Saturday, October 17, 2020

भारतातील ऐतिहासिक स्थळांना पर्यटकांची पसंती Tourist Trend for Historical Indian Monuments

  /

इतिहासाच्या पानांमधून प्राचीन काळापासून पृथ्वी प्रदक्षिणेचे संदर्भ मिळतात. पौराणिक कथांमधून भगवान परशूरामाने अनेक वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे उल्लेख आहेत. प्राचीन काळापासून ते वर्तमानापर्यंत जगप्रवास करणार्‍या लोकांत भारतीय प्रदेश हे आकर्षण बिंदू आहे. भारताच्या विविध प्रांतातील नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैविध्य पाहून येणारा प्रत्येक पर्यटक आवाक् होतो. जगात सर्वोच्च असलेली हिमालय पर्वतरांग, वाळूचे शुष्क वाळवंट, तब्बल साडेसात हजार कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा, असंख्य नद्या आणि वन्यप्राण्यांनी समृद्ध जंगलं असा हा भारत. गेल्या हजारो वर्षात, विविध कालावधीत, वेगवेगळ्या राजवटीनी भारतावर राजसत्ता गाजवली आणि आपापला ऐतिहासिक वारसा इथे ठेवून गेली. त्यामुळेच संपूर्ण भारत हा अनेक ऐतिहासिक वारसास्थळांनी व्यापलेला आहे असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही.

India-Geological.jpg

साधारण २४०० वर्षांपूर्वी युरोपिय पर्यटक मॅगेस्थेनिस भारतात आल्याच्या नोंदी आहेत. त्याच्या प्रवास वर्णनात भारतीय वडाची मोठाली झाडं, कृषी संपन्नता, स्थानिकांचे आदरातिथ्य याबाबतीतले उल्लेख आलेले आहेत. १६०० वर्षापूर्वी फा-हिएन ह्या परदेशी बौद्ध भिख्खूने भारतीय लेणी, चंदन मूर्ती, चलनी नाणी म्हणून वापरल्या जाणार्‍या कवड्या आदी नोंदी केलेल्या आढळतात. दीड हजार वर्षांपूर्वी भारत भेटीसाठी आलेला चीनी प्रवासी ह्यूएन स्तेंग भारतातील विद्यापीठांचं आणि शास्त्रज्ञानाचं भरभरून कौतुक करतो. भारताच्या वैभवशाली विजयनगर साम्राज्याचे तत्कालिन प्रत्यक्ष वर्णन दुमिंगुश पाइश आणि फेर्नाव नूनीश या दोन पोर्तुगिज पर्यटकांनी करून ठेवलेले आहे. परदेशी लोकांची भारताला भेटी देण्याची ही परंपरा आजही पर्यटनाच्या निमित्ताने अखंड सुरु आहे आणि जगभरातून पर्यटकांचा हा ओढा भारताच्या दिशेने येत असतो.

 

सिंधू संस्कृतीपासून ते थेट ब्रिटीश काळापर्यंतच्या ऐतिहासिक पाऊलखूणा पाहण्यासाठी संबंध जगभरातून अनेक पर्यटक भारतात येत असतात. उत्खननात मिळालेली प्राचीन सांस्कृतिक गावं जशी गुजरातची लोथल, ढोलाविरा, राजस्थानातील कालीबंगा वगैरे अभ्यासण्यासाठी अभ्यासक भारतात नियमित पर्यटन करत असतात. मानव जेव्हा नैसर्गिक गुहांमध्ये निवारा शोधायचा अशा भीमबेटका सारखी ठिकाणं जिज्ञासू पर्यटकांना आजही साद घालत असतात.

IMG_0751-a.jpg

Bhimbetka, Madhya Pradesh, India

जगाच्या पाठीवर कुठेही नाही एवढी लेणी एकट्या भारतात आहेत. संपूर्ण भारतभरात साधारण बाराशेहून अधिक लेणी आढळतात. ही सर्व लेणी इसवीसनाच्या अलिकडे-पलिकडच्या काळात कोरली गेल्याचे दिसून येतात.

IMG_0002-a.jpg

Elephanta Caves, Gharapuri, Mumbai

बरं यातही विविधता आहे. बौध्द, जैन, हिंदू पद्धतीच्या या गुफांमधील निरनिराळी शैली आणि रहस्य आजही आपले पदर उलगडून दाखवत आहेत. महाराष्ट्रातील वेरूळ, अजिंठा आणि घारापूरीच्या लेणी तर जागतिक वारसास्थळांच्या यादीत अग्रक्रमाने येतात.

