Wednesday, October 21, 2020

सिक्कीम सहल

  नरेंद्र गोळे

सिक्कीम सहल-१: पूर्वतयारी

१७ मार्च २०१० ते २६ मार्च २०१० दरम्यान नऊ रात्री आणि दहा दिवसांची सिक्कीम-दार्जिलिंग सहल साजरी करून २७ मार्च २०१० रोजी सकाळी ०१:३० मिनिटांनी आम्ही डोंबिवलीस परत आलो. सचिन ट्रॅव्हल्ससोबत आम्ही ही सहल अनुभवली. त्याच प्रवासाचे हे वर्णन आहे. सिक्कीम-दार्जिलिंग सहल काय शेकडो लोक करत असतात. त्याचे प्रवासवर्णन ते काय लिहीणार? आणि लिहीले तरी कोण वाचणार? शेकडो लोक जातात हे खरय. मात्र सगळेच काही लिहीत नाहीत. शिवाय मी जे पाहिलय, त्यापेक्षा पाहण्याच्या दृष्टीने अभ्यासच जास्त केलाय. त्या सगळ्याचे सार, नव्याने पर्यटनास उद्युक्त झालेल्यांना, नक्कीच उपयोगी ठरू शकेल. म्हणूनच तर हा सगळा खटाटोप करतो आहे. होतकरू प्रवाशांना काय पाहावे याचा अंदाज आला आणि कधीच तिथे न गेलेल्या व न जाऊ शकणार्‍यांना तिथे काय खास आहे ते समजले, तर या प्रवासवर्णन लिहीण्याचे सार्थक झाले असे मी समजेन.

१७ मार्च २०१० ला इंडियन एअर लाईन्सच्या, संध्याकाळी सहाच्या विमानाने, आम्ही कोलकात्यास पोहोचलो. तिथे गरियाहाटमधील हॉटेल-पार्क-पॅलेस मधे आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती. १८ मार्चला आम्ही कोलकाता शहरात स्थलदर्शन केले. रात्री दहा वाजताच्या "दार्जिलिंग मेल"ने "न्यू-जल-पैगुडी म्हणजेच एनजेपी" ला निघालो. सकाळी आठ वाजता तिथे जाऊन पोहोचलो. तिथपासून १x२ तेवीस आसनी आरामगाडीने एनजेपी-मिरिक(१-रात्र)-दार्जिलिंग(२-रात्री)-गान्तोक(३-रात्री)-एनजेपी असा सहल कार्यक्रम पार पाडला. २५ मार्चला रात्री आठ वाजता एनजेपी मधे "दार्जिलिंग मेल" गाठली. सकाळी सहा वाजता कोलकात्यास जाऊन पोहोचलो. कोलकात्यात भारतीय-वनस्पती-उद्यान पाहिले आणि मग रात्री आठ वाजताच्या विमानाने निघून, २७ मार्च २०१० रोजी सकाळी ०१:३० मिनिटांनी आम्ही डोंबिवलीस परत आलो.

सिक्कीम राज्य १९७५ मधे भारतीय संघराज्याचा घटक झाले. ईशान्य भारताच्या सात राज्यांत, देवतात्मा हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांच्या परिसरात वसलेल्या या पर्वतीय राज्याची, आठवे राज्य म्हणून भर पडली. सिक्कीम राज्यात विमानतळच काय, पण रेल्वेस्थानकही नाही. त्यामुळे दूरवरून या राज्यात सहलीस यायचे झाल्यास, पश्चिम बंगाल राज्यातील नजीकचे विमानतळ बागडोगरा अथवा पश्चिम बंगाल राज्यातील नजीकचे रेल्वेस्थानक न्यू-जल-पैगुडी यांचाच मार्ग धरावा लागतो. ही दोन्हीही ठिकाणे दार्जिलिंग जिल्ह्यात आहेत. पश्चिम बंगाल राज्याच्या दार्जिलिंग जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय सिलिगुडी शहरात आहे.

सुरवातीसच मी हा तक्ता गान्तोकच्या हवामानकेंद्राच्या संकेतस्थळावरून मिळवला होता. त्यावरून मार्च महिन्यात आम्हाला मानवणारे तापमान असल्यामुळे मार्च महिन्यातच सहल करण्याचे नक्की केले. सचिन ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पूर्वी मेवाडला गेलेलो होतो. त्यांचे पर्यटन-व्यवस्थापन पसंत असल्याने, त्यांच्यासोबतच प्रवास करण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले. त्यांच्या सिक्कीम सहलींचे दिवस माहीत करून घेतले. सगळ्यात कळीचे आरक्षण कोलकाता ते एनजेपी आणि परत हेच असल्याने प्रथम ते स्वतःच करून घेतले. नंतर सचिनसोबत सहल नोंदवली. त्यानंतर विमानाच्या प्रवासाचेही आरक्षण करून टाकले. सरतेशेवटी २६ ला आम्हाला सकाळी सहा ते संध्याकाळी सहा मोकळा वेळ मिळत होता. तो भारतीय-वनस्पती-उद्यान पाहण्यात सत्कारणी लावण्याचा निर्णय झाला. म्हणून दिवसभराकरता हाजरारोडवरील महाराष्ट्रनिवास खोलीचेही आरक्षण करून झाले.

सिक्कीमची राजधानी गान्तोक शहर. ते बागडोगरापासून १२४ किमी, एनजेपीपासून १२४ किमी, दार्जिलिंग शहरापासून ९४ किमी, तर सिलिगुडीपासून ११४ किमीवर आहे. प्रवासादरम्यान एनजेपी-(५५-किमी)-मिरिक-(४५-किमी)-दार्जिलिंग-(५१)-कॉलिंपाँग-(७७-किमी)-गान्तोक-(५६-किमी)-नातू-ला-(५६-किमी)-गान्तोक-(१२४-किमी)-एनजेपी, असा जवळपास ४५४ किमी चा पर्वतीय प्रदेशातील बसप्रवास आम्ही केला. मुंबईच्या समुद्रसपाटीवरून निघून ६,६०० फूट उंचीवर दार्जिलिंगला पोहोचलो, १४,२०० फूट उंचीवरील नातू-ला इथे भेट दिली आणि पुन्हा समुद्रसपाटीवर परत आलो. मुंबईच्या ३७ अंश सेल्शस पासून नातू ला इथल्या -४ अंश सेल्शस तापमानापर्यंत जाऊन आलो. या प्रवासात प्रत्यक्षात जो कार्यक्रम आम्ही अंमलात आणला तो इथे देत आहे.

सिक्कीमचा पूर्वेतिहास

सिक्कीम म्हणजे लिंबू भाषेत "देवभूमी". "लिंबू" ही नेपाळात बोलली जाणारी तिबेटो-बर्मी भाषा आहे. पश्चिम सिक्किममधील युक्सोम-नॉर्बुगँगमधल्या देवदार वृक्षराजीत वसलेल्या शांत टेकडीवर, सिक्कीमचे पहिले चोग्याल (राजे) म्हणून, फुंत्सोग नामग्याल यांचा, इसवी सन १६४२ मधे राज्याभिषेक झाला होता. तेव्हापासूनच आधुनिक सिक्कीमच्या इतिहासास सुरूवात होते.

नामग्याल म्हणजे पूर्व तिबेटच्या खाम प्रांतातील मिन्याक घराण्याचे वंशज होत. असे सांगितले जाते की, खाम प्रांतातील मिन्याक घराण्याचे प्रमुख, तीन भाऊ होते. स्वर्गातून एक पत्र आले. ज्यात मधल्या भावास दक्षिणेकडे सिक्कीमला जाण्याचे संकेत दिले होते, जिथे त्याचे वंशज राज्य करणार असे विधिलिखित होते. सर्वात वडील भावाने एकट्याच्या बळावर शाक्यमठाची स्थापना केली आणि लोकप्रियतेतून, स्वतःकरता "ख्ये बुम्सा- म्हणजे लाखांचा पोशिंदा" हा खिताब मिळवला. शाक्य घराण्याच्या राजकन्येचा हातही ख्ये बुम्साने प्राप्त करून घेतला व तो चुम्बी खोर्‍यात स्थिरस्थावर झाला. पुढे दीर्घकाळपर्यंत सिक्कीमच्या राजघराण्याचे ते केंद्र राहिले. राजा व राणीस बरीच वर्षेपर्यंत मूलबाळ न झाल्याने ते संत्रस्त होते. म्हणून त्यांनी लेपचा प्रमुख थेकोन्ग टेक यांचा आशीर्वाद मागितला. थेकोन्ग टेक पुत्रप्राप्तीचा वर देण्याकरता विख्यात होते. ख्ये बुम्साच्या पत्नीला मग तीन पुत्र झाले. नंतर ख्ये बुम्सा आणि थेकोन्ग टेक यांच्यात उत्तर सिक्कीममधील काबी लाँग्टसोक येथे चिरंतन मैत्रीचा ऐतिहासिक करार झाला.

ख्ये बुम्सा यांच्यापश्चात त्यांचा तिसरा मुलगा मिपोन राब गादीवर बसला. त्याच्यानंतर त्यांचा चवथा पुत्र, गुरू-ताशी राजा झाला, जो गान्तोकला जाऊन राहिला. दरम्यान थेकोन्ग टेक मृत्यू पावला. विघटित होणारी लेपचा जमात मग गुरू ताशीकडे नेतृत्व आणि संरक्षणाकरता अपेक्षेने पाहू लागली. सिक्कीमचे राज्याभिषेकपुस्तक, गुरू ताशीचा "नियमित राजघराण्याची सुरूवात करणारा पहिला शास्ता" म्हणून उल्लेख करते. पाच पिढ्यांनंतर; उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडून आलेल्या तीन थोर लामांनी; फुंत्सोग नामग्याल यांचा, सिक्कीमचे पहिले "डेन्जोंग ग्याल्पो" किंवा सिक्कीमचे राजे म्हणून, पश्चिम सिक्किममधील युक्सोम नॉर्बुगँग इथे, ख्रिस्तोत्तर १६४२ या वर्षी; उद्घोष केला. गुरू रिंपोचे यांनी भाकीत केल्याप्रमाणेच ही घटना घडून आली होती. तिचे वर्णन त्यांनी "नाल्जोर चेझी" म्हणजे चार योगिक संतांचा सत्संग असे केलेले होते.

तिबेटच्या निरनिराळ्या भागांतून तीन थोर संत "बायुल डेमाजोन्ग म्हणजेच सिक्कीम" येथे, सिक्कीमच्या अप्रकट भूमीवर धर्मसाराचे संवर्धन आणि प्रसार करण्याचे आपले कर्तव्य पार पाडण्याकरता, चालून येतील, असे विधिलिखित होते.

म्हणूनच ल्हात्सुन नाम्खा जिग्मे, कथोग कुंटू झांग्पो आणि ग्नाडक सेंपा फुंत्सोग रिग्झिन स्वतंत्रपणे आणि अनुल्लंघनीय मार्गांनी सिक्कीममधे आले. तीन पवित्र लामांचे हे एकत्रिकरण "युक्सोम" म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ लेपचा भाषेत "त्रिमूर्ती" असा होतो.

ल्हात्सुन चेंपो यांनी इतर दोघांवर असे ठसवले की आपण सारेच लामा आहोत आणि राज्यशासन सुरळीतपणे चालवण्याकरता एका सामान्य माणसाची गरज आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणले की गुरू रिंपोचे यांच्या भाकीतानुसार चार विद्वान बंधू सिक्कीममधे जमतील आणि सिक्कीमचे प्रशासन निर्माण करतील. उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडून आलेले आपण त्यापैकी तीन आहोत. पूर्वेसंदर्भात त्यांनी रिंचेन लिंग्पा यांच्या गूढ मार्गदर्शक पुस्तकातील अवतरण दिले. ज्यात म्हटले होते की, "माझ्या चार अवतारांपैकी एक सिंहाप्रमाणे (पशूंचा राजा) असेल, जो आपल्या शूरतेने आणि सामर्थ्याने राज्याचा सांभाळ करेल." पुस्तकात असाही उल्लेख आहे की, "फुंत्सोग नावाचा एक मनुष्य गान्ग च्या दिशेने प्रकट होईल."

अशाप्रकारे ल्हात्सून चेंपो यांनी, टोग्डेन थोन्डुप नावाच्या साधूस व पास्सांग नावाच्या एका सामान्य माणसास बोलावले, आणि गान्तोकला एका दळभारासहित जाऊन, फुंत्सोग नावाच्या माणसास, युक्सोम नॉर्बुगॅंगला येण्यास आमंत्रित करण्यास सांगितले. अनेक साहसांपश्चात सर्व दळभार गान्तोकला पोहोचला. तिथे त्यांना फुंत्सोग गायींचे दूध काढत असतांना सापडला. फुंत्सोगने त्यांना घरात बोलावले, गाईचे ताजे दूध सेवन करण्याची विनंती केली आणि त्यांना सांगितले की माझे नाव फुंत्सोग आहे. त्याने तीन लामांचे ते आमंत्रण सर्वात अवचित लाभदायक घटना मानली आणि क्षणभरही व्यर्थ न दवडता युक्सोम नॉर्बुगॅंगला जाण्याकरता; आपल्या सर्व अनुयायांसहित, अधिकार्‍यांसहित व घरातील माणसांसहित, प्रस्थान केले.

