Friday, October 23, 2020

पूर्व युरोप

 

मागच्या वर्षी ऑक्टोबरमधे युरोपच्या या टर्म मधली पहिली ट्रीप करायचे ठरवले. स्वाती आणि मुलींचे बेल्जियमचे रेसिडंट कार्ड अजून आले नव्हते त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत जायचे की नाही आणि गेलो तर कधी आणि कुठे जायचं ते ठरत नव्हते. शेवटी कुठेच जायचं नाही आणि डिसेंबरच्या सुट्टीत जाउ असं ठरवलं. तोच मुलीच्या शाळेला एक आठवडा सुट्टी लागायच्या बरोबर ३ दिवस आधी अनपेक्षितपणे तिघींचेही कार्ड आले आणि मग परत एकदा प्लॅनिंगला लागलो. खरंतर पोर्तुगालचा प्लॅन करत होतो पण व्हिएन्ना, ऑस्ट्रियाचे फ्लाइटचे चांगले डील दिसले आणि तिकीटं बूक करून टाकली. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया आणि बुडापेस्ट, हंगेरी असा प्लॅन बनवला आणि हॉटेल्स बूक केली आणि निघालो. ही आमची पहिलीच मोठी ट्रीप जी आम्ही अशी अलमोस्ट "ऑन द फ्लाय" ठरवली. ब्रसेल्सहून व्हिएन्नाला विमानाने गेलो. व्हिएन्नात थोडा वेळ घालवून त्याच दिवशी ट्रेननी बुडापेस्टला जायचे होते. व्हिएन्नाच्या विमानतळावरून शटल बसनी रेल्वे स्टेशनला गेलो. तिथल्या सार्वजनिक लॉकरमधे बॅगा ठेवल्या आणि तिथून ट्रामनं व्हिएन्नाच्या सिटी सेंटरला गेलो. आमच्याकडे साधारण ४ तास होते तर सेंट स्टिफान्स कॅथेड्रल बघायचे ठरवले. शहराच्या एकदम मध्यवर्ती भागात हे भव्य कॅथेड्रल आहे.

कॅथेड्रलचे बांधकाम ११३७ मधे सुरू झाले आणि ११६० मधे पूर्ण झाले. याचे रंगीबेरंगी टाइल्सचे छप्पर हे आता व्हिएन्नाची ओळख बनले आहे.

चर्च आतूनही पाहण्यासारखे आहे. नंतर आजूबाजूच्या परीसरात थोडावेळ फिरलो आणि व्हिएन्ना स्टेशनला परतलो. लॉकरमधून बॅगा घेतल्या आणि बुडापेस्टला जाणार्‍या रेलजेट ट्रेनमधे बसलो. या रेलजेट ट्रेन २०० किमी/तास वेगाने धावू शकतात आणि एकदम आरामदायी आहेत. ३ तासात बुडापेस्टला (३०० किमी) घेउन जातात. "बुडापेस्ट केलेती" स्टेशनवर उतरल्यावर पश्चिम युरोपातून पूर्व युरोपात आल्याचे लगेच जाणवते. स्टेशन बरेच जुने आहे शिवाय स्टेशनवर उतरल्यावर लगेचच एक कुली बॅगा उचलण्यासाठी आला जे पश्चिम युरोपात कुठंच नाही बघायला मिळत. स्टेशनवरून बसनं हॉटेलपर्यंत जायचं होतं. जायच्या आधीच बसचा रूट आणि स्टॉप माहित करून घेतला होता. बुडापेस्टमधे बस किंवा ट्राम मधे तिकीट मिळत नाही, ते दुकानातून (टोबॅको शॉप्स) आधीच घ्यावे लागते आणि बसमधे व्हॅलिडेट करावे लागते. व्हॅलिडेट करण्यासाठी आपल्याकडे कंडक्टरकडे पंच करायचे मशीन असते तसले मशीन बसमधे लावलेले असते. जर विना-तिकीट पकडलं तर खूप मोठा दंड लावतात. हे सगळं आधीच वाचलं होतं म्हणून स्टेशनवरच्या दुकानातून तिकीट घेतलं आणि बस पकडली. बुडापेस्टमधे २ किंवा ३ दिवसांचा पासपण मिळतो तो घेउन फिरण स्वस्त आणि सोपं पडतं.
दुसर्‍या दिवशी सकाळी व्होरोस्मार्ती तेर (Vörösmarty tér ) ला गेलो जिथून बुडापेस्ट फ्री वॉकिंग टूर चालू होते.

माझ्यामते बुडापेस्ट बघायला जाणार्‍या प्रत्येकानं ही टूर घेतलीच पाहिजे. नावाप्रमाणे ही खरेच फुकट आहे. जर आवडली तर गाइडला टीप द्यायची. यांचे सगळे गाइड स्थानिक आणि बुडापेस्ट आणि त्याच्या इतिहासाचा चांगला अभ्यास असलेले आहेत. तर त्यांच्याबरोबर आमची भटकंती चालू झाली. मुळात बुडापेस्ट हे एक शहर नसून बुडा आणि पेस्ट (स्थानिक उच्चार पेस्त) अशी दोन वेगळी शहरं आहेत. दोन्हीच्या मधून डॅन्यूब नदी वाहते. बुडा हे एका डोंगरावर वसलंय आणि पेस्ट बर्‍यापैकी सपाट प्रदेशावर आहे.

दोन्ही शहरांना जोडणार प्रसिद्ध चेन ब्रिज

हॅब्सबर्ग घराण्याच्या राजा फ्रान्झ जोसेफचा पुतळा.

याच्या काळात पेस्ट शहर पुरामधे उध्वस्त झाले होते. फ्रान्स जोसेफने ते पुन्हा व्यवस्थित नियोजन करून वसवले.

सेंट स्टिफान्स कॅथेड्रल (हो बुडापेस्ट मधे पण आहे).

स्टिफान हा हंगेरीचा पहिला ख्रिश्चन राजा. त्यानं राज्यकालात हंगेरीमधे शांतता प्रस्थापित केली. शिवाय ख्रिश्चन धर्माचा खूप प्रसार केला (काही वेळा जबरदस्तीनं). त्याच्या या कर्तुत्वामुळं १०८३ मधे त्याला संतपद बहाल करण्यात आलं. हंगेरियन संसद आणि हे कॅथेड्रल या दोघांची उंची ९६ मीटर्स आहे. बुडापेस्टमधल्या नियमांनुसार याच्यापेक्षा उंच बांधकामाला परवानगी नाही.

