण सुरू होत असल्यानं नियोजन फार अचूक हवं. नाहीतर? मग काय; टूर ऑपरेटरच्या भरवशावर. स्वत: नियोजन करुन जाणारी जनता तशी कमी. एकट्या दुकट्याला तर हा खर्च परवडतच नाही. एक सफारी ४ हजारांपासून ११ हजारांपर्यंत पडते. मुक्कामाचे पुन्हा वेगळे. तरी हौशी लोक ३५-४० हजार खर्च करुन फुल सफारीपण घेतात.

पण ताडोबातही कॅंटर चालतात. एक-दोघांना जायचं असेल तर ही कॅंटर सफारी परवडते. एकदम कमी खर्चात. ४०० रुपये. १५-२० जणांना एकत्र जायचं असेल तरी कॅंटर हा चांगला पर्याय आहे. पण ते ही आधी बुकींग असेल तरच. वेळेवर जाऊन जागा मिळालीच तर घरी गेल्याबरोबर सत्यनारायण घाला नक्की.

जिप्सी सफारी बुकींग आता ऑनलाईन आहे. त्यामुळं तारखा ठरे-ठरेस्तोवर गेटच्या जिप्सी हाऊसफुल्ल. एक वेळ रेल्वे भरणार नाही, त्यात जागा मिळते. पण ताडोबात असं झालं तर तुम्ही पुण्यवान आहात बुवा.

असं तसं करुन रिकामं गेट शोधून बुक करावं, परवडत्या दरात कुठं रहायचं जमतंय का पहावं. एवढं करुन ज्या गेटनं जायचं आहे, त्याच्या जवळ राहण्याची सोय व्हावी, नाहीतर वैताग. रिसॉर्ट कुणीकडं आणि गेट कुणीकडं! असा सारा मामला जमवावा तेंव्हा कुठं जीवात जीव येतो.
बोलो तारारा!

आता एवढं होऊन वाघ दिसला म्हणजे बरं, नाहीतर ‘हॅट सालं! फुक्कट पैसे गेले. काय वाघ-बीघ काय नाही इथं. फसवायचे धंदे आहेत.’ अशा शेलक्या प्रतिक्रिया टाकत दु:खी मनानं आपला घरचा रस्ता जवळ करावा.

एकदा एका गृहस्थांनी फार भारी प्रतिक्रिया दिली. अगदीच लक्षात रहावी. आणि पटली खरं तर मला. ते अनेक वेळा वनभ्रमंतीला जातात. त्यांना कित्येक वेळा वाघ दिसत नाही. मला पेंचमध्ये भेटले त्या दिवशी त्यांची सहावी की कायशी सफारी होती. त्यांना वाघ दिसला नव्हता. पण यावर त्यांचं चक्क म्हणणं पडलं की “वाघ पहायला आम्ही येतो. ती जी वाघ पाहण्याची उत्सुकता असते ना! आणि सतत तणावात असणारे कान, डोळे, कॅमे-याच्या बटणावरचा हात. हे मस्त वाटतं. नशा येते त्याची. वाघ दिसून गेला की पुढची सफारी कंटाळवाणी वाटू लागते. ती शरीरातली-मनातली हूरहूर संपते. रस संपून जातो. हा क्षण मला आवडत नाही.”

शप्पत. काय खरं सांगितलं त्या काकांनी! अफलातून सत्य.

असो. खरं तर आपण फिरतो तेंव्हा वाघ आपल्याला दिसो की न दिसो, त्यानं आपल्याला नक्की पाहिलं आहे याची खात्री तुम्ही बाळगा. कुठं तरी पुतळ्यासारखा थिजलेला किंवा गवतात लोळणारा वाघ कान जागे ठेवून एका डोळ्यानं जगाची सारी खबरबात घेत असतो. तो गवतात दबून बसला तर चक्क दाबून बसवल्यासारखा चेपून जातो; सपाट. बांबूत असला तर हिरव्या-तपकिरी बांबूत त्याच्या अंगावरचे पट्टे बेमालूम मिसळतात. म्हणून काय? तर एकंदरीत वाघ दिसणं हा नशीबाचा खेळ म्हणावा लागेल.

मी पहिला वाघ पाहिला नागझि-यात ध्यानी मनी नसताना. असाच जुलैचा महिना. कंबर-कंबर गवत. तळ्याकाठी मत्स्यगरुड उतरलेला. मासा खात होता. मी दुर्बिणीतून बघत होतो. अचानक तो उडून गेला. काय कळालं नाही बुवा. मी तसाच पहात राहिलो मासा दिसतोय का? कोणी नेतंय का? तिथं वारा नाही, काय नाही अन् झुडपाची पानं हलतायेत. मला काही कळेना. आभाळ भरुन आलंय, कधीही धबाधबा कोसळेल असं डोक्याला टेकू आलंय अगदी. वारा नावाला नाही. हे झुडूप हलतंय कसं? मी दुर्बिणीतून पहात राहिलो. पाच-सात मिनीट. मग ती वाघीण उठून उभी राहिली आणि मागून तीन बच्चे आले तेंव्हा कळालं ते झुडूप नाही, वाघीण पाठीवर झोपून पाय हवेत करुन लोळत होती. ते पट्टे हलत होते अन् मला वाटत होतं की ती झुडपाची पानं हलतायेत. असो.

पण आपण ताडोबाचं बोलत होतो ना! माझं लिहिणं जरा असंच अघळ-पघळ आहे. डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.

तर मी काय म्हणत होतो की इतका पैसा खर्च करुन एवढ्या लांबून आल्यावर वाघ दिसो की न दिसो, जे दिसतं आहे त्याचा आनंद लुटायचा की ‘वाघ नाही दिसला हो’ म्हणून रडत रडत जे दिसतं आहे तेही बघायचं नाही हे आपण ठरवायचं आहे.

समजा उत्तरेतून जाता येता वाट वाकडी करुन आग्र्याला एकाच दिवसासाठी गेलात. एक्काच हं! नेमका त्या दिवशी ताजमहाल बंद. मग नियोजन करणा-याला धूम शिव्या. चिडचिड. दिवसभर हॉटेलवर टी.व्ही. पहात बसणं आणि रात्रीच्या रेल्वेनं घरवापसी.

आल्यावर कोणी म्हणतो, “आग्रा!!!!’. अरे वा! दही-जलेबी खाल्लीच असेल. ती पेटंट रेसीपी बरं का.”
“ओह! असं आहे का? नाही बुवा. नाही खाल्ली.”

“किनारी बाजार फिरलात की नाही? कसलं भारी आहे ते मार्केट!”
“नाही बुवा मला हे नव्हतं माहित.”

“बरं. आग्र्याचा प्रसिद्ध पेठा तरी आणलात की नाही? घ्या जरा दोन-दोन पीस, आम्ही पण खाऊ की!”
“आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे? नाही बुवा. गेलोच नाही.”

आपली चिडचिड अजून. ‘अर्रेर्रे………….. ताजमहाल गेलाच होता. पण हेसुध्दा गेलं त्या रागात. आपण पाहिलंच नाही.’ एकदम हेच्च इथं होतं. वाघ-वाघ-वाघ असा धोशा लावून आपण जातो. बाकी काहीच पहायला कुठं थांबत नाही. वाघ दिसला तर ठीक, नाहीतर???
नाहीतर आपला आग्रा होतो..

 

असो. एक कान्हातला अनुभव सांगतोच. मोरघार (Changeable Hawk-Eagle) सशावर टपली होती. दोन प्रयत्न वाया गेले. तिस-या प्रयत्नात ती होती. ससा गवताच्या गचपणात. मोरघारीनं उतरुन चोच मारुन पाहिलं पण काही जमलं नाही. आता सशानं थोडंसं डोकं काढायचा अवकाश की घारीनं नख्यांत उचलून नेलाच म्हणून समजा.

मागून गाडी आली. “शेर है क्या?”

“नही. वो देखो इगल शिकार कर रहा है खरगोशका.”

“हूं!!! इसको क्या देखना?”

आम्ही वेडे सोडलो तर कोणीच थांबलं नाही तिथं. सगळ्यांना वाघच पहायचे होते आणि मोजायचे होते. म्हणजे परत गेल्यावर सांगता आलं असतं “तीन दिवसात बारा वाघ” वगैरे स्कोअर.

अशा ‘मोजा-यांचं’ भलतं हसू येतं, कीव येते अन् चीडही येते. “अर्रेर्रे, रानात काय तुम्हाला वाघ मोजायला पाठवलंय? की जा बाबा, मोजून ये आणि आम्हाला पण सांग.”

मग कश्शाला रे? वाघ झालेत मोजून. त्याचे आकडे आहेत. गेले पार दिल्लीपर्यंत. छापून आले पेपरात.

अशा रानात आलो की खरं तर आपण मस्त मजेत फिरायचं, आनंद लुटायचा, वाघ दिसला तर वाघ, हरीण दिसलं तर हरीण. पण ही मंडळी स्कोअरकार्डच घेऊन फिरतात आणि पुढची अनेक वर्षं आपल्याला बेसावध पकडून हे आकडे आपल्या डोक्यात हाणतात.

असू द्या. आपण ताडोबाचं बोलत होतो ना! चला जाऊ द्या. हल्लू हल्लू आगे चले.

