Wednesday, October 21, 2020

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा !

 

एकेक श्वास घेणे देखील नकोसे झाले होते, शरीरातील ताकद पूर्ण नाहीशी झाली होती. अजून डोल्मा पास (उंची ५६००+ मिटर्स डोल्मा हे तारा देवीचे तिबेटी नाव आहे.) यायला निदान एक किमी तरी होते. साधारण मी ५२०० मिटर्स उंची वर असेन अजून ४०० मिटर्स वर चढायचे होते ! माझे पाय पूर्ण लाकडासारखे झाले होते. एकेक पाऊल उचलायला त्रास होत होता. पण मन मात्र थांबू देत नव्हते. अजून एक किमी झाले की पुढे उतारच लागेल, चल गड्या आता चाल एक किमी, फक्त एक किमी मग उतार लागेल असे मन वारंवार सांगत होते. थांबू नकोस, चालत राहा !

मागून घोडेवाले येऊन पुण्यातील ट्रॅफिक सारखे पँ पँ करत पुढे जात होते. जाताना, आम्हा पायी चालणार्‍या "डाय" (लिटरली) "हार्ड" ( पायाच्या काठ्या झाल्या होत्या) ट्रेकर्स कडे पाहून हसत होते. माझ्या समोर एक ७० एक वर्षाचा तिबेटी म्हातारा होता. त्याला चालताना बघून माझीच मला लाज वाटली होती. तो अजूनही टकाटक पुढे जातोय अन मी आपला, हवालदिल झालोय!

Wind was blowing from the North. It was not too windy, not too cold, just perfect for the trek! I was checking on the scenes. It was cloudy. Far away on the right horizon, all of sudden one tiny thing started showing up from the clouds. It was glowing beautifully. I knew that would be Mount Kailash. And yes it was indeed!

That glimpse gave me instant power. And soon there I was, on the top, feeling exhausted but same time gaining power! How can these two co-exist? But they did! Thanks to that darshan, the pain was gone. The feeling of achievement was concurring the body and soul. All thoughts were gone and my mind became still, eyes gazing at Kaiash and my body gaining power!

डेरापूक कॅम्प पासून डोल्मावर जाईपर्यंत माझ्यासोबत चालणारा भीम पार गळून गेला. भीम हे टोपणनाव आम्ही त्याला त्याच्या भुकेमुळे आणि शरीरामुळे ठेवले होते. त्याचा स्टॅमिना अफलातून आहे, आणि तो ही आज गळाला होता !!

Dolma la उतरल्यावर आता फ्लॅट लॅन्ड वर अजून १२ किमी चालायचे होते. तिथे आमचा आजचा कॅम्प असणार होता. त्या गावाचे नाव आहे Zunzhui Pu! उतरल्यावर बॅगेतून पाणी देखील काढायची इच्छा होत नव्हती. दोघेही थोडावेळ असेच बसून होतो. मेल्यागत ! फक्त डोल्मा पास चढून उतरल्याचे समाधान मात्र होते !

डोल्मा चढ ६ किमी आणि उतार ३ ते ३ १/२ किमी आहे. एकुण अडीच तासाच्या आता डोल्मा चढून, उतरला होता. काल रात्री एका आंतरराष्ट्रीय मॅराथॉन रनरचा विक्रम कुणीतरी सांगतला. की तिने २ तासात चढणे- उतरणे केले होते. तुलनेत नॉट बॅड!

बॅग जवळ घेऊन त्यातनं दोघांनी थोडं खाल्लं. ५ मिनिटं झाल्यावर मी म्हणालो, भीमा, चल उठ आता. भीम फक्त हूं म्हणाला, की तो तसे हूं म्हणाल्या सारखे मला वाटले. ५६०० मिटर्स वर ऑक्सिजन कमी असल्यामुळे भले भले तंतरतात. आम्ही उठणार इतक्यात त्याला अ‍ॅसिडिटी कम AMS ( अ‍ॅक्युट मांऊटेन सिकनेस) मुळे उलटी झाली.

आता भीमाचे काय? हा प्रश्न मला पडला होता.एकतर आमच्या ग्रूप मधील आम्ही दोघंच सोबत होतो आत्ता आणि दोघांकडेही बसायला घोडा नसल्यामुळे ते पूर्ण अंतर पायीच कापायचे होते. बराच वेळ तसे बसून राहिलो. तिथून चालण्यासाठी उठणार इतक्यात पराग आला, तो म्हणाला, "वाटलंच तुम्ही दोघे असाल, तुझे ते जॅकेट आणि लाल बाटली पार वरनं दिसत होती."

तितक्यात आमचे आणखी एक कंपू मित्र डॉन कैलाशी, तिथे येऊन पोचले. भीम, डॉन, पराग अन मी तेथे असलेल्या टपरी मध्ये शिरलो तर तिथे आधीपासूनच दुसरे कंपू मित्र रानडे आणि सौम्या सरकार चहा पीत होते. घोड्यावरून प्रवास करून आल्यामुळे ते एकदम फ्रेश दिसत होते आणि भरीस तो चीनी मॅगीच्या स्वादाचा परिणाम ! मग काय परत ग्रूप जमल्यामुळे, थोड्या गप्पा हाणल्या आणि आम्हीही मॅगी हाणली आणि तिबेटी चहा घेतला. ते १२ किमी चालण्यास सज्ज की काय ते झालो.

आमच्या ग्रूप मधील श्याम आधीच निघून गेला होता कारण त्याने आणि मी कॅम्प वरून सुरूवात एकत्र केली होती. पण मी फोटोच्या नादात मागे पडलो.आणि तसाही श्याम पराग आणि माझ्यापेक्षा फास्ट आहे. तेथून रानडे, सौम्या अन पराग पुढे गेले. मी, भीम आणि डॉन कैलासी निघालो. खूप सारे किमी चालून झाल्यावर वाटलं की अरे १२ संपले असतील असं वाटून आम्ही जीपीएस पाहिला तर केवळ ७ किमी झाले होते.

भीम तर गोठला होताच, पण आता डॉन कैलासी देखील गळून गेले. दोघे गळालेले महारथी आणि मी एकटाच दांडी यात्रेला निघाल्या सारखा पुढे पुढे जातोय ! सारखे परत मागे वळून थांबून दोघांना, चला झालेच, उठा पटकन असे काहीसे असंबद्ध बरळत होतो. आणि त्यांना सांगताना माझे मला बजावून सांगत होतो, की आता थोडेसेच, तो टर्न, नंतर तो डोंगर, ते वळण असा विचार करत होतो.

प्यायचे पाणी थोडेसेच होते. फक्त माझ्याकडेच. मग त्यात तिघे जण पिणारे! त्यातही पाण्यासाठी पहिला प्रेफरन्स भीम होता. तेथपर्यंत दीड एक तास चालून झाले आणि ते अर्धा लिटर पाणी सुद्धा संपले , ऊन वरनं चटका देत होते, घशात कोरड पडली, एकही पाऊल उचलण्याची शक्ती नव्हती. आणखी अर्ध्या तास चालल्यानंतर एक पाण्याचे दुकान दिसले, तिथे दोन बाटल्या प्यायल्यावर आम्हा सर्वात परत थोडी धुगधूगी आली, एकमेकांकडे बघून उठलो आणि झुंजूरपूकच्या दिशेने परत निघाल सर्व शक्तीपात झाल्यावर दूर कुठेतरी कॅम्प सदृष्य काहीतरी दिसले. अजून दोन किमी तरी असावे. सौम्याला आम्ही इथे मागे टाकले. मला आश्चर्य ह्याचे वाटले की सौम्या घोड्यावर होता, आम्ही शक्ती नसलेले पायी चालतोय, तरी आम्ही पुढे, काही तरी घोळ आहे, कुठून ही शक्ती येतेय की दोन तेवढ्या बर्‍या नसलेल्या साथीदारांसोबत चालूनही घोड्याच्या स्पीडला आम्ही मॅच करत आहोत.

एक उतार लागला, तो उतार उतरल्यावर, कॅम्प ऑलमोस्ट आलाच. तिथे एक छोटा ओहोळ आहे. तिथे बसलो. आता १०० मिटर वर कॅम्प दिसत होता. दोन मिनिटे बसावे हा विचार केला. श्वास घेण्यासाठी लागणारी एनर्जी देखील आणावी लागत होती. तिथून (ओहोळापासून) उजवीकडे पाहिले आणि जोरात चिरकलो, O My God! O My God!. कैलास, कैलास !! बसल्या जागेवरूनच कैलासाचा नॉर्थ फेस मला दिसत होता आणि संपूर्ण शक्ती अंगात परत संचारत आहे की काय असा भास होत होता !

आज चरण स्पर्शला जायचे होते. कॅम्प पासून ती जागा आणखी पुढे २ एक किमी आहे. इतके चालल्यावर चरण स्पर्श आपण करायचे नाही, जाऊ दे. असे भीम आणि कैलासीने दोघेही त्या १२ किमी मध्ये म्हणाल्यामुळे चरण स्पर्शाचा विचार सोडला होता. पण आज दुसर्‍यांदा शक्ती संचार तर झाला होता, मग कॅम्प वर नुसतेच बसून राहणार का?

- माझ्या कैलास मानसरोवर ट्रेक / यात्रेतून.

कैलास नॉर्थ फेस !

कैलास चरण स्पर्शासाठी जाताना लागणारे ग्लेशियर !

कैलास - मलारिबा आणि वज्रपाणी सोबत.

पवित्रअश्या याकच्या शिंगातून कैलास मानसरोवर.

आणि यमद्वारापासून कैलास. ते छोटे मंदिर म्हणजेच यमद्वार !!

राक्षस ताल

अजून एक व्हियू

डोल्मा पास चढताना अचानक कैलास दिसतो.

मान सरोवर आणि कैलास

माझ्या पूर्ण प्रवासात मी अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या, त्या सर्वच मला आता आठवणार नाहीत कदाचित, पण जे काही आठवेल, त्यामुळे तो पूर्ण प्रवास परत एकदा अनुभवल्या जाईल हे नक्की ! 

 

२०१३ च्या निसर्ग तांडवामुळे कैलास मानसरोवर यात्रा बंद केली होती, तेंव्हा माझी बॅच ७ नं होती. एवीतेवी सुटी घेतल्यामुळे मग मी सहपरीवार लेहला जाऊन आलो. या वर्षी परत फॉर्म भरले आणि माझा नं परत लागला. अचानक एके दिवशी परागचा फोन आला. तेंव्हा मी सायकल चालवत होतो. बॅच नं ५ मध्ये परागचे सिलेक्शन झाल्याचे परागने मला सांगीतले. मग त्यालाच माझे पर्सनल डिटेल्स सांगितले आणि त्याने मला आनंदाची बातमी दिली की, त्याचे अन माझे योगायोगाने एकाच बॅच मध्ये सिलेक्शन झाले आहे !! तेंव्हा मी कुठेतरी जुन्या मुंबई पुणे हायवेवर होतो. तिथून लगेच परत निघालो नी घरी येऊन बातमी ऐकवली.

कैलास यात्रेला जाणे म्हणजे निदान १ महिना लागतो . १ महिना हा कालावधी खूप मोठा आहे. आणि माझ्या ट्रीप नेहमीच अश्या ऑड असतात. हे घरी माहिती आहे, पण तरी जायच्या आधी सगळे जण मला एकदा तरी "नाही, जायचे नाही" म्हणून पाहतात हे ही खरेच. म्हणून घरच्यांनी एकदा परत खरच गरज आहे का? आपण त्याऐवजी सर्व दुसरीकडे जाऊ असे सुचवून पाहिले. पण पुढच्या ट्रीप फार तर १५ दिवसांच्या वर एकट्याने करणार नाही असे वचन देऊन मी ही महिन्याभराची ट्रीप पदरात की खिशात पाडून घेतली !

पहिली तयारी म्हणजे पुणे - दिल्ली जाण्यायेण्याची तिकिटं बुक करायची. परागला जाताना दुरांतोने जायची इच्छा होती आणि मला वेळच मिळत नसल्यामुळे मी त्याला दोन्ही वेळेस विमानानेच जाऊ असा आग्रह केला आणि आम्ही तिकिटे बुक केली.

काय तयारी झाली, कसे करायचे, हे सामान आणलंस का? अरे टॉर्च विसरू नकोस, अरे त्या ड्राय बॅग पाहून येशील का? रेनपँट चे काय? बरं तू हे घेतोस का? मी ते घेईन. असे अनेक प्रश्न आम्ही एकमेकांना विचारायचो आणि नोंद करून घ्यायचो. त्याप्रमाणे आम्ही तयारी केली.

होता होता प्रोटिन बार ( लॉंग राईडला सायकल चालवतानाचे हे माझे फेवरेट खाद्य आहे ) ते टॉर्च ते अ‍ॅडल्ट वाईप्स पर्यंत सर्व घेऊन झाले.

एवढ्या मोठ्या ट्रेक साठी तुमच्याकडे एकवेळ खूप शक्ती नसेल तरी चालेल, पण चांगले वॉटरप्रुफ बुट असणे फार जरूरी आहे. माझा Vasque हायकिंग बूट

Day -5

निघायच्या चार दिवस आधी माझ्या वडिलांना ICU मध्ये भरती केले आहे, असा माझ्या आईचा फोन आला. परत सर्व प्रायोरिटीज बदलल्या आणि पॅकिंग करण्याऐवजी आम्ही सर्व नांदेडला गेलो. तिथे ३ दिवस घालवले. सुदैवाने वडिलांना डिस्चार्ज मिळाला आणि ते म्हणत होते की तू जा, माझी काळजी नको करू, म्हणून मी परत पुण्याला परतलो.

