आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)
हा ट्रेक घडायला तशी बरीच कारण घडली. एक कारण म्हणजे सिनेमातल्या हिरॉईनिंना जसा ‘आपले बालवय संपून आपण तारुण्यात प्रवेश केला आहे’, हा शोध अचानक लागतो, तसा मला आणि माझ्या मैत्रिणींना आपण आता चाळीशी पार केली आहे, असा महत्त्वपूर्ण शोध एका महान दिवशी लागला. आता आपल्याला ट्रेकिंग करायला थोडीच वर्षे राहिली, दरवर्षी एक तरी ट्रेक झाला पाहिजे, असा ठराव एकमताने मंजूर झाला.
अजून एक कारण म्हणजे माझा मुलगा तसचं बाकी मैत्रिणींची मुलं, ह्या सुट्टीत मोकळी होती. सगळ्यांची १० वी- १२ वी अशी महत्त्वाची वर्षे नुकतीच संपली होती. सुट्टीतले क्लासेस आणि तत्सम अडचणी नव्हत्या. त्यामुळे मुलांच्या आघाडीकडून एकदा सगळे मिळून ट्रेकला जाऊया, अशी मागणी जोर धरायला लागली.
आमची परदेशी वास्तव्यास असलेली बालमैत्रीण, अश्विनी, भारतात त्याच सुमारास सुट्टीवर येणार होती. ती सुट्टीवर आली की आम्ही नेहमीच भेटतो. पण तसा थोडाच वेळ. ह्यावेळेला ती आणि तिची मुलगी अनुजाही आमच्या बरोबर येणार, अस ठरल्यावर आम्ही मार्च महिन्यात पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायच्या बेतात होतो. पुणे मनपाच्या इमारतीवर रोषणाई करण्याचा बेत, आचारसंहिता लागू झाल्यामुळे नाईलाजाने रद्द करावा लागला!!
एकदा हे सगळ ठरल्यावर नक्की कुठे जायचं हा विचार सुरू झाला. २०१३ च्या जून महिन्यात उत्तराखंड आणि परिसरात निसर्ग कोपला होता. बरेच ट्रेक-रूट बंद झाले होते. तिथे जाता येईल की नाही, ह्याबद्दल थोडी अनिश्चितता होती. आत्तापर्यंत केलेल्या भटकंतीत काही ट्रेक माझे तर काही मैत्रिणींचे झालेले होते. त्याच त्याच जागी पुन्हा जाण्यापेक्षा नवीन जागा पहावी, अस वाटत होत.
आमच्या ग्रुपमधले काही मेम्बर हिमालयातला ट्रेक प्रथमच करणार होते. अश्विनी तिच्या सुट्टीच्या भरगच्च कार्यक्रमात हा ट्रेक अक्षरशः कोंबणार होती. शाळेपासूनच्या मैत्रिणींबरोबर असे आणि इतके दिवस घालवण, ही कल्पना सगळ्यांसाठीच खूप छान असली, तरी तिचे सुट्टीचे दिवस मोजलेले होते. तिच्या माहेर-सासरचे लोकं तिच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असणार. त्यात किती दिवस ट्रेकमध्ये घालवायचे? हा एक महत्त्वाचा पण अवघड प्रश्न होताच.
ह्या सगळ्या कारणांमुळे हा ट्रेक थोडा सोपा असावा आणि फार दिवस लागतील
असा नसावा, अस वाटलं. सोपा असला म्हणजे कँपवर पोचल्यावर गप्पा मारायला,
पत्ते खेळायला वेळ आणि ताकद शिल्लक राहील, अस वाटत होत. हिमालयातल्या
ट्रेकला बेस कँपला पोचायला आणि परतीला दोन-दोन दिवस जातातच. ते कमी करायचे,
तर विमानाने दिल्लीपर्यंत आणि रात्रीचा ट्रेनचा प्रवास, हीच आयडिया करायला
लागणार होती. एकदा हे नक्की झाल्यावर बऱ्याचशा जागा आपोआपच रद्द झाल्या.
शेवटी चर्चांच्या असंख्य फेऱ्या पार पाडून उत्तराखंडमधील ‘पिंढारी
ग्लेशियर’ ही जागा नक्की झाली. तो रुट काहीसा बदलून पुन्हा सुरू झाला आहे,
अस समजल्यामुळे सगळे उत्साहाने तयारीला लागले.
********************************************************************************
खरं तर आम्ही काय पहिल्या ट्रेकला जात नव्हतो. पण इतके दिवस गेलो होतो ते
यूथ हॉस्टेल किंवा तत्सम संस्थांच्या, ज्याला ट्रेकच्या भाषेत
‘सर्व्हायव्हल’ ट्रेक्स म्हणतात अश्या ट्रेकना. तिथे आपल्या बाजूने
ठरवा-ठरवी करायला फारशी संधी नसते. त्यांच्या बॅचेस आणि वेळापत्रक ठरलेलंच
असत. आपण आपल्या सोयीची बॅच निवडायची, पैसे भरून आपली जागा पक्की करायची,
की संपल. फक्त घर ते बेस कॅम्प आणि परतीच्या प्रवासाची जुळणी करावी लागते.
इतकचं ठरवायचं असल, तरी त्या निमित्ताने आम्ही असंख्य पर्यायांचा विचार करतो आणि त्याबद्दल भरपूर चर्चाही! ट्रेन की विमान, ही ट्रेन की ती, चेअरकार की स्लीपर, एक न दोन.. बर, कोणाची कशाला हरकत असते, असही नाही. थोडे जास्त पैसे खर्च झाले किंवा ह्या सगळ्यात काही गडबड झाली, तरी तक्रार नसते. पण चर्चा झाल्या नाहीत, तर आम्हाला काही मजा येत नाही, हे मात्र खर!!
बऱ्याच चौकशा केल्यावर ह्या ट्रेकला कुमाऊँ मंडळ विकास निगम बरोबर जायचं, अस ठरल. युथ हॉस्टेल्सपेक्षा महाग , पण सोयी जास्त. राहण्याच्या, खाण्या-पिण्याच्या सोयी चांगल्या. ट्रेकिंगच्या भाषेत चैनच. अशाही संस्था असतात, हा शोध तसा नवीनच होता. आपला ४-५ लोकांचा ग्रूप असला, तरी राहणे, जेवण तसेच सामानासाठी पोर्टर किंवा खेचर, गाईड ही सगळी सोय ह्या संस्थेमार्फत केली जाते.
सुरवातीला ओळखीतल्या, नात्यातल्या बऱ्याच लोकांनी ‘आम्ही येणार’ अस भरघोस आश्वासन दिल होत. पण काहीना काही कारणांनी एक-एक जण गळत गेले. कधी १५ तर कधी ७ अश्या बेरजा वजाबाक्या होत होत अखेर आमचा ९-१० लोकांचा ग्रुप पक्का झाला. त्यात चाळीसच्या वरच्या चार बायका आणि वीसच्या खालची पाच मुल असा ग्रुप पक्का झाला. त्यातले सात मेम्बर पुण्यातले आणि दोन अमेरिकेतले होते!
ह्या ट्रेकमध्ये तर गोष्टी ठरवायला आम्हाला अमाप संधी होती. कुमाऊँ वाल्यांच्या काही ठरलेल्या बॅचेस आणि वेळापत्रक नव्हत. आम्ही म्हणू त्या तारखा, आम्ही ठरवू ते वेळापत्रक. अर्थातच चर्चा करायला प्रचंड वाव होता. कधी भेटूया हे ठरवायला भेटणे इत्यादी गमतीदार प्रकार सुरु झाले. घरी / ऑफीसमध्ये / रेस्तराँमध्ये अश्या चर्चांच्या फेऱ्या झाल्या. मुलांच्या परीक्षांच्या, आमच्या रजांच्या, अश्विनीच्या सुट्टीच्या वेळापत्रकाची असंख्य वेळा उजळणी झाली. कामाच्या मिटींगमध्ये पुढचं काही नियोजन करताना, त्यातल्या काही तारखांचा उल्लेख झाला, तर ‘हो, म्हणजे मुक्ताची परीक्षा संपेल, त्या दिवशी बांधकाम संपेल’ अश्या गोष्टी मनात येऊन, पुढच्या कामाकडे लक्ष लागेना! ते उल्लेख अनवधानाने क्लायेंट किंवा सहकाऱ्यांसमोर होऊ नयेत, अशी काळजी घ्यायला लागत होती!!
मला हा ट्रेकच्या प्लॅनिंगचा काळ अगदी मनापासून आवडतो. थोड्याच दिवसात आपलं नेहमीचं ‘उठा- स्वैपाक करा-तयार व्हा-ऑफिसला जा-स्वैपाक करा-झोपा’ हे रुटीन सोडून लांब जायचं असत. तिथे ना मोबाईल चालत, ना टीव्ही असतो. त्यामुळे दिवसभर चालणे आणि नंतर गप्पा मारणे, हाच करमणुकीचा कार्यक्रम! जवळच्या पाठपिशवीत असेल, तेवढीच आपली संपत्ती. उठायचं आणि चालायचं, जेवायचं आणि झोपायचं. साधा-सरळ कार्यक्रम. सतत उद्याच्या काळज्या, पुढच्या तयाऱ्या करून गळून गेलेल्या मनाला अगदी भरपूर विश्रांती मिळणार असते. त्या आनंदात आधीपासूनच अगदी मोकळ-ढाकळ वाटत असत. ट्रेकच-ट्रेनच नुसत बुकिंग चालू असतानाच तिकडची स्वप्न पडायला लागतात.
ह्या वेळी सोबतही फार छान होती. समजायला लागायच्याही आधीपासूनच्या मैत्रिणी, त्यांची मुलं आणि माझा मुलगा बरोबर होते. म्हणजे माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही होते! ज्यांच्या सहवासात कुठलाही आव आणावा लागत नाही, हिशेब करावे आणि द्यावे लागत नाहीत, असा हा ग्रुप होता. रोजच्या धकाधकीत एका गावात राहूनही मैत्रीणीना भेटायला जमत नाही. मग सातासमुद्रापलीकडे गेलेल्या मैत्रिणीला किती भेटता येणार? ह्या निमित्ताने १०-१२ दिवस सतत बरोबर राहता येणार!! ह्या कल्पनेने झालेल्या आनंदाने अगदी वेडावून टाकलं होत. त्या मैत्रिणींच्या सहवासात परत एकदा लहान व्हायची सुवर्णसंधी होती.
पृथ्वीप्रदक्षिणा करायची असेल तरी पडू शकणार नाहीत, असे असंख्य प्रश्न आम्हाला पडायचे. मग फोनाफोनी. तेवढ्याने नाही भागलं, तर शंकासमाधान करण्यासाठी कुमाऊँच्या ऑफीसमध्ये फेरी! आम्ही ट्रेकला निघाल्यावर ‘गेल्या ह्या बायका एकदाच्या,’ ह्या आनंदात कुमाऊँच्या पुणे ऑफिसने नक्की पार्टी केली असेल. अस करता करता शेवटी एक-एक करत सगळी बुकिंग, रिझर्वेशन्स झाली, सर्वसाधारणपणे सगळ्या शंकांच निरसन झालं आणि सात जूनला आमचा हा नवरापात्र-विरहीत ट्रेक सुरु होणार हे नक्की झाल!
पुणे-मुंबई सेंट्रल-दिल्ली-काठगोदाम (७ आणि ८ जून २०१४)
सात जूनला सर्व पुणेकर मंडळी स्वारगेटला जमली. प्रवासाला जाणारे जास्त आनंदात की सोडायला आलेले, ह्याचा निर्णय होत नव्हता!
भारतात एशियाड झाल्याला आता तीस वर्षे होऊन गेली, तरी राज्य परिवहनने
‘एशियाड बसच्या’ स्वरुपात ती स्मृती सांभाळून ठेवली आहे. तश्या एशियाड
बसमध्ये आमचं रिझर्वेशन होत. सिंहगड एक्प्रेसच तिकीट डेक्कन एक्सप्रेसला
वापरलेलं रेल्वेवाल्यांना आजिबात, मुळीच, कधीही चालणार नाही. पण रा.प. वाली
मंडळी दयाळू असतात.
साडेअकराच्या बसचं तिकीट काढलेलं होत. पण साडेअकराला इथे जी बस होती, ती
वेळापत्रकाप्रमाणे पावणेअकराची बस उभी होता. मास्तरांनी आम्हाला त्या
बसमध्ये आमच्याच सीटवर बसून घ्यायला सांगितलं!! कुठल्यातरी बसचं तिकीट
काढलंय ना, झालं तर मग.. असा उदार दृष्टीकोन ठेऊन त्यांनी आमची व्यवस्था
केली.
बसची रिझर्वेशन्स मी केली होती. स्वारगेटला येऊन मी समजा ‘अग, मी तिकीट घरीच विसरले’ असं म्हटल असतं, तर मैत्रीणी ‘हो का, असुदे. आपण परत काढू तिकीट.’ असं म्हटल्या असत्या ह्याची पूर्ण खात्री होती, इतका मोकळेपणा वाटत होता. पुढचे दहा-बारा दिवस कितीही गोंधळ, बावळटपणे करायला मोकळीक होती. शहाण्यासारखं, जबाबदारीने वागायचं ओझं नसल्याने हलकं-मोकळं वाटत होत!
पुणेकर सोडून उरलेली मंडळी ठाण्याहून यायची होती. कितीही आधीपासून तयारी केली, तरी बसमध्ये बसल्यावर आठवणींचे कोंब मेंदूला फुटतातच. मग फोनाफोनी झाली. जास्तीचे सेल, क्लोरिनचे ड्रॉप्स, सुईदोरा, कॅरीबॅग्ज अश्या असंख्य ऑर्डर गेल्या. त्या दोघी ठाण्याहून निघाल्या, अस कळल्यानंतर ऑर्डर थांबवाव्याच लागल्या.
मुंबई सेंट्रलला अश्विनी व तिची कन्या भेटल्या. अश्विनी तब्बल दोन वर्षांनी भेटत होती. त्यामुळे भरतभेटीसारखा एक छोटासा कार्यक्रम झाला! रेल्वेच्या कृपेने सर्वांची रिझर्वेशन्स एकाच डब्यात आली होती. नाहीतर सांस्कृतिक सरमिसळ व्हावी व नवीन लोकांच्या ओळखी करून घ्यायला उत्तेजन मिळाव म्हणून रेल्वेवाले शक्यतो ग्रूप मोडून सगळ्यांना वेगवेगळ्या डब्यात नाहीतर कंपार्ट मेंटमध्ये तरी विखरून टाकतात. सर्व मुल एका कंपार्ट मेंटमध्ये आणि महिला मंडळ दुसऱ्या कंपार्टकमेंटमध्ये अशी व्यवस्था झाली. राजधानीने वेग घेतला. आमच्याही साठलेल्या गप्पा जोरात सुरू झाल्या.
चौघींपैकी आम्ही तिघीजणी एका शाळेतल्या, एका वर्गातल्या, एका गल्लीतल्या मैत्रिणी. कॉमन मित्र-मैत्रिणी, ओळखीचे प्रचंड लोकं. ह्या गटातली नसलेली मैत्रीण होती मंजिरी. ती कंटाळून जाणार, ह्याची गॅरेंटी होती. त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही तिघींनी तिला कॅप्टन रविंद्र माधव ओक हायस्कूल, कल्याण, येथील माजी विद्यार्थी संघाचं ‘मानद सदस्यत्व’ समारंभपूर्वक दिल! संपूर्ण ट्रेकभर आम्ही तिला शाळेतल्या इतक्या स्टोऱ्या ऐकवल्या, की आता तिला कधी आमच्या शाळेतलं कोणी भेटलं, तर हीच त्यांना चार गमतीच्या गोष्टी ऐकवू शकेल!
मुंबईतील एकेक स्टेशन्स मागे जात होती. कॉलेजला असताना हा नेहमीचा प्रवास होता. त्या आठवणी ताज्या होत होत्या. हल्ली वेळेच्या अभावी बरेच प्रवास हवाई मार्गानीच होतात. पुष्कळ वर्षांनी रेल्वेचा लांबचा प्रवास घडत होता. पाय लांब करून बसणे, बाहेरची पळती दृश्य पाहणे, सगळ्यांची रिझर्वेशन असली तरी बऱ्याचशा जागा रिकाम्या ठेवून सगळ्यांनी थोड्या जागेत दाटीवाटीने बसणे, ही सुखं विमानप्रवासात मिळत नाहीत. ह्या सगळ्याची मजा घेत होतो. वसई सुजाताच्या मामाचं गावं आणि डहाणू माझ्या मामाचं गावं. त्यामुळे हा प्रवास नेहमी ‘मामाच्या गावाचा’ प्रवास असायचा. वसईच्या मोठ्या, रुंद पात्र असलेल्या खाड्या पार केल्या, की डहाणू जवळ आलं अस वाटत असे. पण आता सुजाताचाही मामा नाही आणि माझाही. संपलच ते सगळं....
प्रवासाचा हा पहिलाच टप्पा होता, अजून पुढे बराच पल्ला गाठायचा होता. ती थोडी हुरहूर असतेच. पण तरी मस्त वाटत होत. अश्विनीशी आत्तापर्यंत फोन किंवा मेलवरच संपर्क झाला होता. तिला पुढची माहिती देणे व तिच्या प्रश्नांना थोडक्यात किंवा सविस्तर उत्तरे देणे हा एक कार्यक्रम झाला. राजधानीत खाण्या-पिण्याची चैन असल्यामुळे मेथीचे पराठे, बटाट्याची भाजी, गोड शिरा, दहीभात हे प्रवासी जेवणाचे डबे बरोबर घेणे, ते बॅगेत सांडणे, पदार्थ उरणे; इत्यादी नेहमीच्या (अ)यशस्वी कार्यक्रमातून सुटका झाली होती. राजधानीवाले दर अर्ध्या तासाने काहीतरी खायला आणून देत होते. आम्ही इतकं सगळं खाऊ नाही शकलो, तरी पाच तरूण मुल बरोबर होती. त्यांना ‘पोट भरल्याने खाता न येणे’ असले क्षुल्लक प्रश्न पडत नव्हते. त्यामुळे त्यांनी मजा करून घेतली.
