न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरचे एक शहर. जगप्रसिद्ध शहरांच्या यादीत नाव असलेल्या या शहराच्या नावाभोवती एक वेगळेच वलय आहे, हे नि:संशय. त्याला विविध कारणे आहेत आणि त्यातल्या एक किंवा अनेक कारणांनी हे शहर पर्यटकांच्या यादीत बर्याच वर, किंबहुना पहिल्या स्थानावर असते. अश्या शहराची काहीशी दीर्घ भेट आटपून नुकताच परतलो आहे. अर्थातच त्या भेटीत न्यू यॉर्कमध्ये बरीच भटकंती झाली, त्या शहराचा भरपूर आनंद उपभोगला, थोडक्यात "जीवाचे न्यू यॉर्क केले !" तो अनुभव वाचकांबरोबर वाटून त्या आठवणींचा आनंद परत अनुभवण्याचा मोह आवरला नाही यात आश्चर्य ते काय ? असो.
अमेरिकेला जायचे नक्की झाले आणि अर्थातच इतर तयारीबरोबर काय काय पहायचे याचा विचार सुरू होणे अपरिहार्य होता. पूर्वी एकदा अमेरिकासफर झाली होती. तेव्हा पूर्व किनारा ते पश्चिम किनारा चवीने बघून झाले होते. शिवाय या सफरीचा मुख्य हेतू आमच्या युवराजांना भेटणे आणि त्यांच्या सोबत काळ व्यतीत करणे हाच होता. त्यामुळे, भेट देण्याच्या जागांची फार मोठी यादी नव्हती. अमरिकेच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची १५ दिवसांची एक सहल करण्याची माझी इच्छा होती. पण ते नक्की करेपर्यंत त्या सहलींतल्या ऑक्टोबरपर्यंतच्या जागा संपून गेल्या. उगाच हट्टाने फिरायला जायचेच म्हणून कोठेतरी भटकंती करण्यात माझा रस नव्हता. त्यामुळे, "न्यू यॉर्क न्यू यॉर्क म्हणजे आहे तरी काय, हे संपूर्ण शहर पिंजून काढून पाहूया." असा विचार पक्का झाला. अर्थात असे केल्याने भेटीचा सर्व वेळ मुलाबरोबर राहता येईल हा गुप्त स्वार्थ होताच !
अमेरिकेला जायचे तर व्हिसा काढणे आलेच. या बाबतीत साधारणपणे जरा धडकी भरेल अश्या कहाण्या सांगितल्या जातात. मात्र या प्रकरणाची जनमानसात जी हवा आहे त्यापेक्षा ते खूपच सरळ आणि सोपे असल्याचा अनुभव आला. अमेरिकन दूतावासाच्या संस्थळावरील अर्ज भरा, संस्थळावरच किंवा त्यांनी दिलेल्या यादीतील एका बँकेत व्हिसा प्रोसेसिंग फी भरा आणि संस्थळावरून अनुमती आली की आपल्याला सोयीच्या जागेवरील काउंसलेटमध्ये मुलाखतीची वेळ घ्या, बस्स. मुंबईमधल्या काउंसलेटमध्ये १५ दिवसांच्या आतली मुलाखतीची वेळ मिळाली.
मुलाखतीच्या दिवसाच्या कमीत कमी एक दिवस अगोदरची वेळ घेऊन VFS या वकिलातीच्या मान्यताप्राप्त एजंट कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात बोटांचे ठसे देणे व फोटो काढून घेणे करावे लागते, तेही सोपस्कार पूर्ण केले.
दुसर्या दिवशी, मुलाखतीला आलेल्या लोकांची काऊंसलेटबाहेरची मारुतीच्या शेपटीसारखी लांबच लांब रांग पाहून "आता दिवसभर इथेच जाईल" असे वाटले. मध्ये मध्ये थांबत थांबत, पण तरीही फार मोठे थांबे न घेता न घेता रांग पुढे पुढे जात राहिली आणि थोड्याच वेळात काऊंसलेटच्या अंतर्भागात पोहोचलो. तेथे रांग थांबली असताना बसायची व्यवस्थाही होती, हे पाहून बरे वाटले. फार खोळंबा न होता एकून अर्ध्या-पाऊण तासातच मुलाखतीच्या दालनात पोहोचलो. तेथे रांगेत उभे असताना आमच्या पुढे असलेल्या तरुणीच्या चाललेल्या मुलाखतीतील संभाषण ऐकू येत होते. अमेरिकेत शिकत असलेल्या मुलाशी तिचे दोन-तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती मोठ्या कळकळीने सगळी माहिती अधिकार्याला सांगत होती. पण, "शिकत असलेला तिचा नवरा त्या दोघांचा आर्थिक भार कसा उचलेल ?" याबाबत अधिकार्याची समजूत पटवून देण्यात ती अयशस्वी ठरली. अधिकार्याने "सॉरी मॅडम, मी तुम्हाला व्हिसा देऊ शकत नाही" असे म्हणत पासपोर्ट परत करून तिची बोळवण केली. हे सगळे कान देऊन ऐकत असलेल्या आमच्या गृहमंत्र्यांवर त्याचा प्रभाव पडलाच ! "आता असं झालं तर काय?" अश्या प्रश्नाला "तिची आणि आपली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तेव्हा उगाच काळजी करू नको" असे म्हणत आम्ही मुलाखत घेणार्या अधिकार्यासमोर गेलो.
"(अ) आपल्या देशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा (आ) आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा (इ) आपल्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" ही काळजी घेणे हे वकिलातीतील व्हिसा अधिकार्यांचे मुख्य काम असते, हे माहीत होते. शिवाय, अगोदरच्या अमेरिका भेटीच्या वेळच्या मुलाखतीचा आणि त्या वेळेस मुलाखत घेणार्या अधिकार्याशी झालेल्या किंचित बाचाबाचीचा अनुभव होता. ;) त्यामुळे मी बर्यापैकी निर्धास्त होतो. मात्र, त्याच बरोबर, तो अनुभव वेगळ्या देशातील वकिलातीतील होता आणि "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे सुद्धा पुरेपूर माहीत होते. त्यामुळे, अनावश्यक अतीआत्मविश्वासही नव्हता.
वकिलातीचे सर्व अमेरिकन अधिकारी खूपच विनयशीलपणे वागताना दिसले. स्मितहास्यपूर्वक 'गुड मॉर्निंग' ने स्वागत झाले. मुलाखतीचे सोपस्कार आटपताना एखादा टोकदार प्रश्नही सौम्य शब्दांत आणि 'सर' वगैरे संबोधने सढळपणे वापरून केला गेला. एकंदरीत वरिष्ठतेचा किंवा तुच्छतेचा आविर्भाव चुकूनही दिसला नाही. याविरुद्ध, काऊंसलेटमधल्या भारतीय सुरक्षाकर्मचार्यांची वागणूक बर्यापैकी उद्धट आणि काही वेळेस चीड आणणारी होती. अमेरिकन काऊंसलेटमध्ये आपण व्हिसा घ्यायला आलो आहोत या कारणाने लोक त्यांची वागणूक नाईलाजाने शांतपणे सहन करत होते.
पाचेक मिनिटांची मुलाखत संपल्यावर "तुम्हाला व्हिसा दिला आहे, पाच दिवसांत पासपोर्ट ताब्यात मिळेल" हे आश्वासन मिळाले. काम संपवून "अरे वा ! हे प्रकरण तर खूपच सोपे आहे" असा विचार करत इमारतींबाहेर पडलो. त्याच वेळेस अजून एक गोष्ट ध्यानात आली की, "अरेच्च्या, मुलाखतीत भरभक्कम पुरावे असावे म्हणून आणलेली बर्यापैकी जाड फाइल तर सर्व वेळ बॅगेतच होती." आठवडाभर परिश्रमाने तयार केलेल्या कागदपत्रांना पाहणे तर दूरच, पण मुलाखतीत त्याबद्दल काही प्रश्न किंवा त्यांचा साधा उल्लेखही होऊ नये ?! काय हे !! ;) पण, व्हिसा मिळाल्याच्या आनंदात ही गोष्ट विसरायला फार वेळ लागला नाही.
व्हिसाचा अर्ज करताना संस्थळावर असलेल्या यादीतील आपल्याला सोयीच्या ठिकाणाची "पासपोर्ट परत ताब्यात घेण्याचे ठिकाण (पासपोर्ट कलेक्शन सेंटर)" अशी निवड आपण करू शकतो. पुण्यातल्या सोहराब हॉल (पुणे स्टेशन) येथील VFS चे कार्यालय असे एक कलेक्शन सेंटर आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील लोकांची एक मुंबई फेरी वाचते. व्हिसासह पासपोर्ट तेथे पोहोचला की नाही हे आपल्याला वकिलातीच्या संस्थळावर पाहता येते.
मुलाखत शुक्रवारी असल्याचा फायदा घेत शनिवार-रविवार ठाण्यातील नातेवाइकांचा पाहुणचार घेऊन सोमवारी दुपारी पुण्यात घरी पोचलो. सोमवार म्हणजे मुलाखतीनंतरचा कामाचा पहिलाच दिवस होता. तरी साधारणपणे दुपारी दोन वाजता घरी पोहोचल्यावर वकिलातीच्या संस्थळावर डोकावण्याचा मोह झालाच ! अहो आश्चर्यम्, तेथे "पासपोर्ट पुण्याला पोहोचला आहे आणि तो घेऊन जाऊ शकता" अशी सूचना होती ! पासपोर्ट हातात आल्यावर पाहिले तर व्हिसावरची तारीख मुलाखतीच्या दिवसाचीच होती.
थोडक्यात, लोकहो, "परदेशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा त्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा त्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" हे तुमच्या बाबतीत खरे असले आणि मुलाखत घेणार्या अधिकार्याला ते आपल्या बोलण्याने व कागदपत्रांनी पटवू शकलात तर अमेरिकनच काय पण कुठल्याच देशाच्या व्हिसाचा फार धसका घेण्याची गरज नाही. मात्र, "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे तत्त्व लक्षात ठेवून अनावश्यक अतीआत्मविश्वासही टाळणे जरूर आहे. असो.
व्हिसा हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यावर तुलनेने सहजपणे होणार्या इतर गोष्टी पुर्या करणे आले. त्यातल्या मुख्य गोष्टी म्हणजे...
१. विमानाचे रिटर्न तिकीट : हे हल्ली घरबसल्या आंतरजालावरूनही मिळते. दोनतीन महिने अगोदर जालावर थोडे संशोधन केले तर आपल्या आवडीची विमान कंपनी व सोयीचा प्रवासाचा दिवस आणि तिकिटाची किंमत यांचे चांगले नियोजन करता येते. माझ्यासारखा सतत विमानाच्या खिडकीबाहेर डोकावयाचा नाद असला तर मोक्याची खिडकीजवळची जागाही पटकावता येते !
२. पर्यटन वैद्यकीय विमा : हा प्रत्येक परदेशी सहलीचा महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशांत व्हिसासाठी अर्ज करताना पर्यटन वैद्यकीय विम्याची पॉलिसी जोडणे आवश्यक असते. अमेरिकन व्हिसासाठी असे करावे लागले नाही. तरीही, अमेरिकेतल्या वैद्यकीय सेवांचे गगनाला भिडणारे दर पाहिले तर अमेरिकेत वैद्यकीय विम्याविना जाणे हा वेडेपणा समजायला हरकत नाही.
३. परकीय चलन : आजकाल ही फार मोठी समस्या राहिलेली नाही. अनेक बँकांमध्ये आणि नॉन-बँकिंग संस्थांमध्ये परकीय चलन मिळू शकते. यासाठी "ट्रॅव्हल कार्ड" ची सोयही आहे. पाच-दहा डॉलर्सचाही व्यवहार कार्डाने होणार्या अमेरिकेसारख्या देशामध्ये असे कार्ड फार सोयीचे व सुरक्षिततेचे आहे. परदेशात फिरताना जालावर (ऑनलाईन) स्थानिक सहल, शोचे तिकिट, इ खरेदी करायची असेल तर मात्र असे कार्ड नीट चौकशी करून घ्यावे. सर्व कार्डे प्रत्यक्ष खरेदीच्या जागी (पॉइंट ऑफ सेल) स्वाईप करता येतात. परंतू, काही कार्डांची ऑनलाईन खरेदी करू शकू अश्या संस्थळांची यादी बरीच मर्यादित असते.
सर्वसाधारणपणे व्हिसा मिळाला की त्या देशातला प्रवेश गृहित धरायला हरकत नसते. मात्र पासपोर्टवरचा अमेरिकन व्हिसा ही केवळ "अमेरिकेच्या दिशेने प्रवास करण्याची परवानगी" असते. अमेरिकेच्या प्रवेशव्दारावर असलेल्या आगमन-निर्गमन अधिकार्याला (एंट्री पॉइंट इमिग्रेशन ऑफिसरला) प्रवाश्याची फेरतपासणी करून अमेरिकेत प्रवेश नाकारता येतो. या संदर्भात वरच्या तीन गोष्टी आपल्या बाजूने भरभक्कम असणे फायद्याचे ठरते.
सर्व तयारी झाली. या फेरीत, नेहमीच्या भटकंतीप्रमाणे सतत फिरत न राहता, फक्त न्यू यॉर्कमध्येच ठिय्या मारून राहायचे असल्याने इतर बर्याच गोष्टींचे महत्त्व तुलनेने कमी होते. आम्ही येतोय म्हणून लेकाने मॅनहॅटनमध्येच एक फ्लॅट भाड्याने घेतला अशी खबर दिली आणि सगळे टिक् मार्क्स पुरे झाले. आता निघण्याच्या दिवसाची वाट पाहणे सुरू झाले.
******
आला एकदाचा प्रवासाचा दिवस आणि आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन क्रमांकाच्या स्थानकाककडे (टर्मिनल २) निघालो. मुंबईतील गर्दीचा सामना करत करत स्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर येताच हे स्थानक खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे याची चुणूक दिसायला सुरुवात झाली...
जसजसे पुढे गेलो तसतसे ती समजूत पक्की होत गेली...
या स्थानकाची माध्यमांत जी तारीफ केली गेली ती खरी असल्याचे दिसून आले आणि उड्डाण करण्याअगोदरच भारताच्या भूमीवरच विकसित देशातल्या व्यवस्थेचा अनुभव आल्याने उर अभिमानाने भरून आला...
विमानतळावरची व्यवस्था गेल्या चारपाच वर्षांत बरीच सुधारलयाचा अनुभव होताच. पण या नवीन स्थानकावरची व्यवस्था अजून चांगल्या प्रतीची असल्याचा अनुभव आला. त्यामुळे सगळे सोपस्कार संपवून शिवाय आरामात कॉफीपानाचा आनंद घेऊन बरोबर वेळेवर निर्गमनद्वाराजवळ पोहोचलो आणि काही वेळातच विमानात स्थानापन्न झालो. यावेळीही नेहमीप्रमाणेच खिडकीजवळची जागा राखून ठेवली होती हे सांगायला नकोच !...
खिडकीतून थोडेसे आजूबाजूचे निरीक्षण होते न होते तोच विमानाने बरोबर ठरलेल्या वेळी आकाशात झेप घेतली आणि आम्ही न्यू यॉर्कच्या दिशेने मार्गस्थ झालो. विमानाचा नकाश्यावरील मार्ग भारतातील महाराष्ट्र व गुजरातवरून उड्डाणाची सुरुवात करत नंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान-तुर्कमेनिस्तान-रशिया-स्वीडन-नॉर्वे असा उत्तरपश्चिमेकडे जात जात नॉर्वेजियन समुद्रावर पोहोचल्यावर दिशा बदलून बदलून दक्षिणपश्चिमेला वळून कॅनडा व नंतर अमेरिका असा होता...
रात्री ११:२० ला प्रवास सुरू होऊन दुसर्या दिवशी पहाटे ५:४० न्यू यॉर्कला पोहोचलो. या जवळ जवळ १६ तासांत विमान सूर्याच्या पुढे पुढे पळत राहिल्याने सतत अंधारातच प्रवास झाला. स्वीडनवरून उडताना मागच्या बाजूने थोडेसे झुंजूमुंजू झालेले दिसले...
पण जमिनीवरचे स्वच्छ दिसेल इतका उजेड नव्हता. त्यामुळे खिडकीजवळ बसूनही रशिया आणि स्कॅडेनेव्हिया यांच्या भूभागांचे हवाई सर्वेक्षण करण्याचा मनसुबा धुळीला मिळाला. शिवाय तेथे ढगांचे इतके दाट आवरण होते की बाल्टीक समुद्रातली काही अस्पष्ट बेटे...
आणि एका ठिकाणी नॉर्वेचा बर्फाळ भूभाग इतकेच काय ते दिसले...
कॅनडाचा सर्व भूभाग ढगांची जाड गोधडी पांघरून गाढ झोपी गेला होता. त्यामुळे त्याचेही दर्शन झाले नाही. बरेच दक्षिणेकडे येऊन विमान अमेरिकेवरून उडू लागले तेव्हा कोठे जमिनीवरचे लुकलुकते दिवे दिसू लागले...
न्यू यॉर्क जवळ आले, विमानाने उंची कमी केली आणि पहाटेच्या अंधुक उजेडात खालच्या शहरातल्या दिव्यांची रोषणाई पाहत असताना न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केव्हा उतरलो ते घ्यानातच आले नाही. हा विमानतळ न्यू यॉर्क राज्याला लागून असलेल्या न्यू जर्सी या राज्यात आहे. परंतु तो न्यू यॉर्क शहराच्या इतका जवळ आहे की न्यू यॉर्क शहरातले दोन (जे एफ के आणि ला ग्वार्दिया) व हा एक असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ दळणवळणाच्या दृष्टीने न्यू यॉर्कचेच विमानतळ गणले जातात ! या विमानतळाचे व्यवस्थापनही Port Authority of New York and New Jersey ही संस्था पाहते.
आगमनाचे सर्व सोपस्कार आटपून बाहेर पडेपर्यंत तासभर लागला. मुलगा विमानतळाबाहेर वाट पाहत असल्याचा फोन आला होताच. त्यामुळे बाहेर पडताच रुंद गुळगुळीत रस्त्यांवरून हिरवाईने भरलेल्या न्यू जर्सीतून प्रवास सुरू झाला...
मधूनच एखादी वस्ती लागत होती...
अर्ध्या एक तासात जॉर्ज वॉशिग्टन पूल ओलांडून आम्ही न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावर पोहोचलो...
थोड्याच वेळात ब्रॉडवेवर आलो...
...आणि दहा एक मिनिटांत बेनेट अव्हेन्युवरच्या घरी पोहोचलो. पुढच्या तीन महिन्यांत न्यू यॉर्क शहर व परिसरांवर करायच्या चढायांसाठीची ही आमची मुख्य छावणी होती.
(क्रमश :)
उड्डाणाचा काल :
विमान सुटण्याची व पोहोचण्याची वेळ उलट धरल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ झालाय.
भारतिय प्रमाण वेळेप्रमाणे रात्री ११:२० ला मुंबईहून प्रवास सुरू करून अमेरिकन पूर्व किनार्याच्या प्रमाण वेळेप्रमाने दुसर्या दिवशी पहाटे ५:४० न्यू यॉर्कला पोहोचलो. या दोन प्रमाण वेळांत ९ तास ३० मिनिटांचा फरक आहे... म्हणजे भारतिय वेळेप्रमाणे दुसर्या दिवशी दुपारी ३:१० ला पोहोचलो... म्हणजे उड्डाणाचा कालावधी १५ तास ५० मिनिटे (अंदाजे सोळा) तास होतो.
उड्डाणाचा वक्र मार्ग :
याचे सुलभपणे सांगण्याजोगे विश्लेषण नाही, त्यामुळे ते लेखात देणे टाळले होते.
उत्तर गोलार्धामध्ये, न थांबता अतीदूर अंतरावर उडणार्या (लाँग हाऊल) विमानांचा मार्ग उत्तर धृवाच्या दिशेन वाकलेल्या कंसाच्या स्वरूपात दिसतो. याला great-circle distance असे म्हणतात. याचे कारण, प्रवासाचा मार्ग गोल पृथ्वीच्या सपाट कागदावर काढलेल्या नकाशात जरा जास्त वक्र व जास्त लांब दिसतो.
याशिवाय, न थांबता लांब अंतरावर जाणारे विमान गंतव्यापर्यंत पोहोचेपर्यंत, पृथ्वीही तेवढ्याच वेळात स्वतःभोवती फिरत असल्याने, गंतव्याचे स्थान बदललेले असते. याला Coriolis effect असे म्हणतात. त्यामुळे, विमान जर सरळ रेषेत उडत राहीले तर चुकीच्या ठिकाणी पोहोचेल. हे ध्यानात घेऊन विमानांचा मार्ग वक्र करावा लागतो. या ठिकाणावरील अॅनिमेशन पाहिल्यास ते कसे हे समजू शकेल.
वर प्रियान यांनी म्हटल्याप्रमाणे, fuel economy, air traffic congestion, no fly zones, आणि समुद्रा वरील प्रवासात radar surveillance, बदलत्या ऋतू नुसार बदलत्या वार्यांच्या दिशा, इत्यादींच्यामुळेही फरक पडतो.
विमानकंपनी अमेरिकन (युनायटेड एअरलाईन्स) होती. म्हणून ती भारतातून उडून, कोठेही थांबा न घेता, अमेरिकेत जाऊ शकली.
मुंबई ते नेवार्क अशीही डायरेक्ट सेवा आहे. १४ तासात अमेरिका. एकदाच काय ते छळ सहन करायचा.
ह्या वेळेस मी मुंबई-दिल्ली-जे.एफ.के अशी आले. तिकिटावर दिल्लीचा उल्लेखच नव्हता. आणि एअर ईंडीयाला कॉल केल्यावर विमान बदलावे लागणार नाही असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र विमान बदलावे लागले आणि परत सिक्युरिटी चेक करावा लागला. भयानक वैताग आला.
युए आणि एई ची मुंबई/दिल्ली ते जे एफ के या सेवा भारतात सुरू होतात, भारतावरून विनाथांबा (म्हणजे भारताच्या पूर्वेकडील देशापासून पश्चिमेकडच्या देशाकडे) भरारी घेत नाहीत, म्हणूनच ते तडक उड्डाण शक्य आहे.
सद्या "मुंबई ते न्यू यॉर्क ही तडक सेवा" फक्त युनायडेड एअरलाईन्स आणि एअर इंडिया या दोनच कंपन्या देतात. दुर्दैवाने इंडीयाने अनेकदा मनस्ताप दिलेला असल्यामुळे तिचे कमी तिकीट व जास्त लगेज हे फायद्याचे मुद्दे असूनही युनायटेडला पसंती दिली.
युनायटेडने जाण्यायेण्याचा माझा एकंदरीत अनुभव चांगला होता.
नंतर अजून जरा उत्खनन केले तर २ ते ४ तासांचा दुबईत एक स्टॉपओव्हर घेण्याची तयारी असेल तर एमिरेट्स हा उत्तम पर्याय सापडला. दुबईच्या विमानतळावर २-४ तास हा त्रासदायक नव्हेच तर मजेशीर अनुभव असतो; लाँग हऊल रूटवर एमेरीटस A380 विमाने ही आरामदायक विमाने वापरते; आणि मुंबई-न्यू यॉर्क रूटवर तिकीटाची किंमतही युनायटेड व एअर इंडीयापेक्षा कमी दिसली... सर्वात महत्वाचे म्हणजे, अनेक वेळा एमिरेटस ने प्रवास केला आहे आणि म्हणून खात्रीने म्हणू शकतो की तिच्या सेवेची प्रत जगातल्या पहिल्या तीनात आहे.
नॉनस्टॉप सेवा शोधण्याच्या नादात लावलेल्या गाळणीने एमेरिट्स माझ्या नजरेआड झाली :( :)
तिच्या सेवेची प्रत जगातल्या पहिल्या तीनात आहे. >> सहमत आहे. मुलेबाळे असणार्यांसाठी बहुतेक पहिलाच नंबर लागेल एमिरेट्सचा!
तिकीट असेल तर अजून एक फायदा म्हणजे , US Immigration हे अबुधाबी एयरपोर्ट वरच होते, त्यामुळे खूप वेळ वाचतो(US airport वर उतरल्यावर रांगेत उभे राहावे लागत नाही). मी नेहेमी हाच पर्याय वापरतो. पुणे/मुंबई वरून पहाटेचे विमान असल्यास त्याच दिवशी संध्याकाळी US ला आगमन होते.
ही अमेरिकेतल्या प्रवेशासाठी "प्रीक्लिअरन्स" सेवा अबु धाबी सकट १५ ठिकाणी उपलब्ध मध्ये आहे. ती इतर काही ठिकाणी (?दुबई, मुंबई, इ) सुरू करण्यासाठी तयारी चालू आहे असे ऐकले आहे. अमेरिकेच्या सीमेवर पोहोचण्याआधीच प्रवेश पक्का झाल्याने प्रवाश्यांच्या मनावरचा खूपसा भार कमी होईल हे नक्की.
मात्र, अधिकार्याला संशय आला तर प्रीक्लिअरन्सच्या जागीही तेवढीच समस्या येऊ शकते. काही दिवसांपूर्वी अबू धाबी येथे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार्या काही भारतिय विद्यार्थ्यांना समस्या येऊन भारतात परतावे लागल्याची बातमी पाहिली/वाचली असेलच.
जेएफकेचा जुना आणि न्यूअर्कचा नवीन असे माझे दोन्ही अनुभव चांगले होते. रांगेत १५-२० मिनिटे आणि अधिकार्याबरोबर २-३ मिनिटे इतकाच वेळ लागला व विचारलेले प्रश्नही जुजुबी होते.
मी पूर्वी LA ला इमिग्रेशनचा अनुभव घेतला होता.. लांबच लांब रांगा आणि
आधिकार्यांचे प्रश्न..आधीच २२-२३ तासाचा प्रवास केल्यावर परत एक दिड तास
तिष्ठत उभ राहाणं जिवावर येतं.
पण या वेळी JFK ला अगदी उलट अनुभव आला. १०-१२ लोकच होते रांगेत, आणि मुलाखत
तर जणू झालीच नाही अशी. मला वाटल की मी संध्याकाळी पोचले ती वेळ कमी
गर्दीची असेल म्हणून तसा अनुभव. पण तुम्ही पहाटे पोचलात तरी तीच परीस्थिती
होती म्हणजे JFK ला असंच असतं असं दिसतय.
A380 बद्दल अत्यंत सहमत.केवळ त्या विमानासाठी मी इतिहादचे तिकिट
काढते.अतिशय आरामदायी विमान आहे ते.इकाॅनाॅमी सिट्स पण बर्यापैकी कंफर्टेबल
असतात.स्क्रिन्स पण छान मोठ्या , पिक्चर क्वालिटी आणि सिलेक्शन उत्तम
असते.इतिहादचे जेवणही छान मिळाले आहे दरवेळेला.
या विमानाचा फर्स्ट आणि बिझनेस क्लास वरच्या मजल्यावर असतो.त्याने एकदा यायचय मला!
व्हिसाच्या सुरस कहाण्या नेहमीच सांगितल्या ऐकल्या जातात. माझ्या मते त्या तुलनेने फार कमी असतात, एका नाकारलेल्या व्हिसाच्या बरोबर हजारोंनी मिळालेले व्हिसा असतात. पण, सुखद घटनांपेक्षा धक्कदायक व दु:खद घटनांना जास्त प्रसिद्धीमुल्य असते म्हणून त्या सतत प्रचारात राहतात.
माझे पहिले अमेरिकन आणि युके व्हिसाज् किंचीत बाचाबाची होऊन अनुक्रमे ४५ मिनिटे आणि एक दिवसात ताब्यात मिळाले होते. त्याबाबत कधितरी लिहिले जाईलच :) ;)
न्यु यॉर्क म्हटले की मला मुंबईसारखेच वाटते. बेशिस्त, गोंधळ, आवाज आणि
फेरीवाले सोडून. वॉल स्ट्रीटची मौनातली धावपळ, मुकाट बसलेला तो प्रसिद्ध पण
प्रत्यक्ष पाहिल्यावर छोटासा वाटणारा 'बुल', चाय्नीज मार्केट, सगळं आपलं
वाटतं.
पण सगळ्यात लक्ष्यात राहिला आहे तो बॅटरी पार्क येथे पायांखाली दणाणणारा
अॅटलांटिक. न्यू पोर्ट येथे एक्स्चेंज प्लेसलाही असा स्टील फ्रेमवर
समुद्राच्या (हड्सन नदीच्या) किंचित आत किनार्यावर बांधलेला लाकडी पॅटिओ
आहे. जगात आणखी अनेक ठिकाणी कदाचित असतीलही. आपण त्या मजबूत लाकडी माळ्यावर
असतो आणि खाली समुद्र घोंगावत, रोरावत, गाजत असतो. पायांनाही ती स्पंदने
जाणवतात. शिवाय पोकळीमुळे आवाज वर्धित होतो. तो थरार वेगळाच. आणि आत कुठे
तरी जाणवत राहातं की ह्याचंच एक टोक, आत्याच्या चुलत नणंदेचा मावसदीर
इतक्या दूरच्या नात्याने अरबी समुद्राच्या रूपाने आपल्या उत्तर पश्चिम
किनार्याशी जोडलेलं आहे.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
आता तीन महिने भटकंतीला आहेत म्हटल्यावर शहराची थोडीबहुत माहिती काढणे आवश्यक होते. या भागाचा जरा अभ्यास केल्याने आपले भटकणे जास्त सुलभ, सुखद आणि श्रेयस्कर होते.
न्यू यॉर्क शहर अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरील न्यू यॉर्क राज्यात आहे. त्यांच्या नावात गल्लत होऊ नये व तुम्हाला नक्की शहर म्हणायचे आहे की राज्य, यासाठी काही संकेत पाळले जातात. नुसते न्यू यॉर्क हे संबोधन सहसा राज्यासाठी वापरले जाते तर शहराला "न्यू यॉर्क सिटी" किंवा "एनवायसी" किंवा नुसतेच "शहर (सिटी)" म्हटले जाते. दुसरे म्हणजे न्यू यॉर्क हे दोन शब्द आहेत आणि ते तसेच दोन शब्द म्हणून उच्चारले जातात, न्यूयॉर्क असे नाही, न्युयॉर्क असे तर अजिबात नाही. ते दोन शब्द सलग उच्चारल्यास त्यांची न्यू जर्सीतल्या विमानतळ असलेल्या शहराच्या नावाबरोबर, न्यूअर्क (Newark) बरोबर, गल्लत होऊ शकते. अर्थात, धावपळत न्यू यॉर्क पाहायला आलेल्या आणि डॉलर्स खर्च करणार्या पर्यटकांना या बाबतीत १०० गुन्हे माफ असतात! :)
न्यू यॉर्क शहर इ स १७८५ ते १७९० या कालखंडात अमेरिकेची (United States) राजधानी होते. मात्र, आता हे शहर अमेरिकेची तर नाहीच पण, सर्वसामान्य गैरसमजाविरुद्ध, न्यू यॉर्क राज्याचीही राजधानी नाही. तो मान या शहराच्या २४० किमी उत्तरेला असलेल्या ऑल्बानी (Albany) या केवळ लाखभर लोकसंख्या असलेल्या शहराचा आहे! राज्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध शहर राजधानीचे शहर नसणे ही अमेरिकेची खासियत अनेकवार आपली विकेट काढून जाते!
सुमारे ८६ लाख वस्तीचे आणि ७९० चौ किमीवर पसरलेले हे अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. परिसरातील भूभागाच्या अर्थकारणावर त्याचा पडणारा प्रभाव जमेस धरला तर ही लोकसंख्या सहजपणे २ कोटीच्या वर जाते. अमेरिकेच्या अर्थकारणात या एकट्या शहराचा हिस्सा (gross metropolitan product किंवा GMP) सुमारे $१. ४ ट्रिलियन इतका मोठा आहे. जगभरच्या जेमतेम डझनभर देशांचे GDP चे आकडे यापेक्षा जास्त आहेत! इथले बंदर जगातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक बंदरांमध्ये गणले जाते. व्यापार, अर्थ, माध्यमे, कला, फॅशन, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण, इत्यादी अनेक क्षेत्रातील अमेरिकेच्या पुढारीपणात या एकट्या शहराचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना या शहराला जगाची सांस्कृतिक व आर्थिक राजधानी समजले जाते, इतका मोठा त्याचा दबदबा आहे. संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय येथे आहे. अर्थातच, जागतिक राजकारणावर प्रभाव पाडणारे अनेक निर्णय येथे घेतले जातात. जवळ जवळ ८०० भाषा बोलल्या जाणारे हे शहर जगातील सर्वात जास्त भाषावैविध्य असलेली जागा आहे. येथे फिरताना इतक्या वंशाचे, रंगछटांचे, तोंडवळ्यांचे, शारीरिक चणींचे, भाषावैविध्याचे लोक केवळ एकमेकाशी मिसळत असतात असे नाही तर आपापल्या कामाच्या दिशांनी पळत असतानाही एकमेकाशी सौहार्दाने वागताना दिसतात की, या शहराला "जागतिक सामाजिक सहिष्णुतेचे केंद्र ( global node of social tolerance)" उगाचच म्हणत नाही याची खात्री पटते.
या शहराला "बिग अॅपल" असेही म्हटले जाते. हे नाव कसे पडले याबाबत अनेक
समज-गैरसमज आहेत. त्याचा जास्त विश्वासू इतिहास असा आहे. १९२०च्या दशकात
न्यू यॉर्क आणि परिसरात बरीच घोड्यांच्या शर्यतींची अनेक मैदाने होती. या
शर्यतींतल्या बक्षिसांना "अॅपल" असे म्हटले जात असेल. धनिकांचा तुटवडा
नसल्याने इथल्या शर्यतींतली बक्षिसे मोठ्या रकमांची असत म्हणून त्यांना
"बिग अॅपल" असे संबोधले जाऊ लागले. New York Morning Telegraph च्या
John J. Fitz Gerald नावाच्या वार्ताहराने ३ मे १९२१ ला "बिग अॅपल" असा
न्यू यॉर्कचा उल्लेख केला आणि ते लोकांना इतके आवडले की तेव्हापासून "बिग
अॅपल" हा "न्यू यॉर्क सिटी" चा लाडका प्रतिशब्द बनला आहे.
आधुनिक न्यू यॉर्क शहराच्या जागेवर अनेक सहस्र वर्षांपूर्वीपासून अनेक अमेरिकन इंडियन लोकांच्या टोळ्या राहत होत्या. इ स १५२४ पासून या परिसरात युरोपियन दर्यावर्द्यांच्या फेर्या सुरू झाल्या. मॅनहॅटन बेटाच्या दक्षिण टोकावर व्यापारी केंद्र उघडून डच वसाहतवाद्यांनी १६२४ मध्ये या शहराची पायाभरणी केली व त्याला त्याला "न्यू अॅमस्टरडॅम" असे नाव दिले. हा भाग सद्या "लोअर मॅनहॅटन" असा ओळखला जातो. इ स १६२६ मध्ये डच वेस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर जनरलने स्थानिक कॅनार्सी (Canarsie) जमातीकडून ६० गिल्डर्सना ($१०००) मॅनहॅटन बेट विकत घेतले.
न्यू यॉर्क च्या इतिहासातील एक प्रकरण फार रोचक आहे. १६६७ मध्ये ब्रिटन व नेदरलँड मध्ये झालेल्या करारानुसार (Treaty of Breda) इंग्रजांनी मॅनहॅटन आणि इंडोनेशियामधील रन/रुन (Run) या नावाच्या बेटांवरील हक्कांची अदलाबदल केली गेली. बांदा समुद्रात एकाकी असलेल्या रन/रुन या बेटाची लांबी ३ किमी व रुंदी १ किमीपेक्षाही कमी आहे.
रुन बेटाचे "स्थान". खुद्द बेटाचा ठिपका या नकाश्यात दिसू शकत नाही!
(जालवरून साभार)
या जगाच्या एका कोपर्यातल्या चिमुकल्या बेटामध्ये डचांना रस होता आणि त्याच्या बदल्यात त्यांनी नवीन जगातले (न्यू वर्ल्ड, अमेरिका) एक महत्त्वाचे बंदर ब्रिटिशांना दिले, हे आज विचित्र वाटेल. पण, रुन बेट जायफळांच्या झाडांनी भरलेले होते आणि जायफळाच्या व्यापाराचे केंद्र होते. त्या काळी, उच्च प्रतीचा आणि दुर्मिळ मसाल्याचा पदार्थ असलेल्या जायफळाची किंमत सोन्याशी स्पर्धा करत होती! त्याविरुद्ध, मॅनहॅटन त्या काळी फारसे महत्त्वाचे बेट नव्हते. याशिवाय, ब्रिटिश अमेरिकन कॉलनीने घेरलेले मॅनहॅटन बेट डचांना आणि डच इंडोनेशियन कॉलनीने घेरलेले रुन बेट इंग्रजांना सांभाळणे कठीणच जात असणार. त्यामुळे, त्या काळी वरचढ असलेल्या डचांनी जगभरातल्या जायफळाच्या व्यापारावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी हा सौदा इंग्रजांवर लादला होता.
एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात युरोपातील भीषण दुष्काळ, राजकीय अस्थैर्य व जुलूम, "अमेरिकेतील स्वातंत्र्य व सधनतेच्या स्वप्नाचे (अमेरिकन ड्रीम)" आकर्षण, इत्यादी अनेक कारणांमुळे युरोपातील लोकांनी मोठ्या प्रमाणात अमेरिकेत स्थलांतर केले. या लोकांचे स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या (Statue of Liberty) रूपाने स्वागत करणारे हे शहर अमेरिकेच्या लोकशाहीचे आणि औदार्याचे प्रतीक बनले. त्याचबरोबर अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांतल्या कृष्णवर्णीय नागरिकांनीही मोठ्या संख्येने न्यू यॉर्कमध्ये स्थलांतर केले आहे. आशिया आणि लॅटिन (दक्षिण) अमेरिकेतून आलेल्या लोकांची या सगळ्यांत भर पडली आहे. साहजिकच, अनेक वर्ण, वंश, धर्म, विचार, इत्यादींचे एक अजब रसायन या शहरात झाले आहे. अनेक शतकांचा चढउतार सहन करीत, वसाहतवादातून तावूनसुलाखून बाहेर पडत, गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्ड) सामना करत आणि ९/११ सारख्या भयानक आपत्तींना सामोरे जात, या शहराच्या उत्कर्षाची कमान आजतागायत सतत वर जात राहिली आहे. आजही हे शहर अमेरिकेच्या सर्जनशीलतेचे, उद्योजकतेचे, सामाजिक सहिष्णुतेचे आणि पर्यावरणवादाचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे.
येथे कोलंबिया विद्यापीठ, न्यू यॉर्क विद्यापीठ आणि रॉकफेलर विद्यापीठ यासारखी जागतिक यादीत वरच्या स्थानावर असलेल्या शिक्षणसंस्था आहेत. विविध विषयांचे उच्च शिक्षण देणारी १२० विद्यालये आणि विद्यापीठे असलेले हे शहर उच्च शिक्षणासाठी जगभरच्या विद्यार्थ्यांत प्रसिद्ध आहे.
संगणक व संचार क्षेत्रात झालेल्या आणि होत असलेल्या क्रांतीचे पडसाद या शहरावर पडले नसते तरच आश्चर्य. मॅनहॅटनमध्ये सुरू झालेल्या कंपन्यांनी आता न्यू यॉर्कच्या सर्व बोरोंमध्ये आणि जवळच्या परिसरांत पाय पसरले आहेत. त्या सर्वांना मिळून सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर "सिलिकॉन अॅली" असे नाव पडले आहे. २०१५ मध्ये सिलिकॉन अॅलीमध्ये $७.३ बिलियन (साधारण रु ५०,००० कोटी) इतकी गुंतवणूक केली गेली आहे. काही सबवे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा आहे. ती सबवेच्या सर्व जाळ्यावर टाकण्याचे काम चालू आहे. सर्व शहरभर रस्त्यांवर १००MBPS क्षमतेची ब्रॉडबँड सेवा मोफत देण्याचा महानगरपालिकेचा प्रकल्प चालू आहे. त्यातले काही वायफाय हब्ज काम करू लागले आहेत. आपल्याला शहरात फिरताना ते दिसतात.
न्यू यॉर्क शहराचे खालील नकाश्यात दाखविल्याप्रमाणे पाच प्रशासकीय भाग किंवा बरो (boroughs) आहेत :
न्यू यॉर्क शहरामधील बरोज : १. मॅनहॅटन, २. ब्रूकलिन, ३. क्वीन्स, ४. ब्राँक्स, ५. स्टॅटन बेट
(जालवरून साभार)
यापैकी मॅनहॅटन आणि स्टॅटन ही स्वतंत्र मोठी बेटे आहेत. ब्रूकलिन आणि क्वीन्स लॉग आयलँड नावाच्या एका बर्याच मोठ्या बेटाच्या दक्षिण-पश्चिम भूभागावर आहेत. तर, ब्राँक्स अमेरिकेच्या मुख्य भूमीचा भाग आहे. याशिवाय परिसरात असलेली अनेक छोटी बेटे त्यांच्या जवळच्या बरोमध्ये समाविष्ट केली आहेत. मॅनहॅटनच्या पश्चिमेकडून वाहणारी हडसन नदी त्याला न्यू जर्सी राज्यापासून वेगळे करते तर पूर्वेकडील हार्लेम आणि ईस्ट नावाच्या नद्या त्याला ब्राँक्स, क्वीन्स आणि ब्रूकलिनपासून वेगळे करतात. इतका जुजुबी भूगोल आपल्याला न्यू यॉर्कमध्ये फिरायला पुरेसा आहे.
न्यू यॉर्क शहरातली सबवे (जमिनीखालची रेल्वे) आणि बस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी चांगली आहे की आमच्या तीन महिन्यांच्या वास्तव्यात शहरात फिरताना खाजगी चारचाकीची गरज भासली नाही. रस्त्यांवर दर चौकात असलेल्या (आणि चालक कटाक्षाने पाळत असलेल्या) सिग्नल्समुळे आणि रस्त्यावरच्या गर्दीमुळे, बस किंवा खाजगी वाहनापेक्षा सबवे जवळ जवळ निम्म्या वेळात व खात्रीने गंतव्यापर्यंत पोचवते असाच अनुभव आला! सबवे आणि बस या सेवा शहरभर एकच वाहतूक संस्था (New York City Transit Authority) चालवते. तिने दिलेले स्मार्टकार्ड सर्व शहरभर सबवे आणि बसला चालते. हे कार्ड सर्व सबवे स्टेशन्समध्ये आणि काही बसथांब्यांवर असलेल्या व्हेंडिंग मशिन्समध्ये मिळते. त्यातले पैसे संपले तर तीच मशिन्स वापरून त्यांतले पैसे वाढवता येतात. शहरात कोठूनही कोठे जायच्या एका प्रवासाला $२.७५ पडतात. सबवे स्टेशनम्ध्ये अथवा बसमध्ये जाताना कार्ड स्वाईप केले की तेवढे पैसे कार्डातून वजा होतात. सबवे/बसमधून बाहेर पडून दोन तासांच्या आत प्रवासाच्या दिशेने पुढे जाणारी बस/सबवे पकडली तर अर्थातच कार्ड स्वाईप करावे लागते पण त्या एका प्रवासाचे पैसे कापले जात नाहीत. थोडक्यात, वाहन बदलले तरी एका दिशेचा प्रवास $२.७५ मध्येच होतो. सबवे आणि बसमार्गांचे शहरभर पसरलेले जाळे पाहता ही प्रवासाची पद्धत फार सोईची आणि किफायतदार आहे.
(New York City Transit Authority च्या संस्थळावरून साभार)
मॅनहॅटनमधिल बसमार्गांचा नकाशा
(New York City Transit Authority च्या संस्थळावरून साभार)
मात्र, संपूर्ण अमेरिकेत, एकदा मोठ्या शहरांच्या बाहेर पडले की लहान शहरांत व गावांत सार्वजनिक वाहतूक सेवेचा बर्यापैकी ठणठणाट आहे. त्यामुळे खाजगी वाहन नसले तर एकतर मोठा खोळंबा होतो किंवा खिशाला चाट लावणारी टॅक्सी वापरावी लागते. तेथे खाजगी वाहन ही चैन नसून अत्यावश्यक व बचत करणारी सोय आहे. अमेरिकन किंवा आंतरराष्ट्रिय चारचाकी परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) जवळ असला तर भाड्याची गाडी (रेंटल कार) सहज मिळते. त्यामुळे अमेरिकेच्या अंतर्भागात स्वतंत्रपणे फिरायचे असले तर असा परवाना असणे सहलिला आणि खिशाला सोईचे ठरते.
असो. इतक्या पूर्वतयारीनंतर आता आपण आपल्या भटकंतीकडे वळूया.
वरची सर्व पार्श्वभूमी पाहता या शहराचे जागतिक पर्यटनात अनन्य महत्त्व असले तर आश्चर्य ते काय! २०१५ मध्ये या शहराला ६ कोटी पर्यटकांनी भेट दिली होती. अर्थातच, त्याला "The most photographed city in the world" हा किताबही मिळालेला आहे.
या शहरात असलेल्या पर्यटन आकर्षणांची यादी करायला लागल्यावर ती न संपणारी मारुतीची शेपटी आहे हे ध्यानात आले...
अर्थातच, भरपूर वेळ गाठीशी असला तरी, इतक्या सगळ्या जागांना भेट देणे नक्कीच थकवादायक, कंटाळवाणे आणि गैरजरूर ठरले असते. त्यामुळे, उगाच सगळे टिकमार्क्स पुरे करण्याच्या नादात न पडता त्यातल्या माझ्या दृष्टीने आकर्षक आणि आनंददायक असलेल्या जागांचा आरामात आणि मनसोक्त आनंद घेतला. त्या जागांची सफर आपण या मालिकेत करणार आहोत.
याशिवाय, बराच मोकळा वेळ असल्याने, माझा आवडता छंद म्हणजे "प्रसिद्ध, मुख्य ठिकाणांना सोडून जरा दोन चार गल्ल्या आतले शहर पाहणे" हे सुद्धा आपण करणार आहोत. असे केल्याने खर्या शहराची जवळून ओळख होते आणि कधीमधी अचानक, सुखद, आश्चर्यकारक अनुभव येतात... जे नेहमीच्या पर्यटनात सहसा शक्य नसते.
चला तर मग, पुढच्या भागापासून न्यू यॉर्क शहर आणि परिसराची भटकंती करायला तयार व्हा !
(क्रमश :)पाथ आणि सबवे या दोन वेगवेगळ्या रेलवे कंपन्या/डीपार्टमेंट्स आहेत.
पाथ (PATH) उर्फ The Port Authority of NY & NJ ची सेवा ही न्यू यॉर्क शहर आणि न्यू जर्सी राज्य यांना जोडणारी सेवा आहे. ती न्यू यॉर्कच्या अंतर्गत वाहतूकीत भाग घेत नाही. त्यामुळे तिचा उल्लेख आला नाही. तिचे WTC स्टेशन मात्र पहाण्यासारखे आहे. न्यू जर्सीच्या फेरीत आपण त्याला भेट देऊ !
अजून एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट अॅडवतो - मॅनहटनची रस्त्यांची रचना ही अगदी नेटकी कॅडबरीच्या वड्या पाडल्यासारखी चौकोनी आहे. म्हणजे सगळे उत्तर-दक्षिण रस्ते हे अवेन्यूज या नावाने आणि पूर्व-पश्चिम रस्ते स्ट्रीट्स या नावाने ओळखले जातात. त्यामुळे पत्ता सांगताना थर्ड अवेन्यू, सेवेंटीफिफ्थ स्ट्रीट असं म्हंटलं की नेमकं कुठे ते चटकन समजू शकतं. यातले जवळपास सगळे स्ट्रीट्स हे एकाआड एक उलटसुलट एकदिशामार्गी आहेत त्यामुळे वाहतूक सुरळित रहायला मदत होते (अर्थात तिथे नो एंट्रीत लोक घुसत नाहीत हे देखील आहेच! ;) )
सबवे म्हणजे न्यु यॉर्कच्या रक्तवाहिन्या! सिटी मध्ये असाल तर खाजगी वाहानाची अजिबात गरज पडत नाही. एकदा तिकिट काढलं की एक स्टेशन जा अथवा अगदी शेवटच्या स्टेशन पर्यंत.. तिकीट तेच!
सबवेच्या आतमध्ये स्टेशनमध्ये सुद्धा भरपुर अतरंगीपणा चालु असतो. लोक्स मस्तपैकी गिटार, ड्रम्स वाजवत असतात. स्टेशन्सच्या भिंतींवरचे म्युरल्स सुद्धा अगदी देखणे असतात. आणि खुद्द स्टेशन्स म्हणजे सुद्धा एक भुलभुलैया असावा इतकी मोठी आहेत. जसे की ४२-टाईम्स स्क्वेअर हे स्टेशन. आतल्या आत जवळपास २ ब्लॉक्स चालावं लागतं. त्यातही पुन्हा जमिनीखाली असुनही स्टेशन मध्ये पुन्हा मजले आहेत. तीन मजल्यांवर तीन (एन. क्यु, आर / ए, बी,सी आणि ७) अशा ट्रेन्स जातात. एकदा आत गेलं की तुम्ही आतल्या आत कुठेही फिरु शकता, पुन्हा स्वाईप करावे लागत नाही. एवढी गुंतागुंतीची सिस्टीम, ते ही इतकी जुनी आणि आजही इतकी भक्कम!
ग्रॅण्ड सेंट्रल हा कळस आहे ह्या सिस्टीम वर! काका लिहीतीलच.
सबवे / मेट्रो हे सर्वात मोठं कारण आहे ह्या शहराच्या प्रेमात पडण्याचं! ज्यांना कधी इकडे यायचं आहे त्यांनी टुर नाही घेतली आणि स्वतः सबवेने फिरुन न्यु यॉर्क पाहिलं तर फारच कमी पैशात अगदी जवळुन शहर पहाता येईल.
ब्रूकलीन हे येथील कामगार वर्गाचा राहण्याचा आवडता भाग. त्यामुळे चित्रपटात ब्रूकलीनचा सारखा उल्लेख असतो.जसे मुंबईत धारावी मध्ये हिरो राहतो तास न्यू यॉर्क मध्ये ब्रूकलीन मध्ये
जर्सी सिटीचा फेरफटका
न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटाच्या पश्चिमेकडून वाहणार्या हडसनमाईच्या पल्याडच्या तटावर जर्सी सिटी नावाचे एक आटपाट नगर आहे. हे शहर शेजारच्या न्यू जर्सी राज्यात असले तरी न्यू यॉर्क शहर व जवळच्या परिसरात दोनतीन आठवड्यांपेक्षा जास्त वस्ती करून राहणार्या भारतीयांना अमेरिकेत पोचल्या पोचल्या या तीर्थक्षेत्राला भेट देणे अत्यावश्यक असते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे तेथे असलेली भारतीय खाद्यपदार्थ, भाज्या, फळे आणि कपड्यांची दुकाने. दुकानांची नावेही भारतात असावी अशीच असतात. शनिवार-रविवारी तर तेथे भारतीय उपखंडातील लोकांची आठवड्याचा भाजीपाला आणि वाणसामानाच्या खरेदीसाठी झुंबड उडालेली असते.
न्यू यॉर्क प्रमाणेच या शहरालाही जगाच्या सर्व खंडातील लोकांनी घर बनवले आहे. २०१० सालच्या जनगणनेनुसार येथील १०% पेक्षा जास्त लोक भारतीय वंशाचे आहेत. हे प्रमाण पश्चिम गोलार्धातल्या शहरांमध्ये सर्वाधिक आहे आणि ते सतत वाढत आहे. इथला भारतीय बहुल प्रभाग "इंडिया स्क्वेअर" किंवा "लिटिल इंडिया" किंवा "लिटिल बॉम्बे" या नावांनी ओळखला जातो. या ठिकाणी राहणारे भारतीय नवरात्री, होळी, इत्यादी सण सार्वजनिकरीत्या साजरे करतात आणि त्याला स्थानिक माध्यमांत बरीचशी प्रसिद्धीही मिळते.
जेटलॅग घालविण्यासाठी दोन दिवस आराम करून आलेल्या पहिल्या आठवडी सुट्टीत महिन्याचे वाणसामान भरण्यासाठी जर्सी सिटीला जायचा बेत ठरवला.
चिरंजीवाने घर मोक्याच्या जागी घेतले होते. अल्याडच्या बेनेट अव्हेन्यूवर सबवेचा A हा वेगवान (एक्सप्रेस) मार्ग होता तर पल्याडच्या ब्रॉडवेवर १ हा दर स्टेशनवर थांबणार्या (लोकल) गाड्यांचा मार्ग होता. हे दोन्ही रूट्स मॅनहॅटन बेटामध्ये दक्षिणोत्तर आहेत. दक्षिणेत असलेल्या मध्य मॅनहॅटनमध्ये व डाऊनटाऊनच्या काँक्रिट जंगलात पोचल्यावर A ला इंग्लिश अल्फाबेटमधील अक्षरांची नावे असलेले B, C, D,... Z असे आणि १ ला २, ३, ४, इत्यादी आकड्यांची नावे असलेले नवीन मार्ग येऊन मिळतात किंवा फाटे फुटतात. अनेक मोठ्या सबवे स्टेशनवर (उदा ४२ स्ट्रीट स्टेशन) समान स्तरावर असलेल्या मार्गावरचे थांबे बोगद्यांनी जोडलेले आहेत आणि/किंवा एकमेकाच्या वरखाली असलेल्या मार्गावरचे थांबे जिने व लिफ्ट्सनी जोडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा जमिनीखाली गेलात की कितीही गाड्या बदलल्या तरी शेवटचा थांबा येईपर्यंत परत जमिनीवर यायची सहसा गरज भासत नाही. अर्थातच तुमचे एकदा स्वाईप केलेले स्मार्टकार्ड शेवटापर्यंत काम करते. जमिनीवर आल्यावर त्याच दिशेने जाणारी बस पकडली तर बसमध्ये स्मार्टकार्ड स्वाईप करावे लागते पण बसचा प्रवास २ तासाच्या आत सुरू केला असला तर पैसे कापले जात नाहीत.
मॅनहॅटनमधल्या दक्षिणोत्तर जाणार्या रस्त्याला अव्हेन्यू म्हणतात तर पूर्वपश्चिम जाणार्या रस्त्यांना स्ट्रीट म्हणतात. बेटाच्या पार दक्षिण टोकाला आणि इतरत्र क्वचित अपवादात्मक रस्त्यांना व्यक्तींची नावे दिली आहेत. इतर सर्व रस्त्यांना त्यांच्या क्रमांकांनी ओळखले जातात. उदाहरणार्थ, ५वा अव्हेन्यू, ४२वा स्ट्रीट, इत्यादी. त्यामुळे, मॅनहॅटनचा नकाशा म्हणजे अव्हेन्यू आणि स्ट्रीट मिळून काढलेली चौकडीची नक्षी दिसते !
सबवे आणि बसच्या थांब्यांची नावे ते कोणत्या अव्हेन्यू/स्ट्रीटवर आहेत त्यावरून दिलेली आहेत. जागांचे पत्तेही "इमारत क्रमांक + अव्हेन्यू / स्ट्रीट क्रमांक" असे असतात. त्यामुळे, गंतव्याचा पत्ता माहीत असला तर कोणत्या सबवे/बसमधून जाऊन कोणत्या थांब्यावर उतरायचे हे वेगळे विचारायची गरज नसते. एकंदरीत संपूर्ण पत्ता माहीत असला तर न्यू यॉर्कमध्ये कोणालाही न विचारता जागा शोधणे फारसे कठीण नाही.
सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था "सबवे+बसच्या सेवेच्या आताच्या व भविष्यातल्या वेळा, थांब्यांच्या जागा, थांब्यांपर्यंत चालत जाण्याकरिता लागणारा वेळ, सर्व मार्गाचा मधल्या थांब्यांसह नकाशा, इत्यादीसह" गुगलमॅपवर पाहता येते. बहुतेक सर्व मार्गांवरील सबवे सेवा दर ३ ते १० मिनिटांनी असते आणि खूप भरवशाची असते. बस दर १० ते १५ मिनिटांनी असते पण रस्त्यावरच्या गर्दीमुळे बससेवेच्या वेळा बेभरंवशाच्या असू शकतात. सबवे इतकी सोयीची आहे की तीन महिन्यांत न्यू यॉर्कच्या एका भागातून दुसर्या भागातल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी; गंतव्यस्थानाच्या जवळपर्यंत सबवे जात नसेल अश्या मोजक्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा केवळ न्यू यॉर्क शहरातील रस्ते व वस्ती पाहायला मिळावी यासाठी मुद्दाम केलेल्या प्रवासासाठीच आम्ही बस सेवा वापरली. टॅक्सी तर विमानतळ व घर यामधले जाण्यायेण्याचे दोन प्रवास सोडून एकदाही वापरली नाही.
तर, जर्सी सिटी या भारतीयांच्या अनेक आशाआकांक्षाइच्छांची पूर्ती करणार्या क्षेत्राला जाण्यासाठी सकाळी न्याहारी करून आम्ही सज्ज झालो. घरातून निघण्यापूर्वी "कसा प्रवास करू म्हणजे तो सुगम होईल रे बाबा ?" असे गुगलबाबाला साकडे घातले. त्याने, सबवेचा A मार्ग पकडून डाऊनटाऊनमधील चेंबर स्ट्रीट थांब्यावर उतरा आणि तेथून चालत जवळच असलेल्या PATH या सेवेची सबवे पकडून जर्सी सिटीतल्या जर्नल स्क्वेअर या थांब्यावर उतरा" असा सल्ला दिला. PATH हे The Port Authority of NY & NJ संस्थेच्या न्यू यॉर्क शहराला न्यू जर्सी राज्यातील जर्सी सिटी व न्यूअर्क या शहरांना जोडणार्या सार्वजनिक वाहतूक सेवेचे संक्षिप्त रूप आहे.
गुगलबाबा प्रमाण असे म्हणत आम्ही घराबाहेर पडून बेनेट अव्हेन्यूवर आलो...
बेनेट अव्हेन्यू
बेनेट अव्हेन्यूच्या शेवटच्या भागाच्या एका बाजूला बर्यापैकी उंच टेकडी तर दुसर्या बाजूला रहिवासी वस्ती आहे. इमारतीतून बाहेर पडून उजवीकडे वळून पायी दोन मिनिटे चालल्यावर त्या टेकडीच्या उभ्या कड्यात असलेले A मार्गावरच्या "१९० स्ट्रीट" नावाच्या थांब्याचे प्रवेशव्दार दिसते...
बेनेट अव्हेन्यू आणि १९० स्ट्रीट सबवे थांब्याचे प्रवेशद्वार
या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक लांबच लांब बोगदा लागतो. तो टेकडीच्या पोटात असलेल्या सबवे थांब्यावर घेऊन जातो...
१९० स्ट्रीट सबवे थांब्याकडे जाणारा बोगदा
बहुतेक सर्व सबवे थांब्यांवर पोहोचायला एकदोन जिने उतरून जावे लागते. पण, १९० स्ट्रीटसारखे काही थांबे असे आहेत की जे एकदोन ब्लॉक्स (१ ब्लॉक = साधारण १०० ते ३०० मीटर्स) अलीकडे-पलीकडे असलेल्या रस्त्यांनी बोगद्यांनी जोडलेले आहेत. १९० स्ट्रीट थांब्याच्या पलीकडच्या बाजूचा रस्ता टेकडीवर बर्याच वरच्या स्तरावर आहे. बोगद्याच्या थांब्याजवळच्या टोकापासून तेथे जायला तीन मोठे लिफ्ट्स आहेत. सबवेने प्रवास न करणारे लोकही या बोगद्यांचा व लिफ्ट्सचा शॉर्टकटसारखा वापर करून इकडून तिकडे जाऊन वेळ व श्रम वाचवू शकतात. लोकांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेल्या स्वायपिंग मशीन्स चुकवून जाता येईल असा एक वेगळा मार्ग ठेवलेला असतो. थोडक्यात, लोक त्या सेवेचा गैरफायदा घेत नसून ती प्रशासनाने नागरिकांसाठी केलेली सोय आहे. घराच्या जवळ असलेल्या पार्क आणि बगिच्यामध्ये संध्याकाळचा फेरफटका मारायला जाण्यासाठी या सोयीचा आम्हाला पुरेपूर उपयोग झाला.
"कायद्यावर बोट ठेवून सेवा" या तत्त्वाला घट्ट धरून न बसता, "सर्वच नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा" असा विचार करणार्या प्रशासनाचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही ! अश्या छोट्या छोट्या गोष्टींतूनच विकसित देशातले जीवन जास्त सुसह्य होते आणि जीवनस्तर आपोआप उंचावतो.
१९० स्ट्रीट सबवे थांबा
न्यू यॉर्कच्या सबवेचे थांबे युरोपमधल्या मेट्रो/अंडरग्राउंड सारखे चकचकीत दिसत नाहीत. याची महत्त्वाची कारणे म्हणजे ही जगातली सर्वात जुनी आणि सर्वात अजस्त्र भूमीगत वाहतूक सेवा आहे. त्यातच, २०१२ साली आलेल्या सँडी नावाच्या चक्रीवादळात तिचे अपरिमित नुकसान झाले. हा नुकसानाचा आकडा $३२ बिलियन (सुमारे २ लाख १५ हजार कोटी रुपये) इतका मोठा होता. अर्थातच सद्याच्या आर्थिक तंगीच्या काळात या सेवेला सुंदर बनविण्यापेक्षा ती लोकांसाठी सुलभ, सोयीची आणि वेगवान बनविण्याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. बर्याच थांब्याचे नूतनीकरण केले गेलेले आहे, काहींचे चालू असलेले आपल्याला प्रवास करताना दिसते आणि उरलेल्या इतरांचे भविष्यात केले जाणार आहे. सबवेच्या एखाद्या भागातले थांबे दुरुस्तीसाठी बंद असले तर त्याच्या एका टोकाच्या थांब्यापासून दुसर्या टोकाच्या थांब्यापर्यंत दोन्ही दिशांनी मोफत बस धावत असतात आणि प्रवाश्यांचा कमीत कमी खोळंबा होईल याची काळजी घेत असतात. मला हे आश्चर्यकारकरित्या सुखद वाटले. पण वाहतूक कर्मचारी आणि प्रवासी ते सर्व गृहीत धरून वागत असल्याचे दिसत होते.
सबवेचा प्रवास, गर्दीच्या वेळांतही, सुलभ आणि सुखद असतो. पण, माझ्यासारख्या केवळ काही काळासाठी तेथे राहणार्या आणि नवीन जागेचे जरा जास्तच कुतूहल असलेल्यांसाठी त्यात एक तोटा असतो. तो म्हणजे "सबवे मार्गाच्या वर असलेल्या जमिनीवरचे शहर कसे आहे, ते दिसत नाही", ही चुटपूट सतत लागून राहते !
हा हा म्हणता चेंबर्स स्ट्रीट सबवे थांबा आलासुद्धा. दोन मजले चढून जमिनीवर आलो आणि मॅनहॅटनच्या डाऊनटाऊनच्या काँक्रिटच्या गगनचुंबी जंगलात पाय ठेवला...
...
मॅनहॅटन डाऊनटाऊन
तेथून पायी पाचएक मिनिटांवर असलेला "पाथ"चा जर्सी सिटीच्या दिशेने नेणारा थांबा आम्हाला गाठायचा होता. मे महिना असला तरी अमेरिकन उन्हाळा नीटसा सुरू झालेला नव्हता. सकाळच्या हवेत बर्यापैकी सुखद गारवा होता.
वाटेत चिरंजीवाची अल्मा माटर पेस युनिव्हर्सिटी लागली. तिला नंतर एका खास समारंभासाठी भेट द्यायची होती, त्यामुळे दरवाज्यातच फोटोचा एक हॅलो म्हणून पुढे निघालो...
पेस विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार
थोडे पुढे गेल्यावर नष्ट झालेल्या जागतिक व्यापार केंद्राच्या (WTC) जुळ्या टॉवर्सच्या जागी बांधलेल्या नव्या वन वर्ल्ड सेंटरने उंच इमारतींच्या घोळक्यातून आणि उंच वृक्षांच्या शेंड्यांवरून मान वर करून खुणावले...
वन वर्ल्ड सेंटर
पण त्यालाही, "आता जरा घाईत आहे. नंतर आरामात बराच मोकळा वेळ काढून भेटायला येऊ." असे सांगून पाथच्या दिशेने मोर्चा वळवला. पाथ थांब्याजवळ WTC Transportation Hub च्या इमारतीची प्रचंड आकाराच्या सळयांनी बनवलेली एक रचना दिसते. "आकाशात भरारी घेणारा पक्षी" हा त्याचा अर्थ आहे हे सांगितल्याशिवाय कळणे जरासे कठीण आहे. याशिवाय, त्याचे डिझाइन बनवताना काहीतरी गडबड झाली. ती रचना जागेवर बसवताना एका बाजूचे पंख जवळच्या इमारतीत घुसतील असे दिसून आले ! ते छाटून त्यांचा आकार कमी करावा लागल्याने रचनेच्या दोन बाजूंत समानता राहिली नाही. मात्र, आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या गर्दीत ते सहजपणे दिसून येत नाही. WTC Transportation Hub पूर्ण बांधून होईल तेव्हा ते जागतिक कीर्तीचे संकुल होईल असा दावा केला जातो. मात्र, त्याच्या पूर्णत्वाची ठरवलेली तारीख पाच पाच वर्षांनी पुढे गेली आहे आणि मूळ ठरवलेला खर्च $२ बिलियनवरून $४ बिलियन इतका म्हणजे दुप्पट झाला आहे..
पाथच्या WTC Transportation Hub ची इमारत
पाथचा WTC थांबा मात्र एकदम आधुनिक, आकर्षक आणि भव्य आहे. प्रथमदर्शनीच त्याची आपल्यावर छाप पडल्याशिवाय राहत नाही...
पाथचा WTC थांबा ०१
पाथचा WTC थांबा ०२
पाथचा WTC थांबा ०३
नवीन प्रकल्प असल्याने पाथच्या गाड्यांचे डबे व त्यांच्या आतली व्यवस्था आधुनिक आहे. पाथचा मार्ग हडसन नदीच्या खालून न्यू जर्सी राज्यात जातो. जर्सी सिटीमधला जर्नल स्क्वेअर थांबा आला आणि आम्ही परत जमिनीवर आलो...
जर्सी सिटी ०१
चिरंजीवाचे काही काम असल्याने शहरात थोडासा फेरफटका झाला. हे एक मध्यम आकाराचे शहर आहे. मुख्य बाजारपेठ सोडल्यावर लगेच रहिवासी विभागातील एकमेकाला खेटून असलेली अमेरिकन टाऊनहाऊसेस सुरू झाली...
जर्सी सिटी ०२
नंतर अर्थातच भारतीय वाणसामान आणि मेथी, मुळा, गवार, तोंडली इत्यादी खास भारतीय भाज्यांच्या खरेदीसाठी "लिटिल इंडिया" कडे मोर्चा वळवला. या भागाच्या दुकानांचा भारतीय लहेजा, त्यांची भारतीय नावे आणि त्यात काम करणारे कर्मचारी इंग्लिशबरोबरच सहजपणे वापरत असलेल्या हिंदी आणि गुजराती भाषांमुळे, "येऊन दोन दिवस नाही झाले तेव्हाच लगेच भारतात परतलो की काय ?" असा गमतीदार विचार मनात तरळून जातो आणि आपल्या चेहर्यावर आपसूक आश्चर्ययुक्त स्मितहास्य उमलते.
चला तर मनसोक्त भटकूया अमेरिकेतल्या लिटिल इंडियामध्ये..
लिटिल इंडिया ०१
लिटिल इंडिया ०२
लिटिल इंडिया ०३
लिटिल इंडिया ०४
लिटिल इंडिया ०५
लिटिल इंडिया ०६
लिटिल इंडिया ०७
लिटिल इंडिया ०८
लिटिल इंडिया ०९
येथे राजरोस पानाचे दुकान टाकून पान विकले जाते...
लिटिल इंडिया १०
खरेदी केलेल्या सामानाच्या हातातल्या बॅगा सांभाळत जर्नल स्क्वेअर थांब्यावर परतलो. तेथे वर्णभेद तोडून मानाच्या अमेरिकन बेसबॉल लीगमध्ये धडक मारणारा जर्सी सिटीचा लाडका खेळाडू जॅक रुझवेल्ट रॉबिन्सन हात उंचावून स्वागत करताना दिसला. त्याला थोडा मान दिल्याशिवाय तसेच पुढे जाणे कसे बरे दिसेल ?...
जॅक रुझवेल्ट रॉबिन्सनच्या पुतळ्यासोबत
थांब्यावर पाथची परतीची गाडी आमची वाट पाहत होती...
पाथचा जर्नल स्क्वेअर थांबा आणि गाडी
परतताना १ मार्गावरील गाड्या जास्त सोयीच्या आहेत असे गुगलबाबाने सांगितले. त्या मार्गावरचा "१९१ स्ट्रीट" थांबा घराला जवळचा होता. त्याचा ब्रॉडवेला जोडणारा बोगदा जवळ जवळ ८०० मीटर लांबीचा आहे. हा बोगदा आपले खास वैशिष्ट्य राखून आहे. त्यातून चालत घरापर्यंत जाईपर्यंत तो "मिजाज रंगीन बनाता है"...
"१९१ स्ट्रीट" थांब्याचा बोगदा ०१
"१९१ स्ट्रीट" थांब्याचा बोगदा ०२
"१९० स्ट्रीट"चा बोगदा एकदम "प्लेन जेन", एकरंगी आणि साधा पण नेहमी स्वच्छ व नीटनेटका असे; तर "१९१ स्ट्रीट"चा बोगदा सुंदर रंगीबेरंगी ग्राफितीने भरलेल्या भिंती, त्यावर मधूनच कोणीतरी स्प्रे पेंटने काढलेले फराटे व नावे, आणि बर्याचदा काहीसा अस्वच्छ असा असे. एकमेकापासून जेमतेम दोन-तीनशे मीटरवर असणार्या या सबवेच्या दोन बोगद्यांतील फरक न्यू यॉर्क शहरात एकत्र नांदणारी विविधता अधोरेखीत करताना दिसतो.
(क्रमश :)
एक्काकाका तो ग्राफीटीचा प्रकार काय असतो? कुणीही जाऊन काहीही कसेही रंगवू शकतो का? का काही भिंती ठेवलेल्याच असतात? ती स्टाइल पण बरीचशी ओळखीची झालीय. त्यामध्ये पण प्रयोग, स्पर्धा वगैरे चालतात का?
ग्राफिती म्हणजे हुल्लडबाजी, अनेक स्थानिक प्रशासन संस्था कावलेल्या आहेत ह्या ग्राफितीला, आपले frustation काढण्याचा बहुतांशवेळा काळ्या तरुणांचा हा एक मार्ग आहे, दुसरं अगदी जंगली कायदा- आपली हद्द आपल्या ग्रुपची हद्द अधिरेखित करायचा, लाखो डॉलर दरवर्षी खर्च होतात हे स्वच्छ करायला,
ग्राफितीच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत... हे कृत्य विध्वंसक (vandalism), समाजविघातक (antisocial) आहे यापासून ते तो सुंदर कलाविष्कार (artistic expression) आहे इथपर्यंत. काही ग्राफितीचा उद्द्येश केवळ नेत्रसुखद चित्रकला असा असतो तर काही राजकिय किंवा सामाजिक संदेश देतात. काही ठिकाणची ग्राफिती इतकी सुंदर असते की ते खर्या कलाकाराचे काम आहे हे सांगायची गरज नसते, तर काही ठिकाणी स्प्रे पेंटचा डबा बाजारात सहजपणे विकत मिळतो म्हणून केलेली मस्ती असते, तर काही ठिकाणी सरळ सरळ विद्धंसक चित्रे आणि मजकूर असतो. अनेक पाश्च्यात्य शहरांत ग्राफितीच्या स्पर्धाही असतात.
काही ठिकाणी ग्राफितीला कलेचा प्रकार मानून, तिचा सकारात्मक उपयोग करून, एखादी जागा सुंदर करायचा प्रयत्न केला जातो... जसा १९१ स्ट्रीट थांब्याच्या बोगद्यात केला आहे. पण त्यावर काही जणांनी काहीबाही स्प्रे करून विध्वंसक प्रवृत्ती दाखली आहेच.
मात्र, वैध प्रकारे एखादी भिंत रंगवणे वेगळे आणि हातात रंगाचा डबा आहे म्हणून परवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी जागेवर तो वापरणे, यांच्यातला फरक समजणे सर्व जणांना जमतेच असे नाही. त्याची ही काही उदाहरणे...
..
..
लोकसहभागातून मुंबईतली रेल्वे स्टेशन्स रंगवून त्यांना सुशोभित करण्याचा जो प्रयत्न झाला/होत आहे, हे सकारात्मक ग्राफितीचे उदाहरण म्हणता येईल.
ग्राफिती हा काही आधुनिक कलाप्रकार नाही. प्राचीन मानवही या कलेत तरबेज होता, आणि त्यानी खरडलेली कला जपायचे आज आपण जीवापाड प्रयत्न करतो आहोतच ना ?! :) ...
(या व वरच्या प्रतिसादातील सर्व चित्रे जालावरून साभार)
छान लिहिताय डाॅक्टर, मी व बायको 5 आॅगस्ट ला गेलो होतो...
कनेटीकट हून पियू व अॅलीस्टरचा निरोप घेऊन न्यूयाॅर्कला आलो.
प्रचंड ट्रॅफिकमुळे साडेचार तास लागले .
56th street वर हाॅटेल होते.
संध्याकाळी फिरायला गेलो. आधी Broadway show ची माहीती काढली. लंडनला आॅपेरा पहायचा राहून गेला होता.आता Broadwayshow बद्दल खूप ऐकले होते. पता चला 49th street वर च्या थिएटरवर chicago शो आहे. बजेटचा पण प्रश्न होता पुढच्या रांगेतली तिकीटं obviously महंगी होती $139 वगैरे, (आधी काढली तर स्वस्त मिळतात म्हणून 3 महिन्यापासून intnet वरुन लक्ष ठेऊन होतो...) नशीबाने दुस-या दिवशी दुपारचा शो $49.5 ला मागची तिकीटं ला मिळतात हे दिसलं, लगेच दोन तीकिटं घेतली. (बाटा सारखे हे रेट आॅड का ठेवतात 139 व 49.5 ते कळले नाही)
तिथून empire state building पहायला निघालो. well defined रस्ते असल्याने पत्ता शोधणे फारचं सोपे होते.
mobile वर GPS map वर सहज कळतं होतं.34th street वर esb साठी निघालो...
रस्स्ता खूपचं happening होता.वातावरण bubbling उत्त्साहाने charged
झाले होते.आम्ही चक्क न्युयाॅर्कमध्ये फिरतोय म्हणून खूपचं exited होतो
.आजुबाजूला सगळेच tourst फिरत होते काही रस्त्यावरच खात होते
मुलाबाळांबरोबर फिरत होते. road shows व तरुणाई ला उधाण आले होते. अर्ध्या
चड्डीत फिरत होती.सोय म्हणून अस्मादीकांनीही अर्धी कार्गो परीधान केली
होती! अॅडव्हांस डिग्री ला सुधारीत बाईमाणसं quarter चड्डी व त्याही पेक्षा
सुधारलेल्या काहीजणी half-quarter चड्डी धारण करुन फिरत होत्या.
"सुधारणा = inversely proportionl कपडे "
असा काही formula असावा का आणि असल्ल्यास त्यात c square (k कपडे,c प्रकाशाचा वेग!) टाकून
सुधारणा = 1 / kc2
k = 1 / सुधारणा x c square
मग अतिसुधारणा (>>सुधारणा) म्हणजे k ~= शून्य !
अतिसुधारणा म्हणजे nearlyविवस्त्र चअवस्था (?!) अशा theotical conclusion ला आम्ही पोहचत असतांनाच
आम्ही टाईम्स स्क्वेअर जवळ आलो,समोर तिघीजणी दिसल्या....topless !! tops
रंगवलेले होते ....कमरेला इतरांचा मान राखण्यासाठी एव्हढीशी झालर लावली
होती , तिचा चेहरा अतिशय आनंद झाला असल्यासारखा फूलला होता .
दुस-या दोघींच्या छातीवर artist रंगवत होता.
आमच्या formula चा proof इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते.आम्ही धन्य जाहलो !!
(Times square ला चाललेल्या अनेक road shows पैकी हा हि एक प्रकार, असे
राहून मग डाॅलर घेऊन फोटो काढू देणे हा एक बिन(धास)कष्टाचा व्यवसाय (?))
जो जे वांछील,
तो ते लाहो,प्राणीजात !
या ओळींच्या अर्थाचा नवीन साक्षात्कार झाला...!
तिथं रेगाळून चालणार नव्हते, 34th street ला Empire State building ला जायचे होते.आम्ही चालत सुटलो.
(भीषण चालणं झालं त्या दिवशी....16,000 steps हाॅटेल ला परतलो तेव्हा as per pedometer !)
34th street वरुन चालत 56th street वर आलो, solid भूक लागली होती,
बनारस रेस्टाॅॅरेंंट दिसले,गेलो,बसलो, समोर एका painting ने लक्ष वेधून घेतले होते.
मॅॅनेजर आला, मी विचारले beer कोणती आहे, पता चला, किंग्ज
फिशर पासून ब-याच काही. म्हटले हे बरे आहे, भारतापासून दूर आल्यावर होमसीक वाटले तर किंग्ज
बरी आहे.मी मेक्सीकन ट्राय केली.
मॅॅनेजर म्हणाला, आधी पाहिले नाही तुम्हाला.
मी, अरे बाबा tourist आहोत... अच्छा, वो पेंंटिंंग के बारे मे बताओ, बहोत interesting है.
त्या painting मध्ये fusion करुन एका बाजूला...बनारस चे घाट,
मंंदिरे,गंंगानदी, अर्ध्य वाहणारे साधुमहाराज आणि skyline ला Newyork च्या
tall buildings अशी fantacy दाखवली होती !!
मॅॅनेजरने जोक मारला,
"पता है पंंडीतजी(साधूमहाराज) क्या मांंग रहे है ? वो कह रहे है, किसी तरहा अमेरिका का विजा दिलवा दो,भगवान"
जगाची थोडीबहुत माहिती आहे पण न्यू यॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे नाव माहीत नाही असा माणूस विरळा असेल. केवळ अमेरिकेचाच नव्हे तर जागतिक अर्थकारणाचा मानबिंदू असलेल्या या संकुलातले मानाचे दोन टॉवर्स ११ सप्टेंबर २००१ रोजी अतिरेकी हल्ल्यामध्ये विमानांच्या आघातांनी जमीनदोस्त केले गेले. अगोदर माहीत असले नसले तरी या दुर्घटनेमुळे हे जुळे टॉवर्स जगातल्या बहुतेक लोकांना माहीत झाले. त्यानंतर त्या घटनेमुळे सुरू झालेल्या प्रतिक्षिप्त सामरिक व आर्थिक, कृती व घटनांच्या साखळीने सर्व जग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ढवळून निघाले आहे. अजूनही त्या परिणामांचे दीर्घकालीन धक्के अजूनही संपलेले नाहीत आणि नजिकच्या काळात संपतील असे वाटत नाही.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१)
या संकुलात एकूण सात महाकाय इमारती होत्या. मात्र, या संकुलाचे नाव जगभर प्रसिद्ध झाले ते ०४ एप्रिल १९७३ साली जनतेसाठी खुले केलेल्या जुळ्या टॉवर्समुळे. आजवरही बहुतेक सर्व जणांच्या मनात "वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे हे दोन जुळे टॉवर्स होते" हेच समीकरण कायम आहे. १वर्ल्ड ट्रेड सेंटर ४१७ मीटर व २वर्ल्ड ट्रेड सेंटर ४१५ मीटर उंच होते. हे जुळे टॉवर काही काळ जगातल्या उंचीने एक आणि दोन क्रमांकाच्या इमारती होत्या. थोड्या काळातच, मे १९७३ मध्ये, शिकागोतल्या ४४० मीटर उंच सिअर्स टॉवरने जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब पटकावला. तरीही, न्यू यॉर्क शहराचे वलय सभोवती असलेल्या या इमारतींचे पर्यटन नकाश्यावरचे महत्त्व अजिबात कमी झाले नाही. शिवाय, २०१० मध्ये दुबईमधील बुर्ज खलिफा ही इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत सर्वात जास्त ११० मजले असलेली इमारत म्हणून १ वर्ल्ड ट्रेड सेंटरचा विक्रम अबाधित होता. अर्थातच, न्यू यॉर्कला भेट देणार्या पर्यटकांचे वर्ल्ड ट्रेड सेंटर हे प्रथम क्रमांकाचे आकर्षण होते यात काहीच आश्चर्य नव्हते.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०१. जुळे टॉवर्स आणि परिसर (जालावरून साभार)
या संकुलातल्या मॅरिऑट World Trade Center (3 WTC), 4 WTC, 5 WTC, 6 WTC, आणि 7 WTC या इतर इमारती १९७५ ते १९८५ या कालखंडात बांधल्या गेल्या. न्यू यॉर्कच्या आर्थिक प्रभागात (फिनान्शियल डिस्ट्रिक्ट) असलेले हे संकुल बांधायला त्या वेळेस $४० कोटी (आजची किंमत $२३० कोटी) खर्च आला होता आणि त्यातील व्यापारी जागेचे एकूण क्षेत्रफळ १२ लाख ४० हजार चौ मीटर (१ कोटी ३४ लाख चौ फूट) होते.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०२. जुन्या संकुलाचा आराखडा (जालावरून साभार)
२ वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या १०७ आणि ११० व्या मजल्यांवर असलेल्या ऑब्झर्वेशन डेकवरून दिसणार्या न्यू यॉर्क आणि विशेषतः मॅनहॅटनच्या नजार्याची स्पर्धा करणारी इतर इमारत या जगात खचितच नव्हती. १०७ व्या मजल्यावर काचेतून परिसर पाहायला मिळत असे, तर ११० मजल्यावर खुल्या आकाशाखाली उभे राहून (ओपन टू स्काय) न्यू यॉर्कचा परिसर न्याहाळण्याची मजा पर्यटक घेऊ शकत असत. उत्तम हवामान असेल तर ८० किमी पर्यंतचा परिसर स्वच्छ दिसत असे.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०३. एकशे दहाव्या मजल्यावरचे खुल्या आकाशाखालचे ऑब्झर्व्हेशन डेक
(जालावरून साभार)
९/११ च्या हल्ल्यात जुळे टॉवर्स जमीनदोस्त झाले. सात क्रमांकाची इमारत पूर्णपणे कोसळली, तर इतर चार इमारती धोकादायक झाल्याने त्यांना पाडणे भाग पडले. अर्थातच हा सर्व भाग नष्ट झाला.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (सन १९८९)
१९८९ मध्ये झालेल्या अमेरिका फेरीमध्ये या संकुलाला भेट देऊन ११०व्या मजल्यावरील खुल्या आकाशाखालच्या ऑब्झर्व्हेशन डेकवरून न्यू यॉर्क आणि परिसर पाहण्याची संधी मला मिळाली होती. त्या वेळचे, आता तांबूस-धूसर होत असलेले, काही फोटो पाहून त्या काळाची थोडीशी कल्पना करता येईल...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०१. जुळ्या टॉवर्सची धुक्यात हरवलेली शिखरे
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०२. पायथ्याजवळून टॉवरला कॅमेर्याच्या कवेत घेण्याचा प्रयत्न
...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ऑब्झर्व्हेशन डेकवरून दिसणारे न्यू यॉर्क :
०३. ब्रूकलीन पूल आणि परिसर व ०४. हडसन नदी आणि तिच्या काठावरच्या गगनचुंबी इमारतींच्यावर असलेले बगीचे
...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ऑब्झर्व्हेशन डेकवरून दिसणारे न्यू यॉर्क :
०५. जवळच्या गगनचुंबी इमारती व ०६. दूरवर पसरलेले मॅनहॅटन
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आमच्या भेटीच्या दिवशी कर्मधर्मसंयोगाने फ्रेंच राज्यक्रांतीचा द्विशतकी सोहळा चालू होता. त्यानिमित्त रंगीत पाण्याचे फवारे उडवत चाललेल्या बोटींच्या संचलनाचे विहंगम दर्शन ऑब्झर्व्हेशन डेकवरून झाले...
...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०७. बोटींच्या संचलनाचे दृश्य व ०८. स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचे विहंगम दर्शन
वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नवा अध्याय (२००१ पासून पुढे)
या परिसराला ९/११ च्या विध्वंसातून बाहेर काढून त्याचा पुनर्विकास करण्यासाठी २००१ साली The Lower Manhattan Development Corporation (LMDC) ची स्थापना करण्यात आली. तिने एक स्पर्धा आयोजित केली व Daniel Libeskind याने बनविलेला विकास आराखडा निवडला. त्यात नंतर बरेच बदल केले गेले.