२४ जूनला आम्ही दिल्ली गाठली !

परागने लिहिल्या सारखे सर्व सोपस्कार पार पाडले. गुजराती समाजात आम्ही राहिलो. तिथे दररोज सकाळ संध्याकाळ त्या मेकशिफ्ट ऑफिस मध्ये पूजा पाठ होत असत. माझे आणि पूजेचे काही जमत नाही. ( प्लिज नोट, मला खूप सार श्लोक , स्तोत्र, आरत्या वगैरे वगैरे पाठ आहेत !) पण जिथे-तिथे भक्ती दाखविण्याची एक चढाओढ असते, तिथून मी थोडा लांबच राहतो. त्या ऑफिस कम देवळात रोज सकाळ-संध्याकाळ हनुमानचालिसा / पूजा वगैरे असायची. यात्रेसाठी तो एक चांगला माहोल त्याने निर्माण व्हायचा हे खरे पण मला प्रामाणिकपणे बोअर ते वातावरण बोअर व्हायचं. मी तिथे मोस्टली नसायचो, कधी असलो तर असून नसल्यासारखेच असायचो. पराग मात्र बरेचदा जायचा. त्याने मला, कृपया इथे तरी भक्ती वरून वाद घालायचा नाही, अशी धमकीवजा सूचना केली होती. जी मी पाळली, शेवटी आम्ही "यात्रेत" सहभागी होतो, ट्रेक हा त्या यात्रेचे उप-उद्दिष्ट होते.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मिटिंग घेतली गेली. त्यात मग परत हनुमानचालिसातील ओळी तेथील चेअरमन बुवांनी विषद करून सांगितल्या. शेवटी सगळ्यांना विचारण्यात आलं की तुम्ही ही यात्रा का करत आहात? मी उत्तर दिले, " मुझे मै आस्तिक हूं या नास्तिक हूं ये पता नाही. शायद नास्तिक जादा. मै भगवान की खोज मे ये यात्रा नही कर रहा हूं, तो खुद की खोज मे प्रकृत्तीका आनंद लेने के लिये कर रहां हूं.!"

यात्रेला एकुण खर्च असा

  1. कुमाऊँ मंडल विकास निगम - ३२००० ह्यात राहणे, खानपिणं इत्यादी सर्व येतं.
  2. चायना विजा फी - २४००
  3. मेडिकल फी - ३१००
  4. चीन मधील फी - $८०१
  5. भारतातील पोर्टर - ९०००
  6. भारतातील पोनी - ११०००
  7. चीन मधील पोर्टर - ४५० RMB
  8. चीन मधील पोनी - १०५० RMB

ह्या शिवाय तुम्हाला येणारा खर्च, जसे थंडीचे कपडे, ट्रेकचे कपडे शुज, तिथे करावे लागणारे कॉन्ट्रिब्युशन, सामान इत्यादी इत्यादी. साधारण १.५ लाख ते २ लाख + असा खर्च सहज येतो.

अनेक लोकांची ओळख झाली, काहींची ओळख आता आयुष्यभर राहणार. आणि द बर्ड्स ऑफ सेम फेदर प्लॉक टूगेदर प्रमाणे आमचा असा एक कंपूही तयार झाला. थोडक्यात ओळख करून द्यायची तर

आदारणिय शाम गर्गजी - हा २८ वर्षाचा व्यक्ती बिनधास्त, बेफिकीर असा आहे. तो कमी वयाचा असल्यामुळे उत्तरप्रदेश मध्ये जे काही सत्कार झाले, त्यात त्याला आदरनिय असे म्हणले गेले. तेंव्हापासून आम्ही त्याला आदरनिय असेच म्हणायचो

सौम्या सरकार - हा माणूस इंटरेस्टिंग आहे. एका मोठ्या इंग्रजी दैनिकाचा संपादक आहे. अनेक ट्रेक त्याने केले आहेत. त्याचे आमचे जुळायला वेळ असा लागलाच नाही. मुख्य म्हणजे त्याची अन माझी क्लासिकल आवड पण जुळली. त्याने आणि मी अनेक गाणी बळजबरी (माझ्या फोन मधून) इतर कंपूकरांना ऐकवली. आणि आम्ही दोघांनी John McLaughlin ते रविशंकर ते अनुष्का ते झाकिर ते जसराज अश्या गप्पा मारल्या.

विशाल शिरसाट उर्फ भीम ; भीम नाव ह्याला श्याम ने दिले ते त्याचा उंची आणि भूकेमुळे. हा पण जातीवंत ट्रेकर, मॅरॉथॉन रनर आणि पुणेकर! ह्याचे प्रश्न म्हणजे केवळ असायचे ! श्याम आणि भीम अनसेपरेबल होते.

प्रसाद रानडे : . एकदम भारी माणूस अर्धा गढवाली, अर्धा मराठी. ( बायको गढवाल्ची आणि हे साहेब मुंबईकर मराठी) श्याम वर रानडेंचे भारी प्रेम !

दिनेश बन्सल : पंजाबी पुत्तर गोवामे ! गेल्या हजार वर्षांपासून गोव्यात राहतो. सरकारी ऑफिसर आहे. ( पण एकदम नॉन सरकारी माणूस). अश्यातच ट्रेकिंग आणि मॅराथॉन रनिंगचा छंद लागला आहे.

पराग : ह्या माणसाबद्दल काय लिहावे? मायबोली वाचलेल्यांना तो माहिती असतोच. Happy

आणि आमचे अर्धकंपू मित्र श्री चौबळ - SBI मध्ये खूप मोठ्या पदावर आहेत. आमचा LO, IAS आहे पण त्याचे स्वागत करायला कुणी येत नव्हतं पण चौबळ साहेब? प्रत्येक गावातील त्या त्या शाखेतील माणसं त्यांना भेटायला यायचीच. मग पार गुंजी ते पिथोरागड आणि दिल्ली ते धारचुला त्यांचा दबदबा आहे. पण तो दबदबा त्यांच्या पदामुळे नाही तर त्यांचा "माणूस" असल्यामुळे. अतिशय सरळ, जमिनीवर असणारा माणूस. आमच्या यात्रेतील प्रत्येक कंपू मध्ये हा माणूस हवासा असायचा, मग तो कंपू गुजराथी असो की हटलेल्या डोक्याच्या माणसांचा!

दिल्लीत गेल्यावर तिसरे दिवशी टेस्टचे निकाल आले आणि आमच्यापैकी ९ जण गळाले. सर्वांच्या चेहर्‍यावर दुसरे दिवशी सकाळ पासून ते निकाल येईपर्यंत अनिश्चितता होती. प्रत्येक जण टेन्स मध्ये होता. आम्ही "पास" होऊ असे हे आम्हाला माहिती होते.

ITBP च्या रिझल्ट अनाउंसमेंट नंतर अनेक कमिट्या तयार होतात. उदा लगेज कमिटी, फुड कमिटी, फायनान्स कमिटी इत्यादी. हट्टेकट्टे माणसं पाहून त्यांना लगेज मध्ये घालतात हे मला आधीपासून माहिती होते. त्यामुळे मी दोन दिवस आधी जेंव्हा आमची एक मिटिंग झाली होती तेंव्हा मी फायनान्स कमिटी पाहिल असे आधीच सांगून ठेवले, तर मग मी आणखी दोघांना घेऊन फायनान्स कमिटी स्थापन केली. त्यात श्री चौबळ आणि चैनाराम होते.

कमिटीला पैसे गोळा करून सर्व खर्च ( जसे टिप्स, सामान ने आण करण्याचे पैसे, तिबेट मध्ये लागणार्‍या सामानासाठी पैसे, तेथी स्वंयपाक्याचा पगार) असे अनेक कामं करावे लागतात. मागच्या कमिटीने प्रत्येकी ५००० रू जमा केले होते असे कानावर आले. काही उत्साही लोकं आपणही करू असे म्हणाले. मी जेंव्हा बोलायला उभा राहिलो, तेंव्हा सांगीतलं की आपण ३००० रू घेऊ आणि लागलेच तर परत गोळा करू, कारण ३००० X ५० = १५०००० जमा होतील आणि ते मलाच सांभाळावे लागतील. लोकांनी मग ते ऐकले.

पण .. काही लोकांना ते ही आवडले नाही. कारण गाईड मध्ये २००० जमा करा असे लिहिले होते. त्यातील दोन बायका अनेकांच्या कानी लागल्या. एकीला मी समजावून सांगत होतो की बाई, तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत, उरले तर तुला परत मिळतील , पण तिथे पैसे गोळा करत बसणे म्हणजे जास्त होईल, तर ती बाई मला म्हणाली, " बाबू ये पैसे तो तूम खा लोगे"

ती तळपायाची की काय आग असते ती मस्तकात वगैरे जाऊन सुद्धा मी न चिडता उतरलो की हे बघ बाई, मी जर माझ पाकीट उघडलं तर त्यातून दिड लाख सहज बाहेर पडतील, कृपया करून मला नीट बोल" आणि एवढे बोलून शांत झालो. मग त्या बाईला मी तिचे १००० परत देण्याच्या निर्णय घेतला आणि चैनाराम जो माझ्यासोबत कमिटीत होता, त्याला तिला परत द्यायला सांगीतले. त्याने ते दिले. माझ्या त्या वाक्याच्या खूप परिणाम झाला, कारण नंतर मला कोणीही, कधीही, पैंसोंका क्या किया? असे विचारले नाही. पुढे उरलेल्या पैशातून मी देणगी द्यायचा निर्णय घेतला, त्यालाही कोणी विरोध केला नाही आणि आम्ही २५००० + ५००० अशी देणगी ITBP ला दिली. पहिल्याच दिवशी असे झाल्यामुळे पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याची कल्पना आली, पण मी अश्या सामाजिक भाकर्‍या खूप भाजलेल्या असल्यामुळे मला फारसे काही वाटले नाही. असे लोकं सगळीकडेच असतात. जिथे दिड लाखाच्यावर खर्च करून कोणी येत असेल त्याला कुणाच्या १००० रू मधून काय मिळणार? पण असे लोक ह्याच ट्रिप मध्ये होते,ह्याचा अनुभव काही दिवसातच आला.

लगेज कमिटीमध्ये फानी कुमार नावाचा प्राणी होता. हा माणूस कायम तिरसट बोलायचा. गनी बॅग देण्यावरून त्याचे आणि रानडेंची बाचाबाची झाली. रानडे लगेच माझ्याकडे आले आणि म्हणाले की तो फानी त्यांना बॅग देत नाहीये, काहीतरी कर. मी त्याजागी जाऊन फानीकडून ( ह्याला नंतर आम्ही फनीच म्हणू लागलो) बॅग घेतल्या आणि रानडेंना दिल्या.

होता होता हे सर्व सोपस्कार दिल्लीत पार पडले आणि आम्ही २८ जूनला दिल्ली बाहेर पडलो.

पुढील दोन दिवसांचा मॅप

Map_1.JPG

पहिलाच थांबा ५० किमीवर ब्रेफफास्टचा होता. इथे परत गळ्यात हार घालून स्वागत झाले. आणि इथेच "आदरनिय" असे नाव पडले.

मजल दर मजल करत आम्ही अल्मोडाला पोचलो. काठगोदाम पर्यंत दोन-तिनदा सत्कार झाले. तिथपर्यंत व्होल्वो होती. पुढे काठगोदाम ते अल्मोडा आणि अल्मोडा ते धारचुला मात्र छोटी बस होती.

काठगोदामला मस्त पैकी जेवण झाले. तिथून पुढे नैनीताल - भीमताल असे करत अल्मोराकडे कडे निघालो.

अल्मोराला रात्री ट्रीप मधील पहिले भांडण झाले ते रूम अलॉटमेंटवरून. काल रात्रीच्या बाचाबाचीचा बदला फनीने रूम अ‍ॅलॉटमेंट मध्ये घेऊन रानडेंनां त्रास देण्याचा प्रयत्न केला. ते प्रकरण निस्तरले. रोज रात्री हॉटेल वर पोचलो की रूम अ‍ॅलॉटमेंटचा प्रश्न असायचा कारण जे जे मित्र होते त्यांना एकत्र राहायचे होते, जे जे नवरा बायको होते त्यांनाही एकत्र राहायचे होते आणि फनी हे सगळे बिघडवत होता. अर्थात मी अन पराग रूम नेहमीच एकत्र मिळवायचो ते गोष्ट अलहिदा. पण फनी लोकांचा बदला घेत होता. आणि लोकं फनीवर चिडली होती. इतकी की त्याला चादरीत घेऊया असा प्रस्ताव आमच्या ग्रूपने एकमताने संमत केला होता. अर्थात एकदा फनीला आमची सहानुभूती मिळाली, पण तो प्रसंग नंतर.

आम्ही दोघे (पराग आणि मी) कायम सोबतच असायचो ह्याचे इतरांना नवल वाटत होते. सौम्या तर मला, तुम्ही इनसेपरेबल आहात असे म्हणाला. मग मी त्याला म्हणालो की बाबारे आम्ही दोघे गेल्या ७-८ वर्षांपासून मित्र आहोत. त्याची माझी पहिली भेट शिकागोत झाली होती आणि त्याला मी नेट मुळे ओळखतो. हे ऐकुन ग्रूप मध्ये सर्वांना नवल वाटले होते. ग्रूप मध्ये सर्वांना वाटले की आम्हा दोघांची पहिली भेट गुजराथी समाजात, दिल्लीला झाली असेल

आमचा ग्रूप बसमध्येही एकत्रच आजूबाजूला बसायचा. त्यामुळे दोन दिवस धमाल आली. शाळेच्या ट्रीपसारखीच ! मध्ये मध्ये लोक भजन गात होती आणि आमचा आणखी एक मित्र (उत्कल पटेल) सारखी, " ॐ नम: पार्वती पते, हर हर महादेव" ची घोषणा देत होता. त्यातील महादेव हे तो ओरडून इतका वेळ म्हणायचा की बास ! म्हणून त्याचे नाव मी पार्वते असे पाडून टाकले. नॉर्थ मध्ये हर हर महादेव च्या वेळी हात वर करतात हे पण आम्हाला नवीन होते. पण एकंदरीत खूप मजा आली.

