Saturday, October 24, 2020

मसाईमारा

 मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान...

( या मालिके मधील पुढचा भाग....

मसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव

नैरोबी एअरपोर्टला उतरल्यावर मसाईमाराला (Masai Mara) पोहोचेपर्यंत दुपारचे ४-४.१५ उजाडले. आमच्या गाईडच्या सांगण्यावरून मग आम्ही हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करणे, फ्रेश होणे याऐवजी संध्याकाळची पार्क राउंड घ्यायचा पर्याय स्विकारला .
त्यामुळे साहजिकच आम्हांला आमच्या "मारा सिंबा" जंगल लॉजमध्ये प्रवेश करायला रात्र उजाडली.
त्या रात्रीच्या जंगल लॉजचे पहिले दर्शन...

प्रचि ०१ : रिसेप्शन कडे जाणारा पाथ वे......

प्रचि ०२ : लॉजच्या वेगवेगळ्या भागात जाणारे व्हरांडे...

त्या काळी मसाई माराच्या सभोवताली बरीच हॉटेल्स असली तरी प्रत्यक्ष जंगलाच्या अंतर्भागाच्या भोवतालच्या वापर क्षेत्रात फक्त ३ जंगल लॉजेस होती. जंगल लॉज ह्या संकल्पनेत हॉटेल बांधताना त्यातील जास्तीत जास्त बांधकाम हे स्थानिक नैसर्गिक वस्तूंचा वापर करून बांधलेले असावे लागते. हे हि लॉज त्याला अपवाद नव्हते. बांबू, लाकडाचे बुंधे, लाकडी फळ्य़ा, सुतळी दोरा ह्यांचा वापर कठडे, Lamp Post, भिंती याच्यासाठी केलेला वरच्या प्रचिं मध्ये दिसतोच आहे.
ह्या वातावरणातलं आख्खं जंगल लॉज बघण्याची खरं तर खूप उत्सुकता असायला हवी होती, पण आदल्या दिवसाची ऑफिसची शेवटच्या दिवसाची कामं आटपायची घाईगडबड, Last Minute Packing, विमानतळ गाठणे, रात्रीचा विमानप्रवास आणि दिवसभराची दगदग ह्यामुळे आम्ही जेवून झाल्यावर रुम मध्ये जाऊन पाठ टेकणेच पसंत केले. आणि त्यातही दुसऱ्या दिवशी सकाळची ५.४५ ची पार्क राउंड आमची वाट पहात होतीच. त्यामुळे आमचं लॉज आणि त्याचा परिसर बघायला त्या रात्री तरी सवड आणि इच्छाशक्ती नव्हती.
दुसऱ्या दिवशीच्या पार्क राउंडसाठी अलार्म लावला तरी उत्सुकतेने अलार्मच्या आधीच जाग आली. प्रातर्विधी आणि आन्हिक आटपूनही ५/७ मिनिटे बाकी होती म्हणून आमच्या रुमच्या बाल्कनीत डोकावलो.
बाल्कनीमधून आमच्या जंगल लॉजला कवेत घेणारी मारा नदीची लहानशी उपनदी "तालेक" वहात होती. अचानक काठाजवळच्या पाण्यात खळबळ माजली आणि त्यातून पहाता पहाता ही घोरपड काठावर आली.

प्रचि ०३ : Nile Monitor......

या नव्या शोधा मध्ये रमायला फुरसत नव्हती कारण पार्क राउंडसाठी वेळेत पोहोचायचे होते. पण ह्या सकाळच्या पार्क राउंडनंतर परत आल्यावर वाट पहात होता एक निवांत ब्रेकफास्ट........ आणि संध्याकाळच्या ४.०० च्या पार्क राउंडपर्यंतचा फुरसते -ए -आलम....
ब्रेकफास्ट झाल्यावर आम्हाला आमचे मारा सिंबा जंगल लॉज explore करायची संधी मिळाली.
आमचे जंगल लॉज आजूबाजूची अधे मधे येणारी झाडे तोडायची नसल्यामुळे त्याच्या आजूबाजूने इतस्ततः पसरलेले होते.
जरा प्रशस्त जागा मिळाली की गवताने शाकारलेले उतरतं छप्पर मिरवणारा अधांतरी Dining Area, त्याला लाकडी बुंध्याचा कठडा आणि अशा विविध छोट्या मोठ्या Dining Area ला जोडणारे लाकडीच कठड्याचे Passages…

प्रचि ०४ :

प्रचि ०५ : लाकडी फळ्यांची जमीन असलेल्या नदीकाठच्या Dining Area चे जवळून दर्शन.....

प्रचि ०६ : नदी आणि निसर्गाच्या सानिद्ध्यातला लाकडाच्याच कैचीवर अधांतरी बसवलेला Dining Area चा कोपरा....

प्रचि ०७ : संपूर्ण जंगल लॉजच्या परिसराला कवेत घेऊन वहाणारी तालेक नदी.....

प्रचि ०८ : तालेक नदी....

प्रचि ०९ : त्या नदीमधले आमचे प्रेमळ, निवांत शेजारी....

प्रचि १० : आणि त्यांच्या खेळकर, प्रेमळ मारामाऱ्या.....


प्रचि ११ : नदीच्या पावसाळ्यातल्या वाढणाऱ्या पातळीनुसार उंचावर बांधलेला Dining Area
(परिसरातल्या प्राण्यांना नदीकडे जाताना येताना त्रास होऊ नये आणि माणसं आणि त्यांनी बांधलेल्या इमारती, Structures ह्या प्राण्यांच्या मधे मधे येऊ नयेत म्हणून हे लाकडी खांबावर बांधकाम करण्याचे प्रयोजन)...

ब्रेकफास्ट नंतर हे सगळ निवांतपणे बघत रमत गमत आम्ही आमच्या खोलीकडे निघालो कारण काल रात्री अंधारामुळे आणि दमल्यामुळे हे काही पहाताच आलं नव्हतं.

प्रचि १२ : जागेवरच्या चढ उतारांमध्ये बदल न करता त्यानुसार वेगवेगळ्या पातळ्यांकडे जाणारे पायऱ्या-पायऱ्यांचे चढ उताराचे Passages...

हे संपूर्ण जंगल लॉज एका Single छताखाली नसून झाडा झाडांमधल्या मोकळ्या जागेतल्या तळ किंवा तळ+१ च्या वेगवेगळ्या हट्स , लॉजेस मध्ये विखुरलेलं होतं.

प्रचि १३ : आमच्या लॉजकडे जाणारा लाकडी पूल...

प्रचि १४ : आमची एकमजली जंगल कुटी (बाहेरून)....

प्रचि १५ : संपूर्ण जंगली लाकडांचा जिना...

प्रचि १६ : जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर केलेली आमची कुटी...

प्रचि १७ : कुठेही भपका नाही, संपत्तीचे, अतिरिक्त वस्तूंच उगाच मांडलेले प्रदर्शन नाही...
एका प्रदेशात असून दुसऱ्या प्रदेशातलं वातावरण डिझाईन करुन वर त्याचा टेंभा मिरवणारा कृत्रिमपणा नाही...
संपूर्ण स्थानिक अनुभूती देणारी, स्थानिक संस्कृतीचा परिचय करून देणारी , संयत डिझाईन असलेली , स्थानिक वस्तूंनी बांधलेली किमान गरज भागवणारी, आरामदायक MINIMALISTIC स्थानिक कुटी....

प्रचि १८: आणि सकाळी जिच्या Potential ची ओझरती झलक दाखवलेली आणि पुढील चार दिवस माझ्या सुख निधानास कारणीभूत ठरलेली नदीकाठची जंगलामधली लाॅग हटची बाल्कनी...

प्रचि १९ : बाल्कनीतून शेजारच्या तळमजली कुटीच्या छपरावरून दिसणारी नदी ,झाडं....

प्रचि २०: बाल्कनीमध्ये गेलो तेव्हा हे महाशय निवांत बसले होते. Velvet Monkey....

ही माकडं आपल्या ईथल्या माकडांसारखीच दिसली तरी ह्या माकडांची खासियत म्हणजे अगदी परीकथेतल्या नीळसर रंगाचे असलेले यांचे वृषण....

प्रचि २१: त्यानंतर जवळच्या झाडावर आलेला Lilac Breasted Roller.....

प्रचि २२ : नदीच्या पाण्यातून समोरच्या फांदीवर येऊन बसलेला खंड्या (Woodland Kingfisher).....

प्रचि २३ : पिवळा Black Headed Oriole.....

प्रचि २४ : नदीतून अधून मधून फेऱ्या मारणारी मगर....

प्रचि २५ : नदीच्या पलीकडच्या काठावरच्या झाडावर बसलेलं Hamerkope पक्षाचं जोडपं....

प्रचि २६ : ह्याच जोडीतला एक पक्षी दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यावर आला तेव्हा....

प्रचि २७ : मध्येच एक निळसर काळा पक्षी नजरेला नजर भिडवून, खुन्नस देऊन गेला. (Rupell's Starling)...

प्रचि २८ : त्याचाच दुसरा जोडीदार....

प्रचि २९ : नंतर तर एक अल्लड , खेळकर पक्षी दोन पायात दोन बारक्या फांद्या पकडून त्यावरून घसरत घसरत आम्हाला बघायला आला....

प्रचि ३० : दुपारी जेवायला restaurant मधे जाताना सामोरा आला मोकळ्यावरती फिरणारा Marabu Stork....

प्रचि ३१ : आम्ही जेवायला जाताना आमच्या पाऊल वाटेवरून पुढे पुढे पळणारे कबुतर..... (Laughing Dove)

पहिल्याच दुपारी जेवताना जवळ जवळ ८० ते १०० मुंगुसांचा कळप , खर तर झुंडच, इकडे तिकडे बघत पण कोणतीही भय भीती न बाळगता, थोड्याश्या उंचावलेल्या restaurant च्या खांबाखालून आणि आजूबाजूच्या मातीच्या जमिनीवरून नदी किनारी गेली. काय नव्हतं त्या कळपात..? नर मादी तर ओळखता आले नाही, पण आइबाबांच्या पायात येणारी, लुडबुडणारी, अंगाला अंग घासणारी क्युट पिल्लं बघून डोळ्याचं पारणं फिटलं.
असं काही घडू शकतं याची कल्पनाच नव्हती म्हणून आमच्यापैकी कोणाकड़ेच Camera सोबत नव्हता.. आमची रूम तिथून 200 मीटर लांब. पण तिथल्या वेटर्स नी सांगितल की काही काळजी करु नका. हा त्यांचा जवळ जवळ रोजचाच परीपाठ आहे पण दुर्दैवाने अशी झुंड नंतरच्या 3 दिवसात कधीच बाहेर पडली नाही, निदान आम्ही Dining Area मधे असताना....
शेवटच्या संध्याकाळी मात्र ३/४ मुंगुस गेटच्या जवळ दिसले.
Camera सरसावेपर्यन्त त्यातलं एकच पाठीमागे राहिलं....
पण ते मात्र मुंगुसाच्या त्या Typical Pose मधे..

