दिवाळी अंक २०२५ - रोमँटिक व्हेनिस - भटकंती
रोमँटिक व्हेनिस
व्हेनिस… या नावात एक अशी जादू दडलेली आहे की पहिल्यांदा उच्चारला तरी मन वेगळ्याच लहरींवर झुलायला लागतं. या नावात इतिहास आहे, रोमँटिकतेचं ओलं काव्य आहे, आणि कल्पनाशक्तीला पंख लावणारी स्वप्नंही आहेत. जगभरात कितीतरी शहरे पाहायला मिळतात, प्रत्येकाचं काहीतरी वेगळेपण असतं, पण व्हेनिससारखं शहर दुसरं नाही. कारण व्हेनिस म्हणजे गाड्याविना, रस्त्याविना, केवळ पाण्याच्या कालव्यावर उभं राहिलेलं एक जिवंत शहर. शतकानुशतकं समुद्राशी लढत जिवंत राहिलेलं, प्रेमकथांचा साक्षीदार ठरलेलं, कलेच्या झऱ्याने सिंचन झालेलं आणि सौंदर्याने परिपूर्ण असं हे शहर म्हणजे खरोखरच एक स्वप्न.
व्हेनिसकडे प्रवास करताना मनात एक वेगळंच कुतूहल दाटलेलं असतं. विमानाने उतरताना खिडकीतून दिसणारी बेटे, निळ्याशार पाण्याच्या अंगावर पांढरं प्रकाशमान शहर, त्यात पसरलेले लहानमोठे पूल. हे सगळं पाहून असं वाटतं की आपण पृथ्वीवर नाही तर जणू एखाद्या परीकथेच्या भूमीत उतरतो आहोत. विमानतळावरून शहरात पोहोचण्यासाठी बोटींचाच आधार घ्यावा लागतो. सुरुवातीला हे थोडं वेगळं, थोडं विचित्र वाटतं खरं.
शहराच्या जवळ येताना दिसणारी पहिली दृश्यं म्हणजे उंच उंच घंटाघरं, दगडी इमारतींचे घुमट पिटपिटावेत, आणि पाण्याच्या काठावर उभे असलेले प्रासाद. ते दृश्य इतकं मोहक असतं की डोळे मिटावेत की नाही याचा विचार मनात चालू राहतो. बोटीतल्या इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही तोच आनंद दिसतो तर कधी हसरे भाव, कधी आश्चर्याचा झटका, कधी मोबाईल कॅमेऱ्यांतून टिपली जाणारी दृश्यं.
शहराच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो की एकदम वेगळंच जग सुरू होतं. इथे गाड्या नाहीत, बस नाहीत, ट्रक नाहीत. म्हणजे आपण रोजच्या जीवनात ऐकतो ते सगळे आवाज गायब आहेत. त्याऐवजी इथे ऐकू येतं ते फक्त पाण्याचं मंद गुंजन, होड्यांच्या टप्प्यांचा हलकासा आवाज आणि दूरवरून येणारी एखाद्या गायकाची सुरेल धून. हाच तो क्षण, जेव्हा आपण खात्री पटवतो की व्हेनिस खरंच वेगळं आहे.
गोंडोलामध्ये बसणं हा प्रत्येक प्रवाशासाठी एक स्वप्नवत अनुभव असतो. काळ्या रंगाची लांबलचक गोंडोला, त्यावर नाजूक नक्षीकाम, आणि होडी चालवणारा गोंडोलिअर त्याच्या खास पोशाखात. तो आपल्या हातातील लांब दांड्याने होडीला पुढे नेतो आणि आपण त्या पाण्यावर हळुवार तरंगत जातो. गोंडोलामध्ये बसताना मनात हलकासा थरार दाटतो, पण काही क्षणांतच तो आनंदात बदलतो. पाण्यावर डुलत चालणारी होडी, दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या इमारतींच्या भिंतींवर पडणाऱ्या लाटांच्या छाया आणि हवेत तरंगणारी ओलसर गंध हे सगळं मनात कायमचं कोरलं जातं.
ग्रँड कॅनॉल म्हणजे या शहराचं मुख्य वाहतुकीचए साधन. तीन किलोमीटर लांबीचा हा कालवा जणू शहराला दोन भागात विभागतो आणि दोन्हीकडे भव्य इमारती उभ्या आहेत. अनेक इमारतींना थेट पाण्याशी जोडलेलं प्रवेशद्वार आहे. दगडी पायऱ्या थेट कालव्याच्या पाण्यात उतरतात. काही घरांच्या खिडक्यांतून दिव्यांची मंद झगमग बाहेर पडते आणि ती झळाळी पाण्यावर चमकू लागते. हे दृश्य पाहताना मनात एकच भावना दाटते, काळ जणू इथे थांबून गेला आहे.
या कालव्यावर उभा असलेला रियाल्टो पूल हा व्हेनिसचा मुकुटमणी आहे. पांढऱ्या दगडाचा हा पूल कालव्याला जोडतो आणि वरून दिसणारं दृश्य अवर्णनीय असतं. पुलावरून खाली दिसणाऱ्या होड्या, पाण्यावर चमकणारे प्रतिबिंब आणि पलीकडे दिसणाऱ्या इमारतींचा गडद रंग हे सगळं इतकं मोहक असतं की वेळ कसा जातो ते कळतच नाही. पुलावर बसलेले कलाकार अनेकदा प्रवाशांचे चित्र रेखाटतात. दोन मिनिटांत तयार झालेलं एखादं जलरंगाचं स्केच आयुष्यभराची आठवण बनून जातं.
सेंट मार्क्स स्क्वेअर हे व्हेनिसचं हृदय आहे. या चौकात पाय ठेवताच असं वाटतं की आपण एका भव्य रंगमंचावर आलो आहोत. दगडी फरशीवर पसरलेले कबुतरांचे थवे, पर्यटकांची लगबग, कॅफेंमधून उमटणारे पियानोचे स्वर आणि चौकाभोवती उभ्या असलेल्या भव्य इमारती या सगळ्यामुळे चौक नेहमीच जिवंत असतो. चौकात उभं असलेलं सेंट मार्क्स बॅसिलिका हे तर शिल्पकलेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. घुमटावरचं सोनेरी काम, भिंतींवर रंगवलेले मोजॅक्स आणि आत उमटणारा स्वर्गीय प्रकाश पाहताना मन भारावून जातं. या बॅसिलिकामध्ये पाऊल टाकलं की असं वाटतं की आपण एखाद्या स्वर्गीय गुहेत आलो आहोत जिथे प्रत्येक भिंत, प्रत्येक स्तंभ आपल्याशी बोलतो आहे.
चौकाच्या एका बाजूला उभं असलेलं डोजेस पॅलेस हे राजकीय वैभवाचं प्रतीक आहे. त्याच्या आत फिरताना एकेक दरबारगृह, एकेक जिना आणि भिंतीवरचं रंगीबेरंगी चित्र पाहून आपण थक्क होतो. त्या पॅलेसच्या खिडकीतून बाहेर डोकावलं की दिसतो "ब्रिज ऑफ साईज". हा पूल म्हणजे कारागृहात नेल्या जाणाऱ्या कैद्यांच्या शेवटच्या नजरेचा साक्षीदार. पुलावरून पाण्याकडे पाहताना त्यावेळची वेदना मनाला स्पर्शून जाते.
पण व्हेनिस म्हणजे केवळ भव्य इमारती नाही. त्याच्या गल्लीबोळांत फिरताना खऱ्या अर्थाने शहराचा आत्मा जाणवतो. लहानशा गल्लींमध्ये दुकाने, काचेच्या खिडक्यांत ठेवलेले मुखवटे, रंगीबेरंगी मण्यांचे हार, हस्तकलेची वस्तू आणि गोंडोला आकाराच्या शोपीसेस दिसतात. दुकानदार हसतमुखाने पर्यटकांना बोलावतो, त्यांना वस्तूंच्या मागच्या कथा सांगतो. एखाद्या मुखवट्याच्या रंगात दडलेलं रहस्य ऐकलं की तो मुखवटा अधिकच आकर्षक वाटतो.
व्हेनिसची उपबेटं तर प्रवाशाला अजूनच वेड लावतात. मुरानो बेटावर गेलं की लक्षात येतं की काच ही केवळ काच नाही, तर कला आहे. लालसर भट्टीसमोर उभा असलेला कारागीर वितळलेल्या काचेपासून काही मिनिटांत एखादा नाजूक घडा तयार करतो. त्याच्या हातातून उमटलेली कलाकृती सूर्यप्रकाशात चमकते आणि डोळ्यांवर जादू करुन जाते.
