२८/१/२०१८
नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं अन कुटं कुटं जायचं फिरायला? विचार डोक्यात घोळू
लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित
केला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन
आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का ? माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर
शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं
डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा
विचार करून बुकिंग केलं. झालं ! दोन हजार अठराचा कोटा पूर्ण झाला.
निवांत..... पण ... नेहमीच पण नकारात्मक नसतात कधी कधी सुखावह , सकारात्मक
पण 'पण' असतात.
अचानक ध्यानीमनी नसताना ठरलेली ही ट्रीप!
त्याचं असं झालं पिंपळदला असल्याने माझ्याशी संपर्क न झाल्यामुळे शोभा/वंदना (बहीण) व तिच्या यजमानांनी एका प्रवासी कंपनी बरोबर जायचं ठरवलं 'रण आॅफ कच्छ' ! हो, तेच ते ! ज्याची जाहिरात अमिताभ बच्चन करतो ना तेच. माझी जी मोठ्ठी बकेट लिस्ट आहे ना त्यात हिमालया नंतर दुसर्या क्रमांकावर असलेलं हे स्थान! हं तर त्या प्रवासी कंपनीवाल्याकडे दोन जागा शिल्लक असल्याचा निरोप आला तिला. मी ही नागपूरला परतले होते. तिने आम्हाला विचारलं पण इतक्या वेळेवर रेल्वेचं आरक्षण मिळण्याची शक्यता कमीच वाटत होती म्हणून आधी फ्लाईटची तिकीट बघितली पण ती काहीच्या काही महाग! टूर तीस तारखेला अहमदाबादहून सुरू होणारे पण एकोणतीसच्या कुठल्याही गाडीचं आरक्षण शिल्लक नव्हतं. फक्त सत्तावीसच्या संत्रागाच्छी राजकोट स्पेशल ट्रेनमध्ये मात्र अडीचशे तिकीटं शिल्लक होती. पण परतीची स्लीपर क्लासची मिळत होती . ती आधी तर काढलीच व त्याचसोबत एसीची पण काढून ठेवली. अश्याप्रकारे रेल्वेला आम्ही नियमीत देणगी देत असतो smile दोन दिवस नंतर न राहता आधी राहू निताकडे (चुलत बहीण)असा विचार करून सत्तावीसची तिकीटं नंतर काढली अन् दोन दिवसांनी गाडीत बसलोही smile
नीताचं घर मणीनगर स्टेशनपासून जवळ, पण तिथे गाडी थांबत नाही पण काही कारणाने. म्हणजे सिग्नल वैगेरे नाही मिळाला आणि थांबली तर आम्ही उतरण्याच्या तयारीने दाराशी आलो. गाडी हळू झाली पण थांबली नाही. थोडं पुढे जाऊन थांबली अन् पब्लिक उतरू लागलेलं पाहून आम्ही पण उतरलो... थ्रील ! एडवेंचर ! रिक्शा करुन घरी पोचलो.
काकूने गरमागरम मेथीचे गोटे म्हणजेच भजी नाश्त्याला केली ती इतकी
तोंपासू होती की फोटो काढायला विसरले. रात्र थोडी सोंग फार व पोट लहान!
मनसोक्त गप्पा मारून आधीच ठरवलेल्या प्रोग्रामप्रमाणे इथलं स्पेशल
काठियावाडी जेवायला गेलो. पंजाबी मेन्युला काट मारून स्थानिक जेवण मागवलं.
उंधियो, भरीत, तुरिया पात्रानु शाक, खिचडी -कढी ! एकूण गुजराती गोडबोले,
दिलदार व आतथ्यशील. ताकाचा मसाला आवडल्याचे सांगतात शंभरग्रॅम मसाल्याची
पुडी हातात दिली. काॅलेज बाॅय माधव आम्हा बायकांमध्ये मस्त एन्जाॅय करत
होता, कौतुक वाटलं.



घरी आल्यावर आराम व गप्पांत रात्र केव्हा झाली कळलेच नाही. जेवायचा प्रश्नच
नव्हता . एकादशी दुप्पट खाशी! दुसर्या दिवशी एकादशी तर करत नाही पण दुप्पट
खादाडी (रात्रीची व सकाळची)मात्र केली आदल्या दिवशी!
