Sunday, October 25, 2020

मेक्सिको

 

या लेखमालेत एका नव्या देशाविषयी. भारताशी खूप साधर्म्य असलेले काही देश आहेत त्यातील हा एक. सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय समृद्ध वारसा असलेला, भौगोलिक वैविध्य असलेला, चविने खाणा-यांचा, विविधरंगी देश! भारताप्रमाणे लोकसंख्या, प्रदूषण, गरिबी, बेकारी, अमली पदार्थांचा वाढता व्यापार इ. ला तोंड देत उदयाला येणारी एक महत्वाची बाजारपेठ!

थोडा इतिहास भूगोल, अतिप्राचीन नागरी संस्कृती जन्माला घालणा-या मोजक्या प्रदेशांपैकी हा एक. अॅझ्टेक, टोल्टेक, ओल्मेक, झापोटेक, माया हे काही महत्वाचे ऐतिहासिक समाज घटक. त्यातील माया व अॅझ्टेक हे त्यावेळच्या उपलब्ध साधनांचा वापर करून उत्कर्षाच्या परमावधीपर्यंत पोहोचले. पुढे माया संस्कृती बव्हंशी अज्ञात कारणाने उतरणीला लागली तर अॅझ्टेक लोक स्पॅनिश आक्रमणाचे बळी ठरले. माया जीवनपद्धती अजूनही जिवंत आहे, बाकी सगळे इतिहासजमा. हेमांगीके यांनी मिपावर याआधी मध्य अमेरिकेच्या इतिहासावर सखोल लेखन केले असल्याने त्यातील पहिल्या भागाचा दुवा देउन पुनर्लेखन टाळतो. पुढे वेळोवेळी त्या लेखमालेचा संदर्भ घेउच… मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप

हा प्रदेश उत्तर व दक्षिण अमेरिकेला जोडतो. १९व्या शतकात जवळजवळ एक तृतीयांश मूळ मेक्सिको अमेरिकन संघराज्याने गिळंकृत केला. आज आपण त्या भूभागाला पश्चिम टेक्सास, न्यू मेक्सिको, अॅरिझोना व कॅलिफोर्निया या नावांनी ओळखतो. स्पॅनिश प्रभाव तिथे आजही आढळतो. उर्वरित भूभाग पॅसिफिक व अॅटलांटिक सागराच्या मधोमध दक्षिणेकडे निमुळता होत कर्कवृत्त ओलांडतो, दक्षिण-पूर्वेकडे घनदाट जंगलं, उत्तरेकडे वाळवंट तर मध्यावर उत्तुंग ज्वालामुखीय शिखरे, तो आजचा मेक्सिको, उर्फ 'मेह्हीको'. सांप्रत ३१ राज्यांत विभागलेल्या या देशातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ८ राज्यांतील हा एकल प्रवास.

मेक्सिको चा भौगोलिक इतिहास (संदर्भ: विकी; जीआयएफ सपोर्टींग ब्राउझर मध्ये पहा)




यूएसनिवासी लोकांसाठी महत्वाची माहिती; H1/L1/GC असेल तर या देशासाठी वेगळा व्हिझा लागत नाही, जमल्यास जरूर भेट द्या.

मेक्सिको चा भौगोलिक संदर्भ:

मेक्सिको विस्ताराने मोठा देश असल्याने एका कोप-यातून सुरुवात करून मग मध्य भागाकडे प्रवास केला. युकेतान द्विपकल्प हा मेक्सिकोचा दक्षिण-पूर्व कोपरा. हा संपूर्ण विभाग भूगर्भीय गुहा, भूमिगत तळी व नद्या अशा जगावेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. हवामान ऊष्ण-दमट, झाडी बरीच, तीन बाजूंनी चंदेरी वाळूचे कॅरिबिअन किनारे... पूर्वापारचे माया लोकांचे घर.

आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेली दोन मोठी शहरे, मेरिदा व कॅनकून. मेरिदा हे सर्वाधिक माया वंशाचे लोक असलेले शहर आहे, 'त:हो' (T'ho) या मूळ मायन नावाची ही मायानगरी. कॅनकून हे मायामी, हवानाच्या कुळातील 'वाईल्ड पार्टी टाऊन'; निराळ्या अर्थाने 'माया'नगरी! सहलीचा उद्देश वेगळा असल्याने कॅनकूनच्या वाटेला गेलो नाही. जगातील नविन सात आश्चर्यांपैकी 'चिचेन ईत्झा' चे पिरॅमिड म्हणजे या प्रदेशाचे हृदय. मेरिदा पासून सुरुवात करून पुढे या विभागातील महत्वाच्या जागा 'ऊश्माल', 'कबा', 'चिचेन ईत्झा', 'तुलुम' ची सफर व कॅनकूनबद्दलही थोडी माहिती.