आता वैदर्भीय रानात जे काही बघावं, असं ताडोबात बघण्यासारखं बरंच काही आहे. पण खरं तर ‘वाघ दिसण्याची हमी’ हा भाग सोडला तर ताडोबात इतर रानांपेक्षा खास असं काऽऽऽही नाही. पण लोक येतात, जगातून येतात. कारण ताडोबात वाघ बरेच आहेत. त्यामुळं इथं जर चार सफारी घेतल्या, तर आंधळ्यालासुद्धा वाघ दिसतो.
असो.

इतक्या महागाईच्या काळातसुद्धा नमनाला दोन-चार मोठमोठे घडे कच्च्या घाणीचं तेल मी ओतलेलं आहे.

आता पाल्हाळ आवरतं गेतो. आपण रानात जातो आहोत. चार तासांनी परत बाहेर निघू. पाणी घेतलंय का? दुर्बिणी? कॅमेरा?

9E3A6060a.jpg

पाणी, दुर्बिण, कॅमेरा, नाक, डोळे आणि कान घ्या.

पाखरं-जनावरं पहा, झाडं-पानोळा पहा, रानाचे आवाज ऐका. येतायेत ना ऐकायला? हा पाण्यात पडणा-या थेंबांचा असा आवाज ऐकलात? अहो हा शिंगळा आहे; Scop's owl. बसलाय त्या तिकडं थेट त्या लेंडीयाच्या झाडावर. दिसला? नाही ना? मला पण नाही. फक्त अर्धा मिनिट डोळे बंद करा आणि ऐका.

हा शिंगळा, तो सुतार, या बाजूला हा सुभग, तिकडचा तो मोर, वर हा मोहाड्या गरुड गेला, मागच्या सवानातून हा रातवा, तिकडं दरीत तो माजावर आलाय चितळ. एक अद्भुत आवाजाचं विश्व जागं होतं. मग मला काय वाटतं सांगू? देवा! मला नजर दिलीस. पण एखाद्या अंधाला जे नादब्रह्माचं पारलौकिक सुख इथं, या रानात मिळेल, ते मला मिळू नये याचीही पुरेपूर तजवीज केलीस. तसे कान दिले नाहीस. तसं एकाग्र मन दिलं नाहीस.

या आवाजाची दुनिया म्हणजे मोठा भुलभुलैया. याची बाधा होऊ द्यायची नाही. भूल चढू लागली की डोळे उघडून भानावर यायचं.

इथला रानवट वास श्वासांत भरा. या हवेला स्वर्गीय सुवास आहे. इथल्या धुळीला अनवट गंध आहे. रानफुलांचे - जनावराचे वास अनुभवा. भले वाघ दिसणार नाही. पण तो तिथं रस्त्याच्या काठाला बसून गेला असेल, एखाद्या मजबूत सागवानावर तुरतुरला असेल. त्याचा वास तुम्हाला जाणवेल बरं! तिकडं कुठल्या एका त्या कुकुडरांझीच्या बेटामागं त्यानं परवा मारलेला अर्धा-मुर्धा गवा पडलाय. त्याचा जेमतेम वास आला की समजायचं इथं वाघोबा येऊ शकतात. म्हणून डोळे आणि कानाबरोबर नाक जागं ठेवा. पण तोंडं इथंच ठेवा; गेटच्या बाहेर. रानात ती बिनकामाची वस्तू आहे. हे तोंडं घेऊन येणारे लोक ना, चार तासात आपले कान चघळून टाकतात एकदम. वाट लागते मग.

रानात अस्वलाची नजर अधू, वाघाचं नाक अधू, मोरा-कोंबड्याचे पंख अधू. हे सारे दिसतील. पण कान अधू असणारं जनावर शोधून सापडणार नाही. थोडासा आवाज झाला की जनावर सावध. अधू कानाचं जनावर फक्त माणूस. सांगून ऐकत नाही आणि ऐकून समजत नाही.

जाऊ द्या. हल्लू हल्लू आगे.

मोहर्ली गेटनं आत जाल तर हा ताडोबातला एकमेव डांबरी रस्ता दिसेल.

_MG_3375.jpg

गंमत म्हणजे आधी या रस्त्यानं चंद्रपूर - मोहर्ली - ताडोबा - नवेगाव - चिमुर - अशी एस.टी. जायची. लोक पन्नासेक रुपयांचं तिकिट काढून चंद्रपूर ते चिमूर आणि त्याच परत फेरीच्या गाडीनं पुन्हा चंद्रपूर अशी फेरी करीत. आता जाता-येता वाघ दिसणारच. एस.टी. नं वाघाला दिसू नये असं कुठं काही आहे? किंवा वाघानं एस.टी. ला तरी? अशी स्वस्तात मस्त सफारी अगदी आता-आतापर्यंत होती. २०१७ पर्यंत. पण आता ही एस.टी. मोहर्ली पर्यंतच.

इतक्या गेट्सपैकी मोहर्ली, खुटवंडा, नवेगाव आणि कोलारा यापैकी कोणत्याही गेटनं जाल तर तुम्ही ताडोबा तळ्याला भेट देणारच.

ताडोबा तळ्याशी गेलं की सहसा हा बाबा असतोच. मत्स्यगरुड. ताडोबा आणि नागझिरा इथं हमखास दिसतो. याच्या भुकेच्या वेळी आपण ताडोबाच्या तळ्याशी असलो तर हा तळ्यावर फिरता फिरता एखादा किलोभराचा मासा उचलून नेताना दिसू शकेल बरं. याचा आवाज मात्र नवख्याला धडकी भरवणारा भेसूर. नागझि-यात किती संध्याकाळी तळ्याकाठी बसून घालवल्यात. सोबतीला याचा आवाज. आधी ऐकला तर भीतीच बसली एकदम.

FIsh-Eagle.jpg

तळ्याकाठी अजून काही दिसतंच. हा पाण्यातला वाघ. लठ्ठू पैलवान.

Crocodile.jpg

पण असं तब्येतीवर नका जाऊ एकदम. हिच्यापाशी जर गेलं तर जो काही वेग क्षणात पकडते, त्यानं भीती वाटते. ही मस्त खाऊन पिऊन उन्हाला पडली आहे. बरं या इतक्या भारी आहेत, की कुठल्या कुठं रांगत-सरपटत जातात. कोणी ताडोबा पाहिलं असेल तर सांगतो, मोहर्ली गेटला मगरी येतात. अगदी गेटच्या नाक्यामागं. हेच असेच दिवस. आषाढाच्या आगंमागं. तुम्हाला वाघ + जंबो मगरी पहायच्यात याच्या दुप्पट? पेंचला जा.

मगरी एरवी काठाशी बसतात. आज काठाशी पाणी भरलंय. म्हणून थेट रस्त्यावर आली ही अगडबंब मगर. तिच्या आजूबाजूला ही तीनचार पोरं तिच्या रुपा-गुणाचा उद्धार करत टवाळक्या करत फिरतायेत वाटतं.

Croc-with-ibis.jpg

कधी कधी तिच्या असण्याचा फायदापण होत असावा. तिच्या किल्ल्यासारख्या मजबूत तटबंदीच्या आश्रयानं या पाणलावा निवांत चरताहेत.

Snipe.jpg

एरवी या पाणलावा जवळ येऊ देणार नाहीत.
सहज एक आठवलं. पूर्वी इंग्रज शिकारी या पाणलावांची शिकार करीत. विदर्भात संत्रा भरपूर. संत्र्याच्या रसात पाणलावा शिजवून खात.

हे तुतारीवाले शराटी. लाल गोंड्याची टोपी आणि काळा झळाळीचा अंगरखा. उन्हात याचा काळा रंगही मोठा गोड दिसतो. खाऊन पिऊन झालंय. थोडी ढगाळ संध्याकाळ झाली. तळ्याकाठच्या या लाकडाच्या पुरातन ओंडक्यावर हे कुटूंब रानाच्या काव्यात रंगलंय.

Ibis.jpg

हा एकटा आगाऊ पोरटा इकडं बसलाय आरामात आई-बापापासून दूर. आता हा शहाणा होईल, मोठा होईल तेंव्हाच हा लाल टोपी घालणार, तोवर अधिकार नाही.

Ibis-Juv.jpg

बारा महिने इथं राहणा-या या अडया. बिलकूल जवळ येऊ देत नाहीत. ही आता डुकराची सार पाण्यावरुन आली आणि जांभळीखाली मुस्काटानं नांगरत किडामुंगी, मुळं खाऊ लागली. त्यांच्या आडोशानं या अडया राहिल्या. नाहीतर एव्हाना दुसरा काठ जवळ केलाच असता.

Whistling-teals.jpg

हा तुरेवाला सर्पगरुड. त्यातल्या त्यात सर्वात शांत. माणसाशी मैत्रीभाव याचाच जास्त. तसा फारसा नाही घाबरत माणसाला. निवांत बसून राहतो. हा अस्वलहि-यापाशी बसलेला सापडला. एकदा खाऊनपिऊन बसला सावलीला की सहसा उडून जाणार नाही.