बुरानो बेटावर मात्र वेगळंच दृश्य असतं. प्रत्येक घर वेगळ्या रंगात रंगवलेलं पिवळं, निळं, हिरवं, लाल. संपूर्ण बेट एखाद्या चित्रकाराने रंगवलेल्या कॅनव्हाससारखं वाटतं. इथल्या स्त्रिया हाताने लेस विणताना दिसतात. त्यांचा प्रत्येक धागा, प्रत्येक गाठ म्हणजे मेहनतीचं आणि कलात्मकतेचं प्रतीक आहे.
लिडो बेटावर समुद्रकिनारा आहे. वाळूच्या किनाऱ्यावर बसून सागराच्या लाटा पाहताना थोडा वेळ शहराच्या गजबजाटापासून दूर जाता येतं. संध्याकाळच्या वेळी इथं फेरफटका मारणं म्हणजे आत्म्याला शांत करणारा अनुभव असतो.
व्हेनिसमध्ये रात्रीचं सौंदर्य अजूनच खुलतं. चंद्रप्रकाशात पाण्यावर चमकणाऱ्या लाटा, पूलांवर पडणाऱ्या दिव्यांची झगमग, आणि हवेत मिसळलेलं प्रेमगीत. हे सगळं मनाला जादूमय अनुभूती देतं. एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत गोंडोलामध्ये बसून चांदण्यात फिरणं म्हणजे जणू आयुष्यभरासाठी हृदयात कोरलेला क्षण.
इथलं अन्नही एक वेगळा प्रवास घडवतं. रिसोटो, पास्ता, पिझ्झा, समुद्री अन्नाचे पदार्थ आणि गोडात तिरामिसू हे पदार्थ खऱ्या अर्थाने इटालियन खाद्यसंस्कृतीचं प्रतीक आहेत. पाण्याच्या काठावरच्या कॅफेमध्ये बसून गरम कॉफी घेताना समोरून जाणाऱ्या होड्यांकडे पाहणं ही एक अविस्मरणीय मजा आहे.
तरीही या जादूमागे एक काळी बाजू आहे. समुद्राची पातळी वाढत आहे, आणि शहराला सतत पूराचा धोका आहे. चौक पाण्याखाली जातात, लोकांना उंच पायऱ्यांवरून चालावं लागतं. तरीही व्हेनिसचे लोक आपल्या शहरावर प्रेम करतात, त्याला जपतात. ते जिद्दीने म्हणतात,"हे शहर आमचं जीवन आहे, आम्ही ते वाचवू."
व्हेनिस सोडताना मनात एक हळवा उदासपणा येतो. या शहरात घालवलेले क्षण आत्म्याला स्पर्शून जातात. इथली पाणी, इथले पूल, इथल्या गल्लीबोळातले आवाज, मुखवट्यांच्या मागे दडलेलं रहस्य, आणि गोंडोलामधून ऐकलेली प्रेमगीते, हे सगळं आयुष्यभरासाठी आठवणीत राहतं. काही शहरे आपण पाहून विसरतो, पण काही शहरे आपल्या मनात कायमची वस्ती करतात. व्हेनिस त्यापैकीच एक आहे.
व्हेनिस म्हणजे केवळ एक शहर नाही, तर एक अनुभव आहे, प्रेमाला नवा अर्थ देणारा, सौंदर्याला नवा चेहरा देणारा आणि जीवनाला नवी प्रेरणा देणारा. आयुष्यात एकदा तरी या शहरात जाणं म्हणजे स्वतःला दिलेली एक अनमोल भेट आहे.
=======================================================
श्रीपाद टेंबे,
पॅरिसमधे पुरातन भारत... गीमे संग्रहायल
तसा Indian म्हणुन ओळखला जाणारा भाग पॅरिसमधेही आहे... ला शापेल नावाचा. जिथे कोणिही हिंदी बोलत नाही, दुकानांबाहेर तमिळ वाघांचे (LTTE) फोटो लावलेले असतात. हे बघितेल्यावर समजलं की Indian म्हणजे भारतीय नाही तर Indian म्हणजे भारतीय उपमहाद्विपीय. त्यात पाकिस्तान आल, लंका आणि बांगलादेश आले. तसे तमीळ भारतीय आहेत या ठिकाणी पण मी अजुनही एखादे पंजाबी/गुजराथी दुकान शोधतोय (असायलाच पाहीजे नं, 'ती' लोकं तर सगळीकडे असतात!!)
पण हा लेख आहे पुरातन भारतावर. म्हणजेच पुरातन भारतीय वस्तु असलेल्या एका संग्रहालयावर. पॅरिसमधे तशी बरिच संग्रहायल आहेत. इथल्या महाराष्ट्र मंडळामुळे गीमे संग्रहायल पाहायचा योग आला. हे संग्रहायल तसे एवढ प्रसिद्ध नाही. इथे आशियामधल्या पुरातन (खासकर धार्मिक) कलावस्तु आहेत. एमिल गीमे यांनी १८८० दरम्यान केलेल्या प्रवासात या वस्तु फ्रांसमधे आणल्या.
इथे भारत, नेपाळ, तिबेट व कंबोडिया इथेल्या हिंदु कलावस्तु, तर भारत, तिबेट, चीन, अफगाणिस्तान व (सध्याचे) पाकिस्तान इथेल्या बौद्ध कलावस्तु आहेत. बर्याच गोष्टी फार पुरातन आहेत (९ वे शतक).
प्रामाणिकपणे सांगतो, आधी वाटलं आपल्याच जुन्या वस्तु पाहण्यात काय एवढ भारी?!! पण अर्ध्या तिकिटात, गाइड सकट संग्रहालय पाहायला मिळतय तर का सोडा (आता... आहे मी मध्यमवर्गीय!), पण दिवसाअखेर पटलं की योग्य निर्णय घेतला.
आत गेल्या गेल्या, पहिलंच दालन कंबोडियातील हिंदु कलाकृतींच. हिंदु साम्राज्याच्या वैभवाच्या काळात हिंदु (आणि नंतर बौद्ध) धर्म "शांततामय मार्गानी" कंबोडिया पर्यंत पोचला होता. इथे समुद्रमंथन, रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग दगडात कोरलेले पाहायला मिळतात. सर्व मुर्ती त्यांच्या (कंबोडिअन) पद्धतीच्या असल्यामुळे पहायला मजा येते!
समुद्रमंथन,
मध्यभागी वरती 'ब्रम्हा' त्याच्या बाजुला 'चंद्र' व 'सुर्य'; डावीकडे देव,
उजवीकडे दानव; खाली 'विष्णू' कासवाच्या अवतारात ('कुर्म'), मंथनासाठी
वापरलेल्या 'मंदर' नामक पर्वताला पाठिवर घेउन. 'लक्ष्मी' आणि इंद्राचा घोडा
मंथनातुन बाहेर येताना.
रामायण: सुग्रीव-वाली,
डावीकडे राम व लक्षुमणाबरोबर वानरराज सुग्रीव; मधे सुग्रीव-वाली लढताना; उजवीकडे वालीचा वध.
सुंद-उपसुंद,
सुंद-उपसुंद हे भाउ 'तिलोत्तमा' या अप्सरेसाठी भांडताना. 'तिलोत्तमा'ला
ब्रम्हदेवानी पाठवले या दोघांमधे भांडण लावायला कारण ब्रम्हदेवानीच
दिलेल्या एका वरामुळे ते दोघे अमर झाले होते (पण ते एकमेकांना मारु शकतील
असा clause होता त्या वरात!)
यातील बरीच शिल्प 'अंगकोर' इथल्या मंदिरातील आहेत. मला बर्याच वर्षांपासुन ह्या मंदिराबद्दल उत्सुकता आहे (श्रेयः डिस्कव्हरी वाहिनी) चिक्कार मोठं मंदीर आहे म्हणे, जंगलाच्या मधे. अशीच शिल्प काही इंग्लंडमधे असतील, काही अमेरिकेत... मग अंगकोरमधे काय उरलं असेल? आणि तरी देखिल तिथे अजुन शिल्प असतील तर मुळात किती तयार केली असतील?!!
पुढचं दालन होतं आपल्या (भारतातल्या) शिल्पांच. या वस्तुंमधे बर्याच आपल्या देवाधिकांच्या अत्यंत सुंदर मुर्ती आहेत.
खालील फोटो: ब्रम्हा,
खालील फोटो: नटराज (११वे शतक, तामीळनाडू) शंकर, वैश्विक नर्तकाच्या रुपात
सहजच मला वाटले की ह्या मुर्ती 'आपल्या' आहेत.. त्या भारतात असायला हव्या होत्या! ह्या आपल्या वस्तु या लोकांनी चोरल्या(?) असं आत्ता म्हणणे सोप्पे आहे.. पण त्या वेळी आपण सरळ सरळ हारलो (कारण काही का असेना) आणि त्यामुळे ह्या लोकांना 'आपल्या' मुर्ती इथे आणणं शक्य झालं, मग आपल्याला आत्ता असे म्हणण्याचा हक्क नाही.