मेरिदा हे शहर बरेच नीटस आणि आटोपशीर आहे. युरोपिय प्रभाव असलेल्या मेक्सिकन शहरांमध्ये काही गोष्टी ठळकपणे सारख्या असतात. शहराचा मध्यवर्ती भाग 'सोकालो' (zócalo) किंवा 'सेंत्रो' (centro) या नावाने ओळखला जातो. लगतच कॅथेड्रल, शासकीय इमारत व निवास. या देशांत फिरताना शक्यतो वास्तव्य याच परिसरात करणे फायदेशीर ठरते. मेरिदा साधारण सोळाव्या शतकात (आधीच्या त:हो चा नायनाट करून) वसवलेले शहर.

शहरातील एक चौक:

सोकालो: स्ट्रीट व्ह्यू

कॅथेड्रल:




जुन्या चर्चचा अंतर्भाग:



शासकीय इमारत



पॅलासिओ दे गोबिएर्नो - गव्हर्नरनिवास (बराचसा भाग आता संग्रहालय)

इथे अनेक मोठी तैलचित्रे व भित्तिचित्रे आहेत. 'मेक्सिकन म्युरल पेंटिंग्' हा स्वतंत्र धाग्याचाच विषय आहे, तेव्हा अधिक लेखन त्यामध्ये...

गव्हर्नरनिवासातील चित्रकलादालन:

मातृत्वस्मारक:

आधुनिक चर्च:




आकर्षक दुकान

राहते हॉटेल

अमेरिका खंडात उचापती युरोपिअन लोक पोहोचले आणि एका विनाशसत्राला प्रारंभ झाला. कॅनडा व संघराज्यातील भागात लक्षावधी हत्या घडवून पद्धतशीर वंशविच्छेद करण्यात आला. थोड्या दक्षिणेत मध्य मेक्सिको मध्ये प्रचंड लूट व वर्णसंकर घडवण्यात आला. या भागात आज बव्हंशी 'मेस्टिझो' म्हणजे अॅझ्टेक व स्पॅनिश संकरवंशी लोकसंख्या आहे. त्याहून दक्षिणेकडे माया लोकांचे धर्मपरिवर्तनाचे सत्र तर सुरू झालेच, त्याबरोबर त्यांचे ज्ञानभंडार नष्ट करण्यात आले. या लोकांना लेखनकला अवगत होती व त्यांचे अनेक ग्रंथ लिखितस्वरूपात (किंवा चित्रलिपी असल्याने चित्रस्वरूपात म्हणू आपण) जपलेले होते ते हजारोंच्या संख्येत जाळले गेले. ही जागतिक साहित्याच्या इतिहासातील नालंदाविनाशाप्रमाणे भीषण व कधीही न भरून निघण्यासारखी हानी आहे. जे लोक दूर जंगलात पळून गेले ते वाचले व अत्यल्प प्रमाणात आज ही संस्कृती टिकली. पुढे अजून सुदूर दक्षिणेकडे इंका सामाजाचीही बरीच समांतर कथा. या पळापळीत राहती घरे सोडून हे लोक गेले आणि शहरे च्या शहरे ओसाड पडली. कालांतराने निसर्गाने ती आपल्या ताब्यात घेउन जंगलाच्या पांघरुणात हलकेच दडवून ठेवली. तशी माया लोकांनी आक्रमणपूर्व इतिहासातही काही स्थाने अज्ञात कारणाने सोडून दिली होती त्यांचाही आता हळूहळू शोध लागत आहे. अशा दोन 'हरवले-सापडले' विभागातील दोन शहरांची सफर... कबाह् व ऊश्माल. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स.



कबाह
किंवा कबह्वाकान मेरिदापासून शंभर किलोमिटरवर आहे. येथील बहुतांश वास्तु सातव्या ते अकराव्या शतकातील आहेत. (भारतातील समकालीन स्थापत्य: बृहदीश्वरादि चोलराष्ट्रीय मंदिरे किंवा खजुराहो इत्यादी). बहुतांश माया शहरात 'चाक' या देवतेला समर्पित मंदिर असतेच. भीतीदायक डोळे, सोंडेसारखे नाक यावरून ही देवता ओळखता येते. याशिवाय राजकीय प्रमुखाची उंच घरे, क्रीडागृह ही अजून काही नगरवैशिष्ट्ये.