राज्याभिषेक "चु-टा"मधे म्हणजे पाणघोड्याच्या वर्षात किंवा ख्रिस्तोत्तर १६४२ मधे साजरा झाला. अशाप्रकारे फुंत्सोग नामग्याल यांची सिक्कीमच्या राज्यसिंहासनावर प्रतिष्ठापना झाली. त्यांना "चोग्याल" म्हणजे आध्यात्मिक आणि कालसंभव अधिकारप्राप्त राजा, ही पदवी मिळाली. त्या तीन लामांनी सिक्कीममधे बुद्धधर्माचा प्रसार केला, तर फुंत्सोग नामग्याल यांनी राज्य संघटित करण्यास सुरूवात केली. चोग्याल यांच्या बारा पिढ्यांनी ३०० वर्षांहून अधिक काळपर्यंत सिक्कीमवर राज्य केले. या छोट्याशा हिमालयन राज्याने १९७२-७३ दरम्यान मोठ्या उलथापालथी अनुभवल्या. १९७५ मधे चोग्याल ही संकल्पनाच नामशेष झाली आणि १६ मे १९७५ रोजी सिक्कीम, अधिकृतरीत्या भारताचे बाविसावे राज्य म्हणून भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले. तिथे झालेल्या सार्वमत चाचपणीत, स्थानीय जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसारच हे विलिनीकरण घडून आले.

सिक्कीमचा भूगोल

आजचे सिक्कीम राज्य ७,३०० वर्ग किलोमीटर भूभागावर विस्तारलेले असून लोकसंख्या सुमारे साडेपाच लाख आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चार जिल्ह्यांमधे ते विभागलेले आहे.

पूर्व जिल्ह्याचे मुख्यालय तसेच संपूर्ण राज्याची राजधानी गान्तोक आहे. उत्तर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा असून त्याचे मुख्यालय मंगन इथे आहे. पश्चिम सिक्कीम जिल्ह्याचे मुख्यालय गेयझिंग इथे आहे तर दक्षिण सिक्कीम जिल्ह्याचे मुख्यालय नामची येथे आहे. भुतिया भाषेत "नाम" म्हणजे "आकाश" आणि "ची" म्हणजे "उंच". म्हणून नामची म्हणजे "उंच आकाश". नामची येथे रिंपोचे यांची ३६ मीटर (१२० फूट) उंचीची जगातील सर्वात भव्य मूर्ती आहे.

हे क्षेत्र पर्वतीय प्रदेशात वसलेले असल्याने इथे प्रवासास किती वेळ लागेल याचे गणित अंतराच्या अंदाजावरून काढता येत नाही. उदाहरणार्थ सिलिगुडी ते गान्तोक अंतर ११० किलोमीटर आहे. आपल्या मैदानी प्रदेशातील अंदाजानुसार आपण सहज समजू की फार तर फार तीन तास लागतील. प्रत्यक्षात या प्रवासाला सहा तास लागतात. दुसरे म्हणजे नकाशात सरळसोट दिसणारी अंतरे प्रत्यक्षात वळणावळणांनीच साध्य होणारी असतात. उदाहरणार्थ दार्जिलिंगहून गान्तोक नकाशात दिसणारे अंतर प्रत्यक्षात दार्जिलिंग-कॉलिंपाँग-गान्तोक असेच जावे लागत असल्याने बरेच जास्त पडते. कारण प्रत्येक गाव एका पर्वतराशीवरील एका टेकडीवर वसलेले असते. ती टेकडी, तो पर्वत उतरून खाली यायचे नदीच्या काठाकाठाने पुलापर्यंत प्रवास करायचा (पूलही जागोजागी बांधलेले आढळत नाहीत, कुठेतरी स्थानिकांच्या सोयीने बांधलेले मोठे पूलच दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाकरताही वापरावे लागतात). पुन्हा नदीच्या काठाकाठाने पूर्वस्थळावर पोहोचायचे आणि मग दुसर्‍या तीरावरला पर्वत चढू लागायचे, त्यावरली ईप्सित टेकडी गाठायची आणि घाटरस्त्याने गंतव्यस्थळी पोहोचायचे.

वर्तमान पर्यटनानुकूलता

हिमालयन शिवालिक पर्वतराशींच्या पट्टीतील रंगीत आणि तिस्ता या दोन नद्यांच्या खोर्‍यात (खरे तर पाणलोट क्षेत्रात) हल्लीचे सिक्कीम वसलेले आहे. तिस्ता हा "त्रिस्था" या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असावा. तिस्ता नदी पूर्वी तीन प्रवाहांद्वारे दक्षिणेकडे वाहत असे. पूर्वेला करतोया, पश्चिमेला पुनर्भवा आणि मध्यभागी आत्रेई. पुनर्भवा पुढे महानंदेला मिळाली. आत्रेई एका चिखल-पाणथळ-स्वरूपी जागेतून वाहत वाहत करतोयेस मिळाली व मग पुढे वाहत वाहत जफरगंज नजीक पद्मा नदीस मिळाली.

१७८७ च्या विध्वंसक पुरानंतर, तिस्ता पुन्हा जुन्या प्रवाहास लागून आग्नेयेस वाहत वाहत ब्रह्मपुत्रेस मिळाली. नदीला नेपाळी भाषेत खोला म्हणत असल्याने तिला "तिस्ताखोला" असेही म्हणतात. येत्या दहा वर्षात एकूण ५०,००० मेगॅवॉट क्षमतेचे छोटेछोटे जलविद्युत प्रकल्प या नदीवर होणार आहेत. या माहितीवरून तिच्या ऊर्जस्वल प्रवाहाची कल्पना करता येईल. रंगीत नदी जोरेथाँग, पेलिंग, लेग्शिप मार्गे वाहत वाहत तिस्ता बाजार येथे तिस्ता नदीस मिळते. हिचा प्रवाह फारच खळबळजनक असल्याने ही तराफा-तरण-कर्त्यांच्या (राफ्टींग) फारच आवडीची आहे. या नदीवर राष्ट्रीय जलविद्युत निगमाचे ६० मेगॅवॉट क्षमतेचे विद्युत संयंत्र बसवलेले आहे.

गान्तोक शहर उंच पर्वतात समुद्र सपाटीपासून ६,००० फूट उंचीवर वसलेले आहे. तरीही अद्ययावत सुखसोयींनी सुसज्ज आहे. सोबतच्या प्रकाशचित्रात दूरदर्शनचा मनोरा दिसत आहे. गान्तोकचे ऊर्जा-उद्यान संपूर्णतः सौर ऊर्जेवर संचालित आहे. तिथे सौर ऊर्जेला सामान्य जीवनात कसे उपयोगात आणता येईल याचे उत्तम मार्गदर्शन प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे समूर्त साकार केलेले आहे. सिक्कीम राज्याने पर्यटन-स्नेही धोरण स्वीकारलेले आहे. समुद्रसपाटीपासून १४,२०० फूट उंचीवरील "नातू ला म्हणजे ऐकत्या कानांची खिंड", या अति-अंतरंगातील, किंबहुना चीन सीमेवरील पुरातन रेशीममार्गातील खिंडीपर्यंतही पर्यटकांना जाण्यास अनुमती देतात.

सोबतची ही पाटी, नातू ला मधे येणार्‍या पर्यटकांकरता लावलेली आहे.

सिक्कीममधे पर्यटकांकरता किती प्रचंड नैसर्गिक वैविध्य आहे आणि सिक्कीम, पार सीमेपर्यंत पर्यटनास किती सुरक्षित आहे याची ती ग्वाहीच आहे. केवळ पराकोटीच्या नैसर्गिक परिस्थितींचा सामना करणे ह्याचीच काय ती तयारी सिक्कीम पर्यटनाकरता करायला हवी.

 

कलकत्ता स्थलदर्शन

पर्यटनाचा पहिला दिवस कलकत्ता दर्शनाचा होता. पार्क पॅलेस हॉटेलमधून नास्ता करून आम्ही २x२ बसने बेलूर मठाकडे निघालो. कलकत्ता शहर हुगळी (गंगा, पद्मा) नदीच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांवर वसलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाणारी नदी पुढे पश्चिमवाहिनी होते. मात्र त्याआधीच नदीवर दोन मोठे पूल आहेत. रविंद्रसेतू म्हणजेच विख्यात हावडाब्रिज आणि विद्यासागर सेतू म्हणजे दक्षिणेकडला मोठा पूल. मुख्य शहर पूर्वेलाच आहे. त्यातही दक्षिणेलाच जास्त. कालीघाट, बालीगंज सारखे वर्दळीचे भाग तिथे आहेत. विमानतळ ईशान्येला आहे. विमानतळाहून हॉटेलात येत असतांना जागजागी विस्तीर्ण जलाशय दिसत होते.

आमचे हॉटेलही तिथेच गरिया-हाट-रोडवरच होते. तिथून रविंद्रसेतूकडे आणि मग बेलूर मठाकडे वाटचाल सुरू झाली. वाटेत मोठमोठे हिरवेगार वृक्ष दिसून येत होते. सावरीच्या कापसाची झाडेही खूप होती. मठाचे वातावरण अत्यंत स्वच्छ, शांत आणि प्रसन्न आहे. मोठ्या आवाजात न बोलण्याच्या सूचनाही जागोजाग लिहिलेल्या आहेत. फोटोग्राफीही निषिद्धच आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असूनही गजबजाट नाही. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांच्या व्यक्तिगत वापरातील वस्तू प्रदर्शनार्थ ठेवलेल्या आहेत. बाजूलाच गंगाघाट आहे. पश्चिम तीरावर दक्षिणेश्वराचे मंदिर आहे. अर्थात्‌ फेरी बोटीने पलीकडे जाण्याची इच्छा होणे अगदी स्वाभाविकच आहे. आम्हालाही तशी इच्छा झाली. गटात केवळ १६ माणसेच असल्याने सहलप्रणेते “फेरी”करता तयार झाले. बस पलीकडे पाठवून दिली आणि आम्ही बोटीवर स्वार झालो.

११०० वाजण्याचा सुमार असेल. प्रवाहाच्या दिशेनेच खालच्या बाजूला दक्षिण तीरावर दक्षिणेश्वर मंदिर आहे. सुमारे अर्ध्या तासाचा प्रवास. बोटीला छत नाही. त्यामुळे टळटळीत उन्हात प्रवास सुरू झाला. सगळ्यात प्रथम जाणवला तो गंगेच्या प्रवाहाला असलेला वेग. मग जाणवले की नदीतून फोटोग्राफीस मनाई नाही. त्यामुळे कॅमेरे बाहेर निघाले. तीरावरील स्थावरांची उत्तम प्रकाशचित्रे निघू लागली. बाली पुलाखालून पार झाल्यावर थोड्याच वेळात दक्षिणेश्वराचे मंदिर दिसू लागले. बोट किनार्‍याला लागली. दक्षिणेश्वरास आलेले भक्तगण गंगेच्या पवित्र पाण्यात डुबक्या घेत होते. लहानथोर, स्त्रीपुरुष, उच्चनीच कुठलाच भेदभाव त्यांच्यात दिसून येत नव्हता. आम्हीही हलकेच पायउतार झालो. दक्षिणेश्वराचे दर्शन घेतले. सभोवतालच्या परिसरात सुमारे तासभर विहार केला. अतिशय प्रसन्न वाटले. पुण्यतोया नदीच्या पावनस्पर्शाचीच किमया म्हणायची.

तिथून आम्ही “जतीनदास पार्क” नावाच्या मेट्रोस्थानकावर जाऊन पोहोचलो. आता मेट्रोप्रवासाचा अनुभव घ्यायचा होता. तिकिटे काढली. स्थानकाचे फलाट आपल्या लोकलच्या फलाटाच्या मानाने पार पाताळात गेलेले. खूप खोलवर उतरून गेल्यावर फलाट लागला. स्थानक बर्‍यापैकी स्वच्छ होते. जमिनीखाली खोलात असूनही वायुवीजन कमी आहे असे कुठेही वाटले नाही. गाड्यांची वारंवारताही बर्‍यापैकी होती. दर पाचसहा मिनिटाला गाड्या येत होत्या. आम्ही सगळेच एका गाडीत चढलो. मेट्रोमधेही फोटो निषिद्धच आहे. काही स्थानकांनंतर मेट्रोमधून उतरून आम्ही हल्दीराम रेस्तराँमधे जेवायला गेलो. जेवणानंतर व्हिक्टोरिया स्मारक आणि सायन्स सीटी पाहण्याचा कार्यक्रम होता. व्हिक्टोरिया स्मारकाच्या आतल्या भागात फोटो निषिद्धच होते. मात्र बाहेरील भागात, तसेच सायन्स सिटीत सर्वत्र फोटोग्राफीस पुरता वाव होता.