डॅन्यूबच्या किनार्‍यावरची हंगेरियन संसद ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची मोठी संसदेची इमारत आहे (सगळ्यात मोठी इमारत रोमानियन संसदेची आहे)

चेन (Szécheny) ब्रिज (बुडाच्या बाजूनं). बुडा आणि पेस्त मधला हा सगळ्यात पहिला बांधलेला पूल.

बुडा किल्ल्यावरच्या राजप्रासादाचा एक भाग

बुडा किल्ल्यावरचे मथायस चर्च

या चर्चच्या छतावरच्या मोझाइक टाइल्स

बुडा किल्ल्यावरच्याच फिशरमन बॅशनच्या (Fisherman's Bastion) सात मिनारांपैकी एक

बुडा किल्ल्यावरच्याच एका प्राचीन चर्चमधे ही फ्री टूर संपली. तिथून आम्ही परत पेस्त मधे आलो.

हंगेरीयन पोलिसाचा पुतळा. चांगल्या हंगेरीयन खाण्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पर्यटक याच्या पोटावरून हात फिरवतात.

त्यानंतर डॅन्यूबवरती एक नाइट क्रूझ घ्यायची ठरवलं जी इथून जवळच्याच ठिकाणावरून सुटनार होती. तोपर्यंत स्टिफान कॅथेड्रलला भेट देउन आलो.

या कॅथेड्रलमधे येशूपेक्षा सेंट स्टिफानची जागा मध्यवर्ती आहे. असे जगात मोजकेच कॅथेड्रल्स आहेत.

तिथून मग क्रूझवरती गेलो.

क्रमशः

आम्ही डीनर क्रूझवर फक्त क्रूझचाच पर्याय घेतला होता. बोटीवरून बुडापेस्टचा रात्रीचा नजारा मस्तच होता.

चेन ब्रिज आणि बुडामधला राजप्रासाद

हंगेरीयन संसद

बुडा किल्ला आणि तिथले चर्च

क्रूझ संपल्यावर तिथल्या मुख्य शॉपिंग स्ट्रीटवर थोडा वेळ भटकलो आणि तिथल्याच एका इटालियन रेस्तराँमधे जेवून हॉटेलवर परतलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी पेस्टमधले ज्यूइश सायनागॉग बघायला गेलो. हे युरोपमधले सगळ्यात मोठे सायनागॉग आहे. तिथे खूप मोठी रांग असल्यानं आम्ही आत काही गेलो नाही. तिथून आम्ही मुख्य शॉपिंग स्ट्रीटवरच्या अंडरग्राउंड गिफ्ट मार्केटमधे जाउन बुडापेस्टची आठवण म्हणून फ्रीज मॅग्नेट घेतलं (आम्ही बघितलेल्या प्रत्येक शहर/देशाचे फ्रीज मॅग्नेट घेतले आहे). तिथून बाहेर पडल्यावर ही युवती पारंपारिक हंगेरियन (हंगेरियन संस्कृतीला मॉज्यॉर असे पण नाव आहे) वेषात उभी होती. (फोटो तिच्या परवानगीनं घेतलाय).

तिथून मग आम्ही "शूज ऑन द डॅन्यूब" बघायला गेलो.

हा एक वेगळाच अनुभव होता. हे दुसर्‍या महायुद्धावेळी "अ‍ॅरो क्रॉस" नावाच्या फॅसिस्ट संघटनेनं डॅन्यूब नदीच्या तीरावर मारलेल्या ज्यू लोकांचं स्मारक आहे. ज्यूंना नदीच्या तीरावर उभे करून मारायच्या आधी त्यांचे शूज काढायला लावत. गोळ्या मारल्यावर ते लोक आपोआपच नदीत पडत आणि वाहून जात. त्यातल्या ६० शूजच्या लोखंडी रिप्लिकांनी हे स्मारक बनलंय. चित्रपट दिग्दर्शक कान टोगे आणि शिल्पविशारद ग्युला पॉअर या दोघांनी मिळून २००५ मधे हे स्मारक उभारलंय.

तिथून आम्ही जवळच्याच गोविंदा नावाच्या इस्कॉनवाल्यांनी चालवलेल्या व्हेज रेस्तराँमधे जेवून 'हिरोज स्क्वेअर"ला (Hősök ter) गेलो. हंगेरीचे सात राजे आणि इतर महत्त्वाचे नेते, ज्यांनी हंगेरीच्या इतिहासात मोलाची कामगिरी केली त्यांचे हे स्मारक.

याच्या मागेच स्झेशेन्यि (Szechenyi) थर्मल बाथ आहे. बुडापेस्ट नैसर्गिक गरम पाण्याच्या झर्‍यांसाठीपण प्रसिद्ध आहे. या झर्‍यांवर सार्वजनिक हमामखाने(बाथ) आहेत. Szechenyi हा त्यातला सगळ्यात मोठा.

हंगेरीत जवळजवळ १५० स्पा/बाथ आहेत. या बाथवरती एखाद्या स्विमिंग पूलसारख्या सर्व सोइ असतात. टॉवेल्स आणी पोहायचे कपडे भाड्यानेही मिळतात. इथे जाताना हंगेरियन चलनात (फ्लोरेंट्स) मधे रोख रक्कम घेउन जाणं जास्त चांगलं कारण भाडं आणि डिपॉझिट दोन्ही रोखच द्यावं लागतं. मुलीबरोबर इथं १-२ तास घालवून आम्ही हॉटेलवर परत गेलो. जाताना आम्हाला १ क्रमांकाची मेट्रो घ्यायची होती. ही काँटिनेंटल युरोपातली पहिली मेट्रो लाइन. याच्या आधी फक्त लंडनची ट्यूब चालू झाली होती (इंग्लंडला काँटिनेंटल युरोपचा भाग समजत नाहित Happy )

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरची व्हिएन्नाची रेलजेट पकडायची होती.

हंगेरीची काही माहिती -

राजधानी - बुडापेस्ट
भाषा - मॉज्यॉर
चलन - फ्लोरिंट. इथं चलनाचं अवमूल्यन इतकं आहे की साध्या ब्रेडची किंमत सुद्धा ३०० फ्लोरिंट वगैरे असते. शिवाय चलनाची कमीतकमी किंमत १ फ्लोरिंटच आहे (१ रूपयाचे जसे १०० पैसे असतात तसं फ्लोरिंटचं नाहिये). त्यामुळे इथं दुकानात गेलं की १००० फ्लोरिंटवगैरे सहज बील होतं. लाखांमधे कमवायचं आणि लाखामधेच खर्च करायचा Wink

रूबिक क्यूबचा निर्माता एर्नो रूबिक हा हंगेरियन होता.