अनेक वर्षांचा विलंब आणि अनेक वादंग यांच्या पार्श्वभूमीवर १३ मार्च २००६ ला या जागेवरचा उरलेला राडारोडा काढायची सुरुवात झाली व २७ एप्रिल २००६ ला नवीन बांधकाम चालू झाले. ते अजूनही चालू आहे. या १६ एकर जागेवर, सद्या मान्य असलेल्या आराखड्याप्रमाणे ६ टॉवर्स; ९/११ स्मारक आणि संग्रहालय; एक मॉल; एक वाहतूक संकुल (transportation hub); एक गाडीतळ; एक बगिचा (लिबर्टी पार्क) आणि एक चर्च (St. Nicholas Greek Orthodox Church) बांधले जाईल. या सर्व विकास कामाचा जमिनी आराखडा (ग्राउंड प्लॅन) खालीलप्रमाणे आहे...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (२००१ पासून पुढे) : ०१. नव्या संकुलाचा आराखडा. निळ्या
रंगांचे चौकोन नष्ट झालेल्या जुळ्या टॉवर्सच्या पायांची जागा दाखवत आहेत. (जालावरून साभार)
वर्ल्ड ट्रेड सेंटर (२००१ पासून पुढे) : ०२. नवे संकुल पूर्ण झाल्यावर कसे दिसेल याचे एक कल्पनाचित्र (जालावरून साभार)
7WTC ही इमारत मे २००६ मध्ये सर्वप्रथम पूर्ण झाली. त्यानंतर ९/११ स्मारक (२०११) आणि संग्रहालय (२०१४); 4WTC (२०१३); 1WTC (२०१४) व लिबर्टी पार्क इतके काम पुरे झाले आहे. 3WTC आणि वाहतूक संकुलाचे काम २०१७/१८ मध्ये पुरे होणे अपेक्षित आहे. 2WTC मधील जागेला अजून पुरेसे खरेदीदार न मिळाल्याने तिचा आराखडा बदलत गेला आहे आणि ती बांधली जाईल की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे आहे. 5WTC च्या बांधकामाची जबाबदारी पाथ (Port Authority of New York and New Jersey) वर सोपविलेली आहे पण तिचे काम सुरू होण्याची तारीख अजून नक्की केलेली नाही. हुश्श ! मोठ्या प्रकल्पांतले घोळ ही केवळ भारताची खासियत नाही असेच दिसते ! :) असो.
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर असे अधिकृत नाव असलेली ही इमारत फ्रीडम टॉवर, १ वर्ल्ड ट्रेड सेंटर, One WTC आणि 1 WTC अश्या अनेकविध नावांनी ओळखली जाते. ही पश्चिम गोलार्धातली सर्वात उंच इमारत केवळ वर्ल्ड ट्रेड सेंटर संकुलाचाच नव्हे तर संपूर्ण न्यू यॉर्क शहराचा शीर्षबिंदू आहे. अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणेच्या इसवीसनाच्या आठवणीसाठी तिची उंची १७७६ फूट (५४१ मीटर) ठरवली आहे. १३ फूट ४ इंच उंचीचे १०४ मजले असलेल्या या इमारतीत ३५ लाख चौ फूट व्यापारी जागा आहे. या इमारतीच्या लॉबीची उंची ५० फूट आहे, तिच्यात ७३ लिफ्ट्स आणि एस्कॅलेटर्स आहेत. तिच्या बांधकामाला $३९० कोटी इतका खर्च आला आहे.
या इमारतीत ५० पेक्षा जास्त चित्रपट, टिव्ही सीरियल्स व टिव्ही कार्यक्रमांचे चित्रीकरण झाले आहे.
वन वर्ल्ड ऑब्झरवेटरी
चला तर मग वन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या वन वर्ल्ड ऑबझर्व्हेटरीमधून न्यू यॉर्क शहर आणि परिसराचे विहंगम निरीक्षण करायला.
सर्वप्रथम A सबवे पकडून चेंबर्स स्ट्रीट गाठला आणि बाहेर पडून मॅनहॅटन डाऊनटाऊनच्या काँक्रिटच्या जंगलातून वाट काढत पाच एक मिनिटे चाललो...
मॅनहॅटन डाऊनटाऊन
आणि अचानक तो सामोरा आला...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०१
अजून पाच मिनिटे चालल्यावर इमारतीच्या पायथ्याशी पोहोचलो. या इमारतीचा बाहेरील पृष्ठभाग काचेच्या आठ त्रिकोणांनी बनलेला आहे. त्यामुळे दिवसाच्या बदलत्या प्रकाशात त्याचे रूप सतत बदलताना दिसते. या इमारतीचा दर्शनी भाग फारसा आकर्षक नाही. मात्र, पायथ्याशी उभे राहून वर पाहिले तर तिचे अणकुचिदार टोक ढगांत खुपसलेल्या सुरीसारखे दिसते...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०२
इमारतीत गेल्यावर, ऑब्झरवेटरीकडे नेणारा लिफ्टचा मार्ग आपल्याला ९/११ च्या दुर्घटनेची आठवण करून देतो. त्या खडबडीत भिंतींवर चलतचित्रांद्वारे ही इमारत बांधण्यात हातभार लावणार्या कर्मचार्यांच्या कथा आपल्याला सांगितल्या जातात...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०३
या इमारतीला खरे तर ९४ मजले आहेत. पण, सर्वात वरच्या मजल्याला १०४ क्रमांक दिलेला आहे. १०० ते १०२ क्रमांकाच्या तीन मजल्यांना मिळून ऑब्झर्वेशन डेक असे नाव असले तरी केवळ १०० वा मजला पर्यटकांना निरीक्षणासाठी ठेवलेला आहे. १०१ व्या मजल्यावर रेस्तराँ आहेत आणि १०२ मजला खास कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेला आहे.
वर जात असताना अतिजलद लिफ्टच्या चारी भिंतींवर जमिनीपासून-ते-छपरापर्यंत असलेल्या LED पडद्यावर आपल्याला गेल्या ५०० वर्षांत न्यू यॉर्क शहरात झालेली स्थित्यंतरे दिसतात; ती पाहताना १०२ वा मजला केव्हा आला ते कळतच नाही. १०२ व्या मजल्यावरच्या एका मोठ्या भिंतीसमोर असलेल्या पडद्यावर चलतचित्रांद्वारे न्यू यॉर्क शहराच्या वेगवेगळ्या रूपाचे आणि धावपळीच्या जीवनाचे दर्शन करविले जाते...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०४
या सादरीकरणाच्या शेवटी पडदा मिनिटभर वर जातो आणि त्याच्या मागच्या काचेच्या भिंतीतून मॅनहॅटनची एक झलक दिसते...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०५
...आणि पडदा लगेच खाली येतो ! यानंतर पुढे गेल्यावर, वाटेत "आपला ऑब्झरवेटरीचा अनुभव अत्युत्तम बनविण्यासाठी हे विकत घ्या, ते विकत घ्या" असे मार्केटिंग होते. पण तिकडे दुर्लक्ष करून आपण १०० वा निरिक्षणमजला गाठायचा असतो. या मजल्यावरून चहुबाजूच्या परिसराचे मनोहर विहंगम दर्शन होते. डाऊनटाऊनमधल्या गगनचुंबी इमारतींच्या डोक्यावरून त्यांच्याकडे पाहण्यात आणि ७०-८० किलोमीटर दूरवर पसरलेला परिसर पाहण्यात एक वेगळीच मजा आहे...
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०१. डाऊनटाऊन, इस्ट नदी, ब्रूकलीन पूल आणि ब्रूकलीनचा काही भाग
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०२. हडसन नदी, डाऊनटाऊन आणि दूरवर दिसणारी टोकदार शिखर असलेली एम्पायर स्टेट इमारत
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०३. हडसन नदी आणि तिच्या पलीकडील जर्सी सिटी व तिथले डाऊनटाऊन
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०४. हडसन नदी आणि तिच्या मुखाजवळील बेटावरील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०५. हडसन नदीकिनार्यावरील गगनचुंबी इमारतींवरील बगीचे
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०६. मॅनहॅटनचे दक्षिण टोक आणि बॅटरी पार्क
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०७. जुळ्या टॉवर्सपैकी एकाच्या पायाच्या जागेवर बांधलेले कारंजे
या मजल्याच्या एका भागात गोलाकारात बसवलेले दहा-अकरा टिव्ही वापरून न्यू यॉर्क आणि परिसरातल्या आकर्षणांची आणि खादाडीची माहिती दिली जाते...
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०८. न्यू यॉर्क आणि परिसराची माहिती देणारे प्रात्यक्षिक
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०९
ऑब्झर्वेशन डेक वरून : १०
इमारतीवरून खाली येऊन संकुलाच्या परिसरात फेरी मारताना दोन मोठे चौकोनी मानवनिर्मित खड्डे दिसतात. नष्ट झालेल्या जुळ्या टॉवर्सच्या पायथ्यांच्या जागी उरलेले खड्डे भरून न काढता त्यांना तसेच सुशोभित करून त्यांत सपाटीवर पाणी वाहणारी कारंजी बनवली आहेत. खड्ड्यांच्या कठड्यांवर ९/११ च्या दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांची नावे लिहिलेली आहेत..
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नष्ट झालेल्या टॉवरच्या पायथ्यांच्या ठिकाणी बनवलेले कारंजे
संकुलाचे आवार झाडे व फुलझाडांच्या वाफ्यांनी सुशोभित केलेले आहे...
संकुलाचे आवार
या परिसरात, दीड दशकांपूर्वी, शांतताकाळातील जगातील सर्वात मोठा विध्वंस घडला होता यावर विश्वास बसणार नाही इतपत हा परिसर बदललेला आहे.
(क्रमश :)
त्या दोन (उत्तर आणि दक्षिण) Reflecting Absence pools मध्ये २००१ सप्टेंबर ११ च्या हल्ल्यात मृतूमुखी पडलेल्या २९७७ बळींच्या स्मरणार्थ प्रत्येकी एक अशा २९७७ जलधारांच्या रूपाने पाणी सोडलं जातं. आणि दर दिवशी त्या त्या दिवशी ज्या व्यक्तिचा वाढदिवस असेल त्या व्यक्तींच्या नावाशेजारी प्रशासनाच्या वतीने १ पांढरा गुलाब खोचला जातो. मी परवा तिथे गेलो तेंव्हा असा एक गुलाब पाहिला. दोन्ही तळ्यांच्या कठड्यांवर वर लेखात लिहिल्याप्रमाणे जी नावं आहेत, ती वेगवेगळ्या क्रमांकाच्या टाईल्स (पॅनेल्स) वर आहेत. बाजूलाच एका भिंतीवर असलेल्या कंप्यूटर स्क्रीन्स वर कुटुंबियांना आपल्या आप्तांचं नाव कुठल्या पॅनेल वर आहे ते शोधता येतं. तिथे परवा एक भारतीय आजोबा आपल्या कुणा नातीचं नाव शोधत होते, ती वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये कुठल्याशा कार्यालयात त्या दिवशी कामानिमित्त गेली होती...
मॅनहॅटन बेटाच्या दक्षिण टोकावर "न्यू अॅमस्टरडॅम" या नावाने आजच्या न्यू यॉर्क शहराची सुरुवात झाली हे आपल्याला माहीत आहेच. या शहराची उत्तरोत्तर उत्तरेच्या दिशेने वाढ होत राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत ही वाढ आजच्या ४२व्या स्ट्रीटपर्यंत वाढून तो भाग शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा केंद्रबिंदू बनला होता. १९०४ मध्ये न्यू यॉर्क टाईम्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने ४३व्या स्ट्रीट व ब्रॉडवेच्या चौकात पंचवीस मजली "टाईम्स टॉवर" बांधून आपले कार्यालय तेथे हलविले. त्यामुळे त्या इमारतीसमोरील चौकाचे लाँगएकर चौक (Longacre square) हे जुने नाव बदलून "टाईम्स स्क्वेअर" असे ठेवले गेले. न्यू यॉर्क शहराच्या वाढीबरोबरच त्याच्या या सामाजिक-सांस्कृतिक केंद्राचा आकार वाढत राहिला आहे. आजमितीला "टाईम्स स्क्वेअर" म्हणून ओळखल्या जाण्यार्या जागेचा आकार एका चौकाइतपत सीमित न राहता "४०वा ते ५३ वा स्ट्रीट आणि ६वा ते ९वा अव्हेन्यू" या सीमांनी बनलेल्या प्रभागाइतका (नेबरहूड) मोठा झाला आहे...
टाइम्स स्क्वेअर (मूळ नकाशा जालावरून साभार)
या भागाला लाडाने "विश्वाचा केंद्रबिंदू (Center of the Universe)", "जगाचे हृदय (Heart of the World)" आणि "The Great White Way" असेही संबोधले जाते.
१ टाईम्स स्क्वेअर
न्यू यॉर्क टाईम्सने, १ टाईम्स स्क्वेअर या पत्त्यावरच्या, आपल्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन १९०४ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता (New Year's Eve) फटाक्यांची रोषणाई करून केले. १९०६ नंतर सुरक्षेच्या कारणासाठी फटाक्यांची रोषणाई बंद केली गेली. त्याऐवजी १९०७ साली त्या इमारतीवर असलेल्या स्तंभावरील स्फटिकगोल खाली उतरवून नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. हा सर्व सोहळा पाहण्यासाठी जगभरचे जवळ जवळ १० लाख पर्यटक तेथे दरवर्षी ३१ डिसेंबरला गर्दी करतात.
१ टाइम्स स्क्वेअर इमारत : २०१६ या चालू वर्षाच्या आकड्यावर दिसणारा स्फटिकगोल तेथेच दिसणार्या खांबावरून
३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता खाली उतरवला जातो व वर्षभर तेथेच राहतो.
त्याच्यामागे वेळ दाखविणारा इलेक्ट्रॉनिक फलक दिसत आहे.
१ टाईम्स स्क्वेअरवरचा नववर्षस्वागत सोहळा (जालावरून साभार)
उण्यापुर्या दहा वर्षांच्या वापरानंतर टाईम्सने त्याचे मुख्यालय या इमारतीतून "२२९ वेस्ट ४३वा स्ट्रीट" या पत्त्यावर हलविले. असे असले तरी वर्षारंभाच्या स्फटिकगोल उतरवण्याच्या प्रथेमुळे व तिच्या दर्शनी भागावर असलेल्या महाकाय जाहिरातींमुळे या इमारतीचे व तिच्यासमोरच्या चौकाचे महत्त्व कायम राहिले आहे. खालच्या काही मजल्यांवर असलेले औषधाचे दुकान सोडले तर इतर सर्व इमारत हल्ली रिकामी असते. मात्र, जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न ती आर्थिक कमी भरून काढत असल्याने ती इमारत तोडून नवीन काही बांधण्याचा विचार केला गेलेला नाही.
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट
पहिल्या महायुद्धाच्या (१९१४ ते १९१८) सुरुवातीपर्यंत टाईम्स स्क्वेअरच्या आजूबाजूला ब्रॉडवेवर नाटकांच्या थिएटर्सची गर्दी झाली आणि तेथे पर्यटकांची वर्दळ वाढू लागली. १९३० च्या दशकातल्या आर्थिक मंदीमुळे त्यातली अनेक रंगमंदिरे बंद पडली आणि अनेकांचा उपयोग स्ट्रीपटीज, पीप शो इत्यादी सवंग गोष्टींसाठी केला जाऊ लागला. दुसर्या महायुद्धानंतर सुधारलेल्या आर्थिक स्थितीने रंगमंदिरांना काही कालासाठी परत ऊर्जितावस्था आली होती. मात्र १९६०च्या दशकाच्या शेवटाला परिस्थिती परत बिघडली आणि हा विभाग अंमली पदार्थ आणि गुन्हेगारीचे माहेरघर बनला.
१९८०च्या दशकात या विभागाच्या पुनर्विकासाचे अनेक मसुदे तयार केले गेले पण जमिनीवरची परिस्थिती तीच राहिली. मात्र त्याच सुमारास वॉल्ट डिस्ने कंपनीने येथे "डिस्ने स्टोअर" सुरू करून पर्यटकांना आकर्षित करणे सुरू केले. त्यामुळे तयार झालेल्या सकारात्मक परिस्थितीमुळे सर्व कुटुंबासह भेट देता येईल असे इतर अनेक व्यवसाय येथे परतले आणि या विभागाचा कायापालट सुरू झाला. या सर्व प्रक्रियेला "डिस्निफिकेशन" असे संबोधले जाते. आता येथे जागतिक कीर्तीची १०० पेक्षा जास्त दुकाने व MTV व ABC यासारख्या मान्यवर माध्यमांची कार्यालये आहेत. १९९०च्या दशकाच्या शेवटापासून हा विभाग पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित आणि आकर्षक झाला आहे. गेली अनेक वर्षे तो केवळ न्यू यॉर्क शहर पर्यटनाच्या केंद्रस्थानीच नाही तर भेट देणार्या पर्यटकसंखेप्रमाणे बनवलेल्या बर्याच जागतीक याद्यांत शीर्षस्थानी आहे.
येथे प्रत्येकी ५०० पेक्षा जास्त आसने असलेली ४० पेक्षा जास्त रंगमंदिरे आहेत. दर रंगमंदिरात एकाच नाटकाचे दर आठवड्याला आठ प्रयोग चालू असतात. त्यातली ५०% तरी नातके पाच-सात वर्षे तर काही १०-१२ वर्षे सतत प्रयोग करणारी आहेत. येथील १९३० च्या दशकातील जुन्या क्लासिकल नाटकांपासून आजच्या जमान्यातील हायटेक नाटकांपर्यंतचे असंख्य प्रकार पहायला जगभरचे पर्यटक आणि दर्दी रसिक वर्षभर गर्दी करतात. या नाटकांच्या जाहिरातींनी सतत झगमगणार्या या विभागाला The Great White Way असेही म्हणतात. या नाटकांची तिकिटे मात्र खिशाला भारी असतात. नावाजलेल्या नाटकाच्या पुढच्या रांगेतील तिकिटाला $२२५ किंवा अधिक मोजावे लागतात. मागच्या खुर्च्यांवर बसण्याची तयारी असली तर जालावरून बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण, तरीही या नाटकांच्या मक्केत काही जगप्रसिद्ध नाटके पुढच्या खुर्चीवरून बघण्याचा आनंद निर्विवादपणे पैसे वसूल करून देणारा अनुभव असतो.
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०१
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०२
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०३
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०४
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०५
महाकाय बिलबोर्ड
नाटक बघण्यासाठी होणार्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी तेथे मोठ्या मोठ्या आकाराच्या जाहिराती (बिलबोर्ड) लावल्या जातात. येथे १९१७ मध्ये पहिली विजेच्या वापराने झगमगणारी जाहिरात लावली गेली. धावत्या अक्षरांच्या विद्युत जाहिरातीची सुरुवात १९२८ साली नवनिर्वाचित अमेरिकन अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांच्या विजयाच्या बातमीने झाली. त्यात चलतचित्रे असलेल्या अनेक मजली उंचीच्या महाकाय जाहिरातींची भर पडली आहे. या जाहिराती इतके मोठे पर्यटक आकर्षण ठरल्या आहेत की शहराच्या झोनिंग नियमांप्रमाणे या विभागातल्या इमारतींच्या दर्शनी भागावर जाहिराती लावणे कायद्याने आवश्यक केले गेले आहे !
महाकाय बिलबोर्ड आणि धावत्या अक्षरांच्या जाहिराती ०१
महाकाय बिलबोर्ड ०२
महाकाय बिलबोर्ड ०३
महाकाय बिलबोर्ड ०४ (जालावरून साभार)
महाकाय बिलबोर्ड ०५
पादचारी प्लाझा
वाहनांची गर्दी कमी करून तो पायी चालणार्या पर्यटकांसाठी अनुकूल व्हावा यासाठी या भागात २००९ पासून अनेक पुनर्विकास कामे केली गेली आहेत आणि ती अजूनही चालू आहेत. या योजनेअंतर्गत येथे अनेक मोठमोठे वाहनमुक्त प्लाझा (car-free plazas) बनवले आहेत. या प्लाझांमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी सरकारी खर्चाने खुर्च्या बसवल्या आहेत. बरेचसे रेस्तराँ त्यांच्या दर्शनी भागासमोर खुर्च्या व टेबले मांडतात. तेथे बसून पर्यटक खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतात किंवा नुसते आजूबाजूचा नजारा न्याहाळू शकतात. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालवलेला हा प्रकल्प आता कायमस्वरूपी झाला आहे आणि त्यात अजून नवनवे रस्ते सामील केले जात आहेत. यामुळे पर्यटकांच्या सोयीबरोबरच, अपघातांचे प्रमाण कमी होणे, प्रदूषण कमी होणे इत्यादी अनेक फायदे होत आहेत. या प्लाझांवर काही कलाकार त्यांचे कसब दाखवून पर्यटकांचे मनोरंजन करताना दिसतात.
पादचारी प्लाझा ०१
पादचारी प्लाझा ०२
पादचारी प्लाझा ०३
पादचारी प्लाझा ०४
पादचारी प्लाझा ०५
पादचारी प्लाझा ०६
पादचारी प्लाझा ०७ : पादचारी प्लाझावरील खेळ
पादचारी प्लाझा ०८ : स्वातंत्र्यदेवतेचे रूप घेतलेला कलाकार
पादचारी प्लाझा ०९ : रस्त्यावर कसरतींचे कौशल्य सादर करणारे कलाकार
पादचारी प्लाझा १० : पर्यावरणवादी न्यू यॉर्क शहर पर्यटक व नागरिकांच्या वापरासाठी भाड्याने सायकली पुरवते
इतर आकर्षणे
वरच्या गोष्टींशिवाय येथे अनेक आकर्षणे आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची खालीलप्रमाणे आहेत :
१. मादाम तुस्सॉज (Madame Tussauds) या जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाची शाखा.
२. Ripley’s Believe It or Not! हे आश्चर्यकारक गोष्टींचे संग्रहालय.
३. अनेक चलत्चित्र पडदे (स्क्रीन) असलेली चित्रपटगृह संकुले. AMC एंपायर२५ नावाच्या अनेक मजली संकुलात २५ पडदे आहेत.
४. The Ride ही नाटकीय प्रयोग आणि हायटेक सादरीकरण करणार्या कलाकारचमूसह न्यू यॉर्कमध्ये फिरवून आणणारी बसची सफर.
५. न्यू यॉर्क शहर व परिसराचे दर्शन करवणार्या बसच्या बहुतांश सहली टाईम्स स्क्वेअर परिसरातून सुरु होतात.
६. बिटल्स, लेड झेपेलिन, मॅडोना, इत्यादी अनेक प्रसिद्ध मान्यवर
तारे-तारकांच्या भेटींचे फोटो व चिन्हे (मेमरोबिलिया) असलेल्या हार्ड रॉक
कॅफेसारखी उपाहारगृहे येथे आहेत.
७. असंख्य लहानमोठी रेस्तराँ आणि दुकानांनी हा भाग खच्चून भरलेला आहे.
इथली काही रंगमंदिरे व इतर महत्त्वाच्या आकर्षणांना आपण लेखमालेच्या पुढच्या काही भागांत स्वतंत्रपणे भेट देऊच.
दुकानांचा झगमगाट
मेसीज : जगातले सर्वात मोठे मेगॅस्टोअर
H & M सुपरस्टोअर
रस्त्याच्या बाजूला उभ्या असणार्या खाण्याच्या पदार्थांच्या गाड्या सर्व
न्यू यॉर्कभर जागोजागी दिसतात आणि त्यावरचे खाणे पर्यटक आणि न्यू
यॉर्ककरांचा आवडता छंद आहे
पर्यटकभेटींच्या संख्येप्रमाणे बनवलेल्या यादीत टाईम्स स्क्वेअर अनेक वर्षे सतत वरच्या स्थानावर आहे. दरदिवशी या जागेला साधारणपणे ३,६०,००० पादचारी भेट देतात. मार्च २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या एका वर्षाच्या कालावधीत टाईम्स स्क्वेअरला १२,८७,९४,००० लोकांनी भेट दिली. ही संख्या त्याच कालावधीत जगभरच्या सर्व डिस्ने थीम पार्क्सना भेट दिलेल्या पर्यटकांपेक्षा मोठी होती. फक्त लास वेगास हेच एक पर्यटक आकर्षण याबाबतीत टाईम्स स्क्वेअरच्या पुढे आहे. न्यू यॉर्क शहराच्या पर्यटन उत्पन्नापैकी २२% या एकाच जागेवर मिळते.
फिरत्या गाडीवरचा हॉट डॉग, सँडविच इत्यादी खात खात इथली मजा पाहत फिरणे, दुकानांत शिरून काही खरेदी करणे किंवा फक्त त्यांच्या अनेकमजली काचांच्या भिंतीपलीकडचे वस्तूंच्या सादरीकरणाचे देखावे पाहणे, प्रचंड आकाराच्या बिलबोर्डांवरच्या व्हिडिओ जाहिराती पाहणे, रस्त्यावरच्या कलाकारांच्या करामती पाहणे, चालायचा कंटाळा आला तर मोक्याची खुर्ची पकडून इकडून तिकडे लगबगीने जाणार्या लोकांना न्याहाळणे, असे अनेक प्रकार करत टाईम्स स्क्वेअरवर तासनतास खर्च केले तरी कंटाळा येत नाही.
(क्रमश :)
टाईम स्क्वेअर म्हणजे अहोरात्र चालु असलेली गणपतीची मिरवणुक! नुसतंच जाऊन बसलं तरी उगाच भारी वाटत रहातं!
जम्बोट्रॉनवर आपण दिसलो आणि त्यात सुद्धा बदामाच्या बरोब्बर मध्ये आलो तर काय आनंद होतो. खरं तर फारच बालीशपणा आहे! हा आहे जंबोट्रोन आणि फक्त ह्याच्या समोर १०० लोक अधाशा सारखे जमले आहेत असं समजा आणि नक्की कुठे उभे राहिलो तर ह्या बदामाच्या आत येऊ ह्याचा विचार करत असतील..
मागच्या वर्षी इथे द फेमस किसिंग सेलरचा २५ फुट पुतळा आणुन ठेवला होता.
अनेक जण ह्याच पोझ मध्ये पुतळ्या समोर फोटो काढुन घेत होते.
अजुनही काही "विभुती" इथे फिरत असतात! आपण नवर्याचे डोळे झाकुन पुढे सरकायचं!!!
उगाच उदास वाटत असलं की जाऊन बसायला फार आवडती जागा आहे ही. इथे डिझ्नेचं अत्यंत सुंदर शोरुम आहे.
मी तिथल्या एस्कलेटरचे शेकडो फोटो काढले होते.सापडले तर नक्की टाकेन. हे काही आंतरजालावरुन
ही जी झाडं दिसत आहेत ना, त्यावर डिझ्नेचे फेमस कॅरेक्टर्स आहेत. आणि टँगल्ड मध्ये जसं दिवे सोडलेले असतात, तसे हे दिवे लावलेत.
शिवाय आता बंद झालेलं टॉईज आर अस हे ही खेळण्यांचे फार मोठे दुकान इथे होतं. (ज्याच्या आत रहाटपाळणा आहे!).
शाकाहारी लोकांना इथे "माओज" नावचा फलाफलचा उत्तम पर्याय आहे. सबवे प्रमाणेच ही एक चेन आहे.
बायकांनो इथे forever 21 चे सुद्धा दुकान आहे जिथे अनेकदा स्वस्तात मस्त गोष्टी मिळुन जातात.
पादचारी पथात ती होटेलची टेबले कशाला की प्रथम कम्पनी मग राष्ट्र या भांडवल शाही अमेरिकेची ती प्रतिके आहेत ?
त्या जागा म्हणजे पूर्वीचे चारचाकीचे रस्ते बंद करून त्यांच्या जागी बनवलेले पादचारी प्लाझा (पेडेस्ट्रियन प्लाझा) आहेत. तेथिल बहुतेक खुर्च्या व टेबले सरकारी खर्चाने पर्यटकांच्या सोयीसाठी ठेवलेली आहेत. त्यांच्या वापराला शुल्क नाही.
त्या प्लाझांना लागून असलेल्या रेस्तराँनाही, सशुल्क परवाना काढून, प्लाझाच्या / फूटपाथच्या ठराविक भागापर्यंत खुर्च्या व टेबले मांडता येतात. मात्र, त्या खुर्च्या-टेबलांचा वापर फक्त आमच्याच गिर्हाइकांनी करावा असा आग्रह कुठेही दिसला नाही. पर्यटक सर्व सरकारी-गैरसरकारी सोयींचा उपयोग खिनभर बूड टेकायला आणि दुसरीकडून आणलेला बर्गर खायला अगदी बिनधास्तपणे करत होते.
क्ताच फ्लॉरिडातल्या डिस्नेल्यांडास जाऊन आलोय. एकदम फालतू प्रकार वाटला. शंभर डॉलर प्रत्येकी तिकीट, बाकी खाण्यापिण्याचे अर्थातच वेगळे. बरं, मला माझं वय आणि आवडीनिवडी यामुळे तसं वाटलं म्हणाल, तर माझा ३२ वर्षाचा मुलगा सुद्धा वैतागला, आणि पाच वर्षाचा नातू तर कंटाळून झोपीच गेला, त्याला कडेवर घेऊन उन्हातान्हात वणवण करावी लागली. प्रत्येक ठिकाणी (झोपाळे, चक्र्या वगैरे) तासा-तासाभराची रांग. उगाचच जाहिरातबाजी - गवगवा करून लाखो डॉलर्स कमवायचं साधन बनवून ठेवलंय, बळी पडणारे तेरीभी चूप मेरीभी चूप म्हणून उग्गाचच ऑसम वगैरे भंकस मारतात.आणखी एक ओर्ल्यांडोहून सात तास ड्राईव्ह करून की वेस्ट म्हणून आहे. ते
म्हणे अमेरिकेचे सर्वात दक्षिणेचे टोक आहे. असेना का, आपल्याला काय करायचे
आहे ते उत्तरेचे टोक असो की दक्षिणेचे. तिथे एका सिमेंटच्या खडकावर लिहिलंय
की हे अमेरिकेचं सर्वात दक्षिणेचं टोक आहे. त्या दगडासोबत आपली सेल्फी
काढण्यासाठी रांग लावून ताटकळायचे. मग पायपीट करत सनसेट पॉईंट गाठायचा.
तिथे सूर्यास्त बघायला हीSSS गर्दी. सूर्य धड दिसतही नव्हता गर्दीतून.
सगळा वायझेडपणा. याच्यापेक्षा सुंदर सूर्यास्त तर मी लहानपणी इंदुरात अगदी
रोज बघायचो. तोही अगदी पूर्ण एकांतात, रम्य जागी.
मी अगदी तरुणपणीच ठरवलं होतं, की फेमस ठिकाणी जायचंच नाही आपण कधी. भारतात
ते पाळत आलो, आता इकडे इकडे मुलांना वाटतं आई-बाबांना हे दाखवावं ते
दाखवावं. फुकट दगदग.
आजच १२/०९/२०१६ च्या ' फ्री प्रेस जर्नल ' मध्ये बातमी वाचली कि, टाईम स्क्वेअर मध्ये एका नाविकाने जिचे चुंबन घेतले होते ती, ग्रेटा फ्राइडमॅन नावाची, स्त्री, न्युमोनिया होवुन, वयाच्या ९२ व्या वर्षी वारली. दुसरे महायुद्ध, १९४५ मध्ये संपल्यानंतर , नाविकाने तीचे चुंबन घेतांनाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यावेळी फार गाजला होता. जापानने शरणागती पत्करल्यानंतर, दुसरे महायुद्ध संपले. त्यावेळी अल्फ्रेड आयसेन्डॅट नावाच्या फोटोग्राफरने १४ ऑगस्ट १९४५ रोजी हा फोटो काढला होता. हा नाविक कोण होता आणि नर्सच्या वेषातील ही स्त्री कोण होती याबद्दल बरेच प्रवाद त्यावेळी निर्माण झाले होते. ' टाईम ' मासिकामध्ये , प्रकाशित झालेल्या ह्या फोटोतील व्यक्ती, आपणच आहोत,असा दावा ११ पुरुषांनी, तर फोटोतील महिला आपणच आहोत असा दावा तीन महिलांनी केला होता. त्या तिघांपैकी ग्रेटा फ्राइडमॅन ही एक होती.तिच्या म्हणण्यानुसार, १९६० पावेतो तिला ह्या फोटोबद्दल काहीच कल्पना नव्हती. १९६० पावेतो तिने हा फोटो पाहिलाच नव्हता. अल्फ्रेड आयसेन्डॅट ने १९६० मध्ये आपला अल्बम प्रकाशित केला, तेंव्हा तिने " टाईम " मासिकाकडे ह्या बाबत कळविले. सदर फोटोतील स्त्री आपणच आहोत, त्यावेळी अंगावर हाच पोषाख घातला होता. नाविक अतिशय ताकदीचा होता आणि त्याने घट्ट पकडून ठेवले होते.चुंबनाबाबत नक्की सांगता येत नाही. कुणीतरी (युद्ध संपल्याचा) आनंद व्यक्त करीत होता, त्यात रोमान्स वगैरे असं काहीही नवह्तं, असं तिचं म्हणणं होतं. ५ जुन १९२४ मध्ये ऑस्ट्रिया येथे तिचा जन्म झाला होता आणि एका डेंटीस्ट कडे ती सर्व्हिस करीत होती, म्हणुन अंगावर नर्सचा पांढरा ड्रेस होता असे तिने लिहिले होते. अल्फ्रेड आयसेन्डॅट ने मात्र फोटोतील सर्वच व्यक्तिंच्या नावांची कधीही नोंद ठेवली नव्हती. तो १९९५ मध्ये मरण पावला.
मॅडिसन स्क्वेअर गार्डन हे न्यू यॉर्क शहरातले ठिकाण जगभरच्या बॉक्सिंग, बास्केटबॉल आणि आईस हॉकीच्या दर्दी खेळप्रेमींना आणि जागतिक किर्तीच्या गायकांच्या कार्यक्रमांमध्ये (कन्सर्ट्स) रस असलेल्या रसिकांना नवीन नाही. याला 'MSG' किंवा नुसते 'द गार्डन' या संक्षिप्त नावांनीही संबोधले जाते.
सद्याच्या स्वरूपात, मॅडिसन स्क्वेअर गार्डन हा त्याच्या नावात असलेला चौक किंवा बगिचा यापैकी काहीच नाही ! ते नाव त्याला त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे पडलेले आहे. मॅडिसन स्क्वेअर गार्डन म्हणजे अजस्त्र बहुउद्द्येशी इमारतीत सामावलेले स्टेडियम, सभागृह, क्लब, पन्नासएक बार व रेस्तराँ, इत्यादींचे जागतिक किर्तीचे भले मोठे संकुल आहे. हे संकुल मध्य मॅनहॅटनमध्ये (मिडटाऊन) ७वा व ८वा अॅव्हेन्यू आणि ३१वा ते ३३वा स्ट्रीट यांच्या मधल्या विशाल जागेवर पसरलेले आहे.
मॅडिसन स्क्वेअर गार्डन : ०१ : सद्य संकुलाचे ३४व्या स्ट्रीटकडून होणारे दर्शन
या संकुलाचे अजून एक विशेष म्हणजे, न्यू यॉर्कची सबवे आणि देशभर जाणार्या इतर रेल्वे लाईन्सचे जंक्शन असलेला पेन्सिल्वानिया स्टेशन हा विशाल थांबा याच्या पायाखालच्या जमिनीच्या पोटात आहे ! त्यामुळे, या इमारतीचे काही दरवाजे सबवेच्या थांब्याकडे तर इतर मॅडिसन स्क्वेअर गार्डन संकुलाच्या अनेक विभागांत घेऊन जातात ! खरे तर, हे संकुल, पेन् स्टेशनची जमिनीवर असलेली जुनी इमारत पाडून त्या जागी बांधलेल्या अजस्त्र पेन्सिल्वानिया किंवा पेन् प्लाझाचा एक भाग आहे !
मॅडिसन स्क्वेअर गार्डन : ०२ : पेन्सिलवानिया (पेन्) स्टेशनचे मुख्य प्रवेशव्दार
जेम्स मॅडिसन या अमेरिकेच्या चवथ्या अध्यक्षाच्या नावाने बांधलेल्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन या संकुलाची जागा आणि इमारत अनेकदा बदलेली आहे. १८७९ ते १८९० पर्यंत वापरात असलेल्या पहिल्या दोन संकुलांची जागा पूर्व २६वा स्ट्रीट आणि मॅडिसन ऍव्हेन्यू यांच्या चौकात होती. तिसरे संकुल बरेच उत्तरेकडे ५०वा स्ट्रीट आणि ८व्या ऍव्हेन्यूच्या चौकात बनवले गेले.
$११० कोटी (सुमारे रु ७,५०० कोटी) खर्चून बांधलेले व ११ फेब्रुवारी १९६८ ला उद्घाटन झालेले सद्याचे ठिकाण या संकुलाची चौथी जागा आहे. हे बहूउद्द्येशीय संकुल बास्केटबॉल, आइस हॉकी, बॉक्सिंग, कुस्ती (रेसलिंग), गाण्यांच्या कन्सर्ट, आइस स्केटिंग शोज, सर्कस आणि इतर अनेक प्रकारच्या खेळांसाठी व करमणुकींच्या कार्यक्रमांसाठी वापरले जाते. न्यू यॉर्क रेंजर्स या अमेरिकन राष्ट्रीय हॉकी लीगमधिल (NHL) संघ, न्यू यॉर्क निक्स या अमेरिकन राष्ट्रीय बास्केटबॉल असोशिएशनमधील (NBA) संघ आणि अमेरिकन राष्ट्रीय फुटबॉल लीगमधिल (NFL) न्यू यॉर्क जायंट्स व जेट्स या संघांसह इतर अनेक संघांचे व संस्थांचे हे माहेरघर आहे.
इमारतीत बंदिस्त असलेल्या याच्या बास्केटबॉल स्टेडियममध्ये १९,८१२ आसने; आइस हॉकी स्टेडियममध्ये १८,००६ आसने; रेसलिंग स्टेडियममध्ये १८,५०० आसने; गाण्याच्या कंन्सर्टच्या स्टेडियममध्ये २०,००० आसने, बॉक्सिंगच्या स्टेडियममध्ये २०,७८९ आसने असतात. त्याच्या थिएटरमध्ये ५,६०० आसने आहेत. गाण्याच्या कन्सर्टसच्या उत्पन्नाच्या प्रमाणात याचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक आहे.
...
मॅडिसन स्क्वेअर गार्डन : ०३ : बास्केटबॉल स्टेडियम आणि आइस हॉकी स्टेडियम (जालावरून साभार)
२८ सप्टेंबर २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका भेटीत या संकुलाच्या कन्सर्ट हॉलमध्ये सभा घेऊन अमेरिकेतील भारतीय मूळाच्या लोकांशी व अनिवासी भारतीयांशी संवाद साधला होता. अमेरिकेमध्ये आजतागायत कोणत्याही परदेशी नेत्याने इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या आपल्या देशवासीयांना संबोधलेले नाही. या घटनेमुळे या संकुलाचे नाव भारतात खूप जणांच्या तोंडी आले हे मात्र नक्की...
पंतप्रधान मोदी त्यांच्या २०१४ च्या अमेरिकाभेटीत अनिवासिय भारतीय व भारतिय मूळाच्या लोकांना संबोधताना
(जालावरून साभार)
चिरंजीवाच्या विद्यापीठाचा पदविदान समारंभ याच संकुलातल्या थिएटरमध्ये आहे हे समजले होते तेव्हापासून या जागेला भेट देण्याची उत्सुकता वाढत चालली होती !
सकाळची टाइम्स स्क्वेअरची रपेट आटपून चालत चालत आम्ही जवळच्या कोरिया टाऊन या विभागात आलो. नंतर ध्यानात आले की तो गुरुवार आणि म्हणून शाकाहाराचा दिवस होता. 'कोरियन विभागात शाकाहारी खाणे मिळणे कठीण आहे' हाच विचार प्रथम मनात आला. पण सकाळच्या भरपूर चालण्याने दमलेल्या पायांनी 'जरा गुगलबाबांना साकडे घालून तर बघा' अशी कळकळीची विनंती केली. तसे केले आणि चक्क शाकाहारी जेवण मिळणारे रेस्तराँ दीड-दोन ब्लॉक दूर आहे असे गुगलबाबांनी सांगितले. त्या जागेवर जाऊन जरा अविश्वासानेच चौकशी केली तर, अहो आश्चर्यम्, ते कोरियन रेस्तराँ १००% शाकाहारी होते !
पदार्थ चवदार होते, पण पदविदान समारंभाची वेळ जवळ येत असल्याने जरासे घाईगडबडीत जेवण आटपले. बाहेर येऊन भरल्या पोटी चालायला नको म्हणून टॅक्सीला हात करू लागलो. भरपूर टॅक्स्या इकडून तिकडे पळत होत्या. पण,जगभरच्या टॅक्सीवाल्यांची इज्जत राखण्यासाठीच की काय, रिकामी टॅक्सीवालेही आमच्याकडे बघितले न बघितले करत सरळ पुढे जात होते. त्यांचा हाच रिवाज दहा एक मिनिटे चालू राहिल्यावर ध्यानात आले की गुगलबाबाचे ऐकून चालत गेलो तर पुढच्या १०-१५ मिनिटांत मॅडिसन स्क्वेअर गार्डनला पोहोचू. नाहीतर टॅक्सीच्या नादात कार्यक्रमाला उशीर होईल. मग काय भरल्या पोटी पदयात्रा सुरू केली आणि दहा मिनिटांतच गगनचुंबी इमारतींच्या घोळक्यातून मॅडिसन स्क्वेअर गार्डन संकुल आमच्याकडे डोकावून पाहताना दिसले व आनंदाचा सुस्कारा सोडला...
मॅडिसन स्क्वेअर गार्डन / पेन् प्लाझा : ०१ : प्रथमदर्शन
पदविदान समारंभाचे डगले परिधान केलेले स्नातक हसतमुखाने धावपळ करताना दिसले. त्यानंतर विद्यापीठाच्या नावाचा बोर्डही दिसला आणि आपण या भल्या मोठ्या संकुलातील योग्य दरवाज्याजवळ पोचलो आहोत यावर शिक्कामोर्तब झाले...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०१ : दर्शनी भाग
अगोदरच पोहोचलेले व पदविदान समारंभाचे गाऊन्स घालून तयार झालेले आमचे उत्सवमूर्ती दिसले. त्यांचे परत एकदा एकशेएकव्या वेळेला अभिनंदन करून थोडे फोटो काढणे वगैरे झाले आणि ते आत गेले...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०२ : आत जाण्यापूर्वीचा उत्सवमूर्तींचा फोटोसेशन
मुलाच्या पोस्टग्रॅजुएट पदविदान समारंभाचे एक विशेष कौतुक असतेच यात वाद नाही. पण, मला स्वतःच्या ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅजुएट अश्या कोणत्याच पदवीदान समारंभाला हजर राहता आलेले नाही. त्यामुळे मी बघणारा हा पहिला वहिला पदवीदान समारंभ होता आणि तोही अश्या जगप्रसिद्ध स्थळावर, म्हणून खूपच उत्सुकता होती ! अर्थातच, पुढची जागा पटकाविण्यासाठी आम्हीही इमारतीत शिरलो...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०३ : सर्वात बाहेरचे प्रवेशद्वार
स्टेडियमच्या तुलनेत एक चतुर्थांश आसनक्षमता असलेले हे थिएटर खरेच किती भव्य आहे याचा अंदाज प्रत्यक्ष आत गेल्याशिवाय येणे कठीण आहे...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०४ : बाहेरच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर लागणारी लॉबी
आता थिएटरमध्ये शिरू असे वाटत असतानाच अजून एक सुबक व भव्य प्रवेशद्वार; आणि त्याच्या पलीकडे अजून मोठी आणि अजून चकचकीत लॉबी दिसू लागली...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०५ : दुसरे प्रवेशद्वार आणि दुसरी लॉबी
या लॉबीत सुरक्षा तपासणी झाली. एक्स रे स्कॅनर असलेली द्वारे आणि श्वानपथके असलेली इथली सुरक्षाव्यवस्था एखाद्या विमानतळाला साजेशी आहे...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०६ : दुसर्या लॉबीतील एक्स रे द्वारे असलेली सुरक्षाव्यवस्था
सुरक्षाव्यवस्था ओलांडून गेल्यावर आतमध्ये तिसरी प्रशस्त गोलाकार लॉबी होती. ती इतकी प्रशस्त होती की तिच्यात आल्यावर बाहेर वाटणारी गर्दी एकदम कमी झाल्यासारखे वाटले. या लॉबीत ठराविक अंतरावर स्वच्छतागृहे होती आणि थिएटरच्या वेगवेगळ्या विभागातल्या आसनांकडे जाण्यासाठी अनेक प्रवेशद्वारे होती...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०७ : थिएटरभोवतालची अंतर्गत (तिसरी) लॉबी
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०८ : थिएटरभोवतालची अंतर्गत (तिसरी) लॉबी
आपण थिएटरमध्ये चाललो आहोत की जमिनीखालच्या एखाद्या छोट्या भुयारी उपनगरात चाललो आहोत असा संभ्रम होण्याजोगी सगळी परिस्थिती होती ! शेवटी पोचलो एकदाचा थिएटरमध्ये ! बघतो तर आमच्या अगोदर बरेच लोक मोक्याच्या खुर्च्या पकडून बसलेले होते. मग मात्र चपळाईने आम्हीही त्यातल्या त्यात चांगल्या खुर्च्या पकडल्या. थिएटरची मांडणी अशी आहे की सर्वच ठिकाणांहून स्टेज विनाअडथळा दिसत होते. खुर्च्यांच्या रांगांची मांडणी तीव्र खोलगट पृष्ठभागावर केल्यामुळे पुढच्या माणसाचे डोके मध्ये आल्याने स्टेजवरचे दिसत नाही, असा प्रकार अजिबात नव्हता. त्यामुळे, खचाखच भरलेल्या थिएटरमध्येही सर्व कार्यक्रम आरामात खुर्चीत रेलून बसून, मान बगळ्यासारखी न ताणता पाहता आला...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ०९ : भरलेले थिएटर
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : १० : भरलेले थिएटर
कार्यक्रम मोठा शिस्तबद्ध पद्धतीने झाला. पाच विद्यालयांच्या वेगवेगळ्या विसापेक्षा जास्त पदव्युत्तर (एम एस, डॉक्टरेट, इ) अभ्यासक्रमांचे तीनशेपेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी आपापल्या विद्यालयांप्रमाणे राखीव असलेल्या पुढच्या आसनांवर प्रत्येकाला दिलेल्या क्रमाने बसलेले होते. सर्वप्रथम स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर विद्यापिठातिल कॉलेजेसची नावे एकामागून एक पुकारली गेली. नाव पुकारल्यावर, खास मानदंड हातात घेऊन नेतृत्व करणार्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या मागे रांगेने इतर सर्व अध्यापक व इतर वरिष्ठ अधिकारी, प्रेक्षकांमागून येऊन आसनांच्या मधील जागेतून प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारत, स्टेजवरच्या आपापल्या राखीव जागांवर जाऊन बसत होते. प्रत्येक कॉलेजच्या वेषात काही खास स्वतंत्र चिन्ह होते.
असे मिरवणूकीने येण्याच्या प्रथेला प्रोसेशनल असे म्हणतात. ही प्रथा विद्यापीठाच्या मानाचा आणि अभिमानाचा भाग समजला जातो व काटेकोरपणे पाळला जातो. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपले स्थान ग्रहण केले. या अध्यक्षांचे, "उदय सुखात्मे, प्रोवोस्ट अँड एक्झेक्युटीव व्हाइस प्रेसिडेंट फॉर अॅकॅडेमिक अफेअर्स" असे नाव व पद असे होते. अमेरिकेतल्या या ११० वर्षे जुन्या नामवंत विद्यापीठातले इतके मानाचे स्थान एका भारतीय वंशाच्या माणसाने भूषवले आहे हे पाहून आश्चर्यपूर्ण आनंद झाला.
अमेरिकेचे राष्ट्रगीत झाले व कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाल्याचे जाहीर केले गेले. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंचे व खास पाहुण्याचे भाषण झाले. या वर्षी खास पाहुणे म्हणून याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व सद्या अमेरिकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अंडर सेक्रेटरी फॉर हेल्थ (मिनिस्टर ऑफ स्टेट, आरोग्य) यांना आमंत्रित केलेले होते.
भाषणे संपल्यावर एकेका विद्यार्थ्याचे नाव पुकारून त्याला स्टेजवर त्याच्या प्राचार्यांच्या हस्ते डिग्री सर्टिफिकेट दिले जात होते व जरा पुढे गेल्यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थ्याच्या पदवीप्रमाणे विशिष्ट रंगाच्या कापडाची पट्टी त्याच्या गळ्यात घालून पदवी मिळाल्याचे शिक्कामोर्तब करत होते. जमलेले नातेवाईक अर्थातच हे कौतुक पाहून सुखावून जात होते. नाव पुकारल्यावर एखाद्या नातेवाईकाने केलेल्या "दॅट्स माय हजबंड / वाईफ / बॉय / गर्ल !" अश्या उत्स्फूर्त पुकार्यामुळे हशा पिकत होता आणि वातावरणातला ताण कमी करून ते किंचित हलकेफुलके बनवत होता...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : ११ : पदविदान समारंभ
कार्यक्रमातील बहुतेक सर्व कार्यक्रम पुस्तिकेत दिलेल्या वेळा पाळून होत राहिले आणि ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा पदविदानसमारंभ कार्यक्रमपत्रिकेत लिहिलेल्या वेळेप्रमाणे अडीच तासांत संपला.
मुलाचा पदवीदान समारंभ संपवून इमारतीच्या बाहेर पडलो तेव्हा,अर्थातच, उर अभिमानाने आणि आनंदाने भरून आला होता. त्याशिवाय, त्यानिमित्ताने जगप्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनला आतून भेट द्यायला मिळाली म्हणून "डबल बेनेफिट स्कीम" मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला होता !
बाहेर पडल्यावर त्या इमारतीचे अजून काही फोटो काढण्याचा मोह झालाच...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : १२ : पेन् स्टेशनच्या द्वाराजवळ
आणि हा खास त्या भेटीच्या आठवणीसाठी...
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील थिएटर : १३ : आठवणफोटो
दिवसभराच्या दगदगीचा थकवा आता जाणवू लागला होता. त्यामुळे पावले आपोआप सबवेच्या दिशेने वळली. जाण्याच्या वाटेवर न्यू यॉर्कच्या दोन मानबिंदूंनी लक्ष वेधले. त्यांना दुरूनच हाय म्हणून पुढे निघालो...
एम्पायर स्टेट बिल्डिंग
युनायटेड स्टेट्स पोस्ट ऑफिस
(क्रमश :)
ब्रूकलीन प्रभागात असलेले हे वनस्पतीशास्त्रिय उद्यान न्यू यॉर्क शहरातले एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. मे महिना म्हणजे इथली फुलझाडे बहरण्याचा महिना. अर्थातच, त्याचवेळी आमची त्या उद्यानाची फेरी झाली हा दुग्धशर्करा योग होता. कर्मधर्मसंयोगाने जमून आलेला हा योग किती गोड होता हे तेथे हिंडायला लागल्यावरच नीट ध्यानात आले.
हे अनेक उद्याने मिळून बनलेले एक महाउद्यान आहे. त्यात उघड्या आकाशाखाली विशिष्ट वनस्पतींचे संग्रह असलेली अनेक उद्याने आहेत; स्टाईनहार्ट काँझरवेटरी नावाच्या इमारतीत वेगवेगळ्या हवामानात वाढणार्या वनस्पतींची अनेक दालने (climate-themed pavilions) व एक बोन्साय विभाग आहे; आणि त्याचबरोबर जलवनस्पतींचा विभाग, आर्ट गॅलरी, संशोधन विभाग, प्रयोगशाळा असे विभागही आहेत. या उद्यानात वनस्पतींच्या १०, ००० पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी येथे अमेरिका व जगभरातून दरवर्षी ९ लाखापेक्षा जास्त पर्यटक येतात.
२१ हेक्टरांवर (५२ एकरांवर) पसरलेले हे उद्यान १९१० साली जनतेला खुले झाले आहे आणि गेल्या १०० पेक्षा जास्त वर्षांपासून ते केवळ शास्त्रीय जगतातच नाही तर न्यू यॉर्क शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनातही मोलाची भर टाकत आहे. विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना ज्ञानदान करणारे; त्यांना प्रेरित करून पर्यावरणाचा विकास साधणारे आणि परिसराच्या (नेबरहूड) सौंदर्यात भर घालणारे अनेक सामाजिक प्रकल्प या उद्यानाच्या नेतृत्वाखाली सतत चालू असतात...
ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनच्या नेतृत्वाखाली चालणारे काही प्रकल्प (उद्यानाच्या संस्थळावरून साभार)
सद्य हवामानानुसार उद्यानात कोणत्या वनस्पती बहरल्या आहेत आणि कोणते खास कार्यक्रम चालू आहेत हे त्याच्या अधिकृत संस्थळावर (http://www.bbg.org/) व फेसबुक पानावर (https://www.facebook.com/BrooklynBotanic/) सतत प्रसिद्ध केले जाते. स्थानिक लोकांच्या व पर्यटकांच्यासाठी काही खास फायदेशीर योजना असल्यास त्यांची माहितीही तेथे मिळते. उदाहरणार्थ, आता हा लेख लिहिण्याच्या वेळेस (अ) crape-myrtle आणि anemone वनस्पती फुलांनी बहरलेल्या आहेत आणि (आ) दर मंगळवारी उद्यानात मोफत प्रवेश दिला जात आहे, ही माहिती तेथे दिलेली आहे. जेव्हा या उद्यानाला भेट देणार असाल तेव्हा ही दोन संस्थळे नजरेखालून घालणे फायद्याचे होईल.
चला तर मग या मनोहारी उद्यानाची सफर करायला.
प्रवासाची सुरुवात १ मार्गाने करायला सबवेच्या १९१ स्ट्रीट थांब्यात शिरलो. त्या मार्गावर दुरुस्तीचे काम चालू असल्याने तो व पुढचे काही थांबे बंद केले असल्याची सूचना लावलेली दिसली. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवसांना बर्याचदा अशी कामे काढली जातात. मात्र, प्रवाशांची अडचण होऊ नये सबवेचे कर्मचारी त्यांना "थांब्याचा विरुद्ध बाजूस असलेल्या निकोलास अव्हेन्यूवर तुम्हाला १६८ स्ट्रीट थांब्याकडे नेणारी बस उभी आहे हे सांगत होते. या निमित्ताने आम्हाला ब्रॉडवेच्या पलीकडचा भाग पहायची अनायासे संधी मिळाली...
निकोलास अव्हेन्यूवरून बसने जाताना ०१
निकोलास अव्हेन्यूवरून बसने जाताना ०२
गंमत म्हणजे या बसला तिकिट नव्हते व १६८ स्ट्रीट थांब्यावर उतरून कोणी सरळ आपल्या गंतव्याकडे चालायला लागले तर त्याची शहानिशा करायला कोणी उभे नव्हते !
१६८ स्ट्रीट थांब्यावर सबवे पकडून, जमिनीच्या पोटातच मधे एकदा सबवे मार्ग बदलून, उद्यानाजवळ पोचेपर्यंत जमिनीखालूनच प्रवास होता. जमिनीवर आलो...
सबवेच्या ब्रूकलीन गार्डन थांब्यावरून जमिनीवर आणणारा जिना
... आणि समोर आली ही ब्रुकलिन संग्रहालयाची इमारत...
ब्रूकलीन संग्रहालय
ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन आणि ब्रूकलीन संग्रहालय एकमेकाला लागून आहेत हे नकाशात पाहिले होते. आतापर्यंत कॉक्रिटच्या जंगलात फिरलो असल्याने आज प्रथम उद्यान पाहून मग संग्रहालय पहावे असे ठरवले होते. पण उद्यान दिसेचना! मग रस्त्यावर उभ्या असलेल्या एका खाण्यापिण्याच्या गाडीवर चौकशी केली. त्याने आम्ही बघत होतो त्याच्या विरुद्ध दिशेला हात दाखवला. चालत दोनएक मिनिटांच्या अंतरावर उद्यानाचे रस्त्यावरच असलेले पण रस्त्यापासून किंचित आत असलेले प्रवेशद्वार दिसले. आजूबाजूच्या वृक्षराजीमुळे संग्रहालयाच्या समोरून ते दिसले नव्हते...
ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन : मुख्य प्रवेशद्वार
तिकिटे घेऊन आत शिरलो आणि लगेच सामोर्या आलेल्या या प्रसन्न गुलाबी फुलोर्याने स्वागत केले. त्याने जणू उद्यानात डोळ्यांसाठी वाढून ठेवलेल्या मेजवानीची पहिली झलक दाखवली होती...
प्रवेशद्वाराजवळील स्वागत
वनस्पतींचे आणि माझे प्रेम केवळ "डोळे आणि नाकाने आस्वाद घेणारा रसिक"
इतपतच सीमित आहे. शिवाय इथे असलेल्या १०,००० वनस्पतींच्या जाती-प्रजाती
माहीत असायला वनस्पतिशास्त्राचे उच्च प्रतीचे ज्ञान असायला हवे. त्यामुळे
हे उद्यान आपण शास्त्रीय चर्चा न करता मुख्यतः बागेत फिरण्याचा आनंदानुभव म्हणूनच करणार आहोत.
हे उद्यान बघण्यासाठी पायाना भरपूर व्यायाम करावा लागणार आहे हे त्याचा नकाशा पाहून ध्यानात आले होते ! कमीत कमी श्रमात सर्व उद्यान पहाता यावे यासाठी आमच्या रपेटीचा मार्ग खालील नकाश्यात दाखविल्याप्रमाणे ठरवला होता...
उद्यानातल्या आकर्षणांची स्थाने आणि आमच्या रपेटीचा मार्ग दाखविणारा नकाशा
लेखात चित्रांची संख्या मोठी असल्याने
उद्यानातील फुलांची बरीच चित्रे लहान आकारात व कोलाजच्या स्वरूपात टाकली
आहेत. त्यातले एखादे चित्र मोठ्या आकारात पहायचे असल्यास त्या चित्रावर
राईट क्लिक् करून "open image in new tab" हा पर्याय निवडावा. नवीन उघडल्या
गेलेल्या टॅबमध्ये चित्र त्याच्या मूळ मोठ्या आकारात दिसेल.
ओसबोर्न गार्डन
इस्टर्न पार्कवेवर असलेल्या प्रवेशद्वारातून आत शिरल्याने आम्हाला हे ३ एकराचे (१. २ हेक्टर) उद्यान सर्वप्रथम लागले. मागच्या (२० लाख वर्षांपूर्वीच्या) हिमयुगातील हिमनदीच्या जागी आत्ता उरलेल्या १८ प्रस्तरांच्या परिसरात हे उद्यान आहे. इटॅलियन शैलीत विकसित केलेल्या या उद्यानात दगडी कमानी (pergolas), दगडी कारंजे, स्थानिक फुलझाडे, तेथले मूळचे दगडधोंडे, इत्यादींचा कलात्मक उपयोग केलेला आहे. यातल्या दगडी (पेव्ह्ड) मध्यमार्गाच्या दगडांवर बार्बारा स्ट्रायझंड, वूडी अॅलन, वॉल्ट व्हिटमन, इत्यादी प्रसिद्ध ब्रुकलिनकरांच्या सन्मानार्थ त्यांची नावे कोरलेली आहेत...
ओसबॉर्न उद्यानातील एका कमानीचा काही भाग
स्थानिक परिसरात पूर्वी नैसर्गिकपणे वाढणारी अनेक फुलझाडे विकासाच्या रेट्यामध्ये नष्ट होऊ लागली आहेत. यावर उपाय म्हणून मध्यमार्गाच्या दोन्ही बाजूंना त्यांचे ताटव्यांमध्ये रोपण व संवर्धन करून येथे एक मोठा नैसर्गिक वारसा जतन केलेला आहे. त्या वनस्पतींचे अप्रतिम फुलोरे पाहिले की हे काम करणे किती महत्त्वाचे आणि किती दूरदर्शी आहे हे समजते. मध्यमार्गावरून पुढे पुढे जाताना विविध फुलांचे सौंदर्यपूर्ण ताटवे बागेच्या डाव्या-उजव्या बाजूंना आलटून पालटून खेचून घेत होते...
ओसबॉर्न उद्यानातील अप्रतिम स्थानिक रानटी फुलझाडांचे ताटवे
ओसबॉर्न उद्यानाच्या संमोहनातून बाहेर पडून पुढे आल्यावर अजून काय दिसेल असा विचार करत असतानाच त्या उद्यानाशी स्पर्धा करणार्या फुलझाडांच्या एका छोट्याश्या जंगलात पाऊल पडले. मंतरलेले चैत्रबन कसे असेल याची झलक देणारा हा भाग होता...
मंतरलेल्या चैत्रबनात
डावीकडे वळून पुढे जाताना आकर्षक आकाराची आणि रंगाची फुले सतत साथ करतच होती...
नंतर आलेल्या उंच बंधार्यासारख्या मार्गावरून जाताना उजव्या बाजूला खालच्या जमिनीवर प्रथम क्रॅनफर्ड गुलाबाच्या बागेचे आणि तिला लागून पुढे असलेल्या चेरीच्या झाडांच्या शिस्तबद्ध रांगांचे (चेरी एस्प्लनेड) विहंगम दर्शन होते...
क्रॅनफर्ड गुलाबाची बाग : विहंगम दर्शन
चेरी एस्प्लनेड : विहंगम दर्शन
या रस्त्याच्या शेवटाजवळ डाव्या बाजूला दोन्ही बाजूला गिन्क्गो (ginkgo biloba) नावाच्या झाडांच्या रांगा असलेला "गिन्ग्को अॅली" नावाचा एक छोटा मार्ग आहे. या झाडांना जिवंत जीवाश्म (living fossils) म्हणतात. कारण, डायनॉसॉर्सच्या काळात अस्तित्वात असलेली ही वनस्पती प्रजाती साडेसहा कोटी वर्षे कीटक, आजार आणि प्रदूषणाला तोंड देत अजूनही यशस्वीपणे तग धरून आहे...
गिन्क्गो अॅली
येथून उजवीकडे स्टाईनबर्ग व्हिजिटर सेंटरच्या इमारतीचे स्थानिक गवत आणि रानटी फुलझाडांच्या झुडुपांनी झाकलेले छप्पर दिसते. या इमारतीच्या कल्पक रचनेमुळे ऊर्जेची बचत होऊन ती पर्यावरणपूरक झाली आहे. याशिवाय बागेचे लागवडीचे क्षेत्रफळ वाढून गवताच्या व फुलझाडांच्या काही प्रजातींच्या संवर्धनाची सोयही झाली आहे...
स्टाईनबर्ग व्हिजिटर सेंटरचे पर्यावरणपूरक छप्पर
पायर्या उतरून खालच्या स्तरावर असलेल्या स्टाईनबर्ग व्हिजिटर सेंटरला धावती भेट देऊन आम्ही पुढे निघालो. वृक्षराजीने भरलेल्या समोरच्या हिरवळीवर काही पर्यटकांचा आनंदोत्सव (पिकनिक) चालला होता...
फुलझाडांचे ताटवे आणि रंगीबेरंगी झाडांची गर्दी रस्ताभर सतत साथ देत होती...
जापनिज हिल अँड पाँड गार्डन
हिरवाई आणि रंगाच्या दंग्यातून पुढे जात असतानाच अचानक "जापनिज हिल अँड पाँड गार्डन" समोर आली...
जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०१
आल्फ्रेड व्हाईट या ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनच्या एका ट्रस्टीने स्वतःच्या पदरचे $१३,००० खर्चून हे उद्यान बांधून जनतेसाठी १९१४-१५ मध्ये खुले केले. ताकेओ शिओता या नावाजलेल्या जपानी लॅंडस्केप डिझायनरचा मास्टरपीस म्हणून हे उद्यान ओळखले जाते. तीन एकरांवर पसरलेल्या या उद्यानात तलाव, धबधबा, लाकडी पूल, टेकडी, बेट, प्रस्तर, दिवे, निरिक्षणस्थळ, शिंतो मंदिर, तळ्यातले कोई मासे, इत्यादी जपानी बगिच्यांच्या सर्व घटकांची मनोहारी मानवनिर्मित रचना पहायला मिळते. मोक्याच्या जागांवर केलेल्या विविध आकारांच्या आणि रंगांच्या झाडांच्या लागवडी या जागेला एक अनवट मनोहारी रूप दिलेले आहे. तिथल्या लाकडी निरिक्षणस्थळावर खिनभर डोळे मिटून बसल्याशिवाय राहवत नाही. या परिसराला भेट दिल्यावर भारून न जाणारा पर्यटक सापडणे कठीण !
जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०२
जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०३
जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०४
जपानी बागेतून पाय निघणे कठीण झाले होते. पण घड्याळ्याच्या धावत्या काट्यांकडे पाहून पुढे निघणे भाग पडले. वाटेत लागलेल्या शेक्सयियर गार्डन आणि फ्रॅग्रन्स गार्डनने नवनवीन फुलांचा आश्चर्यकारक नजारा दाखवणे चालूच ठेवले होते..
जसजसे आम्ही काँझरव्हेटरीच्या जवळ येऊ लागलो तसतसा परिसर जास्त जास्त आखीवरेखीव बनत होता. डांबरी रस्त्याऐवजी फरशीचे रस्ते सुरू झाले होते...
वाटेत लागलेल्या तलावांत कमळे आणि सुंदर बदके विहरत होती...
काँझरव्हेटरीजवळ असलेली रेस्तराँ पाहताच दमलेल्या पायांनी आणि भुकेने खवळलेल्या पोटाने जोरदार निदर्शने सुरू केली. अर्थातच त्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.
(क्रमशः :)
आरामात बसून उदरभरण केल्याने पोटोबा शांत झाले होते आणि पायही परत ताजेतवाने झाले होते. आतापर्यंत दुर्लक्षित झालेली रेस्तराँच्या खुर्च्यांच्या आजूबाजूची फुले आता अचानक खुणावू लागली होती...
काँझरवेटरी जवळच्या रेस्तराँच्या खुर्च्यांच्या आजूबाजूचे फुलोरे
स्टाईनहार्ट काँझरवेटरी
हे विशिष्ट हवामानातल्या वनस्पतींसाठी आणि खास देखाव्यांसाठी बनवलेले ग्रीनहाऊस संकुल आहे. या दोन मजली संकुलातले विभाग एकमेकांना जोडून आहेत. अनेकदा शिड्या वापरून वरखाली जावे लागते आणि काही ठिकाणी उंच वृक्षराजी नीट न्याहाळता यावी यासाठी उंच निरिक्षणमनोरे आहेत. त्यामुळे, आत शिरल्यावर एखाद्या भुलभुलैयात गेल्यासारखे वाटते. पण फक्त एकच एक बाजू घेऊन (उदा : डावी, डावी, डावी) वळत राहिले तर सगळे संकुल पाहून सहीसलामत बाहेर येता येते ! :)
स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०१
बोन्साय विभाग
इथला बोन्साय संग्रह अमेरिकेतला सर्वात जुना आहे असा त्यांचा दावा आहे.
स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०२ : बोन्साय विभाग
ऑर्किड विभाग
हा मी पाहिलेला सर्वात मोठा ऑर्किडसंग्रह होता. त्याच्या आकारामुळे जास्त प्रभावित झालो की तिथले चित्रविचित्र फुलोरे पाहून जास्त आश्चर्यचकीत झालो हे मी अजून नक्की करू शकलो नाही !
स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०३ : ऑर्किड विभाग
मरुस्थल विभाग
इतके विविध आणि मोठ्या प्रमाणात फुलोरे आलेले निवडुंग मी पहिल्यांदाच पाहिले ! त्यातील काही निवडक खालच्या चित्रांत दिसतील...
स्टाईनहार्ट काँझरवेटरी : ०४ : मरुस्थल विभाग
काँझरवेटरीमधले अजून काही विशेष फुलोरे...
काँझरवेटरीमधले अजून काही विशेष फुलोरे
थकलेले पाय विसरून मी त्या काँझरवेटरीमधून दोन फेर्या मारल्या !
चकीत मनाने तिथून पुढे निघालो तर बागेने अजूनही बरेच काही बघायचे आहे याची जाणीव करून द्यायला सुरुवात केली...
मूळ जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांना प्रमाणापेक्षा जास्त कृत्रिम व आखीवरेखीव करण्याऐवजी, तिचे मूळ नैसर्गिक सौंदर्य जपून ते कसे जास्त सुंदर करता येईल इकडे जास्त लक्ष दिले गेले आहे हे जागोजागी दिसत होते...
फिरत फिरत आम्ही ओक सर्कल येथे पोहोचलो. आजूबाजूचे सौंदर्य निरखत खिनभर बसून श्वास घ्यावा अशी जागा ! बाग बनवणार्यांच्या मनातही तेच असावे. कारण त्यांनी त्या चौकात बसण्यासाठी बाकेही ठेवलेली होती...
ओक सर्कल : ०१
ओक सर्कल : ०२ : परिसर
बागेचे नाव बोटॅनिकल गार्डन (वनस्पतीशास्त्रिय बाग) आहे. पण "ही एक गंभीर शैक्षणिक व संशोधनपर जागा आहे" असा नाही तर "सर्व वयाच्या आणि सर्व पार्श्वभूमीच्या लोकांनी तेथे येऊन एक आनंदभरा पिकनिक साजरा करावा व ते करताना कळत-नकळत कमीजास्त ज्ञानवृद्धी करून जावे" हा उद्येश डोळ्यासमोर ठेवून तिचा चेहरामोहरा जाणीवपूर्वक बनवला आहे, हे वारंवार जाणवते. यासाठी तिच्या विकासकांच्या व त्यामागच्या प्रशासकांच्या कल्पकतेची प्रशंसा करावी तेवढी थोडीच ! अख्ख्या बागेत एकही संरक्षक दिसला नाही. पण तरीही अगदी लहान मुलेही कोणत्याही झाडाचा पाला किंवा फुले तोडताना दिसली नाहीत व इकडेतिकडे टाकलेला कचरा दिसला नाही. अर्थातच, या बागेला भेट देणार्या परदेशी प्रवाशाच्या मनातही "इथे परत यायला जमले तर किती बहार येईल" असा विचार येत असला तर त्यात आश्चर्य ते काय !...
बागेतला आनंदोत्सव
कितीही चालत राहिलो आणि कितीही फुले बघितली तरी अजून काही नवीन दिसतच होते. त्यामुळे चालताना भिरभिरत्या नजरेने सतत आजूबाजूचे निरीक्षण करणे आणि काही वैशिष्ट्यपूर्ण दिसले की फोटो काढणे चालूच होते...
आमचा पुढचा थांबा होता चेरी एस्प्लनेड. बागेच्या या भागाला भेट देण्यासाठी आमची वेळ सर्वोत्तम नव्हती. त्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये "चेरी ब्लॉसम" ची वेळ उलटून गेली होती. बहरलेली असताना चेरी वृक्षावली कशी दिसत असेल याचा जालावरून घेतलेला फोटो पाहिला तर मी काय म्हणत आहे याची कल्पना येईल...
आम्ही पाहिलेली चेरी वृक्षावली आणि ती बहरात असतानाचा जालावरून घेतलेला फोटो
बहरात नसलेल्या चेरी वृक्षावलींतून चालत जाऊन पुढचा महत्त्वाचा, क्रॅनफर्ड रोज गार्डनचा, थांबा घ्यायचा होता. आतापर्यंत आमच्या अपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या होत्या आणि हे उद्यान त्या फोल जाऊ देणार नाही इतकी त्याच्याबद्दल खात्री झाली होतीच. तेव्हा पाय झरझर गुलाबी उद्यानाच्या दिशेने चालू लागले.
(क्रमशः :)
क्रॅनफर्ड रोज गार्डन
वॉल्टर क्रॅनफर्ड या ब्रूकलीनमधील सबवेचे काम करणार्या स्थापत्य कंपनीच्या मालकाने दिलेल्या $१५,००० च्या देणगीतून हा विभाग निर्माण झाला आहे. जून १९२८ मध्ये खुल्या झालेल्या या बागेतली गुलाबांची अनेक मूळ झाडे अजूनही तेथे अस्तित्वात आहेत. येथे १४०० पेक्षा जास्त गुलाबांच्या प्रजातींची (wild species, old garden roses, hybrid tea roses, grandifloras, floribundas, polyanthas, hybrid perpetuals, climbers, ramblers, miniature roses, इत्यादी) ५००० पेक्षा जास्त झुडुपे आहेत. हा उत्तर अमेरिकेतला सर्वात मोठा गुलाबांचा संग्रह आहे. २००९ साली झालेल्या रोगाच्या आघाताने उद्यानाचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. त्याचे आता कळूनही येणार नाही इतके सुंदर पुनर्निर्माण केले केले आहे.
त्याच्या उद्घाटनाच्या वर्षापासून हे उद्यान ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. व्यवस्थित आखणी केलेल्या पुष्पवाटिकांमध्ये प्रजातींप्रमाणे आणि रंगसंगतीप्रमाणे वर्गवारी केलेली झुडुपे, त्यांच्या झुडुपांच्या गरजेप्रमाणे त्यांच्यासाठी केलेले वाफे आणि कमानी, इत्यादींमुळे प्रत्येक प्रकारचे फुल त्यांच्या जवळ जाऊन, त्याला हात लावून व त्याचा सुवास हुंगून पाहता येते.
उद्यानाच्या जवळ आलो आणि या सहस्रकलिकांच्या ताटव्यांनी दर्शन दिले...
"अरेरे इथे आपण जरा लवकरच आलो की काय ?" असे वाटले आणि हे सगळे ताटवे फुलून आल्यावर काय नजारा दिसेल अशी कल्पना मनात येऊन मन जरासे खट्टू झाले ! पण बागेत शिरून जसजसे पुढे जाऊ लागलो तेव्हा मनातले मळभ क्षणात नाहीसे झाले. शिवाय त्या जरा उशीरा फुलणार्या प्रजातीची झाडे ब्रॉंक्समधल्या न्यू यॉर्क बोटॅनिक गार्डन मध्ये नव्हे तर आम्ही राहत असलेल्या कॉलनीच्या बागेतही होती (हे नंतर कळले!), त्यामुळे त्या फुलोर्यांची मजाही बघायला मिळाली. पुढच्या काही भागांत त्यांचे फोटो आपण पाहूच.
उद्यानातले काही फुलोरे..
क्रॅनफर्ड रोज गार्डनमधले फुलोरे ०१
क्रॅनफर्ड रोज गार्डनमधले फुलोरे ०२
या बागेत गुलाबांबरोबर इतर अनेक पूरक प्रजातींचीही झाडे बहरली होती...
नेटीव फ्लोरा गार्डन
गुलाब उद्यानातून बाहेर पडून आम्ही नेटीव फ्लोरा गार्डनकडे मोर्चा वळवला...
नेटीव फ्लोरा गार्डन ०१
नेटीव फ्लोरा गार्डन ०२
नेटीव फ्लोरा गार्डन ०३
नेटीव फ्लोरा गार्डनमध्ये जवळ जवळ सर्व स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती, छोटे तलाव आणि पाणथळ जागा निर्माण करून त्यांच्या मूळ अविकसित जंगलाच्या वातावरणात असाव्या तश्या जतन केलेल्या आहेत. आम्ही भेट दिली तेव्हा सगळ्याच वनस्पतींना फुले आलेली नसली तरी, न्यू यॉर्कसारख्या महानगरात असूनही जंगलात फेरी मारल्याचा रोचक अनुभव मिळाला :)
त्या उद्यानाच्या भुलभुलैयातून बाहेर पडलो आणि पाय ठेवला मंतरलेल्या चैत्रबनाच्या पूर्वी न पाहिलेल्या कोपर्यात. काही वेळापूर्वी पाहिलेल्या उद्यानाचा हा भाग फिरण्याच्या गडबडीत नजरेआड राहिला होता..
मंतरलेल्या चैत्रबनात परत एकदा ०१
मंतरलेल्या चैत्रबनात परत एकदा ०२
मंतरलेल्या चैत्रबनात परत एकदा ०३
मंतरलेल्या चैत्रबनातून वाट काढत परत ओसबॉर्न गार्डनमधून परतीच्या मार्गावर असताना ही जोडगोळी त्यांच्या नादसमाधीत मग्न झालेली दिसली...
उद्यानाच्या बाहेर पडलो आणि ध्यानात आले की पावणे सहा वाजले होते ! ब्रूकलीन संग्रहालय सहा वाजता बंद होणार होते. म्हणजे आता संग्रहालय बघणे शक्य नव्हते. मग उरलेला वेळ ब्रूकलीन प्रोमोनेडवरून संधिप्रकाशात ब्रूकलीन ब्रिज आणि मॅनहॅटनची आकाशरेखा पाहण्याचा बेत ठरवून त्या दिशेने निघालो.
***********************************************************************
भटकंती करताना डोळ्यासमोरचे आणि डोळ्यामागचे काय काय मला प्रभावित करते ?
टाईम्स स्क्वेअरवरच्या लेखावरील प्रतिसादांमध्ये झालेल्या चर्चेत भटकंतीतली आकर्षणे बघताना मला काय भावते याबद्दल थोडे काही लिहिले होते. आता ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनच्या भटकंतीच्या निमित्ताने ते जरा विस्ताराने लिहायचा मोह आवरत नाही.
जगाबद्दलचे तीव्र कुतूहल हे भटकंतीमागचे नेहमीचे मुख्य कारण असते. मात्र एखादे आकर्षण पाहताना नकळतपणे जरासे खोलात जाऊन त्याची माहिती काढावी असे माझ्या मनात असतेच असते. या सवयीच्या परिणामाने एक वेगळाच फायदा होतो... डोळ्यासमोर असलेल्या-नसलेल्या अनेक गोष्टी कळून एक प्रकारे भटकंतीची मजा वाढायला मदत होते.
दृष्टीपुढची सृष्टी
सहजपणे प्रत्यक्ष समोर दिसणारा हा भाग आकर्षणाला भेट देणार्या प्रत्येक पर्यटकाच्या नजरेत येतोच. किंबहुना, ही दृष्टीपुढची सृष्टी पर्यटकांच्या नजरेत भरावी यासाठी तिची बरीच जाहिरातही केली जाते. बहुसंख्य पर्यटकांच्यासाठी तीच फार महत्त्वाची असते, आणि त्यात काहीच गैर नाही. कारण खूश आणि विस्मयचकित होण्यासाठी तर बहुसंख्य पर्यटक पदरचे पैसे खर्च करून तेथे जातात.
"या बागेतली दृष्टीपुढची सृष्टी म्हणजे काय आहे ?" हे वेगळे सांगण्याची गरज नाही, ते काम आतापर्यंत आपण पाहिलेल्या बागेच्या आणि तिच्यातल्या फुलोर्यांच्या फोटोंमध्ये आपण पाहिले आहेच !
दृष्टीआडची सृष्टी
एखादी जागा "वर्षानुवर्षे, दशकानुदशके मोठे पर्यटक आकर्षण का राहते ?" याचे कारण बहुदा आकर्षणाच्या जाहिरातीत दिसत नाही. मात्र, प्रत्येक दीर्घकालीन यशस्वी पर्यटक आकर्षणामागे काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण कारणे म्हणा, गुपिते म्हणा असतेच असते. ही कारणे, म्हणजेच दृष्टीआडची सृष्टी, समजावून घेण्यात एक वेगळीच मजा आहे. समोर दिसते ते "कसे दिसते आहे?" याबरोबरच ते "तसे का दिसते आहे?" हे समजले तर भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो; आपले अनुभवविश्व विस्तारते. अर्थातच, जरासे ज्ञान म्हणा, शहाणपण म्हणा, आपल्या गाठीला बांधून आपण परततो.
उदाहरणादाखल, ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन पाहिल्यानंतर मी कोणती दृष्टीआडची सृष्टी गाठीला बांधून घेऊन आलो ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहे :
१. (जगभराप्रमाणे तेथेही असलेल्या लँड शार्क्सना न जुमानता) खास कायदा करून वाढत जाणार्या शहरातील ३९ एकर जागा या उद्यानासाठी राखून ठेवली आणि नंतर ती वाढवत नेत आजतागायत ते क्षेत्रफळ ५२ एकरांपर्यंत वाढवलेले आहे.
२. उद्यान विकसित करण्यासाठी स्वतंत्र मंडळ तयार करून त्यात नावाजलेले वनस्पतिशास्त्रज्ञ (Charles Stuart Gager), जमीन विकासक तज्ज्ञ (लॅंडस्केप स्पेशियालिस्ट), इत्यादी तज्ज्ञांची नेमणूक करून त्यांना सर्वाधिकार दिले गेले.
३. तज्ञांना सर्वाधिकार असल्याने, उद्यानाच्या जागेचे एकजात सपाटीकरण न करता, तेथील मूळ जमीन व प्रस्तर नैसर्गिक स्वरूपात कायम ठेवून विकसनकामात त्यांचा सौंदर्यपूर्ण उपयोग कसा केला जाईल इकडे लक्ष दिले गेले.
४. उद्यानाचा मोठा भाग स्थानिक जैववैविध्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी व त्यासंबंधी लोकांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी राखून ठेवलेला आहे.
५. लहान मुलांच्या कार्यशाला आणि सक्रिय सहभागासाठी येथे खास विभाग आहेत आणि त्याचे कार्यक्रम सतत चालू असतात.
६. उत्तम संशोधक तज्ज्ञांना उद्यानात काम करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी (अ) विशेष वनस्पती विभाग असलेली काँझरव्हेटरी; (आ) आधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा; आणि (इ) जागतिक स्तराचे वाचनालय; यासारखे विभाग स्थापन केलेले आहेत.
७. येथील अनेक विभाग खाजगी देणग्यांतून निर्माण झालेले आहेत. पण तरीही, उद्यानाच्या सौंदर्याला धक्का न लावता विभागत एका बाजूला असलेली पाटी सोडता त्यांची खास जाहिरात दिसत नाही. हे पाहून, आपल्या शहरांत जागोजागी उद्यान्/रस्ता/पूल यावर मोठ्या पाट्यांवर आपले किंवा आपल्या पूर्वजांचे नाव यावे यासाठी चाललेले राजकारण आठवले. तसेच, बसथांब्यांवर आणि अगदी कचरा जमा करणार्या गाड्यांवर "अमुक अमुक यांच्या निधीतून (जो निधी खरे तर नागरिकांनी भरलेल्या करातून आलेला असतो)" अश्या मोठ्या अक्षरातल्या जाहिराती आठवल्या.
८. समाजाच्या सर्व घटकांसाठी आणि सर्व वयोगटांसाठी (मुले आणि कुटुंबे; प्रौढ नागरिक; शिक्षक आणि विद्यार्थी; इत्यादी) असलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे, स्थानिक जनता आणि विशेषतः शाळा-कॉलेजातल्या विद्यार्थ्यांना उद्यानाच्या कामकाजात सामील करून घेतले जाते. यामुळे (अ) स्थानिक लोकांचे ज्ञानवर्धन होते; (आ) त्यांना उद्यानाबद्दल ममत्व निर्माण होते; (इ) त्यांना झाडे व पर्यावरणाबद्दल ममत्व निर्माण होते; आणि (ई) प्रकल्पांत सामील झालेले लोक हे ज्ञान घरी नेऊन आपल्या घराचे आवार व परिसर सुधारण्यास मदत करतात.
९. परिसरातल्या सर्व वनस्पतींचा अभ्यास करणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या उद्यानाने हाती घेऊन वनस्पतिशास्त्र आणि शहर परिसर या दोन्हींना मोठे फायदे झाले आहेत.
१०. हे उद्यान Greenest Block in Brooklyn यासारख्या अनेक लोकोपयोगी स्पर्धा सतत आयोजित करून लोकांमध्ये आपला परिसर सुंदर करणे व एकंदरीत पर्यावरण सुधारणे हे उद्येश साध्य करत असते.
११. नुकत्याच खुल्या झालेल्या "वॉटर गार्डन" या उद्यानात १८,००० पाणवनस्पती आहेत. पण त्यापेक्षा अजून महत्त्वाचे म्हणजे या विभागाने उद्यानाच्या सर्व ५२ एकरांवर पडणारे पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर व पुनर्वापर करून उद्यानाची बाहेरून घेतल्या जाण्यार्या पाण्याची गरज २२० लाख गॅलन्सवरून ९ लाख गॅलन्स इतकी कमी केली आहे ! या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे "कँपेन फॉर द नेक्स्ट सेंचुरी" असे ब्रीदवाक्य आहे. याची अधिक माहिती या दुव्यावर पाहणे रोचक होईल.
विस्तारभयास्तव इतकेच पुरे. मात्र, वरचे मुद्दे न्यू यॉर्क शहरातल्या शेकडो पब्लिक पार्क्समध्ये कमीजास्त प्रमाणात सतत दिसत राहतात.
अश्या दृष्टीआडच्या सृष्टीची झलक पाहिली तर मग हे उद्यान वर्षानुवर्षे जगातल्या सर्वोत्तम उद्यानामध्ये का गणले जाते याचे गमक समजणे सोपे जाते. याशिवाय, ही दृष्टीआडची सृष्टी माझ्या अनेक कुतुहलाचे निरसन करून जाते, माझ्या ज्ञानात भर टाकत जाते आणि माझा पर्यटनाचा आनंद द्विगुणित करून जाते.
***********************************************************************
(क्रमशः :)
ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनपासून सबवे पकडून ब्रूकलीनमधलेच क्लार्क स्टेशन गाठले. तेथून चालत १५-२० मिनिटांत ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेडला पोहोचलो. वाटेत नेटनेटक्या ब्रूकलीनचे दर्शन झाले. जिथे जागा मिळेल तिथे झाडे व फुलझाडे लावून आपला परिसर कसा आकर्षक करता येईल याकडे प्रशासन आणि नागरिकांची चढाओढ असल्यासारखेच दिसत होते...
ब्रूकलीन परिसर ०१
ब्रूकलीन परिसर ०२
ब्रूकलीन परिसर ०३
ब्रूकलीन परिसर ०४
ब्रूकलीन परिसर ०५
ब्रूकलीन परिसर ०६ व ०७
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड (याला ब्रूकलीन एस्प्लनेड असेही म्हणतात) हा इस्ट रिव्हरच्या मुखाजवळ दक्षिण मॅनहॅटनच्या समोर असलेल्या ब्रूकलीनच्या किनार्यावर बांधलेला ५५७ मीटर लांबीचा भलामोठा चार मजली पादचारी चौथरा आहे. हा चौथरा इंटरस्टेट २७८ महामार्ग व त्याच्या सर्विस रोडच्या वर बांधलेला आहे.