व्हिक्टोरिया स्मारक प्रेक्षणीय आहे. आतील वस्तुसंग्रहालय फारसे लक्षात नाही. त्यातील वस्तूही वेगळ्याने वर्णन करून सांगाव्यात अशा आठवात नाहीत. मात्र वास्तूची बाहेरील भव्यता, कितीही दूरवरून सारखा दृष्टीस पडत राहणारा चित्ताकर्षक घुमट, शिल्पकला, परिसराची कलापूर्ण आखणी, विस्तीर्ण उद्याने, हिरवीकंच वृक्षराजी यामुळेच स्मारक आमच्या स्मरणात राहिले आहे. आणि हो. दारापासचे सिंहही विसरता येणारे नाहीत. शिवाय, बाहेर पडतांना आम्हाला एक खरीखुरी व्हिक्टोरियाही (बग्गी) नजरेस पडली. अर्थातच तीही आमच्याकरता स्मारकच ठरली. व्हिक्टोरिया स्मारकानंतर आम्ही सायन्स सिटीकडे निघालो. ती पाहायला चारपाच तासही अपुरेच पडतात, असे सांगितले गेले होते. म्हणून काय काय पाहायचे याची यादी प्रत्येकजण करत होता.

आम्ही सुमारे साडेपाच वाजता प्रवेश करत होतो. सातच्या सुमारास आम्हाला बाहेर पडणे गरजेचे होते. कारण, त्यानंतर जेवण करून रात्री दहाची दार्जिलिंग मेल पकडायची, तर इथून सातपर्यंत बाहेर पडायलाच हवे होते. म्हणून मी मात्र स्वतःपुरते असे ठरवून टाकलेले होते की समुद्रसफरींचे संग्रहालय आणि आरसेमहाल यांचाच पूर्णपणे आनंद घ्यायचा. सर्वप्रथम समुद्रसफरींच्या संग्रहालयात गेलो. निरनिराळ्या जहाजांच्या प्रतिकृती, त्यांचेवरील शिडे, डोलकाठ्या, गळ यांच्या विकासाचा इतिहास, आणि एकूणच समुद्रपर्यटनात घडत गेलेल्या प्रगतीचा सुंदर इतिहास इथे समूर्त साकार केला गेलेला आहे. तो अतिशय मनोरंजक वाटला.

त्यानंतर मग आम्ही गेलो आरसे महालात. खरेतर लहान पोरांचाच खेळ म्हणायचा. पण मी तिथे तासभर कसा गुंगून गेलो याचा पत्ताच लागला नाही. आरशांच्या अक्षरशः असंख्य गमतीजमतींनी प्रकाशशास्त्राच्या वैज्ञानिक रहस्यांचा सहज उलगडा होत होता. मनोरंजनही साधत होते.

जाडी, रोडकी, वाकडीतिकडी प्रतिबिंबे दाखवणारे वक्र आरसे पाहिले. कॅलिडोस्कोपसारखी माणसाचीच प्रतिबिंबे रचून दाखवणार्‍या रचना पाहिल्या. एकाच माणसाभोवती आरसे रचून त्याला त्याच्या प्रतिबिंबांशीच बैठक घेत असण्याचे दृश्य साकारणारी रचना मला सर्वात जास्त आवडली. खिडकीसारख्या पोकळीत खिडकीबाहेर सर्व बाजूंनी आरसे रचून, त्यात वाकून पाहिले असता एखाद्या अनंत लांबीच्या बोगद्यात आपल्याच प्रतिबिंबांचे असंख्य फोटो काढता येतात हा विस्मयकारक शोधही लागला.

मग आमच्याच गटातील इतर लोक भेटू लागले. कुणी डायनासुरांच्या नगरीस भेट देऊन आलेले होते तर कुणी अवकाश तंत्रज्ञानाच्या दालनातून परतत होते. कुणी यांत्रिक साधनांच्या दालनातून तर कुणी तर्‍हेतर्‍हेचे प्रयोग पाहून. दृक्‌श्राव्य खेळ खेळूनही बरेच जण परतत होते. सारेच जण उत्साहात होते. वेळ अपुरा पडत होता. आमच्या गटाचे सरासरी वय पन्नासापुढेच होते. त्यामुळे बहुतेकांना पायांचे तुकडे पडत असल्याची जाणीवही प्रकर्षाने होऊ लागली होती. तहानही लागली होतीच. मात्र तिथले पाणी मचूळ होते. त्यामुळे अनिच्छेनेच का होईना पण एकएकजण हळूहळू काढता पाय घेऊ लागला. नियत वेळेपावेतो आम्ही सर्वच बाहेर आलेलो होतो. तरीही पुन्हा संधी मिळाल्यास अत्यंत आवडीने सगळे मन भरून पाहण्याची अनिवार इच्छा मनात घेऊनच, आम्ही त्या चित्तचक्षुचमत्कारिक विज्ञाननगरीचा निरोप घेतला.

मिरीक स्थलदर्शन

१९ मार्च २०१० ला सकाळी ०८०० वाजता आम्ही न्यू जलपैगुडी स्थानकावर उतरलो. स्थानकाबाहेर सुमोंमधे सामान लादून आम्ही हॉटेल सेंट्रल प्लाझा, सिलिगुडी येथे गेलो. नास्ता केला आणि १x२ बसमधे आपापली आसने ग्रहण करून मिरीकच्या दिशेने प्रयाण केले. हवामान काहीसे थंड होते. उत्साहवर्धक. वाटेत आम्ही एका चहाच्या मळ्यात उतरलो.

घातधर्मी वळणाच्या (लॉगरिदमिक) निमुळत्या टोपल्यांतून चहाची पाने खुडून आणणारे मजूर (स्त्रिया आणि पुरूषही) आपापल्या टोपल्या एका लहानशा लांबुळक्या छपरीमधे अंथरलेल्या मच्छरदाणीच्या कापडावर रिकाम्या करत होते. मग ताणकाट्याच्या साहाय्याने वजन करून त्यांची बोचकी बांधली जात होती. तिथे उतरून आम्ही जेमतेम गुडघ्यापावेतो उंच असणार्‍या चहाच्या झुडुपांतून फेरफटका करत होतो. तेवढ्यात आमच्या सहलप्रणेत्याने प्रश्न केला. या झुडुपांचे वय काय असेल? मग कोणी सहा महिने, कोणी पाच वर्षे तर कुणी तब्बल दहा वर्षे तरी असल्याचे सांगू लागला. तेव्हा त्यांनी त्या चहामळ्याच्या स्थापनेची घोषणा करणार्‍या पाटीवर लक्ष वेधले. १८८८. म्हणजे तो मळा १८८८ मधे लावण्यात आलेला होता. ते म्हणाले की चहाच्या झुडुपांचे वयही सामान्यतः तेवढेच असते. म्हणजे १००-१२५ वर्षे. जेमतेम गुडघ्यापावेतो पोहोचणार्‍या त्या प्रत्येक झुडुपाचे वय आमचे आज्जी-आजोबा शोभावेत असे होते. आम्ही मात्र त्या माहितीपासून अनभिज्ञ राहून, मळ्यात मुक्तपणे विहरत होतो.

मग तिथून निघून आम्ही यथावकाश जेवायच्या वेळेपावेतो हॉटेल जगजीत, मिरीक इथे येऊन पोहोचलो. जेवलो. थोडीशी विश्रांती घेऊन फेरफटका मारण्याकरता तयार झालो. असे कळले की मिरीकमधे एक तलाव पाहण्यासारखा आहे. तिथे बोटिंगही करता येते. ते पाच वाजता बंद होते. तसेच एक बुद्ध मठही आहे. मात्र तोही संध्याकाळी पाच वाजता पर्यटकांसाठी बंद करतात.

तेव्हा प्रथम तलावावर जाण्याचा निर्णय झाला. तलाव ऐटदार होता. पाणी स्वच्छ होते. नयनमनोहर आणि देखण्या देखाव्यांत तो शोभून दिसत होता. चार जणांच्या, पायडलिंग करून चालवण्याच्या बोटीस, अर्ध्या तासाचे चाळीस रुपये घेत होते. शिवाय मार्गदर्शक सोबत घेतल्यास वीस रुपये जास्तीचे. आम्ही आठ जण होतो. पैसे भरून दोन बोटी ताब्यात घेतल्या. मार्गदर्शकही घेतले. वातावरण काहीसे गारच असल्याने परिश्रम जाणवत नव्हते. साधारण अर्धा तलाव पार होत होता, तेवढ्यात आमचा मार्गदर्शक म्हणाला की पलीकडल्या तीरावर जो उत्सव सुरू असलेला दिसत आहे, तो देवीच्या नवरात्रानिमित्त होणारा देवीभागवताच्या समारोपाचा आहे. वर डोंगरावर देवीचे मंदिर आहे. तुम्हाला जायचे असेल तर तलावावरील पुलावरून जाऊन पाहून येऊ शकता.

मी त्याला विचारले की, हीच बोट आपण पलीकडच्या किनार्‍यावर उभी करू. आम्ही दहा मिनिटांत वर देवीचे दर्शन घेऊन येतो. तू इथेच थांबून राहा. आम्ही परत आल्यावर मग परत जाऊ. असे करता येईल का? तो तयार झाला. मग आम्ही दुसर्‍या बोटीवर फोन करून विचारणा केली. तिच्यावरचा मार्गदर्शक तयार होईना. तो म्हणू लागला की आपण वेळेच्या आत परतू शकणार नाही, दंड होईल. त्याला कसाबसा तयार केला. आम्ही दुसर्‍या किनार्‍यावर उतरलो. वर देवीचे दर्शन घेऊन आलो. त्याच्याही वर काही पायर्‍या होत्या तिथे एक दत्तासारखी मूर्ती दिसली. तिला चार हात होते. मस्तक मात्र एकच. पाठीमागे गाय होती. परतताना आमच्या मार्गदर्शकास विचारले तर तो म्हणाला की ती मूर्ती शिवाची आहे. त्याच्या पाठीमागे नंदी आहे. माझ्या आठवणीत मात्र नंदी कायमच शिवासमोर उभा राहत असे. दत्ताच्या पाठीमागे गाय (कामधेनू) उभी असते त्याप्रमाणे, शिवाच्या पाठीमागे नंदी उभा आहे, अशी ही एक आगळी वेगळी मूर्ती आम्ही इथे पाहिली होती. आम्ही नौकानयनतळावर परतलो तेव्हा तासभर उलटून गेलेला होता. म्हणून आमच्याकडून दंड म्हणून चाळीस रुपये प्रती नाव, जास्तीचे वसूल करण्यात आले. आम्हाला मिळालेल्या अनुभूतीच्या मानाने, त्या दंडास आम्ही अगदीच क्षुल्लक दंड समजून लगेचच भरून टाकला. मग आमच्यापैकी काहींनी घोडेस्वारीचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही हॉटेलला परतलो.

परतताना तळ्याच्या पाळीवर नेहमीच दिसणार्‍या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, टपर्‍या इत्यादी दिसू लागल्या. मात्र त्यातले खाद्यपदार्थही वेगळेच होते. विशेष लक्ष वेधून घेतले ते “मोमों”नी. मोमो म्हणजे आपण करतो तसे उकडीचे मोदक किंवा करंज्या. मात्र त्यात सारण भरतात ते भाजीचे. भाजी असते स्क्वॅश नावाच्या फळांची. तांबड्या भोपळ्यासारख्या दिसणार्‍या स्क्वॅशच्या भाजीची चव तिखट आणि रुचकर असते. खाण्याची इच्छा अनिवार होत होती. पण सहल नुकतीच कुठे सुरू होत होती. अशात, हातगाडीवर खाल्लेले पचेल न पचेल अशा शंकेमुळे, केवळ फोटोच काय ते काढले. मोमो मांसाहारीही असतात. त्याचप्रमाणे मोदक व करंज्यांसारखेच त्यांचे उकडलेले आणि तळलेले असे दोन्हीही प्रकार पुढे पाहण्यात (आणि हो, खाण्यातही) आले. मात्र मोदकासारखा गोड मोमो काही सिक्कीमभर कुठेही दिसला नाही.

हॉटेलपासून दुसर्‍या दिशेला बौद्ध मठ होता. पाच वाजून गेलेले होते. सूर्य मावळतीला आलेला होता. मठातून परतलेले लोक आम्हाला भेटत होते. डोंगरावर चढून जाऊन पंधरावीस मिनिटांत तिथे पोहोचता येते. मठ बंद झालेला असल्यास, मुंबईहून आलो आहोत असे सांगितल्यास, उघडूनही दाखवतात असे कळले. म्हणून मग वर जाण्याचा निर्णय झाला. ज्यांना कंटाळा आलेला होता ते थांबले. आमच्यातील उत्साही लोक पुढे झाले. आम्ही त्यांच्या पाठी निघालो.