कबाह अवशेषांचे प्रथम दर्शन:

राजप्रासाद:

मंदिर अवशेष:

स्थापत्यविशेष: जुनी भिंत. पुढे मोठ्या प्रस्तरांचे बांधकाम सुरु झाले

एकसंध शिलांचे बांधकाम: माया मोनोलिथ

कोण्या राजाचा पुतळा

शिल्पशैली: व्यक्तीशिल्पे


लांब नाकाचा, थोडा भयावह 'चाक' देव : दोन मोठे डोळे आणि मध्ये लांब नाक अशा मुखवट्यांच्या रांगा

माया 'टॅब्लेट्स' - चित्रलिपी शिलालेख

अजुनही बरेच अवशेष दुर्लक्षित पडून आहेत





ऊश्माल
मोठ्या माया शहरांपैकी एक, पारंपारिक चौकोनी आकाराच्या पायापेक्षा वेगळा पाया असलेल्या पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे. काही काळासाठी हे राजधानीचे शहर असल्याने मोठ्या इमारती आहेत. येथील इमारती पाच ते अकराव्या शतकाच्या कालावधीतील आहेत. आक्रमणकालापर्यंत हे शहर वपरात होते, नंतर मात्र झपाट्याने -हास होऊ लागाला. बराच भाग आता जंगलाकडून परत मिळवण्यात आला आहे.

जादुगाराचा पिरॅमिड

धार्मिक इमारतीचे प्रांगण

थोडे बारकावे

राजवाडा

राजाची मूर्ती

वास्तुशिल्पांवर घुबड, साप जॅग्वार अशा काही प्राण्यांचा विशेष प्रभाव आहे. खाली रॅटलस्नेकचे शिल्प

जंगलात उभी असलेली भिंत.

स्थापत्यविशेष: प्रत्येक चार शंकरपाळ्याच्या मध्यभागी वेगळी नक्षी

पर्जन्यदेवता 'चाक'देव

शहराचा उंचावरून नजारा

वनराईने गिळंकृत केलेली वास्तु

तेम्प्लो मयोर: मुख्य मंदिर

स्थापत्यविशेष: वेगळ्या आकाराचे दालन


सरदार निवास

राजभवन

पुजारी




चिचेन ईत्झा

या भागात युकेतान प्रांताच्या मध्य भागाची सफर... मेरिदाहून चिचेन ईत्झा तासाभरावर आहे, त्यामुळे एका दिवसात सहज ईथे भेट देता येते. जाताना वाटेत 'इक्-काल सिनोते' नावाची एक अद्भुत जागा आहे.



सिनोते: युकेतान प्रदेशात अनेक भूमिगत तळी व नद्या आहेत, काही ठिकाणी जमिन धसल्यामुळे विवर तयार होऊन हे भूजल दृश्यमान होते त्याला इथे सिनोते म्हणतात. थोडक्यात हे एक प्रकारचे सिंकहोल आहे. आणि येथील बरीच सिनोते अंतर्गत गुहांनी जोडलेलीही आहेत. एकमेकींना जोडलेल्या प्रचंड विहिरी अशी याची कल्पना करू शकतो. अथांग अशी ही जलप्रणाली बह्वंशी गुप्त असल्याने अतिशय शुद्ध आहे. यात पोहण्याचा आनंद अनुपमेय.
इक-काल चे सिनोते: चिचेन ईत्झा च्या मार्गावरच हे ठिकाण आहे. येथील नैसर्गिक विहीर हे संरक्षित क्षेत्र असून पोहण्यासाठी बरेच नियम केलेले आहेत. जमिनीवरून आत डोकावणा-या वेली आणि मूळे, कवडशातून येणारा सूर्यप्रकाश यामुळे इथे वेगळ्याच दुनियेत आल्यासारखे वाटते.

सिनोते: वरून मध्यभागी पाण्याची धार, शुद्ध निळे पाणी

वरून डोकावणारी मूळे व वेली

खोलवर जाणारा सूर्यप्रकाश

अजून एक दृश्य

चिचेन ईत्झा : त्या काळातील एक महानगर; मंदिरे, वेधशाळा, क्रिडांगण, राजमहाल, सिनोते या सर्वांनी सुसज्ज. येथील 'एल कॅस्तिय्यो' हा स्टेप पिरॅमिड ही सर्वात प्रसिद्ध वास्तू. शिखरावरील 'कुकुलकान' या सर्पदेवतेला समर्पित मंदिरास चारी बाजूंनी वर जाण्यास जिने आहेत. प्रत्येक जिन्याच्या दोन्ही बाजूंस सापाच्या शिल्पाकृती आहेत. आधीच्या जुन्या लहान वास्तूवर ही आज दिससणारी ३० मिटर उंच इमारत बांधण्यात आली. पिरॅमिडची रचना अतिशय खास व सूक्ष्म गणितावर आधारित आहे हे वसंत व शरद संपातदिनी (सध्या २१ मार्च/सप्टेंबर) अनुभवण्यासारखे असते. या दोन दिवशी सूर्यकिरणे एक खास कोनातून पडल्याने जिन्याच्या सर्पाकृती जणू जिवंत झाल्याचा भास होतो. जसजसा सूर्य कलतो तसे हे सर्प पुढे सरकल्याचा भास होतो. हे दृश्य बघण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी खासकरून मार्च महिन्यात इथे येतात. स्थानिक लोकांसाठी धार्मिक दृष्ट्याही हा दिवस महत्वाचा असतो. विवीध प्रकारच्या पूजाही संपन्न होतात.