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०१ : प्रोमोनेडच्या खालून जाणारा इंटरस्टेट २७८ महामार्ग
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०२ : मॅनहॅटनवरून होणारे ब्रूकलीन प्रोमेनेडचे दर्शन (जालावरून साभार)
त्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे येथून मॅनहॅटनची जगप्रसिद्ध आकाशरेखा, न्यू यॉर्क बंदर, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, ब्रूकलीन पूल, इत्यादींचे मनोहारी दर्शन घेता येते.
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०३ : प्रोमोनेडचे मोक्याचे स्थान दाखवणारा नकाशा (जालावरून साभार)
ही जागा न्यू यॉर्कच्या पार्क व्यवस्थापनाच्या नियंत्रणात आहे आणि एखाद्या उद्यानासारखी विकसित केलेली आहे. लोक इथे धावायला, दक्षिण मॅनहॅटनचा (विशेषतः संध्याकाळचा व रात्रीचा) नजारा पाहायला आणि मस्त मजेत बाकावर बसून हडसन नदीवरून येणारा वारा खायला येतात.
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०४ : प्रोमोनेडच्या बाजूने दिसणारा प्रवेशमार्ग
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०५ : प्रोमोनेडच्या बाजूने दिसणारा प्रवेशमार्ग
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०६ : निरीक्षण चौथरा ०१
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०७ : निरीक्षण चौथरा ०२
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०८ : ब्रूकलीन व मॅनहॅटनला जोडणारा ब्रूकलीन ब्रिज
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ०९ : गव्हर्नर्स आयलंड व त्याच्या उजव्या
टोकाच्या मागे दिसणारा (पलीकडच्या बेटावर असलेला) स्वातंत्र्यदेवीचा पुतळा
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड १० : ब्रूकलीन किनारा, हडसन नदी आणि पलीकडच्या किनार्यावरच्या मॅनहॅटनमधल्या गगनचुंबी इमारती
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड ११ : संध्याछाया पसरू लागल्या की मॅनहॅटनची आकाशरेखा जरा जास्तच आकर्षक व गूढगंभीर दिसू लागते
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड १२ : रात्रीच्या काळोखात मॅनहॅटनच्या गगनचुंबी
इमारती दिव्यांनी झळकू लागल्या की त्या अधिकच आकर्षक दिसू लागतात (जालावरून साभार)
परतीची वेळ झाली आणि इतका वेळ मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारतींनी वेधून घेतलेले लक्ष प्रोमोनेडच्या बागेकडे गेले. प्रोमोनेड व रहिवासी इमारतींमधली चिंचोळी पट्टीही सौंदर्यपूर्ण बागेने भरून काढली होती...
ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड १३ : बगिचा
परतीच्या रस्त्यावरही ब्रूकलीनकरांच्या कलासक्तीची अनेक उदाहरणे नजरेस पडत होती...
परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०१
परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०२
परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०३
परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०४
परतीच्या रस्त्यावरचे ब्रूकलीन ०५
आज मॅनहॅटन बेटाच्या पश्चिम किनार्यावर असलेल्या बंदराच्या ८६ व्या धक्क्यावर असलेले "इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय" नावाचे खास संग्रहालय बघायचे होते. यातली मुख्य आकर्षणे अशी आहेत :
१. USS इंट्रेपिड ही दुसर्या महायुद्धात व नंतर कार्यरत असलेली विमानवाहू नौका,
२. लॉकहीड A-12 हे स्वनातीत हेरगिरी विमान (supersonic reconnaissance aeroplane),
३. काँकॉर्ड SST हे ब्रिटिश एअरवेजचे स्वनातीत व्यावसायिक विमान (supersonic commercial aeroplane) ,
४. एन्टरप्राइज अवकाशयान (Space Shuttle Enterprise) आणि
५. USS ग्रोवलर ही पाणबुडी.
या संग्रहालयातले प्रत्येक मुख्य आकर्षण केवळ महत्त्वाचेच नाही तर इतके अजस्त्रही आहे की ते त्यांच्या संग्रहालयातल्या जागेवर आणून ठेवणे आणि ते पर्यटकांना सुरक्षितरीत्या पाहता यावे अशी त्यांची मांडणी करण्यासाठी खास अभियांत्रिकी प्रकल्प करावे लागले आहेत. शिवाय, उघड्या समुद्रात ठेवलेले असल्याने त्यांना क्षती पोहोचू नये यासाठी खास व्यवस्था कराव्या लागल्या आहेत. २०१२ मध्ये "हरिकेन सँडी" नावाच्या महाकाय चक्रीवादळाने न्यू यॉर्क शहर व परिसराला जोरदार झोडपले होते. त्यात या संग्रहालयाचेही खूप नुकसान झाले. त्यानंतर येथे अनेक गोष्टींची डागडुजी करावी लागली आहे व आकर्षणांच्या सुरक्षेत अजून वाढ करण्यात आली आहे.
चला तर भेट द्यायला या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संग्रहालयाला...
नेहमीप्रमाणेच सबवेने निघालो. सबवे थांब्यापासून एक दीड किलोमीटर अंतर जाण्यासाठी बसची वाट पाहू लागलो. पण, १५-२० मिनिटे झाली तरी बसचा पत्ता नाही असे पाहून, वाटेत दिसणार्या दक्षिण मॅनहॅटनच्या भागांचे फोटो काढत, चालत निघालो...
इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०१
इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०२
इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०३
जरा पुढे आल्यावर बस न येण्याचे शक्य असलेले कारण दिसले. एक पर्यटक बसच्या विद्युतप्रणालीत बिघाड होऊन लागलेल्या आगीत तिच्या पुढच्या भागाचे नुकसान झालेले दिसत होते. आम्ही तेथे पोचेपर्यंत आगीच्या बंबांनी त्यांचे काम केले होते. रस्ता वाहतुकीला बंद असला तरी पादचारी जाऊ शकत असल्याने आम्ही पुढे जाऊ शकलो...
इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०४ : आग लागलेली बस
USS इंट्रेपिड
थोड्याच वेळात लढाऊ विमानांच्या दर्शनाने संग्रहालय जवळ आल्याची सूचना दिली...
इंट्रेपिड संग्रहालय ०१ : प्रथमदर्शन
इंट्रेपिड संग्रहालय ०२ : मुख्य आकर्षणांची संरचना (जालावरून साभार)
दुसर्या महायुद्धाच्या काळात, १९४३ साली, हे "एस्सेक्स क्लास" प्रकारचे विमानवाहू जहाज अमेरिकन नौदलासाठी बांधले गेले. याला लाडाने "द फायटिंग I" असेही संबोधत असत. याने प्रशांत महासागरातल्या अनेक मोहिमांत भाग घेतला. दुसरे महायुद्ध संपल्यावर याला प्रथम निवृत्ती देण्यात आली. पण, लवकरच १९५० मध्ये त्याला आक्रमक विमानवाहू नौकेच्या (attack carrier) स्वरूपात परत सेवेत घेण्यात आले. त्यानंतर परत त्याचे स्वरूप बदलून पाणबुडीविरोधक विमानवाहू नौका (antisubmarine carrier) बनवले गेले. या दुसर्या अवतारात अटलांटिक महासागरात आणि व्हिएतनाम युद्धात या नौकेने कामगिरी बजावली. तसेच समुद्रात उतरणारी अवकाशयाने व अवकाशवीरांना पाण्यातून उचलण्याचे कार्यही या नौकेवर सोपवलेले होते.
दुसर्या महायुद्धाच्या कालखंडात तिच्यावर चार वेगवेगळे जपानी कामिकाझे (आत्मघातकी) हवाई हल्ले, टॉर्पेडोचे हल्ले, इत्यादी अनेक आपत्ती आल्या आणि तिला डागडुजीसाठी खूप वेळ कोरड्या धक्क्यावर (ड्राय डॉकवर) उभे राहणे भाग पडले होते. त्यामुळे "इंट्रेपिड" व "द फायटिंग I" या नावांचा अपभ्रंश करून तिची "डेक्रेपिट (मोडकळीला आलेली)" व "द ड्राय I" या नावाने बरीच कुचेष्टाही केली गेली आहे.
कितीही मोठी असली आणि कितीही महत्त्वाची कामगिरी केली असली तरी प्रत्येक जहाजावर निवृत्तीची वेळ येतेच. इंट्रेपिडचीही १९७४ साली कायम निवृत्ती जाहीर केली गेली. निवृत्ती झाली की सर्वसाधारणपणे जहाजाचे तुकडे करून त्यातील धातू व इतर सामानाचा पुनर्वापर केला जातो. मात्र, झॅकरी फिशर आणि लॅरी फिशर हे बांधकाम व्यावसायिक बंधुद्वय व मायकेल स्टर्न हा वार्ताहर, या तिघांना अमेरिकेच्या इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावलेली इंट्रेपिडला भंगारात पाठवणे पसंत नव्हते. त्यांनी १९८२ साली तिचा उपयोग करून इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय (Intrepid Sea, Air & Space Museum) उभारले. १९८६ साली या संग्रहालयाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. सद्या हे संग्रहालय एका विनाफायदा (nonprofit) संस्थेच्या स्वरूपात काम करत असून इतिहासाची जपणूक व प्रसार करतानाच नवीन पिढीमध्ये इतिहास, शास्त्र आणि देशप्रेम वाढावे यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी, येथे वेळोवेळी प्रसंगानुरुप खास प्रदर्शनेही आयोजित केली जातात.
हे संग्रहालय स्वतः फेरी मारून पहायला एक सर्वसामान्य तिकीट असते. इंट्रेपिड व इतर विशेष आकर्षणांच्या खास सहली अधिक मूल्य भरून मार्गदर्शकांबरोबर करता येतात.
या महाकाय जहाजात एकूण ९ मजले आहेत...
USS इंट्रेपिड ०३ : जहाजाची अंतर्गत रचना
गॅलरी डेकवरच्या मुख्य दालनात जहाजाची १:४० परिमाणात बनवलेली हुबेहूब प्रतिकृती ठेवलेली आहे...
USS इंट्रेपिड ०४ : जहाजाची प्रतिमा
USS इंट्रेपिड ०५ : १९६० साली कार्यरत असतानाचे छायाचित्र (जालावरून साभार)
गॅलरी डेकवर या जहाजावर वापरलेली अनेक विमाने, हेलिकॉप्टर्स व इतर अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत...
USS इंट्रेपिड ०६ : विमाने व हेलिकॉप्टर्स
USS इंट्रेपिड ०७ : विमानांना उड्डाण करताना व उतरताना मार्गदर्शन करणारे दिवे व जहाजाचा एक जुना प्रॉपेलर
USS इंट्रेपिड ०८ : विमानवेधी तोफ व विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यावर वैमानिकांना वाचवण्यासाठी वापरली जाणारी इजेक्शन सीट्स
याच डेकवर एका भागात या जहाजावर झालेल्या जपानी कामिकाझे (आत्मघाती) हल्ल्यांच्या वेळी केलेले चित्रीकरण वापरून व मशीनने केलेल्या धुराचा वापर करून त्या हल्ल्याच्या वेळेचा थरारक दृकश्राव्य अनुभव पर्यटकांना देणे चालू होते...
USS इंट्रेपिड ०९ : जपानी कामिकाझे (आत्मघाती) हल्ल्यांचा थरारक दृकश्राव्य अनुभव
याच डेकवर या जहाजाने समुद्राच्या पाण्यातून उचलेली मर्क्युरी व जेमिनी अवकाशयाने ठेवलेली आहेत...
USS इंट्रेपिड १० : मर्क्युरी अवकाशयान व जेमिनी अवकाशयान
या जहाजाने युद्धकालात बुडविलेल्या शत्रूच्या जहाजांची माहिती देणार्या तक्त्यावरून या जहाजाच्या उत्तम कामगिरीची कल्पना येते...
USS इंट्रेपिड ११ : या जहाजाने बुडवलेल्या बोटींची माहिती देणारा तक्ता
खालच्या डेक्सवर जहाजाची इंजिने व त्याच्या कार्यशैलीवर ताबा ठेवणारी विविध दालने (कंट्रोल रूम्स) आहेत...
USS इंट्रेपिड १२ : स्क्वॉड्रन रेडी रूम
USS इंट्रेपिड १३ : एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटर
USS इंट्रेपिड १४ : रडार कंट्रोल रूम आणि एअर ऑपरेशन्स रूम
सर्वात वरच्या फ्लाईट डेकवर जाताना एक जहाजवेधी तोफ आणि या जहाजाला विविध कामगिर्यांबद्दल मिळालेली पदके (मेडल्स) आपले लक्ष वेधून घेतात...
USS इंट्रेपिड १५ : जहाजवेधी तोफ
USS इंट्रेपिड १६ : इंट्रेपिडला मिळालेली पदके (मेडल्स)
या विमानवाहू नौकेने तिच्या १९४३ ते १९७४ या ३१ वर्षांच्या कार्यकालावधीतील मोहिमांत वापरलेली दोनएक डझन प्रकारची विमाने जीर्णोद्धार करून सर्वात वरच्या फ्लाईट डेकवर मांडून ठेवलेली आहेत. विविध काळातील त्यांच्या मूळ स्वरूपात असलेली लढाऊ विमाने अगदी हाताच्या अंतरावरून पाहण्याचा अनुभव मोठा रोमहर्षक होता...
USS इंट्रेपिड १७ : इंट्रेपिडवर वेगवेगळ्या वेळी वापरली गेलेली लढाऊ विमाने
लॉकहीड A-12
फ्लाईट डेकच्या एका टोकाला CIA साठी हेरगिरी करण्याकरिता बनवलेले "लॉकहीड A-12" हे खास स्वनातीत विमान उभे करून ठेवलेले आहे. हे विमान २४,००० मीटर (८०,००० फूट) उंचीवरून ध्वनीच्या वेगापेक्षा ३.१ जास्त वेगाने (Mach 3.1) उडू शकत असे. या प्रकारच्या एकूण बारा विमानांचा व्हिएतनाम युद्धात, उत्तर कोरियावर हेरगिरी करण्यासाठी व इतर मोहिमांत वापर केला गेला.
हे विमान १९६८ पर्यंत वापरात होते. त्यानंतर त्याच्या सुधारीत आवृत्त्या बनवून त्यांना इंटरसेप्शन, ड्रोन लाँचिंग, फोटोग्राफी व इतर प्रकारच्या हेरगिरीसाठी वापरले गेले आहे. नंतरच्या काळात, उपग्रहांच्या तंत्रज्ञानात झालेल्या विकासामुळे ते हेरगिरीकरिता जास्त सुरक्षित आणि कमी खर्चिक ठरले. अर्थातच, या विमानाची उपयुक्तता कमी होऊन त्याला निवृत्त केले गेले.
याचे शक्तिशाली इंजिन सुरू करण्यासाठी जमिनीवर ठेवलेल्या एका स्वतंत्र बाह्ययंत्रणेची मदत घ्यावी लागत असे...
USS इंट्रेपिड १८ : लॉकहीड A-12 आणि त्याचे इंजिन सुरू करण्यासाठी लागणारी स्वतंत्र बाह्ययंत्रणा
फ्लाईट डेकवर फिरताना आपल्याला दक्षिण मॅनहॅटनमधिल कल्पक बांधणीच्या गगनचुंबी इमारतींचेही दर्शन होते...
USS इंट्रेपिड १९ : फ्लाईट डेकवरून दिसणार्या दक्षिण मॅनहॅटनमधील आकर्षक इमारती ०१
USS इंट्रेपिड २० : फ्लाईट डेकवरून दिसणार्या दक्षिण मॅनहॅटनमधील आकर्षक इमारती ०२
काय बघू आणि काय नको असे होत असले तरी अजून काँकॉर्ड विमान, एन्टरप्राइज अवकाशयान व USS ग्रोवलर पाणबुडी ही तीन महत्त्वाची आकर्षणे पहायची असल्याने पुढे जाणे भागच होते.
(क्रमशः )
संग्रहालयाच्या सर्वसाधारण फीमध्ये पुढची तीन आकर्षणे फक्त त्यांच्या बाहेरून पाहता येता. आत प्रवेश करून त्यांचा अंतर्भाग पाहायचा असल्यास अधिक मूल्य भरून मार्गदर्शकासह असलेल्या सहली घ्याव्या लागतात. काँकॉर्डच्या सहलीची वेळ झाली असल्याने आम्ही तिकडे निघालो.
काँकॉर्ड अल्फा डेल्टा जी-बीओएडी (Concorde Alpha Delta G-BOAD)
एरोस्पॅतिएल्/ब्रिटिश एअरवेज कॉर्पोरेशनचे काँकॉर्ड (Aérospatiale/BAC Concorde) हे टर्बोजेट प्रणालीवर चालणारे व व्यापारी वाहतुकीसाठी वापरात आणलेले पहिले स्वनातित विमान होते. फ्रान्स व ब्रिटन या दोन देशांच्या सहकार्याने बनवलेल्यामुळे याचे नाव काँकॉर्ड असे ठेवले गेले, या शब्दाचा अर्थ करार किंवा सुसंवाद किंवा संयोग (agreement or harmony or union) असा होतो. असे असले तरी, त्याच्या नावाच्या (Concorde) स्पेलिंगमधला शेवटचा e फ्रेंचमध्ये असतो व इंग्लिशमध्ये नसतो, त्यामुळे तो ठेवावा की नाही यासाठी दोन देशांतील देशाभिमानी लोकांमध्ये बराच वाद झाला ! त्या लोकांचे समाधान करण्यासाठी, त्या e चा अर्थ Excellence, England, Europe किंवा Entente (मैत्री) असा आहे किंवा स्कॉटलंडच्या विमानाच्या बांधणीत झालेल्या मदतीमुळे (तेथे विमानाचे नाक बनत असे व फ्रेंचमध्ये स्कॉटलंडला Écosse म्हणतात) तो e स्कॉटलंडचे प्रतिक आहे, इत्यादी अनेक गमतीदार राजकीय कोलांट्या उड्या मारून लोकक्षोभ बोथट केला गेला. हे विमान बनवण्याच्या प्रकल्पाच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या खर्चामुळे त्या e चा extravagance (उधळपट्टी) व escalation (खर्चवृद्धी) असा अर्थ लावून त्याची यथेच्छ चेष्टाही केली गेली !
१९६९ पासून आकाशात उडू लागलेल्या या विमानाने २१ जानेवारी १९७६ ला पहिली व्यापारी भरारी घेतली व ते २००३ सालापर्यंत म्हणजेच २७ वर्षे वापरात होते. याच प्रकारातल्या दुसर्या रशियन बनावटीच्या स्वनातित व्यापारी टुपोलेव (Tupolev Tu-144) विमानाचे व्यापारी आयुष्य यापेक्षा बरेच कमी ठरले.
हे विमान ९२ ते १२८ प्रवासी घेऊन आवाजाच्या दुपटीपेक्षा जास्त वेगाने कमाल Mach 2.04 किंवा प्रतीतास २,१८० किमी वेगाने उडत असे. अशी एकूण २० विमाने निर्माण केली गेली. एअर फ्रान्स व ब्रिटिश एअरवेज या केवळ दोनच कंपन्यांनी ही विमाने विकत घेऊन त्यांचा व्यापारी तत्त्वावर उपयोग केला.
या जगावेगळ्या विमानातल्या अनेक खासियतीपैकी काही विशेष अश्या आहेत :
* डेल्टा प्रकारचे (त्रिकोणी) पंख
* या विमानाचे नाक जमिनीवर उतरताना धावपट्टी वैमानिकांना दिसावी यासाठी स्वतंत्रपणे खाली वाकत असे
* आकारमान : ६१.६६ मीटर लांब, २५.६ पंख्यांची रुंदी व १२.२ मीटर उंची
* कमाल Mach 2.04 किंवा १,३५४ किमी प्रतीतास वेग
* कमाल १८,००० मीटर (६०,००० फूट) उंचीवरून प्रवास
* २२,००० लीटर दर तास इंधनाची गरज
* पुर्णकाळ (विमान उडण्यापासून ते उतरेपर्यंत) पूर्ण क्षमतेची स्वयंचलित (hands off) नियंत्रण प्रणाली
* विमानाचे वजन ताब्यात ठेवण्यासाठी बांधणीत केलेला अल्युमिनियमचा लक्षणीय प्रमाणातला उपयोग
* वाढीव सुरक्षेसाठी स्वतंत्र तीन पदरी सुरक्षाप्रणाली व एक अतिरिक्त टर्बाईन
* विमान बनवले त्या काळापुढे असलेली अपवादात्मकरीत्या विकसित असलेली संगणकप्रणाली
वरच्या आणि त्या कालाच्या पुढे असलेल्या इतर अनेक प्रणाली या विमानात होत्या.
या विमानाच्या नावावर उड्डाणाचे अनेक विक्रम असल्यास नवल नव्हते. त्यापैकी काही असे :
* फेब्रुवारी १९९६ मध्ये न्यू यॉर्क (जेएफके) ते लंडन (हिथ्रो) हे अंतर २ तास ५२ मिनिटे व ५९ सेकंदात पार करणे
* फेब्रुवारी १९८५ मध्ये लंडन ते सिडनी हे अंतर (इंधनासाठी घेतलेले थांबे धरून) १७ तास ३ मिनिटे व ४५ सेकंदात पार करणे
* ऑक्टोबर १९९२ मध्ये पश्चिमदिशेने (Westbound) प्रवास करत (इंधनासाठी
घेतलेले सहा थांबे धरून) ३२ तास ४९ मिनिटे व ३ सेकंदात जगप्रदक्षिणा करणे
* ऑगस्ट १९९५ मध्ये पूर्वदिशेने (Eastbound) प्रवास करत (इंधनासाठी घेतलेले
थांबे धरून) ३१ तास २७ मिनिटे व ४९ सेकंदात जगप्रदक्षिणा करणे
काँकॉर्ड ०१ : जमिनीवर उतरताना नाक वळवून खाली केलेले दिसत आहे (जालावरून साभार)
उत्पादनाच्या वाढलेल्या खर्चामुळे व विमान चालविण्यासाठी होणार्या अतिरिक्त खर्चामुळे या विमानाचे तिकीट खूप महाग होते. लंडन-न्यू यॉर्क मार्गावर सर्वसाधारणपणे याच्या एका दिशेच्या तिकिटाची किंमत £४,३५० व येण्याजाण्याच्या तिकिटाची किंमत £८,२९२ होती. त्यामुळे, उच्चपदस्थ राजकारणी, श्रीमंत उद्योजक, सिनेमा-संगीत जगतातले तारे, गर्भश्रीमंत लोक, इत्यादींनाच त्याने प्रवास करणे परवडत असे. अर्थातच, काँकॉर्डने प्रवास करणे हा "श्रीमंतांचा खेळ" आहे असा सर्वसामान्यांचा सकारण ग्रह झाला होता. इतके असूनही या विमानांचा वापर फायदेशीर ठरला नाही तो नाहीच.
सुरुवातीचे कुतूहल ओसरल्यावर; फार महागड्या तिकिटांमुळे घटणार्या प्रवाशांच्या संखेमुळे, स्वनातीत वेग गाठताना होणार्या तीव्र आवाजाबद्दलच्या (सॉनिक बुम) पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींमुळे आणि वापराच्या शेवटच्या काळात (इ स २०००) झालेल्या काही अपघातांमुळे ही सर्व विमाने व्यापारी सेवेतून निवृत्त केली गेली. असे असले तरीही पॉल जेम्सच्या नेतृत्वाखालील क्लब काँकॉर्ड ही काँकॉर्डप्रेमी संस्था स्वस्थ बसलेली नाही. तिने आतापर्यंत £१६ कोटी जमा केले आहेत व काँकॉर्डच्या पहिल्या भरारीच्या सुवर्णजयंतीच्या मुहूर्तावर २०१९ मध्ये काँकॉर्ड विमानसेवा परत सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
इंट्रेपिड संग्रहालयात पियर ८६ वर उभे असलेले "काँकॉर्ड अल्फा डेल्टा जी-बीओएडी (serial no. 100-010)" हे ब्रिटिश विमानकंपनीच्या सेवेतून निवृत्त झालेले व संग्रहालयाला कर्जाऊ मिळालेले विमान आहे. त्याच्या नावावर खालील जागतिक विक्रम नोंदवलेले आहेत :
१. याने फेब्रुवारी १९९६ मध्ये न्यू यॉर्क (जे एफ के) ते लंडन (हिथ्रो) हे अंतर २ तास ५२ मिनिटे व ५९ सेकंदात पार केले आहे. ही वेळ आजच्या कोणत्याही आधुनिक विमानाला लागणार्या वेळेच्या निम्म्यापेक्षा कमी आहे !
२. याने इतर कोणत्याही काँकॉर्ड विमानापेक्षा जास्त, एकूण २३,३९७ किमी चा, हवाई प्रवास केला आहे.
चला तर बघू या हे विक्रमी काँकॉर्ड विमान.
सहलीच्या सुरुवातीला मार्गदर्शकाने दिलेल्या माहितीनंतर आम्ही विमानाच्या दिशेने निघालो...
काँकॉर्ड ०२ : विमानाकडे प्रस्थान
काँकॉर्ड ०३ : विमानाकडे प्रस्थान
काँकॉर्ड ०४ : विमानाच्या जवळ
सर्वांना हे विमान त्याच्या खालून व सर्व बाजूंनी फिरून बघता येते. केवळ खास सहल घेतलेल्या पर्यटकांना विमानाशेजारचा कायमस्वरूपी जिना वापरून मार्गदर्शकाबरोबर विमानाच्या आत जाता येते. आतमध्ये आम्हाला विमानाच्या खुर्च्यांवर आरामात बसवून मार्गदर्शकाने विमानासंबंधीच्या अनेक खास गोष्टी मनोरंजक व विनोदी पद्धतीने सांगितल्या...
काँकॉर्ड ०५ : विमानाच्या आत बसून माहिती ऐकताना
काँकॉर्ड ०६ : विमानाच्या आत फिरताना
आताच्या अजस्त्र विमानांची सवय झालेल्या डोळ्यांना, हे प्रत्येक बाजूला असलेल्या दोन आसनांच्या रांगांच्या मधोमध एकच आईल (aisle) असलेले विमान, काहीसे BAC111 विमानासारखे, बरेच छोटे दिसते. त्याची आसनेही जराशी लहानच वाटतात.
मार्गदर्शकाने माहिती सांगून झाल्यावर सर्व विमान आरामात फिरून बघता आले. नंतर एकदोघांच्या गटाने जाऊन विमानाचे कॉकपिटही आतमध्ये जाऊन बघायला मिळाले. तिथे असलेल्या अक्षरशः शेकड्यांनी असलेल्या विविध मापनयंत्रणा पाहून चक्रायला झाले...
काँकॉर्ड ०७ : विमानाचे कॉकपिट
कॉकपिटमधील मुख्य व सहाय्यक वैमानिकांच्या खुर्च्यांवर बसायची परवानगी नाही. पण तेथे असलेल्या फ्लाईट इंजिनियरच्या तिसर्या खुर्चीवर बसायला हरकत नाही असे मार्गदर्शकाने सांगितले. अर्थातच त्या खुर्चीवर बसून फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही यात आश्चर्य ते काय !...
काँकॉर्ड ०८ : काँकॉर्डच्या फ्लाईट इंजिनियरच्या आसनावर बसण्याची संधी
फार पूर्वीपासून ऐकत आलेल्या आणि मनामध्ये खूप आकर्षण असलेल्या काँकॉर्डच्या आत फिरून आल्याने मन प्रफुल्लित झाले होते.
विमान पाहून खाली उतरल्यावर ध्यानात आले की विमानाच्या बाजूला एकदोन मिनी-रेस्तराँ होती आणि खाण्याचे पदार्थ व पेये मिळणार्या डिस्पेन्सर्सची रांगही होती. तेथून खाण्याचे पदार्थ व पेये घेऊन लोक विमानाच्या पोटाखाली आणि आजूबाजूला मांडलेल्या खुर्च्या-टेबलावर बसून त्यांचा आस्वाद घेत होते...
काँकॉर्ड ०९ : विमानाच्या बाजूचे टपरी रेस्तराँ आणि 'फूड अँड ड्रिंक डिस्पेन्सर्स'ची रांग
काँकॉर्ड १० : काँकॉर्डच्या पोटाखाली बसण्याची जागा ०१
काँकॉर्ड ११ : काँकॉर्डच्या पोटाखाली बसण्याची जागा ०२
ही जेवणासाठी बसण्याची व्यवस्था इतकी अनवट होती की आम्हीही इतर लोकांत सामील होऊन तेथेच पोटोबा करून घेतला...
काँकॉर्ड १२ : काँकॉर्डच्या पोटाखालचा पोटोबा
हा स्वनातीत विमानाच्या पोटाखाली त्याच्या सावलीत केलेला जगावेगळा
पोटोबा निश्चितच मनोरंजक वाटला ! शरीरात इंधन भरून झाले आणि आरामही करून
झाला. ताजेतवाने होऊन आम्ही एन्टरप्राइज अवकाशयानाच्या सहलीला निघालो.
एन्टरप्राइज अवकाशयान (Space Shuttle Enterprise)
एन्टरप्राइज अवकाशयान (Space Shuttle Enterprise किंवा Orbiter Vehicle Designation: OV-101) पुनर्वापर होऊ शकणार्या अवकाशयानांच्या साखळीतला पहिला दुवा आहे. या यानाच्या बांधणीची सुरुवात त्याला अवकाशात पाठवण्याच्या हेतूने सुरू झाली होती. त्याचा मूळ सांगाडा १९७६ साली तयार झाला. त्याचे इंजिन व तापमान कवच (हीट शील्ड) बसविण्याआधी, त्याला बोईंग७४७ विमानाच्या पाठीवरून उंचावर नेऊन तेथून पृथ्वीच्या वातावरणातील सोडून अवकाशयानांसाठीच्या चांचण्यांकरिता वापरले गेले. त्याच सुमारास त्याच्या पुढची अवकाशयानमालेतील कडी असलेल्या कोलंबिया अवकाशयानाच्या संरचनेचे नवीन तपशील (स्पेसिफिकेशन्स) नक्की केले गेले. ते तपशील चॅलेंजर या अवकाशायानसाखळीत त्यापुढे असलेल्या प्रायोगिक अवकाशयानात सुधारणा करून वापरणे जास्त सहज व कमी खर्चाचे आहे असे दिसले. त्यामुळे एन्टरप्राइज प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला गेला. कोलंबिया अवकाशयान दुर्घटनेत नष्ट झाल्यावर परत एकदा एन्टरप्राइज प्रकल्पाला पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न झाला होता. पण, काही कारणांनी तो प्रयत्न मागे पडून एन्टरप्राइजचे सुटे भाग वापरून एंडेव्हर हे नवीन अवकाशयान बांधण्यात आले. अश्या रितीने एन्टरप्राइज बाह्यरूपात पूर्ण अवकाशयान दिसत असले तरी ते इंजिन व तापमान कवच बसवून अवकाशप्रवासयोग्य बनवले गेले नाही.
एन्टरप्राइजने जरी एकदाही अवकाशप्रवास केला नसला तरीही अवकाशयुग वास्तविकतेत उतरण्यासाठी त्याने दिलेले प्रायोगिक योगदान नि:संशय उच्च प्रतीचे आहे, आणि त्यासाठीच ते नासाचे आणि एकूणच जागतिक अवकाशप्रवासप्रेमी लोकांचे लाडके अवकाशयान आहे.
२००३ साली एन्टरप्राइजची डागडुजी करून त्याचे स्मिथसोनियन इंस्टिट्यूटच्या वर्जिनिया येथील Udvar-Hazy Center मध्ये प्रदर्शन केले गेले. डिस्कव्हरी आकाशयान निवृत्त झाल्यावर त्याने एन्टरप्राइजची जागा घेतली व २०१२ मध्ये एन्टरप्राइजला इंट्रेपिड संग्रहालयात हलवले गेले. या अजस्त्र यानासाठी जागा मोकळी करण्यासाठी इंट्रेपिडवरची तीन विमाने शेनेक्टेडी (न्यू यॉर्क राज्य) येथील एरोस्पेस संग्रहालयात हलवावी लागली.
या यानाच्या सुरक्षेसाठी इंट्रेपिड नौकेच्या फ्लाईट डेकच्या एका टोकाला एक भले मोठे दालन बनवले आहे. या दालनात एन्टरप्राइजबरोबरच, नासाने बनवलेला प्रायोगिक अवकाशयानांपैकी एक नमुना (prototype), अवकाशसफरींमध्ये भाग घेतलेल्या यानांतील वस्तू, प्रकाशचित्रे, चलतचित्रे, ध्वनिफिती, इत्यादी गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना अवकाशसफरींच्या एका कालखंडाची सुंदर ओळख होते...
एन्टरप्राइज अवकाशयान दालन
या दालनात प्रवेश केल्यावर प्रवेशद्वाराजवळच आपल्याला मिशन कंट्रोल आणि अवकाशवीरांमधील संभाषणाची खरीखुरी ध्वनिफीत ऐकू येऊ लागते. यानाच्या आजूबाजूला ठेवलेल्या प्रदर्शनिय वस्तूंमधून आपल्याला अवकाशयानाच्या जडणघडणीसंबंधी आणि अवकाशयान प्रकल्पाच्या इतिहासाची व भविष्यातल्या प्रकल्पांची तोंडओळख होते. स्टेशनलाईफ नावाच्या एका प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर चाललेल्या घटनांची तत्कालिक (लाइव्ह) माहिती, तत्कालिक बातम्या व आपल्या भेटीच्या वेळी अवकाश केंद्रावर असलेल्या अवकाशवीरांचे चालू असलेले तत्कालिक (लाइव्ह) ट्विटर संभाषण पहायला मिळते.
एन्टरप्राइज अवकाशयान ०१ : प्रथमदर्शन
दालनाच्या मध्यभागी मुख्य आकर्षण, "एन्टरप्राइज अवकाशयान", ठेवलेले आहे. उंचावरून त्याच्या भोवती फिरून नीट पाहता यावे यासाठी त्याच्या चहुबाजूला उंच प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. तरीही हे प्रचंड अवकाशयान एका फोटोच्या पकडीत आणण्यासाठी बरेच प्रयोग करावे लागतात !...
एन्टरप्राइज अवकाशयान ०२
एन्टरप्राइज अवकाशयान ०३
खास सहलीचे तिकीट काढले म्हणून तरी यानाच्या आतमध्ये एक चक्कर मारू देतील असे वाटले होते. पण त्या वाईट्ट वाईट्ट लोकांनी तेवढी मानसिक उदारी दाखवली नाही :(
अवकाशयानाचे तापमानविरोधक कवच हजारो डिग्री सेल्सियसचे तापमान रोखून धरू शकते, पण जराश्या जास्त वजनाने (उदा : माणसाने त्यावरून चालणे, हातोडीसारख्या हत्याराचा एखादा ठोका, इ) त्याला इजा होऊ शकते, हे दाखविण्यासाठी तशी इजा झालेले तापमानविरोधक कवचाचे तुकडे (टाइल्स) यानावर चिकटवलेले आहेत...
एन्टरप्राइज अवकाशयान ०४ : वजनाने इजा झालेले तापमानविरोधक कवच
गॅलिलिओ प्रायोगिक अवकाशयान
नासाने बनवलेल्या प्रायोगिक अवकाशयानांपैकी एक नमुना (prototype) : गॅलिलिओ
या दालनात फिरताना लोकप्रिय "स्टार ट्रेक एन्टरप्राइज"ची आठवण होणे स्वाभाविक आहे. कारण एन्टरप्राइज प्रकल्पातील आणि एकंदर अमेरिकन अवकाशयान प्रकल्पांतील अनेक नावे स्टार ट्रेक या अत्यंत प्रसिद्ध झालेल्या टीव्ही व चलतचित्र मालिकांतूनच उचललेली आहेत !
सोयुझ टीएमए-६
याच दालनात सोयुझ टीएमए-६ (Soyuz TMA-6) ही अवकाशकुपी (space capsule) ठेवलेली आहे. सोयुझ एफजी या रशियन रॉकेटच्या साहाय्याने उडवलेल्या या छोट्याश्या अवकाशयानाने १७ एप्रिल २००५ ला सेर्गेई क्रिकालेव (फ्लाईट कमांडर, रॉकेट शास्त्रज्ञ, रशिया), जॉन फिलिप्स (फ्लाईट इंजिनियर, नासा, अमेरिका) आणि रॉबर्टो वित्तोरी (फ्लाईट इंजिनियर, इटॅलियन एअर फोर्स, इटली) या तीन अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर (International Space Station किंवा ISS) नेले होते व ११ ऑक्टोबर २००५ ला परत आणले होते.
७ फूट उंच आणि ७ फूट रुंद आकाराची ही अवकाशकुपी पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना हवेबरोबर झालेल्या घर्षणामुळे तिचे बाहेरचे आवरण चांगलेच भाजून निघाले आहे.
सोयुझ टीएमए-६ : जमिनीवर उतरलेल्या सोयुझ यानातून आवकाशवीरांना बाहेर काढताना (जालावरून साभार)
या अवकाशकुपीबाबतचा महत्त्वाचा तांत्रीक मुद्दा असा की ती पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरत असे. जगातला पहिला अवकाशप्रवासी युरी गागरीन सोयुझ कुपीतूनच अवकाशात गेला होता व परतताना पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरला होता. रशियाचे हे पॅराशूटच्या साहाय्याने अवकाशयान जमिनीवर उतरवण्याचे तंत्र अमेरिकन शास्त्रज्ञांना जमले नाही. जमिनीवर विमानाप्रमाणे उतरणारी पुनर्वापरयोग्य याने (शटल्स) तयार करेपर्यंत सर्व अमेरिकन अवकाशयाने समुद्रात डुबकी मारत असत.
रशियन संघराज्याचे (USSR) विभाजन झाल्यानंतर पैशाची चणचण निर्माण झाल्यामुळे रशियन अवकाशसंस्थेने ही कुपी वापरून सशुल्क खाजगी अवकाशसहली आयोजित केल्या होत्या. ही कुपी वापरून ग्रेग ओलसन याने अशीच एक सहल केली होती. ही कुपी निवृत्त केली गेल्यावर ग्रेगने तिला खरेदी केले. त्याच्या मालकीची ही कुपी त्याने इंट्रेपिड संग्रहालयाला केवळ प्रदर्शित करण्यासाठीच दिलेली आहे.
ही कुपी व एन्टरप्राइज यांच्या आकारमानातला प्रचंड फरक थक्क करणारा आहे...
सोयुझ टीएमए-६ : इंट्रेपिड संग्रहालयातील सोयुझ टीएमए-६ यानकुपी
सोयुझ टीएमए-६ : सोयुझ यानातल्या इतर सामानामध्ये दाटीवाटीने बसलेले अवकाशवीर (जालावरून साभार)
युरी गागारीनने १२ एप्रिल १९६१ ला अवकाशात भरारी मारल्याची बातमी
वाचल्यापासून त्याचे आणि सोयुझचे नाव मनात कोरले गेले होते. मानवाचे
अवकाशप्रवासाचेस्वप्न प्रथमतः प्रत्यक्षात आणणार्या त्या सोयुझकुपीला याची
देही याची डोळा पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून आली होती !
USS ग्रोवलर अण्वस्त्रसज्ज पाणबुडी
अवकाशातून निघून आम्ही एकदम विरुद्ध दिशेची पुढची सफर करण्यासाठी, म्हणजे '२० लीग्ज अंदर द सी' किंबहुना त्यापेक्षा जास्त खोलवर पाण्यात बुडी मारू शकणार्या USS ग्रोवलर पाणबुडीच्या दिशेने चालू लागलो.
ही ग्रेबॅक क्लास (Grayback class) प्रकारची ९६.९ मीटर लांबीची व जास्तीत जास्त ८.२ मीटर रुंद असलेली पाणबुडी ९ अधिकारी व ७८ नौसैनिकांसह कार्यरत असे. अमेरिकन नौदलातील अण्वस्त्राने सज्ज असलेले क्रूझ मिसाइल वाहून नेणार्या (nuclear armament deployed cruise missile submarine) व डिझेल-इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या केवळ दोन पाणबुड्यांपैकी ही एक होती. १९५८ ते १९६४ या शीतयुद्धाच्या काळात या हिच्याकडे प्रशांत महासागरात रशियाविरुद्ध अण्वस्त्रनिरोधक क्षमता (nuclear deterrent capability) पुरविण्याची कामगिरी सोपवलेली होती.
अणुशक्तीवर चालणारे इंजिन असलेल्या अधिक परिणामकारक अण्वस्त्रधारी पाणबुड्या वापरात आल्यावर अर्थातच या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडीची गरज कमी झाली. ०१ ऑगस्ट १९८० ला या पाणबुडीला निवृत्ती मिळाली व तिचा उपयोग टॉर्पेडोंच्या सरावासाठी निशाण म्हणून करायचे ठरले. मात्र नंतर हा निर्णय बदलून १९८८ मध्ये अमेरिकन काँग्रेसच्या एका ठरावाने तिला तिच्यावरील रेग्युलस नावाच्या अण्वस्त्राच्या बाह्यआवरणासह इंट्रेपिड संग्रहालयाला भेट देण्यात आले.
पाणबुडीत शिरण्याच्या अगोदरच रेग्युलस अण्वस्त्रधारी क्रूझ क्षेपणास्त्र आपले स्वागत करते...
USS ग्रोवलर ०१ : रेग्युलस अण्वस्त्रधारी क्रूझ क्षेपणास्त्र
USS ग्रोवलर ०२ : बाह्यदर्शन
पाणबुडीत शिरल्यावर लगेचच तिच्यातल्या नौसैनिकांना किती कमी जागेत आपले नेहमीचे व्यवहार आणि युद्धकाळाच्या कामगिर्या पार पाडाव्या लागत असत याची कल्पना येऊ लागते...
USS ग्रोवलर ०३ : अंतर्भाग
अमेरिकन क्रूझ मिसाइल वाहून नेणारी हीच एकुलती एक पाणबुडी लोकांना पाहण्यासाठी खुली केली गेली आहे. त्यामुळे, याच एका जागी अमेरिकन टॉप सीक्रेट असलेले क्षेपणास्त्र आदेश केंद्र (missile command center) जनतेला जवळून पाहायला मिळते. तीन आसने असलेल्या कंट्रोल रूम व अटॅक सेंटरमधील पेरिस्कोप वापरून पाण्याच्या वर काय चालले आहे याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पाणबुडीच्या मार्गक्रमणाची दिशा, वेग, किती खोलवरून जायचे इत्यादीसंबंधीचे निर्णय घेतले जात असत...
USS ग्रोवलर ०४ : कंट्रोल रूम व अटॅक सेंटर
या पाणबुडीत एकूण ४ रेग्युलस-एक (Regulus I) व २ रेग्युलस-दोन (Regulus II) अण्वस्त्रे सज्ज असत. याशिवाय स्वसंरक्षणासाठी एकूण ८ टॉर्पेडो असत. मिसाइल चेकआऊट व गायडन्स सेंटरमध्ये क्षेपणास्त्रांची युद्धसज्जता व क्षेपणास्त्र सोडल्यावर त्याला लक्षापर्यंत पोचेपर्यंत किंवा दुसर्या कोणत्या यंत्रणेच्या (उदाहरणार्थ उपग्रह) ताब्यात देईपर्यंत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी होती...
USS ग्रोवलर ०५ : मिसाइल चेकआऊट व गायडन्स सेंटर
एका चिंचोळ्या जागेतला चिमुकला मुदपाकखाना पाणबुडीत काम करणार्या सर्वांची (९ अधिकारी व ७८ नौसैनिक) खानपानाची व्यवस्था पाहत असे. त्याच्या शेजारच्या जागेत नौसैनिकांच्या व अधिकार्यांच्या जेवण्याच्या तसेच मनोरंजनासाठी खेळ खेळण्याची व चलतचित्रपट पाहण्याच्या जागा होत्या...
USS ग्रोवलर ०६ : मुदपाकखाना
USS ग्रोवलर ०७ : नौसैनिकांच्या जेवणाची व मनोरंजनाची जागा
USS ग्रोवलर ०८ : अधिकार्यांच्या जेवणाची व मनोरंजनाची जागा (बोर्डरूम)
थोडे पुढे अधिकार्यांच्या झोपण्याची जागा होती व तेथे त्यांना बसण्यासाठी एक समाईक खुर्ची होती. त्याच्या जवळच त्यांचे ऑफिस होते...
USS ग्रोवलर ०९ : अधिकार्यांच्या झोपण्याच्या जागा व ऑफिस
त्यामानाने या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या पाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरसाठी एका अंदाजे ७X४ फूट आकाराच्या स्वतंत्र जागेत झोपायला गादी, फोन व वॉशबेसिन अशी "राजेशाही" व्यवस्था दिसली !...
USS ग्रोवलर १० : पाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरची राहण्याची जागा
पुढे रेडिओ रूम होती. येथून पाणबुडी बाह्यजगाशी संपर्क राखत असे...
USS ग्रोवलर ११ : रेडिओ रूम
चिंचोळ्या जागेतून पुढे पुढे जात असताना अधून मधून जेथे जागा मिळेल तिथे नौसैनिकांची झोपायची व्यवस्था (बंकर्स) केलेली दिसत होती. एका ठिकाणी नौसैनिकांसाठी असलेले स्वच्छतागृह दिसले...
USS ग्रोवलर १२ : नौसैनिकांचे बंकर्स आणि स्वच्छतागृह
ग्रोवलरमध्ये पुढच्या (बो) आणि मागच्या (स्टर्न) टोकाला प्रत्येकी एक अश्या दोन टॉर्पेडो रूम आहेत. इथले पुढचे ६ व मागचे २ टॉरपेडो स्वसंरक्षणासाठी वापरण्यासाठी होते. प्रत्येक टॉरपेडो रूममध्ये नऊ नौसैनिकांच्या झोपण्याची व्यवस्था (बंकर्स) होती...
USS ग्रोवलर १३ : टोर्पेडोने सज्ज टोर्पेडो रूम
पाणबुडीतून बाहेर पडलो आणि तिचे परत एकदा डोळेभरून दर्शन घेतले...
USS ग्रोवलर १४ : निरोप घेतानाचे दर्शन
पियरवरून बाहेर येऊन रस्ता ओलांडल्यावर भव्य इंट्रेपिड विमानवाहक नौका आणि तिच्यावरच्या विमानांकडे मागे वळून नजर गेलीच...
विमानवाहू नौका, मोठ्या कालखंडातील अनेक लढाऊ विमाने, स्वनातीत हेरगिरी करणारे विमान, स्वनातीत व्यापारी वाहतूक करणारे विमान, पुनर्वापर होणार्या अवकाशयानशृंखलेतील पहिली कडी असणारे अवकाशयान आणि अण्वस्त्रसज्ज क्रूझ क्षेपणास्त्र घेऊन काम केलेली पाणबुडी अशी आजवर केवळ चित्रांत, टीव्ही किंवा चित्रपटगृहांत पाहिलेली आधुनिक जगातील सामर्थ्यवान आश्चर्ये पाहिली होती. आज घरी परतताना मनात एक खास समाधान होते.
(क्रमशः )
संक्षिप्त पार्कायण
न्यू यॉर्क शहरांत अनेक पार्क्स आहेत हे माहीत होते, पण ते इतक्या संखेने असतील, (सेंट्रल पार्कचा अपवाद वगळता) ते इतक्या मोठ्या आकारांचे असतील आणि त्यांची इतक्या उत्तम प्रकारे निगा राखली जात असेल असे वाटले नव्हते. हे पार्क्स पाहिले की आपली "पार्क = फुलझाडे आणि हिरवळ असलेली सार्वजनिक बाग" हे समीकरण चुकीचे आहे हे कळते.
पार्कची अमेरिकन व्याख्या साधारणपणे, "जनतेला मोकळेपणाने मनोरंजनासाठी वापरण्यासाठी राखीव ठेवलेली सार्वजनिक जागा" अशी आहे. पण, ती तिथेच न थांबता, "खेळाची मैदाने, बागबगीचे, हिरवळी, पिकनिक स्पॉट्स, रेस्तराँ, रेस्टरूम्स, इत्यादी उत्तम अवस्थेतल्या सोयींनाही" सामावून घेते. अनेक दशएकरांच्या आकाराच्या मोठ्या पार्क्समध्ये रमत गमत चालण्यासाठी, धावण्यासाठी वा हायकिंग करण्यासाठी खास पायवाटा (ट्रॅक्स) बनवलेल्या असतात. छोटे बगिचे तर सर्वच पार्क्समध्ये असतात, पण काही मोठ्या पार्क्समध्ये विशिष्ट हेतूंनी बनवलेल्या फुलबागा, संग्रहालये व इतर वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणे असतात. नौकानयनाच्या व्यवस्थेसह तलाव व पार्कच्या अंतर्गत रस्त्यांवरून घोड्याच्या बग्गीतून सफर करणे अश्या मनोरंजक व्यवस्थाही काही पार्कमध्ये आहेत.
एकट्या न्यू यॉर्क शहरात २०० पेक्षा मोठे पार्क्स आहेत (त्यांची यादी येथे मिळेल) आणि छोट्या आकाराचे पार्क्स तर दर २००-२५० मीटरवर आहेत. यातल्या बर्याच पार्क्सचे क्षेत्रफळ एकरांत नाही तर चौ किमी मध्ये मोजली जाते ! इथला आकाराने सर्वात मोठा पेलहॅम बे पार्क ११.१९ चौ किमी आकाराचा आहे तर दहाव्या क्रमांकाचा २.५८ चौ किमी आकाराचा आहे. काही पार्क्सची जागा म्हणजे शहर वेगाने वाढत असतानाही बांधकामाच्या आक्रमणापासून मुक्त ठेवलेले आणि शतकांपूर्वी असलेली जंगले कायम राखलेले भूभाग आहेत. गर्दीच्या रस्त्यावरच्या एखाद्या पार्कच्या प्रवेशद्वारातून आत शिरावे आणि १५-२० मीटरवर जंगलसदृश्य भागाला सुरुवात व्हावी, असे आश्चर्य बघायला मिळणे इथे सहज शक्य आहे !
या महानगराचे नियोजन करताना इतके मोठे जमिनीचे पट्टे, बिल्डर लॉबीच्या आक्रमणापासून संरक्षित करून, त्याचे उत्तम रितीने विकसन करून, नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण करून, त्यांचे दशकानुदशके जतन करून ठेवले आहे, यावर पार्क्स प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसणे कठीण आहे.
शहरांतल्या पार्क्सची देखभाल सरकार, नागरिकांची संघटना किंवा खाजगी संस्था यापैकी कोणीही एक किंवा अनेकजण करू शकतात. बहुतेक सर्व पार्क्सच्या विकासात आणि रोजच्या व्यवस्थापनात त्याच्या परिसरातल्या नागरिक संघटनांचा लक्षणीय सहभाग असतो. पार्कमध्ये सतत बरेच मनोरंजक व समाजोपयोगी कार्यक्रम / प्रकल्प चालू असतात. अश्या कार्यक्रमांमध्ये, उत्साही नागरिकांबरोबरच परिसरातल्या अनुभवी तज्ज्ञांचा सहभाग असल्याचे पार्क्सच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या माहितीपत्रकांवरून सहज कळून येतो. "येत्या रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत बागेतील फुलझाडांची माहिती देण्यासाठी (परिसरांत राहणारा/र्या अथवा परिसरांतल्या कॉलेजमध्ये काम करणारा/र्या) अमुक अमुक बोटॅनिस्ट येणार आहेत. लहान मुलांसकट सर्व वयांच्या नागरिकांचे स्वागत आहे." किंवा "येत्या शनिवारी संध्याकाळी ६ ते ८ अमुक अमुक कलासंघ पार्कमधील उघड्या मंचावर संगीताचा विनाशुल्क कार्यक्रम सादर करणार आहे. सर्वांचे स्वागत." किंवा योग, चित्रकला, इत्यादी, इत्यादी विनाशुल्क शैक्षणिक व मनोरंजक कार्यक्रमांच्या माहितीपत्रकांनी भरून गेलेला प्रवेशद्वाराजवळचा माहितीफलक पाहणे विरळ नाही. केवळ पार्कसाठी निधी गोळा करणारे कार्यक्रम सशुल्क असतात.
इथल्या पार्क्स किंवा संग्रहालयांत तिकिटाच्या खिडकीवरचे काम करणारे मार्गदर्शक, सुरक्षारक्षक, इत्यादींमध्ये इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप करणारी शाळाकॉलेजातील मुले नेहमी दिसतात. ही कामे ते विनावेतन किंवा जुजुबी वेतनावर करतात. काही ठिकाणावरच्या अश्या कामाचे त्यांना शिक्षणसंस्थेकडून अथवा नोकरीचा अर्ज करताना क्रेडिट मिळू शकते. अश्या रितीने पार्क किंवा इतर सार्वजनिक संस्थांत काम करण्याने तरुणाईत "पडेल ते काम करण्याची तयारी आणि स्वावलंबनाची सवय" रुजते. शहरभर असणार्या अनेक ठिकाणी अनेक तरुण/तरुणींना मन लावून असे काम करताना पाहून "हे काम माझ्या लायकीचे नाही" असा दंभ सतत पाहणार्या भारतीयाला काहीसा धक्का बसला तर नवल नाही ! गरीब देशाच्या नागरिकापेक्षा श्रीमंत देशातल्या नागरिकाला "श्रमाचे महत्त्व" जास्त चांगले कळले आहे, हा वर वर विरोधाभास वाटत असला तरी ते देशादेशांतील "मानवी स्वभावाचे आणि म्हणूनच प्रगतीतील फरकाचे" गमक आहे असे मला वाटते. असो.
फोर्ट ट्रायॉन पार्क
आम्ही राहत असलेली फोर्ट ट्रायॉन गार्डन्स ही सहकारी गृहसंस्था हडसन हाईट्स या मॅनहॅटन बेटाच्या उत्तर भागात होती. या जागेपासून दोन एक किलोमीटरच्या परिघात फोर्ट ट्रायॉन पार्क (६६.५ एकर किंवा २६.९ हेक्टर) व इनवूड्स पार्क (१९६.४ एकर किंवा ७९.५ हेक्टर) हे दोन मोठे आणि पाच मध्यम ते छोट्या आकाराचे पार्क होते. ही सर्व माहिती मुलाने अमेरिकेत पोचण्यापूर्वी फोनवर सांगितली होती. पण पारक म्हणजे काय याचा खरा अर्थ तेथे राहायला लागल्यावर व त्या पार्क्सना भेटी दिल्यावरच कळला.
यातल्या फोर्ट ट्रायॉन पार्कची हद्द तर आमच्या इमारतीला लागून असलेला बेनेट अॅव्हन्यूच्या लगेच पलिकडे सुरू होत होती. त्यामुळे, ज्या दिवशी आमचा मोठ्या भटकंतीचा बेत नसे तेव्हा या पार्कमध्ये संध्याकाळची (आणि कधी कधी सकाळीही) रपेट मारणे हा नित्यक्रम झाला होता. या फेरफटक्यांत पार्कच्या अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध खासियतीची आश्चर्यकारक आणि सुखद ओळख झाली. अर्थातच, या पार्कबद्दल खास ममत्व निर्माण झाले. या पार्कमुळे आमचे तेथील वास्तव्य अविस्मरणीय झाले असे म्हटले तर ते योग्यच होईल.
६७ एकर (२७ हेक्टर) क्षेत्रफळाचा हा पार्क मॅनहॅटनच्या उत्तर टोकाजवळ हडसन हाईट्स या नेबरहूडमध्ये आहे. मॅनहॅटन बेटाच्या चिंचोळ्या उत्तर भागात असलेली लांबोळकी टेकडी व तिच्यावर असलेली फोर्ट ट्रायॉन नावाची ऐतिहासिक गढी व आजूबाजूची शेकडो वर्षे वयाच्या जंगलाची जागा मिळेन हा पार्क बनला आहे. याच्या पश्चिम कडेने हडसन नदी वाहते, पूर्वेकडून ब्रॉडवेवरून वाहनांची अथक वाहतूक चालू असते, उत्तरेची हद्द डाइकमन स्ट्रीटने आणि दक्षिणेची हद्द आमच्या इमारतीच्या कडेने जाऊन ब्रॉडवेला मिळणार्या १९० व्या स्ट्रीटने आखलेली आहे....
फोर्ट ट्रायॉन पार्कची जागा आणि त्यातील चारचाकींचे, चालण्याचे व धावण्याचे रस्ते (मूळ नकाशे जालावरून साभार)
स्थानिक लेनापे (Lenape) अमेरिकन इंडियन या परिसराला Chquaesgeck या नावाने ओळखत असत. सतराव्या शतकाच्या शेवटी तेथे आलेले डच वसाहतवादी त्याला 'लांगं बेर्घ (Lange Bergh, लांब टेकडी)' असे म्हणत. याच परिसरात अमेरिकन राज्यक्रांतीचे "फोर्ट वॉशिंगटन युद्ध" लढले गेले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या भागात मोठमोठ्या बागायती वाड्या आणि विरळ वस्ती होती. ब्रिटिश साम्राज्यातील न्यू यॉर्क परगण्याचा शेवटचा राज्यपाल (गव्हर्नर) विल्यम ट्रायॉन (१७२९ - १७८८) याचे नाव फोर्ट ट्रायॉनला दिले गेले.
जॉन डी रॉकंफेलर, ज्युनियर (John D. Rockefeller, Jr) या अमेरिकन समाजसेवकाने (philanthropist) १९१७ सालापासून पार्क निर्माण करण्याच्या उद्द्येशाने इथल्या जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. पार्क बनवण्यामध्ये नामांकित असलेल्या कंपनीकडून हा पार्क बनवून घेऊन त्याने तो १९३१ मध्ये शहराला अर्पण केला. त्यानंतरही १९३५ पर्यंत पार्कचे काम चालू होते.
याशिवाय, रॉकंफेलरने प्रसिद्ध शिल्पकार जॉर्ज ग्रे बर्नार्ड याचा मध्ययुगीन युरोपियन कलाकृतींचा संग्रह खरेदी करून तो Metropolitan Museum of Art (Met, मेट) ला दान केला. मेट ने या पार्कमध्ये मध्ययुगीन बांधणीची इमारत बांधून त्यात हा संग्रह जनतेसाठी १९३९ साली खुला केला. हे "मेट क्लॉइस्टर्स" नावाने प्रसिद्ध असलेले संग्रहालय शहरातले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. या पार्कमधले दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे "हिदर गार्डन". या दोन आकर्षणांना आपण नंतर स्वतंत्रपणे भेट देणार आहोत.
या पार्कला अनेक सन्मान मिळालेले आहेत :
१. ऐतिहासिक जागांच्या सरकारी दप्तरांत (National Register of Historic
Places) "राष्ट्रीय महत्त्वाची ऐतिहासिक जागा" अशी १९७८ मध्ये नोंदणी.
२. १९८३ सालापासून "न्यू यॉर्क शहरातली निसर्गरम्य जागा (New York City Scenic Landmark)" अशी नोंदणी.
३. न्यू यॉर्क शहरातील सर्वात मोठा खुला (unrestricted access) पार्क.
फोर्ट ट्रायॉन पार्क ट्रस्ट (https://www.forttryonparktrust.org/art-in-the-parks.html) नावाची एक ना-फायदा तत्त्वावर चालवली जाणारी नागरिकांची संस्था या पार्कच्या देखभालीचे व रोजच्या व्यवस्थापनाचे काम करते. तिला या कामात 'न्यू यॉर्क पार्क डिपार्टमेंट' व 'ग्रीनएकर्स फाऊंडेशन' मदत करतात. या संस्था योग, ताई ची, संगीत मैफली (live outdoor concerts), पक्षीनिरीक्षण पदयात्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, इत्यादींचे आयोजन करून पार्कसाठी निधी जमवतात. २०१६ मध्ये हा पार्क ८१ वर्षाचा झाला आहे.
***************
न्यू यॉर्कला पोहोचल्याच्या दुसर्या दिवशी सकाळी काही काम नव्हते म्हणून घराच्या आजूबाजूला चक्कर मारावी म्हणून बाहेर पडलो. बेनेट अॅव्हन्यूवरून इमारतीला फेरी मारत तीन-चार मिनिटांत तिच्या दुसर्या बाजूला पोचलो आणि अचानक रस्त्याच्या पलीकडे ब्रॉडवेला लागून असलेल्या या पार्कचे प्रथमदर्शन झाले...
फोर्ट ट्रायॉन पार्कचे प्रथमदर्शन ०१
फोर्ट ट्रायॉन पार्कचे प्रथमदर्शन ०२ व ०३
पार्कमध्ये शिरून दहा मिनिटे चालत राहिल्यावर ध्यानात आले की ही आपल्या कल्पनेतली नेहमीसारखी "बाग" नाही. दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती म्हणून मागे वळून घरी परतताना येथे जरा जास्त वेळ काढून यावे लागेल असाच विचार मनात होता. जेवण वगैरे झाल्यावर जरा आरामात बसून गुगलबाबाला साकडे घातले. पार्कचा आकार आणि त्यातल्या अनेक प्रकारच्या मार्गांची लांबी आणि गुंतागुंत पाहून येथे एक फेरी मारणे पुरे होणार नाही याची खात्री पटली. याशिवाय त्यात अजून दोन महत्त्वाची आकर्षणे असल्याचे समजले. झाले, घराशेजारी असलेल्या या पार्कमध्ये बर्याच फेर्या होणार यावर शिक्कामोर्तब झाले. दर फेरीत हा पार्क आपल्या पोतडीतून नवनवीन नजारे काढून दाखवत राहिला आणि तेथे परत परत चक्कर मारायला जाणे हे 'व्यायाम' किंवा 'पाय मोकळे करणे' न राहता आनंददायक सहलीसारखे झाले.
या पार्कचा बहुतांशा भाग टेकडीने व्यापलेला आहे. तिच्यात अनेक प्रकारच्या खनिजांच्या मिश्रणांनी बनलेल्या ओबडधोबड प्रस्तरांचे वेडेवाकडे स्तर आहेत. या विविधतेमुळे व गेल्या हिमयुगातील हिमनद्यांनी ओढलेल्या ओरखड्यांमुळे त्या प्रस्तरस्तरांना अनेक तडे जाऊन त्यांचे चित्रविचित्र आकार आणि उंचसखल जागा निर्माण झाल्या आहेत. जंगलाला शक्य तेवढे त्याच्या मूळ स्वरूपात राखल्याने पार्कचा बहुतेक भाग घनदाट झाडी-झुडपांनी भरलेला आहे. जागेच्या मूळ नैसर्गिक व ऐतिहासिक वैशिष्ट्यांना धक्का न लावता, किंबहुना त्यांचे सौंदर्य उठून दिसेल अश्या तर्हेने, या पार्कची रचना केलेली आहे.
या पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी रुंद डांबरी रस्त्यापासून ते मातीच्या पायवाटांपर्यंत अनेक प्रकारच्या मार्गांचे जाळे आहे.
मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्ह
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात, १६ नोव्हेंबर १७७६ साली, ४००० ब्रिटिश सैनिकांनी, येथून जवळच असलेल्या फोर्ट वॉशिंग्टनवर हल्ला केला. अमेरिकन सैन्याकडे तुटपुंजे मनुष्यबळ व केवळ दोनच तोफा होत्या. त्यातील एक तोफ चालविणारा मार्गारेटचा नवरा होता. लढाईत तो मृत्युमुखी पडल्यावर मार्गारेटने पुढे होऊन तोफेचा ताबा घेतला. ती लढाई, अर्थातच, ब्रिटिशांनी जिंकली. पण, जबर जखमी झालेल्या मार्गारेटने शौर्याची परिसीमा केली व तिच्या ताब्यातील तोफ सर्वात शेवटपर्यंत धडधडत ठेवली होती. तिच्या या असामान्य शौर्याची खूप प्रशंसा झाली. मार्गारेट कॉर्बिन ही अमेरिकन सैन्याचे निवृत्तिवेतन मिळणारी पहिली स्त्री होती. उत्तर मॅनहॅटनच्या निसर्गरम्य परिसरातल्या वस्तीतून जाणार्या व पार्कमधे काही भाग असलेल्या एका डांबरी रस्त्याचे नाव या शूर स्त्रीच्या स्मरणार्थ "मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्ह" असे ठेवलेले आहे. पार्कमधील या रस्त्याचा भाग मुख्यतः Metropolitan Museum of Art च्या The Cloisters ला (मेट क्लॉइस्टर्स संग्रहालयाला) भेट देणार्या पर्यटकांच्या बसेस व खाजगी गाड्यांसाठी वापरला जातो.
घनदाट झाडीमधून जाणारा मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्ह
या पार्कच्या रचनेत (लॅंडस्केप) अनेक छोटे छोटे दगडी पूल आहेत... काही मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हवरून जाणार्या पायवाटांसाठी बनवलेले आहेत तर काही पायवाटांवरून जाणार्या मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हसाठी बनवलेले आहेत. त्यांच्यामुळे येथील फेरफटका अधिकच चित्ताकर्षक होतो...
मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हवरून जाणारा एक पूल
पायवाटेवरून जाणार्या मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हसाठी बनवलेला एक पूल
पार्कमधील अजून एक पूल
गूगल मॅपची सोय हाताशी नसलेल्या नवख्या माणसाला पार्कमध्ये फेरी मारायला हा रस्ता सर्वोत्तम आहे. कारण दाट झाडीतून जाणार्या वळणावळणाच्या डांबरी आणि मातीच्या पायवाटांच्या भुलभुलैयात शिरल्यावर, चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूला आलेला अनुभव आपल्याला येतो ! विशेषतः संध्याकाळच्या फेरीत असे झाले तर, सावल्याच्या लांबीच्या प्रमाणात हृदयाचे ठोके वाढत जातील ! मात्र, हे जंगल "सॅनिटाईज्ड" आहे, येथे कोणतेही हिंस्र प्राणी (माणूस सोडता ! :) ) नाहीत. हा पार्क अधिकृत रित्या "रात्री १ वाजेपर्यंत खुला आहे" अश्या पाट्या असल्या तरी पार्कच्या कोणत्याही प्रवेशमार्गांना दारे दिसली नाही आणि इतक्या वेळा मारलेल्या फेर्यांमध्ये पार्कमध्ये एकदाही रखवालदार दिसला नाही. असे असूनही पार्कमधल्या झाडाझुडुपांची, रानटी फुलांची किंवा बागेची एकदाही नासधूस झालेली दिसली नाही, हे विशेष !
पायवाटांचे जाळे
या पार्कमध्ये पायवाटांचे गुंतागुंतीचे जाळे पसरलेले आहे. गूगल मॅप सोबतीला घेऊन, दर वेळेस नवनवीन पायवाटा शोधत या पार्कमधे रपेट मारायला खूप मजा आली. पार्कमधिल सर्व डांबरी पायवाटा चालण्या-धावण्यासाठी सुरक्षित व खड्डे मुक्त होत्या. टेकडीच्या कपारीच्या बाजूने असलेल्या पायवाटांना सुरक्षित दगडी कठडे आहेत. मातीचे रस्ते तुडविण्यात आनंद वाटणार्या हायकर्ससाठी डांबरी वाट सोडून जंगलात घुसणारे काही 'हायकर्स डर्ट ट्रॅक' मधून मधून दिसत होते...
पायवाट ०१
पायवाट ०२
पायवाटा ०३ व ०४
डांबरी पायवाटा ०५ व ०६
डांबरी पायवाटा ०७ व ०८
तीव्र उतार असलेल्या पायवाटांवर नागरिकांच्या चालण्याच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी जागोजागी दगडी पायर्या आहेत...
पायवाटेवरच्या दगडी पायर्या ०१
पायवाटांवरच्या दगडी पायर्या ०२ व ०३
या पार्कमधील टेकडी मॅनहॅटन बेटाचा सर्वात उंच भूभाग आहे. या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबोळ्या टेकडीच्या पूर्व व पश्चिम बाजूंच्या कड्यांवर कमी अधिक उंचीवर अनेक पायवाटा तयार केलेल्या आहेत. त्यांच्यावरून चालताना एका बाजूला उंच कडा-कपारी आणि दुसर्या बाजूला परिसरातले वेगवेगळे मनोहर विहंगम देखावे असतात.
टेकडीवरच्या पूर्वेकडील कड्यांवरच्या रस्त्यांवरून चालताना जंगलाच्या झाडीतून मधून मधून ब्रॉडवे डोकावत राहतो आणि त्याच्या पलीकडे असलेल्या शहरातील इमारतींच्या गर्दीचे विहंगम दर्शन होते...
टेकडीवरच्या पूर्वेकडील रस्त्यावरून पायथ्याशी दिसणारा ब्रॉडवे आणि त्या पलीकडील वस्ती
टेकडीवरच्या पूर्वेकडील रस्त्यांवरून दिसणारी इमारतींच्या गर्दीची काही दृश्ये
टेकडीच्या पश्चिमेकडील कड्यांवरच्या रस्त्यांवरून हडसन नदीचे विस्तीर्ण पात्र, तिच्यातून मार्गक्रमण करणार्या बोटी आणि त्याच्या पलीकडे घनदाट जंगलाने भरलेली न्यू जर्सी राज्याची किनारपट्टी दिसते...
टेकडीवरचा पश्चिमेकडील एक रस्ता व त्याच्या पलीकडील हडसन नदी
एका रम्य संध्याकाळी टेकडीवरच्या पश्चिमेकडील एक रस्त्यावरून दिसलेली हडसन नदी
टेकडीवरच्या पश्चिमेकडील रस्त्यावरून दिसणारी काही दृश्ये
पार्कच्या दक्षिणपश्चिमेकडील रस्त्यावरून मॅनहॅटन व न्यू जर्सीला जोडणार्या जॉर्ज वॉशिंगटन पुलाचे मनोहारी दर्शन होते...
पार्कमधून दिसणारा जॉर्ज वॉशिंगटन पूल
पायवाटांवरून जाताना आपल्याला एकाहून एक सरस दृश्ये दिसत राहतात आणि आपल्याला चालण्याचे श्रम विसरायला होते...
पायवाटेवरून जाताना दिसलेले दृश्य ०१
पायवाटेवरून जाताना दिसलेले दृश्य ०२
या अगणित पायवाटांवरच्या निरुद्द्येश भटकंत्यांमध्ये पार्कमधिल अगोदर माहीत नसलेल्या अनेक आकर्षक जागा सापडत राहिल्या. त्यामुळे, फेरफटक्यांची मजा द्विगुणित होत गेली व पार्क परत परत येण्यासाठी सतत खुणावत राहिला. चला तर पार्कमधल्या अजून काही आकर्षणांना आपण भेट देऊया.
लिंडन टेरेस
ज्या गढीवरून या पार्कचे नाव पडले आहे त्या फोर्ट ट्रायॉनचा चौथरा व काही तटबंदी इतकेच अवशेष बाकी राहिले आहेत. त्यांची डागडुजी करून त्याला लिंडन टेरेस हे नाव दिलेले आहे. येथे असलेल्या बाकांवर वसून समोरचा नजारा आरामात पाहता येतो. इथला सूर्यास्त खास असतो. ही जागा सर्वात उंचावर असल्याने येथून हडसन नदी आणि तिच्या पलीकडील किनार्यावर असलेला न्यू जर्सीमधील पॅलिसेड्स पार्कचे विनाअडथळा पॅनोरॅमिक दर्शन होते...
लिंडन टेरेस ०१ : प्रवेशद्वार
लिंडन टेरेस ०२
लिंडन टेरेस ०३
लिंडन टेरेस ०४
हिरवळी
या पार्कमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी व आरामासाठी उत्तम निगा राखलेल्या हिरवळी जागोजागी आहेत. याचा उपयोग लोक सुटीच्या दिवशी पिकनिकसाठी, रोज संध्याकाळी मुलांना बरोबर घेऊन फेरफटका मारण्यासाठी किंवा दुपारी मस्तपैकी ताणून देण्यासाठीही करताना दिसत होते...
पार्कमधील अनेक हिरवळींपैकी काही
पार्कमधली इतर फुलझाडे
खास जागांवर बनवलेल्या गार्डन्सशिवाय या पार्कमध्ये जागोजागी अनेक फुलझाडे आहेत. फिरताना आपल्याला ती सतत दिसत राहतात आणि श्रमपरिहार करत राहतात...
पार्कमधिल बागांव्यतिरिक्त जागांवर फुललेले फुलोरे
मुक्त श्वानांगण (डॉग रन)
या शहरात, जेथे कुत्रे नेण्यास परवानगी आहे अश्या सर्व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा असणे कायद्याने बंधनकारक आहे; नसल्यास तो गुन्हा होतो. या पार्कमध्ये न्यू यॉर्क शहरातील श्वानांसाठी सर्वात मोठे मुक्त मैदान (डॉग रन) आहे. येथे श्वानमंडळी गळ्यातल्या पट्ट्याशिवाय मोकळेपणाने धावू शकतात व मैदानातील इतर श्वानांबरोबर खेळू शकतात...
मुक्त श्वानांगण (डॉग रन) ०१
मुक्त श्वानांगण (डॉग रन) ०२
रेस्तराँ
पार्कच्या एका निसर्गरम्य भागात घनदाट झाडीमध्ये एक पुरातन इमारत आहे. खूप काळ दुर्लक्षित राहिल्यावर १९९५ मध्ये बेट्टं मिडलर या अमेरिकन विविधगुणी तारकेच्या (गायिका, कवयत्री, अभिनेत्री, चित्रपट निर्माती, इ) पुढाकाराने व नावाने स्थापन केलेल्या Bette Midler's New York Restoration Project (NYRP) या प्रकल्पाअंतर्गत या इमारतीचा जीर्णोद्धार केला गेला. सद्या तेथे Coffeed नावाच्या एका स्थानिक रेस्तराँने आपली शाखा उघडली आहे. हे रेस्तराँ त्याच्या उत्पन्नातील काही भाग पार्कच्या परिसरातील धर्मदाय संस्थांना दान करते.
कॉफीड रेस्तराँ ०१ : प्रांगण
कॉफीड रेस्तराँ ०२ : अंतर्भाग (जालावरून साभार)
फोर्ट ट्रायॉन कॉटेज
पार्कच्या दक्षिण टोकाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका सखल भागात असलेली फोर्ट ट्रायॉन कॉटेज ही पुरातन इमारत बराच काळ दुर्लक्षित राहिली होती. नुकताच तिचा जीर्णोद्धार करून तेथे एक छोटे संग्रहालय केले आहे. प्रसंगानुरुप कार्यक्रम करण्यासही या इमारतीचा उपयोग केला जातो.
फोर्ट ट्रायॉन कॉटेज
बिलिंग आर्केड
येथून थोडे पुढे गेले की बिलिंग आर्केड नावाचे ग्रॅनाईटच्या १५.२४ मीटर (५० फूट) उंच कमानी असलेले बांधकाम आहे. पूर्वी येथून नदीशेजारून जाणार्या महामार्गाला जोडणारा रस्ता जात असे. आजकाल, आजूबाजूच्या निसर्गाचा देखावा व नदीकिनार्यावरच्या महामार्गांवरील वाहतुकीची मजा पाहण्यासाठी पर्यटकांना या जागेचा उपयोग होत आहे...
बिलिंग आर्केड ०१
बिलिंग आर्केड ०२
अॅन लोफ्टस क्रीडांगण
बहुतेक सगळ्या पार्क्समध्ये क्रीडांगण असते. या पार्कमध्ये एकच नाही तर उत्तर आणि दक्षिण टोकांना प्रत्येकी एक अशी दोन क्रीडांगणे आहेत. त्यापैकी उत्तरेकडील भवय क्रीडांगणाच्या एका भागाचा फोटो...
अॅन लोफ्टस क्रीडांगण
उघडा रंगमंच
या पार्कच्या उत्तर टोकाला एक मोठा उघडा रंगमंच आहे व तेथे अनेक स्थानिक कलाकारांचे प्रयोग मधून मधून चालू असतात. पार्कसाठी निधी जमविण्यास केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रम बहुतेक विनामूल्य असतात...
फोर्ट ट्रायॉन पार्कमधला उघडा रंगमंच : अमेरिकन स्वातंत्र्यदिवसाच्या (४ जुलै) निमित्ताने चाललेला एक कार्यक्रम
गार्डन्स (बागबगिचे)
या पार्कमध्ये खास प्रकारची फुलझाडे किंवा झाडे लावलेल्या एकूण चार गार्डन्स आहेत :
१. हिदर गार्डन
२. अल्पाईन गार्डन
३. ब्लूम गार्डन
४. विंटर वॉक
इतर ऋतुंमधले फोर्ट ट्रायॉन पार्कचे रुपडे
"न्यू यॉर्क शहरातली निसर्गरम्य जागा" हा पुरस्कार मिळालेली ही जागा आम्हाला उन्हाळ्यात मनसोक्त बघायला, अनुभवायला मिळाली. ही जागा इतर ऋतूंत कशी दिसत असावी याबद्दल उत्सुकता निर्माण झाली तेव्हा थोडेसे जालौत्खनन केल्यावर काही चित्रे मिळाली. त्यातली काही इथे देणे रंजक ठरेल...
पानगळीच्या ऋतूतला फोर्ट ट्रायॉन पार्क (जालावरून साभार)
हिवाळ्यातला फोर्ट ट्रायॉन पार्क (जालावरून साभार)
राहत्या घराशेजारी असलेला हा पार्क म्हणजे न्यू यॉर्क शहराने आम्हाला अनपेक्षितपणे दिलेली भेट होती आणि आम्ही तिचा पुरेपुर उपभोग घेतला ! महानगराच्या भर वस्तीत असे काही अनुभवायला मिळणे केवळ अकल्पनिय होते !
ता क : फोर्ट ट्रायॉन पार्कच्या भूमीवर असल्या तरी "हिदर गार्डन" व "मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय" या दोन जागा आपल्या स्वतःच्या बळावर खास आकर्षणे आहेत. त्यामुळे आपण त्यांना पुढच्या दोन भागांत स्वतंत्रपणे पाहणार आहोत.
(क्रमशः )
फारच भारी प्रकार आहे हा इथे. नुसती पार्क्सच नाहीत तर दोन बिल्डींगच्या मध्ये सुद्धा लहान लहान पार्कस आहेत. म्हणजे अगदी इल्लुशीच जागा पण थोडीशी झाडं, एक लहानसा धबधबा, बसायला बाकडी, एखादं बारिकसं दुकान. दुपारी येईन निवांत बसु शकता. मॅनहॅटनमध्ये तुम्ही आहात आणि वाट भायची वेळ आली तर कधीच तुम्हाला पायर्यांवर किंवा बळंच एखाद्या हॉटेलात शिरावं लागणार नाही. २-५ मिनिटावर अशी सुरेखशी जागा असेलच.
आणि हे सोडुन जी भली मोठी पार्क्स आहेत ती भारतीय मनाला सुखद धक्का! मॅनहॅटन मध्ये सेंट्रल्पार्कने किती जागा घेतली आहे पहा. भारतात तिथे नक्की एखादी बिल्डींगची स्किम काढली असती (ट्रम्पचा डोळा होता म्हणे पार्कवर). पण सेंट्रलपार्क काय किंवा प्रॉस्पेक्ट पार्क काय.. शहरात राहुनही जंगलात गेल्याचा अनुभव हवा असेल तर ह्या पार्क्स मध्ये जावे. मस्त खायला न्यायचं बनवुन, सोबत बेडशीट वगैरे.. पथारी पसरायची मस्त झाडाखाली!
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय
या संग्रहालयाचा फोर्ट ट्रायॉन पार्कच्या माहितीत उल्लेख आला आहेच. त्या पार्कची निर्मिती करत असताना १९२५ मध्ये रॉकंफेलरने जॉर्ज ग्रे बर्नार्ड या अमेरिकन शिल्पकार व संग्राहकाकडून युरोपातल्या मध्ययुगीन इमारतींच्या अवशेषांचा संग्रह विकत घेतला आणि तो 'मेट'ला (Metropolitan Museum of Art) दान केला.
क्लॉइस्टर म्हणजे मठ, चर्च अथवा तत्सम धार्मिक इमारत. मध्ययुगीन युरोपातल्या अश्या इमारतींचे अवशेष व त्या इमारतीतील कलाकुसरीच्या वस्तूंचा समावेश या संग्रहालयात आहे. म्हणून याला क्लॉइस्टर्स असे नाव दिले गेले. या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूसंग्रहाला साजेसे एक स्वतंत्र संग्रहालय बनवून ते १९३८ मध्ये जनतेला खुले केले गेले. यानंतरही या संग्रहालयाला रॉकंफेलर फाउंडेशन व इतर लोकांकडून नवनवीन वस्तू भेट मिळत आहेत. आतापर्यंत एकूण वस्तूंची संख्या २००० पेक्षा जास्त झाली आहे. हे संग्रहालय पाहताना सहजपणे पुण्यातल्या केळकर संग्रहालयाची आठवण आली !
या संग्रहालयाचे नाव खालील महत्त्वाच्या राष्ट्रीय याद्यांत समाविष्ट केले गेले आहे :
१. New York City landmark (१९७४ पासून)
२. Register of Historic Places (१९७८ पासून)
फोर्ट ट्रायॉन पार्कच्या उत्तर टोकाजवळच्या ४ एकर जमिनीवर चार्ल्स कोलन्स या प्रसिद्ध डिझायनरने या अनवट संग्रहाला प्रदर्शित करण्यासाठी त्याला साजेशी वैशिष्ट्यपूर्ण इमारत बांधलेली आहे.
एका सकाळी फोर्ट ट्रायॉन पार्कच्या हिरवाईतून रमत गमत फिरत असताना अचानक एक इमारत समोर आली. खास करून तिच्या वैशिष्ट्यपूर्ण मनोर्याने लक्ष वेधून घेतले...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्रथमदर्शन
कोणतीही पाटी नसल्याने ही जुनाट बांधणीची दिसणारी इमारत बहुदा रिकामी किंवा फारतर पार्कच्या कार्यालयाची असावी असे बाहेरून वाटले वाटले. तरीही कुतूहलाने तिच्या भोवती फेरी मारली. इमारतीच्या आखीवरेखीव फुलझाडांनी शोभीत प्रवेशमार्गाने आणि पार्कमधिल खारूताई रुपी स्वागतिकेने खास स्वागत केल्यावर मात्र अजून पुढे शोध घ्यावासा वाटला...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : स्वागत
एका बाजूला सुंदर कमानी असलेल्या बर्याच खिडक्या आणि एक जुनाट दरवाजा दिसला. खिडक्यांतून इमारतीच्या आत काही लोकांची हालचाल चाललेली दिसली...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्रवेशद्वार
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : दर्शनी भाग
मग आम्हीही अधिक शोध करण्यासाठी आत गेलो. बरीच लांबलचक पडवी पार करून गेल्यावर एक नक्षीदार प्रवेशद्वार लागले...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : स्वागतकक्षाचे नक्षीदार प्रवेशद्वार
आत जाऊन चौकशी केल्यावर शोध लागला की हे मध्ययुगीन युरोपातल्या मठांच्या इमारतींच्या अवशेषांचे व मठातील वस्तूंचे संग्रहालय आहे. मग काय ! अचानक हाती लागलेल्या खजिन्याच्या आस्वाद घ्यायला तिथल्या अप्रेंटिस स्वागतिकाकडे चौकशी केली. त्याने सांगितले की, "इथे प्रवेश शुल्क नाही. तुम्हाला हवे असल्यास दान (डोनेशन) म्हणून कितीही छोटीमोठी रक्कम देऊन किंवा न देताही तुम्ही हे संग्रहालय पाहू शकता". आम्ही दोघांचे २० डॉलर्स भरून संग्रहालयासंबंधीची विनाशुल्क माहितीपत्रके उचलली आणि आत शिरलो.
विशेष माहिती : अमेरिकेतील सर्व सरकारी
संग्रहालयातला प्रवेश विनामूल्य असतो. त्यांच्या जाहिरातींत, पत्रकांत व
जालावर लिहिलेले प्रवेशमुल्य केवळ सूचीत (इंडिकेटेड) असते. पर्यटकांनी ते
मूल्य आपल्या मर्जीने द्यावे, त्यापेक्षा कमीजास्त द्यावे अथवा अजिबात देऊ
नये, असा कायदा आहे. फक्त सीमित कालासाठी (एक आठवडा, एक महिना, इ) आयोजित
केलेल्या खास समयोचित संग्रहांच्या प्रदर्शन विभागांसाठी (सर्व
संग्रहालयासाठी नव्हे) मूल्य घेणे कायदेशीर आहे. परंतू, असे लिखीत स्वरूपात
कोणत्याही माहितीपत्रकात अथवा बोर्डवर लिहिलेले नसल्याने त्याबद्दल
बहुसंख्य पर्यटकांना माहिती नसते. त्यामुळे, संग्रहालये एक प्रकारे
पर्यटकांची फसवणूक करत आहेत असा दावा काही समाजोपयोगी संस्थांनी व सजग
नागरिकांनी अमेरिकन कोर्टात लावला होता. आम्ही अमेरिकेत असताना या खटल्याचा
निकाल लागल्याची बातमी टीव्हीवर पहायला मिळाली. कोर्टाने "नागरिकांचे
म्हणणे खरे आहे; पण तरीही, ना-फायदा तत्त्वावर चालणार्या संग्रहालयांना
रोजचे व्यवस्थापन व विकास यासाठी खर्च करण्यासाठी प्रवेशमुल्यातून मिळणारे
धन आवश्यक असल्यामुळे सद्या चालू असलेली (फसवी ?) व्यवस्था तशीच चालू
ठेवावी" असा निर्णय दिला ! तुमच्या भेटीच्या वेळेस, सरकारी
संग्रहालयाचे प्रवेशमुल्य तुम्हाला जास्त वाटत असल्यास "माहितीपूर्ण चौकशी"
करून ते कमी किंवा माफ करून घेण्याचा वैध प्रयत्न करता येईल ! :)
येथील मुख्य आकर्षण कुक्सा (Benedictine monastery of Saint-Michel-de-Cuxa; इ स ८७८ ते १७९१), बोन्फो (Bonnefort; ११३६ ते १८०७ ), त्री (Trie; १४८४ ते १४९०) आणि सान्त गिल्हेम (Saint-Guilhem; ८०४ ते १६६०) या चार प्राचीन फ्रेंच मठांच्या अवशेषांचे व त्यामधिल वस्तूंचे संग्रह आहेत. चला तर त्याना पहायला.