क्रमशः

टण्यानं सांगितलेल्या दुरुस्त्या आणि अधिक माहिती-

टण्या | 28 August, 2014 - 05:18नवीन

काही सुधारणा वा अधिक तपशीलः हंगेरी वा हंगेरीअन हे इंग्लिश नाव आहे (जसे भारत - इंडिया, ड्यॉइशलँड - जर्मनी). हंगेरिअन स्वतःला मॉज्यॉर म्हणवतात (म्हणजे हंगेरिअन), देशाला मॉज्यॉरोर्शाग म्हणतात. हंगेरिअन भाषेला मॉज्यॉर वा मॉज्यॉरन्येव म्हणतात. हंगेरिअन वंशाच्या लोकांना (रोमा जिप्सी सोडून) देखील मॉज्यॉर म्हणतात.

हंगेरीत सर्वसाधारणपणे प्रवासी बुडापेस्टच बघतात. मात्र तुम्हाला अधिक वेळ असेल तर बुडापेस्टबरोबरच पेच केच्केमेत, सेगेड ही साधारण मध्य-दक्षिणेकडची छोटी शहरे आणि थोडे उत्तरेकडचे एगेर (त्याच्याच जवळ सिल्वाशवाराद हे हिल स्टेशनसारखे एक गाव) व वाइनसाठी प्रसिद्ध असलेले तोकाई ही गावेही बघू शकता. हंगेरिअन समुद्र म्हणुन प्रसिद्ध असलेल्या बालाटोन तळ्याभोवताली प्रत्येक गावात राहण्यासाठी उत्तम सोयी आहेत, बालाटोनच्या काठाला वाइन वा बीअर पीत दिवस घालवणे या पेक्षा सुखी गोष्ट विरळच.

बुडापेस्टहून सकाळची रेलजेट पकडून व्हिएन्नाला परत आलो. ट्रेनमधे ज्या बोगीत चढलो ती नेमकी भरली होती आणी मी नेमक्या सीटस बूक केल्या नव्हत्या. पण शेवटी आम्हाला एकत्रित चार सीटस मिळाल्या त्याही नेमक्या 'चाइल्ड कॉर्नर' जवळच्या. चाइल्ड कॉर्नर ही एक मस्त कन्सेप्ट आहे. तिथे मुलांसाठी स्क्रीन असते आणि मुलांचे कार्टून्स किंवा चित्रपट चालू असतात.
व्हिएन्नाला उतरून आम्ही आमच्या बूक केलेल्या अपार्टमेंटवर पोहोचलो. घाईगडबडीत अपार्टमेंटवर जायचा बरोबर मॅप घेतला नव्हता. शेवटी एका दुसर्‍या हॉटेलमधेच पत्ता शोधायला मदत मागितली आणि अपार्टमेंटवर पोहोचलो. फ्रेश होउन व्हिएन्ना बघायला बाहेर पडलो. व्हिएना मधली सार्वजनिक वाहतूक फारच मस्त आणि फास्ट आहे. मेट्रोनी आम्ही 'हॉफबर्ग' या 'इंपिरीयल पॅलेस' ला गेलो. हॅब्सबर्ग राजांचे हिवाळी निवासस्थान. ऑस्ट्रियन आणि युरोपियन इतिहासातले दिग्गज इथं रहायचे. सध्या ऑस्ट्रियाच्या अध्यक्षांचे निवासस्थान आहे. शिवाय काही ऑस्ट्रियाची काही महत्त्वाची कार्यालयं आता इथं आहेत. संध्याकाळ झाली होती त्यात थोडा पाऊस सुरू होता. त्यामुळं फोटो एवढा चांगला आला नाहिये.

या राजवाड्यात अनेक विभाग आहेत जे पर्यटकांसाठी खुले आहेत (अर्थात तिकीट काढून). त्यातलेआम्ही इंपिरीयल अपार्टमेंटस, सिसी म्युझियम आणि इंपिरीयल सिल्व्हर कलेक्शन बघितलं. ऑस्ट्रियन सम्राट फ्रांझ जोसेफ (ज्याने हंगेरीवर पण राज्य केले आणि पेस्ट शहर परत वसवले) आणि महाराणी एलिझाबेथ (हिलाच सिसी असंही म्हणत) हे इंपिरीयल अपार्टमेंटसमधे, जे १९ दालनांनी बनलंय, रहायचे. सिसी म्युझियममधे महाराणी एलिझाबेथच्या व्यक्तिगत वस्तू आणि तिच्या आयुष्यातील घटनांची माहिती आहे. इंपिरीयल सिल्व्हर कलेक्शनमधे भव्य डिनर सेटस आणि तत्सम वस्तूंचं डोळे दिपवून टाकणारं प्रदर्शन आहे.त्यातल्याच काही वस्तू खालच्या फोटोमधे आहेत.

हॉफबर्ग पॅलेस बघून आम्ही व्हिएन्ना प्रॅटर बघायला गेलो. प्रॅटर हे जगातले सगळ्यात जुने अम्युझमेंट पार्क आहे. दुसर्‍या जोसेफनं हे पार्क सर्वांसाठी १७६६ मधे खुले केले त्यानंतर इथले बरेचसे खेळ (मेरी-गो-राउंड, बोलिंग अ‍ॅले, इ.) सुरू झाले. याच प्रॅटरमधले सर्वात मोठं आकर्षण आहे इथलं जायंट व्हील (पाळणा). हे एका दृष्टीनं व्हिएन्नाचं लँडमार्क आहे. हा पाळणा १८९७ मधे बांधला होता. दुसर्‍या महायुध्दात बाँबमुळं जवळजवळ बेचिराख झालेला पाळणा १९४५ मधे परत उभारला गेला.

पुढच्या दिवशी आम्ही व्हिएन्नामधलाच अजून एक पॅलेस बघायला गेलो. हा श्कॉनब्रून (Schonbrunn) पॅलेस म्हणजे हॅब्सबर्ग राजांचे उन्हाळ्यातील निवासस्थान. हाही एक सुंदर पॅलेस आहे. पॅलेसमधेच खूप सुंदर बाग आहे.

पॅलेसच्या प्रवेशद्वाराजवळचा कारंजा..

राजांची व्यक्तिगत बाग

नेपच्यून कारंजा आणी त्याच्या मागं ग्लोरिएट

पॅलेसच्या भिंतीवरचं एक घड्याळ..

जगातलं सगळ्यात जुनं प्राणीसंग्रहालय याच पॅलेसच्या आवारात आहे. पॅलेस आणि बाग बघून आम्ही प्राणीसंग्रहालय बघून आलो. मुलींनी तिथं भरपूर मजा केली.