डोंगरावर चढून जायला मजा आली. मठ बंद झालेला होताच. तरीही एका प्रमुख भिख्खूंना विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला तो पाहण्यास खुला करून दिला. इथले मठ हे, प्रामुख्याने धर्मप्रसाराची गुरूकुल पद्धतीने चालणार्‍या शाळाच असतात. मुख्य सभागृहात प्रवेश करताच समोरच्या बाजूच्या भिंतीलगत बुद्धाची मूर्ती. सोन्याची वाटावी अशी पिवळ्या धमक रंगाची. मूर्तीसमोर सात (आईस्क्रीमचे कप वाटावेत अशा) भांड्यांमधे पाणी ठेवलेले असते. तेलाचे दिवे तेवत असतात. सर्वत्र कमालीची स्वच्छता, टापटीप, नीरव शांतता आणि पावित्र्य. मूर्तीसमोर शे-दोनशे लोकांना आडव्या-उभ्या ओळींच्या सारणीत व्यवस्थित बसता यावे अशी जागा. प्रत्येकाला स्वतंत्रपणे मांडी घालून, जमिनीवर, बुद्धमूर्तीकडे तोंड करून बसता येईल एवढी जागा. प्रत्येकासमोर प्राथमिक शाळेत शोभतील असे उतरते चौरंग मांडलेले असतात. समोर, विद्यार्थी आणि बुद्धमूर्ती यांच्यामधे गुरू उभे राहून शिकवू शकतील अशी विस्तीर्ण जागा. चहुबाजूंच्या भिंतींवर बुद्धाच्या जातककथांमधील प्रसंग चित्रित केलेले दिसून येतात. आम्ही गेलो ती वेळ संध्याकाळची असल्याने सर्व दालन रिकामेच होते. आम्ही "बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि" असा मंत्र म्हटला आणि भारलेल्या मनाने मठाचा निरोप घेतला. मठाच्या पाठीमागच्या दरवाजातून मिरीक तळ्याचे दृश्य सुंदर दिसत होते.

दार्जिलिंगचे चहाचे मळे

२० मार्चला आम्ही मिरीकहून निघालो ते दार्जिलिंगकडे. दार्जिलिंग म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतात ते चहाचे मळे. बसमधून वळणदार घाटमार्गाने चालत असता दुतर्फा चहाचेच तर मळे सर्वत्र दिसत होते. आम्ही पोहोचण्याच्या आधी तीन दिवस सतत दार्जिलिंगला पाऊस पडत होता. आज मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशात, नुकत्याच झालेल्या पावसाने सतेज झालेले चहाचे मळे प्रसन्न वाटत होते.

मग आम्हाला एका ठिकाणी बसमधून उतरवण्यात आले. जिथे नेपाळ सरहद्दीपलीकडील पशुपतीनगर नावाच्या एका गावात जाऊन खरेदीची संधी देण्यात आली. त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर नेपाळ सरहद्द होती. नेपाळात प्रवेश करण्याकरता भारतीय नागरिकांना कुठलाच प्रतिबंध नव्हता. मात्र नेपाळात असतांना चुकून जरी मोबाईल वापरला तर उगाचच आंतरराष्ट्रीय रोमिंग चार्जेस पडण्याची भीती असल्याने मोबाईल्स बसमधेच राहू दिले होते. इतर कुठल्याही नव्या वस्तू, कॅमेरे वगैरे सोबत नेले नव्हते, कारण परतताना कस्टम्स ड्युटी लागण्याची भीती होती. स्वेटर, जाकीट, पेन-ड्राईव्हज अशा प्रकारच्या वस्तू स्वस्त मिळतात असेही सांगण्यात आलेले होते. सरहद्द पार करून गेल्यावर मार्केटपर्यंत पोहोचण्याकरता पाच जणांना एक यानुसार एक एक टॅक्सी करावी लागली.

मार्केटमधे नेऊन तासभर थांबून परत आणण्याचे प्रती टॅक्सी रुपये १५० घेत होते. आमच्या सोबतच्या बहुतेकांनी कुठलीच खरेदी केली नव्हती. नाही म्हणायला प्रत्येकाने एकएक पेन-ड्राईव्ह अवश्य घेतला होता. कारण तो अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध होता. २५० रुपयाला ६४ जीबी. मुंबईला परतल्यावर मात्र ती खरेदी महागात पडल्याचेच निष्पन्न झाले. त्यातला एकही पेन-ड्राईव्ह कुणालाही वापरता आला नाही. दोन-तीन तासांचा उपलब्ध वेळ, पर्यटकांच्या सरहद्द पार करून काहीतरी खरेदी करण्याच्या हुरूपार्थ, शहीद झाला. जे पैसे बळी पडले त्यांची गोष्ट तर सांगून झालेलीच आहे. पर्यटना दरम्यान टाळता आले तर असे दौरे अवश्य टाळावेत. ट्रॅव्हल कंपन्यांच्या व त्यांच्या इष्टमित्रांच्या, वरकड मिळकती व्यतिरिक्त यांतून पर्य़टकास लाभदायक काहीच घडत नाही. हे मी स्वानुभवावरून नक्कीच सांगू शकतो. याव्यतिरिक्त त्साम्गो तलावाकाठी याकावर बसण्याची जी टूम काढली होती त्याबाबतही मला हेच म्हणायचे आहे. पर्यटकांना मुळीच हौस नसते, सहल-व्यवस्थापकच मुद्दाम अशा जागी घेऊन जातात, असे मला म्हणायचे नाही. तरीही अशा घटनांच्या पुनरावृत्ती, पर्यटक व यात्राकंपनी दोघांनीही टाळाव्यात या मताचा मी आहे. याकारोहणप्रसंगी याकावर बसून फोटो काढण्याचे दरमाणशी रुपये तीस. थोडे दूर फिरवून आणण्याचे आणखी रुपये १२० असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात याकांचे मालक आमचेच कॅमेरे घेऊन आमचेच फोटो आमच्याच कॅमेर्‍यांमधे बंद करून देत होते. आम्हीच आमचे फोटो काढले असते तर जास्त चांगले तरी आले असते, असे आता दिसून आलेले आहे. आमच्यासोबतच्या सोळा लोकांनी अक्षरशः शेकडो रुपये, या दोन्हीही ठिकाणी, उगाचच खर्च केले. स्थानिक लोकांना तेवढेच उत्पन्नाचे साधन आहे. त्यांना मिळू देत हवे तर थोडे पैसे. अशा भावनेने लोकांनी खर्च केले. मात्र पर्यटन, मूल्यप्रभावी होण्याकरता, अशा प्रसंगी योग्य तीच निवड करण्याचे धोरण पर्यटक तसेच यात्राकंपन्यांनीही ठेवावे. असो. आमचा पुढला कार्यक्रम फार सुरस झाला. थोड्याच वेळात दार्जिलिंगकडे प्रवास करत आम्ही एका डोंगर-उतारावरील चहाच्या मळ्यातच उतरलो. खूप फोटो काढले.

 हे छान चहाचे मळे किती । रेखले चित्र टेकडीवरती ॥

त्यानंतर आम्ही टॉय-ट्रेनच्या दर्शनार्थ घूम स्थानकापाशी जाऊन पोहोचलो. एक गोड मुलगी पारंपरिक पोशाखात नटून इकडे-तिकडे मजेत फिरतांना दिसली. छे, छे! जुळी नाही. तिचेच प्रतिबिंब आहे ते आरशातले. मग तिथेच एका पाटीवर ती टॉय-ट्रेन जागतिक-सांस्कृतिक ठेवा असल्याची जाणीव करून देणारी जाहिरात पाहिली.

मेरो सपना की रानी कहिले आउंछो तिमि ।

मेरो सपना को महल कहिले बनाउंछो तिमि ॥

माझे स्वप्नांचे राणी सांग येशील तू कधी ।

माझ्या स्वप्नाचा महाल सांग बांधू मी कधी ॥

दार्जिलिंगची हिमालयन रेल्वे हे अभियांत्रिकी कौशल्याचे एक चिरंतन स्मारक आहे. इसवी सनाच्या १८७९ मधे घातलेल्या रुळांवरून आजही ती दिमाखात धावत असते. तिला विश्व-संस्कृतिक-वारसा असण्याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. दार्जिलिंग शहरात उंचीवरच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्याकरता आगगाडी जेव्हा इंग्रजी आठच्या आकाराच्या लोहमार्गांवरून वेगाने जात असते तेव्हा ती अत्यंत प्रेक्षणीय भासते. तिचा डौल तो काय वर्णावा. दार्जिलिंग शहरात तिची “दार्जिलिंग” आणि “घूम” ही स्थानके आम्ही थांबून पाहिली. दार्जिलिंग हे अंतिम स्थानक आहे. या लोहमार्गासोबतच डांबरी सडकही हातात हात घालून चालत असते.

याचाच उपयोग ’आराधना’ सिनेमातील सदाबहार गीतात करून घेतलेला आहे. जीपने प्रवास करणार्‍या राजेश खन्नावर चित्रित करण्यात आलेले “मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, बीत जाये जिंदगानी कब आयेगी तू” हे गीत, याच गाडीत बसून प्रवास करणार्‍या शर्मिला टागोरला उद्देशून म्हटले गेलेले आहे. त्याची चित्रफीत पाहिल्यासही या रेल्वेची खरीखुरी गंमत लक्षात येऊ शकेल. त्याकरता अगदी दार्जिलिंगला जायलाच हवे असे नाही.

जवळच गोर्खा-वॉर-मेमोरिअल म्हणजेच गुरखा-युद्धाचे-स्मारक आहे. १८१४ ते १८१६ दरम्यान, नेपाळ आणि ब्रिटिश-ईस्ट-इंडिया-कंपनी यांच्यात जमिनीवरील सार्वभौमत्त्वावरून झालेल्या घनघोर लढाईत, नेपाळचा दारूण पराभव झाला. सुगौलीच्या तहात तत्कालीन नेपाळची एक तृतियांश जमीन ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. या लढाईत मारल्या गेलेल्या ब्रिटिश (खरेतर एतद्देशीयच) सैनिकांचे स्मारक घूम रेल्वेस्थानकाच्या बाजूलाच उभारलेले आहे.

संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही दार्जिलिंगच्या हॉटेल आनंद पॅलेसमधे जाऊन पोहोचलो. तिथे प्रत्येकास रेशमाचे उत्तरीय घालून आमचे स्वागत करण्यात आले. असे सांगण्यात आले की ही दार्जिलिंगची स्वागत करण्याची पारंपरिक पद्धत आहे. आम्हाला ही पद्धत आवडली. त्यानंतर बराच वेळ आम्ही त्या उत्तरीयाशी खेळण्यात घालवला होता. जवळच दार्जिलिंगचा सुप्रसिद्ध मॉल होता. म्हणून, संध्याकाळी दिवे जातात हे माहीत असूनही आम्ही उत्साहाने खरेदीला बाहेर पडलो. गान्तोकला ज्या थंडीचा सामना करावा लागणार होता त्याकरता तयारी म्हणून प्रत्येकानेच कुठे हातमोजे घे, तर कुठे स्वेटर घे असे करत मजेत खरेदी केली.

हिमालयन पर्वतारोहण संस्था

सकाळी ०४०० वाजता उठून ०४३० ला आम्ही सगळ्यांनीच टायगर हिलकडे प्रस्थान केले. दार्जिलिंग- गोर्खा- हिल- कौन्सिलने बांधलेल्या बंद निवार्‍यातील काचघरांतून सूर्यदर्शन आणि कांचनजंगा पर्वत-उदयाचे विलोभनीय दृश्य पाहणे त्यामुळे शक्य होणार होते. त्या बंदिस्त निवार्‍यात ते प्रथम पोहोचेल त्यासच बसण्यास जागा देतात. इतरांना कडाक्याच्या थंडीत बाहेर बसून वा उभे राहूनच सूर्योदय पाहावा लागतो. गेले तीन दिवस सतत दार्जिलिंगमधे पाऊस पदत असल्याने सूर्योदय पाहता आलेला नव्हता ही खबर आम्हाला होतीच. आज मात्र उघडीप होती. पावसाची मेहेर होती. सकाळी सहाच्या सुमारास यथावकाश सूर्योदय आणि कांचनाप्रमाणे उजळलेले कांचनजंगा दोन्हीही मनसोक्त अनुभवता आले.