बागबगिचे
या मुख्य संग्रहांची मांडणी त्यांचा मूळ स्रोत असलेल्या मूळ मठांसारखी केली आहे. मूलभूत रचना मध्यभागी चौकोनी बाग व तिच्या चार बाजूला असलेल्या ओसर्यांनी बनलेल्या चौसोपी जागा अशी आहे. बागांच्या मध्यभागी असलेली वैशिष्ट्यपूर्ण कारंजी आणि त्यांच्या भोवती एकाद्या धार्मिक तत्वानुसार केलेल्या वनस्पतींच्या लागवडीमुळे प्रत्येक बाग आपले वैशिष्ट्य राखून आहे. धार्मिक महत्त्वाच्या वनस्पती; फुलझाडे; आकर्षक आकाराची व रंगांची पाने असलेली झुडुपे; मसाल्याचे पदार्थ; व इतर प्रकारच्या वनस्पती धरून या संग्रहालयातल्या सर्व बागांत एकूण २५० च्या वर प्राचीन वनस्पती आहेत.
कुक्सा या उत्तरपूर्व फ्रान्समधिल मठाचे (मोनास्टरी) अवशेष या संग्रहालयाचे मध्यवर्ती आकर्षण आहे. संग्रहालयाच्या इमारतीचा (प्रथमदर्शनाच्या व दर्शनी भागाच्या चित्रांत दिसणारा) मनोरा याच मठाचा आहे. संग्रहालयाच्या मध्यभागात या मठाच्या जवळ जवळ अर्ध्या इमारतीची मूळ स्वरूपात पुनर्रचना केलेली केलेली आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथांतले वर्णन व शिल्पांतील चित्रांच्या आधारे वनस्पतींची लागवड करून या मठाच्या मध्यभागात असलेल्या बागेचे पुनर्निर्माण केलेले आहे. बागेच्या मध्यावर मूळ मठातून आणलेले अष्टकोनी कारंजे आहे...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कुक्सा बाग ०१
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कुक्सा बाग ०२
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयातली अजून एक बाग ०१
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयातली अजून एक बाग ०२
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : एका बागेतले कॅंडल होल्डरचा आकार दिलेले ६० वर्षे वयाचे पेअरचे झाड
दगडी बांधकामे व कोरीवकामे
मठांच्या बागांभोवतीच्या चार पडव्यांचा उपयोग मठातले साधक (मंक) वास्तव्यासाठी करत असत. प्रत्येक मठाच्या काळानुसार त्यांच्या बागांच्या सभोवतालच्या खांबांची शैली व त्यांच्यावरची नक्षी यांच्यात फरक पडलेला दिसतो. भौमितिक आकार, पानेफुले, पाईनचे कोन, ख्रिस्त, संत, देवदूत, जलपर्या, दोन डोकी असलेले राक्षसी आकार, इत्यादी अनेक प्रकारच्या कोरीवकामाची विविधता या खांबावर दृष्टीस पडते...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव खांब व छप्पर ०१
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव खांब ०२
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव खांब ०३ व ०४
काही ठिकाणी स्वतंत्रपणे उभे असलेले किंवा भिंतींना जोडून असलेले, कसबी कोरीवकामाने सजलेले, जुळे खांब (डबल कॅपिटल्स) आपले लक्ष वेधून घेतात...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कोरीव जुळे खांब ०५
मोडकळीला आलेल्या किंवा उत्खननात सापडलेल्या मठांचे खांब, कमानी, दरवाजे, इत्यादी अनेक भाग दगड बरहुकूम दगड लावून या संग्रहालयात मठांच्या अनेक भागांचे पुनर्निर्माण केलेले आहेत. हे अवशेष संग्रहालयाच्या इमारतीत ठिकठिकाणी इतके बेमालूमपणे वापरले आहेत की आपण पुरातन वस्तूंचे संग्रहालय बघत आहोत असे न वाटता मूळ पुरातन वास्तूत फिरत असल्याचा सतत भास होतो. संग्रहालयाच्या बांधणीतील या अनवट कल्पकतेबद्दल त्याच्या डिझायनरची जेवढी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे !
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयाच्या इमारतींचा भाग बनलेले मठांचे इतर अवशेष ०१
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयाच्या इमारतींचा भाग बनलेले मठांचे इतर अवशेष ०२
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : संग्रहालयाच्या इमारतींचा भाग बनलेले मठांचे इतर अवशेष ०३ व ०४
प्राचीन गालिचे
बायबलमधील व इतर धार्मिक कथांतील प्रसंगांची चित्रे असलेले प्राचीन गालिचे (tapestries) हे या संग्रहालयाचे एक खास वैशिष्ट्य आहे. अनेक मोठ्या आकाराचे जगप्रसिद्ध गालिचे येथील भिंतींवर टांगलेले आहेत...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचा ०१
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचा ०२ : युनिकॉर्नची शिकार
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचा ०३
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचे ०४
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : गालिचे ०५ व ०६
कलाकुसरीच्या इतर वस्तू
याशिवाय इतर अनेक प्रकारच्या आकर्षक व कलाकुसरीच्या प्राचीन वस्तू तेथे आहेत. त्यातील काहींचे फोटो...
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : लाकडी कोरीवकाम ०१
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : लाकडी कोरीवकाम ०२
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : लाकडी कोरीवकाम ०३ आणि धातूच्या बश्या
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०१
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०२
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०३
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०४
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०५
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०६ व ०७
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : कलाकुसरीच्या इतर वस्तू ०८ व ०९
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्राचीन रंगीत सचित्र हस्तलिखित
मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय : प्राचीन रंगीत सचित्र हस्तलिखितांतील बारकाव्यांसह काढलेली कसबी चित्रे
पार्कमध्ये सकाळी फिरत असताना हा अचानक समोर आलेला अदभुत खजिना अनुभवता अनुभवता जेवणाची वेळ केव्हाच निघून गेली होती, पण पोटाला त्याची आठवण झाली नव्हती. मन भरल्याची ढेकर देत बाहेर संग्रहालयाच्या पडल्यावर घड्याळाकडे लक्ष गेले आणि पोटात जोरजोरात कावळे कोकलू लागले !
(क्रमशः )
हेदर गार्डन
फोर्ट ट्रायॉन पार्कसारख्या सौंदर्यपूर्ण नजार्यांकरिता प्रसिद्ध असलेल्या जागेत अंतर्भूत असली तरी ही बाग तिच्या कल्पक व आकर्षक रचनेच्या बळावर एक स्वतंत्र आकर्षण ठरली आहे. न्यू यॉर्कच्या जगप्रसिद्ध सेंट्रल पार्कचा विकास ज्या डिझायनरने केला त्याच्या तेवढ्याच नावाजलेल्या ओम्स्टेड नावाच्या मुलाने फोर्ट ट्रायॉन पार्कच्या मूळ आराखड्यात या तीन एकर क्षेत्रफळाच्या अनवट बागेचा (three-acre jewel) आराखडा तयार केला होता. पार्क व बागेचा एकत्रित विकास करून त्यांचे उद्घाटनही १९३५ साली एकाच वेळी केले गेले. या बागेत मुख्यत्वाने हेदर (heather; Calluna vulgaris) ह्या खुरट्या वनस्पतीच्या अनेक प्रकारांची लागवड केली होती, त्यावरून तिचे "हेदर गार्डन" हे नाव ठेवले गेले.
या बागेसाठी ओम्स्टेडने पार्कच्या दक्षिणेकडील खडकाळ उताराच्या भागाचा कल्पकतेने उपयोग केला. उतारावरच्या दगडधोंड्यांनी भरलेल्या खाचरांत वनस्पतींची अशी लागवड केली आहे की आपण गावाबाहेरच्या एखाद्या टेकडीच्या उतारावर नैसर्गिकपणे वाढलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या व चित्रविचित्र पानाफुलांच्या ताटव्यांतून असलेल्या पायवाटांवरून फिरतो आहोत असा अनुभव येतो. सर्वात उंच भागामध्ये अमेरिकन एल्म वृक्षांनी नटलेली प्रोमोनेड बनवलेली आहे. तेथून बागेच्या विहंगमावलोकनाचा अनुभव घेता येतो. उताराच्या खालच्या टोकाला असलेल्या हडसन नदीच्या पाण्याच्या स्तरापेक्षा प्रोमोनेड १८३ मीटर (६०० फूट) उंचावर आहे, त्यामुळे तेथून व बागेतून फिरताना नदीचे विहंगम दर्शन होते. त्याचप्रमाणे नदीच्या विरुद्ध किनार्यावर असलेल्या न्यू जर्सी राज्यातील दाट वृक्षांनी भरलेल्या पॅलिसेड पार्कचेही नयनमनोहर दर्शन तेथून होते.
१९५५ मध्ये या बागेचे नवीनिकरण करणार्या डिझायरने झाडीत बरेच बदल करून तिचे मूळ रूप पार बिघडवून टाकले. त्यामुळे १९८४ पर्यंत ती जागा एक बेमुर्वत वाढलेली झाडी असलेली कुरूप जागा झाली होती. १९८५ मध्ये फोर्ट ट्रायॉन पार्क व बागेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पार्कच्या ट्रस्टने ग्रीनएकर फाउंडेशन या धर्मदाय संस्थेच्या मदतीने या बागेला तिचे मूळ वैभव प्राप्त करून देण्याचा प्रकल्प सुरू केला. १९३० च्या दशकातली अनेक सहस्र छायाचित्रे, ९०० रेखाचित्रे आणि २५० पानांची वनस्पतींची यादी वापरून बागेतली घुसखोर झाडी दूर केली गेली व मूळ बागेबरहुकूम पुनर्लागवड केली गेली. काही नवीन सौंदर्यपूर्ण वनस्पतींचीही भर त्यांत घातली गेली. या प्रकल्पांतर्गत या बागेत सुमारे २५०० हेदर, हीथ व ब्रूम प्रकारच्या वनस्पती; १५००० कांदे लागवड करून वाढणार्या वनस्पती (bulbs); ५००० बारमाही वनस्पती; ५०० खुरट्या वनस्पती (shrubs); व ५ मोठ्या झाडांची लागवड केली गेली.
युरोपिय व अमेरिकन जमिनींत वाढणार्या वनस्पतींची चतुर सरमिसळ असलेली ही बाग वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने अतुलनिय आहे. विचारपूर्वक निवडलेल्या या वनस्पतींमुळे या बागेचा दुहेरी फायदा झाला आहे. वसंत आणि ग्रीष्म ऋतूंच्या सर्व काळांत या बागेत एकामागोमाग एक विविध आकाराचे व रंगाचे फुलोरे उमलत राहतात. त्याचबरोबर पानगळीच्या मोसमात ही बाग चित्ताकर्षक पिवळ्या-नारिंगी-लालभडक रंगांची उधळण करते !
पार्कच्या ट्रस्टने २००९ साली, या बागेच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, नावाजलेल्या उद्यानतज्ञांच्या मदतीने एक प्रकल्प सुरू केला आहे. पुढच्या ७५ वर्षांच्या काळात या बागेचे सौंदर्य उत्तरोत्तर वाढवत नेणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्द्येश आहे.
ही बाग न्यू यॉर्क शहरामधील अनिर्बंध प्रवेश असणारी सर्वात मोठी बाग आणि अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरील सर्वात मोठी हेदर व हिथ प्रकारच्या वनस्पतींची बाग आहे.
***************
फोर्ट ट्रायॉन पार्कची माहिती जालावर पाहताना या बागेची माहिती झाली होती. तेव्हा एक दिवस नेहमीच्या प्रवेशद्वारातून पार्कमध्ये न शिरता, सबवेच्या १९० स्ट्रीटच्या स्थानकाकडे जाणार्या टेकडीच्या पोटात असलेल्या ७००-८०० मीटर लांब बोगद्यात शिरलो...
१९० स्ट्रीट सबवे स्थानकाच्या बोगद्याचे बेनेट स्ट्रीटवरचे द्वार व
सबवे स्थानकाच्या टेकडीवर असलेल्या विरुद्ध दिशेच्या द्वारातून बाहेर आल्यावर दिसणारे वाहतूक वर्तूळ
बोगद्याच्या टोकाला असलेल्या रेल्वेमार्गाकडे जाण्याऐवजी, त्याच्या डावीकडील उद्वाहक वापरून टेकडीवर पोहोचलो. स्टेशनच्या दरवाज्याजवळ असलेल्या एका वाहतूक वर्तुळाला लागून पार्कचे एक प्रवेशद्वार आहे. ते बागेला जवळचे आहे असे जालावर वाचले होते...
वाहतूक वर्तुळाला लागून असलेले फोर्ट ट्रायॉन पार्कचे प्रवेशद्वार
पार्कच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर लगेच बागेचा परिसर सुरू होतो. कोणतेही कुंपण नसलेली ही बाग पार्कमध्ये सहजपणे अंतर्भूत केलेली आहे. आपण बागेत शिरलो आहे हे, छोट्या पायवाटांच्या दोन्ही बाजूला खुरट्या आणि चित्रविचित्र आकाराच्या पानाफुलांनी सजलेल्या वनस्पती दिसू लागल्यावरच, आपल्या ध्यानात येते !
त्यानंतर मात्र, प्रत्येक झाडा-झुडूपाच्या पानाफुलांना निरखून पाहण्यात आपण सहजपणे गढून जातो. वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने ही बाग अनमोल आहेच. पण, माझ्यासारख्या केवळ सौदर्यदृष्टीने बागेकडे पाहणार्या पर्यटकालाही प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही सुंदर दृश्य वैशिष्ट्य दिसावे, इतका खोलवर विचार ही बाग निर्माण करताना केलेला दिसतो.
या बागेतला प्रत्येक ताटवा, फूल, पान जवळून पाहणे जितके आनंददायक आहेच. पण जरा थबकून, या बागेच्या एकेका भागाचे सर्वसमावेशक दृश्य पाहणे, हा तितकाच किंवा किंचीत जास्तच आनंददायक अनुभव आहे. या अनवट बागेचे सौंदर्य पाहण्याचा अनुभव शब्दांत पकडणे फार कठीण आहे.
बागेत फिरताना दिसलेले काही झाडी-झुडूपे-फुला-पानांचे देखावे व वैशिष्ट्यपूर्ण फुलोर्यांचे फोटो पाहून मला काय म्हणायचे आहे याची थोडीफार कल्पना येईल असे वाटते.
बागेतले देखावे
बागेतला देखावा ०१
बागेतला देखावा ०२
बागेतला देखावा ०३
बागेतला देखावा ०४ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)
बागेतला देखावा ०५ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)
बागेतला देखावा ०६ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)
बागेतला देखावा ०७ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)
बागेतला देखावा ०८
बागेतला देखावा ०९
बागेतला देखावा १०
बागेतला देखावा ११
बागेतला देखावा १२
बागेतला देखावा १३
बागेतला देखावा १४
बागेतला देखावा १५
बागेतला देखावा १६ : पानगळीच्या मोसमातली हेदर गार्डन (जालावरून साभार)
काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे
काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०१
काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०२
लोकोपयोगी कार्यक्रम
या पार्कच्या व बागेच्या व्यवस्थापनात व रोजच्या व्यवहारात आजूबाजूच्या (नेबरहूडमधल्या) नागरिकांचा सक्रिय सहभाग सहभाग असतो. पार्कच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर असलेल्या अनेक माहिती पत्रकांवरून ते सहज कळून येते...
माहिती पत्रकांचा बोर्ड
त्यातल्या या खालील माहितीपत्रकाने विशेष लक्ष वेधून घेतले. विकसित देशांतील नागरिकांत आपला परिसर, आपल्या बागा, आपले पर्यावरण उत्तम स्थितीत व स्वच्छ राखावे याची जी जाणीव दिसते ती तिथल्या सजग नागरीकांनी त्यांच्या तरूण पिढीवर केलेल्या अश्या संस्कारांमुळेच निर्माण झालेली आहे...
उद्यानतज्ञाबरोबर होणार्या बागेच्या फेरीची माहिती
ही बाग बघताना मला 'हिमालयातील फुलोंकी घाटी/वादी' आणि 'महाराष्ट्रातले कास पठार' यांची सतत आठवण येत होती. या दोन्ही जागांतील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व फुलझाडे हळू हळू नष्ट होत आहेत अशी हळहळ नेहमी ऐकू येते. त्यांचे अश्या बागेच्या स्वरूपात संरक्षण आणि संवर्धन केले तर काय बहारदार बाग बनेल असे सतत वाटत होते. अश्या जैववैविध्याच्या वारशाचे रक्षण करणार्या आणि आपल्या परिसराचे सौंदर्य जतन करणार्या सकारात्मक कार्यक्रमांसाठी गैरसरकारी संस्थांनी आणि नागरिकांनी पुढाकार घेतला नाही तर काही वर्षांनी आपण त्या अनमोल ठेव्यांना कायमचे गमावून बसू. दुर्दैवाने असे झाले तर पुढच्या पिढ्यांना ते ठेवे केवळ फोटोंतच बघूनच समाधान मानावे लागेल !
(क्रमशः )
'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'
न्यू यॉर्क शहर अनेक जगावेगळ्या गोष्टींनी खच्चून भरलेले आहे. त्यातल्या अनेक गोष्टी जगप्रसिद्धही आहेत. पण, त्या शहराच्या आणि तिथल्या नागरिकांच्या स्वभावाच्या वैशिष्ट्याची चांगली निशाणी कोणती? असे विचारले, तर आज माझ्या डोळ्यासमोर एक तितकीशी प्रसिद्ध नसलेली 'द हाय लाइन' ही जागा येते. न्यू यॉर्क शहराच्या या भेटीअगोदर या जागेचे नावही मला ठाऊक नव्हते. पण हे नवीन आकर्षण वेगाने प्रसिद्ध होत आहे, हे मात्र नक्की. या जागेबद्दल वाचले आणि तिला भेट देऊन ते खरे असल्याची खातरी पटवावी, असे प्रकर्षाने वाटले.
नॅशनल जिओग्राफिक्सने 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन' या शब्दांनी नावाजलेले 'द हाय लाइन' नावाचे हे प्रकरण आहे तरी काय ?
कोणत्याही शहराच्या भरभराटीमुळे आणि वाढीमुळे तेथील अनेक गोष्टी निकामी किंवा अस्थायी होतात व त्या नष्ट केल्या जाऊन त्यांच्या जागी नवीन गोष्टी अस्तित्वात येतात, हा कालचक्राचा सामान्य भाग आहे. हाच नियम पाळत न्यू यॉर्क शहर दशकानुदशके सतत पुनर्निर्मित (रिमॉडेल) होत राहिले आहे... किंबहुना, नवनिर्माण व पुनर्निर्माण हे या शहराच्या रोजच्या जीवनातले अविभाज्य घटक बनलेले आहेत, हे जागोजागी चालू असलेल्या नव्या बांधकामांच्या व जुन्यांच्या नूतनीकरणांच्या (रिनोव्हेशन) प्रकल्पांच्या स्वरूपात या शहरात फिरताना सतत दिसत असते.
'द हाय लाइन' हे उद्यान वरच्या नियमांना काहीसा छेद देऊन विकसित केलेले उद्यान आहे. त्यामुळे, त्याच्यापेक्षा अनेक जास्त मोठी आणि जास्त सुंदर उद्याने असूनही, हे उद्यान शहराचा एक महत्त्वपूर्ण मानबिंदू बनला आहे. 'हे का व कसे झाले?' हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडी पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
इ.स. १८४७ साली दक्षिण मॅनहॅटनमध्ये असलेलया मांसप्रक्रिया (मीटपॅकिंग) करणार्या उद्योगधंद्यांचा माल त्यांच्या उत्तरेकडे असलेल्या पश्चिम किनार्यावरच्या बंदरावर पोहोचविण्यासाठी एक जमिनीवरचा मालगाडीचा लोहमार्ग (फ्रेट रेल्वे लाइन) बनविला गेला. भरवस्तीतून जाणार्या या मार्गावर लोकांच्या सुरक्षिततेसाठी, मालगाडीसमोरून लोकांना हटविण्यासाठी, घोडेस्वार दौडत असत. यांना गमतीने 'वेस्ट साइड काऊबॉईज' असे म्हणत!
द हाय लाइन ०१ : लोहमार्ग अपघातांपासून सुरक्षित ठेवणारा 'वेस्ट साइड काऊबॉय' (जालावरून साभार)
सर्व खबरदारी घेऊनही या लोहमार्गावर इतके अपघात होत असत की त्या मार्गावर असलेल्या १०व्या अॅव्हन्यूचे नाव 'डेथ अॅव्हन्यू' असे पडले. सरतेशेवटी हे अपघात टाळण्यासाठी, १९२९ ते १९३४ या कालखंडात, उद्योगधंद्यांच्या जागा आणि साठवणगृहे (वेअरहाउसेस) यांना जोडणारा, २१ किमी लांबीचा, एकूण १०५ स्ट्रीट्सना छेदून जाणारा एक उंचावरचा (एलिव्हेटेड) लोहमार्ग पूर्ण केला गेला. भरवस्तीतून जाणारा हा लोहमार्ग अनेक इमारतींच्या आतून जात असे...
द हाय लाइन ०२ : बेल लॅब्जच्या इमारतीतून जाणारा एलिव्हेटेड लोहमार्ग (जालावरून साभार)
१९५०च्या दशकात मालवाहतुकीसाठी ट्रक्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि लोहमार्ग तोट्यात जाऊ लागला. त्यामुळे १९६०पर्यंत त्याचा दक्षिणेकडील अर्ध्यापेक्षा जास्त भाग मोडीत काढला गेला. त्यानंतर उरलेला मुख्यतः चेलसी नावाच्या विभागातला मार्ग १९८०पर्यंत वापरात होता.
१९८०च्या दशकाच्या मध्यात उरल्यासुरल्या मार्गाचा वापर पूर्णपणे बंद झाला आणि त्याला मोडीत काढून त्याच्या महागड्या जमिनीवर इमारती बांधण्यासाठी बिल्डर लॉबीने जोरदार प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला पीटर ओब्लेट्झ नावाच्या लोहमार्गमित्राच्या (railroad enthusiast) नेतृत्वाखाली चेलसीमधील रहिवाशांनी विरोध करून कोर्टात आव्हान दिले. त्यात त्यांना यश आले. पण लोहमार्गाला परत वापरात आणण्याचे त्यांचे प्रयत्न असफल झाले. १९९१मध्ये त्याचा आणखी एक तुकडा नष्ट केला गेला. पण लोकांच्या विरोधामुळे मोडतोडीचे काम थांबवले गेले. त्यानंरही, या लोहमार्गाला मोडीत काढण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण लोकांच्या सतत विरोधामुळे ते असफल झाले. मजबूत संरचना असलेला हा पोलादी बांधणीचा लोहमार्ग नव्वदीच्या दशकात खंबीरपणे उभा होता, पण दुर्लक्षित झाला होता. त्यामुळे त्याच्यावर रानटी गवताची, झुडपांची आणि छोट्या झाडांची अमर्याद वाढ झाली होती...
द हाय लाइन ०३ : दुर्लक्षित झालेल्या लोहमार्गावर उगवलेले रानटी गवत व झाडेझुडपे आणि त्याचा निरस परिसर
(जालावरून साभार)
१९९३मध्ये पॅरिसमध्ये ४.८ कि.मी. लांबीच्या एका एलिव्हेटेड लोहमार्गाचे Promenade plantée (tree-lined walkway) या नावाच्या सार्वजनिक उद्यानात रूपांतर केले गेले. त्यावरून प्रेरणा घेऊन, तसेच उंचावरचे रेखाउद्यान (एलिव्हेटेड लिनिअर पार्क) न्यू यॉर्क शहरात बनवावे, यासाठी १९९९ साली जोशुआ डेव्हिड आणि रॉबर्ट हॅमंड यांच्या नेतृत्वाखाली Friends of the High Line ही संस्था स्थापन केली गेली.
जोएल स्टर्नफेल्ड नावाच्या फोटोग्राफरने या मार्गावर नैसर्गिकपणे वाढलेल्या हिरवाईच्या व झाडाझुडपांच्या फोटोंचा उपयोग करून बनवलेली चित्रमालिका लोकप्रिय झाली. या मालिकेने, या मार्गाचे संवर्धन करून त्याच्यावर पॅरिसच्या धर्तीवरचा प्रकल्प करणे हे एक लोकोपयोगी काम होईल हा विचार अधोरेखित केला. डाएन फ्युर्स्टेनबर्ग नावाच्या एका स्थानिक फॅशन डिझायनरने आपल्या पतीच्या साहाय्याने आपल्या खाजगी स्टुडिओत अनेक कार्यक्रम आयोजित करून या प्रकल्पासाठी देणग्या जमा केल्या.
परिसरातल्या (नेबरहूड) नागरिकांच्या या सर्व प्रयत्नांना यश आले. लोकमताच्या रेट्याला मान देऊन, शहर प्रशासनाला या प्रकल्पाला मान्यता व $५ कोटीची मदत देणे भाग पडले. अशा रितीने हे हवाई रेखाउद्यान बनण्याचा मार्ग खुला झाला...
द हाय लाइन ०४ : लोहमार्ग उद्यानाचा नकाशा (जालावरून साभार)
नागरिकांच्या प्रयत्नांतून आजतागायत या प्रकल्पासाठी एकूण $१५ कोटींपेक्षा जास्त देणग्या जमा केल्या गेल्या आहेत. स्थानिक नागरिकांची तळमळ पाहून जगभरच्या उद्यानतज्ज्ञांनी या अनवट प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे.
२००६च्या जूनमध्ये या अनवट उद्यानाचे काम जोमाने सुरू झाले. पहिला टप्पा २००९मध्ये, दुसरा २०११मध्ये आणि तिसरा २०१४मध्ये जनतेला खुला झाला आहे. आता केवळ छोटीमोठी कामे बाकी आहेत, तीही २०१७पर्यंत पुरी होतील.
हे उद्यान बनवताना डिझायनर्सनी एक जगावेगळी कल्पकता दाखवली. लोहमार्गावर जवळजवळ २५ वर्षे साठलेले गवत आणि इतर चिवट झाडेझुडपे साफ न करता त्यांना शक्य तेवढे त्याच जागेवर ठेवून उद्यानाची मांडणी केली आहे. त्यामुळे उद्यानाला नैसर्गिक स्वरूप तर प्राप्त झाले आहेच, त्याचबरोबर हे उद्यान कमीत कमी खर्चात व श्रमात वर्षभर सुंदर ठेवायला मदत झाली आहे! शिवाय स्थानिक वनस्पतींचे संवर्धन झाले आहे, हा एक महत्त्वाचा फायदा झाला आहेच!
थोडक्यात, 'द हाय लाइन पार्क' हे Friends of the High Line या एका शहरवासीयांच्या संघटनेच्या दोन दशकांच्या अथक प्रयत्नाने (किंबहुना लढ्याने), एका महानगराच्या भरवस्तीत असलेल्या, निकामी झालेल्या २.३३ कि.मी. लांबीच्या एका ऊर्ध्वमार्गी (एलिव्हेटेड) लोहमार्गाचा उपयोग करून विकसित केलेले उद्यान आहे. या उद्यानावर केल्या जाणार्या खर्चाचा ९८% वाटा ही संस्था स्वतः उभा करते आणि त्याचे रोजचे व्यवस्थापन चालविते.
चला तर, या अनवट हवाई रेषामार्गी उद्यानाचा (एलिव्हेटेड लिनियर पार्कचा) फेरफटका मारायला...
चेलसी मार्केटच्या जवळचा जिना चढून वर गेलो आणि उजव्या बाजूला हिरवाई आणि फूलझाडांनी दर्शन दिले...
द हाय लाइन ०५ : प्रथमदर्शन
तर डाव्या बाजूला चेलसी मार्केट पॅसेज नावाच्या रुंद जागेत थाटलेल्या मिनी-रेस्तराँने व छोट्या दुकानांनी लक्ष वेधून घेतले...
द हाय लाइन ०६
द हाय लाइन ०७
उद्यानातून जसजसे पुढे जाऊ लागलो, तसतसे आपण जमिनीपासून दहा-पंधरा मीटर्स उंचीवरून जाणार्या लोहमार्गावरून चालत आहोत यावर विश्वास ठेवण्यासाठी स्वतःला चिमटा काढायची गरज भासू लागली!...
द हाय लाइन ०८
द हाय लाइन ०९
द हाय लाइन १०
द हाय लाइन ११
द हाय लाइन १२
द हाय लाइन १३
द हाय लाइन १४
जरा पुढे गेल्यावर १०व्या अॅव्हन्यूवरून जाणार्या लोहमार्गाचा काही भाग वापरून बनवलेली एक फारच अनवट छोट्या अँफिथिएटरसारखी रचना दिसली. इथे बसून पर्यटकांना १०व्या अॅव्हन्यूवरून आपल्या पायांखाली धावणार्या रहदारीची मजा पाहता येते...
द हाय लाइन १५
थोडा वेळ ती मजा उपभोगून बागेतून पुढे निघालो. वाटेत केवळ हिरवाई आणि फूलझाडेच नव्हे, तर गमतीदार संदेश असलेल्या पाट्या मनोरंजन करत होत्या...
द हाय लाइन १६
द हाय लाइन १७
आजूबाजूच्या चित्रविचित्र आकर्षक इमारती पाहणे हासुद्धा मनोरंजक विरंगुळा होता...
द हाय लाइन १८
द हाय लाइन १९
द हाय लाइन २०
द हाय लाइन २१
द हाय लाइन २२
उद्यानाच्या आजूबाजूच्या असलेल्या परिसरातल्या दुकानांत अथवा रेस्तराँमध्ये जाण्यासाठी ठिकठिकाणी जिने व उद्वाहक आहेत...
द हाय लाइन २३
उद्यानाच्या मधल्या एका रुंद भागात एक चित्रकार बसला होता. तो येणार्या-जाणार्या कोणाही लहान-मोठ्यांनी त्याचे ब्रश आणि रंग घेऊन मुक्तपणे चित्रे रेखाटावी असे आवाहन करत होता...
द हाय लाइन २४
अनिर्बंध वाढलेल्या गवतातून डोलणारी अनेक प्रकारची स्थानिक फूलझाडे लक्ष वेधून घेत होती...
द हाय लाइन २५
द हाय लाइन २६
द हाय लाइन २७
विकासकामामुळे आणि दाट झाडीझुडपांमुळे बहुतेक सगळे रूळ झाकून गेले आहेत. पण, एखाद-दुसर्या जागी त्यांचे दर्शन होते...
द हाय लाइन २८
द हाय लाइन २९
मूळ मार्गाच्या चौकटीला धक्का न लावता व कलात्मकतेचा दर्जा राखूनही, भेट देणार्या लोकांना हे उद्यान सोईस्कर आणि आनंददायक कसे होईल इकडे लक्ष दिल्याचे जागोजागी दिसत होते. लोकांना आरामात बसण्यासाठी जागोजागी वेगवेगळ्या प्रकारची सोय आहे. मनोरंजनासाठी जागेचा उत्तम वापर कसा होईल इकडेही लक्ष दिलेले जागोजागी दिसत होते...
द हाय लाइन ३०
द हाय लाइन ३१
द हाय लाइन ३२
द हाय लाइन ३३
द हाय लाइन ३४
हा दोन-अडीच किलोमीटरचा विस्मयकारी फेरफटका संपून उद्यानाच्या दुसर्या टोकाला कधी पोहोचलो, ते समजलेच नाही!
द हाय लाइन ३५
या उद्यानात आयोजित केल्या जाणार्या अनेक कार्यक्रमांमुळे हे उद्यान न्यू यॉर्क शहरातील एक 'हॅपनिंग प्लेस' झाले आहे.
या प्रकल्पामुळे त्याच्या परिसराला आणि एकंदर शहराला अनेक महत्त्वाचे फायदे झाले आहेत...
१. मजबूत अवस्थेत असलेला एक ऐतिहासिक लोहमार्ग नष्ट होण्यापासून नुसता वाचला असेच नाही, तर त्याचे रूपांतर शहराचे भूषण ठरलेल्या एका अनवट उद्यानात झाले आहे.
२. हे उद्यान परिसरातल्या लोकांसाठी फायद्याचे ठरले आहेच, त्याबरोबरच हे पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण बनले आहे. गेल्या वर्षी या उद्यानाला ५० लाख लोकांनी भेट दिली आणि हा आकडा वाढत आहे.
३. या उद्यानाचे यश पाहून अमेरिकेतील इतर अनेक शहरांत (शिकागो, फिलाडेल्फिया, सेंट लुई, इ.) या प्रकल्पावर बेतलेले 'शहरी पुनर्निमाणाचे (urban regenerationचे)' प्रकल्प सुरू केले गेले आहेत.
४. हे उद्यान खेचत असलेल्या पर्यटकांच्या वर्दळीचा फायदा घेण्यासाठी त्याच्या आजूबाजूला अनेक संग्रहालये, दुकाने, रेस्तराँ, इत्यादी निर्माण केली गेली आहेत. अर्थातच त्याचा परिणाम हा परिसर अधिक आकर्षक आणि अधिक सधन बनण्यात झाला आहे.
५. एक गंमत अशी आहे की, बिल्डर लॉबीचे या लोहमार्गाला नष्ट करण्याचे प्रयत्न फसल्यामुळे, बिल्डर लॉबीलाच मोठा फायदा झाला आहे! हे उद्यान अस्तित्वात येण्यापूर्वी चेलसी या लोहमार्गाच्या आजूबाजूच्या परिसराला अवकळा आली होती. या उद्यानामुळे आज चेलसी हा मॅनहॅटनच्या आकर्षक व महागड्या परिसरांपैकी (नेबरहूड) एक झाला आहे. या परिसरातल्या जागांचे भाव कल्पनेपलीकडे वाढले आहेत. इथल्या सर्वसामान्य सदनिकेची किंमत सहजपणे $६० लाखाच्या (सुमारे ४० कोटी रुपयांच्या) घरात जाते आणि त्यापैकी काही तर $१ कोटींपेक्षा (सुमारे ६७ कोटी रुपयांपेक्षा) जास्त किमतीच्या आहेत. या भरभराटीला 'High Line Effect' असे नाव पडले आहे.
'हाय लाइन इफेक्ट'च्या मागे नागरिकांनी आपला परिसर (नेबरहूड) व आपले शहर अधिक सुखद आणि अधिक सुंदर बनविण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. मुख्य म्हणजे 'सर्व विकास आपले सरकार व प्रशासन आपोआप करेल' असा गोड गैरसमज न करून घेता, 'तसे व्हावे यासाठी नागरिकांची स्वतः काम करण्याची आणि प्रसंगी सरकार-प्रशासनाशी संघर्ष करून त्याला नमविण्याची तयारी' दिसली. यालाच साध्या शब्दांत सहभागी लोकशाही (Participatory Democracy) असे म्हणतात. हाच सहभाग न्यू यॉर्क शहरभर नागरिकांनी चालविलेल्या असंख्य पार्क्सच्या व इतर समाजोपयोगी संस्थांच्या कार्यशैलीत सतत दिसतो. तिथल्या नागरिकांचा हा स्वभावच न्यू यॉर्क शहराच्या दृश्य झगमगाटामागचे व सौंदर्यामागचे इंगित आहे, यात वाद नाही.
यासारख्या जागाच न्यू यॉर्क शहराच्या मोठेपणाची खरी ओळख करून देतात... या जागांच्या मागे जे विचार, जी जीवनप्रणाली लपलेली आहे, तीच इथे जगप्रसिद्ध आकर्षणे इथे निर्माण होण्यामागे आणि ती वर्षानुवर्षे टिकून राहण्यामागे आहे.
न्यू यॉर्क शहराची भटकंती करताना दोन-एक तास वेगळे काढून या उद्यानाची फेरी जरूर मारा. जास्त वेळ गाठीला असेल तर या उद्यानाच्या एका टोकाकडून दुसरीकडे जात असताना त्याच्या बाजूला असलेल्या अनेक रेस्तराँना, दुकानांना आणि संग्रहालयांना भेट देत देत आख्खा दिवस सहजपणे मजेत घालविता येईल.
क्रमश :
सेंट्रल पार्क
सेंट्रल पार्क हा मॅनहॅटन बेटाच्या मध्यभागी असलेला एक मोठा शहरी (अर्बन) पार्क आहे. एखाद्या महानगरातील काँक्रिट जंगलाच्या मध्यभागी, बिल्डर लॉबीच्या विरोधाला न जुमानता, दाट वृक्षराजीने भरलेले जंगल असावे हे जेवढे आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा जास्त आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य पार्कमध्ये सहसा न आढळणार्या अनेक गोष्टी येथे खच्चून भरलेल्या आहेत. उगाच नाही या जागेला भेट देण्यासाठी जगभरातून दरवर्षी ४ कोटीपेक्षा जास्त लोक येतात ! त्याचबरोबर The most filmed location in the world, National Historic Landmark, इत्यादी अनेक लौकिकही या जागेच्या नावावर दाखल आहेत. या स्थळाचे चित्रिकरण ३० पेक्षा जास्त चित्रपट व टीव्ही मालिकांत झाले आहे; पाचपेक्षा जास्त आल्बम्समधल्या गाण्यांत याचा उल्लेख आहे, दोनतीन कांदबर्यांत याची पार्श्वभूमी आहे आणि अनेक विख्यात चित्रकारांनी या पार्कमधिल दृश्यांची चित्रे चितारली आहेत.
१८२१ ते १८५५ या कालखंडात वेगाने विस्तारणार्या न्यू यॉर्क शहराची लोकसंख्या चौपटीने वाढली. सुरुवातीला मुख्यतः मॅनहॅटनच्या दक्षिण टोकाला असलेली झालेली वस्ती झपाट्याने उत्तरेच्या दिशेने पसरू लागली. शहराच्या गजबटातून काही काळ विसावा मिळावा यासाठी नागरिक शहरातल्या तुरळक मोकळ्या जागा व दफनभूमींचा वापर करत असत. ही परिस्थिती सुधारून लोकांना मनोरंजनासाठी शांत व सुंदर पार्कची गरज आहे ही कल्पना मूळ धरू लागली. बेटावरच्या वस्तीच्या विकासाचा आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) १८११ सालीच तयार झालेला होता. त्याप्रमाणे आखणी करून जमिनीत खुणांचे सर्वेइंग बोल्टही ठोकले गेले होते. पार्कच्या जमिनीत यापैकी काही बोल्ट्स अजूनही सापडतात व त्यांची ऐतिहासिक वस्तूंच्या रूपात जपणूक केली जाते. यावरून मूळ आराखड्यात कोणत्याही मोठ्या पार्कच्या जागेची तरतूद नव्हती हे सिद्ध होते.
कोणत्याही मोठ्या पार्कची व्यवस्था नसलेला १८११ सालचा न्यू यॉर्क शहराचा विकास आराखडा (जालावरून साभार)
सेंट्रल पार्कच्या आवारात १८११ साली सर्वे करून आखणी करताना खडकाळ जमिनीत
ठोकलेले असे बोल्ट्स काही ठिकाणी अजूनही दिसतात. त्यांची ऐतिहासिक वस्तू
म्हणून जपणूक केली जाते. (जालावरून साभार)
१८४४ साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ईव्हिनिंग पोस्ट नियतकालिकाचा संपादक विल्यम ब्रायंट आणि अमेरिकेचा पहिला लॅंडस्केप आर्किटेक्ट अँड्रयू डावनिंग यांनी पॅरिसमधल्या बो द बोलोन (Bois de Boulogne) किंवा लंडनमधल्या हाईंड पार्कप्रमाणे न्यू यॉर्क शहरातही एक मोठा सार्वजनिक पार्क असावा यासाठी जनजागरण सुरू केले. खूप कालाच्या झगड्यानंतर व अनेक अपयशी प्रयत्नांनंतर शासनाने त्यांची मागणी मान्य करून १८५३ मध्ये पार्कची जागा नक्की करून तिच्या खरेदीसाठी $५० लाख मंजूर केले.
फ्रेडरिक लॉ ओम्स्टेड व कॅलवर्ट वॉ नावाच्या प्रसिद्ध वास्तुविशारद व उद्यानविशारदांनी बनवलेल्या "Greensward Plan" नावाच्या आराखड्याने स्पर्धा जिंकली आणि ३१५ हेक्टर आकाराच्या पार्कचा विकास करण्यास १८५७ साली सुरुवात झाली. १८५८ साली पार्कचा दक्षिणेकडील पहिला भाग जनतेसाठी खुला झाला. अमेरिकन सिविल वॉरच्या (१८६१ ते १८६५) दरम्यानही त्याचे काम सुरू होते. इतकेच नव्हे तर या पार्कच्या आकारमानात उत्तर दिशेने वाढ करत करत त्याचे क्षेत्रफळ १८७३ पर्यंत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे ३.४१ चौ किमी (३४१ हेक्टर किंवा ८४३ एकर) इतके वाढवले गेले.
साधारणपणे ४ X ०.८ किमी आकाराच्या सेंट्रल पार्कच्या पूर्वपश्चिम सीमा पाचवा ते आठवा अॅव्हन्यू आणि दक्षिणोत्तर सीमा ५९वा ते ११० वा स्ट्रीट अश्या आहेत. म्हणजेच, हा पार्क मॅनहॅटनच्या एकूण १५३ मध्यवर्ती महागड्या (प्राइम) ब्लॉक्सची जागा व्यापून आहे ! मॅनहॅटन बेटाच्या एकूण ५९.१ चौ किमी क्षेत्रफळाचा ५.८% भाग या एका पार्कने व्यापलेला आहे ! डिसेंबर २००५ मध्ये मिलर सॅम्युअल या नावाजलेल्या मालमत्ता मुल्यमापक संस्थेने केलेल्या अभ्यासात या जागेची किंमत $५२८.८ बिलियन (रु ३ लाख ५४ हजार कोटी) इतकी ठरविण्यात आली होती !! इतक्या मोठ्या जागेच्या प्रशासनासाठी स्वतंत्र नागरी प्रभाग, अँब्युलन्स सेवा व पोलीस चौकी आहेत.
पार्कचे मॅनहॅटन बेटावरचे स्थान व आकार दाखवणारा नकाशा (डावीकडे) आणि
पूर्णपणे विकसित सेंट्रल पार्कचा त्याच्या बाजूच्या रस्त्यांसकट नकाशा (दोन्ही नकाशे जालावरून साभार)
बर्यावाईट क्लृप्त्या वापरून मोकळ्या जागा गिळंकृत करण्यार्या शहरी बांधकाम लॉबीचा अनुभव आपल्याला आहेच. त्यामुळे, वेगाने वाढणार्या शहरातला विशाल मध्यवर्ती भाग पार्कसाठी राखून ठेवण्यासाठी नागरिकांना किती मोठा व प्रदीर्घ संघर्ष करावा लागला असेल याची थोडीबहुत कल्पना आपण नक्की करू शकतो.
या विशाल पार्कच्या निर्माणात अनेक अडथळे आले, विकासक आणि प्रशासकांमध्ये अनेक भांडणे झाली, ओम्स्टेडला प्रकल्पातून बाहेर काढले गेले आणि अनेक वादग्रस्त घटना घडल्या. अखेर १८७३ मध्ये त्याचे सर्व काम पुरे झाले.
पार्कच्या अनेक भागात दगडांनी भरलेली किंवा खडकाळ जमीन होती. एकूण एक कोटी गाड्याभर राडारोडा बाहेर काढावा लागला. आराखड्याप्रमाणे झाडाझुडुपांची लागवड करता यावी यासाठी पार्कच्या मूळ ओसाड जमिनीवर न्यू जर्सीतून १४,१०० घन मीटर सुपीक माती आणून पसरली गेली. पार्क सुंदर बनविण्यासाठी १५०० पेक्षा जास्त प्रजातींच्या ४० लाखापेक्षा जास्त झाडे, झुडुपे व फुलझाडांची लागवड केली गेली. हे सर्व काम इतक्या कौशल्याने केलेले आहे की हा पार्क एखाद्या नैसर्गिकरीत्या झाडीने भरलेल्या जंगलाच्या जागेवर बनवला आहे असेच वाटते.
या पार्कच्या कल्पनेमागचे लोक कालमानाप्रमाणे जसजसे जगाचा निरोप घेऊ लागले तसतशी सुरुवातीच्या उत्साहाला ओहोटी लागून पार्क अनावस्थेत जात राहिला. पार्कच्या सौंदर्याच्या ओहोटीला जनतेच्या अनिर्बध वागणुकीने आणि ग्रेट डिप्रेशनमधील आर्थिक मंदीने हातभार लावला. १९३४ मध्ये फिओरेल्लो ला गार्दिया (न्यू यॉर्कच्या ला गार्दिया आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव याच्याच स्मरणार्थ दिलेले आहे) न्यू यॉर्क शहराचा मेयर झाल्यावर मात्र चित्र पालटू लागले. त्याने शहराच्या पाच वेगवेगळ्या पार्कसंबंधीच्या विभागांचे एकत्रीकरण करून रॉबर्ट मोझेस याच्याकडे पार्क्स सुधारण्याची मोहीम एकहाती सोपवली. मोझेसने धडाडीने काम करून एका वर्षात या पार्कमध्ये अनेक पुनर्निर्माणाची कामे केली, पार्कच्या जमिनीवरच्या अनधिकृत झोपड्या उठवल्या, नवीन झाडेझुडुपे लावली, नवीन तलाव निर्माण केले आणि मुख्य म्हणजे मूळ पार्कच्या आराखड्यात नसलेली १९ खेळाची मैदाने, १२ बेसबॉल मैदाने, एक हँडबॉल कोर्ट आणि अनेक हिरवळी बनवून त्याला अधिक लोकाभिमुख बनवले. या कामांसाठी त्याने सरकार व जनता या दोघांकडून पैसे उभे केले.
शंभर वर्षांच्या भरभराटीनंतर १९६०-७० च्या दशकांत या पार्कची परत हेळसांड सुरू झाली. तो दिवसा धुळीचे मैदान आणि रात्री गुंडांचे माहेरघर झाला. ही अनावस्था सहन न झाल्याने नागरिक अनेक संघटनांच्या पुढे आल्या. त्यांनी स्वयंसेवी कामे व पैसा उभारण्याचे कार्यक्रम सुरू केले. त्यांच्यापैकी Central Park Community Fund नावाच्या नागरिक संघटनेने पार्कच्या व्यवस्थापनाचा आराखडा बनवून महानगरपालिकेला त्यानुसार पार्कची व्यवस्थापन प्रणाली बनविणे भाग पाडले. या प्रणालीतील तरतुदींप्रमाणे निवडक नागरिकांचे एक "Board of Guardians" पार्कच्या नवीन योजनांचे आराखडे संमत करणे, संमत आराखड्यांप्रमाणे होणारी कामे आणि रोजचे व्यवस्थापन या सर्वांवर सतत नजर ठेवून असते.
रॉकंफेलर सेंटरच्या निरिक्षणमनोर्यावरून दिसणारे काँक्रिट जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सेंट्रल पार्कचे विहंगम दृश्य
नव्वदीच्या दशकापासून नागरिकांच्या देखरेखीमुळे आणि सतत केल्या जाणार्या विकासकामांमुळे हा पार्क अधिकाधिक आकर्षक होत आहे आणि त्याने शहरातल्या महत्त्वाच्या आकर्षणांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे. इथे आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांमुळे त्याला शहराच्या जीवनात एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थान प्राप्त झाले आहे. त्याच्यावरून प्रेरणा घेऊन अमेरिकेत व जगभरही अनेक पार्क्स निर्माण केले गेले आहेत; उदाहरणार्थ : सान फ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट पार्क, तोक्योचा उएनो पार्क, व्हँकुवरचा स्टॅनली पार्क, इ.
अमेरिकेन पार्क्सच्या विकास व व्यवस्थापनामध्ये हा दोन समान दुवे सतत दिसतात. पहिले म्हणजे, पार्कचे विकासक केवळ कंत्राटदारांसारखे दगडमाती झाडापाल्याचे काम करून थांबत नाहीत तर सरकार व जनतेमधला दुवा बनून विकासासाठी पैसा उभा करताना दिसतात. दुसरे म्हणजे सरकार व जनता या दोघांच्या सहकार्याने पार्कचे व्यवस्थापन भविष्याही उत्तम रितीने चालू रहावे यासाठी मनापासून प्रयत्न करताना दिसतात. नागरिकही या कामात रस घेतात व सर्व तर्हेचे सक्रिय सहकार्य करायला पुढे असतात. याचा परिणाम, छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या सर्व पार्क्सचे निर्माण, रोजची देखभाल व दीर्घकालासाठी व्यवस्थापन, उत्तम रितीने चालू राहण्यात झाला आहे.
सद्या Central Park Conservancy नावाची ना-नफा संस्था पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप तत्त्वावर सेंट्रल पार्कचे व्यवस्थापन चालवत आहे. या संस्थेचा अध्यक्ष पार्कचा पदसिद्ध कार्यकारी अधिकारी बनतो. या पार्कच्या $४ ते ६.५ कोटी वार्षिक खर्चाचा ८५% हिस्सा ही संस्था उभा करते व पार्कमधले ८० टक्के कर्मचारी स्वतःच्या अधिकारात नेमते. या संस्थेने बनवलेली पार्क व्यवस्थापन प्रणाली इतकी यशस्वी झाली आहे की ती शहरातल्या इतर अनेक पार्क्समध्येही लागू केलेली आहे.
***************
या पार्कचे आजचे झाडी-झुडुपे, तलाव आणि हिरवळींनी भरलेले आकर्षक रूप पाहताना तो मूळच्या खडकाळ, ओसाड जागेवर वसवलेला आहे आणि त्यातले सर्व तलाव मानवनिर्मित आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. येथे पायवाटांची असंख्य जाळी, दोन आईस स्केटिंग रिंक्स (यातल्या एकीचा जुलै व ऑगस्टमध्ये पोहण्याचा तलाव बनतो !), प्राणिसंग्रहालय, फुलझाडांनी भरलेली बाग, अभयारण्य, उघडे प्रेक्षागृह, शेक्सपियरची नाटके सादर करणारे देलाकोर्टे उघडे थिएटर, बेलवेडर किल्ला, स्वीडिश कॉटेज मॅरिओनेट थिएटर, ऐतिहासिक चक्री, इत्यादी अनेक आकर्षणे खच्चून भरलेली आहेत.
सेंट्रल पार्कामधील रस्त्यांची व पायवाटांची जाळी, विविध आकर्षणांची स्थाने व इतर विशेष दाखविणारा नकाशा (सेंट्रल पार्कच्या संस्थळावरून साभार)
चालायची इच्छा नसल्यास या पार्कची सफर तेथे भाड्याने मिळणार्या सायकलीने किंवा घोड्याच्या बग्गीतून करता येते. पर्यटन-कालात (उन्हाळ्यात) बग्गीचा पर्याय बराच महाग (दोन-अडीच तासांच्या फेरीला माणशी $५० किंवा जास्त) असू शकतो. मार्गदर्शकासह चालत, सायकलने किंवा बग्गीतून सहल करण्याचा पर्यायही येथे आहे.
हाती भरपूर वेळ असल्याने या विविध आकर्षणांनी भरलेल्या विस्तीर्ण पार्कमध्ये फिरायला संपूर्ण दिवस राखून ठेवला होता. शिवाय, आपल्या मनाप्रमाणे रमत गमत फिरत व आपल्याला मनोरंजक वाटणार्या आकर्षणाच्या जागी हवा तेवढा वेळ थांबत पार्क पहायचा असल्यास स्वतःच्या हातात माहितीपत्रक पकडून पार्कच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत चालण्याला पर्याय नाही. ५९व्या स्ट्रीटपासून ११०व्या स्ट्रीटपर्यंत पार्कची लांबी चारएक किमी असली तरी त्यातली सगळी आकर्षणे पहायला आळीपाळीने डावीउजवीकडे वळत वळत बरेच जास्त (सहा ते आठ किमी) अंतर चालायची तयारी असायला लागते. थोडा विचार करून आम्हाला हाच पर्याय उत्तम वाटला.
सकाळी लवकरच घरातून निघून कोलंबस सर्कल सबवे स्टेशन गाठले. जमिनीवर आल्या आल्या एक पोलादी पृथ्वीगोल आणि त्याच्या मागची ट्रंप इंटरनॅशनल हॉटेलची गगनचुंबी इमारत समोर आली. समोरचा रस्ता ओलांडून काही अंतर चालल्यावर पार्कच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशभागात असलेले शिल्पांनी सजवलेले भव्य स्मारक दिसले...
पोलादी पृथ्वीगोल व त्याच्या मागचे ट्रंप इंटरनॅशनल हॉटेल आणि दक्षिणेकडील मुख्य प्रवेशभागात असलेले स्मारक
प्रवेशभागात असलेली शिल्पे
"प्रवेशभाग" असे मुद्दाम म्हटले आहे कारण या पार्कला असलेल्या वीस प्रवेशमार्गांवर एकही प्रवेशद्वार (दरवाजा) नाही ! आत शिरल्यावर १५-२० मीटरवर दाट झाडी आणि फुलझाडांच्या मधे असलेले पायवाटांचे जाळे लागले...
सेंट्रल पार्कचे प्रथमदर्शन ०१
सेंट्रल पार्कचे प्रथमदर्शन ०२
पार्कच्या मधून जाणार्या डांबरी रस्त्यावरून एखाददुसरी घोड्यांची बग्गी जाताना दिसत होती...
सेंट्रल पार्कामधील बग्गी
मन प्रसन्न करणार्या हिरवाईतून काही वेळ चालल्यावर उजवीकडे वळत आम्ही सेंट्रल पार्क प्राणिसंग्रहालयाजवळ पोहोचलो. तेथे असलेल्या सिनेमा थिएटरमध्ये आईस एज या कार्टून चित्रपटाची छोटी 4D आवृत्ती दाखवली जात होती. प्रथम हा एक नवा अनुभव घ्यावा व नंतर प्राणिसंग्रहालय बघावे असे ठरले. तिकिटघराचे आवार एखाद्या बागेला लाजवेल असे होते...
चित्रपटगृहाचे आवार
चित्रपटगृहाचे प्रवेशद्वार त्या आवाराशी स्पर्धा करेल असेच सुंदर होते...
चित्रपटगृहाचे प्रवेशद्वार
१०-१५ मिनिटांच्या 4D चित्रपटाचा पहिलावाहिला अनुभव घेऊन तेथून बाहेर पडून आम्ही प्राणिसंग्रहालयाकडे निघालो.
सेंट्रल पार्क प्राणिसंग्रहालय
उजव्या बाजूला वळून उत्तरपूर्वेच्या दिशेने काही अंतर चालल्यावर ५व्या अॅव्हन्यूला लागून असलेले व झाडीत लपलेले प्राणिसंग्रहालय सापडले. पाच एकर क्षेत्रफळावर असलेल्या या संग्रहालयात जगभरातून आणलेल्या १३० पेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांच्या प्रजाती आहेत. त्या जीवांच्या स्थानिक पर्यावरणाला साजेसे हवामान नियंत्रित केलेली, झाडाझुडुपांची लागवड केलेली व जरूर तेथे कृत्रिम पाणीसाठे असलेली दालने आहेत.
प्राणिसंग्रहालयातले काही वैशिष्ट्यपूर्ण पक्षी
जमिनीवरून चालणार्या सगळ्या प्राण्यांचा आज आरामाचा दिवस असावा त्याप्रमाणे त्या सर्वांनी ताणून दिली होती. मात्र पाण्यातल्या प्राण्यांनी चपळाईने पोहण्याचे प्रदर्शन करून त्यांच्या आळसाची कसर भरून काढली होती...
आरामात पहुडलेले मुंगूस, बर्फाळ प्रदेशातला चित्ता (स्नो लेपर्ड), ग्रिझली बेअर आणि
पाण्यात अथक येरझार्या घालणारे पाणमांजर
एका मोठ्या उघड्या तलावात सहा सात समुद्री सिंह (सी लायन) वेगवेगळ्या कसरती करत लोकांचे मनोरंजन करत होते...
कसरती करून लोकांचे मनोरंजन करणारे समुद्री सिंह
संग्रहालयातील एक भाग पाळीव प्राण्यांसाठी राखीव ठेवलेला आहे...
पाळीव प्राणी
येथे एक छोटेसे मत्स्यालय आहे, पण त्यात फारसे आकर्षक असे काही दिसले नाही. तेथून बाहेर आलो तर समोरच संग्रहालयाचे रेस्तराँ दिसले. त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे एक बगिचाच होता...
संग्रहालयाच्या परिसरातील बगिचा
संग्रहालयाच्या परिसरातील आठवणवस्तूंचे दुकान
या संग्रहालयाचा विकास लहान मुले, तरुण आणि कुटुंबे या सर्वांचे सर्वांगीण मनोरंजन आणि ज्ञानवर्धन मनात ठेवून केलेला आहे. हाच उद्येश केंद्रस्थानी ठेवून इथले सर्व ललित व शैक्षणिक कार्यक्रम आखले जातात.
रेस्तराँमध्ये पोटपूजा करून आमची वाटचाल सुरू झाली. पार्कचा आराखडा आणि विकास करणार्या तज्ज्ञाचे कसब चालताना जागोजागी दिसत होते. सगळी जमीन सरसकट सपाट न करता तिच्या उंचसखलपणाचा आणि दगडधोंड्यांचा उपयोग करून जागोजागी नैसर्गिक जंगलाचा आभास निर्माण केलेला आहे. त्यामुळे, लगबग-गडबड-गोंधळ चालू असलेले महानगरी रस्ते तेथून अर्ध्या किमीपेक्षा कमी अंतरावर आहेत, हे विसरायला होत होते...
पार्कामधील कृत्रिम जंगलाची दोन दृश्ये
एक किलोमीटरपेक्षा कमी रूंदी असल्यामुळे या पार्कमध्ये फिरताना आजूबाजूच्या दाट झाडीतून आकर्षक आकाराच्या व रंगांच्या गगनचुंबी इमारती सतत डोकावताना दिसत होत्या...
झाडीतून डोकावणार्या आकर्षक गगनचुंबी इमारती
बर्फावरून बिनचाकांच्या गाड्या ओढत नेणार्या कुत्र्यांबद्दल (स्लेड डॉग) आदर दाखवणारे स्मारकशिल्प वाटेतल्या एका खडकावर स्थापित केलेले दिसले. त्या श्वानमुर्तीबरोबर फोटो काढायचा मोह झालाच...
स्लेड डॉग स्मारकशिल्प
या पार्कमध्ये ३६ पूल आहेत. त्यातले काही पाण्याचे तलाव ओलांडण्यासाठी आहेत तर काही रस्ते अथवा पायवाटांच्या वरून जातात. कोणतेही दोन पूल एकसारखे नाहीत. त्यामुळे, काही ना काही वैशिष्ट्य असलेला पूल आपल्याला मधून मधून दिसत राहतो आणि त्याच्या वरून किंवा खालून चालत आपला प्रवास चालू राहतो...
तळभागात तांबड्या विटांची नक्षी असलेला पूल
अमेरिकन पार्कमध्ये पर्यटकांची चित्रे काढणारे किंवा गायन-वादन करणारे कलाकार दिसणे ही नेहमीची गोष्ट आहे...
पर्यटकांची रेखाचित्रे काढणारा कलाकार
गायन-वादन काढणारे कलाकार
मोठमोठी हिरवळ असलेली मैदाने आणि क्रीडांगणे जागोजागी आहेत. त्यांचा पुरेपूर फायदा उठवत सुट्टी (पिकनिक) साजरी करणारे नागरिक व पर्यटक सतत दिसत होते...
जरा पुढे गेल्यावर ध्वजनृत्याचा सराव करणारा एक संघ दिसला...
ध्वजनृत्याचा सराव करणारा संघ
सुट्टी आणि स्वच्छ आकाशाचा फायदा घेत असलेल्या लोकांमुळे पार्कभर उत्सवाचे आणि पिकनिकचे वातावरण होते. तो आनंदोत्सव पाहत पाहत प्रसिद्ध बेथेस्डा टेरेस व कारंज्याकडे निघालो...
बेथेस्डा कारंज्याच्या दिशेने जाताना ०१ : चेरी हिल फाऊंटन
बेथेस्डा कारंज्याच्या दिशेने जाताना ०२ : बो पूल (Bow Bridge)
बेथेस्डा कारंजे
बेथेस्डा कारंजे या पार्कमधील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. या कारंज्याच्या सर्वात वरच्या टोकावर उभ्या असलेल्या स्त्री देवदूताचे आठ फूट उंचीचे कांस्यशिल्प आहे. ख्रिश्चन ग्रंथांतील (गॉस्पल ऑफ जॉन) वर्णनांनुसार बनवलेले हे जलदेवतेचे शिल्प बेथेस्डा तलावातील पाण्याला रोगनिवारक बनण्याचे वरदान देत आहे. तिच्या एका हातात पावित्र्याचे चिन्ह असलेली लिली आहे तर दुसरा हात वरदान देण्याच्या मुद्रेत आहे. देवदूताच्या पायाखालील छत्रीसारख्या आकाराखाली संयम, पावित्र्य, आरोग्य व शांती यांचे प्रतिनिधित्व करणार्या चार मूर्ती आहेत...
बेथेस्डा कारंजे
कारंज्याच्या एका बाजूला मानवनिर्मित तलाव आहे. तर दुसर्या बाजूला दोन स्तरांचा चौथरा आहे. त्याला कारंज्याच्या नावावरून बेथेस्डा टेरेस असे नाव पडले आहे. चौथर्याच्या दोन्ही बाजूला वरचा व खालचा स्तर जोडणारे रुंद नक्षीदार जिने आहेत...
बेथेस्डा कारंज्याच्या बाजूने दिसणारा बेथेस्डा चौथरा
वरच्या स्तराखालून पलीकडे जाण्यासाठी एक छोटा भुयारी मार्ग आहे. त्याला नक्षीदार टाईल्सने अलंकृत केले आहे...
बेथेस्डा चौथर्याच्या वरच्या स्तराखालून जाणारा अलंकृत भुयारी मार्ग
बेथेस्डा टेरेसच्या वरच्या स्तरावरून मानवनिर्मित तलाव, कारंजे आणि त्याचा परिसर यांचे सुंदर विहंगम पॅनोरामा दिसतो...
बेथेस्डा चौथर्याच्या वरच्या स्तरावरून दिसणारे कारंजे व तलावाचे पॅनोरॅमिक दृष्य
बेथेस्डा परिसराचे निरीक्षण करत बसून काही काळ पायांना विश्रांती दिली आणि पार्कच्या मानवनिर्मित जंगलातून पुढची वाटचाल सुरू केली...
तलावात चाललेला जलविहार
पार्कच्या मानवनिर्मित जंगलातून पुढे वाटचाल
कॅथेड्रल पार्कवे स्टेशन कडुन आलात तर कॅफे अम्रिता मध्ये ब्लुबेरी पॅनकेक्स खावेत. आणि दोन ब्लॉक चालत जाऊन अॅमस्टरडॅम एव्हेन्यु वरचं ते कॅथेड्रल पाहुन यावं! अप्रतिमच आहे ते सुद्धा! तिथे फिरताना मात्र खरंच वाटतं की इथे रहाण्यात मजा आहे..
कॅथेड्रल सुंदर आहे. तिकडून दोन-तीन ब्लॉक उत्तरेला चालत जाऊन आमचं विद्यापीठ नाही पाहिलं का? आणखी जरा चाललं की रिव्हरसाईड चर्च दिसतं, तेही छान आहे. अमेरिकेतलं सगळ्यात उंच चर्च आहे.
तिथले राजकारणी सर्वच बेट काँक्रिट जंगल बनवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी लेखात सुरुवातीच्या नकाश्यात दिलेला डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) बनवलाही होता (पहिले चित्र). लोकांनी संघर्ष करून त्यांना त्यातला मोठा भाग पार्कला ठेवणे भाग पाडले. या संघर्षाच्या खाणाखूणा म्हणून तिथे मिळालेले १८११ साली ठोकलेले काही सर्वे बोल्ट्स तसेच ठेवले आहेत (दुसरे चित्र). अजूनही काही नागरिक पार्कच्या जंगलवजा भागांत अधिक सर्वे बोल्ट्स शोधण्यासाठी मोहिमा काढत असतात !
बल्वडिअर कॅसल (Belvedere Castle)
ही गोथिक आणि रोमनेस्क स्थापत्यशात्रांचा संगम असलेली गढी सेंट्रल पार्कमधील दोन क्रमांकाच्या उंचीच्या टेकाडावर व एका तलावाच्या काठावर बांधलेली आहे. ग्रॅनाइट दगड वापरून बांधलेली मुख्य गढी, तिच्यापासून जरा दूर शंकूच्या आकाराचे छप्पर असलेला टॉवर आणि सभोवती एक कठडा असलेला उंच निरीक्षण चौथरा आहे. तेथून दिसणार्या पार्क व मॅनहॅटनच्या उंच इमारतींचे पॅनोरॅमिक दृश्यावरून गढीचे बल्वडिअर (इटॅलियन भाषेत, सुंदर दृश्य) हे नाव पडले आहे.
तलावाच्या विरुद्ध किनार्यावरून दिसणारे गढीचे सुंदर दृश्य
असे असूनही ही सुंदर जागा सुरुवातीला सेंट्रल पार्क वेदर स्टेशनला दिली गेली आणि पर्यटकांना सुंदर अनुभवापासून वंचित ठेवले गेले. काही काळाने हवामानाचा अंदाज करण्याच्या सुधारलेल्या यंत्रणांमुळे या जागेची गरज संपली व तिला पडीक ठेवले गेले. मात्र, १९८३ मध्ये तिचा जीर्णोद्धार करून नवीन हवामानविषयक यंत्रासाठी टॉवर राखून ठेवून इतर भाग पर्यटकांसाठी खुला केला गेला. त्यामुळे पर्यटकांसाठी पार्कमध्ये एक सुंदर आकर्षण निर्माण झाले. अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांत या गढीचे चित्रण केले गेले आहे.
गढीकडे जाणार्या रस्त्यावर इतकी दाट झाडी वाढली आहे की ती दुरून सर्व बाजूंनी सहजी दिसत नाही. पण हिरवाईत लपलेल्या तिची जागा गूगलची मदत घेऊन शोधून काढलीच...
झाडीत लपलेली गढी
गढीवर नेणार्या पायर्या चढून निरीक्षण चौथर्यावर आलो तेव्हा पाश्चात्त्य परिकथेतील गढीत गेल्यासारखे वाटले...
गढीच्या इमारतीत फारसे बघण्यासारखे नाही. एक आठवणवस्तूंचे दुकान व एक छोटे रेस्तराँ आहे. मात्र निरीक्षण मनोर्यावरून दिसणारे विहंगम नजारे मनमोहक होते. त्यातले काही खालील चित्रांत पाहता येतील...
निरिक्षणमनोर्यावरून दिसणारा तलाव; त्याच्या शेजारचे ग्रेट लॉन व
त्याच्यावर पिकनिक साजरा करणारे लोक; आणि दूरवर दिसणार्या गगनचुंबी इमारती
निरिक्षणमनोर्यावरून दिसणारे देलाकोर्ट खुले थिएटर
१८०० आसनक्षमतेच्या देलाकोर्ट थिएटरमध्ये आतापर्यंत शेक्सपियरच्या नाटकांचे १५० पेक्षा जास्त मोफत प्रयोग सादर केले गेले आहेत.
स्वीडिश कॉटेज मॅरिओनेट थिएटर
गढीच्या पायर्या उतरल्या की आपण पार्कच्या एका फुलझाडांनी भरलेल्या विभागात प्रवेश करतो. त्यात एक जुन्या लाकडी घरासारखी दिसणारी इमारत आहे. ही स्वीडिश कॉटेज मॅरिओनेट थिएटरची इमारत स्वीडनने पार्कला १८७६ मध्ये दिलेली भेट आहे. येथे मुलांसाठी बनवलेल्या जुन्या गाजलेल्या आणि नवीन नाटकांचे प्रयोग होतात...
शेक्सपियर गार्डन
मॅरिओनेट थिएटरच्या जवळच ४ एकर जागेवर एक बाग आहे. १९१३ मध्ये निर्माण केलेल्या या बागेचे वैशिष्ट्य असे की येथे शेक्सपियरच्या कवितांत आणि नाटकांत उल्लेख आलेल्या फुलझाडांची आणि इतर वनस्पतींची लागवड केलेली आहे. लागवडीची रचनाही नाटककाराच्या मूळ इंग्लिश गावाच्या परिसरातील बागांप्रमाणे केलेली आहे. १९१६ मध्ये शेक्सपियरच्या त्रिशतकी निर्वाणवर्षी या बागेचे नाव शेक्सपियर गार्डन असे ठेवले गेले.
सेंट्रल पार्कच्या इतिहासातील अनास्थेच्या काळात ही बागही दुर्लक्षित होऊन १९७० पर्यंत तिची पूर्ण दुर्दशा झाली. १९७५ मध्ये नागरिकांच्या स्वयंसेवी संस्थांनी तिच्या पुनर्निर्माणाच्या कामाची सुरुवात केली. त्यानंतर सेंट्रल पार्क काँझरवेटरीने ते काम हातात घेऊन, तेथे अनेक फुलझाडांची पुनर्लागवड करून, १९८७ पर्यंत तिला तिचे मूळ वैभव प्राप्त करून दिले.
या बागेतल्या काही वैशिष्ट्यपूर्ण फुलांची प्रकाशचित्रे...
शेक्सपियर गार्डनमधली काही फुले
बागेतून पुढे निघालो आणि घ्यानात आले की जेमतेम अर्धाच पार्क बघून झाला आहे. आणि तेही आम्हाला महत्त्वाची न वाटणारी आकर्षणे गाळून पुढे जात असल्याने जमले होते ! वाटेत नावाप्रमाणेच विस्तीर्ण असलेले "ग्रेट लॉन" लागले. या अंडाकृती जागेवर विविध खेळांची सहा मैदाने आहेत. असे असूनही त्या मैदानांमधल्या व भोवतालच्या हिरवळीत अनेक मोठमोठी दाट छाया देणारी झाडे आहेत. आठवड्याच्या सुट्टीचा दिवस असल्याने भरगच्च गर्दी होती. बरेच गट मोक्याच्या जागा पकडून मैदानांवर खेळत होते, हिरवळीवर खेळत होते, बसून गप्पा मारत होते, तर काहींनी मस्तपैकी ताणून दिली होती...
चार वाजत आले होते. त्या विस्तीर्ण हिरवळीवर एक कमी गजबजाटाची झाडाच्या सावलीतली जागा शोधणे फारसे कठीण गेले नाही. मग काय, आम्ही तिच्यावर हक्क प्रस्थापित करून मोकळेपणे हिरवळीवर पसरून ताणून दिली ! अर्ध्या पाऊण तासांच्या डुलकीने ताजेतवाने होऊन परत वाटचाल सुरू केली. पुढचा थांबा होता क्लिओपात्राज नीडल्.
क्लिओपात्राज नीडल्
प्राचीन इजिप्तमधून पाश्चात्त्य जगात आणलेल्या आणि लंडन, पॅरिस व न्यू यॉर्क शहरात पुरर्स्थापित केलेल्या तीन दगडी स्तंभांना (ओबेलिस्क) क्लिओपात्राज नीडल् या लोकप्रिय नावाने संबोधले जाते. हे प्रत्येकी साधारण २१ मीटर उंच व १८० टन वजनाचे आहेत. या स्तंभांना प्राचीन इजिप्तमध्ये अनंतत्वाची आणि अमरत्वाची खूण समजले जात होते. प्राचीन इजिप्तमध्ये हे स्तंभ दोन जोड्यांच्या रुपाने उभारले गेले होते. लंडनचा व न्यू यॉर्कचा स्तंभ एका जोडीतील आहेत. पॅरिस येथील स्तंभाचा जुळा भाऊ इजिप्तमधील लुक्झॉर येथे आहे.
फॅरो थुत्मोज-III याने हेलिओपोलिस येथील रा (सूर्यदेव) मंदिराच्या आवारात इ स पूर्व १४२५ मध्ये या स्तंभांची सर्वप्रथम उभारणी केली. त्यांच्यावरची प्राचीन इजिप्शियन चित्रलिपीतील अक्षरे (हायरोग्लाफिक्स) साधारण २०० वर्षांनंतर फॅरो रामसेस-II याच्या कारकीर्दीत त्याच्या युद्धविजयांची स्तुती नोंदण्याखातर कोरली गेली. या सनावळी पाहता, सेंट्रल पार्कमधील स्तंभ ही न्यू यॉर्क शहरातील सर्वात जुनी वस्तू मानवनिर्मित वस्तू आहे.
रोमन सम्राट ऑगस्ट्स सीझरच्या काळात इजिप्त रोमन साम्राज्याचा भाग होता. त्या काळापर्यंत हे स्तंभ आदवे होऊन रेतीखाली गाडले गेले होते. ऑगस्टसने इ स पूर्व १२ मध्ये या स्तंभांना वाळूतून काढून इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहरातील सिझेरियम नावाच्या इमारतीसमोर ज्यूलियस सीझरच्या स्मरणार्थ उभारले. सिझेरियम ही इमारत प्रसिद्ध इजिप्शियन राणी क्लिओपात्रा-VII हिने मार्क अँटनी याच्या नावाने देऊळ म्हणून बांधली होती. या इतिहासामुळे या स्तंभांना क्लिओपात्राज नीडल् असे नाव पडले आहे.
न्यू यॉर्क शहरातला स्तंभ तेथे कसा पोचला याबाबत दुमत आहे. स्तंभाजवळ कोरलेल्या पाटीप्रमाणे इस्मेल पाशा या इजिप्तमधील सत्ताधार्याने हा स्तंभ शहराला भेट दिला. तर काहींच्या मते विल्यम वांडरबिल्ट या प्रसिद्ध अमेरिकन व्यापार्याने तो चलाखीने हस्तगत केला व अमेरिकेत आणला. हा अवजड स्तंभ इजिप्तमधून अमेरिकेत आणणे हा एक मोठा प्रकल्प होता. त्याची सेंट्रल पार्कमध्ये १९८० साली उभारणी केली गेली.
आजूबाजूच्या घनदाट झाडीमुळे या २१ मीटर उंचीच्या स्तंभाचे ठिकाण शोधायला गूगलची जराशी मदत घ्यावीच लागली. मात्र जवळपास आल्यावर झाडीतून डोकावणार्या क्लिओपात्राच्या सुईचे दर्शन झाले व तिच्या दिशेने निघालो...
क्लिओपात्राज नीडल् ०१ व ०२ : प्रथमदर्शन व जवळून दर्शन
त्याच्या जवळ जाऊन आजूबाजूला फिरत त्याच्या प्रत्येक बाजूवर कोरलेले शिलालेख पाहता येतात. हायरोग्लाफीक्स न वाचता येणार्या बहुसंख्य पर्यटकांच्या सोयीसाठी त्यांचे भाषांतर प्रत्येक बाजूस असलेल्या ब्रॉझच्या पट्ट्यांवर कोरलेले आहे. तो बहुतेक सर्व मजकूर फॅरोंची स्तुती आणि त्याच्या युद्धातल्या विजयांची वर्णने आहेत...
स्तंभाच्या एका पृष्ठभागावरची हायरोग्लाफिक्स व त्यांचे इंग्लिश भाषांतर
फॅरोच्या स्तुत्या वाचून त्याला "वा, वा" अशी दाद देत पुढे वाटचाल सुरू केली. या सुईच्या बाजूलाच मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट आहे. पण पुरेश्या वेळे अभावी त्याला दुरूनच "हाय" म्हणून पुढे निघालो. थोड्याच वेळात एक विशाल तलाव लागला.
जॅक्लीन केनेडी ओनासिस (जेकेओ) रिझर्वायर
१८५८ ते १८६२ या कालखंडात निर्मिलेला हा ४३ हेक्टर (१०६) एकर क्षेत्रफळाचा मानवनिर्मित तलाव ३८ लाख घनमीटर पाण्याची साठवण करतो. १९९३ पर्यंत याचे पाणी मॅनहॅटनच्या लोकवस्तीसाठी वापरले जात असे. पण हल्ली त्याचे पाणी केवळ पार्कसाठी आणि पार्कमधल्या इतर मानवनिर्मित तलावांत पाणी भरण्यासाठी वापरले जाते. पूर्वी (आणि आताही स्थानिक लोकांमध्ये) केवळ सेंट्रल पार्क रिझर्वायर या नावाने या तलावाची ओळख आहे. न्यू यॉर्क शहराच्या विकासात श्रीमती केनेडी ओनासिस यांनी केलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ या तलावाचे नाव १९९४ मध्ये जॅकलिन केनेडी ओनासिस (जेकेओ) रिझर्वायर असे बदलले गेले.
जेकेओ रिझर्वायर ०१
तलावाच्या काठाने सुंदर झाडी व फुलझाडांची लागवड केलेला रूंद धावण्याचा मार्ग (जॉगिंग ट्रॅक) बनवलेला आहे. मॅनहॅटनकर त्याचा पुरेपूर उपयोग करताना दिसले. या तलावाच्या किनार्याजवळील १०४० फिफ्थ अॅव्हन्यू येथे श्रीमती केनेडी ओनासिस यांचा निवास होता व तेथून जवळ असलेल्या तलावाच्या किनार्यावर त्या धावण्याचा व्यायाम करसाठी येत असत. आम्हीही उजव्या किनार्यावरील धावण्याच्या मार्गावरून पुढे चालू लागलो...
जेकेओ रिझर्वायर ०१ : अल्याडच्या किनार्यावरून चालताना
जेकेओ रिझर्वायर ०१ : पल्याडच्या किनार्यावरचे दृश्य
काही वेळाने उजवीकडील ५व्या अॅव्हन्यूवर नेणारा जोडरस्ता दिसला. त्यावरून चालत ५वा अॅव्हन्यू पकडून एका बाजूला पार्क व एका बाजूला अॅव्हन्यूची मजा बघत पुढे निघालो. वाटेत अॅव्हन्यूपलिकडचे "म्युझियम ऑफ द सिटी ऑफ न्यू यॉर्क" दिसले. साडेसहा वाजले होते, संग्रहालय बंद झाले होते. उघडे असते तरी ते बघायला ताकद उरली नसल्याने पुढे चालत राहिलो...
म्युझियम ऑफ द सिटी ऑफ न्यू यॉर्क
काँझरवेटरी गार्डन
आता बस पकडून घरी निघावे असा विचार करत बसथांब्याकडे जात असतानाच गुगलबाबाने पार्कमधली काँझरवेटरी गार्डन केवळ पन्नासएक मीटरवर आहे असे दाखवले. तिला भेट देण्याचा मोह आवरला नाही. पुढे निघालो तर तिचे प्रवेशद्वार केवळ १०-१५ मीटरवरच दिसले (गुगलबाबा छोट्या अंतरांच्या बाबतीत अशी गंमत नेहमी करतो !). आतापर्यंत न्यू यॉर्क शहरातल्या अनेक सुंदर बागा बघून झाल्या असल्या तरी या बागेनेही काही नवीन दाखविण्याचा पायंडा न मोडता नवीन नजारे दाखवून आमचे भरपूर मनोरंजन केले. तेथे काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो खाली देत आहे...
काँझरवेटरी गार्डन ०१
काँझरवेटरी गार्डन ०२
काँझरवेटरी गार्डन ०३
काँझरवेटरी गार्डन ०४
काँझरवेटरी गार्डन ०५
काँझरवेटरी गार्डन ०६
काँझरवेटरी गार्डन ०७ : काही फुलोरे
बागेने मनाचे बरेच रंजन केले. पण पायांची तक्रार बरीच वाढल्याने परत सरळ ५वा अॅव्हन्यू गाठून घराकडे जाणारी बस पकडली.
(क्रमशः )मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा
न्यू यॉर्क शहराचा नजारा बघण्याचा अजून एक महत्त्वाचा पर्याय पाण्यातून जातो. हा पर्याय अनेक देखण्या शहरांत उपलब्ध आहे. मॅनहॅटनसारखे जगप्रसिद्ध बेट आणि त्याच्या बाजूचा भूभाग अशी भौगिलिक रचना असलेल्या आणि जलवाहतूक ही रोजच्या जीवनाची गरज असलेल्या न्यू यॉर्क शहरात, हा पर्याय पर्यटन व्यवस्थेतले एक महत्त्वाचे आकर्षण बनले नसते तरच आश्चर्य होते. ही जलसफर दिवसा किंवा रात्री, धावती किंवा आरामात, दुपारच्या अथवा रात्रीच्या जेवणासह आणि गायनवादनाच्या साथीत करता येते. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे.
स्टॅटन आयलँड फेरी :
या फेरीने मॅनहॅटनवरून स्टॅटन बेटावर किंवा विरुद्ध दिशेने जाऊन गंतव्यावर
हवे तितका वेळ भटकून परतता येते. अर्ध्या तासाचा प्रवास असलेली ही फेरी
दोन्ही बाजूंनी दर अर्ध्या तासाने सुटते व विनासुट्टी वर्षभर २४ X ७ चालू
असते. या प्रवासात जलसफरीच्या आनंदाबरोबरच मॅनहॅटनची आकाशरेखा, न्यू
जर्सीची आकाशरेखा व हिरवागार किनारा, एलिस बेट, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा,
इत्यादी आकर्षणाचे बोटीवरून दर्शन होते. ही मुनिसिपल फेरी सेवा पूर्णपणे चकटफू आहे ! त्यामुळे दोनतीन तास मोकळे असले तर गंमत म्हणून या सोयीचा फायदा घेता येईल.
स्टॅटन आयलँड फेरी
अनेक कंपन्यांच्या असंख्य पर्यायांतून शेवटी प्रकार, आवड आणि खर्च यांचे उत्तम गुणोत्तर असलेला सर्कल फेरी या कंपनीची मॅनहॅटन बेटाला पूर्ण प्रदक्षिणा करणारी सफर निवडली. या अडीच-तीन तासांच्या, तीन नद्यांतून व २० पुलांखालून जाणार्या जलसफरीत, पाण्यातून दिसू शकणारी न्यू यॉर्क शहरातील पाच बरोंतील (कंपनीच्या दाव्याप्रमाणे) १०१ आकर्षणे दिसतात. अर्थातच, आपल्याला इतक्या सगळ्या आकर्षणांच्या जंत्रीत रस नसतो. पण ज्यात आपल्याला रस वाटेल अशी अनेक आकर्षणे प्रवासात सतत दिसत राहून आपल्याला सतत गुंतवून ठेवतात इतके मात्र नक्की. मार्गदर्शक त्यांच्याकडे निर्देश करत सतत धावते समालोचन करत असतो. त्यामुळे आरामात खुर्चीत बसून किंवा डेकच्या एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे फेर्या मारत दोन्ही बाजूंचे नजारे पाहत अडीच-तीन तास भरकन उडून जातात.
भटकंतीसाठी घरातून बाहेर पडताना, त्या दिवशीच्या यादीत, सगळ्यात पहिली ही प्रदक्षिणा होती. तेथे पोचायला प्रथम सबवे, मग बस आणि शेवटी थोडेसे चालणे असा प्रवास होता. चालताना हा भोपळा वाटेत उभा असलेला दिसला. त्यातली म्हातारी कुठे जवळपास दिसली नाही. बहुतेक भोपळा तेथे पार्क करून ती आमच्यासारखीच बाजूला कोठेतरी भटकायला गेली असावी. भोपळ्याची सोनेरी चमक पाहता, तिच्या मुलीने तिला चांगली खातीरदारी करून परत पाठवलेले दिसत होते !...
भोपळा
आम्ही धक्का गाठला आणि तिकिटे काढून मोक्याची जागा पकडायला बोटीकडे निघालो. फेरीच्या मध्यम आकाराच्या दोन मजली बोटीवर मोठ्या खिडक्या असलेली वातानुकूलित दालने होती. वरच्या मजल्यावरचा अर्धा भाग उघड्या डेकचा होता. परिसराचे मुक्त दर्शन व्हावे यासाठी आम्ही उघड्या डेकवरच्या जागा पकडल्या. जून महिना असला तरी उन्ह अमेरिकेतले असल्याने तितकीशी काळजी नव्हती. तसेही लवकर डेक गाठल्याने आम्हाला सावलीतली जागा मिळाली. बोटीवर असलेल्या कॅफेत सँडविचेस, बर्गर, हॉट डॉग, सलाद, इतर अनेक खाण्याचे पर्याय आणि थंड पेये, बियर व वाइनचे प्रकार उपलब्ध होते. अनेक सुविधागृहांची सोयही होती. चिरंजीवाने खाण्यापिण्याची बेगमी केली आणि तोंड चालवत स्थानापन्न होऊन आम्ही जलप्रदक्षिणेला तयार झालो...
सर्कल लाइन फेरी बोट (सहलकंपनीच्या संस्थळावरून साभार)
बोट सुटायला थोडा वेळ होता. पण, आजूबाजूच्या परिसरात बरेच काही चालू होते, ते बघण्यात तो मजेत गेला.
बीस्ट
ही १०० फूट लांबीची बीस्ट नावाची वेगवान बोट (स्पीडबोट) हडसन नदीतून ताशी ७२ किमी वेगाने सफर करण्याचा थरारक आनंद देते. तिच्या फेरीत ती स्वातंत्र्यदेवीचे पाण्यातून १०० फूट दुरून दर्शन देते आणि मधूनच ३६० अंशात गिरकी मारत पर्यटकांच्या हृदयाचा एखादा ठोका चुकवते ! एक बीस्ट धक्का सोडून वेगाने पाणी कापत जाताना दिसली...
बीस्ट सफारी
वॉटर टॅक्सी
न्यू यॉर्क शहर अनेक बेटे आणि मुख्यभूमीची काही जमीन मिळून बनले आहे हे आपण अगोदर पाहिले आहेच. त्यामुळे जलप्रवास ही तेथील एक सर्वसामान्य आवश्यकता आहे. सरकारी कंपन्या, खाजगी कंपन्या व वॉटर टॅक्सी ही सेवा पुरवतात. आमच्या बोटीपासून जवळच एक वॉटर टॅक्सीचा थांबा होता. तेथून सुटलेली एक टॅक्सी...
वॉटर टॅक्सी
जरा दूरच्या पाण्यात एक छोटी स्पीडबोट घेऊन एक जण आपले कसब दाखवत होता...