तिसर्‍या दिवशी आम्ही व्हिनेयार्ड्स बघण्यासाठी व्हिएन्नाजवळच्याच काहलेनबर्गला गेलो. काहलेनबर्ग व्हिएन्ना शहराअंतर्गतच आहे. व्हिएन्ना हे जगातलं एकमेव महानगर आहे ज्याच्या शहराच्या हद्दीतच व्हिनेयार्डस आहेत.

काहलेनबर्गच्या डोंगरावरून खाली येताच Heiligenstad मधे बीथोवनचे स्मारक आहे. बीथोवनने Heiligenstädter Testament इथेच लिहिलंय.

तिथून आम्ही बेलवेदर (Belvedere) पॅलेसला गेलो. हे बरोक शैलीतलं प्रिन्स युजिनचं उन्हाळ्यातील निवासस्थान जे १८व्या शतकात बांधलंय.

तिथून जवळच असणारं सोव्हिएत वॉर मेमोरियल

ऑस्ट्रियन संसद

हे व्हिएन्नामधले आम्ही बघितलेले शेवटचे आकर्षण. दुसर्‍या दिवशी ब्रसेल्सला परत आलो.

ऑस्ट्रियाबद्दल -
राजधानी - व्हिएन्ना
चलन - युरो
भाषा - जर्मन

ऑस्ट्रियाला युरोप आणी जागतिक इतिहासात बरेच महत्त्वाचं स्थान आहे. चांगलीच सुबत्ता असलेला पुढारलेला देश आहे. व्हिएन्नामधे ही सुबत्ता बरीच जाणवते. इन्सब्रूक आणि साल्झबर्ग ही इतर दोन ठिकाणं बरीच प्रसिध्द आहेत.

समाप्त.

 