प्रचि ३२ : (Banded Mongoose)....

आदल्या दिवशीच्या पहाटेच्या अनपेक्षित आणि अवचित अनुभवामुळे पुढचे सर्व दिवस पहाटे लवकर उठून बाल्कनी मधून नदी काठावरची हालचाल टिपणे हा आमचा रोजचाच परीपाठ होऊन गेला.

प्रचि ३३ : पहाटे पहाटे समोरच्या जंगलातून नदीच्या पलिकडल्या काठावर पाणी प्यायला आलेल हरीण...

जंगलामुळे आजुबाजुच्या झाडावर माकडांची, पक्षांची ये-जा असायची तर नदीमुळे नदीच्या पात्रात आणि किनारी पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांची गर्दी आणि पाणपक्षांची चहलपहल..
दुसऱ्या दिवशी सकाळी तर एक मजाच झाली. एक Egyption Goose बदक, बहुतेक बाबा असावेत, ते त्यांच्या ८ पिल्लांना नदीच्या पलिकडल्या काठावरून नदी पात्रातुन पोहत पोहत घेऊन चालले होते..
पोहता पोहता बाबांनी पिल्लांना अलिकडच्या काठाजवळ आणल. तिथे पिल्लांची आई झाडामागे उभी होती.
तिच्या एका क्वॅक नी आठही पिल्लांची पलटण क्षणार्धात दाहीने मूड करून त्यांच्या बाल क्वॅक क्वॅकच्या किलकिलाटात आईकड़े वळली. आणि ज्या आनंदाने, लगबगीने काठावर येत तिच्या कुशीत शिरली. त्यांची ती गळाभेट, तो किलकिलाट, तो आनंद यांनी भारलेले ते अवघे काही क्षण किती दिवस, महीने,वर्ष गेली तरी नक्कीच विसरु शकणार नाही.

प्रचि ३४ :

प्रचि ३५ : या Family चा पुढ़चा प्रवास मात्र पुढ़े बाबा, मागे आई, आणि मधे पिल्लं असा झाला.
हेच कुटुंब मग एरवीही अधून मधून आम्हाला दिसत राहीलं.....

प्रचि ३६ : पाण्यावर येणाऱ्या कोंबड्या.....

Helmeted Guineafowl...

प्रचि ३७ : पाण्यावर आलेला African Sacred Ibis.....

प्रचि ३८ : आणि सोबत Hadada Ibis.....

जर निसर्गप्रेमी असाल तर जंगल लॉज मधले वास्तव्य म्हणजे खरंच एक अद्भुत अनुभव आहे. इथे रुममध्ये टेलीव्हिजन नाही, फोन नाही, बटण दाबून order सोडता येईल अशी व्यवस्था नाही. पण निसर्गाशी एकरूप होणारे डिझाईन, नैसर्गिक झाडांची केलेली जपणूक, नैसर्गिक चढ उतार न बदलता त्या अनुषंगाने केलेले विविध बांधकामाचे नियोजन आणि ह्या सर्वांमध्ये सहजपणे फिरणारे, नदी किनारी येणारे जाणारे प्राणी पक्षी...
ज्या हॉटेलमध्ये आपले शेजारी पाणघोडे, मगरी आणि वरच्या प्रकाशचित्रांमधले प्राणी पक्षी असतील, तर त्यातील वास्तव्य किती सुखकारक, आनंददायक आणि मनावरचा ताण हलके हलके कमी करणार (unwinding) असेल.
सकाळ आणि दुपारच्या पार्क राउंड मध्ये मसाई माराच्या जंगलातले प्राणी, पक्षी बघणं, जंगल लॉजच्या परिसरात तिथल्या प्राण्या-पक्षांचं निर्भयपणे आणि घरच्यासारखे वावरणं पाहणं, Dining Hall च्या कठड्याशेजारी बसून नदीतल्या प्राण्यांच्या क्रीडा पाहणं आणि रुममध्ये गेल्यावर बाल्कनीमध्ये वेताच्या खुर्चीत बैठक मारून किंवा कठड्यावर ओठंगून आजूबाजूच्या झाडावरचे कधी बागडणारे तर कधी निवांत पक्षी पहाणं किंवा बाल वानरांच्या लीला अनुभवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नदी मधल्या आणि तिच्या दोन्ही काठावरच्या प्राण्यापक्षांच जीवन पाहणं ज्यात त्याचं प्रियाराधन आलं, मातापित्यांचं वात्सल्य आलं, बछड्या-पिल्लांचा लडीवाळपणा आला, लुटूपुटुच्या आणि खऱ्याखुऱ्या मारामाऱ्या आल्या, अन्नासाठीचा झगडा आला, जीवाच्या भीतीने आलेली सावधता आली; राग, लोभ, सामर्थ्याचं प्रदर्शन आलं आणि वयोमानानुसार आलेलं निवांतपण अथवा क्षीण झालेल्या शक्तीनुसार आलेली अगतिकता सुद्धा आली.
काय दिलं नाही त्या बाल्कनीने किंवा नदी आणि नदी किनाऱ्यानी ….?

या जगात जे जे नाट्य घडू शकतं ते ते सारं नाट्य तिथे घडत होतं, पूर्वीही घडलं होते आणि या पुढेही घडणार होतं.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा सर्व भावनांचा आविष्कार, त्यामधली विविधता, त्याचं सतत बदलणार वातावरण..... हे "शाश्वत" होतं .
तिथे आनंद मिळाला, सुख लाभलं, समाधान प्राप्त झालं. ताणतणाव निमाले, चिंता-विवंचना, काळज्या विसरल्या गेल्या. माझ "मी" पण कळलं सुद्धा आणि "मी" पण सरलं सुद्धा. आणि ती शाश्वतता हि कळली आणि तेही ५ दिवसांच्या जंगलाच्या, अरण्याच्या वास्तव्यात...

एक MINI वानप्रस्थच म्हणा नं…

म्हणुनच पूर्वी आयुष्य पुरेपूर आणि भरभरून उपभोगल्यावर माणसं आत्मशोधासाठी वानप्रस्थाश्रमात अरण्यात जात असतील कां...?
आजही तो नदीकिनारा, ते जंगल आणि "तीरावरच्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही " अशी संथ वाहणारी "तालेक" माई आठवते..... आणि पुन्हा एकदा साद घालते तिच्या सर्व पशु पक्षांसह...
माझे आनंद निधान असलेल्या ह्याच त्या लॉग हटमधल्या बाल्कनीत येउन बसण्यासाठी ……!!!

lioness

मसाईमारा : बिग फाइव आणि मसाई गांव
(Masai Mara Big 5 And Masai Village)

( या आधीचा भाग : मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान

मसाईमाराला भेट देण्यामागे पर्यटकांची दोन मुख्य आकर्षणं असतात . त्यापैकी एक म्हणजे बिग फाइव.
मसाईमाराच्या जंगलात अनेक प्राणी असतात,दिसतात. पण त्यापैकी हत्ती, सिंह, बिबळ्या, गेंडा, आणि जंगली म्हैस यांना बिग फाइव मानलं जात. हे सर्व प्राणी एका जंगलात, एका सहलीत बघायला मिळतात हे मसाईमाराचे मोठे वैशिष्ट आणि आकर्षणही. आम्हालाही आमच्या सहलीत हे बिग फाइव मुबलक प्रमाणात पाहायला मिळाले .

मुंबईहून रात्रीच्या फ्लाईटने नैरोबीला सकाळी पोहोचल्यावर मारा सिंबा या आमच्या जंगल लॉज मध्ये पोहोचायला आम्हाला दुपारचे ४-४.३० वाजले. पार्क राउंडची वेळ already झालेली होती. ,म्हणून आम्ही लॉजमध्ये check in करण्याऐवजी direct पार्क राउंडलाच गेलो. एक राउंड होता होता आमच्या Driver Cum Guide ने एका गवताळ कुरणाकडे बोट दाखवून एक सिंहीण शिकारीसाठी गवतात दबुन बसल्याचे सांगितले. आम्हाला मात्र पहिली ५ मिनिटे ती सिंहीण काही दिसलीच नाही. नंतर मात्र ती अचानक एका WILDER BEAST वरती झेपावताना दिसली. तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला; पण आमच्या बिग फाइवच्या प्रथम दर्शनाचा ओनामा झाला. मसाईमारा काय चीज आहे त्याची झलकही दिसली. दुर्दैवाने माझ्या कॅमेऱ्याची Bag सर्व सामानाच्या खाली असल्यामुळे मला एकही फोटो काढता आला नाही.
पण ह्या सगळ्याची कसर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळच्या पार्क राउंडमध्ये भरून निघाली. बाहेर पडल्या पडल्या १ले दर्शन झाले ते गवताळ भागातल्या एका खडकावर पसरलेल्या वनराजांचे.

प्रचि १ : कोवळ्या उन्हात अंग शेकणारा वनराज….

प्रचि २ : डोळे मिटून उन्ह खाणारी वनराजांची आणखी एक भावमुद्रा....

प्रचि ३ : सकाळची साफसफाई -०१...

प्रचि ४ : सकाळची साफसफाई – ०२…

प्रचि ५ : बाजूलाच हे आणखी एक राजे निवांत पसरलेले होते...

प्रचि ६ : क्लोज अप ऑफ जखमी शेर...