नंतर आम्ही हॉटेल आनंद पॅलेस दार्जिलिंग येथे जाऊन नास्ता केला. मग चहाच्या मळ्यात पारंपरिक पोशाखांत फोटोसत्र साजरे केले. त्यानंतर तेनझिंग खडकावर प्रस्तरारोहणाचा खास अनुभव घेतला. वरील प्रकाशचित्रात उजवीकडले वरचे चित्र तेनझिंग खडकाचे आहे, तर खाली पद्मजा नायडू प्राणी-उद्यान तसेच हिमालयन-पर्वतारोहण-संस्था यांच्या प्रवेशद्वाराचे आहे. त्या संस्थेकडेच मग आम्ही रवाना झालो. प्रवेशद्वारापूर्वीच आमचे लक्ष वेधून घेतले ते एका डौलदार, उंचच-उंच, लाललाल फुलांनी बहरलेल्या एका सुंदर वृक्षाने. तो होता ’लाली गुरांच’ म्हणजेच र्‍होडोडेन्ड्रॉन. ही फुले अतिशय आरोग्यकारक मानली जातात. यांचा गुलकंदही केला जातो. आमच्या सिक्कीम प्रवासात मग अनेकदा हे वृक्ष आम्हाला दिसतच राहिले.

मग दिसला एडका. एडक्याचा ए शिकलो त्याला आता ४५ वर्षे उलटली आहेत. मात्र तेव्हापासून ते आजतागायत एडका नावाचा हाडामासाचा प्राणी पाहिलेलाच नव्हता. आजच प्रथम पाहत होतो. शिवाय, त्यावेळेसही एडक्याचे पुस्तकात जे चित्र देले जायचे त्यात दोन एडके परस्परांशी टक्कर घेतांनाच दाखवलेले असत. इथे एकटा सुटा एडका, गवत खात उभा असलेला पाहून, चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले.

इथेच आम्हाला आणखीही एतद्देशीय प्राणी भेटले. ते म्हणजे काळं अस्वल आणि याक.

लाल पांडा सिक्कीमचा राष्ट्रीय प्राणी समजला जातो. (१९७५ पूर्वी सिक्कीम हे एक स्वतंत्र राष्ट्रच होते.) त्याचीही भेट सरतेशेवटी या उद्यानातच झाली. उंच झाडाच्या टोकावर तो राहत होता. आमच्या स्थिरचित्रण चित्रकाने तो पुरेसा आवाक्यात येईना. मग चलचित्रकवाले सरसावले. दूरवरच्या पांड्याला दृष्टीच्या पल्ल्यात आणला आणि प्रकाशचित्रे काढली गेली. पण ती पाहिल्यावर मात्र, तो त्याच्या ख्यातीप्रमाणेच रुबाबदार असल्याचे जाणवले.

मग जपानी पॅगोडा-मठ पाहायला आम्ही इथे आलो. मठाला हिंदू मंदिरांप्रमाणेच सिंहद्वार होते. वरच्या मजल्यावरील बुद्धमंदिरात आरती सुरू असतांना आम्ही पोहोचलो. झार्‍याच्या आकाराचे चामड्याचे तालवाद्य दांडीने हाती धरून त्यावर वेताच्या वळलेल्या काडीने ढुम असा ताल धरून प्रत्येक भक्त खालील मंत्र म्हणत असे. “नमो म्यो हो रें गे क्यो ... ढुम.” मुख्य ढोल वाजवणारा कषायवस्त्रे नेसून एका मोठ्या ढोलापुढे बसून जाडशा ठोक्याने ढुम आवाज करत असे.

आम्ही पर्य़टकही जेव्हा आत गेलो तेव्हा त्याने आम्हाला भिंतीलगत ठेवलेली झारा-सदृश तालवाद्ये हाती घेण्यास सांगितली. ती घेऊन आम्ही त्या भक्तांसोबत खाली मांडी घालून बसलो. सुमारे पाच-दहा मिनिटे तोच मंत्र अत्यंत समरसून म्हटला. याचे पर्यवसान असे झाले की मग पुढे बसमधेही वारंवार मजेने तो म्हटला जात असे.

मठाला सिंहद्वार होते. पॅगोड्याभोवतालच्या शिल्पांमधे आम्हाला एक परीही टांगलेली आढळली. तेव्हा, बुद्ध जातक कथांमधे सिंहद्वार आणि परी कुठून आली याचा आता शोध घ्यायला हवा.

तिथून निघालो ते आम्ही खडकावरले उद्यान ऊर्फ रॉक गार्डन बघायला गेलो. एका नैसर्गिक धबधब्याच्या दोहो बाजूस सुरेख पायर्‍या पायर्‍यांचे टप्पे बांधून सुंदर उद्यानाची रचना त्या धबधब्याच्या दुतर्फा केलेली होती. एका बाजूने वर चढून, हवे तर अधे मधे पुलांवरून तीर बदलत, आम्ही दुसर्‍या तीरावरून खाली उतरलो. हा सर्वच अनुभव अगदी प्रसन्न करणारा वाटला.

गान्तोक-१: शहरदर्शन

उंच पर्वतावर वसलेले असल्याने गान्तोक शहर उंचसखल जमिनीवर बांधलेल्या घरांतून नांदते आहे. शेजारच्या घरी जायचे असेल तरी कित्येकदा शे-पन्नास पायर्‍या चढाव्या-उतराव्या लागतात.

मुख्य रस्ते अरुंद आणि वर्दळीचे होते. मारूती व्हॅन, अल्टो अशा प्रकारच्या चार चाकी वाहनांनाच केवळ "टॅक्सी" म्हणून वाहतूक करण्यास परवानगी होती. टॅक्सीत केवळ चारच प्रवासी बसू शकत. उतारचढावाचे रस्ते असल्याने एखादी टॅक्सी जरी उभी राहिली, तर रस्त्यातील वाहतूक तुंबून राही. याकरता रस्त्यांवर कुठेही टॅक्सी उभी करण्यास मनाई होती. टॅक्सी विवक्षित जागीच उभी करावी लागत असे. आमच्या हॉटेलला एक गॅरेजसदृश गाळा प्रवेशद्वारानजीकच मोकळा सोडलेला होता. टॅक्सी बोलावली असता तिथेच उभी करत. रस्त्यावर नाही. पुढे असे लक्षात आले की बहुतेक घरांना तशा प्रकारची वाहने थांबवण्याची जागा असे. अशा प्रकारच्या नियमांमुळे थांब्याच्या जागा माहीत नसल्यास लांब लांब अंतरे पायीच चालावी लागतात. असेच एकदा आम्ही महात्मा गांधी रोडपासून आंबेडकर रोडपर्यंत पायी आलेलो होतो. टॅक्सीच्या शोधात. मग आमचे हॉटेल अगदीच जवळ आल्याने टॅक्सीचा नादच सोडावा लागला होता.

त्यामुळे, डाव्या बाजूच्या चित्रात दिसतात तशा प्रकारच्या जागा टॅक्स्या उभ्या राहण्याकरता निर्माण केलेल्या असत. तिथेच टॅक्सी मिळू शके. त्यांची ठिकाणे स्थानिकांकडून आधीच माहीत करून घेणे चांगले. उजव्या बाजूस घूम बुद्धमठ दिसत आहे. दार्जिलिंगमधे स्थलदर्शन करत असतांना अनेकदा आम्ही घूम बुद्धमठासमोरून, स्थानकासमोरून जात असू. घुमून-फिरून पुन्हा त्याच त्याच जागेवर पोहोचत असल्यामुळेच त्या भागाचे नाव घूम पडले असावे असा माझा संशय त्यामुळे पक्का झाला. प्रत्यक्ष घूम मठाचे दर्शन मात्र २२ तारखेस दार्जिलिंगहून गान्तोक प्रवासास निघालो तेव्हा सकाळी सकाळीच घेतले. या मठाजवळ आम्हाला स्थानिक विणीच्या विविधरंगी आकर्षक लोकरी शाली मिळाल्या. भावही माफकच होते. इथे केलेली सर्वच खरेदी उत्तम ठरली.

आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो त्या सिक्कीम रिट्रीट हॉटेलचे प्रवेशद्वार डॉ.आंबेडकर रस्त्यावर तळ मजल्यावर आहे. प्रवेशाशी उभे राहून हॉटेलकडे पाहिले असता ते दोन मजली भासते. आम्ही ज्या खोलीत राहिलो होतो त्या खोलीत जाण्याकरता स्वागत-कक्षापासून एक मजला खाली जावे लागे. खोलीतील खिडकीतून एक रस्ता दिसे. तो हॉटेलच्या पाठीमागचाच रस्ता होता. मात्र मी त्या रस्त्यावर जाऊन पाहिले तेव्हा आमची खोली दुसर्‍या मजल्यावर दिसत होती. इथे सर्वसाधारणपणे सर्वच घरांचे बांधकाम असेच असे.

अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत चालावी म्हणून जे अनेक उपाय सिक्कीम सरकारने योजलेले आहेत त्यात पुढील इशार्‍याचाही समावेश आहे. "इशाराः जो कुणी झरे आणि नाल्यांमधे केरकचरा आणि बांधकामातील मलबा इत्यादी टाकेल, त्यास रु.५,०००/- दंड किंवा सहा महिनेपर्यंतची कैद अथवा दोन्हीही होऊ शकेल. – हुकुमावरून. शहरी विकास आणि गृहनिर्माण खाते, सिक्कीम सरकार." असा सज्जड दम भरल्यावरही असले अपराध करणारे अजिबात नव्हतेच असे नाही. तरीही त्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात आटोक्यात होते असे गान्तोक शहरात पायी फिरत असता, जागोजागी जाणवत होते.

तसेच गान्तोकमधे कुठल्याही दुकानाला "दोकान" म्हणत असत. आम्ही आपले दोन कान असलेला हा कुठला प्राणी बुवा? म्हणून दुकानाला दोकान म्हणण्याच्या प्रथेची जाता-येता टिंगल करत होतो. तरीही आमच्या नागपुरी संस्कृतीत अगदी चपखल बसणारा पानाचा ठेला, गान्तोकमधेही आपला रुतबा राखून असल्याचे पाहून उगाचच काहीतरी ओळख लागल्याचा आनंद झाला. एरव्ही मुंबईत राहायला लागल्यापासून (त्यालाही आता सुमारे तीस वर्षांचा काल लोटला आहे) परंपरागत प्रकारचा पानाचा ठेला क्वचितच आढळत असे. गुटखा, खर्रा, चिंगमवालेच जास्त. नागपूरला मात्र काळाचा मुलाहिजा राखणारे नाव असणारे ठेले, कालानुरूप अवश्य पाहायला मिळतात. ज्यावेळी बोफोर्स तोफांतील गैरव्यवहार उघडकीस आलेले होते त्या काळात मला नागपुरात माझ्या घराकडेच "बोफोर्स" नामक पानाचा ठेला असल्याचा शोध लागला होता.

अशा डोंगर-उतारांवर वसलेल्या गान्तोक शहरात, मोठी सपाट अशी जाग मिळणे प्रायः दुरापास्त होते. तरीही ज्या काही मोजक्या जागी अशी प्रशस्त ठिकाणे सापडतात, त्या आहेत महात्मा गांधी मार्ग, पाल्जोर स्टेडियम आणि बुद्ध मठ. सुदैवाने या तिन्ही जागा व्यवस्थित पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. आमच्या हॉटेलपासून पंधरा-वीस मिनिटांच्या पायी चालण्याच्या अंतरावर महात्मा गांधी मार्ग असल्याने तो वारंवार जाऊन नीट पाहता आला. पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने नीट बांधलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर वाहनांना मनाई आहे. वर्षांतले केवळ काही दिवसच स्वच्छ सूर्यप्रकाशात नाहणार्‍या गान्तोक शहरात, कोवळे पिवळे ऊन पडलेले असल्याने लोक उत्सवी वातावरण असल्यासारखे बाहेर पडलेले असतील, ही आमची अपेक्षा अनपेक्षितरीत्या फोल ठरली. वर डावीकडच्या महात्मा गांधी रोडच्या चित्रात सकाळी ११०० वाजता एकही माणूस प्रकाशचित्रात प्रकटलेला दिसत नाही आहे. मात्र त्या रस्त्याच्या दुभाजकानजीक ठायीठायी ठेवलेल्या बाकड्यांवर फुरसतचंद लोक मजेत बसून विहार करत असल्याचे (पक्षी, उन्हे खात असल्याचे) दिसून येत होते. दुकाने मुख्यतः गरम कपड्यांची, प्रकाशचित्रण साहित्याची, पर्यटनविषयक आणि तत्समच दिसत होती.

पाल्जोर स्टेडियम जवळच आमचे हॉटेल सिक्कीम रिट्रिट असल्याने प्रभातफेरी-सायंफेरीत ते चहुबाजूंनी पाहता आले. महात्मा गांधी मार्गाकडून पाल्जोर स्टेडियमकडे येणारा रस्ता पीएस रोड म्हणून ओळखला जातो. याच रस्त्यावर सिक्कीम सरकारची अनेक महत्वाची कार्यालये आहेत. अनेक हॉटेल्स आहेत. याच रस्त्यावरून पाल्जोर स्टेडियमचे अतिशय देखणे विहंगम दृश्य पाहता येते.