छोटी स्पीड बोट
सफरीची वेळ झाली आणि बोटीने किनारा सोडला...
आमच्या जलसफरीचा मार्ग असा होता...
मॅनहॅटनप्रदक्षिणेचा नकाशा
बंदराच्या बाहेर पडल्यावर एका बाजूला हडसन नदीच्या किनार्याजवळील मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारती दिसल्या...
धक्क्याच्या जवळील हडसन नदीचा मॅनहॅटन किनारा ०१
धक्क्याच्या जवळील हडसन नदीचा मॅनहॅटन किनारा ०२ (उजवीकडे टोकदार शिखर असलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग दिसत आहे)
तर, नदीच्या विरुद्ध किनार्यावर दूरवर न्यू जर्सी राज्यातील जर्सी सिटी शहरातील डाऊनटाऊन सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधल्या व त्याच्या जवळच्या गावांतील गगनचुंबी इमारती दिसल्या...
जर्सी सिटीतील व शेजारच्या गावांतील गगनचुंबी इमारती
लॅकावाना
थोडे पुढे गेल्यावर, या दोन गगनचुंबी आकाशरेखांच्या मध्यभागी असलेल्या, न्यू जर्सी राज्यातील माँटक्लेर गावातील तांबड्या विटांनी बांधलेल्या जुन्या ग्रेशियन-डोरीक शैलीत बांधलेल्या व Lackawanna असे भल्यामोठ्या अक्षरांत नाव असलेल्या आकर्षक इमारतीने लक्ष वेधून घेतले. १९१३ साली ही इमारत रेल्वे स्टेशनच्या स्वरूपात कामी आणली गेली. १९८१ साली स्टेशन जवळच दुसरीकडे हलविले गेले आणि या इमारतीचे सुपरमार्केट, इतर लहान दुकाने व रेस्तराँ असलेल्या मॉलमध्ये रूपांतर केले गेले. भाडेकरू कंपनीने, १९१५ साली लीज संपल्यावर त्या इमारतीचा उच्चस्तरीय व्यापारी उपयोग करण्यासाठी तिच्या दृश्य स्वरूपात बदल करण्याचा मनोदय जाहीर केल्यामुळे, त्याला विरोध म्हणून लीजची मुदत वाढवली गेली नाही. सद्या ही आकर्षक इमारत मोकळी पडून आहे...
लॅकावाना इमारत
कोलगेट घड्याळ व गोल्डमन साक्स इमारत
जर्सी सिटीच्या किनारपट्टीच्या अजून थोडे जवळ गेल्यावर कोलगेट कंपनीचे नाव असलेले १५ मीटर व्यासाचे एक मोठे घड्याळ दिसते. पूर्वी कोलगेट-पामोलिव कंपनीच्या मुख्य कार्यालयाची इमारत घड्याळाच्या जागेजवळ होती पण आता ती तेथून ४०० मीटर दूर हलविली आहे. या घड्याळामागे न्यू जर्सी राज्यातली सर्वात उंच १०० मीटर उंचीची गोल्डमन साक्स टॉवर ही इमारत दिसते...
कोलगेट घड्याळ व त्याच्या मागची गगनचुंबी गोल्डमन साक्स इमारत
एलिस बेट व इमिग्रेशन संग्रहालय
थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एलिस बेट व त्याच्यावरची जुन्या शैलीतली आकर्षक इमारत दिसते. हे बेट १८९२ ते १९५४ या कालखंडात परदेशातून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी येणार्या लोकांची तपासणी करण्याचे केंद्र होत. या बेटावर दिसणार्या इमारतीत १९९० सालापासून इमिग्रेशन संग्रहालय आहे...
एलिस बेट
स्वातंत्र्यदेवीचा पुतळा (Statue of Liberty)
इथून पुढे, आतापर्यंत दूर असल्याने चिमुकला दिसणारा एका स्वतंत्र बेटावरचा स्वातंत्र्यदेवीचा पुतळा त्याचे खरे भव्य स्वरूप हळू हळू उघडे करू लागतो...
स्वातंत्र्यदेवीचा पुतळा व त्याचे बेट
निओक्लासिकल शैलीतला हा जगप्रसिद्ध पुतळा ४६ मीटर उंचीचा आहे. जमिनीपासून (चौथर्यासकट) मशालीच्या टोकापर्यंत त्याची उंची ९३ मीटर आहे. या २४०,१०० किलो वजनाच्या या पुतळ्याच्या चपलांचा नंबर अमेरिकन परिमाणाप्रमाणे ८७९ आहे !
या लिबर्टास नावाच्या रोमन देवतेच्या पुतळ्याच्या उंचावलेल्या एका हातात मशाल व दुसर्या हातात ४ जुलै १७७६ ही अमेरिकन स्वातंत्र्यदिनाची तारीख कोरलेली पाटी (tabula ansata) आहे. हा पुतळा फ्रेंच जनतेकडून अमेरिकेला मिळालेली भेट आहे. तो ४ जुलै १८८४ ला पॅरिसमध्ये अमेरिकेला अर्पण केला गेला. मात्र त्याचा अमेरिकेतला पायथा बांधून पुरा झालेला नसल्याने तो जानेवारी १८८५ पर्यंत फ्रान्समध्येच होता. इतका मोठा पुतळा सलग वाहून नेणे शक्य नसल्याने वाहतुकीच्या सोयीसाठी त्याचे अनेक भाग केले गेले व ते २१४ खोक्यांत भरून बोटीने अमेरिकेला पाठविण्याची तयारी केली गेली. पैश्यांच्या समस्येमुळे वाहतूकीचे काम रखडलेल. तो खर्च फ्रेंच सरकारने उचलला आणि १८८५ च्या जूनमध्ये पुतळ्याचे सर्व भाग अमेरिकेत पोचले.
इकडे अमेरिकेत चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे, फ्रान्सवरून येणार्या या भेटीसाठी लागणारा पायथा बनविण्यासाठी अमेरिकने पैसे खर्च करण्याला लोकांचा विरोध झाला. पैसे उभे करण्यासाठी केलेल्या अनेक कार्यक्रमांनंतरही पुतळ्याचे काम करणार्या समितीच्या बँकेच्या खात्यात १८८२ साली केवळ $३००० होते. त्यात भर म्हणून, पायथ्यासाठी लागणारे $१० लाख देण्याला सरकारने नकार दिला ! त्यानंतर, १८८४ साली या कामासाठी $५०,००० देण्याच्या मसुद्याला न्यू यॉर्कच्या मेयरने व्हेटो वापरून विरोध केला. ही अवस्था पाहून केवळ न्यू यॉर्क शहरच नव्हे तर बोस्टन, फिलाडेल्फिया व इतर शहरांतील अनेक नागरिक संघटनांनी पुढे येऊन हा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. शेवटी त्यांच्या मदतीने २८ ऑक्टोबर १८८६ या दिवशी पूर्व न्यू यॉर्क गव्हर्नर व त्या काळचे अमेरिकन राष्ट्रपती ग्रोव्हर क्लिव्हलँड यांच्या हस्ते पुतळा अमेरिकन जनतेला अर्पण करून भेटीला खुला केला गेला.
तेव्हापासून हा पुतळा बोटीने एलिस बेटावर पोचणार्या स्थलांतरितांचे १९५४ पर्यंत स्वागत करत उभा राहिला. त्यानंतर, विमानवाहतूक सुरू झाल्याने स्थलांतरीत बोटीने येणे बंद झाले. त्यामुळे, ते पूर्वीचे महत्व आता इतिहासजमा झाले असले तरी जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षणांच्या यादीतले या पुतळ्याचे स्थान आजही अबाधित आहे.
एकंदरीत, आपण समजत असतो की, हा पुतळा फ्रेंच आणि अमेरिकन सरकारांचा प्रेमाचा संयुक्त प्रयत्न असेल. पण, फ्रेंच सरकारने केलेला वाहतूक खर्च सोडला तर इतर बाबतीत, विशेषतः अमेरिकेत, या प्रकल्पाला विरोधच झाला होता ! तेव्हा खरी वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रकल्प मुख्यतः फ्रेंच व अमेरिकन जनतेच्या खाजगी प्रयत्नातून आणि सरकारी विरोधाला न जुमानता, झालेला आहे !
कॅप्टन आपले कौशल्य वापरत बोट या पुतळ्यापासून साधारण १०० फुटांवर आणून तिची गती कमी करतो. येथून ते भव्य शिल्प पूर्णरूपात पाहण्यात वेगळीच मजा आहे. त्याचे रूप डोळ्यात सामावून घेण्यात आपण गुंगून जातो...
स्वातंत्र्यदेवीचा पुतळा
तेथून परत फिरून मॅनहॅटन व ब्रूकलीनमधून वाहणार्या इस्ट नदीच्या दिशेने जाण्यासाठी बोट डावीकडे वळू लागते. न्यू यॉर्क बे (सामुद्रधुनी) आणि हडसन, इस्ट व हार्लेम या तीन नद्या न्यू यॉर्क शहराच्या प्रभागांना एकमेकापासून दूर करतात. त्यापैकी हडसन व हार्लेम याना नद्या असे संबोधले जात असले तरी न्यू यॉर्क शहरातले त्यांचे भाग प्रत्यक्षात खाड्या आहेत आणि इस्ट तर पूर्णपणे खाडी आहे. नद्या व खाड्यांनी विभागलेले न्यू यॉर्क शहराचे अनेक प्रभाग शेकडो पूल व पाण्याखालून जाणार्या भुयारी मार्गांनी जोडलेले आहेत. त्यांची संख्या जवळ जवळ २००० आहे असा दावा केला जातो (खरे खोटे न्यू यॉर्क प्रशासन जाणे), त्यातल्या मुख्य पूल व भुयारी मार्गांची यादी इथे सापडेल. यातले बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पूल आपल्याला आजच्या जलप्रवासात दिसणार आहेत.
व्हेराझॅनो-नॅरोज पूल
बोट इस्ट नदीच्या दिशेने वळू लागली की ब्रूकलीन व स्टॅटन आयलँड हे दोन प्रभाग जोडणारा व्हेराझॅनो-नॅरोज नावाचा पूल दिसतो. इटॅलियन दर्यावर्दी व्हेराझॅनो याचे नाव दिलेला हा पूल ब्रूकलीन व स्टॅटन आयलँड यांच्यामध्ये असलेल्या अरुंद पाण्यावरून (इंग्लिशमध्ये, दोन विशाल पाण्याचे साठ्यांना जोडणार्या अरुंद भागाला नॅरोज असे म्हणतात) जातो यावरून त्याचे नाव पडले आहे. सन १९६४ साली बांधलेला हा पूल १९८१ पर्यंत जगातला सर्वात जास्त लांबीचा टांगता (सस्पेन्शन) पूल होता. या पुलाची एकूण लांबी ४,१७८ मीटर आणि त्यांच्या स्टीलच्या दोरांवर टांगलेल्या भागाची लांबी १,२९८ मीटर आहे. आजही तो अमेरिकन खंडांतला सर्वात जास्त लांबीचा सस्पेन्शन पूल आहे. न्यू यॉर्क व न्यू जर्सी बंदरांत येजा करणार्या सर्व जहाजांना त्याच्या खालून जावे लागते, यामुळे भरतीच्या पाण्याच्या उंचीपासून पुलाच्या खालच्या भागाची उंची ६९.५ मीटर आहे. हा द्वीस्तरीय (डबलडेकर) पूल आहे व त्याच्या प्रत्येक स्तरावर ६ लेनचे रस्ते आहेत. याच्या स्टॅटन आयलँडकडील टोकापासून जगप्रसिद्ध न्यू यॉर्क मॅरॅथॉनची सुरुवात होते.
व्हेराझॅनो-नॅरोज पूल
इस्ट नदीचे ब्रूकलीन व मॅनहॅटन किनारे
बोट १८० अंशात वळण घेऊन ती मागे फिरली की सर्वात प्रथम आपल्याला उजवीकडे ब्रूकलीनचा सुंदर हिरवा किनारा व तेथील मध्यम उंचीच्या इमारतींनी बनलेली आकाशरेखा दिसू लागते...
ब्रूकलीन ०१ : सुंदर हिरवा किनारा व तेथील मध्यम उंचीच्या इमारतींनी बनलेली आकाशरेखा
जरा पुढे गेले की ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड दिसू लागते. काही दिवसांपूर्वी तेथून मॅनहॅटनची आकाशरेखा बघितली असल्याने ती जागा आता नदीच्या बाजूने बघणे जास्तच रोचक वाटले...
ब्रूकलीन ०२ : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड
तेथून बोट वळवत नजर डावीकडे नेताना, अर्ध्या वाटेत नाकासमोर आपल्याला प्रसिद्ध ब्रूकलीन पूल दिसतो...
ब्रूकलीन ब्रिज
हा जगातला पहिला स्टीलच्या तारांनी टांगलेला (सस्पेन्शन) १८२५ मीटर लांबीचा पूल आहे. १८८३ ते १९०३ या कालखंडात तो जगातील सर्वात लांब टांगता पूल होता. न्यू यॉर्क शहरातील, केवळ ४.५ फूट जास्त लांब असलेल्या विलियम्सबुर्ग पुलाने त्याची जागा १९०३ मध्ये पटकावली ! निओगोथिक शैलीत बांधलेल्या या पुलावरून दिवसभरात १२५,००० चारचाकी, २,६०० सायकली आणि ४,००० माणसे प्रवास करतात. या पुलावरून मॅनहॅटन ते ब्रूकलीन किंवा विरुद्ध दिशेने चालत जाणे हा एक सुंदर पर्यटन अनुभव असल्याचे मानले जाते...
ब्रूकलीन ०३ : ब्रूकलीन ब्रिजचा ब्रूकलीनच्या बाजूचा भाग
नजर डावीकडे नेली की मॅनहॅटनच्या दक्षिण टोकावरील न्यू यॉर्कच्या डाऊनटाऊनची जगप्रसिद्ध आकाशरेखा दिसू लागते...
मॅनहॅटन ०१ : डाऊनटाऊन
मॅनहॅटन ०२ : ब्रूकलीन ब्रिजखालून प्रवास करताना दिसणारे न्यू यॉर्क शहराचे (मॅनहॅटन) डाऊनटाऊन
त्यानंतर पुढे इस्ट नदीच्या दोन्ही किनार्यांवरची दृश्ये पाहत असतानाच बोट एकामागोमाग मॅनहॅटन ब्रिज व विलियम्सबुर्ग ब्रिजखालून जाते...
मॅनहॅटन ०३ : विलियम्सबुर्ग ब्रिजखालून दिसणारा मॅनहॅटन ब्रिज, त्या पलीकडील ब्रूकलीन ब्रिजचा काही भाग व डाऊनटाऊन
मॅनहॅटन ०४ : इस्ट नदीचा मध्य मॅनहॅटन किनारा
ब्रूकलीन ०४ : इस्ट नदीचा मध्य ब्रूकलीन किनारा
इथून पुढे उजव्या बाजूला ब्रूकलीन आणि डाव्या बाजूला मॅनहॅटनच्या किनार्यांवर दिसणारे नजारे बघता बघता आपण टेनीसचा सामना पाहत असल्यासारखे मान डावी-उजवीकडे हलवत राहतो...
मॅनहॅटन ०५
ब्रूकलीन ०५
मॅनहॅटन ०६ (डावीकडे संयुक्त राष्ट्रसंघाची इमारत व उजवीकडे टोकदार शिखराची क्राय्सलर इमारत दिसत आहेत)
मॅनहॅटन ०७
४३२ पार्क अॅव्हन्यू
४२६ मीटर उंचीची "४३२, पार्क अॅव्हन्यू" ही जगातली सर्वात उंच "निवासी" इमारत, न्यू यॉर्क शहरातली (१ वर्ल्ड सेंटरच्या खालोखाल) दुसर्या क्रमांकाच्या उंचीची व संपूर्ण अमेरिकेतली तिसर्या क्रमांकाच्या उंचीची इमारत आहे. २३ डिसेंबर २०१५ साली पूर्ण झालेल्या या इमारतीत १०४ सदनिका आहेत.
मॅनहॅटन ०८ : ४३२ पार्क अॅव्हन्यू, आपल्या उंचीने बाकीच्या उंच इमारतींना न्यूनगंड देत उभी दिसत आहे
जसजसे आपण उत्तरेकडे जातो तसतसे मॅनहॅटन बेटावरची हिरवाई अधिकाधिक होत जाते आणि इमारतींची उंची कमी होत जाते...
मॅनहॅटन ०९
मॅनहॅटन १०
मॅनहॅटन ११ व १२
ब्रूकलीन ०६
हार्लेम नदीचे मॅनहॅटन व ब्राँक्स किनारे
बोट इस्ट नदी व हार्लेम नदीच्या संगमामधून हार्लेम नदीत शिरते व उत्तरेकडील प्रवास चालू ठेवते. येथून पुढे, आपल्या डाव्या बाजूला हार्लेम नदीचा मॅनहॅटन किनारा व उजव्या बाजूला ब्रूकलीनऐवजी ब्राँक्स प्रभागाचा किनारा दिसू लागतो.
ब्राँक्स ०१
यांकी स्टेडियम
थोड्याच वेळात उजव्याकिनार्यावरील पूल, रस्ते आणि मध्यम उंचीच्या इमारतींमागे, ब्राँक्समधले प्रसिद्ध यांकी स्टेडियम, दिमाखाने मिरवताना दिसते. याला "अमेरिकन बेसबॉलचे कॅथेड्रल" असे म्हटले जाते. या मैदानाच्या उद्घाटनाच्या दिवशी (१८ एप्रिल १९२३) झालेल्या सामन्यात बेब रुथ याने इथली पहिली होम रन काढली. त्यामुळे या मैदानाला लाडाने "द हाउस दॅट रुथ बिल्ट" असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र जेकब रुपर्ट या बेसबॉल रसिकाने पदरचे $२४ लक्ष (आजच्या घडीला $३२० लाख) खर्च करून हे मैदान बांधले आहे ! आजतागायत येथे ६५०० च्या वर सामने खेळले गेले आहेत. यांकी संघाच ते माहेरघर (होम ग्राऊंड) आहे. ते काही काळ न्यू यॉर्क जायंट्स या संघाचेही माहेरघर होते.
ब्राँक्स ०२ : यांकी स्टेडियम
द हाय ब्रिज
हा ब्राँक्स व मॅनहॅटन जोडणारा हार्लेम नदीवरचा दगडी पूल, १८४८ साली साली मॅनहॅटनला पाण्याचा पुरवठाकरणार्या जलवाहिनीसाठी बांधला गेला. त्यामुळे तो सुरुवातीला अक्वेडक्ट ब्रिज (Aqueduct Bridge) या नावाने ओळखला जात असे. १९२७ साली केलेल्या डागडुजीत त्याचा एक भाग पाडून तेथे पोलादी कमान उभारली गेली. १९७०च्या दशकात पाणी वाहून नेण्याची गरज संपल्यावर तो ४० वर्षे निकामी पडला. २०१५ मध्ये त्याचे पदमार्ग व सायकलमार्गात रूपांतर करून जनतेसाठी खुला केले गेले. आता न्यू यॉर्क शहराचा पार्क व मनोरंजन विभाग याची निगा राखण्याचे काम करत आहे.
द हाय ब्रिज उर्फ अक्वेडक्ट ब्रिज ०१
यापुढे उत्तर मॅनहॅटनचा जंगलासमान दिसणारा हिरवागार भाग सुरू होतो. त्यातून मधूनच डोकावणारी एखादी चुकार इमारत हा शहराचा भाग असल्याची आठवण देते...
मॅनहॅटन १३
ब्रॉंक्सचा किनारा मात्र त्याच्या मध्यम उंचीच्या इमारती व बर्यापैकी झाडी असा नजारा चालूच ठेवतो...
ब्राँक्स ०३
ब्रॉडवे ब्रिज
थोड्या वेळाने जरासा विचित्र दिसणारा आणि आमच्या ओळखीचा पूल दिसला आणि बोट डावीकडे वळून मॅनहॅटनच्या उत्तर टोकाला वळसा घालत हडसन नदीच्या दिशेने चालली आहे ध्यानात आले. आमच्या घरापासून तीनेक किमीवर असलेल्या या पुलावर आम्ही संध्याकाळचा फेरफटका मारलेला असल्याने तो माहितीचा झालेला होता. हा पूल जलवाहतूकीसाठी बनवलेल्या हडसन व हार्लेम नद्यांना जोडणार्या मानवनिर्मित कालव्यावर आहे. या द्विस्तरीय पुलाच्या वरच्या स्तरावरून सबवेचा "१" हा मार्ग जातो व खालच्या स्तरावरून जाणारा ब्रॉडवे (US 9) मॅनहॅटन सोडून अमेरिकेच्या मुख्य भूमीवर ३०-३२ किलोमीटर उत्तरेकडे गेल्यावर संपतो. या रस्त्यामुळेच या पुलाला ब्रॉडवे ब्रिज हे नाव पडले आहे.
ब्रॉडवे ब्रिज
या पुलापलीकडे ब्राँक्स प्रभागात कालव्याच्या किनार्याला लागून असलेले रेल्वे स्टेशन व रस्त्यापासून तेथे नेणारा वैशिष्ट्यपूर्ण जिना लक्ष वेधून घेत होता...
ब्राँक्स ०४ : ब्रॉडवे ब्रिज जवळचे रेल्वे स्टेशन
जरासे पुढे गेल्यावर कालव्याच्या तासलेल्या उभ्या उजव्या कड्यावर, कोलंबिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पांढर्या रंगाने रंगवलेले प्रचंड आकाराचे "C" हे विद्यापिठाचे आद्याक्षर दिसते...
कालव्याच्या किनार्यावरील कड्यावरचे कोलंबिया विद्यापिठाचे अद्याक्षर
हेन्री हडसन ब्रिज व स्प्युटेन ड्युव्हिल ब्रिज
यानंतर रुंद स्प्युटेन ड्युव्हिल खाडी लागते व तिच्यावरून जाणारा मोठा आणि उंच हेन्री हडसन ब्रिज समोर येतो. हा मॅनहॅटनची पश्चिम किनारपट्टी व फोर्ट ट्रायॉन पार्क यांच्या मधून जाणार्या हेन्री हडसन पार्कवेला हा पूल ब्राँक्समध्ये घेऊन जातो. हा पूल एकुलत्या एक भव्य स्टीलच्या वैशिष्ट्यपूर्ण कंसाच्या (आर्क) आकारावर तोलून धरलेला आहे.
या पुलाच्या जवळ स्प्युटेन ड्युव्हिल ब्रिज नावाचा अॅमट्रॅक रेल्वेचा एक बसका पूल आहे. १८४९ साली बांधलेला हा पूल लाकडी होता. नंतर १९०० मध्ये त्याचे स्टीलने बांधलेल्या पुलाच्या रूपात नूतनीकरण केले गेले. या पुलावरून दर दिवशी सुमारे तीस रेल्वेगाड्या धडधडत जातात. इतर वेळी नदीच्या मध्यभागी असलेल्या पायाभोवती तो पूल ९० अंशांत गोल फिरवून त्याच्या दोन्ही बाजूंना पर्यटक बोटींच्या वाहतुकीसाठी जलमार्ग खुले केले जातात...
हेन्री हडसन ब्रिज व स्प्युटेन ड्युव्हिल ब्रिज
आतापर्यंत इतर अनेक चित्रविचित्र मध्यम आकाराच्या व लहान पूलांखालून बोट गेली होती. सगळ्यांचेच मोठे ऐतिहासिक महत्त्व नसले तरी न्यू यॉर्कच्या प्रभागांना जोडून वाहतूक सुसह्य करण्यात सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. त्यातल्या काही प्रेक्षणीय पुलांचे फोटो खाली देत आहे...
मॅनहॅटनला ब्रूकलीन व ब्राँक्सशी जोडणारे काही प्रेक्षणीय पूल
मॅनहॅटनच्या उत्तर टोकाला वळसा घालून बोट हडसन नदीच्या विशाल पात्रात शिरते व डावीकडे वळून दक्षिण दिशेने जाऊ लागते. आता इथून पुढे डाव्या बाजूला मॅनहॅटनचा तर उजव्या बाजूला न्यू जर्सी राज्याचा, असे दोन दाट झाडीने भरलेले हिरवागार किनारे दिसू लागतात. इथून पुढे हडसन नदीचे (खरे तर, खाडीचे) पात्र आतापर्यंतच्या प्रवास केलेल्या नद्या/खाड्यांच्या मानाने खूपच प्रशस्त आहे. जसजसे आपण पुढे पुढे जातो तसे ते अधिकाधिक विशाल बनत जाते व न्यू यॉर्क सामुद्रधुनीत परावर्तित होते. यापुढच्या प्रवासात न्यू जर्सीच्या किनार्याची हिरवाई बर्याच प्रमाणात अबाधित राहते, तर मॅनहॅटनच्या किनार्यावर इमारतींची गर्दी आणि उंची जास्त जास्त होत जाते.
फोर्ट ट्रायॉन पार्क व क्लॉईस्टर्स संग्रहालय
थोड्याच वेळात डावीकडे अजून एक ओळखीची खूण दिसते... फोर्ट ट्रायॉन पार्कमधल्या टेकडीवरच्या जंगलात दिमाखाने उभे असलेले क्लॉईस्टर्स संग्रहालय त्याच्या मनोर्यामुळे लगेच ओळखू येते...
फोर्ट ट्रायॉन पार्क व क्लॉईस्टर्स संग्रहालय
या टेकडीच्या पलीकडे आपले काही काळासाठीचे का होईना, पण घर आहे हे आठवून, त्याबद्दल उगाचच जरासे मस्त वाटले !
जॉर्ज वॉशिंगटन ब्रिज
थोडे पुढे गेल्यावर या सफरीतला शेवटचा पूल, जॉर्ज वॉशिंगटन ब्रिज, लागतो. हा द्वीस्तरीय टांगता पूल मॅनहॅटनला न्यू जर्सीतील फोर्ट ली शहराशी जोडतो. वरच्या स्तरावर प्रत्येक दिशेला जाणार्या ४ लेन आणि खालच्या स्तरावर प्रत्येक दिशेला जाणार्या ३ लेन असणारा हा विशाल पूल दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हाच पूल वापरून आम्ही न्यू जर्सीतल्या न्युअर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मॅनहॅटनमध्ये पोचलो होतो. संध्याकाळच्या फोर्ट ट्रायॉन पार्कमधल्या अनेक फेरफटक्यांत याचे मनोहर दर्शन झालेले होते. शिवाय घराशेजारचे रस्ते पालथे घालण्याच्या पदयात्रांपैकी दोनतीनमध्ये याला मॅनहॅटनच्या भूमीवरून पाहिले होतेच. तरीही... किंवा त्यामुळेच... त्याच्याखालून बोटीने जाताना, त्याच्या खर्या भव्यतेची नीट कल्पना येत असल्याने, अधिकच मजा वाटत होती...
जॉर्ज वॉशिंगटन ब्रिज
रिव्हरसाईड चर्च
तेथून पुढे, जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठाशेजारी असलेले, एक उंच सुळक्यासारखे दिसणारे रिव्हरसाईड चर्च आजूबाजूच्या हिरवाईच्या व इमारतींच्या खूप वर डोके... आपलं, मनोरा... उंचावून आपले लक्ष वेधून घेते. निओगोथिक मनोरा असलेले व ४० पेक्षा जास्त ख्रिश्चन पंथांना एकत्रित करणारे हे चर्च, रॉकंफेलर (ज्युनिअर) व पाद्री हॅरी फोस्डिक यांच्या समन्वयाने बांधले गेले. त्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासात, या चर्चने अमेरिकेच्या व एकंदरच जगाच्या, न्याय व समतेसाठीच्या, सामाजिक व राजकीय लढ्यांत भरीव योगदान दिले आहे...
रिव्हरसाईड चर्च
इथून पुढे उजव्या बाजूला असलेल्या न्यू जर्सीच्या किनारपट्टीवरची हिरवाई तशीच गर्द आणि मनोहर राहते व बहुतेक इमारती तिच्यात लपलेल्या राहतात. त्याविरुद्ध, डावीकडील मॅनहॅटनच्या इमारतींची उंची क्रमाक्रमाने वाढत जाते आणि नदीकाठच्या पार्क व इतर झाडी त्यांच्या पायाशी लोळताना दिसते. त्यातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण इमारतींचे हे फोटो...
मॅनहॅटन १४
मॅनहॅटन १५
हडसनचे पात्र खूपच विशाल असल्याने मॅनहॅटन बेटाचा एक पॅनोरामा फोटो काढता आला...
मॅनहॅटन १६ : पॅनोरामा
काही काळाने मध्य-दक्षिण मॅनहॅटनवरच्या बंदराचा भाग सुरू झाला. वैविध्यपूर्ण गगनचुंबी इमारतींच्या आकाशरेखेच्या पार्श्वभूमीवर दिसणार्या बंदरातील गमतीजमती पाहत असताना बोट तिच्या धक्क्याला केव्हा लागली हे ध्यानातच आले नाही...
मॅनहॅटन १७ : आकाशरेखा व किनारपट्टीवरील त्रिकोणी इमारत
मॅनहॅटन १८ : आकाशरेखा व धक्क्यावर उभे असलेले अनेक मजली क्रूझशिप
मॅनहॅटन १९ : आकाशरेखा व इंट्रेपिड संग्रहालय (डावीकडून : काँकॉर्ड विमान,
विमानवाहू नौका व तिच्यावरील एन्टरप्राइज अवकाशयानाचे पांढर्या रंगाचे
दालन)
ही सहज गंमत म्हणून केलेली अडीच-तीन तासांची जलसफर अपेक्षेपेक्षा जास्त रोचक आणि नक्कीच चिरस्मरणिय ठरली.
***************
या सफरीच्या काही चलतचित्रे (क्लिप्स) (सर्कल लाइन टूर्सच्या संस्थळावरून साभार)
***************
(क्रमशः )ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास
अमेरिकन लोक एका बाबतीत एकदम चलाख आहेत. त्यांची, १ जानेवारी ही वर्षारंभाची आणि ४ जुलै ही स्वातंत्र्यदिनाची अश्या मोजक्या सुट्ट्या सोडून इतर सर्व सुट्ट्या "अमुक महिन्याचा पहिला शुक्रवार" किंवा "अमुक महिन्याचा दुसरा सोमवार" अश्या वार धरून प्रसिद्ध केलेल्या असतात. या शासकीय चलाखीमुळे त्या सुट्ट्या आठवडी सुट्टीला (शनिवार-रविवार) जोडून येतात व सलग तीन दिवस सुट्टी मिळते. याला लॉग वीकएंड असेही म्हटले जाते. उदाहरणार्थ, २०१६ मध्ये खालीलप्रमाणे लॉग वीकएंड होते...
New Year's Day : January 1, Friday.
Martin Luther King, Jr. Day : January 18, Monday.
George Washington's Birthday: February 15, Monday.
Memorial Day : May 30, Monday.
Independence Day : July 4, Monday.
Labor Day : September 5, Monday.
Columbus Day : October 10, Monday.
(यातल्या १ जानेवारी व ४ जुलै या सुट्ट्या २०१६ मध्ये कर्मधर्मसंयोगाने आठवडीसुट्टीला जोडून आल्या होत्या.)
आमच्या वास्तव्यात त्यातल्या ३० मे व ४ जुलै या दोन सुट्ट्या दोन लॉग वीकएंडच्या रूपाने आल्याने वैयक्तिक सुट्टी खर्च न करता मुलाला तीन सलग दिवसांची मोकळीक मिळाली होती. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न नसल्यासच आश्चर्य !
असे म्हणतात की न्यू यॉर्क शहर म्हणजे काही खरी अमेरिका नाही त्याकरिता त्या शहराच्या सीमेपासून पन्नास-शंभर किमी तरी दूर जायला हवे. न्यू यॉर्कच्या उत्तरेला साधारण १२० किमी दूर कनेटिकट (Connecticut) राज्यात वेस्ट हेवन हे सुमारे ५५००० लोकवस्तीचे शहर आहे. कनेटिकट राज्य अमेरिकन उत्तर-पूर्वेतील "न्यू इंग्लंड" नावाच्या राज्यसमूहाचा भाग आहे, तसेच ते न्यू यॉर्क व न्यू जर्सी राज्यांबरोबर ट्रायस्टेट्स राज्यसमूहाचा भाग समजले जाते. हे राज्य मुख्यतः बंदरी शहरे आणि छोट्या गावांच्या समूहाने बनले आहे आणि वरच्या खर्या अमेरिकेच्या व्याख्येत बसणारे आहे. तेथे स्थायिक झालेल्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी आणि खर्री खर्री अमेरिका बघायला जरा जास्त वेळ मिळावा यासाठी, आम्ही ३० मेला जोडून आलेला लाँग वीकएंड निवडला.
तेथे जाण्याचा आमचा मार्ग असा होता...
प्रवासाचा मार्ग
ग्रँड सेंट्रल टर्मिनल
वेस्ट हेवनला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी, २७ तारखेच्या संध्याकाळी आम्ही सबवे पकडून ४२ स्ट्रीटवरील "ग्रँड सेंट्रल टर्मिनल"ला पोहोचलो...
ग्रँड सेंटर टर्मिनल ०१ : बाह्यदर्शन
ही इमारतीची भव्यता प्रभावी आहे. तिच्या दर्शनी भागाच्या शीर्षस्थानी एक भले मोठे शिल्प आहे. त्यात जगातले सर्वात मोठे ४ मीटर व्यासाचे अपारदर्शक टिफॅनी काचेची तबकडी असलेले घड्याळ आहे. त्याच्या भोवती "Glory of Commerce" नावाचा मिनर्व्हा, हर्क्युलस आणि मर्क्युरी यांच्या मूर्तीचा समुह आहे. १९१४ सालच्या उद्घाटनाच्या वेळी, १५ मीटर उंचीचा हा जगातला सर्वात मोठा मूर्तीसमूह होता असे म्हणतात.
ग्रँड सेंटर टर्मिनल ०२ : प्रदर्शनी भागावरचा शिल्पसमुह
हा नावाप्रमाणे विशाल असलेला दूरगामी आगगाड्यांचा हा थांबा "ग्रँड सेंट्रल स्टेशन" किंवा नुसताच "ग्रँड सेंट्रल" या नावांनीही ओळखला जातो. एकूण ४८ एकरांवर पसरलेल्या या जागेत तब्बल ४४ प्लॅटफॉर्म आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे. द्विस्तरीय मांडणी असलेल्या या थांब्याचे सर्व प्लॅटफॉर्म जमिनीखाली आहेत. वरच्या स्तरावर ४१ रुळांच्या जोड्यांवरून (ट्रॅक) व खालच्या स्तरावर २६ रुळांच्या जोड्यांवरून धावणार्या गाड्यांना ते सेवा पुरवतात. इतर सर्व रूळ धरून येथे एकूण शंभरावर रुळांच्या जोड्या आहेत. याशिवाय हा थांबा '४२ स्ट्रीट' या सबवेच्या मोठ्या थांब्याला जमिनीखालून जोडलेला आहे. अर्थातच, ही जागा सतत अत्यंत गजबजलेली असते. तिच्या भव्य व कलापूर्ण बांधणीमुळे ती एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षणही आहे. गंमत म्हणजे हे शहरातले सर्वात मोठे टर्मिनस सरकारी नाही, तर 'मिडटाऊन टीडीआर वेंचर्स' नावाच्या खाजगी कंपनीच्या मालकीचे आहे आणि त्याचा वापर करणार्या मेट्रो नॉर्थ कंपनीने ते २२७४ पर्यंत लीजवर घेतले आहे !
भव्य प्रवेशद्वारातून आत जाऊन जमिनीच्या पोटात शिरणारा मार्ग पकडून...
ग्रँड सेंटर टर्मिनल ०३ : मुख्य स्वागतकक्षाकडे नेणारा मार्ग
आपण एका विशाल आणि अतिउच्च छपराच्या मुख्य स्वागतकक्षात आपण प्रवेश करतो. अमेरिकन लोकांना भव्य आणि प्रभाव पाडणार्या इमारती बांधायची हौस आहे असे म्हणतात, त्याचा ही इमारत एक उत्तम नमुना आहे. बिनखांबी मुख्य स्वागतकक्ष ८४ मी लांब, ३७ मी रुंद आणि ३८ मी उंच आहे. ही जागा इतकी मोठी असली तरी ती प्रवासी, वेळ ठरवून भेटायला आलेले लोक आणि केवळ तिचा नजारा पहायला आलेले पर्यटक यांनी सतत गजबजलेली असते.
कक्षाच्या मध्यभागी मुख्य माहिती-बूथ आहे. कक्षाच्या एका बाजूला चारमुखी पितळी घड्याळ आहे. त्याच्या दोन फूट व्यासाच्या चार तबकड्या ओपलसारख्या अपारदर्शक पांढरट रंगाच्या काचेने बनवलेल्या आहेत. त्या तबकड्या खरोखरच ओपल दगडापासून बनवलेल्या आहेत आणि सोथेबी व क्रिस्ती या जगप्रसिद्ध लिलावकंपन्यांनी त्यांची किंमत $१ ते $२ कोटींच्या मध्ये ठरवली आहे, अशीही एक वदंता आहे !
ग्रँड सेंटर टर्मिनल ०४ : मुख्य स्वागतकक्षाची (मेन काँकोर्स) एका बाजू
ग्रँड सेंटर टर्मिनल ०५ : मुख्य स्वागतकक्षाची (मेन काँकोर्स) दुसरी घड्याळ असलेली बाजू
कक्षाच्या विशाल छतावर खगोलशास्त्रीय चिन्हे वापरून भले मोठे चित्र रेखाटलेले आहे. मात्र, त्यातल्या तपशिलाचा किंवा चिन्हांच्या रचेनशी खगोलशास्त्रातील तथ्यांशी फारसा संबंध नाही असे तेथे कळले! पण, खरी गोष्ट अशी आहे की...
खगोलशास्त्रातील तथ्यांशी त्यांचा संबंध आहे. छतावर एका रेषेत
दिसणाऱ्या कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन व कर्क ह्या राशी आकाशात एका रेषेत
दिसतात. त्यांतून जाणाऱ्या रेषेला क्रांतिवृत्त (ecliptic) म्हणतात. सूर्य
वर्षभरात वेगवेगळ्या वेळी ह्या रेषेवरील बारा राशींत /सत्तावीस नक्षत्रांत
दिसतो. त्याचबरोबर छतावरील दुसरी रेष ही खगोलीय विषुववृत्त आहे (celestial
equator). ह्या दोन रेषांचा चित्रात दिसणारा छेदनबिंदू हा वसंतसंपात, जिथे
सूर्य २१ मार्चला असतो. त्याचबरोबर मृग नक्षत्र (ओरायन शिकारी) व
आकाशगंगाही दिसते. (महितीश्रेय : आपलेच मिपाकर मिहीर)
११ सप्टेंबर रोजी World Trade Center वर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या स्मरणार्थ कक्षाच्या छतापासून एक भलामोठा अमेरिकन ध्वज लटकवलेला आहे.
ग्रँड सेंटर टर्मिनल ०६ : छत
कक्षाच्या वरच्या व खालच्या स्तरावर खानपानाची अनेक रेस्तराँ व इतर दुकाने आहेत. खालच्या स्तरावरचा आकर्षक फारशांनी सजवलेला ऑयस्टर बार एक खास प्रसिद्धी पावलेली जागा आणि येथील सर्वात जुना व्यवसाय आहे...
ग्रँड सेंटर टर्मिनल ०७ : ऑयस्टर बार (जालावरून साभार)
मुख्य कक्षाच्या बाजूंना अनेक तिकीट खिडक्या आहेत. हल्ली तिकीट देणार्या मशिनचा सुळसुळाट झाला असल्याने त्यांच्यातल्या अनेक बंद असतात आणि उघड्या असलेल्यांवरही फारशी गर्दी नसते. पण त्यांच्यावरची कलाकुसर बघण्याजोगी आहे...
ग्रँड सेंटर टर्मिनल ०८ : एमटीए मेट्रो नॉर्थ तिकिट खिडक्या
या संकुलात खाजगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध असणारे कक्षही आहेत.
तर अश्यारितीने, मुख्य प्रवास सुरू होण्याअगोदर आमचा न्यू यॉर्क शहरातील या अनवट आकर्षणाशी परिचय झाला.
ग्रँड सेंटर टर्मिनल ते वेस्ट हेवन प्रवास
मेट्रो नॉर्थ रेल्वेमार्ग आणि लॉग आयलँड रेल्वेमार्गावरची तिकिटे MTA eTix® नावाच्या स्मार्टफोन अॅपवरूनही काढता येतात. पण पर्यटकाच्या भूमिकेतून आम्ही कलाकुसरपूर्ण खिडकीतून तिकिटे काढली. शिवाय रेल्वे प्रवासासंबंधीच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरेही मिळवता आली. तिकिटे हाती घेऊन तेथून सुरू होणार्या रुंद रस्त्यांच्या जाळ्यातून प्लॅटफॉर्म्सवर नेणार्या खाणाखुणा शोधत आम्ही आमच्या रेल्वे गाडीपर्यंत पोहोचलो. जरा शोधाशोध केल्यावर मिळालेल्या एकमेकाला सामोर्या असलेल्या आरामदायी खुर्च्या पकडून स्थानापन्न झालो...
एमटीए मेट्रो नॉर्थ ०१ : डब्याच्या अंतर्भागाचे दृश्य
अमेरिकेत भारतासारखा एकच एक रेल्वेमार्गसेवा देणारे मंत्रालय नसून, एखाद-दुसर्या राज्यापुरती सेवा देणार्या ते पूर्ण अमेरिकाभर (ट्रान्सकाँटिनेंटल) सेवा देणार्या अनेक रेल्वेकंपन्या आहेत. मात्र या कंपन्या एकमेकाशी फटकून न वागता प्रवाशांच्या सोयीची काळजी डोळ्यासमोर ठेवून एकमेकाशी सहकार्य करताना दिसतात. त्यांचे थांबे एकाच संकुलात असलेले किंवा जमिनीखालील खास मार्गांनी एकमेकांना जोडलेले दिसतात. तसेच, एकाच मार्गावर एकापेक्षा जास्त कंपन्यांच्या अनेक प्रकारच्या सेवा असू शकतात. त्यामुळे इथल्या रेल्वेसेवेची नीट माहिती घेऊन प्रवास केल्यास खिशाला चाट लागणे टळू शकेल. उदाहरणार्थ, ग्रँड सेंट्रल टर्मिनल ते वेस्ट/न्यू हेवन या अडीच-पावणेतीन तासांच्या प्रवासाच्या दोन्ही दिशेच्या प्रवासासाठी एमटीए मेट्रो नॉर्थचा $३३, तर अॅमट्रॅकच्या सर्वसामान्य सेवेसाठी $४२ आणि 'असेला एक्सप्रेस' नावाच्या सेवेसाठी $७७ असे कमीतकमी आकार आहेत.
दूरगामी रेल्वेमार्गांचे (अॅमट्रॅक, एमटीए मेट्रो नॉर्थ, इत्यादी) न्यू यॉर्क शहरातले भाग सबवे प्रमाणेच जमिनीखालून जातात व मॅनहॅटन बेटाच्या किंवा शहराच्या हद्दीजवळ जमिनीवर येतात. आम्ही प्रवास केलेल्या एमटीए मेट्रो नॉर्थचा मार्ग ग्रँड सेंट्रल टर्मिनल पासून १२५ स्ट्रीट थांब्यापर्यंत जमिनीखालून जातो. जमिनीवर आल्यावर आपल्याला मॅनहॅटन बेटाच्या उत्तरपूर्व किनार्यावरील प्रसिद्ध हार्लेम उपनगराचे थोडेसे दर्शन होते...
एमटीए मेट्रो नॉर्थ ०२ : हार्लेम ०१
एमटीए मेट्रो नॉर्थ ०३ : हार्लेम ०२
जमिनीवर आल्या आल्या काही वेळात रेल्वेने हार्लेम नदीवरचा पूल ओलांडून ब्राँक्सच्या हद्दीमध्ये प्रवेश केला आणि नंतर अर्ध्या एक तासात न्यू यॉर्क राज्याची हद्द ओलांडून कनेटिकट राज्यात प्रवेश केला. आता यापुढे फक्त काही हजार लोकसंख्येची छोटी पण नीटनेटकी शहरे-गावे दिसणार होती...
एमटीए मेट्रो नॉर्थ ०४ : कनेटिकट
हा सर्व मार्ग सागरकिनार्याजवळून जातो. अर्थातच अनेक खाड्या व छोट्या सामुद्रधुन्या; त्यांच्यावर वसलेली मनोहर शहरे-गावे व त्यांची चिमुकली बंदरे; आणि बंदरांवर उभ्या असलेल्या अनेक आकारांच्या छोट्यामोठ्या बोटी सतत रस्ताभर दिसत होत्या...
एमटीए मेट्रो नॉर्थ ०५ : कनेटिकट
एमटीए मेट्रो नॉर्थ ०६ : कनेटिकट
एमटीए मेट्रो नॉर्थ ०७ : कनेटिकट
मधूनच एखादे व्यापारी संकुल किंवा कारखाना दिसत होता...
एमटीए मेट्रो नॉर्थ ०८ : कनेटिकट
वाटेत ब्रिजपोर्ट शहरातले हे वीजनिर्मिती केंद्र दिसले...
एमटीए मेट्रो नॉर्थ ०९ : कनेटिकट
जरा मोठी वस्ती असली की तिच्या गर्दीतून एखाद्या चर्चचा मनोरा डोके वर काढून आपल्या अस्तित्वाची जाहिरात करत होता...
एमटीए मेट्रो नॉर्थ १० : कनेटिकट
एमटीए मेट्रो नॉर्थ ११ : कनेटिकट
हा अस्सल अमेरिकन भूमीच्या सतत बदलणार्या नजार्यांचा मनोहारी चित्रपट पाहता पाहता आणि गुगलबाबावर प्रवासाचा मागोवा घेता घेता अडीच-पावणेतीन तास संपून वेस्ट हेवनचा थांबा कधी आला ते कळलेच नाही...
एमटीए मेट्रो नॉर्थ १२ : वेस्ट हेवन रेल्वेथांबा
(क्रमशः )
कक्षाच्या विशाल छतावर खगोलशास्त्रीय चिन्हे वापरून भले मोठे चित्र रेखाटलेले आहे. मात्र, त्यातल्या तपशिलाचा किंवा चिन्हांच्या रचेनशी खगोलशास्त्रातील तथ्यांशी फारसा संबंध नाही !
संबंध आहे. छतावर एका रेषेत दिसणाऱ्या कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन व कर्क ह्या राशी आकाशात एका रेषेत दिसतात. त्यांतून जाणाऱ्या रेषेला क्रांतिवृत्त (ecliptic) म्हणतात. सूर्य वर्षभरात वेगवेगळ्या वेळी ह्या रेषेवरील बारा राशींत /सत्तावीस नक्षत्रांत दिसतो. त्याचबरोबर छतावरील दुसरी रेष ही खगोलीय विषुववृत्त आहे (celestial equator). ह्या दोन रेषांचा चित्रात दिसणारा छेदनबिंदू हा वसंतसंपात, जिथे सूर्य २१ मार्चला असतो. त्याचबरोबर मृग नक्षत्र (ओरायन शिकारी) व आकाशगंगाही दिसते.
वेस्ट हेवन
उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचे आठ वाजूनही बर्यापैकी उजेड होता. नातेवाइकांच्या घरी पोचून त्यांचा पाहुणचार स्वीकारून बर्याच उशीरापर्यंत गप्पा मारत बसलो. नंतर केव्हातरी डोळे जड झाल्यावर झोपेची हाक ऐकायलाच लागली. दुसर्या दिवशी आरामात उठून न्याहारी वगैरे करून शहरात फेरफटका मारायला निघालो.
जगप्रसिद्ध येल विद्यापीठामुळे नावाजलेल्या न्यू हेवन या मोठ्या शहराच्या जवळ वसलेले असले तरी वेस्ट हेवन आपले अस्सल अमेरिकनपण राखून आहे. वेस्ट हेवनच्या २८.५ चौ किमी क्षेत्रफळावर साधारणपणे ५५,००० लोकवस्ती आहे. मूळ न्यू हेवन वसाहतीचा भाग म्हणून इथली पहिली घरे १६४८ मध्ये उभी राहिली. १७१९ मध्ये स्वतःचे चर्च मिळाले तरी १८२२ पर्यंत अधिकृतरीत्या ही वस्ती न्यू हेवनचा भाग म्हणूनच ओळखली जात असे. महत्त्वाचे बंदर असल्याने तिला अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात बरेच महत्त्व होते. वरखाली होणाऱ्या युद्धाच्या पारड्याबरोबर या बंदराचा ताबा प्रतिस्पर्धी ब्रिटिश व अमेरिकन सैन्यांच्या हाती आलटून पालटून जात राहिला.
महत्वाचा इतिहास पाठीशी असूनही, या वस्तीला आपले अस्तित्व स्वतंत्र शहराच्या रूपात प्रस्थापित करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. १७८४, १७८६ आणि १७८७ सालांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर १८२२ मध्ये तिला नॉर्थ मिलफर्ड या शेजारच्या वस्तीबरोबर संयुक्तपणे ऑरेंज नावाच्या शहराच्या रूपात ओळखले जाऊ लागले. त्यानंतर १०० वर्षांनी, सन १९२१ मध्ये ऑरेंजपासून वेगळे होऊन, वेस्ट हेवनला स्वतंत्र टाऊनचा दर्जा मिळाला. नंतर, तब्बल चाळीस वर्षांनी १९६१ मध्ये शहराचा दर्जा मिळून तेथे मेयरने चालवलेली स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली. यामुळे "कनेटिकटची सर्वात जुनी वस्ती आणि सर्वात नवीन शहर" असा या शहराचा विशेष सांगितला जातो !
वेस्ट हेवन ०१ : शहराचा इतिहास सांगणारी पाटी (जालावरून साभार)
वेस्ट हेवन ०२ : शहराचे विहंगम दर्शन (जालावरून साभार)
पूर्वी चांगले बंदर म्हणून महत्त्व असलेल्या या शहराची अमेरिकन औद्योगिक विकासाच्या पाठीवर भरभराट झाली आणि अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनी तेथे आपले कामकाज विस्तारले. तसेच, अमेरिकेच्या औद्योगिक आणि आर्थिक मंदीच्या काळाचा फटकाही या शहराला बसला आहे. एकेकाळी येथे बायर फार्मास्युटिकल्स, आर्मस्ट्राँग रबर कंपनी, कोलेको, सिकोर्स्की एअरक्राफ्ट, युनायटेड टेक्नॉलॉजीज, इत्यादी महत्त्वाच्या कंपन्या कार्यरत होत्या. आता त्या बंद झाल्या आहेत किंवा इतरत्र गेल्या आहेत. त्यामुळे हे शहर कमी गर्दीचे, आरामात चाललेले व काहीसे झोपाळलेले दिसले. पण तरीही सार्वजनिक जागांतील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सुव्यवस्था समाधानकारक आहे. न्यू यॉर्क शहराच्या गर्दी-गडबडीच्या पार्श्वभूमीवर इथला शांत संथ कारभार स्वागतार्ह वाटला.
शहराचा फेरफटका
दुसर्या दिवशी घरातून बाहेर पडल्यावर रहिवासी भागाचे दर्शन सुरू झाले. इथली बहुतेक रहिवासी घरे एक-दोन मजले असलेली, लाकडी व स्वतंत्र हिरवळीचे आवार असलेली आहेत. इथे न्यू यॉर्क शहराप्रमाणे आठ-दहा किंवा जास्त मजली उंच व काँडो (सदनिका) असलेल्या इमारती नाहीत. किंबहुना दोनतीन मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारती अभावानेच दिसतात...
वेस्ट हेवन ०३ : रहिवासी भाग
थोड्याच वेळात आम्ही मेन स्ट्रीट नावाच्या शहरातल्या नावाप्रमाणेच मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या रस्त्यावर पोहोचलो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकमेकाला खेटून दुकाने आहेत. इथल्या बहुतेक इमारती वीट-दगड-सिमेंटच्या पण एक-दोन मजलीच होत्या. विजेच्या तारांचा गुंतावळा पाहून नाही म्हटले तरी मायभूमीची आठवण येऊन शहराशी जवळीक वाटली !...
वेस्ट हेवन ०४ : मेन स्ट्रीट ०१
वेस्ट हेवन ०५ : मेन स्ट्रीट ०२
वेस्ट हेवन ०६ : मेन स्ट्रीट ०३
या रस्त्यावर उगाचच मोठ्याने घरघराट करत शांतता भंग करणारी ही एक अनवट तिचाकी दिसली...
वेस्ट हेवन ०७ : मेन स्ट्रीटवर दिसलेली अनवट तिचाकी
शहर नीट पाहता यावे यासाठी चारचाकी सोडून पायी फेरफटका करायला सुरुवात केली. जराश्या वेळातच भव्य आकारामुळे आणि तांबड्या विटांच्या बांधकामामुळे उठून दिसणारी ही सिटी हॉलची भारदस्त इमारत दिसली...
वेस्ट हेवन ०८ : सिटी हॉल ०१
वेस्ट हेवन ०९ : सिटी हॉल ०२
जरा पुढे गेल्यावर मेन स्ट्रीटवरची दुकानांची गर्दी संपून स्वतंत्र रहिवासी घरांचा भाग सुरू झाला. मधूनच एखादी सदनिका असलेली दोन मजली इमारत, एखादे व्यापारी संकुल किंवा एकांडे दुकान दिसत होते. इतर सर्व पारंपरिक लाकडी बनावटीची रहिवासी घरे दिसत होती...
वेस्ट हेवन १० : पारंपरिक अमेरिकन रहिवासी घरे ०१
वेस्ट हेवन ११ : पारंपरिक अमेरिकन रहिवासी घरे ०२
वेस्ट हेवन १२ : पारंपरिक अमेरिकन रहिवासी घरे ०३
वेस्ट हेवन १३ : रहिवासी भाग
मध्येच एका चर्चच्या टोकदार पांढर्याशुभ्र मनोऱ्याने झाडीतून डोके वर काढून लक्ष वेधून घेतले...
वेस्ट हेवन १४ : विटांची रहिवासी इमारत आणि चर्च
वेस्ट हेवन १५ : मेन स्ट्रीटवरच्या एका चौकातील व्यापारी संकुल
बऱ्यापैकी पायपीट करून पोटातल्या कावळ्यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे सुरू केल्यावर पोटपूजा करायला घरी परतलो.
***************
वेस्ट हेवनचा समुद्रकिनारा
समुद्रकिनार्यावरचे महत्त्वाचे बंदर असण्याबरोबरच वेस्ट हेवनला मोठ्या लांबीच्या वाळवंटी समुद्रकिनार्यांची देणगीही लाभली आहे. सर्व कनेटिकट राज्याच्या सार्वजनिक समुद्रकिनार्यांपैकी २५% लांबीचे किनारे या एकाच शहराच्या हद्दीत आहेत. त्यांची एकूण लांबी ५.६ किमी आहे. निसर्गाच्या या देणगीचा स्थानिक नागरिकांसाठी आणि पर्यटनासाठी सुंदर विकास केलेला आहे...
वेस्ट हेवन १६ : वेस्ट हेवनच्या समुद्रकिनार्याचा नकाशा (जालावरून साभार)
वेस्ट हेवन १७ : समुद्रकिनार्याचे विहंगम दर्शन ०१ (जालावरून साभार)
वेस्ट हेवन १८ : समुद्रकिनार्याचे विहंगम दर्शन ०२ (जालावरून साभार)
वेस्ट हेवन १९ : समुद्रकिनार्याचे विहंगम दर्शन ०३ (जालावरून साभार)
संध्याकाळी समुद्रावर फेरफटका मारायला गेलो तेव्हा कर्ममधर्मसंयोगाने आमच्या नातेवाइकांचा एक अमेरिकन मित्र त्याची स्पीडबोट धक्क्याला लावत होता. आम्हाला बघून त्याने बोटीतून फेरी मारण्यासाठी आमंत्रण दिले...
वेस्ट हेवन २० : जेटी
अश्या संधीचा अव्हेर करणे शक्यच नव्हते ! मग काय ? वेस्ट हेवन आणि त्याला लागून असलेल्या न्यू हेवनच्या किनारपट्टीचे प्रशांत सागरातून वेगाने पाणी कापत जाण्यार्या स्पीडबोटीतून दर्शन झाले...
वेस्ट हेवन २१ : समुद्रकिनार्यावरची रहिवासी घरे
वेस्ट हेवन २२ : पूल ०१
वेस्ट हेवन २३ : पूल ०२
वेस्ट हेवन २४ : पुलाखालून जाताना
वेस्ट हेवन २५ : बंदरात उभ्या असलेल्या बोटी आणि किनार्यावरच्या इंधन साठवणीच्या टाक्या
वेस्ट हेवन २६ : समुद्रकिनारा
अर्ध्या एक तासांची ही अनपेक्षित जलसफर संपवून आम्ही किनारपट्टीची चक्कर मारायला निघालो. किनारपट्टीवर बनवलेल्या खास डांबरी पायरस्त्यावरून कुटुंबकबिल्यासह संध्याकाळी पायी फिरायला आलेल्यांची आणि व्यायामासाठी धावणार्यांची वर्दळ होती...
वेस्ट हेवन २७ : समुद्रकिनारा ०१
वेस्ट हेवन २८ : समुद्रकिनारा ०२
अमेरिकेने केलेल्या अनेक युद्धांत कामी आलेल्या या शहरातील सैनिकांच्या स्मरणार्थ येथे एक स्मारक उभारलेले आहे...
वेस्ट हेवन २९ : युद्धस्मारक
वेस्ट हेवन ३० व ३१ : व्हिएतनाम आणि कोरियन युद्ध स्मारकांच्या पाट्या
अमेरिकेने जगभर केलेल्या युद्धांपैकी १५ पेक्षा जास्त युद्धांत या शहरातले नागरिक कामी आले आहेत. त्या प्रत्येक युद्धाच्या नावे एक छोटा स्तंभ या उघड्या स्मारकात उभारलेला आहे...
वेस्ट हेवन ३२, ३३ व ३४ : इराक, अफगाणिस्तान आणि क्यूबा युद्धांच्या स्मरणार्थ असलेले छोटे स्तंभ
वेस्ट हेवन ३५ : समुद्रकिनार्यावरची सुंदर संध्याकाळ
वेस्ट हेवनमधले अजून काही
उत्पन्नाच्या दृष्टीने जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि वादग्रस्त कारणांसाठी चर्चेत असणार्या वॉलमार्ट कंपनीचे एक हायपरमार्केट वेस्ट हेवनमध्ये सन २००० पासून आहे. त्यालाही एक धावती भेट दिली...
वेस्ट हेवन ३६ : वॉलमार्ट हायपरमार्केट ०१
वेस्ट हेवन ३७ : वॉलमार्ट हायपरमार्केट ०२
या अस्सल अमेरिकन परिसरातही आशियाई लोकांनी यशस्वी शिरकाव केलेला आहे. त्यांचे सद्याचे इथले प्रमाण ३% टक्के आहे. त्यात भारतीय लोक लक्षणीय संख्येने आहेत याचे अनेक पुरावे सापडतात. ते कधी "इंडिया एशियन ग्रोसरीज" किंवा "भारत बझार" अश्या नावांच्या दुकानांच्या स्वरूपात दिसतात...
वेस्ट हेवन ३८ : भारत बझार
तर कधी पारंपरिक अमेरिकन धाटणीच्या घरासमोर असलेल्या पारंपरिक मराठी तुळशीवृंदावनाच्या स्वरूपात दिसतात...
वेस्ट हेवन ३९ : वेस्ट हेवनमधील घरासमोरील तुळशीवृंदावन
एकंदरीत, नातेवाइकांच्या प्रेमळ पाहुणचारामुळे आणि पारंपरिक अमेरिकन शहर पहायला मिळाल्यामुळे वेस्ट हेवनची आमची फेरी सुखद आणि चिरस्मरणिय झाली यात वाद नाही.
(क्रमशः )
येल विद्यापीठ (Yale University)
वेस्ट हेवन जवळील न्यू हेवन या एका मोठ्या शहरात (साधारण ९ लाख मेट्रोपोलिटन लोकसंख्या) येल विद्यापीठ आहे. अमेरिकेतील "आयव्ही लीग (Ivy League) या संबोधनाने गणल्या जाण्यार्या आठ उच्च श्रेणीच्या विद्यापीठांपैकी हे एक आहे. सन १७०१ मध्ये प्रोटेस्टंट चर्चमधिल अधिकारी धर्मगुरुंच्या प्रशिक्षणासाठी कनेटिकटमधिल सेब्रूक कॉलनीमध्ये एका महाविद्यालयाची स्थापना केली गेली. सन १७१६ मध्ये त्याला न्यू हेवनला हलवले गेले व ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या एलिहू येल (Elihu Yale) या नावाच्या गव्हर्नरने केलेल्या भरघोस दानामुळे त्याचे नाव या शिक्षणसंस्थेला दिले गेले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या सुमारास येथे भौतिक शास्त्रांसह इतर विषयांचे शिक्षण सुरू झाले. एकोणिसाव्या शतकात इथे उच्च (मास्टर्स) आणि व्यावसायिक शिक्षणाची भर पडली आणि अमेरिकेतील पहिली पीएचडी डिग्री १८६१ साली येथेच दिली गेली. सन १८८७ साली तिला विद्यापीठाचा दर्जा दिला गेला.
खरे बोलायचे तर, आजच्या घडीला हे केवळ एक विद्यापीठ नसून, जागतिक शिक्षणक्षेत्रातील एक विशाल आणि अग्रगण्य संस्था आहे. हिच्या छत्रछायेखाली १४ विद्यालये; एक कला व शास्त्र महाविद्यालय; १२ व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालये; इत्यादी कार्यरत आहेत. विद्यालये व महाविद्यालये आपापले स्वतंत्र अभ्यासक्रम चालवतात व एकूण २००० पेक्षा जास्त पदविका/पदव्या प्रदान करतात. या विद्यापीठात साधारण ५,५०० बॅचलर स्तराचे विद्यार्थी; साधारण ६,९०० उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी; ११८ देशांतून आलेले ४,५०० विद्यार्थी; २८८ वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना; आणि ३५ वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांचे ३५ संघ आहेत. विद्यापीठाच्या सर्व शिक्षणसंस्थांना सेवा पुरविणारे व १.५ कोटीपेक्षा जास्त पुस्तके/मासिके असलेले येल वाचनालय अमेरिकेतील तिसर्या क्रमांकाचे आहे.
या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांत अनेक नामवंतांच्या नावांची मोठी जंत्री आहे... त्यात सुमारे ५५ नोबेल सन्मान विजेते, ५ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, १९ सुप्रीम कोर्ट न्यायाधीश, १३ सद्य बिलियनेर्स, अनेक अमेरिकन काँग्रेसमेन्/सिनेटर्स, ५ फील्ड मार्शल्स, ५ फील्ड मेडॅलिस्ट्स (याला गणितातले नोबेल समजले जाते), २४७ र्होड स्कॉलर्स, ११९ मार्शल स्कॉलर्स, इत्यादी, इत्यादी, इत्यादी, आहेत. या यादीत बिल आणि हिलरी क्लिंटन, सद्य आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल, पूर्व अमेरिकन प्रेसिडेंट पिता-पुत्र बुश, जॉन केरी, इंद्रा नुयी, मेरीला स्ट्रीप, अशी जगभर माहीत असलेली अनेक नावे आहेत.
सर्वोच्च अधिकार असलेली येल कॉर्पोरेशन (Yale Corporation) या विद्यापीठाच्या सर्व कारभारावर लक्ष ठेवते. या विद्यापीठाच्या अधिकारात न्यू हेवन कँपस; वेस्ट हेवनमधील एक शैक्षणिक व एक अॅथलेटिक्स कँपस; आणि न्यू इंग्लंड या अमेरिकेच्या उत्तरपूर्वेतील अनेक राज्यांत (कनेटिकट, मेन, मॅसेचुसेट्स, न्यू हँपशायर, र्होड आयलँड आणि वरमाँट) पसरलेली जंगले व संरक्षित नैसर्गिक प्रभाग (forest and nature preserves) येतात. या विद्यापीठाच्या मालकीच्या साधनसंपत्तीची २०१५ मध्ये जाहीर केलेली किंमत (endowment) $२५.६ बिलियन (रु१.७५ लाख कोटी) होती !!! या प्रमाणावर येल अमेरिकेतील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत विद्यापीठ आहे.
येल विद्यापीठ, फार पूर्वीपासून, न्यू हेवन काऊंटीतील सर्वात मोठा जमीनदार (जमीन व इमारतींचा मालक) आहे. याशिवाय, मोठी गंगाजळी बाळगून असल्याने व वाढत्या पसार्याची गरज म्हणून, शहरातल्या नागरिकांच्या जमिनी व इमारती विकत घेऊन विद्यापीठ आपल्या मालमत्तेत सतत भर घालत आहे. याचा परिणाम, शहराच्या संस्कृतीवर विद्यापीठाची संस्कृतीचे आक्रमण होण्यात आणि स्थानिक लोकांच्या छोट्या उद्योगधंद्यावर आणि दुकानांवर गदा येण्यात झाला आहे. अर्थातच, याबद्दल स्थानिक जनतेत रोष आहे. त्याशिवाय, अमेरिकेतील विद्यापीठे ना-नफा संस्था समजल्या जात असल्याने त्यांना करमाफी असते. येल विद्यापीठाच्या ताब्यातल्या जमिनी आणि इमारतींवरचा दरवर्षीचा एकूण कर $१०० मिलियन (रु७०० कोटी) च्या घरात जातो. महानगरपालिकेचे इतके मोठे उत्पन्न बुडाल्यामुळे त्या रोषात अजूनच भर पडली आहे. या परिस्थितीमुळे येलला "गरीब शहरातले श्रीमंत विद्यापीठ" असे कुत्सितपणे म्हटले जाते. राज्य सरकारने या करतूटीची भरपाई करण्याचे कबूल केले होते, पण सर्वसाधारण राजकीय प्रघाताप्रमाणे हे आश्वासन पाळले गेलेले नाही. विद्यापीठाच्या हल्लीच्या प्रशासनाने तडजोड म्हणून स्वतःहून दरवर्षी नगरपालिकेला काही रक्कम (गेल्या वर्षी $८.२ मिलियन) देण्याचे कबूल केले आहे. अर्थात, ही रक्कम कराच्या १०% सुद्धा नाही हे वेगळे !
तर अश्या या विद्यापीठाच्या परिसरात फेरी मारण्याचा आणि त्याच्या मालकीच्या संग्रहालयांपैकी "पीबॉडी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी" हे नामवंत संग्रहालय पाहण्याचा योग, वेस्ट हेवन शहराच्या फेरीत आला.
विद्यापीठाच्या नीटनेटक्या आणि हिरव्यागार झाडीने भरलेल्या परिसरात फेरी मारत असताना तेथील जुन्या आणि नव्या शैलीतल्या भव्य इमारती लक्ष वेधून घेतात...
येल विद्यापीठ परिसर ०१ : मुख्य प्रवेशद्वार
येल विद्यापीठ परिसर ०२
येल विद्यापीठ परिसर ०३
येल विद्यापीठ परिसर ०४
येल विद्यापीठ परिसर ०५
येल विद्यापीठ परिसर ०६
येल विद्यापीठ परिसर ०७
येल विद्यापीठ परिसर ०८
येल विद्यापीठ परिसर ०९ : व्यवस्थापन महाविद्यालयाची आधुनिक इमारत
येल विद्यापीठाचे "पीबॉडी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी"
या संग्रहालयाची सुरुवात १८व्या शतकात "जगभरातून आणलेल्या कुतूहलपूर्ण, नैसर्गिक व मानवनिर्मित वस्तू" जमविण्याच्या छंदाच्या रूपाने झाली. शिक्षण आणि संशोधनासाठी अश्या वस्तू पद्धतशीरपणे जमा करण्याची आणि मांडणी करण्याची सुरुवात सन १८०२ मध्ये प्रोफेसर बेंजामिन सिलिमान (Benjamin Silliman) यांच्या नेमणुकीने झाली. त्यांनी जमवलेले भूगर्भशात्रिय आणि खनिजशास्त्रिय नमुने हे एक फार मोठे आकर्षण ठरले. सिलिमान यांनी येल विद्यापीठाला शास्त्रीय संशोधनाचे उच्च प्रतीचे केंद्र बनवले. त्या कीर्तीमुळे तिथे आकर्षित झालेल्या ओथ्नील चार्ल्स मार्श (Othniel Charles Marsh) नावाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च जॉर्ज पीबॉडी नावाच्या जागतिक स्तरावर सावकारी करणार्या त्याच्या काकाने उचलला होता. जीवनाच्या शेवटच्या काळात पीबॉडीने आपली अफाट संपत्ती अनेक संस्थांत वाटायला सुरुवात केली. त्या देणग्यांच्या यादीत येल विद्यापीठ यावे यासाठी मार्शने केलेल्या प्रयत्नांतून मिळालेल्या $१५०,००० च्या देणगीतून "पीबॉडी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी" जन्माला आले.
मार्शची १८६६ मध्ये "प्रोफेसर ऑफ पॅलिओंटॉलॉजी" अशी नेमणूक झाली. या विषयातल्या प्रोफेसरची ही अमेरिकेतील पहिली व जगातील दुसरी नेमणूक होती. त्याने आपल्या सहकार्यांबरोबर पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या अष्मीभूत अवशेषांचा व ठश्यांचा मोठा संग्रह जमवला. त्यातल्या डायनॉसॉर अवशेषांचा संग्रह विशेष समजला जातो. इथल्या वस्तूंची संख्या आणि आकार इतका भव्य झाला की त्यांच्यासाठी जुनी इमारत पाडून खास मोठ्या आकाराच्या व उंचीच्या दालनांची नवीन इमारत बांधावी लागली, ती १९३१ साली पुरी झाली. ती इमारतही अपुरी पडू लागल्याने वाढत्या शैक्षणिक पसार्यातल्या अजून दोन इमारती संग्रहालयाला जोडल्या आहेत. त्याही कमी पडल्यामुळे, संग्रहालयातील १.३ कोटीपेक्षा जास्त नमुन्यांपैकी निम्मे अवशेष सामावून घेईल इतके मोठे एक नवीन Environmental Science Center बांधले आहे. याशिवाय, संग्रहालयाचे कर्मचारी, कार्यशाळा, शैक्षणिक वर्गांसाठी व फील्ड स्टेशन यासाठी वेगळ्या इमारती आहेत. हा पसारा अजूनही वाढतच आहे. या वर्षी (२०१६) हे संग्रहालय आपला १५० वा वाढदिवस साजरा करत आहे.
संग्रहालयाच्या आवारात डायनॉसॉर्सच्या (मेसोझोइक) कालखंडात अस्तित्वात असणार्या किंवा त्यांचे आजचे वंशज असलेल्या अनेक वनस्पतींची लागवड केलेली आहे.
संग्रहालयाच्या आवारातला हा टायरॅनोसॉरसचा पुतळा आपले स्वागत करतो...
पीबॉडी म्युझियम ०१ : दर्शनी भागातला टायरॅनोसॉरसचा पुतळा
पीबॉडी म्युझियम ०२ : मुख्य प्रवेशद्वार
पीबॉडी म्युझियम ०३ : मुख्य डायनॉसॉरस दालन ०१
पीबॉडी म्युझियम ०४ : मुख्य डायनॉसॉरस दालन ०२
पीबॉडी म्युझियम ०५ : आर्किओप्टेरिस (उडता डायनॉसॉरस) ठसा
पीबॉडी म्युझियम ०६ : डायनॉसॉरस डोक्यांचे जीवाश्म
पीबॉडी म्युझियम ०७ : अजगराचा सापळा
पीबॉडी म्युझियम ०८ : सामुराई सरदार लॉर्ड निशिओचे चिलखत
पीबॉडी म्युझियम ०९ : पेरूमधील माचू पिच्चू येथे उत्खननासाठी केलेल्या तयारीचे कागदपत्र
पीबॉडी म्युझियम १० : पेरूमधील माचू पिच्चू मोहिमेतील टिपणे
पीबॉडी म्युझियम ११ : पेरूमधील माचू पिच्चू मोहिमेत जमवलेले काही अवशेष
पीबॉडी म्युझियम १२ : संग्रहालयातल्या स्वयंसेविका त्यांनी प्रदर्शित
केलेला पर्यावरणासंबंधीचा प्रयोग एका किशोरवयीन अथितीला समजावून सांगताना
न्यू हेवन विद्यापीठ
सन १६३८ पासून न्यू हेवन शहरात "न्यू हेवन विद्यापीठ" नावाचे १२२ एकरावर पसरलेले अजून एक खाजगी विद्यापीठ कार्यरत आहे. या विद्यापीठाच्या कनेटिकट व न्यू मेक्सिको या दोन अमेरिकन राज्यांत सहा आणि इटलीमध्ये एक अश्या एकूण सात शाखा (कँपसेस) आहेत. आकाराने येलपेक्षा लहान असले तरी त्याचे अभियांत्रिकी विद्यापीठ "America's Best Colleges" या श्रेणीत गणले जाते. येथे एकूण ६००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
परतताना या विद्यापीठाच्या परिसरातून चक्कर मारली. त्यावेळची काही चित्रे...
न्यू हेवन विद्यापीठ ०१
न्यू हेवन विद्यापीठ ०२ : न्यायवैद्यकशास्त्र विभाग
न्यू हेवन विद्यापीठ ०३
न्यू हेवन विद्यापीठ ०४
न्यू हेवन विद्यापीठ ०५
विद्यापीठ मोठे असो की लहान, इथे केवळ शिक्षणव्यवस्थेकडेच लक्ष दिले जाते असे नाही तर विद्यापीठाचा परिसरही सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याकडे कसोशीने लक्ष दिले जात असल्याचे सतत दिसून येते.
(क्रमशः )
नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन
स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन
अमेरिकन सरकारने सन १८४६ मध्ये ज्ञानवर्धन आणि ज्ञानप्रसार करण्यासाठी "युनायटेड स्टेट्स नॅशनल म्युझियम" या नावाने एक सरकारी विभाग स्थापन केला. सन १९६७ साली त्याला स्वतंत्र संस्थेचे स्वरूप देऊन स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन असे नाव दिले गेले. या महाप्रकल्पाअंतर्गत आजतागायत एकूण १३ कोटी ८० लाख वस्तू जमा केल्या गेलेल्या आहेत. यामुळे त्याला देशाचा पोटमाळा (the nation's attic) असे म्हटले जाते. या वस्तू १९ संग्रहालये, ९ संशोधन केंद्रे आणि एक प्राणिसंग्रहालय अश्या अनेक प्रकल्पांत संग्रहित केलेल्या आहेत. यापैकी अनेक प्रकल्प ऐतिहासिक आणि राष्ट्रीय स्मारके समजले गेले आहेत. यातले बहुतेक सर्व प्रकल्प अमेरिकेची राजधानी, वॉशिंग्टन डि सी, मध्ये आहेत. पण त्याच बरोबर काही अॅरिझोना, मेरिलँड, मॅसेचुसेट्स, व्हर्जिनिया, टेक्सास या राज्यांत; न्यू यॉर्क शहरात आणि पनामा या देशातही आहेत. याशिवाय, अमेरिकेच्या ४५ राज्यांत आणि पनामा या देशात स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनच्या २०० च्या वर सहकारी संस्था आणि संग्रहालये आहेत. अश्या या महाकाय संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रकही $१.२ बिलियन (रु ८,००० कोटीच्या वर) आहे. यातले २/३ सरकारी अनुदान असते आणि उरलेले १/३ संस्थेला मिळणार्या देणग्या, सभासद वर्गणी, आठवण वस्तूंच्या दुकानांतली विक्री, इत्यादीतून मिळवण्यात येतात. या संस्थेच्या कोणत्याही संग्रहालयांमध्ये प्रवेशमुल्य आकारले जात नाही.
न्यू यॉर्क शहरातले "नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" उर्फ
"जॉर्ज गुस्ताव हेये सेंटर"
कोलंबिया विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरची पदवी घेऊन अॅरिझोना राज्यात रेल्वेमार्गाच्या बांधकामावर काम करणार्या जॉर्ज गुस्ताव हेये (१८७४ ते १९५७) याच्या हाती सन १८९७ साली नावाजो जमातीच्या वापरातला हरिणाच्या कातड्याचा पोशाख आला. येथून त्याचा अमेरिकन इंडियन जमातींच्या वस्तू जमवण्याचा छंद सुरू झाला. या संग्राहकाने उत्तर व दक्षिण अमेरिकन खंडात तब्बल ५४ वर्षे भटकून अनेक जमातींच्या वापरातल्या असंख्य वस्तू जमा केल्या. तो संग्रह इतका मोठा झाला की त्याने त्याची काळजी घेण्यासाठी त्याने हेये फाऊंडेशन आणि "म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" यांची स्थापना केली. हेये फाउंडेशनने १९२२ साली न्यू यॉर्क शहरातील औडूबॉन टेरेस या जागी सर्वप्रथम म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन थाटले. काही कारणाने १९९४ साली संग्रहालय बंद करावे लागले आणि त्यातला काही भाग दक्षिण मॅनहॅटनमधील "अलेक्झांडर हॅमिल्टन यु एस कस्टम हाउस"या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारतीच्या दोन मजल्यांमध्ये हलवला गेला. सन १९९० मध्ये हेये फाउंडेशनच्या ताब्यातील संपूर्ण संग्रहाला स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनने सामावून घेतले.
हा संग्रह आणि त्यासंबंधीचे काम पुढे नेण्यासाठी स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनचे "नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" नावच्या तीन संस्था स्थापन केल्या आहेत. त्यापैकी एक भावंड वॉशिंग्टन डि सी च्या जगप्रसिद्ध नॅशनल मॉलवरच्या आकर्षणांच्या रांगेतील एका संग्रहालयाच्या रूपात आहे; दुसरे न्यू यॉर्क शहरातल्या एका संग्रहालयाच्या रूपात आहे आणि तिसरे अमेरिकन इंडियन समाजासंबंधीचे सांस्कृतिक संसाधन, संशोधन आणि संग्रह केंद्राच्या रूपात मेरिलँड राज्यातल्या सुटलँड शहरात आहे.
सद्य भेटीत यातले न्यू यॉर्क शहरातील संग्रहालय पाहण्याचा योग आला. येथे वस्तूसंग्रह प्रदर्शनाव्यतिरिक्त वर्षभर चलतचित्र / व्हिडिओ कार्यक्रम; शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम; आणि अमेरिकन इंडियन समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शित केले जातात. हेये फाउंडेशनच्या संग्रहापैकी ८ लाख वस्तू आणि १.२५ लाख फोटो येथे आहेत.
तर अश्या तर्हेने, एका नागरिकाच्या छंदातून निर्माण झालेल्या प्रकल्पातून, आता अमेरिकेच्या तीन शहरांत जगप्रसिद्ध आकर्षणे निर्माण झालेली आहेत. त्यातले न्यू यॉर्क शहरातले संग्रहालय पाहण्याचा योग या भेटीत आला.
***************
घरून निघालो तेव्हा धो धो पाऊस सुरू होता. सबवेचा थांबा घराजवळ असल्याने धावत त्याच्या भुयारी मार्ग गाठला. आत गेल्यावर कळले की आज तेथून पुढच्या काही थांब्यांपर्यंतचा रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी बंद होता. पण तेथे एक कर्मचारी उभा राहून "थांब्याच्या पलीकडच्या रस्त्यावर चालू थांब्यापर्यंत नेणारी मोफत बससेवा चालू आहे" असे सांगत होता. सन २०१२ मध्ये आलेल्या हरिकेन सँडीने न्यू यॉर्क शहराचे सुमारे $३२ बिलियनचे (रु२.१५ लाख कोटी) नुकसान केले. सबवेचा सर्व मार्ग पाणी आणि वाळूने भरून गेल्याने त्याचे अपरिमित नुकसान झाले होते. त्यामुळे झालेल्या नुकसानाची दुरुस्ती व त्याचबरोबर सततच्या नवीनीकरणाचे काम करण्यासाठी आठवडी सुट्टीच्या दिवसांत (शनिवार-रविवार) सबवेचे काही भाग बंद असणे हे नेहमीचे आहे. मात्र, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी तत्पर मोफत पर्यायी व्यवस्था पुरवली जाते. त्यामुळे, फारतर १०-१५ मिनिटाचा उशीर सोडता नागरिकांना फारशी तोशीस पडत नाही, हे विशेष.
बसने आम्हाला गाड्या चालू असलेल्या थांब्यापर्यंत पोचवले. तेथून जणू आमचीच वाट पहात असलेली एक गाडी पकडून आम्ही साऊथ फेरी हा मॅनहॅटनच्या दक्षिण टोकावरच्या थांबा गाठायला निघालो. वाटेत अनेक ठिकाणी रेल्वेमार्गाचे व थांब्याचे काम चालू असलेले दिसत होते...
दुरुस्तीचे काम चालू असलेला सबवेचा थांबा
साऊथ फेरी हा थांबा दक्षिण मॅनहॅटनच्या टोकाला असल्याने येथून रेल्वेमार्ग ९० अंशात वळून पश्चिमेकडील ब्रूकलीनच्या दिशेने जातो. हे वळण थांब्यातच असल्याने हा थांबा काहीसा अर्धवर्तुळाकार आहे !...
सबवेचा अर्धवर्तुळाकार साऊथ फेरी थांबा
थांब्यातून बाहेर जमिनीवर आलो तेव्हा नशिबाने फारसा पाऊस नव्हता. पण वातावरण ढगाळ होते आणि गगनचुंबी इमारतींची शिखरे धुक्यात गुरफटलेली होती. भर उन्हाळ्यात मॅनहॅटनचे हे एक नवीन "हिल स्टेशन" रूप पहायला मिळाले...
पावसाळी हवामानात गुरफटलेले दक्षिण मॅनहॅटन ०१
पावसाळी हवामानात गुरफटलेले दक्षिण मॅनहॅटन ०२
पाऊस पडत नसल्याने, या सुखद वातावरणात रमत गमत चालत आम्ही संग्रहालयाकडे निघालो. या भागात, बागेसमान हिरवाई असलेल्या जागा आणि दक्षिण मॅनहॅटनचे विशेष असलेल्या एकमेकाला ढुशी देणार्या गगनचुंबी इमारतींचे जंगल, यांचा मनोहारी संगम आहे...
संग्रहालयाकडे जाताना दिसलेली दक्षिण मॅनहॅटनमधील जमिनीलगतची हिरवाई आणि गगनचुंबी कॉक्रिट जंगल
एका कोपर्यावर वळल्यानंतर "अलेक्झांडर हॅमिल्टन यु एस कस्टम हाउस" ही भव्य इमारत पुढे आली. ती इमारत चित्राच्या एका फ्रेममध्ये बसवणे, खूप दूर जाऊन मोक्याच्या जागेवरून फोटो घेतल्याशिवाय शक्य नाही. तेव्हा सर्वांगसुंदर दर्शन करवणारे जालावरून घेतलेले तिचे चित्र खाली टाकलेले आहे...
अलेक्झांडर हॅमिल्टन यु एस कस्टम हाउसचे सर्वांगसुंदर दर्शन (जालावरून साभार)
ही इमारत संग्रहालयाकरिता बांधलेली नसून संग्रहालयाच्या वापराला दिलेली यु एस कस्टमची जुनी इमारत आहे. सरकारी कामासाठी बांधलेली इमारत असली तरी तिच्यावरची कलाकुसर आणि दर्शनी भागातल्या अनेक शिल्पकृतींना न्याहाळल्याशिवाय आत जाणे शक्य होत नाही...
संग्रहालयाच्या इमारतीवरची कलाकुसर ०१
संग्रहालयाच्या इमारतीवरची कलाकुसर ०२
संग्रहालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागातल्या शिल्पकृतींपैकी काही
एका छोट्या टेकडीच्या उंचीच्या पायर्या चढून आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. आत गेल्यावर स्वागतकक्ष लागतो. तो अमेरिकन परंपरेला जागून पुरेसा उंचापुरा भव्य बनवलेला आहे. आपल्या मोठेपणाचे दर्शन करणे आणि अमेरिकेला भेट देणार्या व्यापार्यांवर मानसिक प्रभाव पाडणे या दोन उद्येशांना तो पुरेपूर न्याय देणारा आहे, हे प्रथमदर्शनीच पटते.
त्याच्या लंबगोल घुमटाकार छतावर अनेक चित्रे चितारलेली आहेत. अर्थातच ती इमारतीच्या मूळ वापराला साजेशी, म्हणजे सागरी वाहतूक व व्यापाराशी संबंधित आहेत...
स्वागतकक्षाचे छत ०१
स्वागतकक्षाचे छत ०२
येथे, हेये संग्रहातल्या निवडक ७०० वस्तू वापरून, "इन्फिनिटी ऑफ नेशन्स (Infinity of Nations) नावाचे खास कायमस्वरूपी प्रदर्शन बनवलेले आहे. त्यात अमेझॉन नदीची खोरी, अँडीज पर्वतशृंखला, आर्क्टिक/सबआर्क्टिक, कॅलिफोर्निया/ग्रेट बेसिन, मेसोअमेरिकन/कॅरिबियन, अमेरिकेचा उत्तरपश्चिम किनारा, पॅटागोनिया, सपाट व पठारांवरच्या, जंगलातल्या, इत्यादी अनेक प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत विकसित झालेल्या अनेक अमेरिकन इंडियन लोकांच्या विविध सामाजांच्या सांस्कृतिक विशेषांची आपल्याला ओळख करून देतात. सद्य अमेरिकन इंडियन कलेसाठीही एक स्वतंत्र दालन बनवलेले आहे.
या संग्रहालयाची ही एक चित्रसफर...
