कार्तिकी पौर्णिमेला मी गिरनार परिक्रमा आणि दत्तशिखरावरील पादुका दर्शन पुर्ण करून आले. बऱ्याच लोकांनी तुझा अनुभव लिही असे सांगितले.. त्याप्रेरणेने एक तोकडा प्रयत्न करत आहे.
त्या जगत्गुरुंच्या दर्शनाचे मी काय वर्णन करु.. शब्द तोकडे आहेत. तरी हा प्रयास गोड मानून घ्यावा ही विनंती करते.
मायबोलीवरही लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तेंव्हा जाणकारांनी सांभाळून घ्यावे ही विनंती. तुमच्या सूचना व अभिप्राय अनमोल आहेत जेणेकरुन लेखनात सुधारणा होऊ शकेल.
गिरनार बद्दल नक्की कधी ऐकले होते लक्षात नाही पण लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंकडे श्री. प्रमोदजी केणे यांचे "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" हे पुस्तक वाचायला मिळाले व गिरनार विषयी उत्सुकता वाढली. तरीही गिरनार इथून किती लांब आहे, शिवाय १०हज्जार पायऱ्या चढायच्या.. छे.. हे काही आपल्याने होणार नाही म्हणून सोडून दिलेले.. प्रमोदजींना आलेले अनेक दिव्य अनुभव वाचून लोक भारावून गिरनारला जातात.. तसे माझे काही झाले नव्हते.. आणि हे त्यांचे अनुभव त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याईच्या शिदोरीमुळे होते.. सगळ्यांना थोडी येतात ते.. माझे व्यावहारीक मत.. शिवाय अश्या अनुभवांमुळे नक्की काय फरक पडतो जीवनात तेही माहीत नाही.
पण मग गिरनार विषयी गुगलवर वाचत गेले, जेंव्हा जेंव्हा जे जे वाचायला मिळेल ते वाचत होते. त्यात असे कळाले की पायऱ्या कठीण असतात वारा जोराचा वहात असतो, शिखर खूप उंच आहे, रस्ता एकदम घनदाट जंगलातून जातो. जंगल इतके दाट आहे की रात्रीच्या वेळी वन्य श्वापदे मार्गावर दिसतात.. का कुणास ठाऊक पण दाट जंगल म्हटले की मला त्याची ओढ लागते.. भीतीही वाटतेच.. पण जंगलात जायला, रहायला मनापासून आवडते. त्यामुळे अजुनच जावेसे वाटायला लागले. त्यात अचानक ध्यानी मनी नसताना माझ्या सासुबाई आणि माझ्या २ नणंदा गिरनारवर जाऊन आल्या.. त्यांचा उत्साह पाहुन माझी इच्छा आणखीन प्रबळ झाली.. ६० च्या आसपास वय असलेल्या माझ्या सासुबाई लीलया गिरनार चढून उतरल्या.. मग आपण का बर कच खावी असं वाटायला लागलं.. (सासुबाईंची क्षमता आणी इच्छाशक्ती अफाट आहे हे अलहिदा.)
मग काय सगळ्यांना सांगून झालं की कुणी जाणारं असेल गिरनारला तर मला
सांगा, मलापण यायचं आहे. साधारण ३ एक महिन्यांपुर्वी आमच्या पुर्वी शेजारी
रहाणाऱ्या काकुंचा फोन आला.. पुण्याहून एक ग्रुप नोव्हेंबरमधे जातोय तर आपण
जायचं का. तेव्हा माझ्या प्रोजेक्टचं काम चालू होतं पण नोव्हे. पर्य्ंत ते
कमी होणार होतं, तेंव्हा सुट्टी मिळण्याची शक्यता होती.. मी हो म्हणून
टाकलं. मनी विचार केला पुढचं पुढे पाहू..
पण लगेचच त्यांचा दुसरा फोन आला की नवरात्रापर्यंत त्यांच नक्की काय ते
ठरेल.. काही अडचणींमुळे त्यांचं नक्की होत नव्हत.. झालं मी थोडी थोडी
माहीती वाचायला सुरवात केलेली, सकाळी लवकर उठून चालायला जाण्याची मनाची
तयारी करत असतानाच (हो, मला आधी लवकर उठण्यासाठी मनाची तयारी करावी लागते,
मग शरीराची.. लै अवघड काम असतंय ते) काकूंनी अस सांगितल्यामुळे परत सगळ
शांत झाल.. कांकू दिवाळी दरम्यान जाण्यासाठी मोकळ्या झाल्या आणी आता परत
आमच जाण्याच ठरू लागलं.. त्या ग्रुपला फोन केला तर जागा नव्हती ती लोकं ८
तारखेलाच निघणार होती.
शेवटी आम्ही आमचं जायचं ठरवलं आणि १२, १३,१४ ची तिकिटे काढली.. जातानाची वेटिंगवर होती तर येतानाची कन्फर्म झालेली. आता ऑफीसमध्ये सांगून सुट्टी टाकून, कामे मॅनेज करून परत चालण्यासाठी, लवकर उठण्यासाठी, मनाची, शरिराची थोडी थोडी तयारी सुरु केली. नेटवर वाचताना असे लक्षात आले की कार्तिकी पौर्णिमा दत्तदर्शनासाठी महत्वाची मानली जाते, त्यामुळे तिथे खुप गर्दी असणार.. आम्ही रहाण्याचे तिथे गेल्यावर पाहू असे ठरवले होते कारण अनेक धर्मशाळेत सहज जागा उपलब्ध होते, पण आता तसे चालणार नव्हते.. मग परत शोध सुरु झाला.. ज्या ग्रुपबरोबर जाणार होतो, त्यांची काकुंशी अधीची ओळख होती म्हणून त्यांनाही विचाराचे ठरले कारण ते निघणार तेंव्हा आम्ही गिरनारला पोहोचत होतो, त्यांच्यापैकीच एखादी खोली आम्हाला मिळाली असती तर काम सोपे होणार होते. ऑनलाईन धर्मशाळा फुल दिसत होत्या.. काकुंनी त्यांना फोन केला तर त्या म्हणाल्या असे नाही होऊ शकणार पण ऐनवेळी ३ जणांनी रद्द् केल्याने जागा आहे तेंव्हा तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. जातानाची ३ तिकिटे आहेत आमच्याकडे फक्त येतानाची २ च् आहेत एकाच तात्काळमध्ये पहावं लागेल.
हे सगळे ६ तारखेला चालले होते आणि ही लोकं ८ तारखेला निघणार होती. मी
तारखा पाहिल्या तर मला जास्तीची सुट्टी टाकावी लागणार नव्हती पण सुट्टी
अलिकडे मात्र घ्यावी लागणार होती.. एक कांम नेमके शुक्रवारी किंवा सोमवारी
येऊ शकत होते, आता परत डेव्हलमेंट टिम, आमचा ऑनसाईट असलेला माणूस, मॅनेजर
या सर्वांशी परत बोलावे लागणार होते.. अधीची मंजूर झालेली रजा परत कॅन्सल
करणे, नव्याने रजा टाकणे, कामाची आखणी करणे आले. पण सर्वांनीच सहकार्य दिले
आणि ६ तारखेला संध्याकाळी ग्रुप बरोबर ८ तारखेच्या संध्याकाळच्या गाडीने
निघण्याचे नक्की झाले.
हे सगळे होईस्तोवर Open SAP teamचा इमेल आला.. मी एका कोर्ससाठी नाव नोंदणी
केली होती तो बरोबर ६ तारखेपासून सुरु होणार होता आणि पहिल्या आठवड्याचे
साहित्य आणि सराव परिक्षा नेटवर उपलब्ध झाले होते. सराव परीक्षा १४
तारखेच्या आत द्यायची होती.. आम्ही १३ला रात्री येणार म्हणजे जायच्या आधी
हे सगळे पुर्ण करायला हवे होते..
७ तारखेचा दिवस यातच गेला आणि ८ला दुपारी आम्ही निघणार होतो.. तयारी तर शुन्य होती.
आधी १२ तारखेच ठरलेलं तेंव्हा शनि, रवि हातात असणार होते.. तेंव्हा मायबोलीवर एकीचा गिरनारचा प्रवास वाचायला सुरू केलेली.. तिने बरीच शारीरीक तयारी, आखीव व्यायामाचे नियोजन वगैरे केलेले.. ते आठवले आणि ताण यायला लागला.. इतका की संध्याकाळी पित्ताने डोके दुखी वाढली.. याला अजुन एक कारण होते.. आम्ही गिरनारचा विचार केलेला तो गुरुशिखर चढून पादुकांचे दर्शन घेण्याचा.. पण ह्या ग्रुपमधे परिक्रमाही होती ज्यासाठी ३८ ते ४० किलोमीटर चालावे लागते.. दोन्ही कसं जमणार, परिक्रमा तर आधी होती आणि मग गुरुशिखर.. म्हणजे परिक्रमेने दमलो तर गुरुशिखरावर पाणी सोडावे लागणार होते आणि ते मन मानायला तयार होत नव्हते.. शेवटी मनाची तयारी केली कि परिक्रमा वर्षातून फक्त ५ दिवस - कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंतच करता येते तेंव्हा तिला प्राधान्य द्यायचे गुरुशिखरावर १२ही महिने जाता येते तेंव्हा तिथे परत जाता येईल.
मनाला आश्वस्त करित ८ तारखेला घरची कामे मार्गी लावीत तयारी पुर्ण केली.
८ तारखेला घरून काम करण्याची परवानगी मिळाल्याने अनेक गोष्टी कमी वेळात
मार्गी लावणे शक्य झाले.
अगदी निघायच्या वेळी बॅग भरत २.३०ला निघणारे आम्ही ३ ला मार्गस्थ झालो.
मला जसे आठवत होते तशी मी सामानाची यादी करत होते अगदी टूथपेस्ट्, कंगवा ई. ई. ज्याचा फायदा निघताना ऐनवेळी बॅग भरताना झाला व काहीही न विसरता ३ वाजता मी बांद्रा स्थानकाकाडे निघाले..
क्रमश:
नीलाक्षी
माझ्याबरोबर
शेजारी रहाणाऱ्या काकू व त्यांची बहिण होती.. त्यामुळे अगदी एकटे वाटणार
नव्हते. जाताना त्या दोघी माझ्या घरी आल्या व आमचा माझ्या घरून एकत्र
प्रवास सुरु झाला..