आमच्या ट्रीपची रोजची आखणी इथे मिळेल. इथे जे मिटर्स दिले आहेत ते कॅम्पसाईटचे आहेत. त्यामुळे Zunzhui Pu ला येताना डोल्माचे ५६०० किंवा लिपूलेख पासचे खरे मिटर्स इथे दिलेले नाहीत. शिवाय ट्रेक आम्ही जीपीएस द्वारे मोजला. तर काही दिवशी आम्ही इथे लिहिलेल्या पेक्षा २ ते ३ किमी जास्त चाललो आहोत.

अल्मोरा हून पुढे जाताना एक गोलू बाबाचे मंदीर लागते. हे मंदीरही नवसकरणार्‍यांसाठी प्रसिद्ध ! तुमची कैफियत / फिर्याद तुम्ही इथे लिहून बांधायची. आणि जर गोलू बाबाने ऐकले तर तुम्हाला ते सगळे मिळेल / तुमचा त्रास दुरू होईल वगैरे आणि त्या बदल्यात तुम्ही मग गोलू बाबाच्या देवळात अशी घंटा बांधायची !

दर्शन घेऊन पुढे आणखी एका मंदिरात थांबलो.

तिथून पुढे ITPB च्या कॅम्पवर जेवण केले आणि ब्रिफिंग नंतर धारचुलाला पोचलो.

धारचुलाला परत एकदा हॉटेल अलॉटमेंट मध्ये गोंधळ झाला आणि फनी कुमारने लोकांचे अगणित पुण्य कमावले.

तर ह्या भागाचा शेवट करताना मी पण म्हणून घेतो.

ॐ नमः पार्वतीपते, हर हर महादेव !!!

ॐ नमः पार्वतीपते, हर हर महादे SSSSSSव !!!

ज्यांना ज्यांना पोनी पोर्टर हवे होते त्यांना धारचुलालाच रजिस्ट्रेशन करायचे होते. परागने पुण्यातच पोनी पोर्टर करणार असे ठाम ठरविले होते. सौम्या पूर्ण ट्रेक घोड्यावरच करणार असे म्हणाला होता, डॉन कैलाशी (म्हणजे दिनेश बन्सल) पण पोनी पोर्टरच करणार होते. पण तिथे बुक करताना सगळे म्हणू लागले की अरे तू पण इन्शुरंस म्हणून पोनी घे, बसायला हवेच असे नाही. पण पाय मुरगळला तर काय करशील? मग तिथे माझी द्विधा मन:स्थिती झाली. कारण इतके दिवस मी ठरवले होते की फक्त पोर्टर करायचा. मग सेक्युरीटी ओव्हरटूक माय माईंड आणि पराग, सौम्या, रानडे ह्यांचे ऐकून मी पण पोनी बुक केला. लिटिल डिड आय नो की पुढे मला माझा पोनी हॅन्डलरच जास्त मदत करणार !

धारचुलाहून सकाळी निघून जीपने आम्ही नारायण आश्रमाला आलो. येताना गेल्यावर्षीच्या पुरामुळे झालेले नुकसान अजूनही दिसत होते. नारायण आश्रमाला सगळ्यांना पोनी पोर्टर मिळणार होते. पण पोनींची संख्या कमी असल्यामुळे आज मला आज पोनी अ‍ॅलॉट नाही झाला पण पोर्टर मात्र मिळाला. संतोराम ! संतोराम कडे सामान देऊन आणि नारायण आश्रमाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे आजच्या मुक्कामी सिरखाला जाण्यासाठी पायी निघालो.

३० जून - धारचुला ते नारायणस्वामी आश्रम ते सिरखा

आजचा रस्ता

ट्रेकला सुरूवात झाल्यामुळे आम्ही आनंदी होतो. कारण आता खरे निसर्गाच्या सानिध्यात असणार होतो आणि शिवाय कुणी ठरवणार नव्हते की इथेच थांबा, तिथेच थांबा. आज केवळ ७ किमीच पायी चालायचे होते. आणि ट्रेक रोडही तसा फार चढाचा नव्हता. थोड्यावेळात आम्ही ते ७ किमी पार केले आणि कॅम्प वर आलो.

कॅम्प वर आल्याबरोबर जेवण मिळाले. आजपासून हॉटेल टाईप सोयी नसणार होत्या, तर बेसिक सोयी. एका रूम मध्ये ७ ते ८ लोकं आणि हीच व्यवस्था तिबेट मधील तकलाकोट पर्यंत असणार होती. अल्मोरा अन धारचुलाच्या रूम अ‍ॅलोटमेंट गोधंळ नसणार होता कारण जे पहिले आले त्यांना रूम चॉईस असली असती. आणि एकदाका तुम्ही ती रूम तुमच्या ग्रूपसाठी घेतली की झाले. बाहेर कागदावर त्यांची नाव नोंदविली आणि ७ जण भरती केले की मग ते तुमचेच विश्व. आम्ही कर्मधर्मसंयोगाने ७ होतो. पहिले तीन दिवस जनरली सगळीकडे मी आणि पराग पहिल्या ५ च्या आत असायचो. पहिले दोघे जनरली बिहार मधील शेतकरी श्री रामसेवक सिंग आणि टेकचंद असायचे. ( ऑन हाईंडसाईट ह्याचे नाव मी ट्रेकचंद ठेवायला हवे होते) ह्यानंतर पहिले तीन-चार दिवसात, पराग, मी, श्याम आणि फनीकुमार असायचो. आणि त्या पाठोपाठ पार्वते यायचा. परागने तर पहिल्या काही दिवसानंतर कैलाशी टॉप टेन असे नावही ठेवले. आम्ही खूप आधी आल्यामुळे आम्हाला हवी ती रूम, व्यवस्थित आंघोळ करणे आणि बाकी गोष्टी म्हणजे स्वच्छ संडास वगैरे मिळायचे. शिवाय आमच्यात व शेवटी येणार्‍यात साधारण ६ तास किंवा जास्त अंतर असायचे. त्यामुळे आम्ही आराम करून फ्रेश असायचो. आणि त्यामुळेच नेहमी कल्ला करायचो.

सिरखा गाव.

आणि त्या रिमोट भागात लोकशाही जिवंत असण्याचा हा पुरावा !

संध्याकाळी आम्हाला एका पिकचे कॅम्प् वरून दर्शन झाले. ITBP ने सांगीतले की तो अन्नपूर्णा आहे. पण मला खात्री होती की ते अन्नपूर्णा पिक नाही. म्हणून मग मी काही स्थानिकांना विचारले. तर ते आणि ITBP दोघेही हाच अन्नपूर्णा पिक आहे हे सांगत होते. दुसरे दिवशी माझ्या पोर्टरला विचारले, तर तो कुडिला आहे असे म्हणाला. पण आणखी एकाने कुडिला हे तेथील गाव आहे असे सांगीतले.

शेवटी ते पिक्स अन्नपूर्णा नसून अन्नपूर्णा रेंज मधील काही पिक्स आहेत असे मल वाटले. घरी येऊन मी खात्री करून घेतली.

भविष्यात अन्नपूर्णा सर्किट करायचे आहे. तेंव्हा ह्या पिकजवळ जाता येईल. Happy

१ जुलै आजचा दिवस सिरखा ते गाला असा १४ किमीचा ट्रेक होता.

Sirkha to Gala_1.JPG

एलेवेशन मॅप

Sirkha to Gala_Elevation.JPG

आजचा रस्ता !

आज आम्हाला रिंगलिंग टॉप चढायचा होता. रिंगलिंग ची कहाणी अशी की, तो एक चीनी गुप्तहेर होता. भारतात येऊन त्याने हेरगीरी केली. पण शेवटी भारतीय आर्मीला कळाले. तो चीन मध्ये परत जाण्यासाठी पळत सुटला आणि Z मध्ये त्याने हा पर्वत चढला, पण पर्वतावर त्याला आपल्या लोकांनी गाठलेच. तिथे त्याने आत्महत्या केली.

हा चढ म्हणजे पहिला मेजर चढ ( सिंहगडापेक्षा भारीच म्हणावा लागेल का? ) होता. टॉप वर मंदीर आहे. त्याचा घंटानाद निदान १ किमी खाली ऐकु येत होता. तो घंटा नाद इतका मस्त होता की बास ! वर चढत येणार्‍या लोकांना, चला आता टॉप आला आहे हे त्याने कळत होते.

हे ते मंदीर.

त्या रस्त्यावर जाताना ही कोब्रा फुलं दिसत होती. संतोराम म्हणाला की खाऊ नका, विषारी आहेत.

दूर लांबवर जो दिसतोय तो गाला कॅम्प !

आणि मध्येच डोंगराला एक आडवा छेद दिसतोय. तिथून आता नवीन मोटारेबल रोड तयार करत आहेत.

गाला कॅम्पवर आम्ही जेंव्हा पोचलो तेंव्हा सकाळचे केवळ १०:१५ मिनिटे झाली असावीत. आमच्या आधी १० मिनिटे सर्वात फास्ट जोडगळी श्री रामसेवक व ट्रेकचंद येऊन पोचले. त्यांना तर ITBP ने विचारून खात्री केली की तुम्ही नक्की यात्री आहात की कोण? कारण १० वाजे पर्यंत तिथे (इतक्या फास्ट कोणी येत नसे.) गाला कॅम्पवर जाताना आम्हाला (द इनसेपरेबल ड्युओ) कॅम्पच्या चढावर फनि कुमार दिसला. तो स्वे होत होता. त्याच्या झोकांड्या जात होत्या. त्याला आम्ही त्याचे सामान घेऊन तू फक्त चाल, हात धर वगैरे अशी मदत देऊ केली. पण त्याने ती नाकारली. फनि देखील टॉप टेन मध्ये असायचा. पण फरक इतकाच की तो जिथे उतार असायचा तिथे खूप फास्ट म्हणजे टॉप ५ मध्ये असायचा. जिथे जिथे म्हणून चढ लागला, तिथे तिथे तो ढेपाळायचा. अगदी झोकांड्या खात चढायचा. आम्हाला ती मजा वाटायची. त्याचे फोटो घेणे ही लाजवाब होते. तो चालता चालता ते दृष्य क्लिक करायचा. जणू काही ते कॅप्चर केले नाही तर ट्रीप अपूर्णच राहील.

आम्ही आपले चढ असो की उतार त्याच स्पिड मध्ये असायचो. ह्या पूर्ण रस्त्यावर तुम्हाला चढ उतार खूप आहे, बरेचचा आपण आपला कॅम्प ज्या उंचीवर आहे त्या पेक्षा २ ते ३००० फुट जास्त चढून परत उतरायचे असते. कारण त्यानेच बॉडी अक्लमटाईज होत असते.

कॅम्पवर जेवण्याची खरंच खूप छान सोय आहे.

रोज आम्ही सकाळी चार वाजता उठायचो. तो चहा बेड टी असायचा ! ती लोकं येऊनच उठा उठा म्हणायची.
सकाळी पाच वाजता कुच करायचो.

साधारण आम्ही साडेसात वाजता ( आम्ही म्हणजे जी लवकर पोचू शकत ती मंडळी) ब्रेकफास्टच्या ठिकाणी असू.
तेथून परत दोन तासात, लंच मिळायचा. अर्थात त्यांनी ब्रेकफास्ट आणि लंचच्या वेळा ह्या कॉमन यात्रेकरूच्या स्पिडला गृहित धरून ठेवल्याअसल्यामुळे दोन तीनदा ब्रेकफास्टसाठी आम्ही तो रेडी नसल्यामुळे थांबावेही लागले तर कधी कधी लंच १० ला आटोपले !

कॅम्पवर पोचल्याबरोबर तुम्हाला कधी चहा / ज्युस लगेच मिळतो.

नंतर जेवणाआधी ५ वाजता सूप मिळते. ते सूप तिथे दैवी वाटतं. इतकं की आम्ही दोन दोन ग्लास आणि भीम क्वचित ४ ग्लास पण पीत असे. मग रात्री जेवणात, दाल, राईस, छोले आणि पोळी असे. (नंतर नंतर तीच टेस्ट बोअर झाली हे खरे असले तरी तिथे, तेवढ्या रिमोट भागात हे रोज मिळणे म्हणजे स्वर्ग होता ! थॅक्युं ITBP आणि कुमाऊं मंडळ विकास निगम !

२ जुलै - आज गाला ते बुधी

गाला कॅम्प हाईट - २३३३ मिटर्स
बुधी - २६८६ मिटर्स
मॅक्स हाईट गेन - २९०० मिटर्स

अंतर - २० किमी - (खरे गाईड मध्ये १८ दिले आहे. पण मोजल्यावर ते २० भरते)

आजचा रस्ता !