मसाईमाराच्या सिंहाना मसाई सिंह किंवा पूर्व आफ्रिकन सिंह म्हणून ओळखल जातं. भारतीय सिंहापेक्षा हे वजनाने आणि लांबीने जास्त असतात. ह्यांची आयाळहि जास्त दाट आणि गडद असते. कळपाला स्थैर्य आणि सुरक्षितता देण्यासाठी इतर सिंहाबरोबर लढाया करण्यात सिंहांची जास्त शक्ती खर्च होत असल्यामुळे ह्यांच्यामध्ये शिकारीची प्रमुख जबाबदारी सिंहिणीवर असते. पण सिंहिणीने शिकार केल्यावर शिकार खाण्यासाठी मात्र सिंहच पहिला नंबर लावतात. सिंह हा सामाजिक (Social) प्राणी समजला जातो. कळपाने राहतो आणि शिकारही एकत्र मिळून केली जाते. विशेष म्हणजे सिंहीण आपल्या छाव्यांबरोबरच इतर छाव्यांनाही दुध पाजते.

पुढे गेल्यावर हा एक छोटासा कळप दिसला. त्यात वनराज एकच होते, पण त्यांच्या वनराण्या मात्र तीन तीन होत्या. एवढ्या राण्या असूनही महाराज स्थितप्रज्ञ होते…. कि म्हणूनच स्थितप्रज्ञ होते ते माहिती नाही. Happy ...
हे सर्व जण WILDER BEAST च्या सकाळी कधी तरी केलेल्या शिकारीवर ताव मारून निवांत बसले होते.

प्रचि ०७ : पाऊलवाटेवरच बसलेले वनराज आणि वनराज्ञी...

प्रचि ०८ : वनराज जवळून...

प्रचि ०९ : दुसरी राणी थोडीशी बाजूला गवतामध्ये बसलेली... (हिच्या चेहऱ्यावरचे भाव एवढे आवडले कि त्याचा Cropped Photo मुखपृष्ठ म्हणून वरती दिलेला आहे.)

प्रचि १० : अर्धवट खाल्लेली शिकार (WILDER BEAST )...

प्रचि ११ : तिसरी राणी बिनधास्तपणे सफारी Vehicle च्या जवळून जाताना...

प्रचि १२ : जरावेळाने महाराज उठले. त्या सुसंस्कृत महाराजांनी आमच्याकडे पाठ केली आणि मोकळे झाले...

तिथल्या सिंह सिंहिणीना माणसांची काही पडलेली नसायची. माणस असू देत, गाड्या असू देत, त्यांनी त्यांच्या निवांतपणात, लोळण्यात काही फरक नाही पडायचा. एका सिंहिणीने एकदा आमचा रस्ता cross केला होता; पण तो शिकारीसाठी. पण एक वनराज तर आख्खा कळप एका बाजूला असताना पर्यटकांच्या १५-२० मोठ्या मोठ्या सफारी गाड्यांच्या मधून रस्त्या पलीकडच्या कुरणात उगाचच एक फेरी मारून पुन्हा पहिल्या कुरणात परत आले. जणू आम्ही त्याच्या खिजगणतीतच नव्हतो. आणि नसायचोच...
हे कधी माणसांना बघून बिचकले नाहीत , दचकले नाहीत कि कोणावर गुरगुरलेही नाहीत.. सम्राटही तसेच आणि सम्राज्ञीही तशाच. कसली भय भीती तर नसायचीच. कदाचित त्या निर्भयतेमधून ही स्थिर अवस्था प्राप्त होत असेल.

ध्रुव भट्ट यांच्या "अकुपार" मध्ये आईमांच्या तोंडी एक वाक्य आहे - " स्हावज जाणे , के आ आपडी वैईड नंई" (सिंहाला माहित असते कि हा आपल्या बरोबरीचा नाही)

ह्या वाक्याचा प्रत्यय जागोजागी मसाईमाराला आला होता... (म्हणजे हे पुस्तक मी नंतर वाचलं पण जाणवलं होतं ते हेच , भावना तीच, खुणगाठही तीच)
हे खानदानी जनावर कदाचित म्हणत असेल...
"तुमची माझी काय बरोबरी …. ?
तुमच्यावर गुरकावून हल्ला करून माझाच मान कमी होईल.

प्रचि १३ : थोडे अजून पुढे गेल्यावर झाडाच्या सावलीत बसलेला हा अजून एक सिंह. खोडी केल्यावर आईने रागे भरलेल्या मुलासारखा चेहरा करून बघणारा ……
कि पथ्यामुळे आवडत्या वस्तू खायला न मिळालेले पदार्थ नातू खातोय त्याकडे बघणारा आजोबांचा चेहरा…...?

सकाळची पार्क राउंड संपता संपता आमच्या जंगल लॉजच्या वाटेवर दिसलेला हा हत्तीचा कळप
ह्या मध्ये तीन वेगवेगळ्या वयाची लहान पिल्ले होती.

प्रचि १४ : हत्तींचा कळप...

प्रचि १५ : त्यातला एक मोठा हत्ती...

प्रचि १६ : आणि एका झुड्पाशी झट्या घेणारा त्याहून एक मोठा पाठमोरा हत्ती...

त्यानंतर दुसऱ्या पार्क राउंड मध्ये एकमेकांच्या बाजूला लोळणारी आणि थोडीशी प्रेमात, लाडात आलेली हि सिंहाची जोडी

प्रचि १७ : Camoflaged In Grass...

पुढे जाताना एक हत्तींचा कळप आमचा रस्ता (कि त्यांचा …?) ओलांडून गेला. दोन्ही बाजूनी सफारी गाड्यांची रांग लागलेली.
प्रचि १८ : त्यातल हे एक पिल्लू. नुकतच सुळे फुटायला लागलेलं…

ह्या कळपातला एक महाकाय नर हत्ती

प्रचि १९ : समोरून...

प्रचि २० : पूर्णपणे बाजूनी...

प्रचि २१ : कातरलेल्या कानाचा विस्तार...

भारतीय हत्ती हाच मुळात एक मोठा प्राणी आहे. पण आफ्रिकन हत्ती त्याच्यापेक्षाही उंच, धिप्पाड आणि वजनदार असतो. एवढच नाही तर त्याचे कानही भारतीय हत्ती पेक्षा खूप मोठे असतात. त्यामुळे कान पसरलेला आफ्रिकन हत्ती समोरून पाहिला तर अतिशय भव्य वाटतो...

दुसऱ्या दिवशी आमचा दौरा जंगली म्हशींचा (African Buffalo or Cape Buffalo) कळप आणि गेंडे बघायला बाहेर पडला. रानम्हशींच्या नेहमीच्या ठिकाणी गाईड कम ड्रायव्हरने गाडी नेली. एक अख्खा कळप दिसला ,पण तो कळप खूप अस्वस्थ वाटत होता. आमचा गाईड हि म्हणाला त्यांच काहीतरी बिनसलय म्हणून .
मोठे रेडे आणि म्हशी फळी करून गाडीच्या जवळ येत होत्या. फार जवळ नाही पण हुलकावणी म्हणून. त्यातून त्याचे सूचनावजा हंबरण्याचे आवाज. (Warning Sounds )
फोटो खूप काढले…. पण थरथरत्या हाताने …. एकच फोटो बरा आला तो हा…..

प्रचि २२ : ह्या म्हशींच्या कानाची त्वचा खूप पातळ असते आणि त्यातल्या रक्त् वाहिन्याही. त्यामुळे उष्मा वाढला कि त्यांचे कान लाल दिसतात. कधीकधी हलका रक्तस्त्रावही होतो. त्यांच्या अंगावरच्या त्रासदायक किड्यांना खाणारे पक्षी (ह्या प्रचिमधला Yellow Billed Ox pecker) म्हणजे ह्यांचे मदतगार. म्हणून म्हशींच्या अंगावर त्यांचे नेहमी स्वागतच असते.
हे पक्षी शत्रूची चाहूल लागल्यावर सूचनाही देतात, त्याचाही म्हशींना फायदा होतो (A Perfect Symbiosis)...

आफ्रिकन जंगली म्हैस आपल्या रानगव्यापेक्षा वजनाने कमी असते. पण रानगवा संकोची, लाजाळू, मारामारी टाळण्याकडे कल असलेला आहे तर आफ्रिकन जंगली म्हैस खूपच Aggresive. अतिशय घातकी प्राणी. आफ्रिकेतील अनेक माणसं दरवर्षी मारत असल्यामुळे ह्याला
" The Black Death " किंवा "Widow Maker " असही म्हटलं जातं...

त्यानंतर आम्ही गेलो ते ज्या भागात सर्व साधारणपणे गेंडे दिसतात त्या भागात. त्या दिवशी आणि नंतरही दिसलेल्या गेंड्यांचे काही प्रचि:

प्रचि २३ :

प्रचि २४ :

प्रचि २५ :

प्रचि २६ :

आफ्रिकन आणि भारतीय गेंड्यामधले २ प्रमुख फरक म्हणजे भारतीय गेंडा हा वजनाने जास्त असतो पण त्याला एकच शिंग असते, तर आफ्रिकन गेंडा वजनाने हलका असून त्याला २ शिंगे एका मागोमाग असतात आणि त्यातलं पुढचं शिंग मागच्यापेक्षा जास्त मोठं असत. शिंगाचा तथाकथित औषधी उपयोग आणि त्यामुळे मिळणारी मोठी किंमत हेच त्यांच्या ऱ्हासाचे मोठे कारण आहे. आफ्रिकेत काळ्या गेंड्याप्रमाणेच पांढऱ्या रंगाचेही गेंडे असतात आणि ते जास्त लांब, उंच आणि वजनदार असतात. आमच्या ट्रीपमध्ये आम्हाला मात्र हा पांढरा गेंडा बघायला मिळाला नाही.

आमच्या तिथल्या वास्तव्यात आम्हांला सिंहांनी शिकार करण्याचे तीन प्रयत्न दिसले पण त्यातला एकच प्रसंग आमच्या समोर यशस्वी झाला. आमची गाडी संथगतीने जात असताना डाव्या बाजूने एका सिंहीणिने आमचा रस्ता Cross केला.

प्रचि २७ : रस्ता ओलांडणारी सिंहीण...

प्रचि २८ : त्यानंतर ती आधीच पुढे जाऊन बसलेल्या जोडीदारणीच्या शेजारी बसली...

प्रचि २९ : दोन्ही जोडीदारिणी जवळून...

प्रचि ३० : त्यानंतर त्यातली एक सिंहीण उठून सावजाच्या दिशेने चालायला लागली...

