सांप्रत-भारताच्या आजूबाजूचा बऱ्याच मोठ्या भौगोलिक प्रदेशातील जनसमुदाय
ऐतिहासिक काळात भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली एक सुसंस्कृत समाज म्हणून
विकास पावला. आज भले ते स्वतःची ओळख वेगवेगळ्या देशाचे/धर्माचे प्रतिनिधी
म्हणून असतील, परंतु वर्तमानातही अन्न, वेश, भाषा, लिपी, कला, स्थापत्य,
वाङ्मय, तत्वज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रथा, पूजाविधी व परंपरा या
सर्वांवर भारतीय संस्कृतीचा ठसा ओळखता येण्याइतका स्पष्ट आहे. यातील
पूर्वेकडच्या काही प्रदेशाचा हा चित्रमय दौरा.
संपूर्ण प्रवासाचा आवाका बराच मोठा होता. ब्रह्मदेश, सयाम, लाओस, व
कंबोडिया या चार देशांचा समावेश होता. त्यापैकी काही देशांवर इथे लेखन
झालेले असल्याने पुनरावृत्ती टाळून लेखाचा मूळ विषय ब्रह्मदेशाभोवती अधिक
ठेउन गरजेपुरती अन्य माहिती समाविष्ट करत आहे. पूर्वी 'पेरू'
वर एक लेखमाला लिहिली होती, त्याप्रमाणेच विस्तृत लेखन करण्याचा मानस
होता, परंतु वेळेअभावी कमी लेखांत शक्य तितका समावेशक दौरा घडविण्याचा
प्रयत्न आहे. काही महिन्यांपासून भारत-थायलँड महामार्गही चर्चेत आहे
त्यामुळे या दोघा देशांच्या मध्ये स्थित असलेल्या या नितांत सुंदर
प्रदेशाविषयीची माहिती असे या लेखाचे प्रयोजन.
ब्रह्मदेश आपला अगदी सख्खा शेजारी. स्वातंत्र्यपूर्व काळात
मद्रास-कलकत्ता-कराची इतकीच मंडले-रंगून ही परिचयाची शहरे होती. परंतु पुढे
काही सामाजिक व राजकीय कारणांमुळे हा भूभाग दुरावला तो कायमचाच...
'आपलेपणाच्या' शिल्लक खाणाखुणांचा मागोवा घेत या समृद्ध प्रदेशातील एकल
प्रवासाचा अनुभव काही स्मृतीचित्रांसमवेत या लेखांद्वारे गुंफण्याचा हा
प्रयत्न.
पूर्वतयारी : एकंदर भौगोलिक आवाका लक्षात घेऊन
बँकॉकला मध्यवर्ती ठिकाण बनवून सारा प्रवास आखला. भारतातून विमानेही बँकॉक
साठी थेट व स्वस्त आहेत हे आणखी एक कारण. माझ्या आराखड्यानुसार
थायलँडमध्ये किमान तीन वेळा येणेजाणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक 'ट्रिपल
एन्ट्री व्हिसा' मिळविण्यास प्रयास पडले. पहिल्यांदा तर 'असा व्हिजा आम्ही
करत नाही' असे सांगून वकिलातीने कागदपत्र परत पाठवून दिली. नंतर साधारण २५
दिवस सततचा पाठपुरावा, त्यांच्याच वेबसाईटचे दाखले व दिल्लीतील
दूतावासाकडून मिळालेली मदत यामुळे शेवटी काम झाले. वेगवेगळ्या देशांना भेटी
देत असल्याने तांत्रिकदृष्ट्या मला 'ट्रिपल एन्ट्री ट्रांझीट व्हीझा'
मंजूर झाला.
(टीप : थायलँड 'ऑन अरायव्हल' सुद्धा व्हिसा देतो, परंतु त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे तीन तीन वेळा असा वेळेचा अपव्यय न करण्याचा योग्य सल्ला त्यांच्या दूतावासाकडून मिळला व तो अतिशय उपयोगी ठरला.)
ब्रह्मदेश व कंबोडिया दोन्ही देश ई-व्हिसा देतात. साधारण दोन ते पाच दिवसात
ईमेल वर उत्तर येते. ब्रह्मदेशाचा ईव्हिसा मात्र केवळ मंडले व रंगून या
दोन टिकाणी आगमन होणार असेल तरच मिळतो. बाकी कुठूनही देशात जाण्यासाठी
रीतसर दिल्लीहून आधी व्हिसा करावा लागतो.
ब्रह्मदेश : सद्य
भौगोलिक सीमांनुसार हा प्रदेश भारत व चीन यांच्या मध्ये स्थित आहे.
(सांप्रत चीन व भारत यांची लांबवर समाइक सीमा हि खरी तिबेट सीमा आहे).
सांस्कृतिक चीनचा भारताशी संबंध या भूमीवर आला व हा मिलाफ आजही पहावयास
मिळतो. स्वतंत्र भारताची अरुणाचल प्रदेश, नागलँड, मणिपूर व मिझोरम हि
राज्ये ब्रह्मदेशास लगत आहेत. खरी छिंदविन नदी हि नैसर्गिक सीमा, परंतु
नेहरूंच्या अनेक कृपाकर्तव्यांपैकी एकामुळे इथला नाग जमातींचे पूर्वापार
वास्तव्य असलेला बराच भूभाग ब्रह्मदेशाच्या हद्दीत गेला. छिंदविन नदी पुढे
इरावतीस जाऊन मिळते. इरावती हि ब्राह्मदेशाची जीवनरेखा. हिमालयातून उगम
पावून अनेक महान संस्कृतींच्या विकासास आधार ठरणाऱ्या सिंधू, गंगा,
ब्रह्मपुत्र, इरावती, साल्विन, मेकॉंग, यांग्त्झी व हॉंगहे या
महानद्यांपैकी पहिल्या चार भारतीय संस्कृतीच्या मातृका होत तर पुढच्या चार
पौर्वात्य संस्कृतीच्या. ब्रह्मदेशाच्या बहुतांश प्राचीन राजधान्या व
संपन्न शहरे ईरावतीच्या काठीच आहेत.
प्रवासाचा आराखडा:
प्रवास रूपरेखा : आधी लिहिल्याप्रमाणे, थायलँड प्रवासाचे तीन भाग केलेले
होते. भारतातून प्रथम बँकॉक गाठले व त्यातील पहिला भाग 'शहरी पर्यटन /
नैशाचारी पर्यटन' पूर्ण करून ब्रह्मदेशाकडे प्रस्थान ठेवले. मंडले हा
प्रवासातील सर्वात उत्तरेकडचा बिंदू. तिथून सुरुवात करून क्रमाक्रमाने
दक्षिणेस येत रंगून वरून पुनश्च बँकॉक, पुढे थायलँड भाग दुसरा 'ऐतिहासिक
हिंदू-बौद्ध नागरी पर्यटन' तिथून पूर्वेकडे कंबोडिया प्रवास, पुनश्च
थायलँड, भाग तीन, 'अतिउत्तर सीमावर्ती ग्रामीण पर्यटन' पुढे लाओस व शेवटी
घरी परत असा एकंदर आराखडा…