Gala_Budhi.JPG

एलेवेशन मॅप

Gala_Budhi_elevaton.JPG

आज सकाळी आधी २ एक किमी थोडा चढ उतार असणार होता. पण खरी कसरत गाला ते बुधी मध्ये तुम्हाला त्या फेमस ( की इनफेमस) ४४४४ पायर्‍या उतराव्या लागतात आणि आज पूर्ण वेळ तुम्ही काली नदीच्या काठाकाठाने चालत असता. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील नॅचरल बॉन्ड्री आहे. मोस्टली हा रस्ता डाउनहिल असला तरी सगळ्यात जास्त डेंजरस आहे कारण ह्यातून मध्ये मध्ये पाणी वाहते आणि कधी कधी काली २००० फुट खाली तर कधी कधी सोबत असते. तिचे रौद्र रूप निव्वळ ऐकणे आणि बघणे म्हणजे देखील तपश्चर्याच होय!

गाला ते बुधी मध्ये लखनपूरला तुम्हाला नाश्ता मिळतो. (त्या पायर्‍या उतरल्यावर) आणि पुढे माल्पा हे गावं लागतं. माल्पा गावात पूर्वी राहायची सोय असायची. पण बहुदा १९९८ मध्ये, तिथे जेंव्हा यात्रा चालू होती आणि कॅम्पवर लोकं राहत होती, त्या दिवशी रात्रभर लॅन्डस्लाईड झाली आणि सर्व यात्रींसहीत जवळपास १५० लोक मृत्यूमुखी पडली. प्रोतिमा बेदी पण त्यातच गेली. त्यानंतरही तिथे लॅन्डस्लाईड चालूच होती, त्यात एकुण ३५० लोकं आणि पूर्ण गाव नाश पावलं. तिथे आता काही नाही.

निसर्गाचे असे रौद्र रूप हिमालयात नेहमीच बघायला मिळते. त्यामुळे यात्रेत सहभागी होताना तुम्ही मेलात तरी चालेल, आणि चीन मध्ये असताना मेलात तर बॉडीही घरच्यांना मिळणार नाही असे लिहून घेतात !

त्या पायर्‍या !

एकदम डेंजरस !

आणि पायर्‍यांच्या बाजूला काली ! उजव्या बाजूस जी पायवाट दिसते तो नेपाळ.

कालीचे असेही एक रूप

यात्री त्या पायवाटेवरून !

अ‍ॅन्ड द म्युल ट्रेन !

घोड्यांची सारखी ये-जा असते. ते मालवाहू घोडे असल्यामुळे लाथ मारू शकतात. आणि त्यांच्या धक्क्याने तुम्ही नदीत पडून कैलासाला जाण्याआधीच वैकुंठाला पोचता ! त्यामुळे थम्ब रूल असा की, "घोडा येताना दिसला रे दिसला की आपण डोंगराच्या बाजूला व्हायचे".

ते वरून पाणी पडत आहे, ते कालीत जात आहे. काली खाली वाहतेय !

आणि मग अचानक काली तुमच्या बाजूने !

आज सकाळी ७ वाजता नाश्ता आणि ९:१५ ला जेवण केलं आणि आमच्या स्पिड मुळे नेहमीप्रमाणेच टॉप ५ मध्ये होतो. कॅम्पला पोचल्यावर नेहमीप्रमाणेच आमचा दंगा सुरू झाला. आज आदरनिय आमच्या आधी पोचला, त्यामुळे त्याने आमच्या नावाचा एका खोलीत रूमाल टाकून ठेवला. काही लोकं आज संध्याकाळी ५ पर्यंत आले.

गाला ते बुधी ही वाट अत्यंत अवघड आहे असे आम्हास सांगण्यात आले होते. तिची प्रचिती आम्हा येताना झाली. जाताना पाऊस नसल्यामुळे आणि आम्ही खूप फ्रेश असल्यामुळे काही वाटले नाही.

प्रत्येक कँम्पचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे तो कॅम्प तुम्हाला दिसतो पण येतच नाही. आणि शेवटी चढच चढ ! बुधीपण त्याला अपवाद नाही. रादर बुधीला पोचताना शेवटचा चढ खूपच अवघड आहे !

आम्ही दिवसभरातल्या घडामोडी, देशी परदेशी राजकारणाच्या घडामोडी, ग्रूप मधील एकमेकांचे पाय ओढत आणि उद्या छियालेख चढायचा आहे, ह्याची नोंद घेत, वी हीट द सॅक !

बुधी कॅम्प मध्ये सकाळचा चहा पिऊन आम्ही निघालो. सर्वच यात्री उत्साहात होते. फार तर १०० मिटर चाललो नाही की छियालेख चढाई लागते. ही एकूण चढाई ३ किमी आहे. त्या चढाईबद्दल आधी पासून ऐकले होते. तिची उंची गुगल अर्थ ११२०० फुट दाखवत आहे, पण जेंव्हा जीपीएस द्वारे मोजली तेंव्हा ती ११९०० फुट दाखवली होती.

३ जुलै बुधी ते गुंजी

एकुण अंतर १८ किमी (खरेतरे २० असावे)

बुधी १०३०० फुट
गुंजी १०५०० फुट

एलेवेशन गेन: ४४४५ फुट
एलेवेशन लॉस : ४२७६ फुट

आजचा रस्ता

Budhi To Gunji.JPG

आणि एलेवेशन

Budhi To Gunji_Elevation.JPG

आजच्या एलेवेशन मॅप मध्ये अनेक तीव्र चढ उतार दिसतील. पण तरीही आज सकाळी ज्या एलेवेशन वरून निघणार होतो साधारण त्याच एलेवेशनला पोचणार होतो. एलेवेशन गेन (आणि लॉस) ऑलमोस्ट ४५०० फुट असणार होते. आज आमच्या ग्रूप मधी पायी चालणारे सर्व ( श्याम, पराग, भीम आणि मी) सोबत होतो.. चढाई करताना थोडेफार थकल्यासारखे नक्कीच वाटते. त्याचे कारण नंतर कळाले. आम्ही ऑलमोस्ट १२००० फुटांपर्यंत चढलो (वर गेल्यावर जी पी एस १२००० दाखवत होते.) आणि परत उतरलो. KMY प्रमाणे बुधी ८९०० फुट दाखविले आहे. पण गुगल अर्थ १०३०० दाखवत आहे. आणि KMY चे आकडे बर्‍यापैकी चुकीचे आहेत त्यामुळे मला तरी ते १०३०० बरोबर वाटते. आणि बुधी ८९०० असेल तर आम्ही आधी १२००० (छियालेख टॉप) पर्यंत जाऊन मग परत १०५०० ला आलो.

गप्पा मारत मारत आम्ही वर चढत असताना एकदा अचानक विश्रांतीसाठी थांबल्यावर असे दृष्य दिसले

तेथील एका खडकावर लिहिलेले "फुलोंकी घाटी"

छियालेख चढून आल्यावर जिथे टॉप आहे तिथेच नाश्त्याची सोय केली होती. तेंव्हा केवळ ६:४५ झाले होते. बरंच लवकर आल्यामुळे मग तिथे टंगळमंगळ केली. थोडे पुढे गेल्यावर इथे एक पोस्ट आहे. आता तुम्ही इनर लाईन मध्ये जाता, बॉन्ड्री पासून जवळ, म्हणून आमचे पासपोर्ट वर तपासन्यात आले आणि आमच्या नावाची इन्ट्री केली गेली.

तिथून थोडे पुढे आपण एका टेबलटॉप वर येतो. तेथील दृष्य इतके सुंदर आहे की बास !

ह्या फोटोत एकाचवेळी विविध कलर दिसत आहेत.

हा टेबल टॉप उतरून झाल्यावर लगेच गर्ब्यांग नावाचे गाव लागते. ह्या गावाचे वैशिष्ट्य असे आहे की ते " गाव सिंक" होत असल्यामुळे त्याला सिंकिंग व्हिलेज असेही म्हणतात. इथे अनेक हॉटेल होती आणि परागचा पोर्टर म्हणत होता की समोसा खाऊ, पण आम्ही काही वेळा पूर्वी जरा जास्तच खाल्ल्यामुळे इथे काही घेतलं नाही. ऑन हाईंडसाईट मला ते नंतर लक्षात आले की, "त्याला खायचा आहे, त्या निमित्ताने आम्ही बसलो तर त्याला विश्राम होईल आणि पैसेही आम्हीच देऊ" मग येताना आम्ही ही कसर भरून काढली आणि गर्ब्यांग मध्ये यथेच्छ ताव हाणला.

गर्ब्यांग

माझा पोर्टर संतो राम छियालेख चढून येई पर्यंत सोबत होता, तिथून पुढे जा असे म्हणाला आणि आलाच नाही. त्याची तब्येत बिघडली होती त्यामुळे तो परत सिरखाला त्याच्या गावी गेला. पण मला हे गुंजीला आल्यावरच कळाले. माझे सामान तसेही घोड्यावर होते आणि पोनी हँडलर गुमानसिंग पाठीमागून येत होता.

आम्ही गर्ब्यांग सोडून पुढे आल्यावर परत चेकिंग झाले. छियालेख झाल्यावर गुंजी पर्यंत मोस्टली स्ट्रेट रस्ता आहे. इतका की चालायला बोअर होतं. कारण वळणावळणाची आणि चढाची सवय झालेली असते.

ह्याच रस्त्याने नाविढांगपर्यंत छोटा कैलास म्हणजे आदि कैलासची यात्राही असते. जी लोकं ५ कैलासाला जाता त्यांना पंच कैलासी असे म्हणले जाते ( रादर तेच म्हणवून घेतात.) इतकावेळ मी कैलासी, कैलासी असे लिहितो आहे, मला वाटलं कोणी विचारेल की कैलासी म्हणजे काय? तर जी लोकं कैलासला जातात ती स्वतःला कैलासी म्हणवून घेऊ शकतात. ( सर्टीफाईड बाय लॉर्ड शिवा ! )

ह्या फोटोमध्ये मध्यभागी जो पर्वत दिसत आहे, तोच आदिकैलास !

आदिकैलासाचे आणखी एक दर्शन !

कुठल्यातरी गावी जेवण केले आणि पुढे निघालो. फ्लॅट, मोटारेबल रोडवर चालताना बोअर होत होते, तितक्यात आम्हाला आदिमाय आणि आदिबाप ह्यांनी निसर्ग निर्मिती कुठल्या ठिकाणी केली असेल ते ठिकाण, त्या बाणासहित दिसते आणि आम्ही परमोत्साहात तिथे निदान पाणी तरी पिऊ म्हणून थांबलो.

हेच ते ठिकाण ! अगदी दिलाचे चिन्ह आणि बाण पण ! शिवाय पाणी, डोंगर आणि दर्‍या. मग निर्मिती सुचली नसेल तरच नवल !

अजून खूप तंगडतोड केल्यावर शेवटी एकदाचा आम्हाला हा ब्रिज लागला. तो पार केला की कॅम्प असे सांगण्यात आले.

पण कसचे काय? तो पार केला की परत चढ ! मग तो पार केला आणि आम्ही गुंजी मुक्कामी पोचलो.

गुंजीपासून पुढे खूप जोरात हवा चालते. इतकी की डोंगरात पण विन्ड इरोजन मुळे शेप्स फॉर्म झाले आहेत.

कॅम्पवर आम्ही नेहमी प्रमाणे आधी पोचलो. तिथे एक मस्त रूम होती. आठ बेड आणि मुख्य म्हणजे बाथरूम, आणि संडास त्याच रूम मध्ये ! श्याम, भीम, मी आणि परागने इथे सामान ठेवलं न ठेवलं इतक्यात पार्वते आला. त्याला समाजोपयोगी काम करण्याची भारी हौस. प्रत्येक गोष्टीत नाक खूपसायची सवय ! मग त्याने फर्मावले की ही रूम आपण बायकांना देऊ. खरे तर गुंजी मध्ये दोन दिवस हॉल्ट असल्यामुळे नवराबायको एकत्र असलेल्यांना एकत्र राहायचे होते. पण पार्वतेने फनीला कन्विन्स केले. (फनी तितक्यातच पोचला होता.) आणि आमची रवानगी समोरर्‍या खोलीत झाली ! पुढे त्यातील अर्ध्या बायकांनी आम्हाला नवर्‍यासोबत न राहू देणारे तुम्ही कोण? असे म्हणून पार्वते आणि फनीला बोल दिले पण ही माणसं कोणाचं ऐकतील तर शपथ !

गुंजीत दोन रात्र राहावे लागते. दुसर्‍या दिवशी तिथे परत मेडिकल होत असतं. त्याचे टेन्शन परत आदल्या दिवशीपासूनच येते. रात्री गुंजीच्या ITBP ने भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. आमच्या पैकी मी आणि सौम्याने तिथे जाणे धुडकावून लावले. पराग मात्र जावे की नको ह्या द्वंदात होता कारण त्याला जायचे होते. तेथील भजनं पण निराळी असतात त्यामुळे त्याला ती ऐकायची होती. मग हो ना करता, उशीरा शेवटी आम्ही सर्वच जण तिथे गेलो. तेथील भजनं मला कंटाळवाणी वाटली. ( आम्ही जाईपर्यंत ITBP ची भजनं बहुदा संपली, आणि आमचेच वीर, महारथी लोक गळा शेकू लागले होते.) तेथील प्रसाद आणि जेवण मात्र उच्च होतं.

रात्री मग मस्त पैकी डिस्कशनला सुरूवात झाली. आणि खूप दिवसांनंतर राजकारणावर चांगली चर्चा झाली. थोड्यावेळाने चर्चा बदलून "गाण्या"वर आणली. मी मस्त पैकी सर्वांना "शक्ती" आणि रविशंकरचा "बैरागी" राग ऐकवला. तर त्यात मी आणि सौम्या सोडून सगळे बोअर झाले. सगळ्यांनी अरे हे काय "राग, राग" खेळत आहेत अशी आमची संभावना केली. त्यावर पराग ने उतारा म्हणून " चार बोटल व्होडका" गाणे आहे का? असे विचारले. अर्थात ते गाणे मला माहितीच नव्हते. पण मुन्नी बदनाम ते जसराजचे "श्याम मुरारी गिरीधारी" अशी रेंज माझ्याकडे होती. त्यावर श्याम तर म्हणालाही, की मै तेरा फोन फेक दुंगा ये कुछ भी गाणा बजायेगा तो !!