आल्प्समधील भटकंती - पास्टर्झे हिमनदीच्या संगे

"आम्हा दोघांची गावं बाजूबाजूच्या दोन खोर्‍यांत आहेत, मधून डोंगररांग जाते. इकडून तिकडे जायचं असेल तर हिवाळ्यात बरं पडतं. केबल कारने डोंगर चढायचा आणि स्की करून उतरायचा. उन्हाळ्यात रस्त्याने जायचं म्हणजे वैताग येतो, कारण बराच वळसा पडतो." नवर्‍याचा ऑस्ट्रियन सहकारी सांगत होता. ही होती माझी ऑस्ट्रियाशी अनेक वर्षांपूर्वी झालेली ओळख. एक देश म्हणून ऑस्ट्रियाबद्दल थोडीफार माहिती होती. अनेक लहान मुलं जिथे चालण्याबरोबरच स्की करायला शिकतात असा हा आल्प्सच्या कुशीतील देश. हिमाच्छादित पर्वत, त्यांच्या अंगाखांद्यांवरून वाहणार्‍या हिमाच्याच नद्या, असंख्य जलधारा, निवळशंख सरोवरे आणि हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला बोलावणार्‍या डोंगरवाटा. अशीच एक डोंगरवाट ग्रोसग्लोक्नर शिखराच्या सावलीतून जाते, पास्टर्झे हिमनदीच्या वितळणार्‍या पाण्याला सोबत करत.
.
समुद्रसपाटीपासून ३,७९८ मीटर उंच असणारं ग्रोसग्लोक्नर (Grossglockner, जर्मन Großglockner) हे ऑस्ट्रियातील सगळ्यांत उंच शिखर. पिरॅमिडसारखा आकार असलेल्या या शिखराला Glocke (घंटा) या जर्मन शब्दावरून Glockner हे नाव पडलं असावं. हे Groß म्हणजे मोठं शिखर आणि त्याचं जोडशिखर आहे फक्त २८ मीटरने लहान क्लाइनग्लोक्नर (Kleinglockner, Klein म्हणजे लहान). ग्लोक्नर पर्वतांच्या पूर्व उतारावर असलेली पास्टर्झे (Pasterze) हिमनदी ही ऑस्ट्रियातील सगळ्यांत मोठी हिमनदी. या परिसराचं सौंदर्य पाहायला येणार्‍या पर्यटकांसाठी सुमारे २,४०० मीटर उंचीवर Franz-Josefs-Höhe इथे अनेक सुविधा आहेत. ऑस्ट्रियन सम्राट फ्रान्झ योसेफ यांचं नाव दिलेला हा viewpoint म्हणजे ग्रोसग्लोक्नर होखआल्पेनष्ट्राझं (Großglockner-Hochalpenstraße) या ऑस्ट्रियातील सगळ्यात उंचावरील रस्त्याचं शेवटचं टोक. या रस्त्याचं सुंदर वर्णन स्वाती दिनेश यांनी केलं आहे.
ग्रोसग्लोक्नरच्या परिसरात ट्रेकिंग करण्यासाठी जवळच्या हायलिगेनब्लुट (Heiligenblut) या गावात नवर्‍याने आणि मी मुक्काम केला होता. आजूबाजूला डोंगर आणि त्यात वसलेलं हे टुमदार गाव. हॉटेलच्या बाल्कनीतून दिसणारं सौंदर्यही भूल पाडणारं होतं.
.
.
या गावातून अनेक ट्रेक्सची सुरुवात होते, शिवाय पर्वतावर जाण्यासाठी एक केबल कारही आहे. पण इथलं मुख्य आकर्षण आहे अर्थातच ग्रोसग्लोक्नर! दुपारी हायलिगेनब्लुटला पोहोचल्यावर लगेच फ्रान्झ-योसेफ्स-होहंला जाणारी शेवटची बस होती ती पकडली. पण वातावरण ढगाळ होते. परतीच्या शेवटच्या बसपर्यंत मिळालेल्या अर्ध्यापाऊण तासात ग्रोसग्लोक्नरने काही दर्शन दिलं नाही. बर्फ पांघरलेलं Johannisberg हे शिखर दिसत होतं. ढग, भुरभुरणारा पाऊस आणि पांढरीकरडी हिमनदी असं ते निसर्गाचं रूप हुरहुर लावणारं होतं.
.
पुन्हा इथे यायचं होतं, पण ते हवा चांगली असेल तर. दुसर्‍या दिवशीही ढगांनी पाठ सोडली नाही. मग जवळपासचे ट्रेक केले. तिसर्‍या दिवशी मात्र सकाळी उठल्यावर चुकार ढग, निळं आकाश पाहिलं आणि आधी बसचं वेळापत्रक बघितलं. उन्हाळा असला तरी एवढ्या उंचावर थंडी असणार. त्यामुळे बरोबर वार्‍यापावसासाठी जॅकेट आणि त्याच्या आत आणखी एक गरम कपड्यांचा लेयर असा जामानिमा आवश्यक होता. खाण्यापिण्याचं सामान सॅकमध्ये भरून भरपेट न्याहारी करून निघालो. बसने जातानाच ग्रोसग्लोक्नरच्या त्रिकोणाने स्वागत केलं. ढगांमधून डोकावून पाहणारं ते टोक पाहून आजचा ट्रेक मस्त होणार असं का कुणास ठाऊक वाटलं खरं!
.
वाटेतल्या उंच पर्वतांच्या शिखरांवर ढग अडकलेले होते. अंगावर येणार्‍या त्या पर्वतांच्या मध्ये खोलवर लपलेलं एक धरण दिसलं. पास्टर्झे हिमनदीचं वितळलेलं बर्फाचं पाणी तिथे येऊन साठतं. आम्हाला जो ट्रेक करायचा होता, त्याच्या शेवटच्या टप्प्यात या धरणाला वळसा घेऊन जायचं होतं.
.
फ्रान्झ-योसेफ्स-होहंला उतरलो, तेव्हा समोर दिसलेलं दृश्य पहिल्या दिवसापेक्षा खूप वेगळं होतं. ढगांनी केलेल्या उदास काळोखाचा मागमूस नव्हता. शुभ्र हिमशिखरं, त्यांच्याशी खेळणारे कापसासारखे शुभ्र ढग आणि वर निळं आकाश! थंडीत हवंहवंसं वाटणारं ऊन अंगावर घेत समोरचा नजारा डोळ्यांत साठवत होतो. तिथेच थांबायचा मोह होत होता. पण असं दुरून काठावरून ते रौद्र सौंदर्य पाहून मन भरणार नव्हतं.
.
Franz-Josefs-Höhe वरून दिसणारी ढगात गुरफटलेली शिखरं आणि उजवीकडे हिमनदी
ग्रोसग्लोक्नरच्या पायथ्याशी पास्टर्झेच्या मुखाशी सुरू होणारा Gletscherweg Pasterze (Pasterze Glacier trail) हा ट्रेक करायचं आधीच ठरवलं होतं. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. 'गणपती बाप्पा मोरया' म्हणून ट्रेकची सुरुवात केली.
ट्रेकच्या पहिल्या भागात तीव्र उतार आहे. त्यातील काही अंतर Großglockner Gletscherbahn (Glacier Railway) ने जाऊन वेळ वाचणार होता. शिवाय २१२ मीटर अंतरात १४४ मीटर उतरणार्‍या या रेल्वेचा अनुभवही घ्यायचा होता. वरच्या फोटोत उजवीकडे या रेलचं वरचं स्टेशन दिसतंय.
.
खालच्या स्टेशनला उतरल्यावर बाहेर पडल्यावर उताराचा अंदाज आला. वरच्या अजस्र इमारती, लोकांची गर्दी दूर राहिली होती. त्यांचा मागमूसही दिसत नव्हता. पुन्हा रेल्वेने त्या जगात जायच्या ऐवजी पायी डोंगरांच्या अंगाखांद्यांवर भटकायचं होतं.
कडा उतरून तळाशी असलेल्या हिमनदीपर्यंत उतरायचं होतं. डोंगराच्या उतारात कुठे खोदलेल्या पायर्‍या होत्या. काही ठिकाणी लाकडी फळ्या ठोकून वाट काढलेली होती. १९६० मध्ये हिमनदीची पातळी इथपर्यंत होती. ती आता बरीच खाली गेली आहे. बर्फाचं वितळलेलं निळसर पाणी आणि आणखी पुढे नदीचं आक्रसत जाणारं मुख दिसत होतं. पाण्याजवळ गेलेली माणसं वरून मुंगीएवढी दिसत होती. म्हणजे अजून आम्हाला बरंच उतरून जायचं होतं. थोडं चालून गेलो आणि डावीकडे जाणारी एक वाट लागली. उजवीकडे पास्टर्झेच्या मुखाकडे जाणारी वाट होती. तिकडे जाऊन परत उलट येण्याऐवजी आम्ही डावीकडे जाणारी वाट धरली.
.
.
दगडधोंड्यांतून उतरत असल्यामुळे वेग थोडा मंदावला होता. समोर कुठे खुरटं गवत आणि कुठे दगडांच्या राशींचं नदीपात्र, स्क्रीचा उतार आणि त्यापलीकडे अविचल असे पर्वत! थोड्याच वेळात एका वेगळ्याच जगात प्रवेश केला होता. सुरुवातीला अंगावर येणारी शांतता आता मनात झिरपली होती.
.
निसर्गाचं राकट रूप पाहत पायाखालची वाट सरत होती. पाण्याच्या पातळीपर्यंत उतरलो होतो. इथे थोडा वेळ थांबायचं ठरवलं. तसंही हातात वेळ होता. भराभर ट्रेक उरकून परत जायचं नव्हतं. येणारेजाणारे ट्रेकर्स 'Grüß Gott!' (जर्मन 'राम राम!') नाहीतर हॅलो म्हणत होते. तेवढंच काय ते बोलणं. बरोबर आणलेली फळं खाऊन पुढे निघालो. मागे वळून पाहिलं तर ग्लेशियर रेल्वेचं खालचं स्टेशन ठिपक्याएवढं दिसत होतं.
.
पुढे माझ्यासाठी कठीण पॅच लागला. इथे वाट अशी नव्हतीच. दगडधोंड्यांतून वाट काढत जावं लागत होतं.
.
कठीण भाग संपला. वाटेने एक वळण घेतलं आणि समोरचं दृश्य अचानक बदलून गेलं. हिरव्याकरड्या डोंगरांत पसरलेलं पाणी पाहताना भान हरपून गेलं. फ्रान्झ-योसेफ्स-होहंवर असताना वरून हा Sandersee तलाव इवलासा दिसत होता. पुढचा रस्ता कधी पाण्याच्या कडेने, कुठे डोंगराच्या मधून गेला होता. सोबतीला दोन लाल पट्यांमधे एक पांढरी पट्टी ही ऑस्ट्रियातली डोंगरवाटांची खूण होतीच.
.
.
तलावात बराच गाळ भरलेला होता. कडेने वाढलेलं गवत, लहान झाडाझुडपांचा गंध हवेत भरला होता. थोडा चढ लागला. वाट पुन्हा वळली आणि दुसर्‍या शिखरामागे दडलेल्या ग्रोसग्लोक्नरचं दर्शन झालं. शिखरावर रेंगाळणारे ढग काही क्षणांसाठी दूर झाले आणि दोन्ही ग्लोक्नर शिखरं पाहता आली.
.
.
आता वाट जरा रुंद झाली होती. थोडं पुढे तलावावर बांधलेला पूल लागला. कडेला साठलेल्या गाळातून जाण्यासाठी दगड लावून वाट तयार केलेली होती. तळ्यातलं संथ निवांत दिसणारं पाणी त्या पुलाखालच्या उतारावरून पत्थरांमधून रोरावत फेसाळत जात होतं. त्या पाण्याचा अनाहत नाद वातावरणात भरून राहिला होता.
.
.
पूल पार केल्यावर थोडी मोकळी जागा लागली. इथे दुसरा ब्रेक घेतला. समोर पसरलेलं पाणी, त्याला बांधून ठेवणारे रौद्रभीषण पहाड, दूर क्षितिजावर दिसणारी गर्द निळी शिखरं मंत्रमुग्ध करत होती. एका बाजूला डोंगरावर टोकाशी होखआल्पेनष्ट्राझं हा रस्ता आणि त्यापुढे पर्यटकांसाठीचा प्लॅट्फॉर्म अंधूक दिसत होता. लवकरच त्या जगात परत जायची वेळ येणार होती. पण तोपर्यंत निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये हरवून जायला काय हरकत होती?
.
एक उंचवटा चढून गेल्यावर मागची हिमशिखरं नाहीशी झाली आणि पुढच्या वाटेवर दरीत असलेला Margaritzenstausee हा तलाव दिसू लागला. पहिल्या तलावाचं पाणी पुलाखालून जाऊन डोंगरकापारींमधून या धरणात येऊन साठतं. आम्हाला मात्र थोडा वळसा पडणार होता. आता ट्रेक सोपा होता. पायाखालची वाट बर्‍यापैकी रुंद आणि सपाट होती.
.
अर्ध्या तलावाला वळसा घालून धरणाच्या भिंतींवरून पुढे जायचं होता. ट्रेकमध्ये सुरुवातीपासून एकापेक्षा एक सुंदर नजारे बघायला मिळाले होते. त्यामानाने हा भाग थोडा एकसुरी वाटला. माणसाच्या अपेक्षा वाढत जातात त्या अशा!
.