गेल्या वर्षी उन्हाळ्यात ईशान्य भारतात प्रवास केला होता तेव्हा मणिपूर
च्या सीमेवर ब्रह्मदेशाची प्रथम ओळख झाली. तेथे भारत-ब्रह्मदेश मैत्री
करारानुसार १६ मैलांपर्यंत दोन्ही बाजूंच्या नागरिकांना एकमेकांच्या हद्दीत
मुक्त प्रवेश आहे. मी आसाम, त्रिपुरा, नगालँड, मणिपूर असा भटकत सीमेवरच्या
'मोरे' गावातून तिथल्या अधिकाऱ्याचे सही-शिक्क्याचे पत्र घेऊन 'तामू' या
ब्रह्मदेशाच्या हद्दीतल्या गावास भेट देऊन आलो. या देशाविषयी कुतूहल
निर्माण झाले ते तेव्हा. तोही प्रवास अत्यंत रोमांचक होता, त्याविषयी
पुन्हा कधी…
तर मग, ब्रह्मदेशात प्रवेशास तयार?
बँकॉकहून सकाळचे थेट विमान घेऊन मंडले येथे उतरलो. ईव्हिसा होताच,
इमिग्रेशन, स्थानिक चलन व सिमकार्ड असे प्राथमिक सोपस्कार पार पाडून एअर
एशिया च्या शटलने शहराकडे प्रस्थान. विमानतळ नवीन असल्याने बराच लांब आहे,
परंतु एअर एशिया त्यांच्या प्रवाशांशाठी मोफत शटल चालवते. एक उत्तम
एकल-प्रवासी / बॅकपॅकर होस्टेल आरक्षित केलेलं होतं तिथे समान टाकून जुन्या
शहराकडे कूच केली. (उत्तम अशासाठी : शहराच्या मध्यवर्ती भागात, भोवती
खायची प्यायची उत्तम सोय, स्वस्त मिक्स डॉर्म, भाड्याने सायकल, कपडे
धुवायची फुकट सोय (वॉशिंग मशीन), गरम पाणी, न्याहरी फुकट व उत्तम कर्मचारी.
दोस्तही खूप चांगले मिळाले, बहुतांश 'कल्चरल शॉक' पचवत असलेले युरोपीय…
(एकल प्रवाशांसाठी; राहण्याची जागा मी अशी निवडतो. डॉर्म स्वस्त व नवे
मित्र बनविण्यास उत्तम, TripAdvisor व Agoda ही उत्तम माध्यमे) )
ब्रह्मदेशातील बहुतांश जुनी शहरे चौरसाकृती असून उंच संरक्षक भिंती व खोल
खंदकांनी संरक्षित असत. मंडलेही असेच एक. आता शहरीकरण वाढल्याने या
चौरसाच्या बाहेरही दहा पट विस्तार झालेला आहे पण जुन्या शहराच्या कवचामुळे
त्याचा वेगळेपणा टिकून आहे. तटबंदीच्या आत जुना राजवाडा अलीकडेच पुन्हा
बांधून काढण्यात आला. ब्रह्मदेशाची ही शेवटची राजधानी. ब्रिटीशांनी राज्य
खालसा केल्यानंतर इथल्या 'थिबा' राजाला नजरकैदेत रत्नागिरीला ठेवण्यात आले,
तेव्हापासून इथली राजेशाही खंडित झाली. उत्कृष्ठ प्रकारचे सागवानी बांधकाम
इथे पहावयास मिळते. तिथेच एका इतिहासप्रेमी स्थानिक तरुणाशी ओळख झाली,
पुढे त्याच्या दुचाकीवर आम्ही गावभर हिंडलो. जुन्या शहरातला मुळ राजवाडा
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या स्फोटकांमुळे उद्ध्वस्त झाला. याच परिसरात
मंडलेचा तुरुंगही होता.
पुढे महामुनी बुद्धाच्या दर्शनाला गेलो. मंडले मधील सर्वात प्रसिद्ध
धर्मक्षेत्र. इथे बहुतांश मोठ्या बौद्ध मंदिरांत मूर्तीला सोन्याच्या तलम
पत्र्यान्द्वारे मुलामा देण्याची प्रथा आहे. हे स्थान विशेष प्रसिद्ध
असल्याने अनेक शतकांमध्ये अशा अर्पण केलेल्या सोन्यामुळे मूळ मूर्तीचा आकार
सर्व बाजूंनी किमान सहा इंच वाढला आहे. मूळ मूर्ती बुद्ध काळातील असून वजन
कैक टनांमध्ये आहे.
या मंदिराव्यतिरिक्त 'चुकवू नये असे काही' म्हणजे कुथोडाव पॅगोडा, इथे
संपूर्ण त्रिपिटक ग्रंथ ४-५ फुटी ७२९ शिलपट्टिकांवर कोरून मुख्य
स्तुपाभोवती छोट्या छोट्या घुमट्यांमध्ये स्थापन केला आहे. 'जगातील सर्वात
मोठे पुस्तक' म्हणून याची ओळख आहे.
दुसरे स्थान म्हणजे 'श्वेनंदाव विहार', मूळ राजवाड्याचे काही भाग वापरून
बांधलेली हि इमारत आज प्राचीन ब्राह्मदेशाच्या स्थापत्य वैभवाचा एकमात्र
शिल्लक नमुना आहे. उत्कृष्ठ सागवानी बांधकाम व सुंदर कलाकुसर यासाठी हि
इमारत प्रसिद्ध आहे. तासंतास बघत राहावे असे शिल्पवैभव! फोटो फार न्याय देऊ
शकणार नाहीत, परंतु झलक सुद्धा मुग्ध करणारी आहे.
तिसरे म्हणजे मंडले हिल, उत्तरेकडे असलेली हि पर्वती सारखी छोटी टेकडी.
इथून शहराचे दृश्य फार सुंदर दिसते. शिखरावर काही बौद्ध मंदिरेही आहेत.
चित्र दालन :
मंडले चा नकाशा आवर्जून पाहण्यासारखा, खंदकासहित जपलेले जुने नगर
उत्तरेकडे, सुनियोजित विस्तार, समांतर रस्ते, सर्व रस्त्यांना क्रमांक ई.
विशेष, आशियायी जुन्या शहरात दुर्मिळ…