9E3A4476.jpg

सुभग - Iora
मोहाड्या गरुड - Honey Buzzard
रातवा - Nightjar
पाणलावा - Snipe
शराटी - Ibis
अडया - Lesser whistling ducks
तुरेवाला सर्पगरुड - Crested serpent eagle

क्रमशः

:35

sarpagarud

कोणताही प्राणी-पक्षी-किडा पुन्हा पुन्हा दिसला तरी पुन्हा पुन्हा मोह होतो फोटोचा. अगदी या सर्पगरुडाचंही तेच. मीही तयार आणि तोही हौसेनं फोटो काढून घेतो. हेच बघा ना. मागच्या भागातला अस्वलहि-याचा गरुड जसा शांत होता, तितकाच, तसाच हा काटेझरीतला. पुन्हा दिसला, अशाच शांत मूडमध्ये. काही घाई नाही.

अशाच एका पावसाळी संध्याकाळी हवा पडलेली. घामाच्या धारा. उमरझरीला हे एवढा मोठ्ठा वाघ बसून. जुने लोक म्हणत ना, गाढवाएवढा वाघ, अगदी तसाच. रिमझिम टिपटीप सुरू झाली. तिकडून परत फिरलो तर समोरच धावड्याच्या फांदीवरून सर्पगरुडानं सूर मारला उजवीकडच्या जंगलात. काही तरी धरत होता. आम्ही थांबलो. पावसाचा जोर वाढू लागला. रस्त्यात पुढं काळीचा पट्टा होता. तिथून निघणार की नाही याच्या चिंतेबरोबरच शिकार पाहण्याचा मोहपण सुटेना. जमिनीपासून सहा फुटावर आडव्या फांदीवर तो सावजावर एक डोळा ठेवून होता. कॅमेरा आज नव्हताच. पाऊस वाढत होता. अखेरीस पाऊस वाढण्यापूर्वी निघावं लागलं. नंतर जे काही अंदाधुंद झोडपलं म्हणताय पावसानं, की ज्याचं नाव ते! रातोरात नद्यांना पूर आले. असो.

तर हा सर्पगरुड, एकदा जामणी चौकातल्या नाल्यात बसला होता. मी अर्ध्या तासानं तिथून परत गेलो तरी हा तिथंच. पण त्या दिवशीपण कॅमेराच नव्हता. नेमकं त्या दिवशी मला तिथंच ग्रिझल्ड स्कीपर दिसलं, अर्जुनाच्या खाली पडून सडत आलेल्या फळावर बसलं होतं. रपट्यावरच्या रानकुत्र्यांच्या लेंडकांवर टॉनी राजा आणि ब्लॅक राजा ही दोन्ही फुलपाखरं एकत्र.

सोनकुत्र्याचं टोळकं तिथून गेलं होतं. नाल्याच्या रपट्यावरची त्यांची लेंडकंच सांगत होती. ही कुत्री अख्ख्या रस्त्यानं लेंडकं टाकत जातात.
कुंभी बोडीच्या पुढं एकदा ही नऊ कुत्र्याची टोळी रस्त्यावर मिळाली.

9E3A5753.jpg

एकानं मागचे दोन पाय हवेत उचलून शीर्षासन केलं आणि खालच्या दगडावर मुत्राचे थेंब उडवले. हा त्यांचा अजब कार्यक्रम असतो. अजून एकानं रस्त्यावर मागचे पाय वाकवून शरीरधर्म आटोपला. तोवर दुसरा आला. पहिल्याच्या विष्ठेचा वास घेतला. त्यानं उत्तेजित होऊन की काय, पण चार-आठ पावलं चालून त्यानंही दोन लेंडकं टाकली. मग तिसरा. हे चालूच. ही टोळी पुढं बरीच चालत गेली. चालत कुठली? कुत्रा चालताना कधी दिसत नाही, तो असा टुकूटुकू पळतच असतो.

मग खातोड्याच्या अलीकडं नेहमीप्रमाणेच झाडो-यात चितळं होती. तिथं हे टोळकं पसरलं. चितळाला तपास नाही रस्त्याला काय चाललंय त्याचा. पसरून काही व्यूह रचून मग हे टोळकं आपआपल्या जागा धरून आत आत जात राहिलं. पुढं आता काय घडलं हे त्या रानानंच बघितलं.

ही कुत्री जरी क्रूर आणि धाडशी मानली गेली असली तरी आक्रमक नसावीत असं दिसतं. कधी म्हणता कधी धावली नाहीत माणसावर. तशी मला मजेशीर वाटतात.

पेंचला सलाम्याजवळ दिसायची. एकदा वेणूबनाकडं गवतात चितळं होती. सलाम्याच्या पुलावर कुत्रे. यांना चितळं दिसेनात. मग जागेवरच उड्या मारायचे चितळं पाहायला. मग रस्ता सोडून उतरले.

_MG_0390.JPG

एकेकानं आपली जागा धरली आणि वेणूबनाच्या आडोशाची चितळं उधळली.

_MG_0603a.jpg

मी पुढं जाऊन आलो. तोवर वेणूबनातून यांनी एक चितळ हाकून एकटं पाडलं आणि त्याचा ताण काढला. पुलापाशीच त्याला धरून तोडलं. वरुन भुरुभुरु पाऊस.
_MG_0400.JPG

मी पोहोचेस्तोवर शेलका माल संपून कुत्री हाडातोडांना झोंबली होती.

_MG_0418.JPG

तर ताडोबातल्या त्या जामणी चौकाजवळच्या नाल्याच्या रपट्यावर या कुत्र्यांच्या विष्ठेवर टॉनी राजा आणि ब्लॅक राजा ही दोन्ही फुलपाखरं एकत्र. खरं तर ही निव्वळ त्या कुळात जन्मली म्हणून यांना ‘फुल’पाखरं म्हणायचं, नाहीतर मी यांना कायम बघत आलो वाघा-सोनकुत्र्याच्या विष्ठेवर, उदा-सारईच्या लांबोडया लेंड्यांवर. देवा रे देवा! अन नावं पण काय दिली आहेत तर ‘राजा’. कॅमेरा हाती नसल्यानं नुसता बघत बसलो. अर्थात मला ते ग्रिझल्ड स्कीपर नंतर मिळालं पांगडी रस्त्याला. तेही नाट्यमयच झालं.

मला हे स्कीपर दिसलं, उन्हाला बसलेलं. पण फोटो काढू गेलं की भुरुभुरु उडायचं. आणि मी मागं एकदा टाकलेला ‘फारसे न पाहिलेले शिकारी’ हा लेख वाचला असेल तर आठवून बघाल. कसं फुलपाखराला रॉबरं फ्लायनं हवेतच उचलून खाल्लं. तेच इथं पुन्हा घडलं. हे स्कीपर भुरभुरत पळालं आणि एका तुटक्या फांदाडाच्या वाळलेल्या पानाच्या दाटीमागून एक चतुर निघाला. भिर्रर्रर्र............... अन हे माझं लाडकं स्कीपर त्यानं धरून नेलं. मी त्याला हर्रर्र, होहोहो करूस्तोवर सफाईनं धारदार जबड्यानं स्कीपरचं मुंडकं चावून-चापलून त्याला तसंच पानावर सोडून चतुर पळून गेला.
9E3A5143.jpg

त्याच्या आयुष्यात कदाचित इतकेच दिवस लिहिलेले होते.

तो टॉनी राजासुद्धा याआधी लख्ख दिसला तो पेंचमध्ये सुरेवानीला. त्यानंतर तो पुन्हा असा जवळून म्हणाल तर पेंचमध्येच रेताडघाटला दिसला. वाघिणीच्या ताज्या विष्ठेवर होता.

रेताडघाटला वाघिणीचे ताजे पंजे. तिथंच उकेर आणि विष्ठा. त्यावर तो टॉनी राजा. हे पाहतानाच मला ते हे पण दिसलं. काय त्याचं नाव बघा.....

अशा टोकं चिकटलेल्या पाकळ्या. लांबट फूल, धोत-याच्या कळीसारखं पण लाल-तपकिरी.........

..............................

अंधार, अंधार............................

हां, आठवलं. कंदीलपुष्प. सेरोपेजिया. असं काही पटकन सांगू म्हटलं ना, की आठवतच नाही. हे असं नॉर्मल आहे का? जाऊ द्या. फूल बघा ते.

_MG_0897.JPG

फारसं न दिसणारं आहे हे. दुर्मिळ म्हणू शकतो. इथंच पहाल. याच्या अनेक प्रजाती आहेत. तुम्हालाही दिसलं कुठं तर त्याच्या नादी लागायला हरकत नाही बरं! एखादी नवीनच जात तुम्हाला सापडलेली असू शकते.

मी तर जरा काही वेगळे असे किडे, पाली, फुलं असं काही सोडत नाही. नवीनच जातीचा शोध लागलाच तर काय? मी त्यासाठी नावं पण शोधून ठेवली आहेत. बस आता फक्त असं काही सापडायचाच अवकाश. पण असं काही सापडतच नाहीये ही एक किरकोळ अशी अडचण आहे. मुळात स्वभाव शोधक असल्यामुळं मी या अडचणीवरही संशोधन केलं आहे. की बुवा असं का? आणि अचंबित करणारे निष्कर्ष हाती लागले. या सगळ्याच्या मागं फार मोठ्या परकीय शक्तीचा हात आहे. हो खर्रंर्रंय बर्का!!! इंग्लंड म्हणू नका, जर्मनी म्हणू नका, फ्रांस म्हणू नका. सगळे गोरे संशोधक आपल्या विरोधात ठाकलेत. सांगू नका कोणाला, पण या गो-या लोकांनी पद्धतशीर आपली नाकाबंदी केलेली आहे. मजबूतच. अहो कोणताही पक्षी घ्या, किडा घ्या, पाल घ्या, फुलपाखरू घ्या; या बेट्यांनी सा-यांचा शोध आधीच लावून ठेवलाय.