धरणाच्या भिंतींवरून वाट जात होती. पास्टर्झेचा ट्रेल संपत आला होता. समोर हिरव्यानिळ्या डोंगररांगा पसरलेल्या होत्या. मागे पाहावं तर नितळ पाण्यात पडलेलं ग्रोसग्लोक्नरचं प्रतिबिंब खुणावत होतं. तो विलोभनीय परिसर डोळ्यांत साठवत थोडं रेंगाळलो.
.

.

धरण मागे राहिलं आणि शेवटचा रस्त्यापर्यंत नेऊन सोडणारा चढ लागला. बरोबर चालणार्‍या इतर ट्रेकर्सबरोबर आम्हीही नकळत लांबून वळसा घेऊन जाणार्‍या वाटेला लागलो. या वाटेनं थोडं दमवलंच. एकदाचं Glocknerhaus ला येऊन पोहोचलो. इथून परतीची बस पकडता येणार होती. तिथल्या कॅफेमध्ये उदरभरण केलं.
.
बाहेर नॅशनल पार्कच्या परिसराबद्दल माहिती लावलेली होती. तिथेच पास्टर्झे ग्लेशिअर ट्रेलचा बोर्डही होता. त्यावर रेखलेल्या मार्गावरून मनाने पुन्हा एकदा फिरून आले. आणि अवघ्या काही तासांत निसर्गाने दाखवलेल्या जादूई रूपाने पुन्हा एकदा स्तिमित केलं...
.

http://misalpav.com/node/43478


 https://www.misalpav.com/node/35012

 ग्रोसग्लोकनर होख आल्पनं स्ट्रासं!!!

आल्प्समध्ये लपलेल्या सुंदर, अनवट जागा हुडकून तिथे मनसोक्त भटकंती करायला आम्हाला आवडते. नेहमीच्या टूरिस्ट जागा सोडून प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायला आवडतातच पण ह्या अशा भटकंतीत एक वेगळा आनंद असतो. इतक्यांदा ठरवूनही ऑस्ट्रीयन आल्प्समधल्या 'ग्ग्रोसग्लोकनर होख आल्पनं/अल्पाइनं स्ट्रासं' (großglockner hochalpenstraße) वरती जायचा योग काही आला नव्हता. कधी अतिवृष्टी तर कधी हिमवर्षा तर कधी खराब हवा तर कधी वेळेची कमी अशा एक ना दोन.. अनेक कारणांनी हा हाय अल्पाइन रोड आम्हाला हुलकावण्या देत होता. ह्या वेळी मात्र हवामानाचा अभ्यास करून तेथल्या ऑफिसमध्ये चारचारदा खात्री करून घेऊन आम्ही होख अल्पाइन स्ट्रासं जवळच्या एका चिमुकल्या गावातल्या फार्महाउस वर बुकिंग केले. तारांकित हॉटेलं वगळून अशा फेरियन वोहनुंग म्हणजे हॉलिडे होम्स किवा फार्म हाउस वर राहणे म्हणजे स्वतःशी आणि तिथल्या निसर्गाशी संवाद करण्याची हुकमी संधी! तर साल्झबुर्गपासून जवळ असलेल्या फारवेर्फन नावाच्या लहानशा खेड्यातल्या अहोन्न्नेगरांच्या फार्म हाऊसवर आमचे बुकिंग झाले..

.

फ्रांकफुर्ट पासून साधारण ६०० किमी अंतरावर हे गाव असल्याने सहा तासांच्यावर वेळ लागणार हे गृहित धरून सकाळी ब्रेकफास्ट करून दहाच्या सुमाराला बाहेर पडलो. इतकसं चिमुकलं गाव आहे ते की सहा साडेसहालाच सगळं बंद होऊन जातं. हे माहित असल्याने तहानलाडू, भूकलाडू बरोबर घेतले होतेच. मध्ये दोन कॉफी ब्रेक्स घेतले आणि एखादा छानसा स्पॉट दिसला की थोडे रेंगाळत साडे पाचच्या सुमाराला तेथे पोहोचलो. हसतमुख गेर्टा आजी आणि पीटर आजोबांनी आमचे आपुलकीने स्वागत केले. मागच्या उन्हाळ्यात आम्ही येथे आल्याची आठवण काढली. थोड्या गप्पा झाल्या आणि मग पहिल्या मजल्यावरच्या आमच्या खोल्या दाखवल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट हॉलमध्ये ब्रेड, जॅम, अंडी, फळे, म्युसली असा भरपेट नाश्ता करताना ग्रोस ग्लोकनर ला कसे जायचे हे विचारले. तर उत्तर आले, आता सिझन सुरू झाल्यामुळे रस्ता चालू झाला आहे पण तरीही आधी फोन करा तिथे आणि आज रस्ता खुला आहे की नाही ते पहा. आज हवा चांगली आहे म्हणजे काही अडचण येऊ नये. आम्ही तेथल्या ऑफिसला फोन लावला आणि रस्ता खुला आहे हे समजल्यावर लगेचच निघायचे ठरवले. जपून जा रे, गाडी जपून चालवा. आजीआजोबांची प्रेमळ दटावणी सुरू होती.