वाटेतील एक पारंपारिक घर

जुनाट प्रवेशद्वार

वेधशाऴा

शुक्रमंदिर

देवता शुक्र: एक महत्वाची देवता, माया पंचांगावर शुक्रगतीचा विशेष प्रभाव आहे.

योद्ध्यांचे मंदिर

मध्यभागी बलिवेदिका

चिचेन इत्झाचे सिनोते: गावाचे नावच मुळी या विहिरीवरून पडले आहे.

पिरॅमिड प्रथम दर्शन

कुकुलकान

पिरॅमिड: एल कॅस्तिय्यो

आता येथून पुढे चित्रांमध्ये बरेच अवांछित घटक, विशेषत: माणसे आहेत, पण ते टाळणे केवळ अशक्य होते. कारणण कऴेलच... पण तरिही, क्षमस्व...

एकही माणूस नसलेलं हे एकच चित्र; याची विशेषता पुढील गर्दी पाहिली की कळेल ;-)

पुढील दोन परिच्छेद 'हेमांगीके' यांच्या लेखातून साभार...
या पिरॅमिडचे नऊ टप्पे आहेत. पिरॅमिड्च्या चारही बाजूंना मधून छेदणार्‍या पायर्‍या या नऊ टप्प्यांचे २ भाग करतात. त्यामुळे एकूण भाग झाले अठरा. हे वर्षाचे १८ महीने. या चार जिन्यांना प्रत्येकी ९१ पायर्‍या. त्यामुळे एकूण पायर्‍या झाल्या ९१ X ४ = ३६४ आणि वरची १ धरुन ३६५ पायर्‍या. हे झाले वर्षाचे ३६५ दिवस. पिरॅमिडच्या दर्शनी भागात ५२ फरश्या बसवल्या आहेत. मायन्स दर ५२ वर्षांनी नवी कालगणना करीत असत. दर ५२ वर्षांनी आधीच्या पिरॅमिडवर नविन पिरॅमिड बांधला जाई.

या पिरॅमिडचे चार कोपरे पुर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर अशा चार दिशा अचुकपणे दाखवतात. या अशा रचनेमुळे दर २१ मार्च आणि २१ सप्टेंबर या दोन दिवशी (१२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र) इथे दिसणारा छाया-प्रकाशाचा अद्भभुत खेळ बघायला मिळतो. चित्रात दिसाणार्‍या जिन्याची कड नीट पाहीली तर ती सरळ नसून उतरत्या जिन्यासारखी असल्याचं आपल्याला दिसेल. तसंच पिरॅमिड्च्या पायथ्याशी सापाचं तोंड कोरलेलं दिसेल. वर उल्लेख केलेल्या दोन दिवशी प्रकाश जेव्हा इथे पडतो तेव्हा ही रचना नागिण असल्यासारखा भास होतो. ऊन जसंजसं खाली येत तसंतसं ही नागिण सळ्सळ्त खाली आल्याचा भास होतो. (खरंतर हा नजारा प्रत्यक्षात पाहिला तर जास्त स्पष्ट होईल) हे खालचं चित्र सळसळत खाली येणार्‍या नागिणीचं. या रचनेचा वापर धर्मगुरू करित. नागिण पहिल्यांदा खाली आली की पेरणी सुरु होत असे आणि दुसर्‍यांदा खाली आली की कापणी.

'ती' सावली पडायला आता सुरुवात होते आहे, आणि गर्दी जमायलाही...

सळसळत जमिनीत शिरू पाहणारा सर्प...

त्या दिवशी जमलेला विशाल जनसमुदाय

बॉल कोर्ट: हे क्रीडांगण एका जगावेगळ्या स्पर्धेचे ठिकाण आहे. खेळाचे नियम: दोन संघातील सामना, एक मोठा रबर व तत्सम वनस्पतीजन्य पदार्थापासून बनलेला चेंडू, हात व पाय चेंडूला न लावता केवळ कमरेने किंवा खुब्याच्या हाडाने चेंडू उडवत पोलोच्या गोळिसारख्या दिसणा-या छिद्रातून पार करायचा. जो संघ जिंकेल त्याच्या नेत्याचा बळी दिला जाई आणि तो ही हसत हसत तयार होत कारण ही अतिशय प्रतिष्ठेची बाब असे.

वरीलप्रमाणेच एक भिंत समोरील बाजूस, व मध्ये ही पंचांसाठीची जागा

चेंडू व जॅग्वार

राजाची खेळ बघण्याची जागा

कुणा जेत्याची/राजाची मूर्ती



अवांतर
घोरपडींचा येथे मुक्त वावर असतो.

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...