
हल्ली लहानमुलांना आणि मोठ्यांनाही वन्य प्राणी बघायचे म्हणजे टेलिव्हीजनसेटवरच. आपण शाळेमध्ये ‘डी फॅर डीयर’ आणि ‘टी फॉर टायगर’ जरी शिकलेलो असलो तरी प्रत्यक्षात हरिण आणि वाघ बघण्याची वेळ आयुष्यभरात एखाद्यावेळेस येते आणि ती ही प्राणीसंग्रहालयात. पण जर आपल्या शहरापासून अगदी जवळ चारपाच गावं असलेल्या ग्रामीण क्षेत्रातून स्थानिक लोक आणि वन्यपशू एकत्र नांदतांना बघायला जायचं असेल तर येवला तालुक्यातील ‘ममदापूर संवर्धन राखीव’ या प्रकल्पाला भेट देणं म्हणजे अनोखं वनपर्यटन ठरतं…

भारतीय उपखंडातील वन आणि वन्यप्राण्यांची महती संपूर्ण जगाला परिचित आहे. संपूर्ण भारतात ही वन्य विविधता जपण्यासाठी अगदी कशोसीने आणि नियमबद्धतेने प्रयत्न होतांना दिसत आहेत. अगदी रामायणातल्या पौराणिक काळापासून ते सध्याच्या युगापर्यंत मृग म्हणजेच हरिण हा प्राणी सर्व मानवजातीसाठी मुख्य आकर्षणबिंदू आहे. या मृगांमध्ये कुरंगवर्णीय कृष्णमृग म्हणजेच काळवीट (ब्लॅकबग) ही तर भारतीय उपखंडाची प्रमुख ओळख आहे. पुर्वी जगभरात पदभ्रमंती करणारे महान लोक सांगत की, भ्रमंती दरम्यान जर आपल्याला काळवीट दिसला तर आपण भारताच्या क्षेत्रात आलो आहोत असं समजावं! आज जगभरातून विदेशी पर्यटक फक्त या भारतीय काळविटांच्या दर्शनासाठी भारतीय अरण्यांना सतत भेटी देत असतात. काळवीट हा तसा फारच लाजाळू, चपळ आणि देखणा प्राणी. शुष्क मोकळी अशी माळरानं आणि खडकाळ जमिन हेच या काळवीटांचं आवडतं अधिवास क्षेत्र. काळवीट ही अतिशय धोक्यात असलेल्या २६ वनजातींपैकी एक प्रजात. नामशेष होण्याच्या स्थितीत असल्याने वनविभागाने ममदापूर आणि परिसर हा संवर्धन राखीव घोषित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी इथं काळविटांचं अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या तालुक्यांत तसंच सोलापूर, आंध्र, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात आणि हरियाणातही काळविटांचं विशेष भ्रमणक्षेत्र आढळतं. परंतु येवला तालुक्यातील हे ममदापूर-राजापूर क्षेत्र सर्वात विस्तृत आणि काळवीटांसाठी अगदी योग्य असं नैसर्गिक ठिकाण आहे. या भागात काळवीटांचा अगदी स्वच्छंद वावर आहे.

गेल्या वर्षी २१ मार्चला जागतीक वन दिनी वनविभाग नाशिक पूर्व, येवला
वनपरिक्षेत्र आणि ग्रामपरिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून ‘ममदापूर
संवर्धन राखीव’ हे काळविटांसाठीचे विशेष संवर्धन क्षेत्र विकसित करण्यात
आलं. आज या प्रकल्पाला एक वर्ष पुर्ण होत आहे. येवला तालुक्यातील ममदापूर,
राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश अशा परिसरात साडेपाच हजार हेक्टर एवढे
विस्तृत क्षेत्र विकसीत करण्यात आले आहे. यात साधारण पंचवीसपेक्षा जास्त
ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. सोलर बोअरवेल, गणवेशधारी
वनकर्मचारी दल, पर्यटनासाठी पुरक अशा सायकल अशा एक ना अनेक सोयीसुविधांनी
हे काळविट क्षेत्र सुसज्ज करण्यात आलेलं आहे. स्थानिकांनाही यातून रोजगार
निर्मिती झाली आहे. या परिसरात काळवीटांबरोबरच लांडगा, तरस, कोल्हा, खोकड,
रानमांजर, उदमांजर, ससा, मुंगुस, साळिंदर इत्यादि वन्य पशुंचीही रेलचेल
आहे. सन २०१० मध्ये केलेल्या गणनेनुसार या ठिकाणी तब्बल २७१५ हून अधिक
काळविटांची संख्या दिसून आली होती. नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्या
या काळवीटांची संख्या आता मात्र झपाट्याने वाढतांना दिसते आहे. कारण
काळवीटांचा पळण्याचा वेग हा फक्त चित्त्याकडे होता. आता त्यांची नैसर्गिक
शिकार करणारा चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे. त्यामुळे
काळवीटांचा नैसर्गिक शिकारी कोणीच नाही.