जुने मंडले


राजप्रासाद (पुनर्रचित)



महामुनी बुद्ध मंदिर





सुवर्णलेपित बुद्ध मूर्ती
कुथोडाव पॅगोडा


श्वेनंदाव विहार
प्रवेशद्वार




सागवानी कोरीवकाम

सागवानी कोरीवकाम व स्थानिक पर्यटक
मंडले हिल
[अवांतर १ : मंडलेशी मराठी मनाचं नातं आहे ते टिळकांच्या या शहराशी
संबंधित कार्यामुळे. अंदमान प्रमाणे 'तीर्थक्षेत्र' ही माझी वैयक्तिक
भावना! ६ वर्षे टिळक येथे कारागृहात होते. येथेच त्यांनी 'गीता रहस्य' हा
महान मराठी ग्रंथ लिहिला. गेल्या वर्षी या ग्रंथाच्या प्रकाशनाचे शतकी वर्ष
होते, त्यामुळे या ठिकाणी जाण्याचे एक वेगळे महत्वही होते. येथील भारतीय
दूतावासाकडे टिळकांच्या स्मृती येथे कुठल्याही स्वरुपात जपल्या आहेत का?
अशी विचारणा केली असता, पहिले 'कोण तुम्ही?' असा उद्दाम प्रतिसाद, परंतु
नंतर सविस्तर ईपत्र देवघेविनंतर सध्यातरी असे कोणतेहि स्मारक अथवा
स्मृतीदर्शक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात त्यासाठी आपला तेथील
प्रमुख दूतावास, आपले परराष्ट्र खाते या सगळ्यांनाही आमच्या ईपत्र संभाषणात
बोलवावे लागले... हेतू हाच, की भविष्यात तरी किमान हे प्रत्यक्षात यावे.
विशेषतः आपण ज्या प्रकारे थिबा राजाचा निवास जपलेला आहे, ते लक्षात घेता…
टिळकांनंतर सुभाषचंद्र बोस देखील मंडलेशी काही काळ निगडीत होते.
अवांतर २ : नगराचे नाव संस्कृतोद्भव, 'मंडल' वरून स्थानिक भाषेत मंडले/मंदले/मंटले असेच आहे (बोली प्रमाणे उच्चार भिन्नता). ‘मंडाले’
हा सांप्रत भारतीय रूढ उच्चार अयोग्य आहे. गीता रहस्याच्या प्रस्तावनेतही
टिळक ' मन्दले' असेच लिहितात. पुढे कधीतरी याचे अपभ्रष्ट रूप रूढ झाले ते
कायमचेच.]
लेख आणि छायाचित्रे आवडली
टिळकांनंतर, सुभाषचंद्र बोस
माझ्या आंजा वरील माहितीनुसार जपानी आक्रमण मयन्मारच्या लोकांना आवडलेले नव्हते, सुभाषचंद्र बोसयांचा उल्लेख त्यांना कितपत खटकू शकतो याची कल्पना नाही. शिवाय बर्मात राहणारे भारतीय वंशाच्या स्थानिक हिंदू व्यापार्यांनी स्वातंत्र्यपुर्व काळा पर्यंत केलेले व्याज व्यवहारामुळे स्थानिक जनतेत भारतीय वंशाच्या स्थानिक हिंदू बद्दल नाराजी असावी. शिवाय आपले रास्वसंघाच्या काही अंखडभारत नकाशात बर्मा सहीत पुर्व आशीयाचा भाग दाखवला जात असावा आणि त्यावरुन चीन आणि पाकिस्तानी डिप्लोमॅट्स भारताविरुद्ध वातावरण निर्मिती करत असावेत. (चुभूदेघे)
बाकी इमेल चर्चेतून टिळकांच्या मन्डले निवासाचा काही पत्ता लागला का ? मला वाटते बहादूर शहा जफर थिबा प्रमाणे मंडलेत राहीला होता.
* शेवटी आपल्या लेखात जे दोन उल्लेख आले आहेत त्या अनुषंगाने आमची धागा जाहीरात
**"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?
** लोकमान्य टिळकांचे साहित्य विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे
१. जपानचे पूर्व भारतावरील आक्रमण : महायुद्ध काळात कोण कोणाविरुद्ध आणि कोणासाठी लढले यात आपल्याकडे देखील कुठे स्पष्टता आहे… ईशान्य भारतात सुभाष बाबू व जपान्यांविरुद्ध लढणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या स्मृती अगदी उत्तम मोठमोठ्या कबरस्तानात जपल्या आहेत आणि खुद्द नेतजींसह अनेक सैनिकांचे काय झाले कोणाला माहितीही नाही… कोहिमा व इम्फाळ (कोमिल्ला सुद्धा) येथील वर्ल्ड वॉर सिमेटरि बघताना फार दु:ख वाटले. काही मराठी नावेही दिसली याद्यांमध्ये, अर्थात ब्रिटीशांकडून लढ्लेल्यांची… असो, ब्रह्मदेशाचा पारंपारिक शत्रू थायलंड जपान्यांबरोबर असल्याने व इतरही कारणांनी ते त्यांना म्हणता तसे आवडले नाही हे सत्य
२. म्यानमार जनतेची पश्चिम-भारतीयांविषयी भावना : एके काळी रंगूनची अर्धी अधिक लोकसंख्या पश्चिम-दक्षिण भारतीय होती, महायुद्ध काळात बरेच परत आले. पुढे साठच्या दशकात सैन्यसत्ता आल्यानंतर वंशवाद पुन्हा उफाळून आला व मोठ्या संख्येने लोकांनी स्थानांतर केले. आजही मणिपुरच्या सीमेवर कैक हजार तमिळ भाषिक स्थायिक आहेत, ब्रह्मदेशातून पायी पश्चिमेकडे यायला निघालेले… (असा प्रांतवाद आजच्या महाराष्ट्रालाही नवीन नाही, त्यामुळे त्यांनाही नावे का ठेवा… आपलेच बंधू ते…(वैषम्य)) सध्या २ टक्के लोक पश्चिम भारतीय वंशाचे आहेत.
३. रास्वसंघ, अंखडभारत इ. : संघाचे विस्तृत कार्य या देशात आहे. आपल्याकडेच संघाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या लोकांची कमी नाही त्यामुळे तिथेही काही लोक असतील तर त्यात नवल नाही, त्यासाठी चीन/पाकिस्तान यांना काही वेगळे कष्ट घ्यावे लागत असतील असे वाटत नाही (स्वल्प उपहास, क्षमस्व).
४. टिळकांचा मन्डले निवास : जुन्या शहरातील कारागृह तर संपूर्ण नष्ट झालेला आहे, तसेच त्यांना ज्या स्वतंत्र निवास स्थानात ठेवले होते तोही कालौघात नाश पावला. पूर्वी तेथे एक फलक असे पण आता तोही नाही.
५. बहादुरशाह : बहादुरशाह झफ़र हा रंगून मध्ये नजरकैदेत होता व तिथेच त्याचे निधन झाले. अलीकडे त्याची कबर 'मिळाल्यानंतर' त्यावर दर्गा वगैरे बांधण्यात आला पण त्याचीच ही कबर याबद्दलची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.