आता मला कळले की इजिप्तच्या लोकांना त्यांच्या 'ममीज्' दुसर्या देशातील संग्रहालयात बघुन काय वाटत असेल!
तर, मी म्हणत होतो त्याप्रमाणे या मुर्ती 'आपल्या' आहेत असे मी म्हणु शकणार नाही ('होत्या' हे खरं!), पण तसे मानले तरी पुढचा प्रश्ण हा पडतो (मलातरी पडला) की, ह्या मुर्ती आपल्याकडेच राहिल्या असत्या (आणि काही धर्मांध बादशहांच्या नजरेतुन सुटल्या असत्या) तर आत्ता यांची स्थिती काय असती? दोन पर्याय आहेत, एकतर शेंदुर फासुन ठेवला असता, (ती मुर्ती न रहता त्याचा देव झाला असता), किंवा, कुठेतरी दुर्लक्षित मंदिरात, त्या मुर्ती पाहायला कुणी गेलेच नसते. मी स्वतः पाहिली आहेत ही उदाहरण, कार्ले/भाजेची लेणी पहा, एका लेण्याचं मंदिर केलेलं तर बाकी दुर्लक्षित! लोणारला देखिल, एका मंदिरात मुर्तीला शेंदुर फासुन ठेवलाय, त्याबरोबर त्या मंदिराची रंगरंगोटी, ढिगभर फोटो, देणगिदारांची नावे, मोठ्या आवाजातली भजनं या सगळ्यात मूळ मंदिर, मुर्ती कुठल्या कुठे हरवून जाते. एक मंदीर असं तर बाकी भग्नावस्थेत... देव्हार्यात अंधार आणि वटवाघुळं... का, तिथे देव नाही?
जाउदे (घिसा पिटा विषय आहे हा), तर सांगायचा मुद्दा हा की शेवटी असं वाटलं, ह्या कलाकॄती इथे आहेत तेच चांगल आहे... त्या निमित्ताने इथल्या लोकांना आपले (गत)वैभव बघायला तरी मिळते. नाहीतर या लोकांना वाटत भारत, माफ करा, इंडिया, म्हणजे फक्त गरीबी, झोपडपट्टी, जातीय दंगे आणि call centers (जय हो!!)
या सार्या मिश्रभावनांनी मी आपल्या देवादिकांच्या मुर्ती बघत होतो. मला मुळातच हे असलं सगळ पाहायला आवडतं. त्यातला काही आभ्यास आहे किंवा विशेष कळतं अशातला भाग नाही! पण आवडतं.
तर, हे पण दालन संपल. आता पाय बोलायला लागले होते आणि वरती अजुन दोन मजले होते. तरी मोर्चा पुढल्या मजल्यावर वळवला. पुढे, नेपाळ मधिल पुरातन कलाकॄतिंमधे एक वेगळीच गोष्ट बघितली, मोठ्या कापडावर काढलेली चित्र-मालिका, एखाद्या comics प्रमाणे! या पुरातन कॉमिक्समधेही पहिले चित्र गणपतीबप्पांचे!! गणरायाच्या नमनानेच गोष्ट सुरु.
पुढे, बौद्ध कलाकॄती नुसत्या चीन व तिबेट इथल्या नसुन, अफगाणिस्तान व (आत्ताचे) पाकिस्तान इथल्या देखिल.... या तालिबानी प्रदेशात शेकडो वर्षांपुर्वी बौद्ध धर्मानी अहिंसा व शांतीचा संदेश पसरवला होता यावर कोणाचा विश्वास बसेल?
खालील फोटो: बोधिसत्व (काळः इ.स. १०० ते ३००) गांधार (पाकिस्तान)
पुढे पुढे शेवटची दालनं उरकत पुन्हा भारतीय दालनापाशी आलो. इथे शिल्प नसुन दागिने, कपडे अशा एकंदर कलाकुसरीच्या वस्तु होत्या, प्रामुख्याने राजस्थानी. फार जुन्यापण नव्हत्या. मला तर वाटलं माझा लग्नातला शेरवानी ड्रेस आणला असता तर यांनी तो पण ठेउन घेतला असता. इथे आमच्या गाइडने मजेदार गोष्ट सांगितली. "आपल्याकडे इंग्रजांचे राज्य असताना, समाजातील काही घटक त्यांना (इंग्रजांना) विशेष मान देत आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करत. त्यातुनच इंग्रजी पेहेरावातील काही खुबींचे अनुकरण झाले. त्यातील एक म्हणजे मानेभोवतीची ताठ कॉलर (शेरवानी/नेहरु शर्टची असते तशी). कालांतराने इंग्रजानी ही पद्धत सोडुन दिली आणि आता ही स्टाईल खास भारतीय म्हणुन ओळखली जाते.
मला विश्वास आहे की फ्रेंच लोकांना हे संग्रहालय म्हणजे एक अजायब घर वाटत असणार! फ्रेंचांचे भारतज्ञान आणि भारतीयांचे फ्रेंचज्ञान दोन्ही अगाघ आहे. मला फ्रांस व फ्रेंच लोक यांच्याबद्दल कीती कमी माहीती होती ते इथे राहिल्यावर जाणवल. जास्त तर गैरसमजुतीच होत्या. माहीती तशी फक्त एकच, की पॅरिसमधे आयफेल टॉवर आहे. बस. बाकी शुन्य.
तस फ्रेंचांना पण आपल्याबाबतीत जास्त माहीती नाही. 'श्री गणेश' तेवढा सगळ्यांना माहीतीये कारण प्रत्येक इंडियन (भारतीय नाही इंडियन) हॉटेलात तो असतोच! हाइट म्हणजे, माझा बॉस मला खास फ्रेंच हॉटेलात घेउन गेला तर त्या हॉटेलमालकाने मला गणपतीची पितळ्याची मुर्ती आणुन दाखवली. तो (म्हणजे मालक... गणपती नाही) मुंबइत ताजमधे शेफ होता काही वर्ष. भारतीय जेवणाबद्दल अजुनही त्याच्या मनात धसका आहे! ती मुर्ती त्याने बारवर ठेवली होती! आता काय सांगायच याला...
फ्रेंच लोकांना भारताबाबत माहीती म्हणजे, माहात्मा गांधी आणि जातीव्यवस्था. इंफोसिस देखिल माझ्या कंपनीतल्या लोकांना माहिती नाही. (आता बोला, आणि मी संगणक क्षेत्रात काम करतो!)
तर हे संग्रहालय भारताबद्दल कुतुहल तरी नक्कीच निर्माण करत असेल. मझ्या ज्ञानातही यामुळे भर पडली, भर पडली म्हणण्यापेक्षा उजळणी झाली असं म्हणु!
फ्रान्स म्हणल्यावर डोळ्यासमोर काय येत? ... पॅरिस, आणि पॅरिस म्हणल्यावर... आयफेल टॉवर.
बाकीच्यांच माहित नाही पण मलातरी आयफेल टॉवर सोडला तर फ्रान्सबद्दल दुसरं काही माहित नव्हतं. पहिल्यांदा जेंव्हा मी त्याला प्रत्यक्ष बघितलं तेंव्हा बघतच राहिलो. त्यासमोरील हिरवळीवर बसलो होतो पण मला वाटत होतं कि हे एक स्वप्न आहे. असं वाटत होतं की आपल्यासमोर भलं मोठ्ठं पोस्टर लावलय!!
आयफेल टॉवर बद्दल विकिवर बरंच वाचायला मिळेल. तरी इथे थोडक्यात माहिती देतो. आयफेल टॉवर १८८९ मध्ये पॅरीस मध्ये झालेल्या जागतीक व्यापार संमेलनासाठी बांधण्यात आला. गुस्ताव आयफेल या अभियंत्यानी त्याची रचना केली. संमेलन झाल्यावर हा मनोरा काढण्यात येणार होता पण सर्वांना तो एवढा आवडला कि त्याला तसंच ठेवायचं ठरलं आणि आता तो फ्रान्सचे प्रतिक झाला आहे.
. . . . . . . . .