या काळवीटांचं म्हणजेच कृष्णमृगांचं जीवनाचे अंतरंग फार रंजक आहेत. संपुर्ण
भारतात एकुण सहा प्रकारचे/जातीचे कुरंगवर्णीय (ऍन्टीलोप) प्राणी आढळतात.
त्यापैकी महाराष्ट्रात चार जातींचा अधिवास आहे. ह्या चार जाती म्हणजे
नीलगाय, चौशिंगा, चिंकारा आणि काळवीट. काळवीट म्हणजे भारतात आढळणारा हा
एकमेव ऍन्टीलोप आहे. जाणकारांच्या मते हा तर संपुर्ण पृथ्वीतलावरचा एकमेव
कुरंग (ऍन्टीलोप) असावा. मोठे पुष्पासम डोळे आणि तिक्ष्ण नजर यामुळे हा
ऍन्टीलोप प्रसिद्ध आहे. या काळविटाचे नर पिल्लू एक वर्षाचे झाले की त्याला
शिंग फुटतात. दुसर्या वर्षापासून साधारण जसा तो प्रौढ होत जातो तसतसे
त्याच्या शिंगांना गोलाकार पीळ पडत जातात. तिसर्या वर्षांनंतर तो प्रौढ
समजला जातो. सुरूवातीला तपकिरी असणारा याचा रंग गडद तपकिरी आणि नंतर अगदी
काळा होतो. मात्र मानेचा आणि पोटाचा भाग तसा पांढर्या रंगाचाच राहतो. मादी
जन्मापासून फिकट तपकिरी रंगाची असते आणि प्रौढ झाली तरी तिच्या रंगात बदल
होत नाही. काळविट हा कळपाने राहणारा प्राणी. या भागातील काळविटांच्या एक
कळपात साधारण पंधरा ते तीस अशी संख्या असते. या कळपांमध्ये नर, मादी,
पिल्लं असा सर्वप्रकारचा कुटूंबकबिला आढळतो. एका कळपात पाच ते पंचविस
इतक्या प्रमाणात मादी असू शकतात. कळपातली अनुभवी मादी कळपाचे नेतृत्त्व करत
असते. नर आपापले क्षेत्र राखून ठेवण्यासाठी सर्वशक्ति पणाला लावून संघर्ष
करतांनाही दिसून येतात. खरंच या काळविटांचे सहजीवन नवलपूर्ण आहे. मादी
साधारण २० ते २२ महिन्यांची झाली की ती प्रजोत्पादनक्षम होते. वर्षातल्या
कुठल्याही ऋतूत या मृगांना पिल्लं होऊ शकतात. यांचा गर्भधारणेचा कालावधी
साधारण १८० दिवसांचा असतो. एकावेळी एक किंवा दोन पिल्लं जन्माला येतात आणि
अल्पावधीतच स्वतंत्रपणे हालचाल करण्यास ते सक्षम असतात. भारतात अनेक
समाजांकडून हरिणांना अगदी मुलाप्रमाणे जीव लावून त्यांची पुजा करण्याचीही
प्रथा आहे.

कळपात राहूनही सतत सावध राहणारे, अगदी हलक्याशा चाहूलीने उंच झेप घेत पळ
काढणारे आणि चुटूचुटू गवत खाणारे अशा या चंचल-चपल मृगक्रीडा बघण्यासाठी
‘ममदापूर संवर्धन राखीव’ क्षेत्रं आपल्यासारख्या अस्सल भटक्यांना साद घालत
असते.
कसे जाल-
नाशिकहून आधी येवला गाठावे. तिथून नांदगाव रस्त्यावर ममदापूर वसलेलं आहे.
ममदापूरचे अंतर- येवला २० किमी, नांदगाव २५ किमी, नगरसुल १५ किमी, मनमाड ३५ किमी, शिर्डी ५२ किमी.
केव्हा जाल / भेट देण्याचा कालावधी –
या क्षेत्रात काळविटांची वस्ती बारमाही असल्याने केव्हाही भेट देणे सोयिस्कर. निरीक्षणासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.