ह्या सर्व प्रकारात तोपर्यंत त्यांना किरकोळ का होईना पण छोट्या झुडपांचा आसरा होता. एका वेळेला एक सिंहीण उठायची. दबकत दबकत चाहूलही लागू न देता थोडं अंतर कापून पुढे जाऊन बसायची. खर तर दबकायची. एक सिंहीण पुढे जाऊन मुरून बसली कि मागची सिंहीण त्याच पद्धतीने पुढे जायची. हळूहळू त्या झुडुपांच्या भागातून पूर्णपणे गवताळ भागात पोहोचल्या.

प्रचि ३१ : गवताळ भागातील सिंहिणीची जोडी...

एकमेकांमधले अंतर वाढवत आणि सावज Cover करत त्या त्यांच्या सावजाजवळ, झेब्र्यापाशी पोहोचल्या. झेब्र्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेली सिंहीण त्याच्या जास्त जवळ पोहोचली होती. ती योग्य ठिकाणी पोहोचल्यावर झेब्र्याच्या तोंडाकडच्या सिंहीणीने अचानक पुढून झेप टाकली. झेब्रा दचकला, उधळता उधळताच वळला आणि हल्ला केलेल्या सिंहीणी पासून दूर पळता पळता पाठीमागच्या सिंहीणीच्या तावडीत सापडला. तिथल्या सिंहीणीने दोन्ही बाजूनी त्याच्या मानेवर पंजे टाकून त्याचा गळा पकडला आणि स्वतःच्या वजनाने आणि पंजाच्या ताकदीने जमिनीवर लोळवला. त्याच्या वर राहिलेल्या पुठठयाकडच्या भागावर प्रथम हल्ला केलेल्या सिंहीणीने झडप घातली आणि त्याला एका कुशीवर कलंडवला. झेब्रा जमिनीवर आडवा झाला. दीड-दोन मिनिटे जागेवरच धडपडला आणि निपचित पडला. तोपर्यंत गळा धरलेल्या सिंहीणीचे तोंड लाल रक्ताने माखलेलं होते.
फक्त आता शिकार होणार म्हटल्यावर आम्ही सर्वानीच कॅमेऱ्यातला MOVIE MODE ON केल्यामुळे ह्या प्रसंगाचे चलत चित्रीकरण आहे पण फोटो नाहित....

पण ह्या बिग फाइव च्या बरोबरीने आणखीन एक लक्षात घ्यायचा महत्त्वाचा घटक म्हणजे या गवताळ प्रदेशात रहाणारी "मसाई माणसं".
जसे हे बिग फाइव इथल्या निसर्गाचा, पर्यावरणाचा घटक तसेच हे स्थानिक आदिवासी मसाई पण त्याच निसर्गाचा, पर्यावरणाचा घटक. ह्या मसाई माराच्या प्रदेशातील प्राण्यांसोबत रहायचं कधी साथीने तर कधी संघर्ष करत; पण संघर्ष करायचा तोही कारणापुरताच…. हे मसाई म्हणजे अतिशय कष्टाळू जमात. पण ह्यांची आमची गाठभेट झाली ती एकदाच. तीही आमच्या हॉटेलच्या माध्यमातून. आमच्या जंगल लॉजच्या बाहेरच थोड्याश्या अंतरावर एक मसाई गाव (Masai Village ) होते. अगदी एकुलते एक गाव. जणू आमच्या entertainment साठी एखादा सेट उभारल्यासारखे. आजूबाजूने कुठेही दुसरे मसाई गांव नाही.
हॉटेलच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आम्ही जवळच असलेल्या त्यांच्या वस्तीपर्यंत गेलो. संपूर्ण वस्तीला काटक्यांचे कुंपण होते. तिथल्या एका माणसाने त्यांच्या मुखियाला बोलून आणलं . त्यांनी त्यांचे charges सांगून त्यात काय काय समाविष्ट आहे त्याची मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये कल्पना दिली.

त्यांच्या सांगण्यानुसार सुरुवातीला ते त्यांचा पारंपारिक नाच दाखवणार, नंतर त्यात आम्हाला सहभागी करून घेणार, त्यानंतर मसाई गावात प्रवेश, त्यांचे राहणीमान, घर बघण्याची संधी, त्यांच्या स्त्रियांचा पारंपारिक नाच, मसाई मुलांचे , गावकऱ्यांचे फोटो काढण्याची संधी आणि त्यांनी हाताने बनवलेल्या वस्तू बघणे, विकत घेणे असा एकंदरीत कार्यक्रम होता. थोड्याफार घासाघाशीनंतर उभयपक्षी रक्कम मान्य झाली. गावामध्ये निरोप गेले आणि भराभर ८/१० मसाई तरुण बाहेर आले. त्यांच्या हातात वेगवेगळ्या आकाराच्या काठ्या होत्या. आणि एकाच्या हातात होतं सिंहाचे डोक्याच्या भागाचे आयाळी सकट कातडं.
आधी त्यांनी त्यांचा पारंपारिक नाच करून दाखवला आणि नंतर आमच्यापैकी एकेकाच्या डोक्यावर ते सिंहशिरचर्म ठेऊन आम्हालाही सामील करून घेतलं .

प्रचि ३२ : सिंहशिरचर्मा सह अस्मादिक...

प्रचि ३३ : मसाई झोपडी -०१...

प्रचि ३४ : मसाई झोपडी-०२...

प्रचि ३५ : झोपडीचा अंतर्भाग...

प्रचि ३६ : घराबाहेरचा छोटा गोठा...

प्रचि ३७ : मसाई मुखिया...

प्रचि ३८ : मसाई मुखियाच्या कानातील अलंकार : फोटो फिल्मची डबी (मुखियाचे फोटो काढण्याच्या बदल्यात त्याला वेगळे अतिरिक्त पैसे द्यावे लागले)...

प्रचि ३९ : मसाई मायलेक...

प्रचि ४०: मसाई मायलेक, पाठमोरे...

प्रचि ४१: मसाई बालक...

प्रचि ४२: मसाई स्त्रिया आणि तरुणी - पारंपारिक नाचापूर्वी...

प्रचि ४३: मसाई स्त्रिया पारंपारिक नाच...

प्रचि ४४ : गावातला सार्वजनिक गोठा (इथे सर्व गुरं रात्री एकत्र करतात आणि ३/४ तरूण तिथे त्यांच्या रखवालीसाठी थांबतात)...

प्रचि ४५ : मसाई कुटिरोद्योग : प्राण्यांची हाडं , शिंग, दात आणि लाकूड यापासून
बनवलेल्या वस्तू ...

प्रचि ४६ : मसाई ग्रामोद्योग...

हे सर्व मसाई काटक, चिवट, सडपातळ,उंच आणि चकचकीत काळ्या वर्णाचे. अगदी गोरा वर्ण शरमावा असा लख्ख काळा वर्ण, अंगावर रंगीबेरंगी भडक कपडे, हातात काठी, अंगावर, गळ्यात प्राण्यांच्या हाडांचे, दातांचे , शिंगाचे, मण्यांचे दागिने, माळा. आणि कायम हसतमुख...

हे सर्व बघितलं पण सर्व गोष्टी का कोणास ठाऊक बेगडी, कृत्रिम वाटल्या. एखाद्या Presentation सारख्या, दिखाऊ, आणि वरवरच्या. मुळात ते गाव नांदत वाटायच्या ऐवजी सेट उभारल्यासारख वाटलं. असं वाटलं कि हे सर्व कलाकार आहेत. दिवसा येतात, कलेची किंमत सांगतात, किंमत नक्की करतात आणि कला दाखवतात . संध्याकाळी निघून जातात आपापल्या घरी. रात्री गाव ओसाड होत असावं. कोणी राहातच नसेल.
हॉटेलची युक्ती : त्यांच्या Tourist ना एक Attraction देण्याची
आणि पर्यटकांची हौस : Authentic Massai Village बघण्याची.
निव्वळ व्यवहार....

त्यामुळे Authentic मसाई माणसं बघितली तरी ती सर्वसाधारण कल्पना येण्याइतपतच. आणि तसही ज्या गोष्टी, एखादी जमात, तिच्या परंपरा, त्यांची संस्कृती हे कळायला काही वर्षे घालवायला पाहिजेत ते एका भेटीस, तेही २ तासांच्या हे कसं शक्य आहे ?
त्यामुळे जेवढ दाखवलं तेवढं बघितलं आणि जितकं दिसलं तितकं कळलं असं म्हणायचं... वास्तवाचा आभास म्हणा ना…..

ह्या मसाई जमाती सारखाच बिग फाइव मधला चपळ, काटक आणि शिकारी प्राणी म्हणजे बिबळ्या (African Leopard)

जसे सिंह, हत्ती मुबलक दिसतात तसा हा नाही. मुळात सिंह आणि हत्तींना शत्रू फार कमी. जवळ जवळ नाहीच. परत हे कळपाने रहातात आणि कळपाचे सामर्थ्य मोठं. म्हणून हे उघड्यावर असतात. कायम दिसतात आणि मुबलक ही दिसतात. रानम्हशीही कळपाने राहणाऱ्या. सर्वत्र नाही पण कुठे कुठे त्यांच्या विशिष्ट area त नक्की दिसणार, तेही कळपांनी. गेंडा एकांडा शिलेदार, कधी कधी जोडीने फिरणारे, पण ह्यालाही शत्रू कमी. त्यामुळे बिनधास्त फिरणार आणि दिवसाही दिसणार. संख्या कमी पण तरीही एका विशिष्ट क्षेत्रात आम्हाला ४ वेगवेगळे गेंडे दिसले.

पण बिबळ्या एकांडा शिलेदार. शत्रू चिक्कार त्यामुळे बिचकून रहाणारा आणि लपून छपून वावरणारा. ह्यांची संख्याही कमी त्यामुळे क्वचितच दिसणारा Big 5 मधला मेंबर. दिसणं म्हणजे पर्वणीही आणि नशिबही.
आमच्या नशिबाने मसाई मारा ला प्रवेश केल्यावर हॉटेलचे check in हि करायच्या आधी घेतलेल्या संध्याकाळच्या पार्क राउंड मध्ये याचे अस्पष्ट दर्शन झाले. मसाईमाराला प्रवेश केल्याच्या पहिल्याच संध्याकाळी एका झाडाखाली ४/५ जिप्स थांबलेल्या दिसल्या. आपल्याकडच्या पारंपारिक सवयीनुसार थांबून जिथे गर्दी पहात होती तिथे म्हणजे झाडावर पहायला सुरवात केली... नेहमीप्रमाणेच आधी काहीच दिसल नाही...
तरीपण गर्दीवर विश्वास ठेवून बघायचा वसा काही सोडला नाही...
आणि मग थोड्याच वेळात फांदीवर उठून उभ्या राहिलेल्या आणि झाडाच्या पाना फांद्या मधे कॅमाॅफ्लॅज झालेल्या चलाख, चपळ, उमद्या जनावराचे दर्शन झाले...