ओला बुक केली होतीच गाडीत बसल्यावर गेले २/३ दिवसाचा ताण निवळला आणि डोळे
पेंगू लागले.. मनोमन कुलदेवतेला, दत्तात्रयांना आणि आई बाबांना नमस्कार
केला. त्यांच्या पुण्याईनेच हा दिवस उजाडला होता.. बाबा, माझी आजी, आई आणि
आजोळ हे दत्तभक्त. मी त्यांच्यामध्ये नास्तिकच! बाबा आणि आजीला स्वामी
समर्थांचे वेड.. त्यांचा स्वामींवर गाढ विश्वास.. बाबांनी अगदी शेवट पर्यंत
गुरुवारचे स्वामी दर्शन सोडले नव्हते.. आईने तर सगळे आयुष्यच त्यांच्या
भरवश्यावर जगलेले.. माझी धाकटी बहीणही त्यांच्याच पावलावर चालणारी.. मीच
कशी काय नास्तिक जन्मले या लोकात देव जाणे.. माझे म्हणणे अगदी स्पष्ट असे
की देवाला जर सगळ्यांची काळजी आहे तर त्याला नमस्कार न करता, त्याची पुजा न
करता त्याने सर्वांना आनंदी ठेवायला हवे. हा म्हणजे व्यवहारच झाला की तु
माझे स्तोत्र म्हण मग मी तुला बळ देतो.. आता जसे वाचन वाढते आहे तसे हळुहळू
उमगतंय असं वाटते आहे.. देव म्हणा निसर्ग म्हणा ही एक उर्जा आहे, आणि तिची
शक्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तिच्याशी संधान हवे. जसे
इलेक्ट्रीसिटी घराबाहेर पोलवर वाहते आहे, पण घरात दिवा लावण्यासाठी, पंखा
लावण्यासाठी, एसी ला वेगवेगळ्या पॉवरची बटणे, वायर टाकून ती घरात आणावी
लागते. तिचे बटण गरज असताना दाबावे लागते तेंव्हा दिवा लागतो.. देवाचंही
तसंच काहीसं असावं!
असो..तर आम्ही अगदी वेळेत गाडी सुटायच्या तासभर आधी स्टेशनवर पोचलो.
गाडी फलाटावर लागली होती आणि बरीचशी लोकं गाडीत आपापल्या जागेवर गेलेली
होती. जी थोडीफार मंडळी फलाटावर होती त्यांना भेटलो आणि आमच्या जागा जाणून
घेऊन स्थानापन्न झालो.. गाडी अगदी वेळेवर सुटली आम्ही राजकोटच्या दिशेने
निघालो. आजुबाजुला पाहीले तर सगळीच मंडळी गिरनारला निघालेली.. हळुहळू असे
जाणवले की सारा डबाच गिरनारयात्रींनी भरलाय.. प्रत्येक ग्रुपच्या
सहकाऱ्यांची वेगवेगळ्या डब्यांत वाटणी झालेली त्यामुळे बराच वेळ लोक या
डब्यांतुन त्या डब्यात करत होती.
अखेर सगळे स्थिरस्थावर झाले, रात्री आम्हाला पॅक फूड देण्यात आले, मस्त
पोळी भाजी, मसाले भात होता.. आम्ही जेवून झोपेची आराधना करू लागलो.. काही
लोकांना ५ वाजता अलिकडच्या स्टेशनावर उतरायचे असल्याने दिवे बंद करून मंडळी
ढाराढूर झोपली.
मला मात्र काही केल्या झोप येईना एक तर सर्वात वरचा बर्थ होता त्यामुळे सतत पडण्याची भीती. शेजारी एक लहान मुलगी होती एकदम चुणचुणीत, ती सर्वांना बालसुलभ विनोद सांगत होती, अखंड बडबड चाललेली. तिच्या निरागस गप्पा ऐकीत झोपेच्या आधीन झाले.. सकाळी ६लाच जाग आली, म्हणजे रात्रभर गाढ झोप नव्हतीच पण आता डुलकीही येईना तेव्हा उठून बसले.. थोड्याच वेळात बाकीची मंडळी उठली. गाडी बरोब्बर वेळेत राजकोटला पोचली. आयोजकांनी बस तयार ठेवली होती, मधे आंघोळीसाठी थांबून सोमनाथकडे प्रयाण केले.
सोमनाथची २ मंदिरे आहेत, एक नवे जिथे पाताळात खाली महादेव स्थापिले आहेत व त्यावरच्या मजल्यावरपण एक पिंड. पुर्वी हिंदूमंदिरे आक्रमणांपासून वाचविण्यासाठी ही व्यवस्था.
बऱ्याच लोकांना जुने मंदिर माहीत नसते ते फक्त नवीन मंदिरच पहातात. दोन्ही मंदिरे एकदम जवळ जवळ आहेत. हे मंदिर अनेकवेळा पाडले गेले व पुन:पुन्हा उभे केले गेले असे म्हणतात. अतिशय सुंदर बांधकाम, शंकराची पिंडही मोठ्ठी आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. मी मंदिरात शिरले तेंव्हा प्रदोषाची सायंकाळची पुजा चालु होती. विविधरंगी, विविधसुगंधी फुले इतक्या आकर्षकपणे मांडली होती की पहात रहावे. मंत्रांचा धीरगंभीर आवाज गाभाऱ्यात घुमत होता.. एक प्रसंन्नता मंदिर वेढून राहीली होती. मनात शंकराचार्यांचे आत्मषटक घोळत होते - चिदानंदरुपम् शिवोहं शिवोहं !
चंद्राने दक्षाच्या शापातून मुक्त झाल्यावर येथे शिवलिंगाची स्थापना केली असे पौराणिक कथा सांगतात तर मंदिराचा उल्लेख अगदि इ.स. पुर्वीपासून इतिहासकारांना मिळतो. सध्याचे मंदिर हे सरदार वल्लभभाई पटेलांनी बांधले आहे.
मी दर्शन घेतले आणि मागे गेले, देवळाभोवती बाग थाटली होती, हिरवळ
पसरलेली चहूबाजूनी. त्याच्याकडेने सज्जा होता सागर दर्शनासाठी. देवळातून
बाहेर पडल्यावर डाव्या बाजूलाच प्रसिद्ध असलेला बाणस्तंभ पाहीला. म्हटलं
व्हॉटस् ॲपचे सगळेच मेसेजेस् फेक नसतात तर
तर या खांबावर एकबाण दाखवून एक श्लोक कोरलेला आहे. त्याचा अर्थ असा की बाणाच्या दिशेने सोमनाथ मंदिर आणि दक्षिण ध्रुव यात कुठलाही भुभाग नाही. हा स्तंभ ६व्या शतकातील आहे म्हणतात.
मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे, पुर्वी आलेली लोकं सांगत होती की भरतीच्या वेळेत पाणी मंदीरात शिरत असे. आता मात्र भर टाकून बहुतेक, समुद्रापासून थोड उंचावर वाटलं देऊळ. मस्त समुद्रजल शांतपणे हेलकावत होतं.. दूरवर काही नावा दिसत होत्या एकूण शांतता वाटत होती मनाला..
सोमनाथाच्या दर्शनाने एक वेगळी उर्जा घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान ठेवलं. जुनागढ हे गावच एक गड आहे म्हणे. त्यामुळे गावाला अनेक मोठमोठाले दरवाजे दिसतात. तसेच बाजूची तटबंदीही सतत दिसत रहाते. काही ठिकाणी पडझड झालीय. पण बऱ्याच अंशी तटबंदी शाबूत असावी.
रात्री जुनागढ स्टेशनजवळ गीता लॉजमधे जेवलो, जेवण अप्रतीम होतं. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी मधुर ताकाचा जगच टेबलवर आणून ठेवला.. मी मस्त २/३ ग्लास ताकच प्यायले.. केरळमध्ये सांबार, रस्सम, नाशिकला मिसळीच्या ठिकाणी रस्सा तस इथे अनलिमिटेड ताक.. भारीच.. जुनागढला जाणाऱ्यांनी एकदातरी इथे जेवाव. जेवणे आटोपून रात्री १०.३०ला आम्ही आमच्या खोल्यात पोचलो.
रहाण्याची सोय तळेठीला नरसी मेहता धर्मशाळेत होती. धर्मशाळा असली तरी सोय उत्तम होती. खोलीत गरमपाणी, एसी, सगळ्या सुविधा होत्या. आता २/३ दिवस आमचा ईथेच मुक्काम असणार होता. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आलेला होता. उद्या सकाळी ४.३०लाच परिक्रमेला निघायचे होते. तेंव्हा खोलीत गेल्यावर ताबडतोब झोपून गेलो.
क्रमश:
सकाळी
४.३०ला बाहेर प्रांगणात सगळ्यांनी भेटायचे ठरलेले. ३.३०लाच उठलो, आवरून
बरोब्बर ४.३०ला बाहेर हजर झालो. समोर गिरनारच्या पायऱ्यांवरील लाईटस् दिसत
होते.. त्या दिव्यांच्या ओळीवरून रस्ता कसा जात असेल ते कळत होते. सारी
मंडळी अगदी वेळेवर हजर झाली. ग्रुपलीडरने परिक्रमेच्या दृष्टीने काही सूचना
दिल्या उदा. टॉर्च घेतल्याची खात्री करणे, काठ्या गरज लागत असेल तरच
घ्या.. बऱ्याचदा घेऊन नुसतेच ओझे होते इत्यादी. धर्मशाळेच्या बाहेर पडून
आम्ही सगळ्यांनी चहा/ कॉफीपान केले, ज्यांना काठ्या घ्यायच्या होत्या
त्यांनी काठ्या निवडल्या आणि चालायला सुरुवात केली. हो आता कुठेही जायचं तर
खोलीतून निघायचं व थेट चालू लागायचं 
आता परिक्रमेविषयी थोडेसे:
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा
करणे असे म्हणतात. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट
डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत
नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश खुला करतात.
ही परिक्रमा केवळ कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंत करतात. पहिला दिवस भवनाथमंदीरापासुन सुरु होतो. दुसरा मुक्काम जीना बाबांची मढी, तिसरा मालवेल आणि शेवटचा बोरदेवी मंदीर. अश्याप्रकारे एकादशीपासून सुरु करुन पौर्णिमेला परीक्रमेची समाप्ती करतात. हल्ली एखादा मुक्काम करुन किंवा एका दिवसात सलग चालून १२/१४ तासात पुर्ण करतात. पण एक तरी मुक्काम असावा असे शास्त्र आहे. (मी भाडीपाची फॅन आहे) यादरम्यान सर्व देव, यक्ष, गंधर्व, यती, ऋषी असे सगळेजण परिक्रमा करत असतात व त्यांचा सहवास व आशीर्वाद मुक्काम केल्याने मिळतो अशी भावना आहे.
तर अश्या या परिक्रमेच्या वाटेवर आमची पाऊले पडू लागली.