हा मनोरा फक्त लोखंडी खांब आणि पट्ट्या एकमेकांना जोडून तयार करण्यात आला. त्याच्या राचनाकर्त्याची कल्पकता सर्वांच्या लगेचच लक्षात येणार नाही. विचार करा, या घडीला १२० वर्ष पूर्ण झालेली हि रचना, ज्यावर रोज हजारो पर्यटक जातात, ती किती भक्कम असेल. तरीही आख्या टॉवरचे वजन हे त्याच्या एवढेच क्षेत्रफळ असलेल्या हवेच्या स्तंभाएवढेच (जमिनीपासून आकाशापर्यंत) आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपण खुर्चीवर बसल्यावर खुर्चीचे पाय जमिनीवर जेवढा दाब देतात तेवढाच दाब आयफेल टोवर जमिनीवर देतो. शिवाय जाळीदार रचनेमुळे वाऱ्याचा विरोधही जास्त होत नाही.
तसे पाहता त्याची भव्यता आणि प्रमाणबद्धता सोडून कलात्मक मूल्य वेगळे नाही. म्हणजे जे सौंदर्य भव्य पुतळ्यात किंवा मोठ्ठाल्या इमारतीत असते ते इथे नाही. याबद्दल एक कथा अशीही आहे कि, १८८६ मध्ये फ्रांसनी अमेरिकेला भेट म्हणून जो स्वातंत्र देवतेचा पुतळा दिला त्याची अंतर्गत रचना देखील गुस्ताव आयफेल यांनी केली होती. तिथेही भव्य आकार असूनही कमी वजन असलेला आणि तरीही पुरेसा भक्कम सांगाडा त्यांनी तयार केला होता. पण बाहेरून असलेल्या पुतळ्यामुळे ही अफलातून रचना लपून राहिली. त्यामुळे जागतीक व्यापार संमेलनासाठी पुन्हा एक संधी मिळाली तेंव्हा गुस्ताव आयफेल यांनी त्या अंतर्गत रचनेचीच इमारत करायचा निर्णय घेतला.
मराठीत 'हा टॉवर' असला तरी फ्रेंच भाषेत 'ही टॉवर' आहे (La Tour Eiffel). इथे त्याला 'old lady' किंवा 'iron lady' म्हणतात. माझ्यासारखेच बरेच फ्रेंच देखील याचे चाहते आहेत. लग्न झाल्यावर या आज्जीबाईंबरोबर फोटो काढायलाच पाहिजे.
. . . . . . . . . . . . . . . . . . .
ह्या टॉवरच्या तीन पातळ्या आहेत. याच्या चारी पायातून वर जाणाऱ्या लिफ्ट आहेत. या लिफ्ट दुसऱ्या पातळीपर्यंत जातात आणि पुढे सर्वात वरती जायचं असेल तर लिफ्ट बदलून जावे लागते. वर्षातल्या कुठल्याही दिवशी इथे गर्दी ठरलेली. खाली रांगेत एक तास तरी उभारावं लागतच. शिवाय वरती लिफ्टला देखील रांग असतेच. वरून पॅरीस छान दिसते ...
. . . . . . . .
... पण त्यात टॉवरबद्दल काही विशेष वेगळं जाणवत नाही... टॉवर वरुन टॉवरला तुम्ही कसं बघणार?!! टॉवरची जवळून ओळख करून घ्यायची असेल तर जिन्याने दुसऱ्या पातळीला जाणे उत्तम. जिन्यानी जाताना आतून हा वेगळाच दिसतो... गर्दीपण नसते त्यामुळे अगदी तुमची आणि टॉवरची वैयक्तिक भेट घडते.
. . . . . . . . 
युरोपातल्या कुठल्याही स्मारकांप्रमाणेच हा टॉवर देखील वेगवेगळ्या वेळी पाह्यलाच हवा. दिवसा निळ्या (तुम्ही नशीबवान असाल तर... नाहीतर ढगाळ पांढऱ्या) आकाशासमोर हा टॉवर एकदम भव्य दिसतो. संध्याकाळी बघाल तर वेगळाच दिसतो... तर रात्री काळ्या पार्श्वभूमीवर हा एक छोटासा सोनेरी टॉवर वाटतो.
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
शिवाय अधून मधून यावर वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई केली जाते. जसे मागच्या वर्षी फ्रेंच अध्यक्ष सार्कोझी हे युरोपिअन युनिअन चेही अध्यक्ष होते, तेंव्हा नेहमीचा सोनेरी टॉवर निळा झाला होता तर एका बाजूस त्यावर पिवळ्या तारका गोलाकार मांडल्या होत्या... युरोपिअन युनिअनच्या झेन्ड्याप्रमाणे!
. . . . . . . . . . . . . . . . . .
तसेच हे सहस्त्रक सुरु झाले तेंव्हा यावर एक नवीन रोषणाई केली गेली. ही देखील कायमस्वरूपी नव्हती पण सगळ्यांना इतकी आवडली कि आता दर तासाला पाच मिनिटांसाठी ही रोषणाई केली जाते. टॉवरवर असंख्य छोटे छोटे फ्लॅश सारखे लाईट लावलेत. पाच मिनिटांसाठी टॉवारचे लाईट बंद करून हे छोटे लाईटस randomly लावले जातात. टॉवरवर जणू चमकी टाकल्यासारखी वाटाते. मी कितीही वर्णन केलं, प्रकाशचित्र किंवा चलचित्र दाखवली तरीही तो अनुभव मी व्यक्त करू शकणार नाही. त्या वेळी जर तुम्ही जवळपास असाल आणि ही रोषणाई सुरु झाली तर तुमच्या तोंडूनही अगदी नकळत 'आह' निघूनच जाते... आणि जिथे आहात तिथेच थबकून तुम्ही टॉवर बघत राहता. पाच मिनिटे कशी जातात कळत नाही आणि संपल्यावर 'हे काय, एवढ्यात संपलं...' असं होतं.
. . . . . . . . . . . . . . . . .
आर्क दी ट्रायंफ वरुन, ही रोशणाइ सुरु असताना घेतलेले long exposer,
. . . . . . . . .
long exposer सुरु असताना कॅमेरा हलवून मिळवलेला हा फोटो,
. . . . . . . . .
सध्या १२० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष रोषणाई किलीये. साधारण बारा मिनिटे चालणारी ही रोषणाई रात्री ८:०५, ९:०५, १०:०५ आणि ११:०५ ला या ३१ डिसेंबर परेंत असेल. याबाबत जास्त माहिती आणि चलचित्र इथे बघायला मिळेल.
. . . . . . . . .
. . .
. . .
अजूनही वेळ मिळाला कि मला टॉवर बघायला आवडते. तिथे आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव असतात. टॉवर बघून परतताना प्रत्येकजण वळून वळून पुन्हा पुन्हा त्याला शेवटचे बघत असतो. आता तो माझ्यासाठी नवा नाही तरीही तो मला जुना झालेला नाही.
या वेळी पुन्हा नाताळची आठवडाभर सुट्टी होती. काही कारणांनी विमानप्रवास टाळायचा होता. त्यामुळे आठवडाभराच्या सुट्टीत काय करायचं हा प्रश्न होता. फ्रान्समध्ये पॅरिस सोडून आम्ही फक्त शमोनी (Chamonix) बघितले होते. यावेळी अगदी ऐनवेळी दक्षिण फ्रांस (इंग्रजीत, French Riviera, फ्रेंचमधे Côte d'Azur) बघायचं ठरलं. 'फ्रेंच रिविएरा' या नावानं ओळखला जाणारा हा भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश (तुलनेने) गरम हवामान आणि बीच यासाठी प्रसिद्ध आहे... अर्थातच नाताळाच्या सुट्टीत इथे गर्दी नसते! पण आमचा काही दिवस निवांत घालवणे एवढंच उद्देश होता. हिवाळ्यातले पॅरिस म्हणजे अतिशय मरगळ... सदैव थंड हवा, ढगाळ आकाश आणि कमी सुर्यप्रकाश यामुळे फार फार डिप्रेसिंग वाटतं. या वातावरणापासून दूर जायचच होतं.
थोडी शोधाशोध केल्यावर नीस (Nice), कान्न (Cannes) आणि मोनाको (Monaco) बघायचं ठरलं. फक्त नीसला राहून हे शक्य होतं. मग जाण्याच्या आठवडाभर आधी रेल्वे आणि हॉटेलचे बुकिंग फ्रेंच रेल्वेच्या साईटवरून केलं. निघायच्या दिवशी पॅरिसच्या रेल्वे स्थानकावरुन आमच्या गाडीला निघायलाच एक तास उशिर झाला. फ्रान्सच्या जगप्रसिद्ध TGV नी (माहिती आहे नं?!!) जाण्याची ही दुसरी वेळ होती. ही अतिवेगवान रेल्वे मार्सेय (Marseille) पर्यंतचे साधारण ७५० कि.मी. अंतर तीन तासात कापते आणि पुढे नीसपर्यंतचे २०० कि.मी. कापायला अडीच तास जातात. आम्हाला तशिही काही घाई नव्हती. मस्तपैकी पत्ते खेळत आम्ही रात्री नीसला पोचलो.