नीता सख्खी चुलत बहीण! बर्याच वर्षांनी नीताला प्रत्यक्षात भेटत होते. किती बोलू न बोलू झालं. ती एकेक तिची फाईट सांगत होती अन् मी तिच्याकडे थक्क होऊन पहात राहिले. कॅन्सर सर्व्हायवर नीता म्हणजे मूर्तिमंत सकारात्मकता! पंधरा वर्षांपूर्वी केमो, रेडीएशन करून दहा वर्षे व्यवस्थित गेली. नुसती व्यवस्थितच नाही तर एक उद्योगिनी उदयाला येत होती. सोयाबीनचे प्रोटीन रिच विविध टीकाऊ पदार्थ, सोया पफ्स, प्रोटीन पावडर, चटपटीत पूड चटणी असे करून विकायची. कामाला पाचसहा जण होते. भारतभर खादी ग्रामोद्योग प्रदर्शनात तिचा स्टाॅल असायचा.
त्यानंतर रिलॅप्स झाले. परत पाच केमो नीट पार पडले नंतर सहन झाले नाही त्यामुळे रेडीएशन घेतलेच नाही. दुर्दैव हात धुवून पाठीमागे लागले... पंधरा वर्षापासून चालू असलेला उद्योग तेव्हाच घाट्यात आला अन् व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसायात सुभाषची साथ होती व सासुबाईंचा पाठिंबा. सुभाषकडच्या सात पिढ्या गुजरातच्या मातीत व पाण्यावर वाढलेल्या ! हार मानली नाही. विम्याचं काम सुरू केलं. घसरलेली गाडी जरा रूळावर आली. अॅलोपथीच्या औषधांचा परिणाम ह्रदयावर झाला. एका नामांकित आयुर्वेदिक डाॅक्टरकडे खोपोलीत ट्रीटमेंट घेतली त्याने बराच आराम पडला. घरबसल्या म्युच्युअल फंडाचे काम करते. दोन तरूण काॅलेजमध्ये शिकणारी मुले. सुभाष अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी गेलेत. दोन म्हातार्या सासू व आई, दोन तरुण मुले असे आज आनंदाने एकमेकांना सांभाळत राहताहेत.
hareThis
२९/१/२०१८
एक उनाड सकाळ
जेशी क्रुष्ण ! जय श्री क्रुष्ण अभिवादनाने प्रसन्न सकाळ झाली. आज्यांचे
प्रात:स्मरण सुरू झाले होते व एकीकडे चहाची लगबग सुरू होती. कांकरिया
तलावावर माॅर्निंग वाॅकला जायचं व नाश्ता करूनच परतायचा प्लॅन माधवने ठरवला
होता. गाईड, घरचा कर्ता पुरुष व आईची जबाबदारी स्वत:कडे घेत तिन्ही भूमिका
समजूतदारपणे, उत्साहाने पार पाडत होता. मावशीचे अर्धो कल्लाकाने जाऊ, मी
आज दौडणार नाही गुजराथी अनुवादित मराठी ऐकायला मजा येत होती. त्याला काही
सुचवायला म्हटलं की त्याचं उत्तर असायचं 'वांधो नथी' ही टॅग लाईन मला फारच
आवडली. मनातल्या मनात म्हणायला सुरूवात केली तर लक्षात आलं आपण उगीचच्या
उगीच वांधे करत बसतो. वांधो नथी 
काॅलेजमध्ये असताना आम्ही दोघी बहिणी एकदा उन्हाळ्याच्या सुटीत अहमदाबादला आलो होतो, तेव्हा काका काकुंनी कांकरियाला नव्यानेच सुरू झालेले म्युझिकल फाऊंटन बघायला आणले होते. तेव्हा पहिल्यांदा इथली प्रसिध्द पावभाजी खाल्ली होती. पण आता पावभाजी बरोबरच प्रांतोप्रांतीच्या पंगतीला देशीविदेशी आलेले पदार्थ दिमाखाने बसले आहेत. आपणही त्यांना सामावून घेतलंय. संध्याकाळी चालू होणारे म्युझिकल फव्वारे अजूनही चालू स्थितीत आहेत. ही सगळी मजा पाहायला संध्याकाळी यायला हवं. पण गर्दीची आम्हाला सवय नसल्यामुळे सकाळी जायचा प्लॅनवर शिक्कामोर्ब केलं.
तलाव खूप स्वच्छ आहे. आरोग्य सजगता देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर वाढल्याने सकाळीही तितकीच गर्दी होती चिल्लेपाल्ले वगळता.