एवढ्या पहाटेसुद्धा रस्त्यात अनेक ठिकाणी आश्रम उघडे दिसत होते. अखेर ती
कमान आली.. गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार... आता खऱ्या अर्थाने चालणे सुरु
होणार होते. अंधार मी म्हणत होता.. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा
अंधार होता. या रस्तावर चालायला विजेरी अत्यावश्यक आहे. मधे मधे इतरांच्या
विजेरीचा उजेड मिळतो पण तुमच्या पायाखाली खड्डा आहे की उंचवटा आहे ते
पहाण्यासाठी तुमच्या हातात विजेरी हवीच हवी..
हेच ते प्रवेशद्वार :
मी परिक्रमेला सुरवात झाल्यावरच आमचा ठरलेला ग्रुप सोडून पुढे चालायला सुरवात केली. काल सोमनाथ मंदीरात झालेल्या चुकामुकीमुळे जरा लीडरनी प्रेमळ दटावणी केली. पण त्यांना मी विनंती केली की त्यांच्या इतक्या हळूहळू वेगाने मला चालता नाही येणार. इथून मी जी पुढे गेले ते शेवट पर्यंत पुढेच राहीले. आपण जर आपल्या सहज वेगाने चाललो नाही तर पाय जास्त दुखू लागतात. परिक्रमेचे अंतर पाहता मला ती रिस्क घ्यायची नव्हती.
जंगल सुरु झाल्यावर, म्हणा कमान ओलांडली की जंगलच सुरु होते; तेही घनदाट. तर इथून लगेचच हळूहळू चढालाच सुरुवात होते. या पहील्या चढाला जवानी की घोडी म्हणतात.. जवानीकी घोडी चढुन गेल्यावर जीनाबाबाकी मढीपाशी जरा रेंगाळलो. त्यांची चिलीम आजही तिथे आहे. बाजूला एक हनुमान आणि कालिकेचे मंदीर आहे. इथे बरेच नागासाधू बसलेले असतात आणि तुमचा रस्ता अडवून पैसे मागतात. ते जे काही चित्र होते ते फारच भयंकर वाटत होते.. काही साधूंची बडबड चालू होती - "१रुपयात काही येतं का आता १०रुपये तरी द्या." माझ्या मागून आलेल्या काहीजणींनी सांगितले की बायकांवरही शेरेबाजी करत होते म्हणे.. कसले हे साधू! मी फार बघू शकत नव्हते.. आपल्याला अश्या दिंगंबर अवस्थेतील माणसांना पहायची एकतर सवय नसते त्यामुळे आधी अवघडायला होतं.. त्यात इथे अनेकजण असे नुसते भस्म फासून बसलेले.. त्यांचाबद्दल अनेक वदंताही आहेत जसे की ही लोकं फार कोपिष्ट असतात, त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर संमोहीत करतात इत्यादी इत्यादी.. आमच्या लीडरलातर पकडून पैसे द्यायला लावले म्हणे..
मी यु ट्युबवर पाहिलं होतं की ही लोकं पैसे मागतात, तेंव्हा हा मुक्काम जवळ आल्यावर मी काही नाणी हातात ठेवली. आणि कुणाकडेही न बघता भराभर चालायला सुरवात केली.. हात पुढे आला की नाणं ठेवायच आणि चालू लागायचं. त्यात मला एक जाणवलं की नामस्मरण चालू असेल तर ही लोकं बाजूला होऊन तुम्हाला रस्ता मोकळा करुन देतात.. नामस्मरण थांबलं की पैसे मागणार.. जीना बाबाच्या मढीच्या आधीपासून, नंतरही बऱ्याच अंतरापर्यंत ही लोकं रस्त्याच्या दुतर्फा बसलेली असल्याने मला माझा अनुभव टेस्ट करता आला.. पुढे पुढे साधूंबरोबर साध्वीपण होत्या (त्या मात्र दिगंबर नव्हत्या). त्याही पैसे मागत असत पुरुषयात्रेकरूंना ते त्रासदायक होई. यातून सुटकेचा मार्ग एकच, नामस्मरण. असे अनुभव यायला लागले की ही परिक्रमा नुसता जंगल ट्रेक न राहता यात्रा बनून जाते व जाणवते त्यांच्या इच्छेनेच केवळ आपण हे करु शकतो.
इथे येईस्तोवर चालणाऱ्यांचे वेगानुसार गट पडले होते. सर्वात आधी सुपरफास्ट बर्वेदादा, श्री. अभ्यंकर आणि अजून दोघे सासरा जावयाची जोडी होती. सासरेबुवाही ७०च्याजवळपास होते पण चालण्याचा वेग अफाट होता. त्यानंतर आमचा ग्रुप मी, राणे आजी, नगरचे चव्हाणदादा, शुभांगी, पुण्याचे पंकजभाऊ, त्यांच्या मातोश्री आणि त्यांची मैत्रिण, तेजस आणि शिरवळकडचा रोशन. तेजस आणि रोशन एकदम उमदे गडी होते आणि अगदी टणाटण उड्या मारत परिक्रमा पार करत होते. मी बऱ्याचदा पंकजभाऊंच्या आई आणि त्यांच्या मैत्रिणी बरोबर चालत होते. मधेमधे एकमेकांसाठी थांबून आमचा हा चमू मार्गक्रमण करत होता. आमच्या मागे माझ्याबरोबर आलेल्या २न्ही काकू आणि अजून २जणी होत्या. सर्वात शेवट सगळे लीडर आणि ज्यांचा वेग कमी आहे अशी माणसे. जंगल घनदाट होते व एकदा आत शिरल्यावर चालूनच बाहेर पडायचे त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. म्हणून ग्रुप लीडर्स या लोकांना चीअर अप करत, मदत करत मागून येत असावेत.
चालताना दिसलेली पवनचक्की व पाण्याची उन्हाळी सोय

एकूण तीन डोंगर चढायचे आणि उतराचे असतात हे माहित होते. पण चढ एवढा होता की २रा डोंगर संपेपर्यंत थकायला झाले होते. मधे थांबत होतोच आम्ही. जवळपास ७०अंशाचे चढ होते.
परिक्रमा ही वर्षातून काही ठराविक दिवसच करता येत असल्याने गर्दीचा
नुसता पुर आलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्टॉल्स लागलेले दिसत
होते.. भजी, पापड, खारे दाणे, फुटाणे, मसाला आलू, मीठ, मिरची, मसाला,
भाज्या असे काय काय न् काय काय.. सर्वात कहर म्हणजे पानाचे ठेलेही होते.
ठिकठिकाणी लिंबू सरबत, पाणी मोफत वाटत होते.. अनेक महाराजांचे रस्त्यात
लंगर होते, ते चहा नाष्टा, जेवण वाटत होते.. हा सेवाभाव पाहून सद्गतीत
व्हायला होत होतं..
असाच एक अमूलचा स्टॉलः
मीठ, मिरची, भाजीचे ठेले:

सुरवातीला टेंपो, गाड्या काही अंतरापर्यंत येऊ शकतात म्हणून दुर्लक्ष
केलेले पण दुसऱ्या डोंगरावरही पाणी मोफत वाटत होते जे त्यांनी खालून
कुठुनतरी लांबून वाहून आणलेले.. बरं ही लोकंही गरीबच दिसत होती.. हे सगळे
मोफत वाटणारे अगदी हात जोडुन तुम्हाला आमंत्रण देतात.. तो सेवाभाव बघून
शब्द सुचत नाहीत. काही ठिकाणी शहाळेही ५/५ रुपयांना विकत होते.. का? केवळ
परिक्रमा वसीयांची सेवा हा भाव.. इकडे शहरातील विक्रेते असते तर अश्या
ठिकाणी अजून १०० रुपयांना शहाळे विकले असते.. पहिल्याचढापासुन पुढे
तुम्हाला सगळे पाठीवर वाहून न्यावे लागते.. गाडी अगदी ३ऱ्या डोंगराचा उतार
संपल्यावरच! मला या माणसांची खूप कमाल वाटली.. मी मनातून या सगळ्यांना
नव्हे त्यांच्या सेवाभावाला साष्टांग दंडवत घातला.
वारीत जशी सगळ्या प्रकारची माणसे दिसतात तशी परिक्रमेतही दिसत होतीच. सेवाभावी अनेक गरीब लोक होते तसेच लहान मुलाला घेऊन भीक मागणारे, अपंगलोक, वृद्ध भीकारी अनेक ठिकाणी दिसत होतेच. काही मुलांना शंकर, राम, लक्ष्मी असे साज चढवलेले व पैसे मागायला लावलेले तर काही ठिकाणी साधू जमीनीत पुर्ण डोके गाडून झोपलेले अशी अनेक निरीक्षणे करीत मी चालले होते. दुसऱ्या डोंगरमाथ्याला आम्ही साधारण ११.३०च्या सुमारास होतो. उन आजिबात जाणवत नव्हते. मला जरा जरी उन लागले तरी लगेच पित्ताचा त्रास होतो.. म्हणजे पित्त उसळतेच.. मग विश्रांती घेतल्याशिवाय आराम पडत नाही. पण आज मी अखंड चालत होते, थकवा जाणवल्यावर मधे लिंबू सरबत घेत होते, बरोबर इलेक्ट्रॉलचे पाणी घोट घोट घेत होते. पण पित्ताचा त्रास आजिबात जाणवत नव्हता. उन्हाचे अस्तित्वही डोंगरमाथ्याला जाणवत होते थोडेफार नाहीतर नाहीच.
मधे मधे अनेक ओढे दुथडीभरून वहात होते आणि बूट ओले होऊनयेत म्हणून मी कसरत करत होते. मधल्या एका ओढ्याला अशीच कसरत करताना उडी चुकली आणि पाण्यात पडले.बूट वाचवत होते आता बऱ्यापैकी पाय भिजले. झाले, सगळ्यांना करमणुकीला नवीन विषय मिळाला- "मी व ओढा". पुढे जिथे जिथे ओढा येत असे तिथे लोक आधीच हसायला सुरवात करत. या करमणुकीने आमचा थकवा विसरायला मदत होत होती.


३रा डोंगर अगदी लहान आहे असे ऐकले होते. लोकही असेच सांगत होते आता फार चढण नाही. त्यामुळे जरा बरे वाटत होते. पण ३रा चढ सुरु झाला आणि संपायचे नाव घेईना. शेवटी १.३० की २च्या सुमारास आम्ही कालीका देवळापाशी आलो. हे ठिकाण मालवेल व परिक्रमेचा मध्य आहे असे नंतर कळले. तेंव्हा मात्र चला आता हा डोंगर उतरला की परिक्रमा संपणार असे वाटत होते. उतारावर एक शॉर्टकट मिळाला, अजून अंतर कमी झाले. ३ऱ्या डोंगराच्या पायथ्यापाशी आलो तेंव्हा २.३० वाजलेले. आता भूक लागली होती. पायथ्याशी असलेल्या एका लंगर मध्ये पुरी, भाजी, गाठीया, शिरा, खिचडी असे पुर्ण गरमागरम जेवण जेवलो. आता मालिशवाले दिसायला लागले होते, निरनिराळ्या माळा, तेले अश्या वस्तूंची विक्री चालू झालेली. हे पाहून मला अजूनच वाटायला लागले की परिक्रमा संपत आली. काही लोक मालीश करून घ्यायला, झोप काढायला थांबले. मी मात्र चालणे सुरूच ठेवले होते. आता थांबायचे ते रूमवर जाऊनच.