बघा म्हणजे, आपलं गाव कुठं? आपण चाललो कुठं? काही आहे की नाही? मस्त आपल्या गावात थंडगार हवेत शेकोटी पेटवून शेकत-शेकत चहा किंवा वारुणीचे घोट घेत बसावं सुखासुखी. तर ते नाही. खुशाल आठ-आठ, दहा-दहा हजार किलोमीटर लांब इकडं उन्हा-तान्हात करपून काळे झाले तरी आपली इकडची रानं फिरून यच्चयावत जाती शोधून टाकल्या. हा काय न्याय झाला? आम्ही आता काय शोधणार? एवढं होऊन यावर मोर्चासुद्धा कोणी काढत नाही???

असो. अपनाभी दिन आयेगा.

बाकी टॉनी राजाचा सुरेख असा हा फोटो म्हणाल तर जामुनझो-याजवळ ताडोबात मिळाला.

9E3A4722.jpg

असाच ताडोबात नेहमी दिसणारा मत्स्यगरुडपण पेंचला तोतलाडोहमध्ये इनटेकला दिसला. मी मागच्या भागात सांगायचंच विसरलो खरं. एकदा पेंचमध्ये इनटेकला उभा होतो.

या इनटेकच्या ना, भारीभन्नाट आठवणी आहेत.
इनटेकच कशाला? थेट पुढं मॅगझीन नाला, राज्यपाल रोड, तुमडीमट्टा, बोदलझिरा, पिवरथडी काय नं काय. लिहितो म्हटलं तर लांबत जातील. जाऊ द्या. आता निघालाच विषय तर सांगतो इनटेकच्या दोन.

पहिली आठवण म्हणजे एकदम सुरूवातीला आपण तो मत्स्यगरुड पाहिला होता ना, तो मी पेंचमध्ये दोन-चार वेळा छान बघितला, पण फोटो काढायला वेळच नव्हता. तर एकदा असाच इनटेकला उभा होतो. झप-झप-झप हा आला की; मत्स्यगरुड. आणि बसला समोर. बघा म्हणजे, ध्यानीमनी काही नाही हां. मी म्हटलं हे काय आलं बुवा. बघतो तर हा. पळत गाडीकडे आलो कॅमेरा काढला. लेन्स-बिन्स जोडली. पुन्हा तिकडं गेलो. हा बसूनच की. आता अशा वेळी काय आनंद होतो काय सांगू? मी मस्त आरामात त्याचे हर पोझमध्ये फोटो घेत राहिलो अन तो देत राहिला. पन्नासेक असतील. हा थोडा हावरटपणा आहे खरा. पण काय करता आता? काढलेले फोटो बघण्यापेक्षा फोटो काढणं हीच एक नशा असते. हा त्यातलाच एक.
_MG_0590_0.jpg

 

एकदा अशीच मजा. पेंचमध्ये सलामा-भिवसनच्या मध्ये जाता जाता मला दिसला ब्लॅक राजा. म्हणजे फुलपाखरू आहे हे. फर्र करून उडून गेलं. पण ते येणार हे नक्की. कारण वाघाच्या पहाटेच्याच विष्ठेवर ते बसलं होतं. मी तिथंच थांबलो.

तोवर भिवसनकडून गाडी आली. “वाघीन हाये वाघीन. ती नाय का तर बसूनसनी हाय. तीन बच्चे घेऊन. बिलकूल रोडावर.”

“खरं म्हणता काय? बरं जातोच.”

जायचं होतं, पण जीव राजात गुंतलेला. त्याची आशा सुटेना. तो आला. कुठून तरी अज्ञातातून आल्यासारखा अवतरला आणि असा डाव्या हाताला वर एका पद्धतशीर पानावर बसला. घ्या आता. थांबू की जाऊ? थांबू की जाऊ? थांबू की जाऊ? थांबूच म्हटलं शेवटी. तो उतरणारच.

होता करता अजून एक गाडी आली. “दीड घंटा झाला, वाघीण रोड सोडत नाय. आन बच्चे तीन. खेळतेत. रोडा-रोडानीच बिलकूल. पावरझोडीच्या पहिले मोड हाये नाय का जी; बास, थितंच.”

गाडी गेली आणि राजा उतरला. पुन्हा वाघाच्या विष्ठेवर स्थिरावला. सकाळच्या उन्हात सुंदरच दिसत होता. काय सांगू? एक मिनीट. शोधून टाकतोच इथं. हे घ्या.

_MG_1110.jpg

या राजानं तासभर खाल्ला. पुढं जायचं होतं भिवसनकडूनच. जाईस्तोवर ऊन तापलं. वाघीण काय अशा उन्हाला बसून राहील होय बच्चे घेऊन? नावच काढू नका. ती उठून कुटूंब-कबिला घेऊन पोहोचली असणार पाण्याला मॅगझीन नाल्यात म्हणा किंवा अजून कुठं.

पण खरं तर आपण इनटेकपासून सुरू केलं होतं ना! या इनटेकची दुसरी आठवण सांगतो आता. ही ब्लॅक राजाची आठवण अशीच उडत-उडत मध्येच घुसली. ती काही इनटेकची नव्हे. इनटेक राहिलं तिकडंच आणि आपण आलो सलाम्याकडं.

तर इनटेकचं काय झालं एकदा, एकाने इनटेकला गाडी उभी केली अन् कट्ट्यावर बसला गडी. रस्त्याकडेच्या गवतानं चरत चरत आलेली सांबरं एकदम ओरडून सैराट धावली. हा वळून बघतो तर मागून वाघोबा. मग हा फटकन उठून गाडीत घुसला. वाघाला काय घेणं ना देणं याच्याशी. वाघ त्याच्याच तंद्रीत काही जुगाड जमवायच्या नादात होता. तो याच्या गाडीपुढून सरळ पाय-या चढत वरच्या विश्रामगृहाच्या अंगणात निघाला आणि पुढं चालता झाला.

हा जरा छपरीच होता वाघ. काय काय गमती याच्या. तसा दोन-तीनदा याला पाहिला, पण कॅमेरा नसताना. पेंचला इनटेकला गेलात तर तिथं देवमन भेटेल. देवमनला विचारा, तो कसा उभा होता खाली आणि वरुन पाय-यांनी हा बदमाश वाघोबा उतरला. देवमन जाईल कुठं? एकुलत्या वाटेनं वाघ उतरून आल्यावर? त्यानं मागचा-पुढचा विचाऱ न करता क्षणात आहे तशी तोतलाडोहात १०० फुट खोल पाण्यात उडी मारली. वाघ जाईपर्यंत तो पाण्यातच राहिला. आता हा वाघ खोडसाळ म्हणून गंमत करून पळाला. खरं त्याला देवमन पाहिजे म्हणून उतरला असता तर? वाघ पट्टीचे पोहतात. मागच्या भागात मी लिहिलं आहे. कसा वाघानं पाण्यात पाठलाग केला आणि माकडाची शिकार केली.

आणि तोतलाडोहात तशा मगरी नाहीत. इनटेकच्या खोल पाण्यात तर नाहीतच. मॅगझीन नाल्यात एक दिसत होती अलीकडच्या काळात. तुमडीमट्ट्यावरून कधी उन्हाला पडलेली दिसे. बाकी अवजड मगरी म्हणाल तर सा-या धरणाच्या खाली. मग सहसा रस्त्यावरून दिसणार नाही अशा ठिकाणी खाली कुसुमखडकला या बिलामती झोपून राहायच्या. तोंडं सताड उघडून. कुसुमखडकला वळायच्या आधी झाडो-यातून एक सापट होती. अगदी तिथून पाहिलं की ही काळी धुडं दिसत नेमकी. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांना कोणी पहात आहे. पण पुढं कुसुमखडकपाशी पोहोचून पाहायचं म्हटलं तर तेवढा कौशल्यविकास झालेल्या माणसाचंच काम ते. इथून कसं एकदम असं चुपचाप पाहायचं. स्लो मोशनमध्ये पाहायचं. अडम-धडम जाल तर या मगरी काही थांबत नाहीत. जर्रा काही जोरात हालचाल जाणवली की पाण्यात सूर. हे बघा असं.

Croc-in-pench.jpg

असू द्या. आपण कुठून कुठं निघालो? इनटेकला पाहिलेल्या मत्स्यगरुडाची आठवण मला झाली होती आणि आलो कुठं!
डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.

तर आपण ताडोबा तळ्याकडं होतो ना? सर्पगरुड पहात. इथून आता एकतर पांढरपौनी, येनबोडी करत जामणीकडं निघायचं.
या पांढरपौनी, येनबोडीला वाघ बसतो उन्हाचा. पांढरपौनीला तर सारे पर्यटक वाघाच्या नादाने गाड्या लावून वाट बघतात. पलिकडून गवतात वाघाची झोपायची जागा. शिकाऱ खाऊन पाणी प्यायचं आणि तंगड्या ताणून गवतात पडी मारली की मारली. नादावलेले पर्यटक इकडं घामाघूम. मध्येच एखाद्या वेळाने मग तो लमडीचा वाघ डोकं उचलून जागेवरूनच अदमास घेतो, हे गाड्यावाले गेले की आहेत?