एव्हाना एकमेकांच्या मोबाईलची माहिती घेऊन झाल्यामुळे मुलांनी उनो खेळणे सुरू केलं होतं. त्यांच्या हसण्याच्या आणि बोलण्याच्या टीपेच्या आवाजामुळे वैतागून राजधानीतून आपल्याला नक्की कुठच्या स्टेशनवर उतरवून देतील? अशा पैजा आम्ही लावत होतो. ह्या मुलांना न्यायचं असेलं, तर दुरांतो इतकी चांगली (मध्ये थांबतच नसल्याने!) दुसरी गाडी नाही, ह्यावर आमचं एकमत झालं.
सहप्रवासी सहनशील असल्याने आम्हाला दिल्लीपर्यंत प्रवास करता आला! आम्ही ह्या राजधानीतून त्या राजधानीत पोचलो. पुढची ट्रेन पाच तासांनी होती. हजरत निजामुद्दीन ते पुरानी दिल्ली असा एक टप्पा पार पडायचा होता. आमचे मुंबईकर संस्कार उफाळून आल्याने, तो प्रवास आम्ही लोकल ट्रेनने करायचा ठरवला. मुंबईतल्या लोकांना तिथल्या(च) लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी असते, असा अभिमान असतो. पण माझी त्यांना नम्र विनंती आहे, की त्यांनी दिल्लीच्या लोकलने एकदातरी प्रवास करून पहावा. चव वाढवण्यासाठी आमच्याबरोबर प्रत्येकी दोन असे सामानाचे डागही होते. मग काय विचारता, तुंबळ गर्दीत आम्ही मनात ‘हरहर महादेव’ असा गजर करून आत शिरलो. ती ट्रेन ‘पुरानी दिल्ली’ स्टेशनला जाते की नाही, ह्याबद्दलच पब्लिकला खात्री नव्हती. शेवटी बरेच एका वाक्याचे, सविस्तर स्पष्टीकरणाचे असे निरनिराळे प्रश्न सोडवून, ट्रेन ‘पुरानी दिल्ली’ला जाणार असा निर्णय झाला. ट्रेनमध्ये पाण्याचे पाऊच, खोबऱ्याचे तुकडे, तळलेले पापड असे चमत्कारिक पदार्थ विकायला येत होते. अश्या अर्ध्या तासाच्या रोमांचकारी प्रवासानंतर आम्ही पुरानी दिल्लीच्या फलाटावर ढकलले गेलो.
सगळीकडे प्रचंड गर्दी होती. भीषण उकाडा. माणसं, प्राणी आणि वस्तूंच्या वासाच्या मिश्रणातून तयार झालेला रेल्वे स्टेशनवरचा एक खास भारतीय वास. असा बराच वेळ काढायचा होता. प्रतीक्षागृहात मुंग्यांना सुद्धा आत शिरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, इतकी गर्दी होती. मग आम्ही एका वातानुकुलीत खान-पान गृहाला आमचं प्रतीक्षागृह बनवलं! एका वेळेला एकाने एकच डीश मागवायची. ती संपली की दुसऱ्याने. अस करत तो कंटाळवाणा वेळ ढकलला.
पुढची ट्रेन काठगोदामपर्यंत नेणार होती. त्याच्या कुर्सी-यान मध्ये स्थानापन्न झालो. बाहेरची दृश्य झरझर बदलत होती. मोठ्या इमारती मागे पडून बसकी घर, शेत दिसत होती. हिमालयाचा मात्र अजून पत्ता नव्हता. कधी एकदा ह्या त्रस्त करणाऱ्या उकाड्यातून गारव्यात जातोय, अस झालं होत. रात्री उशीरा काठगोदामला पोचलो. हे त्या मार्गावरील शेवटचे स्टेशन आहे. कुमाऊँ मंडळाचा माणूस इतक्या रात्री आम्हाला घ्यायला रेल्वे स्टेशनवर आला होता. त्याने हसतमुखाने ‘नमस्ते’ म्हणत आमचे मनापासून स्वागत केले आणि त्याचा तो हसरा, उत्साही चेहरा पाहून आपण पुणे, मुंबई, दिल्ली सगळं मागे टाकून देवभूमी उत्तराखंडात पोचल्याची खात्री वाटली!
काठगोदाम – बागेश्वर – लोहारखेत (९ जून २०१४)
२०११ मध्ये कैलास-मानस यात्रा केली तेव्हा कुमाऊँ मंडळाच्या ह्याच गेस्ट हाऊसमध्ये जाता-येता दोन्ही वेळा जेवायला थांबलो होतो. जाताना यात्रा कशी होईल ह्या विचाराने काळजी दाटून आली होती आणि येताना ‘आज यात्रेचा शेवटचा दिवस’ ह्या कल्पनेने गलबलायला झालं होत. परत येताना एका छोट्या पण अत्यंत हृद्य कार्यक्रमात यात्रा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे इथेच मिळाली होती. त्याच जागी तीन वर्षानंतर आले होते. यात्रेच्या, सहयात्रींच्या आठवणी येत होत्या. जागा तीच असली, तरी ह्या वेळेला ग्रूप, जायची जागा आणि प्रवासाचा मूड.. सगळच वेगळ होत.
काठगोदाम कँप
आज आम्हाला बागेश्वर पर्यंत जीप किंवा बसने जायचं होत. तिथे पोचल्यावर कुमाऊँ मंडळाच पॅकेज सुरू होणार होत. तिथे पोचल्यावर दुपारच जेवण आणि जास्तीच सामान जमा करणे हा कार्यक्रम उरकला, की पुढे जीपने ‘सॉंग’ ह्या गावापर्यंत जायचं होत. तिथून आमची चालायला सुरवात होणार होती. तीन किलोमीटर चालल्यावर लोहारखेत ह्या गावी मुक्काम होता.
रात्री सगळी बच्चा कंपनी ‘लवकर उठवू नका’ अस (रोजच्या सारखच) सांगून झोपली होती. पण प्रवास आणि ट्रेकच्या उत्सुकतेने कोणी फार उशीरापर्यंत झोपू शकले नाहीत. भराभरा जागे होऊन आणि पुढे बाथरूम्स कधी आणि कश्या मिळतील, ह्याची खात्री नसल्याने अंघोळी उरकून सगळे चकाचक तयार झाले.
काठगोदामचा नाश्ता
बसअड्डा गाठतो, तर बागेश्वरला जाणारी बस आमची वाटच पाहात असल्यासारखी थांबली होती. बसच्या वाहकाने घाईघाईने आमच सामान टपावर चढवल सुद्धा. लगेच बस मिळाल्यामुळे आम्ही अगदी आनंदात आतमध्ये शिरलो. मात्र बसायला जागाच दिसेना. कंडक्टरने जादू करून त्या गच्च भरलेल्या बसमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी, मागे अश्या विविध ठिकाणी जागा निर्माण केल्या आणि आम्ही तिथे स्थानापन्न झालो. आमच्या नऊ जणांच्या गँगमधे हमखास बस लागणारे, आजिबात बस न लागणारे, आणि वेळ-प्रसंग बघून ह्या पार्टीतून त्या पार्टीत जाणारे ‘आयाराम-गयाराम’ असे तीन प्रकार होते. पहिल्या गटातल्या लोकांना सन्मानाने चांगल्यात चांगल्या जागा (आणि प्लास्टीकच्या पिशव्या!!) दिल्या गेल्या. तिसऱ्या गटातले लोक ‘मन्नू, तेरा हुआ, अब मेरा क्या होगा,’ अशा विचारात केविलवाणे चेहरे करून बसले होते. दुसऱ्या गटातले लोकं आरामात उर्वरीत जनांचे आंबट चेहरे बघत होते!
थोड्याच वेळात सपाट रस्ता संपून वळणा-वळणाचे पहाडी रस्ते सुरु झाले. ही बस अगदी ‘हात दाखवा, गाडी थांबवा’ ह्या प्रकारातली असल्याने दारोदार थांबून प्रवासी चढत- उतरत होते. खच्चून भरलेली बस, डिझेल आणि अन्य वास, गैरसोयीच्या सीट, सगळच नकोनकोस होत. आम्हाला पुण्यात कळलं होत, की काठगोदाम ते बागेश्वर ४-५ तास लागतात. जेवायच्या वेळेपर्यंत पोचू, अस वाटत होत. निघताना वेळेवर र निघालोही होतो. पण बस फारच हळूहळू जात होती. दुपारपर्यंत पाच तास प्रवास झाला, तरी आम्ही फक्त अल्मोड्यापर्यंतच आलो होतो. म्हणजे साधारण अर्धच अंतर पार झाल होत.
उशीर होणार, अस लक्षात आल्यावर बागेश्वरला फोन केला, तर त्या लोकांनी ‘टॅक्सीने न येता बसने आल्याबद्दल आम्हाला रीतसर मूर्खात काढल. किती वेळ लागेल, ही चौकशी केली नाही, हे चुकलच होत आमच. त्यातून बस लागणाऱ्या मंडळींची अवस्था बिकट झाली होती. शेवटी सर्वानुमते आम्ही मधल्या एका गावात बसमधून उतरलो, आणि टॅक्सी करून बागेश्वरला पोचलो. बसचं तिकीट बागेश्वरपर्यंत काढलेलं होत. वर टॅक्सीचे वाढीव पैसे देऊन आम्ही आमची आधीच बाळसेदार असलेली अक्कलखाती अजून जरा गुटगुटीत केली!!
ठरलेल्या वेळेपेक्षा बराच उशीर झाला होता. आता आणखी हे लोक काय काय ऐकवणार? अशी भीती वाटत होती. पण तस काही झालं नाही. आमच्या बरोबर गाईड म्हणून येणार असलेले देवेन सर तिथे कधीचेच आलेले होते. त्यांनी भराभर सूत्र हातात घेतली. त्यांनी आम्हाला सगळ्यात आधी जेवून घ्यायला लावल. मग जमा करायचं सामान देणे, हे काम उरकलं. ‘आता सॉंग पर्यंत न जाता सरळ लोहारखेतपर्यंत जीपने जाऊया. काळोखात चालायला त्रास होईल’ असा सोपा पर्याय त्यांनीच सुचवल्याने आमचं टेन्शनच संपलं!
दोन जीपमध्ये आम्ही सगळे, आमचं सामान आणि शिधा असे लोहारखेतकडे निघालो. संध्याकाळ होत होती. जिकडे तिकडे डोंगर रांगा दिसत होत्या. कैलास यात्रेनंतर तब्बल तीन वर्षांनी हिमालयाची गळाभेट होणार होती. त्या दरम्यान एकदा सिक्कीमला फिरायला गेले होते. पण तो हिमालय नुसता दिसला होता, भेटला नव्हता. हिमालयातल्या नद्यांचे आवाज ऐकणं, तिथली शांतता मनात-कानात साठवणं, टुरीस्टी स्पर्श नसलेला निसर्ग डोळ्यात भरून घेणं, म्हणजे हिमालयाची खरी भेट. ती भेट उद्यापासून होणार होती.
पहाडातल्या वेड्यावाकड्या, अरुंद रस्त्यांवरून आमच्या जीपचा चालक वेगात गाडी चालवत होता. जोडीला शेजारच्या देवेन सरांशी गप्पा, मोबाईलवर बोलणेही चालू होतच! त्याच्या उजव्या हाताशी येईल अशी एक छोटीशी घंटा गाडीत बसवलेली होती. रस्त्यावर देऊळ दिसलं, की तो इथे घंटा वाजवायचा. व्हीलवरचे हात सोडून नमस्कार करण्यापेक्षा ही कल्पना नक्कीच बरीच सुरक्षित होती!
एखाद्या क्रॉसकंट्री ड्रायव्हरला लाजवेल अश्या वेगाने आणि कौशल्याने गाडी चालवत त्याने आम्हाला लोहारखेतला पोचवल. हा कँप अतिशय देखणा आहे. लांबवरचे डोंगर, दऱ्या दिसाव्यात अश्या बेताने ह्याची जागा योजली आहे. काळोख झाला होता. चंद्र उगवला होता. पौर्णिमा जवळ होती. कृत्रिम दिव्यांच जग आम्ही आता मागे टाकल होत. दृष्टीपथात येणारे सगळे डोंगर चंद्रप्रकाशात मऊ, मवाळ दिसत होते. रात्र बरीच झाली. उद्याला चालायला सुरवात करायची आहे, हा विचार डोक्यात होताच. त्यामुळे नजरबंदी करणारा तो नजारा डोळ्यात साठवून आम्ही उबदार खोल्यांमध्ये गुडूप झालो.
लोहारखेत – धाकुरी (१० जून २०१४)
ज्या साठी गेले २-३ महिने आम्ही अट्टाहास करत होतो, तो ट्रेकचा दिवस एकदाचा उजाडला! इतके दिवस ‘कधी हा दिवस उजाडतोय’ अशी आतुरतेने वाट बघितली होती. पहाटे उठून पुन्हा तशीच वाट बघितली, पण सूर्याची! कँपची जागाच इतकी छान होती, की बस. रात्रीच चंद्रप्रकाशातल दृश्य जास्त छान की पहाटेच कोवळ्या उन्हातल? इतकाच प्रश्न पडू शकत होता.
काल रात्री डोंगरांच्या फक्त बाह्यरेषा दिसल्या होत्या. आता दिवसाच्या उजेडात त्यांची प्रचंड उंची डोळ्यात भरत होती. ह्या कँपपर्यंत गाडीरस्ता आहे, त्यामुळे म्हातारपणीही इथे पोचता येईल. हे लक्षात घेऊन आम्ही, अजून वीस-पंचवीस वर्षांनी मैत्रिणींच संमेलन ह्या जागी करायचं, असा निर्णय पहाटेला घेऊन टाकला. ह्या पहाटेची स्वप्ने खरी होतात, अस म्हणतात. पहाटेच्या तीव्र इच्छा खऱ्या होतील, अशी आशा आहे!!
ह्या ट्रेकला जी बरीच चैन होती. राहण्यासाठी सुसज्ज खोल्या होत्या. जेवायला सुग्रास जेवण होत. जेवल्यावर ताट-वाट्या-डबे घासायचे नव्हते. जड सॅक आपण उचलायची नाही ही सगळ्यात मोठी चैन होती. १० किलो सामान खेचरावरून जाणार होत. त्यामुळे सगळ्यांनी आधीच ‘पोर्टर सॅक’ आणि ‘डे सॅक’ वेगळ्या करून ठेवल्या होत्या. चालायच्या अंतराचे आकडेही फार घाबरवणारे नव्हते.
सकाळची सगळी आन्हिके आवरून आम्ही चालायच्या तयारीने खाली आलो. देवेन सर तयारच होते. पुण्यातून पिंढारीला बरेच ट्रेक ग्रूप जातात. देवेन सर अशा कितीतरी ग्रूप बरोबर गाईड म्हणून गेले होते. त्यामुळे त्यांना जुजबी मराठी येत होत.
त्याच कँपवर कलकत्ता इथून आलेला ग्रुप मुक्कामाला होता. रात्रीच्या गप्पांमध्ये तो ग्रुपही हाच ट्रेक करणार असल्याच समजलं. त्या सगळ्यांनी एकसारखे पिवळे टी-शर्ट घातले होते. त्या ग्रूपच नामकरण आम्ही ‘पिवळा ग्रूप’ अस केलं. खरतर ह्या नावात काहीही कल्पनाशक्ती लढवली नव्हती. पण देवेन सरांना हे नाव फारच आवडलं. ते सगळ्यांना ‘हमारे बच्चोंने क्या बढिया नाम रखा है ‘पिवळा ग्रूप’..अस हसत ज्याला-त्याला सांगायचे.
सगळ्यांचा नाश्ता, चहा झाला. पाण्याचा बाटल्या भरणे हा एक रोमांचकारी
कार्यक्रम झाला. रोमांचकारी का? ते पुढे येईलच. ट्रेकिंगचे बूट, टोप्या,
गॉगल्स सगळा साजशृंगार करून झाल्यावर आम्ही चालायला सुरवात केली.
ट्रेकिंग ग्रूप बरोबर येणारे गाईड लोकं, आपण चढून चढून अगदी मरायला टेकू,
असा चढ असला, तरी कध्धीही, चुकुनही तसं सांगत नाहीत. ‘शुरूमें थोडीसी चढाई
है, उसके बाद तो कँपतक ढलानही ढलान है’ असं तोंडभर आश्वासन मिळालं होत.
आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हतो. ‘सोप्पच तर आहे ना, मग अगदीच
सावकाश येतो’ असं म्हणून चालायला सुरवात केली. आजचा टप्पा धाकुरीपर्यंत
होता. नऊ किलोमीटर चालायचं होत.
सगळी मुलं झपाझप चालत कधीच पुढे निघून गेली. त्यानंतर रोज चालताना अशीच
विभागणी व्हायची. मुलं पुढे आणि आम्ही मागे. ‘बच्चे लोग और दिदी लोग’ असं
आमचं नामकरणही झालं होत.