चढत जाणारी नागमोडी वाटः
तासाभरात शेवटची कमान आली परिक्रमा संपल्याची, समोर बोरदेवी मंदिराची पाटी दिसली. मनातल्या मनात मी आनंदाने एक उडी मारली. (शारिरीक शक्यच नव्हते.) देवाचे आभार मानले. बोरदेवीचे दर्शन घेऊन पुढे जाण्याची प्रथा आहे परंतू पाटीवाचली तर एक कि.मी. अंतर होते म्हणजे येऊन जाऊन २ कि.मी. बापरे.. आता २किमी सुद्धा जास्त वाटायला लागले होते. मी तिथेच स्टॉल्सवाल्यांजवळ चौकशी केली तर म्हणाले इथे परिक्रमा संपली बोरदेवीचे दर्शन घेतले पाहिजेच असे नाही. ऐकून किती बरं वाटलं सांगू. थोडं चालल्यावर म्हटले किती अंतर बाकी ते तरी विचारू.. तर कळाले की इथून भवनाथ मंदीर अजून १२किमी. आहे. हे ऐकून फक्त पडायचीच बाकी होते. मनाला आवरलं, इतके अंतर चालून आलो आता हेही संपेल. तशी धुगधुगी होती अजून शरीरात आणि मन थकायला तयार नव्हतं.
हाही रस्ता जंगलातूनच आहे पुर्ण. मधे मधे गिरनार दर्शन देत होता. आजूबाजूला दाट झाडी छोटेसे ओहोळ.. रस्ता खरोखर सुंदर होता. मन प्रसंन्न् करत होता. हळूहळू चालत होते, आता टेकायचे झाल्यास अगदी खाली बसावे लागत होते, त्यामुळे शक्यतो ते टाळून उभ्या उभ्या विश्रांती घेऊन चालणे सुरु ठेवले होते. (एकदा खाली बसल्यावर उठताना काय परिस्थीती होत होती ते केवळ माझे मीच जाणे) तिसऱ्या डोंगराच्या उताराच्यावेळी पंकजभाऊंनी काठी दिलेली; तिचा खूपच उपयोग होत होता. त्याचे झाले असे की knee capsमी पहिल्यांदाच वापरत होते आणि त्याने उजव्या पायाची नस कुठेतरी दुखावली होती. मधे रस्त्यात थांबून मी त्या कॅपस् काढल्या तरी पाय उचलायला खूपच त्रास व्हायला लागला होता. मग काठीच कामी आली. मध्ये मध्ये शॉर्ट्कटस् होते पण पाउल नीट पडेल का याची शाश्वती न वाटल्याने सरळ मार्गावरुनच चालत राहिले.
बोलणे कधीच बंद झाले होते. थकव्याने डोळे मिटायला लागले होते. जेंव्हा जेंव्हा विचारू तेंव्हा सगळेजण ५किमी. राहिले सांगत होते पण हे शेवटचे ५ किमी काही संपायला तयार नव्हते. एकदातर मी केवळ खुणेनेच पोलीसांना विचारले किती अंतर आहे.. त्यांनाही माझी परिस्थिती पाहुन हसू आले. अर्थात उत्तर तेच होते -५ किमी. संपूर्ण परिक्रमेत मधे मधे पोलीसांचा तंबू होता, किंवा पोलीस येताजाताना दिसत होते. मदतीलाही तत्पर असावेत कारण एका कुटुंबातील मुलगा हरवला होता तो त्यांनी विक्रमी वेळात शोधून दिला होता.
मी मजल दर मजल करीत चालत होते. खोडीयारमातेचे छोटेसे देऊळ अगदी रस्त्यातच लागते. तिथे कळाले की बोरदेवीचे दर्शन नसेल घेतले त्यांनी इथे दर्शन घेतले तरी चालते. जणू भक्त्तांसाठी माता रस्त्यावर येऊन उभी होती. परिक्रमा सोपी करत होती. स्वत:ला मोटीवेटकरत होते. निघाल्यापासून अनेक वृद्ध माणसे दिसत होती, गुजराथी बायका केवढाली वजने डोक्यावर वहात वेगाने चालत होत्या. त्यांना पाहून अचंबीत होत होते. शेवटी ती वेळ आलीच. एका पाणीवाटपाच्या ठिकाणी बसायला जागा होती, समोर गिरनार दिसत होता.. आता मैलाचे दगड सुरुझाल्याने खरे अंतर कळत होते व खरोखर शेवटचे ५किमी. राहिले होते. शरीर प्रचंड थकले होते, वाटले बस्स आता कोणी काही म्हणो, मी काही इथून ऊठणार नाही.. मागून येणाऱ्यांना विचारू की एखाद्या गाडीवानाला विनंती करायची का ते. आता इथे अगदी दुचाकीपण दिसत होत्या पण रिकामी गाडी एकपण नाही. तेवढ्यात भलमोठं बोचकं घेऊन एक बाई आली आणि माझ्या शेजारी जरा टेकली. तिला विचारलंच न राहवून की बाई गं, एवढ सगळ ओझे कसे वाहतेस. तर ती हसून म्हणाली आम्हाला याची सवय आहे. ओझे नसेल तर भरभर चालता नाही येणार. तिचं कुटुंब आता लवकरच परिक्रमा पुर्ण करणार होतं आणि मग डोक्यावरच्या साहित्यातून तिला स्वयंपाक करायचा होता. बापरे.. इथे चालायची शक्ती नाही आणि ही बाई त्यानंतर स्वयंपाकपण करणारे.. मी स्वत:वरच रागवले.. ते काही नाही हे अंतर पुर्ण करायचेच.. चला यात्रावीरहो.. चालायला लागा.. तु हे करु शकतेस. आता फक्ता ५ किमी म्हणजे १च तास.. "common, you can do it!". परत चालणे सुरु झाले, दत्तात्रयांचे नाम मुखी सुरु केले. मागे नामस्मरणात चालताना असे जाणवले होते की आपले पाय जमिनीला लागतच नाहीयेत.. तो अनुभव आठवला आणि स्वत:ला सांगितले की तेच करून घेत आहेत तेंव्हा परिक्रमा पुर्ण होणारच ! जय गिरिनारी!
आतातर अगदी हळूहळू चालत होते, चालणे कसले म्हणा खुरडतच होते. काठी
टेकवायची मग तिच्यावर जोर टाकून पाय ओढायचे. मधे क्षणभरच उभे रहायचे की
उर्जा मिळायची, तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जेवढा वेग साधता येईल तो
साधायचा की परत थोड्यावेळाने पाय ओढणे सुरु, परत विश्रांती असे चक्र चालू
होते. एकीकडे पुणेरी मन म्हणत होते, यांना कुणीतरी सांगायला पाहिजे, जिथे
परिक्रमा संपल्याची कमान आहे तिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट ठेवा. किती लोक
घेतील तो. दुसरीकडे स्वत:ला सांगत होते, तुला कैलास-मानसरोवर चालत जायचे
आहे ना, त्याची रिहर्सल समज. हे अंतर पुर्ण केलेस तर तुझी थोडी तरी तयारी
होऊ शकते तिकडे जायची. तुला हे अंतर पुर्ण करायलाच हवे. मधेच रुम मधील बेड
आणि आरामदायी वातावरण डोळ्यासमोर येत होते, हे अंतर कापले की आपल्याला आराम
मिळणार आहे. तेंव्हा एकला चलो रे..
अश्या प्रकारे अनेक विचारांना फाटे देत, नामस्मरणकरत पावणे सहाला मी
धर्मशाळेत प्रवेश केला. सकाळी ४.३०ला निघालेली मी ५.४५ म्हणजे जवळ जवळ १४
तासांनी परतले होते.
न आलेल्या व आधी पोचलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले तेंव्हा
खुप मस्त वाटले. बाहेरच बाकावर बसून घेतले, रुमची चावी काकूंकडे होती. त्या
मागे होत्या पण परिक्रमा चालत पुर्ण केल्याचे समाधान एवढे होते की लगेच
आडवे व्हायला नाही मिळाले त्याचे आजिबात दु:ख झाले नाही. मी एक उद्देश्य
पुर्ण केले होते. लगेच उद्या गडावर येणार का लोकांची चर्चा सुरु झाली.
सगळेच इतके दमले होते की उद्याची कल्पना करवत नव्हती. मी म्हटले उद्याचे
उद्या पाहू. खोलीवर गेल्यावर गरम पाण्यानी अंग शेकले, लवकर जेवून आडवे झालो
तेंव्हा काय वाटत होते ते शब्दात मांडणे कठिण आहे.
क्रमश:
काल रात्री झोपताना बी कॉम्प्लेक्स व पेन किलर घेऊनच झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कालच्या इतका थकवा जाणवला नाही. आज दिवसभर आराम होता, रात्री शिखरासाठी निघायचे होते. नाष्टाकरून परत एक झोप काढली. तेवढ्यात असे कळाले की कुणी मसाजसाठी पतीपत्नी धर्मशाळेशी संलग्न आहेत व त्याचा चांगला उपयोग होत आहे. माझा उजवापाय दुखराच झाला होता, एक पायरीही चढणे दुष्प्राप्प्य झालेले. सॅकच्या ओझ्याने खांदे सुजलेले. मी अगदी आतुरतेने तिची वाट पाहू लागले, पण ती काही येईना.. शेवटी तिचा फोन नं मिळवला तर तो तिच्या नवऱ्याचा होता तो म्हणाला की ती धर्मशाळेतच आहे; येईल. ह्यात दुपारच्या झोपेचे खोबरे झाले, हो ती आली आणि झोप लागल्यामुळे आपण दारच उघडले नाहीतर.. शेवटी ४.३०ला तिला पहायलाच बाहेर पडले तेंव्हा सापडली एकदाची. तिला जवळ जवळ पकडूनच रुमवर आणली. अजून कोणी बोलावल तर उशीरच झाला असता. तसेच मसाजची खूप गरजही होती. तिने फटाफट १५-२०मिनिटात मसाज केला. तिचा हात जरी पायाला लागला तरी कळ येत होती त्यात तीने शेवटी फटके मारले.. देवा रे.. पण तिला नसांची चांगली जाण असावी, माझा पाय तिने छान मोकळा करून दिला. आम्ही आंघोळी उरकल्या व जेऊन तयार झालो. रात्री १०.३०ला निघायचे ठरले होते; परत झोप काही येईना; मग असाच वेळ घालवला.