मंडलेहून छोट्या बसने साधारण ४ तासांच्या अंतरावरील ह्या पुरातन
राजधानीच्या ठिकाणी मुक्काम हलवला. हा या लेखमालेचा मुख्य गाभा होय. या
स्थानाविषयी लेखन करायची इच्छा होती म्हणून हा प्रपंच. तुमच्यापैकी काही
जणांना माहिती असेलही, परंतु बव्हंशी हे स्थान अपरिचित आहे. आणि इतके आफाट
सुंदर असूनही अपरिचित असावे ही आश्चर्यभावना या लेखाची जननी होय. असो…
संक्षिप्त इतिहास : मूळ पुरातन नाव 'अरिमर्दनपुरं', पाऴी भाषेत 'अरिमद्दन',
स्थानिक भाषेत 'पुगं' आणि आंग्ल 'बगान'. या स्थानाचा भरभराटीचा काल हा
साधारण नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत. उर्वरित जगात मंगोल हैदोस
घालू लागले तेव्हा भारत तुलनेत जवळ असूनही अनेक कारणांनी त्यांच्या
आक्रमणापासून सुरक्षित राहिला. परंतु त्याच सुमारास बगान चे राज्य कमजोर
होत गेले व अतिपुर्वेकडे ब्रह्मदेशात मंगोल घुसले. ते बगान पर्यंत कधीच
पोहोचले नाहीत, तरीही सततच्या युद्धाने राज्य खिळखिळे होत शेवटी या शहराचे
महत्व कमी होत एका पुरातन तीर्थस्थानाइतकेच उरले. (पुढे कायमच उत्तर व
दक्षिण ब्रह्मदेशात वेगवेगळी सत्तास्थाने निर्माण झाली, पण बगान नंतर तितके
शक्तिशाली राज्य पुढे तीन शतके झाले नाही. पुढे 'हंसवती' साम्राज्याने
पुन्हा सर्व भूभागाचे एकत्रीकरण केले ज्यात त्यांनी थायलँड चे 'अयुत्थया'
राज्य बुडविले व उत्तरेकडे मणिपूर सुद्धा जिंकले.)
इरावतीच्या काठी वसलेले हे महानगर निश्चये जागतिक स्थापत्य आश्चर्यांपैकी
एक! १०० चौकिमी पेक्षाही अधिक विस्तृत भूभागावर हे महानगर पसरलेले होते.
इथल्या संपन्न जनतेने अनेक मंदिरे व स्तूप या ठिकाणी बांधले, १०,००० हूनही
जास्त संख्येने असलेली ही पूजास्थाने या शहराची संपन्नता व सौंदर्य यांची
कीर्ती दूरवर पसरवत असतील यात शंका नाही. शतकांनंतर आज सुमारे २२००
बांधकामे शिल्लक आहेत, परंतु तेवढीही मूळ वैभवाची कहाणी समर्थपणे सांगत
दिमाखात उभी आहेत. आज हा संपूर्ण भूभाग संरक्षित करण्यात आलेला आहे. येथे
अनेक हिंदू मंदिरेही होती परंतु आता निश्चित ओळखण्यासारखे एकच विष्णूमंदिर
शिल्लक आहे. लहानमोठ्या आकाराची विविध शैलीतली अशी शेकडो मंदिरे
क्षितिजापर्यंत पसरलेली पाहणे हा अनोखा अनुभव. पुरातत्वशास्त्र
प्रेमींसाठी तर मेजवानी, स्थापत्य उत्क्रांती विशेष अभ्यासनीय! मूळ
अमरावती-नागार्जुन (आं.प्र.) स्तुपावर आधारित बौद्ध शैली व नागरी हिंदू
मंदिर स्थापत्य दोन्हीचा ब्राह्मी पद्धतीने समांतर विकास तर कुठे मिलाफ
पहावयास मिळतो. विविध काळातील मंदिरे कमी अंतरावर पहावयास मिळत असल्याने
असा तौलनिक अभ्यास सोपा व फार मजेदार आहे.
हि सर्व मंदिरे मातीच्या विटांनी बांधलेली आहेत त्यामुळे नैसर्गिक लाल रंग
हिरवाईत उठून दिसतो. सूर्योदय व सूर्यास्ताचे रंग अजूनच सौंदर्य खुलवतात.
काही महत्वाची मंदिरे पांढऱ्या रंगात रंगवलेली आहेत तर काही सोन्याने
मढवलेली आहेत, वेगवेगळ्या कोनातून मंदिरसमुच्चयाची येथील दृश्ये खासच!
आधुनिक काळात पर्यटन विभागाने हॉट एअर बलून सेवा सुरु केली आहे, त्यामुळे
एका वेगळ्या अनुभवाचा आनंद पर्यटकांना घेत येतो. एका खासगी हॉटेल ने एक उंच
मनोरा बांधून अजून एक सोय केली आहे. दूरवर पसरलेला ईरावतीचा प्रवाह, व नजर
जाईल तिथवर पसरलेली सुंदर कलात्मक मंदिरे असे किती साठवू नि किती नको असे
करून सोडणारे दृश्य!
आता पर्यटन वेगाने वाढत आहे, सोयी सुद्धा आता जागतिक दर्जाच्या उपलब्ध
आहेत. सवयीप्रमाणे येथेही एका हॉस्टेलवर राहिलो, तेथेच मंडलेला भेटलेला
स्वीडिश मुलगा परत भेटला, आम्ही दोघे व अन्य एक-दोन असे ई-बाईक भाड्याने
घेऊन रोज नव्या दिशेने जात असू. हजारो मंदिरे असल्याने कोठे काय बघायचे हा
अभ्यास करून जाणे फायद्याचे ठरते. काही मंदिरे भव्यतेसाठी, तर काही
कलाकुसरीसाठी विशेष. काही मंदिरांमध्ये भित्तिचित्रेही आहेत तर काही
मंदिरांमधून सभोवतीचे दृश्य अतिशय मनोहर दिसते. त्यामुळे कुठले मंदिर
सुर्योदयास पहायचे, कुठून सूर्यास्त चांगला दिसतो, कुठे गर्दी अधिक असते
इत्यादी गोष्टींचा अभ्यास असला तर वेळ वाया न घालवता सर्वोत्तम ते पाहता
येते. वैयक्तिक अनुभवात साधारण दोन महिने या चारही देशांच्या अभ्यासासाठी
दिले, त्यातील निम्मा वेळ बगान व अंगकोरलाच लागला. परंतु 'याची देही याची
डोळा' पाहण्याच्या गोष्टींच्या यादीतील एक, अतिशय मनसोक्त आनंद घेऊन
यादीतून वजा केली. असो… शब्दांना मर्यादा घालतो चित्रेच अधिक बोलतील…
छोट्या समूहापासून सुरुवात
हि चित्रे म्हणजे केवळ एक झरोका
लाल विटांची मंदिरे, अनेकविध शैलीतील मंदिरे असली तरी चित्रातील मंदिर हे खास बगान शैलीतील म्हणता येईल. बहुतांश मंदिरे पुढे यासारखी बांधण्यात आली
काही प्रमुख मंदिरे
आनंद मंदिर : बौद्धमतानुसार एकुण २८ पैकी सध्याच्या युगात ४ बुद्ध होऊन गेले. काश्यप, काकुसंध, कोणागमन व गौतम या चारही बुद्धांच्या सुवर्णलेपित भव्य मूर्ती या मंदिरात आहेत. मंदिराचे बांधकाम सममित व भव्य आहे.
आनंद मंदिर