मागचे दोन दिवस एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसणे आणि वेळ घालवायला खात राहणे, असे गेले होते. आता चालताना शरीर आनंदाने कुरकुरत होत. सुदैवाने हवाही चांगली होती. पाउस नव्हता. अगदी कडक, चटके देणार ऊनही नव्हतं. आसपास सुरेख अशी झाडी होती. मोकळ्या, स्वच्छ, प्रदुषणमुक्त हवेत श्वास घेतानाही किती चांगल वाटत. हिमालयातली ही करकरीत हवा आणि नीळभोर आकाश मला अतिशय आवडतं. इथली हवा नुकतीच तयार झाल्यासारखी, अस्पर्श असावी अस वाटत राहत!
चढाच्या रस्त्यामुळे मधेमधे थांबावं लागत होत. आमच्यासारख्या लोकांची सोय म्हणून ठीकठीकाणी ‘रेसटिंग पिलेष’ बांधल्या होत्या. तिथे नाही थांबलं, तर बांधणाऱ्यांना किती वाईट वाटेल, अशा विचाराने आम्ही प्रत्येकच ठिकाणी पाच मिनिटे टेकून त्यांना दाद देत होतो!
काही ट्रेकरूटवर ट्रेकर्स, स्थानिक लोकं ह्यांची वर्दळ असते. लहान लहान वस्त्या, गावे असतात. पण आजच्या रस्त्यावर असं काहीही नव्हत. आमचा ग्रूप आणि पिवळा ग्रूप इतकेच लोकं होतो. आम्ही ‘दिदी लोग’ जरी सावकाश चालत होतो, तरी पिवळ्या ग्रुपच्या बरचं पुढे निघून गेलो होतो. डोळ्यावर गुंगी यावी, इतकी निरव शांतता होती. पक्ष्यांची शीळ ऐकू येत होती. लहान लहान झरे-ओढे वाहत होते. थोडक्यात म्हणजे अगदी यश चोप्रांच्या चित्रपटात शोभून दिसेल अशी जागा होती.
कधी अगदी गर्द झाडी, तर कधी हिरवीगार गवताची कुरण असा रस्ता होता. हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा डोळे तृप्त करत होत्या. सपाटी मात्र नव्हती. चढ होता. पण तोही फार थकवणारा नव्हता. आम्ही फार मागे तर पडत नाहीये ना, ही खात्री करायला देवेन सर अधूनमधून थांबत होते. आम्ही दिसलो, की पुन्हा भराभर चालून मुलांना गाठत होते.
आज माहितीपत्रकाप्रमाणे आम्हाला नऊ किलोमीटर चालायच होत. पण ती माहिती चुकीची होती, हे सिद्ध करणारा एक बोर्ड दिसला. त्यावर लोहारखेत पाच आणि धाकुरी पाच किलोमीटर असं लिहिलेलं होत! अर्थात ह्या आकड्यांना तसाही काही अर्थ नसतो. ते आपले असेच माहितीफलकाची शोभा वाढवण्यासाठी असतात. आपण आकड्यांचा विचार न करता एका पावलानंतर दुसर टाकत राहणे, हे उत्तम धोरण असतं.
थोड्याच वेळात आम्ही एका खोपट्याजवळ येऊन पोचलो. हिमालयन पद्धतीप्रमाणे
इथे मॅगी, चहा-कॉफी, शीतपेयांची सोय होती. मुलांनी अर्थातच मॅगी आणि
कोल्ड्रींक्स घेतली! घरच्या मॅगीपेक्षा पहाडात मिळणार मॅगी खूप चांगलं
लागत, हे त्या पाच जणांनी इतक्या जोरात पटवून दिल, की आम्हाला ते पटावचं
लागलं! पण ट्रेकिंगला गेल्यावर इतपतच मागण्या करता येतात, बाकी काही मिळतच
नाही. त्यामुळे ही मागणी वाटाघाटींशिवाय मंजूर झाली.
मॅगी पॉइंटनंतर थोड्याच वेळात चढ संपला. त्या जागी एक चिमुकलं देऊळ होत.
कोणीतरी भाविक पूजा-अर्चा करून गेला होता. नवस फेडायला बांधलेल्या घंटा वर
टांगल्या होत्या. पताका फडफडत होत्या. साध-सरळ निरागस असं देऊळ आणि तसेच
तिथले भक्त! श्रद्धा होती पण बाजार नव्हता.
इथून कँप तीन किलोमीटर आहे, अशी बातमी देऊन देवेन सर पुढे गेले. तिथे मोबाईलला रेंज मिळत होती. त्यामुळे घरी फोन करून सर्वांनी ‘आम्ही अजून आहोतही, आणि ठीकही आहोत’ अशी बातमी दिली. पुढे सगळा उताराचा रस्ता होता. आम्ही निवांत होऊन गप्पा मारत रस्ता उतरायला लागलो. थोड्याच वेळात कँप दिसायला लागला. आमच्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही जेवायच्या वेळेआधी पोचलो सुद्धा!
तिथे जाऊन पाहतो, तर पाचही मुलं हिरवळीवर एकीकडे खिदळत लोळत होती! काय झालं, ते सांगायलाही त्यांना हासणं थांबवता येत नव्हतं. बराच वेळानंतर हास्याच्या ह्या उकळ्या शांत झाल्या. कारण कळल्यावर आम्हीही हसायला लागलो. ते कारण असं होत की, मुलांना पोचून बराच वेळ झाला होता. आल्याआल्या मिळालेलं स्वागत-सरबत पिऊन ते लोळत होते. डोळ्यांवर गॉगल होते. अचानक मुक्ता म्हणाली,’ ए, आभाळात दिसतोय, तो सूर्य आहे की चंद्र?’ वाजला होता दुपारचा एक. आत्ता कुठला आलाय चंद्र? मग हा इफेक्ट नक्की कसला? सरबताचा की रस्त्यात खाल्लेल्या स्ट्रॉबेरीजचा? नक्की काय चढलं होत काय माहिती? हा विनोद ट्रेकभर तर पुरलाच पण अजूनही घरी काही विचित्र बोललं की ‘स्ट्रॉबेरी खाल्ल्या का?’ असा प्रश्न येतोच!
हा कँपची जागाही सुरेख होती. आमच्यासाठी लगत बाथरूम्स असलेल्या दोन खोल्या होत्या. बसायला छानसा व्हरांडा होता. समोर मस्त लॉन होत. पिवळा ग्रूप आणि आम्ही एकाच कँपवर होतो, तरी राहण्याच्या जागा दूर होत्या. जवळच एक नवीन बांधलेलं गेस्ट-हाउस होत. चौकशी केल्यावर ‘वो डिलक्स गेस्ट-हाऊस बनाया है, उधर बॉयलर वगैरा सब है, अशी माहिती मिळाली. पण इथे जनरेटरची वीज संध्याकाळी दोन तास मिळते. बॉयलरचं काय करणार कोण जाणे?
आमच्या शेजारच्या खोलीत हा ट्रेक संपवून आलेल एक जोडपं होत. त्यांच्याशी गप्पा झाल्या. ते उत्तराखंडातच राहणारे होते. अनेक वेळा ह्या ट्रेकला येऊन गेलेले होते. त्यांचा प्रत्येक कँपवर आरामात थांबत थांबत जायचं, असा हेवा वाटण्यासारखा प्लॅन होता.
मुलांनी व्हरांड्यात पत्त्यांचा डाव मांडला. बदाम सातचा डाव सुरू झाला. कँपवरचे मदतनीस त्यांचा खेळ बघत होते. मुलांनी आग्रह केल्यावर खेळ समजून घेऊन तेही सामील झाले. पुढचे सगळेच्या सगळे डाव ही नवी मंडळीच जिंकली!!! मुलांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
रात्री जेवण झाल्यावर गाणी-बजावणी झाली. ‘संगीsssत-सरिता, भुले-बिसरे गीत आणि चित्रलोकं- गाने नये जमानेके’ अशी विविधभारती झाली. झोपायची वेळ झाल्यानंतर टॉर्च, पाण्याची बाटली, कोल्ड क्रीम, लोकरी पायमोजे, स्कार्फ इत्यादी वस्तुंच्या शोधाशोधीत सॅक उपसल्या आणि परत भरल्या गेल्या, प्लास्टिक पिशव्यांचे कुरकुर आवाज करून झाले, दिवसभरातल्या मजेदार गोष्टींमधलं काहीतरी आठवून खुसूखुसू हसून झालं. आता करण्यासारखं अगदीच काही उरल नाही, तेव्हा नाईलाजाने सगळे झोपून गेले.
धाकुरी-खाती (११ जून २०१४)
हा ट्रेक ट्रेकिंगच्या अवघडपणाच्या पट्टीवर फार वर नसावा. कागदोपत्री (तरी!) ह्या ट्रेकला तसा सोपा मानतात. त्यामुळे ज्यांना घाई असते, असे ट्रेकर्स दोन-दोन कँप एका दिवशी करून अगदी कमी दिवसांमध्ये ह्याच गणित बसवतात. आम्ही मात्र ह्या फंदात पडलो नव्हतो. आम्ही जाताना निवांतपणे एक-एक कँप करत जाणार होतो. जातानाच्या चार दिवसांचं चालायचं अंतर येताना दोन दिवसांमध्ये संपवणार होतो.
ह्याचा फायदा म्हणजे अगदी भल्या पहाटे उठा, भराभरा आवरून निघा अस शेड्यूल नव्हतं. घराबाहेर, त्यातून अशा निसर्गरम्य जागी असल्यावर तशीही फार उशिरापर्यंत झोप लागतच नाही. आदल्या दिवशी पाहिलेलं दृश्य आता पहाटेच्या कोवळ्या उजेडात कसं दिसेल, ह्या उत्सुकतेने लवकर जाग येतेच.
पण उठल्यानंतर व्हरांड्यात बसून एकट्याने किंवा मैत्रिणींबरोबर आरामात कॉफी प्यायला, गप्पा मारायला वेळ मिळत होता! नक्की किती वर्षांपूर्वी ही मजा घेतली होती, तेसुद्धा आठवत नव्हत. मैत्रिणींच्या घरी गेलं, तरी जिच्या घरी गेलेलो असू, तिला तिची काम असतातच. इथे सगळेच रिकामे होते. डब्याच्या भाज्या, कुकर लावणे, कामवाल्या बाईंच्या वेळा, स्वैपाक, ऑफिसचे फोन आणि तिथल्या डेडलाईन्स..... काहीही नव्हत.
दुर्मिळ असलेले निवांत क्षण
आजही काहीही न ठरवता आम्ही ‘दिदी लोग’ बाहेर कॉफीचे कप हातात घेऊन बसलो होतो. उजाडलं होत पण ऊन मात्र नव्हतं. भल्या पहाटे थोडासा पाउस झाला होता. त्याचे थेंब समोरच्या लॉनवर चमकत होते. पक्ष्यांच्या सुरेल हाका सोडल्या, तर बाकी सगळी शांतता होती. त्या शांततेमुळे आपल्या मनातला, डोक्यातला सतत चालू असलेला कोलाहल थांबला नाही, तरी थोडा कमी व्हावा अस वाटत होत.
जरा वेळाने मुलांना जाग आली. त्यांची आवराआवरी, चहा-पाणी, हसणं-खिदळणं सुरू झालं. आम्हीही आमची कॉफी-समाधी संपवून आवरायला लागलो.
आवरून, पोर्टर आणि डे सॅक वेगळ्या करून, चालायचे बूट चढवून आणि किमान सतरा वेळा कँपवर काही विसरलो नाही, ह्याची खात्री करून बाहेर आलो, तर एक आश्चर्य आमची वाट पाहात होतं. लख्ख ऊन पडलं होत. कँपसमोरच्या झाडांच्या मधून एक उंच, बर्फाच्छादित शिखर दिसत होत! सगळ्यांना इतका आनंद झाला. जणूकाही आम्ही ते शिखर सर करून आलोय.. तातडीने त्या शिखराचे आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे सर्वांचे फोटो काढले गेले. आमची ही घाई पाहून देवेन सर हसत होते. ‘मॅम, ऐसे बहोत सारे नजारे दिखाई देंगे, फिकर मत किजीयेगा.’ असं म्हणून आमचा उत्साह आणि पुढच्या दिवसांबद्दलची उत्सुकता वाढवत होते.
प्रथम तुज पाहता, जीव वेडावला!!
देवेन सर म्हणजे अगदी शांत लीडर होते. संपूर्ण ट्रेकभर त्यांनी आम्हाला निघण्याची, चालायची, पोचायची घाई केली नाही. सगळं आमच्या वेगाने करू द्यायचे. ‘ आपलोग जहांसे आते हो, हरदिन जल्दीही होती है. पहाडोमें आये हो, उसका मजा लिजिये, कोई दिक्कत नहीं है’ अस म्हणायचे. नाहीतर बरेच लीडर ‘घाई’ संप्रदायातले असतात. ‘हल्या-हल्या’ करण्यात त्यांना फार आनंद मिळतो. एकदा लोकांना पुढच्या कँपवर पोचवलं, म्हणजे झालं. अशी साधारण मनोवृत्ती असते.
काही वर्षांपूर्वी ह्याच ग्रुपमधले आम्ही पाच लोकं गोव्याच्या ट्रेकला एका संस्थेबरोबर गेलो होतो. मोठा, चाळीस लोकांचा ग्रूप होतं. त्या ग्रुपमधल्याच एका व्यक्तीला लीडर नेमलं होत. त्यांनी तर अगदी नकोनको केलं होत. ‘बॅचच्या सुरवातीला बायका नंतर पुरुष असचं चालायचं, फक्त नवरा-बायको असले, तरच बरोबर चालू शकतात’, असे तालिबानी फतवे काढले होते. आम्ही ‘मुलाबरोबर चाललं तर चालेल का? भाच्याबरोबर चाललं तर परवानगी आहे का?’ असे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडलं होतं. त्या बॅचमधल्या कोणीच त्यांनी सांगितलेलं ऐकल नाहीच. पण अशा वेळेला भांडण, वाद, बोलाचाली होते, त्यामुळे ट्रेकची मजा जाते.
इथे मात्र असा काही त्रास नव्हता. सर मुलांबरोबर चालायचे. अगदी अवघड वाट असेल किंवा रस्ता चुकायची शक्यता असेलं, तरचं थांबायचे. ‘आप लोगोंका स्पीड बढिया है. आरामसे आईये’ अशा पाठिंब्यावर आमचं एकंदर मजेत चालू होत!
आज चालायला सुरवात केल्यावर चांगल्यापैकी उताराचा रस्ता होता. येताना हा रस्ता चढून यावं लागणार होतं. वर्तुळाकार ट्रेकरूटमध्ये हा प्रॉब्लेम नसतो. हा ट्रेकरुट ‘आल्या रस्त्याने परत’ ह्या प्रकारचा असल्याने हा प्रॉब्लेम होता. आत्ताचा प्रत्येक उतार येतानाचा चढ होणार होता!
थोड्याच वेळात आम्ही एका छोट्या गावात पोचलो. रस्ता दगडाच्या उभ्या
कपच्या लावाव्या तसा होता. दगडाने बांधलेली, पत्र्याच्या उतरत्या छपरांची
घर, सावलीला बांधलेली जनावरं दिसत होती. लहान मुलं खेळता खेळता थबकून
आमच्याकडे आश्चर्याने बघत होती. देवाजीच्या करुणेमुळे गव्हाची शेत पिकून
पिवळी झाली होती. गावातल्या बायका-पुरुष कापणीच्या घाईत होते. जनावरांचा,
फुलांचा, उन्हाचा आणि गवताचा असा संमिश्र वास येत होतं.
समोर दरी, त्यातून वाहणारी नदी, पलीकडच्या डोंगरांवरची लहान गावं दिसत
होती. लहान मुलांनी पाटीवर गिरगुटया काढाव्या, तश्या रस्त्यांच्या रेघा
दिसत होत्या. क्षितिजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हिमालयाची
शिखर दिसत होती. हे सगळं दृश्य, तो गावातला वास आणि ताजी स्वच्छ हवा. मन
अगदी निवत होत. नजर बांधली गेली होती. एक हुरहूर वाटत होती.
देवाजीने करुणा केली, शेते पिकूनी पिवळी झाली!
पण अजून बरचं अंतर चालायचं आहे, हे ठाऊक असल्याने आम्ही वाट कापायला सुरवात केली. थोड्याच वेळात अजून एका मॅगी पॉंईंटला पोचलो होतो. प्रथेप्रमाणे मुलाचं मॅगी खाणे चालू होत. छान सारवलेल्या चुलीवर स्वैपाक चालू होता. बसायच्या जागेच्या आसपासच्या भिंती असंख्य पोस्टर्सने भरलेल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतल्या राजकीय पोस्टर्सपासून ते देवी-देवता, निसर्गदृश्ये काय म्हणाल ते होत! थोडा वेळ त्याच रसग्रहण झाल्यावर पुढे चालायला सुरवात झाली.