१०.३०ला बरोब्बर बाहेर आलो, ज्यांनी दुपारी डोली ठरवल्या होत्या ते लोक थोडे उशीरा निघणार होते. शेवटी सगळे जमून ११ला चालायला सुरुवात केली. ज्यांनी काल काठ्या घेतल्या नव्हत्या त्यांनी आज काठ्या घेतल्या. गुरुशिखरावर सगळ्यांनी काठी घेतलीच पाहिजे असे सांगितले होतेच. आधी भवनाथाचे दर्शन घेतले. भवनाथ हे शंकराचे देऊळ आहे, तेथील ग्रामदैवत. त्याला आधी प्रार्थना करायची की महादेवा, गुरुशिखर चढत आहोत, सगळा प्रवास सुखरुप होउ दे!
जाता जाता भवनाथ मंदिरा विषयी थोडेसे :
हे महादेवाचे जागृत मंदीर आहे असे म्हणतात. बाजूलाच मृगीकुंड आहे. त्याची
काहीतरी गोष्ट ऐकलेली, पण लक्षात नाही आता. येथे शिवरात्रीला फार मोठी
यात्रा भरते व मुहुर्तस्नाना साठी साधू थेट कुंडात उड्या टाकतात. हे मी
कुंभमेळ्याबाबतपण ऐकले आहे. असे म्हणतात भगवान शिव स्वत: इथे त्यादिवशी
स्नानाला येतात. कुंडाला प्रदक्षिणा करुन आल्यावर बाहेरच्या बाजूला एक दगड
पाण्यात ठेवलेला आहे. पाण्यावर तरंगणारा दगड. असे म्हणतात की रामसेतूतील हा
दगड इथे आणला गेला आहे म्हणूनच पाण्यावरही तरंगतो. रात्रीच्या अंधारात खरच
तरंगत होता की नाही हे कळाले नाही. दिवसा पहायला हवे.
रात्रीचे भवनाथ मंदिर :
म्रुगी कुंडः
असे महादेवाचे दर्शन झाले की थेट पहिल्या पायरीशी चढावा हनुमान आहे, त्याला नमस्कार; त्यालाही प्रार्थना की शक्ती दे. त्यानंतर पहिल्या पायरीवर नारळ फोडला जातो. त्या पायरीवर डोके ठेवायचे, दत्तात्रयांना सांगायचे, तुम्हीच घेऊन जा आणि सुखरुप खाली आणा. मग सुरुवात. आम्ही भवनाथानंतर जवळच असलेल्या जुन्या आखाड्याच्या आश्रमातील दत्तालापण नमस्कार केला. उत्सुकतेने सभोवार नजर फिरवीली. चारी बाजूंनी बांधकाम करुन साधू आणि साध्वींसाठी रहाण्याची सोय केलेली अनेक मजली इमारत होती ती. अनेकसाधू, साध्वी दिसत होत्या. या प्रवासात साध्वींना तेही अनेक संख्येने मी पहिल्यांदा पाहिले.
दर्शन घेऊन गिरीशिखराकडे वाटचाल चालू ठेवली.
गिरनार हे भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला परिसर आहे. त्याची रेवताचल, कुमुद, उज्जयंत, श्वेताचल, श्वेतगिरी अशीही नावे आढळतात. श्रीराम व पांडवांनी इथे भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. श्रीकृष्णाद्वारे रुक्मिणी हरणही इथेच झाले अशीही मान्यता आहे. गिरनारचे उल्लेख सम्राट अशोकापुर्वीच्या इतिहासातही आहेत असं वीकीपीडिया सांगतो. असा हा गिरनार पर्वत हिमालयापेक्षाही जुना. अनेक साधू, बैरागी यांची तपोभूमी. स्वत: दत्तात्रयांनी इथे १२हजार वर्षे तपश्चर्या केली होती ब आजही त्यांचे अक्षय निवासस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांच स्थानावर आज दत्तपादुका उमटलेल्या आहेत. हां आता कुणी म्हणू शकतं की हातानी छिन्नी हातोड्याने त्या कोरू शकतं! तसे असेलही.. पण या स्थानावर अनेकांना अनेक अनुभव येतात जे पादुका उमटल्या ह्यावर श्रद्धा ठेवायला लावतात. गिरनारला जसे धार्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणेच तो अनेक वन्यप्राणी, वनस्पती यांचे वसती स्थान आहे. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती इथे मिळतात.
आम्ही सुरवात केली, चढाई रात्रीची असल्याने किती चढलो ते काही कळत नाही. हवा छान थंड असते त्यामुळे लवकर थकवा येत नाही. आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला चढत होतो. परिक्रमेचा काळ, त्यातून पौर्णिमा त्यामुळे वाटेवरची सगळी दुकाने चालू होती. त्यांचा प्रकाश मिळत होता. पायऱ्यांवर दिवेही लावले आहेत. अगदीच अंधार वाटेल तर तिथे पौर्णिमेचा चंद्र नैसर्गिक प्रकाश पुरवत होता. सुचना पुर्वीच दिल्या गेल्या होत्या की चढताना आजिबात घाई करायची नाही. अगदी सावकाश एकेक पायरी चढायची. प्रत्येकजण त्याची अंमलबजावणी करत होता. तसंपण ही स्पर्धा थोडीच होती..
इथेही खूप गर्दी होती. अगदी सतत एकाबाजूने चढणारे चालत होते तर दुसऱ्या बाजूने उतरणारे. जसजस वर जाऊ तसतशी गर्दी कमी न होता वाढतच होती. कुणी मोबाईलवर दत्तनामाचा जप लावून चालले होते तर कुणी स्वामी समर्थांचा. काही तरुण मंडळी एवढ्या गर्दीतही धसमुसळेपणा करत सिनेमाच्या गाण्यांवर उड्या मारत चालत होती व यात्रेकरुंच्या रोषास पात्र होत होती. मी सावकाश चालत होते तरी पहिल्या सुपरफास्ट बॅचचे लोक माझ्या आजुबाजूला होते. आश्चर्यच वाटलं माझ्या वेगाचं.
मन स्थिरही होते, शांत होते पण भावूकही झालेले. माझे बाबा अनेकवेळा गुरुचरित्राचे पारायण करीत. त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी आठवत होत्या. दत्तगुरु व गणपती हे देव न वाटता लहानपणी आम्हाला आमचे कुटुंबीयच वाटत असत त्यामुळे आजपर्यंत गुरु किंवा देव या नजरेने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही; मला कुणा नातेवाईकालाच फार वर्षाने भेटायला जातोय असंच वाटत होतं.
पायरी चढताना आम्हाला सांगण्यात आलेले की विश्रांती उभ्यानेच घ्या, सारखे खाली बसलात तर अजून त्रास होईल. पायऱ्यांना एका बाजूला कठडे आहेत बहुतांशी. सुरवातीच्याच काही पायऱ्यांना आजिबात कठडे नाहीत. सतत चालत असल्याने हवा थंड असूनही थंडी आजिबात वाटत नव्हती. १५०० पायऱ्यांजवळ एक तरुण मुलगा खाली जाताना पाहिला. २५०० पायऱ्यांपासून परत आला होता तो. मला त्याचं आश्चर्य आणि स्वत:ची काळजी वाटली. हा मुलगा परत आला, आपण जाऊ ना ! पण मला थकवा आजिबात जाणवत नव्हता अगदी आरामात चढत होते. २०००पायरीच्या दरम्यान बेलनाथबाबा समाधी आहे. ते एक मोठे सिद्ध होते. २२५० पायरीवर डावीकडे राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. ३/४ पायऱ्या चढून आतमध्ये जाऊन दर्शनास दोन सुंदर मूर्ती आहेत. तिथून एका कपारीतून अजून वर गुहेत जाता येते. अगदी घसपटत जावे लागते. वर ३शिळांमुळे एक छोटीशी खोली तयार झाली आहे. मस्त वाटलं वर गेल्यावर. इथे भर्तुहरी नाथांनी राजा गोपीचंदाला उपदेश करून तपाला बसवले होते. वरच्या गुहेत ५/६ माणसे बसू शकतात, मस्त उबदार वातावरण होते आत.
रात्रीचे खाली दिसणारे गाव :
यादर्शना दरम्यान सुपरफास्ट बॅच पुढे गेली, ती शेवट पर्यंत भेटली नाही. मी काहीकाळ एकटीच चालत होते, मग परत मंडळी भेटली. २,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे अजून वर गेल्यावर ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर भाविक येथे त्या संतानाला घेऊन येतात. आम्ही राणकमातेपाशी दिवा लावला. सगळेजण त्रिपुरवाती घेऊन आलेले व जिथे शक्य आहे तिथे वात लावत होते. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. चढता चढता आम्ही पहिल्या मुक्कामी पोहोचलो- जैन मंदिर - साधारण ४हजार पायऱ्या इथे पुर्ण होतात. इथे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी बसायला जागा आहे. कुणी आडवे झालेले, कुणी बसल्या बसल्याच झोपलेले. आम्ही इथे पावणे ३ वाजता पोहोचलो.
कुड्कुडणारे आम्ही:
आता असं ठरलं की इथून पुढे सगळ्यांनी एकत्रच जायचं. जैन मंदिराच्या मागच्या बाजूस वळणावर बऱ्यापैकी मोकळी जागा मिळते. आम्ही तिथे थांबलो. मागची लोकं बऱीच मागे होती. झोपाळू मंडळींनी ताबडतोब खाली अंथरले व आडवे झाले. मी पण पाठ टेकून झोपण्याचा थोडावेळ प्रयत्न केला. आता चांगलच गार वाटू लागलं. चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून थंडी जाणवत नव्हती. अजून थांबलो तर थंडीने हुडहुडी भरेल अस वाटायला लागलं. इथे पोचल्यावर लगेचच कमरेला बांधलेले स्वेटर्स अंगावर चढले होते, कानटोप्या घातल्या गेल्या.
खरंतर चालून आता उत्साह आला होता. मोठ्या विश्रांतीची गरज वाटत नव्हती. चव्हाणदादा तर उभं राहुन अस्वस्थपणे येरझारा घालायला लागले होते. त्यांना आजिब्बात नुसत थांबून रहायचं नव्हतं. तसाच साधारण तासभर काढला असेल. मागून आमची मंडळी एकेक करून यायला लागली. आता अजून थांबणे फारच जीवावर आलेले, मागून आलेल्या लोकांनापण झोपायचे नव्हते. मग थोड्याच वेळात सगळेच निघालो. आता इथून नुसती चढाई जवळ जवळ संपली. म्हणजे चढाई होती पण मधे मधे पायऱ्या उतरायच्याही होत्या.