एकदा तिकडं जाता-जाता म्हणून गेलो अन् वानराच्या मोहात पडलो. काही म्हणा पण प्रेमात पडावं तर माकडाच्या, वांद्राच्या. काय काय आणि कसे कसे खेळ शोधून काढतात!

मारुती चितमपल्ली साहेबांच्या एखाद्या पुस्तकात वाचलं असेल की माकडं डोळ्याने चेंडू खेळतात. म्हणजे अशी गंमत, की दोन जण आमोरा-समोर बसतात. एकानं भुवईनं टुईंग करून काल्पनिक चेंडू उडवायचा, तो दुस-यानं भुवयांनी टॉईंग करून परतवायचा. अर्थात वांद्रं काय चेंडू-बिंडू मानून खेळत नसतील. हा आपला कल्पनाविलास झाला. पण खाणं-पिणं उरकलं की कधी कधी ती असा चाळा करतात हे मात्र खरं. मी स्वत: पाहिलं आहे.

शिवाय एका फांदीवर नाहीतर दगडावर बसून शेपट्या ओढून एकमेकांना पाडायचं आणि त्याच्या जागेवर आपण बसायचा खो-खो खेळायचा. वांद्रं मोठी गमतीची. यांचे खेळ पहावेत, नजरेचे चाळे पहावेत. वेळ कुठं जातो काही समजत नाही.

रस्त्याच्या या बाजूला मोहाचा वृक्ष. वानरांचा फिरस्ता कळप तिथं पोहोचला. मोहाच्या टोळ्या; फळं, खाली पडली होती. ओलीनं त्याला कोंब फुटले. पेरभर मूळ मातीत घुसलं. नखभर पानाची जोडी बी फाकलून बाहेर येऊ बघत होती. तुम्हाला माहितीये बहिणाबाईंनी काय सुरेख सांगितलंय या पानांचं रहस्य?

ऊन वा-याशीं खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी

बहिणाबाई एक अद्भुत व्यक्तिमत्व.

तर मी काय पाहिलं त्या दिवशी की वांद्रं एकेक बी उचलून मोठ्या चवीनं खात होती.

Langur.jpg

अगदी गोव्याच्या रानात फिरताना जमिनीतून काढून खाल्लेल्या अशा काजू बियांचीच आठवण झाली. मध्येच या माकडीणीला वाटलं असेल, ‘आता गं बाई! काय सारखी ती फुकणी आमच्याकडं करुन बघतो रे? जेऊ दे की गप.’

langur2.jpg

या पांढरपौनी, येनबोडीसारखंच जामणीत पक्कं पाणी. पाणी आणि गवत म्हटलं की जनावरं रमतात. सांबरं गळा-पोट पाण्यात उतरतात.

_MG_3836.jpg

पाण्याखाली मुंडकं घालून त्यात उगवलेलं लुसलुशीत गवत मोठ्या मजेने खातात. कधी-कधी एखादा गवाही असं करताना दिसतो खरा, पण ही गव्याची अस्सल सवय नाही. ताडोबा तळ्यात एकदा असं रमलेलं सांबर उभ्या-उभ्याच मगरींनी फाडून खाल्लं.

मगर आणि कोळसुंदे यांना कधी शिकार करताना नाजूक मनाच्या माणसानं पाहू नये. मगरीची जी काही धांदल होते ती पाण्यात. पण कोळसुंदे म्हणजे रानकुत्रे पळत्या जनावराला झोंबतात, फाडत राहतात. जनावर पळत राहतं, कुत्रे खात राहतात. रक्ताळलेलं जनावर मग कुठंतरी पडतं. तसं पडून डोकं उचलून बघत राहतं आणि कुत्रे त्याच्या देखता डोळा त्याला तोडतात, खात राहतात. असो.

तर त्या जामणीत अशी सांबरं, तरी पाच-दहा असतीलच; गवत खात होती. खाता-खाता-खाता एकदम दचकली. भैताड असलं तरी त्या जनावराला समजलं की ही रणभूमी आपली नाही. मगर असो की वाघ, या पाण्यात आपलं जे शस्त्र, वेगवान धाव; हे चालणार नाही. म्हणून आधी त्यांनी पळायला सुरुवात केली आणि जमिनीवर उभे राहिले, तेंव्हाच वळून पाहिलं.

9E3A5130.jpg

या जामणीच्या मैदानात मी नाही म्हटलं तरी दोनेक हज्जार चितळं एका वेळी पाहिलीत. कितीतरी गवे, सांबरं इथं असतातच. एकदा खातोड्याहून येताना चितळाचा कळप होता, कोसेकनार रस्त्याला. बरं, जाता जाता एक; या रस्त्याला एक चट्टेरी घुबड असतं बरं का! म्हणजे Mottled Wood Owl.
असू द्या.

तर असा त्या जामणीत चितळांचा कळप, कोसेकनार रस्त्याला. आपण तिथं अशा वेळी गेलं की ही चितळं अगदी हमखास जामणी तळ्याकडून आपल्याला आडवी होऊन रानात पळतात. असा जवळपास साराच कळप गेला, एक चितळ मानेला झटके देत काही खात होतं. जवळ गेलो तरी त्याला ते जे काय खात होतं त्याची लालूच सुटेना. बरं तर बरं मी होतो म्हणून. ‘आला जर वाघ म्हणजे तुला काय भावात पडंल रे हा मोह?’ बहुधा माझं स्वगत त्यानं मनावर घेतलं आणि तोंडातला जो काय मुद्देमाल असेल, तो टाकून धूम पळाला गडी. मी पाहिलं, अशी काय चीज आहे ही? ते होतं चितळाचं गळून पडलेलं शिंग. चावून चघळून वीतभर राहिलं असेल आता.

असं दिसूनही जातं कधी, ही हरणं गळून पडलेली शिंगं चघळतात. थोडं विस्तारानं सांगतो. काय आहे की आपण सा-याला नुसतीच हरणं-बिरणं म्हणतो.

चितळ काय? हरीण.
सांबर काय? हरीण.
नीलगाय काय? हरीण.
चौशिंगा काय? हरीण.

तर असं आपण गवत खाणारं, लाल रंगाचं, चार पायावर जे येईल त्याचं मुटकुळं हरणात टाकतो. काय वाट्टेल ते आलं तरी हरणाची रेष काही ओलांडत नाही. पण हरणाचे प्रकार दोन; सारंग आणि कुरंग. ज्या हरणाची शिंगं दरवर्षी गळून पडतात आणि नवीन येतात ते सारंग. ज्यांची शिंगं आयुष्यभर गळत नाहीत ते झाले कुरंग.

म्हणजे काळवीट, नीलगाय, चौशिंगा हे झाले कुरंग; antelopes. कुरंगाची शिंगं म्हणजे कायमची. फेव्हिकॉल का मजबूत जोड. यांच्या शिंगांना फाटे-फुटे काही नसतात.

सांबर, चितळ, भेडकी हे झाले सारंग; deers. या सारंगांना मग शिंगं येतात. त्यावर रेशमी मलमली आवरण असतं. अगदी हात लावून पहावा असं.

म्हणजे हे बघा असं.
9E3A5175.jpg

म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो बघा, ते किवी म्हणून फळ येतं ना आजकाल? ते पाहिलं की मला हरणाची मलमली शिंगं आठवतात.

शिंगांची वाढ पूर्ण झाली की त्यांना अज्ञात कॉल येतो, ‘झालं बे, घास की आता!’ अशी हरणं मग शिंगं झाडाच्या खोडावर घासतात. वरची मलमल घासून काढतात. खाऊन टाकतात. हो, एवढी प्रथिनं काय वाया घालवणार उगाचच्या उगाच? शिंगं मग उजळतात, टोकदार होतात.

आपल्याला डौल वाटतो, पण मोठा नर असला ना सांबरा-बिंबराचा, तर ८-१० किलोचं एक शिंग असतं. हे ओझं कशाला तर म्हणे स्वयंवरासाठी. मग असा मजबूत धिप्पाड नर असा शिंगांचा डोलारा घेऊन माद्यांना इम्प्रेस करत फिरतो. अशा वेळी बाकी नवतरुण कुठं काही आपलंही सूत जमतंय का पाहतात. पण हे त्या जुनाट नरानं जर पाहिलं तर काही धडगत नाही. तुफान हाणामारी होते मग आणि हारलेला नर जीव वाचवून बुंगाट पळतो; पुढच्या वर्षीची संधी घ्यायला. एक चितळ मी बघितलं होतं असं. मारामारी करायला गेलं आणि समोरच्यानं खच्च्याक करून वीतभर शिंग त्याच्या मानेत खांद्याशी खुपसून मोडलं. त्याचं शिंग मोडलं, पण याची हौसच मोडली. मग धूम-तकाट पळाला हा. मानेत मोडलेलं शिंग तसंच.