मॅगी पॉइंट
नंतरचा रस्ता ‘कधी चढ तर कधी उतार’ असा, म्हणजेच ‘कधी धाप लागणे तर कधी गुढघे दुखणे’ असा होता. कालच्या रस्त्यावर खेडी-वस्त्या आजिबात नव्हत्या. आजचा रस्ता मानवी स्पर्श असलेला होता. पायऱ्या-पायऱ्यांची शेत, घरं होती. गायी, बैल, मेंढ्या रस्ता अडवत होते. न बांधलेला कुत्रा एक मैलाच्या परिघात असला, तरी सुजाताची घाबरगुंडी होते. ह्या ट्रेकमध्ये तर ह्या कँपवरची कुत्री पुढच्या कँपपर्यंत सोबत करायची. ती कुत्री सारखी आमच्या पुढे-मागे बागडत असायची. त्यामुळे मुलं तिला नुसतं ‘सुजातामावशी...’ अस जरी म्हटली, तरी कुत्र्याच्या भीतीने तिची पळापळ सुरू व्हायची. तिची किंचाळी ऐकून कोणालातरी अडगळीत गेलेला ‘अस्फुट किंचाळी’ हा शब्द आठवला. तिथून पुढे सगळ्या किंचाळ्या ‘अस्फुट’ झाल्या! ‘सुजाता-कुत्रा-अस्फुट किंचाळी’ ह्या समीकरणाला ह्या ट्रेकच्या विनोदांमध्ये अग्रस्थान मिळालं..
अशी मजा करत करत आम्ही खाती गावात पोचलो. तिथे एका गेस्ट-हाउस मध्ये पिवळ्या ग्रुपचा कँप होता. धाकुरीला आमचा कँप एकाच जागी होता. इथे त्यांचा कँप दिसल्यावर आपणही पोचलो, अस आम्हाला वाटलं. पण नाही. पुढे चांगल्यापैकी थकवणारा असा दोन किलोमीटरचा चढ होता! तो चढताना सगळ्यांची अगदी वाट लागली. आजच्या रस्त्यावर इतरही चढ चढलो होतो, पण इथे मनाची तयारी नसल्याने चढ भयानक वाटला. कुमाऊँच्या कँपचं डिझाईन एव्हाना ओळखीचं झालं होत. मध्ये खोल्या आणि दोन्ही बाजूंनी व्हरांडे अशी रचना दिसल्यावर ‘आला एकदाचा कँप!’ असं म्हणत आम्ही व्हरांड्यातच बसकण मारली.
खाती कँप
कँपवर पोचल्यावर काय लाडचं लाड होते. आल्याआल्या लगेच सरबत, पाठोपाठ गरमगरम जेवण, दुपारी चहा-कॉफी, संध्याकाळी सूप, रात्री जेवण अशी ऐश होती. चालून भूक चांगलीच लागत होती, अधेमधे विशेष काही खायलाही मिळत नव्हतं. शेतातून आणलेली ताज्या भाजीची चव, मोकळ्या हवेत फारच खुलायची. घरी ज्या भाज्या खायला मुलं खळखळ करतात, त्याही भाज्या तिथे अगदी आनंदाने, चवीने खायची.
दुपारचं जेवण झाल्यावर बराच वेळ मोकळा होता. मग पत्ते बाहेर आले. आम्ही लहान असताना कल्याणला ‘कॅनिस्टा’ हा प्रकार फार लोकप्रिय होता. फार वर्षात न खेळल्यामुळे आता कसा खेळायचा ते विसरायलाही झालं होतं. अश्विनीने सूत्र हातात घेऊन सगळ्यांची शिकवणी घेतली. एक-दोन डाव चुकत माकत खेळल्यावर सगळे अगदी अट्टल जुगाऱ्यांसारखे खेळायला लागले.
कल्याणला एकदा धो-धो पावसाची झाड लागली होती, तेव्हा अश्विनीच्या माजघरात, भर दुपारी मेणबत्त्या लावून तिच्या घरच्यांबरोबर आम्ही दुपारभर कॅनिस्टा खेळलो होतो, ती आठवण येत होती. एकुणात फार जुन्या मैत्रिणी बरोबर असल्यामुळे नोस्टॅल्जियाचे झटके उठता-बसता येत होते. आमचं जवळपास सगळं लहानपण बरोबर गेलं होतं. त्यामुळे आई-वडील-भावंडेच काय पण शेजारी-पाजारी, नातेवाईक सगळेच माहितीचे. ह्या सगळ्या गप्पा मारायला लागलो की मुलांच्या आघाडीकडून ‘झाल्या ह्यांच्या कल्याणच्या गप्पा सुरू’ असा निषेध व्हायचा. पण सगळ्याच मुलांना आपल्या आई-बापाचे लहानपणचे किस्से ऐकायची खूप उत्सुकता असते. सदैव मोठेपणाचे ओझे डोक्यावर असलेली आपली आई सुद्धा शाळेत शिक्षकांची बोलणी खायची, उनाडक्या करायची हे मुलांना गमतीशीर वाटायचं.
काळोख झाला, पत्ते दिसेनासे झाले, तसा कॅनिस्टा थांबला. मुक्ता आणि अभिराम दोघं शास्त्रीय संगीत शिकतात आणि सुंदर गातातही. जेवणानंतर टॉर्चच्या उजेडात मैफील जमली. त्या सुरांमध्ये तरंगतच सगळे स्वप्नांच्या राज्यात पोचले.
खाती – द्वाली (१२ जून २०१४)
जोपर्यंत बऱ्यापैकी शहरी भागात, महामार्गावरून जात असतो, तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोपा असतो. बाटलीबंद पाणी सगळीकडे विकत मिळते. ट्रेकमध्ये, प्रवासात पोट बिघडून सगळ्या वेळापत्रकाची वाट लागू नये, म्हणून आपल्यातले बहुतेक लोकं ह्या पाण्यात पैसे घालवतात. पण आता आम्ही ज्या भागात होतो, तिथे दुकान हा प्रकार दुर्मिळ होता. पाणी विकत घेणार तरी कुठून? पैसे किती निरुपयोगी होऊ शकतात, ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी प्रत्येकाने हिमालयाच्या कुशीत जायला हवं!
तर, अशा रीतीने पाणी प्रश्न अशा जागी नेहमीच बिकट होतो. एरवी पाणी तिथल्या झऱ्याच भरून घ्यायचं आणि त्यात क्लोरिनचे ‘दो बूंद’ गंगाजलासारखे घालून त्या पाण्याच शुद्धीकरण करायचं, अशी पध्दत असते. पण ह्या वेळेला आधुनिक युगाचे पाच प्रतिनिधी बरोबर होते. शिवाय अश्विनी आणि तिच्या लेकीला ट्रेक संपल्यावर चारच दिवसात अमेरिकेत परतायचं होतं. पोट बिघडणे, आजारी पडणे ह्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे जास्तीची काळजी घेणं भागच होतं.
आता बाजारात फिल्टर बसवलेल्या बाटल्या मिळतात. त्यांची खरेदी निघण्याआधी झाली होती. त्या बाटल्यांमध्ये स्थानिक पाणी भरून आम्ही उरलेल्या बाटल्यांमध्ये ते ‘डाउनलोड’ करायचो. फिल्टरवाल्या बाटल्या दाबून दाबून हे काम करावं लागायचं. त्यामुळे ह्या कामाला ‘बाटल्या पिळणे’ असं यथायोग्य नावं पडलं! रोज सकाळ – संध्याकाळ आम्ही हा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारायचो. हे काम कंटाळवाण वाटायचं. पण हे शुद्ध पाणी आणि स्वाईनफ्लू पासून प्रसिद्ध झालेल्या हँड-सॅनिटायझरचा मुबलक वापर ह्यामुळे कोणीही आजारी पडलं नाही, हेही तेवढच खरं आहे.
आज जो रस्ता चालायचा होता, तो मागच्या वर्षीपर्यंत ह्या ट्रेकमधला सगळ्यात सोपा रस्ता होता. पण जून २०१३ मध्ये काफनीगंगा नदीला प्रलयकारी पूर आला, प्रचंड प्रमाणात दरडी कोसळल्या, पाण्याच्या लोंढ्यामुळे नदीवरचे पूल वाहून गेले. रस्ता अक्षरशः होत्याचा नव्हता झाला. स्थानिक लोकांना आमच्यासारखे प्रवासी हे उत्पन्नाचे साधन. त्यामुळे त्यांनी बरेच कष्ट घेऊन तो मार्ग चालण्याजोगा केला आहे.
ह्याची कल्पना आम्हाला देवेन सरांनी आदल्या दिवशी दिली होती. तेव्हा सर्वानुमते सकाळी लवकर म्हणजे साडेसहा – सातला निघायचं, असं ठरलं. कँपवरचा एक मदतनीस आमच्या नाश्त्याची पुरी-भाजी घेऊन आम्हाला गाठेल, अशी सोय झाली होती. दाट जंगलातल्या रस्त्याने आमची वाटचाल सुरू झाली.
सुरवात चढाच्या रस्त्याने झाली, पण खूप सुंदर, वनराईने समृद्ध असा भाग होता. नदीचाचा ध्रोन्कार सतत ऐकू येत होता. तो आवाज, ते सौंदर्य, जंगलाचा ओलसर वास, सुखद असा गारवा, पुढे चालणाऱ्या मुलांच्या गप्पांचा-हसण्याचा आवाज आणि बरोबर मनासारखी सोबत... पंचेंद्रियांबरोबर मनही तृप्तीने काठोकाठ भरून वाहात होते.
लवकरच पहिली लँडस्लाईडची जागा आली. देवेन सर, इतर मदतनीस ह्यांच्या मदतीने ती जागा पार झाली. इथून पुढे बऱ्याच जागी ही कसरत करावी लागणार होती. ह्या जागेपर्यंत आमचं सामान खेचराच्या पाठीवरून येत होतं. आता ह्या अश्या रस्त्यावर खेचरं येणं अशक्य होतं. त्यामुळे त्या सॅक पोर्टरच्या पाठींवर चढल्या. ह्या स्थानिक लोकांना ह्यातून रोजगार मिळतो, रोख पैसे त्यांच्या खिशात पडतात म्हणून आनंद मानावा की आपण पैसे मोजून दुसऱ्याचे श्रम विकत घेतो, ह्याची लाज वाटावी हा त्रासदायक प्रश्न दरवेळेप्रमाणे आत्ताही टोचायला लागला.
त्या पोर्टरमध्ये एकाचं नावं ‘स्वरूप’ होतं. गप्पा मारायची खूप हौस
असल्याने हा आमच्यात लगेचच मिसळून गेला. पाठीवर दोन-तीन सॅक लीलया तोलून तो
आम्हाला अवघड रस्ते पार करायला मदतही करायचा.
अर्धा रस्ता चालून झाल्यावर एका जागी थांबून आम्ही पुरी-भाजी खाल्ली.
नदीच्या अगदी जवळ होतो. तिचा अविरत असा नाद अजूनही कानात भरलेला आहे.
डोंगरांवरून वाहणारे धबधबे आवेगाने नदीला येऊन मिळत होते. ढग नसले की
नंदादेवी शिखराच दर्शन होत होत. आत्तापर्यंत पावसाच्या बाबतीत आम्ही
नशीबवान होतो. मी कैलास-मानस यात्रा करून आलेली आहे, हे देवेन सरांना
गप्पांमधून कळल होत. त्यामुळे ‘आप सब डीव्होटी लोग हो, देखना पुरा ट्रेक
हवा अच्छीही होगी’ असं देवेन सरांचं म्हणणं, तर फॉरेनर आके कुछ उलटा-सिधा
खाते है, मां नंदादेवी नाराज होती है, फिर बारीश होती है’ असं स्वरूपचं
लॉजिक होत!
निसर्गाचे उग्र तांडव
कधी नदीच्या वाळवंटातून, कधी जंगलातून तर कधी कोसळलेल्या दरडीच्या रस्त्याने आजचा रस्ता होता. अगदी भयानक अवघड नसला तरी थोडा त्रासदायक मात्र आहे. नदीच्या वाळवंटातून चालताना दगड पायांना टोचत राहतात. आसपास सगळीकडे उध्वस्त झालेले डोंगर बघताना त्याचेही एक दडपण मनावर येतच. तरी आम्ही हा सगळा विध्वंस एका वर्षानंतर बघत होतो. तेव्हा ह्या परिसरात जे लोकं अडकले असतील, त्यांचं काय झालं असेलं, ही कल्पनाही अस्वस्थ करणारी होती.
पण जगरहाटी कोणाही करता थांबत नाही, हेच खरं. पूर ओसरला, पाणी वाहून गेलं, पुढचा दिवस उजाडला की पुढे बघावच लागत. इथल्या लोकांना पर्यटक हे उत्पनाच साधन. त्यांच्या सोयीसाठी जुने, विसरलेले रस्ते ह्यांनी पुन्हा शोधून काढले. संध्याकाळी नदीपात्रात दिशा कळणार नाही, म्हणून वाटेच्या कडेने खुणेसाठी दगड लावून ठेवले. जंगलातली जी वाट धोक्याची झाली आहे, तिथे चुकून कोणी जावू नये, म्हणून तिथे काटेरी झाडं टाकून ठेवली. आता सरकारनेही ह्या मार्गावर परत पूल बांधण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. काही वर्षात इथली ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या पुन्हा पूर्ववत होईल अशी आशा आहे.
सापशिडीच्या खेळाप्रमाणे आम्ही सारखे नदीजवळ यायचो, चढून डोंगरावर जायचो, लँडस्लाईड मधून जपून जपून पावलं टाकत उतरून पुन्हा नदीजवळ!! असा खेळ अनेकवेळा खेळलो. पिवळ्या ग्रुपचे काही सदस्य आमच्यापेक्षा पुढे तर काही मागे असायचे. कँपच्या दोन किलोमीटर आधी आजची शेवटची आणि सगळ्यात मोठी लँडस्लाईड आली. मुलं केव्हाच उतरून आमची वाट बघत खालच्या एका दगडावर थांबली होती. घाटात एखादा ट्रक अडकून सगळी वाहतूक अडकून राहावी, तश्या पिवळ्या ग्रूपमधला एक सदस्य मधेच अडकला होता. पोर्टर त्यांना धीर देऊन, हात धरून उतरायला सांगत होता. पण पुढे पाऊल टाकायची त्यांची हिंमत होईना. बरं, बाकीचे आपापला जीव मुठीत धरून तिथे उभे, ते काय मदत करणार, कपाळ? शेवटी त्या पोर्टरने त्याच कसब पणाला लावत हळूहळू त्यांना खाली नेलं. घाटाचा रस्ता मोकळा झाला! वाहतूक सुरळीत होऊन आम्हीही खाली पोचलो.
डावीकडून पिंढारी गंगा आणि उजवीकडून काफनी गंगा वाहताना दिसत होती. इथे
त्यांचा संगम होतो. फार छान दृश्य होतं. काफनी गंगा पार करून आम्हाला
कँपकडे जायचं होत. पूर्वी पिंढारी गंगेवरचा पूल पार करावा लागायचा. तो
मागच्या वर्षी वाहून गेला. म्हणून आता काफनी गंगेवर तात्पुरता पूल बांधला
आहे. तो अगदीच कमकुवत असल्याने एका वेळेला एकच माणूस जावू देतात. वाहतूक
नियमनाच काम स्वरुपने स्वखुशीने स्वीकारलं होत.
नंबर लागायची वाट बघत असताना, सुजाता मध्य रेल्वेवाली आणि पिवळा ग्रूप
पूर्व रेल्वेवाले आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. पिंढारी व काफनीच्या
संगमाच्या साक्षीने पूर्व आणि मध्य रेल्वेचाही संगम घडून आला!
नेहमीप्रमाणे पिवळ्या ग्रुपचा कँप आधी आणि आमचा अजून एक चढ चढल्यावर होता. ह्याचा तीव्र निषेध देवेन सरांकडे करत आणि धापा टाकत आम्ही कँपवर पोचलो. मुलाचं तोवर सरबत पिवून झालं होत. अश्विनी दिसताच एका स्वरात त्यांनी ‘कॅनिस्टा- कॅनिस्टा’ असा गजर सुरू केला. कालची पत्त्यांची चावी त्यांना फारच बसली होती. भराभरा जेवून त्यांनी पत्त्यांचा डाव मांडला.
ह्या खेळाला समसंख्येतले खेळाडू लागतात. आम्ही होतो नऊ लोकं. मग मी खेळात गेलेच नाही. शेजारच्या व्हरांड्यात बसून राहिले. समोर उंच डोंगर दिसत होते. दोन्ही नद्यांचा खळखळाट आसमंतात भरून राहिला होता. सगळ्या डोंगरउतारांवर मागच्या वर्षीच्या लँडस्लाईडच्या खुणा दिसत होत्या. आम्हाला धाकुरीच्या कँपवर भेटलेल्या काकांनी ‘खातीपासून पुढे तुम्हाला निसर्गाचा कोप किती भयानक होता, त्याचा अंदाज येईल,’ सांगितलं होते. ते किती खरं होतं ह्याचा प्रत्यय कुठल्याही दिशेला नजर फिरवली तरी येत होता.
मी एकटीच बसलेय, हे पाहून स्वरूप गप्पा मारायला आला. २०१३ च्या प्रसंगाची आठवण सांगू लागला. तेव्हा तो पन्नास लोकांच्या मोठ्या ग्रूपबरोबर इथेच होता. भयानक पाउस, थंडी, दरडी कोसळण्याचे भयप्रद आवाज अशा वातावरणात तीन दिवस सगळे अडकले होते. कँपवरचं रेशन कधीच संपून गेलं, त्यामुळे खायला काही नाही, जीवाची शाश्वती नाही, घर दूर राहिलेलं... त्यांची काय मनस्थिती झाली असेलं, ह्याची नुसती कल्पना करूनच थरकाप होत होता. सुदैवाने गोष्टीचा शेवट चांगला झाला. पाऊस ओसरल्यावर नदीचा पूरही कमी झाला. मग ते लोकं चिखल, पाणी तुडवत कसेबसे खातीला पोचले. तिथे जीप आल्या. जीपमधून बागेश्वरपर्यंत गेले आणि पुढे सुखरूप आपापल्या घरीही पोचले. हाल झाले पण निदान जीवित हानी झाली नाही. परमेश्वराची कृपाच ती.