शिकारीच्या कथा सांगणारे कातड्यावरचे चित्र
युरोपियन लोकांच्या आगमनाने अमेरिकन इंडियन लोकांच्या जीवनात घडलेले बदल दाखवणारे कातड्यावरचे चित्र
समारंभाचे पोशाख आणि भरतकाम केलेली स्त्रियांनी डोक्यावर घ्यायची खोप (शेवटच्या रांगेतले उजवीकडचे चित्र)
समारंभांत वापरायची कलाकुसर केलेली छत्री आणि जिचा नातेवाईक युद्धात
धारातीर्थी पडलेला आहे अश्या स्त्रीला भेट दिला जाणारा कातडी अंगरखा
पारंपरिक पोशाखात एक अमेरिकन इंडियन कुटुंब
पारंपरिक पोशाखात एका जमातीचा नेता (ट्रायबल चीफ)
घोडेस्वाराचा चाबूक आणि इंडियन अमेरिकन घरातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू
लहान मुलांचे खेळणे आणि पाणी साठवण्याचे कलाकुसर असलेले मातीचे भांडे
माया संस्कृतीतील एक मातीचे चेहराशिल्प, गळ्यातला हार बनविण्यासाठी वापरल्या जाणारी मातीची चिमुकली मुंडकी आणि रंगवलेले मातीचे मग
मेक्सिकोमधील अमेरिकन इंडियन संस्कृतींतील लहानमोठ्या शिल्पकृती
खुर्ची, पर्स, तंतूवाद्य, भांडी, पडदे, मुखवटा, इत्यादी
वेताचे सूप, कलापूर्ण मातीची भांडी, भिंतीवर टांगण्याची चित्रे, इत्यादी
हल्ली स्त्रियांचे पंजाबी ड्रेस शिवण्यासाठी रंगकाम किंवा भरतकाम केलेले कापड मिळते. ही पद्धत अमेरिकन इंडियन प्राचीन कालापासून वापरत असल्याचे खालच्या चित्रातील स्त्रियांचे कपडे शिवण्यापूर्वी म्हशीच्या कातड्यावर केलेले रंगकाम पाहून दिसले...
स्त्रियांचे कपडे शिवण्यापूर्वी म्हशीच्या कातड्यावर केलेले रंगकाम
वेताचा वापर करून बनवलेल्या कलापूर्ण वस्तू
कालपूर्ण पादत्राणे आणि हातमोजे
भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वनस्पतिजन्य साधनांनी बनवलेली कलाकुसर असलेली भांडी
मानवी चेहर्यांचे कोरीवकाम असलेली भांडी
कलापूर्ण पाण्याची भांडी
अजून काही कलापूर्ण भांडी
कलाकुसरीच्या वस्तू
कापडावर नक्षी काढण्यासाठी बनवलेले ठसे
सपाट प्रदेशांतील आणि ग्रेट लेक्स प्रदेशांतील अमेरिकन इंडियन लोकांचे पारंपरिक घर (टेपी) आणि त्याच्या अंतर्भागातली चित्रे
एका विभागात जुन्या अमेरिकन इंडियन जीवनशैलीची आणि युरोपियन लोकांच्या आगमनाने तिच्यात होत गेलेल्या बदलाची रेखाटलेली रंगीत चित्रे ठेवलेली आहेत. ही चित्रे मुख्यतः हिशेबांसाठी जुन्या काळी वापरल्या जाण्यार्या लेजरबुकांच्या कागदांवर काढलेली आहेत. काही चित्रे तर, कोरा कागद न मिळाल्यास हिशेबांसाठी वापरलेल्या लेजर कागदांवर काढलेली आहेत...
जुन्या अमेरिकन इंडियन जीवनशैलीची आणि युरोपियन लोकांच्या आगमनाने होत गेलेल्या संघर्षांची आणि बदलाची रेखाटलेली रंगीत चित्रे
अमेरिकन इंडियन राजे त्यांच्या राज्याचे हिशेब ठेवण्यासाठी एक जगावेगळी पद्धत वापरत असत. एका आडव्या धाग्याला अनेक उभे धागे बांधलेले असत. प्रत्येक उभा धागा बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, धाग्याची लांबी, त्यावरच्या गाठी मारण्याची पद्धत, गाठींची संख्या, इत्यादीवरून संसाधनाचा प्रकार (लोकसंख्या, धान्याचा प्रकार, प्राण्याच्या प्रकार, धातूचा प्रकार, इ.), त्याचे प्रमाण (संख्या, वजन, इ) आणि त्याचे भौगोलिक स्थान, इत्यादी माहिती साठवली जात असे. मोठ्या साम्राज्यांचे हिशेबही याच पद्धतीने साठवले जात असत. हिशेब ठेवण्यासाठी खास प्रशिक्षण दिलेले हिशेबनीस असत...
अमेरिकन इंडियन खाताबही
या सगळ्या वस्तू पाहिल्यावर युरोपियन लोक अमेरिका खंडांत पोचण्याअगोदर तेथे सांस्कृतिक व कलादृष्टीने विकसित असलेल्या अनेक संस्कृती नांदत होत्या असेच दिसते. त्यावरून युरोपियन अमेरिकेत पोचण्याअगोदर तेथे केवळ असंस्कृत आणि अविकसित लोक होते हे आक्रमकांचे दावे किती पोकळ होते याची खात्री पटते. युद्धासाठी लाकडी शस्त्रांचा उपयोग करणार्या व त्यामुळे चिलखताची गरज नसणार्या पायदळाचा वापर करणार्या मूलवासींच्या विरुद्ध युरोपियन आक्रमकांकडे घोडे, पोलादी तलवारी आणि बंदुका असल्यानेच युरोपियन विजयी झाले. युरोपियन आक्रमकांनी स्थानिक जमातींची नृशंस कत्तल करून त्यांच्या जमिनी कश्या बळकावल्या, युरोपमधून सोबत आणलेल्या देवीसारख्या रोगांचा वापर करून (त्या रोगांशी पूर्वी कधीच संबंध न आल्याने) रोगप्रतिकारकशक्ती नसलेल्या स्थानिक जमातींना कसे नष्ट केले याच्या अनेक कहाण्या (दाबण्याचा खूप प्रयत्न करूनही) आता सर्वमान्य झाल्या आहेतच. माध्यमे आणि विशेषतः सामाजिक माध्यमे नसल्याने वसाहत वादाच्या काळात असे अनन्वित अत्याचार अनिर्बंधपणे होऊ शकले. काही केले तरी आता त्याचे परिमार्जन करणे शक्य नाही. पण, तो इतिहास मान्य करून, त्या संस्कृतींची जमेल तितकी माहिती साठवून पुढच्या पिढीकडे ती पोचवणे इतकेच हाती आहे.
या संग्रहालयात एक गोलाकार बहूद्येशी रंगमंच आहे. त्यातल्या पडद्यावर अमेरिकन इंडियन जीवनाशी संबंधीत चलतचित्रे प्रदर्शित करणे सतत चालू असते. याशिवाय, कलाकारांनी सादर केलेले समयोचित कार्यक्रमही तेथे मधून मधून सादर केले जातात...
या रंगमंचाच्या भिंतींत केलेल्या खोबण्यांत वेगवेगळ्या अमेरिकन इंडियन जमातींच्या नृत्यसमारंभांचे पारंपरिक पोशाख घातलेले पुतळे बसवलेले आहेत...
अमेरिकन इंडियन जमातींचे नृत्यसमारंभांचे पारंपरिक पोशाख घातलेले पुतळे
या संग्रहालयातली प्रत्येक वस्तू खूप विचारपूर्वक निवडलेली दिसली... त्यामुळे त्यातली एखादी टाळून पुढे जाणे कठीण जाते. वेळेच्या अभावामुळे तसे करावे लागले की जरासे अपराध्यासारखेच वाटते.
(क्रमशः )
ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन
न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन्स ही "National Historic Landmark" असा महत्त्वाचा मान मिळालेली जगातील सर्वात मोठी वनस्पतीशास्त्रिय संशोधन आणि संवर्धन करणारी संस्था आहे. या उद्यानाची व आजूबाजूची बहुतेक सर्व जमीन तंबाखूच्या व्यापारात गडगंज संपत्ती मिळवणार्या लोरिलार्ड (Lorillard) कुटुंबाच्या मालकीची होती. न्यू यॉर्क शहर प्रशासनाने यापैकी विकत घेतलेल्या जागेवर हे उद्यान व ब्राँक्स प्राणिसंग्रहालय निर्माण केले. उद्यानाला लागून असलेल्या, त्याच कुटुंबाच्या जागेवर, सेंट जॉन्स कॉलेज स्थापन केले गेले, जे वर्धिष्णू होत आजच्या घडीला फोर्डहॅम विद्यापीठात विकसित झाले आहे.
कोलंबिया विद्यापीठातील वनस्पतिशास्त्रज्ञ नाथानील ब्रिटन आणि त्यांची पत्नी गर्ट्रूड ब्रिटन यांनी लंडनमधील जगप्रसिद्ध रॉयल बोटॅनिकल गार्डन्सपासून (क्यू गार्डन्स) स्फूर्ती घेऊन या उद्यानाच्या निर्माणात पुढाकार घेतला होता. टोरी बोटॅनिकल क्लब (Torrey Botanical Club) आणि ब्रिटन पतिपत्नी यांच्या निधी उभारण्यासाठी केलेल्या मोहिमांतून या उद्यानाला निर्माण करण्यासाठी लागणारे धन उभारले गेले. सन १८९१ साली जनतेसाठी खुले झालेल्या या उद्यानाला सन १९६७ साली "National Historic Landmark" हा दर्जा मिळाला. या उद्यानाने २०१६ मध्ये त्याचा १२५ वा वाढदिवस साजरा केला.
या संस्थेचे मिशन स्टेटमेंट असे आहे :
The New York Botanical Garden is an advocate for the plant kingdom. The
Garden pursues its mission through its role as a museum of living plant
collections arranged in gardens and landscapes across its National
Historic Landmark site; through its comprehensive education programs in
horticulture and plant science; and through the wide-ranging research
programs of the International Plant Science Center.
ब्राँक्स उपनगरातील २५० एकरावर पसरलेल्या या उद्यानातील असंख्य संग्रहात मिळून सुमारे १० लाख वनस्पती आहेत. या उद्यानात सुमारे ५० वैशिष्ट्यपूर्ण बगिचे आणि वनस्पतीसंग्रह आहेत. या संस्थेत २०० पूर्णवेळ संशोधक व ८० पीएचडीचा अभ्यास करणारे विद्यार्थी कार्यरत आहेत. उच्च कोटीचे संशोधन करण्यासाठी येथे एक अत्याधुनिक (स्टेट-ऑफ-आर्ट) आण्विक प्रयोगशाळा (मोलिक्युलर लॅब) आहे. येथील संशोधक ४९ देशांतील वनस्पतीसंशोधन प्रकल्पांचे नेतृत्व करत आहेत. ते जगभर फिरून नवनवीन वनस्पतींना शोधण्याचे कामही करतात. त्यांच्या संशोधनामागे वनस्पतींचा अन्न, औषधे आणि ऊर्जा यासाठी उपयोग करणे हे सुद्धा एक महत्त्वाचे उद्येश असतात.
दरवर्षी या उद्यानाला सुमारे १० लाख पर्यटक भेट देतात. येथे वर्षभर प्रसंगानुरुप खास वनस्पती प्रदर्शनेही भरवली जातात. याशिवाय ही संस्था नागरिक, शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अनेक शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमही सतत आयोजित करते. यासाठी ती वनस्पतिशास्त्र, पर्यावरण, आरोग्यवर्धक अन्न, इत्यादी अनेक विषयांवरील कार्यशाळा आयोजित करते व मान्यताप्राप्त अभ्यासक्रम असलेले शिक्षणही देते. याचा फायदा दर वर्षी ३ लाखापेक्षा जास्त नागरिकांना होतो.
तर एका सकाळी सज्जड न्याहरी करून हे उद्यान बघायला बाहेर पडलो. ब्राँक्स आमच्या घरापासून उत्तर-पूर्वेला असल्याने सबवेऐवजी बस हा चांगला पर्याय होता. त्यानिमित्ताने ब्राँक्सचे दर्शन झाले. ब्राँक्स हा न्यू यॉर्क शहराचा तुलनेने गरीब प्रभाग आहे. इथे इतर प्रभागांसारख्या उंच इमारती फार कमी आहेत. मुख्य बाजारपेठेत तर बहुतेक इमारती दोन-तीन मजलीच आहेत. भपकेदार शोरूम्सचाही अभाव आहे. मात्र, हिरवाईची मात्र इथेही फारशी कमी नाही.
उद्यानाच्या दिशेने जाताना बसमधून दिसलेले ब्राँक्स हे असे होते...
ब्राँक्स ०१
ब्राँक्स ०२
ब्राँक्स ०३ : बसमधून दिसलेला फोर्डहॅम विद्यापीठ परिसर
बसच्या थांब्यापासून प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी उद्यानाला जवळ जवळ एक किलोमीटरची फेरी मारून जायला लागले. ते करताना उजवीकडे उद्यान आणि डावीकडच्या रस्त्यापलीकडे असलेला फोर्डहॅम विद्यापीठाचा तितकाच झाडीने भरलेला हिरवागार परिसर दिसत होता...
ब्राँक्स ०४ : उद्यानाच्या कडेने चालताना दिसलेला फोर्डहॅम विद्यापीठ परिसर
गुगलबाबा उद्यानाचे प्रवेशद्वार या दिशेला आहे असे दाखवतोय खरे, पण ते नक्की या बाजूलाच आहे ना ? की उगाच पायपीट करवतोय ? असे विचार मनात येत असतानाच उद्यानाच्या कुंपणावर त्याच्या नावाची पाटी आणि प्रवेशद्वार समोर आहे आणि हायसे वाटले...
न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन्सचे प्रवेशद्वार
आत शिरून तिकिट काढून उद्यानाच्या आवारात शिरल्या शिरल्या हा १०० वर्षे वयाचा हिमालयन पाईन (Pinus wallichiana) समोर आला आणि आपल्या गावचा भिडू पाहून नाही म्हटले तरी जरा बरे वाटलेच ! याचा विशेष म्हणजे याच्या सुईसारख्या पानांची लांबी एक फूटभरापर्यंत असते...
हिमालयन पाईन (Pinus wallichiana)
हे उद्यान फारच आखीव रेखीव आहे, अंतर्गत रस्ते डांबरी आणि रुंद आहेत. उद्यानात फिरण्यासाठी विद्युत ऊर्जेवर चालणार्या टायरवाल्या पर्यटक गाड्यांची ट्रेन धावत असते. तिने प्रवास करताना पर्यटक कोणत्याही थांब्यावर चढू-उतरू शकतात. तरीही इतक्या सुंदर परिसराचे गाडीत बसून धावते दर्शन करण्याऐवजी सुरुवातीला प्रवेशद्वारापासूनची ठिकाणे पाहत पाहत चालत पुढे जावे आणि पाय तक्रार करू लागल्यावर गाडीचा आधार घ्यावा असे ठरवून वाटचाल सुरू केली...
आखीवरेखीव उद्यानाचे प्रथमदर्शन
जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डन
प्रवेशद्वाराच्या पासून डावीकडे वळल्यावर थोड्याच अंतरावर जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डन आहे. उन्हाळ्यात फुललेले रंगीबेरंगी फुलोरे पाहून पाय आपोआप तिकडे वळले. हा उघड्यावरचा बगिचा असला तरी विविध हवामानात वाढणार्या वनस्पतींचे अनेक संग्रह त्यात आहेत. वनस्पतींच्या बहरात येण्याच्या ऋतूवरून त्या विभागांना कूल रूम, हॉट रूम, फॉल रूम, बॉग रूम (पाणथळ जमिनीत वाढणार्या वनस्पतींचा विभाग) अशी नावे दिलेली आहेत. अर्थातच, येथे वर्षभर ऋतुमानानुसार कोणत्या ना कोणत्या "रूम"मध्ये आकर्षक फुले-वनस्पती बहरलेल्या असतात...
पेरेनियल गार्डन ०१
पेरेनियल गार्डनमध्ये फुललेले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती...
जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डनमधील काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०१
जेन वॉटसन आयर्विन पेरेनियल गार्डनमधील काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०२
एनिड ए हाऊप्ट वनस्पतीसंरक्षकगृह (काँझरव्हेटरी)
या बगिच्याला लागूनच एक प्रशस्त वनस्पतीसंरक्षकगृह (काँझरव्हेटरी) आहे. ब्रिटन दांपत्याने लंडनच्या क्यू गार्डनमधील पाम हाउस आणि हाईंड पार्कमधील क्रिस्टल पॅलेस या इमारतींपासून प्रेरणा घेऊन एका स्थानिक ग्रीन हाउस बनवणार्या कंपनीकरवी याचे काम करून घेतले आहे. घडीव लोखंडी जाळ्यांच्या व काचांच्या रचनेने बनवलेले, अठराशे नव्वदीच्या इटॅलियन रेनेसाँ शैलीत बनवलेले हे वैशिष्ट्यपूर्व वनस्पतीसंरक्षकगृह १९०२ साली जनतेसाठी खुले झाले. त्यानंतर त्याला अत्याधुनिक ठेवण्यासाठी आजतागायत चारदा पुनर्निमाणाची मोठी कामे केली गेली आहेत.
लांबट इंग्लिश 'C' अक्षराच्या आकाराच्या या इमारतीमध्ये शिरल्यावरच तिच्या भव्यतेची कल्पना येते. तिच्यात आपण जसजसे पुढे पुढे जात राहतो, तसतसे आपण इमारतीत नसून एखाद्या छोट्याश्या जंगलातच फिरत असल्याचा भास होऊ लागतो. त्यातली काही आकर्षक क्षणचित्रे खाली देत आहे.
(अ) वर्षारण्य विभाग
वर्षारण्य विभाग ०१
वर्षारण्य विभाग ०२
वर्षारण्य विभाग ०३ व ०४
काही ठिकाणी वनस्पतीभांडाराचे विहंगमावलोकन करण्यासाठी उंचावरचे निरिक्षणमनोरे केलेले आहेत...
वर्षारण्य विभाग ०५ : निरिक्षणमनोर्याकडे नेणारे जिने
वर्षारण्य विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती...
वर्षारण्य विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०१
वर्षारण्य विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०२
(आ) वाळवंटी विभाग
वाळवंटी विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०१
वाळवंटी विभागातले काही आकर्षक फुलोरे आणि वनस्पती ०२
(इ) ऑर्किड विभाग
ऑर्किड विभागाच्या सुरुवातीला एका काचेच्या दालनात असलेली आकर्षक पुष्परचना
ऑर्किड विभागातले काही आकर्षक फुलोरे ०१
ऑर्किड विभागातले काही आकर्षक फुलोरे ०२
पुढच्या विभागात विविध रंगांचे आणि आकारांचे वौशिष्ट्यपुर्ण फुलोरे असलेल्या वनस्पतींचे आकर्षक वाफे होते...
विविध रंगांचे आणि आकारांचे वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे असलेल्या वनस्पतींचे आकर्षक वाफे ०१
त्यातला हा एक मला खास आवडलेला वाफा...
मला खास आवडलेला अनेक वैशिष्ट्यपुर्ण फुलोर्यांचा वाफा ०२
बहुतेक सर्व वनस्पती पूर्ण बहरात येऊन आपल्या वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या फुलोर्यांची उधळण करताना दिसत होत्या. त्यापैकी अजून काही खास आकर्षक फुलोरे...
वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०१
वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०२
काँझरवेटरीतील फुलोर्यांच्या आकारांची आणि रंगांची विविधता केवळ वेड लावणारी होती ! काय बघू आणि काय नको असे झाले होते. तेथून पाय निघायला मागत नव्हते. पण, अजून बरेच काही बघायचे होते त्यामुळे बाहेर पडून पुढे निघालो.
(क्रमशः )
काँझरवेटरीतून बाहेर पडून तिला एक फेरी मारली. तिच्या आजूबाजूच्या परिसराची निगा तर उत्तम रितीने राखलेली होतीच पण तेथेही काही अनवट वनस्पती व फुलेही पाहायला मिळाली...
काँझरवेटरीचा परिसर ०१
काँझरवेटरीचा परिसर ०२
काँझरवेटरीचा परिसर ०३ : काही अनवट फुले
तेथून उजवीकडे वळून एका उपाहारगृहाला वळसा घालून पुढे निघालो आणि पाचेक मिनिटांत उंच वृक्षाच्या रांगांच्या मधून एक रस्ता जाताना दिसला. नकाश्यावर तिचे नाव टुलिप ट्री अॅली आहे असे समजले. इतक्या महाकाय वृक्षांचे हे नाव जरासे धक्कादायक होते. :) या उत्तर अमेरिकेतील भरभक्कम आकाराच्या स्थानिक वृक्षाला टुलिप सारख्या दिसणार्या त्याच्या फुलांमुळे टुलिप ट्री ( Liriodendron tulipifera) हे नाव पडले आहे हे नंतर गुगलबाबाच्या कृपेनेच कळले...
टुलीप ट्री अॅली
टुलीप ट्री चे फूल (जालावरून साभार)
त्या रस्त्यावरून पुढे जाऊ लागल्यावर गर्द झाडीत लपलेली एक भव्य इमारत हळू हळू नजरेत येऊ लागली...
टुलीप ट्री अॅलीतून झालेले लायब्ररीच्या इमारतीचे प्रथमदर्शन
लु-एस्थर टी मेर्ट्झ लायब्ररी
न्यू यॉर्क राज्याच्या विधानसभेने १८८१ साली सर्वोत्तम सार्वजनिक वनस्पतीशास्त्रिय उद्यान निर्माण करण्यासाठी जमीन संरक्षित करून बांधकाम सुरू केले त्यावेळी या लायब्ररीचे आणि काँझरव्हेटरीचे बांधकाम सर्वप्रथम सुरू केले गेले. अँड्र्यु कार्नेजी, कॉर्नेलियस वँडरबिल्ट आणि जे पी मॉर्गन या त्या काळाच्या प्रसिद्ध सामाजिक कार्य करणार्या धुरिणांनी पुढे येऊन हे काम सर्वोत्तम प्रतीचे व्हावे यासाठी सरकार जेवढा खर्च करेल त्याच्या एवढाच पैसा भेट देण्याचे जाहीर केले. अश्या रितीने सरकारी व खाजगी सहकार्यातून "लु-एस्थर टी मेर्ट्झ लायब्ररी" हे उत्तर-दक्षिण अमेरिका खंडातले सर्वात मोठे शास्त्रीय वाचनालय उभे राहिले.
गर्द झाडीचा अडसर दूर झाली की ही इमारत किती भव्य आहे हे स्पष्ट होते. एकंदरीत या इमारतीचा भव्य आकार, तिचे कलापूर्ण बांधकाम आणि तिच्या समोरचे आकर्षक कारंजे यांचा आपल्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही...
वाचनालय ०१
वाचनालय ०२ : दर्शनी भागातले कारंजे
वाचनालय ०३ : प्रवेशद्वारातून दिसणारे दर्शनी भागातले कारंजे आणि टुलीप ट्री अॅली
येथे ५,५०,००० पेक्षा जास्त पुस्तके आहेत. वनस्पतिशास्त्र व फलोत्पादनशास्त्रासह येथे इतिहास, मानववंशशास्त्र, लँडस्केपिंग, स्थापत्यशास्त्र, आर्किटेक्चरचा इतिहास, एथ्नोबॉटनी, वनस्पतिशास्त्राचे अर्थशास्त्र, नागरी समाजाचा इतिहास, पर्यावरण, इत्यादी अनेक विषयांवरचे ग्रंथ आहेत. केवळ आधुनिक शास्त्रीय पुस्तके व नियतकालिकेच नाहीत तर औषधी वनस्पतींवरची मध्ययुगीन पुस्तके; १७व्या व १८व्या शतकातल्या युरोपियन उद्यानतंत्रावरची पुस्तके; चार्ल्स डार्विन व कार्ल फोन लिन्ने इत्यादींची पुस्तके, यासारखी दुर्मिळ ग्रंथसंपदाही येथे जतन करून ठेवलेली आहे.
वाचनालयाच्या स्वागतगृहातली भलीमोठी पुष्परचना
वाचनालयाच्या एका दालनात डोकावून आणि नावाजलेल्या कलाकारांनी विविध ऋतूत बागेच्या रंगवलेल्या चित्रांचे दालन पाहून पुढे निघालो.
मी काही वनस्पतिशास्त्रज्ञ नाही किंवा त्या विषयांत मला सौदर्यदृष्टीने पाहण्यापलीकडे रस नाही. त्यामुळे, शास्त्रीय मुद्दे सोडून देऊन, पुढचे एकमेकाला लागून असलेले अनेक छोठेमोठे बगिचे केवळ डोळ्यांत आणि कॅमेर्यात साठवत पुढे निघालो. त्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोर्यांचे फोटो खाली देत आहे...
वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०१
वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०२
वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०३
वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०४
वाचनालयाच्या शेजारच्या बगिच्यांत फिरताना दिसलेले फुलोरे ०५ व ०६
आता मात्र चालून चालून दमलेल्या पायांनी तक्रार करायला सुरुवात केली होती. कर्मधर्मसंयोगाने तोपर्यंत बस-ट्रेनच्या एका थांब्यावर पोहोचलो होतो. बस पकडून, आरामात बसून, बागेच्या सौंदर्याचे निरीक्षण करत आणि चांगले दृश्य दिसले की कॅमेर्याचा वापर करत फेरी पुढे चालू झाली...
बसट्रेनने फिरताना दिसलेले दृश्य ०१
बसट्रेनने फिरताना दिसलेले दृश्य ०२
बसट्रेनने फिरताना दिसलेले दृश्य ०३
बसट्रेनचा थांबा
पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका (Peggy Rockefeller Rose Garden)
या गुलाबपुष्पवाटीकेचे विशेष म्हणजे १९१६ साली, जेव्हा अमेरिकन स्त्रियांचे विश्व घरापुरते मर्यादित होते त्या काळी, बियाट्रिक्स फेरांड नावाच्या लॅंडस्केप कलावतीने हिची निर्मिती सुरू केली. पहिल्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या लोखंडाच्या अभावामुळे वाटिकेचे कुंपण अपूर्ण अवस्थेत ठेवावे लागले होते ! १९८८ साली वाटिकेचे व्यवस्थापन करणार्या बोर्डाच्या एका सभासदाने मूळ आराखडे शोधून काढले व डेविड रॉकंफेलरला दाखविले. रॉकफेलरच्या उदार मदतीने फेरांडच्या मनातली वाटिका पूर्णरूपाने अस्तित्वात आली. तिला गुलाबांची आवड असणार्या डेविडच्या पत्नीचे, पेगीचे, नाव दिले गेले. आजच्या घडीला या बागेत वेगवेगळ्या आकार-रंग-गंध-रूपांच्या ७०० पेक्षा जास्त प्रकारच्या गुलाबांची ३००० पेक्षा जास्त झुडुपे आहेत. जगातल्या सर्वोत्तम गुलाबाच्या बगिच्यांमध्ये हिची गणना केली जाते.
उंचीवर असलेल्या रस्त्यावरून दरीत वसलेल्या या बागेचे विहंगम दर्शन होते...
पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीकेचे विहंगमावलोकन ०१
पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीकेचे विहंगमावलोकन ०२
ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनला भेट दिली तेव्हा गुलाबांचे खूप ताटवे दिसले होते. त्याचबरोबर अनेक झुडुपांवर शेकडो कळ्यांचे झुबकेही दिसले होते. त्या वेळेस, आपण जरासे अगोदर तेथे गेलो आहोत असे काहीसे चुकचुकल्यासारखे वाटले होते. त्यानंतर तीनेक आठवड्यांनी या वाटिकेची फेरी झाल्याने इथली गुलाबांची सर्व झुडुपे अक्षरशः शत-हजारो फुलांच्या झुबक्यांनी भरून गेलेली होती. त्यामुळे ती जुनी खंत पुरेपूर भरून निघाली !
पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका ०१
पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका ०२
पेगी रॉकंफेलर गुलाबपुष्पवाटीका ०३
इथली विविध आकार-रंग-गंध-रूपांच्या गुलाबांची उधळण अक्षरशः वेड लावणारी होती. तेथे घेतलेले ताटव्यांचे आणि फुलांचे खालील निवडक फोटो मी काय म्हणतो आहे त्याची कल्पना देऊ शकतील...
वैशिष्ट्यपूर्ण ताटवे ०१
वैशिष्ट्यपूर्ण ताटवे ०२
वैशिष्ट्यपूर्ण फुले व ताटवे ०३
आज लिहिताना जेव्हा मी हे फोटो पाहत आहे, तेव्हा त्यांनी त्या वाटिकेतील अनुभवाला पुरेसा न्याय दिला नाही असे जाणवते !
बागेतून बाहेर पडून परत बसट्रेन पकडली आणि उद्यानाची सफर परत सुरू केली.
बसने बागेत फिरताना ०१
बसने बागेत फिरताना ०२
बसने बागेत फिरताना ०३
बसने बागेत फिरताना ०४
इतके मोठे उद्यान बघताना होणारी बरीच पायपीट वाचवल्याबद्दल या गाडीला आपल्या पायाकडून अनेक धन्यवाद मिळतात ! बागेला फेरी घालून गाडीने आम्हाला प्रवेशद्वारापर्यंत आणून सोडले.
आतल्या बाजूने दूरवर दिसणार्या प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग
आतल्या बाजूने दिसणारे प्रवेशद्वार
प्रवेशद्वाराच्या आकर्षक इमारतीच्या एका बाजूला फुलझाडे व इतर झाडांच्या रोपांचे विक्रीकेंद्र आहे, तर दुसर्या बाजूला उपाहारगृह आहे. चारपाच तासाच्या फेरफटक्याने भूक मस्तपैकी खवळली होती. अर्थातच उपाहारगृहाला राजाश्रय देण्यात आला !
परत निघण्यापूर्वी झाडे विक्रीकेंद्र आणि त्याच्या प्रांगणाला धावती भेट दिली. तेथेही फोटो घेण्याचा मोह व्हावा असे बरेच काही होते...
प्रवेशद्वार परिसर आणि विक्रीकेंद्रातील नजारे ०१
प्रवेशद्वार परिसर आणि विक्रीकेंद्रातील नजारे ०२
उद्यानातून बाहेर पडून परतीची बस पकडली आणि हार्लेमनदीला ओलांडून आमच्या गल्लीत प्रवेश केला...
हार्लेम नदी आणि पलीकडील मॅनहॅटनचा किनारा
हडसन हाईट्स, मॅनहॅटन
(क्रमशः )
ब्राँक्स प्राणिसंग्रहालय
१८९५ साली Boone and Crockett Club च्या सभासदांनी इतर काही नागरिकांच्या सहकार्याने "प्राणिसंग्रहालये स्थापन करणे, प्राणिशास्त्रात संशोधन करणे आणि जंगली प्राण्यांचे संरक्षण करणे" हे हेतू मनात धरून New York Zoological Society ची स्थापना केली. या संस्थेचेच पुढे Wildlife Conservation Society या विश्वव्यापक संस्थेमध्ये रूपांतर झाले. आजच्या घडीला ही संस्था ६५ देशांतील ५१.८ लाख चौ किमी क्षेत्रफळावर ५०० वन्यप्राणी संवर्धन प्रकल्प चालवत आहे व तिच्या छत्राखाली २०० जण पीएचडी स्तराचे संशोधन करत आहेत. भारताचे क्षेत्रफळ ३२.९ लाख चौ किमी आहे यावरून या संस्थेच्या पसार्याचा अंदाज यावा ! ही संस्था एकट्या न्यू यॉर्क शहरात चार प्राणिसंग्रहालये आणि एक मत्स्यालय चालवते. या सर्वांना मिळून दरवर्षी ४० लाख लोक भेट देतात.
त्यापैकी, सन १८९९ मध्ये जनतेला खुल्या झालेले व २६५ एकर क्षेत्रफळ असलेले ब्राँक्स प्राणिसंग्रहालय हे अमेरिकेतील नागरी भागात असलेले सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. याच्या हद्दीतून वाहणार्या ब्राँक्स नदीचा प्राण्यांसाठी नैसर्गिक परिसर निर्माण करण्यासाठी तिचा खुबीने उपयोग करून घेतलेला आहे. सन १९१६ साली येथे प्राणिसंग्रहालयासाठी स्थापन केलेले जगातले पहिले प्राणिरुग्णालय अस्तित्वात आले. गेली काही वर्षे सतत घटत जाणार्या सरकारी मदतीमुळे, दुर्दैवाने, या प्राणिसंग्रहालयाचा सुवर्णकाल मागे पडला आहे आणि अनेक विभाग बंद पडले आहेत. तरीही, सद्या येथील २० पेक्षा जास्त विभागांत अंदाजे ६५० प्रजातींचे सुमारे ४००० प्राणी आहेत. या जागेला दरवर्षी २१ लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात.
याच्या सगळ्या विभागांना भेट द्यायची तर त्याच्या आवारात चालत बरेच उलटे-सुलटे फेरे घालावे लागते. बागेत प्रवास करण्यासाठी शटल बसट्रेनची चकटफू सोय आहे. पण, तिच्या ठराविक मार्गामुळे आणि थांब्यांच्या संख्येमुळे, सगळ्या आकर्षणांना बघायचे असल्यास बरीच पायपीट करावीच लागते.
ब्राँक्स प्राणिसंग्रहालयाच्या आवाराचा नकाशा
असो. आता अधिक वेळ न घालवता चला फेरी मारायला या संग्रहालयात.
हे संग्रहालय ब्राँक्स मधील न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डनच्या जवळ असल्याने येथे कसे पोचायचे माहीत झालेले होते. बोटॅनिकल गार्डनप्रमाणेच बसथांब्यापासून, विरुद्ध दिशेने, एक-दीड किलोमीटरची फेरी मारून त्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो...
ब्राँक्स प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार
तिकीट काढून संग्रहालयाची शटल पकडून आम्ही आकर्षणांकडे निघालो...
झू शटल
संग्रहालयाचा बराचसा भाग पायी पाहिल्यामुळे एकमेकांना लागून असलेल्या भागांचा मागोवा ठेवणे कठीण होते. त्यामुळे भागांच्या नावांचा हिशेब सोडून प्राण्यांच्या मागोव्यावर राहिलो.
वाईल्ड एशिया
हा भाग अनेक उपभागांनी बनलेला मोठा परिसर आहे. इथे सुरुवातीलाच इजिप्शियन चित्रांत आणि चित्रलिपीत दिसणारा व सद्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला वॉल्डरॅप पक्षी दिसला...
वॉल्डरॅप
झाडावर राहणारा मॅत्शीज् कांगारू (Matschie's tree-kangaroo)
अनेकरंगी जावन लुतुंग माकडे
छोटी सोंड असलेले मलायन/एशियन तापीर
पर्यटकांच्या कोलाहलाला दाद न देता आरामात झोपलेले दोन काळे वाघ
वाईल्ड एशियाच्या दर्शनी भागात एका छोट्या कायमस्वरूपी उघड्या रंगमंचावर व्हॉलंटीयर्स लहान-मोठ्यांसाठी प्राणी-पक्षांची माहिती देण्याचा मनोरंजक कार्यक्रम सादर करत होते...
त्यांना थोडा वेळ न्याय दिला आणि जवळच असलेल्या मोनोरेल स्टेशनच्या दिशेने निघालो...
बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल
वाईल्ड एशिया विभागाच्या ४० एकरांमधील प्राण्यांचे आरामात बसून दर्शन देण्यासाठी सन १९७७ मध्ये ही २.६ किमी लांबीच्या मार्गावर धावणारी ९ डब्यांची मोनोरेल सेवा सुरू झाली आहे. या विभागातील बरेच प्राणी केवळ या रेल्वेप्रवासातच पाहता येतात. त्यामुळे ही सफर जेवढी मनोरंजक आहे तेवढीच इथले सर्व प्राणी पाहण्यासाठी आवश्यक आहे. व्हीलचेअर आणि मोटोराईझ्ड स्कूटर घेऊन फिरणारे पर्यटक या गाडीत आपल्या वाहनांसकट बसून मोनोरेल सफरीचा आनंद घेऊ शकतात. शारीरिक दृष्ट्या असमर्थ असणार्या (डिफरंटली / स्पेशली एबल्ड) लोकांसाठी सार्वजनिक व खाजगी ठिकाणांवर अशी खास सोय असणे ही अमेरिकेत नेहमीची गोष्ट आहे. आपली व्हीलचेअर घेऊन आत शिरण्याची सोय व तिच्यातच बसून प्रवास करण्यासाठी खास जागा प्रत्येक शहरी बसमध्येही असते. सहसा आपली जागा न सोडणारे बस चालक, व्हीलचेअरला तिच्या जागी बसविण्यासाठी विनाअपवाद अगत्याने मदत करताना दिसतात. इथे जागोजागी असलेल्या अश्या सोयी पाहताना, भारतातल्या एका राष्ट्रीय वाहिनीवर चाललेल्या चर्चेत, "अश्या सोयीची गरज असणारे भारतात ५% च लोक आहेत, त्यामुळे ती प्रायॉरिटी नाही" असे एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्याने तोडलेले तारे आठवले ! :(
इथल्या मोनोरेलमध्ये बसायची व्यवस्था अशी आहे की सगळे पर्यटक गाडीच्या एका बाजूकडे तोंड करून बसलेले असतात ! चित्रपटगृहात असते त्याप्रमाणे पुढच्यापेक्षा मागच्या आसनांच्या रांगांची उंची जास्त ठेवली आहे. जणू हे धावते प्रेक्षागृहच आहे. त्यामुळे, मान वाकडी करायला न लागता सगळ्यांना नाकासमोर दिसणारे प्राणी व निसर्गाचे देखावे पाहता येतात. संग्रहालयाच्या आवारातून वाहणार्या ब्रॉक्स नदीच्या प्रवाहाचा व दलदलींचा फायदा घेत प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात असण्याचा आभास निर्माण केला आहे. त्यामुळे ही मोनोरेल सफर प्राणीदर्शन आणि निसर्गदर्शन असा आनंद द्विगुणित करणारी होते...
बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल ०१
बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल ०२ : ब्राँक्स नदीच्या मनोहर प्रदेशातून प्रवास (जालावरून साभार)
बेंगाली एक्सप्रेस मोनोरेल ०३ : ब्राँक्स नदीच्या मनोहर प्रदेशातून प्रवास
मध्य आशिया व मंगोलियातील नष्ट होऊ लागलेली रानटी घोड्यांची Przewalski's प्रजाती. यांना आजतागायत माणसाळवणे शक्य झालेले नाही...
रानटी घोड्यांची Przewalski's प्रजाती
जणू फोटोसाठी पोझ घेऊन बसला आहे असा अमुर (सायबेरियन) वाघ
आशियाई हत्ती
तांबडा पांडा
मोनोरेल सफर संपवून वाईल्ड एशियामधून बाहेर पडलो तेव्हा अॅस्ट्रर कोर्ट येथील पक्षांच्या एका खास कार्यक्रमाची वेळ होत आली होती. त्यामुळे, तो बघायला झू शटल पकडून निघालो. शटलमधून उतरून अॅस्ट्रर कोर्टाकडे जाताना वाटेत समुद्री सिंहाचा (सी लायन) तलाव होता. वाटेत भेटलेल्या या राजेमहाराजांना थोडा वेळ देऊन त्यांचा मान राखणे भाग होते.
एका मोठ्या तलावात अनेक समुद्री सिंह पर्यटकांचे मनोरंजन करत होते. त्यातला एक फारच धीट होता आणि पाण्यातून उसळ्या मारत पर्यटकांपासून हाताच्या अंतरावर तलावाच्या कडेवर रेलत जणू "है कोई ?" असे म्हणत आरामात उभा राहत होता...
कॅलिफोर्नियानं सी लायन ०१
तर दुसरा एका शीळेवर रॉयल पोझ घेऊन आरोळ्या ठोकत शो ऑफ करत होता...
कॅलिफोर्नियानं सी लायन ०२
अॅस्टर कोर्टावर "बर्ड्स इन फ्लाईट" या नावाचा कार्यक्रम सुरू होणार होता. त्याची वेळ होत आल्यावर मोक्याच्या खुर्च्या पकडून बसलो. या कार्यक्रमात अनेक पक्षांच्या करामती पहायला मिळाल्या. पक्षीशास्त्रात संशोधन करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शास्त्रज्ञांनी बनलेला संच हा कार्यक्रम मनापासून आवडीने सादर होता, हे विशेष !
आपले पद, ज्ञान अथवा अनेक दशकांच्या अनुभवाच्या मानाने खूप खाली उतरून आपण सर्वसामान्य पर्यटकांसमोर कार्यक्रम सादर करत आहोत, असे त्यांच्या वागण्यातून किंचितही जाणवले नाही. पाश्चिमात्य देशांतून आलेल्या संशोधनाची कारणमीमांसा करताना, त्यांना उपलब्ध होणारा पैसा आणि साधने यांना आपण सहजपणे पुढे करतो. संशोधनासाठी उच्च प्रतीची संसाधने असलेली प्रयोगशाळा जेवढी आवश्यक असते त्यापेक्षा जास्त आपल्या संशोधनात समरस होऊन, झोकून देऊन काम करणे महत्त्वाचे असते. हे जिथे दिसते तेथेच खरे संशोधन होऊ शकते, हे मात्र आपण सहजपणे (किंवा सोईस्करपणे) विसरून जातो.
"बर्ड्स इन फ्लाईट" कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...
बर्ड्स इन फ्लाईट ०१
बर्ड्स इन फ्लाईट ०२
बर्ड्स इन फ्लाईट ०३ व ०४
बर्ड्स इन फ्लाईट ०५
बर्ड्स इन फ्लाईट ०६, ०७ आणि ०८
इथून पुढे शटलच्या मार्गात नसलेले अनेक विभाग बघण्यासाठी पदयात्रेला पर्याय नव्हता. त्यामुळे, तेथून जवळच असलेल्या मादागास्कर दालनाकडे मोर्चा वळवला.
मादागास्कर
मादागास्कर भवन
ही इमारतीचे १९०३ साली "लायन हाउस" या नावाने उद्घाटन झाले होते. ते १९८० मध्ये बंद पडले. सन २००८ साली ती मादागास्कर दालनाच्या स्वरूपात परत वापरात आणली गेली. या दालनात आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावरील मादागास्कर बेटावरील अनेक प्राण्यांचा संग्रह केलेला आहे. यातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. Wildlife Conservation Society त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणारे अनेक प्रकल्प राबवित आहे.
रिंग टेल्ड लेमूर
मादागास्कर भवनातले काही प्राणी
तिथून जरा पलीकडे शिकारी पक्षांचा भाग सुरू झाला...
शिकारी पक्षी
त्यापुढे सागरी पक्षांचा भाग होता...
सागरी पक्षी ०१
सागरी पक्षी ०२ : पेंग्विन
गोलाकार पदयात्रा करत करत परत अॅस्टर कोर्ट जवळच्या कारंजे गोलात (फाऊंटन सर्कल) पोचलो होतो. या भागाला सुंदर टाइल्सच्या नक्षीने आणि कोरीवकामाने सजवलेले आहे. तिथे आरामात बसण्यासाठी एक जागा सापडली. बरोबर आणलेल्या खाण्याच्या सामुग्रीला बाहेर काढून कुरकुरणार्या पोटाला शांत केले...
फाऊंटन सर्कल ०१ : कारंजे
फाऊंटन सर्कल ०२ : सजावट
"वर्ल्ड ऑफ बर्ड्स" नावाच्या एका बंदिस्त पक्षीदालनातून फिरत असताना हे अनेक आकर्षक रंगांनी सजलेले चिमुकले जीव, आजूबाजूने फिरणार्या पर्यटकांची पत्रास न बाळगता, एका छोट्या खड्ड्यात साठवलेल्या पाण्यात भर दुपारी अंघोळी उरकून घेत होते...
"वर्ल्ड ऑफ बर्ड्स" मधले अजून काही आकर्षक पक्षी...
वर्ल्ड ऑफ बर्ड्स मधील काही पक्षी
तिथून पुढे निघालो आणि वाटेवर हे कुटुंब आमच्यासारखेच सहलीला निघालेले दिसले...
संग्रहालयाचे आवार म्हणजे एक सुंदर जंगलच आहे. पायवाटांच्या दोन्ही बाजूला असलेले प्राणी व पक्षी बघताना होणारी पायपीट सुकर व्हावी यासाठी मध्ये मध्ये पर्यटकांना बसायला सोयी केलेल्या आहे...
शेवटची मजल दरमजल करत निर्गमनद्वाराकडे वाटचाल चालू असताना हा एक आकर्षक पक्षी दिसला...
आणि दरवाजाच्या जवळ या अमेरिकन बायसनच्या जोडीने (म्हैस/रेडा) दर्शन दिले...
आम्ही जेथून बाहेर पडलो त्या लोखंडी फोर्डहॅम रोड गेटवरची नक्षी बघण्यासारखी होती...
फोर्डहॅम रोड गेट
बस घराच्या दिशेने पळू लागली आणि आम्ही दमलेल्या पायांना कुरवाळत आजूबाजूची वस्ती न्याहाळू लागलो.
(क्रमशः )
रॉकंफेलर सेंटर
मॅनहॅटन बेटाच्या मध्यभागात (midtown) २२ एकर (८९,००० चौ मीटर) क्षेत्रफळावरच्या सहा ब्लॉक्सच्या जागेवर १९ गगनचुंबी इमारती मिळून बनलेले रॉकंफेलर सेंटर नावाचे एक विशाल व्यापारी संकुल आहे. यातल्या इमारतींतली जागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७४३,००० चौ मी (८,०००,००० चौ फू) इतके मोठे आहे. या संकुलात केवळ व्यापारी जागाच नाही तर बगिचे, थिएटर्स, स्केटिंग रिंक, जमिनीखालच्या एकमेकाला छेदणार्या मार्गांच्या जाळ्यामध्ये सुमारे २०० दुकाने, रेस्तराँ आणि चक्क सबवेचा एक थांबा पण आहे. या संकुलात रेडिओ सिटी म्युझिक हॉल, एन बी सी या दूरदर्शन संस्थेच्या "टुडे" नावाच्या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचे चित्रीकरण करणारा स्थायी स्टुडिओ, इत्यादी गोष्टी आहेत. हे कमी झाले की काय म्हणून, इमारतींच्या बहिर्भागावर आणि इमारतींच्या व्हरांड्यांच्या भिंतींवर, हे संकुल अजून आकर्षक बनविणारी अनेक चित्र व शिल्पकलेचे नमुने आहेत. याशिवाय, येथे वर्षभर प्रसंगानुरूप अनेक रोचक कार्यक्रम साजरे केले जातात. या संकुलात ख्रिसमसनिमित्त केलेली सजावट आणि रोषणाई पहायला लोक मोठ्या संख्येने आवर्जून जातात. अश्या अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींनी भरलेल्या या जागेला "सिटी विदिन अ सिटी" असे अभिमानाने म्हटले जाते. एक मिनिटाचीही उसंत न घेता २४ X ७ चालू असलेले हे संकुल वर्षभर गजबजलेले असते.
सन १९८८ मध्ये या संकुलाला National Historic Landmark हा दर्जा दिला गेला आहे. या जागेची पर्यटकांमधली लोकप्रियता केवळ खरेदीसाठीच नव्हे तर कला, क्रीडा, खवय्येगिरी व मनोरंजन या कारणांसाठीही आहे. मोठ्या संखेने असलेली आकर्षणे न चुकवता या संकुलाची फेरी मारायची असल्यास मार्गदर्शकासह असलेल्या सहलीसुद्धा उपलब्ध आहेत.
सन १९२९ मध्ये, जॉन डी रॉकंफेलर (धाकला) नावाच्या त्या काळाच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणसाच्या मुलाने हे संकुल उभे आहे ती जागा कोलंबिया विद्यापीठाकडून दीर्घ मुदतीच्या करारावर (लीज) घेतली. १९व्या शतकाच्या शेवटी न्यू यॉर्क शहरातल्या सधन समजल्या जाणार्या या भागाला १९२०च्या दशकापर्यंत उतरती कळा लागली होती. कराराच्या वेळेस हा भाग अवैध दारूची दुकाने आणि पब्ज, वेश्यागृहे आणि छोट्या छोट्या खोल्यांच्या बसक्या इमारतींच्या रांगांनी (rooming houses) भरलेला होता. त्याला उर्जितावस्तेत आणण्याच्या उद्येशाने रॉकंफेलरने तो ताब्यात घेतला होता. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग म्हणून संगीत नाटकांचे रंगमंदिर (ऑपेरा हाउस) बांधण्यासाठी या जागेचा एक महत्त्वाचा भाग त्याने एका ऑपेरा कंपनीला देऊ केला. त्याच वर्षी, म्हणजे १९२९ मध्ये, प्रचंड आर्थिक मंदीचे संकट अमेरिकेवर कोसळले. त्यामुळे ऑपेरा कंपनीने त्या प्रकल्पातून आपले अंग काढून घेतले. रॉकंफेलर (धाकला)च्या अंगावर मोठे लीज पडले होते आणि तेथे विकासकाम करायला मोठा भागीदार मिळणे दुरापास्त झाले होते. पण अश्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रकल्प बाद करण्याचे सल्ले धुडकारून, त्याने सर्व जुने आराखडे बाद केले आणि त्या जागेवर स्वतःच्या बळावर एक व्यापारी महासंकुल बनवण्याचे ठरविले.
हे सेंटर बांधण्याचा निर्णय घेतानाची जॉन डी रॉकंफेलर (धाकला)ची मन:स्थिती दाखविणारा फलक
आपले नवीन मनसुबे सिद्धीस नेण्यासाठी जॉन डी रॉकंफेलर (धाकला)ने कोलंबिया विद्यापीठाबरोबर (पहिली २७ वर्षे आणि नंतर २१ वर्षांच्या तीन मुदतवाढी असा) एकूण ८७ वर्षांसाठी जमिनीच भाडेकरार (लीज) केला; स्वतःच्या जबाबदारीवर Metropolitan Life Insurance Company कडून कर्ज उभे केले आणि स्वतःच्या मालकीचे तेल कंपन्यांतील समभाग विकले. सन १९३१ साली कामाला सुरुवात झाली आणि या संकुलातल्या पहिल्या १२ इमारती १९४० साली पूर्ण झाल्या. हा आधुनिक काळातला जगातल्या सर्वात मोठा खाजगी बांधकाम प्रकल्प असल्याचे म्हटले जाते.
या प्रकल्पातील एका इमारतीच्या नावामागे एक रोचक इतिहास आहे. दुसर्या महायुद्धापूर्वी तयार झालेल्या शेवटच्या चार इमारतींपैकी एकीला काय नाव द्यावे याचा विचार चालू होता. जर्मन व्यापारी कंपन्यांना ती भाड्याने देऊन तिचे Deutsches Haus (जर्मन गृह) असे नामकरण करण्याचा एक प्रस्ताव होता. मात्र, हिटलरच्या नाझी जर्मनीची दुसर्या महायुद्धाच्या दिशेने चाललेली वाटचाल पाहून जॉनने त्याला आक्षेप घेतला. जॉनने तसे केले नसते तर, काही काळाने युद्ध सुरू झाल्यावर, हा सर्व प्रकल्पच वादग्रस्त ठरला असता. त्या इमारतीचे International Building North असे नामकरण करण्यात आले. ही इमारत अमेरिका आणि मुख्यतः ब्रिटिश व इतर दोस्त राष्ट्रांच्या हेरगिरीच्या समन्वयाचे मुख्य केंद्र बनले. तिच्यातले ३६०३ क्रमांकाचे दालन दोस्त राष्ट्रांच्या Allied intelligence नावाच्या हेरसंस्थेचे मुख्यालय होते. युद्ध संपल्यावर Allied intelligence चे रूपांतर Central Intelligence Agency (CIA) मध्ये झाले व ३६०३ क्रमांकाचे दालन सीआयएचा पहिला मुख्य अॅलन डलेस याचे कार्यालय झाले !
हा व्यापारी प्रकल्प असल्याने त्याला स्वतःच्या कुटुंबाचे नाव देण्यासाठी जॉनचा विरोध होता. पण या प्रकल्पाला "Rockefeller Center" असे नाव दिल्यास जास्त चांगले आणि जास्त संख्येने भाडेकरू मिळतील या मुद्द्यावर "पब्लिक रिलेशन्स पायोनियर" म्हणून ओळखल्या जाणार्या आयव्ही ली ने त्याची संमती घेतली.
अश्या रितीने, एका माणसाच्या जिद्दीतून, "रॉकंफेलर सेंटर" या अमेरिकेतील सर्वात मोठ्या खाजगी व्यापारी संकुलाचा जन्म झाला ! एवढेच नव्हे तर, या एका महाप्रकल्पामुळे, आर्थिक मंदीच्या कालात ४०,००० बांधकाम कर्मचार्यांना नोकर्या मिळाल्या आणि एका अर्थाने रॉकंफेलरने न्यू यॉर्क शहरातील बांधकाम व्यवसायाला जीवनदान दिले.
कोलंबिया विद्यापीठाने या संकुलाची जागा १९८५ मध्ये रॉकंफेलर ग्रुपला $४० कोटीला विकली. १९८९ मध्ये Mitsubishi Estate ने रॉकंफेलर ग्रुपसकट रॉकंफेलर सेंटर विकत घेतले. त्यानंतर १९९६ मध्ये हे संकुल जेरी स्पेयरच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदारांच्या एका गटाने विकत घेतले. सन २००० मध्ये शिकागोमधील लेस्टर क्राऊन कुटुंबाने या संकुलातील मुख्य १४ इमारती $१८५ कोटींना विकत घेतल्या.
चला तर, अमेरिकेच्या व्यापारी इमारतींच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या, रॉकंफेलर सेंटरची सफर करायला.
सहा ब्लॉक्सवर विस्तारलेल्या रॉकंफेलर सेंटरमधल्या इमारतींचा नकाशा व त्यांच्यातील आकर्षणे :
१. कॉमकास्ट बिल्डिंग, २. आईस स्केटिंग रिंक आणि पॉल मॅनशिपचे 'प्रोमेथेउस' शिल्प, ३. रॉकंफेलर क्रिडो,
४. कारंजी, ५. छतावरचे बगिचे, ६. प्रोमोनेड व चॅनेल गार्डन्स, ७. इंटरनॅशनल बिल्डिंग,
८. ली लॉरीचे 'अॅटलास' शिल्प, ९. मिचिओ इहाराचा 'लाइट अँड मुव्हमेंट' चा खेळ,
१०. चार्ल्स लिंडबर्गचा अर्धपुतळा, ११. ली लॉरीची 'स्टोरी ऑफ मॅनकाईंड', १२. बँक ऑफ अमेरिका,
१३. रेडिओ सिटी म्युझिक हॉल, १४. बॅरी फॉल्कनरचे 'इंटेलिजन्स अवेकनिंग' मोझेइक,
१५. NBC च्या 'Today' शो चा स्टुडिओ, १६. इस्टर्न एअरलाईन बिल्डिंग, १७. मूळ 'टाइम-लाईफ' बिल्डिंग,
१८. होजे मारिया सर्टचे 'मॅन्स इंटेलेक्चुअल मास्टरी ऑफ द मटेरियल
युनिव्हर्स' शिल्प, १९. बार सिक्स्टी फाईव्ह, २०. काँकोर्स, २१. रिदम्स ऑफ
इन्फिनिटी
(रॉकंफेलर सेंटरच्या माहितीपत्रकावरून साभार)
कॉमकास्ट (Comcast) बिल्डिंग
ही या सेंटर मधली सर्वात पहिली इमारत. इथे 'मेट्रोपोलिटन ऑपेरा हाउस' बांधायचे ठरले होते. त्या योजनेचा प्लॅन प्रशासनाने पास केल्यानंतर तो मनसुबा कसा फिसकटला याबद्दल वर आले आहेच. त्याच सुमारास डेविड सारनॉफ हा 'रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका (RCA)' चा अध्यक्ष त्याच्या कंपनीच्या NBC नावाच्या नवीन उपकंपनीसाठी जागेच्या शोधात होता. NBC ला तिच्या दोन रेडिओ स्टेशन्ससाठी आणि चलतचित्रपट/नाटक यांच्यासाठी खास सोयी असलेल्या थिएटरसाठी इमारत हवी होती. त्यानुसार ही इमारत "एलीट प्रकारातला क्लास A" शैलीत बांधली आणि सजवली गेली. तिची रचना अशी आहे की भाड्याने दिलेली कोणतीही जागा बाहेरून आत येणार्या नैसर्गिक प्रकाशापासून २७.५ फुटांपेक्षा जास्त दूर नाही. आजच्या घडीला NBC च्या ९ प्रमुख दूरदर्शन स्टुडिओंनी या इमारतीचे २४ मजले व्यापलेले आहेत. त्यात 'Saturday Nite Live' हा प्रसिद्ध कार्यक्रम प्रसारित करणारा 8H हा स्टुडिओही येतो. या इमारतीच्या मुख्य भाडेकरूंच्या वरून तिचे "RCA and GE Building" असे नाव पडले होते. २०१५ मध्ये ते बदलून 'Comcast Building' असे केले गेले.
या इमारतीच्या दर्शनी भागावर चुनखडीचा दगड आणि काच वापरून ली लॉरी या कलाकाराने बनवलेली आकर्षक शिल्पे आहेत...
कॉमकास्ट बिल्डिंगच्या दर्शनी भागावरची शिल्पे
यातले मध्यभागातील मुख्य शिल्प मानवी ज्ञानाचा उपयोग करून निसर्गनियमांचे विश्लेषण करणारी हुशारी (विसडम) दर्शविते. त्यात हुशारी (विसडम) मानवी व्यक्तिरेखेच्या रूपात प्रकाश आणि ध्वनीच्या लहरी कोरलेल्या २४० पायरेक्सच्या तुकड्यांपासून बनवलेल्या पडद्याकडे निर्देश करते आहे. त्या पडद्यावर "Wisdom and knowledge shall be the stability of thy time" हे बायबलमधले वचन कोरलेले आहे. मुख्य शिल्पाच्या दोन बाजूला प्रकाश आणि ध्वनी यांना दर्शविणारी शिल्पे आहेत.
आईस स्केटिंग रिंक आणि पॉल मॅनशिपचे 'प्रोमेथेउस' शिल्प
कॉमकास्ट बिल्डिंगच्या समोरचा रॉकंफेलर प्लाझा (गाड्यांना बंदी असलेला रस्ता) ओलांडून गेलो की समोर एक अमेरिकन ध्वजांच्या रांगेने वेढलेली जमिनीच्या खालच्या स्तरावर असलेल्या चौकोनी जागा व तिच्यापर्यंत पोचवणार्या पायर्या आहेत. या जागेवर उन्हाळ्यात उघडे रेस्तराँ असते आणि तिथे हिवाळ्यात एका वेळेस १५० खेळाडूंना सामावून घेईल इतकी मोठी जागतिक स्तराची आईस स्केटिंग रिंक बनवतात ! गंमत म्हणजे आजच्या घडीला वर्षभर पर्यटकांनी गजबजलेली ही जागा सेंटरच्या मूळ आराखड्यातील एका अपयशी कल्पनेतून जन्मली आहे. सुरुवातीला या सखल जागेच्या चारी भिंतींना लागून छोट्या दुकानांच्या रांगा होत्या. सन १९३९ पर्यंत वरखाली जाण्यासाठी या जागेला एकाच बाजूला पायर्यांची व्यवस्था असल्याने ही जागा पर्यटकांना अडचणीची वाटे. त्यामुळे तेथे फारशी वर्दळ नसे. १९३६ सालच्या हिवाळ्यात तेथे प्रायोगिक तत्त्वावर एक आईस स्केटिंग रिंक बनविण्यात आली. ही नवी कल्पना इतकी लोकप्रिय झाली की ती सेंटरचे सौंदर्य आणि उत्पन्न वाढवणारे स्थायी आकर्षण बनली.
कॉमकास्ट बिल्डिंगसमोरून दिसणार्या स्केटिंग रिंकसभोवतालच्या अमेरिकन ध्वजांच्या रांगा
उन्हाळ्यातले स्केटिंग रिंकच्या जागेवरचे "समर गार्डन अँड बार" रेस्तराँ
हिवाळ्यातली आईस स्केटिंग रिंक (जालावरून साभार)
या सखोल भागाच्या एका बाजूला, अग्नी घेऊन उडत येणार्या प्रोमेथेउसचे सोनेरी रंगाचे पितळी शिल्प आपले लक्ष वेधून घेते. त्याच्या पार्श्वभागी कारंज्याची सजावट आहे. प्रोमेथेउस नावाच्या देवाने मानवाची निर्मिती केली आणि त्याच्याकरिता ऑलिंपस पर्वतावरून अग्नी चोरून आणला अशी कथा ग्रीक पुराणात आहे.
प्रोमेथेउसचे सोनेरी रंगाचे पितळी शिल्प
ख्रिसमसनिमित्त उभारलेल्या जाण्यार्या भव्य झाडासाठी हे प्रोमेथेउसचे शिल्प आधार म्हणून वापरले जाते. ते झाड आणि स्केटिंग रिंकच्या आजूबाजूला केलेली ख्रिसमसनिमित्त केलेली सजावट व रोषणाई पाहण्यासाठी दरवर्षी येथे मोठी गर्दी होते...
रॉकंफेलर सेंटरमधील ख्रिसमस ०१ : दिव्यांची रोषणाई (जालावरून साभार)
रॉकंफेलर सेंटरमधील ख्रिसमस ०२ : सजावट (जालावरून साभार)
रॉकंफेलर प्लाझा, प्रोमोनेड, कारंजी व चॅनेल गार्डन्स
तीन इमारतींच्या दोन रांगामधील जागेमध्ये रॉकंफेलर पादचारी प्लाझा आहे. तेथे फुलझाडांच्या सुंदर मांडणीमध्ये पर्यटकांना बसायची व्यवस्था केलेली आहे...
रॉकंफेलर प्लाझा
स्केटिंग रिंकच्या पुढे 'फ्रेंच बिल्डिंग' व 'ब्रिटिश एम्पायर बिल्डिंग' या दोन इमारतींच्यामध्ये असलेली २०० फूट लांब आणि ६० फूट रुंद जागा कारंजी, शिल्पे आणि बगिच्यांनी सुशोभित केली आहे. सेंटरच्या परिसरात भटकताना खिनभर बसून त्या सौंदर्याचा आस्वाद घेत पर्यटक श्रमपरिहार करताना दिसतात...
प्रोमोनेड, कारंजी व चॅनेल गार्डन्स
ली लॉरीचे 'अॅटलास' शिल्प
इंटरनॅशनल बिल्डिंगचा आकार इंग्लिश अक्षर 'C' सारखा आहे. त्या 'C' च्या पाचव्या अव्हेन्यूकडील चौकोनी खोबणीत ली लॉरीने बनवलेले 'अॅटलास' शिल्प आहे. हे या सेंटरमधील सर्वात मोठे शिल्प आहे. १५ फूट उंचीचे, १४००० पाउंड वजनाचे व ९ फूट उंच पायथ्यावर उभे असलेले हे प्रभावी शिल्प अॅटलासच्या ताकदीची पुरेपूर कल्पना करून देते...
ली लॉरीचे 'अॅटलास' शिल्प
सेंटरमधील इतर कलाकृती
वरच्या वर्णन केल्याशिवाय इतरही अनेक कलाकृती या सेंटरच्या परिसरात फिरताना दिसतात. त्यापैकी काहींची छायाचित्रे...
सेंटरच्या परिसरातील इतर कलाकृतींपैकी काही
रेडिओ सिटी म्युझिक हॉल
रेडिओ सिटी म्युझिक हॉल हे अमेरिकेतील सर्वात मोठे व प्रसिद्ध थिएटर आहे. त्याअंतर्गत पूर्ण वेळ काम करणार्या सिंफनी ऑर्केस्ट्रा, ग्ली क्लब आणि बॅले कंपनी या संस्था आहेत. या संस्थांनी १९२९ ते १९३९ च्या आर्थिक महामंदीच्या काळात आणि नंतरही हजारो कलाकारांना आश्रय दिला आहे. त्यानंतर काळानुसार बदलत म्युझिक हॉलला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी चलतचित्रपट प्रदर्शित करणे भाग पडले. हल्ली तेथे लाइव्ह कंन्सर्ट्स, वार्षिक बक्षीस समारंभ आणि इतर कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात.
रेडिओ सिटी म्युझिक हॉलच्या दर्शनी भागावरची नृत्य, नाट्य आणि संगीत दर्शविणारी चिन्हे
रेडिओ सिटी म्युझिक हॉल इमारत
रेडिओ सिटी म्युझिक हॉलचा अंतर्भाग (जालावरून साभार)
'द रॉक' वरचे आरोहण
'कॉमकास्ट बिल्डिंग' किंवा '३० रॉकंफेलर सेंटर' ही इमारत अजून एका महत्त्वाच्या कारणामुळे या संकुलाचा मध्यबिंदू समजली जाते. या २६६ मीटर व ७० मजली उंच इमारतीच्या ६७, ६९ व ७० व्या मजल्यावर निरीक्षण डेक आहे. ७० व्या मजल्यावरील डेकवरून चारी बाजूच्या न्यू यॉर्क शहराच्या परिसराचे निरीक्षण करता येते.
कॉमकास्ट बिल्डिंगच्या तळमजल्यावरील 'टॉप ऑफ द रॉक" स्वागतकक्षातल्या तिकिटघराकडे जाताना लागणार्या लॉबीच्या भिंतींवर अनेक चित्रे आहेत. त्यात ९९ चौ मी (१०७१ चौ फूट) आकाराचे "Man at the Crossroads" नावाचे भित्तिचित्र दिएगो रिवेरा नावाच्या समाजवादी कलाकाराने काढले होते. मूळ रेखाटनांमध्ये नसलेले 'मॉस्कोमधील मे दिवस' आणि 'लेनिनची छबी' या दोन तपशिलांचा रिवेराने चित्रात समावेश केल्याने ते अर्थातच वादग्रस्त ठरले. त्या तपशिलांना बदलून निनावी इसमांचे चेहरे रंगवायचे आदेश रिवेराला दिले गेले. त्याने ते धुडकावून लावले त्यामुळे त्याला कामावरून बरखास्त केले गेले. त्याच्या चित्रात बदल करून ते वाचवायचे प्रयत्न असफल झाल्यामुळे, ते नष्ट करण्यात आले. नंतर त्या जागी जोसेफ मारिया सर्ट या कलाकाराकरवी "American Progress" नावचे चित्र काढून घेण्यात आले. या चित्रात आधुनिक अमेरिकेच्या विकासाचे चित्रीकरण आहे. याशिवाय, त्या चित्रात अब्राहम लिंकन, महात्मा गांधी आणि राल्फ वाल्डो इमर्सन यांचे चेहरे आहेत...
'अमेरिकन प्रोग्रेस' भित्तिचित्र ०१
'अमेरिकन प्रोग्रेस' भित्तिचित्र ०२
तिकिटघराच्या दालनाच्या छताखाली शेकडो लोलक वापरून बनवलेली आकर्षक रचना आणि दोन मजली उंचीचे झुंबर आहे...
तिकिटघरातली लोलकांची आकर्षक रचना आणि दोन मजली उंचीचे झुंबर
'द रॉक' च्या निरीक्षण मजल्यांवर नेणार्या स्काय शटल नावाच्या उद्वाहकात शिरण्याअगोदर रॉकंफेलर सेंटरच्या बांधकामाच्या इतिहासाचा एक छोटासा चलतचित्रपट दाखवला जातो...
रॉकंफेलर सेंटर बांधताना जेवणाच्या वेळेत घेतलेले कामगारांचे हे प्रकाशचित्र खूपच गाजले आहे (जालावरून साभार)
त्यानंतर अतिजलद स्काय शटल आपल्याला एक मिनिटापेक्षा कमी वेळात ६७ व्या मजल्यावर घेऊन जातो. ६७ आणि ६९ मजल्यावरून बंद इमारतीच्या खिडक्यांतून आपल्याला परिसर पाहता येतो. ७० व्या उघड्या मजल्यावरून चारी बाजूचा नजारा मोकळेपणे पाहता येतो. ही इमारत मध्य मॅनहॅटनच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे तिच्या उत्तरेकडे असलेला सेंट्रल पार्क आणि दक्षिणेकडील गगनचुंबी इमारतींसह चारी बाजूंचे विहंगमावलोकन करण्यासाठी तिचे स्थान मोक्याचे आहे.
टॉप ऑफ द रॉकवरून काढलेली काही प्रकाशचित्रे...
उत्तरेकडे गगनचुंबी इमारतींच्या पार्श्वभूमीवर दिसणारा सेंट्रल पार्क
दक्षिणेकडे काँक्रिटच्या घनदाट गगनचुंबी जंगलातही मान उंचावून ताठ उभी
असलेली टोकदार एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि तिच्या पलीकडे उजवीकडे दूरवर
दिसणारे 'वन वर्ल्ड ट्रेड सेंटर'
८६ व्या धक्क्यावर असलेले इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय
मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारती, त्यांच्या पलीकडे इस्ट नदी आणि तिच्या पलीकडील ब्रूकलीन
रॉकंफेलर सेंटरजवळच्या गगनचुंबी इमारतींच्या गोतावळ्याचे विहंगमावलोकन
७० व्या मजल्यावरून ६८ व्या मजल्यावरील गॅलरीचे आणि इमारतीच्या आजूबाजूचे होणारे दर्शन
हडसन नदीचे मुख आणि त्यातली एलिस व लिबर्टी बेटे
काही वैशिष्ट्यपूर्ण इमारती : ०१ : १. "४३२, पार्क अॅव्हन्यू" ही जगातली
सर्वात उंच रहिवासी इमारत ; २. सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल; ३. मेटलाईफ या
विमाकंपनीची इमारत व तिच्या पलीकडील टोकदार घुमट असलेली क्रायस्लर बिल्डिंग
इतर काही वैशिष्ट्यपूर्ण इमारती : ०२
निरीक्षण डेकच्या मजल्यांवरून ३६० अंशातले सर्व दृश्य पुरेपूर पाहून नजरेचे आणि कॅमेर्याचे पोट भरल्यावर 'द रॉक' वरचे आरोहण संपवून आम्ही खाली उतरलो आणि पोटोबा करायला रेस्तराँ शोधू लागलो.
(क्रमशः )
रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर
रॉबिन्सव्हिले टाउनशिप याचे पुर्वीचे नाव वॉशिंग्टन टाउनशिप असे होते. न्यू जर्सी मध्ये अश्या अजुन ५ गावांची नावे वॉशिंग्टन टाउनशिप असल्यामुळे २०११ साली रॉबिन्सव्हिले टाउनशिप असे केले.
न्यू जर्सी राज्यातल्या रॉबिन्सव्हिल या गावी १० ऑगस्ट २०१० साली एका मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन झाल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. त्या मंदिराची रसभरीत वर्णने आणि आकर्षक प्रकाशचित्रे पाहून त्याला भेट देण्याचे मनात होतेच. न्यू यॉर्कला जरा स्थिरस्थावर झाल्यावर मंदिरापर्यंत कसे जाता येईल यासंबंधी जालावर माहिती काढणे सुरू केले. अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असतात. मात्र, शहरापासून जरा दूर गेले की त्यांची बोंबाबोंब असते. शहराबाहेरच्या प्रवासासाठी एकतर स्वत:ची किंवा भाड्याची (रेंटल) चारचाकी असल्याशिवाय काय खरे नाही. हे धक्कादायक सत्य समोर आले की, कितीही धक्के खात का होईना पण कानाकोपर्यापर्यंत परवडणार्या दरात घेऊन जाणार्या आपल्या एसटी, वडाप, इत्यादी आणि एखाद्या फोनने घरी हजर होणार्या खाजगी चारचाक्यांच्या सेवांचे महत्त्व पटते !
मंदिराच्या जास्तीत जास्त जवळ असलेल्या 'नॉर्थ-इस्ट रिजनल रेल्वे'च्या
स्टेशनपर्यंत जाणे सहज शक्य होते. मात्र, तेथून पुढे आडजागी असलेल्या या
मंदिरापर्यंत नेऊन परत आणणार्या खाजगी गाडीची व्यवस्था कशी करायची याचा
शोध कठीण झाला होता. तो शोध चालू असतानाच एडिसन, न्यू जर्सीस्थित मिपाकर
राघवेंद्र यांचा फोन आला. त्यांनी एडिसन स्टेशनपासून पुढे मंदिराचे दर्शन
करवून परत रेल्वे स्टेशनापर्यंत सोडण्याची तयारी दाखवली. एडिसन नॉर्थ-इस्ट
रिजनल रेल्वेमार्गावर असल्याने सगळ्या समस्या पटकन सुटल्या. केवळ काही दिवस
आधी झालेल्या न्यू जर्सीच्या कट्ट्यात प्रथम ओळख झालेली असताना राघवेंद्र
यांनी स्वतःहून दाखवलेल्या या औदार्यामुळे आमची रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण
अक्षरधाम मंदिर पाहण्याची इच्छा सहज साधून गेली. याबद्दल त्यांचे आभार
मानावे तेवढे थोडेच !
स्वामिनारायण पंथ
(या पंथाबद्दल बहुतेक लोकांना फारशी माहिती नसते (मलाही नव्हती), त्यामुळे मी जालोत्खनन करून बाहेर काढलेली ही अल्प ओळख.)
अवतारी पुरुष समजले जाणारे स्वामिनारायण उर्फ सहजानंद स्वामी (३ एप्रिल
१७८१ ते १ जून १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामिनारायण पंथाचे संस्थापक समजले
जातात. उत्तर प्रदेशातील अयोध्येजवळील छापैया नावाच्या गावात त्यांचा जन्म
झाला. सात वर्षाचे होईपर्यंत त्यांनी वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण आणि
महाभारतासह अनेक प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता असे म्हणतात.
आईवडीलांच्या मृत्यूनंतर, वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी, 'नीलकांत वर्णी'
हे नाव घेऊन, त्यांनी भारतभर तीर्थयात्राभ्रमण सुरू केले. या भ्रमणात अनेक
लोकोपयोगी कामे करत करत ते सन १७९९ मध्ये गुजरातमध्ये पोचले व तेथेच
स्थिरावले. तेथे १८०० मध्ये स्वामी रामानंद यांनी त्यांना उद्धव
संप्रदायाची दीक्षा देऊन 'सहजानंद स्वामी' असे नाव दिले. स्वामी रामानंद
यांनी, आपल्या मृत्यूपूर्वी, सन १८०२ मध्ये, त्यांना उद्धव संप्रदायाचे
प्रमुख स्वामी बनवले. सहजानंद स्वामींनी एक मेळावा घेऊन लोकांना
'स्वामीनारायण मंत्र' शिकवला. तेव्हापासून त्यांना स्वामिनारायण या नावाने
संबोधले जाऊ लागले आणि उद्धव संप्रदायाला स्वामिनारायण संप्रदाय हे नाव
पडले. स्वामिनारायण यांच्या शिष्यांत केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम व पारशी
लोकांचाही समावेश आहे. स्वामीनारायण त्यांच्या धार्मिक कामांबरोबरच महिला व
दलितांच्या उत्थापनासाठी केलेल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.
हे मंदिर "बोचासंवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेने (Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha)" बांधले आहे व त्याचे पूर्ण नाव "BAPS श्री स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर" असे आहे. याच्या बांधकामाला २०१० मध्ये सुरुवात झाली आणि १० ऑगस्ट २०१४ रोजी ते लोकांसाठी खुले झाले. मंदिराचा मुख्य भाग बांधून झाला असला तरी त्याच्या विशाल परिसराचा विकास करणे अजून चालू आहे. या परिसरात स्वामिनारायण अक्षरधाम महामंदीर नावाचे आध्यात्मिक-सांस्कृतिक केंद्र, निवासाची सोय असलेले अभ्यागत केंद्र आणि भारतीय इतिहास व संस्कृतीसंबंधी स्थायी प्रदर्शन असेल. ही सर्व कामे संपायला अजून काही वर्षे लागतील असा अंदाज आहे.
या संकुलातील मुख्य मंदिराच्या इमारतीचे क्षेत्रफळ सुमारे १२,००० चौ फूट (१३३ X ८७ फूट) व उंची ४२ फूट आहे. संपूर्ण इमारत ६८,००० घनफूट इटॅलियन करारा (Italian Carrara) संगमरवराच्या एकूण १३,४९९ तुकड्यांचा वापर करून बांधलेली आहे. मंदिराच्या सर्व पृष्ठभागावर सुंदर कोरीवकाम आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनावर आणि संदेशांवर आधारीत कोरीवकामे आहेत आणि मंदिराच्या ९८ खांबांवर भगवान स्वामीनारायण यांचे शिष्य असलेल्या परमहंसांच्या (spiritual aspirants) जीवनावर आधारीत कोरीवकामे आहेत.
या मंदिरासाठी आवश्यक असणारे कोरीवकाम करण्याचे कसब असलेले कारागीर अमेरिकेत मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे संगमरवराचे तुकडे युरोपातून प्रथम बोटीने भारताच्या किनार्यापर्यंत आणि तेथून पुढे ट्रकने राजस्तानमध्ये नेले गेले. तेथे कसबी कारागिरांच्या हाताने त्यांच्यावर कोरीवकामाचे संस्कार केले गेले. राजस्तानातल्या कार्यशालेत त्यांची अमेरिकेतील मंदिरात जशी हवी आहे तशी रचना करून खात्री झाल्यावर स्थापत्यकारांनी बनवलेल्या प्रणालीअंतर्गत त्यांना क्रमांक दिले गेले. कोरीव तुकडे परत वेगळे करून खास वेष्टनांतून बोटीने अमेरिकेला आणले गेले आणि त्यांना दिलेले क्रमांक वापरून मंदिराची रचना केली गेली. अश्या रितीने संगमरवराच्या प्रत्येक तुकड्याने मंदिराच्या बांधणीत उपयोग होईपर्यंत ३४,६०० किमी (२१,५०० मैल) प्रवास केला होता !
इटॅलिअयन संगमरवराशिवाय या मंदिराच्या बांधकामात भारतीय गुलाबी दगड आणि तुर्कस्तानचा चुनखडीचा दगड यांचाही वापर केलेला आहे. मंदिराचे बांधकाम वेद आणि इतर प्राचीन ग्रंथांचा आधार घेऊन शिकारबद्ध शैलीत केलेले आहे. संगमरवरावर हवामानाचा परिणाम न होता त्याचे सुंदर रूप खूप काळ तसेच राहावे यासाठी मंदिराला सर्व बाजूंनी वेढणारा ५५ फूट उंचीचा स्थायी मंडप बनवलेला आहे. या मंदिराच्या बांधणीत कारागीर व स्वयंसेवक मिळून एकंदर ४७ लाख व्यक्ती-तास खर्च झाले आहेत. केवळ मंदिर बांधणीचेच नव्हे तर इथली रोजची कामेही प्रामुख्याने स्वयंसेवकातर्फे केली जातात.
मंदिराचा परिसर हिरवागार, आखीवरेखीव आणि उत्तम निगा राखलेला होता. मंदिराशेजारी असलेल्या एका मानवनिर्मित तलावामुळे त्याला अधिकच शोभा आली होती...
चारचाकी थांब्यातून दिसणारा मंदिराचा मंडप आणि त्याच्या शेजारचा तलाव
मंडपाच्या एका बाजूने त्याच्या दर्शनी भागाकडे नेणारा संगमरवरी कोरीवकामाने सजलेला पडवीवजा मार्ग आहे. त्यावरची कलाकुसर आपल्याला मंदिराच्या सौंदर्याची चुणूक दाखवते...
मंडपाच्या एका भिंतीला लागून असलेला संगमरवरी कोरीवकामाने सजलेला पडवीवजा मार्ग
पडवीवजा मार्गाचा संगमरवरी कोरीवकामाने सजलेला अंतर्भाग व मंडपाची बाहेरून दिसणारी विरुद्ध बाजूची भिंत
हा मार्ग संपल्यावर डावीकडे वळून आपण मोरांच्या २३६ शिल्पांनी सजवलेल्या मंडपाच्या मयूरद्वारासमोर येतो. मोरांशिवाय या द्वारात हत्ती, परमहंस आणि भक्तमंडळींची शिल्पेही आहेत...
मयूरद्वार
मयूरद्वाराचे जवळून दर्शन : मध्यभाग आणि एक बाजू
मयूरद्वाराचे जवळून दर्शन : मध्यभागाचे शिखर
मयूरद्वाराचे जवळून दर्शन : एक शिल्प व त्याच्या सभोवतालचे कोरीवकाम
मयूरद्वारातून आत गेल्यावर मंडपाने पूर्णपणे आच्छादलेले मुख्य मंदिर समोर येते...
मयूरद्वारातून दिसणारे मंडपाच्या छ्ताखाली सुरक्षित असलेले मुख्य मंदिर
मंडपाच्या छताचा आणि भिंतीचा अंतर्भाग सुंदर कोरीवकामाने भरलेला आहे...
मंडपाच्या छतावरील नक्षी
मंडपाच्या भिंतींच्या अंतर्भागावरील नक्षी
जसजसे आपण मंदिराच्या जवळ जातो तेव्हा त्यावरचे सुंदर कोरीवकाम अधिकाधिक स्पष्ट होत जाते...
मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०१
मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०२ : मध्यभागावरची कलाकुसर जवळून
मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०३ : मध्यभागाचे एका बाजूने दर्शन व उजव्या बाजूच्या कलाकुसरीचे जवळून दर्शन
मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०४ : मध्यभागावरील शिखराचे एका बाजूने दर्शन
मुख्य मंदिराचा बहिर्भाग व तेथे चालू असलेले काम
या मंदिराच्या भिंती व छताच्या पृष्ठभागांचा प्रत्येक चौरस सेंटीमीटर कसबी कोरीवकामाने सजवलेला आहे. तसेच मंदिरात अनेक हिंदू देवदेवता व स्वामिनारायण पंथाच्या प्रमुख स्वामींच्या अनेक मनोहारी मूर्ती आहेत. मूर्तींना अनेक आकर्षक रंगीत वस्त्राभूषणांनी सजवलेले आहे. मंदिराच्या आत छायाचित्रे काढायला बंदी आहे. त्यामुळे, मंदिराच्या सौंदर्याची कल्पना येण्यासाठी मंदिराच्या संस्थळावरून व जालावरून साभार घेतलेली काही चित्रे खाली देत आहे...
स्वामिनारायण पंथाच्या प्रमुखांच्या व हिंदू देवदेवतांच्या मूर्ती
भगवान स्वामीनारायण व अक्षरब्रम्ह गुणातितानंद स्वामी; आणि श्री घनश्याम महाराज
श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधा-कृष्ण देव
श्री सीता-राम देव, श्री हनुमानजी व श्री लक्षमणजी
श्री शिवपार्वती देव, श्री गणेशजी व श्री कार्तिकेयजी
मंदिराचा अंतर्भाग
मंदिराचा अंतर्भाग
मंदिराच्या छतावरची नक्षी
मंदिराच्या छतावरची नक्षी
मंदिरातील नक्षीदार कमानी
मंदिराच्या नक्षीदार कमानी
मंदिराच्या भिंतींवरची नक्षी
मंदिराच्या भिंतींवरची नक्षी ०१
मंदिराच्या भिंतींवरची नक्षी ०२
==============================================================================
अक्षरधाम मंदिराची (यू ट्यूबवरून साभार) चित्रफीत...
==============================================================================
मंदिराशेजारच्या मिठाईच्या दुकानात खास भारतीय मिठाया व चटपटीत पदार्थ होते. अर्थातच, जीभेच्या आग्रहास्तव त्यांची खरेदी झालीच. परतीच्या वाटेत राघवेंद्र यांच्या घराला भेट व त्यांचा पाहुणचार झाला. रेल्वेच्या थांब्याजवळ पटेल ब्रदर्स यांचे दुकान दिसले. तेथे राघवेंद्र यांचा साभार निरोप घेतला आणि दुकानात घुसलो...
पटेल ब्रदर्स, एडिसन, न्यू जर्सी
रेल्वे थांब्यावर आमच्या गाडीची वाट पाहत असताना नॉर्थ-इस्ट करिडॉरवरून वेगाने प्रवास करणारी "असेला एक्सप्रेस" जोमाने धडधडत गेली...
असेला एक्सप्रेस
अमेरिकेतले नावाजलेले हिंदू मंदिर आणि एक अप्रतिम कलाकृती पाहिल्याचे समाधान मनात घेऊन आम्ही आमची गाडी पकडली आणि घराच्या दिशेने निघालो.
(क्रमशः )
लंडनंचं स्वामीनाथ मंदिर सुद्धा सुंदर आणि स्वच्छ आहे. दरवर्षी दिवाळीत आणि निवडणूकांच्या आधी आजी पंतप्रधान / उमेदवार / राजपरिवारातील सदस्य वगैरे तिथे जाउन येतात.
इकडचा त्यांचा स्टाफ मॉरल पॉलिसिंगचा अतिरेक करतो, त्यामुळे मंदिर अतिशय आवडतं असलं तरी एकेदिवशी मी ऑलमोस्ट पोलिसांत तक्रार करावी का या विचारापर्यंत आले होते.
इकडे बायका पुरूषांच्या वेगळ्या रांगा असतात देवळात जायला, न्युयॉर्क मधेही असच आहे का? मुख्य स्वामी मंदिरात असतील तर बायकांना देवळात ( जिथे मूर्ती आहेत तिथे ) प्रवेशच देत नाहीत, कारण स्वामींच सोवळं. मला आलेले काही अनुभव -
मंदिराच्या वेबसाइट्वर कुठेही ड्रेसकोड सांगितलेला नाही, एका दिवाळीत स्लीव्हलेस पंजाबी ड्रेस घालून गेल्यामुळे एका १६-१७ वर्षाच्या स्वयंसेवकानं मला भारतीय संस्कृती आणि माझी नालायकी याबद्दल रांगेत उभ्या असणार्या निदान १०० लोकांसमोर मोठ्ठं भाषण दिलं आहे :), आणि घरी जाउन कपडे बदलून या असही सांगितलं आहे. मी तिथे खूप भांडले पण एकही बाई माझ्याबाजूनं बोलली नाही,जेंव्हा मी पोलिसांत तक्रार करायची धमकी दिली तेंव्हा त्यांच्या वरिष्ठानं मध्यस्ती करून मला ओढणीनं माझे दंड झाकून यायची परवानगी !!! दिली. हे सगळे सो कॉल्ड स्वयंसेवक लंडन मधेच जन्मलेले आहेत.