नीस तसे जास्त मोठ्ठे शहर नाही. इथे एकच ट्राम आहे पण सार्वजनिक बसचे
जाळे (बाकी फ्रान्सप्रमाणेच) चांगले आहे. फक्त १५ युरोत सात दिवसाचा पास
घेतला आणि ट्राम पकडून हॉटेलला निघालो. नाताळ असल्याने सगळे शहर उजळून
निघाले होते. शहराच्या मुख्य चौकात - प्लास मासेना (Place Masséna)
मध्ये - नाताळ बाजार (हा दर वर्षी आणि सगळ्या ठिकाणी एकसारखाच असतो),
मोठ्ठा पाळणा आणि इतर जत्रा लागली होती. हॉटेल समुद्रकिनारीच होते. एकंदर
इमारत आणि खोलीतले खुर्च्या-टेबलं बरीच जुनी होती. ताजेतवाने होउन पलंगावर
बसतोच तोवर भुकेची जाणीव झाली. येताना प्लास मासेनाआधी एक 'बॉलीवूड कॅफे'
नावाचं भारतीय हॉटेल बघितलं होतं. तिथे जायचं ठरलं. आत बघतो तर शाहरुख,
करीना मंडळींची छायाचित्रे... मालक हॉटेलच्या नावाला इमान राखून होता.
त्याचप्रमाणे तो भारतीय जेवणालाही इमान राखून होता. सामोसा चार कोनाचा होता
आणि त्यात चक्क बटाटा आणि मटार निघाले. पॅरिसमधले सो-कोल्ड भारतीय
हॉटेलवाले त्रिकोणी सामोस्यात गाजर कोबी काय वाट्टेल ते घालतात
दुसऱ्या दिवशी पहिलं काम केलं ते पर्यटन कार्यालयात जाऊन माहिती घेतली. तिथल्या बाईने आम्हाला भरपूर नकाशे आणि माहितीपत्रके दिली. शिवाय या आठवड्याचं हवामान विचारल्यावर चक्क नेटवरून हवामानाचा अंदाज छापून दिला!! मग आमचं ज्ञान, ही नवी माहिती आणि हवामानाचा अंदाज यांचा विचार करून आज नीस हिंडायचं ठरलं. पहिल्यांदा गेलो समुद्रावर! पाणीतर थंड होतंच पण थंड वारं देखिल वाहात होतं.
थोडा वेळ फिरून आम्ही जुन्या नीसकडे मोर्चा वळवला. जुन्या नीसमध्ये अगदीच छोटे छोटे रस्ते आहेत. कार अर्थातच आत येऊ शकत नाही. हलक्या गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या इमारती छान दिसत होत्या. इथे पर्यटकांची रेलचेल होती. नेहमीप्रमाणे सोवेनिअरची दुकानं आणि वेगवेगळी उपहारगृहं दिसत होती. अत्तर व इतर सुगंधी पदार्थांची देखील बरीच दुकानं होती. इथून जवळच असलेले ग्रास (Grasse) गाव सुगंधी द्रव्यं तयार करण्यासाठी बरेच प्रसिद्ध आहे.
इथुन आम्ही बस घेऊन रशियन ओर्थोडोक्स चर्च बघायला गेलो. या प्रकारचे रशिया बाहेरचे हे सर्वात मोठ्ठे चर्च आहे. जसं फ्रांस म्हणाल्यावर आयफेल टॉवर दाखवतात तसं रशियासाठी मोस्कोच्या लाल चौकातल्या एका चर्चचा फोटो दाखवला जातो. हे चर्च देखील तसेच होते. यावरील घुमटांना त्यांच्या आकारामुळे ओनिअन डोम म्हणतात. आतूनही हे चर्च सुंदर होते. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत असले चर्च बघितले नसल्याने हे भलतंच आवडलं.
इथून बसनी नीस बंदराला गेलो. इथे बघायला खास काही नसल्याने तसेच पुढे नीसबाहेरील 'मो बरोन' (Mont Boron) डोंगरावर गेलो. वर जाईपर्यंत अंधार झाला होता. इथून सगळं नीस दिसतं. रात्री तर अतिशय सुंदर दिसतं. वर जाणारा रस्ता जंगलातुन जाणारा अगदी सुन्सान असल्याने शेवटच्या थांब्यावरून फोटो काढायचं ठरलं. पण बसं थांबली तिथुन काहिच नीट दिसेना. इथे त्या फोटोसाठी परत यायचं ठरवून आम्ही पुढच्या बसने हॉटेलला परतलो.
एकंदर नीसमध्ये भारतीय उपहारगृह मोठ्या संख्येनी आहेत. म्हणजे पिझ्झेरीयाहूनदेखील जास्त! आज दुपारी पण एका भारतीय उपहारगृहातच जेवण केलं. इथेही कांदा भजी म्हणाल्यावर ओनिअन रिंग्स नं देता चक्क आपल्याकडची, ज्याला आम्ही खेकडा भजी म्हणतो, तशी भजी मिळाली.... (माझा आनंद गगनात मावेना वगैरे वगैरे वगैरे ...). रात्री देखील एका भारतीय फास्ट-फूड दुकानातून (इथल्या सॅडविच शॉप प्रमाणे) अगदी स्वस्तात जेवण मिळालं. पॅरिसपेक्षाही नीसमध्ये भारतीय उपाहारगृहांची घनता जास्त आहे आणि पदार्थांचा दर्जा तर कित्तेक पटीनी चांगला आहे. इथे मोठ्या प्रमाणात येणारे इंग्रज पर्यटक याला कारणीभूत असावेत. कारण काहीही असो पण खाण्याच्या बाबतीत चैन होणार होती हे आम्हाला दिसताच होतं.
हवामानाच्या अंदाजाप्रमाणे दुसऱ्या दिवशी निरभ्र आकाश होते. आधी ठरवल्याप्रमाणे आम्ही शमँ द फर द प्रोवान्स (Chemins de Fer de Provence) या छोट्याश्या रेल्वेनी नीसच्या उत्तरेला जाणार होतो. इथे नक्की काय बघायचं ते माहिती नसल्याने सरळ शेवटच्या थांब्याला जाऊन परतायचं ठरलं. हा एकंदर प्रवास सहा तासाचा झाला असता. त्यामुळे भल्या पहाटे उठून सकाळी आठची रेल्वे पकडली. तिथल्या तिकीट खिडकीवरच्या बाईला आमची कल्पना काही आवडली नाही. मग तिने सुचवल्याप्रमाणे शेवटी न जाता, मधल्याच एका आँथ्रेवो (Entrevaux) नावाच्या गावापर्यंतचे तिकिट काढले. आँथ्रेवोला एक जुना किल्ला आहे हे ही तिनी सांगितलं. ही रेल्वे बरीच जुनी आहे. रेल्वेचा एकचं मार्ग नदीशेजारून पुढे पुढे जात जातो. आजूबाजूला डोंगर, मधूनच एखादे खेडे असं सुरेख दृश्य होतं. सकाळी लवकर निघाल्याने सूर्य डोंगरामागेच होता. डिसेंबर महिना असल्याने तो तसाही वरती येणार नव्हता. डोंगराच्या ज्या बाजूला सूर्यप्रकाश पडत नाही तिथे बर्फ होता. वरती नदीवर साठलेलं धुकं आणि खाली रुळावर बर्फ अश्या वातावरणात रेल्वे पुढे चालली होती. अधून मधून छोटी छोटी स्थानकं लागत होती. आजूबाजूला फ्रेंच खेडी बघत आम्ही हळू हळू आमच्या गावाकडे पोहचत होतो.
आँथ्रेवो येण्याआधी तो किल्ला दिसू लागला. आँथ्रेवोला उतरणारे आम्ही दोघेच होतो. बाहेर प्रचंड थंडी होती. आधी स्थानकाशेजारच्या उपहारगृहात जाऊन गरम कॉफी (आणि मी गरम वाईन!!) घेतली. त्याने थोडी तरतरी आली तसा समोरचा रस्ता ओलांडून गावात गेलो. गावं अगदी मध्ययुगीन... मागे डोंगरावर किल्ला आणि समोरून वळसा घालून जाणारी नदी या दोन्हीमध्ये वसलेले! या बाजून गावात जायला नदीवर एक जुना दगडी पूल आणि साखळीने खाली पडणारे दोन दरवाजे होते. गावात प्रवेश केल्यावर डावीकडे 'बंद' पर्यटन कार्यालय दिसलं. बाहेर आँथ्रेवोचा नकाशा लावला होता त्याचाच एक फोटो घेतला. तसाच चालत पुढे गेल्यावर गावाचा मुख्य चौक होता. फार काही मोठ्ठा नव्हता. दोन दुकानं... एक उपाहारगृह.. बस. नकाशाप्रमाणे रस्ता शोधत गावाच्या चर्चकडे आम्ही निघालो. गावात अगदीच सामसूम होती. पण लोकं राहतायत हे जाणवत होतं. (अगदीच व्हेनिससारखी भुताटकी नव्हती!) छोट्या गल्ल्यातून पुढे जात जात शेवटी चर्च आलं.