मग भीम ने अनेक प्रश्न विचारुन विद्ध करून सोडले. तो आमच्या ग्रूप मधील प्रश्नकर्ता होता. त्याला विविध वेळेस विविध प्रश्न पडायचे आणि त्याने प्रश्न विचारला की सगळे हहपुवा व्हायचे. रात्री मग उशीरापर्यंत जागून अनेक विषयांवर गप्पा मारताना बाजूच्या खोलीतून जोरदार टक टक ऐकू आली, आणि आवाजही आली की, भई, अब सो जाओ. मग आम्ही आवरते घेतले आणि उद्याच्या मेडिकल टेस्टची वाट पाहत झोपलो.

सकाळी उशीरा उठायचा विचार केला होता पण जाग आलीच. मग परत गप्पा. ८ वाजता सर्वांना वाखान्यासमोरील जागेत जमायचे होते. तिथे आम्ही वृक्षारोपनाचा कार्यक्रम केला व आपआपल्या "व्हर्डिक्टला" सज्ज झालो. माझा नं ४ असल्यामुळे मला लगेच बोलावले गेले. माझा बिपी आणि ऑक्सिजन लेव्हल पाहून, डॉक्टरांनी "अभिनंदन" केले व मी जाण्यास "पात्र" आहे असे तेथे अनऑफिशियली सांगीतले. अश्याच सर्वांच्या टेस्ट झाल्या. एक मि. डे म्हणून आमच्या सोबत होते, त्यांचा BP २१० होता ! दोनशे दहा ! त्यांना मग परत आराम करून यायला सांगीतले. आमच्या सोबत असणार्‍या डॉ. बाईचा BP पण हाय होता. पण दोघांनही नंतर परवानगी देण्यात आली. २१० असतानाही तो माणूस व्यवस्थित होता हे एक आश्चर्यच ! केवळ एक जण इथे गळाले आणि आम्ही ५१ चे ५० झालो.

गुंजीला ११ ते ५ मध्ये प्रचंड वारा असायचा. इतका ही त्या कॅम्प वर टाकलेल्या ताडपत्र्यांचा भयानक आवाज यायचा. दुपारी मस्त जेवण झाल्यावर बाकी झोपले. मी कुठे जायचे म्हणून गुंजी गावात गेलो. तर तिथे मला माझा पोनी हॅन्डलर गुमान सिंग भेटला. त्याने मग एका ठिकाणी नेऊन मला समोसे खाण्याचा आग्रह केला. जो मी स्विकारला. आम्ही काही समोसे खाल्ले. गप्पा मारल्या. मी परत कॅम्पवर आल्यावर एक तासाने अचानक आवाज ऐकु आले तर तिथे भांडण चालू झाली होती.

पोनी पोर्टर लोकांनी युनियन करून कॅम्पवर मोर्चा आणला कारण त्यांच्या कडे आउट परमिट नव्हते आणि ITBP त्यांना त्या परमिट शिवाय जाऊ देणार नव्हते. मग काय? जो गोंधळ झाला, होता होता मांडवली झाली आणि ITBP त्यांना आता जा, पण पुढच्या वेळी परमिट हवेच असे म्हणाली.

संध्याकाळी आम्ही (पराग, श्याम, भीम आणि मी) भटकायला बाहेर पडलो. परत आणखी एखादी टेकडी चढावी असा बेत होता तो लोकांनी हाणून पाडला. भीम अन पराग मागे फिरले. मी आणि श्याम ती पायवाट अर्धी तुडवून झाली असेल / नसेल तितक्यात थोडा थोडा पाऊस पडायला लागला. . मग आम्ही ही कॅम्प वर जाऊन चहाची काही सोय होते का ते बघितले. श्याम ने त्या किचन मध्ये एकाला पटवले व आम्हाला थोडा चहा मिळाला.

गुंजीला अन्नपूर्णा रेंजेस च्या आम्ही खूप जवळ आल्यामुळे रेंज मधील काही पिक दिसले

५ जुलै ! गुंजी ते कालापाणी ते नाभीढांग आजचा ट्रेक दोन भागात होता.

गुंजी ते कालापाणी ९ किमी
आणि कालापाणी ते नाभीढांग - ९ किमी.

गुंजी १०५०० फुट
नाभीढांग : १४०३८ फुट
एलेव्हेशन गेन : ४६५८ फुट
एले लॉस : १११८ फुट

आज गुंजीहून आम्ही भारतातल्या लास्ट कॅम्पवर जाणार होतो. तो म्हणजे नाभीढांग. इथे पार्वतीची नाभी आहे म्हणून त्या गावाचे नाव नाभीढांग. तसेच इथूनच ॐ पर्वत दिसतो. ॐ म्हणजे एका पर्वताचा आकारच (वरचा ॐ सारखा आहे) त्यात बर्फसाठला ( तो कधी नसतो? ) की ते पूर्ण ॐ दिसतं.

सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा संतोराम नव्हता. गुमानने सांगितले की तो परत गेला. आता माझ्यासोबत पोर्टर नव्हता. केवळ पोनी. अर्थात आम्ही दोघेही घोड्यावर बसत नव्हतो. त्यामुळे आमचे सामान पोर्टर कडे नसायचे तर ते घोड्यावर बांधायचे. गुमान म्हणाला, की तोच सोबत असेल, पाणी वगैरे आणून द्यायला.

आम्ही सकाळी नेहमीसारखे निघालो तेंव्हा ११ वाजेपर्यंत नाभीढांग गाठायचे असे ठरवले होते कारण आज ॐ पर्वत दिसणार होता. त्यामुळे आम्ही थोडे स्पिडनेच निघालो.

गुंजीपासून ट्री लाईन नाहीशी होताना दिसते. कारण १०००० + फुटांवर विरळ ऑक्सिजनमुळे झाडं तग धरू शकत नाहीत. आता जे फोटो येतील ते बहुतांश ड्राय माउंटेन लाईनचे असणार.

कालापाणीला जाताना रस्त्यात पांडव पर्वत लागतात. एका मोठ्या पर्वत रांगेचे हे पाच शिखर म्हणून पांडव पर्वत. तसेच कालापाणी इथे काली नदीचा उगम आहे. आणि तिथेच व्यास गुफाही आहे. व्यास गुफेत बसून व्यासांनी महाभारत लिहिले अशी वंदता आहे.

आजचा मॅप

Gunji to Nabhidhang_map.JPG

आणि आजचे एलेव्हेशन

Gunji to Nabhidhang_elevation.JPG

आजचा रस्ता !

आणि हाच तो पांडव पर्वत

आज आम्ही कालीच्या अगदी पात्रातून पण चाललो. आज आमच्या सोबत सोबत पार्वते होता. कालीचे पात्र इथे तेवढे रौद्र नव्हते. पार्वतेला काय वाटले कुणास ठावूक, पण तो पात्रातून नदीत गेला, डोक्यावर पाणी मारून घेतले आणि परत आला.

व्यास गुफा ! चित्राच्या मध्यभागी जो गोलाकार आकार आहे तीच गुफा !

ही गुफा अचानक येते आणि दिसत नाही. आमच्यासोबत जे पार्वते अन इतर प्रभुती होते, ते पुढे गेले, त्यांना गुफा इथे आहे हे कळाले नाही. मग मंदीरात बसल्यावर आम्ही त्यांना सांगीतले की, गुफा तर पाठीमागेच राहीली.

कालापाणी मंदीर !

ह्या मंदीरातून काली नदीचा उगम आहे असे मानले जाते. इथे आम्ही मस्तपैकी दर्शन घेतले. एक शांत घनगंभीर तरीही हवी हवीशी वाटणारी शांतता तेथे आहे.

मंदीरापाशी आम्हाला मस्त भजी देण्यात आली. जबरदस्त स्वादिष्ट, वगैरे वगैरे. ( पण एकच प्लेट) आणि त्यासोबत चहा. फिर क्या कहने ! मौज्जा ही मौज्जा !

कालापाणीला तुमचा पासपोर्ट अन व्हिजा चेक होतो. इथे तुम्हाला पासपोर्टवर ठप्पा लावून देतात की तुम्ही आता डिसिम्बार्क झाला आहात. पण गंमत म्हणजे व्हिजा हा प्रत्येकाचा नसतो, तर सगळ्या बॅचचा मिळून एकच पेपर व्हिजा असतो. त्यामुळे चुकून तुम्ही बॅच बरोबर न जाता इकडे तिकडे भरकटलात की तुम्ही, "घर के ना घाट के" इथे बराच वेळ गेला.

कालापाणीहून पुढे नाभीढांग कडे जाताना ..

आजचा रस्ता

नाभिढांग कॅम्प हाच मुळी ॐ पर्वताजवळ आहे. अगदी रूम बाहेर आले की पर्वत दिसू शकतो. पण पूर्ण ढगाळ वातावरणामुळे हवे तसे दर्शन पूर्ण दिवस झाले नाही. तसेही दर्शन सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान होते. तेंव्हा ढग क्लिअर होतात असे सांगण्यात आले होते म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. पण कालापाणी येथून सर्व यात्री एकत्रच जाऊ अशी टूम निघाल्यामूळे (कारण तिथे पासपोर्ट चेक होतो आणि तो तुम्हाला लगेच मिळत नाही तर सर्वांचा एकत्र मिळतो.) आम्हाला लवकर जाता आले नाही. आणि त्यामुळेच आम्हाला ॐ पर्वताचे विशेष दर्शन झाले नाही. तरी पण ..

आम्ही नाभिढांगला पोचलो तेंव्हा चांगलीच दुपार झाली होती. फार काही विशेष केले नाही. नेहमीप्रमाणेच गप्पा टप्पा मध्ये मुख्य विषय होता तोच मुळी, उद्या सकाळी आपण लिपूलेख ( ५५०० मिटर्स) पास क्रॉस करू आणि तिबेट मध्ये पोचू ! मग लिपू वर काय करायचे, उद्या किती लेयर्स घालायचे, किती वाजता निघायचे ह्याची चर्चा सुरू झाली.

उद्या काय होणार? कारण इथेही काही लोक रिजेक्ट होऊ शकतात असे सर्वांनी यात्रा सुरू झाल्यापासून सांगितले होते.

ॐ पर्वताचे दर्शन झाले नीट झाले नाही म्हणून आम्ही तसे नाराज होतो. प्रचंड वारे आणि बर्‍यापैकी थंड वातावरण असल्यामुळे मग आम्ही रूम मध्ये दडी मारून राहणे पसंत केले. सुप सोबत उद्या काय घालायचे, सामान सोबत किती ठेवायचे ह्याच्या चर्चा रंगल्या. कारण लिपूलेखला पोचल्यावर येथील (भारतातील) पोर्टर पुढे येऊ शकत नाहीत. ३ किमी उतरून त्या बस मध्ये बसेपर्यंत ते सामान तुम्हालाच वाहून न्यावे लागते. (आणि येतानाही परत तसेच).

लिपूलेख पास हा नो मॅन्स लॅन्ड आहे. आणि भारतातील ट्रेकचा सर्वात अवघड टप्पा. तितक्या वर जायचे, तो परत उतरायचा व तकलाकोट गावी पोचायचे एवढा उद्याचा कार्यक्रम होता.

भारतीय वेळेनुसार ७ वाजताच "यात्री एक्स्चेंज" होते. चीन मध्ये गेलेली बॅच त्यावेळी परतते आणि आणखी एक बॅच चीन मध्ये जाते. त्यामुळे हा सर्व कार्यक्रम "वेल मॅनेज्ड" असतो. तेंव्हा तुम्ही तिथे पोचला नाहीत, की झाले. मग तुम्ही चीन मध्ये पोचू शकत नाही, असे आम्हाला बजावण्यात आले. ७ वाजता तिथे उपस्थित राहायचे असेल तर साधारणतः हा पास चढायला रात्री अडीच तीनला सुरूवात करतात.

ते सर्व प्लानिंग चालू असताना LO ने अचानक घोषणा झाली की, उद्या वेळेवर पोचायचे म्हणून सगळ्यांनी घोड्यावर बसावे. त्याला आम्ही विरोध दर्शविला, हे सांगने नकोच. मग ह्यावर उपाय म्हणून पायी चालणार्‍यांनी लवकर निघावे आणि घोडेवाल्यांनी थोडे उशीरा, अशी मांडवली ठरली.

मग पायी कोण चालणार आणि घोड्यावर कोण जाणार? अशी यादी करण्याचे काम संध्याकाळी आमच्या LO ने श्यामला दिले. ती यादी तयार झाली. १५ एक जण पायी चालणारे होते. मग आम्हा सर्वांनी रात्री १ ला निघावे की २ ला ह्यावर चर्चा सुरू झाली. होता होता दोन वाजता निघायचे आणि १ वाजता उठायचे असे ठरविण्यात आले. आणि घोडेवाल्यांनी १ तास उशीरा निघायचे असेही ठरवले.

आजचा मॅप

Nabhidhang to Lipulekhpass_1.JPG

आजचे एलेवेशन

Nabhidhang to Lipu_Elevation.JPG

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व उठलो, त्या गडबडीत मग घोड्यावर जाणारेही उठले. आणि ते ही सोबतच निघाले. लिपूला अंधारातच जावे लागते. त्यामुळे सर्वांनी आपापल्या टॉर्च जवळ ठेवल्या आणि वाट तुडवत निघालो. कसे गेलो, कुठे चाललो हे काहीही कळत नव्हते. केवळ आपल्या समोरच्या रस्त्यावरचे दोन तीन फुट आणि दुर अंधारात लुकलुकणार्‍या टॉर्च एवढेच दिसायचे.