फायर, फायर, कँप फायर
ह्या कँपवर थंडी होती. रात्रीचं जेवण झाल्यावर तर आणखीनच हुडहुडी भरायला
लागली. देवेन सरांनी शेकोटी पेटवली. सगळे त्याच्या भोवती शेकत बसले. ‘जबभी
कभी महाराष्ट्रासे ग्रूप आता है, एक गाना जरूर गाते है, आप लोग पेहेचानके
गाईये’ अस कोडं त्यांनी घातलं. पण ह्याचं उत्तर ‘चाल तुरुतुरु’ असणार हे
आम्ही लगेचच ओळखलं. पैज हारल्याची शिक्षा म्हणून त्यांनाच सगळ्यांनी गाणी
म्हणायला लावली. पोर्टर लोकांनी त्यांची स्थानिक गाणी गायली. पौर्णिमा
उद्यावर आली होती. आभाळात चंद्र, शेकोटी, डोंगर आणि नदी म्हणजे अगदी
बॉलिवूड सेटिंग होतं!
हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम जरा उशिरापर्यंत रंगला. त्यामुळे रोज
रात्री होणारा सॅक उपसायचा कार्यक्रम सर्वानुमते रद्द करण्यात आला!!
द्वाली –फुरकिया (१३ जून २०१४)
जगात कुठे उकडत असेलं का? अशी शंका येईल, अश्या थंडीच्या प्रदेशात आलो होतो. अंगावरच्या कपड्यांचे आणि झोपताना घेतलेल्या पांघरुणाचे थर वाढले होते. कँपवरच्या मदतनीसांनी तोंड धुण्यासाठी गरम पाणी तयार ठेवल होतं. थंडीतल्या गरम पाण्याच्या स्पर्शाने, सुखं म्हणतात ते हेच, अशी खात्री होत होती! मागच्या वर्षीच्या हाहाःकारानंतर काफनी ग्लेशियरकडे जाणारा रस्ता बंद झाला. तो रस्ता द्वाली कँपवरून जायचा. तेव्हा द्वाली-काफनी-द्वाली असा एक दिवसाचा ट्रेक असायचा. आता तो दिवस शेड्यूलमध्ये जास्तीचा असतो. त्या गणितामुळे आज आम्हाला फक्त पाच किलोमीटर चालायचं होतं. चालताना मजा यायचीच पण कँपवरही आम्ही तेवढीच मजा करायचो. त्यामुळे मोकळ्या वेळाबद्दल आमची काहीही तक्रार नव्हती.
मधे एक दिवस टाकून पुन्हा ह्याचं कँपवर मुक्काम करायचा होता. फक्त ह्या दोन दिवसासाठीच सामान बरोबर घेऊन, उरलेलं इथेच ठेवलं. पोर्टरची सोय झाली आणि आम्हाला सॅक उपसायला अधिकृत कारण मिळालं! अंतर कमी असल्याने जरा उशीरानेच चालायला सुरवात केली. उंचावर आल्यामुळे थोडा जास्त दम लागत होता. हाय अल्टीट्यूड सिकनेसचे कारण सांगण्याइतकी उंची गाठली नव्हती, तरी ‘धकधक’ मात्र होत होती. आमच्या म्हणण्याप्रमाणे रस्त्याला चढ होता, पण स्वरुपच्या म्हणण्याप्रमाणे ‘सीsssधा रस्ता होता!’ ‘आजका रस्ता तो सीsssधा है, कल थोडी चढाई है’ हे पुरवणी मत होतं. आजचा रस्ता ‘सीsssधा’ असेलं, तर उद्याचा नक्की कसा असेलं? असं दडपण हळूच येत होतं.
रस्ता मात्र सुरेख होता. रस्त्याकडेने वेगवेगळी फुलं फुलली होती. नागाच्या फण्यासारखी दिसणारी ‘कोब्रा लिली’ जागोजागी होती. डावीकडे पिंढारी नदी वेगाने समुद्राकडे धावत होती. शुभ, दुधाळ धबधबे तिचा जोर वाढवत होते.
कोब्रा लिली
पुढे गेलेली मुलं आणि देवेन सर थांबून पलीकडच्या डोंगरावर काहीतरी पाहात होते. सरांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे डोंगरी मेंढे (माउंटन गोट) दिसत होते. बराच वेळ कोणाला काही दिसेना. सर्किटला बापू दिसावे, तसे सगळे मनाला येईल तिथे हात दाखवत होते. आम्हाला थांबायला, दम खायला वेळ मिळत होता, म्हणून आम्हीही मुलांना उत्तेजन देत होतो. खूप वेळानंतर सगळ्यांना एखादा-एखादा मेंढा दिसला. ‘सुटलो बुवा’ म्हणत आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो.
आजच्या रस्त्यावरही लँडस्लाईड होत्याच. त्या पार करणे, म्हणजे कसरतच होती. सुट्या, भुसभुशीत मातीवरून पाय घसरतात. दगडाला हात धरायला जावं, तर तो दगडही ‘आत्ता पडू की मग’ अशा मूडमध्ये असतो. स्वरूप खूप मदत करत होता. एकेकाला सांभाळून पलीकडे नेत होता. ह्या स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय ही कसरत शक्यच झाली नसती..
भरपूर चालण्या-चढण्यामुळे इथल्या बऱ्याचश्या लोकांची शरीरयष्टी काटक असते. एका लयीत, एका वेगाने ते चालू शकतात. त्यांना दम लागत नाही, की थकल्यामुळे थांबावं लागत नाही. आपल्या शारीरिक कष्ट नसलेल्या शहरी जीवनशैलीची इथे अगदी लाज वाटते.
असचं दमत, थांबत, सृष्टीसौंदर्याचा आनंद घेत, फोटो काढत काढत आम्ही एकदाचे फुरकिया कँपला पोचलो.
दिवसासुद्धा चांगलीच थंडी वाजत होती. हा कँप ह्या ट्रेकमधला सगळ्यात
उंचावरचा कँप होता. उद्याला पिंढारी ग्लेशियर जवळच्या झिरो पॉइंटपर्यंत
जायचं, परत येऊन दुपारचं जेवण ह्याचं कँपला करायचं आणि रात्रीच्या
मुक्कामाला पुन्हा द्वालीला जायचं होत. परतीच्या प्रवासात दोन-दोन कँप एका
दिवशी होणार होते. त्यामुळे अर्थातच चालायला जास्त वेळ लागणार होता. पत्ते
खेळायला वेळ मिळणे आणि शक्ती शिल्लक राहणं कठीण होत. ती मजा करायचा हा
शेवटचाच कँप होता.
माणसापरीस मेंढरं बरी!
आमचा आणि पिवळ्या ग्रुपचा कँप अगदी जवळजवळ होता. दुपारच्या जेवणानंतर आम्ही आणि ते लोकं कँपच्या जवळपास फिरत होतो. त्यांच्यातल्या काही लोकांशी चांगली ओळख झाली होती. प.बंगाल आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक देवाणघेवाण होत होती. नंदादेवी शिखर आणि इतर बर्फाच्छादित शिखरं अगदी जवळ दिसत होती. वेगळ्याच जगात आलोय, असं वाटत होतं. जरा वेळाने थोडा पाउस सुरू झाला आणि आम्ही सगळे आमच्या आमच्या कँपमध्ये आलो.
आधीच्या कँपच्या मानाने हा कँप लहान होता. नऊ जणात मिळून एकच टॉयलेट होत. सकाळी लवकर निघायचं होत. तेव्हा जरा अडचणीच होणार होतं. पण कुमाऊँ निगम बरोबर आल्याचा फायदा म्हणजे प्रत्येक कँपवर टॉयलेट होतं. टॉयलेटमध्ये असलेल्या सोयी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या होत्या. अगदी सुरवातीला बेसिन, अंघोळीसाठी गरम-गार पाण्याचे नळ, कमोड; सगळं व्यवस्थित होतं. जसजशी कँपची उंची वाढत गेली, तसतशी एकेक सोय कमी होऊ लागली. बेसिनवर कधीकधी आरसा असायचा, पण नळ नसायचा. काही ठिकाणी डोंगरावरच वाहत पाणी सायफन करून आणलेले असायचं, मग तो नळ सततच वाहात असायचा. पाणी बंद करायची सोयच नसायची! फुरकियाच्या कँपवरच्या टॉयलेटपर्यंत पोचायचं म्हणजे मोठ्या उंचीच्या पायऱ्या चढाव्या लागायच्या. ट्रेकिंगच होत ते एक प्रकारचं...!
बाहेर पावसाने जोर धरला, तशी थंडीही वाढली. कँपवर ढीगभर पांघरूण, रजया होत्या. सगळे त्यात गुरफटून बसले. आम्हाला जरी तसं लोळायला छान वाटत होतं, तरी उत्साहाने, तारुण्याच्या जोशाने सळसळणाऱ्या मंडळींना काही ती आयडिया आवडेना. ‘उठा की आता, झोपताय काय? इथे काय झोपायला आलोय का आपण? पत्ते खेळूया ना. आई नाही उठत, मावशी तू तरी उठ’ अशी आर्जव करून झाली. हो-ना करता करता सगळे उठले, पत्ते पिसले गेले, हसा-हशी सुरू झाली.
आम्ही तिघी तर बालमैत्रिणी आहोत. लग्नानंतर वेगळ्या गावात गेलो, संसारात गुरफटलो, आपापल्या काम-धंद्यात अडकलो, तरी आमची मैत्री टिकली, वाढली, ह्याचा आम्हाला अभिमान, कौतुक आणि आनंद सगळच वाटत. पण आमची मुलांचीही तेवढीच घट्ट मैत्री झाली आहे, हे बघून फारच बर वाटतं. एरवी लहानलहान गोष्टींवरून कुरकुर करणारे हे आधुनिक पिढीचे प्रतिनिधी, निसर्गाच्या सान्निध्याची मजा घेत होते. तिथल्या गैरसोयींवर विनोद करत होते. अश्विनीची मुलगी तर लहान असल्यापासून अमेरिकेत वाढलेली. पण पूर्ण ट्रेकभर तिने एकही तक्रार केली नाही. ना अन्नाबद्द्ल, ना कँपवरच्या स्वच्छतेबद्दल. त्याबद्दल तिच कौतुक करावं, तितक कमीच आहे.
बराच वेळ पत्ते कुटून झाले. चहा-कॉफी झाल्यावर सगळे पुन्हा बाहेर पडले. सगळ्या डोंगरांवरच्या बर्फात वाढ झाली होती. इथल्या लोकांची मानसिकता फार चांगली असते. पाउस पडला की,’अभी गिर रहा है, तो अच्छाही है, कल सुबह मौसम एकदम साफ होगा.’ हे आशादायक वाक्य ऐकायला मिळतच मिळतं. कदाचित इतक्या अनिश्चित वातावरणात राहताना मनातल्या ह्या प्रखर आशावादाचाच काय तो आधार वाटत असेल.
फुरकिया कँपवरून मां नंदादेवी शिखराचे दर्शन
बाहेर काळोख झाला, तसे पत्ते थांबले. इथे वीजपुरवठा नसतोच. पण जनरेटरची वीज थोडा वेळ मिळते. तो वेळही कँपच्या उंचीच्या व्यस्त प्रमाणात कमी होत गेला होता. थोडा वेळ वीज असायची, त्यात चपळाईने फोन / कॅमेरा चार्ज करणे, आपल्या हरवलेल्या वस्तू शोधणे हे कार्यक्रम उरकावे लागायचे. आज जेवण झाल्यावर अर्धा तासच वीज मिळणार होती. त्यामुळे सगळे लढाईला सज्ज व्हावे, तसे तय्यार, हुश्शार मोडमध्ये होते.
पिवळ्या ग्रुपचे सदस्य चार वाजताच चालायला सुरवात करणार होते. देवेन सरांना ही आयडिया आजिबात आवडली नव्हती. ‘रस्त्याचा काही भाग लँडस्लाईडने फारच खराब झाला आहे, त्यात काही ठिकाणी ग्लेशियर पार करावी लागतात. काळोख असताना हे भाग अजूनच धोक्याचे होतील. आपण साडेपाच-सहा वाजता निघूया.’ असं त्यांचं म्हणणं होतं. जे लॉजिकली बरोबर वाटत होतं आणि अवेळी उठायलाही लागणार नव्हत, म्हणून आम्ही आनंदाने मान्य केलं.
उद्या ट्रेकचा सर्वोच्च भाग गाठायचा होता. आनंद, भीती, उत्सुकता, काळजी सगळ्याच भावना दाटल्या होत्या. मी अगदी खिडकीलगत झोपले होते. झोपल्याझोपल्या पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. शेजारी अश्विनी आणि तिची लेक झोपल्या होत्या. एरवी उशीला डोकं टेकल की तत्क्षणी मी झोपलेली असते. पण आज मात्र चंद्राच्या उजेडामुळे आणि मनातल्या विचारांमुळे मला झोप लागेना.! थोड्या वेळाने शेजारी खुसफुस सुरू झाली. आपल्या हालचालींमुळे ह्या लोकांना जाग आली की काय, असं वाटून मी अगदी शांत पडून राहिले.
पण ती अडचण नव्हती. आश्विनी आणि तिच्या लेकीचा लडिवाळ(?) संवाद ऐकायला येऊ लागला.
‘आई, काहीतरी चावतय..’
‘थांब. मी तुला पांघरूण झटकून देते.’ पांघरूण झटकल्याचे आवाज. थोडा वेळ शांतता. मग पुन्हा एकदा,
‘आई, काहीतरी चावतय..’
‘तू हाता-पायांना क्रीम लाव. थंडीमुळे तडतडत असेलं.’
‘आई, काहीतरी चावतय..’
‘हं... शेजारी बघ, मुक्ता कशी मुटकुळं करून झोपलीय’
‘ही..ही..ही.. ‘मुक्ताच मुटकुळं’ ही..ही..ही..’
‘अग हळू जरा, किती जोराने हसतेस’
‘ही..ही..ही.. ‘मुक्ताच मुटकुळं’ ही..ही..ही.. पण आई, मला मुटकुळं म्हणजे काय ते माहीत नाही’
अग, मग हसत का होतीस?
‘मला आवडलं ‘मुक्ताच मुटकुळं’ म्हणून. ही..ही..ही..’
मग मातोश्रींनी कन्येच्या ज्ञानात ‘मुटकुळ’ ह्या संकल्पनेची भर घातली. थोडा वेळ शांतता. पाचच मिनिटांनी पुन्हा एकदा..
‘आई, काहीतरी चावतय..’
‘झोप आता. म्हणजे काही होणार नाही’
‘आई, आत्ता बाबा काय करत असेल? आणि आपली पाणीपुरी खायची राहिलेय. मला
जायच्या आधी खूप वेळा पाहिजे. आपण आत्याकडे कधी जाऊया? ती मला शॉपिंगला
नेणार आहेना?’
‘हो ग, परत मुंबईला गेलो की सगळं करुया.’
‘आई, बाहेर चंद्र दिसतोय. जाऊया का बघायला? आणि मी उद्या कपडे कुठले घालू?’
‘आता बास बरं का. मी रामरक्षा म्हणते, तू डोळे बंद करून झोप पटकन.’
( ह्या वाक्याला एक विशिष्ट असा जोर होता, तो लिखाणात आणणे शक्य नाही. त्याचं उदाहरण द्यायचं, तर तो जोर साधारणपणे वैतागलेल्या आयांच्या बोलण्यात असतो. वाक्यात उपयोगही सगळ्यांनी ऐकलेला असेलच!)
फुरकीया – झिरो पॉईंट – फुरकिया- द्वाली (१४ जून २०१४)
सहा वाजता निघायचं होतं. सगळ्यांना मिळून एकच टॉयलेट असल्यामुळे आवरायला
वेळ लागणार, हे स्पष्ट होतं. बऱ्याच वाटाघाटी होऊन, मग सर्वानुमते
साडेचारला उठायचं ठरलं. अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने साडेचारचा गजर
लावला असता. पण त्यात काय मजा? म्हणून अश्विनीने साडेतीनचा गजर लावला
होता!
रोज काही इतक्या लवकर उठायला लागायचं नाही, पण आम्हाला सर्वांना लवकर उठायची सवय व्हावी, ह्या उदात्त हेतूने तिने पहिल्या दिवसापासून साडेतीनचाच गजर लावला होता. उठण्यात आळस होऊ नये, म्हणून ते घड्याळ ती जवळ न ठेवता सॅकमध्ये ठेवायची. फोनचा गजर वाजला की सगळे, ’आश्विनी.....’ असा आरडाओरडा करायचे. मग ही काळोखात आधी आपली सॅक शोधणार, असंख्य प्लास्टिक पिशव्यांचा कुरकुर आवाज करणार. फोन मिळाला, की त्याचा ठणाणा करणारा आवाज बंद करून ‘आहे वेळ अजून उठायला, झोपा-झोपा’ अशी आमची समजूनही घालणार! अस का? कारण ती अश्विनी आहे म्हणून!!!
तर, असा हा रोजचा साडेतीनचा गजर ऐकून आम्ही रोजच्याप्रमाणे झोपलो. नंतर एकदम पाच वाजता ‘बेड टी, मॅडम’ ह्या आवाजानेच सगळे जागे झाले. मग तुंबळ गडबड झाली. सगळे डोकं हरवलेल्या मुरारबाजीसारखे धावपळ करत होते. सामानात खुणेने ठेवलेल्या वस्तू रात्रीतून कुठेतरी फिरायला गेल्या असाव्या, कारण कोणालाच काहीच मिळेना. त्यात थंडी ‘मी’ म्हणत होती.