IMG_1284-a.jpg

Kanheri Caves, Borivali, Mumbai

बौद्ध धर्म प्रभावित असलेल्या संपूर्ण पूर्व अशियायी देशातील पर्यटक बुद्धांची जन्मभूमी असलेल्या आपल्या देशात तर नियमित वार्‍या (बौध्द स्थळ परिक्रमा) करताना दिसतात. विशेष म्हणजे जापान आदि देशांनी भ. बुद्धांचा प्राचीन वारसा जपावा आणि संवर्धित व्हावा म्हणून भारताबरोबर अनेक करारही केलेले आहेत.

 

लेण्यांबरोबरच संपूर्ण भारत अजून एका गोष्टीमुळे ओळखला जातो, ते म्हणजे ‘मंदिरे’. भारतातील प्रत्येक राज्यात निदान हजार वर्षांपूर्वीचे एकतरी मंदिर आहे. भारतातील प्राचीन मंदिरं ही स्थापत्यशास्त्र, मुर्तीकला, धर्म, धार्मिक चालीरीती, इतिहास, भौगेलिक स्थिती, समाजशास्त्र असे विविध अंग दाखवत असतात. भारताच्या प्रत्येक दिशेला असलेल्या मंदिरांची धाटणी आणि शैलीही वेगवेगळी असल्याने येणार्‍या पर्यटकाना त्याचे आकर्षण असते. मध्य भारतात असलेला खजूराहोचा मंदिर समुह हा जगाने वारसास्थळ म्हणून स्विकारून त्यावर हजारोच्या संख्येने संशोधन केलेले आहे. या व्यतिरिक्त मंदिरांचे शहर भुवनेश्‍वर, कोणार्क, पुरी हा मंदिर स्थापत्यकलेचा एक आगळा नमुना आहे.

IMG_0820-a.jpg

Khajurao, MadhyaPradesh, India

lingaraj-temple-bhubaneswar.jpg

Lingaraj Mahadeo Temple, Bhuvaneshwar

प्राचीन मंदिरं म्हटली की परदेशी पाहुण्यांची पाऊलं वळतात ती दक्षिण भारताकडे. तंजावूर, मदुराई, रामेश्‍वरम आदी एकेक मंदिर फिरण्यासाठी काही दिवस द्यायला लागतात. दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये प्रत्येक गावात प्राचीन आणि मोठाली मंदिरे आहेत. जगभरातल्या लोकांबरोबरच संपूर्ण भारतातील पर्यटकांचा एकंदरीतच दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये विशेष राबता असतो.

India (6).jpg

Big Temple, Tanjore

India (7).jpg

Natraj Temple, Chidambaram

आपल्याकडे एक म्हण आहे ‘दक्षिणेत जावे पहायला तर उत्तरेत जावे खायला’. उत्तर भारतात अनेक वर्ष मुगल आणि तत्सम नवाबी राजवटीनी आपापल्या शैलीने, भारतीय मसाल्यांच्या वापरात अनेक प्रयोग करून खुमासदार खाण्याची परंपरा निर्माण केली. या खाद्यसंस्कृतीचा अस्वाद घेत अनेक मुगलकालीन राजवटीतील वास्तू पर्यटकांच्या पसंतीस उतरतात.

 

जागतीक आश्‍चर्यांमध्ये अग्रक्रम भुषविणारा विलोभनिय असा ताजमहलची झलक बघण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवरचा प्रत्येक पर्यटक वेडा असतो. ताजमहालाच्या बरोबरीने फतेहपूर सिक्री, लाल किल्ला (दिल्ली आणि आग्रा), कुतुबमिनार, दिल्लीतील अनेक मध्ययुगीन वास्तू ही पर्यटकांची गर्दी खेचणारी ठिकाणं आहेत.

P1320904-A.jpg

Taj Mahal, Agra

 

P1320766-1.jpg

Kutub Minar, Delhi

गुजरातच्या कच्छपासून ते पश्‍चिम बंगालपर्यंत आणि लडाखच्या लेहपासून ते दक्षिणेतील कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारत हा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक वास्तूंनी भरलेला आहे. प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक गावात उत्तम वास्तू, मंदिरे, गावं, किल्ले, हवेली, गढी, वाडे असा काहीनाकाही वारसा सापडतोच. भारत म्हणजे अशा अनेक वास्तू, धर्म, संस्कृती, परंपरा, कलाकृती यांचा सुंदर मिलाफच आहे. भारतातील अधिकाधिक ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा हा ट्रेण्ड पर्यटकांमध्ये दिसून येतो.

आजही भारतीय माणूस पर्यटनासाठी परदेशी जात असेल तर काही लोक म्हणतात की, ‘आधी आपला देश तर बघ, मग जा बाहेर…’ यातून भारतात पर्यटनाच्या अंगाने किती विविधता आणि समृद्धता आहे हे दिसतं. विदेशी पर्यटकच नाही तर भारतात राहणारी मंडळीही म्हणतात की, ‘फिरता फिरता आयुष्य संपेल पण सबंध भारताचा कानाकोपरा व्यवस्थित फिरायचा असेल तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल…’

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...