असेच आम्ही खूप वर आलो. सकाळी ५ वाजता फटफटले. तेंव्हा आम्ही लिपू पासून दीड एक किमी खाली होतो. वेळे आधी आल्यामुळे तिथेच सर्वजण थांबलो. कारण वर ७ वाजता पोचायचे होते. लिपूवर भयानक जोरदार वारे वाहत असते. रात्र, भयानक थंडी, ५५०० मिटर्सवरील विरळ ऑक्सिजन आणि वर यायला लागणारी ताकद ह्या मध्ये माणूस गलितगात्र होतो. इतका की, "व्ह्याय डिड आय साईन अप फॉर दिस" असा विचार येतो.

पराग आणि मी इथपर्यंत सोबत होतो. पण त्या स्टॉप नंतर पराग मागे पडला. आम्ही सर्वच (घोड्यावर बसणारे अपवाद) इतके थकलो होतो की एकेक पाऊल उचलायला खूप शक्ती लागत होती. माझे पायदेखील लाकडासारखे कडक झाले होते. आणि प्रत्येक पावलागणिक धाप ही लागत होती. प्रत्येक जण इथे "एकला चलो रे" मध्ये गेला होता. सगळ्यांनाच खूप त्रास होत होता.

माझ्यासोबत भीम होता. आमच्या सोबत एक मराठी जवान होता. तो भीम आणि मला इतका वेळ ( त्या तश्या चालण्यात) गप्पा मारत होता आणि आम्हाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागत होते, काहीच नाही तरी हूं हूं असे म्हणावे लागत होते. ती शक्ती आणणे ही कठीण वाटायचे. पण तो मराठी, इतक्या उत्साहाने गप्पा मारतोय, इतक्या दूर मराठी बोलणारे त्यालाही कोणी मिळत नसणार, म्हणून आम्ही त्यासोबत गप्पा चालू ठेवल्या. तो पठ्ठ्या ५ किलो ची रायफल, पूर्ण पोषाख आणि दोर वगैरे सामानासहित मस्त चालत होता. त्याने आम्हाला बराच धीर दिला ! तो सांगलीचा होता.

मध्येच गुमानसिंग मला म्हणाला की घोड्यावर बसता का? मी नको म्हणालो, तेंव्हा तो म्हणाला की, चालेल घोड्यावर नका बसू, हळू हळू चालत राहा. लिपू पास आता दिसत होता. एक शेवटचा मोठा चढ आणि लिपू येईलच असे वाटले. समोर एके ठिकाणी खूप बर्फ साचला होता. अनेक घोडेवाले त्यातूनच घोडा घालत होते. कारण ती शॉर्ट कट होती. असाच चालण्यात थोडा वेळ गेला. आणखी काही वेळाने मला गुमान सिंग म्हणाला, इसकी पुंछ धरलो सर, मजा आयेगा, मग मी त्याचे ऐकले आणि घोडेकी पुंछ को हात मे धर लिया. त्यात होतं काय की, तुम्हाला घोड्याचा स्पिड मॅच करावा लागतो. मग पावलं जोरात ओढली जातात.

पराग मध्ये अन माझ्यामध्ये खूप अंतर आधीच पडले होते. घोड्याची शेपटी धरल्यावर मी जोरात निघालो. इतका की भीमाला मी निदान २० फुट मागे टाकलं. तसे २० फुट काहीच नसतात, पण तिथे एक फुटही खूप जास्त वाटतो, मग २० तर खूप जास्त !

होता होता मी वर येऊन पोचलो. आणि शांत पैकी पाणी पीत बसलो. लगेच भीमही आला. बरेच घोड्यावर येणारे लोकं तेथे आधीपासूनच आले होते. परागही आला. .

आम्ही सर्वांनी मग आपआपल्या पोनी पोर्टरला पैसे दिले. कालच LO ने काही लोकांच्या कानी लागून, सर्वांनी पोनीला ३५००च द्यायचे असे ठरवले होते. पण मी आणि पराग ने असे काही न करता अर्धे पैसे देण्याचे ठरवले होते. बाकी लोकांनी मात्र "यात्री युनियन" फॉर्म करून ३५०० पोनीला आणि ३००० पोर्टरला असा हिशोब चुकता केला. माझ्यासोबत संतोराम नव्हता, पण मी त्याचेही अर्धे पैसे गुमानला दिले. एकंदरीत ही लोकं तुम्हाला इतकी मदत करतात, तरी पण यात्रीगण त्यांनाही त्रास देऊ पाहतात, आणि ते ही कैलासला जाऊन ! व्यर्थ ते जाणं !

लिपूवर फारसे कुणीही फोटो काढले नाही, कारण लोकांमध्ये तेवढी ताकदच नव्हती. अर्थात मी काढलेच Happy

लिपूलेखचे फोटो !

लिपू चढताना

ह्या फोटोत तुम्हाला बर्फावर पायी चालण्याच्या खुना दिसतील. तिथून काही उत्साही घोडेवाले शॉर्टकट मारत होते.

आणि तिथे जमलेली ही भाऊगर्दी !

बाय बाय इंडिया ! वेलकम टू तिबेट (चीन)

खाली उतरतानाचा रस्ता

Lipu_To_China.JPG

ही जी वाट दिसत आहे ती तीन एक किमी आहे. मग पुढे बस ने ते तकलाकोट ह्या नावी आपल्याला नेतात.

चीन साईडला लिपू खिंड उतरायची. तिकडे बर्फच बर्फ. मग त्यातून वाट काढत निघालेले यात्री. इथे सामान आपणच घ्यायचे !

भारतात परतणारे बॅच तीनचे यात्री. ही वाट आम्ही उतरली, ते चढत आहेत.

ग्लेशियर पार करताना !

खाली तीन किलोमीटरवर दोन बस आमची वाट पाहत उभ्या होत्या. हे उतरणे पण खरे त्रासदायकच झाले कारण पोर्टर नसल्यामुळे पाठीवर ते ७-८ किलोचे धुड वाहावे लागते व उतरण ही बर्फातून होती. व जिथे बर्फ नव्हता तिथे कधी कधी पाय घसरत होता. श्याम आणि मी सोबत होतो.. श्री मराठे व श्री चौबळ ह्यांचे काही आम्ही घेत होतो, त्या गडबडीत पराग, भीम वगैरे पुढे निघून गेले होते.

वाटेत काही जीप उभ्या होत्या. त्यांना आम्ही बस पर्यंत नेणार का असे विचारले होते पण त्या अजून काही वेळ थांबणार होत्या म्हणून पुढे निघालो. उतार असला तरी जाम बोअर होत होते हे खरे. मग आम्ही आमच्या सामानासोबत काही प्रयोग केले. मी आणि श्याम ने काठीचे एकेक टोक पकडून दोघांच्या रकसॅक त्याला लटकवून चालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही कंटाळा आला. मग आम्ही शॉर्टकटस घ्यायचे ठरविले आणि डोंगर धाडधाड उतरू लागलो, हा प्रयोग बराचसा सफल झाला. होता होता आम्ही बस पर्यंत येऊन पोचलो.

मग बाकीचे लोकं त्या जीपने येऊन पोचले आणि चीनी अधिकार्‍यांनी आमचे पासपोर्ट वगैरे तपासले. तिथून आम्ही मजल दरमजल करत तकलाकोट ह्या गावी पोचलो. तेथे मग कस्टम्स चेक आणि इतर सोपस्कार पार पडले आणि हॉटेल कडे आम्हाला नेण्यात आले.

परत एकदा हॉटेल वाटपाच्या ठिकाणी ही भाऊ गर्दी झाली. चावी हस्तगत करुन परागचे व माझे नाव नोंदवले. हॉटेल मध्ये येऊन आम्ही पहिले काम केले असेल तर गिझर लावणे !! खूप दिवसानंतर (धारचुला नंतर पहिल्यांदाच) हॉट रनिंग वॉटर ही कमोडिटी मिळाली आणि आम्ही यथेच्छ, सचैल वगैरे स्नान केले. त्यामुळे आमचे वजन निदान अर्धा किलो ने कमी झाले असे मला वाटले. Happy

तकलाकोट ह्या चीनी गावात मला फोटो काढायचा काही उत्साह नव्हता. त्यामुळे तेथील फोटो मी काढलेच नाही.

हे गाव सीमेपासून फक्त ३० एक किमी दुर आहे. एक आवर्जून सांगावे वाटते की मध्यवर्ती चीन पासून इतके दूर असणारे हे छोटेसे गाव परिपूर्ण होते. चकचकीत रस्ते, पादचाऱ्यांसाठी मोठाले फूटपाथ आणि सर्व दिवे हे सोलार पॅनल्स वर चालणारे वगैरे. तेथे असणार्‍या सोयी बघून आम्हाला भारत आठवला नाही तरच नवल. भारतात घारचुलासारख्या मोठ्या तालुक्याच्या गावी साधे सेल फोन चालत नाहीत. गंमत अशी की धारचुला ते कालापाणी पर्यंत फोन नेटर्वक नसतानाही पोर्टरचे सेल फोन चालायचे आणि आमचे नाही. मग विचारल्यावर कळले की ते नेपाळ सेल फोन नेटर्वक आहे आणि ते नेपाळी सीम. आपल्या जवानांकडेही पर्सनल सीम हे नेपाळी असायचे. (थोडक्यात सिक्युरिटीची बोंबच) म्हणजे ज्या सोयी तितक्याच रिमोट एरियात नेपाळ देखील देऊ शकतो, तिथे भारत मात्र बेसिक सोयी देऊ शकत नाही. मग तकलाकोट सारखे परिपूर्ण गाव वगैरे लांबच !

उद्याचा दिवसही तकलाकोट मध्येच राहायचे होते त्यामुळे निवांत होतो. जाताना मी माझ्या बॅगेत चहाच्या पुड्याही नेल्या होत्या. मग काय तकलाकोटला दोन दिवस आमचा ग्रूप चहा सारखा चालूच असायचा. ( इलेक्टॉनिक अधान सारखे ठेवलेलेच असायचे ) फक्त चहात त्यात दूध नसायचे. पण त्या चहा आणि गप्पा भारी होत्या.

आम्ही KMVN कडनं मिळणार्‍या त्याच त्या इतके जेवणाला कंटाळलो होतो त्यामुळे आज संध्याकाळी तकलाकोट गावी एखादे मस्त पैकी हॉटेल शोधून क्षुधा शांत करण्याचा बेत आम्ही केला आणि त्या शोधात बाहेर पडलो. 

आम्ही जेवायला म्हणून बाहेर पडलो खरे, पण ज्या ज्या खानावळीत गेलो, तिथे व्हेज काहीही नव्हते. जे काही होते ते ते सगळे नॉनव्हेज. आणि असे नॉनव्हेज की भारतीय नॉनव्हेजीटेरियन पण न खाऊ शकणारा. अर्थात सौम्या त्याला अपवाद होता. त्याने कुठेतरी भरपेट जेवून घेतले. पण आम्ही मात्र परत त्या आमच्या राहण्याच्या ठिकाणी येऊनच जेवलो. पण नेपाळी चहा मात्र एका हॉटेल मध्ये घेतला.

जवळच असणार्‍या नेपाळी मार्केट मध्ये थोडे भटकलो. हे मार्केट म्हणजे आपल्या तुळशीबागेची आवृत्ती. मग लोकांनी तेथे भरपूर खरेदी केली हे सांगने न लगे.

जेवण झाल्यावर मला उद्या लागणारे प्रत्येकी $८०१ गोळा करायचे होते म्हणून मी चैनारामला घेऊन तिथेच थांबलो. मग प्रत्येकाचे ते ८०० डॉलर मोजून घेणे आणि प्रत्येक नोट २००६ नंतरची आहे ते पाहणे हे किचकट काम केले. ( चीन मध्ये २००६ नंतरचेच अमेरिकन डॉलर चालतात, त्या आधीच्या नोटा चालत नाहीत. का ते माहीत नाही.) मी कैलासला जाण्याआधी १५ दिवस शिकागो मध्ये गेलो होतो, तेथून करकरीत नोटा आणल्या होत्या. परागकडे दोन तीन नोटा २००६ च्या आधीच्या होत्या, म्हणून मग त्याला दिल्या. पण सगळ्यांसाठी हे सिरीज पाहण्याचे किचकट काम करण्यात माझा खूप वेळ गेला.

जेवताना पार्वते आणि समाजसेवकांनी LO ला असे सांगीतलं की, "सगळ्यांना लागणारे चीनी RMB पण फायनान्स कमिटीने आणावेत, सगळ्यांनी मोजून फायनान्स कमिटीला पैसे द्यावेत आणि मग फायनान्स कमिटी जाऊन ते कन्व्हर्ट करून आणेन" LO ने टीम मिटिंग मध्ये मला सांगीतलं, ते मी धुडकावून लावले. कोणी किती पैसे घ्यायचे ते घ्या नाहीतर न घ्या, पैसे घेणे न घेणे हा वैयक्तिक प्रश्न आहे ज्यात फायनान्स कमिटी काम करणार नाही असे मी स्पष्ट सांगीतले. ज्याला दोन तीन जणांनी (पार्वते टाईप नारायण लोक, ज्यांना सर्व क्रेडीट हवे असते त्यांनी) व LO ने विरोध केल्यावरही मी बधलो नाही आणि ते काम टाळले. म्हणजे ही लोकं मस्त मार्केट मध्ये फिरणार, आराम करणार, आणि आम्ही मात्र त्यांचे वैयक्तिक RMB चेंज करून आणणार हे काही मला पटले नाही. अर्थात LO ने माझे ऐकले.