ब्रिटन मधे नळाल येणारं पाणी हे पिण्याचं पाणी असतं ( पिण्यायोग्य ), त्यामुळे कोणत्याही रेस्टॉरंटमधे जर गिर्हाइकानं 'टॅप वॉटर' मागितलं तर ते विनामूल्य देणं बंधनकारक आहे. पण मंदिराच्या आवारातील गुजराथी कँटिन मधे जवळ्जवळ २५पौंडांची खाद्यपदार्थांची खरेदी केल्यानंतरही त्यांनी पाणी विकतच घ्यायची सक्ती केली, कायद्या बद्दल सांगितल्यावर 'जिथे तक्रार करायची आहे तिथे करा, आंम्हाला कुणीही काहीही करू शकत नाही' या भाषेत उत्तर मिळालं, मॅनेजरकडे तक्रार केल्यावर त्या बाईनेही हेच सौम्य शब्दात सांगितलं. अत्यंत उद्ध्ट लोकं आहेत.
एक दक्षिण भारतीय जोडपं हातात हात घालून राधा-कृष्णाचं भिंतीवर रंगवलेलं चित्र पहाण्यात दंग असताना एक स्वयंसेवक येउन त्यांना माझ्यासमोर असंच भारतीय संस्कृतीचं भाषण अतिशय उद्धट्पणे देउन गेला, ते दोघं बिचारे मान खाली घालून निघून गेले.
मी खूप दर्गे, चर्च, गुरूद्वारं बघीतलेले आहेत पण इतकी उद्धट माणसं कुठेही पाहिलेली नाहीत;
एक भटकंती प्रिय आणि स्थापत्य शास्त्रात रस असणारी व्यक्ती आणि हिंदू
म्हणून या वास्तू बद्दल / त्यांचं निर्मात्यांबद्दल कौतुक मला साहजिक वाटते
परंतु २ कटू अनुभव आणि काहि विचार मांडावासा वाटतो ...यात लेखकवर टीका
करण्याचा कोणताही हेतू नाही , त्यन्नि भत्कन्ति मह्नुन चन्गल लेख लिहिला
आहे .
एक खुंलासा ,एक सर्वसामान्य हिंदू म्हणून हे प्रश्न मनात येतात , मी
हिंदुधर्मातील कोणत्याही पंथाला वाहिलेला नाहीये किंबहुना फारसा धार्मिक हि
नाही ,
- विचार १: हा पंथ स्वतःला हिंदू म्हणवतो कि नाही? कारण माझ्यासारख्याला
हे सर्व म्हणजे "हिंदू धर्माचा वापर करून आपला स्वतः सुभा निर्माण
करण्यासारखे) वाटते.. हा पंथ काय किंवा इस्कॉन सारखे काय किंवा सर्व आधुनिक
"बाबा / गुरु बिसनेस "वाले काय सरळ स्पष्ट आम्ही हिंदू धर्माचाच प्रसार /
जपणूक करतो असे का म्हणत नाहीत? एक बापास पंथीयाला विचारले तर तो म्हणाला
.. आम्ही असा कधी विचार केला नाही! मग करा !
विचार २: पाश्चिमात्य जगात पाश्चिमात्य लोक या पंथानंच मूळ सर्वसाधार हिंदू
धर्म म्हणून ओळखू लागतील अशी मला काळजी वाटते ... उदाहरण: आता बऱ्याच
शहरात हिंदू अससोसिएशन असा सार्वजनिक संस्थांची मंदिरे आहेत त्यात कोणताही
पंथ नसतो .. व्यक्तिपूजा नसते... आणि मग हि असली मंदिरे असतात, भव्य ,
शिस्तबद्ध वैगरे पण येथे व्यक्तिपूजा आणि एकाच पंथाची बांधिलकी असते हे
फारसे योग्य चित्र वाटत नाही ...
- अनुभव १>
मी राहत असेलेली शहरात (भारताबाहेर ) त्यावेळी कोणते हि हिंदू मंदिर नव्हते
, त्यातल्या त्यात म्हणजे इस्कॉन चा एक गावाबाहेर आश्रम होता, कामाच्या
ठिकाणी एक पंजाब मधील माणूस ओळखीचा झाला आणि तो काही कारणाने चिंतेत होता
खचलेला होता , माझ्य लक्षात आले कि तो ज्या वडीलधाऱ्या पाश्चिमात्य
कुटुंबाचाच उल्लेख करीत होत ते अतिशय कट्टर ख्रिस्ती पंतह्चे ( सर्वसाधारण
रोमन कॅथलिक किंवा प्रोटेस्ट नव्हे तर अति कट्टर जेहोवा विटनेस वाले )
अनुयायी होते आणि ते हळू हळू त्याला धर्मांतर कार्याला लावतील कि काय अशी
मला शंका अली म्हणून त्याला एका मित्र म्हणून आणि या पासून वाचवण्यासाठी /
विरंगुळा मिळावा म्हणून विचारले कि रविवारी आपण इस् कॉन आश्रमात जाऊया का
छान आहे जागा आणि सर्वसाधारण मंदिरात जसे प्रसन्न वाटते तसे वाटेल...
त्यांनी दिलेल्या उत्तराने मला धक्का बसला : तो म्हणाला "हम नाही जायेंगे
क्यू कि हं स्वामी नारायण वाले है ? तो पर्यंत मला हा एक पंथ आहे हे हि
माहिती नव्हते... मी म्हणाले अरे स्वामी नारायण काय आणि दुसरं कय मंदिरात
तर जातोस ना मग चल तिथे हि राधा कृष्ण येथी हि काय फरक पडतो आपण हिंदू आहोत
ना शेवटी... पण तो काही बांधला नाही.. येवडः आंधळे पणा ! प्रथम राग आला
मला मग कीव वाटली...अनुभव २: एका तबलजी मित्राने स्थानिक स्वामी नारायण
मंदिरातील कार्यक्रमाला बोलावले.. सुदर कार्यक्रम / चोख व्यस्था वैगरे ...
चांगले वाटले, त्यावेळी मी स्थानिक महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष होतो
त्यामुळे स्वामीनारायण वाले माझ्या बरोबर जरा जास्त आपुलकीने वागत होत (
कारण सेल्फ प्रोमोशन) २ गोष्टी जबरदस्त खटकल्या: स्त्री ला पुढे येऊन काही
कार्याला परवानगी नव्हती ... भजन म्हण्य्याची इच्छा होती तिला नाही दिली
परवानगी... प्रथम वाटले कि ऐनवेळी विचारले असेल म्हणून नाही म्हणाले
असताही.. नंतर कळले कि "नाहीच" का हि स्त्रीला दुय्यम वागणूक? तसेच
सभागृहात कुटुंब म्हणून एकत्र नाही बसायचे अगदी नंतरच्या जेवण प्रसादाला
सुद्धा! का? दुसरे खटकले कि चिमुकल्यांचे संस्कार वर्ग पण मुलं/ मुली
वेगळे ... काय हा मागासलेपणा .. आपण हिंदू पुरोगामी ना.. अरे हो पण विसरलो
हे पंथीय स्वतःला कुठे हिंदू समजतात ! असो ... लोकांचं श्रद्धेला हात
घातल्या बद्दल क्षमस्व पण शांत पाने विचार करा हे असले कट्टर वाडी विचार
आपल्या धर्मात चांगले का?
अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी
मॅनहॅटनच्या अपर वेस्ट साइडमध्ये आणि सेंट्रल पार्कला लागून असलेल्या "अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी" ची गणना जगातल्या अतिविशाल संग्रहालयांमध्ये होते. शहरामधील चार ब्लॉक्सच्या १७ एकर (६९,००० चौ मी) क्षेत्रफळावर पसरलेल्या "थिओडोर पार्क"मध्ये ते आहे. सन १८७७ ला जनतेला खुले झाल्यानंतर, या संग्रहालयात नवनवीन संग्रह आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अधिकाधिक इमारतींची भर पडत आली आहे. या संग्रहालयातल्या एकमेकाला जोडलेल्या २८ इमारतींमध्ये ४५ स्थायी संग्रह दालने, एक तारांगण, एक ग्रंथालय आणि अनेक समयोचित/तात्पुरती संग्रह दालने आहेत. या संग्रहालयाच्या बांधणीत, वृद्धीत आणि जोपासनेत अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचा, नामवंत अमेरिकन व्यक्तींचा आणि धनाढ्यांचा हातभार लागला आहे. येथे प्राणी, वनस्पती, अश्मीभूत अवशेष, अश्म, खनिजे, उल्का, मानवी संस्कृतींचे अवशेष, इत्यादी गोष्टींचे एकूण ३.३ कोटींपेक्षा जास्त नमुने संग्रहित आहेत ! अर्थात,१९०,००० चौ मी (२० लाख चौ फूट) इतके मोठे क्षेत्रफळ असले तरी या महासंग्रहालयात त्यातले फक्त निवडक नमुनेच एका वेळेस बघण्यासाठी उपलब्ध करणे शक्य होते. या संग्रहालयाला दरवर्षी ५० लाखांवर पर्यटक भेट देतात.
संग्रह प्रयोगशाळा (Exhibitions Lab)
कार्ल एथन अॅकली याने सन १८६९ मध्ये जगात प्रथमच स्थापन झालेल्या "संग्रह प्रयोगशाळा" या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाने जमवलेल्या वस्तूंचा संग्रह तयार करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे यासाठी कामी येणार्या अनेक भौतिक शास्त्रांचा (प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इ) व कलांचा (चित्रकला, फोटोग्राफी, मल्टिमेडिया, इ) संगम घडवून त्यांना शास्त्रीय बैठक दिली. तो इतका यशस्वी ठरला की येथे केलेल्या प्रयोगांचे जगभर अनुकरण केले गेले आहे आणि उत्तम संग्रहालयासाठी "संग्रह प्रयोगशाळा" ही एक अत्यावश्यक व्यवस्था समजली जाऊ लागली. या सुधारणेमुळे, जगभरच्या संग्रहालयांना भेट देण्यार्या पर्यटकांचा अनुभव, अधिक रोचक, आनंददायी व ज्ञानवर्धक झाला आहे. सद्या इथल्या प्रयोगशाळेत ६० पेक्षा जास्त कलाकार, लेखक, संग्रह तयार करणारे कर्मचारी, डिझायनर आणि प्रोग्रॅमर काम करत आहेत. ते दर वर्षी २-३ खास प्रदर्शने/शो तयार करतात. त्यांचे अमेरिकेतील इतर संग्रहालयामध्येही प्रदर्शन केले जाते.
संशोधन ग्रंथालय, संशोधनकार्य आणि शैक्षणिक कार्य
संग्रहालयाच्या चवथ्या मजल्यावरचे संशोधन ग्रंथालय अभ्यागतांनाही उघडे असते. त्याच्या विशाल संग्रहात शेकडो विषयांवरील पुस्तके आहेत. संशोधक, संग्राहक, प्रवासी-शोधक, अमेरिकन एथ्नॉलॉजिकल सोसायटी, न्यू यॉर्क अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इत्यादींच्या उदार ग्रंथ/ग्रंथसंग्रहांच्या देणग्यांमुळे इथल्या माहितीसंसाधनांची (पुस्तके, चलतचित्रे, चित्रे, प्रकाशचित्रे, पत्रके, स्मृतिचिन्हे, इत्यादींची संख्या ५५०,००० ओलांडून पुढे गेली आहे. त्यात काही १५व्या शतकातील दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे.
येथे २२५ संशोधक पूर्णवेळ काम करतात. ते दर वर्षी जगभरातल्या विविध ठिकाणी १२० पेक्षा जास्त शास्त्रीय मोहिमा फत्ते करतात. याशिवाय हे संग्रहालय शिक्षणक्षेत्रातही काम करते. त्याच्या अधिकारातील महाविद्यालयात "मास्टर ऑफ आर्ट्स इन सायन्स टिचिंग" व "पीएचडी इन कंपॅरेटिव बायॉलॉजी" या मान्यताप्राप्त उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालविले जातात. त्यात भाग घेणार्या विद्यार्थ्यांना संग्रहालयात काम करणार्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन तर होतेच पण तिथल्या कोट्यवधी नमुन्यांच्या प्रत्यक्ष अभ्यासाचा अमूल्य फायदा सहजपणे मिळतो.
सामाजिक प्रसिद्धी साधनांमधिल हजेरी
या संग्रहालयाचा उल्लेख दहापेक्षा जास्त कादंबर्यांत आला आहे; याच्या वेगवेगळ्या सदनांचे सातपेक्षा जास्त चलतचित्रपटांमध्ये चित्रीकरण झालेले आहे आणि साधारण आठ टीव्ही मालिकांमध्ये त्यांच्या पार्श्वभूमीचा उपयोग केलेला आहे. इतकेच नव्हे तर या संग्रहालयाच्या पार्श्वभूमीचा 'Grand Theft Auto IV', 'Manhunter: New York' आणि 'Parasite Eve' या तीन व्हिडिओ गेम्समध्ये उपयोग केला गेला आहे.
तर अश्या नावाजलेल्या संग्रहालयाला भेट न देणे अशक्य होते. त्याच्यासाठी एक अख्खा दिवस राखून ठेवला होता. सकाळी न्याहारी आटपून निघालो.
वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारे
हे संग्रहालय मध्यवर्ती ठिकाणी व सेंट्रल पार्क वेस्ट अॅव्हन्यूला जोडलेल्या सबवेच्या थांब्याजवळच आहे. तरीही सबवेच्या गुहेमधून बाहेर आल्यावर थिओडोर पार्कच्या उंच्यापुर्या हिरव्या झाडीमध्ये झाकून गेल्यामुळे त्याची थोडीशी शोधाशोध करावी लागली. मात्र झाडी ओलांडून जरा पुढे आल्यावर त्याचे रोमनस्क शैलीतले भारदस्त प्रवेशद्वार दिसले. प्रवेशद्वारासमोर घोड्यावर आरूढ थिओडोर रुझवेल्टचा पुतळा आहे...
सेंट्रल पार्क वेस्ट अॅव्हन्यूवरचे संग्रहालयाचे रोमनस्क शैलीतले प्रवेशद्वार
या संग्रहालयाला ७७ स्ट्रीटवर पारंपरिक किल्ल्यासारखे दिसणारे अजून एक प्रवेशद्वार आहे. या बाजूच्या दर्शनी भागात 'ब्लॅक चेरी' लाकडापासून बनवलेल्या व काळजीपूर्वक जतन केलेल्या ६५० खिडक्या आहेत...
७७ स्ट्रीटवरचा किल्ल्यासारखा दिसणारा संग्रहालयाचा दर्शनी भाग आणि प्रवेशद्वार
सेंट्रल पार्क वेस्ट अॅव्हन्यूवरील प्रवेशद्वाराच्या पायर्या चढून आत शिरल्यावर एक रोमन बॅसिलिका शैलीत बांधलेला Theodore Roosevelt rotunda नावाचा प्रशस्त आणि उंचापुरा स्वागतकक्ष लागतो. तिथे मिळालेल्या माहितीवरून कळले की त्या दिवशी संग्रहालयात पाच विशेष कार्यक्रम/संग्रह प्रदर्शित केले जात आहेत. सगळे स्थायी संग्रह पाहण्यात रस होताच, पण तरीही कोणत्याही संग्रहालयांतले खास अस्थायी कार्यक्रम काहींना काही अधिक रोचक माहिती व अनुभव देऊन जातात. त्यामुळे त्यांना चुकवणे मला जमत नाही.
त्या वेळेस चालू असलेले खास कार्यक्रम/प्रदर्शने अशी होती :
१. हेडन तारांगणातला "डार्क युनिव्हर्स" शो
२. ल फ्राक थिएटरामधील "नॅशनल पार्क्स" शो
३. फुलपाखरे संवर्धनगृहातील (बटरफ्लाय काँझरवेटरी) मधील अनुभव
४. गॅलरी ३ मधील "सीक्रेट वर्ल्ड इनसाईड यू" प्रदर्शन
५. ल फ्राक फॅमिली गॅलरीतील "डायनॉसॉर्स अमाँग अस" प्रदर्शन
इथल्या सर्व खास कार्यक्रमांना वेळ ठरवून प्रवेश आहे हे माहितीपत्रकावरून दिसले. अनेक इमारतींच्या पाच मजल्यांवरच्या अनेक दालनांत असलेले स्थायी संग्रह व अस्थायी खास कार्यक्रम पाहण्यात बरीच तारांबळ होणार हे कळून चुकले होते ! त्यामुळे सगळे खास कार्यक्रम बघायला प्राधान्य द्यायचे व त्यांच्यामधल्या वेळेत, एकाकडून दुसर्या कार्यक्रमाकडे जाताना, वाटेत येणारे स्थायी संग्रह पाहायचे असा ढोबळ कार्यक्रम ठरवला. स्वागतकक्षात एटिएम सारख्या दिसणार्या तिकिटाच्या १०-१२ मशीन्सची रांग होती. त्यातले एक निवडले व त्याच्या स्क्रीनवर सर्व कार्यक्रमांची माहिती भरून, स्लॉटमध्ये कार्ड सरकवून, तिकिट छापण्याचे बटण दाबले. मशीनने $३५ मिळाल्याबद्दल आभार मानले पण ते बेटे तिकीट काही छापेना ! नशिबाने मशीनच्या स्क्रीनवर माझ्या बुकिंगचे व पैसे मिळाल्याबद्दलची सूचना कायम होती. शेजारीच एक माहिती पुरवणारी स्वागतिका होती, तिला साद घातली. तिनेही मशीनबरोबर जराशी खुडबूड करून पाहिली, पण त्याने तिलाही दाद दिली नाही. शेवटी तिने मला तेथून पन्नास एक मीटरवर असलेल्या मॅनेजरच्या डेस्ककडे जायला सांगितले. पण तो माझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवेल असे विचारल्यावर, तिने तोवर तिथेच उभी राहून किल्ला... आपले मशीन... लढवत राहण्याचे आश्वासन दिले. नाहीतर मध्येच कोणी ते मशीन वापरले तर स्क्रीनवरचा माझा सर्व पुरावा नाहीसा झाला असता.
मी मॅनेजरकडे गेलो तर तो त्याच्या डेस्कवर नव्हता. शेजारच्या डेस्कवरच्या तरुणीने तो थोड्याच वेळात येईल असे दोन-तीनदा सांगत माझी महत्त्वाची दहा मिनिटे खर्च केली. पहिल्या अस्थायी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तसा माझा पारा वर जात होता. जरा आक्रमक आवाजात मला इतका वेळ वाट पाहत ठेवल्याबद्दल तक्रार केली. मग मात्र तिने बाजूलाच, दोन डेस्क दूर, असलेल्या डेस्कवरच्या तरुणीशी गप्पा मारत असलेल्या तरुणाला (मॅनेजरला) हाक दिली. तो लगेच त्याच्या डेस्कवर आला. त्याला सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्याच्या चेहर्यावरील जरासे अविश्वासाचे भाव पाहून मी वापरलेल्या मशीनकडे पाहिले. तिथली स्वागतिका मशीनजवळ उभी राहून पर्यटकांशी बोलत होती. बहुदा तिने दिलेल्या शब्दाप्रमाणे ते मशीन इतर कोणाला वापरू दिले नसावे. मॅनेजरला तिला सगळे माहीत आहे हे सांगताना माझा हात तिच्या दिशेने गेला. कस्टमर सर्विसबद्दल जागृत असलेल्या तिचा एक डोळा आमच्याकडे होता. तिनेही "तो म्हणतोय ते बरोबर आहे" अश्या अर्थाने हात उंचावून हालवला. मॅनेजरची खात्री पटल्यावर मात्र त्याचा नूर एकदम मित्रत्वाचा झाला. त्याने स्वतःचा लॉगईन वापरून मी म्हटले तसे सर्व खास कार्यक्रमांसकटचे तिकीट देण्याचे कबूल केले. मग मात्र, "मी पहिल्यांदाच येथे आलो आहे. आता हे वेगवेगळ्या इमारतींच्या वेगवेगळ्या मजल्यांवर असलेले सगळे खास कार्यक्रम वेळेत जागेवर पोचून कसे पाहता येतील हे तूच ठरवून तश्या वेळा बुक कर." असे सांगून त्याच्या मैत्रिपूर्ण व्यवहाराचा पुरेपूर वापर करून घेतला ! त्यानेही सुस्मित चेहर्याने सर्व बुकिंग्ज करून मला कुठून कसे गेल्यास जास्त बरे हे पण समजवून सांगितले. ते विसरू नये यासाठी त्या कार्यक्रमांच्या वेळा आणि जागा माहितीपत्रकावरच्या त्याने नकाश्यावर लिहाव्या असे मी सुचवले आणि त्याने ते आनंदाने केले. त्याच्या या मदतीविना, ते सर्व कार्यक्रम आणि स्थायी संग्रह एका दिवसात पाहणे केवळ अशक्य झाले असते, हे संग्रहालयाच्या भुलभुलैयात वारंवार वाट चुकताना मला सतत जाणवत राहिले आणि मॅनेजरला अनेकदा धन्यवाद मिळत राहिले !
तर अश्या रितीने माझी एका अनपेक्षित समस्येतून सुटका तर झालीच पण वर मॅनेजरच्या अधिक सौजन्याचा फायदाही झाला. या संग्रहालयातील चक्रव्यूहाची आणि त्यातल्या खास कार्यक्रमांच्या जागांची रचना खालील नकाश्यात पाहिल्याशिवाय मी काय म्हणतो आहे हे नीट ध्यानात येणार नाही...
खास कार्यक्रमांच्या जागा व वेळांच्या नोंदींसह संग्रहालयाचा नकाशा
तर, अशी माहितीरूपी आयुधे सज्ज करून आम्ही चक्रव्यूहावर हल्ला करण्यास तयार झालो. सुरुवातीलाच भल्या मोठ्या आणि उंचच उंच दालनातल्या "अॅलोसॉरसपासून आपल्या बछड्याचे संरक्षण करणारी महाप्रचंड बॅरोसॉरस माता" असा प्रसंग रंगवणार्या तीन सापळ्यांच्या रचनेने स्वागत केले. हे प्रचंड आकाराचे सापळे आपल्याला संग्रहालयाच्या भव्यतेची आणि त्यातील संग्रहांच्या ताकदीची पुरेपूर जाणीव देतात. त्या भव्य दालनाच्या भिंतींवरील चित्तवेधक चित्रेही आपले लक्ष वेधून घेतात...
अॅलोसॉरसपासून आपल्या बछड्याचे संरक्षण करणारी महाप्रचंड बॅरोसॉरस माता (सांगाडे) ०१
अॅलोसॉरसपासून आपल्या बछड्याचे संरक्षण करणारी महाप्रचंड बॅरोसॉरस माता (सांगाडे) ०२
सरळ क्रमाने संग्रहालय पाहिले तरी एक-दीड किलोमीटर चालणे सहजपणे होते. खास कार्यक्रमांच्या वेळा साधणे महत्त्वाचे असल्यामुळे मला हे संग्रहालय एक बाजू पकडून क्रमाक्रमाने बघणे शक्य झाले नाही. उलट्या सुलट्या फेर्या घालत का होईना पण प्रत्येक दालनाला हजेरी लावण्याचा माझा मनसुबा मी पुरा केलाच. मात्र, त्यासाठी दिवसभरांत डझन-दीड डझन वेळा तरी जिन्यांवरून वरखाली करावे लागले आणि एकदोन किलोमीटर तरी जास्त चालावे लागले. एकाच भेटीत सगळे आटपायचे म्हणजे हा आटापिटा करणे जरूर होते.
टीप : या संग्रहालयातली बहुतेक दालने (बहुतेक, संग्रहित
प्राण्याची प्रतिकृतीमधली कातडी प्रखर प्रकाशाच्या परिणामाने खराब होऊ नये
यासाठी) बर्यापैकी अंधारी आहेत. योग्य प्रकाशाच्या अभावात काढल्यामुळे
आलेल्या फोटोंच्या प्रतीमधील कमतरतेसाठी क्षमस्व.
आफ्रिकन सस्तन प्राण्यांचा अॅकली हॉल (Akeley Hall of African Mammals)
वर उल्लेख आलेला कार्ल एथन अॅकली (१९ मे १८६४ ते १८ नोव्हेंबर १९२६) हा जगप्रसिद्ध अमेरिकन जीवशास्त्रज्ञ, शिल्पकार, संवर्धनतज्ज्ञ, संशोधक, निसर्गप्रकाशचित्रणकार आणि टॅक्सिडर्मिस्ट (मृत प्राण्यांची कातडी व इतर अवशेष वापरून त्याच्या मूळ रूपाची प्रतिकृती तयार करण्याची कला) होता. त्याला "फादर ऑफ मॉडर्न टॅक्सिडर्मी" समजले जाते. त्याच्या अनेकविध प्रतिभांची अनेक प्रसिद्ध अमेरिकन संग्रहालयांना मदत मिळाली आहे. त्यातही विशेषतः, फील्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी आणि अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी (AMNH) यांना त्याचे खास योगदान मिळालेले आहे. त्याने AMNH मध्ये संग्रहालय प्रयोगशाळा (AMNH Exhibitions Lab) स्थापन करून संग्रहालयाच्या स्थापनेत जरूर असणार्या अनेक शास्त्रांचा संगम करवून त्यांच्यामध्ये परस्पर पूरक संयुक्त संशोधन करण्याची परंपरा सुरू केली. संग्रहालय प्रयोगशाळांमुळे, आज जगप्रसिद्ध समजल्या जाणार्या अनेक संग्रहालयांची प्रत आणि उपयुक्तता वाढवली आहे.
या त्याच्या योगदानाच्या सन्मानार्थ AMNH मधल्या या एका मोठ्या विभागाला त्याचे नाव दिले गेले आहे. Theodore Roosevelt rotunda ला लागून असलेल्या या विभागाच्या दोन मजल्यांवर आफ्रिकेतील सस्तन प्राण्यांच्या व त्यांच्या पर्यावरणाच्या वैविध्याचे बारकावे प्रदर्शित करणारे २८ संग्रह (dioramas) आहेत.
सर्वात मध्यभागी, हल्ल्यापासून संरक्षण करणार्या रचनेच्या स्वरूपात ('alarmed' formation) आठ आफ्रिकन हत्तींचा कळप उभा आहे. ही भव्य रचना फोटोच्या एका चौकटीमध्ये बसवणे कठीण आहे. आजूबाजूला फेरी मारून बघताना हे हत्ती आपल्यावर चालून येतील की काय असे वाटावे इतक्या उत्तम रितीने त्यांची पुनर्रचना केली आहे...
अॅकली हॉलच्या वरच्या मजल्याच्या गॅलरीतून दिसणारी आफ्रिकन हत्तींची रचना
हा विभाग ८० वर्षांपूर्वी प्रथम निर्माण केला गेला. त्या वेळेस अफ्रिकन जंगलात सर्वसामान्य असलेल्या प्राण्यांच्या अनेक प्रजाती अनिर्बध जंगलतोडीमुळे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही, आनंदाची गोष्ट अशी की, कार्ल अॅकलीने तेथे सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांमुळे (उदा : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील विरुंगा नॅशनल पार्क) त्यातली एकही प्रजाती अजून पूर्णपणे नष्ट झालेली नाही.
या संग्रहांचे वैशिष्ट्य असे की दर प्राण्याबरोबर त्याची पार्श्वभूमीही नैसर्गिक वाटावी इतकी हुबेहूब बनवलेली आहे...
आफ्रिकन प्राण्यांचे व पक्ष्यांचे काही संग्रह
आफ्रिकन संस्कृती
आफ्रिकेतील अनेक संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणार्या या संग्रहात तेथील मानवी समूहांच्या वापरातल्या अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या रोजच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे दर्शन घडवणारे संग्रह आहेत. त्यापैकी काही निवडक संग्रहांचे फोटो...
आफ्रिकन संस्कृतीचे दर्शन करवणारे संग्रह
आशियाई सस्तन प्राण्यांचा वेर्नी-फाँथोर्प हॉल (Vernay-Faunthorpe Hall of Asian Mammals)
Theodore Roosevelt Rotunda च्या डाव्या बाजूला असलेल्या या विभागातील भारत, नेपाळ, ब्रह्मदेश व मलेशियातील प्राण्यांचे १८ संग्रह आहेत. येथेही दोन आशियाई हत्तींचा संग्रह केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती इतर संग्रह रचलेले आहेत.
आशियाई हत्ती
आशियाई प्राणी
आशियन संस्कृती
आशियन संस्कृती दालनामधील काही संग्रहांचे फोटो ०१
आशियन संस्कृती दालनामधील काही संग्रहांचे फोटो ०२
उत्तर अमेरिकन सस्तन प्राण्यांचा बर्नार्ड फॅमिली हॉल (The Bernard Family Hall of North American Mammals)
या मोठ्या विभागात मेक्सिकोच्या उत्तरेकडील अमेरिकन खंडातील लहान मोठ्या प्राण्यांचे ४३ संग्रह आहेत. तेथील काही निवडक फोटो...
उत्तर अमेरिकन प्राणी
उत्तर अमेरिकन पक्षांचा सॅनफर्ड हॉल (Sanford Hall of North American Birds)
संग्रहालयाच्या सुरुवातीपासून, सन १९०९ पासून, असलेल्या या विभागात उत्तर अमेरिकन पक्षांचे एकूण २५ संग्रह आहेत.
उत्तर अमेरिकन पक्षी
सरपटणार्या प्राण्यांचा विभाग (Hall of Reptiles and Amphibians)
या भागात सरपटणार्या प्राण्यांच्या उत्क्रांती, रचना (सापळे) आणि जीवनावर आधारलेले संग्रह आहेत.
सरपटणारे प्राणी
सागरी जीवनाचे मिलस्टाईन दालन (Milstein Hall of Ocean Life)
छतापासून टांगून ठेवलेला मूळ आकारातील २९ मीटर (९४ फूट) लांबीचा भव्य नील देवमासा (ब्ल्यू व्हेल) या विभागाचे डोळ्यात भरणारे मुख्य आकर्षण आहे...
नील देवमासा
सागरी प्राणी
आर्थर रॉस उल्कादालन (Arthur Ross Hall of Meteorites)
या दालनात ग्रीनलँडमध्ये अहनिघितो (Ahnighito) या जागी सापडलेल्या २०० टन वजनाच्या उल्केचे तुकडे आहेत. त्यातला ३४ टन वजनाचा एक तुकडा वजनाने जगातली सर्वात मोठी उल्का आहे. या अवजड दगडाला उभा ठेवण्यासाठी आधार देणारे स्तंभ जमिनीतून खाली जात इमारतीखालच्या खडकामध्ये घुसवलेले आहेत...
अहनिघितो (Ahnighito) उल्केचा ३४ टन वजनाचा तुकडा
मॉर्गन मेमोरियल रत्नदालन (Morgan Memorial Hall of Gems)
या दालनात नैसर्गिक अवस्थेत असलेल्या रत्नांबरोबरच, संग्राहकांनी दान केलेल्या पैलू पाडलेल्या रत्नांचे आणि रत्नजडित दागिन्यांचे अनेक नमुने आहेत. संग्रहालयाच्या ताब्यात एकूण तब्बल एक लाखापेक्षा जास्त हिरे माणके आहेत. त्यातला एक पुष्कराज (topaz) तब्बल २७० किलो (५९६ पाउंड) वजनाचा आहे, तो खडा म्हणणे विनोदी वाटते !...
रत्नदालनातले काही नमुने आणि २७० किलो वजनाचा पुष्कराज
चालून चालून पाय दमले होते आणि भूकही लागली होती. तेव्हा थोडे मध्यांतर घेऊन उदरभरण केले. संग्रहालयाच्या रेस्तराँमध्ये ही चक्क रंगीबेरंगी m&m जेम्सनी सजवलेली आकर्षक कुकी मिळाली...
पायांना जरासा आराम मिळाला आणि पोटाचीही सोय झाली तसे मोठ्या उत्साहाने मोहीम परत सुरू केली.
(क्रमशः )
या संग्रहालायात बर्याच चित्रपटांचे शुटींग विशेष्तः तो प्रचंड सांगाडा
ज्या ठिकाणी ठेवला आहे तेथील. मॅमथ नावाचा एक हत्ती पुरातन काळी होता काय ?
आपल्या तिकिटाच्या किश्यासारखे अनुभव ( इष्टापत्ती) मला ही आलेले आहेत. तो
सरपटणार्या प्राण्याचा लांग सांगाडा ... अबब . असाच एक मत्स्याचा सांगाडा
बडोदा येथील संग्रहालयात आहे. अहनिघितो वरून पुण्यात ३ फुटावरून
पाहिलेल्या चांद्र अश्मांची आठवण झाली. सगळ्यात गंमत शेवटच्या फोटोत आली.
केळ्याशेजारी ती कुकी आहे ना तो मला रत्नांच्या संग्रहालयातील एक ऐक्झीबीट
आहे असेच वाटले )))))) .
तो तीन सापळ्यांचा संग्रह आणि त्याच्या भव्यतेमुळे आणि सादरीकरणामुळे संग्रहालयाच्या भेटीच्या सुरुवातीलाच मनावर नक्कीच गाढ प्रभाव पाडतो.
Elephantidae family मधील मॅमथ (Mammuthus उर्फ Mammoth) हे आज दिसणार्या आधुनिक आशियाई हत्तींचे एक प्राचीन चुलत कुटुंब (genus) होते. त्यांच्यात अनेक प्रजाती (species) होत्या. पण आकाराने आधुनिक हत्तींपेक्षा मोठ्या व लांब सुळे असलेल्या प्रजाती जास्तकरून प्रसिद्ध आहेत. सर्व Mammuthus प्रजाती कालाच्या ओघात पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यांच्या शेवटच्या प्रजातीचा अंत सुमारे ४ ते ४.५ हजार वर्षांपूर्वी झाला.
Elephantidae कुटुंबाची वंशावळ खालच्या चित्रात पाहता येईल (जालावरून साभार)...
ती m&m जेम्स लावलेली कुकी रत्नदालनात शोभून दिसेल अशीच होती :)
अमेरिकन इंडियन संस्कृतीचे संग्रह मोठ्या प्रमाणात असणे या संग्रहालयात साहजिकच होते. "नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" बघून झाले होते. "आता इथे काय अधिक पहायला मिळणार ?" असा प्रश्न मनात येणे साहजिक होते. पण त्या विभागात... किंबहुना विभागसंकुलात... शिरल्यावर ती शंका केव्हा कशी उडून गेली हे ध्यानात आले नाही. अजस्त्र अमेरिकन द्वीखंडांमध्ये काही सहस्र वर्षांच्या कालखंडात जन्मलेल्या आणि बहरलेल्या असंख्य प्राचीन अमेरिकन संस्कृतींचा खजिना पाहिल्यावर, त्या संस्कृती त्यांच्या कालखंडासाठी प्रगत होत्या याबद्दल मनात शंकाच राहत नाही. मात्र, तेथील लोक युरोपातून येणार्या नवीन आक्रमकांच्या मानाने फारच कमी भांडखोर असल्याने त्यांना नवनवीन, जास्त विध्वंसकारी शस्त्रास्त्रे निर्माण करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे सोने आणि चांदीचा अपरिमित साठा करण्याइतके धातुशास्त्र विकसित झाले असूनही त्यांची शस्त्रे मुख्यतः लाकडी दंडुक्यांच्या पुढे क्वचितच गेली. संस्कृतीच्या इतर विकसित आनंददायी पैलूंच्या मानाने त्यांची शस्त्रे अतिशय कमकुवत होती. अर्थातच, आक्रमकांच्या धातूंच्या तलवारी आणि स्फोटकांचा उपयोग असलेल्या बंदुकांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही यात आश्चर्य नाही... आणि त्याचा त्या संस्कृतींवर काय परिणाम झाला हा इतिहास, आक्रमकांना मानणे कितीही कठीण असला तरी, आतापर्यंत सर्वमान्य झाला आहेच. या पार्श्वभूमीमुळे, अमेरिकन इंडियन संस्कृतींच्या दालनांतून फिरताना, आश्चर्य-आनंद-दु:ख यांची मिश्र भावना मनात सतत एक विचित्र वादळ निर्माण करत राहते.
मेक्सिको आणि मध्य अमेरिका दालन (Hall of Mexico and Central America)
या विभागात मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील कोलंबियनपूर्व (pre-Columbian) कालखंडातील माया, ओल्मेक, अॅझटेक इत्यादी संस्कृतींमधील अवशेषांचे संग्रह आहेत. या संस्कृतींचा लिखित इतिहास नसल्याने, त्या काळचे जीवन, व्यवहार, रुढी-परंपरा, इत्यादींची कल्पना त्यांच्या सापडलेल्या अवशेषांवरून करावी लागते. या संस्कृतींचे अवशेष मिळणे आणि त्यांचे शास्त्रीय विश्लेषण होणे याची सुरुवात होण्याच्या काळात सन १८९९ मध्ये हा विभाग सुरू झाला. त्यानंतर मिळत जाणार्या नवनवीन अवशेषांच्या ठेव्यांबरोबर या विभागाचा आकार वाढत गेला आणि त्याची वारंवार पुनर्रचना होत गेली आहे.
उत्खनन स्थानात मिळालेल्या एका पूर्णरुपातील थडग्याची प्रतिकृती आणि त्यांच्यातील वस्तू असलेला संग्रह या विभागातला एक प्रसिद्ध मानबिंदू आहेत...
मानवी अवशेषांसह थडग्याची प्रतिकृती आणि थडग्यात सापडलेल्या वस्तू
अॅझटेक सूर्यशिला (Aztec Stone of the Sun)
मेक्सिको सिटीमधील संग्रहालयामध्ये ठेवलेल्या मूळ अॅझटेक सूर्यशिलेची आणि प्राचीन काळी ती तिच्या मूळ रंगांत कशी दिसत असेल त्याची, अश्या दोन प्रतिकृती येथे आहेत. त्या संस्कृतीतील सूर्यदेव व दिनदर्शिकेसंबंधीच्या अनेक कल्पना चिन्हांच्या रूपाने या शिलेवर कोरलेल्या आहेत. १२ फुट व्यासाच्या या शिलेचे वजन तब्बल २ टन आहे...
अॅझटेक सूर्यशिलेची प्रतिकृती आणि ती प्राचीन काळी मूळ रंगीत स्वरूपात कशी दिसत असेल हे दाखवणारी प्रतिकृती
इतर वस्तू...
इतर वस्तू
या संस्कृतींनी खनिजांपासून शुद्ध सोने आणि चांदी वेगळे करण्याच्या व त्यापासून वस्तू बनवण्याच्या पद्धती विकसित केल्या होत्या. मुबलक सोने-चांदीचे साठे असलेल्या त्यांच्या संस्कृतीत त्या धातूंना प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व नव्हते. परंतू, ते साठे पाहून सोने-चांदीला समृद्धीचे मुख्य परिमाण समजणार्या युरोपियन लोकांचा लोभ जागा झाला. अश्या रितीने अमेरिकन इंडियन समुदायांकडे असलेले सोने त्यांच्या संस्कृतींवरील आक्रमण आणि नाशाचे कारण ठरले.
सोन्याच्या वस्तू : आभूषणे, कलात्मक वस्तू आणि रोजच्या वापरातल्या वस्तू
टोळीच्या प्रमुखाने वापरायची आभूषणे
अमेझॉनच्या जंगलातील संस्कृतींचे दालन
अमेझॉन खोर्यातले एक युगुल आणि घरातील नेहमीच्या वापराच्या वस्तू
इतर आकर्षक संग्रह...
विणकर स्त्री आणि वैद्यकीय उपचार करणारा 'मेडिसिन मॅन'
शिकारीचे शिक्षण आणि जलवाहतूकीची साधने
एकत्रित कुटुंबाचे एक मोठे घर आणि सामाजिक समारंभांत वापरायची साधने
पूर्वेकडील जंगलांतील संस्कृतींचे दालन (Hall of Eastern Woodlands Indians)
पूर्वेकडील जंगलांतील संस्कृतींचे संग्रह
पठारांवर राहणार्या संस्कृतींचे दालन (Plain Indians)
पठारांवर राहणार्या संस्कृतींमधील व्यक्ती व वस्तू
प्रशांत सागराच्या (पश्चिम) किनार्यावरील संस्कृतींचे दालन (Hall of Pacific People)
प्रशांत सागराच्या (पश्चिम) किनार्यावरील संस्कृतींमधील वस्तू
म्युझियमच्या ७७व्या स्ट्रीटवर असलेल्या किल्ल्यासारखे दिसणार्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यास त्याला लागून असलेल्या "ग्रँड गॅलरी"मध्ये अलास्काच्या दक्षिणपूर्वेतल्या हायडा (Haida) भूभागावर राहणार्या जमातीची एक पूर्णरुपातील भली मोठी नौका टांगून ठेवलेली आहे...
हायडा (Haida) नौका
अश्मावशेषांची दालने
ही दालने या संग्रहालयातील खास आकर्षण आहे. जगभरातून जमवलेल्या अश्मावशेषांच्या स्थायी संग्रहांनी या संग्रहालयाचा पूर्ण चवथा मजला व्यापलेला आहे. त्यातील तीन डायनॉसॉर जीवाश्मांचा एक विशाल संग्रह मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच असल्याचे आपण पाहिले आहेच. असे असूनही इतर अनेक अश्मावशेष साठवणघरांत बंदिस्त आहेत. केवळ थक्क व्हावे इतक्या विविध प्रकारचे इतक्या मोठ्या संखेने असलेले जीवाश्म येथे आहेत. या संग्रहांतील असंख्य पृष्ठवंशिय जीवाश्मांचा अभ्यास (vertebrate paleontology) करणारे बरेच जगन्मान्य संशोधन येथून झाले आहे आणि त्याने पृथ्वीवरच्या जीवनाचा इतिहास नक्की करण्यामध्ये मोलाची मदत केली आहे.
येथिल काही नमुने इतके महाकाय आहेत की त्यांना एका विशाल दालनातही सामावून घेणे शक्य झालेले नाही. असाच एक दालनात उभा राहून त्याच्या दरवाज्यातून डोके बाहेर काढून डोकावणारा डायनॉसॉर अश्मावशेष खालच्या प्रकाशचित्रात दिसेल...
दालनाला पुरून उरल्याने दरवाज्यातून बाहेर डोकावणारा डायनॉसॉर अश्मावशेष
इतर विशेष डायनॉसॉर अश्मावशेष संग्रह ०१
इतर विशेष डायनॉसॉर अश्मावशेष संग्रह ०२
अश्मीभूत डायनॉसॉर डोक्यांचे संग्रह
सस्तन प्राणी आणि त्याच्या नष्ट झालेल्या प्रजातींचे अश्मावशेष असलेले दालन
नष्ट झालेल्या सस्तन प्राण्यांचे अश्मावशेष (वरच्या रांगेतील डावीकडच्या चित्रात मॅमथचा अश्मावशेष आहे)
आपल्या आजूबाजूला राहणारे डायनॉसॉर्स (Dianosaurs among us)
पृथ्वीवरील जीवनाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात अनेक चित्तवेधक घटना आहेत. पण, त्यातली एक फारच रोचक आहे, ती म्हणजे, १७० कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य करून काही कोटी वर्षांपूर्वी पूर्णपणे नष्ट झाले असा समज असलेल्या, अनेक टन वजन असलेल्या अजस्त्र डायनॉसॉर्सपैकी काहींचे आजच्या घडीला आपल्या आजूबाजूला असलेल्या शेकडो-हजारो पटींनी लहान आकाराच्या व हवेत सलग अनेक तास मुक्त भरार्या घेणार्या पक्षांत झालेले रूपांतर !
प्रथमदर्शनी हे मान्य करायला कठीण वाटले तरी, जीवावशेषांच्या संशोधनातून आतापर्यंत मिळालेल्या व सतत पुढे येत असलेल्या नवनवीन सबळ शास्त्रीय पुराव्यांमुळे, प्राचीन डायनॉसॉर्सपासून आधुनिक पक्ष्यांपर्यंतच्या उत्क्रांतीचे दुवे मिळाले/मिळत आहेत. या संबंधातील शास्त्रीय पुराव्यांची मांडणी "Dianosaurs among us" या प्रदर्शनात केलेली आहे. त्यासंबधिचे महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
१. काही डायनॉसॉर्स घरटी बनवून त्यात अंडी घालत असत आणि आधुनिक पक्षांसारख्या पद्धती वापरून आपल्या पिलांची काळजी घेत असत...
घरट्यात अंडी घालणारे डायनॉसॉर्स
२. अनेक डायनॉसॉर्समध्ये प्राचीन स्वरूपातील पिसे उत्क्रांत झाली होती. त्यांचा उपयोग थंडीपासून संरक्षण, आपल्या जोडीदाराला आकर्षित करणे, उडणे, इत्यादींसाठी होता. त्या पिसांच्या रचनेत उत्क्रांती होत आधुनिक उडणार्या पक्षांची पिसे बनली आहेत.
डायनॉसॉर्समधील पिसांची उत्क्रांती दाखवणारे संग्रह
३. आधुनिक सुधारीत तंत्रज्ञानाने जीवाश्मांची तपासणी करून मिळालेल्या माहितीतून डायनॉसॉर्स आणि आधुनिक पक्ष्यांच्या शरीररचनेतली आणि शरीरकार्यपद्धतीतली अधिकाधिक साम्ये पुढे येत आहेत. उडण्याची क्षमता नसलेल्या काही डायनॉसॉर्समध्येही उडण्यासाठी आवश्यक रचना असलेले मेंदू आणि फुफ्फुसे निर्माण झाली होती. पुढे पक्षी निर्माण होण्याच्या उत्क्रांतीच्या पायर्यांमध्ये या फरकांचा उपयोग झाला.
४. पोकळ हाडे, चोच आणि टोकदार नखे ही आधुनिक पक्षांना डायनॉसॉर्सपासून मिळालेली भेट आहे.
या उत्क्रांतीची चित्तवेधक कहाणी खालील व्हिडिओ क्लिपमध्ये पाहता येईल...
फुलपाखरे संवर्धनगृहामधिल (बटरफ्लाय काँझरवेटरी) मधील अनुभव
कीटकांबद्दल आपल्या मनात सर्वसाधारणपणे घृणा असली तरी, त्यांच्या कुटुंबातील फुलपाखरे मात्र त्यातला एक मोठा अपवाद आहे. रंगीबेरंगी चित्ताकर्षक नक्षी अंगावर घेऊन दिमाखाने भिरभिरणारी फुलपाखरे पहायला आवडत नाहीत असा माणूस विरळाच असेल. झुडुपांनी भरलेल्या एका मोठ्या संरक्षित दालनात मुक्तपणे विहरणार्या सुमारे ५०० फुलपाखरांमध्ये फिरण्याचा आनंदानुभव हा कार्यक्रम देतो. अर्थातच, हा कार्यक्रम पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आपल्या भोवती रुंजी घालणार्या फुलपाखरांची मजा पाहत या फिरताना तेथील या दालनातील माहितीच्या पाट्यांमुळे आपल्याला फुलपाखरांबद्दल बरीच रोचक शास्त्रीय माहितीसुद्धा मिळते.
तेथे काढलेली ही काही प्रकाशचित्रे...
फुलपाखरे संवर्धनगृहातील काही फोटो
आणि ही जालावरून साभार घेतलेली फुलपाखरे संवर्धनगृहाची व्हिडिओ क्लिप...
रोज पृथ्वी व अवकाश केंद्र (Rose Center for Earth and Space)
सन १९३५ सालापासून कार्यरत असलेल्या हेडन तारांगणाला तोडून तेथे १९०० साली "रोज पृथ्वी व अवकाश केंद्र" उघडले गेले. सहा मजले उंचीच्या काचेच्या घन (क्यूब) आकारात तरंगणारा २७ मीटर त्रिज्येचा प्रकाशित गोलाकार दिसावा, अशी त्याची रचना आहे. जेम्स पोल्शेक या त्याच्या वास्तुशिल्पकाराने त्याचे वर्णन "वैश्विक प्रार्थनागृह (cosmic cathedral)" असे केले आहे. या इमारतीची गणना मॅनहॅटनच्या सर्वोत्तम स्थापत्याविष्कारांमध्ये केली जाते. ३०,९८० चौ मी (३३३,५०० चौ फू) आकाराच्या या केंद्रात हेडन तारांगणाबरोबरच उच्च प्रतीचे संशोधन, शिक्षण आणि प्रदर्शनांचे काम करणारे विभाग आहेत. नील दग्रास टायसन (Neil DeGrasse Tyson) हा जगप्रसिद्ध अवकाशशास्त्रज्ञ (अॅस्ट्रोफिजिसिस्ट) हेडन तारांगणाचा निर्देशक आहे.
हेडन तारांगणामध्ये प्रदर्शित होणार्या "डार्क युनिव्हर्स" या कार्यक्रमाला खुद्द नील दग्रास टायसनने आपला आवाज दिला आहे. प्रेक्षकांच्या चारी बाजूला व डोक्यावर असलेल्या तारांगणाच्या अर्धगोलाकार पडद्यावर हा दृकश्राव्य कार्यक्रम प्रदर्शित केला जातो. अनंत विश्वाच्या अभ्यासात आतापर्यंत उघड झालेल्या अनेक नाट्यमय गोष्टी आणि भविष्यात अपेक्षित असलेले शोध यांचा मागोवा, सर्वसामान्य जनतेला समजेल अश्या रोचक व सोप्या शब्दांत, हा कार्यक्रम घेतो. या दरम्यान हा कार्यक्रम प्रेक्षकांना अनेक जगप्रसिद्ध वेधशाळा व हबल सारख्या अवकाशात फिरणार्या दुर्बिणींच्या डोळ्यातून विश्वदर्शन घडवतो. गॅलिलिओ नावाच्या उपग्रहाने गुरुग्रहाच्या वातावरणात मारलेला सूर आपले मन थक्क करून जातो. हे सर्व बघत असतानाच हा कार्यक्रम आपल्याला "डार्क मॅटर" आणि "डार्क एनर्जी" यासारख्या किचकट शास्त्रीय संकल्पनांची सहज सोपी ओळख करून देतो.
आपल्या शरीरातले गुप्त विश्व (The Secret World Inside You) प्रदर्शन
या खास प्रदर्शनात, निरोगी मानवी शरीरात अस्तित्वात असणार्या सूक्ष्म जीवासंबंधीची माहिती आकर्षक प्रतिकृती, दृकश्वाव्य माध्यमे आणि इंटरअॅक्टिव खेळांच्या स्वरूपात मांडलेली आहे. रोचक पद्धतीने लहान मुलांचे ज्ञानवर्धन करण्याबरोबरच हे प्रदर्शन मोठ्या माणसांच्या मनातले अनेक गैरसमजही दूर करते.
"आपल्या शरीरातले गुप्त विश्व" या प्रदर्शनातले काही विभाग
अवनट कारंजे
संग्रहालयात फेरी मारताना खिडकीतून एक अनवट नजारा दिसला. इमारतीला लागून असलेल्या हिरवळीच्या एका भागात काँक्रिटच्या एका मोठ्या सपाटीवर असलेल्या छिद्रांतून अचानक पाण्याचे फवारे उडत-बंद होत होते. तेथे फिरायला आलेली काही मुले समुद्रकिनार्यावर आल्याप्रमाणे आपले कपडे उरतवून, पाणी केव्हा व कुठून उडेल याचा अंदाज बांधत, त्याची मजा घेत होते. त्यांच्या बरोबर आलेल्या पालकांपैकी एखाद-दुसरा स्वच्छंदपणे त्यांच्यात सामील होत होता...
अचानक फवारे उडवणार्या कारंज्याची मजा लुटणारी बालके आणि पालक
केवळ एका दिवसात हे महासंग्रहालय आणि पाच खास कार्यक्रम पाहण्याचा विक्रम करून तृप्त झालेले मन आणि धावपळ करून थकलेले पाय घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी सबवे पकडायला निघालो.
(क्रमशः )
डायनॉसॉर फॉसिल्स उत्तम प्रकारे जतन केलेले आहेत.
अमेरिकेतील प्राचीन संस्कृतीविषयी मात्र नेहमीच विषाद वाटतो. संस्कृती नष्ट करुन त्यांची संग्रहालये मात्र उभारली गेली. अर्थात इथल्या प्राचीन संस्कृती ह्या भारतीय, ग्रीक, पर्शियन, इजिप्शियन, मेसोपोटेमियन संस्कृतींइतक्या प्रगत मात्र अजिबात दिसत नाहीत.
अमेरिकेत गेलेल्या सुरुवातीचे युरोपियन वसाहतवादी कमी आणि आपल्या राजासाठी संपत्ती लुटालूट करून आणणारे जास्त होते. त्यासाठी त्यांनी क्रूरतेची परिसीमा गाठली होती. आपल्या कारवाया युरोपात कळून आपली नाचक्की होऊ नये यासाठी त्यांनी अनेक कपोलकल्पित कथा आणि थियर्या पसरवल्या होत्या. उदा. अमेरिकन मूलवासी रानटी, क्रूर, अशिक्षित आणि असंस्कृत आहेत, किंबहुना आदिमानवच आहेत, इ. आपल्या कारवायांचा पुरावा नष्ट करायला त्यांनी प्रचंड नरसंहार आणि उध्वंस केला. गेल्या काही शतकांत या मूल संस्कृतींच्या अवशेषांचे उत्खनन आणि अभ्यास सुरू झाल्यावर अनेक तथ्ये पुढे येऊ लागली आहेत. अर्थात जे पूर्णं किंवा बर्याच प्रमाणात नष्ट झाले आहे त्याबद्दल, लेखी पुरावे नसल्याने, केवळ अंदाजच बांधावे लागतात.
अमेरिका खंडात मानवी वस्ती सर्वात शेवटी झाली. भारतीय, ग्रीक, पर्शियन, इजिप्शियन, मेसोपोटेमियन संस्कृती जेव्हा एका जागेवर स्थिरस्थावर झाल्या त्या वेळेस आणि नंतर काही हजार वर्षे हे लोक स्थलांतरांच्या (प्रसरण) अवस्थेतच होते. त्यामुळे, एका जागेवर स्थिर झालेल्या मोठ्या लोकसंखेचा फायदा तुलनेने कमी मिळाला. शिवाय, "आपल्या मालकीच्या भूभागावर स्थिर असून एकमेकाशी सतत भांडत असणारे जनसमुदाय", युरोप इतके जगात इतर ठिकाणी नव्हते. या भांडखोरपणामुळे (इतर सामाजिक-राजकीय-आर्थिक परिणामांबरोबरच) ताकदवान शस्त्रे आणि हुशार रणनीती विकसित करणे ही एक अत्यावश्यक गरज होती. त्याचा उपयोग नंतर वसाहती निर्माण करणे व कमी मनुष्यबळावर तेथील लोकांना ताब्यात ठेवणे किंवा नष्ट करणे यासाठी झाला.
याशिवाय मोठ्या व विकसित संस्कृती निर्माण होण्यासाठी अत्यावश्यक असणार्या, (१) माणसाळवण्याजोगी जनावरे (विशेषतः गुरे, घोडे, इ) आणि माणसाळवण्याजोग्या अन्नधान्यांच्या प्रजाती (गहू, तांदूळ, कडधान्ये, इ) या दोन गोष्टी जगभरात केवळ लेव्हांत (भूमध्य समुद्राच्या उत्तर-पूर्व टोकाजवळचा भूभाग) या प्रदेशातच निर्माण झाल्या होत्या किंवा मध्य आशियाई स्टेपेजमधून तेथे पोचल्या. त्यामुळे सुरुवातीच्या मोठ्या व विकसित संस्कृती प्रामुख्याने तेथे निर्माण झाल्या.
यारेड डायमंडने (Jared Diamond) त्याच्या "Guns Germs and Steel" या पुस्तक याबाबतीत सुंदर विश्लेषण केले आहे.
अमेरिका खंडात मानवी वस्ती सर्वात शेवटी झाली ह्याचे कारण काय असावे? अटलांटिक आणि प्रशांत महासागरांमुळे हा भूभाग अगदी अलीकडेपर्यंत मानवी वस्तीपासून तुटलेलाच राहिला का? जलवाहतुकीची तुलनेने प्रगत साधने विकसित झाल्यानंतरच म्हणजे मानव इकडे येऊ शकला का? पॉलिनेशियन लोकांनी केवळ तराफ्याच्या साहाय्याने समुद्री प्रवास केला असे कुठेतरी वाचले होते.
अमेरीकेत प्रागैतिहासिक वसाहतींचे अवषेश काही सापडतात का?
आफ्रिकेतील (सद्याच्या इथिओपियात असलेल्या) रिफ्ट व्हॅलीत २ लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेला आधुनिक मानव सुमारे ९०,००० व ८०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात केव्हातरी आफ्रिकेबाहेर बाहेर पडू लागला व प्रथम आशियात आणि नंतर युरोप व अमेरिकेत पसरायला लागला. ही सगळी वाटचाल अंतर (मुख्यतः पायी होत असल्याने), भौगिलीक परिस्थिती (मुख्यतः प्रशांत समुद्राने विभागलेली अशिया व अमेरिकन खंडे) आणि हवामान (हिमयुगे, इ) यांचे अडथळे पार करत त्याला अमेरिका खंडात पोहोचायला ९,००० वर्षांपूर्वीपर्यंतचा काळ उगवला. काहींच्या मते हा काळ अगोदरचा असला तरी तो १२,००० वर्षांपुर्वीच्या अगोदर असण्याचे सबळ पुरावे मिळालेले नाहीत. यावेळेपर्यंत युरेशियातील मानव अनेक ठिकाणी स्थायीक होऊन शेती करू लागल्याचे व त्याने (कष्टाची कामे/वाहतूक करण्यासाठी, अन्नासाठी, इ) अनेक प्राण्यांना माणसाळविल्याचे पुरावे आहेत.
अमेरिकेतील मानवांपेक्षा युरेशियातील मानवांना एका जागी स्थिरस्थावर होण्यासाठी काही दशसहस्त्र वर्षे (किंवा दुप्पट-तिप्पट) जास्त वेळ मिळाला. हा महत्वाचा मुद्दा असला तरी त्याबरोबरच, (अ) एका जागी स्थिर झालेल्या वेगवेळ्या मानवी समुदायाचे जमिनीच्या हक्कांसाठी एकमेकाशी संघर्ष होणे आणि त्यामुळे सामरिक शस्त्रे व रणनिती विकसित करण्याची निकड निर्माण होणे आणि (आ) वस्ती केलेल्या भूभागावर, संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक माणसाळवण्याजोग्य प्राणी व वनस्पतींची उपलब्धता, हे दोन मुद्देही तेवढेच महत्वाचे आहेत.
"पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" या मिपावरच्याच माझ्या लेखमालिकेत या मानवी प्रवासाचे मार्ग व कालखंड, आणि ते ठरविण्यासाठी वापरलेल्या सबळ शास्त्रीय पुराव्यांचा उहापोह केला आहे.
मातेकडून मिळणार्या मायटॉकाँडियल डिएनएच्या अभ्यासावरून बनवलेला मानवी प्रसरणाराचा एक नकाशा (जालावरून साभार) खाली देत आहे...
नकाशातील वर्तुळांचे/कंसांचे रंग त्या त्या भूभागावर मानव केव्हा पोचला / स्थिरावला याचे (लिजंडमघ्ये विषद केलेले) आकडे (हजार वर्षांच्या परिमाणात) दाखवत आहेत.
त्या काळी जलप्रवास फार विकसित नसल्याने मानवाचा अमेरिकेतील शिरकाव जलप्रवासाने नाही तर (सद्याचा बेरिग सामुद्रधुनीच्या मार्गे) पायी झाला असल्याचेच जास्त पुरावे आहेत. त्याबरोबर जलप्रवासानेही माणूस अमेरिकेत पोचला असे मानणारेही काही दावे आहेतच !
आशियाई व पॉलिनेशियन लोकांच्या प्रशांत महासागरातील जलप्रवासाबद्दलची माहिती "समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास" या माझ्या लेखात आहे. मात्र, याबाबतीत अधिक संशोधन होणे जरूरीचे आहे आणि त्यातल्या काही तथ्यांना अजून सबळ शास्त्रीय पुराव्यांची गरज आहे.
अमेरिकेतील प्राचीन संस्कृतीविषयी मात्र नेहमीच विषाद वाटतो. संस्कृती नष्ट करुन त्यांची संग्रहालये मात्र उभारली गेली.
हे खरे आहेच. पण एक गोष्ट नजरेला आणुन देऊ इच्छितो की त्यांच्यात वसाहतवादी अरेरावी आणि विध्वंसक प्रवृत्तीचे लोक होतेच; पण जुन्या संस्कृतीबद्दल कुतुहल असणारे, त्यांची जपणूक करण्यासाठी धडपडणारे, अभ्यासू आणि संशोधक लोकही होते. ते नसते तर जगातल्या सगळ्याच प्राचीन संस्कृतींचे नामोनिशाण उरणे जरासे कठीणच होते...
ग्रीक आणि रोमन संस्कृतींचे उत्खनन, अभ्यास आणि जतन पाश्चिमात्यांनी केले ही वस्तूस्थिती आहे आणि यात फारसे कौतूक करण्याजोगे नाही असेही आपण म्हणू शकतो.
मात्र, दक्षिणपश्चिम आशियातल्याच भारताभिमुखी संस्कृतींचेच नव्हे तर खुद्द भारतातल्या प्राचीन संस्कृतींक ठेव्यांचेही उत्खनन आणि अभ्यास कोणी सुरू केला ?" या प्रश्नाचे उत्तर भारतियांना अभिमानास्पद वाटावे असे खचितच नाही :( ...
नमुन्यादाखल खालील दोनच उदाहरणे बघा :
१. हराप्पा-मोहेंजोदरो: चार्ल्स मॅसनने यांचा पहिला उल्लेख १८४२ मध्ये त्याच्या "Various Journeys in Balochistan, Afghanistan, and the Punjab" या पुस्तकात केला. नंतर १८५६ मध्ये जनरल अलेक्झांडर कनिंघॅम (जो नंतर director general of the archaeological survey of northern India बनला) ने East Indian Railway Company च्या कराची आणि लाहोरला जोडणार्या रेल्वे लाईनच्या कामाला भेट देत असताना त्या अवशेषांची नोंद घेतली. तो पर्यंत त्या संस्कृतीच्या अवशेषांतील विटा तोडून त्या बांधकामे व रेल्वेलाईनच्या कामासाठी वापरल्या जात असत ! :( :( आज मोहेंजोदरोबद्दल कळकळीने बोलणार्या भारतियांची ही अनास्था ब्रिटीश हस्तक्षेपाने बंद झाली नसती तर आता त्या अवशेषांच्या जागी काय उरले असते ???
२. अजंता आणि वेरूळ: आपण मराठी माणसांचे मानबिंदू असलेली अजंता आणि वेरूळ येथील लेणी सन १८१९ साली शिकारीसाठी जंगलात फिरताना जॉन स्मिथ या ब्रिटिश सैन्यदलातील अधिकार्याच्या नजरेस पडली नसती तर ?
भारताचा बराचसा इतिहास इंग्लिशेतर भाषांत नोंदलेला असूनही भारतिय इतिहासाच्या बहुतेक मान्यवर इतिहासकारांचे लेखन गोर्या इतिहासकारांचे दाखले दिल्याशिवाय पुरे होत नाही !
या वरच्या गोष्टी स्वतःच्या इतिहासाचा (मुळात तो गोर्यांचा इतिहास नव्हताच) अभिमानाचा भाग म्हणून झालेल्या नाहीत तर "शोधलेल्या/सापडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रचंड कुतुहल असणे, त्यांतील गोष्टीचे जतन/संग्रह करणे आणि त्यांची चिकाटीने तपशीलवार नोंद ठेवणे" या विशेष प्रवृत्तीच्या निदर्शक आहेत. अजूनही या गोष्टी अपाश्चिमात्य लोकांत अभावानेच दिसतात... यावर "असे कसे म्हणता येईल ?" असा प्रश्न मनात आला असला तर आपल्या गडकिल्ल्यांची अवस्था नजरेसमोर आणल्यास त्वरीत उत्तर मिळते. भाततातील इतर प्राचीन/ऐतिहासिक ठेव्यांचीही अवस्था स्पृहणिय म्हणण्याइतकी चांगली खचितच नाही.
असो. अजून काय लिहिणे ?!
सेंट बार्टचे चर्च
पाश्चिमात्य देशांची जरा निगुतीने केलेली फेरी तेथील महत्त्वाची धार्मिक-सामाजिक संस्कृतीची प्रतीके असलेली चर्चेस पाहिल्याशिवाय पुरी होत नाही. मुख्यतः धार्मिक उद्येशाने स्थापन केलेली असली तरी बर्याच महत्वाच्या पाश्चिमात्य चर्चेसनी स्थानिक सामाजिक-राजकीय-कलाजीवनाच्या विकासात मोठा सहभाग घेतला आहे. त्यामुळे न्यू यॉर्क शहरातली काही चर्चेस आकर्षणांच्या यादीत होतीच. त्यापैकी सेंट बार्टच्या चर्चची, मिपाकर पिलियन रायडर यांच्याबरोबरच्या बोलण्यात, स्तुती ऐकली होती, त्यामुळे त्याचा चर्चच्या यादीत सहाजिकच पहिला क्रमांक आला.
या चर्चचे पूर्ण नाव "St. Bartholomew's Episcopal Church" असे आहे. हे मुळातले Evangelical म्हणजे स्वत:ला कॅथॉलिक समजणार्या प्रोटेस्टंट लोकांचे चर्च आहे. या चर्चची इमारत पाहण्यासारखी आहे आणि तेथील रविवारचा प्रार्थनासमारंभ सर्व लोकांसाठी खुला असतो असे कळले होते. त्यामुळे या दुहेरी फायद्याचा लाभ घेण्याच्या उद्येशाने एक रविवार गाठून त्याला भेट दिली.
या चर्चची सुरुवात १८३५ साली सद्याच्या जागेपासून दूर ग्रेट जोन्स स्ट्रीट आणि लाफाएत प्लेस यांच्या चौकातल्या एका छोट्या इमारतीच्या स्वरूपात झाली. मात्र, १९व्या शतकाच्या शेवटच्या भागात अमेरिकेत येणार्या स्थलांतरितांच्या लोंढ्यांमधले बरेच जण न्यू यॉर्क शहर आणि परिसरात स्थायिक झाले. हे लोक, साहजिकच, आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते आणि त्यांच्या पहिल्या कठीण काळात या चर्चने त्यांना खूप आधार दिला. या कामामुळे हे चर्च चांगले नावारूपाला येऊन मॅडिसन अॅव्हन्यू आणि ४४व्या स्ट्रीटच्या चौकात एक भव्य इमारत बांधण्याइतके सधन झाले. या कामात त्याला सधन वँडरबिल्ट कुटुंबाची बरीच मदत झाली.
सेंट बार्टच्या चर्चच्या इमारतींची १८३५ ते १९७२ या कालखंडामधील स्थित्यंतरे
या काळात चर्चने न्यू यॉर्क शहराच्या संगीत क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले होते. लिओपोल्ड स्टॉकोवस्कीला खास युरोपातून बोलवून घेऊन चर्चच्या कॉइरचे निर्देशन त्याच्या हाती सोपविले गेले. पुढे स्टॉकोवस्कीची गणना जगातल्या सर्वोत्तम संगीत मार्गदर्शकांपैकी (one of the world’s greatest conductors) होऊ लागली. या चर्चच्या कलाकारांचे सर्वांना खुले असलेले सार्वजनिक संगीत कार्यक्रम खूप लोकप्रिय आहेत.
काही काळाने इमारत मोडकळीला आल्याने १९१८ मध्ये चर्च परत एकदा हलवून सद्याच्या ५०-५१व्या स्ट्रीटच्या जागी बांधलेल्या नवीन इमारतीत आणले गेले. या रोमनस्क शैलीत बांधलेल्या इमारतीत जुन्या इमारतीचे काही अवशेष सामील केले गेले आहेत. या काळात आर्थिक स्थिती भक्कम असल्याने इमारतीचा बहिर्भाग आणि अंतर्भाग बायझांटाईन (पूर्व रोमन साम्राज्य) शैलीमध्ये सुशोभित केलेला आहे. न्यू यॉर्क शहराच्या वाढत्या पसार्याबरोबर इथला बसक्या घरांचा परिसरही बदलून १९२० पर्यंत अपार्टमेंट व ऑफिस बिल्डिंग्जनी गजबजून गेला आणि नंतर १९६० पर्यंत गगनचुंबी व्यापारी इमारतींनी भरून गेला. भरपूर आर्थिक फायद्याच्या वायद्यांवर या चर्चच्या मालकीच्या जागांवर गगनचुंबी इमारती बांधण्याच्या प्रस्तावांची प्रलोभने नाकारत हे चर्चची इमारत मात्र आहे तेथेच उभी आहे.
या इमारतीला १९६७ साली "न्यू यॉर्क सिटी लँडमार्क" आणि ३१ ऑक्टोबर २०१६ ला "नॅशनल हिस्टॉरिक लॅंडमार्क" असे किताब मिळाले आहेत.
चर्चचे रविवारचे कार्यक्रम सकाळी आठ वाजता सुरू होतात असे जालावरून समजले होते. या अगोदर चर्चमधला प्रार्थनेचा कार्यक्रम पाहिला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. तेथे वेळेआधी पोचावे अश्या अंदाजाने घरून लवकरच निघालो. १ सबवेच्या ५० स्ट्रीट थांब्यावर पोहोचून गगनचुंबी इमारतींच्या भाऊगर्दीतून वाट काढत तेथून साधारण १५ मिनिटे दूर असलेल्या चर्चकडे निघालो. वाटेत हे लंबूटांग महाशय आकाशाकडे पाहत काहीतरी शोधत असताना दिसले...
गगनचुंबी इमारतींची भाऊगर्दी आणि त्या गर्दीतून आकाशाकडे पाहणार्या व्यक्तीचे "लुकिंग अप" नावाचे शिल्प
हे आकाशाकडे पाहणार्या व्यक्तीचे "लुकिंग अप" नावाचे शिल्प १०.१५ मीटर (३३.३ फूट) उंच आहे. अल्युमिनियमच्या भांड्यांना चिरडून त्यांचे मोल्ड बनविणे आणि त्यांचा वापर करून स्टीलची शिल्पे बनवण्याचे तंत्र वापरून टॉम फ्रिडमान या शिल्पकाराने बनवलेल्या अनेक शिल्पकृती अमेरिकाभर विखुरल्या आहेत. त्यापैकी ही एक आहे. या अनवट शिल्पकृतीचे कुचमुचलेला, गोंडस, आशावादी (awkward, loveable, hopeful), इत्यादी अनेक विशेषणांनी वर्णन केले जाते.
तेथून थोडे पुढे गेल्यावर आधुनिक गगचुंबी इमारतींच्या गर्दीमध्ये आपल्या शैलीच्या वेगळेपणामुळे नजरेत भरणारी चर्चची इमारत समोर आली. चारी बाजूला वाढलेल्या आधुनिक काँक्रिट जंगलामुळे या चर्चची इमारत जराशी बसकी वाटून झाकोळली जात असली तरी तिच्या प्राचीन शैलीचा भारदस्तपणा लपून राहत नाही...
सेंट बार्टच्या चर्चचे प्रथमदर्शन
चर्चच्या समोरची जागा आणि पदपथ फुलझाडांनी सुशोभित केलेले होते...
चर्चच्या समोरची सजावट
जवळ गेल्यावर इमारतीच्या दर्शनी भिंतीवरची धार्मिक चिन्हे व प्रसंग दर्शविणारी रोमनस्क शैलीतली कलाकुसर स्पष्ट होऊ लागली...
चर्चचा दर्शनी भाग ०१
चर्चचा दर्शनी भाग ०२ : शिल्पपट्टीका
आत शिरल्यावर स्वागतगृहाला ओलांडून पुढे गेल्यावर आपण मुख्य प्रार्थनागृहात प्रवेश करतो. या उंच्यापुर्या दालनाच्या स्थापत्याबरोबरच तेथील नीटनेटकेपणा, शिस्तीने रांगेत मांडलेल्या खुर्च्यांची टापटीप आणि काटेकोर स्वच्छता लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही...
मुख्य प्रार्थनागृह
प्रार्थनागृहातील अर्धगोलाकार गर्भगृहातली संगमरवरी वेदी (अल्टार, altar) रेशमी कापडाने सजवलेली होती. बाजूला धार्मिक प्रवचनासाठी माईकसह व्यासपीठ तयार होते आणि त्याच्या बाजूला एक पियानो वादकाच्या प्रतीक्षेत उभा होता. एकंदरीत सर्व तयारी झालेली होती. पण त्यांचा उपयोग करणारे अजून आले नव्हते. त्याचा फायदा घेऊन आम्ही ती सगळी व्यवस्था जवळून निरखून घेतली. अल्टार्सभोवतीच्या उत्तम पॉलिश केलेल्या अर्धगोलाकार संगमरवरी भिंतीवर संगमरवराच्या तुकड्यांच्या कोलाजने नक्षी काढलेली आहे. गर्भगृहाच्या अर्धगोलाकार छतावर संतगणांच्या मध्यभागी येशू ख्रिस्ताचे रंगीत चित्र आहे. गर्भगृहाच्या प्रदर्शनी भागावरच्या अर्धगोलाकार नक्षीदार कमानीमध्ये फुलेपानांच्या नक्षीत मध्येमध्ये धार्मिक चिन्हे आहेत. कमान दोन्ही बाजूंनी सरळसोट खाली उतरताना मात्र तिच्यावर फक्त पानाफुलांची नक्षी आहे. कमानिच्या आतल्या दोन्ही बाजूला रोमन शैलीतले प्रत्येकी तीन सडपातळ गोलाकार खांब (कोलोनेड) आहेत...
अल्टारच्या छतावरची कलाकुसर
अल्टारच्या भिंती व दर्शनी भागावरची कलाकुसर
अल्टारजवळून मागे वळून पाहिले की प्रार्थनागृहाच्या समोरच्या भिंतीची आतली बाजू दिसते. इतर भागांइतकाच हा भागही प्रभावीपणे सजवलेला आहे. एका भव्य कमानीखाली रंगीत काचांच्या नक्षीने सजलेल्या पाच उंच खिडक्या आहेत. त्यांच्याखालील भागात उत्तम पॉलिश केलेल्या सागवानी लाकडावर काढलेल्या नक्षीने सजलेल्या खिडक्यांसारख्या दिसणार्या दहा कमानी आहेत. त्यांच्या खालच्या भागात, प्रत्येक बाजूला असलेल्या तीन रोमन स्तंभांच्या (कोलोनेड) मध्यभागात प्रवेशद्वार आहे. आत शिरताना, मध्यभागातील बसण्याची व्यवस्था आणि नाकासमोर असलेल्या गर्भगृहाने लक्ष वेधून घेतल्यामुळे, नजरेला न आलेल्या प्रार्थनागृहाच्या दोन्ही बाजूला असलेल्या कमानी आणि त्यांना तोलून धरल्यासारखे दिसणारे दुहेरी रोमन खांब आहेत. त्या कमानींवरच्या असलेल्या मजल्यावरच्या निरीक्षण गॅलर्या आणि गॅलर्यांत असलेल्या कमानीही आपले लक्ष वेधून घेतात...
अल्टारजवळून मागे वळून पाहिले की दिसणारी प्रार्थनागृहाच्या समोरच्या भिंतीची आतली बाजू
प्रार्थनागृहाच्या समोरच्या भिंतीवरील आतल्या बाजूने दिसणार्या रंगीत काचांच्या खिडक्या
प्रार्थनागृहाच्या घुमटाकारात बसवलेली रंगीत काचांची नक्षी
मुख्य प्रार्थनागृहाच्या बाजूच्या भिंतीतील खिडक्यांमधील, धार्मिक प्रसंग चित्रित करणारी रंगीत काचांची नक्षी, हे अनेक चर्चेसमध्ये दिसणारे वैशिष्ट्य येथेही प्रकर्षाने उठून दिसत होते...
रंगीत काचांची नक्षी असलेल्या खिडक्या
प्रार्थनागृहातल्या कार्यक्रमाला थोडा वेळ असल्याने प्रार्थनागृहाला लागूनच असलेल्या दालनात असलेले मंदिर (चॅपल) पहायला गेलो. चॅपलच्या भिंतींवरची कलाकुसर पाहण्याजोगी होती. चॅपलचा रस्त्यावर उघडणारा दरवाजा पूर्णपणे तांब्याचा बनवलेला आहे व तो चर्चच्या जुन्या इमारतीच्या बांधकामातून काढून आणलेला आहे. वातावरणाच्या परिणामाने हिरवी पुटे चढलेला तो जुनाट दरवाजा चर्चला प्राचीनतेची झलक देतो...
मंदिर (चॅपल)
चॅपलचे गर्भगृह (अल्टार) आणि जुन्या काळच्या इमारतीतून आणलेला तांब्याचा बाह्यदरवाजा
थोड्यावेळाने प्रार्थनागृहात परतलो तेव्हा भाविक जमले होते आणि चर्चचे धर्माधिकारी त्यांच्या जागेवर स्थानापन्न झालेले होते. आमच्या हाती दिलेल्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे एक धार्मिक प्रवचन झाले. हे एक गंभीर प्रकरण असेल असे वाटले होते. पण, प्रवचन नेहमीच्या वापरातल्या खेळीमेळीच्या भाषेत आणि विनोदी वचनांनी भरलेले होते. त्यातल्या सद्यस्थितीवरच्या आणि विशेषतः राजकारणावरच्या टिप्पणीमुळे श्रोत्यांमध्ये खसखस पिकत होती...
धर्माधिकारी : स्थानापन्न व प्रवचन देताना
इतका कार्यक्रम संपल्यावर, आमच्या कुतुहलाचा असलेल्या कोरस (समूह गायनाचा) कार्यक्रमाला वेळ असल्याने आम्ही चर्चमधून बाहेर पडून थोडी फेरी मारून परत आलो. तोपर्यंत जमा झालेली भाविकांची गर्दी तो कार्यक्रम लोकप्रिय असल्याचे दर्शवित होती. कोरस गायनाचा अर्ध्याएक तासाचा मुख्य कार्यक्रम झाल्यावर नंतरच्या धार्मिक गायनात श्रोत्यांनाही सामील करून घेतले गेले. श्रोत्यांना गायनात भाग घेणे सुलभ जावे यासाठी त्यांना कवनांच्या छापील प्रती दिल्या होत्या...
कोरस गायन
एक वेगळाच अनुभव घेऊन आम्ही बाहेर पडलो. पायर्या उतरताना चर्चच्या इमारतीला लागून असलेली चर्चची छोटीशी बाग दिसली. त्या इवल्याश्या जागेतही केलेला सौंदर्यपूर्ण बगिचा लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहिला नाही...
चर्चची बाग
(क्रमशः )
न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम
न्यू यॉर्क शहरात संग्रहालयांना तोटा नाही. एका संस्थळावरच्या यादीत २०० च्या वर संग्रहालयांची नावे आहेत ! ती सगळी बघायची म्हटली तर, फक्त संग्रहालये बघायचा मनसुबा करून, त्या शहरात सहा-आठ महिने ठाण मांडून बसायला लागेल ! थोड्या वेळात बरेच काही पहायचे असेल तर मग आपल्या आवडीनिवडीप्रमाणे बर्याच नावांवर काट मारून, एक गुणवत्ता यादी बनवून, तिच्यात वरच्या स्थानावरील काही नावेच निवडावी लागतात. अश्या प्रकारे बनवलेल्या माझ्या यादीत एक नाव होते, "न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम".
सन १९७६ साली स्थापन झालेल्या या संग्रहालयात, Metropolitan Transportation Authority (MTA) च्या अधिकारात न्यू यॉर्क शहरात चालवल्या जाणार्या सबवे प्रणाली, बस प्रणाली, जमिनीवरून जाणारी कम्म्युटर रेल्वे प्रणाली आणि एकंदर वाहतूक सुलभ करण्यासाठी बांधलेले पूल व नद्या-खाड्यांखालून जाणारे बोगदे, इत्यादींच्या संबंधित सन १९०७ पासूनच्या (शतकभरापेक्षा जास्त कालातले) इतिहासातील माहिती आणि वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. मुख्य म्हणजे, न्यू यॉर्कच्या विशाल सबवेची उभारणी करताना वापरलेले / झालेले मोठे तांत्रिक बदल तर इथले संग्रह दाखवतातच; पण, त्यापुढे जाऊन त्या कालखंडातील वाहतुकीतील बदलामुळे झालेल्या सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाची नोंदही येथे ठेवलेली दिसते. आणि त्याचबरोबर या महत्त्वाकांक्षी पण धोकादायक प्रकल्पात झालेल्या अनेक भयानक अपघातांची आणि त्यातील जीवहानीचीही नोंद इथे आहे. ११ नोव्हेंबर २००१ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा अतिरेकी हल्ला, २८-२९ ऑक्टोबर २०१२ ला आलेल्या हरिकेन सँडी, इत्यादींमुळे सबवेच्या प्रणालींचे झालेले नुकसान आणि त्यावेळी उडालेल्या गोंधळातून बाहेर येण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दलचे संग्रहही येथे पहायला मिळतात.
रोचक गोष्ट अशी की, हे संग्रहालय १९३६ साली ब्रूकलीनमध्ये सुरू केलेल्या पण सद्या वापरात नसलेल्या "कोर्ट स्ट्रीट" नावाच्या एका सबवे थांब्यामध्ये आहे ! त्याचे क्षेत्रफळ शहराच्या एका ब्लॉकइतके विशाल आहे. थांब्याचे मेझॅनिन मजला व प्लॅटफॉर्म्ससकट सगळे बांधकाम अजूनही उत्तम अवस्थेत आहे आणि इथला रेल्वेमार्ग आजही सुस्थितीत असून चालू असलेल्या रेल्वेमार्गाला जोडलेला आहे.
या जागेवर अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांचे चित्रीकरण झाले आहे... Guilty Bystander, The FBI Story, The Taking of Pelham One Two Three (मूळ १९७४ सालचा चित्रपट आणि त्याचा २००९ सालचा नवीन अवतार), Life on Mars (The Simple Secret of the Note In Us All), इत्यादी.
या संग्रहालयाची एक छोटी शाखा मॅनहॅटनमधील ग्रँड सेंट्रल टर्मिनलमध्ये आहे.
तर अश्या या अनवट संग्रहालयाला भेट देण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणेच सबवे पकडून ब्रूकलीनमध्ये पोहोचलो. इमारतींच्या भाऊगर्दीतून वाट काढत असताना गुगलमॅपने आम्ही संग्रहालयाजवळ पोहोचलो आहोत असे सांगितले. नेहमीच्या सवयीने डोळे एक भले मोठे आणि आकर्षक प्रवेशद्वार शोधायला लागले. पण तसे काहीच दिसेना. शेवटी एका इमारतीच्या कोपर्यावर, दोन मजल्याइतक्या उंच सडपातळ पाटीवर, सबवेच्या गणवेशातील कर्मचार्याच्या चित्रासह, संग्रहालयाचे नाव दिसले...
संग्रहालयाची पाटी आणि ती पाटी असलेल्या इमारतीचा, प्रवेशद्वाराविना असलेला, दर्शनी भाग
पण, त्या पाटीखाली प्रवेशद्वारच दिसत नव्हते. इकडे तिकडे सगळीकडे पाहूनही अपेक्षित असलेले भलेमोठे प्रवेशद्वार कोठेच दिसले नाही. त्या पाटीच्या जवळ गेल्यावर तिच्या खालच्या भागात, जमिनीच्या दिशेने निर्देश करणारा, एक छोटा बाण दिसला. पाटीच्या खाली उभे राहिल्यावर इमारतीच्या कोपर्यापलिकडच्या फूटपाथवर जमिनीखाली जाणारे सबवेचे एक सर्वसामान्य प्रवेशद्वार दिसले. त्याच्यावर थांब्याचा पाटीऐवजी संग्रहालयाचे नाव पाहिले आणि ध्यानात आले की, अरे हेच आहे ते संग्रहालयाचे प्रवेशद्वार !...
संग्रहालयाचे प्रवेशद्वार
या कल्पकतेने चकित व्हावे की असा साधा दर्शनी भाग असलेल्या संग्रहालयात काही रोचक बघायला मिळेल काय अश्या संभ्रमात पडावे, अशी द्विधा मन:स्थिती घेऊन जिन्याच्या पायर्या उतरलो. सबवेच्या तिकिटघरासारख्या स्वागतकक्षात संग्रहालयाचे तिकिट काढून आत गेलो आणि मनातल्या सगळ्या शंका विरून जाऊ लागल्या. शहराच्या एका अख्ख्या ब्लॉकइतके मोठे क्षेत्रफळ असलेल्या या संग्रहालयातल्या वस्तू अनेक विभागांत संग्रहित केलेल्या आहेत. त्या एक एक करत पाहण्यात केव्हा रमून गेलो ते कळलेच नाही.
पोलाद, पाषाण आणि कणा (Steel, Stone and Backbone)
या भागात, विसाव्या शतकात सबवे बांधताना वापरल्या गेलेल्या बांधकाम पद्धती आणि त्यामध्ये काम करणार्या कामगारांच्या जीवनाशी संबंधीत वस्तू, चलतचित्रपट्टीका, प्रकाशचित्रे, इत्यादींचे संग्रह आहेत.
सबवेचे काम चालू असतानाही त्याच्या वर असलेल्या जमिनीवरचे उद्योग निर्वेधपणे चालू होते हे अभिमानाने सांगणारे चित्र
बांधकामप्रणालीच्या विविध पायर्यांचा प्रकाशचित्ररूपाने जपलेला इतिहास
सबवे बांधकाम कर्मचार्यांचे वेतनदर आणि त्यांच्या नेहमीच्या गरजेच्या वस्तूंचे दर
सुरुवातीच्या काळातले लोहमार्ग व त्यांच्यावरच्या थांब्यांची प्रातिनिधिक प्रकाशचित्रे
नदी किंवा खाडीच्या पाण्याखालून जाणार्या रेल्वेबोगद्यांच्या बांधकामाची पद्धत दाखवणारे चित्र
शहराच्या पोटातून बोगदे खणत सबवे मार्ग पुढे पुढे नेणे अत्यंत धोकादायक काम होते. त्यासाठी त्या काळात आजच्यासारखा पूर्वानुभव गाठीला नव्हता किंवा उत्तमोत्तम आधुनिक मशीनरीही नव्हती. अर्थातच, ते काम अत्यंत धोकादायक होते, अनेक लहानमोठे अपघात त्या कामाच्या इतिहासात विखुरलेले आहेत आणि त्यात अनेक कामगारांच्या प्राणाची आहुती पडलेली आहे. त्यापैकी महत्त्वाच्या अपघातांची नोंद आपल्याला येथे पहायला मिळते...