असा नवख्याला सूत न जुळवू देणारा हा थोराड विजेता नर मग अख्ख्या कळपात सूतंच सूतं करून टाकतो. सा-या हरिणी भरतो आणि स्वत:चाच वंश टिकेल असं पाहतो. हे महत्वाचं काम झालं, की शिंगं गळतात आणि नर बोडका होतो. किस्सा खतम.

पण पुढच्या वर्षी परत हे १० न् १० म्हणजे २० किलो डोक्यावर उगवायचे म्हणजे गंमत नाही राव! हे कॅल्शियम येणार कुठून इतकं? मग कॅल्शियम भरपूर असणा-या कुरणात चरणं, सापडलेली शिंगं चघळणं असे कॅल्सीरिच उपाय सुरू होतात. तेंव्हा कुठं शिंगं आणि तेंव्हा कुठं सुतावर सूतं. असं हे आहे बघा.

सारई असते ना सारई, म्हणजे आपलं साळींदर. त्यालाही अंगभर काटे यायला हवे असतात. कधी एखादा वाघ नादावतो याच्या मांसाला, कधी बिबटाला हाव सुटते. मग मेहनतीनं उगवलेले आणि काळजीनं सांभाळलेले काटे खर्ची घालावे लागतात. गंमत वाटते खरी पण या साळूच्या काट्यानं फट् म्हणता वाघ मेलेत. कधी कधी हे काटे अंगात घुसून वाकतात आणि निघत नाहीत. जखमा सडतात. जनावर चिडचिडं होतं, त्रासतं. तर असे हे काटे गेले तर साळींदराला ते परत यायला हवे असतात. लवकर यायला हवे असतात म्हणजे Z डिग्री प्रोटेक्शन चालूच राहतं. मग ही साळू अशी रात्री मुळं-फळं धुंडाळत निघाली की हरणाची शिंगंपण शोधते. चघळते.

गंमत अशी की माणसांनाही ही शिंगं हवी असतात. काही तरी शोभेच्या वस्तू-बिस्तू, औषधं बनतात. कफासाठी आयुर्वेदात मृगशृंग भस्म वापरतात ते याचंच. पण अशी शिंगं जवळ बाळगणं गुन्हा आहे. आपल्याकडं सापडलं तर कायद्याचा भुंगा लागतोच आपल्या मागं.

तर मी सांगत होतो जामणीपासून पुढं कसं-कसं, काय-काय. डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.

कोसेकनार रस्ता धरून मग खातोड्यातच निघता येतं. नाहीतर मगर टाक्याकडून चितळ रोड पकडा किंवा जामुनबोडीच्या पठारावरून खाली उतरा, विशेष फरक नाही. मी ब-याचदा जामुनबोडीवरून जातो बहुधा. एक छोटासा तुकडा आहे हा, पण मला भारी फील येतो इथं. तो प्रत्येकालाच येईल असं नाही. मला येतो. गवत हिरवं असताना सांबराचे भारीभन्नाट फोटो कुठं मिळत असतील तर ते इथंच.

9E3A8591b.jpg

अर्थात असं मी म्हणतो. तुम्हाला पटलंच पाहिजे असं काही नाही बरं का? अंदाज अपना अपना.

9E3A8567a.jpg

खरं सांगू काय? रानात कुठंही असो. छान वाटत नाही असं काही नसतं. अहो आपल्या घरच्या झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या गच्चीत किंवा समोर हिरवी टेकडी दिसणा-या खिडकीतसुद्धा मन किती प्रसन्न होऊन जातं?

_MG_3390b.jpg

समजा इकडं नको तर मग पंचधारेतून निघा आपलं सरळ सरळ आणि रेंज ऑफिसपासून सरळ परतीचा रस्ता. या पंचधारेत मी पाहिला होता पहिल्यांदा टी-५४. हे असा मजबूत बॉडीबिल्डर. आता फोटो म्हणाल तर नाही. त्या दिवशी कॅमेराच नव्हता. जामणीकडून पंचधारेकडं येता येता, मगर टाक्याच्या आधी उजव्या हाताच्या नाल्यातून एकदमच हा निघाला. थोडी हालचाल दिसली म्हणून पाहिलं तर टी-५४. हे वाघ ना, खरं म्हणजे खरं भीक घालत नाहीत. त्यानं कौतुक सोडा हो, किमान नैसर्गिक उत्सुकता म्हणून तरी पाहायला हवं ना, की बाबा कोण हा? काय करतोय? बरा आहे का? काही भानगड करतोय का माझ्यासोबत? काय नाय. सरळ आपला चाल्ला. बैलाच्या शिंगावर माशी बसली म्हणून बैलाला काय फरक पडतो? त्याच्या चेह-यावर काय वेगळ्या भावना येतात? काय नाय. तस्साच हा. चाल्ला. लय इन्सल्ट केला राव. बघू पण नाही त्यानं? माणूसकी तर संपलीच म्हणतात, पण आता जनावरकी पण नाय राहिली जगात. बरं आता हे असं एकदा घडलं म्हणून नाही हो!

बघा आता या गेल्या काल-परवाच्या हिवाळ्यात काय झालं, एक ब्लॅक रेडस्टार्ट बसला होता. मराठी नाव लय भारी शोधून ठेवलं आहे ‘कृष्ण थिरथिरा’. याच्या जवळ गेलं की हा उडून पुढं जाणार, पुन्हा जवळ गेलं की उडून पुढं जाणार. असं घुमवत घुमवत नेलं त्यानं. याच्या जवळ जायचं म्हणजे धीराचं काम. मी एक गाणं पण लिहिलं याच्यावर –

थिरथिरा, कृष्ण थिरथिरा
थांबा, धीर जरा धरा
जवळ जरा येऊद्या
मग फोटो निघतो बरा
बोलो ताराराऽऽ, बोलो तारारा ऽऽ

अजून गाणी लिहिणारच होतो. कौतुकानं आमच्या 'हिला' पण ऐकवलं. पण वेगळाच इफेक्ट झाला राव. तर असं गाणं ऐकवल्यावर ते अ‍ॅटॉमिक रिअ‍ॅक्शन की काय ते असं म्हणतात ते झालं बहुतेक आणि मला बायकोनं प्रेमानं जवळ बसवून सांगितलं की, “बघ बाबा रे, तू काही माझा असा जवळचा किंवा खास असा शत्रू नाहीस. पण हे असलं हे, हे लिहून ऐकणा-याचे केस उभे करण्यापेक्षा लॉकडाऊन आहे, रविवारी रिकामा असतोस तर घरी भांडी-बिंडी घास की. उठ”

काऽऽही कदर नाही हो, काऽऽही कदर नाही!

मी तसा शीघ्र कवि, पण रसिकांचा तुटवडा आहे; करता काय? असू द्या आता. भांडी घासण्यापेक्षा काही नं लिहिता गप कोप-यात बसणं आरोग्याला हितकारक आहे अशा एकंदरीत निष्कर्षाला मी पोहोचलो. एक गाणं लिहिण्यापेक्षा दहा पानं लिहावीत. शिवाय त्यामुळं आपला नवरा भलताच हुशार आहे, एकटाकी लिहितो असा बायकोचा समज होतो. ती तशा कृपादृष्टीने माझ्याकडे पाहते. घटिका भरली असली तर हातात भरल्या चहाचा कप देते. मग मी हळूच बघतो, माझ्याही डोक्यावर सांबराची शिंगं उगवलीत की काय?

अरे, अरे अरे! कुठून कुठं पार गेलो मी?

तर मी त्या याच्या मागं, म्हणजे आपल्या त्या ब्लॅक रेडस्टार्टच्या मागं होतो. मग तो एका उघड्या-वाघड्या फांदीवर टुलू-टुलू झोके घेत बसला.

Redstart.jpg

मी त्याच्यावरचा डोळा न हलवता तिथं पोहोचलो. हे भलं डोक्याच्या वर गवत!!! झाडू गवत, मारवेल, वाळा. मी आता तिथं पोहोचलो. त्याला झोके घेण्यातली गंमत समजली असणार. यावेळी तो उडाला नाही; पण मीच उडालो. आता म्हणा का? तर झाली गंमत अशी की, हा गडी डाव्या हाताच्या बोरीवर झोका खेळतोय. मी पाहतोय हे असा. आणि गवताचा पट्टा संपला तिथं गाडी आल्यावर एकदम लक्षात आलं राव, उजव्या हाताला पिवळंधम्मक जनावर लोळलंय उन्हाला.

Tiger--1.jpg

मला तसे फारसे वाघ दिसत नाहीत. म्हणजे मी मागं लागत नाही म्हणून असेल कदाचित. पण जसं काहीच लोकांना भुतं दिसतात, काही लोकांना नाही. त्याचं काहीतरी गणाशी असतं म्हणतात. राक्षसगण, देवगण, मनुष्यगण. तसं वाघ हमखास दिसणा-या, कधी-कधी दिसणा-या आणि न दिसणा-या लोकांच्या गणाचा अभ्यास केला पाहिजे. आता मी मधल्या गटात समजा. माझा कोणता गण माहीत नाही. पण घाई-गडबडीनं १-२ च फोटो घेतल्यावर त्या वाघोबानं मात्र अशी अतिसुंदर पोझ तोडली आणि उठून माझ्याकडं शेपटी करून आपलं दुंगण दाखवत झोपला. माझा गण कळाला नाही, पण त्याचा गण दिसला. कर्म माझं.