इथून डावीकडे जुना रस्ता खाली जाताना दिसतो. या जुन्या मार्गाने स्वामी समर्थ गिरनार चढुन आले होते असे म्हणतात. अजूनही बरेच सिद्ध योगी याच मार्गानी येतात अशी वदंता आहे. डोलीवाले मात्र या मार्गावर नसतात व आता सामान्यही सगळे नवाच रस्ता वापरतात. परंतु गर्दीमुळे येणाऱ्या लोकांना इकडे वळवत असल्याचे कळले. त्यामुळे आम्हालाही या मार्गाने यावे लागले असते कदाचित जो आत्तापेक्षाही अवघड आहे असे म्हणत होते. परंतू तसे झाले नाही.
आपल्याला उजवीकडून अंबाजीमाता शिखराकडे जायचे असते. तशी पाटीही इथे लावली आहे. गोमुखी मंदिराकडे, अंबामाता मंदिर, सहसावन मंदिर यासाठी बाणांनी दिशा दाखविली आहे.
हाच तो चौकः
रात्र असल्याने गोमुखी मंदिरावरून सरळ अंबामातेच्या मंदिरापाशी आलो. एरवी रात्री सारी मंदिरे बंद असतात पण आज त्रिपुरी पौर्णिमा असल्याने सगळी मंदिरे उघडी होती व सगळीकडे भाविकांची गर्दी होती. इथे जवळपास ५हजार पायऱ्या संपतात. म्हणजे खरतर अर्धाच रस्ता झालेला असतो.पण पुढच्या रस्त्यात पायऱ्या उतरणेही असल्याने कदाचित, जास्त वेळ लागत नाही. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की पुढचा मार्ग अंबामाताच सुकर करते.
मी मातेला बाहेरूनच नमस्कार केला व पुढे गोरक्ष शिखराकडे चालत राहिले. हा मार्ग थोडा अवघड वाटला बाजूच्या कठड्यांची उंची जेमतेम घोट्या पर्यंतच वाटत होती. एका बाजूला दरी, रस्ता लहान वाटत होता व तीव्र वळणेही होती. जर वळणांवर जोरात वारा आला किंवा गर्दीत चालताना थोडा जरी धक्का लागला तर एका बाजूला कडप्प्याचा सपोर्ट नव्हता आणि खाली पडायला झाले असते. रात्र असल्याने नेमकी दरी किती खोल ते कळत नव्हते तरी विचाराने भीती वाटली.
आता समोरचा डोंगर चढून गेला की गोरक्षशिखर. इथून एक मधुर सुगंध दरवळायला लागला. खुप प्रसंन्न आणि उल्हसित वाटत होतं. तसं गिरनारवर काय परिक्रमेतही नैसर्गिक विधींसाठी काहीही सोय नाही. सरकारी शौचालये तोडक्या मोडक्या अवस्थेत, आतून झाडोरा वाढलेली होती नाहीतर बंदच. त्यांचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे लघुशंकेसाठी जिथे सपाट भाग आहे तिथे लोक आडोसा बघत आणि विधी उरकत होते. मधे मधे तो वास तुमची सोबत करतो. हा सुगंध वेगळा होता. जसजसे शिखर जवळ येत होते तसा वाढत होता. मला वाटले की रस्त्यात अनेक ठिकाणी छोटी छोटी देवळे आहेत. आपल्याकडे काय दगडाला शेंदूर फासला कि झाला देव. तिथे धूप, उदबत्ती लावलेली होती त्याचा वास असेल. नंतर लक्षात आलं की ते तर सगळीकडेच होतं मग हा सुवास फक्त गोरक्षशिखराजवळच का येत होता?
तर सुगंध उत्साह वाढवत होता आणि फार म्हणजे फारच छान वाटत होते. गोरक्ष गुहेपाशी डावीकडे गोरक्ष मंदीर आहे आणि उजवीकडे गुहेत तुम्हाला धुनी भस्म मिळते. तिथेच अगत्याने तुम्हाला चहा पाजला जातो. त्या प्रसादाला नाही म्हणायचे नसते हे आधी वाचलेले आणि अगत्य पाहून चहा घेतलाच. आतापर्यंत एखाद् दोन घोटच पाणी प्यायले होते, तहान अशी लागली नव्हतीच. चहा घेताना लक्षात आले की बराच वेळ आपण काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही.
इथेच उभ्या उभ्या विसावा घेतला. तिथे एक साधू बसलेले होते व अनेकजण सेवेकरी होते. गरम गरम ताजा चहा करून सगळ्यांना देत होते. त्या बाबाजींना मी थोडी माहिती विचारली की गिरनार यात्रा का व कशी करतात. गर्दीमुळे असावं पण त्यांनी थोडक्यात जुजबी माहिती दिली.
गिरनार दर्शन हे आता फक्त पादुका दर्शन घेऊन पुर्ण करतात. पण खरतर इथे अनुसूया माता, महाकाली शिखर आहे. कमंडलू तीर्थाबरोबर यांचेही दर्शन घेतल्यावर गिरनार यात्रा पुर्ण होते. पण हल्ली लोकांना शक्य नसते त्यामुळे फक्त दत्त शिखर करतात. त्याचीही पद्धत त्यांनी सांगितली - खाली दामोदर तीर्थावर आंघोळ करायची मग भवनाथ, चढावा हनुमान अशी दर्शने करत कमंडलूतीर्थाला जायचे. तिथे परत आंघोळ करायची मग दत्तात्रय पादुका दर्शनाला जायचे. ते सांगत होते आताही जाणते लोक, साधू आधी कमंडलू तीर्थाला जातात, आंघोळ शक्य नसली तरी डोक्यावर तीर्थाचे प्रोक्षण करतात मग वर जातात. त्याबरोबर गोरक्ष धुनीपाशी असलेली घंटा आणि मोक्षाची गुहेविषयीपण त्यांनी माहिती दिली.
मी त्यांना नमस्कार केला पुढे डावीकडे धुनीचे दर्शन घेतले. इथली घंटा ३ वेळा वाजवायची व वाजवताना आपल्या पितरांची नावे घ्यायची म्हणजे सर्व पितरांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. ती मोक्ष गुहा काही मला दिसली नाही.
पुढे गेल्यावर पायऱ्या उतरतानाही सुगंध बरोबर होता. खाली जैन मंदिराच्या अलिकडे असतानाच लोक म्हणत होते वर खूप गर्दी आहे तुम्ही थांबून जा. दर्शनाची रांग कमंडलू तीर्थापर्यंत पोचली आहे. आम्ही गोरक्ष शिखराचा एक जीना उतरला असेल् नसेल, रांगच सुरु झाली. आता जसजशी रांग पुढे सरकेल तसतस पुढे जायचे. हा रस्ता खरोखर लहान वाटतो त्यात डोलीवाले विश्रांतीला थांबले तर मग आपण त्या पायरीवर थांबूच शकत नाही.
डोलीवाल्यांची मात्र दया आली. एक डोलीवाला वयस्कर होता, ओझे उचलून त्याच्या तोंडाला अक्षरश: फेस आला होता. पोटासाठी माणसाला काय काय करावे लागते. हे ५ दिवस त्यांचा सिझन होता. वर्षभरातील सर्वात जास्त गर्दी या दिवसांत होते इथे. त्यामुळे याच दिवसांत कमावण्याची संधी. बरं एक डोली झाली की दुसरी डोली मिळेपर्यंत काम नाही. त्यासाठी त्यांना वरखाली फिरावं लागतं गिऱ्हाईक शोधत; म्हणजे परत पायऱ्या चढणे उतरणे आलेच. खुप कष्टामय जीवन आहे हे. तुम्हाला डोली आधीच धर्मशाळेत विचारुन ठरवता येते किंवा रस्त्यात वाटले तरी मागवता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानात विचारले तर त्यांच्याकडे डोलीवाल्याचे नंबर असतात ते मागवून देतात. फक्त मग डोलीवाला जिथे असेल तिथून येईपर्यंत वाट पहावी लागते. तुमच्या वजनानुसार ११ ते १४ हजारापर्यंत डोलीचे दर ठरतात. आमच्यापैकी काहीजणांनी डोली आधीच ठरविली होती तर एकीने येताना केली.
या डोलीवाल्यांचा आमच्या बरोबरच एक किस्सा झाला. गर्दी खूपच होती. रांगेतही माणसे अगदी गर्दी करुन उभी होती. डोलीवाले भरभर चालत व मध्ये जागा मिळताच विश्रांती घेत. ते मोठमोठ्याने सुचना देतच चालत जेणेकरुन त्यांना मार्ग मोकळा मिळेल व डोलीतील माणसाला आणि चालणाऱ्यांना एकमेकांचा धक्का लागणार नाही. ते विश्रांतीसाठी थांबताना देखील लोक पुढेमागे सरकून जागा करुन देत. गोरक्षशिखरापासून पुढे बऱ्याच वेळा एका बाजूला दरी असते. दुसऱ्या बाजूला डोंगर जरी असला तरी पायऱ्यांची कड आणि डोंगर यामधे अंतर असते व खड्डास्वरुप झालेले असते. म्हणजे जिन्याच्या पहिल्या दुसऱ्या पायरीवरुन पाहिले तर चांगला दिड दोन पुरुष उंचीचा खड्डा. तर झालं असं की डोली वाल्याला जागा देताना पुढेमागे लोक पटकन् सरकतात त्याच वेळी आमच्यातील एक अगदी कॉर्नरला गेली व पडणार इतक्यात तिच्या सॅकला पकडून एकाने खेचले तिला. इथे डोंगरबाजूला सगळे पाषाण आहेत त्यामुळे काय झालं असतं हा विचारही न केलेलाच बरा.
इथे दुसरे एक महत्वाचे म्हणजे गोरक्षशिखरापासून पुढे एकही दुकान नाही. त्यामुळे तुम्हाला काही घ्यायचे असल्या अंबामातेपाशी घेऊन ठेवावे किंवा नंतर शिखरापर्यंत काही तुरळक दुकाने आहेत तिथे. गोरक्षशिखरापासून पुढे पाणी जरी लागले तरी ते कमंडलू तीर्थापाशीच मिळणार. म्हणजे जवळपास तीनेकहजार पायऱ्या गेल्यानंतर. तेंव्हा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी.