चहा-कॉफी थंड होत होती. म्हणून कोणाचीतरी टूथपेस्ट (आणि आपलेच ब्रश) घेऊन सगळे तोंड धुवायला पळाले. आजही गरम पाण्याची सोय होती. त्यामुळे फक्त मानेच्या वरच्या शरीराची अंघोळ करून आम्ही खोलीत परत आलो. गरम कॉफी पोटात गेल्यावर सगळे माणसात आले आणि पुन्हा नव्या जोमाने घाई करायला लागले.
आमचा सगळ्यात ज्युनियर मेंबर अभिराम आणि गरम चहा ह्याचं हाडवैर होतं. चहा आला रे आला, की अभिराम कुठेतरी अदृश्य झालाच पाहिजे. चहा थंडगार व्हायचा आणि त्याच्या आईचं, मंजिरीचं डोक तापायचं! आई भडकली की तो, तोंड धुणे / कपडे बदलणे / बूट चढवणे / पोर्टरशी गप्पा मारणे / सूर्योदय पाहणे, अशी कुठलीतरी कामगिरी संपवून अवतीर्ण व्हायचा! आजही सवयीप्रमाणे चहा थंड व्हायला लागल्याबरोबर अभिराम ब्रश करायला गेला. त्याला आधीचे दोन दिवस सर्दी, खोकला, किंचित ताप होता. त्याच्या आईने त्याला सतरा वेळा तरी त्याला तोंड धुताना गरम पाणी घ्यायला सांगितलं होतं. तो शहाणा मुलगा असल्याने त्याने ते ऐकलं.. पण गरम पाण्याने अर्धे कपडे भिजवूनही आला!!! आम्हाला कोणालाही न जमलेली कामगिरी त्याला जमली होती. ते पाहून आई आपल्यावर खूष होईल असं त्याला वाटलं असावं. पण आयांना मुलाचं कौतुकच नसतं. त्याचे ओले कपडे बघून मंजिरी सॉलिड भडकली. थंडी असल्याने सगळ्यांनी होते नव्हते तेवढे सगळे गरम कपडे अंगावर चढवले होते. ओले झालेले बदलायला जास्तीचे कपडेही जवळ नव्हते.
शेवटी निघायच्या वेळेपर्यंत अभिरामला चुलीजवळ (पण सुरक्षित अंतरावर!!) बसायची आज्ञा दिली गेली. कपडे वाळवत त्याने थंड चहा प्यायला आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आली. अत्यंत आवश्यक सामान घेऊन सगळे तयार झाले आणि ठरल्यापेक्षा १५-२० मिनिटे उशीर करून शेवटी आम्ही निघालो.
अजून सूर्योदय झाला नव्हता, पण हळूहळू उजाडत होतं. बऱ्याच उंचीवर आलो होतो, त्यामुळे झाडं नाहीशी झाली होती. हिरवळ आणि लहान झुडपं दिसत होती. जिथे नजर जाईल तिकडे उंचच उंच शिखरं दिसत होती. अशी शिखरं बघताना त्यांची ओढही वाटते पण भीतीही वाटते. पाऊल टाकायचा धीर होत नाही, दुबळं-बिचारं वाटतं, वाट फार अवघड, उंच वाटायला लागते. नजर मात्र त्या बेलाग, अवघड पर्वतांनी बांधली गेलेली असते. हिमालयाने आपल्याला बांधून टाकलंय, आपण तिकडे ओढले जातोय असं काहीतरी वाटतं राहत.
रस्ता सोपा नव्हताच. उंचीवर आल्यामुळे धाप लागत होती. आधीच आमचा तो दिव्य वेग आणि त्यात अल्टीट्यूडचं मोठ्ठ कारण होतं. थोड्या थोड्या वेळाने थांबावं लागत होतं. लँडस्लाईड सोबतीला होत्याच. काही ठिकाणी ग्लेशियर पार करावी लागत होती. पोर्टरपैकी एकजण पहाटे आमच्या पुढे गेला होता आणि आम्हाला चालायला सोयीचं व्हावं म्हणून आईस अॅक्सने पायऱ्या करून ठेवल्या होत्या. एवढ्या लोकांनी आपल्यासाठी कष्ट केल्यावर कसतरी धडपडत, लडबडत आम्ही चालणार!
अधूनमधून देवेन सर मुलांना थांबवत होते. थोडी विश्रांती झाली की पुन्हा पुढे निघायचो. माउंटन गोट बघायचा एक कार्यक्रम होताच. देवेन सर मुलांबरोबर आणि पोर्टर आमच्याबरोबर अशी विभागणी झाली होती. धाप लागत असल्यामुळे आज आमची बडबड पार बंद होती. स्वरूपचा श्वास फुलत नव्हता की दमायला होत नव्हतं, त्यामुळे आमच्या चौघींच्या वाटची बडबड करायची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याने जोरदार बॅटिंग सुरू केली. तो, त्याचं कुटुंब, त्याचं गाव, त्याने केलेले ट्रेक; सगळ्याची साद्यंत माहिती आम्हाला झाली! आम्ही फक्त ‘हं, हं’ इतकचं करू शकत होतो.
चालता चालता एका ठिकाणी डोंगरात बर्फ पडून तयार झालेली ॐ ची आकृती दिसली. ह्या ट्रेकला आल्यापासून मला तीन वर्षांमागे केलेल्या कैलास-मानस यात्रेची खूप आठवण येत होती. तिथल्यासारखा ॐ दिसल्यावर फार आनंद झाला. हा काही ॐ पर्वत नाही, पण तरी बघून मन भरून आल.
चालत, थांबत, लँडस्लाईडना शिव्या देत आम्ही एका पठाराच्या वरच्या भागाजवळ पोचलो. लांबवरच दृश्य दिसत होतं. सगळ्या पठारावर हिरवळ होती. घरंगळून आलेल्या मोठ्या शिळा दिसत होत्या. थोडं पुढे एक मंदिर दिसत होतं. भगवा ध्वज वाऱ्यावर फडफडत होता.
इथे यायचं ठरवल्यापासून ‘पायलट बाबा’ ह्या साधुबुवांबद्दल ऐकत होतो. ते बाबा इथे एकटेच राहतात. आलेल्या ट्रेकर्सना खिचडी-चहा असं खायला घालतात. आलेले लोकं स्वेच्छेने दानपेटीत देणगी देतात, पण बाबांची काही अपेक्षा नसते. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते तिथे नव्हते. ही कल्पना आम्हाला आधीचं असल्याने त्यांची भेट झाली नाही, ह्याचं जरा वाईट वाटलं, पण अपेक्षाभंग झाला नाही.
अश्या ह्या अगदी एकट्या जागी, जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना राहणं किती कठीण असेलं. मेंढरं चारायला येणारे मेंढपाळ आणि ट्रेकर्स सोडून मानवी सहवास नाही. निसर्ग कधी काय रंग दाखवेल, ह्याची आजिबात शाश्वती नाही. शहरात, कुटुंबात राहणाऱ्या आपल्यासारख्यांना ही कल्पना करणसुद्धा कठीण आहे.
आज आम्हाला मॅगी नुडल्सचा नाश्ता होता. बच्चा कंपनी अत्यंत खुशीत होती. त्या थंड हवेत गरमगरम मॅगी खायला मजा आली. जवळच्या एका डोंगर उतारावरच्या बर्फात पिवळ्या ग्रुपची मंडळी खेळत होती. बर्फाचे गोळे मारणे, घसरणे वगेरे करताना हसाहशी चालू होती. तिथे जाऊन मजा करायची किंवा ‘झिरो पॉइंट’ पर्यंत जायचं असे दोन पर्याय होते. देवेन सरांनी आता तुम्हाला पाहिजे तिथे जा, दोन तासांनी परत जायला निघूया, असं सांगितलं आणि पोर्टरना आमच्या सोबतीला देऊन ते कुठेतरी अंतर्धान पावले.
हिमालयन मॅगी (गरम व आयती!)
सुजाता आणि मंजिरीला अल्टीट्यूडचा त्रास होत होता. डोकं जड होणे, मळमळणे असं चालू झालं होतं. त्यामुळे त्या दोघींनी आहे तिथेच थांबायचं, असं ठरवलं. परदेशस्थ मंडळींना ‘बर्फ’ हा प्रकार अगदी नको होता. त्यामुळे मुलं बर्फात आणि आम्ही झिरो पॉइंटकडे जायचं ठरवलं. स्वरूप बरोबर दुसरा लोकपाल नावाचा एक पोर्टरही आमच्याबरोबर होता.
स्वरूप आणि लोकपाल
पुन्हा चालायला सुरवात केली. पहिल्या पावलापासूनच धाप लागायला सुरवात झाली. स्वरूप निरनिराळ्या शिखरांची माहिती पुरवत होता. ‘आप अगले टाईम आओगे ना दिदी, तो आपको ** ट्रेकपे लेके जायेंगे’ वगैरे गप्पा चालू होत्या. ‘बाबारे, आधी आम्हाला हात, पाय, मेंदू आणि हृदय चालू अवस्थेत असताना घरी तर पोचू दे, मग पुढच्या ट्रेकच पाहूया’ वगैरे ऐकवायची फार इच्छा होती. पण फुफ्फुसं आणि हृदयाच्या मर्यादा लक्षात घेऊन तो विचार सोडून दिला.
इतक्यात समोरून पिवळ्या ग्रुपचे काही मेंबर आले. झिरो पॉइंटला जाऊन आलात का? असं विचारल्यावर त्यांनी तिथे जायलाच दोनेक तास लागतात, असं सांगितलं. म्हणजे आपल्यालाही नाहीच जाता येणार, अश्या विचाराने जरा वाईट वाटलं. लोकपालच्या म्हणण्यानुसार तिथे खूप लँडस्लाईड झाल्याने काही पाहण्यासारख नाहीये आणि रस्ता कठीणही होता. पण ह्या ट्रेकच ठरवल्यापासून ‘झिरो पॉइंट’ असं लिहिलेल्या बोर्डचे फोटो पाहिले होते. त्यामुळे तिथपर्यंत किंवा तिथे पोचणं शक्यच नसेल, तर जितकं जवळ जाता येईल तेवढ जावं, असं अगदी तीव्रतेने वाटत होतं. तिथे न जाण, म्हणजे अर्ध्यातून माघारी फिरल्यासारखं झालं असतं. त्याला काही अर्थ नाही. ट्रेकला जाण्याच्या अनेक उद्देश्यांपैकी एक ‘शिखर न गाठता मागे फिरण्याची मनोवृत्ती कमी करणे’ हा असतो. ह्यावेळेला नेमकं तेच होणार होतं.
मग आम्ही ‘पिंढारी ग्लेशियर’ बघायला जायचं असं ठरवलं. वीस मिनिटात तिथे पोचलो. समोर मोठी दरी होती. दरीत लांब पिंढारी ग्लेशियर दिसत होतं. तिथेच पिंढारी नदीचा उगम आहे. नाजुकशी नदी वाहात होती. ह्याच नदीच्या सोबतीने आज द्वाली कँपपर्यंत जायचं होतं. त्या कँपजवळ ह्या नद्यांनी केलेला विध्वंस अजून डोळ्यासमोर होता आणि नदीचा आवाज कानात घुमत होता. पण त्याचं नदीचं हे नवजात, निरागस रूप होतं.
पिंढारी ग्लेशियर: पिंढारी गंगेचा उगम
तिथे गेल्यावर, हाच आपला ट्रेकमधल शेवटचं टोकं, अशी आम्ही मनाची समजूत घातली होती. वेगवेगळ्या कोनातून, वेगवेळ्या कॉम्बीनेशन्सचे फोटो काढून झाले. ते दृश्य डोळ्यात साठवत तिथे बसून राहिलो होतो. ‘क्यूं दिदी, अच्छा लगा नजारा?’ असं स्वरुपने विचारल्यावर ‘हां, बढिया है, लेकीन झिरो पॉइंटतक जाते, तो और बढिया होता’ असा विनंतीअर्ज हळूच पुढे सरकवला.
हे ऐकल्यावर त्याला एकदम उत्साह आला. चला, मी नेतो तुम्हाला, असं म्हटल्यावर आम्ही आनंदाने उठलो! लोकपालचा अजूनही ह्या आयडीयाला विरोधच होता. ‘टाईम लगेगा, दिदी लोग चल नहीं पायेंगे’ वगैरे कुरकुर चालू होती. पण स्वरूपने आता निश्चय केला होता. ‘हे लोकं इतक्या लांबून आले आहेत, परत येतील नाही येतील. चल, त्यांना घेऊनच जाऊया’ असं म्हणत त्याने लोकपालला पटवल.
आम्ही खुशीत त्याच्या मागे चालायला लागलो. माझा मुलगा, अन्वय आमच्या बरोबर नव्हता. त्यालाही यायला आवडलं असतं, ह्याची मला खात्री होती. पण त्याला बोलावणं शक्य नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर तो चक्क आमच्याच दिशेने येताना दिसला! आम्ही अजूनच खुष झालो. थांबत, दम खात अर्ध्या तासात आम्ही ‘झिरो पॉइंट’ला पोचलो!! मोठ्ठा आनंद झाला. त्याच्या थोडं पुढेपर्यंत जाता आलं. नंतर लँडस्लाईडमुळे डोंगर कापला गेला आहे. हा ट्रेकचा सगळ्यात शेवटचा पॉइंट आला होता. पुन्हा एकदा फोटो झाले. हिमालयाच्या त्या भव्यतेने सगळे भारावले होते. कुठे पाहू आणि कुठे नाही, असं झालं होत. आत्ताही ते दृश्य डोळ्यासमोर आहे.
झिरो पॉइंटवरचे फोटोसेशन
आमच्यातली दोघं मुलं त्यांच्या आवडीने बर्फात खेळत होती. दोघी त्रास होत
होता, म्हणून आल्या नाहीत. उरलेले सगळे इथे पोचलो होतो. आता कसं मनासारख
झालं होतं. ह्याचं श्रेय मात्र फक्त स्वरुपला होतं. त्याने आमच मन जाणून,
जिद्दीने आणलं नसतं, तर आम्ही फार काही करू शकलो नसतो. ‘काहीही सबळ कारण
नसताना आपण अर्ध्यातून मागे आलो’ ही बोच राहिली असती.
उतरताना अन्वयनी सांगितलं की तो अर्ध्यापर्यंत दोनदा येऊन गेला होता. एकदा
सरांनी ‘एकटा नको जाऊ’ म्हणून बोलावलं, दुसऱ्यांदा पिवळ्या ग्रूपवाल्यांनी
‘फार कठीण आहे, नको जाऊ, चल आमच्याबरोबर खाली’ असं सांगीतल. नाराज होऊन
उतरत असताना आम्ही जाताना दिसलो, म्हणून तो तिसऱ्यांदा चढून आला होता!
‘काहीका असेना, शेवटी पोचलो,’ ह्या आनंदात मुलं बागडत, धावत उतरायला लागली.
उतरायला फार वेळ लागत नाहीच. लगेचच पठारावर पोचलो. तोपर्यंत मुलांच उर्वरीत मेम्बर्सना ‘झिरो पॉइंट’च प्रवासवर्णन करून झालं होतं. आम्ही थोडा वेळ टेकलो. तिथल वातावरण, शांतता मनात भरून घेतली आणि आनंदाने जड झालेल्या मनाने परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
शेवटचं टोकं गाठून मागे वळलो, की मनःस्थिती बदलतेच. येताना, पुढच्या वळणावर काय नवीन बघायला मिळेल, ही उत्सुकता असते. काही ट्रेक गोलाकार असतात. त्यात आपण वेगळ्या मार्गाने बेस कँपला जातो. तिथे रोज वेगळा रस्ता असतो. हा ट्रेक तसा नव्हता. वाईट भाग म्हणजे कुठल्या दिवशी नक्की किती चढ आहे, किती लँडस्लाईड आहेत, हे पक्क माहिती होतं. चांगला भाग म्हणजे भुरळ पडलेल्या जागा, दृश्य परत एकदा बघायची संधी होती.
चढ, उतार, ग्लेशियर, लँडस्लाईड पार करत करत आम्ही चालत होतो. पुन्हा एकदा ॐ पाशी आलो. देवेन सरांना दाखवून त्यांच्याकडून कौतुक करून घेतलं. ‘आप सब लोग डिव्होटी हो, इसलिये ॐ के दर्शन हो गये’ अशी कॉमेंट आली. असं काही नसतं, हे माहिती असूनही जीवाला बरं वाटलं!
एका जागेवरून लांबवरचा कँप दिसायला लागला. पण आजचा मुक्काम पुढच्या कँपला होता. इथे फक्त जेवणासाठी थांबायचं होतं. मुलांनी उतारावरून धावत आणि आम्ही सावधपणे पावलं टाकत कँप गाठला. थोडं फ्रेश झालो आणि लगेच जेवणावर ताव मारला. जेवताना ‘अभिरामची ओली पँट, लँडस्लाईड पार करताना झालेली फजिती आणि झिरो पॉइंट’ ह्यावर जोरात गप्पा झाल्या. सगळ्यांचे उजळलेले चेहरे, उत्तेजित, आनंदी आवाज ऐकताना मस्त वाटत होतं.
परतीच्या प्रवासाची सुरवात
पुढे पाच किलोमीटर चालायचं होतं. त्यामुळे जेवण झाल्यावर लगेचच पुढच्या मार्गाला लागलो. सकाळी हवा स्वच्छ होती. आता मात्र ढग भरून आले होते. खूप पाऊस आला, तर चालताना पंचाईत होईल, ह्या भीतीने सगळे भराभर पाय उचलायला लागले.