इथेच गावाच्या तटबंदीमधले दुसरे प्रवेशद्वार होते. चर्चमध्ये गेल्यावर कळलं गावात एवढी शांतता का होती ते... आत बहुतेक तो संडे मास का काय असतो ना तो चालला होता. पन्नासएक लोकांसमोर एक पाद्री काहीतरी म्हणत होता. क्षणभर कळेना आत जावं का नको... शेवटी पटकन जाऊन शेवटच्या खुर्च्यांवर बसलो. चर्च बरचं जुनं होतं. उंच छत, रंगीत काचांच्या खिडक्या सगळं बघतच होतो तेवढ्यात सगळे उठले... मागून ऑर्गनचे सूर येऊ लागले आणि त्यांची प्रार्थना सुरु झाली. आम्हीपण उभारलो. पाद्री आता मंचावरून खाली येऊन एक-दोघांशी हस्तांदोलन करत होते. पुढे पुढे येत ते शेवटी आमच्यापर्यंत आले. पाद्री एकदम टिपिकल पाद्री होते! अगदी गुटगुटीत, हसर्या चेहेर्याचे!! मागे प्रार्थना सुरूच होती. त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन करून आमचीपण चौकशी केली. प्रार्थना झाल्यावर एक एक मंडळी जाऊ लागली. पाद्री दारात उभारून प्रत्येकाचा निरोप घेत होते. आम्हीपण पुढे जाऊन चर्च बघितले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर आलो.
आता आम्ही डोंगरावरच्या किल्याकडे मोर्चा वळवला. त्याची उंची पाहता मी एकट्यानेच जायचं ठरलं. सूर्य बऱ्यापैकी वरती आला होता पण हवेत अजून गारवा होताच. दगडी बांधलेल्या रस्त्यांनी जसं जसं मी वरती जाऊ लागलो तसं तसं उकडायला सुरवात झाली. सितादेलापर्यंत पोचलो तेंव्हा जाकीट, स्वेटर काढावा लागला. वरती बऱ्याच खोल्या होत्या. सगळीकडे दिशादर्शक बाण आणि माहिती व्यवस्थित होती. अख्या सितादेलावर मी एकटाच असल्याने जरा वेगळं वाटत होतं.
वरून खाली येताना वर जाणारी काही माणसं दिसली. आधी ठरल्याप्रमाणे बायको मुख्य चौकातल्या उपहारगृहात वाट बघत होती. उपहारगृह खच्चून भरलं होतं. आमचं जेवण येईपर्यंत बराच वेळ गेला. आम्हालाही काही घाई नव्हती. जेवण करून पुन्हा रेल्वे स्थानकावर गेलो तर पुढच्या रेल्वेला अजून बराच वेळ होता. पण बाहेर थंडी अजून वाढली असल्याने प्रतीक्षालयातच बसलो. गाडी साडेसहाला आली आणि परत नीसला पोचायला रात्र झाली.
रात्री नाताळ निमित्त केलेल्या सजावटीचे फोटो काढले.
यावर्षी इथे रशियन बाहुल्यांचं प्रदर्शन देखिल होतं.
तिथेच 'A फॉर डॉक्टर' असला काहितरी रशियन मुळाक्षरांचा बोर्डपण होता.
पुढच्या दिवशी सकाळी कान्न (Cannes) ला जायला रेल्वे पकडली. तसं कान्नमध्ये बघायला काही नाही. चित्रपट मोहोत्सवामुळे या गावाचं नाव झालं. असं म्हणतात की, जेंव्हा चित्रपट मोहोत्सव असतो तेंव्हाच कान्नमध्ये बघण्यासारख काही असतं. पण कान्न काय, पिसाचा मनोरा काय किंवा मोनालिसा काय... कितीही 'हे' असलं तरी आपल्या माहितीतल्या गोष्टी बघण्यातच आपल्याला रस असतो. हा चित्रपट मोहोत्सव जिथे होतो ते 'पॅले दे फेस्टिवल ए दे कॉन्गेस्' (Palais des Festivals et des Congrès)ठराविक दिवशीच उघडे असते. तसाही नुसता हॉल काय बघायचा! आम्ही गेलो तेंव्हा तो बंदच होता. मग त्या समोरच्या 'रेड कार्पेट'वरच फोटो काढले आणि मिनी-ट्रेन घेऊन कान फिरलो.
ती ट्रेन रस्त्यावरून जाणारीच होती. सोबत आजूबाजूच्या स्थळांची माहितीही चालली होती. त्यात कुठलेसे प्रसिद्ध हॉटेल त्यात कोण कोण हॉलीवूड तारे-तारका राहिले होते वै.वै. चालू होतं. पुढे ही ट्रेन थोडासा चढ चढून जुन्या कान्नमध्ये गेली. इथे पुन्हा छोटे रस्ते फिकट रंग दिलेल्या इमारती ई. होते. सर्वात वरती एक चर्च होतं. त्याच्या शेजारून अख्खं कान्न बघायला मिळालं.
टूर झाल्यावर आम्ही जेवण केलं. कान्नजवळ एका बेटावर जंगल कम बाग काहीतरी आहे ते बघायला जायचा बेत होता पण बोटीच्या धाक्यावर जाईपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे तिथे समुद्रकिनारी थोडी टंगळ मंगळ करून नीसला परतलो.
आता उद्या दुसऱ्या देशात जायचं होतं! हो, मोनाको (Monaco) हा जगातला दुसरा सगळ्यात छोटा देश. (पहिला वॅटिकन सिटी). क्षेत्रफळ जेमतेम दोन वर्ग किलोमीटर!! नीसहून रेल्वेनी कान्नच्या विरुद्ध दिशेनी गेलं कि अर्ध्या तासात मोनाको येतं. हे शहर समुद्रकिनारी असलेल्या डोंगरावर वसलेले आहे. त्यामुळे अख्या शहरात बऱ्याच ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जीने आहेत. मोनाको प्रसिद्ध आहे इथल्या फॉर्मुला-१ ग्रॉन् प्री मार्ग आणि मोंटे कार्लो कसिनो साठी. (पार्ल्यानी बिस्कीटाला मोनाको नाव का दिलं मला ठाऊक नाही!) इथेही नेहमीप्रमाणे पहिल्यांदा पर्यटन कार्यालयात गेलो. तिथे बरीच माहिती आणि नकाशे मिळाले. मग बसचे एका दिवसाचे तिकीट काढून (फक्त ३ युरो!!) राजवाड्यात 'चेंज ऑफ गार्ड्स' बघायला गेलो. राजवाडा मुख्य डोंगरापासून वेगळा असलेल्या एका मोठ्या टेकडीवर आहे. बस थांबते तिथेच एक मोठ्ठं मत्स्यालय आहे. हे पण चांगलं आहे म्हणतात. पण आम्ही आत गेलो नाही. या इमारतीच्या मागच्या टेकडीला सरळ कापल्यासारखा कडा आहे, जो सरळ समुद्रात जातो. इथून जुने मिनाको सुरु होते. परत छोटे रस्ते, आकर्षक रंगत रंगवलेली घरं वै. बघत आम्ही राजवाड्यासमोर पोचलो.
राजवाडा काय अगदी लै भारी नव्हता. बाहेर दोन रक्षक पहारा देत होते. बरोबर ११:५५ ला त्यांच्या हलचाली सुरु झाल्या. आतून अजून रक्षक आले. समोरच्या पोलीस मुख्यालयातून ताजे रक्षक आहे. त्यांच्याबरोबर वाद्यवृंद देखील होता. मग त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे जुने रक्षक परत निघून गेले आणि त्यांची जागा नवीन रक्षकांनी घेतली. आम्हीपण नव्या पर्यटकांना जागा करून देऊन उरलेले मोनाको बघायला निघालो.
खालच्या चार फोटोत आख्खा देश येतो!!
जुन्या मोनाकोतून फेरफटका मारला, दुपारची पेटपूजा आटोपून घेतली. पुढे बस घेऊन अनोख्या/विलक्षण बागेत (Jardin Exotique de Monaco) गेलो. ह्या बागेत मुख्यतः निवडुंगाची बरीच वेगवेगळी झाडं आहेत. डोंगर उतारावर नागमोडी वाटा करून आजूबाजूला बऱ्याच वेगवेगळया प्रकारचे निवडुंग लावले होते. कड्यावरून समोर राजवाड्याची टेकडी दिसते.