असे हे वाघ. जाऊ द्या. माझं त्याला कौतुक नाही, त्याचं मी कशाला करू? आपण काय नुसते वाघ पहायला आलो नाही. जे दिसलं ते आपलं. नाही का?

बरं मी काय म्हणत होतो? या मगर टाक्याची भानगड माहिताय का? टी-१२ आहे ना ताडोब्याची? पांढरपौनीत फिरते. पहिलटकरीण होती. या मगर टाक्यातच बच्चे दिले होते. यांना १-२ वेतानंतरच ‘आई’ची कर्तव्य आणि जबाबदा-या कळतात.

या टाक्याच्या नावाची गंमत म्हणजे सुरूवातीला ताडोबा मगर प्रजनन केंद्र होतं. त्यावेळी मगरींची पिल्लं आणून या टाक्यांत ठेवत होते. आता मगर प्रजनन केंद्र बंद झालं कधीच. पण टाक्याची हौस भागली नाही आणि टी-१२ ला उल्हास फार. तिनंही म्हटलं असेल बघू तरी मगरीच्या माजघरात बाळं ठेवायची चैन करू या वर्षी.

 

 http://mr.upakram.org/node/2914

पेंच अभयारण्य आणि आसपास

अभयारण्यातील रस्ते हे दुहेरी कामे करतात. एक म्हणजे माणसांची जा ये. तर दुसरेही तितकेच महत्वाचे. ते म्हणजे आग पसरण्यास रोख. पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेले गवत कामगार साफ करताना दिसत होते. एका विशिष्ट रुंदीच्या पट्यात ज्वलनशील मिळता कामा नये यासाठी ही खबरदारी. (थोडे अवांतर: आग लागली की त्यातून ज्वलनशील वायु निघतात कार्बन मोनोऑक्साईड सारखे. प्राणवायुची कमी असल्याने आग असेल तिथे ते जळू शकत नाहीत. पण थोड्या दूरपर्यंत ते गेल्यास परत प्राणवायु मिळाल्याने पेटु शकतात. अशा रितीने आग काही अंतर उडी मारू शकते.)

कुठल्याच वाहनात, वा कामकर्‍यांकडे शस्त्रे नव्हती. कुणाला काही त्यामुळे अपाय झाला नसावा. जंगलाच्या सीमेवर कुठलेच नैसर्गिक वा मनुष्यनिर्मित कुंपण नव्हते. वाघ राखायचे म्हणजे हरणे राखायची. ती कमी पडली तर ना कामकर्‍यांची ना आसपासच्या खेड्यातील माणसांची खैर नाही. हरणांनी सर्वच गवत खाऊन टाकू नये म्हणून जंगलात विशेष खबरदारी घेतली होती. कित्येक चराऊ भागाला कुंपणे टाकून ती वेगळी ठेवली होती.

जंगलातील एकमेव पाळीव प्राणी म्हणजे हत्ती. आम्ही गेलो तेंव्हा सहा हत्ती होते. हत्ती जंगलात स्वत:चा मार्ग काढत (फांद्यांना तोडत) कुठूनही कुठेही जाऊ शकतो. त्याच्या पाठीवरचा माहुताने सांगितले. हत्ती साठाव्या वर्षी काबुत येतो. (तोस्तोवर तो आपल्या जवानीत धुंद असावा.) मोटारगाड्या जशा आपण पायाने चालवतो तसा हत्ती पायाने चालवला जातो. माहुताचे डावे उजवे पाय हत्तीच्या मस्तकावरील वेगवेगळ्या ठिकाणी आपटले की हत्ती त्याला हवे तसे करतो (डावे उजवे, खाली बसणे, सोंडेकडून काम करून घेणे.) हत्ती तसा माणसाच्या ताब्यात नेहमीच नसतो. रात्री त्याला बांधून वगैरे ठेवता येत नसावे. सहा हत्तींचा एक तळ होता. तिथे जंगलातल्या रपेटीची मधली सुटी होत असे. प्रसाधनांची सोय (खाद्य पदार्थ नाही) या तळावर होती. तळाच्या आसपास कित्येक वृक्ष पडलेले होते. तिकडे कळले की हत्तींचे हे रात्रीचे प्रताप.

जंगल बहुतांशी सागवानाच्या झाडांचे. त्यात काही झाडे पांढर्‍या खोडांची उठून दिसतात. जिकडे खडक तिकडे ही झाडे असे आमच्या गाईडने सांगितले. (अशीच झाडे मी मुरबाड/शहापूर आसपास पाहिली आहेत.)
या झाडाची साल गळून पडते मग ते पांढरे होते. खोडाचे रंग तीनदा बदलतात अशी त्याची माहिती. ही खोडे रात्री विशेष चमकतात (बहुतेक फॉस्फरसन्स असावे). तेंदू (विड्या वळताना लागतो तो.) काही प्रमाणात दिसतो.

पांढर्‍या खोडाच्या झाडाचे नाव घोस्ट ट्री.

jhaad" alt="">

खडकावर उगवलेले हे झाड. (अंगकोर मधील मंदीरावर असलेले विशालकाय झाड यावरून आठवले.)

khadaka vareel jhaad" alt="">

तेंदूला फळे लागली होती. (छायाचित्र घेतले पण फ्लिकरवर चढवले नाही.) तर सागाच्या पानांना (काही) जाळी लागली होती. एक मोडून पडलेले झाड वाटेवर आले.

jhaad modalela rasta" alt="">

वुडपेकर, आउलेट (लहान घुबड ?), दिसले. नीलकंठ पक्षी दिसला. प्रकाश फारसा सुखकर नसल्याने त्याचे पंख दिसले तसे आले नाहीत.

pakshi" alt="">

मोर खूप संख्येने होते. एका ठिकाणी त्यांची शाळा चालू असावी. (रांगेत बसलेले तिनही मोर झोपल्या सारखे वाटतात. )मोरांचा पिसारा पावसाळ्या पूर्वी झडतो.

teen mor" alt="">

bird3" alt="">

याशिवाय मोठ्या संख्येने पोपट, स्पॉटेड डोव, पॅराकीट (पोपटांची एक जात.) दिसले.

जंगल सोडताना परत कधी जावे. आणि पुढच्या वेळी हत्तीचे बुकिंग, थोडा उन्हाळा गाठणे असे मनात आले.

परतीच्या प्रवासात. रामटेक नावाचे तीर्थस्थान लागते. लहानपणी पाहुणे आले की त्यांच्या बरोबर रामटेकची सैर व्हायची. विदर्भ मुख्यत्वेकरून सपाट. उत्तरेकडे सातपुडा विंध्यच्या रांगा महाराष्ट्र मध्यप्रदेशाची सीमा दाखवतात. रामटेक ही सपाट भागातली एक उंच टेकडी. तिकडे जायला खूप पायर्‍या असत. जाताना वराहाची मूर्ती लागते. विष्णूचा हा तिसरा अवतार पण त्याची देवळे (मूर्त्या) फक्त मध्यभारतात आहेत. या वराहाच्या मूर्तीखालून जायचे असते. जो गेला तो पुण्यवान जो अडकला तो पापी असे तिकडे म्हटले जायचे. लहानपणी आम्ही लिलया त्याखालून जायचो. आता मोठेपणी जमते का ही मला उत्सुकता होती. दुसरे म्हणजे रामाची सेना रामटेकात मुक्त पणे वावरते. लोकांच्या हातातली खाद्य पदार्थ हिसकावून घेऊन जाण्यात ती तरबेज असतात. त्यांनाही पाहण्याची उत्सुकता होती. कालीदासाने इथेच बसून मेघदूत लिहिले असे म्हटले जाते. त्यासाठी सरकारने एक स्मारक केले आहे. हल्ली त्याशेजारीच भारत सरकारने 'संस्कृत विद्यापीठ' तिथे स्थापन केले. रामटेकला जायला आता पायर्‍या चढाव्या लागत नाहीत. नागपूरला पोचण्याआधी काही वेळ होता पण सगळे बघायला वेळ नव्हता. म्हणून मी वराहमूर्ती आणि वानरसेना पाहिली. इतर उत्साही राममंदीरावर चढून गेले. (हा भाग दुसर्‍या-तिसर्‍या शतकातला असे काहीसे तिथे लिहिले होते.)

वराहाची मूर्ती उघड्यावर आणि भली थोरली आहे. बहुतेकांना त्याखालून जाता येईल असे वाटले.

varah" alt="">

मी अजून काही पाप केले नाही हे मला कळून चुकले. कसे खालून जातात याचा हा एक नमूना.

varaha" alt="">

थोडीवर वानरसेना विहंगावलोकन करत होती. (रामटेकवरून खरेच दूरदूरचे दिसते.)

ramtek makade" alt="">

जाणार्‍या येणार्‍याचे पायधरून आजर्व केले जायचे.

ramtek makad " alt="">

इकडे एक गोष्ट घडली. (छायाचित्र घडायच्या आत.) एक माकडीण आजर्व करत होती. ज्याचे करत होती त्याने जवळच्या दुकानातून चण्याचे पाकीट आणवले. आजर्व करणार्‍या माकडाच्या हातात देताक्षणी वरच्या अंगाने एक हुप्या आला. ची ची करत तो ओरडला. या माकडिणीला ते पाकीट सोडावे लागले. तो पाकिट घेऊन निघून गेला. या माकडीणीला त्याचे वाईट वाटले. ती आपल्या गटात गेली. तिकडे तिचे तेवड्याच आकाराच्या दोन तरी माकडिणींनी सांत्वन केले. अगदी गळ्यात गळे घालून. एकमेकीच्या कानाशी लागून.