गोरक्षशिखरानंतर जी रांग लागली ती थेट पादुका दर्शन, कमंडलूतीर्थाचे दर्शन झाल्यावरच संपली. अनेकजण सांगतात या पायऱ्या खूप कठिण आहेत, जोराचा वारा असतो, रस्ताही तसा अवघड आणि चढही खडा आहे. वारा वगैरे इथे उंचावर आला तर काही खरे नाही. पण आम्ही रांगेत असल्याने आम्हाला चढाचा त्रास झाला नाही. वाराही शांत होता. एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकत रांग मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. ५.३०/६ च्या सुमारास आम्हाला आमच्या डोल्या दिसायला लागल्या. त्यांचे एकदम छान ४.३०/५ला वरती दर्शन झाले होते. खूप खुष होते ते सगळे. आमच्या एकूण ६ डोल्या होत्या, त्यांची वाट पहाण्यात, त्यांना भेटण्यात थोडा वेळ गेला. मध्ये एक दोन छोटी मंदिरे लागली. त्यांचे नाव विसरले, पण प्रसिद्ध असावीत. सगळेजण न चुकता नमस्कार करत होते. रांगेतून चालतानाच ती लागतात त्यामुळे दर्शने घेणे सहज होत होते. त्यातले पुजारी साधू काही लोकांना भस्म लावत होते व काही लोकांना रुद्राक्ष देत होते. माझ्या असं लक्षात आलं; रुद्राक्ष फार कमी लोकांना मिळत होता. मला दोन्ही मिळालं. भस्म व रुद्राक्ष.काहींना हाताला त्यांनी काहीतरी लावले. त्याला एक अप्रतीम सुगंध होता. आमच्यापैकी चव्हाण दादांच्या हाताला त्यांनी ते लावले त्यामुळे आम्हाला सुगंध कळाला. नंतर घरी आल्यावर पाहिले तर रुद्राक्षालाही तोच अवर्णनीय सुगंध येत होता. नंतर कळाले की तिथे गिरनारी बापूंची गुहा आहे, ते मंदिर भैरवाचे होते. तसेच तिथे ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार रुद्राक्ष दिला जातो.
आता आम्ही कमंडलू तीर्थापाशी असलेल्या कमानी पर्यंत पोहोचलो होतो. उजवी कडच्या कमानीतून ३५० पायऱ्या खाली उतरून तीर्थाकडे जायचे तर डावी कडच्या कमानीतून पादुकांकडे. गर्दी इतकी होती की आम्हाला काही पर्यायच नव्हता; आम्ही दत्तशिखराकडे जात होतो. गर्दीचा उत्साह ओसंडून वहात होता. जय गिरिनारीच्या घोषणा दुमदुमत होत्या. येणारी लोकं घोषणा देत त्याला प्रतिसाद म्हणून तेवढ्याच मोठयाने रांगेतील लोक घोषणा देत. अशी घोषणाई सगळा आसमंत व्यापून राहिलेली. त्यामुळे कंटाळा, थकवा जाणवत नव्हता.
मागे गोरक्षशिखरापर्यंत गेलेली रांग
बाजूने अनेक साधूवर जाताना दिसत होते. त्यांचे निरिक्षण करण्यातही वेळ चांगला जात होता. कुणी भगवी वस्त्र नेसलेले, जटाधारी, हाती दंड व कमंडलूवाले, कुणी मोठ्ठा जटाभारवाले नुसतेच लंगोटीवाले, कुणी शुभ्र वस्त्रातील, या सर्वांचे डोळे खतरनाक वाटत होते, काही सामन्यांसारखे पण भगवी पचंगी नेसलेले किंवा भगवी वस्त्र घातलेले. सर्वजण आपल्या तंद्रीत भराभर वर जात होते. कधीकधी त्यांचा वेग पाहून तोंडात बोटे जात होती. घरी आल्यावर मामानी विचारलं त्यातले किती साधू खाली येताना तु पाहिलेस लक्षात आहे का? आणि डोक्यात प्रकाश पडला खरंच की वर जाणारे तर अनेक होते, खाली येणारा एखाद् दुसराच. खाली यायला मार्ग तर एकच आहे, निदान जैन मंदिरापर्यंत तरी. मग ही लोकं गेली कुठे?
आम्ही कमंडलू तीर्थाच्या अलिकडे असतानाच समोर अरुणोदय झाला. समोर क्षितिजावर तांबडे फुटले होते. अगदी एखादा रंगाचा फुगा फुटावा किंवा डब्यातून रंग सांडावेत तसे रंग क्षितिजावर पसरले होते. आम्ही इतक्या उंचीवर होतो की सूर्य कुठून डोंगराच्या मागून वगैरे न येता सरळ क्षितीजरेषेवरुन वर आला. अरुणोदयापासून सुर्योदयापर्यंतचे आकाश पहाणे केवळ अप्रतीम, अलौकिक अनुभव होता.
सूर्योदयाचे काही क्षण


समोरच्या दातार पर्वतावर मच्छिंद्रधुनी अंधारात पेटती दिसत होती, तिच्यावरचा झेंडाही आता नीट दिसत होता. इथे शंकराने दत्तात्रयांना, तर दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले असे म्हणतात. इतक्यात काही टारगट पोरे रांग तोडून जेष्ठांना न जुमानता पुढे आली. आमच्यातील तरुणांनी मग त्यांना अडवले व मागे जाण्यास भाग पाडले. त्यांची देहबोलीसुद्धा कीती बेफिकीरीची होती..
आता गुरुपादुका मंदिर दिसत होते. एक धीरगंभीर वातावरणात आपण प्रवेश करत आहोत असे वाटत होते. डोळे मिटले की ओम् च्या उच्चारवाने जसे तरंग तयार होतात तसे काहिसे वाटत होते. इथे येताना दत्तसंप्रदाय, दत्तमहाराज यांच्या लहानपणापासून कानावर पडलेल्या गोष्टी मनात रुंजी घालत होत्या. हळूहळू पायऱ्या कमी होत होत्या. आम्ही एकाठिकाणी बूट काढले. थोड्याच वेळात आता दर्शन होणार होते.
डोंगरा आडून दिसणारे मंदिर
क्रमश:
आता एक पायरी अन् बस् ते गिरिनारी स्वत: भेटणारेत आपल्याला.. मी मंदिराला नमस्कार करुन वर गेले. समोरच सुंदर त्रिमुर्तींची मुर्ती चेहऱ्यावर आश्वासक हसू ठेवून स्वागत करती झाली. मंदिर जवळ आले असतानाच मी घरून नेलेली वात, हिना अत्तर, फुले व तुळस काढून हातात ठेवलेली. ते सर्व दक्षिणेसह पुजाऱ्यांच्या हातात दिले. त्यातील खडीसाखर त्यांनी पादुकांना लावून परत दिली. त्या दरम्यान मी पादुकांना नमस्कार केला व गर्दी असल्याने हळूहळू चालत बाजूला क्षणभर थांबले. अगदी दगडात कोरलेली पावले. पुढची बोटे दिसत होती, मागच्या भागावर फुले वाहिली होती. अगदी रेखीव बोटे. ज्याची बोटे इतकी रेखीव ती व्यक्ती प्रत्यक्ष दिसायला कशी असेल. पादुकांभोवती कुंपणाप्रमाणे स्टीलच्या सळया उभ्या लावल्या आहेत. आपण लांबूनच दर्शन घ्यायचे. मागे गर्दी खुप होती, म्हणून प्रदक्षिणा करतच आम्ही बाहेर पडलो. याचसाठी केला होता सारा अट्टाहास.. मी इतके चढून वर पोहोचले होते, कोणत्याही थकव्याशिवाय.. मन तृप्त झाले होते. धीरगंभीरता मनात खोलवर उतरली होती. गोरक्षशिखरापासून दत्तशिखरापर्यंत आम्हाला जवळ जवळ ३/३.३० तास लागले होते. पण इतकावेळ कसा गेला आजिबात कळले नाही.
रांगेत उभे असताना खडकावर पडणार्या सावल्या:

आता उतरायला सुरवात. मनातून तिथून जाऊच नये असे वाटत होते. पण जाणे भाग होते. आम्ही परत कमंडलू तीर्थाच्या रांगेत उभे राहिलो. इथे एकदम शिस्तबद्ध कारभार होता. आधी धुनीचे दर्शन घ्यायचे, मग प्रसादासाठी दुसऱ्या मंडपात जायचे. तिथून बाहेर येऊन तीर्थ प्राशन करायचे मग बाहेर. इथेही बरेच लोक सेवेसाठी जाऊन रहातात. अखंड अन्नदान इथे केले जाते व येथील प्रसाद आवर्जून घेतला जातो. येथील धुनी दर सोमवारी सकाळी ६वाजता उघडतात आणि त्यात पिंपळाची पाने व पिंपळाचीच लाकडे ठेवली जातात. त्यातून आपोआप अग्नि प्रकट होतो. त्यात अनेकांना दत्तगुरूंचे दर्शन झालेले आहे. असं म्हणतात की दत्तगुरु जेंव्हा तपस्या करत होते तेंव्हा जुनागडमधे दुष्काळ पडला, म्हणून अनुसया मातेने त्यांच्या तपश्चर्येला थांबवून आजूबाजूची परिस्थिती त्यांना सांगितली. त्या प्रसंगी त्यांनी कमंडलू खाली फेकला, त्याचे कमंडलू तीर्थापाशी २ तुकडे झाले. एकातून अग्नी निर्माण झाला, तर एकातून पाणी. असे हे कमंडलूपासून निर्मिलेले कमंडलू तीर्थ.
इथे आम्हाला गरम गरम खिचडी, भाजी, दलीयाचा गुळाचा शिरा असा प्रसाद
मिळाला, तोही सकळी सकाळी ८.३०च्या सुमारास. एकदम चविष्ट. सकाळी सकाळी एवढे
अन्न गरमा गरम बनविणाऱ्या व वाढणाऱ्या सेवेकऱ्यांची कमाल वाटली.
आम्हाला असे सांगितले होते की वर बऱ्याचदा तीर्थ बाटलीत भरून देत नाहीत
तेंव्हा बाटली नेऊ नका. पण आज बाटलीतही तीर्थ देत होते. त्यांना उन्हाळ्यात
अक्षरश: १ गडूमधे आंघोळ, कपडे धुणे करावे लागते तरी अन्नदानात कधी खंड पडत
नाही. हे ऐकून आम्ही अवाक् झालो. इथे एकूणच वर शिधा आणणेही खूप कष्टाचे
आहे. अनेक लोक थोडाफार शिधा, पैसे असे दान देतात. आम्हीपण केले. आम्हाला
दत्तगुरूंचा फोटो व प्रसाद भस्मासह मिळाला.