बुद्धमूर्ती: अनुक्रमे गौतम, काकुसंध, कोणागमन व काश्यप
लोकानंद मंदिर

महाबोधी मंदिर : भारतातील महाबोधी मंदिराची प्रतिकृती.
महाबोधी मंदिर
धम्मयंग्यी मंदिर : ब्राह्मी पिरॅमिड म्हणता येईल अशी रचना, येथील सर्वात मोठे मंदिर
धम्मयंग्यी मंदिर
श्वेझिगोन पागोडा : संपूर्ण सोन्याने मढविलेला पागोडा, बुद्धाचा दात व अस्थीखंड येथे जतन केला असल्याने अतिशय महत्वाचे तीर्थस्थान. 
विविध काळातील स्तूप
सुरुवातीच्या काळातील मंदिर, हिंदू मंदिराचा साचा
सुलामनी मंदिर : विकसित ब्राह्मी शैली
हिंदू मंदिरातील आदिनारायण मूर्ती
हिंदू देवता
धम्मजायिका स्तूप
पुरातन भित्तीचित्राचे उदाहरण
सुर्योदयाचे रंग
सुंदर व नेटके मंदिर समूह 

दूरवर पसरलेल्या या पुरातन मंदिरनगरीची काही मनोहर दृश्ये



राजप्रासाद (अर्वाचीन)
बौद्ध विहार
ई-बाईक त्रयी, हॉलंड चा हम्झा, स्वीडिश जॉन व मी. येथे भटकण्याचे उत्तम व स्वस्त साधन
इरावतीचे विशाल पात्र
इरावतीचे विशाल पात्र
इरावतीच्या काठी सूर्यास्त
शेवटी, काही विशेष चित्रे. तंत्रसहाय्य, नेमकी वेळ व नेमके ठिकाण या
सर्वांचा समन्वय झाल्याने विशेष. खास छपाई साठी असल्याने रॉ रंग गडद
करण्यात आले आहेत. मोठ्या आकारात खरी मजा