संध्याकाळी नागपूरात परत्लो. तिकडे दीक्षाभूमी, पाणीपुरी, हल्दिराम वगैरे करत लोकांनी स्टेशन गाठले तर मी घर.

प्रमोद

Comments

छान

तीनही भागांतील कथनशैली आवडली. फोटोही केवळ सौंदर्य म्हणून दिलेले नसून त्यांमागे कथा आहेत हेही विशेष आवडले.

रामटेक

आर्वाचिन कवि चित्त यांच्या "...पटा तो टेक" सहीत स्थान लाभलेले - रामटेक.





प्राचिन कवि कालिदासाचा उल्लेख मी केला नाही काय? ;)

 

अभयारण्य (प्राणी आणि जमीन)
अभयारण्यात जाण्यासाठी सकाळी ६ वाजता पोचावे लागते. आजकाल प्रकल्पाच्या संस्थळावर आरक्षण होते. हत्तीवरून जायचे असेल तर सकाळी पाचला जायचे असते. मात्र त्याचे आरक्षण आधी करावे लागते. (जे आम्हाला माहित नव्हते.) हवा चांगली असल्याने ६ ते ११ दरम्यान ऊन वा थंडी फारशी लागली नाही. जंगलात मारुती जिप्सी वाहनाने फिरता येते. ही गाडी उघड्या टपाची. एकामागोमाग वरवर जाणार्‍या आसनांची होती. एकंदर सहाजण दाटीवाटीने (३+३) बसू शकतात. शिवाय गाईड आणि ड्रायवर. पूर्वी पायी रपेटीची सोय होती पण ती आता काढून टाकली. मोबाईल वर लोक एकमेकाशी बोलत राहतात म्हणून त्यावर बंदी आली.

प्राणी. जंगलात १५-२० हजारात हरणे आहेत. त्यामुळे कंटाळा येईस्तोवर ती बघायला मिळतात. हरणांची शिंगे दरवर्षी (?) गळून पडतात. तशीच कातडीही (बहुदा फर.). या दिवसात हरणांची कातडी नवीन असल्याने मोहक दिसत होती.

harine" alt="">

harine" alt="">

इतर जातीची हरिणे दिसली पण छायाचित्र मनासारखे आले नाही. जंगलातली मांजर ही तशी पटकन न दिसणारी. ती दिसली. उंच गवताच्या मागे दबा धरून उडी मारताना दिसली. मांजर आपल्या घरगुती मांजरी पेक्षा थोडीशीच मोठी. पण तिच्या उडीने एक मोर बावरून उडाला. मांजर काही कॅमेरात आली नाही. पण तिच्या लीला मात्र चांगल्या पैकी दिसल्या. तरस (जॅकल) आम्हाला एकच दिसले. तर दुसरी कडे फिरणार्‍यांना एका वेळी सातच्या कंपूत दिसले.

taras" alt="">

एक रानडुक्कर दिसले. गवतात काहीतरी खाणे चालू होते.

raan dukkar" alt="">

एका झाडावर माकडे ऍक्शनमधे दिसली.

makade" alt="">

दूरवर काही रानटी कुत्री होती. ३०० एम् एम मधे अगदी ठिपक्यागत वाटणारी.

jangli kutri" alt="">

आमच्या बरोबर फिरणार्‍यांना आदल्या दिवशी एक बिबट्या दिसला होता. पण त्यादिवशी ना बिबट्या ना पट्टेवाला वाघ दिसला. सकाळी पाच वाजता हत्ती निघतात. ते वाघाने केलेल्या शिकारीची पाहणी करतात. जर का शिकार मिळाली तर त्याठिकाणी हत्तीवरून नेतात. वाघाचे निवासस्थान शिकारी जवळच असते. आम्ही गेलेल्या दिवशी बहुदा त्यांना काहीच मिळाले नाही. दोन दिवसांनी एक बातमी होती की एक वाघ मृतावस्थेत सापडला. (आम्ही गेलेल्या दिवशीच तो सापडला.) एका दोघा वाघांना रेडिओ कॉलरी घातल्या आहेत. पण त्याचा उपयोग नेहमीच केला जातो असे नाही. आमचा गाईड म्हणत होता की जंगलभक्षकांना (पोचर्स) देखील ते तंत्रज्ञान मिळाले आहे! आणि वाघ त्यांच्याच तावडीत सापडायचा. एक वाघ दोन तीन वाघीणींसोबत साधारण ५० - ६० चौरस कि.मि. चे क्षेत्र व्यापतो. तो सहसा आपल्या क्षेत्रात राहतो. पण त्याचा तसा काही नेम नाही. कान्हा नावाचे म.प्र.तील एक प्रसिद्ध जंगल ३०० कि मि. वर आहे. तिकडचा एक वाघ मजल दरमजल करत या जंगलात दाखल झाल्याचे कळले (ते रेडिओ कॉलरमुळे).

जंगलात दोन महत्वाचे तलाव आहेत. हा भाग पेंच नदीच्या धरणाच्या मागच्या भागात येतो (धरण अंदाजे २०-३० किमि दूर) . तेथील पाणी हळू हळू ओसरत जाते. मग ते जंगलाच्या बाहेर जाते. प्राण्यांची सोय म्हणून दोन तलाव तयार करण्यात आले आहेत. तलावाचे नवीन पण त्यातील झाडांवरून दिसून येते.

talao" alt="">

पूर्वी जंगलात शिरायला अनिर्बंध प्रवेश होता. आता एका वेळी ५० गाड्या ही मर्यादा ठेवण्यात आली आहे. बहुदा तुम्ही हिंडत असताना थांबलात तरी दुसरी वाहने दिसणार नाहीत. क्वचितच ती एकमेका समोरून जातात.
जंगलातली ही वाट.

jangalatil rasta" alt="">

पक्षी झाडे आणि परतीहा प्रवास तिसर्‍या भागात.

प्रमोद

Comments

छान

मस्त.

"तरस" म्हणजे "हाहा" करून भेसूर हसण्यासारखा आवाज करणारे जनावर असते ना - त्याच्या कुबड आलेल्या पाठीवर पांढरे ठिपके असतात ना? (इंग्रजीत हायीना Hyena.) तुमच्या चित्रात इंग्रजीतला "इंडियन जॅकल" आहे, खरा (कॅनिस आउरेअस). त्याचे मराठी नाव काही वेगळे आहे काय? बहुधा "कोल्हा" असेच असावे.
.
ज्याला इंग्रजीत "इंडियन फॉक्स" म्हणतात (व्हुल्पेस बेंगालेन्सिस्) त्याला बहुधा मराठीत "कोकड/खोंकड" म्हणतात, असे शब्दकोशात बघून वाटते.

गावाकडील जीवन

दोन्ही लेख खूप आवडले. बैल बांधलेल्या जवळच्या घराची भींत मातीच्या वीटांनी जरी केली असली तर वेगळी वाटली.
आकाश बहुधा ढ्गाळलेले असावे व त्यातच काही फोटो पुर्वेकडे तोंड काढून संध्याकाळी काढले असावे असे वाटते.
आपण कंट्रीसाइड फारतर आपल्या जुन्या गावातील किंवा जवळपासच्या एक्-दोन जिल्य्ह्यातील पाहीलेली असते आणि बाकी ठिकाणी आपण ब-याच्दा मोठ्या गावात कामानिमीत्त जातो. त्यामुळे एखाद्या नव्या भागातील गावाकडील जीवन खूपच नवे शिकवते-दाखवते.

छान

भटकंती आवडली.

आवडले.

दोन्ही लेख आवडले. छायाचित्रेही छान आहेत.
(माकडांना कुत्र्यांविषयीचे ज्ञान आहे तर!)

सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

आवडले

वर्णन आणि भटकंती आवडली.

वर धनंजयने म्हटल्याप्रमाणे फोटोतील प्राणी तरस नव्हे. तरसाचे मागचे पाय आखूड असतात त्यामुळे त्याला पोक असून तो खुरडत चालतो आहे असे वाटते. तरसाच्या ओरडण्याचा (अमानवी हास्य, हाहाहा असे मजेशीर हास्य नव्हे) आवाज मी ऐकला आहे. वरील प्राणी कोल्हा किंवा खोकड असावे.

ठिपक्यांची, शिंग आलेली हरणे चांगली दिसतात. आम्हीही भर रस्त्यांवर कंटाळा येईपर्यंत हरणं बघत असतो पण त्यांच्या अंगावर ना ठिपके ना शिंगं. लांबून हरण आहे की कुत्रा हे कळत नाही पण अमेरिकेत भटके कुत्रे विशेष नसतात तेव्हा हरणच असते.

प्रतिसाद

तो जॅकल म्हणजे कोल्हा आहे (मला तोंड थोडे वेगळे दिसले!). तरस नाही.

घराचे बांधकाम मातीत असावे असे वाटले. पण तो त्यासारखा दिसणारा एक दगड आहे असे मला जवळ गेल्यावर जाणवले.

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...