मुंबईतून निघताना आम्ही आपल्या ट्रेकच्या पॅकेजमध्ये कसे सगळे आयटम आहेत, ह्यावर विनोद करत होतो. आत्तापर्यंत राजधानी, दिल्लीतली लोकल ट्रेन, चेअरकार, उत्तराखंडमधील राज्य परिवहन बस, जीप असे प्रवासाचे प्रकार झाले होते. पुढे स्लीपर आणि विमान हे नक्की होते. राहण्याच्या खोल्या, टॉयलेट ह्यांचेही निरनिराळे प्रकार बघायला मिळाले होते. पण हवा मात्र चांगलीच मिळाली होती. बहुतेक ‘पावसाचा अनुभव घेतला नाही,’ असं आम्हाला वाटायला नको, म्हणून पाऊस पडायला लागला. सगळ्यांचे रेनकोट इतके दिवस सॅकमध्ये गुमान बसून राहिले होते, त्यानाही जरा बाहेरची हवा लागली!
लँडस्लाईडची जागा आली की देवेन सर किंवा पोर्टरपैकी कोणीतरी आम्हाला हात द्यायला, मदत करायला थांबत असे. एका जागी आम्हाला थांबायला सांगून, मंजिरीचा हात धरून स्वरूप पुढे गेला. मला आपल्याला जमेल असं वाटलं, म्हणून मी थोडी पुढे गेले. एका जागी माझा बॅलन्स गेला, आणि मी थोडी घसरले. फार काही झालं नाही. आवाज ऐकून स्वरूप मागे आलाच लगेच. ‘दिदी, आपको बोला था रुकानेको, क्यूं आगे आये,’ असं म्हणत मला पुढेपर्यंत घेऊन गेला. हात-पाय व्यवस्थित जागच्या जागी आहेत ना? ह्याची खात्री करायला चौघी थांबलो होतो, तेव्हा तो अगदी भाबडेपणाने म्हणाला,’ठीक हो ना दिदी, मैं तो डरही गया था. गिरनेकी आवाज सुनी तो, पहेले मुझे लगा, की बडा पत्थरही गिर गया. जाके देखा तो दिदी गिर गयी थी...’ झालं. हास्याचा प्रचंड स्फोट झाला. माझं हे परफेक्ट वर्णन ऐकून माझ्यासकट सगळे खो खो हसायला लागले. तो बिचारा सरळपणे म्हणाला होता, पण सगळ्यांना सॉलीड हँडल मिळालं! पुढचे सगळे दिवस ‘बडा पत्थर’ गाजत होता.
सकाळपासून चालण्याचा शीण जाणवायला लागला होता. कधी एकदा कँप गाठतोय असं झालं होत. उजवीकडच्या दरीत पिंढारी नदीचं पात्र दिसत होतं. रोंरावत वाहणाऱ्या नदीचा आवाज आसमंतात घुमत होता. लांबवर दिसणाऱ्या डोंगरांच्या अंगावर दरडी कोसळून जखमा झाल्यासारख्या दिसत होत्या.
पायाचे तुकडे पडणार असं वाटायला लागल्यानंतर काही वेळानी कँप आला. नेहमीप्रमाणे पिवळ्या ग्रुपचा कँप आमच्या आधी होता. त्यांच्याशी थोडी बातचीत झाली. त्यांचे लीडर सदैव लीडरच्याच बेअरिंगमध्येच असायचे. पिवळा टी शर्ट, ट्रेकची स्पेशल जिथेतिथे खिसे असलेली पँट, गळ्यात शिट्टी, डोक्यावर कडा असलेली टोपी, डोळ्यावर नसेल तर त्या टोपीवर गॉगल अडकवलेला, पँटच्या लूपमध्ये चहाचा मग लटकत असायचा. अश्या सगळ्या वस्तू ते कायम बाळगत असल्याने आम्ही त्याचं नाव ‘कोचरेकर मास्तर’ ठेवलं होतं. कँपवर मिळणाऱ्या सरबताची तहान लागलेली असताना, ते आमची मुलाखत घ्यायच्या बेतात होते. आम्ही काहीतरी कारण काढून तिथून सटकलो आणि कँपच्या व्हरांड्यात असलेल्या खुर्च्यांवर कोसळलो.
सरबत पिऊन जरा तरतरी आली. मुलांची विश्रांती झाल्याने आता त्यांचं स्ट्रेचिंग सुरू होतं. पाय आखडून गेले होते, स्ट्रेचिंगने बरं वाटेल, म्हणून आम्हीही त्यांच्यात सामील झालो. अधोमुख श्वानासन किंवा डाऊन डॉग करताना ‘ हा कसला कुत्र्यासारखा दिसतोय’ ‘कुत्र्यालाही ही पोझ ह्याच्याइतकी चांगली येत नाही’, वगैरे विनोद झाले. मग रेस्टिंग पोझ करायची ठरली. आमच्या योग वर्गात भिंतीला टेकून ‘विपरीत करणी’ करतात. ती सगळ्यांना फारच आवडली. वेगवेगळ्या उंचीची पाच मुलं भिंतीला तंगड्या लावून खिदळत होती. देवेन सर काहीतरी सांगायला आत आले, आणि हे दृश्य पाहून भंजाळलेच! विचित्रच सीन होता तो! त्यांना हसू आवरेचना. आम्ही सर्व मंडळी एकूण मॅड आहोत, अशी त्यांना आधी शंका असेल तर आता खात्री झाली असेल.. आम्हीही हसायला लागलो. एकमेकांचं हसणं पाहून हसायच्या अजून जास्तच उकळ्या फुटत होत्या.
कसाबसा हास्ययोगाला आवर घालून आम्ही जेवायला गेलो. जेवून, थोडा वेळ शेकोटीजवळ शेकून खोलीत परत आलो. अन्वयचा मित्र नील आधीच खोलीत आला होता. येऊन पाहतो, तर हा मुलगा पोटभर जेवण झाल्यावर आता पुशअप्स करत होता. आजच्या दिवसात जवळपास अठरा किलोमीटर चाललो होतो, तरी त्याला पुरेसा व्यायाम झाला नव्हता, असं त्याचं म्हणणं होतं.. हे भगवान, ह्या मुलाचं आता काय करावं? हतबुद्ध होऊन त्याला थांबवलं आणि झोपायला लावलं.
आडवं झाल्यावर मी आणि मंजिरी एका क्षणात झोपलो. मुक्ता आणि अनुजा ‘मावशी कशी झोपलीय बघ’ असं म्हणून बराच वेळ खिदळत होत्या म्हणे. पण ते मला दुसऱ्या दिवशी कळल. पण त्या वेळेला मात्र फक्त गाढ, शांत, उबदार झोप. बास....
द्वाली- धाकुरी (१५ जून २०१४)
ये राते, ये मौसम, नदीका किनारा!
मनासारखी झोप झाल्यावर सकाळी उठायला किती बरं वाटत. नाहीतर घरी झोपताना ‘उशीर झाला, झोपायला हवं’ असं म्हणायचं आणि उठताना ‘उशीर झालं, उठायला हवं’ असं. झोप पूर्ण झाली म्हणून उठायचं सुख गडबडीच्या दिनक्रमात फार वेळा मिळत नाही.
ट्रेकमधला सगळ्यात जास्त चालण्याचा दिवस आजचाच होता. आज तब्बल वीस किलोमीटर चालायचं होतं. स्वरुपने आम्हाला आदल्या दिवशी ‘ आपको तो जातेजाते रात हो जायेगी. बच्चे टाईमपे पोहोचेंगे’ असा आशीर्वाद दिला होता. त्याचा परिणाम म्हणून भराभर आवरून चालायला सुरवात केली.
पुन्हा तोच काफनी नदीचा डगमगता पूल पार केला. नदीच्या वाळवंटात पसरलेल्या दगडगोट्यांच्या रस्त्याने चालायला लागलो. इथे उभं राहिलं, की मागच्या जूनमध्ये दोन्ही नद्यांचं मिळून किती प्रचंड पात्र झालं असेल, ह्याचा आवाका डोळ्यासमोर येत होता. ते प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांना किती भीती वाटली असेल, ह्याचा अंदाज येत होता.
काफनी नदीवरचा पूल
द्वाली कँपवरून दिसणाऱ्या लँडस्लाईड
ट्रेकमधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात कठीण लँडस्लाईड चढून आम्ही जंगलाच्या रस्त्याला लागलो. बऱ्याच जागी तो रस्ता तुटल्यामुळे नदीपात्रापर्यंत उतरायला लागायचं. त्या दगडाधोंड्यांमधून थोडा वेळ चालून पुन्हा चढायचं आणि जंगलाच्या रस्त्याला लागायचं असा पॅटर्न होता.
असे रस्ते म्हणजे पायांना ब्लीस्टर्स यायला अगदी आदर्श परिस्थिती असते. चढताना दम लागतो, पण पायावर प्रेशर नसतं. उतरताना दम लागत नाही, पण गुढघे, पावलं थकतात, ब्लीस्टर्स यायला सुरवात होते. मला तर ब्लीस्टर्स झाले नाहीत, असा एकही ट्रेक नसेल. त्याच्यावर फार काही उपाय नाही, हेही स्वीकारलं आहे. चालण कमी झालं की आपोआपच ते फोड बसतात. ह्या ट्रेकलाही काही वेगळी स्टोरी नव्हती. ब्लीस्टर्स आले होते, टोचत होते, सगळं नेहमीप्रमाणे होतं.
मंजिरीला जे ब्लीस्टर्स आले होते, ते मात्र भयंकर होते. दोन्ही अंगठ्यांच्या नखाखाली मोठ्ठे मोठ्ठे ब्लीस्टर्स आले होते. तसचं दडपून चालल्यामुळे ते चांगले मोठे आणि लालबुंद झाले होते. थोडक्यात सांगायचं, तर आलुबुखार असतात ना, तसे दिसत होते! ट्रेकमध्ये विनोद करायला कुठल्याही विषयाचं वावडं नसतं. मंजिरीच्या ब्लीस्टर्सचं नामकरण ‘आलुबुखार’ असं झालं. नंतर जीपमध्ये, ट्रेनमध्ये, कुठेही सगळे तिला ‘सांभाळून ग बाई, आलुबुखारना धक्का लागेल’ असं सांगत राहायचे.
हा शब्द खास ह्या ट्रेकच्या मराठीचा होता. असे भाषेचे वेगवेगळे अविष्कार सतत निर्माण होत होते. अनुजा परदेशात राहते. ती जरी मराठी उत्तम बोलत, वाचत असली, तरी इथल्या मुलांचं मराठी तिला शिकवायची जबाबदारी बाकीच्या मुलांनी घेतली होती. नुकत्याच निवडणुका झालेल्या होत्या. त्यातले ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘मॅगी / आईस्क्रीम / चॉकलेट आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ वगैरे सुविचार गरज असेल तसे कानावर पडायचे. शिवाय ‘ आम्ही नाही बाबा असला आचरटपणा करत’, ‘तू म्हणून ऐकून घेतलं, आपण नसतं ऐकून घेतलं’, ‘कसला स्टड आहे रे तू’ हे आणि असे असंख्य वाक्प्रचार मुलं वापरत होती! अनुजाच मराठी आता चांगलच प्रगल्भ झालं आहे!!
चालताना आता आज आणि उद्याचा दिवसच चालायचं आहे. नंतर दोन दिवसात घरी जायचं असे विचार मनात डोकवायला सुरवात झाली होती. मनाचा खेळ किती विचित्र असतो नाही? ट्रेकच्या आधी कधी एकदा हिमालयात येतो आहे, असं झालं होतं आणि आता इथे घरी जायची ओढ लागली होती!
आमचा ट्रेकमधला सोबती
सकाळची ओलसर हवा होती. उजेड होता पण ऊन नव्हतं. पिंढारी नदीची सोबत होतीच. जाताना जिथे थांबून ब्रेकफास्ट केला होता, ती जागा आली. ठरल्यासारखे सगळे थांबले. पुरीभाजीचा ब्रेकफास्ट झाला. नदी अगदी जवळ होती. खळाळत धावणार पाणी बघताना मला त्या पाण्याची विलक्षण ओढ वाटते. त्या पाण्याचा स्पर्श, त्याचा वास, सहवास कसा असेल, अशी उत्सुक ओढ. त्या पाण्यात शिरण्याचा प्रयत्न म्हणजे जीवाशी खेळच. पण तरी ओढ जाणवते, हे मात्र खर...
ह्या जागेनंतर चढ होता. इथून पुढे नदीपासून लांब जायचं होतं. तिचा तो सततचा नाद ह्यापुढे कमीकमी ऐकू येणार होता. मुलांना पुढे पाठवून आम्ही थोडा वेळ तो आवाज कानात साठवत तिथे बसून राहिलो आणि जड मनाने पुढे चालायला लागलो.
थोड्याच वेळात खाती कँप आला. इथे मुक्काम नव्हता. फक्त जेवणासाठी थांबायचं होतं. पुढच्या रस्त्यावर लँडस्लाईड नव्हत्या. त्यामुळे सामान खेचरांवर गेलं. जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने निघायचं असं ठरलं होतं. मग तो रिकामा वेळ खेचरांचं निरीक्षण करण्यात सत्कारणी लावला. खेचरांना ‘हल्या थीरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र’ म्हणणे, जी ऐकून धावायला लागतील, त्यांनाच मराठी कळतं’ ‘कुठलं खेचर कोणासारखं दिसतय, कोणाच्या वेगाने चालतय’ वगैरे वगैरे!
निघायची वेळ झाल्यावर देवेन सरांनी अत्यंत चाणाक्षपणे धाकुरी कँपच्या स्वैपाक्याला फोन केला. ‘हम लोग पाच बजेतक पहोच जायेंगे, पकोडे बनाके रखना’ असं आम्हाला ऐकू जाईल अश्या आवाजात सांगितलं. सगळे जण लगेचच मनातल्या मनात गरमगरम भजी खायला लागले! सरांची आयडिया एकदम बेस्ट होती. एका कँपला पोचलं, की पुढे चालायला जरा कंटाळाच येतो. पोट भरल्यानंतर वेगही मंदावतो. त्या परिस्थितीत भज्यांपेक्षा मोठं मोटिव्हेशन काय असणार? उत्साहाची नवी लाट आल्यासारखे सगळे पुन्हा चालायला लागले.
खेचरं आल्यामुळे स्वरूपचं काम संपल होतं. आज तो आपल्या घरी जाणार होता. पाठीवर सामान असतानाही त्याची बडबड चालू होती, आता तर काय ओझं नसल्यामुळे तो आणखीनच खुशीत आला होता. काल त्याने आम्हाला त्याच्या कुटुंबाबद्दल, गावाबद्दल, त्याने केलेल्या ट्रेक-ट्रीप बद्दल इत्यंभूत माहिती दिली होतीच. आज त्याची रिव्हीजन घेतली आणि काही माहिती द्यायची राहिली असली, तर ती सांगून पोर्शन पूर्ण केला. आम्हाला एकमेकींशी काहीही बोलता येत नव्हतं.... तो भाबडा, गरीब स्वभावाचा होता, त्याच्या मदतीशिवाय आम्ही ट्रेकमधले अवघड भाग पार करू शकलो नसतो, हे खर होतं. पण म्हणून त्याने आम्हाला इतकाही पीळ मारायला नको होता!!
असं स्वरूपच प्रवचन ऐकत ऐकत आम्ही एकदाच मॅगी पॉइंटपर्यंत येऊन पोचलो. अपेक्षेप्रमाणे मुलांची ‘मॅगी व कोल्ड्रींक’ पार्टी चालू होती. तिथेच एक छोटसं दुकान होतं. त्यात खरेदी करून स्वरूप घरी जाणार होता. आम्हाला हुश्य झालं. पण निरोप घेताना जरा वाईट वाटतच. तसं थोडं वाईटही वाटलं.
मॅगी पॉइंट: सर्व राजकीय पक्ष, देवांचे संमेलन
पिवळ्या ग्रुपचे काही सदस्य इथे येऊन पोचले. त्यांच्याकडून असं समजलं, की त्यांचा ट्रेक इथेच संपणार होता. ते इथूनच बागेश्वरला जाणार होते. ही आयडिया आम्हाला सुचली नव्हती, किंवा असा जीप पॉइंट मधे कुठेतरी असेल, असं माहितीही नव्हतं. नाहीतर प्रवासाचा एक दिवस कमी करता आला असता. त्या एक दिवसाचं महत्त्व आमच्यापेक्षाही अश्विनीला जास्त होतं. घरी पोचल्यानंतर तिच्या सुट्टीचे पाच-सहा दिवसच शिल्लक होते आणि साधारण दहा-बारा दिवसांची कामं! एक बोनस दिवस तिला नक्की आवडला असता. पण आता हा विचार करून काही उपयोग नव्हता. आमच्यानंतर कोणी जाणार असेल, तर त्यांना मात्र मी त्या जागी ट्रेक संपवायचा सल्ला नक्की देईन.
मुलांची पार्टी संपल्यावर पुन्हा चालायला सुरवात झाली. ह्या गावापासून धाकुरी कँपपर्यंत सणसणीत चढ आहे. गेले पाच-सहा दिवस चालून पायांची शक्ती जरी वाढली असली, तरी थकायलाही झालं होतं. धापा टाकत पावल उचलायला लागलो.