रांका बुद्धमठाची जागाही अशीच प्रशस्त सपाट असल्याचे आढळून आले. इथेच आम्हाला लोण्याच्या दिव्यांची पुढील जाहिरात दिसून आली. "लोण्याचे दिवे बुद्धाला, धर्माला आणि संघाला पारंपरिकरीत्या अर्पण करण्यात येतात. जेव्हा आपण लोण्याचे दीप उजळतो तेव्हा आपण आपल्या कृतीचे श्रेय सगळ्याच संवेदनाक्षम जीवांच्या प्रबोधन आणि सौख्याकरता समर्पित करत असतो. प्रत्येक दिव्याची किंमत, लहान=रु.५/-, मध्यम=रु.१०/-, मोठा=रु.१००/-. या सर्व लोण्याच्या दिव्यांच्या विक्रितून मिळणारा पैसा मठाच्या इंधन आणि अन्नविषयक गरजांच्या पूर्ततेकरता वापरला जातो."

रांका बुद्धमठ अतिशय भव्य आहे. सोबत विस्तृत ओवर्‍यांचे निवासी संकुलही आहे. मठाच्या मुख्य दालनात शेकडो विद्यार्थ्यांच्या उभ्या-आडव्या ओळींतून बसण्याची सुरेख आसनव्यवस्था आहे. दोन्ही बाजूस पुरूषभर उंचीचे आडवे ढोल ठेवलेले आहेत. बुद्धमूर्ती तसेच गुरू पद्मसंभव (गौतम बुद्धाचे परम शिष्य, ज्यांनी तिबेटमधे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.) म्हणजेच रिंपोचे यांची मूर्तीही, सुवर्णवर्णी असून समोर दिवे उजळलेले असतात. अतिशय स्वच्छ, टापटीपीचे आणि पवित्र वातावरण इथे निर्माण केलेले आहे. मठाच्या आवारात अनेक फिरते दंडगोल भिंतीलगत लावलेले आहेत. पुण्यसंचयाकरता, गुरू पद्मसंभव यांचे नामस्मरण करून ते फिरवावेत अशी प्रथा आहे. गुरू पद्मसंभव यांची एक गोष्टही दरम्यान माहीत झाली. ती अशी.

गुरू पद्मसंभव, ल्हासा (तत्कालीन तिबेटची राजधानी) इथे जात असता उत्तर सिक्कीम जिल्यातील तिस्ता नदीच्या मुळाशी एक सरोवर होते, तिथवर पोहोचले. ते सरोवर त्या काळी वर्षाचे बाराही महिने कायमच गोठलेले असे. स्थानिक लोकांनी पद्मसंभव यांना आपली ही व्यथा सांगितली, की जवळच पाण्याचा इतका प्रचंड साठा असूनही पिण्याला पाणी मिळत नाही. त्यावर पद्मसंभव यांनी सरोवरास चरणस्पर्श केला. आणि काय आश्चर्य, त्या सरोवराचे वितळून, पाण्यात रुपांतर झाले. त्यानंतर ते सरोवर कधीही, अगदी हिवाळ्यातही, गोठेनासे झाले. त्या सरोवरास गुरू पद्मसंभव यांचे नावावरूनच हल्ली ’गुरूडोंगमार’ म्हणतात. नामची ही दक्षिण सिक्कीमची राजधानी आहे. भुतिया भाषेत "नाम" म्हणजे "आकाश" आणि "ची" म्हणजे "उंच". म्हणून नामची म्हणजे "उंच आकाश". नामची येथे सिक्कीमचे तारणहार रिंपोचे, यांची ३६ मीटर (१२० फूट) उंचीची जगातील सर्वात भव्य मूर्ती आहे. गुरूडोंगमार अथवा नामची या दोन्हीही ठिकाणी आम्ही गेलेलो नाही. मात्र, गुरू पद्मसंभव यांच्या उचित उल्लेखाविना सिक्कीम सहलीचे वर्णन संपन्न होणार नाही म्हणून हे लिहीत आहे. गुरू पद्मसंभव यांचे हे चित्रही महाजालावरूनच साभार घेतले आहे.

सिक्कीम सरकारने निर्माण केलेला बनझांकरी (म्हणजे शुद्ध मराठीत वनाची झलक दाखवणारा) कृत्रिम धबधबा आणि सोबतचे सर्वच उद्यान सौर ऊर्जेवर संचालित आहे. इथे ऊर्जेच्या सर्वच स्वरूपांची, त्यांच्यातील परस्पर विनिमयांची आणि तत्संबंधी अनेक विषयांची माहिती, शालेय मुलांना नीट समजून घेता येईल अशा प्रात्यक्षिकांद्वारे व्यवस्थित उलगडून दाखवलेली आहे. मनोरंजक प्रयोगांद्वारे, खेळण्यांद्वारे विविध प्रकारच्या ऊर्जांतरणांची माहिती उद्बोधक रीतीने उघडपणे मांडून दाखवलेली आहे.

उदाहरणार्थ वरील चित्रातील घसरगुंडी पाहा. तिच्या घसरत्या भागावर एक फिरता पट्टा बसवलेला असून, तो पुढल्या भागाच्या तळाकडून पाठीमागे शिडीच्या सर्वोच्च भागाखालून पुन्हा वर पोहोचतो. आपण घसरू लागलो की पट्टा फिरू लागतो. पट्टा बारकेसे ऊर्जानिर्मिती संयंत्र चालवतो. त्यात निर्माण होणारी विद्युत-ऊर्जा एक ध्वनीफीत चालवते, ज्यामुळे आपल्याला संगीत ऐकू येऊ लागते. दुसर्‍या चित्राततील आडव्या डब्यात पिवळ्या खांबांकडे तोंड करून त्या दोन खांबांच्यामधे डब्यात उभे राहायचे. मग पुढे चालत जाण्याचा प्रयत्न केला की सगळा डबाच घड्याळाच्या दिशेने गतीमान होतो. त्या चक्राकार गतीचाच उपयोग विद्युत-ऊर्जा निर्मितीकरता करून घेतलेला आहे. त्या ऊर्जेवर मग संगीत ऐकू येऊ लागते. माणसाच्या ऊरातून निर्माण होणारे चैतन्य (ऊर+जा=ऊर्जा) प्रथम यांत्रिकी हालचालीत, मग विद्युत-ऊर्जेत आणि तत्पश्चात ध्वनीरूपात आपल्याला संगीत ऐकवू लागते तेव्हा आपल्या (पक्षी, मुलांच्या) ऊर्जाविषयक जाणीवा किती झपाट्याने समृद्ध होत जातात ते तिथे प्रत्यक्षच अनुभवायला मिळाले म्हणून एरव्ही अविश्वसनीयच वाटले असते. इनक्रेडिबल इंडिया!

नंतर आम्ही गान्तोक रज्जूमार्गावरून शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनुभव घेतला. सोबतचे चित्र शहरातील रस्त्यांची रचना स्पष्टपणे दाखवत आहे.

एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. जेवण झाल्यावर नामग्याल इंस्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजी आणि तिथला बुद्धमठ पाहण्यासाठी गेलो. चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर ल्हासामधून अगणित निर्वासित सिक्कीममधे आले. त्यांचे पुनर्वसन आणि तिबेटमधील कला व परंपरांच्या जोपासनेकरता या संस्थेची स्थापना झालेली आहे. इथे एक तिबेटी हस्तलिखितांचे भव्य ग्रंथालयही बघता आले.

तिथून मग आम्ही सिक्कीमच्या हस्तकला संग्रहालयात गेलो. इथे चित्रणास मनाई असल्याने चित्रे नाहीत. मात्र तिथला बाहेरचा परिसरही खूपच रम्य असल्याने त्या परिसराचे अनेक फोटो काढलेले आहेत. हातमागावर लोकरी वस्त्रे विणण्याचे तसेच लाकडावर कोरीव काम करण्याचे प्रशिक्षणही तिथे दिले जात होते. तेही पाहता आले. त्यानंतर आम्ही गणेशटोक या टेकडीवरील गणपतीस गेलो. तिथे गणपतीची आरती भरपूर उत्साहाने म्हटली. सर्वात शेवटी गान्तोक पुष्पप्रदर्शनास गेलो. ऑर्किडच्या फुलांचे एवढे रम्य प्रदर्शन मी आजवर पाहिलेले नव्हते. मन प्रसन्न झाले.

पुष्पप्रदर्शनादरम्यान आणखी एक आठवण जागी झाली ती म्हणजे हिरव्या निवडुंगी पर्णकमळांची. दार्जिलिंग ते कॉलिम्पाँग प्रवास झाल्यावर आम्ही एका निवडुंगाच्या बागेत गेलो. उत्तम-उत्तम निवडुंगांनी आणि त्यांच्या इवल्या-इवल्या नयनमनोहर फुलांनी मन प्रसन्न झाले. ही निवडुंगी पर्णकमले ऊन-सावलीच्या खेळात किती रम्य दिसत होती ते सांगून समजणे अवघडच आहे. समजले तर कदाचित शेजारच्या चित्रावरून समजून घेता येईल.


गान्तोक-३: नातू ला – ऐकत्या कानांची खिंड

नातू-ला च्या वाटेवर नागमोडी वळणांनी ४,००० फुटांचा चढ चढत आम्ही त्साम्गो तलावाजवळ येऊन पोहोचलो. त्साम्गो तलावाजवळचे सर्व वातावरणच भारलेले होते. कायम अभ्राच्छादित आकाशातून जरासा सूर्य डोकावला की, क्षणात निळ्या आकाशाची सावली तळ्यात पडून, पृष्ठभागावर चकचकीत निळसर आरसा प्रसन्नपणे चमकू लागे. तशातच डोंगराच्या दोन सोंडांच्यामधून आकाशातून उतरून, ढगच तलावात शिरू पाहत. वातावरणात आर्द्रता इतकी भरून राहिलेली असे की, जरासे वारे सुटले तर शून्य अंश सेल्शिअसच्या आसपासच्या त्या तापमानात, कापरे भरू लागे. आभाळ ढगाळले की लगेच थंडी दाटून येई. "घडी में तोळा, घडी में मासा" अशा प्रकारचे क्षणोक्षणी रंग बदलणारे आकाश, क्षणोक्षणी संग बदलणारे वातावरण आणि कमालीच्या स्वच्छ, आरस्पानी पाण्यावर उमटणारी छाया-प्रकाशाची क्षणचित्रे या सगळ्यांमुळे त्या सरोवराचे सान्निध्य केवळ गूढरम्य बनून राहिले होते. तळ्यापारच्या डोंगरावरचे काळे बर्फ त्या डोंगरांवर नक्षी काढून पहुडलेले होते.

तिथून पुढे निघाल्यावर, लष्कराच्या शिबिराजवळ एके ठिकाणी ’मेरा भारत महान’ आणि ’हम ही जीतेंगे’ या दोन देशभक्तीपर घोषणा रोमन लिपीत, काळ्या बर्फात कोरून ठेवलेल्या दिसल्या. "काळा बर्फ" म्हणजे काळ्या रंगाचा बर्फ नव्हे, तर नेहमीसारखा पांढराच. मात्र, वर्षानुवर्षे सतत साखळून राहिलेला असल्याने सहजी वितळत नाही, आणि प्रखर उन्हातही तळपत राहतो, तो बर्फ. नंतर एका कमानीपर्यंत आमच्या वाहनाने आम्हाला आणून सोडले. वाहन खाली वाहनतळावर रवाना झाले. गाडीतून उतरलो काय अन्‌ अंगभर थंडी दाटून आली. सर्वात प्रथम भावना झाली ती एक नंबरची. गरजेची निकड पुरवणारी सुविधाही जवळच उपलब्ध करून ठेवलेली दिसली. जरा मोकळे झाल्यावर इतरत्र पाहण्याचे भान आले.

ही कमान म्हणजे नातू-ला नाही. ही आहे तिथपर्यंत पोहोचण्याच्या वाटेवरची सर्वात खालची कमान. समोरच्या कमानीपासून साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतर पायर्‍या चढून वर जायचे होते. मगच आम्हाला परंपरागतपणे अव्याहत वापरात असलेल्या आंतरदेशीय पुरातन रेशीममार्गावरचे महाद्वार पाहायला मिळणार होते. चीनसोबतच्या आपल्या सीमेवरचे प्रवेशद्वार आम्ही पाहू शकणार होतो. आम्ही तर बूट, पायमोजे, जीन्स, शर्ट, जॅकेट, हातमोजे, कानटोपी इत्यादी नखशिखांत जामानिमा केलेला असूनही काकडत होतो. तापमान उणे चार अंश सेल्शस होते. सूर्य ढगांचे कवाड किलकिले करून पाहत होता. त्याच्या त्या दृष्टिक्षेपाने हुरूप येऊन आम्ही कमानीतून अग्रसर झालो.