अवांतर १ : बगान येथील मंदिरे पाहण्याचा उत्तम मार्ग हॉट एअर बलून
असला तरी तो प्रचंड महाग आहे. ३००$ एका फेरीसाठी लागतात. अर्थात, उगा
विमानातून कुठेतरी उडी मारायलासुद्धा इतकेच पैसे मोजावे लागतात, त्यापेक्षा
हा अनुभव नक्कीच कैक पटींनी सुंदर व वसूल आहे.
अवांतर २ : बरीच
चित्रे मोठ्या आकारात बघण्यात मजा आहे, विशेषतः "सुंदर व नेटके मंदिर
समूह" या विभागातील. तेव्हा अशा चित्रांवर राईट क्लिक द्वारे प्रॉपर्टिझ
मधून लिंक घ्या व नवीन ब्राउझर मध्ये वेळ असला तर आवर्जून पहा.
मंडलेहून चालू झालेला ब्रह्मदेश प्रवास इरावतीच्या काठाने दक्षिणेकडे
ग्रामीण भागातून बगानमार्गे आता अंतिम टप्प्यात आला. बगानहून रंगून
रात्रभराचा प्रवास आहे, बस व रेल्वे दोन्ही मार्ग उपलब्ध असले तरी बस अधिक
आरामदायक व वेगवान माध्यम.
रंगून किंवा यांगॉन ब्रह्मदेशातले सध्याचे सर्वात मोठे व महत्वाचे शहर.
दशकभरापूर्वीपर्यंत देशाची राजधानी; २००६ मध्ये ती नेयपीटाव येथे हलविण्यात
आली. तसे तुलनेत आधुनिक शहर. ब्रिटीश काळात मुंबई कलकत्त्याप्रमाणे याही
शहराचा नियोजित विकास झाला व त्या काळातील अनेक इमारती आजही दिमाखात उभ्या
आहेत. काही भागात तर अगदी मुंबईत असल्यासारखेच वाटते. स्थानिक बमार व मॉन
तसेच पश्चिम भारतीय, चीनी, थाई अशा अनेकविध रंगांत रंगलेले महानगर म्हणजे
रंगून!
देशाच्या दक्षिण मध्य भागात इरावतीच्या मुखाजवळ वसलेल्या या शहराचे महत्व
वाढले ते उपयुक्त व संरक्षित बंदर म्हणून. ब्रिटीश काळात अधिक विस्तार
झाला, पण त्याआधी जवळील बागो (जुने नाव हंसवती), मंडले व अमरापूर यांना
अधिक महत्व होते. तसा स्थानिक इतिहास बुद्ध काळापर्यंत मागे जातो, विशेषतः
येथील धर्मस्थळांचा इतिहास समृद्ध आहे. श्वेडगॉन हे देशातील सर्वात
महत्वाचे धार्मिक स्थान हा रंगून चा केंद्रबिंदू. पूर्वोद्धृत चार
बुद्धांच्या जीवनाशी निगडीत काही वस्तू (रेलीक्स) येथे जतन करण्यात आल्या
आहेत त्यामुळे या स्थानाला बौद्ध धर्मात अतिशय महत्व आहे. त्याविषयी अधिक
लेखन चित्रांसमवेत… विपश्यना अध्यात्मपद्धतीचे आधुनिक प्रवर्तक सत्यनारायण
गोएंका यांनी रंगून येथेच त्यांच्या कार्याची सुरुवात केली व पुढे भारतात व
नंतर जगभर कार्यविस्तार केला.
द्रविडभाषिक अनेक दक्षिण भारतीय मूळाचे लोक रंगून मध्ये राहतात. कालिकेचे
एक सुंदर मंदिरही जुन्या भागात आहे. एके काळी रंगूनची अर्धी अधिक जनता
परप्रांतीय, विशेष करून पश्चिम व दक्षिण भारतीय होती. साठच्या दशकात
सैन्यसत्ता आल्यानंतर बरेच लोक विस्थापित झाले तर काही करण्यात आले. आज
काही भागात व काही वर्गात या लोकांचे प्राबल्य आहे.
देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून रंगून चे महत्व आहे. उत्कृष्ठ प्रतीचा
चहा, सागवानी लाकूड व त्यावरील कोरीवकाम तसेच उच्च प्रतीच्या माणिक, जेड व
अन्य रत्नांसाठी ब्रह्मदेश प्रसिद्ध आहे. बहुतांश उत्पादन स्त्रोत व खाणी
या उत्तर व पूर्व भागात असल्या तरी बाजारपेठ रंगून मध्ये आहे. येथील
रत्नसंग्रहालय जरूर भेट देण्यासारखे आहे, खरेदीसाठीही विश्वसनीय आहे.
पुढील भागात ब्राह्मी लोकजीवनाची धावती ओळख!
* या भागात एका छोट्या 'रत्नजडीत' विभागासाठी देवस्थानाच्या आंतरजालावरील चित्रांचा वापर करण्यात आला आहे.
रंगून शहर, ठळक उठुन दिसणारा श्वेदगॉन स्तूप
रंगून महापालिका भवन
रंगून स्वातंत्र्य स्मारक

रंगून स्वातंत्र्य स्मारक
रंगून न्यायपालिका

ब्रह्मदेशाच्या राजमुद्रेवरील सिंह
श्वेडगॉन पॅगोडा : पूर्व द्वार प्रथम दर्शन
श्वेडगॉन पॅगोडा : मुख्य स्तूप हा छोट्या टेकडीवजा उंचवट्यावर असून चारही दिशेने असे प्रशस्त जिने बांधण्यात आले आहेत
रचना : मुख्य स्तूप हा छोट्या ६४ स्तूपांनी वेढलेला आहे. त्याही बाहेर चार
दिशांना चार स्तूप आहेत. एकंदर रचना ही मंडल यंत्रा प्रमाणे आहे. 
रचना : स्तूपाचे तीन मुख्य भाग. एकूण उंची ९९ मीटर
श्वेडगॉन पॅगोडा : मुख्य स्तूप
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा मार्ग, डाव्या बाजूस बोधीवृक्ष
प्रदक्षिणा मार्ग
दैनंदिन
पूजा परंपरा : प्रत्येक वारासाठी एक अशा मूर्ती येथे स्थापन केलेल्या
आहेत. त्या त्या दिवशी त्या त्या मूर्तीवर अभिषेक करण्याची पद्धत आहे.
(सोनटक्क्याच्या फुलांचे हार… अहाहा काय दरवळ!)
छतावरील नक्षीकाम
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
श्वेडगॉन पॅगोडा : भित्तिचित्र
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
छतावरील नक्षीकाम
श्वेडगॉन पॅगोडा : रात्रीचे दृश्य