.

छान, स्वच्छ कोवळ्या उन्हात आम्ही ग्रोसग्लोकनरकडे जाणार्‍या रस्त्याला लागलो. फारवेर्फन पासून साधारण ६०/६५ किमी अंतरावर ही हिमशिखरं आहेत. तिथे पोहोचण्यासाठीचा रस्ताही अटकर वळणे घेत जाणारा, एका बाजूने उंचच उंच आल्प्स तर दुसर्‍या बाजूला दरीतली रानफुले, कुरणे, त्यात चरणारी गाईगुरे, छोटी छोटी घरे अशी दोबाजूंना हिरवाई लेवून स्वागत करणारा आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला हा रस्ता पर्यटकांसाठी खुला करतात तो ऑक्टोबर पर्यंत. हिवाळ्यात मात्र पूर्ण बंद ठेवतात. प्रवेशद्वाराशीच दिवसाचा पास (३५ युरो) घेऊन आत जाता येते. अटकर वळणे आता अजून अटकर आणि उंचही होतात.

.

..

दुचाकी, एकचाकी वरून चढाई करणारे स्वार, गड हेंगायला जाणारे वीर आणि गाड्यातून येणारे आपल्यासारखे पर्यट्क.. मेळाच भरलेला असतो. सायकली, मोटरबाइक्स आणि गाड्यांची नुसती जत्रा फुललेली असते शिखराकडे तरीही वाहने शिस्तीत वर जात असतात. मध्ये मध्ये थांबे केलेले आहेत, तेथे थांबून आल्प्सची अनुभूती घेता येते. धुक्यात लपेटून जाता येतं आणि कॅमेरात ती निसर्गाची जादू पकडण्याचा प्रयत्नही करता येतो. खूप कुड्कुडायला झालं तर वाटेतल्या कॉफीशॉप मध्ये वाफाळत्या कॉफीचा आस्वाद सभोवतालचा निसर्ग पाहत घेता येतो.

साधारण तासाभरात आम्ही प्रवेशद्वाराशी पोहोचलो. पास घेऊन वर जायला निघालो तेव्हाही हवेत सुखद गारवा होता, चुकार पांढरे ढग होते पण त्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. काही मीटरच वर गेलो असू, तर उजवीकडे समोर दिसणार्‍या पर्वतरांगा, त्यावर चमकणारे हिम पाहून फोटो साठी एक थांबा घ्यायचा मोह अनावर झाला. आमच्यासारखेच अनेक जणं तेथे गाड्या थांबवून तो नजारा डोळ्यात साठवत आणि कॅमेर्‍यात पकडत होते. फोटो काढत असतानाच समोरच्या डोंगरमाळेवर धुक्याची चादर लपेटली गेली. थोडा वेळ ते निसर्गकौतुक पाहून आम्ही अजून वर जायला निघालो. काही वेळाने परत एक कॉफी ब्रेक घेतला आणि कॉफीशॉपच्या बाहेर आलो तर वर आकाशात ढग दाटून आलेले आणि रस्त्यावर धुक्याचा पूर्ण जाड पडदा! चार फुटांवरचेही दिसेना. गाडीपार्किंग पर्यंतचा रस्ताही धुक्यात बुडून गेला होता. अतिसाहस करण्यात अर्थ नव्हता. पाठीशी आल्पस तर दुसर्‍या बाजूला खोल दरी .. सगळे परत कॉफीशॉप मध्ये आलो. तिथे बाकीची मंडळीही धुकं निवळण्याची वाट पाहत निसर्गाची ती गूढ, रौद्र सुंदरता अनुभवत बसली होती. काही वेळाने धुकं आसमंतात विरघळू लागले आणि थोडे दिसू लागले. मग एकेक गाड्या आस्तेकदम वर सरकू लागल्या.

.

.

३७९८ मी. उंचीवर सेंट्रल इस्टर्न आल्प्स आणि अल्पाइन डिव्हाइन मध्ये वसलेले हे ग्लेशियर ऑस्ट्रीयातले दूरवर पसरलेले मोठे ग्लेशियर आहे. पिरॅमिडच्या आकारातले हे ग्लेशियर ग्रोसग्लोकनर आणि क्लाइनग्लोकनर म्हणजे थोरले आणि धाकले ग्लोकनर असे दोन भागात असून एका ग्लोकनरशार्ट नावाच्या सॅडलने ही दोन ग्लोकनर वेगळी दिसतात. बेल्झर हाकेत नावाचा फ्रेंच अ‍ॅनॉटॉमी प्रोफेसर इस १७७९ ते १७८१ इस्टर्न आल्पस मध्ये गेला आणि तेथून आल्यावर त्याने सन. १७८३ मध्ये ग्लोकनर पर्वतराजींचं वर्णनपर पुस्तक प्रसिध्द केलं. ग्लोकनर पर्वतराजीचं हे पहिलं ज्ञात वर्णन! ह्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन मग प्रिन्स बिशप कोर्ट फ्रान्स झेवियरने त्याच्या सहकार्‍यांसह हे शिखर सर करण्याची मोहिम आखली. सन १८०० मध्ये ६२ लोकांचा चमू हे शिखर पादाक्रांत करायला गेला त्यात फ्रान्स मिशाइल फिअर्टहालर हा शाळा मास्तर आणि डेव्हिड हाइनरिश होफं हा वनस्पतीज्ञ हे ही होते. बर्फातून वाट काढत क्लाइनग्लोकनर पर्यंत ते पोहोचले. १९ व्या शतकात पुढे अनेक जणांनी प्रयत्न करून तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर केला. सन. १९०९ मध्ये तेथे पहिल्यांदाच स्किइंग केले गेले आणि मग पुढे हे पर्यंटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.