LO हा IAS ऑफिसर असल्यामुळे आणि रेल्वे मिनिस्टरचा पर्सनल सेक्रेटरी असल्यामुळे त्याला हुकूम देणे आवडायचे, आणि ही नारायण टाईप माणसं त्याला झेलायची. आमचा ग्रूप मात्र अपवाद होता. पूर्ण ट्रीप मध्ये तो आमच्याशी आदराने वागला. GIve & Take respect तत्त्व कधीही आणि कुठेही कामी येतंच. पण बाकीच्यांवर मात्र तो अरेरावी करायचा हे खरे.

दुसरे दिवशी सकाळी आम्ही आम्हाला लागणारे RMB आणायला गेलो व येतायेता परत एकदा नेपाळी मार्केट मध्ये चक्कर मारून आलो. रानडे म्हणाले की आपण सर्वांनी इथून काही तरी पोस्ट करू या, मग पोस्टात जाऊन थोडा टिपी केला, रानड्यांनी तिकडनं दोन पत्र घरी पाठवली. (जी त्यांना मागच्या आठवड्यात मिळाली.)

संध्याकाळी मग परत ज्यांना ज्यांना घोडे आणि पोर्टर लागणार होते त्याची यादी पार्वतेने तयार केली. पण त्या एजन्सीला एकत्र पैसे द्यायचे असतात म्हणून मग ते पैसे सर्वांकडून मी आणि चैनारामने स्विकारले. ते पैसे मोजणे, व्यवस्थित लावणे, हिशोब करणे ह्या कामी श्याम आणि परागने देखील मदत केली.

मी चीन मध्ये पोनी केला नाही. फक्त पोर्टरच केला. कारण तसेही भारतात पोनीवर मी कधी बसलो नाही आणि ५२०० मिटर्स क्रॉस केल्यावर ५५०० मिटर्सचे तसे फारसे काही वाटले नाही.

ग्रूप मिटिंग मध्ये आज रघूने ( जो न्यु जर्सीकर आहे आणि ज्याने चार वेळा कैलास परिक्रमा केली आहे तो) परिक्रमा मार्ग , त्यातील अडचणी, कुठे काय असेल ह्यावर एक माहितीपूर्ण सेशन घेतले. पण ते आमच्या राजू गाईडला काही आवडले नाही.

राजू बद्दल सांगायचे राहिले. चीन मधील दिवसांमध्ये एक गाईड मिळतो. जो चीन सरकारने दिलेला असतो. हा राजू गाईड भारतात राहिलेला आहे. प्रत्येक क्षणी भारताचा पान उतारा केल्याशिवाय तो श्वास घेत नसे. त्याला हे सेशन आवडले नाही, कारण त्यामुळे त्याच्या पोझिशनला धक्का बसेल की काय असे वाटले. पूर्ण ट्रीप मध्ये हा माणूस गाईड कमी आणि त्रास जास्त होता. येताना त्याचा सोबत प्रचंड भांडणं झाली, ती मी नंतर सविस्तर लिहिलंच,

तकलाकोटहून यात्रींना पुढच्या प्रवासासाठी कुक हायर करावे लागतात, कारण इथे KMVN नसते. आणि व्हेज जेवण मिळत नाही. मग हे कुक लोकं जे देतील ते खायचे. ही लोकं आपल्यासोबत प्रवास करतात. मग पार्वते आणि त्याच्या जोडीदाराने व LO ने ह्या कुकलाच पोर्टर म्हणून हायर केले. जे चुकीचे आहे. तिबेट मध्ये पोर्टर आणि पोनी अ‍ॅलॉट हे लॉटरीने होतात, त्याची एक सिस्टिम असते, ती ह्यांनी बायपास केली.

त्यानंतरच्या दिवशी सकाळी ( ८ जुलै २०१४ ) आम्ही दार्चन कडे निघालो. तकलाकोट ते दार्चन हे अंतर साधारण १०२ किमी आहे. हे पूर्ण अंतर बसनेच जायचे असल्यामुळे आज ट्रेक नव्हता. चीन मधील रस्ते हे अफलातून आहेत. त्या रस्त्यांवरून आमची बस निघाली. आज आम्हाला राक्षस ताल आणि लगेच मान सरोवराचे दर्शन होणार होते.

राक्षसताल आणि मानसरोवर - गुगल अर्थ व्हियू

RakshasTal and Mansarovar.JPG

ह्यात जो राउट S207 दिसतोय त्यानेच आम्ही तकलाकोटहून दार्चन पर्यंत गेलो.

राक्षस ताल आणि सोबतचे मानसरोवर हे सुंदर सरोवर साधारण १५३०० फुट इतक्या उंचीवर आहेत. इथे राक्षस विहार करत व मान सरोवरात देवगण अशी विभागणी आहे. रावणाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे ताल निर्माण करून इथेच आराधणा केली असे म्हणले जाते.

मला स्वतःला राक्षसतालाची निळाई जास्त आवडली कारण त्या दिवशी नेमके चांगले उन होते.

राक्षसतालाचे काही फोटो.

राक्षसतालचे खूप फोटो झाले असे वाटतं असेल. पण, तिथे " किती घेऊ, तीन लेन्सने" असे झाले होते.

राक्षसतालवरंन निघून आम्ही पुढे निघालो. अवघ्या ५-६ किमी मध्ये मग परत मानसरोवर आले, तिथे थांबलो.

ढग असल्यामुळे मानसरोवर अगदीच फ्लॅट दिसत होते.

मानसरोवराच्या पहिल्या दर्शनाने खरं सांगायचे तर फार काही मन वगैरे भरले नाही. पण मानसरोवरच्या काठावर भक्तगण उतरल्याबरोबर त्यांच्यात डुबकी घेण्याची चढाओढ लागली. तेमग तिथे आम्ही काही लोकं वगळता सर्वांनीच डुबकी लावली. ज्यांच्या कडे कपडे नव्हते मग त्यांनी काय करावे? तर ज्याने डुबकी लावली त्याचा कच्छा ( अंडरवेअर) ह्यांनी घातली व डुबकी लावली. एका अंडरवेअरने ८ जणांना तर एकाने तिघांना पवित्र केले. भीम तर म्हणालाही, की ही अंडरवेअर इतकी पवित्र झाली आहे की बास. त्याला मी पुढे देव्हार्‍यात ठेवता येईल अशी पुस्ती जोडणार होतो, पण जोडली नाही.

हा सर्व प्रकार पराग, सौम्या, भीम अन मी पाहून हहपुवा होत होतो. आमच्या ग्रूप पैकी रानडे, बन्सल आणि श्यामने डुबकी लावून पापाचे काउंटर रिसेट करून घेतले. यथावकाश सर्वांच्या डुबक्या झाल्यावर आम्ही पुढे दार्चन गावाकडे (आजच्या मुक्कामी) निघालो.

हे गावं कैलासाच्या पायथ्याशी नाही पण दार्चन पासनं कैलास दिसतो. हे एक एक छोटंस पण टुमदार गाव आहे. इथनं कैलास जसा दिसतो, तसाच गुर्लामांधाता पर्वत (म्हणजे गंधमादन पर्वत) देखील दिसतो. गुर्लामांधाता हा कैलास पेक्षाही उंच आहे. उंची २४५०० + फुट (कैलास २२५०० +/-) मायथॉलॉजी प्रमाणे गंधमादन पर्वतावरूनच स्वर्गारोहणाची वाट होती. आणि इथेच पांडव आणि द्रौपदी एकेक करून पडले.

हाच तो गुर्लामांधाता

आणि हे ते गावं. तिथे दिसणारे सोलार पॅनेल्स पाहा. नॅचरल रिसोर्सचा भरपूर वापर तिबेट मध्ये आढळतो.

आम्ही दुपारी पोचलो होतो. खरेतर रूम मिळाल्याबरोबर तिबेटी ललना, न विचारताच (नॉक न करताच) रूम मध्ये येऊन विक्री करत होत्या. त्यांनी बराच वेळ प्रत्येक गोष्टीला "हाऊ मच" म्हणून बोअर केले. त्यांच्याकडून मग मी काही वस्तू विकत घेतल्या.

गुंजीला येईपर्यंत माझा एक नंबर्ड गॉगल होता. तो अचानक तडकला. माझ्यासोबत दुसरा चष्मा होता पण तो ही तडकेल की काय ही भिती, शिवाय तो क्लिअर ग्लास असल्यामुळे उन्हात तसाही त्याच फायदा नव्हता. मग मी इथे एक कामचलाऊ पोलराईज्ड गॉगल घेतला. अर्थात तो ही चार दिवसांनंतर तुटलाच. पण तो पर्यंत परिक्रमा झाली होती. तो गॉगल घ्यायचा होता म्हणून मग जेवण वगैरे उरकून आम्ही खरेदीसाठी बाहेर पडलो. तिथे मग परत काही खरेदी केली. तसेच गुर्लामांधाताला नीट शूट करता येईल का ते बघितले.

गेले दोन तीन दिवस पायांना आराम मिळाला होता. आता वेध होते उद्याचे. उद्या कैलास परिक्रमा सुरू होणार होती. त्याबद्दलच्या गप्पा मारतच आम्ही निद्राधीन झालो.

कैलास परिक्रमा

९ जुलै - दार्चन ते देरापूक ७ बस + १२ किमी ट्रेक
१० जुलै - देरापूक ते झुंझूइपू १९ किमी ट्रेक
११ जुलै - झुंझूइपू ते परत दार्चन - ५ ट्रेक + ५ बस. ( आणि नंतर सामान घेऊन कुगू कडे रवाना )

आजच्या दिवशी कैलास परिक्रमेला सुरूवात होणार होती. आम्हा सर्वांना ज्याचे त्याचे पोर्टर पोनी मिळणार होते. पोनी पोर्टर लोकं १० वाजायच्या आसपास येतात, त्यामुळे इथे आधी येऊन फायदा नव्हता. म्हणून बर्‍यापैकी उशीरा निघालो. आम्ही सगळे तिथे आलेल्या एका व्हॉल्वो मध्ये बसून परिक्रमेची सुरूवात जिथे होते त्या ठिकाणी पोचलो. ते ठिकाण दार्चन पासून फारतर ५ किमी होते. त्या ठिकाणाचे नाव यमद्वार ! प्रत्येकाचे पोनी पोर्टर अलॉट झाले आणि आम्ही परिक्रमेसाठी निघालो.

कैलासाविषयी थोडे.

कैलास पर्वत हा संबंध एकच दगड आहे. मोनोलिथिक ! २२००० + फूट उंचीचा एकच सलग पर्वत हे देखील एक आश्चर्यच ! कैलास पर्वताला माणणारे चार धर्म ह्या जगात अस्तित्वात आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन रिलिजन.

हिंदू धर्माप्रमाणे कैलास पर्वत हा Axis Mundi आहे. शंकराची राहण्याची जागा, पृथ्वीचा मेरू दंड, स्वर्ग आणि पृथ्वी ह्या दोघांना जोडणारी जागा. ह्या पर्वताला काही जण तो मेरू पर्वत आहे असेही म्हणतात.

जैन धर्माप्रमाणे पहिले तीर्थंकर ऋषभांचे इथेच महानिर्वाण झाले. अष्टपाद ह्या ठिकाणी ( हे कैलास पासून खूपच जवळ आहे, आणि इनर कोरा मध्ये मोडते) जैन मंदीर देखील आहे. इथे आम्हाला जाता आले नाही कारण चीन सरकारने त्या रूटवर जायला मनाई केली. जैन धर्माप्र्माणे देखील हाच पर्वत मेरू पर्वत.

बौद्ध धर्माप्रमाणे कैलासाला गौतम बुद्धाने पण भेट दिली आहे. आम्ही दार्चनला हॉटेल मध्ये उतरल्यावर त्यांनी एक पुस्तक भेट म्हणून दिले होते. तितक्या गडबडीत मी ते पुस्तक बर्‍यापैकी वाचून काढले होते. त्यात मलरिबा आणि बॉन चुंग मध्ये कैलासवर जाण्याची चढाओढ लागते ( हे दोघे बौद्ध व बॉन रिलीजन चे माँक / सेनापती होते)
तर बौद्ध मताप्रमाणे तेथील लोकल धर्म बॉन धर्माचा सेनापती नारो बॉन चुंग आणि बौद्ध सेनापती / लामा मलारिबा ह्यांच्यात तेंव्हा तुंबळ युद्ध झाले आणि बौद्ध धर्माचा जय झाला. आणि तेंव्हापासून बौद्ध धर्म तिबेट मध्ये बॉन पेक्षा महत्त्वाचा मानला जाऊ लागला व त्याला फॉलोअर्स मिळाले.

भगवान बुद्ध ५ व्या शतकात कैलासला भेट देऊन गेले असे बौद्ध धर्मात मानले जाते. (अर्थात ते तेंव्हा नव्हते) आणि बौद्ध धर्म तिबेट मध्ये साधारण ६ व्या शतकानंतर आला. पण वरील युद्धानंतर (१२ वे शतक) बौद्ध धर्मच जास्त रुजला.

बॉन धर्माबद्दल वर लिहिलेच आहे. बॉन धर्म पाळणारे लोकं कैलासाची उलटी परिक्रमा करतात.

तर असा हा कैलास पर्वत. जगातल्या चार धर्माचे आकर्षण आहे.

खालील फोटो बघा. त्यात एक गंमत दिसेल.