हे सगळ करून येईपर्यंत बरेच वाजले असणार. आता आम्ही आश्रमात पोचल्यावरच वेळ पाहिली. आता १५०० पायऱ्या चढून गोरक्ष शिखर गाठायचे, मग अंबाजी. परत गोरक्षांचे दिवसा उजेडी दर्शन झाले. आता मोक्षाची गुहापण दिसली. त्याला पापपुण्याची गुहापण म्हणतात. गुहाम्हणजे छोटासा बोगदाच आहे. त्यातून सरपटत सरपटत बाहेर पडायचे. मी डोके आधी घालायच्या ऐवेजी पायाकडून शिरले आणि बाहेर पडले. तर लोक म्हणायला लागले हे चुकीचं आहे, परत जा आणि डोक्याच्या बाजूने शिरा. मी म्हटले अहो असतं एखादं बाळ पायाळू..:)
काही रस्त्यातले फोटो :


तिथून अंबाजी माता शिखर गाठले. इथे एका दुकानी, आधी आलेल्यांचे चहापान चालू होते. मी लिंबू सरबत घेतले. रात्रीतून पाणी असे प्यायलेच नव्हते. खाली तीर्थावरही अगदी अर्धा ग्लास प्यायलेला. आता लिंबूसाखरेने अजून ताजंतवान वाटलं. अंबाबाईच्या मंदीरात गेले. आता गर्दी कमी झाली होती. चढणारे तर जवळपास कुणी नव्हतेच. अंबेचे मंदीर अगदी शांतपणे आतून पहायला मिळाले. देवी तर थेट आमची रेणुकामाताच. हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे असे ऐकले होते म्हणून पुजाऱ्यांना विचारले की देवीच्या कुठल्या अवयवामुळे हे स्थान निर्माण झाले. त्यांनी नाभी असे सांगितले. स्थानिक लोक बऱ्याचवेळा इथपर्यंत येऊन मातेचे दर्शन घेतात आणि खाली जातात असेही सांगितले. आता पुढचा टप्पा जैन मंदीरे.
जैन मंदिरांचा समूह इथे वसलेला आहे. ती दिसतातही खूप सुंदर. बरेच कोरीवकाम केलेली अनेक मंदीरे आहेत. त्यातील शिवमंदीर प्राचीन आहे असे म्हणतात. जाताना पटापट अंबामाता शिखराला पोहोचलो होतो. येताना मात्र वेळ लागला. त्यात मधे मी गोमुखी गंगेचे दर्शन घेतले तिथेही वेळ गेला. कितीतरी वेळ मंदिरे नुसती लांबूनच खुणावत होती. पण शेवटी एकदा त्यांच्या जवळ पोचलेच. आता उनही जाणवत होते. उन सावलीचा खेळ चालल्याने उन्हाचा त्रास मात्र झाला नाही.
बरीचशी मंदीरे बंद होती. मी नेमीनाथांचे मात्र पाहिले. हे मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. जैनलोकं इथपर्यंत दर्शनाला येत असतात. जरासा थकवा वाटत होता. मन मात्र एकदम फ्रेश होते. इथे क्षणभर विश्रांती घेऊन उतरू लागलो. आता फक्त पायऱ्या उतराच्या. पण तेच अवघड जाते असे म्हणतात, भराभर पायऱ्या उतरल्या तर नंतर पायात गोळे येतात तेंव्हा सावकाश उतराच्या.
सतत खुणावणारी जैन मंदिरे :


उजवीकडे रस्ता दिसतोय तिथे मंदिराच्या भिंतीमुळे उन्हापासून संरक्षण होते.

आता मी आणि शुभांगी थोडावेळ एकत्र उतरलो, मध्येच आम्ही एक काकडी खाल्ली दोघींनी मिळून आणि मस्त थंडगार वाटले, भूकही भागली, थकवाही गेला. मग मात्र ती पटापट पुढे निघून गेली. उतरताना परत भर्तुहरी-गोपीचंद गुहा, बेलनाथ महाराज करत सावकाश उतरत होते. मधे मधे उन जाणवत होते, मधेच आभाळ, छान वातावरण होते. आजूबाजूला निसर्ग ठासून भरलेला, दाट झाडी, झाडे तरी कीती वेगवेगळी. बेल, तुळस तर अमाप होते. मधे मधे पांढरी आणि पिवळी कोरांट फुललेली. कोरांटीची एवढी मोठी फुले पहिल्यांदाच पहात होते. लहानपणी अंगणात कोरांट होती पण तिची फुले म्हणजे साधारण अबोलीपेक्षा थोडी मोठी. इथे प्रदूषण नसल्याने सगळीच झाडे वेली तरारून वाढलेली.
खाली उतरता उतरता संध्याकाळ व्हायला लागली. वानरे आता खूप दिसायला लागली. त्यांचे मस्त खेळ चालू होते व आश्चर्य म्हणजे एकाही वानराने त्रास दिला नाही की रस्त्यात आले नाही. माकडेच फक्त त्रास देतात की काय कुणास ठाऊक. त्यांचे खेळ बघत किती पायऱ्या उतरतोय हेही कळत नव्हते. मधेच एका ठिकाणी एकदम सारे चिडीचूप झाले, वानरानी झाडावरुनच खॉक् असा इशारा दिला; मी ज्या पायरीवर होते तिथेच जवळच झाडीत खसपस झाली. मला वाटले कुठलेतरी जनावर पायरीच्या दिशेने येत असावे. मी जिथे होते तिथेच थांबले पण तो आवाज लांब जाऊ लागला. थोड्याच वेळात वानरे परत खाली उतरली आणि खेळू लागली म्हणजे जनावर गेले असावे मग मी ही चालू लागले. शेवटच्या पायरीवर आले तेंव्हा - " अरे पायऱ्या संपल्यापण" अशी मनाने प्रतिक्रीया दिली. परत पायरीवर डोके टेकले, दत्तगुरु, चढावा हनुमान यांचे आभार मानून भवनाथाकडे निघाले. मला असे कळले होते की शेवटच्या पायरीशी ॲक्युपंक्चरवाला बसतो आणि त्याचा खूप फायदा होतो. पण मला काही तो दिसला नाही.
मी भवनाथाचे दर्शन घेतले, जुन्या आखाड्यात जाऊन दत्तमुर्तीसमोर डोके टेकले. ही मुर्ती सुद्धा खूप प्रसंन्न आणि हसरी आहे. तिथे डोके टेकल्यावर क्षणात् जाणीव झाली की आपले उद्देश्य आता पुर्ण झाले. माझे डोळे भरुन आले, अश्रूंना बांध घालणे अवघड झाले. झ्टकन् उठून बाहेर पडले. जवळच धर्मशाळा होती. तिथे जवळपास सर्वच आलेले होते आणि आपापल्या खोल्यात विश्रांती घेत होते. सर्वात शेवटी माझ्या २न्ही काकू आणि अजून एक जण होती. तिचे बूट कमंडलू तीर्थापाशी चोरीला गेले त्यामुळे अनवाणी उतरत होती. ते पण मग निवांत उतरले. रात्री १२.३०ला गाडी होती त्यामुळे सगळ्यांनीच आंघोळ विश्रांतीला प्राधान्य दिले. दुसऱ्या दिवशी रात्री घरी पोचलो आणि ही गिरनार यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
दिवसाचे भवनाथ मंदिर :

आम्ही रहात असलेले नरसी मेहता धामः
एक स्वप्नवत असा हा प्रवास झाला. स्टेशनजवळचा स्कायवॉक पार करताना त्या जिन्यांनीही माझी दमछाक होते, मधे थांबावं लागतं आणि हे एवढे परिक्रमेचे अंतर, इतक्या हजारो पायऱ्या कसेकाय पुर्ण केल्या माझाच विश्वास बसत नाही. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा मला कळाले की रात्रीचे चढायचे असते तेंव्हा पहिली प्रतिक्रिया नको रे बाबा अशीच होती कारण मला झोप आजिबात आवरता येत नाही. (लक्ष्मी रस्त्यावर भर गणपती मिरवणुकीमध्येही मी दुकानाच्या पायरीवर बसून झोप काढलेली आहे ! ). पण गुरुशिखराच्या रस्त्यावर एकही क्षण थकवा किंवा झोप जाणवली नाही. उतरताना पाय लटपटतात, एकेक पायरी नको होते असे ऐकले होते, यातला एकही अनुभव मला आला नाही. उलट घरी आल्यावरही मी ताजीतवानी होते. सहज चालता येत नव्हते किंवा खाली मांडी घालून बसायला १/२दिवस त्रास झाला तेवढेच!
असे अनुभव आले की त्या जगतगुरुंवर आपोआप विश्वास बसतो आणि मस्तक त्यांच्या चरणी लीन होतं मनात शब्द उमटतात "जय गिरीनारी !"
असा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी केलाच पाहिजे! एकदा तरी जंगल जोखले पाहिजे, गुरुशिखरावरील गूढता, रमणीयता अनुभवली पाहिजे. वरजाताना मुळीच फार खाणे पिणे नेऊ नये. रस्त्यात अनेक दुकाने आहेत व तिथे सर्व काही मिळते. पेनकिलर किंवा स्प्रे मात्र जवळ ठेवावा. त्याचा उपयोग होतो. वर जाताना कपडे सैलसर, सर्वांग झाकणारे व सुटसुटीत असावेत. त्याने चढाउतरायला व उन वाऱ्याचा त्रास होत नाही. गिरिनारची विशेषता हीच की इथे तुम्ही कुठलेही कपडे घालू शकता, अगदी ट्रॅकपॅण्ट टी शर्ट देखील.
या अश्या प्रकारच्या यात्रा आपणही करु शकतो हे बीज माझ्या सासूबाईंनी रोवले. त्यांच्या ठिकठिकाणच्या वाऱ्या पाहूनच मनातील सुप्त इच्छेला सत्यात आणणे शक्य वाटले. परत इतक्या ऐनवेळी जा तू मी काम संभाळतो म्हणणारा माझा कलीग, माझा बॉस यांचाही यात हातभार आहे. माझ्या नवऱ्यानेही जाण्याविषयी कुठलीच तक्रार केली नाही त्यामुळे मी समाधानाने जाऊ शकले. माझ्या नणंदेने औषधांची यादीच मला पाठवून दिली व ती उपयोगीही पडली. बहिणीनेही वेळोवेळी मॉरलसपोर्ट दिला ज्यामुळे ताण कमी होऊन तयारीवर व धेयावर लक्ष केंद्रीत करता आले. या अश्या अनेक लोकांच्या शुभेच्छा व शुभाशिर्वादाने ही यात्रा पूर्ण झाली.
सर्वात शेवटी असेच म्हणेन की एकतरी वारी अनुभवावी गुरुशिखराची! जय गिरिनारी!
नीलाक्षी
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.