श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील छत्र, ध्वज व शिखा

श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील सुवर्णध्वज ५ फुट लांबीचा आहे. त्यावरील अत्यंत नाजूक व मनोहारी रत्नजडीत नक्षी

श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील सुवर्णशिखा एकूण १४१ किलो सोने, ४५०० हिरे व अन्य मौल्यवान रत्ने जडवून बनवलेली आहे. मध्यभागातील सर्वात मोठा हिरा ७६ कराट वजनाचा आहे
सुंदर कांडॉग्यी सरोवर
कांडॉग्यी सरोवर व पुरातन राजप्रासाद
राजनौका प्रतिकृती
ब्रह्मदेशाविषयी काही विशेष माहिती या भागात. एकंदर फिरण्यासाठी हा देश
सुंदर आहेच त्याचप्रमाणे सामान्य जीवनातील सांस्कृतिक पैलूही विशेष
अनुभवण्यासारखे आहेत. लेखमालेचे नाव 'बृहन्भारत' असण्याचे हे कारण, या सर्व
प्रदेशाचा भारताशी असलेला अतूट संबंध अशा अनुभवात अधोरेखित होतो. भौगोलिक
सीमा या सतत बदलतच असतात परंतु सीमांपलिकडे जगातील एका महान संस्कृतीच्या
प्रभावळीने सजलेल्या लोकजीवनाचे हे सहज परंतु शक्य तितक्या वेगवेगळ्या
बाजूंनी दर्शन.
धर्म : हिंदू-बौद्ध संस्कृतीचा जिवंत मिलाफ
म्हणजे ब्रह्मदेश. बौद्ध धर्माचे प्रमुख तीन पंथ, महायान सर्वात मोठा व
इराण च्या पूर्वेकडे सर्वत्र कमी अधिक प्रमाणात टिकून आहे. वज्रयान
उत्तरेकडे तिबेट मंगोलिया चीन कोरिया येथे विकास पावला. तिसरा हीनयान
भारतात दक्षिणेत प्रसार होत श्रीलंकेत पोहोचला व तेथून राजकीय संबंधातून
याची बीजे ब्रह्मदेशात पोहोचली. इथे तो चांगलाच फोफावला व जतनहि करण्यात
आला. इथूनच तो पूर्वेकडे पसरला. यालाच थेरवाद असेही म्हणतात. आजही मोठ्या
प्रमाणात बौद्ध भिख्खुंचे जीवन येथे बालक-युवक आजीवन व्रतासाठी स्वीकारतात.
त्यांचा समाजात मानही खूप मोठा असतो. जीवनशैलीत कालसापेक्ष खूप कमी बदल
केलेले हे भिख्खू सकाळी भिक्षेसाठी जाताना भल्या मोठ्या रंगांमध्ये नित्य
दिसतात. कुठेही बौद्ध भिख्खू समोर आले तर प्रत्येक नागरिक दोन्ही हात जोडून
आदर दर्शवतो.
मंदिराबाहेरील ओळखीची फुले… ओळखीचा दरवळ …
फुले विकणारी एक विक्रेती
मंडले येथील महामुनी मंदिराबाहेरील एक दृश्य
समाजकारण : बऱ्याच प्रमाणात अल्पसंतुष्ट, तुलनेत गरीब, धार्मिक व आत्ममग्न असे काहीसे ब्राह्मी समाजाचे वर्णन करता येईल. बौद्ध संन्याशांचाही सक्रिय समाजकारणात सहभाग. सत्ता उलथवून टाकण्याची क्षमता, इच्छाशक्ती व कार्यशक्ती याचा अलीकडेच घडविलेला प्रयोग हे आधुनिक समाजाचे विशेष. सामान्यतः शांत परंतु वेळ आल्यास पश्चिमेकडच्या धर्मांध मुस्लिमांना त्यांच्याच भाषेत सुस्पष्ट उत्तर देऊन त्यांची बौद्ध देशातील जागा दाखवून देणारा सजग, सक्षम समाज. पूर्वेकडे अधिक कल राहिल्याने डावीकडे झुकणारी मानसिकता. पूर्वापार चालत आलेली राजेशाही ब्रिटिशांनी संपवली तरीही त्या सवयीतून न सावरलेला समाज, त्यामुळे 'सत्तेच्या हाती सेना' नसून 'सेनेच्या हाती सत्ता' हे वास्तव. तथाकथित लोकशाही असली तरीही सेनेच्या २५% जागा दोन्ही सभागृहात राखीव असतात. अलीकडच्या अर्थव्यवस्थेतील बदलांनंतर स्वतःच्या सांस्कृतिक व प्राकृतिक संपन्नतेचे जगातील मूल्य लक्षात घेऊन हळूहळू पर्यटन व औद्योगिकीकरण यातून विकास साधण्याचा प्रयत्न गती पकडत आहे.
अन्न : मांसाहार व भात हे प्रमुख खाद्य. चीन व भारत यांचा खाद्यसंस्कृती वर प्रभाव आहे. पौर्वात्य प्रभाव मांसाहारात अधिक, लहान चिमण्या, त्यांची अंडी, मोठे कीटक इत्यादी सर्रास सगळीकडे आवडीने खाल्ले जाते. डाळ, भाज्या यांवर भारतीय प्रभाव अधिक. तमिळ, मलबार, उडुपी, आंध्र या प्रत्येक प्रदेशात जशी सांबार ची पाकृ व चव वेगळी असते त्याप्रमाणे रंगून सांबार ही अजून निराळी चव चाखायला मिळाली. बगान मध्ये एका ठिकाणी चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी विशेष उल्लेखनीय.
चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी
पौर्वात्य प्रकारचे शहरी खाद्य पदार्थ
ग्रामीण भागातील शाकाहारी खाद्य: भात, भेंडीची भाजी, बॉकचॉय किंवा चीनी कोबी, खारवलेला बांबू
भात व काही व्यंजने
चिमणी-फ्राय व भाजक्या शेंगांप्रमाणे किरकोळ विक्रीस असलेली उकडलेली अंडी
रंगून मध्ये काही जुने प्रसिद्ध कॅफे आहेत. उत्तम प्रतीचा चहा हे ब्रह्मदेशाच्या निर्यातमालापैकी एक. अशाच दोन ठिकाणाची सहजचित्रे
वेशभूषा : स्त्रिया व पुरुष दोघेही गोल 'लॉंघ्यी' वापरतात. रंग नक्षी जरा वेगवेगळी, कपड्याने डोके झाकण्याची प्रथा काही लोकांमध्ये आहे. थंडाव्यासाठी व सनस्क्रीन म्हणून चेहऱ्यावर चंदनासम एका लाकडाचा उगळलेला लेप 'तनुका' लावतात.
वेशभूषा व तनुका
बौद्ध भिक्षु तपकिरी रंगाची तर भिक्षुणी फिकट गुलाबी वस्त्रे वापरतात.
भिक्षूंची वस्त्रे पूर्वी कमळाच्या देठा पासून बनलेल्या धाग्यापासून
बनवलेली असत.
दोन ठिकाणी देवदर्शनास आलेली नुकतेच लग्न झालेली जोडपी भेटली त्यांचे हे फोटो. त्यांच्या कडून लग्न पद्धती विषयी मजेदार माहिती मिळाली, नवरा व बायको यांना प्रत्येकी पाच नियम पाळावे लागतात, यातील काही नियम विशेष! लग्ना नंतरही मुली माहेरची जबाबदारीही पाहतात असे दिसते. ५ नियम :
१. आपल्या पत्नीस ओरडून न बोलणे २. सर्व उत्पन्न आपल्या पत्नीच्या
स्वाधीन करणे ३. पत्नीशी एकनिष्ठ राहणे ४. पत्नीस ऐपत/समाजातील स्थानास
अनुसरून वस्त्रालंकार करणे ५. प्रेमाविष्कार
१. पतीच्या घरची व्यवस्था पाहणे २. काटकसरी असणे ३. पतीशी एकनिष्ठ राहणे ४.
माहेर व सासर दोन्हीमध्ये भेदभाव न करणे (आर्थिक जबाबदारी तसेच भेटवस्तू
दोन्हीकडे समान) ५. आळशी नसणे
नवविवाहित दांपत्य
भाषा व लिपी : बामाऽ भासा किंवा बर्मीझ भारतीय भाषांप्रमाणेच
संस्कृत व पाऴी-प्राकृत प्रभावित आहे. मूळ पौर्वात्य असून तोही रंगही
टिकवून आहे. नमस्ते किंवा हेल्लो समांतर 'मिन्गलाबाS' 'मंगल भव' या पाऴी
शब्दावरून आले. बरेच तद्भव शब्द ओळखण्याइतपत स्पष्ट आहेत.
'अख्खार' लिपी अत्यंत सुंदर कलात्मक व समृद्ध आहे. सिंहलि नंतर माझी हि
सर्वात आवडती लिपी. अनेकविध पौर्वात्य उच्चारांसाठी विशेष अक्षरे आहेत.
भारतीय भाषांत आताशा फारशी प्रचलित नसलेली कठिण अक्षरेही नित्य वापरात
असतात, उदा. ञुञू हे मुलाचे नाव, ञोङ्यू (Nyaung-U) हे शहराचे नाव ई. लिपी
उदाहरण : မြန်မာအက္ခရာ
या प्रदेशात फिरताना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग झाला, विशेषतः भाषा ॲप
हस्तकला : लाकूड व कागद वापरून बनवलेल्या रंगीत ब्राह्मी छत्र्या विशेष. सागवानी लाकडावरील काम आधीच्या काही भागात पहिलेच आहे. रंगीत कठपुतळीच्या बाहुल्या अजून एक विशेष.
कठपुतळीबगान ची एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे, काळ्या शाईने प्रथम चित्र साकारून त्यात रंगीत वाळू पासून बनवलेले आकर्षक रंग भरण्यात येतात. एक विशेष अनुभव येथे नमूद करण्यासारखा आहे. एका स्थानिक कलाकाराबरोबर या वेगळ्या शैलीचे प्राथमिक धडे गिरवले. खरे सांगायचे तर वाळूचे रंग इतके आकर्षक असतात हेच माहिती नव्हते त्यामुळे चित्र बनताना पाहण्याची उत्सुकता होती, त्यात मोडके इंग्रजी बोलणारी त्या कलाकाराची मुलगी हा संभाषणातील दुवा बनली व छोटी छोटी काही चित्रे आम्ही गिरवली. पारंपारिक पद्धत वापरून काही आधुनिक शैलीतील चित्रेही आज हे कुटुंब काढते. अशा प्रकारे लोकांच्या आठवणी साठवण्यात खरी प्रवासाची कृतकृत्यता…