चढ मजबूत होता. रस्त्यालगत लहान वस्त्या, शेतं, शाळा होत्या. पार संध्याकाळ झाली नव्हती पण दिवस हळूहळू कलत होता. गाई-बैल रस्त्यात घरच्यासारखे फिरत होते. त्यांच्यापासून लांब राहताना सगळ्यांचीच तारांबळ उडत होती. मेंढरांचे मोठ्ठे मोठ्ठे कळप जा-ये करत होते. मेंढरांचा आवाज बऱ्याचदा लहान मुलांच्या ओरडण्यासारखा वाटत होता. सगळी मेंढरं एकदम ओरडायला लागली, की डेसिबल लेव्हल चांगलीच असते. आमची मुलही त्या आवाजात आपला आवाज लावून घेत होती!!
आम्ही प्राथमिक शाळेत असताना बाई पाढे म्हणायला सांगायच्या. सांगणाऱ्याने चूक केली, की म्हणणारेही चुकायचे. तेव्हा आमच्या अत्यंत प्रेमळ अशा बाई अजूनच प्रेमळ आवाज काढून ‘ मेंढरं आहात तुम्ही मेंढरं. एकाने खड्ड्यात उडी मारली, की मागची मेंढरही मारतात उड्या. तुम्हीही तसलीच आहात’ असं प्रेमळपणे म्हणायच्या, ती कडू आठवण आली...
धाकुरी कँप
असं खूप खूप खूप वेळ चालल्यावर धाकुरी कँप दिसायला लागला. मुलांच्या सपाट्यातून वाचलेल्या स्ट्रॉबेरीज खात, थांबत, धापा टाकत, दमत, थकत एकदाचे आम्ही सगळे कँपवर पोचलो. दुपारपासून वाट बघत होतो, ती भजी खाल्ली. चहा-कॉफी झाली. कोणाला किती ब्लीस्टर्स आले आहेत ह्याची पाहणी करून झाली.
ह्या कँपवरच्या लोकांना आम्ही भरपूर चालून थकून आलोय, ह्याची कल्पना होती. त्यांनी चुलीवर पाणी तापत ठेवलचं होतं. सगळ्यांना एक-एक बादली गरम पाणी मिळालं. बऱ्याच दिवसांनी अंघोळ केल्यावर चालण्याने आलेला शीण खूप कमी झाला. जेवणानंतर पुन्हा एकदा मुक्ता आणि अभिरामची शास्त्रीय गायनाची मैफल जमली. कोणतीही साथ नव्हती. फक्त मोबाईलवरचा तानपुरा. तेवढ्या सुरावर दोघही इतकं सुंदर गायली, की बास! कान अद्गी तृप्त झाले. मजा आली.
धाकुरी- बागेश्वर (१६ जून २०१४)
मला लवकर जाग आली, झोप लागेना. बाहेर उजाडलं होतं. पाउस जोरात पडत होता. व्हरांड्यात येऊन पाउस बघत मी शांत बसून राहिले. मागच्या वर्षी उत्तराखंडात झालेल्या प्रलयाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत होतं. त्या दिवसांत ह्या राज्यातल्या लोकांनी फार सोसलं, त्याचं वाईट वाटत होतं. त्यासोबतच आमचा इथपर्यंतचा प्रवास अगदी ठरवल्यासारखा झाला, कुठे काही गडबड झाली नाही. आता ह्या कोसळणाऱ्या पावसामुळे काही गालबोट तर लागणार नाही ना? अशी काहीशी स्वार्थी भीतीही वाटत होती.
ह्या ट्रेक आम्ही आमच्या हिमतीवर करत होतो. त्याचा चांगला भाग आत्तापर्यंत अनुभवत होतो. एखाद्या ठिकाणी थांबावसं वाटलं तर हल्या-हल्या करणार कोणी नव्हतं, चार पैसे जास्त-कमी खर्च केल्यावर कोणाला उत्तर द्याव लागत नव्हतं. मुलग्यांची खोली नेहमी वेगळी असली, तरी घरचीच मुलं असल्याने संकोच वाटायचं काही कारणच नव्हतं. त्यांची खोली लहान असली, तर एक-दोघं आमच्या खोलीत झोपायला यायची. घाईच्या वेळेत आम्ही त्यांच्या खोलीतली बाथरूम वापरायचो. सगळ्याच बाबतीत मोकळेपणा होता.
पण फक्त स्वातंत्र्य कधीच मिळत नाही. त्याबरोबर जबाबदारी येतेच. इथेही सर्व मंडळी ठरलेल्या शेड्यूलनुसार नीटपणे घरी पोचेपर्यंत जबाबदारी होतीच. जबाबदारी कोणाच्या एकाच्या डोक्यावर नव्हती आणि काही शेड्यूलमध्ये काही अपरिहार्य बदल करावे लागले तर कोणी कोणावर दोषारोप करणार नाही, ह्याची अगदी पक्की खात्री होती. तरी एकमेकांजवळ ह्याबाबतीत बोललं नाही, तरी प्रत्येकाच्या मनावर तो ताण होताच.
आज चौदा किलोमीटर चालायचं होतं. दहा किलोमीटर लोहारखेतपर्यंत आणि चार किलोमीटर सॉंगपर्यंत. तिथे जीप येणार होत्या. रात्री मुक्कामाला बागेश्वर. हिमालयाच्या सुखद गारव्यातून गरमीत जायचं होतं. त्याबरोबर शहरी फायदेही मिळणार होते. टीव्ही, मोबाईल फोन, वीज, बाथरूम, बाटलीबंद पाणी.. पण हा सुखद, सहज सहवासही संपणार होता. मुलांसकट सगळ्यांचेच व्यस्त दिनक्रम, कौटुंबिक – व्यावसायिक जबाबदाऱ्या... पुन्हा कधी असा मेळ जमून येणार? असं वाटत होतं. मुलांनी मात्र आता दर वर्षी असं कुठेतरी जायचचं असा ठाम निश्चय केला होता. अनुजाला हे असं वातावरण आवडेल की नाही, अशी भीती होती. पण ती ‘आई नाही आली तरी मी एकटी तुमच्याबरोबर येईन’, असं म्हटल्यावर हा सगळा खटाटोप सत्कारणी लागला, असं वाटत होतं.
उजाडल्यावर थोड्या वेळाने पाउस कमी झाला. हलकं ऊन पडलं. बाहेरच्या गवतावर पावसाचे थेंब चमकायला लागले. नेहमीप्रमाणे चहा, नाश्ता, सॅकमध्ये सामान कोंबणे, काहीतरी विसरणे, सामान पुन्हा उपसणे, बूट-टोप्या-गॉगल चढवणे वगैरे रोजचे एपिसोड्स पार पडले. फोटो काढून झाले, सामान खेचरांच्या पाठीवर गेलं. एका खेचरवाल्याच्या बोटाला मोठ्ठी जखम झालेली पाहून अश्विनीने परिस्थिती हातात घेतली. प्रथमोपचाराचे सामान सॅकमधून उपसून मलमपट्टी करून दिली. फार वर्षांपूर्वी आम्ही ‘चंद्रखणी पास’ चा ट्रेक एकत्र केला होता. अवघड रस्ता, पावसाचा कहर ह्यामुळे बॅचमधल्या बऱ्याच जणांची पडझड झाली होती. अश्विनी एकदम फुल डिमांडमध्ये! ह्या टेन्टमधून त्या टेन्टमध्ये ह्या डॉक्टर मॅडम हिंडत होत्या, त्याची आठवण आली.
बाय बाय धाकुरी...
धाकुरी कँपकडे डोळे भरून बघत आम्ही सगळे चालायला लागलो. रस्ता माहितीचा होतं. कँपनंतर एका देवळापर्यंत चढ आणि मग पार सॉंग गावापर्यंत उतार आहे. लोहारखेतपर्यंतचा रस्ता अतिशय सुंदर आहे. जंगल, मोठे वृक्ष, वाहणारे झरे, हिरवी पठारे, लांबवर दिसणारी पर्वतशिखरे आणि त्यावरची लहान-लहान गावे अशी डोळ्यांना मेजवानी होती. घाई करायचं काही कारण नव्हतं, त्यामुळे निसर्गाची मजा घेत आणि मनात-डोळ्यात हे सगळं साठवत आम्ही चालत होतो.
देवळापाशी आल्यावर बी.एस.एन.एल. च्या फोनला रेंज येते आहे, असं कळल. मी एकटीच बी.एस.एन.एल. वाली. मग पूर्वी एस.टी.डी. बूथवर जश्या रांगा लागायच्या, तश्या माझ्या फोनसाठी लागल्या. घरची खबरबात कळली, मुलांचे फुटबॉल वर्ल्डकपचे अपडेट घेऊन झाले तसे आम्ही लोहारखेतची वाट चालायला लागलो. साधा, उताराचा रस्ता होता. बिकट वाट नसल्याने चालायचे श्रम वाटत नव्हते. तरीही आम्ही थांबत-फोटो काढत-गप्पा मारत चाललो होतो. पाऊस नव्हता पण धुकं होतं. धुक्यात तो रस्ता अजूनच सुंदर वाटत होता.
मजा करत करत आम्ही मॅगी पॉंईंटपर्यंत येऊन पोचलो. प्रथेप्रमाणे मॅगी खाऊन झालं. आत्तापर्यंत सगळ्या मॅगी पॉंईंटवर मुलांनीच मॅगी खाल्लं होतं. नुकतच जेवण झालय किंवा कँप जवळच आलाय किंवा चालताना जड होईल, अश्या कारणांनी आम्ही खाल्लं नव्हत. आता परत हे हिमालयन मॅगी मिळणार नाही, म्हणून आम्हीही ती फोडणीवाली मॅगी खाऊन पहिली. त्या ठिकाणी, त्या हवेत, त्या कंपनीने ती अत्यंत चविष्ट लागली!
बच्चा लोगोंकी मॅगी पार्टी
दिदी लोगोंकी मॅगी पार्टी
थोड्या वेळाने मातीचा रस्ता संपून दगडांचा रस्ता सुरू झाला. चढताना ह्याच रस्त्याने गेलो होतो. पण तेव्हा पायांवर जोर येत नसल्याने त्या दगडांचा काही त्रास झाला नव्हता. आता उतरताना ते दगड पायांना खूपच टोचत होते. त्यातून ब्लीस्टर्सच्या जागी टोचले की नको ते शब्द तोंडात नाहीतरी मनात येत होते! असे उभे दगड खेचरांचे पाय घसरू नयेत म्हणून लावतात म्हणे. पण माणसांच्या पायांचा काही विचार? माणसांच्या पायांच्या चाळण्या होतात त्याचं काय? इथली माणसं खेचरांवर बसून उतरतात असतील कदाचित!
पायाची चाळणी करणारा रस्ता
तर, अश्या ह्या टोचऱ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत आम्ही सर्व मंडळी लोहारखेतला येऊन पोचलो. जेवण तयारच होतं. आपण आता शहराच्या जवळ जात आहोत ह्याची जाणीव वॉश बेसीनमुळे पक्की झाली. कारण बेसीनचा नळ फिरवल्यावर पाणी येत होतं आणि पाईपमधून अदृश्य होऊन वाहुनही जात होतं. ह्या दोन्ही सोयी एकाच जागी आहेत, हा अनुभव बऱ्याच दिवसांनी मिळाला. इतके दिवस नळ, त्याला तोटी, तोटी फिरवल्यावर पाणी येणे आणि ते पाणी नीटपणे वाहून जाणे असे सगळे घटक एकावेळी कधीही नव्हते!
आता पुढचा आणि शेवटचा टप्पा फक्त तीन किलोमीटरवर होता. त्या गावाचं नाव ‘सॉंग’ असं होतं. मग त्या नावावरून ‘गाव आहे की सोंग?’ त्या गावातल्या बायका नवऱ्याला ‘आलं बाई आमचं सॉंगचं सॉंग’ असं म्हणत असतील का? इत्यादी विनोद करून पोट दुखेपर्यंत हसून झालं. ट्रेकच्या शेवटी जे विनोद होतात, ते उच्च कोटीचे नसले, तरी सर्वांना हास्य-रोग झाल्यामुळे त्यांना मोठ्ठ्या प्रमाणात दाद मिळतेच, असा माझा तरी अनुभव आहे.
लोहारखेत ते सॉंगच्या रस्त्यावरही आधीच्या रस्त्यासारखे दगड होते. चालताना वाईट टोचत होते. गप्पा मारण्याची कोणाचीच मनस्थिती नव्हती. रस्त्याला जोरदार उतार होता. खरं तर ट्रेकची सुरवात सॉंगपासूनच होते. आम्हाला बागेश्वरला पोचायला उशीर झाल्याने आम्ही हा टप्पा जीपने गेलो होतो. हे चढताना किती वाट लागली असती, असं प्रत्येकालाच वाटत होतं. ‘होता है वो भले के लिये’. त्यादिवशी उशीर झाला ते बरचं झालं, असं आता कळल!
चालायचा शेवटचा टप्पा
त्या दगडांवरून उतरत एकदाचे सगळे जीपपर्यंत येऊन पोचले!!! मंजिरी तिचे आलुबुखार सांभाळत, वेदना सहन करत चालत होती. तिचा हिमालयातला पहिलाच ट्रेक होता. इतका त्रास होत असूनही तक्रार किंवा कुरकुर न करता तिने तो पूर्ण केला. त्याबद्दल तिला तिथलीच रानफुले बक्षीस देण्यात आली.. चालण्याचे बूट काढून मी फ्लोटर्स घातले. पावलांना इतकं सुख वाटलं, की विचारता सोय नाही. दोन जीप आलेल्या होत्या. नेहमीप्रमाणे मुलं एका जीपमध्ये आणि आम्ही ‘दिदी लोग’ दुसरीकडे अशी विभागणी झाली.
उत्तराखंडातील रस्त्यांवरून जीप घरंगळायला लागल्या. नेहमी असतो, तसाच सीन होता. एकीकडे नदी, दुसरीकडे डोंगर. आम्ही नुकतीच स्वच्छ, सुंदर, निर्मळ पाण्याची नदी बघून आलो होतो. नदी माणसात आल्यावर तिची झालेली केविलवाणी अवस्था पाहवत नव्हती. आमच्या जीपचा ड्रायव्हर गाडी चालवताना देऊळ दिसल्यावर गाडीत टांगलेली घंटा तर वाजवत होताच. पण एकसारखा खिडकीतून डोकं बाहेर काढून वाकून चाकांकडेही पाहात होता. तो असं का करत असेल, हे काही आम्हाला कळत नव्हत.
मधे एका ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण चालू असल्यामुळे आमच्या गाड्या थांबल्या. ड्रायव्हर लोकांना गाडी थांबवावी लागली, की गाडीत बसून राहायला बंदी असते, त्यामुळे आमचा ‘शिवराम गोविंद’ खाली उतरला. तो आणि बाकी सगळे ड्रायव्हरही आमच्याच जीपच्या चाकांकडे पाहात होते. मुलांच्या जीपच्या ड्रायव्हरला विचारल्यावर ‘आपके गाडीके टायर पुरे गंजे हो गये है, ये पागल वैसेही चला रहा है’ अशी माहिती मिळाली.. झालं. ‘गंजे टायर’ ह्या शब्दाची संग्रहात भर पडली आणि काळजीच्या भुंग्याची गुणगुण डोक्यात सुरू झाली.
सुदैवाने त्याच टक्कलवाल्या टायरवर आम्ही बागेश्वरला येऊन पोचलो. अरुंद रस्ते, भरपूर रहदारी, हॉर्नचे कर्णकर्कश आवाज, उकाडा, गर्दी... जीप परत वळवून पुन्हा लोहारखेत नाहीतर धाकुरीला जाऊन राहावं अस फारफार वाटलं. पण तसला काही आचरटपणा न करता बागेश्वर कँपला पोचलो. तिथे त्यांनी नऊ लोकांसाठी पाच खोल्या दिल्या, पण आम्हाला आता एकमेकांची इतकी सवय झाली होती, की अत्यावश्यक गोष्टी आटपून आम्ही एकाच खोलीत गर्दी करून बसलो!
त्यादिवशी सगळ्यांनी इतका वेळ अंघोळी केल्या, की बागेश्वरमध्ये दुसऱ्या दिवशी नक्की पाणीकपात जाहीर करावी लागली असेल. ट्रेकमधल्या कँपच्या मानाने इथली सोय चांगली होती. मुलांच्या अपेक्षा ट्रेकनंतर इतक्या खाली आल्या होत्या, की तो कँप त्यांना पंचतारांकित सोयीचा वाटत होता.
रात्री जेवताना उद्या काठगोदामला जाताना थोडा वेळ नैनितालला थांबायचं असं ठरलं. प्रवास केलेल्या वाहनांच्या यादीत होडीची भर पडली असती आणि वरण-भात-भाजी-पोळीच्या जेवणाला कंटाळलेल्या मुलांना पिझ्झा वगैरे पौष्टिक अन्न खायला मिळाला असता.
इतक्या दिवसांचं चालणं, स्वच्छ अंघोळ, जेवण. थकवा अगदी दाटून आला होता. जेवण झाल्यावर खोलीत न जाता, इथेच पसरावं असं वाटत होतं. ट्रेक संपला की चटकन घरी पोचायची सोय असायला पाहिजे. पण तसं कधी होत नाही. आम्हालाही अजून काठगोदामपर्यंत जीप, मग रात्रभर ट्रेन, दिल्लीतले कंटाळवाणे काही तास मग विमान, इतके टप्पे पार केले, की मग घर दिसणार होत..
सध्या मात्र फार मानसिक किंवा शारीरिक कसरत करण्याच्या स्थितीत कोणीच नव्हत. सगळे कसेबसे सगळे खोलीत पोचले आणि गाssssढ झोपले.







No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.