प्रचि ४७ : African Leopard...

बिबळ्याने त्याच फांदीवर पुढे आणून ठेवलेल्या हरणाचे Kill पण दिसले...

प्रचि ४८ :

अंधार पडल्यामुळे आम्हाला निघायला लागले पण "झाडावर ठेवलेली शिकार झाडावरच खाणारा बिबळ्या" पहायची दुर्मीळ संधी दवडायची नाही म्हणून सकाळ संध्याकाळच्या सफारी राउंड्सच्या सुरवातीला आणि शेवटी त्या झाडापाशी जायचा परिपाठ आम्ही चालूच ठेवला..
पण दर्शन काही झाले नाही..
दोन दिवस (४ राउंड्स) झाले. ३ र्‍या दिवसाचा सकाळचा ५ वा राउंड पण निराशाजनक ठरला...
पण मारा नदीवरून संध्याकाळी परत येताना मात्र बिबळ्या महाराज पावले...
परिपाठाप्रमाणे बिबळ्याच्या झाडापाशी आलो तर तो हरणाचे KILL एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हलवत होता...

प्रचि ४९ : KILL वरच्या फांदीवर योग्य जागी नेऊन ठेवताना...

सुदैवाने आमच्या शिवाय एकही गाडी आसमंतात नव्हती... त्यामुळे लोकांचा कोलाहल नाही, अधीर, अत्युत्सुक हालचाली नाहीत की चांगल्या जागेसाठी वसवस नाही...
सारं कस निवांत... इथे झाडाखाली आम्ही निवांत, तिथे झाडावर बिबळ्या निवांत.. आणि हरिण कशाच्याही पलीकडे निवांत... जन्मल्यापासून जगण्यासाठी त्याची चाललेली धडपडच संपलेली..
प्रचि ५० :

Candle Light Dinner खुप खास असतं... पण त्याही पलीकडचं हे Sun Set Dinner पहायला मिळालं त्याला तोड नाही. ३०-३५ फुट उंचावर गर्द झाडाच्या फांदीवर नेऊन ठेवलेले भक्ष मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर शांतपणे खाणारा बिबळ्या.

प्रचि ५१: अर्थात मधेच त्याने एकदा आमच्या नजरेला नजर देऊन पाहिलेही...

त्याला कोणी वाटेकरी नाहीत.. म्हणून कसली घाईही नाही. खाली फक्त आमची व्हॅन.. त्याच्या हिशोबाने किरकोळीत असलेले आम्ही ४ मित्र आणि आमच्याहून जास्त प्राणीप्रेमी स्थानिक गाईड. त्याला कुठेही Disturb न करता आम्ही तो भोजन सोहोळा डोळे भरून पहात होतो..... एक जीव गेला होता.. तर एका जीवाची आजची सोय झाली होती...
आनंद होत होता... की दु:ख होत होतं.... की दोन्हीही... माहित नाही...
पण निसर्ग नियम मात्र पक्का होत होता. आतून कळत होता..

प्रचि ५२ :

उन्हं झपाट्याने उतरत होती. सूर्य अस्ताचलाला चालला होता. संपूर्ण घटनेने आमचा ताबाच घेतला होता. हे अदभूत दृष्य, हा दुर्मिळ प्रसंग आम्ही भारावून जाऊन पहात होतो. निस्तब्ध... नि:शब्द....
आख्ख्या वातावरणाने मोहिनीमंत्र घालून आमची नजरबंदीच केली होती...
पण मग आमचा गाईड भानावर आला.. पार्क राउंड्सची वेळ संपत आली होती.. मग आम्ही नाइलाजाने निघालो...
पण ते गारुड मनावर बाळगत... ज्याचा अमीट ठसा आजही मनावर जसाच्या तसा आहे....

आज आकाश निरभ्र होते. (आदल्या दिवशीच पाऊस पडला होता.) लॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि अजून एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं ; मसाईमारातला सूर्यास्त .
सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात. विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.

प्रचि ५३ : मसाईमारा - निळा सूर्यास्त

आता आपल्याकडे होणाऱ्या प्रत्येक केशरी सूर्यास्तानंतर हि मसाईमाराची " नीलसंध्या " आठवतेच असे नाही, पण शहरापासून दूर असताना किंवा मावळत्या संध्याकाळी एखाद्या वाहनामधून प्रवास चालू असताना संध्याप्रकाश कमीकमी व्हायला लागला आणि अंधार पडू लागला कि मात्र गाडीच्या तालावर आणि वाढत्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर ही मसाईमारामधली "कृष्णसंध्या "मनात प्रवेश करते...
तिच्या Big Five सह, आभासी का होईना पण वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या त्या मसाई लोकांसह, त्यांच्या त्या खेड्यासह … आणि मग आठवते त्यांच्याशी निगडित एकेक घटना आणि एकेक थरार.... अगदी लख्खपणे….
आणि साद घालते…. हा सर्व थरार पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी …

 

मुखपृष्ठ :

सन २०१० च्या मे महिन्यातील एक आळसावलेली दुपार होती. बायकोने त्या दिवशी डबा न दिल्याने ऑफीस समोरच्या हॉटेलमधे आनंदाने पोटपूजा करून ऑफिस बिल्डिंगजवळ आलो तर फुटपाथवरून माझा एक वकील मित्र माझ्याच दिशेने चालत येत होता. त्याला विचारलं , काय इकडे कुठे….? तर वकील असल्याने "तुझ्याचकडे" असे हजरजबाबी पण असत्य उत्तर देऊन मोकळा झाला. (खरं तर कोर्टाच्या सुट्ट्यांमुळे तो घरीच होता आणि त्याच्या बायकोने आमच्या खाऊ गल्लीत त्याला आइसक्रीम आणायला पिटाळले होते).
म्हटले चल ऑफिसला. ऑफिसमध्ये गेल्यावर गप्पा झाल्या त्यात सध्या दोघांनाही बऱ्यापैकी मोकळा वेळ असल्याचं एकमेकांना कळलं. मग विषय निघाला कुठेतरी फिरायला जायचा. आणि ठरवलं यावेळी परदेशी कुठेतरी जाऊ. पण नेहमीची घिसीपिटी ठिकाणं नको असंही ठरलं. मग आम्ही स्वतःलाच आणि एकमेकांना विचारलं , " कुठे जावंसं वाटतंय.....?"

मी म्हणालो, अरे नेहमी मी Animal Planet पहातो, तर तसे प्राणी पक्षी दिसतील अशा एखाद्या ठिकाणी जाऊ या का ? say मसाईमारा…?

झालं, एकमताने ठिकाण ठरलं. मग आमच्या इतरही २ समव्यसनी मित्रांना कल्पना दिली. ती आवडून मान्य झाली. मग मसाईमाराला जायचा योग्य सीझन वगैरे माहिती तपासणे सुरु झालं. हवामान गुगलवर तपासलं. जुलै मध्ये जगातील नैसर्गिक नविन ७ आश्चर्यापैकी एक म्हणजे मसाईमाराचे सुप्रसिद्ध स्थलांतर (Migration) असतं आणि या सीझनमध्ये हवाही छान असते आणि पाऊसही कमी असतो, असही कळलं. आणि एक केनियन शिलिंग फक्त ८० पैशात मिळत होता ही तर फारच छान बाब होती.

वकील मित्राचे एक अशील काही कामानिमित्त गेली ३ वर्षे नैरोबीला स्थायिक होते, त्यांची बुकिंग आणि इतर माहितीसाठी मदत घ्यायचे ठरलं. त्यांनीही खुशीने आणि तत्परतेने होकार दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार एकाच देशातल्या किंवा वेगवेगळ्या जवळच्या देशातल्या सारख्याच ३, ४ अभयारण्यात फिरण्यापेक्षा मसाईमारातच संपूर्ण काळ काढायचे ठरलं.
त्यामुळे अंतर्गत प्रवास, परत परत पॅकिंग- अनपॅकिंगचे उपद्व्याप वाचले आणि एकाच हॉटेलमध्ये मुक्काम वाढल्यामुळे डीलही चांगलं मिळालं.

आम्ही ५ दिवस मसाईमारा आणि २ दिवस नैरोबीला रहाणार होतो. त्या हिशोबाने हॉटेल बुकिंग, जंगल लॉज बुकिंग, जंगल सफारी बुकिंग आणि फ्लाईट बुकिंग करून झाली.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केनयात जाण्यापूर्वी किमान १० दिवस आधी पिवळ्या तापाची (Yellow Fever) लस टोचून घ्यावी लागते. कारण बऱ्याच जणांना लस टोचल्यावर अंग दुखणारा बारीक ताप येतो. आमच्यापैकी एक सोडून बाकी कोणाला ताप मात्र आला नाही. ही लस त्याकाळी मुंबईत २/३ च ठिकाणी टोचून मिळत असे आणि अत्यंत मर्यादित उत्पादन / आवक यामुळे त्यासाठी नंबर लागणं हाही एक अवघड, वेळखाऊ आणि नशिबाचा भाग असे.
सुदैवाने हे सर्व सोपस्कार वेळेत पार पाडून आम्ही बाकी तयारी केली आणि जुलै मधल्या एका रात्री आम्ही केनयाला जाण्यासाठी मुंबई एअरपोर्ट कडे घरातून प्रस्थान केले.