तसंच उतरत खाली आल्यावर तिथे एक गुहा आहे. दर तासाला त्याची टूर असते. चुनखडीतून पाणी झिरपून तयार झालेल्या या गुहेत उतरायला तीनशे पायऱ्या होत्या. आत सगळीकडून पाणी ओघळत होतं. जसं जसं आत जावं तसं उकडायला सुरवात झाली. त्या क्षारयुक्त हवेचा वास देखील विचित्रच होता. पण मी पहिल्यांदाच अशा गुहेत आलो होतो, त्यामुळे मला चिक्कार आवडली.
आता मोनाको मधलं शेवटाचं ठिकाण, म्हणजे मोंटे कार्लो कसिनो, बघायला आम्ही गेलो. त्याच्यासमोर नाताळनिमित्त चिक्कार सजावट केली होती. तिथे आधी पर्यटकांना आत जाता येतं कि नाही याबद्दल शंका होती. मग चारी बाजूनी चक्कर मारली. सगळ्या भारी भारी गाड्या आजूबाजूला लावल्या होत्या... (त्यातच एक इटुकली स्मार्ट कारपण होती!) मग काही पर्यटकांना आत जाताना बघितल्यावर आम्ही पण आत शिरलो.
प्रवेश फी प्रत्येकी २० युरो होती. आता एवढी गर्दी नव्हती. पहिल्या दालनात सुटाबुटातील लोकं black jack खेळत होते. मी पहिल्यांदाच हे प्रत्यक्ष बघत होतो. त्या खेळाचे नियम मलाही माहिती नाहीत. पण सिनेमात इतक्या वेळेला पाहिलंय कि प्रत्यक्ष पाहताना सिनेमाचे चित्रीकरण बघतोय असंच वाटत होतं. कमीत कमी किती पैसे लाऊ शकता हे प्रत्येक टेबलावर लिहिलेले होते. वीस युरो प्रवेश फी देताना दहादा विचार केला होता, ते आकडे बघितल्यावर तर काढता पाय घेतला. कसिनोची इमारत बरीच जुनी आहे. पूर्वी हे ओपेरा हाउस होते. त्यामुळे भिंतीच काय छतदेखील दगडी मुर्त्या आणि चित्रांनी सजवलेले आहे. (फोटो काढायला बंदी होती) दुसऱ्या दालनात रुलेत (Roulette) होते. इथेही पैसेवाल्यांची चलती होती. एकंदर खेळणाऱ्यांत चिंकी पर्यटक (नक्की कुठल्या देशाचे ते कसे कळणार?!!) भरपूर होते. थोडा वेळ ते बघितल्यावर आम्ही शेवटच्या दालनात गेलो. ते दालन फट असलेल्या यंत्रांनी (Slot Machine) भरलेलं होतं. माझं कसिनोत उडवायचं बजेट ठरलेलं आहे... आख्खे दहा युरो! इथे त्याहून जास्त पैसे प्रवेश करण्यासाठीच द्यावे लागले असल्याने मला अजून पैसे उधळायचे नव्हते.
बाहेर आलो तेंव्हा सगळं मोनाको बघून झालं होतं आणि चिक्कार म्हणजे भयानकच आवडलं होतं. एवढासा देश पण किती वेगवेगळी आकर्षण होती! एक दिवस कसा गेला तेच कळलं नाही. हा एक दिवस आणि कान्नमधला एक दिवस... जमिन आस्मानाचा फरक!!! तरी थंडी असल्याने समुद्रकिनारी आम्ही गेलो नाहीच. रात्री रेल्वेने परत नीसला आलो. उद्या इथला शेवटचा दिवस होता. परवा सकाळी परत घरी निघायचं होतं.
शेवटच्या दिवशी आम्ही कॅसल हिल वर गेलो. वरून नीस आणि सभोवतालचा भूमध्य समुद्र मस्त दिसतो. इथे कोणे एके काळी किल्ला होता. नंतर झालेल्या बऱ्याच लढायांमध्ये तो जमीनदोस्त झाला आता तिथे एक छान बाग केलीये. भरपूर फिरल्यावर जुन्या नीसमध्ये पुन्हा एक चक्कर मारली.
नीसमध्ये अजून एक गोष्ट बाकी होती. परवा रात्री रात्रीच्या नीसचा फोटो घ्यायची संधी हुकली होती. आज मी एकटाच त्या टेकडीवर जाणार होतो. बसनी मधल्याच थांब्यावर उतरलो. खरच निर्मनुष्य रस्ता होता. मधेच एखादा जॉगर टेकडीवर पळत जात होता. बरंच धुकं असल्याने फोटो काही खास आले नाहीत. पण चलता है... नीसचे असेच चांगले चांगले फोटो काय गुगलवर भरपूर मिळतील, त्यापेक्षा माझा अनुभव महत्वाचा!
आता उद्या रेल्वेनी घरी परत! एकंदर खरोखर निवांत मजा करायला यायचं असेल तर नीस उत्तम. भारतीयांना तर खाण्यापिण्याचीही चंगळ आहे. उन्हाळ्यात आलं तर सुर्याहून पिवळं!! या प्रवासात हवामानानी आमची साथ काही दिली नाही. आँथ्रेवोचा एक दिवस सोडला तर बाकी ढगाळ हवा होती. थंडी तर होतीच (डिसेंबरमध्ये उकडायला हे काय ऑस्ट्रेलिया आहे!!) पण मस्त मजा आली.
काही कारणांमुळे फ्रेन्च भाषेतील काही विशेष स्वर (जे इंग्लिशमधे नाहीत) इथे लिहिता आलेले नाहीत. त्या ऐवजी e' (e-acute) , u` (u-grave) असं लिहिलं आहे.
----------------------------------------------------------------------
बोनजुर मादाम ए मिसिअर... (Bonjour Madam et Monsieur) अर्थात, नमस्कार सभ्य स्त्री-पुरुषहो,
फ्रेंच भाषा व लोकांबद्दल जगभरात (म्हणजे इंग्लिश बोलणार्यांमधे) बर्याच
(कान)गोष्टी पसरलेल्या आहेत. त्यातीलच एक त्यांच्या भाषेबद्द्ल. फार गोड
(खरं तर रोम्यांटीक) भाषा आहे म्हणतात. माझा व या भाषेचा कधी संबंध येइल
असं वाटलं नव्हतं. पण जेंव्हा Long Term प्रोजेक्टसाठी फ्रांसला जायचं पक्क
झालं तेंव्हा फ्रेंच शिकण ओघानं आलच.
मी काही फ्रेंचचा 'अभ्यास' केलेला नाही (आणि मराठीचाही!!) पण मला जो काही अनुभव आला ही भाषा शिकताना, तो इथे मांडण्याचा हा प्रयत्न!!
तशी ऐकायला ही भाषा खरोखरच मधुर आहे (तुम्हि म्हणालचं, मग मराठी काय मधूर नाही का?) पण शिकायला फारच अवघड, ते का ते पुढे येइलच. फ्रांसमधे कोणी इंग्लिश बोलतं नाही असं ऐकलं होतं... आता अनुभवही घेतला!! त्यांचपण बरोबर आहे म्हणा, सर्वांना फ्रेंच येत असेल तर दुसर्या कुठल्या भाषेत बोलायला ते मराठी थोडेच आहेत!! बरं ते जाउदे, मी विसरलोच की मला फ्रेंचबद्दल लिहायचय, मराठी बद्दल नाही... पण काय करणार, तुलना ही होणारच.
Champs-E'lyse'es
फ्रेंचबद्दल सर्वात मोठ्ठा आक्षेप म्हणजे, 'ते लिहितात एक आणि बोलतात वेगळच'.
आमच्या बाबतीतलाच एक अनुभव सांगतो, माझ्या फ्रेंच बॉसने 'शोंम्सेलिसे' नामक रस्त्याचे बरेच कौतुक केले (फ्रेंच लोक याला जगातला सर्वात सुंदर रस्ता म्हणतात... मला त्याच्या सौंदर्या बद्दल काही म्हणायचे नाही!!!). आम्हि त्याचे सौंदर्य पाहायला गेलो, पण आम्हाला तो रस्ता काही केल्या सापडेना, तिथेल्या सर्वात मोठ्या रस्त्याचे नाव होते, 'चाम्प्स्-इलिसेस'! दुसर्या दिवशी बॉसला हे सांगितल्यावर तो पण चकित. मग त्याच्या हा घोळ लक्षात आला, दोन्ही उच्चार त्याच रस्त्याचे होते, यानंतर तो जागेची नावं लिहिनुच देतो!!