कांकरिया तलाव फिरून बाहेर पडलो घटवलेल्या क्यॅलरी भरून काढायला.
सुरुवात हेल्दी मिक्स वेज सूपने केली. स्ट्रीट फूड म्हणजे ट्रीट! विविध
पदार्थांची रेलचेल. लिज्जत रेस्टाॅरेंटचा लाईव ढोकळा प्रसिध्द आहे पण ते नऊ
वाजता उघडत त्यामुळे ढोकळा ठेल्यावरच खाल्ला. ठेल्यांची रांगच रांग आणि
प्रत्येकाकडे गर्दी. आधी एक चक्कर मारून सर्वे केला अन 'खिचू' पासून आरंभ
केला. बरेच पदार्थ चाखायचे म्हणून वन बाय थ्री करत बन मस्का, खिचू
(तांदळाच्या उकडीवर कच्चं तेल, तिखट व मसाला भुरभुरवलेला) लाईव ढोकळा.<

IMG-20180202-WA0014.jpg
पोहे काय आपण नेहमीच खातो न, मग नको मागवायला. पण शेजारच्या ठेल्यावरचे
सजवलेली पोह्याची प्लेट पाहून हो, पोहेच जरी असले तरी प्रत्येक घरची,
प्रत्येक ठेल्यावरची चव वेगळी ना, आणि हो, नंतर उगीच रुखरुख नको म्हणत
मागवलेच. अशी ही खादाड उनाड सकाळ!
आमच्या टूरमध्ये अहमदाबाद दर्शन होणारच होतं. त्यामुळे बाहेर गेलोच नाही.
कित्येक वर्षांनी सगळ्यांना प्रत्यक्ष भेटत होतो . घरीच गप्पा मारण्यात
एकमेकांच्या सहवासात घालवला. गोपी, नीताची लाॅ शिकणारी मुलगी संध्याकाळी
एका ट्रीपहून परत आली तिही आमच्या गप्पात सामील झाली. तोंडी लावायला मज्जा
नु लाईफचा वडापाव ! खादाडी, खादाडी अन् खादाडी continued... शेजारीच एक बेन
कुर्ती विकते तिच्याकडे थोडी खरेदी केली. मनाजोगता, समाधानकारक दिवस!
३०/१/२०१८
आजपासून टूर सुरू होणार. प्रवासी कंपनी बरोबरचा हा पहिलाच अनुभव. गोपीची काॅलेजला जायची व आमची निघायची एकच वेळ अन तिच्या वाटेवरच आमचं हाॅटेल असा योग! ती सोडणार असल्याने निश्चींत झोप लागली. सकाळी 'आव जो' 'आव जो' करत सगळ्यांचा जड अंत:करणाने निरोप घेतला. साडेआठ वाजता मुंबई, पुणे बसने, ट्रेनने येणार्यांना हाॅटेल मेट्रोपोलमध्ये एकत्र यायला सांगितलं होतं.
आमच्यासाठी वंदना व जिजू सोडून बाकी अनोळखी होते. टूर कंपनीने पुण्यात सहप्रवाश्यांच गटग ठेवलं होतं त्यामुळे त्यांची आपआपसात ओळख झालेली होती. वयोगट चाळीस ते सत्तरी अपवाद होत्या मुली सोबत आलेल्या ऐंशी वर्षाच्या आजी . दोन पुण्याची पारशी जोडपी मराठी बोलणारी, गुज्जु, मल्याळी असा मिक्स ग्रुप होता. तारांकित हाॅटेलमधला ब्रेकफास्ट करून निघालो. बसमध्ये चढायला -उतरायला एक लोखंडी स्टूल जेव्हा जेव्हा ठेवला जायचा तेव्हा तेव्हा पूर्वांचल आठवायचे. तिथल्या बसच्या पायर्या खूप उंच असतात पण त्यांना स्टूलची गरज कधी वाटतंच नाही. चटकन कोणीही हात देतं.
अहमदाबाद ते भूज नऊ दहा तासांचा प्रवास. हाॅनेस्ट रेस्टाॅरेंटची चेन हायवेवर थोड्या थोड्या अंतरावर दिसत होती. दुपारचं जेवण काठियावाडी/गुजराथी घेतलं. रस्ते चांगले पण लांबच लांब! रस्त्याच्या दोन्ही बाजूला एरंडेल, कापूस व मिठाची शेती. भूजच्या जवळ जसं जसं जात होतो तसं तसं दोन्ही बाजूला सपाट ओसाड जमीन! गांवही दूर दूर. मनुष्य वस्ती तुरळक! मध्ये मध्ये उंटांचे कळप चरत होते. टूर मालक जयेश दिल्लीहून आला होता. तिथून त्याने तोंडात टाकायला बरेच प्रकार आणले होते त्यापैकी गुडगट्टे, गुळाच्या कांड्या मस्त होत्या.