उत्साहात चढत होतो. किती पायर्‍या झाल्या मोजल्या नाहीत. मात्र लवकरच आम्ही त्या टेकडीच्या वरच्या टोकावर उभे असल्याचे आमच्या लक्षात आले. समोरच्या बाजूला एक काटेरी तारेचे कुंपण होते. पलीकडे लाल रंगाच्या पक्क्या इमारतीवरला लाल तारा, ती इमारत चिनी असल्याचे घोषित करत होता. अलीकडे पत्र्याच्या छताचे एक घरच आपला इमला होते. दोहोंच्या दरम्यान कुंपणा-अलीकडे आम्ही उभे होतो.

या फोटोत आम्ही उभे आहोत त्या अवस्थेत, आमच्या उजव्या हाताला नातू-ला होती. तिचे दृश्य खालच्या फोटोतल्याप्रमाणे दिसे. खिंडीच्या पलीकडच्या डोंगरावर एक चिनी सैनिकसुद्धा दिसला होता. खिंडीवरच्या पाटीवर "Nathu La Business Channel for China-India Border Trade" असे लाल अक्षरांत लिहीलेले होते. आम्ही त्साम्गो सरोवरापासून नातू-ला पर्यंत आलो त्या मार्गावर सुमारे अर्ध्या रस्त्यातच शेरेथाँग ट्रेड मार्ट या नावाने आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे बांधकाम जोरात सुरू होते.

हल्ली नातू-ला स भेट देण्याकरता, बुधवार, गुरूवार, शनिवार व रविवार या चार दिवसांतच पर्यटकांना अनुमती देतात. तो दिवस, बुधवार दिनांक २४-०३-२०१०, रामनवमीचा दिवस होता. रामजन्माची –दुपारी बाराची- वेळ होती. आम्ही सगळ्यांनी मिळून "भारत माता की जय", "जय हिंद" अशा प्रकारच्या घोषणा त्रिवार केल्या आणि रामजन्म साजरा केला.

“नातू-ला म्हणजे ऐकत्या कानांची खिंड”. रेशीममार्गावरून देशोदेशींचे प्रवासी जात. आपापल्या देशांतील बित्तंबातम्यांची चर्चा ते खिंडीतून जातांना करत असावेत. त्या गप्पा खिंडीला ऐकू येत असाव्यात म्हणूनच स्थानिकांनी त्या खिंडीला “ऐकत्या कानांची खिंड किंवा नातू-ला” असे नाव दिले असावे असे वाटले. नातू-ला सोडून मग आमची वाहने बाबा हरभजनसिंग यांच्या मंदिराकडे वळली. कॅप्टन “बाबा” हरभजनसिंग (३ ऑगस्ट १९४१ ते ४ ऑक्टोंबर १९६८) भारतीय लष्करातील एक अधिकारी होते. ते नातू-ला वर तैनात होते. कामावर असतांना ते एका हिमनदीत गाडले गेले. तीन दिवस शोधाशोध झाल्यावर त्यांनीच शोधकर्त्यांना घटनास्थानापर्यंत आणून सोडले. ते त्यांच्या एका सहकार्‍याच्या स्वप्नात आले आणि त्यास तिथे समाधी बांधण्याची सूचना केली.

पुढे अनेक भारतीय सैनिकांना कठीण वातावरणांच्या परिस्थितीत त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले अशा दंतकथा आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधलेले आहे. इथे नातू-ला भेटीच्या स्मरणार्थ निर्मिलेल्या कित्येक चित्ताकर्षक भेटवस्तू (पाकिटे, पिशव्या, किल्लीच्या साखळ्या, नाणी, हातमोजे, पायमोजे, उनी कपडे, जाकिटे) एका दुकानात अतिशय माफक किंमतीत विक्रीस उपलब्ध आहेत. इथल्या वस्तूंचा दर्जा चांगला होता आणि वस्तूंच्या किंमती आम्हाला इतर अनेक ठिकाणांपेक्षा चांगल्या वाटल्या.

अशा वातावरणात आमची सुमो मग परत त्साम्गो तळ्याच्या पाळीवर येऊन थांबली. लगेचच दोनचार याक व त्यांचे मालक अवतीभवती जमा झाले. आम्हालाही याक बघण्याची, त्यावर स्वार होण्याची, स्वार होऊन फोटो काढवून घेण्याची हौस होतीच. मात्र, ज्याच्या दर्शनानेही घाबरायला व्हावे, असल्या याकांवर, केवळ त्यांच्या मालकांच्या भरोशावर आम्ही खुशाल सवार होत होतो, हेच मला मोठे आश्चर्य वाटत होते. याक हा प्राणी दिसायला जेवढा गबाळा वाटे तेवढाच असायलाही होता. नाक दाबूनच स्वार व्हावे लागत असल्याने, प्रत्येकाला उतरण्याची सुद्धा घाईच होती. तरीही, कुठल्याही याकाने बंडखोरी केली नाही. जराही अवखळपणा न करता आपापल्या मालकांना इमाने-इतबारे उपजीविका मिळवून दिली. सक्खी पोरेही मायबापांच्या इतक्या वचनांत असलेली मी पाहिलेली नाहीत. धन्य ते याक आणि धन्य ते त्यांचे मालक. कदाचित शीतकालीन हाल-अपेष्टांचा मुकाबला परस्पर सहकार्याने करतांना याक व त्यांचे मालक परस्परांच्या गरजांना आणि सामर्थ्यांना जास्त चांगल्या प्रकारे समजावून घेऊ लागले असावेत.

यानंतर आम्ही एका पडावावर थांबलो. तिथे या वाटेवर वाहने चालवणार्‍या सर्व वाहनांचे चालक राहतात असे एक गाव होते. चालक कठीण पर्वतीय प्रदेशात, अवघड वातावरणात वाहने चालवून थकलेले असतात, ते गावात येताच विश्रांती घेतात. प्रवाशांनाही सोबत आणलेले खाद्यपदार्थ आस्वादण्याइतका थकवा आलेला असतोच. शिवाय छोट्यामोठ्या दुकानांच्या ओळीच्या ओळी इथे स्वागतास सज्ज असतात."मोमो-म्हणजे तांबड्या भोपळ्यासारख्या दिसणार्‍या स्क्वॅश नामक फळाची भाजी भरलेले उकडलेले वा तळलेले मोदक अथवा करंज्या", "थुपका-म्हणजे नुडल्स", "सूप्स-म्हणजे तरतर्‍हेची सारे" इत्यादी स्थानिक चवदार पदार्थांनी क्षुधाशांतीच्या साधनेस हुरूप आला. जंतर-मंतर (प्रसाधनसुविधेस सचिन ट्रॅव्हल्सच्या सहलींमधे प्रचलित असलेले नाव) थांबाही मिळाला. असे म्हणतात की निसर्ग मेहेरबान असेल तरच नातू-ला ची सहल निर्विघ्न पार पडू शकते. त्याचे प्रत्यंतर इथे पोहोचताच आम्हाला आले. अचानकच धो धो पाऊस पडू लागला. आम्हीही लगेच कल्पना करू लागलो की हाच पाऊस जर नातू-ला वर असतांना पडत असता तर वाहनातून पाय-उतार होण्याचीही हिंमत आम्हाला झाली नसती.

गान्तोक ते न्यू जल पैगुडी प्रवास

सकाळी ०९०० वाजता नास्ता झाल्यावर, ११३०० ला सिलिगुडीकडे प्रयाण करण्यापूर्वी, दोन तास वेळ उपलब्ध होता. आम्ही तत्परतेने महात्मा गांधी मार्गावर एक प्रभातफेरी मारून आलो. केरकचरा आणि पानाच्या पिचकार्‍या विरहित क्षेत्र (लिटर अँड स्पिट फ़्री झोन), अशी पाटी दिमाखाने मिरवत महात्मा गांधीपथ आमचे सहर्ष स्वागत करत होता. खरेदीचा हुरूप काही केल्या मावळत नव्हता. पर्यटक आता परतीच्या प्रवासास लागतांना स्मरणभेटींच्या खरेदीत गुंतलेले होते. तरीही लवकर हॉटेलवर पोहोचून सामानाची आवराआवर करणेही गरजेचे होते. तीन दिवस सतत गान्तोकमधेच राहत असल्याने जवळपास सारेच सामान बाहेर काढले गेलेले होते.

सामानाची बांधाबांध झाली. आमची बस पाल्जोर स्टेडियमसमोरच्या मोकळ्या पटांगणात उभी असल्याचे वृत्त समजले. मग प्रवासी आणि सामान सार्‍यांचीच हॉटेलच्या मागेच असलेल्या पाल्जोर स्टेडियमसमोर उचलबांगडी झाली. सामान टपावर चढले. तर प्रवासी बसमधे. परस्परांच्या संपर्क-पत्त्यांची देवाणघेवाण सुरू झाली. संपन्न झाली. गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आणि बस सिलिगुडीच्या दिशेने मार्ग आक्रमू लागली. सुमारे दोन तासात जवळजवळ तीस किलोमीटरचे अंतर कापून रँग्पो इथे पोहोचलो. आमच्यासोबतच्या जर्मन नागरिकांच्या “ईनर लाईन परमिट”चे सोपस्कार सांभाळण्याकरता थोडे थांबलो आणि मग पुन्हा प्रवास सुरू झाला.

रँग्पोहून आम्ही निघालो तेव्हा कॉलिंपॉन्ग ३५, दार्जिलिंग ५८, सिलिगुडी ७७, तर न्यू-जल-पैगुडी ९१ किमी अंतरांवर होते. तिस्ता नदीवरला सिक्कीम-पश्चिम बंगाल सीमेवरला पूल ओलांडला आणि मग आम्हाला लागले दार्जिलिंग-गोर्खा-हिल-कौन्सिलचे “चित्रे वे-साईड इन्न रिव्हर राफ्टिंग सेंटर”. इथेच आम्ही जेवलो. दार्जिलिंगहून जेव्हा सिक्कीमला निघालो होतो तेव्हा इथेच, आकाश भरून आल्याने व पाऊस पडू लागल्याने, आमच्यातील बहुसंख्य लोकांनी तराफातरणाच्या आमच्या कार्यक्रमास फाटा देण्यास प्राधान्य दिलेले होते. तेव्हा, वेळ असूनही आम्ही पावसाच्या भीतीने तराफातरण करू शकलो नव्हतो. आता तर रात्री आठची दार्जिलिंग मेल न्यू-जल-पैगुडीस जाऊन पकडायची असल्याने, गाठीस वेळच नव्हता. येनकेनप्रकारेण तराफातरणाची संधी हुकली होती. ते शल्य मनात धरूनच इथून काढता पाय घेतला.

रँग्पो ते सिलीगुडी अंतर हा त्या मानाने सपाटीवरला प्रवास. या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा शाल्व (साल- ज्याच्या खोडाच्या लाकडाचा उपयोग लोहमार्गाखाली आधार देण्याकरता करतात, स्लीपर्स म्हणून) वृक्षांची लागवड दिसून आली. हिरवा गार लंबवर्तुळाकृती डौलदार पर्णविस्तार आणि काळसर बुंधा (खोड) यांनी नटलेली उंचच उंच झाडे सर्वदूर लावलेली होती. नजर पोहोचेस्तोवर चारही बाजूंना साल वृक्षच दिसत होते. पुढे साल लाकडाच्या भव्य वखारी आणि आगरेही नजरेस पडली. सालाचे कठीण लाकूड किंमती असते आणि त्याचे उत्पादनही ४,००० ते ६,००० फुटावरच्या निम्न-हिमालयन पठारांवरच होऊ शकते. त्यामुळे, रँग्पो ते सिलिगुडी प्रवासात सालाची कृत्रिम अरण्ये दृष्टीस पडणे हा केवळ योगायोगच नव्हता, तर या भौगोलिक कारणांमुळे तसे घडणारच होते.

शिवाय, आता आम्ही बव्हंशी पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून सपाटीवरून प्रवास करत होतो, त्यामुळे ज्यांना बस लागत होती, तेही आता स्थिरस्थावर झालेले होते. संध्याकाळच्या सुमारास आम्ही हॉटेल सेंट्रल प्लाझा, सिलिगुडी इथे येऊन पोहोचलो. चहापाणी झाले. गाडीत खाण्याकरता डबाही भरून घेतला. उगाचच दोन तास आधी तिथे पोहोचून काय करायचे म्हणून गमतीजमती करत तिथेच थोडा वेळ घालवला. मग बस निघाली आमच्या शेवटल्या टप्प्यातल्या प्रवासास. सिलिगुडी ते न्यू-जल-पैगुडी. अंतर जेमतेम १५ किमी. तेही सपाटीवरचे. फार फार तर अर्ध्या तासात पार करू.