काही ऑस्ट्रीयन एक्सपर्ट्सनी सन १९२४ मध्ये ह्या उंच पर्वतरांगातून रस्ता खोदण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांना आधी मूर्खातच काढण्यात आले पण पुढे सन १९३० मध्ये त्यांना मान्यता मिळाली आणि १९३५ मध्ये म्हणजे पाच वर्षांनी हा रस्ता तयार होऊन तेथे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल आणि मोटरबाइक रेस खेळवण्यात आली. त्यावेळी हा रस्ता फक्त उन्हाळ्यातच खुला असे; सुमारे १३२ दिवस पण आता मात्र तो सुमारे २७६ दिवस खुला असतो. नागमोडी वळणे घेत आल्प्सच्या अंगाखांद्यावरून सळसळत जाणारा हा रस्ता! ह्या रस्त्यावरून जाताना दूरवरची हिमशिखरं सतत साद घालत असतात. तेथे कधी पोहोचतो असंही होतं आणि मध्ये मध्ये थांबून ते रौद्र सौंदर्य पाहवेसे, अनुभवावेसे वाटते.

.
ग्रोसग्लोकनरच्या शिखराची उंची जरी ३७९८ मीटर असली तरी २५०० मीटर उंचीपर्यंत साधारण ४८ किमीचा हा रस्ता बांधून काढला आहे. त्यामुळे जेथे रस्ता संपतो त्या टोकाशी जेव्हा आपण पोहोचतो आणि आपल्याला अगदी अमोरासामोरा अगदी जुन्या मित्रासारखा आल्प्स भेटतो ना तेव्हाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. एकदा स्वच्छ उन्हात भेटेल तर एकदम धुक्याची शाल लपेटेलं.. किती रुपडी बदलतो तो! गाडी तिथल्या पार्क हाउस मध्ये पार्क करताना आपलं वयही तिथेच पार्क करायचं आणि मग फक्त हुंदडायचं, त्या आल्प्सच्या अंगाखांद्यावर खेळायचं. पार्क हाउस म्हणजे मोठ्ठी इमारतच आहे. समोरच एक होडगं मांडून ठेवलं आहे आणि त्या पुढे काही अंतरावर रेलिंग. त्या रेलिंगला रेलून मनसोक्त आल्प्स पहायचा..

.

.

तेथून खाली उतरून नितळ, निळ्याशार पाण्यात डोकावायचं. पाय दमले तरी मन भरत नाही तोवर आल्प्स आपल्यात भरून घ्यायचा. अशा विचाराने गाडी पार्क केली आणि आल्प्सला भेटायला गेलो. मनसोक्त हिंडलो. डोळे भरून ती निसर्गशोभा पाहिली. सूर्याचा आणि ढगांचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. मध्येच ढगांचा आणि धुक्याचा पडदा सारून तो बाहेर आला की खोलवर खाली दिसणार्‍या नितळ निळ्या पाण्यात चुकार सोनेरी किरण लख्खकन चमकून जात होते. किती वेळ तो खेळ पाहण्यात गेला समजलेच नाही. तिथे असलेल्या स्मरणवस्तूंच्या दुकानात चक्कर मारून आलो. हे सारं चित्रं मनावर जरी अगदी स्पष्ट कोरलं गेलं होतं तरी सुवेनियर्सचा मोह झालाच. खूप वेळ गेला, पोटात कावळ्यांचं समूहगान सुरू झालं. मग तिथल्याच एका उपाहारगृहात केझं स्पेट्झलं, सलाड खाल्लं आणि परत भटकत बसलो.

घड्याळातले काटे वेळ दाखवायला लागले, मग नाइलाजाने मग परतीचा रस्ता धरावा लागला. मनात आणि कॅमेर्‍यात ग्रोस ग्लोकनर स्ट्रासं जपत आणि आठवणी घोळवत !

.

गेर्टा आजीच्या घरापाशी आलो तर आजी दारात वाटच पाहत होती. आम्हाला पाहून कशी झाली ट्रीप, हवा कशी होती? वगैरे विचारलं आणि मग गप्पच झाली. खोदून खोदून विचारल्यावर समजलं मागच्याच आठवड्यात तिच्याकडे आलेले काही पाहुणे मोटरबाइक्स घेऊन तेथे गेले होते आणि हवा खराब झाली. धुक्यात काही न दिसल्याने मोठ्ठा अपघात झाला आणि त्यात त्या मंडळींपैकी दोघेजण गेले.. क्षणभर सगळेच स्तब्ध झालो. एकदम अंगावर काटा आला. सकाळचा धुक्याचा जाड पडदा आठवला आणि आपण सुखरूप परत आलो ह्याचा नि:श्वास टाकत असतानाच पीटर आजोबांनी सेक्ट उघडली आणि त्यांना फोटो दाखवत असताना आम्ही सगळेच परत त्या ग्रोसग्लोकनरच्या शिखरात हरवलो.

(चित्र- किलमाऊस्की)

 अल्पाइन,आल्पेन,आल्पन ही सगळी उचारणे केली जातात. ऑस्ट्रीयन जर्मन, स्वीस जर्मन आणि जर्मनीतले जर्मन .. उचारणात फरक असतो. जर्मन मध्येही होख डॉइश आणि डिआलेक्टन मध्ये उचारणात फरक होत जातो.
स्ट्रासं, ष्ट्रासं किवा स्ट्रासे, ष्ट्रासे ..अशा प्रकारे स्ट्रासं चेही उचारण केले जाते.
प्रदेशानुसार जर्मन बोलण्याच्या पध्दतीत,उचारणात फरक होत जातो.
उदा- लाइपझिश.. लाइपझिग ,द्रायझिश- द्रायझिग.. इ.
शिकताना आपल्याला ig शेवट असेल तर श उचारण शिकवतात. वरील प्रमाणे.. द्रायझिश, फिअरझिश इ.. परंतु येथे सर्रास दोन्ही वापरले जाते. म्हणजे द्रायझिश, द्रायझिग दोन्ही बरोबर मानले जाते.
तसेच nicht निष्ट.. निट म्हटले जाते. असे अनेक पाठभेद आहेत. लोकल लोकांचे उचारण आणि होख डॉइश उचारण यात बदल आहे. इतरही भाषांत ते दिसून येतेच. जसे पुणेरी मराठी आणि इतरत्र बोलली जाणारी मराठी-- प्रमाण भाषाच असली तरी उचारणात फरक दिसून येतो. लिहिताना मात्र सारख्या पध्दतीने लिहिली जाते. इथेही तसेच आहे, स्पेलिंग ,ग्रामर तसेच राहते, उचारणात फरक होतो.
बर्लिन मध्ये ich- इष ला इख म्हणतात. तसेच बर्लिनर बोलताना व्याकरणातही द्वितियेचा जास्त वापर न करता चतुर्थीचाच करतात पण लिखित स्वरूपात मात्र व्याकरण नियम पाळतात. अशी अनेक उदा. देता येतील. तूर्तास एवढे पुरे.
स्वाती

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...