सबवे उभारणीच्या कामात झालेल्या काही अपघातांची नोंद
सबवे कार्यप्रणाली (Operations)
सबवेचे तिकिट विकत घेण्यासाठी, ते तपासून प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यासाठी आणि गाड्यांची अव्याहत विनासमस्या येजा चालू ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या कार्यप्रणालींचे अनेक संग्रह येथे आपल्याला जवळून पहायला मिळतात. या भागात फिरताना जणू तो इतिहासच आपण अनुभवत असतो...
काळाबरोबर बदलत गेलेल्या सबवे प्लॅटफॉर्मवरच्या प्रवेशप्रणाली
काळाबरोबर बदलत गेलेली सबवे थांब्यांवर प्रवेश करण्यासाठी वापरात असलेली धातूची नाणी (स्लग्ज / टोकन्स)
गंमत म्हणजे, गैरमार्गाने सबवे थांब्यावर जाण्यासाठी या नाण्यांच्याऐवजी वापर केली गेलेली नकली नाणी अथवा धातूचे तुकडेसुद्धा येथे संग्रहित करून ठेवलेले आहेत ! गेली पाच एक वर्षे त्या कामासाठी धातूचे नाणे न वापरता, सबवे आणि बस दोन्हींना सामायिक असलेले इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर चालणारे प्लास्टिकचे "मेट्रोकार्ड" वापरले जाते. त्या मेट्रोकार्डाचे आजतागायत बदलत गेलेले अनेक अवतारही येथे जतन करून ठेवलेले आहेत...
काळाबरोबर बदलत गेलेले मेट्रोकार्डाचे अवतार
सबवे प्रणाली सतत उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सबवेचे जुन्या काळचे नियंत्रणकक्ष आणि अवजारे
रस्त्यावरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा संग्रह (On the Streets Exhibit)
न्यू यॉर्क ट्रांझिट व्यवस्थेअंतर्गत रस्त्यावरून धावणार्या सार्वजनिक बसेसची व्यवस्थाही येते. किंबहुना एकच "मेट्रोकार्ड" सबवे व बस या दोन्ही व्यवस्थांना सामायिकपणे वापरता येते. सबवेतून बाहेर पडून, दोन तासांच्या आत त्याच, दिशेने पुढे जाणारी बस पकडल्यास मेट्रोकार्डातील पैसे कमी न करता "एक्स ग्रेशिया उर्फ फुकट" प्रवास करता येतो.
या विभागात १८००च्या शतकापासून तर आजतागायत बदलत गेलेल्या काही बसेसच्या भागांच्या पूर्णाकृती आहेत. त्यांच्यात बसून त्यांचा पूर्ण अनुभव घ्यायला परवानगी आहे. कोणत्याही प्रकारे, "इथे जाऊ नका, याला हात लावून नका", अशी बंधने अजिबात नाहीत आणि तसे दटावण्यासाठी कोणते संरक्षकही तेथे हजर नसतात. संग्रहालयाला भेट देणारे छोटे पाहुणे त्या सवलतींचा पुरेपूर उपयोग करून धमाल करताना दिसत होते...
बच्चेकंपनीची जुन्या बसमधील धमाल
या संग्रहालयाच्या "T.F Rahilly Trolley and Bus Study Center" या विभागात वेगवेगळ्या काळातील ट्रॉलीज, बसेस आणि दुरुस्ती व्हॅन्सच्या काटेकोर प्रमाणात बनवलेल्या ५० प्रतिकृती आहेत. ज्यांना अश्या मॉडेल्समध्ये रस आहे त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच आहे...
ट्रॉलीज व बसेसच्या काटेकोर प्रमाणात बनवलेल्या प्रतिकृती
सूचनांच्या जुन्या पाट्या (Vintage Signs)
जुन्या काळी वापरात असलेल्या प्रवाशांसाठी सूचना लिहिलेल्या पाट्यांचा एक वेगळा विभाग आहे...
वाहतूक व्यवस्थेतील सूचनांच्या जुन्या पाट्या
या पाट्यांतील "थुंकू नका", "धूम्रपान निषेध", "आपल्या कुत्र्यांची घाण आपणच साफ करा", इत्यादी पाट्या पाहून; आज सहजपणे सर्वत्र दिसणारी शिस्त आणि स्वच्छता जुन्या काळी न्यू यॉर्कमध्ये अस्तित्वात नव्हती हे समजते. आपण भारतात आज अनुभवत असलेल्या बेशिस्त, अस्वच्छता, इत्यादी समस्या न्यू यॉर्कलाही काही काळापूर्वी भेडसावत होत्या हे त्यांच्यावरून समजते. ते पाहून आपले बर्यापैकी मनोरंजन तर होतेच, पण उत्तम प्रशासन ही अनवस्था बदलू शकते याची जाणीव होऊन, दूरवर कुठेतरी आशेचा किरण मनात चमकून जातो.
पोस्टर्स
येथे वाहतुकीशी संबंधित विषयांवरची रोचक पोस्टर्स आहेत...
सामाजिक परिवर्तन दाखवणारी पोस्टर्स : वर्णभेद आणि स्त्री-सबलीकरण
न्यू यॉर्क शहरातील सामाजिक परिस्थितीचे चित्रण करणारी पोस्टर्स
संग्रहालयात चलतचित्रपट्टीका दाखविणारे एक छोटेसे थिएटर आहे. सबवेच्या जुन्या मोटरव्हॅनचा कल्पक उपयोग करून त्याचे प्रवेशद्वार बनवलेले आहे...
सबवेच्या जुन्या मोटरव्हॅनच्या डब्याचा उपयोग करून बनवलेले संग्रहालयातील चलतचित्रपटगृहाचे प्रवेशद्वार
सबवेच्या बदलत्या डब्यांचा जिवंत इतिहास
मेझॅनिन मजल्यावरचे संग्रह पाहून झाल्यावर तेथून एक जिना उतरून सबवेच्या प्लॅटफॉर्मवर गेलो. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला अजूनही कार्यरत असलेल्या सबवे प्रणालीला जोडलेले रूळ आहेत. त्यांच्यावर गेल्या शतकभरात वापरलेल्या सबवेच्या डब्यांचे नमुने रांगेने उभे केलेले आहेत. त्या डब्यांच्या बदलत गेलेल्या आकाराचे आणि अंतर्गत रचनेचे केवळ बाहेरून निरीक्षण तर करता येतेच, पण डब्यांत मुक्तपणे फिरून व आसनांवर बसून त्यांचा पुरेपूर अनुभव घेता येतो...
प्लॅटफॉर्म
प्लॅटफॉर्मवर उभे असलेले वेगवेगळ्या कालखंडातले सबवेचे डबे ०१
प्लॅटफॉर्मवर उभे असलेले वेगवेगळ्या कालखंडातले सबवेचे डबे ०२
सद्यकाळातला सबवेचा डबा
सबवेच्या डब्यांतील जाहिराती
प्रत्येक डब्याच्या कालखंडात त्याच्या आत लावलेल्या जाहिराती उत्तम अवस्थेत राखून ठेवलेल्या आहेत. हा जुन्या काळातला रोचक अमूल्य खजिना आपले लक्ष वेधून घेतो. त्यातील काही...
सबवेच्या डब्यातील जाहिराती ०१
सबवेच्या डब्यातील जाहिराती ०२
सबवे थांब्यांचे जुने अवशेष
बंद झालेल्या व जीर्णोद्धार केलेल्या सबवे थांब्यांचे काही रोचक अवशेषांचा एक संग्रह प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेला आहे...
जुन्या सबवे थांब्यांचे अवशेष
एक अनवट संग्रहालय पाहून बाहेर पडलो आणि "आतापर्यंत माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहात" अशी जोरदार तक्रार पोटोबाने करायला सुरुवात केली. चिरंजीवाच्या अल्मामाटरच्या ब्रूकलीन ब्रिजजवळील डॉर्मशेजारच्या त्यांच्या खास पसंतीच्या रेस्तराँच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. वाटेत ब्रूकलीनचे झालेले हे चित्ताकर्षक दर्शन...
ब्रूकलीनचे मनोहारी दर्शन
(क्रमशः )
सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल
सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल (Cathedral of St. Patrick किंवा St. Patrick's Cathedral) ही न्यू यॉर्क शहरातली एक महत्त्वाची खूण (लँडमार्क) समजली जाते. ख्रिश्चन धर्मातील पंथाच्या विभागीय मुख्य चर्चला, जेथे बिशपच्या स्तराचा धर्माधिकारी असतो, कॅथेड्रल असे म्हणतात. ५वा अॅव्हन्यू आणि ५० व ५१व्या स्ट्रीट्सच्या मध्ये असलेले सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल हे रोमन कॅथॉलिक पंथाचे अमेरिकेतील (युएसए) मुख्यालय आहे. ते रॉकंफेलर सेंटरला लागून आहे आणि सेंट बार्टच्या चर्चपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे, त्यामुळे ही तीन ठिकाणे एका फेरीत आणि अर्ध्या-पाऊण दिवसात पाहता येण्यासारखी आहेत... आम्हीही या तीन प्रेक्षणीय स्थळांना अशीच भेट दिली होती. मात्र, या कॅथेड्रलचा प्रत्येक भाग अगदी जवळून बघायचा असेल तर रविवारची गर्दी टाळून इतर दिवशी जाणे योग्य होईल.
या चर्चच्या जागेचा इतिहास रोचक आहे. शहराच्या त्या वेळच्या मुख्य वस्तीपासून ४-५ किमी दूर असलेली ही जागा १८१० साली जेसुईट समुदायाने खरेदी करून तेथे एक महाविद्यालय सुरू केले. १८१४ साली कॉलेज बंद पडले आणि ती जागा ख्रिश्चन मुख्यालयाने (diocese) विकत घेऊन फ्रान्समध्ये होणार्या छळापासून पळून आलेल्या ट्रॅपिस्ट नावाच्या पंथाच्या लोकांना दिली. आपले चर्च चालवण्याखेरीज या लोकांनी ३३ अनाथ मुलांची जबाबदारीही उचलली. पुढच्याच वर्षी नेपोलियनचा पाडाव झाल्याने परिस्थिती सुधारली आणि ट्रॅपिस्ट फ्रान्सला परत गेले. त्यामुळे, अनाथगृहाची जबाबदारी मुख्यालयाने उचलली आणि मोकळी पडलेली चर्चची जागा भविष्यात दफनभूमी बनवण्यासाठी राखून ठेवली गेली. सन १८४० साली बिशपने परिसरातल्या लोकांसाठी आणि जवळच्या मुकबधिर आश्रयगृहात काम करणार्या कॅथॉलिकांसाठी तेथील प्रार्थनागृह (चॅपल) परत सुरू केले. मुख्यालयाने १९४१ साली तेथे एक लहानसे चर्च बांधले. त्याचा खर्च दानधर्माची तिकिटे विकून चालविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. कर्जबाजारी झालेल्या चर्चला १८४४ साली लिलाव करून विकले गेले.
जवळच्या महाविद्यालयातील एका सदनाचा तात्पुरते चर्च म्हणून उपयोग करून, रेव्हरंड मायकेल ए कुर्रान (Rev. Michael A. Curran) नावाच्या एका तरुण तडफदार धर्माधिकार्यावर चर्चची इमारत परत विकत घेण्यासाठी पैसे जमा करण्याचे काम सोपवले गेले. त्या सुमारास आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ (The Great Irish Famine) पडला होता, तरीही तेथील लोकांनी स्वतःचे पोट मारून चर्चसाठी सढळ हाताने दान दिले. अश्या रितीने या चर्चची जागा, न्यू यॉर्क शहरवासींच्या नव्हे तर आयरिश लोकांच्या त्यागातून मुख्यालयाच्या परत ताब्यात आली. १८५३ साली येथे एका मुख्यालय-चर्चची (कॅथेड्रल) गरज आहे असे ठरवले गेले तोपर्यंत या जागेवरचे सर्व कर्ज फिटले होते. १५ ऑगस्ट १८५८ साली कॅथेड्रल बांधणीचे काम सुरू झाले, पण अमेरिकन यादवी युद्धामुळे (सिविल वॉर) ते खंडित झाले आणि सर्व काम पुरे होईपर्यंत १८७८ साल उजाडले. २५ मे १८७९ ला कॅथेड्रलचे उद्घाटन केले गेले. त्यानंतरच्या काळात मुख्य इमारतीचा विस्तार केला गेला आणि तिच्या आजूबाजूला अनेक छोट्यामोठ्या बांधकामाची भर पडत गेली आहे. निओगोथिक शैलीत बांधलेल्या मुख्य इमारतीत १८८८ साली दोन निमुळत्या मनोर्यांची भर पडली तेव्हा ती त्या काळची न्यू यॉर्क शहरातली सर्वात उंच आणि अमेरिकेतील दुसर्या क्रमांकाच्या उंचीची इमारत बनली होती.
या कॅथेड्रलचे चित्रण व उल्लेख अनेक सामाजिक माध्यमांत झालेले आहेत. उदाहरणार्थ : Planet of the Apes (1970) व Gremlins 2: The New Batch (1990) हे चित्रपट; Futurama ही टीव्ही मालिका; Cathedral (Nelson DeMille, 1981) व Empire of Dreams (Giannina Braschi, 1994) या कादंबर्या; आणि Not A Love Story (Kait Kerrigan and Brian Lowdermilk) हे गाणे.
या कॅथेड्रलला अनेक अतिरेकी हल्ल्यांना तोंड द्यावे लागले आहे. १३ ऑक्टोबर १९१४ साली इमारतीच्या पश्चिमोत्तर कोपर्याजवळ जमिनीत अर्धा मीटर खोल खड्डा पडेल इतक्या शक्तीच्या बाँबचा स्फोट झाला. यामागे कम्युनिस्टांचा हात असावा असे म्हटले जाते. त्यावेळी पूर्ण भरलेल्या कॅथेड्रलमध्ये प्रार्थना चालू असूनही, सुदैवाने, भाविकांपैकी कोणालाही इजा झाली नाही. कॅथेड्रलजवळून जाणार्या एका मुलाला धातूचा एक तुकडा चाटून गेला, ही एकच इजा त्या स्फोटामुळे झाली. २ मार्च १९१५ ला फ्रँक अबार्नो नावाच्या एका इटालियन अराजकवाद्याने (anarchist) कॅथेड्रलमध्ये बाँब आणला होता. पण पोलिसांनी त्याला स्फोट करण्याआधी पकडले. तो आणि त्याच्या साथीदाराला कोर्टाने ६-१२ वर्षांच्या कैदेची शिक्षा केली. १९५१ आणि १९५२ या दोन वर्षांत या कॅथेड्रलला उडवून देण्याच्या, पत्राने आणि फोनवरून, एकूण सहा धमक्या दिल्या गेल्या. सुदैवाने या कॅथेड्रलची सुंदर इमारत अजूनही सुखरूप आणि दिमाखाने उभी आहे. आजही रविवारच्या प्रार्थनेला हे कॅथेड्रल भाविकांनी ओसंडून जाते.
***************
सेंट बार्टच्या चर्चवरून चालत आम्ही सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रलकडे जात असता वाटेत ही कलाकारी दिसली. जवळ गेल्यावर लक्षात आले की त्या एकुलती एक धातूची तार वळवून बनवलेल्या कलाकृती होत्या. पांढर्या कागदाच्या पार्श्वभूमीमुळे, दुरून ती कागदावरची रेखाटने असल्याचा आभास होत होता !...
धातूची तार वाकवून केलेली कलाकारी
जरा पुढे गेल्यावर आधुनिक गगनचुंबी इमारतींच्या जंगलात, आपल्या बांधकामशैलीच्या वैशिष्ठ्याने उठून दिसणारी, कॅथेड्रलची इमारत दिसू लागली...
कॅथेड्रलचे प्रथमदर्शन
आजूबाजूच्या गगनचुंबी इमारतींमुळे कमी उंचीच्या वाटणार्या या इमारतीचा खरा आवाका, तिच्या जवळपास गेल्यावरच आपल्या नजरेत भरतो. शहराचा एक पूर्ण ब्लॉक व्यापून असलेल्या या इमारतीची लांबी १०१.२ मी (३३२ फू), रुंदी ५३ मी (१७४ फू) आणि निमुळत्या मनोर्यांसह उंची १००.६ मी (३३० फू) आहे. ती एकवेळेस ३००० भाविकांना सामावून घेऊ शकते. मध्यभागी भव्य प्रवेशद्वार आणि दोन बाजूंना उंच मनोरे असलेली ही इमारत "डेकोरेटेड निओ-गोथिक (अमेरिकन पुनरुज्जीवन, American Gothic Revival)" शैलीत बांधलेली आहे.
सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलचा प्लॅन (जालावरून साभार)
कॅथेड्रलचा दर्शनी भाग
या कॅथेड्रलची भव्यता एकाच प्रकाशचित्राच्या चौकटीत पकडायची असेल तर त्याच्या समोरचा रुंद ५वा अॅव्हन्यू ओलांडून पलीकडच्या फूटपाथवर शक्य तितके दूर उभे रहावे लागते...
सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलचा पूर्णाकृती दर्शनी भाग
इमारतीच्या जवळ गेल्यावर तिच्या आणि तिच्या मध्यभागच्या प्रवेशद्वाराच्या भव्यतेची खरी कल्पना आपल्याला येते. मुख्य प्रवेशद्वार पितळ वापरून बनवलेले आहे. त्याच्या दरवाजाच्या प्रत्येक फळीचे वजन ४२०९ किग्रॅ (९२८० पाउंड) आहे. मात्र, त्यांची दरवाज्यातली ठेवण इतकी संतुलित आहे की दार उघडण्यासाठी एका व्यक्तीने लावलेला जोर पुरेसा असतो. दरवाज्यावर संतमहात्म्यांची ठाशीव चित्रे आहे. दरवाज्याच्या वरच्या पितळी कमानीत येशू ख्रिस्त, हवेत उडणारे देवदूत आणि भोवताली भाविकांची गर्दी दाखवणारे ठाशीव चित्र आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूला गोलाकार भिंतीत असलेले कोलोनेड प्रकारचे खांब प्रवेशद्वाराची भव्यता आणि सौंदर्य अधिकच खुलवतात...
कॅथेड्रलचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरच्या समोर उभे राहून वर पाहिल्यास वरच्या कसबी कोरीव कमानी आणि त्यांच्या दोन्ही बाजूने सुळक्यांसारखे वर जाणारे निमुळते मनोरे पाहताना डोक्यावरची टोपी सहज खाली पडेल !...
इमारतीच्या जवळून दिसणारा कॅथेड्रलचा वरचा दर्शनी भाग
प्रार्थनागृह व वेदीगृह (Altar)
कॅथेड्रलमध्ये शिरल्या शिरल्या भाविकांनी पूर्ण भरलेले मुख्य प्रार्थनागृह आणि त्याच्या दूरच्या टोकाला असलेले वेदीगृह समोर आले. इमारतीचा अंतर्भाग, धार्मिक मुख्यालयच्या स्थानाला साजेसा भव्य आणि प्रभावी बनविण्यात कोणतीच कसर ठेवलेली दिसत नाही. प्रत्येक रचना... खांब, छत, भिंती, खिडक्या, आसने, इत्यादी... भाविकांच्या मनावर दीर्घकालीन छाप पाडेल अश्या प्रकारे काळजीपूर्वक काटेकोरपणे सजवलेली दिसत होती. एकंदरीत हे कॅथेड्रल सुंदर आणि सधन असल्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या.
आम्ही गेलो तेव्हा तेथे रविवारचे खास प्रवचन चालू होते. बसायच्या सर्व जागा भरल्या असल्याने अनेकजण मागच्या बाजूला उभे होते. आमच्यासारखे पर्यटक त्यांच्यामागून व त्यांच्यातून वाट काढत समारंभ आणि कॅथेड्रल दोन्ही जमेल तेवढे पाहून घेत होते. कॅथेड्रलचे सर्व भाग जवळून पहायचे असले तर रविवार टाळून तेथे जाणे जास्त चांगले हे आधी म्हटले आहे ते यामुळेच.
तेथे काढलेले हे काही फोटो...
प्रार्थनागृह आणि त्याच्या दूरच्या टोकाला असलेले वेदीगृह
प्रवचन चालू असताना काढलेला वेदीगृहाचा (sanctuary) फोटो (जवळून, झूम इन करून)
गोथिक आर्केड शैलीचे छत
प्रार्थनागृहाच्या छतावरची पारंपरिक आर्केड्स असलेली गोथिक नक्षी
रोमन कोलोनेड शैलीचे खांब व गॅलेरिया
प्रार्थनागृहातील रोमन कोलोनेड शैलीचे खांब, त्यांच्यावरील गॅलेरिया
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
प्रवचन शेवटच्या भाविकापर्यंत पोहोचण्यामध्ये प्रवचनकारापासूनचे अंतर किंवा खांब (कोलोनेड) यांचा अडथळा येऊ नये यासाठी आधुनिक दृक्श्राव्य तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग केलेला दिसत होता...
भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
रंगीत काचांच्या नक्षीदार खिडक्या
पारंपरिक प्रथेप्रमाणे या कॅथेड्रलच्या खिडक्या रंगीत काचेच्या चित्रांनी सजवलेल्या आहेत. या कामासाठी, नामवंत अमेरिकन आणि युरोपियन कलाकारांना पाचारणे केले गेले होते...
रंगीत काचांच्या चित्रांनी आणि नक्षीने सजवलेल्या खिडक्या
उपमंदीरे आणि कलापूर्ण धार्मिक प्रतीके
मुख्य प्रार्थनागृहाच्या भिंतींना लागून अनेक उपमंदीरे आणि धार्मिक प्रतीके आहेत. त्यापैकी प्रत्येक आपापल्यावैशिष्ठ्यपूर्ण कलाकुसरीने बघण्यासारखे आहे. त्यातील काहींचे फोटो..
एक उपमंदीर
इतर काही उपमंदीरे
भिंतीवरची एक सागवानी कलाकृती
इथले ऑर्गन्स प्रसिद्ध आहेत. त्यातल्या मुख्य ऑर्गनला ९००० पाइप्स, २०६ स्टॉप्स, १५० रॅक्स आणि १० डिव्हिजन्स आहेत. प्रार्थना (सर्विस) चालू असल्याने तो जवळून बघू शकलो नाही.
एकंदरीत संपूर्ण कॅथेड्रल जवळून पहायला मिळाले नाही तरी, जेवढा भाग पहायला मिळाला तो सुद्धा पुरेसा प्रभावी होता. पुढे केव्हा शक्य झाले तर, रविवार सोडून इतर कोणत्या दिवशी या चर्चला भेट देण्याचे ठरवून बाहेर पडलो.
(क्रमशः )
काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस
मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारतींपासून ते क्वीन्समधील हिरळींनी वेढलेली आधुनिक विशाल टाऊनहाऊसेस आणि त्या दोन टोकांच्या मध्ये असलेल्या अनेक शैलीतल्या आधुनिक इमारती या शहरात दाटीवाटीने नांदत आहेत. न्यू यॉर्क शहर तर, सतत कात टाकत नवनवीन रूप धारण करणार्या महानगरांच्या यादीत, बहुदा पहिल्या क्रमांकावर असावे. किंबहुना, याच सतत पुनर्निर्माण आणि नवीनिकरण करण्याच्या ध्यासासाठी हे शहर जगप्रसिद्ध आहे. अश्या महानगरांचा जसजसा विकास होत जातो तसतशा त्यांच्या भूमीवरच्या जुन्या काळाच्या साक्षीदार असलेल्या रहिवासी इमारती नष्ट होत जातात. जगातल्या बहुतेक शहरांतील शतकभरापेक्षा जास्त जुन्या रहिवासी इमारती आता केवळ प्रकाशचित्रांच्या रूपानेच शिल्लक उरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, येथे दोन शतकांपेक्षा जास्त जुने खाजगी घर अजूनही अस्तित्वात आहे... आणि मुख्य म्हणजे ते मॅनहॅटनचा उत्तर भाग शेतीवाडीने व्यापलेला ग्रामीण भाग असताना बांधलेले "फार्महाउस" आहे हे कळले तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. जालावरून अधिक माहिती काढली तर असे कळले की, ते फार्महाउस "डिक्मान फार्महाउस म्युझियम" या नावाने जनतेला पाहण्यास खुले आहे. मग तर त्याला भेट देणे अपरिहार्यच झाले !
जर्मनीमधील वेस्टफालिया (Westphalia) येथून विल्यम डाईकमानने १६६१ मध्ये अमेरिकेत स्थलांतर केले. १७४८ मध्ये त्याने मॅनहॅटनच्या पूर्वकिनार्यावर हार्लेम नदीकिनारी घर बांधले. अमेरिकन यादवी युद्धात ते नष्ट झाल्याने त्याने, १७८५ साली, त्याच्या २५० एकर शेतीवाडीवर, सद्याच्या जागी, हे फार्महाउस बांधले. हे घर न्यू यॉर्क शहरामधील सर्वात जुनी वास्तू आहे आणि डच वसाहत शैलीत बांधकाम असलेले एकुलते एक घर आहे. डाईकमानच्या मालमत्तेपैकी, ब्रॉडवे आणि २०४वा स्ट्रीट यांच्या चौकाला लागून असलेला, "फार्महाउस आणि त्याच्या आजूबाजूचे काही आवार" इतकाच भाग आता संग्रहालयाच्या रूपाने बाकी राहिला आहे. बाकी इतर सर्व जागा शहरी इमारतींनी गजबजून गेली आहे.
डिक्मान फार्महाउसची जुनी प्रकाशचित्रे (सन १८७५, १८९०, १८९० व १९३४) (जालावरून साभार)
अनेक डाईकमान पिढ्यांनी वापर केल्यानंतर, हे घर १८६८ मध्ये विकले गेले. नवीन मालकाने ते अनेक दशके भाड्याने देण्यासाठी वापरले. दुर्लक्ष झाल्याने ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ते मोडकळीला आले. ते नष्ट होऊ नये यासाठी डिक्मान कुटुंबातील मेरी आणि फॅनी नावाच्या दोन भगिनींनी त्याची १९१५ मध्ये परत खरेदी केली आणि फॅनीच्या अलेक्झांडर नावाच्या आर्किटेक्ट असलेल्या नवर्याच्या मदतीने त्याचा जीर्णोद्धार करून ते १९१६ मध्ये न्यू यॉर्क शहराला दान केले. या इमारतीत डिक्मान कुटुंबाच्या मालकीच्या, डच कोलोनियल जीवनात वापरल्या जाण्यार्या, वस्तूंचे संग्रह आहेत.
आम्ही राहत होतो ब्रॉडवे, बेनेट अॅव्हन्यू आणि १९२व्या रस्त्यांच्या संगमावर. तेव्हा, ब्रॉडवे आणि २०४वा स्ट्रीट यांच्या चौकाला लागून असलेले हे घर, आमच्या संध्याकाळच्या ब्रॉडवेच्या अनेक फेरफटक्यांमध्ये कसे दिसले नाही, असा प्रश्न साहजिकपणे मनात आला. पण, जेव्हा त्या फार्महाउसचा फोटो मी जालावर पाहिला तेव्हा ध्यानात आले की, हे घर आपण बघितले आहे आणि "उंच इमारतींच्या गर्दीत दिसलेले एक जुन्या शैलीतले बसके घर" म्हणून त्याचा फोटोही काढला आहे !...
डिक्मान फार्महाउसचा आजचा अवतार ०१
डिक्मान फार्महाउसचा आजचा अवतार ०२
मूळ घराचा अनेकदा जीर्णोद्धार होत होत या घराचा सद्द्याचा अवतार बनलेला आहे. तरीही त्याच्या मूळ रूपाला फार मोठा धक्का न लावण्याची काळजी घेतलेली आहे. फिल्डस्टोन प्रकारचा दगड, विटा व लाकूड वापरून बांधकाम केलेल्या या इमारतीला पुढे-मागे उतरते छप्पर (gambrel roof) आहे व पुढे-मागे सर्व लांबीभर व्हरांडे आहेत. पावसाचे पाणी व्हरांड्यांत येऊ नये यासाठी छपराला पन्हळी (spring eaves) आहेत. तळघर व दोन मजले असलेल्या या घरात पॅसेजेसनी जोडलेल्या अनेक बसण्याच्या खोल्या (parlors, सिटिंग रूम्स, हॉल) आणि झोपण्याच्या खोल्या आहेत. हिवाळ्यात वापरायचे एक स्वयंपाकगृह (winter kitchen) मुख्य इमारतीत आहे, तर मागच्या परसात, एका स्वतंत्र छोट्या इमारतीत, उन्हाळ्यात वापरायचे दुसरे स्वयंपाकगृह (smokehouse-summer kitchen) आहे.
इमारतीच्या आराखड्याचा उभा काप (व्हर्टिकल सेक्शन)
या संग्रहालयाला १९६७ पासून New York City Landmark व National Historic Landmark असा दर्जा मिळालेला आहे. अनेक टीव्ही मालिकांत याचे चित्रण आलेले आहे.
***************
एका सकाळी न्याहारी आटपून घरापासून चालत १५-२० मिनिटांच्या अंतरावर असलेला हा न्यू यॉर्कचा जिवंत इतिहास पहायला आम्ही निघालो. या संग्रहालयाकडे ब्रॉडवेच्या पदपथावरून जायचे किंवा त्याला लागून असलेल्या फोर्ट ट्रायॉन पार्कमधिल पायवाटेने जायचे असे दोन विकल्प होते. अर्थातच, आम्ही दुसरा मार्ग निवडला. उन्हाळ्याच्या दर आठवड्याला नवनवीन फुलोर्यांनी सजणार्या त्या पायवाटेने आमचे स्वागत करण्यात या वेळेसही कसर सोडली नव्हती...
संग्रहालयाच्या दिशेने नेणार्या फोर्ट ट्रायॉन पार्कममधिल पायवाटेवरचे फुलोरे
ब्रॉडवेच्या पदपथाला लागून असलेल्या दहाएक पायर्या चढून वर गेल्यावर फार्महाऊसच्या आवारात प्रवेश केला. सर्वात प्रथम पुरुष-दीडपुरूष उंचीची मोहरीची हिरवी-पिवळी लागवड समोर आली...
फार्महाउसच्या पुढच्या आवारातील मोहरीची लागवड
मोहरीच्या लागवडीच्या वाफ्याच्या उजवीकडून, बाजूच्या फुलझाडांनी सुशोभित असलेली विटांची पायवाट आपल्याला घराच्या दर्शनी भागातील पडवीवर नेणार्या लाकडी पायर्यांकडे घेऊन जाते...
विटांची पायवाट आणि फार्महाउसच्या दर्शनी भागातील पडवीवर नेणार्या लाकडी पायर्या
पायर्या चढून वर गेल्यावर आपण लाकडी जमीन असलेल्या पडवीत येतो. पडवीला पुढच्या पायर्या सोडून सर्व लांबीभर आणि एका बाजूला पूर्ण कठडा आहे, तर दुसर्या बाजूला बागेत उतरून जाण्यासाठी लाकडी पायर्या आहेत. इमारतीची पुढची पूर्ण भिंत दगडी आहे. विटांनी बनलेला पृष्ठभाग व दरवाजे-खिडक्या सोडल्या तर इतर इमारतीच्या सर्व बाह्य दगडी आणि लाकडी पृष्ठभागाला पांढरा रंग दिलेला आहे...
पुढची पडवी
भरभक्कम लाकडी मुख्य दरवाजा ढकलून आत गेल्यावर पुढच्या-मागच्या पडव्यांना जोडणार्या घराच्या पूर्ण लांबीभर असलेल्या पॅसेजमध्ये आपण येतो. तेथे बसलेल्या एका शाळकरी वयाच्या स्वयंसेवक स्वागतिकेने स्वागत करून घराची प्राथमिक ओळख करून दिली आणि आम्हाला तेथे मुक्तपणे फिरून घर बघायला सांगितले.
मुख्य दरवाज्याजवळच असलेले, पॅसेजच्या उजवीकडचे एक दार आपल्याला एका दिवाणखान्यात नेते. तेथे घर उबदार ठेवण्यासाठी थंड प्रदेशात जुन्या काळी वापरली जाणारी चिमणी, भिंतीतील जुनी कपाटे आणि काही लाकडी खुर्च्या होत्या. या दिवाणखान्याचा माहितीसदन असा उपयोग केलेला होता. टेबलांवर अनेक माहिती पत्रके ठेवलेली होती. एका मोठ्या टेबलावर लेगोचे तुकडे वापरून फार्महाउसची प्रतिकृती बनवलेली होती...
पॅसेजच्या उजवीकडील दिवाणखाना ०१
पॅसेजच्या उजवीकडील दिवाणखाना ०२ : फार्महाउसचे मॉडेल
जुन्या डच शैलीतल्या जांभळ्या रंगाच्या सहा टाइल्स मिळून बनवलेली १८१५ सालची दोन चित्रे (Delft tile panel) इथे ठेवलेली आहेत. त्यांच्यामध्ये नेदरलंडमधिल त्या काळाच्या जीवनाचे चित्रण आहे. अश्या चित्रांनी घरे सजवण्याची फॅशन त्या काळच्या सधन लोकांत होती. चित्रांच्या बाजूला शेतीवाडीत उपयोगात आणली जाणारी घोड्यांचे नाल, हुक्स, इत्यादी उपकरणे आहेत...
पॅसेजच्या उजवीकडील दिवाणखाना ०३ : डच टाइल्सनी बनवलेली चित्रे आणि शेतकीच्या कामाची उपकरणे
पॅसेजच्या डाव्या बाजूला, पहिल्या दिवाणखान्याच्या विरुद्ध दिशेला अजून एक दिवाणखाना आहे. हा जरा जास्त भारदस्त आहे. चिमणी, जमिनीवरचा रंगीत लोकरीचा गालिचा, काळ्या लॅकरचा लेप असलेल्या बैठकीला गादी लावलेल्या खुर्च्या, दोन लाकडी टेबले, कोपर्यात एक मोठे लंबकाचे घड्याळ, खणांची सोय असलेले एक लिखाणकामाचे (रायटिंग) डेस्क, इत्यादी बराच जामानिमा या दिवाणखान्यात बघायला मिळतो. मध्यभागात ठेवलेल्या टेबलावर, जुन्या काळचे एक वर्तमानपत्र (द न्यू यॉर्क कोलंबियन, ऑक्टोबर ८, १८९८ ची आवृत्ती), खेळण्याचे पत्ते आणि काही पत्रके ठेवली होती...
पॅसेजच्या डावीकडील दिवाणखाना ०१
पॅसेजच्या डावीकडील दिवाणखाना ०२
पॅसेजमधून थोडे पुढे गेल्यावर एक छोटेखानी झोपण्याची खोली दिसली. आकार लहान असला तरी आतला बिछाना, खुर्ची, एका गोल टेबलावरची रचना, इत्यादी व्यवस्था सधनता दाखवणारी होती...
तळमजल्यावरील झोपण्याची खोली
पॅसेजच्या भिंतीवरच्या एका काचेच्या कपाटात फार्मवर वापरली गेलेली भांडी व इतर काही गोष्टी होत्या...
फार्मवर वापरली गेलेली भांडी
तळमजला पाहून झाल्यावर पॅसेजला लागून असलेल्या पायर्या उतरून गेल्यावर आपण तळघरातल्या थंडीच्या दिवसांत वापरल्या जाणार्या स्वयंपाक घरात उतरतो. तेथे भिंतीमधील एका खाचेत, सूप आणि कॅसरोल शिजविण्यासाठी आणि गरम ठेवण्यासाठी, काहीशी बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडी शिजविण्याच्या प्रणाली सारखी, व्यवस्था दिसली !...
तळघरातले थंडीच्या दिवसांत वापरायचे स्वयंपाकघर ०१
ही जागा रोजच्या जेवणात वापरायचे मांस, भाज्या आणि फळफळावळ निवडणे, साठवणे व शिजविणे यासाठी वापरली जात असे. यासाठी डिक्मान कुटुंबाकडे दोन गुलाम असल्याची नोंद तिथल्या माहितीपत्रकात वाचायला मिळाली. त्यासाठी जरूर असणारी डिक्मान कुटुंबाने वापरलेली टेबले, फडताळे, भांडी, तबके, इत्यादी सामग्री तेथे आहे. त्यापैकी छताला टांगलेल्या एका आकर्षक नक्षीदार दिव्याने लक्ष वेधून घेतले...
तळघरातले थंडीच्या दिवसांत वापरायचे स्वयंपाकघर ०२
तळघरातून तळमजल्यावर येऊन मग पहिल्या मजल्यावर जाताना, जिन्याच्या भिंतींवर फार्महाउसचे वेगवेगळ्या कालखंडांत काढलेले फोटो, तेथे वापरल्या गेलेल्या वस्तूंची चित्रे आणि नवनिर्माण करताना त्याच्या परिसरात सापडलेल्या गोष्टींचा एक छोटासा चित्रमय इतिहास बघायला मिळतो. भरतकाम करून काढलेले फार्महाउसचे एक सुंदर चित्रही तेथे आहे...
फार्महाउसचा चित्रमय इतिहास
भरतकाम करून काढलेले फार्महाउसचे चित्र
तिरके छप्पर असल्याने पहिल्या मजल्यावरच्या सर्व खोल्यांच्या एका बाजूचे छप्पर तिरके आहे. कोंकणातल्या जुन्या घरांत अश्या तिरक्या छपरांच्या पोटमाळ्यांचा उपयोग आंबे, कांदे, तांदूळ, जुन्या किंवा नेहमीच्या वापरात नसलेल्या वस्तू, इत्यादी साठवून ठेवण्यास केला जातो. इथे मात्र त्यांचा नेहमीच्या वापराच्या, झोपण्याची खोली व बैठकीच्या खोली, यासारखा उपयोग केलेला दिसतो.
झोपायच्या खोलीतले प्रिंटेड कापड वापरून गोधडीसारखे हाताने शिवलेले बेड कव्हर आणि त्या काळाचा चिनी मातीचा टी सेट पाहण्यासारखे होते. तेच, चारखांबी पलंगाच्या, खुर्च्या-टेबलांच्या नजाकतीबद्दल आणि फार्महाउसमधिल स्त्रियांच्या वेशांबद्दल म्हणता येईल. तेथिल वस्तूंवरून, हे कुटुंबप्रमुखाचे मास्टर बेडरूम असल्याचे प्रतीत होत होते...
वरच्या मजल्यावरचे मास्टर बेडरूम ०१
वरच्या मजल्यावरचे मास्टर बेडरूम ०२
इथल्या बैठकीची खोलीतले फर्निचरही इतर खोल्यांपेक्षा उच्च दर्जाचे आहे...
वरच्या मजल्यावरची बैठकीची खोली
या फार्महाउसमध्ये आणि शेतीवाडीवर वापरलेल्या अनेक वस्तू वरच्या मजल्यावरच्या पॅसेजमध्ये काचेच्या आवरणात जपून ठेवलेल्या आहेत...
वरच्या मजल्यावरच्या पॅसेजमध्ये ठेवलेल्या जुन्या वस्तूंचे संग्रह
परत तळमजल्यावर येऊन पॅसेजमधून इमारतीच्या मागच्या पडवीमध्ये गेल्यावर फार्महाउसचे मागचे आवार दिसते. मध्यम आकाराच्या या आवारात हिरवळ, भाज्या पिकवण्याची जागा (किचन गार्डन) आणि लहान आकाराच्या काही स्वतंत्र इमारती आहेत. त्यापैकी उन्हाळी स्वयंपाकघर एक आहे...
मागच्या पडवीतून दिसणार्या मागच्या आवाराचा काही भाग
मागच्या आवारातले उन्हाळी स्वयंपाकघर व किचन गार्डन
मागच्या आवारात एक खास इमारत आहे, तिचे नाव आहे हेसियन हट (Hessian Hut). अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धामध्ये (१७७५-१७८३), अमेरिकन स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध लढण्यासाठी, ब्रिटनने जर्मनीच्या प्रिन्स फ्रेडरिक (दुसरा) बरोबर करार करून ३०,००० जर्मन सैनिक अमेरिकेत आणले. यातल्या बहुतांश सैनिकांची मायभूमी जर्मनीतली हेसन-कासेल (Hessen Kassel) नावाची जागा होती. त्यामुळे, त्या सैनिकांना "हेसियन्स" असे नाव मिळाले. युद्ध संपल्यावर यातले अनेक सैनिक अमेरिकेच्या पेन्सिल्वानिया आणि मेरिलँड या राज्यांत स्थायिक झाले.
युद्धकालात जेव्हा ब्रिटिशांचा न्यू यॉर्कवर ताबा होता तेव्हा त्यांनी डिकमान फार्मपैकी बरीच जमीन ताब्यात घेऊन तेथे यातील काही सैनिकांना राहण्यासाठी साठ छोटी घरे बनविली. त्यांच्या विशिष्ट बांधणीमुळे त्यांना हेसियन हट असे नाव पडले. बराच काळ विस्मृतित गेलेल्या या जागेवर, १९१४ साली रेजिनाल्ड पेलहॅम बोल्टन नावाच्या एका हौशी पुरातत्त्वज्ञाला, हेसियन हट्सचे अवशेष सापडले. १९१५ मध्ये त्याने इथे उत्खनन करून मिळालेले अवशेष वापरून एक पूर्णावस्थेतील हेसियन हट उभी केली.
मागच्या आवारातली हेसियन हट
१९१६ सालापासून जनतेला खुले झालेले डिक्मान फार्महाउस संग्रहालय, त्याच्या परिसरातल्या नागरिकांसाठी वर्षभर सतत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माहितीवर्धक कार्यक्रम आयोजित करत असते. आम्ही मागच्या आवारात फिरत असतानाच, तेथे उभारलेल्या एका तात्पुरत्या तंबूखाली मुलांना चित्रकलेचे धडे देणारे एक छोटे शिबिर सुरू झाले होते...
फार्महाउसच्या मागच्या आवारात तात्पूरता तंबू उभारून चालू असलेले चित्रकला शिबिर
फार्महाउसच्या हिरवळीवर चालू असलेली नागरिकांची एक सभा (जालावरून साभार)
जालावरच्या माहितीत असे सुद्धा कळले की हे संग्रहालय उत्तम अवस्थेत ठेवण्यामागे परिसरातले अनेक तरुण स्वयंसेवक सतत झटत असतात...
स्वयंसेवक संग्रहालयाच्या सफाईचे काम करताना (जालावरून साभार)
शहरांच्या प्रसरणात, आघुनिकीकरणाच्या ओघात आणि आर्थिक समिकरणांच्या शक्तीपुढे, जुन्या ग्रामीण संस्कृतीचे नष्ट होणे, हा जगभर पहायला मिळणारा परिणाम आहे. त्यामुळे, अमेरिकेतील सर्वात मोठ्या महानगराच्या काँक्रिट जंगलात दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास जपत उभ्या असलेल्या या फार्महाउसला भेट देणे हा नक्कीच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक अनुभव होता !
शहराचा वरवरचा आधुनिक, चकचकीत, मोहक मुलामा खरवडून, त्याच्या खालचे असे रोजच्या जीवनातले सत्य बघायला मिळाले की, "तात्पुरते वैयक्तिक हितसंबंध बाजूला सारून, आपला इतिहास आणि आपली खरी ओळख दाखवणार्या खाणाखुणा जपण्याची", सधन असलेल्या-नसलेल्या सर्व नागरिकांची हातात हात घालून चाललेली धडपड अचानक समोर येते. एखाद्या जागेचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्वत्व दाखविणारे रूप पहायला मिळाले की माझा भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो.
(क्रमशः )
जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल
न्यू यॉर्क शहरात फिरताना लांब लांबची अंतरे पार करायला सबवे ही फार सोयीची व वेळ वाचवणारी सोय आहे. मात्र, तिचा ९५% पेक्षा जास्त भाग जमिनीखालून जातो. याचा फार मोठा तोटा म्हणजे, न्यू यॉर्क शहर पाहायला आलेल्या बहुसंख्य प्रवाशांना, फक्त शहराच्या दक्षिण टोकावरचे काँक्रिटचे जंगल दिसते व सर्व शहर तसेच असेल असे वाटते. मात्र, जरा जास्त वेळ हाताशी असला आणि बसने प्रवास करता आला तर मात्र शहराच्या वैविध्यपूर्ण इमारती, संस्कृती आणि समाजांचे दर्शन घेता येते. हे आपण एका पुढच्या भागात जरा विस्ताराने बघूच. पण, इथे त्याची आठवण येण्याचे कारण असे की, शहराचा फेरफटका करताना, मॅनहॅटनच्या दक्षिणेकडून उत्तरेकडच्या घरी परतताना, वेळ हाताशी असल्यास, सबवे ऐवजी बसने येणे आम्ही पसंत करत असू. हा पर्याय जवळ जवळ दुप्पट किंवा जास्त वेळ खाणारा होता, पण त्यामुळे शहराच्या विविध रूपांची जी ओळख झाली ती कितीही वर्णने वाचून अथवा फोटो पाहून होणे शक्य नव्हते.
अश्याच एका बसच्या प्रवासात अनपेक्षितपणे एक खास फायदा झाला. अॅमस्टरडॅम अॅव्हन्यूवरून परतत असताना अचानक एक प्राचीन शैलीतली भव्य वास्तू दिसली. तिला निरखून पाहण्यात फोटो घेण्याची आठवण झाली नाही. मात्र, तिच्या जवळच्या खाणाखुणांची नोंद करून ठेवली. घरी आल्यावर गुगलबाबावर शोधाशोध केली तेव्हा कळले की ती इमारत म्हणजे तीन ब्लॉक्सच्या भव्य आवारातले तितकेच भव्य चर्च आहे. अर्थातच त्याची माझ्या भेट देण्याच्या गोष्टींच्या यादीत भर पडली. या अनपेक्षित दृश्याने व अचानक केलेल्या निर्णयाने माझ्या या भटकंतीच्या आनंदात मोलाची भर टाकली हे मात्र नक्की.
कॅथेड्रलची भव्य इमारत व तीन ब्लॉक्स व्यापणारे तिचे आवार (मूळ नकाशा जालावरून साभार)
कॅथेड्रलची भव्य इमारत व तिचे तब्बल तीन ब्लॉक्स व्यापणार्या आवाराचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)
***************
हे १२० वर्षांपेक्षा जास्त जुने चर्च "कॅथेड्रल ऑफ सेंट जॉन द डिव्हाईन" किंवा अधिकृतरीत्या "कॅथेड्रल चर्च ऑफ सेंट जॉन" या नावाने ओळखले जाते. त्याने अॅमस्टरडॅम अॅव्हन्यू आणि मॉर्निंगसाईड ड्राइव्ह याच्यामधील १०० ते ११३व्या स्ट्रीट्समधील तब्बल तीन ब्लॉक्सचा ४. ७ हेक्टर (११. ५ एकर) परिसरात व्यापला आहे. हे अँग्लिकन पंथाच्या न्यू यॉर्क विभागाचे (Episcopal Diocese of New York) मुख्य चर्च उर्फ कॅथेड्रल असले तरीही, हे चर्च कोणत्याच एका पंथाला बांधील नाही. त्यामुळे त्याच्या उद्येशांमध्ये वैविध्यपूर्ण धार्मिक विषयांबरोबर अनेक वाङ्मयीन, सांकृतिक, सामाजिक, शैक्षणिक, इत्यादी विषयासंबंधी मुद्दे समान महत्त्वाचे समजले गेले आहेत. इथे प्रार्थना करायला धर्म, पंथ आणि समाजाचे बंधन नाही. थोडक्यात हे चर्च धार्मिक कारणांएवढेच अधार्मिक (सेक्युलर) कारणांसाठी व्यासपीठाचे काम करते. या विविध उद्येशांना धरून येथे वर्षभर चर्चासत्रे, कार्यशाळा, सांगीतिक कार्यक्रम, प्रदर्शने, सामाजिक सभा, इत्यादी आयोजित केले जातात.
सन १८८७ मध्ये, आपल्या कॅथेड्रलची इमारत, सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलशी स्पर्धा करणारी असावी या विचाराने या चर्चच्या प्रकल्पाची सुरुवात झाली. सन १८८८ मध्ये एका सार्वजनिक स्पर्धेद्वारे याच्या इमारतीचा बायझेंटाइन-रोमनस्क-पुनरुज्जीवन शैलीतला (Byzantine Romanesque Revival styles) पहिला आराखडा मान्य केला गेला. १८९२ मध्ये सुरुवात झालेल्या बांधकामामध्ये, दोन महायुद्धांच्या काळात मनुष्यबळाची कमतरता झाल्याने खंड पडला. पैशाची चणचण तर पहिल्यापासून सतत पाठपुरावा करत होती आणि ती आजतागायत चालू आहेच. अर्थातच, चर्चचे बांधकाम सतत खंड पडत आणि अत्यंत संथगतीने चाललेले आहे.
चर्चच्या उद्द्येश्यांच्या वैविध्याचा परिणाम इमारतीच्या शैलीवर झाला नसता तरच आश्चर्य होते! त्याचबरोबर, शतकापेक्षा जास्त कालखंडातील बदलत्या विश्वस्तांच्या आवडीप्रमाणे बांधकामाची शैलीही बदलत गेली. १९०९ साली मूळ आराखड्यात बदल करून बांधकामात गोथिक पुनरुज्जीवन शैलीला प्राधान्य दिले गेले. अश्या अनेक बदलांमुळे, या चर्चाचे गर्भगृह गोथिक शैलीत आहे; घुमट रोमनस्क शैलीत आहे; अंतर्गत उपमंदिरे फ्रेंच, इंग्लिश व स्पॅनिश गोथिक शैलीत आहेत; कॉईर स्टॉल्स गोथिक शैलीत आहेत; इमारतीत रोमन कमानी व स्तंभ आहेत; आणि नॉर्मन व बायझेंटाइन शैलीच्या झलका जागोजागी आहेत.
या चर्चच्या इमारतीमध्ये १८९९ साली पहिली प्रार्थना केली गेली. ३० नोव्हेंबर १९४१ रोजी चर्चची इमारत नेहमीच्या वापरासाठी खुली केली गेली आणि आठवड्याभरात जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला व अमेरिका दुसर्या महायुद्धात ओढली गेली. त्या काळाच्या बिशपने चर्चच्या इमारतीवर खर्च करण्याऐवजी ते पैसे समाजातील गरजूंसाठी वापरण्याचे ठरवले व बांधकाम मागे पडले. मात्र, चर्चची इमारत अपूर्ण असली तरी, तेव्हापासून काही खंड सोडता, येथे नियमित धार्मिक समारंभ होत आहेत.
पैशाची चणचण या कॅथेड्रलच्या पाचवीलाच पुजलेली आहे असे दिसते. त्यामुळे केवळ त्याचे बांधकामच शतकापेक्षा जास्त वेळ निघून गेल्यावरही अपुरे राहिले आहे असेच नाही तर धार्मिक कार्यक्रमांसाठी आणि मोठ्या आवारात असलेल्या कॅथेड्रलसह इतर इमारतींच्या देखभालीसाठी होणारा खर्च उभा करणे नेहमीच दुरापास्त ठरले आहे. त्यातच, २००१ साली ही इमारत मोठ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यातून सावरून नोव्हेंबर २००८ मध्ये परत सुरू झालेल्या या चर्चची इमारत अजूनही पूर्णपणे बांधून झालेली नाही. पैशाच्या समस्येवर उपाय म्हणून २००८ नंतर आवारातील जमिनीचे दोन तुकडे आधुनिक रहिवासी वापराच्या इमारती बांधण्यासाठी खाजगी विकासकांना दीर्घ मुदतीच्या लीजने दिलेले आहेत. त्यातून दरवर्षी मिळणार्या सुमारे $५५ लाख उत्पन्नाने रोजमर्राचा खर्च निभावून नेला जात आहे.
नवीन बांधकाम आणि नुकसानीच्या जीर्णोद्धाराचे काम, ही दोन्ही कामे इथे हातात हात घालून दीर्घकाल चालू आहेत. कॅथेड्रलचा सर्व इतिहास पाहता त्याची इमारत कधीकाळी बांधून पूर्ण होईल काय यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे, या चर्चला गमतीने "सेंट जॉन द अनफिनिश्ड" असे म्हटले जाते! असे असले तरीही, जे काही बांधकाम पूर्ण झाले आहे तेही पूर्णावस्थेतील असंख्य नावाजलेल्या चर्चेसच्या इमारतींना मागे टाकेल यात संशय नाही.
इमारतीचा दर्शनी भाग
सबवेच्या कोलंबिया विद्यापीठ स्थानकावर उतरून ब्रॉडवेवर आलो आणि ११२व्या स्ट्रीटवर वळून काही अंतर गेल्यावर दूरवरून हिरव्या झाडीतून डोकावणारी कॅथेड्रलची इमारत दिसू लागली. तिच्या दर्शनी भागातील फुलाची नक्षी असलेली ४० फूट व्यासाच्या गोलाकार खिडकीने लक्ष वेधून घेतले. मात्र, बाहेरून दिसणार्या दगडी कोरीवकामापेक्षा अधिक काही आश्चर्यकारक गुण तिच्यात आहेत जे चर्चच्या इमारतीमध्ये गेल्यावर आपल्याला दिसतात...
कॅथेड्रलचे प्रथमदर्शन
जवळ गेल्यावर या इमारतीचा फोटो काढताना ध्यानात येते की मागे वळून इमारतीसमोरचा भला रुंद अॅमस्टरडॅम अॅव्हन्यू ओलांडून परत विरुद्ध बाजूच्या फूटपाथवर गेल्याशिवाय ते शक्य नाही. तेथूनही सर्व इमारत एका फोटोच्या चौकटीत बसवताना बरीच खटपट करावी लागते आणि ते काम जेमतेम साधते...
कॅथेड्रलचा दर्शनी भाग
इतक्या दुरून काढलेल्या फोटोत पूर्ण इमारत बसते पण तिचे स्थापत्य आणि कलाकुसरीचे बारकावे लपून जातात. मग जवळ येऊन एक एक भाग निगुतीने बघून त्याला फोटोत बंदिस्त केल्याशिवाय समाधान होत नाही.
१९८० मध्ये इमारतीच्या दर्शनी भागातल्या दोन मनोर्यांच्या आराखड्यापैकी दक्षिणेकडील मनोरा बांधण्याचे काम सुरू झाले. मूळ इमारतीच्या उंचीत १५ मीटरची भर पडल्यावर ते काम थांबविण्यात आले. हा अर्धवट दक्षिण मनोरा आणि न बांधलेला उत्तर मनोरा, ही इमारतीच्या अपूर्णतेची बाह्यरूपी साक्ष आजही आपले लक्ष वेधून घेते...
दर्शनी भागाचा वरचा भाग
दोन्ही मनोरे पूर्ण बांधून झाले असते तर कॅथेड्रल कसे दिसले असते हे इमारतीमध्ये असलेल्या चित्रांवरून आपल्याला पाहता येते...
कॅथेड्रलची इमारत पूर्ण बांधून झाल्यावर ती कशी दिसेल त्याचे चित्र
इमारतीच्या दर्शनी भागात एकूण आठ दरवाजे आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारात दोन, त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक आणि त्यांच्या पलीकडे प्रत्येक बाजूला अजून एक दरवाज्यांची जोडी आहे...
दर्शनी भागाचा खालचा भाग
इमारतीच्या जवळ गेल्यावर आपल्याला तिच्या बांधणीतले स्थापत्य, कला आणि धर्मावर आधारीत बारकावे दिसू लागतात. दर्शनी भागाच्या सर्वात मध्यभागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारात काशाचे दोन भव्य दरवाजे आहेत. त्यांना विभागणारा एक खांब आहे व त्यांच्या दोन्ही बाजूंना कोरीव खांबांच्या मालिका आहेत. प्रत्येक दरवाज्यावर स्वतंत्र कोरीव कमान आहे आणि त्यांच्यावरच्या असलेल्या एका सामायिक कमानीत असलेल्या गोलाकारात येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे. दरवाज्यांच्या बाजूच्या खांबांच्या मालिका अर्धगोलाकार पोर्चच्या स्वरूपात आहेत आणि ते खांब वरच्या बाजूला नक्षीदार कमानीत परावर्तित होतात...
मुख्य प्रवेशद्वार
पोर्चच्या खांबांवर ख्रिस्ती संतांची शिल्पे कोरलेली आहेत...
मुख्य प्रवेशद्वाराच्या पोर्चचे कोरीव खांब
मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन दरवाज्यांच्या चार फळ्या, प्रत्येकी १८ फू X ६ फू आकाराच्या व ६ टन वजनाच्या आहेत. जगप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवतेचा पुतळ्याची बांधणी करणार्या बार्बेडिएन् (Barbedienne) याच फ्रेंच कंपनीने त्यांची घडण केली आहे. त्यांच्यावर बायबलमधील कथांवर आधारित एकूण ६० ठाशीव चित्रे आहेत...
मुख्य प्रवेशद्वारातील दरवाजे (बाहेरून)
मुख्य दरवाजे केवळ खास कार्यक्रमांसाठी उघडले जातात. त्यांच्या बाजूच्या एकेरी दरवाज्यांपैकी एक नेहमीच्या व्यवहारांसाठी वापरला जातो. एकेरी दरवाजे एखाद्या जुन्या वाड्याच्या दरवाज्यांसारखे आहेत. त्यांच्यावरच्या कमानींची नक्षी मात्र कलात्मक होती...
मुख्य दरवाज्यांचा बाजूच्या एकल दरवाजा असलेल्या प्रवेशद्वारांपैकी नेहमीच्या वापरात असलेले एक व त्याच्या दरवाज्याची एक फळी
सर्वात बाहेरच्या बाजूंच्या दरवाज्यांच्या जोड्या मात्र शिल्पे व कलाकुसरीने मढवलेल्या आहेत...
उपप्रवेशद्वारांवरील नक्षी ०१
उपप्रवेशद्वारांवरील नक्षी ०२
अंतर्भाग : प्रवेशद्वाराजवळील भाग
बाहेरूनच इतके बघण्यातच बराच वेळ गेल्यावर, "अरे, आता आत जायला हवे! " ही जाणीव झाली! :) उघड्या एकल दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच स्वागतकक्ष दिसला, तेथून माहितीपत्रके उचलली. आतापर्यंतचा इमारतीचा अनुभव आणि माहितीपत्रके पाहून ध्यानात आले की हे प्रकरण नीट समजून घ्यायचे असल्यास, मार्गदर्शकासह सहल करण्याला पर्याय नाही. कर्मधर्मसंयोगाने वीस एक मिनिटात एक सहल सुरू होणार होती. ताबडतोप तिचे आरक्षण केले.
कॅथेड्रल आणि त्याच्या आवाराचा आराखडा (कॅथेड्रलच्या माहितीपत्रकावरून साभार) :
१. मुख्य प्रवेशद्वारातले काशाचे दरवाजे, २. चाळीस फूट व्यासाची वर्तुळाकार 'ग्रेट रोज खिडकी',
३. नाकाशिमाचे 'अल्टार ऑफ पीस' टेबल, ४. पंधराव्या शतकातला 'जर्मन कॉईर स्टॉल', ५. पोएट्स कॉर्नर,
६. द फायरमॅन मेमोरियल, ७. सभागृहातील (नेव्ह) 'पिलग्रिम्स पेव्हमेंट्स'',
८. सभागृहाच्या बाजूच्या भिंतीलगत असलेले चवदा 'थिमॅटिक बेज', ९. पीटर गुर्फेनचे 'फेट ऑफ द अर्थ' कोलाज,
१०. शॅलो डोम, ११. कॅथेड्रलचा सांस्कृतिक व कलापूर्ण वस्तूंचा खजिना (निवडक बार्बेरिनी टेपेस्ट्रीज इथे आहेत),
१२. थायलंडच्या राजाने दिलेल्या भेटवस्तू, १३. द ग्रेट ऑर्गन, १४. बॅप्टिस्ट्री,
१५. मार्टिन ल्यूथर किंग, आईन्स्टाईन, सुसान अँथनी आणि महात्मा गांधी याचे समुहशिल्प,
१६. दोन जपानी क्लॉइसोन व्हासेस, १७. दोन बारा फुटी मेनोराज (वृक्षाकारी कँडल स्टँड),
१८. अल्टारभोवतीचे आठ विक्रमी ग्रॅनाइट स्तंभ, १९. अमेरिकेतील स्थलांतरित
समूहाचे प्रतिनिधित्व करणारी सात प्रार्थनामंदीरे (चॅपल्स), २०. 'लाईफ ऑफ
ख्राईस्ट' अल्टार पीस, २१. माऊंट रशमोअरवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची
शिल्पे कोरणार्या शिल्पकाराची कलाकृती.
जगात कोणते कॅथेड्रल सर्वात मोठे आहे याची चर्चा केली जाते तेव्हा हे कॅथेड्रल आणि लिव्हरपूल (इंग्लंड) कॅथेड्रल यांच्यामध्ये निर्णय करणे कठीण होते. काही बाबतीत हे कॅथेड्रल वर आहे तर काही बाबतीत लिव्हरपूलमधिल कॅथेड्रल. ११, २०० चौ मीटर (१, २१, ००० चौ फूट) अंतर्गत क्षेत्रफळ (कार्पेट एरिया) असलेल्या या इमारतीची लांबी १८३. २ मी (६०१ फू) व उंची ७०. ७ मी (२३२ फू) आहे. त्याच्या प्रार्थनागृहाची (नेव्ह) आतून मोजलेली उंची ३७. ८ मी (१२४ फू) भरते.
मुख्य दरवाज्याचा आतील भाग
इमारतीच्या आत गेल्यावर मुख्य दरवाज्याचे वेगळे स्वरूप पाहायला मिळते. त्यांचे आतले पृष्ठभाग घासून पुसून पॉलिश केलेले आहेत. त्यांच्यावर आतही एकूण साठ ठाशीव चित्रे आहेत. मात्र, आत प्रामुख्याने पाने-फुले-पक्षी-प्राणी-चिन्हे इत्यादी वापरून बनवलेली नक्षी आहे...
मुख्य प्रवेशद्वारातील दरवाजे (आतून) : पूर्णाकार दाखवणारे चित्र आणि दोन ठाशीव चित्रे जवळून पाहताना
या दरवाज्यांचा वरच्या कमानीत एक रंगीत काचेची नक्षीदार खिडकी आहे...
कॅथेड्रलच्या दर्शनी भागाच्या अंतर्भागाचा मध्यभाग
रोज खिडकी
या खिडकीवर एक गॅलरी आहे. गॅलरीच्या, डोक्यावरची टोपी (किंवा, हॅट) पडेल इतके, वर पाहिले की बाहेरून दिसलेल्या ४० फूट व्यासाच्या वर्तुळाकार रोज (गुलाब) खिडकीचे आंतरिक मोहक रूप दिसते. तिला रंगीत काचांच्या १०, ००० तुकड्यांच्या नक्षीने सजवलेले आहे. तिच्या मध्यभागातील असलेली ख्रिस्ताची मूर्ती पुर्णाकृती (लाईफ-साइज) आहे. ही आकाराने अमेरिकेतील सर्वात मोठी रंगीत काचांची खिडकी आहे. खूप उंचावर असल्यामुळे या खिडकीचे सौंदर्य जवळून दिसते त्यापेक्षा जरा दूर जाऊन पाहिले की जास्त खुलून दिसते. त्यामुळे, इमारत पाहत पुढे पुढे जाताना सतत मागे वळून पाहण्याचा मोह आपल्याला पडतो...
४० फूट व्यासाची 'द ग्रेट रोज' खिडकी
अंतर्भाग : नेव्ह (Nave)
मुख्य दरवाज्याकडे पाठ करून उभे राहिले की या इमारतीच्या अंतर्भागाच्या भव्यपणाची झलक दिसते...
प्रवेशद्वाराच्या बाजूने दिसणारा कॅथेड्रलचा अंतर्भाग ०१
सभागृहाच्या दोन्ही बाजूचे भव्य स्तंभ आणि छतांवरील नक्षीत रोमन आणि गोथिक शैलीची सरमिसळ आहे...
प्रवेशद्वाराच्या बाजूने दिसणारा कॅथेड्रलचा अंतर्भाग ०२
पण जसजसे आपण पुढे पुढे जातो तेव्हा, ती भव्यपणाची जाणीव पुरेशी नव्हती आणि १८३ मीटरपेक्षा जास्त लांब म्हणजे नक्की किती लांब हे हळूहळू ध्यानात येत जाते!
अल्टार ऑफ पीस
नेव्हमध्ये सर्वप्रथम उजव्या बाजूला असलेले एक भव्य टेबल दिसते. ३०० वर्षे वयाच्या ब्लॅक वॉलनटच्या झाडाच्या खोडापासून बनवलेले हे 'अल्टार ऑफ पीस' नावाचे टेबल सन १९८६ मध्ये नाकाशिमा नावाच्या जगप्रसिद्ध कसबी सुताराने (मास्टर वूडवर्क क्राफ्ट्समन) भेट दिलेले आहे. सात खंडांना अशी सात टेबले देण्याची त्याची इच्छा आहे. आजतागायत त्याने या टेबलाखेरीज, भारत (ऑरोव्हिल, तामिळनाडू, भारत, आशिया मधील हॉल ऑफ पीस) व रशियाला (युरोप) त्याने टेबल भेट दिले आहे...
नाकाशिमाचे 'अल्टार ऑफ पीस'
जर्मन कॉईर स्टॉल्स
त्यापुढे, सभागृहाला (नेव्ह) आडवे छेदणार्या भिंतीसारख्या उंच्यापुर्या जर्मन कॉईर स्टॉल्सची (चर्चमध्ये संघगान करणार्या गायकांना बसण्यासाठीचा बेंच) मागची बाजू दिसते. ही न्यू यॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्टने काही कालासाठी कॅथेड्रलमध्ये प्रदर्शित केलेली वस्तू आहे. प्राचीन जर्मन चर्चमधून आणलेल्या शिसूसारख्या काळ्या रंगाच्या लाकडापासून बनलेल्या या पाच शतके जुन्या भरभक्कम बेंचवर प्रत्येक बाजूला सात गायकांना बसण्याच्या जागा आहेत आणि त्या मधल्या आडव्या कलापूर्ण पट्टीने एकमेकाला जोडलेल्या आहेत. त्या पट्टीखालील रुंद प्रवेशद्वारासारख्या जागेतून आपल्याला सभागृहाच्या (नेव्ह) पुढील भागात जाता येते व मागे वळून स्टॉल्स पाहता येतात...
जर्मन कॉईर स्टॉल्स (पार्श्वभूमीवर इमारतीच्या दर्शनी भागाचा अंतर्भाग)
पिल्ग्रिम्स पेव्हमेंट
चर्चच्या जमिनीवरील टाइल्स भाविकांनी दान केलेल्या पैशातून बसवलेल्या आहे त्यामुळे त्यांना 'पिल्ग्रिम्स पेव्हमेंट' असे म्हणतात. जमिनीच्या मध्यभागी असलेल्या काळ्या टाइल्सच दोन पट्ट्यांमध्ये ख्रिस्ताशी संबंधीत अथवा त्याने भेट दिलेल्या धर्मक्षेत्रांची प्रतिनिधित्व करणारी काशाची पदके (मेडॅलियन्स) आहेत...
सभागृहाच्या (नेव्ह) जमिनीच्या मध्यभागी असलेली काशाच्या पदकांपैकी काही
अजून एक खास पदक
थिम्ड बेज (विषयवार लघुविभाग)
नेव्हच्या दोन्ही बाजूच्या भिंतीलगत प्रत्येक बाजूला सात असे एकूण चौदा चौकोनी विभाग (बेज) आहेत. त्यातला प्रत्येक एका व्यवसायाला किंवा मानवी आयुष्याशी संबंधीत विषयाला वाहिलेला आहे आणि तेथे त्या विषयाशी संबंधीत वस्तू किंवा कलाकृती प्रदर्शित केलेल्या आहेत. अल्टारकडे पाहत असताना उजव्या बाजूला क्रमाने संतमहात्मे (ओला सेंट्स), कामगार, संचार, वैद्यकशास्त्र, पृथ्वी आणि सैन्य असे विभाग आहेत; तर डावीकडे खेळ, बनलेल्या (क्रूसेडर्स), शिक्षण, कायदा, अँग्लिकन आणि अमेरिकन असे विभाग आहेत. या विषयांच्या निवडीवरून या चर्चच्या सर्वसमावेशक व निधर्मी (सेक्युलर) उद्येशांच्या प्रामाणिकपणाची कल्पना येते.
त्यातील काही विभागांची प्रकाशचित्रे...
ऑल सेंट्स बे
अर्थ बे मध्ये पीटर गुर्फेन नावाच्या कलाकाराने बनविलेले २४ कांस्यपट्टीकांचे कोलाज आहे. प्रत्येक पट्टीकेवर पर्यावरणाच्या हानीच्या वेगवेगळ्या प्रकाराचे (जंगलांचा ऱ्हास, नष्ट होणाऱ्या प्रजाती, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, इत्यादी) दृश्य आहे...
अर्थ बे मधले पीटर गुर्फेनचे 'फेट ऑफ द अर्थ' कोलाज
मिलिटरी / आर्म्ड फोर्सेस बे
लेबर बे, लॉ बे आणि मेडिसिन बे
अंतर्भाग : क्रॉसिंग
नेव्ह ओलांडून आपण क्रॉसिंग नावाच्या दालनात प्रवेश करतो...
अल्टारच्या बाजूने क्रॉसिंगमधून मागे वळून घेतलेल्या या फोटोत क्रॉसिंगचा
काही भाग आणि नेव्ह दिसत आहेत. दूरवर जर्मन कॉईर स्टॉल्स व त्यांच्या वर
दर्शनी भागातल्या दोन रंगीत काचांच्या खिडक्या दिसत आहेत, यावरून
इमारतीच्या दालनांच्या भव्यतेची कल्पना येते.
शॅलो डोम
नेव्ह ओलांडून आपण क्रॉसिंग नावाच्या पुढच्या दालनात येतो. कॅथेड्रलचा पुढचा (नेव्ह) व मागच्या (कॉइर व अल्टार) भागांना जोडणाऱ्या या विशाल चौकोनी भागाला क्रॉसिंग असे म्हणतात. हा भाग सर्वात शेवटी बांधायला घेतला होता. तो कसा असावा यासंबंधी मतभेद होते. याच्यावर असलेला घुमट (शॅलो डोम) हा केवळ तात्पुरते छप्पर म्हणून सन १९०९ मध्ये घाईघाईत केवळ १५ आठवड्यांत बांधला गेला. त्यानंतर काहीच काम शक्य न झाल्याने तो आजही तसाच शेवटचा हात न फिरवलेल्या अपूर्ण अवस्थेत आहे. या डोमची उंची इतकी आहे की त्याच्या खाली (पाया सोडून) स्वातंत्र्यदेवतेची अख्खी मूर्ती ठेवता येईल!...
क्रॉसिंगवरचा अपूर्ण शॅलो डोम
क्रॉसिंगला पुढे नेव्हला व मागे कॉईर व अल्टार असलेल्या भागाला सांधणारे जोडकामही अर्धवट अवस्थेत आहे...
क्रॉसिंगला इतर भागांशी सांधणारे अर्धवट राहिलेले (फिनिशिंग न केलेले) जोडकाम
लाईफ अँड डेथ
जगातल्या इतर कोणत्याही चर्चमध्ये किंवा कोणत्याच देवस्थानात नसणारे वैशिष्ट्य येथे आहे. ते म्हणजे टॉम ऑटर्नेस नावाच्या कलाकाराची मानवी सापळ्यांचे आकार वापरून बनवलेली "लाईफ अँड डेथ" नावाची कलाकृती. क्रॉसिंगशी नेव्ह आणि कॉइर्सला असलेल्या जोडांच्या जागी असलेल्या खांबांच्या बरोबरीने असलेल्या चार स्तंभांच्या स्वरूपात ही कलाकृती येथे आहे. देवस्थानात मानवी सापळे हा अस्थायी विषय प्रदर्शित करणार्या या कलाकृतीला, अर्थातच, अनेकांनी आक्षेप घेतला. पण तरीही २०१५ पासून अजून तरी ती तेथे दिमाखाने टिकून आहेत!...
टॉम ऑटर्नेसच्या "लाईफ अँड डेथ" कलाकृतीचे काही भाग
कलाकृतींचा खजिना
क्रॉसिंगच्या मध्यभागात प्रवचन ऐकणार्या भाविकांसाठी खुर्च्या आहेत. खुर्च्यांच्या सभोवतीच्या मोकळ्या जागेवर आणि क्रॉसिंगच्या भिंतींवर, कॅथेड्रलच्या मालकीच्या अनेक प्राचीन वस्तूंचा व कॅथेड्रलला भेट मिळालेल्या अर्वाचीन कलावस्तूंचा, कायमस्वरूपी संग्रह प्रदर्शित केलेला आहे. प्रार्थनेची वेळ सोडून इतर वेळी इथे भेट देणार्यांना मोकळेपणाने फिरून या वस्तू जवळून पाहता येतात. काही कलाकार व कलेचे विद्यार्थी त्यांची रेखाचित्रे काढताना दिसले.
बार्बेरिनी टॅपेस्ट्रीज
या चर्चचे एक खास वैशिष्ट्य असे की त्याच्याकडे अनेक कलापूर्ण वेलबुट्टी काढलेली प्राचीन वस्त्रे व गालिचे (tapestry) आहेत. त्यांच्यावरच्या धार्मिक प्रसंगापासून ते राफाएलच्या व्यंगचित्रांपर्यंत वैविध्य आहे. या संग्रहात, १७ व्या शतकात रोममधील पोपच्या मालकीच्या मागांवर ख्रिस्ताच्या जीवनातले प्रसंग विणलेली बार्बेरिनी प्रकारची वस्त्रे आहेत. चर्चच्या या अनमोल खजिन्याची जपणूक करण्यासाठी, चर्चमध्ये जागतिक कीर्तीची वस्त्र-जतन प्रयोगशाळा (Textile Conservation Lab) आहे. ती जगभरच्या संस्थांना व खाजगी संग्राहकांनाही प्राचीन वस्त्रजतनाच्या कामात मदत करते.
बार्बेरिनी टॅपेस्ट्रीजपैकी काही
जुनी धार्मिक चित्रे
जुनी धार्मिक चित्रे
क्रॉसिंगमधील इतर काही कलाकृती
अंतर्भाग : कॉईर्स
क्रॉसिंग ओलांडून पुढे गेल्यावर लागणार्या पायर्या चढून गेल्यावर कॉईर्सचे भव्य दालन लागते.
कॉईर्स व द ग्रेट ऑर्गन
कॉईर्स दालनाचा दोन बाजूंना संघगायकांना बसण्यासाठी शिसूसारख्या गडद तपकिरी-काळ्या रंगाच्या लाकडाच्या कोरीव खुर्च्यांच्या रांगा आहेत. या खुर्च्यांची कलाकारी बघण्यासारखी आहे.
कॉईर्सच्या खुर्च्यांच्या मागे कॅथेड्रलचा द ग्रेट ऑर्गन आहे. जागतिक कीर्तीचा ऑर्गनबिल्डर अर्नेस्ट स्किनरने १९०६ मध्ये हा ऑर्गन त्याच्या कंपनीच्या सर्वात भव्य १५० ऑर्गन बनवण्याच्या (Opus 150) प्रकल्पांतर्गत बनवला. या कॅथेड्रलच्या मालकीच्या पाच ऑर्गन्सपैकी हा सर्वात मोठा आहे. सन १९५४ मध्ये त्याचा विस्तार करून त्याला अजून मोठा केले गेले. यातील १३० सेमी (५० इंच) आकाराचा 'ऑर्गन स्टॉप' जगातला सर्वात जास्त ताकदवान हवेचा दाब निर्माण करणारा आहे. २००१ सालच्या आगीत याचे बरेच नुकसान झाले होते, पण त्याचे आता पुनर्निर्माण केले गेले आहे. शिसपेन्सिलइतक्या लहान आकारापासून ३२ फूट उंचीच्या आकाराइतके भव्य, एकूण ८, ५०० पाइप्स असलेल्या या ऑर्गनची सद्याची किंमत $८० लाखापेक्षा जास्त आहे.
कॉईर्सचे दालन आणि त्या पलीकडे दिसणारे अल्टारचे दालन
कॉईर्समधिल गायकांना बसण्यासाठी असलेल्या कलापूर्ण खुर्च्या आणि त्यांच्या मागील 'द ग्रेट ऑर्गन'चा एक भाग
कॉईर्सच्या चौथर्यावरील शिल्पे
सन २००१ मध्ये पूर्ण झालेल्या कॉइर्सच्या चौथर्यावर ख्रिस्ती धर्माच्या जन्मापासूनच्या २००० वर्षांतल्या प्रत्येक शतकाचे प्रतिनिधित्व करणार्या जागतिक स्तराच्या नेत्यांची शिल्पे आहेत. तेथील मार्टीन ल्यूथर किंग, अल्बर्ट आईन्स्टाईन, सुसान अँन्थनी आणि महात्मा गांधी याचे २० व्या शतकाचे प्रतिनिधित्व करणारे समुहशिल्प आपले लक्ष वेधून घेते...
कॉईर्सच्या चौथर्यावरील काही शिल्पे : (अ) डावीकडील चित्रातली शिल्पे
(घड्याळाच्या क्रमाने) : विल्यम शेक्सपियर, जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन
व ख्रिस्तोफर कोलंबस; (आ) उजवीकडील समुहशिल्प (डावीकडून क्रमाने) :
मार्टीन ल्यूथर किंग, अल्बर्ट आईन्स्टाईन, सुसान अँन्थनी आणि महात्मा गांधी
अंतर्भाग : हाय अल्टार
कॅथेड्रलमधील अल्टार हे सर्वात उंचावरचे दालन आहे. तेथे पोचायला कॉईर्समधून दहाएक पायर्या चढून वर जावे लागते. अल्टारभोवती ८ स्तंभांची अर्धगोलाकार रचना आहे. त्या स्तंभांना जोडणार्या कठड्यांनी अल्टारचे दालन बनले आहे. प्रत्येक स्तंभाची उंची ५५ फू (१६. ७६ मी), व्यास ६ फूट आणि वजन १३० टन आहे. प्रत्येक स्तंभ एकाच शीळेतून कोरलेला आहे. आकारमान आणि वजनाच्या परिमाणांत पाहिले तर स्तंभामध्ये हा एक जागतिक विक्रम समजला जातो...
अल्टारच्या मागून एका बाजूने घेतलेल्या फोटोत दिसणारे विक्रमी स्तंभ
अल्टारवर असलेल्या वस्तूंत काही खास कलाकुसरीच्या वस्तू पाहण्यासारख्या आहेत :
मेनोरा (Menorah) : मेनोरा म्हणजे मेणबत्त्यांचा झाडाच्या फांद्यांसारख्या आकाराचा स्टँड. न्यू यॉर्क टाईम्सचा प्रकाशक अॅडॉल्फ ऑखने भेट दिलेले दोन १२ फूट उंचीचे दोन कलापूर्ण मेनोरा येथे आहेत.
क्लॉईसोन प्रकारच्या जपानी व्हासेस : सन १९२६ मध्ये तत्कालीन जपानी राजदूताने त्याच्या देशातर्फे दोन कलापूर्ण क्लॉईसोन व्हासेस कॅथेड्रलला भेट दिल्या. त्यांच्यावरच्या नक्षीमध्ये हिबिस्कस मुताबिलिस उर्फ कॉन्फेडेरेट रोज या फुलांची आणि जपानमधील काही पक्षांची चित्रे आहेत.
अल्टारचे दालन
अंतर्भाग : चॅपल्स ऑफ द टंग्ज (Chapels of the Tongues, भाषांची मंदिरे)
अल्टारच्या सभोवती अर्धगोलाकारात सात चॅपल्स आहेत. १९व्या शतकात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या सात लोकसंघांच्या नावे ही चॅपल्स उभारलेली आहेत, ते संघ असे आहेत (उत्तर ते दक्षिण) : स्कँडिनेव्हिया, जर्मनी, ब्रिटन, पूर्व युरोप, आशिया, फ्रान्स, इटली आणि स्पेन. विविध लोकसंघांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या या चॅपल्सच्या बांधकामांच्या शैलीत नॉर्मन पासून हाय रिनेसाँपर्यंतचे वैविध्य आहे. तेच वैविध्य त्यांच्यामधील धार्मिक वस्तू व इतर कलाकृतींत प्रतीत होते.
प्रत्येक चॅपलमध्ये बघण्यासारखे इतके आहे की तेथील सर्व बारकावे पाहण्यास प्रत्येकी पंधरा मिनिटेही कमी पडतात. प्रत्येक चॅपलचे वर्णन करणे विस्तारभयास्तव टाळत आहे. परंतू तेथे काढलेली काही प्रकाशचित्रे काही प्रमाणात त्यांच्या वैविध्यपूर्ण कलात्मकतेची झलक दाखवू शकतील...
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०१
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०२
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०३
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०४
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०५
चॅपल्समध्ये काढलेली काही प्रकाशचित्रे ०६
चर्चचे काही सभासद आपले मृतदेहाचे दफन न करता दहन करणे पसंत करतात. अश्या लोकांच्या अस्थी साठवून ठेवण्याची सोय एका दालनात केलेली आहे...
मृतदेहाच्या दहनानंतर अस्थी साठविण्यासाठी असलेली खोली
अंतर्भाग : गॅलरी
तब्बल ७० मीटर उंची असलेल्या कॅथेड्रलच्या इमारतीच्या अंतर्भागाच्या चारी बाजूंना नक्षीदार कठडे असलेली गॅलरी आहे. गॅलरीतून फिरण्यासाठी मार्गदर्शकासह असलेली एक खास "व्हर्टिकल टूर" दर शुक्रवारी सकाळी असते असे कळले. तेथून कॅथेड्रलचा अंतर्भाग (विशेषतः वरच्या बाजूला असणार्या रंगीत काचांच्या खिडक्या), कॅथेड्रलचे अॅटिक आणि बाह्यपरिसराचे विहंगम दृश्य निश्चितच मनोहारी असणार. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असलेल्या दिवशी कॅथेड्रलच्या अर्धवट बांधलेल्या मनोर्यावरून जवळ जवळ ११ किमी दूर असलेल्या 'वन वर्ल्ड सेंटर'चा मनोरा दिसतो. मी तेथे बुधवारी गेलो होतो, त्यामुळे मला "व्हर्टिकल टूर" मध्ये जाणे शक्य नव्हते. त्यामुळे, कॅथेड्रलच्या जमिनीवरून होणारे गॅलरीचे दर्शन घेऊन आनंद मानावा लागला...
कॅथेड्रलच्या जमिनीवरून दिसणारी गॅलरी (डावीकडील व मधले चित्र) व तिच्या खालचा पॅसेज (उजवीकडचे चित्र)
कॅथेड्रलचे आवार : पीस गार्डन
चर्चच्या दक्षिणेला असलेल्या आवारात "पीस गार्डन" नावाची बाग आहे. या बागेत बायबलमध्ये उल्लेख केलेल्या सर्व वनस्पती लावलेल्या आहेत, म्हणून तिला "बिब्लिकल गार्डन" असेही म्हणतात. ग्रेग वॉट याने १९८५ मध्ये न्यू यॉर्क धार्मिक प्रभागाच्या (Diocese of New York) स्थापनेच्या द्विशतकी वर्धापनदिनानिमित्त बनवलेले "पीस फाउंटन" येथील एक मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. या कारंज्याच्या शिल्पामध्ये, सैतानाचा पराभव केल्यानंतर आर्चएंजल मायकेल शिल्पातील नऊपैकी एका जिराफाला कवटाळताना दिसतो. सैतानाचे उडवलेले मुंडके मायकेलच्या पायाशी पडलेले आहे. याशिवाय एक सिंह आणि मेंढीचे कोकरू आहे. कारंज्याचा आवर्तणारा पायथा (spiraling base) डिएनएच्या डबल हेलिक्सचे प्रतिनिधित्व करतो...
पीस फाउंटन
पीस फाउंटन आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसणारे कॅथेड्रलचे दक्षिणेकडील बाह्यस्वरूप
चर्चच्या परिसरातल्या बारावी पर्यंतच्या (K-12) विद्यार्थ्यांनी बनवलेल्या काशाच्या शिल्पकृती कारंज्याच्या भोवती मांडलेल्या आहेत. त्यांना 'Children’s Sculpture Garden' असे म्हणतात...
चिल्ड्रेन्स स्कल्प्चर गार्डनमधील दोन शिल्पे
सकाळची अर्ध्या दिवसाची म्हणून सुरू केलेली ही सहल संपली आणि मगच घड्याळाकडे लक्ष गेले. साडेचार वाजून गेले होते. सहल चालू होती तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेली आहे हे पण ध्यानात आले नव्हते. मात्र, परतीचा प्रवास सुरू झाला आणि थकलेले पाय व भुकेले पोट यांनी जोरदार निदर्शने सुरू केली. सबवेकडे जाताना कोलंबिया विद्यापीठासमोरचे एक चांगलेसे रेस्तराँ पाहून त्याला राजाश्रय दिला आणि भरल्या मनाने आणि पोटाने घराकडे मार्गक्रमण सुरू केले.
(क्रमशः )
मात्र, तेथे थांबून निगुतिने बघता आले तर ही जागा अनेक प्रकारे पर्यटन खजिना आहे यात वाद नाही !
विमानाला आपल्या मायदेशाला ओलांडून जाताना तेथे एकतरी थांबा घेणे कायद्याने जरूर असते.