मुंबई एअरपोर्टवरून केनिया एअरवेजने ६ तासांचा प्रवास करून आम्ही जोमो केन्याटा एअरपोर्टवर उतरलो. केनया टाईम भारतीय वेळेपेक्षा २.५० तासांनी मागे आहे.
केनयामध्ये व्हिसा ON ARRIVAL मिळतो. ते सोपस्कार पार पाडून आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो.
तिथे आमचा काळा कुळकुळीत, धिप्पाड पण हसतमुख, हसऱ्या चेहऱ्याचा स्थानिक गाईड व्हॅन घेऊन उभा होता. आमचे सर्व सामान व्हॅनच्या मागच्या डिकीत टाकून (ज्यात दुर्दैवाने आमच्या कॅमेऱ्याच्या बॅग्ज सर्वात खाली गेल्या) प्रवासाला सुरुवात केली. गरज म्हणून एका दुकानातून ४ सिम कार्ड्स घेतली आणि पुढे निघालो.

नैरोबी (Also called as "Green City in the Sun") हे तसे खूप छान , स्वच्छ नीटनेटके शहर आहे. ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६००० फूट आहे. त्यामुळे Hill Station च म्हणायला हवे.
हवा अतिशय सुंदर आणि वर्षभर तापमान जास्तीत जास्त average २४ ° त कमीत कमी average ११ ° या रेंजमध्ये.
सुन्दर रस्ते, रस्त्याच्या कडेला उंच झाडे, फुटपाथचा त्या त्या बंगल्याच्या, घराच्या, इमारतीच्या पुढचा भाग त्यांना हिरवाई राखण्यासाठी (Greenary maintain) आंदण दिलेला. आणि प्रत्येकाचे अतिशय प्रामाणिक, सुन्दर आणि हरित प्रयत्न....
म्हणूनच नैरोबी शहर दिसायला अतिशय छान दिसते. शहरभर कायम हिरवाई, रंगीबेरंगी फुललेली फुले आणि चहा, कॉफीचे मळे.

नैरोबी एअरपोर्ट ते मारा सिंबा लॉज, मसाईमारा रिझर्व्ह हे साधारण २६५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी एअरपोर्ट ते माई महिऊ नाका (Mai Mahiu Junction) हे अंतर साधारण ७५ किमी आहे आणि रस्ता अत्यंत सुरेख आहे.
इथून एक रस्ता नारोक (Narok) कडे वळतो. नाक्यापासून नारोक पर्यंतचे अंतर ९० किमी आहे आणि रस्ता बरा आहे. पण नारोक पासून मारा सिंबा लॉज पर्यंतचा १०० किमीचा रस्ता अत्यंत खराब खड्डयांनी भरलेला, हाडं खिळखिळी करणारा आणि ब्रह्मांड आठवायला लावणारा आहे.
त्यामुळे सकाळी उत्साहात निघालेले आम्ही वीर जे सुरुवातीला खूप खुशीत होतो, वाटेतल्या सुग्रास जेवणानंतर ती खुशी अधिकच वाढली होती आणि नंतर जरा वेळातच लागलेल्या खड्डयांनंतर आपण कुठल्या जन्मीची पापं फेडतोय ह्या विचाराप्रत आलो होतो.
सुदैवाने आम्ही ५.३०/६.०० तासाच्या प्रवासानंतर आमच्या लॉजच्या बाहेर पोहचलो, पण आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार जर आता check in केलं तर त्यात वाया जाणाऱ्या वेळामुळे संध्याकाळची पार्क राऊंड शक्य होणार नाही तर आपण डायरेक्ट पार्क राऊंडला जाणं योग्य ठरेल. आम्ही त्याचे ऐकले आणि ती पहिली पार्क राऊंड पूर्ण करून लॉजवर आलो .

प्रचि ०१ : मारा सिंबा लॉजच्या प्रवेश द्वारापाशीचा माहिती फलक...

आमच्या त्या सुंदर मारा सिंबा लॉजचे वर्णन
" मसाईमारा - भाग ०१ : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान " यामध्ये आलेलं आहे.
आणि मसाईमाराची एक खासियत म्हणजे बिग ५ ह्याचे वर्णन
" मसाईमारा - भाग ०२ : बिग फाईव्ह आणि मसाई गांव " यामध्ये आलेलं आहे.

भाग ०३ रा लिहिण्याच्या प्रतिक्षेत आहे.

पण हे सर्व बिग फाईव्ह, स्थलांतर (Migration), मारा नदीच्या वाटेवरचे प्राणी, जंगल लॉज परिसरातील प्राणी ,पक्षी या व्यतिरिक्त मसाईमाराला काय बघितल ह्यांची यादी काढली तर ती ही भली मोठी निघाली.
बिग फाईव्ह, मायग्रेशन ही मुख्य आकर्षणे सोडली तरी उरले सुरले मसाईमारा किती सुंदर आहे याची कल्पना तुम्हांला पुढील प्रचिंवरून येऊ शकेल.

प्रचि २ : मसाईमारातील एक ढगाळ सूर्योदय...

प्रचि ३ : सूर्योदय...

प्रचि ४: Rupell's Vulture : गृध दंपती...

पहिल्या सकाळी जीप मधून निघाल्यावर कुरणामधल्या वाटेवरच्या एका मध्यम उंचीच्या झाडावर Rupell's Vulture चे जोडपे दिसले.

नंतर कळलं, फक्त जोडपच नाही, एक पिल्लू पण आहे.

प्रचि ५: Rupell's Vulture : आई बाबा आणि पिल्लू...

आई आणि बाबा स्वस्थचित्त होते तर पिल्लू अतिशय चौकस...
डोळे कुतुहलाने भरलेले आणि नुकतचं जन्माला आल्यामुळे जे काही जग त्याच्या आजूबाजूला पसरलं होतं त्याचा वेध घेणारी उत्सुक नजर आणि त्यासाठी मानेच्या चपळ आणि थोड्याश्या वेंधळ्या आणि म्हणूनच मजेदार हालचाली.

या जगातील वाईटाचा अनुभव नाही, दुष्टाव्याची जाण नाही आणि म्हणूनच भयभीतीचा लवलेश नाही.
आणि असेलच कसा, कारण त्याच्या साठी (दृष्टिने) एका अंगाला अख्ख्या जगातलं सारं वात्सल्यं एकवटलेली आई आणि दुस-य्या बाजूला जगातील सर्वात सामर्थ्यवान गोष्ट म्हणजे त्याचे बाबा.....

पिल्लाच्या कुतुहलापोटीच्या सतत हालचालीमुळे काढ़ायला अतिशय अवघड गेलेला हा फोटो..

प्रचि ६ : Common or Burchell's Zebra (Also Called : Plains Zebra)

कोवळ्या उन्हात अंग शेकणारा Common Zebra . मसाईमारात झेब्र्यांचे दोन प्रकार असतात. एक हा, जो संख्येने जास्त प्रमाणात असतो. तर दुसरा Gravy's Zebra.

प्रचि ७ : पाठमोरे झेब्रे...

प्रचि ८ : उन्हं खाणारा अजून एक पाठमोरा झेब्रा...

अतिशय तुकतुकीत त्वचा हे यांच वैशिष्ट्य उन्हात अजूनच खुलून आलेलं.

केनयामध्ये Masai Giraffe , Reticulated Giraffe आणि Rothschild Giraffe असे ३ प्रकारचे जिराफ आढळत असले तरी मसाई माराला प्राबल्य मात्र मसाई जिराफांचेच.

प्रचि ९ : मसाईमारा जिराफ : ०१

मसाईमाराला जिराफाचं पहिलं दर्शन झालं ते पाठमोऱ्या स्वरूपात.
तेही एकाएकी एका झाडामागून वर केलेल्या पाठमोऱ्या मानेचं...

प्रचि १० : मसाईमारा जिराफ : ०२

नंतर कुरणात चरणारे, फिरणारे खूप जिराफ पाहिले, हा त्यापैकीच एक...

प्रचि ११ : मसाईमारा जिराफ : ०३

हा मात्र झुडुपाआडून कुतूहलाने आमच्याकडे बघणारा जिराफ...

प्रचि १२ : अकॅशिआ झाड...

ही झाडं म्हणजे मसाईमाराच्या कुरणातलं एक वैशिष्ट्य. सर्वसाधारणपणे ही झाडं सुटया सुटया स्वरूपात बऱ्यापैकी अंतर राखून दृष्टीपथास पडतात. ह्या झाडांचा हा छत्रीसारखा वैशिट्यपूर्ण आकार मात्र हत्ती आणि जिराफांनी त्यांच्या उंचीनुसार खाल्लेल्या फांद्या, पानांमुळे झालेला आहे.

प्रचि १३ : कोणत्या वाटेने जाऊ….? जाऊ कि नको…..?

हे संभ्रमात पडलेले हरीण म्हणजे Thomson's Gazell. ह्याला पळताना उंच उडया मारायची सवय असते.

प्रचि १४ : कारुण्यमय डोळे. . . .

तीन-चार Thomson's Gazells चरत असताना आमची जीप त्यांच्या जवळून गेली. बाकीची Gazells पळून गेली. पण हे बिचारं मात्र आम्हाला दर्शनसुख देत थांबले. स्तब्ध. त्यालाही हे कोण प्राणी आहेत ते बघायची उत्सुकता असेल. अतिशय सुंदर प्राणी असला तरी पहिल्यांदा लक्ष वेधून घेतात ते त्याचे पाणीदार करुणामय डोळे.

प्रचि १५ : टोपी : ०१ (Topi)
हरणाचा एक प्रकार.

ह्यातील नराला आपले अस्तित्व दाखवण्यासाठी एखाद्या उंच खडकावर किंवा मुंग्याच्या / वाळव्यांच्या वारुळावर उभी रहायची सवय असते.

प्रचि १६ : टोपी : ०२ (Topi)...

प्रचि १७ : शहामृग :०१
नर शहामृग

प्रचि १८ : शहामृग :०२
हाही नर..

प्रचि १९ : शहामृग : ०३

हाही नरच पण विनोदी आणि विनम्र भावमुद्रेत...

प्रचि २० : तरस : ०१ (Spotted Hyaena)

सकाळच्या पार्क राऊंडला आमची जीप निघाली तेव्हा एका धूळ भरल्या पायवाटेवर हे महाशय फतकल मारून बसले होते. ड्राइव्हरने जीप थांबवली, इग्निशन पण बंद केली. तेव्हा हे हळूहळू सरळ रेषेत चालत आमच्या जीपजवळ आले.

प्रचि २१ : तरस : ०२

जीपपासून तीन-चार फुटांवरून त्यांनी एक नजर टाकली आणि एखाद क्षण थबकून दुसऱ्या क्षणाला डावीकडच्या गवतात चपळाईने गडप झाले.