पण ते व्हायचे नव्हते. बस बंद पडली. आम्ही प्रत्येकच जण, सिलिगुडीला उगाचच वेळ घालवत बसलो, म्हणून हळहळू लागलो. इथे किमान इतर वाहने आसपास दिसत होती. रिक्षा-टॅक्सी करूनच शेवटी न्यू-जल-पैगुडी गाठावे लागणार अशी रंगत दिसू लागली. पर्यटनादरम्यान उत्साहाने केलेल्या खरेदीचा भार आम्हाला अकारणच जाणवू लागला.

चक्रधर महाशयांना पेट्रोलटाकीत कचरा अडकला असल्याचा शोध लागला. यथावकाश तंत्रज्ञ हाती लागला. बिघाड दुरूस्त झाला. सार्‍या बसने सुटकेचा निश्वास टाकला. आम्ही पुन्हा एकदा न्यू-जल-पैगुडीच्या मार्गावर अग्रसर झालो. रिंकू बाबा की जय, असे म्हणून प्रवाशांनी चक्रधराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, त्यात आताच्या त्याच्या कर्तबाचा भाग फारसा नसून, ज्या अवघड वाटेवरून त्याने आम्हाला पर्वतीय प्रदेशातून सहिसलामत फिरवून आणले होते, त्या सुरक्षित सफरीचाच भाग अधिक होता.

 भारतीय वनस्पती उद्यान:-

इथला पसंतीचा दर्शनसमय सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणताही आहे. मोबाईल फोनचित्रकास प्रकाशचित्रण शुल्कही नाही, इतर स्थिर आणि चल-चित्रकांस मात्र ते लागू आहे. जवळचे रेल्वेस्थानक हावरा आहे तर जवळचे मेट्रो स्थानक एस्प्लनेड. इथे श्यामबाजार, राजाबाजार आणि धरमतल पासून ६१, ६१अ, ६२ या सीटीसीच्या बसेसमधून पोहोचता येते. बघायला किमान ४५ मिनिटे वेळ तरी हवाच. वनस्पतीशास्त्रातील अभ्यासकांना मात्र कितीही वेळ असला तरी पुरेसा ठरेल अशी खात्री देता येणार नाही.

ईस्ट इंडिया कंपनीने लेफ्टनंट कर्नल रॉबर्ट यांना, इंग्रज अधिकार्‍यां करता निसर्गाच्या सान्निध्यात विहाराचे स्थान निर्माण करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ६ जुलै १७८६ रोजी हे काम पूर्णत्वास नेले. तेव्हाच आशियातील या सर्वात मोठ्या वनस्पती उद्यानाचा जन्म झाला. मग चहासारख्या नकदी पिकाचा इथे चीनमधून प्रवेश झाला. पुढे इथूनच चहा दार्जिलिंग आणि आसामात गेला. आज चहा भारतभर चवीने चाखला जातो.  कलकत्त्यातील हुगळी नदीच्या किनार्‍या वरील या उद्यानात "विशाल वट" नावाने विख्यात असलेला जगातील सर्वात विस्तीर्ण छत्रछाया असलेला प्रचंड वड उभा आहे.

तो अंदाजे २०० ते २५० वर्षे वयाचा असावा. त्याच्या मूळ खोडाची परिमिती १.७ मीटर होती आणि जमिनीपासूनची उंची १५.७ मीटर होती. १८८४ आणि १८८६ सालच्या वादळांमधे त्याच्या प्रमुख फांद्या क्षतिग्रस्त होऊन त्यास बुरशी लागली. १९२५ साली वीज पडून या वृक्षाचा मध्यभाग जळाला, कीडग्रस्त झाला, म्हणून इतर भाग वाचवण्याकरता तो कापून टाकण्यात आला. या घटनेपूर्वी विशालवट, वरील प्रकाशचित्रात दिसत आहे तसाच दिसत असे.

त्यानंतर तो एखादा वृक्ष भासण्याऐवजी वृक्षवसाहतीच्या स्वरूपात राहू लागला. त्याच्या परिमितीवर एक ३३० मीटर लांबीचा डांबरी रस्ता बनवण्यात आला. मात्र वृक्ष त्याच्या बाहेरही विस्तार पावतच आहे. आज त्याची छत्रछाया १४,५०० वर्ग मीटर किंवा १.५ हेक्टर अथवा ४ एकर इतकी विशाल आहे. आज त्याची परिमिती १ किलोमीटर इतकी असून सर्वात उंच फांदी २५ मीटर उंच आहे. त्यास, आज २,८८० अंतरिक्ष मुळे (पारंब्या) आहेत, जी जमिनीपर्यंत पोहोचलेली आहेत.

गेल्या दोनशे वर्षांपासून हे उद्यान, दक्षिण आशियातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे वनस्पती उद्यान, तसेच वनस्पती आणि उपवन संशोधनातील भारतातील प्रमुख संस्था राहिलेले आहे.

येथील प्रेक्षणीयता आणि सुंदरता, तसेच हिरवळ; जगभरातून वर्षभर येत राहणार्‍या लाखो पर्यटकांकरता प्रशिक्षण, संशोधन आणि विहारार्थ एक प्रेरणास्त्रोतच बनून राहिलेली आहे. हुगळी (गंगा) नदीच्या पश्चिम तीरावरील २७३ एकर जागेत हे पसरलेले आहे. १८७२ मधे सर जॉर्ज किंग यांनी संकल्पित केलेले हे उद्यान कृत्रिम तळी आणि भूमिगत नलिकांनी जोडलेल्या जलाशयांमुळे जगभरातील सर्वोत्तम वनस्पती उद्यान मानले जाते. पूर्वी यास ईस्ट इंडिया कंपनीचे उद्यान किंवा "कंपनी-बागान" म्हणत, पुढे कलकत्ता-उद्यान म्हणू लागले, मग याचेच नामकरण रॉयल-वनस्पती-उद्यान असे करण्यात आले, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० मधे यास भारतीय-वनस्पती-उद्यान नाव दिले गेले. १ जानेवारी १९६३ पासून ते भारतीय वनस्पती सर्वेक्षण या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे.

येथे १,४०० जातींची १२,००० झाडेझुडुपे, शिवाय हजारो औषधी वनस्पती यांची खुल्या २५ विभागांत, हरितगृहांत आणि संधारणागृहांत लागवड करण्यात येते. ही बाग; बांबू, बोगनवेली, संत्रलिंबूवर्गातील झाडे, मोगरा, पाणवनस्पती, कमळे आणि नारळाच्या १०९ जातीच्या संग्रहार्थ विख्यात आहे. हा संग्रह दक्षिण आशियातील सर्वात मोठा संग्रह मानला जातो. याशिवाय जास्वंदे, सुगंधी वनस्पती, वेली, सावलीतील वनस्पती, फुलझाडे आणि इतर वनस्पती इथे सांभाळल्या जातात. औषधी वनस्पतींच्या विभागास "चरक उद्यान" असे नाव आहे. या बागेतील नाव घेण्याजोग्या वनस्पती म्हणजे फांद्यांचा नारळ, ब्रेडफ्रूट ट्री, दुहेरी नारळ, भव्य कमळे, शिवलिंग वृक्ष इत्यादी आहेत. याव्यतिरिक्त इथे वनस्पतींची ओळख, गुणन, औषधी उपयोग आणि संधारण याबाबतीत संशोधनही केले जाते.

आम्ही हाजरारोडवरच्या महाराष्ट्रनिवासात उतरलेलो असल्याने तिथपासून भारतीय-वनस्पती-उद्यानात जाणे, तासभर थांबणे आणि परत येणे याकरता रुपये ५०० देऊन पाच जणांकरता एक टॅक्सी करून गेलेलो होतो. दुपारी १२ च्या सुमारास तिथल्या एका दरवाजाशी पोहोचलो. मात्र टॅक्सीचालकाने त्या दरवाजाशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने मुख्य दरवाजापर्यंत नेले. याकरता आणखी दहा मिनिटांचा तरी अतिरिक्त वळसा पडला. तिथे पोहोचलो. कॅमेर्‍यांची तिकिटे काढली आणि अपुराच वेळ हाताशी असल्याने झपाट्याने विशालवटाकडे कूच करू लागलो. मार्गात जागोजागी दिशादर्शक पाट्या होत्या. तरीही १० मिनिटे झाली, पंधरा मिनिटे झाली, ३० मिनिटे झाली आम्ही आपले चालतोच आहोत. विशालवट तर नजरेच्या टप्प्यातही दिसत नव्हता.

एवढा थोर जगप्रसिद्ध वृक्ष, पण त्यास ’कुठे बरं शोधावा’ अशा चिंतेत पडलेले आम्ही, अशी काहीशी विपर्यस्त स्थिती निर्माण झालेली होती. तेवढ्यात काही शब्द मराठीत बोललेले ऐकू आले. मग त्यांनाच विचारले ’काहो हा विशालवट कुठे आहे?’ ते म्हणाले, “अहो, आम्हाला काय विचारता, आम्ही पण गेल्या पंधरा मिनिटांपासून त्याच्याच तर शोधात आहोत.” दरम्यान आम्हाला विलोभनीय तळी आणि विस्तीर्ण बागा बघायला मिळाल्या.

या सार्‍या वनाउपवनांचा काय फायदा, हे सांगणारा सुंदरलाल बहुगुणां यांचा एक नाराही दिसला. त्यात म्हटले होते की:

क्या है जंगल के उपकार?
मिट्टी, पानी और बयार ।
मिट्टी, पानी और बयार,
जिन्दा रहने के आधार॥

बयार म्हणजे हवा. ती सुद्धा आपल्याला जंगलांचीच भेट असते. तेव्हा जंगले ही हवीतच. असा मनोमन पटणारा हा संदेश आम्ही मनात रुजवला.

अशाप्रकारे सुमारे ४५ मिनिटे चालल्यावर अचानकच तो दिसला. सकृतदर्शनी भव्य वाटावे असे त्यात खरोखरच काही दिसले नाही. मात्र उपलब्ध माहितीनुरूपच तो विशाल होता. ३३० मीटर परिमितीच्या वर्तुळाकार डांबरी सडकेने वेष्टीत होता. जेव्हा आम्ही त्या रस्त्यावरून जाऊ लागलो तेव्हा त्याच्या विस्ताराची पुरेशी कल्पना येऊ लागली. सडकेच्या वर्तुळाबाहेरही शाखा वाढून, त्याबाहेरही पारंब्यांनी धरलेली मुळे जागोजाग खोडात रुपांतरित झालेली दिसत होती. एखाद्या थोर व्यक्तीला भेटतांना मन भरून यावे तसेच माझे मन त्या विशालवटास भेट देत असता भरून आले होते.

परतताना पुन्हा ४५ मिनिटांची पदयात्रा करण्याची उमेद आणि वेळ आमच्याकडे नव्हता. तेवढ्यात एक सायकल रिक्षा बागेत दिसला. सारेच पर्यटक तो आपल्याला मिळेल का या दृष्टीने चाचपणी करू लागले. त्याने कुणालाच आत घेतले नाही. मात्र जवळच बागेचे एक दुसरे दार असल्याचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्या दाराचे नाव स्थानिक भाषेत “बोकुलताल बायसेंटेनरी गेट” म्हणजेच मराठीत “बकुळ-तळ्या-जवळील द्विशताब्दीस्मारक दरवाजा”. या दरवाजासमोरच पेट्रोलपंप असल्याची खूणही समजली. अक्षरशः ५ मिनिटांतच आम्ही तिथवर पोहोचलोसुद्धा. मग लक्षात आले की आम्ही इथूनच तर गेलो होतो सुरवातीला. आता तर तिथे वाहनेही उभी दिसत होती. आम्ही वाहनचालकास तिथे बोलावून घेतले आणि आमच्या भारतीय-वनस्पती-उद्यानाच्या फेरफटक्याचे समापन केले.

या सार्‍यातून बोध घ्यायचा तो असा, की ज्या पर्यटकास संपूर्ण भारतीय-वनस्पती-उद्यानात रुची असण्यापेक्षा, विशालवटाचे दर्शन उण्यापुर्‍या तासाभरात उरकायचे असेल, त्याने “बोकुलताल बायसेंटेनरी गेट” वरच उतरून दर्शन घ्यावे. दुसरे असे की, आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी असा तो महाकाय वृक्ष आहे. अशा या महावृक्षाची वाढही या इथेच शक्य आहे. केवळ गंगेच्या मुखाजवळच्या म्हणजेच हुगळीच्या किनार्‍यावर. कलकत्त्यास. म्हणूनच धन्य तो विशालवट. धन्य हुगळीतीर. आणि धन्य कोलकाता.

अशा रीतीने आमच्या सिक्कीम सहलीची ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होत आहे. आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...