Mt.Kailash.JPG

आपण हिंदू धर्मात कैलासाला लिंग रूपात पुजतो आणि ते स्त्री पुरूष समागमाचे प्रतिक आहे असे मानतो. पण वरील फोटो पाहिल्यावर मला मात्र वेगळे वाटले. तुम्हाला जाणवले का? की एरिअल चित्राप्र्माणे खुद्द कैलास पर्वत हा शिवलिंगासहीत आहे. नीट लक्ष द्या, तुम्हाला कैलास आणि लिंग एकत्र दिसते. म्हणजेच आपल्यापैकी काही लोकांना कैलास पर्वत (लिंगासहीत) माहिती होता. आणि त्यामुळेच आपण लिंग स्वरूपात पूजा करतो असे माझे मत झाले आहे. ते लिंग आणि आज कोणालाही गुगल अर्थ वरून दिसणारा पर्वत हा योगायोग आहे ह्यावर माझा विश्वास नाही.

प्लिज नोट : हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे विमान होते आणि त्यातून बघून त्यांनी लिंग काढले असे लिहित नाही तर ही माहिती हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना होती असे लिहितोय. अन्यथा हा योगायोग केवळ दुर्मीळच नाही का?

कैलास परिक्रमा मार्ग !

parikrama_map.jpg

कोरा म्हणजे परिक्रमा. त्याचे दोन प्रकार आऊटर कोरा आणि इनर कोरा आम्ही आऊटर कोरा केली. इनर कोरा खूप अवघड आहे. आणि चिनी सरकार इनरसाठी भारतीय MEA ला परवानगी देत नाही.

तिबेटी बौद्ध धर्मशात्राप्रमाणे ज्यानी १२ आउटर कोरा केले आहेत तेच फक्त इनर कोराला पात्र होतात. १२ परिक्र्मांमध्ये कैलास तुमची परीक्षा घेतो आणि मग इनर कोराला तुम्हाला पात्र ठरवतो असे तिथे अनेकांनी सांगीतलं. पण वेट! जी लोकं महाकुंभाच्या वेळी एक आउटर कोरा करतात, त्यांची एक परिक्रमा म्हणजेच १२ आणि ते इनर कोराला पात्र होतात. आणि २०१४ साली तिबेटीयन महाकुंभ होता. आणि आम्ही त्यावेळीच परिक्रमा केली ! त्यामुळे इनर कोराला आम्ही तिबेटी बौद्ध धर्म शास्त्राप्रमाणे पात्र झालो आहोत !!

तर कमिंग बॅक टू टॉपिक - आम्ही यमद्वार म्हणजेच तारपोचेला ट्रेक सुरूवात करून ४९०९ मिटर्सवरील देरापुक ह्या गावापर्यंत आज जाणार होतो हे अंतर साधारण १२ किमी आहे. दुसरे दिवशी मग डोल्मा करून झुंझूंइपू ह्या गावी राहणार आणि मग तिथून दार्चन.

यात्रेची सुरूवात यमद्वारा पासून होते.

ते मंदीर म्हणजेच यमद्वार. तिथून प्रवेश करून मग परिक्रमा सुरू करायची. यमद्वार आणि कैलास !

हर हर महादेव !

हिंदू असो की बौद्ध आणि भारतीय असा की चीनी, तिबेटी, जॅपनीज. तिथे सर्व लोकं दिसतात. कारण चारही धर्मात कैलासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि का नसावे? माणसाला जीवन देणारे पाणी. कैलासवरून चार मोठ्या नद्या उगम पावतात. सिंधू, ब्रह्मपुत्रा, सतलज आणि कर्णाली.

परिक्रमा मार्ग !

ह्या ज्या इतक्या पताका दिसत आहेत, त्या महाकुंभ असल्यामुळेच !

वरील फोटोत अगदी डावीकडे (लोअर पार्ट) जे दोन पर्वत दिसत आहेत त्यापैकी एक नंदी पर्वत! हा पर्वत देखील नंदीसारखाच आहे !

परिक्रमा करताना कैलासाच्या आजूबाजूच्या पर्वतातून काहींना प्राणी दिसतात. बहुतेकांना एका हत्तीची प्रतिमा दिसतेच.

वरच्या ह्या फोटोत नंदी पर्वत व्यवस्थित दिसेल.

माझ्यासमोर चालणारी ट्रेकर !

नंदीपर्वत खूप वेळ दिसतो, त्या बाजूनचे जायचे असते, पण तो येत नाही. आल्यावर परत तिथून कैलासचे दर्शन होते. पण ढगांमुळे तो तेवढा नीट दिसला नाही.

हा पूर्ण रस्ता तसा फ्लॅट आहे. पण जोरदार उन्हामुळे त्रास होतो. मजल दरमजल करत आम्ही कॅम्पवर आलो.

आम्ही सर्व जेंव्हा कॅम्प वर आलो तेंव्हा खूप थकलो होतो. दिनेश बन्सल आणि भीम माझ्यासोबत होते, पराग घोडे अ‍ॅलॉटमेंट मुळे मागे थांबला होतो. थकल्यामुळे त्या दोघांनीही चरण स्पर्श कॅन्सल असे घोषीत केले. श्याम आधीच आला होता, तो त्या पाठी पर्यंत गेला. तेथे चीनी पोलिस होते, त्यांनी श्यामला परत पाठवले. श्याम देखील म्हणाला की तिथे जाता येणार नाही.

मी देखील खूप थकलो होतो पण कैलास दर्शनाने शक्ती परत संचारली आणि परत एकदा ट्राय करण्यासाठी श्याम, बन्सल मी आणि भीम निघालो.

आम्ही एक पहाड चढलो आणि तेथून दिसणारे दृष्य मंत्रमुग्ध करणारे होते.

एक्स्ट्रा वाईड अँगल

हे जे दोन पर्वत दिसत आहेत, त्यापैकी एक अवलोकितेश्वर आणि दुसरा वज्रपाणी ! हे दोघे आणि मंजूश्री असा तिसरा पर्वत म्हणजे बौद्ध धर्मातील तीन बोधिसत्व ! हे तीन पर्वत कैलासाचे रक्षण करतात अशी बौद्ध धर्मात समजूत आहे.

हिंदू धर्मीय परिक्र्मा करताना ॐ नमः शिवाय ! असे म्हणतात तर बौद्ध धर्मीय ॐ मणिपद्मे हूं,असा जप करतात. ह्यातील मनी म्हणजे "कौस्तुभ मनी" तला मनी आणि पद्म म्हणजे कमळ!

खालील चित्रात दोन माणसं दिसत आहेत. कैलास - स्केल टू ह्युमन बॉडी.

वरील चित्रात एक छोटी निळी पाटी दिसतेय. त्या पुढे जायला चीन सरकारने मनाई केली आहे. तो बोर्ड वॉर्निंगचा आहे.

बट सॉरी चीन, यू गॉट व्हायोलेटर.

चरण स्पर्शाकडे जाताना - चरणस्पर्श म्हणजे एक मोठी स्नो वॉल आहे. ती कैलासाला टच करते असे म्हणले जाते. तिला हात लावला की चरणस्पर्श !

ते जे छोटे ग्लेशियर दिसतेय, ते खरेतर खूप मोठे होते. आम्ही चढत चढत निघालो. सुरूवात मी केली, माझ्यामागे आमचा कंपू आणि पार्वते व आणखी दोघे निघाले.

दगडातून चालत आम्ही वर जात होतो.

त्या ठिपक्यातल्या ग्लेशियर पाशी आम्ही सर्व एकत्र पोचलो.

इथपर्यंत आल्यावर बन्सलजींना खूप त्रास व्हायला लागला. ते चालू शकत नव्हते. श्याम आणि भीम माझ्या समोर २० एक फूट होते. त्यांना मी हाक मारली, श्याम त्याच्या स्वभावानुसार, " अबे केदार, तू पिछे कैसे बे, आजा इधर, मजा आ रहा है" असे न वळताच म्हणाला.

पण बन्सलजी मला यार, प्लिज बैठ यार, मुझे अब खडा रहा नही जा रहा है, अशी विनवणी करू लागले, मला समोर जायचे होते, पण बन्सलजींना पण त्रास होत होता म्हणून एक मन थांब असेही म्हणू लागले.

मी ते ग्लेशियर पार करून पुढे गेलो.

पुढे निघालो तर कैलास अजून लांब गेला. Happy

बन्सलजी परत हाका मारू लागले. भीम आणि श्याम मग पुढे गेले आणि मी परत त्यांच्यापाशी येऊन थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे बन्सलजींना धाप लागली होती. हा अल्टिट्युड कॅम्प पेक्षा निदान १- १२०० फुट उंचीवर होता त्यामुळे ऑक्सिजनचा त्रास कदाचित बन्सलजींना झाला असावा. ते खाली आल्यावर ढाराढूर झोपी गेले ते एकदम २ अडीच तास मृतप्रायच होते. आमच्या ग्रूप पैकी श्याम आणि भीम मात्र तिथे त्या स्नो वॉल पर्यंत जाऊन आले. मी मात्र पाव / अर्धा किमी अलिकडेच परत ग्लेशियर पाशी, जिथे बन्सल बसले होते तिथे येऊन बसलो.

दुसरे दिवशी सकाळी आजचा आणि ट्रीप मधील शेवटचा अवघड टप्पा होता. डोल्मा ला. ला म्हणजे पास. काही जण म्हणाले की आपण गोल्डन कैलास पाहून निघू. (सकाळी उन्ह आल्यावर तो गोल्डन दिसतो) पण नेमके त्या दिवशी ढगाळ वातावरण होते.

थांबून काही फायदा नसल्यामुळे आम्ही पुढे निघालो. डोल्माबद्दल् खूप ऐकले होते. डोल्मा पास हा ५६३६ फुट ( १८५०० फुटांवर आहे). सरळ उंच खडी चढाई असल्यामुळे चढायला प्रचंड त्रास होतो. माझ्या पहिल्या भागात मी डोल्मा बद्दल लिहिले आहे. त्यामुळे इथे ते लिहिणे स्किप करून फोटो देतो.

चढताना दिसलेले गोल्डन पिक्स

आणि हा गोल्डन होणारा कैलास.

पण तो पाहू शकलो नाही !

आजचा रस्ता ! डोल्माची चढाई ही संपूर्ण उभी आणि खडकाळ आहे. भल्या भल्यांची वाट लागते.

चढताना माझा संपूर्ण शक्तीपात झाला, तेंव्हा मला दुरवर एक शिखर दिसू लागले. आणि तो होता कैलास ! त्यामुळे इन्स्टंट पावर मिळाली आणि मी पुढे निघालो.

अन्य काही शिखर

खालून लोकं चढत होती.

खडकाळ वाट !

हे जे कोपर्‍यातले म्हातारे गृहस्थ दिसत आहेत त्यांच्याबद्दलच मी भाग एक मध्ये लिहिले. ते जर चढत आहेत तर मी चढायलाच हवे ! हर हर महादेव !

अ‍ॅन्ड दीस इज इट ! टॉप ऑफ द वल्ड !

महाकुंभामुळे तिथे गर्दी होती.

जय तारा देवी. (डोल्मा म्हणजे तारा)

तिथे फार तर १० मिनिटे मी आणि भीम बसलो आणि खाली उतरायला सुरू केली. पहिल्या १०० मिटर नंतरच गौरी कुंड दिसते.

गौरी कुंडाचे पाणी एमराल्ड ग्रीन दिसते. निळे नाही. इथे गौरी येऊन स्थान करत असे असे म्हणले जाते. हे देखील मानसरओवरासारखेच पवित्र पाणी. मग काय? सगळ्यांनी इथले पाणी घेतले. गौरीकुंडात उतरणे खूप त्रासदायक आहे. १२०० फुट ऊभा उतार, मग मी माझ्या पोर्टरला ४० RMB दिले आणि तिलाच भीम आणि माझ्यासाठी पाणी आणायला सांगीतलं. श्याम मात्र उतरला होता !

तीन किमीची उभी उतरण आम्ही अनेकदा घसरून पार पाडली आणि खाली आलो. तिथे भीमाला उलटी झाली. ( हे वर्णन मी भाग १ मध्ये (टीजर) लिहिले आहे).

आता पायी १२ किमी चालायचे होते.

तिबेटी यात्रींचा जत्था ! त्या गाणं देखील म्हणत होत्या. साधारण तीन एक किमी आम्ही सोबत होतो.

दिनेश, भीम आणि मी इतके थकलो होतो की बोलताही येत नव्हते. एके ठिकाणी पाणी मिळाले. ते प्याल्यावर हुशारी आली आणि आम्ही कॅम्प गाठला. कॅम्पवर पोचल्यावर भीम आणि दिनेश फ्लॅट झाले.

रानडे म्हणाले चल नदीवर जाऊ. मग रानडे, पराग, श्याम अन मी नदीवर पोचलो. तितक्या थंडगार पाण्यात आम्ही अंघोळ उरकली. पाण्यात पाय ठेवून बसल्यामुळे पाय गारठले, पण तरतरी आली.

संध्याकाळी कधीतरी सर्व पोचले. आम्ही तो पर्यंत आमचा पोस्ट ट्रेक रेग्युलर कार्यक्रम म्हणजे गप्पा मारत होतो.

उद्या केवळ पाच किमी चालायचे होते आणि नंतर मग बस मध्ये बसून दार्चन अन तिथून कुगू. मानसरोवर ! त्यामुळे उद्याचा कारभार सोपा होता.

कैलास परिक्रमा ऑलमोस्ट संपल्यामुळे (केवळ ५ किमी बाकी) तसे सुनेसुने वाटायला सुरूवात झाली आणि घरची आठवणही येऊ लागली !

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...