मसाईमाराला Spotted Hyaena आणि Stripped Hyaena असे दोन प्रकारचे त्रास दिसतात. पण आम्हाला दुसरी व्हरायटी काही दिसली नाही.

प्रचि २२ : तरस : ०३

हा मात्र त्यांचा वेगळ्या दिवशी, वेगळ्या भागात दिसलेला भाऊबंद. अंगापिंडाने जरा बऱ्यापैकी खात्यापित्या घरचा असावा असे दिसणारा . . . .

प्रचि २३ : रानडुक्कर (Warthog)

हे रानडुक्कर खरंतर आमच्या फक्त ड्राइव्हर कम गाईडला दिसलं. कुठे आहे, कुठे आहे असं आम्ही करत असेपर्यंत ते लपलं. मग ड्राइव्हरने गाडी रिव्हर्समध्ये घेऊन बंद केली. त्यानंतर हे महाशय बाहेर आले आणि गवतामधून इथे तिथे कानोसा घ्यायला लागले.

प्रचि २४ : मसाई गवताळ माळ - ०१

खूप कमी झाड असलेला गवताचा माळ उन्ह -सावलीच्या पट्ट्यांमध्ये...

प्रचि २५ : मसाई गवताळ माळ - ०२

प्रचि २६ : मसाई गवताळ माळ - ०३

ढगाळ सकाळ आणि त्यातून नजर चुकवून पडलेले चुकार उन्ह...

प्रचि २७ : मसाई गवताळ माळ - ०४

हि मात्र ढगाळ सायंकाळ आणि आसमंत काळोखा होत असताना ढगातून डोकावणारी सूर्यकिरणे...

प्रचि २८ : मसाई गवताळ माळ - ०५

नभ मेघांनी आक्रमिले...

प्रचि २९: मसाईमारामधील सफारी वाहने -०१

हि सर्व वाहने प्राण्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून बंदिस्त असतात. प्राणी पक्षी मनसोक्त बघता यावेत म्हणून मोठ्या मोठ्या सरकत्या काचा, प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र विंडो सीट ची व्यवस्था आणि छप्पर उघडबंद करायची सोय, पाऊस आला कि छप्पर बंद, प्राणी दिसले कि छप्पर वर होणार.

नुसतं बघणं, दुर्बिणीतून पाहणं आणि Still Photography अथवा Video Shooting साठी अतिशय आदर्श व्यवस्था आणि ह्यासाठी मध्ये काचेचाही अडथळा नाही.
एखादा मोठा प्राणी किंवा त्याचा परिवार, कळप दिसला कि गाड्यांची अशी रांग लागायची, पण तीही शिस्तबद्ध.
प्रत्येक गाडीला वायरलेस अँटेना. त्यामुळे परस्पर संपर्क अतिशय छान. आणि प्रत्येक ड्राइव्हर कम गाईड अतिशय सुजाण आणि शिस्तबद्ध देशप्रेमी नागरिक. कुठल्याही नियमाचे उल्लंघन करणार नाही कि करूही देणार नाहीत.

प्रचि ३०: मसाईमारामधील सफारी वाहने -०२

सफारी वाहनाचा एक क्लोज अप. उंच प्राण्यांनाही योग्य अँगलने टिपणे या व्यवस्थेमुळे अतिशय सोयीस्कर.

प्रचि ३१ : (बहुतेक Red - Necked Spurfowl)
फोटो खास नाही पण व्हरायटी म्हणून ठेवलाय.
( दुर्मिळ, अस्तंगत होत जाणारी प्रजाती)

प्रचि ३२ : गाय बगळा (Cattle Egret)

हा तिथेही दिसतो Happy

प्रचि ३३ : Coke's Harte Beest ची जोडी...

हरणाचा (Antelope) प्रकार. ह्यांची शिंग कंसाच्या आकाराची असतात (Bracket Shape)

प्रचि ३४ : Coke's Harte Beest प्रातर्विधी...
पत्नी संकोचून दूर गेलेली...

प्रचि ३५ : Thomson's gazelle – ०१

प्रचि ३६ : Thomson's gazelle – ०२

प्रचि ३७ : Thomson's gazelle – ०३

हा कळपातला नर पाठमोऱ्या स्थितीत चरत होता. त्याचे मागचे पाय, त्यावरचे छान काळे पट्टे, चरण्यासाठी उतरती होत गेलेली मान, त्याच्या वळणदार, पिळदार शिंगांचा अँगल आणि मधेच शिंगांच्याच दिशेने Point Out करणारा टोकेरी काळ्या टोकाचा डावा कान. . . . .

एखाद्या शिल्पाची आठवण यावी असे हे चित्रशिल्प टिपता आलं याचा आनंद आगळाच.

प्रचि ३८ : Marabu Stork - 01 In Flight

प्रचि ३९ : Marabu Stork - 02 In Flight

प्रचि ४० : Marabu Stork - 03 In Flight

प्रचि ४१ : Marabu Stork - 04 घरट्याकडे परतताना

प्रचि ४२ : Marabu Stork - 05
On Top of the House

Stork जमातीतला हा एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी. डोक्यावर तुरळक पांढरे केस, बाकी टक्कल आणि कधी कधी गळ्यात लटकणारी Pendulous Throat Sack हे ह्याचे वैशिष्ट्य. हा पृथ्वीतलावरच्या कुरूप प्राण्यांपैकी एक समजला जातो.

प्रचि ४३ : Marabu Stock - 06 : जमिनीवरून चालताना….

हे पक्षी पहिल्यांदा पाहिले ते नैरोबी मध्ये. . .
नैरोबी एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला गाडी आली होती.. आता प्राणी पक्षी बघायचे ते जंगलात मसाई माराला म्हणून मी कॅमेर्‍याची बॅग डिकीत टाकली. मग सफारी वाल्याने 5 दिवसांच सामान त्याच्या पुढे टाकलं..
वाटेत सकाळचा ट्रॅफिक जॅम लागला..
आणि त्याच ट्रॅफिकमधे फिरत होते.... उंचेपुरे मराबू स्टाॅर्क..
रस्त्यावरुन, फुटपाथवरुन….एकदम बिनधास्तपणे..आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्याच काही विशेष वाटत नव्हतं.
They Were Part and Parcel of the Traffic.

ईमारतींच्या Compound Wall वर पण होते..
कॅमेरा नव्हता म्हणून हळहळलो....
पण मनाची समजूतही घातली.
एवढे आहेत- परतताना भेटतीलच.... जातात कुठे.....
पण गेले.. नाही दिसले City मधे परतीच्या प्रवासात...
ती दवडलेली संधी आजही मनाला हुरहुर लावते..

जंगलातले प्राणी काय, सगळेच टिपतात...

पण रस्त्यावरुन, फुटपाथवरुन.. एकदम बिनधास्तपणे फिरणारे पक्षी That Was Really Unique..

आणि हे पक्षी चालताना मला आठवण करून देतात एखाद्या हात मागे बांधून, पुढे वाकून चाललेल्या पेन्शनर माणसाची...
R.K. लक्ष्मणचा Common Man च म्हणा ना..

प्रचि ४४ : Marabu Stock - 07 : before flight

प्रचि ४५ : लॉजच्या बाहेर पडल्यावर दिसलेली ऑलिव्ह बबून फॅमिली. (यात Yellow Baboon असा आणखी एक प्रकार येतो.)
प्रत्यक्ष टोळी मोठी होती, पण कॅमेरा सावधपणे सरसावल्यावर थोडी पळापळ झाली. एक मायलेक सुरक्षित अंतरावर जाताना.आणि एक सूटा बाल-बबून - हा मात्र पळत पळत.

प्रचि ४६ : बबून बाबा .

हे मात्र "किसमे कितना है दम"च्या पवित्र्यात.

प्रचि ४७ : चित्ता - ०१

प्रचि ४८ : चित्ता – ०२

प्रचि ४९ : चित्ता - ०३

प्रचि ५० : चित्ता - ०४

प्रचि ५१ : चित्ता - ०५

प्रचि ५२ : चित्ता - ०६

प्रचि ५३: उधळलेले झेब्रे...

एका संध्याकाळी परतताना आम्ही झेब्र्यांच्या एका कळपाजवळून जात होतो. आणि अचानक गवतामधून त्याच्या कळ पाच्या जवळ येऊन सरसरत आलेल्या दोन सिंहीणी ऊठल्या. झेब्रांची एकदम पळापळ झाली.
उधळलेच ते.
त्यावेळचा हा फोटो. फोटो अजिबात छान नाहीये.
पण त्या प्रसंगाची, त्यातील थराराची, उत्कटतेची याद आणून देणारा, ते उधळलेपण टिपणारा आणि गती/वेग दर्शविणारा फोटो खास नसला तरी इथे टाकल्यावाचून राहवलं नाही.

यानंतर सुरु झाला आमचा परतीचा प्रवास. मसाईमारा मधून निघताना, जंगल लॉजला अलविदा करताना आणि आमच्या लॉग हटचा निरोप घेताना खूप भरून आलं होतं .
ह्या ४-५ दिवसात खूप अनमोल, अद्भुत आणि पूर्वी कधीही न अनुभवलेले क्षण अनुभवायला मिळाले.
आलो त्याच खडबडीत रस्त्याने Mai Mahiu Junction पर्यंत पोहोचलो. नैरोबीपर्यंतचा पुढचा रस्ता तर छानच होता.

नैरोबीला पोहोचल्यावर माझ्या वकील मित्राचे परिचित आमची वाट पाहतच होते, त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं आणि पहिलं दर्शन घडवलं ते ह्या स्वामी नारायण मंदिराचं..

प्रचि ५४ : स्वामी नारायण मंदिर, नैरोबी...