तर सांगायची गोष्ट म्हणजे, आम्ही केला तो इंग्लिश उच्चार आणि बॉसचा होता
फ्रेंच उच्चार (आणि बरोबरपण हे सांगायला नको). फ्रेंच उच्चारांच्या
नियमांनुसार,
ch - श,
am - एम्,
*s e* - से (Liaison:
साधारणत: शब्दाचे शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर उच्चार करत नाहीत पण
पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर स्वर असेल तर दोन्ही अक्षरे (व्यंजन + स्वर)
मिळुन उच्चार करणे, याला 'लिएसाँ' चा नियम म्हणतात),
e' - ए
असे करुन Champs-E'lyse'es ला म्हणायचं 'शोंम्सेलिसे'!!!
आपल्याकडे कसं, 'क ला काना - का', एकदम सोप्प. फ्रेंचमधे मुळाक्षरं आणि त्यांचे शब्दातले उच्चार यांचा कधी कधी काहीच संबंध नसतो!! जसं 'y' ला 'इग्रेक' आणि 'W' ला 'डुब्लवे' म्हणतात पण शब्दात जर ही मुळाक्षरं आली तर त्यांचा उच्चार तसा होत नाही (इंग्रजी सारखाच होतो). दुब्ल वे म्हणजे डबल व्ही (अर्थात डब्ल्यू)
W ला ड्बल V म्हणतात यावरुन आठवलं, फ्रेंच आकडे पण मजेशिर आहेत.
१ ते १६- (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येक आकड्याला वेगळा शब्द
१७, १८, १९ - dix-sept, dis-huit, dis-neuf, म्हणजे, दहा(आणि)सात, दहा(आणि)आठ, दहा(आणि)नउ!!
२०, ३०, ... ६० - (मराठी / इंग्रजी सारख) प्रेत्येकी वगळे शब्द
२१, २२, ... ३१,..., ६१.. - (मराठी / इंग्रजी सारख) XXवीस / twentyXXX,...
७० - soixante-dix, म्हणजे, साठ(आणि)दहा
७७ - soixante-dix-sept, म्हणजे, साठ(आणि)दहा(आणि)सात !!!
सर्वात विनोदी म्हणजे,
८० - quatre-vingts, म्हणजे, चार(पट)वीस
त्यामुळे,
९९ - quatre-vingts-dis-neuf, म्हणजे, चार(पट)वीस(आणि)दहा(आणि)नउ... ४*२०+१०+९ = ९९... 
spelling आणि उच्चार या बाबतीत स्पॅनिश लोकांना मानलं पाहिजे. 'फुटबॉल' चं spelling होतं, 'futbol' !! बार्सिलोनाच्या मेट्रोमधे पुढच्या स्टेशनचं नाव स्पिकरवर सांगतात, असं पॅरिस मेट्रोत करत नाहीत. पण मग वाटलं, जर तसं केलं तर spelling आणि उच्चार यांच्या तफावतीमुळे बाहेरच्या लोकांचा गोंधळच होइल.
हा घोळ इंग्लिश व फ्रेंच लिपी सारखी (Latin) असल्यामुळेपण होतो. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांचे उच्चार चांगले असतात (शब्द वाचता आला तर!!). आम्हि शब्द बरोबर वाचतो पण उच्चार चुकतो.
उच्चार सारखे आणि अर्थ वगळा:
ही भानगड इंग्लिश मधेपण आहे (dear-deer; meat-meet; right-write वगैरे) पण
तशी कमी प्रमाणात (मराठी/हिंदीत अशी काही भानगड आहे का हो?) फ्रेंचमधे
विचारुच नका...
- ou (किंवा), ou` (कुठे) : दोन्हिचा उच्चार 'ऊ'
- marche (चालणे), marche' (बाजार) : दोन्हिचा उच्चार 'मार्शे'
आणि आजुन बरेच!!
या सगळ्यामुळे माझा तर फारच गोंधळ उडतो... शाळेत असताना स्पेलिंग पाठ
करायच्या नावानी बोंबच होती... मराठीत बरं होतं वेलांटी चुकीची असली तरी
शब्द वाचता तरी यायचा (आणि अर्थपण बदलायचा नाही).. फ्रेंचमधे तर थोडं
स्पेलिंग (किंवा उच्चार) चुकलं की अर्थ बदललाच! हे वरचेच शब्द पाहा ना,
ou (किंवा), ou` (कुठे)
marche (चालणे), marche' (बाजार)
आवाज का शब्दः
अजुन एक वैताग आणणारी गोष्ट म्हणजे, छोटे शब्द. २६ मुळाक्षरं अधिक accented स्वर असताना इतकी कंजुसी का? खालील काही उच्चार पाहा,
आ- a (to have चा एक form)
उ- ou (किंवा), ou` (कुठे)
ए- est (to be चा एक form), et (आणि)
ओ- eau (पाणी)
अं- un (इंग्लिश a सारखं)
ले- lait (दुध)
ने- n' (जन्म)
वरील सर्व गोष्टींमुळे फ्रेंच माणसाशी फ्रेंच बोलणं बरच अवघड होतं (तसं त्याच्याशी इंग्लिश बोलणही सोपं नाही!!). उच्चारातील थोडा फरकही त्यांना कळत नाही. ह्याचं कारण मला वाटतं की आपल्याला कसं कानडी/हिंदी/गुजराथी माणसांनी बोललेलं मराठी(?) पण आपल्याला कळतं तसं ट्रेनिंग ह्या लोकांना नाही मिळत. उत्तर आणि दक्षिण फ्रान्सच्या लोकांच्या उच्चारात बराच जरक आहे असं इथली लोकं म्हणतात (मला नाही माहित!) पण तो तर सोलापुर आणि नागपुरच्या मराठीतला फरक आहे!!
आता तुम्हि म्हणाल मी फ्रेंच भाषेबद्दल सगळच 'नकारात्मक' बोलतोय, पण तसं नाही, काही चांगल्या गोष्टीपण आहेत (मराठी सारख्या!!)
१. कर्ता महत्वाचा:
कर्त्याप्रमाणे विशेषण, क्रियापद सगळ बदलत. इंग्लिश सारख नाही...
विशेषणात इंग्लिश मधे good boy/good girl. मराठीत कसं चांगला मुलगा/चांगली मुलगी, तसच फ्रेंचमधे bon garcon/bonne fille.
आणि क्रियापदाबाबतीत म्हणाल तर, इंग्लिश मधे I go / you go / they go. पण
मराठीत मी जातो / तु जातो(जाते) / ते जातात, तसच फ्रेंचमधे पण Je vais /
vous allez / ils vont.
२. आदरार्थी बहुवचन
मराठी(तु-तुम्ही) / हिंदी(तुम-आप) प्रमाणे फ्रेंचमधेही आदरार्थी संबोधन
आहे. मित्र/जवळची व्यक्ती असेल तर म्हणायच 'त्यु' (tu) आणि आदरणीय/अनोळखी
व्यक्तिसाठी वापरायच 'वु' (vous). इंग्लिशसारख you-you नाही.
३. 'ते', 'तो' आहे का 'ती'?
इंग्लिशमधे बर्याचशा गोष्टी 'it' असतात. मराठीत तसं नाही. त्यामुळे अ-मराठी
लोकं 'तो' का 'ती' मधे गोंधळतात आणि सरळ 'ते' म्हणुन मोकळे होतात. पण
फ्रेंचमधे ती सोय नाही!!! इथे फक्त स्त्रिलिंग आणि पुल्लिंग (म्हणुनच
बहुतेक हे लोक 'रोमँटिक' म्हणुन फेमस आहेत बहुतेक!!!). त्यामुळे नवीन
शिकणार्याची पंचाइत होते. आता हेच पाहा, 'तो' रस्ता यामागे काही logic
आहे? तो सवयीचा भाग आहे. लहानपणी अपोआप ते लक्षात राहातं. पण फ्रेंच
शिकताना यामुळे फार त्रास होतो. वर सांगितल्याप्रमाणे विशेषण पण
कर्त्याच्या लिंगावर अवलंबुन असल्यामुळे तर्क चुकला तर विशेषण पण चुकलच!
ह्या सर्व बाबी इंग्लिशपेक्षा विशेष आहेत, त्यामुळे आमच्या इथल्या फ्रेंच क्लासच्या बाई सारख या गोष्टी सांगत असतात, तेंव्हा त्यांना सांगावसं वाटत की माझ्या भाषेतही या खुबी आहेत!!!
बघितले फ्रेंच आणि मराठीतले साम्य!! या भाषा वाक्यातल्या प्रत्येक अवयवाला न्याय देतात. त्यामुळे इंग्लिश म्हणजे मी तर म्हणेन सोप्पी (simplified) फ्रेंच.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.