संगीत : भारतीय संगीताचा खोलवर प्रभाव. वाद्ये पौर्वात्य असली तरी
सुरावटी भारतीय रागांवर आधारित असतात. बगान जवळ एका खेड्यात काही मुले सराव
करत असतानाचा एक छान अनुभव मिळाला, साधारण 'तिलक कामोद' ची सुरावट आहे.
शास्त्रीय नृत्यप्रकार 'किन्नय-किन्नयी' (मूळ शब्द सहज समजतो) आपल्याकडील नृत्य प्रकारासारखाच मुद्राप्रधान.
क्रीडा : उल्लेखनीय असा खेळ म्हणजे 'चीन्लोन'. वेतापासून बनविलेल्या पोकळ चेंडूनी हा खेळ खेळतात. विशेष असे की या खेळात स्पर्धाभाव नसून नृत्यासम कलात्मकता आणण्याचा प्रयत्न असतो. रंगूनच्या एका गल्लीत टिपलेली ही खेळाची काही क्षणचित्रे.
असे हे ब्रह्मदेशाचे विविध रंग. आग्नेय-आशियामध्ये कमी माहिती असलेल्या या प्रदेशाची हि चित्रयात्रा. लेखमालेत पुढे केवळ अल्प परिचित थायलँड, उत्तर सीमावर्ती भाग.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.