संध्याकाळी हाॅटेल हिल व्ह्यु मध्ये पोचलो. छोटीशी ओळख परेड झाली. आम्ही नागपूरकर अल्पसंख्यक पण बर्याच जणांच नागपूरशी काही ना काही कनेक्शन निघालं. भूजमध्ये शिरतांना वाटेत भुकंपाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या अर्थात सतरा वर्ष उलटली होती म्हणा!भूजमधल्या प्रसिध्द हाॅटेल 'प्रिन्स' मध्ये जेवायला गेलो. थाळीचा आकार बघूनच जीव दडपला. सगळंच जेवण छान होतं पण जिलबी और हलवे का जवाब नही. पोट भरलं पण मन नाही.
रण आॅफ कच्छ (प्रवास दैनंदिनी): ३
भूज म्हटलं की मनात येतात त्या भुकंपच्या आठवणी! इतक्या दूर राहणार्या व इतक्या वर्षांनंतरही आपल्या सारख्या लोकांना त्या आठवणी नको वाटतात. इथल्या लोकांची अवस्था त्यावेळेला काय झाली असेल विचार करून मन उदास होतं. 'रण आॅफ कच्छ' सुरू करण्यामागे तोच उद्देश होता. सर्वच गमावून बसल्यामुळे निराश, उदास झालेल्या मनाला उभारी देण्यासाठी काय करता येईल ह्या मंथनातून हा उत्सव सुरू झाला. त्यासाठी लागणारा मूळ घटक आतिथ्यशीलता त्यांच्या रक्तातच असल्याने तो उधार उसनवारीने आणायचा नव्हता व बाकीचे घटक कलासंपन्नता, सृजनशीलता, उत्सवप्रियताही असल्याने त्याला चार चाॅंद लागले. कच्छींनी ही कल्पना उचलून धरली. लोकं उत्साहाने, नव्या उमेदीने कामाला लागले. नव चैतन्य सळालंल आणि आज त्याचं मूर्त रूप आपल्याला पहायला मिळतंय. तुमचा माल उत्तम असला तरी तो लोकांपर्यंत पोचायलाही हवा न. अमिताभ बच्चन! नाम ही काफी है!
कच्छ नही देखा तो कुछ नही देखा
एखादं ठिकाण आपण बघायला जातो, फोटो काढतो, सेल्फी तर काढतोच व आपला प्रवासी
धर्म निभावतो, धन्यता मानतो पण त्यापलिकडे आपण कधी डोकवत नाही. रणोत्सवाची
कहाणी ऐकल्यावर प्रवासी म्हणून एक नवी दृष्टी मिळाली. कन्याकुमारीच शिला
स्मारक पाहिलं ते केंद्राच काम सुरू केल्यानंतरच. त्यामुळे ते एका वेगळ्या
दृष्टिकोनातून बघितल्याने त्याचा दर्जा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून न राहता
तो उंचावलाय, ते बनलंय 'तीर्थस्थळ'! एका दुसर्या अर्थाने प्रसिध्द
होण्यासाठी कारण ठरलं 'लगान' त्याचा उल्लेख पुढे येईलच.
तर मग आता गुज्जु स्टाईलचा व सर्वसमावेशक नाश्ता करून निघूयात भूज
सफरीला. स्वामी नारायण मंदिर, प्राग व आईना महल. त्या महालांच चित्र दर्शन
घ्याच पण बस मधून उतरल्या उतरल्या गायींच्या शिंगांनी लक्ष वेधून घेतलं.
घेऊयात 'गीर' गाईंचं दर्शन. बाकी गाईडने सांगितलेली रोचक माहिती घरी
गेल्यावर लिहीन शेपटीत. लिहीन ना! वांधो नथी! आॅल इज वेल!
स्वामी नारायण मंदिर
भुकंपाने खंडीत झालेला महालः
महालाचा दर्शनी भागः
कच्छमध्ये जाऊन दाबेली खायची नाही ?

क्रमश:
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.