त्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या नैरोबीतल्या अझी हाऊस या गेस्ट हाऊसमधे पोहोचवले.
नैरोबी हे जगामधले अतिशय असुरक्षित शहर आहे.
ह्याची कल्पना माझ्या मित्राच्या वडिलांनी ते काही कामानिमित्त नैरोबीला गेले होते त्या अनुभवानंतर दिलीच होती.
आमच्या यजमानांनीही एकटे दुकटे फिरू नका, Public Transport ने जाऊ नका ह्याही सूचना दिल्याचं होत्या.
हॉटेलमध्ये पहिल्यांदा शिरताना आणि नंतर दर वेळी त्याची प्रचिती आली.
हॉटेलला उंच दगडी कंपाऊंड वॉल.
त्यामध्ये तुरुंगाला असतो तसा संपूर्ण पोलादी दरवाजा.
त्यात छोटीशी सरक खिडकी.
हॉर्न दिल्यावर सरक खिडकी सरकवून आतले २ गार्डस गाडी आणि माणसांची खातरजमा करणार.
नंतर गाडीला हॉटेलच्या आवारात प्रवेश.
हॉटेलच्या इमारतीला २ जाळीचे दरवाजे. बेल वाजवल्यावर दोन माणसे येणार. आतला जाळीचा दरवाजा उघडून एक माणूस आतल्या आणि बाहेरच्या दरवाज्यामध्ये येणार. आतल्या दरवाज्याला आतला माणूस कुलूप लावणार.
नंतर दुसरा माणूस चावीने बाहेरचा दरवाजा उघडून आम्हाला आत घेणार, बाहेरचा दरवाजा लॉक करून आतल्या माणसाला आतले लॉक काढायला सांगणार आणि मग सगळी वरात आत जाणार.

स्थानिक असूनही ज्यांना एवढा कडेकोट बंदोबस्त करावा लागतो, त्या शहरामध्ये सुरक्षितता कितीशी असणार.

गाडीतूनही माझी फोटो काढण्याची आवड बघून आमच्या Host नी सांगितलं, Signal ला किंवा कुठेही कोणी गाडीच्या खिडकीतून हात घालून कॅमेरा मागितला तर चक्क देऊन टाकायचा.
हलकासा प्रतिकारही करायचा नाही.
मग काय.... मसाई माराचे फोटो जाऊ नयेत म्हणून शहरातल्या इमारतींची फोटोग्राफी बंद केली.

नैरोबी शहराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या शहरात भटकी, रस्त्यावरची कुत्री जवळ जवळ नाहीतच.
कारण काही वर्षांपूर्वी शहरातील Infra- Structure कामाची कंत्राटे चिनी कंपन्यांनी घेतली आणि त्या देशातून आलेल्या कामगारांनी हे सर्व कुत्रे खाऊन संपवले, असं आमच्या होस्टनी आम्हाला सांगितलं.

आम्ही फ्रेश झाल्यावर होस्टनी आम्हाला नैरोबी दर्शन घडवले. पण त्यांची नैरोबी दर्शनाची व्याख्या म्हणजे "वेगवेगळे मॉल्स दाखवणे" इतकीच होती. त्यामुळे आम्ही दीड दिवस वेगवेगळे मॉल्सच पहिले. अर्थात प्रत्येक मॉलच्या Corridor च्या प्रत्येक वळणावर एकतरी रायफलधारी गार्ड असायचाच.
मग आम्ही त्यांना मॉल व्यतिरिक्त काही म्युझियम्स, मॉन्युमेंट वगैरे आहेत का अशी विचारणा केली.कुठून आलं ह्ये पावणं . . . . ?
असा एक तु.क. टाकून मग शेवटी नाईलाजाने त्यांनी आम्हाला नैरोबी नॅशनल म्युझियमला नेले.

प्रचि ५५: नैरोबी नॅशनल म्युझियम...

प्रचि ५६ : म्युझियमच्या आवारातील डायनोसॉरची प्रतिकृती..

प्रचि ५७: त्याच आवारातील हत्तीची प्रतिकृती...

प्रचि ५८: म्युझियमचा अंतर्भाग...

प्रचि ५९: म्युझियमच्या आवारातील ओपन अँफी थिएटर...

यजमानांकडे आम्ही, विशेषतः मी नैरोबी नॅशनल पार्क बघायचा हट्ट दर्शविला, पण त्यांनी, " अहो मसाईमारातून आलायत एवढे प्राणी बघून, आता परत तेच तेच प्राणी कशाला बघताय?" असे म्हणून तो हट्ट मोडून काढला.
त्या रात्री मग ते आम्हाला घेऊन नैरोबीच्या प्रसिद्ध CARNIVORE हॉटेल मध्ये जेवायला घेऊन गेले.

प्रचि ६०: Carnivore Hotel, Nairobi...

ह्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असंख्य प्राण्यांपासून बनवलेले मांसाहारी जेवण मिळते.
त्यातले काही म्हणजे शहामृग, मगर, झेब्रा, जिराफ आणि हार्ट बिस्ट नावाचे हरीण.
हा मेन्यू "Game Menu" म्हणजे "शिकार केलेल्या प्राण्यांचे पदार्थ" ह्या नावाने प्रसिद्ध आहे,
तर " Beast of a Feast" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.
आणि हे मांस दारापाशीच असलेल्या एका मोठ्या कोळशाच्या बार्बेक्यूवर मसाई तलवारीला लावून/लटकवून भाजले जात असते.

प्रचि ६१: Meat Roast ०१..
(आंतरजालावरून साभार) Courtesy Carnivore Hotel..

प्रचि ६२: Meat Roast ०२..
(आंतरजालावरून साभार) Courtesy Carnivore Hotel..

पुढचा दिवस नैरोबी मधला आणि एकंदरीतच Tour चा शेवटचा दिवस होता.
यजमान आम्हाला सकाळी सकाळी Nairobi Flea Market मधे घेऊन गेले. तिथे स्थानिक लोकांच्या कलाकुसरीच्या आणि ग्रामोद्योगाच्या (Handicrafts and Artifacts) वस्तूंची रेलचेलच होती.
भाव अतिशय चढे पण २०, ३० % पासूनही घासाघीस (Bargaining) शक्य होती.

प्रचि ६३ : तिथून घेतलेला हा दगडाचा पाणघोडा जो सध्या माझ्या ऑफिसमध्ये विराजमान आहे.

प्रचि ६४: पाणघोडा

प्रचि ६५ : हा दगडी बुद्धिबळाचा सेट...

प्रचि ६६: दगडी राजा ( Queen of Chess )

प्रचि ६७: हे स्थानिक मसाई लोकांनी बनवलेली CLOTH PAINTINGS...

प्रचि ६८ : ही CANVAS PAINTINGS...

अशी सर्व खरेदी करून आम्ही आता पॅकिंगच्या कामाला लागलो. कदाचित दगडी वस्तू खूप मिळत असल्यामुळे कि काय कोण जाणे, पण Kenya Airways ची सामान मर्यादा ४० किलो आहे.
पॅकिंग झालं, बॅगा गच्च भरल्या, जड झाल्या आणि मनही जड झालं.
नैरोबी तर ठीक आहे, तिथे आम्ही मनमोकळेपणाने फिरूही शकलो नव्हतो. पण मसाईमारा मात्र पाय मागे खेचतच राहिलं.
कधी आमची लॉग हट आठवली, कधी तालेक नदीमधले आणि काठावरचे प्राणी, पक्षी आठवले, कधी शिकारी आठवल्या तर कधी प्राण्यांचे कळप आणि त्याची क्युट क्युट बाळे आठवली.
बिग ५ तर विसरूच शकत नव्हतो. पण मद्दड दिसणाऱ्या Wilder Beast च्या कळपांनीही लळा लावला होता.

शेवटी आता आपली मुलंबाळं ह्या प्राण्यांना दाखवायची असा निर्णय घेऊन KENYA AIRWAYS च्या विमानात पाऊल ठेवले. परतीसाठी.
पण आजही जरी मसाई माराची मुख्य आकर्षणं बाजूला ठेवली तरी हे "उरले सुरले इतुके सुंदर" ही मनावर एवढं गारुड करतं कि पुन्हा एकदा कॅलेंडर कडे हात जातात, गुगल सर्च केले जाते आणि AIR FARES बघितली जातात...

आजही ते सर्व क्षण जसेच्या तसे ताजे आहेत आणि कुठल्याही क्षणी ताजेतवाने करण्याचे त्यांचे सामर्थ्यही तसेच टिकलेले आहे, अबाधित आहे.

असा हा महिमा आहे मसाई माराचा आणि त्या जंगल प्रदेशाने दिलेल्या विलक्षण आणि रोचक अनुभवाचा!!!!!
आणि जंगलापेक्षा शहरेच घातक असतात या शिकवलेल्या धड्याचा!!!!!!

 केनयातच नव्हे तर नैरोबीतही अजून काही पक्षी दिसू शकतात, तसेच नैरोबीत अजूनही काही बघण्याजोगी ठिकाणे आहेत.

काही अपडेट्स..

१ ) केनयाचा व्हिसा आता ऑन अरायव्हल मिळत नाही. तो आधी नेटवरून घ्यावा लागतो.
२) केनया एअरवेजच नव्हे तर आता बहुतेक आफ्रिकन शहरातून विमाने दोन बॅगा न्यायला परवानगी देतात. प्रत्येक बॅग कमाल २३ किलो वजनाची म्हणजे एकंदरीत ४६ किलो वजन आणता येते पण काही एअरलाइन्स फर वगैरे सामानात नेऊ देत नाहीत. ही फर केनयात सहज मिळते.
३) पुर्ण नैरोबी असुरक्षित आहे असे नाही. टाऊन एरीया, लंगाटा, पार्क लॅंड्स सारखे काही भाग असुरक्षित आहेत, पण या आणि इतरही भागात दिवसा पायी फिरण्यात धोका नाही. मी स्वत; भटकलो आहे. सार्वजनिक वाहनातून फिरणेही धोकादायक नाही. स्थानिक भारतीय बायकाही फिरतात.
४) ते कोरी पक्षी ट्राफिक मधे अगदी सहज फिरत असतात. त्यांचे पिल्ले वाढवायचे काम सहा महिने तरी चालते.
पिल्ले चांगली मोठ्या कोंबडीएवढी असतात. ते पक्षी माणसांना त्रास देत नाहीत आणि त्यांनाही कुणी त्रास देत नाही.

आणि खास बंधुराजांना निरोप... मसाई भागातून रात्रीचे आकाश फारच सुंदर दिसते अगदी आकाशगंगाही दिसते.
लेक नाकुरू जवळ आसंख्य फ्लेमिंगोज दिसतात ! खुद्द नैरोबी शहरात झकरांदा, वावळा, पांढरी बाभूळ, दिल्ली सावर, टोकफळ सारखी अनेक झाडे भरभरून फुलतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...